Monday, September 29, 2025

एक आनंदप्रिय, शांत देश

 http://diwali.upakram.org/node/145
भाग १

चांगली आठवडाभर सुट्टी काढून फिरायला जाणार कुठे तर भूतानला! हे सांगितल्यावर मिळणार्‍या प्रतिक्रिया फारच मजेशीर होत्या. एकतर आधी भूतान हा वेगळा देश आहे हेच अनेकांच्या गावी नव्हतं. त्यात ते कुठे आहे, तिथे बघायला काय आहे वगैरेची माहिती असणं तसं दुर्मिळ होतं. काहींनी भूतान ऐकलं होतं मात्र ते शहर आहे, राज्य आहे की देश याबद्दल ते साशंक होते. काहींच्या ज्ञानाची व्याप्ती भूतान कुठे आहे, काय आहे वगैरे पर्यंत होती पण त्याच बरोबर तिथे 'काळी विद्या' बाळगणारे लोक आहेत अशासारखे गैरसमज बाळगून होते. थोडक्यात काय तर या सगळ्या नसलेल्या किंवा चुकीच्या मिळणार्‍या माहितीमधून आपल्याला हवी ती माहिती काढून भूतानच्या सहलीची आखणी करणं हे सुरवातीला दिव्य वाटलं होतं.

पुढचे वर्णन लिहिण्याआधी भूतानची थोडक्यात ओळख करून देतो. भूतान हे भारताच्या उत्तरपूर्व सीमेवरचे स्वतंत्र राष्ट्र. कोणताही समुद्रकिनारा नसणाऱ्या या देशाचे केवळ दोन शेजारी आहेत. पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेला भारत आणि उत्तरेला चीन. चीन आणि भूतानच्या मध्ये हिमालयाची अत्यंत उंच आणि दुर्गम पर्वत-शिखरे- आहेत. त्यामुळे भूतानचा स्वाभाविक शेजारी भारत आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील भारताशी कमीतकमी वाद असलेला हा भारताचा चांगला (व एकमेव? ) मित्रदेश म्हणता याव

तर, नेहमी प्रमाणे जालम् सर्वार्थ साधनम् या न्यायाने जालावर भूतानची माहिती शोधू लागलो आणि गोंधळात अधिकच भर पडली. बऱ्याचशा संकेतस्थळांवर भूतानमध्ये जाणे सुरक्षित आहे, सुंदर आहे असे दिले असले तरी तिथे किंमती अतिशय अधिक आहेत हे ही प्रत्येक जण नमूद करत होता. शिवाय तिथे जायचा परवाना कोठून मिळवायचा याबद्दल भूतानच्या ऑफिशियल स्थळावरही थोडी गोंधळात टाकणारी माहिती होती. पुढे थेट भूतान एम्बसीला इमेल लिहून अनेक गोष्टींचे निरसन करून घेतले. माहिती हाती लागली ती अशी:

  • भूतानमध्ये काही सार्क राष्ट्रे सोडून इतर राष्ट्रातील नागरिकांना स्वतंत्र विजा काढणे बंधनकारक आहे.
  • भारतीय नागरिकांना पारपत्राची (पासपोर्ट) गरज नसून केवळ मतदान ओळखपत्रावरही हा परवाना मिळू शकतो
  • भूतान मुक्त पर्यटनाला व बॅगपॅकर्सना पाठिंबा/मान्यता देत नाही. तिथे कार्यक्रम पूर्वनियोजित असणे गरजेचे (बंधनकारक) आहे. त्याचबरोबर त्या कार्यक्रमानुसार प्रत्येक जिल्हा व काही महत्त्वाच्या खिंडींसाठी स्वतंत्र परवाना मिळवणे गरजेचे आहे जो सगळ्या जिल्ह्यांच्या डीझाँग मध्ये(जुने महाल व आताची सरकारी हाफिसे) मिळू शकतो
  • भूतानमध्ये धर्म आणि शांतता यांना अजोड महत्त्व आहे. काही वास्तूंमध्ये पुरुषांना संपूर्ण शरीर(पूर्ण हात-पाय देखील)झाकलेली वस्त्रे व स्त्रियांना अश्या वस्त्रांबरोबर केस झाकणारे वस्त्रही असणे बंधनकारक आहे
  • भूतानमध्ये भारतीय नागरिकांना वाटाड्या घेणे बंधनकारक नाही (मात्र सोयीचे आणि प्रसंगी गरजेचे आहे). भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींबरोबर भूतानमधील स्थानिक वाटाड्या असणे बंधनकारक आहे
  • भूतानमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश व निर्गमनाच्या वाटेवर बंधन नाही. मात्र भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींनी किमान प्रवेश अथवा निर्गमन विमानमार्गाने करणे बंधनकारक आहे.
  • भूतानमध्ये भारतीय नागरिकांना अन्य कोणताही कर नाही. मात्र भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तींसाठी दररोज (प्रत्येक निवासी-रात्रीसाठी) $२०० भरणे बंधनकारक आहे.

याशिवाय जालावर अशी अनेक प्रकारची माहिती मिळत होती ती वाचून तिथे जाण्याची इच्छा आणि त्या देशाबद्दलची उत्सुकता अधिकच चाळवली. देशाची दुर्गमता आणि अनेक परवान्यांची गरज बघून शेवटी ठाण्यातील एका एजंटद्वारे भूतानमध्ये चक्क मराठी बोलणारा स्थानिक गाईड कम ड्रायव्हर पटकावला. त्याने योग्य ते परवाने मिळवून ठेवले, हॉटेले रिझर्व करून ठेवली (भूतानमधील हॉटेले जालावरून / फोनवरून बुकिंग स्वीकारत नाहीत. स्थानिक एजंटतर्फेच जाणे बंधनकारक आहे). काही दिवसांत सगळीकडून आलबेल मिळाला आणि आम्ही भूतानकडे प्रयाण करण्यास सज्ज झालो.

मुंबईहून उडत कोलकाता व तेथून उडत बागडोगरा येथे गेलो. बागडोगरा हे पश्चिम बंगालमधील उत्तरेकडचे एकमेव विमानतळ. इथून सिक्कीम, दार्जिलिंग वगैरे ठिकाणी जाण्यासाठी पर्यटक येतात. आमचे लक्ष्य मात्र वेगळे होते. आम्हाला घ्यायला आलेल्या 'सलीम'ला ठरल्यावेळेवर, ठरल्याठिकाणी भेटल्यावर सहलीची सुरुवात तर चांगली झाली असे प्रत्येकाने बोलून घेतले. सलीम मूळचा पुण्याचा. अजूनही पावसाळ्यात - ऑफ सीझनला- तो पुण्यातील आपल्या कुटुंबीयांकडे येतो. मराठी संगीताची आवड असल्याने त्याने गाडी सुरू होताच "माझ्याकडे चाळीसेक जीबी गाणी आहेत तुम्हाला काय ऐकायचंय ते सांगा" म्हटल्यावर आम्ही (हिमालयात शिरण्याआधीच) गार पडलो. या रसिकाकडे काय नव्हतं? नाट्यसंगीत, सुगमसंगीत, भावगीते, भक्तिगीते, कोळीगीते, बालगीते, शास्त्रीय संगीत, नवीन कलाकारांचे संगीत.. तुम्ही फक्त नाव घ्या अशी परिस्थिती होती.

दुतर्फा डोळ्याचे पारणे फेडणारी हिरवीकंच बंगाली गावे, स्वच्छ हवा, मोकळा श्वास, सहलीच्या सुरवातीला असलेला उत्साह आणि सोबत नाट्यसंगीत यांच्या प्रसन्न मिलाफाने चारेक तासांचा प्रवास कधी संपला कळलेही नाही. 'जयगाव' हे भारतातील शेवटचं गाव आलं. समोर "भूतानच्या 'रॉयल किंगडम' मध्ये स्वागत आहे" असे विशद करणारी, अत्यंत सुंदर चित्रांनी रेखलेली कमान आली. कमानीखाली भूतानचे पोलिस उभे होते. भारतीय नागरिकांसाठी सीमा खुली असल्याने कोणत्याही दस्तऐवज न दाखवता (दुसऱ्या दिवशी ऑफिसे उघडल्यावर दाखवावी लागतात) आम्ही त्या कमानी खालून भूतानमध्ये प्रवेश केला:

फुट्शोलिंग / फुत्शोलिंगः


भूतानचा राजा

गाडीची चाके १८० अंशात फिरली असतील आणि भोवतालचा परिसर ३६० अंशात फिरला. रस्ता मोकळा झाला, इमारती सुबक झाल्या, रस्ते अचानक खड्डेमुक्त झाले, नदीचं पाणी वाहतं झालं आणि सर्वत्र स्वच्छता जाणवू लागली. स्वच्छता ही जागतिक सवय असून केवळ भारत त्याला अपवाद आहे की काय असे आता वाटू लागले आहे. केवळ एका कमानीमधून जाताच स्वच्छतेमध्ये कमालीचा फरक होता. अंधार पडू लागला होता. थेट हॉटेलवर गेलो. अत्यंत स्वच्छ हॉटेल, टुमदार इमारत, प्रसन्न रंग. खोल्या ताब्यात घेतल्या. जरा फ्रेश होईतो आमचा गाईड-कम-ड्रायव्हर-कम-व्यवस्थापक सलीम अवतरला.
"जेवायला काय हवंय? " समोर मेन्यूकार्ड नाचवत त्याने विचारलं.
कार्डावर तरी अनेक पंजाबी पदार्थांची यादी होती. त्यामुळे बर्‍याचजणांचा जीव भांड्यात पडला. भूतानमध्ये खायला फारसं मिळत नाही हा एक (गैर?)समज सगळे (माझ्यासकट) बाळगून होते. त्यामुळे मी सगळ्यांना भरपूर पदार्थ बरोबर घ्यायला लावले होते. प्रत्येकाने ती पदार्थांची यादी बघून आधी माझ्याकडे आणि मग त्या पदार्थांकडे मोर्चा वळवला. प्रत्यक्ष जेवण आल्यावर मात्र इथे सारे पदार्थ मोहरीच्या तेलात केलेले होते. त्याला एक वेगळा असा वास होता. काहींना तो आवडला तर काहींना तो जमेना.
जेवणं चालू असताना एकीकडे सलीम माहिती देत होता.

"हे जे फुटशोलिंग आहे ते भूतानच्या दोन प्रवेशद्वारांपैकी एक. भूतानचे कदाचित एकमेव 'आधुनिक' किंवा 'भारतासारखे' शहर. भारताला लागून असल्याने इथे तशी अस्वच्छता, गर्दी, दुकाने वगैरे दिसतील. " (यापैकी काहीही न जाणवल्याने किंबहुना हा भाग अगदीच स्वच्छ, मोकळा वाटल्याने आम्ही जरा चकित झालो. तसंही त्या जयगाव मधून आल्यावर बहुदा धारावीही टापटीप वाटली असती.)
"तुम्हाला आता कदाचित पटणार नाही, मात्र परतताना आपण याच शहरातून जाणार आहोत. तेव्हा तुम्ही मला सांगा की फुटशोलिंग तुम्हाला कसं वाटतंय ते. तर हे प्रवेशद्वार. इथे बघायला विशेष काही नाही. प्रवेशाचे शहर असल्याने बऱ्याच सरकारी इमारती, हाफिसे वगैरे आहेत. आपले प्रवेश-परवाने तयार गोळा करून उद्या निघू.. उद्या ५-६ तासांचा प्रवास आहे आपण थिंफूला पोहचू. "
"इथे वेगळं चलन आहे ना? "
"हो. गुल्ट्रम म्हणतात. १ गुल्ट्रम = १ रुपया असं आपलं चलन यांनीच भारताशी बांधून घेतलं आहे. तुम्हाला आधी सांगितलं तसं भारताचं चलनही इथे सगळीकडे सर्रास चालतं. फक्त १००० आणि ५०० च्या नोटा चालत नाहीत. "
"इथे आता लोकशाही आहे ना? "
"होय. २००३ मध्ये पहिल्या निवडणुका झाल्या. मात्र जेव्हा राजाने लोकशाहीची घोषणा केली होती तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्त आंदोलन केलं होतं. त्यांचं राजावर आणि राजघराण्यावर प्रचंड प्रेम! "
"होय खाली रिसेप्शनमध्ये सुद्धा त्याचा फोटो दिसला."


Gross National Happiness

आता तुम्हाला सगळीकडे तोच दिसणार आहे. लोकांना तो इतका आवडतो त्याचं कारण त्यानेही अनेक गोष्टी केल्या आहेत. तो भूतानच्या संस्कृतीला सर्वात अधिक प्राधान्य देतो. जीडीपी हे प्रगती मोजण्याचं साधन न समजता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस (जीएनएच) हे एकक तो मोजतो. श्रीमंत असण्यापेक्षा आनंदी असणं हे अधिक महत्त्वाचं ही तिबेटी शिकवण त्याने नव्या जगाला समजेल अश्या प्रकाराने मांडली आहे. हा फोटो बघा, थिंफुच्या 'ट्रॅडिशनल आर्ट स्कूल' मध्ये लिहिलेलं वाक्य हेच सांगतं. या आधीच्या राजाने भूतानचा चेहरा बदलायला सुरुवात केली आणि हा पाचवा राजा नव्या जगाशी समरसूनही स्वतःचे वेगळेपण जपत जपत बदल घडवतो आहे. "
"मग भूतानला घटनाही असेल?"

"हो तर! आहेच. घटनेनुसार राजा हा देशाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे. मात्र तिबेटी परंपरा त्याहीपेक्षा उच्च समजली आहे. परंपरेला, शांततेला, पर्यावरणाला धक्का बसेल असे निर्णय घेणे राजालाही कठीण आहे. "

 

 : भूतान - २

ऋषिकेश

भाग २


थिंफू शहर

पुढील प्रवासात राजाने जे नियम केले आहेत ते बघता त्याच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले. भूतानबाहेर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीस भूतानचे नागरिकत्व मिळू शकत नाही. अशी कोणतीही व्यक्ती भूतानमध्ये स्थावर मालमत्ता विकत घेऊ शकत नाही. नागरिकत्व हवे असेल एक तर भूतानमध्ये जन्म घ्या नाहीतर भूतानी व्यक्तीशी लग्न करा आणि भूतानमध्येच स्थायिक व्हा. भूतानमधील कायदे असे आहेत की जनता पैशाच्या मागे न लागता साध्या राहणीकडे तोचा ओढा असावा. प्रत्येक गावात 'शॉपिंग' सेंटर्स सोडा साधी चांगली दुकाने मिळणे मुष्किल आहे. जी आहेत ती प्रचंड महाग आहेत! भूतानमधून आठवण म्हणून काही घेऊन यायचे असेल तर खिसा चांगलाच गरम पाहिजे. थोडक्यात काय तर, एका ठराविक आर्थिक स्तरापेक्षा वरच्या लोकांनाच (जे तुलनेने गदारोळ घालणार नाहीत, अशांतता माजवणार नाहीत - असे त्यांचे मत) भूतान खुला आहे. (अपवाद: भारतीय नागरिक)

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कचेर्‍या उघडल्यावर परवाने हाती पडले आणि थिंफूला जायला निघालो. फुटशोलिंग मागे (खरंतर खाली) पडत चालले आणि गाडी पुढे म्हणजे वर वर जाऊ लागली. फुटशोलिंगला असताना जी सपाट जमीन बघितली ती पुढल्या ८ दिवसांतील शेवटची सपाटी होती. यापुढील दिवस आम्ही केवळ आणि केवळ घाटात होतो. आणि तेही साधेसुधे घाट नव्हेत तर हिमालयीन घाट. इथे २०० मीटरचा रस्ताही सरळ नव्हता, एका बाजूला नजर ठरेपर्यंत उंच पहाड आणि दुसर्‍या बाजूला जमीन दिसण्याचा भास होतोय न होतोय इतक्या खोल दर्या. येथील दोन शहरांना जोडणारे बरेचसे रस्ते भारतीय सैन्याने तयार केले आहेत. या रस्त्यांना 'दन्ताक' रस्ते म्हणतात. (भूतानच्या राजाचे स्वत:चे सैनिक असले तरी भारतीय सैन्यच त्यांच्या सीमांचे रक्षण करते). इतक्या दुर्गम आणि दुर्लभ वातावरणात, उंचीवर - प्रदेशात इतके उत्तम रस्ते बांधणाऱ्या भारतीय सैन्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.

थिंफू --> पुनाखा --> पारो असा प्रवास करून आम्ही पुन्हा फुटशोलिंग असा प्रवास केला होता. विस्तार भयास्तव या स्थळांविषयी थोडक्यात लिहितो:

थिंफू:


दोचू ला खिंड

अतिशय मोहक इमारती, स्वच्छ नदीचे पात्र, एका डोंगरावर दिसणारा बुद्धाचा भलामोठा पुतळा या गोष्टी शहरात शिरताच नजरेत भरल्या. थिंफू येथे 'राजाचा महाल' (दूरून), सिटी व्ह्यू पॉंईंट, टकीन झु, एक नेपाळी पद्धतीचा पॅगोडा आणि भल्यामोठ्या आकारातील बुद्धमूर्ती (अद्याप बांधकाम चालू आहे) वगैरे गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तिबेटी पारंपरिक घरांची रचना दाखवणारे एक छोटे घर त्यांनी टिकवले आहे व ते घर हेच प्रदर्शन आहे. तिमजली घरात, एका मजल्यावर केवळ गोठा, बाळंतिणीची खोली आणि अवजारे ठेवायची खोली, पहिल्या मजल्यावर राहायची - झोपायची-जेवायची जागा आणि धान्याची कोठारे, कणग्या आणि वरच्या मजल्यावर बैठकीची खोली व बहुतांश लोकांना प्रवेश निषिद्ध असलेली देवालयाची खोली अशी ढोबळ रचना सांगता यावी.

दोचू ला, पुनाखा:

तिबेटी भाषेत 'ला' म्हणजे 'खिंड'. पुनाखा या सुंदर व पुरातन तिबेटी मठ व प्रशासकीय केंद्राला भेट देताना मध्ये दोचू ला लागते. इथे अनेक स्तूपाच्या रूपातली अनेक स्मरण स्थळे -स्मारके दिसतात. एक भारतीय म्हणून हे स्थळ महत्त्वाचे आहे कारण २००४ मध्ये या स्थळाचा विकास झाला. भारतातील काही आतंकवादी भूतानमध्ये लपले होते. त्यांना भूतानचे नेस्तनाबूत केल्याचे प्रतीक म्हणून हे स्तूप उभारले आहेत. या स्तूपांची रचना व स्थळ दोन्ही सुंदर आहे. इथून हिमालयाची हिमाच्छादित शिखरांची रांग दिसते.


पुनाखा

पुनाखा

हे अत्यंत सुंदर असे प्रार्थनास्थान, मठ व प्रशासकीय केंद्र आहे. दोन नद्यांच्या संगमावरची मुख्य इमारत स्थापत्य, कला, सौंदर्य,आदी अनेक बाबतीत उजवी आहे. भोवतालचा घाऊक जॅकरॅंडा व त्याचा सुंदर जांभळा रंग त्या इमारतीला वेगळेच देखणेपण देतो. अजिबात चुकवू नये असे स्थान.

पारो:


पारो विमानतळ

ही भूतानची पुरातन राजधानी. इथे भूतानमधील 'एकमेव' विमानतळ आहे. पारो हे शहर बघण्यासारखे आहे. इथे त्यातल्या त्यात शॉपिंग करता येईल अशी काही दुकाने आहेत (फार अपेक्षा ठेवू नका, किंमती प्रचंड आहेत.) पारो शहरातील किल्ला, विमानतळ, म्युझियम वगैरे गोष्टी या प्रेक्षणीय आहेत. त्यातही टेकऑफ व लँडींग करणारे विमान ही खास बघण्यासारखी घटना आहे. अनेक डोंगरामध्ये कशाबशा बांधलेल्या या विमानतळावर विमान वळणे घेत घेत लँड होते तेव्हा चाके टेकल्यावर वैमानिकच काय पण प्रेक्षकही हुश्श! करतात.

पारोजवळ टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री नावाच्या बौद्ध-तिबेटी प्रार्थना मंदिराचा एक दिवसाचा ट्रेक प्रचंड सुंदर आहे. उप-हिमालयातील वेगळ्या प्रकारचा डोंगर, हिरवीगर्द झाडे, खळाळते झरे, मोकळी हवा, क्षितिजावर आकाशाला भिडणारी हिमाच्छादित शिखरे व एका कड्याच्या टोकावर तयार केलेली मॉनेस्ट्री सगळा थकवा पळवण्यास उपयुक्त आहे. ट्रेक सोपा आहे फक्त जरा लांब आहे. (आमच्या सोबतच्या ६०-६१ वर्षाच्या आसपासच्या ३ व्यक्तींनी ट्रेक पूर्ण केला.)

कला:

भूतानची वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला ही देखील एक अभ्यासण्याजोगी गोष्ट आहे. अनेक परदेशी पर्यटक ही चित्रकला शिकण्यासाठी तिथे येतात. याशिवाय लोकरीची, रेशमाची वस्त्रे बनविण्याची कला तर घरोघरी दिसली. अनेक घरांपुढल्या ओसरीवर स्त्रिया हातमागावर अतिशय सुंदर मफलर, शाली विणताना दिसल्या. अधिक चौकशीअंती कळले की या स्त्रिया हिवाळ्यात पुढील वर्षाचे कपडेही घरी बसल्या-बसल्या विणून टाकतात.

फुले-फळे-पक्षी


टायगर्स नेस्ट मॉनेस्ट्री

घरगुती विणकाम

हिमालयातील फुलांच्या वैशिष्ट्याला जागून या प्रदूषणमुक्त देशांत फुलांचे रंग व त्यांचे आकार या चकित करणाऱ्या गोष्टी आहेत. दोन्ही हातात न मावणारे व अनेक रंगात फुललेले गुलाब तर खास तिथेच जाऊन बघावेत. साध्या रानफुलांचे इतके रंग व रंगछटा क्वचितच कुठे दिसत असतील. सफरचंद, अक्रोड वगैरे फळे विकायला दिसली. बाकी असल्यास कल्पना नाही. पक्ष्यांमध्ये धनेश, अत्यंत रुबाबदार हिमालयीन घार, भारद्वाज, सुतार पक्षी अनेकदा दिसले. टायगर्स नेस्ट च्या ट्रेकला तर अनेक अनोळखी सुंदर पक्षी दिसले. आपल्याकडे साळुंक्या फिराव्यात तश्या संख्येने नदीकाठच्या वाळवंटात घरटे करणारे (बरेचसे दयाळासारखे दिसणारे) धोबी-धोबीण पारोला चिक्कार दिसले. थिंफूला अगदी हाकेच्या अंतरावर सुतार पक्षी व त्याचे घर(टे) दिसले.

खेळः

तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ. त्याची बरीचशी मोठाली स्टेडियम्स मात्र भूतानच्या पूर्व, उत्तर भागात आहेत. आम्हाला फक्त एकदा थिंफूला तिरंदाजीचे ओझरते दर्शन झाले. मात्र 'खुरू' हा नेमबाजीचा खेळ अनेक मैदानात खेळला जाताना दिसला. आमच्या हॉटेलजवळच्या मैदानातील मुलांनी तर आम्हालाही खेळायची संधी दिली. या खेळात मैदानाच्या दोन बाजूला दोन फळ्या / खोडे लावलेली असतात. आपल्याकडे डार्टचे लोखंडी (बरयापैकी वजनदार) खिळे - बाण असतात. ते जोरात फेकायचे. जर दुसरया बाजूच्या फळीला तो खिळा लागला तर बाकीच्यांनी खिळा लागणारयाला काही पैसे द्यायचे. सगळे व सगळ्यांचे खिळे फेकून झाले की दुसरया टोकाहून हाच खेळ परत. (दुर्दैवाने (अपेक्षेप्रमाणे) आमच्यापैकी कोणाचेही खिळे लक्ष्यवेध करू शकले नाहीत मात्र सुदैवाने (की मुद्दाम कोण जाणे) तेथील स्थानिकांचेही खिळे लक्ष्य भेदू शकले नाहीत. नो लॉस नो गेन)

समाजः

इथला समाज तसा लाजाळू मात्र सज्जन वाटला. सगळी प्रजा सुशिक्षित आहे. बरेच जण इंग्रजी उत्तम बोलतात. वाटेत त्यांची युनिव्हर्सिटी लागली होती. विद्यार्थी शिस्तीत व भडक वर्तन करणारे वाटले नाहीत. एक गंमत अशी की बर्‍याचशा कामांवर फक्त स्त्रियाच दिसतात. अगदी रस्त्याच्या कडेला चाललेल्या बांधकामावर कामे करणारयांची मुकादम स्त्री बघून एकदम नवे दृश्य बघितल्यासारखे वाटते. हॉटेलांमध्ये तर सगळे स्त्री राज्य. आमच्या जड ब्यागा कार वरून उतरवण्यापासून ते जेवायला वाढण्यापर्यंत कामे त्याच करत. एका बंगाली ग्रुपने भूतानी स्थानिक गाण्यावर त्यांना स्थानिक नृत्य करायला सांगितल्यावर त्यांनी आढेवेढे न घेता पाहुण्यांची ही इच्छाही पूर्ण केली.
थोडक्यात सांगायचं तर नवी संस्कृती, नव्या पद्धती, नवे विचार, नवे आचार (आणि नवीनतम गाड्या) बघायला आवडत असेल, आणि 'पर्यटनस्थळे' बघणे, खरेदी करणे, उत्तमोत्तम स्थानिक जेवणाचा आनंद घेणे, जमिनीवरचा प्रवास टाळणे (इथे गाडी लागणे अगदी स्वाभाविक आहे) हे सारे नसल्यास चालणार असेल तर भूतान हा पर्यटनासाठी वेगळा पर्याय ठरावा.

समाप्त.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Saturday, September 13, 2025

माझी अमेरिका डायरी - Pike Place Market, Seattle!

 

माझी अमेरिका डायरी - Pike Place Market, Seattle!

Submitted by छन्दिफन्दि on 21 August, 2023 - 11:47

सिएटल आणि “Pike Place Market” हे नाव जोडीनं मी बऱ्याच वेळेला ऐकलं होत.
आमचं हॉटेल डाऊनटाऊन मध्ये, मार्केट पासून अक्षरश: सातेक मिनिटे चालत होत. त्यामुळे चेक इन केलं, बॅगा टाकल्या, आणि आम्ही बाहेर पडलो.
सिएटल सिटी म्हणजे सॅन फ्रान्सिस्को चा बाप आहे असच वाटलं. अरुंद आणि भयंकर चढ/उतार असलेले रस्ते. चौथ्या ऍव्हेन्यू वरून नजर टाकली की खाली उतरत जाणारा रस्ता, बऱ्यापैकी अरुंद, दुतर्फा उंचच्या उंच बिल्डींग्स, त्या उतरत्या रस्त्यांच्या टोकाला सुरू होणार समुद्र.
नियमित दिसणाऱ्या बसेस, बस स्टॉप वरची माणसं , रस्त्याने चाललेले माणसांचे घोळके, तशीच लगबग.

PXL_20230725_190435222_1.jpg
---

PXL_20230728_033317131~2.jpg

अहाहा मुंबई (आणि आता NYC किंवा SF) चीच आठवण झाली. कुठेही नवीन ठिकाणी गेल तरी नकळत मन मुंबईच्या एखाद्या भागाची छटा / छबी शोधत रहात आणि ओळखीच्या काही खुणा मिळाल्या की एकदम भारी वाटत.
तर असो, आम्ही फिरत फिरत ह्या Pike Place Market शी पोहोचलो आणि माणसांची गर्दी कितीतरी पटींनी वाढलेली जाणवली. मार्केट म्हणजे पसरलेल, बैठ, बंदिस्त संकुलच. त्या गर्दी बरोबर आम्हीही त्या मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसलो. कसलं, एका बोळकांडातून समोरून, मागून येणाऱ्यांना चुकवत (जे इकडे अगदीच दुर्मिळ ) आम्ही पण पुढे सरकायला लागलो. थोडं पूढे गेल्यावर अक्षरश: अलिबाबाच्या गुहेत आल्यासारखं वाटलं. जिकडे बघावं तिकडे काही नवलाईच, सुबक, कलाकुसरीच. एका स्टॉल वर सुंदर विणलेल्या क्रोशाच्या वस्तू तर बाजूच्या स्टॉल वर अतिशय देखणे, आकर्षक, रंगेबिरंगी काचेचे दिवे, प्राणी, पक्षी, लोलक. तिथेच बाजूला लाकडी पझल्स, निरनिरळ्या आकाराचे रूबिस्क cubes, लाकडी ३D पझ्झल्स. काय आणि किती बघू, फोटो घेऊ अस होऊन गेलं. अगदी जत्रेत रमलेल्या मुलासारखी अवस्था झाली. मंडळी पझ्झल्समध्ये रमली. तिथपर्यंत मी भरभरून रंगीत काचेच्या वस्तूंचे फोटो काढत सुटले.

PXL_20230725_212045193_4.jpg
---
PXL_20230725_211956986~2_7.jpg
---
PXL_20230725_212148008~5.jpg

---
PXL_20230725_212106774~4.jpg

उजव्या अंगाला एक गल्ली दिसली तिथून आत गेलो तर जणू काही खाली उतरत चाललेलो. दोन्ही बाजूने, सुंदर, मौल्यवान, दुर्मिळ, लोभस, चित्र विचित्र अशा सगळ्या वस्तू, पुतळे, खेळणी, रंगेबिरंगी किमती स्टोन्स / खड्यांचे दागिने, जुनी कॉईन्स, जादूचे साहित्य यांनी सजलेली ती छोटेखानी स्टॉल वजा दुकानं. जे जे म्हणून मनाला भुलवणारं, रिझवणार अगदी छोट्या बाळगोपाळांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणार काही ना काही होतच तिकडे. मार्केट फिरता फिरता लक्षात आलं, अरे आपण एक एक मजला काही उतरत चाललोय. आणि त्याच्या नंतरच्या लगेचच्या भेटीत त्याची व्याप्ती जाणवली.

PXL_20230725_213706237_2.jpg

--

PXL_20230725_213547463 _3.jpgPXL_20230725_213520858~2_5.jpg
---

PXL_20230725_213514872~2_6.jpg

सेकंड ऍव्हेनुला जी समोरून एक मजली बिल्डिंग दिसते ती, मुख्य पातळीच्या खाली जात जवळ जवळ १० मजले खोल अशी सरळ वॉटरफ्रंट पर्यंत (समुद्र किनाऱ्या लगतच्या रस्त्यापर्यंत) जाणारी मोठी बिल्डिंग आहे. एकंदर नऊ एकर एवढा मोठा परिसर आहे हा. Pike Place Market म्हणजे अमेरिकतेतील सर्वात जुनं आणि मोठं फार्मर्स मार्केट. १९०७ पासून चालू झालेल. म्हणजे जवळ जवळ ११६ वर्ष जुनं म्हणता येईल. इथे जवळपासचे शेतकरी, आर्टिस्ट, कोळी, माळी, आचारी मुख्यत्वे आपली भाजी, कलाकुसर केलेल्या वस्तू, ताजे मासे, फळफळावळ, अन्नपदार्थ विकतात. मला तर “भुलभुलैय्यामे खोया है जोकर” अस काहीस वाटायला लागलं.

इकडचा सर्वात लोकप्रिय असलेला भाग म्हणजे Pike Place Fish, अगदी मोठे मोठे ताजे मासे, खेकडे, कोळंबी वगैरे वगैरे सगळं बर्फात घालून विकायला मांडून ठेवलेलं असत. एखाद्याने एखादा मासा विकत घेतला की ठेल्याच्या बाहेर उभा राहिलेला, दोन्ही हातात पकडून (कारण तो तितकाच वजनदार असतो ) गल्ल्याशी उभ्या असलेल्या माणसाकडे तो मासा फेकतो आणि एकोणी गाणं म्हणत असतो, बाकीचे त्याचे सहकारीही त्याच्यामागून सुरात सूर मिसळतात. आणि हा सगळा नजारा टिपायला अनेक पर्यटक आपले कॅमेरे सरसावून तयारच असतात. आम्ही पण दोन मिनिटं ती गंमत बघितली.

ह्या फिश मार्केट वरून पुढे गेलं कि मग ताज्या भाज्या, ताजी फळं विकणाऱ्यांची रांगच रांग. तिकडून पुढे येऊन बघतोय तर हा फुलांचा अप्रतिम नजराणा. रंगेबिरंगी, अनेक वासाची, आकाराची. सूर्यफूल, झेंडू, लिली, नानाविविध प्रकार. तसेच सुकवलेल्या फुलांचे सुंदर आकर्षक गुच्छ. पापणी न लवता अगदी बघत रहावस वाटत होत. मी पुढे जात जात झर झर त्यांचे कित्येक फोटो काढले.

PXL_20230729_201307763~3_12.jpg

तिथून थोडं पुढे आलं की सुरु होते आर्टिस्ट लोकांची मक्तेदारी, हातांनी बनवलेले किमती खड्यांचे दागिने, सुगंधी साबण, सुंदर मेटलच्या शोभिवंत वस्तू, पेंटिंग्ज, फोटोग्राफ्स, फ्रेम्स काय काय होत. आता मात्र वेळही कमी होता आणि त्या पेंटिंग्ज ची नक्कल करायची इच्छा झाली तर काय घ्या म्हणूनही त्यांचे मात्र फोटो काढले नाहीत.
सोबत कुठे छानस संगीत, फुलांचे, अगरबत्तीचे, सुग्रास भोजनाचे सुवास, आणि ह्या साऱ्यात खेकडे, ऑईस्टर, श्रिम्प यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलसमोर लागलेल्या मत्स्यप्रेमींच्या ह्या भल्यामोठ्या रांगा.
आम्ही काही निवडक पझल, कॉईन्स, मेटलच्या वस्तू खरेदी केल्या, माउंट रेनिअरच्या प्रसिद्ध, अतिशय गोड चेरी चाखल्या, आणि विमान गाठायचं असल्यामुळे पाय निघत नसतानाही Pike Place Market चा निरोप घेतला.

PXL_20230729_201314619~3_11.jpg
--
PXL_20230729_201408236~2_10.jpg
--
PXL_20230729_201354839~3 _9.jpg
--
PXL_20230729_201621474_8.jpg

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...