कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला- जंगल सफारी -०१

कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला- जंगल सफारी -०१
बऱ्याच दिवसात कुठली जंगल सफारी झाली नव्हती. कोरोनाचा काळ अगदीच भाकड गेला होता.
त्यानंतर लॉकडाऊन मधल्या तुंबलेल्या कामांची रांग लागली होती.
आमच्या नेहमी एकत्र जाणाऱ्या ग्रुप्सपैकी एका ग्रुपचं कुठेतरी जाऊया, कुठेतरी जाऊया.. असं बोलणं चाललं होतं.
2022 जानेवारीपासून मे, दिवाळी, क्रिसमस असं होता होता शेवटी मार्च 2023 मध्ये ढिकाला ला जायचं ठरलं.
एका मित्राने बुकिंग्जची सर्व जबाबदारी उचलली आणि सफारीचं बुकिंग, हॉटेल्स बुकिंग, विमानाचं बुकिंग असं सगळं काम पार पाडलं.
ऐन मार्चच्या मध्यात जायचं ठरलं होतं. मार्च एंडिंगची काम होतीच, पण कसंही करून जायचं हे मात्र नक्की होतं.
पहिला टप्पा होता मुंबई दिल्ली विमान प्रवासाचा आणि दिल्लीवरून पुढचा टप्पा होता कॉर्बेट मचाण रिसॉर्ट, रामनगर.
हा जवळजवळ पाच सव्वा पाच तासाचा रस्ता होता आणि मध्ये पाऊण तास जेवणाचा
पकडला तर सहा तास लागणार होते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर एकदम मस्त कलंदर
होता.
वाटेत ज्या ठिकाणी चांगलं नॉनव्हेज मिळेल तिथे जेवायला थांबू असं त्याला
सांगितलं होतं. प्रवासातले पहिले दोन तास जे ढाबे लागले ते सगळे शिव ढाबे
होते म्हणजे थोडक्यात प्युअर व्हेज.
पण नॉनव्हेज हवंय कळल्यावर तो म्हणाला, दिड, दोन तास थांबायची तयारी असेल तर एका मस्त चांगल्या ठिकाणी नेतो.
त्याने गाडी उभी केली ती प्रसिद्ध करीम मोगलाई स्पेशल सिन्स-१९३१ कडे..
प्रचि -०१ : करीम..
प्रचि -०२ : त्याच्या आवारात होता हा मादक सुवासाचा गावठी गुलाब..
तिथे व्यवस्थित जेवण झालं. जेवण अप्रतिम होतं.
प्र. चि. -०३ : हा त्यांच्या हॉटेलमध्ये, त्यांच्या हॉटेलचं पुरातनपण दाखवणारा भिंतीवर टांगलेला फोटो..
त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. दिल्ली रामनगर हायवे वरती काही
काम सुरू असल्यामुळे ड्रायव्हरने गाडी एका आतल्या रस्त्यावरुन काढली. हा
रस्ता तेवढा रुंद नव्हता पण वाटेत लागणारी गावं, शेतं, झाडं यामुळे
हायवेसारखा रुक्ष आणि निरस न वाटता लाईव्हली वाटत होता.
रस्ता आणि शेत याच्यामधून एक कालवा जात होता. सध्या त्याच्यात पाणी नव्हतं पण गरजेनुसार सोडत असावेत.
प्र. चि-०४ :
बऱ्याच वेळानंतर उत्तर प्रदेशची सीमा ओलांडून आम्ही उत्तराखंडमध्ये प्रवेश केला. रस्त्यावरची दिसणारी एक विशेष गोष्ट म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जी जी आंब्याची झाडं दिसत होती ती अफाट मोहराने लगडली होती. आंब्याला आलेला एवढा मोहर मी आधी कधीही पाहिला नव्हता. जिथे आंब्याच्या झाडांची दाटी असायची तिथे गाडीची काच खाली केल्यावर एक धुंद करणारा मोहराचा वास दरवळायचा. वाटेत एका ठिकाणी ड्रायव्हरला सांगून त्याच्याच कृपेने एक चहाचा ब्रेक घेतला.
हे जे ठिकाण होतं ते एकदम यंग फॅमिली वाल्यांसाठी असावं, कारण त्याच्या गेट पाशी आणि आवारात कॉर्बेट मधल्या तर जाऊ दे पण आफ्रिकेतल्या प्राण्यांचीपण रेलचेल होती. आमची मुलं आता मोठी झाली आहेत, पण त्यांचं लहानपण आठवून काही स्नॅप्स मारलेच आणि लगोलग त्यांनाही पाठवले.
प्र. चि. -०५ :
साधारणपणे पावणे सहा वाजता कॉर्बेट मचाण या रिसॉर्ट वरती पोहोचलो. आमची बुक केलेली कॉटेज छान दगडी बांधकामाची आणि प्रशस्त होती.
प्र. चि. -०६ :
इथे फक्त एक रात्र मुक्काम असणार होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमची रवानगी जिम कार्बेट मधल्या ढिकाला या ठिकाणी होणार होती.
आकाशात बेमौसमी ढग दाटून आले होते, त्याचा काळोख आणि रिसॉर्ट मध्ये लावलेले छोटेसे दिवे याच्यामुळे माहोल एकदम जबरदस्त बनला होता.
आणि त्यामुळे आमच्यातल्या तीन वारुणीप्रेमी मित्रांचं रसिकत्व जागं झालं होतं..
(असा माहौल नसता तरीही त्यांनी तो बनवला असताच, ही बाब अलाहिदा.)
त्या रात्री जबरदस्त पाऊस पडला त्यामुळे टेंपरेचर एकदम खाली गेलं होतं.
रात्रीची फ्लाईट, दिवसभराचा प्रवास आणि पावसामुळे थंड झालेलं वातावरण
त्यामुळे छान गाढ झोप झाली. मित्रांची झोप तर विशेष गाढ होती..
दुसऱ्या दिवशी आमची गाडी साडेदहा अकरा वाजता म्हणजेच जरा आरामात येणार होती त्यामुळे आम्ही आन्हिकं वगैरे आटपून रिसॉर्टच्या आवारातले काही पक्षी टिपले.
प्र. चि. -०७ :
हॉटेल रूमच्या बाल्कनीतून टिपलेला हा दयाळ..
प्र. चि. -०८ :
आणि हा जांभळा शिंजीर Purple sunbird..
प्र. चि. -०९ :
हा Chestnut-tailed Starling..
प्र. चि. -१० :
किती खाऊ नी कसं खाऊ..?? या विचारात पडलेला हा बुलबुल..
अकरा वाजता आमची जिप्सी रामनगर वरून ढिकालासाठी निघाली. पहिला मुक्काम होता धनगढी गेट.
या ठिकाणी आम्हाला प्रवेश शुल्क भरायला लागलं. तिथे बऱ्याच गाड्यांची रांग लागली होती.
प्रवेश शुल्क भरायच्या केबिनसमोरच एक सुव्हेनिर शॉप होतं. थोडा वेळ होता म्हणून तिथेच थोडी खरेदी आटपून टाकली.
प्र. चि. -११ अ : धनगढी गेटजवळ जिम काॅर्बेट अभयारण्य आणि त्यातले वेगवेगळे विभाग दर्शवणारा फलक.
प्र. चि. -११ ब :
स्थानिक मटेरियलने शाकारलेलं हे तिथलं कॅन्टीन आणि बाजूला प्रवेश कार्यालय..
प्र. चि. -१२ :
प्रवेशशुल्क भरण्याच्या प्रतिक्षेत सफारी व्हेईकलला टेकून उभा असलेला एक टुरिस्ट..
आता आमचा धनगढी गेट ते ढिकाला गेस्ट हाऊस असा प्रवास सुरू झाला. रस्ता थोडा ओबडधोबड होता. पण जंगल अगदी दाट होतं.
प्र. चि. -१३ :
डोक्यावर झाडांची हिरवी कॅनोपी होती.
प्र. चि. -१४ :
वाटेत नदीचं रिकामं पात्र जागोजागी लागत होतं. बऱ्याच वेळा
त्याच्यावरुनच तात्पुरता रस्ता बनवला होता आणि त्या रस्त्याने गाडी रिकामं
नदीपात्र ओलांडत होती.
विशेष म्हणजे संपूर्ण नदीपात्र पांढऱ्या मोठ्या गोल दगड गोट्याने भरलं
होतं. असे पांढरे दगड आपल्या महाराष्ट्रातल्या नदीपात्रात मी तरी कधी
बघितले नव्हते.
प्र. चि. -१५ :
ही काॅर्बेटमधली लँडस्केपस् आपल्या महाराष्ट्रातपेक्षा एकदम वेगळीच
वाटतात. आपल्याकडे लाल/तांबडी किंवा काळी माती आणि काळे करंद दगड, पाषाण.
टोकदार, करकरीत बाजू असलेले, एकदम कठीण.
कारण हे अग्निजन्य, पृथ्वीच्या पोटातून वर आलेले, लाव्हारसाचे. मातीही त्यांच्यापासूनच बनलेली.
इथली माती फिकी आणि दगड पांढरे, बदामी, हलक्या तपकीरी छटांचे.
तुलनेने मृदू असावेत कारण कंगोरे नाहीत. गोल, लांबट, गुळगुळीत गोटे. वाऱ्याने, पाण्याने तासलेले.
आणि मृदू असणारच, कारण हे हिमालयातले पाषाण, जो जगातला तरुण पर्वत, तुलनेने ठिसूळ दगडाचा..
पण ह्या उजळ रंगाच्या, अ-कठीण भासणाऱ्या दगडांमुळे, पांढरट वाळूच्या
नदीपात्रांमुळे ह्या लँडस्केप्सना एकंदरीतच एक मृदुता आली आहे, वेगळेपण आले
आहे. आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना हा फरक पटकन जाणवतो.
अर्थातच प्रत्येक लँडस्केपची आपापली मजा आणि खासियत वेगळी.
प्र. चि. -१६ :
सुरुवातीलाच एका झाडावर दिसला एक सर्प गरुड..
Crested serpent eagle..
हरणं अधून मधून दिसत होती. माकडंही होतीच.
अशातच आमच्या ड्रायव्हरने गाडी थांबवून एका झाडाकडे बोट दाखवलं तिथे एक घुबड आळसावून निवांतपणे बसलं होतं. हे बहुतेक त्याचं घर असावं आणि म्हणून ड्रायव्हरला ते इथे हमखास असणार हे माहीत होतं.
प्र. चि. -१७ :
आणि ते होतंही अगदी
"आते जाते हुए मै
सबपे नज़र रखता हूँ.." या स्टाईल मध्ये..
त्याचा हा दुसऱ्या बाजूने फोटो..
प्र. चि. -१८ :
Camouflage... Camouflage..
जंगला मधला छान रस्ता पार करत आम्ही ढिकाला गेस्ट हाऊसला पावणेदोन वाजता पोहोचलो.
ढिकाला गेस्ट हाऊसची खासियत ही की ते काॅर्बेटच्या कोअर एरियात वसलेल्या तीन गेस्टहाऊस पैकी आहे आणि सर्व सुखसोईयुक्त आहे.
कारण खिनौली जास्त करुन सरकारी अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे तर सर्पदुली ला सुखसोई अगदीच कमी आहेत.
बाकी गेस्टहाऊसेस कोअर क्षेत्राच्या बाहेर आणि खाजगी हाॅटेल्स तर अभयारण्याच्याही बाहेर.
कोअर क्षेत्रात असण्याचा फायदा हा की पार्क राउंडसाठी तुम्ही गेटच्या बाहेर पडल्या पडल्या जंगल चालू होतं.
इतर ठिकाणच्या टुरिस्ट्सना त्यासाठी १०, १५ किलोमीटरचा प्रवास करायला लागतो. खाजगी हाॅटेल्स मधल्यांना तर त्याहूनही जास्त.
सफारी राईड पार्क राऊंड्स सव्वा दोनला सुरू होतात. त्यामुळे रजिस्ट्रेशन
करणं, चाव्या घेणं, सामान टाकणं आणि जेवून घेणं यासाठी फक्त 25 मिनिटे
होती.
वेळ नसल्यामुळे सामान रिसेप्शन एरियामधेच ठेवून आम्ही डायनिंग हॉल जवळ
गेलो. समोर प्रशस्त अंगण होतं. त्याच्यापुढे लाकडाचा व्ह्युईंग गॅलरीचा
कट्टा होता. आणि त्या गॅलरी मधून बऱ्यापैकी खाली वाहत जाणाऱ्या रामगंगा
नदीचं पात्र आणि वाळूचा नदीकाठ दिसत होता.
त्या काठावरती तीन हत्तींचा छोटासा कळप फिरत होता.
एखाद दोन फोटो त्यांचेही काढून मग घाईघाईतच जेवणासाठी गेलो.
बुफे जेवण साधंच पण रुचकर होतं.
त्यानंतर पटकन आम्ही आमच्या जिप्सीमधे जाऊन बसलो आणि आमची पहिली पार्क राउंड सुरु झाली.
आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने आम्हाला हॉटेलपासून जवळच असलेल्या दाट
झाडीतल्या, खाली दाट पानगळ झालेल्या आणि एका अंधाऱ्या जागेमध्ये गाडी नेली.
इथे बऱ्याच वेळेला एक वाघीण, ‘पेडवाली वाघीण’ हे तिचं नाव; असते म्हणे..
ती काही तिथे नव्हती पण नंतरही ड्रायव्हरने पुढच्या सकाळ संध्याकाळच्या
प्रत्येक पार्क राउंडच्या वेळी आधी गाडी इथेच आणली आणि मगच पुढची पार्क
राउंड चालू केली. आमच्या मते हा त्याच्या शुभशकुनाचा काहीतरी भाग असावा.
प्र. चि. -१९ :
सुरुवातीलाच रस्त्यावर आली ही चितळ मादी.
तिला बिचारीला रस्ता ओलांडायचा होता म्हणून आम्ही थांबलो. म्हटलं, जा बाई निवांत.. आणि तिने पण विश्वास ठेवून शांतपणे रस्ता ओलांडला.
इथे या जंगलामध्ये प्रत्येक ड्रायव्हर, प्रत्येक गाईड हे नॉर्म्स अतिशय
रिलिजियसली पाळतात आणि त्यामुळे अशा जीप गाड्या आणि जंगलामधले प्राणी
यांच्यामध्ये एक साहचर्य निर्माण झालेलं आहे. प्राण्यांना माहिती असतं की
त्यांचा मान इथे पहिला आहे.
दे ॲक्चुअली नो, दे आर द फर्स्ट प्रायाॅरिटी.
यानंतर आम्ही जवळपासच्या रस्त्यांवरनं प्रवास केला पण विशेष काही प्राणी दिसले नाहीत.
मग ड्रायव्हरने गाडी वळवली ती रामगंगा नदीच्या बाजूबाजूच्या रस्त्याने. मग
एका ठिकाणी लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या पुलावरून आम्ही रामगंगा नदीचं
पात्र ओलांडलं.
प्र. चि. -२० :
प्र. चि. -२१ :
मार्च महिना असल्यामुळे नदीला तसं कमी पाणी होतं आणि तिचं पांढऱ्या दगडगोट्यांचं बरंचसं पात्र उघडं पडलं होतं.
या नदीपात्राच्या काही खोलगट भागात पाणी साठलेलं आहे आणि आजूबाजूच्या डोंगरांवरून त्याला थोडा थोडा पाण्याचा पुरवठाही होत असतो.
आत्ता जे उघडं झालेलं पात्र दिसतंय ते पावसाळ्यात पूर्ण पाण्याखाली
असतं. सफारी चार ते पाच महिने पूर्णपणे बंद असतात. आणि आत्ता गाड्या ज्या
रस्त्यांवरून फिरतात ते रस्तेही पाण्याखाली गेलेले असतात.
दरवर्षी पाणी ओसरलं की हे दगड मातीचे रस्ते पुन्हा आखले जातात, बनवले जातात आणि मग सफारी सुरू होतात.
प्र. चि. -२२ :
पात्रामधल्या अशाच एका दगडावर उन्ह खात बसलेली ही चार कासवं..
प्र. चि. -२३ :
दगड गोट्यांचा क्लोज-अप..
प्र. चि. -२४ :
आणि अशाच दगडांमधून वाट काढणारी ही टिटवी
River Lapwing..
प्र. चि. -२५ :
याच पाण्यातल्या माशांवर नजर ठेवून असलेला हा खंड्या पक्षी. Crested Kingfisher..
प्र. चि. -२६ :
मातीच्या रस्त्यावर झुडपांच्या मागून अचानक पुढे आलेला हा रान कोंबडा. Red Jungle Fowl..
प्र. चि. -२७ :
आणि हे आईच्या थोडसं मागे राहिलेलं चितळ शावक..
प्र. चि. -२८ :
दुपारची सफारी शार्प सव्वा दोन ला सुरू होते आणि शार्प सव्वा सहा वाजता संपते. यायला एक मिनिटही उशीर झाला तर ती गाडी आणि तो ड्रायव्हर सात दिवसांसाठी बंद केले जातात. अर्थात पर्यटकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या हातातली ती ती टूर पूर्ण झाल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी होते. त्यामुळे सगळे ड्रायव्हर वेळेच्या दोन-चार मिनिटे आधीच पोहोचू, अशा हिशोबाने फिरणं आखतात.
ती परतीची वेळ गाठण्यापूर्वी जिथे वाघ असण्याची शक्यता आहे अशा चौराह्यावरती शेवटची नजर मारणाऱ्या या गाड्या..
प्र. चि. -२९ :
पहिले दिन की ढलती शाम..
संध्यारंग आणि सदैव आशा अमर असणारे पर्यटक..
यानंतर सव्वासहाला गेस्ट हाऊसवर पोहोचायची मर्यादा असल्यामुळे आम्ही गेस्टहाऊसकडे कूच केले.
इथे संध्याकाळचा चहा-बिस्किटं होती, आणि ८.०० च्या सुमारास जेवण तयार असेल असं सांगितलं गेलं.
आता आम्ही आमच्या रुम्स ताब्यात घेतल्या आणि रिसेप्शनमधे ठेवलेले सामान रुमवर हलवलं.
सकाळपासूनचा रामनगरपासून धनगढी गेट, तिथून जंगलामधलं बरचसं अंतर कापून
ढिकाला गेस्टहाऊस, घाईघाईतच जेवून दुपारची पार्क राउंड हा सर्व प्रवास
केल्यानंतर आता पहिल्यांदाच निवांतपणा मिळाला होता त्यामुळे सगळेच जण जरा
स्थिरस्थावर झालो. शरीराला सुकून मिळाल्यानंतर मनाला सुकून देण्यासाठी रसिक
मित्र तयारीला लागले. त्यामुळे जेवणासाठी साहजिकच सव्वानऊला पोहोचलो.
जेवणात पदार्थांची फार रेलचेल नव्हती पण रुचकर आणि घरगुती चव होती.
उगाचच ढाबेवाल्यांसारखा मसाल्यांचा भडिमार नव्हता. चपात्या गरमागरम सर्व्ह
केल्या जात होत्या.
रुमवर गेल्यानंतर आज काय काय बघितलं त्याबद्दल थोड्याफार गप्पा, कोणाकोणाचे फोटो कसे आले ते बघून अंथरुणावर अंग टाकलं.
रात्री वाघाच्या गर्जनेचा आवाज बऱ्यापैकी जवळून येत होता असं दुसर्या
टुरिस्ट्सकडून कळलं. पण आम्हाला गाढ झोपेत काही ऐकू आलं नाही, एवढं मात्र
खरं..
प्र. चि. -30 :
दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वासहाला गेट बाहेर पडण्याच्या तयारीत थांबलेल्या गाड्या..
रुममधून बाहेर पडलो तर थंडी मी म्हणत होती. जंगलामधली थंडी आणि रात्री
झालेला थोडासा पाऊस यांनी त्या थंडीची तीव्रता अजूनच वाढवली होती. सगळे
लोकं नखशिखांत गरम कपड्यात गुरफटलेले होते.
त्या उघड्या जिप्सीमधून प्रवास सुरू झाल्यावर तर गारठा भयंकर वाढला..
या ड्रायव्हर लोकांचं नेटवर्क एकदम जबरदस्त असतं. आमचा ड्रायव्हर गाडी
बाहेर पडल्या पडल्या म्हणाला की रामगंगा तळ्यापाशी वाघाचे मोठे पगमार्क्स
दिसलेयत म्हणून, तर तिथे एक चक्कर मारू आणि मग पुढे जाऊ. पंधरा मिनिटाच्या
थंडीने प्रचंड कुडकुडणाऱ्या प्रवासानंतर आम्हाला दुरुनच रामगंगा तलावाच्या
काठावरच्या कुरणाच्या रस्त्यावरती पाच सहा गाड्या शेजारी शेजारी दिसल्या.
आमच्या ड्रायव्हरने स्पीड अजूनच वाढवला साहजिकच थंडीची बोच अजूनच वाढली.
त्या गाड्यांच्या जवळ पोहोचल्यावर मात्र त्याने वेग कमी केला आणि हळूहळू
सगळ्यात शेवटच्या गाडीच्या मागे थांबला.
कुरणामध्ये व्याघ्र महोदय बसले असल्याची ग्वाही आधी आलेल्या भालदार चोपदारांनी दिली.
गाडी थांबल्यामुळे आधीच्या प्रवासात वाजलेली भयानक थंडी, आजूबाजूची हवा तशी थंड असली तरी आता वाजेनाशी झाली होती.
तापमानात विशेष काही बदल नसला तरीही आधीच्या प्रवासात अनुभवलेल्या बेफाट
थंडीमुळे, आता थांबलेल्या गाडीमध्ये तीच थंडी एवढी जाणवत नव्हती.
वाघ असल्याच्या बातमीमुळे थोडी उबही आली असेल कदाचित.
कॅमेरे सरसावण्यात आले पण नेम कुठे धरायचा तेच अजून कळत नव्हतं.
एवढ्यातच वाघ बसल्याची नेमकी जागा कळली,
कॅमेरा रोखण्यात आला आणि निघाला तृणपात्यांमधून डोकावणारा वाघाचा इमोटीकाॅन..
प्रचि- ३१ :
जरा वेळाने त्याने एक जांभई दिली आणि तो उठून चालायला लागला.
प्रचि- ३२ : व्याघ्र जांभई..
त्या वाघाचे टिपलेले हे वेगवेगळे प्रचि.
प्रचि- ३३ :
एक शेर अर्ज कर रहा हूँ..
मुलाहिजा गौर फर्माईयेगा…
हा वाघ चालताना एवढा आणि असा वळून वळून चालत होता की जसं काही एखाद्या सौंदर्यस्पर्धेत भाग घेणाऱ्याने आपलं शरीरसौष्ठव परीक्षकांना आणि प्रेक्षकांना वेगवेगळ्या कोनातून दाखवून मंत्रमुग्ध करावं.. आणि आपली छाप पाडावी.
प्रचि- ३४ :
प्रचि- ३५ :
प्रचि- ३६ :
तसा एरवी मी शांतच असतो..
प्रचि- ३७ :
मखमली… वेल्व्हेटी…
प्रचि- ३८ :
आ.. देखे जरा...
किसमे कितना है दम…
प्रचि- ३९ :
पाठमोरा..
प्रचि- ४० :
Incomplete Yet Beautiful..
प्रचि- ४१ :
Yawn.... कंटाळा आला बुवा..
प्रचि- ४२ :
You Are Under My Surveillance..
प्रचि- ४३ :
जलाशय, कुरण आणि वाघ - ०१
प्रचि- ४४ :
जलाशय, कुरण आणि वाघ - ०२
आता वाघ असल्याची बातमी लागलेल्या इतर गाड्यांचीही गर्दी व्हायला लागली होती. आणि वाघ महाराजही जरा लांबवर गेले होते.
म्हणून आमच्या गाडीचालकाने तिथून निघायचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि आम्हीही
त्याला मम् म्हणून जिप्सीचा मोहरा दुसर्या रस्त्यावर वळवला..
क्रमशः
कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला, गैरल- जंगल सफारी -०२ (अंतिम)
कॉर्बेटच्या वाटांवर.. ढिकाला, गैरल- जंगल सफारी -०२ (अंतिम)
यापूर्वीचा भाग एक : “https://www.maayboli.com/node/86758 “
पुढे चालू..
वाघ बघून मन भरलं होतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो आमच्यापासून खूप लांब गेला होता.
वाघ आलाय.. वाघ आलाय.. ही बातमी ऐकून बाकी ही बरीचशी सफारी वाहने त्या जागी आली होती, म्हणून मग आम्ही तिथून निघायचा निर्णय घेतला.
पहिलं वळण घेतल्यानंतर तिथल्याच एका झाडावर हा गरुड बसला होता.
प्रचि -०१ : डोक्यावर तुरा, भेदक नजर, अणकुचीदार चोच आणि अंगावर झाडाचा उन-सावलीचा खेळ.. असा हा Juvenile Crested Hawk Eagle Or Changeable Hawk-Eagle..
यानंतर आम्ही आमचा मोहरा वळवला तो पुन्हा पेडवाली वाघीण जिथे दिसली होती अशी खबर मिळालेल्या रस्त्यावर..
तिचा तिथे मागमुस नव्हता, पण असेलच जवळ कुठेतरी लपलेली किंवा आराम करत आणि
येईल सुद्धा बाहेर थोड्याच वेळात असा विचार करून शिवा, म्हणजे आमच्या
ड्रायव्हरने आमची गाडी तिथेच थांबवली.
जरा वेळाने तिथे एक चितळांचा कळप दूरवरून येऊ लागला, त्याचा हा व्हेरी लाँग, लाँग आणि मिड शॉट..
प्रचि- ०२ : A Beautiful Landscape..
दूरवर चाकर-निवास.. हिरव्या कॅनोपी मधून दिसणारा निळ्या आकाशाचा तुकडा..
मधेच उन्हाचे तिरके पट्टे पडलेला रस्ता.. रस्त्याकडेला तपकिरी पानगळ..
डाव्या बाजूला मुंग्यांच वारुळ…
आणि लांबवर चितळांचा एक कळप, पुढे जावं की नाही याचा विचार करत..
प्रचि- ०३ : निर्णय तर झाला.
चला आणखी थोडं पुढे जाऊ..
प्रचि- ०४ : चितळांची फळी.. (पायांची आणि शिंगांची गर्दी..)
ती पेडवाली वाघीण काही दर्शन देत नव्हती. तिची वाट बघण्याची उत्कंठा हा ही एक interesting प्रकार होता.
दरम्यान तो चितळांचा कळपही जवळ आला होता आणि आम्हाला निरुपद्रवी समजून
(अर्थात अंगभूत सावधगिरी बाळगूनच) त्यांचं उदरभरण जोरात चालू होतं.
दोन बारकुडी भेकरं भीत भीत एका बाजूनी आणि जरावेळाने एक एकांडा मोठ्ठा
सांबर नर आपल्याच मस्तीत दुसर्या बाजूने दर्शन देऊन गेले होते.
थोडक्यात वेळ चांगला चालला होता, पण एकाच जागी बर्यापैकी वेळ थांबलो होतो
आणि बाकीच्या ठिकाणीही फिरायची उत्सुकता होतीच, म्हणून तिथून प्रस्थान
केलं.
प्रचि- ०५ : कॉर्बेटच्या रानवाटांवरचे एक झाड
या सर्व प्रवासात हत्तींच्या कळपांनीही आमचं मन रमवलं. कारण सफारी मध्ये
फिरताना अधूनमधून रामगंगा नदीचा काठ लागायचाच. आणि त्या काठावरती बऱ्याचदा
हत्तींचे कळप असायचे.
त्या हत्तींच्या कळपात काही नर असायचे, बऱ्याचशा माद्या असायच्या. यांचा
आकार मध्यमपासून ते अगदी प्रचंड या सर्व रेंजमध्ये असायचा. शिवाय त्यात
असायची छोटी छोटी बागडणारी पिल्लं.
त्यातही दोन-तीन साईझेस असायच्या आणि प्रत्येक वयाच्या पिल्लाची वेगवेगळी मजा असायची.
बऱ्याचदा हे हत्ती गवत उपटून खात असायचे किंवा स्वतःच्या अंगावरती धूळ टाकत असायचे.
प्रचि- ०६ : नदीकाठच्या कुरणामधला हत्तींचा कळप..
(उदरभरणानंतर एक महाशय आडवे होऊन झोपलेयत..)
प्रचि- ०७ : हत्तीण आणि जरा मोठं झालेलं पिल्लू..
कधीमधी गपगुमान चालत असलेली ही पिल्लं कितीही साधी, गोड गोंडस दिसत असली तरीही भयंकर खेळकर, खोडकर आणि उपद्व्यापी असायची.
मुख्य म्हणजे आपली आई, बाबा, मावश्या हे आपल्याला अन्य कोणीही त्रास देणार
नाही याची खबरदारी घेणार आहेत, आपलं रक्षण करणार आहेत.. ही भावना त्यांना
एवढं बिनधास्त बनवायची की ते मनमौजीपणा करायला मोकळे असायचे.
कोणाची तरी खोडी काढून किंवा मस्ती करून किंवा थोडासा वेडेपणा करुन, परत
मागे गडबडीने आईच्या किंवा मावशीच्या पायांमध्ये शिरून पोटाखाली शांत उभे
राहायचे.
जसं काही मी केलंच नाही हा त्यांचा अविर्भावही खूप मजेदार असायचा आणि हे पाहण्यामध्ये किती वेळ जायचा हे आमचं आम्हालाच कळायचं नाही.
त्या हत्तींचे आणि पिल्लांचे किती फोटो काढले याची गणतीच नाही. अर्थात जागेअभावी ते सगळं इथे देता येणे अशक्य आहे.
प्रचि- ०८ :
हत्तीण आणि तिचं बाळ-०१
प्रचि- ०९ :
हत्तीण आणि तीच बाळ-०२
रामगंगा तलावाच्या चौरस्त्याचा एक फाटा एका डोंगराकडे जाऊन थांबायचा.
त्याच्या अलीकडे या तुटक्या झाडाला वळसा मारून हे ट्रॅफिक आयलंड तयार झालं
होतं.
बाकी गाड्या नाहीत पण आम्ही तरी त्या डोंगरापर्यंत जाऊन, तिथे एखादा प्राणी
आहे का हे बघून आणि या झाडाला वळसा मारण्याची परंपरा कायम राखून पुढे
जायचो..
प्रची-१० : Dead Tree at Traffic Island..
रामगंगा नदीच्या अलीकडच्या भागात म्हणजे जिथे आमचं गेस्ट हाऊस होतं त्या
भागात जर वाघ दिसला नाही तर आम्ही छोट्याश्या तात्पुरत्या पुलावरून नदी
ओलांडून पलीकडच्या भागात जायचो.
पलीकडचं बरचसं क्षेत्र हा नदीपात्राचाच भाग होतं. कारण ते सगळं दगड
गोट्याने भरलेलं होतं. शिवाय त्यातून जाणारा रस्ता सुद्धा नदीच्या वाळूने
भरलेला होता.
इथे सुरुवातीलाच पाण्याने भरलेली काही तळी, काही पाण्याची डबकी, काही
पाणवठे होते आणि त्यापलीकडे नेहमीचं जंगल, पूर्ण वाढीची झाडं-झुडुपं होती.
यातला जंगलाचा भाग पावसाळ्यातही नदीच्या पाण्याखाली जात नसावा.
या पलीकडच्या भागातही एक वाघीण असायची.
तिचं नाव होतं ‘पार वाली वाघीण’. ते कदाचित ‘पहाड वाली’ असं असावं.
तिची आम्ही ज्या ज्या वेळेला पाणवठ्यावर वाट बघायचो, त्या त्या वेळेला शिवा
म्हणायचा की ती समोरच्या पहाडावरच्या दगड गोट्यांवरनं उतरत पाणवठ्यावर
येईल म्हणून.
प्रचि- ११ :
नदी ओलांडांच्या पुलाकडे जाताना लागणाऱ्या रस्त्यावरचं हे पांगाऱ्याचे झाड.
प्रचि- १२ :
दगड गोट्यांवरून चालणारी टिटवी..
(Crop करुन टिटवी, दगडं अजून मोठी, छान दिसली असती. पण मागच्या लाटा, प्रतिबिंब आलं नसतं म्हणून तसंच ठेवलं.)
प्रचि- १३ : Reflection Painting..
पांढरे दगड, उजळ पाषाण, पाण्याच्या काठावरची तपकिरी पानगळ (ब्राऊन फॉल)
हे सर्व, खड्ड्यात साचलेल्या आणि मंद वाऱ्यामुळे हलक्या थरथरत्या पाण्यात
झालेल्या किंचित Destortion सह प्रतिबिंबित करणारं हे चित्र..
याला लँडस्केप म्हणायचं, वॉटरस्केप म्हणायचं, जलरंगातलं चित्र किंवा तैलचित्र म्हणायचं की अजून काही म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवा..
यातल्या दगडावर कोणीतरी येऊन बसलंय..
(याच प्रकाशचित्राचा एक क्लोजप पुढे दिलेला आहे.)
प्रचि- १४ :
दगडांवर पसरून उन्हाचा शेक, सूर्य-स्नान घेणारे मगरीचे पिल्लू..
प्रचि- १५ : फुलांमध्ये दडलेला हा Hair crested drongo.
प्रचि- १६ : आणि ही चेस्टनट टेल्ड स्टारलिंग जोडी..
Chestnut-tailed Starling.
प्रचि- १७ :
ढिकालामधलं आमचं कॉटेज आणि बाजूचं कॉटेज यामध्ये एक मोकळी जागा होती. तिथे
एक तुटलेल्या झाडाचा बुंधा होता आणि त्याच्यावर हे हनुमान माकड (लंगूर)
बऱ्याचदा बसलेलं असायचं.
त्याच्या समोरच्या बाजूला एक कट्टा होता आणि याच ठिकाणी फोनची थोडी बहुत रेंज कधीकधी मला मिळायची. (आमच्या प्रत्येकाला रेंज मिळायच्या जागा निरनिराळ्या होत्या.) त्यामुळे घरच्यांना फोन करण्यासाठी मधे मधे मी तिथे बसलेलो असायचो.
हा लंगूर नेहमी तिथे काय करत असायचा याचा मला प्रश्न पडायचा. आणि हा प्राणी
इथे बऱ्याचदा येऊन कानावर हात ठेवून काय करत असतो हा प्रश्न त्यालाही
बहुतेक पडत असावा..
सफारी मध्ये वेगवेगळ्या रस्त्यांवरून जाताना दोन-तीन वेळा आम्ही एका
विशिष्ट पॉईंट पाशी यायची आणि तिथून शिवा जिप्सी परत मागे फिरवायचा.
(कदाचित ढिकाला सफारी रुटचा तो लास्ट स्टाॅप असावा.)
(हाच रस्ता पुढे गेल्यावर गैरल ला जायचा हे नंतर आम्हाला गैरलला जाताना कळलं.)
या परत मागे फिरायच्या जागीच एक थोडासा वर जाणारा रस्ता होता. शिवाला विचारलं हा रस्ता कुठे जातो म्हणून..
तर तो म्हणाला की हा रस्ता पेडवाल्या वाघिणीच्या एरियामधून (जिथे तो
आम्हाला दर सफारीची सुरुवात करताना घेऊन जायचा) बाहेर पडतो. पण जास्त कोणी
या रस्त्याने जात नाहीत.
जर विशेष कोणी या रस्त्याने जात नसेल... म्हणजेच ही जागा कमी वर्दळीची
असेल, तर आपल्याला प्राणी बघायला मिळण्याच्या शक्यता जास्त आहेत; असा विचार
करुन मी त्याच रस्त्याने जीप न्यायचा आग्रह केला.
रस्ता वर जाऊन उजवीकडे वळला. थोडं पुढे गेल्यावरती जंगल दाट होत गेलं. झाड
उंच होती, सावली जास्त त्यामुळे अंधार जास्त. एक काळपट वातावरण तिथे तयार
झालं होतं.
तरी दुपारचे चार वाजले होते. संपूर्ण परिसरामध्ये एक सन्नाटा पसरला होता.
एवढ्या निर्मनुष्य जागी एवढ्या शांत वातावरणात आता प्राणी दिसणारच, वाघ ही
असू शकेल या हिशोबाने आमच्या नजरा चोहो बाजूला फिरत होत्या पण कुठलही जिवंत
अस्तित्व दिसत नव्हतं.
वाघ तर जाऊ देच.. पण हरिण, माकड, डुक्कर हे प्राणी, यांच्यापेक्षाही लहान
प्राणी, पक्षी, खरंतर चिटपाखरूही दिसत नव्हतं. त्यात रस्ता ओबडधोबड आणि वर
खाली असलेला होता.
शिवाचं संपूर्ण कौशल्य गाडी चालवताना पणाला लागलं होतं. सगळं वातावरण म्हणजे एक अजीब माहौल झाला होता. एखाद्या भारलेल्या जागेसारखा.
त्या परिकथांच्या पुस्तकांमध्ये एखादी चेटकीण असते ना जंगलामधली… तिच्या
ताब्यातल्या जंगलासारखं भारलेलं. तिच्या हद्दीत पाऊल टाकलं की ती बंदिवान
करणार किंवा एखाद्या झाडाझुडपात रूपांतर करणार.
इथे भिती वाटत नव्हती पण त्या संपूर्ण भारल्या गेलेल्या वातावरणाचा एक अनोखा परिणाम होत होता.
भय असं म्हणता येणार नाही पण वेगळंच काहीतरी..
आधी कधीही न अनुभवलेलं.
अत्यंत कमी माणसं सोबत असताना मी खूप निर्मनुष्य जागांवर, जंगलांमधे,
नदीकिनारी, डोंगरमाथ्यांवर, गुहेत रात्रीबेरात्री राहिलो आहे. पण असं
भारलेपण, असा अनुभव आधी कधीच आला नव्हता.
अर्थात या वातावरणातून कधी एकदाचा बाहेर पडतो, असंही वाटत नव्हतं. कारण त्याची एक वेगळी मजा होती. आणि पुन्हा अस्सल सफारीप्रेमींप्रमाणे आशाही वाटत होती की पुढे काही चांगले प्राणी किंवा पक्षी आणि नशिबात असेल तर चक्क एखादा वाघही दिसू शकेल म्हणून.
पण पुढेही त्या वाटेवर एकही प्राणी, पक्षी दिसला नाही. आता आम्ही
पेडवाल्या वाघिणीच्या भागात आलो होतो, पण नेहेमीच्या विरुद्ध बाजूने. तिथे
ती ही नव्हती.
मग तिथून आमच्या नेहमीच्या रस्त्यावर बाहेर पडलो.
एकाएकी एकदम मळभ गेल्यासारखं वाटलं आणि प्रसन्न प्रकाशाने, हिरव्या जंगलाने आणि निळ्या आकाशाने आमचं स्वागत केलं.
प्रचि- १८ : लगेचच स्वागत करायला समोर आला हा चितळांचा कळप.. (कुठे तडमडत आलात त्या वाटेवरुन असा अचंबा व्यक्त करणारे त्यांच्या चेहर्यावरचे भाव.)
प्रचि- १९ :
कलत्या दुपारचा हा रामगंगा तलाव आणि त्याचा काठ. इथे कालचाच वाघ येईल या आशेने आम्ही थांबलो होतो. सोबत अजूनही काही गाड्या होत्या.
अर्थात वाघ बघणं हे आमचं केवळ एकमेव उद्दिष्ट नव्हतं.
त्याची वाट बघता बघता तलावावरचे पाणपक्षी बघा, पाणी प्यायला येणारे इतर
प्राणी बघा, हेही उद्योग चालू होतेच. त्यामुळे वाघ नाही दिसला तरी पण
अभयारण्य अनुभवणं हे मात्र होत होतं.
वाट बघता बघता संध्याकाळ होऊ लागली.
प्रचि- २० : अस्ताचलाला चाललेला सूर्य, आमची दुसरी संध्याकाळ..
प्रचि- २१ :
सव्वा सहाच्या आत गेस्ट हाऊस वर पोहोचायच्या वाटेवर दिसलेला हा झाडामागचा सूर्यास्त.
और एक हसीन शाम.
प्रचि- २२ : काॅर्बेट मधला सूर्योदय..
प्रचि- २३ : मोर- ०१.
हा झाडावर असल्यामुळे फोटो काढताना पानं, फांद्या मधे मधे येत होत्या.
प्रचि- २४ : मोर-०२.
पण नंतर तो एक छोटीशी फ्लाईट घेऊन या ओंडक्यावर विसावला.
एखाद्या प्रमत्त सुंदरीप्रमाणे.. स्वतःचा तोरा मिरवत, आब राखून आणि छायाचित्रकारांना अप्रत्यक्ष सुचवत..
काढा तुम्हाला माझे काही फोटो काढायचे असतील तर..
प्रचि- २५ : पुन्हा एकदा कुरण आणि जलाशय..
रामगंगा तलाव आता सकाळच्या प्रसन्न उन्हात..
त्याच्या काठावरच्या कुरणामधले हत्ती..
काही आमच्याकडे पाठ करून, तर काही तोंड करून.. मधे मधे पिल्लं..
प्रचि- २६ :
नदी ओलांडण्यासाठी पुलाकडे जाताना अवचित पणे वाटेत आलेलं आणि जेम्स
बॉण्डच्या चपळाईने तीरासारखा रस्ता पार करणारं हे रानडुक्कर.. (त्याच्या
माद्या आणि पिल्लं रस्त्यापलिकडच्या चिखलात तोंड घालून चाफलत फिरत होती.)
Hi, I am डुक्कर… रानडुक्कर..
प्रचि- २७ :
नदी ओलांडून पहाडवाल्या (पारवाली) वाघिणीच्या इलाख्यात गेल्यानंतर एका पाणवठ्याच्या पलीकडे असलेली सांबर मादी आणि तिचं पाडस.
सांबर माता आणि पाडस..
(पिल्लामागून डोकावणारा मोर..)
प्रचि- २८ : हे त्यांचे कुटुंबप्रमुख सांबर बाबा..
प्रचि- २९ : Crested Serpent Eagle.. सर्पगरुड..
प्रचि- ३० : लांबवर मुंग्यांचं वारुळ आणि सांबर..
पाठमोरा, पाठीवरती..
पर्णछायेची, नक्षी मिरवत..
प्रचि- ३१ : आमच्या गेस्ट हाऊसच्या आवारातल्या झाडाचा ढोलीवाला बुंधा..
प्रचि- ३२ : ढिकाला गेस्ट-हाऊस..
प्रचि- ३३ : डेकवरुन दिसणारी रामगंगा नदी, तिच्याकाठचं कुरण आणि सुळेवाला नर हत्ती : Tuskar
प्रचि- ३४ : Pied Bushchat - Female..
प्रचि-३५ : Sykes's Lark..
प्रचि- ३६ : Black Winged Kite.. नजरेतील जरब..
प्रचि- ३७ : The Great Tuskar-01
सकाळी जिथे मोर बघितले तिथूनच हा बाहेर आला.
चार जिप्सी एकापाठोपाठ याच्याकडे तोंड करुन होत्या.
प्रचि- ३८ : The Great Tuskar-02
जसजसा हा पुढे येऊ लागला तसतशा चारही जिप्सी रिव्हर्स गिअर टाकून
मागेमागे घ्याव्या लागल्या. रस्त्याच्या एका कडेला टेकाड असल्यामुळे
हत्तीला पलीकडे जाणे शक्य नव्हते.
वाटेत एक आडवा रस्ता (T-junction) लागल्यावर दोन जिप्सी तिथे वळल्या. आमची आणि अजून एक जिप्सी तशीच मागे येत राहिली.
आता ते टेकाडही संपलं होत. हत्ती मग त्या बाजूच्या झाडांमधे घुसला.
प्रचि- ३९ : सर्पगरुड
प्रचि- ४० : "Elephant in Wilderness" - A Nice Landscape..
आता वेळ झाली होती ढिकालाचा मुक्काम हलवायची आणि गैरलला पोहोचायची.
त्यामुळे ढिकालाची सकाळची पार्कराउंड आटपून आणि जेवून आम्ही गैरलला जायला
निघालो.
हा गैरलला जायचा प्रवास म्हणजेच आमची दुपारची पार्कराउंड टूर होती.
ज्या रस्त्यावरून आम्ही गैरलला जात होतो तो आमच्या नेहमीच्या पार्कराऊंड पासून धनगढी गेटच्या रस्त्याला कनेक्ट होत होता. मात्र थोड्या वेळाने गैरलला जाताना मुख्य रस्ता सोडून आम्हाला डावीकडचं वळण घ्यायला लागलं. या रस्त्यावरुन आम्ही आधी कधीही प्रवास केला नव्हता किंवा ढिकालाच्या पार्कराऊंड मध्येही त्यावरून गेलो नव्हतो. त्यामुळे या प्रवासाचा अनुभव वेगळा होता. या रस्त्यावर आम्हाला खूप बार्किंग डिअर्स वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळाले. खूप सारे एकांडे असले तरी दोन ठिकाणी बार्किंग डिअर्सची जोडपी बघायला मिळाली.
प्रचि- ४१ : भेकर... Barking Deer..
प्रचि- ४२ : गैरलच्या वाटेवरचा सूर्यास्त..
हा रस्ता अतिशय खडबडीत, अप्स डाऊन्स असलेला, थोड्या दाट झाडीचा होता.
याच्या डाव्या हाताला रामगंगा नदीचं पात्र वाहत होतं. इथे नदीच्या
पात्रामध्ये वर्दळ कमी असावी कारण बऱ्याच मगरी नदी काठावरती असतील असं
आमच्या गाईड कम ड्रायव्हर शिवाने आम्हाला सांगितलं.
अर्ध अंतर गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि डाव्या हाताला एक व्ह्युईंग
पॉईंट किंवा व्ह्युईंग गॅलरी होती तिथे जायला सांगितलं. त्या पॉईंटवरून
खालचं रामगंगा नदीचं पात्र, काठावरचे दगड गोटे आणि बाजूला जंगल दिसत होतं.
काठावरतीच बऱ्याच मगरी अंग वाळवत पहुडल्या होत्या. त्या व्ह्युईंग पॉईंटचं
नावंच होतं ‘क्राॅकोडाइल पॉईंट’.
इथून मग आमची गैरल रेस्ट हाऊसला पोहोचायची घाई सुरू झाली. कारण पुन्हा
सव्वा सहाची सफारी समाप्तीची वेळ. त्यामुळे आता उडत्या जीपमधून प्रवास सुरू
झाला. पार्श्वभाग सडकू नये म्हणून जीपला घट्ट धरायला लागत होतं. मात्र
त्यातूनही आजूबाजूला काही प्राणी दिसतात का किंवा हे नवं जंगल एन्जॉय करणं
चालू होतं. वेळेच्या एक दीड मिनिट आधीच आम्ही रेस्ट हाऊसला पोहोचलो.
आमच्यापेक्षा शिवाने सुटकेचा जास्त मोठा निश्वास सोडला. आम्ही सडकल्या
जाणाऱ्या अवयवांना आराम मिळाला म्हणून निश्वास सोडला.
हे रेस्ट हाऊस ढिकालापेक्षा खूपच लहान होतं. अवघ्या चार खोल्या होत्या.
त्याही एकदम साध्यासुध्या. रेस्ट हाऊसचा परिसरही कमी होता. फक्त लागून
असणारी नदी होती ती जास्त जवळ आणि समपातळीत होती आणि तिचा खळाळ जास्त होता.
संध्याकाळचा चहा बिस्किट आणि सँडविच खाऊन आम्ही आमच्या रूम्स ताब्यात
घेतल्या. फ्रेश झाल्यानंतर इथल्या प्रशस्त व्हरांड्यात लाकडी खुर्च्यांची
मांडणी केली आणि खानसाम्याला घोळात घेऊन थोडे स्टार्टर आयटम्स बनवून घेतले.
छोटसं आवार, कमी आणि मिणमिणते कंपांऊंड लाइट्स आणि नदीपात्राच्या पातळीवर
असल्यामुळे चहुबाजूने डोंगर अशा वातावरणात ती रात्र जास्त गडद होत गेली.
बाजूलाच असलेल्या नदीचा खळाळता नाद सोबतीला होताच. इथलं जेवणही साधं पण रुचकर होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या पार्कराऊंडला बाहेर पडल्यावर एन्ट्रन्स गेटच्या
डाव्या बाजूच्या चढाच्या रस्त्यावरती ड्रायव्हरने जिप्सी घातली. थोडं पुढे
गेल्यावर रस्त्यावरती लांबवर हत्तींचा कळप आहे असं गाईडने सांगितलं.
त्यांच्या जवळ जाऊन पण सुरक्षित अंतर राखून फोटो काढावेत अशा हिशोबाने
आम्ही जिप्सी पुढे काढायला सांगितली. नेमका त्याच वेळेला आमच्या मागच्या
बाजूने बांबू तोडल्याचा आवाज आला. तिकडेही काही हत्ती बांबूचा पाला खात
होते. फक्त ते रस्त्यावर नसून रस्त्यापासून थोडेसे आत झाडांमध्ये होते.
गाईडचं म्हणणं पडलं की बहुतेक ते आता रस्ता क्रॉस करून पलीकडे जातील. तसे
गेले तर उत्तम पण रस्त्यावरच राहिले तर दोन बाजूंच्या हत्तीच्या कळपात
आम्ही रस्त्यामध्ये ट्रॅप होऊन जाऊ. हा रस्ता पण सरळसोट होता. डोंगरावरचा
चढाचा रस्ता असल्यामुळे त्याला डावीकडे उजवीकडे असे कुठलेही फाटे नव्हते;
जेणेकरून आम्हाला त्या रस्त्यावरून डायव्हर्शन घेता येईल.
सुदैवाने मागच्या हत्तींनी थोडसं रेंगाळून का होईना पण रस्ता क्रॉस केला आणि रस्त्यापलीकडच्या बांबूंकडे मोर्चा वळवला.
तशी घड्याळी दहा-बाराच मिनिटं गेली. पण तो कालावधी प्रत्यक्षात मात्र खूपच
दीर्घ (तेव्हा तरी) वाटला होता. गाईडच्या म्हणण्यानुसार आता परत फिरणं
योग्य होतं. कारण जर ते हत्ती फिरुन पुन्हा रस्त्यावर आले असते तर आम्ही
परत ट्रॅप झालो असतो. त्यामुळे तिथल्या तिथे जीप मागेपुढे करून वळवली आणि
उलट दिशेच्या रस्त्यावरून पार्कराउंड चालू केली.
प्रचि- ४३ : वाटेत कालचीच नदी आणि तिचा काठ सकाळच्या उजेडात नीट पहाता आले. त्या नदीचे आणि काठाचे हे प्रकाशचित्र.
जीपचे टायर मार्क्स दर्शवणारा हा वळणदार रस्ता.
ह्या जंगलातले रस्ते थोडे अरुंद होते, झाडं जास्त दाट होती आणि वाहनांची
येजा खूपच कमी होती. त्यामुळे मुख्य रस्ता सोडला तर बाजूच्या दुय्यम
रस्त्यांवरती ही तपकिरी पानगळ कायमच गालीच्यासारखी पसरलेली असायची.
आता आम्ही विरुद्ध दिशेने पुन्हा डोंगराचा चढ चढत होतो, पण त्या रस्त्यावर
नेमकं एक झाड आडवं पडलं होतं. आणि ते झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे
अधिकार फक्त फॉरेस्टच्या लोकांनाच होते. त्यामुळे शिवाने गाडी इथूनही परत
वळवली. त्यामुळे अशा निवांत, ब्राऊनफाॅल झालेल्या रस्त्यांवरून बरंच अंतर
फिरायची आमचे मनीषा काही पूर्ण झाली नाही. अशा निवांत रस्त्यांवरून
फिरण्याचं एक वेगळंच निसर्गसौंदर्य बघणं हे एक कारण असलं तरी सहसा न
दिसणारे प्राणी, त्यांचा मोठा कळप, एखादा वाघ, वाघीण किंवा आख्खं
व्याघ्रकुटुंब दिसावं हा उद्देशही होता.
परंतु पानगळीने भरलेले टेकडीवरचे रस्ते आम्हाला विशेष काही लाभले नाहीत.
प्रचि- ४४ :
तपकिरी पानगळ आणि रस्ता अडवलेलं झाड दर्शवणारं हे प्रकाशचित्र.
प्रचि- ४५ : मधेच डोकावलेला हा Kalij Pheasant..
ह्याची जोडीदारीणही सोबत होतीच.
प्रचि- ४६ : नदीच्या काठी चिखलात आणि दगड गोट्यांवर पसरलेली ही मगर..
प्रचि- ४७ :
पार्कराऊंड संपायच्या सुमारास गाईडने परत आम्हाला सुरुवातीच्या रस्त्यावर नेलं. त्याच्या म्हणण्यानुसार या दोन तासात त्या दोन्ही हत्तींचा कळप आता तिथून पार झाला असेल. यावेळी मात्र आम्ही त्या रस्त्याच्या शेवटपर्यंत जाऊ शकलो. हा रस्ता डेड एंड होता आणि तिकडे एक ट्री-हाऊसवजा चौकी होती. त्या चौकीतून दिसणारं हे नदीचे दृश्य.
प्रचि- ४८ :
वाटेत आमच्या जिप्सीने एक छोटासा पाण्याचा प्रवाह ओलांडला. त्या
पाण्याची एक बारीकशी धार बाजूला वळून हळूहळू एका बऱ्यापैकी मोठ्या
खड्ड्यामध्ये जमा होत होती. त्या खड्ड्याच्या काठाशी दगडांवर छोटे-मोठे
पक्षी होते. त्यापैकीच हा ग्रे वॅगटेल.
Grey Wagtail..
पार्कराऊंड संपवून आम्ही रेस्टहाऊस वर आलो. ब्रेकफास्ट केला पॅकिंगही केलं. आज आमचा कॉर्बेट मधला शेवटचा दिवस होता. जिप्सी निघेपर्यंत थोडा वेळ होता, त्या वेळात पुन्हा एकदा आवाराच्या कंपाउंडपाशी गेलो.
प्रचि- ४९ : शेजारच्या खळाळत्या नदीच्या पाण्यात मासेमारी करणारा पण सध्या स्तब्ध बसलेला हा छोटा मत्स्य गरुड. Lesser Fish Eagle..
प्रचि- ५० :
नदीपात्राच्या पलीकडल्या किनाऱ्यावर हत्ती गवत खात होते. मध्येच त्यातल्या
एकाने सोंड भरून माती घेतली आणि ती धूळ स्वतःच्या अंगावर फवारली.
हत्तीचे धूलिका-स्नान..
प्रचि- ५१ : : आता धनगढी गेटच्या आणि एकंदरीतच जिम कॉर्बेट अभयारण्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. वाटेमध्ये पक्षी, प्राणी दिसतच होते. सांबरांची दोन जोडपी आमच्या बाजूबाजूने चालत होती. त्यातल्या एका नराने आम्हाला केलेला गुडबाय.
ढिकालापासून गैरलपर्यंत अंतर आम्ही आधीच पार केलं होतं. त्यामुळे
गैरलपासून धनगढी गेट पर्यंतचा प्रवास पहिल्या दिवसापेक्षा निम्म्या वेळात
झाला. इथे एक इन्फर्मेशन कम म्युझियम टाईप सेंटर होतं, तेही पाहिलं.
तसं ठीकठाकच होतं.
प्रचि- ५२ :
The Real Bye Bye to Jim Corbett Sanctuary..
हा जिम कॉर्बेट अभयारण्याच्या बाहेरचा, आतल्या वेगवेगळ्या गेस्टहाऊसेस पर्यंतची अंतरं दर्शवणारा बोर्ड.
आता Wel-Come च्या ऐवजी Come Soon म्हणणारा..
शिवाने त्याच्या जिप्सीने आम्हाला परत आल्या रस्त्याने रिसॉर्टला सोडलं.
तिथे आमचं जेवून होईपर्यंत आमची सुरुवातीचीच ईनोवा आम्हाला एअरपोर्टला
न्यायला आली. हा संपूर्ण प्रवास मात्र हायवेनेच झाला. कारण रस्त्याच्या
जायच्या बाजूच्या लेन्सचं काम आधीच झालं होतं.
ट्रिप संपत आली होती. घरचे वेध लागले होते. सगळं काही बघून झालं होतं.
ऑफिसमधल्या साचलेल्या कामांची आठवण येत होती. आणि रस्ता भर एक उदास पाऊस
पडत होता. त्यामुळे हा प्रवास निरस आणि कंटाळवाणा झाला.
त्यानंतर बॅगेज चेक-इन, सिक्युरिटी तपासणी, बोर्डिंग हे सोपस्कार आटोपून आम्ही दिल्लीहून मुंबईला पोहोचलो आणि तिथून आपापल्या घरी.
पहिल्या दिवशी सकाळी दिसलेला वाघ सोडला तर परत वाघ किंवा वाघीण दिसली
नाही. पण माझ्यासाठी वाघ दिसणं ही जंगलसफारी मधली एकमेव अट किंवा गरज नसते.
दिसला तर उत्तमच.. पण नाही दिसला तरी तो दिसण्याच्या अपेक्षेने केलेला
प्रवास, दुसऱ्या सफारी व्हेईकल मधल्या ड्रायव्हरशी आपल्या ड्रायव्हरची
होणारी बातचीत, चौकशी..
दोन गाड्या एकमेकांना पार होताना क्षणभर थांबवून, 'कुऽछऽऽ ??' असं
एकमेकांना विचारणं.. 'नाही' अशी समोरच्याची मान हलल्यावरही एखाद्या
स्थितप्रज्ञाप्रमाणे तो नकार स्विकारुन गाडी पुढे काढणं..
कधी कधी ऐकू आलेलं कॉलिंग.. कधी माकडांचं, कधी हरणाचं, कधी पक्षांचं.. मग पालवल्या गेलेल्या आशा.
आणि वाघ दिसला नाही तरी आता दिसेल का ही अपेक्षा, उत्कंठा..
एखाद्या ठिकाणी वाघ बसलाय हे बातमी कळल्यावर तिथेच आपण आणि अन्य गाड्यांनी मांडलेलं ठाण..
तो आता बाहेर येईल, नंतर बाहेर येईल या उत्सुकतेमध्ये काढलेला वेळ.. या साऱ्या साऱ्या मधून सफारीचा हा वेळ कारणीच लागत असतो.
आणि कधीतरी अनपेक्षितपणे एखाद्या झुडूपातून बाहेर येणारा किंवा अवचितपणे गवतातून उभा राहिलेला वाघ पहाताना उठणारा तो थरार..
हमखास वाघ बघायचा असणाऱ्यांनी खरंतर प्राणीसंग्रहालयातच जावं..
पण त्यामध्ये तो थरार, ती उत्सुकता नाही.
शिवाय वाघ दिसण्यापेक्षा वाघ असणारं जंगल, हा खरं तर जंगल फिरण्याचा क्रायटेरिया असला पाहिजे.
ही खरंतर एक बहारदार गोष्ट असते. कारण असं वाघ असणारं जंगल हे सर्वोच्च
पातळीवरती असतं. कारण त्यामध्ये वाघ राहू शकत असेल तर त्याचं अन्न, त्या
अन्नाचं अन्न अशी ही सगळी पर्यावरणीय साखळी परिपूर्ण असते.
वाघाला राहण्यासाठी, हरणा माकडांना राहण्यासाठी, रानडुक्कर आणि तृणभक्षी
प्राणी राहण्यासाठी आवश्यक असलेला अधिवास, या अशा सगळ्या परिसरामधून नुसतं
फिरणं हाही एक मनोरंजक, स्वतःला तृप्त करणारा, स्वतःला शांतवणारा अनुभव
असतो.
शतकानुशतकं विशेष न बदललेलं या सर्वांचं जगणं पाहून आदिम निसर्गाशी कुठेतरी नाळ जोडली जाते.
या प्रक्रियेमधे मग वाघ, छायाचित्रण ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी दुय्यम होऊन जातात.
दिसले तर उत्तम आहे, छायाचित्रंही मिळाली.. अजूनच उत्तम आहे.
पण माझ्यासाठी तरी जंगलसफारी ही ‘मंज़िलसे सफर बेहेतर’ अशीच असते..
समाप्त…