Monday, October 25, 2021

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी!

 एखादं ठिकाण पाहून झालं की त्याच जागी पुन्हा जायला मी नाखूश असतो; मला तो पैशांचा नि वेळेचा अपव्यय वाटतो. पण काही जागा याला अपवाद आहेत. ताजमहाल, अजिंठा, वेरूळ, ओर्छा, मांडू, हंपी इ. काही. ह्या जागा पाहून झाल्या असल्या तरी आयुष्यात पुन्हा एकदा त्यांना भेट द्यायचा मानस आहे. ह्या यादीतल्या हंपीला भेट द्यायचा विचार बरेच दिवस मनात होता; शेवटी ह्या ऑगस्ट महिन्यात तो योग आला.

मी पहिल्यांदा हंपीला गेलो ते २०११ साली. अर्थात् ती आमची धावती म्हणता येईल अशी भेट होती. आम्ही हंपी उरकली ती दोन दिवसांत आणि तीही काय पहायचे, कसे पहायचे याचे काहीही पूर्वनियोजन न करता. यावेळी मात्र काय नि कसे पहायचे याचे नियोजन करून गेलो होतो. तरीही काही ठिकाणं पहायची राहिलीच. पण काही हरकत नाही, ह्या कारणामुळे पुन्हा एकदा हंपीला जाणे होईल, नाही का?

हंपीबाबत मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले गेले आहे - किंबहुना मराठी प्रवासवर्णानांमध्ये हंपीचा क्रमांक पहिला असेल. त्यामुळे या लेखमालेत मी फार काही लिहित बसणार नाही; फोटो जास्त नि मजकूर कमी असे ह्या लेखमालेचे स्वरूप असणार आहे. मात्र काही माहिती हवी असेल तर वाचकांनी जरूर विचारावी, मी ती देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

०६ ऑगस्ट

हंपीला जायचे ‘पुणे - सातारा - कोल्हापूर - धारवाड - गदग - हंपी’ आणि ‘पुणे - सोलापूर - वियजपूर (बीजापूर) - हंपी’ असे दोन मार्ग आहेत. पहिल्या मार्गात असलेला घाट, त्या रस्त्यावर होणारी वाहनांची गर्दी आणि एकूणच त्या रस्त्याची खराब स्थिती पाहता आम्ही दुसरा मार्ग निवडला. शुक्रवारी रात्री निघून शनिवारी सकाळी हंपीला पोहोचायचे आमचे नियोजन होते. असं केल्यामुळे शनिवारचा एक जास्तीचा दिवस आम्हाला स्थलदर्शनासाठी मिळणार होता. साडेनऊचे नियोजन असले तरी आम्हाला निघायला सव्वा दहा झाले. उरळीकांचनपर्यंत गाड्यांची ब-यापैकी गर्दी असली तरी पुढचा रस्ता मात्र मोकळा होता. पुणे सोलापूर रस्ता उत्तम स्थितीत आहे. मी म्हणेन की पुण्यातून बाहेर पडणा-या सगळया रस्त्यांत हा उत्तम रस्ता आहे.

रात्री एक वाजता सोलापूरच्या अलीकडे कुठेतरी आम्ही चहा घेतला.



आजकाल कुठेही बाहेर जायचे म्हटले की आधी RT-PCR चाचणी करून घ्यावी लागते. त्यात आम्ही महाराष्ट्रातले (करोनासाठी कुप्रसिद्ध राज्यातले) - तेव्हा सगळ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी करूनच निघालो होतो. एवढ्या रात्री कुणी चाचणीचे रिपोर्ट पाहणार नाही असा आमचा होरा, पण कर्नाटकात शिरताच रस्त्याशेजारीच बनवलेल्या एका तपासणी नाक्यावर कर्नाटक पोलिसांनी आमची गाडी कडेला घ्यायला लावली. ‘कुठे चाललात? हंपीला? कर्नाटकात सध्या वीकेंड लॉकडाऊन आहे, सोलापूरला परत जा आणि सोमवारी या.’ हवालदार साहेबांनी असं म्हणताच आमच्या तोंडचे पाणी पळाले. पण आम्ही चाचणी रिपोर्ट दाखवताच हवालदार साहेब जरा मवाळ झाले. त्यांनी आमची नावे तिथल्या वहीत लिहून घेतली - पण त्यानंतर ते काहीच बोलेनात - जा असेही म्हणेनात आणि थांबा असेही म्हणेनात. तेव्हा आता आपल्याला पुढे जायची परवानगी मिळाली आहे असा समज आम्ही करून घेतला आणि तिथून दबक्या पावलांनी सटकलो.

विजयपूर होस्पेट रस्त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे तर म्हणता येईल ‘झकास!’. चारपदरी सरळसोट रस्ता, मध्ये विस्तीर्ण दुभाजक, अगदी तुरळक गर्दी या कारणांमुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याची मजा १००% अनुभवता येते. त्यात रात्रीची वेळ, तेव्हा गर्दी आणखीनच कमी होती. विजापूर पार केल्यावर आम्ही एका पेट्रोलपंपावर गाडी कडेला घेतली. जवळपास एक तास आम्ही त्या पेट्रोलपंपावर असू - पण झोप येत नव्हती आणि गाडीत झोपायला जागाही नव्हती - तेव्हा हॉटेलवरच जाऊन झोपू असं ठरवून आम्ही निघालो. वाटेत एका टपरीवर चहा घेऊन आम्ही हंपीला पोहोचलो तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजून गेले होते.

०७ ऑगस्ट

केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीतल्या खोल्या ताब्यात घेतल्यावर आम्ही पहिल्यांदा आंघोळी केल्या आणि मस्त ताणून दिली. रात्री दहा वाजल्यापासून आम्ही जागे होतो, तेव्हा अगदी मेल्यासारखे झोपलो. दुपारी एक/दीडला उठून जेवणे केले आणि आमचे हंपीतले पहिले स्थलदर्शन करायला बाहेर पडलो.

आमचा पहिला थांबा होता ‘पट्टभीराम मंदिर’. हंपीतले हे सगळ्यात मोठे (विजयविठ्ठल मंदिराहूनही मोठे) मंदिर आहे. अनेक लोक याच्याशी सहमत होणार नाहीत, पण माझ्या मते हे हंपीतले सगळ्यात देखणे मंदीरही आहे. आडबाजूला असल्याने ह्या मंदिरात फारशी गर्दी नसते. किंबहुना आम्ही गेलो तेव्हा एकूणच हंपीमध्ये फारशी गर्दी नव्हती.


आम्ही हॉटेलातून निघालो तेव्हा पाऊस पडत होता. आम्ही मंदिरात शिरताच तो थांबला. हवेत आलेला गारवा, ढगाळ आकाश आणि समोर हे सुंदर, देखणे, निर्मनुष्य मंदीर. हंपीतली आमची सुरूवात तर उत्तम झाली होती!






मंदिराच्या गर्भगृहाभोवती एक संपूर्ण अंधारा प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गातून प्रदक्षिणा मारणे हा एक थरारक, रोमांचकारी अनुभव असतो. अगदी न विसरता घ्यावा असा.

मंदिर पाहून आम्ही जवळच असलेली पुष्कर्णी आणि गुंबज द्वार पहायला गेलो. हंपीत अनेक पुष्कर्ण्या आहेत, ही त्यातलीच एक.


पुष्कर्णी पाहून आम्ही निघालो गुंबज द्वाराकडे. गुंबज म्हणजे घुमट (आठवा विजयपुरचा तो गोल गुंबज). अशी अनेक द्वारे आपल्याला हंपीत दिसतात. पुर्वी संपूर्ण हंपी शहराला मजबूत तटबंदी होती आणि ही द्वारे हाच शहरात शिरण्याचा एकमेव मार्ग होता. पण फक्त शहरात शिरायचा दरवाजा एवढाच यांना अर्थ नव्हता. त्यांचा एकूणच ऐसपैस पसारा पहाता, आत शिरत असलेल्या मालाची तपासणी करणे, त्यावर कर वसूल करणे या कामांसाठी आणि आलेल्या उतारूंना क्षणभर विश्रांती घ्यायला एक जागा म्हणूनही त्यांचा उपयोग होत असावा.





गुंबज द्वार पाहून आम्ही निघालो आणखी एका द्वाराकडे - भीमद्वाराकडे. हे दार गुंबजद्वारापेक्षाही जास्त ऐसपैस आहे. एका मोठ्या दगडावर कोरलेल्या भीमाच्या आकृतीमुळे ह्या द्वाराला त्याचे नाव मिळाले आहे.








भीमद्वार पाहून होईतो साडेसहा वाजले होते. अजून बराचसा प्रकाश होता, तेव्हा एखादे ठिकाण पदरात पाडावे असे ठरले. भीमद्वाराशेजारीच गणिगत्ती जैन मंदिर आहे, पण ते आत्ता बंद झाले होते. आम्ही नकाशात थोडा शोध घेतला आणि फार लांब नसलेले तलारीगट्टा द्वार पहायला निघालो.

द्वार म्हटल्यावर आपल्यापुढे जे चित्र येते अगदी तसेच तलारीगट्टा द्वार आहे. गावांत शिरताना आजकाल कमानी दिसतात तसे. या दारातून आजही वाहतूक चालू आहे. (विजय विठ्ठल मंदीर पाहण्यासाठी याच दारातून जावे लागते.) छतावर जाण्यासाठी द्वाराच्या दोन्ही बाजूला पाय-या आहेत. आजूबाजूचा परिसर मोठा रमणीय आहे. छोटयामोठ्या टेकड्या, त्यांवर आडवेतिडवे पडलेले वेगवेगळ्या आकारांचे दगड, दूरवर पसरलेल्या केळीच्या बागा. काहीही न करता नुसते शांतपणे पहात रहावे असे दृश्य.




तलारीगट्टा द्वार परिसरात अर्धा एक तास घालवून आम्ही परत निघालो. चला, हंपीतला पहिला दिवस तर अगदी छान गेला! उद्या? हंपीतली काही प्रसिद्ध मंदिरे!

 

०८ ऑगस्ट

आजचा आमचा पहिला थांबा होता गणिगत्ती जैन मंदिर. अगदी साध्याश्या या मंदिराकडे लोकांना आकर्षित करेल असं काहीच नाही; ना भव्य आकार, ना कुठली आकर्षक कलाकुसर. मला मात्र हे मंदिर त्या काळच्या राजांच्या उदार आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याच्या प्रवृत्तीचं प्रतीक वाटलं!



गणिगत्ती जैन मंदिर पाहून आम्ही निघालो हजाररामा मंदिराकडे. आता आम्ही हंपीच्या गाभ्यात प्रवेश करत होतो. विष्णुच्या रामावताराला वाहिलेल्या हजाररामा मंदिराचं नाव पडलं आहे त्या मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या रामायणातल्या अनेक प्रसंगांमुळं.
















या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मुख्यमंडपात उभे खांब बनवण्यासाठी वापरलेला काळा दगड. हा दगड फक्त याच मंदिरात दिसतो. हंपी परिसरात कुठेच हा दगड आढळत नाही, अर्थात फक्त या मंदिरासाठी तो कुठूनतरी आणला असावा.


हजाररामा मंदिराच्या शेजारीच आहे राजवाडा परिसर. राजा आणि इतर अतिमहत्वाचे लोक जिथे बसत आणि विजयनगर साम्राज्याचे कामकाज चालवत ती जागा. लहान मोठ्या अशा जवळपास ४० वास्तू या परिसरात आहेत. अर्थात् आज या वास्तुंचे चौथरेच ते काय उरले आहेत. चौथ-यांच्या वरचे मुख्य बांधकाम लाकडे वापरून केले गेले असेल म्हणून की काय?


हजाररामा मंदिराकडून वास्तुंचे अवशेष पहात महानवमी डिब्ब्याकडे निघालो की उजव्या बाजुला दिसते पुष्कर्णी. ही (बहुधा) हंपीतली सगळ्यात खोल आणि (नक्कीच) सगळ्यात देखणी पुष्कर्णी आहे. पुष्कर्णी आज जरी सुंदर दिसत असली तरी पन्नासेक वर्षांपुर्वी तिची अवस्था एका उथळ खड्ड्यात अस्ताव्यस्त पडलेले दगड अशी होती. (संदर्भ: भारतीय पुरातत्व विभागाचे हंपी संग्रहालय). पुष्कर्णी शेजारीच असलेल्या आणि तिच्यात पाणी खेळवण्यासाठी उभ्या केलेल्या दगडी नळांची रचनाही आवर्जून पहाण्यासारखी आहे.



पुष्कर्णीशेजारीच आहे महानवमी डिब्बा. विजयनगर साम्राज्यातलं सगळ्यात महत्वाचं सभागृह. हंपीचे राजे इथेच महानवमी (विजयादशमी) साजरी करीत आणि राज्याचे इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही इथेच होत. जवळपास ८ मीटर उंच या चौथ-यावर चढून गेलं की वरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. अर्थात हे सभागृह एवढं उंच बांधायचं कारण काही कळत नाही, इथे चालणारे कार्यक्रम प्रजेलाही अगदी सहज दिसावेत म्हणून?




घड्याळात साडेबारा होत होते आणि ऊन अक्षरश: भाजून काढत होतं. खरं तर खोलीवर जाऊन AC लावून मस्त ताणून द्यावी असं वाटत होतं, पण कसंतरी स्वत:ला आवरलं आणि जवळच असलेलं राण्यांचे स्नानगृह पहायला निघालो. राण्यांचे स्नानगृह म्हणजे एक भला मोठा हौद आणि त्याच्या चारही बाजुंना असलेले रुंद व्हरांडे.



आत्तासारखं कडक, बोचरं ऊन पडलेलं असावं आणि जोरात पळत येऊन आपण ह्या हौदातल्या गार गार पाण्यात उडी मारावी - ऑगस्टमधल्या एका दमट, अस्वस्थ करणा-या दुपारी यापेक्षा आनंददायी गोष्ट काय असू शकते?

राण्यांचे स्नानगृह पाहून आल्यावर आम्ही एक छोटी विश्रांती घ्यायची ठरवली. ह्या भयंकर उन्हात उघड्यावर फिरण्यात काही अर्थ नव्हता. आम्ही निघालो हंपी वस्तुसंग्रहालयाकडे. वस्तुसंग्रहालयाला जुजबी प्रवेशशुल्क आहे. एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे एकच तिकीट काढून तुम्ही लोटस महाल आणि गजशाळा, आणि विठ्ठल मंदीर ही ठिकाणंही पाहू शकता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं चालवलेल्या ह्या वस्तुसंग्रहालयात हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. मूर्त्या, नाणी, हत्यारं अर्थातच इथं आहेत, पण इथल्या दोन गोष्टी मला विशेष आवडल्या. पहिली म्हणजे अंदाजे २० फूट बाय २० फूट ह्या आकारात बनवलेलं हंपीचं प्रारूप (मॉडेल). हंपीतली मंदिरं, तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूच्या टेकड्या हे सगळं काही ह्या प्रारूपात आहे. हंपी नेमकं कसं आहे हे ह्या प्रारूपामुळे एका दृष्टिक्षेपात आपल्याला कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे हंपीला भेट दिलेल्या अंतर्राष्ट्रीय प्रवाशांनी केलेली हंपीची वर्णनं. ह्या वर्णनांमधून हंपीच्या राजांचं, त्यांच्या दिनचर्येचं, तिथल्या राज्यकारभाराचं आणि तिथं राहणा-या लोकांच्या जीवनशैलीचं दर्शन आपल्याला घडतं.





वस्तुसंग्रहालय पाहून आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यावर आम्ही तिथंच थोडी विश्रांती घेतली आणि उन्हं थोडी उतरल्यावर निघालो लोटस महालाकडे.

खरं सांगायचं तर, का कोण जाणे, लोटस महाल हंपीतला वाटतच नाही. मला तर हा महाल दुसरीकडून कुठूनतरी उचलून हंपीत अलगद ठेवल्यासारखा वाटतो. याचं कारण सोपं आहे - हंपीतल्या सगळ्या वास्तू आहेत हिंदू, लोटस महालात मात्र हिंदू वास्तुकलेचं एकही लक्षण दिसत नाही. ही वास्तू १००% इस्लामी वाटते. अर्थात्, महाल सुंदर आहे याबाबत काहीच वाद नाही.


लोटस महालाला तटबंदी म्हणून बांधलेल्या एका मोठ्या दगडी भिंतीतलं एक छोटंसं दार पार करून आपण गजशाळेजवळ पोचतो. लोटस महालाप्रमाणेच ह्या वास्तुवरचा इस्लामी वास्तुकलेचा प्रभावही अगदी सहज दिसून येतो.


गजशाळेशेजारीच आणखी एक वास्तू आहे. रुंद व्हरांडे असलेल्या ह्या वास्तुचं मूळ प्रयोजन काही कळत नाही. (माहूत/सैनिकांना राहण्यासाठी?) आज मात्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेनं इथे हंपी आणि आजूबाजूच्या परिसरात सापडलेल्या विविध मूर्त्या ठेवल्या आहेत.


ह्या इमारतीत ठेवलेली एक गणेशमुर्ती


गजशाळेसमोरची हिरवळ फारच आकर्षक दिसत असली आणि तिच्यावर ताणून द्यायचा अनावर मोह होत असला तरी आम्ही तिथून निघालो. खरं तर विजयविठ्ठल मंदीर आमच्या आजच्या कार्यक्रमात नव्हते. पण वस्तुसंग्रहालयात घेतलेले तिकीट आज जर वापरले नसते तर ते उद्या पुन्हा काढावे लागले असते (गरीबी खूप वाईट...), तस्मात् आम्ही विठ्ठल मंदिराकडे निघालो.

विठ्ठल मंदीराजवळ गाड्या नेता येत नाहीत. तुमच्या गाड्या वाहनतळावर लावून पुढे विजेवर चालणा-या गाड्यांमध्ये बसून मंदिरापर्यंत जावे लागते. विठ्ठल मंदीराला हंपीतील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदीर म्हणता येईल - अर्थात् गर्दी बरीच होती- गाड्यांसाठी आणि मंदिरातही.


या मंदीराचे मुख्य आकर्षण आहे या मंदिरातला रथ. या रथाला आता ५० रुपयांच्या नोटेवरही स्थान मिळालेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Indian_50-rupee_note#/media/File:India_new...).



 

  त्या रथावर आधी लहानसे शिखर देखील होते जे आजही बाजूला पडलेले दिसते. अलेक्झांडर ग्रीनलॉच्या छायाचित्रात रथावरील शिखर स्पष्टपणे दिसून येते.

हे बघा ते छायाचित्र, १८५६ मधले विठ्ठल मंदिर

a

 



पूर्वी रथाला हात लावता येत असे, आत्ता मात्र रथाभोवती एक अनाकर्षक अशी साखळी ओढून घेतलेली दिसते - हा नक्कीच ‘इन्फ्लुएन्सर्सचा’ दुष्परिणाम असावा.

विठ्ठल मंदीरातल्या बहुबेक मंडपांची आता पडझड झाली आहे, तेव्हा आम्ही रथाजवळच रेंगाळलो. गर्दीमुळे अस्वस्थ व्हायला होत होतं - छायाचित्रे घेताना मला लोकांची अडचण होत होती किंवा माझी त्यांना. आता वाटतं, सुट्टीच्या दिवशी ह्या मंदिराला भेट देऊन आम्ही मोठीच चूक केली होती; वाचकांनी ही चूक करू नये. अर्धा एक तास घालवून आम्ही शेजारच्या एका मंदिराकडे निघालो. ह्या मंदिरात पाहण्यासारखे काहीच नाही. बाहेर दगडांवर आम्हाला एक दोन सरडे दिसले तेवढेच. आम्ही आधी ह्याच मंदिराला उत्किर्णित विष्णू मंदीर समजत होतो, पण खरं तर ते होते शिवमंदिर. उत्किर्णित विष्णू मंदीर विठ्ठल मंदीराच्या मागे आहे.

विठ्ठल मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो - हंपीतल्या एका नितांतसुंदर दिवसाची सांगता झाली होती!

 ०९ ऑगस्ट

आज सकाळी लवकर मातंग टेकडीवर पोहोचून तिथून सुर्योदय पहायचे आमचे नियोजन होते. पण असे होणार नव्हते (हे प्रवासवर्णन नसून नाटक असते तर ‘नियतीला हे मंजूर नव्हते’ असे लिहिले असते, असो.) स्वत: रमतगमत आवरत आणि दुस-याला ‘अरे आवर पटकन...’ असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी साडेसातला आम्ही मातंग टेकडीवर पोचलो.

मातंग टेकडी उंचीला आपल्या पर्वतीच्या साधारण दीडपट असावी. पायथ्यापासून साधारण वीस ते तीस मिनिटांत आपण वरती पोचतो.

मातंग टेकडीवरून संपूर्ण हंपी गावाचे विहंगम दृष्य दिसते.






अंजनेय पर्वत - वेळ कमी पडला आणि इथे जायचे राहिलेच.


चारही बाजुंना अस्ताव्यस्त पसरलेले मोठमोठे दगड, दूरवर वाहणारी तुंगभद्रा नदी, त्याशेजारी दिसणारे विरुपाक्ष मंदिराचे भलेमोठे गोपूर, आडवेतिडवे पडलेले रस्ते, त्यांच्या आजूबाजूला दिसणारी (काही ओळखीची आणि बरीचशी अनोळखी) मंदिरं. सारंच सुंदर असं. मला तर मातंग टेकडी जाम आवडली, हंपीतल्या लोकांचा हेवाही वाटला. आपण हंपीत राहत असतो तर १००% रोज आलो असतो इथं.



विरूपाक्ष मंदिर




अच्युतराया मंदिर



अच्युतराया मंदिर जवळून


उन चढायला लागल्यावर आम्ही निघालो.
मातंग टेकडीवरून खाली उतरताना





मातंग टेकडी उतरेपर्यंत पावणेनऊ झाले होते. आम्ही हॉटेलात जाऊन नाश्ता केला आणि लगेच पुन्हा बाहेर पडलो. आता आम्ही हंपीतली काही फारशी प्रसिद्ध नसलेली मंदिरं पाहणार होतो.

आमचा पहिला थांबा होता चंद्रशेखर मंदिर.


नंतर आम्ही गेलो सरस्वती मंदिरात.


नंतर आम्ही गेलो अष्टकोनी स्नानगृह पहायला.




राण्यांचे स्नानगृह बंदिस्त आहे तर हे खुले - अर्थात् ते राजांसाठी असावे आणि हे सामान्य माणसांसाठी!

ही मंदिरं पाहून झाल्यावर आम्ही गेलो प्रसन्न विरूपाक्ष अर्थात् भूमिगत शिवमंदिर पहायला.





प्रसन्न विरूपाक्ष मंदिरात पाणी भरलेले आहे. ह्या पाण्यामुळे हे मंदिर थोडेसे गूढ, एखादे रहस्य आपल्या गर्भात लपवून ठेवल्यासारखे वाटते. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा प्रयत्न केला. पाणी दोनेक फूट खोल होते आणि पुढे आणखी खोल वाटत होते, त्यात गर्भगृहातून दोन तीन वटवाघुळे पंख फडफडवत बाहेर आली - आम्ही तत्काळ परत फिरलो!


इथे काल आम्हाला राजवाडा परिसर दाखवायला आलेला आमचा गाईड पुन्हा भेटला. खरंतर हा माणूस भापुसचा कर्मचारी होता, काल सुट्टी म्हणून गाईडचं काम करत होता. ह्या बोलघेवड्या माणसाशी जवळपास एक तास गप्पा मारल्यावर आणि मंदिराच्या आवारात असलेल्या हिरवळीवर यथेच्छ लोळल्यावर आम्ही निघालो जेवण करायला. वाटेत आम्हाला लागले शंकरनारायण द्वार. आपल्याला कोणीच पहायला येत नाही म्हणून ते बिचारे थोडेसे खट्टू झालेले दिसले.



जेवण झाल्यावर खोलीवर गेलो असतो तर बाहेर पडणे अवघड होते, तेव्हा तिथेच थोडा वेळ घालवून आम्ही निघालो माल्यवंत रघुनाथ मंदिर पहायला.

हंपीतल्या ज्या थोडक्या मंदिरांमध्ये आजही पूजाअर्चा चालू आहे त्या मंदिरांत माल्यवंत रघुनाथ मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे. मंदिराची रचना गमतीदार आहे - मंदिर बांधताना जागेवर सापडलेल्या एका दगडाला न हालवता चक्क मंदिराचा एक भाग बनवले गेले आहे. त्यामुळे आज मंदिराचा कळस ह्या मोठ्या दगडावर उभा केलेला दिसतो.




सूर्यास्त होत होता. मंदिराच्या अलीकडच्या बाजूला एक मंदिर आहे - इथे आम्ही काही वेळ रेंगाळलो.





एका मोठ्या दगडावर बनवलेले मंदिर


दूरवर दिसणारी मातंग टेकडी



माल्यवंत रघुनाथ मंदिराचा कळस



नंतर मंदिराच्या पलीकडल्या बाजूस असलेल्या दगडांवर गेलो.




मुख्य मंदिराच्या पलीकडे एक नैसर्गिक घळ आहे. याच्या दोन्ही बाजूला अनेक नंदी आणि शिवलिंगे कोरलेली आहेत.


अंधार बराच झाल्यावर (आणि सुरक्षारक्षकाने हाकलल्यावर) आम्ही तिथून निघालो.

ज्याचा शेवट गोड ते सारे गोड असे म्हणतात, पण आज आमच्या दिवसाची सुरूवात नि शेवट दोन्ही गोड झाले होते.

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...