Tuesday, February 23, 2021

बनेश्वर : रमणीय परिसर

 निसर्गाच्या सानिध्यात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस घालवायचा असल्यास चांगला पर्याय आहे तो बनेश्वरचा.महादेवाचे अत्यंत देखणे मंदिर पाहण्याबरोबर या ठिकाणचा धबधबाही मन मोहून टाकतो.

लॉकडाउननंतर आता सर्व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर यायला लागली आहे. त्यामुळे सर्वांची पावले कोणत्या न् कोणत्या पर्यटनस्थळाकडे वळायला लागली आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात दिवस घालवायचा असल्यास चांगला पर्याय आहे तो बनेश्वरचा. महादेवाचे अत्यंत देखणे मंदिर पाहण्याबरोबर या ठिकाणचा धबधबाही मन मोहून टाकतो. 

बनेश्वर  पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे असलेले महादेवाचे मंदिर आहे. पुण्यापासून नैऋत्य दिशेला ३६ किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. आजूबाजूस दाट जंगल आणि निसर्गरम्य परिसर हे या जागेचे वैशिष्ट्यच आहे. बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी १७४९ मध्ये केली. त्यावेळी मंदिरास उभारणीस एकूण खर्च ११,४२६ रुपये आला. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा यांनी एका युद्धात पोर्तुगीज सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. या घंटेवर १६८३ असे वर्ष असे कोरले असून, त्यावर एक क्रॉस आहे. 

मंदिरात आत गेल्यावर खूप प्रसन्नता जाणवते. सुरुवातीला असलेले तळे आपले लक्ष वेधून घेते. तळ्यातील पाणी नितळ असून त्याभोवती आता संरक्षक कडे तयार केले आहे. महादेवाचे शांतपणे दर्शन झाल्यावर आपली पावले मंदिराभोवती असलेल्या वनसंपदेकडे आपसुकच वळतात. या ठिकाणचे वातावरणच खूप आल्हाददायक आहे. मंदिराच्या भोवतीचे वन संरक्षित आहे. या वनात अनेक फुलझाडे असून ते विविध प्राणी, पक्षी यांचे आश्रयस्थान आहे. निसर्गप्रेमी अन् यात्रेकरूंसाठी हे एक आवडीचे स्थान आहे. या वनातून थोडे पुढे गेल्यावर छानसा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटकांना प्रमुख आकर्षण आहे. 

कसे जाल? 
ऑगस्ट ते फेब्रुवारी हा काळ बनेश्वरला भेट देण्यास उत्तम मानला जातो. पुणे शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनेश्वरला येण्यासाठी  राज्य परिवहन  गाड्यांच्या मदतीने नसरापूर येथून पुढे बनेश्वरसाठी स्थानिक वाहतुकीच्या मदतीने पोचता येते. या ठिकाणी छोटेखानी हॉटेलमध्ये खाण्याची सोय होऊ शकते. स्वतःचे डबे असतील तर निसर्गाच्या सानिध्यात वनभोजनाचा आनंद घेता येतो. 

‘बारा दिवसांचा’ स्पेनमधला नाताळ (जयप्रकाश प्रधान)

 नाताळवर यंदा साऱ्या जगात कोरोनाचं सावट आहे, त्यामुळं या वेळी दरवर्षीच्या उत्साहानं नाताळ साजरा होणं शक्य नाही. पण, त्याच पार्श्वभूमीवर आठवण झाली, ती स्पेनमध्ये चक्क बारा दिवस साजरा होणाऱ्या नाताळ उत्सवाची. सर्वत्र नाताळ सात दिवसांचा असला, तरी स्पेनमध्ये मात्र तो बारा दिवस मानण्यात येतो. काही वर्षांपूर्वी स्पेनमधील ''मलगा'' प्रांतात डिसेंबर - जानेवारी महिन्यांत मी व पत्नी जयंतीनं मुक्काम केला व या नाताळ महोत्सवात सहभागी होऊन त्याची माहितीही घेतली. बारा दिवसांचा, म्हणजे २५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंतचा नाताळ बहुतेक साऱ्या स्पेन राष्ट्रात साजरा होत असला, तरी मलगा या प्रांताचं महत्त्व थोडं निराळं असल्याचं, युरोपमधील मित्रांकडून समजलं. सुमारे सहा लाख लोकवस्तीचं मलगा हे स्पेनमधील सहाव्या क्रमांकाचं मोठं शहर. स्पेनच्या दक्षिण किनारपट्टीवर भूमध्य सागरात उत्तरेकडं ते वसलं आहे. मलगा प्रांतामध्ये सुमारे ३१ लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो व मलगा त्याची राजधानी आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन-चार महिन्यांत युरोपमधील कोणत्याही शहरापेक्षा येथील हिवाळा सुखद असतो. तापमान साधारणतः १७-१८ डिग्री सेल्सिअसच्या घरात राहिल्यानं थंडीचा त्रास होत नाही, शिवाय आनंदही लुटता येतो. त्यामुळं विशेषतः ब्रिटन व युरोपमधील अनेक देशांतील नागरिकांची इथं नाताळमध्ये चांगली गर्दी उसळते. त्यामुळं या बारा दिवसांच्या नाताळचं आकर्षण आणखीनच वाढतं. म्हणूनच मलगामधील ''बेनालमाडेना'' या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वांगसुंदर शहरात आम्ही १५ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत मुक्काम केला, मनसोक्त भटकंती केली आणि नाताळची मजाही लुटली.

ख्रिश्चन व पॅगन परंपरांचं एकत्रीकरण म्हणजे हा बारा दिवसांचा नाताळ. ख्रिश्चन परंपरेनुसार २५ डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो. कारण, त्या दिवशी जीझसचा जन्म झाला. ३१ डिसेंबर, म्हणजे वर्षाला निरोप द्यावयाचा व नवीन वर्षाचं स्वागत करायचं. पण, स्पेनमधील ख्रिसमस सोहळा तिथंच थांबत नाही. पाच जानेवारीची रात्र व सहा जानेवारीची सकाळही फार महत्त्वाची मानण्यात येते. ''थ्री किंग्स डे'' (Three King’s Day) म्हणून तो दिवस ओळखला जातो. २४ डिसेंबर ही ख्रिसमसइव्ह असली, तरी २२ डिसेंबरपासूनच नाताळच्या खऱ्याखुऱ्या जल्लोषाला इथं आरंभ होतो. त्या दिवशी मोठमोठ्या रकमांच्या स्पॅनिश लॉटरीज ठिकठिकाणी काढण्यात येतात आणि टीव्हीवर, शाळकरी मुलं गाण्यांतून त्यांच्या विजयी नंबरांची घोषणा करतात. बहुतेक स्पॅनिश लोक बऱ्याच आधीपासून त्या तिकिटांची खरेदी करतात. आपल्याला लॉटरी लागली का, याबाबत प्रत्येकाला मोठी उत्सुकता असते. एकदा का लॉटरीची बक्षिसं जाहीर झाली, की नाताळची सुटी व खरेदी यांना खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि प्रत्येक घर नाताळमय झालेलं दिसतं.

ख्रिसमसइव्हला - नाताळच्या पूर्वसंध्येला स्पॅनिश भाषेत ‘Nochebuena’ असं म्हणतात. २४ डिसेंबरचा हा एक कौटुंबिक सोहळा असतो. जवळचे, लांबचे नातेवाईक एकत्र जमतात आणि वाइन, मांस यांची मेजवानी असते. या जेवणाचं वैशिष्ट्य म्हणजे, वर्षभर जे पदार्थ आपण खात नाही, असे खास पदार्थ त्या दिवशी बनविण्यात येतात आणि मुख्य म्हणजे, सर्व प्रकारच्या डेझर्टची रेलचेल असते. या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या दिवशी रात्री बहुतेक रेस्टॉरंट्स बंद असतात. कारण जेवणाच्या मेजवान्या प्रत्येकाच्या घरी होतात आणि नातेवाईक, मित्र यांना त्यासाठी आग्रहानं बोलाविण्यात येतं. जे धार्मिक कॅथलिक असतात, ते रात्री जेवणानंतर चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. तिथं गिटार, ड्रम आदींवर पारंपरिक गाणी वाजवून, परमेश्वराच्या या सुपुत्राचा जन्म साजरा करण्यात येतो. त्या दिवशी रात्री काही ठिकाणी, Santa claus‘ - ज्याला स्पॅनिशमध्ये ‘Papanoel ‘ म्हणतात, तो मुलांना भेटवस्तू वाटतो. अर्थात, याबाबत इथं निरनिराळ्या प्रथाही आढळून येतात. आता नाताळला नुसती सुरुवात झाली आहे. २५ डिसेंबर हा नाताळचा दिवस. ख्रिसमस इव्हला मस्त मेजवान्या झोडल्या तरी, नाताळच्या दिवशीही सर्व कुटुंबीय जेवणासाठी एकत्र जमतात. पण, आदल्या रात्रीच्या एवढं जेवणाचं स्वरूप मोठं नसतं. आदल्या रात्री ''पापा नोएल''ने काय भेटी दिल्या, त्या सर्वांना दाखविण्याचा कार्यक्रम घराघरांत सुरू असतो.

२५ डिसेंबर साजरा झाल्यानंतर आता लक्ष लागलेलं असतं, २८ डिसेंबरकडं. हा ''होली इनोसन्ट डे'' म्हणून पाळला जातो. स्पेनमध्ये तो ''एप्रिल फुल डे'' म्हणून साजरा होतो. प्रत्येकजण एकमेकांची गम्मत करीत असतो. या दिवशी तुम्ही जे पाहता किंवा ऐकता त्यावर फारसा विश्वास ठेवायचा नसतो.

३१ डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस. ख्रिसमसइव्ह ही कुटुंबीयांसमवेत, तर नववर्षाची पूर्वसंध्या ही मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली जाते. रात्रीचं जेवण झाल्यानंतर, वर्षाचे शेवटचे क्षण व नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण शहराच्या चौकांत किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमतात. मध्यरात्रीनंतर अक्षरश: जल्लोषात, नाच-गाण्यांत आणि आवाज व प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं स्वागत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सारा थंडा कारभार, रस्त्यावर अगदी सामसूम असते.

पण अजून स्पेनमधील नाताळ संपलेला नसतो हं ! स्पॅनिश कुटुंबांतील अगदी तरुण मंडळींच्या दृष्टीनं ५ जानेवारी हा फार महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशीही सार्वजनिक सुटी असते. प्रत्येक शहराच्या सर्व चौकांत प्रचंड मोठ्या फ्लोट मिरवणुका निघतात. त्यांत वादक, गायक, कलाकार निरनिराळे आकर्षक कपडे घालून सहभागी होतात आणि मुख्य म्हणजे, त्यात तीन राजे (Three Kings) असतात. ते शहरातील सर्व लहान मुलांना हात हलवून, त्यांचं स्वागत स्वीकारतात. परेड संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात. त्या दिवशीचं रात्रीचं जेवण लवकर घेतलं जातं. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातील मुलं आपले बूट एकदम स्वच्छ करून घराच्या हॉलमध्ये आणून ठेवतात. दुसऱ्या दिवशी अगदी लवकर ''तीन राजे'' त्यांच्या घरात येतात, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी भेटी कुठं ठेवावयाच्या, हे त्यांना त्यामुळं बरोबर समजू शकतं. सहा जानेवारीला जाग आली, की मुलं बूट ठेवलेल्या जागेच्या दिशेनं धावतात. म्हणजे तीन राजांनी कोणाकोणासाठी काय-काय भेटी इथं ठेवल्यात, हे त्यांना समजतं. साऱ्या स्पेनमध्ये हेच चित्र दिसतं....

सहा जानेवारीचा दिवस हा मात्र तसा क्लेशकारक असतो. कारण आज बारा दिवसांचा नाताळ सोहळा व सुटी संपून दैनंदिन जीवन सुरू होणार असतं. पण पुढल्या वर्षीच्या नाताळची वाट पहात रोजच्या कामकाजाला सुरुवात होते.अशी असते स्पेनमधील बारा दिवसांच्या ख्रिसमसची आगळी-वेगळी कहाणी. मलगात आम्हीही या नाताळची मजा लुटली आणि त्या आठवणी मनाच्या कप्प्यात बंद करून, सहा जानेवारीलाच मलगाचा निरोप घेतला.

बारा लकी द्राक्षं
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाला आरंभ करताना, स्पॅनिश संस्कृतीत एक मजेशीर प्रथा असल्याचं समजलं व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही घेता आला. आमच्या रिसॉर्टला लागूनच असलेल्या, कोस्टा डेल सोलच्या किनाऱ्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये बसून, आम्ही शॅम्पेन घेत, त्या वर्षाला निरोप देत होतो. रात्री ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वेटरनं दोन डिशेशमध्ये प्रत्येकी १२ द्राक्षं आणून आमच्यासमोर ठेवली. आम्हाला काहीच कळेना! वेटरनं सांगितलं, की ''ही १२ लकी द्राक्षं'' आहेत. वर्ष संपायला (१२ वाजायला) १२ सेकंदं राहिली असताना, १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं खायची, म्हणजे येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं जातं! आम्ही दोघांनीही १२ सेकंदांत ती १२ लकी द्राक्षं संपवली.... पुढल्या वर्षीही भरपूर जगप्रवास काहीही अडचण न येता पार पडला. त्यामुळं ती १२ द्राक्षं खरोखरच लकी ठरली, असं मानायला हरकत नाही!

कन्याकुमारीतला सूर्योदय

 

सन २०२० वर्ष संपलं अन् २०२१ सुरू होतंय... गेल्या वर्षात आपण काय केलं? ते वर्ष कसं गेलं? या वर्षात आपले काय संकल्प आहेत? गेल्या वर्षीप्रमाणे अनेक महिने आपल्याला घरीच बसावं लागेल का? अशा अनेक प्रश्नांवर सगळेच लोक विचार करतायत. सन २०२० मध्ये काहीच विशेष घडलेलं नाही असंही बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे! मात्र, याव्यतिरिक्त आपलं आयुष्य जगत असताना कितीतरी प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. कोरोनाच्या महामारीचे दिवस संपत असताना आता आपण नव्या दिशेनं वाटचाल करणार आहोत की नाही? स्वत:साठी जगणार आहोत की नाही? हाही विचार आपण केला पाहिजे. महामारी, आंदोलनं, नैसर्गिक संकटं इत्यादी गोष्टी होतच राहतील. त्या यापूर्वीही थांबल्या नव्हत्या व पुढंही होत राहतील. जात-पात-धर्मापलीकडे जाऊन माणूस म्हणून जगाकडे नव्या नजरेनं पाहायला सन २०२० नं आपल्याला शिकवलंय... तरी एकविसाव्या शतकात आपण फारच पळतोय का? काही ना काही गाठायचंय यासाठीच कष्ट घेतोय का? अशाही गोष्टींचा विचार करण्याची ही वेळ आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडंसं ‘स्लो लाईफ’, म्हणजेच जरा मंद गतीनं, आपण आयुष्य जगलो तर ते अधिक भारी होईल असा विचार आपण का नाही करत?

सप्तरंगमधील आणखी दर्जेदार लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सन २०२१ च्या सुरुवातीला काही प्रश्न उपस्थितीत करू या. आपण कुठल्याही देशाच्या पूर्व समुद्रकिनारपट्टीवरून कधी सूर्योदय पाहिलाय? कधी रात्री उशिरा मध्यरात्री बाईक राईड केलीये? कधी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना विमानप्रवास घडवून आणलाय? शंभर-दीडशे किलोमीटर कधी चाललोय का? कधी ‘सोलो ट्रिप’ केलीये का? उत्तरेकडच्या पर्वतरांगांत बर्फ अनुभवलाय का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करून ती उत्तरं कृतीत उतरवली पाहिजेत. काही गोष्टी यशस्वी होतील, तर काही अयशस्वीही होतील. कधी तरी अयशस्वी ठरलेले प्रसंगदेखील साजरे केले पाहिजेत! 

जन्मापासून आपण कायमच शिकत आलोय; पण कधी तरी ‘अनलर्निंग’ व्हायचा प्रयत्न केला तर अधिक मजा येऊ शकते. अगदीच चौकटीत जगण्यापेक्षा थोडंसं स्वत:ला सैल सोडून बघूया ना! स्वत: मधमाशीसारखं जगूया ना! प्रवास करत, अनुभव घेत, छोटे-मोठे प्रसंग जगत आयुष्य अधिक समृद्ध करता येतं. ‘ जर्नीज् मेक यू वाईज’ असं कुणीतरी म्हटलंय आणि या जर्नीत किंवा प्रवासात आपण काही तरी शिकू अन् त्याचबरोबर जे काही इतकी वर्षं शिकलोय त्यातल्या काही गोष्टी विसरू या म्हणजेच अनलर्न करू या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असं जगण्याचं शिक्षण जगातल्या कुठल्याच मोठ्या विद्यापीठात पैसे देऊन मिळणार नाही; परंतु हे सारं प्रवासातून मिळवू शकतो. एक असतो तो बाह्य प्रवास - जिथं निसर्ग, प्राणी, हवा, डोंगर, दरी, समुद्र, रस्ते, स्मारकं, मंदिरं अनुभवतो, तर दुसरा असतो अंतर्गत प्रवास - ज्यात स्वत: आपल्या आत डोकावून पाहतो, चिंतन करतो, मनन करतो, स्वत:ला विकसित करतो, स्वत:संदर्भात काही काम करतो.

मानवजात मुळातच भटकी आहे; परंतु आपण कुठल्या ना कुठल्या चौकटीत अडकत गेलो. संत तुकाराम महाराज म्हणतात तसं ‘होय मनासी संवादु। आपुलाची वाद आपणासी।।’ या तत्त्वावर आपण कायम चाललं पाहिजे, तरच आपली स्वत:ची वेळच्या वेळी पानगळ होते व आपण पुन्हा नव्यानं बहरतोही! स्वत:शी असाच संवाद व वाद घालण्यासाठी मी २३ डिसेंबर २०२० रोजी सोलो बाईक राईडला जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांची मेंदूची आणि हृदयाची अशा दोन मोठ्या शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वीच झाल्या. त्यांना त्यातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी किमान सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. अशा प्रसंगात मी अनियोजित बाईक राईडवर जाण्याचा निर्णय घेऊन निघालो होतो. मी जाऊ नये असंच काहीसं चित्र आईच्या डोळ्यात मला दिसत होते; परंतु २३ डिसेंबरला मी ९९९९ दिवसांचा झालो होतो. अर्थात, २४ डिसेंबर २०२० ला मी २७ वर्षं, चार महिने व १५ दिवसांचा झालो. थोडक्यात काय तर, पृथ्वीवर मी माझ्या आयुष्याचे दहा हजार दिवस पूर्ण केले. यानिमित्त मला काही ना काही तरी करायचं होतं, ज्याचे अनुभव माझ्या आयुष्यात खोलवर रुजतील व त्या आठवणींमध्ये मी जगेन अशी काहीशी भावना माझ्या मनात होती. 

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे याच्या ‘चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये, म्हणून!’ या पुस्तकातल्या ‘मी ५९ व्या वर्षाऐवजी १९ व्या वर्षी कन्याकुमारीस जायला हवं होतं’ या लेखानं मला प्रभावित केलं होतं. तो लेख वाचून मी प्रेरित व्हायचो; पण कन्याकुमारी गाठली नव्हती. आयुष्याचा १०००० वा दिवस साजरा करण्यासाठी या सोलो बाईक राईडसाठी पुणे ते कन्याकुमारी हा प्रवास निवडला अन् दोनच दिवसांत बेंगळुरूमार्गे ‘Benelli TRK 502X’ या गाडीवर १६०० किलोमीटर अंतर कापून सायंकाळी पाच वाजता पश्चिम किनारपट्टीवर सूर्यास्त पाहायला पोहोचलो. तब्बल दोन तास तिथं बसलो. सूर्य मावळतीला जात असताना एकटक त्याच्याकडे बघत बसलो. आपण भारताच्या शेवटच्या टोकाला बसलोय हा आनंदच वेगळा होता. सायंकाळी सात वाजता एका हॉटेलात (Home Stay) मुक्काम केला व ता. २५ डिसेंबर, नाताळ व माझ्या १०००१ व्या दिवशी पूर्व किनारपट्टीवर पहाटे सहा वाजता जाऊन बसलो अन् सूर्योदय अनुभवला. हा माझ्या आयुष्यातला पूर्व किनारपट्टीवरून पाहिलेला पहिला सूर्योदय होता. हा सोनियाचा दिवस येण्यासाठी २७ वर्षं गेली, याबद्दल मनातल्या मनात स्वत:ला हसत होतो, तर दुसरीकडे हा सुंदर क्षण जगतोय म्हणून स्वत:ची पाठही थोपटत होतो! आपल्या देशातलं हे एकच असं गाव आहे, जिथून पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून सूर्योदय व सूर्यास्त अनुभवता येतो व ते गाव म्हणजे कन्याकुमारी. भारतभूमीच्या दक्षिण सीमेवरच्या अखेरच्या बिंदूवर मी उभा होतो आणि अरबी समुद्र, बे ऑफ बंगाल व हिंद महासागर अशा तीन समुद्रांचा रोमांचकारी क्षण मी अनुभवत होतो...माझ्यासाठी आयुष्यातला हा एक मैलाचा दगड होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

परतीचा प्रवास तुतीकोरिन-चेन्नई- हैदराबाद असा करून मी सात दिवसांनी पुण्यात दाखल झालो. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगण अशा पाच राज्यांतून तीन हजार १४४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. दक्षिणेकडची शेतजमीन जवळून पाहता आली. तिथली परंपरा व खाद्यसंस्कृती समजली. स्थानिक लोकांकडून राजकीय व सामाजिक परिस्थितीचा आढावा घेता आला. मात्र, या सगळ्यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे, स्वत:शी सात दिवस गप्पा मारता आल्या. अंतर्मनात डोकावता आलं. कधी संवाद झाला, तर कधी वादही झाला!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

नागझिरा मनाच्या कोपऱ्यातलं जंगल

 

नागपूरपासून जवळच भंडारा जिल्ह्यात एक नितांतसुंदर जंगल आहे. ते म्हणजे नागझिरा वन्यजीव अभयारण्य. गेली अनेक वर्षं या जंगलानं अनेकांना भुरळ घातली आहे. वेडच लावलं आहे म्हणा ना. एकदा का तुम्ही नागझिऱ्याच्या सहवासात आलात की तुम्हाला निसर्गाचं वेड लागतं आणि मग फक्त निसर्ग निसर्ग आणि निसर्ग... निसर्गाशिवाय तुम्हाला काहीही दिसत नाही. प्रत्येकानं एकदा तरी भेट द्यावं असं हे जंगल. मात्र, नागझिऱ्याच्या जंगलाला केवळ एकदाच भेट देऊन भागणार नाही हेही, तुम्ही एकदा का या जंगलात गेलात की तुमच्या लक्षात येईल. या जंगलाची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. मध्य भारतातल्या विविध जंगलांपैकी असं हे एक जंगल असलं तरी इतर जंगलांपेक्षा किंचित् वेगळी भूरचना या जंगलाला आहे. सातपुड्याच्या रांगांमध्ये वसलेलं हे जंगल आपल्या अनोख्या सौंदर्यानं कायम साद घालतं आणि मग हे जंगल मनाच्या कोपऱ्यात कायमचं वसतीला येतं!

तूर्त ‘नागझिरा वन्यजीव अभयारण्या’बद्दल माहिती घेऊ या. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारात मोडणारं हे जंगल सातपुडा पर्वताच्या उपरांगांमध्ये आहे. अभयारण्याच्या पिटेझरी प्रवेशद्वारापासून सुमारे १५ किलोमीटरवर पर्यटनसंकुल आहे. आजही जंगलाच्या आत या पर्यटनसंकुलात वास्तव्य करू शकतो. अशा प्रकारची मुभा असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव ‘व्याघ्र राखीव क्षेत्र.’ भंडारा जिल्ह्यात असणाऱ्या या अभयारण्यात जैवविविधता ठासून आहेच; शिवाय या जंगलात भौगोलिक विविधताही तितकीच आढळते.

बिबट्यांची लक्षणीय संख्या हे नागझिऱ्याचं वैशिष्ट्य. स्वभावतः बुजरा असणारा हा हुशार आणि धूर्त शिकारी इथं मात्र हमखास दर्शन देतो. आलेवाही पाणघाट, अंधारबन यांसारख्या दाट जंगलांच्या जागा, हत्तीखोदरासारखे विरळ प्रदेश, सातमोडीसारखे घाटरस्ते, गौरीडोह, बंदरचुवा, सर्क्युलर रोड यांसारख्या पाण्याच्या जागा, चितळ मैदानासारखा गवताळ प्रदेश, नागदेव पहाडीसारखे डोंगराळ भाग आणि वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवणारे गौर गल्ली, टायगर ट्रेल यांसारखे भाग आणि निसर्ग पर्यटनसंकुलाच्या बाजूला पसरलेला नागझिरा तलाव या सर्वांनी नागझिऱ्याच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

पुढची पिढी सक्षम होण्यासाठी वयात आलेल्या वाघांनी हद्दीच्या शोधार्थ दुसऱ्या जंगलात जाणं गरजेचं असतं. एकाच कुटुंबातले आई आणि मुलगा अथवा बाबा आणि मुलगी यांचं मीलन झालं तर पुढची पिढी सक्षम होत नाही. अशा वयात आलेल्या वाघांना दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी सुरक्षित जंगलांचे काही भाग असावे लागतात. त्यांना ‘कॉरिडॉर्स’ म्हणतात. नागझिऱ्याचं त्यादृष्टीनं महत्त्व आहे. 

महाराष्ट्रातले ‘ताडोबा’, ‘बोर’, ‘उमरेड-कऱ्हांडला’, ‘पेंच’, तसंच मध्य प्रदेशातली ‘कान्हा’, ‘पेंच’; आंध्र प्रदेशमधला ‘कावल’ हा व्याघ्रप्रकल्प आणि इतर वन्यजीव अभयारण्‍ये एकत्र जोडण्यात आणि या व्याघ्रप्रकल्पातून होणाऱ्या युवा वाघांच्या स्थलांतरात नागझिऱ्याची मोलाची भूमिका आहे.

वन्यजीव-अभ्यासक किरण पुरंदरे यांनी या जंगलात सलग ४०० दिवस वास्तव्य केलं आणि संपूर्ण ऋतुचक्राचा अभ्यास केला. ‘सखा नागझिरा’ हे नागझिऱ्याच्या त्यांच्या अनुभवांवरचं  पुस्तक प्रसिद्ध आहे. पुरंदरे शहराच्या गजबजाटाला कंटाळून नागझिऱ्याच्या प्रवेशद्वाराजवळ पिटेझरी गावात कायमस्वरूपी वास्तव्याला गेले. तिथल्या स्थानिक गोंड आदिवासींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी नवीन उपक्रम सुरू केले. नागझिऱ्यामध्ये या उपक्रमांना  भेट देता येऊ शकेल आणि हातभारही लावता येऊ शकेल. एखादी गोष्ट, एखादं वेडच असं असतं ज्याची वाट बघण्यात, त्याच्या मागं धावण्यात सगळं आयुष्य निघून जातं. त्या वेडाच्या मागं धावताना मग आपल्याला जाणीव होत राहते...हा ध्यास, हे वेड आपण पूर्ण करू शकलो नाही तरीही हा प्रवासच खूप सुंदर होता, ही ती जाणीव. हा प्रवास थकवा आणत नाही; किंबहुना त्या वेडामागं धावण्याची जास्तच ऊर्मी  देतो...माझ्या निसर्गवेडाची जाणीव मला नागझिऱ्यात आल्यावर पहिल्यांदा झाली. अनेक वर्षं इथे येतोय; पण ही जादू आजही टिकून आहे. 

कसे जाल? 
नागपूर : भंडारा-पिटेझरी-नागझिरा
भेट देण्यासाठी उत्तम काळ : ऑक्टोबर ते मे

काय पाहू शकाल? 
आवर्जून पाहा :
वटवाघळांच्या काही प्रजाती, झाडचिचुंद्री, तीनपट्टी खार, जरबेल उंदीर, मुंगूस, जवादी मांजर, उदमांजर, खवल्या मांजर, साळिंदर, रानकुत्रे, खोकड, चांदी-अस्वल, रानडुक्कर, अस्वल, गवा, रानमांजर, चितळ, दुर्मिळ पिसोरी हरीण, नीलगाय, चौशिंगा, बिबट्या, पट्टेरी वाघ, पखमांजर आदी.

पक्षी : सुमारे २५० प्रजातींचे पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळ-घार, कापशी घार यांसारखे शिकारी पक्षी, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड(इंडियन स्कॉप्स आउल), गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, नागझिऱ्याची खासियत असणारा मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, सूर्यपक्षी आदी.

सरपटणारे प्राणी : मगर, कासव, पाल, गेको, सरडा, घोरपड, सापसुरळी, वाळा, डुरक्या घोणस, अजगर, दुतोंड्या, तस्कर, धामण, धूळनागीण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, हरणटोळ, मांजऱ्या, चापडा, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.

(शब्दांकन : ओंकार बापट)   
(सदराचे लेखक वनपर्यटक आणि ‘महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळा’चे सदस्य आहेत.)



 नृसिंह मंदिर, माडगी- देव्हाडा, तुमसर, भंडारा

 #VidarbhaDarshan -














नृसिंह मंदिर, माडगी- देव्हाडा, तुमसर, भंडारा

मोहाडी - तुमसर तालुक्याच्या सिमेवर गोंदिया राज्यमार्गावरील वैनगंगेच्या पवित्र पात्रात वसलेले प्रभू नृसिंहांचे पावनधाम तिर्थक्षेत्र माडगी येथे आहे. जिल्ह्यात हे तिर्थक्षेत्र मीनी पंढरी म्हणूनही ओळखले जाते. तुमसर - गोंदिया मार्गावरील माडगी येथे वैनगंगेच्या कुशीत मोठ्या दगडाच्या टेकडीवर पांढरेशुभ्र नृसिंहाचे मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिरात भगवान नृसिहांची मूर्ती आहे. येथील मंदिराविषयी एक अख्यायिका पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान विष्णू नृसिंह अवतरात खांबातून प्रकट झाले व हिरण्यकश्यपाच्या पोटात आपली तीक्ष्ण नखे खुपसून, आपल्या मांडीवर मांडून वध केला. हे नृसिंहाचे स्वरूपाच्या मुर्तीतून प्रतिबिंबीत होते.कार्तिक पौर्णिमेनंतर अमावस्यापासून दरवर्षी १५ दिवसाची मोठी यात्रा नदीच्या खुल्या पात्रात भरत असते. यात्रेला विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीगढ राज्यातील हजारो भाविकांची उपस्थिती लाभत असून वैनगंगेच्या निर्मल , पवित्र पाण्यात स्नान करून पूजन अर्चना केली आहे. यात्रेला प्रारंभ होताच भक्तांचा लोंढा माडगी व देव्हाडा या ठिकाणी असलेल्या नृसिंहांचे पावनधाम तिर्थक्षेत्रा कडे वळत येतो. हजारो भाविक या तिर्थक्षेत्रात गर्दी करत असून अनेक भाविक वैनगंगेच्या निर्मळ पाण्याने स्नान करतात.
नृसिंह भगवंतांच्या मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून सरळ आत गेल्यास खुल्या आकाशा काही हवनकुंड आहे. हवंकुंडाच्या बाजूने मोजक्याच पायऱ्या चढून वर जावे लागते. हाच मंदिराचा सर्वात उंच भाग आहे. या ठिकाणी मंदिर तळघरासारखा भासतो. तेथे दाराजवळ उजवीकडे हनुमंताची मूर्ती आहे. दरवाज्याच्या समोर समोर उभे असता नृसिंह भगवानाची पाच फुट उंच विशाल मूर्ती दिसते. मूर्तीजवळ खिडकीतून भगवंताच्या मुर्तीवर सूर्य प्रकाश पडून मूर्ती विलोभनीय दिसते. याच मंदिरात गणपती, आदिशक्ती दुर्गा देवी, अन्नपूर्णा देवी इत्यादी पुरातन मुर्त्या आहेत.
राजयोगी अण्णाजी महाराज , सदगुरू योगीराज स्वामी सितारामदास महाराजाच्या आदेशावरून नृसिंह टेकडी माडगीला सन १९२८ साली आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशी त्यांची जवळी होती. त्यांनी माडगी येथील नृसिंह टेकडीला सन १९२८ साली भेट दिली होती. अण्णाजी महाराजांनी माडगी येथील नृसिंह टेकडीवर तपश्चर्या, उपासना, योगाभ्यास साधना, ध्यान साधना, प्रवचन तसेच अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. ते ग्रामगितेतील, पुराणातील दाखले देवून भाविक भक्तांच्या शंकेचे निराकरण करत असत.
मंदिराच्या बाजुला असलेले मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे लाईनवरील रेल्वे पूल...
या नदीपात्रात मंदिराच्या बाजूला नदीपात्रात पाहिले असता, मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे लाईनवर असलेलं रेल्वे पुलाचे विहंगम दृश्य नजरेस पडते.
नृसिंह मंदिर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु अद्यापही या तीर्थक्षेत्राचा काहीसा विकास झालेला नाही. आताही या तीर्थक्षेत्राला तुटपुंज्या विकासात समाधान मानावे लागते. भविष्यात जर शासनाने या तिर्थक्षेत्राचा विकास केला तर, स्थनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जिल्ह्यातील हे तीर्थक्षेत्र मोठ्यास्तरावर नावारूपाला येईल.
प्रतिमा व महिती संकलन- ©Digital Bhandara

पन्ना., नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

   सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. "हा जगून वाचून आला तर आपला" अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच. 

                    मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्‍यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार. 
                    पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ "भगत आणि भग्तीन" एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो. 
                    सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. 
                    सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्‍यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्‍या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्‍यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात. 
                    आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली. 
                    धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्‍या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे. 
                    आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
 ------------------------------------------------------------------
Nagdwar
अशा पाऊलवाटांनी चालणे म्हणजे अवघडच
---------------------------------------------------------------------------
                     काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्‍या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने "एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता" या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्‍या आणि शिखर उतरणार्‍या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे "अन्नदानाचा भंडारा" लागलेला असतो आणि तो सुद्धा अगदी फुकट. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी "गरजू" बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था "अन्नसुरक्षा" प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar
नागद्वाराचे प्रवेशद्वार
 ------------------------------------------------------------------ 
 दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

पद्मशेषद्वार
 ------------------------------------------------------------------ 
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

अन्नदानाचा भंडारा - येथे आम्ही पोटभर जेवण घेतले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे. 

------------------------------------------------------------------
Nagdwar

दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

गुळगुळीत वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी 
------------------------------------------------------------------
Nagdwar

थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

या वाटेने अनवाणी चालण्याचा आनंद काही वेगळाच. 
------------------------------------------------------------------ 
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला. 
----------------------------------------------------------------------------------------------------------
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात. 
 ------------------------------------------------------------------ 
Nagdwarचौरागढाचे प्रवेशद्वार. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढण्याला पायर्‍या आहेत पण चढताना देव आठवतोच. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्‍यावर हास्य फुलायला लागले. 
------------------------------------------------------------------
Nagdwar

प्राचीनकाळीन शिवमंदिर
 ------------------------------------------------------------------
Nagdwar

हर हर महादेव
 ---------------------------------------------------------------------------------------------------
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे. 
------------------------------------------------------------------ 
Nagdwar

गरम पाण्याचे कुंड - पाण्यातून वाफ निघते
 -----------------------------------------------------------------------------------------------------
काही वैशिष्टे :

१) पश्चिमद्वार गुफेची उंची ३/४ फूट असल्याने गुफेत वाकून चालत जावे लागते.
२) स्वर्गद्वार गुफेची उंची २/३ फूट असल्याने गुफेत रांगत किंवा सरपटत चालत जावे लागते.
३) हल्दीशेष गुफेत रांगत जावे लागते. आत गेलो आणि आतील दगडांना स्पर्श झाला की आपले अंग आणि कपडे हळदीसारखे पिवळे होऊन जातात.
४) गंगावन शेष गुफेत ५०/७० फूट रांगत किंवा बसून किंवा सरपटत जावे लागते. आत मात्र अत्यंत रमनिय मनोहरी दृष्य अहे. मुर्तीवर होणारा नैसर्गिक झर्‍याचा अभिषेक विलोभनिय आहे.

काही अवांतर :
१) पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि सिमेलगतचे मराठी भाषिक यात्रिकच असतात.
२) नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्‍या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत.
३) प्रांतसिमा आणि पचमढी यामधल्या सौंसर, पांढुर्णा वगैरे भागात अजूनही मराठीच बोलली जाते.
४) नागद्वार यात्रेला प्रशासकिय सुविधा पुरेशा उपलब्ध न होण्यामागे व म.प्र शासकांची भूमिका उदासिनतेची असण्यामागे कदाचित हे एक प्रमुख कारण असण्याची शक्यता आहे.
५) नागव्दार यात्रा बंद करण्यासाठी म.प्र. शासनाकडून जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची आतल्या गोटात चर्चा आहे. यावर्षी केवळ १० दिवसाची परवानगी मिळाली हा त्याचाच परिणाम असावा, असा संशय घ्यायला बराच वाव आहे.
६) नागद्वारला जाणारा बहुतांश यात्रिकवर्ग हा श्रमिकवर्गच असतो. कर्मचारी, व्यापारी किंवा सुखवस्तू घराण्यातील लोक नागद्वारला जातच नाहीत. श्रमिक वर्गाचे तिर्थस्थान म्हणूनच नागद्वारचा एकंदरित ट्रेन्ड बनलेला आहे.म्हणूनच या स्थळाबद्दल कुठेही चर्चा होत नाही. जर येथे शिक्षित-उच्चशिक्षित यात्रिक गेले असते तर कदाचित देशातिल सर्वोत्तम नैसर्गिक आनंददायी क्षेत्र म्हणून या स्थळाचा नक्किच गाजावाजा झाला असता.

७) शिवाय या स्थळाच्या भौगोलिक जडणघडणीच्या काही मर्यादाही आहेत.

अ) या मार्गावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकेल असे रस्ते निर्माण करणे, अशक्य आहे.
ब) हेलिपॅड तयार करायला देखिल तेवढी सपाट जमिन उपलब्ध नाही.
क) पायदळ यात्राच शक्य आहे पण अत्यंत असुरक्षित आणि शारिरीक कष्टाची आहे.

                पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत.

पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.

* नागद्वार यात्रा वर्षातून दोनदा असते.

१) गुरूपोर्णिमा ते नागपंचमी परंतु यावर्षी प्रशासनाने केवळ २ ते १२ ऑगष्ट अशी १० दिवसाचीच परवानगी दिली होती. हीच मुख्य यात्रा असते.
२) वैशाख महिन्यात वैशाखी यात्रा, पण यावेळेस पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. जंगली प्राण्यांचा या भागात वावर असतो, नि:शुल्क भोजन किंवा अन्य सुविधा देखील नसतात. अजिबात गर्दी नसते. त्यामुळे ही नागद्वार यात्रेसाठी उपयुक्त वेळ नाही.
३) उर्वरित संपूर्ण काळ हा प्रभाग निर्जन असतो.

पंचमढीला कसे जावे? 
* हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी. 
* रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने - अंतर ४५ कि. मी. आहे. 
* नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते - अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.
                                                                                                                              - गंगाधर मुटे

 http://www.misalpav.com/node/25393

 

बुंदेलखंडातल्या पन्ना जिल्ह्यात ‘पन्ना व्याघ्रप्रकल्प’ हे अप्रतिम जंगल आहे. या जंगलाच्या संवर्धनासाठी सन १९८१ मध्ये ‘पन्ना राष्ट्रीय उद्याना’ची स्थापना करण्यात आली. पुढं सन १९९४ मध्ये जंगलाला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला; पण चोरट्या शिकारी आणि विविध कारणांमुळे सन २००९ पर्यंत इथल्या सर्व वाघांचा निःपात झाला आणि ‘व्याघ्रप्रकल्प असूनही जंगलात एकही वाघ नाही,’ अशी स्थिती निर्माण झाली!

‘जंगल वाचवायचं असेल तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्यक आहे,’ असं मत काही विवेकी, विचारी, अभ्यासकांनी मांडलं. मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. सन २००९ मध्यए बांधवगड आणि कान्हा या दोन व्याघ्रप्रकल्पांतून दोन वाघिणी पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्यात आल्या. बांधवगडमधून आणलेल्या वाघिणीला नाव देण्यात आलं ‘T-१’ आणि कान्हातून आणलेल्या वाघिणीला ‘T-२.’ मात्र, याचदरम्यान पन्नात वावरणारा शेवटचा नरवाघही नाहीसा झाल्यानं या वाघिणी साथीदाराशिवाय इथं टिकतील का अशी शंका अभ्यासकांनी व्यक्त केली. आणि मग सन २००९ मद्ये ‘पेंच व्याघ्रप्रकल्पा’तून ‘T-३’ नावाचा नरवाघ इथं आणण्यात आला. पन्नाचं गतवैभव पुन्हा उभं करण्याच्या याकामी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. त्यांचं नाव आर. श्रीनिवास मूर्ती. मूर्ती यांनी त्यासाठी ‘भगीरथप्रयत्न’ केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या नवीन वाघांवर लक्ष ठेवण्यासाठी त्या वाघांच्या गळ्यात ‘रेडियो कॉलर’ नावाचं उपकरण बांधण्यात आलं. यातून निघणारे सिग्नल्स एका अँटिनाद्वारे मिळवले जातात. या कामावर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी आर. श्रीनिवास मूर्तींनी काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आणि अखेर एक खडतर ‘तपश्चर्या’ सुरू झाली.

T-१ आणि T-२ यांनी पन्नाच्या भूमीचा त्यामानानं लवकर स्वीकार केला. इथं त्या मुक्तपणे वावरू लागल्या. प्रत्येक वाघाची स्वतःची हद्द ठरलेली असते. T-१ आणि T-२ यांनीही आपापल्या हद्दी निश्चित केल्या; पण T-३ नरवाघानं पन्नाचं जंगल मात्र पटकन स्वीकारलं नाही. T-३ नं एक दिवस पन्ना व्याघ्रप्रकल्पाचा प्रदेश सोडला आणि ‘पेंच’च्या दिशेनं तब्बल ४४२ किलोमीटरचा प्रवास केला. पन्नापासून त्याचं अंतर जसं वाढत गेलं तसं त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. त्याला शेवटी जेव्हा पुन्हा बेशुद्ध करून पन्ना व्याघ्रप्रकल्पात आणण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा त्याच्या तैनातीला तब्बल ७० कर्मचारी, चार हत्ती आणि  स्वतः मूर्ती असा फौजफाटा होता. 

आता मात्र पुन्हा ही परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पुन्हा तो ‘पन्ना’चं जंगल सोडून जाऊ नये म्हणून T-३ ला या दोन्ही वाघिणींकडे आकृष्ट करण्यासाठी मूर्ती यांनी नामी शक्कल शोधून काढली. त्यांनी T-३ ला सोडायच्या वेळी वाघिणींचं मूत्र आणि पाणी यांच्या मिश्रणाचा ठिकठिकाणी शिडकावा केला. हा बाण बरोबर बसला. T-३ दोन्ही वाघिणींच्या शोधार्थ निघाला. अखेर दोन्ही वाघिणींनी त्याला जोडीदार म्हणून स्वीकारलं आणि सरतेशेवटी मूर्ती आणि त्यांच्या टीमच्या अथक् प्रयत्नांना यश आलं.

ता. १६ एप्रिल २०१० या दिवशी T-१ या वाघिणीनं चार पिल्लांना जन्म दिला. अशा प्रकारच्या वाघांच्या या पुनर्परिचयाच्या यशस्वितेचं पन्ना हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. यापाठोपाठ T-२ नं ऑक्टोबर २०१० मध्ये चार पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर आणखी चार वाघांना इतर व्याघ्रप्रकल्पांतून पन्ना इथं आणण्यात आलं. हळूहळू वाघांची सख्या वाढत जाऊन आज सुमारे ४० वाघ पन्नामध्ये आहेत.

इथल्या वाघांच्या बच्च्यांची नाव ठेवण्याची पद्धत मोठी अनोखी आहे. उदाहरण म्हणून आपण T-१ ला झालेल्या बछड्यांना ठेवलेली नावं पाहू या. या चार पिल्लांना नावं दिली होती - P१११, P११२, P११३ आणि P११४. यातलं ‘P’ म्हणजे पन्ना. १११ मधला पहिला ‘१’ म्हणजे आईचं ‘T१’ हे नाव दर्शवतो. दुसरा ‘१’ म्हणजे, पहिल्या वेळेच्या बछड्याचा निदर्शक आणि तिसरा ‘१’ हा चारमधल्या बछड्याचं नाव दर्शवतो. आत्ता T-१ नं पाचव्यांदा बच्चांना जन्म दिला आहे. त्यामुळे त्यांची नावं ठेवण्यात आली आहेत P१५१ आणि P१५२, तसंच T-२ च्या बच्च्यांना नावं दिली आहेत P२११, P२१२ अशी.

माझ्या मते वाघांना ‘सोनम’, ‘माया’, ‘गब्बर’, ‘जय’ अशी नावं देणं हे त्या वाघांभोवती प्रसिद्धीचं वलय निर्माण करतं. हे असं करणं एकूणच वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून तारकही आहे आणि तितकंच मारकही. जंगलातल्या प्रत्येक वाघाला सारखंच; पण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या वेगळ्या नावांनी हे वाघ प्रसिद्ध झाले की त्या भागातलं पर्यटन त्या वाघांभोवती केंद्रित होतं आणि मग काही अत्युत्साही पर्यटकांमुळे या सगळ्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. मला वाटतं, पन्ना व्याघ्रप्रकल्पाच्या प्रशासनानं ही आगळीवेगळी पद्धत रूढ केली आणि इथं गाईड म्हणून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक वाघाची ओळख याच नावानं लोकांना करून दिली. प्रशासन आणि गाईड या दोघांनीही हा एक आदर्शच इतर व्याघ्रप्रकल्पांसमोर ठेवला आहे.      

‘कर्णावती’ ही नदी म्हणजे इथं वास्तव्याला असणाऱ्या अनेक जीवांची जीवनवाहिनी. अत्यंत शुद्ध असणारा तिचा प्रवाह ‘पन्ना’च्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. पन्ना राष्ट्रीय उद्यान, गंगाऊ अभयारण्य आणि केन-घडियाल अभयारण्य यांच्या एकत्रीकरणातून ‘पन्ना’ व्याघ्रप्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘पन्ना’चा भूभाग अनेक छोट्या-मोठ्या नद्या, असंख्य छोटे जलप्रवाह, गवताळ भाग, डोंगररांगा आणि नैसर्गिकरीत्या बनलेल्या अवाढव्य घळी यांनी तयार झालेला आहे. इथल्या जैवविविधतेत भर टाकणाऱ्या सात प्रकारच्या गिधाडांच्या वास्तव्याचं ठिकाण असलेली ‘धुंधवा सेहा’ ही घळ म्हणजे इथल्या जंगलाच्या उत्पत्तीच्या वेळी झालेल्या हालचालींचा उत्कृष्ट नमुना होय. 

या लेखाच्या निमित्तानं मी आज गतकाळाचं सिंहावलोकन केलं. ‘० ते सुमारे ४५ वाघ’ असा यशस्वी टप्पा गाठणारा प्रवास अनेक लोकांच्या प्रयत्नांच्या परिसीमेचं फलित आहे. या व्याघ्रप्रकल्पाच्या या ‘टिकवल्या’ गेलेल्या वैभवाला आणखी एक धोका काळ बनून उभा आहे व तो म्हणजे केन-बेतवा नदीजोड प्रकल्प. केन म्हणजेच कर्णावती. कर्णावती आणि बेतवा या दोन नद्यांना जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे संपूर्ण मडला गाव आणि जंगलाचा खूप मोठा भूभाग पाण्याखाली जाणार आहे. हा धोका परतवून लावण्यासाठी मूर्ती यांच्यासारखा एखादा ‘भगीरथ’ पुन्हा एकदा उभा राहील आणि जंगलाचं हे सौंदर्य अबाधित ठेवण्याचं; किंबहुना ते वाढवण्याचं ‘शिवधनुष्य’ तो लीलया पेलेल याची मला खात्री आहे!

कसे जाल 
पुणे-मुंबई-जबलपूर-पन्ना/पुणे-मुंबई-सतना-पन्ना.  
भेट देण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते मे.
काय पाहू शकाल  
सस्तन प्राणी : बिबट्या, कोल्हा, खोकड, तरस, अस्वल, चिंकारा, चौशिंगा, नीलगाय चितळ, सांबर, भेकर, वाघ आदी.
पक्षी : तुरेबाज व्याध, शिक्रा, मोहोळघार, कापशी घार, मत्स्यघुबड, कंठेरी शिंगळा घुबड, गव्हाणी घुबड, ठिपकेदार पिंगळा, मत्स्यगरुड, कोतवाल, कुरटुक, गिधाडं आदी.
सरपटणारे प्राणी : मगर, कासव, अजगर, धामण, कवड्या, कुकरी, गवत्या, पाणदिवड, नानेटी, नाग, फुरसे, मण्यार, घोणस आदी.
भेट देण्यायोग्य जवळची ठिकाणं : पांडव फॉल, रणेह फॉल, केन घडियाल अभयारण्य, खजुराहो मंदिरं.  

(शब्दांकन : ओंकार बापट)

तुवालू... जगा‘वेगळा’ देश!

 

‘एक दिवस आम्ही अदृश्य होऊन जाऊ...’ तुवालू (Tuvalu) देशाचे नागरिक गेली काही वर्षं असं म्हणतायत. तिथला समुद्र सर्व वाळू खाऊन टाकत आहे. पूर्वी तिथं वाळू लांब लांब पसरली जायची आणि लोकांना तिथं प्रवाळ स्पष्टपणे दिसायचं. आता तिथं सतत ढगाळ वातावरण असतं आणि प्रवाळही नष्टप्राय झालं आहे. तुवालू बुडत आहे...

एखादा देश बुडत आहे...हे वाचून भीतिदायक वाटतं ना? पण खरंच तुवालू बुडत आहे!  तुवालू या देशाला आजवर खूप कमी जणांनी भेट दिली आहे. खूप कमी पर्यटकांचे पाय तुवालूला लागले आहेत. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टूरिझम’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरातून केवळ दोन हजार लोक तुवालूला भेट देतात. ‘फेसबुक’वरच्या माहितीनुसार, केवळ १० हजार लोकांनी तिथं ‘चेक इन्’ केलंय. ‘The least visited place or country on Earth,’ असंही तुवालूचं वर्णन केलं जातं.

प्रत्येक देशाचे व देशातल्या लोकांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न वेगळे असतात. जगभरातल्या विविध लोकांचे वैयक्तिक प्रश्न तर आणखीच भिन्न भिन्न आहेत. या सर्व प्रश्नांची एकमेकांशी तुलना आपण करू शकत नाही. कारण, भौगोलिक, ऐतिहासिक, पारंपरिक, सामाजिक रचना वेगवेगळ्या आहेत; परंतु ‘आपलेच प्रश्न मोठे’ असं काही आपण समजता कामा नये. आयुष्य जगताना आपण सहज म्हणून इतरांच्या प्रश्नांकडेही पाहायला शिकलं पाहिजे. त्या प्रश्नांची तीव्रता आपल्याला संपूर्णपणे लक्षात नाही येणार कदाचित; पण त्यांचा निदान अंदाज तरी येऊ शकतो आणि मग आपलाही आपल्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या अर्थानं बदलत जातो. मग उत्तरंदेखील सापडत जातात आणि त्या प्रश्नांकडेही आपण वास्तववादी दृष्टीनं पाहू लागतो. 

तुवालू हा दक्षिण पॅसिफिकमधला नऊ लहान बेटांचा समूह आहे. या देशाचे प्रश्नच जगावेगळे आहेत. तिथल्या नागरिकांना देशाचं आणि पर्यायानं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागत आहे. या देशाचे प्रश्न किती गंभीर आहेत याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. 

सन १९७८ मध्ये तुवालू ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पूर्वी या देशाची ओळख ‘एलिस आयलंड्‌स’ अशी होती. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडे फिजी देश असून फिजीच्या उत्तरेला तुवालू हा देश आहे. फुनाफुटी ही तुवालूची राजधानी आहे. तुवालूंच्या नागरिकांची भाषा आहे तुवालूअन. ‘गूगल मॅप्स’वर पाहिलं तर हा देश दिसत नाहीच; परंतु नावानं शोध घेतल्यास लगेच सापडतो. गूगलवर हा देश खूपच कमी लोकांनी ‘सर्च’ केला असेल.  तुवालू देश अतिशय छोटा असून त्याचं क्षेत्रफळ २६ स्क्वेअर किलोमीटर आहे.  इथं कुठंही उभं राहिलं की दोन्ही बाजूंचा समुद्र दिसतो. गाडीवरून चक्कर मारायची म्हटलं तर हा देश अवघ्या नऊ किलोमीटरचाच आहे. अर्ध्या-पाऊण तासात संपूर्ण देशभर चक्कर मारता येते!

‘येत्या काही वर्षांत तुवालू देश ग्लोबल वॉर्मिंगमुळे नाहीसा होऊ शकतो,’ अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानं सन १९८९ मध्येच दिला आहे. ‘वातावरणातले बदल/ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुवालूची पूर्णपणे वाट लागली आहे, म्हणून तुवालू बुडत आहे,’ असं म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून साधारणत: सरासरी दोन मीटर इतकं या देशाचं अंतर आहे आणि सध्याच्या वेगानं महासागराच्या वाढीचा अंदाज घेतला तर पुढच्या ३० ते ५० वर्षांत हा देश अदृश्य होऊ शकतो असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘टाईमलेस तुवालू’ अशीही या देशाची एक ओळख आहे.  तुवालूला कुठल्या भारतीय प्रवाशानं आजवर भेट दिली आहे किंवा कसं याचा शोध मी घेत आहे. या देशाबद्दल कुणाला काही माहिती मिळाली तर ती इतर लोकांपर्यंत पोहोचायला हवी. एखादा देश, एखादं ठिकाण प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव वेगळेच असतात. त्या संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतचे किस्से ऐकण्याचा आनंद वेगळाच.

या जगात तब्बल १९६ देश आहेत. यांपैकी किती देशांत मी जाऊ शकेन माहीत नाही; परंतु जमलंच तर तुवालूला मी नक्कीच जाईन. तिथं जायला विमानखर्च खूपच येईल हे खरं आहे; पण मी ‘बजेट ट्रॅव्हल’ नक्कीच करू शकतो यात शंका नाही. तुवालू बुडेल की नाही हे येणारा काळच ठरवेल; पण दुर्दैवानं तसं घडलंच तर ते घडण्यापूर्वी तिथं जाऊन यायलाच हवं. ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी हे करावं. कारण, असे स्वर्गीय सौंदर्याचे देश पाहण्याची संधी पुनःपुन्हा येत नसते. तर मग, बघू या... जाऊ या कधीतरी तुवालूमध्ये...स्वप्न पाहायला काय हरकत आहे? त्यातूनच तर ‘जिंदगी वसूल’ करण्याची ऊर्जा मिळत असते!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

'बजेट ट्रॅव्हल' म्हणजे नेमकं काय?

 प्रवास किंवा पर्यटन म्हटलं की देव-धर्म, मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशीद असं सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. ‘आयुष्यात अमुक मंदिराला किंवा तमुक दर्ग्याला भेट दिलीच पाहिजे,’ असं आपण ठरवतो व तसं काही प्रमाणात करतोही. मात्र, पर्यटन म्हणजे फक्त तेवढंच असं अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारचा आणि ठिकाणचा प्रवास माणसाला समृद्ध करतो हे आपण जसजसा जास्त प्रवास करत जातो तसतसं उलगडत जातं. त्यामुळे धार्मिक स्थळांव्यतिरिक्तही आपण भटकलं पाहिजे असं ठरवा आणि मग बघा, किती वेगळी मजा येते ते! अशा पर्यटनानंतर आपण नक्कीच जगाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. वयाच्या हिशेबानं आपण जितक्या लवकर जग फिरायला बाहेर पडू तितके आपण बहरत जाऊ, फुलत जाऊ अन् समृद्ध होऊ... 

मी ‘बजेट ट्रॅव्हल’ करतो; जेणेकरून शंभरहून अधिक देश मला फिरता यावेत. मात्र, ‘बजेट ट्रॅव्हल’ म्हणजे नेमकं काय? ते कुणालाही जमू शकतं का? ते कसं करता येतं? फिरायचं तर आहे; पण त्याला खूप पैसे लागतात अशी ‘मिथकं’ आपल्या मनात तयार झालेली असतात, ती एकदम बाजूला सारा आणि स्वत:ला ठणकावून सांगा...होय, मीही ‘बजेट ट्रॅव्हल’ करू शकतो...!

मित्रांनो, कुठंही प्रवास करताना तीन गोष्टींसाठीचा खर्च सर्वात जास्त असतो.  पहिली गोष्ट म्हणजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवासखर्च (Transportation), दुसरी बाब म्हणजे, राहणं/निवास (Accommodation) आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तिथलं खाणं-पिणं (Food & Beverages). 

आता यापैकी जर आपण विमानप्रवासाची तिकिटं तीन महिने आधीच आरक्षित केली तर प्रवासखर्च फारच स्वस्त पडतो. राहण्याच्या सोईबाबत सांगायचं तर, होस्टेल, Couch surfing, Airbnb किंवा अन्य काही वेबसाईट्‌सवर जाऊन रिसर्च करून आरक्षण केलं तर बऱ्याच ऑफर्सही मिळतात. 

आता खाणं- पिणं.  हे जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक पातळीवरचंच करायचं. हे सगळं केल्यानं पैसेही वाचतात व नवनवे अनुभवही येतात. असं केलंत की झालात तुम्हीही ‘बजेट ट्रॅव्हलर’! 

आपण एका ठरावीक काळानंतर आयते कपडे घालणं बंद करतो व आपल्याला हवे तसे कपडे शिवून घेतो. प्रवासाबाबतही तसंच आहे. आपणही आपला प्रवास कधी तरी स्वत: क्युरेट, क्राफ्ट अन् कस्टमाईझ (Curate, Craft & Customise) करू या ना...म्हणून मी अशा संकल्पनेला नाव दिलं आहे : ‘डू इट युवरसेल्फ’!

एक किस्सा सांगतो. सन २०१९ च्या ऑगस्टमध्ये आपण कुठं तरी परदेशात असायला हवं असं मी ठरवलं. निमित्त काय होतं? तर मी माझा जन्मदिवस कधीच परदेशात साजरा केला नव्हता. आता मला ते करायचं होतं. पंचविशी आली तरी आपण हे करू शकलो नाही ही खंत माझ्या मनात होती. तर ऑगस्टच्या आधी तीन महिने, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, मी लॅपटॉप घेऊन माझ्या दोन-तीन मित्रांबरोबर मध्यरात्रीपर्यंत पुण्यात एका हॉटेलात बसलो होतो. ‘ज्या देशाचं विमानतिकीट स्वस्त, तो देश फिरायला जायचं,’ असा माझा सिम्पल फंडा होता. सिंगापूर-मलेशिया या दोन देशांचा विमानप्रवास अवघ्या १६ हजार रुपयांत होतोय हे त्यात मला दिसलं. क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेऊन मी चार फ्लाईट्सचं आरक्षण करून टाकलं. मी हे करत असताना हॉटेलात माझ्याबरोबर असलेला मित्र चिन्मय यालाही परदेशवारी करण्याची इच्छा झाली अन् त्यानंही माझ्याबरोबर येण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतला. थोड्या दिवसांनी आम्ही दोघं आपापला जन्मदिवस साजरा करण्यासाठी सिंगापूर-मलेशियाला जातोय हे दुसरे दोन मित्र - सागर आणि सुमित -  यांना कळलं, तर त्यांनी आमच्याशी वाद घातला. ते म्हणाले : ‘‘आम्हाला का नाही विचारलंत?’’ मग त्या दोघांनीही विमानतिकिटं आरक्षित केली. ‘More the merrier,’ असं काहीसं आमचं झालं व आम्ही मध्यमवर्गीय चार मित्र या दोन देशांच्या परदेशवारीसाठी सज्ज झालो. एकाचा जन्मदिवस सिंगापूरमध्ये, तर दुसऱ्याचा मलेशियामध्ये! सिंगापूरचा व्हिसा एका व्हिसा एजन्सीकडून करून घेतला; पण मलेशियाचा व्हिसा आम्ही आमचा स्वत: केला. दोन्ही व्हिसांचा खर्च प्रत्येकी फक्त चार हजार ५८५ रुपये एवढा आला. एकंदर खर्चापैकी मोठ्या खर्चाचा विषय हा असा मार्गी लागला. आता राहणं, खाणं-पिणं व तिथं फिरणं या खर्चाविषयी विचार करायचा होता. दहा दिवसांचा प्लॅन ठरला अन् मग पुन्हा एक-दोन दिवस नीट रिसर्च करून राहण्यासाठी विविध ठिकाणांसाठी Airbnb वर आरक्षण केलं. हे आरक्षण करताना, जिथं आमचा आम्हाला स्वयंपाक करता येण्याची सोय असेल अशीच ठिकाणं निवडून त्यांचं आरक्षण केलं. 

एका पर्यटकाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर भारतात राहणं (Aaccommodation) खर्चाच्या दृष्टीनं परवडणारं नसतं. इतर काही देशांत एका रात्रीच्या मुक्कामासाठी सरासरी आठशे ते हजार रुपयांचा खर्च येतो. सिंगापूरला पाच दिवस व चार रात्री राहण्याचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३२२ इतका आला, तर मलेशियात चार दिवस व तीन रात्रींचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३६६ इतका आला. आम्ही चौघांचा ग्रुप असल्यामुळे हा निवासखर्चही स्वस्तात पडला. 

एक रात्र सिंगापूर ते क्वालालंपूर, मलेशिया असा बसप्रवास आम्ही ९५० रुपयांत केला. त्यामुळे एका रात्रीचा राहण्याचा खर्चदेखील वाचला. स्वयंपाकासाठी जेमतेम किरणासामान आम्ही इथूनच नेलं होतं. सागर-सुमितनं स्वयंपाक केला आणि मी-चिन्मयनं भांडी घासली. गंमत म्हणजे, प्रत्येकानं ‘टूर लीडर’ म्हणून एकेक दिवस जबाबदारी घ्यायची असं ठरवलं आणि तसं केलं. विशिष्ट बजेटमध्ये जो तो दिवस पार पाडायचा असा नियम केला होता, त्यामुळे अंतर्गत प्रवास, खाण-पिणं व पर्यटनस्थळांच्या तिकिटांचा दहा दिवसांचा प्रत्येकी खर्च  २० हजार ४८६ इतकाच आला. संपूर्ण सिंगापूर व मलेशियातल्या क्वालालंपूर, जॉर्जटाऊन आणि लांकावी आयलंड या ठिकाणी आम्ही फिरलो. काही तडजोडीही कराव्या लागल्या. नाही असं नाही. आम्ही १० दिवसांत जवळपास ८० किलोमीटर पायी चाललो, मेट्रोचाही वापर केला. रात्रभर फिरत राहिलो, स्थानिक खाद्यपदार्थ चाखले, काही ठिकाणी कहर केला अन् काही ठिकाणी स्वयंपाकही केला! असे १० दिवस आम्ही चार वेळा विमानप्रवास, दोन देश पूर्णपणे भ्रमंती करून प्रत्येकी एकूण ४८ हजार ७०९ रुपयांमध्ये वसूल केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

थोडक्यात काय तर, आम्ही ‘बजेट ट्रिप’करून आमची ‘जिंदगी वसूल’ केली. 
तर मग, तुम्हीही करणार ना ‘बजेट ट्रॅव्हल’? कधी करताय सुरुवात...?

लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...