Thursday, April 16, 2026

उस्वाया

 रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329

रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177
रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.maayboli.com/node/86969

संस्कृती, विज्ञान, भूगोल आणि अगदी दैनंदिन आयुष्यातसुद्धा ‘सात’ या अंकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी सप्तपदी पासून साडेसाती पर्यंत. (ही फक्त उदाहरणं आहेत, क्रम नव्हे  ). इंद्रधनुष्याचे सात रंग असोत, संगीताचा पाया रचणारे सात सूर असोत किंवा हिंदू धर्मातले सात महान ऋषिगण, सप्तर्षी. जगात खंड किती, तर सात. प्राचीन काळात भारताचा उल्लेख सप्तसिंधु म्हणजेच सात नद्यांचा प्रदेश असा आहे. फार मागे का जायचं, तुमची आमची मुंबईसुद्धा सात पाड्यांवर (बेटांवर) वसवलेली. पूर्वीच्या काळी अंतराची कमाल मर्यादा म्हणजे ‘साता समुद्रापलीकडे’ अशी होती. गंमत म्हणजे काळाचं मोजमाप करणारा ‘आठ’वडा असला तरी त्यात वार मात्र सातच असतात. आध्यात्मिक पातळीवर विचार केला तर शरीरातली चक्रं आणि मोक्षप्राप्तीची पवित्र केंद्रंही (सप्तपुरी) सात. तेवढंच कशाला, जगातली मानवनिर्मित आश्चर्यंही अवघी सातच.

तेच अलौकिक ‘सात’त्य असलेला आणखी एक भव्य आविष्कार म्हणजे अँडीज. दक्षिण अमेरिकेतल्या सात देशांतून जाणारा, सुमारे सात हजार किमी. लांब आणि जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आपल्या खांद्यावर मिरवणारा अँडीज, नुसतीच एक पर्वतशृंखला नसून सात खंडांचा एक भला मोठा ग्रंथच आहे. हा बहुखंडी ग्रंथ ‘अथ’ पासून ‘इति’ पर्यंत वाचायला जर कटिबद्ध असाल तर उष्ण, समशितोष्ण आणि शीत असे तीनही कटिबंध ओलांडायची तुम्हाला तयारी ठेवावी लागेल. सुरवातीला व्हेनेत्झुएलामधली जराशी दमट पण हिरवीगार जंगलं रमत गमत पार करून पाय थोडे शिणले की कोलंबियातले कॉफीचे मळे तुम्हाला जरा तरतरी आणतील. तिथून थोडं खाली उतरलात तर इक्वादोर मधले जिवंत ज्वालामुखी लगेच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील. त्यांना लांबूनच हात जोडून ‘परु’त दाखल झालात की अतिशय उंचावर वसवलेलं, ढगांत लपलेलं, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक, माचू पिचू बघून तुम्ही थक्क व्हाल. परू-बोलिव्हिया सीमेवरच्या प्रचंड तितिकाका सरोवरात डुंबायचा आनंद लुटून बाहेर पडता न पडता तोच चिलेतलं अताकामाचं भीषण रखरखीत वाळवंट तुम्हाला लगेच कोरडंठण्ण करून टाकेल. जीव अगदी मेटाकुटीला येईल तेव्हा अर्जेंटिनामधलं अँडीजचं सगळ्यात उंच अंकोकागुआ शिखर, गार फुंकर घालून थोडा दिलासाही देईल. मेंदोसातल्या द्राक्षांच्या मळ्यात, मॅल्बेक वाइनचे दोन घोट घशाखाली गेल्यावर मात्र आत्तापर्यंत झालेली सगळी दगदग क्षणात विरघळून जाईल. पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन बॅरिलोचे, सॅल्टा सारख्या नितांतसुंदर शहरातून फिरत फिरत अचानक तुम्ही पातागोनियाच्या अवाढव्य आणि अतिशय दुर्गम प्रदेशात प्रवेश कराल. इथं फिरतांना शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागेल पण इथले महाकाय पर्वत, अजस्त्र हिमनद्या आणि गर्द निळी सरोवरं तुम्हाला अगदी काठोकाठ तृप्त करून टाकतील. एल चॅल्टेनला 'रॉय'ची गळाभेट घेऊन मजल दरमजल करत, अर्जेंटिनाच्या पार दक्षिण टोकावरच्या उस्वायाला जेव्हा येऊन थांबाल तेव्हा तुमचा सात हजार किमी.पेक्षाही जास्त प्रवास झालेला असेल. या ठिकाणी जमिनीची हद्द संपते. यापुढे सत्ता फक्त समुद्र आणि त्याहीपलीकडे दूर कुठेतरी, दृष्टीक्षेपात नसलेल्या अंटार्क्टिकाची.

1774062659707(1)(1)

तर जगाच्या अगदी टोकावरचं हे उस्वाया. एकीकडे फेसाळता समुद्र तर दुसरीकडे शुभ्र बर्फानं झाकलेले उंच पर्वत अशी निसर्गदत्त देणगी घेऊन उस्वाया उणीपुरी दोन शतकं उभं आहे. एअरपोर्टबाहेर पडलात की डोंगरांच्या पायथ्याशी पसरलेलं हे शांत शहर लगेच प्रेमात पाडतं. याला शहर म्हणावं तर इथं काही गगनचुंबी इमारती नाहीत, दिव्यांचा दिखाऊ झगमगाट नाही किंवा मनुष्यप्राण्यांनी उगाचच ओसंडून वाहणारे रस्ते नाहीत; पण त्याऐवजी देवानं भरभरून दिलेली निसर्गसंपत्ती मात्र उदंड आहे. उस्वायाला कदाचित फारसं काही कृत्रिम मानवतच नसावं. ते काही मिरवत नाही आणि काही लपवतही नाही. जितक्या उघडपणे इथलं सौंदर्य दिसतं तितकंच थेट इथलं रांगडेपणसुद्धा जाणवतं. इथल्या बोचऱ्या, थंडगार वाऱ्यानं नाकाचा शेंडा, कानाच्या पाळ्या लाल होतात. कधी अचानक आलेली पावसाची सर डोक्यावर छत्री धरायला लावते तर कधी अंगावरचं उबदार जॅकेट भिरकावून द्यावसं वाटतं. इथली दिनचर्यासुद्धा घड्याळ नाही तर निसर्ग ठरवतो. उस्वायाचं व्यक्तिमत्त्व त्यामुळंच कमालीचं लवचिक झालंय. निसर्गाशी जुळवून घेतलेलं पण तरीही आपल्याच तंद्रीत जगणारं उस्वाया, नुसतं बघण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे.

Gemini_Generated_Image_dfkd71dfkd71dfkd(1)(1)(1)

PXL_20240405_172305163

मग इथं आवर्जून अनुभवावं असं काय काय आहे? खरं तर सगळंच आहे… कधी एखादी मोटरबोट पकडून अटलांटिक आणि पॅसिफिक या महासागरांना जोडणाऱ्या, सुमारे दीडशे मैल लांब, बीगल सामुद्रधुनीतून फेरी मारून यावी. जगाच्या अगदी टोकावरच्या आणि शेवटच्या लेस् ईक्लेरेउर्र दीपगृहाला वळसा घालून ब्रिजेस् बेटावर घटकाभर थांबावं. इथल्या वातावरणात चिवटपणे जगलेल्या यॅमना आदिवासींच्या संस्कृतीचे अवशेष आणि तेवढ्याच जिद्दीनं तग धरून सावकाश वाढणाऱ्या गुबगुबीत कुशन प्लँट्सचं निरीक्षण करावं. कुणे एके काळी सजीवांची उत्क्रांती कशी झाली याचं संशोधन करण्यासाठी चार्ल्स डार्विन इथवर आला होता. याच लाटांवरुन एके काळी त्याचं एच एम एस बीगल जहाज सुद्धा गेलं असेल, ही जाणीव होऊन आपण क्षणभर काही-शे वर्ष मागे जातो. पण कोण कुठला तो डार्विन, आपल्याला काय त्याचं कौतुक, अशा आविर्भात समुद्रातल्या खडकांवर पसरलेले थुलथुलीत देहाचे, आळशी सी लॉयन्स तेव्हापासून तसेच आरामात लोळत पडलेले असावेत (यांना बघूनही डार्विनने 'सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट'चा सिद्धांत कसा काय बरं मांडला?), बाजूच्याच एखाद्या बेटावर इंपिरियल कॉर्मोरन्ट्सचा कलकलाट तसाच अखंड चालू असेल आणि पेंग्विन्सची नेहमीचीच लगबग तर आजतागायत तसूभरही कमी झालेली नसेल.

Gemini_Generated_Image_fuyduafuyduafuyd(1)

20260414_170951

20260410_134856

PXL_20240405_193309872

दर्यावर्दी साहसाची हौस भागवून झाली की जवळच्याच तिएरा देल फ्युगो (अग्नीची भूमी) नॅशनल पार्कमधल्या ट्रेन देल फिन देल मुंदो (जगाच्या टोकावरची शेवटची आगगाडी) मधे शिरावं. उस्वाया म्हणजे एके काळचं, दक्षिण अमेरिकतलं 'काळे पाणी'. अतिशय कठोर शिक्षा म्हणून अट्टल अपराध्यांना किंवा अगदी राजकीय कैद्यांना सुद्धा इथं पाठवलं जायचं. ते सराईत गुन्हेगार यामुळे रुळावर आलेत का नाही ते काही माहीत नाही, पण त्यांनी अतिशय सराईतपणे ही सुप्रसिद्ध आगगाडी मात्र रुळावर आणली. त्यावेळी इथलं कारागृह, शहर, रस्ते हे सगळं उभारण्यासाठी शेकडो झाडं कापली गेली. लाकूडतोड करायला इथल्याच कैद्यांना जुंपलं जायचं आणि तोडलेली लाकडं वाहून नेण्यासाठी म्हणून या आगगाडीचा जन्म झाला. गाडीतल्या प्रवासाच्या एका टप्प्यात त्या कापलेल्या झाडांचे हातभर उंच खुंट सर्वदूर दिसतात. तो भाग आज झाडांचं स्मशान म्हणून ओळखला जातो ते काही उगाच नाही. खरं तर या इतक्या खडतर वातावरणात झाडं पूर्ण वाढायला खूप काळ लोटतो त्यामुळं वाटतं, या जखमा कशा अन् कधी भरून निघणार?

20260411_171802

वाटेवरच्या एका छोट्या स्टेशनात धूर सोडत गाडी जरा वेळ उभी राहते. प्रवासी लगबगीनं बाजूच्या जंगलात लपलेला, लहानसा माकारिना धबधबा बघून येतात. परतीच्या वाटेवर कैद्यांचा वेश घालून अभिनय करणारे खोटे कैदी फोटो सुवेनरचं आमिष दाखवून अधिकृतपणे खऱ्या प्रवाशांचे खिसे कापतात. पिको नदीच्या कडेकडेने, धुरांच्या रेषा काढत, शीळ घालत, गाडी हळूहळू पुढे धावते.

Gemini_Generated_Image_10hau010hau010ha(1)(1)

या प्रवासातलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुक्तपणे सर्वत्र हुंदडणारे बग्वालेस (जंगली घोडे). एके काळी स्पॅनिश वसाहतवाद्यांनी यांना आपल्याबरोबर आणलं आणि काम संपल्यावर बिचाऱ्यांना तसंच वाऱ्यावर सोडून दिलं. आता या जंगलात प्रामुख्यानं त्यांचीच वसाहत आहे. पूर्वी अतोनात राबवून घेतलेले पण आता गुलामगिरीतून मुक्त झालेले, अत्यंत दणकट असे हे वारू आता मात्र मनुष्यप्राण्यापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. मोकळ्या मैदानातून, पाणथळीतून, लेंगा वृक्षांच्या गर्द झाडीतून वाट काढत आगगाडी धावत असते आणि अचानक एखाद्या वळणावर पांढराशुभ्र, धष्टपुष्ट स्टॅलियन वाऱ्यावर आपली घनदाट झुल्फं उडवत, बेफिकीरीनं आपल्याकडे बघतांना दिसतो. ते दृश्य अगदी स्वप्नवत वाटतं. जेमतेम एका तासाच्या या प्रवासात मन काही तृप्त होत नाही. तेव्हा परतीचं तिकीट काढावं आणि पुन्हा त्याच वाटेनं खिडकीच्या दुसऱ्या बाजूचे, मघाशी निसटून गेलेले देखावे बघावेत.

Gemini_Generated_Image_y3szaoy3szaoy3sz(1)(1)(2)

गिर्यारोहणाची हुक्की आली असेल तर मार्शल ग्लेशियरच्या मोहिमेवर निघावं. उस्वायामागच्या डोंगरातून मार्शल ग्लेशियर वाहते. एखाद्या हळव्या पुणेकराची, “पूर्वीचं पुणं राहिलं नाही” ही हळहळ इथल्या स्थानिकांमध्ये, अगदी त्याच तीव्रतेनं मार्शल ग्लेशियरबद्दल जाणवते. हवामानात झपाट्यानं होत असलेल्या बदलांमुळे भराभर आटत चाललेल्या हिमनद्यांमध्ये मार्शल ग्लेशियरचाही अपवाद नाही आणि नुकतेच एल कलाफातेची अजस्त्र पेरितो मोरेनो ग्लेशियर बघून आला असाल तर त्यापुढे ही हिमनदी अगदीच पिटुकली वाटू शकते. बीगल चॅनेल पाठीशी ठेऊन, नागमोडी रस्त्यावरून चालू लागावं. फार कष्ट नको असतील तर उशुवायातून ग्लेशियर पर्यटन केंद्रापर्यंत टॅक्सी करावी आणि तिथून पायी निघावं. चढण जसजशी तीव्र होते तसतसा इथला रागरंग बदलतो. जरा वेळापूर्वी अतिशय मोहक आणि रंगीबेरंगी असलेला आजूबाजूचा निसर्ग अचानक अक्राळ विक्राळ अवतार घेतो. अनाहूतपणं येऊन धडकलेलं एखादं हूड हिमवादळ, आपला पुरता धुव्वा उडवतं. त्यामुळं डोक्यावर 'हूड' असलेलं गरम जॅकेट, हातमोजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम स्नो बूट्स अशा जय्यत तयारीनं मोहिमेवर जावं. अन्यथा पानिपत अटळ आहे. पण ग्लेशियरची मोहीम फत्ते होवो अथवा न होवो, केलेल्या कष्टांची पोचपावती म्हणून पर्यटनकेंद्राबाजूच्या रस्टिक बारमधली, थंडगार बियरची एखादी पाईंट स्वतःला बक्षीस म्हणून द्यावी. लहान लहान घोट घेत, समोर पसरलेला निळाशार बीगल चॅनेल बघत, हवा तेवढा वेळ आरामात बसावं.

Gemini_Generated_Image_fm691tfm691tfm69(1)(1)

PXL_20240407_141625949

PXL_20240407_143132259

20260411_172254

Gemini_Generated_Image_k6pqdek6pqdek6pq(1)(1)(1)(1)

20260411_172825

दिवेलागणीची वेळ झाली की अंगावर उबदार जॅकेट चढवून सॅन मार्टिन ॲव्हेन्यूवर फिरायला निघावं. सुवेनर शॉप्स, स्थानिक हस्तकला, ब्रँडेड वस्तू, कॅफेज् आणि रेस्टॉरंट्सनी हा रस्ता फुललेला असतो. जॅकेटइतकाच खिसाही गरम असला तर थोडं शॉपिंग करायलाही हरकत नाही. फार नाही तरी एक आपली आठवण म्हणून लाईट हाऊस किंवा पेंग्विन्स असलेलं एखादं किचेन नाहीतर छोटंसं फ्रिज मॅग्नेटच घ्यावं. एके काळी या ठिकाणी प्रामुख्यानं कैद्यांचाच सुळसुळाट होता हे ठिकठिकाणी कैद्यांचे गमतीदार पुतळे बघून कळतं. एखाद्या दुकानातला मॅनेक्विन कैद्याच्या पोशाखात काचेमागे उभा असतो, कधी दुकानाबाहेर नकाशा घेऊन उभा राहतो. एखादा दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून डोकावून रस्त्याकडे बघत असतो तर कुठेतरी पोलिसाला चुकवून उंच इमारतीवरून दोरखंडानं खाली उतरतांना दिसतो.

Gemini_Generated_Image_92uu2892uu2892uu(1)

20260411_175057

तफरी करून करून पाय थकले की कुठल्यातरी रेस्टॉरंट मधे शिरून पॅटागोनियन बियर नाहीतर वाइनचा आस्वाद घेत श्रमपरिहार करावा. इथल्या पॅटागोनियन ब्रुवरी मध्ये बियर बरोबर मंचिंग म्हणून पॉपकॉर्न्स देतात; छान लागतात. भूक चाळवल्या गेली तर सदाबहार फिश अँड चिप्स, अर्जेंटेनियन स्टेक्स किंवा मंद आचेवर भाजलेली लुसलुशीत कोर्देरो (मेंढी) तर असतेच पण इतक्या लांब येऊन इथला सेंतोयाह् नहीं खाया तो क्या खाया? सेंतोयाह् म्हणजे किंग क्रॅब. रेस्टॉरंटबाहेर काचेच्या लांबरुंद टाक्यात, मोठमोठे, लालसर गुलाबी रंगाचे काटेरी किंग क्रॅबस् ठेवलेले असतात. आपल्याला हवा तो निवडावा आणि स्वयंपाकघरात पाठवून द्यावा. मत्स्याहारात खेकड्याला सर्वोच्च स्थानी जरी ठेवलं तरी खेकड्याला त्याची काडीचीही किंमत नसते. एकदा का पोटात गेला की तो पुरेपूर सूड उगवतोच. त्यामुळं योग्य ती खबरदारी घ्यावी. उदाहरणार्थ, रेस्टॉरंट पासून आपलं हॉटेल जवळच असावं किंवा लगेच कुठला लांबचा प्रवास नसावा वगैरे… म्हणूनच, खेकड्याचे दोन्ही बाहू पकडून टँगो डान्स करता येईल एवढे मोठाले खेकडे जरी हाताशी असले तरी बोटांनी धरता येईल इतपतच आकाराचा खेकडा निवडावा. खरं तर भरपूर लोणी-लसूण घालून शिजवलेला आणि वर फक्त मिठ-मिरी शिंपडलेला खेकडा म्हणजे 'चैनीची परमावधी'. पण मूळ चव घ्यायची असेल तर खेकडा नुसता उकडून खावा असं शास्त्र आहे. जमत असल्यास पाळावं.

Gemini_Generated_Image_ccekirccekirccek(1)

20260411_175545

20260411_180042

20260411_173528

काहीच करायचं नसेल तर लागो रोकाच्या काठावर जाऊन नुसतं बसावं आणि तिथल्या लाटांचा, एका संथ लयीत येणारा, “चुबुक डुबुक” आवाज ऐकावा. कुठल्याही कृत्रिम संगीतापेक्षा हा आवाज कित्येक पटींनी सरस वाटतो. बसून बसून बूड फारच आखडलं तर काठाकाठानं लेंगा वृक्षांच्या झाडोऱ्यातून, ओलसर खडकाळ डगरीवरनं लांबवर रपेट मारून यावी. इथल्या नितळ पाण्याइतकाच एकांतही इथं अगदी तुडुंब भरलेला असतो.

Gemini_Generated_Image_f8v51rf8v51rf8v5(1)

PXL_20240406_155712923

20260411_180544

सुप्रसिद्ध पॅन अमेरिकन हायवे, अलास्कातल्या प्रुधो बे हून सुरू होतो आणि हजारो मैल प्रवास करून शेवटी तिएरा देल फ्युगोतल्या बाहिया लापातायाशी येऊन लापता होतो. तशी इथं पाटीही लावलेली आहे. तुम्ही कधीतरी या इथे, जगाच्या अगदी टोकावर येऊन गेला होतात याचा भक्कम पुरावा जवळ ठेवायचा असेल तर इथल्या पोस्टल फिन देल मुंदो मधे जा. लहानश्या, लाकडी केबिनवजा पोस्ट-ऑफिसमधला पोस्टमन तुमच्या पासपोर्ट वर तसा शिक्का उमटवून देईल.

1774062224361(1)(1)

Gemini_Generated_Image_9ib4zq9ib4zq9ib4(1)

PXL_20240406_172340408

PXL_20240406_171655077

PXL_20240406_172039057

फिन देल मुंदो म्हणजेच जगाचा शेवट अशी ओळख मिळाली असली, तरी उस्वाया काही शेवट नाही. मोठमोठी जहाजं समुद्रात नांगर टाकून शांतपणं पुढच्या प्रवासासाठी आपापल्या कप्तानाच्या आदेशाची वाट बघत असतात. अंटार्टिकाच्या सफरीवर निघालेल्या एखाद्या साहसी सिंदबादासाठी ही तर सुरवात असते. माझ्या अर्जेंटिना भ्रमंतीचा मात्र हा शेवट होता. अद्भुत निसर्ग, पुरातन संस्कृती, नाना रहस्यं आणि आश्चर्यांनी भरलेला अँडिजचा हा जाडजूड ग्रंथ संपूर्ण वाचायला कधी मिळेल का? माहीत नाही. पण दैवकृपेनं त्यातली अधली मधली काही पानं आणि शेवटच्या पानांवरचं उस्वाया थोडंफार तरी का होईना, मी चाळून आलोय.

PXL_20240407_210715537~2-01

*इति*
***यातील ॲनिमेटेड चित्रे AI ने बनवलेली आहेत***
***अर्जेंटिनामधलं उस्वाया हे जरी शेवटचं शहर असलं तरी चिलेतलं केप हॉर्न हे दक्षिण अमेरिकेचं शेवटचं टोक***

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...