Wednesday, January 13, 2021

लाक्कुंदी आणि दांडेली

 

एखाद्या ठिकाणाबद्दल तुम्ही कुठेतरी वाचता, कुणाकडून तरी ऐकता किंवा त्याची एखादी झलक पाहता आणि ते ठिकाण तुमच्या मनाच्या एका कोप-यात कुठेतरी आत जाऊन बसतं. हे ठिकाण ताजमहाल किंवा अजिंठा-वेरूळ सारखं प्रसिद्ध नसतं पण तरीही (की त्यामुळेच?) ते तुम्हाला भावलेलं असतं. भेट द्यायच्या ठिकाणांच्या यादीत त्याचा क्रमांक वरचा नसतो, पण तरीही ते कधीही विस्मरणात जात नाही. लाक्कुंदीच्या बाबतीत असंच झालं. इंटरनेटवर कुठेतरी या ठिकाणाबाबत वाचलं आणि तेव्हाच तिथं जायचं हे पक्कं ठरवून टाकलं.

दर वर्षी पुढे पुढे ढकलत जात शेवटी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात लाक्कुंदीला जायचा योग आला. या सहलीच्या आधी नोव्हेंबरात भुज, जुनागढ आणि गीर अभयारण्य आणि नंतर जानेवारीत कच्छचे छोटे रण (LRK) अशा सहली झाल्या. आजच्या या करोनाच्या काळात ते दिवस एखाद्या सुखद स्वप्नासारखे वाटतात. (गेले ते दिन गेले...)

सुरुवातीला या सहलीत दांडेली नव्हतं. पण मग असं वाटलं की फक्त लाक्कुंदी पहायला एवढ्या लांब जायचं? मग लाक्कुंदीच्या आजूबाजूच्या जागांचा शोध सुरू झाला. ऐहोळे, पट्टडक्कल, हंपी, विजापूर, गोकाक धबधबा ही सगळी ठिकाणं पाहून झालेली असल्यामुळे शेवटी मग दांडेलीची निवड झाली. बेत असा ठरला-

दिवस १: पुणे ते गडग, लाक्कुंदी स्थलदर्शन
दिवस २: लाक्कुंदी स्थलदर्शन
दिवस ३: लाक्कुंदी ते दांडेली, दांडेली स्थलदर्शन
दिवस ४: दांडेली अभयारण्यास भेट, दांडेली ते पुणे

सहल २१ ते २४ डिसेंबर अशी असल्यामुळे हॉटेलांमधे जागा नव्हत्या. त्यातल्या त्यात गडगला चांगलं हॉटेल मिळालं, पण दांडेलीला कुठल्याच हॉटेलात जागा नव्हती. शेवटी एका कळकट मळकट हॉटेलात उपलब्ध असलेल्या दोन खोल्या गोड मानून घ्याव्या लागल्या.

दिवस पहिला:

आम्ही पहाटे पाच वाजता निघालो. आजकाल पुण्यात दुर्मिळ झालेली सुंदर गुलाबी थंडी पडली होती. पुणे-बेंगलूरू रस्ता हा एकाच वेळी रडवणारा आणि हसवणारा असा आहे. या रस्त्याचा महाराष्ट्रातला भाग जितका भयानक आणि थरकाप उडवणारा आहे, तितकाच कर्नाटकातला भाग सुंदर आणि आनंददायी आहे. भयंकर खड्डे असलेल्या आणि सतरा ठिकाणी काम चालू असलेल्या या रस्त्यावर टोल नामक खंडणी देऊन आम्ही पुढे निघालो.

सातारच्या पुढे कुठेतरी






कोल्हापूर पार केल्यावर गाडी कर्नाटकात शिरली. कोल्हापूर ते बेळगावी रस्त्यावर गाडी चालवणे हा एक प्रसन्न करणारा अनुभव असतो. आत्तापर्यंत झालेल्या मानसिक त्रासाची ही एक भरपाईच असते म्हणाना. रूंद, तीन मार्गिका असलेला रस्ता, दोन्ही बाजूला असलेले प्रशस्त सेवा रस्ते, दुभाजकावर लावलेली आकर्षक झाडे, तुरळक गर्दी यामुळे हा प्रवास संपूच नये असे वाटते.

साधारण एकच्या सुमारास आम्ही गडगला पोचलो. हॉटेलात गेलो, खोल्या ताब्यात घेतल्या आणि जेवण केले. गडगपासून लाक्कुंदी फक्त ११ किमी दूर आहे. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही लगेच लाक्कुंदीला निघालो. लाक्कुंदीला पोचल्यावर आमचा पहिला थांबा होता तिथले वस्तुसंग्रहालय. हे वस्तुसंग्रहालय म्हणजे एक सुखद धक्का होता. लाक्कुंदीसारख्या छोट्या, अपरिचित ठिकाणालाही कर्नाटक सरकार किती महत्व देते याचेच ते द्योतक होते.





कहाणी लाक्कुंदीची (Story of Lakkundi) या नावाचे हे वस्तुसंग्रहालय ब-यापैकी मोठे आहे. आजूबाजूच्या परिसरात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्त्या तिथे ठेवल्या आहेत. लाक्कुंदी गावातल्या सगळ्या मंदिरांचे स्थान दर्शविणारा एक नकाशाही तिथे आहे. तिथे काही वेळ घालवून आम्ही बाहेर पडलो. वस्तुसंग्रहालयाच्या मागेच ब्रह्म जिनालय आहे. लाक्कुंदीतील ११ मंदिरांपैकी सुमारे ५ मंदिरांचा ताबा आत्ता सरकारकडे आहे - ब्रह्म जिनालय यापैकी एक आहे. हे लाक्कुंदीतील सगळ्यात जुने मंदिर असून सगळ्यात मोठे जैन मंदिर आहे. मंदिर उत्तम स्थितीत आहे. आजूबाजूला राखलेली हिरवळही मन सुखावणारी आहे.


















मंदिरात दोन सुंदर मुर्त्या आहेत. त्यापैकी एक ब्रह्मदेवांची असून तिला चार मुखे आहेत (सोबत सावित्री आणि गायत्री आहेत), दुसरी यक्षी पद्मावतीची आहे. दोन्ही मुर्त्या कमालीच्या देखण्या आहेत. ब्रह्मदेवांच्या मुर्तीमुळे या मंदिरास त्याचे नाव मिळाले आहे.









मंदिरात ब-यापैकी गर्दी होती. मला वाटले त्यापेक्षा लाक्कुंदी थोडे अधिक लोकप्रिय दिसत होते. आजकाल हंपी, ऐहोळे, पट्टडक्कल पाहून झाल्यावर लोक इथेही येत असावेत. मंदिरात कुठल्यातरी शाळेची सहल आली होती. भिरभिरणा-या डोळ्यांनी ती लहान मुले इकडेतिकडे पहात होती. बाजूच्याच हिरवळीवर माकडांचाही खेळ रंगला होता. मंदिरासमोरच एक घर होते. मला त्या घरातल्या लोकांचा हेवा वाटला. पण काय माहीत? कदाचित त्यांना ह्या मंदिराचे अजिबात कौतुक नसेल. हे लहानसे खेडे सोडून आपण शहरात जाऊन रहावे असे त्यांना वाटत नसेल कशावरून?

ब्रह्म जिनालय आणि त्याला लागून असलेले एक छोटेसे जैन मंदिर पाहून झाल्यावर आम्ही निघालो नान्नेश्वर मंदिराकडे. (ह्या दोन मंदिरांशेजारीच नागनाथ मंदिर आहे, पण आज त्याची स्थिती दयनीय आहे. मंदिराभोवती अतिक्रमण झाले असून त्याची पडझड झालेली आहे. ह्या मंदिराची सद्यस्थिती https://www.youtube.com/watch?v=XmeJDrC4IqU ह्या व्हिडिओत पाहता येईल.)
नान्नेश्वर आणि काशीविश्वेश्वर ही मंदिरे अगदी जवळजवळ (रस्त्याच्या दोन बाजुंना दोन) आहेत. नान्नेश्वर मंदिर भल्यामोठ्या उंच जोत्यावर उभारलेले आहे. मंदिर भापुसच्या ताब्यात असल्यामुळे अर्थातच स्वच्छ, नीटनेटके आणि उत्तम स्थितीत आहे.









घासून गुळगुळीत केलेले अगदी आरशासारखे चमकणारे खांब ही कर्नाटकातल्या मंदिरांची खासियत आहे, इथेही ती दिसते. (ब्रह्म जिनायलातही हे खांब होतेच.) मंदिराच्या मंडपाला लाकडी दरवाजा असला तरी सध्या तो उघडा होता. आम्ही आत शिरलो. मंडपही देखणा होता. आत गाभा-यात एक शिवलिंग दिसत होते, पण सध्या त्याची पूजाअर्चा होत नसावी.
नान्नेश्वर मंदिराजवळ आम्ही थोडा वेळ थबकलो. वरून लाक्कुंदीचा बराच मोठा परिसर दृष्टिपथात येत होता. भारतात असणा-या लाखो खेड्यांसारखेच लाक्कुंदी एक चिमुकले झोपाळू खेडे होते. रस्त्यावर स्वच्छंदपणे फिरणारी गुरे, त्यांनी टाकलेल्या शेणामुताचा सगळीकडे पसरलेला दरवळ, इकडून तिकडे जाणारे ट्रॅक्टर, छोटी बसकी घरे, चौकात असणारे पार आणि त्यांवर बसलेले गावकरी.
नान्नेश्वर पाहून आम्ही निघालो शेजारच्या काशीविश्वेश्वर मंदिराकडे. काशीविश्वेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरचे देखणे कोरीवकाम. लाक्कुंदीच्या इतर कुठल्याच मंदिरात असे कोरीवकाम नाही. काशीविश्वेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक खुला रंगमंच आहे. लाक्कुंदीतले सांस्कृतिक कार्यक्रम बहुधा इथेच होत असावेत.














काशीविश्वेश्वर मंदिर पाहून घाईघाईने आम्ही निघालो मणिकेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेल्या मुस्कानीबावी अर्थात मुस्कानी विहिरीकडे. सूर्यास्त होत होता आणि आज दिवस मावळायच्या आधी आम्हाला हे शेवटचे मंदिर पाहून घ्यायचे होते. लाक्कुंदीच्या मुख्य रस्त्यापासून एका अरुंद रस्त्याने आत गेलो की हे मंदिर लागते. मणिकेश्वर मंदिराला मी लाक्कुंदीतील सगळ्यात सुंदर मंदिर म्हणेन. हे मंदिर स्वत: सुंदर आहेच, पण त्याची शोभा वृद्धिंगत केली आहे त्यासमोर असलेल्या पाय-या पाय-यांच्या त्या अतीदेखण्या विहिरीने.


















सूर्य महोदय आता अगदी दिसेनासे होण्याच्या बेतात आले होते. मंद असा तांबूस प्रकाश सगळीकडे पसरला होता. त्या मंद प्रकाशात हे मनोहर मंदिर अधिकच लोभसवाणे दिसत होते. ह्या मंदिरात आम्ही बराच वेळ रेंगाळलो. शेवटी तिथे देखरेख करणा-या कामगाराने आम्हाला आता निघा असे बोलल्यावर नाईलाजाने आम्हाला तिथून निघावे लागले.

एक टीप: इतिहासात रस असलेल्या आणि हा इतिहास पाहिलेल्या प्रत्येक जुन्या वास्तूविषयी आस्था असलेल्या कुठल्याच व्यक्तीचे मत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात् Archaeological Survey of India या संस्थेविषयी फारसे चांगले नसते. अर्थात् हे नकारात्मक मत निराधार नाही हे सत्य आहेच. भारतातल्या अनेक वास्तुंची होणारी अक्षम्य हेळसांड पाहून कुणाचेही मत असेच होईल. मीही स्वत: असे म्हणतो की भापुसचे काम सुधारण्यास अजून बराच वाव आहे. ते जे काही करतात ते उत्तम असते हे खरे, पण अनेकदा ते काहीच करत नाहीत हेही तितकेच खरे आहे. मणिकेश्वर मंदिर पाहिल्यावर भापुसने इथे काही खास केलेले नाही असेच कुणीही म्हणेल. थोडीशी हिरवळ आणि काही शोभेची झाडे लावण्याइतपतच भापुसचे काम आहे असेच कुणालाही वाटेल. पण भापुसने इथे केवढे प्रचंड काम केले आहे हे खाली दिलेल्या दोन छायाचित्रांवरून स्पष्ट होते. जुनी छायाचित्रे कुणा अज्ञात छायाचित्रकाराने १८८५ साली काढली आहेत (ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावरून साभार), तर आजची छायाचित्रे मी काढली आहेत. दोन्ही छायाचित्रांमधला फरक अक्षरश: थक्क करणारा आहे! मी तर म्हणेन की काहीही काम केलेले नाही असे वाटणे हीच भापुसच्या कामाची खरी पावती आहे! (त्यांचे अजिंठा आणि वेरूळमधील कामही थक्क करणारे आहे. ब्रिटिश लायब्ररीच्या संकेतस्थळावर अजिंठा आणि वेरूळची अनेक जुनी छायाचित्रे उपलब्ध आहेत, गरजुंनी जरूर पहावीत.)









मंदिर पाहून झाल्यावर आम्ही परत गडगला निघालो. वाटेत एका ठिकाणी एका छोट्याश्या टपरीवर मिरची आणि (चक्क अख्ख्या) वांग्याची भजी खाऊन आणि चहा मारून (एकूण बील 50 रुपये!) आम्ही परत हॉटेलवर परतलो.

 

दिवस दुसरा:
आजचा दिवस आमच्या सहलीतला एकूणच आराम दिवस होता. डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आणि इटगीचे महादेव मंदिर पहाणे एवढेच आजचे आमचे काम होते. मला सहलीत हे असले दिवस जाम आवडतात. जर धावपळच करायची असेल तर मग सहलीला येण्यात काय हशील?

आरामात उठून अगदी सावकाश आम्ही आमचा नाश्ता उरकला आणि बाहेर पडलो. गदगपासून साधारण २२ किमी अंतरावर गदग-मुंदरगी रस्त्यापासून थोडे आत डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आहे. वाटेत काही पवनचक्क्या दिसल्या, तेव्हा तिथे थांबून थोडी छायाचित्रे काढली आणि निघालो.



मंदिराशेजारीच गाडी लावली आणि आत शिरलो. आत शिरलो आणि क्षणभर श्वास थबकला. एका छोट्या गावातले हे मंदिर एवढे सुंदर असेल अशी मी कल्पनाच केली नव्हती. छोटेसे सुरेख मंदिर, त्यासमोरचा भला मोठा नंदी आणि सभोवताली नेत्रसुखद रंगीबेरंगी फुलझाडे - कुणीही भान हरपून नुसते पाहत राहील असे दृश्य होते ते.

मंदिराचे प्रथमदर्शन



















मंदिराच्या जवळच्या एका झाडावर बसलेला भारतीय नीलपंख (Indian Roller)



सकाळची वेळ असल्याने मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. तानसेन मेघमल्हार गाऊ लागला की निरभ्र आकाशात बघताबघता काळे ढग दाटून येत आणि पाऊस पडत असे; अगदी तसंच निराश झालेल्या आणि जीवनाला कंटाळलेल्या कुठल्याही माणसाला इथं आणावं - हे मंदिर पाहिल्यावर त्याच्या मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला लागतील हे नक्की.

डोड्डाबसप्पा मंदिर पाहून आम्ही रस्त्यापलीकडच्या सोमेश्वर मंदिरात गेलो. हे बिचारे मंदिर समोरच्या दादा मंदिराच्या तुलनेत सौंदर्य आणि आकार दोन्ही दृष्टीने डावे आहे. पुण्यात असते तर ते भलतेच लोकप्रिय ठरले असते, पण ते बिचारे आहे डोड्डाबसप्पाच्या अगदी समोर; अर्थातच ते झाकोळले गेले आहे.





समोर दिसणा-या डोड्डाबसप्पा मंदिराकडे पहात आम्ही इथे थोडा वेळ रेंगाळलो आणि निघालो. इटगी इथून साधारण ३६ किमी लांब आहे. साधारण एका तासात आम्ही इटगीच्या महादेव मंदिरात पोचलो.

लाक्कुंदी आणि आजूबाजूच्या परिसरात आम्ही पाहिलेल्या मंदिरांपैकी इटगीचे महादेव मंदिर आजही पूजाअर्चा चालू असलेले एकमेव मंदिर होते. गावाचे ग्रामदैवत, गावातले मुख्य देऊळ असते तसे. आम्ही गेलो तेव्हा मंदिरात कसलातरी उत्सव चालू होता. मंदिरावर विजेच्या माळा सोडलेल्या दिसत होत्या, गर्दीही पुष्कळ होती. असे असले तरी मंदिर उत्तम स्थितीत दिसत होते. देवादिकांच्या तसबीरी लटकवलेल्या, लाईटचे बोर्ड, पट्ट्या, दिवे कुठेही कसेही लावलेले, मंदिराला चित्रविचित्र रंग फासलेला असा कुठलाही प्रकार तिथे नव्हता. एकूणच व्यवस्था उत्तम होती.






मंदिराच्या आवारात एका बाजूस एका नविन मंदिराचे बांधकाम चालू होते. बांधकाम दगडी असले आणि जुन्या शैलीनुसारच होत असले तरी बांधकामाचे दगड फारच उजळ म्हणजे फिकट पिवळे दिसत होते. हा दगड नविन असल्यामुळे असा दिसत होता की त्याचा प्रकारच वेगळा होता हे कळायला काही मार्ग नव्हता.

नविन बांधकाम



मंदिरात एखादा तास घालवून आम्ही निघालो. बाहेर लाकडापासून बनवलेला आणि दगडी चाके असलेला एक रथ दिसत होता. रथ पाहून मला जगन्नाथ पुरीच्या त्या प्रसिद्ध रथाची आठवण झाली.





इटगीहून गदगला जाताना लाक्कुंडीमार्गेच जावे लागते, तेव्हा ASIच्या ताब्यात नसलेले एखादे मंदिर पाहूयात असा विचार करून गावात शिरलो. तीन मंदिरे सापडली. त्यातली दोन मंदिरे तर आजूबाजूच्या घरांच्या गर्दीत पार हरवून गेली होती. एका मंदिराच्या तर भिंतीला लागून शेजारचे घर बांधले होते. तिसरे मंदिर जरा बरे दिसत होते. गावकरी दुपारच्या वेळी विश्रांतीस्थान म्हणून या मंदिराचा वापर करीत असावेत.



काही वेळातच आम्ही गदगला परतलो आणि तिथे एका छोट्या कर्नाटकी खानावळीत एक अस्सल कर्नाटकी शाकाहारी थाळी हाणली. गदगला एक वस्तुसंग्रहालय आहे अशी माहिती आम्हाला होती, तेव्हा तिकडे निघालो. बहुतेक सरकारी वस्तुसंग्रहालये असून अडचण आणि नसून खोळंबा अशी असतात, गदगचे वस्तुसंग्रहालय अर्थातच याला अपवाद नव्हते. या वस्तुसंग्रहालयाला तिकीट नव्हते; त्याचे कारण आम्हाला लागलीच मिळाले. तिकीट देणा-या माणसाला द्यायच्या पगाराइतकेही पैसे जर तिकीटे विकून मिळत नसतील तर माणूस ठेवणार कसा?

फोटो काढू नका अशी प्रेमळ सूचना देऊन रखवालदार नाहीसा झाला. एकून चार एक दालने असावीत. मला वस्तुसंग्रहालये आवडतात; माझ्या बरोबरचे इतर लोक मात्र कंटाळले. संग्रहालयात ठेवता येणार नाहीत अशा काही मोठ्या मूर्त्या इमारतीच्या आवारात उघड्यावर ठेवल्या होत्या, त्यांवर एक नजर टाकून आम्ही निघालो.

या मुर्त्यांमधल्या दोन सुंदर मुर्त्या :P





त्यानंतर? खोलीवर जाणे, खाणे, पिणे (पाणी!) आणि झोपणे. उद्या? दांडेली.

 दिवस तिसरा:

कर्नाटकातील दांडेली मुख्यत्वे प्रसिद्ध आहे तिथल्या रिव्हर राफ्टिंगसाठी. आम्ही मात्र ते करणार नव्हतो. दांडेलीत जाऊन तिथला निसर्ग अनुभवणे आणि जमले तर तिथल्या अभयारण्याला भेट देणे एवढाच आमचा कार्यक्रम होता.

खोल्यांमधले सगळे सामान आवरून आम्ही गाडीत टाकले, नाश्ता उरकला आणि निघालो. साधारण तीनेक तासात आम्ही दांडेलीला पोहोचलो. हॉटेलात जाऊन पहातो तर ते छायाचित्रांमधे दिसत होते त्यापेक्षा फारच जास्त भयानक निघाले. आता काय करावे? दुसरे हॉटेल शोधण्यासाठी लागणारा वेळ आमच्याकडे नव्हता, शिवाय हे पैसे परत मिळणार नव्हते आणि एकाच रात्रीचा तर प्रश्न होता, तेव्हा इथेच राहण्याचे ठरले. अरुंद, अंधारा जिना आणि लहानशा, एकही खिडकी नसलेल्या खोल्या - हॉटेलचा मालक बहुधा आधी मुंबईत रहात असावा.

खोल्यांमधे सामान टाकून आम्ही बाहेर पडलो आणि शेजारच्या कामत हॉटेलात जेवणे उरकली. थोडी वामकुक्षी घेऊन आम्ही तीनला बाहेर पडलो - आमचा पहिला थांबा होता सिंथेरी रॉक्स. वनखात्याच्या चौकीवर गाडीची नोंद केली, तिकीटे घेतली आणि आत शिरलो. आत जाण्याचा रस्ता कच्चा आणि अरुंद आहे. एके ठिकाणी गाडी लावल्यावर आत साधारण दोन-तीनशे मीटर दगडी रस्त्याने उतरून जावे लागते.

सिंथेरी रॉक्स म्हणजे एक नदी आणि तिच्या अवतीभोवती असलेले मोठमोठे दगड. खरं सांगायचं तर ना या नदीत काही खास आहे ना त्या दगडांमधे. आणि गंमत म्हणजे त्या नदीत जायची परवानगी नाही. साधारण १०० फूट दुरूनच या अलौकिक दृश्याचा आनंद घ्यावा लागतो. कारण विचारल्यावर कळले की काही लोक हुल्लडबाजी करतात म्हणून. काहीही. असं आपल्या महाराष्ट्रात करायचं म्हटलं तर निम्मी प्रेक्षणीय ठिकाणे पावसाळ्यात बंद करावी लागतील. एकूणच आजकाल इंटरनेटवर प्रदर्शित होणा-या चित्रपटांसारखे हे ठिकाण आहे - अगदीच सपक आणि बेचव.







पण गाडीकडे परत येत असताना मात्र एक गोष्ट चांगली घडली - महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूनं आम्हाला दर्शन दिलं. महाराष्ट्रात जंग जंग पछाडूनही जो आम्हाला कधीच दिसला नाही, त्या ह्या प्राण्यानं आम्हाला कर्नाटकात दर्शन द्यावं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?









जगप्रसिद्ध सिंथेरी रॉक्स पाहून आम्ही निघालो दांडेली अभयारण्याकडे. एका वनरक्षकाकडे चौकशी केल्यावर कळले की सकाळी सहा ते साडेआठ एक जंगल सफारी असते - मोजक्याच जागा असतात - उद्या पहाटे पाचला पोचलात तर तिकीटे मिळतील म्हणून. थोडा विचार केल्यावर असे वाटले की पहाटे सगळे सामान घेऊनच इथे यावे, पुन्हा खोलीवर जाऊन करणार काय? तेव्हा, उद्या पहाटेच खोली सोडून सगळे सामान गाडीत टाकावे आणि अभयारण्याला भेट देऊन झाल्यावर थेट पुण्याला निघावे असे ठरले.

दिवस चौथा:

पहाटे साडेचारला निघून आम्ही पाच वाजेपर्यंत अभयारण्यात पोचलो. अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ताही दाट जंगलातून जातो. या अरुंद रस्त्याने मिट्ट अंधारात गाडी चालवण्याचा अनुभव रोमांचकारी होता. या रस्त्यावर आपल्याला काहीतरी दिसेल असं आम्हाला वाटलं खरं, पण तसं काही झालं नाही. थोड्याच वेळात कार्यालय उघडले आणि तिकीटे द्यायला सुरुवात झाली. एव्हाना ब-यापैकी गर्दीही झाली होती. हे अभयारण्य कर्नाटकात असले तरी इथल्या बहुतेक कर्मचा-यांना मराठी येत होते. ४ लोकांचे १८०० रुपये देऊन आम्ही तिकीटे घेतली आणि बाहेर पडलो.

कार्यालयात कुठला प्राणी शेवटचा कधी दिसला याची नोंद असलेला एक बोर्ड होता. त्यात बिबट्या, काळा बिबट्या, एवढंच काय पट्टेदार वाघही दिसल्याची नोंद होती. तो बोर्ड पाहून आपल्यालाही काहीतरी दिसेल अशी एक भाबडी आशा आमच्या मनात जागली.



सहाच्या आसपास गाड्या निघाल्या. गाडीत बसताना एक विनोद घडला. आमच्या बरोबर असलेल्या दुस-या कुटुंबातल्या एक आज्जी आपल्या नातवाला म्हणाल्या, "अरे तू मागेच बस. पुढून तुला काही दिसणार नाही." यावर आमचा ड्रायव्हर कम गाईड म्हणाला, "कुठेही बसा, तसंही आपल्याला काही दिसायची शक्यता खूपच कमी आहे." चालकसाहेबांचा हा विनोद ऐकून आमचे चेहरे फोटो काढण्यासारखे झाले, पण सुदैव असे की अजूनही अंधार असल्यामुळे ते कुणाला दिसले नाहीत.

थोड्याच वेळात आम्ही निघालो. आधीच अंधार आणि वर धुके. त्यात पीएमपीएमएलचा चालक शेवटची फेरी पूर्ण करताना बस हाणतो तशी हा चालक जीप हाणत होता. काय बिशाद काय दिसेल याची? पण थोड्याच वेळात उजाडले, धुके निवळले आणि थोडेसे दिसू लागले. सुदैवाने चालकसाहेबांचे भाकीत खोटे ठरेल असे काहीही सफारीत घडले नाही. दूरवर चरणारी काही हरणे सोडली तर कुठलाच प्राणी आमच्या वाटेला गेला नाही (की वाटेला आला नाही?). हो, पक्षी मात्र खूप दिसले. नंतर वाचल्यावर कळले की हे अभयारण्य प्राण्यांपेक्षा पक्षांसाठीच जास्त प्रसिद्ध आहे ते.

खंड्या/धीवर (White breasted kingfisher)



निखार (Orange minivet)



मलबार धनेश (Malabar pied hornbill)



टोई पोपट (Plum headed parakeet)



कुणी काहीही म्हणो, पण मी म्हणेन की हे अडीच तास मस्त गेले म्हणून. मला जंगलात फिरायला आवडतं. आणि जंगलात गेल्यावर झाडे पहावीत, फुले पहावीत, पाने पहावीत, जंगलाचा तो विशिष्ट वास नाकात भरून घ्यावा, जंगल अनुभवावे. वाघ किंवा बिबट्याच दिसायला हवा असं थोडंच आहे?

अभयारण्यातून घरी परत जाताना काही विशेष घडले नाही. बेंगलुरू-पुणे या रस्त्याबाबत एक चांगली गोष्ट अशी आहे की साता-यानंतर जी वाहनांची भयानक गर्दी तुम्हाला लागते त्यामुळे पुण्यात तुमच्यापुढे काय ताट वाढून ठेवले आहे याची एक चुणूक तुम्हाला मिळते. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर तिथल्या बेशिस्त वाहतुकीचा दु:खद धक्का तुम्हाला बसत नाही. असो. दु:खात सुख एवढेच की २५ डिसेंबरला सुट्टी होती; त्यामुळे पुन्हा कामाला लागण्याआधी आम्हाला एक दिवस आराम करता येणार होता.

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...