माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग १ - पूर्वतयारी
![]() |
कैलास दर्शन pc : श्री.शरद तावडे |
मला जाताना प्रवासाच्या अनुभवांबद्दल जशी उत्सुकता वाटत होती, तशीच उत्सुकता आपले सहयात्री कोण-कोण असतील ह्याचीही वाटत होती. एकतर मी मुळात देवधर्म, यात्रा, पुण्य कमावणे वगैरे पंथातली नाही. पण सिंहगड चढणाऱ्या लोकांच्या गप्पा जशा ट्रेकिंग संदर्भातल्या असतात, तशा यात्रेला गेल्यावर देवदेव-यात्रा ह्याबद्दल गप्पा होणार, हे स्वाभाविकच होतं. पण आपल्याबरोबरचे सगळेच लोक अगदी किरकोळ गोष्टीचा संबंधही जर ‘भोले बाबाकी कृपा’ ला लावणारे असतील तर काही खरं नाही, अशी भीती वाटत होती. एक जरी मैत्रीण मनासारखी मिळाली तरी सगळ्या प्रवासात मजा येईल. तसं झालं तर फार छान होईल. हा आणि नाही मिळाली, तर एक महिना कसा रेटायचा? असे परस्परविरोधी विचार मी पुणे - दिल्ली प्रवासात करत होते. मैत्रिण मिळण्याबद्दलची मुख्य काळजी आणि इतर लहान-मोठ्या असंख्य काळज्या आणि समजा कैलास-मानसच्या ऐवजी परस्पर दक्षिण-उत्तर ध्रुवाची सहल करावी लागली तरी पुरेल इतके समान घेऊन मी दिल्लीत पाय ठेवला.
गुजराथ समाजमधील डॉर्मीटरी pc : श्री. शरद तावडे![]() |
![]() |
चर्चा आणि सल्लामसलत! (श्री.शरद तावडे) |
ह्या यात्रेसाठी अगदी कडक वैद्यकीय परीक्षा घेतात. भारतात असेपर्यंत वैद्यकीय मदत नीटपणे मिळते. सुरवातीला कुमाऊँ मंडळ विकास निगम आणि नंतर भारत सीमा तिबेट पोलीस हे व्यवस्थित मदत करतात. प्रत्येक कँपवर डॉक्टर असतात. प्रश्न असतो तो तिबेटामध्ये गेल्यावर. तिथे चीन सरकार कुठलीही वैद्यकीय मदत देत नाही. ह्या यात्रेत समुद्रसपाटीपासून १८६०० फूट इतकी उंची गाठायची असल्याने हृदय, फुफ्फुसे तेवढा ताण घेऊ शकतील का, हे काटेकोरपणे तपासले जाते. त्याचबरोबर हिमोग्लोबिन, लघवी, रक्त, छातीची क्ष किरण तपासणी, स्ट्रेस टेस्ट, पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा तपासण्या केल्या जातात. ह्यात पास होणाऱ्या यात्रीनाच पुढे जायची परवानगी मिळते. (यात्रेतल्या ‘गुंजी’ ह्या कॅम्पवर पुन्हा तपासणी होते. तेथूनही परत पाठवू शकतात.)
मी आधी म्हटल्याप्रमाणे भारत सरकार दरवर्षी सोळा बॅचेस यात्रेला पाठवते. प्रत्येक बॅच साठ लोकांची असते. प्रत्येक बॅचंबरोबर एक लायझन ऑफिसर असतात. हे ऑफिसर भारत सरकारचे अंडर सेक्रेटरी किंवा त्यावरील पदांवर काम करणारे असतात. हे सर किंवा मॅडम त्या-त्या ग्रुपचे नेतृत्व करतात तसंच ते भारत सरकारचे प्रतिनिधीत्वही करतात. ग्रुपमध्ये शिस्त ठेवणे, सर्वांची काळजी घेणे, काही बरी-वाईट परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळेला परिस्थिती पाहून योग्य असे निर्णय घेणे अश्या भरगच्च जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात.
एख्याद्या यात्रीचे वर्तन योग्य नसल्यास ते त्याला परतही पाठवू शकतात. आमच्या बॅचचे एल.ओ. कोण असतील ह्याची खूप उत्सुकता होती. मेडिकलच्या वेळेला ते भेटतीलच, असे लोकांचे म्हणणे होते. आलेल्यांपैकी कोण पुढे जाणार आणि कोण घरी? ही एक काळजी होती. मला माझे हिमोग्लोबिनचे आणि वजनाचे आकडे डोळ्यासमोर आले की पोटात गोळा येत होता. दुसऱ्या दिवशी ह्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती.
दिनांक १० जून २०११
एक चांगली गोष्ट म्हणजे एकदा गुजराथ सदनला पोचलात की प्रत्येक गोष्टीची सोय कुमाऊँ मंडळवाले करतात. जेवण, चहा-पाणी, राहणे, वैद्यकीय तपासणीसाठी जाता-येता बसची सोय सगळं. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील यात्रींची उत्तम सोय व्हावी म्हणून प्रचंड काम करतात. आम्ही सर्व लोक तयार होऊन, न खाता-पिता (मेडिकलमुळे) दिल्ली हार्ट लंग इंस्टिट्यूटला पोचलो. त्या सगळ्या तपासण्यांसाठीची रक्कम आणि चीनच्या व्हिसासाठी पारपत्र असे जमा करून घेतल्यावर तपासण्यांची फैर सुरु झाली. निरनिराळ्या तपासण्यांसाठी फिरताना सहयात्रींची ओळखही होत होती. आमच्या बॅचमध्येच दोन डॉक्टर आहेत अस कळल्यावर बरं वाटलं. अजिबात हिंदी-इंग्रजी न येणारी काही गुजराथी मंडळी होती, तर केरळचे एक डॉक्टर फक्त इंग्रजी येणारे होते! अश्या सगळ्या जनतेची मोट आमचे एल.ओ. बांधणार होते. एक महिना हेच मित्र-मैत्रिणी, हेच कुटुंब.
एक-एक करून सगळ्या तपासण्या संपल्या. नंतर त्या हॉस्पिटलच्या प्रेक्षकगृहामध्ये सगळ्यांना बसवून ‘यात्रा आणि त्या दरम्यान घेण्याची काळजी’ अशी माहिती देण्यात आली. आपण समुद्रसपाटीपासून जसे वर वर जातो, तशी ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचा आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, पचनसंस्थेवर, स्वभावावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो. हाय अल्टीट्यूड सिकनेसच्या ,अक्युट आय माउंटन सिकनेस, हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडीमा आणि हाय अल्टीट्यूड प्लमनरी एडीमा अश्या पायऱ्या असतात. ह्यात मृत्यूही ओढवू शकतो.
यात्रेत घ्यायच्या काळजीची माहिती |
माझा एक शाळेतला मित्र दिल्लीत राहतो. संध्याकाळी त्याच्याबरोबर फिरून, गप्पा मारून मस्त मजा केली. शाळेतल्या दिवसांच्या आठवणी काढून भरपूर हसलो, खिदळलो. मेडिकलच सगळं दडपण निघून गेलं. आता दुसऱ्या दिवशी भारत सीमा तिबेट पुलीसच्या इस्पितळात मी यात्रेला जाणार की परत घरी, हा निर्णय होणार होता.
दिनांक ११ जून २०११
आम्ही सर्व लोक तयार होऊन, आणि आज व्यवस्थित नाश्ता-पाणी करून भारतीय तिबेट सेना पोलीस हॉस्पिटला पोचलो. आज सगळेजण ‘किस्मत का फैसला’ मोड मध्ये होते. एव्हाना माझी आणि नंदिनीची (पुण्याची मैत्रीण) मस्त मैत्री झाली होती. तेवढे सूर बॅचमधल्या कोणाशी जुळतील अस वाटत नव्हत. दोघीतल्या एकीला जर परत जायला लागलं तर दुसरीची फारच पंचाईत होणार होती. कारण बाकीच्या सगळ्याच बायका नवऱ्याबरोबर आल्या होत्या. दोघींना जायला मिळावं नाहीतर दोघींना परत तरी पाठवावं अस वाटत होत. नेहमीप्रमाणे तिथेही यात्रेत घेण्याची काळजी, पाळावयाची शिस्त, नियम, हवामान ह्या विषयांवर माहिती दिली.
नंतर एकेकाला बोलावून फैसला सुरु झाला. आम्ही सगळे मिळून ६२ लोक होतो. प्रत्येकाला बोलावून त्यांचे सर्व रिपोर्ट्स तीन डॉक्टर मिळून बघत होते. आपण जास्त उंचीवर जाऊ, तसा बऱ्याच जणांचा रक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच जास्त रक्तदाब असलेल्यांना परत-परत तपासत होते. निरनिराळ्या कारणांमुळे एकूण दहा लोक नापास झाले. दोन लोक काठावर पास, किंवा नापास होते. दुर्दैवाने त्यात नंदिनी होती. तिचा इ.सी.जी. नीट नव्हता, अस डॉक्टरांच म्हणणं होत. पण हे सांगणाऱ्या डॉक्टर मॅडम चक्क प्रसुतीतज्ञ होत्या! हृदयविकार तज्ज्ञ नव्हत्याच! मग त्यांनी नंदिनी आणि अजून एकीला जवळच्या बात्रा हॉस्पिटलमध्ये जाऊन परत इ.सी.जी. काढायला सांगितला. त्या दुसऱ्या यात्रीचा नवरा स्वतः डॉक्टर होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काहीही प्रश्न नव्हता. बात्रा हॉस्पिटलमधल्या हृदयविकार तज्ज्ञाने पुन्हा तपासणी करून कुठलीही अडचण नसल्याचं लिहून दिलं. पुन्हा आमची वरात भा.ति.से.हॉस्पिटलला आली. अशी सगळी सव्यापसव्य करून दोघींनाही परवानगी मिळाली! हुश्श!
गुजरात सदनामध्ये संमिश्र वातावरण होत. नवरा-बायकोच्या जोडीतील कुठे नवरा तर कुठे बायको नापास झाली होती. त्यांची रडारड, समजावणे चालू होते. मला आणि नंदिनीला मात्र आता गुंजीपर्यंत नक्की जाणार ही खात्री वाटायला लागली. ह्याच खुशीत झोपून गेलो.
दिनांक १२ जून २०११ (दिल्ली मुक्काम)
![]() |
बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे) |
![]() |
बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे) |
दिनांक १३ जून २०११ (दिल्ली ते अल्मोडा)
दिल्लीतील हृद्य निरोप |
सकाळी ठरलेल्या वेळेला आम्ही सर्व जण आवरून, सामान जमा करून बाहेर पडलो. बाहेर आलो तर काय, आम्हाला निरोप द्यायला मोठा जमाव जमला होता!! दिल्लीतल्या यात्रींचे कुटुंबीय, कुमाऊँ मंडळाचे लोक, खूप गर्दी होती. सगळे यात्रीन्च्या पाया पडत होते,. हातात खाऊ, पाण्याच्या बाटल्या कोंबत होते, अगदी डोळ्यात पाणी आणून ‘ ठीकसे वापस आना’ असा निरोप देत होते. लोकांच प्रेम, श्रद्धा पाहून सगळ्यांनाच भरून येत होत. समारंभाने हार-तुरे घालून, गंध लावून दिल्लीच्या लोकांनी आम्हाला निरोप दिला. आज आम्हाला दिल्ली ते काठगोदाम असा ३६० की.मी.चा प्रवास वातानुकूलित बसने आणि पुढे अल्मोड्यापर्यंतचा प्रवास साध्या बसने करायचा होता.
काठगोदाम येथील स्वागत |
दिनांक १४ जून २०११ (अल्मोडा ते धारचूला)
मिडीयाची गर्दी |
![]() |
मीरथी येथील बिदाई समारोह (फोटो : श्री. शरद तावडे) |
तिथल्या कमांडंटसाहेबांनी चीनमध्ये गेल्यावर सुरक्षिततेची कशी काळजी घ्यायची हे सांगितले. तिबेटी भाषेतले रोज लागणारे शब्द असणारी पुस्तिका सर्वांना दिली. पूर्ण बॅचचा एक फोटो काढून त्यांनी आम्हाला निरोप दिला. हे सगळं स्वागत बघून जरा संकोचच वाटत होता. आम्ही काही एवरेस्टवर स्वारी करणार नव्हतो किंवा एखादं युद्धही लढणार नव्हतो. ज्या सैनिकांच आपण स्वागत करायला हवं, ते आमच्या सोयींसाठी केवढीतरी धडपड करत होते. तिथे नागपूरचा एक मराठी जवान भेटला. त्याच्याशी मराठीत गप्पा मारून पुन्हा एकदा तो दमवणारा बसप्रवास सुरू केला.
दिनांक १५ जून २०११ (धारचूला ते सिरखा)
नारायण आश्रम |
आता त्यांचा इस्पितळ, महाविद्यालय, प्राथमिक शाळा असा बराच विस्तार झाला आहे. तिथे गेल्यावर डोळ्यात भरली ती त्यांची शिस्त, व्यवस्था आणि स्वच्छता. जिकडे नजर जाईल तिथे आता हिमशिखरे दिसत होती. पाऊस नव्हता. हवा छान होती. आकाशाची निळाई, शिखरांचा शुभ्रधवल रंग आणि त्या पार्श्वभूमीवर आश्रमातील काळजीपूर्वक जोपासलेली रंगीबेरंगी फुले! वा! तिथे दर्शन घेऊन, आणि त्यांनी दिलेला गरम शिरा आणि चहा हा प्रसाद घेऊन सगळे पुढे निघाले.
यात्री आणि पोर्टर-पोनीवाले-पोनी यांची गाठभेट |
यादगारी |
आमच्या बॅचचे कलाकार श्री. शरद तावडे |
दिल्ली सोडल्यापासून लेकाशी बोलणं झालं नव्हत. तो पावणेबाराला शाळेत जातो. त्या आधी फोन पर्यंत पोचता यावं म्हणून अधेमधे न रेंगाळता सरळ गाला कँपला पोचलो. पण....... तिथला फोन बंदच होता! घर सोडून आता आठवडा झाला होता. आई-बाबा, नवरा ह्यांची आठवण येत होतीच. पण सगळ्यात जास्त मुलाची येत होती. त्याच्या वयाचे मुलगे बघितले की फारच जाणवायचं. पण आता त्याच्याशी बोलण्यासाठी अजून एक दिवस वाटबघायला लागणार होती.
कँपवर रोज संध्याकाळी भजन व्हायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या मार्गाबद्दल सूचनाही मिळायच्या. आमचे एल.ओ. नारंग सर चालताना, जेवताना सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायचे. हळूहळू त्यांच्यासकट सगळ्या पन्नास लोकांची नाळ जुळत होती. चेष्टामस्करी बरोबर एकमेकांना मानसिक धीर देणे, मदत करणे हे सगळं एका कुटुंबासारखं चालू झालं होत.
१९९८ च्या आधी मालपा इथेही कँप असायचा, पण १९९८ च्या दुर्घटनेनंतर तिथे कँप नसतो. त्यामुळे चालायला जास्त अंतर आहे. माहिती पुस्तका नुसार हे अंतर चालायला ७ ते १२ तास लागू शकतात. आजचा टप्पा झाला की तुमची यात्रा झालीच अस समजतात. आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी दिलेल्या सूचनांमध्ये सगळ्यात जास्त सूचना ह्याच मार्गाबद्दल होत्या.
चालत असतानाच घोडे, खेचर वर-खाली करत होते. तरी आमच्या नशिबाने आणि शिवशंकराच्या कृपेने पाऊस नव्हता. नाहीतर अश्या अडचणीच्या रस्त्यावर आणखीन वरून पाऊस आल्यावर काय होत असेल ह्याची कल्पनाच भयंकर होती. सगळं वातावरण भीती वाटेल असच होत. प्रत्येक पायरी अक्षरशः तोलून मापून उतरत प्रवास चालू होता. एक पाऊल जरी इकडे-तिकडे पडलं तरी कपाळमोक्ष ठरलेला आणि खालून रौद्ररूप धारण करून वाहणाऱ्या कालीच्या उदरात यात्रा समाप्त!
मागच्या वर्षी एक महाराष्ट्रातले यात्री परिक्रमा संपवून परत येत होते. तेव्हा फोटो काढण्यासाठी नदीच्या बाजूला उभे राहिले, आणि सामान वाहून नेणाऱ्या खेचराने त्यांना धक्का दिला. ह्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, पण कालीच्या प्रवाहामुळे त्यांचा मृतदेहसुद्धा हाती लागला नाही. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या. त्यांनी हा धक्का कसा सहन केला असेल देव जाणे.
ह्या प्रसंगामुळे आम्हाला वारंवार ‘डोंगराच्या बाजूला थांबा, नदीच्या कडेला उभे राहू नका.’ अस बजावलं होत. मला फोटो काढावेसे वाटले तर सुरेशभाई मला डोंगराला पाठ टेकून उभं राहायला लावायचा. ह्या रस्त्यावर स्थानिक लोक तसेच मिलिटरीचे जवान ये-जा करत असतात. सगळे जण ‘ओम नमा शिवाय’ च्या गजराने आमचा उत्साह वाढवत होते. रस्त्यातल्या घोडे, खेचरांकडे सुरेश बारीक लक्ष ठेवून होता. फार अरुंद वाट असेल तर तो त्याच्या स्थानिक भाषेत बोलून त्यांना थांबवायचा, हातातल्या काठीने त्यांना बाजूला करायचा.
काही अंतर चालून गेल्यावर जरा बरा रस्ता आला. एक लाकडी पूल पार केल्यावर आम्ही मालपाला पोचलो. भारत सरकार आणि १९९८ च्या दुर्घटनेत मरण पावलेल्या यात्रींचे नातेवाईक ह्यांनी मिळून तिथे एक शंकराचे मंदिरबांधले आहे. तिथे नतमस्तक होऊन आणि मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पुढे वाटचाल सुरू केली.
रस्त्यात लमारी ह्या छोट्या गावात आय.टी.बी.पी.चा कँप आहे. तिथे चहा आणि चिप्सने स्वागत झाले. महत्त्वाचे म्हणजे इथे फोनची सोय होती. सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली.
आम्ही आजच्या दिवसाबद्दल जे एकाला होत, ते त्या ४४४४ पायऱ्या आणि मालपापर्यंतचा अवघड रस्ता ह्याबद्दलच. त्यामुळे मालपा आल्यावर वाटलं की झालं आता. पण पुढे जवळ जवळ ८ किमी अंतर बाकी होत. ते चालण्याची मानसिक तयारीच नव्हती. आता ते सगळे चढ-उतार प्रचंड वाटायला लागले. अंतर संपता संपेना. देवाच नाव घेत मी एक एक पाऊल टाकत होते. जवळच्या बाटलीतलं पाणी पीत, सुका मेवा खात चालत होते. आजचा रस्ता म्हणजे हिंदीत ‘ नानी याद आई’ म्हणतात तसा होता. पाय ओढत चालल्यावर बऱ्याच वेळाने कँप दिसायला लागला!! एक पूल पार करून शेवटचा अर्ध्या किलोमीटरचा चढ चढून कशीबशी कँपवर पोचले. पण सगळं अंतर चालत पार केल्याच समाधान वाटत होत.
सर्व यात्रींची अवस्था अशीच झाली होती. सगळे प्रचंड थकल्यामुळे रात्री भजन म्हणायला कोणाच्या अंगात त्राण नव्हत. जेवून सगळे गुडुप झाले.
दिनांक १७ जून २०११ (बुधी ते गुंजी)
आज गुंजीपर्यंत पोचलं की उद्या आराम! गुंजी समुद्रसपाटीपासून साधारण १२००० फुटांवर आहे. इथपासून पुढे विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. ह्या कँपपर्यंत सगळी व्यवस्था कुमाऊ निगम विकास मंडळ करते. गुंजीपासून पुढे आय.टी.बी.पी. व्यवस्था करते. त्यांची इथे परत एकदा मेडिकल होते. विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी इथे दोन रात्री थांबवतात.
पण ह्या सगळ्यासाठी १९ किलोमीटर चालायचं होत!
छीयालेख घाटी आणि त्याचा अपूर्व सौंदर्याने नटलेला परिसर पाहून मन मोहरत होते. हा परिसर ‘फुलोंकी घाटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच पाईन वृक्ष आणि रंगीबेरंगी असंख्य फुलांनी फुललेला घाटीचा सपाट प्रदेश आतापर्यंतची दमछाक विसरायला लावत होता. हिरव्यागार मखमली गवताच्या गालिच्यावर सुंदर रंगीबेरंगी फुले आणि त्यावर पडलेल्या पावसाच्या थेंबांवरून परावर्तित होणारी पावसाची किरणे... सगळा प्रदेश देहभान विसरायला लावणारा होता.
ही सुरेख वाट संपल्यावर आय.टी.बी.पी. ची पहिली चौकी आली. चहा-बिस्किटे देऊन जवानांनी आमचे स्वागत केले. पारपत्र तपासणी झाल्यावर व जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद केल्यावर आम्हाला पुढे गर्ब्याल गावाकडे जायची परवानगी मिळाली.
सुंदर नक्षीकाम केलेल्या घरांनी नटलेले हे एक टुमदार पण दुर्दैवी गाव आहे. गर्ब्याल गावाला पूर्वी ‘छोटा विलायत’ म्हणत असत. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी गर्ब्याल ही मोठी बाजारपेठ होती. युद्धानंतर तसेच तिबेट चीनच्या ताब्यात गेल्यावर व्यापारी हालचालींवर निर्बंध आले. इथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. अजून दुर्दैव म्हणजे पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे आणि प्रचंड वृक्षतोडीमुळे इथल्या निसर्गाचे संपूर्ण संतुलन पार बिघडून गेले. इथली जमीन खचू लागली. सुंदर कलाकुसर असलेली घरे चक्क जमिनीत गाडली जाऊ लागली. जिवाच्या भितीने गाव रिकामे झाले. आताही काही माणसे तिथे राहतात, पण बरीच घरे रिकामी, उदासवाणी वाटली.
इथल्या सगळ्या गावांमधून जाताना सर्व स्थानिक लोक हात जोडून ‘ओम नमा शिवाय’ म्हणून स्वागत करायचे. कुठून आले वगैरे चौकशी व्हायची. चहाचा आग्रह व्हायचा. मी अजिबातच चहा पीत नसल्याने सगळ्यांना नाराजकरावं लागायचं.
गोड, गोंडस छोटी मुले आपल्या बोबड्या भाषेत ‘ओम नमा शिवाय’ म्हणून हक्काने गोळ्या-चॉकलेट मागायची. ही कल्पना आधीच असल्याने मी रोज खिशात गोळ्यांची पिशवी ठेवायचे. त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून छान वाटायचं!
गर्ब्याल गावानंतर दोन-अडीच तास चालल्यावर गुंजी कँप दिसायला लागला. आय.टी.बी.पी.चा कँप असल्याने तिरंगा झेंडा डौलात फडकत होता. कँप खूप आधी दिसायला लागतो, पण नदीच्या पलीकडच्या काठाला! ‘ मेरा कँप हैउसपार, मै इसपार, ओ मेरे सुरेशभैय्या ले चल पार, ले चल पार’ अस म्हणावंसं वाटत होत!! एकदा कँप दिसायला लागला की चलण्याच मीटर संपतच. पुढची वाट चालायला नको वाटते. पण चालल्याशिवाय गत्यंतर नव्हते. बराच वेळ पाय ओढल्यावर एकदाचा तो नदीवरचा पूल आला. पुन्हा अर्धा तास चालल्यावर आधी पोचलेल्या यात्रींची ‘ओम नमः शिवाय’ ही आरोळी ऐकून जीवात जीव आला.
सगळ्या कँपवर बायका आणि पुरुषांची राहण्याची वेगवेगळी सोय असते. एका कुटुंबातून आलेल्या लोकांची बरीच पंचाईत होते. कितीही वेगवेगळं ठेवायचं ठरवलं तरी काही सामायिक सामान असतच. मग त्या लोकांच्या सारख्या फेऱ्या सुरू व्हायच्या. काही पतीसेवापरायण बायका सगळी सेवा करायच्या. आमच्या बरोबरची गुजराथची पायल नवऱ्याला अगदी पेस्ट लावून ब्रश हातात द्यायची. सकाळ झाली की तिचा नवरा संकेतभाई ‘ पायल, जरा ब्रश आपोतो’ करत दारात हजर!! एकदा हे लक्षात आल्यावर, तो दिसला की मी आणि नंदिनीच ‘पायल, जरा ब्रश आपो तो’ अस ओरडायला लागलो!!
जवळच्या आय.टी.बी.पी. कँप मध्ये एक छोटंसं देऊळ होत. रोज संध्याकाळी तिथे भजन होत. आम्ही सर्व यात्री मिळून तिथे गेलो. सर्व जवान स्त्रिया व पुरुष मिळून अगदी जोषपूर्ण भजन म्हणत होती. पेटी, ढोलकी, खंजिरी आणि सगळ्यांचे टीपेला भिडलेले सूर!! यात्रीनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून बरीच भजन म्हटली. त्या तरतरीत, उत्साही ,चुस्त जवानांची ऊर्जा आपल्याला मिळाली आहे अस वाटत होत.
सकाळी १० वाजता सगळ्यांना आपापले मेडिकल रिपोर्ट घेऊन तयार राहायला सांगितलं होत. दिल्लीतून निघताना ज्या तपासण्या झाल्या होत्या, त्यातील क्ष-किरण तपासणी आणि अन्य सर्व वैद्यकीय रिपोर्ट जवळ ठेवायला आम्हाला किमान सतरा वेळा तरी बजावून सांगितलं होतं. पुढे यात्रेदरम्यान एखाद्या यात्रीला काही त्रास होऊ लागल्यास आधीचे रिपोर्ट डॉक्टरांना तुलना करायला उपयोगी पडतात.
सकाळची सगळ्यात मोठी आणि अत्यंत मजेदार बातमी म्हणजे, आमच्या नारंग सरांनीच त्यांचे सगळे रिपोर्ट आणले नव्हते!! क्ष-किरण फोटो फार मोठा होता म्हणून त्यांनी दिल्लीतच ठेवला होता. बाकीचे रिपोर्टही सगळे न आणता, थोड्याच रिपोर्टची प्रत ते घेऊन आले होते. एल.ओ. सरांना पूर्ण यात्रेत अग्रपूजेचा मान असतो. त्यांनीच अशी गंमत केल्यावर आय.टी.बी.पी.वाले डॉक्टर चांगलेच वैतागले. त्यांचा सगळा सैनिकी खाक्या. कोणीही त्यांची शिस्त मोडलेली ते खपवून घेत नाहीत. इथे आमच्या एल.ओ. सरांशीच त्याचं वाजल्यावर त्यांनी दणादणा लोकांना नापास करायला सुरवात केली. कोणाला न्युमोनियाची शंका, कोणाचा रक्तदाब जास्त तर कोणाच कोलेस्टरॉल जास्त. अर्धी बॅच परत पाठवतात की काय अशा विचाराने कँपवर वातावरण एकदम तंग झालं.
माझं हिमोग्लोबिन सदैव कमी असतं. त्यामुळे मला ती काळजी होती, तर नंदिनीला तिच्या इ.सी.जी. प्रश्नाची. माझी मेडिकल झाली तेव्हा माझ्या हिमोग्लोबिनच्या त्या सुरेख आकड्यांकडे डॉक्टर बराच वेळ बघत बसले होते. मी एकदम गॅसवर. पण शेवटी त्यांनी फक्त ‘चालण्याचा हट्ट न करता, जास्त चढ असेल तिथे घोड्यावर बसा. काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला. हिमोग्लोबिन कमी असल्याने, विरळ हवेचा जास्त त्रास होऊ शकतो, अस त्या डॉक्टरांच म्हणणं होत. एकूण काय, मला वरच्या वर्गात ढकलले होते! पुष्कळ झालं.
गुंजी कँपला फोनची सोय होती. ह्यानंतर तिबेटपर्यंत फोन नाही. त्यामुळे घरी फोन करून सगळ्यांशी गप्पा मारल्या. शनिवार असल्याने लेक घरी होता! त्याच्याशी बोलून खूप बरं वाटलं. माझ्या गप्पांमुळे त्याचा यात्रेचा गृहपाठ चांगला झाला होता. त्यामुळे त्याने सगळी बारीक-सारीक चौकशी केली. बरोबरचे लोकं कसे आहेत, किती चालते आहेस, जेवायला काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी कधी येणार आहेस!
रोज सकाळी माझं आवरून होण्याआधीच हजर असणारी सुरेश-रमेशची जोडी आज मात्र गायब होती. थोडा वेळ त्यांची वाट बघितली, पण सगळ्यांनी चालायला सुरवात केली. अशी किती वाट बघणार? त्यामुळे त्यांना मनात शिव्या देत सॅक उचलून चालायला सुरवात केली. खरंतर रस्ता तसा सोपा होता, पण विरळ हवा आणि पाठीला सॅक असल्यामुळे माझी अवस्था वाईट होत होती. गुंजीपासून नबीढांगपर्यंतच्या रस्त्याचे काम चालू आहे. अजून काही वर्षांनी यात्रेचा हा भाग वाहनाने करता येईल. ह्या क्षणी मात्र मी त्या रस्त्याशी झुंजत होते. तेवढ्यात नंदिनीचा घोडेवाला आला. त्याने माझी सॅक घेतली. अजून एक तासभर चालल्यावर सुरेश उगवला. ‘दिदी माफ करना. अलार्म ही नही बजा’ वगैरे सारवासारव करून माझे सामान उचलून चालायला लागला.
चालताना उजव्या हाताला खूप दूर बर्फाच्छादित डोंगर दिसत होता. तो म्हणजे छोटा कैलास किंवा आदी कैलास. तिबेटामधील कैलासाची भारतातील प्रतिकृती. तिबेटमध्ये गौरी कुंड आहे. आदी-कैलासच्या पायथ्याशी पार्वती सरोवर आहे. असे एकूण पाच कैलास आहेत. तिबेटामधील महा-कैलास, आदी कैलास, मणी-महेश, किन्नोर कैलास आणि श्रीखंड कैलास. ह्या सगळ्या कैलासांचं दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना ‘पंचकैलासी’ असं म्हणतात.
आता इतके दिवस सोबत करणारे उंचच उंच वृक्ष आणि हिरवळ विरळ होत असल्याचे जाणवू लागले होते. डोंगरमाथ्याचे हिरवेपण सरत चालले होते. जिकडे बघावे तिकडे हिमाच्छादित पर्वत दिसत होते. वातावरणातील थंडी चांगलीच जाणवत होती. थंडीपासून बचावासाठी सतत हाताचे पंजे, पावले, कान आणि नाक झाकून ठेवा. एकच जड कपडा न घालता पातळ कपड्यांचे एकावर एक थर घाला, अश्या सूचना आम्हाला वारंवार मिळाल्या होत्या.
![]() |
कालीमाता मंदीर |
कालापानी कँपवरील लष्करी पाहुणचार |
![]() |
बिकट वाट वहिवाट! |
२.३० वाजता थोडा बोर्नव्हीटा घशाखाली ढकलला. २.३० ही वेळ घरी असताना साखरझोपेची. पण इथे मात्र सगळे कुडकुडत पुढच्या प्रवासासाठी तयार झाले होते. यात्रेत खूप वेळा ५.३०-६.०० वाजता नाश्ता केला होता. पण ही वेळ अगदीच विचित्र होती. यात्रेतील प्रत्येक दिवसागणिक यात्रींचे शरीर आणि मन तेथील प्रदेश, हवामान, वारा, पाऊस, थंडी सगळ्याला तोंड द्यायला तयार झाले होते. यात्रेची सुरवात धारलापासून केली होती. तिथली समुद्रसपाटीपासूनची उंची ३००० ते ४००० फूट आहे आणि आता नबीढांगला जवळजवळ १४००० फुटांवर होतो. आता शेवटच्या चढाईची परीक्षा द्यायची होती.
नबीढांग ते लीपुलेख हा यात्रेतील सर्वात कठीण, अवघड प्रवास असे ऐकले-वाचले होते. पण तो इतका अवघड असेल अस वाटलं नव्हत. शेवटी मी फार धोका न पत्करता घोड्यावर बसले. थोड्या चालण्याने थंडीतही घाम फुटला होता. घामावर वारा लागून जास्तच थंडी वाजायला लागली. रात्रीची वेळ, थंडी आणि थकव्याने डोळे मिटू लागले. रमेशभाई सारखा मला उठवत होता. ‘ दिदी, सोना मत. आंखे खुली रखो. ॐ नमः शिवाय' का जाप करते रहो’ अस म्हणत होता. अस पेंगत, उठत असताना हळूहळू उजाडायला लागले. आता झोप उडली. सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. नजर जाईल तिथपर्यंत सगळे डोंगर फक्त बर्फाने झाकलेले होते. सृष्टीतील जिवंतपणाची काही खूण नव्हती.
त्या विरळ हवेची थोडी सवय व्हावी म्हणून बऱ्याच वेळा सगळी बॅच मधूनमधून थांबवत होते. काही वेळात आम्ही भारत आणि चीनमधल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ मध्ये प्रवेश केला. जवानांनी आपल्या जवळची शस्त्रे एका जागी ठेवून दिली. एक जवान तिथे थांबला. आमचा काफिला पुढे चालू लागला. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल असच दृश्य होत. परदेशात जाण्याचा हा वेगळाच मार्ग होता. निर्वासितांची टोळी पळून चालली आहे असाच ‘सीन’ वाटत होता.
साधारण सातच्या सुमारास आम्ही चीनच्या हद्दीवर पोचलो. सुरेश-रमेशच्या जोडीला त्यांचे ठरलेले पैसे व थोडी बक्षिसी दिली. त्यांच्या कष्टांची, सहकार्याची किंमत पैशात करणे अशक्य होते. त्यांनी ‘दिदी, संभालकर जाना. पहाड गिरता है. उपर-नीचे ध्यान रखना. घोडेपे ना बैठनेकी जिद मत करना. ठीकसे वापस आना.’ अश्या खूप आपुलकीच्या सूचना दिल्या. तसं पाहता आमचं अगदी व्यावहारिक नात. पण गेल्या काही दिवसांच्या सहवासानंतर मैत्र जुळले होते. त्यांचा, तसेच आय.टी.बी.पी.चे अधिकारी, जवान, डॉक्टर सगळ्यांचा भरल्या मनाने निरोप घेऊन आम्ही तिबेटकडून येणाऱ्या पहिल्या बॅचेसची वाट बघू लागलो.
थोड्याच वेळात पहिली बॅच आली. आम्ही सर्व यात्रीनी त्याचं ‘ॐ नमः शिवाय’ च्या गजरात स्वागत केले. हे सगळे लोक अतिशय कठीण समजली जाणारी कैलास-मानसची यात्रा यशस्वीरीत्या पूर्ण करून आले, ह्याच कौतुक वाटत होते. सगळे एकमेकांच्या पाया पडत होते. भक्ती आणि भावनांना पूर आला होता. माझ्यासारख्या नास्तिक व्यक्तीलाही ते भारलेलं वातावरण स्पर्श करत होत.
सर्वदूर बर्फ पसरले होते. निळेभोर आकाश, शुभ्र धवल बर्फ आणि लाल, निळे, काळे कपडे घालून त्यावरून धडपडत चालणारे पन्नास यात्री. नजरेत साठवून ठेवावं असच दृश्य होत ते! सगळा प्रदेश निष्पर्ण होता. आजूबाजूला असलेले विस्तीर्ण,तांबूस राखाडी रंगाचे डोंगर लक्ष वेधून घेत होते. काठगोदामला हिमालयातील प्रवास सुरू झाल्यापासून, हिमालयाची वेगवेगळी रूपे दृष्टीस पडत होती. तिबेटमधील लालसर किरमिजी राखाडी रंगाचे उंचच उंच डोंगर हे अजून एक आकर्षक आणि अपरिचित रूप आज दिसत होते.
थोड्या वेळात चीन सरकारचे कस्टम ऑफिस आले. तिथे आमचे सगळे सामान क्ष-किरण यंत्रातून तपासले गेले. एखाद-दुसऱ्या यात्रीचे सामान बाहेर काढून तपासले गेले. तिथेच सर्व यात्रींची अंगातल्या तापासाठी तपासणी झाली. हे सगळे सोपस्कार उरकेपर्यंत एक एकदम ‘ब्रेकिंग न्यूज’ आली. प्रत्येक बॅचचा चीनचा ‘ग्रुप व्हिसा’ दिल्लीत होतो. त्याची मूळ प्रत एल. ओ. सरांकडे आणि प्रती प्रत्येक यात्रींकडे असतात. आमच्या एल. ओ. सरांकडे ही प्रतच नव्हती!! ते सगळ्यांना त्यांच्या कडची प्रत बघायला सांगत होते. त्यांना वाटत होत की चुकून मूळ प्रत कोणाला दिली गेली आहे की काय? मी आणि नंदिनी फार म्हणजे फार हुशार! आम्ही आमच्या प्रती दिल्लीत जमा केलेल्या सामानात ठेवून दिल्या होत्या. आता काय होणार आम्हाला काळजी वाटायला लागली. नंदिनी तर म्हणाली, ‘ बहुतेक यात्रेच्या इतिहासातली आपली पहिलीच बॅच असणार आहे, की जी बॅच तिबेटमध्ये आली, बारा दिवस तकलाकोटलाच राहून परत गेली. व्हिसा नसल्याने परिक्रमा नाहीच!!’
कस्टमचे सोपस्कार झाल्यावर परत बसमध्ये बसून तासभर प्रवास केल्यावर कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून आम्ही तकलाकोटला पोचलो. तकलाकोट हे पश्चिम तिबेटमधील पहिले मोठे शहरवजा गाव आहे. कदाचित भारताच्या सीमेवरचे पहिले मोठे गाव असल्यामुळे असेल पण तिथे सरकारी कचेऱ्या, हॉस्पिटल्स, बँका, पोस्ट ऑफिसच्या मोठ्या आणि आधुनिक इमारती दिसत होत्या. रस्ते अगदी प्रशस्त होते.
चीनच्या आणि भारताच्या वेळेत अडीच तासांचा फरक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ‘माउंटन लॅग’ मुळे (मग, आम्हाला जेटलॅग कसा येणार ना? ) पहाटेपासून उठून बसले होते. चहाप्रेमी लोक सारखे किचनकडे खेपा मारत होते, पण त्या आघाडीवर अजून शुकशुकाट होता. अश्या अडनेड्या जागी आपली कॉफीची सोय होणार नाही, हे मी गृहीत धरलेलं होतं. चहावाल्यांची पंचाईत बघून मला आसुरी आनंद होत होता!!
हे अवर्णनीय दृश्य डोळ्यासमोरून हालत नाही, तोच दूर क्षितिजापर्यंत पसरलेला निळ्याशार पाण्याचा प्रचंड जलाशय दिसू लागला. आधी आम्हाला वाटलं की हेच ‘मानस सरोवर’, पण हा होता राक्षसताल! बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर एखाद्या नीलमण्यासारखा चमकणारा राक्षसताल अप्रतिम सुंदर दिसत होता. हा प्रचंड तलाव रावणाच्या हृदयापासून झाला अस म्हणतात. ह्याचे पाणी मानससरोवरापेक्षा थंड आहे. म्हणून ह्याला ‘रावणहृदय’ आणि ‘अनुतप्त’ अशीही नाव आहेत. राक्षसतालचे पाणी विषारी आहे,असा समज आहे. त्यामुळे इथले पाणी पीत नाहीत किंवा इथे स्नानाची प्रथा नाही. काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे हे पाणी मानसिक रोगांवर उपयोगी असते. राक्षसतालच्या काठावर आणि इतर अनेक ठिकाणी दगडांवर दगड ठेवून घर बांधलेली दिसतात. इथे असं घर बांधलं तर आपलंही घर होतं असं समजतात.
सर्व यात्रींनी मनापासून हात जोडले. पहिल्याच दिवशी उत्तम दर्शन झाल्यामुळे आता परिक्रमाही नीट होईल अशी उभारी वाटू लागली.
बाहेर फोन करायला गेलो, तर काय! बाहेर तिबेटी तुळशीबाग भरली होती. बऱ्याच तिबेटी बायका आपल्या पारंपरिक वेषात आल्या होत्या. सगळ्यांजवळ मण्यांच्या माळा, चाकू आणि इतर तिबेटी वस्तू होत्या. भाषेचा मोठा प्रश्न होता. पण सगळ्यांकडे कॅलक्युलेटर होते. त्यावर ती अक्का लिहायची ‘१००’, लोक लगेच ‘३०’ पुन्हा अक्का ‘९५’! शेवटी सौदा ५० युआनवर तुटायचा!
आज आमची कैलास परिक्रमा सुरू होणार होती. परिक्रमा मार्गावर फोनची सोय नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. परिक्रमा संपवून पुन्हा दारचेनला आलो, की नंतरच घरच्यांचा आवाज ऐकायला मिळणार होता. तीन दिवसांनी पुन्हा ह्याच कँपवर येणार होतो. त्यामुळे परिक्रमेच्या तीन दिवसाकरता लागेल तितकेच सामान लहान सॅकमध्ये घेतलं होत. बाकीचं सामान इथे दारचेनला ठेवलं होतं.
सकाळी कसली तरी संशयास्पद भाजी आणि पुऱ्या खाऊन आम्ही दारचेन कँप सोडला. कैलास परिक्रमा संपवून आम्ही इथे एक रात्र राहणार होतो. नंतर मानसची परिक्रमा करून तकलाकोटला परत जाणार होतो. बसमधून साधारण अर्धा-एक तास गेल्यावर ‘यमद्वार’ ही जागा आली. ह्या जागेपासून परिक्रमा सुरू होते. ह्याचा शब्दशः अर्थ ‘यमाचा दरवाजा’ असा होतो. इतर अनेक ठिकाणी दिसलेल्या तिबेटी-बौद्ध धर्मात महत्त्वाच्या असलेल्या पताका यमाद्वार येथेही होत्याच. त्या पताकांना ‘तारबोचे’ असा शब्द आहे. ह्या पताका उंच काठीवर असतात किंवा मग एका जागी सुरू होऊन लांबलचक पसरतात. त्यांचे रंग आणि क्रम ठरलेला असतो.निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग ह्याच क्रमाने असतात. त्यांचा संदर्भ आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांशी असतो.
तिथेच पोर्टर आणि पोनीवाले गोळा झाले होते. सगळ्यांना पोर्टर-पोनी मिळाल्यावर वाटचाल सुरू झाली. हवा अगदी स्वच्छ होती. आभाळ निळेभोर दिसत होते. डाव्या बाजूला लांछू नदी आणि उजव्या बाजूला कैलास पर्वताचे सतत दर्शन होत होते. लांबपर्यंत रस्ता दिसत होता.
माझी तब्येत ठीक नसल्याने मी घोड्यावर बसले होते. भारतातले आमचे पोर्टर-पोनीवाले फार आपुलकीने, प्रेमाने वागायचे. इथे तसं चित्र नव्हतं. एक तर भाषेचा मोठा अडसर होता. त्यातून एकूण मामला तीनच दिवसांचा. नंतर कोण तुम्ही कोण आम्ही? त्यामुळे पोर्टर-पोनीवाल्यांकडून घोड्यावर बसताना-उतरताना मदत न करणे, यात्रींना घोड्यावर बसायचं असेल तेव्हा गायब होणे, पाण्याची बाटली भरून आणायलाही नकार देणे, असले प्रकार वारंवार होत होते. चालताना घोड्यांची आपसात आपटा-आपटी झाली, तरी पोनीवाले थंड! ह्या सगळ्यात यात्रींची मात्र घाबरगुंडी व्हायची.
सगळा वाळूचा, दगडधोंड्यांचा प्रदेश होता. जागोजागी जुन्या बौद्ध गुहांचे भग्न अवशेष विखरून पडले होते. मोठ्या झाडांच्या अनुपस्थितीत सगळा भाग काहीसा वैराण, रुक्ष वाटत होता. आपल्या डोळ्यासमोर सृष्टीसौंदर्याची एक ठाशीव कल्पना असते. घनदाट झाडी, समृद्ध जंगल असं काहीही नसतानासुद्धा हा सगळा प्रदेश कल्पनातीत सुंदर होता. स्तब्ध, शांत सौंदर्य! प्रदूषण, धूर ह्या शब्दांचा अर्थही विसरायला होईल इतकी स्वच्छ हवा होती. त्या अनुभूतीच वर्णन शब्दात करणं, मला खरंच शक्य नाही. ती ज्याची त्याने अनुभवायची अशी गोष्ट आहे.
सगळे यात्रेकरू गौरीकुंडाचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. पण तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता खोल जाणारा, खडकाळ आणि वितळलेल्या बर्फामुळे अजूनच निसरडा झालेला होता. बरोबरचे पोर्टर-पोनीवाले पाच युआन घेऊन तीर्थ आणून देत होते. आमच्या बॅचमधले काही हौशी लोक आणि नारंग सर खाली उतरून गेले. बाकी आम्ही जनरल पब्लिक पुढे चालायला लागलो. उताराचा रस्ता असला तरी चांगलाच थकवा जाणवत होता. नदी काठाला कोरडा भाग बघून सगळे थांबले. जवळचा सुका मेवा, बिस्किटे असं थोडं खाऊन घेतल्यावर जरा तरतरी आली. थोडी विश्रांती आणि पोटात पडलेलं अन्न ह्यांनी जरा ताजेतवाने होऊन झोंगझेरबूकडे चालायला सुरवात केली.
थोड्याच वेळात पोनीवाले येऊन पोचले. घोड्यावर बसून आरामात इकडे तिकडे बघत सरळ-सपाट रस्त्यावरून जाऊ लागले. नदीच्या किनाऱ्याने, कधी खडकाळ पायवाट, कधी चिखल, कधी झरे असा रस्ता होता. चालताना कितीही जपलं तरी बूट ओले झालेच होते. पायांना संवेदनाच नव्हती. एका जागी दोन यात्री थांबले होते.
त्यांनी हात केल्यावर मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले. सुरवातीचं, आता सवयीचं झालेलं 'ॐ नमः शिवाय' झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'कलसे देख रहा हुं, आप घोडेपे जा रहे हो, क्या हुआ? लीपूलेखतक तो आप अच्छेसे पैदल चल रहे थे?' मी तब्येतीचं कारण सांगितल्यावर ' अरे, सबका यही हाल हैI कोई नहीं, आप तो बडे बहादूर हो, अकेले इतनी दूर आये होI अभी हमारे साथ चलियेI' त्यांच्या ह्या आश्वासक बोलण्यावर खूष होऊन मी त्यांच्याबरोबर चालायला लागले. थोडं चालल्यावर त्यांनी 'महाराष्ट्रकी लेडीज तो झासी की रानीयाँ होती है, बडी बहादूर!' असं म्हणून मला फार म्हणजे फार म्हणजे फारच खूष केलं! त्या वाक्यावर मी उरलेलं अंतरही चालू शकले!
आता खरंतर सगळं सामान बरोबरच राहणार होत. मानस परिक्रमा संपवून आम्ही तकलाकोटला जाणार होतो. पण सामान उपसणे आणि पुन्हा कोंबणे हा यात्रेतला अत्यंत आवडता उपद्व्याप असतो. ‘लगेज देना है’ किंवा ‘लगेज आ गया’ ह्या आरोळ्या सारख्या ऐकायला येत असतात. पण एक मात्र आहे, प्रत्येकाजवळ भरपूर सामान असूनही, शोधायला इतका कंटाळा येत असे, की लक्ष मात्र दुसऱ्याच्या सामानावर जास्त असायचं!
दिनांक २८ जून २०११ (किहू मुक्काम)
सुदैवाने आज हवा चांगली होती. त्यामुळे तो वेळ मानसच्या काठावर असलेल्या बुद्ध मंदिरात जाऊन सत्कारणी लावायचा, अस मी आणि नंदिनीने ठरवून टाकलं. इथल्या बुद्ध मंदिराच्या दारावर एक विशिष्ट चिन्ह होत. ते चिन्ह म्हणजे दोन बाजूंना दोन हरणे आणि मध्ये चक्र, अस असायचं. ह्याचा संबंध गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील प्रथम प्रवचनाशी आहे. गौतम बुद्धांचं दर्शन आणि वाणी इतकी शांतिपूर्ण असायची, की तिथली हरणेसुद्धा प्रवचन ऐकायला यायची, अशी कथा सांगतात. तिबेटातील ज्या मंदिरांवर हे चिन्ह असेल तिथे काही विशिष्ट ग्रंथ ठेवलेले असतात, असा काहीतरी संकेत आहे. बौद्ध धर्मात चक्र, मत्स्य, कुंभ, पद्म, शंख, श्रीवत्स, ध्वज, धर्मचक्र अशी आठ शुभचिन्हे आहेत. ह्यातले श्रीवत्स हे चिन्ह सगळ्या घरांच्या-दुकानांच्या पडद्यावर असायचं. अतिशय सुंदर अर्थ असलेली ही शुभचिन्ह बघताना छान वाटायचं.
अजून श्राद्ध-विधी चालूच होता. दाराजवळ बसूनच हे विधी चालू होते,त्यामुळे कँपमध्ये जाण शक्य नव्हत. आम्ही मानसच्या काठावर फिरायला निघालो. त्या भटकंतीत मानसच्या पाण्याची क्षणाक्षणाला पालटणारी रूपे, समुद्राला येतात तश्या लाटा, त्या लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत चालत होतो. किनाऱ्यावरील वाळूत अनेक रंगीबेरंगी दगड लक्ष वेधून घेत होते. त्या शांत, पवित्र वातावरणात फिरताना ना थंडीची जाणीव झाली, ना वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची ना जवळजवळ १६ हजार फूट उंचीवर असूनही चटके देणाऱ्या उन्हाची. सर्व वातावरण अगदी निर्मळ, स्वच्छ, पवित्र वाटत होते. आसमंतात देवत्व पसरल्यासारखे वाटत होते.
तिथल्या थंडीचा आणि विरळ हवेचा काही जणांना फार त्रास होत होता. कालरा अंकलचा त्रास आहे तसाच होता. त्यांना जेवण आणून देणे, हात धरून टॉयलेटला नेणे, अशी मदत सगळे करत होते. पण वेदना त्यांच्या त्यांनाच सहन कराव्या लागत होत्या. त्यांना क्ष-किरण तपासणीची आवश्यकता होती. उर्वरीत मंडळींमध्ये रोज रात्री झोपेत छातीवर दडपण आल्यासारखं वाटून झोपेतून दचकून उठणे, नाकातून रक्त येणे, श्वास घुसमटणे, हे प्रकारही लोकप्रिय होते.
बऱ्याच यात्रींनी यज्ञासाठी नवीन कोरे कपडे घातले. इतके दिवस मळक्या, चुरगळलेले कपड्यातले लोक आता एकदम चकाचक दिसत होते. यज्ञासाठी तिथे एक मोठा चौथरा बांधून ठेवला आहे. बॅचमधल्या ज्या लोकांना ह्या विधींची माहिती होती, त्यांनी पुढाकार घेऊन सगळी तयारी केली. आज पाऊस नव्हता, पण ऊनही नव्हत. यज्ञाचा अग्नी धडधडून पेटला. मंत्रांच्या घोषात आहुती पडायला लागल्या. काही दिवस होत असलेल्या कुरबुरी, भांडण सगळं विसरून आजचे विधी सुरळीत चालू होते.
ज्या साठी एवढा अट्टहास केला, तो यात्रेचा महत्त्वाचा भाग आज संपणार, म्हणून मनाला हुरहूर लागली होती. आता तकलाकोटला तीन दिवस राहायचं, तीन तारखेला लीपुलेख पार करून मायभूमीत परत, १० तारखेला घरी पोचणार होतो. पण आजपासून तसा परतीचा प्रवास सुरूच. घरची ओढ तर लागली होती, पण येण्याआधीचे काही महिने मन ह्या भावी विलक्षण अनुभवांच्या कल्पनेने थरारून गेलं होत. आता ही लाट अत्युच्च बिंदूला स्पर्श करत होती. इथून लाटेचा प्रवास अटळपणे खाली-खाली होणार होता!
दोन्ही परिक्रमा, यज्ञ सगळं नीट पार पडल्याने सगळे खुशीत होते. बसमध्ये गाण्याबजावण्याला उत आला. अंताक्षरी खेळताना सगळ्यांनी आपले घसे साफ केले. मजा चालू होती.
दिनांक ३० जून २०११ (तकलाकोट मुक्काम)
आता हा सगळा ताणाचा भाग पार पडला होता. आता कँपवर उन्हाळ्याच्या सुट्टीसारखं निवांत वातावरण तयार झालं होतं. सगळ्यांच्या ओळखी होऊन तीन आठवडे झाले होते. आम्ही सर्वांनी एकाच वेळी घाबरवणारे आणि कल्पनातीत रौद्रसुंदर असलेले अनुभव घेतले होते. त्या धाग्यांनी सगळे यात्री जोडले गेले होते. आमच्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तीन तारखेला लीपुलेख पार करून, आल्या मार्गाने परतून नऊ तारखेला दिल्लीत पोचायचं होतं. सगळ्यांच्या बोलण्यात आता ‘दिल्लीहून कोण कसा जाणार, कोणाच कधीच रिझर्वेशन आहे,’ हे विषय येत होते. घर सोडून इतके दिवस झाल्याच आता चांगलंच जाणवत होतं. परतीच्या प्रवासात एखादा दिवस कमी करता येईल का? अशी चर्चांच्या फेऱ्या नारंग सरांबरोबर चालू होत्या.
आमच्या नारंग सरांनी का कोणास ठाऊक, त्यांच्या पत्नीला ते एक तारखेला दिल्लीत पोचणार आहेत, अस सांगितलं होतं!! ते सगळ्यांना सांगायचे, ’कोई बात नही| मै फोनपे बोल देनेवाला हूं, की वेदर खराब हो गया, इसलिये अटक गये!!’ ते म्हणजे धन्यच होते.
समाधीला भेट देऊन आम्ही परत आलो. जेवलो. लगेच सगळेच्या सगळे यात्री खरेदीच्या दिशेने जवळजवळ पळतच सुटले!! तसं बघितलं, तर तकलाकोट हे सीमेवर असलेलं एक लहान गाव आहे. ते काही शॉपिंग सेंटरसाठी प्रसिद्ध असलेलं शांघाय किंवा बीजिंग नाही. पण ‘जातीच्या खरेदीप्रेमींना काहीही सुंदर’ दिसत असावं! मुलांचे, मोठ्यांचे कपडे, दागिने, तिबेटी पद्धतीच्या शोभेच्या वस्तू, मोबाईल हँडसेट, चामड्याची जाकिटे इतकंच काय पण ब्लँकेट्सची सुद्धा खरेदी लोकांनी केली!
अगदी खरं सांगायचं तर ह्यातल्या बऱ्याचशा चिनी किंवा नेपाळी बनावटीच्या वस्तू काही आंतरराष्ट्रीय पातळीच्या दर्जाच्या नव्हता. त्याच तोडीच्या वस्तू सगळीकडे मिळतात. पण ‘इतकं लांब आलोय, काहीतरी न्यायला पाहिजे’, अश्या विचाराने की काय पण यात्रींनी अगदी चढाओढ लावून, हिरीरीने जाकिटे व ब्लँकेट्सची खरेदी केली. बाकीच्यांबरोबर दुकानात फिरताना माझ्या सामानाचा ढीग डोळ्यासमोर येत असे! त्यात अजून भर घालायची हिंमत होत नव्हती. सामान खेचराच्या पाठीवर बांधून नेलं जातं. त्यामुळे नाजूक-साजूक गोष्टीं नक्कीच तुटल्या असत्या. असा सगळा शहाण्यासारखा विचार करून मी काहीच घेतलं नाही.
दिनांक १ जुलै २०११ (तकलाकोट मुक्काम)
ज्या अमावास्येच्या अंघोळींवरून मानससरोवरच्या काठावर वादावादी झाली होती, ती अमावस्या आज होती. बॅचमधले ८-१० लोक जीपने मानसच्या स्नानासाठी जाणार होते. ते आल्यावर दुपारी सगळ्यांनी मिळून तिबेटमधील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या खोजरनाथ मंदिराच्या दर्शनाला जायचे होते.
आज आमचा नेपाळी स्वैपाकी बहुधा चांगल्या मूडमध्ये असावा. त्याने आज नाश्त्याला ‘आलू पराठे’ करायचा घाट घातला होता. बऱ्याच दिवसांनी काहीतरी छान चविष्ट खायला मिळणार, म्हणून सगळे घाईघाईने डायनिंग हॉलमध्ये पोचले. पण, त्याचा पराठे बनवायचा वेग आणि ५० यात्रींचा खाण्याचा वेग ह्यात फारच फरक पडायला लागला. पुष्कळ दिवस चालण्याचा व्यायाम झाल्याने सगळ्यांच्या भुकांमध्ये चांगलीच वाढ झाली होती. त्या बनवणार्याची बिचाऱ्याची तिरपीट होऊ लागली.
आम्ही दोन-दोन पराठे खाऊन उठलो. पण सगळे थोडीच हार मानणार होते. त्या जेवणाच्या हॉलमध्ये पराठ्यांवरून युद्ध सुरू झालं. बोलाचाली, शिव्यागाळीपर्यंत गोष्टी आल्या. बघताना लाज वाटत होती, पण मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही. शेवटी दुसऱ्या काही यात्रींनी मध्यस्थी केली आणि वाद शमला.
त्यांच्या ह्या संयत पण कठोर बोलण्याने सगळे सटपटलेच! सकाळी भांडण करणाऱ्यांनी एकमेकांची आणि बाकी यात्रींची माफी मागितली. त्या भांडणावर पडदा पडला, पुन्हा एकदा समजुतीच वातावरण कँपवर तयार झालं. जेवण झाल्यावर आम्ही खोजरनाथ मंदिराकडे जायला निघालो. हे बौद्ध मंदिर १२०० वर्षे जुने आहे. तकलाकोट पासून साधारण ३० किलोमीटरवर आहे. तकलाकोट सोडल्यापासून रखरखीत, धुळीने भरलेल्या आणि दुतर्फा डोंगर असलेल्या चढ-उताराच्या रस्त्यावरून आमची बस चालली होती. फक्त आम्ही ‘बस’लेलो असल्याने चढ-उताराची काळजी वाटत नव्हती!
हा मठ नेपाळच्या हद्दीपासून अगदीच जवळ आहे. इथला पुरातन मठ चिनी आक्रमणात उद्ध्वस्त केला होता. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. खोजरनाथचा भव्य मठ अतिशय आकर्षक आहे. गाभाऱ्यात मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात तीन भव्य मूर्ती अजूनच तेजःपुंज दिसत होत्या. ह्या मूर्ती अष्टधातुपासून बनवलेल्या आहेत व कमळावर आरूढ झालेल्या आहेत. डावीकडे अवलोकितेश्वर, मध्यभागी मंजुघोष आणि उजवीकडे वज्रपाणी अश्या तीन मूर्ती आहेत. काही जणांच्या मताप्रमाणे ह्या तीन मूर्ती राम, लक्ष्मण व सीतेच्या आहेत व ते रामाचेच मंदिर आहे. पण सगळ्या रचनेवर बौद्ध धर्माची छाप दिसत होती. त्याबरोबरीने, हिंदू धर्माचाही प्रभाव जाणवत होता.
उदबत्त्यांचा सुगंध, समयांचा मंद प्रकाश आणि साधकांच्या ध्यानधारणेसाठी मांडून ठेवलेली आसने, तिथली शांतता आणि शिस्त ह्या सगळ्यामुळे पावित्र्याची जाणीव होत होती. मठाच्या भिंतींवर बुद्ध जीवनावरची मोठमोठी रंगीत चित्रे काढली होती. बुद्ध मंदिराचे वैशिष्ट्य असलेली लहानमोठ्या आकाराची चक्रे, बाहेरील भिंतीला लागून होती.
लाल-किरमिजी अश्या सहसा न दिसणाऱ्या रंगसंगतीच्या ह्या मंदिरात आम्ही भरपूर फोटो काढून घेतले. बाहेर तिबेटी लोक त्यांच्या पारंपरिक वेषात आले होते. त्यांच्या बरोबरही फोटो झाले. पुन्हा बसमध्ये बसून आम्ही तकलाकोटला परतलो.
तकलाकोटला एकाच वेळेला कडक थंडीही असायची आणि उन्हाचे चटकेही बसायचे. सगळ्या यात्रींचे चेहरे, विशेषतः नाक बघण्यासारखी झाली होती. सनस्क्रीन लावूनही चेहरे काळे पडले होते. पण त्यामुळे तरी घरी गेल्यावर घरचे लाड करतील, अशी मी आणि नंदिनी एकमेकांची समजूत घालत होतो!
साधारण तासभर चालल्यावर आम्ही कर्नाली नदीवरचा पूल ओलांडून त्या गुहांजवळ पोचलो. वाळूने बनले असावेत अश्या डोंगरात त्या गुहा होत्या. माझ्या मराठी डोळ्यांना ‘राकट, कणखर, दगडांचे’ डोंगर बघायची सवय, हे ठिसूळ डोंगर पाहून भीतीच वाटत होती. जोरात हाक मारली, तरी हे सगळं प्रकरण कोसळेल, अस वाटत होतं.
आमचा नंबर लागल्यावर आम्ही वर गेलो. वरून तकलाकोटचे विहंगम दर्शन होत होते. लांबवर दिसत असलेले डोंगर बघून उद्या आपल्याला असेच डोंगर ओलांडायचे आहेत, हे लक्षात येऊन काळजी वाटत होती. थंड वाऱ्यावर थोडा वेळ थांबून आम्ही आत शिरलो. आत मंद दिव्याच्या प्रकाशात बुद्ध मूर्ती चमकत होती. शांत-स्तब्ध वातावरणात सगळे तिथे थोडावेळ बसलो. गेल्या काही दिवसात आलेल्या विलक्षण अनुभवांची उजळणी सगळे आपल्या मनात करत होते.
लीपुलेखच्या अवघड प्रवासात लागणारे, थंडीपासून बचाव करणारे कपडे, थोडा खाऊ, रेनकोट वगैरे आवश्यक गोष्टी जवळच्या लहान सॅकमध्ये भरल्या. मी सोबत बुटांचे दोन जोड आणले होते. त्यापैकी एक जोड तिबेटमध्ये येतायेताच फाटल्यामुळे फेकून दिला होता. काही कपडेही टाकून दिले होते. (बरेचसे ट्रेकर ट्रेकला जाताना जुने कपडे नेतात, आणि परत आणत नाहीत.) घरून आणलेलं खाण्याचं सामानही संपलं होतं. ह्या सगळ्यामुळे माझी मोठी सॅक थोडी हलकी झाली होती. तरटाच्या पोत्यात सहज जात होती. ती तशी कोंबून वर ठळक अक्षरात नाव घालून आम्ही आमचं सामान वेळेआधीच जमा केलं. खोली एकदम सुबक, सुंदर, देखणी दिसायला लागली! ज्या यात्रींच्या सामानात थोडी जागा शिल्लक होती, ते नव्या उत्साहाने शेवटची खरेदी करून आले. सगळ्यांची पारपत्रे आणि सामान जमा करून घेऊन नारंग सर आणि आमचे तिबेटी गाईड काही सोपस्कार पूर्ण करायला गेले.
संध्याकाळी एका छोट्या कार्यक्रमात आम्हाला दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे मिळाली. आम्ही सगळ्यांनी आमच्या दोन्ही गाइडचे मनापासून आभार मानले. आमच्या व्यवस्थेसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. कालरा अंकलना दोन-तीन दिवस दवाखान्यात सलाईन लावून ठेवलं होत. आता ते पूर्ण बरे झाले होते. रात्रीच्या कार्यक्रमात ते सामील झाल्यामुळे सगळ्यांना खूप बरं वाटलं. नंतर हिंदी गाण्यांच्या तालावर मनसोक्त नाचून सगळे आपापल्या खोल्यांत शिरले.
घोडेवाले यात्रींची वाट पाहत उभे होते. आमच्या सामानाची मोजदाद होऊन ते खेचरावर लादले गेले. चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आमची पारपत्रे कालच दिली होती. पुन्हा एकदा त्यांनी आमचे व्हिसाच्या कागदपत्रांवरचे आमचे फोटो, पारपत्रावरचे फोटो आणि प्रत्यक्ष व्यक्ती निरखून, ताडून बघितल्या. ज्या व्यक्ती तिबेटात गेल्या त्याच परत जात आहेत, ही खात्री पटल्यावर त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली.
आम्ही तिबेटमध्ये गेलो त्या दिवशीपेक्षा आज बर्फाच प्रमाण जास्त वाटत होत. घोड्यांचे पाय बर्फात रुतत होते. ओठ आवळले तरी दातावर दात आपटून आवाज येत होता. थोडं अंतर पार केल्यावर पोनीवाले आम्हाला उतरायचा आग्रह करू लागले. हो-नाही करत शेवटी बरेचसे यात्री उतरले. काही यात्री मात्र नाहीच उतरले. बॅचमधल्या ज्येष्ठ किंवा आजारी यात्रींना घोड्यावर बसू द्यावे, आणि जे चालू शकतात त्यांनी चालावे, हा साधा संकेतही लोक धुडकावून लावत होते. नारंग सर सगळ्यांच्या शेवटी होते. ते बिचारे ओरडून त्या यात्रींना ‘ आप प्लीज उतर जाईये, लेडीजको बैठने दिजीये|’ असं सांगत होते. काही जणांनी ते ऐकलं, पण काही जण हट्टाने नाही म्हणजे नाहीच उतरले. मूळचा मनुष्यस्वभाव कैलास-मानसच्या दर्शनाने बदलेल, अशी आशा ठेवणे, चुकीचंच होतं...
लीपूखिंडीच्या उंच टोकावर काही काळ्या आकृत्या हालताना दिसल्यावर मागून कोणीतरी ओरडले, ‘हौसला रखो, अपना देश आ गया, वो देखो अपने जवान दिखाई डे रहे है|’ सगळ्यांच्या अंगात उत्साहाची नवी लाट आली. चिंचोळ्या वाटेची शेवटची जीवघेणी चढण आम्ही धापा टाकत चढत असताना पाचव्या बॅचचे यात्री, पोर्टर-पोनीवाले, आय.टी.बी.पी.चे जवान, अधिकारी सगळे ‘ॐ नमः शिवाय, भोलेबाबा की जय’ अश्या घोषणा देऊन आमचा उत्साह वाढवत होते. माझे पोर्टर-पोनीवाले सुरेश-रमेश ‘दिदी-दिदी’ हाका मारून मला हात करत होते. त्या सगळ्याचे आनंदी-उत्साही चेहरे पाहून आताच घरी आल्यासारखं वाटायला लागलं.
त्या संचारलेल्या मन:स्थितीत मी शेवटची पावले टाकली आणि एकवीस जून ते तीन जुलै एवढ्या दिवसांनंतर मायभूमीत प्रवेश केला.
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा
पाचव्या बॅचचे यात्री तिबेटमध्ये जाण्यासाठी उभे होते. तिबेटमध्ये जाताना आम्ही ज्या कौतुकाच्या नजरेने पहिल्या बॅचच्या यात्रींकडे बघितलं होत, तसेच हे यात्री आमच्याकडे बघत होते. ‘काही त्रास झाला का, हवा कशी होती?’ अश्या चौकश्या करत होते.
माझ्या परिचयातले पुण्याचे श्री. व सौ. रायकर ह्या बॅचमध्ये होते. त्या दोघांनी आधीही यात्रा केली होती. यात्रेची तयारी करण्यासाठी त्यांची दोघांचीही खूप मदत झाली होती. आमच्या बॅचेस् लीपूलेखला भेटतील, असं लक्षात आलं होतं. तेव्हाच, इथे भेटल्यावर त्यांनी मला चॉकलेट द्यायचं, असंही ठरलं होतं! त्याप्रमाणे त्यांनी मला चॉकलेट दिलं. त्या आपुलकीने आणि नेहमीच्या परिचयाचे चेहरे बघून मला अगदी भरून आलं. तीन आठवड्यानंतर घरच कोणीतरी भेटल्यासारखं वाटलं.
आमच्या आणि पाचव्या बॅचच्या लगेज कमिटीचे लोक सामान मोजून देण्यात गर्क होते. इथेही आसमंतात बर्फाच साम्राज्य होतच. पाचव्या बॅचला धारचूलापासून पुढे नबीढांगपर्यंत पाऊस लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या बॅचच्या लोकांनी एकमेकांना ‘कित्ती बै आपण नशीबवान नै’ अस पटवून दिलं!`
तासभर चालल्यानंतर वाटेत एका ठिकाणी तीन-चार जवान वाटेत उभे राहून ‘ॐ नमः शिवाय’ चा गजर करत येणाऱ्या यात्रींना पाणी देत होते. लगेच गरमागरम चहाचा ग्लास हातात देत होते. त्यांचे औपचारिक आभार मानले तर त्यांचा त्या अगत्याचा अपमान होईल, अस वाटत. म्हणून त्यांच्या ‘ॐ नमः शिवाय’ला जोरात ‘ॐ नमः शिवाय’ म्हणून आम्ही पुढे निघालो. तेवढ्यात नारंग सर आलेच. त्यांनी आजच गुंजीपर्यंत जायचं नक्की झाल्याचसांगितलं. अजून बराच रस्ता बाकी होता. त्या काळजीने आणि ॐ पर्वताचे दर्शन घेण्याच्या ओढीने मी अजून पटापट पाय उचलायला लागले. माझ्यासोबत अक्षरशः सावलीसारखा चालणारा सुरेशभाई, नबीढांग कँप जवळ आल्यावर मात्र पुढे पळत गेला. ॐ पर्वताचे दर्शन होतंय हे बघून पुन्हा मागे येऊन ‘ आरामसे चलो दिदी, बढिया दर्शन हो जायेगा’ अशी बातमी आनंदाने हसत दिली. नबीढांगचा कँप हळूहळू दृष्टिपथात आला.
यात्रेच्या महितीपुस्तकात चालायच्या बुटांचे दोन जोड आणायला सांगितले होते. बूट आपल्या पावलाच्या मापापेक्षा एक माप मोठे आणावे, म्हणजे थंडीत उबेसाठी पायमोजांचे दोन जोड घातले, तरी बूट घालायला त्रास होत नाही, असं पुस्तकात सांगितलं होत. मी जे माझे नेहमीच्या वापराचे बूट जाताना घातले होते, ते जाताना नबीढांगपर्यंत फाटून गेले होते. दुसरे मोठ्या मापाचे बूट आता पायात होते. उतरताना पावलांवर, पायाच्या बोटांवर चांगलंच प्रेशर येत होतं. बूट मोठ्या मापाचे असल्याने पाऊल आतल्या आत सरकत होते. आजच्या पहिल्याच दिवशी उजव्या अंगठ्याच नख काळनिळ झालं होत. पायांना फोड यायला सुरवात झाली होती. तशीच दाटून चालत होते.
त्या कँपमध्ये एका बंकरमध्ये इमिग्रेशनचे सोपस्कार करायचे असतात, हे मी विसरून गेले होते. माझा पासपोर्ट तर सुरेशजवळचं सॅकमध्येच होता! मी सुरेशची वाट बघत त्या बंकरच्या बाहेर बसून राहिले. सगळेजण मी का थांबले आहे, ते विचारत होते. मी प्रत्येकाला तीच स्टोरी सांगत होते. येणाऱ्या सगळ्या पोर्टरांना सुरेशला पाठवायला सांगत होते, तेवढ्यात स्वतः नारंग सर बाहेर आले. मला पाहून म्हणाले, ’ऐसे क्यू बैठी हो?’ मी पुन्हा माझी ष्टोरी ऐकवली. 'अरे, मेरा भी यही हाल है| सुनोभाई, मॅडमका फॉर्म भरवा लो, बाकी का काम पोर्टर करवायेगा|’ अस म्हणत त्यांनी माझी सुटका केली! आमचे सर म्हणजे एक नंबर होते. कोणत्याही प्रकारचा गोंधळ केला, तरी कंपनी द्यायला सर हजर असायचे. तिथली लिखापढीपूर्ण करून मी आणि सर पुढे सटकलो.
कालापानी ते गुंजीचा रस्ता जीपसारख्या वाहनासाठी बनवला आहे. त्या रस्त्याच्या बाजूने काली नदी वाहताना दिसत होती. आता ही नदी आम्हाला मालपा पार करेपर्यंत सोबत करणार होती. वाहनाचा रस्ता असल्याने फारसे चढ-उतार नव्हते. रुंद रस्त्यावरून गप्पा मारत चालता येत होत. पण सकाळी तकलाकोटपासून सुरू केलेला प्रवास चांगलाच जाणवत होता. कधी एकदा कँपवर पोचतोय अस झालं होत. शेवटी मी गप्पा मारणारा ग्रुप मागे टाकून पुढे सटकले. आता अक्षरशः पावलं मोजून चालत होते. प्रत्येक वळणानंतर ‘आता आलाच कँप’ अस वाटत होत. सुरेशभाईला विचारलं की तो ‘ अभी तो दूर है| तीन किमी चलना है|’ अस सांगून माझा थकवा द्विगुणित करत होता. असं पाय ओढत चालताना तिरंगा फडकताना दिसला! झालं! मला वाटलं आला कँप. पण....., तो कँप सीमा सुरक्षा दल (border security force) चा होता. आणखी एक तास चालल्यावर आमचा आय. टी. बी. पी. चा कँप आला.
संध्याकाळी चहा पिताना न ठरवताच सगळे बाहेर जमले. गाण्याची मस्त मैफिल जमली. सगळ्या हौशी कलाकारांनी आपापले घसे साफ करून घेतले.
सगळे यात्री रेनकोट घालून पावसापासून वाचायचा प्रयत्न करत वाटचाल करत होते. आम्ही ह्याच भागातून काही दिवसांपूर्वी गेलो होतो, तेव्हाच्या आणि आताच्या निसर्गात फरक पडलेला दिसत होता. मध्यंतरीच्या काळात पाऊस भरपूर झाला होता. चालताना एका बाजूला रोरावत वाहणारी काली नदी, कालीच्या पलीकडच्या अंगाला असणाऱ्या नेपाळमधून अक्षरशः थव्याने कोसळणारे दुधाळ धबधबे, उंचचउंच आकाशाच्या पोटात शिरू पाहणारे हिरवेगार डोंगर, अनेक रंगांची बरसात करीत जाणारी विविधरंगी फुले हे पाहताना भान हरपत होत.
ह्या टप्प्यात यात्री विरुद्ध पोनीवाले अशी भांडणे सुरू झाली. दगडी रस्त्यांवरून घोड्यांचे नाला मारलेले पाय घसरतात. त्यात आज पावसाने जोर धरला होता. घोड्यांनी नदीच्या कडेने चालायचं आणि पायी जाणाऱ्यांनी डोंगराच्या कडेने, असं ठरलेलं असत. घोड्यावरचे यात्री थोडे जरी हलले आणि घोडा नदीत पडला तर काय? ह्या भीतीने अवघड वाटेवर पोनीवले यात्रींना खाली उतरायला सांगतात. पण काही यात्री आपण घोडा तेवढ्या दिवसांसाठी विकतच घेतला आहे, अश्या थाटात बोलत होते. काही अपवाद असतीलही, पण साधारणपणे हे सगळे स्थानिक लोक प्रामाणिक, कष्टाळू असतात. ते कळवळून यात्रींना समजावत होते, ’ साब, मुझे भी बच्चे पालने है| घोडा गीर गया, तो मेरा राशनपानीही बंद हो जायेगा|’
आता काली नदी खोल दरीत चिमुकली दिसत होती. अचानक नेपाळच्या बाजूला मोठा आवाज होऊन दरड कोसळायला लागली. मी स्तिमित होऊन तो प्रकार बघतच राहिले. किती वेगाने आणि केवढे मोठमोठे दगड, माती, झाड सगळं कालीच्या प्रवाहात अदृश्य होत होत.
फार दम लागला नाही, तरी मी पाच-पाच मिनिटानंतर थांबत होते. एखाद्या दगडावर बसून आसपासची शांतता पिऊन घेत होते. सगळं वातावरण नुकताच पाऊस झाल्याने टवटवीत होत, उन्हात दरीतल्या वस्त्या चमकत होत्या. सगळं दृश्य गंभीर स्तब्ध होत. घरी जायचा दिवस जवळ येत होता, त्याचा आनंद तर होता, पण हे सौंदर्य परत कधी बघायला मिळेल कोण जाणे?
थोड्याच वेळात कँप दिसायला लागला. कँपवर जाऊन पहिल्यांदा कोरडे कपडे घातले. ओल्या बूट-मोज्यांमध्ये पाय पांढरे पडून, सुरकुतले होते. त्यांना थोडा मसाज केला. काही जणांनी सगळे कपडे प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवायची काळजी न घेतल्यामुळे त्यांचं सगळं सामान भिजून गेलं होत. मग काय, उन्हात कपडे वाळवायची एकच धांदल उडाली. नंदिनी, मी आणि असे इतर रिकामटेकडे लोक मजा पाहत होतो. नारंग सरही आमच्यात मजा करत होते. त्या दिवशी चतुर्थी होती. तो ‘चवथीचा चंद्र’ आणि चांदण्याने टिपूर भरलेलं आकाश कितीही वेळ पाहिलं, तरी मन भरत नव्हत. फार उशीर झाला, अशी तंबी मिळाल्यावर जड मनाने आडवे झालो.
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा
ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आमचा आजचा मुक्काम ‘सिरखा’ ह्या कँपला होता. पण नारंग सरांनी बरीच खटपट करून आजच धारचुलाला जायचं नक्की केलं होत. आमच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ही कल्पना अजिबात आवडली नव्हती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जाताना जे अंतर आम्ही आठवड्यात पार केले होते, तेच अंतर आता आम्ही चार दिवसात पार करणार होतो. खेचरांचा तेवढा वेग नसतो, अशी कुरकूर चालू होती.
यात्रींना मात्र एक दिवस लवकर पोचता येईल तर चांगल होईल, असं वाटत होतं. आज चालण्याचा शेवटचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा संपणार होता. धारचुला, जागेश्वर, दिल्ली असे तीन मुक्काम झाले, की सगळे आपापल्या घरची वाट पकडणार होते. यात्रा संपत आल्याची हुरहूर आणि घरी जायची वेळ जवळ आली, म्हणून आनंद अशा संमिश्र भावना मनात येत होत्या.
एका जागेवरून आमचा जीप पॉईंट दिसायला लागला. चालण्याचा शेवट अगदी दृष्टिपथात आला. खरंच का मी इतका प्रवास केला? माझा माझ्यावर विश्वास बसेना. शारीरिक ताकद खरंतर केव्हाच संपली होती. मनाच्या ताकदीवर केवढातरी प्रवास झाला. उतारावरून भराभर उतरत लगेचच आम्ही सोसा गावात पोचलो. सगळे अगदी उत्साहात होते. काही यात्री जीपमध्ये बसून आधीच रवाना झाले होते. नारंग सर जश्या जीप येतील, तसे यात्री पुढे पाठवत होते.
आता माझ्याबरोबर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालावीशी हाती धरोनिया’ अश्या सोबत्याचा, सुरेशभाईचा निरोप घेण्याची वेळ आली. त्यालाही पैसे, कपडे, खाऊ दिला. माझी यात्रा नीटपणे होण्यात त्याचा फार मोठा वाटा होता. थोड्याच वेळात आमची जीप आली. वडाप पद्धतीने कोंबून दहाजण एका जीपमध्ये बसलो. आमचे पोर्टर टपावर स्वार झाले, त्यात सुरेशभाईही होता. जीपमध्ये बसल्यावर मी लगेच माझे चालायचे बूट ओरबाडून काढले आणि साध्या चपला घातल्या! पायांना इतकं बरं वाटलं की बस्स!
धारचूलाच्या यात्री निवासमध्ये पोचलो, तर आधी पोचलेले यात्री अंघोळ वगैरे करून तयार! चांगल्या-चुंगल्या कपड्यातले लोक ओळखायलाच येईनात. बहुधा अती ऑक्सिजनचा मारा झाल्याने सगळ्यांचे मेंदू गडबडले होते. सगळीकडून हास्याचे फवारे उडत होते. मोबाईल ह्या सोयीचा खूप दिवसांचा विरह झाला होता. आता मोबाईल सुरू झाले म्हटल्यावर मी दणादणा फोन करून गप्पा मारून घेतल्या. जाताना इथे जमा केलेलं सामान परत मिळाल. त्यातले स्वच्छ कपडे घातले. अशी शहराकडे जायची तयारी करू लागले.
धारचुला पासून जरा बाहेर पडतोय, तोवर दरड कोसळून रस्ता बंद झालेला होता! आम्ही लोक खाली उतरून बाजूला बसून राहिलो. तासाभराने तिथले सां.बा.खात्याचे लोक उगवले. मग मात्र त्यांनी अक्षरशः वीस मिनिटात रस्ता मोकळा केला. थोड्याच वेळात आम्ही आय.टी.बी.पी.च्या ‘मीरथी’ ह्या कँपला पोचलो. जाताना होता, तसाच थाट आताही होता. आम्ही काही युद्ध जिंकून आलो असल्यासारखे ते आमचं कौतुक करत होते. अल्पोपाहार आटोपल्यावर जाताना आमच्या ग्रुपचा जो फोटो काढला होता, त्याची प्रत प्रत्येकाला भेट दिली.
पाताळ भुवनेश्वर ह्या त्या भागातला एक विलक्षण प्रकार आहे. चुनखडीच्या (lime stone) खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे निरनिराळे आकृतिबंध तयार झाले आहेत. आत-बाहेर करायला एका भुयारातून घसरत जावं लागत. आत मात्र चालता येत. गणपती, श्रीशंकर आणि इतर ३३ कोटी देवांचे स्थान इथे आहे, अस म्हणतात. वनवासाच्या काळात पांडवांचे वास्तव्य ह्या गुहांमध्ये झाले होते, अशी श्रद्धा आहे.त्या गुहा वेगळ्याच आणि म्हणून लक्षात राहण्यासारख्या होत्या.
महाराष्ट्रात नाही, पण तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रातून कैलास यात्रेला बरंच महत्त्व असत. त्यातल्याच एका वर्तमानपत्रात नंदिनीचा एक नदी पार करताना फोटो आला होता! मज्जा! बसमधला काही वेळ त्यावर चर्चा करण्यात छान गेला. मग मात्र वेळ जाता जाईना. एक तर सगळा रस्ता वळणावळणाचा. त्यामुळे पु.लं.च्या ‘म्हैस’ सारखी, बसला एका अर्थाने लागणारी ‘वळण’ प्रवाशांना दुसऱ्या अर्थी लागत होती! प्रत्येकाला आपला पुढचा नंबर लागतोय की काय ही भीती वाटत होती. त्यामुळे तोंड उघडून दुसऱ्याशी बोलायची पण भीती वाटत होती. संध्याकाळ होऊन काळोख झाल्यावर तर बाहेर बघणंही अशक्य झालं. कधी एकदा ते जागेश्वर येईल अस झालं होत. भांडा-भांडी व्हायला अगदी आदर्श परिस्थिती होती. पण सगळे त्या प्रवासाने इतके गळून गेले होते, की भांडायलासुद्धा ताकद शिल्लक नव्हती.
अधून मधून डुलक्या घेताना ‘आपण घरी पोचलोय, आपल्या सवयीच्या बेडवर झोपलोय’ अशी स्वप्न पडत होती. यात्रेची मजा संपली, हिमालयाची संगत थोडाच वेळ राहिली, अश्या वेळेला घरची आठवण चरचरून येत होती. हॅरी पॉटरसारखी काही जादू येत असती, तर मी त्याच क्षणी घरी गेले असते.
पुन्हा एकदा बसप्रवास सुरू झाला. चालून पायांना त्रास झाला नव्हता, इतका त्रास कालपासूनच्या बसच्या प्रवासाने झाला होता. कधी एकदा हा प्रवास संपेल, असं झालं होतं. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही काठगोदामला पोचलो. हे हिमालयाच्या पायथ्याशी असलेलं गाव. हिमालयाचा निरोप घेऊन, पर्वतांची साथ सोडून शहरी भागाकडे जायचं होतं. काठगोदामच्या यात्रा समितीने आमचं जोरदार स्वागत करून आम्हाला उत्तम जेवण दिलं. नंतरच्या कार्यक्रमात यात्रा पूर्ण केलेल्यांना भारत सरकारची प्रमाणपत्रं दिली. कार्यक्रम आटोपल्यावर आरामदायी अश्या वोल्वो बसमध्ये बसून आमचा बस प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. कितीतरी दिवसांनी पायांना खूप जागा मिळाली. त्या भव्य लेगस्पेसच ‘काय करावं?’ हेच कळेना. बसमध्ये चक्क पाय हालवता येत होते! इतकं बरं वाटत होत!
पुढचा प्रवास महामार्गावरून सुरु झाला. हिमालयाची शिखरे मागे पडली होती. गाड्यांचे कर्णकर्कश आवाज, गर्दी, अडकलेली वाहतूक, धूळ-धूर, निरनिराळ्या नेत्यांचे चेहरे दाखवणारी होर्डिंग्ज आपण शहराकडे चाललोय ह्याची जाणीव देत होती. आम्ही ठरल्यापेक्षा एक दिवस अगोदर दिल्लीत पोचणार होतो. माझं परतीच्या प्रवासाचं तिकीट १० तारखेच होत. ठरल्याप्रमाणे १० तारखेला जावं की जास्त पैसे भरून एक दिवस आधीचं, म्हणजे उद्याचंच तिकीट काढावं हा विचार दोन दिवस करत होते.
उरलेले यात्री पुन्हा एकदा डॉर्मिटरीत गेलो. बरीच रात्र झाली होती. पण कोणालाच झोपायची इच्छा होईना. सगळे एकमेकांशी गप्पा मारत होते, हसत होते. महिन्याभराची उजळणी होत होती. आठव्या बॅचचे यात्री शेजारच्या डॉर्मिटरीत झोपले होते. त्यांना दुसऱ्या दिवशी मेडीकलसाठी जायचं होतं. त्यांची झोपमोड होऊन त्यांना त्रास होईल, हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या उत्साहाला कसाबसा आवर घालून झोपलो.
माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१२ (यात्रेविषयी थोडेसे)
ह्या मालिकेतील आधीचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा
- चीनमधल्या कॅम्पवर मोकळा वेळ बराच मिळतो. वाचायला पुस्तक किंवा पत्ते-उनो सारखा खेळ सोबत ठेवावा.
· कैलास परिक्रमेच्या पहिल्या दिवशीच ‘कैलास चरणस्पर्श’ इथे जायचे असते. तिथे घोडे येत नाहीत. ते सहा किलोमीटर जाता यावे, म्हणून वाटल्यास आधीचा भाग घोड्यावरून जावे, म्हणजे थकायला होणार नाही.
· आपले शरीर आपल्याला ज्या सूचना देते, त्यांचा आदर करावा. चालताना थकायला झाल्यास घोड्यावर बसण्यात काही कमीपणा नसतो. शेवटी आपण ठीक राहिलो तरच आपली आणि आपल्या सहयात्रींची यात्रा आनंददायक होणार आहे.
· पोर्टर-पोनीवाले आपल्यासाठी जीवापाड कष्ट करतात. त्यांच्याशी नीट बोलावे. काही यात्री त्यांना ‘ ए पोर्टर, इधर आ’ अश्या पद्धतीने बोलावतात. ते टाळावे. परमेश्वरच आपल्याला त्यांच्या रुपाने मदत करत असतो.
· पोनीवाले जेव्हा पोनीवरून खाली उतरायला सांगतात, तेव्हा ते आपल्या आणि पोनीच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. घोड्याचा पाय घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या स्थानिक लोकांचे जरूर ऐकावे.
· तिबेटमध्ये जाईपर्यंत आपली पोर्टरशी खूप मैत्री होते. तरीही त्याचे कुठलेही सामान आपल्या सामानातून घेऊन जाऊ नये. तसेच परत येतानाही आणू नये.
· तिबेटमध्ये आपली राजकीय मते मांडू नये. आपण परक्या देशात आहोत, हे सतत लक्षात ठेवावे.
· ही यात्रा आहे, सहल नाही, हे कायम ध्यानात ठेवावे. भारतात हा प्रश्न फारसा येत नाही, पण चीनमध्ये थोडी गैरसोय होते. तेव्हा आपले डोके थंड ठेवावे. सहयात्री तसेच तिथले स्थानिक लोक ह्याच्याशी वाद घालणे, वेडेवाकडे बोलणे, असले प्रकार करू नयेत. अश्या वागण्याने आपण आपल्या देशाची प्रतिमा खराब करत असतो.
· कैलास मानस सरोवर यात्रेला इंडीयन माउंटेनिअरिंग फाउंडेशनकडून मान्यता असल्याने केंद्रीय व राज्य सरकारचे तसेच बँक व निमसरकारी कर्मचार्यांना यात्रा पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतर विशेष रजा मिळू शकते.
आपली तब्येत उत्तम राखली आणि योग्य ते आणि तेवढेच सामान बरोबर ठेवलेत तर ह्या यात्रेच्या आनंददायक स्मृती तुमची आणि तुमच्या सहयात्रींच्या मनात दरवळत राहतील, ह्यात मला शंका नाही
ह्या मालिकेतील पुढचा भाग वाचण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा
माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-१३ (समारोप)
भाग १२ : यात्रेविषयी थोडे https://aparnachipane.blogspot.com/2019/02/blog-post.html
वयाने मोठं होऊन ह्या जगाच्या रुक्ष धकाधकीत तगून राहणे अवघडच असतं. त्या मोठं होण्याबरोबर अपरिहार्यपणे गळ्यात येणाऱ्या कर्तव्य -जबाबदाऱ्यांच्या जडशीळ माळा, यश-अपयशात होणारी रस्सीखेच, वेळोवेळी मनाला घालावी लागणारी मुरड हे सगळं बाजारात फेरफटका मारण्याइतकं सोपं असेल कसं? ह्या सगळ्यातून थोडं थांबून वेगळ्या वातावरणात जाणे, आपल्या मनाला ‘आपल्याला नक्की हवंय तरी काय?’ हा विचार करायला भाग पाडणे, असा काहीसा हेतू माझ्या मनात होता. शिक्षण, विवाह, अर्थाजन, अपत्य संगोपन हे ठराविक टप्पे घेताना जगण्याचा वेग प्रचंड वाढला. मध्येच अचानक वाटायचं, पण आपण का धावतोय इतकं? आणि कशासाठी? नक्की पोचायचंय तरी कुठे? आपलं नक्की ध्येय तरी काय आहे? हा शोध घेण्याइतकीही फुरसत मिळत नव्हती. गेली काही वर्षे ह्या कुतरओढीने मी अगदी गळून गेले होते. परिस्थितीने दिलेले काही घाव सांभाळत, कुरवाळत राहत होते. पूर्वी स्वभावात नसलेला एक कडूपणा आला होता. त्याचा त्रास व्हायचा.
मी आनंदी / सुखी/ समाधानी होण्यासाठी स्वतःकडे पाहण्याऐवजी मला बाह्य परिस्थितीकडे बोट दाखवणं सोपं वाटत होतं. मला अमुक इतके पैसे मिळाले की, माझ्या भोवतालचे लोक अश्या अश्या पद्धतीने बदलले की, समाज असा असा झाला की, मी समाजासाठी- कुटुंबासाठी ह्या गोष्टी केल्या की मग मला छान वाटेल, सगळे मला नक्की नावाजतील, अशी भावना मनात प्रबळ झाली होती. ह्या भावनेला धक्का बसला, की निराश वाटायचं. ह्या सगळ्यातून बाहेर पडायला मला ह्या महिन्याची फार मदत झाली. आत्मशोधाच्या ह्या प्रक्रियेसाठी अत्यंत पोषक असं वातावरण ह्या यात्रेत मला मिळालं. एकतर संगणक, आंतरजाल, दूरध्वनी आणि कुटुंबीय ह्या सगळ्यापासून मी खूप दूर होते. इतर कुठल्याही ट्रेकपेक्षाही जास्त शारीरिक-मानसिक क्षमतेचा, अनिश्चितता झेलण्याचा तयारीचा कस ह्या यात्रेत रोजच्या रोज लागत होता.
रोजच्या चरितार्थासाठीच्या गडबडीत माझा माझ्यासोबतचा संवाद केवळ रोजचे अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या प्रश्नांपर्यंतच राहिला होता. ती तुटलेली साखळी जोडायला मला इथे वेळ आणि मोकळीक मिळाली. आपल्या स्वतःच्या मतांची चिरफाड करणे, म्हणजे एक शल्यकर्मच! ते काम मी नेहमीच मागे टाकत होते. आता मात्र ते आपोआपच होत होत. धार्मिकतेकडे माझा कल नव्हता, आणि आजही नाही. परंतु माझ्यातल्या आध्यात्मिकतेचा परिचय ह्या महिन्याभरात झाला. मात्र ती आध्यात्मिकता माझ्या स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी असेल, बाह्य प्रदर्शनासाठी नाही. ह्या यात्रेत ‘दिव्यत्वाची प्रचिती’ घेतल्यावर ‘कर माझे’ नक्कीच जुळले. पण मी नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे गेले का? तर नाही. मी त्या बाबतीत होते तिथेच आहे. कैलास पर्वतावर किंवा मानस सरोवराच्या काठी कोणतेही देऊळ नाही. अर्थातच त्याबरोबर येणारा ‘देव’ नावाचा व्यवसाय नाही, धातूशोधक यंत्रे नाहीत, प्रसाद-माळांची दुकानेही नाहीत. ‘निर्गुण-निराकार’ असे ते रूप अनुभवून आल्यावर तर मला गर्दीने गजबजलेली, स्वतःची जाहिरात करणारी देवळे आणखीनच आवडेनाशी झाली.
पण कैलास-मानस च्या रौद्र अनुभूतीचा परिणाम माझ्या मनावर नक्कीच झाला.
मी काहीशी शांत झाले, अस मला वाटत. कपडे – दागिने हा माझा प्रांत पहिल्यापासून कधीच नव्हता. आता मी त्यापासून अजूनच लांब गेले. माझी विचार करायची पद्धत काहीशी सखोल झाली. आपल्या दिशेने येणारी काही वाक्य किंवा घटना मी थोड्या अलिप्तपणे पाहू लागले. वाद घालणे, शब्दाने शब्द वाढवणे हे टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न करायला लागले. म्हणजे मी क्रोध, लोभ, मोह, माया सगळं जिंकलं का? नाही, अजिबात नाही. मी अजूनही एक माणूसच आहे, साधू- संन्यासी झाले नाही. पण तिथल्या अपूर्व अश्या शांतीचा अनुभव मन शांत करून गेला, हे मात्र खरं!! कैलास यात्रेला येणाऱ्या यात्रींमध्ये भाविक, श्रद्धाळू लोक मोठ्या प्रमाणात असतात. संपूर्ण यात्रेत उपास करण्यापासून ते चालताना मौन पाळणारे लोक असतात. त्यांच्या मनोबलाची कमाल वाटते. पण हेच लोक लहान-सहान कारणावरून आपल्या सहयात्रींबरोबर किंवा पोर्टरबरोबर भांडताना, अद्वातद्वा बोलताना दिसले, की धक्काच बसतो. ह्या लोकांची ही व्रत-वैकल्य शरीरापर्यंतच राहतात, मनापर्यंत झिरपत नाहीत, ह्याची खंत वाटते.
पूर्वी लोकं काशीयात्रेला जात, ते घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच. प्रवासाच्या, संपर्काच्या कोणत्याही सोयी नसताना ह्या यात्रेला जात असत. जाताना आपल्या घराचा, कुटुंबाचा शेवटचा निरोप घेण्याची मानसिक तयारी आपोआपच होत असेल. जगून-वाचून कोणी परत आला, तर तो त्याचा पुनर्जन्म मानला जात असे. त्या आलेल्या माणसाला आपला जीव ज्यात गुंतला आहे, त्या सगळ्याकडे साक्षी भावाने पाहणे शक्य होत असेल. ह्या सगळ्या पसाऱ्याचा केंद्रबिंदू ‘मी’ आहे, ही समजूत किती पोकळ आहे, ह्याची जाणीव होणे, हाच तीर्थयात्रांमागचा उद्देश असेल का?
महाविद्यालयात असल्यापासून मी ह्या यात्रेची स्वप्न बघितली होती. पुढे घर-संसार-व्यवसाय ह्या जबाबदाऱ्या महिनाभर बाजूला कशा टाकणार? असं वाटून खूप वर्षे ती इच्छा मी कोपऱ्यात सरकवली होती. पण प्रत्यक्षात मी नसतानाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहिल्या. माझ्या परीने मी सगळी ओळ नीट लावायचा प्रयत्न केला होता. तरीही, मनाच्या एका कोपऱ्यात ‘माझ्या वाचून सगळ्यांचं खूप अडेल’ अशी एक भावना होती. पण तो एक अहंभाव होता, असं आता वाटतं. आपलं घर, व्यवसाय, कुटुंब ह्या सगळ्यात गुंतून पडलेल्या मनाला थोडं बाजूला जाण्याची संधी मिळाली. निसर्गाचे ते भयचकित करून टाकणारे ते रूप बघून माझ्या सुखरूप परत येण्यामागे थोडा योगायोग, थोडं नशीब, थोड्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत ह्याची प्रखर जाणीव झाली.
हे लक्षात आल्यावर मनात असलेल्या, पण करायची हिंमत न केलेल्या असंख्य गोष्टी वर आल्या. मला चित्र काढायला शिकायची आहेत, भरपूर प्रवास करायचा आहे, नवीन भाषा शिकायच्या आहेत. जी गोष्ट खरंच मनापासून करावीशी वाटते, ती परिस्थितीचा फार बाऊ न करता करून टाकायचा एक आत्मविश्वास मला ह्या प्रवासातून मिळाला. आपल्या वागण्यातून जर हे काही करायची तेवढी असोशी दिसली, तर आपले कुटुंबीय सुद्धा भरपूर सहकार्य करतात, हे लक्षात आले. आपल्या दिनक्रमाशिवाय वेगळी गोष्ट करायला, शिकायला ‘अत्यंत आदर्श’ अशी परिस्थिती कदाचित कधीच निर्माण होणार नाही. ‘आता दोन महिने मला ऑफिसला सुट्टी आहे, मुलगा आजीकडे गेलाय, खिशात भरपूर पैसे आहेत, घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीयेत, आता मी माझ्या मनातली ही गोष्ट करते/ शिकते’ असं व्हायची शक्यता जवळपास नाहीच!! आणि वर वर्णन केलेली आदर्श परिस्थिती नसताना काही ठरवलं, तर माझ्यावर विश्वास ठेवा, आभाळ कोसळत नाही’!! सगळं व्यवस्थित रांगेला लागतं! तेव्हा ‘त्यागमूर्ती’ होण्याची नशा सोडून ‘आनंदमूर्ती’ व्हायचा निश्चय मी करून टाकला आहे.
मी लहान असल्यापासून भरपूर वाचत आले. लिखाणाची हिंमत मात्र कधीच केली नव्हती. माझ्या मोठ्या भावाने मला हे अनुभव लिहिण्याचा खूप आग्रह केला. देवनागरी लिखाणासाठीचा फॉन्ट देण्यापासून ते मला लिहिता न आलेले काही शब्द इ-मेलने पाठवण्यापर्यंत सगळी मदत त्याने मला केली. त्याच्यामुळेच ही लिखाणाची झिंग मला अनुभवता आली. माझेच अनुभव लिहिताना कितीतरी वेळा माझे डोळे भरून आले. यात्रा संपताना झालेली घालमेल लिहिताना मी परत तशीच अस्वस्थ झाले. पण मला नक्की काय वाटलं, तेव्हा नक्की काय विचार आले, ह्या सगळ्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर काही परिणाम झाला का? ह्याची उत्तरे मला लिहितानाच मिळाली. प्रत्यक्ष प्रवासात असताना आपलं लक्ष ‘आपली तब्येत, आपलं सामान, ऊन/पाऊस/थंडी, उद्याच्या चढ/उताराची – चालण्याच्या अंतराची काळजी, घरची आठवण’ अश्या असंख्य ठिकाणी असत. घरी संगणकासमोर बसून शांतपणे टंकताना, हे कोणतेही ताण नव्हते. त्यामुळे स्वतःला तपासायला योग्य वेळ मिळाला. लिहील नसत, तर ह्या माझ्या ‘स्व’च्या शोधाला मी नक्कीच मुकले असते.
ह्या लिखाणाबरोबरची सर्व छायाचित्रे मी काढलेली नाहीत. मला यात्रेत गवसलेली माझी मैत्रीण नंदिनी, तसेच आमच्या बॅचचे कलाकार श्री.शरद तावडे ह्यांनी ती मला विनातक्रार, विनाअट दिली. त्यामुळे माझ्या लेखांची खुमारी खूप वाढली. काळ-काम-वेगाची गणिते सोडवताना ज्यांच्याशी संपर्क कमी झाला होता, किंवा पार तुटलाच होता, अशा काही मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाइकांशी मी ह्या निमित्ताने परत एकदा जोडली गेले. माझे लिखाण वाचून, ज्यांची माझी काहीही ओळख नाही, अशांनीही मला भरघोस प्रोत्साहन दिले. त्या सर्वांची मैत्री ही मला ह्या लिखाणाने दिलेली अपूर्व अशी भेट आहे.
शेवटी काय सांगू? आता शब्द अपुरे पडत आहेत. ह्या संपूर्ण यात्रेत निसर्ग सौंदर्याने, आव्हानाने, आश्चर्याने नटलेली धरतीमाता आपल्यासमोर असते. ह्या अलौकिक सौंदर्याचा अनुभव प्रत्येक भारतीयाला मिळावा, इथे प्रत्यक्ष जाऊन येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी आपण काहीतरी करावे, हा एक हेतू ह्या लिखाणामागे आहेच! इच्छुक आनंदयात्रींना हिमालयाचा यात्रिक होण्याचे भाग्य लाभलेल्या आमच्यासारख्या भाग्यवंताच्या हार्दिक शुभेच्छा!