Thursday, June 19, 2025

छोटा पॅकेट बडा धमका - केदारताल ट्रेक

 Submitted by धनश्री. on 17 June, 2025 - 00:41

दरवर्षी एप्रिल महीना आला की आंब्यांचे वेध लागतात, मे अखेरीस पावसाचे, ऑगस्टमध्ये गणपती तसे डिसेंबर, जानेवारी आला की आम्हाला ट्रेकचे वेध लागतात. ( निबंधाची सुरुवात वाटते आहे ना ? )

तसेच ह्याही वर्षी, कुठे जायचं ? हा विचार सुरु झाला.

माझ्या मनात दोन जागा होत्या, पण त्यातल्या एकाची एकच बॅच होती, जी कोणास ठाऊक कधी फुल झाली होती आणि दुसर्‍याची तारीख जमेल असं वाटत नव्हतं.

मग माझ्या लिस्टमध्ये असलेले ट्रेक्स, त्याच्या उपलब्ध तारखा, त्यातल्या मला जमू शकतील अश्या तारखा ह्या सगळ्यांचा लसावि, मसावि काढून केदारताल नक्की केला.

केदारताल हा हिमालयाच्या गढवाल भागात आहे.  हा ट्रेक गंगोत्रीहून सुरु होतो. ( आणि संपतोही तिथेच ). हा तलाव केदारगंगा नदीचे उगमस्थान आहे, जी भागिरथी नदीची मुख्य उपनदी आहे. भागिरथी पुढे गंगेला जाऊन मिळते. ही भागिरथी गौमुख येथे उगम पावते. गौमुख तपोवन हाही गंगोत्रीहून सुरु होणारा ट्रेक आहे.

साधारण मे च्या मध्यावर ट्रेकींग सिझन सुरु होतो तो सप्टेंबरपर्यंत चालतो. आताशी वर्षभर लहानसहान ट्रेक्स सुरुच असतात पण मुख्य ट्रेक्स ह्या दरम्यान असतात.

प्रत्येक ट्रेक, त्याभागातलं हवामानावर अवलंबून असतो, जसे की केदारतालच्या चारच तारखा आहेत. मे मध्ये एक बॅच, जूनमध्ये एक आणि मग डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये दोन.

त्यातली मे ची बॅच जमणारी होती. जूनमध्ये पावसाची शक्यता आणि ऑक्टोबर मध्ये जमेल की नाही ह्याची कल्पना नसल्याने मे ची बॅच फायनल केली.

महेश ने ( नवरा ) हा ट्रेक मागच्या वर्षी केलाय आणि केदार ( लेक ) नुकताच नविन नोकरीत जॉइन झाल्याने ते दोघेही येणार नव्हते. जुन्या ट्रेकींग ग्रुपमध्ये विचारलं तर ५ जण तयार झाले, पण नंतर ते सगळे वेगवेगळ्या कारणाने गळले. आणि मी एकटीच उरले

तरी अजून बुकींग करावं असं वाटेना. एप्रिलच्या पहील्या आठवड्यात सहज बघितलं तर मे बॅचमधल्या फक्त ७ जागा शिल्लक होत्या. मग जागं होऊन बुकींग करुन टाकलं. कधी कधी मोठा ग्रुप येतो आणि ब्लॉक बुकींग होतं

मग फ्लाईट्सx बघितल्या.  पुण्याहून देहराडूनला जायला यायला अगदी सोयीस्कर फ्लाईट्स आहेत. फक्त येतांना मी शनिवारी येणार होते. शनिवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पुण्याचा एअरपोर्ट सिव्हिल विमानांसाठी बंद असतो त्यामुळे त्यादिवशीसाठी जरा खटपट करावी लागली. देहराडूनहून मुंबईला जाऊन कॅबने यावं की वंदे भारत पकडून दिल्लीला जाऊन विमानाने यावं इथपर्यंत सगळे पर्याय बघितले. शोधाशोध केल्यावर दुपारी १ ची दिल्ली  आणि तिथून मग सहा वाजताची पुणे फ्लाईट बुक केली. प्रवासात पूर्ण दिवस जाणार होता पण इलाज नव्हता.

मग राहीली हॉटेल्स. ह्याआधी तिकडून चार वेळा ट्रेक्स केल्याने जातांनाचं आणि येतांनाचं हॉटेल फिक्स आहे. त्याचीही बुकींग्ज यथावकाश करुन टाकली.

आता तयारी. हा ट्रेक मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या ट्रेक्समध्ये कमी ऊंचीचा होता. पण तरी तो डिफीकल्ट कॅटेगरीततला होता म्हणून हलक्यात घेऊन चालणार नव्हतं. अर्थात हिमालयातला कोणताच ट्रेक, चला करुन येऊ किंवा इतके वेळा गेलो आहोत तर नो प्रॉब्लेम असं करुन चालत नाही. तिथली चॅलेंजेस वेगळी असतात.

ह्यावेळी मी माझ्या नेहमीच्या रुटीनवर भिस्त ठेवली. ३ दिवस रनिंग, ३ दिवस जीम. ते मात्र अगदी नियमीत सुरु ठेवलं. ३/४ वेळा सिंहगडावर जाऊन आले.

शेवटी खरेदी. नव्याने घेण्यासारखं काहीच नव्हतं. फक्त रेनकोट घ्यावा का हा विचार करत होते. पाँचो घालून उतरणं थोडं त्रासदायक होतं . तो पायघोळ असतो, पायात येतो. डिकेथलॉनमध्ये चक्कर मारली पण एप्रिलमध्ये रेनकोट कुठले दिसायला !  ऑनलाईन होते पण हो ना करता करता नाहीच घेतला.

शुज मात्र पुढल्या वेळी घ्यायला हवेत.

जायचा दिवस आला.

ह्यावेळी मी सामानाचा फाफटपसारा शक्य तितका कमी ठेवला होता. तरी गरजेच्या वस्तू न्याव्याच लागतात. खायला ड्रायफ्रुट्सना काट मारुन, ( फक्त थोडे काजू आणि मनुका घेतल्या, त्या मला आवडतात म्हणून ) योगाबार घेतले आणि लाँग रन्सना मी खाते त्या जेल्स घेतल्या.

कपडेही मोजकेच घेतले. चारच दिवसांचा ट्रेक होता तर एकच जोड घ्यावा असा विचार करत होते पण नंतर अजून एक जोड ठेवला. आणि नंतर बरं झालं तो ठेवला असं झालं.

निघायच्या आठवडाभर आधी पासून वेदर अ‍ॅपवर गंगोत्रीचं हवामान बघत होते. तिकडे पाऊस नव्हता. पुण्यात मात्र बर्‍यापैकी सुरु होता. मग जायचा दिवस जवळ आला तसे तिकडे ढग दिसायला लागले. पाऊस मला नको होता. थंडी वाढते आणि चालणंही कठीण होत जातं.

तिकडे रात्री टेम्परेचर शुन्य किंवा खालीही दिसत होतं. म्हणजे वर वर जाऊ तसं अजून थंड होणार.

जायच्या आधी फिटनेस सर्टीफिकेट घ्यायला डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला बघूनच त्यांनी, आता कुठे दौरा असं विचारलं. त्यांनाही सवय झालीये.

निघाले तेव्हाही पुण्यात पाऊस होताच. संध्याकाळी साडेपाच वाजता देहराडूनला उतरले तेव्हा छान ऊन होतं. प्रिपेड टॅक्सीचा काऊंटर आता आत बॅगेज बेल्टजवळ शिफ्ट झालाय. सॅक घेतली आणि टॅक्सी बुक केली. बाहेर जाऊन त्यांच्या माणसाकडे रिसीट दिली, त्याने टॅक्सीवाल्याला बोलावले, टॅक्सीजवळ पोहोचले आणि अचानक वाटलं, आपण आपलीच सॅक घेतली ना ? बेल्टवर इतरही सॅक्स दिसल्या होत्या. मी माझ्या सॅकला खुण लाऊन ठेवली आहे, तरी एक कप्पा उघडून चेक केलं आणि निघालो.

हॉटेलवर पोहोचले. हे हॉटेल आमच्या पिक अप पॉइंटच्या,प्रिन्स चौकाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कितीही लवकरचा पिक अप असला तरी जाता येतं.

दरवेळी ट्रेकच्या आधी एक एक्सेल शीट शेअर केली जाते, ज्यात काही माहिती भरुन द्यायची असते शिवाय त्यातून येणार्‍या लोकांचा साधारण वयोगट काय आहे , बायका आहेत का, ह्याचा अंदाज येतो .ह्यावेळी सगळं ऑनलाईन वेबसाईटवर लॉग इन करुन शेअर करायचं होतं. नाही म्हणायला एकीने फिटनेस सर्टीफिकीट ग्रुपवरच शेअर केल्याने एक तरी बाई आहे एवढं कळलं होतं. महेश गेला होता त्या बॅचमध्ये सगळे चौदाच्या चौदा पुरुषच होते. अर्थात तसं झालं असतं तरी टेंटमध्ये एकटीने राहण्याची किंवा पुरुषाबरोबर शेअर करण्याची माझी तयारी होतीच. प्रत्येक वेळी थोडच कोणी सोबत मिळणार.

दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी सहाचा पिक अप होता. देहराडूनहुन गंगोत्रीला जायचं होतं.

ह्याआधी बालीपास करतांना प्रिन्स चौकात गेले होते तेव्हा तिथे फक्त आमचीच बस होती. कारण तो ऑक्टोबर महीना होता, बहुतेक सगळे ट्रेक्स संपले होते आणि एकच बस, काही थोडे लोक हेच चित्र डोक्यात होतं.

ह्यावेळी पोहोचले तर तिथे जत्राच भरलेली. चार मोठ्या बसेस, चार पाच बोलेरो आणि अनेक लोक. मला आधी कळेचना हे काय चाल्लय ते.  तिथे गेले.  रँडमली दोघांना विचारलं केदारताल का ? ते म्हणाले हर की दुन. आणि मग डोक्यात प्रकाश पडला.

देहराडूनहून गंगोत्रीच्या बाजूला केदारताल, गौमुख तपोवन हे दोन आणि सांकरी साईडला हर की दुन आणि बाली पास हे दोन ट्रेक्स जातात. ही सगळी गर्दी ह्या चारही ट्रेक्सची होती.

पलीकडे एक माणूस हातात कागद घेऊन फिरत होता, त्याच्याकडे जाऊन सांगितलं केदारताल. त्याने अजून एकाकडे पाठवलं. त्याच्याकडे असलेल्या लिस्टमधल्या माझ्या नावावर खूण करुन त्याने, इस बस के पिछे रख दिजीये आपका सामान असं सांगितलं. तिथे काही सॅक्स होत्या. मग बसमध्ये जाऊन एका सीटवर छोटी बॅग ठेवली.

बाहेर येऊन निरीक्षण करत उभी राहीले. लोक इकडे तिकडे फिरत आपापला ग्रुप शोधत होते. जुने ओळखीचे कोणी भेटल्यावर चौकशी करत होते. मधल्या काळात काय केलं, म्हणजे कोणते ट्रेक्स केले ह्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. एक चहलपहल होती. लोकांच्या एकूण हालचालींवरुन ते कोणत्या ट्रेकला जात असतील ह्याचा अंदाज करायला मजा येत होती. तिथे उभी असतांना काही चेहरे दिसले जे काल माझ्याच फ्लाईटमध्ये होते. त्यांनी मला ओळखलं की नाही कोणास ठाऊक !

जरा वेळात ड्रायव्हर आला आणि टपावर चढला. खालून त्याला आमच्या सॅक्स द्यायच्या होत्या. सॅक दिली, ती त्याने नीट ठेवली ते बघितलं आणि मग बसमध्ये जाऊन बसले.

सगळे लोक जमले. ड्रायव्हर आणि को ऑर्डीनेटरने चार चार वेळा केदारताल जा रहे हो ना ? असं सगळ्यांना विचारून सात वाजता बस निघाली.

देहराडूनहुन मसुरीकडे जाणारा रस्ता मला फार आवडतो. शहरीच भाग आहे पण सकाळी सकाळी खूप छान दिसतो. आज आम्ही मसुरी बायपास करणार होतो.

बस मसुरी बायपासला लागणार इतक्यात ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर असलेली मुलगी अचानक तिच्या शेजारी बसलेल्याला काहीतरी विचारु लागली आणि ड्रायव्हरला थांबा थांबा म्हणायला लागली. झालं असं की सॅक बसच्यामागे ठेऊन ती पाणी आणायला गेली आणि येऊन बसमध्ये बसली. आपली सॅक आपण वर चढवायला द्यायची असते हे तिच्या गावीही नव्हतं. तिला वाटलं की ड्रायव्हर स्वतःहून ठेवतो. मग निदान ठेवली की नाही  हे तरी बघावं ! तिची सॅक तिकडेच राहिली. मग ड्रायव्हरने फोन केला. नशिबाने तिकडे अजून लोक होते आणि आमच्या रुटवर येणारी एक आर्टीगा अजून निघत होती. त्यांनी ती घेतली आणि ह्या फोनाफोनीत १५/२० मिनीटे जाऊन आम्ही निघालो.

पुढे ब्रेकफास्टला थांबलो तिथे तिला ती मिळाली. तोवर ती मुलगी अगदी निवांत होती. मी तिच्याजागी असते असते तर तोवर डोकं कामातून गेलं असतं.हे सगळं होतांना मला सारखा संशय येऊ लागला की मी वर चढवायला दिली ती माझीच सॅक होती ना ! आता बघता येण्याचीही शक्यता नव्हती.

ब्रेकफास्टच्या वेळी इतरांशी ज्या काही थोड्या गप्पा झाल्या त्यात बाकीच्या लोकांनाही असाच संशय येतोय हे ऐकून तेवढंच बरं वाटलं.

रस्ता पूर्ण वळणावळणांचा आहे. पण खूप छान आहे. म्हणजे बाहेर बघत रहावं अशी हिरवीगार दृष्यं आणि रस्ता नीट मेन्टेन केलेला आहे. संपूर्ण २४० किमीच्या रस्त्यावर फक्त एक टोल आहे. तरीही रस्ता इतका मख्खन म्हणावा असा आहे.

गुगल मॅपच्या हिशोबाने ८ तास लागणार होते. शिवाय जेवणखाण धरुन ९/९.३० म्हणजे उशीरात उशीरा पाच साडेपाच पर्यंत पोहोचलो असतो.

सध्या त्या भागात चारधाम यात्रा सुरु आहे आणि गंगोत्री हे तर महत्त्वाचं ठिकाण.

तिकडे लहान लहान गाड्यांबरोबरच मोठमोठ्या टुरीस्ट बसेस भरुन भाविक येतात. रस्ते खूप अरुंद. काही ठिकाणी जेमतेम एक गाडी एकावेळी जाईल एवढे. मग दोन्ही बाजूने वाहतुक थांबवून एक एक बाजू सोडतात.

त्यामुळे उत्तरकाशीपासून ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली. तिथेच पाऊण एक तास थांबवलं. पुढे एका ठिकाणी अजून तासभर आणि मग १० मिनीटे, १५ मिनीटे असे थांबत थांबत पाच ऐवजी रात्री आठ वाजता गंगोत्रीला पोहोचलो. १३ तास लागले.

अगदी उतरता उतरता जॅकेट अडकवून घेतलं. हवेत मस्त गारवा होता.

बस गंगोत्रीच्या बर्‍यापैकी बाहेर थांबवतात. ड्रायव्हरने पोलीसांना  सांगितलं की आत टुरीस्ट नाही, ट्रेकर्स आहेत तेव्हा बस थोडी अजून पुढे नेता आली. आणि शेवटी उतरलो. देवस्थानात असतं तसं वातावरण होतं. दुतर्फा फोटो, जपमाळा, प्रसाद आणि मुख्य म्हणजे भागिरथीचं पाणी भरुन घ्यायला अगदी अंगठ्याएवढ्या आकाराचे ते पाच पाच लिटर एवढे मोठे कॅन्स, बाटल्या विकणारी दुकाने. ते बघत, थबकत थबकत चालणारे घोळके. मध्येच जिलबी, गुलाबजाम, पॅटीस विकणारी टिचकीभर हॉटेल्स, आणि रात्रीपुरता मुक्काम करता येईल इथपासून ते रिव्हर व्ह्यू वगैरे नावाची हॉटेल्स.

इथून १० वगैरे मिनीटे चालत गेस्ट हाऊसवर पोहोचलो. मंदीराच्या पलीकडच्या काठाला. मध्ये दोन्ही बाजू जोडणारा छोटासा पूल.

गेस्ट हाऊस छानच होतं. नविन होतं. टेंट तुम्ही कोणाबरोबरही शेअर करा. गेस्ट हाऊस मध्ये मुली आणि पुरुष अशी विभागणी होते. ट्रिपल/ चार शेअरींग अश्या खोल्या असतात. आम्हाला ट्रिपल शेअरींग खोली मिळाली त्यात ती सॅक विसरलेली मुलगी सृष्टी आणि बँगलोर गँगमधली नमिता माझ्या बरोबर होत्या.

जेवणात पनीर, दाल, पोळ्या भात आणि खीर होती.

जेवण झाल्यावर देहराडूनला राहणार्‍या कुसुम आणि नीलमबरोबर मंदीरात जाऊन आले. मंदिर बंद व्हायची वेळ झाली होती म्हणून अजिबात गर्दी नव्हती. गाभार्‍यात उभे राहून छान दर्शन झाले. एरवी गर्दीत एखादा सेकंद जेमतेम मिळतो. त्यात मुर्ती कुठे आहे हे शोधेपर्यंत बाहेर पडावं लागतं

WhatsApp Image 2025-06-15 at 9.02.55 AM.jpeg

रात्री झोप मात्र लागली नाही. थंडी होती आणि गाद्यांवरचं ( गाद्या कसल्या मॅट्रेस ) प्लॅस्टिकही काढलेलं नसल्याने अंगाखाली काहीतरी विचित्रच जाणवत होतं.

उद्याही मुक्काम इथेच.

गंगोत्री १०,२०० फुटांवर आहे. अ‍ॅक्लमटायजेशन म्हणून इथे एक मुक्काम असतो. त्यामुळे घाई काही नव्हती.

दुसरा दिवस - गंगोत्री.

सकाळी ७ वाजता चहा ब्रेकफास्ट आणि ८.३० ला ब्रिफींग होतं.

लवकर, नेहमीच्या वेळेला जाग आली. जरावेळ पडून राहीले आणि मग आटोपून बाहेर येऊन बसले.

ब्रेफाला उपमा आणि इडली चटणी सांबार होतं.

ब्रिफींगच्या आधी आमची फिटनेस सर्टीफिकेट्स, सेल्फ डिक्लरेशन, फोटो वगैरे गोळा केले.  आत्ताही सॅक विसरणार्‍या सृष्टीला लक्षात आलं की तिने मेडीकल आणि सेल्फ डिक्लरेशन, फोटो काहीच आणलं नाहीये. सॉफ्ट कॉपी आधी दिलेल्या होत्या पण हार्ड कॉपीज आणायच्या होत्या. खरं तर ग्रुपवर चार पाच दिवस आधीपासून ह्याबद्दलचे मेसेज येत होते. आमचा ट्रेक लिडर सुधांशू जरा वैतागला. मग प्रिंट काढायची सोय करुया म्हणाला.

आधी सगळ्यांची ओळख. नावं, कुठून आलेत, कोणकोणते ट्रेक्स केलेत वगैरे विचारुन झाल्यावर  त्याने ट्रेकची साधारण माहिती दिली. काय करायचं, काय नाही हे सांगितलं.

एव्हाना हवा ढगाळ झाली होती. गारवा प्रचंड वाढला होता. एकाच जागी बराच वेळ बसल्याने हुडहुडी भरली होती. वेदर अ‍ॅपवर आज पाऊस दिसत होता. वरती काय असेल ह्याचा काहीच अंदाज नव्हता. खाली पाऊस तर वरही असणारच.

बोलणं झाल्यावर आम्हाला दोन ज्युनिअर गाईड्सबरोबर जवळची सूर्य कुंड, गौरी कुंड अश्या जागा बघायला पाठवलं. तिथून आल्यावर मग जिथे हवं तिथे जा, पण सांगून जा आणि जेवणाच्या वेळेला हजर रहा असं सांगितलं.

WhatsApp Image 2025-06-15 at 9.04.53 AM.jpeg

परत येईपर्यंत थेंब थेंब पडायला लागलेच. गारवाही वाढला. जेवायला वेळ होता. खोलीत येऊन जरा पडले ते गाढ झोपच लागली. जेमतेम २० मिनीटं पण बरं वाटलं

जेवणात कढी चावल. जेवण तळमजल्यावर खोल्यांच्या बाहेर पॅसेजमध्ये होतं. खूप थंडी होती त्यात गरमागरम कढी चावल खायला बरं वाटत होतं.

पलीकडच्या काठाला दर्शनासाठी मोठ्ठीच्या मोठी  रांग लागली होती. लोक भागिरथीत आंघोळ करत होते. लाईफ गार्ड्स ओरडून ओरडून सांगत होते, पाण्यात जास्त उतरु नका तरी लोकांची धक्काबुक्की सुरुच होती. तिकडे पाण्याला कसला जबरदस्त फोर्स आहे. जरा पाय घसरला तर झालंच.

जेवण झाल्यावर सामान जरा आवरलं. सॅक पॅक करतांना नीटच भरली होती तरी उगाच थोडं सामान इकडे तिकडे केलं

 मी सामान अ‍ॅडजेस्ट करत असतांना ( सॅक विसरणार्‍या ) सॄष्टीला आठवलं की तिनी रेनकोट आणलाच नाहीये. मग ताडकन उठून ती लोकल मार्केटमध्ये गेली. ही तिची पहिली फेरी. मग दिवसभर रेनकोट, थर्मास, नी कॅप ( मी पण नेली नव्हती, नको आणूस सांगूनही ती ऐकेना ), तिची जुजबी औषधं, आणि मुख्य म्हणजे डबा अश्या अनेक गोष्टी आणायला तिनी अनेक फेर्‍या केल्या. काय काय आणायचं ह्याची यादी खूप आधी दिली होती, शिवाय ग्रुपवर पोस्ट केली होती, तिनी बरेच लहान लहान ट्रेक्स केले होते तरी बॅग भरतांना काय केलं कोणास ठाऊक.

शिवाय ती नक्की कोणत्या ट्रेकला जाते आहे हे घरी सांगितलं नव्हतं. ' गंगोत्री ' एवढंच सांगून आली होती. हा एवढा कठीण ट्रेक आहे, सांगायला नको का तर म्हणाली की घर मै पता चलता तो बंद करके रखते !! वाईट वाटलं पण पुढल्या वेळी कोणालातरी सांगून ये, एखादा मित्र/मैत्रीण, नात्यात कोणीतरी. कोणालातरी माहिती हवी ना !

दुपारी झोप काढायचा प्रयत्न केला. चहा झाल्यावर बँगलोर ग्रुपबरोबर आमच्या गेस्टहाऊसच्या मागे, जरा ऊंचावर असलेल्या राधा कृष्णाच्या देवळात गेले. इतकं सुरेख देऊळ होतं. ही तिन मुले ( २मुलं, तिसरी नमिता ) केदारपेक्षा ४/५ वर्षंचं मोठी होती.  बहुतेक सगळेच ह्या वयोगटातले होते. फक्त देहराडूनहुन आलेल्या दोघी मैत्रीणी, आणि अजून दोन जण साधारण माझ्याच वयाचे होते.

ग्रुपमध्ये एकूण १९ जण होतो. त्यातल्या बहुतेक सगळ्यांशीच मस्त ओळखी झाल्या. चेन्नईहून तिन मित्र आले होते, ते मात्र फारसे कोणात मिसळले नाहीत. एक तर त्यांना हिंदी धड येत नव्हती., आणि ओळखी करुन घेण्याची फार हौसही दिसली नाही.

पुन्हा एकदा गंगेच्या देवळात जाऊन आले.

WhatsApp Image 2025-06-15 at 9.05.02 AM.jpeg

गंगोत्रीला संध्याकाळी आधी काठावर भागिरथीची आरती होते आणि मग मंदिरात गंगेची.  आरत्यांच्या वेळा  लक्षात ठेवण्यात माझी गडबड झाली त्यामुळे भागिरथीची आरती चुकली. फार चुकचुकल्यासारखं वाटलं पण परत येतांना एक संध्याकाळ परत इथे असणार होती तेव्हा जाता आलं असतं.

मला पल्स ह्या गोळ्या चालतांना चघळायला फार आवडतात. त्या घेतल्या होत्या पण उत्तरकाशीच्या ट्रॅफिक जॅममध्ये बसमधून उतरले तेव्हा तिथे रस्त्याच्या कडेला काम करणार्‍या लोकांची मुलं खेळत होती, त्यांना वाटून टाकल्या. त्या घ्याच्या म्हणून मार्केटमध्ये चक्कर मारली तर नाहीच मिळाल्या.

परत आल्यावर जेवण. जेवणात आलू मटर, दाल, पोळ्या भात आणि गाजराचा हलवा होता.

मग आम्हाला हेल्मेट्स वाटली आणि लायनर्स ( किंवा वॉर्मर्स ). ते स्लिपिंग बॅगच्या आत घालायचे असतात. मऊ उबदार कापडाचे असतात. ते खरं तर कँपसाईटवर वाटतात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी परत द्यायची. पण इथे सामान पोर्टर्स बरोबर जाणार असल्याने ती आधीच देऊन टाकली.

ह्या ट्रेकसाठी घोडे/ म्यूल्स नेत नाहीत. रस्ते खूप अरुंद आहेत आणि लँड स्लायडींग झोन आहे म्हणून.

सगळं सामान बहुतांशी नेपाळहून आलेले पोर्टर्स वाहून नेतात. त्यामुळे ऑफलोडींग चार्जेस इतर ट्रेक्सपेक्षा जास्त आहेत.

मला स्पाँडिलोसीस असल्याने मानेवर ताण येईल असं काहीही करता येत नाही, अगदी प्लँक्स सारखे व्यायामही एक मिनीटापेक्षा जास्त करता येत नाही त्यामुळे मी मोठी सॅक नेहमी ऑफलोडींगला देते.

उद्या सहा वाजता चहा, सातला ब्रेफा आणि आठ वाजता निघायचं.

रात्री पुन्हा थंडीचा जोर वाढला पण आकाश मोकळं होतं. नशिबाने पावसाचं चिन्ह नव्हतं .

रात्री दहा वाजायला आले तरी सृष्टीचा पत्ता नव्हता. काहीतरी आणायला ती परत मार्केटमध्ये गेली होती. शेवटी ग्रुपमधून तिचा नंबर शोधला आणि फोन केला. मॅडम परत आल्या पण आल्या आल्या लक्षात आलं की कोणत्यातरी दुकानात  चष्मा विसरली आहे, पुन्हा गेली.  ट्रेकला निघेपर्यंत तिने डबा, थर्मास, रेनकोट, नी कॅप, जुजबी औषधं आणि कोणास ठाऊक काय काय विकत घेतलं !

झोप लागेना तेव्हा उठून सॅकमध्ये नीट बसवलेला वॉर्मर काढला, रजईच्या आत घेऊन झोपले तेव्हा कुठे मस्त, शांत झोप लागली. आणि ते गरजेचं होतं. उद्यापासून सलग, शांत झोप येण्याची शक्यता कमी होती.

उद्यापासून ट्रेक सुरु.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ट्रेक दिवस 1

गंगोत्री ते भोज खरक

अंतर अंदाजे 9 किमी

ऊंची : १०,2०० ते १२,८०० फूट

सकाळी नेहमीच्या सवयीने लवकर जाग आली. काल आंघोळीला कोमट पाणी मिळाल्याने आज आंघोळीला दांडी मारायची असं ठरवलं होतं. पण ब्रश करतांना लक्षात आलं की चांगलं कडकडीत पाणी येतं आहे, मग दांडी मारायचा प्लॅन कॅन्सल केला.

ज्यांच्या सॅक्स ऑफलोडींगला होत्या, त्यांनी त्या साडेसहावाजता तयार ठेवायच्या होत्या. पोर्टर्स आधी निघतात म्हणून.

सगळं आटोपून, ब्रेफा करुन सगळे तयार झाले. बर्‍यापैकी वेळेवर आले सगळे.

ब्रेफाला बटाट्याचे पराठे आणि पोहे होते. मोठा टप्पा असल्याने आज पॅक्ड लंच होतं.

WhatsApp Image 2025-06-15 at 9.05.16 AM.jpeg

हेल्मेट घातलं आहे, ते फोटोपुरतं. आज गरज पडणार नाहीये.  आज अजून दोन नविन गाईड्स आले, ते दोघे, लीड गाईड सुधांशू आणि अजून एक जरा ज्युनियर गाईड असे चार जण.

थोडं स्ट्रेचिंग करुन घेतलं.

आणि हर हर महादेव, जय गंगे, गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणून आम्ही निघालो.

हवा मस्त स्वच्छ होती. सुखद गारवा होता.

साधारण ५/१० मिनीटे चालल्यावर आम्ही पोहोचलो गंगोत्री नॅशनल पार्कच्या दारात. तिथे सगळ्यांना एकत्र करुन ड्यूटीवर असलेल्या गार्डने सुचना दिल्या.

ह्या पार्क मध्ये स्नो लेपर्डसारखे प्राणी आहेत पण ते क्वचित दिसतात. सहजपणे दिसतात ते भरल किंवा ब्ल्यू शीप्स. त्यांना मारणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यांना त्रास देऊ नका, कचरा करु नका, शांतता राखा, दारु सिगरेट ओढू नका, ग्रुप सोडून जाऊ नका वगैरे.

WhatsApp Image 2025-06-10 at 6.32.15 PM (1).jpeg

तिथून खरा ट्रेक सुरु.

महेशकडून ऐकलं होतं की चालायला सुरुवात केल्या केल्या चढ सुरु होतो तो शेवटपर्यंत आहे.

म्हणजे  बघा ना. गंगोत्री आहे १०,२०० फुटांवर. आम्ही ३ दिवसात जाणार होतो १५,५०० फुटांपर्यंत. आणि ते एकूण अंतर आहे साधारण १६ किमी. म्हणजे दर किमीला साधारण ३०० फुटांची चढाई. आणि ती ही दगड, माती, खडक अश्या रस्त्यावरुन. चढ असणारच !

आणि तो तसा होता.

आधी साधारण २० मिनीटं जरा बांधलेला असावा असं वाटावं असा रस्ता होता,

ह्या संपूर्ण रस्त्याची गंमत म्हणजे फार कमी वेळा असे भाग आहेत जिथे तुम्ही दोघे, तिघे एकत्र चालू शकता. बाकी सगळीकडे एक रांग करुनच चालावे लागते. काही ठिकाणी मागच्याला पुढे जाऊ द्यायचे असेल तर डोंगराला चिकटून उभे राहील्याशिवाय पर्याय नाही.

पोर्टर्स जायचे तेव्हा तर बरेचदा डोंगर उतारावर चढून बसलो.

अगदी डबा खातांनाही आम्ही एका रांगेत बसून खाल्ला.

सुरुवातीला बरीच अरुंद पायवाट होती. डाव्या हाताला सरळ उभा टोकदार पहाड आणि उजवीकडे शंभर एक फुट सरळ दरीत खळाळत वाहणारी केदारगंगा. नजर हटी, दुर्घटना घटी ह्या वाक्याला अगदी साजेसा रस्ता. त्यात काही ठिकाणी डोंगराचा भाग पायवाटेवर आल्याने त्याखालून वाकून, गुडघे टेकून पार करावा लागला. काळजाचा ठोका जरा चुकलाच तिथे.

narrow road.jpgnarrow climb.jpgnarrowest part.jpg

हा जो वरचा फोटो आहे, त्यात अगदी उजवीकडे डोंगराचा ताशीव भाग आहे आणि फोटोच्या मध्यभागी पायवाट दिसते आहे, डावीकडे दरी.

साधारण असाच रस्ता होता.

ह्या दिवसाच्या चालण्याबद्दल फार काही लिहीण्यासारखं नाहीये. आम्ही फक्त चालत होतो. सगळ्या ग्रुपचा साधारण वेग सारखाच होता. अगदी पुढच्या आणि शेवटच्या व्यक्तित २० एक मिनीटांचं अंतर होतं. अपवाद फक्त नीलमचा.

नीलम देहराडूनची होती. ती आणि तिची मैत्रीण कुसूम दोघी आल्या होत्या. कुसूमला ट्रेकींगचा बर्‍यापैकी अनुभव होता. लहानलहान असेल ८/९ ट्रेक्स तिनी केले होते. नीलमनी फक्त ब्रम्हताल केला होता. आधी लक्षात आलं नाही पण ती फार म्हणजे फार मागे पडली. त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला १५/२० मिनीटे थांबवून ठेवलं. आजच्या रस्त्यावर बरीच झाडं, त्यातली बरीच भूर्जपत्राची असल्याने बर्‍यापैकी भागात सावली होती. सावलीत थांबलं की थंडी वाजायची की मग ऊन्हात जाऊन बसायचं, मग उकडायचं की पुन्हा सावलीत सरकायचं.

थांबावं लागत असल्याने बरेच जण अस्वस्थ झाले.

चालतांनाही एखाद्या स्पर्धेत चालतो आहोत की काय असं वाटायला लागलं होतं, काही जण सतत पुढे जायच्या घाईत. थांबवलं तरी त्यांचा जीव वरखाली होईल. तासभर आधी पोहोचून काय करणार होते ?

साडेबारा वाजता डबा खाल्ला. डब्यात भेंडीची भाजी आणि पोळ्या होत्या. भाजी चविष्ट होती पण ट्रेकला डब्यात म्हणून योग्य नाही वाटली.

किती अंतर झालं आहे, काही अंदाज नव्हता. अजून किती वेळ हे गाईडला विचारायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं त्यामुळे उशीरात उशीरा चार पर्यंत तरी पोहोचूच असं मी मनाशी ठरवून टाकलं होतं.

चढ बराच असला तरी मला तो ठिकठाक वाटत होता. म्हणजे एकतर माझी तयारी चांगली झाली आहे किंवा अजून खरा चढ आलाच नाहीये !

Screenshot 2025-06-15 100703.jpgIMG_2665.jpgtricky climb.jpgtricky road.jpg

ह्या फोटोत, कडेच्या गुलाबी फुलांच्या बाजूला दगडाखाली मीच आहे. अश्या शिळांखालून वाकून, प्रसंगी हातही टेकवून रांगत जावं लागत होतं

क्वचित असं मोकळं पठारही लागे

आजच्या चालण्याचं हायलाईट होतं स्पायडर वॉल. साधारण २/३०० मीटरची ही दगडी भिंत, तिच्यावर कोळ्याप्रमाणे चिकटून चालत पार करावी लागते.

थोडी धाकधुक होतीच.

शेवटी एक बारका चढ चढून गेल्यावर काही अंतरावर तुटके पत्रे दिसले. हाच आजचा मुक्काम, भोजखरक.  एक वाजला होता. हा मुक्काम तर लवकर आलो म्हणत स्पायडर वॉलपाशी पोहोचलो  आणि तळाशी एक लहानसा पुल दिसला.

गेल्यावर्षी इकडे दरड कोसळल्याने स्पायडर वॉलच्या पायाशी पुल बांधला आहे. ५/६ पावलांचाच आहे , डुगडुगता आहे. ते बघून थोडं हुश्श झालं पण थोडं वाईटही वाटलं. ती भिंत पार करता यायला हवी होती.

अर्थात वरुन घसरत खाली उतरुन, पुल ओलांडून पुन्हा वर चढून जायची कसरत होतीच.

एकावेळी एकानेच घसरत यायचं., त्याने पुल ओलांडल्याशिवाय मागच्याने यायचं नाही.

IMG_2674.jpg

पुल ओलांडला, चढ चढला आणि ते पत्रे गायब ! इतकं दु:ख झालं. वाळवंटात मृगजळ दिसतं, इथे मला कँपसाईट दिसली होती. चार पावले पुढे जाऊन वळले आणि पुन्हा ते पत्रे दिसले.

आधी आलेले काही पोर्टर्स तिथे बसले होते. इतकं बरं वाटलं की पोहोचलो.

अगदी आधी पोहोचलेल्या तीन जणात मी होते ह्याचा ( नाही म्हणटलं तरी ) थोडी कॉलर टाईट करावी वाटली. एक वाजून चाळीस मिनीते झाली होती. निघाल्यापासून ५ तास.

पण तरी एकंदरीत ती जागा पाहता, इकडे इतके टेंट कसे बसवणार हा प्रश्न पडला. आम्ही १९ जण होतो, म्हणजे आमचेच १० टेंट. किचन, डायनिंग आणि इतर स्टाफ ह्यांचे किमान ४/५ असे १५ टेंत तिथे मावणं अशक्य होतं.

थोडी जागा होती तिथे पसरलो. जरा वेळात सगळे जमले. स्ट्रेचिंग झालं आणि टेंट लावायला सुरुवात झाली. मदतीला आलात तर आमचं काम सोपं होईल, नाही आलात तरी आम्ही करुच असं सांगितलेलं असतं. मदत करावी. त्यांचं काम खरंच सोपं आणि लवकर होतं, आपली हालचाल होते त्यामुळे एकदम थंडी भरत नाही आणि टेंट लवकर मिळतो हा बोनस. तशी मदत करायला उठले तेव्हा सृष्टी पण आली. मग आम्ही टेंट शेअर करायचा ठरवला.

ह्यावेळचे टेंट लावायला सोपे होते. तारा ओवून क्लिप्सने घट्ट करायचे. पटकन लागला.

सामान आत टाकलं. कपडे बदलले. थर्मल लगेच घालून घेतले. चार नंतर हवा पटकन बदलते, थंडी वाढते. शिवाय हालचाल कमी झाल्याने अजून जाणवते. थर्मल लगेच घातलेले चांगले.

नीलम शेवटी ३ वाजता पोहोचली. फार दमली होती.

४ वाजता चहा आणि पकोडे झाले.

सुधांशूने तिथल्या थोडक्या जागेत काही खेळ घेतले.  तासभर गेला. खूप मजा आली.

मग मुलींबरोबर मी जवळचा चढ चढून थोड्या ऊंचावर जाऊन बसले. इतकी शांतता होती. गार वारा. नजर जाईल तिथवर झाडं. बरं वाटलं.

Bhoj Kharak campsite.jpg

वरुन दिसणारा भोज खरक कँप

साडेसहाला पल्स आणि ऑक्सीजन चेक केला. माझा हार्ट रेट ८२ आणि ऑक्सीजन ९८ आला. ऊंचावरच्या मानाने छानच.

जेवायला आधी हॉट अ‍ॅन्ड सावर सूप होतं. जरा तिखट होतं. मग कोफ्ते, दाल आणि गोडात खीर !

थंडी वाढली होती. जमेल तितक्या जागेत अर्धा तास फेर्‍या मारल्या. कोमट पाणी देत होते, ते घेतलं आणि झोपायला गेले.

रात्री अजिबात म्हणजे अजिबात झोप लागली नाही किंवा लागली असेल तरी तुकड्या तुकड्यात लागली. थंडी मात्र सहन करता आली.

आज गंमत अशी झाली की भुवनेश्वरहून आलेले एक शिक्षक होते, येतांना काही भाग बसून, घसरत पार करावा लागला होता, तर त्यांची पँट मागून सीटवर फाटली. ते पाहून एक नक्की केलं की टिशर्ट एकच असला तरी चालेल, पँट नाही.

उद्या सकाळी ६.३० ला चहा, ७.३० ला ब्रेफा आणि ८ ला निघायचं.

 

या आधीचा भाग -
https://www.maayboli.com/node/86852

ट्रेक दिवस २

भोज खरक ते केदार खरक

अंतर अंदाजे ५ किमी

ऊंची : १२,८०० फूट ते १४,२०० फूट

सकाळी नेहमीप्रमाणे लवकरच साडेचारला जाग आली. बाहेर थोडं फटफटलं होतं. लोक उठून गर्दी करायच्या आत टॉयलेट टेंटच काम आटोपून घेतलं. जमेल तसे दात घासले आणि बाहेरच बसून राहीले.

कँप हळू हळू जागा होत होता.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.06.08 AM.jpeg

( हा पहाटे सव्वा पाचचा फोटो आहे )

ह्या मुक्कामात खूप वेळा चढ उतार करावा लागला कारण सपाट अशी जागाच नव्हती.

काल गंगोत्रीहून निघाल्यापासून पहील्यांदाच अशी एवढी सलग जागा दिसली. इथून पुढे थोड्या चढावर एक पठार होतं पण तिथे कँप करत नाहीत कारण पाणी. इथेही पाण्यासाठी कालच्या पुलापर्यंत जायला लागत होतं. आम्हाला नाही, सपोर्ट स्टाफला. पोर्टर्स त्या मोडक्या पत्र्याखाली असलेल्या खोलीत झोपले.

ब्रेफाला पॅनकेक्स, पोहे आणि ओट्स होते.

आवरुन सगळे जमले.

आजपासून झाडं असणार नव्हती म्हणून सावलीही नाही. सगळीकडे कातळ, रुक्ष भाग.

आज नीलमला सगळ्यांच्या पुढे चालायचं होतं.

आज अंतर कमी असलं तरी हायलाईट होता लँडस्लाइड झोन. तो सगळ्या ग्रुपने एकत्र पार करायचा होता. त्यामुळे ती येईपर्यंत पुढे जाता येणारच नव्हतं. ती सावकाश दर १५/२० पावलांवर थांबत चालत होती. मागे काही जणांची इनडायरेक्ट कुरकुर सुरु झाली.

हे नेहमीचं आहे. प्रत्येक वेळी किमान ३/४ जण असे असतात की जे सतत घाईत असतात. आता पुढे जाऊन काय फरक पडणार होता ? थाबावं लागणार होतंच ना.

bharhal.jpg

उतारावर भरहल दिसत आहेत

सावकाश तासाभराने त्या भागात पोहोचलो. थोडा ब्रेक घेऊन सगळ्यांना गोळा केलं. हेल्मेट्स घालायला सांगितली. सुचना दिल्या.

सगळ्यांनी रांगेत चालायचं

दोन जणांमध्ये थोडी गॅप ठेवायची.

कान डोळे उघडे ठेवा.

गाईड्सच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. सुचना आल्या तर तंतोतंत पाळा.

पाणी वगैरे काय खायचं प्यायचं आहे ते आत्ताच करुन घ्या. मध्ये अजिबात म्हणजे अजिबात थांबायचं नाही. फोटो बिटो काढणं तर दुरच.

पुढचा साधारण अर्ध्या तासाचा भाग मुख्य लँड स्लाईड झोन होता. बारीक बारीक वाळू घरंगळतांना दिसत होतीच. वर ऊंचावर इथले भरहल हे प्राणी फिरत असतात., त्यांच्यामुळे दगड खाली येतात.

दगड खूप प्रमाणात येत असतील तर हा भाग सरळ ओलांडण्या ऐवजी, डावीकडे उतार उतरुन नदीकडे जायचं, ती ओलांडून मग सरळ जायचं आणि उजवीकडे पुढे पुन्हा चढ चढून मुळ रस्त्यावर यावं लागतं.

आज तशी गरज दिसत नव्हती.

चालायला सुरुवात केली. हा भाग नक्की कसे चाललो, काय केलं हे कोणालाच धड आठवत नाही कारण विचार करण्याएवढा वेळच नव्हता. रस्ताही सरळ नव्हता. चढ, उतार, मोठा चढ, वेडावाकडा, सरळ उभा असे सगळे प्रकार होते.

पायाशी सुटे दगड. एरवी अश्या दगडांवरुन चालतांना आपण अंदाज घेत चालतो. इथे तो प्रश्नच नव्हता. फक्त चालायचं.

मान खाली घालून पुढच्याला फॉलो करत, पण अंतर ठेऊन. आत्ता लिहीतांना लक्षात येतंय की संपूर्ण प्रवासात सरळ, समोर बघून फार कमी वेळा चालले असेन. आम्ही सगळेच. खाली मान घालून चालण्याशिवाय पर्यायच नव्हता.

रस्त्यात मध्येच एक मोठा कातळ आला. रस्ता पूर्ण अडवून.

माझ्या पुढे मोक्षीत, त्याच्या पुढे नमिता होते, त्या दोघांनी त्या कातळाला धरुन, उतारावर एक पाऊल टाकून तो पार केला. मी ही तेच केलं असतं पण मोक्षीतला पुढे जाऊ द्यायला अर्धा सेकंद थांबले आणि माझा चालण्याचा रिदम तुटला आणि आता हा कसा ओलांडू असा गोंधळ निर्माण झाला. उतारावरुन जायची हिंमत नव्हती कारण पाय घसरला तर संपलंच. थांबून विचार करण्याइतका वेळ नव्हता. मग सरळ वॉकींग स्टिक वर ठेवली आणि कातळावर हात टेकून, हातांवर पूर्ण शरीर उचललं, एक पाऊल वर टेकवुन पलीकडे उतरले. आणि गेलं वर्षभर पहाटे लवकर उठून जीम मध्ये जाऊन गाळलेल्या घामाचं सार्थक झालं. कातळ माझ्या छातीएवढ्या ऊंचीवर होता पण तो इतक्या सहजपणे पार करता आला. अगदी असंच बाली पासलाही नामा रिज ओलांडतांना झालं होतं. फक्त तेव्हाचा दगड जेमतेम गुडघ्यांपर्यंत येणारा असल्याने ते आजपेक्षा फारच सोपं वाटलं.

माझ्यामागे असण्यार्‍या उरलेल्या सोळाही जणांना तो वर चढून पार करता आला नाही. मी काही फार ग्रेट वगैरे केलं नाही, उलट कठीण मार्ग निवडला, पण जमलं.

असेच अर्धा तास चालून पलीकडे पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. परत जातांनाही हे दिव्य पार पाडायचं आहे पण ते तेव्हा बघू. रोज सकाळी आम्हाला एक बिस्कीटाचा एक छोटा पॅक, एक चॉकलेट, ज्यूसचा टेट्रा पॅक देत. पोटात भुकेने म्हणा, हुश्श झाल्याने म्हणा खड्डा पडला होता त्यामुळे त्यातलं पारले जी मी पहील्यांदा एका बैठकीत फस्त केलं.

साधारण असा रस्ता होता. फारसे फोटो कोणाकडे नाहीयेत.

landsliding.jpg

आणि

tough climb.jpg

आणि

IMG_2671.jpg

अजून कँपसाईट यायची होती.

ह्या सगळ्यात आमचे पोर्टर्स मात्र किलो किलो सामान घेऊन येत होते.

WhatsApp Image 2025-06-15 at 10.41.13 AM.jpeg

इथून पुढचा उरलेला रस्ता मात्र कठीण होता. संपता संपत नव्हता. प्रत्येक वळणावर वाटे, आता दिसेल मोकळी जागा, पण ते वळण येतच नव्हतं.

tought climb 2.jpg

डावीकडे थलायसागर डोकावतो आहे

शेवटी अजून दिड तास चालून एकदाचं एक मोकळं पठार दिसलं आणि जीवात जीव आला.

campsite.jpg

तिथे अक्षरशः पसरलो.

मग सुरु झालं टेंट लावणं. सृष्टी आणि मी, आमचा टेंट लावला. त्यात सेटमध्ये मोठ्ठे खिळे असतात, ते दोरीत अडकवून जमिनीत पक्के करायचे, त्या जीवावर टेंट जागेवर राहतो. आमच्या सेटमध्ये एकच खिळा होता. आम्हाला मदत करणारा म्हणाला, थांबा मी बघतो. तो गेला, आम्हीही स्लिपींग बॅग्ज, मॅट्स आणायला गेलो.

जोरदार वारा सुटलेला होता आणि दोनच मिनीटात आमचा टेंट उडून गेला. गेला म्हणजे तब्बल अर्धा वगैरे किमी उडत होता. मध्ये असलेल्या टेंट्सवरुन उडत चालला आणि त्याच्यामागे तिथली तमाम जनता धावत होती. शेवटी कसंबसं त्याला पकडलं, त्यात तीन चार दगड ठेवले आणि आम्हाला दुसरा टेंट दिला. गंमत म्हणजे तो ही उडाला, पण पटकन पकडला गेला.

फायनली सामान सेट करुन, कपडे बदलून मी जरा पाठ टेकली. आज शरीराबरोबर मनावरही ताण पडल्याचं जाणवत होतं.

Screenshot 2025-06-15 111414.jpg

टेंट्स लागले. खाली भोज खरकला जागेची जेवढी टंचाई होती, तेवढं इकडे, होल वावर इज आवर असं दृष्य होतं.

ह्या ट्रेकला मोठ्या ट्रेकींग कंपन्या आपापसात तारखा अ‍ॅडजेस्ट करुन घेतात कारण अरुंद रस्ते असल्याने गर्दी होऊन चालत नाही, शिवाय मुक्काम करायला तेवढी जागाही नाही.

दोन वाजले होते, जेवण अजून तयार होत होतं. आज फार उशीर झाला. जेवणात दाल चावल खाऊन जरा आराम केला.

जेवणानंतर सृष्टीला अस्वस्थ वाटायला लागलं. मी परत जाते, मला इकडे नाही थांबायचं असं म्हणायला लागली. मी सुधांशूला बोलावून आणलं. त्याने तिचा ऑक्सीजन वगैरे पाहीला आणि तिला आराम करायला सांगितला पण टेंटमध्ये झोपायला मनाई केली.

संध्याकाळी सुधांशूने पुन्हा चायनीज व्हिस्पर, फायर इन द माऊंटन असे खेळ घेतले. मजा आली, वेळही गेला. मग नेहमीची तपासणी. माझा ऑक्सीजन ९४ आणि पल्स ८९. आज १०० खाली मीच एकटी होते.

त्यानंतर उद्याचं ब्रिफींग. उद्याचा दिवस महत्त्वाचा.

उद्या सकाळी साडेसातला निघायचं होतं. उद्याचाही कँप इथेच असल्याने आवराआवरी करण्याची गरज नव्हती.

उद्या फ्लिसही घाला आणि पायात जाडसर पँट.

माझ्याकडची ट्रेंकींग पँट जाड वगैरे नाहीये त्यामुळे थर्मल घालायला सांगितली. चालतांना थर्मल घालून चालण्याने नंतर नंतर वाट लागते ह्याचा अनुभव बाली पासच्या वेळेस घेतला होता म्हणून आतून थर्मल घालण्यात मी जरा साशंक होते. गरज पडली तर आणि जर उकडलं तर उपर बहोत बडे पत्थर है, कोई प्रोब्लेम नही आयेगा असंही म्हणाला.

उद्याचा कट ऑफ वेळ होता ११. अकरा वाजता जो जिथे असेल तो तिथून परत फिरेल असंही सांगितलं

उद्याही पॅक्ड लंच. आज जेवणात चायनीज होतं आणि गोडात कस्टर्ड.

मोकळी जागा भरपूर असल्याने जरा वेळ फेर्‍या मारून, गरम पाणी घेऊन झोपायला गेले.

एव्हाना सृष्टीला बरं वाटू लागलं होतं. तिला, रात्री गरज पडली तर हाक मार सांगून झोपले.

झोप तुकड्यांमध्ये लागली पण सकाळी बरंच फ्रेश वाटत होतं.IMG_2680.jpg


 या आधीचे भाग -

भाग १ https://www.maayboli.com/node/86852

भाग २ https://www.maayboli.com/node/86856

ट्रेक दिवस ३

केदार खरक ते केदार ताल

अंतर अंदाजे ३ किमी

ऊंची १४,२०० फूट ते १५,५०० फूट आणि परत १४,२०० फूट

आजचा दिवस अगदी प्रसन्न उगवला होता.

साडेसात वाजता सगळे तयार झाले. डबे घेतले. खाऊ घेतला. नेहमीच्या घोषणा वगैरे देऊन निघालो. आजची चाल कठीण नव्हती, पण थकवणारी होती. किंवा कठीण होती पण परवा आणि काल जे चाललो त्यामुळे जाणीव होत नव्हती.

वाट चुकायला नको म्हणून रस्त्यात जागोजागे असे कॅरन्स रचलेले दिसतात

Carans that show way.jpg

आज एकतर पायवाट नव्हती. मोठे मोठे, बोल्डर्स म्हणतात तसे दगड होते रस्त्यात. तेही वेडेवाकडे पसरलेले.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.07.11 AM.jpeg

काल परवा चालतांना तो लँडस्लाईड झोन सोडल्यास खूप दगड असे रस्त्यात नव्हते. ह्या दगडांवर कधी हात टेकवून, कधी उडी मारुन चढायला लागत होतं. त्यावर बर्फ. चढ. ऊंची चांगलीच गाठली गेली होती, आणि थंडी. अंगात चार लेयर्स असूनही, चालतांनाही चांगलीच थंडी जाणवत होती. थांबल्यावर तर जास्तच.

दम चांगलाच लागला. दोन वाक्यही सलग बोलता येईनात.

तरी चालण्याचा वेग चांगला होता.

साधारण अर्ध्या पाऊण तासानंतर बाकीचे मागे पडले आणि आम्ही चार जण बरेच पुढे आलो. साडेतीन तासांचा वेळ होता पोहोचायला पण आश्चर्यकारक रित्या पावणे दोन तासातच पोहोचलो.

on the way to summit.jpg

केदारतालचं पहीलं दर्शन झालं तो क्षण अगदी अविस्मरणीय आहे.

WhatsApp Image 2025-06-16 at 8.07.48 AM.jpeg

वरचा फोटो समोरुन काढलेला आहे. वरुन काढायचा राहीला.

कदाचित हे एकच समीट असं असेल जिथे उतरुन जावं लागतं.

त्यामुळे त्या सुळक्याच्या टोकाला पोहोचलो आणि खाली तळाशी हिरवं निळं चंदेरी पाणी. हवा स्वच्छ असल्याने काठाशी असलेल्या थलायसागराचं प्रतिबिंब पडलेलं.

reflection of Thalay sagar.jpg

अगदी आ वासला गेला.

मागच्या वर्षी स्पितीमधल्या चंद्रतालचं दर्शन घेतलं होतं. पण हा आजचा अनुभव जास्त भारावणारा होता कारण तिथे वरपर्यंत गाडीत बसून गेलो होतो. हे दृश्य बघायला मात्र मेहनत घेतली होती. म्हणूनच म्हणत असावेत, the best view comes from the hardest climb

मग सावकाश उतरुन खाली गेलो. आणि आधी दहा मिनीटं काहीही न करता बसून राहीले. आम्ही चौघचं तिथे असल्याने ( गाईड वरच थांबला ) पूर्ण शांतता होती.

मग फोटो काढले.

WhatsApp Image 2025-05-31 at 7.10.12 AM.jpegWhatsApp Image 2025-06-19 at 11.59.47 AM.jpeg

आणि पुन्हा एक कोपरा पकडून बसून राहीले.

जपमाळ बरोबर होतीच. नेहमीचे ठरलेले आणि सुचतील तसे जप केले.

एव्हाना सगळे पोहोचले होते. फक्त नीलम नव्हती.

मग ग्रुप फोटो.

आणि आमच्यासाठी एक सुखद सरप्राईज, चहा. गाईड्सनी दोन मोठ्ठे थर्मास भरुन चहा आणला होता. वा !!! असं झालं आणि अर्थात त्यांचं खूप कौतुकही वाटलं. ( मागच्या वर्षी महेशला नव्हता मिळाला चहा ! ) चहा घेतला.. बिस्कीटं खाल्ली.

इकडे पोहोचून आम्हाला तासभर होत आला होता. निघायची वेळ झाली.

वर जाऊन पुन्हा फोटो काढले आणि उतरायला सुरुवात केली.

मध्ये एका ठिकाणी नीलम थांबलेली होती. तिच्याबरोबर एक ज्युनियर गाईड होता. तिथेच बसून डबा खाल्ला. डब्यात कोबीची भाजी भरुन रोल्स होते.

मग परत उतरायला सुरुवात केली.

दिड वाजता, साधारण सव्वा तासाने कँपवर पोहोचले. तशीच गवतावर आडवी झाले. मग शुज काढून पावलांना हातानेच थोडं चोळलं. बिचारे चांगलेच थकले असणार.

कँपच्या मागे एक ओहोळ होता त्यात पाय बुडवले. आपण कसं म्हणतो, कळ डोक्यात पोहोचली. अगदी तसंच ( पण इकडे चांगल्या रितीने ) पाण्याचा गारवा पायातून वर चढत डोक्यापर्यंत पोहोचला. बरं बरं वाटलं.

हळू हळू लोक पोहोचत होते. कंटाळा आला होता पण उद्यासाठी थोडी तयारी करुन ठेवली. संपलेला खाऊ भरुन घेतला.

नंतर दोन अडीच तास डायनिंग टेंटमध्ये जमून गप्पा मारल्या, क्लॅप अ‍ॅट सेव्हन, हू अ‍ॅम आय सारखे काहीतरी टिपी गेम्स खेळलो. चहाबरोबर TTH सिग्नेचर सामोसे होते., आणि रात्रीच्या जेवणात गुलाबजाम.

उद्याचं ब्रिफींग झालं. सकाळी आठ वाजता निघायचं होतं. उद्याही पॅक्ड लंच असणार होतं

कालसारखंच लँड स्लाईड झोनपाशी एकत्र जमून पार करायचा होता.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

ट्रेक दिवस चौथा.

केदार खरक ते गंगोत्री.

अंतर अंदाजे १४ किमी

१४,२०० ते १०,२०० फूट उतरणे.

sसकाळी लवकर आवरुन तयार झालो. स्लिपिंग बॅग्ज, मॅट्स आवरुन जमा केल्या. टेंट बंद करुन जमा केले, डबे घेतले, खाऊ घेतला आणि घोषणा देऊन निघालो.

ह्या गडबडीत मी माझं माझं स्ट्रेचिंग मात्र करुन घ्यायचे.

आम्हाला दिलेली हेल्मेट्स आम्ही सॅकला अडकवलेली होती. पहील्या दिवशीच माझ्या लक्षात आलं की उजव्या बाजूला ते अडकवू नये कारण उजवीकडे पहाड होता. हेल्मेट त्यातल्या सुळक्यांमध्ये अडकू शकलं असतं आणि मागे खेचलं जाऊ शकलं असतं.

निघतांना माझ्यापुढे एकजण होते जे आल्यापासून कधीच कोणात मिसळले नाहीत. चालतांना जर आपण मागच्यांपेक्षा सावकाश चालत असू तर बाजूला होऊन त्यांना पुढे जाऊ द्यायचं असतं. असा नियम काही नाहीये, पण उगाच त्यांची वाट का अडवायची ! पण हे ग्रुहस्थ काही कोणाला पुढे जाऊ देत नसत. त्यांना विचारलं की मी जाऊ का तरी काही उत्तरही देत नसत. मग जागा होईल तसं त्यांना ओलांडून पुढे जायचं.

एका वळणावर कडेने त्यांना ओलांडलंच शेवटी.

लँडस्लाईड झोनजवळ सगळे जमण्यात थोडा वेळ गेला, आरामही मिळाला. मग परवासारखंच तो पार करायचा होता. आज वरुन माती, बारके दगड घरंगळत होते. आज हा भाग ओलांडतांना मला जास्त ताण आला असं वाटलं. का कोणास ठाऊक ! हाही टप्पा ओलांडला. पुन्हा एक लहानसा ब्रेक घेतला आणि पुढची चाल सुरु केली

इथे आता ग्रुप थोडा विस्कळीत झाला. पण रस्ता चुकायची काहीच शक्यता नव्हती कारण एकच एक पायवाट होती. मी माझ्या वेगाने चालले होते आणी तो ही नेहमीपेक्षा जास्त आहे हे जाणवत होतं.

उतरणं मला नेहमीच जड जातं. सिंहगडावरही चढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच उतरायला लागतो कारण पायाचे दोन्ही अंगठे. ट्रेक नंतर दर वेळी ते शुजमध्ये दाबले जाऊन नखं काळीनिळी पडतात आणि पुढच्या महीन्याभरात गळून पडतात. आज मी विचार करत होते की फ्लोटर्स ठेऊन घ्यावेत का. अगदी त्रास झाला तर घालता येतील पण रस्ता खूप अरुंद असल्याने पायाला नीट ग्रिप असायला हवी होती. त्यामुळे फ्लोटर्सचा बेत रद्द केला. पण ह्यावेळी आश्चर्यकारकरित्या आंगठ्यांची टोकं काळी होण्यावरच निभावलं आहे. खरं ह्यावेळचा उतार सरळ उभा उतार होता. प्रत्येक वेळी, आपण चढून आलो तो हाच रस्ता का ह्याच मनातल्या मनात नवल करत होते.

निघाल्यापासून ब्रेक घेऊनही तीन तासात भोज खरक गाठलं. इथून पुढे अधुनमधून सावली असणार होती.

पावणे बारा वाजता सांगितलं की ज्यांना डबा खायचा आहे, त्यांनी तो खावा. बाकीच्यांनी पुढे जायला हरकत नाही. काही जण थांबले. चार पाच जण पुढे निघाले. मला भूक नव्हती पण जायची घाई पण नव्हती. मग असंच चालत राहू, पुढे भूक लागली की थांबू.

रस्त्यात आम्हाला दोन ग्रुप्स वर जातांना दिसले. मग रस्ता कसा आहे, कठीण आहे का, किती वेळ लागतो वगैरे नेहमीची प्रश्नउत्तरे झालीच.

साडेबारा वाजता, आता थांबावं का असा विचार करत असतांना झाडांमधून अचानक खाली लांबवर पत्रे दिसू लागले. म्हणजे गंगोत्री आलंच की. आता खाली जाऊनच डबा खाऊया. तो आनंद साजरा करायला एक चॉकलेट खाल्लं. बरोबर उरलेली ( जी रोज खाऊ म्हणून द्यायचे आणि संपली नव्हती ) ती रस्त्यात मला ओलांडून पुढे जाणार्‍या पोर्टर्सना दिली.

आत्तापर्यंत पायांना काही त्रास होत नव्हता. अशी दहा पंधरा मिनीटे गेली आणि हळू हळू अंगठे ठुसठुसायला लागले. मग वेग अगदी मंदावला. एकच्या दरम्यान बरोबर असलेला गाईड , जो आधी पुढे गेलेल्यांबरोबर होता आणि एका ठिकाणी मागच्यांसाठी थांबला होता तो फोनवर बोलतांना दिसला. मग मी पण फोन काढून बघितला तर रेंज आलेली होती. घरी फोन केला. खाली उतरल्यावर कसं जायचं हे गाईडकडून समजावून घेतलं. सोपं होतं. सरळ रस्ता आणि मग उजवीकडे वळण, मग सरळ सरळ.

पुढे सावकाश उतरत निघाले. आता पावलं टाकणं कठीण होऊ लागलं. येतांना असलेला खडा चढ आता सरळ उतार झाल्याने पावलं कशीही टाकली तरी त्रास होतच होता.

अखेरीस दिड वाजता गंगोत्री नॅशनल पार्कच्या दारात आले. तिथे असलेल्या गार्डला पुन्हा एकदा रस्ता विचारला.

नीट समजावून घेतलं तरी रस्ता चुकणे हा माझा usp आहे. त्याला अनुसरुन इतका सोपा रस्ता मी चुकलेच आणि लगेच लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. बरं दिसणारे लोक हे सगळे टुरीस्ट असल्याने विचारुन फायदा नव्हता. तेवढ्यात गंगोत्री पोलीस स्टेशन दिसलं. रस्त्यावरच होतं. इन्स्पेक्टरला देवळाकडे कसं जायचं विचारलं. माझा एकूण अवतार बघून त्याने विचारलं कहासे आये ?

मी - केदारताल ट्रेक करके

तो - एकदम सरसावून बसून, डोंगरांकडे हात दाखवून - वहा उपर ?

मी - हा

तो - ताल तक गये थे ?

मी - हा

तो - जरा आदराने ( किंवा मलाच तसं वाटलं ) बहोत बढीया. मुश्किल है वहा तक जाना.

तो - ऐसा ऐसा जाईये, पाच मिनीटमे पोहोच जाओगे

धन्यवाद देऊन निघाले आणि खरेच दोन मिनीटात पहील्या दिवशी आम्ही जिथे उतरलो होतो त्या बस स्टँडला पोहोचले.

आम्ही उतरलो होतो ते गेस्ट हाऊस मंदीराच्या पलीकडल्या बाजूला होतं. तंद्रीत तिकडे जात होते तर एक जण धावत आला आणि आज तुम्हाला तिकडे रहायचं आहे असं दुसर्‍या एका ठिकाणी हात करुन म्हणाला. ही ही नविन जागा, पुरोहीत गेस्ट हाऊस खरे तर TTH ची ठरलेली आहे, तिथे आम्ही आलो तेव्हा गौमुख तपोवनचा ग्रुप होता त्यामुळे आम्हाला दुसरीकडे उतरवलं.

तिथे पोहोचले. ४/५ जण आधीच आलेले होते. डबा खाल्ला. जरा वेळाने सामान मिळालं, मग सचैल आंघोळ करुन जरा वेळ पडी टाकली.

आज मात्र संध्याकाळची भागिरथीची आरती चुकवणार नव्हते म्हणून अगदी वेळेवर पोहोचले.

त्या सगळ्या वातावरणाचे वाईब्ज वेगळेच असतात. ढोलकं, टाळ वाजवून आरती म्हणणारा गट, मोठ मोठे दिवे, धुप, कापूर, उदबत्त्यांचा सुवास आणि तल्लीन झालेले लोक !

आरती करुन परत आले आणि सामान आवरुन सॅक पॅक केली.

रात्रीच्या जेवणात गोडात जिलबी होती !

जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे प्रत्येकाने थोडे फार बोलणे, निरोप वगैरे पार पडले.

उद्या लवकर, म्हणजे अगदी साडेचार वाजता निघायला हवे असा बस आणि आर्टीगाच्या ड्रायव्हरचा आग्रह होता कारण सध्या रोज रस्ता तास तासभर बंद रहात होता. पण हो ना करता करता सहा वाजता निघायचे ठरलं. मी ह्यावेळी आर्टीगाने जावे असं ठरवलं., कारण लहान गाड्या शक्यतो अडवत नाहीत.

दुसर्‍या दिवशी परतीचा प्रवास तुरळक जॅम लागणे सोडल्यास आरामात पार पडला, तरी बारा तास लागलेच पोहोचायला.

प्रिन्स चौकात उतरुन, TTH ऑफीसमधून सर्टिफिकीट घेऊन हॉटेलवर गेले. देहराडूनला ट्रेक संपत असेल तर आमचं हे ४ स्टार हॉटेल ठरलं आहे. रात्री एकटीनेच बिअर ( आणि माझं आवडतं क्लब सँडविच ) घेऊन ट्रेक मस्त पार पडल्याचा आनंद साजरा केला

पुढल्या दिवशी दुपारी एक वाजताची दिल्ली आणि सव्वा सहाची पुणे फ्लाईट होती. त्याच दिवशी नेमकं कोणीतरी येणार म्हणून रस्ते बंद / एकमार्ग वाहतूक असल्याने एअरपोर्टला पोहोचायला नेहमी लागतात त्या चाळीस मिनीटांऐवजी सव्वा तास लागला आणि पोहोचे पोहोचेपर्यंत माझा जीव टांगणीला लागला. शेवटी बारा वाजता कशीबशी पोहोचले.

पुढचा प्रवास, पुण्याची फ्लाईट पाऊण तास डिले होणे ह्या व्यतिरीक्त आरामात पार पडला आणि शेवटी रात्री साडेनऊ वाजता घरी पोहोचले !!!

ट्रेक करुन आलं की दुसरा दिवस कपडे धुणे, सॅक रिकामी करणे ह्यात जातो आणि मग येतो थकवा. तीन दिवस, मी दिवसरात्र झोपून काढले. इतकी गाढ झोप लागायची ! आठवडा तरी जातोच थकवा पूर्ण जायला. ( ह्याला मी पोस्ट ट्रेक कंटाळा सिंड्रोम म्हणते ) : डोमा:

ही तर झाली ट्रेकची गोष्ट.

हा ट्रेक माझ्यासाठी वेगळा होता, स्पेशल होता, कारण एकटीने केला होता. कामासाठी, नुसतं फिरण्यासाठी एखादा प्रवास एकटीने करणे आणि हिमालयातला ट्रेक एकटीने करणे ह्यात थोडातरी फरक आहे.

चार पाच दिवस जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो, बरोबर अनोळखी लोक, रात्री शांत झोप नाही आणि दिवसा कस लावणारा प्रवास. मी हे दहा दिवस खूप एंजॉय केले. चालतांना, इतरांशी बोलण्याच्या काही वेळा सोडल्यास छान तंद्री लागायची. इतर वेळी हाताशी किंडल होतंच.

एकटी असल्याने एरवी ज्या गोष्टींची मनाशी नीट नोंद केली गेली नसती, ती झाली.

दर वेळी नविन काहीतरी शिकायला मिळतं, ही गोष्ट करायला हवी किंवा टाळायला हवी ह्या नोंदी मनात होत राहतात.

ह्या वेळी, एकरपोर्टवर जातांना, रस्ते बंद असू शकतात ह्या शक्यतेचा आधीच विचार करुन निघावे हे शिकले.

शुज नविन घ्यावे लागतील.

उतरतांना लेसेस थोड्या सैल बांधल्या तर आंगठ्यांना त्रास होतो, पण लगेच नाही. थोडा वेळ सुसह्य होतो.

हा ट्रेक खरं तर आत्तापर्यंत केलेल्या चारही मधला सगळ्यात कमी ऊंचीचा ( altitude ) आहे, तरी मला तो तितकाच चॅलेंजिंग वाटला. खूप समाधानही मिळालं.

बाली पास केल्यावर यमुनोत्रीचं दर्शन झालं तसं इथे गंगोत्रीचं झालं. ( आता देहरादून किंवा निदान उत्तरकाशी ते गंगोत्री ड्रायव्हिंग करायचं आहे. तो रस्ता केवळ अहाहा आहे, आणि आवडतो तसा वळणावळणांचा आहे )

हे सगळं मी जेव्हा लिहीते तेव्हा पुन्हा एकदा ते दिवस जगते. अधुनमधून वाचते तेव्हा परत ते थ्रील अनुभवते. टेंटमध्ये एखाद्या रात्री, अ ती थंडी असतांना, पुन्हा हे असले प्रकार करायचे नाहीत असा एखादा चुकार विचार येतो पण तो तेवढ्यापुरताच.
थोडी गैरसोय अनुभवली की आपली मऊसुत गादी, उशी, उकडलं तर पंखा, थंडी वाजली तर अजून एखादी चादर, अपरात्री शू लागली तर बाहेर पडावं की नाही ह्याचा हजार वेळा विचार न करावा लागणं किंवा टॉयलेट टेंट ऑक्यूपाय असतील तर कधी बाहेर येणार हे लोक ! हा विचार न करावा लागणं ह्या सगळ्या अगदी ' टेकन फॉर ग्रँटेड ' म्हणतो त्या गोष्टी सुद्धा अमुल्य वाटायला लागतात. आणि खडतर वाट पार करुन कँपसाईट दिसली की होम स्विट होम ही भावना वेगळ्या लेव्हलला जाणवते.

( हे सगळं अनुभवायला प्रत्येकाने किमान एक तरी ट्रेक करावाच ! )

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...