Friday, November 25, 2022

सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं: नंदुरबार

 https://adimculture.wordpress.com/category/tribal-culture/%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/

सातपुड्याच्या कुशीतलं, आदिवासींच्या भूमीतलं: नंदुरबार

कोकणच्या सागरकिनार्‍यापासून गडचिरोलीच्या जंगलापर्यंत पसरलेला महाराष्ट्र हा बहुजिनसी प्रदेश आहे. वेगवेगळ्या भागांमधल्या माणसांच्या वागण्या-बोलण्याच्या तर्‍हा, जगण्याच्या पद्धती, स्वभाववैशिष्ट्यं या बाबतीतही महाराष्ट्रात भरपूर विविधता आहे. वर्षानुवर्षं आपापली वैशिष्ट्यं जपत, वाढवत हे सर्व भाग एकमेकांसोबत राहत आले आहेत. यातूनच महाराष्ट्राच्या बहुविध-बहुपेडी संस्कृतीचा कोलाज तयार झाला आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातला नंदुरबार हा जिल्हा अलिकडेच धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन अस्तित्वात आलेला. सातपुड्याच्या डोंगर-दर्‍यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना धर्मांचे लोक अशी सरमिसळ इथे पाहावयास मिळते. वेगवेगळ्या बोली बोलणार्‍या इथल्या आदिवासींची जीवनशैली वैविध्यपूर्ण आहे. शेती आणि जंगलसंपत्तीवर गुजराण करणार्‍या या प्रदेशात औद्योगिक विकासाचं वारं अद्याप शिरलेलं नसलं, तरी आधुनिक जीवनशैलीने शिरकाव केला आहे. त्यामुळे इथल्या आदिवासींच्या जगण्याची कुसही बदलत आहे.

महाराष्ट्राचा नकाशा जरा लक्षपूर्वक पाहिला तर, म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर ह्या लक्ष वेधून घेणार्‍या क्षेत्रांपासून ‘जरा हटके’ आपली दृष्टी नकाशाच्या डाव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात नेली तर आपल्याला गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या चिमट्यात अटकलेला नंदुरबार जिल्हा सापडेल. एक दशकापूर्वीच जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेल्या नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा, अक्कलकुँवा आणि अक्राणी (धडगाव) या सहा तालुक्यांचा समावेश असलेला हा भूभाग पूर्वी धुळे जिल्ह्‌यात सामावलेला होता. असं असलं, तरी सातपुड्याच्या कुशीतील डोंगर-टेकड्यांनी व्यापलेल्या आणि आदिवासी जमातींचं बाहुल्य असलेल्या ह्या क्षेत्राचा इतिहास, संस्कृती व लोकजीवन ऐतिहासिक कालापासूनच वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्णच होतं. ब्रिटिशकाळात निजाम स्टेटच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगांपर्यंत पसरलेला भूभाग खानदेश म्हणून ओळखला जायचा. प्रादेशिक वेगळेपण आणि कारभाराच्या सोयीकरता खानदेशचे पूर्व व पश्चिम खानदेश असे विभाग केले गेले. पूर्व खानदेश (जळगाव, भुसावळ) हा काळ्या सुपीक मातीचा, तापीच्या खोर्‍याचा भाग. कापूस, केळी याकरता नावाजलेला. मुंबईला दूधपुरवठा करणारा. पश्चिम खानदेशच्या तुलनेत संपन्न, विकसित, पुढारलेला.
पश्चिम खानदेश (धुळे, नंदुरबार) क्षेत्रातील तापी नदीच्या खोर्‍याचा भाग सोडला तर हा भाग डोंगराळ आणि मध्यम प्रतीच्या मातीचा. सातपुड्याचा भाग सोडला तर पावसाचं प्रमाणही अल्पच. आदिवासींचं बाहुल्य असलेल्या ह्या जिल्ह्यात एखाद्या विशिष्ट जातीची लोकसंख्या जास्त आहे किंवा पुढारलेली आहे अशी स्थिती नाही. गुजर पाटील, कुणबी पाटील, रजपूत, परदेशी, धनगर इत्यादी अठरापगड जाती वेगवेगळ्या भागांत विखुरलेल्या आहेत.
महाराष्ट्राच्या ज्या नकाशात पर्वत, नद्या, धरणं इत्यादी भौगोलिक तपशील असतील अशा नकाशात बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल, की कोकण आणि देश यांना वेगळा करणारा आणि संपूर्ण दक्षिण भारताच्या हवामानाला वेगळा आयाम देणारा, कन्याकुमारीपासून दक्षिणोत्तर पसरलेला सह्याद्री या जिल्ह्यात आपला पसारा आडव्या आलेल्या तापी नदीच्या दक्षिण तटाशी आवरता घेतो. पूर्व-पश्चिम वाहणार्‍या तापीच्या उत्तरेकडे जरा वर दिसेल सातपुड्याचा नदीला समांतर असलेला पसारा आणि पलीकडे महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांची सीमारेषा निश्चित करणारी नर्मदा. आणखीही एक नजरेला खुपणारी बाब आपल्या लक्षात येईल. तापी नदीच्या दोन्ही बाजूंनी जिल्ह्याच्या मध्यावर पाचरीसारखा आत घुसलेला गुजरातचा भूभाग. महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या सीमारेषेवर असणार्‍या तापीवरील उकाई धरणाचं जलाशय गुजरातच्या कब्जात राहावं म्हणून जलाशयाच्या दोन्ही बाजूंचं भूक्षेत्रच तोडून देण्याचा सौदा करायला महाराष्ट्रातील कोण उदार नेते जबाबदार होते याचा शोध घेण्यात आता अर्थ नाही. परंतु या धरणामुळेच गुजरातमधील बलसाड, सुरत जिल्ह्यांत हजारो एकरांचा संपन्न शुगर बेल्ट अस्तित्वात आला आणि नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नवापूर, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रात दरसाल गुजरातमध्ये ‘जगायला’ स्थलांतरित होणारा विपन्नावस्थेतील आदिवासी मजुरांचा बेल्ट अस्तित्वात आला, हे वास्तव आहे. सरदार सरोवर धरणाची निर्मितीही अशीच महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमेवर आहे. असं सांगतात, की सातपुड्याच्या कठीण प्रस्तरातून वाहणारी नर्मदा एका जागी इतकी अरुंद आणि खोल झाली होती, की हरणं नदीच्या खाईवरून उडी मारून पलीकडे जात. हरणङ्गाळ नावाचं गावही होतं तिथे. सरदार सरोवराच्या जलाशय क्षेत्रातूनही हजारो आदिवासींना विस्थापित व्हावं लागलं आहे. तापीवरील उकाई धरण महाराष्ट्राच्या इतर क्षेत्रात असतं (उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्रात) तर एवढ्या मोठ्या प्रमाणातील विस्थापन आणि शेजारच्या भूभागाची अशी पाचर महाराष्ट्राच्या शासनकर्त्यांनी मान्य केली असती का, असा प्रश्न मनात येतो.
यात गमतीचा भाग असा, की उकाईचं बॅकवॉटर गुजरातमध्ये राहावं अशी पाचर मारली गेली, तरी पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढला की पाणी सीमा पार करून नंदुरबार तालुक्यात पसरतं आणि गढूळ झालेल्या पाण्यातून जलाशयातील मासे प्रवाहाच्या उलट्या दिशेने सीमा पार करून महाराष्ट्रात येतात. हे गोड्या पाण्यातील मासे गेल्या अनेक वर्षांपासून हावड्याला पाठवले जातात कोलकत्यातील फक्त गोड्या पाण्यातील मासे खाणार्‍या भद्र लोकांकरता. त्यामुळे जून-जुलै या आदिवासी शेतकर्‍यांसाठी अत्यंत हलाखीच्या दिवसांत तापीच्या काठावरील काही गावांतील आदिवासींना काही तरी जगण्याचं साधन म्हणून मच्छीमारी करून मासे व्यापार्‍यांना विकता येतात. पण याचं श्रेय राजकारण्यांना घेता येणार नाही, ते श्रेय निसर्गनियमांनाच द्यावं लागेल.
………
सातपुड्याच्या आणि सह्याद्रीच्या पसार्‍यातील टेकड्यांनी व्यापलेल्या या जिल्ह्यातील प्रमुख शहर नंदुरबार हे मात्र तुलनेनं सपाटीवर आहे, तरी भोवती छोट्या छोट्या टेकड्या आहेत. पूर्वी तर हे शहर भोवतालच्या टेकड्या मजबूत भिंतीनी जोडून किल्ल्यासारखं कोटाने सुरक्षित केलेलं होतं. मध्यप्रदेशमधून येऊन नाशिककडे जाणार्‍या उत्तर-दक्षिण मार्ग आणि सुरतकडून निजाम स्टेटकडे जाणार्‍या पश्चिम-पूर्व मार्गावरील सुरक्षित शहर असल्याने प्रचंड संपत्ती असलेल्या व्यापार्‍यांचं हे मुख्य केंद्र होतं. ब्रिटिश सत्ता स्थिरावल्यावर दक्षिण गुजरातमधील सुरत आणि पूर्व खानदेशातील मध्य रेल्वेवरील महत्त्वाचं जंक्शन भुसावळ यांना जोडणारी रेल्वेलाइनही टाकली गेली. या तापी व्हॅले लाइनवरील नंदुरबार हे महत्त्वाचं स्टेशन असल्याने हे क्षेत्र गुजरातशी जोडलं गेलेलं आहे. ब्रिटिश शासनकर्त्यांशी असलेल्या नात्याचा लाभ घेऊन सुरत परिसरातील पारशी व्यापारी मंडळी जशी मुंबईच्या दिशेने डहाणूकडे सरकली, तशीच ती बलसाड, वापी, नवापूर, नंदुरबार या खानदेशातील रेल्वेलाइनवरील प्रमुख गावांतही आली. ताडी, दारू, लाकूड इत्यादींच्या व्यापाराबरोबरच रेल्वे इंजिनात जळालेला कोळसा लिलावाने घेण्याचे पिढीजात अधिकार या लोकांनी आतापर्यंत सांभाळले होते. त्यांच्यासोबत गुजराती मंडळीही खानदेशात पसरलेली. याचा खानदेशच्या संस्कृतीवर खोल परिणाम झाला आहे. खानदेशमधील भाषेलाही त्यामुळे काहीशा तुच्छतेने धेडगुजरी म्हटलं जातं.
धेडगुजरी म्हणजे धेडाची भाषा मराठी आणि गुजराथी मंडळींची भाषा गुजरी. पण प्रत्यक्षात मात्र नंदुरबारच्या स्थानिक भाषेत ऐराणी, भिली, मराठी आणि गुजराथी आणि मध्य प्रदेशच्या सामीप्यामुळे आलेली हिंदी, या सर्व भाषांचा सहभाग आहे. आदिवासींच्या भिलोरी भाषेप्रमाणेच ऐराणी भाषेलाही वेगळी लिपी नाही, परंतु राजमान्य मराठी भाषेच्या तुलनेत ऐराणी भाषा मृदू आहे. मराठी वा संस्कृत भाषेतील उच्चाराला कठीण असलेल्या र, स, श यासारख्या अक्षरांचं ऐराणी, भिलोरीत अपभ्रंशित मृदू रूप वापरलं जातं. त्याचबरोबर बोलताना आवाजात चढउतार असणारी एक लय असते. त्यामुळे या भाषेला एक उपजत गोडवा आहे. भिलोरी भाषेत तर हे वैशिष्ट्य विशेष करून जाणवतं. खानदेशातील भाषांची विविधता एवढ्यापुरतीच मर्यादित राहत नाही. आदिवासींच्या भिलोरी भाषेतही पोटभाषा आहेत. सातपुड्यात डोगरी भिली, तर नवापूर परिसरातील मावची, पावरा भिलांची पावरी इत्यादी बोलीभाषा आहेत.
वानगीदाखल एकच वाक्य तीन बोलीभाषांत इथे देत आहे :
१) कोठली : तुमनी बगिचामा एक बारी फुल फुललो सो. ताय मला देसा का?
२) पावरी : तुमरा बगिसामाय एक हाजलो फुल सेतह छो. मेह आपहात के?
३) डोगरी : तुमा बगिसामे एक हाजलो फुल फुल्याहं. तो माहू आपाहा के?
ह्या वाक्याचा आणखी एक सांस्कृतिक संदर्भ आहे. आदिवासी समाजात पूर्वी मुलाचा बाप मुलीला मागणी घालायला जायचा तेव्हा अशा अर्थाचं वाक्य वापरून येण्याचा हेतू तो सुचवीत असे.
….
या क्षेत्राची एकच एक भाषा नाही याचं एक कारण असू शकतं, आणि ते म्हणजे खानदेशातील विविध जातींचे जनसमूह. आताच्या नंदुरबार जिल्ह्यात आणि पूर्वीच्या धुळे जिल्ह्यातही कुणा एकाच जातीचं वर्चस्व नव्हतं, आणि त्यातही उच्च जातींचं संख्याबल कमीच होतं. त्यामुळे आपापल्या जाती, पोटजातींची भाषा, संस्कृती टिकवून या अठरापगड जाती गुण्यागोविंदाने जगत होत्या, असं म्हणायला हरकत नाही. या जाती-जातींमध्ये समानता होती, असं म्हणता येणार नाही कदाचित, पण शत्रुत्वाचा अभाव होता हे निश्चितच खरं. केवळ वेगवेगळ्या जाती नाही, तर वेगवेगळ्या धर्मांचा प्रभावही आपल्याला या क्षेत्रात सहजच जाणवतो. हिंदू, मुस्लिम, जैन, महानुभावी, कबीरपंथी अशा विविध धर्मनिष्ठा असणारे समाजगट इथे एका सहिष्णुवृत्तीने जगताना दिसतात. अशाच प्रकारचं नातं हिंदू-मुस्लिम समाजगटांतही होतं. नंदुरबार शहरातील काही वर्षांपूर्वीचंच उदाहरण घ्यायचं, तर त्या वेळी नंदुरबारमध्ये एकच माध्यमिक शाळा होती आणि ती होती नगरपालिकेची. नंदुरबारच्या प्रसिद्ध दर्ग्याजवळच ही शाळा होती. शाळेमध्ये गुजराथी, मराठी आणि उर्दू या तिन्ही मीडियमचे विद्यार्थी होते. एकाच शाळेत एकमेकाचं वेगळेपण गृहीत धरून ते एकत्र शिकत होते. आठवड्यातून एक दिवस शेवटच्या पीरियडला सुट्टी असायची, पण घराकडे पळण्यासाठी नाही. घंटी झाल्याबरोबर सर्व मुलं (सर्व अठरापगड जातींची आणि जैन, मुस्लिम, हिंदुधर्माची) टेकडीवरील दर्ग्याकडे पळत सुटायची. मध्ये आडव्या येणार्‍या नदीवरील बांधावरून पोरं जीव खाऊन धावायची. एक शिक्षक साखरफुटाणे घेऊन अगोदरच टेकडीवरील दर्ग्याशी पहिल्या येणार्‍या पोरांचं स्वागत करायला तयार असायचे. पहिल्या काही मुलांना ओंजळीनं, मागून येणार्‍या पोरांना मुठीमुठीनं दिलं जायचं. नंदुरबार गावाची प्रथाही हीच होती. दर्ग्याच्या दरसाल होणार्‍या जत्रेला जाणार्‍यांत हिंदूंचा भरणा मोठा असायचा. तर गणपती उत्सवात हजेरी लावायला आणि मिरवणुकीसमोर लेझीम खेळायला मुस्लिम वस्तादांच्या तालमीतील पठ्‌ठेही हजर होत असत.
गेल्या दोन-तीन दशकांत जे देशात झालं त्याचं प्रतिबिंब इथेही उमटलं. आपापल्या धर्माशी निष्ठा असलेल्या समाजगटांत एकमेकांबद्दल द्वेष, अविश्वास आणि दूरत्व वाढत गेलं, तसं इथेही झालं आहे; परंतु तरीही ह्या धर्मनिष्ठेला कडवेपणाचा, तिरस्काराचा गडद रंग नाही, असं निश्चितपणे म्हणता येईल. शिक्षण घेणार्‍यांची संख्या वाढू लागल्यावर गुजराती लोकांचं श्रॉफ हायस्कूल आणि ब्राह्मण आणि सवर्ण जातींचं डी.आर. हायस्कूल, मुस्लिमांसाठी उर्दू अँग्लो हायस्कूल सुरू झालं. आदिवासी पोरांना शिक्षण देण्यासाठी आदिवासी समाज कार्यकर्ते नटावदकर, जनार्दन वळवी यांनीही शाळा व आश्रमशाळा सुरू केल्या. आता त्यांचं मोठाल्या शिक्षणसंस्थांत रूपांतर झालेलं आहे. एका शिक्षणसंस्थेचा इथे उल्लेख करणं अत्यावश्यक आहे. अक्कलकुँवा इथे जामिया इस्लामिया ईशातूल उल्म या संस्थेने तीस वर्षापूर्वी धार्मिक शिक्षण देण्यासाठी मदरसा सुरू केला. आज ह्या संस्थेच्या विशाल परिसरात १५ हजारांवर तरुण-तरुणी आर्ट्‌स, सायन्स, आयटीआय, आयटी, युनानी मेडिकल, बीएड, डीएड अशा शिक्षणशाखांतील उच्च पदवीशिक्षण घेत आहेत. सर्वांना होस्टेल्सची उत्तम सोय आहे. शिक्षणाचं मीडियम उर्दू आणि मराठी आहे, आणि जरी मुस्लिम समाजातील विद्यार्थी तुलनेने जास्त असले तरी आदिवासी व इतर समाजगटांचे विद्यार्थी-विद्यार्थीही इथे शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या पसार्‍याची कल्पना येण्याकरता एका बाबीचा उल्लेख केला तरी पुरेसा होईल. विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी पोळ्या करण्याचं यंत्र संस्थेने आणलं आहे. अगदी अल्प काळात हे यंत्र २५००० पोळ्या तयार करतं.
……………..
पुरातन काळापासून या भूमीत माणसाचं अस्तित्व होतं. प्रकाशा इथे इतिहासपूर्वकालीन आदिवासी माणसांचं अस्तित्व होतं असं दाखवणारे पुरावे उत्खननात सापडले आहेत. आर्यांच्या आगमनापूर्वीच आदिवासी या क्षेत्रात वास्तव्य करून होते, असे पुराणकालीन ग्रंथांतून उल्लेख सापडतात. स्वत: आदिवासी आपण राजस्थानकडून आल्याचं सांगतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजस्थानातून भाट समाजाची माणसं या भागात दरसाल येत असत. आताच्या आदिवासींचे पूर्वज या भागात कसे आले याबद्दल ते कथा सांगत. एका मोठ्या परातीत पाणी टाकून, त्यात धातूची तार ताणून तयार केलेल्या वाद्याला उभं करून त्याच्या घूं घूं ध्वनीच्या तालात हे भाट आदिवासींच्या पूर्वजांच्या कहाण्या सुरामध्ये गाऊन सांगत.
भिल आदिवासींना पूज्य असलेल्या देवी मोगरा मातेचं स्थान गुजरातच्या सीमेवर आहे. दरसाल चैत्रात भरणार्‍या या देवीच्या यात्रेला हजारो आदिवासी, बिगरआदिवासी कुटुंबं येतात. दोन-दोन दिवस लाइन लावून दर्शन घेतात. ही यात्रा अमावस्येला असल्याने पूर्वी मंदिराभोवतालच्या टेकड्यांमध्ये असंख्य चुली पेटत असत, तेव्हा भोवतालच्या जंगलावर असंख्य काजवे चमचमत असल्याचा भास होत असे.
ब्रिटिशकाळात आदिवासी राजा असलेल्या काठी गावाची होळी आजही लोकांना आकर्षित करते. आपापली पूर्वापार चालत आलेली वेषभूषा करून आलेले स्त्री-पुरुष विविध रंगांची बहार आणतात. भोंगर्‍या बाजार हे या भागाचं वैशिष्ट्य आहे. पूर्वी अशा यात्रांच्या वेळी आदिवासी कुटुंबं बैलगाड्यांनी येऊन दोन-दोन दिवस मुक्काम करायची. एकमेकांवर फिदा झालेल्या जोड्या मग यात्रेचा लाभ घेऊन पळून जायच्या. कुणा तरी ओळखीच्या वा नातेवाइकांच्या घरात लपून राह्यच्या. पुरेसा अवधी सोबत काढून अशी जोडी घराकडे आली की दोन्हीकडचे नातेवाईक पंचमंडळींच्या साक्षीने आपसात भांडायची हौस पुरी झाल्यावर दोघांचं लग्न लावून देत असत. या प्रथेला ‘झगडा मोडणं’ असंच म्हटलं जायचं. असं सांगतात, की आतापर्यन्त आदिवासींच्या लग्नात आमंत्रणं देण्याची पद्धतच नव्हती. ढोल वाजायला लागला की कुणीही यावं, नाचात सामील व्हावं, लग्नघर सधन असेल तर मध्येच बाजूला जाऊन पानाच्या द्रोणातून दोन घोट मोहाची होरो पोटात रिचवावी, परत नाचात सामील व्हावं. आपल्या घरच्या भाकरी खाऊन लग्नाला जाण्याची आदिवासींची पद्धत आपल्या जातीत नाही म्हणून इतर जातींतील लोक हळहळताना मी ऐकलेत.
बिगरआदिवासी जातींमध्ये दीपावली हा महत्त्वाचा सण असतो. परंतु मध्यमवर्गात नव्याने प्रवेश केलेली आदिवासी कुटुंबं सोडली तर सर्वसामान्य ग्रामीण आदिवासी या दिवाळीला फारसं महत्त्व देत नसत. आदिवासी ज्याला दिवाळी म्हणतात ते गावाच्या सोयीने होणारं, पंचांच्या निर्णयाने होणारं एक सामूहिक हॅपनिंग असतं. ज्या गावात बहुसंख्य आदिवासी वस्ती आहे अशा गावात हा दिवस सामूहिकरीत्या साजरा केला जातो. या दिवशी बकरं कापून गावातील कुटुंबांना वाटे दिले जातात. गावात दिवाळी आहे असं समजल्यावर आठवडी बाजारात दुकानं मांडणारे विक्रेते गावात हजर होतात. गावात एक प्रकारची यात्राच भरते. जरा आडोशाला जुगारवाली मंडळी आपले अड्डे जमवतात. संध्याकाळी गावानं सौदा केलेली आदिवासी सोंगाड्या पार्टी येते आणि धेडगुजरी भाषेत करमणुकीचा कार्यक्रम सुरू होतो. स्त्री पार्ट एखादं कोवळं मिसरूड न फुटलेलं पोरगंच करतं. आदिवासींत रोडाल्या नावाचा नाचत नाचत प्रेमगीतं गायचा किंवा गात गात नाचायचा एक प्रकार आहे. दोन सोंगाडे (स्त्री व पुरुष) एकमेकांसमोर मधे काही अंतर सोडून उभे राहतात आणि आळीपाळीने प्रेमगीताचं एक-एक कडवं म्हणतात. ध्रृवपदाला दोघं जवळ येऊन अत्यंत गतीने नाचतात. या गावदिवाळीत केल्या जाणार्‍या सोंगाड्या पार्टीच्या कलापथकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांमध्ये पुढे बसण्याचा मान स्त्रियांना दिला जातो. पुरुष मंडळी मागच्या बाजूला बसतात. उत्तररात्रीनंतर स्त्रिया-मुलं निघून गेल्यानंतर पुरुष जरा जास्त रसिक होतात. संवादांत आणि गाण्यांत चावटपणाचं प्रमाण जरा वाढतं. परंतु सर्वसाधारणपणे हा गावदिवाळीचा कार्यक्रम लहानमोठ्या, स्त्री-पुरुषांना एकत्रितपणे सर्व दिवस मजा घेण्याचा असतो.
या भागात होणारी आणखी एक दिवसेंदिवस लोकप्रिय होणारी यात्रा म्हणजे सारंगखेड्याची दत्तात्रयाची यात्रा. या यात्रेला गुजरात, राजस्थान, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रदेशांतून उत्तमोत्तम घोडे विकायला येतात. कित्येकदा लाखाच्या वर किंमत देऊन घोडे विकत घेणारी गिर्‍हाइकंही इथे येतात. दोन आठवडे चालणारी ही यात्रा आजकाल मुंबई-पुण्याकडील लोकांचंही आकर्षण होत आहे.
तापीच्या काठाचं श्रीप्रकाशा तीर्थस्थान तर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. गुजरातच्या सीमेवरील उकाई धरणाचं बॅकवॉटर कवेत घेतलेल्या गुजरातची सीमा प्रकाशापासून दोन-तीन किलोमीटर्सवर पोचलीय. नाशिकला जाणं जमलं नाही तर या भागातील हिंदू मंडळी अस्थिविसर्जन करायला प्रकाशाला येतात. आदिवासींच्या परंपरेत मात्र या स्थानाला विशेष महत्त्व नाही. आदिवासींच्या दृष्टीने मोगरामातेनंतर दुसरं पवित्र स्थान म्हणजे अस्तंभ्याचा डोंगर- सातपुड्यातील एक उंच शिखर. महाभारतातील चिरंजीवपद प्राप्त झालेला अश्वत्थामा या डोंगराच्या आसपास भटकत असतो आणि या दुर्गम अशा गडावर यात्रेसाठी आलेल्या, रस्ता चुकलेल्या वा भलत्याच वाटेला गेलेल्या यात्रेकरूंना तो सुरक्षित रस्ता दाखवतो, अशा आख्यायिका सांगितल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून वणीच्या देवीला इथून चालत जाणार्‍यांची संख्याही वाढत आहे.
….
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बाहूल्य आणि अठरापगड जातींचं वास्तव्य यामुळे इथल्या संस्कृतीत वैविध्य आणि उर्वरित महाराष्ट्रापेक्षा असलेलं वेगळेपणही जाणवतं. लग्नाच्या वेळी लाऊडस्पीकर्स लावून सभोवताल दणाणून सोडण्याची आधुनिक पद्धती इथेही पोचली आहे. मुहूर्तवेळेच्या बाबतीत मात्र मध्यम व कनिष्ठ जातींचा ङ्गारसा आग्रह नसतो. आता तर मारुतीचं दर्शन घेऊन परतणारी नाचणारी पोरंपोरीच लग्नाची घटिका ठरवतात. लग्न समारंभात नाचणं हा अटळ असा कार्यक्रम असतो. इथे त्यात आणखीही एक स्थानिक वैशिष्ट्य आहे. हिंदी, गुजराथी वा मराठी पॉप्युलर गाणी या स्पीकर्सवर लावली जातात, पण कॅसेट्‌सचा वा सीडीचा वापर करून नाही. बहुधा कुणातरी व्यावसायिक व सुमार आवाजाच्या स्थानिक गायकाला आपल्या वाद्यवृंदासह अशा कार्यक्रमाला आणलं जातं. ज्या गाण्यांच्या तालावर नाचता येतं अशी पॉप्युलर हिंदी व गरब्याची गुजराथी गाणी हे गायक म्हणतात. गाण्यामध्ये स्त्रीच्या आवाजातील ओळी गाण्यासाठी गायिका नसते. कोवळ्या आवाजाचा मर्दच बाईच्या आवाजात अशी गाणी म्हणतो. हा प्रकार का पॉप्युलर आहे हे एक गूढच म्हणावं लागेल. कारण स्पीकर सिस्टीमवर सीडी लावण्यापेक्षा हा प्रकार निश्चितच महागडा आहे. पण एकूणच, लोक अजून लाइव्ह प्रोग्रॅम ऐकण्याला प्रेफरन्स देतात असं दिसतंय.
लग्नाची गाणी परंपरागत चालत आलेली असतात हे खरं, परंतु तशा अर्थाने ही गाणी पाठ केलेली नसतात आणि उस्फुर्त काव्यरचनाही नसते. असं म्हणता येईल, की परंपरेने चालत आलेल्या गाण्याच्या टेम्प्लेट्‌स असतात. लहान मुलांना रंगवण्याकरता पुस्तकं असतात त्यातील रेखाचित्रांप्रमाणे गाण्यांचे ढाचे तयार असतात. गाणारी बाई त्यात वर्तमान वास्तवाचे रंग भरत जाते. मग ओळखीच्या, नात्यातील व्यक्तींना टोमणे मारणं, जुन्या घडलेल्या घटनांच्या आधारे टिंगल-टवाळी करणं, असे तपशील त्यात भरले जातात. रात्रीच्या निवांत वेळी तासन् तास ही मैफल चालू राहते.
आदिवासींमध्ये तर स्त्रियांना सामूहिकरीत्या गाणी म्हणण्याची उपजतच आवड असते. चार बाया एकत्र आल्या की त्यांचे दोन गट तयार होतात. प्रौढ बायांपैकी कुणी तरी गाणं म्हणायला सुरुवात करतं. एका गटानं एक ओळ गायली की दुसर्‍या गटानं तीच ओळ परत गायची. जोपर्यंत ती बाई गाण्याची पुढची लड सोडत नाही तोपर्यंत दोन्ही गटांत गायलेल्या ओळींचं आवर्तन सुरू राहतं. यामध्ये एक लाभ असाही होतो, की एकच ओळ घोळून घोळून म्हटल्यामुळे लहान व तरुण वयातील मुलींना ही गाणी आपोआपच पाठ होतात.
गाण्याची जशी पद्धत तशीच नाचाचीही. आदिवासींच्या नाचात वापरले जाणारे ढोल चांगलेच वजनदार आणि मोठ्या आकाराचे असतात. हे ओझं गळ्यात घेऊन, एक चाळ वाजवत ढोलवाला सतत पावलं टाकत असतो. ढोलाचा आवाज आला की पोरंपोरी हळूहळू भोवती जमा होतात. पोरं, गडीमाणसं आधी नाचायला लागतात, अन् मग तारुण्याच्या सीमेवर असलेल्या मुली हळूच एकमेकांच्या पंजांत पंजे अडकवतात, खांद्याला खांदा भिडवून पावलं टाकू लागतात. मग प्रौढ स्त्रियाही पुढे होतात. ढोलवाला, बासरीवाला, झांजवाला हा वाद्यवृंद मधे आणि भोवती पुढेमागे आणि रिंगणात गोलाकारात सरकणारे पोरापोरींचे लहान लहान गट. नवरात्रीचे नऊ दिवस गल्लोगल्लीत गरबा नाचणार्‍यांचा उत्साह दृश्य व श्रवणीय रूपांत जाणवतो. पुण्यामुंबईसारखं या नाचांना धंदेवाईक रूप अजून तरी आलेलं नाही, पण त्या बाबतीतही गुजरातचं अनुकरण होणार यात शंकेला जागा नाही. गरब्याप्रमाणेच संक्रातीला पतंग उडवण्याचं वेड गुजरातमधून इथं पोचलेलंच आहे.

जिल्ह्यातील लोकांच्या रोजच्या जेवणात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकर आणि भरपूर शेंगदाणा वापरलेली चटणी. चटणी बनवण्याच्या पद्धतीत भरपूर तेल आणि मुबलक तिखट यांचा वापर. मात्र कुठलीही जात असो, पाहुणे-रावळे आले की खिचडी पाहिजेच. सोबत पापड, कुरडया, सांडगे यासारखे तळणाचे पदार्थ असायलाच हवेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गल्लोगल्लीत उन्हात खाटलं तिरकं ठेवून त्यावर शेवया बनवणार्‍या स्त्रिया नजरेत येतात. सणासुदीला पुरणपोळ्या, मांडे असणारच. अगदी मुस्लिमांमध्येही मटणाच्या रश्शाबरोबर मांडे खाण्याची पद्धत आहे. गुजरात जवळ असल्यामुळे आणि स्थानिक पातळीवर तूर, मूग, हरभरा यांचं उत्पादन असल्याने स्वयंपाकात बेसनाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जातो. इथल्या हॉटेलांत गेलात तरी सकाळच्या नाश्त्याला लोक शेव-खमणी (खमण ढोकळा) खाताना दिसतात. याशिवाय इथला खास पदार्थ म्हणजे भजीपात्रा. पात्रा म्हणजे आळूची पानं वा अळूच्या वड्या. मात्र खानदेशातील अळूच्या वड्या कडक तळलेल्या असतात, त्यामुळे त्या भरपूर टिकतातही. सामिष खाणारे लोक बकरं वा बोकड खाण्याऐवजी कोंबडी खाणंच जास्त पसंत करतात. चिकनगुनियामुळे काही महिने बर्‍याच लोकांनी कोंबड्या खाणं बंद केलं होतं, पण आता परत सर्व व्यवस्थित सुरू झालं आहे.
आदिवासींच्या सर्वच सणासुदींत मोहाच्या दारूला खास महत्त्व असतं. बहुधा अशी दारू खास भट्टी लावून नवसागर वा इतर किक आणणारी केमिकल्स न वापरता बनवून घेतली जाते. एकूणच, इथल्या लोकांमध्ये, आदिवासींच्या सहवासामुळे म्हणा हवं तर, पिण्याचा षोक जास्त दिसतो. कदाचित प्रमाण जास्त नसेलही; पण निदान दारू पिणं हे फारसं निषेधार्ह मानलं जात नाही हे निश्चित. असंही असू शकेल, की पलीकडेच दारूबंदी असलेलं ड्राय स्टेट आहे आणि चोरट्या दारूच्या व्यापाराला भरपूर वाव आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये उत्पादित होणारी दारू महाराष्ट्रातूनच गुजरातला जात असल्याने काही प्रमाणात तो माल या जिल्ह्यातही वितरित होत असावा.

आदिवासींची वेषभूषाही वैशिष्टपूर्ण आहे. पुरुषांचे वेष खास वेगळे नसले, तरी पुरुषांनी दागिने घालणं हे समाजमान्य आहे. भिल समाजातील स्त्रिया बहुधा साडीचे दोन तुकडे करून कमरेच्या खाली एक व वर डोके व छाती झाकण्याकरता एक अशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रं वापरतात. पावरा स्त्रियांच्या पायांत, कानांत, गळ्यात वापरले जाणारे दागिने बहुधा चांदीचे असतात. बाकी ठाण्यातील वारली जमातीतील स्त्रियांना केसांची खास निगा राखून फुलं माळण्याची हौस दिसते तशी भिलांमध्ये नाही. खेड्यावर राहणार्‍या आदिवासीच्या घरामागे वाडी (किचन गार्डन) सर्रास पाह्यला मिळते. इथे मका, लिंबू यासारखी झुडपं आणि वेगवेगळ्या शेंगांचे वेल लावले जातात, परंतु फुलांची झाडं क्वचितच दिसतात. ठाण्यातील आदिवासी आपल्या घराच्या भिंती चित्रं काढून सुशोभित करतात, तीही परंपरा इथं आढळत नाही. आदिवासींत स्त्री-पुरुषातील नातं सवर्ण जातीतील या नात्यापेक्षा निश्चितच अधिक समान आहे. अगदी गुजर समाजातही कुटुंबात स्त्रीला खास अधिकार परंपरेने दिले आहेत. शेतातील धान्य एकदा खळ्यातून घरी आलं की त्याची कशी विल्हेवाट लावायची यावर घरातील प्रमुख स्त्रीचा अधिकार असतो. घरातील प्रमुख स्त्री कित्येकदा आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे आपल्या मुलांपेक्षा जास्त झुकतं माप देते, अशी तक्रार गुजर पुरुषमंडळींकडून ऐकू येते. मात्र इथे एक गोचीदार परंपराही आहे. सासूनंतर घरातील मोठी सून थाकट्या जावांवर अधिकार गाजवते. त्यामुळे कुटुंबातील धाकट्या भावाला मुलगी मिळणं जरा कठीणच होतं. पण एकूणच मध्यम व अठरा-पगड जातींत स्त्रियांना पुरेसं महत्त्व आणि अधिकार परंपरेने दिलेले असतात असं दिसतं.
………….
परंतु हे शहरी सुशिक्षित जातींपेक्षा वेगळं असणारं सांस्कृतिक वास्तव व वेगळी जीवनशैली झपाट्याने बदलत आहे, हेही खरं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील लोकवस्ती मुख्यत: डोंगरदर्‍यांतील गावा-पाड्यांत पसरलेली आहे. एकूण लोकवस्तीच्या केवळ १८-१९ टक्के लोक शहरात राहतात. यातही शहरात राहणार्‍या आदिवासींचं प्रमाण अगदीच अल्प आहे. परंतु या परिस्थितीतही आता झपाट्याने बदल होत आहे आणि याचं प्रमुख कारण आहे आदिवासींमध्ये शिक्षणाचं वाढत असलेलं प्रमाण आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत होत असलेले बदल. आज नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षितांचं प्रमाण आहे लोकसंख्येच्या ४६-४७ टक्के. आदिवासींमधील सुशिक्षितांचं प्रमाणही आता कमी नाही. आदिवासींनी शिक्षित व्हावं म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न चालू आहेत. त्यातील लहान वयापासूनच आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा काढण्याचा कार्यक्रम शासन अनेक वर्षांपासून यशस्वीपणे राबवत आहे. आदिवासी मुलामुलींमध्ये मुलींचं गळतीचं प्रमाण काही वर्षांपूर्वी बरंच होतं, परंतु आता हे प्रमाण कमी होत चाललं आहे. यामुळे आदिवासींतील सुशिक्षितांचं प्रमाण तर वाढत आहेच, परंतु लहानपणापासून कुटुंबापासून आणि आदिवासी सामाजिक जीवनापासून वेगळे राहिल्याने आणि मुख्यत: नोकरदारवर्गात सामील झाल्याने आदिवासींचं मध्यमवर्गीयीकरणही मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीपासूनही हा सुशिक्षित आदिवासी स्तर अलग पडत चालला आहे. इतकंच नव्हे, तर मुलांपेक्षा मुली जास्त प्रमाणात शिक्षण घेत असल्याने पदवीधर आणि नोकरी करणार्‍या मुलींना योग्य वर न मिळण्याची समस्या भेडसावू लागली आहे.
नंदुरबार स्वतंत्र जिल्हा घोषित झाल्यापासून नंदुरबार शहर व जिल्ह्याचं रूप बदलत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, तहसिलदार ऑफिस, पोलिस कार्यालय यांच्या नवनव्या बिल्डिंगा तिथे उभ्या राहिल्या आहेत. नंदुरबारमध्ये नवं शानदार नाट्यगृहही उभं राहिलं आहे. रस्ते रुंदावले आहेत. चौकांत पुतळे उभे करून सुशोभित केले गेले आहेत. एकीकडे असे भौतिक बदल होत असताना वाढत्या लोकसंख्येमुळे, आधुनिक जीवनप्रणालीच्या प्रसारामुळे निर्माण होत असलेल्या वाढत्या गरजा पुर्‍या करण्यासाठी नोकर्‍यांच्या अभावामुळे स्पर्धा व ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत. गावागावांत पोहोचलेल्या टीव्ही आणि व्हिडिओमुळे तरुण-तरुणींच्या भोवतालचं वास्तव तर बदललेलं नाही, मात्र त्यांची स्वप्न शहरी व सधनवर्गाची झाली आहेत; वाढत्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा यांच्या वाढत्या दबावामुळे वाढतं नैराश्य आणि आत्महत्यांचं वाढतं प्रमाण, ही भयावह समस्या समाजाला भेडसावू लागली आहे. इथला आदिवासी मात्र यापासून अजून तरी दूर आहे. याचं कारण त्याची अल्पसंतुष्टता असावी. या संदर्भात हा सद्गुणच म्हणावा लागेल.
जिल्ह्याच्या या परिस्थितीचं विकासाचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे. जिल्ह्यात उद्योगांचा विकास जवळजवळ नसल्यासारखाच म्हणावा लागेल. पहाडपट्टीतील गावपाड्यांमधील लहान मुलं आणि त्यांच्या आया यांच्यात कुपोषणाचं प्रमाण कमी होत नाहीय. नव्या जिल्ह्याच्या विकासाकरता आणि आदिवासींची स्थिती बदलावी म्हणून केंद्र व राज्यपातळीवर अनेकविध योजना कार्यान्वित होत असूनही वास्तवात बदल होताना दिसत नाही.
विकासातील अवरोधास शासकीय कर्मचार्‍यांत असलेला भ्रष्टाचार आणि निष्क्रियताही कारणीभूत आहेच, परंतु ग्रामपंचायत सभासदापासून खासदारापर्यंत राज्यकारभार करणार्‍या नेत्यांची आपमतलबी संकुचित वृत्तीही कारणीभूत आहे. शासकीय पैशाने म्हणजे पर्यायाने जनतेच्या पैशानेच येणार्‍या योजनांचं श्रेय स्वत:ला मिळणार नसेल तर त्या योजनेलाच विरोध करायचा किंवा तिला केराच्या टोपलीत टाकायचं, हा प्रकार इथले सर्वच राजकीय नेते करतात. हा प्रकार कधी कधी हास्यास्पद पातळीवर घसरतो. इथल्या एका तरुण आदिवासी नेत्याने ‘आदिवासी अडाणी आहेत’ असा युक्तिवाद करून आदिवासींना गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेलाच विरोध केला होता. आपल्या क्षेत्रात होणार्‍या औद्योगिकीकरणाच्या व आधुनिकीकरणाच्या वा सार्वजनिक हिताच्या योजनांचं श्रेय विरोधी नेत्यांना मिळेल म्हणून योजनांनाच विरोध करणार्‍या नतद्रष्ट नेत्यांनीही जिल्ह्याचं प्रचंड नुकसान केलं आहे.
आदिवासींच्या अल्पसंतुष्टतेचा उल्लेख आधी केला आहेच. या अल्पसंतुष्टतेतूनच आदिवासी आळशी असल्याचा सर्वमान्य भ्रम किंवा ‘घरात दाणा तर भील उताणा‘ अशा म्हणी अस्तित्वात आल्या आहेत. या स्वभाववैशिष्ट्यामुळे आदिवासी समाजगटांवर व त्यांच्या पुढार्‍यांवर इतर जातींतील नेत्यांचा प्रभाव असल्याची उदाहरणं अनेक ठिकाणी आढळतात. नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुके धरून एक लोकसभेचा मतदारसंघ होतो. विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. सध्या तरी हे सर्व मतदारसंघ आदिवासींकरता राखीव आहेत. महाराष्ट्रातील एकूण आदिवासींचं नेतृत्व करणं तर सोडाच- पण या जिल्ह्यातील भील, पावरा, कोकणी इ. आदिवासींचं नेतृत्व करणारा कर्तबगार आदिवासी नेता अद्यापपावेतो लोकप्रतिनिधी झालेला नाही. वस्तुत: आदिवासी समाजात गावपातळीवर असलेल्या पंच पद्धतीतून लोकशाहीची बीजं रुजलेली आहेत; मात्र आदिवासी बाहुल्य असूनही पंचमंडळीशी नातं राखून आपलं नेतृत्व टिकवण्याचं कसब आदिवासी नेत्यांनी अवगत केलेलं नाही. जिल्ह्यातील आदिवासी नेते कुणा तरी बिगरआदिवासी नेत्याचं बोट धरून चालणंच पसंत करतात, असा गेल्या पाच-सहा दशकांचा दाखला आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती बदलत आहे. मात्र, जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाचं सकुंचित जातीय व स्वार्थी राजकारण आणि प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाचं श्रेय घेण्याची धडपड यामुळे जिल्ह्याचं एकमेव वादातीत नेतृत्व अद्याप आकाराला आलेलं नाही.
….
खरं पाहिलं तर जिल्ह्याच्या विकासाला भरपूर वाव आहे. सातपुड्याच्या टेकड्यांवरील जंगलांचं संवर्धन केलं गेलं तर अजूनही असंख्य औषधी व जीवनोपयोगी वनस्पती उपलब्ध होऊ शकतात. नद्यांतून वाहून जाणार्‍या पाण्याचं नीट नियोजन केलं, येथील हवामान-जमीन यांना योग्य असलेल्या आणि पिढ्यान् पिढ्यांच्या अनुभवातून ज्यांची योग्यता सिद्ध झाली आहे अशीच पिकं घेतली तर निश्चितच लाभ होऊ शकतो. पूर्वी सातपुड्यात प्रचंड प्रमाणात सागाचं उत्कृष्ट लाकूड उपलब्ध होत होतं. आंबा, मोह, चिंच, चारोळी यासारख्या वृक्षांच्या कंदमुळांपासून आदिवासींची अन्नाची गरज तर पूर्ण होत होतीच, पण शरीरास आवश्यक सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मिळत असत. आज पहाडपट्टीत कुपोषित बालकांची समस्या भयावह रूपात सतावत आहे. आदिवासी समाजात शारीरिक व मानसिक रोगांवर उपचार करणारे भगत व वैदू असतात. वैदूंना जंगलातील वनस्पतींचा वडिलोपार्जित ज्ञानसाठा उपलब्ध आहे. ज्यांनी जगण्याचं साधन म्हणून वनखात्याची नोकरी पत्करली आहे अशा सरकारी कर्मचार्‍यांनी स्थानिक वनस्पती व पशुपक्षी यांचं परंपरागत ज्ञान असलेल्या स्थानिक लोकांचं सहकार्य घेतलं, तर स्थानिक जनसमूह श्रीमंतीचे नाही पण सुखी सुरक्षित जीवन निश्चितच जगू शकतील.
नैसर्गिक संसाधनांचा सम्यक उपयोग करून जगण्याची शैली ही डोंगरटेकड्यांच्या कुशीत राहणार्‍या समाजगटांनी शतकानुशतकांच्या अनुभवातून विकसित केली होती. नैसर्गिक संसाधनाचा अमर्याद उपयोग व विनाश यातून काय संकटं आकारात येतात याचा कटू अनुभव मानवाला घ्यावा लागत आहे. वनखात्याच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जातं जमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने. ही जमीन बहुधा शेतीयोग्य नसते. केवळ अशा जमिनीवरील उत्पादनातून शेतकर्‍याला जगणं कठीणच असतं. आदिवासी कुटुंबांना खासगी मालकीने जंगल राखण्याच्या अटीवर जंगल उत्पादनं घेण्याची परवानगी दिली तर वनविकास होणं अवघड नाही. परंतु जंगलविकास करण्यात वनखात्यांच्या कर्मचार्‍यांनाच रस नसतो. चांगलं जंगल वाढलं तर त्यातून या कर्मचार्‍यांना ‘वरचं’ उत्पन्न काय मिळणार? त्यापेक्षा जंगल नष्ट झालेली पडीक जमीन ही दरवर्षी विणार्‍या गाईप्रमाणे कमाई देणारी असते. अशी जमीन दरसाल कुणा तरी आदिवासी शेतकर्‍यांना कसायला देऊन त्याच्याकडून मन मानेल ती देणगी घेता येते. पावसाळ्याचं एक पीक घेतलं की त्या आदिवासीचा जमिनीच्या तुकड्याशी संपर्क तुटतो. पुढल्या वर्षी नव्याने सौदा, परत देणगी. परिणामी असं दिसतं, की वनकर्मचारीच आदिवासींना जंगल तोडायला उत्तेजन देतात.
शहादा तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली. बहुधा डोंगर-टेकड्यांवर जंगलतोड झाली तरी ही झाडं मुळातून नष्ट होत नाहीत. त्यामुळे एक-दोन वर्षं या जंगलजमिनींना संरक्षण दिलं की जंगल नव्याने वाढू लागतं. दरा विरपूर या गावातील रहिवाशांनी अशाच प्रकारे जंगल राखलं होतं, गेल्या सहा वर्षांपासून. या साली येथून कित्येक मैल दूर असलेल्या धडगाव भागातील पावरा आदिवासींनी या राखलेल्या जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केली. माहीतगार असं सांगतात की यामागे वनकर्मचार्‍यांचीच प्रेरणा होती. पूर्वी आदिवासी गावांत एकोपा होता; निवडणुकीतील स्पर्धेच्या राजकारणाने, गटबाजीने, धर्मपंथद्वेषाने गावाचं वातावरण दूषित झालं नव्हतं. आता मात्र असं घडतंय. आदिवासी गावांमधला एकोपा कमी होतोय. हितसंबंधी लोक याचा फायदा घेताहेत. परंतु एक आहे, निसर्गाबद्दल आपलेपणा अजूनही आदिवासी स्त्रीपुरुषांत टिकून आहे. वनखात्याच्या मालकीत असलेली सर्व जमीन आदिवासींना केवळ वर्षात एक पावसाळी पीक काढण्यासाठी नाही, तर मोह, चारोळी, चिंच, हिरडा यासारखे मोठे वृक्ष, औषधी गुण असलेली झुडपं आणि पावसाळी एकपिकी शेती, अशा प्रकारची मिश्र शेती करण्यासाठी दिली गेली तर सातपुडा काही वर्षांतच हिरवागार दिसू लागेल.
…..
आदिवासींनी आपली आदिम संस्कृती टिकवून ठेवावी असं अनेकांना मनापासून वाटतं. हे केवळ रोमॅन्टिसिझममधून होतं असं मला वाटत नाही. आदिम संस्कृती विकसित झाली माणसामाणसांतील परस्परावलंबी आणि निसर्गावलंबी सहज संबंधांतून. समूहामध्ये प्रत्येकजण प्रामुख्याने आणि प्राथमिकतेने होता माणूस. तिथे राजा आणि प्रजा, उत्पादक आणि गिर्‍हाईक, मालक आणि मजूर अशा वर्चस्ववादी नात्यांतून आलेले संबंध अस्तित्वातच नव्हते. आदिम संस्कृतीचं आकर्षण आकारतं ते माणूस म्हणून. आपण जे हरवलंय त्याच्या धूसर स्मृतीतून. पण संस्कृतीचा संबंध असतो जीवनशैलीशी. जीवनशैली आकारते भोवतालाशी घडणार्‍या जिवंत संबंधातून. आदिवासीचं भोवताल बदलतंय, जीवनशैली बदलतेय. मग आदिम संस्कृती टिकून राहणार कशी?
या काळात एवढंच म्हणता येईल, एका स्थानावरून दुसर्‍या स्थानी स्थलांतरित होणारे विस्थापित आणि एका संस्कृतीतून दुसर्‍या संस्कृतीत स्थित्यंतरीत होणारे विस्थापित, दोघांचीही पीडा एकाच प्रकारची आहे. ही पीडा केवळ आदिवासी जमातीच नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या परिघावरील सर्वच जाती-जमाती अनुभवत आहेत. नंदुरबार जिल्हा अशा अनेकांतील एक आहे. या दगडाधोंड्यांच्या महाराष्ट्रात सह्याद्री, सातपुडा, विंध्य अशा पर्वतरांगांशी नातं सांगणार्‍या डोंगरदर्‍यांतील अनेक क्षेत्रांतील लोकसमूहांचीही हीच पीडा आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...