Tuesday, April 18, 2023

नर्मदे हर!! उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

  https://www.misalpav.com/node/51270

नमस्कार मंडळी
नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे. मी ते वाचले नाही पण स्वतः कुंटे यांची "नर्मदे हर"/"साधनामस्त"आणि "नित्य निरंजन " तसेच नाशिकच्या भारती ठाकूर यांचे "नर्मदा परिक्रमा -एक अंतर्यात्रा" ही पुस्तके मी वाचली आहेत. ही पुस्तके वाचून मनात नर्मदा परिक्रमेबद्दल बरेच कुतूहल निर्माण झाले होते. बऱ्याचदा ही पुस्तके वाचताना जणू मी प्रत्यक्ष तिकडे नर्मदेच्या तटावर ,किंवा आसपास कुठेतरी फिरतोय असाही भास होत असे.अर्थात पूर्ण परिक्रमा करण्यासाठी लागणारी अध्यात्मिक बैठक, शारीरिक ताकद आणि मुख्य म्हणजे हापिसातून सुट्टी मिळणे हे सगळे एकत्र जमणे कठीण असल्यामुळे मी पुस्तके वाचून दुधाची तहान ताकावर भागवत होतो.

पुढे मिपावर विअर्ड विक्स यांनी नर्मदा परिक्रमेवर लिहिलेला लेख वाचनात आला आणि त्यांच्याकडूनच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल समजले. शिवाय अशी परिक्रमा आयोजित करणाऱ्या माणसाचा नंबरही मिळाला. हा माझ्यापुरता त्यातल्या त्यात सोपा पर्याय होता. चालायचे अंतरही फार नव्हते (१८ कि.मी.) आणि पैशाचे/सुट्टीचे गणितही जमत होते. त्यामुळे मानाने पुन्हा उचल खाल्ली.टूर आयोजक संतोषशी(९९८७ २७३३२५) २-३ वेळा बोलणे झाले आणि त्याला तिकिटापुरते पैसे गूगल पे करून माझी जागा नक्की करून टाकली.

पुढील माहिती विकिपीडिया वरून साभार
=================================
इतिहास
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे. तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्‍वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते.
===================================
तर शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून लॉगिन करून सकाळच्या सगळ्या मीटिंग आणि ईमेल्स वगैरे वगैरे आटोपल्या आणि २ च्या सुमारास आउट ऑफ ऑफिसचा फ्लॅग लावून टाकला.जेवून थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या इंटरसिटीने निघालो. खूप वर्षांनी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो होतो.गाडी सुरु झाली आणि जुने दिवस आठवले. पहिल्या नोकरीमध्ये जवळपास दर आठवड्याला पुण्याला फेरी व्हायचीच. सकाळी धावत पळत इंद्रायणी पकडायची, गाडीतच किंवा शिवाजीनगरला उतरून जे एम रोडवर पांचाली वगैरे कुठेतरी नाश्ता करायचा. मग ओळीने क्लायंट्स ना भेटायचे. त्यावेळी जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर बरेच क्लायंट्स होते आणि तिथे वडाप किंवा विक्रम रिक्षा चालायच्या. त्यामुळे ५-१० रुपयात हॉपिंग करत शिवाजीनगर ते पिंप्री-चिंचवड फिरायचे आणि संध्याकाळी ३.३० ची डेक्कन एक्स्प्रेस ते ६ ची इंद्रायणी (तेव्हा इंटरसिटी नव्हती) यादरम्यान कुठलीतरी गाडी पकडून परतायचे. तेव्हा माहित नव्हते की पुढे हीच आपली कर्मभूमी असणार आहे. :) असो. आज निवांत खिडकीबाहेर बघत असताना ते सगळे दिवस डोळ्यासमोरून सरकू लागले. विचार करता करता गाडी दादरला कधी पोचली समजलेच नाही. बाहेर पडून पोटपूजा केली आणि दादर पश्चिमेला फलाट क्रमांक ५ वर पोचलो. तोवर परीक्रमेसाठी बनवलेल्या कायप्पा ग्रुपवर मेसेज चालू झाले, आम्ही पोचलो, आम्ही इथे आहोत, आम्ही येतोय वगैरे वगैरे. यथावकाश दादर एकतानगर गाडी फलाटाला लागली आणि आम्ही आपापल्या डब्यात स्थानापन्न झालो.टूर मॅनेजर संतोष सगळीकडे फिरून लोकांना भेटून ट्रीपच्या प्रवाशांची यादी तपासून गेला. बोरिवली आणि वडोदरा येथे प्रवासी चढ उतार करताना झालेली चाव चाव वगळता रात्रभर मस्त झोप झाली. सकाळी गाडी थोडी उशिराने एकतानगराला पोचली.
a

b
सुंदर नवीनच बांधलेले स्टेशन.ऊन वर आले होते. स्टेशनवरून बाहेर पडताना सुखद धक्का बसावा तसे झाले. समोर सरदार पटेलांचा पुतळा ,छान कारंजे ,मोठा रस्ता, २-३ पेट्रोल पम्प, नवीन झालेली हॉटेल्स , स्टॅच्यू ऑफ युनिटी ला नेणारी फेरी बस लागलेली असा माहोल होता. संतोषने आमच्या ३०-३२ जणांच्या ग्रुपसाठी ३ जीप केल्या असल्याने सरळ तिकडेच गेलो. सगळ्यांना एकाच रंगाच्या टोप्या दिलेल्या असल्याने माणसे ओळखायला सोपे जात होते.

१५-२० मिनिटात गरुडेश्वर गावात पोचलो.गाव छोटे असल्याने सगळ्या लोकांची सोय वेगवेगळ्या ठिकाणी केली होती.आमची राहायची सोय एका होम स्ट मध्ये केलेली होती.सकाळची आन्हिके आटोपून नाश्ता करून १० वाजता स्थळ दर्शनासाठी निघालो. मैलोन मेल पसरलेली सपाट जमीन आणि कापूस,भुईमुगासारखी पिके साथ करू लागली. क्वचित कुठे ऊस.

प्रथम कुबेर मंदिर पाहिले.तिथे एक पुजारी १० -१० रुपयाला एक पुडी विकत होता.त्यात १ रुपया, तांदूळ व सुपारी होते, जे तुम्ही घरात ठेवले तर बरकत येते. गंमतीचा भाग म्हणून एक घेतली.मंदिराजवळ एक काचेची पेटी होती ज्यात कुबेराची अनेक पागोटी ठेवली होती. एकेक पागोटे मीटरभर व्यासाचे असेल.
b

प्रसाद भोजन करून बाकीच्या लोकांची वाट बघत होतो. तोच मंदिराच्या मागच्या बाजूला माईचे विस्तीर्ण पात्र दिसले. ऊन कडक होते, पण तिची धूळभेट घ्यावी म्हणून घाट उतरून खाली गेलो. उन्हाचे चटके बसत होते, किनाऱ्यावरचे नावाडी पलीकडे जाणार का म्हणू विचारू लागले. पण मला कुठेही जायचे नव्हते. वाळूचे चटके सहन करत घोटाभर पाण्यात उतरलो. माझ्याकडे येतानाच एक कामगिरी होती. घराच्या पंचायतनामधील गणपती हरवला होता, त्यामुळे नर्मदेतील लाल खडा आणायचा होता.खरेतर ट्रीपला यायचा तोही एक हेतू होताच.शोधाशोध करत असताना अजून काही माणसे दगड गोळा करताना दिसली. मला इतर छान छान दगड मिळत होते, पण पाहिजे तो लाल खडा मिळेना. शोध घेता घेता त्यातील एकजण जवळ आला आणि विचारू लागला, की काय शोधतोयस? त्याला लाल खडा पाहिजे म्हणून सांगितले. दोन मिनिटात त्याने २-३ लाल खडे शोधले आणि मला दिले. मला इतका आनंद झाला की बस.

b
त्याचे आभार मानले आणि त्याला सांगितले की हा नर्मदेतील गणपती स्वयंभू असतो, त्याची प्रतिष्ठापना करावी लागत नाही. माझ्याकडचा बाप्पा निर्माल्यात कुठेतरी हरवला म्हणून हा नेतोय. त्यावर त्यानेही आपल्या देवात ठेवायला एक खडा घेतला. तोवर इतर लोकांचे जेवण झाले असल्याने माझ्या नावाने शंख व्हायच्या आत पटापट परतलो.

पुढचा कार्यक्रम अनुसूया माता मंदिर. श्री दत्तात्रयांची आई अनुसूया हिचे माहेर स्थान. सुंदर देऊळ, मूर्ती , स्थान माहात्म्य सांगणारे गुरुजी आणि त्यात महिला मंडळाने केलेली आरती असा मस्त माहोल जमून आला. पुढे अनुसूयेची बहीण सौंदर्य सुंदरी मंदिर, श्री रंगावधूत यांचे स्थान नारेश्वर , मग हनुमंतेश्वर , मग शनी आणि पनवती मंदिर आणि शेवटी शूलपानीश्वर असे करून आणि रस्त्याने परत जाताना लांबूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेत गरुडेश्वरला परतलो.
नारेश्वर

हनुमंतेश्वर

b

पनवती मंदिर संकुलात बरीच मंदिरे आहेत. जगन्नाथ कुंट्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेले साधू चंदुलाल महाराज सोमण यांचे चिरंजीव तेथील श्री यंत्र मंदिरात पुजारी म्हणून बसले होते. पुस्तकात वाचलेले ठिकाण प्रत्यक्ष बघताना मस्त वाटत होते.पुढे होऊन त्यांची ओळख करून घेतली. अतिशय विद्वान आणि नम्र माणूस. काही मिनिटांच्या गप्पांमध्ये त्यांनी संस्कृत ,मराठी,इंग्लिश मध्ये इतके काही सांगितले की "घेता किती घेशील दो कराने " अशी माझी अवस्था झाली. या गप्पांबद्दल पुन्हा कधीतरी. येथील स्वामी समर्थांच्या पादुकांची विशेष वाटल्या. ज्यांच्या पादुका जवळपास फूटभर लांब त्यांची उंची किती असेल? असा विचार मनात आला. सर्व परिसरात काळतोंडी माकडे खूप होती. पण कोणाला त्रास देत नव्हती.मागच्या बाजूला १०० मीटर खाली मैयाचे चमकणारे विस्तीर्ण पात्र,मावळणारा सूर्य आणि मंदिर संकुलातले ते गूढ वातावरण मनात घर करून राहिले.
पनवती

शूलपानीश्वर

अंधारु लागले आणि दमलेले लोक आपापल्या जीप्स मध्ये बसून हॉटेलवर परतले. आज रात्री लवकर जेऊन झोपायचे होते कारण पहाटे ३ वाजता परिक्रमा सुरु करायची होती.जेवण करून घरी फोन करायला गच्चीवर गेलो कारण खाली रेंज मिळत नव्हती. वर आकाश ताऱ्यांनी गच्च भरलेले. बाजूला कैऱ्या लगडलेले आंब्याचे झाड,उंबराची फळे आणि वातावरणात एक मंद सुवास भरलेला. आजचा दिवस खरा भाकड दिवस असेल असे वाटले होते , कारण मैयाची परिक्रमा तर अजून सुरूच झाली नव्हती. पण आजच्या दिवसाने बरेच काही पदरात टाकले होते. विशेष करून दुपारी मिळालेला लाल खडा आणि संध्याकाळी श्रीयंत्र मंदिरातल्या गप्पा.
इथे रोज राहणाऱ्या लोकांनाही असे काही जाणवत असेल का? की मी आज रिकामटेकडा आहे म्हणून डोक्यात काय काय कल्पना येताहेत?काही समजेना.

शेवटी थकलेल्या अवस्थेत खोलीत झोपायला गेलो. पण दिवसभर गच्ची तापल्याने खोली गरम झाली होती, त्यामुळे खूप उकडत होते. रात्रभर नीट झोप अशी लागलीच नाही. शेवटी २ वाजता उठलोच. अंघोळी उरकल्या.यजमानांकडे सामसूम होती.चहा मिळेल की नाही असे वाटत असतानाच किटली घेऊन आयोजक अंधारातून कुठूनतरी आले आणि फक्कड चहा पाजला. त्यामुळे तरतरी आली. वातावरणात थंडावा असला तरी दिवसभर आग ओकणारा सूर्य थोडी धग मागे ठेवून गेला होता. निघू निघू करता करता ३.३० झाले.
b
नर्मदा मंदिरात संकल्प केला आणि जीप निघाल्या.
b
सुरुवात रणछोडदास मंदिरापासून करायची होती. काही वेळ चालून मग जीपमध्ये बसायची सोय आहे असे संतोष म्हणाला होता. पण एक घोटाळा झाला.रणछोडदास मंदिराकडे जायच्या रस्त्यावर पोलीस वाट अडवून उभे होते. काय झाले होते माहित नाही, पण सगळ्या जीपवाल्याना त्यांनी तिकडून जायला मनाई केली आणि मणी नागेश्वरला जायला सांगितले. त्यामुळे प्लॅन बदलला. ज्यांना थोडे पायी आणि मग जीपने जायचे होते त्या ऐवजी पूर्ण जीपने जावे लागणार होते. त्यामुळे त्यात थोडा वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही मणी नागेश्वरला पोचलो आणि चालायला सुरुवात केली.
b
शंकराचे दर्शन घेऊन पुढे गेलो. इथे तर जत्रा भरली होती. पहाटेचे ४ वाजले आहेत असे वाटतच नव्हते. नर्मदे हर--माताजी चाय लेलो,पोहा लेलो, खिचडी खाओ, ढोकळा लेलो, लस्सी पीओ अशी विनंती करणारे ग्रुप्स जागोजागी उभे होते. खाणारे जणू त्यांच्यावर उपकार करत होते अशा थाटात सगळे चालले होते. दार थोड्या वेळाने नवीन काहीतरी खात पित लोक चालत होते. एका ठिकाणी तर मजाच झाली. कोणीएक कार्यकर्ता माइकवरून घोषणा करून सगळ्यांना खायला बोलावत होता. मग कोणाच्यातरी डोक्यात आले आणि त्याने स्पीकरवर गरब्याची धून लावली. पहिले २ मग ४ असे करता करता पन्नासेक लोक गोल करून गरबा खेळू लागले.बाकीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात गुंग झाले.

हे गुजराती लोक फारच उत्सवप्रेमी बुवा असे म्हणता म्हणता आमच्यातलेही काही लोक त्यांना सामील झाले. एकुणातच मजा मजा चालू होती. आपण परिक्रमेला आलोय की खादाडी करायला हेच समजेना. भल्या पहाटे आणि तेही फुकट एव्हढ्या सगळ्या गोष्टी वाटणारे लोक बहुतेक डोक्यावर पडलेले असावेत असा विचार मनात येऊन गेला.पण लोक तर चांगले शहाणे दिसत होते. रात्रीपासून मोठमोठी पातेली लावून पदार्थ शिजवून आग्रहाने लोकांना खिलवण्यात त्यांना काहीतरी मिळत असणार खास. पण काय मिळत असणार ते माझ्या शहरी बुद्धीला झेपेना. शेवटी डोक्याला जास्त ताण न देता नर्मदे हर म्हणून तिथून पुढे झालो.
b
आता उजाडू लागले होते. पायाखालचा रस्ता दिसू लागला होता. वाटेत वासुदेव आश्रम लागला. इथे एक थांबा घेतला. मठातील मुख्य स्वामींचे दर्शन घेतले.
b
अनेक परिक्रमावासी तिथे मुक्कामाला होते. पुढे निघालो. आता रस्ता अगदी मैयाच्या काठाने जात होता. पण पाण्यात मगरी असल्याने उतरायला बंदी होती. लहानथोर सगळेच कुठल्यातरी ओढीने पुढे पुढे चालले होते. कोणी उड्या मारत , कोणी काठी टेकत, कोणी लंगडत, तर कोणी आधार घेत, पण चालत होते. ऐतरीय उपनिषदातील "चरैवेति चरैवेति" मनात रुंजी घालू लागले.
b
b
गप्पांच्या नादात चालता चालता आमचे टूर मॅनेजर संतोष यांच्याबरोबर चालू लागलो. हि ट्रिप सोडून अजून कुठल्या ट्रिप करता? पुर्ण वेळ हेच काम करता का?काय काय अनुभव आले ? असे एक एक करता करता संतोष ही एक "पहुँची हुई व्यक्ती" आहे हे लक्षात येत गेले. त्याचा इथवरचा प्रवास तुंगारेश्वर,गिरनार,माहूर गड,नर्मदा परिक्रमा,गांजा,गुरुकृपा,अनुग्रह,साधना अशा वेगवेगळ्या स्टेशनांवरून झालाय हे लक्षात येत गेले.
b
गप्पा ट्रॅक सोडून कुठेही धावत होत्या. वाटेत फोन घेणे, करणे, लोकांना मदत करणे हे चालूच होते. त्यामुळे मध्येच गिरनार, तर मध्येच रेल्वे बुकिंग, मग माहूर गड, लगेच कोणालातरी पैसे ऍडव्हान्स देणे , मग गांजाची नी लगेच कुठले ब्लु टूथ चांगले आहे याची चर्चा असे वाट्टेल ते चालले होते. एकुणातच २-३ तास कसे गेले कळलेच नाही. बघता बघता मैया पार करायला होडी घेण्याची जागा आली.
b
चार दिवसात चैत्र संपणार आणि उत्तरवाहिनी परिक्रमाही. आज चैत्रातील शेवटचा रविवार असल्याने तुडुंब गर्दी होती. इथे २ तास गेले. त्यातील होडीमध्ये फक्त १० मिनिटे आणि बाकी नुसतेच वाट बघण्यात. रणरणत्या उन्हात दक्षिण तटाला पोचलो.
b
इथे अर्धे अधिक लोक जीपमध्ये बसले.उरलेली मंडळी चालू लागली.वाटेत जिथे तिथे पुन्हा ताक लस्सी खिचडी वगैरे होतेच. तपोवन आश्रम इथे तर आईस्क्रीम वाटत होते. अरे देवा, लाड लाड म्हणजे किती?
आता शेवटचा टप्पा सीताराम आश्रम. छान दाट झाडीमध्ये विसावलो. तिथले सेवक सर्वांना जेवायचा आग्रह करत होतेच, पण फक्त ताक पिऊन निघालो आणि मैयाच्या किनाऱ्यावर उतरलो. दुपारचा १ वाजला होता. ऊन इतके तापले होते की कोरड्या पडलेल्या पात्रात धुळीचे भोवरे तयार होत होते. मानेची हाताची त्वचा भाजत होती. वाटेतील छोट्या पुलावरून मैयापार केली आणि एक मोठा चढ चढून परिक्रमा संपवली.
b
=========================
अवांतर - जेवून खोलीवर येऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी गावातलेच गरुडेश्वर मंदिर आणि आश्रम बघायला गेलो. नदीच्या काठावरील दत्तगुरूंचे सुंदर मंदिर आणि पू. टेमबेस्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू. नेमके तिथे गेलो आणि आरती सुरु झाली.
b
वातावरणात काहीतरी अगोचर ,अद्भुत भरून राहिले. आरती घेतली आणि नदीकाठावर गेलो. माईच्या आरतीची तयारी चालू होती. अंधार पडत होता. पलीकडच्या किनाऱ्यावर दूर स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत होता तर इथे नुकतेच बांधलेले धरण आणि त्यामुळे कोरडे पडलेले नदीपात्र होते.
b
एक दोन दाढ्या जटा वाढवलेले साधू बसले होते. त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह झाला पण आवरला. जड मनाने माईचा निरोप घेतला आणि पायऱ्या चढून वर खोलीवर आलो. चला , ओळख तर झाली. आता पुढची भेट कधी?(समाप्त)b

अतुल्य! भारत - भाग २५: चिकमंगळूर, कर्नाटक

  https://www.maayboli.com/node/40074?page=1

"आज कॉफी वेगळी पण छान लागतेय. कुठुन आणली?" - मी
"मैत्रिणीने दिली. चिकमंगळूर ला गेली होती ती. तेथुन आणली तिने." - बायको.
कॉफी घेता-घेता तिचे चिकमंगळूरचे फोटोज् पहात होतो.
ऑगस्ट सुरु होता. कॅलेंडर बघितले. १५ ऑगस्ट बरोबर बुधवारी येत होता. नुकतेच रीलीज झाले असल्याने ऑफिसमध्ये काही खास काम पण नव्हते. गुरुवार, शुक्रवार सुटी टाकली तर ५ दिवस सलग मिळत होते.
त्यातच मुंबईच्या काही मित्र-मैत्रिणींना फोन केला तर ते पण तयार झाले. लगेचच हॉटेल्सचा शोध सुरु झाला.
चिकमंगळूर परीसरात कॉफीच्या मळ्यातले होम स्टे (बंगले) प्रसिद्ध आहेत. ह्यांचा दर सिझनवर अवलंबुन असतो. आम्हाला १५००/- दर माणशी दर रात्री असा होम स्टे मिळाला. हे सर्व बंगले चिकमंगळूर शहरापासुन बाहेर जंगलात किंवा मळ्यात असतात. हे सर्व मळे खाजगी असल्याने तिथपर्यंत जायचा रस्ता यथा-तथाच किंवा कधी-कधी नसतोच. त्यामुळे स्वतःची गाडी असणे फार गरजेचे आहे.
चिकमंगळूर बंगलोर पासुन २५० किमीवर आहे. बराचसा रस्ता खुप चांगला आहे. १२०-१३० चा वेग आरामात गाठता येतो. मध्ये थोडा-फार खराब पॅच आहे. पण बंगलोरच्या बाहेर पडायलाच २ तास लागतात.
असो. सकाळी १० ला घराबाहेर पडलो व टाईमपास करत, फोटोज् काढत दुपारी ३ वाजेपर्यंत चिकमंगळूरला पोहोचलो.

ह्या भागात झेंडूचे पण बरेच मळे आहेत.
प्रचि १

-
-

जो बंगला रहायला बुक केला होता तो अगदी भन्नाट जागी होता. कॉफी मळ्यात अगदी आत चारही बाजुने कॉफी मळ्यांनी ने वेढलेला, समोरच थोड्याच अंतरावर मोठा डोंगर व त्यावर घनदाट जंगल व खाली एक मोठा तलाव. नितांत सुंदर जागी हा बंगला होता.
बंगल्याकडे जाण्याचा रस्ता. दोन्ही बाजुला कॉफीचे मळे आहेत.
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
कॉफी
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
प्रचि ६
सिल्व्हर ओक आणि काळी मिरीच्या वेली.

-
-
-
प्रचि ७

-
-
-

संध्याकाळपर्यंत बाकी सर्व जण पण येऊन पोहोचले.
पावसाळा होता म्हणुन हवेत थंडी होती. समोर व्हरांड्यात सर्व जण खुर्च्या टाकुन बसले होते. तिथल्या कुक ने गरम -गरम सूप आणुन दिले. एकाने मोठी शेकोटी लावुन दिली. पिक्शनरी, गप्पा, खाणे-पिणे ह्यात संध्याकाळ गेली.

दुसर्‍या दिवशी सकाळी मुलायनागिरी शिखर पहायला निघालो. हे कर्नाटकातील सर्वात ऊंच शिखर (१९३० मी) मानले जाते.
प्रचि ८
मुलायनगिरी

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०
मुलायनगिरी समोर दिसणारा एक डोंगर.

-
-
-
तिसर्‍या दिवशी हेब्बे आणि कलाहत्ती धबधबे पहायला निघालो. ईथे जाणारा रस्ता अगदी घनदाट जंगलातुन गेला आहे. रस्ता तर अतिशय वाईट आहे आणि शिवाय गाडीला काही झाले तर जवळपास २०-३० किमीच्या परिसरात वस्तीही नाहिये. जवळपास ४० किमीचा वाईट पॅच आहे. हेब्बे फॉल्सजवळ पोहोचल्यावर कळले की हा धबधबा पर्यटकांना बंद केला आहे. मग तसेच पुढे कलाहत्ती फॉल्स ला निघालो.
प्रचि ११

-
-
-
प्रचि १२

-
-
-
प्रचि १३

-
-
-
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५
पच्शिम घाटातील जंगलातले रस्ते

-
-
-
प्रचि १६
पच्शिम घाटातील जंगल

-
-
-
प्रचि १७
पच्शिम घाट

-
-
-

प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
प्रचि २०

-
-
-
प्रचि २१
कलाहत्ती फॉल्स

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३
परतताना लागलेले काही कॉफी मळे

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
-----------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षणः लेपाक्षी, आंध्र प्रदेश.

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407

Sunday, April 16, 2023

“तेथे होते भृगुंचे आगर, यास्तव त्यास म्हणती भिंगार ”

 'भिंगार', या नावाचे गाव या महाराष्ट्रात आहे हेच कितीतरी मराठीजनांना माहित नसेल ....तर जाणून घेऊया या ऐतिहासिक गावाबद्दल थोडी माहिती.

आजमितीस महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे उपनगर व ब्रिटिशकाळापासून ते आजतागायत सैनिकी महत्व कायम राखून असलेले 'कॅंटोन्मेंट बोर्ड - भिंगार' या ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या परंतु कालौघात हे महत्व कुठेतरी विस्मृतीत जाण्याच्या किंवा झाकोळल्यासारखे झालेल्या भिंगारची कहाणी सुरु होते रामायणकाळापासून....
अहमदनगर शहराच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या भिंगारला मोठा पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. समंगा नदीकाठचे शुक्लेश्वर मंदिर आणि भिंगार टेकडीवरील भृगुऋषींचे मंदिर दोन हजार वर्षांचे साक्षीदार आहे. मुघल बादशहा औरंगजेबाने भिंगार परिसरातच अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म भिंगारचा.
लष्कराच्या वसाहतीमुळे भिंगारला फार पूर्वीपासून महत्त्व प्राप्त झाले आहे.
दंडकारण्य असताना जेथे भृगुऋषींचा आश्रम होता, ते ठिकाण म्हणजे भिंगार.
भृगुऋषींच्या नावावरूनच भिंगार असे नाव पडले, असा उल्लेख समर्थ रामदास स्वामींंचे शिष्य दिनकर स्वामी यांनी सतराव्या शतकात लिहिलेल्या ‘स्वानुभव दिनकर’ या ग्रंथात आहे.
भृगु ॠषींचे पुत्र शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी शुक्लेश्वराची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.
दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तपश्चर्या केल्याने प्रत्यक्ष काशीविश्वेश्वर प्रगट झाले ते शुक्लेश्वर स्थान समंगा नदीकाठी भिंगारमध्येच आहे. याच नदीत स्नान केल्याने नारदमुनींचे पुत्र अष्टवक्र यांना अव्यंग देहाची प्राप्ती झाली.
याठिकाणी भृगुंचा शिष्य परिवार मोठा असल्याने त्यास भृगुंचे आगार म्हणत. हा भाग म्हणजे आजचे भिंगार होय. भृंगार याचा अपभ्रंश भिंगार असा झाला, म्हणून या गावास भिंगार असे नाव पडले.
संगमा नदीच्या तीरावर असलेल्या मंदार पर्वतावर शुक्राचार्य तपस्येसाठी आले होते. त्यांच्या शोध घेत घेत भृगुरुषी काळदेव आले. त्या वेळी शुक्राचार्य यांना तुम्ही दैत्यांचे गुरू व्हावे, असा गुरोपदेश झाला.
शुक्लेश्वर या नाथपंथी शिवालयाची माहिती पेशव्यांनाही होती; म्हणूनच पानिपतकडे निघताना भाऊसाहेब पेशवे यांनी भिंगारचे पाण्याखाली जाणारे शुक्लेश्वराचे देऊळ वर काढून बांधा, अशी आज्ञा दिली होती. (त्या आज्ञेचे पालन न झाल्याने आजही हे मंदिर पावसाळ्यात पाण्यात जात असल्याचे दिसते....असो ..)
पानिपतच्या युद्धास जाताना काहीकाळ पेशव्यांचा मुक्काम येथे होता. पानिपतकडे कूच करण्यापूर्वी त्यांनी ब्राह्मणगल्लीमधील मुळे वाड्यामधील गणपती व शुक्लेश्वरला विजय प्राप्त होण्यासाठी अभिषेक करून बेलभंडारा उधळल्याचा उल्लेख सापडतो.
विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कादंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे.

बाराव्या शतकात भिंगार येथील ब्राह्मणगल्लीमधील सूर्यनारायण मंदिरात महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी आले होते. त्यांचे भिंगार येथे पूर्वार्ध उत्तरार्धात असे एकूण ३५ दिवस वास्तव्य होते. 'स्थान पोथीमध्ये' तत्कालीन भिंगारची माहिती देण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम बाजारपेठ म्हणजे आताचा नेहरू चौक होय. पूर्वेस मोठी वेस पश्चिमेस छोटी वेस गावाला वरगणा (संरक्षक भिंत) होती. नदीच्या उत्तरेस किल्ला असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे त्याकाळी भिंगार गाव मोठे होते, यास पुष्टी मिळते.

नाथपंथियांचे काही काळ येथे वास्तव्य होते. भिंगारमध्ये आजही कानिफनाथांचे व जालिंदरनाथांचे स्थान आहे. शालिवाहन राजाचे चालुक्यांचे वास्तव्य भिंगारमध्ये होते. यादव, बहमनी, निजामशाही, पेशवाई, तसेच ब्रिटिश राजवटीचे भिंगार साक्षीदार आहे.

निजामशाहीतील जगप्रसिद्ध भुईकोट किल्ला, दमडी मशीद या ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. पर्यटक तेथे मोठ्या संख्येने येतात. शुक्रवार बाजारमधील गन्जेशहद दर्गा (मस्जिद) हा शियापंथीयांचा दर्गा आहे. जगभरातून भाविक येथे दर्शनास येतात.
दख्खन जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा अंत भिंगार येथे झाला. ते स्थान आज आलमगीर म्हणून ओळखले जाते.

भिंगार येथे नवरात्रातील तिसऱ्या माळेला महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीच्या पालखी पलंगाचा भेट सोहळा होतो. ही परंपरा शेकडो वर्षे चालू आहे.

ब्रिटिशकाळात भिंगार येथील स्वातंत्र्यालढा खूपच गाजला आहे. ब्रिटिशांचा भाषणबंदीचा कायदा मोडून जोडीने सत्याग्रह करण्याचा मान रखमाजी बोंदर्डे व गणपत फुलारी यांनी सपत्नीक मिळवला. देशभरात गाजलेल्या 'सरोष बॉम्बखटला', या सरोष सिनेमागृहावर बॉम्ब फेकणारे स्वातंत्र्यसैनिक हबीबखान, रत्नम पिल्ले, राधकिसन खोमणे हे भिंगारचेच सुपुत्र. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भिंगार येथे अनेक स्वातंत्र्य सैनिक वास्तव्यास होते. त्यांच्या प्रेरणेने येथील युवकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात उडी घेतली. भारतमातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भिंगारचे मोठे योगदान आहे. त्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती आजही येथे जागवली जाते.

भिंगारमधील ब्रिटिशकालीन क्राइस्ट कॅथॉलिक चर्च आजही सुस्थितीत आहे. या चर्चमध्ये तत्कालीन निधन पावलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची माहिती मिळते.
भिंगारमध्ये तयार होणारी घोडा-बग्गी ब्रिटिशकाळात प्रसिद्ध होती. घोडा-बग्गी तयार करण्यासाठी विदेशातून नामवंत व्यक्ती येत असत.
निजामशाहीतील पाणीपुरवठा योजना अलीकडील काळापर्यंत अस्तित्वात होती. त्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात. त्यास डक्ट लाइन म्हणतात. गवळीवाडा, गणपती मंदिर, पोलिस स्टेशन, ब्राह्मणगल्ली, शुक्लेश्वर मंदिर, एकबोटे मंदिर येथे डक्टलाइनचे अवशेष पाहावयास मिळतात.
असे ऐतिहासिक पौराणिक महत्व लाभलेल्या 'भिंगार' गावाची हि माहिती आपणास आवडली असेल.

माहिती स्रोत : पौराणिक कथा, कादंबऱ्या, पोथ्या, तसेच जुन्या काळातील (सध्या हयात असलेल्या ) स्थानिक लोकांनी सांगितलेले किस्से कहाण्या , स्थानिक वर्तमानपत्रांत आलेल्या माहितीपर लेखांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

Monday, April 3, 2023

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद, माद्रिदचा आलिशान पालासिओ रेआल

 

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

 

जुना राजवाडा, बेलग्रेड (फोटो-Wikipedia)

       माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं. भारताचे परममित्र आणि अलिप्ततावादी चळवळीच्या स्थापनेत आणि विस्तारात पंडित नेहरूंना साथ देणारे युगोस्लाव्हियाचे राष्ट्रपती मार्शल योसेफ टिटो यांचं 1980मध्ये निधन झाल्यापासून बाल्कन क्षेत्रात आजपर्यंत सतत वांशिक संघर्ष पेटत राहिले आहेत. त्यातून एकसंघ युगोस्लाव्हियाची सात शकलं पडलेली आहेत. सततचे वांशिक संघर्ष आणि त्यातच नाटोच्या सर्बियावरील हल्ल्यांचा बाल्कन प्रदेशाच्या इतिहासाची, संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या अनेक अप्रतिम वास्तूंवर विपरित परिणाम होत गेला. या सर्व परिस्थितीबाबत आजी-आजोबा आणि आईच्या बोलण्यातून सतत दु:ख जाणवत राहिलं. बेलग्रेडमध्ये असलेल्या एका महत्वाच्या वास्तूबद्दलही म्हणजेच तेथील जुन्या राजवाड्याबद्दल (Old Palaceसर्बियन भाषेत – स्तारी द्वोर/Стари Двор) मी ऐकलं होतं. त्यातूनच या राजवाड्याविषयी उत्सुकता वाटू लागली होती.

      पूर्वीच्या युगोस्लाव्हियाच्या आणि आताच्या सर्बियाच्या राजधानीत असलेल्या जुन्या राजवाड्यात आज बेलग्रेडची महानगरपालिका भरते. सर्बिया प्रांतानं 19व्या शतकाच्या शेवटी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं. पण त्याच्याही कित्येक वर्षे आधी म्हणजे 1394 मध्ये बाल्कन प्रदेशातील स्लाव्ह वंशियांचा तुर्कांनी पराभव केला आणि त्यानंतर बरीच वर्षे हा प्रदेश आधी ओटोमन आणि त्यानंतर ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा भाग राहिला होता. सर्बियानं 1817 मध्ये ओटोमन साम्राज्यापासून स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर सत्तेत आलेलं ओब्रेनोविच (Obrenovic) राजघराणं 1842 पर्यंत आणि नंतर परत 1858 ते 1903 दरम्यान गादीवर राहिलं होतं. या घराण्यानं आपल्या वास्तव्यासाठी 1882 ते 1884 दरम्यान एक भव्य राजवाडा बांधून घेतला, तोच आजचा जुना राजवाडा. त्याचं आरेखन लेक्सांदर बुगार्स्की यानं केलं होतं.

      दोन्ही महायुद्धांमध्ये या राजवाड्याचं बरंच नुकसान झालं होतं. याच्या आतील बाजूला ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवलेले आकर्षक जिने पहिल्या महायुद्धात पूर्णपणे नष्ट झाले होते. त्यानंतर 1930 मध्ये मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित केलेल्या जुन्या राजवाड्याचं दुसऱ्या महायुद्धात पुन्हा अपरिमित नुकसान झालं. पण महायुद्धानंतर 1947 मध्ये या राजवाड्याचं थोड्या प्रमाणातच पुनरुज्जीवन करण्यात आलं होतं. त्यावेळी मूळच्या आरेखनातील अनेक वैशिष्ट्ये काढून टाकली गेली, जसं की, उद्यानाच्या बाजूचे राजवाड्याचे दोन्ही घुमट हटवले गेले. तसंच राजवाड्याची दर्शनी बाजूही बदलली गेली.

      जुन्या राजवाड्यात 1919-20 मध्ये पहिल्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या हंगामी नॅशनल असेंब्लीच्या बैठका होत असत. 1922 पर्यंत हाच राजवाडा राजघराण्याचं मुख्य निवासस्थानही होता. पुढं 1941 पर्यंत इथं राजघराण्याच्या विशेष समारंभांबरोबरच सर्बियाच्या भेटीवर आलेल्या अतिविशिष्ट व्यक्तींचे स्वागत समारंभ होत असत.

      दुसऱ्या महायुद्धानंतर मार्शल टिटो यांच्या प्रयत्नानं 25 नोव्हेंबर 1945 ला बाल्कन प्रदेशातील विविध प्रांतांचं एकीकरण होऊन Socialist Federal Republic of Yugoslavia स्थापन झाला. त्यानंतर तत्कालीन राजा पीटर (दुसरा) याला युगोस्लाव्हियातून हद्दपार करण्यात आलं आणि त्याबरोबरच सर्बियातील राजेशाहीचा अस्त झाला. त्यानंतरच्या काही काळासाठी जुना राजवाडा युगोस्लाव्ह संघराज्याचं मुख्यालय बनला होता. पण 1961 पासून या राजवाड्यात बेलग्रेडची महानगरपालिका भरत आहे.

      जुन्या राजवाड्याची इमारत चौरसाकृती असून 19व्या शतकात सर्बियात बांधली गेलेली ही सर्वात आकर्षक वास्तू ठरली होती. या इमारतीनं सर्बियामध्ये नव्या पद्धतीच्या वास्तुरचनेचा पाया घातला होता. इमारतीच्या दर्शनी बाजूला व्हरांडे असून त्यांना नक्षीदार कठडे करण्यात आलेले आहेत. याच बाजूला डोरीक शैलीच्या स्तभांच्या दरम्यान मोठ्या खिडक्या केलेल्या आहेत. राजवाड्याच्या समोरच्या बाजूला एक बगीचाही आहे. राजवाड्याच्या मध्यभागी असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मध्यवर्ती कक्ष येतो. हा कक्ष 130 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्याच्या भोवतीनं व्हरांडे, उंच स्तंभ आणि राजवाड्यातील अन्य कक्ष आहेत. त्यांच्यापैकी Great Hall हा सर्वात मोठा कक्ष असून तिथं पूर्वी अनेक स्वागत समारंभ होत असत. याच इमारतीत ग्रंथालय आणि उद्यानाकडच्या बाजूला छोटंसं चर्च आहे. जुन्या राजवाड्यात बसवण्यात आलेली विविध प्रकारची उपकरणं प्रामुख्यानं व्हिएन्नाहून आणलेली होती.

      तांबड्या दिवाणखान्यात सुंदर भित्तिचित्रे लावलेली आहेत. तसंच बेलग्रेडच्या भेटीवर आलेल्या विविध परदेशी शिष्टमंडळांकडून मिळालेल्या भेटवस्तूही तिथं ठेवण्याची सोय करण्यात आली होती. राजवाड्यामधला आणखी एक कक्ष आहे पित कक्ष. पोप जॉन (आठवे) यांनी 16 एप्रिल 878 मध्ये लिहिलेल्या पत्राची हुबेहुब दुय्यम प्रत इथं जतन करून ठेवण्यात आलेली आहे. या कक्षातही अनेक तैलचित्रं लावलेली असून लाकडाच्या शिल्पकृतीही ठेवलेल्या आहेत.

      राजवाड्यामधला गाला हॉल हा सुमारे 230 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्यातील भिंतीच्या वरच्या बाजूला असलेल्या खिडक्यांना रंगीत काचा बसवलेल्या आहेत. कक्षाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना खास फ्रांसहून आणलेली आकर्षक पितळी झुंबरं लावलेली आहेत. तसंच सर्पाकृती शट्रे, पुष्पपात्रंही इथं आहेत.

माद्रिदचा आलिशान पालासिओ रेआल

पालासिओ रेआल दे माद्रिद (स्रोत- https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/f7/Madrid_May_2014-34a.jpg)

      स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये वसलेला पालासिओ रेआल’ (रॉयल पॅलेस) स्पॅनिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान होते. जगातील अतिभव्य राजवाड्यांपैकी एक असलेला हा राजवाडा खुला होऊन २०२१ मध्ये २६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या राजवाड्यात तब्बल २८०० प्रशस्त कक्ष आहेत. सध्या या राजवाड्यात स्पॅनिश राजांचे वास्तव्य नसले तरी त्याचा वापर प्रामुख्याने राजकीय समारंभासाठी होत आहे.

      रॉयल पॅलेस (स्पॅनिश भाषेतील मूळ नाव – पालासिओ रेआल दे माद्रिद) माद्रिदच्या मध्यभागी वसलेला आहे. हा राजवाडा पालासिओ दे ओरिएन्ते या नावानेही ओळखला जातो. स्पॅनिश राजांचे हे अधिकृत निवासस्थान असल्यामुळे स्पेनमध्ये या वास्तुला अतिशय मानाचे स्थान लाभले. सन १९३१ पर्यंत याच राजवाड्यात स्पॅनिश राजघराण्याचे वास्तव्य होते. त्यानंतर स्पॅनिश राजांनी आपला मुक्काम माद्रिदच्या बाहेर असलेल्या ‘पालासिओ रेआल’पेक्षा छोट्या पालासिओ दे ला झार्झुएलामध्ये हलविला.

      ‘पालासिओ रेआल’ उभारला जाण्याआधी तेथे रेआल आल्काझार म्हणजेच भुईकोट अस्तित्वात होता. पण त्या आधीपासून ही जागा स्पेनमधील राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू राहिली होती. या जागेवर दहाव्या शतकात एक भुईकोट बांधण्यात आला होता. त्यावेळी इबेरियन द्वीपकल्पाचा बहुतांश भाग अरब राजवटींच्या अधिपत्त्याखाली होता. कोर्डोबाचा अमीर महंमद (पहिला) याने आपली स्पेनमध्ये सत्ता स्थापन केल्यावर हा किल्ला बांधला होता. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला तेथे स्वतंत्र तोलेदो राज्याची निर्मिती करण्यात आली. पुढे १०८५ मध्ये कास्तिले राज्याच्या आलोन्सो (चौथा) याने तोलेदोवर ताबा मिळविला. चौदाव्या शतकात अरबांचा पराभव झाल्यावर सन १३२९ मध्ये स्पॅनिश राजा आल्फान्सो (अकरावा) याने त्याचा दरबार माद्रिदमध्ये भरविला. त्यानंतर सोळाव्या शतकापर्यंत त्या किल्ल्यातील आरेखनामध्ये बदल करण्यात आले नाहीत.

      पंधराव्या शतकाच्या अखेरीस युरोपात अंधारयुगाचा शेवट होऊन आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यावर युरोपातील विविध सत्तांनी जगातील नवनवीन प्रदेशांच्या शोधासाठी अनेक सागरी मोहिमा आखल्या आणि नव्या प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. त्या काळात अशा शोधमोहिमा राबविण्यात स्पेन आघाडीवर होता. ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिगो आदींनी धाडसी सागरी मोहिमा राबवून नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला होता. परिणामी त्या काळात ज्ञात झालेल्या जगापैकी निम्म्या प्रदेशावर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे राज्यकारभाराचा वाढलेला व्याप सांभाळण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी राजधानी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. १५६१ मध्ये स्पेनचा राजा फिलीप (दुसरा) याने आपला दरबार माद्रिदमध्ये आणल्यावर आल्काझारच्या जागी नव्याने किल्ला उभारण्यात आला. मात्र १७३४ मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हा संपूर्ण किल्ला आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यामुळे तत्कालीन राजा फिलीप (पाचवा) याने याच जागेवर एक नवा आणि स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाला साजेसा राजवाडा उभारण्याचे आदेश दिले.

      या नव्या राजवाड्याचे बांधकाम १७३८ ते १७६४ दरम्यान चालले. या वास्तूत स्पॅनिश राजाचे वास्तव्य असल्यामुळे तो पुढे रॉयल पॅलेस (पालासिओ रेआल) म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘पालासिओ रेआल’चे प्राथमिक टप्पातील आरेखन फिलिपो युवारा व जी.बी. साच्चेट्टी या इटालियन वास्तुतज्ज्ञांनी केले आहे. युवारा यानेच फिलीपे (पाचवा) याच्या दरबाराचाही या नव्या वास्तुच्या आरेखनात समावेश केला.

      या तीन मजली आयताकृती राजवाड्यामध्ये तब्बल २८०० आलिशान कक्ष, ४४ आकर्षक जिने आहेत. यातील प्रत्येक कक्षामध्ये उच्च दर्जाची वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे. सालोन दे लोस आलाबार्देलोस, स्तंभ कक्ष (स्पॅनिश भाषेतील नाव- सालोन दे लास कोलुमनास), सिंहासन कक्ष (साला देल त्रानो), गॅस्परिनी कक्ष (सालितास गास्पारिनी), पोर्सेलन कक्ष (साला दे पोर्सेलानास) आदी कक्ष आहेत. तसेच राजघराण्यातील व्यक्तींना आणि सरदारांना राहण्यासाठी कक्ष, सेवकांचे कक्ष, प्रशासकीय कार्यालय आही कक्षही येथे आहेत.

    ‘पालासिओ रेआल’च्या प्रत्येक दिशेचे आरेखन वेगळ्या प्रकारचे आहे. राजवाड्याच्या बांधकामात चुनखडक आणि ग्रॅनाईटचा वापर बऱ्याच प्रमाणात करण्यात आला आहे. राजवाड्याच्या पूर्वेकडील भाग सहा मजली असून उत्तर आणि पश्चिमेकडे तळघरेही बांधलेली आहेत. राजवाड्याच्या पहिल्या दोन मजल्यांच्या भिंतींचा बाह्यभाग आयताकृती दगडांच्या मोठ्या आकारातील ठोकळ्यांपासून बनविलेला आहे. त्यावरील दोन मजल्यांवर पांढऱ्या रंगातील अखंड दुमजली स्तंभ तयार करण्यात आले आहेत.

राजवाड्याच्या दर्शनी भागावर बसवलेली फिलीप (पाचवा) याची राजमुद्रा. (स्रोत-File:Royal Palace of Madrid 01.jpg - Wikimedia Commons)



 
    इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर असलेल्या गच्चीला दगडी कठडा असून त्याच्यावर अनेक शिल्पेही बसविलेली आहेत. या गच्चीच्या एका बाजूला मध्यभागी मोठा घुमट तयार करण्यात आला आहे.

      राजवाड्याच्या दक्षिणेकडील बाजूच्या आल्मुदेना कॅथेड्रलसमोर असलेल्या भव्य संचलन प्रांगण असून त्याच्या समोर उंच कुंपण बसविलेले आहे. राजा चार्लस् (तिसरा) याच्या काळात ‘पालासिओ रेआल’मध्ये काही आकर्षक कक्ष तयार करण्यात आले. त्यात राजाकडे आलेल्या विशेष पाहुण्यांसाठी २५२ कक्ष, राजघराण्याची बॉलरुम, स्वागतकक्ष, संगीतकक्ष आदींचा समावेश होतो. ‘पालासिओ रेआल’मध्येच राजघराण्यातील व्यक्तींसाठी बॅसिलिका (राजाचे चर्च) उभारण्यात आले आहे. 'ला रेआल आर्मेरिया' (शस्त्रास्त्र कक्ष) येथे राजांकडून वापरली गेलेली शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली आहे.

     राजवाड्यातील तीन कक्षांचे एकत्रीकरण करून १८८५ मध्ये अवाढव्य भोजनकक्ष तयार करण्यात आला. त्यावेळी त्या तीन कक्षांच्या सीमेवरील स्तंभांवर आणखी आकर्षक सजावट करण्यात आली. या कक्षाच्या छतावर अप्रतिम चित्रे रंगविण्यात आली आहेत. गास्पारिनी कक्षाला त्याची निर्मिती करणाऱ्या मातेओ गास्पारिनी याचे नाव देण्यात आले आहे. या कक्षाच्या भिंती आणि छतावर सोनेरी आणि चंदेरी रंगांमध्ये कलाकुसर केलेली आहे. येथील भिंती रेशमी एम्ब्रॉयडरीने सजविलेल्या आहेत. याची सजावट गिओवानी बातिस्ता तिपोलो याने केलेली आहे. या कक्षाच्या भिंतीवर सजावटीसाठी मखमलीचा वापर करण्यात आला आहे. छतावर तत्कालीन स्पॅनिश साम्राज्याची ओळख करून देणारी चित्रे काढण्यात आली आहेत. या कक्षात जमिनीवर उंची गालिचे अंथरण्यात आले आहेत. यातील सिंहासनाच्या पायथ्याशी कांस्य धातूत घडविलेल्या सिंहांच्या प्रतिमा बसविण्यात आलेल्या आहेत. मातेओ बोनिसेली याने ही शिल्पे तयार केलेली आहेत. येथील भिंतींवर बारीक कलाकुसर केलेल्या सोनेरी फ्रेममध्ये मोठे आरसे बसविलेले असून प्रत्येक आरशाजवळ सोनेरी टेबल ठेवण्यात आले आहे. त्या टेबलांवर अतिशय आकर्षक कलाकुसर केलेले मेणबत्त्यांचे स्टँड ठेवण्यात आलेले आहे. या कक्षात जमिनीपेक्षा थोड्या उंचीवर स्पॅनिश राजा आणि राणीची सोन्याची सिंहासने ठेवलेली आहेत. म्हणूनच स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाची झलक या कक्षात पाहायला मिळते.

     ‘सिंहासन कक्षाच्या छताच्या एका भागावर ऑलिंपस आणि अन्य देवांच्या कथांवर आधारित घटना चितारण्यात आल्या आहेत. दुसऱ्या भागात स्पेनमधील राज्यांचे आणि जगभरातील स्पॅनिश वसाहतींचे प्रतिनिधित्व करणारी चित्रे काढण्यात आलेली आहेत.

पोर्सेलन कक्षाची निर्मिती १७७१ मध्ये पूर्ण झाली. या कक्षाच्या भिंती सजविण्यासाठी चिनी माती आणि हिरव्या व पांढऱ्या रंगाचा आकर्षक पद्धतीने उपयोग करण्यात आला आहे. ‘पालासिओ रेआल’मधील एका कक्षात राजाचे ग्रंथालय (स्पॅनिश भाषेतील नाव – बिब्लिओतेका रेआल) आहे. रॉयल फार्मसीमध्ये राजघराण्यातील व्यक्तींच्या उपचाराची सोय करण्यात आली होती. पूर्वीच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचे संग्रहालय आता या कक्षात उघडण्यात आले आहे.

राजवाड्यातील प्रत्येक कक्षाचे छत आतील बाजूने घुमटाकृती असून त्यावर विविध प्रकारची चित्रे रंगविलेली आहेत. त्या सर्व चित्रांना सोनेरी आणि अन्य रंगातील फ्रेम करण्यात आल्या आहेत. काही कक्षातील चित्रांच्या कोपऱ्यांवर छोटी-छोटी शिल्पेही बसविलेली आहेत. या राजवाड्यात जवळजवळ २४० व्हरांडे तयार केलेले आहेत. या इमारतीतील जिनेही तिच्या सौंदर्यात भर घालण्याचेच काम करत आहेत.

‘पालासिओ रेआल’च्या पश्चिमेच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर प्लाझा दे ओरिएन्ते तयार करण्यात आलेला आहे. एकोणिसाव्या शतकात फ्रान्सचा सम्राट नेपोलियनच्या भावाच्या आदेशावरून याची निर्मिती करण्यात आली आहे. ‘पालासिओ रेआल’च्या अतिभव्य परिसरात अनेक उद्याने विकसित करण्यात आलेली आहेत. त्यातील यार्दिनेस दे साबातिनी हे मुख्य उद्यान आहे. येथे अनेक शिल्पे आणि कारंजे बसविलेले आहेत. येथेच राजा फेलिपे (चौथा) याचा आकर्षक अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. मात्र राजवाड्याच्या पश्चिमेला असलेले काम्पो देल मोरो हे उद्यान यापेक्षाही मोठे असून राजघराण्यातील व्यक्ती पूर्वी त्याचा वापर क्रीडांगणाप्रमाणे करत असत. ‘पालासिओ रेआल’मधील तळघर येथूनच दिसते. ‘पालासिओ रेआल’च्या मुख्य इमारतीसमोर भव्य प्रांगण आहे. तेथे दिव्यांचे जुन्या पद्धतीचे आकर्षक खांब उभारलेले आहेत.


     सुमारे १३ हेक्टर परिसरात पसरलेला हा राजवाडा अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. हा संपूर्ण परिसर स्पॅनिश राजघराण्याचे आलिशान राहणीमान आणि स्पॅनिश साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देत उभा आहे. मान्झानारेस नदीच्या किनारी वसलेला पालसिओ रेआल आज माद्रिदला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
(संदर्भ - Wikipedia)

https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_2.html





लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...