Friday, October 29, 2021

दुबई : मरूभूमितले नंदनवन

 दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

📢   हे प्रवासवर्णन एका दीर्घ लेखाच्या स्वरुपात यंदाच्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहायला घेतले होते. परंतु प्रयत्न करूनही ते लेखन पाठवण्यासाठी वाढवून दिलेल्या मुदतीतही लिहून पूर्ण झाले नाही त्यामुळे दिवाळी अंकात नाही तर किमान दिवाळीत तरी ते मिपावर प्रकाशित करावे ह्या उद्देशाने हे प्रवासवर्णन आता पूर्ण करत करत तीन किंवा चार भागात प्रकाशित करत आहे.

प्रस्तावना :-

नमस्कार

गेल्या तीन वर्षांत अनेकदा ठरवूनही काही ना काही कारणांमुळे लिहायचे राहून गेलेले एक प्रवासवर्णन ह्या वर्षीच्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहून पाठवायचे ठरवले होते. यंदाचा मिपा दिवाळी अंक हा "प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक" असल्याचे आवाहनाच्या धाग्यात वाचले आणि लेखन विषयाधिष्ठित असणे बंधनकारक नसल्याचा स्पष्ट उल्लेख आवाहनात असूनही प्रवास वर्णनपर लेखन दिवाळी अंकासाठी पाठवावे की नाही ह्या विचारात पडलो होतो.

दुसऱ्या दिवशी आवाहनाच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचताना मिपाकर ‘चौकटराजा’ ह्यांच्या प्रतिसादातील,

प्रेम - एखाद्या गोष्टीतील गुणाचा साक्षात्कार होताना दोषांचेही ज्ञान होऊन आकर्षण निर्माण होणे, त्या अनुषंगिक काळजी व कौतुक निर्माण होणारी मनाची अवस्था म्हणजे प्रेम. साहजिकच प्रेम ही द्वेषाच्या मानसिक अवस्थेची दुसरी बाजू आहे . जगातील अनेक समस्या प्रेमाने सोडविल्या आहेत व प्रेमानेच त्या निर्माण केल्या आहेत असे मानवी इतिहास सांगतो.

रोमान्स - कोणत्याही लहान सहान गोष्टीतही आनंद शोधण्याची मानसिक अवस्था म्हणजे रोमान्स.

शृंगार- कोणत्याही साधारण दिसणाऱ्या गोष्टीला सजवून, नटवून उत्तम कसे दाखवता येईल असा प्रयत्न प्रथम मनाकडून मग शरीराकडून होणे म्हणजे शृंगार.

अशा प्रेम... रोमान्स...आणि शृंगाराच्या नव्या व्याख्या वाचल्या, आणि ह्या तिन्ही कसोट्यांवर हे लेखन खरे उतरेल अशी धारणा झाल्याने हे प्रवास वर्णन लिहायचे निश्चित केले!

वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० सालच्या नोव्हेंबर महिन्यात सिमला-कुलू-मनाली-वैष्णोदेवीच्या ट्रीपला गेलो असताना, त्यावेळी इयत्ता बारावीत शिकत असलेली सहप्रवासी अदिती आणि माझी पहिली भेट ट्रीपच्या पहिल्या दिवशी दिल्लीत झाली होती. लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे सारखा काही प्रकार नव्हता पण वरील व्याख्ये प्रमाणे आधीची काही वर्षे मैत्री, मग एकमेकांतल्या गुण-दोषांचा साक्षात्कार होऊन आकर्षण, प्रेम निर्माण होत पुढे प्रेम-विवाह असा ह्या नात्याचा प्रवास झाला आणि दरवर्षी लग्नाचा वाढदिवस शक्यतो परदेशी पर्यटनाला जाऊन साजरा करण्याच्या आमच्या परंपरेचे पालन करताना एकमेकांच्या सोबतीने हि सफर घडलेली असल्याने त्यात ‘प्रेम’ आहे.

कोणत्याही लहान सहान गोष्टीतही आनंद शोधण्याची सवय आम्हाला असल्याने त्यात ‘रोमान्स’ पण आहे.

तसेच लेखनात फारशी गती नसली तरी अतिशय साधारण अशा ह्या लेखाला यथाशक्ती नटवून, सजवून सादर करण्याचा प्रयत्न इथे करतोय त्यामुळे त्यात ‘शृंगार’ सुद्धा आहे.

अर्थात हे झाले माझे विचार आणि माझ्या कल्पना, प्रत्यक्षात तसे काही नाही आढळले तरी मिपाकर मोठ्या मनाने सांभाळून घेतील हा विश्वास देखील आहेच!


पूर्वतयारी :-

२ एप्रिल हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. तो दिवस मध्यवर्ती ठेऊन पर्यटनाला जाण्यासाठी मला सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता पण अदितीला काही कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे ३१ मार्च ते ४ एप्रिल असे एकूण पाचच दिवस सलग सुट्टी मिळणे त्यावेळी शक्य होते.

पाच दिवसात पर्यटनाच्या नावाखाली प्रवाशांची प्रचंड दमछाक करत एका किंवा दोन-तीन शेजारी देशांमधली ठराविक आकर्षणे दाखवून आणणाऱ्या पॅकेज टूर्सचे पर्याय जगभर उपलब्ध असतात, परंतु 'Package Tour' पेक्षा 'Leisure Travel' आम्हाला आवडत असल्याने नेहमीप्रमाणे स्वतःच टूरचे नियोजन करायला घेतले. काही वर्षांपूर्वी कामानिमित्ताने माझा एका रात्रीसाठी आणि अदितीचा लंडन ते मुंबई डायरेक्ट फ्लाईटचे बुकिंग उपलब्ध नसेल तेव्हा 'Emirates'ने केलेल्या प्रवासादरम्यान काही तासांचा ले-ओव्हर/फ्लाईट चेंज असल्याने अनेकदा दुबईच्या भूमीला पदस्पर्श झालेला होता. परंतु दोघांनाही त्यावेळी तिथली पर्यटन स्थळे पाहता आली नसली तरी आम्हाला ती कायमच आकर्षित करत असल्याने मग, फार लांबचा प्रवास पण नाही आणि एंजॉय करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांमधून आपल्या आवडीनुसार निवड करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने दुबईला जाण्याचे ठरले.

शारजाला राहणाऱ्या एका मित्राकडून कानू ट्रॅव्हल (Kanoo Travel) नावाची कंपनी संपूर्ण युएई मध्ये दर्जेदार पर्यटन विषयक सेवा, सुविधा देत असल्याचे समजल्याने त्यांच्या वेबसाईटवर संपर्क साधला. त्यांच्याकडून आलेल्या उत्तरात त्यांनी आम्हाला हवी असलेली माहिती आणि मार्गदर्शनासाठी भारतातील दिल्लीस्थित ‘DestynAsia Holidays’ नावाची त्यांची संलग्न कंपनी आता आमच्या संपर्कात राहील असे कळवले.

त्यांनी कळवल्या प्रमाणे ‘DestynAsia’ ची प्रतिनिधी असलेल्या प्रगती शर्मा नावाच्या मुलीचा फोन आला आणि तिने आवश्यक तेवढी माहिती विचारून घेतली. थोड्याच वेळात व्हिसा, विमानाच्या जाण्या-येण्याच्या वेळा आणि त्यानुसार बदलणाऱ्या तिकिटांच्या किमती, फाईव स्टार/फोर स्टार/थ्री स्टार असे हॉटेल्स चे पर्याय आणि रूमच्या किंमती, भेट देण्यासारख्या ठिकाणांची यादी/ त्यांची प्रवेश फी, प्रायव्हेट टूर्स आणि सीट-इन-कोच चे पर्याय आणि त्यांचे दर, एअरपोर्ट ट्रान्सफर साठी अगदी अलिशान लिमोझिन पर्यंतचे पर्याय आणि त्यांची भाडी अशी भरपूर माहिती असलेली ईमेल तिने पाठवली.

विमानाची तिकिटे आम्ही 'त्यांचे निष्ठावान ग्राहक' असल्याचे बक्षीस म्हणून विशेष सवलत देऊ करणाऱ्या 'मेक माय ट्रीप' वरून स्वतःच बुक केली आणि हॉटेलची रूम स्वतः बुक करण्यापेक्षा DestynAsia तर्फे बुक करणे स्वस्त पडत असल्याने ते काम आणि बाकी सर्व गोष्टींचे बुकिंग जसे कि एअरपोर्ट ट्रान्सफर, निवड केलेल्या ठिकाणांच्या फुल डे / हाफ डे टूर्स आणि यु.ए.ई. व्हिसा वगैरे गोष्टी त्यांच्यावरच सोपवायचे ठरले.

त्यानंतर तीन-चार दिवस रोज आमचा आज हॉटेलच बदल, तर उद्या एखादे ठिकाण बदल, मग परवा आधी ठरलेल्या एखाद्या दिवसाचा कार्यक्रमच बदल असा खेळ ईमेल वर उत्तर-प्रत्युत्तरातून चालू होता. प्रगतीने अजिबात न कंटाळता त्याबरहुकूम आमची सर्व बुकिंग्ज करून दिली आणि आमचा चार दिवस आणि चार रात्री दुबईत व पाचव्या दिवशी घरी परत असा एकूण पाच दिवसांचा कार्यक्रम तयार झाला. सर्व बुकिंग्जचे पैसे भारतीय चलनात भरून झालेले होते त्यामुळे दुबईतील खरेदीची सारी भिस्त डेबिट/क्रेडीट कार्डसवर ठेऊन निघण्याच्या दोन दिवस आधी किरकोळ खर्चासाठी म्हणून थोडेफार दिरहम घेतल्यावर प्रवासाची तयारी पूर्ण झाली.

दिवस पहिला :-

शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी साडे आठ वाजता इंडिगोची मुंबई-दुबई फ्लाईट असल्याने त्याआधीचे विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ हाताशी ठेऊन आम्ही पहाटे साडेपाचला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजर झालो. फ्लाईट ड्यूरेशन साडेतीन तासांचे होते आणि उड्डाण वेळेवर झाल्याने स्थानिक वेळेतील दीड तासाच्या फरकानुसार सकाळी साडेदहाला दुबईला पोचलो.

इमिग्रेशन साठी बरीच गर्दी असल्याने त्यात आणि बॅगेज कलेक्शन मधे जवळपास तासभर गेल्यावर मग प्रचंड विस्ताराच्या दुबई एअरपोर्ट वरून बाहेर पडण्यासाठी असलेल्या शटल ट्रेनने अगदी काही मिनिटांचा प्रवास करून पावणे बारा वाजता बाहेर आलो.

आदल्या दिवशी प्रगतीने फोन करून कळवल्या प्रमाणे आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी आलेला कानू ट्रॅव्हलचा 'झुबेर' नावाचा प्रतिनिधी गेटवर आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. आमची भेट झाल्यावर त्याने पार्किंग मधे थांबलेल्या ड्रायव्हरला फोन करून गाडी तिथे घेऊन येण्यास सांगितले आणि एक मोठा लिफाफा माझ्या हातात दिला ज्यात आमच्या हॉटेलच्या बुकिंग पासून प्रत्येक दिवसाच्या प्रवासाची व्हाउचर्स आणि पर्यटन स्थळांची एंट्री टिकेट्स अशी कागदपत्रे होती. गाडीत बसल्यावर त्याने तो लिफाफा मला उघडायला सांगितले आणि त्यातल्या व्यवस्थित क्रमानी लावलेल्या व्हाउचर्स मधले पहिले व्हाउचर जे आत्ताच्या आमच्या एअरपोर्ट ट्रान्सफरसाठीचे होते ते हॉटेलवर पोचल्यावर ड्रायव्हरला देण्यास सांगितले. अशाच प्रकारे प्रत्येक वेळचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्या लिफाफ्यातल्या पोचपावत्या त्यावेळी आलेल्या ड्रायव्हरला देण्याच्या व कधीही, कुठेही काही समस्या उद्भवली तर कुठल्या क्रमांकावर फोन करायचा वगैरे सूचना आणि सहलीसाठी शुभेच्छा देऊन त्याने आमचा निरोप घेतला. एअरपोर्ट पासून जेमतेम बारा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर डेरा (Deira)भागात असलेल्या आमच्या 'फॉर्च्युन पर्ल' हॉटेलवर पोहोचून रूम ताब्यात मिळेपर्यंत साडे बारा वाजले.

हॉटेल छान होते. त्यात एकूण १३१ रूम्स, तळ आणि पहिल्या मजल्यावर भारतीय, दक्षिण भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन बार आणि रेस्टॉरंटस तसेच एक कॅफे लाउंज, एक स्पोर्ट्स बार आणि एक आफ्रिकन डिस्को अशा खाण्या-पिण्याच्या आणि मनोरंजनाच्या सोयी होत्या, गच्चीवर स्विमिंगपूल होता. आम्हाला देण्यात आलेली दुसऱ्या मजल्यावरची रूम पण मस्त होती.

▲ हॉटेल 'फॉर्च्युन पर्ल' चा फोटो त्यांच्या वेबसाईट वरून साभार.

आता भुकेची जाणीव व्हायला लागल्याने फ्रेश होऊन एकच्या सुमारास आम्ही जेवायला खाली उतरलो. आमच्या हॉटेलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध असूनही आम्ही तिथल्या उपहारगृहांत न जाता, एक इमारत सोडून त्या पुढच्या इमारतीत असलेल्या 'लाहोरी पकवान' नावाच्या एका पाकिस्तानी रेस्टॉरंट मध्ये गेलो, आणि त्याला कारणीभूत होता आम्हाला थोड्या वेळापूर्वी एअरपोर्ट पासून हॉटेलवर घेऊन येणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर 'हबीब'! पाकिस्तानातील रावळपिंडीचा हा मध्यमवयीन हबीब गेल्या अनेक वर्षांपासून कानू ट्रॅव्हल मधे नोकरी करत असल्याने त्याला दुबईचा काना कोपरा माहिती होता आणि आजतागायत असंख्य भारतीय पर्यटकांच्या संपर्कात आल्याने भारतीयांच्या आवडी-निवडींचीही त्याला चांगली कल्पना होती. आमचा निरोप घेऊन निघताना "तुम्ही ह्या हॉटेल मधे मुक्कामाला आहात तर इथून चार पावलांवर असलेल्या 'लाहोरी पकवान' मधे एकदातरी जरूर जेवायला जा, तुम्हाला अस्सल पंजाबी खाद्यपदार्थांची लज्जत चाखायला मिळेल!" असा सल्ला त्याने दिला होता.

रेस्टॉरंटचा असा बोर्ड बघून आम्ही तिथे जेवायला जाण्याचा काय चहा/कॉफी प्यायलाही जाण्याचा कदाचित कधी विचार केला नसता. पण केवळ हबीबच्या अनुभवी सल्ल्याचा मान ठेऊन ते धाडस केले आणि काय सांगावे महाराजा, आम्ही चक्क तिथल्या ऑथेंटिक पंजाबी पदार्थांच्या चवीच्या प्रेमातच पडलो. आपल्या इथे पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील काही ठराविक ठिकाणे सोडली तर हल्ली अशी खास चव मिळणे दुरापास्त झाले आहे. उर्वरित भारतात (काही धाबे आणि रेस्टॉरंटचा अपवाद वगळता) विशेषतः शेट्टी लोकं चालवत असलेल्या हॉटेल्समध्ये पंजाबी डिशेसच्या नावाखाली ती एक टिपिकल काजूची ग्रेव्ही आणि रंग वापरून बनवलेले जे पदार्थ आपल्या माथी मारले जातात त्यांचा तर आता उबग आला आहे.

असो, ह्या दुमजली रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट पारंपारिक पद्धतीची होती. त्यात रंगीत, झगझगीत किंवा मंद प्रकाशयोजना टाळून पांढऱ्या रंगांचा आणि पांढरा प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा वापर केला होता. दोन मोठाल्या फिश टँक्स होत्या, आणि प्रत्येक भिंतीवर सुंदर पेंटिंग्ज आणि 50+ इंचांचे LED टी.व्ही. लावले होते आणि त्यांवर 'कोक स्टुडीओ' (पाकिस्तान) च्या आधी झालेल्या सिझन्सचे एपिसोड्स सतत लावलेले असत. आमच्या दुबईतील वास्तव्यात पाच वेळा जेवायला आणि एकदा लस्सी प्यायला ह्या ठिकाणी येणे झाल्यामुळे अनेक एपिसोड्स बघायला मिळाले आणि त्यावर अबिदा परवीन, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम अशा प्रस्थापित व परिचित, तसेच कुर्तलेन बलोच, उमेर जस्वाल, गुल पनरा अशा आणि कित्येक बलुची, पश्तून, पंजाबी आणि अफगाणी नवोदित गायक आणि गायिकांनी गायलेली अनेक सुंदर गाणी बघायला-ऐकायला मिळाली. तेव्हापासून अधून मधून कोक स्टुडीओचे एपिसोड्स युट्युब वर पाहण्याचा छंद आम्हाला जडला आहे.

▼ रेस्टॉरंटचे आणि मेनुचे काही निवडक फोटोज. (फोटोंवर क्लिक केल्यास ते एनलार्ज/मिनिमाईझ होतील)

▲ सर्व फोटो लाहोरी पकवान रेस्टॉरंटच्या फेसबुक पेज वरून घेतले असून मेनू वरील दर जुने आहेत.


वास्तविक भारत विरोधी कारवाया आणि दहशतवादी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तान विषयी बहुतांश भारतीयांच्या मनात जो एकप्रकारचा संताप असतो तसा संताप आमच्याही मनात नक्कीच आहे, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचे अवशेष पाहण्यासाठी नाईलाजाने का होईना पण पुढे कधीतरी त्या नापाक इरादे ठेवणाऱ्या देशाला भेट दिली जाण्याची शक्यताही आहे. परंतु यु.ए.ई. सारख्या त्रयस्थ देशातील दुबईमध्ये आम्हाला भेटलेले ड्रायव्हर्स (सगळेच पाकिस्तानी होते), साठीच्या आसपास वय असलेले लाहोरी पकवानचे मालक रशीद भाई आणि तिथला शेफ ( त्याचे नाव आता विसरलो ) , आणि हॉटेलच्या स्टाफ पैकी काही पाकिस्तानी लोकांबाबत मात्र चांगला अनुभव आला. फक्त व्यावसायिक शिष्टाचार-सौजन्य म्हणून ती माणसे अशी शालीनतेने, आपुलकीने वागत, बोलत होती असे मानणे अयोग्य ठरेल कारण जर खरोखरीच ती भेटलेली माणसे सुस्वभावी असतील तर ते त्यांच्या चांगुलपणावर विनाकारण अविश्वास दाखवल्या सारखे होईल, त्यामुळे एकंदरीत अनुभव चांगला होता असेच नमूद करू इच्छितो. अनेक विषयांवर त्यांच्याशी थोड्याफार गप्पा झाल्या, पण दोन उघड-उघड शत्रुत्व असलेल्या देशांतील नागरिक एकमेकांशी बोलत आहेत असे कधीच जाणवले नाही. आमच्या देशात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असत्या तर आम्हाला कुटुंबीयांपासून दूर राहून इथे अरबांची गुलामी करण्याची वेळ आली नसती अशी खंत त्यातल्या बहुतेकांनी व्यक्त केली होती.

जेवण झाल्यावर आम्ही चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या एका सुपर मार्केट मध्ये गेलो. तिथे परवाच्या अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क सहलीसाठी पाण्यात घालण्याच्या कपड्यांची आणि काही कॉस्मेटिक्स, ज्यूसचे कॅन्स, चॉकलेट्सची खरेदी केली. आता नाव आठवत नाही पण 'S' ह्या इंग्रजी आद्याक्षराने नाव सुरु होणाऱ्या त्या सुपर मार्केट मध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अनेक विलक्षण गोष्टीहि विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रकार प्रत्यक्षात तिथेच पहिल्यांदा पाहायला मिळाला आणि मानवाच्या कल्पकतेचे कौतुक वाटून 'गरज हि शोधाची जननी आहे ' ह्या म्हणीच्या सत्यतेचा पुनःप्रत्यय आला.

खरेदी उरकून हॉटेलवर परतेपर्यंत साडेतीन वाजले होते. संध्याकाळी सात ते रात्री दहा 'दुबई मरीना' येथे 'धाऊ क्रुझ विथ फाइव्ह स्टार डीनर' असा पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्यासाठी साडेसहाला पिकअप करायला ड्रायव्हर येणार होता. परंतु त्यादिवशी शुक्रवार म्हणजे तिथला साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने संध्याकाळी ट्राफिक जाम होण्याची शक्यता बरीच असल्याने अर्धा तास आधी म्हणजे साडे सहा ऐवजी सहा वाजता पिकअप होईल असा झुबेरने आम्ही रुममध्ये नसल्याने खाली रिसेप्शनवर ठेवलेला निरोप चावी देताना रीसेप्शनीस्टने आम्हाला सांगितला. आज पहाटे साडेपाचला एअरपोर्ट वर पोहोचण्यासाठी मध्यरात्री तीन वाजता घरातून बाहेर पडल्याने पुरेशी झोप झाली नव्हती. पिकअप साठी अजून अडीच तासांचा अवकाश होता. अर्धा तास आवारा-आवरी साठी ठेऊन दोनेक तास आरामासाठी उपलब्ध असल्याने तेवढा वेळ मस्तपैकी झोप काढण्याचा आम्ही घेतलेला निर्णय साडेपाचचा आलार्म लाऊन लगेच अंमलातही आणला. जागरणामुळे असेल कि लाहोरी पकवान मध्ये जेवणानंतर खाल्लेल्या 'रस मलाई' मुळे असेल पण बेडवर पडल्या पडल्या झोप मात्र लगेच लागली.

साडेपाचला आलार्म वाजल्यावर उठून तयारी झाल्यावर आम्ही खाली उतरायला रूम मधून बाहेर पडणार तेवढ्यात रिसेप्शन वरून पिकअप साठी ड्रायव्हर आल्याचे सांगणारा फोन इंटरकॉम वर आला. 'टोयोटा प्राडो' ह्या एस.यु.व्ही. मधून आमचा हॉटेल ते दुबई मरीना असा ३० किलोमीटर्सचा प्रवास सुरु झाला.

सुट्टीच्या दिवसाची संध्याकाळ असल्याने मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकही बाहेर पडल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड रहदारी होती. ठीक ठिकाणी सिग्नल्सवर आणि चौकांमध्ये ट्राफिक जाम लागत होता. विविध गाड्यांची इत्यंभूत माहिती असणारा अल्ताफ नावाचा आत्ताचा ड्रायव्हर खूप बोलका होता. आजू बाजूला दिसणाऱ्या एक से बढकर एक अलिशान गाड्यांची माहिती त्यांच्या वैशिष्ठ्यांसाहित त्याच्या कडून ऐकायला मजा येत होती. साधारणपणे इथपर्यंत पोचायला २५-३० मिनिटे लागतात पण त्या दिवशी वाहतूक खोळंब्यामुळे तेच अंतर कापायला आम्हाला एक तास लागला आणि सात वाजता आम्ही धाऊ क्रुझ साठी असलेल्या जेट्टीवर पोचलो.

परत आल्यावर गाडी कुठे उभी असेल त्याची माहिती आणि गाडी शोधण्यास सोपे पडावे तसेच एकमेकांची चुकामुक झाल्यास परत भेटण्याचे ठिकाण परस्परांना माहित असावे म्हणून गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो, ड्रायव्हरचे नाव आणि मोबाईल नंबर आमच्या दोघांपैकी कुणीतरी एकाने दुसऱ्याला व्हॉट्सॲप वर पाठवून ठेवावे अशी उपयुक्त सूचना अल्ताफने दिली (ती सवय इथून पुढे आमच्या अंगवळणीच पडली). यत्र तत्र सर्वत्र वाय-फाय उपलब्ध असल्याने लगेच त्याप्रमाणे कृती करत असताना सव्वा सात ते पावणे आठ पर्यंत बोर्डिंग सुरु असते आणि एअर कंडीशन्ड लोअर डेक व ओपन एअर अप्पर डेक असे दोन पर्याय क्रुझ वर उपलब्ध असले तरी बहुतांश पर्यटकांची पहिली पसंती ओपन एअर अप्पर डेकला असल्याने उशिरा पोचल्यास वरती टेबल मिळणे कठीण जाते आणि नाईलाजाने मग लोअर डेकवर बसावे लागते. तुमच्या बाबतीत तसे होऊ नये म्हणूनच पिकअप अर्धा तास लवकर झाल्याचे त्याने सांगितल्यावर मात्र मग अजिबात वेळ न दवडता अप्पर डेक वर टेबल मिळवायला क्रुझ ऑपरेटरचे काउंटर गाठले. क्रुझचा फ्लोअर प्लॅन बघून इच्छित टेबल निवडून बोर्डिंग पास आणि वाटेत देण्यात आलेले सुगंधी फेस वाइप्स घेऊन अप्पर डेकवरील आमच्या सीट्स वर स्थानापन्न होताच वेलकम ड्रिंक आणि खजूर सर्व्ह करून आमचे स्वागत करण्यात आले.

अल्ताफने सांगितल्या प्रमाणे अप्पर डेक लवकरच पूर्ण भरला. बरेच पर्यटक ट्राफिक जाम मध्ये अडकल्याने उशिरापर्यंत बोर्डिंग सुरू होते. शेवटी वीस पंचवीस इराणी स्त्रिया, पुरुष आणि लहान मुला-मुलींचा एक तांडा क्रुझ वर चढला आणि मग सव्व्वा आठ वाजता नांगर उचलून मंद गतीने धाऊचा पाण्यातून प्रवास सुरु झाला.

'धाऊ' ( इंग्रजीत Dhow ज्याचा 'डाऊ', 'दाऊ', 'धो', 'धौ' अशा अनेक प्रकारे उच्चार केला जातो ) म्हणजे अरब लोकांची पारंपारिक लाकडी बोट. मग ती एकाच व्यक्तीने प्रवास करण्यासाठी बनवलेली लहान आकाराची होडी असो किंवा शे-दीडशे लोकांना सामावून घेण्याएवढे मोठे गलबत असो त्याला नाव एकच ते म्हणजे 'धाऊ'. आता ड्रोन टॅक्सीच्या चाचण्या घेण्याएवढी प्रगती केली असली तरी १९६० च्या दशकात खनिज तेल सापडेपर्यंत स्थानिक अमीराती (Emirates) लोकांची उपजीविका प्रामुख्याने मासेमारी आणि सागरतळातून मोती काढण्याच्या व्यवसायावर अवलंबून होती. त्या कामांसाठी तसेच त्यांच्या आसपासचे आखाती देश, पूर्व आफ्रिका, पाकिस्तान आणि भारताशी चालणारा खजूर, मासे आणि इतर पदार्थांच्या व्यापारासाठी अशा लाकडी धाउंचा वापर होत असे, किंबहुना तोच पर्याय त्यांना उपलब्ध होता. जेमतेम पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक समाजजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या धाऊ म्हणजे अमीराती लोकांचा मानबिंदू आहेत, त्यांच्या संस्कृतीचे ते एक प्रतिक आहे.

मोठ्या लाकडी धाऊचे तरंगत्या, चालत्या-फिरत्या रेस्टॉरंट मध्ये रुपांतर करून त्यातून जलपर्यटन घडवून आणणाऱ्या 'धाऊ क्रुझ' दुबईत दोन ठिकाणी चालतात. एक 'दुबई क्रीक' (Dubai Creek) येथे आणि दुसरे 'दुबई मरीना' (Dubai Marina) येथे. दोन्ही ठिकाणी दिसणारे देखावे आणि त्यांच्या किंमतीत भरपूर फरक आहे, तसेच त्यांत 'सनसेट क्रुझ' आणि 'डिनर क्रुझ' असे दोन प्रकार असून, त्यात पुन्हा थ्री स्टार, फोर स्टार, फाइव स्टार असे उपप्रकारही आहेत. 'दुबई क्रीक' येथे शहराला 'बर दुबई' आणि 'डेरा' जे अनुक्रमे जुनी दुबई आणि नवी दुबई म्हणून ओळखले जातात अशा दोन भागांत विभागणाऱ्या नैसर्गिक खाडी मध्ये क्रुझिंग होते. त्या ठिकाणी बर दुबई भागातील किनारी मार्ग, दाटीवाटीने असलेली जुनी घरे, बाजार असे ग्रामीण आणि डेरा भागातील आधुनिक स्वरूपाच्या व्यापारी, निवासी इमारती, असे शहरी दृश्य आणि कामकाजात व्यस्त असलेले लोकजीवन नजरेस पडते. तसेच खाडीत संयुक्त अरब अमीराती अंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या धाउंची लक्षणीय वर्दळ पाहायला मिळते.

'दुबई मरीना' येथील कृझिंग हे आजची अत्याधुनिक दुबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मानवनिर्मित कृत्रिम कालव्यातून समुद्रात थोडे आतपर्यंत होते. कालव्याच्या दुतर्फा उभारलेल्या, आधुनिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणावा अशा गगनचुंबी इमारती, पंचतारांकित हॉटेल्स, कॅफे, स्पा, किनाऱ्याला लागून असलेले पदपथ, तिथे राहणाऱ्यांची लक्झरीयस लाइफस्टाइल आणि कालव्यातून प्रवास करणारी मर्यादित संख्येत असलेली धाऊ कृझेस, अलिशान यॉट्स अशी दृश्ये ह्याठिकाणी दृष्टीस पडतात. अर्थात हा नजारा बघण्यासाठी आणि दर्जेदार सेवा सुविधा अनुभवण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही 'दुबई क्रीक' येथील क्रुझ पेक्षा जवळपास दुपटीने जास्त आहे.

DestynAsia कडून व्यवस्थितपणे पुरवण्यात आलेल्या ह्या माहितीच्या आधारावर एक निवांत रोमँटिक संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी आम्ही 'दुबई मरीना' येथील 'धाऊ क्रुझ विथ फाइव्ह स्टार डीनर' ची निवड केली होती. चकचकीत पॉलिश केलेली आमची लाकडी धाऊ, तिची सजावट आणि रोषणाई सर्वच छान होते. सेवा अतिशय आदबशीर आणि तत्पर होती. मनोरंजनासाठी तनोरा डान्स, मॅजिक शो, रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम होते.

त्यातला पुरुष नर्तकाद्वारे सादर केला जाणारा तनोरा डान्स विस्मयकारक होता. इजिप्तचे पारंपारिक राष्ट्रीय नृत्य असा लौकिक असलेल्या आणि पुढे समस्त अरब विश्वात लोकप्रिय झालेल्या ह्या नृत्यप्रकाराचे मूळ सुफी संप्रदायात आहे. पारंपारिक पोशाखात थोडे बदल करून सुरवारी पासून डोक्याच्या फेट्यापर्यंत, चेहऱ्यावरचा मास्क आणि एकावर एक असे शेकडो रंगीबेरंगी LED लाईट्स बसवलेले दोन वजनदार स्कर्ट्स घालून, सतत २५-३० मिनिटे स्वतःभोवती गिरक्या घेत नाचणे हि सोपी गोष्ट नक्कीच नाही! बरं नुसतेच भिंगरी सारखे फिरायचे नाही तर जसे संगीत बदलत जाईल त्याप्रमाणे अनेक अदाकारीही पेश केल्या जातात.

त्या नर्तकाचे असे सतत गोल गोल फिरणे बघून आपल्यालाही चक्कर येऊ लागते त्यामुळे टक लाऊन त्याच्याकडे मिनिटभरापेक्षा जास्ती वेळ पाहताही येत नाही. अर्थात खात-पीत आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपल्याला हे नृत्य बघायचे असल्याने ते बघणे सुसह्य होते अन्यथा कितीही विस्मयकारक वाटत असला तरी हा नृत्यप्रकार पाच-दहा मिनिटांनंतर नक्कीच कंटाळवाणा वाटू शकतो. ह्याच नर्तकाने सादर केलेले हे नृत्य आम्हाला एकूण तीन वेळा पाहायला मिळाले. अप्पर डेकवर पहिल्यांदा पाहिले पण त्यावेळी आपण व्हिडिओ शूट केला नाही हे लक्षात आल्याने त्यासाठी लोअर डेकवर जाऊन दुसऱ्यांदा थोडावेळ पाहिले आणि शेवटच्या दिवशी डेझर्ट सफारी नंतर शारजातील बार्बेक्यू डिनर दरम्यान तिसऱ्यांदा पाहिले, व त्यामुळेच हा नृत्यप्रकार किती अवघड आहे ते प्रकर्षाने जाणवले. नमुन्यादाखल लोअर डेकवर शूट केलेला काही मिनिटांचा व्हिडिओ वर दिला आहे.

▲ सुफी संप्रदायातील पारंपारिक तनोरा नृत्याचा फोटो जालावरून साभार.

आल्हाददायक वातावरणात अप्पर डेकवर बसून आजूबाजूचा नेत्रदीपक असा मानवनिर्मित सुंदर परिसर न्याहाळत, अरेबिक आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या फोर कोर्स डिनरचा आस्वाद घेत, तनोरा डान्स, जादूचे प्रयोग आणि व्यावसायिक नर्तक-नर्तकिंनी सादर केलेल्या रेकोर्ड डान्सचा आनंद लुटत, खोल समुद्रात जाऊन 'पाम जुमेरा' ह्या मानवनिर्मित कृत्रिम बेटांवर बांधलेल्या 'अटलांटीस' ह्या अतिभव्य हॉटेलच्या खुल्या समुद्राकडील बाजूचे लांबून दर्शन घडेपर्यंत एका दिशेने झाल्यावर मग परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा जेट्टीवर पोहोचेपर्यंत साडे दहा वाजले.

▲ 'अटलांटीस' हॉटेलचा (संध्याकाळचा) फोटो जालावरून साभार.

'धाऊ क्रुझ' वरील निवडक फोटोंचा स्लाइड शो
1 of 15

बऱ्याच पर्यटकांचे बोर्डिंग उशिरा झाल्याने दहा वाजता परतायच्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला होता. जिना चढून आम्ही वरती रस्त्यावर आलो तर समोरच अल्ताफ आमची वाट बघत उभा असलेला दिसला. आम्हाला तिथेच थांबायला सांगून तो पार्किंग मधून गाडी घेऊन आला. परतीच्या प्रवासात रस्ता मोकळा मिळाल्याने सव्वा अकरा वाजता हॉटेलवर पोहोचलो. खरंतर क्रुझ वरचे जेवण तसे चांगले होते पण आपणा भारतीयांना विशेषतः मराठी लोकांना पदार्थांत तिखट-मीठ थोडे जरी कमी असले तरी ते अन्न अळणी वाटते त्यामुळे कुठलाही पदार्थ आम्ही पुन्हा घेऊन खाल्ला नसल्याने जेवण पोटभर झाल्यासारखे वाटत नव्हते. परत येताना लाहोरी पकवान उघडे दिसले होते त्यामुळे वर न जाता आधी लस्सी प्यायला म्हणून तिकडे गेलो. एकच लस्सी दोघात पिऊनही पोटाला तड लागली एवढी ती घट्ट आणि मलईदार होती.

रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते, दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता 'दुबई सिटी टूर' साठी पिकअप असल्याने फार लवकर उठायची घाई नव्हती. मग दुबईतील नाईट लाईफ अनुभवण्यासाठी रूममध्ये जाण्या आधी हॉटेल मधेच असलेल्या 'आफ्रिकन डिस्को' मधे डोकावलो. तिथे फार कोणी लोकं नव्हती, फक्त दहा-बारा तरुण-तरुणींचा ग्रुप होता. त्यातली काही मंडळी यथेच्छ मद्यपान करून नाचण्याचा आनंद लुटत होती आणि बाकीच्यांतले काही जण त्यांना सांभाळण्यासाठी झटत होते तर काही टेबलवर बसून नाचणाऱ्यांना प्रोत्साहन देत होते. बहुतेक ती मंडळी श्रीलंकन असावीत असा अंदाज आहे, कारण जयसूर्या, कालुविथरणा, मलिंगा अशा श्रीलंकन क्रिकेटपटुंमुळे जी एक सिंहली लोकांची चेहरेपट्टी माहिती झाली आहे तिच्याशी त्यांचा रंग आणि चेहरेपट्टी व्यवस्थित जुळत होती. क्लब मधले बाउंसर्स आणि दुबईतील कडक कायदे सक्षम असल्याने त्यांच्यापासून कोणालाच काही त्रास किंवा धोका होण्याची शक्यता नव्हती आणि तसेही ते लोकं त्यांच्याच विश्वात मश्गुल होते.

ह्याठिकाणी रात्री एक नंतर बऱ्यापैकी गर्दी होत असल्याचे व्यवस्थापकाकडून समजले तेव्हा एकतर आत्ताचा माहौल फार काही जोशपूर्ण नसल्याचे आणि एक वाजेपर्यंत वाट बघायला आमच्याकडे वेळ नसल्याने परवा रात्री भरपूर वेळ असेल तेव्हा पुन्हा इथे येऊ असे त्याला सांगून तिथून परत फिरलो. रुममध्ये आल्यावर सकाळी साडेसातचा अलार्म लावला आणि आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

 

दिवस दुसरा :-

सकाळी साडेसातला उठून आवरल्यावर साडे आठला नाश्ता करण्यासाठी आम्ही खाली उतरलो. बुफे ब्रेकफास्टची व्यवस्था तळमजल्यावरच्या मलबारी व्यवस्थापन असलेल्या कॉफीशॉप मध्ये होती. तिथे ब्रेड, बटर, चीज, उकडलेली अंडी, ताजी फळे, सलाड, ज्यूस, चहा-कॉफी, दुध, कॉर्न फ्लेक्स, डोनट्स, पेस्ट्रीज अशा रोजच्या ठराविक पदार्थां व्यतिरिक्त उपमा, इडली फ्राय, इडली/मेदुवडा-सांबार, उत्तपा, मसाला डोसा, छोले भटुरे असे चविष्ट भारतीय पदार्थही आलटून पालटून खायला मिळत होते. एकदिवस तर आपल्या सर्वांची आवडती मिसळही होती. पण उसळ मात्र सुरवा सारखी आणि अत्यंत अळणी असल्याने मिसळीची चव आम्हाला अजिबात आवडली नसली तरी भारतभरात टाटा ग्रुपच्या 'जिंजर' ह्या हॉटेल शृंखलेत बुफे ब्रेकफास्टच्या मेनूत फार पूर्वीच हक्काचे स्थान मिळवलेला हा मराठमोळा पदार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचल्याचे पाहून आनंद झाला होता.

एकदा फिरायला बाहेर पडल्यावर दुपारचे जेवण किती वाजता होईल ह्याचा काहीच भरवसा नसल्याने सकाळचा नाश्ता भरपेट होणे गरजेचे होते, आणि ती गरज पूर्ण करणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश असलेला नाश्ता आम्हाला रोज मिळत होता ही फार समाधानकारक गोष्ट होती.

कॉफीशॉप

नाश्ता चालू असतानाच हॉटेलचा कर्मचारी पिक-अप साठी गाडी आल्याची वर्दी देऊन गेला होता. नऊ वाजताची वेळ पाळायला आम्हाला फार नाही पण दहा मिनिटे उशीरच झाला होता. बाहेर आल्यावर पाहिले तर काल सकाळी एअरपोर्ट ट्रान्सफर साठी आलेला हबीब तीच 'होंडा सीआर-व्ही घेउन आजच्या सिटी टूर साठी आलेला बघून थोडे आश्चर्य वाटले. कारण संध्याकाळच्या 'धाऊ क्रुझ' साठी पिक-अप करायला तूच येणार आहेस का? असे काल सकाळी त्याला विचारले असता, "काही सांगू नाही शकत, आमच्या कंपनीच्या ताफ्यात तीनशे पेक्षा जास्त गाड्या असून, व्यवस्थापक कुठल्या ड्रायव्हरला कुठे पाठवतील ह्याचा नेम नसल्याने पुन्हा आपली भेट होण्याची शक्यता खूपच कमी आहे" असे त्याने सांगितले होते.

पुन्हा भेट झाल्याचा आनंद व्यक्त करून त्याने सुचवलेल्या लाहोरी पकवान मधील जेवण आम्हाला फारच आवडल्याचे एकमुखाने सांगितल्यावर साहेबांची कळी छान खुलली.


आजच्या दिवसाचा आमचा कार्यक्रम दोन सत्रात विभागलेला होता. सकाळच्या पहिल्या सत्रात दुपारचे ऊन सहन होईल तोपर्यंत शक्य होतील तेवढी पर्यटनस्थळे बघणे आणि दुसऱ्या सत्रात संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत क्षेत्रफळाच्या निकषावर जगातला सगळ्यात मोठा असलेल्या ' द दुबई मॉल ' मध्ये भटकंती, त्याच आवारात होणारा अतिशय प्रेक्षणीय असा ' द दुबई फाउंटन शो ' पहाणे आणि जगातली सर्वात उंच इमारत अशी ख्याती असलेल्या ' बुर्ज खलिफा ' च्या १२४ आणि १२५ व्या मजल्यावरील ' ॲट द टॉप ' (At the Top, Burj Khalifa) ह्या ऑब्झर्वेशन डेक वरून दुबईचे विहंगम दर्शन असा एकंदरीत कार्यक्रम होता.

सकाळच्या सत्रात आम्ही आधी पासून बघण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांच्या यादीत 'दुबई म्युझियम' आणि 'जुमेरा बीच' अशा दोनच स्थळांचा समावेश होता. काल रात्री जलसफरीतून बघितलेला दुबई मरीना परिसर दिवसा कसा दिसत असेल ह्याची उत्सुकता निर्माण झाल्याने त्या यादीत आणखीन एका ठिकाणाची भर पडली होती. बाकी वाटेत जे लागेल ते बघायचे असे ठरवले असल्याने ही भटकंती तशी अनियोजित स्वरुपाची होती. तशी कल्पना हबीबला दिली आणि स्थलदर्शनाची सुरुवात हॉटेलपासून सुमारे साडेसहा कि.मी. अंतरावर असलेल्या दुबई म्युझियम पासून करायचे ठरले.

बर दुबई भागातील अल सुक अल कबीर (मीना बझार) परिसरात १७८७ साली बांधलेल्या 'अल फाहीदी' किल्ल्याचे (Al Fahidi Fort) १९७१ साली दुबईचे तत्कालीन शासक दिवंगत 'शेख रशीद बिन सईद अल मकतूम' यांच्या कारकिर्दीत नूतनीकरण करून, दुबईचा इतिहास आणि मूळ वारसा दर्शविणार्‍या संग्रहालयात रुपांतर करण्यात आले. पुढे १९९५ मध्ये शेजारीच आणखीन एक भूमिगत संग्रहालय (Underground Museum) निर्माण करून ते जुन्या संग्रहालयाला (किल्ल्याला) जोडले गेले. प्रवाळाचे दगड आणि जिप्समचा वापर करून बांधलेल्या ह्या चौकोनी आकाराच्या किल्ल्याच्या चारपैकी तीन कोपऱ्यांत एक आयताकृती आणि दोन गोल बुरुज आहेत. दुबईत अस्तित्वात असलेली एकमेव सर्वात प्राचीन वास्तू अशी ओळख असलेल्या ह्या लहानशा किल्ल्याला खरंतर किल्ल्यापेक्षा गढी म्हणणे जास्ती योग्य ठरेल.

Drone View of Dubai Museum

दुबई म्युझियम (ड्रोन इमेजेस)

अल फाहीदी किल्ला

जमिनीवरील संग्रहालय

इथे खाली भूमिगत संग्रहालय आहे

क्लिक केल्यास फोटो एनलार्ज/मिनिमाइज़ होतील


पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करून साडेनऊच्या सुमारास ह्याठिकाणी पोचल्यावर किल्ल्यात प्रवेश करून प्रत्येकी तीन दिरहमची तिकिटे काढून आम्ही संग्रहालय पाहायला सुरुवात केली.

मधल्या मोकळ्या जागेत काही तोफा, पूर्वी मासेमारी आणि सागरतळातून मोती काढण्यासाठी आणि प्रवासासाठी वापरात असलेल्या लहान आकाराच्या लाकडी होड्या, एक लाकडी रहाट बसवलेली कोरडी विहीर, दोरखंडाच्या सहाय्याने समुद्रातून होड्या-नौका किनाऱ्यावर ओढून घेण्यासाठी वापरले जाणारे (चरका सारखे) लाकडी यंत्र, एक पाणी साठवण्याची लाकडी टाकी आणि १९५० च्या दशकातील अमिराती लोकांचे पाम वृक्षाच्या झावळ्या/फांद्या आणि लाकडा पासून तयार केलेले घर, त्यातले फर्निचर आणि स्वैपाकघर अशा गोष्टी पहायला मिळतात आणि तटाला लागून असलेल्या बंदिस्त व्हरांड्यात अनेक फोटो, हत्यारे, वाद्ये अशा वस्तू प्रदर्शित केल्या आहेत

किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोरील डाव्या बाजूच्या गोल बुरूजातून भूमिगत संग्रहालयात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. 'द सुक 1950 'ही १९५० च्या दशकातील बाजारपेठ, अमीराती लोकांची त्यावेळची जीवनशैली, पोषाख, अलंकार, दैनंदिन जीवन, कामकाज, मदरशातील शिक्षण आणि 'मरीन गॅलरी' मधील 'धाऊ' निर्मितीचा कारखाना, आपल्या डोक्यावर टांगलेल्या होडीतून पायाला दोरी बांधून पाण्यात बुडी मारून सागरतळातून मोती काढणारा पाणबुड्या असे स्त्री, पुरुष, लहान मुले, प्राण्यांचे पूर्णाकृती पुतळे आणि खरोखरच्या वस्तू वापरल्याने जिवंत भासणारे देखावे प्रेक्षणीय आहेत. तसेच १९३० पासून १९८० पर्यंतचा कालखंड दर्शवणारे फोटो माहितीदायक आहेत.

दुबईचा इतिहास हा जेमतेम अडीच-तीनशे वर्षे जुना असल्याने १९६९ साली जुमेरा येथे उत्खननात सापडलेल्या नवव्या शतकातील थोड्याफार पुरातन वस्तू सोडल्यास ह्या संग्रहालयात फार काही प्राचीन/अतिप्राचीन वस्तू बघायला मिळत नसल्या तरी अवघ्या पन्नास साठ वर्षात अमिराती लोकांचा मागास-आदिवासी जीवनशैली ते आजच्या अल्ट्रा मॉडर्न-सुखवस्तू जीवनशैली पर्यंत झालेला प्रवास बघून खरोखर थक्क व्हायला होते. अर्थात इथल्या भूमिगत संग्रहालयाची निर्मिती हेच स्थित्यंतर दर्शवण्याच्या उद्देशाने झाली असून त्यात यु.ए.इ. चे उपराष्ट्र्पती आणि पंतप्रधान व दुबईचे शासक अशी तिहेरी भूमिका निभावणारे 'शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम' साहेब नक्कीच यशस्वी झाले आहेत.

दुबई म्युझियम - स्लाइड शो

म्युझियमचे प्रवेशद्वार

1 of 50


प्रेक्षणीय असूनही अत्यंत माफक प्रवेश शुल्क आकारले जाणारे हे संग्रहालय पाहून सव्वा दहाला आम्ही बाहेर पडलो आणि दिवसा उजेडी पहायची उत्सुकता निर्माण झालेला दुबई मरीना परिसर पाहण्यासाठी इथून ३० कि.मी. वर असलेल्या 'मरीना वॉकवे' (Marina Walkway) साठीचा प्रवास सुरु झाला. वास्तविक 'मरीना वॉक वे' हे आमच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्वात शेवटचे ठिकाण होते, परंतु त्याठिकाणी बराच वेळ पायी फिरायचे असल्याने नंतरच्या वाढत्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी आधी तिथे जाऊन मग परतीच्या प्रवासात उर्वरित ठिकाणे बघण्याची हबीबने केलेली सूचना रास्त वाटल्याने त्याप्रमाणेच करण्याचे ठरवले.

मरीना गेटच्या जवळ मुख्य रस्त्यावरून किनारी पदपथावर (Marina Promenade) उतरण्यासाठी पायऱ्या असलेल्या एका ठिकाणी हबीबने आम्हाला गाडीतून उतरवले. तिथून चालायला सुरुवात केल्यावर सुमारे पाउण-एक तास चालणारी आणि अडीच-तीन किलोमीटर अंतराची आमची ती पदयात्रा, कालव्याच्या दोन्ही किनाऱ्याना जोडणारे चार फ्लायओव्हर्स मागे टाकल्यावर लागणाऱ्या 'मरीना वॉकवे' पर्यंत पोचल्यावर संपणार होती. त्याठिकाणी हबीब आमची वाट पहात थांबणार होता.

Drone View of Dubai Marina

दुबई मरीना (ड्रोन इमेजेस)

शनिवारचा सुट्टीचा दिवस (इथला विकेंड शुक्रवार - शनिवार असतो) त्यात सकाळी अकरा-सव्वा आकाराची वेळ असल्यामुळे रविवार ते गुरुवार दिवसा आणि रोज संध्याकाळी स्थानिकांच्या आणि पर्यटकांच्या लक्षणीय उपस्थितीने फुलून जाणाऱ्या ह्या परिसरात त्यावेळी अजिबात गर्दी नव्हती. अगदी तुरळक संख्येत पर्यटक त्यावेळी तिथे आले असल्याचे आमच्या पथ्यावरच पडले. मस्तपैकी रमत गमत, आजूबाजूच्या आधुनिक स्थापत्यशास्त्राचा अविष्कार असलेल्या वैविध्यपूर्ण आकाराच्या इमारती न्याहाळत, कालव्याच्या वळणा वळणांच्या किनारी पदपथावर भटकंती करायला खूप मजा आली.

▼ मरीना वॉकवे - स्लाईड शो.

.

1 of 20


बाराच्या सुमारास 'मरीना वॉकवे' येथे भेटण्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीत बसून परतीच्या प्रवासातले पहिले ठिकाण असलेल्या जुमेरा बीचला जायला आम्ही निघालो आणि वीसेक मिनिटांत त्याठिकाणी पोचलो. भर दुपारी साडेबाराची वेळ असूनही दोन दिवसांपूर्वी दुबईत भरपूर पाउस पडलेला असल्याने ऊन असले तरी गर्मी अशी विशेष जाणवत नव्हती. मुंबई सारखेच ३५ ते ३७ ℃ च्या दरम्यानचे तापमान त्यावेळी होते.

छान स्वच्छ निळसर पाणी आणि सफेद वाळूचा किनारा लाभलेला हा जुमेरा बीच पोह्ण्यासाठीही अतिशय सुरक्षित असल्याने स्थानिक लोक आणि पर्यटकांमध्ये फार लोकप्रिय आहे. ह्याठिकाणी पोशाखावर कुठलेही निर्बंध नसल्याने स्त्रिया अगदी मोकळेपणी बिकिनी व टँकिनी घालून पोहताना व सूर्यस्नान घेत वाळूवर पहुडलेल्या दिसतात. समुद्रस्नान झाल्यावर अंघोळीसाठी शॉवर आणि चेंजिंग रुमच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत.

Jumeirah Beach

जुमेरा बीच


पंधरा वीस मिनिटे बीचवर घालवून मग आता पहिल्या सत्रातील शेवटचे ठिकाण 'एतिहाद म्युझियम' (Etihad Museum) बघण्यासाठी आम्ही निघालो. पंधरा-सोळा किलोमीटरचा हा प्रवास वीस मिनिटांत पार पडला. सकाळी मरीना वॉकवे साठी जाताना एक वेगळ्याच आकाराची नवी कोरी वास्तू रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसली होती. ते काय आहे अशी विचारणा हबीब कडे केली असता "हे दोन-तीन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेले एतिहाद म्युझियम आहे, मी अजून बघितले नाहीये पण तिथे भेट दिलेल्या तीन-चार पर्यटकांनी ते फार छान असल्याचे सांगितले आहे." अशी माहिती त्याने दिली होती. त्या म्युझियमच्या नाविन्यपूर्ण अशा कलात्मक आकारामुळे ते पाहण्याची इच्छा आम्हाला झाली असल्याने प्रत्येकी २५ दिरहमचे तिकीट काढून आम्ही त्या संग्रहालयात प्रवेश केला.

Etihad Museum

एतिहाद म्युझियम

.
हा फोटो जालावरून साभार

'एतिहाद' ह्या अरबी शब्दाचे मराठीत अर्थ 'ऐक्य', 'एकीकरण', 'संघटन' असे आहेत. २ डिसेंबर १९७१ रोजी मध्यपूर्वेतील अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन व फुजैरा ह्या सहा अमिरातींनी एकत्र येऊन 'युनायटेड अरब एमिरेट्स' (UAE) नावाच्या देशाची निर्मिती केली. रस अल-खैमा ही सातवी अमिरात त्यात नंतर १० फेब्रुवारी १९७२ रोजी सामील झाली. सातही अमिरातींच्या शासक असलेल्या शेख मंडळींनी ज्या युनियन हाऊस (Union House) नावाच्या ऐतिहासिक वास्तूत एकत्रीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या करून युनायटेड अरब एमिरेट्स ह्या नव्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आणली त्या जुन्या युनियन हाऊसच्या आवारातच ह्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना देशाचा इतिहास आणि प्रगती दर्शवण्यासाठी बांधण्यात आलेल्या एतिहाद म्युझियमचे ६ जानेवारी २०१७ रोजी उद्घाटन झाले, आणि १ एप्रिल २०१७ रोजी उद्घाटन होऊन तीन महिनेही पूर्ण झाले नसताना आम्हाला ते बघण्याचा योग आला होता.

एकदम प्लश अँबियन्स आणि उच्च दर्जाच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला पुरेपूर वापर ह्या वैशिष्ठ्यांमुळे एकविसाव्या शतकातील संग्रहालय कसे असावे त्याचे हे एतिहाद म्युझियम एक उत्कृष्ठ उदाहरण आहे.

सात अमिरातींच्या एकत्रीकरणाच्या हस्तलिखित दस्तऐवजाची घडी घातल्या सारखा दिसेल अशा आकाराचा पहिला मजला आणि त्या दस्तऐवजावर सह्या करण्यासाठी वापरलेल्या सात फाउंटन पेनांसारखे दिसतील असे त्याला तोलून धरणारे तळमजल्याचे एका रांगेतील सात तिरके खांब अशा संकल्पनेवर आधारित बांधकाम केलेल्या ह्या म्युझियम मध्ये अनेक शाही वस्तू ज्यात सातही अमिरातींच्या शासकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू, त्यांचे पासपोर्ट्स, फोटो, हत्यारे, कपडे तसेच सोन्या-चांदीची नाणी अशा गोष्टी तर प्रदर्शित केल्या आहेतच, पण त्या जोडीला माहिती देण्यासाठी हॉलिवूडच्या Sci-Fi चित्रपटांमध्ये आपण पाहतो तशा डिजिटल स्क्रीन्स, डिजिटल टेबलटॉप्स, इंटरॲक्टीव्ह नकाशे आणि गाईड्स अशी अत्याधुनिक उपकरणे, डॉक्युमेंटरी फिल्म दाखवणारे छोटेखानी थेटर आणि भारतातील वर्तमानपत्रासाठी फोटो काढण्याच्या कामासाठी म्हणून १९६५ साली दुबईत पहिले पाउल टाकणारे व पुढच्या ५० वर्षांतील यु.ए.इ. तील सर्व महत्वाच्या घटना आणि व्यक्तींना आपल्या कॅमेरात बंदिस्त करून फोटो रूपाने अजरामर करणारे भारतीय फोटोग्राफर ते रॉयल फोटोग्राफर अशी ओळख कमावलेले श्री. रमेश शुक्ला ह्यांच्या कार्याचा सन्मान करणारी तिथली प्रशस्त फोटो गॅलरी हे सर्व खूप प्रेक्षणीय आहे. १९५७ साला पर्यंत दुबई आणि आजूबाजूच्या अनेक प्रांतात चलन म्हणून भारतीय रुपया वापरला जात होता ही माहिती आम्हाला तिथेच समजली.

Etihad Museum

एतिहाद म्युझियम - स्लाईड शो.

.

1 of 34

Etihad Museum at night

एतिहाद म्युझियमचे रात्रीचे रूप

.
हा फोटो जालावरून साभार

म्युझियम बघून बाहेर पडेपर्यंत दोन वाजले होते. तिथून नऊ कि.मी. वर असलेल्या आमच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत सव्वा दोन वाजले. सुट्टीच्या दिवस असल्याने पहिल्या सत्रातील प्रवासात तरी कुठेही ट्राफिक जाम लागला नव्हता. आता पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले असल्याने हबीबचा निरोप घेऊन आम्ही जेवायला लाहोरी पकवान मध्ये शिरलो. कोक स्टुडीओचा एपिसोड बघत-ऐकत जेवण झाल्यावर रूमवर पोहोचायला साडेतीन वाजले.


संध्याकाळच्या भटकंतीसाठी पिक-अप करायला पाच वाजता हबीब पुन्हा येणार होता त्यामुळे झोप काढण्या एवढा वेळ हाताशी नसला तरी तासभर टी.व्ही. वर म्युझिक चॅनल लाऊन, बेडवर लोळत पडून आराम करणे सहज शक्य असल्याने मग तसेच केले. रुममध्ये इलेक्ट्रिक केटल आणि हवे तेव्हा चहा कॉफी बनवून पिण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री होती, पण टी बॅग्स वापरून बनवलेल्या चहा पेक्षा छान उकळवून बनवलेल्या चहाची चवच न्यारी वाटत असल्याने साडेचारला रूमसर्व्हिस ला फोन करून मस्तपैकी मसाला चहा मागवून प्यायला.

तयार होऊन पाचला पाच मिनिटे कमी असताना आम्ही खाली उतरलो तेव्हा पाच-दहा मिनिटे वेळेआधीच पोचण्याच्या परंपरेचे पालन करत हबीब हॉटेल बाहेर येऊन उभा होता. हॉटेलपासून दुबई मॉल पर्यंतचे चौदा कि.मी. अंतर त्यावेळीही ट्राफिक न लागल्याने वीसेक मिनिटांत पार करून साडेपाचच्या थोडे आधीच तिथे पोचलो. इथे येतानाच्या रस्त्यात लांबून एक मोठी, पिरॅमिड सदृश्य आकर्षक ईमारत दिसली होती आणि आमच्या ड्रायव्हर-कम-गाईड हबीब साहेबांना तिच्याबद्दल विचारले असता समजले की तो 'वाफी मॉल' चा परिसर असून, ती पिरॅमिडच्या आकाराची ईमारत 'रॅफल्स' ह्या पंचतारांकित हॉटेलची आहे.. त्याठिकाणी मिनी इजिप्त साकारला असून ते एक अत्यंत प्रेक्षणीय स्थळ असूनही इथल्या बाकीच्या आकर्षणांच्या मानाने बरेच अप्रसिद्ध आणि दुर्लक्षित राहिले आहे. आमचा आजचा बुर्ज खलिफा आणि परिसराचा कार्यक्रम रात्री नऊ पर्यंत आटपला तर थोडी वाट वाकडी करून आम्हाला तिथे धावती भेट देणे शक्य आहे.

'दुबई डाउनटाउन' ह्या तिथल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या व्यापारी + निवासी अशा मिश्र वापर संकुलात हा अतिभव्य मॉल आहे. 'दुबई फाउंटन' आणि 'बुर्ज खलीफा' आणि 'ॲड्रेस डाउनटाउन' (Address Downtown) हे पंचतारांकित हॉटेल देखील ह्याच २ वर्ग किलोमीटर आकाराच्या संकुलात आहेत.

चारशे पेक्षा जास्त 'शार्क' व 'रे' मासे आणि तेहतीस हजारांहून जास्ती संख्येने इतर जलचर ठेवलेले, जगातले दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे 'दुबई ॲक्वेरीयम' आणि 'अंडर वॉटर झु' ( Dubai Aquarium & Underwater Zoo) ह्या मॉल मध्ये आहे. नुसते ॲक्वेरीयम बघायला कोणतेही शुल्क लागत नाही पण 'अंडर वॉटर झु' बघण्यासाठी आणि त्या प्रचंड मोठ्या ॲक्वेरीयम मध्ये 'स्कुबा डायव्हिंग' किंवा 'स्नॉर्केलिंग' करण्यासाठी वेगळी तिकिटे काढावी लागतात.

ऑलिम्पिक साईझची 'आईस रिंक' ( Dubai Ice Rink), २२ स्क्रीन्स्चे मल्टीप्लेक्स, भितीदायक अनुभव देणारे 'हिस्टेरिया' (Hysteria) नावाचे हॉन्टेड हाऊस, आभासी वास्तवाची (virtual reality) अनुभूती देणारे VR Park, दुबई ऑपेरा (Dubai Opera), १५५ दशलक्ष वर्षे जुना महाकाय डायनोसॉरचा सांगाडा 'दुबई डायनो' (Dubai Dino) आणि इनडोअर इलेक्क्ट्रिक गो-कार्टिंग साठी 'इकार्ट झबील' (Ekart Zabeel) अशी सर्व वयोगटातील पर्यटकांना रिझवणारी अनेक आकर्षणे इथे आहेत.

Dubai mall

द दुबई मॉल

फोटो जालावरून साभार

इथले प्रत्येक आकर्षण पाहायला आणि १२०० हून जास्त दुकाने आणि २०० पेक्षा जास्ती उपहारगृहे असलेला हा मॉल पूर्णपणे फिरायला दोन दिवसही कमीच पडतील. इथे खरेदी काहीच करायची नव्हती त्यामुळे आम्ही सव्वा तासात फिरता फिरता सहज बघता येणारी ठिकाणे जसे की, ॲक्वेरीयम, आईस रिंक, दुबई डायनो आणि बाहेरून दुबई ऑपेरा तेवढे पाहिले. 'ॲट द टॉप' साठी आम्हाला साडेसातची वेळ मिळाली होती आणि त्याआधी अर्धातास तिथल्या काउंटरवर रिपोर्टिंग करायचे असल्याने मग बुर्ज खलिफाच्या दिशेने आमचा मोर्चा वळवला.

Burj Khalifa

बुर्ज खलिफा (ड्रोन इमेजेस)

काउंटरवर जाऊन साडेसातच्या बॅच साठी लिफ्ट मधली आमची जागा नक्की केल्यावर मग तिथेच लॉबीत, विक्रीपूर्व प्रसिद्धी आणि नोंदणीसाठी प्रदर्शित केलेल्या 'टेस्ला' च्या दोन नवीन इलेक्ट्रिक कार्सचे निरीक्षण करत, फोटो काढत टाईमपास केला आणि सव्वा सातला लिफ्टच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. तिथल्या एका डेकवर एकावेळी १२-१५ जणांना सामावून घेणाऱ्या, मजला, मीटर्स मधे उंची व लागणारा वेळ दर्शवणारे डिजिटल डीस्प्ले असलेल्या दरवाजांच्या आणि अक्षरशः साठ सेकंदात १२४ व्या मजल्यावर पोचवणाऱ्या वेगवान डबल डेकर लिफ्टस अफलातून आहेत.

खाली येत असलेली लिफ्ट

१२४ व्या मजल्यावरच्या ऑब्जर्वेशन डेकवर पोचल्यावर ज्या उंचीवर आम्ही उभे होतो त्यापेक्षा खालून उडत जाणारे कोस्ट गार्ड वाल्यांचे हेलिकॉप्टर पाहून मात्र आपण खरोखरच 'ॲट द टॉप' आहोत असे वाटले. खाली सुरु असलेला 'फाउंटन शो' पण एवढ्या उंचीवरून बघायला खूपच विलोभनीय वाटत होता. १२५ व्या मजल्यावरून ३६० अंशात दिसलेले रंगीबेरंगी प्रकाशानी उजळलेल्या संपूर्ण दुबईचे दृश्य तर शब्दातीत आहे. जगातल्या ह्या सर्वात उंच इमारतीत घर असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार 'मोहनलाल' आणि बॉलीवूड सिनेतारका शिल्पा शेट्टी अशा दोघा ज्ञात असलेल्या भारतीयांचा फार अभिमान वाटला.

सुमारे पंचवीस मिनिटे ऑब्जर्वेशन डेकवर व्यतीत करून लिफ्टने पुन्हा एका मिनिटात खाली आलो आणि पुढचा कार्यक्रम 'द दुबई फाउंटन शो' बघायला आम्ही बुर्ज खलिफा तळ्यावर (Burj Khalifa Lake) पोचलो.

तीस एकर क्षेत्रफळ व्यापणाऱ्या ह्या मानवनिर्मित कृत्रिम तळ्यात संगीताच्या तालावर रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात पाण्याचे फवारे नाचवणाऱ्या विशाल कारंज्याची यंत्रणा बसवलेली आहे. ह्या कारंज्याची लांबी ९०० फुटांहून अधिक असून ५०० फुट उंचीपर्यंत पाणी वरती उडवण्याची त्यातल्या फवाऱ्यांची क्षमता आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत दर अर्ध्या तासानी चार-पाच मिनिटांसाठी होणारा अरबी, इंग्लिश, हिंदी गाण्यांवर नृत्यदिग्दर्शित केलेला पाण्याचा हा नाच प्रेक्षकांना वेड लावतो!

आम्हाला त्यावेळी मायकल जॅक्सनच्या 'थ्रिलर' ह्या गाण्यावरील परफॉर्मन्स बघायला मिळाला होता. त्या दृश्याचे वर्णन करणे अशक्य आहे. खाली 'दुबई डाउनटाऊन' च्या स्लाईड शो मध्ये त्या दृश्याचे काही फोटो देत आहेच, पण ज्यांना अशा गोष्टींमध्ये रुची असेल त्यांच्यासाठी युट्यूब वरील दोन व्हिडिओ इथे एम्बेड करत आहे. पहिला व्हिडिओ तसा जुना म्हणजे २००९ सालचा आणि अरबी गाण्यावरचा असला तरी त्यात अगदी १००% नसला तरी फाउंटनचा बराचसा भाग फ्रेम मध्ये येत असल्याने त्याची निवड केली आहे. दुसरा व्हिडीओ काही विशिष्ठ/खास कारणांसाठी बुर्ज खलीफावर ज्यावेळी लाईट शो असतो त्यावेळचे दृश्य कसे दिसते ते दाखवणारा आहे.




पाच मिनिटे चाललेला हा पाण्याचा नृत्याविष्कार पाहून झाल्यावर मग पुन्हा दुबई मॉल मध्ये दहा वाजेपर्यंत फिरत वेळ घालवण्यापेक्षा येताना लांबून दर्शन झालेला 'वाफी मॉल' (Wafi Mall) बघण्यासाठी जायला पार्किंग लॉट मध्ये पोचलो. तिथे गाडी शोधण्यात पाच-सात मिनिटे गेली आणि मग साडे आठच्या सुमारास आम्ही तिथून निघालो.

दुबई मॉल, बुर्ज खलिफा आणि दुबई फाउंटन ह्या 'दुबई डाऊनटाऊन' परिसरातील निवडक फोटोंचा स्लाईड शो.

▼ दुबई डाऊनटाऊन - स्लाईड शो.

.

1 of 28


दुबई मॉल पासून आमच्या परतीच्या रस्त्यावर केवळ आठ कि.मी. वरच्या 'वाफी सिटी' येथे १९९१ साली सुरु झालेला हा 'वाफी मॉल' खरोखर खूप सुंदर आहे. आधी ह्या ठिकाणाबद्दल माहिती असती तर किमान तीन तासांचा वेळ नक्कीच राखून ठेवता आला असता अशी चुटपूट आम्हाला इथल्या तासाभराच्या धावत्या भेटीनंतर लागून राहिली!

▼ वाफी मॉल (फोटो जालावरून साभार)

ह्या मॉलचे बांधकाम इजिप्त मधील कर्नाक टेम्पल, पिरॅमिड्स आणि फॅरोंचे पुतळे अशा थीमवर आधारित आहे. त्या जोडीला १४ व्या शतकातील बगदाद शहरातील बाजाराचे स्वरूप दिलेला इथला 'खान मुरजान सुक' (Khan Murjan Souk) इजिप्शियन, सिरीयन, टर्कीश आणि मोरोक्कन स्थापत्याचा प्रभाव असलेले ह्याचे खरेदी आणि खान-पानाचे चार विभाग आपल्याला अरेबियन नाईट्स वाचून परिचित झालेल्या वातावरणात घेऊन जातात. अत्यंत सुंदर असूनही आश्चर्यकारकरित्या हा मॉल दिवसही तसा ओस पडलेलाच असतो. आत्ताही रात्रीची वेळ असल्याने इथे फारसे कोणीच नव्हते. हाताशी कमी असलेल्या वेळात शक्य तेवढा नजारा डोळ्यांत साठवून घेत आणि थोडेफार फोटो काढले.

दुबई भेटीनंतर अवघ्या दहा महिन्यांनी जेव्हा एकट्याने परदेशी पर्यटनाला जाण्याचा योग आला, तेव्हा क्षणार्धात इजिप्तला जाण्याचा विचार पक्का झाला त्यात ह्या मॉलनी महत्वाची भूमिका बजावली असावी. इजिप्शियन शैलीतील जी शिल्पे, ओबिलीस्कच्या प्रतिकृती ह्या ठिकाणी पाहिल्या होत्या, त्यांनी मनाच्या सुप्त कोपऱ्यात त्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहण्याची निर्माण केलेली ओढ तो निर्णय घेताना प्रभावी ठरली असावी असे आता हा लेख लिहिताना राहून राहून वाटतंय.

▼ वाफी मॉल - स्लाईड शो.

.

1 of 26


पावणे दहाला आम्ही गाडीपाशी परत आलो. आता भूकही लागली होती त्यामुळे जेवण करण्यासाठी आम्हाला थेट 'लाहोरी पकवान' ला सोडायला हबीबला सांगितले. पंधरा मिनिटांत तिथे पोचल्यावर त्याला बक्षीस देण्यासाठी दुपारीच २५ दिरहम भरून तयार करून ठेवलेले पाकीट देऊ केल्यावर त्याने ते घेण्यास विनम्रपणे नकार दिला. आमच्या देशातून फार कोणी इथे पर्यटनासाठी येत नाहीत, त्यात कोणी आलेच तरी ते आपल्या मित्र मंडळींकडे मुक्काम करतात आणि त्यांच्याच बरोबर फिरत असल्याने आमच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे तुमच्या सारखे भारतीय पर्यटक भेटतात तेव्हा त्यांच्याशी दुसऱ्या कुठल्या भाषेत न बोलता आपल्या सामाईक हिंदी+उर्दू अशा मिश्र भाषेत संवाद साधता येतो हेच आमच्यासाठी मोठे बक्षीस असते असे त्याने सांगितले.

त्याचे आभार मानून निरोप घेतला आणि मग लाहोरी पकवान मध्ये चविष्ट जेवण झाल्यावर अकरा वाजता रूमवर परतलो. उद्या सकाळी 'पाम आयलंड्स' (Palm Islands) वरच्या 'अटलांटीस' (Atlantis, The Palm) हॉटेल मधल्या 'द लॉस्ट चेंबर ॲक्वेरीयम' (The Lost Chambers Aquarium) आणि अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क (Aquaventure Waterpark) अशा पूर्ण दिवसाच्या सहलीसाठी सकाळी नऊ वाजता पिकअप होता. आज सकाळी नाश्ता व्हायला उशीर झाल्याच्या अनुभवावरून उद्या सकाळी साडे सात ऐवजी सव्वा सातचा अलार्म लावला आणि डोळे चांगलेच जड व्हायला लागले असल्याने सरळ झोपून गेलो.

क्रमश:


टीप: लेखातील सर्व ड्रोन इमेजेस जालावरून आणि कॉफीशॉपचे फोटो हॉटेल फोर्च्युन पर्लच्या वेबसाईट वरून साभार.

 

दिवस तिसरा :-

सकाळी उठून सर्व तयारी झाल्यावर ब्रेकफास्ट उरकून नऊच्या काही मिनिटे आधीच आम्ही रिसेप्शन हॉलमध्ये गाडीची वाट बघत बसलो होतो. आज आम्ही वेळेपूर्वी तयार होतो तर गाडी थोड्या उशिराने आली. आजची आमची 'पाम जुमेरा आयलंड्स' आणि उद्याची 'डेझर्ट सफारी' अशा दोन्ही टूर्स सीट इन कोच तत्वावर असल्याने आमच्या बरोबर गाडीत अन्य चार पर्यटकही असणार होते.

आधीच्या दोन हॉटेल्स मधून कॅनडाहुन हनिमूनसाठी आलेले एक नवविवाहित शीख जोडपे आणि लंडनहून आपल्या ८-९ वर्षाच्या मुलीबरोबर आलेली एक महिला अशा चार व्यक्तींना पिकअप करून सव्वानऊच्या सुमारास मर्सिडीज-बेंझ स्प्रिंटर टूरर हि ९ आसनी व्हॅन घेऊन रमीझ नावाचा ड्रायव्हर आला. आम्ही गाडीत बसल्यावर पाम जुमेरा आयलंड्स वरच्या 'अटलांटीस - द पाम' हॉटेलपर्यंतचा आमचा सुमारे ३६ कि.मी. अंतराचा प्रवास सुरु झाला.

गाडीत शेवटच्या तिसऱ्या रांगेतील सीट्सवर बसलेल्या 'सिंग' आणि 'कौर' यांना चांगली प्रायव्हसी मिळाल्याने ते 'लव्ही-डव्ही' लीलांमध्ये दंग झाले होते. मधल्या सीट्सवर बसलेली अदिती आणि फातिमा यांच्या गप्पा रंगल्या होत्या तर फातिमाची मुलगी लैला हि खिडकीतून दिसणारी दृश्ये बघणे, तिच्या आईला भेटलेल्या नव्या मैत्रिणी बरोबर चाललेल्या तिच्या गप्पा ऐकणे व अधून मधून तिला विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे अशा तिहेरी कामात व्यस्त होती. माझ्या वाट्याला ड्रायव्हरच्या शेजारची सीट आपसूक आल्याने अवघ्या २५-२६ वर्षांच्या पण अनुभवसमृद्ध रमीझ बरोबर वार्तालाप करत त्याचे रोचक अनुभवकथन ऐकायला मिळाल्याने मीही खुश होतो. एकंदरीत गाडीतले वातावरण जो जे वांच्छिल तो ते लाहो टाईप असल्याने आनंदी स्वरूपाचे होते.

पाकिस्तानातील इस्लामाबादच्या रमीझने वयाच्या बाविसाव्या वर्षी अफगाणिस्तान मध्ये सुट्टीवर मायदेशी परतणाऱ्या अमेरिकन सैनिकांना काबुल एअरपोर्ट वर सोडण्याचे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेल्या ताज्या दमाच्या सैनिकांना त्यांच्या पोस्टिंग असलेल्या ठिकाणी नेऊन सोडण्याचे अतिशय जोखमीचे पण भरपूर आर्थिक मोबदला देणारे बस ड्रायव्हरचे काम स्वीकारले होते. दोन वर्षांत त्याने तिथे पैसे भरपूर कमवले परंतु ज्या युवतीशी त्याला लग्न करायचे होते तिचे वडील रमीझ अप्रत्यक्षपणे का असेना पण अमेरिकेसाठी काम करतो म्हणून त्यांच्या लग्नास परवानगी देत नव्हते. अखेरीस त्यांच्या हट्टापायी म्हणूया की त्या मुलीवर असलेल्या प्रेमापोटी त्याने ती नोकरी सोडली आणि लग्न झाल्यावर दुसरे कोणतेच कौशल्य अंगी नसल्याने दुबईत ही ड्रायव्हरची नोकरी पत्करली होती.

नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाल्यावर बायकोलाही इथे आणून दुबईतच स्थायिक होण्याचा त्याचा विचार असल्याचे त्याने सांगितले. अमेरिकेवर केवळ मध्यपुर्वेचाच नाही तर एकूण मुस्लिम जगताचा किती राग आहे हे सर्वश्रुत असले तरी अमेरिकेनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांची विचारसरणी देखील इतकी टोकाची असेल हि गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. त्याच्याकडे अफगाणिस्तानातील सांगण्यासारखे थरारक अनुभव आणि रोचक किस्से भरपूर होते, पण जाता-येतानाच्या प्रवासात त्याला बोलायला मिळालेला उणापुरा दोन-अडीच तासांचा वेळ कमी पडला असेच म्हणू शकतो.

असो, बराचसा प्रवास काल दुबई मरिना साठी जाताना लागलेल्या रस्त्यावरूनच सुरु होता त्यामुळे आजूबाजूला दिसणारी दृश्ये तशी परिचयाची झाली असल्याने त्यावेळी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली 'द दुबई फ्रेम' (The Dubai Frame), 'एतिहाद म्युझियम' (Etihad Museum), जुमेरा बीच जवळचे (वास्तविक पंचतारांकित पेक्षा वरचा कुठलाही अधिकृत दर्जा हॉटेल्स साठी अस्तित्वात नसला तरी सुद्धा तिथे उपलब्ध असलेल्या असामान्य सेवा/सुविधांमुळे) सप्ततारांकित असा लौकिक मिरवणारे 'बुर्ज अल अरब' (Burj Al Arab) हे प्रचंड महागडे पंचतारांकित हॉटेल, शेख साहेबांचा राजवाडा आणि अपूर्ण अवस्थेतील 'दुबई आय' (Ain Dubai/ऐन दुबई) वगैरे बद्दलच्या लैलाच्या प्रश्नांना अदितीच परस्पर उत्तरे देत होती त्यामुळे रमीझच्या सुरु असलेल्या अनुभव कथनातही पाम जुमेरा आयलंड्सला जाण्यासाठी गाडी मुख्य रस्त्यावरून उजवीकडे वळेपर्यंत व्यत्यय आला नव्हता.


रस्त्यावरून जाणारी 'दुबई ट्राम'

दुबईतील 'पाम जुमेरा' (Palm Jumeirah) ह्या मानवनिर्मित कृत्रिम बेटांच्या समूहाला जगातले (स्वयंघोषित) आठवे आश्चर्य म्हंटले जात असले तरी त्यात काही अतिशोक्ती वाटत नाही. पर्शियन आखातात (इराणचे आखात) समुद्रात भराव टाकून पाम वृक्षाच्या आकाराचे तीन ('पाम जेबेल अली', 'पाम जुमेरा' व 'पाम डेरा') आणि जगाच्या नकाशासारख्या आकाराचे 'वर्ल्ड आयलंड्स' असे कृत्रिम द्वीपसमूह निर्माण करून दुबईतील जमीन आणि किनारपट्टीची उपलब्धता आणि पर्यटन वाढवण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतील पूर्णत्वास गेलेला हा एक प्रकल्प!

केवळ सहा वर्षांच्या विक्रमी वेळेत निर्माण करून वापरात आणलेल्या, सुमारे ५ कि.मी. व्यासाच्या ह्या एकूण चार बेटांपैकी मधल्या पाम वृक्षाच्या खोडाचा (Trunk & Spine) आकार दिलेल्या जागेवर मध्यभागी मुख्य रस्ता व मोनोरेल आणि त्यांच्या दुतर्फा ६००० + घरे असलेल्या उंच रहिवासी इमारती आहेत तर १७ झावळ्यांचा (Fronds) आकार दिलेल्या जागेवर प्रायव्हेट बीच असलेल्या १५०० अलिशान व्हिलाज आहेत. ह्या निवासी भागाच्या सुरक्षेसाठी तीन बेटांच्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या सुमारे ११ कि.मी. लांबीच्या वर्तुळाकार क्रिसेंट (ब्रेकवॉटर) वर अनेक हॉटेल्स, रिसोर्ट्स आणि अन्य मनोरंजन, पर्यटन विषयक आकर्षणे आहेत.

पाम जुमेरा द्वीपसमूह (उपग्रह चित्र)

Drone View of Palm Jumeirah

पाम जुमेरा द्वीपसमूह (ड्रोन इमेजेस)

मोनोरेल स्टेशन

मोनोरेल

अटलांटीस हॉटेल

क्लिक केल्यास फोटो एनलार्ज/मिनिमाइज़ होतील


"स्थापत्य आणि अभियांत्रिकीचे भव्य-दिव्य मानवनिर्मित चमत्कार बघायची आवड असल्यास खालील बटणावर क्लिक करून पाम जुमेरा बाबतचे दोन व्हिडीओज बघता येतील"


मुख्य भूमीपासून बेटाला जोडणाऱ्या रस्त्यावरून चार-साडेचार कि.मी. प्रवास करत आम्ही मधल्या बेटाच्या शेवटच्या टोकाला पोचलो जिथून क्रिसेंट वर जाण्यासाठी समुद्राखाली बांधलेल्या सुमारे १ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला सुरुवात होते.


मधल्या बेटावरचा मुख्य रस्ता आणि वरून जाणारी मोनोरेल.

समुद्राखालून जाणारा बोगदा


बोगद्यातून बाहेर पडून क्रिसेंटवर पोचल्यावर गाडी उजवीकडे वळली आणि सव्वा दहाच्या सुमारास आम्ही 'अटलांटिस द पाम' हॉटेलला पोचलो.

हा फोटो जालावरून साभार

'अटलांटिस द पाम'

प्राचीन ग्रीक साहित्यिक व तत्त्वज्ञ 'प्लेटो' ह्याने त्याच्या ग्रंथात उल्लेख केलेल्या 'अटलांटिस' ह्या महाप्रलयात बुडून जलसमाधी मिळालेल्या अतिप्राचीन बेटावरील वैभवशाली राज्याच्या दंतकथेच्या थीमवर आधारित रचना/सजावट असलेल्या 'अटलांटिस द पाम' ह्या अतिभव्य पंचतारांकित हॉटेलमध्ये १५०० पेक्षा जास्ती रूम्स आहेत. इथले एका रात्रीसाठी जवळपास सहा लाख रुपये भाडे असणारे 'Poseidon' आणि 'Neptune' हे दोन भव्य अंडरवॉटर सूट्स गर्भश्रीमंतांमध्ये लोकप्रिय आहेत.

त्या जोडीला जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या दोन गोष्टी इथे आहेत त्या म्हणजे,

  • 'द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम' (The Lost Chambers Aquarium)
  • 'अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क' (Aquaventure Waterpark)

अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क मध्ये भिजल्यानंतर ॲक्वेरीयम बघायला कंटाळा येईल अशा विचाराने आम्ही सुरुवात द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम बघण्यापासून केली. फातिमा आणि लैलाही आमच्या सोबतच आल्या, शीख जोडप्याने बहुतेक आधी वॉटर पार्कमध्ये जाणे पसंत केले असावे.

ग्रीक दंतकथेनुसार दहा-अकरा हजार वर्षांपूर्वी महाप्रलयात बुडालेल्या अटलांटिस ह्या प्रगत महानगराच्या सागर तळातल्या अवशेषांचे देखावे साकारून निर्माण केलेले व ६५००० हून अधिक समुद्री जलचर ठेवलेले हे भव्य ॲक्वेरीयम आवर्जून पाहण्यासारखे आहे. शार्क्स, स्टींग रे सहित असंख्य जातींचे, लहान मोठ्या आकाराचे रंगीबेरंगी मासे आणि समुद्री जलचर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.

मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या ॲक्वेरीयम मध्ये मध्यम व मोठ्या आकाराचे जलचर असून त्यात स्कुबा डायव्हिंग करण्याचीही सोय उपलब्ध आहे. भिंतींमध्ये बनवलेल्या मत्सालयांमध्ये ठेवलेल्या लहान-मोठ्या माशांचे रंग अविश्वसनीयरित्या सुंदर आहेत.
जाडजुड काचे मागच्या, चपळतेने पोहणाऱ्या माशांचे फोटो काढणे हे एक अत्यंत अवघड काम आहे. त्यातल्यात्यात बरे आलेले काही फोटोज खाली स्लाइड शो मध्ये देत आहे.

द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम - स्लाइड शो

1 of 30



साडे अकरा वाजता द लॉस्ट चेंबर्स ॲक्वेरीयम बघून आम्ही अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क कडे आमचा मोर्चा वळवला. लॉकर घेऊन त्यात बरोबर आणलेले कपडे, किरकोळ सामान आणि फोन्स वगैरे ठेऊन मग एक से बढकर एक रोमांचक स्लाईड्सचा आनंद लुटायला सुरुवात केली.

Aquaventure Waterpark

अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क

'लीप ऑफ फेथ' (Leap Of Faith)

(अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कचे सर्व फोटोज त्यांच्या वेबसाईट वरून साभार)


'पोसायडन्स रिव्हेंज' (Poseidon's Revenge), 'लीप ऑफ फेथ' (Leap Of Faith), 'स्लीथरीन' (Slitherine), 'झूमरँगो' (Zoomerango), 'अ‍ॅक्वाकोंडा' (Aquaconda) अशा एकट्या व्यक्तीने, जोडीदार बरोबर आणि चार ते सहा जणांच्या समूहाने करण्यासारख्या अनेक लोकप्रिय स्लाईड्स असल्या तरी, सहा-सात मजली उंच इमारतीवरून एखाद्याने उडी मारली तर त्याला कसे वाटत असेल हा अनुभव देणाऱ्या 'लीप ऑफ फेथ' आणि 'पोसायडन्स रिव्हेंज' ह्या एकट्याने अनुभवायच्या स्लाईड्स सर्वात जास्त थरारक आहेत.

सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी असलेल्या सत्तर-पंचाहत्तर राईड्स / स्लाईड्सच्या जोडीला ह्या अवाढव्य वॉटर पार्कमध्ये 'द अटलांटियन फ्लायर' (The Atlantean Flyer) ही थरारक झिप लाईन (Zip Line), टोरेंट, लेझी रिव्हर, रॅपिड अशा कृत्रिम नद्या आणि (अतिरिक्त शुल्क भरून अनुभवण्याची) 'डॉल्फिन बे' (Dolphin Bay) व 'सी लायन पॉइंट' (Sea Lion Point) अशी अनेक अन्य आकर्षणेही आहेत.

*अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कचा विस्तार करून मार्च २०२१ पासून त्यात अनेक नवीन स्लाईड्सचा समावेश करण्यात आल्याने तेथील राईड्स / स्लाईड्सची संख्या १०५ झाली असून आता हे जगातले सर्वात मोठे वॉटर पार्क ठरले आहे.

साडे चार वाजेपर्यंत अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्कमध्ये मनोसोक्त धमाल केल्यावर शॉवर वगैरे घेऊन आम्ही चौघंजण पार्किंगलॉट मधल्या आमच्या गाडी जवळ आलो. सरदारजीच्या बायकोला काहीतरी तब्येतीचा त्रास जाणवू लागल्याने ते दोघे तीन वाजताच मोनोरेलने निघून गेल्याची माहिती रमीझने दिली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. सव्वा सहाला आम्हाला आमच्या हॉटेलवर सोडून रमीझ पुढे फातिमा आणि लैलाला त्यांच्या हॉटेलवर सोडायला निघून गेला.

दोन सव्वादोन तास रुममध्ये टीव्ही बघत लोळत पडून आराम केल्यावर साडेआठ वाजता फ्रेश होऊन आम्ही पुन्हा बाहेर पडलो. दुपारी वॉटर पार्कमध्ये खाल्लेले पिझ्झा, बर्गर वगैरे आता जिरले असल्याने भूकही लागली होती म्हणून जेवायला लाहोरी पकवान मध्ये आलो. जेवण आले तेव्हा आम्ही दिलेल्या ऑर्डर मध्ये नसलेली खीर बघून वेटरकडे त्याबद्दल विचारणा केली असता त्याने हसून काउंटरवरच्या रशीद भाईंकडे बोट दाखवल्यावर आम्ही काय समजायचे ते समजून गेलो.

आधीच्या दोन दिवसात झालेल्या आमच्या बोलण्यातून आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे रशीद भाईंना समजले होते आणि त्यांनी ते लक्षात ठेऊन त्यांच्यातर्फे ही खीर पाठवली असल्याचा आलेला अंदाज काहीवेळात काउंटरवरच्या कामातून उसंत मिळाल्यावर त्यांनी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या तेव्हा बरोबर ठरला. आपल्या भारतात नेहमीच्या रेस्टॉरंट्स मध्ये जेवायला गेल्यावर अधून मधून एखादी डिश किंवा स्वीट डिश व्यवस्थापनातर्फे कॉम्प्लीमेंटरी दिली जात असल्याचा अनुभव कित्येकदा येत असतो, परंतु जेमतेम २-३ दिवसांची ओळख असलेल्या रशीद भाईंनी असा मनाला सुखावणारा अनुभव दुबईत मिळवून दिल्याने आमचा दिवस फारच खास ठरला होता!

मस्तपैकी जेवण झाल्यावर मग तिथून चालत जाण्याच्या अंतरावर पर्यटक आणि स्थानिकांची बरयापैकी वर्दळ असलेल्या खाडी किनाऱ्यावरच्या चौपाटी टाईप भागात थोडावेळ भटकून टाईमपास केल्यावर किनाऱ्यावरच्या बेंचवर साडे अकरा पर्यंत निवांत बसून मग रमत-गमत आम्ही हॉटेलवर पोचलो.

उद्याचा पूर्वनियोजित डेझर्ट सफारीचा कार्यक्रम दुपारी तीन वाजताचा असल्याने सकाळी लवकर उठण्याची अजिबात घाई नसल्याने मग परवा रात्री धावती भेट दिलेल्या आमच्या हॉटेल मधल्याच 'जंगल क्लब' ह्या आफ्रिकन डिस्को मध्ये एकदम फुरसतमध्ये प्रवेशकर्ते झालो.

JUNGLE CLUB

'जंगल क्लब' आफ्रिकन डिस्को

(जंगल क्लबचे सर्व फोटोज हॉटेल फॉर्च्युन पर्लच्या वेबसाईट वरून साभार.)


क्लब मध्ये आज आमच्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय होती. अदितीच्या आवडीचे 'ब्लू लगून' (Blue Lagoon) मॉकटेल आणि माझे आवडीचे एल.आय.आय.टी. (Long Island Iced Tea) ह्या कॉकटेलचा आस्वाद घेत लाइव्ह ऑर्केस्ट्रावर गायक/गायिका सादर करत असलेली गाणी ऐकत, डान्स फ्लोरवर नाचणाऱ्या हौशी मंडळींचे नृत्य बघण्यात वेळ फार मजेत चालला होता. दुबईतली दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू असतात त्यामुळे मध्यरात्री एक वाजून गेल्यावर दुकाने बंद केल्यावर स्थानिक दुकानदार मंडळींचे ग्रुप्स श्रम परीहारासाठी नाईट क्लब्स मध्ये यायला सुरुवात होते.

माझे कॉकटेलचे तीन राउंड झाल्यावर मात्र L.I.I.T. चा अंमल जाणवायला लागल्या मुळे असेल कि दिवसभरात झालेल्या दगदगीमुळे असेल पण पावणे दोनच्या सुमारास आम्हा दोघांनाही झोप येऊ लागल्याने आम्ही क्लब मधून काढता पाय घेतला आणि वरती आमच्या रूममध्ये आलो. सकाळी उठायची घाई नव्हती पण ब्रेकफास्टची वेळ दहा पर्यंत असल्याने साडे नऊचा अलार्म लावला आणि आम्ही झोपी गेलो.

क्रमशः

 

दिवस चौथा :-

सकाळी साडेनऊला उठल्यावर ब्रश करून आधी कॉफीशॉप मध्ये जाऊन नाश्ता करून घेतला. दुपारी तीन वाजता डेझर्ट सफारीसाठी निघायचे असल्याने हाताशी असलेला तीन-चार तासांचा फावला वेळ सत्कारणी लावायला अकराच्या सुमारास तयार होऊन आम्ही खाली उतरलो आणि दोन-अडीच कि.मी. अंतरावरचा दुबईतले एक प्रमुख आकर्षण असलेला सराफ बाजार अर्थात 'दुबई गोल्ड सूक' ला जाण्यासाठी टॅक्सी पकडली.

शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या ह्या सराफ बाजारात सोने, चांदी, प्लॅटिनम, हिरे-माणके, मोती आणि अन्य मौल्यवान रत्ने विकणारी ९०० हुन अधिक दुकाने आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुठल्याही दिवशी १० ते १५ टन सोने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या ह्या गोल्ड सूक परिसराच्या सुरक्षेसाठी केवळ एक पोलीस व्हॅन तैनात असते, कुठल्याही दुकानाबाहेर एकही बंदूक किंवा दंडुकेधारी सुरक्षा रक्षक दिसणार नाही.

सोन्याच्या किमतीत फार काही फरक नसला तरी त्याच्या शुद्धतेबद्दलची खात्री हे इथे सोने खरेदी करण्या मागचे मुख्य कारण असते. ५७ किलो सोन्याची अजस्त्र अंगठी, सर्वात मोठा सोन्याचा हार आणि साडे बावीस किलो सोन्यापासून बनवलेली 'बुर्ज खलिफा'ची प्रतिकृती अशा अनेक आकर्षणांसहित असंख्य लहान मोठे दाग-दागिने आपल्याला ह्याठिकाणी पाहायला मिळतात.

'गोल्ड सूक' मध्ये भटकंती करून तिथल्या 'मलबार ज्वेलर्स' ह्या भारतीय पेढीतून थोडीफार सोन्याची आणि तिथून जवळच असलेल्या 'स्पाईस मार्केट' मधून काही मसाल्याच्या पदार्थांची खरेदी उरकून आम्ही टॅक्सीने जेवणासाठी लाहोरी पकवान गाठले. जेवण करून रूमवर परतल्यावर फ्रेश होऊन तिनच्या सुमारास रिसेप्शन हॉल मध्ये येऊन गाडीची वाट बघत बसलो. वाळूच्या टेकड्यांवरील 'ड्युन बॅशिंग', सॅंड बोर्डींग करून झाल्यावर वाळवंटातील एका कॅम्प मध्ये कॅमल राईड व अल्पोपहारानंतर तनोरा डान्स, फायर शो आणि 'बेली डान्स' बघण्याचा आनंद घेत आपल्या इच्छेनुसार शाकाहारी/मांसाहारी बार्बेक्यू डिनर झाल्यावर रात्री अकरा-साडे अकरा पर्यंत हॉटेलवर परत असा आजच्या डेझर्ट सफारीचा कार्यक्रम होता.

पाच-सात मिनिटांत 'टोयोटा लँड क्रुझर' हि इथे प्रामुख्याने डेझर्ट सफारीसाठी वापरली जाणारी ऑफ रोड एस.यु.व्ही. घेऊन सलीम नावाचा ड्रायव्हर आला. गाडीत FedEx Express ह्या मालवाहतूक करणाऱ्या अमेरिकन विमान कंपनीची महिला पायलट 'डेब्रा' व तिचा सहकारी पायलट 'जॉन' आणि 'हिरोको' नावाची जपानी महिला व तिची 'युरिको' नावाची वृद्ध आजी अशा चार व्यक्ती आधीपासून बसल्या होत्या.

आधी पुढे बसलेल्या जॉनची जागा डेब्राने घेतली,मधल्या सीटवर अदिती, हिरोको आणि तिची आजी बसल्या तर माझी आणि जॉनची रवानगी शेवटच्या सीट्सवर झाली आणि आमचा शारजा मधील 'अल मदाम' (Al Madam) पर्यंतचा सुमारे ७० कि.मी.चा प्रवास सुरु झाला.

दोन अमेरिकन, दोन जपानी, दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी अशा जबरदस्त ऐतिहासिक पार्श्वभूमीचे नागरिकत्व असलेली मंडळी एका रोमांचक सफरीवर जाण्यासाठी गाडीत एकत्र, त्यात हिरोकोची ब्यायशी वर्षीय आजी ही अमेरिकेने जपानवर अणुबॉंब टाकल्या नंतर झालेल्या वाताहातीची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हंटल्यावर जो दंगा व्हायचा तो झालाच. विषय गंभीर असला तरी टोमणे, शाब्दिक कोट्या, प्रासंगिक विनोद इत्यादींना नुसते उधाण आले होते. आजीबाईं ह्या वयातही खुटखुटीत असल्या तरी त्यांना फारसे इंग्रजी बोलता येत नसल्याने त्यांना प्रत्येकाने (सर्वात जास्ती डेब्रानी) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात हिरोको दुभाष्याची भूमिका निभावत होती तर कळीच्या नारदाच्या भूमिकेत ड्रायव्हर सलीम होता.

तासाभराचा प्रवास करून आम्ही वाळवंटी परिसरातल्या एका बहुउद्देशीय संकुलात पोचलो. मुख्य वाळवंटात जाऊन वाळूच्या टेकड्यांमध्ये 'ड्युन बॅशिंग' करण्या आधी डेझर्ट सफारीसाठी आलेल्या सर्व गाड्या ह्या ठिकाणी थांबा घेतात आणि अस्थिर वाळूवर चांगली ग्रीप मिळण्यासाठी गाड्यांच्या चाकांतली हवा जवळपास अर्ध्याने कमी केली जाते. फूड कोर्ट, भेटवस्तू आणि कपड्यांची दुकाने, प्रसाधन गृहे आणि डेझर्ट स्पोर्ट्स अशा सुविधा ह्या संकुलात होत्या.





अर्धा-पाऊण तास ह्या ठिकाणी घालवून ५ वाजताच्या सुमारास सर्व गाड्यांचा ताफा रोलर कोस्टर राईड सारखा अनुभव देणाऱ्या ड्युन बॅशिंग साठी रवाना झाला.



वाळूच्या टेकड्यांवरून कधी वर जात तर कधी भसकन वेगाने खाली येत, वळणे घेत, कधी डावी बाजू वर तर कधी उजवी बाजू वर होत असताना आता गाडी उलटते कि काय असा विचार मनात आणणारा तो सुमारे २०-२५ मिनिटे चालणारी राईड झाल्यावर एका वाळूच्या टेकडीवर सॅंड बोर्डींगची मजा घेण्यात आली.


सोसाट्याच्या वाऱ्यात वाळवंटात थोडे फोटो, ग्रुप फोटो काढून मग सूर्य मावळतीला आल्यावर पुढच्या कार्यक्रमासाठी कॅम्पच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला.



जॉन, डेब्रा, हिरोको, युरिको (आजीबाई) , आणि आम्ही दोघं.


पंधरा-वीस मिनिटांत गाड्या कॅम्पवर पोचल्यावर कबाबच्या जोडीला सामोसे आणि कांदा भजी असा अल्पोपहार आणि चहा कॉफी सेवनात सर्व पर्यटक रममाण झाले. मध्यभागी भलामोठा स्टेज आणि चहु बाजूने अनेक खाद्यपदार्थ, मद्य, भेटवस्तू विक्रीची दुकाने, हुक्का पार्लर्स, फोटो स्टुडीओ, स्त्रियांना मेहंदी काढण्यासाठीचे तंबू आणि बार्बेक्यू डिनरसाठी असलेले बुफे काउंटर्स तर एका कोपऱ्यात प्रसाधनगृहे होती.

अल्पोपहारानंतर आमच्या बरोबरचे महिला मंडळ हीना टॅटू (मेंदी) काढून घेण्यात व्यस्त असताना माझा आणि जॉनचा बिअर पिणे आणि हुक्का ओढण्याचा कार्यक्रम पार पडला होता. काही वेळात तनोरा नृत्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर एका निग्रो फायर आर्टिस्टने थरारक असा फायर शो सादर केल्यावर समारोपाचा विशेष कार्यक्रम म्हणजे 'बेली डान्स'ला सुरुवात झाली. संगीताच्या तालावर आपल्या कमनीय देहाच्या मादक हालचाली करत नाचणारी ती नृत्यांगना पुरुष प्रेक्षकांपेक्षा कितीतरी अधिक दाद महिला प्रेक्षकांकडून मिळवते.

तनोरा डान्स

फायर शो

बेली डान्स

विविध कार्यक्रमांची मजा घेत जेवण झाल्यावर रात्री साडे नऊच्या सुमारास आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि बरोबरच्या मंडळींना आधी त्यांच्या हॉटेलवर सोडून आम्हाला आमच्या हॉटेलवर पोचायला अकरा वाजले. एकंदरीत दिवस छान गेला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकराला परतीची फ्लाईट असल्याने सामानाची बांधाबांध करून झाल्यावर सकाळी सहा वाजताचा अलार्म लाऊन झोपी गेलो.

सकाळी सव्वा सात वाजता तयार होऊन चेक आउटची प्रक्रिया पार पडल्यावर नाश्ता उरकून घेतला आणि आठ वाजता एअरपोर्ट ट्रान्स्फर साठी आलेल्या गाडीत बसलो. कुठेही ट्राफिक न लागल्याने पंधरा-वीस मिनिटांत एअरपोर्टवर पोचल्यावर तिथले सर्व सोपस्कार आटोपून हाताशी असलेल्या वेळात ड्युटी फ्री मध्ये थोडीफार खरेदी करून मग बोर्डिंग गेट गाठले.

फ्लाईट वेळेवर होती. मरुभूमीत साकारलेल्या ह्या नंदनवनाला पुन्हा भेट देण्याचा निश्चय करून आम्ही विमानात बसलो आणि वेळेतल्या फरकानुसार चार वाजता मुंबईला पोचलो.


दुबई सफर सुफळ संपूर्ण करून घरी परतल्यावर पहिल्यांदाच फोटो आणि चलचित्रांचा एकत्रित असा छोटासा व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तो व्हिडिओ खाली देत आहे, काही फोटोंचा क्रम चुकला आहे पण व्हिडिओ एडिटिंगचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मिपाकर वाचक गोड मानून घेतील अशी आशा आहे.




समाप्त

  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...