आमच्या भटकंतीचा गूगल नकाशा
मोशीला चहासाठी थांबून पुढचा पडाव घेतला ते नारायणगावला राजकमलच्या
सुप्रसिद्ध मिसळीपाशी. मिसळ हाणून आळेफाट्याला उजवी मारून नगर रस्त्याला
लागलो. आळे गावापासून थोडेसे आत साधारण ३ किमी वर ज्ञानेश्वर माऊलींनी
रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्या रेड्याची समाधी आहे. गंमत म्हणून आम्ही
आत वळलो. समाधीमंदिर बर्यापैकी मोठे आहे. स्वागतकमानी, भक्तमंडप अशी
जोरदार बांधकामे चालू आहेत. समाधीमंदिरातील गाभार्यात विठ्ठल रखुमाई आणि
माऊलींची मूर्ती आहे. आणि खालच्या पातळीत रेड्याचे दगडी मुख कोरलेले आहे.
एका दंतकथेचेही लोकांनी आधी दैवतीकरण आणि त्याअनुशंगाने नंतर बाजार
मांडलेला पाहून गंमत वाटली. मंदिर पाहून झाल्यावर पुन्हा माघारी येऊन नगर
रस्त्याला लागलो.
वाटेत गुळूंचवाडी ओलांडल्यावर अणे घाट लागतो. डावीकडच्या दरीत एक
नैसर्गिक आश्चर्य दडलेले आहे ते म्हणजे गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू.
मळगंगा नदीच्या प्रवाहामुळे कातळाला मोठे भगदाड पडलेले असून पुलासारखीच
रचना तिथे तयार झालेली आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह तिथून अगदी फुफाटत
वाहतो. बाजूलाच मळगंगा देवीचे छोटेखानी मंदिर आहे. मी तो नैसर्गिक पूल
अगोदरच एकदा खाली उतरून पाहिला असल्याने आणि इतर दोघांना उन्हातान्हात दरीत
उतरण्यास फारसा इंट्रेस्ट नसल्याने आम्ही घाटातूनच पुलाचे विहंगम दर्शन
घेतले आणि पुढे निघालो. आळेफाट्यापासून आमचे लेण्यांचे ठिकाण, टाकळी
ढोकेश्वर साधारण ३८ किमीवर. रस्ता अतिशय उत्तम त्यामुळे लवकरच टाकळी
ढोकेश्वर गावात पोहोचलो. हे तसे बर्यापैकी मोठे गाव. गावातूनच ४/५ किमीवर
ढोकेश्वराचा डोंगर. गावात कोठेही ढोकेश्वर मंदिर विचारले तर गावकरी रस्ता
सांगतात. गावातून बाहेर पडून मंदिर रस्त्याला लागलो. मंदिर म्हणजे
डोंगरावरची ढोकेश्वर लेणी. सरत्या पावसाळ्यातही हा डोंगर तसा भकासच वाटत
होता. हिरवाई असूनही नसल्यासारखीच आणि जी काही थोडीफार आहे ती देखील
पुढच्या महिन्याभरात लयास जाईल.
रस्ता थेट लेण्यांच्या पायथ्यापर्यंत जातो. काही बांधीव तर काही खोदीव
अशा पायर्या लेणीपर्यंत जाण्यासाठी आहेत. साधारण दोनशेच्या आसपास पायर्या
असाव्यात. लेण्यांभोवती तट बांधला आहे आणि त्यातूनच प्रवेशद्वार केले आहे.
तटाचे हे बांधकाम पेशव्यांच्या कालखंडात केव्हातरी झाले आहे. तटाच्या
दरवाजात तत्संबंधी एक शिलालेख आहे. दरवाजाच्या आधी उजवे बाजूस एका
यादवकालीन मंदिराचा अवशिष्ट भाग असून गाभार्यात काही शिवपिंडी तसेच दगडी
पादुका कोरलेल्या आहेत. तर डाव्या बाजूस शरभ शिल्पांकित दगड बेवसाऊ पडला
आहे.
१. ढोकेश्वराचा डोंगर

२. लेण्यांभोवतीचा तट

३. प्रवेशद्वाराअलीकडील मंदिर

४. मंदिरद्वाराच्या उंबरठ्यावरील शिल्प

५. प्रवेशद्वाराच्या डावीकडील शरभाचे शिल्प

६. प्रवेशद्वारातील शिलालेख

प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अजून काही पायर्या चढून आपला प्रवेश थेट लेणीच्या पुढ्यातच होतो.
ही लेणी राष्ट्रकूटकालीन. साधारण ६ व्या/ ७ व्या शतकात खोदली गेलेली. एक
मोठं प्रमुख लेणं, त्याच्या बाजूला जराशा उंचीवर खोदलेले एक अर्धवट लेणं
आणि एक खोलवर गेलेलं पाण्याचं टाकं अशी याची रचना. लेण्याच्या पुढ्यातच एक
पेशवेकालीन दिपमाळ आहे. ही लेणी पाहून वेरूळच्या रामेश्वर लेणीची आठवण
येते. तिथे डावीकडे गंगा आणि उजवीकडे यमुना. इथे मात्र उलट. डावीकडे यमुना व
उजवीकडे गंगा. अगदी सहजी ओळखू येतात त्या त्यांच्या वाहनांमुळे. यमुना
कासवावर उभी आहे तर गंगा मकरावर. दोन्ही मूर्ती बर्याच भग्न झाल्यात. भग्न
झाल्या असे म्हणण्यापेक्षा इथला कातळाचे ठिसूळ असल्याने बरेच विदारण
झालेय. त्यामुळे इथल्या मूर्ती काहीशा कुरुप दिसतात पण तरीही त्यांचे मूळचे
सौंदर्य काही लपत नाही. दोन्ही नद्यांची वस्त्रे पारदर्शक असून ती त्यांचे
प्रवाहीपण सूचित करतात. आधारासाठी आपला एक हात त्यांनी एका बटूच्या
खांद्यावर ठेवला आहे. जणू आपला वेगवान प्रवाह त्या काहीसा आवरून घेत आहेत.
तर वरती गंधर्व ही नदीची रूपे निरखत आहेत.
७.लेण्याबाहेरची दिपमाळ

८. कूर्माधिष्ठित यमुना

९. मकरारूढ गंगा

१०.गंगेशेजारीच मकराजवळ एका सेविकेची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली आहे.

११. लेण्याचा दर्शनी भाग

१२. दर्शनी भागातील नक्षीदार स्तंभ

इथे आमचा झोपाळू मित्र प्रवेशद्वारातील ओसरीवरच आडवा झाला आणि लेणी पाहायला मी आणि आत्मुबुवा आत शिरलो.
सभापंडप, डाव्या आणि उजव्या कोपर्यातील उपमंडप अथवा अर्धमंडप, अंतराळ
आणि गर्भगृह अशी ह्या लेणीची रचना. गर्भगृहाभोवती फेरी मारण्यासाठी
कातळकोरीव मार्ग आहे. तसेच गर्भगृहात प्रवेशण्यासाठी उजवीकडूनही एक द्वार
आहे. वेरूळच्या लेणी क्र. १४ (रावण की खाई) किंवा पुण्याच्या
पाताळेश्वराच्या लेणीसारखी अशी ही रचना.
प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र
(नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी
(गरूड), वाराही (वराह), ऐन्द्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी
मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे.
प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा माडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही
वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.
१३. संपूर्ण सप्तमातृकापट

१४. वीरभद्र

१५. सप्तमातृका अधिक जवळून अनुक्रमे ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी आणि चामुंडा

१६. वराहमुखी वाराही

सप्तमातृकांच्या बरोबर समोर म्हणजेच प्रवेशद्वारातून आत गेल्यावर
उजवीकडे एक उपमंडप आहे. त्यात आहे नटराज शिव अथवा शिवतांडव. दोन
स्तंभांमुळे हा उपमंडप सभामंडपातून काहीसा वेगळा झाला आहे. त्रिशूळ, नाग,
डमरू आदी आयुधे हाती धरून शिव तांडवनृत्य करत असून पार्वती, शिवगण,
देवगंधर्व हे नृत्य पाहात आहेत.
१७. शिवतांडव

१८. शिवतांडव जवळून

१९. शिवतांडव पटाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीत नागप्रतिमा आहेत.
-
सप्तमातृका तसेच शिवतांडव अशा दोन्ही पटांच्या बाजूला कक्ष खोदलेले
आहेत. मातृकांशेजारच्या कक्षात कुठल्याश्या जुन्या मंदिरातल्या मूर्तींचे
बहुत अवशेष आहेत. बहुधा पायथ्याचे हे कुठलेतरी यादवकालीन मंदिर असावे. कक्ष
जाळी लावून कुलूपबंद केला असल्याने हे नीट पाहताच आले नाही मात्र जमेल तशी
काही छायाचित्रे घेतली.
२०. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष (विष्णू)

२१. सप्तमातृकाशिल्पपटाशेजारील कक्षातील जुन्या मूर्तींचे अवशेष

शिवतांडवपटासशेजारच्या क़क्षात काही वीरगळ आडवे करून ठेवलेले आहेत.
२२. वीरगळ

एव्हाना माझी आणि बुवांची चर्चा ऐकून ढोकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या
गावकर्यांचे कोंडाळे झाले होते. त्यांच्या शंकांना आम्ही जमेल तशी उत्तरे
देत होतो. स्थानिकांच्या दंतकंथा, मूर्तीं त्यांनी दिलेली चुकीची नावे
पाहून थोडी मौजही वाटत होती. इतक्यातच त्यांनी गर्भगृहाच्या दरवाजातील एका
मूर्तीकडे निर्देश केला आणि म्हणाले ही शनीची मूर्ती. अर्थात ही मूर्ती
शनीची नसून ती होती आयुधपुरुषाची- त्रिशुलपुरुषाची.
कलचुरी, राष्ट्रकूट कालखंडात आयुधपुरुष द्वारपालांच्या भरपूर मूर्ती
खोदल्या गेल्या. त्या आपल्याला वेरूळ, घारापुरी, टाकळी ढोकेश्वर अशा
ब्राह्मणी लेण्यांत तसेच वेरूळ येथेच बौद्ध लेण्यांतही दिसून येतात.
सर्वसाधारणपणे द्वारपाल आणि त्यांच्या शेजारी खालच्या बाजूस एक ठेंगणी
व्यक्ती अशी यांची रचना. ह्या ठेंगण्या मूर्ती म्हणजेच द्वारपालांच्या
हातातील आयुधे, इति आयुधपुरुष. तर टाकळी ढोकेश्वरच्या गाभार्याच्या
प्रवेशद्वाराच्या बाजूंना अशा आयुधपुरुष मूर्ती आहेत. पैकी उजवीकडील
द्वारपालानजीकची आयुधपुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झाली आहे मात्र डावीकडील
पूर्णपणे दृग्गोचर आहे. ती आहे त्रिशुळपुरुषाची. आता ही मूर्ती ओळखायला
अगदीच सोपी कारण ह्याने हाताची घडी घातली असून मस्तकी त्रिशुळ धारण केला
आहे. साहजिकच हा त्रिशुळपुरुषाकडे निर्देश करतो. शिवाय हे शैव लेणे
असल्याने द्वारपाल त्रिशुळधारी असणे हे ही अगदी सुसंगतच.
ह्या आयुधपुरुषाच्याच बाजूला एक बैठी मूर्ती आहे तसेच त्याच्या खालच्या
बाजूला कुठलासा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. ह्या मूर्ती खडकाचे विदारण
झाल्यामुळे नीटशा ओळखता येत नाही. उजव्या बाजूच्या द्वारपालाच्या वरचे
बाजूस मात्र धनाची थैली घेऊन चाललेला कुबेर सहजी ओळखू येतो. इतर
दिक्पालांचा मात्र येथे अभाव आहे. सभामंडप आणि अंतराळ ह्यांना विभाजीत
करणार्या स्तंभचौकटीवर गजान्तलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत.
२३. गर्भगृहाचा दर्शनी भाग

२४. आयुधपुरूष द्वारपाल

२५. त्रिशुळपुरुष

२६. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील कुबेर

२७. गाभार्यातील शिवलिंग

गर्भगृहाला फेरी मारण्यासाठी कातळातच खोदून काढलेला मार्ग आहे. वाटेत दोन अतिशय देखणे वीरगळ ठेवलेले आहेत.
२८. वीरगळ

२९. वीरगळ

३०. कातळकोरीव प्रदक्षिणा मार्ग

गर्भगृहाच्या प्रदक्षिणामार्गाच्या उजवे बाजूच्या प्रवेशद्वाराच्या
बाहेरही एक भव्य नंदीची मूर्ती कोरलेली आहे. एक फेरी मारून आम्ही लेणीच्या
बाहेर आलो. आमचे झोपाळू मित्र नुकतचे झोपेतून उठत होते. परत एकदा त्यांना
बळेबळे आत बोलावून सप्तमातृकांचे आणि इतरही दर्शन घडवले आणि तिघे
लेण्याच्या बाहेर आलो.
लेण्याच्या डावीकडे एक पाण्याचे टाके आहे जे आहही पिण्यायोग्य आहे आणि
त्याच्या वरच्या बाजूलाच एक लहानसे लेणे आहे. तेथे जायला उभ्या कातळावर
पावठ्या खोदलेल्या आहेत. हे लेणे म्हणाजे एक लहानसा कक्ष असून आत काहिही
नाही. इकडे मात्र धन्या आणि बुवा जाऊन आले.
३१. वरील लहानशा लेण्यकडे जाणार्या पावठ्या

थोडा वेळ थांबून आम्ही लेणी उतरायला सुरुवात केली. दुपारचे दोन अडीच
वाजत होते. आता कुठे जायचे ह्याचा विचार चालू झाला. ठिकाणही ठरले, जुन्नरची
हिनयान तुळजा लेणी. टाकळी ढोकेश्वर पार करून निघालो. काही अंतर पुढे जातात
एक फलक सामोरा आला- कोरठण खंडोबा ८ किमी, बोरी १३ किमी. बोरी हे आमचे मूळ
गाव. आमचे आजोबा देखील त्या मूळ गावी कधी गेले नाहीत पण कुठेतरी आमची नाळ
मात्र त्याच्याशी जोडलेली राहतेच. कोरठण खंडोबा आमचे कुलदैवत. आतापर्यंत
फक्त एकदाच तिकडे जाणे झाले होते. आता इतके जवळ आलोच आहोत तर कुलदैवताला
भेटून यावे असे ठरले आणि तुळजा लेणीची भेट रद्द केली.
फाट्यावरून आत शिरलो. कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे
लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३ किमी तर उजवीकडे ६ किमी वर वडगाव
दर्या. आधी कोरठण खंडोबाला गेलो. देवस्थान भले प्रचंड झालेय. इथेही
श्रद्धेचा बाजारच. मूळ मंदिर मात्र १५ व्या शतकातले असून शके १४९१ चा
अर्थात इ.स. १४१३ रोजीचा एक शिलालेख गर्भगृहाचा प्रवेशद्वारावर आहे.
खंडोबाची मूर्ती ही तांदळा स्वरूपात म्हणजेच धोंड्याच्या स्वरूपात ( धोंड्यावर नाक डोळे रेखाटलेली अशी) आहे.
३२. कोरठण खंडोबा देवस्थान

३३. सभामंडपातील स्तंभ जे हा मंडप खूप जुना आहे हे सूचित करतात.

३४. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख

३५. खंडोबा

कोरठण खंडोबाचे दर्शन करुन परत पिंपळगाव रोठा येथे आलो. तिथून सरळ ६
किमीवर वडगाव दर्या. इथली दर्याबाई ही आत्मुबुवांची कुलदेवी. वडगाव दर्याला
एक नैसर्गिक आश्चर्य आहे ते म्हणजे इथले अधोमुखी आणि उर्ध्वमुखी लवणस्तंभ.
वडगाव दर्या नावाले अगदी साजेसे. एका खोलवर दरीत हे वसले आहे. कातळातील
नैसर्गिक गुहेत दर्याबाई आणि वेल्हाबाई ह्या दोन देवींची मंदिरे आहेत. काही
पायर्या उतरून दरीत उतरावे लागते. भोवताली उंच कातळ, समोर कातळातलाच
नैसर्गिक ओढा, हिरवागार, शांत परिसर, माकडेही भरपूर. वडगाव दर्याचे आश्चर्य
ह्या दोन मंदिरांत आहे. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत.
मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना
केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो
हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.
इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात
झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे
आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी
तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील
छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप
जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण
हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी
लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही
क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे
त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही
प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत. ह्यापूर्वी मी अधोमुखी लवणस्तंभ
पाटेश्वर येथील वर्हाडघर लेणीसमूहात पाहिले होते. येथे मात्र दोन्ही
प्रकार पाहता आले.
३६. वडगाव दर्या गुहामंदिर

३७. वेल्हाबाई मंदिरातील उर्ध्वमुखी लवणस्तंभ

३८. दर्याबाई मंदिरातील दीड पुरुष उंचीचे अधोमुखी लवणस्तंभ

३९. गुहांतील अधोमुखी लवणस्तंभ

४०. लवणस्तंभ निर्मितीची आजही चालू असलेली प्रक्रिया

४१. लवणस्तंभ निर्मिती

मंदिर आणि लवणस्तंभ पाहून निघालो. धन्या मात्र एव्हाना वैतागला होता.
मात्र आता आमच्या वायफळ गप्पा सुरु झाल्या. विविध विषयांवर भरपूर गप्पा
झाल्या, कित्येकदा निरर्थक. वाटेत स्पाला फोन करून त्यांचा राजगड ट्रेक
कुठवर आला ह्याची विचारणा केली. थोड्याच वेळात अन्या दातारचा फोन आला. मग
त्याला रात्री निगडी प्राधिकरण येथे भेटलो व जेवण करून घरी.
एकंदरीत कान्हूरपठारावरचा हा छोटेखानी दौरा अगदी झक्कास आणि नेहमीपेक्षा वेगळाच असा झाला.
कळायला लागल्यापासून पैठणच्या ब्रम्हवृंदासमोर ज्ञानदेवांच्या आज्ञेने वेद बोलणारा* रेडा मनात घर करुन राहीला होता. या भटकंतीच्या निमित्ताने त्या रेडयाची समाधी पाहता आली.
* दंतकथेनुसार.
निघोजचा भौगोलिक चमत्कार - रांजणखळगेकसे जाल? - पुण्यापासून निघोज सुमारे ११२ किलोमीटर. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर गावानंतर काही अंतरावर निघोजचा फाटा आहे. शिक्रापूरहूनही एक फाटा निघोजला जातो. निघोजमध्ये भोजन आणि निवासाची सोय आहे.
वीकएण्ड पर्यटन - अरविंद तेलकर
अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो. प्रवाहाबरोबर दगड-गोटे आणि इतरही वस्तू वाहत असतात.
या खडकांशी लाखो वर्षं सातत्यानं घर्षण होत राहिल्यानं हा कॅनियन किंवा दरी निर्माण झाली. ही दरी तब्बल ४४६ किलोमीटर लांब आणि २९ किलोमीटर रुंद आहे. अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे २०० मीटर लांब आणि काही ठिकाणी ६० मीटर रुंद दरी तयार झाली आहे.
याच दरीत नदीनं कोरून काढलेली चित्तवेधक पाषाणशिल्पं दिसतात. अनेक ठिकाणी खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्यानं त्याला सामान्यपणे रांजणखळगे असं म्हटलं जातं. प्रवाहातून वाहत आलेले लहान-मोठे दगड नदीपात्रात तयार होणाऱ्या भोवऱ्यांमुळे गोल फिरत राहतात. त्यामुळं वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच आहेत रांजणखळगे. लाखो वर्षांपासून ही क्रिया घडत असल्यानं, पात्रातील खडकांना खळग्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला पॉट होल्स म्हणतात. या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
कुकडी नदीच्या पात्रातले काही रांजणखळगे खूप खोल आहेत. काही ठिकाणी छोटी गुहा आणि काही ठिकाणी पाषाणाला मधोमध कोरून त्यातून पाण्याचा प्रवाह वाहतो. नदीच्या या विशिष्ट ठिकाणच्या पात्रातले पाषाण, अंतरंगात कठीण आणि बाहेरच्या बाजूनं मृदू आहेत. नदीच्या प्रवाहानं मृदू भाग कोरून काढला आहे. लाखो वर्षांपासून घर्षणाची ही क्रिया घडत असल्यानं, पाषाणांची आकर्षक शिल्पं तयार झाली आहेत. या लहानशा दरीत एक छोटा धबधबाही आहे. इथल्या काही कुंडांमध्ये दीर्घकाळ पाणी साठून राहात असल्यानं, तिथं हायड्रिला किंवा वॉटर थाईम नावाची वनस्पती उगवते.
खळग्यांच्या तळाशी उगवणाऱ्या या वनस्पतीच्या फांद्या प्रसंगी २५ फुटांपर्यंत वाढतात. अशा असंख्य फांद्यांमुळं तळ दिसेनासा होतो.
पाण्याच्या उपलब्धतेमुळं पशुपक्षी या ठिकाणी आकर्षित होतात. चिखलानं घरटं बांधणारे स्वॅलो पक्ष्यांची लगबगही इथं पाहता येते. काही वर्षांपूर्वी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. परिणामी पाण्याचा ओघ काहीसा कमी झाला आहे. पर्जन्यछायेत असलेल्या या प्रदेशात पाऊस तसा कमीच होतो. त्यामुळं पावसाळ्यातही हा चमत्कार कधीकधी पाहता येऊ शकतो. नदीच्या प्रवाहावर एक झुलता पूलही बांधण्यात आला आहे. त्यामुळं रांजणखळगे वेगवेगळ्या कोनातूनही पाहता येणं शक्य झालंय. किनाऱ्यावर श्री मळगंगा देवीची दोन सुंदर मंदिरं आहेत. शिवाय कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राममंदिरही पाहण्यासारखं आहे.
निघोजपासून कान्हूर पठारमार्गे सुमारे २३ किलोमीटरवर पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या हे छोटंसं गाव लागतं. या गावाजवळ निसर्गाचा आणखी एक चमत्कार पाहता येऊ शकतो. गावापासून सुमारे एक किलोमीटरवर एक खोल दरी आहे. ही दरी हिरवाईनं नटलेली असते. दरीतच दर्याबाई आणि वेल्हाबाई या देवींची स्थानं आहेत. दरीत मंदिरापर्यंत उतरून जाण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आढळून येतात. इथं माकडांचा मुक्त संचार दिसतो. देवीचं मंदिर प्रचंड खडकातील गुहेत आहे. या गुहामंदिराच्या छतातून सतत क्षारयुक्त पाणी वाहत असतं. हे वाहणारं पाणी आपल्यासोबत क्षार घेऊन येतं. क्षाराचे हे कण भिंतीवर स्थिरावतात. वर्षानुवर्षं चाललेल्या या प्रक्रियेमुळं मंदिरात लवणस्तंभ तयार झाले आहेत. मंदिरात परशुरामाची मूर्ती आहे आणि शंकराची पिंडही आहे. वडगाव दर्याहून पुन्हा निघोज, टाकळी हाजीमार्गे मोराच्या चिंचोलीलाही जाता येतं. हे अंतर सुमारे ४६ किलोमीटरवर आहे. परतीच्या प्रवासात इथं जाता येईल.