
बंगळूरला
रहायला येऊन इतकी वर्षं झाली पण अजून कूर्गला गेलो नव्हतो. यावेळी
नवरात्रीच्या सुट्टीत जायचं ठरवलं. कूर्गबद्दल खूप ऐकून होतो, इतक्या
वर्षांमध्ये अनेक कूर्गी लोक ओळखीचे झाले आहेत. ही माणसं कणखर, लढवय्यी
असतात, अशी त्यांची ख्याती आहे. सैन्यात भरती होण्याचं प्रमाणही इथे खूप
आहे. हा प्रदेशही तसाच रांगडा आहे, कोकणासारखा. ’सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी’ कूर्गमध्ये फिरताना कावेरी नदीचं प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अस्तित्वही सतत जाणवत राहतं.
वीस तारखेच्या शुक्रवारी सकाळी घरून साडेसात-पावणेआठला जे निघालो ते थेट दहाच्या सुमारास म्हैसूरला नाश्ता करायला जाऊन पोचलो. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या बंगळूर-म्हैसूर द्रुतगती महामार्गामुळे म्हैसूरला पोचायला आता अगदी कमी वेळ लागतो. अंतर तसं फारसं नसूनही पूर्वी ’ठेचेवर ठेच’ करत म्हैसूरला पोचायला बराच जास्त वेळ लागायचा. वाटेत लागणार्या मंड्यासारख्या शहरालाही इतक्या वर्षांत बायपास काढलेला नव्हता. आता मात्र सहापदरी एक्स्प्रेस वे झाल्यामुळे हा प्रवास एकदम सहज होतो.
’विनायक मैलारी डोसा’ हे एक जुनं, लहानसं, जरा कळकटच, तरीही सुप्रसिद्ध, ’आमची कुठेही शाखा नाही’ प्रकारातलं ठिकाण.(मैलारी हे ’मल्हारी’चं कन्नड रूप आहे.) बर्याच वर्षांपूर्वी तिथला डोसा खाल्ला होता आणि अतिशय आवडला होता. त्यानंतर आत्ताच परत तिथे जायचा योग आला. गिर्हाईकांची रांग लागलेली होती. नवरात्र असल्यामुळे म्हैसूरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यात चार दिवस सुट्टी आलेली. थोड्या वेळाने जागा मिळाली. इथले डोसे मऊ असतात, इतरत्र जसे कुरकुरीत मिळतात, तसे नसतात. अत्यंत स्वादिष्ट. ताटं भरभरून वेटर डोसे आणत असतो आणि वाढत असतो. ’इतका धंदा करतात तर जरा मोठी जागा का घेत नाहीत?’ असं आम्ही तक्रारीच्या सुरात एकमेकांशी बोलत होतो. पुण्यातल्या तत्सम ( वर्षानुवर्षे लहान जागेतच असलेल्या, काहीशा कळकट, सुप्रसिद्ध, कुठेही शाखा नसलेल्या) काही नावांची उजळणी झाली. डोसे संपवून बिल देऊन निघालो. स्वच्छतागृहाची चौकशी केल्यावर दोन-तीन जणांकडून जी विविध उत्तरं मिळाली, त्यांचा एक म.सा.वि. काढला आणि शोधत शोधत शेजारच्या गल्लीतून बाहेर निघालो. बघतो तर समोर परत ’विनायक मैलारी डोसा’! ओल्ड, ओरिजिनल अशा विशेषणांसहित. पण एकदम प्रशस्त, चकाचक, नवीन रेस्टॉरंट.( मग त्या विविध उत्तरांचा अर्थ लागला!) गंमत म्हणजे पाच मिनिटांपूर्वी ज्याने डोसे आणून दिले तोच वेटर इथेही आणि जिला बिल दिलं ती गल्ल्यावरची मुलगीही तीच. हा काय चमत्कार, असा विचार करत आत शिरलो आणि कॉफी मागवली. लक्षात आलं की मूळ मालकांनीच हे नवीन, मोठं रेस्टॉरंट अगदी काही दिवसांपूर्वीच उघडलेलं होतं. काम करणारे लोक दोन्ही ठिकाणी अधूनमधून जा-ये करत होते. आमची आधीची तक्रार अशा प्रकारे निकालात निघाली.
म्हैसूरच्या नंतरचा रस्ता हळूहळू घाटात शिरणारा, वळणावळणांचा. परत वाटेत
कुठेही न थांबता मडिकेरीला पोचलो. हे कूर्ग (कोडगू) जिल्ह्याचं मुख्य
ठिकाण आहे. डोंगरावरच वसलेलं आहे, त्यामुळे शहरातले रस्ते चढ-उतारांचे,
मुख्य रस्ता सोडल्यास अरुंदच आणि वळणदार आहेत. त्या मानाने रहदारी मात्र
खूपच जास्त होती. ती नंतरच्या दोन दिवसात आणखी वाढली. आम्ही जिथे राहणार
होतो, त्या होम स्टेमध्ये दुपारच्या जेवणाची सोय होणार नव्हती. जेवून मग
होम स्टेला जाऊन पोचलो.
मायबोलीवर काही वर्षांपूर्वी
दिनेशदांनी कूर्ग प्रवासवर्णन लिहिलं होतं, त्यात त्यांनी ते जिथे राहिले
होते त्या होम स्टेचं खूप कौतुक केलं होतं. त्याच ’परिवार’ होम स्टेमधे
आम्हीही राहिलो. खरोखरच, अगदी घरगुती म्हणावा असा हा ’होम स्टे’ आहे. साधा
आणि अनौपचारिक. अगत्यशील पतीपत्नी. जेवण उत्तम. घराच्या आवारात असंख्य
फुलझाडं आहेत. शेजारीच कॉफीचा मळा. घरात तीन मांजरं आणि दोन कुत्रे.
कॉफी पिऊन मग संध्याकाळ निवांत
घालवली. काकांबरोबर समोरच्या रस्त्यावर एक फेरफटका मारला. रात्री जेवून
लवकरच झोपलो. दुसर्या दिवशी ’तलकावेरी’ म्हणजे कावेरी नदीचा उगम जिथे
होतो, तिथे जाणार होतो. ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर हे ठिकाण आहे.
कावेरी नदी तलकावेरीला उगम पावत
असली, तरी तिथे तिचा प्रवाह परत जमिनीत शिरतो आणि खाली काही किलोमीटरवर
’भागमंडला’ नावाच्या ठिकाणी बाहेर पडतो. तिथे लगेचच तिला दोन उपनद्या येऊन
मिळतात (बहुतेक त्यातली एक सरस्वतीसारखी गुप्त आहे. त्रिवेणी संगमावर
प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही तिथे गेलो नाही.) आणि मग कावेरी पुढे वाहू
लागते. कर्नाटक आणि तमिळनाडूची ही जीवनदायिनी नदी.
तलकावेरीहून दिसणारा प्रदेश
नदीचा उगम ही पवित्र जागा मानली जात असल्यामुळे त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व खूपच असतं. तलकावेरीलाही पवित्र स्नानासाठी कुंड आहे. खूपजण तिथे सचैल स्नान करत होते. पुढे खूप विस्तार पावलेली, म्हैसूर, बंगळूरसारख्या शहरांना पिण्याचं पाणी पुरवणारी, कर्नाटक-तमिळनाडूत राजकारण आणि भांडणांनाही निमित्त पुरवणारी ही नदी इथे ज्या बालरूपात दिसते, त्या रूपासमोर नतमस्तक व्हावंसं वाटणं स्वाभाविकच आहे. या कुंडात स्नान केल्यावर पुण्य मिळतं यावर माझी श्रद्धा नसूनसुद्धा मलाही क्षणभर त्या कुंडात डुबकी मारून येण्याचा मोह झाला, पण कपडे वगैरे काही तयारी आणली नसल्यामुळे ते शक्य झालं नाही.
स्नानाच्या कुंडाशेजारी हे गोमुख आहे.
कुंडाच्या वरच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे. हे शिवलिंग अगस्ती ऋषींनी स्थापन केलं असं मानलं जातं. तिथे जे पिंपळाचं झाड आहे, ते, अगस्तींनी ज्या अश्वत्थ वृक्षाखाली तपश्चर्या केली, त्याचं वंशज आहे असं मानलं जातं.
तलकावेरीहून आजूबाजूच्या प्रदेशाचं खूप
सुंदर दर्शन होतं. आपल्याकडे एकंदरीतच अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी
धार्मिक बाबींची माहिती खूप दिली जाते, पण त्याच्याबरोबरीने तिथल्या
निसर्गाची, भूप्रदेशाची माहिती, उदाहरणार्थ तिथला खडक कुठल्या प्रकारचा
आहे, जंगल कुठल्या प्रकारचं आहे, कुठली झाडं जास्त करून दिसतात, कुठली
दुर्मिळ झाडं, प्राणी, पक्षी असल्यास त्यांची माहिती, असं काहीच कुठे दिसत
नाही. खरं तर अशी माहिती मिळाली असती तर आवडलं असतं, कारण निसर्गसौंदर्याने
नटलेला हा प्रदेश आहे. असो.
तलकावेरीहून निघून मडिकेरीला आलो. हा सगळा
घाटातला रस्ता, शिवाय सुट्ट्या असल्यामुळे रस्त्यावर गाड्या, बसेस भरभरून
गर्दी. त्यामुळे प्रवासाचा वेग तसा कमीच राहिला. मडिकेरीला पोचून जेवायला
उशीर झाला. जेवण झाल्यावर मात्र मग कसली घाई नसल्यामुळे मडिकेरीमधल्याच
’राजा’ज सीट’ नावाच्या बागेत गेलो. कूर्गचे राजे म्हणे इथे बसून सूर्यास्त
बघत असत. जागा छानच आहे. पश्चिमेला समोर खूप विस्तीर्ण प्रदेश दिसतो.
बागेतून पश्चिमेला दिसणारं दृश्य
बागही सुंदर आहे. तिथे एका बाजूला
काही साहसी खेळ खेळण्याची सोय आहे. त्यापैकी एक, ’झिप लाईन’ नावाची राईड
आम्ही घेतली. एकमेकांपासून बर्यापैकी लांबवर असलेल्या दोन उंच मनोर्यांना
तारा (केबल्स) जोडलेल्या. मजबूत पट्ट्यांनी आणि हुकांनी एकेका व्यक्तीला
त्या केबलला अडकवतात आणि ’रोप वे’ सारखे आपण केबलवरून खालच्या टॉवरकडे सरकत
जातो. खाली सगळा खोल प्रदेश. सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण मजा आली.
थोडे सावकाश गेलो असतो, तर खालच्या प्रदेशाकडे नीट पाहता आलं असतं, असं
वाटलं, पण वेगावर आपलं नियंत्रण नसतं.
भरपूर गर्दीमुळे मडिकेरीतून बाहेर पडायला वेळ लागला आणि काळोख पडता पडता आम्ही होम स्टेला पोचलो.
आमच्या खोलीच्या बाहेरून सकाळच्या वेळात दिसलेले काही पक्षी
Yellow-browed bulbul
Orange minivet (male)
Orange minivet (female)
Oriental white-eye (चष्मेवाला)
कूर्ग- २/२

रविवारी सकाळी बाहेर सुंदर धुकं होतं. छान थंडी पडली होती. आदल्या दिवशी सकाळी बरेच पक्षी दिसले होते, पण आज मात्र धुक्यात तेही बाहेर पडलेले दिसत नव्हते.
नाश्ता वगैरे करून बाहेर पडलो. आज अॅबी फॉल्स हा धबधबा पहायचा बेत होता. पाऊणेक तासात तिथे पोचलो. धबधबा छानच आहे, पण प्रचंड गर्दी होती. अर्थात आपणही त्याच गर्दीचा भाग असताना गर्दीची तक्रार करण्यात काय अर्थ आहे? धबधबा पाहून बाहेर पडताना येणार्या गाड्यांची लांबलचक रांग बघून त्यामानाने आपण कमी गर्दीत धबधबा बघितला, या विचाराने उलट हायसं वाटलं.
अॅबी फॉल्सकडून मडिकेरीकडे परत येताना ’मंडलापट्टी’ नावाच्या ठिकाणाची पाटी दिसली. आज इतर कुठे जायचं ठरवलेलं नव्हतं, त्यामुळे वेळ आहे तर इथे जाऊन पाहू, असा विचार केला. त्या फाट्यापासून पंधरावीस किलोमीटरवर हे ठिकाण आहे. खूप उंचीवर आहे. पुढचा रस्ता खडकाळ आहे, त्यामुळे तिथे जीपने जावं लागतं असं कळलं. मग आमची गाडी तिथेच पार्क केली आणि जीप ठरवली. असंख्य जीपगाड्या तिथे होत्या आणि त्यांचा भरपूर धंदा होत होता. जीपमधून जाताना लक्षात आलं की अगदी शेवटचे चारपाच किलोमीटर सोडले तर बाकी रस्ता तसा चांगला होता, आपल्या कारने येऊ शकलो असतो. काही जणांनी तिथपर्यंत गाड्या आणल्याही होत्या. तिथून पुढे मात्र जीपच हवी. ही सगळी एक छोटीशी अर्थव्यवस्थाच निर्माण झालेली आहे. एका कन्नड चित्रपटामुळे हे ठिकाण प्रसिद्ध झालं आणि मग तिथे पर्यटक गर्दी करायला लागले. जीप चालवणार्यांची दबावफळी असल्यामुळे तिथले रस्ते सुधारत नाहीत असंही ऐकलं. चिकमगळूरला गेलो होतो, तेव्हा ’क्यातनमक्की’ या उंचावरच्या ठिकाणीसुद्धा असंच, जीपने जावं लागलं होतं. तिथला जीप ड्रायव्हरही ’हा रस्ता सुधारणार नाही’ असं म्हणाला होता, त्याचाही अर्थ हाच असणार.
मंडलापट्टीला पोचल्यावर मात्र खरोखरच फार सुंदर विहंगम दृश्य दिसलं.
आधी अचानक पाऊस आला, पण आला तसा लगेच थांबलाही आणि स्वच्छ ऊन पडलं.
तिथे सर्वात उंच जागी एक लहानसं मचाण बांधलेलं आहे. पलीकडे थोडं खाली उतरून कठड्याजवळ उभं राहून खालचा मोठा प्रदेश पाहता येतो.
अशा ठिकाणी निसर्गासमोर आपण आपोआप नम्र होतो. असं दृश्य डोळ्यात किंवा कॅमेर्यात पूर्णपणे साठवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो अपुरा पडतो.
आमच्या जीपच्या चालकाने पाऊण तासात परत
यायला सांगितलं होतं, त्यामुळे निघणं भाग होतं. शिवाय आता भूकही लागायला
लागली होती. परत पाऊणेक तास जीप, मग कारने अर्धाएक तास प्रवास करून
मडिकेरीला आलो आणि जेवलो. कूर्गला आल्यावर कॉफी पावडर, मसाले आणि चॉकलेट्स
ही खरेदी केली नाही तर ’फाऊल’ धरतात. त्यामुळे ती केली, शिवाय इतरही काही
बारीकसारीक वस्तू घेतल्या आणि परतीचा रस्ता धरला.
संध्याकाळी काकांबरोबर त्यांच्या कॉफीच्या
मळ्यात चक्कर मारली. कॉफी, काळी मिरी, वेलचीची वगैरे लागवड बघितली.
चिकमगळूरलासुद्धा तिथली कॉफी इस्टेट बघितली होती. पण इथे काका झाडांकडे
’इस्टेट’ म्हणून न बघता आम्ही जसे कोकणात आमच्या झाडांबद्दल प्रेमाने
बोलतो, तसे बोलत होते, त्यामुळे छान वाटलं. मला अशा ठिकाणी गेल्यावर एक
गमतीशीर अनुभव येतो. एकदा कोकणात एका ठिकाणी कुठल्यातरी कार्यक्रमासाठी
गेलो असताना एका पर्यटक-निवासात उतरलो होतो. तेव्हा उन्हाळा होता, बागेत
कोकमं होती. जिथे उतरलो होतो, तिथल्या काकू मला कोकम या फळाची ओळख करून
देऊन त्याचं ताजं सरबत कसं करायचं ते दाखवायला लागल्या. मला मनातून फारच
गंमत वाटली, कारण आमच्याकडेही कोकमाची झाडं आहेत, असं सरबत घरी करताना मी
लहानपणापासून बघत आले आहे, कित्येकदा कोकमाच्या आंबटढाण बिया नुसत्या मीठ
लावून चघळल्या आहेत. अर्थात हे त्यांना कसं कळणार, त्यामुळे मीही ते
गंभीरपणे ऐकून घेतलं. चिकमगळूरला कॉफी इस्टेट दाखवताना सुरुवातीला
आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवून तिथला माणूस म्हणाला, ’This is mango tree'
आम्ही मनात म्हटलं, बरं झालं सांगितलंत! नाही तर आम्ही कधी आंब्याचं झाड
बघितलंय? कूर्गचे काकाही उत्साहाने कॉफीबरोबरच पोफळी, मिरीच्या वेली वगैरे
दाखवत होते.
वाटेत ही एक नेहमीपेक्षा खूप मोठी गोगलगाय दिसली.
फिरून आल्यावर खोलीसमोरच्या गच्चीतून रस्त्याच्या पलीकडे झाडावर बसलेला
हा ’मलबार राखी धनेश’ दिसला. काळोख पडल्यामुळे याहून स्पष्ट फोटो मिळाला
नाही.
रात्री आमच्या खोलीच्या समोर एक कोळी त्याचं जाळं विणताना दिसला. आम्ही जवळजवळ पहिल्यापासून त्याचं हे काम पाहिलं.
सोमवारी सकाळी नाश्त्याला तांदुळाचे वेगळ्या प्रकारचे, जाडसर डोसे होते. आदल्या दिवशी राईस बॉल्स होते आणि त्याआधी नीर डोसे. सोबत रोज वेगळ्या चवीची चटणी, सांबार, भाजी वगैरे. रात्रीचं जेवणही छानच असायचं. आपण नेहमी उतरतो तशा प्रकारचं हॉटेल आणि अशा ’होम स्टे’ मधला हा फरक महत्त्वाचा वाटला. इथलं जेवण घरगुती, साधं, तरीही चवदार आणि अनौपचारिक होतं.
नाश्ता करून बंगळूरला जाण्यासाठी निघालो. वाटेत कुशलनगर नावाच्या गावी
असलेली बौद्ध मोनास्टरी बघितली. तिथेही आत प्रचंड गर्दी होती. गर्दी नसताना
तिथे कदाचित छान वाटत असेल, पण आम्हाला तरी तिथे फार थांबावंसं वाटलं
नाही. बुजबुजाट वाटला. आत बरीच दुकानं, रेस्टॉरंट्सही होती. तिथे फार वेळ न
थांबता पुढे निघालो. म्हैसूर यायच्या थोडंसं आधी जेवायला थांबलो आणि मग
कुठेच न थांबता थेट बंगळूरला घरी येऊन पोचलो!
एकंदर प्रवास आणि सहल छान झाली. गर्दी मात्र प्रत्येक ठिकाणी खूप होती.
विशेषत: मंडलापट्टीसारख्या ठिकाणी जर शांतपणे जरा वेळ घालवता आला असता, तर
आवडलं असतं. पण सुट्टीच्या दिवसांमध्ये अशी गर्दी असणारच, हे स्वीकारलं
पाहिजे आणि गर्दी टाळायची असेल तर सुट्टीच्या दिवसांत प्रसिद्ध ठिकाणी जाणं
टाळलं पाहिजे.