कुंभलगड हे स्थान राजस्थानमधील मेवाड प्रांतातील राजसामंड नामक जिल्ह्याच्या जंगल विभागात (forest region) येते. कुंभलगड ला पोचण्याचे २ स्वतंत्र मार्ग आहेत. एक फालना वरून रणकपूर मार्गे व दुसरा उदयपूरहून. फालना ते कुंभलगड हे अंतर साधारणपणे ९० किमी आहे. उदयपूरहूनही जवळपास तितकेच अंतर आहे. फालना ते कुंभलगड ह्या मार्गावर बरोब्बर मध्यावर (साधारण ५० ते ५५ किमी) रणकपूर चे जैन मंदीर लागते. ह्या मंदीराच्या नंतरचा कुंभलगडापर्यंतचा रस्ता घाटांचा व वळणा-वळणांचा आहे.
सिसोदिया वंशीय मेवाड चा राणा कुंभा ह्याने पंधराव्या शतकात बांधलेली ही गढी शूरवीर योद्धा महाराणा प्रताप ह्यांचे निवासस्थानही आहे. राणा कुंभा हे राणा प्रताप ह्यांच्या पणजोबांचे आजोबा (आमच्या गाईडच्या भाषेत - 'परदादा के दादा'). मधल्या राजांची नावे गाईडने सांगितली होती. आता लक्षात नाहीत.
कुंभलगड मुख्यतः ओळखला जातो ते त्याच्या ३६ किमी लांब अतिभव्य तटबंदीमुळे! काही ठिकाणी ही तटबंदी १५ फूट इतक्या रुंदीची आहे. संपूर्ण जगात चीनच्या लांबलचक तटबंदीनंतर ह्या तटबंदीचा दुसरा क्रमांक लागतो अशीही माहिती मिळाली.
किल्ला चढून वर जाईपर्यंत एकूण तीन भव्य दरवाजे लागतात. किल्याच्या ह्या महादरवाजांना तिथे 'पोल' असे म्हणतात. पहिला दरवाजा ओलांडून चारचाकी वाहने पुढे येऊ शकतात. 'राम पोल' च्या अलीकडे वाहनतळ आहे. तिथे गाडी सोडून पुढे पायी गड चढावा लागतो. अधे मधे छोटी प्रवेशद्वारे लागतात.
राम पोलच्या अलीकडचे प्रवेशद्वार:
राम पोलः

वर चढताना सगळीकडे सपाट चढण असल्याने खूप दमछाक होत नाही. मागच्या आठवड्यात १५ सप्टेंबरला इथे भेट दिली तेव्हा ढगाळ वातावरण असल्याने हवा आल्हाददायक होती. त्यामुळेही असेल कदाचित, पण चढणे अजिबात त्रासदायक वाटले नाही.
आपल्याकडच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गड-किल्ल्यांशी इथल्या किल्ल्यांची तुलना करण्याचा मोह झालाच. संपूर्ण प्रवासभर जे काही डोंगर पाहिले ते उघडेबोडके होते. कुंभलगड हा जंगल विभाग असल्याने हिरवाई होती. पण सह्याद्री प्रमाणे दाट जंगले, दर्या, कडे-कपार्या, घनदाट हिरवाई मधे लपलेले डोंगरमाथे असे काही आढळले नाही. तेथील गाईड्स/ स्थानिक लोकांच्या दृष्टीने कुंभलगड चढणे कष्टप्रद आहे. आमच्या गाईडने "पाण्याची बाटली जवळ नक्की बाळगा. चढून खूप दम लागेल" असे सुरुवातीलाच सांगितले. म्हणून पुन्हा मागे जाऊन कार मधून पाणी घेऊन आलो. तर संपूर्ण गड तासाभरात चढून सर्वात वर पोचलो देखील होतो! २-२ तास कठीण वाटांनी ट्रेक करून डोंगराचे/ किल्ल्याचे शिखर गाठावे लागणार्या आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या मानाने हा किल्ला अगदीच "फूस्स्स" वाटला.
कदाचित उंट हे स्वारी/शिकारी व युद्धासाठीचे मुख्य वाहन असल्याने अशा चढणीचा रस्ता उपयोगी असावा.
सपाट चढणीचा रस्ता:

संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीच्या घेर्याच्या आत एकूण ३६० मंदीरे आहेत. त्यातली काही जैन तर काही हिंदू आहेत. पैकी बरीचशी (जवळपास निम्मी) मंदीरे पडझड झाल्याने व काही डागडुजीच्या कारणास्तव बंद आहेत. काहींमधे अजूनही पूजा-अर्चा चालते. किल्ल्याच्या पायथ्यानजीक स्थानिक गावकरी राहतात. अंदाजे लोकसंख्या कळू शकली नाही. किल्ला चढताना अरवली पर्वतरांगांचे नयनरम्य दर्शन घडत राहते. इथे घोंघावणारा वारा नव्हता. अधे मधे वार्याची झुळूक व अधे मधे सुखद ऊन तर चक्क मधेच पावसाचा पुसट व गात शिडकावा अशा वातावरणात गड चढताना मधेच आसपासच्या जंगलातला मोराचा केकारव स्पष्ट ऐकू येत होता.
राम पोल मधून आत शिरल्या शिरल्या उजवीकडे दिसणारे शिव मंदीरः
शिवमंदीरासमोर उभे राहून दिसणारा किल्ल्याचा भाग (चढणीच्या सुरुवातीचे बांधकाम व किल्ल्यावरील महाल):

चढणीच्या सुरुवातीलाच आमच्या गाईडने गडाच्या बांधकामा बद्दल तेथे प्रचलित असलेली रंजक आख्यायिका सांगितली. ती अशी -
"सुरुवातीला राणा कुंभाने जवळच असलेल्या केलवाडा ह्या भागात स्वतःची गढी उभारण्यासाठी बांधकामाची सुरुवात करवली. परंतु दर दिवशी जितके काही बांधकाम होई ते सर्वच्या सर्व रात्रीत कोसळून पडे. असे सतत होऊ लागले तेव्हा राजाच्या पदरी असलेल्या एका सैनिकाने रात्री दबा धरून ह्यात कुणी मानवी घातपात किंवा दगाफटका तर नाही ना, ते पाहण्याचे ठरविले. त्याप्रमाणे केले असता त्याच्या असे लक्षात आले की बांधकाम आपोआपच कोसळून पडते व ह्यात मानवी कारवाईचा काहीही हात नाही. त्याने राणा कुंभाला हा दैवी प्रकोपाचा भाग असल्याचे सांगून एखाद्या साधू/ संतपुरुषाचा सल्ला ह्या बाबतीत घेण्याचे विनविले. त्यानुसार भैरव सिंग नामक साधूस पाचारण करण्यास आले. त्याने असा सल्ला दिला की दैवी प्रकोपावर उपाय म्हणून एक मानवी बळी द्यावा लागेल. असे सांगून त्या साधूने स्वतः बळी जाण्यास सिद्ध असल्याचे ही सांगितले. फक्त त्याची एक अट होती. ती म्हणजे 'मी मंत्रसाधना झाल्यानंतर चालायला सुरुवात करेन. मी जिथे पहिले थांबेन तिथे माझे शिर धडावेगळे करायचे व किल्ल्याची तटबंदी तिथून चालू करायची. तिथून माझे धड बिना शिराचे चालत जाईल. जिथे माझे धड कोसळेल, तिथून मुख्य किल्ला बांधणे चालू करायचे.'"
अशा प्रकारे किल्ल्याचे बांधकाम चालू करून मग पूर्णत्वास नेण्यात आले. जिथे मुंडके छाटण्यात आले तिथल्या महादरवाज्याला 'भैरव पोल' असे नाव आहे. तिथून थोडे पुढे भैरव सिंगच्या बलिदानाचे स्मरण म्हणून एक छोटुकले देऊळ बांधण्यात आले. भैरव पोल नंतर गढ चढताना उजवीकडे वाटेत हे छोटे देऊळ दिसते.
चढणीदरम्यात दिसणारा तटबंदीचा भाग व मंदीरे:
भैरव पोलः
भैरव पोल वरून दिसणारी तटबंदी:
बिनापायर्यांची सपाट चढण

किल्ल्यात कुंभा पॅलेस, बादल पॅलेस, क्वीन्स आणि किंग्स पॅलेस (राजा-राणीचा महाल) ह्या वास्तु आहेत. सर्वात शिखरावरील महाल हा बादल पॅलेस ह्या नावाने ओळखला जातो. कारण पावसाळ्याच्या मोसमात ढगांनी हा पूर्ण महाल वेढला जातो. वर पोचण्याच्या मार्गावर उजव्या बाजुला मुदपाकखाना (रसोई) दृष्टीस पडतो. हा भाग सध्या डागडुजीकरीता बंद ठेवला असल्याकारणाने बाहेरून पहावे लागले. राजस्थान मधील मुख्य अन्न शाकाहार हे आहे. त्यामुळे राजाच्या मुदपाकखान्यात शाकाहारासाठी मुख्य विभाग असे. तसेच मांसाहार पकविण्यासाठी स्वतंत्र विभाग असे. गाईडने धान्ये साठविण्याचे गोदामही दुरूनच दाखविले.
किल्ल्याचे अंतर्गत बांधकामः

शत्रूने हल्ला केल्यास हत्तीच्या सहाय्याने दिंडी दरवाजा धडका देऊन पाडण्यात येत असे. तेव्हा धडक देणार्या हत्तींच्या गंडस्थळांना अणकुचीदार खिळे टोचून त्यांना शक्तीहीन केले जात असे. हत्तींचे डोके ज्या उंचीवर येईल साधारण त्या उंचीवर महादरवाजाला हे खिळे बाहेरून लावण्यात येत असत. (शिवाजीराजांच्या किल्ल्यांमधेही ही युक्ती वापरल्याचे आपल्या गडकिल्ल्यांमध्ये दिसते.)
अणकुचीदार खिळे ठोकलेला महादरवाजा:

वरील महाद्वाराच्या आत गेल्या गेल्या डावीकडे तोफखाना आहे. हत्तींनी धडका देऊन दिंडी दरवाजा सर करून किल्ल्यात प्रवेश केलाच तर शत्रुसैन्यावर लगेच तोफांचा मारा करण्यासाठी अशी योजना असे - इति गाईड महाराज!
तोफखाना व पाहुणे मंडळींचे हत्ती बांधण्याची जागा:
राणा कुंभाचा महाल (कुंभा पॅलेस):
गडावर आलेल्या पाहुण्यांची घोडे बांधण्याची जागा:
पाणी साठविण्याची जागा:
महाराणा प्रताप ह्यांचे जन्मस्थळः

चढणीच्या शेवटी राजाचा व राणीचा महाल जवळ जवळ आहेत. पैकी राजाचा महाल सध्या बंद आहे. राणीच्या महालात सख्या व दासींच्या खोल्या, राण्यांचे शयनकक्ष इ. आहे. मध्यभागी मोकळा चौक आहे. इथून पुढे वरच्या बादल पॅलेस मधे जाण्यासाठी चिंचोळ्या पायर्या आहेत. सर्वात वर छतावर जाण्याचाही मार्ग आहे. इथून संपूर्ण किल्ल्याभवतालचा परीसर न्याहाळता येतो. पण पुरेसे सुरक्षित कठडे नसल्याने पटकन एक-दोन फोटो काढून लगेच खाली उतरलो.
राजा व राणी महालः (राजा महालाचा बंद दरवाजा):
राणी महालाच्या आतील राणीच्या खोल्या:
राणी महालाच्या आतील चौक
बादल पॅलेसच्या कळसा(छता)वरून दिसणारा किल्ल्या भवतालचा परीसर व अस्पष्टशी तटबंदी:

तळटीपः
सर्व प्रचि स्वतः काढलेले आहेत.
माहिती - गाईड + विकीपीडीया ह्यांच्या सौजन्याने!
कुंभलगडचा लाईट शो अप्रतिम असतो.

राणा कुंभा हे राणा प्रताप ह्यांच्या पणजोबांचे आजोबा (आमच्या गाईडच्या भाषेत - 'परदादा के दादा'). मधल्या राजांची नावे गाईडने सांगितली होती. आता लक्षात नाहीत. >>
माझ्या माहिती प्रमाणे -
राणा कुंभा
रायमल
राणा सांगा
उदयसिंह
राणा प्रताप
अशी वंशवेल आहे. 'परदादा के दादा' की 'परदादा के पिता' ? कुणी प्रकाश टाकू शकेल?
मायबोली झब्बुमय झाल्याने इथेपण झब्बु देतोय... 








झब्बू...

कुम्भालगढ आणि राणकपुर
Submitted by आशुतोष०७११ on 31 October, 2009 - 17:20 कुम्भालगढ -
कुम्भालगढ हा राजस्थानच्या मेवाड प्रांतातील एक अतिशय महत्वाचा किल्ला. हा कुम्भालमेर या नावानेही ओळखला जातो. राणा कुंभाने हा किल्ला १५व्या शतकात उभारला. महाराणा प्रतापचा जन्म देखील ह्याच किल्ल्यावर झाला. १९व्या शतकापर्यंत हा किल्ला उदयपुरच्या राजघराण्याच्या ताब्यात होता. २००० साली तो जनतेसाठी खुला करण्यात आला. दररोज सुर्यास्ताच्या वेळेस काही तासांसाठी हा किल्ला प्रकाशमान केला जातो. उदयपुरपासुन ८२ कि.मी.वर असणार्या ह्या किल्ल्याला पोचण्यासाठी सुमारे २ १/२ तासांचा वेळ लागतो. चितोडगडनंतर मेवाडातील हा एक महत्वपुर्ण किल्ला आहे.


कुम्भालगढ समुद्रसपाटीपासुन १९०० मी. उंचीवर आहे. गडाची तटबंदी ३६ कि.मी. लांबीची आहे. असं म्हणतात की ह्यापेक्षा मोठी तटबंदी म्हणजे चीनची ग्रेट वॉल! मुख्य प्रवेशद्वारापासुन प्रासादापर्यंत ७ दरवाजे आहेत. किल्ल्यात एकूण लहान्मोठी मिळून ३६० देवळे आहेत. त्यापैकी ३०० जैनधर्मीय आणि उर्वरित हिंदुधर्मीय देवळे आहेत.


ह्या किल्ल्याच्या तटबंदीबाबत दंतकथा अशी की राणा कुंभाने गडाला तटबंदी बांधण्याचे खुप प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी ठरले.शेवटी त्याने एका स्थानिक साधुची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. साधुने त्याला सल्ला दिला की यासाठी स्वतः साधुचाच बळी देण्यात यावा. साधुचे शिर जिथे पडेल त्या जागी देऊळ आणि धड जिथे पडेल त्या जागी तटबंदी उभारण्यात यावी. त्याप्रमाणे कुम्भालगढाची तटबंदी उभारण्यात आली.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार राणा कुंभ दररोज जवळपास ५० किलो तुप आणि १०० किलो कापुस जाळुन अरवली पर्वतरांगेतल्या शेतात रात्री राबणार्या शेतकर्यांसाठी प्रकाशाची सोय करत असे.

ईतिहास -
आज ज्या जागेवर कुम्भालगढ उभा आहे ती जागा पुर्वी जैनधर्मीय राजा संप्राती आणि त्याच्या घराण्याकडे होती. हे घराणे २ र्या शतकातील मौर्य सम्राटांचे वंशज होत.
कुम्भालगढाची रचना ही स्वतः राणा कुंभाची होती. हा गडदेखील त्याने स्वतःच्या देखरेखीखाली उभारला. राणा कुंभाचे साम्राज्य राजस्थानातल्या रणथंबोरपासुन ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरपर्यंत पसरलेले होते. त्याच्या अधिपत्याखाली एकूण ८४ किल्ले होते. त्यापैकी ३२ किल्ल्यांची संरचना ही स्वतः राणा कुंभाची होती. ह्या सगळ्या किल्ल्यांपैकी कुम्भालगढ सर्वात भव्य आणि विशाल!


कुम्भालगढ हा मेवाड आणि मारवाड यांच्या सीमेवरील किल्ला. दुर्गम स्थानामुळे बरेचदा याचा ऊपयोग परकीय आक्रमणापासुन बचावासाठीच होई. १५३५ साली चितोडगड परकीयांच्या ताब्यात गेल्यावर मेवाड घराण्याचा वंशज बाल्यावस्थेतील राजकुमार उदयला ह्याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवले होते.ह्याच राजकुमार उदयने पुढे उदयपुर शहर वसवले. शहेनशहा अकबर,आमेरचा राजा मानसिंग आणि मारवाडचा राजा उदयसिंग ह्यांच्या एकत्रित फौजांनी कुम्भालगढावर कबजा करेपर्यंत हा गड अजिंक्यच होता.
राणकपुर -
राणकपुरचे जैन मंदिर प्रसिद्ध आहे. ह्या जैन मंदिरासाठी सौम्य पिवळसर झाक असलेला संगमरवर वापरण्यात आला आहे. हे देऊळ एकूण १४४४ संगमरवरी खांबांवर उभे आहे. प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे. वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही दोन खांबांवरील कोरीवकाम सारखे नाही. असं म्हणतात की मंदिरातील खांब मोजणं अशक्य आहे.प्रत्येक खांबावर कोरलेल्या मुर्त्या एकमेकां सन्मुख आहेत.




ह्या मंदिराची रचना चौमुखी आहे. ह्यामागील कारण असं की चार ही दिशा आणि पर्यायाने संपूर्ण विश्वव्यापी असे महावीर आहेत.


ईतिहास -
ह्या मंदिराच्या निर्मितीबद्दलही खुप प्रवाद आहेत. १४ व्या किंवा १५ व्या शतकात याची उभारणी झाली असावी. राणा कुंभाच्या राजाश्रयाने ह्या मंदिराची उभारणी धन्ना शाह नामक सरदाराने केली.


ही दोन्ही स्थळे कोणत्याच सहलीत समाविष्ट नसतात. पण ज्यांना काहीतरी हट के पाहण्याची आवड आहे,त्या उत्साहीजनांसाठी ही स्थळे मस्ट.
हे ठिकाण नेमकं कुठे आहे ते जालावर शोधलं तर या दुव्यावर हे प्रकाशचित्र सापडलं, ही तीच जागा आहे का?
तीच जागा असेल तर त्या अरुंद पायर्यांच्या जिन्याने वर जातांना चढता-उतरतांना मस्त वाटलं असणार!
(तुम्ही 'सिंगेन'हून ट्रेन घेतली म्हणता तर तुम्ही जर्मनीतून या ठिकाणी गेलात का? तुमच्या पहिल्या वाक्यातील रोमच्या उल्लेखाने थोडं गोंधळायला झालं म्हणून विचारतोय.)