Friday, September 17, 2021

कॅनडा सफर जास्परची

 कॅल्गेरीला आल्यापासून जास्परला जाण्याचे मनात होते. जास्पर हे कॅनडामधील Alberta राज्यातील एक अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण. वर्षातील ६ -७ महिने बर्फ, अतिशय थंड असे वातावरण, त्यात आजूबाजूला उंचउंच पर्वतरांगा, आणि त्यात वसलेले हे निसर्गचे छोटेसे जग..

मागचा वीकांत मोकळा होता, त्यात शुक्रवारीच पुत्ररत्नाने "बाबा आपण अस्वल बघायला कधी जायचे ? " हा "सवाल माझा ऐका" estyle विचारलेला. गाडीची टाकी फुल्ल केली, घरून sandwiches , बटाटाच्या काचर्या , पोळ्या असा शिधा तयार झालाच होता. रथात स्वार होऊन आमचा कबिला जास्परच्या मार्गाला कधी लागला ते कळे कळे पर्यंत आमचा पहिला थांबा एका छोट्या तळ्याकाठी झाला देखील...

तळ्यातील थंड पाण्यात थकवा थोडा दूर करून आणलेल्या sandwiches चा फडशा पडून आम्ही Banff मार्गे Lake Louise कूच केली..

लांबच्या लांब रस्ता..

Lake Louise चे तळे वर्षातील ८ महिने बर्फाच्चादित असते. जून महिन्यात देखील त्यावर चांगलाच बर्फ साचलेला होता. जणू संपूर्ण तळे गोठलेले होते. विशेष म्हणजे तापमान १० - १२ च्या आसपास होते.

संपूर्ण गोठलेले तळे....

झाडाखालून निसर्ग टिपण्याचा अजून एक प्रयत्न...

आजूबाजूला गिर्यारोहण करण्यासाठी केलेल्या वाटा, आलेले उत्साही गिर्यारोहक आणि पर्यटक डोळेभरून बघून झाल्यावर आणि थोडी भटकंती केल्यावर पुढील वाटचाल सुरु केली. ह्या ठिकाण नंतर पुढे Columbia Icefields वर जाण्याचे वेध लागले होते.

Columbia Icefields मध्ये आगमन..

स्वागतकक्षात ठेवलेले पेंढा भरलेले अस्वल..

glacier वर जाण्यासाठी तयार केलेला विशेष रथ..

ह्या glacier ची जाडी ( thickness ) Eiffel Tower च्या उंचीहून जास्त आहे असे सांगितले जाते. ह्या भागातील पाण्याचा एकमेव श्रोत

Glacier वर आल्यावर पहिले पाउल...

स्वागतकक्षा कडे परत आल्यावर थोडा पोटोबा भरून आता पुढे काय काय आहे ह्याची चौकशी केली.सूर्यास्ताच्या आत जास्पर गाठायचे होते. एकदा तुम्ही Icefields पुढे निघालात कि मानवी वस्ती थेट जास्परमध्येच. संपूर्ण वाटेत एकही गाव, खेड तर सोडाच, साधा पेट्रोल भरायला पंपही मिळणार नाही. २०० किमी साठी फक्त आपण आणि निसर्ग. ह्या वाटेवर एके ठिकाणी पाटी वाचली.. " जंगलातील प्राण्यांना खायला घालू नये.. तुम्ही स्वत त्यांचा खाद्य होण्याची शक्यता आहे." कुतूहल जागे झाले की असे कुठले प्राणी असावेत आणि एक एक करत त्यांनी दर्शन दिले. मध्येच कॅमेराने दगा दिला त्यामुले श्री व सौ अस्वल ह्यांचे नृत्य, कॅनडा मूस नामक प्राण्याचे धावणे ह्या सारखी चित्रे काढून सुद्धा नीट आली नाहीत. जी आली ती खाली देत आहे..

चिरंजीव अस्वल ( थोडे लाजले फोटो पोज देताना ) ...

"बाबा म्हणतात लेकरू, आई म्हणते पाडस..." ह्यातील हे हरणाचे पाडस ( ३-४ तरी आहेत :-) )

आणि हा कॅनडा मूस.. मोठा अजब प्राणी.. अजिबात घाबरत नाही.. मी इतक्या जवळून फोटो काढला तरी जागचा हलला नाही बिलकुल...

क्रमश:

 

 

जास्परला रात्री मुक्कामास पोहोचलो. दिवसभर उनाडक्या केल्यामुळे म्हणा कि निसर्ग पाहून म्हणा भूक अशी लागली नव्हती. तरी दोन घास पोटात टाकून आरामात निसर्गाच्या कुशीत निद्राधीन झालो.

सकाळी उठून आन्हिके उरकून लवकर पळ काढला तो Jasper Tramway कडे. इथे Canadian Rockies वर नेणारा एक गंडोला आहे. गन्डोल्यात बसण्यासाठी लोक सकाळ पासून रांग लाऊन गर्दी करतात असे ऐकले होते. इतक्या लांब येऊन अवलक्षण कशाला करा म्हणून ९ वाजताच रांगेत उभा ठाकलो.

गंडोला..

गन्डोल्याचा एकंदर मार्ग बघता डोळे पांढरे झाले. एक तर सुसाट वारा, त्यात उंच उंच नेणारा तो पेटारा आणि कमी कमी होत चाललेला प्राणवायू.. एकदम दडपण आला. पण वर उतरल्यावर काय सांगावा महाराजा.. वर्णन करण्या पलीकडे असणारा तो देखावा.

इतक्यात कुठूनशी एक खार दिसली. एवढ्या दुर्दम ठिकाणी ती काय करत होती कुणास ठाऊक, पण तिने हळूच लाजून अशी एक पोज दिली आणि एकदम जमिनीत गुडूप झाली..

वरतीच एक खानावळ वजा कॅन्टीन आहे. तिथे Mexican खाद्यपदार्थांना न्याय देऊन आम्ही खाली उतरलो. आता कूच करायची होती ते Athabasca Falls कडे.

Columbia Icefields च्या उत्तरेस असणारा हा धबधबा. साधारण ७० किमी पाण्याचा प्रवाह वाहत वाहत इथे येतो आणि अचानक जोर पकडून सुसाट वाहत अक्षरश खडक फोडून विवर तयार करतो. मुळात मला पाण्याचे अवास्तव वेड आहे. Niagara पासून ते Ireland च्या glendalough पर्यंत बरेच धबधबे बघितलेले. पण हा वेडावून गेला.

कोसळणाऱ्या पाण्याने बनवलेले विवर..

माहितीपत्रक

फुटलेली नवीन पालवी.. झाडांची जगण्याची अशी जिद्द कुठली ?

ह्याचाच एक सावत्र घराण्यात भासावा असा एक छोटा भाऊ म्हणजे Sunwapta Falls . तोही बघून घ्यावा म्हणून गाडी तिकडे वळवली. हाही धबधबा छोटेखानी असला तरी मजेदार आहे.

आता परतीचे वाट ६०० किमी ची. त्यात पहिले ३०० किमी मानव वस्ती नाही. म्हणून आपला दिवेलागणीच्या आता घरी परत जाऊ ह्या हिशोबाने परत निघालो. पाय निघत नव्हते, पण पुन्हा पुढील मोठ्या विकांताला राहिलेली ठिकाणे बघू असा ठोस वायदा मनाशी करून परतीच्या वाटेवर गाडी पळवू लागलो..

निसर्ग जणू मला खुणावून सांगत होता.. " पिकचर तो अभी बाकी ही मेरे दोस्त...."

समाप्त...

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...