Monday, October 2, 2023

बदामी, प्ट्टदकल, एयहोळ

 कागल क्रॉस करून कर्नाटकात प्रेवेश केला तसा ओम पुरीच्या खडबडीत गालावरून अचानक हेमामालिनीच्या गालावर हात फिरवल्यासारखा भास झाला. काय ते रस्ते.... अहा !!! खड्डे हा विषय सोडा पण पोटातले पाणी सुद्धा इकडचे तिकडे होणार नाही इतके लेव्हलचे आणि शिवाय टोल नाके सुद्धा कमी आणि वाजवी किमतीतील. त्या बदल्यात महाराष्ट्रातून बाहेर पडेपर्यंत भरभक्कम किमतीचे ४ टोल भरले.
मध्ये कुठेतरी मी बाईक वर बसून चैतन्यला गाडीत बसविले. तुळतुळीत रस्त्यावर बाईक राईड हा एक आगळाच सुखद अनुभव होता. एकाच ट्रिप ला असे दुहेरी अनुभव क्वचितच मिळतात. मी त्याचा लाभार्थी होतो. शेकडो वर्ष उभ्या असलेल्या टनावारी वजनाच्या असंख्य शिळा पाहताना आपण बदामी मध्ये पोहोचलोय ह्याची खात्री झाली. ट्रिपचे नाव हंपी - बदामी असे असले तरी आम्ही भटकंतीची सुरवात बदामी पासून करणार होतो. बदामी मध्ये पोहचलो तेव्हा ५ वाजले असतील. आधी कुठं घुसावे ह्याचं नक्की नव्हतं म्हणून बदामी गावाचा रस्ता संपेपर्यंत गेलो आणि बनशंकरी मंदिराजवळ गाड्या पार्क केल्या. डॉक्टर धुमाळ तुळतुळीत रस्त्याला फसून बागलकोटला भलत्याच रस्त्याने गेले असल्याने ते अजून पोचले नव्हते. त्यामुळे आमचे कॅमेरे बाहेर पडले. मंदिराच्या समोर असणारा प्रशस्त हरिद्र तलाव आणि त्याच्यात चारही बाजूला दगडी महिरपी इस्लामी आणि विजयनगर बांधकाम शैलीचा प्रभाव पडतात. मंदिराच्या समोर तलावाच्या काठावर एक अती उंचीचा विजयस्तंभ/दीपस्तंभ आहे. मंदिरात घुसण्याआधी आम्ही रात्रीच्या निवासाची सोय करायला मंदिराच्या मागे असलेल्या भक्त निवासात गेलो. तिथे देवीची पूजा केल्याची पावती दाखविल्यावरच रूम मिळते. सहाच्या आधी पूजा करावी लागते आणि ती वेळ निघून गेल्यामुळे आता पावती करणे शक्य नव्हते. त्यामुळे रूम द्यायला नकार आला पण अभिजितने जरा लावूनच धरले आणि आपले संवाद कौशल्य पणाला लावत एक रूम पदरात पाडून घेतलीच ती सुद्धा वाजवी दरात. तो पर्यंत चुकामूक झालेले डॉक्टर धुमाळ योग्य स्थळी प्रगटले.



            आता अजून एक रूम शोधण्यासाठी डॉक्टर आणि अभिजित कामाला लागले. त्यांनी एक झक्कास जागा मंदिराच्या बाहेर शोधून काढली. सगळी मंडळी अशी येणारी प्रत्येक वेळ जुळवून घेत असेल तर भटकंतीला एक आगळा वेगळा साज चढतो आणि तत्यासमयी घडणारे असंख्य किस्से आपल्या आठवणींच्या किस्स्यात नेहमीच अधिराज्य गाजवतात. ती थंड पाण्याची अंघोळ आणि त्यासाठी लावलेले नंबर, चार्जींग साठी असणारा एकमेव सॉकेट आणि मी आधी मी आधीचा गजर, अनेक नको-नको त्या विषयाच्या रंगणाऱ्या चर्चा ह्यांनी एक वेगळाच माहोल तयार होतो.
      फ्रेश झाल्यावर सगळे पुन्हा एकत्र जमलो आणि चहाचा भुरका घेऊन मंदिर दर्शनाला घुसलो. शाळेच्या सहली असल्याने त्या मुलांच्या घोळक्यातुन आत घुसताना गोंधळ उडाला. त्यात त्यांची कानडी भाषा. हैला आपल्याला शिव्या घालताहेत की त्यांच्या त्यांच्यात बोलताहेत काहीच कळायला मार्ग नाही. शाळेची गर्दी ओसरल्यावर देवीचे दर्शन झाले.
      बनशंकरी किंवा वानशंकरी असे दोन संस्कृत शब्द आहेत, वान ("वन") आणि शंकरी ("शिवाची पार्वती"). तीळकरण्य जंगलात स्थित असल्यामुळे हे मंदिर वानशंकरी म्हणून लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की बनशंकरी हा योद्धा-देवी दुर्गाचा सहावा अवतार आहे. मंदिर सुरुवातीला द्रविडच्या स्थापत्य शैलीत बांधले गेले. पुनर्निर्मित संरचना विजयनगर वास्तुशास्त्रीय शैलीत आहे. मंदिराच्या बाजूला सर्व बाजूंनी एक उंच भिंत आहे. देवी देशस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. (संदर्भ: विकिपीडिया).
            मंदिर पाहून एक फेरफटका मारला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या स्टॉल वर नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेतला. डॉक्टर धुमाळांनी स्वतः तळून एक भजी प्लेट सर्वाना सर्व्ह केली. रात्रीचे व्हेज जेवण (व्हेजच मिळते इथे) खाल्ले आणि उद्या सकाळी ६ वाजता तयार व्हायचंय असे सर्वाना सांगून टाकले. निद्रादेवीच्या खुशीत स्थिरावून हंपी - बदामी ट्रीपच्या पहिल्या दिवसाची सांगता केली.
             भक्त निवासाच्या खोलीत मोबाईलच्या अलार्मने निद्रेची तपस्या भंग झाली. दांडग्या अनुभवामुळे सहाचा वेळ दिल्यावर साडे सात पर्यंत सर्व तयार झाले. आधी पोटोबा मग विठोबा ह्या तत्वावर नाश्ता झाला. बनपाव आणि चहा पुरवता पुरवता हॉटेल मालकाची लादी झाली. सगळं आवरून बदामी केव्ह्ज गाठण्याआधी एका ठिकाणी रात्री फिरताना रोषणाई केलेले एक ठिकाण दिसले होते ते सकाळी पाहू म्हणून आधी मोर्चा तिकडे वळवला. सकाळच्या पारी लोटा घेऊन जाणारेऱ्या महाभागांनी वरती काही नाही असे सांगत होते. आता आलोच आहे तर जाऊन येऊ म्हणून मी भरभर त्या पायऱ्या चढून एका खिंडीत गेलो. चारी बाजूला तांबड्या रंगाच्या महाकाय शिळामधून एक मध्ये क्रॉस होता त्याच्या एका घळीत कोण्या एक देवतेचे साधे मंदिर होतं. ते पाहून आजूबाजूला फारसे काही नसल्यामुळे काढता पाय घेतला. मी उतरत असताना मागून डॉक्टर धुमाळ - अभिजित - चैतन्य - राहुल आले. थोडीशी स्वतःचीच फोटोग्राफी उरकून बदामी गुहेजवळच्या पार्किंगला पोहचायला ९ वाजले.
      तिकिट्स काढून एक एक गुहा पाहण्यास सुरवात केली . शाळेच्या मुलांच्या सहलीची भीती होती कारण त्याचा अनुभव काल बनशंकरी मंदिरात घेतला होता. सकाळची वेळ असल्याने गर्दी फार नव्हती. कॅमेरे सरसावले.
      बदामी ही चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे ठिकाण. या राजवटीचा काळ इसवी सन 6 वे ते 8 वे शतक असा होता. पुलकेशी 2 हा चक्रवर्ती सम्राट या राजकुळातील एक पराक्रमी राजा . या ठिकाणाचे आधीचे नाव वातापि असे होते.. वातापि गणपती या नावाने एक प्रसिध्द गणपती तामिलनाडू राज्यात तंजावर येथे आहे. दक्षिण भारतात सकाळी म्हण्टल्या जाणा-या स्तोत्रात या गणपतीबाबत "वातापि गणपति भजे"" असा उल्लेख आढळतो . (संदर्भ: pragatishirgav :संजय पवार) भल्या मोठ्या शिळखंडात कोरलेल्या टेकडीवर पाषाणात ही लेणी कोरलेली आहेत .
        भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल केली जात असलेल्या या भागाचे एकूण तीन भाग करता येतील. एक चालुक्य कालीन लेण्या, दुसरा भाग अगस्ती तलाव व भूतनाथ मंदिर समूह आणि तिसरा म्हणजे बदामी किल्ला. अशी एकंदरीत बदामी भटकंती व्यापलेली आहे. बदामी या लेण्यांकडे काही पाय-या चढून आलो . एका अखंड डोंगरात खोदकाम करून ह्या लेण्या तयार करण्यात आल्या आहेत. एकूण ४ लेण्या असलेल्यापैकी लेणी क्रमांक 1 मध्ये शिव व इतर हिंदु देव देवता, लेणी क्रमांक 2 व 3 मध्ये विष्णु व विष्णुचे विविध अवतार तसेच रामायण काळातील प्रसंग व यक्ष किन्नर, नर्तकी असे दाक्षिणात्य पद्धतीच्या मुर्ती खांबावर, दर्शनी भिंतीवर तसेच खांबाला आधार देणा-या तुळया व छत यावर कोरलेल्या आहेत. लेणी क्रमांक 4 मध्ये जैन शिल्पे आहेत.
      इतका काळ लोटल्यावर आजही इथली मूर्तिकला आणि त्या शिल्पकारांचे कौशल्य अबाधित आहे. नटराजाची शिल्पे विशेष भाव खाऊन जातात. बदामीची लेणी व त्याचे स्थापत्य अप्रतिम आहे. दगडांचा रंग, लेण्यांची कलाकुसर, वरून दिसणारा विस्तीर्ण अगस्ती तलाव असं सारं दृश्य मनाला मोहवतं.
       आता बदामी भटकंतीच्या दुसऱ्या भागात प्रवेश करताना विस्तीर्ण अशा अगस्ती तलावाला बगल देत भूतनाथ मंदिराकडे निघालो. पाणी कमी असल्याने काठाकाठाने आणि मग वाळूत रुतत - रुतत मंदिर गाठले. भूतनाथ हे शंकराचे नाव. (बच्चनच्या चित्रपटातले नव्हे.) हा मंदिर समूह सुंदर देवालये व स्वच्छ परिसर यामुळे विलोभनीय वाटतो.



       बदामी किल्याच्या दिशेने जाताना एक पुरातत्व विभागाने संग्रहालय उभारले आहे. परिसरात मिळालेली अप्रतिम कलाकौशल्याची शिल्पे इथे एकत्रित करून ठेवली आहेत. दर्शनी भागात ठेवलेले शिल्प "क-मा-ल" आहे. ह्याची मागची पुढची बाजू एकदम समांतर कोरली आहे. लज्जागौरीचही कोरीव शिल्प अचंबित करते.
       किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यातून वाट उजवीकडे वर सरकत जाते. इथं तुमच्या अंगातला ट्रेकर बाहेर येतो. भल्या मोठ्या उंचीच्या शिलाखंडांना वळसा देत किल्याच्या मुख्य दरवाजातून वाट आत येते. सह्याद्रीतल्या किल्यासारखाच इथला दरवाजा खुबीने बसविला आहे. त्यासाठी नैसर्गिक रचनेचा जास्तीत जास्त वापर केल्याचं दिसून येते. मागोमाग चारही दरवाजे तिथल्याच पाषाणांचा फायदा घेऊन बनविले आहेत. दरवाज्यांच्या बाजूने आक्रमण करून किल्ला जिंकणे केवळ अशक्य आहे.
        चालुक्य राजघराण्याने येथे इसवी सन पाचवे शतक ते नववे शतक या दरम्यान बदामी येथे राज्य केले होते . बदामी येथे राजधानी करण्यापूर्वी ऐहोळ येथे त्यांची राजधानी होती.
        तटबंदी, दोन शिवालये, बुरुज, दरवाजे, मनोरे अश्या सुरेख अवशेषांनी सजलेला स्वच्छ किल्ला. साडे अकरा वाजून गेले होते. आता थोडं-थोडं ऊन लागायला सुरवात झालेली. मधेच उगवलेली काटेरी झुडुपे शाळा सुटल्यावर मैदानात उगीच रेंगाळणाऱ्या पोरांसारखी भासत होती. घडाळ्यातला नियोजनाचा काटा पुढे सरकू नये म्हणून किल्ला उतराई पार्किंगकडे येताना एका गावात घुसलो, मंदिर समूह आणि येथील गावाची स्वच्छता ह्यात कमालीचा फरक होता. गाववाल्यांना आपण एका जागतिक वारसा स्थळाच्या बाजूला राहतोय ह्याची चुकूनही जाणीव नव्हती. तरीसुद्धा काल केलेले बनशंकरी मंदिराजवळचे ते आमचं अविस्मरणीय वास्तव्य, आज दुपार पर्यंतच्या बदामीच्या त्या पवित्र वातावरणातील भटकंतीचे मोल तिळमात्रही कमी झाले नव्हते. मोठं मोठ्या शिळा कोरून त्यात गुंफा तयार करणे, विविध शिल्पाकृती साकार करणे ही एक स्थापत्य कलाच होय. या स्थापत्य कलेला कल्पक शिल्पकलेची जोड देऊन फार मोठा कलात्मक वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवला आहे. हंपी बदामी या वारशाच्या बाबतीत खरोखरीच भाग्यशाली होय. आयुष्याच्या एका शांत सायंकाळी ही सारी स्मरणे पुन्हा आठवेन आणि पुन्हा नव्याने जगेन.


_________________________________________________________________________________
_________________________________________________________________________

अट्टाहास:
पुरातत्वीय काही खजिना त्याच सोनेरी झळाळीने कित्येक काळ तसाच रहावा असे बऱ्याच वेळा वाटते पण आधीच्या दिग्गजांनी ह्या विषयी लिहले नसते तर आपण आज ह्या ठिकाणी नसतो, त्यामुळे भ्रमंतीची जाण असलेल्या आणि आपल्या प्रवासावर नितांत प्रेम करणाऱ्या समस्त घुमक्कडांना आपले अनुभव सांगितल्यास त्या भटक्याच्या मनात, ज्ञान वाटणारा एका वेगळ्या उंचीवर पोहचेल. आपण कमावलेलेल्या मौल्यवान ज्ञानाचा, आपल्या भटकंतीचा आणि अनुभवाचा कधीही गर्व नसावा.

जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे, सकळजन।

_________________________________________

महत्त्वाच्या नोंदी :
उत्तम कालावधी : उन्हाळा सोडून कधीही.
दिनांक : २९-३०-३१ डिसेंबर २०१८
आजची भटकंती: आदल्या रात्री बनशंकरी मंदिर आणि वास्तव्य. दुसऱ्या दिवशी एक अनामिक मंदिर - बदामी गुहा - भूतनाथ मंदिर समूह - बदामी किल्ला
लागलेला वेळ : चार ते ५ तास
पाण्याची व्यवस्था : सोबत पाणी असावे.
कसे जाल : पुणे सोलापूर हा मार्ग गुगल मॅप दाखवत असेल किंवा कमी किमी भरत असेल तरी एन एच ४ ने जाणे सोईचे पडते. संपूर्ण प्रवास - निवास - भोजन व्यवस्था ह्याविषयी अखेरच्या भागात लिहेन.
हे चुकवू नका : बदामी किल्ल्याच्या पायथ्याचे संग्रहालय.
अडचणी : सारखी सारखी मंदिरच पाहावी लागतात त्यामुळे एखादा नास्तिक प्राणी सोबत असल्यास तो त्रास देऊ शकतो.
थोडक्यात महत्त्वाचं : प्रत्येकाच्या बकेट ;लिस्ट मध्ये हे ठिकाण असावे.
गाईड मिळतात. आम्ही गाईड न घेतल्यामुळे त्याचा अनुभव नाही.
सहभागी : डॉ. सुनील धुमाळ, अभिजित शिंदे, चैतन्य, राहुल सावंत, पल्लवी सावंत, ख़ुशी कांबळे आणि देवा घाणेकर.
_________________________________________________________________________________
_________________________________________________________________________















No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

https://westernghatstreks.blogspot.com back up

  Korigad Fort Trek, Lonavala, Maharashtra K origad fort is situated in Lonavala in Peth Shahapur, Ambavne village in state of Mahar...