Friday, June 19, 2026

राजस्थान ट्रिप

 

तयारी, भाग १

लेखकजेडीयांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले.

राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची तिकीट काढून ती काही कारणाने रद्द करावी लागली होती. म्हणून यावेळी विमानाने प्रवास करायचा ठरला. डिसेंबरमध्ये जाण्यासाठी चांगली वेळ असते, असे गुगलने सांगितले होते, त्यामुळे डिसेंबर मध्ये जायचे ठरले. त्यासाठी अगदी चार महिने आधीपासून तयारी सुरू झाली.
आम्ही सात जण जाणार होतो. पैकी सहा जण पुण्यातून आणि एक जण गुडगावमध्ये जॉईन करणार होते. आम्ही सप्टेंबरमध्येच जाण्याची 'एअर इंडिया' आणि परतीची इंडिगोची विमान तिकीट बुक केली. “हे पाहू, ते पण पाहू” करत करत अखेर १४ दिवसांची ट्रिप ठरली. “परत कधी येणार आहे, आताच पाहू” असे म्हणत आम्ही हा भारी-भक्कम प्लॅन आखला.
नुसती तीन महिने आधी तिकीट बुक करून आम्ही खुश होतो, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा हॉटेल बुक करायला लागलो, तेव्हा हॉटेल्सचे दर तिप्पट वाढलेले दिसले. जवळपास दोन महिने हॉटेल्स, Airbnb शोधणे, काय पाहायचे त्याची यादी करणे सुरू होते.
आमचे दादा-वहिनी परत इकडे येतील याची शक्यता खूप कमी असल्यामुळे ताजमहाल पाहायचे ठरवले. तीनदा दिल्लीला जाऊनही संसद भवन पाहायचे राहून गेले होते, म्हणून तेही कव्हर करायचे होते. कोण तिकडे फिरायला गेले आहे, काय चांगले आहे यावर ऑफिसमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये चर्चा झाल्या. भरपूर व्हिडिओ पाहिले.
“एअर इंडिया चे तिकीट कशाला काढलेस?” म्हणून मला प्रत्येकाने सुनावले, पण नंतर इंडिगोचा गोंधळ पाहून मी स्वतःला नशीबवान समजले.
जातेवेळीची फ्लाइट सकाळी साडेसहाला होती आणि साडेआठला पोहोचणार होती. दिवसभर आम्ही दिल्लीमध्ये जे पाहता येईल ते पाहून दुसऱ्या दिवशी आग्र्याला मुक्कामाला जाणार होतो. पण अचानक एअर इंडियाकडून फ्लाइट कॅन्सल झाल्याचा मेसेज आला. त्यांनी दोन ऑप्शन दिले – रि- शेड्यूल करा नाहीतर रिफंड घ्या. आम्ही आधीच हॉटेल बुक केली होती, त्यामुळे दिलेल्या दोन ऑप्शनपैकी एक आम्ही रीश्येडूलचा पर्याय निवडला.आमच्या पैकी दोन जण पहिल्यांदाच विमानप्रवास करणार होते, त्यामुळे त्यांना विमानातून खाली शहर दिसावे म्हणून तीन विंडो सीट मिळतील अशा पद्धतीने सहा सीट बुक केल्या, होत्या. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजले होते पण फ्लाइट कॅन्सल झाल्यावर दुसरी निवड करताना सीटबद्दल विचारायचे आम्ही पूर्णपणे विसरलो.
जेव्हा बोर्डिंग पास हातात आले, तेव्हा शेवटच्या ओळीतल्या सहा सीट आम्हाला मिळाल्या होत्या. त्यात विंडो शेजारी बसलेल्यांना नुसता विमानाचा पत्राच दिसत होता. आम्ही सगळे एकाच ओळीत बसलो होतो. रात्रीची वेळ असल्याने सगळे विमानात झोपले. दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यावर मात्र थंडीत अक्षरशः गारठून गेलो.
आधीच्या वेळेनुसार आम्ही दिल्लीला पोहोचून संसद भवन, इंडिया गेट पाहून रात्री आग्र्याला जाणार होतो. पण वेळ बदलल्यामुळे “दिल्लीला पोहोचल्यानंतर काय करायचे ते तिथे ठरवू” असे ठरवले आणि थेट वृंदावनला जायला निघालो. दादा-वहिनींना वृंदावनातील बांके बिहारी आणि मथुरेतील कृष्ण जन्मभूमी पाहायचे होते, म्हणून त्याप्रमाणे जायचे ठरवले.
पूर्ण पंधरा दिवसांत रोज काय पाहायचे, एका दिवसात किती स्थळे पाहायची, सगळे नाही जमले तर काय सोडायचे—याचे पूर्ण नियोजन केले होते. त्यासाठी गुगल शीटवर तारखेनुसार आणि वेळेनुसार स्थळे, हॉटेल्स, प्रवासाची वेळ अशी सगळी माहिती भरली होती.
हॉटेल बुक करणे हे एक दिव्यच होते. रेटिंग, बजेट, रिव्ह्यू, तारखा जुळवणे—सगळेच कठीण होते. प्रत्येक ठिकाणी फोन करून विचारायचो की सात लोकांना दोन रूम मिळतील का, आम्ही निवांत झोपू शकू का, आणि २४ तास गरम पाणी मिळेल का. बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स तीन रूम घ्या असे सांगत होते, पण त्यामुळे बजेट खूप वाढणार होते. पुन्हा फोन, पुन्हा तेच प्रश्न—असेच जवळपास दोन महिने चालले.
शेवटी आम्ही तीन ठिकाणी होम स्टे, तीन ठिकाणी हॉटेल आणि वाळवंटात सॅंड ड्युन कॅम्प बुक केला.

ठिकाण हॉटेल / होम स्टे कालावधी आमची रेटिंग
ब्रज निवास हॉटेल (फक्त फ्रेश होण्यासाठी) २ तास ⭐⭐⭐
आग्रा गोयल पॅलेस १ दिवस ⭐
जयपूर लीला होम स्टे ३ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
उदयपूर घराना Airbnb २ दिवस ⭐⭐⭐
जोधपूर हॉटेल स्टार इन २ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज २ दिवस ⭐⭐⭐
सॅंड ड्युन प्रिन्स डेजर्ट कॅम्प १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
जैसलमेर राठोड हेरिटेज १ दिवस ⭐⭐⭐
दिल्ली होम स्टे, ग्रेटर कैलाश १ दिवस ⭐⭐⭐⭐⭐
आणखी बरीच तयारी केली—उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ, बॅगांचे वजन, किती बॅगा घ्यायच्या, औषधे इत्यादी.
सर्वात महत्त्वाची तयारी होती ती दिल्लीपासून परत दिल्लीला येईपर्यंत फिरण्यासाठी कॅबची. आम्ही इनोव्हा क्रिस्टा बुक केली. जरी आम्ही सात जण असलो, तरी त्यात १२ वर्षांवरील दोन मुले होती, त्यामुळे कॅरियर असलेली कॅबच घेतली. ही कॅब आम्ही गुगलवर शोधली होती आणि त्यांनी खरंच अफलातून सर्व्हिस दिली. कोणी विचारले तर मी नक्की डिटेल्स देईन.
सर्वात महत्त्वाची तयारी बॅगांची होती. त्या कॅरियरवर मावतील अशाच घ्यायच्या होत्या आणि फक्त चारच बॅगा घ्यायच्या ठरवल्या. त्यात एक तीन-बॅगांचा सेट आणि एक मिडियम साईज बॅग घेतली.
बरंचसं खाण्याचं सामान, मास्क, मेकअप साहित्य, मॅगी, चहा, साखर इत्यादी आमच्या गुडगावच्या मेंबरने आणले.

पुढील सर्व ट्रिपचे रोमहर्षक अनुभव घेण्यासाठी आणि राजस्थान का पहायचे होते हे वाचण्यासाठी भेटूया पुढच्या भागात...


डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आम्ही दिल्ली एअरपोर्टवर पहाटे ५ वाजता पोहचलो. फ्रेश होऊन कॅब ज्यांची होती त्या प्रदीप भाईंना फोन केला , त्यांनी आमच्या बरोबर येणाऱ्या ड्राइव्हरचा फोन नंबर शेअर केला होता. त्यांनाही फोन केला. त्यांनी १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि पोहचलेसुद्धा. बॅगा कॅरीअरवर चढवून आम्ही वृंदावनला निघालो. जाताना आमच्या गुडगावच्या मेंबरला घेतले. तिने खाण्याचे पदार्थ, साखर, पावडर, कॉफी, मॅगी , शॅंपू, साबण असे सामान आणले होते. ते डिकीत चढवले . यमुना एक्सप्रेस वे वरून आम्ही वृंदावनला निघालो.
डिसेंबरमध्ये दिल्ली भागात प्रचंड धुके असते. खरेतर रात्रभर जागुन प्रचंड झोप आली होती तरीही समोरची धुके पाहुन गाळण उडाली. वेग अत्यंत कमी होता. मधुनच कोठे ट्रक आडवा येतोय, गाडी येतीय, अगदी समोर आली आणि ड्रायव्हर ने ब्रेक मारल्यावर काही समोर आहे याचा पत्ता लागायचा. अजूनच घाबरायला होत होते. सकाळी ९-९ः३० वाजले तरी धुके होतेच. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर मात्र भितीचा लवलेश नव्हता. हिटर लावुन ते निवांत गाडी चालवत होते.
१०ः३० च्या दरम्यान आम्ही वृंदावनात पोहचलो. प्रचंड थंडी, स्वेटर, शाल , कानटोपी , शुज, मोजे घालुन बसलेले तरीही थंडी वाजतच होती. ब्रजनिवास या हॅाटेल ला आम्ही फोन केला, फक्त फ्रेश व्हायचे होते, सातमधल्या दोन जणांनी फक्त अंघोळ केली कारण पाणी गरम होत नव्हते. वृंदावन मथुरा येतील सर्व मंदिरे सकाळी ८-९ वाजता चालु होवून दुपारी बारा/एक वाजता बंद होतात. दुपारी ४ वाजता पुन्हा उघडून रात्री ८-९ ला बंद होतात. आम्ही फक्त बाके बिहारी मंदीर आणि निधी वन पाहणार होतो. दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग असते. लोक मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर जी प्रसाद, फुलं वैगेरे साठी जी दुकान होती त्यांच्याकडे चप्पल, शूज ठेवतात. अतिशय अरुंद गल्ल्या , त्यामुळे गाडी आपल्याला कोठेतरी लांब अंतरावर सोडते. तिथुन पुढे ई- रिक्षा आपल्याला मंदिराच्या जवळच्या गल्लीत सोडतात. सातही जणांना एका रिक्षात कोंबून आम्ही जवळपास च्या गल्लीत पोहचलो . २०० रुपये घेतले. तिथुन पुढे लोक पळत आहेत तिकडे पळायचे. वृंदावनात माकडे चष्मा, गॉगल पळवतात त्यामुळे तो गाडीतच ठेवुन जायचा पण मुलं ऐकत नसतात. आम्ही पर्स मध्ये ठेवतो म्हणुन घेतलाच. कानात वारे भरते त्यांच्या, त्यामुळे आपण काही सांगितले तरी ते ऐकत नसतात.

प्रचंड गर्दी , उघडी गटारे, खच्च भरलेले रस्ते. फुल प्रसादाची दुकाने, मुंग्यासारखी माणसं…
जय कन्हैया लाल की , हाथी घोडा पालखी .
राधे राधे , राधे राधे..ने सर्व परिसर नुसता दुमदुमत असतो . जयघोष सुरु असतो . भक्त टाळ्या वाजवत असतात. भजन म्हणत असतात.
बाके बिहारी मंदिराच्या दर्शन रांगेत आम्ही उभे राहयलो. अंतराळीच मंदिरात पोहचलो. गर्भग्रुहाचा पडदा उघडत होता . झाकत होता. फुलांची परडी , हार देण्यासाठी देणगी मागत होते नाहीतर तो हार त्या हारांच्या ढिगाऱ्यात फेकायचे आणि अंतराळीच दुसरीकडे कोठेतरी बाहेर पडायचे . परत चप्पल, शूज मिळवण्यासाठी गल्ली शोधायची, मग आपल्या चपला बुटे त्या ढिगातुन शोधायचे. नशीब असेल तर दोन्ही वेळेवर मिळतात अन्यथा दुसरी चप्पल बुट शोधायला अर्धा तास पक्का.
मागे एकदा आम्ही आणि आमची मुलगी असे आम्ही वृंदावन ला गेलो होतो. २-३ तास रांगेत उभे राहिल्यावर माझी मुलगी मी आता रांगेत थांबणार नाही म्हणाली. प्रचंड पाय दुखत होते पण तिला तसेच समजावून सांगत होते तोवर एक मोठा सांड गर्दीत घुसला. लोक त्याची शेपटी पिरगाळत होते. उधळला तर काय होईल? 40-50 तरी नक्की मरतील अशी परिस्थिती होती पण लोक तरीही त्याला चुचकारत होते. मग मात्र माझी मुलगी रांग सोडुन मागे जायला लागली. सर्व लोक आम्हाला दर्शन न घेता चाललो म्हणुन काहीही बोलत होते. शेवटी आम्ही त्या दिवशी दर्शन घेतले नाही. मथुरा आग्रा पाहुन तिसऱ्या दिवशी सकाळी मी एकटीने दर्शन घेतले.
असो , हे अवांतर सांगितले आणि त्याला कारण पणतसेच आहे. यावेळी मुलीने दर्शन रांगेत उभा राहण्यास किरकिर केली नाही. कारण मुलीच्या ॲाफिसमधले तिला म्हणाले होते,
“बाके बिहारी का बुलावा आता है, ऐसेही नही जाता कोई वृंदावन”
बाके बिहारी दर्शन करुन आम्ही निधी वनात गेलो. भगवान कृष्ण तिथे रासलीला रचतात. रात्री तिथे कोणीही जात नाही नाहीतर आंधळे होतं अशी आख्यायिका आहे. पुर्ण जाळीने पॅक केलेल्या तुळशीच्या वनातून आमचे एक एक पाऊल पुढे पडत होते. भजन म्हणत होते, फुलांच्या परड्या सावरत त्यातुन मार्ग काढत होते.
राधे राधे राधे राधे
परिसर नुसता दुमदुमून गेला होता. त्यातही जाळीवरुन माकडे उड्या मारत होती. एका छोट्याशा मंदिरात कृष्णाची सेज रात्री सजवतात आणि सकाळी ती अस्ताव्यस्त होत असते अशीही आख्यायिका आहे.
लोक राधाराणीला साज शृंगार पेटी चढवत होते, बांगड्या, कुंकु पावडर, अत्तर, साडी असे त्या पेटीत असते, काही लोक दक्षिणा देतात.
माझी मुलगी गर्दीतुन वाट काढत तिच्या चुलत बहिणीला घेवुन वाट काढत पुढे जात जिथे थोडी रिकामी जागा आहे तिथे जाळीला पाट टेकून उभी राहिली. त्या जाळीजवळ येऊन माकडाने तिचा चष्मा एवढ्या छोट्या जाळीतुन ओढला , लोकांनी जवळचे लाडू, प्रसाद दिले त्या जाळीतुनच पण माकडाने लाडू खाल्ले पण चष्मा काही दिला नाही. तिने ५ हजार खर्चून तो लेन्सकार्ट मधुन दोनच दिवसांपूर्वीच घेतला होता. मी तिच्यावर चष्मा का घातलास म्हणून आणि ती माझ्यावर तु ह्या निधी वनात कशाला घेवुन आलीस म्हणुन करवादत होती.
सगळा मुड गेलेला, भुक लागलेली. आम्ही गुगलवर रेटिंग पाहुन एक हॅाटेल निवडले. रिक्षा वाल्यांना तिथे पोहोचायला सांगत होतो पण कोणालाही ते कोठे आहे माहीत नव्हते. शेवटी एक रिक्षावाला म्हणाला, “कहासे ढुंढा है, ब्रजवासी में जाओ!”
आम्ही तिथे गेलो, जेवण खुप छान होते. सेल्फ सर्व्हीस आहे. जेवुन बाहेर येवुन आमच्या गाडीची वाट पाहत होतो तोवर तिथे आलेल्या अजुन एकाचा चष्मा (आमच्यापैकी नाही )माकडाने पळवला. मुलीने परत मला वृंदावनात आल्याबद्दल सुनावले.

नंतर आम्ही मथुरेला गेलो , कृष्णजन्मभुमी पाहिली, माझी मुलगी तिथेही आत आली नाही. रात्री आम्ही आग्र्यात मुक्कामी पोहचलो. तिथले गोयल पॅलेस नावाचे हॅाटेल आम्ही बुक केले होते. प्रचंड थंडीमुळे सर्व ठिकाणी छोट्या छोट्या कोळशाच्या शेगड्या पेटलेल्या होत्या. आमची रुम तिसऱ्या मजल्यावर होती, लिफ्ट नव्हती, बॅग वर चढवायला कोणीही हेल्पर नव्हता. हॅाटेल बुक करताना तो माणूस प्रचंड गोड बोलत होता. ऐनवेळी हॅाटेल चेंज करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी पीक सिजन असल्याने दर अतिशय महाग होते आणि बुकिंग फुल होते.गरम पाणी सकाळीच मिळणार होते, एक्सटेंशन फोन चालत नव्हते. अतिशय थंड पाण्याने फ्रेश झालो. जेवायला त्यांच्याच दुसऱ्या जवळच्या हॉटेल मध्ये गेलो. अतिशय घाणेरडे जेवण.. जाता जात नव्हते.
सकाळी अंघोळ करुन आम्ही बॅगा कॅरीअर वर चढवल्या. रस्त्यात देवीराम स्विटस् मध्ये आम्ही बेडई पुरी , जिलबीवर ताव मारला. सकाळी सकाळी प्रचंड गर्दी होती.चव अप्रतिम होती. नाश्ता करुन आम्ही ताजमहाल पाहायला गेलो.

गाडी पार्किंग पासून पुढे १ ते १.५ किलोमीटर चालत जावे लागते. तिथे असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्ट मधुन ताजमहालला पोहोचलो. गाडी पार्क करेपर्यंत हजार लोकं विचारायला येतात, गाईड आणि गाडी साठी पण तिथुन सरळ पुढे गेल्यावर सरकारी कार्ट असतात, त्यांचा रेटही २० रुपये पर पर्सन असतो. आरामात पोहचलो. तिकीट ॲानलाईन काढले होते. प्रचंड गर्दी,आत जाण्यासाठी भरपूर गेटस्, चेकिंग. पाणी नेता येत पण खाण्यासाठी काहीही नेता येत नाही. कडक चेकि्ग करतात. आत गेलो पण ताजमहाल धुक्यात हरवला होता. इतकी गर्दी असुनही आत आल्यावर ती गर्दी ताजमहालात सामावली आणि तरीही भरपूर रिकामी जागा होती इतका मोठा परिसर आहे. शू कवर घालून आपल्याला मुख्य इमारती मध्ये प्रवेश मिळतो. वर जाण्याचे वेगळे तिकीट आहे, आत ताजमहाल , म्युझियम आणि मशिद आहे , सुंदर बाग आहे. ऊन अजिबात नव्हते, सकाळच्या वेळी ताजमहाल अतिशय सुंदर दिसतो. तो एक अनुभव आहे.

ताजमहाल पाहुन आम्ही आग्रा फोर्ट पाहिला, शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याच्या फोर्ट समोर आहे. मन भरून येते तो पुतळा पाहुन. इथे गाईड आवर्जून घ्यावा , छान माहिती सांगतात, छान फोटो काढतात.

फोर्ट पाहुन आम्ही जयपूर ला निघालो. रात्री ९.३० च्या दरम्यान आम्ही जयपूरला पोहचलो.

इथुन पुढे राजस्थान ट्रिप चालु.. त्याविषयी तिसऱ्या भागात…


रात्री ९:३० च्या दरम्यान आम्ही लीला होम स्टे ला पोहचलो. अतिशय चांगले एअर बी ॲंन्ड बी आहे. शहराच्या थोडे बाहेर आहे पण आमच्याकडे गाडी होती त्यामुळे काही फरक पडला नाही. त्या रात्री आम्ही बाहेरून झोमॅटावरुन काही बाही मागवले. तिथे बिसलरी पाणी बॅाटल्स, चहा पावडर,  कॅाफी एनर्जी ड्रिंक्स, भांडी असे बरेच साहित्य होते. ३ बेडरूम, मोठा हॅाल, टिव्ही, गिझर असे बरेच साहित्य होते. त्यामुळे इथला स्टे खूपच सुखकर होता.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून आवरले आणि सकाळी साडेआठच्या दरम्यान हवामहालाजवळ पोहचलो. फोटो काढले आणि नंतर  आत हवामहाल पाहण्यास गेलो. हवामहाल पाहण्यास २ तास खुप होतात.  एका बाजूला जीने आणि दुसऱ्या बाजूला चालत ही वरच्या मजल्यावर जाता येते. छोट्या छोट्या खिडक्या, आरशांचे नक्षीकाम आणि खुप सारी दालने. ह्या खिडक्यातुन आपण रस्त्यांवर चाललेली वाहतुक पाहु शकतो, वरून आपण सर्व पाहु शकतो पण खालून पाहणार्यांना आपण दिसत नाही.  मुख्य आकर्षण त्या आरशाचे नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि दालने इतकेच आहे. ती हवामहालाची इमारत जितकी फोटोत सुंदर दिसते तितकी दिवसा सुंदर दिसत नाही. रात्री समोरच्या कॅफेतुन खुप सुंदर दिसते असे म्हणतात पण त्या कॅफेचे रेट्स खुप आहेत आणि वेटिंगपण खुप असते म्हणुन आम्ही रात्री गेलो नाही. 

 हवामहल पाहुन आम्ही सिटी पॅलेस पाहायला गेलो. सिटी पॅलेस मध्ये म्युझियम, सर्वात मोठे झुंबर , सर्वात मोठे चांदीची गंगाजली, शस्त्रे , पुर्वी पासुनची वाहने जसे की मेने, पालख्या , अंबाऱ्या, जुन्या बग्ग्या , हत्तींची आभूषणे, राजा महाराज्यांचे कपडे असे बरेच पाहण्यासारखे आहे. सिटी पॅलेस मध्ये आम्ही गाईड घेतला होता. त्याने बरीच माहिती सांगितली. आताचा राजा  जो त्यांच्या मुलीचा मुलगा आहे , राजा पॅलेस मध्ये आहे की नाही कसे ओळखायचे वगैरे.. कोणत्या राजाने जयपूर वसवले .. असे बरेच काही. ते पाहता पाहता ऐकणे ह्यात वेगळीच मजा आहे. आजही ह्या पॅलेस मध्ये काही भागात राजाचे वास्तव्य आहे. तिथे आतमध्ये पश्मिना शालींचे दुकान आहे. ते दुकान राजाने त्यांच्या खानदानी शाली पुरवणार्या कुंटुबाला दिले आहे. ह्या शाली विशेष जातीच्या मेंढ्या च्या दाढी च्या तेलापासून कश्मीर मध्ये बनतात पण त्यावरचे रंगकाम राजस्थानात बनते. ही शाल उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात गरम आणि अतिशय पातळ असते. ती ओरिजनल आहे की नाही हे ओळखायची खुण म्हणजे ती जळल्यावर केस जळाल्याचा वास येतो. हे प्रात्यक्षिक ते करुन दाखवतात. छोट्या रिंग मधुन ती आख्खी शाल पास होते. किमतीही प्रचंड आहेत. सर्व पाहुन झाल्यावर गाईड आपल्याला त्या दुकानात घेवुन जातात. पण इंटरनेट वर ते फसवतात असा रिव्ह्यू आहे त्यामुळे माझी इच्छा असतानाही घरचेयांननी घेवु दिली नाही.

आम्ही गेलो त्या दिवशी संध्याकाळी तिथे एक लग्न होणार होते त्यासाठीची सजावट चालली होती त्यामुळे काही भाग पाहता आला नाही त्यामुळे अतिशय वाटले कारण सिटी महाल पाहण्यासाठीचे तिकीट दर माणशी ३१० रुपये होते. २ तासात सिटी महाल पण पाहुन होतो.

 अजुन एक गोष्ट इथे समजली ती म्हणजे जयपूर हे शहर राजा सवाई जयसिंग यांना पाणी टंचाईची भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी किल्ल्याच्या खाली शहर वसवले आणि त्यांच्या नावावरून जयपूर हे नाव पडले.

 सिटी महालानंतर आम्ही जंतरमंतर ला गेलो. जंतरमंतर ही सुर्य नक्षत्रे यांच्या स्थानांवर आधारित एक प्रयोगशाळा आहे . भाततात अशा ५ जंतरमंतर आहेत पण सर्वात मोठे जयपूरला आहे. ह्या सर्व राजा जयसिंग दुसरा  यांनी बांधलेल्या आहेत. तिथे सुर्याच्या उन्हावर किती वाजले ते ओळखण्याचे घड्याळ आहे, म्हणजे खरंतर ती एक स्केलच आहे. अचूक वेळ दाखवते.  इथे आम्ही गाईड न घेतल्याने फार काही माहिती नाही मिळाली.माणुस जिथे जातो तिथे तो घाण करतो त्यामुळे ह्यातील बराच भाग आता पाहता येत नाही.  

हे सर्व पाहोपर्यंत दुपारचे दोन अडीच  वाजले. प्रचंड भुक लागली होती. जेवण्यासाठी आम्ही चांगले रेटिंग असलेले हॅाटेल गोविंदम शोधले. गोविंदम मध्ये छोट्या लोखंडी जिन्याने वर चढुण जायचे , त्यावर चढताना वर एवढे चांगले हॅाटेल आहे असे वाटलेच नाही .  पण हॅाटेल अतिशय चांगले आहे. प्रचंड भुक लागली होती , पण वेटिंग टाईम खुप होता. अतिशय सुंदर आवाजात दोन गायक तबला पेटी वाजवत गात होते. काही कस्टमर त्यांना रेकॅार्ड करत होते. त्यातील राजस्थानी थाळी ७००  रुपये होती. मी आणि वहिनी दोघींनी ती घेतली , थाळी अतिशय चविष्ट होती. पण बाकीच्यांनी पंजाबी जेवण मागवले आणि ते बेचव होते. जेवणाच्या किमतीच्या मानाने राजस्थानी जेवण चांगले पण पंजाबी बेचव. रेटिंग च्या बाबतीत आमचे दोन गट पडले. आम्ही ५ स्टार देवु इच्छित होतो तर बाकीचे १ स्टार वर ठाम होते.  

 

जेवण करुन बाहेर यायला चार साडेचार झालेले, शेवटी आम्हाला अल्बर्ट हॅाल पाहायचा होता. जयपूर ला पिंक सिटी का म्हणतात तर ह्याला हे अल्बर्ट साहेब कारणीभूत आहेत . त्यांच्या स्वागतासाठी राजा सवाई राम सिंह यांनी सर्व शहरांच्या इमारती ह्या टेराकोटा पिंक कलर मध्ये रंगवल्या. त्यामुळे तिथले सर्व घरे गुलाबी दगडात बांधली आहेत वैगेरे सर्व खोटं आहे.

अल्बर्ट हॅाल म्हणजे एक म्युझियम आहे , ह्यात विविध चीनीमातीची भांडी, सुंदर नक्षीकाम केलेल्या फ्रेम्स असे बरेच काही आहे. बाहेरच असणाऱ्या छोटेखानी कॅन्टीन मध्ये आम्ही चहा पिला , दिवसभर चालून पाय दुखत होते पण त्या दिवसाचा शेवटचे स्थळ चोखीदानी होती. आमच्या गाडीचा ड्रायव्हर आम्हाला सकाळी हवामहल ला सोडुन पार्किंग साठी निघुन गेला. हवामहल, सिटी पॅलेस, जंतरमंतर वॅाकिंग डिस्टन्स वर आहे. गोविंदम ला आम्ही रिक्षाने गेलो. तिथुन पुढे आम्ही गाडीने अल्बर्ट हॅाल ला गेलो आणि  नंतर चोखीदानी ला पण गाडीने गेलो. चोखीदानीचा पार्किंग साठी मोठी जागा आहे.

 

चोखीदानी पुण्यात पण आहे आणि मी पाहिलं आहे पण बाकींच्यांना खुप उत्साह होता. चोखादानीचा दर माणशी १२०० रुपये रेट होता. संध्याकाळी पाच नंतर चालु होते.  तिथले ढोल वाजवत होणारे स्वागत, तिलक लावुन सरबत देतात.  अतिशय छान वाटते. लोक त्या ढोलाच्या तालावर नाचायला लागतात. 

आतमध्ये विविध खेळ, कटपुतली, विविध राजस्थानी कला यांचे प्रदर्शन असते . परातीवर, परातीत काचा टाकून , एकावर एक हांडे ठेवुन काही स्त्रिया डान्स करतात. जादुगर, डोंबारी खेळ, विविध आदिवासी डान्स असे बरेच काही असते. लोक स्वतः पण त्यांच्या बरोबर डान्स करत असतात. बाजेवर बसुन बरेच ठिकाणी काहीबाही खाता येतं, शेकोट्या पेटलेल्या असतात. एक प्रकारची जत्राच ही.  हत्तीची सफारी पण आहे पण ती मात्र नको वाटली पाहायला, हत्ती थोड्याच अंतरात लोकांना घेवुन फिरत होता. जादुगर सुद्धा ज्या पद्धतीने कबुतरांना हाताळत होता ते पाहुन वाईट वाटले पण बाकी अनुभव अफलातून होता. तिथल्या कलाकारांनी पैशाची डिमांड केली तर पैसे न देता तक्रार करा असे फलक लिहिले आहेत पण तरीही ते लोक पैसे मागतात आणि लोकही देतात. सर्वात शेवटी राजस्थानी थाली जेवायला मिळते. ती मात्र पुण्यातील चोखीदानीच्या थाळी सारखी नव्हती. बाजरीचा खिचडी, काही दुकाने आहेत त्यात राजस्थानी कलाकुसर असलेले कपडे, रजया, पर्स, झुंबरे , लाकडी शोपीस असे बरेच काही खरेदी करता येते. पॅाटरी,  माघावर विणकाम हे सर्व स्वतः अनुभवता येतं एकंदर मजेचा दिवस. 
 

पुढच्या भागात अमेर फोर्ट, नहार फोर्ट याविषयी ..






























































हंपीचा ध्यास

 हंपी नावाचा एक मराठी सिनेमा आहे. ठीकठाक आहे, पण तेव्हापासून हंपीचा ध्यास लागला होता.

हंपीला जाण्याआधी मी मिपावर जयंत कुलकर्णी यांची "विजयनगर साम्राज्याची मालिका" नीट वाचून काढली. युट्युबवर शेकडो व्हिडिओ पाहिले. प्रत्यक्ष हंपी फिरताना "सफर हंपी - बदामीची आणि गदग परिसराची" हे आशुतोष बापट यांचे पुस्तक सतत सोबत होते. एक-दोन ठिकाणी गाईड घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेही केले.

तरी घरी आल्यावर ते भग्न अवशेष, तरीही ती भव्यता हे सर्व कसे साकार झाले आणि मग हे सर्व कसे नष्ट झाले, याचे मनाला खूप कुतूहल होते. यासाठी मग पुस्तक वाचायला सुरुवात केली.

रोबर्ट सेल चे A Forgotten Empire: Vijayanagar – A Contribution to the History of India पुस्तक आणि Fritz & Michell चे Hampi Vijayanagara आंतरजालावर उपलब्ध आहे. या पुस्तकांत डोमिंगोस पेस (१५२०-२२) आणि फर्नाओ नुनिज (१५३५-३७) यांनी हंपीला भेट दिल्याचे वर्णन आहे. तसेच तारीख-ए-फरिश्ता (गुलशन-ए-इब्राहीमी) हे पुस्तकाचाही संदर्भ म्हणून वापर केला आहे

हे सर्व वाचून आकलन होण्यासाठी तीन महिने लागले. मी अजूनही या सर्वांचे बारकाईने वाचन करत आहे.

समजलेली माहिती उतरवून त्यावरून AI ने सुरेख चित्रे तयार केली, जी खरोखरच खूप रोचक आहेत.

मिपाची थोरवी पाहता, पूर्ण बारकाईने काही पैलू अभ्यासल्यावरच लिखित माहिती द्यावी, असा मानस आहे.

तूर्तास ज्यांना हंपीला भेट द्यायची असेल, त्यांच्यासाठी ही हंपी इतिहासाची चित्रमालिका आहे. हंपी स्थापत्याबाबत इथे निवांतपणे लिहिणारच आहे.

ही मालिका हंपी (विजयनगर साम्राज्य) चा इतिहास सोप्या, वाचनीय मराठीत आहे. पौराणिक कथा, राजवंश (संगम → सालुवा → तुलुवा → आरविडू), युद्धे, राजकीय डावपेच आणि सांस्कृतिक पैलू यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. एकूण ७-८ भाग आहेत

 

१.उगम आणि पौराणिक कथा: पम्पा-शिव कथा, हेमाकुटा, विरुपाक्ष मंदिराचा इतिहास, किष्किंधा (रामायण काळ) यांचा उल्लेख. चालुक्य, होयसळ, कंपिली राजवटींचा परिचय. उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे आणि दक्षिणेतील धोका याचे चित्रण केले आहे.भाग-१

१

 

२.संगम राजवंश (हरिहर-बुक्का): हरिहर-बुक्का बंधू, होयसळ साम्राज्याचा अंत, बहमनी सत्तेचा उदय (गंगू ब्राह्मण कथा), प्रारंभिक विस्तार. इब्न बतूताच्या वर्णनातून मदुराई सुलतानाची क्रूरता दाखवली आहे.
भाग-२

२

३.हरिहर द्वितीय,पंगळ युद्ध (बहामनींवर निर्णायक विजय).
भाग  ३

४

४.देवराय प्रथम: अडोनी वेढा, गोवा-चौल जिंकणे, पार्थल (सोनाराची मुलगी) प्रेमकथा (फेरिश्ता नुसार, अतिरंजित असू शकते),  देवराय प्रथमने सैन्य सुधारणा, घोडदळ मजबूत करणे यावर भर.
भाग-४

५.देवराय द्वितीय: बहमनी व गजपतींशी अनेक युद्धे, मुस्लिम धनुर्धाऱ्यांची भरती, दक्षिण व पूर्वेकडे विस्तार. संगम वंशाचा ऱ्हास.
भाग ५

५

६.सालुवा राजवंश: नरसिंह देवराय, गजपतींशी उदयगिरी युद्ध (पराभव), पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे जिंकणे. छोटा पण महत्वाचा संक्रमण काळ.

भाग 


७.कृष्णदेवराय (सुवर्णकाळ): तुलुव वंश, रायचूर युद्ध (१५२०), गजपती मोहीम (उदयगिरी, कोंडाविडू, कटक), १४ लढाया जिंकणे, प्रशासन, साहित्य (अमुक्तमाल्यदा), पोर्तुगीज संबंध. त्यांचे व्यक्तिमत्त्व, योद्धा व राजा म्हणून विस्तृत वर्णन.
भाग ७

 

८.अंतिम काळ: रामराय, राक्षस-तंगडी (तालीकोटा) युद्ध (१५६५), पाच सुलतानांची युती, पराभव आणि साम्राज्याचा ऱ्हास.
भाग ८

 

 

विरुपाक्ष मंदिर, हंपी.

ज्याप्रमाणे नगर शहरात थोड्या उंचीवर गेलात तर कधी  सपाट जागेवरून ‘चांदबिबी महाल’ दिसतोच, तसेच हंपीतलं विरुपाक्ष मंदिरही शहरातून कुठूनही सहज दिसतं. माझी रूम जिथे होती, तिकडूनही उत्तरेकडे नीट ठराविक उंचीवरून विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसायचे. अगदी अंजनेरी पर्वतावरूनही हंपीचे गोपुर स्पष्ट दिसतात.

मंदिराच्या मुख्य गोपुरासमोर बाह्य प्रांगणात एक उंच आणि देखणा लाकडी रथ उभा होता. चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हा रथ बाहेर काढण्यात आला असावा.

विरुपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हम्पी (विजयनगर) येथील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शतकानुशतके हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. पंपापती म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या पंपा नदीची स्वामी किंवा पंपा-तीर्थाचा स्वामी. येथे तुंगभद्रा नदीला पंपा नदी म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर, हेमकूट डोंगराच्या उत्तरेला, अतिशय देखण्या निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.विरुपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ७व्या शतकात बदामी चालुक्य काळात झाली. सुरुवातीला हे एक छोटे शिवमंदिर होते, ज्यात विरुपाक्ष किंवा पंपापती लिंगाची स्थापना करण्यात आली होती. ९व्या आणि १०व्या शतकातील उपलब्ध शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आढळतो. १२व्या शतकात उत्तर चालुक्य काळात मंदिराचा लक्षणीय विस्तार झाला. याच काळातील पार्वती आणि भुवनेश्वरी ही दोन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांमधील काळ्या दगडाचे लेथ-टर्न केलेले सुंदर स्तंभ हे त्या काळाचे जिवंत साक्षी आहेत.म्हणजेच, विजयनगर साम्राज्य स्थापन होण्यापूर्वीच हे मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षे जुने होते.

१४व्या शतकापासून विजयनगर राजांनी या मंदिराला संरक्षण व संवर्धन दिले. देवराय दुसरा (१४२२–१४४६) यांच्या काळात मुख्य पूर्व गोपुर बांधण्यात आला. मात्र मंदिराचा सर्वात मोठा आणि वैभवशाली विस्तार कृष्णदेवराय (१५०९–१५२९) यांच्या काळात सुमारे १५१० मध्ये झाला. यावेळी रंगमंडप -महामंडप, आंतर गोपुर, अनेक उपमंदिरे, स्तंभयुक्त क्लॉइस्टर आणि इतर सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले. लक्कण दंडेश (कृष्णदेवरायाचे सेनापती) यांनी या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याचे मुख्य देवस्थान बनले.

 विरुपाक्ष मंदिराचा हा गोपुर उंचीने ५० मीटर आहे. त्याचे बाह्यरूप फ्रॅक्टल या गणितीय संकल्पनेतून तयार झाल्यासारखे दिसते (अर्थात ‘फ्रॅक्टल’ ही संकल्पना नंतर प्रसिद्ध झाली).

 

फ्रॅक्टल स्थापत्यशास्त्र

फ्रॅक्टल ही गणितीय संकल्पना आहे जी स्वसदृशता वर आधारित आहे. म्हणजे एका आकाराचा छोटा भाग संपूर्ण आकारासारखाच दिसतो. हे नमुने वेगवेगळ्या स्केलवर आकारमानांवर पुनरावृत्ती होतात. बेनॉइट मॅन्डेलब्रॉट यांनी १९७५ मध्ये या संकल्पनेला औपचारिक स्वरूप दिले. प्रकृतीत फ्रॅक्टल्स सर्वत्र दिसतात. झाडाची फांदी, हिमकण, ढग, समुद्रकिनारा, रक्तवाहिन्या इत्यादी.

स्थापत्यशास्त्रात फ्रॅक्टल्सचा वापर केल्यास इमारती ज्यात पुनरावृत्ती, स्केलिंग आणि स्वसदृशता यांचा समावेश असतो. यामुळे इमारत नैसर्गिक, जटिल पण सुसंगत वाटते. हे अनैच्छिक असू शकते ज्यात सौंदर्य किंवा संरचनात्मक कारणांसाठी फ्रॅक्टल रचना वापरली जाते. तर काही वेळा हे औपचारिक असते ज्यात आधुनिक काळात संगणकाच्या मदतीने डिझाइन केले जाते. उदाहरणार्थ फ्रँक लॉइड राइट यांच्या काही इमारती किंवा समकालीन आर्किटेक्चर यात मोडतात. फ्रॅक्टल डिझाइनमुळे इमारती अधिक बायोफिलिक निसर्गाशी जोडणारी होतात ज्यामुळे मानवी मनःशांती, एकाग्रता आणि कल्याण वाढते.

भारतीय हिंदू मंदिर वास्तुकला ही फ्रॅक्टल्सची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधीच भारतीय स्थापत्यकारांनी ही रचना वापरली होती. मंदिरांच्या शिखर किंवा गोपुरात मुख्य शिखराभोवती लहान शिखरे त्याभोवती आणखी लहान शिखरे अशी रिकर्सिव स्वसदृशता दिसते. यामागे प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिर हे ब्रह्मांडाचे सूक्ष्म प्रतिरूप आहे. पूर्णता प्रत्येक भागात प्रतिबिंबित होते हा हिंदू दर्शनाचा सिद्धांत फ्रॅक्टल संकल्पनेत स्पष्ट दिसतो.हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या आकारात जे आहे, ते लहान आकारातही तसेच असते. हीच गोष्ट फ्रॅक्टल गणितात “स्वसदृशता” म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी मंदिरांमधून अमलात आणले असावे का ?

विरुपाक्ष मंदिर हंपी याचे गोपुर हे फ्रॅक्टल रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य आकार त्रिकोणी असून वर चढताना नमुने पुनरावृत्ती होतात जे स्नोफ्लेक सारखे दिसतात. हे १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील बांधकाम आहे. याचप्रमाणे खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, मदुराई मंदिर आणि राणकपूर जैन मंदिर यांमध्येही फ्रॅक्टल रचना स्पष्टपणे दिसते.

इतर संस्कृतींमध्येही फ्रॅक्टल आर्किटेक्चर आढळते. आफ्रिकन गावे, घरं आणि कापड यांमध्ये स्केलिंग आणि रिकर्शनचे उत्कृष्ट नमुने आहेत ज्यांचा अभ्यास रोन एग्लॅश यांनी केला आहे. युरोपातील गॉथिक आणि बारोक कॅथेड्रल्स तसेच आधुनिक काळातील फ्रँक लॉइड राइट यांच्या ऑर्गेनिक आर्किटेक्चरमध्येही फ्रॅक्टल तत्त्वे आढळतात.

गोपुरातील स्वसदृशता म्हणजे मोठ्या आकारातील रचना लहान आकारात पुन्हा पुन्हा दिसणे. एकच नमुना वेगवेगळ्या आकारमानांवर पुनरावृत्ती होणे ही फ्रॅक्टलची मूलभूत वैशिष्ट्ये गोपुरांमध्ये स्पष्ट दिसून येते. विरुपाक्ष मंदिर हंपी याचे मुख्य राजगोपुर सुमारे पन्नास मीटर उंच आणि नऊ मजली आहे. यात स्वसदृशता अशी दिसते की संपूर्ण गोपुराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे आणि खालच्या मोठ्या स्तरांवरील रेषा कोन व नक्षी वरच्या लहान स्तरांवरही त्याच रूपात पुनरावृत्ती होतात. प्रत्येक मजला हा खालच्या मजल्याचा लहान प्रतिरूप असतो. वर चढताना प्रत्येक पातळीवर नमुने लहान होत जातात तरी संपूर्ण गोपुरासारखेच दिसतात. ही रचना रिकर्सिव स्वसदृशता दर्शवते. म्हणजे गोपुराचा एखादा छोटा भाग वेगळा केला तरी तो संपूर्ण गोपुरासारखाच भासतो. याचप्रमाणे खजुराहोच्या कंदरिया महादेव मंदिरात मुख्य शिखराभोवती असलेल्या लहान शिखरांमध्येही आणखी लहान शिखरे दिसतात. मदुराई मीनाक्षी मंदिरातील गोपुरांवर प्रत्येक स्तरावर मुख्य गोपुरासारखीच नक्षी, देवमूर्ती आणि छोट्या शिखरांची पुनरावृत्ती होते. हिंदू दर्शनानुसार, गोपुर हे मेरु पर्वताचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील पूर्णता प्रत्येक छोट्या भागात असते, हेच तत्त्व गोपुरातील स्वसदृशतेतून व्यक्त होते. “पूर्णमदः पूर्णमिदम्” -पूर्णातून पूर्ण निघते, तरी पूर्णच उरते या वेदान्तातील कल्पनेशी हे जुळते.

विरुपाक्ष मंदिराच्या गोपुरात ही स्वसदृशता इतकी स्पष्ट आहे की, फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी १५वे शतकात ती वापरली गेली होती?

 

या गोपुराच्या बाह्य भागावर अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. विशेषतः पहिल्या स्तरावर मैथुन शिल्पे स्पष्ट दिसतात. ही शिल्पे प्राचीन भारतीय परंपरेनुसार सृष्टीची सर्जनशीलता आणि जीवनचक्र दर्शवतात.

गोपुरावर विविध देवदेवतांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात आहेत. शिव, विष्णू, गणेश, नंदी, राम-लक्ष्मण-सीता यांसारख्या देवमूर्ती, पौराणिक कथांमधील दृश्ये, यक्ष-यक्षिणी, गंधर्व आणि इतर सैद्धांतिक आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर शिल्पांची रचना वेगळी असून, खालच्या स्तरांवर मानवी जीवन, प्रेम, सृष्टी आणि पौराणिक कथा यांचे दर्शन घडते, तर वरच्या स्तरांवर अधिक आध्यात्मिक आणि देवी-देवतांच्या रूपांचे चित्रण आहे.

एक सुंदर गजरा विकत घेऊन ,केसांत माळला ...चार पाच रील्स काढल्यावरच मंदिराकडे वळाले ,हे वेगळे सांगायला नको 😊

मंदिरात आत शिरताच तीन शिरे असणारा त्रिमुखी नंदी दिसतो. 

एका भिंतीवर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह म्हणजे  वराह (जंगली डुक्कर), तलवार, सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त कोरीव आकृतिबंध दिसतो .वराह चिन्हाची सुरुवात मूळ चालुक्य राजवंशात झाली. बादामी चालुक्य (६व्या ते ८व्या शतक) यांनी सर्वप्रथम वराह (विष्णूचा तिसरा अवतार) याला आपले कुलचिन्ह स्वीकारले. चालुक्य राजे विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी पृथ्वीला समुद्रातून वाचवणाऱ्या वराह अवताराला आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रतीक बनवले.

विजयनगर साम्राज्याने चालुक्य राजवंशाकडून हे चिन्ह आपल्या राजकीय चिन्ह म्हणून स्वीकारले. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३३६) हरिहर आणि बुक्का राय यांनी चालुक्यांच्या परंपरेचा वारसा चालू ठेवला. विशेषतः कृष्णदेवराय आणि त्यानंतरच्या राजांच्या काळात हे चिन्ह सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि साम्राज्याच्या वैभवाचे प्रमुख प्रतीक बनले.

चिन्हातील घटक आणि त्यांचा अर्थ-

हे चिन्ह सामान्यतः वराह, तलवार, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोजनात दाखवले जाते. वराह हे शक्ती, साहस, धर्मरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे. तलवार युद्धक्षमता, न्याय आणि साम्राज्य संरक्षण दर्शवते. तर सूर्य आणि चंद्र “आचंद्रार्क” (सूर्य-चंद्र अस्तित्वात असेपर्यंत) हे साम्राज्य टिकावे, असा शुभ आणि चिरंतन अर्थ देतात.

विरुपाक्ष प्रांगणात डावीकडे लक्ष्मी हत्तिणीचे दर्शन झाले. ती झुलत-झुलत लुसलुशीत हिरव्या चाऱ्यावर ताव मारत होती.🐘

समोरच्या मोठ्या प्रांगणात दोन मंडप आहेत . एक मोठा व एक छोटा. यांना फलपुजा मंडप/कल्याण मंडप/सभामंडप अशी अनेक नावे आहेत. यातील मोठ्या मंडपात जवळपास १०० खांब आहेत. या खांबांवर सिंह, कृष्ण, पौराणिक कथा इत्यादी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मी खूप वेळ इथे रेंगाळले . प्रत्येक खांबावर वादकांची शिल्पे ही खूपच वेगळी आणि रोचक आहेत. छोट्या मंडपात मधोमध एक शिळा आहे, जिला कुंपण घातले आहे व भोवती खांब आहेत.

पुढे गोपुराच्या आतल्या भागावर आणखी एक मोठे प्रांगण आहे. त्याच्या समोर प्रथम दीपमाळ, नंदीमंडप, मग मोकळी जागा आणि पुन्हा विरुपाक्ष मंदिराचे प्रसिद्ध रंगमंडप येते. त्यानंतर अंतराल (अंतःप्रकोष्ठ) आणि गर्भगृह. गर्भगृहात ‘पंपापती’ विरुपाक्ष म्हणजे शंकराचे पिंड आहे.

रंगमंडपात ८ खांब आहेत, जे ससा, बकरी, घोडा, मंगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अशा विविध प्राण्यांपासून बनवलेल्या व्यालकृती (याली) स्वरूपात आहेत. विजयनगर साम्राज्यात बाजार, कल्याण मंडप, सभा मंडप, वादक शिल्पे यांसारखे व्यालकृती खांब खूप प्रसिद्ध आहेत. 

विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपाच्या पायऱ्यांजवळ शिलालेखात कृष्णदेवराय यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो, ज्यामुळे त्यांना या मंदिराचे सर्वात मोठे संवर्धक आणि दाता मानले जाते. विशेषतः १५१० ईसाली (त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात) कोरलेल्या कन्नड भाषेतील शिलालेखात कृष्णदेवरायांनी विरुपाक्ष देवतेच्या नावाने मोठ्या प्रमाणात दान आणि बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यात त्यांनी रंगमंडप (महामंडप), आंतर गोपुर, मुख्य गोपुराची दुरुस्ती आणि इतर अनेक सजावटीचे काम पूर्ण केल्याचे नमूद आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी सिंगनायकनहळ्ळी या गावाचे दान दिले, तसेच सोन्याचे ताट, सोन्याचे आणि चांदीचे दिवे, अमृतपदीसाठी जमीन आणि उत्पन्नाची व्यवस्था केली.

 

यापुढे तिन्ही बाजूंनी ओसरी आहेत. त्यात एक भव्य दगडी रांजण दिसले, ज्यात पंचामृत करून प्रसाद तयार केला जात असे.त्याशेजारीच एक मीटर रुंद अशी दगडी चूल दिसली, जी चंदन उगाळण्यासाठी वापरली जाते असे समजले.

हम्पीतील विरुपाक्ष मंदिर हे विजयनगर चित्रकलेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रंगमंडपाच्या छतावर ही चित्रे काढली आहेत. ही हम्पीतील एकमेव जिवंत विजयनगर चित्रे मानली जातात. यातील प्रमुख विषय म्हणजे विदुरण्य महर्षींची मिरवणूक, अर्जुनाने मत्स्ययंत्र भेदून द्रौपदीचा स्वयंवर, दशावतार, शिव-कामदहन, त्रिपुरारी, कल्याणसुंदरम (शिव-पार्वती विवाह) आणि गिरिजाकल्याणम (पंपा-विरुपाक्ष विवाह) यांसारख्या पौराणिक घटना आहेत. ही चित्रे १६व्या शतकातील आहेत आणि विजयनगर चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात.विजयनगर चित्रकलेचा नंतरच्या काळात मैसूर आणि तंजावर चित्रकला शैलींवर मोठा प्रभाव पडला

मी आपली मन लावून चित्र पाहत असताना एका मर्कटाने चपळाईने माझ्या केसांतील गजरा जोरात ओढला आणि निवांत खात बसला ,कोणाच्या हातातला प्रसाद ,पेय घे अशा मर्कट लीला मंदिरात सतत सुरु होत्या.तर अनेक कुटुंब वत्सल मर्कट कुटुंबही दिसले.ज्यात आई माकडिणीला पिल्लु माकड चिकटले आहे आणि वडिल माकड त्या पिल्लाला प्रेमाने गोंजारत आहेत. हे पाहुन हेच आपले पुर्वज असतील हे नक्किच पटले.🤩🐒

पंपा-भुवनेश्वरी देवीचे मंदिर विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ, उत्तरेकडील शांत कॉरिडोरमध्ये विराजमान आहे. या प्राचीन मंदिरात पाऊल टाकताच सुंदर अलंकार-वस्त्रांनी सजलेली देवीची मूर्ती पाहून मन एक वेगळ्याच भक्तीभावाने भरून जाते. १२व्या शतकातील चालुक्य शैलीतील हे छोटेसे मंदिर इतके सुंदर आणि पवित्र आहे की, येथे उभे राहिल्यावर आपण इतिहासाच्या काळात हरवल्यासारखे वाटते. याच ठिकाणी हम्पीच्या महान सम्राटांची संपूर्ण वंशावळ दगडावर इंग्रजीत रंगविली आहे .जी वाचताना  जणू हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाने आपल्याशी बोलत आहे असे वाटले.चार बाजूला स्तंभयुक्त क्लॉइस्टर भोवती फिरणारा मंडप-ओसरीवजा मार्गक्रमण भाग आहे.

मंदिराच्या उजव्या कोपऱ्यात काही पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटी, रहस्यमय आणि अंधारी खोली आहे. त्या खोलीत प्रवेश करताच मनात एक अपूर्व कौतुक आणि आश्चर्य जागे होते. खोलीच्या पूर्व भिंतीवर असलेल्या एका छोट्याशा छिद्रातून बाहेरच्या भव्य ५२ मीटर उंच पूर्व गोपुराची उलटी प्रतिमा भिंतीवर स्पष्ट दिसते. प्राचीन काळातील हे पिनहोल कॅमेरा तंत्र पाहून,ही  किती अद्भुत कला होती. त्या काळातील भारतीयांचे विज्ञान आणि कलेचा हा संगम आहे .🙏

 

पिनहोल कॅमेरा हा जगातील सर्वात सोपा आणि प्राचीन कॅमेरा आहे. यात कोणतीही लेन्स (काच) वापरली जात नाही. फक्त एका अंधार्‍या खोलीत भिंतीवर एक अत्यंत छोटे छिद्र (pinhole) केले जाते. या छोट्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत येतो आणि भिंतीवर उलटी प्रतिमा तयार होते.हे तंत्र “Camera Obscura” नावाने ओळखले जाते.

प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, ही मूलभूत भौतिकशास्त्रीय सत्यता विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा तंत्रामागील मुख्य रहस्य आहे. जेव्हा बाहेरचा तेजस्वी प्रकाश त्या छोट्याशा छिद्रातून आत येतो, तेव्हा प्रकाश किरण एकमेकांत मिसळत नाहीत किंवा एकत्र होत नाहीत. प्रत्येक किरण सरळ मार्गाने आत शिरतो आणि विरुद्ध भिंतीवर आपली छाप सोडतो. यामुळे बाहेरच्या गोपुराची प्रतिमा पूर्णपणे उलटी तयार होते .वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे दिसतो.

मंदिराच्या उत्तरेकडील दाराने बाहेर पडताच, समोर एक पवित्र पुष्करणी दिसते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली होती, तरीही त्या ठिकाणचे शांत आणि पवित्र वातावरण मनाला मोहिनी घालते. हम्पी मंदिरासमोरून पुन्हा जाताना आम्ही हेमकूट टेकडी चढण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल उचलताना हृदयात एक वेगळाच रोमांच जाणवत होता .

मंदिराबाहेरील लाकडी रथ
मंदिराबाहेरील लाकडी रथ 

 

 फलपुजा मन्दिरातील खांबावरील वादक व सुरसुंदरी

१
3
कन्न्ड मधील शिलालेख
कन्नडमधील शिलालेख 
आकर्षक व्यालखांब
आकर्षक व्यालखांब  

 

नक्षीदार खांब
नक्षीदार खांब 

 

रंगमंडप छतावरील रंगीत छायाचित्रे (यात दशावतार दिसत आहेत)फोटो आंतरजाल 
दगडी रांजण
पिनहोल कॅमेराद्वारे गोपुर उलटी प्रतिमा 

हो त्या दिवशी संध्याकाळीही विविध रंगांनी सजलेल्या आकाशात विरुपाक्षचा गोपुरही पाहिला.त्या आकाशात तो शोभत होता तर त्या सर्वोच्च टोकावर चन्द्र्कोर विराजमान झाली होती..जणु पंपावती शंकराचेच हे रुप!!!😇



विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर आहे. हंपीतून कुठूनही त्याचे रायगोपूर आभाळात उठावलेले दिसते.  फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत. पंपा भुवनेश्वरी मंदिरात तर एकदम प्राचीन मंदिरात आल्यासारखे वाटते. 

तुमच्या लेखामुळे माझ्या विरुपाक्ष दर्शनाची आठवण आली. 


फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत.

अच्छा 👍

कन्नप्पा नयनार खुप शोधला पण सापडलाच नाही. मी कोणाला तरी विचारायला पाहिजे होते.

कन्नप्पा नयनार अंतराळातील स्तंभावर आहे. केवळ विरुपाक्ष मंदिरातच इतकी शिल्पे आहेत की अगदी साताठ फेऱ्यांतही काहीतरी पाहणे राहून जावे.


देवळे पाडली नाहीत पण देव फोडले, विरुपाक्ष आणि आणि २/३ लहान देवळे वगळता एकाही देवळात गाभाऱ्यात मूर्ती नाही. अच्युतराय, विजय विठ्ठल, बाळकृष्ण, हजारराम, सरस्वती, चंद्रशेखर एकही लिव्हिंग टेम्पल नाही.


 

पण त्यातील देवळे पाडली नाहीत. राजवाडे पाडले, संपत्ती पळवली.

हे लिहायचे राहिले. नुकतीच एके ठिकाणी याबद्दल माहिती वाचली. फक्त विरूपाक्ष मंदिरात पूजा होते इतरत्र कोणत्याच मंदिरात होतं नाही कारण तिथल्या मूर्ती बहामनीन्नी फोडून भग्न केल्या आहेत.बडवेलिंग येथेही पूजा होते.

*****

हंपीतील बहुतेक मंदिरात मुख्य मूर्ती नाहीच, आणि आहेत त्या भंग केलेल्या....
चौदाव्या शतकात बहामनी सुलतानाने विजयनगर वर आक्रमण केले आणि त्यात त्याला थोडं फार यश आल्यावर भारतातील चारी -पाची मुस्लिम राजवटींनी हंपी अर्थात विजयनगर च्या साम्राज्यावर हल्ला केला. हल्ल्याचा मूळ उद्देश हा हंपीत असणार धन हा होता. 
पण येणार सुलतानी आक्रमण एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन येते. त्यातून हंपीतील अनेक मंदिराची तोडफोड झाली, मुर्ती  भंग केल्या गेल्या.

पण त्यातून देखील जे दोन तीन मंदिर वाचले त्यातील प्रमुख म्हणजे "वीरूपाक्ष मंदिर " जे शिवाचे मंदिर आहे.
त्याची कथा स्थानिक लोक सांगतात की, मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर व बऱ्याच ठिकाणी विजयनगर च्या साम्राज्याचे राजचिन्ह कोरलेले आहे. ज्यात वराह (डुक्कर ),तलवार, चंद्र - सूर्य आहे. हे चिन्ह हंपीत बऱ्याच ठिकाणी दिसेल.

पण ह्या चिन्हात डुक्कर (वराह ) असल्याने ह्या मुस्लिम सैन्याला ते मंदिर तोडता आले नाही. कारण मुस्लिम डुकराला सगळ्यात अपवित्र मानतात, ते त्याच नाव देखील घेत नाहीत.

 

----- TEAM INDIAN HERITAGE PANDA 

खखोदेजा.


बडवीलिंग,  यंत्रोद्धारक हनुमान मंदिर, उड्डाण वीरभद्र मंदिर ह्यात आजही पूजाअर्चा चालू असते.

तसेच बहमनीच्या शकले झालेल्या पाच सुलतानांच्या नासधुशीत ह्या मंदिरांच्या शिल्पांचे फारसे नुकसान झाले नाही (फक्त गर्भगृहातील मुख्य देवता नष्ट झाल्या) ह्याचे कारण म्हणजे ह्या दख्खनी सुलतानांच्या सैन्यात बरेच हिंदू सरदार होते. मूर्तींची नासधूस सर्वच शाह्यांच्या काळात झाली मात्र सुरुवातीची गझनवी, खिलजी, घोरी, आणि मुघलांच्या बाबर आणि औरंगजेब ह्या राजवटी सर्वात असहिष्णु होत्या असे म्हणता यावे, औरंगजेब तर सर्वाथाने बुतशिकन होता.


हंपीत फिरायचे कसे??
मला खूप निवांतपणे, माझ्या सोयीनुसार प्रेक्षणीय स्थळे पाहायची असतात. त्यामुळे पहिल्या दिवशी रूमपासून विरुपाक्ष मंदिरापर्यंत रिक्षा केली (१५० रुपये, बार्गेनिंग केले). पहिल्या दिवशी मी जवळपास १० किलोमीटर पायी फिरले. फक्त एका लांबच्या ठिकाणी रिक्षा घेतली.
पूर्ण दिवस रिक्षा टुरिझम १५००-२००० रुपये प्रतिदिवस असते. ज्यांना अजिबात चालायचे नसेल त्यांनी रिक्षाच करावी. दुसऱ्या दिवशी १००० आणि तिसऱ्या दिवशी १२०० रुपये असे माझे रिक्षा खर्च झाले.
पर्याय
हंपीत ८०० रुपये प्रतिदिवस टू-व्हीलर (स्कूटर/बाइक) रेंटने मिळते. २००-४०० पर्यंत सायकलही मिळते. (सध्याच्या दरानुसार स्कूटर ४००-९०० रुपये पर्यंत असू शकते, बार्गेनिंग करा.)

***
हंपी पाहायचे कसे??
हंपीला जाण्याआधी मी पूर्ण एक आठवडा विजयनगर साम्राज्याविषयी वाचन आणि व्हिडिओ पाहिले. जयंत कुलकर्णी यांच्या लेखांचा, सागर बोरकर 
" उनाडक्या: हंपी: दिवस पहिला - हजारराम मंदिर आणि पानसुपारी बाजार - भाग ३ https://share.google/L3HFbci3Aq3iXZmL5 "
यांच्या हंपी ब्लॉगचा खूप फायदा झाला. केतन पुरी आणि आशुतोष बापट यांचे यूट्यूब व्हिडिओ ऐकले. आशुतोष बापट यांचे हंपीवरचे पुस्तकही विकत घेतले.

***
पोटोबाचा कसा करायचा
सकाळी भरपेट नाश्ता-ब्रंच (इडली, डोसा, उत्तपा, वडा) करायची सवय ठेवा. थेट सायंकाळी ५-६ ला जेवण. दरम्यान ज्यूस, रस, आयस्क्रीम, फळे आणि भरपूर पाणी — हायड्रेटेड राहा. (उन्हाळ्यात ४०°C+ तापमान असू शकते, म्हणून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घ्या.)

***
पहिल्या दिवशी
विरुपाक्ष मंदिर आणि त्याच्या परिसरातील हेमकूट पर्वत, दोन गणेश मंदिरे, कृष्ण मंदिर, लक्ष्मी नरसिंह, कोंदडराम अच्युतराय मंदिर आणि सूर्यास्त मातंग टेकडीवरून पाहायचा.
***
दुसऱ्या दिवशी
विजयविठ्ठल मंदिर, जुना राजवाडा परिसर, प्रसन्न विरुपाक्ष, म्युझियम, कोरॅकल राईड आणि सूर्यास्त तुंगभद्रा किनारी किंवा हेमकूट पर्वतावर.
****
तिसऱ्या दिवशी
अंजनेरी पर्वत, पम्पा सरोवर, शबरी गुहा, अनगुंडी किल्ला पाहायचे.
अतिरिक्त टिप्स

बार्गेनिंग सर्व ठिकाणी करा,राहणे, रिक्षा, टू-व्हीलर, सर्व काहीत.😅
उन्हाळ्यात गर्दी कमी असते, त्यामुळे चांगले डील आणि शांत अनुभव मिळतो.
सकाळी लवकर बाहेर पडा आणि दुपारी सावकाश विश्रांती घेत फिरा.
चांगले चालण्याचे शूज, सनस्क्रीन, टोपी आणि रिचार्जेबल पॉवर बँक घ्या.
मोबाईल नेटवर्क काही ठिकाणी कमकुवत असू शकते.


हंपीच्या जोडीने बदामी-पट्टदकल-ऐहोळे ही करावेचं असे आहे, भेट देण्यास हिवाळा ऋतू सर्वोत्तम. बदामीवरून सुरवात करून, पट्टदकल-ऐहोळे व शेवटी हंपी करणे श्रेयस्कर. स्वतःचे वाहन वापरणे अत्यंत सोयीचे व प्रवास कालावधी वाचवणारे, स्वतःचे वाहन असल्यास, दीड दिवस बदामी (लेणी, किल्ला आणि भूतनाथ मंदीर समूह-अगस्त्य तलाव परिसर), दीड दिवस पट्टदकल+ऐहोळे मिळुन व हंपी तीन वा चार दिवस अशी विभागणी सर्वसामान्य पर्यटकांसाठी पुरेशी ठरावी. अभ्यासु, संशोधक वृत्तीच्या लोकांसाठी तर कितीही दिवस कमी पडावेत असा परिसर आहे. 


सकाळी सहाला ही ठिकाणे उघडतात व त्यावेळी गर्दी अजिबात नसते व लगतच्या दाट मानवी वस्तीचा उपसर्ग ही मर्यादित असतो, त्यामुळे सकाळची ही वेळ गाठता आली तर अनुभव अजूनचं सुंदर होतो, तांबूस दगडी टेकड्यांवर कोवळी उन्हे उतरताना पाहणे 'खास' असते.  

 

या सर्व ठिकाणी स्थानिक मार्गदर्शक(Guide) घेण्याविषयी तडजोड अजिबात करू नये, सर्वसामान्य पर्यटकांसाठी मार्गदर्शकाशिवाय ही ठिकाणे पाहणे मुर्खपणा ठरेल इतके ते महत्त्वाचे आहे, शिवाय स्वतःचे वाहन असले तरी भरपूर चालायची तयारी असणे गरजेचे.... 


होस्पेटमधील प्राणी संग्रहालय आणि तुंगभद्रा धरणाच्या केंद्रीय जल निगमच्या ताब्यातील भागातून संध्याकाळच्या वेळी धरण परिसराची सफर हा अनुभवही नक्की घ्यावा असा आहे, जल निगमच्या एखाद्या कर्मचाऱ्याची ओळख असेल तर खाजगी वाहन थेट वर गेस्ट हाऊसपर्यंत नेता येते व धरणाच्या भिंतीवर ही सहज प्रवेश मिळू शकतो, तिथल्या विस्तीर्ण जलाशयाच्या पार्श्वभुमीवरचा कातरवेळेचा अनुभव 'दुर्मिळ' असा ठरावा...































भटकंती कर्नाटकातली

 ((अपडेट २०२१ जुलै Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.)) जानेवारी महिन्यात कर्नाटकात थोडी भटकंती केली होती त्याची थोडक्यात माहिती देत आहे . फोटो इथे कलादालनातआहेत. सर्व फोटो नोकिआ X2-00चे काही नकाशे खाली दिले आहेत . प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत बिजापूर नकाशा भटकंतीची ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातन (हेरिटिज) स्वरूपाची आहेत .धार्मिकपण नाहीत .सर्वाँना आवडतील अशी थंड हवेची ठिकाणे अथवा समुद्रकिनारे नाहीत . बदामि ,हम्पि आहे .बिजापूर (विजापूर)ही पाहिले गोलघुमटसाठी . केव्हा जावे: मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही . मार्ग: रेल्वे सोयीची आहे .बिजापूर मोठे स्टेशन आहे .सोलापूरपासून दोन तास लागतात .याच मार्गावर पुढे आणखी दोन तासावर बदामि आहे .मुख्य गाव पाच किमी दूर आहे .आणखी दोन तासावर गदग स्टेशन आहे ,येथे अकरा किमीवर लखुंडी आहे .गोव्यातून एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हम्पि आहे . काही उपयुक्त रेल्वे : (१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस . (२)सोलापूर हुबळी एक्सप्रेस ११४२३ रोज (३)हुबळी ते मुंबईसाठी चालुक्य ए ११००६ /११०२२ , शरावती एक्स ११०३६ , शिवाय १७३१७ /०६५११ आहेत . रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो .कोरडी आणि आल्हाददायक हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात .स्वत:चे वाहन नसले आणि राज्य परिवहनाच्या बसने जात असाल तरीही तुमचा प्रवास आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात . हॉटेल्स : (अपेक्षित दिवस) विजापूर (१),बदामि(२) आणि होस्पेट (२)तीनही ठिकाणी सर्व थरातली भरपूर हॉटेल्स आहेत .लखुंडीला काही नाही .जाता जाता करता येते . खाणे :काही प्रश्न नाही . काय पाहाल : बिजापूर -गोलघुमट ,ईब्राहिम रोजा ,उपली बुरूज आणि मोठी 'मलीक ए मेदान' तोफ . बदामि :चार गुंफा ,अगस्ति तलाव ,पंधरा देवळे ,बनशंकरी स्थान आणि तलाव .एक दिवस . ऐहोळे आणि पट्टडकल: (बदामिहूनच जाऊन येणे) पंचवीस देवळे . हम्पि :तुंगभद्रा डैम ,नदी काठची देवळे खासकरून विरुपाक्ष आणि विठ्ठलमंदिर ,दगडी रथ .विजयनगर साम्राज्याचे अवशेष . लखुंडी :अकरा खास देवळे . हुबळी :रेल्वे स्टेशन आणि इमारत . बिजापूर -१(विजापूर): मी इथे दोन वर्षाँत दोनवेळा आलो .सुरुवात बिजापूर पासून करणे सोयीचे पडले कारण मुंबईहून थेट गाडी ५१०२९आहे जी दुपारी एक वाजता पोहोचते .स्टेशनहून बस स्टैंडकडे जातानाच गोलघुमट आहे परंतु प्रथम हॉटेलच्या रुमवर सामान टाकून मोकळे फिरायला बाहेर पडायचे .ललितामहाल बजेट हॉटेल आहे .स्टेडीअमजवळ मयुरा आदिलशाही आणि इतर थोडी चांगली हॉटेल्स आहेत . तीनही मुख्य ठिकाणे दोन एक किमीटरात शहरातच आहेत त्यामुळे रिक्षाने जाता येते ,स्पेशल करू नये .प्रथम गोलघुमट पाहिला .अरुंद दोन फुटी जिन्याने ७ मजले चढल्यावरच प्रतिध्वनीच्या सज्जापर्यँत जाता येते .गुडघ्यांची वाट लागते (पुढील सहा दिवसांत पायांचीही वाट लागणार आहे )पण प्रतिध्वनी ऐकल्यावर आणि वरून शहर पाहिल्यावर फार आनंद होतो .शहरांत असे बरेच घुमट दिसतात .फक्त चुना आणि विटांनी बांधलेला ३८ मिटर्सचा मोठा घुमट जगातला दुसऱ्या स्थानावर आहे .जगातील पर्यटकांना भारतात आणण्यात मुस्लिम इमारतींचा मोठा वाटा आहे .या ठिकाणी दीड तास मोडतो .आता लगेच इब्राहिम रोजा गाठणे . बिजापूर-२ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशस्त आवारात बाग बनवून स्वच्छता राखली आहे .इथे भव्यतेपेक्षा कलाकुसरीला अधीक प्राधान्य दिले आहे .आपण जर दोन दिवस विजापूराला राहणार असाल तर जरा सावकाश पाहता येते अथवा सकाळच्या वेळी तरी हॉटेलात यायला हवे .म्हणजे घाई होणार नाही .रोजाची भेट उरकून थोडे अलीकडे शिवाजी सर्कलला तोफ आहे .मलिक ए मैदान तोफ पाहून जवळच्याच उंच उपली बुरुजावर आणखी तोफ आहे .साडे पाचला बंद करतात .तसं बिजापूर रेंगाळण्याच्या आणि जास्ती राहण्याच्या दृष्टिने बरोबर नाही वाटले .हि ठिकाणे पाहण्यासाठी राहायचे .स्टेशनच्या जवळ काही नाही .बस डेपो प्रशस्त आणि स्वच्छ आहे .इथल्या 'नंदिनी'च्या दुकानात धारवाड पेढे चांगले मिळतात . समजा तुम्हाला बिजापूरला काही कारणाने चार पाच तास मिळत असतील तर बस डेपोत बैगा ठेवण्याची क्लोकरूम आहे .साध्या चेनवाल्याही बैगा ठेवून घेतात .(रेल्वेवाले बिनकुलुपाच्या ठेवत नाहीत) .बैग ठेवून मोकळे फिरू शकतो .शिवाय चांगले टॉइलेटस आहेतच .स्टेट बैंक एटिएम आहेत . असे अर्ध्या दिवसात बिजापूर आटपले.दुसरे दिवशी बदामिला जाणयासाठी सोलापुर हुबळी गाडीकरता ११४२३ साडेआठला स्टे गाठले . बिजापूर-३ सहाव्या शतकानंतर चालुक्यासह वेगवेगळ्या हिंदू राजांची येथे सत्ता होती .हम्पिच्या विजयनगर सामराज्याचा पराभव केल्यावर इथे आदिलशाही आली . विजापुरात आणखी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत म्हटतात .परंतु ती मशिदी स्वरुपाची आहेत अथवा मोडकळीस आलेली आहेत असे कळले होते .बिजापुरात आणि एक दिवस वाढवावा लागला असता .गगन महाल ,असर महाल ,जामा आणि मेका मशिद ,आणि बारा कमान . मलिक -ए -मैदान तोफेजवळ तीन मलबार हॉनबिल तिथल्या झाडावर आले आणि ही ट्रीप छान होणार असे मनाने घेतले .(सकाळी भारद्वाज पक्षी दिसण्याचाही आतापर्यँतचा अनुभव चांगला आहे ).रस्त्याच्या कडेने डिडीटी पाउडर नगरपालिकेने टाकली होती .गांधी चौकचा उल्लेख/उच्चार गाँध चोक असा ऐकला .सिटि बस मात्र नवीन आणि आवाज न करणाऱ्या होत्या .कंडक्टर सौजन्यशील होते . सविस्तर माहिती प्रतिसादांत दिली आहे .

विजापूर फोटो /अ १)इब्राहिम रौजा, बिजापूर.१२)इब्राहिम रौजा, बिजापूर२३)आतला भाग, गोल गुंबज.३४)मलिक ए मेदान तोफ.५५)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा.६६)इ०रौजा.७

In reply to  by प्रचेतस

बदामि फोटो/अ १)बनशंकरी तलाव.१२)बनशंकरी रथाची चाके.२३)रथ बनशंकरी.३४)अगस्ति तलाव.४५)अगस्ति तलाव.५६)शाळेची मुले, मधल्या सुटीत.६७)बदामिची शाळेची सहल.७

In reply to  by प्रचेतस

पट्टडकल फोटो /अ १)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर.१२)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत.२३)लेख.३४)उपदेवता मंदिर.४५)द्वारपट्टीका.५६)जैनमंदिरातील हत्ती.६७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी.७

In reply to  by प्रचेतस

हम्पि फोटो /अ १)विठ्ठल मंदिर परिसर.१२)रावणाचे शिल्प.२३)तुंगभद्रा नदी.३४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार.४५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी.५६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट.६७)कारंजा, होस्पेट.७

In reply to  by प्रचेतस

लखुंडी फोटो /अ १)जैन मंदिर.१२)जैन मंदिर.२३)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया.३४)पद्मावती.४५)लखुंडी दर्शनफेरी.५६)काशिविश्वेश्वरा.६७)कोरीव काम.७

ट्रीप प्लान करून जसे पाहात गेलो तसे लिहिणार आहे .कोणत्या ठिकाणी स्थळदर्शनास किती वेळ लागतो आणि प्रवासाला लागणारा वेळ तसेच कोणती सोयिस्कर रेल्वे मिळते हे कळले की इतरांना त्याचा पूर्ण उपयोग करता येईल .लखुंडी दर्शनाबद्दल फोटो नकाशासह येईलच .६ ते १२जानेवारी २०१४ आम्हाला तिघांसाठी संपूर्ण सहलीचा रे तिकीट ,बस प्रवास .राहणे ,खाणे धरून रुपये दहा हजार खर्च आला .सर्व सावकाश पाहिले .
बदामि-१ बिजापूरहून बागलकोटला बस जातात व तिथून बदामिची बस मिळते .परंतु मी रेलवेचे तिकीट रेज० काढलेले होते .रिजवच्या दोन डब्यात दहाजणच होते परंतू टिटिई कोणाला येऊ देत नाही .वाटेत लागणारे अलमट्टी धरण पाहणे हे खास आकर्षण असते .गाडी हळू जाते आणि वळसे घेते .साडेअकराला अर्धा तास उशिरा बदामि स्टे आले . बाहेर पडून शेर रिक्षा मिळतात .दहा रु/प्र .बदामि गाव पाच किमी आहे .कधी बसपण मिळते .हॉटेलचे नाव आनंद वगैरे सांगून डेपो गाठणे .डेपोजवळच बरीच बजेट हॉटेल्स आहेत आणि रिक्षावाला उगाचच फिरवेल.वाटेत बदाम कोर्ट दिसते .कर्नाटक टुअरिजमचे गावात लेण्यांपुढे आहे . एक वाजेपर्यँत आपले सामान रुमवर पडून आणि जवळच्याच रेस्टरॉमध्ये जेवण करून फिरायला तयार झालेलो असतो .हातात पर्स अथवा झोळणा घेऊ नका .पाठीवरच्या सैकमध्ये पाण्याच्या बॉटल्स ,खाण्याचे तयार पदार्थ आणि छत्री ठेवा .इकडे माकडे बदमाश आहेत .सैक ओढत नाहीत आणि छत्रीला फार घाबरतात .म्युझिअमच्या वरती शिवालय पाहतांना छत्री उपयोगी येते .इकडच्या गाईडसनाही माकडे ओचकारतात .छत्रीपासून माकडे चार हात दूर राहतात हा माझा सह्याद्री ट्रेकिंगचा अनुभव आहे .

बदामि-२ लेणी आणि अगस्ति तलाव बस डेपोपासून एक किमीवर आहे त्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही .शिवाय ते लेण्यांकडे नेतात आणि वेटिंग चार्ज घेतात .म्युझीअमकडे नेत नाहीत .म्यु०च्या वर आणि पुढे बरेच पाहणयासारखे आहे . पंधरा मिनिटे चालल्यावर म्यु०ला आलो .बाजूलाच अगस्ति तलाव आहे .रम्य जागा .समोरच्या डोंगरात लेणी आहेत . म्यु०च्या वरच्या डोंगरावर जाण्यास डावीकडून छान वाट आहे .पूर्वी इथे किल्ला होता .वर दोन शिवालये पाहून मशिदीच्या मागून मारूती मंदिराच्या दुसऱ्या वाटेने खाली आलो .येथे माकडे अंगावर येतात .खाली आल्यावर तलावाच्या मागच्या काठावर भूतनाथ मंदिरे आणि एक वेगळीच जैन गुंफा आहे त्याचे दार दोन फुटी आहे .बदामिला येऊन शंभरातले दोनच जण इकडे येतात .हा भाग अवश्य पाहा . गुंफा पाहाण्यासाठी मागे येऊन रस्त्याने अथवा पायऱ्यांवरून यल्लमाच्या देवळाजवळून जावे लागते .जवळच्या शाळेची मधली सुट्टी झाली त्या मुलांचाही फोटो घेतला .तिकीट काढून वर गेलो .बस रिक्षा पार्क केलेल्या असतात .
बदामि-३ . इथे खूप गर्दी असते .गाईड लोक या गुंफा दाखवून कटवतात .शाळेच्या खूप सहली आलेल्या पण दोन दोनच्या जोड्या करून रांगेने चारही गुंफा पंधरा मिनिटांत उरकतात . मास्तर शिटी वाजवतात नी शिक्षिका छडी हलवून लवकर चला करतात .ते तरी काय करणार सहाव्या शतकातील चालुक्यांची शिल्पकला कळणे विद्यार्थ्याँच्या कुवतीबाहेर आहे .असो . याच त्या चार गुंफा ज्यासाठी परदेशांतून हजारो पर्यटक येथे येतात .बऱ्याच जणांच्या हातात 'लोनलि प्लानेट'चे पुस्तक असते .याची जी '९६ अथवा '९८ ची जुनी आवृत्ती आहे त्यात खूप विस्तृत माहिती आहे .चारांपैकी तीन गुंफा हिंदू आहेत .शंकर आणि विष्णूअवतारांची सुरेख व अखंड साडेसहाफुटी मोठी शिल्पे आहेत .त्रिविक्रम ,वराह आणि नरसिंह अवताराचा प्रभाव त्याकाळी होता असे दिसते.शंकर सोळा हातांचा आहे .चौथी गुंफा आदिनाथाची आहे . या चालुक्यांचे शत्रु दुसरे हिंदू राजे(पल्लव) होते आणि नंतर सोळाव्या शतकांतही मुसलमान सुलतानांनी देवळांची नासधूस नाही केली .शिल्पांचे सविस्तर वर्णन आणि चालुक्यांचा इतिहास न सांगता पुढे चलुया .
बदामि-४ येथून दहा मिनिटांत मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा साडेचार वाजले होते .नाक्यावर बनशंकरी'कडे जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात .त्याने पाच किमीवरच्या बनशंकरीला आलो .इथल्या आठव्या शतकातल्या शाकंबरी देवीच्या देवळाचा उत्सव आज सुरू होणार होता .पौष शुक्ल अष्टमी (आज)ते पौर्णिमा .एकादशीनंतर जत्रा सुरू होते .थोड्या वेळाने चौघडा ,वाजंत्री वाजली आणि पालखीतून देवीची पितळी उत्सवमूर्ति आली .नऊवारी पातळांतल्या स्त्रियांनी आरती केली आणि पालखी देवळात गेली .आतमध्ये गाभाऱ्यात अडीचफुटी आठ हातांची मूर्ती आहे .देवळासमोर जो प्रचंड तलाव आहे तो बांधीव दगडी आहे .सभोवालती प्रदक्षिणा मार्ग आहे .नारळी आहेत .एकंदर या देवस्थानाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्व कायम आहे .इकडे टोपलीतून भाकऱ्या आणि दही घेऊन "ऊटा ?"(=जेवण) विकणाऱ्या बायका भाविकांना विचारत होत्या .एका दुकानात एका काळा चिक्की सारखा पदार्थ होता .याला करदान म्हटतात .गूळ आणि सुक्यामेव्याची मऊ चिक्की (फज ?)होती .जवळच्या पटांगणात जत्रेसाठी राहुट्या उभारण्याचे काम जोरात चालू होते .हल्ली जत्रा आठ दिवस चालत नाही पूर्वी फार मोठी असायची .

बदामि-५ अचानक एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष गेले .उत्सवाचा लाकडी रथ !२०१२ मध्ये नोव्हेँबरात आलो त्यावेळी मला दिसला नव्हता .सातफुटी दगडी चाके पाहा याची .कानडी येत असती तर विचारता आले असते .जत्रेनंतर हा रथ झाकून ठेवतात . रीक्षाने हॉटेलवर परतलो तेव्हा सहा वाजले होते .चहा नाश्ता केला .परदेशी पर्यटकांना डोसा आणि हॉट करी (=सांबार) आवडीने खातांना पाहिले .चहा ऐवजी कॉफी अथवा थंड पसंत करतात .बरेचसे बदाम कोर्ट अथवा केटीडीसीत उतरतात .आमच्या रुमशेजारी जपानी /कोरिअन असावेत . आज तसे बरेच फिरलो आणि दमलो .म्युझिअममध्ये मोठा एअरिअल नकाशा आहे .त्यातले फक्त मलगट्टी शिवालया नाही पाहिले .पोलीस स्टेशनकडून बाजारातून रस्ता आहे .आपण अगस्ति तलावाकडून गावात येतो तेव्हा सहाव्या शतकातून दहा मिनिटांत एकविसाव्या शतकात येतो .मजा अशी की बदामिऐवजी चौदाव्या शतकातले हम्पि जागतिक वारसा (वल्ड हेरटिज साइट)यादीत आहे ! आता उद्या या बदामितच मुकाम आहे पण ऐहोळे(ऐवळी) ,पट्टडकल (पट्टडकलु) ची पंचवीसेक मंदिरे पाहून यायची आहेत .सकाळी पावणे आठला एकच बस ऐहोळेला (२५)जाते .याच वाटेवरच्या पट्टडकल येथे (१३किमी) दर अर्ध्या तासाने आहे .

बदामि-६(ऐहोळे -१) सकाळी लवकर उठून नाश्ता करून बस डेपोत साडेसातला हजर झालो .इकडे थोडा आतला भाग असल्यामुळे बसच्यावर पाट्या कानडीत असतात .मी त्या वाचण्यासाठी मोठ्या शहरांची नावे कानडीत लिहुन आणली होती .(पाणिनि किपैड डॉट कॉम च्या वेबसाईटवर हे करता येते) .बस वेळेवर निघाली आणि पावणे नऊ वाजता ऐहोळे गावात थांबली .वाटेत पट्टडकल लागले पण ते येताना करायचे आहे .[इथून पंधराएक किमीवर विजापूर-हॉस्पेट हायवेवरचे "इल्कल" हे शहर आहे .स्वत:चे वाहन असल्यास बदामि नंतर पटट० आणि ऐ०पाहून तसेच पुढे पाचपर्यँत हॉस्पेट गाठता येईल .] बस नाक्यापाशीच दुर्गदेवी मंदिर आणि म्युझीअमचे आवार आहे .तिकीट काढून आत गेले की आवारातली मंदिरे पाहता येतात .पाऊणेक तास लागतो .बाकीच्यांना तिकीट नाही एका फलकावर ऐहोळे गावातील मंदिरांची नावे लिहिली आहेत .बरेच जण दुर्गदेवी पाहून परत जातात .इतर मंदिरे न पाहणे अन्याय केलयासारखे होईल .पुढची परतीची बस दीड वाजता आहे तोपर्यँत आम्ही सर्व महत्त्वाची मंदिरे सावकाश पायी फिरून पाहिली .नाक्यावर इडली वडा चहाचे एकच हॉटेल आहे .तसेच पेरू ,शेंगा आणि रस मिळतो .बदामि-७(ऐहोळे २) इथे येताना मला एक गोष्ट माहित होती ती म्हणजे हे एक साधे गाव आहे परंतू असंख्य परदेशी पर्यटक येतात .शाळेत जाणारी पहिली दुसरीतली मुले 'स्कूल पेन ?'मागतात .त्यामुळे पंचवीसेक पेनस बरोबर आणली होती .खूप आनँद होतो त्यांना .पण भिकारी कर्नाटकात सापडत नाहीत .काल बनशंकरीला काही तृतियपंथी देवळाबाहेर दूर बसलेले होते पालखी आली त्यावेळी पण त्रास नाही .मान असावा त्यांचा त्यादिवशी . आता देवळाकडे वळू .सहाव्या शतकापर्यँत कोरीव गुंफा-मंदिरे होती .गुप्त काळाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव मंदिरांचे प्रयोग उत्त र भारतात सुरू झाले .इकडे दक्षिणेत हेच काम पल्लव आणि चालूक्यांनी हाती घेतले . हे चालूक्य राजे अगोदरच्या कदंब राजांकडे सरदार होते .नंतर ते स्वत:च राज्य करू लागले .यांची राजधानी याच तीन ठिकाणी होती .इथेच त्यांनी देवळे बांधण्या चे निरनिराळे नमुने करून पाहिले .देवळाचे जोते ,मंडप ,खांब आणि छत ,प्रदक्षिणा मार्ग ,गर्भगृह ,शिखर आणि कळस याबाबतीत प्रत्येक देऊळ निराळे आहे .दक्षिणेतल्या कोणत्याही देवळाचा आराखडा येथूनच उचलला आहे .
बदामि-८(ऐहोळे ३) तांबड्या रंगाचा वालुकाष्म दगड वापरला आहे .कोरायला मऊ असतो पण तकतकीत करता येत नाही .शिवाय बाहेरची शिल्पे पावसाने झिजली आहेत . शंकर आणि विष्णू मुख्य हिंदू देवता आहेत .तरीही जैनधर्मियांची पूर्ण देवळे हेच दाखवते की तेही राजघराण्यांत महत्त्व राखून होते . दुर्गदेवी आवारातून बाहेर पडून आणखी दीड तासाची फेरी मारली तर सर्व मुख्य मंदिरे पाहून झाली .याच वाटेवर असलेली रावणफडी गुंफा खासच आहे .शेवटी नाक्यावर येऊन बसची वाट पाहत थांबलो . पटटडकल: दोन वाजता पोहोचलो .इथे नदीकाठी एकाच आवारात सर्व मंदिरे पटावर सोंगट्या मांडल्यासारखी आहेत .पाट्या फलकांवर माहिती लिहिली आहे .खास उल्लेख करण्यासारखे विरुपाक्ष आणि त्याच्या भल्यामोठ्या काळ्या नंदीचे अशी दोन आहेत .मूर्ती ठसठशित आणि आकर्षक आहेत .आत रामायणातील चित्रे आहेत . आवाराबाहेर येऊन चहा भजी ,नारळपाणी घेतले .इथून एक किमीवरच्या जैन मांदिरातले दोन मोठे हत्ती खास आहेत . आता या भागातले फक्त महाकुटा बघायचे राहिले परंतू त्या रस्त्याने बस जात नाहीत .एका ठिकाणी वाटेत उतरून दोन किमी जाऊन यायला हवे .नाही गेलो .रूमवर परत आणि आराम केला
काही नकाशे इथे आहेत . प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत . http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/map1

हम्पि -१ बदामिला दोन दिवस राहून फिरलो तेव्हाच कळले की उद्यापासून तीन दिवसांचा हम्पि उत्सव सुरू होत आहे .थोडी धाकधूक वाढली ,होस्पेटला हॉटेल मिळेल का ? गर्दी असेल का ?बदामिला येतांनाही हीच शंका होती कारण बनशंकरीची जत्रा .परंतू एक फायदा झाला .तो रथ पाहता आला .बस डेपोत चौकशी केली होस्पेट बस कधी आहे .सात वाजता होती .नंतर इल्कल'च्या असतात त्याही उपयोगी असतात असे कळले . काल ऐहोळेला दुर्ग मंदिराजवळ एक कोल्हापूरची शाळेची सहल(बस) आलेली दिसली .गुरुजींना विचारले "मुलांची राहण्याची व्यवस्था कुठे केलीत ?" . "कोल्हापुरहून विजापूरमार्गे कुडलसंगमा'ला आलो आणि राहिलो . सकाळी हुनगुंड मार्गे इथे ऐहोळेला आलो ." परतीचा मार्ग कळला नाही .पन्नासेक पाचवी सहावीच्या मुलांना घेऊन जायचे एक मोठी जबाबदारीच असेल . १० जानेवारी ,शुक्रवार (२०१४) . आज बदामिहून होस्पेटला जाण्यास सवासहालाच हॉटेल सोडले .साडेसहाला चहा घेतला पण भूक नव्हती त्यामुळे इडली वड्यांचे पार्सलच घेतले .बस स्टैंडला बदामि ते बंगळुरू होस्पेटमार्गे बस आमचीच वाट पाहत होती .उदबत्ती लावल्यावर सहा जणांना घेऊन सवासातला बस सुटली .आम्ही तिकीटाची भोणी केली .हम्पि -२ सकाळी प्रवास छान वेटत होता .जानेवारी महिना असूनही फारशी थंडी नव्हती .इकडे रस्त्याला वाहने कमी दिसली .मोठ्या हायवेला हुनगुंड येण्याच्या अगोदर शेतात पाच मोर पाहिले .चला सुरुवात चांगली झाली .पुढे तीनपदरी हायवेवरून प्रवास सुरू झाला .इल्कल या ठिकाणी थांबून सवाअकराला होस्पेट आले .सहा किमी अगोदर तुंगभद्रा धरण आणि वसाहत येते .एकशेसत्तर किमीचा प्रवास अजिबात जाणवला नाही . होस्पेटचा डेपो नवीन केला आहे .अप्रतिम .इकडे वेळ न घालवता स्टेशनरोडकडे बैगा घेऊन निघालो .आजुबाजूला खूप हॉटेल्स आहेत .मागच्या वेळेस रोटरी हॉल आणि गार्डनच्या समोरच्या SLV यात्री निवास येथे उतरलो होतो .मालक सुरेश प्रभू यांच्याशी ओळखही झाली होती .इकडे मंगलोरी लोकांची बरीच हॉटेल्स आहेत .रूम मिळाली समोरच्या झाडावर बरेच कोकिळ होते . हंम्पि उत्सवाबद्दल कळले .दोन वर्षे झाला नव्हता .आपल्याकडे एलिफंटा अथवा वेरुळ चा असतो तसाच आहे .जत्रा लागते .नाचगाण्यांचे कार्यक्रम होणार .त्यात मोठे कलाकार कला सादर करणार .संध्याकाळी गर्दी होणार .आम्हाला काही फरक पडणार नव्हता .
हम्पि -३ तयार होऊन ,उदरभरणं करून दोन वाजता बस डेपोत हजर झालो .इथून हम्पि ११/१६ किमी आहे आणि चकाचक बसेस दर दहा मिनिटांनी सुटत होत्या .आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस हाताशी होता . हम्पितील ठिकाणं पाहण्यासाठी फार तंगडतोड करावी लागते .जेवढे तुम्ही पायी फिराल तेवढं चांगलं .काही परदेशी नागरिक हेच करतात .विठ्ठल मंदिर ,कमल महाल आणि म्युझिअम या तीन ठिकाणचे एकच तिकीट आहे आणि ते त्याच दिवशी वापरावे लागते .इतर ठिकाणांना तिकीट नाही .आज शुक्रवार म्युझिअम बंद असते .असे पण हे पाहणारच नव्हतो . बसमध्ये बसलो .आज जेवढे जमेल तेवढे पाहण्याचे ठरले .(नकाशा पाहा ) .कमलापूरचे तिकीट मागितले .पण तीन दिवस एकदिशा केला होता .कृष्ण मंदिराला आलो .या ठिकाणी समोरच्या पटांगणात जत्रा लाखत होती .मागच्या बाजूस स्टेज आणि खुर्च्या लावत होते .पोलीस खुप होते परंतू मदतीला होते ,खिसे चाचपडायला नव्हते .बसमधून हौशी लोकं सारखे येत होते .एकंदर आनंदाचे वातावरण दिसले .भाषेची अडचण त्यामुळे माहितीफलक वाचता आले नाहीत आणि विचारता आले नाही .हेलीकॉप्टर राईड होती एवढं मात्र कळलं .

हम्पि -४ थोडं गोंधळल्यासारखं झालं पण नंतर लगेच सासिदुकालू आणि कलेदूकालू या दोन महागणपतीँपासून हम्पिदर्शनाचा श्रीगणेशा केला .इथून पुढे पाच मिनिटांवरच्या विरुपाक्षाकडे न जाता मागे येत कृष्ण मंदिर पाहून ,प्रवेशद्वारातून लक्ष्मीनरसिंहापुढे उभे ठाकलो .येथून बसने सरळ कमलापूर गाठले . चार वाजले होते .चहा कोलड्रीँक घेऊन ताजेतवाने झालो .इथे मोठा पोलीस ताफा होता आणि पुढे जवळच हेलिपैड होते .परंतू तिकडे गेलो नाही .पट्टाभिरामा मंदिराची वाट धरली .चालत म्युझिअमच्या पुढे वीस मिनिटांवर कनाल ओलांडल्यावर हे एक प्रशस्त आवारात देऊळ आहे .शांत भाग आणि एखाददुसऱ्या परदेशी पर्यटकाशिवाय कोणी फिरकत नाही .एक नृत्यमंडप आहे .भरपूर खांब आणि त्यांवरची शिल्पे हे हम्पिच्या देवळांचे वैशिषट्य आहे .इकडे अर्धा तास थांबून कमलापूरला स्टॉपला आलो .बस पकडून सहाला हॉटेलवर परतलो . एकेका ठिकाणासाठी ऑटोवाले यायला तयार नसतात .एक पैकेज गळ्यात मारायला बघतात .हॉस्पेटच्या चांगल्या आणि स्वस्त बसेसची सोय नसती तर ऑटोवाल्यांनी पर्यटकांची किती धुलाई केली असती ते सांगता येत नाही .

हम्पि -५ संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे फेरफटका मारला .इकडे काही तीनस्टार मोठी हॉटेल्स दिसली .एक कनाल ओलांडावा लागतो .एक हायवे बनलेला दिसला तो थेट विजापूर -हंम्पि-बंगळुरू जातो . पर्यटनामुळे राज्याचे चित्र पारच पालटले आहे .परत आलो तर समोरच्या बागेत कारंजे सुरू झाले होते . आजचा अर्धा दिवस प्रवास आणि भटकणे झाल्यामुळे रात्री छान झोप लागली . दुसरे दिवशी शनिवारी उरलेली ठिकाणं पाहायची होती .आणि ही सगळी महत्त्वाची होती .सकाळी टिव्ही लावून कालच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्या .बऱ्याच जागा रिकाम्या होत्या फारसे प्रेक्षक थंडीत कुडकुडत उघण्यावर गाणे ऐकायला आले नव्हते . सकाळी साडेसातलाच हम्पिबाजार गाठला . विरुपाक्ष देवळापासून समोरच्या मातंगमदिरातल्या नंदीपर्यँत रुंद रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी खांबांची दुकाने आहेत .ती नँतर सुलतानांनी लढाईत बरीच पाडून टाकली . त्यांनी देवळे मात्र पाडली नाहीत .विरुपाक्षाचे ५०मी उंच गोपूर लक्षवेधक आहे . या ठिकाणी ऑटोवाले विचारायला येतात .पण फार मागे लागत नाहीत .कोणत्या ठीकाणी काय पाहण्यासारखे आहे ते माहिती असेल तरच ऑटो ठरवून फायदा आहे .

विजयनगराचे स्थापक हरिहर यांचे स्वामि मध्वाचार्य .यांनी प्रथम इथे तुंगभद्रेच्या उत्तर किनाऱ्यावर अनेगुंडी डोंगरावर किल्ला बांधायला सांगितला असे म्हटतात .तो सुलतानानी उध्वस्त केल्यावर दक्षिण तिरावर दुसरे विजयनगर बांधण्यात आले .विरुपाक्ष आणि गणपती तसेच हेमकुटा हे सर्व शैव स्थापत्य यांच्या अगोदरच्या हिंदू राजांचे आहे . मध्वाचार्य राम कृष्ण भक्ती मार्गातले असावेत .त्यामुळे राजांची नावेही कृष्णदेवराय ,रामदेवराय आहेत .देवळेही विष्णू अवताराचीच त्यांनी बांधली .राम कृष्ण अवताराचा इतिहास माहिती असणाऱ्याला येथील शिल्पांचे कथानक लगेच समजते .गाईड लोक एक दोन गोष्टी परदेशी पर्यटकांना समजावतांना दिसतात .फ्रेंच ,रशिअन ,जर्मन मध्ये चालू असते .दशरथाच्या राण्यांना पुत्र होण्यासाठी खिरीचा प्रसाद ,सीता आपली अंगठी मारुतीला देत आहे ,बाळकृष्ण पळू नये म्हणून पायाला दोरी बांधून उखळाला बांधली आहे .असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत .अवर्णनीय आहेत .घोंगडीवाला इथेच आहे .पट्टाभिराम ,हजाररामा आणि कृष्णमंदिर खासच . (घाई करणाऱ्यांबरोबर जाऊ नका ) . नकाशे कसे वाटले ?

हम्पिपासून ६० साठ किमी पूर्वेला बेल्लारी(येडीयुरप्पांचे) एरपॉट आहे .बंगळुरूरून हम्पि एक्सप्रेस सकाळी येते /जाते .होस्पेटहून सकाळची एक्सप्रेस दुपारी दोनला मडगावला (दूधसागर धबधबा मार्गे) पोहोचते . यावर्षी बहुधा २-३-४ जानेवारी २०१५ हम्पि उत्सव असेल .यावेळी गर्दी फार असते .मंदिरांचे वर्णन देईनच .लहान मुलांना बोरिंग आहे .न चालणाऱ्यांनी जाऊ नये . (मुलांसाठी हैदराबाद उत्तम) २९ डिसेंबर २०१४ पौष शु अष्टमी बनशंकरी जत्रा सुरुवात (रथ पाहा )आणि पौर्णिमा ५ जाने २०१५ शेवटचा दिवस .

हम्पि -६ दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही .(पाणी आणि वरचे खाणे जवळ ठेवा ).मग हे ऑटोवाले कसे विठ्ठल मंदिरला जातात ?तर ते कमलापूरकडून तिकडे येतात .(नकाशा पाहा ).मधल्या ठीकाणांना दांडी . कोणत्याही पर्यटन स्थळी हीच तऱ्हा असते .पर्यटक गाडी वेटिंग ठेवून एक तास काढतील अशी ठिकाणे "तिकडे काही नाही "सांगून जात नाहीत .तास दोन तासात पाचशे रुपये मिळवायचे हा धंदा असतो .शिवाय एखाद्या दुकानातले कमिशन पदरात पडले तर उत्तमच .इथे भाडे आणि ठिकाणावरून ऑटोवाल्याशी 'बार्गेन 'करत बसू नका .असो . एरवी हम्पि बजार बस स्टैंड आणि पार्किँगपाशी बरीच चहा वड्याची दुकाने असतात .आज सर्वांना हटवले होते .वेळ न घालवता विरूपाक्ष मंदिराचे भव्य उंच गोपूर पाहत तिकडे निघालो .वाटेत एक भलेमोठे पत्र्याचे धूड दिसेल त्याच्या आत देवळाचा रथ आहे .दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे .महाशिवरात्रीला या रथासाठी यावे लागेल .पुजा होत असलेले हे एकमेव देऊळ आहे .हजार वर्षाँचे आहे .कृष्णदेवरायाने याची डागडुजी केली म्हटतात .

हम्पि -७ गोपूरातून आत गेल्यावर उजवीकडे हत्ती असतो .पण नदीवर गेला असेल .नदी मागे उजवीकडेच आहे आणि घाटही आहे .देव दर्शना नंतर नदीवर जाऊन आलो . साडेसात झालेले .यावेळी नदीकाठाने दोन किमी चालायला त्रास होत नाही . हम्पि बाजारातून रुंद रस्त्याने जाताना गतवैभवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही .लहान विक्रेत्यांसह हत्तीच्या अंबारीत बसून थेट खरेदी करणाऱ्यांसाठी दगडी गाळे आहेत .पुढे नंदी पाहून मागे आलो .(तशी या मातंग टेकडीवरून पलीकडे अच्युतरायाकडे वाट आहे ) . डावीकडून नदीकाठाने जाताना नदीतल्या कारकल नावाच्या गोल होड्या दिसतात .एक अलीकडे बांधलेले मंदिर दिसते . मातंग मंदिराच्या भोवती वळसा घालून गेल्यावर पाटी दिसेल .पुढे विठ्ठल मंदिराकडे ,तर पुष्करणी ,अच्युतराय उजवीकडे .या दोन ठिकाणी जाऊन पाहून परत यायला अर्धा तास लागेल . पुष्करणी बांधता बांधता अर्धवट सोडल्यासारखी वाटते .अलीकडे खांबांवर महाल योजला असावा .तलाव छान आहे मागे मातंग डोंगर .डावीकडचे मोठे पटांगण आहे तिथे बजार होता .हल्लीचे नाव सुळे बाजार आहे .

हम्पि -८ अच्युतराय मंदिराची जागा फार छान आहे .आवाराला तटबंदी आहे आणि आत ओवऱ्या (=भाविकांना थांबण्यासाठी खोल्या ) आहेत .आवारातूनच उजवीकडे पायऱ्यांची वाट मातंग डोंगरावरून (२५ मी) नंदीपाशी उतरता येते .सरळ वर (५० मी) शिखरावरही जाता येते .वरून नदी आणि अनेगुंडी छान दिसते .अतिउत्साही लोकांसाठी आहे . पायगाडीला जोर मारा कारण आजचे दहा टक्केच झाले आहे .पुढच्या वाटेवर एक वराहमंदिरात प्रवेशद्वारावर वर एक वराह कोरलेला आहे .नंतर दोन एक मांदिरे उजवीकडे आहेत .आता नदीकडे खाली एक मंदिर आहे ती जागा फारच रम्य आहे .इथे एक चहाची टपरीही आहे .परत वर मोठ्या वाटेवर मागे एक दगडी नक्षीदार कमान राजाची तुला आहे .येथे तराजू टांगून राजाच्या वजनाइतके धन धान्य वाटले जायचे . येथे डावीकडे 'उत्किर्णविषणूमंदिर' आहे .बंद केले आहे परंतू बाहेरच्या सपाट दगडी भिंतीवरची पाल पाहा .(कांचीपुरम ,चैनईच्या विष्णूमंदिरातली पाल प्रसिध्द आहेच) .पालीचा पौराणिक उल्लेख काही आहे का ?इथून समोरचा अनगुंडी डोंगर छान दिसतो .आता दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दाराशी येतो .प्रवेश पूर्वेकडून आहे .

हम्पि -९ विठ्ठल मंदिर हम्पितली फार चर्चित आणि प्रसिध्दी मिळालेली वास्तु .उत्तरेला तुंगभद्रा नदी आणि पलीकडे अनेगुंडी ही पूर्वीची राजधानी .पूर्वेकडे एक रुंद मातीचा रस्ता एक किलोमीटर वरच्या पार्किँगकडे नेतो .कमलापुरातून एक रस्ता इथे येतो .याच रस्त्याने पुढे गेल्यास होडीने नदी ओलांडता येते .पार्किँग ते देवळापर्यँत येण्यासाठी इलेक्ट्रीक आठ सिटर गाड्या आहेत,ज्या मुली चालवतात .छान व्यवस्था आहे;शिस्तबध्द आयोजन असते.दहा रुपये तिकीट आहे .चालत गेल्यास अर्धा तास लागतो आणि वाटेत एक छान पुष्करणी पाहता येते . देवळाच्या पूर्व दारासमोर तिकीट (१०रु) काढल्यावर ते जपून ठेवायचे जे पुन्हा कमलमहाल आणि म्युझीयमसाठी चालते . तटबंदीला चार दिशेला चार चाळीसफुटी गोपुरे आहेत . गरुड रथ : मोठ्या आवारात प्रथम तो प्रसिध्द दगडी रथ आहे .त्याचे तोंड मंदिराकडे आहे .रथात बसायचा मान मात्र विष्णूचे वाहन गरुडाला मिळाला आहे .चार फुटी दगडी चाके खऱ्या दगडी आसांवर आहेत आणि ती फिरु शकतात .हा तांबूस दगडाचा रथ या देवळात नव्हताच .नंतर इथे आणून ठेवला .बहुतेक पट्टाभिरामा मंदिरात असावा .तिकडे शोभतो आणि दगडही जुळतो .

हम्पि -१० विठ्ठलाचे देऊळ बसके आणि दोन भागात आहे .अगोदरचा किर्तनमंडप पूर्ण ढासळायच्या बेतात आहे .सर्व खांब तिरके झाले आहेत .वरचे छताचे दगड पडले आहेत .जागोजागी लोखंडी नळे लावून आधार दिलेला आहे .आत जाऊ देत नाहीत .मंडपात जे मुख्य खांबाभोवती मुसळासारखे बारीक खांब आहेत ते आघात केले की वाजतात .आतले रक्षक /मार्गदर्शक काही जणांच्या विनंतीवरून वाजवून दाखवत होते (५०रु टिप मिळत होती ) .परंतू इथले आणि पट्टाभिरामाचे (मी वाजवले) काही खास वाटले नाहीत .हा दगड वालुकाश्म आहे .याला नाद नसतो .खरे नादस्तंभम/संगीतस्तंभम केरळात पद्मनाभ मंदिरात आणि कन्याकुमारीजवळच्या सुचिंद्रम (खांब स्वत: वाजवू शकता) मंदिरात आहेत .तिकडचा दगड काळा आहे . मुखमंडप आणि गर्भगृहात जाऊ शकतो .अंधार फार आहे फोटो नाही काढता आले .परदेशी पर्यटक आणि त्यांचे गाईड फार .ते गर्भगृहात जात नाहीत .देवळाच्या मानाने गाभारा लहान आहे .आत उंच चौथरा रिकामा आहे .विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी पंढरपुरला चला .गाभाऱ्यातच एक अंधारी प्रदक्षिणामार्ग आहे आणि तळाला पाणी असावे ( पाय ओले ठेवणयासाठी ?) असं वाटतं 

हम्पि -११ विठ्ठलमूर्तीचा वाद आणि काही पुरावे . यावर बरीच चर्चा होते .विजयनगरची सुरूवात १३४० च्या सुमारास अनेगुंडीला झाल्यावर बहामनी सुलतान आणि या राजांत लढाया होतच राहिल्या .एका जुन्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती लढाईच्या वेळी पंढरपूरच्या एका (आताचे) शंकराच्या देवळात हलवली ."ज्ञानदेवाचा कानडा विठठलु करनाटकु ." मुर्तीला कानडी पध्दतीची कापडी टोपी आहे ,मुकुट नाही . मूर्तीकाराने गुराखी (=कृष्ण) रुपाचे देवाचे हात काठी खांद्यावर धरतात तसे न करता कटीवर ठेवले असतील .पण त्या विटेचे कोडे उलगडत नाही .काहींच्या मते ती मूर्ती जुन्या पंढरपुरात नदीपलीकडे लपवली आहे .कारण रुसलेली रुक्मिणीची मूर्ती तिकडे आहे . पुढे कृष्णदेवरायाच्या काळात हे मंदिर बांधून एक नवी मूर्ती बसवली .त्यासमोर भक्त पुरंदरदास बसायचा .पंढरपुरातली मूर्ती बडवे लोक देईनात . १५५६च्या तालिकोटच्या मोठ्या लढाईत ही पण काढली आणि पुरंदरदास पंढरपुरात बसू लागला . सुलतानाने या मंदिराचा किर्तनमंडप मोडला असावा .इतर मंदिरे तोडली नाहीत पण राजा राणींचे महाल मात्र ध्वस्त केले . ते आपण नंतर पाहणारच आहोत .

हम्पि -१२ विठ्ठल मंदिर पाहून झाले .आता दोन पर्याय होते आल्या मार्गानेच दोन किमी चालणे अथवा इले० गाडीने पार्किँगला जाऊन रिक्षा मिळते का पाहणे .सवा अकरा झाले होते आणि दुसरा मार्ग निवडला . गाडीला नंबर लावून लगेच पार्किँगला आलो .ही गाडी फारच छान आहे .इकडे बसण्यासाठी गवताने शाकारलेला मोठा तंबू बनवला आहे .या रस्त्यावर फक्त खासगी बस ,रिक्षा येतात ,हम्पिच्या सिटि बस अथवा गंगावतीकडे जाणाऱ्या परिवहनच्याही या मार्गाने येत नाहीत .दोन रिक्षा उभ्या होत्या .कमलापूर (५ किमी)चे १२० रु सांगितले .नको सांगून परत इले०गाडीच्या रांगेत उभे राहिलो .पाचच मिनिटांनी तो रिक्षावाला बोलवायला आला .दोन आणि सिटस त्याला मिळाल्या होत्या .साठ रुपये देऊन कमलापूरला आलो .वाटेत हेलिपैड दिसले . नाक्यावरच्या हॉटेलात थंडपेय घेतले .इथून काल पट्टाभिरामाकडे गेलो होतो त्या रस्त्यावरचे म्युझिअम जवळच आहे आणि आज उघडे होते तिकिटपण हाताशी होते .पण गेलो नाही .अजून तीन तासांचा कमलमहाल परीसर बाकी होता . अजून एक पर्याय आहे .सकाळी प्रथम ऑटोरिक्षाने विठ्ठलमंदिर पार्किँगला जायचे .तिथून मंदिर-नदीकाठाने चालत विरुपाक्ष -कमलमहाल -कमलापूर .

हम्पि -१३ कमलापूरवरून राणी स्नानागारकडे चालत निघालो .एक किमी आहे आणि झाडांची सावली आहे . साडेबारा झाले होते आणि उत्सवामुळे गर्दी होती .राणी स्नानागारच्या बागेत थोडा आराम केला .ही इमारत चुन्यात बांधलेली आहे .मुसलमान कारागिर हाताशी धरून राण्यांसाठी बंदिस्त महाल आणि हौद बांधून घेतलेला आहे .इथून पुढे दोन मंदिरे पाहून पंधरा मिनिटांत डावीकडच्या महानवमि डिब्बा पाशी येतो .या सर्व परीसराला रॉइल सेंटर म्हटतात तर अगोदरच्या मंदिर परीसरांस सेक्रिड सेंटर असे नामकरण केले आहे .देवालय आणि राजवाडा परीसर . महानवमि डिब्बा याच्या मागेच रस्ता आहे परंतु प्रवेश राणी स्नानागार स्टॉप अथवा कमलमहाल स्टॉपकडूनच आहे .विजयनगर साम्राज्य राजांशी बहामनी सुलतानांच्या लढाया होत होत्याच शिवाय चीड आणि द्वेषही फार होता .तालिकोटच्या लढाईत जिंकल्यावर सुलतानांनी मिळालेले महाल वापरायला ठेवले नाहीत तर ध्वस्त केले .त्यामुळे इथे जे काही राहिले आहे त्यावर समाधान मानायचे . देवळे मात्र फार तोडली नाहीत .त्यानंतर नवीन शहर अथवा राजधानी इकडे न करता अडीचशे किमी दूरवर उत्तरेला विजापूर वसवले .

हम्पि -१४ एका छोट्याशा राज्याचे दोनशे वर्षात विजयनगर साम्राज्य झाले .एक मोठे व्यापाराचे केंद्र झाले .महाल बांधले गेले .देवळे आली .काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले .असाच एक उत्सव महानवमि अर्थात नवरात्र .हे बहुधा अश्विन महिन्यातले नसून पौष शु० अष्टमी ते पोर्णिमा .या वेळी रासक्रीडा होत असावी .हे राजे कृष्णावतार भक्त ना .यासाठी मोठा जो चौथरा बांधला गेला तोच हा महानवमि डिब्बा .सुलतानांनी जिंकल्यावर हा विलासाचे द्योतक डिब्बा आणि सर्व महाल तोडले .तरी खालचे जोते पाहून कल्पना करू शकतो की किती सुंदर असावे त्याकाळी . सत्तर फूट चौरस आणि पंचवीस फूट उंच चौथरा शिल्लक आहे .त्याचे कोरीव दगड हे दगड नसून इतिहासाची पाने आहेत .इतर देवळातली शिल्पे ही राम ,कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारलेली आहेत परंतू इथे जे लोक प्रत्यक्ष येत होते त्यांची चित्रे आहेत .गोव्यातून पोतृगीझ घोडे विकायला यायचे .ते त्यांच्या नेहमीच्या पोशाखात ,दाढी आणि टोपी घातलेले कोरले आहेत .राजस्थानातून उंट आलेले आहेत .उंटाना दोरीने चालवणाऱ्या घागरा घातलेल्या बायका आहेत .हत्तींनाही स्त्रिया चालवत आहेत .दांडियाचा खेळ चालला आहे .


हम्पि -१५ परंतू चित्रे कोणीच बघत नाही .सर्वजण वरती दंगा करण्यात मग्न . याच्या मागच्या बाजूस आहे पायऱ्यांचा तलाव .राण्यांना जलक्रीडेसाठी .आत पाणी नाही त्यामुळे सर्व पायऱ्या पाहता येतात .यासाठी पाणी येथवर आणण्यासाठी दगडी पन्हाळ सहा फूट उंचीवर बसवली आहे .ती पार आवाराच्या बाहेर पूर्वेला निघते .तिथे पखालीतून पाणी ओतले जात असेल .या चा फोटो नाही जमला . अगदी टोकाला राजवाड्याचे तळघर फक्त राहिले आहे . यासर्वाला तटबंदी होती तीचे तीनफुटी अवशेष उरले आहेत .याचे प्रवेशद्वारही दगडी होते ती दोन्ही अजस्त्र कोरीव दारे त्यांच्या अडण्यासह तिथेच पडलेली आहेत .तळघर पाहून बाहेर पडलो की लगेच डावीकडे आहे एक छान मंदिर .हजाररामा . हे चुकवण्यासारखे नाही .एका तटबंदीच्या आत छोटेसे मंदिर आहे .ताशिव काळे चार खांब छान आहेत .बाहेरच्या भिंतीवर रामायण आणि कृष्णचरित्रातले प्रसंग ठसठशीत आणि उठावदार आहेत .अर्धा तास लागु शकतो .उजविकडे एक कमलमहालात वाट जाते .तिकीट हातात असल्याने इथूनही आत जाता येईल .नाहीतर थोडे पुढे जाऊन मुख्य दारातून आत जायचे .


हम्पि -१६ कमलमहाल हे आपले शेवटचे ठिकाण .याची वीसफुटी दगडी तटबंदी तळाला रुंद आणि वर अरुंद बाहेर झुकल्यासारखी आहे .त्यामुळे फुललेल्या कमळासारखी वाटते .आतमध्ये मुख्यवास्तु मुस्लीम पध्दतीचा बांधकाम असलेला हत्तीखाना आणि राणी महाल .राजाकडे मुस्लीम स्थपति होते बहुतेक .अकरा लहानमोठे हत्ती उभे राहतील अशी घुमटांची इमारत आणि बाग छानच आहे .पुढे रंगामंदिरात मोठा मारूती आहे .मंदिर पडायला आलेय .अगदी शेवटी एक दुर्लक्षित जैन मंदिर पाहून तिकडूनच राणीस्नानागार मार्गे हम्पि दर्शन संपवून होस्पेटात परत आलो .हेलिकॉप्टर राईड करायचे ठरवले होते परंतू रांगेत उभे राहण्याचा त्राण राहिला नव्हता .डेपोजवळ शानभाग स्नैक कॉर्नरमध्ये पदार्थ गरमागरम छान आणि झटपट मिळायचे .बिसि बेळी अन्ना हा खास भाताचा प्रकार खायचा राहूनच गेला .ती सकाळ/दुपारची डिश आहे असे कळले . संध्याकाळी यात्री निवासचे मालक प्रभुंशी गप्पा मारल्या .तिरुपतीच्या लावलेल्या मोठ्या फोटोकडे बघून म्हणाले हे हॉटेल यांची कृपा . वडिलांनी बांधले .पूर्वीचे राजे कसे प्रजेची काळजी घ्यायचे आता काय आहे ?हा परीसर मला फार आवडला .होस्पेट राहण्यासारखे आहे .उद्या लखुंडि .

बस ,हॉटेल विषयी होस्पेटला भाषेची अडचण नाही .विजापूरला तर नाहीच .हॉटेल कर्मचाऱ्यांना हिंदी येतं .आणि शहरात मारवाडी ,पंजाबींची दुकाने आहेत .एका सक्सेनाचे स्टेशनरोडच्या भपकेबाज हॉटेलमध्ये जंगी लग्न होते . ऐहोळे आणि लखुंडित ते लोक फक्त कानडी बोलतात .मला गाववाल्यांशी शेतीच्या गप्पा मारायला आवडतात .भाषा येत असली तर फार चांगली माहिती त्यांच्या जीवनाविषयी मिळते .लहान मुलांच्या हातावर ठेवायला काही खाऊ जवळ ठेवतो .आणि हो दहा रुपयांची नाणी जवळ ठेवा ,फार कौतुक याचे इकडे. इथे कुठेही पर्यटकांना कोणीच त्रास देत नाहीत .दोन वर्षांपूर्वी ऐहोळेच्या रिक्षात एक कॉलेजची मुलगी भेटलेली .तिची पुस्तके पाहून कॉलेज ?सुरुवात केली .ऐहोळे सुंदरवादा .मगळ ?मगन ?(मुली ,मुलगे ?)यावर मी मोबाईलमधले माझ्या बिकॉमला असणाऱ्या मुलीचा फोटो दाखवला .तिला बरेच बोलायचे होते .पण माझ्या स्वल्पा कन्नडा मातनाडुत्तीनी मुळे गाडी अडली . औब्बळे ?(एकुलती ?) असे संभाषण झाले .असो .भाषा फार उपयोगी पडते मला तरी .(रैपिडेक्सची कृपा) अजून दोन एक भागात लेख संपेल नंतर योग्य वाटेल तसे वेगळे केलेत तर उत्तम .

हम्पि -१७ ,इतर माहिती . होस्पेटच्या मुकामात शनिवारी हम्पि पाहण्यात बरीच तंगडतोड झाली .सकाळी सात ते चार फिरलो .परंतू समाधान झाले .तशी कर्नाटक पर्यटनची टुअरही निघते .कॉलेजरोड हॉस्पेट पर्यटन केंद्राहून .९.३० ते ५.३० ,रुपये दोनशे .पण ते तुंगभद्रा गार्डन आणि एका इम्पोरिअमला वेळ काढतात असे कळले .शिवाय उरकणे पध्दतीने पाहायचे तर कशाला जायचे .मला धरणाची बाग बघायची नव्हती . बंगळुरूहून १४ क्रमांकाची सहल आहे "North Karnataka Tour -5 day tour ,(२०१३चे पत्रक) :Every Thursday during season (October - January ) Dep : 9.00p.m. Arr: 6.00 a.m. (Monday) Fare Rs.2510/- (including accommodation) Places of visit - Tungabhadra Dam , Hampi , Badami , Aihole , Pattaadakal , Bijapur , Kudala Sangama ." कमलापूरपासून पंधरा किमी वर एक अस्वलांचे अभयारण्य बनवले आहे . काम्पिलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मलयरघुवन्ते मंदिर आहे . चित्रदुर्ग किल्ला .होस्पेटपासून १४०किमी बंगळुरू हायवेवर आहे .विजयनगर साम्राज्यातलाच एक पण नंतर स्वतंत्र झाला .इकडे चौदा मंदिरे आहेत .

लखुंडि - १ आज रविवार .होस्पेटचे हॉटेल सोडून हुबळीला जायचे होते .दीडशे किमी आहे .वाटेत नव्वद किमीवर लखुंडी येथे उतरून मंदिरे पाहायची आणि तसेच पुढे हूबळीला दुपारी तीनची शरावती इक्सप्रेस मिळणार होती . दुपारी दोनला एक गरीबरथ पण आहे परंतु घाई नको म्हणून त्याचे तिकीट नाही काढले .जाताजाताच लखुंडि होणार होते फक्त बैगा घेऊन फिरावे लागणार होते .इथून गदग (स्टेशन) अकरा किमी आहे .होस्पेट ते हुबळी बस खूप असतात त्यामुळे निश्चिंत होतो . सकाळी सातला रूम सोडून चहा नाश्ता करून बस डेपोत आलो .पावणे आठला बस सुटली आणि दहा वाजता लखुंडिला उतरलो .अगदी छोटासा डेपो आहे आणि गाववाल्यांशिवाय कोणी उतरत नाही .इकडे पर्यटक अजिबात फिरकत नाहीत .सगळे गाव बैठ्या घरांचे आहे आणि रस्त्याच्या दक्षिणेला आहे .सगळीकडे दृष्टी टाकली तर एकपण देवळाचे शिखर दिसत नाही .समोरच्या रस्त्यावर आणि बाजूला एक दोन चहा भजीची हॉटेल्स आणि केळीवालाशिवाय काही नाही . लखुंडी देवळांचा नकाशा पाहा . आपल्याकडे दहा ते साडेबारा अडीच तासांचा वेळ आहे आणि अकरापैकी सहा सात देवळे पाहणार आहोत ती दीड दोन किमी च्या एका फेऱ्यात आहेत .एवढा वेळ पुरेसा आहे .

लखुंडि - २ माणकेश्वरा ,मुस्वीनाभावी आणि पायऱ्यांची विहीर : यासाठी बस डेपोच्या मागेच दहा मिनिटे चालावे लागते .एका मोठ्या आवारात एक जैन मंदिर आणि ही विहीर आहे .माणकेश्वराचे मुखमंडपाचे खांब सुबक आणि घोटीव आहेत .बाकीचा राखाडी रंगाचा वालुकाश्म आहे .आवारात बाग करून स्वच्छ ठेवले आहे . कल्याण चालूक्य नावाचा एक वेगळा राजवंश ९ते ११ व्या शतकात राज्य करत होता .त्यांनी ही मंदिरे बांधली आहेत .सर्व शंकराची आहेत .विष्णू नाही .विशेष म्हणजे जैनदेवालये बाजूलाच आहेत .राजवंशात त्यांचाही दबदबा असणार हे उघड आहे .इथे बऱ्याच ठिकाणी अत्यंत कठीण अशा काळ्या दगडाचा उपयोग केला आहे .बारीक कोरीव काम करता येते आणि ताशिवही होतो .खांबांवर एकाच वेळी समोरच्या वस्तुच्या उलटसुलट प्रतिमा दिसतात .आठ फुटी खांब अखंड नाहीत दोन तीन तुकडे जोडून उभे केले आहेत आणि लांबलचक दगड मिळवण्याचा प्रश्न सोडवला आहे .जी गोष्ट भव्यपणात नाही ती इकडे कलाकुसरीने सोडवली आहे .आणखी एक वैशिष्ट्य गाभाऱ्याची दारांची चौकट आहे ती पाहा .खांब जोडूनही एकसंध वाटतात तर चौकट एकाच दगडात पाच सहा वेगळ्या नक्षीदार पट्टया लावल्याचा भास देतात .

लखुंडि -३ माणकेश्वरा पाहून रस्ता ओलांडून थोडे मागे होस्पेटच्या दिशेने आलो की एक पाटी दिसेल विरुपाक्षाकडे .गावातून रस्ता सापडायला हवाय ? एखाद्या मुलाला विचारा .पटकन नेईल . या क्रमाने जायचे विरुपाक्ष -कुंभारेश्वरा -मल्लिकार्जुना -काशिविश्वेश्वरा .आता हे इथले खास जोड मंदिर आहे .शंकराचे आणि सूर्यनारायणाचे समोरासमोर तोंड करून आहेत . मध्ये जोडणारे छप्पर आता नाही .एकाच आवारात आहेत .अरे ,पण दाराला कुलूप आहे .काळजी नको .आपल्याला पाहून एक राखणदार लगेच आपल्या मागे येतो .दार उघडून माहिती सांगू लागतो कानडितून .थोडे संस्कृत शब्द असल्यामुळे कळते .जेवढी उत्सुकता दाखवाल तेवढे सांगत जातो .सूर्यनारायणाची मूर्ती काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .हळे (=जुना)कन्नडा शिलालेख आहे .शिल्पाने मंदिरे खच्चून भरली आहेत .बाहेरचा दगड पावसाच्या पाण्याने झिजला आहे .दोन तीन माकडे काही खाऊ आणलाय का बघायला येतात . आता रस्त्या समोरचे नानेश्वरा मंदिर हाच माणूस उघडून दाखवतो .खांबांची शोभा पाहात आपण चटकन त्यामधून दिसणाऱ्या काशि०चा फोटो घेतो .राजांचे चिन्ह हा एक त्यांचा आवडीचा विषय असतो .

लखुंडि -४ कल्याण चालुक्य राजांनी एक वेगळाच काल्पनिक प्राणी शुभचिन्ह म्हणून निवडला .त्याचे शिल्प इथे आहे .मोराची शेपटी (पिसारा ) ,घोड्याचे शरीर ,सिंहाचे पंजे ,मगरीचा जबडा आणि हत्तीची सोंड या प्राण्याला आहे . नानेश्वराच्या रस्त्यानेच पाच मिनिटांवर आहे म्युझिअम .आत ती सूर्यनारायणाची मूर्ती दिसते .एक मोठा नकाशाही आहे .आवाराच्या मागे मंदिर आहे .ब्रह्मजिनालय .सुंदर खांब आहेत .तिर्थँकराच्या या देवळातच ब्रह्मा आणि पद्मावति (=सरस्वती ?)च्या मूर्ती आहेत .एखाद्या खांबाशी माकडाचे कुटुंब बसलेले असते आपले नेहमीचे उद्योग करत .बाजूच्याच मंदिराबाहेर एक शिर नसलेली जैन तिर्थँकराची मोठी मूर्ती ठेवली आहे . आता बारा वाजत आले होते आणि आम्ही पाच मिनिटांत मुख्य रस्त्याला आलो .डेपोकडे जाण्याअगोदरच एक बस येतांना दिसली .हुबळी ?असे विचारत ड्रायवरास हात केला आणि त्याने बस थांबवली .तासाभरात हुबळी(साठ किमी) आले .वाटेत गदगला बाहेरच्या डेपोत थांबते .हुबळी स्टेशनचा स्टॉप अगोदरच येतो (दीड वाजला होता) .छान स्टेशन .रेल्वेनेही आम्हाला ३एसी त अपग्रेड करून खुश करून टाकले होते .परतीचा प्रवास छानच झाला .

सहल आयोजन ./समारोप १)मुंबईकडून :इथे लिहिलेला मार्ग . २)पुण्याहून: वर दिलेल्या जाण्यायेण्याच्या रेल्वे रात्री भलत्याच वेळी पुण्यास येतात .त्याऐवजी असे करता येईल - पुणे ते हुबळी ट्रेन नंबर १२७८० (+१७३०६)ने मंगळवारी दुपारी ४.२०ला निघून सकाळी ६.२५बुधवार हुबळी .बसने साडेआठपर्यँत लखुंडि .हे पाहून चारपर्यँत होस्पेट .गुरु ०हंम्पि दर्शन .शुक्रवारी सकाळी बदामिकडे .शनि०ऐहोळे ,पटटडकल .रवि०सकाळी बिजापूर .क्लोकरूममध्ये बैगा ठेवून बिजापूरदर्शन .रात्री ९.००ची गरीब रथ (नं ०६५११ ) पकडून सोमवारी पहाटे पाच पुणे . ३)गोव्याकडून अमरावती इक्स०(१८०४८) चार दिवस .मडगाव (०७.५०) हुबळी गदगमार्गे होस्पेटला तीन वाजता जाते .परत सकाळी ६.३० ला आहे .

हे लक्कुंडी (लक्कुंडीचा अल्बम मात्र दिसला नाही) कल्याण चालुक्यांचे काही महाल जैन घराण्यातील होते म्हणून त्यांनी जैन देवळे पण मोठ्या प्रमाणावर उभारली. हे असेच राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष आणि सिन्नर / देवगिरी यादवांच्या काळातही होत होतेच. सर्व ठिकाणांचे वर्णन खूप छान आणि सहज समजेल असं लिहिलंत. तुम्ही वर फिरायचा जो आराखडा दिलाय तो फार घाईघाईचा वाटतो म्हणजे दोन तीन तासात लक्कुंडी, एकेक दिवसातच हंपी आणि बदामी आणि एकाच दिवसात ऐहोळे आणि पट्टदकल. ह्यात ठिकाणे सर्व बघून होतील पण केवळ भोज्याला शिवून आल्यासारखे वाटणार नाही का? आयकोनॉग्राफी, मंदिरशैली बघायची तर भरपूर वेळ हवा. बाकी असेच लिखाण बेलूर, हळेबीडूवर पण येऊ द्यात.

लखुंडीचे फोटो त्या दुसऱ्या लिंकमध्ये आहेत .मोठ्या मूर्तीँचे घेतले पण आतली शिल्पे अंधारामुळे फ्लैश टाकल्यावर चमकली आणि नीट नाही आली .शिवाय फार लहान आहेत .तरी जी आहेत ती अपलोड करतो . लखुंडीला एक दिवस द्यायचा तर कुठे राहणार ?होस्पेटलाच राहून करून परत जायला लागेल .शिवाय आपल्या बरोबरचे दुसरे इतका वेळ देणारे हवेत .मी पहिल्यांदा एकटा होतो तेव्हा काय कुठे पाहून घेतले .या वर्षी बायको मुलगी होती .त्यांना एवढेच ठीक वाटले .म्हणूनच पर्यटक लखुंडि वाटेवर असून टाळतात . तुमचा पुण्याचा प्लान दिला आहे त्यात तुम्हाला साडे आठ ते चार वेळ मिळेल .कुणा एकाला बैगा संभाळत स्टैंडला बसवले तर रिकामे फिरता येईल .आठ तास खूप होतील .काय वाटते ? बेळूर हळेबिडू नाही पाहिले अजून पण केरळ (मंदिरे) पाहिले .

आता कधी जमते बघू! मला वाटते, ट्रेनने जाण्यापेक्षा आम्ही आमची गाडी घेऊन जाऊ, (गोव्यातून). ते जास्त बरे पडेल. हापिसात २५ वर्षे कन्नड लोकांचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे आणि सतत तोंड चालू असतेच. त्यामुळे भाषेचा काही प्रॉब्ळम येईल असे वाटत नाही.

स्व्ता: ची गाडी घेउन्न गेल्यास जास्त वेळ ही सारी ठिकाणे पहाता येतीलच . होस्पेट ऐवजी कमलापूर येथे रहाणे स्वस्त की महाग पडते हे मात्र तपासून पहावे. हंपीमधे रहाणे म्हणजे एखाद्याच्या घरी रहाणे. स्वस्त, थोडेसे गैरसोयीचे (खोल्या लहान) पण आपल्याला हवे तसे जेवण मिळण्यास सोयीचे.

कारने गेल्यास जास्ती वेळ ठिकाणे पाहता येतील नक्कीच.खासकरून लखुंडि सहज होईल .शिवाय कारचा प्लान इतरांना उपयोगी पडेल . माझ्या मते कारने गोव्याकडून लखुंडि -होस्पेट -चित्रदुर्ग करावे .नंतर कधी तरी बदामि-ऐहोळे-कुडलसंगमा-बिजापूर करावे . बिजापूर ते धारवाड/बिजापूर -होस्पेट चित्रदुर्ग-बंगळुरू हायवे आहेत .हुबळी -लखुडि-होस्पेट हायवे नाही परंतू रस्ता चांगला आहे .फक्त हायवेला टोल आहे . होस्पेटात राहण्याचे प्रचंड पर्याय आहेत .रात्री जेवणानंतर पाय मोकळे करायला शहर बरे वाटते .कमलापूर ओसाडवाणे वाटेल नंतर .कार नसल्यासही चिंता नसते कारण सकाळी ६ ते संध्या ६ दर दहा मिनिटांस बस सुटते .


बिजापूर डायरी (ऐसि अक्षरे -४२)

लेखकBhaktiयांनी शुक्रवार, 29/05/2026 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
बिजापूर डायरी
लेखिका - डॉ. ऐश्वर्या रेवडकर
विकसित भारताची चमकदार प्रतिमा आपण नेहमी पाहतो. मोठमोठी शहरे, आधुनिक सुविधा, वेगाने धावणारे जीवन आणि विकासाच्या गप्पा. पण या सगळ्याच्या पलीकडे अजूनही एक भारत असा आहे, जो जंगलात हरवलेला आहे. जिथे आजही रस्ते, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुरक्षित आयुष्य या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर हा असाच एक दुर्गम, नक्षलवादाच्या सावटाखाली जगणारा भाग. या भागात एक तरुण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर म्हणून पोहोचते.बस्तर विभागातील बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर आणि सुकमा या जिल्ह्यांतील सकारात्मक बदलांविषयीची लेखमालिका डॉ. ऐश्वर्या यांनी साधना साप्ताहिकासाठी लिहिली होती. त्याच लेखांतुन पुढे तिच्या अनुभवांतून जन्माला येते  ती “बिजापूर डायरी”.
याआधीही डॉ. ऐश्वर्या यांनी सर्च, स्पर्श आणि आरोही या संस्थांमार्फत वंचित समाजासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सेवाकार्य केले होते.
डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली ही डायरी केवळ एका डॉक्टरच्या अनुभवांची नोंद नाही, तर ती बस्तरच्या माणुसकीची, संघर्षाची आणि आशेची कहाणी आहे. इथल्या आदिवासी जीवनाचे वास्तव, त्यांच्या वेदना, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते, त्यांच्या डोळ्यांतील भीती आणि तरीही न हरवणारी जगण्याची जिद्द या पुस्तकातून अत्यंत संवेदनशीलपणे समोर येते.
पुस्तकातील अनेक प्रसंग मन हेलावून टाकतात. गर्भवती स्त्रिया अनेक किलोमीटर चालत,  कधी जंगलातून जीव धोक्यात घालून रुग्णालयात पोहोचतात. काही वेळा त्यांची अवस्था इतकी गंभीर असते की जगण्याची आशाच उरत नाही. पण अशा परिस्थितीतही डॉक्टर म्हणून डॉ. ऐश्वर्या शांतपणे, संयमाने आणि कौशल्याने उपचार करत राहतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात निर्माण होणारा विश्वास पुस्तकात अत्यंत हळुवारपणे उमटतो.
या भागातील वास्तव फक्त दारिद्र्याचे नाही, तर सततच्या संघर्षाचे आहे. एका बाजूला नक्षलवादी, दुसऱ्या बाजूला पोलीस आणि प्रशासन यांच्या संघर्षात सामान्य आदिवासी माणूस भरडला जातो. संशय, भीती, असुरक्षितता आणि हिंसा या वातावरणातही इथली माणसे जगण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही या पुस्तकात निराशेपेक्षा आशेचा सूर अधिक जाणवतो.
डॉ. ऐश्वर्या यांनी फक्त समस्याच मांडलेल्या नाहीत, तर या भागात काम करणाऱ्या सकारात्मक व्यक्तींची ओळखही करून दिली आहे. बारसूरमधील गोडबोले दांपत्य, शिक्षणासाठी झटणारे कार्यकर्ते, मुलांच्या भविष्यासाठी सुरू असलेले “बचपन बनाओ” अभियान, खेळातून मुलांना नवी दिशा देणारी बिजापूर स्पोर्ट्स अकादमी, सेंद्रिय शैलीच्या शेती प्रसारासाठीचा भूमगादी प्रकल्प, पर्यटनासाठी झटणारे निसर्गप्रेमी जीतसिंह आर्य,आदिवासी संस्कृती जपणारे विविध उपक्रम  या सगळ्यांमुळे बस्तरचा एक वेगळाच चेहरा समोर येतो.
IAS अधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, IPS अधिकारी डॉ. दिव्यांग पटेल यांसारखे अधिकारी केवळ प्रशासन चालवत नाहीत, तर लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, हे पुस्तकातून जाणवते. पंचशील आश्रमसारख्या संस्थांमुळे आदिवासी मुलांना शिक्षणाची आणि सुरक्षित आयुष्याची नवी संधी मिळताना दिसते.
“बिजापूर डायरी”चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील माणुसकी. पुस्तक कुठेही कृत्रिम वाटत नाही. प्रत्येक अनुभव हा जगलेल्या वास्तवातून आलेला असल्याने तो थेट मनाला भिडतो. आदिवासी समाजाविषयी सहानुभूती निर्माण करतानाच त्यांच्या संघर्षशील वृत्तीबद्दल आदरही निर्माण होतो.
बस्तरमधील आदिवासी समाजाचे जीवन जंगलाशी घट्ट जोडलेले आहे. आदिवासी संस्कृती जंगलातील विविध झाडे, फुले आणि फळांपासून ते पारंपरिक पेये तयार करतात. महुआच्या फुलांपासून बनवलेले पेय हे त्यांच्या सण, समारंभ आणि धार्मिक विधींचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच सल्फीच्या झाडातून मिळणारा गोड रस पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पेय मानले जाते.
तेंदू, इमली आणि इतर वनफळांपासूनही स्थानिक पेये तयार केली जातात. ही पेये केवळ खाद्यसंस्कृतीचा भाग नसून आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे प्रतीक आहेत.
बिजापूर डायरीमध्ये इंद्रावती नदीचा उल्लेख केवळ एका नदीप्रमाणे नाही, तर बस्तरच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून आलेला दिसतो. दाट जंगलातून शांतपणे वाहणारी इंद्रावती बस्तरच्या निसर्गसौंदर्याला अधिक गूढ आणि मोहक बनवते.
सलवा जुडूम चळवळीमुळे बस्तरचे सामाजिक जीवन हादरून गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तरीही इथला आदिवासी समाज पूर्णपणे कोसळला नाही. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा भागच बनून गेला आहे. निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या या लोकांमध्ये जगण्याची विलक्षण ताकद आहे, हे पुस्तक वारंवार जाणवून देते.
' बिजापूर डायरी ' वाचताना आपण फक्त एका प्रदेशाची माहिती घेत नाही, तर एका वेगळ्या भारताला भेटतो. संवेदनशील मनाने समाजाकडे पाहण्याची दृष्टी हे पुस्तक देते. वंचितांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षामागे किती माणुसकी आणि समर्पण दडलेले असते, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक मनाला अंतर्मुख करते.
हे पुस्तक वाचून संपल्यावर बस्तर, तिथली माणसे आणि त्यांचे जगणे दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. 'बिजापूर डायरी' ही फक्त डायरी नसून, अंधारातही आशेचा दिवा जपणाऱ्या माणसांची जिवंत कहाणी आहे. 

























राजस्थान ट्रिप

  तयारी, भाग १ लेखक जेडी यांनी मंगळवार, 14/04/2026 18:51 या दिवशी प्रकाशित केले. राजस्थान पहायचे असे खूप वर्षांपासून मनात होते. एकदा ट्रेनची...