Sunday, November 27, 2022

सीएटल, माऊंट रेनिअर

 https://www.maayboli.com/node/82717

पाच वर्षांपूर्वी आमची मोठी कन्या मास्टर्स डिग्रीसाठी अमेरिकेत गेली आणि तिनं तिकडेच बस्तान बसवलं. पाठोपाठ दोन वर्षांनी धाकटीही गेली आणि मास्टर्स नंतर तीही तिकडेच नोकरीला लागली. त्याआधी मेहुणी अमेरिकेतच स्थायिक झालेली. सर्वांचा आम्हाला अमेरिकेस येण्याचा आग्रह बरेच दिवस सुरु होता. पण अनेकदा जवळजवळ ठरलेला कार्यक्रम कुठे तरी माशी शिंकायची आणि रद्द व्हायचा. शेवटी गेल्या डिसेंबरमध्ये मोठ्या मुलीच्या लग्नानंतर आमचा अमेरिकावारीचा प्लॅन आकार घेऊ लागला आणि गेल्या 24 में रोजी अमेरिकेतील सीएटल शहराच्या विमानतळावर आमच्या आगमनाने तो मूर्त स्वरूपात आला. निघताना पत्नीने मुली आणि बहिणीसाठी बॅगांमध्ये ठुसलेले मसाले, लोणची, सुकी मच्छी सारखे पदार्थ, आतापर्यंत ऐकलेले अनुभव आणि सल्ले पाहता अमेरिकन कस्टम्सच्या नजरेतून सुटतील याची शाश्वती नव्हती. पण बहुतेक त्यादिवशी कस्टम्स अधिकाऱ्यांचा मूड चांगला होता त्यामुळे आमचं सर्व सामान विनातपासणी बाहेर निघालं....आणि..अजूनही आंबे वगैरे सारख्या वस्तू घेता आल्या असत्या आणि त्या घ्यायला मी आडकाठी केल्याबद्दल एअरपोर्टवरच माझी कानउघडणी झाली.

विमानतळाबाहेर स्वागताला सीएटलला राहणारी धाकटी कन्या हजर होतीच. घरी पोचल्यावर ताजतवान होऊन जेवण झाल्यावर मस्त ताणून दिलं ते संध्याकाळपर्यंत. तशी या मोसमात इथे संध्याकाळ रात्री नऊ साडेनऊला होते म्हणजे रात्री नऊपर्यंत चक्क ऊन. परदेशवारीचा जेट लॅग मला मात्र जाणवला नाही (याच कारण म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागण्याची माझी सवय हेच असावं). मुलीच अपार्टमेंट अगदी सीएटल बंदराच्या समोरच त्यामुळे सकाळी उठल्यावर बाल्कनीत बसून चहा घेत घेत समोर बंदरात येजा करणाऱ्या मोठमोठ्या प्रवासी क्रूझ, मालवाहू बोटी, लहान मोठ्या सुंदर शिडाच्या खाजगी होड्या पहाण हा माझा दुसऱ्या दिवसापासूनचा दिनक्रमच बनला. 

 

या बंदरात अनेक अजस्त्र धक्के (Piers), त्यातला एक तर तरंगता. या धक्क्यावर हॉटेल्स, निरीक्षण मनोरे, महाकाय मेरी गो राऊंड, मत्स्यालय यासारखी पर्यटकांना आकर्षित करणारी मनोरंजनाची अनेक साधन आहेत. किनाऱ्याच्या दुसऱ्या अंगाने एक सुंदर पार्क आहे. ज्यात वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक सारख्या सुविधा आहेत. पहिल्या दोन तीन दिवसांत आजूबाजूच्या परिसराचा प्राथमिक धांडोळा झाल्यावर सौच्या साथीने आमची स्थानिक भटकंती सुरू झाली. इथे छान छान इलेक्ट्रिक दुचाकी भाड्याने मिळतात. त्या पाहून इथल्या मुक्कामात त्यावरून एक तरी सैर करण्याचा इरादाही पक्का झाला.
IMG-20220719-WA0038.jpg
सीएटल हे अमेझॉन कंपनीच प्रमुख बिझिनेस सेंटर. इथला एक अवेन्यू अमेझॉनच्या उंच उंच इमारतीनीच व्यापला आहे. या इमारती पण पाहण्यासारख्या. त्यातली काचेच्या तीन घुमटांची अमेझॉन स्फीयर ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत एक पर्यटन स्थळच. यामध्ये जगभरातील विविध वनस्पतींच्या सांनिध्यात बसून अमेझॉन कर्मचारी काम करू शकतात. दर शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर अमेझॉन कर्मचाऱ्यांचे नातेवाईक ही इमारत आतून पाहू शकतात. कन्या अमेझॉन मधेच कार्यरत असल्याने अमेझॉनचा हा कार्यालयीन कामकाज करताना कर्मचाऱ्यांना निसर्गाच्या सांनिध्यात घेऊन जाणारा अप्रतिम अविष्कार अनुभवण्याची संधी आम्ही घेतली.

पाइक प्लेस मार्केट...सीएटलमधल वैशिष्ट्यपूर्ण मार्केट
सीएटलमधल इलीयट बे ला लागूनच असलेलं पाइक प्लेस मार्केट माझ्या मुलीच्या रहाण्याच्या ठिकाणापासून दहा मिनिटांवर. 1907 साली सुरू झालेल हे अमेरिकेतल सर्वात जुन्या आणि सुरू असणाऱ्या पब्लिक फार्मर्स मार्केट्सपैकी एक. शेतमाल, हॅन्डीक्राफ्टस् आणि इतर पाचशेच्या वर दुकानं असलेल हे मार्केट सिएटलमधल सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ. दर वर्षी जगभरातुन 10 दशलक्षाहून अधिक पर्यटक इथे येतात आणि सर्वाधिक पर्यटक भेट देणाऱ्या जगातील पर्यटन स्थळांच्या क्रमवारीत या मार्केटचा 33 वा नंबर लागतो. मार्केटच्या चार स्तरांवर (levels) प्राचीन वस्तू, कॉमिक्स, खेळणी, पुस्तक, संग्रहणीय वस्तू, ताजा शेतमाल, मासे-मटण आणि इतर विविध प्रकारची दुकान आणि रेस्टॉरंटस् आहेत. स्थानिक शेतकरी आणि कारागीरांना माल विकण्यासाठी इथे टेबल स्पेसहि मिळते. Allowing consumers to "Meet the Producer" हे या मार्केटच ब्रीदवाक्य. मार्केटचा विस्तार आणि वैविध्य एवढ मोठ की पूर्ण मार्केट फिरायला एक दिवस अपुराच.

मार्केटच्या एका गल्‍लीत चूइंग गम पासून बनलेली एक अनोखी रंगीबेरंगी ‘ गम वॉल’ आहे. 1990 च्या दशकात इथल्या ‘Unexpected Productions’ थिएटरच्या कलाकारांनी चघळलेला गम या गल्लीच्या भिंतींवर चिकटवण्यास सुरवात केली आणि त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांच अनुकरण केल्याने या गमचा विस्तार वाढत त्याने दोन्ही भिंती व्यापून गेल्या. हळू हळू ही रंगीबेरंगी लक्षवेधी कलाकृति पर्यटकांच्या कुतुहलचा विषय बनली. इथे येणारे सर्व पर्यटक या वॉलला भेट तर देतातच पण तिचा विस्तार वाढवायला आपला हातभारही लावतात.IMG_20220530_123224.jpg
मार्केटमध्ये ब्रॉन्झची एक मोठी पिगी बँक आहे. या पिगी बँकेला ‘राचेल’ हे एका खऱ्या डुकराच नाव दिल आहे. यात टाकलेले पैसे मार्केट फाउंडेशनच्या फंडाला जातात. राचेलची लोकप्रियता एवढी की ती या मार्केटचा राजदूत (Mascot) आहे.

माझ्यासारख्या मत्स्यप्रेमीसाठी या मार्केटमधल मोठ आकर्षण म्हणजे त्यातल फिश मार्केट. अमेरिकेत कुठेही ताज्या माशांची डिलिव्हरी एका रात्रीत द्यायची ग्वाही इथे दिली जाते. त्यामुळे माशांची दुकानं दिसताच आमचे पाय लगेचच तिकडे वळले. दुकानात फिश टेबलवर अनेक प्रकारचे मोठमोठे मासे, कोळंबी, खेकडे, किमतीच्या लेबल्ससह बर्फात रचून ठेवलेले. पण किमतीत नो घासाघीस..... कोळणीशी घासाघीस करूनच मासे घ्यायची अंगी मुरलेली सवय....आणि कोळणीच्या जागी असलेले हट्टे कट्टे ‘कोळणे’ पाहूनच मासे खरेदीतला आमचा उत्साह तिथेच मावळला... त्यातही कोळंबी, खेकडे वगळता दिसणारे मोठमोठे अनोळखी मासे पाहून आमची मत्स्यभूक फक्त निरीक्षणावरच भागली. या दुकानांमधला जगप्रसिद्ध फिश शो मात्र पाहण्यासारखा. गिऱ्हाइकाने साल्मन सारखा एखादा मोठा मासा निवडल्यावर दुकानातला कर्मचारी तो मासा पॅकिंग काउंटरवरच्या कर्मचाऱ्याकडे हाताने नेऊन देण्याऐवजी ऑर्डरचा पुकारा करत त्याच्याकडे फेकतो आणि पॅकिंग काउंटरवरचा कर्मचारी त्या माशाला झेलून साफ करून पॅक करतो. गिऱ्हाईकाची तयारी असेल तर त्यालाही मासा फेकण्याची संधी मिळते. हा शो पाहायला पर्यटकांची गर्दी जमते.

गिटार वादक, पियानोवादक, फिडलर्स, वाद्यवृंद, मॅजिक शो, जगलर्स सारखे आपापले कलाविष्कार पेश करून पोट भरणारे स्ट्रीट परफॉर्मर्सही (Buskers) या मार्केट मध्ये अनेक ठिकाणी दिसतात. पण कोणीही त्याबद्दल पैसे मागताना दिसत नाही... सगळा खुशीचा मामला.. वाटल तर समोरच्या पेटीत टाका.. नाही तर जो देगा उसका भला..ना देगा उसका भी भला.....
IMG-20220609-WA0026.jpg
एक खास बात स्टारबक्स कॉफीप्रेमींसाठी......स्टारबक्स कॉफी स्टोअर्स आज जगात कानाकोपऱ्यात आहेत. पण जगातला पहिला स्टारबक्स स्टोअर सिएटलमध्ये याच पाईक प्लेस मार्केट समोर आहे. पाईक प्लेस मार्केट ऐतिहासिक ठिकाण असल्याने या स्टारबक्स स्टोअरच्या मूळ रचनेत अजिबात बदल झालेला नाही. अगदी मूळ स्टारबक्स लोगोही तसाच आहे. पण इथे इतर स्टारबक्स स्टोअर्ससारख आरामात बसून कॉफीचा आस्वाद घेता येत नाही कारण जागेअभावी इथे टेबल खुर्च्या नाहीत.....

मार्केटचा असाच फेरफटका मारताना एक सिगरेटस, चिरूटसारख तंबाखूजन्य वस्तु विकणारं दुकान दिसल. दर्शनी भागात अनेक प्रकारचे चिरूट, पाईप्स, तंबाखू पाउच, सिगरेट लायटर्स, टी शर्टस आणि इतरही बरीच चित्रविचित्र कधी न पाहिलेली सामग्री विक्रीसाठी ठेवलेली. कुतुहलापोटी चौकशी केली तर समजल की ते सीएटलमधल सर्वात जुनं Head Shop होत.IMG-20220609-WA0024.jpg आता Head Shop हा शब्द पहिल्यांदाच ऐकलेला.....मग गूगल बाबाची मदत घेतली तेव्हा कळल.. .ते Cannabis (भांग, गांजा), तंबाखू सारख्या अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारी सामग्री आणि संबंधित वस्तूंच्या किरकोळ विक्रीच दुकान होत. सीएटलमधील आमच्या मुक्कामात या मार्केटच्या खूप फेऱ्या झाल्या आणि या मार्केटची अनेक वैशिष्ट्य माहिती झाली. (क्रमश:)
IMG-20220609-WA0027.jpg


अरे वा! सिअ‍ॅटलवर मालिका!! सिअ‍ॅटलात स्वागत. माऊंट रेनिअर चक्कर झाली असेलच तुमची अर्थात, त्यावर लिहीणार असालच. माझाही लेख पाहून घ्या Happy https://www.maayboli.com/node/50426 (उगीच आपली माझी रिक्षा!)

आमची अमेरिका वारी….. (प्रशांत मठकर)

सीएटल- भाग 2
लीव्हनवर्थ

वीकएंडला जोडून सुट्टी आली की इथला ‘लॉन्ग वीकएंड’. अशा वीकएंडला इथला नोकरदार वर्ग सहकुटुंब पिकनिकसाठी बाहेर पडतो. जवळपासची पिकनिकची ठिकाणी अशा वेळी गर्दीने ओसंडून वहात असतात. त्यात सध्या इथला स्प्रिंग सीझन म्हणजे वातावरण एकदम उत्साही. मग आमचाही अशाच एका वीकएंडला पिकनिकसाठी सिएटल जवळच्या लीव्हनवर्थ या ठिकाणी जायचा बेत ठरला. सिएटलपासून 150 किलोमीटरवर कॅस्केड पर्वतांच्या पायथ्याशी पारंपारिक पर्वतीय जर्मन शहराच्या धर्तीवर वसलेल हे शहर पर्वतीय रांगांच नैसर्गिक सौंदर्य आणि दक्षिण जर्मनीच्या बव्हेरियन आल्प्स प्रदेशाशी असलेल साम्य यामुळे पिकनिक स्पॉट आणि हिवाळी खेळासाठी प्रसिद्ध. दर वर्षी नोव्हेंबर ते मार्च या काळात इथल्या जागतिक दर्जाच्या अल्पाइन स्की आणि स्नोबोर्ड रिसॉर्ट्स मध्ये राहून स्कीइंग, स्की जम्पिंग सारख्या हिवाळी खेळांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. हे गांव ‘Living Snow Globe’ म्हणूनही ओळखल जात. आमच सारथ्य करायची जबाबदारी लेकीच्या मैत्रिणीने घेतल्याने जाण्यासाठी एक सेल्फ ड्राइव कार घेऊन सकाळी अकरा वाजता आम्ही निघालो. लीव्हनवर्थला जाणारा रस्ता राखीव जंगल, बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि सरोवरांच्या सोबतीने जातो. उंच उंच झाडांच्या मधून जाणाऱ्या या रस्त्याच्या आसपासच्या कुरणांमधून कुठतरी हरणांचे कळप बागडताना दिसत होते. काही ठिकाणी डोंगरावरून वितळणारा बर्फ अगदी रस्त्याच्या कडेपर्यंत पसरलेला दिसत होता. पण फ्री वे आणि राखीव जंगल असल्याने बर्फात खेळण्यास किंवा फोटोग्राफीला वाव नव्हता त्यामुळे कार मधूनच भोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आणि जमेल तेवढी फोटोग्राफी करत आम्ही दुपारी दोनच्या सुमारास लीव्हनवर्थला पोहोचलो.
IMG_20220528_140145_0.jpg
गाडी पार्क करून प्रथम पोटपूजेसाठी निघालो. पार्किंगला लागूनच बाजार आणि पादचाऱ्यांसाठी राखीव मध्यवर्ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला कपडे, स्थानिक हस्तकला, मध, फळं आणि त्यापासून बनलेले विविध पदार्थ, इथली आठवण म्हणून घेण्यासारख्या छोटया छोट्या वस्तु, यासारखी असंख्य दुकान, जिव्हालौल्य पुरविणारी हॉटेल्स आणि वारुणीप्रेमींच खास आकर्षण म्हणजे वायनरीज आणि Breweries ची Testing Outlets. Market.jpgसुट्टीचा दिवस असल्याने सगळीकडे पर्यटकांची गर्दी. अशाच एका Wine Testing Outlet मध्ये डोकावलो असता सहा डॉलरला सहा प्रकारची एक एक ग्लास वाईन अशी लूभावणारी ऑफर दिसली. लेक आणि तिची मैत्रीण मला ती ऑफर स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या पण सहा ग्लास रिते करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अभाव..आणि सौच्या कपाळावरची सूक्ष्म आठी पहाता मी गुपचुप जेवणासाठी हॉटेलमध्ये शिरलो. पण जेवताना मात्र इथल्या स्वीट रोज वाईनच्या एका ग्लासची चव घेतलीच. व्यवस्थित पोटपूजा झाल्यावर मार्केटच्या मधूनच जाणाऱ्या रस्त्याकडेची विविध वस्तूंनी सजलेली दुकान पहात छोटी मोठी खरेदी करत आमच लीव्हनवर्थ दर्शन सुरू झाल. IMG_20220528_185522Livenworth .jpgएक दोन मजली दुकान फक्त ख्रिसमसला लागणाऱ्या सर्व साहित्याच...विविध प्रकारची सुंदर ख्रिसमस ट्रीज, सांता क्लॉज, लाइट्स इत्यादि वस्तुनी दुकानाचे दोन्ही मजले व्यापलेले. हा गाव ख्रिसमस लाइट फेस्टिवलसाठीही प्रसिद्ध. डिसेंबरमध्ये या फेस्टिवलसाठी इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. आणखी एक आकर्षण म्हणजे अडकित्त्यांच संग्रहालय (Nutcracker Museum) ज्यात जगभरातील पाच हजारपेक्षा जास्त अडकित्ते आहेत. पण आमच दुर्दैव म्हणजे हे संग्रहालय दुपारी एक ते पाच या वेळेतच उघड असत आणि आम्ही तिथे पांचनंतर पोहोचलो. मार्केटचा एक भाग स्थानिक चित्रकारांनी काढलेली चित्र आणि हस्तकलाकृतींच्या विक्रीसाठी राखीव, त्यात दहा वीस डॉलर पासून पाच हजार डॉलर किमतीची चित्र विक्रीसाठी ठेवलेली होती. Buggy.jpgबाजाराचा फेरफटका झाल्यावर इथल्या ‘वेनाची’ नदीच्या किनाऱ्याने जाणाऱ्या ट्रेलने केलेला छोटासा ट्रेक आमच्या पिकनिकचा हाय पॉइंट.. अविस्मरणीय अनुभव..River.jpgनदीच्या किनाऱ्याने जंगलातून पायवाटेने जाणारा रस्ता.. वळणावर अचानक समोर अनोखा नजारा घेऊन येणारा..दूरवर कुठेतरी दिसणारी संधिप्रकाशात न्हाऊन निघालेली छोटी छोटी घर.... सोबत घरट्यात परतणाऱ्या विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाच आणि वाहत्या पाण्याच पार्श्वसंगीत...IMG_20220528_170733.jpgकिती फोटो काढावे नी किती डोळ्यात साठवाव..निसर्गाचा ओंकार ऐकवत डोळे आणि मन शांत करणारा तो अनुभव....वाटत होत की तिथून हलूच नये.. पण संध्याकाळचे आठ वाजत आले होते आणि परतीच्या प्रवासाचा वेळ झाला होता त्यामुळे जड अंत:करणाने लीव्हनवर्थला अलविदा करून आम्ही मार्गस्थ झालो.
Trees.jpg
या सर्व भागातून फिरताना प्रकर्षाने जाणवलेली इथली स्वच्छता. सर्व भाग पर्यटकानी गजबजलेला असूनही, कसलेही बोर्डस, सूचना किंवा गार्डस तैनात नसताना कुठेही कचरा फेकलेला दिसला नाही. प्लास्टिक पिशव्या तर अजिबातच नाही.. लहान मुलंसुद्धा कचरापेटीतच कचरा टाकताना दिसत होती. अगदी जंगलातल्या पायवाटेवरहि फक्त झाडांच्या पालापाचोळ्यांचा नैसर्गिक कचरा....आपल्याकडील पर्यटन स्थळ, डोंगर-जंगलातील ट्रेकिंग ट्रॅक्सच्या आसपास फेकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, गुटक्याची पाकीट यासारख्या कचऱ्याचे ढीग पहायची सवय झालेल्या आमच्या डोळ्यांना अगदी चुकल्या चुकल्या सारख वाटत होत. स्वच्छता हा गुण अंगभूत असण किती गरजेच आहे या विचाराने लीव्हनवर्थवरुन परतताना अंतर्मुख केल.

डिसेप्शन पास स्टेट पार्क… डिसेप्शन पास ब्रिज

‘डिसेप्शन पास स्टेट पार्क’ या अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यामधील राष्ट्रीय उद्यान आणि तिथल्या प्रसिद्ध डिसेप्शन पास ब्रिज विषयी पूर्वी थोडफार वाचल होत त्यामुळे या पार्कविषयी कुतूहल होतच. हे पार्क सीएटलपासून फक्त साठ मैलांच्या अंतरावर. एका रविवारी दुपारी एकच्या सुमारास आम्ही व्हिडबे बेटावर या पार्कजवळच्या ओक हार्बर या शहरात पोचलो.
DSC_0219.jpg
‘डिसेप्शन पास’ ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील व्हिडबे आणि फिडाल्गो या दोन बेटाना विभागणारी सामुद्रधुनी. जून 1792 मध्ये ब्रिटिश एक्सप्लोरर कॅप्टन जॉर्ज व्हँकुव्हरच्या शोधमोहिमेतील एचएमएस डिस्कव्हरीचे मास्टर आणि मुख्य नेव्हिगेटर जोसेफ व्हिडबे यांनी सिद्ध केलं की हा पास म्हणजे स्पॅनिश खलाश्यांच्या मानण्याप्रमाणे छोटीशी खाडी नसून ‘Juan de Fuca’ सामुद्रधुनीला साराटोगा पॅसेजशी जोडणारी आणि व्हिडबे आणि फिडाल्गो या दोन बेटाना विभागणारी एक खोल आणि खवळलेली सामुद्रधुनी आहे. हा पास पार करण्याच्या अगोदरच्या प्रयत्नात व्हिडबे बेट हे द्वीपकल्प आहे अशी दिशाभूल झाल्याने कॅप्टन व्हँकुव्हरने या पासला " डिसेप्शन पास" हे नाव दिलं.
Deception I.jpg
उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, खडकाळ भूभाग, घनदाट जंगल, छातीत धडकी भरवणारा उंच पूल आणि खाडीतून होणारं विहंगम सूर्यास्त दर्शन यामुळे हे उद्यान स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच आवडीच ठिकाण. सरोवरात मासे पकडणं, पोहणं, समुद्रकिनाऱ्यावर शंख शिंपले गोळा करणं, जंगल आणि कडेकपारीमधून हायकिंग, ट्रेकिंग, पक्षी निरीक्षण या सर्व वयोगटांच्या लोकांच्या आवडीच्या गोष्टी इथे आहेत.
DSC_0247_1.jpg
या फिडाल्गो आणि व्हिडबे बेटांना जोडणारा, वायव्य पॅसिफिक भागातल निसर्गरम्य आश्चर्य म्हणून ओळखला जाणारा डिसेप्शन पास ब्रिज हे इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण. 20 व्या शतकाच्या सुरवातीच्या काळात या दोन बेटांमध्ये वाहतुकीसाठी फेरीबोटीचा वापर केला जाई. या फेरीला बोलविण्यासाठी प्रवासी करवतीवर धोपाटण्याने (Mallet) आवाज करीत. या बेटांना जोडणाऱ्या दोन पूलांच काम ऑगस्ट 1934 मध्ये सुरू होऊन 31 जुलै 1935 रोजी ते वाहतुकीसाठी खुले झाले. या दोन पूलाना ‘डिसेप्शन पास ब्रिज क्रॉस डिसेप्शन पास’ म्हणून एकत्रितपणे ओळखल जातं. Deception Bridge.jpg1982 साली या पूलाची राष्ट्रीय ऐतिहासिक ठिकाण म्हणून नोंद झाली. पूलाची पाण्यापासून रस्त्यापर्यंतची उंची साधारणपणे 18 मजली इमारतीएवढी आणि लांबी पाऊण मैलापेक्षा जास्त आहे. ऊंची आणि दाट धुकं यामुळे या पूलाची गणना अमेरिकेतील दहा भीतीदायक पूलांमध्ये केली जाते. IMG-20220615-WA0026.jpgपुलाच्या दोन्ही बाजूना पादचाऱ्यांसाठी जेमतेम एकजण जाऊ शकेल एवढी अरुंद वाट आहे. पण भणाणणारा थंडगार वारा, पूलाची ऊंची आणि खाली वाहणारं गर्द हिरव पाणी यामुळे या वाटेनं पूल पार करण आमच्यासाठी जरा धाडसाचच. जेमतेम 100 मिटर गेल्यावरच आणखी पुढे जायची हिम्मत होईना....तरी त्यावेळी तिथे धुकं नव्हत..
Beach.jpgIMG_6561A.jpg
या जंगलामध्ये बरेच लहानमोठे ट्रेल्स आणि तंबू ठोकण्यासाठी जागाही (Camping Sites) आहेत. एक ट्रेल तर पुलाच्या बाजूनेच थेट खालच्या ‘Little North Beach’ किनाऱ्यावर उतरतो. आम्हीही पार्कच्या घनदाट जंगलामध्ये थोडी भ्रमंती करून सूर्यास्त पाहण्यासाठी किनाऱ्यावर आलो. किनाऱ्यावर विविध आकाराच्या आणि रंगांच्या दगडांचा सडाच पसरलेला. गोळा करावे तेवढे थोडेच. इथे आम्हाला समुद्रात मजेत पोहणाऱ्या सीलच दर्शनही झालं. Sunset ii .jpgसमोरच्या क्षितिजावर चाललेला सूर्यास्ताचा रंगीन नजारा डोळ्यात साठवत उंचच उंच वृक्षांमधून पार्किंग बे कडे जाणाऱ्या सुंदर पायवाटेने आम्ही परतीच्या प्रवासाला सुरवात केली..... (क्रमश:)

मागच्या अमेरिका वारीतल्या लीवनवर्थच्या खूप आठवणी तुमच्या लेखाने जाग्या केल्या. आम्ही ऑक्टोबरफेस्ट दरम्यानच तिथे होतो त्यामुळे जर्मनीला न जाताही बीअर फेस्टिवलचा मोहोल काय असतो त्याचा खूप छान अनुभव घेता आला. त्या दरम्यान पर्यटकांची गर्दी अगदी पूर्ण लीवनवर्थ मध्ये मावत नाही. थंड हवा, फॉल सीझन, डोंगररांगा, हवेत विरत जाणारे ख्रिस्मस जिंगल्स आणि बव्हेरिअन स्टाईल दुकाने, रेस्टॉरंट्स अगदी स्विस आल्प्सचा फील येतो.
लीवनवर्थची सगळ्यात मोठी आठवण म्हणजे मी चार महिन्यांची प्रेग्न्नंट असतांना केलेली ८ मैलांची साधारण २४०० फीट एलेव्हेशनची कुलचॅक लेक हाईक. ग्लेसिअर लेकच्या दर्शनाने ८-९ तासांचा शिणवटा, डिहायड्रेशन, थंडी वगैरेंच्या जाणीवा कुठल्याकुठे नाहीशा होत मनात हर्ष दाटून राहिला.
CL.png

आणि हाईक नंतर पोटात ऊसळलेला आगडोंब शमवण्यासाठी तुम्ही फोटो टाकला आहे त्याच बाकड्यांवरच्या मागच्या मंगोलिअन ग्रिल मध्ये न भुतो न भविष्यति खादाडी केली होती ते सुद्धा लख्ख आठवले.

आमची अमेरिका वारी….. भाग 3 (प्रशांत मठकर)

सीएटल - ऑलिम्पिक नॅशनल पार्क

वॉशिंग्टन राज्याच्या वायव्येकडील ऑलिम्पिक द्वीपकल्पावरच ऑलिम्पिक नॅशनल पार्क सिएटलपासून कारने तीन तासांवर. इथे आल्यापासूनच लेक आणि तिच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपच आमची या पार्कची सैर घडवून आणायच प्लानिंग सुरू होत. पार्क खूप मोठ आणि पहाण्यालायक खूप ठिकाणं असल्याने जवळच्या शहरात एक रात्र मुक्काम करायच ठरल. तरीही पार्कमधली सर्वच प्रेक्षणीय ठिकाण एकाच फेरीत पहाण शक्य नसल्याने बर्फाच्छादित पर्वतरांगामधली हरिकेन रिज, क्रिसेन्ट लेक आणि हो रेन फॉरेस्ट ही तीन मुख्य ठिकाण पहायच नक्की झाल. मुक्कामासाठी पार्क पासून जवळच्याच फॉर्क या लहानशा गावातल्या सुंदर मॉटेलमध्ये रूम्सच बुकिंग झाल. थंडीच्या कपड्यांचाही पुरा इंतजाम झाला. सीएटलहून दोन गाड्यानी फेरीमार्गे पार्कपासून 90 मैलांवरच्या बेनब्रिज आयलंडपर्यन्त आणि त्यापुढे गाड्यांनी असा प्लान ठरला. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता समोरच्या हार्बरच्या एका धक्क्यावरून (Pier) सुटणाऱ्या क्रुझसदृश्य महाकाय फेरीमध्ये गाड्यांसह आरोहण करून आमच्या प्रवासाला सुरवात झाली आणि अर्ध्या तासातच बेनब्रिज आयलंडच्या धक्क्यावर उतरून गाड्यांमधुन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. मुलांनी सर्व प्लानिंग अगदी चोख केल होत. आंटी आणि अंकलनी फक्त गाडीत बसायच, पहायच आणि मजा करायची. आंटीच्या बॅगमध्ये लाडू, चकली सारख्या घरी बनवलेल्या खायच्या वस्तू ठासून भरलेल्या होत्याच त्यामुळे ती बॅग मुलांची फेवरीट.

दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही पार्कच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. सुमारे दशलक्ष एकरात पसरलेल हे पार्क हिमाच्छादित पर्वत, पॅसिफिक किनारपट्टी, हिरवीगार समशीतोष्ण जंगलं, वैविध्यपूर्ण वनस्पति, जीवजंतु आणि प्राणी यामुळे जगभरातील निसर्गप्रेमीच आवडीच ठिकाण. इथला 7,980 फूट उंच माउंट ऑलिंपस हा ऑलिंपिक द्वीपकल्पातील सर्वात उंच पर्वत. 95% पेक्षा जास्त भाग सुरक्षित जंगल असलेल अमेरिकेतल्या सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक अस हे उद्यान जागतिक वारसा स्थळही (World Heritage site) आहे.
IMG_20220611_171936.jpgआमच इथलं पहिल ठिकाण होत ऑलिंपस पर्वतरांगेमधली हरिकेन रिज. पार्कच्या प्रवेशद्वारापासून रिजकडे जाणाऱ्या 10-12 मैलांच्या रस्त्याच्या दुतर्फा दृष्टीला पडणार निसर्गसौंदर्य पहातानाच पुढे उलगडणाऱ्या खजिन्याची प्रचिती आली. हिरवेगार घनदाट वृक्ष, उंचच उंच कडे आणि खोल दऱ्यांमधून जाणारा रस्ता..मध्येच पसरणारी दाट धुक्याची झालर..सोबतीला सूर्याचा चाललेला लपंडाव.. क्षणात धुक्याचा पडदा गुंडाळून समोरच्या लॅंडस्केपवर उलगडणारा कॅलिडोस्कोप....जसजशी रिज जवळ येऊ लागली तसतशी वृक्षांची दाटी कमी होऊ लागली आणि बर्फाने भरलेले डोंगर, घळी आणि रस्त्याच्या आसपास बर्फ दिसू लागले. IMG_20220611_172152.jpgथोड्याच वेळात आम्ही रिजच्या कडेवर असलेल्या पर्यटन केंद्रापाशी पोहोचलो. रिजच्या कडेवरुन समोरच्या बर्फाच्छादित ऑलिंपिक पर्वतरांगांच विलोभनीय दृश्य दिसत होत. रिजवर पर्यटकांना चालण्यासाठी पायवाटा आखून दिलेल्या आहेत. या पायवाटानी चालताना थोडीशी वाकडी वाट करून बर्फात चालण्याचा आनंदही आम्ही घेत होतो. पण हा बर्फ जुना, घट्ट झालेला असल्याने बर्फात खेळण्याची मजा नव्हती. IMG_20220611_174835.jpgहिवाळ्यातही हिमवृष्टिवर अवलंबून ही रिज पर्यटकांसाठी खुली असते आणि इथे स्कीइंग, हायकिंग, स्नोबोर्डिंग सारखे खेळ चालतात. या भागात हिमअस्वलांचा निवास असल्याने फिरताना एखाद्या अस्वलाची भेट व्हायच्या शक्यतेच्या सूचनाही जागोजागी आहेत. आम्हाला मात्र हरिण, कोल्हा आणि इथल्या मुंगूससदृश्य मारमोट प्राण्याच्या भेटीतच समाधान मानाव लागल. रिजवर मनसोक्त भटकंती, फोटोग्राफी करून आम्ही इथून 54 किलोमीटर अंतरवरच्या क्रिसेन्ट लेकला जायला निघालो.

या द्वीपकल्पात एकाहून एक सुंदर अशी 650 हून अधिक सरोवर आणि पाणथळ जागा आहेत. त्यातल 12 मैल लांब आणि तीन मैल रुंद निलमणी रंगाच लेक क्रिसेंट हे वॉशिंग्टन राज्यातल दुसर सर्वात खोल सरोवर. हिमनदीपासून बनलेल हे सरोवर म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृति जिच्या प्रथमदर्शनीच आम्ही प्रेमात पडलो. डावीकडे पिरॅमिड आणि उजवीकडे माऊंट स्टॉर्मकिंग या दोन पर्वतांच्या अंगाने बनलेल्या या सरोवराच पाणी अगदी स्फटिकासारख स्वच्छ. DSC_0301.JPGत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे सरोवराच्या पाण्यात शेवाळ आणि त्यासदृश्य जीवजंतुच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्व फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे पाणी अतिशय स्वच्छ रहात. पर्वतरांगांवरून सरोवराला मिळणाऱ्या बर्फाच्या पाण्याच्या अनेक प्रवाहामुळे सरोवराच्या पाण्याच आणि त्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यांच तपमान नेहमीच थंड असत. पाण्याच्या कडेने थंडगार वार अंगावर घेत पाईन वृक्षांच्या जंगलामधून पक्षांचा किलबिलाट ऐकत सभोवतीच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्याची अनुभूति घेत फिरण्याचा अनुभव तर वर्णनातीत. IMG_7986.jpg
सरोवराच्या काठावरच ऐतिहासिक वारसा असलेल ‘लेक क्रिसेन्ट’ हे एक सुंदर हॉटेल आहे. सप्टेंबर 1930 मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी या हॉटेलमधील आपल्या मुक्कामात या उद्यानाला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केली.IMG_20220611_212446.jpgIMG_7802.jpgबाहेरच्या सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यात आम्ही एवढे मश्गुल होतो की आम्हाला या हॉटेलमध्ये शिरेपर्यंत रात्रीचे नऊ वाजून गेले तोपर्यंत सर्व खानपान सेवा बंद झाली होती. तरीहि, हॉटेलच्या लॉबीमधल्या शेकोटी समोर बसून काही फोटो काढण्याची संधी आम्ही साधलीच. तिथल्या कॉफी मशीनच्या कर्मचाऱ्यानेही मग त्याच्या मशीनमधली शेवटची शिल्लक कॉफी आम्हाला चकटफुच दिली. त्या कॉफीने आम्ही दिवसाची सांगता करून फॉर्क गावातील आमच्या मॉटेलकडे रात्रीच्या मुक्कामासाठी प्रयाण केल.

हो रेन फॉरेस्ट
आमच्या या ऑलिम्पिक नॅशनल पार्कच्या या टुरच्या दुसऱ्या दिवशीच ठिकाण ‘हो रेन फॉरेस्ट‘..पर्जन्यवन. सकाळी सर्वांची तयारी होऊन बाहेर पडेपर्यंत अकरा वाजून गेले आणि मॉटेल मध्ये नाश्ता किंवा लंचची सोय नसल्याने बाहेर हॉटेलमध्ये ब्रंच, म्हणजे नाश्ता आणि जेवण याच्या मधला प्रकार, घ्यायच ठरल. मॉटेल मधून चेक आउट करून बाहेरच्या मुख्य रस्त्यावरच्या एका हॉटेल मध्ये आम्ही स्थानापन्न झालो. हॉटेल मध्ये विशेष गर्दी नव्हती पण सगळा कारभार आरामात चालला होता त्यामुळे आम्हाला ब्रंच आटोपून रेन फॉरेस्टच्या रस्त्याला लागेपर्यंत एक वाजला आणि ब्रंचचा निर्णय अगदी योग्य होता याची खात्री पटली. इथून हो रेन फॉरेस्ट एक तासाच्या अंतरावर. आम्ही दोन अडीचच्या सुमारास रेन फॉरेस्टच्या व्हिजिटर्स सेंटर मध्ये पोचलो. सेंटरच्या कर्मचाऱ्याने जंगल आणि त्यातील ट्रेल्सविषयी थोडी माहिती दिली. इथे एक मैलापासून 18 मैल पर्यन्तचे ट्रेल्स आहेत. आपली ताकद आणि वेळेप्रमाणे ट्रेल निवडायचा आणि चालायला लागायच. आम्ही पाऊण मैलाचा छोटा ट्रेल निवडला आणि मार्गी लागलो. सेंटरचा गाईड रेन फॉरेस्ट विषयी माहिती देत आणि विशेष गोष्टी दाखवत आमच्या ग्रुप बरोबर काही अंतरापर्यंत आला.IMG_20220612_142410.jpg
माऊंट ऑलिंपसपासून पॅसिफिक किनाऱ्यापर्यंत वाहणाऱ्या हो नदीवरून या जंगलाला हो रेन फॉरेस्ट नाव पडल. संपूर्ण हिवाळाभर येथे सतत पाऊस पडतो. दरवर्षी होणाऱ्या सरासरी 140 इंच पर्जन्यवृष्टी मुळे बनलेल हे पानझडी आणि सूचिपर्णी वृक्षांच जंगल म्हणजे जणू काही दाट हिरवागार मंडपच. IMG-20220616-WA0044.jpgवर पसरलेली शेवाळ (Moss) आणि फर्न (म्हणजे आपल्याकडील बांडगूळ म्हणता येईल) ची झालर एव्हढी दाट की अगदी भर दुपारी कडक उन्हात पण सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. जंगलात मुबलक वाढणाऱ्या विविध प्रकारच्या बेरी, फर्न आणि शेवाळ मुळे रूझवेल्ट एल्क (मोठ्या हरिणासारखा प्राणी), अस्वल आणि हरण, माउंटन लायन, बॉबकॅट, रिव्हर ऑटर आणि बाल्ड ईगल सारखे प्राणी या जंगलात मोठ्या संख्येने आहेत. IMG_7948.jpg
आम्ही चालत असलेल्या ट्रेलच नाव होत ‘हॉल ऑफ मॉसेस’. नावाप्रमाणेच पायवाटेच्या आजूबाजूला उंचच उंच, शेवाळ आणि फर्नचा कोट घातलेले विशाल वृक्ष दिसत होते.....जणू काही तपाला बसलेले ऋषिच. जमिनीवर शेवाळाचा हिरवागार गालीचा पसरलेला. चालता चालता गाईड देत असलेली रेन फॉरेस्ट आणि त्यातल्या जैवसाखळीची माहिती ऐकताना निसर्गाचा जन्म-मृत्यू-पुनर्जन्माचा अनोखा खेळ आमच्या समोर साकार होत होता. IMG_20220612_160438.jpgजंगलातली जवळ जवळ सगळी जमीन शेवाळ, फर्न आणि दाट झुडुपांनी व्यापलेली त्यामुळे नवीन बियाण्याला अंकुर फुटायला जमिनीवर जागाच नाही. अशा परिस्थितीत जगण्यासाठी चाललेल्या धडपडीत पडलेल्या झाडांच्या ओंडक्यांमधून बी-बियाण अंकुरत. दर वर्षी हिवाळ्यात होणाऱ्या जोरदार वादळात जंगलातले पाचशे वर्षांपेक्षाही जुनाट आणि दोनशे फुटाहुन उंच असे काही मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. एका जीवनाचा अस्त होतो पण त्यातूनच नवीन जीवन जन्मालाही येत. या वृक्षांवर शेवाळ आणि इतर झाडांच्या बियांचा खजिनाच असतो. पडलेल्या वृक्षावरच हे बी-बियाण त्याच वृक्षांच्या खोडातल्या अन्नावर जीव धरत आणि हळूहळू रोपटयांची मूळं जमीनी पर्यंत पोचून खोडाच्या आधाराने वाढू लागतात. काही काळाने खोड कुजून जात पण तोपर्यंत या नवीन बाळांनी चांगलच बाळस घेतलेल असत आणि त्यांची वृक्ष बनण्याकडे वाटचाल सुरू झालेली असते. युगानुयुगे चालत आलेला जन्म,मृत्यू,पुनर्जन्माचा हा नैसर्गिक खेळ. IMG-20220705-WA0056.jpg
या ट्रेलवर दोन तास मनसोक्त भटकंती आणि फोटोग्राफी करून आम्ही परत व्हीजिटर्स सेंटरला आलो आणि दूसऱ्या दीड मैलांच्या स्पृस ट्रेल वर चालू लागलो. या ट्रेलवरची वृक्षसंपदा त्या मानाने तरुण. हो नदीच्या जवळून जाणारा हा ट्रेल तेवढाच सुंदर आणि जीवसृष्टीच रहस्य उलगडणारा. इथल्या जैवसाखळीचा केंद्रबिंदू म्हणजे ऑलिंपस पर्वतावरुन खळाळत येणारी आणि जंगलामधून वहात पॅसिफिक समुद्राला मिळणारी ‘हो’ नदी. ट्रेलच्या मध्यावर आपण या नदीच्या किनारी येतो. नदीच्या आजुबाजूने वाढणाऱ्या जंगलामुळे जमिनीची धूप होत नाही आणि पाण्याबरोबर वाहून आलेला गाळही नदीत वाहून जात नाही आणि जमीन सुपीक बनते. नदीच्या पात्रात पडणाऱ्या झाडांमुळे बनलेली तळी म्हणजे सालमन माशांची वसतीस्थानं. ही तळी जलचर आणि इतर वन्य प्राण्यांना मुबलक खाद्य पुरवतात त्यामुळे इथल वन्य आणि जलजीवन समृद्ध आहे. आम्हाला या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ‘बनाना स्लग’ या आपल्याकडील गोगलगाई सदृश्य प्राण्याच दर्शन झाल.IMG_20220612_144625_2.jpg पानं,अळंबी खाऊन त्यांच विघटन करून निसर्गाला ऊर्जा परत करणारा हा प्राणी या जैवसाखळीतील एक महत्वाचा घटक. पर्वत, नदी, जंगल आणि समुद्र यांच्या परिसंस्थेवर (Ecosystem) अवलंबून असणारी जैवसाखळी आणि या साखळीतील घटकांचं महत्व या रेन फॉरेस्टच्या भेटीत आम्हाला अनुभवता आल. कल्पनाही करता येणार नाही अशा हिरव्या रंगांच्या छटांची उधळण इथे आहे. कितीही सुंदर छायाचित्रण त्याला न्याय देऊ शकत नाही. हे प्रत्यक्षच अनुभवण्याजोग.. हे जंगल अमेरिकेतल्या काही शिल्लक राहिलेल्या रेन फॉरेस्टपैकी एक. या साखळीत नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमुळे खंड पडू नये यासाठी इथल्या लोकांची धडपड सुरू आहे. IMG-20220705-WA0043.jpgIMG_20220612_154056.jpg
इथे फिरताना प्रकर्षाने जाणवलेली बाब म्हणजे इथल्या अगदी आतील भागातल्याही रस्त्यांचा दर्जा. या भागातही पाऊस भरपूर, भरीला हिमवर्षाव, तरीही सर्व रस्ते खड्डेविरहित. रस्त्यांवर ठराविक अंतराने मार्गदर्शक खुणा त्यामुळे गुगलबाबाच्या मदतीशिवाय आपण अगदी नवख्या ठिकाणीही सहजपणे पोहोचू शकतो. वाहनचालकही नियम काटेकोरपणे पाळणारे. त्याचा हा बोलका अनुभव. इथला एक नियम म्हणजे सिंगल लेन रस्त्यांवर खुणा असलेल्या जागीच ओव्हरटेक करायच. एके ठिकाणी एका ट्रेलरच्या मागे आमच्यासह दहा बारा गाड्यांची रांग संथ गतीने चाललेली. समोरून येणारा रस्ता रिकामा असतानाही कोणी त्या ट्रेलरला ओव्हरटेक करत नव्हत कारण मध्ये कुठेच ओव्हरटेकिंगची खुणा नव्हती. शेवटी जवळजवळ अर्ध्या तासाने एका क्रॉसिंगवर ट्रेलर दुसऱ्या रस्त्याने गेल्यावरच मागच्या सर्व गाड्यांनी वेग घेतला…...माझ्या डोळ्यांसमोर आपला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे उभा राहीला.... Road.jpg 

 (क्रमश:)

माऊंट रेनियर- माऊंट रेनियर नॅशनल पार्क

सीएटलला आलो त्या दिवशी सकाळीच मुलीच्या फ्लॅटच्या किचनमधून एका बर्फाच्छादित पर्वताच दर्शन झाल. त्याच नाव ‘माऊंट रेनियर’ असल्याच समजल आणि रोज सकाळी पहिल्यांदा खिडकीतून त्याच दर्शन घ्यायचा नादच लागला. पण दर्शन द्याव की नाही हे त्याच्या मर्जीवर.. IMG-20220710-WA0062_0.jpgआकाश स्वच्छ असेल तरच त्याच दर्शन व्हायच. शेवटी त्याच्या प्रत्यक्ष भेटीला जायचा बेत ठरला. मधल्या काळात त्याच्याविषयी बरीच माहितीही जमा केली. माऊंट रेनियर नॅशनल पार्क मधला हा सध्या निद्रिस्त अवस्थेत असलेला सक्रीय ज्वालामुखी, कॅस्केड पर्वतरांगांमधल सर्वोच्च शिखर. गेल्या 500,000 वर्षांमध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या अनेक उद्रेकांमधून घडलेला, बर्फ आणि 25 हिमनद्यांनी आच्छादिलेला हा पर्वत सीएटल पासून फक्त साठ मैलांवर. याच्या शिखरावर असलेल्या दोन ज्वालामुखीय विवरांमधून ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्याचा शेवटचा उद्रेक 1894-95 मध्ये झाला. याच शिखर गाठण्यासाठी 8 मैलांपेक्षा जास्त 9,000 फूट उभ्या ऊंचीपर्यन्त जाणार अंतर पार कराव लागत त्यामुळे या भागातील गिर्यारोहकांसाठी हे आव्हानच. इथे माउंट एव्हरेस्टच्या चढाईसाठीच प्रशिक्षणहि दिल जात. आमच उद्दिष्ट मात्र त्याच्या पायथ्याशी बर्फात थोडेफार हातपाय मारण आणि आजूबाजूच्या नॅशनल पार्क मधील निसर्गाचा आस्वाद घेणं एवढच, त्यामुळे टूर कंपनीच्या एक दिवसाच्या टूरच आम्ही बूकिंग केल आणि एका सकाळी आठ वाजता कंपनीच्या व्हॅनमध्ये स्थानापन्न झालो . दीड तासाच्या प्रवासानंतर एका सुंदर लेकच्या किनाऱ्यावर टूर कंपनी आयोजित नाश्ता उरकून आम्ही रेनीयरच्या पायथ्याशी असलेल्या व्हिजिटर्स सेंटरसमोर उतरलो.
IMG_2526.jpg
समोरच माऊंट रेनियरच धवल वस्त्राकित शिखर दिसत होत. आम्ही स्वेटर्स, कानटोप्या वगैरे आयुध चढवली. आमच्या टूर गाईडने बर्फात चालताना घ्यायच्या काळजी बद्दल सूचना दिल्या आणि सर्वांना बर्फात चालताना वापरावयाच्या स्टिक्स देऊन मार्गस्थ केल. Renier 1_1.jpg एक मैलभर बर्फात चालत जायच होत. सुरवातीला चालताना घसरायला होत होत पण स्टिक्सचा वापर करत सावरायला हळू हळू जमायला लागल. जसजस पुढ जाऊ लागलो तसतशी आजूबाजूची बर्फाची झालर दाट होऊ लागली आणि रेनियरची विविध रूप समोर दिसू लागली. IMG_9220 R.jpgसगळ्यांचे मोबाईल्स आणि कॅमेरे छायाचित्रणात व्यस्त झाले. भुसभुशीत बर्फात चालताना मजा येत होती. काही ठिकाणी वाट चिंचोळी आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या घळीमुळे थोडी धाकधूक होत होती.. पण तीही एक वेगळी मजा. गाईडच्या माहितीप्रमाणे यावर्षी उन्हाळ्याच आगमन लांबल्यामुळे पर्वताच्या पायथ्याच्या भागातल बर्फ पूर्णपणे वितळल नव्हत. ते वितळल्यानंतर हा भाग रंगीबेरंगी फुलांचा गालीचाच बनतो आणि ते दृश्य खूपच मनमोहक असत. पण आमची ती संधी हुकली. दोन तास बर्फात घालवल्यानंतर टूर गाईडने आम्हाला परत व्हिजिटर्स सेंटरला आणल. IMG_9207.jpg
आमच या टुरमधल पुढच ठिकाण होत तिथून 17 मैलांवरचा माऊंट रेनियर नॅशनल पार्क मधल्या पॅराडाइज नदीवरचा ‘नारडा फॉल्स’. इथे पॅराडाइज नदी बॅसाल्ट खडकांच्या भिंतीवरून 170 फूट खाली कोसळते. मुख्य रस्त्यावरून या धबधब्याचा थरार लक्षात येत नाही. त्यासाठी समोरच्या बाजूने 200 फूट खाली उतरणाऱ्या पायवाटेने उतरून त्याच समोरूनच दर्शन घ्यायला हव. हो ना करत आम्ही त्या वाटेने उतरलोच आणि समोरच दृश्य पाहून परत 200 फूट चढ चढून जाण्यासाठी लागणाऱ्या श्रमाच सार्थक झाल. धबधब्याच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत समोरून त्याच रौद्र रूप पहाण एक रोचक अनुभव होता. IMG_20220709_134627.jpg
त्यानंतरचा स्टॉप लंच ब्रेकचा. आमच्या टूर गाईडने त्यासाठी पॅराडाइज नदीकाठी एक सुंदर ठिकाण निवडल होत. इथे नदीच पात्र मोठ आणि पाणी कमी असल्याने अगदी नदीच्या पात्रात जाता येत होत. नदी, जंगल आणि माऊंट रेनियर असा त्रिवेणी संगम.. फोटो आणि सेल्फी सेशनसाठी योग्य ठिकाण. मग काय.. लंच विसरून सगळे फोटो सेशन्समध्ये व्यस्त झाले. शेवटी गाईडला सर्वांना लंचची आठवण करून द्यावी लागली.
IMG_9360.jpg
लंचनंतर परत आसपास थोडा फेरफटका मारून आम्ही टुरमधल शेवटच ठिकाण म्हणजे नॅशनल पार्कमधील ‘ट्रेल ऑफ शॅडोज’ या जंगल ट्रेलसाठी निघालो. हेसुद्धा एक रेन फॉरेस्ट..हिरवगार आणि घनदाट. इथल वैशिष्ट्य म्हणजे बुडबुडे येणारे पाण्याचे झरे आणि अमेरिकन एक्सप्लोरर जेम्स लाँगमायरने 1883 मध्ये या झऱ्यांच्या आसपास रहाण्यासाठी बांधलेल्या लाकडी केबिन्स. IMG_20220709_153156.jpgएका गिर्यारोहण मोहिमेदरम्यान घोड्यांसाठी पाणी शोधताना लाँगमायरला या भागात बुडबुडे येणाऱ्या गरम पाण्याचे झरे आढळले. लाँगमायरने ही जमिन घेतली आणि झर्‍यापर्यंत तेरा मैल पायवाट बांधली, रहाण्यासाठी केबिन उभारल्या. पुढे 1890 मध्ये स्पा साठी एक हॉटेलही बांधल आणि ‘अनेक असाध्य व्याधी बरे करणारे लॉन्गमायर मेडिकल स्प्रिंग्ज्’ अशी या झऱ्यांची जाहिरात केली त्यामुळे इथे मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. IMG_2693.jpgरेनियर नॅशनल पार्कने 1939 मध्ये लाँगमायरची मालमत्ता विकत घेतल्यानंतर या झऱ्याच पाणी तपासल असता त्यात कोणतेही औषधी गुणधर्म आढळले नाहीत आणि पाण्यातुन येणारे बुडबुडे म्हणजे जमिनीतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साइड असल्याच सिद्ध झाल त्यामुळे या झऱ्यांबद्दलच औषधी आकर्षण कमी झाल. आजही बुडबुडे येणारे हे झरे इथे पाहायला मिळतात मात्र आता त्यांच पाणी गरम नाही. आज हे ‘सोडा स्प्रिंग्ज्’, लाँगमायर केबिन्स आणि इतर इमारती माउंट रेनियरच्या इतिहासाचा आणि पर्यटनाचा महत्त्वाचा भाग आहेत. साधारण एक किलोमीटरचा इथल्या इतिहासाच्या पाऊलखुणांवरुन जाणारा हा ट्रेल संपवून आमच्या टूर गाईड ने आम्हाला परत पार्किंग एरियाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ केल. (क्रमश)

आमची अमेरिका वारी….. भाग 5 (प्रशांत जयानंद मठकर मोबाइल 9619036406 )
सीएटल शहर

आतापर्यंत सीएटल आणि आसपासच्या मुख्य प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन झाल्या. खुद्द सीएटल शहरातही अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यापैकी सीएटल स्पेस सेंटर मधला 1962 साली बांधलेला 605 फूट उंच ‘स्पेस निडल ऑब्झरवेशन टॉवर’ हा सीएटलचा लॅंडमार्क वायव्य अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण. IMG-20220711-WA0082.jpgदरवर्षी इथे एक दशलक्षाहून अधिक पर्यटक येतात. हा टॉवर अवघ्या 400 दिवसांत बांधला गेला त्यामुळे त्याला ‘400 Day Wonder’ म्हणूनही ओळखल जात. ताशी 10 मैल किंवा 16 किमी वेगाने चालणाऱ्या लिफ्टने या 605 फूट (184 मीटर) उंच इमारतीच्या प्रवासाला फक्त 41 सेकंद लागतात. टॉवरमधे 500 फूट (152 मीटर) ऊंचीवर एक फिरत रेस्टॉरंट आहे जे पूर्ण 360 अंशात फिरत. रेस्टॉरंट आणि त्यावरच्या निरीक्षण सज्जामधून, सिएटल शहर, आजूबाजूचे पर्वत, खाडी आणि आसपासच्या बेटांचा मंत्रमुग्ध करणारा नजारा दिसतो. रेस्टॉरंटच्या फिरत्या आणि पायाखाली पारदर्शक काच असलेल्या डेकवरून चालत बाहेरची आणि पायाखालच्या काचेतून दिसणारी दृश्य पहाण हा एक चित्तथरारक अनुभव. हा टॉवर जगातील सर्वात जास्त छायाचित्रित इमारतीपैकी एक आहे. आम्ही येथे रात्री आठ वाजता प्रवेश केला आणि अकरा वाजले तरी पण तिथून पाय काढवत नव्हता.

याच सीएटल स्पेस सेंटरमधल्या ‘चिहुली गार्डन अँड ग्लास’ प्रदर्शनात जगप्रसिद्ध अमेरिकन कलाकार डेल चिहुली याची काचेची चित्रशिल्प (Glass Sculptures) मांडलेली आहेत. या प्रदर्शनाची मांडणी चिहुलीने स्वत: केली. एक प्रदर्शन हॉल, आठ दालनं, ग्लासहाऊस आणि बागेत ही चित्रशिल्प अतिशय कलात्मक रीत्या मांडली आहेत. Chihuli II.jpgप्रदर्शनाचा केंद्रबिंदू म्हणजे 40-फूट उंच, काच आणि स्टीलपासून बनवलेल ग्लासहाउस आणि त्यात मांडलेली चिहुलीची चित्रशिल्प. ग्लासहाऊसमधील लाल, नारंगी, पिवळ्या रंगातल्या काचेच्या अनेक कलाकृतीनी बनलेल 100 फूट लांब शिल्प चिहुलीच्या सर्वात मोठ्या लटकणाऱ्या (Suspended) शिल्पांपैकी एक. Chihuli.jpgहॉलच्या बाहेर बागेत विविध रंगी फुलांच्या आणि झाडांच्या हिरव्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केलेल्या चिहुलीच्या इतर कलाकृतीही अप्रतिम. A Chihuli III.jpgकाचेपासून बनवलेली ही चित्रशिल्प, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, डोळे दीपवणारी अद्भुत रंगसंगती पहाताना ती काचेपासून बनली आहेत यावर विश्वास बसत नाही.
Chihuli Va .jpg
सीएटल मधली 76 मजली कोलंबिया सेंटर ही वॉशिंग्टन राज्यातली सर्वात उंच इमारत. स्पेस निडल प्रमाणे याही सेंटरच्या 73 व्या मजल्यावर स्काय वह्यू ऑब्झरवेटरी आहे. 900 फूट उंचीवरुन दिसणार सीएटल शहर, हार्बर फ्रंट,खाडीतल्या बोटी आणि आसपासचा नजारा अविस्मरणीय.... पण स्पेस निडलच्या फिरत्या आणि पारदर्शक डेकची मजा इथे नाही.
Columbia A.jpg
इथलं वूडलँड पार्क झू हे प्राणी संग्रहालय जगभरातील लयाला जात असलेल्या किंवा धोक्यात असणाऱ्या (Extinct / Endangered) वन्यप्राणी प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध. 92 एकराच्या हिरव्या गर्द जंगलात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयातल्या जगभरातील 250 प्रजातींच्या जवळपास 900 प्राण्यांपैकी 35 प्राणी हे लयाला जात असलेल्या किंवा धोक्यातील प्रजातीपैकी आहेत. गोरिलाच्या संवर्धनावर इथे खास भर दिला जातो. 92 एकरांचा हा परिसर एशिया, आफ्रिका, उष्णकटिबंधीय पर्जन्यवन, समशीतोष्ण पर्जन्यवन, वाळवंट, यासारख्या जैविक वातावरणात विभागुन सर्व प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ठेवल आहे. त्यामुळे इथे फिरताना आपण त्या भागात आणि त्या प्राण्यांच्या सहवासात असल्याचाच आभास होतो. प्राणी संग्रहालय पाहायला जाताना ‘अशी बरीच प्राणी संग्रहालय पाहिली.. इथे वेगळ काय असणार’ हाच विचार मनात होता..पण दुपारी 12 वाजता प्रवेश केल्यानंतर पाच वाजता झू बंद होईपर्यंतचा वेळ कसा गेला ते कळलच नाही...
IMG_20220626_153518.jpg
24 जुलैला आम्हाला अमेरिकेत सीएटलला येऊन दोन महीने झाले. या दोन महिन्यात खूप फिरलो..पाहिल.. वेळ मजेत गेला. माझ्या मुलीच्या घरासमोरच सीएटल बंदराची किनारपट्टी. हे बंदर अमेरिकेतल्या मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार. बंदरात मालवाहू, प्रवासी बोटी आणि छोट्या शिडाच्या खाजगी बोटीची सतत येजा. बंदरावर अनेक मोठमोठे धक्के(Piers), त्यातले काही पर्यटकांच्या मनोरंजनासाठी. आमच्या बऱ्याच संध्याकाळी या धक्क्यांवरची गजबज आणि मावळत्या सूर्याची विविध रूपं न्याहाळण्यात गेल्या. Boat II.jpg
या बंदरासमोरचा अल्की बीच आणि तिथल्या सूर्यास्त दर्शनाविषयी इथे आल्यापासून खूप ऐकल होत. एका संध्याकाळी फेरी बोट पकडून 15 मिनिटांत अल्कीला पोहोचलो. या बीचच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अडीच किलोमीटर लांबीचा वाळूचा विस्तीर्ण किनारा. इथून किनाऱ्याच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेने चालत अनुभवलेला सूर्यास्त अगदी अविस्मरणीय. असच एकदा सीएटल बंदरापासून फेरी बोटीने अर्ध्या तासाच्या अंतरावरच बेनब्रिज आयलंड हे छोटस सुंदर गांव पहाण्याचा योग साधला. अगदी इंग्रजी सिनेमात दाखवतात तसा गांव..IMG_20220611_130829.jpg
सुंदर बैठी घरं, बागा, शेतं, आठवडा बाजार, हायकिंग ट्रेल्स, स्थानिक कलाकृतींची दुकानं आणि निसर्गसौंदर्य पहात पहात परतीची शेवटची फेरी धावतपळत गाठण्याची वेळ आली.
IMG_20220608_191045.jpg
सीएटलमध्ये आबालवृद्धाना इलेक्ट्रिक सायकल्सवर मजेत फिरताना पाहून आपणही या सायकलवर पाय चालवायच पहिल्या दिवसापासूनच पक्क मनात बसल होत. शेवटी एका संध्याकाळी तो योग साधला आणि या सायकलवर मनसोक्त भटकण्याची मजाही अनुभवली. खूप मजेदार अनुभव..लहानपणी गावी भाड्याच्या सायकलवर मारलेल्या राऊंडसची आठवण करून देणारा. इथल्या सर्व रस्त्यांवर वेगळा सायकल ट्रॅक आहे. तीन-चार प्रकारच्या बॅटरी वर चालणाऱ्या आणि इतर सायकली भाड्यावर मिळतात. सर्व कारभार मोबाईल अॅपमधून. अॅप डाउनलोड करून क्रेडिट/डेबिट कार्ड लिंक करून सायकल वरचा कोड स्कॅन केला की सायकल आपल्या ताब्यात. सायकल सोडताना अॅपवर नोंद केली की भाड्याचे पैसे अकाऊंटमधून वळते होतात. सर्वात सोईस्कर म्हणजे सायकल घेण्यासाठी किंवा परत करण्यासाठी दुकानात जाव लागत नाही. गर्दीच्या भागात, नाक्यानाक्यावर कंपनीने सायकल्स ठेवलेल्या असतात. शिवाय कोणीही कुठेही सोडलेली सायकल घेता येते. Cycle.jpg
एकंदरीतच अमेरिकन लोकांना फिरण्याची आवड. वीकएंड शक्यतो घराबाहेर घालवावा हा अलिखित नियम. शुक्रवार संध्याकाळपासूनच इथली हॉटेल्स,पार्कस आणि पिकनिक स्पॉट्स गजबजू लागतात. डोंगरात, जंगलात तंबूत रात्र घालवण (Camping) आणि सकाळी उठून ट्रेकिंग, हायकिंग करण हा लोकांच्या आवडीचा छंद. त्याला पूरक अशा सुविधाहि इथे आहेत. समुद्रकिनाऱ्याने, सरोवरांच्या सभोवती, जंगलात वसवलेल्या मोठमोठया पार्कस् आणि पिकनिक स्पॉट्समध्ये पिकनिक एरिया, कॅम्प एरिया, आर व्ही पार्क, सायकल ट्रॅक्स, ट्रेकिंग किंवा हायकिंगसाठी ट्रेल्स सर्व काही व्यवस्थित आखलेलं असत. ठराविक अंतरावर खानपान आणि विश्रांतीगृहांची व्यवस्था आणि जागोजागी त्याची सूचना आणि पार्कमधल्या खास गोष्टींची माहिती देणारे फलक, यामुळे पार्क किंवा ट्रेल कितीही मोठा असला तरी फिरण हा सुखद अनुभव ठरतो.

इथे बरेच लोक फिरण्यासाठी आर व्ही (Recreational Vehicle) वापरतात. हे म्हणजे किचन, बाथरूम, झोपण्यासाठी बेडस् अशा सर्व सुविधायुक्त चाकांवरच घरच...आपल्याकडे दिसणाऱ्या नट-नटयांच्या व्हॅनिटी व्हॅनसारखं. सर्व पार्क, जंगलं आणि प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या जवळच्या आर व्ही पार्किंग एरिया मध्ये वीज, पाण्याची सोय असते. तिथे भाड भरून आर व्ही पार्क करायची, दिवसभर भटकून रात्र आर व्ही मध्ये घालवून सकाळी पुढच्या प्रवासाला निघायच. बस, ट्रेन,प्लेन, हॉटेल बुकिंगची गरज नाही आणि त्या मानाने कमी खर्चीक.. त्यामुळे बऱ्याच लोकांकडे कारबरोबर आर व्ही पण असते, शिवाय रेंटल कंपन्यांकडून त्या भाड्यावरही मिळतात. मनात आल की उठा आणि आर व्ही मध्ये बसून सुटा..इथल्या जीवनशैलीला साजेसा पर्यटनाचा हा प्रकार खूप लोकप्रिय.
best-washington-rv-parks_t5.jpg
अमेरिकेतल ‘सदाहरित’ म्हणून ओळखल जाणाऱ्या वॉशिंग्टन राज्यातल सीएटल हे सर्वात मोठ शहर. इथे पाहण्यासारखी मानवनिर्मित अनेक ठिकाण आहेतच पण या शहराला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. त्याचा थोडाफार आस्वाद आम्हाला घेत आला. आता इथला मुक्काम हलवायची वेळ झाली. आमचं पुढच ठिकाण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातल लॉस एन्जेलस शहर. 25 जुलैच्या सायंकाळी मुलीच्या किचन विंडोमधून माऊंट रेनीयरच दर्शन घेत सीएटलला अलविदा करून आम्ही लॉस एन्जेलसला जाणाऱ्या विमानात बसलो. विमानाने उड्डाण केल्यावर खिडकीतून बाहेर बघितल तर संधिप्रकाशात न्हाऊन निघालेल्या माऊंट रेनीयरच अद्भुत रूप परत येण्यासाठी खुणवत होत. IMG_20220724_090304 BB_0.jpg
(क्रमश:)

तो बंदराचा फोटो पाहूल इथे अनेकदा जाणवलेली गोष्ट आठवली. वापरात नसलेल्या गोष्टी किंवा एरव्ही लागणार्‍या पण तात्पुरत्या बाजूला ठेवलेल्या गोष्टी सुबकपणे रचून ऑर्गनाइज्ड रीतीने ठेवायची पद्धत. कंपन्या व इव्हन सामान्य माणसे आपल्या बॅक/फ्रंट यार्ड मधे गोष्टी सहसा अस्ताव्यस्त ठेवत नाहीत. अशा रचून ठेवतात. कमर्शियल बंदरांमधे तर त्याची गरज असतेच पण जेथे ती नसते तेथेही हे चित्र दिसते. भारतात नैसर्गिक सौंदर्य भरपूर आहे, पण अशी मानवनिर्मित सुबकता क्वचित दिसते.

अगदी इंग्रजी सिनेमात दाखवतात तसा गांव.. >>> तो फोटो बघूनच शंका आली की "डिस्क्लोजर" मधे मायकेल डग्लस चे घर व ती फेरी दाखवली आहे ती तिथलीच असावी. विकिवर पाहिले तर तर ते तसेच आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Disclosure_(1994_film)





















माऊंट रेनिअर

Submitted by रायगड on 19 August, 2014 - 22:22


प्रचि १

माऊंट रेनिअर! - सिअ‍ॅटलच्या स्कायलाईन वर दिसत रहाणारा, किंवा बहुतेक वेळा ढगांच्या पडद्यात गुरफटून नाहीसा होणारा, एखादा ऋषि आपली पांढरीशुभ्र दाढी सोडून तपश्चर्या करत बसल्यागत दिसणारा, पण प्रत्यक्षात आतून खवळणारा ज्वालामुखी उदरात घेऊन वावरणारा तर वरती जवळपास २५ glaciers बाळगून असणारा - १४५०० फूट उंचीचा हा पर्वत!
गेल्या विकांताला (१५,१६,१७ ऑगस्ट) माऊंट रेनिअर नॅशनल पार्क ला गेलेलो - त्याचे काही फोटोज नी वृतांत!

ऑगस्ट महिना म्हणजे पार्कात रानफुलांच्या बहरीचा काळ! रंगीबेरंगी फुलांनी बहरलेला पार्क आणि बॅकग्राऊंडवर रेनिअर म्हणजे डोळ्यांना पर्वणीच!

आजतागायत रेनिअरला कायम एक दिवसाची ट्रीप केल्ये. यावेळी मात्र घरात चालू असलेल्या कामातून जरा बदल म्हणून २ दिवस कोठेतरी जाऊ असे ठरवून सहज पार्कच्या आतलं पॅरॅडाईस इन चेक केलं - आणि आश्चर्य म्हणजे नेमकं शुक्रवार-शनिवार कोणीतरी आयत्या वेळी cancellation केल्यामुळे आम्हाला बुकिंग मिळालं. नाहीतर पार्कच्या आतल्या लॉजेस ची बुकींग्ज उन्हाळ्यात मिळणं म्हणजे महाकठीण काम!


प्रचि २ - पॅरॅडाईज इन

पार्क मधील हा एक धबधबा - नारदा फॉल्स! - हो! नारद मुनींचं नाव या धबधब्याला दिलंय! त्यांच्या नावाची इथे कुठे वर्णी लागली काय ठाऊक!


प्रचि ३

शुक्रवारी संध्याकाळी पार्क मध्ये पोहोचलो - त्या दिवशी आणि दुसर्‍या दिवशीही, मध्येच ढग येऊन रेनिअर साहेबांना झाकून टाकतायत आणि अचानक कोणीतरी पडदा उघडावा तसा ढगांचे आवरण बाजूला होऊन समोर महाराज प्रकट - असा लपाछपीचा खेळ चालू होता!

पॅरॅडाईज पॉईंट हा पार्क मधील सर्वांत पॉप्युलर एरिआ! हजारोंनी पर्यट्क उन्हाळ्यात या भागाला भेट देतात. पॅरॅडाईज भागात - पॅरॅडाईज व्हिजिटर सेंटर च्या परीसरात स्कायलाईन ट्रेल ही साधारण ४.५ मैलाची, रेनिअर ला मिठी मारता येईल अशी जवळ जाणारी लूप ट्रेल आहे - नितांतसुंदर! त्याला अनेक उपफाटे पण आहेत.
सकाळी १० नंतर पर्यटकांची गर्दी चालू झाली की हा ट्रेल प्रचंड बिझी होतो. पण यावेळी मात्र आम्ही शेजारीच राहिल्याने जरा लवकरच ट्रेलवर गेलो. अधे-मधे हलके-फुलके ढग उतरलेत- नजर जाईल तिथे रानफुलांची जत्रा, मध्येच दर्शन देणारा- आणि क्षणात आपल्या डोळ्यादेखत नाहीसा होणारा रेनिअर - अश्या वातावरणात सुमारे २ मैल चालल्यावर धाकट्या चिरंजीवांनी आता (अगदी) बास असे जाहीर केल्यावर मग परतलो. पुढचा ट्रेल बराच स्टीप देखील होता - तो आत्ता राहू देत असं म्हणत परतलो.


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२

ट्रेलहेड पाशीच हॉटेल असल्याचा फायदा म्हण जे दुपारच्या उन्हात आणि गर्दीच्या वेळात शांतपणे रूमवर जाऊन आडवे झालो! ते संध्याकाळी ६ नंतर परत बाहेर पडलो. आता जवळ च्या मिर्टल फॉल्स ला चक्कर मारली.


प्रचि १३

स्कायलाईन ट्रेल पूर्ण झाला नाही म्हणून दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी आणि मोठे चिरंजीव यांनी तो ट्रेल पूर्ण करायचा ठरवला. सकाळी ७-७.१५ ला आम्ही दुसर्‍या बाजूने त्या ट्रेलला लागलो. काय वर्णावा तो नजारा! मैलोन मैल पसरलेली दरी, तो almighty Rainier, रानफुलांनी नटलेली वाट, सकाळची जादुई वेळ! केवळ स्वप्नात आहोत आपण असं वाटत होतं! Paradise point हे नाव सार्थ असल्याचं पटवून देणारा अनुभव!


प्रचि १४


प्रचि १५


प्रचि १६ - Paradise Inn and Paradise Visitor Center - seen from the trail


प्रचि १७


प्रचि १८


प्रचि १९


प्रचि २०

ट्रेलवरून परतेपर्यंत ऊन आणि गर्दी फारच वाढली होती. दुपारी जेऊन आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो तर पॅरॅडाईसला यायला गाड्यांची मैल भर रांग लागलेली!

परतताना मध्ये ह्या reflection lake ला भेट दिली. पण रेनिअर साहेब तोपर्यत परत ढगांचं आवरण चढवून बसलेले. त्यामुळे त्यांचं reflection काही लेक मध्ये दिसलं नाही.


प्रचि २१

======================================================
सप्टेंबर २०१५ ला रेनिअर फॉल ट्रीप केली. पानगळीचे रंग अगदी बहरात आहेत रेनिअर परिसरात. त्याची फोटोरूपी झलक :


https://www.maayboli.com/node/50426






  discovermh.com वाकेश्वर मंदिर,वाई | Wakeshwar Temple, Wai | Discover Maharashtra Discover Maharashtra ...