Sunday, April 16, 2023

“तेथे होते भृगुंचे आगर, यास्तव त्यास म्हणती भिंगार ”

 'भिंगार', या नावाचे गाव या महाराष्ट्रात आहे हेच कितीतरी मराठीजनांना माहित नसेल ....तर जाणून घेऊया या ऐतिहासिक गावाबद्दल थोडी माहिती.

आजमितीस महाराष्ट्रातील अहमदनगर शहराचे उपनगर व ब्रिटिशकाळापासून ते आजतागायत सैनिकी महत्व कायम राखून असलेले 'कॅंटोन्मेंट बोर्ड - भिंगार' या ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या परंतु कालौघात हे महत्व कुठेतरी विस्मृतीत जाण्याच्या किंवा झाकोळल्यासारखे झालेल्या भिंगारची कहाणी सुरु होते रामायणकाळापासून....
अहमदनगर शहराच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या भिंगारला मोठा पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. समंगा नदीकाठचे शुक्लेश्वर मंदिर आणि भिंगार टेकडीवरील भृगुऋषींचे मंदिर दोन हजार वर्षांचे साक्षीदार आहे. मुघल बादशहा औरंगजेबाने भिंगार परिसरातच अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा जन्म भिंगारचा.
लष्कराच्या वसाहतीमुळे भिंगारला फार पूर्वीपासून महत्त्व प्राप्त झाले आहे.
दंडकारण्य असताना जेथे भृगुऋषींचा आश्रम होता, ते ठिकाण म्हणजे भिंगार.
भृगुऋषींच्या नावावरूनच भिंगार असे नाव पडले, असा उल्लेख समर्थ रामदास स्वामींंचे शिष्य दिनकर स्वामी यांनी सतराव्या शतकात लिहिलेल्या ‘स्वानुभव दिनकर’ या ग्रंथात आहे.
भृगु ॠषींचे पुत्र शुक्राचार्य यांनी समांगा नदीच्या पश्चिम बाजूला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती.
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी शुक्लेश्वराची स्थापना झाल्याचा उल्लेख आहे.
दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तपश्चर्या केल्याने प्रत्यक्ष काशीविश्वेश्वर प्रगट झाले ते शुक्लेश्वर स्थान समंगा नदीकाठी भिंगारमध्येच आहे. याच नदीत स्नान केल्याने नारदमुनींचे पुत्र अष्टवक्र यांना अव्यंग देहाची प्राप्ती झाली.
याठिकाणी भृगुंचा शिष्य परिवार मोठा असल्याने त्यास भृगुंचे आगार म्हणत. हा भाग म्हणजे आजचे भिंगार होय. भृंगार याचा अपभ्रंश भिंगार असा झाला, म्हणून या गावास भिंगार असे नाव पडले.
संगमा नदीच्या तीरावर असलेल्या मंदार पर्वतावर शुक्राचार्य तपस्येसाठी आले होते. त्यांच्या शोध घेत घेत भृगुरुषी काळदेव आले. त्या वेळी शुक्राचार्य यांना तुम्ही दैत्यांचे गुरू व्हावे, असा गुरोपदेश झाला.
शुक्लेश्वर या नाथपंथी शिवालयाची माहिती पेशव्यांनाही होती; म्हणूनच पानिपतकडे निघताना भाऊसाहेब पेशवे यांनी भिंगारचे पाण्याखाली जाणारे शुक्लेश्वराचे देऊळ वर काढून बांधा, अशी आज्ञा दिली होती. (त्या आज्ञेचे पालन न झाल्याने आजही हे मंदिर पावसाळ्यात पाण्यात जात असल्याचे दिसते....असो ..)
पानिपतच्या युद्धास जाताना काहीकाळ पेशव्यांचा मुक्काम येथे होता. पानिपतकडे कूच करण्यापूर्वी त्यांनी ब्राह्मणगल्लीमधील मुळे वाड्यामधील गणपती व शुक्लेश्वरला विजय प्राप्त होण्यासाठी अभिषेक करून बेलभंडारा उधळल्याचा उल्लेख सापडतो.
विश्वास पाटील यांनी त्यांचे पानिपत कादंबरीत भिंगारच्या शुक्लेश्वर मंदिराचा उल्लेख केला आहे.

बाराव्या शतकात भिंगार येथील ब्राह्मणगल्लीमधील सूर्यनारायण मंदिरात महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी आले होते. त्यांचे भिंगार येथे पूर्वार्ध उत्तरार्धात असे एकूण ३५ दिवस वास्तव्य होते. 'स्थान पोथीमध्ये' तत्कालीन भिंगारची माहिती देण्यात आली आहे. पूर्व-पश्चिम बाजारपेठ म्हणजे आताचा नेहरू चौक होय. पूर्वेस मोठी वेस पश्चिमेस छोटी वेस गावाला वरगणा (संरक्षक भिंत) होती. नदीच्या उत्तरेस किल्ला असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे त्याकाळी भिंगार गाव मोठे होते, यास पुष्टी मिळते.

नाथपंथियांचे काही काळ येथे वास्तव्य होते. भिंगारमध्ये आजही कानिफनाथांचे व जालिंदरनाथांचे स्थान आहे. शालिवाहन राजाचे चालुक्यांचे वास्तव्य भिंगारमध्ये होते. यादव, बहमनी, निजामशाही, पेशवाई, तसेच ब्रिटिश राजवटीचे भिंगार साक्षीदार आहे.

निजामशाहीतील जगप्रसिद्ध भुईकोट किल्ला, दमडी मशीद या ऐतिहासिक वास्तू आजही उभ्या आहेत. पर्यटक तेथे मोठ्या संख्येने येतात. शुक्रवार बाजारमधील गन्जेशहद दर्गा (मस्जिद) हा शियापंथीयांचा दर्गा आहे. जगभरातून भाविक येथे दर्शनास येतात.
दख्खन जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा अंत भिंगार येथे झाला. ते स्थान आज आलमगीर म्हणून ओळखले जाते.

भिंगार येथे नवरात्रातील तिसऱ्या माळेला महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीच्या पालखी पलंगाचा भेट सोहळा होतो. ही परंपरा शेकडो वर्षे चालू आहे.

ब्रिटिशकाळात भिंगार येथील स्वातंत्र्यालढा खूपच गाजला आहे. ब्रिटिशांचा भाषणबंदीचा कायदा मोडून जोडीने सत्याग्रह करण्याचा मान रखमाजी बोंदर्डे व गणपत फुलारी यांनी सपत्नीक मिळवला. देशभरात गाजलेल्या 'सरोष बॉम्बखटला', या सरोष सिनेमागृहावर बॉम्ब फेकणारे स्वातंत्र्यसैनिक हबीबखान, रत्नम पिल्ले, राधकिसन खोमणे हे भिंगारचेच सुपुत्र. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भिंगार येथे अनेक स्वातंत्र्य सैनिक वास्तव्यास होते. त्यांच्या प्रेरणेने येथील युवकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात उडी घेतली. भारतमातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भिंगारचे मोठे योगदान आहे. त्या स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती आजही येथे जागवली जाते.

भिंगारमधील ब्रिटिशकालीन क्राइस्ट कॅथॉलिक चर्च आजही सुस्थितीत आहे. या चर्चमध्ये तत्कालीन निधन पावलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची माहिती मिळते.
भिंगारमध्ये तयार होणारी घोडा-बग्गी ब्रिटिशकाळात प्रसिद्ध होती. घोडा-बग्गी तयार करण्यासाठी विदेशातून नामवंत व्यक्ती येत असत.
निजामशाहीतील पाणीपुरवठा योजना अलीकडील काळापर्यंत अस्तित्वात होती. त्याचे अवशेष आजही पहावयास मिळतात. त्यास डक्ट लाइन म्हणतात. गवळीवाडा, गणपती मंदिर, पोलिस स्टेशन, ब्राह्मणगल्ली, शुक्लेश्वर मंदिर, एकबोटे मंदिर येथे डक्टलाइनचे अवशेष पाहावयास मिळतात.
असे ऐतिहासिक पौराणिक महत्व लाभलेल्या 'भिंगार' गावाची हि माहिती आपणास आवडली असेल.

माहिती स्रोत : पौराणिक कथा, कादंबऱ्या, पोथ्या, तसेच जुन्या काळातील (सध्या हयात असलेल्या ) स्थानिक लोकांनी सांगितलेले किस्से कहाण्या , स्थानिक वर्तमानपत्रांत आलेल्या माहितीपर लेखांचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...