चिनई (चीनबद्दल)
चायना पोस्टिंग as a country Head हे 2016 च्या डिसेंबरमध्ये जेव्हा वाचले,
तेव्हा घरातील आम्हा सगळ्यांची एकच प्रतिक्रिया होती – ”बाप रे!”–
नंतरच्या प्रतिक्रिया दारच्या अर्थात परिचितांच्या. उदा: “अमेरिका किंवा
लंडन नाही का; गेला बाजार हाँगकाँग तरी !” Foreign Posting म्हणजे
पाश्चात्त्य देश हेच समीकरण इथल्यांच्या डोक्यात नि त्यांतही चीनमध्ये बदली
म्हणजे विविध प्रतिक्रियांचा अनुभव. करमणूक तर होत होती, त्यांमागची
काळजीही जाणवत होतीच..चीनमधील वास्तव्य सुकर होण्यासाठी माहितीच्या
महाजालापासून ते व्यक्तिगत अनुभवांपर्यंत अनेक मार्गांनी पूर्वतयारी
केली.एकदाचे मलेशियन एअरलाइन्सच्या विमानातून चीनमधील ग्वांगझौ या शहरात
दाखल झालो.
द रीगल कोर्ट ह्या 31 मजली इमारतीत निवास असणार होता.जसा काळ पुढे सरकू लागला, तशी ‘अजब’
चीनच्या गजब दुनियेची नि त्याहून गहजब वाटतील अशा नियमांची तोंडओळख होऊ
लागली. पण थांबा! तोंडओळख म्हणणे चुकीचे होईल… कारण येथील भाषा मँडरीन- जी
अगम्य व दुर्बोध आहे,- त्यामुळे (चिन्यांच्या) इंग्रजीच्या एक वा दोन
शब्दांपुरत्या संभाषणातून आकलन होऊ लागले,असे म्हणता येईल. पहिला गहजब
तडाखा कस्टम्स मध्येच बसला होता. आपले पोळपाट – लाटणे एवढे ‘विनाशकारी’ असू
शकते, नि उदबत्त्या ‘प्रक्षोभक’ असू शकतात, हे तेव्हा ( ह्या वस्तू जप्त
झाल्यावर ) कळले.
तर गेल्या काही महिन्यांत चिनी दिनचर्येचे जे दर्शन घडले, समजून घेता आले,
ते प्रातिनिधीक नसेलही, परंतु चक्षुर्वैसत्यम् असल्याने विश्वासार्ह नक्कीच
आहे. विशेषत: आमच्या ग्वांगझौ शहरापुरते..
ग्वांगझौ हे ग्वांगडन परगण्यातील राजधानीचे शहर. बैजिंगनंतरचा क्रमांक
असलेल्या या शहराने चक्क 13 जिल्ह्यांना पोटात सामावले आहे, बैयूनसारखा
पर्वत व कॅन्टन टॉवर ही उत्तुंग मनोरा असल्यासारखी संरचना यांना कवेत घेऊन
या शहराचा अगडबंब विस्तार झालेला आहे. नुसते ग्वांगझौ पूर्ण पहायचे म्हटले
तरी कमीत कमी 150 तरी प्रेक्षणीय स्थळे आहेत! आमच्या डोळ्यांना व
हालचालींना भारतीय , तेही डोंबिवलीमधील उलट्या स्पीडब्रेकर्सची सवय..
त्यामुळे सुरुवातीस इथले गुळगुळीत आठपदरी रस्ते, शास्त्रशुद्ध
स्पीडब्रेकर्स, इ, पाहून जरा गांगरल्यासारखेच व्हायचे ! स्वच्छता बघून तर
डोळे अक्षरश: निवले; कारण दिवसातून दोनदा रस्ते पाण्याने धुतले जातात !
तरीही चिखल वा डबकी नाहीत. निवांत चालण्यासाठी (फेरीवाल्यांसाठी नव्हे)
फुटपाथ.. नि कपडे वा चपलांना माती, थुंकी, पानाच्या पिचकार्यांची घाण
लागेल, याचे भय इथले वाटत नाही ! उंचच उंच इमारती नि त्यांना जणु
टुमदारपणाचे आव्हान देत उभी असलेली बंगलीवजा घरेही दिसतात. ग्वांगझौमध्ये
दुचाकींना प्रवेश नाही. फक्त चारचाकी, तेही आलिशान वर्गातील ; अपवाद
सायकलींचा ! आबालवृद्ध सायकलींवर स्वार होऊन लगबगीने जाताना दिसतात. मध्येच
एखादी हिरकणी पाठी वा पुढे छोटुकल्या मुलांना बसवून सायकल चालवत जात असते.
रस्ता ओलांडण्याचे नियम व आपण यांची शाळेनंतर फारकत झालेली असते. मात्र इथे
त्यांच्याशी पुन्हा जवळीक करावीच लागते.सिग्नल कोणीच तोडत नाहीत.पोलीस
नसला तरी CCTV च्या डोळ्यांची ‘पाखरे’ (खरे तर ‘घार’ म्हणायला हवे) आपल्या
‘भोवती सतत फिरतात’! नजरेच्या टप्प्यात जिथे तिथे हे नजरबाज दिसतात.इथे
भारतात असलेल्या पद्धतीविरुद्ध वाहतुकीचा शिरस्ता आहे.म्हणजे उजवीक़डून..
आणि वाहनचालकही डावीकडे बसतो. मेट्रोचं विस्तीर्ण जाळं, 9 ते 12 रेल्वे
लाईन्स, बुलेट, ठिकठिकाणी पूल आणि त्यांवर फक्त पादचारी वा वाहने, भिकारी
किंवा फेरीवाले नाहीत.. खरे तर विशिष्ट झोनमध्येच फिरते विक्रेते; तेही
कमीच. मुळातच राहणीमान स्वस्त आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू माफक दरात,
दर्जेदार उपलब्ध असतात. इथे RMB म्हणजे युआन हे चलन असून भारतीय रुपयाच्या
दसपट मूल्य आहे. विशेषत: अन्न व कपडे यांचे विविध नमुने माफक किंमतीत
मिळतात. हो! ज्या गोष्टीच्या उल्लेखाने इथल्या वास्तव्याबद्दल धास्ती वाटत
होती, तसं चित्र स्वकीयांनीच रंगवलं होतं (पूर्वी मुलीला माहेरच्यांकडून
पालुपद ऐकावे लागे की ‘तिथे’ गेल्यावर हे होईल नि ते असेल; याच धर्तीवर) ..
“ओ चायना! तिथे आता साप,झुरळं,पाली खावे लागतील’’! तर पूर्वीच्या सासर
संकल्पनेत जसं हे भय वास्तविक ठरत असे, तसं चीनमध्ये खरोखरंच चालणारा
कोणताही सजीव (माणूस वगळून) गट्टम् होतो! हे लोक एकंदरच खाण्याचे फार शौकीन
आहेत.मात्र नुसतेच कच्चे,उकडून वा शिजवून.. मसाल्यांचा संस्कार
कमीच.चायनीजच्या नावाने आपण भारतात जे काही पाकसंस्कार करतो, त्यांचं
नामोनिशाण इथे नाही! सतत चहा पीत तरुण मंडळी कार्यरत असतात.पण तोही खराखुरा
हर्बल.म्हणजे विविध रंगरुपाच्या मुळ्या उकळवून चक्क त्यांचा काढा करतात नि
घोट घोट पीत असतात.
भारतीय पद्धतीचे अन्नधान्य लहान प्रमाणात का होईना, जवळच उपलब्ध होणे हा एक
सुखद धक्का होता.परंतु तिथे Sellers Monopoly. दुकानदाराच्या मनाप्रमाणे
वस्तूची किंमत ठरते, तीही प्रत्येक वेळी वेगवेगळी! उदा: तूप पाचपट तर
पार्ले जी चा पाच रुपयांचा पुडा पन्नास RMB !
पाण्याचे रिसायकलींग केले जाते.त्यामुळे पिण्याजोगे पाणी विकत आणले जाते वा
उकळून वापरतात. इथली हवा इतकी चंचल की घटकेत ऊन तर कधी भुरुभुरु पाऊस..
आणि डिसेंबर- जानेवारीमध्ये थंडी थेट 1 डिग्रीपर्यंत उतरते!
रंगीबेरंगी ओव्हरकोट लपेटून तरीही चिनी मंडळी दिनक्रमात गर्क असतात.फावल्या
वेळात व्यायाम,खेळ.. एवढ्या मोठ्या ग्वांगझौमध्ये ठिकठिकाणी बगीचे, मैदाने
आणि मोठाली स्टेडियम्स आहेत.अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन जिम
असतात, तिथे व्यायामाची तर्हेतर्हेची उपकरणे व वेगवेगळे खेळ खेळण्याची
सोय असते. सारे एकतर नि:शुल्क किंवा खेळण्याची साधने.. तेवढी स्वत:ची
न्यायची. शारीरिक तंदुरुस्तीबाबत चिनी लोक फारच सजग असतात. नृत्यही त्याच
भूमिकेतून केले जाते. वय, लिंग यांची मर्यादा नाही. सार्वजनिक जागी
शिष्टाचार पाळले जातात, तरीही एखादा चिनी नागरीक व्यायाम/ नृत्य
करतानादेखील आढळतो. भोवतालचे भान त्यास नसते आणि लोकही त्याचे अवडंबर माजवत
नाहीत. किंबहुना आरोग्याबाबत, व्यायामाबाबत आवड असल्यानेच सवडही काढली
जाते.
ज्येष्ठांमध्ये असा उत्साह तर तरुणांमध्ये काय विचारता ! सडसडीत बांधा (ही
चिन्यांची मक्तेदारी असावी), तुकतुकीत त्वचा, काळेभोर केस, जगप्रसिद्ध
लाघवी (काहीजण त्यांना मिचमिचे म्हणतात !) डोळे अशी वैशिष्ट्ये वागवणारी
किशोर व तरूण मंडळी.. पेहराव हा ज्येष्ठ व तरूण सार्यांचाच आधुनिक व
पाश्चात्त्य . मात्र केसांच्या - घरटी,तुरे इ. तर्हा तरुणांमध्ये आढळल्या
नाहीत.विशेष म्हणजे सार्वजनिक जागी तरी युगुलांचे अश्लाघ्य अशोभनीय वर्तन
दिसत नाही. आधुनिकतेची वाट चालतानादेखील पारंपारिक सभ्यता कायम ढेवता येते,
ह्याचे हे उत्तम उदाहरण. परस्परांच्या सोबतीने फास्ट फूड चा आस्वाद घेत
गप्पा करीत चालणारी युगुले वा मित्रमंडळी जरूर दिसतात. लिव्ह- इन् चं लोण
बर्यापैकी आहे.तरी प्रोफेशनल भूमिकेतून कार्यसंस्कृती जपली जाते. तसेच
बहुतांशी कार्यालये, सेवा इ. ठिकाणी स्त्रियांचे प्रमाण खूपच अधिक आहे!
नवववर्ष स्वागत : कम्युनिझमचा प्रभाव अद्याप आसरलेला नसल्यामुळे तरूण पिढी,
विशेषत: ग्वांगझौसारख्या मोठ्या शहरांतील – देव धर्म मानीत नाही. इथे
स्थायिक झालेले भारतीय – प्रामुख्याने सिंधी उद्योजक मात्र भारतीय परंपरा ,
सण अगत्याने साजरे करतात. अर्थात चिनी चौकटीत राहून!
चिनी नववर्षाच्या सुरुवातीचे वेध मॉल्सना डिसेंबरपासूनच लागतात !
चांद्रवर्ष पद्धत असल्याने तारीख दरवर्षी बदलते. 2018 चं चिनी नववर्ष 16
फेब्रुवारी पासून सुरू झालं.त्यापूर्वी साधारण पाच दिवस व नंतर दोन दिवस
अशी सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी असते.शाळा,इं बंद. दुकाने उघडी असली तरी
कर्मचारीवर्ग (कोकणातल्या चाकरमान्यांप्रमाणे) आपापल्या गावी पळतो.
मॉल्समध्ये लाल रंगाची उधळण दिसू लागते. शुभसूचक पताका,कंदील,
डोअरमॅट;,सजावटीचे सामान, कपडे सार्यांवर लाल रंगाचा साज.. बारा
प्राण्यांच्या नावाने नवीन वर्षे ओळखली जातात. हे नववर्ष Dog Year आहे तर
2019 हे Pig Year असेल. त्या निमित्ताने रस्ते, घरे अधिकच स्वच्छ करतात.
आमच्या इमारतीला तर नुसते न्हाऊ माखूच घातले नाही, तर रंगरंगोटीही
झाली.तसेही ग्वांगझौचा नखरा बघायचा, तर रात्रीच! .. कॅन्टनचा झगमगता मनोरा व
त्यासभोवार पसरलेले ग्वांगझौ हे चित्तवेधक रंगसंगतीच्या प्रकाशाचा उत्सव
रोजच साजरा करीत असते! नवीन वर्षाचं स्वागत करताना ह्या कृत्रिम
प्रकाशाच्या वाटांवर पावलं उमटतात, ती लाल रंगाच्या विविध छटा लेवून
बसलेल्या नाजूक फुलांची!
जिथे नजर जाईल, तिथे फुलांची बहारदार सजावट.. मला तर त्या दरम्यान ग्वांगझौचं नाव कुसुमावती ठेवावं असं वाटू लागलं..
नववर्षस्वागताच्या काही परंपरा नव्या पिढीने कालबाह्य ठरवून बाद केल्या
आहेत.जसे – त्या दिवशी केर- लादी करायची नाही, नाहीतर भाग्यही पुसले जाईल !
किंवा पदार्थ बनवताना डंपलिंग्जना टोक ठेवायचं नाही, अन्यथा गरीबी
येते..इ.
असं असलं तरी काही प्रथा आवर्जून पाळल्या जातात. जसे कौटुंबिक स्नेहमेळावा;
एरव्ही घरी स्वयंपाक करणे हे शहरातील चिनी कुटुंबात तसं दुर्मिळच; परंतु
नवीन वर्षानिमित्त सारे एकत्र जेवतात.घरीच चिकट भाताचे साखर घालून गोलसर
केक करतात.किंवा स्प्रिग रोल्स तळतात.कल्पना अशी, की ते जसे सोनेरी
दिसतात,तसे नवीन वर्ष सोन्याचे, समृद्धीचे जाईल. डंपलिंग्ज मध्ये आत एखादे
नाणे ठेवले जाते; ज्याला ते मिळेल, तो भाग्यवान.(आपल्याकडे डोहाळेजेवणाला
अंगठी वा रुपया असतो तसे) गोड केकमुळे नवीन वर्षाचे गोड भाकीत ऐकायला
मिळेल, अशी समजूत. कोण करणार हे गोड भाकीत? तर Kitchen Gas God! अर्थात
आपली अन्नपूर्णा म्हणू या. नूडल्स हे लांब असल्याने त्यांतून
दीर्घायुष्याचा संदेश मिळतो.
परस्परांना लाल पाकीटात पैसे देण्याची पद्धत आहे.त्याला लकी मनी म्हणतात.
रक्कम कितीही असू शकते. मूर्तिपूजा न मानणारी नवी पिढी हे सारं मात्र
आवर्जून करते! मनात वाटतं, आम्ही भारतीय करतो, तसं हे लक्ष्मीपूजनच नाही
का? एकूण काय, सर्वे जना: काञ्चनमाश्रयन्ते। धनलाभ हा सण व पूजेमागचा सनातन
सुप्त उद्देश इथेही बघायला मिळतो.एरव्ही इथे जाहीरपणे फटाके उडवायला बंदी
असली तरी नववर्षाचं स्वागत करताना तीन माळा तरी लावल्या जातात, अशुभ नष्ट
करणे व येत्या शुभ गोष्टींचे स्वागत करणे! गंमत म्हणजे जेवढा फटाक्यांचा
आवाज मोठा, तेवढी व्यवसायाची भरभराट होणार, असंही समजलं जातं!
ग्वांगझौमध्ये कधी गाडीचा हॉर्नही विनाकारण ऐकायला मिळत नाही आणि ह्या
प्रसंगी मात्र असा विरोधाभास!
एकंदरीत सुरुवातीचे काही महिने चिनी माणूस चीनच्या अभेद्य भिंतीसारखा वाटत
होता, फारसा मोकळेपणाने न वागणारा, मुळीच मैत्रीपूर्ण नसलेला, असा.. आता
ह्या सणाच्या निमित्ताने त्याचे भिन्न रूप पहायला मिळाले. ह्यातील खरा चिनी
कोणता, याची उकल करण्याच्या फंदात न पडता, इतर अनेक परदेशस्थ
नागरिकांप्रमाणे चिनी जीवनपद्धतीमध्ये रुळण्याचा प्रयत्न करणंच ठीक !
आपल्यासारखीच प्राचीन संस्कृती असणारा हा देश … पण सध्या तरी मित्र म्हणता
येणार नाही अशा या भूमीत वास्तव्य करताना पौर्वात्य संस्कृतीचा बारिकसा
धागा असा अचानकपणे गवसला, हे मात्र खरं!
चीन -२
बीजिंग लू अर्थात सब ले लूँ
त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे भटकंतीपेक्षा खरेदी
करण्याचा पर्याय निवडला. मुद्दामच गाडीने न जाता १९७ क्रमांकाच्या बसने
गेलो. पुढून चढायचं असतं बसमध्ये. दारातच एक स्क्रीन व पेटी असते.कार्ड
असल्यास स्क्रीनवर दाखवायचं नि नसेल तर २ आर एम बी पेटीत टाकायचे. चालक
महाशय तिथेच असतात.त्यामुळे संभावितपणाचा विचारही करू नये. बसच्या मागच्या
भागात आपल्या इथल्यासारख्या सीटस्, दाराजवळ कचरा टाकण्यासाठी सोय (पेटी) नि
त्यापुढील भागात समोरासोर सीटस्. दर मिनिटाला बसेस् येत असतात. त्यामुळे
गर्दी असली तरी दुथडी भरून वाहण्याइतकी नाही. कंडक्टर नसतो. पतिदेवांना जरा
माहिती असल्याने मला गंतव्यस्थान कळले; नाहीतर “दादा,जरा स्टॉप आला की सांगा“ हा प्रकार इथे शक्य नव्हता.
बीजिंग लू (हे सर्व उच्चार स्थानिक हिंदी मैत्रिणीकडून उचललेले) म्हणजे
आपल्या फॅशन स्ट्रीटसारखा भाग- मात्र भव्य आवृत्ती ! इथे वाहनांना मज्जाव
त्यामुळे चालण्याची मज्जा घेत खरेदी करायची. मिंग राजवटीतील शेकडो वर्षे
जुने रस्ते इथे जतन करून ठेवलेले आहेत. त्यांना धक्का न लावता सभोवती
दुकानांची उभारणी केलेली आहे. लहान-मोठी, खास नाममुद्रा असलेली व साधीदेखील
,सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरलेली, अं हं ,लगडलेली दुकाने.. विक्रेत्या
कन्यकांचा एक अद्भुत प्रकार बघायला मिळाला ! काहीजणी दुकानापुढे उभ्या
राहून टाळ्या वाजवून लक्ष वेधून घेत होत्या . खाद्यपदार्थाची दुकानेही
आहेत. एक गंमत म्हणजे एका सोनाराच्या दुकानात शोकेसमध्ये सोन्याने मढलेल्या
खर्याखुर्या सुंदरी उभ्या केल्या होत्या ! शिवाय सोन्याच्या छोट्या
पायर्यादेखील कलाकुसर करून ग्राहकांना खुणावत होत्या !
चकाकतं ते सोनं नसतं
यावर दृढ विश्वास असल्यामुळे (?) आम्ही अगदी उदासीनपणे तिथून पुढे गेलो.
घासाघीस वगैरे आवश्यक पायर्या ओलांडून काही खरेदीही केली. परंतु अधिक रमले
ती मिनिसो, बलेनो या नाममुद्रांकित दुकानांमध्ये. मला जी बार्गेनिंग ची
हौस आहे, त्याचा फील यावा, याची पतिदेवांनी जरूर तेवढी मुभा दिली. इथे आपण
घासाघीस केल्यावर सेल्समन फार गंमतीशीर ऑ आऽऽ असा नाराजीचा
अनुनासिक स्वर काढतात, याचा सार्वत्रिक अनुभव आला. जपानी नाममुद्रा मिनिसो
येथील खरेदीचा अनुभव विशेष आवडला. मनसोक्त खरेदी, तीही वाजवी किंमतीत असा
तो अनुभव. पतिदेवांनी माझी प्रथम चीनवारी असल्याने जरी मुक्तद्वार दिले
होते, तरी मी एक सजग (?) व्यक्ती असल्याने मुक्तपणा एंजॉय केला पण त्यास
बेबंदपणाच्या मार्गावर नेले नाही !(हा:हा:) .
सर्वाधिक खरेदी अर्थातच चॉकोलेटस् ची. अन्नपदार्थांची नावे व माहिती चिनी
(मॅँडरिन)मध्ये.फक्त अंक तेवढे वाचता येत,त्यामुळे खरेदी करताना विचार
करावा लागत होता. उदा: शेंगदाणे घ्यायला जावं,तर खाली बारीक इंग्रजी शब्द
नजरेस पडले, बीफ फ्लेवर्ड, की झटकन पाकीट खाली ठेवणे ! फळे मात्र
तर्हेतर्हेची नि गोड,रसाळ अशी. भाज्या अगडबंब आकाराच्या. दुधाचे,पावाचे
अनंत प्रकार.एका विभागात अंडी होती. मी कुतूहलाने पाहिले तर काळी,भुरी
असेही नमुने होते, जे मला पहिल्यांदाच दिसले!
चिनी नवे वर्ष येऊ घातल्याने सर्वत्र लाल रंगाचे स्टीकर्स, उभी
तोरणे,कंदील,घंटा, शोभेच्या वस्तू इ. नी बाजार नुसता सजला होता.
नववर्षानिमित्त केक्स वगैरे (तिळाची मिठाई हा खास पदार्थ) पाहून, निदान सणासुदीला गोड हवं
ह्या माझ्या खास भारतीय मानिसकतेला दिलासा मिळाला. कसलीही चव घेण्याच्या
मात्र फंदात पडलो नाही (प्रतिगामी असा शिक्का बसला तरी चालवून घेऊ म्हणावं)
भाषेचा प्रश्न असल्याने मूकबधिर असल्याप्रमाणे हातवारे करून, मोबाईलवर
ट्रान्स्लेटरच्या मदतीने संवाद साधावा लागे. मग तो खरेदी करताना असो की
ट़ॅक्सी करताना.
काँक्रिटमधील निसर्गधून – बैयून
दुसर्या दिवशी पाऊस थांबून थोडी उघडीप आल्याने आम्ही बैयून पर्वतावर
स्वारी करण्याचा बेत आखला. प्रचंड थंडीला तोंड देण्याची जय्यत तयारी करून
निघालो. वरती जाण्यासाठी विस्तीर्ण, रेखीव बगीचा व त्यामधून जाणारी फरसबंद
वाट. पण आम्ही एक वेगळा अनुभव घ्यावा, म्हणून ट्रॉलीचा पर्याय स्वीकारला.
नुकतेच मी व माझा लेक रायगडावर ट्रॉलीने जाण्याचा थरारक (3 तास प्रतीक्षा)
अनुभव घेतलेला होता. त्यामुळे जरा निरुत्साही होतो. पण इथे सतत ये–जा
करणार्या अनेक ट्रॉलीज्.. स्वयंचलित दरवाजे, सिटा भरेपर्यंत थांबा हा
प्रकार नाही आणि भाडेही तुलनेन कमी. जसजसे वर जाऊ तसतसे ग्वांग झौ (चौ)
शहर आख्खे नजरेच्या टप्प्यात येऊ लागले. संपूर्ण बैयून पर्वत हा हिरवाईचे
आवरण घेऊन होता, तरी मला त्या निसर्गामध्ये तजेलदारपणा आढळला नाही.
फुलांच्या रचनांमध्ये सौंदर्यदृष्टी दिसत होती, हे मात्र खरे. पर्वताचा
विस्तार इतका आहे, की तेथे फिरण्यासाठी मिनिकारची सोय केलेली आहे. सर्वत्र
स्वच्छता, टापटीप,शांतता, प्राथमिक सोयीसुविधा यांची दखल घेत फिरू लागलो.
येथील अभयारण्यात मोर,चिमणी,बदक,पोपट हे पक्षी दिसले. मोर फार म्हणजे फारच
धीट होते.त्यांनी आमच्यावर चालच केली म्हणाना ! मात्र चिनी पक्षी हे
सामान्यपणे पक्षी जसे दिसतात, तसेच दिसले (उगीचच वाटत होतं की चिन्यांसारखे
दिसत असतील का ) थंड वातावरणाला चवदार कॉफीची ऊब दिली. चक्क चार कबूतरेही
बागडताना दिसली. सौंदर्य जपण्याची चिनी हौस कोणत्या थराला जाऊ शकते, याचे
प्रत्यंतर तेथील स्वच्छतागृहामध्ये आले. स्वच्छता तर अध्याह्रतच होती,
परंतु आश्चर्य वाटले ते तेथील पुष्परचना व विविध आकारांतील बिलोरी आरसे
पाहून!
प्राचीन वा ऐतिहासिक पुतळे असलेला एक भाग होता. नावे तर वाचता येणे शक्य
नव्हते, पण त्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, एवढे लक्षात आले. एक अजब
दृश्यही बघायला मिळाले. धर्मगुरू असतील अशा दोन पुतळ्यांसमोर दोन चिनी
मध्यमवयीन स्त्रिया हाती तलवार, पंखे घेऊन संथ लयीत तल्लीनतेने नृत्यसाधना
करीत होत्या. फारच छान दृश्य होतं ते !
भरपूर पायपीट झाल्यावर पायथा गाठला. तर तिथले फेरीवाले व स्टॉल्स बघून मला
अगदी घरच्यासारखं वाटलं! कसलातरी रानमेवा वगैरे दिसेल या अपेक्षेने तिथे
गेलो, आणि हाय रे ड्रॅगन (देवा ! प्रमाणे घ्यावे) !
मेवा जरूर होता, पण तो रान होता, खान
करण्याइतपत नव्हता ! (बसमधून जाताना) भारतात टांगलेले बोकड (मांस) बघण्याचा
मला सराव होता; पण इथे तर यच्चयावत् प्राणिसृष्टी – जी कधीकाळी सचेतन
होती- तिला झोपाळ्यावाचून झुलायला ठेवलं होतं! नाक दाबणे शक्य होते पण डोळे
हे जुल्मी गडे कसे झाकणार ? तरीही स्थानिक व्यापार्यांना उत्तेजन मिळावे
या हेतूने एक कांद्याची माळ घेऊन तेथून सटकलो. डोळे निवले असले तरी पोट
भरले नव्हते. त्यामुळे बॉम्बे ग्रिल या हॉटेलमध्ये पुढचा टप्पा. धुरी या
कुडाळकडील माणसाचे हे हॉटेल. छान सजावट आणि उत्कृष्ट अन्न. कुल्फी व समोसा
ह्या सिग्नेचर डिशेस्. गेली तेरा वर्षे येथेच वास्तव्य असल्यामुळे धुरी
अस्खलितपणे चिनी भाषेत बोलतात. मराठी बोलायला मिळाल्याचा त्यांनाही आनंद
झालेला दिसला.
आणि आता एक चायनीज नमुना
ज्यो- ज्यो
रीगल कोर्टच्या आवारात हिचं एक छोटंसं दुकान आहे. खरं तर चिमुकलंच. तिथे
भारतीय किराणा, भाज्या ,हल्दीरामची मिठाई आणि हो, मला इतरत्र न मिळालेलं -
मॅगीसुद्धा मिळतं. फक्त मेख अशी आहे, की किमान पाच ते दहापट किंमतीमध्ये!
त्यातही ज्यो-ज्यो,तिचा मुलगा व भाऊ तिघेही मूँहमाँगे दाममध्ये जिन्नस
विकतात. फरक एवढाच की त्यांच्या मूँह ने मागितलेल्या भावाने!
म्हणजे तिघेही एकाच वस्तूचे वेगवेगळे भाव सांगतात. इथल्या भारतीयांसमोर
अन्य पर्याय नसल्याने बहुतेक हा व्यवहार सुरळीतपणे चालतो. इथे ज्यो- ज्यो वांछील तो तो भाव!
जाता जाता -
इथे मोठ्या प्रमाणात सुधारणेचा वारू दौडताना दिसला, हे खरेच. अगदी
घरापासून ते विमानतळापर्यंत.. घरातील मला जाणवलेला वेगळेपणा म्हणजे झाडू
ब्रशसारखा नि सूप लांब दांड्याचं. कपडे हँगरवर वाळवणे अधिक प्रचलित.
मायक्रोवरही चायनिज अक्षरे असल्याने अंदाजपंचे वापरता येऊ लागला. दुधाला
वेगळी चव, टी.व्ही. हा इंटरनेटच्या कृपेवर, हवामान सारखे बदलते.इ.. एकदा मी
ब्रेड घेऊन यायला निघाले, पिशवी शोधत होते. तेव्हा चिरंजिवांनी आश्वस्त
केलं, इथे कुत्रे नाहीत,हातांत पाव बघून मागे लागायला! खरंच की!
इथे भटकी जनावरे दिसली नाहीत; भलेमोठे रस्ते,मॉल्स,फ्लायओवर्स इ. अनेक
पाऊलखुणांतून इथल्या आधुनिकतेची, विकासाची वाट दृगोच्चर होत जाते.
सामाजिकशिस्त, गतिमान जीवन यांचे कौतुक वाटते. अर्थात हे काही चीनचे
प्रातिनिधिक चित्र नव्हे. हे माझ्यापुरते!
आंतरराष्ट्रीय प्रवास माणसाला समृद्ध करतो, असे म्हणतात. माझ्या ह्या
प्रवासाने व चीनमधील अल्पकालीन वास्तव्याने अनुभवांची श्रीमंती तर दिलीच,
परंतु जाणिवादेखील विस्तारल्या हे तितकेच खरे!