प्रत्येक वेळी शनिवार-रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीचा विचार करताना शहराबाहेर जाण्याऐवजी शहराचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जागांनाही प्राधान्यक्रमाने भेटी द्यायला हव्यात. आज आपण अशाच एका जागेला भेट देणार आहोत. ती जागा आहे डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय.
फिरायला जायचं असेल तर प्रत्येक वेळी समुद्रकिनारे, गड-किल्ले किंवा ऐतिहासिक स्थळांनाच भेट द्यायला हवी असं नाही. शहरातही अशा अनेक जागा असतात, त्यांना त्या शहरांमधील नागरिकसुद्धा क्वचितच भेट देतात. वस्तुसंग्रहालये ही या यादीतील सर्वांत दुर्लक्षित ठिकाणं. म्हणूनच तिथे जाऊन काय पाहायचं आणि सुट्टीचा दिवस तिथे का घालवावा, असे प्रश्न अनेकांना पडतात. पण आपले शहर, इतिहास, शोध, कला आणि संस्कृतीची माहिती करून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही वस्तुसंग्रहालये, कलादालनं, प्रदर्शनांना भेटी द्यायला हव्यात.
मुंबईतील राणीची बाग प्रसिद्ध आहे; मात्र राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी १८५७ पासून दिमाखात उभ्या असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाकडे पर्यटकांची पावले क्वचितच वळतात. मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरील भायखळा स्थानकाच्या पूर्वेला अगदी हाकेच्या अंतरावर हे वस्तुसंग्रहालय आहे. कलाप्रेमी आणि अभ्यासकांना ही जागा नवीन नाही; मात्र शहरातील नागरिकांनीही आवर्जून पाहावं आणि पुन्हा पुन्हा भेट देण्यासारखं हे ठिकाण आहे. इटालियन रेनेसान्स शैलीचं बांधकाम असलेलं हे वस्तुसंग्रहालय पूर्वी ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम’ नावाने ओळखलं जायचं, पण १९७५ मध्ये संग्रहालयाच्या संस्थापकांपैकी एक असलेले डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव या संग्रहालयास देण्यात आलं.
‘बॉम्बे’ ते ‘मुंबई’ शहर असा प्रवास पाहणारं हे शहरातील सर्वांत जुनं आणि कोलकाता, चेन्नईनंतर देशातलं तिसरं वस्तुसंग्रहालय आहे. वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीत प्रवेश करण्याआधी आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी म्हणजे घारापुरी लेण्यांमधला प्रचंड दगडी हत्ती आणि तोफ. मजबूत दगडी बांधकाम असलेल्या भव्य इमारतीच्या पायऱ्या चढून आत प्रवेश करताच एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं वाटतं. सोन्याचा वर्ख असलेल्या एका समान रेषेत दोन बाजूंना असलेल्या १२ खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेलं रंगीत छत नजरेत भरतं.
तळमजल्यावर समोरच असलेला अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससूनचे पुतळे लक्ष वेधून घेतात. आकर्षक मांडणी केलेल्या तळमजल्यावरील कलादालनात प्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेल्या नक्षीयुक्त वस्तू, लाकूड, शंख-शिंपल्यावरील कलाकुसर, आकर्षक माती-धातूची भांडी आणि अनेक धातूंच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. तळमजल्यावर उजव्या हाताला असलेल्या एका छोट्या सभागृहात १९ व्या शतकातल्या चित्राकृती आहेत. वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचं दृक्श्राव्य सादरीकरण येथे पाहता येतं.
वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी दगडी पायऱ्यांचा प्रशस्त जिना आहे. जिन्याच्या मध्यावरील दालनात जमशेठजी जीजीभॉय, जगन्नाथ नाना शंकरशेठ, भाऊ दाजी लाड या भारतीयांबरोबर काही ब्रिटिश अंमलदारांचीही तैलचित्रे लावण्यात आलेली आहेत. मधोमध मोकळी जागा असलेल्या या कलादालनाला लोखंडी कठडे आहेत. मुंबईकरांना सर्वाधिक जिव्हाळ्याचं वाटेल अशा ‘मुंबईतलं लोकजीवन’ नावाच्या दालनात मुंबईचे वेगळेपण अधोरेखित करणाऱ्या अनेक जात, धर्म, पंथांच्या लोकांच्या पारंपरिक पोशाखातील मातीच्या छोट्या बाहुल्या येथे ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई औद्योगिक बंदर म्हणून विकसित होतानाची जहाज व्यवसायाची स्थित्यंतरं, पारसी समाजाची स्मशानभूमी, ग्रामीण जीवन, जुन्या काळातील भारतीय घरगुती खेळ, चिलखतधारी योद्धा, अनेक वाद्यं, नृत्यशैली आणि मातीच्या नकाशांमधून मुंबईचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कमलनयन बजाज कलादालनात मुंबईतल्या कापड गिरण्या व त्याचा परिसर, कपड्यांवरील कलाकुसर, जुनं लोअर परळ रेल्वेस्थानक आणि दुर्मिळ असा बिडाचा जिना पाहायला मिळतो.
पेशव्यांच्या प्रतिनिधींनी तयार केलेला मुंबई परिसराचा नकाशा (१७७०), जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधला सिरॅमिकच्या मातीच्या भांड्यांचा नमुना, एकोणिसाव्या शतकात लंडनहून पश्चिम आशिया आणि भारतमार्गे ऑस्ट्रेलिया असा प्रवास करणाऱ्या जहाजाचा नमुना, समुद्राच्या तळातून गाळ काढणाऱ्या ड्रेजर ‘कूफूस’ (१९१४) या यंत्राचा नमुना, युरोपात ‘बाँबे बॉक्स’ म्हणून प्रसिद्ध असलेली हस्तिदंती पेटी अशा कधीही न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या अनेक कलात्मक गोष्टी येथे प्रत्यक्ष पाहता येतात. याशिवाय वस्तुसंग्रहालयात वेळोवेळी विविध प्रकारची प्रदर्शने भरवली जातात, ज्यामध्ये ऐतिहासिक आणि समकालीन कला, संस्कृतींना प्राधान्य दिले जाते.
भराभर फेरफटका मारून येऊ म्हणून वस्तुसंग्रहालयात शिरणारी व्यक्ती इथे काही तास सहज रमून जाते आणि नंतर संग्रहालयाचे विक्री केंद्र व त्यासमोरील मोकळ्या जागेत भल्या मोठ्या वृक्षांच्या सावलीत चहा, कॉफीचा आस्वाद घेत शहराची संस्कृती आणि कलेवर चर्चा करण्यात हरवून जाते. इथून बाहेर पडताना मुंबई शहराची एक वेगळी ओळख झालेली असते. गतस्मृतींना उजाळा देणारी ओढ लागून राहते. इथे कितीही वेळ व्यतीत केला, तरी तो पुरेसा वाटत नाही. म्हणून एकदा भेट दिलेली कलासक्त व्यक्ती आपसूकच या वास्तूशी आपलं नातं कायमचं जोडून घेते.
प्रशांत ननावरे