Sunday, February 12, 2023

बांधवगडचे व्याघ्रदर्शन

 लेकाची दहावी संपली आणि हुश्य झालं. दहावीची मांडवपरतणी म्हणून आम्ही बांधवगडचा बेत केला. मागे 'फोलिएज' बरोबरचा कान्हाचा अनुभव फार छान होता, त्यामुळे पुन्हा त्यांच्याबरोबरच जायचे नक्की केले. एकतर त्यांची सगळी सोय मस्त होती, सोबतही छान होती. पन सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचा "पायगुण" मस्त होता कारण कान्हाला आम्हाला नऊ वेळा व्याघ्रदर्शन घडले होते. पहिल्यांदाच जंगलात जाऊन इतक्यांदा वाघ पहायला मिळाला होता त्यामुळे आम्ही फारच नशिबवान ठरलो होतो. त्यात त्या वेळेस गाईडच्या अनुभवामुळे एका ठिकाणी अगदी तासभर काही दिसत नसताना त्याच्यावर विश्वास ठेऊन थांबून राहिल्यावर फार मोठे घबाड मिळाले होते.

झालं काय, आम्ही एका टेकडीवरच्या वळणाच्या रस्त्यावर होतो. उजवी कडे छोटी टेकडी होती, अन डावी कडे खाली नदी होती. डावी कडे थोडे खोल असल्याने अन तिथे खुप झाडी असल्याने काहीच दिसत नव्हते. थोडे लांबवर नदीपलिकडचा चढ अन तिथली छोटी टेकडी दिसत होती. मागे साधारण दहा फुटाचा रस्ता दिसत होता अन पुढे लगेच वळण. आम्ही जरा साशंकच होतो, इथून काय अन कोठे दिसणार? पण आपल्यापेक्षा गाईडचा जंगलचा अनुभव मोठा, या विचाराने गप्प बसलो. आर्धातास झाला पण तरी काही घडेना. बरं जंगलात बोलायला बंदी. निसर्ग बघत अन जंगलाची निरव शांतता ऐकत बसून राहिलो. मध्येच गाईडकडे काय अशी नजरने, मानेने विचारणा करत होतो. तो हळूच म्हणाला, " इधरसे बाधिन जायेगी | निचे पानी है और सामने एक गुफा जैसे दिख रहा है ना | " आम्हाला फारसे कळले नाही. पण समोरच्या टेकाडावरती थोडी गुहेसारखी जागा आता सांगितल्यावर आम्हाला दिसली. खरच मस्त गुहा होती ती !

अन मग अचानक जंगलाला जाग आली. चितळाने पहिला कॉल दिला. कॉल म्हणजे; वाघ, बिबळ्या वगैरे शिकारी प्राणी शिकारी साठी हालचाल करू लागले की इतर प्राण्यांना त्यांचा सुगावा लागतो. अन मग ते इतर प्राण्यांना सावध करण्यासाठी विशिष्ठ आवाज काढतात, त्याला कॉल असे म्हटले जाते. एरवी माकड, सांबर, चितळ ओरडताना जसा आवाज काढतात त्यापेक्षा; हा कॉल देताना ते वेगळे आवाज काढतात. जसे माकडे एरवी हुप असे ओरडतात तर कॉल देताना खॉक खर असा काहीसा खोकल्यासारखा आवाज काढतात. जंगलात लक्ष देऊन एक दिवसजरी फिरलात की हे कॉलस कळायला लागतात. अर्थात खरा कॉल कोणता, फॉल्स कॉल कोणता हे कळायला जरा वेळच लागतो. पण हे कॉल ट्रेस करायला मजा येते.

तर आता जंगल जिवंत झाले. आमच्या मागच्या बाजूने चितळाने कॉल दिला. आमच्यात लगेच चैतन्य आले. लगेचच माकडाने खॉक केले. जंगल भराभर हालू लागले. गाईडने कानोसा घेउन जीप चालकाला जीप हळूहळू मागे घे असे सांगितले. " बच्चेवाली आ रही है| " आम्ही थक्कच ! चक्क वाघिण अन तिची पिल्ले एकत्र ? एकदम गाईड म्हणाला, " जल्दी कर "

जीप झटक्यात मागे गेली. पण जsssssरा उशीर झाला. आम्ही चकीत होऊन बघत राहिलो. मगाशी येताना आमच्या जीपच्या टायरचे ठसे होते त्यावर आता वाघिणीच्या पावलांचे ठसे होते. " बच्चेवाली यहाँसे अभी निचे गयी " आम्ही ते ठसे पाहून मंत्र मुग्ध झालो., इतके की त्याचे फोटोही काढायचे विसरलो.

" अरे आगे ले, जहाँ पर खडे थे" गाईडने जीपचालकाला ऑर्डर दिली . आता आम्ही त्याच्या माहिती, अनुभव अन ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवला. तरी मनात खुटखुटत होते, बच्चे वाली? पण पिल्लांचे ठसे तर नव्हते.....
" वो देखो, सामने देखो, ऊस गुफाँ के सामने देखो...." आता गाईडही उतावळा झाला होता. आम्ही समोर बघितलं. तसं जवळ जवळ ४० एक फूट अंतर होतं. आम्ही गाईड दाखवत होता तिथे प्राण डोळ्यात आणून पहात होतो. आम्हाला तिथल्या झुडुपांमध्ये हालचाल दिसली. अन अहो आश्चर्य तिथे दोन अगदी छोटी पिल्ल खेळत होती. अजून काळी-पांढरीच होती, एक क्षण मला ती मांजराची पिल्लच वाटली, इतकी छोटी होती ती ! अन तेव्हढ्यात एक मोठा वाघ गुहेतून बाहेर आला. " वो देखो बडा बेटा आ गया | " आम्ही थक्क झालो. म्हणजे ही वाघिण नव्हती, तिचा मोठा मुलगा, छोट्या भावंडांना सांभाळत गुहेत बसला होता , अन आई आल्यावर हे सगळे कुटुंब बाहेर खेळायल आले होते, आईच्या छ्त्रा खाली सुरक्षित वाटल्याबरोबर ! वाघिण मात्र दिसत नव्हती . कारण ती खाली दोन टेकड्यांच्या खालच्या घळीत होती. आता पिल्ल अन त्यांचा दादा थोडे अजून खाली उतरले. आता ते आम्हाला दिसत नव्हते. पण त्यांचे म्यॉव म्यॉव अन गुर्गुर ऐकू येत होते. फारच मजा वाटत होती.

तेव्हढ्यात आमच्या पुढून आता कॉल देणे सुरु झाले. वाघिण तिथे न थांबता पुढे निघाली होती. गाईडने विचारले, इथेच थांबायचे का? खरं तर पिल्ल, त्यांचा दादा दिसत नव्हते. पुढे गेलो असतो तर वाघिण दिसण्याची शक्यता होती. पण गाईड म्हणला, त्याने त्याच्या १४ वर्षांच्या जंगल अनुभवात इतकी छोटी पिल्ल पाहिली नव्हती. जेमतेम महिन्याची होती. त्यामुळे त्याला त्या पिलांना पाहण्याचा मोह सुटत नव्हता, खरं तर मोठा वाघ पाहण्याची संधी सोडून या न दिसणार्‍या पिल्लांसाठी बसण त्याच्या कर्तव्यात बसणारे नव्हते. वाघ दाखवा असा टुरिस्टांचा हेका असतो. असे असताना हातातला वाघ सोडणे त्याला योग्य वाटेना. पण मग आम्ही त्याला सांगितले की वाघ नाही दिसला तरी चालेल पण हा अनुभव घेउ यात. तो फारच खुश झाला. अन मग जवळ जवळ २५ मिनिटं आम्ही त्या तिघांचा खेळ नुसता अनुभवत बसलो. ती २५ मिनिटं मी आयुष्यात विसरणार नाही. ते निर्व्याज्य म्यॉव अन गुरगुर अजूनही माझ्या कानात गुंजतय. एक अविस्मरणीय प्रसंग !

मग त्यांची ही जुगलबंदी एकदम थांबली. बहुतेक आई थोडी लांब गेल्या मुळे ती शांत झाली असतील किंवा दमली असतील. आम्ही अजून दहा मिनिट वाट बघितली. पण सारं काही शांत होतं. मग तिथे न थांबता गाईडने जीप पुढे काढायला सांगितली. मनात अजूनही तेच आवाज रुणझुणत होते. साधारण पाच एक मिनिटं आमची जीप पुढे जात राहिली. सगळे जण त्या पिल्लांची भाषा ऐकून शांत झाले होते.

पण पिक्चर अभी बाकी है दोस्तो

गाईडही तो अनुभव मनात साठवत शांत बसला होता. अन एकदम तो उभा राहिला. एव्हाना आम्हाला त्याच्या देहबोलीवरून कळून चुकले .... वाघिण आमच्या भेटीला येतेय......

समोरुन वानराने खॉक केले. अन डावीकडच्या झाडीत हालचाल दिसली. साक्षात वाघिण आपल्या मोठ्या मुलासाठी त्याचा खाऊ घेऊन येत होती. अन आम्हाला दर्शन देण्यासाठीच जणू त्या वाटेवरून परत येत होती. मधल्या पाऊण तासात शिकार करून ती परतत होती. अन तिच्या कामाच्या वेळात आम्ही तिच्या बाळांचे बेबीसिटिंग केले म्हणून ती आम्हाला भेटायला आली होती जणू ! क्षणात तिने दिशा बदलली अन झाडांमधून आपल्या गुहे कडे दिसेनाशी झाली. अक्षरशः २ मिनिटांचा खेळ ! पण डोळे निवाले अगदी. परतीच्या प्रवासात आम्ही सगळे अगदी अगदी तृप्त-तृप्त, शांत-शांत होतो. 

 कान्हाचा मस्त अनुभव पाठीशी होता. त्यामुळे पोस्ट दहावी सुट्टी जंगलातच जाऊन सेलिब्रेट करायची असा माझा अन माझ्या लेकाचा बेत होता. आता पुन्हा कान्हाला जायचं की दुसरे जंगल गाठायचे हे ठरत नव्हते. लेक कान्हासाठीच अडून बसला. मग फोलिएजमध्ये गेलो. तिथे सगळ्यांनी बांधवगडचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की दुसरी सगळी जंगलं पहा अन मग वाटलं तर पुन्हा कान्हाला जा. हे फारच छान वाटल्याने, पुन्हा कान्हाला जायच्या बोलीवर लेकाने संमती दिली.

फोलिएज ही पुण्यातली एक पर्यटक संस्था. आम्हाला दोन्ही वेळेस त्यांचा अनुभव खुप छान. लहान मुलांचे गृप ही ते घेऊन जातात. ( माझा त्यांची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. फक्त माझा अनुभव सांगते आहे.)
तिची साईट ही www.foliageoutdoors.com )

सगळ्या जंगलात जायचे म्हणजे पुण्याहून खुप लांबचा प्रवास करावा लागतो. बरं उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात प्राणी अस्तात्,अन झाडी, गवत थोडे कमी असल्याने प्राणी दिसणे सोपे जाते त्यामुळे उन्हाळ्यातच हा प्रवास करावा लागतो. तरच तो कारणी लागतो.

बांधवगड म्हणजे मध्यप्रदेशातले अभयारण्य ! जबलपूरपर्यंत ट्रेनने जाऊन मग जवळजवळ ६ -७ तासाचा जीपचा प्रवास. बरं ट्रेनच्या वेळाही अशा की जीपचा प्रवास म्हणजे अगदी भट्टीतून तावून सुलाखून निघणार. पण काय करणार. काही मिळवायचं तर घाम गाळावाच लागणार ना

तर आम्ही बांधवगडला पोचलो तो पर्यंत संध्याकाळ झाली होती. पण तरी ही जंगलाला सलामी द्यायला हवी म्हणून सगळे एक फेरफटका मारायला निघालो. फोलिएजचे सगळे मार्गदर्शक फारच मदतखोर  अन माहिती अगदी झाडं, पक्षी, प्राणी, किटक सगळ्याची तपशीलवार माहिती देणारे. या वेळेस आमच्या बरोबर होते, देवेन्द्र, अनघा , आदित्य होते. रिसॉर्टच्या दारातच छोटेसे तळे होते, अन त्यातल्या कमळांनी आमचे स्वागत केले.

गप्पा मारत थोडे पुढे गेलो अन तेव्हड्यात कोणीतरी डावीकडे लक्ष वेधले. जंगलचा रात्रीचा रखवालदार आमच्याकडे पहात होता.

थोडे पुढे झालो अन उजवी कडे नजर गेली. समुद्रावरचा सुर्यास्त, डोंगरावरचा सुर्यास्त पाहिला होता. पण मोकळ्या माळरानावरचा- देशावरचा सुर्यास्त प्रथमच बघत होते तो हा असा...

अंधार होत आला ,सगळेच थकले होते अन उद्या जंगलात जायचे तर सकाळी सव्वा चारला उठायचे होते. आम्ही परत फिरलो.

जंगलात जायचं तर काही गोष्टींची माहिती हवीच.

१. सहसा जंगलात जायच्या वेळा सकाळी ६.०० ते १०.३० अन संध्याकाळी ४.३० ते ६.३० अशा अस्तात. त्या त्या जंगला नुसार अन ऋतुनुसार यात बदल असतात. पण असे असले तरी पहाटे सव्वापाचलाच आपल्याला निघावे लागते. कारण जंगलाच्या पहिल्या गेटवर जीपच्या रांगा लागतात. त्यात आपली जीप पहिल्या ३-५ मध्ये असली तर चांगले पडते. जंगलात साधारणतः ३-४ रस्ते असतात. एकदा का माणसांची वरदळ वाढली की पक्षी, प्राणी जंगलात आत आत जातात. विषेशतः अस्वलं अन पक्षी . त्यामुळे पहिल्या गेटवर आपली पहिली गाडी असेल असे पहावे. त्यासाठी आपल्या जीपमधील सहसद्स्यांशी बोलून ठेवावे.

कान्हाला आमच्या याच सवयीमुळे आम्हाला पहिल्याच दिवशी अस्वल बघायला मिळाले होते

२. जंगलात जाताना आपले कपडे जंगलात सामावून जातील असे हवेत . जसे हिरवा, पिवळा, तपकिरी अन या रंगाच्याही मातकट शेड्स असतील असे पहावे. विषेशतः पक्षी निरिक्षणावेळी याचा फायदा होतो. अन कोणतीही सेंट्स, सुगंधी पावडरी ही वापरू नका, त्यानेही पक्षी, प्राणी लांब जातात. आमचे मार्गदर्शक तर आंघोळीही करू नका म्हणत

३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जंगलात जायचे तर आपल्या तोंडावर आपला प्रचंड ताबा हवा. जरा जरी आवाज झाला तरी पक्षी, प्राणी लांब जातात. वाघही फार आवाज असेल तर आपली वाट बदलतो. त्यामुळे जंगलाच्या आत गेलं की आपल्या तोंडाला कुलुप लावायचं. याचा एक फायदाही होतो. आपण जंगल जास्ती चांगल अनुभवू शकतो. आपणही जंगलातले आवाज ऐकू लागतो, समजू लागतो

४. आपला गाईड आणि जीप चालक याच्यावर पूर्ण विश्वास टाकावा. ते तुम्हाला जास्तीत जास्त जंगल दिसावं असाच प्रयत्न करत असतात. पण शेवटी वाघ दिसणं - न दिसण हा केवळ नशीबाचा भाग असतो. अनेकदा प्रवासी वाघ दाखवा, वाघ दाखवा असा लकडा लावतात. मग तेही कंटाळतात. खरं तर वाघ नुसता तिथ्र आहे हा अनुभवही आपल्याला वेगळी अनुभुती देऊन जातो. कान्हाला आम्हाला एकदा असाच अनुभव आला होता, लिहिन पुढे कधी तरी. 

जंगलाची अनेक सौंदर्य असतात. जसे तिथले वनस्पती जीवन, पक्षीजीवन आणि प्राणीजीवन. अन प्रत्येक जंगलाचे या तिन्हींबाबत स्वतःचे असे वेगवेगळे व्यक्तिमत्व असते. कान्हा गवताळ रानं आणि मोठी झाडी , अनेक प्रकारचे पक्षी, हरणं, रानडुकरं, कोल्हे, आणि वाघा साठी प्रसिद्ध ! तर बांधवगड दाट झाडी, बांधवगड, गिधाडं, गरुड, हरणं, रानडुकरं, सांबर आणि वाघासाठी प्रसिद्ध !

तर हा बांधवगड !

या डोंगरावर किल्लाही आहे, पण तिथे जाण्यासाठी पूर्व परवानगी लागते. या डोंगराच्या खडकातील कपारी फार महत्वाच्या आहेत कारण इथेच गिधाडांची घरं आहेत. खडकावरचे पांढरे ओघळ त्यांच्या वस्त्यांचे द्योतक आहेत. गिधाडं हे निसर्गाचे साफसफाई कामगार ! त्यांची संख्या जास्त असण, म्हणजे जंगलात शिकार भरपूर होते आहे याचे लक्षण. म्हणजेच निसर्गाची जैवसाखळी तेथे चांगली आहे याचेच हे द्योतक.

या बांधवगडच्या पायथ्याशी जे जंगल वसले आहे तेच आपले डेस्टिनेशन ! आम्ही पहाटे ५.१५ लाच पहिल्या गेटवर पोहोचलो. आमची चौथी जीप होती. म्हणजे आम्ही निम्मी बाजी मारली होती. बरोबर ५.४५ला आतले गेट उघडले. अन आम्ही खर्‍या जंगलात प्रवेश केला. आता तीन मुख्य रस्ते होते. आमच्या गाईडने मधला बी रूट पसंत केला. हा जंगलाच्या मध्यातून जाणारा रस्ता होता.

गाइड्ने बांधवगडची थोडी माहिती सांगितली. तिथली झाडे, प्राणी, पक्षी यांची माहिती सांगितली. आम्ही थोडे पुढे आलाओ. अन जीप चालकाने जीप थांबवली. गाईडने डावीकडे खूण केली. डावीकडे झुडुपांची जाळी होती. छोटे पक्षी उडताना दिसत होते. काही फांद्यांवर बसले होते. तेव्हढ्यात चालकाने जीप थोडी पुढे घेतली. अन आम्ही स्तिमित होऊन बघत राहिलो. त्या झुडूपांच्या जाळी मघून छोटी वाट दिसत होती, अन त्यापुढे एक रमणीय तळे होते. अतिशय सुंदर दॄश्य समोर उभे होते. त्या तळ्याभोवती चार मोर, पाच लांडोरी अन ५-६ हरणं उभी होती. आता लिहितानाही ते दॄश्य डोळ्यासमोर येतय. त्यातही तीन मोर पूर्ण पिसारा फुलवून नाचत होते. प्रियाराधन करताना आपला पिसारा पुढे-मागे करत होते. त्याचा सssssळ सळ्ळ्ळ आवाज अंगावर रोमांच उभे करत होता. माझ्याकडच्या व्हिडिओतही त्याचा आवाज टिपला गेलाय. तळ्याच्या तिन्ही बाजूंना ते तीन मोर नाचत होते. इथे बघू की तिथे की त्या तिथे अशी आमची धावपळ झाली. व्हिडिओ शूटतर अगदी अवघड झाले. बरं ते तीन मोर एकमेकांपासून लांब असल्याने एका फ्रेममध्ये पकडता येत नव्हते. मग जसे जमेल तसे फोटो काढले अन व्हिडिओ शूट केले. माझा लेकही बर्‍यापैकी शूट करतो त्यामुळे दोन्ही शक्य झाले. पण आमचा कॅनन ४० डी अगदीच नवीन होता आम्हाला. त्यामुळे सवय नसल्याने या फोटोत अनेक चुका सापडतील जाणकारांना. पण जंगलचा फिल येईल इतपत बरे काढले असावेत आम्ही फोटो Happy

समोर तळ्याच्या मध्यात हा नाचत होता.

अन डावी कडे हा.


आम्हाला जीपमध्ये बसूनच फोटो काढावे लागत असल्याने फारसे हलता येत नव्हते. पण त्यामुळेच मला वाटतं ही पोज मला पकडता आली, नाही तर फक्त समोरूनच फोटो काढण्याचा मोह झाला असता.

उजवीकडचा मोर नाचत पाठमोरा झाला ( निलाजरा मेला ) अन स्नॅप मारायची संधी मी पकडली, क्षणात तो पुन्हा सामोरा झाला. पण त्या आधीच मी त्याला माझ्या फ्रेममध्ये पकडले होते Happy

तेव्हढ्यात एक हरीण पाणी प्यायला तेथे आले. मग हरीण, मोर अन लांडोर असे तीघं मला फारच भावले.

थोडे पलिकडे एकच हरीण आपली नुकतीच आलेली शिंग न्याहाळत होते, बहुदा माझ्या लेकाच्याच वयाचे असेल, आलेली इवलीशी दाढी शोधणारे Wink

अन उजवी कडे हे तीन मित्र. ये दोसती, हम नही छोडेंगे असंच काही गात ......

कित्ती वेळ आम्ही तेथेच थांबलो. जवळ जवळ २०-२५ मिनिटं. मग आमचा गाईडच म्हणाला, " आगे चलेंगे " आम्ही जणू विसरूनच गेलो होतो की जंगलात अजूनही काही बघण्या सारखे आहे ते.

आम्ही पुढे निघालो. मनातून ते दॄश्य काही हलत नव्हते. आता आम्ही बी रुट्च्या शेवटी आलो. सर्व रस्ते इथे एकत्र येतात. गेटपासून इथपर्यंत आपला रूट बदलता येत नाही पण मग येथून परत कोणत्याही मार्गाने परत फिरता येते. तिथे आम्ही सर्व थांबलो. तिथे काही दुकानं आहेत तेथे बांधून घेतलेली न्याहारी खाल्ली. चहा-पाणी झाले अन परतीच्या वाटेला लागलो. मधल्या काळात गाईडने वाघ कोठे दिसला आहे, कोठे दिसण्याची शक्यता आहे , हे इतर गाईड अन जीप चालकांशी बोलून निश्चित केले. अन आम्ही सी रूटला लागलो.

आता उन जाणवू लागले होते. थोडे पोट भरले असल्याने काहीशी गुंगी चढू लागली होती. तशात पहाटे चारला उठलो होतो ना ! जंगलाची निरव शांतता, वरून पेटलेले ऊन , जीपच्या स्पीडमुळे लागणारे गरम वारे.... आमची विकेट अगदी पडायला आली होती. आता पटकन रिसॉर्टवर पोहचू असे झाले होते अन तो क्षण आला.....

चालकाने जीप रस्त्याच्या कडेला उभी केली. आम्ही आजूबाजूला पाहिले. एक क्षण काहीच वेगळे जाणवेना. अन एकदम समोरच्या झाडीत लक्कन काहीतरी हलले. झाडांच्या मातकट फांद्या, त्यांच्या काळ्या सावल्या अन खालचे पिवळे गवत यांच्यात "तो" अगदी लपून गेला होता. तुम्हाला दिसला वरच्या चित्रात ? नीट बघा. ( फोटोवर टिचकी मारून तो मोठा करून बघा ) आता दिसला ना ?
शिकार करून त्याचाही ब्रेकफास्ट चालला होता. तोड खाली - वर- थोडे तिरके करत लचके तोडणे चालू होते. आमच्या पासून साधारण तीस एक फुटावर असावा. पण एकदम झाडीत असल्याने तो निवांत होता. इतक्यात त्याला आमची चाहूल लागली. अगदी दोन क्षण त्याने आमच्या कडे "पाहून" घेतले, अंदाज घेतला,

अन मग पुन्हा आपल्या खाण्याकडे वळला. मग मात्र आम्ही तिथून निघे पर्यंत काही त्याने आपली खाद्यसमाधी सोडली नाही. पण मला ते दोन क्षण खुप मोठा आनंद देऊन गेले. तुम्हाला ..... ? 

तेव्हढ्यात आमच्या गाईडच्या वॉकीटॉकीने बीप केले. टायगर शो अनाउंन्स झाला होता !
जंगलात जाऊनही कधी कधी वाघ दिसत नाही. मग पर्यटक फारच नाराज होतात. त्यावर या अभयारण्यांनी शोधून काढलेला उपाय म्हणजे हा टायगर शो ! वाघाने शिकार केली की तो त्या ठिकाणी काही काळ निश्चित थांबणार असतो, किंवा भरपूर खाणे झाल्यावर अंग थंड रहावे या साठी तो पाण्यात जाऊन बसतो. या आणि अशा परिस्थितीत वाघ काही काळ का होईना एका ठिकाणी बराच काळ थांबतो. मग पर्यटकांना हत्ती वरून तेथे नेऊन हा बसलेला वाघ दाखवता येतो. यालाच टायगर शो म्हणतात. या टायगर शो मध्ये वाघ अगदी जवळून बघण्याची संधी मिळते.

जंगलात प्रवेश केल्यानंतर आपल्याला या शोसाठी नाव द्यावे लागते. आमच्या गाईडने हे आधीच केले होते, अन त्या नुसार आमचा नंबर आला होता. म्हणून आम्ही परत फिरलो अन वाघिणीला बघायला निघालो. जंगलात शिरल्यावर पहिल्याच फेरीत आम्हाला वाघ अगदी जवळून बघायला मिळणार होता. या टायगर शो मध्ये फक्त एकच मायनस बाजू असते ती म्हणजे असा वाघ फारशा हालचाली करत नसतो, तो एकतर झोपलेला असतो, किंवा आपले खाणे खात बसलेला असतो, त्याची हालचाल, त्याची ग्रेस फारशी पहाता येत नाही यात. पण वाघ खुपच जवळून अन स्पष्ट पहाता येत असल्याने या टायगर शोला खुप महत्व असते.

जीपवरून हत्तीवर चढून मग आत जंगलात जायचे असते. स्वाभाविकच हत्ती जंगलातल्या रस्ते नसलेल्या आतल्या भागात जातो, त्यामुळे 'अन-टच्ड' जंगलही आपल्याला बघायला मिळते. पण हे हत्तीवर चढणे जरा जिकीरीचे असते. आधी जीपच्या सीटवर उभे राहायचे. मग सीटच्या पाठीच्यावर पाय देऊन दुसरा पाय जीपच्या चौकटीच्या बारवर ठेऊन हत्तीवर लावलेल्या छोट्या शीडीवर चढून हत्तीवर स्वार व्हायचे. मला लिहायला जेव्हढा वेळ लागला त्याच्या अर्ध्या वेळात हे आरोहण करावे लागते. ही कसरत अवघड खरी पण वाघ बघायचा या उत्साहात करून जातो आपण.

तर आम्ही हत्तीवर बसलो. अन हत्तीने झाडाझुडपातून वाट काढत आगेकुच केले. माहूत झाडांच्या फांद्या बाजूला करत होता अन आम्हाला ही तसे करायला गाईड करत होता. आम्ही उत्सुकतेने इकडे तिकडे बघत होतो. आमचे नशीब फार जोरावर होते. इतका वेळ एका ठिकाणी बसलेली वाघिण थोडी पुढे निघाली होती. आमच्या समोर अगदी दहा फुटावर ती आम्हाला पाठमोरी दिसली ती अशी,

माहुताने हत्ती पुढे नेला, तिला आमची चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिले,

पण आमचे तिच्या मागे येणे तिच्या दृष्टीने फारसे गंभीर नव्हते. ती पुढे चालू लागली. वाघाला जंगलचा राजा का म्हणतात ते आता कळले. काय दमदार पावले टाकत, ती जंगलची अनभिशिक्त राज्ञी चालत होती. आम्ही तिच्या मागे आहोत, नाहीत याची तिला काही फिकीर नव्हती. ना आम्ही तिचे सावज होतो, ना तिला आमच्याशी काही कर्तव्य होते, ना ती आम्हाला घाबरत होती. आम्ही जणू तिच्या दॄष्टिने अगदी किडामुंगीच ! मला वाटतं हाच तिचा अ‍ॅप्रोच आम्हाला थक्क करून गेला. ना कोणाची भीती ना कोणाला जवाब देणे, मस्त आपल्याच धुंदीत ती पुढे चालत होती .

१०-१२ फुटावर खाली खड्डा होता. त्यात थोडे पाणी होते. तिथे जाऊन ती बसली. आता ती खाली खड्यात अन आम्ही खड्याच्यावर असे उभे होतो. हत्तीच्या पायाखाली साधारण २-३ फुटावर ती. आमच्या पायाखाली साधारण ८- १० फुटावर ती बसली होती. आमच्या हत्तीने पाय हलवला. बहुदा खालचे झुडुप थोडे दबले असावे. आम्ही तिच्या डोक्याच्या अगदी जवळ असल्याने तिला थोडे "डिस्टर्ब " झाले. तिने थोडे वर पाहिले. अन मधल्या छोट्या झुडुपातून तिचा मी अगदी क्लोज अप घेतला तो असा,

हत्तीने आपला पाय अजून हलवला तशी ती उभी राहिली अन अगदी थोडी गुरगुरली अन तिने आमच्या नजरेला अशी नजर दिली.अगदी "आय टू आय कॉन्टॅक्ट" !

त्याबरोबर हत्तीने स्वतःच पाऊल मागे घेतले. जंगलचा कायदा हातात घ्यायला हत्ती थोडाच माणूस होता? हत्ती आता सुरक्षीत अंतरावर आला. अजून २ मिनिट आम्ही तिला न्याहाळत होतो. पण आता माहुताला घाई झाली, दुसरे पर्यटक त्याची वाट पहात होते. आम्ही परत फिरलो. माहुताला तीन तीनदा धन्यवाद देत आम्ही खाली जीपमध्ये उतरलो. आता जंगलात काही दिसत नव्हतं. तिच्या नजरेने आमचा पूर्ण ताबा घेतला होता. आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.

 

बांधवगडच्या जंगलात प्रवेश करताना आधी एक अगदी छोटीशी नदी लागते. छोटी म्हणजे किती छोटी, तर आपण जीपमधून ती पार करतो रस्त्यावरून ती आपली वाहतेय इतकेच. पावसाळ्यात तिला खुप पाणी असतं म्हणे. तिचं नावही काही तरी फार छान आहे, चरण गंगा ! असं म्हणतात, की जंगला बाहेरची सगळी घाण धुवून मगच ही नदी तुम्हाला आत जंगलात येऊ देते, किती छान कल्पना नाही ?

तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी आम्ही जंगलात जायला निघालो. या छोट्या नदी पाशी आलो. अन शेजारच्या झाडावर हा आमचे स्वागत करायला आलेला.

अगदी छोटासा खंड्या ( किंगफिशर ) अगदी त्या छोट्याश्या नदीला शोभेल असा Happy

अन दुसर्‍या झाडावर हा अगदी झाडाच्या पानाच्या आकारा एवढा चिमुकला पक्षी " टिकल्स ब्लू फ्लाय कॅचर "

बांधवगडचे सौंदर्य म्हणजे तेथली हरणे. अगदी कळपच्या कळप. संध्याकाळच्या उन्हात गवताच्या रानात ती चमकत होती.

तसेच आम्ही पुढे गेलो. मग थोडी दाट झाडी लागली. पुढे काही जीप्स थांबल्या होत्या. आमचीही जीप थांबली. पुढच्या जीपमध्ये निखिल, माझा लेक होता. त्याने खुणा करून झाडाच्या फांदीवर पंख सुकवत बसलेला गरूड दाखवला. रिसॉर्टवर परत आल्यावर त्याने आधीची "स्टोरी " सांगितली. तिथे हा गरुड आधीपासून होता. ती त्याची "जहागीर" असावी. तेव्हढ्यात तिथे दुसरा गरुड आला. या गरुडाला ते अजिबात खपले नाही. त्या दोघांची टेरीटरी वरून भांडण सुरु झाली. जवळ जवळ १५-२० मिनिटं ही जंग चालू होती. अखेर या गरुडाने त्याला हुसकाऊन लावलच. या मारामारीचा शीण उतरवायला महाराजांनी शेजारच्या नदीत स्नान केले होते, अन आता मस्त उन्हात आपले पंख वाळवत बसले होते. आमची ही जंग बघण्याची संधी हुकली, पण हा राजस पक्षी असा पंख सुकवत निवांत बसलेला तरी बघायला मिळाला, हे ही नसे थोडके !

संध्याकाळी वेळ फार भरभर जातो. तशात संध्याकाळी जंगलात थांबण्याच्या वेळाही कमी आहेत सकाळच्या तुलनेत. आम्ही पुढे निघालो. थोडं अंधारु लागलं. अन जंगलाचे रुप पालटू लागले. झाडांच्या सावल्या खेळ करू लागल्या. संधीप्रकाशात उगाचच कसलीतरी भीती दाटून आली. कोणत्याही नव्या जागेत उजेड असताना आपल्याला काही वाटत नाही. पण अंधार पडू लागला की त्या जागेचे अनोळखीपण अंगावर यायला लागते. तसेच काहीसे वाटू लागले. आमची जीप आता मध्यात असलेल्या तळ्याच्या दिशेने निघाली. शक्यता होती की एखादा वाघ पाणी प्यायला तिथे येईल, किमान काही प्राणी पक्षी दिसतील.

तळ्या काठीतर जत्राच जमली होती. कारणही तसेच होते. जंगलातली दुसरी वाघिण पाण्यात मस्त पाय सोडून बसली होती. खरं तर ती तळ्याच्या त्या बाजूला होती. आमच्यामध्ये बरेच अंतर होते. पण मध्ये कसलाच अडथळा नसल्याने अन सुर्य आमच्या उजव्या बाजुला असल्याने ती छान स्पष्ट दिसत होती.

तळ्याच्या उजवी कडे थोडी लांब हरणे चरत होती. मध्यात एका झाडावर काही पक्षी बसले होते. आपापल्या कामांत असले तरी त्यांची नजर मात्र वाघिण काय करते या कडे होती. हे पक्षीही तिच्या कडेच पहात होते. सर्वांच्या नजराच दाखवत होत्या वाघिण कोठे बसली आहे ते.

थोडावेळ तिने पाण्यात बसून घेतले. वातावरण आता हळूहळू थंडावत होते. म्हणूनच की काय ती आता पाण्यातून उठली. उठून आमच्याकडे पाहत निथळत उभी राहिली.

आता सगळे प्राणी- पक्षी सजग झाले. तेव्हढ्यात आमच्या आवाजाने तिचे आमच्याकडे लक्ष गेले. तिने थोडे गुरकाऊन आमच्या आवाजाबद्द्ल नाराजी दर्शवली. मग तिला आपले अंग सुकवावेसे वाटले, अन शेजारचे गवत तिला उपयोगी वाटले. अन आजपर्यंत अगदी फोटोतही न पाहिलेली पोज तिने दिली. अगदी आपल्यासारखी ती पाठीवर लोळू लागली Happy खरं वाटत नाही ना ? हे घ्या प्रूफ Happy

तिचे पांढरे पोट, भरदार मांड्या, गुबगुबीत पावलं ( सॉरी अ‍ॅडमिन, जरा जास्तच सेक्सी वर्णन होतय ) . ती आपली मस्त एका कुशीवरून पाठीवर मग पुन्हा दुसर्‍या कुशीवर अशी लोळत पडली होती. मला तर वाटलं आता ती एक पाय दुसर्‍यावर टाकून निवांत ताणून देणार. तेव्हढ्यात ती पुन्हा ऊठली. अन आम्हाला समोर ठेऊन पुढे यायला लागली. तिची ही पोज जरी ती तळ्याच्या त्या बाजूला असली तरी आम्हाला जरा धोकादायकच वाटली. समोरून चाल करून येणारी वाघिण ! काय चेष्टा आहे का ?

मग आम्ही निघालो. आमच्या जीपमधले काही अजून तिथे थांबू असे म्हणत होते. आमच्या इतर जीप्सही तिला पहात उभ्या होत्या. पण आमच्या गाईडला काय झाले माहिती नाही, त्याने जीप वळवायला सांगितली. आता आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुढच्याच वळणावर जीप उजवीकडे वळणार तेव्हढ्यात आमच्या गाईडने डावीकडे हालचाल टिपली. त्याने खुण केली अन चालकाने लगेच अगदी हळू जीप डावीकडे वळवली. अन मग आम्हाला पिवळ्या गवतात लपत छपत येणारे हे महाशय दिसले.

नीट बघितलेत की दिसेल. मध्यात झाडाच्या डावीकडे काळे अस्वल ! दिसले ? नाही तर चित्रावर टिचकी मारा, मग नक्की दिसेल.

ते इकडे तिकडे पहात पहात , अंदाज घेत पाणवठ्याकडे चालले होते.

मुळात अस्वल हा अतिशय लाजाळू प्राणी. त्याला माणसांचे फार वावडे. जरा चाहूल लागली की ते लगेच झाडात दिसेनासे होते. आमच्या मागे अजून एक जीप आली. अन आम्ही का थांबलोय हे पहायला ती जीप जरा जोरातच आवाज करत आली. त्याबरोब्बर ते अस्वल गोंधळले. अन चटकन मागच्या झाडीत नाहीसे झाले. पण तेव्हढ्यात माझ्या कॅमेराने क्लिक क्लिक केले होते Happy

हे म्हणजे अगदी बोनस होते. कान्हालाही आम्ही अस्वल पाहिले होते, पण अगदी अंधूक प्रकाशात. त्याची फक्त काळी आकृती ( सिल्हाउट) दिसली होती. पण आता जंगलातले मोकळे अस्वल पूर्ण प्रकाशात दिसले होते. मागच्या जन्मी आम्ही नक्कीच जंगलचे रहिवासी होतो Happy

आता मात्र जंगलातून बाहेत पडायलाच हवे होते. आता इकडे तिकडे न बघता गाईडने जीप पळवायला सांगितली. पण जंगलच्या राजाचे काही समाधान झाले नव्हते. तो आमच्या जायच्या रस्त्यावर आम्हाला टाटा करायला आला.

जंगलातला हा नुकताच स्वतंत्र झालेला छोटा वाघ होता. आमच्या उजवी कडच्या गवतातून स्वारी फिरायला बाहेर पडली होती. आमच्या बरोबरीने तो चालत होता. अर्थातच आमची अन पुढच्या - मागच्या सर्व जीप्स्ची चाल मंदावली. पुढे हरणांचा कळप निवांत चरत होता. त्यांना या धोक्याची जाणीव झाली नव्हती. एकतर वारा उलट वहात होता, अन गवतात जंगलचा राजा लपून गेला होता.

आता संध्याकाळचे ६.३० वाजले होते. जंगलचे दरवाजे बंद व्हायची वेळ ! आता थांबणे शक्य नव्हते. सगळ्या जीप्स सुसाट निघाल्या. त्यांच्या आवाजाने हरणां लक्ष आता वाघाच्या बरोबर विरुद्ध बाजूला होते. वाघाला हे सगळे अतिशय अनुकुल होते. त्याने दबा धरला....

त्याचा हा अगदी जाता जाता, चालत्या जीपमधून काढलेला फोटोच सांगेल पुढे काय झालं असेल ते. कारण ते पहायला आम्ही थांबलो नव्हतो तेथे !

(पुढे चालू ...)

तिसर्‍या दिवशी पहाटे जंगलातला एकदम उजवी कडचा रूट आम्ही पकडला. गाईडने सांगितले, याच रूटवर तीन वाघांचा इलाखा आहे. बांधवगडचा सध्याचा वयाने, अनुभवाने आणि आकाराने सर्वात मोठ्या वाघची, B 2 ची ही टेरिटरी !

बांधवगडमधील सध्याची वाघांची वस्ती ज्या दोघांच्यामुळे "वस्ती" झाली, ते म्हणजे; चार्जर हा वाघ अन सीता ही वाघिण. यांचाच हा बी टू मुलगा. डिस्कव्हरीवर सीता अँड हर स्टोरी ( नाव थोडं वेगळे असेल, पण सीता ... असं काही तरी आहे ) अशी ३-४ भागांची मालिका लागते कधी कधी. त्यात हा बी टू इतका गोड दिसतो की काही विचारू नका. कधी मिळाली तर चुकवू नका ही मालिका. तर सीता अन चार्जरचा बी टू हा मुलगा. सध्या तोच बांधवगडचा घरप्रमुख ! त्याची मुलं कल्लू आणि बल्लू !

सहसा वाघाची पिल्ल आईच्या छ्त्राखालून स्वतंत्र झाली की एकएकटे आपला इलाखा तयार करतात. त्यातही दोन नर कधीच एकत्र राहत नाहीत. पण बांधवगडमध्ये हे आश्चर्य घडतेय. तसे दोघेही नुकतेच आईच्या पंखाखालून स्वतंत्र झालेत, पण एकमेकांची सोबत त्यांना अजून सोडवत नाहीये Happy

तर आम्ही या तिघांच्या मागावर होतो. आधी बी २ चा इलाखा होता. पण बी२ आता म्हातारा झाल्याने त्याच्या हालचाली आता कमी झाल्या आहेत. त्यामुळे एकदा शिकार केली की बराच वेळ तो एकाच जागी बसून राहतो, त्यामुळे तो दिसणे फारच अवघड होते. आम्ही पुढे पुढे निघालो. आता बी २ चा इलाका संपला.

चालकाने जीप हळू केली. " उजवी कडच्या जाळीमागे एक छोटी टेकडी दिसत होती, तशी बरीच लांब होती अन मध्ये बरीच झाडी अन वाळक्या वेलींची जाळी होती. आम्हाला ती टेकडी कशीबशीच दिसत होती. " उस में एक गुफॉ है जहॉ पर कल्लू- बल्लू रहते है " गाईडने अतिशय आल्हाददायक माहिती पुरवली. " इस टाईमपर निकलते है दोनो | देखते है आज क्या करते है | " जणूकाही तो त्याच्या दोन मित्रांचीच दिनचर्या सांगत होता Happy

आम्ही डोळे फाडफाडून पाहू लागलो. पण अहं काहीच हालचाल दिसत नव्हती. आमच्या चालकाने जीप बंद केली, जणूकाही कल्लू-बल्लूने त्याला मोबाईलवर मेसेज पाठवला होता, "यहॉ रूक | हम आहे है |" पुन्हा एकदा वाट बघणे सुरू झाले.

गाईड एकदम हलला. आमची नजर आपोआप त्याच्या हलचालींचा मागोवा घेत मागच्या बाजूला फिरली. अन जाळीतून तो दिसला ... " ये बल्लू आ रहा है ..."

आमच्या डावी कडच्या जाळीतून बल्लू रस्त्याच्या बाजूला येत होता. गाईडच्या मते आम्हाला " क्रॉसिंग" मिळणार होते. " क्रॉसींग " म्हणजे, वाघाला रस्ता क्रॉस करताना पहायला मिळणे. हे जंगल सफारीत फार फार महत्वाचे असते. एक तर आपल्याला वाघ अतिशय जवळून पहायला मिळतो. अन रस्त्यावर तो येत असल्याने, मध्ये कसलाही अडथळा नसल्याने त्याचे अगदी नीट दर्शन होते, त्याचे फोटो ही यामध्ये छान मिळू शकतात.

बल्लू पुढे पुढे येत होता. आता तो आम्हाला ओलांडून पुढे गेला. अहोहो तो आता रस्त्याच्या जवळ आला. झाडा-वेलींच्या सावलीतून तो एकदम उन्हात आला. त्याने गपकन डोळे मिटले. अन मी ही एक डोळा मिटला, माझे बोट मात्र दाबले गेले होते.

मला वाघांनी अगदी छान छान पोजेस दिल्या आहे की नाहीत ?
अरे, तो पहा तो रस्त्यावर आला. आमच्या अगदी समोर तो रस्ता " क्रॉस" करत होता.

कोवळ्या उन्हातले त्याचे राजबिंडे रूप डोळ्यात ठरेना. मागच्या हिरव्या गडद झाडांच्या पार्वभूमीवर उन्हात त्याच्या अंगावरचे चमकणारे पट्टे फारच लुभावणारे होते.आता बल्लू पुढे पुढे अन आम्ही त्याच्या मागे असे साधारण १५-२० फूट गेलो. अतिशय थरारक असा हा अनुभव. चक्क वाघाबरोबर मॉर्निंग वॉक Happy

थोडे पुढे गेल्यावर बल्लू डावीकडच्या गवतात शिरला. आता तो आत आत घुसत होता. पिवळ्या गवतात तो मध्येच दिसत होता, मध्येच लपत होता. साधारण २० फूट आत तो गेला असेल. अन तिथे आम्हाला दुसरी हालचाल दिसली.

" अरे ओ देखो कल्लू ! " आम्ही थक्क होऊन बघू लागलो. बल्लू जेथे पोहचत होता तिथे आधीच कल्लू होता. म्हणजे आम्ही यायच्या थोडावेळ आधी कल्लू याच मार्गावरून गेला होता तर. आता आमच्या समोर दोन दोन राजे उभे होते- कल्लू आणि बल्लू !

कल्लू आमच्याकडे पाहत उभा होता,जणूकाही " मी तुमच्या आधीच आलो " असं म्हणत आम्हाला जीभ दाखवत चिडवत होता . बल्लू तिथे अजून पोहचत होता म्हणून आम्हाला अजून पाठमोरा होता.

पाच सात मिनीटं दोघे आपापसात काही बोलले अन दोघांनी मिळून आगेकूच सुरू केली.

आमच्या डाव्याबाजूने ते आता मागे चालू लागले. जंगलात जीप चालवणार्‍या चालकांच्या स्किलची आम्हाला प्रचिती आली. चालकाने इतक्या कौशल्याने जीप उलटी वळवली की आम्हाला जाणवलेही नाही. आता ते दोघे आमच्या उजवी कडे होते. आम्हाला वाटलं की आता ते दोघे आत जंगलात जातील. पण आमच्या जीप चालकाने आणि गाईडने सांगितले की नाही ते पुन्हा आपल्या गुहेत जातील. म्हणजे पुन्हा क्रॉसींग ? वॉव ! पुन्हा वाघ रस्त्यावर समोर दिसणार ?

मगाशी आमची जीप पहिली होती पण आता उलटे फिरल्यामुळे आता आमच्या पुढे दोन जीप्स होत्या. सगळे जण आता घाई करत होते. ते दोघे कोठे क्रॉसींग करतील याचा अंदाज घेत घेत चालक पुढे चालले होते. थोडे पुढे गेल्यावर खरचच त्यांनी आपला मोर्चा रस्त्याच्या दिशेने वळवला. अन पुन्हा तो क्षण आला.

कल्लू पुढे होता. तो इतक्या भरकर पुढे आला अन त्याने झटकन रस्ता क्रॉस केला. पुढच्या जीपने घोटाळा केला. ती आम्हाला अगदीच आडवी आली. अन एक मस्त क्षण हातातून गेला. अ‍ॅडजेस्ट करून मी क्लिक करे पर्यंत तो कशाला थांबतोय. मला कल्लूचा चेहरा काही पकडता आला नाही.

तो झाडांतून भराभर दिसेनासा झाला. मी फारच हिरमुसले. मगाशी बल्लू मिळाला पण पाठमोरा. आता कल्लू चेहर्‍याशिवाय Sad

तेव्हढ्यात बल्लू पुढे आला. आता मात्र माझा मार्ग खुला होता. थोडी सावली होती पण मला बल्लू नीट मिळाला.

६.४० ते ७.१० केवळ आर्ध्या तासाच्या अंतरात तीन क्रॉसींग्ज आम्हाला मिळाली होती. आमचे नशिब खरच जोरावर होते.

वरचे दोन फोटो कोणाला एकाच वाघाचे वाटतील. गाईड, चालक या वाघांना कसे काय वेगवेगळे ओळखू शकतात असाही प्रश्न पडू शकतो. मी याबद्दल थोडी माहिती वाचून काढली, काही डिस्कव्हरीवर मिळाली. ती तुमच्याशी शेअर करते.

सगळ्या वाघांवर पट्टे असतात. प्रथम दर्शनी ते सगळेच आपल्याला सारखे वाटतात. पण या पट्ट्यांवरून , त्यातल्या फरकांवरून वाघ ओळखता येतात. माझ्याकडे कल्लू आणि बल्लू यांचे वेगवेगळे फोटो मी अभ्यासले. अन आता मलाही नाव न बघताही त्यांच्यातला कल्लू कोण अन बल्लू कोण हे ओळखता येते.

बघा हं, कल्लूच्या अंगावरचे, तोंडावरचे पट्टे थोडे फिक्या रंगातले अन थोडे जास्त शार्प आहेत, तर बल्लूच्या अंगा-तोंडवरचे पट्टे थोडे जास्ती डार्क अन जास्ती ठळ्ळक आहेत. कल्लूच्या डोळ्यावर अर्ध गोल अन त्यात मध्यात एक छोटी रेघ दिसतेय. तर बल्लूच्या डाव्या डोळ्यावर आडवा तीन काढल्या सारखा दिसतोय.

बल्लूच्या डोक्यावरचे पट्टे जास्त ब्रॉड अन डार्क आहेत तर कल्लूचे फिकट आणि शार्प !.
त्यांच्या पोटावरचे पट्टेही असेच वेगळेपण दाखवतात. बल्लूचे थोडे डार्क अन जवळ जवळ, तर कल्लूचे फिके अन थोडे लांब लांब.

पुढच्या भागात याबद्दल अजून सांगेन.

(पुढे चालू...)

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...