Sunday, May 19, 2024

सफरनामा

 माणुसकीची लिफ्ट

Written by लोकसत्ता टीम

article about hitchhiking story hitchhiking from the road
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

मितेश रतिश जोशी

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती हे त्यांच्या स्पष्ट विधानांमुळे सतत चर्चेत असतात. गेल्याच महिन्यात त्यांनी एक त्यांचा अनुभव सांगितला. ५० वर्षांपूर्वी बल्गेरिया (तेव्हाचे युगोस्लाव्हिया आणि आजचे सर्बिया) मधील निश नावाच्या एका सीमेवरील शहरात, ज्या ठिकाणी ते युरोपमध्ये हिचहाइक करत होते तेव्हा ते १२० तास उपाशी होते. त्यांनी सांगितलेल्या या अनुभवामध्ये हिचहाइक हा फारसा वापरला न जाणारा शब्द कानावर पडला आणि त्याच्या अर्थाची उत्सुकता लागली. अर्थ समजल्यावर त्यामागचं विशाल जग डोळ्यांसमोर आलं. आजच्या सफरनाम्यात नेमका त्याचाच उलगडा आहे.पर्यटन विश्वातील हिचहाइक ही पद्धत काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून हिचहाइक ट्रेण्डमध्ये आहे. हिचहाइक म्हणजे काय तर लिफ्ट घेऊन प्रवास करणे. या ट्रेण्डमध्ये लिफ्ट घेणाऱ्यापेक्षा लिफ्ट देणाऱ्याचा संकोच अनेक वेळा दिसून येतो. हिचहाइकिंग किती सुरक्षित आहे आणि किती नाही, हा बऱ्याच काळापासूनचा चर्चेतला विषय आहे. चित्रपटांमध्ये हा ट्रेण्ड सर्वाधिक वापरला गेला आहे. चित्रपटात नायक-नायिका हात दाखवून कार किंवा इतर वाहनचालकांकडे लिफ्ट मागताना दिसतात. हॉलीवूड – बॉलीवूडपटात दिसणाऱ्या या दृश्याप्रमाणे सामान्य जीवनातही लांबच्या मार्गावर खांद्यावर पिशव्या वा हातात सामान घेऊन लोक अशा प्रकारे लिफ्ट मागताना दिसतात. देशात किंवा परदेशात अनेक व्लॉगर्स आणि ब्लॉगर्स या पद्धतीने प्रवास करताना दिसतात. १९५० च्या दशकात अशाच एका हिचहाइकरची कथा लोकांसमोर आली. त्याने हिचहाइकिंगद्वारे सुमारे २५०० मैलांचा प्रवास पूर्ण केला होता, या व्यक्तीचे नाव होते पीट कोल्टेनाऊ.

शोमन राज कपूर यांनी ‘अराऊंड द वर्ल्ड इन ८ डॉलर्स’ची शिफारस त्यांच्या चित्रपटातील एका गाण्यात केली होती. अगदी ८ डॉलर्समध्ये नाही, पण अशा प्रकारे (लिफ्ट मागत) एकूण प्रवासाच्या बजेटमधील मोठा खर्च नक्कीच वाचतो. देश-विदेशात कुठेही तुम्हाला रस्त्यावर लिफ्ट मागणारे हिचहाइकर्स दिसतील, पण प्रवासाच्या या पद्धतीमुळे पैशांची बचत होते, त्यातला धोका कमी होतो का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे हिचहाइकर्स दिवसा त्यांचा प्रवास पूर्ण करतात आणि रात्री विश्रांतीसाठी जागा शोधतात. रात्रीचा प्रवास धोकादायक आणि थकवणारा दोन्ही असू शकतो. म्हणून जर तुम्हाला हिचहाइक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही दिवसाउजेडी सफर करण्याचा पर्याय निवडायला हवा.

पुण्यातील रोहन सदडेकर या तरुणाने २०१८ मध्ये भारत फिरताना हिचहाइकचा अनुभव घेतला आहे. २०२२ मध्ये सलग दोन महिने त्याने दक्षिण भारतात हिचहाइक केले. त्याच्या या अनुभवाविषयी तो सांगतो, ‘हिचहाइकच्या माध्यमातून मी माझी सफर पूर्ण करू शकतो का? हे पाहण्यासाठी मी घरातून पाच हजार रुपये घेऊन दक्षिण भारताच्या भ्रमंतीला निघालो. मी स्वत:वर काही नियम घालून घेतले होते. रोज २०० किमीपर्यंतचा प्रवास करायचा. संध्याकाळी सातनंतर प्रवास करायचा नाही, यासारख्या नियमांच्या जोरावरच मी कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ इत्यादी पाच राज्ये हिचहाइक करत फिरू शकलो’. हिचहाइकिंग या शब्दातच हाइकिंगचा उल्लेख आहे. या शब्दाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हिचहाइक म्हणजे केवळ लिफ्ट मागत फिरणं नव्हे, तर त्यात तुम्हाला चालावंही लागतं. जर लिफ्ट मिळाली नाही तर काही किलोमीटर चालून टप्पा पूर्ण करावा लागतो. चौकात लिफ्ट मिळाली नाही तर महामार्गापर्यंत चालत जाऊन लिफ्ट मागावी लागते, त्यामुळे हिचहाइकिंग म्हणजे चालणं व लिफ्ट मागत आपला प्रवास पूर्ण करणं हेही अभिप्रेत आहे, असं रोहन नमूद करतो.

प्रत्येक फिरस्तीचं त्याच्या प्रवासातील आठवणींशीही घट्ट नातं जोडलं जातं. असाच काहीसा अनुभव रोहनला आला. त्याविषयी सांगताना तो म्हणाला, ‘मुन्नारपासून आठ किमी लांब अनाचल या गावी असताना मला पुढे इडुकी या गावी जायचं होतं. जेव्हा तुम्ही परराज्यात पहिल्यांदाच फिरता, तेव्हा तुम्हाला तिथल्या लोकांच्या मानसिकतेचा, माणुसकीचा काहीच अंदाज नसतो. त्यामुळे अशा अनोळखी ठिकाणी हिचहाइक खूप सांभाळून करावं लागतं. अशीच खबरदारी घेत रस्त्यात कोणी लिफ्ट देईल का याची वाट बघत मी उभा होतो. तेवढ्यात एक गाडी आली आणि माझ्यापाशी येऊन थांबली. माझं काम झालं. मला लिफ्ट मिळाली. गाडीत कुटुंब होतं. गाडी चालवणाऱ्या मालकाशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. त्याने आपुलकीने माझी चौकशी केली. दुपारचा एक वाजून गेला होता. त्याने मला हॉटेलमध्ये लंचसाठी आग्रह केला. मी नाही नाही म्हटलं तरीही त्याचा आग्रह काही थांबत नव्हता. अखेर तो म्हणाला, तुला हॉटेलमध्ये संकोच वाटत असेल तर माझ्या घरी जेवायला चल. त्याचा आग्रह पाहून शेवटी मी होकार दिला. त्याच्या घरी गेलो. अतिशय मोठं टुमदार घर, आजूबाजूला चहा, मिरी आदि पदार्थांची हिरवीगार शेती. हे पाहून माझं मन प्रसन्न झालं. जेवता जेवता आमच्या शेतीविषयी गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर त्याने राहण्यासाठी आग्रह केला, पण मला वेळेत प्रवास पूर्ण करायचा होता. त्यामुळे मी थांबलो नाही, पण एकमेकांचे नंबर शेअर करत संपर्कात राहिलो’. खरं तर कोणत्याही प्रवासाहून परत आल्यावर आपण हळूहळू ती जागा, तिथली माणसं, परिसर विसरायला लागतो. मग केवळ आठवण म्हणून कुठेतरी रुतून राहातात त्या जागा नेणिवेत किंवा अनेकदा फोटोंच्या स्वरूपात… पण इथे उलटंच घडलं. एक वर्षानंतर मी पुन्हा त्याच्याकडे दोन आठवड्यांसाठी गेलो. त्याच्याच घरी राहिलो. त्याच्याकडून चहाच्या शेतीचे बारकावे जाणून घेतले. माझ्या या हिचहाइकिंगच्या प्रवासाने मला असं एक कुटुंब कायमचं जोडून दिलं, त्यामुळे काही आठवणी नात्यांची वीण अधिक घट्ट करून जातात, असं रोहन सांगतो.

सातारा जिल्ह्यातील कुसगावमधील अक्षय राजेश कुसगावकर या फिरस्तीने भारतातील बारा ज्योतिर्लिंग यात्रा हिचहाइकिंग करत पूर्ण केली आहे. २०२० मध्ये त्याने त्याच्या प्रवासाला सुरुवात केली. करोनामुळे त्याच्या फिरस्तीला काही काळासाठी अर्धविरामही लागला. टाळेबंदी संपली आणि नियम शिथिल झाल्यावर त्याने पुन्हा आपली सफर सुरू केली. या सफरनाम्यात त्याला अनेक अनुभव आले. ‘मी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचं ठरवल्याने साहजिकच हिचहाइकिंगच्या माध्यमातून मला संपूर्ण देश पालथा घालता आला. हिचहाइकिंग हे असं प्रवासाचं माध्यम आहे, ज्यात तुम्हाला प्रचंड संयम ठेवावा लागतो. श्रीशैल्यमच्या डोंगरात मला तब्बल दोन तास लिफ्ट मिळाली नव्हती, तेव्हा १५ किलोची बॅग पाठीवर घेऊन जमेल तितकी वाट मी चालत गेलो.

अखेर दोन तासांनी मला लिफ्ट मिळाली, पण भाषेचा अडथळा होताच. एकमेकांची भाषा कळत नसल्याने अखेर हातवारे करत संवाद साधून ती मोहीम फत्ते केली’ अशी आठवण अक्षयने सांगितली. एकदा गोव्याला असताना मोबाइलचा रिचार्ज करायला पैसे कमी पडत होते, तेव्हा मी कोणतीही लाज न बाळगता रेस्टॉरंटमध्ये भांडी घासून, रूम साफ करून पैसे कमावले होते. कारण तुम्ही शून्य म्हणून आला आहात आणि शून्य म्हणूनच जाणार आहात हे मला हिचहाइकिंगने शिकवलं, असंही तो सांगतो.

हिचहाईक करताना काळजी ही घ्यावीच लागते. अनोळखी व्यक्तीला लिफ्ट मागत प्रवास करायचा असल्याने काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्याच लागतात. साधारणपणे कार, ट्रॉली किंवा ट्रकला हिचहाइकिंगसाठी प्राधान्य दिलं जातं. कुठल्याही वाहनाची निवड करताना चालकाचं वर्तन संशयास्पद वाटत असेल अथवा चालक वारंवार जबरदस्ती करत असेल किंवा वाहनात बसण्याचा आग्रह करत असेल तर त्या वाहनात चढू नका. बंद किंवा काळ्या काचा असलेलं वाहन निवडू नका. आजकाल गॅझेट्स खूप उपयुक्त आहेत, रोख रक्कम कमीत कमी ठेवा आणि मोबाइल नेहमी पूर्ण चार्ज करून ठेवा. दुसऱ्या राज्यात किंवा देशात हिचहाइकिंग करताना पोलिसांना कॉल करा, वाचवा वा मदतीसंदर्भात तेथील स्थानिक भाषेतील महत्त्वाचे शब्द पहिले जाणून घ्या. तुमची प्रवास योजना, कुटुंब किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देणे टाळा. हिचहाइकिंग करताना नेहमी असे कपडे घाला जे तुम्हाला वाहनात चढताना, बाहेर पडताना, बसताना, धावताना आरामदायी ठरतील. महामार्गांवर वाहने जास्त वेगाने जातात आणि लोक सामान्यपणे त्यांची वाहने लिफ्टसाठी थांबवत नाहीत. त्यामुळे महामार्गाऐवजी बाजारपेठ किंवा शहराच्या मध्यभागी लिफ्ट मागणं अधिक सुरक्षित आणि चांगलं आहे.

पर्यटन विश्वातील हिचहाइकिंग हा ट्रेण्ड फार इंटरेस्टिंग आहे. इथे माणुसकीच्या भावनेनेच प्रवासासाठी मदत मिळते. कधी कधी काही अनुभवांमुळे या प्रवासातील उत्साह कमी-जास्त होत राहतो. मात्र तुमचं ध्येय पक्कं असेल तर थोडी सावधगिरी बाळगत तुम्ही हिचहाइकिंगच्या माध्यमातून प्रवासाचा आनंद अनुभवू शकता.

viva@expressindia.com

सफरनामा : दुचाकीवरून देशाटन

बाइकवरून फिरणं हा योगेशचा छंद होता. या छंदाचं रूपांतर कालांतराने पॅशनमध्ये झालं. सुरुवातीला मित्राच्या बाइकवरून त्याने भारतभ्रमंती केली.

story of farmer s son from sangli who successfully completed the mumbai london mumbai double bike journey

मितेश रतिश जोशी

मुंबई-लंडन-मुंबई ही दुहेरी बाइक सफर यशस्वी करणाऱ्या, एक नाही, दोन नाही तर तब्बल २७ देशांच्या अंतरंगात डोकावून आलेल्या आणि ही जगावेगळी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील आजच्या घडीला एकमेव असलेल्या सांगलीच्या शेतकरी पुत्राचा भन्नाट सफरनामा!!

सफर प्रत्येकालाच आवडते. कोणी आपल्या खासगी वाहनातून प्रवास करतो, तर कोणी बस, रेल्वे, विमान अशा सार्वजनिक वाहनातून.. प्रत्येकाची आपापली अशी फिरण्याची पद्धत असते. काहींना प्रसिद्ध स्थळांना भेटी द्यायला आवडतं, तर अनेक जण खिडकीच्या बाहेर डोकं काढून आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळण्यात धन्यता मानतात. मात्र, या सगळयांपेक्षा एक वेगळी जमात या भूतलावर अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे बाइक राइडर्सची. या अवलियांना आपल्या दुचाकीवरून अवघं जग फिरून यायचं असतं. आपल्याला पाहिजे ते सामान बाइकवर लादायचं आणि कधी ठरल्याप्रमाणे तर कधी वाट मिळेल तिथं सुटायचं. वाटेत मिळेल त्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा आणि कंटाळा आला की थांबायचं. इतकी साधी सरळ सोपी मांडणी वाटत असली तरी या प्रवासाची गणितं मात्र कठीण असतात. अशीच एक भन्नाट बाइक राइड सांगलीच्या योगेश आलेकारी या शेतकरी पुत्राने केली आहे.       

बाइकवरून फिरणं हा योगेशचा छंद होता. या छंदाचं रूपांतर कालांतराने पॅशनमध्ये झालं. सुरुवातीला मित्राच्या बाइकवरून त्याने भारतभ्रमंती केली. त्यातून त्याला पुढच्या राइडसाठी आणखी ऊर्जा मिळाली. पुढे त्याने हिमालयन रॉयल एनफिल्ड विकत घेतली. स्वत:च्या बाइकवरून कुठे तरी दूरदेशी जावं या विचारातून त्याने पहिली मुंबई ते सिंगापूर ही राइड केली. या राइडनंतर त्याला जगभ्रमंती करण्याचा ध्यास लागला आणि त्याने २७ देशांच्या बाइकवारीसाठी पूर्वतयारी सुरू केली. ही तयारी नेमकी कशी केली याविषयी सांगताना योगेश म्हणाला, ‘या राइडचा चार वर्षे मी अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय राइड ही फार वेगळी असते. आपल्याच देशात राइड करताना आपण मुक्त असतो, पण दुसऱ्या देशात राइड करताना भरपूर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्येक देशाच्या हवामानाचा अभ्यास, त्या त्या देशाचा सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक आढावा घेतला. या अभ्यासामुळे मला त्या देशाला भेट देण्याची अधिक ओढ लागली. प्रवासासाठीची सरकारी कागदपत्रं तयार करणं, प्रत्येक देशातील वाहतुकीचे नियम समजून घेणं, माझ्या गैरहजेरीत घरच्यांची गैरसोय होऊ नये त्या दृष्टीने सोयीसुविधा निर्माण करून मी माझ्या प्रवासाची नांदी केली.’

योगेशच्या प्रवासाची सुरुवात २७ जुलै २०२३ पासून झाली. सर्वप्रथम त्याने इराण हा देश गाठला. मग पुढे तुर्की, ग्रीस, अल्बानिया, बल्गेरिया, मोंटेनिग्रो, बोस्निया, क्रोएशिया, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, लक्झेंबर्ग, बेल्जियम, इंग्लंड, स्कॉटलंड, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया, जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया, दुबई, बहरीन असे अनेक देश फिरून हा फिरस्ती पुन्हा भारतात आला. या प्रवासादरम्यान अनेक किस्से घडले. याविषयी सांगताना योगेश म्हणाला, ‘माझ्या आर.सी. बुकवर ‘गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र’ असं नाव होतं. ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ असं नाव नसल्याने एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मला अडवून धरलं. त्याला मी गूगलवर महाराष्ट्र हे भारतातीलच एक राज्य असल्याचे पुरावे दाखवले, तरीसुद्धा त्याने प्रश्नांचा भडिमार कमी केला नाही. खूप शांतपणे दोन तास मी ती परिस्थिती हाताळली.’ वेगवेगळया देशात भाषेच्या अडचणीही यायच्या, असं त्याने सांगितलं. ‘दुभाषिकांची काही ठिकाणी मदत व्हायची. काही ठिकाणी हातवारे करून संवाद चालायचा. काही ठिकाणी हातवारेही कळायचे नाहीत. एकदा इराणमध्ये पैसे संपले, तिथे डॉलर स्वीकारले जात नव्हते. अशा वेळी रात्री अकरा वाजता तेथील दुभाषिकाने मला पैशांची मदत केली. बऱ्याच देशात माझं जंगी स्वागत झालं. इस्तंबूलमध्ये रोटरी क्लबने केलेलं स्वागत व अंकारा येथे भारताचे राजदूत डॉ. एस. पोल यांनी अतिशय उत्साहात तुर्कीमध्ये केलेलं स्वागत न विसरण्याजोगं आहे’ असं तो म्हणतो.     

या प्रवासादरम्यान मुद्दाम काही ठिकाणी योगेशने भेट दिली. ‘ब्रिटनमधील हे-ऑन-वाई हे गाव जगातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रातील भिलारची भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून ओळख निर्माण झाली. म्हणून मी खास त्या गावी भेट दिली. लंडनमध्ये मला मुद्दाम ब्रायटनच्या किनाऱ्यावर जायचं होतं, कारण तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला। सागरा, प्राण तळमळला’ ही कविता लिहिली होती. त्याच ब्रायटनमध्ये एक राजवाडा आहे, त्याचा दरवाजा पटियालाच्या राजाने बसवला आहे. पहिल्या महायुद्धामध्ये पटियालाच्या राजाचे सैनिक इंग्रजांबरोबर लढत होते. भारतीय सैनिकांची देखभाल ब्रिटिश सैनिकांनी चांगली केल्यामुळे खूश झालेल्या पटियालाच्या राजाने तिथल्या राजाला हा दरवाजा भेट म्हणून दिला. आजही तिथे या घटनेची माहिती देणारी पाटी आहे. त्याचबरोबर मला सुवर्णदुर्ग कॅसेलला भेट द्यायची होती. कारण या कॅसेलच्या इतिहासाची मुळं थेट सुवर्णदुर्ग किल्ल्याशी जोडली गेली होती’ अशा काही खास भेटींच्या आठवणी योगेशने सांगितल्या.     

हेही वाचा >>> फेनम स्टोरी: सुरिली मैथिली

योगेश इराण, दुबई मार्गे भारतात येणार होता, पण युद्धसदृश्य परिस्थितीमुळे त्याला मार्ग बदलावा लागला. युद्धसदृश्य परिस्थितीमुळे या देशातील ट्रॅन्झिट व्हिसा योगेशला मिळाला नाही, त्यामुळे त्याला अनेक अडथळे आले. इजिप्त, जॉर्डन, इस्रायलसारख्या ऐतिहासिक देशांमध्ये मनापासून जायची योगेशची इच्छा होती. मात्र युद्धामुळे मनात इच्छा असूनही त्याला तिथे राइड करता आली नाही. तरीही, शहरांमधील ‘शांततामय’ गोंधळाचा, तिथल्या असाधारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, अनोख्या खाद्यसंस्कृतीचा, फुलांनी, पक्ष्यांनी बहरलेल्या हिरव्यागार मैदानांचा अनुभव योगेशने युरोपमध्ये घेतला. ‘एक बार ठान ली तो बस्स ठान ली’ या उक्तीप्रमाणे मुंबई- लंडन- मुंबई असा प्रवास योगेशने चक्क त्याच्या लाडक्या हिमालयन बाइकने करायचं स्वप्न पाहिलं होतं. खरं तर असं स्वप्न पाहणंदेखील महाकठीण गोष्ट आहे, पण त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही’ हे शिवशाहिरांचे कथन तो या राइडच्या माध्यमातून अहोरात्र जगला. मुंबई ते लंडन आणि पुन्हा मुंबई असा १३६ दिवसांत २७ देश, २ खंड आणि थोडाथोडका नाही तर २९,००० किमीचा जबरदस्त प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करून योगेश १६ डिसेंबर २०२३ला मायदेशी परत आला.      

‘राइडला निघण्यापूर्वी पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते. कुठेही बाहेर जाताना आपण स्वत: तयार होतो तसंच बाइकलादेखील आपण तयार केलं पाहिजे. रायिडगसाठी बाइक फिट असली पाहिजे. जेणेकरून प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्हाला मदत मिळू शकेल. वेळच्या वेळी बाइक सव्‍‌र्हिस करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. कंपनीच्या सव्‍‌र्हिस सेंटरवर जाऊन बाइक सव्‍‌र्हिस करून घ्या. या वेळी तुम्हाला बाइकमधील लहान-मोठया अडचणी समोर येतील, त्यांची दुरुस्तीही होईल. बाइकची हेडलाइट, टेल लाइट, इंडिकेटर देखील तपासून घ्या. जेव्हा तुम्ही लांबच्या बाइक राइडला जाता, तेव्हा सोबत एक रिकामा कंटेनर ठेवा. प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही जेव्हा बाइकमध्ये पेट्रोल भराल तेव्हा त्या कंटेनरमध्ये देखील पेट्रोल भरून घ्या. अनेकदा अशा ठिकाणी आपल्या बाइकमधलं पेट्रोल संपतं, जिथे आसपास पेट्रोल पंप नसतो. तसंच तुम्हाला तिथे कोणतीही मदत मिळत नाही. अशा वेळी त्या कंटेनरमध्ये भरलेलं पेट्रोल तुमच्या कामी येईल. कंटेनरमध्ये अर्धा लिटर पेट्रोल जरी असलं तरी त्यानंतर तुम्ही २५ ते ३५ किलोमीटपर्यंतचा प्रवास करू शकता’ असं योगेश सांगतो. शिवाय, बाइक रायिडगची तयारी करताना बाइक सव्‍‌र्हिस केल्यानंतर दोन स्पार्क प्लग, टायर पंक्चर किट, टायरमध्ये हवा भरण्यासाठी मॅन्युअल इन्फ्लेटर, फर्स्ट एड बॉक्सदेखील बरोबर ठेवा. या वस्तू ठेवण्यासाठी थोडी जागा लागेल, परंतु या वस्तू लाँग ड्राइव्हच्या वेळी खूप उपयोगी पडतात, असं त्याने सांगितलं.

ऋतुमानानुसार बाइक रायडर्सना स्वत:ची काळजी घ्यावी लागते, असंही त्याने सांगितलं. उन्हाळा व हिवाळयाच्या दिवसात बाइक राइड करण्यापूर्वी तुमचं संपूर्ण शरीर झाकलेलं असेल याची काळजी घ्या. कपडयांच्या दोन ते तीन लेयर्स असायला हव्यात. जेणेकरून तुम्हाला थंडी व ऊन लागणार नाही. तसंच तुमचं डोकं, मानदेखील झाकलेली असली पाहिजे. उन्हाळयात सकाळी लवकर राइडला सुरुवात करावी. शक्यतो दुपारी बारानंतरचा प्रवास टाळायला हवा. यादरम्यान, बारा ते चार आराम करा. आहार आणि पाणी याकडे विशेष लक्ष द्या. उन्हाळयात प्रचंड घाम आल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पाण्यामध्ये ओ.आर.एस मिसळून ठेवा. जेणेकरून डिहायड्रेशनपासून संरक्षण होईल. उन्हाळयात बाइक चालवताना शक्यतो टाइट कपडे न घालता मोकळेढाकळे कपडे घालायल हवेत. जास्तीत जास्त सुती कपडे वापरा. यामुळे शरीरातील घाम सहज शोषला जातो. तसंच उष्णतेपासून तुमचं पूर्ण संरक्षण व्हावं या उद्देशाने पूर्ण बाह्या असलेले कपडेच घालायला हवेत. हातांमध्ये ग्लोव्ह्ज आणि पायात चांगले बूट असले पाहिजेत, अशा महत्त्वाच्या टिप्सही त्याने दिल्या.     

स्पीड ब्रेकर आला की आपण तो हळूच क्रॉस करून पुन्हा स्पीड पकडून पुढे जातो. आयुष्यातही प्रॉब्लेम आल्यावर थोडं स्लो होऊन प्रॉब्लेमला सामोरं जाऊन पुन्हा स्पीड पकडून पुढे जायचं असतं. राइडला निघाल्यावर डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत कितीही प्रॉब्लेम आले तरी त्यावर मात करून तिकडे आपण पोहोचतो. तसंच आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर मात करून पुढे जायचं असतं. बाइक ही रायडर्ससाठी फक्त एक मशीन नसून एक इमोशन आहे, हे योगेशसारख्यांच्या बाइक भ्रमंतीवरून पुन:पुन्हा सिद्ध झालं आहे.

viva@expressindia.com

सफरनामा: सेवा आणि प्रवास!

पर्यटन विश्वामध्ये प्रत्येक पर्यटकाची आपली स्वतंत्र अशी फिरण्याची स्टाइल असते. व्हॉलेंटिअर टुरिझम म्हणजेच स्वेच्छा पर्यटन किंवा स्वयंसेवक पर्यटन, हा पर्यटन विश्वातला सध्याचा आकर्षक ट्रेण्ड आहे.

Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
(सफरनामा: सेवा आणि प्रवास! )

मितेश रतिश जोशी
स्वयंसेवक व्हा आणि पर्यटनाच्या अशा एका मोहक स्वप्नात प्रवेश करा, ज्याची जादू दीर्घकाळ तुमच्या मनाला मोहवत राहील..

पर्यटन विश्वामध्ये प्रत्येक पर्यटकाची आपली स्वतंत्र अशी फिरण्याची स्टाइल असते. व्हॉलेंटिअर टुरिझम म्हणजेच स्वेच्छा पर्यटन किंवा स्वयंसेवक पर्यटन, हा पर्यटन विश्वातला सध्याचा आकर्षक ट्रेण्ड आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून परदेशात हा ट्रेण्ड फॉलो केला जात असला तरी भारतात आता कुठे या पर्यटनाला अच्छे दिन आले आहेत.

article about hitchhiking story hitchhiking from the road

सफरनामा : माणुसकीची लिफ्ट

ran chabahar port important for india

विश्लेषण : इराणच्या चाबहार बंदरातून भारताचा व्यापार थेट रशियापर्यंत… चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाला आव्हान?

The country security market is estimated to reach dollars 736 billion by 2029 print eco news

देशाची सुरक्षा बाजारपेठ २०२९ पर्यंत ७३६ कोटी डॉलरवर जाण्याचा अंदाज

Upasana Makati, White Print, first Braille magazine, visually impaired people

दृष्टीहिनांसाठी पहिलं ब्रेल मासिक काढणारी उपासना मकाती

व्हॉलेंटिअर टुरिझम म्हणजे नेमकं काय? तर पर्यटनासाठी देश-विदेशातील एखादं स्थळ निवडायचं. तिथं जाऊन स्वेच्छेने काम करायचं. मोबदल्यात समोरची संस्था आपल्या राहण्याचा, खाण्याचा सगळा खर्च करते. अशा प्रकारचं काम पर्यटन क्षेत्रातील एखाद्या हॉस्टेलमध्ये हमखास मिळू शकतं. हॉस्टेलमध्ये दिवसभर काम करायचं. तुमच्यातील अंगभूत कलागुण, कौशल्य इतर पर्यटकांना शिकवायचे. उरलेल्या वेळेत मनसोक्त हिंडायला बाहेर पडायचं. उभय देशांची संस्कृती आदानप्रदान करायची, तिथल्या शाळांमध्ये जाऊन एखादी भाषा, नृत्य, गायन, चित्रकला शिकवायची वा मुलांना एखादं वाद्य वाजवायला शिकवायचं. याबदल्यात कोणताही आर्थिक मोबदला न घेता संबंधित संस्थेकडून राहण्याची, जेवणाची व फिरण्याची व्यवस्था मोफत होतेच. हेच असतं व्हॉलेंटिअर टुरिझम! अलीकडच्या काळात बराच लोकप्रिय झालेला ट्रेण्ड.

व्हॉलेंटिअर टुरिझमचं नियोजन अगदी सोपं आहे. सर्वप्रथम आपण एखादा देश आणि तेथे उपलब्ध असलेल्या संधीसाठी किती वेळ देऊ शकतो? आपले छंद कोणते? आपल्यात कोणती कौशल्ये आहेत? या सगळय़ाचा अभ्यास करावा. हे कळलं की प्रवासाची आखणी करणं सोपं जाईल. आपला व्यवसाय वा नोकरी सांभाळून, प्रकृतीला मानवेल यानुसार एखादं काम निवडायचं. लहान मुलांना शिकवणं आवडत असेल तर अनेक संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या सामाजिक कार्यात रस असेल, प्रशासकीय कार्याची आवड असेल वा वैद्यकीय सेवा देण्याची आवड असेल तर तशी सेवा देऊन तुम्ही पर्यटनाचीही मजा लुटू शकाल. भारतासह परदेशातही काही बिगर-सरकारी संस्था आहेत ज्या अशा पर्यटनाला प्रोत्साहन देतात. नेटसर्फिगमधून तुम्हाला त्याची इत्थंभूत माहिती मिळू शकते.

डोंबिवलीचा इंद्रजीत मोरे हा तरुण २०१८ पासून फक्त आणि फक्त व्हॉलेंटिअर टुरिझम करत आपला सफरनामा एन्जॉय करत असतो. जगभर हे पर्यटन कसं चालतं याची माहिती देताना तो म्हणाला, ‘संपूर्ण जगभर सध्या या भ्रमंतीची क्रेझ आहे. लेह-लडाखमध्ये काही शाळा आहेत, ज्या फक्त स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालवल्या जातात. त्यासाठी भारतभरातून मुलं आपला अर्ज दाखल करतात. त्यांचं शिक्षण व इतर कौशल्यं तपासून त्यांची निवड केली जाते. त्यांना शाळेत शिकवण्यासाठी विषय आणि तास दिले जातात. तितके तास पूर्ण झाले की उरलेल्या वेळेत स्वयंसेवक एक तर त्यांची कामं करू शकतात किंवा भटकंती. आफ्रिका या देशात शेतांमध्ये व्हॉलेंटिअर टुरिझम चालतं. यातून तुम्हाला तेथील शेतीच्या पद्धतीची माहिती मिळते आणि सोबत तुम्ही तो देशही फिरू शकता. कोस्टारिका या देशात जंगलाचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे, त्यामुळे तिथे जंगल संवर्धन प्रकल्प चालतात. त्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता भासते.’ असे अनेक प्रकल्प जगभर सुरू असतात. त्यानिमित्ताने सलग काही महिने एका ठिकाणी राहून एक नवीन संस्कृती जवळून अभ्यासायला मिळते. वेगळं काही तरी शिकायला मिळतं, असं तो सांगतो. व्हॉलेंटिअर टुरिझम तुम्हाला तुमची चौकट मोडायला लावतं. आपल्याकडे जी माहिती नाही ती माहिती करून देतं. वेगळे अनुभव जगायला शिकवतं’, असंही तो नमुद करतो.

मुळातच ही संकल्पना केवळ स्वयंसेवकांसाठी डिझाइन केलेली आहे हे सगळय़ांनी समजून घ्यायला हवं, असं सांगत इंद्रजीतने या पर्यटनाच्या काही इतर नकारात्मक बाजूंवरही प्रकाश टाकला. एखादी संस्था जेव्हा तुम्हाला त्यांचा स्वयंसेवक म्हणून निवडते, तेव्हा अर्थातच त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये मदत मिळेल या हेतूने तुमची निवड झालेली असते. फिरणं हा मुद्दा तिथे प्रथमस्थानी नसतोच. आता नेमकं यात उलट घडू लागलं आहे. मुलं कामाला कमी आणि फिरायलाच अधिक प्राधान्य देतात, त्यामुळे संबंधित संस्थेची गळचेपी होते. त्या पर्यटनातला आनंद भरकटून जातो. तसंच या पर्यटनात आपण आपल्या घरापासून, रोजच्या मित्रमंडळींपासून शेकडो मैल लांब असतो, त्यामुळे एकटेपणा वाटणं साहजिक आहे. अशा वेळी जर एखादा पर्यटक मानसिक संतुलन सांभाळू शकला नाही तर त्याला नैराश्यसुद्धा येतं, असं सांगणाऱ्या इंद्रजीतने गोव्यात बारमध्ये काम करताना आपल्याला नैराश्य आल्याचं सांगितलं. ‘त्यावर उपाय म्हणून मी माझं काम संपल्यावर एका कॅफेत जाऊन बसायचो, समुद्रावर फिरायला जायचो. असे उपाय आपलेच आपल्याला शोधावे लागतात’ असंही त्याने सांगितलं.

पुण्यातील मधुरा हुबळीकर ही तरुणीसुद्धा व्हॉलेंटिअर टुरिझममध्ये सहभागी होत असते. धरमकोटमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहून तिथल्या पर्यटकांकडून मधुराने भरतनाटय़मचे धडे गिरवून घेतले. व्हॉलेंटिअर टुरिझमला निघण्याआधी नियोजन कसं असावं हेही ती सविस्तर सांगते. ‘मुळातच व्हॉलेंटिअर टुरिझमसाठी वयाचं बंधन नसतं. कोणतंही पर्यटन स्थळ निवडण्याची जरी मुभा असली तरी त्यासाठी किती खर्च येणार आहे, तो कसा करायचा, तेथे मोफत सेवा द्यायची की खर्चापुरते पैसे घ्यायचे वा त्याबदल्यात राहण्याची- खाण्याची सोय करून घ्यायची हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. एकूण खर्च आणि निधीची उपलब्धता यासाठी तुमचं बजेट निश्चित असायला हवं. तुम्ही किती वेळ देऊ शकता, हे पाहून त्यानुसार पर्यटनाला निघण्यापूर्वीच कोणतं काम करायचं हे ठरवा. तेथे गेल्यावर अर्धवेळ काम करणार की पूर्णवेळ, उर्वरित वेळेत की वीकएंडला पर्यटनाला जाणार हे ठरवून त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करावी लागते. याशिवाय, विदेशी भाषा, तेथील खाद्यपदार्थ, तेथील संस्कृतीशी जुळवून घेण्याची तयारी ठेवावी लागते. तडजोड करण्याच्या तयारीबरोबरच भावनेपेक्षा व्यवहार जपण्याची मानसिकता अंगी बाणवून घ्यावी लागेल’ असंही ती सांगते. ‘उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी गेल्यावर कोणत्याही विदेशी मुलगा वा मुलगीबरोबर रूम शेअर करण्याची, स्वत:चं जेवण स्वत: बनविण्याची, अस्वच्छ टॉयलेट्स वापरण्याची तयारी ठेवावी लागते. त्याचबरोबर हे पर्यटन आपण एकटे करत आहोत याचं सतत भान ठेवावं लागतं. कोणत्याही क्षणी बेसावध राहता येणार नाही, हे जरूर ध्यानात घ्या. प्रत्येक व्यक्तीला याचे भिन्न अनुभव येतात. म्हटलं तर सगळंच ‘अभूतपूर्व’, म्हटलं तर पुन्हा कधीही जाणार नाही इतपत मानसिकताही तयार होऊ शकते. प्रत्येकानं ठरवायचं साहसी, धाडसी पर्यटन करायचंय तरच मग चला पुढे..’ असा सल्लाही तिने दिला. 

व्हॉलेंटिअर टुरिझमसाठी आवश्यक आहे धीटपणा, आत्मविश्वास, एखादं लक्ष्य ठरवून ते नेटाने पूर्ण करण्याची चिकाटी, समोर आलेल्या परिस्थितीत तडजोड करण्याची तयारी आणि विचारांमधील स्पष्टता. हे गुण अंगी असतील तर अशा प्रकारच्या पर्यटनाचा तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता. आणि अर्थातच ‘सेवा’ केलीत तरच पुढचा तुमचा ‘सफरनामा’ सुकर होईल.

सफरनामा: होली खेले मसाने में..

होळीच्या निमित्ताने भारतातल्या प्रसिद्ध शहरांना भेट देऊन तिथल्या लोकसंस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक मुसाफिर बाहेर पडतात. होळी आणि राधाकृष्ण यांचं एक अतूट नातं आहे.

viva
(नाशिकची रहाडी होळी )(बरसानाची होळी)

मितेश रतिश जोशी

देशभर होळीच्या सणाची धूम सुरू आहे. भारतातील काही शहरांमध्ये खास होळी पाहण्यासाठी भ्रमंती केली जाते, ज्यात भारतीयांसह परदेशी पर्यटकांचाही मोठा सहभाग असतो.

Smuggling camels from Pune to slaughterhouses in Karnataka

पुण्यातून उंटाची तस्करी… कसा उघडकीस आला प्रकार?

Hajj pilgrims, app, devotees,

हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा

gadchiroli Naxalites marathi news, gadchiroli naxal marathi news

गडचिरोली: पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त

Nagpur, Police Raid, Prostitution, Prostitution, Prostitution in Nagpur, Wathoda Area, Two Arrested, two women arrested in prostitution business,

नागपूर : वाठोडा परिसरात एका सदनिकेत देहव्यापार, दोन तरुणींची सुटका तर दोघींना अटक

tadoba andhari tiger project, nayantara tigeress, tigeress did hunt, nayantara tigeress did hunt, tigeress did hunt hide it in water,nimdhela buffer zone, Nayantara tigeress in tadoba, tadoba in Chandrapur, tadoba news, tiger news, Chandrapur news,

VIDEO : ‘नयनतारा’ला ‘भोला’ अन् ‘शिवा’ची भीती! शिकार लपवण्यासाठी ‘ति’ने काय केले, एकदा पहाच…

Kisan Kathore, Kapil Patil,

कपिल पाटलांच्या विजयासाठी कथोरेंचे विशेष मनोगत, घरोघरी पोहोचवलेल्या प्रचार पत्रावर कथोरेंचे आवाहन

Girl brutally killed by boyfriend in Mankhurd

मानखुर्दमधील तरुणीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, स्थानिकांमध्ये संताप

Loksatta editorial Spices Board bans some Indian brand products from Singapore and Hong Kong

अग्रलेख: अनिवासींच्या मुळावर निवासी!

होळीच्या निमित्ताने भारतातल्या प्रसिद्ध शहरांना भेट देऊन तिथल्या लोकसंस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक मुसाफिर बाहेर पडतात. होळी आणि राधाकृष्ण यांचं एक अतूट नातं आहे. याच नात्याचं दर्शन उत्तर प्रदेशातील मथुरा, वृंदावन, बरसाना, नंदगाव या शहरांमध्ये घडतं. श्री कृष्णाच्या भूमीतील होळीच्या सणाची धूम अनुभवण्यासाठी अनेक ट्रॅव्हल कंपन्या ‘होळी स्पेशल टूर’ आयोजित करू लागल्या आहेत. इथल्या होळीतील या मजा-मस्तीची मूळ भावना म्हणजे प्रेम आणि भक्ती. मथुरा – वृंदावनमध्ये आठ दिवस होळी खेळली जाते, त्यामुळे पर्यटकांना भ्रमंतीसाठी बरेच दिवस हाताशी मिळतात. इथल्या होळीला लाठमार होली, फुलों की होली, लड्डू होली अशी नावं आहेत. नावाप्रमाणेच गमतीजमती यामागे दडल्या आहेत.

फाल्गुन महिन्याच्या द्वितीया तिथीला फुलों की होली मथुरेमध्ये साजरी केली जाते. या सणाला फुलेरा दूज असं देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे रंगांनी होळी खेळण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे वृंदावनमधील बाकेबिहारी मंदिरात श्रीकृष्णाबरोबर फुलांनी होळी खेळण्याची रीत आहे. वेगवेगळय़ा फुलांच्या पाकळय़ा श्रीकृष्णावर उधळल्या जातात. यामागची दंतकथा अशी आहे की बरेच दिवस भगवान श्रीकृष्ण राधेला भेटायला वृंदावनात गेले नाहीत. त्यामुळे राधा व गोपिका रुसल्या. राधेच्या रुसण्याने मथुरेमधील झाडं, पानं, फुलं अगदी कोमेजून गेली. मथुरेतील सृष्टिचैतन्याला धक्का पोहोचलेला पाहून श्रीकृष्णाने सकल सृष्टी पुन्हा चैतन्यमय केली. सगळीकडे पुन्हा हिरवळ दाटली. रंगीबेरंगी फुलांनी झाडं डोलू लागली. राधेचा रुसवा घालवण्यासाठी श्रीकृष्णांनी राधेच्या अंगावर फुलं उधळली. तेव्हापासून या होळीला सुरुवात झाली, असं सांगितलं जातं.

मथुरेपासून ४२ किलोमीटर अंतरावर राधेचं जन्मस्थान असलेल्या बरसानाची होळी विशेष आकर्षण ठरलं आहे. नंदगावमधील पुरुष राधेच्या मंदिरावर आपला मानाचा झेंडा फडकवण्याच्या निमित्ताने व बरसानाच्या मुलींबरोबर होळी खेळण्याच्या आशेने येतात, पण रंगांऐवजी गोपींकडून त्यांना लाठय़ा-काठय़ा मारल्या जातात. त्यामुळे इथल्या होळीला लाठमार होळी किंवा लठ्ठमार होळी असं म्हणतात. या थट्टा-मस्करीत चाललेल्या लढाईत आपण पकडले जाऊ नयेत यासाठी सगळे पुरुष सर्वतोपरी प्रयत्न करतात. तरीही कुणी एखादा सापडतोच, मग त्याला मुलींकडून चांगलाच चोप मिळतो.  त्यांना स्त्रियांचा पोशाख घालून सार्वजनिक ठिकाणी नृत्य करायला सांगितलं जातं. पर्यटन आणि सुरक्षिततेच्या हितासाठी येथील राज्य पर्यटन मंडळाने पर्यटकांसाठी उत्कृष्ट व्हेंटेज पॉइंट्स उभारले आहेत. शहराच्या बाहेरील बाजूला एक मोठं मोकळं मैदान सणाच्या सर्वात भव्य प्रदर्शनासाठी खुलं केलं जातं.

खरंतर पूर्वीपासून होळीचं दहन केल्यानंतर जी राख शिल्लक राहते, त्यापासून होळी खेळण्याची प्रथा आहे. मात्र एका ठिकाणी होळीच्या राखेपासून होळी न खेळता चक्क स्मशानभूमीतील चितेच्या राखेपासून होळी खेळली जाते. वाराणसीमध्ये जी होळी खेळली जाते त्यात चितेच्या राखेचा समावेश असतो. याविषयी माहिती सांगताना ‘नोमॅडिक ट्राईब्स’ या ट्रॅव्हल कंपनीचा सर्वेसर्वा वैभव खैरे म्हणाला, ‘काशीमध्ये चितेच्या राखेपासून होळी खेळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. ही तेथील एक परंपरा आहे. वाराणसीमध्ये फाल्गुन शुक्ल एकादशी ही रंगभरी एकादशी या नावाने साजरी केली जाते. असं म्हटलं जातं, भगवान शंकराने गौरीबरोबर होळी खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी शंकराच्या भक्तांनी चितेच्या राखेपासून होळी खेळली होती. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे. वाराणसीमधील ‘मणिकर्णिका घाट’ म्हणजेच ‘महाश्मशान घाटा’वर लोक एकत्र येऊन बरोबर १२ वाजता श्मशानेश्वर महादेव मंदिरात शंकराची आरती करतात. त्यानंतर जळत असलेल्या चितेमधील गरम राख काढून त्यापासून होळी खेळण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे ही होळी खेळण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. परदेशी पर्यटकही खास या होळीसाठी येतात’.

काशीमधील रस्ते या काळात स्मशानभूमीच्या राखेने भरलेले आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे कोणी तोंडावर राख चोळतं आहे, तर कोणी चितेच्या भस्मात न्हाऊन निघालं आहे असं दृश्य ठिकठिकाणी दिसत असल्याचं वैभव सांगतो. काही जण गळय़ात मानवी कवटीची माळ घालून, जिवंत साप धरून नाचत असतात. तर कोणी प्राण्यांची कातडी घालून ढोल वाजवतात. एकीकडे चिता जळत असते तर दुसरीकडे लोक त्याच्या राखेची होळी खेळतात. सुख आणि दु:ख, भीती आणि आनंद यांचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर काशीला येऊन ही होळी पाहायलाच हवी, असं वैभवने सांगितलं.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याची रीत असली तरी नाशिकमध्ये मात्र रंगपंचमी साजरी केली जाते. रहाडीची अनोखी प्रथा फक्त नाशिकमध्येच आढळते. नाशिकमध्ये हेरिटेज वॉक घेणारी ‘इरा सेंटर ऑफ इंडिक स्टडीज’ची अनिता जोशी याविषयी सांगते, ‘रंगोत्सवासाठी पेशवेकाळापासून विविध भागांत रहाडींची म्हणजे दगडी बांधीव हौदांची निर्मिती करण्यात आली होती. पेशवेकाळात अशा १८ रहाडी होत्या. सध्या तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, तांबट आळी, शनी चौक, मधली आळी आणि जुनी तांबट आळी अशा सहा रहाडी उरल्या आहेत. पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारीत असणाऱ्या या रहाडींची जबाबदारी नंतर विविध तालमी आणि स्थानिक मंडळांकडे आली. शनी चौकात गुलाबी, दिल्ली दरवाजाजवळ केशरी, तिवंधा चौकात पिवळा असा प्रत्येक रहाडीचा रंग वेगळा. या रहाडीच्या पूजेचा, पहिली उडी मारण्याचा मान देखील ठरलेला असतो. रंगपंचमीला रहाडीत धप्पा मारून आला नाही तो नाशिककरच नाही. अशी ही अनोखी होळी पाहण्यासाठी नाशिककर तर एकत्र येतातच, पण मुंबई-पुण्यातील लोक हा उत्सव याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात’.

गोव्याच्या होळीला पारंपरिक व सेलिब्रेशन असे दोन रंग आहेत. होळीच्या सुट्टीच्या निमित्ताने एन्जॉय करण्यासाठी तरुण पर्यटक आवर्जून गोव्याला भेट देतात. गोव्यातील शिमगोत्सव चौदा दिवस चालतो. दसऱ्याच्या दिवशी शत्रूंशी लढून होळीच्या वेळी घरी परतलेल्या योद्धयांच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. एक प्रकारे गोव्यातील शिमगा हे पौराणिक कथा आणि सांस्कृतिक कार्निव्हल यांचं मिश्रण आहे. धाकटो शिमगा (छोटा शिमगा) आणि थोरलो शिमगा (मोठा शिमगा) असे याचे दोन भाग आहेत. धाकटो शिमगा हा सण बहुतेक शेतकरी, मजूर मिळून गावांमध्ये साजरा करतात. त्याचवेळी थोरलो शिमगा हा सगळे पारंपरिक गाणी आणि नृत्य करत एकत्र साजरा करतात. इथे होळीच्या संध्याकाळी  सुरू होणारी परेड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. फ्लोटिंग स्ट्रीट परेड (गोवा फ्लोटिंग परेड) हे शिमगा उत्सवाचं मुख्य आकर्षण आहे. या परेडमध्ये गोवा आणि भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेशी निगडित भव्य झांकी दाखवली जातात. यात हिंदू देवी-देवतांची झलकही पाहायला मिळते. परेडमध्ये भाग घेणारे लोक पौराणिक देवांपासून ते राक्षस आणि आत्म्यापर्यंत विविध पात्रांच्या पोशाखात येतात. वेगवेगळय़ा गावात रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू असतात. कार्निव्हलमध्ये घोडा मोडणी, फुगडी आणि रोमटामेल या गोव्यातील लोकनृत्यांसह पर्यटकांचं मनोरंजन केलं जातं.

दक्षिण गोव्यातील ‘शेनी उजो’ ही होळीदेखील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रिबदू आहे. शेनी म्हणजे शेणी तर उजो म्हणजे अग्नी. मळकर्णे गावात ही होळी साजरी केली जाते. गावातील काही तरुण होळीच्या रात्री मल्लिकार्जुनाच्या देवळासमोर एकत्र येतात. यावेळी होळीची माडी (फोफळीचे कांड) वाजत-गाजत आणली जाते. देवळासमोरील मांडावर ती उभी केली जाते आणि तिथूनच होळीला सुरुवात होते. या होळीच्या माडीवर गावातील तरुण चढतात. खाली असलेले लोक पेटलेली शेणी त्या तरुणांवर फेकून मारतात. माडीवर शेण्या फेकून मारल्या की त्या आपटून आगीच्या ठिणग्या उडतात. ही वेगळय़ा प्रकारची होळी पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांची गर्दी जमते.

कुठे रंग तर कुठे फुलं, कुठे धूळ तर कुठे चिताभस्म. सण एकच पण त्याची नावं अनेक. आनंद एक पण तो साजरा करण्याच्या तऱ्हा अनेक. सरतेशेवटी लोकसंस्कृतीचा आनंद देणारा हा ‘कलरफुल सफरनामा’ हा एक वेगळाच जिवंत रसरशीत अनुभव म्हणायला हवा.  

सफरनामा: घळीचा थरार!

‘घळ’ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. कात्राबाईची घळ ही सह्याद्रीमधील सर्वात खोल घळ आहे. घळीची सैर करणे म्हणजे अत्यंत कठीण काम.

Loksatta viva Safarnama Nature Katrabai Ghal is the deepest ghal in Sahyadri
सफरनामा: घळीचा थरार!

मितेश रतिश जोशी

‘घळ’ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. कात्राबाईची घळ ही सह्याद्रीमधील सर्वात खोल घळ आहे. घळीची सैर करणे म्हणजे अत्यंत कठीण काम. दोन्ही बाजूला उंचच उंच अजस्र कडे आणि त्यात मानव म्हणजे जणू मुंगीच.. पण तिथून सह्याद्रीच्या रांगडय़ा रूपाचे आणि नितांतसुंदर निसर्गाचे दर्शन मात्र घडते.

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.. ही ओळ महाराष्ट्राचे रांगडे रूप दाखवते. महाराष्ट्रात भ्रमंती करताना अशा एका उंच टोकावर आल्यावर सह्याद्रीचे रौद्र रूप दिसते. त्यासोबत असतो मनाला आनंद देणारा निसर्ग! अशा या नितांतसुंदर पण तितकेच रौद्र रूपाचे दर्शन आपल्या भटकंतीतून घेतलेल्या तरुण तुर्काचा सफरनामा आज पाहू या. दोन्ही बाजूला भिंतीसारखे डोंगर असून मधल्या भागात असलेल्या अत्यंत अरुंद दरीला घळ असे म्हणतात. पावसाच्या पाण्याच्या क्षरणकार्यामुळे जमिनीवर, विशेषत: डोंगरउतारावर, तयार झालेला खोल, अरुंद, लांब व बहुधा वाकडातिकडा भूभाग. पाण्याबरोबर आलेल्या दगडगोटय़ांच्या घर्षणामुळे घळ अधिकच खोल व रुंद होत जाते. पावसाळय़ानंतर घळ कोरडी पडते. ती शेवटी नदीनाल्यास मिळते किंवा सपाटीवर संपते. घळीच्या बाजूंवर कधी कधी गवत किंवा झुडपे उगवलेली दिसतात. वेडय़ावाकडय़ा, कोरडय़ा घळीत आणि तिच्या कपारीत वन्य श्वापदांना किंवा एकांतप्रिय माणसांना आसरा मिळतो. गाळजमिनीत प्रवाहांमुळे खोल घळी तयार होऊन शेवटी उत्खातभूमी बनते. सपाट जमिनीवरही वनस्पतीचे आच्छादन नसेल, तर पावसाच्या पाण्याने मातीचे कण वाहून जाऊन तिच्यावर लहान लहान नाळी पडतात. शेजारशेजारच्या नाळी एकत्र होऊन घळ बनते. अशा या सह्याद्रीमधील सर्वात खोल कात्राबाईच्या घळीची सैर मुंबईच्या सूरज मालुसरे या तरुणाने व त्याच्या तीन साथीदारांनी केली आहे.    

हा सफरनामा इतर सफरनामांपेक्षा निश्चितच कठीण आणि संघर्षमय होता. सर्वात पहिला संघर्ष होता तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. या घळीमध्ये येण्यासाठी सूरजने सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची सोय केली. घळ खाली उतरताना रतनगडाच्या चौफुल्याच्या वाघ टाक्याचे ४० ते ५० लिटर पाणी कॅनमध्ये भरून घेतले. नाही तर पाण्यासाठी रांजण सुळक्याच्या खाली साधारण दीड तासानंतर पाणी मिळाले असते. मधल्या सहा रॉक पॅचेसमध्ये कुठेच पाण्याचा अंश नाही. खालून पाणी चढवायचे कामही खूप जिकिरीचे आहे. एखाद्या डोंगरमाथ्यावर पाणी पोहोचवणे तसे खूप सोपे असते, पण घळीमध्ये पाणी पोहोचवणे किंवा जेवण घेऊन जाणे महामुश्कील आहे. जी व्यक्ती जेवण किंवा पाणी घेऊन येतेय तिला गिर्यारोहणासारखे साहस स्वत:हून जमले पाहिजे तरच काही तरी होऊ शकते. त्यामुळे सूरज व त्याच्या साथीदारांनी पाण्याबरोबरच गुळपोळी, सफरचंद, संत्री, मॅगी, चहा, कॉफी, खिचडीचे सर्व सामान एकत्र करून बॅगेत अक्षरश: कोंबले होते.    

घळीची सैर एकूण तीन दिवसांची होती. रतनगडाच्या दक्षिण बाजूने बघितले की समोरील करवतीच्या पात्यासारखी कातरलेली डोंगररांग म्हणजे कात्राबाईची डोंगररांग होय. सात डोंगर करवतीच्या पात्याप्रमाणे तयार झाले आहेत, कात्राबाईचे सौंदर्य खरे तर पावसाळय़ात व हिवाळय़ात पाहायला खूप छान वाटते. धुक्याने अंथरलेल्या ढगांच्या आच्छादनात यांचे रूप बघताना देहभान विसरायला होते. पहिल्या दिवशी शाही नदीपात्राच्या बाजूने सुरू झालेली वाट उंचच उंच अजस्र कडय़ांपाशी येऊन थांबली. निसर्गाच्या नजीक नदीपात्रातील जेवणाची पंगत म्हणजे कोणत्याही फिरस्त्यासाठी स्वर्गसुखच! अशा या सुखाचा अनुभव घेऊन रतनगडला मागच्या बाजूला ठेवून सर्वानी रांजणच्या दिशेने कूच केली. सूर्यास्ताआधी रांजण सुळक्याच्या पायथ्याला मुक्कामाची जागा निश्चित करून पाण्याची सोय कुठे करता येईल का, याची चाचपणी करून प्लास्टिक पिशवीच्या साहाय्याने टोपात पाणी जमा करायचे काम केले, असे सूरज सांगतो. त्यानंतर सूरज व त्याच्या साथीदार प्रमोदने एक जुगाड केला. सूर्य मावळायला काही मिनिटे बाकी असताना पहिल्या रॉक पॅचच्या खाली जाऊन पाहणी केली. एका रबरी बॉलला नायलॉनची दोरी लावून चोक स्टोनच्या वरती टाकण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा अपयश आले, पण तिसऱ्या वेळेला बॉल बरोबर त्या गॅपमधून बाहेर आला. लगेच दहा एमएमचा रोप लावून दुसऱ्या बाजूला खेचून घेतला. त्यामुळे उगाच त्या कातळाला ड्रिलने चैन ब्लोटिंग करून चढाई करावी लागली नाही. निसर्गाला आपल्या आनंदासाठी त्रास नको या विचाराने हा जुगाड केल्याचे त्याने सांगितले. सहा जण खाली बेस कॅम्पला थांबले. सूरजबरोबर सचिन मदने, प्रसाद सावंत, वसंत यादव असे चौघे जण हा थरार अनुभवत होते.      

दुसऱ्या दिवशी सकाळी कातळाची पूजा करून प्रस्तरारोहणाला त्यांनी सुरुवात केली. उंच किंवा उभ्या कडय़ांवर एखाद्या उपकरणाच्या मदतीने चढण्याची क्रिया म्हणजे प्रस्तरारोहण होय. सर्वात पहिले २० फूट डोंगराची खडकाळ उतरण होती. त्यानंतर सूरजने जुमारिंग सुरू केले. जुमारिंग म्हणजे गिर्यारोहाणामध्ये उपयुक्त अशी दांडा असलेली पकड, ती ज्या दोराला अडकवलेली असते त्या दोराच्या वरच्या बाजूला सहजपणे सरकते, पण खालच्या दिशेने दाब देताच ती स्थिर होते. अंदाजे २० फुटांवरती जुमारिंग करत पहिला बोल्ट मारून हँगर प्लेटमध्ये क्विक ड्रॉ टाकून सूरजने स्वत:ला लीड क्लायिम्बगच्या रोपने सुरक्षित केले. सूरजला खालून सचिनने  belay दिला होता. अजून १५ फूट जुमारिंग करून चोक स्टोनच्या खाली दुसरा बोल्ट मारला. मजल दरमजल करत पहिल्या रॉक पॅचचा माथा आम्ही गाठला, असे सूरजने सांगितले. अशा एकूण सहा पॅचमधून त्यांना प्रवास करायचा होता. वर काही आणीबाणी आलीच तर खालची टीम हा टप्पा चढून वर पोहोचू शकेल या हेतूने सूरजने रोप यू करून खाली सोडून दिले. दुसरा आणि तिसरा रॉक पॅच तसा एकमेकांना लागून होता. त्यात दुसऱ्या पॅचखाली मुबलक पाणी वाहत होते. सूरज व त्याच्या साथीदारांचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम एका कपारीत होता.     

तिसऱ्या दिवशी सकाळी तिसरा रॉकपॅच सर करण्याची त्यांची धडपड सुरू झाली. धडपड हा शब्दच इथे योग्य राहील. कारण इथे सूरज दोन वेळा पाय ठेवताना घसरला. त्याला इतर साथीदारांनी धीर दिला व त्याने अखेर तिसऱ्या रॉकपॅचवर पाऊल ठेवले. तासाभरात चौथा व पाचवा रॉकपॅचही त्यांनी सर केला. शेवटचा व सहावा रॉकपॅच सर करायला सुरुवात केली. समोर कात्राबाईचा माथा दिसत होता. आता काहीही झाले तरी पण आपण आजच्या आज कात्राबाईचा माथा गाठायचा असा सर्वानी निर्धारच केला. दुपारचे चार वाजून गेले होते. शेवटचा पॅच गिर्यारोहणासाठी उत्तम होता. मोहिमेचा शेवटचा टप्पा दिसत होता. त्यामुळे सर्वाच्या अंगात बळ आले. मागोमाग क्रमाने सर्व वरती आले. कात्राबाईचा माथा गाठल्यानंतर सर्वानी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला. अशा प्रकारे ही घळमोहीम फत्ते झाली.    

निसर्गाच्या सान्निध्यात, आभाळाच्या उघडय़ा छताखाली सूरज व त्याच्या साथीदारांचे तीन दिवस नितांतसुंदर गेले. ही घळमोहीम अत्यंत कठीण व तितकीच जीवघेणी होती. आमच्यातल्या एकाला जरी डॉक्टरची आवश्यकता लागली असती तर डॉक्टरला आमच्यापर्यंत यायलाच दोन दिवस गेले असते. त्यात तो डॉक्टरही ट्रेकर असायला हवा ही किमान अट. ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण किंवा गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. इथे रुजण्यासाठी, बहरण्यासाठी काही गोष्टींची सवय, अभ्यास, जाणीव, काळजी असावी लागते. ‘घळ उतरणे निराळे व घळ चढणे निराळे. आम्ही घळ उतरलो नाही, तर आम्ही घळ चढलो. कात्राबाईची घळ इतर घळीप्रमाणे सलग चढाई करू देत नाही. एक रॉक पॅच संपल्यावर दुसऱ्या रॉक पॅचवर जाताना मध्ये पायथा गाठण्यासाठी पंधरा मिनिटांची चाल आहे. त्यामुळे घळ सर करणे म्हणजे गिर्यारोहण नाही. आणि केवळ चालणेही नाही’ असे सूरज सांगतो. 

घळ उतरणे जेवढे अवघड त्याच्या दहापट अवघड घळ चढणे आहे. त्यामुळे हा सफरनामा म्हणजे आपली वाट आपल्यालाच शोधायला भाग पाडणारी लय अवघड गोष्ट आहे.

सफरनामा: सफर वारसास्थळांची..

अकेले ही तय करने होते हैं, कुछ सफर.. हर सफर में हमसफर नहीं होते!  फिरायला सर्वानाच आवडतं, प्रत्येकाच्या फिरण्याच्या दिशा वेगळय़ा असतात, तऱ्हा वेगळय़ा असतात, अनुभव वेगळे असतात.

Loksatta Safarnama Travel to heritage site India is a symbol of rich cultural heritage
सफरनामा: सफर वारसास्थळांची..

मितेश रतिश जोशी

अकेले ही तय करने होते हैं, कुछ सफर.. हर सफर में हमसफर नहीं होते!  फिरायला सर्वानाच आवडतं, प्रत्येकाच्या फिरण्याच्या दिशा वेगळय़ा असतात, तऱ्हा वेगळय़ा असतात, अनुभव वेगळे असतात. म्हणूनच तरुण तुर्काच्या फिरस्तीचा अनुभव आणि फंडा जाणून घेण्यासाठी ‘सफरनामा’ हे सदर दर पंधरवडय़ाला..

आपला भारत देश हा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं एक प्रतीक आहे. या देशातील भव्य ऐतिहासिक गावांमधून आणि शहरांमधून हा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा विखुरलेला आहे. पिढी दर पिढीतील विविध लोक आणि वंशांनी ही ऐतिहासिक गावं आणि शहरं उभारण्यात नुसतं योगदान दिलं आहे असं नव्हे तर हा वारसा अधिक समृद्ध केला आहे. आर्थिकदृष्टय़ा शाश्वत आणि एकसंध देश निर्माण करण्यात संस्कृती आणि वारसा हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच त्यांच्या संवर्धन आणि जतनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ‘हेरिटेज वॉक’ या माध्यमातून ही संस्कृती आणि वारसा येणाऱ्या पिढय़ांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो हा महत्त्वाचा भाग आहेच. मात्र गेल्या काही वर्षांत या ‘हेरिटेज वॉक’ प्रकाराने फिरस्तीच्या अध्यायातही महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे ‘सफरनामा’ या सदराची सुरुवात ‘हेरिटेज वॉक’ या नव्याने प्रचलित झालेल्या भटकंतीच्या प्रकाराने करूया..

शहराचं महत्त्व, जडणघडण आणि जुन्या शहरांची ओळख शहरात येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना आणि भावी पिढीला होण्याच्या दृष्टीने वारसास्थळांची सफर म्हणजेच हेरिटेज वॉक हा उपक्रम  राबविण्यात येतो. पूर्वी ज्याप्रमाणे मुंबई दर्शन किंवा पुणे दर्शन आयोजित केलं जायचं. त्याचप्रमाणे जुनं शहर त्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भातून पाहण्याच्या दृष्टीने हेरिटेज वॉक आयोजित केले जातात. हेरिटेज वॉक हे भारतामध्ये मुंबई, पुणे, बंगळूरु, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, नाशिक, औरंगाबाद, भोपाळ अशा विविध ठिकाणी होतात.

पुणे येथे ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून अनुराग वैद्य गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वारसास्थळांच्या अभ्यास सहली आयोजित करतो आहे. वारसा सहलींची पर्यटनविश्वाला गरज का आहे? या प्रश्नापासूनच अनुराग या विषयावर बोलायला सुरुवात करतो. ‘विविध शहरांमध्ये आणि गावांमध्ये सुंदर ऐतिहासिक वास्तू किंवा इमारतींजवळून जात अनेक लोक दररोज त्यांचं कार्यालय, शाळा किंवा त्यांचं पोहोचण्याचं ठिकाण गाठत असतात. मात्र जायची घाई त्यांना या वास्तूंकडे निरखून पाहण्यासाठी अजिबात सवड देत नाही. आपल्या गावाचा किंवा शहराचा वारसा असलेल्या वास्तू, इमारती हा त्या ठिकाणाचा इतिहास सांगत असतात. हेरिटेज वॉक हे देशातील परिचित आणि अपरिचित वारसा वास्तूंच्या समृद्धीचे अन्वेषण करण्याचा एक सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे’ असं अनुराग म्हणतो. स्थानिकांशी चांगले संबंध निर्माण करत, शहरातील किंवा गावातील ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी आवश्यक अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग वाढवायचा. त्या माध्यमातून शहराचा इतिहास, त्याचा चेहरामोहरा घडवण्यात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यात हेरिटेज वॉक मोलाची भूमिका बजावतं, असंही त्याने नमूद केलं.

गूढ सफर  

भुताखेतांच्या दंतकथा ज्या वास्तूंशी वा जागांशी जोडल्या गेल्या आहेत त्याविषयी एक उत्सुकता कायमच लोकांच्या मनात असते. मात्र अशी काही ‘ऐतिहासिक भुतांनी पछाडलेली’ वारसास्थळंही लोकप्रिय आहेत. या वारसास्थळांना भेट देण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे आता या अशा झपाटलेल्या ऐतिहासिक वारसा स्थळांचं पर्यटन हा नवाच प्रकार रूढ होऊ पाहतो आहे. ‘दिल्ली पर्यटन खात्याकडून घेण्यात येणाऱ्या हेरिटेज वॉकच्या यादीत दिल्लीतील सर्वात झपाटलेल्या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी दिल्लीतील अनेक ऐतिहासिक वास्तू त्यांच्या इतिहासापेक्षा ‘ऐतिहासिक भुतांनी पछाडलेल्या’ असल्याच्या समजुतीमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे हे सगळे हेरिटेज वॉक रात्रीच्या अंधारात होतात आणि अनेक पर्यटकांमध्ये यासारख्या हेरिटेज वॉकविषयी स्वारस्य असल्याचं लक्षात आलं आहे’ असं अनुरागने सांगितलं. या हेरिटेज वॉकची सुरुवात चाणक्यपुरीजवळील १४ व्या शतकातील ‘मालचा महल’पासून करण्यात येते. त्यानंतर भूली भटियारी का महल, फिरोजशाह कोटला, तुघलकाबाद किल्ला यासारख्या रहस्यमय कथा असलेल्या ठिकाणांना भेट दिली जाते. मुळात म्हणजे अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक लोकाग्रहास्तव सुरू केले गेले आहेत. पर्यटकांनी अशा स्वरूपाच्या झपाटलेल्या वास्तूंच्या कथांमध्ये विशेष रस दाखविल्याने प्राधान्याने या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. अद्याप संशोधक व आयोजक यांच्याकडून वास्तूंच्या गूढ, अनभिज्ञ पैलूंविषयी शोध घेणं सुरू आहे. त्यामुळे केवळ रंजकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्यात येतं आहे. किंबहुना अशा वॉकमध्ये सहभागी होणाऱ्यांना नेमकी काय माहिती सांगावी, त्या वास्तूचं महत्त्व लक्षात घेत त्याची सफर माहिती आणि रंजकता दोन्ही दृष्टीने कशी घडवता येईल यासाठीचं निश्चित धोरण आखण्याचं काम सुरू आहे. ‘अशा स्वरूपाचे हेरिटेज वॉक प्रथमच इतक्या उघडपणे भारतात दिल्लीमध्ये करण्यात आले आहेत. या स्वरूपाचे हेरिटेज वॉक पाश्चिमात्य देशांमध्ये प्रचलित आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील काही ऐतिहासिक झपाटलेल्या वास्तूंच्या मागे नेमकं कोणतं गूढ दडलेलं आहे ते जाणून घेणे मनोरंजक ठरेल. यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. जिज्ञासा हा मनुष्याचा मूलभूत गुण आहे. म्हणूनच गूढ, अकल्पित कथा, सिनेमा ऐकण्या – वाचण्याकडे अधिक कल असतो.  त्याचप्रमाणे रहस्यमय कथा असणाऱ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तशाच प्रकारची उत्सुकता इच्छुकांमध्ये दिसते’ असं अनुरागने सांगितलं. 

हेरिटेज वॉक आयोजित करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. मुख्य म्हणजे त्या वास्तू योग्य पद्धतीने माहिती असायला हव्यात. कोणतीही ऐतिहासिक वास्तू हा फक्त त्यामागच्या इतिहासाची उजळणी इतपत मर्यादित नसते. या वास्तू आपल्याला काही न काही गोष्ट नक्कीच सांगायचा प्रयत्न करत असतात. तत्कालीन बांधणी आणि रचनेवरून त्या वास्तूच्या इतिहासाचे अनेक पैलू उलगडत जातात. त्यासाठी विविध संदर्भ ग्रंथ, विविध तत्कालीन समकालीन पुस्तकात आलेली वर्णनं तसंच वास्तुरचना संदर्भात असलेली पुस्तकं अशा सगळय़ांचाच आधार घेत टूर गाईडना अशा हेरिटेज वॉकचं आयोजन करावं लागतं.    

वारसास्थळांची सफर घडवताना तत्कालीन कालखंडाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करणं किंवा प्रत्येक वास्तू आणि त्याचा इतिहास लक्षात घेणं, अभ्यासणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आपणच आपली संस्कृती, इतिहास पुढच्या पिढीच्या लक्षात आणून देऊ शकलो नाही तर हा वारसा पुढे नेणं अधिकाधिक आव्हानात्मक होत जाईल. अशा अनेक ऐतिहासिक वास्तू काळाच्या ओघात नष्ट होत चालल्या आहेत, काहींचे संदर्भ बदलत चालले आहेत.  त्यांचं महत्त्व अधिक असल्याने ते समजावून सांगणं गरजेचं आहे तरच हा वारसा पुढची पिढी टिकवू शकेल. ही गरज हेरिटेज वॉक या माध्यमातून फार सोप्या-सुलभ आणि रंजक पद्धतीने पूर्ण करता येते आहे. त्यामुळे इतिहास आणि वर्तमानाचा धागा जोडणारा हेरिटेज वॉक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरतो आहे.

सफरनामा: कला खजिना

भारतामध्ये धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी देवळांत जाऊन पूजाअर्चा करणं, अभिषेक करणं, निरनिराळय़ा फुलांनी मंदिर सजवणं या गोष्टींपलीकडे फारसं काही केलं जात नाही.

Loksatta safarnama Religious Tourism in India A trip to the temple India country
सफरनामा: कला खजिना

मितेश रतिश जोशी

अवघा भारत देश हा मंदिर स्थापत्याच्या बाबतीत श्रीमंत आहे. कुठल्याही राज्यात जावे तिथे एखादे तरी देखणे, सुंदर मंदिर आपले स्वागत करते. मंदिरांवर कोरलेला ‘कला खजिना’ सफरनाम्यात अधिकच आनंद देतो.

भारतामध्ये धार्मिक पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जात असले तरी देवळांत जाऊन पूजाअर्चा करणं, अभिषेक करणं, निरनिराळय़ा फुलांनी मंदिर सजवणं या गोष्टींपलीकडे फारसं काही केलं जात नाही. वास्तविक, आपल्याकडे असलेली प्राचीन मंदिरं ही त्या त्या काळात विशिष्ट हेतूने बांधली गेलेली आहेत. त्यांच्यावर कोरलेली विविध प्रतीकं, मूर्ती त्या विशिष्ट काळावर प्रकाश टाकत असतात, त्या दृष्टीने प्रत्येकाने मंदिर पाहायला हवं. मंदिर, मंदिरातील मूर्ती, मंदिरात असलेल्या विविध गोष्टी या काही विचार करून निर्मिलेल्या असतात. मंदिरावर असलेली अनेक प्रतीकं, चिन्हं, शिल्पं आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. मंदिर हे केवळ देवाचं निवासस्थान नसून ती एक सामाजिक संस्था आहे. इथं अनेक लोकांचा सतत वावर होत असल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीसाठी, त्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी, तत्त्वज्ञान खूप सोप्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात रुजवण्यासाठी मंदिरांची, त्यावरील शिल्पांची आणि इतर गोष्टींची निर्मिती झाली असं म्हणता येईल.

मंदिराचा सफरनामा करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे मंदिराचं प्रथम बाह्य दर्शन घ्यावं, असं सांगितलेलं आहे. आधी बाहेरून प्रदक्षिणा घालावी आणि नंतर मंदिरात प्रवेश करावा. मंदिरांवरील शिल्पांची रचनासुद्धा तशीच केलेली आहे. विविध प्रतीकं जी मंदिरांवर कोरलेली दिसतात, ती माणसाच्या आयुष्यातील विविध प्रसंग, गोष्टी यांची आठवण करून देणारी असतात. भारतातील एक अत्यंत देखणं मंदिर म्हणून ज्यांची नावं डोळय़ासमोर येतील त्यातलं एक म्हणजे मध्य प्रदेशमधल्या खजुराहो इथलं कंदारिया महादेव मंदिर! खजुराहो हे खरं तर मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातलं एक लहानसं गाव, परंतु इथं असलेल्या एकापेक्षा एक देखण्या मंदिरांमुळे हे गाव आज जगाच्या नकाशावर आलेलं आहे. चंदेल राजवटीच्या काळात इथं ८५ मंदिरं होती, असं सांगितलं जातं. सध्या फक्त २५ मंदिरं इथं उभी आहेत. इथं असलेल्या मंदिर समूहाला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. कंदारिया महादेव मंदिर हे त्यातलंच एक देवालय. अतिशय देखणं आणि मंदिर स्थापत्याच्या सगळय़ा खाणाखुणा आपल्या अंगावर अभिमानाने मिरवणारं हे मंदिर डोळय़ांचं पारणं फेडतं. मंदिर स्थापत्याबरोबरच खजुराहो मंदिरावर असलेलं मूर्तिकाम हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. इतकं देखणं आणि मोठय़ा प्रमाणावर असलेलं मूर्तिकाम दुसरीकडे कुठे क्वचितच बघायला मिळेल. कंदारिया महादेव मंदिराच्या बाह्य भागावर अतिशय देखणं मूर्तिकाम केलेलं आहे. या मंदिरावर असलेल्या देवकोष्ठात म्हणजेच कोनाडय़ात विविध देवदेवता, अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असं म्हणतात अशांच्या मूर्ती आहेतच, पण मुद्दाम बघाव्यात अशा अग्नी, ब्रह्मा यांच्या मूर्ती, तसेच गणपती आणि वीरभद्र यांच्यासमवेत सप्तमातृकांच्या मूर्ती हे इथलं खास आकर्षण आहे.  

कर्नाटकमधील हम्पी येथील विरुपाक्ष मंदिरात भौतिकशास्त्रातील पिनहोल कॅमेरा तंत्र सर्वाचंच लक्ष वेधून घेतं. मंदिराच्या मागच्या बाजूला बाहेर पडण्यासाठी जे द्वार आहे त्याच्या अलीकडे उजव्या बाजूला एक छोटीशी अरुंद खोली असून त्या खोलीच्या भिंतीला चुन्याचा गिलावा दिलेला दिसतो. एका बाजूच्या समोरच्या भिंतीला एक भोक पडले असून त्याच्या पलीकडे या मंदिराचं १६० फूट उंचीचं भव्य गोपूर आहे. गोपुरावरून आलेले सूर्यकिरण त्या छिद्रातून समोर असलेल्या भिंतीवर पडतात. किरण छिद्रातून जाताना समोरच्या गोपुराची उलटी प्रतिकृती या पांढऱ्या भिंतीवर पडलेली दिसते. भौतिकशास्त्रात असलेल्या पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञानाचा इथं मोठय़ा खुबीने वापर केलेला दिसतो. हे केवळ आश्चर्यच म्हणावं लागेल. तत्कालीन स्थपतींना या तंत्राची माहिती होती, त्यांनी ते मंदिरात वापरलं आणि येणाऱ्या लोकांनी आवर्जून पाहावं अशी व्यवस्थासुद्धा करून ठेवलेली दिसते.

कोणतीही कला ही तत्कालीन समाजाचं प्रतीक असते. तत्कालीन समाजजीवनाचं प्रतिबिंब त्या त्या कलेत पडलेलं अगदी प्रकर्षांने दिसतं. अंदाजे हजार वर्षांपूर्वीच्या समाजजीवनाचं आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरच्या कोपेश्वर देवालयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. इथं गज, अश्व, वराह, मेष आदी प्राणी तसेच आंबा, काजू, केळी, द्राक्षाचे घड अशी विविध फळंसुद्धा या मंदिरावर पाहायला मिळतात. ध्यानस्थ योगी आहेत, उत्तान सौंदर्य दाखवणाऱ्या ललना आहेत, ढगळ पोशाख परिधान केलेले विविध प्रवासी इथे दिसतात, त्याचबरोबर दिगंबर साधकांची शिल्पंसुद्धा इथं कोरलेली आहेत. त्या काळच्या शिल्पकारांना जे जे काही दिसलं असेल ते ते त्यांनी मंदिरावर कोरून ठेवलेलं लक्षात येतं.   

देशाच्या विविध भागांत राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी वेगवेगळय़ा काळांत मंदिरं बांधली. प्रत्येकाला स्वत:चं असं अस्तित्व निर्माण करायचं होतं, त्यामुळे विविध शैली तयार करण्यात आल्या. आपल्या पुराणात मंदिर बांधणीच्या ४५ शैली सांगितल्या आहेत. त्यातील प्रमुख शैली चार आहेत. नागर (उत्तर भारत), भुमिज (महाराष्ट्र, माळवा, राजस्थान), द्राविड (दक्षिण भारत) आणि वेसर (दक्षिण कर्नाटक) इत्यादी. याव्यतिरिक्त ओडिसा प्रांतातील शैली वेगळी, बंगाल प्रांतातील शैली वेगळी आहे, हे विसरूनही चालणार नाही.    

मंदिर स्थापत्यशास्त्र अभ्यासासाठी अनेक जण भारतातल्या समृद्ध मंदिरांना भेट देत असतात. तरुणांचे अभ्यास दौरेही यानिमित्ताने वाढत आहेत. परिणामी, ट्रॅव्हल कंपन्यांनासुद्धा तशा सहली आयोजित कराव्या लागत आहेत. पुणे येथील फिरस्ती हेरिटेज स्टडी टूर आणि हेरिटेज वॉक या ट्रॅव्हल कंपनीचा शंतनू परांजपे त्याचा सहलीचा अनुभव सांगताना म्हणाला, ‘आजकाल अशा सहलींना उत्तम गर्दी होते. हम्पी, खजुराहोसारख्या मंदिर फिरस्तीला खूप मागणी आहे. इंस्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून जेव्हा मी वेगवेगळय़ा मंदिरांची माहिती देतो तेव्हा तरुणाई ते व्हिडीओ अत्यंत आवडीने पाहते, अनेक जणांना शेअरसुद्धा करते. माझ्या मते आपल्या संस्कृतीबद्दल असलेलं प्रेम आणि त्याबद्दल वाढत चाललेली जाणीव याचा यात महत्त्वाचा वाटा आहे. हे सर्व जपण्याचं काम ही तरुण पिढीच करणार आहे यात काही शंका नाही. गंमत म्हणजे या मंदिरांवर अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी परदेशी मंडळी अधिक उत्सुक असतात. एकदा हळेबीडू येथे असताना एका ग्रीक जोडप्याला मंदिरात फिरताना पाहिलं. सोबत कुणी गाइड नव्हता. त्यामुळे सहज विचारलं की ‘‘रामायण/महाभारत ऐकलं आहे का?’’ तर चक्क हो म्हणाले. मग मी म्हटलं या ग्रंथातील काही शिल्पं दाखवतो. पुढील अर्धा तास ते जोडपं मी दाखवत असलेली विविध शिल्पं पाहात होतं, समजून घेत होतं आणि नोट्स काढत होतं. योग्य तिथं प्रश्न विचारत होतं. कधी कधी असं वाटतं की आपलीच संस्कृती समजून घेण्यात आपली जिज्ञासा कुठे कमी पडते का? असा सवाल उपस्थित करतानाच हळूहळू हे चित्र बदलतं आहे आणि मी याबद्दल प्रचंड आशावादी आहे, असंही शंतनू म्हणतो. पुढील दहा वर्षांत मंदिरांचा कला खजिना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दहा पटीने वाढलेली असेल, हे तो खात्रीने सांगतो.      

अनेक बारीकसारीक गोष्टी आपल्याला मंदिर कसं पाहावं हे शिकवतात, आपल्या बुद्धीला चालना देतात, आपल्याला आश्चर्यचकित करून टाकतात. मंदिर स्थापत्यामध्ये असलेले बारकावे अभ्यासू लागलो की त्यामागची कलाकाराची दृष्टी, त्यामागचं तत्त्वज्ञान ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ समजून येते. आणि नवं काही तरी समजून घेण्याची ही ऊर्मीच या मंदिरांच्या सफरीवर निघण्यास फिरस्त्यांना भाग पाडत असेल.

थंडीतली भटकंती

२०२३ च्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. वर्षांचा शेवटचा महिना हा भटकंतीचा महिना असतो.

Loksatta viva article Wandering in the cold Planning to go for a walk
थंडीतली भटकंती

वैष्णवी वैद्य मराठे

२०२३ च्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. वर्षांचा शेवटचा महिना हा भटकंतीचा महिना असतो. सुट्टय़ा भरपूर मिळतात आणि वेगवगेळय़ा ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करता येते. भारतात आणि महाराष्ट्रातही अशी अनेक ठिकाणे, प्रांत, राज्य आहेत जिथे थंडीतल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. योगायोगाने यावेळी नाताळ आणि ३१ डिसेंबर दोन्ही वेळेस वीकएंड असल्याने लोकांची जय्यत तयारी एव्हाना सुरू झाली असेल. हळूहळू सर्वत्र थंडीची चाहूल लागते आहे, त्यामुळे फिरण्यासाठी पोषक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

तुम्ही अजून सुट्टीतील भटकंतीचं प्लॅनिंग करत असाल तर यातली काही ऑफबीट ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा.

गुजरात

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरात राज्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक स्थळे आणि वैविध्यपूर्ण लँडस्केपसह सजलेले गुजरात पाहण्यासाठी किमान ३ ते ८ दिवसांचे नियोजन करणे गरजेचे आहे. अहमदाबाद, वडोदरा, द्वारका, रण ऑफ कच्छ अशा अनेक जागा गुजरातमध्ये फिरण्यासारख्या आहेत. इथे तुम्हाला निसर्गरम्य जागांपासून सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, अक्षरधाम आश्रम, सयाजी बागसारखी ऐतिहासिक मंदिरं आणि अनेक प्रकारच्या जागा एक्सप्लोर करायला वाव मिळतो. वर्षांच्या कोणत्याही महिन्यात गुजरातच्या इतर भागांत फिरू शकता, परंतु कच्छला भेट देण्यासाठी डिसेंबर महिन्यापेक्षा कोणताही चांगला महिना नाही. या काळात तीन महिने चालणारा रण उत्सव आकर्षणाचा भाग आहे. तुम्हाला फक्त रण उत्सवाला जायचे असेल तर आता तसेही पॅकेज मिळते. अ‍ॅडव्हेंचर आणि ट्रेकिंग प्रकार हवे असतील तर गीर नॅशनल पार्क हासुद्धा उत्तम पर्याय आहे. पाटणमध्ये तुम्ही पटोला साडीचे विणकाम केंद्रही पाहू शकता.

राजस्थान

राजस्थान हा वाळवंटी भाग असल्याने थंडी हा तिथे फिरण्याचा सर्वोत्तम मोसम आहे. इतर वेळी तिथले तापमान आपल्याला सहन होऊ शकत नाही. कमीत कमी ६ ते ८ दिवसांची योजना आखून तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता. जयपूरमध्ये २ दिवस, जैसलमेरमध्ये २ दिवस, जोधपूरमध्ये १ दिवस आणि उदयपूरमध्ये १ दिवस अशी ही ट्रीप होऊ शकते. राजस्थानला जाण्यासाठी आता डायरेक्ट फ्लाइट असल्याने प्रवासाचा वेळही वाचतो. तिथलं स्थानिक जीवन, खाद्य, सगळं अनुभवण्यासारखे आहे. तसेच तरुणांना फॅशन आणि स्टाइल शॉिपगची मेजवानी इथे मिळते. इथे फार निसर्गरम्य किंवा साहसी जागा नाहीत, तर महाल, किल्ले, मंदिरं जास्त आहेत. उदयपूरला बऱ्यापैकी सुंदर जागा पाहायला मिळतील. जयपूर, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, पुष्कर, उदयपूर, रणथंबोर नॅशनल पार्क या जागा आणि तिथले विविध पॉइंट्स न चुकविण्यासारखे आहेत. तिथले एकमेव सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणजे माउंट आबू जिथे थंडीतच जायला मज्जा येते.

नॉर्थ-ईस्ट

डिसेंबरमध्ये भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागात प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव असू शकतो. भारताचा हा प्रदेश देशाचा एक वैविध्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध भाग आहे, ज्यामध्ये आठ राज्ये आहेत. भौगोलिक निसर्गसंपत्ती डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगले आणि असंख्य नद्यांद्वारे वैशिष्टय़ीकृत आणि परिपूर्ण असा हा प्रदेश आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड या सगळय़ा परिसरांमध्ये निसर्गाची एक वेगळी कृपादृष्टी आहे. इथे वेळ काढून किमान ८ दिवसांसाठी तरी जाणे करावे, जेणेकरून निसर्गाचे सौंदर्य म्हणजे काय ते कळेल. हा प्रदेश त्याच्या सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो, प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी परंपरा, भाषा आणि सण आहेत. पावसाळा सोडून इतर मौसमात इथे जाऊ शकता. पावसाळय़ात इथले वातावरण जरा धोक्याचे असते. इथले वैशिष्टय़पूर्ण पदार्थ आणि खाद्यसंस्कृती सध्या फार आकर्षणाचा मुद्दा झाली आहे. व्लॉगर्ससाठी नॉर्थ-ईस्ट म्हणजे पर्वणी आहे.

दक्षिण भारत

दक्षिण भारतातही विविध प्रकारचे निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. विशेषत: समुद्रकिनारपट्टी आणि जैवविविधता याचे इथे अनोखे आकर्षण आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण भारतातील हवामान सामान्यत: आल्हाददायक असते, त्यामुळे दक्षिणी प्रदेश एक्सप्लोर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. दक्षिण भारतात ऊटी, मैसूर, पाँडिचेरी, कूर्ग, मदुराई, कन्याकुमारी हे सगळंच फार सुंदर आणि बघण्यासारखं आहे. विशेषत: समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी ही सगळीच ठिकाणं उत्तम आहेत. नॉर्थ-ईस्टसारखी आता इथल्या ठिकाणांनाही तरुण व्लॉगर्सची पसंती मिळताना दिसते. हंपी, पाँडिचेरी, अंदमान निकोबार ही ठिकाणं एक पूर्णपणे स्वतंत्र ट्रीप काढण्यासारखी ठिकाणं आहेत. इथे फ्रेंच आणि पोर्तुगीज संस्कृती प्रामुख्याने पाहायला मिळते. आपल्या आवडीप्रमाणे डेस्टिनेशन तुम्ही निवडू शकता.

थंडीत फिरताना काय काळजी घ्याल:

अ‍ॅडव्हान्स बुकिंग : थंडीचा मौसम हा फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो, त्यामुळे प्रवासाचे आणि राहण्याच्या खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आगाऊ बुकिंग करून ठेवले तर खर्च वाचू शकतो. तसेच तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ट्रीप होऊ शकते.

हवामाचा अंदाज घ्या : प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सगळय़ा स्थानकांच्या हवामानाची चौकशी करा. आताशा सगळेच विमानप्रवास करत असल्याने सगळी माहिती मिळते, पण तरीही आपण सजग असणे गरजेचे आहे.

गरम कपडे सोबत घ्या : थंडीचे वातावरण जितके प्रसन्न वाटते तितकेच आपल्याला बाधू शकते. तसेच वेगवेगळय़ा प्रांतात थंडीचे तापमान कमी जास्त असते. दक्षिणेकडील वातारण सौम्य असते तर उत्तरेकडे अतिथंड असते, त्यामुळे स्वेटर, सॉक्स, स्कार्फ, कानटोप्या, बूट, हातमोजे, थर्मल्स, हवी तशी अंथरूणे अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्याकडे असणे फार गरजेचे आहे. आजकाल हॉटेल्समध्ये हीटरची सोय असते तरीही आपण स्वत:ची काळजी घ्यावी.

त्वचेची काळजी घ्या : उन्हाळय़ापेक्षाही थंडीचा त्वचेवर जास्त परिणाम होतो. कोरडय़ा त्वचेचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मॉश्चरायझर, लीप बाम, सनस्क्रीन, हे तुमच्याजवळ असणे आणि तुम्ही वापरणे गरजेचे आहे.

आपत्कालीन पुरवठा ठेवा : प्रथमोपचार किट, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी आणि स्नॅक्स यांसारख्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवा. तुम्ही दुर्गम भागात प्रवास करत असल्यास, काही मूलभूत साधने आणि आणीबाणीच्या परिस्थितीत गरजेच्या गोष्टी असणे शहाणपणाचे आहे.

उत्तरेकडे अजून काश्मीर, हिमाचल, चंदीगड, उत्तराखंड, दक्षिण भागात गोवा, केरळ, आपल्या महाराष्ट्रात तर अख्खा कोकण आणि रायगड भाग, कोल्हापूर ही सगळीच ठिकाणं तरुणांच्या हॉट लिस्टमध्ये आहेत. पण वरची ऑफबीट लोकेशन नक्की यावेळी फिरून पाहा. या जागा नेहमीच्या बकेट लिस्टमध्ये नसल्या तरी पाहण्यासारख्या आहेत आणि सध्याच्या सीझनमध्ये अगदी मस्ट-व्हिजिट आहेत.

सफारीनामा

फारी गाइड ही संकल्पना तेजीत आली असून करिअरची एक वेगळी वाट तरुणाईसाठी खुली झाली आहे.

world tiger day 2023
(संग्रहित छायाचित्र)

मितेश रतिश जोशी

२९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. टायगर सफारी हा फोटोग्राफर्स आणि व्याघ्रप्रेमी पर्यटकांचा हळवा कोपरा आहे. याच सफारींचं नियोजन करून करिअरचा एक वेगळा मार्ग निवडण्यात काही तरुण यशस्वी झाल्याचं दिसून येतं..

२९ जुलै २०१० रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत उपस्थित देशांनी एक करार केला. या कराराची आठवण म्हणून २९ जुलै हा दिवस ‘जागतिक व्याघ्र दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. घनदाट जंगलात आश्रयाला असणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा तसेच आधुनिकीकरणाच्या नादात जंगलांचं प्रमाण कमी झालं. साहजिकच वाघासारख्या जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली. हे लक्षात घेता भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पांची सुरुवात झाली. सुरुवातीला देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात ताडोबा,पेंच, सह्याद्री, मेळघाट, नवेगाव-नागझिरा आणि बोर असे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. बोर व्याघ्र प्रकल्प १३८.१२ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचा, पण तितकाच महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाची कुठलीही जाहिरात विदर्भातले वाघ दाखवल्याखेरीज पूर्ण होत नाही. याचं कारण आपल्या राज्यातले बहुतांश व्याघ्र प्रकल्प विदर्भात आहेत. व्याघ्रदर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सफारी गाइड ही संकल्पना तेजीत आली असून करिअरची एक वेगळी वाट तरुणाईसाठी खुली झाली आहे.

पुण्यातील रोहित दामले हा त्यापैकीच एक तरुण. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण करत असताना त्याला वाइल्डलाइफ फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. पुण्याजवळच्या डोंगरांवर, निसर्गाच्या जवळ जाऊन प्राणी-पक्षी पाहण्याचा व ते क्षण कॅमेरात टिपण्याचा त्याला छंद लागला. त्याच्यासोबतचे इतर फोटोग्राफर मित्र सफारीला जात व परतल्यावर तिथले वाघांचे फोटोज रोहितला येऊन दाखवत. रोहितलासुद्धा सफारीला जायची इच्छा होती, पण त्याचे आईवडील करिअरला प्राधान्य देणारे असल्यामुळे त्याचं लक्ष करिअरवर केंद्रित करण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. रोहितच मन मात्र काँक्रीट आणि माणसांनी बुजबुजलेल्या शहरात रमत नव्हतं. जंगलातला निसर्ग आणि त्या निसर्गाशी इमान राखणारे वन्यजीव त्याला खुणावत होते. अखेर त्याने ताज सफारीच्या ट्रेिनग प्रोग्रॅममध्ये भाग घेतला. त्या प्रोग्रॅमनंतर त्याला नॅशनल पार्कमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. ज्यात तो पर्यटकांना गाडी चालवत सफारी घडवायचा व माहिती द्यायचा. कालांतराने अनुभवाने पक्कं होत त्याने ‘सफारी विथ रोहित’ या नावाने स्वत:ची कंपनी सुरू केली आणि करिअरची एक वेगळी वाट निवडली. सफारी नेमकी कशी आयोजित केली जाते याविषयी माहिती सांगताना रोहित म्हणतो, ‘करंगळी एवढं जर जंगल असेल तर त्याच्या नखाएवढय़ा भागातच सफारी करता येते. ज्याला कोअर क्षेत्र असे म्हणतात. आता ताडोबाच्या बफर क्षेत्रातही सफारी करता येते. बफर सफारीचा फायदा ग्रामस्थांना जास्त होतो. ताडोबा बफर झोनमध्ये १३ प्रवेशद्वार आहेत आणि सफारी मार्ग बहुतेक एकमेकांशी जोडले आहेत. कोअर झोन पावसाळय़ात बंद असतो. प्रत्येक झोनचे प्रवेश शुल्क वेगवेगळे असतात. पर्यटकांच्या मागणीनुसार त्या त्या क्षेत्रात त्यांना नेलं जातं. काही पर्यटकांना वाघांची फक्त पिल्लं बघायची असतात, तर काहींना मेल टायगर बघण्याची इच्छा असते. प्रत्येकाच्या अजब अपेक्षा असतात’. 

प्रत्येक सफारीत पर्यटकांबरोबर किस्से घडत असतात. असाच एक किस्सा रोहितने सांगितला. ‘एक विदेशी पर्यटक होता. तो दरवर्षी भारतात यायचा व सफारी करायचा. त्याच्या एकूण १७० सफारी झाल्या होत्या, पण त्यातल्या एकाही सफारीमध्ये त्याला वाघ दिसला नाही. वाघाचे पंजे, झाडात बसलेल्या वाघाची शेपटीच त्याने पाहिली होती, पण वाघ काही पाहिला नव्हता. वयाच्या साठीपासून तो सफारी करत होता. एकदाही वाघ न दिसल्याने तो अत्यंत हतबल झाला होता. पन्ना नॅशनल पार्कमध्ये वयाच्या ८२व्या वर्षी तो आयुष्यातली शेवटची सफारी करण्यासाठी आला, तेव्हा त्याचा सफारी गाइड मी होतो. त्या सफारीतसुद्धा त्याला वाघ दिसला नाही. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं व तो हुंदके देऊन रडायला लागला. मी त्याची खूप समजूत काढली. तेवढय़ात अचानक एक वाघ झाडीतून बाहेर आला व रस्त्यावर येऊन थांबला. त्याला मी सांगितलं तो बघ वाघ तुझ्या समोर आहे, पण त्याचे डोळे इतके पाणावले होते की त्याला समोरचा वाघच दिसत नव्हता. शेवटी मी गाडी थांबवून त्याला वाघ दाखवला. तेव्हा त्याला आकाश ठेंगण झालं होतं. त्याचे हात आनंदाने कापत होते. त्या परिस्थितीतही त्याने कॅमेरा काढला व वाघोबाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. मोजून नऊ सेकंद त्याने वाघ पाहिला. त्याला आयुष्याचं सार्थक झाल्याचं समाधान माझ्यामुळे मिळालं, असं तो सांगत राहिला’, ही आठवण सांगतानाच कुठल्याही जंगलात जाणं हा सर्वात आनंदाचा क्षण तर जंगलातून शहरात परतणं हा अतीव दु:खाचा क्षण असतो, असं रोहित सांगतो. 

नागपूरमध्ये निकिता व कार्तिक हे तरुण जोडपं जंगल सफारीसाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ताडोबा जंगलाच्या नजीक जन्माला आलेल्या कार्तिकला लहानपणापासूनच आजोबांबरोबर जंगलात फिरण्याची आवड होती. कार्तिकचे आजोबा शिकारी होते. त्यामुळे त्यांना जंगलातले खाचखळगे माहिती होते. त्यांच्याबरोबर फिरून त्यानेही आजोबांसारखी माहिती करून घेतली. वयाच्या नवव्या वर्षी कार्तिकने एकटय़ाने जंगल सफारी केली होती. ताडोबामध्ये डब्ल्यूडब्ल्यूएफने आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये त्याने सहभाग घेतला होता. कार्तिकला माहिती खूप असल्यामुळे त्याचे नातेवाईक व मित्रपरिवार त्याला गाइड म्हणून सोबत येण्यासाठी गळ घालायचे. त्यातूनच त्याला सफारी गाइड म्हणून काम करण्याची दिशा सापडली. कार्तिक सांगतो, ‘पूर्वी माझ्या लहानपणी संपूर्ण ताडोबा जंगल सर्वासाठी खुलं होतं. मी स्वत: संपूर्ण जंगल पायी चालत फिरलो आहे. ताडोबातले सगळे वाघ मी हजारो वेळा पाहिले आहेत. व्याघ्र सफारीसाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा वेगवेगळा उद्देश असतो. सफारीचं बुकिंग तीन महिने आधी करावं लागतं. उन्हाळा आणि हिवाळा हे दोन ऋतूच जंगलसफारीसाठी अनुकूल व खुले असतात. दोन्ही ऋतूत वाघांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. हिवाळय़ात सकाळच्या वेळी गवतावर दव पडत असल्यामुळे वाघ झाडीतून चालत नाही तर तो रस्त्यावरून चालतो. त्यामुळे हिवाळय़ात सकाळी हमखास रस्त्यांवर वाघ पाहायला मिळतो. उन्हाळय़ात पाणवठय़ावर पाणी पिताना किंवा पाण्यात खेळताना वाघ दिसतो’.आपल्या हिंदी सिनेमांनी ‘माणसांची शिकार करणारं हिंस्र जनावर’ असंच वाघाचं चित्रण कायम केलं आहे. वन्यजीव-मानव संघर्षांच्या घटना वरचेवर घडत असतात, पण वाघ किंवा अन्य वन्यजीव सहसा माणसावर भक्ष्य म्हणून हल्ला करत नाहीत. विशेषत: वाघ तर मला ‘परफेक्ट जंटलमन’ वाटतो, असं कार्तिक म्हणतो. ‘वाघाला माणसात तर अजिबात रस नसतोच, पण पोट भरलेलं असेल तर तो त्याच्या आवडत्या भक्ष्याकडेसुद्धा ढुंकून पाहत नाही’, असं त्याने सांगितलं. 

कार्तिकची पत्नी निकिता ही खास स्त्रियांसाठी सफारी आयोजित करते. स्त्री पर्यटकांबरोबरचे अनुभव सांगताना निकिता म्हणाली, ‘पुरुषांपेक्षा महिला सफारीसाठी खूप जास्त उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या उत्साहाला आवर घालणं ही आमची पहिली  जबाबदारी असते’. पर्यटकांना काही नियमावलीचं पालन करावं लागतं. ब्राइट कपडे न घालणं, सुवासिक परफ्यूमचा वापर न करणं हे बेसिक नियम महिलांना वारंवार सांगावे लागतात, असं सांगणाऱ्या निकिताने तिची एक आठवण सांगितली. ‘एकदा मुंबईची क्राइम ब्रॅंचमधील महिला अधिकारी तिच्या मैत्रिणींचा गोतावळा घेऊन माझ्यासोबत सफारीला आली होती. सफारी संपत असताना एके ठिकाणी त्यांची जिप्सी बंद पडली. मी दुसऱ्या जिप्सीमध्ये होते. नियमानुसार मी त्यांच्याबरोबर थांबूही शकत नव्हते किंवा माझ्या जिप्सीतूनही ओव्हरलोडिंग करून त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकत नव्हते. नियम तोडणाऱ्या गाइडला दीड ते दोन महिने बॅन करण्याची कडक शिक्षा आहे. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य राखत त्यांना मी म्हटलं की मी बाहेर जाऊन तुमच्यासाठी दुसरी जिप्सी पाठवते. तिच्या जिप्सीमध्ये नियमानुसार गाइड व ड्रायव्हर होता. त्यांनी एका बाजूला गाडी उभी केली. काही वेळाने गाडीच्या एका बाजूला कोपऱ्यात वाघिणीची पिल्लं खेळत होती व गाडीच्या दुसऱ्या बाजूला त्यांची वाघीण आई त्यांना शोधत होती. तिला अगदी समोर बघून बंद पडलेल्या गाडीतल्या सर्व महिला घाबरून गेल्या. गाइड त्यांना समजावत होता तरीही त्या काही ऐकायला तयार नव्हत्या. जंगलात बारीक आवाजही फार मोठा येतो, त्यामुळे त्यांचा व वाघिणीचा आवाज घुमायला लागला. शेवटी त्यांना गाइडने कसंबसं शांत केलं. मुळात ती वाघीण तिच्या पिल्लांना शोधत होती आणि तिची पिल्लंही तिला आवाज देत होती, पण मधोमध बंद पडलेल्या जिप्सीमुळे त्यांची नजरानजर होत नव्हती. त्यांचा आवाज ऐकून सगळे घाबरले व त्यांनी घाबरून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. काही मिनिटांतच त्यांच्यापर्यंत  जिप्सी पोहोचली. त्यांना सुखरूप दुसऱ्या जिप्सीत बसवलं’, ही आठवण सांगणाऱ्या निकिताने मुळात आतापर्यंत वाघाने पर्यटकांवर कधी हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला नाही, अशी माहिती दिली.

आपण मर्यादा ओलांडून त्याला असुरक्षित वाटेल इतक्या जवळ न गेल्यास तो आक्रमकता दाखवत नाही आणि त्याच्या इशाऱ्याच्या गुरकावण्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय हल्लाही करत नाही. सफारीसाठी लागतात ते पेशन्स. पर्यटकांकडे पेशन्स नसतील तर घाबरून सफारी करण्यात काही अर्थ नाही, असं ती म्हणते. जंगलात सफारी करताना वा गाइड म्हणून काम करताना असे कित्येक प्रसंग येतात जे खूप काही शिकवून जातात. आपल्याला जंगलाबद्दल असलेली माहिती, नियमांचं पालन, प्रसंगावधान राखत या सफारीचं नियोजन करावं लागतं. मात्र खरोखरच जंगलाची-वन्यजीवांची ओढ असेल आणि करिअरची अशी वेगळी वाट खुणावत असेल तर सध्या रोहित, कार्तिक-निकितासारखी अनेक तरुण मंडळींचे काम आणि त्यांचे अनुभव तुम्हालाही प्रेरणादायी ठरू शकतील. 

पावसाळी भटकंती

पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा मनमुराद आनंद घेत सगळय़ांनाच भटकंती करावीशी वाटते. काही वर्षांपासून पावसाळी भटकंतीचा हा ट्रेण्ड जोमाने रुजलेला पाहायला मिळतो आहे.

wandering trip
पावसाळी भटकंती

वैष्णवी वैद्य मराठे

पावसाळा सुरू झाला की निसर्गाचा मनमुराद आनंद घेत सगळय़ांनाच भटकंती करावीशी वाटते. काही वर्षांपासून पावसाळी भटकंतीचा हा ट्रेण्ड जोमाने रुजलेला पाहायला मिळतो आहे. करोना काळात लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले, एकाच जागी कित्येक दिवस अडकलेल्या लोकांनी करोना संपल्यानंतर भटकंतीचं वेड लावून घेतले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्याच्या फास्ट लाइफमुळे दरवेळी मोठी सुट्टी घेऊन फिरणे शक्य नसते. त्यातूनच रोड ट्रिप्स, छोटय़ा पिकनिक, सोलो ट्रिप, स्टेकेशन असे विविध भटकंतीचे प्रकार तरुणांमध्ये प्रचलित झाले आहेत. सध्या तरुणांमध्ये पावसाच्या भटकंतीसाठी कुठल्या जागा आवडत्या आहेत ते बघूया.

मुळशी

मुळशी हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पुण्याच्या पश्चिमेला अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर आहे. निसर्गरम्य वातावरणासोबतच मुळशी हे कृषी पर्यटनासाठीही ओळखले जाते. परिसरातील अनेक स्थानिक शेतकरी विविध भाज्यांची शेती, भाताची शेती, सेंद्रिय शेती समजून घेणे आणि ताज्या जेवणाचा आनंद घेणे यासारख्या गोष्टींमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेतात. या परिसरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे मुळशी तलाव. मुळा नदीवर मुळशी धरणाने तयार केलेला हा तलाव मानवनिर्मित जलाशय आहे आणि सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण बनला आहे. याचा वापर सिंचन आणि वीजनिर्मितीसाठीसुद्धा केला जातो. शांत वातावरण आणि आजूबाजूच्या टेकडय़ांमुळे विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. इथे सध्या अनेक रिसॉर्ट्स आणि होमस्टे बनले आहेत, परंतु तुम्हाला अस्सल जेवण, निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर इथल्या स्थानिक लोकांकडे राहण्याची सोय होत असेल तर त्याचा नक्की लाभ घ्या.

कर्जत/खोपोली

कर्जत आणि खोपोली ही रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य शहरे आहेत. नैसर्गिक सौंदर्य, हिरवेगार लँडस्केप आणि अ‍ॅडव्हेंचरसाठी ओळखली जाणारी ही दोन ठिकाणे हे वीकेंड पिकनिक आणि मोठय़ा सुट्टय़ांसाठी लोकप्रिय आहेत. ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइिम्बग आणि रिव्हर राफ्टिंग यासारख्या साहसी गोष्टींसाठी हा प्रदेश ओळखला जातो. नवशिक्या आणि अनुभवी ट्रेकर्स सगळय़ांनाच अनुभवता येतील अशा नेचर ट्रेल्ससाठी इथे अनेक जागा आहेत. जवळपास पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागा म्हणजे इमॅजिका, कोंडाणा गुहा, कर्नाळा, झेनिथ धबधबा, उल्हास व्हॅली. कर्जत/खोपोलीचे वैशिष्टय़ म्हणजे मुंबई लोकलने इथे तुम्हाला अगदी दोन ते अडीच तासांत पोहोचता येते. ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे त्यांना या जागा म्हणजे पर्वणी आहेत. इथेही अनेक छोटे छोटे रिसॉर्ट्स आहेत जे योग्य त्या दरात तुम्हाला पिकनिक आणि आउटिंगची योजना आखून देतात. तुमच्या बजेटप्रमाणे अगदी साध्या होमस्टेपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत विविध पर्याय इथे आहेत.

महाबळेश्वर / पाचगणी

दऱ्या-खोऱ्यांमध्ये वसलेले महाबळेश्वर आणि पाचगणी, शहरी जीवनाच्या गजबजाटातून एक शांत सुटका देतात. मुंबई-पुण्यापासून ४-५ तासांवर असलेली ही ठिकाणे पुन्हा तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जातात. या दोन जागा एकमेकांपासून बऱ्यापैकी कमी अंतरावर असल्याने अनेक पर्यटक एकाच ट्रिपमध्ये फिरून घेतात. वेण्णा तलाव, प्रतापगड, मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी गार्डन, सिडनी पॉइंट अशा बऱ्याच जागांमुळें इथे २-३ दिवस तुम्ही आरामात घालवू शकता. शिवाय तिथले वातारण इतर वेळीसुद्धा प्रसन्न आणि गार असते म्हणून उन्हाळय़ातही बरेच जण भटकंतीला इथे येतात. इथेही पॅराग्लायिडगसारखे साहसी उपक्रम काही ठिकाणी आहेत. पुणेकरांसाठी खास बाब म्हणजे पुणे-महाबळेश्वर बससेवा आहे, ज्याने तुम्ही ३-४ तासांत महाबळेश्वरला पोहोचू शकता, म्हणून पुण्यातून पर्यटकांची जास्त गर्दी असते. इथे तुम्हाला नक्की आवडेलअशी विशेष जागा म्हणजे पंचगंगा हे अद्वितीय मंदिर. कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या पाच नद्यांच्या संगमावर हे मंदिर बांधले आहे. मॅप्रो आणि स्ट्रॉबेरी गार्डन असल्याने चवीच्या पदार्थाची रेलचेलही इथे उपलब्ध आहे,  त्याचा मनमुराद आनंद नक्की घ्या.

नागाव, अलिबाग

नागाव हे रायगड जिल्ह्यात अलिबागजवळील एक किनारपट्टीचे गाव. येथील सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक आकर्षणे आणि आरामशीर वातावरण यासाठी प्रसिद्ध असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. सोनेरी वाळू आणि स्वच्छ पाणी असलेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी नागाव प्रसिद्ध आहे. गोव्याला पर्याय म्हणून आता बीच लव्हर तरुणाईत हे लोकप्रिय आहे. इथले बीच स्वच्छ आणि बऱ्यापैकी शांत असतात. महाराष्ट्रातील निसर्गप्रिय कोकणाच्या अगदी किनाऱ्यावर असलेले नागाव, अलिबाग तुम्हाला बिझी आयुष्यातून निवांत वेळ किंवा आजकाल तरुण म्हणतात तसा ‘क्वॉलिटी टाइम’ देते. अलिबाग या छोटय़ा शहरालासुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे. इथे बीचव्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. कणकेश्वर मंदिर, कुलाबा किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ला, अलिबाग मार्केट अशा अनेक जागा तुम्ही पाहू शकता, प्रत्येकालाच स्वत:चा इतिहास आहे. अलिबाग हे सीफूड आणि स्थानिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी असलेल्या असंख्य बीच- श्ॉक आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वादिष्ट किनारी पदार्थाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. विशेष म्हणजे अलिबाग आता मुंबईच्या खूपच जवळ आले आहे. भाऊचा धक्का या मुंबई पोर्टवरून तुम्ही रो-रो फेरीने अलिबागला (मांडवा किनारा) अगदी तासाभरात पोहोचू शकता.

कोकण

निसर्गाची जिथे अमर्याद कृपादृष्टी आहे तो महाराष्ट्रातला अविस्मरणीय भाग म्हणजे कोकण. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक असा मिळून जवळपास ७००-८०० किमीची कोकण किनारपट्टी आपल्याला लाभली आहे. दापोली, हर्णे, आंजर्ले, सिंधुदुर्ग, मालवण, तारकर्ली अशा विविध भागांमध्ये पर्यटकांची मांदियाळी आपल्याला आता पाहायला मिळते. तिथे जाणे म्हणजे नो-नेटवर्क झोनमध्ये जाणे आहे असे तरुणांना वाटते. रिफ्रेश, रिस्टार्ट, रेझ्युम हे तुम्हाला अनुभवायचे असेल तर कोकणासारखा दुसरा पर्याय नाही. खाण्यापिण्याची, भटकण्याची कसलीच कमतरता तुम्हाला इथे भासणार नाही. तुम्ही इथे पावसाळय़ाव्यतिरिक्त गणपती, दिवाळी, होळी अशा सणांना गेलात तर वेगवेगळय़ा भागांतल्या वेगवेगळय़ा पद्धती पाहायला मिळतील. तसेच प्रत्येक प्रांताचे आपापले वैशिष्टय़ इथे आहे. अनेक गूढ जागा, मंदिर, त्यांच्या कथा अतिशय रोमांचकारी आहेत. इथे तुम्ही पटकन शॉर्ट ब्रेकचासुद्धा आनंद घेता येतो. तसेच वेळ काढून निवांतपणे निसर्गाच्या सान्निध्यात राहू शकता.

याव्यतिरिक्त अनेक लोकप्रिय जागा आहेत- लोणावळा, इगतपुरी, नाशिक इथेही तुम्हाला अनेक सुंदर जागा पाहायला मिळतील. या जागांचे वैशिष्टय़ म्हणजे इथे तुम्ही फक्त निवांतपणा अनुभवू शकता. वर म्हटलेल्या जागांसारखे फारशा अ‍ॅक्टिव्हिटीज इथे नसतील, पण या जागाही तरुणांच्या पावसाळी भटकंतीच्या लिस्टमध्ये असतात.

पावसाळी भटकंती करताना योग्य ती काळजीही घेतली पाहिजे

  •  फिरणे आणि ऋतूंचा आनंद घेणे वाईट नाही, परंतु आपण एक सुजाण नागरिक आहोत त्यामुळे जबाबदारीने वागणे हे गरजेचे आहे. आपण अनेक बऱ्यावाईट घटना या दिवसात घडताना पाहत असतो आणि ऐकत असतो याचे कारण अनेकदा आपण वाहवत जाणे हे असते.
  •  समुद्रकिनारे, धबधबे, गड -किल्ले फिरताना अनुभवी लोक बरोबर असावेत आणि नसतील तर अपरिचित, जोखमीच्या जागांवर जाणे टाळावे.
  •  धबधब्यांवर पाण्याच्या स्रोतांसह दगड, दरडसुद्धा कोसळू शकते.
  •  पावसाळय़ात प्रत्येक ठिकाणी पाणी, ओलावा, शेवाळे हे असणे साहजिक आहे.
  •  स्थानिक नागरिक, गिर्यारोहक, अनुभवी/जाणकार माणसे जी काळजी घ्यायला सांगतात त्या सूचना पाळाव्या.
  •  बातम्यांमध्ये हवामानाबद्दल जी माहिती येतेय ती बघून प्रवास करावा.
  •  पावसाळी भटकंती असली तरी अतिवृष्टीचा इशारा, रेड अ‍ॅलर्ट, ऑरेंज अ‍ॅलर्ट असताना फिरायला जाऊ नये.
  •  जिथे जाताय ती जागा पावसाळय़ात किती जोखमीची आहे याची चाचपणी करावी.
  •  घाटांमध्ये सावधतेने प्रवास करावा व पावसाळय़ात रात्रीचा प्रवास टाळावा.








No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...