Sunday, May 5, 2024

नर्मदे हर ४

 

 लेखांक ८४ : खतरनाक खप्परमाळ आणि भमाण्याचे भाविक मान्याभाई पावरा

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेचा हा प्रदेश . इथल्या लोकांची शेती दोन्ही राज्यामध्ये आहे . त्यामुळे घरातील मतदान देखील कोणाचे मध्य प्रदेशात तर कोणाचे महाराष्ट्रात होते .इथे मुली देताना जवळपासच्या गावातच देतात .एका गावातील सर्व मुले मुली स्वतःला बहिण भाऊ मानतात . दिनेश पावरा चा मी निरोप घेतला आणि खप्परमाळचा पहाड चढायला सुरुवात केली . सुरुवातीला मला वाटले की हा पहाड किरकोळ आहे . परंतु जसा चढू लागलो तसे लक्षात आले की हा पहाड चढणे वाटते तितके सोपे नव्हते ! पायाखालची पाय वाट अतिशय अरुंद अशी होती . वाटाण्याच्या आकाराच्या मुरुमाच्या गोल गरगरीत खड्यांनी भरलेली होती . प्रत्येक पावलाला पाय सटकत होते . पायवाट उताराच्या दिशेला तिरकी होती . काठी देखील रोवली जात नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात छोडे खडे सर्वत्र होते . सोसाट्याचा वारा चालणे अजून कठीण करत होता . कुठेही आधार घेण्यासाठी एकही झाड नव्हते . मध्येच एक झाड सापडले तर अक्षरशः मी त्या झाडावरती पाच मिनिटे बसून राहिलो !   इथे डावीकडे उजवीकडे फुटलेल्या अनेक पायवाटा होत्या . नशीब मला दिनेश पावराने कुठली खूण दिसली की कुठल्या पायवाटेला वळायचे ते आधीच सांगून ठेवले होते . नाहीतर मी कधीच तोरणमाळला पोहोचलो असतो ! नशिबाने डोंगरदर्‍यामध्ये भटकंती करायची सवय असल्यामुळे आणि अशी भटकंती करताना दिशा भान जागृत ठेवायची देखील अनुभव सिद्ध सवय असल्यामुळे माझ्या डोक्यात कुठल्या दिशेला जायचे आहे ती दिशा अतिशय पक्की होती . परंतु चुकून-माकून एखाद्या व्यक्तीचे दिशाभान अशा ठिकाणी हरपले तर खरोखरच खूप कठीण आहे कारण गुरांच्या आणि स्थानिक लोकांच्या हजारो पायवाटा तुम्हाला सर्वत्र दिसतात .
हाच तो डोंगर आणि डोंगराला आडव्या सुरकुत्या पडलेल्या दिसतात ना , ह्याच त्या पायवाटा ! मोजा किती पायवाटा आहेत !
वरती थोडी सपाटी लागली तिथे एक घर होते . घरात कोणी नव्हते परंतु बाहेर ठेवलेल्या माठातले थंडगार पाणी प्यायलो . खूप बरे वाटले . आता भयंकर चढ संपला होता . हा चढ ज्यावरून पायाने चालणे देखील आपल्याला कठीण वाटते तिथून दिनेश आणि गावातले तरुण मोटरसायकल घेऊन खाली उतरतात ! इथल्या लोकांना भय म्हणजे काय ते माहितीच नाही ! गाडीचा ब्रेक देखील हे लोक फारसा वापरत नाहीत . कारण शहरात जसे अनेक वेळा समोर अडथळा आल्यामुळे थांबण्याचे प्रसंग आपल्यावर येतात तसे इकडे येतच नाहीत ! चलते रहो ! भगाते रहो ! बऱ्याच वेळा ब्रेक दाबल्यामुळेच गाड्या सटकतात . असो .
या ठिकाणी आता उत्तम महाराज समर्पण सेवा समिती नावाने उत्तम महाराजांचा आश्रम सुरू झालेला आहे . मी चाललो तेव्हा म्हणजे २०२२ साली हा माळ पूर्णपणे मोकळा होता .हे उत्तम महाराज म्हणजे मूळचे अमरावती भागातील मराठी संत असून वयाने अतिशय तरुण आहेत . माझ्या साधारण दहा ते पंधरा दिवस आधी ते परिक्रमेला निघालेले होते . आणि मी जिथे जिथे जायचो तिथे त्यांच्या स्वागतासाठी लागलेले शब्दशः हजारो फलक पाहायचो . यांच्यासोबत सुमारे शंभर सव्वाशे शिष्य मंडळी देखील पायी परिक्रमा करत होती . महाराज उत्तम कथाकार असल्यामुळे ते जिथे जातील तिथे राजकारणी लोक त्यांचे प्रचंड स्वागत करायचे ! त्यानिमित्ताने महाराजांनी प्रवचनामध्ये त्या राजकारण्यांचा उल्लेख करावा अशी त्यांची भाबडी आशा ! महाराजांचे वय ४५ असावे . स्थानिक लोक सांगत की हे भारतीय जनता पक्षाला उपकारक आहेत . अनेक ठिकाणी महाराजांना सोयीचे जावे म्हणून फलक वगैरे लावलेले होते त्याचा फायदा माझ्यासारख्या एकटे चालणाऱ्या परिक्रमावासीला व्हायचा . 
 महामंडलेश्वर श्री ईश्वरानंदजी ब्रह्मचारी अर्थात उत्तम स्वामी महाराज पंचाग्नी आखाडा
परिक्रमेमध्ये आपल्या भक्तांसोबत चालताना उत्तम महाराज
अलीकडच्या काळामध्ये नर्मदा खंडामध्ये प्रसिद्ध पावलेल्या आणि राजकीय वजन असलेल्या महंतांपैकी हे एक आहेत एवढे निश्चित . कारण प्रत्येक राजकारणी यांचे उंबरे झिजवताना दिसतो . 

बुधनी , मंदसौर , (दोन्ही मध्य प्रदेश ) बासवाडा (राजस्थान ) , राजपीपला (गुजरात ) ,हरिद्वार ( उत्तराखंड )अशा ठिकाणी महाराजांचे आश्रम आहेत . त्यात या महाराष्ट्रातील आश्रमाची आता भर पडली .
या उत्तम महाराजांच्या आश्रमामध्ये राहण्याचा योग पुढे उत्तर तटावर आला . त्यावेळी त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात . सध्या आपल्याला रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण शोधायचे आहे . आणि संध्याकाळ होत आलेली आहे . थोडे अंतर चालल्यावर मला रस्ता दिसू लागला . या रस्त्यावर एक झोपडी होती जिथे नर्मदा परिक्रमावासींची सेवा केली जाते असा फलक लावलेला होता ! माझ्या जीवात जीव आला ! चला एकदाचे पोहोचलो ! आणि आनंदाने त्या घरापाशी जाऊन नर्मदे हर चा पुकारा केला . परंतु आतून काही आवाज आला नाही . मग मला धीर गंभीर ढोलाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की घराच्या मागे सर्वजण ढोल वाजवत आहेत . मागच्या बाजूला बांधलेल्या गोठ्यामध्ये मी गेलो . गावातील सर्व तरुण मंडळी मिळून ढोल वादनाचा सराव करत होती . इथे सेवा देणारा सेवाधारी शेजारीच उभा होता . मी त्याला विचारले की मला ढोल वाजवायला परवानगी आहे का ? त्याने सांगितले आम्ही कोणाला ढोल वाजवायला देत नाही . कारण हे वाद्य चुकीचे वाजवायला परवानगी नाही . इतक्यात बाहेरून कोणीतरी परिक्रमा वासी आला आहे हे पाहून सर्व मुले वाजवायची थांबली होतीच . मी त्यांना नकरसिंग सोलंकीच्या घरी मी ढोल कसा वाजवला ते सांगितले . गंमत म्हणजे या भागातील सर्वच लोक सर्व लोकांना नावाने ओळखतात . पूर्वी मी ढोल वाजवला आहे हे कळाल्यावर त्याने मला वाजवायला परवानगी दिली . मी देखील डोक्यात बसलेला, अतिशय पक्का बसलेला तो ताल चालू केला आणि सगळ्या मुलांना आनंद झाला ! कारण तो त्या सर्वांचा आवडता ताल आहे ! साधारण १५ मिनिटे आम्ही वादन केले असेल . इतक्यात मला सेवाधारीने थांबवले आणि सांगितले की महाराज सूर्यास्त होत आहे तुम्ही लवकर पुढे निघून जा नाहीतर अंधार पडेल ! क्षणात माझ्या पायाखालची जमीन सरकली ! पुढे निघून जा ? "पुढचे मुक्कामाचे ठिकाण किती अंतरावर आहे ? " मी विचारले . " फक्त दोन किलोमीटर आहे महाराज . " सेवाधारीने सांगितले . "एखादा शॉर्टकट वगैरे आहे का ? " प्रथेप्रमाणे मी त्याला विचारले . "शॉर्टकटने गेल्यावरच दोन किलोमीटर आहे आणि रस्त्याने गेला तर चार किलोमीटर आहे . " सेवाधाऱ्याने सांगितले . मी ताबडतोब काढता पाय घेतला . इतक्यात त्याच्या बायकोने चहा आणून दिला . तो पटापट घेऊन पुढे निघालो . एवढ्यात एक मनुष्य धावतच माझ्या मागे आला आणि त्याने मला सांगितले की महाराज शहाणे असेल तर शॉर्टकटच्या नादी लागू नका . डांबरी रस्त्याने चालायला लागा . परंतु आता अंधार पडणार होता त्यामुळे लवकरात लवकर पोहोचावे या दृष्टीने मी शॉर्टकटचा मार्ग निवडला . डोंगराच्या उताराच्या बाजूने अतिशय छोटी अरुंद पायवाट होती . त्या पायवाटेने मी काही अंतर गेलो आणि लक्षात आले की पायवाटेवरूनच एक छोटीशी दरड कोसळलेली आहे . त्यामुळे तेवढ्या भागातील पायवाट खचलेली होती . हे अंतर साधारण चार-पाच फूट होते . त्यानंतर पुन्हा सुरळीत पायवाट दिसत होती . नेमकी ही डोंगराची वळलेली सोंड होती . कदाचित मी वेगाने चालत आलो असतो आणि एकच मोठी उडी मारली असती तर पलीकडच्या पायवाटेवर पोहोचलो असतो . परंतु चुकून माकून माझा पाय सटकला असता तर मात्र डाव्या हाताला दोनशे तीनशे फूट खोल दरी होती ! इथे मी सुमारे अर्धा तास थांबलो होतो . मला असे वाटायचे की कदाचित मला ही पायवाट पार करता येईल . परंतु नेमकी उडी मारायच्या वेळी मन कच खायचे . असे खूप वेळा झाले . मला अक्षरशः घाम फुटु लागला . कारण आता खरोखरच अंधार होणार होता . त्यापूर्वी मला भमाणा हे पुढचे गाव गाठणे अतिशय आवश्यक होते . काही केल्या मला तो टापू पार करता येईना . तो भाग किती कठीण होत आहे आपल्याला कळावे म्हणून मी गुगल नकाशा वर ते वळण शोधून काढले .
 उजव्या हाताला दिसते आहे ते सेवाधारीचे घर आहे . डावीकडे लाल मार्कर आहे तिथे मी अडकलो होतो . तीच जागा आता जरा अधिक जवळून पाहुयात .
या नकाशात दिसणाऱ्या पायवाटेने उजवीकडून डावीकडे आपल्याला जायचे आहे . परंतु वरती जे झाड आहे तिथून दरड सटकलेली आहे . त्यामुळे लाल मार्करच्या अलीकडे पाच फुटाचा पांढरा उभा पट्टा उठलेला आहे पहा ! तोच टप्पा पार करता येईना ! चुकून सटकले तर खाली दरी कशी आहे पहा ! 
बरे कोणाला विचारावे तर इथे कोणी दिसत सुद्धा नव्हते .अखेरीस मी विचार केला की यापूर्वी आपल्याला कोणी सल्ला दिला होता ? त्या माणसाने जाऊ नको असे सांगितले आहे . याचा अर्थ मैय्याची ती इच्छा आहे म्हणून आता आपण परत फिरावे . परंतु माझे दुसरे मन मला सांगू लागले की ही भीतीपोटी मी काढलेली पळवाट आहे . प्रचंड वैचारिक द्वंद्वा मध्ये मी जिथे केवळ एकच पाऊल कसेनुसे ठेवता येईल अशा पायवाटेवरती असहायपणे उभा होतो . ते अंतर खरोखरीच फार काही अधिक नव्हते . परंतु चुकून उडी चुकली तर मात्र फार मोठी किंमत मोजावी लागणार होती . कठीण प्रसंग आलेला आहे आणि निर्णय घेता येत नाही . हातात वेळ देखील कमी आहे . अशावेळी माणसाने काय केले पाहिजे ? नर्मदे हर ! अखेरीस मी एक युक्ती चालवली . माझ्या हातातील काठी हलक्या हाताने पकडली . आणि नर्मदा मातेचे वैखरीमध्ये जोरात स्मरण करून तिला सांगितले की मैया या काठीचे टोक तु ज्या दिशेला नेशील त्या दिशेने मी चालायला सुरुवात करणार आहे . आता निर्णय तुझ्या हातात आहे . इतक्यात एक वाऱ्याची हलकीशीच झुळूक आली आणि काठी उलटी फिरुन मागच्या दिशेला गेली . क्षणाचाही विलंब न लावता मी उलटा फिरलो आणि धावत सुटलो ! हे थोडे आधी का नाही सुचले गं मैया तुला ? असा विचार करत मी धावत पुन्हा त्याच सेवाधारीच्या कुटी पाशी आलो . 
हीच ती कुटी
सेवाधारी वागरा ठुमला पावरा . या सर्वांना खालील तीन फोटोमध्ये दाखविलेल्या व्यक्ती लागेल तशी मदत करतात असे मला कळाले . अशी मदत ते बऱ्याच ठिकाणी करतात . एकूण १३ ठिकाणी करतात असे देखील कळाले .
महाराष्ट्रातील भादल गावामध्ये देखील ही मदत काळूराम वर्मा यांच्या माध्यमातून केली जाते . मी हा टप्पा नदीपात्रातून पार केल्यामुळे डोंगरावर असलेल्या काळुराम वर्मा यांच्या घरी गेलो नाही .
नकरसिंह सोलंकी याच्या घरी देखील अशीच पाटी मी पाहिली होती . या सर्व सेवादारांचे मनापासून आभार मानले पाहिजेत .

इथे जमलेले काही ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसू लागले ! त्यांना खात्री होती जणू की मी परत येणार आहे ! आणि समजा मी परत आलो नसतो तर ? तर त्यांना खात्री होती की मी दरीमध्ये कुठेतरी पडलेला असेन ! त्यांच्याशी बोलल्यावर मला कळाले की ही दरड नुकतीच कोसळलेली असून इथून हे लोक देखील पलीकडे जायची हिम्मत दाखवत नाहीत ! मला एकंदरीत या असहकार प्रकाराचा राग आला आणि मी पुढे निघालो . चारच किलोमीटर चालायचे आहे असा विचार करून मी झपाझपा पावले उचलायला सुरुवात केली .
मी तिथे गेल्यावर जी एकंदरीत परिस्थिती पाहिली होती त्यावरून मला काय सुरू आहे याचा अंदाज आला होता . तिथे काही स्वच्छ आंघोळ घातलेली बकरी आणि कोंबड्या मधोमध आणून बांधलेले होते . होळीचा सण सुरू असल्यामुळे आज त्यांचे गाव पातळीवरचे प्रीती भोजन होते . त्यामुळे कोंबड्या आणि बकरे वगैरे कापून मस्तपैकी चिकन मटण आणि दारूचा बेत सगळ्या गावाने आखलेला होता . अशाप्रसंगी परिक्रमावासी ला हे सर्व पाहायला लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती . परंतु मला हे जर त्यांनी नीट समजावून सांगितले असते तर मी आनंदाने पुढे गेलो असतो . परंतु आधीच दारूच्या नशे मध्ये असलेले हे सर्व लोक मला काही सांगू शकले नाहीत . आणि त्यांनी माझी थोडक्यात बोळवण केली . मी तो रस्ता वेगाने उतरू लागलो . अतिशय घातक आणि तीव्र उतार होता . रस्ता नवीन केलेला असल्यामुळे त्याच्यावरती प्रचंड खडी पडलेली होती . या रस्त्याने एकही गाडी जात नव्हती कारण हा रस्ताच मुळी नवीन झालेला होता . अंधार पडायला सुरुवात झाली होती . मला पायाखालचा रस्ता मुश्किलीने दिसत होता . या भागात वन्य श्वापदे अगदी लीलया फिरतात . त्यांची बाहेर पडण्याची वेळ झालेली होती . माझ्या डाव्या हाताला एक उंचच उंच पहाड होता तर उजव्या हाताला खोल दरीतून एक नदी वाहत होती . या डोंगराला भरपूर सोंडा होत्या आणि प्रत्येक सोंडे वरती रस्त्याने एक झोकदार वळण घेतलेले होते . समोरचा रस्ता अक्षरशः मला शंभर मीटर वर दिसायचा . परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आडवी-तिडवी अनेक वळणे पार करत जावे लागायचे . मध्ये खोल दरी होती . या रस्त्याने मला अक्षरशः रडवले ! काही केल्या हा रस्ताच संपे ना ! मला क्षणभर वाटले की मला चकवा लागला की काय ! उतारा चा वापर करून मी अक्षरशः पळू लागलो . डांबर कमी वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला होता त्यातून सटकलेली खडी पायाला प्रचंड टोचत होती . पळताना त्यावरून पाय सटकत होते . जंगलाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . फक्त माझ्या धपधप पळण्याचा आवाज , रस्त्यावर आपटणाऱ्या काठीचा आवाज आणि फुललेल्या श्वासांचा आवाज डोंगरावरून परावर्तित होऊन माझा मलाच ऐकू येत होता . सर्वत्र किर्र अंधार पडला होता . अर्थात काही वेळाने पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर आला आणि त्याने बरीच मदत केली . परंतु डावीकडचा पहाड या चंद्राची सावली रस्त्यावर पाडायचा ! या नागमोडी रस्त्याची वळणे किती होती खालील नकाशामध्ये पहा !
वरील चित्रामध्ये सेवाधारी ची कुटी दिसते आहे . लाल रंगाचा मार्कर आहे तिथून मी परत फिरलो होतो आणि राखाडी रंगाने दाखवलेला रस्ता पहा कसा नागमोडी आहे ! नाग सुद्धा इतके वळल्यावर मोडून जाईल ! 
मी आपला चालतो आहे ! चालतो आहे ! काही केल्या रस्ता सरेना ! कितीही चालले तरी अजून वळणे येतच राहिली ! वर दाखविलेला रस्त्याचा टप्पा केवळ काही टक्क्याचाच आहे . संपूर्ण रस्ता पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की किती चालावे लागले त्या रात्री ! होय रात्रच झाली होती आता ! चार किलोमीटर अंतर तर मी कधीच तोडले होते . त्याच्या दुप्पट चालून देखील भमा णा तर सोडा एकही गाव किंवा एकही घर किंवा एकही मनुष्य मला दिसेना ! आजूबाजूला कुठे मानवी वस्ती असल्याची चिन्हेच नव्हती ! सर्वत्र घनघोर अंधार ! डोळ्यात बोटे घातली तरी दिसणार नाही असा अंधार पडला होता . मी केवळ पायाखाली वाजणाऱ्या खडीचा अंदाज घेत चालत होतो . आता मला दिनेश पावराचे शब्द आठवू लागले . त्याला कदाचित पुढे काय काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आधीच आलेला असणार होता . म्हणून त्याने कोणाचेही नाव न घेता मला फक्त इथेच राहा असा शहाजोग सल्ला दिला होता . परंतु मी मात्र स्वतःची बुद्धी लावून पुढे चालायला लागलो होतो . ह्या माणसाने मला चार किलोमीटर अंतर कुठल्या फूट पट्टीने मोजून सांगितले आहे हेच मला लक्षात येईना ! साधारण साडेपाच सहा वाजता मी सेवाधारी कुटिया सोडून खप्परमाळाचा उतार पकडला होता . आता अंधार पडून देखील दोन तास होऊन गेले होते , तरी मी चालतच होतो ! परिक्रमेच्या नियमानुसार सूर्यास्त झाल्याबरोबर तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे आवश्यक असते . परंतु इथे कुठेही थांबणे शक्यच नव्हते . कारण रस्त्याचा तीव्र उतार अजूनही सुरूच होता आणि वळणे वळणे सामोरी येतच होती . अशाप्रसंगीच तर तुमच्या सर्व साधनेची , संयमाची आणि सत्वाची परीक्षा असते ! मी या परिस्थितीचा आनंद घ्यायचे ठरविले ! आणि मोठ्या आवाजात भजने गात नर्मदा मातेचे नामस्मरण करत उतरत राहिलो . रात्रीचे आठ साडेआठ वाजून गेले असावेत . दूरवर मला एका घराचे दिवे मिणमिणताना दिसले .  आता मला या घाटाची सवय झाली होती . हे काय इथेच समोर तर आहे ! असे वाटून दिसणारा रस्ता किंवा पदार्थ साधारण दोन किलोमीटर दूर असायचा ! आत मध्ये गेलेली खोलगट वळणे हे टिचभर अंतर शतपटीने वाढवायची ! माझ्या मनात एका क्षणात त्या माणसाबद्दल राग उफाळून यायचा ! दुसऱ्या क्षणी माझे विवेकी मन त्याला समजावून सांगायचे की अरे नर्मदा परिक्रमा कशासाठी करायची ? अशा किरकोळ उद्वेगांना जिंकण्यासाठी तर तिचे प्रयोजन आहे ना !
गाडीने ५१ मिनिटाचे अंतर गुगल दाखवत आहे . म्हणजे चालत किती असेल गणित काढा ! अखंड चालतच होतो ! 
मला हे अंतर चालायला हरकत काही नव्हती . परंतु सकाळपासून मी हा उभा पहाड चढलो होतो . त्यात एका भाकरीवर सगळा कार्यक्रम सुरू होता . त्यामुळे पायातील बळ हळूहळू संपत चालले होते . तो मिणमिणणारा दिवा असलेले घर देखील दोन चार किलोमीटर लांब निघाले . तिथे आवाज दिल्यावर एक मनुष्य बाहेर आला आणि त्याने सांगितले समोर दिवा चमकतो आहे तिथेच आश्रम आहे ! हा दिवा त्या घरापेक्षा अधिक लांब चमकत होता त्यावरून मी अंतराचा अंदाज बांधला ! अजून बरेच चालायचे होते ! 
शांतचित्ताने चालत राहिलो . मध्येच उफाळून येणारे उद्वेग दाबत राहिलो . अखेरीस व्यवस्थित रीतसर जिला रात्र म्हणता येईल अशी रात्र सुरू झाल्यावर मी एका घरापाशी आलो . उजव्या हाताला रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये एक घर होते . घर म्हणजे कुटीच . मी दारात उभे राहून नर्मदे हर असा आवाज दिला . आतून धावतच एक मनुष्य बाहेर आला . वय साधारण साठ असावे . चटपट्याची चड्डी घातली होती आणि उघडाच होता . हे होते मान्या भाई पावरा ! मी आत्ता कुठून आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले ! त्यांनी अतिशय आदरपूर्व घरामध्ये बोलावले . गोठ्यामध्ये आसन लावून एक परिक्रमा वासी झोपला होता . मला पाहताच तो उठला . बघतो तर हा विशाल जवंजाळ होता ! तो विशाल आहे हे देखील मला कळत नव्हते इतका अंधार त्या गोठ्यामध्ये होता ! आवाजावरून मी ओळखले ! मला पाहताच तो आनंदाने उठला आणि आम्ही दोघांनी एकमेकांना आनंदाने कडकडून मिठी मारली !  मी एवढ्या रात्री कसा काय आलो याचे त्याला आश्चर्य वाटू लागले . मान्या भाई ने विचारले की आपली भोजन प्रसादी झालेली आहे काय ? मी सांगितले की दुपारी फोदला पावरा यांच्याकडे एक भाकरी खाल्ली आहे . त्याने सांगितले थोडाच वेळ द्या तुम्हाला लगेच गरमागरम भोजन प्रसादी करून वाढतो . आणि धावतच आत मध्ये गेले . स्वयंपाकाची सूचना देऊन ते बाहेर आले आणि आम्ही तिघे अंगणामध्ये गप्पा मारत बसलो . मला इतका उशीर कसा काय झाला याची उत्कंठा दोघांनाही लागली होती . मी त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला . खरे सांगायचे तर मी इतका चाललो होतो की नक्की किती चाललो आणि कुठून कुठपर्यंत आलो याचे काहीच भान मला राहिलेले नव्हते . जे अंतर चार किलोमीटर आहे असे मला सांगण्यात आले होते ते प्रत्यक्षामध्ये १७ किलोमीटर आहे असे मला मान्या भाई ने सांगितले . मला हे अंतर सांगणाऱ्या माणसाचा प्रचंड राग आला . चार किलोमीटर अंतर ? चाराचे सहा होऊ शकते अगदी आठ सुद्धा होऊ शकते . अगदी चौपट केली तरी १६ किमी भरते . इतका कमी आकडा सांगून या माणसाने काय साध्य केले असेल ? उत्तर सरळ होते . संध्याकाळी पाच वाजता जर त्यांनी मला सांगितले असते की तुम्हाला अजून १७ किलोमीटर चालायचे आहे तर कुठलाही मनुष्य चालायला तयार झाला नसता . आणि मुक्कामाची गळ घातली असती . परिक्रमावासी मुक्कामी थांबला आहे म्हटल्यावर बकरे कापणे कोंबडी कापणे ती शिजवणे दारू पिणे या त्यांच्या सर्व नित्य कर्मावर गदा आली असती . त्यामुळे चक्क खोटे बोलून त्यांनी मला पुढे पाठवून दिले . मान्या भाईला या प्रकारचे खूप वाईट वाटले आणि त्याने समस्त आदिवासी समाजातर्फे माझी माफी मागितली . मी दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना म्हणालो की कृपया त्यांनी असे काही बोलू नये . ठीक आहे . जे झाले ते झाले . विशाल कधीचाच भोजन करून आडवा झाला होता . मी येईपर्यंत त्याची एक झोप सुद्धा झाली होती .  झालेल्या प्रकाराचे आम्हाला तिघांनाही हसू येऊ लागले ! माझ्या मनात पुन्हा पुन्हा या घटने विषयी राग उफाळून यायचा . आणि तो आला रे आला की मी स्वतःला समजावून सांगायचो की खरे पाहायला गेले तर तू असे काय केले आहेस त्या सेवाधारी मनुष्यासाठी? की ज्या करता त्याने तुझी म्हणाल ती सेवा करावी ? जी सेवा मिळते आहे ते भगवंताचे उपकार समज आणि शांतपणे प्राप्त परिस्थितीला सामोरा जा . प्रत्येक वेळी या विवेकाचा विजय होत होता ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती ! विशेषतः विशालशी बोलताना माझा राग बाहेर यायचा आणि मान्या भाई यांच्याशी बोलताना विवेक जागृत व्हायचा ! असा कटू अनुभव संपूर्ण परिक्रमे दरम्यान पहिल्यांदाच आल्यामुळे आणि परिक्रमेचा नियम तोडून रात्री उशिरापर्यंत मला चालावे लागल्यामुळे थोडीशी मनाची घालमेल होत होती इतकेच . अखेरीस गरमागरम भात आणि आमटीचा भोजन प्रसाद घेतला . त्यांच्या मुलीने अतिशय तत्परतेने सर्व भोजन वगैरे वाढले . तिच्या शिक्षणाविषयी चौकशी करून तिला शिकत राहण्याचा फुकटचा सल्ला दिला . भोजनप्रसाद झाला आणि बाहेर आलो .इतक्यात रस्त्यावरून माणसांचे जथेच्या जथे चालताना दिसू लागले . नक्की काय प्रकार सुरू आहे विचारल्यावर लक्षात आले की बिलगावची होळी बघायला हे लोक रात्रीच निघाले होते ! रात्रभर चालून सकाळी बिलगावात पोहोचणार होते . दिवसभर चालून माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की मला देखील वाटले की सामान उचलावे आणि या लोकांसोबत चालू लागावे ! परंतु अतिशय विवेकी असलेल्या विशालने मला थांबवले आणि सांगितले की तुझी इतकीच इच्छा असेल तर आपण पहाटे लवकर निघूयात परंतु आता तू विश्रांती घे .  अखेरीस त्याच्या विनंतीला मान देऊन मी गोठ्यामध्येच त्याच्या शेजारी आसन लावले आणि पाठ टेकली . पडल्या पडल्या मी मान्या भाई पावरा यांच्या बद्दल विचार करू लागलो . इतका सज्जन ,शांत , सुस्वभावी , नम्र , ऋजु , मृदुभाषी, सात्विक आणि भाविक मनुष्य मी त्या संपूर्ण शूलपाणीच्या झाडीमध्ये अजून पर्यंत तरी पाहिला नव्हता . त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत झोपी गेलो . विशालने मोबाईलवर पहाटे पाच वाजता चा गजर लावून ठेवला होता . आमची चर्चा झाल्याप्रमाणे ह्या मोबाईलचा वापर फक्त वेळ बघण्यासाठी करण्याचे त्याने ठरविले होते . अन्यथा त्या फोनचा फोन म्हणून काहीच उपयोग तो करत नव्हता . ही गोष्ट फारच अभिनंदनीय होती ! 
पहाटे विशालचा गजर वाजला . परंतु त्यापूर्वीच मी आन्हीके आटोपून बसलेलो होतो . मान्या भाई पावरा आमच्यासोबत अंगणातच झोपला होता . त्याने वहीमध्ये जाताना सही शिक्का दिला . 
परिक्रमेतला ७५ वा मुक्काम भमाणा येथे घडला .दिनांक होता १७ मार्च २०२२
शिक्क्यावरचे शब्द
नर्मदे हर , माँ रेवा अन्नक्षेत्र ,भमाना , तालुका धडगाव ,जिल्हा नंदुरबार , महाराष्ट्र .
 श्री मान्या भाई पावरा
आलेला प्रत्येक दिवस पहिल्या दिवसापेक्षा अधिक रंजक आणि अधिक घडामोडींचा ठरावा असेच नियोजन नर्मदा मातेने केलेले होते , हे लवकरच माझ्या लक्षात आले ! तो दिवस मोठा मजेशीर ठरला ! 

 लेखांक ८५ : बिलगांव ची होळी आणि धडगावचे राजू टेलर


पहाटे लवकर उठून मान्याभाई पावरा यांचा निरोप घेतला आणि पुढे निघालो . डांबरी सडक मला तशी आवडत नव्हतीच . आपण खूप वेगाने चालतो आहे असे वाटायचे . इतक्यात एखादे आदिवासी कुटुंब माझ्या दुप्पट वेगाने अगदी सहज पावले टाकत माझ्या पुढे निघून जायचे ! तुमच्या मारुती गाडीच्या सर्वोच्च वेगाने तुम्ही दृतगति महामार्गाने चाललेले आहात आणि अचानक तुमच्या दुप्पटीहून अधीक वेगाने एखादी पोर्श करेरा जी टी गाडी तुम्हाला मागे टाकून पुढे निघून जाते तेव्हा कसे वाटते तसे काहीसे माझे व्हायचे ! गंमत म्हणजे कितीही प्रयत्न करा आपण त्यांना गाठू शकत नाही ! मुळातच त्यांच्या पावलांमध्ये इतकी सहजता आहे आणि ढांगा इतक्या मोठ्या असतात की आपण त्यांना गाठूच शकत नाही . हे लोक चालण्यासाठी बनलेले आहेत . दिवसभरात कुठेही जाण्यासाठी ते कितीही चालू शकतात . चालण्याचा त्यांना जरा देखील कंटाळा नाही .
        आज माझ्यासोबत विशाल जवंजाळ देखील काही काळ चालत होता . सोबत म्हणजे गप्पा मारता येणार नाही असे अंतर ठेवून आम्ही चालत होतो . मला डांबरी सडके ने चालण्याचा प्रचंड कंटाळा आला . आणि काही कोणाला कळायच्या आत मी उजवीकडच्या जंगलामध्ये घुसलो . विशाल ही धावत धावत माझ्या मागे घुसला . एका अरुंद पायवाटेने चालत राहिलो . उजवीकडे एक ओढा होता त्या ओढ्या मध्ये उतरलो .  ओढा जवळपास कोरडा पडत आलेला होता .वाहणारे पाणी थांबले होते . परंतु साचलेले पाणी शिल्लक होते . त्यातील दगड गोट्यांवरून उड्या मारत चालत राहिलो . मला खात्री होती की हा ओढा जाऊन जाऊन कुठे जाणार आहे ! त्याचे पात्र सोडायला नको ! म्हणजे मैय्याचे दर्शन होईल ! डांबरी रस्ता हळूहळू खूप वर गेला आणि लांब निघून गेला . आम्ही खोल दरीत उतरत होतो . ओढया ने अनेक वळणे घेत , उड्या मारत मार्गक्रमणा सुरू ठेवली .  एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी याहून सुंदर जागा मिळणे कठीण आहे ,असा तो ओढा होता . सुमारे तासभर आम्ही त्या ओढ्यातून चाललो असू . अचानक समोर एक छोटीशी टेकडी आली . ओढ्याने टेकडीला वळण घातले होते . मी असा विचार केला की आपण ओढ्या सोबत न चालता ही छोटीशी टेकडी चढून उतरावी . टेकडीवर चढलो मात्र समोरचे दृश्य पाहून बेभान झालो ! जिथवर नजर जाईल तिथवर फक्त नर्मदा मातेचे जल च पसरलेले होते ! आज पर्यंतच्या परिक्रमेमध्ये इतका भव्य दिव्य जलाशय कोठेच पाहिला नव्हता ! समोर साक्षात मैय्याला पाहून उत्स्फूर्तपणे .बेंबीच्या देठापासून तिचा जयजयकार सुरू झाला ! विशाल ही मागून आला आणि ते दृश्य पाहून अवाक झाला ! दोघांनी आनंदाने टेकडी पळतच उतरली आणि झोळ्या काठ्या टाकून मैया मध्ये कुठलाही मागचा पुढचा विचार न करता क्षणात उतरलो ! उतरताना लक्षात आले की गुडघाभर चिखल काठावर झालेला आहे . परंतु इतक्या दिवसांनी नर्मदा मैया चा स्पर्श होत असल्यामुळे ते सर्व क्षम्य होते ! इथे एक नाव नांगरलेली होती . मी विशालला एक कल्पना सांगितली . इथे पाणी खूप दिवस थिजलेले असल्यामुळे प्रचंड चिखल गाळ झालेला होता . या नावेचा आधार घेत आम्ही थोडेसे अजून खोल पाण्यात जाऊ शकत होतो . त्यामुळे पाण्यातूनच नावेला बाहेरून पकडून आम्ही थोडे अजून खोल पाण्यात गेलो . नावेला धरण्याचा फायदा इतकाच की बुडावे लागणार नाही . स्वच्छ निळ्या रंगाची ती फायबरची नाव होती . इथे सुंदर असे नर्मदा स्नान करून दोघे बराच वेळ काठावर बसून राहिलो . कोणीही कोणाशीही बोलत नव्हते . मौनामध्ये सर्वांचे बोलणे सुरू होते . सर्वजण म्हणजे मी , विशाल आणि मैया ! 
वाचकांना या भूभागाची कल्पना यावी म्हणून गुगल वरून या भागाचे चित्र सोबत जोडत आहे .

इथे समोर मध्य प्रदेश आहे आणि आपण महाराष्ट्रा मधून पाहत आहोत . नर्मदामाईच्या मधून जाणारी तुटक रेषा ही दोन राज्यांची सीमारेषा आहे .
हा भाग अतिशय निसर्ग संपन्न आहे .
इथे मानवी वावर अतिशय कमी आहे . अगदी अलीकडे पर्यंत इथे येण्यासाठी रस्ता नव्हता . आता इथून बिलगाव कडे कसे जायचे माहिती नव्हते . साधारण डाव्या हाताला कुठेतरी बिलगाव आहे इतकेच माहिती होते माहिती होते . या भागातून मैयाच्या काठाने चालण्यासाठी रस्ता उपलब्धच नव्हता . मुळात हे भयानक पर्वताचे शिखर होते . मैयाचे पाणी दरीमध्ये भरल्यामुळे ही जमीनी ची पातळी आहे असे वाटायचे .

आता या भागातील हाच किनारा पहा .इथे तुम्ही काठाने कसे काय चालू शकणार आहात ? हे केवळ कठीण नव्हे अशक्यच आहे .
मैया चे पाणी अक्षरशः हजारो शाखांनी आत मध्ये घुसलेले आहे त्यामुळे चालायला मार्ग मिळतच नाही .
हे चित्र पावसाळ्यात असून उन्हाळ्यामध्ये हा सर्व परिसर अतिशय रुक्ष असतो .
उन्हाळ्यातील शूलपाणी . डोंगराचे हे तीव्र उतार चालणे कठीण करतात . अत्यंत सावधपणे प्रत्येक पाऊल टाकावे लागते . चुकलेले एक पाऊल तुम्हाला किती खाली घेऊन जाईल याचा अंदाज लावता येणे कठीण असते . 
आम्ही देखील असाच एक डोंगर चढायला सुरुवात केली . आसपास कोणीही माहिती सांगणारे भेटत नव्हते . अक्षरशः कुठे जावे काय करावे काहीच कळेनासे झाले . कारण जिकडे बघावे तिकडे मैयाचे पाणीच शिरलेले दिसत होते . 
अशा पद्धतीने नर्मदा मातेचे पाणी सर्व नदी ,नाले , ओढे यांच्यामध्ये उलटे शिरलेले असते .
विशालला आता पुढे निघून जायचे होते . त्यामुळे मी त्याला काही अनुभव जन्य सूचना विनाकारणच देत होतो . उदाहरणार्थ मी त्याला सांगितले की हे पहा जेव्हा असा प्रसंग येईल की कुठे जायचे कळत नाही तेव्हा नर्मदा मातेला हाक मारायची . काहीतरी सोय होते . असे म्हणून आम्ही दोघांनी नर्मदे हर असा पुकारा केला . तेवढ्यात समोरच्या डोंगरा आडून एक तरुण स्त्री शेळ्या हाकत आमच्याकडे आली . तिने फाटका तुटका गाऊन घातला होता . इतक्या भयंकर डोंगर उतारावरून गाऊन घालून ही कशी काय चालू शकत होती हे मला कळले नाही ! त्या माताराम ला आम्ही बिलगाव कडे जाण्याचा रस्ता विचारला . तिने दोन-तीन मार्ग सांगितले . पैकी डांबरी सडके कडे जाणाऱ्या मार्गाने विशाल मार्गस्थ झाला . इथे एक उदे किंवा उदय नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते . त्या नदीमध्ये अनेक सुंदर सुंदर धबधबे आहेत असे मला त्या मातारामने सांगितले . मी असे ठरविले की मार्कंडेय ऋषी ज्याप्रमाणे उपनदी च्या काठाने चालत तसे काहीतरी करत आपण जाऊया . त्यासाठी एक अतिशय उंच डोंगर चढणे मला आवश्यक होते . तिथून पुढे नदीसोबत फक्त उतरायचे होते . 
जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर पर्याय येतो की सोपा मार्ग निवडावा की अवघड मार्ग निवडावा तेव्हा तेव्हा माझे प्राधान्य कायम कठीण मार्गालाच राहते . कारण त्या निमित्ताने तुम्हाला तुमची क्षमता जोखण्याची एक संधी प्राप्त होते आणि समजा अपयश आलेच तर सोपा मार्ग आहेच हे तुम्हाला आधीच माहिती असते ! आता सुद्धा डांबरी मार्गाने चालण्यापेक्षा इथे कधी नव्हे ते आलेलो आहोत तर इथले सृष्टी सौंदर्य पाहत चालावे असे मला फार वाटले . समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
सदा सेवी आरण्य तारुण्य काळी ।
 मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ।
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा ।
 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥
याच लोकांचा एक अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ निश्चितपणे आहे . परंतु समर्थ रामदास हे फार मोठे कवी होते त्यामुळे अनेक अर्थ ध्वनित होणारे काव्य लिहिणे ही त्यांची विशेषता राहिलेली आहे . नाही श्लोकाचा अर्थ विविध प्रकारे सांगता येतो विविध प्रकारे सांगता येतो . अरण्य याचा अर्थ सर्व भौतिक गोष्टींचा त्याग करून निःसंग रहाणे असा आहे त्याचप्रमाणे याचे साधे शब्दार्थ देखील प्रभावी आहेत . साध्या शब्दात अर्थ पहायचा झाला तर समर्थ सांगतात ही जोर करून आहात तोपर्यंत अरण्यवास दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकून घ्या . कारण एकदा का तुम्ही वयस्कर झालात की अशा ठिकाणी जाण्याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकणार नाही अशी तुमची अवस्था होणार आहे ! फक्त अशा ठिकाणी भटकताना आपल्या मनाचा दृढ निश्चय मात्र ढळू देऊ नका . असे जो कोणी करेल तो प्रभू रामाचा दास धन्य होय ! मला सर्वच संतांचे वाङ्मय वाचण्याची खूप आवड आहे .परंतु
समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा माझा जीवनावर अतिशय खोल प्रभाव राहिलेला आहे . याचे कारण त्यांना असलेली भटकंतीची आवड हे एक असू शकते ! त्यांच्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी अरण्यवासाचे महत्त्व समजावून सांगितलेले आहे . 
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची पाहतो ॥
 किंवा 
गिरी कंदरे राहीजे दुरी देशे । 
किंवा
सुखालागी आरण्य सेवीत जावे ।
किंवा 
खनाळामध्ये जाऊन राहे ।तेथे कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥
अशा त्यांच्या अनेक काव्यांमधून आपल्याला त्यांचे निसर्ग प्रेम आणि एकांत वासाची उत्कट इच्छा दिसून येते . असो .
इथे असलेले काही धबधबे प्रसिद्ध आहेत . त्यातील दोन मी पाहिले . अर्थातच पाणी नव्हते परंतु कठीण मार्गाने येथे उतरण्याचा आनंद मला घेता आला . पावसाळ्यामध्ये मात्र हा परिसर खूप सुंदर असतो .वाचकांच्या माहिती करता या जलप्रपातांची चित्रे सोबत जोडत आहे . 
त्रिशूल नावाच्या गावातून उदयनदी थोडीशी पुढे आल्यावर कुवरखेत नावाचा सुंदर धबधबा आहे .
हाच तो कुवरखेतचा धबधबा .एक मोठी सलग दगडी घसरगुंडी हे या धबधब्याचे वैशिष्ट्य आहे .
अतिशय सुंदर असा हा खडक आहे .
आमखेडीपाडयाचा धबधबा
एकंदरीत हा भूभाग असा आहे .
इथला सर्वात प्रसिद्ध धबधबा मात्र बारधाऱ्या धबधबा हाच आहे . नीट पाहिले असता हा १२ मोठया धारांनी खाली पडतो .
मी गेलो तेव्हा अर्थातच हा धबधबा जवळपास कोरडा पडला होता परंतु धोकादायक पद्धतीने दगडांवरून खाली उतरण्याचा आनंद मी इथे घेतला ! ( प्रस्तरावगमन )
थोडेसे अंतर चालल्यावर बिलगाव लागले . मला लक्षात आले की गेले काही दिवस मी ज्या ज्या गावात जातो आहे त्या प्रत्येक गावातील होळीचा सण त्या त्या दिवशी च आयोजित करण्यात आलेला आहे ! नर्मदा मातेचे नियोजन कसे असते पहा ! मी स्वप्नातही अशा पद्धतीने परिक्रमा करण्याचे नियोजन कधी करू शकलो नसतो .  ही केवळ तिची कृपा ज्यामुळे मला हे सर्व सण समारंभ उत्सव पाहता आले ! अगदी मूळ स्वरूपात पाहता आले ! बिल गावामध्ये होळीची प्रचंड लगबग चालू होती ! सर्वत्र नटलेले थटलेले आदिवासी तरुण-तरुणी फिरत होते . सर्वांच्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला तुम्हाला या काळामध्ये आवर्जून दिसतो . एरव्ही ही माणसे फार साधी राहतात . 
पावरा आदिवासी तरुणाचे याच भागातील छायाचित्र . 
याची पॅन्ट जागोजागी जी फाटलेली आहे ती फॅशन नसून अनेक दिवस एकच एक वस्त्र नेसून कष्ट केल्याचा तो परिणाम आहे . डोंगर चढताना उतरताना आपटून धोपटून वगैरे फाटल्याची ही चिन्हे आहेत . सध्या मात्र अशा प्रकारे कपडे फाडून ते चढ्या भावाने विकण्याची पद्धत फॅशन जगतामध्ये आढळते . एसी खोलीतून बाहेर पडत एसी उद्वाहकाने खाली उतरत एसी कार मध्ये बसून गाव बोंब मारणाऱ्या " शहरी कष्टकऱ्यांना " असे खऱ्या कष्टकऱ्यांची आठवण करून देणारे फाटके कपडे घालण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे ! असो .
बिलगावामध्ये मी पुन्हा एकदा पावरा आदिवासी लोकांचे निरीक्षण करू लागलो . या लोकांची मी जी काही निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत अगदी बऱ्यापैकी तीच सर्व निरीक्षणे विकिपीडिया वर देखील नोंदविण्यात आलेले आहेत असे माझ्या लक्षात आले . त्यातील छोटासाच लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे म्हणून आपल्याशी शेअर करावा असे मला वाटले . कृपया आपण तो वाचावा म्हणजे आपल्याला पावरा आदिवासी समाजाची थोडक्यात तोंड ओळख होईल . तो लेख खालील प्रमाणे .

आदिवासी पावरा समाज हा महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. पावरा जमातीतील लोक सातपुड्याच्या खासकरून धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आढळते .

पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे .

पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला व पाल्या म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.

पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पॅंट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात तर आताचे स्त्रीया साडी परिधान करू लागल्या आहेत. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.

पावरा आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या ( भुत्या )बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी आधी भौंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात.

होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात.

पावरा समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरिष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात महूच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

पावरा समाज आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करून लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

होळीच्यानिमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या आधी १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात रायबावा बुद्यावन्य प्राणीचेटकीण वा काली इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात . होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात.

नाटकांचे प्रकार :

राय : हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्यांचा पेहरावात दोन ९ वारी साडयांचे केलेले उपरणे असते. कंबरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तलदार व डोक्यावर रंगीत पागोटे असते. यांच्या सोबत साडी नेसलेले स्त्री वेषातील पुरुष असतात. या सर्वांना गेर नृत्यातील शिस्त चोखपणे पाळावी लागते. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यास मनमोहक असते.

  • बावा बुद्या: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूंपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढऱ्या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती  दुधी भोपळ्याची वाळलेली फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. व कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा ढोलाच्या ठेक्यावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते.
  • वन्यप्राणी: वेषात अस्वल वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात.
  • चेटकीण वा काली: प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते. ( विकिपीडिया वरील लेख इथे समाप्त होतो . सौजन्य : विकीपेडिया आणि त्यावरील विविध लेखक व संपादक)

आपण यापूर्वी जे अनेक व्हिडिओ आपल्या लिखाणातून अपलोड केलेले पाहिले त्यातील सर्व नृत्यांमध्ये तुम्हाला वरील सर्व पात्रं भेटतील .पावरा आदिवासी नृत्याची एक वेगळी प्ले लिस्ट आपल्या यूट्यूब चैनल वर केलेली आहे ती आवर्जून पहावी म्हणजे आपल्याला यांची संस्कृती लक्षात येईल .

होळी किंवा भगुरै किंवा भंगुरई सणाच्या प्रसंगी पावरा आदिवासी बांधव करत असलेले गेर नृत्य

आजचा माझा दिवस चालण्याचा होता . बहुतांश डोंगराचा उतार असल्यामुळे खूप वेगाने चालत होतो . बिलगावा मध्ये खूपच मोठी होळी पेटवण्यात आली होती . या गावातील लोकांच्या होळ्या किती मोठ्या असतात त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही . अक्षरशः मान दुखेल इतक्या उंचीची होळी रचलेली असते . मला तर काही लोकांनी सांगितले की बिलगाव मधील होळी भमाण्यामधून सुद्धा दिसते ! हे अंतर साधेसुधे नाही , तब्बल २२ किलोमीटर आहे ! होळी निमित्ताने इथे खूप मोठा मेळा देखील लागला होता . बिलगावातली होळी पहात पुढे निघालो . हा नावाला महाराष्ट्र होता . इथे अजूनही कोणीही मराठी बोलत नव्हते . मुळात हे सर्व सण उत्सव याच काळात का होत असतील ? विचार केल्यावर मला जाणवले , की हा परिसर मानवी वस्तीसाठी किती विषम आहे पहा . पावसाळ्यामध्ये इथे इतका मुसळधार पाऊस असतो की बाहेर फिरकता देखील येत नाही . थंडीच्या दिवसांमध्ये इतकी प्रचंड थंडी पडते की माणूस गोठून जातो . उन्हाळा तर इतका कडक आहे की तुम्हाला भाजून काढतो . त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंचा संधी काळ अर्थात होळी हा एकमेव कालावधी येथे मानवी वावरासाठी किंवा एकत्रीकरणासाठी सुसह्य असा उरतो . 
बिलगावानंतर सर्व सपाटीवरील गावे लागली . या भागातली सपाटी म्हणजे दोन गावांच्या मध्ये पर्वत न लागता टेकड्या लागतात ! हा संपूर्ण परिसर खूप सुंदर आहे . आता हळूहळू डोंगर उतारावर दाट झाडी दिसू लागली होती . शेतीचे प्रमाण वाढले होते . सुंदर अशा नदीला समांतर रस्ता चालला होता . त्यामुळे मी बहुतांश वेळा नदीपत्रातूनच चालायचो . नदी महाराष्ट्रामध्ये वाहत असल्यामुळे अर्थातच खाली जमीन कमी आणि खडक जास्त होता . त्या खडकावरून लागणारे छोटे मोठे धबधबे आणि नदीपात्राचा आनंद घेत चालत होतो . इथे कोळी लोक छोट्या छोट्या दगडांची मोठी रांग करतात त्यामुळे एक छोटेसे धरण तयार होते . अशा धरणामध्ये मग ओढणीने किंवा साडीने मासे पकडले जातात . ज्यांना जाळे देखील विकत घेणे शक्य नाही असे लोक या पद्धतीने मासे पकडून स्वतःच्या जेवणाची सोय करतात . साडी देखील धुवून निघते आणि मासे देखील सापडतात .
रस्त्याला समांतर चाललेली नदी . मागे दिसणारे खप्परमाळ चे डोंगर .
नदीमध्ये मासे धरण्यासाठी गरीब कोळी बांधवांनी घातलेले छोटे छोटे बांध . पुढे डोह असल्यामुळे तिथे मासे धरणे अवघड होते . 
नदीच्या आजूबाजूला सर्वत्र अभेद्य महाराष्ट्राचा काळा कातळ आहे .
मी जेव्हा या भागात सपाटी लागली असे म्हणतो तेव्हा या बालकाच्या मागे दिसणारा रस्ता पहा , तसा रस्ता मला अपेक्षित असतो .
हळूहळू या भागामध्ये बारमाही शेती ,झाडे आणि ताडाची झाडे दिसू लागली .
ताडाच्या झाडाचे खोड होळीच्या मधोमध वापरले जाते यावरून तुम्ही होळीच्या उंचीचा अंदाज घ्यावा ! मागे दिसणारे पर्वत मी काल उतरून आलो होतो . अजूनही मी डोंगरांमध्येच होतो . मूळ महाराष्ट्राची भूमी गाठण्यासाठी तुम्हाला अजून बरेच डोंगर खाली उतरावे लागते . (सर्व चित्रे संग्रहित )
या भागात आल्यावर आपला महाराष्ट्र किती सुजलाम सुफलाम आहे ते कळते .
यालाच मी सपाटी म्हणतो आहे !
एकंदरीत हा परिसर सुगम आणि सुरम्य आहे .इथवर येण्यासाठी बरेच रस्ते आहेत .
गावांची नावे आता जरा आपलीशी वाटू लागली होती .तसे पाहायला गेले तर ही महाराष्ट्रातील सर्वात गरीब गावे गणली जाणारी गावे होती . परंतु मध्य प्रदेशातील मोठ्या गावांपेक्षा सुद्धा अधिक समृद्धी येथे नांदत आहे हे सहज कोणालाही दिसत होते . आपला महाराष्ट्र सर्वार्थाने पुढारलेला आहे आणि देशाचे अग्रगण्य नेतृत्व करणारा आहे हे नुसता असा त्याचा भूगोल पाहीला तरी लक्षात येते . लहानपणी कीर्तनामध्ये मी आर्या या अक्षरगण वृत्तातले एक सुभाषित ऐकले होते व ते कायमचे लक्षात राहिले होते . 
कीर्तनकार सांगतात की काय केल्यामुळे मनुष्य चतुर होतो किंवा मनुष्याला चातुर्य प्राप्त होते ? तर

केल्याने देशाटण ।
पंडित मैत्री सभेत संचार ।
शास्त्र ग्रंथ अवलोकुनि ।
मनुजा चातुर्य येतसे फार ॥

नर्मदा परिक्रमा तुम्हाला यातील प्रत्येक गोष्ट करण्याची खूप चांगली संधी देते . पर्यायाने परिक्रमेच्या अखेरीस तुमची चातुर्य पातळी वाढली पाहिजे अशी तिची फलश्रुती आहे . विशेषतः ज्यांना राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रामध्ये जीवित कार्य करण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींनी नर्मदा परिक्रमा हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे . आळंदी येथे परम पूज्य जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था नावाची संस्था आहे , जीने वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये पुनरुज्जीवन केले असे एकमुखाने मानले जाते .
संस्थेची आळंदी मधील मूळ इमारत
या संस्थेने आजवर मानव जातीला हजारो अत्युत्कृष्ट कीर्तनकार दिले .
 या संस्थेमध्ये चार वर्षे राहून कीर्तनाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी आहेत . या सर्वांना कीर्तनाचा परिपूर्ण अभ्यास झाल्यावर नर्मदा परिक्रमा करून येणे अनिवार्य केलेले आहे . कारण चार वर्षांमध्ये तुम्ही जे शिकलात त्याचे प्रत्यक्ष समाज जीवनामध्ये प्रकटीकरण कसे होते आहे हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी नर्मदा परिक्रमे मध्ये जेवढे तुम्हाला मिळू शकते तेवढी अन्यत्र कुठेही मिळणार नाही हे धगधगीत सत्य आहे . ही केवळ वदंता नसून अशा रीतीने परिक्रमा करणारे अनेक वारकरी विद्यार्थी मला माझ्या परिक्रमेदरम्यान भेटले . रामदासी संप्रदायातील नर्मदा परिक्रमा केलेले देखील अनेक लोक मला माहिती आहेत . विवेकानंद केंद्र किंवा रामकृष्ण मठाचे देखील अनेक साधक नर्मदा परिक्रमा करतात . थोडक्यात काय तर नर्मदा परिक्रमा करणे या गोष्टीचे महत्त्व भारतातील सर्वच सांप्रदायांनी ओळखलेले असून ती करून आलेल्या व्यक्तीचा लाभ विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला करून घेता आला पाहिजे . ऐकीव माहिती आणि प्रत्यक्ष अनुभूती याच्यामध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो . असो .
राजबर्डी , कामोद , भोगावडे ,उमरणी , धनाजे , वडफल्या अशी गावे पार केल्यावर धडगाव लागत होते .
यातील धनाजे गावामध्ये मी आलो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सुंदर आश्रमाने माझे लक्ष वेधले . हनुमंताचे मंदिर भरपूर झाडी आणि दोन सुंदर कुटी असलेला हा छोटासा आश्रम होता . खरे म्हणजे बिलगाव च्या जत्रेमध्ये खाण्यापिण्याचे खूप सारे स्टॉल लागलेले होते आणि माझ्याकडे थोडेफार पैसे देखील होते . परंतु परिक्रमा वासीं कडून लोक इथे पैसे घेत नाहीत . आणि तसेही परिक्रमेमध्ये विकत घेऊन खाणे वर्ज्यच आहे . त्यामुळे दिवसभर उपाशीपोटी चालत होतो . विशालची आणि माझी केव्हाच ताटातूट झालेली होती . सोबत एखादा परिक्रमावासी चालत असेल तर त्याच्या जवळचे खाणे थोडेफार आपल्याला खायला मिळते . आज एकटाच चालल्यामुळे तसेही काही झाले नव्हते . त्यामुळे कडकडून भूक लागली होती .  या आश्रमाची व्यवस्था अच्युतानंद सरस्वती नावाचे एक तेजस्वी संन्याशी सांभाळीत होते . मी हनुमंताचे दर्शन घेऊन आत मध्ये गेलो . आणि स्वामीजींना ओम नमो नारायण केले . त्यांनी मला माझे नाव विचारले .मी त्यांना नाव सांगितले . इथे एका अनपेक्षित घटना क्रमाने माझ्या परिक्रमेचा ताबा घेतला . प्रत्यक्षामध्ये मला ओंकारेश्वरच्या मुक्कामी राजू टेलर म्हणून धडगाव चे जे परिक्रमा वाशी भेटले होते त्यांना भेटून त्यांच्याकडे मुक्काम करायचा होता . म्हणजे तशी प्रेमळ तंबीच त्यांनी मला दिलेली होती . या राजू टेलर यांचे घर इथून किती लांब आहे हे मी स्वामीजींना विचारत होतो . स्वामीजींनी राजू टेलरला फोन लावून मला बोलायला दिले . परंतु तत्पूर्वी दोघेजण जे काही बोलले ते अतिशय संशयास्पद होते ! तो आला आहे . त्याला तिकडे पाठवू का इकडेच ठेवू वगैरे दोघांचे बोलणे चालले होते ! जणूकाही माझा ताबा घेण्यासाठी दोघांची चर्चा चालली होती असे मला वाटले ! सर्व संशयास्पद होते . अखेरीस न रहावून मी स्वामीजींना विचारले की स्वामीजी नक्की काय झाले आहे मला सांगा .  तरी देखील स्वामी मला केवळ आज तू धडगावातच राहा पुढे जाऊ नको असेच सांगत राहिले . वाचकहो तुम्हाला अधिक गोंधळामध्ये न टाकता प्रत्यक्षामध्ये काय झाले होते ते सर्व सांगतो . आदल्या दिवशी मी फोदला गारद्या पावरा यांच्याकडे भोजन घेतले होते .तिथे त्यांचा मुलगा दिनेश याने माझ्याबरोबर काढलेले दोन-तीन फोटो नंतर जेव्हा केव्हा रेंज येईल तेव्हा तुमच्या मित्राला पाठवतो असे मला सांगितले होते . यानंतर मी पुढे मार्गस्थ झालो होतो परंतु माझ्या मागोमाग काही वेळातच दिनेश देखील डोंगर चढून वर आला तिथे त्याला रेंज आली आणि त्याने माझे फोटो माझ्या मित्राला पाठवून दिले . माझ्या मित्रमंडळींना मी महाराष्ट्रामध्ये आलो आहे असे लक्षात आल्याबरोबर त्यांनी अचानक असा विचार केला की चटकन गाडी काढावी आणि माझी नर्मदे काठी भेट घ्यावी ! अशा रीतीने मला भेटण्यासाठी माझे चार मित्र तयार झाले ! ज्यांना मी सर्व फोटो पाठवत होतो ते बाळासाहेब वाल्हेकर , त्यांच्याकडे त्या काळामध्ये राहणारे माझे इतिहास संशोधक मित्र श्री घनश्यामराव ढाणे , मी आर्टिक क्षेत्रात नोकरी करत असताना माझे वरिष्ठ राहिलेले श्री प्रशांत चन्ने आणि त्याच कंपनीतील सह कर्मचारी श्री अनिल पावटे असे चौघेजण एका क्षणात तयार झाले आणि गाडी काढून नंदुरबारच्या दिशेने निघाले सुद्धा ! दिनेशने पुढील क्रमांक म्हणून यांना धनाजे आश्रमातील स्वामीजींचा क्रमांक दिला . साधारण तुमची चाल वगैरे पाहून या लोकांना अंदाज येतो की हा परिक्रमावासी उद्या कुठे मुक्कामाला पोहोचलेला असेल . तसेच माझ्या मित्रांनी कुठून तरी राजू टेलरचा क्रमांक देखील मिळवला आणि या दोघांशी त्यांचे बोलणे सतत चालू होते . माझे मित्र या दोघांना फक्त एवढेच सांगत होते की आम्ही येत आहोत तोपर्यंत त्याला थांबवून ठेवा . कारण एकदा हा पुढे सटकला तर आमचा संपर्क होणे अवघड आहे . आणि हे दोघे त्यांना सांगत होते की अजून तरी तुमचा मनुष्य आमच्या आश्रमात आलेला नाही परंतु तो येईलच याची खात्री देता येत नाही . दिनेशला खात्री होती की मी या दोन्हीपैकी एका कुठल्यातरी आश्रमामध्ये नक्की थांबणार आहे आणि तसे तो माझ्या मित्रांना सांगत राहिला . माझ्या अपरोक्ष हे सर्व प्रकार सुरू आहेत याची मला तीळ मात्र कल्पना नव्हती . स्वामीजींना असे वाटले की बहुतेक मी घरदार सोडून पळून आलेला परिक्रमावासी आहे आणि मला पकडून घरी नेण्यासाठी माझे मित्र येत आहेत . त्यामुळे ते मला थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते . परंतु का थांबवून ठेवत आहे ते सांगत नव्हते . अखेरीस मी स्वामीजींना म्हणालो की कृपा करून नक्की काय सुरू आहे ते सर्व मला सांगावे . मग त्यांनी मला माझ्या मित्राला फोन लावून दिला . मला फोनवर संवाद साधल्यावर लक्षात आले की हे चौघे मला भेटण्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत . आता इथे अजून एक गंमत घडणार होती . माझे आध्यात्मिक गुरु श्री जनार्दन स्वामी खेर  यांची समाधी नंदुरबार जिल्ह्यातच टाकरखेडा नावाच्या गावामध्ये आहे तिथे जाऊन दर्शन करून येण्याची मला इच्छा होती . आणि माझे मित्र येताना त्या ठिकाणावरूनच येणार होते . सर्वप्रथम मी स्वामीजींना सांगितले की मी काही पळून वगैरे आलेला परिक्रमावासी नसून मी परिक्रमा अर्धवट सोडून परत वगैरे जाणार नाही आहे . परंतु मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन अवश्य घ्यायचे आहे . हे ठिकाण साधारण ७० किलोमीटर दूर होते याचा अर्थ दोन दिवस जायला आणि दोन दिवस यायला मला लागणार होते . परिक्रमेमध्ये ७० किलोमीटर हे अंतर अतिशय किरकोळ वाटते . परंतु माझ्या मित्रांपैकी बाळासाहेब वाल्हेकर आणि प्रशांत चन्ने या दोघांना देखील टाकरखेडा येथील आश्रम बघण्याची इच्छा होती त्यामुळे सगळाच घोळ झाला होता कारण ते निघालेले असल्यामुळे लवकरच या परिसरामध्ये पोहोचणार होते . अखेरीस अतिशय हुशार असलेल्या अच्युतानंदन सरस्वती स्वामी महाराजांना सर्व घटनाक्रमाचा अंदाज आला आणि त्यांनी मला पुढील मार्ग सुचविला तो याप्रमाणे .
त्यांनी मला सांगितले की माझे गुरुस्थान हे परिक्रमेपासून बऱ्यापैकी लांब असल्यामुळे तिथे जाण्यासाठी परिक्रमेप्रमाणे चालत जाण्याची गरज नाही . तरी मी परिक्रमा मार्गावरील एखाद्या ठिकाणी नर्मदा मैया आणि माझी झोळी वगैरे सर्वसामान ठेवावे .नर्मदेची प्रार्थना करावी की मला माझ्या गुरुस्थानाचे दर्शन सुरळीतपणे घडवावे आणि मिळेल त्या मार्गाने गुरुस्थानचे दर्शन घेऊन पुन्हा त्या अधिष्ठानापाशी यावे आणि परिक्रमा पुढे सुरू करावी हे उत्तम आहे . तिथे जाण्यासाठी गाडी मार्ग धडगाव या पुढच्या गावातून होता . त्यामुळे अधिक वेळ न घालवता मी पुढे धडगावात निघून जावे असे त्यांनी मला सांगितले . ही दोन्ही गावे शेजारी शेजारी असून मध्ये फक्त एक नदी आहे . मी धडगाव मध्ये जाऊन राजू टेलर यांचे दुकान गाठले . त्यांना देखील मित्रांचा फोन आल्यामुळे ते माझी वाटच पाहत होते . यांचे एक अतिशय छोटेसे टेलरिंग चे दुकान गावामध्ये असून गुंठा भर जागेमध्ये छोटेसे घर यांनी बांधलेले आहे . इथे परिक्रमावासींची अगदी आश्रमासारखी सेवा होत नसली तरी कोणी अचानक आले तर ते नाही म्हणत नाहीत इतकेच . शिवाय आता स्वतः नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आल्यामुळे हे परिक्रमावासींना मार्गदर्शन देखील आवर्जून करतात . यांना जेव्हा कळाले की मी सकाळपासून उपाशीपोटी ४४ किलोमीटर चालत आलेला आहे , तेव्हा त्यांनी ताबडतोब घरी भोजन प्रसादी बनविण्याचा आदेश दिला . वरच्या मजल्यावर बांधलेल्या छोट्याशा खोलीध्ये मी आसन लावले होते . एक पातळ लोखंडी जिना वरती घेऊन जात होता . विचार करून पहा .मुळात हा सर्व मागासलेला परिसर आहे आणि अशा ठिकाणी छोटेसे टेलरिंग चे दुकान . ते असे किती चालत असणार ? परंतु तरी देखील मला काही सेवा द्यावी अशी इच्छा राजू दादा यांना होत होती हे फार महत्त्वाचे आणि मोलाचे होते . त्या दिवशी मला मिळालेल्या भोजनाप्रसादीचे मूल्य शब्दांमध्ये कसे काय करता येईल ! यांचा तरुण मुलगा माझ्याशी लगेच 'कनेक्ट ' झाला . जेन झी का काय नावाचा नवीन प्रकार सध्या बाजारात आहे ! मला या प्रकाराबद्दल आमच्या चिरंजीवांकडून कळले जे स्वतः जेन झी आहेत ! १९९७ ते २०१२ या कालावधीमध्ये जन्माला आलेल्या मुलांना जेन झी असे म्हणतात . १९८१ ते १९९६ दरम्यान जन्माला आलेले मिलेनियल म्हणून ओळखले जातात . २०१२ ते आजतागायत जन्माला येणाऱ्या पिढीला जनरेशन अल्फा म्हटले जाते . मला यातील कुठलीही पिढी वर्ज्य नाही . माझे अतिशय जवळचे मित्र जर तुम्ही पाहू गेलात तर त्यात सत्तर ते ८० या वयोगटातील मित्र अधिक आहेत ! गंमत म्हणजे मी त्यांचा मित्र असा उल्लेख करत नसून ही गुरूतल्य व्यक्तिमत्त्वे इतरांना ओळख करून देताना हा आमचा मित्र आहे अशी ओळख करून देतात ! याचा अर्थ कुठल्याही जनरेशन अर्थात पिढीतील माणसाशी जुळवून घेऊन संवाद साधण्याची युक्ती मला साधलेली आहे . परंतु त्यातल्या त्यात अधिक आनंद देणारे संवाद हे या तथाकथित जेन झी सोबत घडतात असा माझा अनुभव आहे . राजू टेलर यांचा चिरंजीव या वयोगटातला होता . त्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या ! जेव्हा मी राजू टेलर यांना स्वामीजींनी मला दिलेला सल्ला सांगितला तेव्हा त्यांनी देखील तो योग्य असल्याचे सांगितले आणि आज रात्रीच तुला एखाद्या दुधाच्या वगैरे गाडीमध्ये बसवून शहाद्याच्या दिशेला पाठवून देतो असे मला सांगितले . राजू टेलर यांची नुकतीच नर्मदा परिक्रमा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांनी घरामध्ये त्यांची नर्मदा मातेची कुपी पूजेमध्ये ठेवली होती तिच्या शेजारीच माझी नर्मदा मैय्या देखील स्थापित केली . आणि गाडीची चौकशी करण्याकरता आम्ही दोघे मुख्य रस्त्यावर आलो . इथे एक ट्रक जो रोज रात्री शहाद्याला जायचा तो उभा होता परंतु नेमका त्याच दिवशी तो जाणार नव्हता . आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली परंतु त्या दिशेला जाणारी एकही गाडी उपलब्ध नव्हती . ट्रकचा मालक डेअरी चालवायचा त्याला देखील विचारले परंतु त्याने असमर्थता दर्शवली . सुदैवाने माझे निघालेले मित्र देखील मध्ये कुठेतरी मुक्कामासाठी थांबले त्यामुळे मला अजून एक दिवस मिळाला . अखेरीस उद्या पहाटे पाचच्या सुमाराला पहिली एसटी पकडून शहादा सारंगखेडा मार्गे टाकरखेडा गाव गाठायचे आणि माझ्या मित्रांनी देखील त्याच वेळी तिथे पोहोचायचे असे ठरले . त्यानंतर ते मला पुन्हा धडगावला आणून सोडणार होते आणि माझी परिक्रमा पुढे सुरळीत सुरु होणार होती .  ज्या गुरुदेवांमुळे आज माझे अस्तित्व आहे त्यांच्या समाधीस्थानाचे दर्शन आपल्याला घडणार आहे आणि नर्मदा जलाने त्यांना अभिषेक करता येणार आहे , या कल्पनेनेच माझी झोप उडाली ! रात्रभर मी तळमळत राहिलो . कधी एकदा उजाडते आणि कधी एकदा मी गुरुस्थानाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होते असे मला झाले ! माझे धड धडगावामध्ये पडलेले होते परंतु मन मात्र कधीच टाकरखेड्याला पोहोचले होते !

 लेखांक ८६ : परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर (बडोदा) यांचे समाधी स्थान श्रीक्षेत्र टाकरखेडा

राजू टेलर यांचे घरून सर्व आवरून ठीक सहा वाजता धडगाव एसटी स्टँड गाठले . लाल परी गाडी पकडून सकाळी सात वाजता निघालो आणि नऊ वाजता शहाद्याला पोहोचलो . ७५ दिवसांनी प्रथमच गाडीत बसल्यावर कसे तरीच वाटत होते .माझी नर्मदा मैया आणि झोळी राजू टेलर यांच्या देवघरामध्ये स्थिर ठेवली होती . परिक्रमेच्या या पद्धतीला खंडित परिक्रमा असे म्हणतात . आणि ती शास्त्र संमत आहे . विशेषतः मी माझ्या मोक्षदात्या सद्गुरूंच्या समाधीच्या दर्शनासाठी जात असल्यामुळे हे करणे अधिकच आनंददायक होते .
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज
 शहादा गावातून नाशिकला जाणाऱ्या एसटी बसने सारंगखेडा गावामध्ये उतरलो . या एसटीमध्ये बसायला जागा नसल्यामुळे ड्रायव्हरच्या मागे उभा राहिलो .त्याच्याकडून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचे कळले नाही तर परिक्रमेमध्ये देशातील व जागतिक घडामोडींची काहीही माहिती कळत नाही. सारंगखेडा आणि टाकरखेडा या दोन गावांच्या मधून तापी नदीचे भव्य पात्र वाहते . सारंगखेडा नंदुरबार जिल्ह्यात आहे तर टाकरखेडा धुळे जिल्ह्यामध्ये येते . परंतु एसटी वाले टाकरखेड ला थांबत नाहीत . त्यामुळे तिथून पाय गाडीने टाकरखेडा गाठले .महाराष्ट्रामध्ये टाकरखेडा नावाची अनेक गावे आहेत . मध्यप्रदेश मध्ये देखील या नावाची गावे सापडतात . विदर्भातील एक थोर संत श्री लहानोजी महाराज यांची समाधी देखील अमरावती जवळ असलेल्या टाकरखेडा नावाच्या गावातच आहे . परंतु ते टाकरखेडा वेगळे आणि हे गाव वेगळे . हे टाकरखेडा गाव सारंगखेडा या गावामुळे ओळखले जाते . सारंगखेडा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरतो . इथे दत्ताचे एक भव्य मंदिर असून या गावांमध्ये बहुतांश राजपूत किंवा सिसोदिया लोकांची वस्ती आहे . तापी नदीचे दर्शन घेतले ! पूर्वी तापी नदी देखील नर्मदेला येऊन मिळत असे , असे सांगतात . पुढे काही भौगोलिक घडामोडी झाल्या आणि दोघींचे मार्ग वेगळे झाले . परंतु संपूर्ण भारतातील या दोनच प्रमुख नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी आहेत . 
तापी नदीच्या उत्तर तटावर सारंगखेडा तर दक्षिण तटावर टाकरखेडा गाव दिसते आहे . मध्ये दोघांना जोडणारा पूल दिसत आहे . तापी नदीचे पात्र इथे मोठे विस्तृत आहे . 
आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर कोणीतरी साधू आला आहे असे आश्रमातील सेविका कमलबाईने आश्रमातील व्यवस्थापिका असलेल्या कीर्ती बेनला सांगितले आणि तिने पटापट दारे खिडक्या लावून घेतली ! 
टाकरखेडा आश्रमाचे नवीन प्रवेशद्वार
याच आश्रमाचे जुने प्रवेशद्वार असे होते
कीर्ती बेन ही गुजराती माताराम गेली अनेक वर्षे हा संपूर्ण आश्रम सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहे . तिच्या वडिलांपासून घरामध्ये स्वामींची भक्ती आहे . तिच्या वडिलांनीच परमपूज्य जनार्दन स्वामींना या गावामध्ये आणले . परमपूज्य जनार्दन स्वामी खेर हे मूळचे बडोद्याचे . त्यांचे वडील शंकरराव खेर हे बडोदा संस्थान मध्ये मोठ्या अधिकारी पदावर होते . त्यामुळे स्वामींच्या लहानपणी घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नोकर चाकर होते . रात्रीची अंथरुणे घालायला वेगळे नोकर आणि सकाळी ती काढायला वेगळे नोकर अशी अवस्था होती . पुढे काही कारणाने संस्थान खालसा झाले आणि कुटुंबीयांवर अतिशय गरिबीची परिस्थिती आली . घरामध्ये पाच वेडी माणसे होती . तशाही परिस्थितीमध्ये स्वामींची मनस्थिती स्थिर राहिली . 
संपत्तौ च विपत्तौ च साधूनाम् एकरूपता ।
स्वामी स्वतः इंग्रजी मॅजिस्ट्रेट सोबत काम करत असल्यामुळे त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम होते . या नोकरीच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंब अनेक वर्ष सांभाळले . पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब असायचे . त्यात घरात पाच माणसे ठार वेडी झाली होती . 
आपल्या शिष्यमंडळीन समवेत बसलेले पूज्य जनार्दन स्वामी महाराज
त्यांचे वडील शंकरराव हे स्वतः ॲनी बेझंट यांच्या मार्गदर्शनाखाली थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे काम करायचे . तेथील भुताटकी वातावरणामुळे त्यांना देखील वेडाचे झटके यायचे . अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो काही असामान्य स्थितप्रज्ञपणा दाखवला त्याच्या परिणाम स्वरूप दत्तप्रभूंची त्यांच्यावर कृपा झाली . आणि टेंबे स्वामी , अक्कलकोट स्वामी यांची विशेष कृपा अनुभूती त्यांना लाभली .

बडोदा येथील सुरसागर तलावाजवळ असलेल्या स्वामींच्या घरातील अक्कलकोट स्वामींची तसबीर

 पुढे पू . अम्मू मैया या संतांच्या सूचनेनुसार इंदोरचे नाना महाराज तराणेकर यांच्याकडे स्वामींना नेले गेले आणि त्यांनी स्वामींना अनुग्रहित केले . अक्कलकोट स्वामींनी एक दिवस अचानक येऊन जनार्दन स्वामींना आदेश दिला की तू आता घरा बाहेर पडायचे . आणि संन्याशाप्रमाणे तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहायचे नाही . हा नियम जनार्दन स्वामींनी ५६ वर्षे अहोरात्र पाळला . अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला .
श्री क्षेत्र नासिक येथे संपन्न झालेल्या परमपूज्य जनार्दन स्वामी महाराजांच्या पंचाहत्तरी च्या कार्यक्रमातील त्यांची एक प्रसन्न भाव मुद्रा

नागपूर येथे संपन्न झालेल्या परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यातील त्यांच्या पालखी चा भोई होण्याचा मान लाभलेला प्रस्तुत लेखक (तपकिरी वस्त्रात )
 .स्वामींनी प्रवासामध्ये असतानाच शिर्डी मध्ये आल्यावर आपले प्राण पंचत्वात विलीन केले . त्यावेळी मी पुण्याला होतो . त्यांच्या चालकाने सर्वप्रथम फोन करून ही वार्ता मला कळविली आणि मी ताबडतोब मोटरसायकलवर टाकरखेड्या ला जायला निघालो . कारण स्वामी देखील टाकरखेडा लाच निघाले होतेकारण स्वामी देखील टाकरखेड्यालाच निघाले होते . पुणे ते टाकरखेडा हे अंतर त्यावेळी मी केवळ पाच तासांमध्ये पार केले होते . मी जेव्हा टाकरखेड्याला पोहोचलो तेव्हा स्वामींचे पार्थिव नुकतेच तिथे आणण्यात आले होते . आणि त्यांचे सोबत प्रवास करणारे फैजपूर येथील भंगाळे सर आणि चालक वगळता अन्य कोणीही तिथे नव्हते . कालांतराने लाखोंचा जनसमुदाय तिथे गोळा झाला . आणि स्वामींच्या पांच भौतिक देहाला आश्रमातच मंत्राग्नी देण्यात आला . माझ्या डोळ्यासमोर हे सर्व चित्र अखंड उभे राहत होते . त्या क्षणानंतर मी पुन्हा त्या आश्रमात गेलोच नव्हतो . आज परिक्रमेमध्ये मात्र स्वामींना नर्मदा जलाने स्नान घालावे अशी तीव्र इच्छा मनात आल्यामुळे मी इथे आलो होतो . स्वामींच्या आदेशाचे पालन म्हणूनच तर माझे संपूर्ण जीवन आहे ! मी पूर्वीच सांगितले आहे त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनात अतिशय विचित्र नास्तिक जीवन जगत होतो . नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्ता असलेला , डाव्या विचारांनी प्रभावित असा मी , या स्वामींच्या दर्शनासाठी , माझ्या मावशीच्या आग्रहाखातर जेव्हा पहिल्यांदा गेलो , तेव्हा त्यांच्या पाया देखील पडलो नव्हतो . तब्बल दोन वर्ष मी त्यांची परीक्षा पाहत होतो ! मी केवळ दर्शनाला म्हणून जायचो आणि गोडधोड प्रसाद खायचो ! परंतु ज्या क्षणी स्वामींनी मला एक एक अनुभव द्यायला सुरुवात केली त्या क्षणी माझ्यातला विवेक मला सांगू लागला की हे योग्य ठिकाण आहे ! माझ्या अनुमानापेक्षा माझे अनुभव वरचढ ठरू लागले ! आणि तिथून पुढे संपूर्ण जीवन त्यांच्या आदेशानुसारच मी जगत आलो आहे . त्यापुढे मी अक्षरशः कोणाचीही पर्वा केलेली नाही ! 
गुरुर्वाक्यम् सदा सत्यम् । सत्यमेव तत्पदम् ।
माझ्या आयुष्यातील दोन अविस्मरणीय व्यक्तिमत्वे
! परमपूज्य जनार्दन स्वामी खेर , (बडोदा ) आणि माझी शतायुषी आजी . उजवीकडे खाली प्रस्तुत लेखक बसलेला दिसतो आहे . 
नर्मदा परिक्रम विषयी स्वामीं शी माझे अनेक वेळा बोलणे झाले होते. त्यांचा सदेह सहवास मला योग्य वयात पुरेपूर लाभला . सत्पुरुषांकडे गेल्यावर लोक एक फार मोठी चूक करतात असे माझे मत आहे . लोक त्यांना काहीतरी विचारत बसतात . आपण त्यांना काही विचारण्यापेक्षा आपण शांत रहावे आणि ते जे काय बोलतात ते ऐकत रहावे हे अधिक उत्तम आहे असे माझे मत आहे . त्यामुळे आजवर मी त्यांना कधीही कुठलाही प्रश्न विचाराच्या भानगडीत पडलो नाही . परंतु ते जे काही बोलतात ते कानामध्ये प्राण आणून ऐकत मात्र राहिलो . त्याचीच परिणती म्हणजे प्रस्तुत लेखकाचे संपूर्ण आयुष्य आहे . असो .
शालेय जीवनातच सद्गुरु कृपेचा वरदहस्त माथ्यावर पडल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला प्रस्तुत लेखक . . .सोबत आजी व मावशी .
अगदी तरुण वयातच स्वामींनी प्रस्तुत लेखकाला ध्यानाची गोडी लावली . नामाची आवड उत्पन्न केली . भजनातील प्रेम शिकवले . स्वामींनी घेतलेल्या ध्यान शिबीरात बसलेला प्रस्तुत लेखक . "अरे बाळ हे तुझे ध्यान करण्याचे वय नाही " असे सांगणाऱ्या सर्व वयोवृद्ध साधकांना मी सांगायचो की मला आधीच उशीर झालेला आहे ! आणि हे ऐकल्यावर स्वामी अनुमोदनपूर्वक हसायचे !
स्वामींनी ध्यानाचा खोल संस्कार केला आहे .त्यामुळे कुठे निसर्गात फिरायला गेल्यावर पोज देऊन फोटो काढताना सुद्धा ध्यानच आठवायचे !
 तेव्हाही . . .
 आणि आजही . . . 

ध्याने ध्याने तद्रूपता

वयाच्या दहाव्या वर्षी पहिले कीर्तन झाल्यावर प्रस्तुत लेखक .
स्वामींनी बाल वयात व तरुण वयातच प्रस्तुत लेखकाकडून अनेक कीर्तने करून घेतली .
सातारा येथील परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या आश्रमातील कीर्तनानंतर वैद्य दांपत्याकडून प्रसाद घेताना प्रस्तुत लेखक . मागे परमपूज्य जनार्दन स्वामी यांची पंचधातूची मूर्ती . ही मूर्ती साताऱ्यातून टाकरखेडा आश्रमात नेण्याचे भाग्य देखील प्रस्तुत लेखकाला लाभले . पुढे मात्र आपण जे बोलतो आहोत तसे वागावे लागते किंबहुना जसे वागतो आहोत तितकेच बोलता येते हे लक्षात आल्यावर मी कीर्तन करणे बंद केले ! कारण कोरडे कीर्तन काय कामाचे !
 महाजनो येन गतः स पंथः ।
भजनाचा आनंद वेगळाच आहे ! 
मला एक जुळी बहीण आहे . 
हिने देखील स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे .
ही मात्र बालवयापासून आजतागायत उत्कृष्ट कीर्तने करत आहे .पुण्यातील नारद मंदिरामध्ये आणि हरिभक्तिपरायण आफळे बुवांकडे हीचे शिक्षण झाले आहे .
 आपल्यापैकी बरेच जण टीव्ही अँकर म्हणून तिला ओळखत असाल !  हिच्यावर देखील स्वामींची अपरंपार कृपा राहिलेली आहे . 
टीव्हीच्या माध्यमातून वारी किंवा नवरात्रीला देवीची शक्तीपीठे अशा अनेक यात्रा हिने स्वतः केल्या आहेत व संपूर्ण महाराष्ट्राला घडविल्या आहेत .
 ( प्रस्तुत लेखक टीव्हीच बाळगत व पाहात नाही ! व पाहण्याचे समर्थकही नाहीत याची कृपया नोंद घ्यावी ! विषयोघात सांगितले इतकेच .)
मी तिच्याशी फोनवरून बोलावे असा आग्रह कीर्ती दीदी मला करत होती . परंतु असे संभाषण केले नाही तरी आम्हाला दोघांना काही फरक पडत नाही हे तिला मी समजावून सांगितले . जुळे असल्यामुळे आमची पत्रिका एकसारखी आहे ! असो .
मी मंदिरामध्ये जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेतले . अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे . या मूर्ती पुढे स्वामींनी माझ्याकडून बरीच अनुष्ठाने ,पारायणे , कीर्तने इत्यादी करून घेतलेली आहेत . त्यामुळे नुसते ते रूप पाहताच डोळ्यातून अश्रूधारांना वाट मोकळी झाली . ते जल वाया न घालविता पादुकांना त्याचा अभिषेक करून घेतला ! कारण संपूर्ण देहच नर्मदामय झालेला असल्यामुळे डोळ्यातील अश्रुधारा देखील नर्मदा जलाच्याच होत्या हे निश्चित ! 
टाकरखेड्याचे श्री दत्तप्रभू
आश्रम अतिशय सुंदर झाला होता ! मी शेवटचे आलो तेव्हाचे आश्रमाचे रूप आणि आताचे रूप यात जमीन आसमानाचा फरक होता ! अतिशय भव्य दिव्य बांधकामे सुंदर अशा मूर्ती स्वामींचे नवीन मंदिर आणि स्वामींचे समाधी स्थान अशी सर्व ठिकाणी नव्याने बांधण्यात आली होती . एक अतिशय भव्य असा सभामंडप किंवा सभागृह नव्याने उभारण्यात आले होते . आश्रमाला जोडून स्वामींची पाच एकर शेती आहे त्यामुळे विस्ताराला फारशी बंधने नाहीत .इथे बुवाजी बाबा / बुवादादा नावाचे साधू तप करीत राहत असत त्यांना अक्कलकोट स्वामींनी दृष्टांत दिला की माझा मनुष्य इथे येईल त्याच्या ताब्यात तुझा आश्रम दे आणि इकडे जनार्दन स्वामींना दृष्टांत देऊन सांगितले की अमुक अमुक ठिकाणी जा आणि तिथे तुझा आश्रम स्थापन कर . त्यामुळे जनार्दन स्वामी इथे आले तेव्हा बुवाजी बाबा त्यांची वाट पाहतच बसलेले होते ! स्वामींनी देखील त्यांचे देहावसन झाल्यावर त्यांची सुंदर अशी समाधी बांधलेली आहे . त्यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले . स्वामींची अतिशय सुंदर मूर्ती इथे नव्याने स्थापन करण्यात आली आहे .
आश्रमात स्थापन केलेली जनार्दन स्वामींची मूर्ती
मूर्ती सुंदर आहे .
 तिचे दर्शन घेऊन मागच्या बाजूला स्वामींची समाधी अर्थात शक्ती स्थळ इथे पोहोचलो . पुन्हा एकदा अंगभूत नर्मदा जलाने शक्तिस्थळाला अभिषेक झाला ! इथे औदुंबराची तीन झाडे आपोआप उगवलेली आहेत . इथे काही काळ बसलो .
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ अथवा शक्ती स्थळ
शक्ती स्थळावर आपोआप उगविलेली औदुंबराची तीन झाडे
 इथे नेहमी फुलांची सजावट केली जाते
इथेच याच ठिकाणी परमपूज्य स्वामींच्या देहाला मंत्राग्नी देण्यात आला होता

 आश्रमाच्या मागच्या दाराने कीर्ती बेन जिथे राहते त्या मुख्य भागामध्ये सवयीप्रमाणे घुसू लागलो . आश्रमाची संपूर्ण शेती पाहणारा नारायण नावाचा सेवेकरी आहे तो धावतच आला आणि त्याने मला अडवले ! साधू समाजाशी आपला समाज कसे वागतो याचाच हा वस्तूपाठ होता ! शेवटी न राहून मी कीर्ती बेन ला हाक मारली ! माझा आवाज ऐकताच ती धावतच बाहेर आली ! मला या साधुरूपामध्ये पाहून तिला काय बोलावे तेच कळेना ! सुमारे वीस-बावीस वर्षांनी आम्ही असे निवांत भेटत होतो ! कीर्ती बेन मला मुलगा मानते . ती माझ्या आईच्या वयाचीच आहे . परंतु गुजराती पद्धतीने नुसार तिला सर्वजण बेन म्हणजे बहिण म्हणतात किंवा दीदी म्हणतात . दोघांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या !
टाकरखेडा आश्रमातील सेवाधारी कीर्ती बेन
 नारायण च्या लक्षात आले की हा वेगळा प्रकार आहे . आणि मग त्याने मला आत मध्ये सोडले ! मी नर्मदा परिक्रमा करतो आहे हे कळल्यावर कीर्ती बेनला प्रचंड आनंद झाला ! आमच्या गुरु परिवारातील देखील काही लोकांनी पूर्वी गाडीने वगैरे नर्मदा परिक्रमा केलेली आहे . ते ती मला सांगू लागली . दोन-चार लोकांनी पायी परिक्रमा देखील केलेली आहे ,आणि ते सर्वजण आश्रमामध्ये येऊन गेले आहेत हे देखील तिने सांगितले . रश्मी गंभिरे , अरुण खोंडे,  स्मिता धर्माधिकारी, रमेश पोद्दार, मंगेश कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी असे काही परिक्रमावासी आमच्या गुरुपरिवारातील आहेत .
 आता मस्तपैकी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही असे निक्षून सांगून ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली . माझ्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला झाले होते ! माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारी ती माझी आईच आहे . त्यामुळे तिने अतिशय साग्रसंगीत स्वयंपाक केला . आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या . स्वामींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ! हिच्या जन्मापासून हिला जनार्दन स्वामींचा सहवास लाभला होता . 
स्वामींचा खूप जुना फोटो
गावात राहणारे भगवान पाटील काका म्हणून एक आहेत त्यांना देखील मी आल्याची खबर लागली ! ते देखील आले . त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या . काल संपर्क झाल्यानुसार माझे काही मित्र नर्मदेच्या दर्शनासाठी येथे येणार होते . त्याची कल्पना मी कीर्ति बेनला दिली . ते वाटेमध्ये जेवून येणार होते त्यामुळे मी भोजन प्रसाद घ्यायला बसलो . 
इथे मैयाने एक गमतीदार चमत्कार केला ! मला गोड आवडते हे माहिती असल्यामुळे कीर्ती बेनने तिला आवडणारे हल्दीराम चे गुलाबजाम , त्याचा एक डबा तिच्याकडे होता तो फोडला . आणि मला गुलाबजाम वाढताना सांगितले की हे पहा हे गुलाबजाम खरे तर मला आवडतात . आणि मी माझ्यासाठी आणलेले आहेत . परंतु तू देखील माझा आवडता आहेस म्हणून तुला हे गुलाबजाम देते आहे ! यावर मी तिला म्हणालो की हे पहा मी आता केवळ तुझा गुरुबंधू नाही तर एक परिक्रमावासी सुद्धा आहे . त्यामुळे परिक्रमा वासीला तू हे गुलाबजाम देते आहेस . आणि परिक्रमा वासी ला तुम्ही जे काही द्याल त्याच्या चौपट नर्मदा मैया तुम्हाला देते असा अनुभव लोक सांगतात ! 
हसत खेळत गप्पा मारत माझे भोजन संपन्न झाले . खूप आग्रहपूर्वक तिने मला वाढले . हळूहळू गावामध्ये मी आल्याची वार्ता पोहोचली आणि अजूनही काही लोक मला भेटायला आले . कीर्ती बेन च्या फोनवरून मी मित्रांना फोन केला आणि कुठपर्यंत आले आहेत ते विचारले . माझा फोन उचलला तेव्हा हे लोक गाडीच लावत होते !  माझे अनेक मित्र आहेत . किंबहुना मला अजातशत्रू राहायला आवडते . माझ्याशी वैर पत्करू पाहणारे लोक देखील माझे मित्र होऊन जातात . यात माझी काही थोरवी नसून समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली या संतांनी सांगितल्याप्रमाणे वागले की आपोआप मनुष्य जगन्मित्र होतो . 
जगापाशी जगन्मित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र । असे समर्थ रामदास स्वामी सांगतात . त्यामुळे आयुष्यात बरी संगती सज्जनाची धरावी ।  याप्रमाणे वागत आलो आहे . त्यातही ज्या मित्रांशी आध्यात्मिक संवाद होतात असे मित्र खूप अधिक आहेत . त्यातीलच हे चौघेजण मला भेटण्याकरता आतुरतेने निघाले होते . यातील बाळासाहेब वाल्हेकर हे निवृत्त लष्करी अधिकारी असून आता पूर्ण वेळ भजन कीर्तन आणि गुरु सेवेमध्ये घालवितात . दर गुरुवारी त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी ते अमरावतीला पुण्यावरून जातात . गेल्या १४ वर्षांमध्ये एकाही गुरुवारचा खंड पडलेला नाही . गुरु भक्तीचे असे उदाहरण आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे कारण दर आठवड्याला तेराशे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करणे हे सोपे काम नाही . यांच्या विषयी अधिक माहिती सुरुवातीच्या प्रकरणात आलेली आहे त्यामुळे द्विरुक्ती टाळतो . 
मंदिर बांधणीच्या क्षेत्रातले माझे गुरु श्री बाळासाहेब वाल्हेकर . विदर्भातील मंगरूळ दस्तगीर गावातील आम्ही बांधत असलेल्या लहानुजी बाबा जन्मस्थान मंदिराच्या गर्भगृहात आम्ही दोघे .
दुसरे मित्र श्री प्रशांत चन्ने हे खरे तर मी आयटी कंपनीमध्ये नोकरी करत असताना माझे बॉस होते . परंतु आमचे नाते नेहमी मामा भाच्याचे राहिले आहे ! कारण मी त्यांचे मामा असे नामकरण केलेले होते ! आज त्यांना ओळखणारा प्रत्येक मनुष्य चन्ने मामा याच नावाने हाक मारतो ! यांचे पलूस गाव सांगली जिल्ह्यातच आहे . त्याच कंपनीमध्ये काम करणारा आणि आमच्याच गावचा हुशार आणि कष्टाळू मित्र म्हणजे अनिल पावटे . याचे मूळ गाव सावळज आमच्या सांगली जिल्ह्यातीलच .
प्रस्तुत लेखक , अनिल पावटे आणि प्रशांत चन्ने यांचे संग्रहित चित्र
 चौथा मित्र हा थोर इतिहासकार ! शिवाजी महाराजांची सही शिक्का असलेली अस्सल पत्रे ज्यांना सापडली आहेत असे इतिहासकार फार कमी आहेत ,त्यातील हा एक ! इतिहासकार घनश्याम ढाणे यांचे मूळ गाव तारळे . तारळी खोऱ्यातील या सुपुत्राला आम्ही प्रेमाने शामराव म्हणतो . रायगड किल्ला आणि महाराजांचे अनेक किल्ले कोळून पिलेला हा मनुष्य आग्रा ते राजगड पायी चालत आलेला आहे ! 
 इतिहासकार घनश्यामराव ढाणे
असे चार एकापेक्षा एक वल्ली भेटायला येणार असल्यामुळे त्याची आधीच कल्पना मी दीदीला देऊन ठेवली ! हे आले तेव्हा मी स्वामींच्या शेतामध्ये बसून चिकू खात होतो . चौघांनी धावतच येऊन माझी घट्ट गळाभेट घेतली ! बाळासाहेब वाल्हेकर वगळता मी नर्मदा परिक्रमेला निघालो आहे हे कोणाला सांगितले नव्हते . त्यामुळे माझी प्रत्यक्ष भेट झाल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला ! आता तुम्हाला मैयाने केलेला चमत्कार सांगतो ! साधारण तासाभरापूर्वी यांच्या लक्षात आले की आपण आश्रमात चाललो आहोत तर स्वामींच्या पुढे ठेवण्यासाठी काहीतरी सोबत घ्यावे . म्हणून यांनी हार फळे वगैरे विकत घेतली . परंतु मी व्यवस्थापिकेच्या फोनवरून बोललो आहे हे लक्षात आल्यावर तिच्यासाठी देखील काहीतरी खाऊ घ्यावा म्हणून यांनी एका पिशवीमध्ये खाऊ घेतला होता . तो त्यांनी कीर्ती बेनच्या हातात दिला आणि सांगितले की हा तुमच्यासाठी आम्ही खाऊ आणला आहे ! तिने पिशवी उघडून पाहिली तर त्यात बराच खाऊ होता परंतु त्यासोबत हल्दीरामच्या गुलाबजामचे चार हवाबंद डबे होते ! होय हे तेच गुलाबजाम होते जे तिने तिला आवडत असूनही मला वाढले होते आणि मी देखील भुकेपोटी सर्व संपविले होते ! मैया ने तिला जागेवर चार गुलाबजाम चे डबे दिले ! 
तिला इतका आनंद झाला की डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ! मी भोजन प्रसाद घेताना नर्मदा परिक्रमेचे अनुभव तिला सांगत होतो त्यावेळी तिच्या मनामध्ये असे आले होते की नर्मदा मैया मला कधी अनुभव देणार ! आणि ताबडतोब तिला अनुभूती मिळाली होती . त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना ! पुढे हा अनुभव सर्वांना कळाला आणि आता आश्रमात जाताना काही लोक तिच्यासाठी हल्दीराम चा गुलाबजामचा डबा घेऊन जातात त्यामुळे नर्मदा मातेने तिला हल्दीरामच्या गुलाबजामचा लाईफ टाईम सप्लाय सुरू केला आहे असे म्हणावयास हरकत नाही ! परिक्रमा वाशीला एक दिले की मैया त्याच्या बदल्यात इतके भरभरून देते हे इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! सर्वांना मी आश्रम फिरवून दाखविला . नर्मदा जलाचा अभिषेक मी केला नव्हता कारण माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन तो करावा अशी त्यांची व माझी इच्छा होती . त्याप्रमाणे शक्ती स्थळावर आणि स्वामींच्या पादुकांवर आम्ही नर्मदा जलाचा अभिषेक केला ! मला भेटून माझ्या मित्रांचा आनंद गगनात मावत नव्हता ! माझ्याकडे फोन नसल्यामुळे त्यांना माझ्याशी संपर्क साधताना अडचणी येत होत्या . परंतु जर मनापासून इच्छा असेल तर मात्र कोणाचाही कोठेही संपर्क होऊ शकतो हेच माझ्या मित्रांनी सिद्ध केले !  सर्वांना आश्रम फार आवडला . कीर्ती दीदी ने आम्हाला आश्रमातील उसाचा भरपेट रस पाजला . तो रस आकंठ प्यालो . आश्रमातील साखरेपेक्षा गोड चिकू सर्वांनी भरपूर खाल्ले आणि सोबत विकतही घेतले . यावेळी आश्रमात काढलेले काही फोटो माझ्या मित्रांकडून प्राप्त झाले ते आपल्यासाठी सोबत जोडत आहे.
टाकरखेडा येथील दत्तप्रभू मंदिरामध्ये उभे डावीकडून श्री प्रशांत चन्ने, श्री बाळासाहेब वाल्हेकर , दत्तप्रभू ,प्रस्तुत लेखक आणि श्री घनश्याम ढाणे . उजवीकडे व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन स्वामी विराजमान आहेत .
श्री अनिल पावटे ( सावळज ) सेल्फी घेताना
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीवर नर्मदा जलाचा अभिषेक करताना आम्ही सर्वजण .
दासबोधातील सद्गुरु स्तवन म्हणत अभिषेक केला गेला .
टाकरखेडा आश्रमामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहामध्ये अभंग गायन करताना श्री बाळासाहेब वाल्हेकर आणि प्रस्तुत लेखक .
आश्रमामध्ये पदोपदी फिरताना स्वामींची आठवण येत होती .माझे मन आठवणींच्या भूतकाळामध्ये फेरफटका मारू लागले .
वाचकांना कदाचित प्रश्न पडू शकेल की परिक्रमा थांबून स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्या एवढे काय आहे त्याच्यात ? थोडेसे सविस्तर सांगतो .माझी आध्यात्मिक जडणघडण पूर्णपणे स्वामींच्या देखरेखीखाली झालेली आहे आणि अजूनही होत आहे . त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची प्रचीति मला आजवर आलेली आहे . त्यामुळे स्वामींनी सांगावे आणि आपण ऐकावे इतके सोपे गणित आहे . स्वामीजी देहामध्ये नसले तरी देखील त्यांनी केलेले उपदेश आजही जसेच्या तसे स्मरतात ही त्यांची कृपाच आहे .मी लहान असताना स्वामी जमलेल्या शिष्यमंडळींना माझ्याकडे हात करून सांगत असत , " ईश्वरी कृपा म्हणजे काय असते हे पाहायचे असेल तर या मुलाकडे पहा " मला तेव्हा त्याचा अर्थ अजिबात कळत नसे .त्या काळामध्ये लौकिक अर्थाने माझे काहीच चांगले चालू नव्हते . भौतिक दृष्ट्या संपन्नता वगैरे मी कधी फारशी अनुभवलेली नाही . परंतु पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये आपले हे सर्व करून झालेले आहे हे निश्चितपणे जाणवते त्यामुळे त्याची जरादेखील ओढ सुद्धा शिल्लक नाही .तरी देखील माझे लौकिक आयुष्य उघड्यावर येऊ नये याची काळजी सद्गुरूंनी रीतसर घेतलेली आहे . मी आजवर आयुष्यात दोनच इंटरव्यू दिलेले आहेत . आणि दोनच नोकऱ्या देखील केलेल्या आहेत . इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला अनेक विषय पास होण्याचे बाकी असताना स्वामींच्याच आशीर्वादाने आणि शब्दानुसार मला भारतातील क्रमांक एक असलेल्या आयटी कंपनीमध्ये सहज नोकरी लागली होती . पुढे त्यांनीच सहज दिलेल्या आदेशानुसार मी ती नोकरी एका वर्षाच्या आतच सोडून ही दिली होती ! त्यानंतर स्वामींनी काही काळ मला त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून ठेवले होते . आणि माझा तो कालावधी संपल्या बरोबर त्याच दिवशी मला अडीच पट पगाराची नोकरी देखील त्यांच्याच आशीर्वादाने लागून गेली . नोकरी किंवा पगार हा कृपेचा भाग नसून त्यासाठी मरमर करावी न लागणे ही कृपा आहे . दहा वर्षात लग्न मुले घरदार उभे करून दहा वर्षे झाल्यावर नोकरी सोडून देणे या त्यांच्या आदेशाचे पालन करत मी संपूर्ण जगाचा रोष पत्करत पुण्यात स्वतःची घरे घेऊन कर्जमुक्त होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली .समर्थ कृपेने माझा अखेरचा दिवस दास नवमी हाच आला हा समर्थांचा संकेतच जणु. त्यानंतर गेली दहा वर्षे मी एकही रुपया नोकरी चाकरी करून कमावलेला नाही . काही व्यवसाय यशस्वीपणे केले खरे परंतु त्यातील कमाई अधिकांश व्यवसाय विस्तारातच खर्ची पडली . तरीदेखील केवळ गुरुकृपेचे पालन केल्यामुळे माझे सर्व जीवन अतिशय सुरळीतपणे चालू आहे ! कधीही कुठेही कसलीही अडचण येत नाही ! स्वामींच्याच आदेशानुसार आज पर्यंत कधीच कोणापुढे हात पसरलेले नाहीत ! अगदी घरच्यांच्या पुढे देखील नाहीत !
 देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांशी तुटी ।
सर्व अर्पावे शेवटी । प्राण तोही वेचावा ॥
देवाचे जे मनोगत । तेची मानावे आपले उचित ।
आपले इच्छेसाठी भगवंत । अंतरू नये की ॥
हे समर्थ रामदासांचे बोल हृदयात कोरलेले आहेत . या काळामध्ये स्वामींच्या कृपेने या सुंदर अशा देशाचे भरपूर अवलोकन करता आले ! ते करण्यासाठी खिशामध्ये दमडी असलीच पाहिजे असे नाही हे देखील स्वामींनी सिद्ध करून दाखवले ! 
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।चालविसी हाती धरोनिया ॥ 
या उक्तीची प्रचिती प्रत्येक पावलाला येत गेली . स्वतः स्वामींचे शिष्य अनेक राज्यांमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबत ही सर्व राज्ये फिरण्याचे भाग्य मला लाभले . त्यानंतरही देश काल परिस्थितीचे अवलोकन करण्याकरिता या सुंदर अशा भारत वर्षाचे विविध दौरे स्वामींनी माझ्याकडून करून घेतले . स्मार्टफोन हा प्रकार मी लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्यांदाच वापरला . त्यानंतर झालेला माझा प्रवास गुगल मॅप या ॲपवर काहीसा असा दिसतो . अर्थात सोबत फोन घेऊन केलेला प्रवास तेवढाच इथे दिसतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे . याशिवाय जिथे फोन नेला नव्हता ती ठिकाणे दिसत नाहीत .
गेल्या चार वर्षातील प्रस्तुत लेखकाचा प्रवास
हे सर्व करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये खचितच नाही . ही केवळ गुरुकृपा आहे .याशिवाय दुसरे काय असू शकते ? खिशामध्ये दमडी नसताना इतका प्रवास शक्य आहे काय ? होय ! शक्य आहे ! गुरुकृपा असेल तर या जगात काहीही शक्य आहे ! स्वामींच्या केवळ एका आशीर्वादामुळे हे सर्व घडले आहे . नर्मदा परिक्रमा देखील याच सर्व यात्रांचा परमोच्च बिंदू आहे ! 
अलीकडच्या काळामध्ये मानवी जीवनातील दुःखे जर तुम्ही पाहिलीत तर प्रत्येक दुःखाचे मूळ कुठल्या ना कुठल्या रूपाने पैसा हेच आहे . 
लक्ष्मीचा धरी भरवसा । तो एक मूर्ख ॥ असे रामदास स्वामी सांगतात . त्यामुळे त्या लक्ष्मीचा पती जो परम परमेश्वर परमात्मा त्याला आपलेसे केले म्हणजे झाले . मग लक्ष्मी कुठेही जात नाही . परंतु फक्त लक्ष्मीचाच ध्यास धरला तर मात्र ती फार चंचल आहे . त्यामुळे नर्मदा परिक्रमा करताना देखील लक्ष्मी वर फारसा भरवसा ठेवणे काहीच उपयोगाचे ठरत नाही . कुठलेही कार्य उभे करायला पैसा लागतो हे मान्य आहे .परंतु तुम्ही कार्य करत राहिलात तर त्यासाठी लागणारा पैसा देखील आपोआप उभा राहतो हे देखील सत्य आहे . आपण गोळा केलेल्या नोटा नाणी ही संपत्ती नसून कागदाचे चिठोरे आहेत . म्हणून आपल्याकडे पैशाला अर्थ असा शब्द वापरला जातो . अर्थकारण अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ या शब्दातील अर्थ म्हणजेच त्या कागदाच्या चीठोऱ्यांनी विकत घेता येणारा अर्थ आहे . सर्वसाधारण गोष्टींसाठी अर्थ आवश्यक आहे . परंतु पारलौकिक सुख मिळवण्यासाठी परमार्थ आवश्यक आहे . एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता तेव्हा जितका चांगला व्ह्यू असेल तितके त्या खोलीचे भाडे अधिक असते . याचा अर्थ ते दृश्य पाहण्यासाठी तुम्ही काही पैसा मोजता . आणि त्या दृश्यातला अर्थ विकत घेता . असे लक्षावधी देखावे , साधे-सुधे नव्हे , सुंदर आणि अर्थपूर्ण देखावे नर्मदा मैया तुम्हाला परिक्रमे मध्ये फुकट दाखवते ! ती एक प्रकारे तुमची आर्थिक कमाईच असते ! आणि ते दृश्य बघत असताना जर तुम्ही परमात्म चिंतन केले तर तुमची पारमार्थिक कमाई देखील होऊन जाते ! आपण जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा नोट देऊन त्या बदल्यात जीवनाचा अर्थ विकत घेतो . तेच शुद्ध स्वच्छ नितळ पाणी नर्मदा मैया तुम्हाला संपूर्ण परिक्रमे मध्ये फुकट देत राहते ! त्यामुळे साधू संत सज्जन नदी वृक्ष गोमाता यांनी आपल्याला कधी कुठे किती व काय दिले याचा हिशोब शहाण्या माणसाने कधीच लावू नये ! कारण त्याचा ताळेबंद नेहमी आपल्यासाठी तोट्याचाच असतो ! इतके भरभरून दान यांनी दिलेले असते आणि त्याबदलत कुठलाही मोबदला आपल्याकडून घेतलेला नसतो ! नद्या ना जळाचे कधी मोल घेती ।
सद्गुरूंच्या आणि नर्मदा मातेच्या या ऋणामध्ये आजन्म राहणे हेच खूप आनंददायी आहे ! 
त्यांच्या चरणांची सेवा घडणे हाच परमार्थ !

 लेखांक ८७ : धनाजे येथील होळी आणि मित्रांसोबत शूलपाणी झाडीत नर्मदा स्नान

टाकरखेडा आश्रमातून पाय हलत नव्हता . परंतु नर्मदा माता बोलावीत होती त्यामुळे आश्रमाची रजा घेतली आणि सर्वजण निघालो . परंतु दारातून बाहेर पडताच गाडी पंक्चर झाली आणि पुन्हा एकदा मी आणि चन्ने मामा आत स्वामींच्या समाधीपाशी जाऊन बसलो ! अखेरीस मुहूर्त लागला आणि आम्ही निघालो . या भागाचा भूगोल इतका विचित्र आहे की रस्ता चुकला तर तुम्ही या राज्यातून त्या राज्यात जाता . आमच्यापैकी अनिल गाडी चालवत होता आणि त्याचा अंदाज चुकल्यामुळे आम्ही खेतीया या मध्य प्रदेश मधल्या गावात जाऊन परत आलो . आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो आहोत आणि मी गाडी चालवत नाही असे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडत होते . कारण मला गाडी चालवण्याचा प्रचंड नाद असून कोणाच्याही बरोबर प्रवासामध्ये असलो आणि कोणाचीही कुठलीही गाडी असली तरी चालक मात्र नि:संशयपणे मीच असतो . माझ्या अनेक मित्रांच्या गाड्यांचे एकूण धावणे जेवढे झाले आहेत त्यातील त्यांच्यापेक्षा अधिक रनिंग मी केलेले आहे . उदाहरणार्थ वाल्हेकर आणि चन्ने मामा ! शहाद्यावरून धडगाव कडे जाताना अर्थात शूलपाणीची झाडी गाठताना खूप मोठे मोठे डोंगर पार करत गाडी धावते . राजू टेलर यांचे घर लहान असल्यामुळे धनाजे येथील आश्रमामध्ये माझ्या सर्व मित्रांनी राहावे असे ठरले. इथे अच्युतानंदन स्वामी परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी थांबले होते .स्वामीजी स्वतः सात वर्षाची जलहरी परिक्रमा करीत होते आणि त्या दरम्यानच इथे सेवेसाठी थांबलेले होते . सुभाष आप्पा पावरा नावाचा त्या गावचा सरपंच या संपूर्ण आश्रमाची व्यवस्था पाहतो . हा खासदार हीना गावित यांचा कार्यकर्ता आहे .स्वामींनी भरपेट भोजन प्रसाद बनवला व सर्वांना वाढला . माझ्या मित्रांसाठी आश्रम भोजन प्रसाद वगैरे सर्वच गोष्टी नवीन होत्या . आश्रमामध्ये अजूनही काही परिक्रमा वासी मुक्कामासाठी थांबलेले होते . आणि त्याच्यामध्ये अमर गिरी , राधेगिरी , प्रजापति पिता पुत्र यांचा देखील समावेश होता . हे सर्वजण मला ओळखत असल्यामुळे माझ्या मित्रांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले . प्रत्यक्षामध्ये ही नर्मदा मातेची योजना होती ! माझ्या मित्रांना माझ्याबद्दल अभिमान वाटावा अशी परिस्थिती तिने मुद्दाम निर्माण केलेली होती ! भोजन प्रसाद झाल्यावर आम्ही सर्वजण मिळून आश्रमामध्ये बांधलेल्या दोन झोपड्यांमध्ये गप्पा मारत बसलो . आश्रमाची रचना अतिशय सुंदर रितीने केलेली होती . 
अंगणामध्ये भरपूर झाडे असल्यामुळे सावली होती . ठीक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी ठेवली होती . बांबूचे तट्टे वापरून सुंदर कुटी बनवली होती . माझ्या मित्रमंडळींनी इथे भरपूर फोटोग्राफी केली ! 
एका प्रसन्न भावामुद्रेमध्ये जलहरी परिक्रमा करणाऱ्या विशाखापटणम येथील प्रजापती पिता-पुत्रांसोबत प्रस्तुत लेखक . दतवाडा येथील प्रबुद्धानंद स्वामींनी दिलेले नवीन वस्त्र मी परिधान केलेले आहे .

धनाजे आश्रमामध्ये पिता राजेश प्रजापती , पुत्र तनय प्रजापती आणि प्रस्तुत लेखक यांच्यासोबत सेल्फी काढताना अनिल पावटे .

 ह्याच त्या दोन कुटी जिथे परिक्रमावासींची निवासाची सोय केलेली आहे . मध्ये पत्र्याची पन्हाळ काढून पाणी जाण्याची सोय केलेली आहे . या चित्रामध्ये सर्वात डावीकडे पाठमोरे शामराव ढाणे उभे आहेत . त्यानंतर डावीकडून लुंगी घातलेले प्रशांत चन्ने,तनय प्रजापती ,राजेश प्रजापती , राधे गिरी , प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब वाल्हेकर .
डावीकडून क्रमशः श्री बाळासाहेब वाल्हेकर , प्रस्तुत लेखक ,राधे गिरी , राजेश प्रजापती , तनय प्रजापती , शामराव ढाणे , प्रशांतच चन्ने आणि अनिल पावटे .
वरील चित्रामध्ये डाव्या हाताला पिठाच्या गिरण्या झाकून ठेवलेल्या दिसत आहेत . 
या गिरण्यांचे वाटप खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते धडगाव किंवा आकरणी तालुक्यातील ५७ गावातील ५७ महिला बचत गटांना करण्यात आले होते . मध्यभागी गुलाबी वस्त्रामध्ये खासदार हिनाताई गावित . माजी जिल्हा परिषद सदस्य नीलिमा ताई सुभाष पावरा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता . (संग्रहित छायाचित्र ) 
इथपर्यंत या परिक्रमा गटातील सर्वजण एकत्र होते.पुढे जलहरी परिक्रमा करीत असल्यामुळे प्रजापती पिता पुत्र दोघेच चालू लागले आणि राधेगिरी व अमर गिरी वगैरे विलग झाले .

मी यापूर्वी बिजासन , सेमलेट आणि बिलगाव ची होळी पाहिली होती . आज ती होळी धनाजे गावात होती ! त्यामुळे माझ्या मित्रांना पुन्हा एकदा सर्व आदिवासी परंपरा दाखवण्याचे भाग्य मला लाभले ! मी ताजे ताजे ज्ञान घेतलेले असल्यामुळे त्यांना माहिती सांगू शकत होतो . आश्रमा शेजारीच असलेल्या मोकळ्या मैदानावर होळीचा कार्यक्रम होता . आम्ही सर्वजण होळीचा कार्यक्रम बघण्यासाठी होळीच्या माळावर गेलो . हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक चालत येतात .पाठीवरती पिशवी बांधून त्यात खाण्यापण्याचे सामान कपडे वगैरे सोबत आणलेले असते. एका भव्य दिव्य मैदानामध्ये फुटभर खोलीचा गोल खड्डा करून त्यात होळी रचण्यात आली होती . मधोमध झाडाच्या झाडाचा बुंधा लावून त्यावर अतिशय उंच असा बांबू लावला होता . होळीची उंची प्रचंड होती . आणि ती अशा रीतीने रचण्यात आली होती की प्रज्वलित करता क्षणी एका क्षणात सर्व बाजूने पेट घेईल ! तसेच होळी पेटवल्या पेटवल्या त्यात अशा काही वनस्पती हेतूपुरस्सर लावल्या होत्या की ज्यातून प्रचंड प्रमाणात ठिणग्या उडायच्या ! हे दृश्य अत्यंत नयनरम्य असे होते ! एका क्षणात त्या होळीच्या ज्वाळा ऐंशी नव्वद फूट आकाशामध्ये झेपावल्या आणि सुंदर अशा ठिणग्यांची बरसात सुरू झाली !
होळीतून अशा प्रकारे ठिणग्या उडतात आणि मग जमलेले आदिवासी बांधव होळीच्या बाजूने सुंदर असे नृत्य करतात
या ठिणग्या फार उंच पर्यंत जातात . आणि होळी अतिशय कमी काळात जळून संपूर्ण नष्ट होते .
होळीची धग इतकी भयानक असते की तिच्या जवळपास देखील कोणी जाऊ शकत नाही .
होळी लावणारे आदिवासी बांधव ती इतक्या सुंदर पद्धतीने लावतात की जरा देखील धूर होत नाही .
या भागातील होळी कशी असते याची काही प्रतिनिधीक चित्रे आपल्या माहितीकरता जोडली आहेत .
या भागातील होळीचे वर्णन काय करावे !शब्द अपुरे आहेत !होळीचा सण साजरा करण्यासाठी गावातील परिसरातील झाडून सर्व माणसे आबालावृद्ध मैदानामध्ये जमलेले असतात . इथल्या प्रथेप्रमाणे सर्वांनी आकंठ मोहाची दारू पिलेली असते . ही दारू पिणाऱ्या लोकांनी सांगितले की इतर दारूपेक्षा या दारूची चव थोडीशी गोड असते . परंतु इतकी दारू पिलेली असूनही आणि झाडून सर्व स्त्री पुरुष एकत्र आलेले असूनही जरा देखील बिभत्स पणा न करता अखंड शांतपणे , शिस्तीने आणि एकाच तालात अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये जाऊन सर्वजण झुलत ,नाचत असतात . त्यांच्या कमरेला बांधलेले भोपळे आणि घुंगरू यांचा आवाज सर्वत्र भरून उरलेला असतो . ढोलांचा धीर गंभीर आवाज वातावरणाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो . विशेषतः या आदिवासींचे पदलालित्य पाहण्यासारखे असते .एका तालात एका ठेक्यांमध्ये सर्वांचे पाय पडत असतात . स्त्री-पुरुष सर्वजण एकत्र एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून नाचत असतात . परंतु कुठेही जरा देखील मर्यादा भंग होताना दिसत नाही . एक समाज म्हणून आपण भारतीय किती प्रगल्भ आहोत याचेच हे उत्तम उदाहरण आहे ! फिरणाऱ्या जुन्या जाणत्या आदिवासी लोकांकडे धनुष्यबाण ,फाल्या ,तलवार , काठी अशी शस्त्रे असल्यामुळे या जमावाला शिस्त लावण्यासाठी बाहेरच्या कुठल्या पोलीस फोर्स ची गरजच पडत नाही ! सर्व कार्यक्रम स्वयंशिस्तीने चालू असतो . सुभाष पावरा याने आमचे सर्वांचे अतिशय चांगले आदरातिथ्य केले . या समाजातील तुलनेने सधन असा तो मनुष्य आहे .त्याचा स्वतःचा पेट्रोल पंप देखील आहे . मैदाना शेजारील एका घरामध्ये पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली होती . यावर्षी आम्हीच बाहेरचे होतो त्यामुळे आमचे सर्वांनी खूप चांगले आदरातिथ्य केले . मला होळीचा सण बघायचा आहे हे मी सांगितल्यावर स्वतः सुभाष पावरा मला घेऊन मैदानामध्ये आला . होळी पेटल्यावर काही क्षणातच तिच्या मधोमध रोवलेली ध्वज लावलेली बांबूची काठी खाली पडते . ती खाली पडू न देता वरच्या वरच झेलायची असते . आणि आम्ही चक्क ती झेलली ! ती खाली पडणे अपशकुनी मानले जाते . आदिवासी बांधवांचे गेर नामक नृत्य रात्रभर सुरू असते आणि होळी पहाटे पाच वाजता पेटते . आम्ही रात्रभर नृत्य पाहिले होते . आणि तासभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुख्य होळीचा कार्यक्रम पाहायला आलो होतो . ध्वज आणि बांबू झेलल्यावर मात्र अतिशय महत्त्वाचा विधी सुरू होतो . पाल किंवा पाल्या किंवा फाल्ल्या या शस्त्राने एकाच घावामध्ये हा बांबू छाटायचा असतो .समजा तुम्हाला असे वाटले की आपल्याला छाटायला जमणार नाही तर आपण आपली संधी सोडून द्यायची असते . गावचा कोतवाल एकेका व्यक्तीचे नाव पुकारतो आणि त्या व्यक्तीने पुढे जाऊन होळीला वंदन करून हातामध्ये फाल्या घेऊन एका घावामध्ये बांबू छाटायचा असतो . अर्धा मुर्दा छाटला गेलेला बांबू अपशकून मानला जातो . मला सर्वप्रथम त्यांनी बोलावले . त्यामुळे तुलनेने छोटा बांबू मला छाटायला मिळाला . नंतर मात्र बांबूचा आकार वाढत जातो तशी छाटायला लागणारी शक्ती आणि क्षमता अधिक लागते . माझ्या मित्रांना हे लोक बोलवत नव्हते कारण त्यांच्यामुळे अपशकुन होईल असे त्यांना वाटत होते . परंतु हे चारही मित्र जातिवंत ९६ कुळी मराठा असल्यामुळे त्यांना कुठल्याही जाडीचा बांबू सहज छाटता येणार याची मला खात्री होती . शेवटचा जाड बांबू जेव्हा आला तेव्हा दहा ते पंधरा लोकांनी न छाटता केवळ बांबूला नमस्कार करून फाल्या खाली ठेवला .परंतु माझ्या चारही मित्रांनी एक एक करून अतिशय सहज पणे तो प्रचंड जाडीचा बांबू एका घावात छाटला ! आदिवासी लोकांची चण लहान असते . त्यांच्यापुढे माझे सर्व मित्र चांगले धिप्पाड दिसत होते . हा विधी होईपर्यंत उजाडले होते . यानंतर कोंबडीचा बळी आणि नैवेद्याचा कार्यक्रम होता . तडफडणारी कोंबडी बघून मला वाईट वाटले . तमिळनाडूमध्ये वर्मक्कलै  नावाचे जे शास्त्र मी शिकलो आहे त्याच्यामध्ये प्राण्यांना हिप्नोटाईज किंवा शांत करता येते . इथे त्याचा वापर करता येतो का ते पाहूया असा मी विचार केला . कोंबडीला प्रेमाने कुरवाळले आणि तिच्या पाठीवरील दोन विवक्षित बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी मूर्च्छा अवस्थेत गेली ! माझा तो प्रकार पाहून सगळे आदिवासी माझ्या भोवती गोळा झाले ! आणि पुन्हा एकदा करून दाखवायला गळ घालू लागले . मी कोंबडीला भानावर आणण्याचा बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी जणू काही झालेच नव्हते अशा रीतीने इकडे तिकडे पाहू लागली . पुन्हा एकदा मी तिला शांत केले . इथे कोंबडीचा बळी देण्याची एक विकृत पद्धत आहे . विझत चाललेल्या होळीमध्ये जिवंत कोंबडीला फेकले जाते . होळीची धग इतकी असते की क्षणात कोंबडी पेट घेते ! तडफडू लागते आणि बघता बघता तिचा कोळसा होतो . परंतु यावेळी पहिल्यांदाच कोंबडी होळीमध्ये पडल्यावर शांत पडून राहिली .हे मला आदिवासी लोकांनीच सांगितले . मी त्यांच्यातल्या एकाला ते बिंदू शिकवून ठेवले . आणि इथून पुढे दरवर्षी जागृत अवस्थेतील प्राण्याचा बळी न देता सुप्त अवस्थेतील प्राण्याला होलिकार्पण करावे असे सुचवले . इथले आदिवासी लोक प्रचंड परंपरा पाळणारे असतात आणि त्याच्यामध्ये जराही बदल झालेला त्यांना चालत नाही .  परंतु हा बदल त्यांनी स्वीकारला हे मला आश्चर्यकारक वाटले . युट्युब वर तुम्हाला अशा रीतीने कोंबडीला हिप्नोटाइज करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ सापडतील . हे एक सर्वमान्य ,सर्वसामान्य शास्त्र आहे आणि यात कुठलाही चमत्कार नाही . असो .
नैवेद्य झाल्यावर तर्पण विधी असतो . एका छोट्याशा बाटलीमध्ये दारू भरलेली असते . बाटली सजवलेली असते . तिच्या तोंडावर बोट ठेवून थेंब थेंब दारू जमिनीला पाजायची असते . जमिनीमध्ये छोटासा खड्डा करून त्यात दारू टाकायची असते . त्यानंतर आदिवासी पुजारी तुम्हाला हरभऱ्याचे दाणे देतो ते जमिनीला वहायचे असतात . आणि नमस्कार करून झाला की अजून एक मानकरी बसलेला असतो तो तुम्हाला एका छोट्या ग्लासात दारू प्यायला देतो ! मी परिक्रमावासी असल्यामुळे त्यांनी मला दारू प्यायला दिली नाही इतकेच ! माझ्या सह माझ्या सर्व मित्रांनी ही पूजा केली . या प्रसंगाचा व्हिडिओ देखील मित्रांपैकी कोणीतरी चित्रित केला आहे तो सोबत जोडतो आहे .









हा सर्व विधी पाहिल्यावर आता आम्ही निघणार इतक्यात नटून थटून आलेली छोटी मोठी मुले संपूर्ण मैदानात दिसू लागली ! पांढऱ्या रंगाचे गोल चट्टेपट्टे संपूर्ण अंगावर त्यांनी काढले होते . बांबूच्या टोप्या घालून त्या रंगीबेरंगी कागदांनी सजवल्या होत्या . कमरेला घुंगरे भोपळे होते . हातात दिमड्या होत्या . (दिमडी हे एक गोलाकार चामड्याचे वाद्य असते ) . घुंगुर काठ्या नाचवत होते ! मुलांच्या आगमनाने त्या मैदानाला एक नवीन चैतन्य प्राप्त झाले ! रात्रभर त्या परिसराला आलेला गंभीरपणा एका क्षणात नाहीसा झाला ! माझ्या मित्रांनी त्या मुलांसोबत भरपूर फोटो काढून घेतले ! मुलांना देखील कोणीतरी बाहेरचे आपल्याला पाहायला आलेले आहे हे पाहून चेव चढत होता ! आपणही या दृश्यांचा आनंद घ्यावा ! 
 (संग्रहित छायाचित्र ) अशा रीतीने सुंदर रंगीबेरंगी दागिने घालून इथले तरुण व मुले सजतात .
कमरेला लावलेले भोपळे अतिशय सुंदर आवाज करतात ! हे भोपळे घालून होळी भोवती नाच केला जातो .
अंगावर काढलेले गोल बिबट्याची आठवण करून देतात . डोक्यावर उंचच उंच मोराच्या पिसांचा मुकुट घातलेला असतो . ढोलाचा धीर गंभीर आवाज घुमत असतो . हातातील दिमड्या आणि कंबरेची घुंगरे सुंदर नाद निर्माण करतात .
अलीकडच्या काळामध्ये नंदुरबार सातपुडा पर्वतरांगातील हा होलिकोत्सव पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनू लागला आहे . होळीसाठी मैदानावर उपस्थित लोकांची संख्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हा सण किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ! 
जमलेल्या मुलांसह सेल्फी घेण्याचा मोह बाळासाहेब वाल्हेकर यांना देखील आवरला नाही .
मुलांनी डोक्यावर घातलेल्या टोप्यांचे निरीक्षण करा ! प्रत्येकाची टोपी वेगळी असते ! प्रत्येक जण आपापले डोके लावून आपली टोपी अधिक उंच व अधिक आकर्षक कशी दिसेल याचा प्रयत्न करत असतो ! 
अनिल पावटे यांनी देखील या दिवशी खूप फोटो काढले !
प्रत्येक चित्र झूम करून पाहिल्यावर तुम्हाला सजावटीतील एक एक पैलू लक्षात येतील
हाच तो सेल्फी ! टोप्यांचे आणि काठ्यांचे किती सुंदर प्रकार आहेत पहा !
सजलेल्या मुलांसोबत प्रस्तुत लेखक आणि त्याचे मित्र . सोबत आदिवासी कार्यकर्ता . मुलाच्या हातातील तलवार पहा ! शस्त्र हा आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे ! 
श्री सुभाष आप्पा पावरा यांनी आम्हाला खूप प्रेम आणि सन्मान दिला ते या छायाचित्रांमध्ये सोबत दिसत आहेत .
श्री सुभाष पावरा यांच्यासमवेत प्रस्तुत लेखक
श्री सुभाष पावरा यांचे आदरातिथ्य आणि निरागस हास्य सदैव स्मरणात राहील !
नटलेल्या आदिवासी मुलांसोबत सेल्फी घेताना अनिल पावटे . सोबत श्री सुभाष पावरा आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते . रात्रभर जागून कंटाळून आळस देणारा छोटासा मुलगा उजवीकडे दिसतो आहे !
 फाल्या हे कोयत्याच्या प्रजातीतले हत्यार हातामध्ये घेऊन सजलेल्या मुलांसोबत फोटो काढण्याचा मोह चन्ने मामांना सुद्धा आवरला नाही !मुलांच्या पायातली घुंगरे ,हातातल्या काठ्या , हातामध्ये घातलेले चांदीचे  अलंकार , गळ्यात बांधलेले रुमाल , आणि घातलेल्या साखळ्या , माळा ,अलंकार हे सर्वच पाहण्यासारखे आहे !
प्रत्येक माणसाकडे पहातच राहावे अशा प्रकारची सजावट त्याने केलेली असायची ! या भागातील प्रत्येक होळीमध्ये प्रत्येक माणसाने स्वतंत्र सजावट केलेली होती ! मानवी कल्पनाशक्तीला अंतच नाही हेच खरे ! 
अनिल ने देखील ढोल वादनाचा भरपूर आनंद घेतला ! त्याच्या शेजारी उभा प्रस्तुत लेखक . आणि गावातील सर्व बुत्यां सोबत आम्ही मित्रमंडळी . शामरावांच्या पलीकडे उभे असलेले आजोबा गावातील अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती होते . 
काही फोटो पुन्हा पुन्हा टाकले आहेत असे आपल्याला वाटू शकेल परंतु हे सर्व फोटो स्वतंत्र आहेत आणि त्यात काही ना काही तरी वेगळे आपल्याला पाहायला मिळेल याची खात्री आहे म्हणून टाकले आहेत . सूर्योदय होता होता काढलेली ही सर्व छायाचित्रे आहेत .
एक एक चेहरा झूम करून पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे लोक रानावनात राहत असल्यामुळे किती भयानक दिसायचा प्रयत्न करतात ! हे सर्व अवतार मुळामध्ये हिंस्र प्राण्यांना घाबरवण्यासाठी केलेले आहेत . आता त्या पशूंपासूनचे भय फारसे शिल्लक राहिले नाही परंतु परंपरा शिल्लक आहे .


वादनामध्ये गुंग आदिवासी तरुण
भुत्या बनलेली लहान लहान मुले . सेल्फी काढायला लहान मुले सुद्धा तत्पर आहेत !
एकेक व्यक्ती झूम करून पहा ! 
पावरा आदिवासी बांधव गेर नृत्य करताना
होळीचे रंग !
आज-काल आदिवासी तरुण या पारंपारिक वेशासोबतच रंगीबेरंगी गॉगल आणि स्पोर्ट शूज घालू लागले आहेत . 
दोन काठ्या जमीनीत खोचून मध्ये देवता ठेवली आहे आणि तिला काचेच्या ग्लासात मोहाची दारू आणि अजून काही गोष्टींचा नैवेद्य दाखवला जात आहे . 
समोर दिसणाऱ्या काळया आगी मध्येच कोंबडीचा बळी दिला होता
पळसाची फुले पूजेचे पावित्र्य वाढवत आहेत

ही आपली माती ! हीच आपली संस्कृती !
सुभाष आप्पांचे सर्वांनी खूप आभार मानले . माझ्या मित्रांनी आश्रम चालविणाऱ्या सुभाष आप्पांना भरभरून देणग्या दिल्या . आणि होळीचा निरोप घेतला .
आता सर्वांना वेध लागले होते नर्मदा स्नानाचे ! सर्वांना घेऊन मी उदय नदीच्या नर्मदा संगमावर गेलो . इथे सरदार सरोवराचे पाणी उलटे आत शिरल्यामुळे प्रचंड पाण्याचा फुगवटा आहे . अतिशय खोल अशा या पाण्यामध्ये सर्वांनी बराच वेळ आनंदपूर्वक स्नान केले . त्यानिमित्ताने नर्मदे काठी चालण्याचा अनुभव सर्वांना घेता आला . इथे देखील चौघांनी यथेच्छ फोटोग्राफी केली ! मी त्रयस्थपणे या सर्व प्रकाराकडे पाहत होतो . जेव्हापासून माझे मित्र सोबत आले होते तेव्हापासून माझे नर्मदा मैय्याकडचे लक्ष जवळपास उडाले होते . इकडच्या तिकडच्या गप्पा , जुन्या आठवणी , हास्यविनोद , खेचाखेची हेच सर्व सुरू होते ! गंमत म्हणजे हे सर्व माझे अंतरंगी आणि आध्यात्मिक स्पर्श असलेले मित्र आहेत तरी देखील ही अवस्था ! म्हणूनच सर्वांना हात जोडून सांगतो मित्रांनो , की जोडीने परिक्रमा करत नसाल तर परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी कृपया नर्मदा परिक्रमा एकट्यानेच करा ! सोबत कोणालाही घेऊ नका ! मैया सदैव आपल्या सोबत असतेच !
इथे एक केवट भेटला . तो बराच वेळ आमचे निरीक्षण करत होता . नंतर त्याला विचारले असता तो म्हणाला की मी मगरी गेल्या का ते पाहत होतो ! काल मी विशाल सोबत स्नान केले ती जागा इथून जवळच होती ! आणि तिथेच मगरींचा मुक्काम असतो असे मला त्या केवटाने सांगितले ! याचा अर्थ काल आम्ही दोघांनी मगरीं सोबत स्नान केले होते ! मी त्याला विचारले की मगर गेली कसे ओळखणार ? त्याने सांगितले की तुम्ही पाण्यामध्ये उतरले आहात . जर मगर असेल तर नक्की तुम्हाला खायला आली असती ! म्हणजे इथे मगरी आहेत हे सांगून आम्हाला सावध करण्याऐवजी मगरी आहेत का नाही ते पाहण्यासाठी आमचा जीव याने पणाला लावला होता ! हा प्रकार आठवून नंतर बराच वेळ सर्वजण हसत होतो ! 
या भागातील भव्य दिव्य नर्मदा पात्राचे दर्शन आपणही घ्या !
हाच तो केवट ज्याने आमच्या सहाय्याने मगरींचा तपास केला ! डावीकडून घनश्याम ढाणे ,अनिल पावटे , प्रशांत चन्ने, प्रस्तुत लेखक , केवट आणि बाळासाहेब वाल्हेकर . मागे दिसणारा नर्मदा मैया चा फुगवटा आहे . सर्वात दूर दिसणाऱ्या डोंगराच्या खाली मूळ पात्र आहे . 
इथे पाणी अतिशय खोल होते . सर्वांनी पोहण्याचा आनंद घेतला . परंतु परिक्रमावासींना पोहायला परवानगी नाही .त्यामुळे मी आपला शांतपणे पद्मासन घालून पाण्यावर पडून राहिलो ! मैयामध्ये असे पडून राहण्यातला आनंद काय वर्णावा ! आ हा हा !
प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब वाल्हेकर .मागे सर्वत्र दिसते आहे ती शुलपाणीची झाडीच आहे परंतु नावाला देखील एकही झाड शिल्लक नाही यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे .
हा परिसर अतिशय निर्मनुष्य आणि शांत आहे . नर्मदा मैयाचे असे शांत , धीर गंभीर रूप पाहायला खूप छान वाटते .
नाव शूलपाणी ची झाडी आहे . आणि मागील डोंगरावर एकच झाड कसे बसे उभे आहे . भविष्यातील भारतातील वनांची अवस्था कशी होऊ शकते याची ही नांदी आहे . आपण वेळीच सावध होऊयात . आणि वनीकरण हातात घेऊयात .
आपल्याला जे काही फोटो पाहायला मिळत आहेत ती याच बाळासाहेब वाल्हेकर यांची कृपा आहे . त्यांचा क्रमांक मी झोळी वर लिहिलेला असल्यामुळे त्याच क्रमांकावर सर्व लोक फोटो पाठवायचे .
आमचे परममित्र इतिहासकार घनश्यामराव ढाणे
एक परिक्रमावासी!
या भागातून चालत परत येताना आम्ही वाटेत बरेच फोटो काढले ते देखील आपल्या करता सोबत जोडत आहे .
प्रस्तुत लेखक आणि प्रशांत चन्ने . शुलपाणीच्या जंगलातील झाडांची काय अवस्था आहे आणि झाडे नसल्यामुळे मातीची धूप कशी होत आहे हे कळावे म्हणून मुद्दाम येथे उभे राहून फोटो काढला .
वाटेत आडवा आलेला डोंगर चढताना प्रस्तुत लेखक चन्ने मामा आणि अनिल पावटे .
केवळ कल्पना करून पहा की याच डोंगरावर जर घनदाट झाडी असेल तर किती छान दिसेल !
आपण सर्वांनी मनावर घेतले तर हे करणे शक्य आहे .
केवळ एका झाडाने केलेला पालापाचोळा पहा . अशी अनेक झाडे लावली तर इथे पुन्हा एकदा सुपीक माती तयार होईल .
पावसाळ्यामध्ये जरी हे दृश्य स्वर्गीय दिसत असले तरी वर्षभर ते टिकणे आवश्यक आहे आणि शक्य देखील आहे . अजून फार उशीर झालेला नाही केवळ पन्नास वर्षेच गेलेली आहेत .
छायाचित्रांचा अतिरेक होत आहे त्याबद्दल क्षमस्व परंतु त्या निमित्ताने ही चित्रे संग्रहित होत आहेत म्हणून इथे टाकून ठेवत आहे . 
इथे उभे राहून आमची हीच चर्चा चालली होती की हे चित्र बदलण्यासाठी आपण काय काय करू शकतो . त्याची पहिली पायरी म्हणजे इथे असे उदासवाणे चित्र आहे याबाबत जनजागृती करणे ते या छायाचित्रांच्या निमित्ताने होत आहे .

आयटी क्षेत्रामध्ये एकत्र काम करताना माझे वरिष्ठ असलेल्या प्रशांत चन्ने यांनी एक सर्वर तयार केला होता . त्याला नर्मदा असे नाव दिले होते !
अभक्तांची मांदियाळी असलेल्या या क्षेत्रामध्ये आम्ही दोघेच थोडेसे समविचारी असल्यामुळे या  सर्व्हर बाबत फारसे कोणाला माहिती नव्हते आम्ही दोघेच त्याचा पुरेपूर वापर करायचो ! तेव्हा आम्ही स्वप्नातही अशी कल्पना केली नव्हती की आम्ही दोघे लवकरच असे कुठेतरी प्रत्यक्ष नर्मदा मातेच्या काठावर उभे असू किंवा भेटू ! 
बाळासाहेब वाल्हेकर देखील तरुणपणी साधू बनून भरपूर फिरलेले आहेत !
आमच्या वयामध्ये अंतर असले तरी आध्यात्मिक धारणा एक सारखीच असल्यामुळे मैत्रीचा पाया मजबूत आहे .
परंतु तरीही त्यांनी देखील कधी असा विचार केला नव्हता की मला भेटण्यासाठी त्यांना असे नर्मदेच्या काठावर कधीतरी यावे लागेल !नर्मदा मातेची लीलाच गमतीशीर आहे !
माझ्या सर्वच मित्रांना नर्मदा स्नानामुळे अत्यंत आनंद झाला होता ! विशेषतः माझी भेट होईल का नाही याची खरोखरीच शाश्वती त्यांना नव्हती त्यामुळे अगदी मी भेटलो नाही तर नर्मदा स्नान नक्की करायचे असे ठरवून ते सर्वजण आले होते .
आपल्या मित्राला तेही नर्मदा मातेच्या काठावर भेटून मित्राची छाती आनंदाने अभिमानाने फुगून न येईल तरच नवल !




या परिसरातले काही व्हिडिओ देखील पहा म्हणजे आपल्याला यथार्थ कल्पना येईल .





इथले स्नान वगैरे आटोपल्यावर आम्ही सर्वजण निघालो आणि धनाजे आश्रमातून बालभोग खाऊन स्वामींची रजा घेतली . निघताना सर्वांनी आश्रमाला भरघोस देणग्या दिल्या . मी येथूनच सर्वांचा निरोप घेतला आणि राजू टेलर यांच्याकडे आलो . माझी नर्मदा मैया आणि झोळी उचलली . राजू टेलर यांना दंडवत प्रणाम केला . आणि पुढील मार्गाकडे मार्गस्थ झालो ! इतका वेळ मित्रांच्या सहवासात घालवल्यावर पुन्हा एकदा एकट्याने चालताना खूप बरे वाटत होते ! गेले अडीच महिने एकट्यानेच चालत असल्यामुळे पुन्हा मूळ पदावर गाडी आली याचा आनंद झाला ! नर्मदा परिक्रमेचा मूलभूत नियम सर्वश्रेष्ठच आहे ! 
एक निरंजन , दो सुखी ! तीन मे खटपट , चार दुखी !
एक निरंजन !  
एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्यात आला आनंद केवढा ?
हा पहा ! हा एवढा !!! 

 लेखांक ८८ : खुंटामोडी , भारतातील सर्वात मोठी काठीची होळी आणि मोलगीचे भिलाशेठ

धडगाव सोडले आणि कडक उन्हातून डांबरी रस्त्याने चालू लागलो . हा अजूनही शूलपणीच्या झाडीचाच परिसर चालू होता . उन्हाचा तडाखा प्रचंड होता . वाटेमध्ये अतिशय विरळ वस्ती आहे . कोणीही मराठी बोलत नव्हते . पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे हा तीनही राज्यांमध्ये विस्तारलेला संपूर्ण आदिवासी प्रदेश आहे . इथे अनेक स्थानिक भाषा आहेत .मध्य प्रदेशामधील हिंदी भाषा ,त्यानंतर नेमाडी बोली , शूल पाणीच्या झाडीच्या सुरुवातीला बोलली जाणारी पावरा आदिवासी लोकांची पावरी बोली , त्यांच्याहून थोडेसे मागास अथवा दुय्यम मानले जाणारे भील आदिवासी आहेत त्यांची भील अथवा भिलोरी बोली आहे . पावरा आणि भील यांच्यात रोटीबोटी व्यवहार सहसा होत नाहीत . (ही सर्व मला स्थानिक लोकांनी दिलेली माहिती मी लिहीत आहे . यात माझे स्वतःचे काहीही नाही . वस्तुस्थिती मांडणे हे माझे कर्तव्य आहे . ) पावरा आदिवासींचे प्राबल्य मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सीमांवर आहे . धडगाव पासून अक्कलकुवा पर्यंत कमी उंचीचा डोंगराळ प्रदेश आहे इथे भिल्ल लोक जास्त राहतात त्यामुळे भिलोरी भाषा जास्त चालते . भिलट नावाची अजून एक बोली आहे असे मला सांगण्यात आले . इथून अजून थोडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खाली उतरले की अतिशय गरीब अवस्थेमध्ये राहणारे आदिवासी भिल्ल लोक आहेत जे अहिराणी भाषेमध्ये बोलतात . जसजसे आपण गुजरातच्या जवळ जातो तसे निआरी अथवा नियारी नावाची भाषा बोलली जाते .गुजरातच्या सीमेवर धाणका नावाची एक भाषा देखील आहे ! शिवाय गुजराती भाषा तर त्या लोकांना येतेच . महाराष्ट्राची सीमा रेखा असल्यामुळे इथल्या सर्व लोकांना मराठी देखील समजते . इंग्रजी शिक्षणाच्या अतिरेकामुळे आजकाल सर्वांना इंग्रजी देखील कळते आहे . अजूनही काही बोली या भागात आहेत .आता या पट्ट्यातील लोकांना किती भाषा येतात मोजून पहा !
न्याहीली , बंजारा , काकावाडी , कोटली , बारोटी , निमाडी / लिंबाडी , पावरी , भील , राठवा /राठली , मराठी , अहिराणी , गुजराथी , हिंदी , निदारी , धाणका ! 
 मला असे अनेक बहुभाषिक लोक इथे भेटले ! बहुभाषिकत्व हे भारताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे ! भाषावार प्रांतरचना केल्यामुळे जरी भाषा वैविध्य कमी झाले तरी अजूनही पूर्णपणे संपलेले नाही ! असो .
मित्रांच्या भेटीमुळे चालायला उशीर झाला होता त्यामुळे पायांना गती देऊन चालत राहिलो .  धडगाव सोडल्यावर बऱ्याच गावांच्या हाती लागल्या . रोषा माळ , हरणखुरी , उमराणी खुर्द ,जमानवाही , सुरवाणी , सोण बुद्रुक, मोजरा ,खानबरा ही गावे पार करत कुंडल गावामध्ये आलो . या संपूर्ण काळामध्ये उजव्या हाताला डोंगरांची एक सुंदर रांग माझी साथ करत होती . 
ही डोंगर रेषा बराच वेळ तुमची साथ करते . तुम्ही किती चालले आहात हे तुमच्यासमोर आता कुठला डोंगर आहे त्यावरून कळते .
या भागात ताडाची झाडे दिसतात दिसतात
होळीमध्ये लावण्यासाठी ताडाचे खोड वापरले जाते त्यामुळे ताडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते . मोहाच्या दारू सोबतच ताडी देखील या भागात पितात .
पुढे कुंडल नावाचे गाव लागल्यावर एका आदिवासीने मला आवाज दिला . इला सोमा पाडवी नावाचा हा भिल्ल आदिवासी मनुष्य परिक्रमावासींची मनोभावे सेवा करत होता . मी चालत होतो तो महाराष्ट्र राज्य  महामार्ग क्रमांक एक होता ! आणि त्या महामार्गाला लागूनच थोडेसे आत चालत गेल्यावर त्याचे घर होते . तिथेच झाडाखाली सावली व निवारा करून त्याने छोटासा आश्रम नुकताच उघडला होता . त्यावेळी त्याच्या कुवतीनुसार तो परिक्रमावासींना चहापान व बालभोग देण्याचे सेवा करत असे . मला अतिशय सुंदर असा काळा चहा त्याने पाजला . तोडके मोडके मराठी बोलत होता . या आश्रमाची काही छायाचित्रे गुगल नकाशावर मिळाली ती आपल्यासाठी जोडत आहे .
राज्य महामार्ग क्रमांक एक ने आपण आलो आणि डावीकडे वळलो की आश्रम येतो .
राहत्या घराच्या शेजारीच त्याने एक नवीन बांधकाम केलेले आहे .
अंगणामध्ये देखील पहुडण्याची सोय केलेली आहे
आश्रमात बसल्यावर महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक असा दिसतो .
 इला सोमा पडवीने माझ्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का .  त्यावरील मजकूर वाचायचा प्रयत्न करूयात . 
जय बडा देव राणी काजल माता देव मोगरा माँ नर्मदा अन्नक्षेत्र कुंडल . ता. अक्राणी जि. नंदुरबार
Public trust स्थापना दिनांक 13 .9. 2018 रजिस्ट्रेशन नंबर ई/24
इथून महामार्गाने ओसाड माळरानावरून बरेचसे अंतर चालल्यावर खुंटामोडी नावाचे गाव येते . या गावापासून थोडासा उतार चालू झाला असे माझ्या लक्षात आले . हा भाग उन्हाळ्यामध्ये अतिशय ओसाड आणि पावसाळ्यामध्ये हिरवागार असतो . आत्ता चालताना मला ऊन अक्षरशः भाजून काढत होते . आधीच तापलेला डांबरी रस्ता त्यात आजूबाजूला सावली देणारे एकही झाड नाही . हे चित्र काही फारसे आश्वासक नाही . रस्ता बांधताना ज्याप्रमाणे त्याच्यावर डांबर टाकावेच लागते हा एक अनिवार्य भाग आहे त्याप्रमाणे प्रत्येक दहा-पंधरा फुटावर एक झाड लावलेच पाहिजे असा अनिवार्य कार्यक्रम सरकारने केला तरच आपले रस्ते चालण्यासाठी सुसह्य होतील . त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य देखील वाढते आणि धूप सुद्धा कमी होते . 
हा भूभाग कसा आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून काही छायाचित्रे गुगल नकाशाच्या सौजन्याने टाकत आहे .
हीच ती डोंगररांग जी अखंड आपल्या उजव्या हाताला आपली साथ करत असते . ही नुसती डोंगरांची रांग नसून हिच्या खालूनच नर्मदा मैया वाहते आहे त्यामुळे ही रांग आपल्याला आश्वस्त करते की तुम्ही योग्य मार्गाने चाललेले आहात .
महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक अतिशय ओसाड प्रांतातून जातो . वाटेमध्ये एकही झाड नसल्यामुळे अखंड चालत राहावे लागते . पुन्हा एकदा सांगतो की महामार्गाने चालताना नेहमी विरुद्ध बाजूने अर्थात उजव्या हाताने चालावे . त्यामुळे तुम्हाला न दिसणारे वाहन तुमच्यापासून दुरून निघून जाते आणि जवळून जाणारे वाहन तुम्हाला दिसत राहते . गाड्यांचे नियम चालणाऱ्या माणसांसाठी लागू होत नाहीत .
या भागातील डोंगर इतके रिकामे आहेत की तिथे अशा प्रकारे गाडी देखील चालवता येते ! मध्ये कुठलाच अडथळा येत नाही !
दूरवर एकाही महावृक्षाची सावली दिसत नाही . ज्यांना वृक्ष लागवड क्षेत्रात काम करायचे आहे अशा लोकांसाठी हा परिसर नंदनवन आहे .
या भागातील आदिवासी लोक त्यांच्या गाड्या कुठूनही कुठेही घालतात . याहा मोगा असे गाडीवर लिहिलेले असते . महाराष्ट्रातील अक्कलकुवा तालुक्यामध्ये येणाऱ्या देवमोगरा या गावांमधील मोगा आई ही त्यांची देवी आहे . याहा म्हणजे आई .
ही नदी खालून अखंड आपल्याला साथ करत असते . हिचे पात्र कोरडे पडलेले होते परंतु अखंड डाव्या हाताला दिसत होते .
खुंटामोडी पठाराच्या उताराची सुरुवात जिथे होते अगदी त्या ठिकाणी डाव्या हाताला एक अतिशय सुंदर आश्रम दिसला .तसेही दुपारपासून मी सुमारे १५ किलोमीटर चाललो होतो त्यामुळे इथे थांबावे असा विचार केला . स्थानिक भिल्ल आदिवासी मनुष्य संन्यास घेऊन नागा बाबा झाला आहे . आपलीच पूर्वाश्रमीची जागा त्याने या आश्रमासाठी दान केलेली असून तो स्वतः देखील आश्रमातच राहतो आणि परिक्रमावासींची सेवा करतो . भुसावळ जळगाव येथील लोक देणग्या गोळा करून हा आश्रम चालवीत आहेत . तीन वर्षांची परिक्रमा करणारे पाटील नावाचे अतिशय तेजस्वी दांपत्य या आश्रमामध्ये काही काळ सेवेकरिता म्हणून थांबलेले होते . त्यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले आणि आश्रमामध्ये कुठेही राहण्याची मुभा दिली . मी एकटाच मुक्कामी असल्यामुळे या आश्रमामध्ये काळ खूप आनंदात व्यतीत झाला . आश्रम अतिशय सुंदर रीतीने सजविलेला होता . अगदी महामार्गावर दुतर्फा उत्तम जातीची देशी झाडे लावलेली असून त्यांच्या संरक्षणासाठी जाळ्या व हिरव्या रंगाचे शेडनेट लावण्यात आले होते . प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला होता . असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते . आश्रम म्हणजे छोटेसे कौलारू घर होते ज्याच्या अंगणामध्ये सुंदर बगीच्या तयार करण्यात आला होता तसेच वरांडा देखील अतिशय चकाचक व स्वच्छ ठेवला होता . परिक्रमावासी वरांड्यात अंगणात हॉलमध्ये किंवा शेजारी बांधलेल्या शेणाने सारवलेल्या खोलीमध्ये असे कुठेही मुक्काम करू शकत होते .
पाटील पती-पत्नी उच्च कोटीचे साधक होते . त्यांच्यासोबत मी त्यांच्या खोलीमध्ये उभे राहून आरत्या स्तवने कवने वगैरे म्हटली . इंदोर चे नाना महाराज तराणेकर यांची करुणात्रिपदी आम्ही एकत्र म्हटली .हे माझे परात्पर गुरु होत . दोघांनाही मला भेटून खूप आनंद वाटला . मला देखील दोघांचा एकत्र परिक्रमा करण्याचा निर्णय खूप आवडला . आयुष्यभर आपण सतत कोणाला कोणासाठी राबत राहतो . गरजेपेक्षा अधिक वाढविलेला संसार चालविण्यासाठी काही ना काही खटपट करावी लागते . अशी खटपट करण्यातच उभे आयुष्य निघून जाते . आणि आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपले जगायचे राहून गेले आहे याची जाणीव आपल्याला होते तोपर्यंत शरीराने साथ देणे सोडून दिलेले असते . मग आपण ठरवतो की आता पुढच्या जन्मात नक्की हवे ते करू ! परंतु असे अनेक जन्म जातात आणि आपण मात्र आला दिवस ढकलत राहतो ! याला थोडासा फाटा देत हात पाय हलत आहेत तोपर्यंत सर्वकाही पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवून स्वतःच्या शोधासाठी असे रानावनात भटकणे आणि त्यावेळी आपल्या जीवनसाथीची देखील साथ सोबत असणे या परते भाग्य ते दुसरे काय ! म्हणूनच सहकुटुंब अर्थात पती-पत्नी जोडीने नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्याचे मानले गेलेले आहे . सदर लिखाण वाचून एका जरी दांपत्यास एकत्र नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण होईल तरी या लेखन प्रपंचाचे सार्थक झाले असे मानावयास हरकत नाही ! एकत्र परिक्रमा करण्याचे फायदे तोटे या विषयावर मी या दोघांशी सविस्तर चर्चा केली . यात नकारात्मक काही सापडलेच नाही ! उलट आपल्या जीवनसाथीची एक वेगळी ओळख इथे तुम्हाला निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही याची खात्री नर्मदा मैया आपल्याला देते !  प्रत्येक माणसाला वाटत असते की आपण कमावतो आहोत म्हणून घर चालले आहे किंवा आपण कष्ट करत आहोत म्हणून सर्व होते आहे . परंतु प्रत्यक्षामध्ये परमेश्वराला प्रत्येक जीवाच्या पोटाची काळजी लागलेली आहे . आणि जो तुम्हाला चोच देतो तोच चारा देखील देतो . हा एक अतिशय खात्रीपूर्वक सिद्ध झालेला सिद्धांत आहे . त्यामुळे अतिशय निश्चिंतपणे आपण बाहेर पडावे कारण 
जन पळभर म्हणतील हाय हाय । मी जाता राहील कार्य काय । हेच सत्य आहे . 
आज ना उद्या प्रत्येकाला मृत्यू येणार हे शाश्वत सत्य आहे . समर्थ रामदास स्वामी दासबोधातल्या मृत्यू निरूपण समासात म्हणतात 
अवचिते काळाचे म्हणीयारे । मारीत सुटले येकसरे । नेऊनी घालती पुढारे । मृत्युपंथे ॥
होता मृत्याची अटाटी । कोणी न घालू सकती पाठी । सर्वत्रास कुटाकुटी ।मागे पुढे होत असे ॥
ओघाने विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . दासबोध या ग्रंथातला दशक तिसरा समास नववा म्हणजे मृत्यू निरूपण समास होय . हा समास प्रत्येकाने आवर्जून वाचावा . रामदासी संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे की कुठलीही व्यक्ती मृत्यू पावल्यावर तिच्या मृतदेहापुढे या समासाचे प्रकट वाचन केले जाते . मी आजवर किमान ३०० मृतदेहांपुढे या समासाचे वाचन केलेले आहे . हा समाज याच प्रसंगी का वाचायचा याचे कारण असे आहे की त्याचा अर्थ निर्वाणप्रसंगी जितका खोल कळतो तितका एरव्ही कळत नाही . समर्थ या समासामध्ये जे काही बोलत आहेत ते तुमच्यासमोर घडलेले किंवा निश्चेष्ट पडलेले असते त्यामुळे तुम्हाला लगेच खात्री पटते . आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट एकदा गेल्यावर पुन्हा मिळू शकते परंतु एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही . त्यामुळे जर मनामध्ये नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असेल तर जरा देखील विलंब न करता ताबडतोब त्याचे नियोजन करावे . आणि नियोजन इतकेच आहे की सोबत काहीही न घेता थेट मैया चा किनारा गाठावा . पुढची सर्व सोय मैया लावून देते . माझा एक तरुण मित्र ज्याचे वय केवळ ३३ वर्षाचे आहे तो या ब्लॉगचे नित्य वाचन करायचा आणि त्याने अनेकांना हा ब्लॉग वाचायला प्रवृत्त केले . परंतु दुर्दैवाने नुकतेच अचानक त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले . तो मला नेहमी म्हणायचा की माझी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे . आता त्याचा देह पडला आहे परंतु इच्छा शिल्लक आहे त्यामुळे ही इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला पुन्हा एकदा जन्म मिळणार हे निश्चित आहे . आपल्याला देखील नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होत असेल तर ती कुठल्याही मागील जन्मातील इच्छा सुद्धा असू शकते . त्यामुळे तिचा अनादर न करता  मैयाच्या काठावर रुजू व्हावे हे सर्वश्रेष्ठ ! शुभस्य शीघ्रम् ! आतापर्यंत नर्मदा परिक्रमेचे जे काही यथार्थ वर्णन मी नर्मदा मातेच्या कृपेने करू शकलो आहे त्यावरून आपल्याला कल्पना आली असेल की ही परिक्रमा जितक्या कमी वयात आपण करू तितके उपकारक आहे आणि जितका उशीर करू तितका नर्मदा मातेच्या डोक्याला होणारा ताप आपण वाढवत असतो . परिक्रमेतील असे अनेक मार्ग आहेत की जिथून कदाचित पुन्हा जायला सांगितले तर मी जाणार देखील नाही कारण शरीर त्या ठिकाणी साथ देईलच याची खात्री देता येत नाही . दरवर्षी असे अनेक मार्ग तुमच्यासाठी अगम्य होत जाणार आहेत त्यामुळे संपूर्ण परिक्रमा आगम्य होण्यापूर्वीच आपण उचललेली काय वाईट आहे ! परिक्रमे संदर्भात एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे ते म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा संशोधन करायच्या भानगडीत पडू नये .नर्मदा परिक्रमा करण्यासाठी कुठल्याही मार्गदर्शकाची गरज नाही .कारण ती स्वतः मार्ग दाखवते. नर्मदा मैया प्रत्येकासाठी व्यक्तिगत पद्धतीने परिक्रमेचे आयोजन स्वतः करीत असते ! अमुक ठिकाणी गेलेच पाहिजे किंवा अमुक ठिकाणीच मुक्काम केला पाहिजे असा कुठलाही नियम परिक्रमेमध्ये ग्राह्य नाही . जिथे मैया नेईल तिथे जावे आणि जिथे मैया ठेवील तिथे राहावे इतकी परिक्रमा सोपी आहे . असो . 
अशा अनेक साधक बाधक चर्चा पाटील कुटुंबीयांशी झाल्यावर मी नागा बाबांचे पाय पकडले . त्यांच्याशी देखील भरपूर गप्पा मारल्या . शक्यतो संन्यासी आपल्या पूर्वाश्रमीची संपत्ती सोडून देतात परंतु इथे बाबांनी आपली पूर्वाश्रमीची जमीन मुलांकडूनच दान स्वरूपात घेतली होती हे पाहून मला मोठी मौज वाटली . पत्नी व मुलांशी संपर्क मात्र त्यांनी ठेवलेला नाही हे देखील लक्षात घ्यावे .  या आश्रमातील बगीचा सुंदर होता . मी झाडांना पाणी घातले आणि अगदी प्रत्येक झाडाचे सूक्ष्म अवलोकन केले . मला त्यात खूप आनंद मिळाला . अतिशय सुग्रास असे भोजन पाटील काकूंनी बनवले होते . खूप दिवसांनी घरगुती महाराष्ट्रीय पद्धतीचे भोजन जेवायला मिळाले ! अर्थात हे केवळ भोजन नसून भोजन प्रसाद असल्यामुळे चवीचा फारसा काही विषय नव्हता परंतु महाराष्ट्राची चव वेगळी जाणवली हे मात्र खरे ! या आश्रमाचे काही फोटो आपल्या अवलोकना करता देत आहे . सौजन्य अर्थातच गुगल नकाशे .
धडगाव या तालुक्याचे जुने नाव आक्राणी असे आहे . ही आश्रमाची पाटी . पलीकडे झाडांच्या संरक्षणासाठी केलेल्या जाळ्या पहा .
आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या सेवाकर्मी नर्मदा भक्तांचे क्रमांक
आश्रम अतिशय सुंदर आहे .
इथे समोर दिसणाऱ्या खोलीमध्येच मी आसन लावले होते .
हेच आदिवासी नागा बाबा आहेत जे या आश्रमाचे संचालक आहेत .
आश्रमाच्या बाहेर सुंदर पद्धतीने लावण्यात आलेली झाडे आणि त्याच्याभोवती घातलेल्या जाळ्या
आश्रमाच्या बाहेर इथून पुढे शूलपाणीची झाडी संपेपर्यंत प्रत्येक गावांमधील अंतर लिहिलेले आहे . हे फारच उपयुक्त आहे . 
आश्रमाच्या याच स्वच्छ वरांड्यावरील कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो . इथे समोर भिंतीवर लावलेला नर्मदा परिक्रमा मार्गाचा नकाशा देखील उपयुक्त आहे . 
गप्पा मारत रात्री उशिरापर्यंत बसल्यामुळे झोपायला थोडासा उशीरच झाला . त्यामुळे सकाळी चांगलाच उशिरा उठलो . परिक्रमेत प्रथमच इतक्या उशिरा उठलो असेन . सगळे आटोपून निघायला साडेनऊ वाजले. झपाझप चालू लागलो . आजूबाजूला सर्व डोंगराळ परिसर च होता . पावसाळ्यामध्ये हा सर्व परिसर हिरवागार असतो .
पावसाळ्यामध्ये हा परिसर काहीसा असा दिसतो
आत्ता हिरवेगार दिसणारे डोंगर प्रत्यक्षामध्ये वाळलेल्या गवताने पिवळे धमक पडले होते .
या भागात ताडाची बरीच झाडे मी पाहिली .
इथल्या घरांच्या कुंपणामध्ये देखील ताडाच्या झावळ्यांचा वापर केला जातो . आपल्यापैकी जे कोणी रामेश्वरम आणि कन्याकुमारीला जाऊन आले आहेत त्यांना ताडाच्या झावळ्यांची कुंपणे आठवत असतील पहा .
इथून बरेच अंतर चालल्यावर दुपारी गौतम तडवी नावाच्या एका आदिवासी सेवाधारीने मला अडविले आणि भोजन प्रसाद घेण्याकरिता घरी नेले ! कोणीतरी असे आपल्याला आडवावे असे भूक लागल्यावर फार वाटत असते ! नर्मदा मैया ला ते बरोबर कळते आणि ती कोणालातरी प्रेरणा देते ! हे काठी नावाचे गाव होते . या गावातील होळी जगप्रसिद्ध आहे . विशेषतः ही होळी तिच्या भव्य दिव्य आकारासाठी आणि उंचीसाठी प्रसिद्ध आहे . या गावच्या होळीची काठी सर्वात मोठी असते म्हणून गावाचे नाव काठी पडले आहे असे मला सांगण्यात आले . ही होळी देखील नुकतीच संपन्न झाली होती परंतु होळीची धग अजून शिल्लक होती त्यामुळे त्या होळीचे दर्शन आणि भस्म प्रसाद मला मिळाला .
गौतम तडवीकडे पहिल्यांदाच गरमागरम चुलीवरची ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी खायला मिळाली . खप्परमाळला मी वाळलेली भाकरी खाल्ली होती . महाराष्ट्रात आल्यावर भाकरी मिळालीच पाहिजे असे ते समीकरण आहे ! माझी आजी नेहमी एक म्हण सांगायची . घरातून बाहेर पडताना नेहमी एक भाकरी खाऊन बाहेर पडावं . एक गिरनारी ।भरवसा भारी । अर्थात एकच भाकरी खाऊन तुम्ही बाहेर पडलात तरी त्याच्यावर तुम्ही दिवसभर भरवसा ठेवू शकता ! परिक्रमेतील प्रथम ज्वारीची भाकरी खाऊन थोडा वेळ गौतमशी गप्पा मारल्या आणि पुढे निघालो .
 गौतम तडवी काठी
याच माऊलीने भाकरी बडवली
गौतम ची तडवीची झोपडी . गाडीची पूजा करताना त्याची कन्या . गाडीवर याहा असे लिहिले आहे . याहा म्हणजे आई . याहा मोगा अर्थात देव मोगरा आई
गौतम पाडवीने माझ्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का .
 माँ नर्मदा सेवा निवास 
अन्नक्षेत्र काठी (गौतम पाडवी )
 तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार 
मोबाईल नंबर ९३०९४३४८६३
(मोबाईल क्रमांक सुद्धा देवनागरी लिपी मध्ये छापलेला पाहून मला खूप बरे वाटले ! परंतु तरीदेखील नंबर हा इंग्रजी शब्द घुसवलाच ! )
काठी या गावातील होळी प्रसिद्ध का आहे ? कारण इथे सर्वच मोठे मोठे असते . सजावट करून येणारे आदिवासी लोक मी प्रत्येक गावात पाहिले परंतु या गावातील लोकांचा सजावटीचा जो आकार आहे तेवढा मोठा आकार तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही ! दहा दहा पंधरा फूट उंचीची सजावट डोक्यावर केली जाते ! भोपळ्यांची संख्या देखील वाढते ! सजावट कलाकुसर देखील सुंदर असते ! इथल्या होळीला राजवाडी होळी असे देखील म्हणतात . इथली काठी खरच खूप मोठी असते . होळीचा आकार अजस्त्र असतो . होळीसाठी होणारी गर्दी देखील विक्रमी असते .
आपण काठीवरून चाललोच आहोत आणि नुकतीच होळी झालेली आहे तर थोडेफार त्या होळीचे दर्शन देखील घेऊयात ! 
काठीची होळी ज्या क्षणी पेटते तो क्षण ! आगीशी खेळणे हा आपल्या धर्माचा अविभाज्य भाग राहिलेला आहे . कारण मुळात आपण सर्व अग्नीचे उपासक आहोत .
काठी ची राजवाडी होळी . आगीशी इतके खेळूनही आजवर कधीही इथे कुठलीही दुर्घटना झालेली नाही .
ओघाने विषय निघाला आहे म्हणून सांगतो .मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना लाईफ सेव्हर आणि फायर वॉर्डन अर्थात अग्निशमन आणि प्राण संरक्षण हे दोन्ही कोर्स पूर्ण केले होते . याचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते . त्यामुळे कंपनीच्या विविध इमारतींचे फायर ऑडिट करणे किंवा फायर मॉक ड्रिल करणे वगैरे कामे आम्ही करायचो . आमचे सर्वांचे एकत्र ट्रेनिंग चालू होते . केरळ मधून आलेला एक ख्रिस्त प्रभावित ट्रेनर आम्हाला हे सर्व शिकवत होता . शिकवता शिकवता त्याने सांगितले की भारतातल्या आगींचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मातील दिवे ,अगरबत्ती आणि कापूर हे आहेत . आणि त्याच्या या वाक्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या होत्या . मला हे खटकले मी हात वर केला आणि बोलण्यासाठी उभा राहिलो . मी त्याला प्रश्न विचारला की आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी कुठल्या ते सांग . त्याने सांगितले पाणी आणि अलार्म . 
 मग जर अग्नि शामन शास्त्रामध्ये अग्नी विझविण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पाणी आणि घंटा अथवा अलार्म आहे तर हिंदू धर्मामध्ये देखील कुठल्याही देव्हाऱ्यामध्ये धूप आणि दीप प्रज्वलित करण्यापूर्वी कलश ,शंख आणि घंटा पूजणे अनिवार्य आहे. आपल्या देव्हाऱ्यामध्ये देखील आपण तेल वात , तुप वात , कापूर वगैरे अग्नी प्रज्वलित करतो परंतु तत्पूर्वी कलश पूजन , घंटापूजन आणि शंख पूजन करून हे सिद्ध करतो की आपल्याकडे अग्निशमन यंत्रणा सुसज्ज आहे . यातील एकही गोष्ट नसेल तर देवाची पूजा केली जात नाही याचा अर्थ दिवा पेटवला जात नाही . माझ्या या वाक्याबरोबर सर्वजण उठून टाळ्या वाजवू लागले ! कारण मनोमन कोणालाच त्या ट्रेनर चे हे वाक्य पटले नव्हते परंतु  त्यांच्याकडे शास्त्रीय उत्तर नसल्यामुळे आणि सर्वधर्मसमभावाचा किडा भुणभुण करत असल्यामुळे त्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या होत्या . यानंतर मी त्या ट्रेनरला विचारले की घरातील देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागली आहे अशा किती घटना तुला ज्ञात आहेत त्याची कृपया मला लेखी माहिती द्यावी . यावर तो निरुत्तर झाला . मी त्याला सांगितले की इथून पुढे अशी चुकीची माहिती ट्रेनिंग मध्ये कृपा करून शिकवू नये . उलट हिंदू धर्मामध्ये अग्निशमन यंत्रणा सहज कशी गोवलेली आहे हे मात्र तो शिकवू शकतो . त्याने देखील इथून पुढे हे उदाहरण देण्याचे मान्य केले . जाता जाता त्याला मी खोट्या प्लास्टिकच्या ख्रिसमस ट्री मध्ये लावलेल्या विद्युत दिव्यांच्या वायर्स लूज झाल्यामुळे स्पार्किंग होऊन कशा आगी लागू शकतात याची उदाहरणे दिली . आणि भारतातील आगींचे मुख्य कारण शॉर्टसर्किट हेच आहे हे त्याच्या मुखातून वदवून घेतले ! असो .
काठीच्या होळीची आग अजूनही धगधगत होती इतकी ती होळी मोठी असते . 
इथले भुते मोठे रेखीव असतात .पंचम जॉर्ज आणि व्हिक्टोरिया राणी यांचे छाप असलेले जुने चांदीचे रुपये वापरून केलेले दागिने त्यांच्या गळ्यामध्ये असतात .
डोक्यावर घातलेल्या टोप्यांचा आकार आणि कंबरेला अडकवलेले भोपळे यांची संख्या हळूहळू वाढू लागते . कमरेला एक विशिष्ट प्रकारचा झटका देत घुंगरांचा आणि भोपळ्यांचा सुरेख आवाज काढला जातो .
टोप्यांचा आकार हळूहळू मोठा होऊ लागतोच पण उंची देखील वाढू लागते !
गगनचुंबी उंचीच्या या टोप्या पाहणे मोठे मौजेचे असते ! इतकी मोठी टोपी घालून हे लोकं चालतात कसे देवमोगाच जाणे !
काठीच्या होळीची काठी किती उंच असते पहा !
काठीच्या राजेवाडी होळीचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन पुढे जाऊयात . 
इथून थोडेसे अंतर पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक आश्रम होता . डाव्या हाताला लावलेली माय नर्मदा ही पाटी पाहून भरून आले . कारण आतापर्यंत नर्मदा मैया , नर्मदा माई हेच शब्द ऐकत होतो .परंतु माय हा अस्सल मराठी शब्द वाचायला मिळाला आणि खूप बरे वाटले !
चित्रामध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक दिसत आहे . उजवीकडे मागे इमारत दिसत आहे ते आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वस्तीगृह आहे .त्याच्या अलीकडेच आपला आश्रम आहे .
हे आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आहे
हा आहे मोलगीचा आश्रम . विश्व हिंदू परिषदेचे कार्य करणारे भिलाशेठ म्हणून आहेत ते हा आश्रम चालवितात .
आश्रम साधाच परंतु नीटनेटका आहे .
तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस चालणारी परिक्रमा करणारे मूळचे यवतमाळ येथील ओंकार दास नामक तरुण साधू या आश्रमामध्ये त्यावेळी सेवा देत होते .
मी यांना भेटलो तेव्हा त्यांची दाढी आणि जटा इतक्या वाढलेल्या नव्हत्या. आश्रमाच्या पुढचे कुंपण देखील नव्हते . तसेच आश्रमाची एकच खोली बांधलेली होती आता दोन दिसताहेत .
या ही आश्रमाच्या बाहेर शूल पाणीच्या झाडीतून बाहेर पडेपर्यंतची अंतरे लिहिलेली आहेत . मी राहिलो तेव्हा ही अंतरे लिहिलेली नव्हती . इथे अन्नक्षेत्र असा एक शब्द लिहिलेला आपल्याला दिसेल . अन्नक्षेत्र किंवा ज्याला मराठीमध्ये अन्नछत्र असे म्हणतात इथे बना बनाया अर्थात तयार भोजन मिळते . सरावृत अथवा सदाव्रत असे जिथे लिहिलेले असते तिथे सदावर्त अर्थात भोजनासाठी लागणारा शिधा दिला जातो व आपल्याला करून खावे लागते . 
आज-काल बहुतेक आश्रमामध्ये तयार भोजन दिले जाते . फार क्वचित एखादा परिक्रमावासी असा असतो की जो तयार भोजन घेत नाही तर शिधा स्वीकारून स्वतः बनवून खातो . मला संपूर्ण परिक्रमेदरम्यान असे करणारे एक दोन लोकच भेटले . अन्न अजिबात न शिजवता खाणारा एक साधू देखील भेटला होता . तो कुठल्याही प्रकारचे एक मूठच धान्य भीक्षेत घ्यायचा . असे चार-पाच मुठी वेगळे वेगळे धान्य कमंडलू मध्ये नर्मदा जलात भिजत घालायचा . आणि साधारण धान्य फुगले किंवा मोड आले की जाता येता मूठमूठ खायचा . हे प्रकृतीसाठी अति उत्तम !  असो . 
इथे शुकलाल नावाचा एक स्थानिक भिल्ल परिक्रमावासी होता ज्याने १३ महिन्यांची परिक्रमा उचलली होती . ओंकार दास साधू नवीन नवीनच साधू जीवनामध्ये आलेला होता . अशावेळी त्याला भिलाशेठ सारखा मार्गदर्शक मिळाला ही फार मोठी गोष्ट आहे . भिलाशेठ हा जरी गृहस्थ असला तरी देखील त्याला अनेक वर्षांपासून नर्मदा परिक्रमावासींची सेवा करण्याचा दांडगा अनुभव आहे . मी असे अनुभवले की संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कुठल्याही साधूला भिलाशेठचे नाव माहिती नाही असे सहसा होणार नाही . इथे येणाऱ्या तसेच काठाने चालणाऱ्या कुठल्याही साधू संतांची सेवा करण्याची संधी भिलाशेठ सोडत नाहीत . पुढे उत्तर तटावर मला दादू दयाल संप्रदायाचे एक मौनी बाबा भेटले होते . पूरणदास जी महाराज असे त्यांचे नांव होते . इस १५४४ ते १६०३ म्हणजे साधारण एकनाथ महाराजांच्या काळामध्ये होऊन गेलेले हे एक संत होते . यांना मानणारा एक साधू संप्रदाय आहे . या मौनी बाबांनी जगदीश मढी आश्रमामध्ये आपले सोळा वर्षाचे मौन सोडले होते . यांनी १८ वर्षाची कठीण परिक्रमा चालवली आहे . ते जिथे कुठे मुक्काम करतात तिथे एक मंदिर उभे करतात . आतापर्यंत त्यांनी अनेक मंदिरे उभी केली . एकलबारे ,जागेश्वर , जबलपूर , गौगच्छाघाट अशा ठिकाणी त्यांनी महादेवाची मंदिरे उभी केलेली आहेत . परंतु लाडवी या गावांमध्ये ते मुक्कामी असताना त्यांनी तत्काळ उभे केलेले तत्कालेश्वर महादेवाचे मंदिर मी स्वतः पाहिले आहे . या साधूंनी भिलाशेठ म्हणजे साक्षात संत असल्याचे मला सांगितले . कुठेही कोणीही परिक्रमा वासी अडचणीमध्ये असला की त्यासाठी सर्वप्रथम भिलाशेठ धावून जाणार हे नर्मदा खंडामध्ये सर्वांना माहिती आहे . ही केवळ ऐकीव माहिती नसून याची अनुभूती मी स्वतः नुकतीच घेतलेली देखील आहे . तो प्रसंग देखील अखेरीस सांगतो . परंतु तत्पूर्वी भिलाशेठ यांनी मदत केलेल्या अजून एका साधू ची माहिती सांगतो . गवाली नावाच्या गावामध्ये चातुर्मासासाठी राहिलेल्या हिरण्मयानंद नावाच्या एका बंगाली साधूंना रोज नावेतून शिधा पोहोचवण्याचे काम भिलाशेठ करत असत . पावसाळ्यामध्ये शूलपाणीच्या घनदाट अरण्यामध्ये साठलेल्या सरदार सरोवराच्या भयंकर पाण्यामधून छोट्या नावेने रोज जाणे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो . या साधूंचे नियम कडक असल्यामुळे ते फक्त एक पेलाभर जेवण करायचे . मुठभर डाळ आणि मूठभर तांदूळ कमंडलू मध्ये ठेवून खाली पणतीला चार वाती लावायचे आणि गॅसच्या शेगडी सारखी ती पणती कमंडलू खाली ठेवून द्यायचे . नर्मदा जल भरल्यावर एक तासभर जप करायचे . तासाभरात मंद आचेवर खिचडी तयार व्हायची . तिचे भक्षण करून हे राहत असत . अशा रीतीने संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कोणीही साधू असेल ज्याला काही मदत हवी आहे त्याच्या मदतीकरता आपल्या खिशाचा विचार न करणारा धावणारा कार्यकर्ता म्हणजे भिलाशेठ होय ! ओंकार दास साधू कडून मी भिलाशेठ यांच्या बद्दल खूप ऐकले होते त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा लागली होती . परंतु आज काठी गावातील होळी असल्यामुळे त्यांच्या घरी पाहुण्यांचा प्रचंड राबता होता . ओंकार दास साधूने त्यांना फोन करून सांगितले की असा असा एक पुण्याचा परिक्रमावासी आपली भेट घेऊ इच्छितो तेव्हा तशामध्ये देखील वेळ काढून ते मला भेटण्यासाठी आले . आणि मला पुरेसा वेळ देऊन माझ्याशी भरपूर गप्पा मारून मग रात्री उशिरा ते घरी निघून गेले . हे एका खऱ्या कार्यकर्त्याचे लक्षण आहे . 
१०मार्च २०२४ रोजी नर्मदा खंडामध्ये कधीही घडत नाही अशी एक दुर्दैवी घटना मंडला परिक्षेत्रामध्ये घडली . महाराज पूर जवळ घाघा आश्रमातून सकाळी निघालेले मनमाड नाशिक येथील दांपत्य शालिनीताई आणि विश्वनाथराव अजसे यांना साल्हे दांडा या गावाकडे सडक मार्गाने जाताना दारू पिऊन आलेल्या एका मिनी ट्रक ड्रायव्हरने जोरदार धडक दिली . आणि त्यात दुर्दैवाने त्या माताराम चा जागेवरच मृत्यू झाला . विश्वनाथराव गंभीर जखमी झाले . ही घटना घडल्या बरोबर पोलिसांनी सर्वप्रथम भिलाशेटला फोन केला आणि या दोघांच्या कुटुंबीयांचा क्रमांक त्यांच्याकडून मिळविला . प्रत्येक परिक्रमावासीला भिलाशेठ लक्षात ठेवतात हे पोलिसांना देखील आता माहिती झालेले आहे . त्यामुळे ताबडतोब यांच्या दोन्ही मुलांना संपर्क करून पोलिसांनी बोलावून घेतले आणि पुढील कार्यवाही केली . नर्मदा खंडामध्ये अशा घटना अजिबात घडत नाहीत . ही पहिलीच दुर्दैवी घटना कानावर पडलेली आहे . त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नये . परंतु सांगण्याचा मथितार्थ इतकाच की भिलाशेठ प्रत्येक परिक्रमावासीकडून त्याची सविस्तर माहिती त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात . त्याचा असा फायदा वेळोवेळी होतो . 
मी स्वतः नुकताच याचा अनुभव घेतला . माझ्याकडे फोन नाही हे माहिती झाल्यावर भिलाशेठ यांनी मला कुठल्यातरी मित्राचा संपर्क क्रमांक लिहून ठेवायला सांगितले . त्याप्रमाणे मी माझ्या एका मित्राचा क्रमांक तिथे लिहून ठेवला होता . २६ मार्च २०२४ रोजी भिलाशेठ यांचा माझ्या मित्राला फोन आला आणि त्यांनी माझा क्रमांक पाठवण्यास मित्राला सांगितले . मित्राने माझी परवानगी घेऊन त्यांना क्रमांक पाठवला . त्यांनी मला भाष करून सांगितले की पुण्यातील एक परिक्रमावासी रावेरखेडी जवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडलेला आहे . तो काहीही बोलत नसून त्याचा किंवा त्याच्या नातेवाईकांचा शोध लावायचा आहे . त्याच्या खिशामध्ये ब्रह्मचैतन्य भक्त निवास हिंजेवाडी असे लिहिलेली चिट्ठी सापडली . या एका चिठ्ठी वरून सुमारे ३०-३५ ठिकाणी फोन लावत अखेरीस त्या मुलाचा तपास लावण्यात मला मैय्याच्या कृपेने यश आले ! सदर आश्रम अजून बांधून झालेला नव्हता . परंतु त्याला रिव्ह्यू देणाऱ्या एका गायकाच्या कॅसेट कंपनीच्या मालकाकडून गायकाचा क्रमांक मिळवून आश्रम चालविणाऱ्या ग्वाल्हेर स्थित काकांचा क्रमांक मिळवून सनावद येथील सरकारी रुग्णालयाबाहेरील मेडिकल वाल्याचा क्रमांक मिळवून ॲम्बुलन्स वाल्याचा क्रमांक मिळवून खरगोन च्या सरकारी दवाखान्या बाहेर मोबाईल शॉप चालवणाऱ्या माणसाचा क्रमांक मिळवून त्याद्वारे खरगोन सरकारी दवाखान्याचा क्रमांक मिळवून त्या परिक्रमावासी वर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरांचा क्रमांक मिळविला ! आणि दरम्यान संन्यास घेण्याचे वेड डोक्यात घेतलेला हा तरुण आयसीयू मधून पळून देखील गेला ! परंतु योग्य वेळी पोलिसांना तो सापडला आणि पुन्हा एकदा या परिक्रमावासी सोबत चालणाऱ्या काही अन्य परिक्रमावासींचा क्रमांक मिळवून अशा बऱ्याच भानगडी करत अखेरीस सो*** ***डे नावाचा लोणंद सातारा येथील ,अतीशय हुशार ,इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेला , गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित असा हा परिक्रमावासी ,त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यामध्ये सुखरूपपणे दिला गेला ! तो सुखरूप पणे घरी पोहोचल्याचे त्याच्या जिवलग मित्राने मला कळविले आणि मगच मी आणि भिलाशेठने मोकळा श्वास घेतला ! अशी तळमळ असलेला भिलाशेठ सारखा एखादाच कार्यकर्ता असतो . याच प्रसंगामध्ये एक विपरीत अनुभव देखील मला आला .बिर्ला नावाच्या व्यक्तीने याला सर्वप्रथम एडमिट केले होते असे कळल्यावर त्याला मी फोन लावला असता त्यांनी मला विचारलं की हा तुमचा कोण लागतो ज्या करता तुम्ही इतकी तळमळ करत आहात ? मी सांगितले की तो नर्मदेला आई मानतो आणि मी देखील नर्मदा मैया म्हणतो म्हणजे आम्ही दोघे परिक्रमा वाशी भाऊ भाऊ आहोत ! शिवाय माझ्यावर दुर्दैवाने असा काही प्रसंग नर्मदे काठी आला असता तर समोरच्या व्यक्तीने काय केलेले मला आवडले असते तेच मी आता करत आहे .  आणि तसेही एका आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार करून पहा की त्यांचा तरुण तडफदार हुशार मुलगा जर असा कोणी पळवत असेल तर ते योग्य आहे काय ? 
विषय निघालाच आहे म्हणून या निमित्ताने एका गंभीर विषयावर थोडेसे भाष्य करतो . या संपूर्ण प्रकरणामध्ये मला असे लक्षात आले की अजून साधनेमध्ये तुलनेने कच्चेपणा असलेल्या तरुणांना भुलवून साधू बनवण्याची खुमखुमी काही नवसाधुंना ( ? ) असते .यांना साधू तरी कसे म्हणावे . हे तर आयता हक्काचा शिष्य , स्वयंपाकी , हरकाम्या मिळवण्याची संधी साधू पाहत असतात .  तरी अशा लोकांपासून सर्वांनीच सावध राहावे . योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात त्यासाठी अट्टाहास करायची गरज नसते . तुम्हाला खायची इच्छा झाली आहे म्हणून झाडावरील कैरीचा अंबा होत नसतो . त्याला पाड आला की पिकलेला आंबा आपोआप गळून पडत असतो . तसेच साधू जीवनाचे देखील आहे . 
असाच पिकलेला आंबा म्हणजे मोलगीचे भिलाशेठ आहेत !
 शूलपाणेश्वराच्या झाडीतील मोलगी येथील भिला शेठ , त्यांचा भाचा , आणि ओंकार दास महाराजां समवेत प्रस्तुत लेखक . हा मोबाईल भिला शेठ यांचाच होता .
सर्वांच्या चेहऱ्यावरून ते किती दमलेले आहेत ते आपल्याला दिसत असेल तरीदेखील केवळ एक परिक्रमावासी आपली आठवण काढतो आहे हे जाणून स्वतः मला भेटायला येऊन मला इतका वेळ दिलात त्याबद्दल भिला शेठ तुमचे खूप खूप आभार !

नर्मदा खंड अशा अद्भुत नररत्नांची खाण आहे . इथले पाणी , इथले माती , इथली हवा यांचा गुणच वेगळा आहे . नर्मदा खंडाचा परिस स्पर्श झालेल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहात नाही . नराचा नारायण करते ती नर्मदा ! वाल्याचा वाल्मिकी करते ती नर्मदा ! भोग्याचा योगी करते ती नर्मदा ! एका सर्वसामान्य भिल्लाचा , परिक्रमावासींसाठी आधारस्तंभ ठरलेला भिलाशेठ करते ती नर्मदा !  हर हर नर्मदे ! नर्मदे हर हर ! 

 लेखांक ८९ : पिंपळखुट्याच्या हनुमंताची करवली भक्ती आणि वडफळीच्या गावगुंडाची जिरवली मस्ती


त्या रात्री खूपच उकाडा होता . त्यामुळे आश्रमाच्या गच्चीमध्ये जाऊन उघड्यावर झोपलो . पहाटे सर्व आन्हिके आटोपून पुढे मार्गस्थ झालो . आन्हिके आटोपली असे मी जेव्हा जेव्हा म्हणतो आहे तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक दिवसाची एक वेगळी कथा आहे ! अगदी आंघोळ कुठे व कशी केली इथपासून शौचासाठी कुठे व कसे जावे लागले या प्रत्येक गोष्टीचे एकापेक्षा एक मजेशीर किस्से आहेत . शिवाय यानंतर जो परिक्रमेतील सर्वात महत्त्वाचा विधी आहे त्या नर्मदा पूजनाचे अनुभव देखील अनीर्वचनीय असेच आहेत . विस्तारभयास्तव अनुल्लेखाने पुढे जातो आहोत . असो . 
कालचा दिवस फारसे चालणे झाले नव्हते . त्यामुळे आज भरपूर चालावे असे मनात आले . फक्त चालण्यासाठी जेव्हा आपण चालतो तेव्हा चालण्याची चाल ढकलच अधिक करतो . कारण त्यावेळी चालणे हेच आपले ध्येय असते . परंतु इथे मात्र अधिक चालण्याचा संकल्प मन करू शकते कारण कमी किंवा अधिक चालणे हे ध्येय नसून कुठेतरी पोहोचणे किंवा एखादे धाम गाठणे हे ध्येय असते . चालणे ही फक्त त्यासाठी लागणारी मधली एक प्रक्रिया असते . त्यामुळेच आयुष्यातील एखादे काम व्यवसाय किंवा नोकरी करताना आनंद मिळत नसेल तर नोकरीसाठी नोकरी , किंवा कामासाठी काम न करता , आपण ते कुठल्या ध्येयासाठी करत आहोत ते लक्षात घेऊन काम करावे म्हणजे आनंद मिळायला सुरुवात होईल ! आणि एक गोष्ट सदैव डोक्यात ठेवावी . आपण अर्थार्जनासाठी जे काही करत आहोत ती आपली उपजीविका असते . उपजीविका हा शब्दच सर्व काही सांगून जातो ! ही आपली मुख्य जीविका नव्हे ! उप जीविका आहे ! जगातील प्रत्येकाने आजवर प्रचंड पैसा कमावून ठेवला . खूप मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी उभ्या केल्या . परंतु त्याचा उपभोग घेण्याची पुरेशी संधी त्यांना मिळालीच असेल याची खात्री देता येत नाही . या उलट ज्यांनी या सर्व ऐशो आरामाचा उपभोग घेतला त्यांच्याकडून काहीतरी विधायक समाज उपयोगी कार्य झाले आहे अशी उदाहरणे अपवादानेच आढळतात . हे एक चक्र आहे . एक पिढी कमावत असते . एक पिढी उपभोग घेते . आणि एक पिढी उधळून मोकळी होते ! कारण त्यांना हे वैभव उभे करण्यासाठी कणभर सुद्धा कष्ट पडलेले नसतात . त्यामुळे साम्राज्य उभे करताना त्याचा विस्तार नक्की किती असावा आणि त्याचे वारस कोण , किती व कसे आहेत , किंबहुना आहेत तरी का याचा विचार जरूर व्हावा . न पेक्षा स्वतः कमविलेल्या वैभवचा उपभोग स्वतः घेणे व आपल्या दृष्टीपथात येणाऱ्या गरजूंना आणि याचकांना करून देणे हे अधिक आनंददायी असते . 'सेटलमेंट ' नावाचा एक भ्रमक शब्द सध्या मार्केटिंग वाल्या लोकांनी बाजारात सोडला आहे ! भारतातील सर्वात श्रीमंत मनुष्य अंबानी हा देखील अजून 'सेटल' झालेला नाही . झाला असता तर दर नवीन दिवशी एखादा नवीन उद्योग धंदा त्यांनी चालू केला नसता ! "तो अनेकांची घरे चालवतो आहे आणि अनेकांची पोटे भरतो आहे " वगैरे 'टिपिकल' उत्तरे यावर काही लोक देतील .  परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जगातील कुठलाही जीव दुसरा जीवाचे पोट भरण्याचे सामर्थ्य बाळगत नाही . 
आम्ही काय कुणाचे खातो ।श्रीराम आम्हाला देतो ॥ हे रामदास स्वामींनी म्हटले आहे ते योग्यच आहे . विशेषतः आपल्या 'कम्फर्ट झोन ' मधून बाहेर पडल्यावर तुम्हाला याची अनुभूती नक्की येते !  ज्याने चोच दिली आहे तो चारा देतोच देतो . परिक्रमेमध्ये पदोपदी क्षणोक्षणी याची जाणीव आपल्याला होत राहते . 
आजवर या देशामध्ये अनेक मोठे मोठे राजे होऊन गेले ! अगदी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगावेळी रायगडावर वातावरण कसे असेल आठवून पहा आणि आज त्या गडाची काय अवस्था झालेली आहे ते देखील पहा . आपण उभ्या केलेल्या राजमहालांची अवस्था थोड्याच वर्षात थोडीफार अशीच होणार आहे हे दुर्दैवी सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा ! मोठ्या मोठ्या धनिकांची पुढे झालेली अवस्था पाहून देखील इथे प्रत्येकाला 'सेटल' व्हायचे आहे ! स्थिरस्थावर व्हायचे आहे ! स्थावर मालमत्ता याचा अर्थ ज्याला तुम्ही स्पर्श करू शकता अशी तुमची मालमत्ता . अशा मालमत्तेवर तुम्ही स्थिरपणे बसू शकलात की ती स्थिरस्थावर अवस्था असते . स्थिर बसण्यासाठी माणसाला किती जागा लागते ? तुम्ही मुळात जागाच इतकी वाढवून ठेवली की ती आवरण्यासाठी आणि सावरण्यासाठी तुमची स्थिरता निघून जात असेल तर त्याचा काय उपयोग आहे ? तुकाराम महाराज सांगून ठेवतात ! 
औट हात तुझी जागा ! 
औट म्हणजे साडेतीन हात ! खरे तर इतकीच जागा पुरेशी आहे परंतु तरी देखील थोडेफार इकडे तिकडे करणे सोयीचे जावे म्हणून अजून थोडी जागा फार फार तर त्यात जोडावी . परंतु उभे आयुष्य प्रपंच विस्तार करण्यात घालविणे म्हणजे अन्नाचा अतिरिक्त संचय करणाऱ्या मुंग्या किंवा मधाचा भारंभार संचय करणाऱ्या मधमाशा यांच्यासारखी गत होऊन जाते ! तुम्ही आयुष्यात कधी एखाद्या मुंगीला शांतपणे बसून साखरेचा दाणा खाताना पाहिले आहे काय ? एखाद्या मधमाशीला फुलपाखराप्रमाणे फुलातील मध चाखताना पाहिले आहे काय ? त्यांच्या अल्प बुद्धीमध्ये एकच प्रोग्राम लिहिलेला असतो ! संचय ! त्याचा लाभ त्यांना भविष्यामध्ये होतही असेल ! परंतु बहुतांश वेळा असे पाहण्यात येते की अशा जीवांनी केलेल्या संचयाचा फायदा दुसराच एखादा जीव सहज जाता येता उठवितो ! सध्या सेकंड होम नावाची एक संकल्पना चांगलीच दृढमूल झालेली आहे ! याने घेतले म्हणून मी घेतले , त्याने बांधले म्हणून मी देखील बांधले अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात . अशा सेकंड होम चा उपभोग त्या घराची निगा राखण्यासाठी ठेवलेले रखवालदार अधिक घेतात ! 'केअर टेकर ' हा प्रत्यक्षामध्ये 'उपभोग टेकर ' होऊन जातो ! म्हणजे दुसरे घर असूच नये असे माझे म्हणणे नाही . परंतु एका मर्यादेच्या पुढे आपल्या संपत्तीचा विस्तार करणे म्हणजे भविष्यातील डोकेदुखी वाढवून ठेवणे आहे हे थोडासा विचार केल्यावर एखादा लहान शाळकरी मुलगा देखील सांगू शकेल इतके धादांत सत्य आहे ! त्यापेक्षा दोन-चार अशा गरजू लोकांना साधीच झोपडी वजा घरे उभी करून दिली तर ते आयुष्यभर आपले स्मरण ठेवतील ! तुम्ही बांधलेले दुसरे घर आणि त्याच्या वार्षिक डागडुजी साठी येणारा खर्च , राखणदारांचा खर्च , याची बेरीज केली तर त्याच्या व्याजावर त्याहीपेक्षा उत्तम अशा वेगवेगळ्या जागा सहज उपलब्ध होऊ शकतात जिथे आपण मनसोक्त वेळ घालवू शकता ! त्याही पेक्षा कमी खर्चात जर आनंद मिळवायचा असेल तर नर्मदा खंडातील एखाद्या आश्रमामध्ये जावे आणि मस्तपैकी पडेल ती सेवा करावी ! नर्मदेतला प्रत्येक आश्रम ज्याला शुद्ध मराठी भाषेत 'प्राईम लोकेशन ' असे म्हणतात त्या ठिकाणी आहे ! त्यामुळे तुम्हाला जगावेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही ! उपभोग घेण्यामध्ये जितका आनंद आहे त्याहीपेक्षा अधिक आनंद सेवा देण्यामध्ये आहे ! कधीतरी देऊन पहा किंवा सेवा दिल्याचा प्रसंग आठवून पहा ! कोविड महामारीच्या काळामध्ये अनेक लोकांनी समाज उपयोगी उपक्रमामध्ये आणि सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवला . त्यावेळी आपल्याला मिळालेला आनंद आठवून पहा ! या महामारीने जगाला अनेक उपकारक गोष्टी दिल्या आहेत ! जगण्याचा अर्थ आणि जिवंत असण्याचे महत्त्व कोविडने अलीकडच्या काळातील उरलेल्या पिढ्यांना शिकविले ! गेलेली वेळ आणि गेलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही . त्यामुळे आपल्याला असे वाटत असेल की आपण आपल्या इष्ट जनांसाठी पुरेसे करून ठेवले आहे तर नक्कीच परिक्रमेचा विचार करायला हरकत नाही . कारण परिक्रमा करून देखील तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रकारे सर्वोत्तम असे काहीतरी परत आणत असता ! तुमचे परिक्रमे नंतर बदललेले स्वरूप समाजासाठी उपकारकच असते . असो . 
पायांना गती दिली . बिजरीगव्हाण नावाचे गाव लागले . त्यानंतर सुरगस , बर्डी अशी आश्रम असलेली गावे लागली परंतु कुठल्याही आश्रमामध्ये न थांबता थेट पिंपळखुटा गावाच्या मारुती मंदिरामध्ये पोहोचलो . पिंपळखुटा या नावाचे मला फार आश्चर्य वाटते . या नावाची किमान पाच गावे मला माहिती आहेत . पिंपळाच्या झाडाचा खुंट असा या नावाचा साधा अर्थ आहे . खुंटामोडी गावात जशी पूर्वी कधीतरी अनिर्बंध वृक्षतोड झालेली असणार आहे त्याचप्रमाणे या गावात पिंपळाचा एखादा भव्य वृक्ष असणार आहे . गावांची नावे नेहमीच खूप मजेशीर इतिहास सांगतात . अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पिंपळखुटा नावाची गावे आहेत . इथले मारुतीचे मंदिर एका खोल ओढ्याच्या उतारा वर होते . मी मंदिरामध्ये ओढ्यातूनच चढून वर आलो . छोटेसेच मंदिर होते आणि एक आदिवासी भिल्ल साधू इथे राहून सेवा करत होता . साधूने भगवा रंग विकत आणून फडक्याने भिंतींना मारला होता . त्याने भिंती चोपडल्यामुळे त्या मोठ्या मजेशीर दिसत होत्या . त्यावर अतिशय फताड्या अक्षरांमध्ये कोणीतरी परिक्रमावासी साधूने काही अक्षरे लिहून तो निघून गेला होता . साधूचा एक भगत तिथे आला होता . त्याने मला बसायला सांगितले व कोरा चहा करायला तीन दगडाच्या चुलीवर ठेवला . मला ती फताडी अक्षरे बघून काही बरे वाटेना . मंदिराची भिंत कशी सात्विक पाहिजे . मी साधूला विचारले की अजून थोडा रंग शिल्लक आहे का ? त्याने सांगितले चांगला डबाभर रंग शिल्लक आहे परंतु आपल्याकडे ब्रश नाही . तिथे जवळच बांबूची एक कामठी पडली होती . इंचभर जाडीची ती पट्टी चांगली चपटी होती . दाताने कचाकचा चावून मी त्याच्या एका टोकाचा ब्रश तयार केला . आणि त्या डब्यातल्या रंगाने भिंतीवर काही अक्षरे आणि द्रोणागिरी घेऊन उडणारा हनुमान वगैरे चित्रे काढली . भगतराम खुश झाला आणि त्याने आमचे फोटो काढले . माझ्याकडे मोबाईल नाही सांगितल्यावर मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले . आपणही त्या साधूचे दर्शन घ्यावे . अक्षरे जेमतेमच आलेली आहेत परंतु उपलब्ध संसाधनामध्ये याहून चांगले काही करता आले असते असे वाटत नाही .
पिंपळखुटा हनुमान मंदिरातील भिल्ल साधू आणि प्रस्तुत परिक्रमावासी
रंगवून झालेली अक्षरे ! आणि हनुमान जी !
साधूची राहणी किती साधी आहे पहा !
फताडी अक्षरे माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीवर होती.
 तसे पाट्या रंगवणे अथवा सुलेखन माझ्यासाठी अगदीच नवीन आहे असे नाही .
माझ्या एका डॉक्टर बहिणीच्या दुकानावरील पाटी हौसे खातर रंगवताना ..
सुलेखन करायला मजा येते ! 
तसाच काहीसा प्रयत्न इथे केला !
गरमागरम काळा चहा घेतला आणि साधु महाराजांची आज्ञा घेतली . जेमतेम दहा पंधराचच मिनिटे या आश्रमामध्ये होतो . परंतु रिकामे बसून राहण्यापेक्षा वेळेचा काहीतरी सदुपयोग झाला याचा आनंद वाटला .
मी काही व्यावसायिक चित्रकार वगैरे नाही . परंतु हौसेला कुठे मोल असते ! अशा रीतीने संधी मिळेल तिथे संधी मिळेल ती कला नर्मदा मातेच्या चरणी अर्पण करण्याची हौस मी भागवून घ्यायचो ! किंबहुना मैय्याच तुम्हाला तुमची क्षमता बघून विविध संधी उपलब्ध करून देत असते असे म्हटले पाहिजे . 
इथून पुढे मोकस आश्रमापासून पुढे जाण्याचे दोन मार्ग होते . इथे एक नवीन शब्द मला कळाला . एक आदिवासी मनुष्य मला म्हणाला रोडी रोड जायचं तर उजव्या हाताला जा . आणि चटकट जायचं असेल तर डावीकडून जा . चटकट ? हा काय नवीन प्रकार आहे ? त्याने सांगितले ज्या मार्गाने चटकन् कटता येते तो चटकट ! अर्थात शॉर्टकट ! शॉर्टकट या शब्दाला गेले बरेच दिवस मी पर्यायवाचक शब्द शोधत होतो ! तो इथे सहज चटकन मिळून गेला ! चट कट ! कुठल्याही इंग्रजी शब्दासाठी स्वभाषेत पर्यायवाचक शब्द शोधताना उच्चार साधर्म्याचा जरूर विचार केला पाहिजे . तरच त्यात यश मिळू शकते . हे माझे मत नसून भाषा प्रभू असलेले माझे मित्र अनंत भालचंद्र तथा रमणजी चितळे यांचे मत आहे . आणि त्यांची भाषाविषयक मते मला शिरोधार्यच आहेत ! आज आपण देवनागरी लिपी मध्ये जे काही फॉन्ट वापरतो त्यातील बरेचसे फॉन्ट त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत . वयाची पंचाहत्तरी ओलांडूनही अजूनही ते नवनवीन फॉन्ट तयार करतच आहेत ! असो .
मोकस मार्गे अतिशय सुंदर असा तीव्र उताराचा चट कट घेऊन पांढरी माती नावाच्या गावाची हद्द पार करून एका नदीपात्रातून चालत चालत वडफळी गाव गाठले . हे महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव आहे . या नदीचे नाव देव नदी असून हिच्या ऐल तीरावर महाराष्ट्र तर पैल तीरावर गुजरात आहे . नदीचा रस्ता सुनसान आणि अरण्यमय होता . ही नदी थेट नर्मदा मातेला जाऊन मिळते . आणि जिथे ती नर्मदा मातेला मिळते तो संगम पूर्वी अतिशय पवित्र मानला जायचा परंतु आता तो जलमग्न झालेला आहे .  
मोलगी गाव सोडल्या सोडल्या बिजरी गव्हाण गावात  एक आश्रम लागला होता . मी इथे थांबलो नाही . परंतु आपल्याला माहिती असावे म्हणून या आश्रमाची काही चित्रं सोबत जोडत आहे . इथल्या घरांची रचना लक्षात येण्यासाठी ही चित्रे उपयुक्त आहेत .
बिजरी गव्हाण गावातील अन्नक्षेत्र आणि ते चालविणारा आदिवासी तरुण . संग्रहित छायाचित्र
इथे बांबूच्या अतिशय सुंदर तट्ट्या बनवून त्याच्या भिंती करण्याची पद्धत आहे . या लिंपायला सोप्या जातात व हवेशीर असतात .
राष्ट्रीय संत श्रद्धेय विवेक जी  नामक कोणी संत या आश्रमाचे संस्थापक आहेत . संत हा शब्द उत्तर भारतामध्ये अतिशय सर्वसामान्य रीतीने वापरला जातो . महाराष्ट्रामध्ये संत हा शब्द फार जपून वापरला जातो . हा फरक कृपया वाचकांनी कायम ध्यानामध्ये ठेवावा . छपराची रचना कशी आहे ते इथे वास्तुविशारदांनी पाहून घ्यावे .
अतिशय सुंदर रीतीने सारविलेली जमीन आणि लिंपलेल्या हवेशीर भिंती अतिशय सुखद असतात ! या परते सुख अन्य कुठल्याही लॅविष फ्लॅटमध्ये किंवा बांधकामांमध्ये मिळणे शक्य नाही !
सांगा बरं या स्वयंपाक घरामध्ये दिव्याची , पंख्याची गरज आहे काय ? आणि पाश्चिमात्य देश आम्हाला शिकवतात ? गो ग्रीन ? 
 सुरगस गावाच्या जवळ आल्यावर हळूहळू शिंदीची झाडे आंब्याची झाडे वगैरे दिसू लागली .
हा महाराष्ट्रीय ताड आहे
आपण निरा याच झाडाची पितो
पावसाळ्यामध्ये हा परिसर स्वर्गीय दिसतो
सर्व डोंगर हिरवाईने नटतात
दर्या खोऱ्यातून जलप्रपात नर्मदा मातेच्या भेटीसाठी झेपावू लागतात
या भागातील दहेलचा धबधबा प्रसिद्ध आहे
या दहेल च्या धबधब्यावर जमलेली आदिवासी मुले . इथली आदिवासी मुले शूर आहेत .
इथली आदिवासी मुले धाडसी सुद्धा आहेत
फक्त त्यांच्या अंगातील ऊर्जेचा गैरवापर करून कोणी विद्रोही किंवा फुटीरतावादी विचार त्यांच्यात भिनवून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची व भारतीय सामाजिक सौहार्दाची होळी कोणी करू नये इतकेच वाटते . त्यामुळेच या संपूर्ण समाजाला विना विलंब मूळ राष्ट्रीय प्रवाहात आणणे अगत्याचे आहे .
अखंड वृक्षतोड ही या भागातली एक प्रमुख समस्या आहे .त्याची पदचिन्हे तुम्हाला जागोजागी दिसतात .
पांढर माती गावाजवळ केवडीचा धबधबा प्रसिद्ध आहे .
पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर पर्यटकांसाठी स्वर्ग आहे
चटकटने उतरताना अशा प्रकारची घनदाट अरण्ये पार करावी लागतात
आपल्याला दुर्दैवाने इंग्रजांनी विकसित केलेली गिरिभ्रमण क्षेत्रे तेवढीच माहिती आहेत . महाबळेश्वर आणि माथेरान सोडून महाराष्ट्रात अजूनही अतिसुंदर गिरी माथे आहेत हे प्रत्यक्ष फिरल्याशिवाय कसे कळणार ! 
या भागात अशी असंख्य रान फुले आहेत की जी फक्त  पावसाळ्यामध्येच दर्शन देतात !
इथले आदिवासी लोक कमळाची लागवड सुद्धा करताना दिसतात . या आदिवासी तरुणीच्या हातामध्ये आहे ते खरे कमळ असून आपल्या बाजारात गणपती मध्ये जी फुले मिळतात ती कमळाचीच कमोदिनी नावाची जात आहे . 
ज्वारी हे या भागातले मुख्य धान्य आहे .
हीच ती देवनदी जी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची सीमा आखते .खालच्या बाजूला डुमखल नावाचे गाव दिसते आहे ते गुजरात राज्यामध्ये असून वडफळी हे गाव महाराष्ट्रामध्ये आहे . वडफळी आणि चापडी याच्या मधोमध श्री कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम आहे . जिथे प्रत्येक परिक्रमावासी थांबतोच थांबतो .
अतिशय सुंदर अशा निसर्गसंपन्न मार्गाने चालत मी वडफळी आणि चापडी गावाच्या सीमा हद्दीवर असलेल्या श्री कुलदीप कुलकर्णी यांच्या चैतन्य आश्रमामध्ये पोहोचलो . या आश्रमाचे वैशिष्ट्य असे आहे की इथे परिक्रमावासींना अतिशय सुग्रास भोजन दररोज दिले जाते . इथे सतत पदार्थ बदलले जातात . आणि ताटामध्ये किमान सहा ते सात पदार्थ असतातच असतात ! कुलदीप स्वतः स्वयंपाक करतात तसेच काही स्थानिक आदिवासी तरुण देखील गर्दी वाढल्यावर त्यांना मदतीसाठी येतात . इंदोर येथील दत्त संप्रदायातील थोर संत श्री नाना महाराज तराणेकर यांच्या गुरुपरंपरेचा अनुग्रह कुलदीप कुलकर्णी यांच्यावर आहे . नानांच्या परंपरेतील सर्व उपासना कुलदीप कुलकर्णी यथासांग करतात . परिक्रमा वासी इथे मोठ्या संख्येने मुक्काम करतात कारण इथून पुढे गुजरात राज्याची हद्द लागते आणि पुन्हा एकदा मोठे मोठे डोंगर चढावे लागतात . हा आश्रम नदीच्या काठावर असल्यामुळे खड्ड्यामध्ये आहे . छोटीशीच वास्तू असली तरी ती कायम परिक्रमावसींनी गजबजलेली असते . मी जेव्हा आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा माझ्या खेरीज अन्य कोणी परिक्रमा वासी तिथे नव्हते . कुलदीप कुलकर्णी यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले . आश्रमामध्ये गेला गेला एक व्हरांडा आहे तिथे मी काही काळ शांतपणे विसावलो . आपल्या माहितीकरता आश्रमातील काही संग्रहित छायाचित्रे जी स्वतः कुलदीप कुलकर्णी यांनीच काढलेली आहेत ती सोबत जोडत आहे . सौजन्य गुगल नकाशा .
श्री कुलदीप कुलकर्णी यांचा चैतन्य आश्रम . वडफळी ,महाराष्ट्र
आश्रमाच्या ठीक समोरून वाहणारी देव नदी
पावसाळ्यामध्ये ही नदी पार करणे थोडेसे कठीण होते
महापूर आल्यावर तर हिला पार करणे केवळ अशक्य !
आश्रम संचालक श्री कुलदीप कुलकर्णी डावीकडे
उभे
चैतन्यआश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणारे परिक्रमावासी
चैतन्यआश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणारे साधू परिक्रमावासी
चैतन्य आश्रमामध्ये भोजन प्रसाद घेणाऱ्या माताराम परिक्रमावासी
परमपूज्य नाना महाराज तराणेकर आणि नर्मदा मैया यांचे अधिष्ठान

पू . नाना महाराजांची सुरेख मूर्ती आणि पादुका
श्री कुलदीप कुलकर्णी यांचा फोन क्रमांक आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे . इच्छुकांनी त्यांना संपर्क करावा . ९६३७५७१५४२


आश्रमामध्ये भरपूर परिक्रमावासी आले की कधीकधी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागतो . त्यावेळी स्थानिक आदिवासी तरुण कुलदीप यांना मदत करतात .
परिक्रमावासींना उत्कृष्ट दर्जाचे आणि साग्रसंगीत भोजन दिले जाते
 रोज काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ बनवले जातात
पावभाजी आणि गाजर हलवा वगैरे अन्य कुठल्या आश्रमात मिळताना पाहिले नाही .
उपवासाचे पदार्थ देखील भरभरून दिले जातात .
सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की मूळचे धुळ्याचे असलेले श्री कुलदीप कुलकर्णी हे अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने आश्रम चालवीत आहेत . परंतु इथे येताना एका अप्रिय घटनेचा सामना मला करावा लागला . नर्मदा मातेने माझी चांगलीच परीक्षा पाहिली असे म्हणा हवे तर ! त्याचे असे झाले . 
त्या जंगलातील चटकट घेऊन मी वडफळी गावामध्ये पोहोचलो . गावातील मुख्य रस्त्यावर बऱ्यापैकी बाजार भरला होता . माणसांची गर्दी चांगली होती . शक्यतोवर परिक्रमावासी गावातून जाताना त्याला लोक नर्मदे हर असा आवाज देतात ! आपणही फिरून त्या लोकांना हर हर नर्मदे किंवा नर्मदे हर असा आवाज देतो ! इथे मात्र साधारण पंचवीशीचा एक आदिवासी तरुण मोटरसायकलवर बसून आरशातून मला येताना पाहत होता . मी चालताना बऱ्यापैकी सावध असतो त्यामुळे हा माझ्याकडे पाहतो आहे हे मी आधीच हेरले होते . मी त्याच्या जवळ गेल्यावर तो माझ्या वाटेत थुंकू लागला . म्हणून मी थोडासा बाजूला झालो तरी तो थुंकलाच . त्याच्या तोंडामध्ये गुटखा भरलेला होता . त्यामुळे त्याची पिंक मोठी होती . अतिशय किळसवाणा असा तो प्रकार होता . क्षणभर त्याला तत्काळ प्रत्युत्तर द्यावे असे माझ्या मनात आले . परंतु मी विचार केला की हे बरोबर नाही . त्याने त्याचे काम केले . मी माझे काम केले पाहिजे .मी त्याला एवढेच म्हणालो , " माणसे दिसत नाहीत का रे तुला बाळा ? "  आणि मी पुढे चालत राहिलो . तो थुंकल्याबरोबर आजूबाजूला जमलेली त्याची मित्रमंडळी कुत्सितपणे हसल्याचे देखील मी पाहिले . परंतु तो एवढ्यावर थांबला नाही . मी थोडासाच पुढे गेलो असेन . हा गाडीवरती पुन्हा पुढे आला आणि यावेळी नेम धरून तो माझ्या पायावर थुंकला . अतिशय गलिच्छ घाणेरडी अशी त्याची गुटखा मिश्रित थुंकी माझ्या पायावर सगळीकडे पसरली . माझ्या डोक्यात क्रोधाग्नी भरून मी काहीतरी विपरीत कृती करणार इतक्यात त्याची जागा विवेकाने घेतली आणि मी स्वतःला समजावून सांगितले , की मी काहीतरी भडक प्रतिक्रिया द्यावी म्हणूनच हा तरुण असे वागतो आहे .तशी प्रतिक्रिया जर मी दिली तर त्याचा कायमचा त्रास अत्यंत सेवाभावी वृत्तीने इथे आश्रम चालविणाऱ्या कुलदीप कुलकर्णी यांना होणार आहे . त्यामुळे मी हे सर्व अन्याय सहन करून पुढे निघून गेले पाहिजे . कारण मी इथे एका दिवसासाठी आलेला पाहुणा आहे . परंतु कुलदीप कुलकर्णी यांना कायमचे येथे राहायचे आहे आणि इथल्या लोकांना तोंड द्यायचे आहे . तरी देखील मी एक काम असे केले की त्या बाजारामध्ये दुकान लावलेल्या तीन-चार वयस्कर लोकांना मी ती घाण दाखवली आणि त्यांना विचारले की हे तुम्हाला मान्य आहे काय ? बहुतेक त्या गुंडाची आणि त्याच्यासोबत फिरणाऱ्या चेल्या चपाट्यांची सर्वत्र खूप दहशत होती . कारण सर्वजण मान खाली घालून उभे राहिले कोणीही काहीही बोलले नाही . त्यांना हा प्रकार आवडलेला नाही हे त्यांच्या चर्येवरून लक्षात येत होते परंतु बोलण्याची हिंमत होत नाही हे देखील स्पष्टपणे कळत होते . मला अजूनही मनोमन असे वाटत होते की याला सर्व गावासमोरच धडा शिकवावा . परंतु पुन्हा एकदा मी कुलदीप कुलकर्णी यांचा विचार केला . अजून मी त्यांना भेटलेलो नव्हतो बर का . परंतु माझ्या लक्षात आले की आश्रमाच्या अगदी जवळ मी पोहोचलेलो असताना जर कोणी असे वागत असेल तर त्याचा निश्चित अर्थ असा आहे की ह्या माणसांना आश्रमाला त्रास देण्याची इच्छा दिसते आहे . त्यामुळे मी माझ्या मार्गाने चालत राहिलो . तो माथेफिरू तरुण पुन्हा एकदा माझ्या दिशेने वेगाने गाडीने येऊ लागला . यावेळी मात्र मी बाजाराच्या थोडासा पुढे आलेला होतो . आजूबाजूला फारशी माणसे नव्हती . त्यामुळे मी माझी काठी आडवी- तिडवी हलवून जरा हात मोकळे करतो आहे असे दाखवले . त्या काठीच्या परिघाजवळ काही त्याला गाडी आणता आली नाही . आणि तो फिरून निघून गेला . मी मागे वळून पाहिले तेव्हा तो देखील गाडीवरून जाताना मागे वळून पाहत होता . आणि नजरेने मला सुचवत होता की अजून माझी मस्ती जिरलेली नाही . मी शांतपणे चैतन्य आश्रमामध्ये पोहचलो . कुलदीप कुलकर्णी यांनी माझे प्रेमाने स्वागत केले . मी त्यांना झालेला प्रसंग सांगितला . सांगणे आवश्यक नव्हते परंतु त्यांना माहिती असावे म्हणून सांगितले . त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी मला पाय धुण्यासाठी पाणी आणून दिले . त्यांना हा प्रकार कोणी केला आहे ते लक्षात आले . या संपूर्ण परिसरामध्ये हा एकच असा गावगुंड होता की जो परिक्रमावासींना त्रास देण्यासाठी प्रसिद्ध होता . विद्रोही विचारांच्या नादाला लागल्यामुळे त्याच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी आणि त्या धर्मातील परंपरांविषयी प्रचंड आकस होता . शिवाय अतिशय बेमुवर्तखोर वर्तन असल्यामुळे गावातील देखील कोणीही त्याच्या नादाला लागायचे नाही . त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती . मी कुलदीप यांना हे देखील सांगितले की मी त्याला जरा देखील प्रतिकार केला नाही कारण तुम्हाला त्रास व्हायला नको हा माझा शुद्ध भाव होता . कुलदीप यांना फार वाईट वाटले . त्यांनी मला नुकताच होळीच्या वेळी झालेला एक प्रकार सांगितला . याच गावगुंडाने एका परिक्रमावासीला होळीची "फुई " मागितली . इकडे वर्गणीला हा शब्द वापरतात . परिक्रमावासी कडे अर्थातच काहीच नव्हते . त्या तुलनेने वयस्कर परिक्रमा वासीयाने होळीची फुई देण्यास असमर्थता दर्शविल्याबरोबर या गावगुंडाने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या परिक्रमावाशीला भर चौकात बेदम चोप दिला ! उभा गाव बघत होता परंतु कोणी मध्ये पडले नाही . हे ऐकल्यावर मात्र माझ्या मेंदूचे तापमान थोडेसे अधिक वाढले . आणि अतिशय विचित्र भावना मनामध्ये दाटल्या . आपलीच माणसे आपल्याच मातीमध्ये राहून आपल्याच माणसांशी असे कसे काय वागू शकतात ? आपण आपल्याच मातीतल्या माणसांना इतके पारखे व्हावे ? आपल्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि आपल्या समाजाचे ऋण यांची इतक्या सहजतेने प्रतारणा करावी ? ही कुठल्या प्रकारची शिकवण आहे ? आणि अशी परंपरा धारण करणारी पिढी पुढे वाढवून या देशाचे , समाजाचे ,धर्माचे किंबहुना स्वतःच्या कुटुंबाचे देखील काय कल्याण करणार आहे ? कुलदीप त्याचे किस्से मला सांगत राहिले . तो गावगुंड सर्वांच्याच डोक्याला ताप झाला होता . भंगुरै दरम्यानच आसपासच्या गावातील मुलांनी ठरवून येऊन याला भर जत्रेमध्ये बेदम चोपला होता . त्यामुळे हा अजूनच चवताळला होता आणि स्वतःला गावासमोर सिद्ध करू पाहत होता . हे सर्व कुलदीप सांगत असतानाच अचानक दोन-चार मोटरसायकल मोठमोठा आवाज करत आश्रमासमोर येऊन थांबल्या . गाडीवरून हा गाव गुंडा उतरला . याला बघताच कुलदीप काहीतरी आणायचे निमित्त करून आत मध्ये केले . माझ्या लक्षात आले . की हीच संधी आहे ! मी त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते कारण त्याने आश्रमा पर्यंत येऊ नये अशी माझी इच्छा होती . परंतु आता तो आश्रमा पर्यंत आला होता .शेवटची चूक त्याने केलेली होती ! त्यामुळे त्याची मस्ती जिरवणे भाग होते . मी आश्रमाच्या दारापाशी त्याला सामोरा गेलो . तो अतिशय तोऱ्यामध्ये चालत आत मध्ये येत होता . मी प्रतिकार करत नाही हे त्याला चांगले कळल्यामुळे तो माझ्याकडे न बघता कुलदीप भाऊला अतिशय हिडीस स्वरा मध्ये हाका मारू लागला . त्याला काही कळायच्या आत मी माझ्या हाताने जमेल तितका मोठा परीघ हवेत काढत फाड करून त्याच्या कानाखाली मुस्कटात भडकवली ! या प्रकाराने ५५ - ६० किलो वजनाचा तो खत्रुड जीव चांगलाच हेलपाडला .  वीर्य नाशाची नशा लागलेले ते पाप्याचे पितर नैष्ठिक ब्रह्मचर्याच्या तप्त तव्यावर तावून सुलाखून निघालेल्या नर्मदा भक्ताच्या हाताच्या एकाच आघाताने क्षणात वठणीवर आले ! मी त्याच्या श्रीमुखात भडकवली आहे हे पाहिल्याबरोबर त्याच्यासोबत आलेले गाडीवरचे सर्व मित्र उलट्या पावलाने निघून गेले आणि चक्क पळून गेले . जाताना गाड्या ही घेऊन गेले . तो एकटा पडला ! मी त्याला म्हणालो आता बोल . माझ्याशी बोल . विषय तुझ्या आणि माझ्यामध्ये होता . तू कुलदीप भाऊ ला भेटायला का आलास ! माझ्या एका हातामध्ये दंड होता . तो गावगुंड गाल चोळत थरथर कापत माझ्यासमोर उभा होता . इतक्यात कुलदीप कुलकर्णी बाहेर आले . तो काही बोलणार इतक्यात मी त्याला सांगितले भाऊंच्या पाया पड . त्याच्या डोळ्यात पाणी आले होते . असा अपमान यापूर्वी कधीच त्याचा कोणी केला नसावा . तो रडक्या स्वरामध्ये कुलदीप भाऊला सांगू लागला . या परिक्रमावासीने चौकामध्ये मला मारहाण केली . मला उलट बोलला . मी डाव्या हातातली काठी उजव्या हातात घेतली त्याबरोबर घाबरून तो दोन पावले मागे सरकला . मी त्याला म्हणालो . तुला मी मराठी भाषेमध्ये काय सांगितले ते लक्षात आले का ? कुलदीप भाऊ ला नमस्कार करायचा आणि माफी मागून म्हणायचं मी पुन्हा असं करणार नाही . मी पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही . मी कोण आहे तुला माहिती नाही . तुझा असा बाजार उठवीन की तुला आयुष्यात परत कुठे स्थिरस्थावर होता येणार नाही . त्याने मागे वळून पाहिले . मी म्हणालो अरे बाळा तुझ्यासारखे मरतुकडे सरळ करण्यासाठी मला फार वेळ लागत नाही . आणि राहिला प्रश्न तुझ्या मित्रांचा तर ते कधीच xxला पाय लावून पळून गेलेले आहेत . पटकन माफी मागून मोकळा हो नाहीतर तुला मी कोण आहे ते दुर्दैवाने दाखवावे लागेल . सगळे परिक्रमावासी एक सारखे दिसतात म्हणून असे समजू नकोस की सगळेच तुझा मार खातील . मी काठी उचलल्या बरोबर तो चटकन खाली वाकला आणि कुलदीप भाऊ च्या पाया पडला . " सॉरी " एवढेच म्हणाला . आणि शर्टाच्या बाहीने डोळे पुसत ताड ताड ताड निघून गेला . जाताना मी त्याला मोठ्या आवाजात ऐकवले की पुन्हा जर त्याने कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाकडे डोळे वर करून पाहिले तर त्याची खैर नाही. त्याच्या मित्रांनी त्याची गाडी सुद्धा नेली होती इतके ते सर्व पळपुटे निघाले . तो गेल्यावर मी कुलदीप कुलकर्णी यांची क्षमा मागितली . त्यांना मात्र या प्रकाराचे फारच टेन्शन आले ! ते मला म्हणाले की तुम्ही आता पटकन जेऊन घ्या आणि पुढे मार्गस्थ व्हा . कारण हा मुलगा काही तुम्हाला आता सोडणार नाही . मी कुलदीप ला म्हणालो मला हात लावायला याचा बाप आला तरी बेहद्द ! माझ्या केसाला सुद्धा धक्का लावायची हिम्मत याच्या कोणामध्येच नाही .अर्थात हा माझा स्वतःवरील अति आत्मविश्वास नव्हता तर नर्मदा मातेच्या सामर्थ्यावरील श्रद्धा होती . "तुझी परिक्रमा निर्विघ्नपणे पार पडेल " असा अनेक संतांनी दिलेला जो आशीर्वाद होता त्या आशीर्वादावरील तो विश्वास होता . परंतु कुलदीप मात्र खरोखरीच खूप चिंतित आहेत असे मला दिसले . नशीब मी त्याच्या कानाखाली काढलेली नक्षी त्यांनी पाहिली नव्हती ! त्यांनी लगेचच मला गरमागरम जेवण वाढले . सकाळी कधीतरी टाकरखेडा आश्रमाची आठवण झाली आणि दुसरे काही नाही आठवले तरी गुलाबजाम खाण्याची इच्छा मात्र झाली होती ती देखील कुलदीप ने पूर्ण केली ! पोटभर जेवून नाना महाराजांना साष्टांग नमस्कार करून पुढे निघालो ! कुलदीप ने वही मध्ये माझे नाव लिहून घेताना पुन्हा एकदा मला गतीने मार्गस्थ होण्याची विनंती केली . त्यांचे असे म्हणणे होते की एकदा मी देव नदी ओलांडली की या मुलाचे काही चालणार नाही ! पुन्हा एकवार कुलदीप ची क्षमा मागून मी मार्गस्थ झालो . कुलदीप चा आश्रम नदीच्या काठावर एका रस्त्यावरच होता . समोर गुडघाभर पाण्याची नदी ओलांडली की लगेच डुमखल गावातला गुजराती आश्रम होता . 
नदिया के पार असे लिहिलेली आश्रमाची पाटी लावलेली होतीच . 
माझ्यासाठी हे फार सोपे होते . कुलदीपच्या आश्रमातून धावतच बाहेर जायचे आणि नदी ओलांडून पलीकडे गेले की या गाव गुंडाची हद्य संपली ! पण मी मूळ ज्या गावचा आहे ते गाव संपूर्ण पंचक्रोशी मध्ये गुंडागर्दी साठी प्रसिद्ध आहे ! म्हणजे असली फालतू गाव गुंडगिरी तिकडे कोणी करत नाही . परंतु आमच्या गावाला कुस्तीची महान परंपरा आहे . हिंदकेसरी मारुती माने यांची कर्मभूमी अर्थात सांगली जिल्ह्यातील सप्तर्षी कवठे किंवा कवठेपिरान हे माझे मूळ गाव आहे .या गावात घरटी एक पैलवान तरी आहेच .माझे थोरले चुलते देखील तालीम करायचे .वडिलांना देखील कुस्तीचा कोण नाद !त्यांच्या कुस्तीच्या वेडापायी मी आयुष्यात कधी क्रिकेट खेळू शकलो नाही ! इतका त्यांचा या त्यांच्या मते 'फालतू ' खेळांवर रोष होता ! आमच्या या गावातील लोकांचा एक वाईट गुण आहे . हे लोक अन्याय सहन करत नाहीत . आणि विनाकारण वाकड्यात गेलेल्या माणसाला हाणून , मारून ,ठोकून ,बडवून सरळ केल्याशिवाय राहत नाहीत ! त्यामुळे मी देव नदी पार न करता महाराष्ट्राच्या हद्दीतूनच अजून काही किलोमीटर चालत जाण्याचे ठरवले ! देव तारी त्याला कोण मारी ! ही नुसती म्हणू नसून माझा धगधगीत अनुभव आहे ! मी जसा त्या कच्च्या रस्त्याने चालायला निघालो तसे माझ्या लक्षात आले की माझ्यावर पाळत ठेवली जात आहे . एका दुचाकीवर तीन मुले , अशा रीतीने फिरणाऱ्या सहा सात मोटरसायकल माझ्या शेजारून पुढे गेल्या . जाताना सर्व मुले माझ्याकडे वळून वळून पाहत होती . हळूहळू नदी खाली जाऊ लागली आणि डोंगर सुरू झाला . रस्ता मोकळा असल्यामुळे मी जाताना मुक्त हाताने माझी काठी फिरवत होतो ! विशेषतः या मुलांच्या गाड्या जवळून जाताना मी काठीचा आवाज येईल अशा रीतीने ती फिरवायचो ! किंवा रस्त्यावरचा एखादा खडा नेम धरून काठीने उडवायचो . चालता चालता हे प्रकार करण्याची मला चांगली सवय झाली होती . आणि क्वचितच मी काठीचा केलेला वार खडा चुकवू शकायचा असे महारथ मला परिक्रमा कृपेने प्राप्त झाले होते . त्या खड्यावर माझ्या काठीचा ॲल्युमिनियम चा ठोकळा जेव्हा आपटायचा तेव्हा अक्षरशः बंदुकीच्या गोळी सारखा आवाज निघायचा ! त्यामुळे ती मुले मनोमन दचकायची ! त्यांचे असे नियोजन होते की पुढे असलेल्या एका खिंडीमध्ये मला गाठायचे आणि बेदम मारहाण करायची . माझे असे नियोजन होते की यांच्यातल्या निम्म्या लोकांना घाबरवून सोडायचे म्हणजे त्यांची लढण्याची इच्छाच मारून टाकायची ! आधीच त्यांच्यासमोर त्यांच्या म्होरक्याला कानफाडून मी अर्धी लढाई जिंकली होती !  एकदा तर फार मजा झाली ! समोरच्या उतारावरून वेगाने माझ्या दिशेने एक दुचाकी येत होती ! माझ्या अंगावर गाडी घालून मला घाबरवायचे असे त्यांचे नियोजन होते . परंतु तो बाईक स्वार जवळ येतानाच मी चटकन खाली वाकलो आणि बुटाची लेस बांधू लागलो . परंतु या प्रकारामुळे गडबडलेला गाडीवान फापलला ! आणि ती तीन मुले पडता पडता वाचली ! मी धावतच त्यांच्याजवळ गेलो . ती घाबरून पळून जाण्याच्या बेतात होती . पण मी त्यांना आडवा गेलो आणि थांबवले . आणि मी त्यांना विचारले की तुमचे नक्की काय चालू आहे ? मला सांगा . ती मुले म्हणाली काही नाही आम्ही असेच फिरत आहोत . आतापर्यंत त्या गावगुंडाचे नाव मला कळालेले होते .  मी त्यांना विचारले खरे सांगा तुम्हाला त्यानेच पाठवले ना ? तुम्हाला नर्मदा मैया ची शपथ आहे . मुलांनी माना खाली घातल्या . आणि म्हणाले , " दादा आम्हाला त्याचे विचार पटत नाहीत . परंतु त्याचे ऐकावेच लागते . त्याच्या घरातले नातेवाईक मोठे राजकीय पुढारी आहेत . त्यांच्या हातात सगळी सत्ता आहे . त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही . " मुलांनी तो गावगुंड माझ्या अंगावर थुंकलेले पाहिले होते . त्यानंतर मी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही हे देखील पाहिले होते . आणि कुलदीपच्या मुळावर उठल्यावर मात्र त्याची काय गत केली ते देखील पाहिले होते . त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती की मी निष्पाप आहे . परंतु गावगुंडा च्या दबावामुळे ते मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते . मी त्या मुलांचे अतिशय प्रेमळ शब्दात प्रबोधन केले . या वयोगटातील मुले हाताळण्याचा मला बऱ्यापैकी सराव आहे . मुलांना माझी भूमिका समजावून सांगितली . त्यांना मी त्यांची ऊर्जा योग्य त्या शत्रूच्या विरोधात वापरण्यासाठी सुचवले ! भारतीय लष्करामध्ये भरती होऊन तिथे आपली मस्ती जिरवावी असा सल्ला दिला . आपल्याच गावात येणाऱ्या आपल्याच संस्कृतीच्या आपल्या धर्माच्या अभ्यागताला त्रास देण्यात कुठला मोठा पुरुषार्थ आहे ? या माझ्या प्रश्नाने मुले अंतर्मुख झाली . त्यांना संगतीचे महत्त्व देखील पटवून सांगितले . आणि योग्य ती संगत धरण्याची कळकळीची विनंती केली . कुलदीप कुलकर्णी यांना आश्रमामध्ये जाऊन मदत करत जावी असे देखील सुचवले . या मुलांनी सदर गाव गुंडाच्या मार्फत कोणी कोणी या आश्रमाला कसा त्रास दिला याची जंत्रीच मला ऐकवली . हा आश्रम ज्या जागेवर होता ती जमीन याच गुंडाच्या लांबच्या नातेवाईकांची होती . नातेवाईक जरी चांगले असले तरी हा गावगुंड अलीकडे फारच शेफारला होता . मी त्याचा अहंकार जिरवून खूप चांगले काम केले असे त्याच्याच साथीदारांनी मला सांगितले ! मी त्या मुलांना सांगितले की तुमच्या गुंड मित्राला माझा निरोप द्या की कुलदीप कुलकर्णी यांच्या आश्रमाला केस भर जरी धक्का लागल्याचे मला कळले तरी त्याला मी आयुष्यातून उठवीन ! अर्थात वाईट आयुष्यातून उठवून , चांगल्या आयुष्यामध्ये बसवीन असा त्याचा अर्थ होता ! परंतु तो कळण्याइतपत या मुलांची वैचारिक प्रगल्भता नव्हती ! ती मुले मला नर्मदे हर करून निघून गेली .
पुढे जाण्याचा चटकट देखील त्यांनी मला सांगितला . एक लक्षात ठेवा मित्रांनो . दुर्जन हे नेहमी अल्पसंख्यच आहेत . सज्जन हे नेहमी बहुसंख्यच राहणार आहेत . निसर्गाची रचनाच अशी आहे की सज्जनांची संख्या वाढविण्यावर त्याचा भर असतो . परंतु बहुसंख्य असूनही सज्जन निष्क्रिय असल्यामुळे मूठभर दुर्जन शक्तिमान झाल्याचा भ्रम उभा राहतो . सज्जन दुर्बळ नाहीत हे दुर्जनांना योग्य वेळी योग्य प्रकारे सिद्ध करून दाखवावे लागते . अन्यथा त्याचा त्रास पुढील सज्जनांना होऊ शकतो . त्या गावगुंडाला नर्मदा मैया ने माझ्या माध्यमातून असा धडा शिकवला होता की पुन्हा पुढच्या एखाद्या परिक्रमा वाशीला त्रास देताना तो हजार वेळा विचार करेल . शिवाय जाता जाता त्याचे साथीदार देखील मी फोडले होते ! शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शत्रूच्या सैन्यातील चांगली माणसे हेरून त्यांना आपल्या विचारांचे बनवत तसेच हे काहीसे आपोआप घडले होते . नर्मदा मैया चा जयजयकार करत मी पुन्हा एकदा शूलपाणेश्वर राष्ट्रीय अभयारण्याचा आनंद घेत चालू लागलो ! 
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे । 
असे रामदास स्वामी म्हणतात .
भवाच्या भये काय भीतोसि लंडी ।
धरी रे मना धीर धाकासी सांडी ।
रघुनायका सारिखा स्वामी शिरी ।
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥
हे देखील माझे आवडते समर्थ वचन आहे .
शिवाजी महाराज म्हणायचे 
भ्यावे तो एक रघुनाथासी !तुम्हासी काये म्हणोनि भ्यावे ?
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोडेसे अधिक भय आणि गुजरातच्या भूमीमध्ये गेल्यावर थोडे कमी भय हे काहीच माझ्यासाठी लागू होणार नव्हते ! कारण मी नर्मदा मातेचा , शिवछत्रपतींच्या विचारांचा असा गुंडा आहे की ज्याची हद्दच फार मोठी आहे ! 
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे !
थोडक्यात जगात कुठेही असो , भयमुक्त राहणे हाच साधकाचा खरा अंतरीचा भाव असला पाहिजे . जगातील सर्वात पचविण्यास कठीण गोष्ट आणि भयप्रद गोष्ट म्हणजे मृत्यू आहे . परंतु एकदा मृत्यूचेच भय निघून गेले की माणूस कशालाच घाबरत नाही ! नर्मदा माता तुमचे मृत्यूचे भयच काढून घेते ! तुम्हाला निर्भय बनवते ! आत्मनिर्भर बनवते ! आत्म मग्न बनवते ! आत्म स्वरूपाचा साक्षात्कार निश्चितपणे करवते ! 
जय मा रेवा । पळविसी भेवा ।
उकलसी ठेवा । अंतरीचा ॥
अबल करिसी भय । सबल दिधसी जय ।
सकलभुवनत्रय । हर रेवा ॥ 
महादेव हर हर देवा ॥
हर रेवा । हर हर रेवा ॥
नर्मदे हर !

 लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर

देव नदी नावाची परमपवित्र नदी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडते .तिच्या एका काठावर गुजरात तर दुसऱ्या काठावर महाराष्ट्र आहे . याच नदीच्या नर्मदा संगमावर शूलपाणेश्वराचे पुरातन मंदिर होते असे मला स्थानिकांनी सांगितले . हे गाव महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे . त्यामुळे मंदिराचे पुनर्वसन करावे लागणार हे लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारने नवीन मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते . परंतु तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंदिरासाठी जागा न दिल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हे मंदिर गुजरात मध्ये पळवले आणि गोरा कॉलनी या गावामध्ये भव्य दिव्य मंदिर पुनर्निर्माण करून दाखविले . नर्मदे काठचे हक्काचे एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र अशा रीतीने महाराष्ट्राने गमावले . आज सकाळपासून मी सुमारे ३५ किलोमीटर चाललो होतो . देव नदीचा सुखद सहवास डाव्या हाताला होता . महाराष्ट्राची भूमी सोडून पलीकडे जावे असे वाटतच नव्हते ! असे वाटायचे की हाच काठ पकडून थेट नर्मदा मैयाचा किनारा गाठावा ! परंतु देव नदी अतिशय खडतर मार्ग क्रमणा करत नर्मदार्पण होते . त्यामुळे अखेरीस तिला ओलांडलेच . आणि कणजी या गुजरात मधील पहिल्या गावामध्ये आलो ! 
महाराष्ट्रातील वडफळी ते गुजरात मधील लाल रंगाने अंकित कणजी या गावांमध्ये जाताना देव नदीच्या काठाने करावा लागणारा प्रवास या नकाशात आपल्याला दिसेल . पुढे देव नदीचा नर्मदा संगम देखील दिसत आहे . ( सौजन्य गुगल नकाशा . गुगल नकाशातील बहुतांश भारतीय नावे चुकीच्या प्रकारे लिहिलेली असतात . इंग्रजीतून लिप्यांतर केल्यामुळे या चुका होतात . रोमन लिपी ला तिच्या मर्यादा आहेत . किमान आपल्याला माहिती असलेली नावे आपण बदलत जावीत . तशी सुविधा उपलब्ध आहे . असो)

कणजी गावामध्ये येताच एका मोठ्या मोबाईल टॉवर ने स्वागत केले . गेल्या बऱ्याच दिवसात असा मोठा टॉवर कुठेच पाहिला नव्हता . मी मोबाईल सोबत नेलाच नव्हता त्यामुळे माझा काही प्रश्न नव्हता परंतु मुक्कामावर असलेले परिक्रमावासी रेंज नाही रेंज नाही असे रडताना मी नेहमी ऐकत असे . गुजरात राज्यामध्ये येताच पहिलीच खूण विकासाची ग्वाही देणारी दिसली तो म्हणजे हा मनोरा ! रस्त्यांचा दर्जा देखील अचानक कैक पटीने सुधारलेला जाणवला . मला तर काही ग्रामस्थांनी असे सांगितले की सीमेवरचे रस्ते आणि विकास कामे गुजरात सरकार अधिक प्राधान्याने चांगली आणि सर्वोत्तम करून ठेवते ज्यामुळे इतर राज्यातील लोकांना गुजरातचा हेवा वाटावा . नर्मदा मातेला साक्षी ठेवून सांगतो की हे सर्व गुजरातचे वर्णन जे काही आता इथून पुढे येणार आहे ते सर्व केवळ जे दिसले तेवढेच लिहिणार आहे . मी कुठल्याही एका व्यक्तीचा अथवा संस्थेचा प्रचारक किंवा प्रवक्ता नाही . परंतु प्रामाणिकपणे जे डोळ्यांना दिसते आहे ते नाकारण्याचा नतद्रष्टपणा देखील करणार नाही . अलीकडे आपल्याकडे एक नवीन टूम निघालेली आहे . इतर राज्यातील लोकांना किंवा इतर राज्यांना हिणवणे किंवा कमी लेखणे हे भूषणाचे मानले जाते . परंतु तसे करण्यातून कुठला हेतू साध्य होतो हे मला माहिती नाही . आपले असे आहे . जे आहे ते आहे . मग कोणाचेही असो .कसेही असो . तर पायांना त्रास देणारा खडे खुडे पसरलेला महाराष्ट्रातला रस्ता देवनदी ओलांडल्याबरोबर अतिशय सुरेख , स्वच्छ , सुंदर झाला . पायांना सुखदायक झाला . महाराष्ट्रातील कंत्राटदाराने कदाचित थोडेफार कमी पैसे खाल्ले असते तर त्याला देखील असाच रस्ता बनविता येणे शक्य होते . परंतु त्यात त्याचा दोष कमी आहे कारण त्याला रस्त्याचे काम मिळाल्यावर त्यातील एक मोठा हिस्सा वरती पाठवावा लागतो अशी व्यवस्था गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे . रस्त्याची कामे घेणारे काही कंत्राटदार मित्र माझ्या परिचयाचे आहेत त्यामुळे मी सांगतो आहे त्यात तथ्य आहे . मी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये देखील राहिलेलो आहे . तिथे देखील दृष्ट लागावे असे रस्ते आहेत . मध्यप्रदेश तर त्याच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहेच . परंतु अलीकडे उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये देखील अतिशय सुंदर रस्ते माझ्या पाहण्यात आले . देवभूमी उत्तराखंड इथले रस्ते तर अक्षरशः स्वर्गीय वाटावेत अशा दर्जाचे बनवण्यात आलेले आहेत . त्यामुळे स्वर्ग भूमी , देवभूमी अशी त्या राज्याची ओळख जरा देखील लांछनास्पद होणार नाही याची काळजी ते रस्ते घेतात . महाराष्ट्रामध्येच रस्त्यांच्या नावाने जरा वेगळा प्रकार आढळतो . रस्त्याची रुंदी जितकी कागदावर दाखवली आहे तितकी जमिनीवर असेलच याची खात्री देता येत नाही . एक फूट जरी रस्ता कमी केला तरी किलोमीटरच्या हिशोबाने टनावारी माल वाचवता येतो . 'साईड पट्ट्या ' नीटच केल्या पाहिजेत असे बंधन घालणारी यंत्रणा महाराष्ट्रात नाही . त्यामुळे परिक्रमे मध्ये जीव मुठीत धरून या 'साईड पट्टी 'वरून चालताना पायांचे प्रचंड हाल होतात . गुजरात मध्ये आल्याबरोबर सुंदर , रोड रोलर मारून सपाट केलेल्या खडे विरहित साईड पट्ट्या दिसू लागल्या .खड्डे विरहित रस्ता आणि खडे विरहित बाजू पट्टे पाहून फार बरे वाटले ! 
याच गावातील देव नदीवरील एका पुलाचे प्रातिनिधिक चित्र पहा ! डावीकडचा सिमेंट मध्ये पक्का केलेला रस्त्याचा किंवा पुलाचा भाग गुजरातच्या हद्दीतला आहे . उजवीकडे कच्चा राहिलेला व वाहून निघालेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीतील आहे . मला मात्र देव नदीचा स्पर्श हवा होता व स्नानही करायचे होते . त्यामुळे . . .
देव नदीचे पात्र याच ठिकाणी मी ओलांडले . आपला महाराष्ट्र हिरवागार आणि सुजलाम सुफलाम आहे परंतु गुजरात मात्र उघडाबोडखा आहे हे तुम्हाला नकाशात पाहिल्यावर सुद्धा लगेच लक्षात येईल .
माझे स्वागत करणारा हाच तो मनोरा . मी बारावी शास्त्र शिकल्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग नावाचा भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स चा कोर्स होता तो पूर्ण केलेला आहे . त्यामुळे अशा काही तांत्रिक बाबी दिसल्या की तिथे थांबून मी नीट निरीक्षण करायचो किंवा योग्य तंत्रज्ञांकडून माहिती घ्यायचो . हा रिलायन्स जिओचा टॉवर होता . 5G Ready होता . 
महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांना गुजरात मधील टॉवर्स ची रेंज येते .  
या टॉवरला लागून एक मैदान होते . आणि मैदानाच्या पलीकडेच सान्सूभाई तडवी यांचा आश्रम होता .
हनुमान मंदिरासमोर टॉवर दिसतो आहे . मध्ये मैदान आहे आणि लाल चिन्हाने अंकित सांसूभाई तडवी यांचे घर आहे . 
या कणजी गावाला लागून घनदाट असे शूलपाणेश्वर अभयारण्य आहे . लाल चिन्ह म्हणजे आपला आश्रम आहे .
 याच गावात अजून एक परिक्रमा आश्रम आहे . परंतु कुलदीप ने सांगितल्यामुळे मी सांसूभाई तडवी यांच्याकडे आलो .
गुजरात राज्य सुरू झाल्याचे तुम्हाला गुजराती पाट्या सुचित करतात .
परंतु इथे मराठी पाट्या सुद्धा दिसतात आणि इथल्या सर्व लोकांना मराठी बोलता येते !
गुजरात मधल्या या जिल्ह्याचे नाव "नर्मदा" असेच असून नर्मदा जिल्ह्यातला देडियापाडा नावाचा हा तालुका आहे . किती भाग्यवान आहेत ते लोक जे सांगतात की आम्ही नर्मदा जिल्ह्यात राहतो ! 
या गावात सान्सुभाई साराभाई तडवी नावाचे रंग अवधूत महाराजांचे निस्सीम भक्त नर्मदा परिक्रमावासियांची मनोभावे सेवा करतात . यांची इथे ओळीने एक दोन घरे आहेत . त्यातील एक घर त्यांनी परिक्रमावासींसाठी राखीव ठेवले होते . श्री रंगा आश्रम नावाने परिक्रमावासींची सेवा करणारा आश्रम ते चालवितात . समोर मोहाची दोन मोठी झाडे होती . मैदानामध्ये मुले क्रिकेट खेळत होती . केवळ कटी वस्त्र गुंडाळलेले सान्सु भाई तडवी सामोरे आले आणि त्यांनी प्रेमाने स्वागत केले .सुंदर अशा झोपडीमध्ये आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली . इथे बाहेर बसण्यासाठी एक सारवलेला कट्टा केला होता . त्यावर बसून मी क्रिकेट खेळणारी मुले आणि मोहाची फुले वेचणारी बालके यांच्या लीला पाहू लागलो . मोहाच्या फुलांचा बहर सगळीकडे आलेला होता . ती वेचण्याचे काम घरातील सर्व लहान थोर मंडळी करतात . त्यासाठी शाळेला सुद्धा दांडी मारली जाते . तशाही या परिसरातील शाळा नावापुरत्याच आहेत . खरे शिक्षण मुलांना निसर्गच देत असतो . मोहाच्या फुलांना एक विशिष्ट मंद सुवास येतो . ही फुले सडवून त्याची दारू केली जाते . जी आबालवृद्ध सर्वजण पितात . होळीचा सण झाल्यावर पुढील महिनाभर हा वृक्ष फुले गाळतो .मोहाच्या झाडाची गंमत अशी आहे की या झाडाची लागवड करता येत नाही . सध्या जी काही झाडे आहेत ती फार पूर्वीपासून लावण्यात आलेली आहेत . परंतु मोहाचे नवीन झाड लावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत .ते झाड आपण होऊन उगवले तरच उगवते . मोहाची फुले वेचायचे काम भल्या पहाटे चालू होते .
 कणजी गावातील मोहाचा वृक्ष
घरातील सर्व मंडळी मोठ्या मोठ्या साड्या घेऊन किंवा टोपल्या घेऊन फुले वेचायचे काम करतात . ही फुले वाळवून साठवून ठेवली जातात . ही फुले त्या भागातील दुकानदार लोक विकत घेतात . आणि दारू बनवणारे लोक दुकानदाराकडून मोहाची फुले विकत घेतात . त्यासाठी भट्टी बनवून दारू गाळली जाते .
मोहाचे झाड हे अतिशय औषधी आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे . मोहाच्या फळांचे तेल काढले जाते . आदिवासी लोक स्वयंपाकामध्ये किंवा देवापुढे दिवा जळताना हेच तेल वापरतात . याला एक विचित्र वास येतो . परंतु नंतर तो सवयीचा होतो . मोहाच्या फळाला टोळी असे म्हणतात . मोहाची ताजी ताजी फुले खाल्ल्यावर खूप छान लागतात . एकदा फुले गळून पडायला लागली की अक्षरशः खाली पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी फुले पडतात .
महुवा किंवा मोहाचे झाड . फाल्गुन महिन्याच्या काळामध्ये या झाडाला फुले येतात .
 फुलांचे असे घोस लगडलेले असतात
मोहाची पाने अशी दिसतात
टोळ , टोळी किंवा मोहाचे फळ
मोहाची रसरशीत फुले
मोहाची फुले वाळत घालताना आदिवासी महिला
अशा टोपल्या भरभरून फुले गोळा केली जातात
(सर्व छायाचित्रे सौजन्य विकिपीडिया )
सान्सुभाई तडवी यांचा मुलगा विनोद हा अतिशय हुशार आणि वडिलांसारखाच पराकोटीचा सज्जन मनुष्य आहे . वडील तर साक्षात संत आहेत . श्रीरंग अवधूत महाराजांची शिकवण त्यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे . या परिसरातील आदिवासी समाजामध्ये सहज आणि उपजत पणे आढळणारा आक्रमकपणा किंवा थोडासा तापट स्वभाव यांचा लवलेशही मला या दोघांच्या वागण्यात जाणवला नाही . नुकतेच हे लिखाण सुरू केल्यावर विनोद कडून काही फोटो प्राप्त झाले ते आपल्यासाठी खाली जोडत आहे . विनोद तडवी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून गावामध्ये शाखा सुद्धा लावतो . 
डावीकडून मुक्कामासाठी आलेले परिक्रमावासी , विनोद , त्याची पत्नी , मुलगा , वडील सान्सुभाई तडवी आणि मातोश्री .
घराच्या जमिनीवर केलेले सुंदर नक्षीकाम आणि कोरीव खांब व त्यावरील रंगकाम हे सर्व प्रत्येक आदिवासी घरामध्ये पाहायला मिळते ! इथून पुढे गुजराती पद्धतीच्या साड्या नेसायला सुरुवात होते .
विनोद तडवी आणि त्याची अर्धांगिनी
नुकतेच तडवी कुटुंबीयांनी घराच्या मागे असलेल्या जागेमध्ये एका नवीन परिक्रमावासी आश्रमाचे बांधकाम सुरू केलेले आहे . या बांधकामाची काही छायाचित्रे विनोद भाई यांनी मला पाठवली ती आपल्यासाठी जोडत आहे . 
कणजी ता डेडिया पाडा जि नर्मदा गुजरात येथील नवीन श्री रंगा आश्रम
गावात लहान मुले भरपूर आहेत
या मुलांच्या गमती जमती पुढे आपल्याला सांगेनच
नवीन आश्रमाचा परिसर आणि बांधकाम
घराकडे जाणारा रस्ता मोहाची झाडे आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी
तडवी यांचे घर आणि याच कट्ट्यावर बसून मी मुलांच्या बाललीला पाहत होतो .
तडवींच्या पडवी मध्ये बसल्यावर दिसणारे मैदान आणि मोहाची दोन पुरातन झाडे . 
आपल्या झोपडी मध्ये बसलेले सांसूबाई तडवी त्यांची पत्नी आणि विनोद भाई तडवी
या आदिवासी कुटुंबाचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे तरी देखील हे लोक नर्मदा परिक्रमा वाशी यांसाठी प्रचंड सेवा कार्य करतात . एकही परिक्रमावासी यांच्या गावातून उपाशी जाऊ देत नाहीत . घरातील चार लोकांचा स्वयंपाक करून थकणाऱ्या शहरी स्त्रिया कुठे आणि अचानक भोजनासाठी येऊ घातलेल्या ४० अनोळखी लोकांचा स्वयंपाक करणारी एखादी आदिवासी स्त्री कुठे ! एखाद दिवशी हे करणे ठीक आहे परंतु रोजच अशा प्रकारचे सेवा कार्य स्वीकारणे ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो ! पडवी यांच्या घरामध्ये चालू असलेल्या अन्नदानाचा एक व्हिडिओ विनोद भाई ने मला पाठवला तो आपल्यासाठी सोबत जोडत आहे .


आपल्याला देखील या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर कृपया विनोद तडवी याच्याशी संपर्क साधावा ही विनंती . विनोदाचा पत्ता व क्रमांक खालील प्रमाणे आहे .
श्री विनोद सान्सुभाई तडवी
श्री रंग आश्रम कणजी , पोस्ट डुमखल तालुका डेडियापाडा, जिल्हा नर्मदा , गुजराथ
संपर्क : ९६३८३७९७५७
At kanji po.dumkhal. ta . dediya pada dist.narmda . Sri.   ranga ashram kanji po.9638379757 
 त्यांच्या बँक खात्याचा तपशील वरील प्रमाणे आहे
अधिक मोठ्या अक्षरात दिसावे म्हणून झूम केलेले चित्र . शुलपाणीच्या झाडीमध्ये विषम परिस्थितीत सेवा देणाऱ्या या सर्व आदिवासी बांधवांना आपण खंबीर आधार दिला पाहिजे असे फार वाटते .
(कृपया दान केल्यानंतर त्याची माहिती जर कळवली तर ती ब्लॉग वर टाकलेल्या यादीवर अपडेट करता येते . हेतू इतकाच की इतरांना ते पाहून प्रेरणा मिळावी व कुठे अधिक गरज आहे त्याची माहिती मिळावी)
मी माझी पूजा वगैरे आटोपून घेतली आणि बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलांच्या बाललीला पाहू लागलो . दहा वर्षाच्या आतील या मुलांनी मला हसवून हसवून अक्षरशः लोळवले ! आपल्या मर्कटलीला कोणीतरी पाहत आहे हे पाहिल्यावर त्यांना जोर चढत होता . माझ्या अक्षरशः पोटात दुखायला लागले इतके त्या मुलांनी हसवले . आदिवासी मुले मुळात निर्भय असतात . त्यामुळे त्यांचे खेळ अतिशय बिनधास्त आणि धांगडधिंग्याचे होते . यांना पडण्याचे ,लागण्याचे भय नसते . आपल्याला कोणी काय म्हणेल याची देखील चिंता फिकीर ते करत नाहीत ! सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ! याची बाधा त्यांना झालेली नसते त्यामुळे कुठल्याही खेळाचा आनंद लहान मुले घेऊ शकतात ! विजयातही आनंद ! पराजयातही आनंद !कारण विजय पराजय महत्त्वाचा नाहीच !त्यांच्या खिजगणतीत देखील हे काही नाही . मुख्य गाभा आहे आनंद मिळवणे ! शेवटी विनोदने या मुलांना पळवून लावले . यानंतर विनोद आणि मी बराच वेळ बोलत होतो . विनोदने मला या भागात सुरू असलेल्या विविध सेवा कार्यांची रीतसर माहिती दिली . या भागात काय काय आव्हाने आहेत हे देखील त्याने उदाहरणासह सांगितले . आदिवासी समाजामध्ये विशेषतः तडवी लोकांमध्ये धर्मांतरणाचे पेव अलीकडे फुटले आहे . महाराष्ट्रातील तडवी समाज इस्लाम धर्माकडे आकृष्ट झालेला आहे . गुजरात मध्ये ख्रिस्तीकरण जोरात आहे . या लोकांनी परधर्म स्वीकारला तरी आदिवासी परंपरा सोडलेल्या नाहीत . त्यामुळे अजून थोडेसे प्रयत्न केल्यावर ते मूळ धर्माकडे परत येऊ शकतात . परंतु थोड्याच वर्षांमध्ये हळूहळू त्यांच्या आदिवासी परंपरा सुटत जाणार हे निश्चित आहे .
मुळात आदिवासी हे इतर भारतीय लोकांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत अशी चुकीची संकल्पना त्यांच्या डोक्यात बसविण्याचा प्रयत्न अनेक शक्ती गेली अनेक दशके करत आहेत . असेच वातावरण राहिले तर नक्षलवादाला पोषक अशी मनोभूमिका इथल्या लोकांची बऱ्यापैकी आधीच तयार झालेली आहे तिला खत पाणी मिळेल आणि भारताला अजून एक अंतर्गत शत्रू निर्माण होईल हे निश्चित आहे . या लोकांना फार काही मोठ्या अपेक्षा नाहीत . त्यांना त्यांच्या रितीरिवाजांचे पालन करून सुखेनैव जगू देणे इतकेच सरकारला करायचे आहे . जंगलाला हे लोक देव मानतात . अगदी मोहाच्या झाडाला सुद्धा देव मानतात . प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहण्याची ही अतिशय परमपवित्र अशी संस्कृती आहे .
भारतामध्ये कुठेही गेलात तरी थोड्याफार फरकाने सर्वत्र हीच संस्कृती आढळते . भाषा बदलतात परिभाषा बदलतात परंतु संस्कार बदलत नाहीत . इथे शूल पाणीच्या झाडीमध्ये काय काय महत्वाची कामे करणे गरजेचे आहे यावर माझे आणि विनोद चे भरपूर चर्चा केल्यावर एकमत झाले . इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे निर्वनीकरणाचा . सरकारी धेंडांना हाताशी धरून काही स्वार्थी व्यापारी लोकांनी इथली लाकडे विकत घेण्याची टेंडर्स जिंकली आणि अक्षरशः दहा ते वीस वर्षांमध्ये सगळे डोंगर उघडे बोडके करून टाकले . जी झाडे उगवण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षे लागतात ती काही वर्षातच पूर्णपणे भादरली गेली . या भागाचे फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की इथे झाडे नावाचे पदार्थ शिल्लक नाहीत . मी गेले आठवडाभर या भागाचे जे काही निरीक्षण करत होतो त्यातून माझ्या असे लक्षात आले की या भागाचे पुनर्वनीकरण शक्य आहे . याबाबतीत माझा थोडासा अभ्यास आहे जो मी विनोदला देखील सांगितला आणि तोच आपल्याकरताखाली मांडतो . कुठे ना कुठे नक्की कामाला येईल .माझ्या दक्षिण भारतातील तमिळनाडू येथील वास्तव्यामध्ये मी आणि माझे एक मित्र , प्राध्यापक पांडियन दोघांनी मिळून तमिळनाडू मधून नामशेष होत चाललेल्या ताडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता . सुरुवातीला बीज गोळे बनवणे असा उपक्रम मी एकट्यानेच चालू केला . नंतर मला कळाले की पांडियन देखील त्याच्या पातळीवर हेच करत आहे . मग दोघांनी एकत्र येऊन हळूहळू काम सुरू केले . त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की लवकरच त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले . मी आणि माझा सहा वर्षाचा मुलगा आम्ही दोघांनी मिळून केवळ साडेदहा हजार ताडाची झाडे लावली यावरून तुम्ही आमच्या कामाचा आवाका लक्षात घ्यावा . एकूण लावलेला झाडांची गणती करता येणे अशक्य आहे . 
ताडाचे झाड आम्ही का निवडले याचे कारण म्हणजे तो तमिळनाडूचा राज्य वृक्ष आहे . शिवाय त्याला पाणी फार कमी लागते आणि त्याचा उगवण्याचा दर चांगला आहे . १०० बियांपैकी ९५ नक्की उगवतात . या झाडाची पूर्ण वाढ व्हायला चाळीस वर्षे लागतात . सध्या शेतकरी लोकांकडे इतका संयम नसल्यामुळे आहे तीच झाडे शंभर दोनशे रुपयाला लाकडासाठी तोडायला द्यायची पद्धत इथे सुरू झाली . त्यातून या झाडाची फार मोठ्या प्रमाणात कत्तल झाली . याला अजून एक धर्मांतरणाचा देखील कंगोरा आहे . ताडाच्या झाडावर चढणारी पणै  एडी नाडार नावाची एक जमात तिथे आहे . पणै मरम म्हणजे ताडाचे झाड. या लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्यांना चर्च कडून आयते पैसे मिळू लागले आणि त्यामुळे त्यांनी ताडाच्या झाडावर चढणे सोडून दिले . त्यामुळे देखील या झाडाचे मिळणारे लाभ कमी होऊ लागले आणि लोकांनी झाडे तोडणे पसंत गेले . सुदैवाने ताडाची हीच झाडे या भागात देखील चांगली उगवत आहेत असे माझ्या लक्षात आले . या झाडाचे प्रत्येक भाग कामाला येतात . तमिळ साहित्य जगात सर्वात जुने मानले जाते कारण ते ताडाच्या पानावर लिहिले गेले आणि ताडपत्री चे आयुष्य २००० पेक्षा अधिक वर्षे असते . कागदाला इतके आयुर्मान नसते . याची निरा तर औषधी आहेच परंतु याच्या निरे पासून गुळ तयार केला जातो तो देखील खूप पौष्टिक आणि त्यामुळेच महाग आहे .तमिळनाडूमध्ये याला करपट्टी असे म्हणतात. प्रत्येक गोष्ट उपयुक्त असणारा हा एक कल्पवृक्ष आहे . शिवाय यावर पक्षी घरटी करतात त्यामुळे पक्षांच्या विष्ठेतून होणारा बीज प्रसार वाढतो . या झाडाची सावली फारशी पडत नसल्यामुळे आजूबाजूला झाडे उगवतात . आणि त्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो . असेच काहीतरी कार्य या भागात सुरू करता येणे शक्य आहे असे मला वाटते .जिज्ञासूंसाठी आम्ही आधी केलेल्या कामाचे काही फोटो सोबत जोडत आहे .विनोदला त्याच्या मोबाईलवर मी हे सर्व दाखवले कारण याचा एक ब्लॉग मी करून ठेवला होता . तो इथे कामाला आला . आपल्याला ही शेवटी याची लिंक देऊन ठेवतो .
एकला चलो रे ! बीज गोळे बनविताना प्रस्तुत लेखक
बीज गोळे वाळविण्याचे देशी जुगाड
सुरुवातीला दिवस-रात्र मी हे गोळे वळत बसायचो नंतर मात्र मी सायकलवर चालणारे एक यंत्र बनवले याच्या सहाय्याने हे गोळे फार पटपट बनू लागले .
यासाठी लागणाऱ्या देशी बिया सुरवातीला मी एकटा गोळा करायचो . नंतर स्थानिक मुले मला मदत करू लागली .
बीज गोळे बनवणे हा देखील नंतर मुलांचा आवडता छंद बनून गेला ! नुसत्या बिया टाकल्या तर किडा मुंगी त्या बिया काजू बदाम खाल्ल्याप्रमाणे खाऊन टाकतात . म्हणून शेण आणि मातीमध्ये कालवून त्याचे गोळे करावे म्हणजे किड्यांना ते खाता येत नाहीत .
पांडियन आणि मी जंगलामध्ये फिरून ताडगोळे गोळा करायचो
इथे आम्ही अनेक वेळा साप विंचू वगैरे बाजूला करून ताडगोळे जमवायचो
स्थानिक शेतकरी आम्हाला खूप मदत करायचे . सुरुवातीला ते आमच्याकडे संशयाने पाहायचे परंतु आमचा शुद्ध हेतू लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला थंडगार पाणीच काय घरचे गरमागरम जेवण आणून द्यायला सुद्धा सुरुवात केली ! 
सुरुवातीला परिसरातील मुले घेऊन चालू केलेला हा उद्योग हळूहळू विस्तारात गेला .
तमिळनाडूतल्या अनेक शाळा आमच्या कामांमध्ये सामील झाल्या ! त्या आम्हाला विद्यार्थी शिक्षक गाड्या इत्यादी सर्व काही पुरवू लागल्या .
सुरुवातीला आम्ही चार-पाच जणच झाडे लावायचो
नंतर मदत करणाऱ्या हातांची संख्या वाढत गेली !
स्थानिक ग्रामस्थ आमच्या कार्यात सहभागी होऊ लागले .
अक्षरशः शेकडोंच्या संख्येने स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थ वृक्ष लागवडी मध्ये सहभागी होऊ लागले आणि मोठ्या मोठ्या जेवणावेळी झडू लागल्या !
ज्या माडकुलम नावाच्या तलावामध्ये उभा राहून आम्ही हा फोटो काढला आहे त्याच तलावात सुमारे नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी साठले !
तमिळ मध्ये माडु म्हणजे गाय . प्रथमच पाणी साठल्यामुळे या तलावामध्ये आंघोळीसाठी गाय बैल येऊ लागले ! मुळात गाई बैलांच्या अंघोळीसाठी हा तलाव चोलराजांनी बांधला होता . त्याचे पुनरुज्जीवन आमच्या वृक्ष लागवडीमुळे च झाले असा ग्रामस्थांचा ठाम समज झाला .
आज आम्ही लावलेली सर्व झाडे उत्तम पैकी वाढलेली आहेत . तिथे जाऊन पाहायची गरज नाही कारण गुगल नकाशा वर ती दिसू लागली आहेत !
पुढे या पाण्याची पातळी इतकी वाढत गेली की आम्ही या पाण्यात जलक्रीडा करू लागलो ! 
होय ! आमचे चिरंजीव सुद्धा घरण्याच्या परंपरेनुसार पट्टीचे पोहणारे आहेत आणि उपजतच पाण्यावर झोपायला शिकलेले आहेत ! 
इकडे डावरा किंवा पावरा अशी आदिवासी जमात आहे तशी तिकडे देवर नावाची जमात आहे . या जमातीतील आमच्या मदती करता आलेल्या स्वयंस्फूर्त माता भगिनी !
यांच्या उत्साहामुळे कामाची गती खूप वाढली .
तमिळनाडूमध्ये चोळ राजाने बांधलेले पुरातन बंधारे आहेत .त्याच्या उतारावर आम्ही ताडाची झाडे लावायचो ज्यामुळे ते बंधारे मजबूत व्हायचे . आणि त्यातून झिरपणारे पाणी अडून साठू लागायचे .
रात्रीच्या अंधारामध्ये धोकादायक उतारावर झाडे लावणारा वृक्षमित्र पांडियन !
पुढे पुढे शेतकरीच आम्हाला टेम्पो भरभरून ताडाची बीजे देऊ लागले .
मी स्थानिक वनस्पतींच्या बिया वापरून बीज गणेश बनविला आणि त्याची वन स्थापना केली !
तमिळ मुलांनी अतिशय उत्साहाने वन स्थापना केलेला बीजगणेश !
वन स्थापना केलेल्या बीजगणेशाच्या आरतीला रोज स्थानिक तमिळ लोक येऊ लागले ! 
विसर्जनाच्या दोनच दिवस आधी तलावाची पातळी अचानक वाढली आणि विसर्जन करण्यापुरते पाणी आम्हाला मिळाले ! या बिया पुढे योग्य वेळी उगवल्या असणार .
या चळवळीमध्ये आम्ही मंदिरांना देखील सहभागी करून घेतले . 
विविध महाविद्यालय शाळा येथे जाऊन मी आणि पांडियन यांनी लोकजागृती केली आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक गट आम्हाला सामील झाले .
आपण जर कार्य आरंभले तर समाज प्रतिसाद देतो असा माझा तमिळनाडू मधील कार्याचा अनुभव आहे . भाषा प्रांत जात-पात संस्कृती याचा कुठलाही अडसर मला या कामांमध्ये आला नाही .
ग्रामीण भाग असो वा शहरी सोसायट्या हा विषय सर्वांच्या हृदयाच्या जवळ चा
 आहे आणि अत्यावश्यक आहे .
समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
वन्ही तो चेतवावा रे ।
चेतविताची चेततो ।
प्रयत्नु जाणिजे तैसा ।
वाढविताची वाढतो ॥
वृक्ष लागवड , वनीकरण ,पुनर्वनीकरण
या विषयाची ज्यांना आवड आहे अशा लोकांनी त्यावेळी मी बनवलेला एक छोटासा ब्लॉग अवश्य पहावा .
Seedballsproject.blogspot.com
असो .
तर महाराष्ट्रातील वन प्रदेशात जी काही झाडांची बेसुमार कत्तल झालेली आहे तशी आता हळूहळू या भागांमध्ये सुरू झालेली होती . या भागातील थोडीफार झाडे शिल्लक दिसतात ती लवकरच नष्ट होऊन इथले डोंगर सुद्धा महाराष्ट्रासारखेच उघडे बोडके होण्याची शक्यता आहे हे मी विनोदला सांगितल्यावर त्याने देखील तसे इथे देखील सुरू झाल्याचे मान्य केले . आणि यावर काहीतरी करूयात असे त्याचे मत पडले .
 ( दिनेश फोदला पावरा देखील या कामासाठी एका पायावर तयार झालेला आहे . नुकतीच तो पुण्याला आल्यावर मी त्याची भेट घेतली होती आणि या विषयावर आमची चर्चा झाली .)
निर्वनीकरण कसे होते हे लक्षात येण्यासाठी माथासर  नजीकच्या गावातीलच हा फोटो पहावा . शेतीसाठी असा डोंगर साफ केल्यावर हळूहळू जंगल मागे मागे सरकू लागते .
शून्यातून मार्ग निर्माण करताना देखील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते . त्या प्रमाणात झाडांची पुनर लागवड केली नाही तरी देखील निर्वनीकरण सुरू होते . शूलपाणीच्या झाडीमध्ये रस्ते तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला अनेक ठिकाणी दिसते .
असो .
 रात्री आमटी भात खाल्ला आणि सान्सु भाई यांच्याबरोबर सत्संग घडला . इथून पुढे गुजरात प्रांतामध्ये तुम्हाला रंग अवधूत महाराज उर्फ बापजी यांचे अनेक शिष्य आढळतात . इतके दिवस बाबाजी किंवा महाराज अशी जी संबोधने आम्ही ऐकत चाललो होतो त्याचे गुजरात मध्ये आल्यावर रूपांतरण दादाजी ,दद्दाजी किंवा बापूजी मध्ये होऊन जाते . बापूजी बापजी एकच .
अतिशय विषम परिस्थितीमध्ये देखील केवळ धर्माची सेवा आणि गुरु आज्ञे चे पालन म्हणून सान्सूभाई हे सेवा कार्य चालवत आहेत .हे अतिशय गौरवास्पद आहे . धर्मांतरण कशामुळे होते लक्षात घ्या मित्रांनो . जर सेवा कार्य करणाऱ्या आदिवासी माणसाच्या पाठीशी बहुसंख्य समाज उभा राहतो हे लक्षात आले तर कोणीही धर्मांतरण करणारच नाही उलट सर्वजण सेवा कार्य करू लागतील . प्रत्यक्षामध्ये इथे असे होते की सेवा कार्य करणारी माणसे अधिक गरीब होत जातात आणि अन्य धर्म स्वीकारणाऱ्या माणसांना  मात्र त्या त्या धार्मिक स्थळावरून काही पैसा नित्य नियमाने मिळू लागतो ज्यामुळे लोकांना त्यांचे जीवन अधिक सुरळीत आणि सोपे वाटू लागते . या भागातील धर्महानी रोखणे अशा रीतीने आपल्या हातात आहे . आपण मौजमस्ती चित्रपट आउटिंग यावर जो काही पैसा खर्च करतो त्यातील काही टक्के जरी रक्कम अशा गरीब आदिवासी लोकांना सेवा कार्याकरिता दान करता आली तर त्यांना दहा हत्तींचे बळ लाभणार आहे ! विचार करा मित्रांनो ...
पहाटे लवकर उठून सर्व आटोपून मी या सज्जन कुटुंबाचा निरोप घेतला .आता मात्र मी नदीच्या पातळीवरून पुन्हा एकदा उंचच उंच डोंगराच्या पातळीवर चढू लागलो होतो . त्यामुळे अखंड जंगल आणि अखंड चढ लागला . मला विनोदने जंगलातील चटकट सांगितला होता . परंतु नेहमीप्रमाणे कुठल्यातरी गोष्टीचे निरीक्षण करत चालताना मी पुन्हा एकदा भटकलो आणि अतिशय बेकार अशा जंगलामध्ये खूप वेळ फिरलो ! परंतु त्यामुळे जिथे माणूस कधीच जात नाही अशा अनेक जागा मला पाहायला मिळाल्या आणि तिथे असलेले विविध प्रकारचे दगड विविध प्रकारच्या वनस्पती आणि विविध प्रकारचे पशुपक्षी कीटक आदि मला पाहायला मिळाले ! शिवाय अशाच एका चुकीच्या टोकावर पोहोचल्यावर मला नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन झाले !
उजवीकडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेखा दिसेल . तिथे कणजी गाव आहे . तिथून खाल ,सुरपाण वगैरे गावे पार करत संपूर्ण डोंगररांगा चालत चालत माथासर गाव गाठावे लागते .
सुरपाण हे गावाचे नाव बहुतेक शूलपाणेश्वर वरून पडले असावे . या भागातील जंगल चांगले होते आणि प्रचंड खडकाळ डोंगर होते . डोंगरामधील खडक हे स्फटिकाकृती अथवा काटकोनात कापल्यासारखे चौकोनी होते . अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर क्यूआर कोड सारखे होते ! त्याचे कपचे पायाला टोचायचे . इथल्या जंगलामध्ये मी जेव्हा फसलो तेव्हा दाट झाडीमुळे खाली वाकून चालावे लागले . हातपाय दोन्ही बऱ्यापैकी फाटून निघाले . परंतु परिक्रमेमध्ये झालेल्या जखमा लगेच बऱ्या होतात . कारण रक्ताभिसरण सुधारलेले असते . आणि रक्तातील शर्करा सतत जळत असते . 
हे जंगल संपूच नये असे वाटत होते ! कारण इथे हवा खूप चांगली होती . नर्मदे वरून येणारे वारे वासावरून लगेच जाणवत होते ! शेजारीच ती आहे याची कल्पना देत होते !
या भागातील झाडी
पावसाळ्यामध्ये हा परिसर असा दिसतो
पावसाळ्यामध्ये जरी हे दृश्य हिरवेगार दिसत असले तरी उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी दाहक असते
अलीकडे इथले डोंगर देखील महाराष्ट्रासारखे उघडे बोडके पडू लागलेले आहेत . पशूंसाठी चारा निर्माण करणाऱ्या मूरघास , हत्तीघास , हायड्रोपोनिक्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लोकांनी इथे येऊन इथल्या पशुपालकांना नवीन खाद्य तंत्र शिकवली तर यांचे डोंगरावर उगवणाऱ्या गवतावरील अवलंबित्व कमी होऊन जाईल असे वाटते .

 एक मोठी टेकडी उतरून अचानक एका खिंडीपाशी आलो . एका ओढ्याला लागून कच्ची पायवाट उजवीकडे खाली गेली होती . मला या पायवाटेचे विनाकारण आकर्षण वाटू लागले . मी तिथेच काही काळ थांबून राहिलो . थोड्यावेळाने एक आदिवासी डोंगरावरून आला आणि त्याने मला त्या वाटेची माहिती सांगितली .  हीच पायवाट जुन्या शूलपाणेश्वराच्या मंदिराला जायची ! या वाटेवरून कुठले कुठले संत महात्मे गेले असेल कल्पना करून पहा ! अगदी मार्कंडेय मुनींपासून ते २० -३० वर्षांपूर्वी पर्यंत होऊन गेलेल्या अनेक दृष्ट्या युगपुरुषांचे पाय या पायवाटेवरून गेलेले होते ! इथून जुने मंदिर चार किलोमीटर आत होते . आणि आता ते जलमग्न झालेले आहे त्यामुळे दर्शन होत नाही . क्षणभर वाटले की आपण आत मध्ये जाऊन दर्शन घेऊन यावे . परंतु आदिवासीने मला ते धोकादायक असल्याचे सांगितले . ही वाट गेली अनेक वर्षे बंद झालेली असल्यामुळे आणि मध्ये काही गुहा वगैरे असल्यामुळे हिंस्र श्वापदांचे वसती स्थान झालेली आहे . इथे आत मध्ये एक बंगाली साधू चातुर्मासाकरता राहिले होते . स्वामी हिरण्मयानंद असे त्यांचे नाव होते . यांना मोलगीचे भिलाशेठ नावेने शिधा आणून द्यायचे .शिधा म्हणजे तांदूळ डाळ आणि तेल. एका निरांजनाला चार वाती लावून त्या ते प्रज्वलित करत असत आणि त्यावर चार दगड ठेवून कमंडलू ठेवून देत . त्यात नर्मदा जल टाकून एक मूठ तांदूळ एक मूठ डाळ टाकून देत . आणि भजन करत बसत . बरोबर एक तास झाला की खिचडी तयार होत असे . त्यावरच त्यांनी चातुर्मास काढला . असे लोक आजही आहेत यावर विश्वास ठेवण्यास नर्मदाखंड तुम्हाला भाग पाडतो ! या पायवाटेला मी साष्टांग नमस्कार केला . तिथल्या धुळीमध्ये लोळण घेतली . 
संत पाऊले साजिरी । गंगा आली आम्हावरी ।
जेथे उडे रजधुळी ।तेथे करावी अंघोळी ॥ 
असे तुकोबारायांचे वचन सार्थच आहे .
खिंड ओलांडून पुढे निघालो . आता पुन्हा जंगलाचा मार्ग चालू झाला . खाली एका रस्त्याचे काम चालू आहे असे दिसत होते . झरवानी ते माथासर रस्ता बनवण्याचे काम सरकारने हातात घेतले होते .त्यासाठी आणलेली यंत्रसामुग्री धडा धडा आवाज करत जंगलातील शांततेचा भंग करत होती . थोड्यावेळाने माथा सर गाव लागले . गावातील लोकांनी दूर एका डोंगराकडे हात केला आणि तिथे असलेल्या नागा बाबाच्या आश्रमात जाऊन रहा असे मला सांगितले . रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठे मोठे दगड पसरण्यात आले होते . त्यावरून चालता येणे अशक्य होते . त्यामुळे मी जंगलातील मार्ग पत्करला . मोठा डोंगर चढून आल्यावर समोर एका झोपडीचे सुंदर असे दर्शन झाले ! शुद्ध मातीमध्ये बनविलेली सुंदर अशी ती झोपडी होती ! नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर एक तरुण स्त्री बाहेर आली आणि तिथे मला झोपडीच्या आत मध्ये कप्पा करून बनवलेल्या एका खोलीमध्ये नेले . आसन लावण्याची सूचना करून ती भोजन प्रसादी बनविण्यासाठी निघून गेली . जेसलगिरि बाबा नाम धारण करणाऱ्या एका भिल्ल साधूंचा हा आश्रम होता . बाबांनी संन्यास घेतलेला असला तरी आपल्या पूर्वाश्रमीच्या कुटुंबीयांसोबत ते इथे राहत होते फक्त बाबांची राहण्याची कुटी वेगळी होती .आणि त्यांच्या घरातील लोक त्यांना परिक्रमावासींची सेवा करण्यामध्ये येथे खूपच मदत करत होते . उदाहरणार्थ आता त्यांची मुलगी स्वयंपाकाला लागली होती . पत्नी समोर असलेल्या टाकीमध्ये पाणी भरत होती . होय इथे खालील एका झऱ्याचे पाणी भरून टाकीमध्ये आणून ओतावे लागत होते . सरकार इथे बोरवेल मारून देणार आहे असे बाबाजींनी मला सांगितले . या आश्रमाचे काही फोटो गुगल नकाशावर सापडले ते आपल्या माहितीकरता जोडत आहे .ते पहावेत .म्हणजे आपल्याला या परिसराची आणि आश्रमाची कल्पना येईल . 
हाच तो जैसलगिरी बाबा संचालित नित्यानंद आश्रम माथासर तालुका डेडियापाडा जिल्हा नर्मदा राज्य गुजरात
आश्रमाच्या आजूबाजूला प्रचंड झाडी आहे आणि कुठेही एकही घर नाही हे आपल्या लक्षात येईल . आता नकाशामध्ये जो रस्ता दिसतो आहे तो त्यावेळी निर्माण झालेला नव्हता तर त्याचे काम चालू होते . 
लाल रंगाने दाखविलेला माथासर आश्रम आहे इथून नर्मदा मैया किती जवळ आहे हे आपल्याला नकाशा झूम आऊट केल्यावर लक्षात येते . माथा सर हा शेवटचा सर्वोच्च बिंदू आहे त्यानंतर सरदार सरोवर धरणापर्यंत सारा उतारच आहे .

शुलपाणेश्वर अभयारण्य आपण आता पार केले आहे हे तुम्हाला नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल .
सुदैवाने येथे मला कुठल्या हिंस्र श्वापदाचा सामना करावा लागला नाही . मला ते दिसले नाहीत तरी त्यांना मी दिसलो असणार हे निश्चित आहे !
बडवाणी पासून इथे येईपर्यंत आपण किती अंतर तोडले हे आपल्याला वरील नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल .खाली महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे शिरपूर शहादा दोंडाईचा ही महत्त्वाची शहरे दिसत आहेत . पांढऱ्या रंगाची तुटक सीमारेषा पहावी ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा डोक्यासारखा भाग स्पष्ट दिसेल .

जिथे ती माऊली  टाकीत पाणी भरत होती तिथे आता बोरवेल झालेले दिसत आहे .
नित्यानंद आश्रम नक्षत्र अशी पाटी देखील लावलेली दिसत आहे . 
आश्रमाकडून झरवाणी कडे जाणारा रस्ता आता पूर्ण झालेला असून इथपर्यंत आता गाडी येते असे दिसते आहे .
या भागामध्ये रस्ते व्हावेत की न व्हावेत या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळालेले नाही . इथे मुळात रस्तेच नव्हते तेव्हा देखील परिक्रमावासी जातच होते . परंतु रस्ता झाल्यामुळे आता कोणालाही इथेपर्यंत सहज पोहोचता येते . या रस्त्याने या भागात समृद्धी आली तर ठीक आहे परंतु या भागातील समृद्धी लुटण्यासाठी या रस्त्याचा वापर झाला तर मात्र ते अत्यंत दुर्दैवी ठरेल . उदाहरणार्थ या भागामध्ये वनीकरण करण्यासाठी ट्रक भरून झाडे आली तर रस्त्याचा नक्कीच वापर होईल .परंतु या भागातील लाकडे वाहून नेण्यासाठी रस्त्याचा वापर झाला तर हा रस्ता वरदान न ठरता शाप ठरेल . कुठल्याही गोष्टीचा वापर वरदान म्हणून करून घ्यायचा का शाप म्हणून करून घ्यायचा हे आपल्या हातात असते . इथल्या स्थानिक आदिवासी लोकांना हे रस्ते करणे फारसे भावलेले दिसत नाही . कारण वर्षानुवर्षे त्यांच्या जीवनशैलीमध्ये रस्ता नावाच्या प्रकाराला स्थानच नव्हते . बहुतांश लोकांकडे आजही कुठलेही वाहन नाही त्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर कुठेतरी वाहन घेऊन जातील अशी शक्यता फार कमी आहे .उलट त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या मात्र आता वाढणार आहे आणि त्यांचा हेतू काय आहे आणि त्या हेतूची शुद्धता किती आहे यावर आता या रस्त्याचे सर्व भवितव्य अवलंबून राहणार आहे . जमिनींची खरेदी विक्री व्यवहार करणारे लोक इथे घुसले की इथल्या भूमिपुत्रांची वाट लागलीच म्हणून समजावे . देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची दलाली करणारे दलाल आणि जमिनीचे सौदे करणारे दलाल यांच्यामध्ये मला फारसा काही फरक वाटत नाही . कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला जसे आईचे स्थान दिलेले आहे तसेच भूमीला देखील माता मानले जाते . मुळात जमिनीची मालकी आपल्याकडे कधीच येऊ शकत नाही . काही काळापुरते एखाद्या जमिनीच्या तुकड्याचे पालकत्व तुम्ही निभावू शकता परंतु सर्वकाळ एखाद्या भूमीचे स्वामी तुम्ही झाले आहात असे होणे शक्य नाही कारण निसर्गच तुम्हाला तशी परवानगी देत नाही . त्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या भागात येणारे रस्ते गुजरात मधून इकडे येतात आणि गुजराती लोकांची सरासरी व्यापारी मनोवृत्ती लक्षात घेता या भागात पुढे स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध उपरे असे द्वंद्व उभे राहण्याची अतिशय दाट शक्यता मला वाटते आहे . सरकारने लवकरात लवकर याच्या मध्ये लक्ष घालून इथल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकत घेता येणार नाहीत असा काहीतरी कायदा या संपूर्ण आदिवासी क्षेत्रापुरता करावा हेच उत्तम राहणार आहे . किमान स्थानिक लोकांनी आपापल्या ग्रामपातळीवर असे ठराव करून घ्यावेत अन्यथा जी अवस्था मुळशी वेल्हा भोर सासवड पुरंदर या पुण्यातल्या तालुक्यांची झालेली आहे तशी अवस्था तिकडे झाल्याशिवाय राहणार नाही . असो . 
हाच तो अतिशय सुंदर असा नित्यानंद आश्रम . मागच्या बाजूला जो भराव घातलेला आहे तिथे देखील परिक्रमावाशांसाठी राहण्याची कुटी निर्माण करण्याचे काम मी गेलो तेव्हा सुरू झालेले होते .
नित्यानंद आश्रम माथा सर . घनघोर अरण्यामध्ये असे भगवे झेंडे फडकताना दिसले की मनाला जो काही आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही .
या झोपडी मध्ये डाव्या बाजूला जेसलगरी बाबांचे कुटुंबीय राहतात आणि उजव्या बाजूला केलेल्या खोलीमध्ये परिक्रमावासी उतरतात .
मी या आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा हा रस्ता अस्तित्वात नव्हता तर केवळ जंगल सर्वत्र पसरलेले होते त्यामुळे हे चित्र पाहून मला वेगळेच काहीतरी वाटते आहे . अरण्यातील पायवाट्याने या आश्रमा पर्यंत तेव्हा यावे लागले होते . कालाय तस्मै नमः ।
भिल्ल संत महंत जैसलगिरी महाराज अतिशय निष्ठेने हा आश्रम चालवीत आहेत . साध्या जंगलात सापडणाऱ्या वनस्पती आणि मातीचा वापर करून हा सुंदर आश्रम उभा करण्यात आलेला आहे .
हा आश्रम  वगळता आजूबाजूला कुठेही आश्रम किंवा विसावा स्थळ सुद्धा नाही . त्यामुळे प्रत्येक परिक्रमावासी किमान विश्रांतीसाठी तरी येथे थांबूनच पुढे जातात .
आश्रमाच्या भोवती बाबांनी सुंदर अशी छोटी बाग केलेली आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्गाचा एक उपयुक्त नकाशा देखील इथे लावलेला आढळतो . 
माझ्यासारख्या परिक्रमेची शून्य माहिती घेऊन निघालेल्या माणसांना अशा नकाशाचा अत्यंत फायदा होत असतो . 
आश्रमा बाहेर बसलेले परिक्रमावासी आणि दारातून दर्शना देणारे जेसलगिरी महाराज 
झोपडी आतून इतकी थंडगार आहे की काही विचारू नका ! मी देखील याच झोपडीमध्ये काही काळ शांतपणे पडलो होतो . स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत ही झोपडी , मैय्या आणि मी असे तिघेच इथे होतो खूप छान वाटले होते . 
हे आहेत जेसलगिरी महाराज . पूर्वाश्रमीचे भिल्ल समाजातील एक सद्गृगृहस्थ . उंची पुरी सडसडीत अंगकाठी , तेजस्वी कृष्णवर्ण , आदिवासी लोकांमध्ये अभावाने आढळणारे धारदार सरळसोट नाक , शुभ्र पांढरी टोकदार दाढी , अंगावर परिधान केलेली भगवी वस्त्रे आणि आलेल्या परिक्रमावासींशी अतिशय प्रेमाने बोलण्याची पद्धत हे सारे कायमचे मनात कोरले गेले .
या आश्रमामध्ये सतत काही ना काही कार्यक्रम आयोजित केले जातात . अशाच एका कन्या पूजनाप्रसंगी घेतलेले संग्रहित छायाचित्र .
इथे साधू संतांची सेवा केली जाते .भजन पूजन केले जाते .
त्याचप्रमाणे स्थानिक आदिवासी लोकांना देखील भरपूर अन्नदान व अन्य मदत केली जाते .
स्थानिक आदिवासी लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आश्रमामध्ये नेहमी केले जाते . जनसंपर्क हा जेसलगिरी बाबांचा प्राण आहे .
 शूलपाणीच्या झाडीमध्ये भरघोस मदत करणारे मदतीचे हात इथे देखील मदत देतात असे या फलकावरून दिसते .
 यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता रममाण होतात .
कन्या पूजनाचे कार्यक्रम भारतात पुन्हा एकदा सर्वत्र सुरु व्हावेत असे वाटते . कारण त्यामुळे कन्या किती महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व त्यांच्या आई-वडिलांना पडते आणि कन्यांना देखील आपण पूज्य आहोत त्याज्य नाही हे लक्षात येते .
जेसलगिरि बाबांच्या आश्रमामध्ये आदिवासी स्त्रियांना अन्नदान सुरू असताना .
या आदिवासी विभागामध्ये जितके अधिक प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होतील तितके या सर्वसामान्य भोळ्या भाबड्या लोकांचे परधर्माकडे आकर्षण कमी होत जाईल . धर्म परिवर्तन करणारी माणसे अशा गरीब बिचाऱ्या आदिवासी लोकांना अतिशय अल्प मोबदल्यामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करतात असे लक्षात येते .
अशावेळी सद्धर्माचा आधार घेऊन भगवी वस्त्रे धारण केलेल्या जैसलगिरी बाबांसारख्या महाराजांना आपण एक समाज म्हणून भरघोस पाठिंबा दिला पाहिजे ज्यामुळे या आदिवासी लोकांना लक्षात येईल की भगव्या वस्त्राचे मोल काय आहे .
या भागातील तरुण सुद्धा आश्रमाशी जोडले गेलेले आहेत . इथे आता रस्ता पोहोचल्यामुळे चांगल्या लोकांनी लवकरात लवकर इथे पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा दुष्ट शक्ती इथे पोहोचण्यासाठी योग्य संधीची  वाटच पाहत होत्या .
बाबांच्या कुटुंबीयांनी मला पोटभर जेवू घातले . सावलीमध्ये क्षणभर पडा असे सांगितले परंतु पडले की आळस वाढतो त्यामुळे मी उन्हामध्येच पुढे निघण्याचा निर्णय घेतला : शूलपाणीच्या झाडीचा हा शेवटचा टप्पा होता . आतापर्यंत जेवढे म्हणून डोंगर मी चढलो होतो ते सर्व डोंगर आज उतरणार होतो . ज्यांना डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा सराव आहे त्यांना माहितीच आहे की डोंगरावर चढण्यापेक्षा उतरणे अधिक कष्टदायक असते . पाठीवर असलेल्या प्रचंड ओझ्यामुळे तो सर्व दाब गुडघ्यांवर येऊन कुर्च्या चांगल्या दबल्या जातात . आणि गुडघे बोलू लागतात . परंतु थोडेसेच पुढे आल्यावर असे काही दृष्य दिसले की ज्याने भान हरपून गेले !

 लेखांक ९१ : सरदार सरोवराची भिंती आणि जगातील सर्वात भव्य दिव्य "ऐक्यमूर्ती " statue of unity

शूलपाणीच्या जंगलातून चालण्याचा आनंद मिळालेल्या आमच्या काळातील काही लोकांच्या परिक्रमा , या शेवटच्या परिक्रमा ठरल्या . कारण आता सगळीकडे डांबरी रस्ते झालेले आहेत .झाडीच्या प्रत्येक गावातून आता डांबरी सडकांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे असे नकाशा पाहिल्यावर लक्षात येते . मी देखील माथासर येथून निघाल्यावर संपूर्ण जंगलातून चाललो . परंतु आता माथासर ते झरवानी पक्का रस्ता झालेला दिसतो आहे . जंगलातील वाटा तुडवत चालत होतो . आजूबाजूला झाडी असल्यामुळे फारसे काही दिसत नव्हते . अजूनही डोंगरांचे चढ-उतार सुरू होते . बरेच अंतर चालल्यावर डावीकडे एक कुटी वजा आश्रम दिसू लागला . इथे देखील अर्धा मुर्धा रस्ता खणून ठेवला होता याचा अर्थ इथून रस्ता जाणार हे लक्षात येत होते . हा गजानन महाराज आश्रम होता . इथे कोणीतरी मराठी संचालक भेटणार हे लक्षात आले आणि आनंद वाटला ! 


संत श्री गजानन महाराज आश्रम झरवानी


गुजराती लोक गजानन चा उल्लेख नेहेमी गजानंद असाच करतात !
आश्रम आता खूप छान झालेला दिसतो आहे
आम्ही गेलो तेव्हा असा साधा होता
इथे सर्व परिक्रमा वासी आवर्जून थांबतात

क्षणभर विश्रांती घेतात आणि मगच पुढे जातात
मी मात्र या पायऱ्यां पाशी बसून राहिलो होतो आणि चहा घेतल्यावर पुढे निघून गेलो

याही आश्रमामध्ये स्थानिक आदिवासी मुलांसाठी भरपूर उपक्रम आणि अन्नदान वगैरे चालते . रस्त्याचे काम सुरू असलेले मागे दिसत आहे .

गजानन महाराजांचे इथे अधिष्ठान असल्यामुळे मराठी परिक्रमाशींना खूप आनंद वाटतो . गजानन महाराजांच्या भक्तांची मोठी संख्या आपल्या महाराष्ट्रात असून गजानन विजय पोथी नित्य वाचणारे अनेक भक्त आहेत . 

आदिवासी बहुल भागात असूनही या आश्रमाशी स्थानिक आदिवासी जोडले गेले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि हेच आश्रमांचे अतिशय महत्त्वाचे असे कार्य आहे . 
या आश्रमामध्ये परिक्रमा पूर्ण झालेले एक जोडपे सेवेसाठी थांबले होते  . शिवाय एक वयस्कर आजोबा देखील हा आश्रम सांभाळत होते . यांनी मस्तपैकी चहा पाजला . इथे एक रामकृष्ण आश्रमाचा कानडी भाषाच बोलता येणारा परिक्रमावासी पोहोचला होता . माझे मित्र जेव्हा मला भेटायला आले होते तेव्हा वाटेमध्ये हा भटकताना मला दिसला होता . मला आणि माझा मित्र अनिल पावटेला कानडी भाषा येत असल्यामुळे आम्ही त्याला जाण्याचा योग्य मार्ग सांगितला होता . हा देखील इथे बसलेला सापडला . याचे नाव अशोक कुमार होते आणि हा मंगलोर येथील रामकृष्ण मठाचा शिष्य होता .
सेवाधारी आजोबा आणि परिक्रमावासी दांपत्य इथेच मुक्काम करण्याचा आग्रह करत होते परंतु अजून दिवस थोडासा बाकी होता आणि आता सर्व उतारच होता त्यामुळे पुढे चालावे असे ठरविले . इथून पुढे रस्त्याचे काम चालू आहे तसेच चालत जावे असे सर्वांनी मला सांगितले परंतु ते पायासाठी अत्यंत कष्टदायक होते कारण मोठे मोठे खडक फोडून सगळीकडे पसरण्यात आले होते आणि अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती . झरवाणी पासून थेट धरणाच्या भिंतीवर जाणारा एक चटकट आहे असे मला विनोद तडवी ने सांगून ठेवले होते , ते माझ्या पक्के डोक्यात होते . अखेर थोडेसे डोंगर माथ्यावर आलो आणि समोरचे दृश्य पाहून भान हरपून गेले ! दूरवर सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य दिव्य मूर्ती अक्षरशः एखादा मनुष्य उभा आहे अशी दिसत होती ! हे अंतर १२ - १५ किलोमीटर पेक्षा जास्त असावे . तरीदेखील ती भव्य दिव्य मूर्ती दिसत होती ! थोडेसे पुढे गेल्यावर एक घर लागले तिथून चटकट कसा आहे ते पुन्हा एकदा समजून घेतले आणि कोणालाही न विचारता थेट घुसलो . इथे परिक्रमावासींना जायला स्थानिक ग्रामस्थांनी आघोषित बंदी केल्यासारखे आहे .कारण रस्ता कठीण असल्यामुळे आणि परिक्रमाशींना वाटेत काही झाल्यास ग्रामस्थांनाच धावपळ करावी लागत असल्यामुळे इथून कोणालाही ते जाऊ देत नाहीत . तर अतिशय लांब पडणाऱ्या सडक मार्गाने चालायला भाग पाडतात ! त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवत मी पटकन आत घुसलो आणि पळत सुटलो . तीव्र उतार सुरू झाला . खाली अतिशय घनदाट जंगल दिसत होते आणि त्याच्यामध्ये हा उतार शिरत होता . 

सोबतचे चित्र नीट पहा ! तुम्हाला नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसेल !

दिसत नसेल तर थोडे झूम करून पाहूया ! आता तुम्हाला लक्षात येईल की मूर्तीचा आकार किती मोठा आहे ! 
ही मध्ये दिसणारी सर्व जंगले आता मला पार करायची होती ! इथून मूर्ती जवळ आहे असे वाटते परंतु कितीही चालले तरी मूर्ती पाशी आपण पोहोचतच नाही इतकी ती भव्य दिव्य आहे ! 

याच डोंगरावरून सरदार सरोवर प्रकल्पाचे असे दर्शन होत होते ! दुर्दैवाने या मार्गाने परिक्रमावासींना कोणी जाऊ देत नसल्यामुळे हे भव्य दिव्य आणि सुंदर दर्शन पाहण्यापासून बहुतांश परिक्रमावासी वंचित राहतात . सदर चित्र पावसाळ्यातले असून ढगांची पातळी किती खाली आली आहे हे आपल्या लक्षात येईल .
इथे अतिशय घनदाट असे अरण्य सर्वत्र पसरलेले आहे . शूलपाणीची झाडी कशी असावी ? तर ही अशी असावी ! 
शेजारीच असलेले झरवाणी गाव असे उघडे बोडके होते
आदिवासींची तुंगाई माता नावाची देवी इथे आहे खाली मातीचे करून ठेवलेले बैल इथे जागोजागी ठेवलेले आढळतात .


 तुंगाई माता मंदीर हा या भागातील सर्वोच्च बिंदू आहे . इथून सर्वच परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते . 


इथून पुढे डोंगरातून वाहणारे अनेक ओढे नाले असून त्याच्यावर सुंदर असे धबधबे सुद्धा आहेत .
बिनधास्त उडी मारणारा आदिवासी मुलगा पहा !


दुपारच्या उन्हाचा दाह शमविण्यासाठी आदिवासी मुले इथे हमखास पोहताना आढळतात . माकडे बरी म्हणायची अशा सराईत पणे उड्या ही मुलं मारतात


वरील नकाशा मध्ये तुम्हाला धरणाची भिंत ऐक्यमूर्ती (statue of unity)आणि तुंगाई माता मंदिर या त्रिकोणाची कल्पना येईल . इथून पुढे मात्र अतिशय तीव्र उतार आहे आणि घनघोर अरण्य लागते .आपल्याला साधारण मूर्तीच्या जवळ बाहेर पडायचे आहे .

खाली उतरताना वाटेमध्ये एक दोन छोट्या वस्त्या लागल्या . परिक्रमा मार्गातील गुराढोरांना परिक्रमा वासींना पाहण्याची सवय असते त्यामुळे ते तुम्ही काठी घेऊन आलात तरी ती बिथरत नाहीत परंतु या भागातून एकही परिक्रमा वासी जात नसल्यामुळे मला बघितल्यावर जनावरे बिथरत आहेत असे माझ्या लक्षात आले . मोटा थवडीया नावाचे गाव मध्ये लागले . पुन्हा इथले लोक देखील मी रस्ता चुकलो आहे वगैरे मला सांगू लागले . परंतु विनोदने सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा नदी कुठे आहे पाहून त्या दिशेला जंगलामध्ये घुसलो ! आणि गायब झालो ! माझी अदृश्य होण्याची गती पाहता पाहणाऱ्या कुणाला तरी हा चमत्कार सुद्धा वाटू शकला असेल ! काही सांगता येत नाही ! परंतु मी इतकी घाई करत होतो कारण मला इथून कोणीतरी परत पाठवावे अशी माझी इच्छा नव्हती . दुसरा मार्ग फारच कंटाळवाणा आणि लांबचा होता हा मार्ग मात्र नर्मदा मैय्याचे दर्शन घेत घेत जाणार होता .

मी ज्या पायवाटाने जंगलात शिरलो ती रस्त्यासारखी मोठी होती आणि मला गुगल वर सापडली .


एका गावामध्ये मी शिरलो जिथून सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसत होती . तिथल्या एका तरुणाने माझे फोटो काढले . या चित्रात झोपडीच्या शेजारी हिरवे झाड आहे त्याच्या बाजूला लगेच काळी मूर्ती दिसत आहे पहा !


या चित्रामध्ये माझे बोट त्या मूर्तीच्या अधिक जवळ गेलेले आहे . 
वर्तुळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसत आहे .

कितीही चालले तरी त्या मूर्ती पासूनचे अंतर कमीच होत नव्हते ! ही मूर्ती नरेंद्र मोदी यांनी अलीकडे उभी केलेली आहे . आणि अशी एखादी मूर्ती किती दिशादर्शक असू शकते हे मला त्या दिवशी चालताना कळाले . तुम्ही वाट चुकूच शकत नाही कारण दिशा भटकली की लगेच मूर्ती शोधायची आणि त्या दिशेला चालायला लागायचे इतके सोपे गणित होते . भरमसाठ झाडी व्यापलेल्या या भागातून चालताना दरीमध्ये उतरले की मूर्ती गायब व्हायची . आणि डोंगर चढला की दिसू लागायची . इथे थवडिया नदीचे पात्र अतिशय मोठे आणि भयानक आहे . प्रचंड मोठा खडकांना कापत ही नदी इथे वाहते आहे . चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अतिशय जबरदस्त अशी ही जागा आहे . इथे काही ठिकाणी तर इतकी भयानक आहेत की तुम्हाला वरून खाली पहायची देखील भीती वाटते . एका खडकाळ दरीमध्ये असेच काहीतरी झाले . तिथे खाली पाण्याचा खोल डोह होता जिथे प्रचंड आरडाओरडा मला ऐकू येऊ लागला . जणूकाही चार-पाच जण मिळून एखाद्या माणसाला बुडवून मारत आहेत असा तो आवाज होता .मी त्या दिशेला निघालोच होतो इतक्यात एक वेगळाच प्रकार घडला . मी ज्या पायवाटेने वेगाने तिकडे निघालो होतो त्याच्यावरती एक दगड होता . पायवाटेला दोन शाखा फुटल्या होत्या . एक त्या दगडी दरीकडे चालली होती आणि एक जंगलाकडे चालली होती . माझा पाय नकळत त्या दगडावर पडला आणि मी वेगाने जंगलाकडे जाणाऱ्या पायवाटे वरती घसरलो . नुसता घसरलो नाही तर उतारामुळे चांगला दहा पंधरा फूट खाली गेलो . पुन्हा वर चढायचा प्रयत्न केला असता पुन्हा पुन्हा घसरलो . मग माझ्या लक्षात आले की मी तिथे जाऊ नये अशी मैयाची इच्छा आहे . वेळोवेळी अनेक साधूंनी मला सांगितलेले बोध स्मरले की नर्मदे काठी चालताना तिथे चाललेल्या घटनांमध्ये आपण स्वतः काही ढवळाढवळ करायला जाऊ नये .साक्षी भावाने पाहत पुढे निघावे . कारण या भागातील आदिवासी लोकांची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे . एक समाज म्हणून अतिशय प्रगल्भ असा हा समुदाय आहे . एक साधे उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल . या भागातील आदिवासी समुदायांमध्ये अशी प्रथा आहे की कोणीही विवाहबाह्य संबंध ठेवायचे नाहीत . मग त्यावर दुसरी काही मात्रा नाही का ? तर तिथे असा नियम केलेला आहे की एखाद्या माणसाला अजून एखादी स्त्री आवडू लागली तर त्याने थेट तिच्याबरोबर विवाह करावा जो समाजामध्ये मान्य धरला जातो . शिवाय इथे विवाह केल्यावर दोन्ही पक्ष निम्मा निम्मा खर्च करतात . संपूर्ण घरामध्ये आणि गावामध्ये स्त्रियांचीच सत्ता चालते हे पाहता एकापेक्षा अधिक स्त्रिया करणारा पुरुष हा फारच महापुरुष समजला जातो . काही तीन स्त्रिया असलेले आदिवासी मी पाहिले तर काहींना सात स्त्रिया देखील होत्या . हे सर्वजण एकाच घरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात . आपल्या शहरी मनाला कदाचित हा प्रकार पटणारा नाही परंतु लाखो वर्षांच्या उत्क्रांती नंतर या निर्णयाप्रत हा समाज आलेला आहे . हेतू हाच आहे की जे काही करायचे आहे ते उघड उघड करा . या नियमाला फाटा देत कोणी लपून-छपून काही प्रकरणे केली तर मात्र त्याला आदिवासी बांधवांच्या नियमानुसार कठोरातले कठोर शासन केले जाते . शिवाय मागे मी एकेक ठिकाणी सांगितले त्याप्रमाणे एकाच गावातील सर्व मुले मुली स्वतःला भावंडे मानतात . 

अशा पद्धतीने उघड उघड गळ्यात गळे घालून सुंदर असा नृत्याविष्कार करणारे तरुण-तरुणी तुम्हाला अनेक प्रसंगी दिसू शकतात आणि हे एक समाज म्हणून या भागातील आदिवासी लोकांनी जणु अनिवार्य केलेले आहे असे जाणवते. त्यामुळे लहानपणापासूनच इथल्या मुलांच्या मनामध्ये कुठलेही छुपे आकर्षण शिल्लक राहिलेले नसते आणि केवळ निखळ प्रेम सर्वत्र दिसते . शहरांमध्ये मात्र याच्या विपरीत दृश्य दिसते .(वरील नृत्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर टाकलेला आहे तो सर्वांनी येथे पाहावा . ढोलाचा धीर गंभीर आवाज तुम्हाला मोहित करेल )

अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेतून मी जात असल्यामुळे तिथे मध्ये पडून काही बोलण्याचा संबंधच नव्हता . त्यामुळे मैय्याने ढकलून दिलेल्या मार्गाने मी शांतपणे उतरत राहिलो आणि थोडे पुढे गेल्यावर नदीपात्रात उतरलो . तत्पूर्वी एका झोपडी मध्ये एका अत्यंत तरुण स्त्रीने मला सुंदर असा चहा करून पाजला . तिची एकंदर देह प्रकृती पाहता ती आदिवासी कुटुंबातील वाटत नव्हती . मी अधिक काही तपास न करता चहा पिऊन तिथून पुढे मार्गस्थ झालो . परंतु इतक्या जंगलामध्ये एकच झोपडी कुठून आली आणि त्यामध्ये इतर आदिवासींसारखी न दिसणारी धडधाकट बांध्याची ती तरुणी कुठून आली असा विचार मी बराच वेळ करत राहिलो . मला त्यावेळी त्या अमृतातुल्य चहाची खरोखर गरज होती हे मात्र खरे . असो .
नदीचे पात्र खडकांनी भरलेले होते . अनेक ठिकाणी उड्या मारत प्रस्तर उतरत खाली खाली निघालो होतो .

झरवाणी पासून मी जसा निघालो तसा बहुतांश काळ या नदीच्या काठाकाठानेच किंवा नदीपात्रातूनच मला चालावे लागत होते . सुदैवाने नदी जवळपास आटलेली होती त्यामुळे चालताना फारसा त्रास होत नव्हता .परंतु तरीदेखील पायाखाली असलेल्या दगडामुळे फार लक्षपूर्वक चालावे लागत होते . जितका मोठा दगड तितका तो अस्थिर असतो हे कायम लक्षात ठेवावे . या संपूर्ण टप्प्यामध्ये एकही मनुष्य मला कुठे दिसला नाही . या भागामध्ये जंगली श्वापदांचा प्रचंड वावर आहे याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या . हिंस्र प्राण्यांची विष्ठा लगेच लक्षात येते . त्याच्यामध्ये हरणाचे भेकराचे सशाचे किंवा वानराचे वगैरे केस हाडे इत्यादी आढळतात . तसेच ती विष्ठा किती ओली आहे यावरून प्राणी किती जवळ आहे त्याचा देखील अंदाज बांधता येतो . अगदी नुकतीच विष्टा करून प्राणी गेला असेल तर त्यातून अक्षरशः उष्णता बाहेर पडताना जाणवते . थंडीच्या काळात वाफा दिसतात . अशावेळी मात्र फार सावधपणे चालावे लागते . कुठेही न थांबता सरळ आपल्या मार्गाने निघून जाणे हा सर्वोत्तम उपाय असतो कारण तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लपून बसलेल्या श्वापदाचे बारीक लक्ष असते . मी माझ्या आयुष्यभर केलेल्या भटकंतीमध्ये असे प्रसंग वारंवार अनुभवले आहेत की ज्यामध्ये हिंस्र वन्य श्वापद माझ्या अगदी जवळ असताना मी तिथून सटकलेलो आहे .
टेंबे स्वामी यांचे मूळ गाव माणगाव म्हणून कोकणात सावंतवाडी जवळ आहे .तिथे त्यांची ध्यानाची गुहा जंगलामध्ये आहे . त्या गुहेच्या वर असलेल्या दगडावर मी ऊन खात पडलेला असताना एकदा पट्टेरी वाघ माझ्या मागे येऊन बसला होता . प्रत्यक्षामध्ये ती त्याची जागा होती . त्याने खूप वेळा मला सावध केले परंतु मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो .कारण मी शांतपणे डोळे मिटून पडलो होतो . अखेरीस आतून निघ असा आवाज आल्यामुळे मी तिथून खाली उतरलो आणि शंभर पावले गेलो नाही इतक्यात त्याच्या डरकाळ्या मला ऐकू आल्या . त्या दिवशी मी दत्तप्रभूंच्या कृपेने थोडक्यात वाचलो होतो . अजून एका प्रसंगी पुण्यातून चालत शिवथर घळी मध्ये जाताना आंबेनळी नावाची एक पायवाट आहे आणि गोप्या घाट नावाची दुसरी पायवाट आहे . त्याच्या मधून एक तिसरीच वाट मी शोधून काढली होती तिथे एक बिबट्या माझ्या मागे लागला होता . मागे लागला म्हणजे त्याने फक्त त्याच्या हद्दीच्या बाहेर मला हाकलण्याचा प्रयत्न केला होता . मी अतिशय वेगाने ती वाट उतरून अक्षरशः त्याच्या हद्दीतून पळून गेल्यामुळे त्याने मला काहीही इजा केली नाही . याप्रसंगी समर्थांनी मला वाचवले ! 
कर्नाटकामध्ये देखील खूप सुंदर जंगले आहेत . त्यातली बरीचशी मी पालथी घातलेली आहेत . दांडेली अभयारण्य ,बंदीपूर अभयारण्य ,नागरहोळे अभयारण्य ,गिरसाप्पा अभयारण्य , शबरीमला अभयारण्य ही माझी काही आवडती अभयारण्ये आहेत . यातील दांडेली मध्ये भटकत असताना मी एका जंगलातील 'व्ह्यू पॉइंट ' वर गेलो असताना माझ्याबरोबर मागे येऊन विष्ठा करून एक बिबट्या पळून गेला होता ! त्यावेळी त्या बिंदूपासून माझ्या जीप पर्यंत मी कसा आलो हे माझे मला माहिती आहे ! शबरीमाला मध्ये तर वाघांचा सुळसुळाट आहे . इथे अय्यप्पा स्वामीची जी उपासना केली जाते त्या पद्धतीने महिनाभर राहून मी देखील अय्यप्पाच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहे . हा संपूर्ण मार्ग जंगलातून जातो . इथे रजस्वला स्त्रियांना बंदी असण्याचे महत्त्वाचे कारण इथे असलेला वाघांचा वावर हेच आहे . वाघांना वासाचे खूप चांगले ज्ञान असते त्यामुळे केवळ या एका मंदिरामध्ये हा नियम कठोरपणे पाळला जातो . रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया व छोट्या छोट्या कन्यका मोठ्या प्रमाणात ही यात्रा करताना दिसतात .


अय्यप्पा मंदिरातील पूजेद्वारे अय्यप्पाचे व्रत स्वीकारताना प्रस्तुत लेखक . ठिकाण तिरुप्परंकुण्ड्रम तमिळनाडू .


नारळाला छिद्र पाडून त्यात साजूक तूप भरून बंद करून तांदुळामध्ये तो ठेवला जातो आणि तो ठेवलेली पै अथवा पिशवी डोक्यावर घेऊन चालत हे व्रत करायचे असते . या काळात महिनाभर एकभुक्त राहून अनवाणी चालत जमिनीवर झोपायचे असते .


या काळात कायम काळी किंवा निळी लुंगी घालायची असते . आणि चटईवर झोपायचे असते .


माझ्या पूजा सामानाच्या काळ्या पिशवीवर त्यावेळी मी फक्त पांढऱ्या रंगाने काढलेले अय्यप्पाचे चित्र .

भारतामध्ये होणाऱ्या (कुंभमेळ्या व्यतिरिक्त ) कुठल्याही धार्मिक यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणजे या अय्यप्पाची यात्रा च असते . अक्षरशः कोटींच्या संख्येने दरवर्षी केरळमध्ये या यात्रेसाठी हिंदू भाविक जमत असून देखील या भागातील धर्मांतरण रोखण्यात आपल्याला यश आलेले नाही इतका आपला समाज अतिसहिष्णू आहे . या यात्रेच्या मार्गामध्ये एक मोठी मशीद पडते तर जाणारा प्रत्येक भाविक त्या मशिदीला सुद्धा मनोभावे नमस्कार करतो हे दृश्य प्रस्तुत लेखकाने स्वतः अनुभवलेले आहे . धार्मिक सौहार्दाचा इतका परिपोष जगातल्या अन्य कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही . असो . ओघाने विषय निघाला म्हणून सांगितले .
इथून थोडेसे पुढे जंगलातूनच गेलो असताना काही अंतरावर एक डांबरी रस्ता लागला आणि त्यावरून काही आदिवासी मुले चालत येताना दिसली . हा कुठला विचित्र प्राणी दिसतो आहे असा विचार करत त्यांनी माझ्यासोबत काही फोटो काढून घेतले . त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्ती सोबत देखील काही फोटो त्यांनी काढले आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिले .


अजूनही सरदार वल्लभभाई पटेल यांची ही मूर्ती कित्येक किलोमीटर लांब होती . इथून मूर्तीचे अंतर किमान तीन ते पाच किलोमीटर असावे . 


या आदिवासी मुलांनी मोठ्याच हौसेने वेगवेगळ्या ठिकाणी मला वेगवेगळ्या अवस्थांमध्ये उभे करून भरपूर फोटो काढून घेतले ! मी हातातला दंड फार क्वचित प्रसंगी खाली टेकायचो आणि बहुतांश वेळ असा आडवा धरायचो त्यामुळे मी जिथे पकडले आहे तिथे उष्णतेमुळे तो वाकडा झालेला आपल्याला लक्षात येईल .


मला बिजासन नजिक मिळालेले नवीन बूट या चित्रामध्ये दिसत आहेत . सर्वत्र पानगळ झालेली दिसत आहे . वन खात्याने लोकांनी रस्ता सोडून वनात शिरू नये म्हणून सगळीकडे असे तार कंपाउंड लावलेले आहे . 


जगात एकच देव आहे असे दर्शविणारी ही खूण एकेश्वरवादी लोक कायम करत असतात . परंतु मी मात्र तशी खूण करत नसून हा पहा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अशा  अर्थी बोट दाखवत आहे . :D


सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि माझा आकार एकच दिसावा असा या मुलांचा प्रयत्न चालला होता . त्यासाठी त्यांनी बरेच फोटो काढून पाहिले . त्यातल्या त्यात हा फोटो जवळ जाणारा आहे .


अखेरीस अंधार पडतो आहे मला पुढे जाऊ द्या अशी विनंती केल्यावर मुलांनी मला सोडले .

इथून पुढे चालताना पुन्हा एकदा अरण्यमार्ग लागला . नदीपात्रातून पुन्हा एकदा चालावे लागले . आता मात्र एका डोंगराच्या मागून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा फारच मोठा दिसू लागला . तो इतका मोठा होता की डोंगराएवढे त्याचे डोके दिसत होते . हे वल्लभभाई पटेल मूर्ती प्रकरण फारच भव्यदिव्य आहे हे जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही . जंगलातील पानगळ झालेल्या पायवाटांवरून प्रचंड तंगड तोड केल्यावर अखेरीस ही नदी नर्मदा मातेला जिथे मिळते त्या संगमावरती जाऊन मी पोहोचलो . इथे एक पूल बांधलेला होता . आता नियमानुसार डावीकडे वळून चालायचे होते . परंतु मला सरदार सरोवर धरणाची भिंत बघायची होती जी इथून फक्त दोन किलोमीटर उजवीकडे होती . आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता या घनदाट अरण्यातून मोदींनी बांधला होता . त्यामुळे भिंत पाहून मग डावीकडे गोरा कॉलनी गावाकडे प्रस्थान ठेवावे असा विचार मी केला . डाव्या हाताला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा इतका मोठा दिसत होता की वर बघताना मान दुखत होती. इथे रस्त्याच्या दुतर्फा उत्तम असे बागबगीचे तयार करण्याचे काम चालू होते .नळीने झाडांना पाणी घालण्याचे काम चालू होते . त्यातीलच दोन माळी मला बघून नर्मदे हर असे ओरडले ! आणि पाया पडण्याकरता आले . मी देखील दोघांना नमस्कार केला . यांनी माझे काही फोटो इथे काढले .


झाडांना पाणी घालणारे वनमाळी बुवा . या संपूर्ण प्रकल्पामध्ये केवळ स्थानिक आदिवासी लोकांनाच नोकऱ्या मिळालेल्या आहेत . आणि त्यांच्या आयुष्याचे कल्याण गुजरात सरकारने केलेले आहे .


सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या मूर्तीच्या अगदी उजव्या हाताला सरळ रेषेमध्ये असलेल्या या बिंदूवर माळीबुवांनी भरपूर फोटो काढले .


या भागामध्ये बहुतेक सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखी 'पोझ ' देऊन पुतळ्यासोबत फोटो काढण्याची पद्धत आहे असे मला जाणवले .


रस्त्याला किती तीव्र उतार आहे हे आपल्याला फोटो पाहिल्यावर लक्षात येईल .


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याच्या आतून वरती जाणारी लिफ्ट अथवा उद्वाहक असून त्याद्वारे आपण हृदय स्थानी निर्माण केलेल्या एका प्रेक्षा गॅलरीमध्ये जातो जिथून नर्मदा मातेच्या जलाशयाचे अत्यंत विहंगम असे दर्शन होते . 


दप्तराच्या मागे लटकणारे कापड म्हणजे दुपारी धुवून वाळत घातलेला लंगोट आहे . कपडे धुऊन झाले की सुकविण्याची वाट न
 बघता अशा रीतीने मागे झोळीला बांधून मी चालायला लागतसे . चालताना कपडे वाळून जात .


या रस्त्यावर केवळ देशी-विदेशी पर्यटकांना  पाहण्याची सवय माळी लोकांना होती . परिक्रमावासी प्रथमच दिसल्यामुळे त्यांना अप्रूप वाटत होते आणि त्यांनी भरपूर फोटो काढून घेतले


आता लवकरच अंधार पडणार आहे तरी कृपया मला मार्गस्थ होऊ द्या म्हणजे एखादा आश्रम गाठता येईल अशी विनंती मी त्यांना केल्यावर त्यांनी मला जाऊ दिले .

 त्यांनी हे देखील सांगितले की इथे कुठलेही परिक्रमा वासी कधीच येत नाहीत . सर्वजण बहुतेक करून गोरा कॉलनी गावामध्ये थेट उतरतात . ते इथून बरेच लांब होते . आज उजेडात मी तिथे पोहोचेन का नाही हे देखील मला माहिती नव्हते . परंतु आल्यासरशी सरदार सरोवर धरणाचे जवळून दर्शन घेण्याची मला इच्छा होती . इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी अति भव्य अक्षरे रस्त्याच्या कडेला उभी आलेली आहेत जी समोरच्या तटावरून खूप छान दिसतात . हॉलीवुड अशी अक्षरे लिहिलेला डोंगर आपल्या डोळ्यासमोर असेल त्याहीपेक्षा भव्य दिव्य अशी ही अक्षरे गुजरात सरकारने उभी केलेली असून त्या प्रत्येक अक्षराची उंची एखाद्या पाच दहा मजली इमारती एवढी आहे . या अक्षरा समोरून जाताना अक्षरशः आपण फार खुजे आहोत असे वाटते परंतु समोरच्या तटावरून पाहिले असता ही अक्षरे अतिशय लहान आणि गोंडस दिसतात .

हीच ती अक्षरे ! मी किती घनदाट जंगलातून आलो आहे ते तुमच्या लक्षात येईल . त्यामुळेच या मार्गाने परिक्रमावासींना स्थानिक लोक जाऊ देत नाहीत . परंतु मार्ग निश्चितपणे आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे .


सरदारजींच्या पुतळ्याच्या हृदयातून काढलेले हे फोटो आहेत . उजवीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेली पांढरी अक्षरे आहेत त्याच्या मागून चालत मी भिंतीपर्यंत गेलो होतो . आणि पुन्हा उलटा येऊन गोरा कॉलनीच्या दिशेला गेलो होतो . 
ही अक्षरे फार मोठी असून मागे असलेले अरण्य देखील घनदाट आहे . अक्षरांच्या मागून चालताना हे नक्की काय प्रकरण आहे ते कळत नाही इतके ते भव्य दिव्य आहे . हे चित्र समोरच्या तटावरून काढलेले आहे . 


मूर्तीच्या मानाने भिंत आणि ती अक्षरे किती लहान दिसत आहेत हे तुम्हाला या चित्रांमध्ये लक्षात येईल तसेच आता तुम्हाला मी किती उंच डोंगर उतरून आलो आहे ते देखील लक्षात येईल . हे चित्र मूर्तीच्या मागच्या बाजूने समोरच्या तटावरून काढलेले आहे . मूर्तीची गुजरातकडे पाठ असून महाराष्ट्राकडे तोंड केलेले आहे . मूर्ती ज्या चबुतऱ्यावर उभी आहे तीच मुळी एक भव्य दिव्य इमारत आहे . 
मूर्तीपर्यंत जाण्यासाठी समोरच्या तटावरून एक पूल बांधलेला आहे . परिक्रमावासी दोन्ही तटावरून या मूर्तीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत कारण हे नर्मदा मातेच्या पोटामध्ये असलेले एक बेट आहे आणि तिथे गेल्यास परिक्रमा खंडित होते . . 
इथे सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती समोरून छान दिसेल असा एक व्ह्यू पॉइंट बनवण्यात आलेला असून तिथे सुंदर असा बगीचा केला आहे व उभे राहून फोटो काढता येतील अशी व्यवस्था केलेली आहे .

मी इथे गेलो तेव्हा दिल्लीवरून आलेली एक तरुण youtuber मुलगी Vlog बनवत होती . तिने मला विनंती केली की मी तिला मुलाखत द्यावी . त्याप्रमाणे तिने आणि तिच्यासोबत आलेल्या कॅमेरामनने माझी नर्मदा परिक्रमा या विषयावर छोटीशी मुलाखत घेतली . पुढे त्या मुलीने ती कुठल्या चॅनेलवर टाकली किंवा नाही याची मला काही कल्पना नाही .परंतु त्या मुलीने तिच्या मोबाईलवर माझे काही फोटो काढले आणि ते मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले ते फोटो मात्र सोबत जोडत आहे . मी काही चॅनल कुठले वगैरे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही . कारण मुळात मी स्वतः युट्युब वर संशोधन वगैरे करून परिक्रमा उचललेली नव्हती तर केवळ नर्मदा मैयाच्या भरवश्याने सर्व चालू होते .
 दिल्लीच्या youtuber मुलीने काढलेले फोटो
सायंकाळ झाली होती आणि लवकरच अंधार पडणार होता .


याही मुलीच्या फोटोग्राफरने मला वल्लभभाई पटेल यांच्यासारखे उभे राहायला सांगितले . त्याने तर माझ्या खांद्यावरचा पंचा देखील त्यांच्याप्रमाणे ठेवून घेतला !

कोणी कितीही नक्कल केली तरी देखील मूळ व्यक्तीची सर आपल्याला येणे शक्य आहे काय ! आज आपण जो काही उर्वरित अखंड भारत बघतो आहोत त्याचे सर्वस्वी श्रेय श्री वल्लभभाई पटेल या लोहपुरुषाला जाते .कारण त्यांनी जर हैदराबाद जुनागड काश्मीर सारखी संस्थाने भारतामध्ये वेळच्यावेळी विलीन करून घेतली नसती तर आपल्या देशाचे अजून अनेक तुकडे व्हायला वेळ लागला नसता . त्यांचे हे अभूतपूर्व कार्य बघूनच बहुतेक नर्मदा मातेने आपल्या एका बेटावर त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा करण्यासाठी जागा बहाल केली !  हा पुतळा असंख्य छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून बनविलेला आहे . प्रत्यक्षामध्ये या पुतळ्याच्या आत मध्ये लोखंडाचा एक मोठा सांगाडा किंवा इमारतच उभी केलेली आहे आणि त्याच्यावरती जागोजागी वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीचे तुकडे जोडण्यात आलेले आहेत . मूर्तीच्या हृदयस्थानी असलेल्या सज्जावरून नर्मदा मातेचे फारच सुंदर दर्शन होते असे ऐकले आहे .अजून प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही आणि परिक्रमे मध्ये तर पाहायला परवानगी देखील नाही . या पुतळ्या विषयी थोडक्यात माहिती जिज्ञासूंसाठी खाली देत आहे .

सरदार वल्लभ भाई पटेल यांची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. नर्मदा मातेच्या पाण्यापासून ही २४० मीटर उंच असून त्यात ५८ मीटर उंचीचा चबुतरा अर्थात एक भली मोठी इमारतच आहे. गुजरात मध्ये १८२ विधानसभा मतदारसंघ आहेत त्याप्रीत्यर्थ या मूर्तीची उंची १८२ मीटर ठेवण्यात आलेली आहे.  मूर्ती आतून पोकळ असून भाला मोठा लोखंडी सांगाडा अथवा इमारत उभी करून त्याला बाहेरून तुकड्यांमध्ये मूर्तीचे भाग जोडण्यात  आलेले आहेत . हे भाग बनविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी नांगराचे फळ, कुदळ, फावडे, घण, हातोडे आदी पोलादी वस्तू गुजराथ सरकारला दान केल्या होत्या. त्या वितळवून एल अँड टी कंपनी ला कंत्राट देऊन ३००० कोट रुपये खर्चून हा प्रकल्प मोदींनी उभा केलेला आहे.  

इथून पुढे जाऊन धरणाची भिंत देखील बघून आलो. इथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे. 
धरणाला धोका असणे यांच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट मानवतेच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या  गप्पा ठोकणाऱ्या देशासाठी असू शकत नाही. विचार करून पहा! असो. जिज्ञासूंसाठी धरणाची माहिती थोडक्यात देत आहे. 
‘नर्मदा खोरे विकास प्रकल्प’ या महायोजनेत ‘सरदार सरोवर’ व ‘नर्मदा सागर’ हे दोन मुख्य प्रकल्प आहेत. या योजनेंतर्गत नर्मदा व तिच्या ४१ उपनद्यांवर ३० मोठी, १३५ मध्यम आणि ३,००० लहान धरणे बांधण्याचे नियोजित आहे. या धरणाच्या जलाशयाचे क्षेत्रफळ ३७,००० हेक्टर असून धरणाला ३० दरवाजे आहेत. धरणाची लांबी १,२१० मीटर असून उंची १३९ मीटर (पायापासून १६३ मीटर, ५३५ फुट) आहे. सुरुवातीला ९३ हजार कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असलेला हा महाप्रकल्प २०१७ मध्ये, साधारण ५६ वर्षानंतर, ६५ हजार कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला. या धरणांमुळे १८ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून अनेक शहरे, उद्योग आणि ४,७२० खेड्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच १,४५० मेगावॅट वीज तयार होणार आहे. या धरणावरील वीजनिर्मिती केंद्राद्वारे एकूण निर्माण होणाऱ्या विजेतून मध्यप्रदेश ५७ टक्के, गुजरात २७ टक्के आणि महाराष्ट्र १६ टक्के असे वीजेचे वितरण करण्यात आले. याव्यतिरिक्त राजस्थानला पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी दिले जाते, असे सरकारी आकडेवारीमध्ये नमूद आहे. (सौजन्य : मराठी विश्वकोश )  



सरदार सरोवर प्रकल्पावरून काहूर माजवले गेलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनात मी महाविद्यालयीन जीवनात सक्रिय सहभाग घेतलेला असल्यामुळे माझे या विषयीचे मत एकांगी नसून अभ्यासातून आणि अनुभवातून आलेले आहे. मुळात हा प्रकल्प सरदार पटेल यांनी १९४५ साली मांडला होता व अंमलबजावणीस १९८३  साल उजाडले , इथेच मुख्य चूक झालेली आहे. १९४५ साली भारताची लोकसंख्या केवळ ३५ कोटीच्या घरात होती . आणि विस्थापित गावातील लोकसंख्याही त्याच प्रमाणात होती किंवा काही गावे तर वसलीच नव्हती. आता मात्र धरण पूर्ण झालेले असून पुनर्वसनही झालेले आहे. तसेच ३५०० रुपये तिकिटात विद्युत गाडीतून हा संपूर्ण प्रकल्प तुम्हाला दाखविणारे स्थानिक मार्गदर्शक देखील विस्थापित आदिवासीच आहेत.  तसेच इथला प्रत्येक कर्मचारी विस्थापित गावातील आहे. अशा अनेकांशी मी बोलल्यावर असे कळले की ते या नवीन जीवनात सुखी आहेत. दरमहा अमुक एक रक्कम खात्यात जमा होईल असे यांच्या स्वप्नातही कधी वाटलेले नव्हते. शिवाय ते काम करताहेत तो सारा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्यात आलेला असल्यामुळे कामाचे वातावरणही यांना आवडणारेच आहे. असो.सरदार पटेल यांना साष्टांग नमस्कार केला आणि मुक्कामाच्या शोधात चालू लागलो. नर्मदा मातेवरून येणारे रेवागंधीत वारे मनाला सुखावीत होते. तिच्या केवळ एका दर्शनाने दिवसभराच्या कठीण वाटचालीचा शिणवटा क्षणात पळून गेला ! 
दुःख हर, कष्ट हर,पीडा हर ,वेदना हर, दैन्य हर ,क्लैब्य हर ,पाप हर, नर्मदे हर !! नर्मदे हर !!!

 लेखांक ९२ : उलुकेश्वर महादेव आणि गोरा कॉलनीचे नूतन शूलपाणेश्वर मंदिर व हरिधाम आश्रम

संध्याकाळ झाली होती आणि धरणाच्या भिंतीपासून गोरा कॉलनी ठीक सात किलोमीटर लांब होती . माझ्या चालण्याच्या गतीनुसार हे दोन तासाचे अंतर होते . तोपर्यंत अंधार पडला असता . त्यामुळे धरणाची भिंत पाहायला उलटे येण्याचा निर्णय चुकला असे मला वाटू लागले . परंतु इतक्या भव्य भिंतीचे दर्शन पुन्हा आपल्याला कधी होणार हे ही मनात होतेच .कारण तिथे उपस्थित असलेले सीआयएसएफ चे जवान पर्यटकांना जवळपास सुद्धा फिरकू देत नाहीत . मी परिक्रमावासी असल्यामुळे अतिशय आदरपूर्वक माझ्याशी सर्वजण बोलले आणि मला हवे ते सर्व पाहू दिले होते . यांनी देखील मला सांगितले की इथे परिक्रमावासी फारसे येत नाहीत . याचे महत्त्वाचे कारण त्यांची येण्याची इच्छा नसते असे नसून त्यांना इथे येऊच दिले जात नाही हे खरे कारण आहे . प्रत्येक गावातील लोक त्यांना सडक मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला देतात . आणि स्थानिक भूगोलाचे ज्ञान नसल्यामुळे शक्यतो स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे ऐकण्या पलीकडे परिक्रमा वासींच्या पुढे पर्याय राहत नाही . आता मी परत फिरलो मात्र सर्व डांबरी रस्ता सामसूम झाला . अतिशय सुंदर काळाभोर स्वच्छ असा तो डांबरी रस्ता होता . अतिशय नेटके पट्टे त्यावर मारलेले होते . डाव्या हाताला मोठे मोठे डोंगर होते आणि त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात झाडी होती . उजव्या हाताला नर्मदा मैया होती परंतु खाली जाता येऊ नये म्हणून अखंड तारेचे कुंपण केलेले होते . या भागामध्ये नर्मदा मातेचे पात्र पूर्णपणे खडकाळ होते . इथून पुढे गरुडेश्वर नावाच्या गावामध्ये चेक डॅम अर्थात एक लघुबंधारा बांधलेला आहे ज्याच्या मधील पाणी अडवले की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याभोवतीच्या संपूर्ण बारा चौरस किलोमीटर आकाराच्या तलावामध्ये पाणी भरते . त्यानंतर या जलाशयामध्ये क्रूज , नौकानयन वगैरे चालविले जाते .
आता देखील बऱ्यापैकी पाणी साठलेले होते . डावीकडचे जंगल हळूहळू गडद होत चालले होते . त्यातून येणारा रातकिड्यांचा आवाज इतका भयानक होता की बाकीचा कुठला आवाज येतच नव्हता . त्या संपूर्ण टापू मध्ये एकही मनुष्य नव्हता . आता सात किलोमीटर चालावे लागणार या विचाराने मी पायांना गती दिली . अखंड तीव्र उतार उतरून आल्यामुळे पाय थोडेसे कुरबुर करू लागले होते . परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधार पडायच्या आत गोरा कॉलनी गाठणे मला आवश्यक होते . हळूहळू सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पुन्हा एकदा जवळ येऊ लागला . या पुतळ्याचे निरीक्षण करत क्षणभर उभा राहिलो . इतकी भव्य दिव्य कृती आपण करूयात अशी केवळ इच्छा निर्माण होणे हे देखील किती भाग्याचे लक्षण आहे ! मग तशी प्रत्यक्षात उतरविणे आणि त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान संपादन करणे आणि त्यासाठी लागेल ते कष्ट करणे , निधी उभा करणे हा सर्व एक प्रकारे भीम पराक्रमच आहे .आम्ही शाळेमध्ये एक गीत शिकलो होतो .
राष्ट्रार्थ भव्य कृती काही । पराक्रमाची ॥
ईर्ष्या निजांतरी धरून । करावयाची ॥
ही हिंदू भू परम श्रेष्ठ । पदास न्याया ॥
आम्ही कृती नित करू । झिजवोनी काया ॥
या ओळी इथे मूर्ती रूपाने उभे असलेल्या पाहत होतो ! मूर्तीच्या भव्यतेबद्दल शब्दांमध्ये वर्णन करता येणे खरोखरच कठीण आहे ते प्रत्यक्ष तिथे जाऊन अनुभवणे हेच श्रेयस्कर आहे ! इतके भव्य दिव्य काहीतरी उभे करता येणे शक्य आहे असा आत्मविश्वास ज्या व्यक्तीच्या अंतर्यामी आहेत ही व्यक्ती खरोखरच अलौकिक मानली पाहिजे ! युगपुरुष एका कृतीतून ठरविता येत नसतो . असे अनेक कंगोरे जुळले की आपोआप ते पद एखाद्या व्यक्तीला बहाल होत असते .आपल्या घराशेजारील चौकामध्ये एखादा अर्ध पुतळा देखील कधी बसवू किंवा उभा करून न शकलेले लोक जेव्हा इतकी भव्य कलाकृती उभी करणाऱ्या माणसाविषयी मतप्रदर्शन करतात तेव्हा खरोखरीच त्या सर्वांची कीव येते . माझ्या बोलण्याचा काही लोकांना कदाचित राग येईल परंतु पुन्हा एकदा सांगतो मी केवळ माझा अनुभव सांगतो आहे . यात अनुमानाला कुठेही थारा नाही .जे मी स्वतः पाहिले अनुभवले तेच इतके भव्य दिव्य होते की आपोआप आपले डोके नतमस्तक होऊन जाते .सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती उपग्रहातून कशी दिसते याचे एकच चित्र पुरेसे बोलके आहे .
उपग्रहातून दिसणाऱ्या या मूर्तीच्या पायाजवळ ज्या मुंग्या दिसत आहेत , ते वास्तवामध्ये ती मूर्ती पाहण्यासाठी आलेले पर्यटक आहेत ! यावरून तुम्ही या मूर्तीच्या आकाराची कल्पना करून घ्यावी !आणि आता मी तुम्हाला काय म्हणतो आहे ते अधिक चांगले लक्षात येईल . 
२०१८ मध्ये या पुतळ्याचे उद्घाटन झाले तेव्हा मी तमिळनाडूमध्ये राहायचो परंतु या पुतळ्याविषयी विविध बातम्या ज्या कानावर पडत होत्या केवळ त्या ऐकूनच मी अतिशय प्रभावीत झालो होतो ! इतके भव्य कोणीतरी उभे केलेले आहे आणि तेही आपल्या देशात उभे केलेले आहे की बाबच अतिशय अभिमानास्पद वाटायची !
त्यावेळी उत्स्फूर्तपणे काही व्यंगचित्रे मी काढली होती .
ती आपल्या अवलोकनासाठी खाली देत आहे .प्रत्येक व्यंगचित्राखाली त्याचे थोडक्यात रसग्रहण देत आहे .
नरेंद्र मोदी सांगत आहेत की मी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनविला . आणि सोनिया गांधी सांगत आहेत की मी सरदार मनमोहन सिंग यांना चालता बोलता पुतळा बनविला ! अर्थात त्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया फारशी ठेवलेली नाही ! 
या चित्राचा भावार्थ असा होता की मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभा करून त्यांच्या या एकाच कृतीद्वारे अनेक लोकांच्या अनेक वर्षांच्या कष्टांवर पाणी फिरवले आहे. ज्यामध्ये बॅरिस्टर महंमद अली जिना ,महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी , राजीव गांधी , सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या व्यंगचित्रांचा समावेश आहे .

(वाचकांना एक नम्र विनंती आहे की ही व्यंगचित्रे पाहून प्रस्तुत लेखकाच्या राजकीय भूमिकेबद्दल कुठलेही आडाखे बांधावयास जाऊ नये . आपले गणित फार सोपे आहे . आपल्या उदात्त भारतीय परंपरांचा अभिमान असलेला आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन कष्ट करण्याची तयारी असलेला कुठल्याही पक्षाचा नेता हाच आपला पुढारी असावा असे सांप्रत आमचे मत आहे . सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापाशी आल्यावर मला प्रकर्षाने ही चित्रे आठवली होती म्हणून इथे टाकली आहेत . कारण ती चित्रे काढताना माझ्या डोक्यामध्ये या पुतळ्याचा जो आकार होता त्यापेक्षा हा कैकपटीने मोठा निघाला . मी एक परिक्रमावासी आहे आणि त्याचबरोबर मी एक भारतीय नागरिक देखील आहे ज्याला आपली मते मुक्तपणे मांडण्याचा अधिकार या लोकशाहीने दिलेला आहे त्याचा कृपया सन्मान व्हावा इतकीच माफक अपेक्षा आहे .)

समर्थ रामदास स्वामी म्हणतात
उत्कट भव्य तेचि घ्यावे ।
मिळमिळीत अवघेची त्यागावे ॥
जिथे भव्यता देखील आहे आणि उत्कटता देखील आहे अशा ठिकाणीच रुची ठेवावी . केवळ उत्कट भाव कामाचा नाही . आणि केवळ भव्यता देखील उपयोगाची नाही . या दोघांचा संगम जिथे झाला आहे तेच योग्य ठिकाण होय . या संपूर्ण परिसरामध्ये लवकरच लाईट अँड साऊंड शो सुरु होणार होता असे मला मगाशीच कळाले होते . तो देखील पाहण्याची उत्सुकता मनामध्ये होती . परंतु लवकरात लवकर हा परिसर सोडून गोरा कॉलनी मध्ये पोहोचणे आवश्यक होते नाहीतर राहण्याचे वांदे झाले असते . म्हणून वेगाने चालू लागलो . मगाशी मी ज्या पुलावरून आलो तो पूल ओलांडला . सरदार सरोवर धरणाच्या भिंतीनंतर नर्मदा मातेला येऊन मिळालेली थवडिया ही पहिलीच नदी आहे तिला नमस्कार करून पुढे चालू लागलो . हे अंतर अतिशय कंटाळवाणे झाले होते कारण कितीही चालले तरी पायाखालचा रस्ता संपत नव्हता आणि डाव्या हाताचे जंगल काही कमी होत नव्हते . शिवाय नर्मदा माता उजव्या हाताला वाहत होती परंतु मध्ये घातलेल्या बंधनामुळे तिचा स्पर्श देखील अजून झालेला नव्हता . हा दिसायला विकास होता परंतु प्रत्यक्षामध्ये अतिशय भकास आहे असे मला वाटू लागले ! जिथे माणसे दिसत नाहीत तो विकास काय कामाचा ! जिथे आपल्या आराध्य दैवताचे पूजन करता येत नाही तो विकास , विकास म्हणायचा की अजून काही ? ते काही नाही . नर्मदा मातेचे दर्शन झाल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही असा विचार मी केला आणि इतक्यात उजव्या हाताला असलेले तार कंपाउंड एके ठिकाणी तोडले आहे असे मला दिसले ! मग काय विचारता ! माझ्या आनंदाला पारावार उरला नाही ! धावतच आत मध्ये गेलो . इथे पुन्हा थोडेसे जंगल होते . ते कसेबसे पार करत खडकाळ जमीन उतरत झोळी काठी पटकन खाली ठेवली आणि मैया ला जाऊन बिलगलो ! इतका काळ आई मुलाने दूर राहणे चांगले नव्हे गं ! चांगली अंधारलेली संध्याकाळ झाली होती . अशा वेळी नर्मदे वरचे वातावरण अतिशय गूढ रम्य असते ! संधी प्रकाशामध्ये नर्मदा माता एका वेगळ्याच तेजाने झळाळून उठलेली असते . इथे पाणी इतके स्वच्छ होते की त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही . सरदार सरोवर धरणामुळे नर्मदा मातेच्या पाण्यातील सर्व गाळ खाली बसतो आणि केवळ शुद्ध पाणी खाली सोडले जाते . इतका अंधार पडलेला असून देखील मला नर्मदा मातेचा तळ दिसत होता इतके ते पाणी स्वच्छ होते ! या पाण्यामध्ये मनसोक्त स्नान केले ! दिवसभराचा सर्व थकवा क्षणात पळून गेला ! मी नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये खाली सपाट जागा मिळाली की आत जाऊन मांडी घालून बसण्याचा प्रयोग करायचो . खूप शांत आणि भारी वाटायचे .त्यासाठी आधी पोटातली सगळी हवा सोडून द्यावी लागते .आणि बराच काळ बहिर्कुंभक करून बसावे लागते . तसा इथे बसून राहिलो . मला असे वाटले की नर्मदा माता मला सांगते आहे की बाहेर ये आणि काठाकडे बघ .मी त्याप्रमाणे उठलो आणि काठाकडे पाहिले . बराच वेळ पाण्याखाली राहिले की बाहेरचे दृश्य पुसट दिसू लागते . मला असे दृश्य दिसले की मी ज्या जंगलातून इकडे आलो तिथून दोन-तीन लोक मला पाहत आहेत . आणि आपापसात काहीतरी चर्चा करत आहेत . मी बाहेर आल्याबरोबर ते सर्व निघून गेले . मला आतून काहीतरी संकेत जाणवला आणि मी पाण्यातून बाहेर पडलो . अंग पुसले आणि पुन्हा रस्त्यावर आलो . अखेरीस थोडेसेच अंतर चालल्यावर उजव्या हाताला एक अंगणवाडी आणि दुर्गामातेचे एक मंदिर दिसले . आत मध्ये एक माताजी बसल्या होत्या त्यांनी मला नर्मदे हर असा आवाज दिला . मी आत मध्ये गेलो आणि माताजींना नमस्कार केला . इतक्यात एक पुजारी देखील तिथे आले . त्यांना देखील मी नमस्कार केला . हे या आश्रमाचे महंत होते . "इतक्या उशिरा इकडून कुठून आलात ? " त्याने मला विचारले . मी त्यांना झरवाणी पासून घेतलेल्या चटकट ची माहिती दिली . आणि धरणाची भिंत पाहून आल्याचे सांगितले . माताजी आणि गुरुजी गंभीर झाले . ते म्हणाले मुक्कामाचे काय ठरवले आहे ? मी त्यांना म्हणालो की गोरा कॉलनीमध्ये मुक्कामाची सोय आहे असे कळले आहे . गुरुजी मला म्हणाले की आता अंधार पडला आहे . त्यामुळे पुढे न जाता इथेच मुक्काम करावा . हा देखील आश्रमच आहे . फक्त इथे मुक्कामाची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर झोपावे लागेल . भोजन प्रसादीची व्यवस्था मात्र होईल . मला अतिशय आनंद झाला ! आता आजच्या दिवसाचे चालणे संपले असे ज्या क्षणी लक्षात येते त्या क्षणी फार आनंद वाटतो ! ज्याप्रमाणे कंपनीचा मालक आणि कंपनीचे कामगार या दोन वेगळ्या प्रकृती असतात तसेच आपल्या देहाचे आहे . अविरत कठीण मार्गाने चालणारे पाय , प्रमाणाबाहेर वजन उचलून घेणारी पाठ आणि भुकेने कळवळणारे पोट हे तीन कामगार हाकत हाकत मी इथवर आणले होते ! हे काय इथेच तर जायचे आहे असे त्यांना सांगत सांगत मी इथवर आणले होते ! आपले शरीर म्हणजे आपण नसतोच मुळी ! तो तर आपला कामगार आहे ! खरं पाहायला गेलं तर पाच लोक असा दावा करत असतात की मीच अमुक अमुक आहे . इथे या व्यक्तीचे नाव अमुक अमुक आहे असे आपण लक्षात घेऊया . 
कोण आहे ते पाच लोक ? मन , बुद्धी ,चित्त ,अहंकार आणि शरीर ! या पाचही जणांचा दावा असतो की मीच अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे ! आपण अमुक अमुक या ठिकाणी आपले स्वतःचे नाव घालून वाचू शकता ! तरी ते चपखलपणे तुम्हाला लागू होणार कारण हे वैश्विक सत्य आहे ! या प्रत्येकाचे स्वतःचे एक वेगळे तर्कट असते . मन हे अतिशय चंचल असते . ते सांगत असते की मीच तू आहे . आणि मी म्हणेन तेच खरे ! परंतु मुळातच वायु तत्वाचा आधार घेऊन उभे असलेले हे मन वायूप्रमाणेच चंचळ असते . त्यामुळे त्याची एक ठाम भूमिका कधी नसते . बुद्धी ही पूर्णपणे तर्कवादी असते . अमुक झाले आहे म्हणजे असेच असणार आणि तमुक झाले आहे म्हणजे तसेच असणार अशा प्रकारचे आडाखे ती बांधत असते . चित्ताला मात्र स्वतःचा असा काही विचार नसतो परंतु ते लिटमस पेपर प्रमाणे असते . पेपर जसा प्रयोग शाळेमध्ये हे अमुक आहे आणि हे तमुक आहे असा निर्णय देतो त्याप्रमाणे चित्त केवळ आनंदी होते किंवा दुःखी होते किंवा विचलित होते किंवा काळवंडते . अहंकार म्हणजे मी आहे याची जाणीव . लोभ गर्व अशा अर्थी हा अहंकार शब्द वापरलेला नाही . सकाळी झोपेतून उठल्यावर मी जिवंत आहे असे आपल्याला ज्या जाणिवेमुळे कळते ती जाणीव म्हणजे अहंकार . हिचाही असा दावा असतो की मीच अमुक अमुक आहे . राहिला प्रश्न शरीराचा तर ते म्हणजे आपण आहोत असे आपल्याला स्वतःलाच वाटत राहते ! गणित फार सोपे आहे ! आपण जन्माला आलो तेव्हा देखील आपले नाव अमुक अमुक होते . शाळेमध्ये देखील तेच नाव होते . आता देखील तेच नाव आहे . आणि म्हातारपणी देखील तेच नाव असणार आहे . या काळातील सर्व छायाचित्र एकत्र करून पहा . एकही शरीर दुसऱ्या शरीरासारखे दिसत नाही . याचाच अर्थ अमुक अमुक नावाची व्यक्ती शरीर असू शकत नाही ! कारण शरीर सतत बदलणारे आहे ! आणि अमुक अमुक हे एकच तत्व त्यामध्ये सातत्याने अस्तित्व टिकवून आहे !
मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना असे एक कोलाज बनवून ठेवले होते . ज्यामध्ये माझ्या बालपणीपासूनच्या प्रतिमा मी चिकटवल्या होत्या .
 आणि त्यातील होणारा बदल पाहून मी स्वतःला सांगायचो की हे शरीर म्हणजे तू असू शकत नाहीस !
अयं न इंद शरीरम् । 
 कारण शरीर म्हणजे तू असतास तर सर्व चित्रे एकसारखी दिसली पाहिजेत ! ज्या अर्थी हे शरीर बदलते आहे त्या अर्थी शरीर म्हणजे तू नाहीस . शीर्यते इति शरीरम् । अशी शरीराची व्याख्या आहे . जे सतत शीर्यमाण होते आहे अर्थात झिजते आहे तेच शरीर . मग जर हे पाचही कामगार म्हणजे मालक नव्हे तर मग मालक कोण आहे ? तर तो वेगळ्याच ठिकाणी बसलेला असून या पाचही जणांना राबवितो आहे . परंतु जर कामगार वरचढ झाले तर मात्र ते मालकाला संकटामध्ये नाचवितात तसेच बहुतांश वेळा आपले होते . ज्याप्रमाणे हाताबाहेर गेलेले कामगार काम बंद पडतात तसे मग अशा व्यक्तीचे होते . मी संपूर्ण परिक्रमेदरम्यान याची काळजी घ्यायचो की माझे अवयव , माझे शरीर , मन , बुद्धी ,चित्त आणि अहंकार हे माझे कामगार कधीही माझ्या आज्ञेबाहेर किंवा हाताबाहेर जाणार नाहीत . त्यासाठी मी एक अजून मोठा मालक नेमला होता ! किंवा मालकीण म्हणा फार तर ! या मालकिणीला सर्व फॅक्टरी चालवायला दिली होती ! ती म्हणेल , ती सांगेल , ती दाखवेल त्या वाटेने जायचे . ती सांगेल तिथे उतरायचे आणि ती देईल ते खायचे ! ती कोणाच्या रूपाने येऊन मार्गदर्शन करेल हे सांगता येत नसे . अलीकडे एक खूप सुंदर भजन ऐकले . 
पता नही किस रूप मे आके नारायण मिल जायेगा । निर्मळ मनके दर्पण मे वह राम के दर्शन पायेगा ।
याची पदोपदी प्रचिती नर्मदा खंडामध्ये येत राही . अन्यत्र ती येतेच परंतु इथे मात्र विशेषत्वाने येते . कारण आपला अन्य ठिकाणी किंचितसा न्यूज असलेला भाव आणि नर्मदा खंडामध्ये आल्यावर आपला बदललेला भाव याचा तो प्रभाव असतो . असो .
पंडित जी मला आश्रमाचे नियम सांगू लागले . त्यांचा स्वभाव थोडासा कडक होता . ते म्हणाले की या आश्रमामध्ये राहायचे असेल तर मी सांगतो ते नियम पाळावेच लागतील . आश्रमात इकडे तिकडे अजिबात फिरायचे नाही . दुर्गा माता मंदिराशेजारी अंगणामध्ये पडून राहायचे . डाव्या हाताला माताजींच्या खोल्या होत्या तिकडे जायचं नाही .आश्रमामध्ये गोशाळा होती तिथे देखील जायचे नाही . आश्रमाच्या बाहेर देखील जायचे नाही . सकाळी उठल्यावर नर्मदेमध्येच स्नानाला मुळीच जायचे नाही ! हे असे नियम असलेला आश्रम मी प्रथमच पाहत होतो . बाकी सर्व नियम ठीक होते . परंतु नर्मदा स्नानाला का जायचे नाही ते काही मला कळाले नाही . परंतु मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे मी एकही अवाक्षर काढले नाही . हात जोडून नम्रपणे या सर्व सूचनांचा स्वीकार केला . माझ्या अगदी तोंडावर आले होते की पंडितजींना सांगावे की मी नुकतेच नर्मदेमध्ये स्नान करून आलेलो आहे . परंतु मी काही बोललो नाही . दुर्गा माता मंदिराशेजारी आसन लावले . आणि खरे सांगतो ! उघड्यावर आसन लावणे माझ्या पथ्यावर पडले ! कारण समोरच नर्मदा मैया वहात होती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पाठमोऱ्या मूर्तीच्या समोर दिसणारे अप्रतिम असे सरदार सरोवर धरण रात्रीच्या झगमगाटाने उजळून निघालेले दिसू लागले ! लवकरच साऊंड अँड लाईट शो सुरु होणार आहे असे मला माताजींनी सांगितले . मी दुर्गामाता आणि नर्मदा पुराणांमध्ये उल्लेख असलेल्या उलूकेश्वर अथवा उल्केश्वर महादेवाचे दर्शन घेतले . माझी सायंउपासना आटोपली . माताजींनी मला सांगितले की त्यांच्या खोल्यांच्या वर गच्ची आहे . तिथून साउंड अँड लाईट शो छान दिसतो . त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी गच्चीवर गेलो . डोळ्याचे पारणे फेडणारा लेझर शो पाहिला ! 
इतके भारी काहीतरी आपल्या देशामध्ये झालेले आहे हेच बहुतांश लोकांना माहिती नसावे ! अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा लाईट शो नर्मदा मैया च्या पात्रामध्ये दररोज संध्याकाळी केला जातो ! 
भारताच्या ध्वजाच्या रंगांमध्ये उजळून निघालेले सरदार सरोवर धरण .
धरणाच्या भिंतीवरून आकाशामध्ये विविध आकृती क्षणात तयार करणारे लेझर बीम . 
या प्रकाश प्रदूषणाचा त्रास निश्चितपणे इथल्या जंगलातील प्राण्यांना होत असणार आहे .परंतु हा सर्व खटाटोप मनुष्य प्राण्याला छान वाटावे म्हणून आहे असे एकंदरीत चित्र आहे .
दिवसा या धरणाच्या भिंतीकडे पाहिल्यावर इथे असे काही होत असेल यावर विश्वासच बसला नसता .

नर्मदा मातेच्या काठावरील उलूकेश्वर महादेवाचे मंदिर लाल खुणे ने दाखवलेले आहे . मी स्नान केले तो डोह शेजारीच दिसतो आहे . पुढे गरुडेश्वर लघु धरणामध्ये पाणी अडवले की हे सर्व पात्र पाण्याने भरून जाते . 
घुबडाला संस्कृतमध्ये उलुक असे म्हणतात . एका घुबडाने इथे तपस्या केली होती म्हणून या महादेवाचे नाव उलूकेश्वर पडले असे मला पंडितजींनी सांगितले .
गुरुजींच्या सोबत मी देवीची आणि महादेवाची सुंदर अशी आरती केली . मी घंटा वाजवत होतो . परंतु त्यांनी घंटा वाजवायला बंदी केली . शंख फुंकू लागल्यावर तो देखील थांबवायला लावला . एकंदरीत या मंदिराचे नियम काय आहेत आणि इथे काय काय करावे यापेक्षा काय काय करू नये हेच माझ्या लक्षात येत नव्हते . परंतु इतके बंधनकारक नियम अन्य कुठल्याही आश्रमात नसल्यामुळे काहीतरी वेगळे आहे इतके मात्र मला नक्की जाणवत होते . अधिक विचार न करता मी गुरुजींनी वाढलेला भोजन प्रसाद ग्रहण केला .हे गृहस्थ मध्य प्रदेश मधले होते . अतिशय सुंदर चविष्ट असे गरमागरम भोजन त्यांनी वाढले . 
सहा-सात टिक्कड , काळा गुळ आणि भरपूर भाजी होती . गुजरात मध्ये प्रवेश केल्यापासून भोजनाची लज्जत जी काही वाढली ती अक्षरशः लक्षात येण्यासारखी होती ! बदललेले पदार्थ आणि पदार्थांची संख्या , शिवाय तयार पदार्थ जेवणासाठी मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले . सदाव्रत जवळपास बंद झाले . असो .
भोजन प्रसाद घेतल्यावर मी थोडेसे चालावे म्हणून दुर्गा देवी मंदिराच्या मागे जाऊ लागलो . इतक्यात मला समोर झाडीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली . म्हणून मी पाहिले असता समोर एक खूंखार कुत्रा मला दिसला . सावधपणे मी मागे सरकलो . तो माझ्यावर गुरगुरत होता . अंधारामध्ये डोळे विस्फारून पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की इथे एक जाळी लावली होती . आणि तिच्या पलीकडे १२ - १५ भली दांडगी कुत्री होती ! थोडक्यात मी वाचलो होतो ! आता माझ्या लक्षात आले की गुरुजींनी मला इकडे तिकडे फिरू नको का सांगितलं होतं ! शिवाय गोशाळेकडे जाताना देखील मध्ये कुत्र्यांची ही जाळी लागत होती . म्हणूनच त्यांनी गोशाळेमध्ये सुद्धा जाऊ नको असे मला सांगितले होते . मी मनोमन त्या गुरुजींचे आभार मानले आणि पांघरूणामध्ये शिरलो . शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ?  असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ?
 तो मनुष्य सांगू लागला . 
सांगतो बाबाजी . सगळं सांगतो .  आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . 
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . 
ते का ? 
मी उपजत चौकसपणातून विचारले . 
कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे .
 काय ?महंतांचा खून ?
 होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा .
पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो .
आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . 
आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! 
मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . 
ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . 
माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . 
परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले .
पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील ! 
 हेच ते दुर्गा माता मंदिर . मागे नर्मदा मैया चे पात्र दिसते आहे . डावीकडे खाली हवन कुंड दिसते आहे तिथेच मी आसन लावले होते .
दुर्दैवाने गुगल फोटोमध्ये सुद्धा बंदोबस्तासाठी उभा असलेला पोलीस दिसतो आहे . पोलिसाच्या मागे जी गच्ची आहे तिथूनच मी लाईट अँड साऊंड शो पाहिला . उजव्या हाताला उलुकेश्वर महादेव आहेत .
शेजारीच प्राथमिक शाळा आहे . नाना थवडीया असे या गावाचे नाव आहे . नाना म्हणजे छोटे . डोंगरात मोटी थवडीया लागले होते . 
सकाळी उठून अधिक काही न बोलता मी हा आश्रम सोडला . आणि भल्या पहाटे भरपूर चालत गोरा कॉलनी गाव गाठले . गोरा कॉलनी हे नवीन वसविलेले आधुनिक पद्धतीचे गाव आहे . त्यामुळे इथली घरे रस्ते गल्ल्या सर्व आधुनिक पद्धतीचे आहे . एखाद्या गावाचे पुनर्वसन कसे करावे याचे हे एक आंतरराष्ट्रीय मापदंड ठरू शकेल असे उदाहरण आहे . 
एखाद्या गावाचे किती शिस्तबद्ध पुनर्वसन करता येऊ शकते याचे आदर्श उदाहरण म्हणजे गोरा कॉलनी . इथली घरे कशी एका रांगेत बांधलेली आहेत पहा .
हे गाव अगदी नर्मदा मातेच्या काठावरच बांधलेले आहे . पलीकडे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल बांधलेला आहे . शिवाय शूलपाणेश्वराचे नवीन मंदिर देखील इथेच आहे .
या गावाचे अवलोकन करत करत पुढे चालत होतो . एका दुकानदाराने चहा पाजला . तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला उंच टेकडावर शूलपाणीश्वराचे मोदींनी नवीन बांधलेले मंदिर दिसले . सुमारे २०० एकसारख्या पायऱ्या होत्या. प्रत्येक काही फुटावर उत्कृष्ट दर्जाची रोषणाई केलेली होती . त्यामुळे रात्री हे फार आकर्षक दिसते . पायऱ्या चढून गेल्यावर भव्य दिव्य मंदिर उभे केलेले आहे . मूळ शिवलिंग जागचे हलवता आले नाही त्यामुळे दुसरे शिवलिंग स्थापन केलेले आहे . मी एकाच दमा मध्ये या २०० पायऱ्या चढून वरती गेलो ! गंमत म्हणजे मला जरा देखील दम लागला नाही ! महादेवांचे शांततेमध्ये दर्शन घेतले . 
नर्मदा मातेकडून येताना याच पायऱ्या चढल्या की शूलपाणेश्वराच्या मंदिरात आपण येतो .
मंदिर आणि मंदिराचे आवार अति भव्य दिव्य असे बांधलेले आहे . मोठा खर्च सरकारने केलेला दिसून येतो .
मंदिरामध्ये स्थापन केलेले शिवलिंग नवीन असले तरी जुन्या शिवलिंगाचा फोटो मागील भिंतीवर लावलेला आहे त्याचे देखील दर्शन होते . 
पायऱ्यांवर केलेली रोषणाई रात्री खूप छान दिसते . अशीच विद्युत रोषणाई संपूर्ण सरदार सरोवर प्रकल्प परिसरामध्ये केलेले असून हे सर्व सौर विद्युत उर्जेवर चालते .
इथे खाली नर्मदा मातेवर पक्का घाट बांधलेला असून आजूबाजूचा परिसर पूल आणि किनारा यावर लावलेल्या दिव्यांमुळे नर्मदामाता फार सुंदर दिसते . इथे रोज संध्याकाळी नर्मदा मातेची आरती होते .
आरतीच्या वेळी , नर्मदा मातेच्या आरती मध्ये उल्लेख असलेल्या कोटी रतन ज्योती खरोखरीच नर्मदेमध्ये उतरल्यासारखे वाटते !
या मंदिराचे आवार अति भव्य आणि औरस चौरस पसरलेले आहे .जागोजागी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे .परंतु आमच्या शिवाय ( मी , मैय्या व महादेव )
तिथे अन्य कोणीच नव्हते . थोड्यावेळाने एक आई आणि तिचा तरुण मुलगा असे दोघे परिक्रमावासी आले .  त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा एकाच धावेमध्ये सगळ्या पायऱ्या उतरलो ! हे करायला दोन्ही वेळेस खूप मजा आली ! परिक्रमेमध्ये एका नव्या उर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो हे खरे आहे . खाली उतरल्या उतरल्या मला कोणीतरी सांगितले की इथे हरिधाम आश्रम आहे तिथे जावे . त्याप्रमाणे तो आश्रम शोधू लागलो . तत्पूर्वी नर्मदा मैया ची आरती होते तो घाट पाहून घेतला . खूपच आधुनिक पद्धतीने घाट बांधलेला आहे . 
समोरच्या उत्तर तटावरून पाहिले असता नर्मदा आरती घाट आणि शूलपाणेश्वर महादेवाचे मंदिर असे दिसते .
घाटावरून पुलाची रोषणाई रात्री खूप छान दिसते .

हा गोरा कॉलनी येथील पूल आहे
रात्री तो अधिक आकर्षक दिसतो
सर्वत्र रोषणाई केलेली आढळते . असा सुंदर घाट तुम्ही अन्यत्र कोठे पाहिला नसेल .

इथे नर्मदा मातेमध्ये करंजी लावलेली असून त्यावर सुंदर असा लेसर शो केला जातो .
असे लेझर शो या संपूर्ण पट्ट्यामध्ये जागोजागी ठेवलेले आहेत . व ते पर्यटकांचे आकर्षण आहे .
विशिष्ट गणवेश केलेली मुले नर्मदा मातेची आरती करतात
त्यांच्या हालचालीतले लालित्य बघण्यासारखे असते
घाटावर लावलेली नमामि देवी नर्मदे अशी गुजराती अक्षरे .
हरिधाम आश्रमाचा शोध मला लगेचच लागला . इथे श्री गुरु हरिचरणदासजी संस्कृत पाठशाळा नावाची शाळा असून त्या शाळेच्या समोरच हरि धाम आश्रम आणि श्रीराम मंदिर बांधलेले आहे . या आश्रमामध्ये साधू लोक अधिक मुक्कामाला आहेत असे माझ्या लक्षात आले . आश्रमाचे कामकाज अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले होते . संस्कृत वेदपाठ शाळेची मुले संपूर्ण आश्रम सांभाळत होती त्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणि चैतन्य होते . मी गेल्याबरोबर मला बालभोग घेण्यासाठी सर्वांनी बसविले . बालभोग खाऊन झाल्याबरोबर रामाची उपासना आणि आरती वगैरे होती . त्यासाठी देखील सर्व साधू मंडळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले होते . आश्रमातून आत गेल्याबरोबर डावीकडे राम मंदिर होते आणि समोर साधूंच्या विश्रामासाठी एक मोठा कक्ष बांधलेला होता . तिथे आसन लावण्याची सूचना मला आश्रमातील मुलांनी केली . मी त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर अनेक जुने परिक्रमावासी मित्र भेटले आणि सर्वांनी पुन्हा एकदा जल्लोष केला ! ते पाहून आधीच तिथे बसलेले काही साधू वैतागले . कर्नाटकातील मंगलोर चा अशोक कुमार ,अमरकंटक इथे भेटलेला भूषण स्वामी , वडवणीचे तुकाराम बुवा सुरवसे , मी १३० पोळ्या लाटल्या तेव्हा मदतीला आलेला साधू असे अनेक जुने परिक्रमावासी मित्र मला या ठिकाणी भेटले ! सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या ! हे सर्वजण सडक मार्गाने येथे आले होते . सर्वांनी माझ्याकडून शूलपाणी ची झाडी कशी आहे ते जाणून घ्यायला सुरुवात केली . अजूनही काही साधूंची इथे नव्याने ओळख झाली . काही साधू भ्रमणामध्ये येथे आलेले होते . इथे मला एक भोपळ्याचा तुंबा किंवा कमंडलू सापडला . भूषण स्वामी आणि मी दोघांना तो आवडला आणि आम्ही दोघांनी तो स्वच्छ धुऊन घेतला . भोपळ्याच्या कमंडलूचे तंत्र असे असते की त्याचे आतील गर माऊ असल्यामुळे सतत निघत राहतो व तो रोज घासावा लागतो . हा कमंडलु सुंदर फिकट पिवळ्या रंगाचा होता . त्यावर छान पेंटिंग काढावे असे भूषणने मला सुचवले . कारण तो स्वतः एक कमर्शियल आर्टिस्ट होता . मला देखील ती कल्पना आवडली . इथून खाली गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर असा घाट होता . तिथे जाऊन मी स्नान आदि सर्व आटोपून घेतले . छोट्याशा पायऱ्या होत्या परंतु पाणी खूप स्वच्छ होते . त्यामुळे जागेवर स्नान करता आले . आश्रम सांभाळणाऱ्या स्वामींची सुंदर अशी आधुनिक कुटी इथे उभी केलेली होती . 
हरिधाम आश्रमाचे प्रवेशद्वार . डावीकडे राम मंदिर असून समोर लाल गाडीच्या मागे जी खोली आहे तिथे आम्ही उतरलो होतो .
समोर आदिवासी मुलांसाठी प्राथमिक संस्कार शाळा आहे .
त्याचबरोबर हरिचरणदास संस्कृत विद्यालय देखील समोरच आहे
डाव्या बाजूला रामाचे सुंदर मंदिर आहे .
उजव्या बाजूला ज्या स्वामींचा फोटो लावला आहे त्यांचे अप्रतिम असे दर्शन आणि सत्संग मला लाभला . दुर्दैवाने पुढे लवकरच त्यांनी देह ठेवला असे परिक्रमेत च कळाले .
या आश्रमामध्ये साधूंचा सतत राबता असतो .
रामाचा विग्रह सुंदर असून याची पूजा अर्चा देखील उत्तम प्रकारे केली जाते व स्वच्छता चांगली ठेवली जाते .

नर्मदा मातेकडे जाणारा सुंदर छोटासा घाट
इथून सरदार वल्लभभाई पटेल यांची पाठमोरी मूर्ती फारच छोटीशी लांब वर दिसते आहे पहा .
आपण आता या मूर्तीला बरेच मागे टाकलेले आहे .
नर्मदा मातेची पूजा करण्याची प्रत्येक भागातली वेगळी पद्धत आहे इथे अशा प्रकारचे दिवे ओवाळले जातात .
स्नान करून परत येताना आश्रमातील प्रमुख स्वामीजींचा चांगला सत्संग लाभला . त्यांची कुटी खूप छान होती .
नर्मदा मातेकडे तोंड करून असलेली सद्गुरु हरिचरणदास स्वामीजींची कुटी

पुन्हा एकदा साधूनिवासामध्ये आलो . या वास्तूला सत्संग हॉल असे नाव दिले होते . आणि नावाप्रमाणे इथे खरोखरीच सत्संग घडत होता . या आश्रमाचे दोन मुख्य अध्वर्यू जे संत होते त्यांचे फोटो दारात लावलेले होते .
परमहंस सद्गुरु भगवान श्री रणछोडदास जी महाराज
आणि सद्गुरु श्री हरिचरणदासजी जी महाराज
यातील दैव दुर्विलासाचा भाग असा की सद्गुरु हरिचरणदासजी महाराज यांचे दर्शन आणि सत्संग मला लाभला . तो दिनांक होता २४ मार्च २०२२ . आणि यानंतर तीनच दिवसांनी महाराजांनी आपला देह पंचतत्वात विलीन केला . ही बातमी पुढे परिक्रमेमध्ये मला कळाली . माझे भाग्य थोर की अशा संतांचे सदेह दर्शन मला लाभले . 
या महाराजांना नरेंद्र मोदी देखील मानत असत .
विविध कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी नेहमी इथे यायचे
हाच तो सत्संग हॉल जिथे आम्ही सर्वजण सत्संग करीत बसलो होतो .
त्या दिवशी इथे वीस पंचवीस तरी साधू होते .
या सत्संग हॉलमध्ये एक गंमत घडली .
दुपारी एक क्षणभर मला डोळा लागला . आणि एक स्वप्न पडले त्याच्यामध्ये मला तो कमंडलू दिसू लागला जो मी सकाळी मिळवला होता . मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात . ज्या कमांडोरीचा माझा परिचय होऊन काही तास सुद्धा झाले नाहीत तो थेट स्वप्नामध्ये यायला लागला याचा अर्थ तो माझ्या मनामध्ये फारच खोल शिरला आहे हे लक्षात आल्यामुळे पुढे त्याचा त्रास वाढण्यापूर्वी आत्ताच तो नष्ट करावा असा विचार करून मी तो कमंडलू एका साधूला जागेवर देऊन टाकला! सुंठी वाचून खोकला गेला ! मला हलके हलके वाटू लागले . 
आश्रमाची शिस्त अतिशय कडक होती . सर्व वेळा काटेकोरपणे पाळल्या जात .
आश्रमाचे व्यवस्थापक असलेल्या महाराजांशी देखील थोडे बोललो आणि इथल्या कामाची माहिती घेतली .
आश्रमाशी संपर्क साधण्यासाठी पत्ता असा आहे . संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे .
आश्रमाती सामानाची ने आण करायला एक मजेशीर रिक्षा तिथे ठेवलेली होती . 
एकंदरीत या आश्रमातील मुलांची आणि साधूंची स्वयंशिस्त आणि नीटनेटकेपणा तसेच टापटीप मला खूप आवडली . मुख्य महंत चांगला असला की आश्रम अतिशय सुव्यवस्थेत राहतो असा माझा अनुभव आहे .
इथे अधिक काळ थांबलो असतो तर सर्वांशी गप्पा झाल्या असत्या म्हणून मी पुढे निघण्याचा निर्णय घेतला . शूल पाणीची झाडी संपली तरी अजून अश्वत्थामा काही भेटला नाही ! असे वाटावयास नको म्हणून मैयाने एक मजेशीर ठिकाण मला दाखविले ! या ठिकाणी गेलो ते फार बरे झाले असे नक्की वाटते ! हे ठिकाण संस्मरणीय असेच होते! 

 लेखांक ९३ : वाल्मिकी आश्रम बोरिया इथले अश्वत्थाम्याने स्थापन केलेले श्री माखणेश्वर शिवलिंग

दुपारी निघाल्यावर नर्मदा मातेच्या किनाऱ्याने जावे असा विचार करत असतानाच एका साधूने सांगितले की इथून केवळ पाच किलोमीटर अंतरावर अश्वत्थाम्याची तपोभूमी आहे . तिचे दर्शन अवश्य करावे . बोरिया नावाचे हे गाव आहे . इथे अश्वत्थामा स्वतः राहिलेला असून त्याने स्वतःच्या हाताने माखनेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केलेले आहे . इथून नर्मदा मातेचा तट केवळ तीन किलोमीटर आहे . आल्यासरशी या स्थानाचे दर्शन करावे असा विचार केला , आणि बोरिया बिस्तर उचलून डांबरी सडकेने चालत बोरिया गाव गाठले . गावामध्ये शेती आणि झाडी चांगली होती . अश्वत्थाम्याच्या कठोर तपामुळे महादेव त्याला इथे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याच्या कपाळाला माखन लावले अर्थात लोणी लावले म्हणून या महादेवाचे नाव माखनेश्वर / माखणेश्वर किंवा नवनीतेश्वर असे पडले . (गुजराती मध्ये माखणेश्वर असे म्हणतात ) . त्यामुळे इथे असलेल्या शिवलिंगाला पाण्यासोबतच लोण्याने देखील लेप केला जातो . इथल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की याचा आकार दरवर्षी थोडा थोडा वाढत आहे . पूर्वी अतिशय छोटे असलेले हे शिवलिंग आता जलहरीच्या देखील बाहेर आलेले आहे . गणपतीपुळे मूळ गाव असलेले बडोद्याचे कमलाकर बापट नावाचे एक परिक्रमावासी वयाच्या २८ व्या वर्षी या क्षेत्रामध्ये आले .त्यांनी शूलपाण्याची झाडी आणि तिथले कठीण लोकजीवन अनुभवले होते . त्यामुळे या भागातील मुलांसाठी काहीतरी भरीव कार्य करावे या हेतूने या मंदिरामध्ये ते राहिले आणि आपल्या सोबत आदिवासी मुलांना शिक्षणासाठी ते ठेवू लागले . हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली . आणि कमलाकर महाराज संपूर्ण आदिवासी क्षेत्रामध्ये लोकांना माहिती झाले . हा मनुष्य निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांची शिक्षणे मोफत करून देत आहे हे कळाल्यामुळे या परिसरातील जवळपास सर्व महत्त्वाच्या गावातील मुले इथे राहून शिकून गेली . आज या आदिवासी वस्तीगृहामध्ये २५० ते ३०० मुले शिकत आहेत .या वसतिगृहाला त्यांनी वाल्मिकी आश्रम असे नाव दिले . ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला त्याप्रमाणे रानोमाळ भटकणाऱ्या , आणि कुसंगतीमुळे व्यसनाधीनतेकडे झुकणाऱ्या मूलतः तापट स्वभावाच्या आदिवासी मुलांचे शिक्षणाद्वारे कल्याण करण्याचे महत्त्वाचे कार्य कमलाकर महाराजांनी केले . त्यामुळे हे नाव समर्पक वाटते . या आश्रमाचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे . इथे प्रवेश घेण्यासाठी कुठलीही प्रक्रिया नाही . कुठलेही कार्यालय नाही . कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही . कुठलीही कागदोपत्री नोंद ठेवली जात नाही . ज्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी यावे , इथे राहावे , खावे , प्यावे , अभ्यास करावा आणि योग्य वाटेल तेव्हा निघून जावे .इतके सोपे गणित कमलाकर महाराजांनी ठेवलेले आहे ! महाराजांनी कुठलाही ट्रस्ट स्थापन केलेला नाही आणि कुठल्याही बँकेत त्यांचे खाते सुद्धा नाही . तरी देखील एवढ्या सार्‍या मुलांचे सर्व काही नर्मदा मैया करते आहे असा त्यांचा पक्का विश्वास आणि अनुभव देखील आहे .या आश्रमामध्ये पोहोचल्यामुळे मला जी काही धन्यता वाटली ती शब्दात व्यक्त करता येणे अवघड आहे . 
मी आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा कमलाकर महाराज बाहेर गेले होते . यांचे वय आता ७५ च्या पुढे गेलेले आहे . परंतु कोणीतरी परिक्रमावासी आपल्या आश्रमामध्ये आलेला आहे हे पाहिल्याबरोबर चार-पाच मुले मला सामोरी आली . सर्वांनी मला नर्मदे हर केले आणि दंडवत प्रणाम केला . मी देखील सर्वांना नमस्कार केला . परस्पर देवो भव । त्यांनी मला मी कुठून आलो वगैरे विचारून घेतले . आज मुक्काम करणार आहे का असे न विचारता आज तुम्ही आमच्या सोबत मुक्काम करा अशी गळ मला घातली ! त्यांच्या या प्रथम दर्शनी प्रेमानेच मी पुरता भारावून गेलो ! वयाच्या नवव्या वर्षापासून मी वसतिगृहामध्ये राहून शिकलेलो आहे . त्यामुळे वस्तीगृहामध्ये कोणीतरी पाहुणे आले आणि त्यांनी आपल्याला लळा लावला की किती छान वाटते याचा अनुभव मी बालवयात घेतलेला आहे . ते गणित डोक्यात ठेवूनच माझे लहान मुलांशी वागणे आपोआप होत असते . मुलांनी माझी झोळी काढून घेतली आणि एका झाडाखाली ठेवली . आणि मला हातपाय धुवायला एका नळावर घेऊन गेले . एका मुलाने पटापट पायावर पाणी घातले एकाने हात धुवायला पाणी दिले . तोपर्यंत अजून एक मुलगा पळत आला आणि त्याने सांगितले की अश्वत्थामा इथे तप करायचा ! चला तुम्हाला मी ती जागा दाखवतो ! हे बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये इतका आत्मविश्वास आणि त्या जागेविषयी मालकी हक्क असल्यासारखा भाव होता की मला मौज वाटली ! सगळे लटांबर आणि मी माखणेश्वर मंदिरामध्ये आलो . महादेवाचे शिवलिंग अतिशय सुंदर होते . यापूर्वी केदारनाथ येथील शिवलिंगाला तूप चोळण्याचा अनुभव मी घेतला होता . केदारनाथचा प्रलय झाल्यानंतर अक्षरशः दोनच महिन्यांनी मी तिथे गेलो होतो . आणि निसर्गाने केलेला भयंकर विध्वंस याची देही याची डोळा पाहिला होता . तेव्हा तर तिथे जाणारा रस्ता देखील वाहून गेल्यामुळे सुरू झालेला नव्हता . आता जी काही बांधकामे पायऱ्या वगैरे दिसतात त्यातील काहीच नव्हते . फक्त भारतीय लष्कराने उभे केलेले तात्पुरते तंबू आणि एक छोटासा हेली पॅड होता . फक्त हेलिकॉप्टरने जाता येत होते . त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती . बराच वेळ मी त्या गाभाऱ्यामध्ये बसून राहिलो होतो . आणि त्या शिवलिंगाचा स्पर्श अगदी परिचयाचा झालेला होता . १००% तसाच स्पर्श या माखनेश्वर शिवलिंगाचा होता .
केदारेश्वराचे शिवलिंग म्हणजे रेड्याच्या वशिंडाचा भाग आहे असे मानले जाते . त्याची आख्यायिका थोडक्यात सांगतो . पांडव स्वर्गाला जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितले की या क्षेत्रामध्ये महादेवांचा वास आहे . परंतु महादेवांना काही कारणामुळे पांडवांना दर्शन देण्याची इच्छा नव्हती . त्यामुळे त्यांनी एका रेड्याचे रूप घेतले . आणि हजारो रेड्यांचा एक कळप चरत होता त्यात ते शिरले . पांडवांना महादेवांचे दर्शन घेण्याची इच्छा असल्यामुळे भीमाने युधिष्ठराला विचारले की आता महादेवांना ओळखायचे कसे ? त्यांनी सांगितले की या कळपातील एक रेडा म्हणजे महादेव आहेत तरी तू अशी काहीतरी युक्ती कर ज्यामुळे तुला त्यातील महादेव कोण आहेत ते लक्षात येईल . भीमाने दोन डोंगरांवर पाय ठेवून त्याच्या पायाखालून नकुल आणि सहदेव यांना ,सर्व रेड्यांना हाकलायला सांगितले . सर्व रेडे पळाले परंतु महादेव काही त्याच्या पायाखालून जायला तयार होईनात . हेच महादेव होते परंतु भीमाला हा रेडा आपल्या पायाखालून जात नाही यामुळे राग अनावर झाला आणि त्याने गदेचा प्रहार जोरात त्या रेड्याच्या पाठीवर केला . त्यामुळे हे महादेव भूमिगत झाले . आणि केवळ त्यांचे वशिंड शिल्लक राहिले . डोके जमिनीत घुसून नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात बाहेर आले . आणि शेपटीचा भाग पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर कुठेतरी बाहेर आलेला आहे . तो आता मुस्लिम देश झाल्यामुळे ते मंदिर नष्ट झाले . परंतु केदारनाथ अजून शिल्लक आहे . नंतर सर्वांना पश्चाताप झाला आणि महादेवांना पाठीला लागले असेल म्हणून तूप चोळायला सर्वांनी सुरुवात केली . आजही ती प्रथा कायम आहे . मी स्वतः अनुभव घेतला आहे की कितीही तूप चोळले तरी हे शिवलिंग त्या तुपाला शोषून घेते . आणि क्षणात तुमचे हात पुन्हा पहिल्यासारखे स्वच्छ होतात . अगदी तशीच अनुभूती माखणेश्वर महादेवाच्या इथे येते .कितीही लोणी लावले तरी ते शोषून घेतले जाते . आणि हाताला मेंचटपणा राहत नाही .अर्थात माझ्याकडे लोणी नव्हते त्यामुळे मला स्वतःला हे करण्याचे भाग्य लाभले नाही . मी मुलांशी गप्पा मारू लागलो . इतकी अफाट माहिती या मुलांना आहे की विचारू नका . मी येताना कुठल्या कुठल्या मार्गाने आलो ते त्यांना सांगितले आणि माझ्या असे लक्षात आले की इथल्या प्रत्येक मुलाचे भूगोलाचे ज्ञान अफाट आहे . जवळपास प्रत्येक मुलाला आसपासच्या प्रत्येक गावाची नावे माहिती होती . मी एखाद्या गावाचे नाव घेतले की त्या गावातील मुलाला धावतच जाऊन हजर केले जायचे ! मुळात वरती वसतिगृहामध्ये असलेल्या मुलांमध्ये देखील हा नवीन प्राणी कोण आला आहे त्याला भेटावे अशी उत्कंठा आहे हे माझ्या लक्षात आले . त्यामुळे मुलांना घेऊन मी स्वतः वरती त्यांच्या निवासस्थान असलेल्या खोल्यांमध्ये गेलो . मी आत मध्ये येतात मुलांना काय करू आणि काय नाही काय दाखवू आणि काय नाही असे झाले ! मुलांनी त्यांनी केलेले प्रकल्प दाखवायला सुरुवात केली . कोणी शाळेतल्या वह्या दाखवल्या . कोणी तोडून आणलेली फळे दाखवली . कुणी गोळा केलेल्या बिया दाखवल्या . कोणी फक्त समोर येऊन हसून दाखवले ! सगळी मुले माझ्या मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेली होती ! त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून गालावरून हात फिरवला की त्यांना खूप बरे वाटत होते ! आई-वडिलांपासून दूर राहून सरकारी शाळेत जाऊन शिकणारी ही मुले त्यांच्या उपजत कुतूहलापोटी आणि चौकसपणामुळे माझ्या भोवती गराडा करून बसली ! इथल्या जवळपास प्रत्येक मुलाने मला येऊन मिठी मारली ! लवकरच त्यांच्या लक्षात आले की हा परिक्रमावासी हाड हुड करणारा नसून प्रेमळ आहे . माझ्याकडे उरलेल्या सर्व गोळ्या मी इथे वाटून टाकल्या . प्रथेप्रमाणे चित्रकलेचा वर्ग सुरू झाला . इथल्या मुलांनी मोठ्या प्रमाणात माझ्याकडून चित्रं काढून घेतली . शहरी मुलांमध्ये मुख्यत्वे पालकांकडून शिकवण्यात झालेल्या चुकीमुळे आलेली एक आपापसातील चढाओढ या मुलांमध्ये कुठेही दिसत नव्हती . आधी माझेच चित्र काढा वगैरे कोणीही मला म्हणाले नाही तर मी ज्या क्रमाने वह्या हातात घेईन , त्या क्रमाने चित्रे काढून घेण्यात मुलांनी धन्यता मानली ! हा गुण किती शिकण्यासारखा आहे विचार करून पहा ! मुख्य म्हणजे इथे मुलांना शिकवणारे कोणीही नाही . मुलांनी संपूर्ण वस्तीगृहाचा परिसर मला फिरवून दाखविला . खाली मोठे स्वयंपाक घर आहे . त्याच्यामध्ये भांडीकुंडी आणणे , ती लावणे , ती वापरून , घासून ठेवणे , स्वयंपाक करणे , त्याची पूर्वतयारी करणे , केलेला स्वयंपाक वाढणे , ही सर्व कामे मुले स्वतः आपापल्या इच्छेने आणि आपापल्या जबाबदारीने आवडीनुसार करतात . त्यासाठी कुठलीही नियमावली नाही किंवा कुठलेही बंधन कोणावरही नाही . मी आतापर्यंत अनेक वसतिगृहे पाहिली आहेत . अक्षर भारती नावाची एक संस्था स्थापन झाल्यापासून मी तिचा संस्थापक सदस्य होतो . ५० जणांनी मिळून चालू केलेले हे कार्य पुढे इतके वाढत गेले की आम्ही जवळपास ४०० पेक्षा अधिक ग्रंथालयं , ७ राज्यात त्या काळात उभी केली होती . आणि यातील प्रत्येक ग्रंथालयाचे मूल्य चाळीस हजार ते एक लक्ष रुपये इतके  होते . यानिमित्ताने अनेक शाळांची आणि वसतिगृहांशी माझा संबंध यायचा . मी वैयक्तिक देखील अनेक आदिवासी वसतिगृहांमध्ये जाऊन राहिलेलो आहे . पुण्यातील वेल्हा ज्याचे नाव आता राजगड तालुका झाले आहे त्या वेल्हा गावातील संघसंचलित वनवासी मुलांचे वसतीगृह देखील असेच खूप सुंदर आहे . अतिशय सेवाभावी वृत्तीने हे चालवले जाते . परंतु त्या प्रत्येक वस्तीगृहाची थोडीफार काहीतरी शिस्त असायची . इथे कुठलाही नियम नसून मुलांमध्ये असलेली स्वयंशिस्त पाहून मी अक्षरशः अचंबित झालो ! संध्याकाळ झाल्यावर मुलांनी आपण होऊन आश्रमाची स्वच्छता सुरू केली . झाडू किंवा हातात मिळेल त्या झाडाची फांदी घेऊन अक्षरशः पाचच मिनिटांमध्ये संपूर्ण परिसर मुलांनी एकदम चकाचक करून टाकला .हे करा असे त्यांना कोणीही सांगितलेले नव्हते परंतु एक कोणीतरी करतो आहे पाहिल्यावर बाकीची लहान मुले त्याचे अनुकरण करत आणि अशा पद्धतीने हे संस्कार ही परंपरा पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित केली जात होती . आपल्या घरी देखील लहान मुले असतील तर आपण हा प्रयोग करून पहावा की त्यांना अमुक एक गोष्ट कर असे सांगण्यापेक्षा त्यांच्यासमोर आपण ती गोष्ट केली तर मुले अधिक सहजतेने त्याचे अनुकरण करतात कारण तो त्यांचा मूळ स्वभाव आहे . 
वाल्मिकी आश्रमातील मुलांसमवेत प्रस्तुत लेखक
स्वयंस्फूर्तीने हातात मिळेल त्या फांदीच्या साह्याने झाडलोट करताना आदिवासी मुले . मला बळेच देखरेख करायचे काम त्यांनी सोपवून दिले !
आपल्या देशाची खरी संपत्ती जर काही असेल तर ती म्हणजे अशी सद्वर्तनी मुले आहेत
प्रत्येक मुलगा स्वतंत्रपणे काही ना काही करत आहे हे वरील चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल
मुलांनी आश्रम फिरवून दाखवता दाखवता माझ्याकडून परिक्रमेची भरपूर माहिती विचारून घेतली . इथली सर्व व्यवस्था कोण पाहते असे विचारल्यावर त्यांनी प्रकाश दादा असे नाव सांगितले . याच आश्रमामध्ये शिकून बाहेर पडलेला प्रकाश नावाचा विद्यार्थी आता सपत्नीक तिथे राहून या सर्व मुलांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेत होता . थोड्याच वेळात प्रकाशदादा आले . मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आश्रमाची कार्यपद्धती समजून घेतली . मला प्रकाश दादाशी बोलल्यावर कमलाकर महाराजांना भेटण्याचे वेध लागले . गेली ५० - ६० वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये असून या माणसाबद्दल तुम्हाला कुठेही काहीही लिहायला वाचायला पाहायला मिळणार नाही . त्यांचा साधा एक फोटो किंवा एखादा व्हिडिओ सुद्धा सापडणे दुरापास्त आहे . 
मोठ्या कष्टाने मला ही एक बातमी मिळाली . यावर कमलाकर महाराजांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे . आदिवासी मुलांचे टोकाचे कल्याण करणाऱ्या या लोकोत्तर महात्म्याला शतशत नमन !
अखेरीस माझी महाराजांना भेटण्याची तळमळ पाहून प्रकाश तडवी यांनी महाराजांना फोन लावला आणि बोलावून घेतले . कमलाकर महाराज त्यावेळी फोनवर माझ्याशी बोलले आणि म्हणाले की प्रत्यक्ष भेटून बोलूयात .मी येईपर्यंत आश्रम सोडू नका. आता सुद्धा मी प्रकाशभाई तडवी यांचा क्रमांक कमलाकर महाराजांकडून घेतला आणि त्यांना बँकेच्या माहितीकरता संपर्क केला तेव्हा त्यांना हा प्रसंग आठवला . 
आमच्या नुकत्याच झालेल्या इ संभाषणाचा काही भाग !
हजारो परिक्रमावासी या आश्रमांमध्ये येत असतात . त्यातून एखादी व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवते तेव्हा ती नर्मदा मातेचीच कृपा !

आपणही कमलाकर महाराजांना संपर्क साधण्याऐवजी थेट प्रकाश भाई तडवी यांच्याशी संपर्क करू शकता . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे .
प्रकाशभाई तडवी : ९७ २७ ८८८ ३१५
इच्छुक देणगीदारांसाठी बँकेची माहिती खालील प्रमाणे .
BOB KEVDIA COLONI
VALMIKIASHRA
A/C NO....13280100013558
IFSC ....BARB0KEVADI
(कृपया देणगी दिल्यावर तसे प्रकाशभाई यांना व mazinarmadaparikrama@gmail.com वर कळविणे ही नम्र प्रार्थना म्हणजे आपल्या यादीमध्ये नाव जोडता येते . . .)
या मुलांची संध्याकाळी शाखा लागते . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेल्यामुळेच कमलाकर महाराज या अध्यात्मिक मार्गाकडे वळले होते . संघासाठी त्यांचे संपूर्ण जीवन समर्पित राहिलेले आहे . परंतु त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनामध्ये देखील त्यांनी संन्यस्त वृत्तीचा स्वीकार केलेला आहे . त्यामुळे तोच संस्कार या मुलांना देखील मिळावा यासाठी प्रथम पासून येथे शाखा लागते .शाखेचे अप्रतिम संचालन मुलेच करतात . इथे एक सुंदर असा तीन मंदिरांचा समूह आणि त्यामुळे बांधलेला कट्टा होता . त्या कट्ट्यावर बसून मी संपूर्ण शाखा आणि त्यांचे खेळ पाहिले . महादेवाच्या मंदिरासमोर एक झोपाळा होता . त्यावर देखील मुलांसोबत गप्पा मारत बसलो . याखेरीज एका बाजूला भव्य दिव्य असे व्यासपीठ बांधण्यात आलेले आहे . तिथे सुद्धा मुले मला घेऊन बसली . या मुलांना मला कुठे नेऊ आणि कुठे नको असे झाले होते . या मुलांचे शेतीतले वनस्पतींचे आणि पर्यावरणाचे ज्ञान पाहून मी अचंबित झालो . विशेषतः या मुलांना कुठलेही बंधन नसल्यामुळे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा कुठेही जायचे त्यांना स्वातंत्र्य होते . आदिवासी समाज हा मुळात स्वतंत्रपणे जगणारा आहे .त्यांना बंधनामध्ये जगणे आवडत नाही म्हणून तर त्यांनी शहरे ,नगरे ,गावे यांचा त्याग करून डोंगरदऱ्या राहण्यासाठी निवडल्या . अशा स्थितीमध्ये त्यांना शिक्षणाच्या नावाखाली पुन्हा बंधनामध्ये अडकवणे कमलाकर महाराजांना पटणारे नव्हते . आणि हे केवळ बोलण्यात नव्हे तर वास्तवात आणलेले दिसत होते ! मी माझी संध्याकाळची उपासना करून घेतली . आणि साक्षात भगवंत आलेच ! कमलाकर महाराज आल्याबरोबर मुलांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव मी स्वतः पाहिले ! मी देखील वस्तीगृहामध्ये राहिलो आहे . आमचे रेक्टर आले की आमच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जायचा आणि हातपाय थरथर कापायला लागायचे ! इतकी त्यांची दहशत होती . इथे मात्र बरोबर उलटे चित्र होते . कमलाकर महाराज आल्याबरोबर मुलांनी त्यांना गराडा घातला . ते कुठे गेले होते काय काय करून आले अशा प्रश्नांची सरबत्ती केली . महाराजांनी देखील न कंटाळता न थकता सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . महाराजांची खोली म्हणजे उघडी तिजोरी होती ! आओ जाओ घर तुम्हारा ! ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे अशी मुले त्यांच्या खोलीत येऊन अभ्यास करत बसली होती .ज्या मुलांना झोप येत नाही ती मुले इथे येऊन झोपू शकतात . काही मुले तर महाराज आले तेव्हा त्यांच्या बेडवर आधीच झोपलेली होती ! तरी देखील महाराज त्यांना काहीही बोलले नाहीत ! मी महाराजांना साष्टांग नमस्कार केला . भगवे कपडे घातलेले अनेक लोक परिक्रमेमध्ये भेटतात . परंतु या भगव्या कपड्याचे सामर्थ्य जाणून आणि जबाबदारी पेलून त्याची गरिमा वाढवणारे फार थोडे लोक असतात त्यातील एक कमलाकर महाराज निश्चितपणे होते ! महाराजांनी मला भरपूर वेळ दिला . माझ्या सर्व बालिश आणि मूर्खपणाच्या प्रश्नांची उत्तरे दिली . आदिवासी शिक्षण या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच त्यांनी बदलून टाकला ! शहरामध्ये राहून किंवा नागरिकरणा मध्ये राहून शिक्षणाविषयी काही ठोकताळे आपल्या मनामध्ये बसलेले असतात त्यातील एकही या भागात चालणारा नसतो . मुलांना मुक्त वातावरण मिळवून देणे आणि चांगले पोषण देणे , त्यांचा शारीरिक , मानसिक , बौद्धिक , भावनिक आणि अध्यात्मिक विकास करणे हेच अधिक महत्त्वाचे आहे . एकदा हे ध्येय निश्चित झाले की मार्ग कुठलाही असू शकतो . बरेचदा असे होते की ध्येय मागे पडून मार्गाच्या नियमांमध्येच आश्रम शाळा आणि वसतीगृहे अडकत जातात . एखादी गोष्ट का करायची यापेक्षा कशी करायची यात अडकून पडले की असे होते . परंतु इथे मात्र कमलाकर महाराजांनी असामान्य बुद्धीचातुर्याने सर्व मॉडेल उभे केलेले होते ! माझी अशी विनंती आहे की ज्यांना ज्यांना वसतिगृह चालवण्याची इच्छा आहे किंवा आधीचीच वसतिगृहे जे लोक चालवत आहेत त्यांनी नक्की वाल्मिकी आश्रमाला एकदा भेट देऊन त्यांचे मॉडेल समजावून घ्यावे .
आपल्याला एकदा या आश्रम शाळेची फेरी करवितो .
गुगल नकाशा वरून साभार प्राप्त झालेली खालील छायाचित्रे आपल्याल वाल्मिकी आश्रमाचे यथार्थ दर्शन घडवतील .
बोरिया किंवा बोडिया गावाच्या चौकातून अतिशय गर्द वनराजीतून जाणारा एक छोटासा रस्ता आपल्याला या आश्रमात घेऊन येतो . 
वाल्मिकी आश्रमाची मुलांनीच बांधलेली आणि सांभाळलेली नवीन इमारत
खाली भोजन सभागृह आहे आणि वरती मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था आहे .
इथे कमलाकर महाराजांची खोली असून तिला महाराजांची खोली म्हणणे चुकीचे आहे कारण त्या खोलीमध्ये त्यांच्यापेक्षा अधिक काळ मुलेच फिरत असतात . मुलांना इथे अक्षरशः कुठलेही बंधन नाही आणि कुठलीही गोष्ट करू नकोस असे कोणी ऐकवत नाही . तरीदेखील मुले स्वयंशस्तीने राहतात आणि कुठलाही अपराध कधीच करत नाहीत हे खरोखरच कौतुकास्पद आहे .
गरुडेश्वर आणि शूलपाणेश्वर या दोन मंदिरांपासून समान अंतरावर आणि सरळ रेषेत वाल्मिकी आश्रम आहे . 
या माखणेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार कमलाकर महाराजांनी केलेला असून या परिसरातील सर्व मंदिरांची पूजाअर्चा आदिवासी मुलेच करतात . 
मंदिराशेजारी असलेल्या याच हातपंपावर मुलांनी मला हात पाय धुवायला मदत केली ! 
आश्रमाच्या शेजारीच मंदिर आहे . समोर प्रचंड झाडी आहे . मोठी मोठी झाडे सतत सावली धरून आहेत .
विशेषतः काही झाडे नजरेत भरण्याइतकी मोठी आहेत .इथली आदिवासी मुले लीलया या झाडांवर चढतात आणि खेळत असतात .
हेच ते मोठे व्यासपीठ जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि मुलांनी माझ्याबरोबर काही काळ इथेच गप्पा मारल्या .
मंदिरासमोरील या झोपाळ्यावर बसून मुलांशी अनेक विषयांवर चर्चा करता आली
वाल्मिकी आश्रमाची इमारत अत्यंत मजबूत असून ३०० मुले इथे आरामात राहू शकतात अशी सोय केलेली आहे .
मुलांसाठी फोमच्या आरामदायक गाद्या बनविलेल्या असून जमिनीवरती त्या अंथरून मुले झोपतात
प्रत्येकाने आपापला एक पेटारा आणलेला असतो ज्यात त्याचे सामान कुलुप बंद ठेवलेले असते .
यातही कुठलेही बंधन नसते कोणीही आपले समान कुठल्याही कप्प्यात ठेवू शकते . आदिवासी समाजामध्ये एक उपजत शिस्त असते त्यामुळे त्यांना प्राधान्य किंवा ठरलेली जागा वगैरे द्यावी लागत नाही ते आपोआप स्वतःमध्ये तडजोड करून सर्व काही वाटून घेतात .
अशी दोन मोठी मोठी दालने आहेत . शिवाय अनेक छोट्या मोठ्या खोल्या देखील आहेत . प्रकाश भाई तडवी आणि त्यांची पत्नी मुलांची पोटच्या पोराप्रमाणे देखभाल करतात .
इथे सायं शाखा लागते . उपस्थिती अजिबात अनिवार्य नाही . परंतु तरीही सर्व मुले स्वेच्छे ने सहभागी होतात . 
शाखेमध्ये विविध खेळ घेतले जातात . यातून आपोआप मुलांचे अंगभूत गुण बाहेर पडतात आणि गटकार्य करण्याची सवय तसेच नेतृत्व देखील विकसित होते .
मुलांना ही शाखा खूप आवडते असे माझ्या लक्षात आले .
ह्याच कट्ट्यावर बसून मी हा सारा खेळ पाहत होतो . हा कट्टा यज्ञकुंड सारे मुलांनी तयार केलेले आहे .
इथली पूजा अर्चा देखील मुलेच पाहतात .या मुलांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे . आणि श्री कमलाकर महाराज यांना द्यावेत तितके धन्यवाद अपुरे आहेत .
रात्र पडली तशी सर्व मुले आपण होऊन अभ्यासाला लागली . मी कमलाकर महाराजांच्या खोलीमध्ये त्यांच्या चरणाशी बसून त्यांचा सत्संग अनुभवला.
रात्री मुलांनीच  बनविलेल्या भोजन प्रसादाचा आस्वाद मुलांसोबतच घेतला . वाढायला सुद्धा मुलेच असतात .
इथे रात्री अश्वत्थामा महादेवांच्या दर्शनासाठी येतो असे मुलांनी मला सांगितले . त्यामुळे त्या मंदिरामध्ये झोपावे आणि अश्वत्थाम्याचे दर्शन घ्यावे अशी माझी इच्छा होती . परंतु मुलांनी मला तसे करू दिले नाही . म्हणजे मी झोपताना मंदिरातच झोपलो . परंतु महादेवाच्या आणि दरवाज्याच्या मध्ये नाही झोपलो . रात्री जागे राहून बाबाजी भेटतात का पहावे असा विचार मी केला परंतु दिवसभर झालेल्या बौद्धिक थकव्यामुळे पाठ टेकताच क्षणात झोप लागली . पहाटे उठल्यावर महादेवाची पूजा झालेली आहे असे माझ्या लक्षात आले . या महादेवाच्या पिंडीचा आकार कमलाकर महाराज येथे आले तेव्हापेक्षा आता खूपच अधिक मोठा झालेला आहे हे स्वतः महाराजांनी मला सांगितले . असे अजूनही काही देव आपल्या देशामध्ये आहेत . उदाहरणार्थ मीनाक्षी मंदिर मदुराई येथे खांबावर असलेला एक मारुती गेली अनेक वर्षे हळूहळू मोठा होत चालला आहे . वाईचा ढोल्या गणपती देखील यासाठी प्रसिद्ध आहे . तसेच काहीसे या शिवलिंगाचे होते . नर्मदा परिक्रमा आणि अश्वत्थामा असे एक समीकरणच आता झालेले आहे . माझी परिक्रमा नर्मदा मातेच्या कृपेने पूर्ण झाली असे कळाल्याबरोबर सर्वात पहिला प्रश्न हाच विचारला जायचा की तुम्हाला अश्वत्थामा भेटला का ! अश्वत्थामा भेटला की नाही माहिती नाही परंतु अश्वत्थाम्याला स्वतःचा शोध ज्या ठिकाणी लागला ते ठिकाण मात्र मी नक्की पाहिले ! आणि तेच हे बोरियाचे श्री माखणेश्वर महादेव मंदिर !
पहाटे लवकर उठून महादेवाची स्तवने गायली आणि महाराजांची आज्ञा घेऊन प्रस्थान ठेवले . आज बाणा सारख्या सरळ रेषेत चालल्यावर मी पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठावर पोहोचणार होतो . इथे समोर गरुडेश्वर होते आणि अलीकडच्या काठावर वरुणेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र होते . नर्मदा मातेचे एक वेगळे च रूप इथे पाहायला मिळणार होते . मला कधी एकदा नर्मदा मातेमध्ये डुबकी मारतो असे झाले होते ! त्यामुळे मी अश्वत्थाम्याच्या तपोभूमीला रामराम गेला ! आणि पायांना गती दिली . 

 लेखांक ९४ : इंद्रेश्वर , वरुणेश्वर , विश्वेश्वर , व्यासेश्वर , वैद्यनाथेश्वर , आनंदेश्वर महादेवांची दर्शने

वाल्मिकी आश्रम सोडला आणि पुन्हा एकदा सरळ रेषेमध्ये नर्मदा मैयाच्या दिशेने निघालो . इंद्रवरणा गाव पार केले . या गावातून जाताना उगाचच मनामध्ये दक्षिण भारतातील स्मृती जागृत झाल्या. दक्षिणेकडील गावामध्ये प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढलीच जाते . त्याला कोलम असे म्हणतात . रांगोळीची पूड असते तिला कोलापुडी म्हणतात . एखाद दिवशी घराबाहेर रांगोळी नाही काढली तर शेजारच्या पाजारच्या बायका घरी येऊन मंडळींकडे चौकशी करायच्या , की काय झाले ? कोणी गेले की काय ? त्यामुळे न चुकता रांगोळी काढावी लागायची ! इथे देखील सकाळ सकाळी तसेच वातावरण पाहिले आणि मन दक्षिणेत रममाण झाले .
 गावातील मंदिरांचे दर्शन घेत नर्मदा मातेच्या काठावरील इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेव तीर्थावर आलो . इथे नर्मदा मातेच्या काठावर एक मोठे धरण बांधलेले आहे . परंतु शेजारीच सरदार सरोवर धरणासारखे अति भव्य धरण असल्यामुळे हे धरण लघुबंधारा म्हणून ओळखले जाते . याला इंग्रजीमध्ये चेक डॅम असे म्हणतात .
 गरुडेश्वर लघुबंधारा

समोरच्या तटावर जिथे भिंत संपते तिथे वरूणेश्वर महादेवाचे मंदिर आहे . भिंतीच्या खाली दरवाजे आहेत तिथून पाणी सोडले जाते . पाणीपातळी वाढल्यावर सांडव्यावरून पाणी वाहते .

 या बंधार्‍यामुळे साठलेल्या पाण्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात ऐक्यमूर्तीपाशी येणाऱ्या पर्यटकांचे जल पर्यटन चालते . हा साधारण बारा किलोमीटरचा पट्टा आहे . इथे एकता क्रूज नावाने " क्रूज सर्विस " अर्थात नौकानयन सेवा चालवली जाते .पर्यटकांमध्ये ही नौसेवा चांगली प्रसिद्ध आहे .
 एकता क्रूज
विशेषतः रात्री ही क्रूज बाहेरून बघणाऱ्यांना खूप छान दिसते !
काल याच स्टॅच्यू ऑफ युनिटी अक्षरांच्या मागून मी चालत गेलो होतो . तिथून जाणारी एकता नौसेवा

बंधाऱ्याची एक भिंत वरूणेश्वराला स्पर्श करते तर दुसरी भिंत गरुडेश्वराला . वरुणेश्वर नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे तर गरुडेश्वर बडोदा जिल्ह्यामध्ये आहे . नर्मदा हा भारतातील बहुदा एकमेव असा जिल्हा आहे जिथे नर्मदा नावाचे कुठले गावच नाही आहे तर केवळ नदी आहे .
आपण खालच्या तटावर आहोत .वरचा तट अर्थात गरुडेश्वर हे गाव बडोदा जिल्ह्यात आहे .इथून आपण आता डावीकडे किनारा पकडून चालणार आहोत .
इंद्रेश्वर आणि वरुणेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये पोहोचलो . 
इंद्र वरणा गावातील इंद्रेश्वर वरूणेश्वर महादेव मंदिर .
मंदिराच्या मागे दिसणारी धरणाची भिंत
श्री वरुणेश्वर महादेव
दक्षिणेकडील साधू असल्यामुळे अतिशय उत्तम पूजा केली जाते
 वरूणेश्वर महादेव आश्रमातील मैया ची मूर्ती
इथे रामकृष्णदास नावाचे एक साधू महाराज बसलेले होते . यांना परिक्रमावासींचे फारसे काही अगत्य आहे असे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नव्हते . त्यांनी मला त्रासिक चेहऱ्याने विचारले की चहा घेणार की कॉफी घेणार . परिक्रमेमध्ये प्रथमच हा प्रश्न कोणीतरी विचारला होता . रोज चहा चालूच होता त्यामुळे मी अर्थातच कॉफी असे उत्तर दिले . महाराजांनी आतून कॉफी बनवून आणली . मी ती कॉफी प्यायलो आणि एक क्षणात माझ्या मेंदूतील गतस्मृती जागृत झाल्या ! तीच चव ! तोच स्वाद !तोच अनुभव ! आणि मी क्षणात महाराजांना म्हणालो "ये नरसु की कॉफी है क्या ? " महाराज उडालेच ! ही नरसु कॉफी आहे हे या परिक्रमावशीला कसे काय कळाले ? महाराज म्हणाले , " आपको कैसे पता चला ? " मी महाराजांना सांगितले की ही तीच चव आहे . महाराज माझ्यावर भलतेच खुश झाले . ते म्हणाले , " तू असा पहिला माणूस भेटला आहेस ज्याने पहिला घोटात कुठली कॉफी आहे ते ओळखले .परंतु तुला नरसू कॉफी कशी काय माहिती ?" 
मदुरै गावातील नरसू कॉफीचा घाणा
मी महाराजांना सांगितले की काही काळ मी दक्षिण भारतात वास्तव्य केलेले आहे . आणि तिथल्या नरसूच्या दुकानात जाऊन बिया भाजून , भरडून , दळून ताजी ताजी कॉफी ग्राहकांच्या समोर तयार केली जाते ती बरेचदा विकत आणलेली आहे . महाराजांना मी उलटा प्रश्न विचारला मदुराई मध्ये मिळणारी कॉफी तुमच्याकडे कशी काय बरे आली ?  महाराज म्हणाले मी संन्यास घेतला आहे परंतु मूळचा मदुराईचा आहे ! झाले ! मी इथून पुढचा सर्व संवाद तमिळ भाषेतच साधला ! त्या साधू महाराजांना इतका आनंद झाला की मला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे त्यांना झाले ! त्यांनी ताबडतोब मला झोळी खाली ठेवायला सांगितली आणि एका कट्ट्यावर बसवले . 
ह्याच कट्ट्यावर मला रामकृष्णदास साधूनी बसविले
महाराज त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि एका मोठ्या ताटलीमध्ये भरपूर इडल्या आणि खोबऱ्याची चटणी तसेच टोमॅटोची चटणी व एका मोठ्या वाटीमध्ये सांबार घेऊन आले ! मला म्हणाले हे सर्व खाल्ल्याशिवाय तू जायचं नाहीस ! मी म्हणालो अहो महाराज परंतु हे जर तुमच्यासाठी तुम्ही बनवले आहे . मग मी कशाला खाऊ ! तुम्हाला कमी पडणार . महाराज म्हणाले नर्मदा मातेची कृपा आहे . त्यामुळे आज सकाळी इडल्या करताना मैयाने प्रेरणा दिली आणि मी दुप्पट इडल्या केलेल्या आहेत ! पोटभर खा ! मग काय विचारता ! मला तसेही दक्षिणात्य पदार्थ आवडतातच ! आणि त्यात हे रामकृष्णदास महाराज मूळचे मदुराईचे असल्यामुळे अतिशय अप्रतिम अशी मूळ दाक्षिणात्य चव मला चाखायला मिळाली ! मी खरोखरीच त्यादिवशी पोटाला तडस लागेपर्यंत इडली चटणी सांबार खाल्ला ! सकाळीच मला दक्षिण भारताची आठवण का येत होती त्याचे उत्तर मैयाने अशा रीतीने दिले ! 
आश्रमाचा निवांत परिसर . 
मी महाराजांना तमिळनाडूमध्ये लावलेली ताडाची झाडे आणि बीज गोळे प्रकल्प याची माहिती दिल्यावर त्यांना खूप आनंद वाटला . जालीकट्टूच्या बैलांना आंघोळ घालायला मी शिकलो आहे कळल्यावर त्यांनी मला मिठीच मारली ! काही वेळापूर्वी त्रासिक चेहरा केलेले ते महाराज आपल्या मूळ स्थानाला ओळखणारा मनुष्य आला आहे हे कळल्यावर इतके आनंदित झाले की विचारू नका !त्यात मी त्यांना तमिळमध्ये लिहून दाखवल्यावर मग तर त्यांचा आनंद गगनात मावेना !भाषा शिकण्याचे सामर्थ्य किती मोठे आहे हे अशा प्रसंगी लक्षात येते . त्यांनी मला मुक्काम कर म्हणून गळ घालायला सुरुवात केली . मला दाक्षिणात्य पदार्थांची लालूच ते दाखवू लागले ! ते म्हणाले तुला जे आवडते ते बनवून खायला घालतो ! डोसा बनवू , उत्तप्पा बनवू , पुट्टु बनवू , इडियाप्पम बनवू , पनियारम बनवु , तईर सादं बनवू , पोंगल बनवू , पुळीयोदरै बनवू , पण तू इथेच थांब . या मोहमायेमध्ये अडकणे म्हणजे कठीण कार्यक्रम होता . त्यामुळे मी महाराजांना नम्रपणे परंतु ठामपणे सांगितले की मला पुढे जाणे आवश्यक आहे नाहीतर नावा बंद होण्याच्या आत समुद्र तटावर मी पोहोचू शकणार नाही . महाराजांनी पुन्हा एकदा मला कॉफी पाजली आणि मोठ्या प्रेमाने निरोप दिला . 
आश्रमातून बाहेर पडताच समोर पांढऱ्या रंगाचा दिसणारा गरुडेश्वर चा घाट दिसू लागला . इथे कच्च्या मातीच्या रस्त्याने खाली गेलो . आणि मार्गस्थ झालो .
इथे मी अगदी काठावर गेलो आणि नर्मदा मातेचे स्पर्श दर्शन घेतले . इतक्यात दोन नावाडी तिथे आले आणि त्यांनी मला सांगितले की इथून पुढे समुद्रापर्यंत नर्मदा मातेच्या उदरामध्ये असंख्य मगरी आहेत . तरी असे अचानक काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करू नये ! आता मात्र पंचाईतच झाली ! मी त्या दोघांकडून मगरी बद्दलची सगळी माहिती काढून घेतली . कुठल्या टाकू मध्ये जास्त मगरी आहेत , त्या दिवसभर कुठे असतात , रात्री कुठे असतात , त्यांचा स्वभाव कसा असतो , त्या हल्ला कधी करतात , त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा असे अनेक प्रश्न विचारून मी त्या दोघांना भंडावून सोडले आणि त्या दोन्ही केवट राजांनी कुठलीही भीडभाड न बाळगता माझ्या सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित व सविस्तर उत्तरे मला दिली . सरदार सरोवर धरणामध्ये सर्वात जास्त मगरींचा वावर आहे कारण तिथं मानवी वावर शून्य आहे . त्या धरण परिसरामध्ये मासेमारी करायला देखील बंदी असल्यामुळे पाण्यामध्ये भरपूर मासे आहेत . मुख्यत्वे करून हे मासे खाऊन मगरी जगतात . पावसाच्या पुरामध्ये धरणाच्या सांडव्यावरून काही मगरी खाली वाहत येतात . अशा मगरी पुन्हा मागे जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्या इथेच राहतात . त्यामुळे दरवर्षी मगरींची संख्या वाढत चालली आहे . मगर हे नर्मदा मातेचे वाहन आहे . त्यामुळे मगरीचे दर्शन परिक्रमेदरम्यान होणे म्हणजे साक्षात नर्मदा मैया ची कृपा समजली जाते . त्यामुळे मला आता मगरींच्या दर्शनाचे वेध लागले . इथून पुढे पुन्हा गरुडेश्वर ला येईपर्यंत अखंड माझे लक्ष नर्मदा मातेच्या पात्रामध्ये कुठे मगरी दिसतात का याकडे लागलेले असायचे . आणि त्याचा पुरेपूर फायदा देखील मला झाला . 
इथे चालताना एक जोड पूल लागला . तो पार केल्यावर फुलवाडी नावाचे गाव आहे . इथे मिरजेजवळ समाधी असलेल्या ओम मालती आई नामक ध्यानसाधनेची दीक्षा देणाऱ्या थोर विभूतींच्या नावे त्यांच्या कोणी शिष्याने आश्रम काढलेला आहे . मिरजेच्या तपोवनामध्ये मी संपर्क केल्यावर हा तपोवनांतर्गत आश्रम नाही असे मला सांगण्यात आले . सुदैवाने माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये मला या थोर विभूतीचे दर्शन झाले होते . आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक प्राध्यापक दांपत्य या माताजींचे शिष्य होते . त्यांच्यासोबत मी दोन-तीन वेळा या मालती आईंचे दर्शन घेतले होते . विशेषतः त्यांना सर्वजण दुरून नमस्कार करायचे . परंतु त्यांनी आपण होऊन मला पायावर डोकं ठेवून नमस्कार करायला परवानगी दिली होती . आणि माझ्याकडून चरण सेवा देखील करून घेतली होती . त्याचे त्यावेळी तपोवनातील सर्व सेवकांना अप्रूप वाटले होते ,इतके मला स्मरते . मालती आईंनी मला त्यांच्या आश्रमातील एक कोपरा दाखवून इथे मी समाधी घेणार आहे असे देखील सांगितले होते . 
परमपूज्य ओम मालती आई मिरज
तरुण वयापासून त्या ध्यानाची दीक्षा देत असत
हाच तो मध्ये लागलेला जोड पूल
फुलवाडी गावातील मालती आई आश्रमातील पूजा . मालती आई रामदास स्वामींना खूप मानायच्या .
लघु बंधाऱ्यापासून मी ज्या मार्गाने चालत आलो होतो तो मार्ग समोर दिसतो आहे . हे चित्र पुलावरून काढलेले संग्रहित चित्र आहे .
इथे विश्वेश्वर महादेव तीर्थ आहे त्याचे दर्शन घेतले .
याच गावामध्ये रामकिशनदास नावाच्या अजून एका त्यागी साधूंचा आश्रम आहे . मगाशी आपण पहिले ते रामकृष्णदास वेगळे . 
इथे गावामध्ये अश्विनी कुमाराची तपस्थळी आहे . ते मंदिर देखील पाहण्यासारखे आहे . गोलाकार घुमट मजेशीर दिसतात . 
आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे गावांची नावे बुद्रुक आणि खुर्द अशी असतात तशी गुजरात मध्ये मोटी आणि नानी अशा नावाची गावे असतात . बुद्रुक हा बुजुर्ग शब्दाचा अपभ्रंश आहे याचा अर्थ मोठी वस्ती . त्या आर्थिक गुजरातमध्ये मोटी हा शब्द वापरतात . 
खुर्द हा खुर्दा या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे , ज्याचा अर्थ आहे किरकोळ अथवा छोटी वस्ती . याला गुजराती मध्ये नानी असे म्हणतात . इथे देखील मोटी रावल आणि नानी रावल नावाची गावी होती . पैकी नानी रावल या गावांमध्ये व्यासेश्वर आणि वैद्यनाथेश्वर महादेवाची प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत . त्याचे दर्शन घेऊन त्या परिसरामध्ये काही काळ थांबलो आणि शांतता अनुभवली . वैद्यनाथ अष्टक थोडेफार पाठ होते ते म्हणून घेतले . 
श्री व्यासेश्वर महादेव मंदिर
श्री व्यासेश्वर महादेव दर्शन
श्री वैद्यनाथ महादेव मंदिर
श्री वैद्यनाथ महादेव दर्शन . 
श्री वैद्यनाथाय नमः शिवाय ।
या भागात अनेक शिवलिंगे आहेत . प्रत्येकाचे दर्शन घ्यावे आणि त्यातील ऊर्जा अनुभवावी असे करीत करीत पुढे जायचो . 
इथे पूर्वी खूप भव्य दिव्य मंदिरे असणार असे तिथे आजूबाजूला इत:स्ततः विसरून पडलेल्या अवशेषांवरून लगेच लक्षात येत होते .
मूर्ती भंजकांनी येथील एकही मूर्ती शिल्लक ठेवलेली नव्हती . त्यांच्या भीतीमुळे मंदिराचे कळस देखील घुमटकार होते . 
स्थानिक लोकांनी खांबावरील तुटक्या फुटक्या मूर्ती घेऊन त्याची मंदिरे उभी केली होती .
इथे पूर्वी अजूनही अनेक मंदिरे असणार आहेत याचे पुरावे सर्वत्र विखुरले होते . या भागातील मंदिरांची दाटी बघता सरदार सरोवरामध्ये किती मंदिरे जलमग्न झाली असेल याची केवळ कल्पना आपण करू शकतो . एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण्यापेक्षा विविध जलस्रोतांमध्ये ते सतत फिरते ठेवले तरी देखील सिंचनाचे मोठे काम होऊ शकते . परंतु यावर भारतीय जलतज्ञांनी फारसे संशोधन केलेले दिसत नाही . दक्षिण भारतामध्ये चोल व चालुक्य राजांनी नद्यांना पूर आल्यावर त्यातील वाहून समुद्राकडे जाणारे जास्तीचे पाणी मानवनिर्मित तलावांमध्ये साठवून ठेवण्याचे तंत्र विकसित केले होते . तसे काहीही न करता आपल्या देशामध्ये भूजल उपसा करून तेच वापरणे अधिक सोयीचे मानले गेले आहे . भूजलाचा साठा संपृक्त होण्यासाठी अक्षरशः हजारो वर्षे गेलेली असतात . बोरवेल मधून मिळणाऱ्या पाण्याचा जो थेंब तुम्ही वापरता तो शेकडो हजारो वर्षांपूर्वी जमिनीखाली गेलेला असतो . त्या प्रमाणामध्ये जल पुनर्भरण आपल्याकडे जवळपास होतच नाही . नद्यांचे पाणी जितक्या अधिक प्रमाणात रिकाम्या पडलेल्या ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये उपसा पद्धतीने नेले जाईल तितके धरणांचे महत्त्व आणि गरज कमी होत जाईल . यासाठी विजेची गरज नसून उताराचा वापर करून ही योजना आखता येऊ शकते . कारण सर्व नद्या उतारा कडेच वाहत असतात . याबाबतीत जलतज्ञांनी अधिक विचार करावा अशी विनंती आहे . इथे देखील गरुडेश्वर बांधाने पाणी अडवल्यामुळे पाणी पातळी अतिशय कमी असून नर्मदा मैया चे पात्र पूर्णपणे खडकांनी भरलेले दिसते . 
मध्ये असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला येऊन मिळतात ते कधी उडी मारून पार केले तर कधी पाण्यात उतरून पार केले आणि चालत राहिलो . एक नजर सतत कोठे मगर तर दिसत नाही ना याकडे होती . पुढे आनंदेश्वर महादेवाचे मंदिर आहे तिथे एका त्यागी बाबांचा आश्रम लागला .
श्री आनंदेश्वर महादेव मंदिर
मंदिराच्या मागे नर्मदा माता दिसते आहे . समोर थोडेसे मोकळे पटांगण आणि यज्ञशाळा केलेली आहे . 
 महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो . वाचकांना असा प्रश्न पडू शकतो की इतकी सारी मंदिरे एका मागोमाग एक आल्यावर दर्शन घेऊन कंटाळा येत नाही का ?  वास्तविक पाहता रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीची ओळीने मंदिरे आली तर कंटाळा येऊ शकतो . परंतु इथे नर्मदा खंडामध्ये आपण परिक्रमेसाठी जेव्हा येतो तेव्हा मुख्य हेतू हाच आहे की वाटेमध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे त्या त्या ठिकाणाचे दर्शन घेणे आणि तिथल्या स्पंदनांची अनुभूती घेणे . अशी ठिकाणे कधी किती किलोमीटर दिसतच नाहीत तर कधी फुटा फुटावर दिसतात . नर्मदा खंडामध्ये तप करणाऱ्या लोकांचे कमंडलू एकमेकांना टेकून लागलेले आहेत असे जे नर्मदा खंडामध्ये म्हटले जाते ते काही खोटे नाही . केवळ अशा एकमेकांना खेटलेल्या कमंडलूंनी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण होऊ शकते इतक्या लोकांनी इथे आजवर तपाचरण केलेले आहे .  अशा ठिकाणी साधकाने निर्विचार मनाने जाऊन जर तिथली स्पंदने अनुभवली तर निश्चितपणे एक वेगळी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही . या मंदिरांकडे केवळ एक मंदिर म्हणून न पाहता कुठल्यातरी थोर विभूतीमत्त्वाची तपस्थळी म्हणून पहावे लागेल तेव्हा त्याचे महात्म्य अधिक चांगले लक्षात येते . बहुतांश वेळा अशा तपोमुर्तीचे नाव आपल्याला ठाऊक नसणार असते परंतु त्यांच्या तपाचरणामुळे तिथे निर्माण झालेले वलय तुम्हाला जाणवू शकते . विशेषतः भारत वर्षामध्ये करोडो तीर्थक्षेत्रे असली तरी देखील तपस्थळी म्हणून केवळ नर्मदा मातेचाच गौरव सर्व साधुसंतांनी आणि देवादिकांनी एकमुखाने केलेला आहे . असा एकही साधू संत किंवा संन्यासी नसेल ज्याने कधी नर्मदा खंडावर भ्रमण केलेले नसेल . कुठल्या ना कुठल्या निमित्ताने प्रत्येक सदपुरुषाला नर्मदे काठी यावेसे च वाटते . आपणही आयुष्यात कधी नर्मदा खंड अनुभवला नसेल तर तुम्हाला जवळ पडणाऱ्या कुठल्याही नर्मदा किनाऱ्यावर जावे आणि तिच्या दर्शनाचा आणि त्या दर्शनामुळे होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्यावा ! इथे निश्चितपणे काहीतरी वेगळे आहे हे तुम्हाला जाणवते . आपण आयुष्यामध्ये हजारो नद्या पाहिलेल्या असतात परंतु नर्मदा मातेची गोष्टच न्यारी आहे हे तुम्हाला पाहता क्षणी लक्षात येते . तिचे वाहणे , तिचे दिसणे ,तिचा आवाज , तिची वळणे , तिचे थांबणे सर्वच इतरांपेक्षा निराळे आहे . म्हणूनच आज पर्यंत तिने प्रत्येक सात्विक जीवाला साद घातलेली आहे . राजसिक लोकांसाठी तर नर्मदाखंड हा नंदनवनच आहे . परंतु अगदी रावण मेघनाथासारख्या तामसी लोकांना देखील नर्मदा खंडाने आकर्षित केलेले आहे . इथे कितीही मंदिरे ओळीने लागली तरी दर्शन घेताना आपल्याला कंटाळा येत नाही . मुळात देवाचे दर्शन घेऊन त्याला काहीतरी मागायला गेले की आपली ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे थकल्यासारखे वाटते . परंतु केवळ दोन हस्तक तिसरे मस्तक जोडून देवाकडे पाहत राहिले की त्याला आपल्याला जे काही द्यायचे आहे ते आपल्याला मिळून जाते . रामदास स्वामी दासबोधा मध्ये जागोजागी सांगतात की खरा देव कोण आहे ते ओळखायला शिका . अशा असंख्य देव देवतांच्या मंदिरातून फिरताना तुम्हाला तो खरा देव त्याच्या अस्तित्वाची जाणीव वेळोवेळी करून देतो . आणि एकदा त्या खऱ्या देवाचा पत्ता सापडला की माणसाला पुन्हा आयुष्यभर वणवण भटकायची गरज राहत नाही . नर्मदा माता सतत तुमच्याशी संवाद साधू इच्छित असते . आपण आपले मन शांत ठेवून ती काय बोलते आहे ते ऐकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिचे मनोगत ऐकू येऊ शकते . जन्माला आलेले तहाने बाळ जसे कुठलीही भाषा येत नसताना त्याला काय हवे नको ते सर्व आपल्या आईला सांगू शकते व आपल्या आईला काय म्हणायचे आहे ते सर्व त्याला लगेच कळते तसाच हा संवाद असतो . गर्भाचे आवडी मातेचा डोहळा असे तुकाराम महाराज म्हणतात . अगदी तीच अनुभूती नर्मदा माई आपल्याला देते . तुम्ही जे काही चिंतन कराल ते तुमच्या समोर ती उभी करते . कारण अनेक दिवस तिच्या काठावर अनन्यपणे चालल्यामुळे तुम्हाला लक्षात आलेले असते की आता आपल्याला नर्मदा माते शिवाय दुसरा कोणीही आधार नाही . १९६० साली हृदयनाथ मंगेशकर यांनी अंतरीचा दिवा या चित्रपटासाठी  "कोण दुजा आधार तुजविण कोण दुजा आधार "  नावाचे एक अतिशय कठीण गाणे संगीतबद्ध केलेले होते . लता मंगेशकर यांनी ते गाणे तेवढ्याच ताकतीने गायलेले आहे . या गाण्याची प्रत्येक ओळ सार्थ ठरवणारी नर्मदा परिक्रमा आहे . प्रत्येक पावलाला आपल्याला लक्षात येते की आपल्याला नर्मदा माते शिवाय दुसरा कोणीही आधार नाही . दुसरा कोणी आधार देणारा भेटला तरी तो सांगत असतो की त्याला नर्मदा माते शिवाय त्यास अन्य कोणाचा आधार नाही . आणि हे केवळ तोंडाने बोलले जात नाही तर मनापासून सर्वांचा हा भाव असतो हे तुम्हाला लगेच जाणवते . या मताशी सहमत नसलेले लोक परिक्रमेतून आपोआप बाहेर फेकले जातात . काही ना काही कारणाने त्यांना नर्मदाखंड सोडून जावे लागते असा अनुभव सर्वांनाच येतो . नर्मदा माता अतिशय जागृत आहे . विशेषतः ज्या भागामध्ये खडकाळ प्रदेश आहे तिथून ती वेगाने पुढे वाहून जाते , आणि महापुरामध्ये देखील फार काळ पाणी साठवून राहत नाही त्यामुळे अशा ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक दिसते . तपोभूमी अधिक दिसतात . तिथे तिचे अस्तित्व देखील प्रकर्षाने जाणवते . आज सकाळपासून मी अशाच परिसरातून मार्गक्रमण करत होतो . केवळ नर्मदा खंडातीलच नव्हे तर अखंड भारत वर्षातील एक अतिशय प्रसिद्ध व तपस्वी संन्यासी श्री वासुदेवानंद सरस्वती उपाख्य श्री टेंब्ये स्वामी महाराज यांची समाधी देखील समोरच होती . संन्यासी लोकांना नर्मदा मातेचे प्रचंड आकर्षण आहे . देहामध्ये प्राण असताना ते नर्मदा खंडामध्ये चातुर्मास तर आवर्जून करतातच . परंतु आपला नश्वर देह विसर्जित करण्यासाठी देखील नर्मदा मातेचीच निवड ते करतात . नर्मदा मातेमध्ये असा कुठेही संन्यासी महाराजांचा देह विसर्जित केला जात नाही तर त्यासाठी ठराविक ठिकाणे ठरलेली आहेत . ठराविक डोह आरक्षित आहेत . मला माहिती नव्हते परंतु अजाणतेपणे मी अशाच एका ठिकाणाच्या जवळ निघालो होतो . लवकरच मला पुन्हा एकदा ती जागा दिसणार होती ! ती घटना डोळ्यासमोर येणार होती , जिने माझ्या आयुष्याला कायमची कलाटणी दिलेली आहे . मी प्रत्येक पावलाला नर्मदा मातेचे स्मरण करत चाललो होतो आणि नर्मदा मैया मात्र गालातल्या गालात हसत होती . 






































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...