Saturday, June 21, 2025

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास

 Submitted by निकु on 9 June, 2025 - 10:49

ओम नम: शिवाय !

सर्व प्रथम मला नमूद केले पाहिजे की या यात्रेचे मूळ / बीज हे येथील अनया, पराग आणि केदारच्या कैलास मानस सरोवर यात्रेबाबत येथे केलेल्या लिखाणात आहे. या यात्रेची प्रेरणा मला यांनी केलेल्या लिखाणातूनच मिळाली. तेंव्हा सर्वप्रथम त्यांचे अनेक धन्यवाद!

आदिकैलास यात्रा करायची असे गेले काही वर्षे मनात होते. २०१४ला जेंव्हा प्रथम कैलास मानसरोवर यात्रे विषयी वाचले तेंव्हापासून कैलास मानसरोवर यात्रा करायची मनात आहे. नंतर अशीच माहीती मिळवत असताना, KMVN आदि कैलास यात्रा पण नेते असे कळाले. दरम्यान कोव्हिडमुळे सगळेच थांबले होते.

मला ही यात्रा मे महिन्यात करायची होती. पण कधी उशीरा चेक केल्यामुळे तर कधी अपडेटस् उशीरा आल्याने यात्रा चुकत होती.

यंदा मात्र मी अगदी फेब्रुवारीपासूनच KMVN साईटवर लक्ष ठेवून होते. पण KMVN काही यात्रा सुरु करेना. अश्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यात्रा सुरु झाल्याचे वाचले आणि लगेच तयारी सुरु केली.

मध्यंतरी वाशीला उत्तराखंड भवन आहे तिथे भेट देऊन झाली. तिथे KMVN चे ऑफिस आहे पण ज्या मॅडम बघत होत्या त्या आता इथे काम करत नाहीत असे कळाले. तिथेच पुण्याच्या नेगीजींचा नंबर मिळाला. सध्या ते पुणे आणि मुंबई अशी दोन्ही ऑफिसेस संभाळतात.

आता KMVN विषयी थोडे: लोकांनी कुणाकडून गेलात असे विचारल्यावर मी "के एम व्ही एन" सांगत असे. हे नाव ऐकल्यावर लोकंचे क्लू लेस चेहरे आणि रिस्पॉन्स पाहिल्यावर मला खरंतर आश्चर्य वाटायचे. पण अशा सगळ्यांसाठी थोडक्यात माहिती देत आहे.

KMVN - Kumaon Mandal Vikas Nigam Limited ही महाराष्ट्राच्या MTDC सरखी उत्तराखंड सरकारची संस्था आहे. कुमाऊ मधील बरेच ट्रेक्स, यात्रा ही संस्था दरवर्षी नेत असते. उत्तराखंडाचे दोन भाग आहेत. एक गढवाल आणि दुसरा कुमाऊ. आपली चारधाम यात्रा गढवाल मधे येते तर कैलास मानसरोवर, आदि कैलास अश्या यात्रा कुमाऊ भागात येतात. गढवाल भागातील यात्रा व ट्रेक

 GMVN तर्फे चालवले जातात तर कुमाऊ मधील KMVN तर्फे. KMVN रेस्ट हाऊसेस ची लोकेशन्स खुप सुंदर आहेत आणि पर्यटकांमधे प्रसिद्धही आहेत जसे भीमताल, नैनीताल, सातताल हे लेक व्ह्यू साठी तर चोकौडी पक्षी निरीक्षणासाठी, मुन्सियारी ट्रेक्ससाठी. सगळ्या पर्यटन स्थळी त्यांची रेस्ट हाऊसेस आहेत आणि उत्तम स्थितीत आहेत. तुम्हाला अगदी रेस्ट हाऊस मधे बसून लोकेशन दिसत रहाते. अगदी ओम पर्वत, आदि कैलासचे दर्शनही तुम्ही रेस्ट हाऊसच्या आवारात बसून घेऊ शकता. अर्थात उंचीवरची ठिकाणे निसेन हटस् (याला पर्यायी मराठी शब्द कुणाला माहिती असेल तर सुचवा) स्वरुपाची आहेत. पण आता पक्के बांधकामही होऊ लागले आहे. यात्रेकरूंची विषेश काळजी सगळीकडे घेतली जाते.

अश्या या KMVN बद्दल अनेक वर्षे ऐकून होते. अखेरीस त्यांच्या बरोबर यात्रेला जायचा योग आला.

यात्रा सुरु झाली आहे कळाल्यावर पहिला नेगीजींना फोन केला. कागदपत्रे, आणि इतर बाबींची माहिती घेतली. परंतू रेल्वे आरक्षण आधीच सुरु झाले असल्याने त्यांनी ते करण्यास सांगितले. यात्रा काठगोदाम ते काठगोदाम अशी होती. मुंबई ते काठगोदाम आपले आपण पोहोचायचे होते.

वेगवेगळ्या वेळा, मग मुक्काम करावा की नाही, केला तर तो दिल्लीत करावा की काठगोदामला. त्यात रेल्वेची तिकीटे कधी उपलब्ध आहेत, वेटिंगची कुठली तिकीटे कन्फर्म होण्याची शक्यता जास्त. विमानाने जायचे की नाही असा बराच खल होत अखेर आम्ही काठगोदामला आदल्या दिवशी पोहोचायचा निर्णय घेतला. मुंबई ते दिल्ली आणि परतीच्या प्रवासाची तिकीटे वेंटिंगवरच होती. परंतू दिल्ली ते काठगोदाम व परतीची तिकीटस् मात्र कन्फर्म मिळाली.

नशीबाने वेटिंगची तिकीटेपण लवकर कन्फर्म झाली. मला आता आदि कैलास यात्रेचे वेध लागले. ऑफिसमधे धोशा लावून सुट्टी पक्की केली. फक्त दिवस मोजणे चालू होते. पुर्वीचे वाचलेले लेख त्यांचे अनुभव यांचे स्मरणरंजन चालू होते. आपणही त्या वाटेवरून जाणार आहोत याचा आनंद होत होता.

पण शेवटी यात्राच होती ती.योग यावा लागतो ना! नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ! तशी विघ्न आली नाही तरी परिस्थिती मात्र निर्माण झाली.
पहेलगामची धक्कादायक बातमी आली. मन विषण्ण होऊन गेले. सरकार काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना मॉक ड्रीलची बातमी आली. एकीकडे सरकारने केलेल्या कारवाईबाबत बरे वाटत असताना आपण मात्र काय करावे?अस्थिर परिस्थिती असताना एवढ्या लांबचा आणि बॉर्डरजवळचा प्रवास करावा की नाही अशी आंदोलने सुरु झाली. एक मन म्हणे उत्तराखंड तर सुरक्षित आहे ना, ती नेपाळ आणि तिबेटची बॉर्डर आहे. की लगेच दुसरे म्हणे पण दिल्लीत किंवा प्रवासात कुठे अडकलो तर. कुणी म्हणे १० तारखेला इंडिगोने बरीच उड्डाणे रद्द केलीत तर कुणी म्हणे दिल्लीवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
काय करावे ते सुचेना.. सतत तळ्यात मळ्यात होऊ लागले. हे सगळे माझेच चालू होते. नवऱ्याचा मात्र ठाम निश्चय झालेला की काहीही झाले तरी जायचेच. म्हणतात ना बायकांचा जीव जरा जास्तच संसारात गुंतलेला तसा माझा ऑफीसमधे. कुठे अडकलो तर ऑफीसचे काम कसे करणार, सुट्टी फारशी शिल्लक नव्हती. विनाकारण कुठे अडकल्यामुळे रजा टाकावी लागेल हे काही पटत नव्हते. यात्रेचे बुकिंग झाल्यावर माझ्या मनात फुललेल्या गुलाबाच्या जाऊ की नको करत एकेक पाकळ्य झडत होत्या.

आमचे नशीब बलवत्तर होते. ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती का होईना, स्थगिती मिळाली. मनातील सगळ्या शंकांचे सावट दूर झाले. आता यात्रा निर्धोक होणार असा विश्वास वाटू लागला.
क्रमश:

पुढचा भाग :
https://www.maayboli.com/node/86841

 रस्ते तर खूपच चांगल्या दर्जाचे झालेत. काही ठिकाणी निसर्गाचा र्‍हास लक्षात येण्याजोगा आहे. पण आम्ही पूर्वीचे सौंदर्य न पाहिल्याने हाही निसर्ग खूप छानच वाटत होता. अगदी लिपूलेख पर्यंत गाडीनेच प्रवास आहे आता. चालणे आजिबात नाही.

खरं तर इच्छा कैलास मानसची आहे पण तत्पूर्वी दमसास चेक करण्यासाठी ही यात्रा उपयोगी ठरावी. >> चालणे नाहीये पण विरळ हवेचे वातावरण कसे काय झेपते ते नक्कीच पाहू शकतो. अर्थात भारताकडून आणि चीन कडून ही चालणे नसल्याने कैलास मानसरोवर यात्रा जरा सुकर होईल असे वाटते. यंदा कुणी जाणार असेल तर माहिती घ्यायला उत्सुक आहे.
मुंबई ते काठगोदाम किती वेळ लागला वगैरे सविस्तर लिहा सगळं. >> आम्हाला खूपच वेळ लागला हर्पेन कारण रेल्वे आरक्षण उशीरा केले. आमचा जवळ जवळ २६ तासाचा प्रवास फक्त दिल्ली मुंबईचा होता. पुढे काठगोदाम ६ तासाचा. पण तरीही दिल्लीत एक थांबा लागतोच. दिल्ली काठगोदाम फक्त २/३ रेल्वे आहेत. त्यापैकी शताब्दीचे तिकीट मिळते सहज. आणि विमानाचा पर्याय आहेच वेळ वाचवायला. वेळे आधी प्लॅनिंग करणे गरजेचे आहे रेल्वेने जाणार असाल तर.

 

आधीचा भाग खालील लिंकवर वाचता येईल :
https://www.maayboli.com/node/86819

अशा रितीने आम्ही आदिकैलास यात्रेला जाण्यासाठी तयारी सुरु केली. तयारी फार अशी नव्हतीच.थंडी, वारा, पावसासाठी जॅकेटस् घेतली होती. थोडेसे गरम कपडे: मोजे, टोपी ई. कागदपत्रे सगळी तयार करून घेतली होती.
आवश्यक कागदपत्रे म्हणजे :
१.यात्रेचा अर्ज (फोटो सहित) 
२. इनर लाईन परमिटसाठी अर्ज ( फोटो सहित) 
३.डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट, 
४. एक नुकसान भरपाईचा बॉण्ड १०० रु.च्या स्टॅम्प पेपरवर (ह्यात आपण लिहून देतो की जाणीवपूर्वक यात्रा करतोय, काही कमी जास्त झाले तर मीच जबाबदार आहे ई.),
५.पोलीस वेरीफीकेशन- पासपोर्ट असेल तर लागत नाही.

या सगळ्या कागदपत्रांचे फॉरमॅट साईटवर उपलब्ध आहेत. आपण फक्त डाऊनलोड करायचे आणि भरायचे. सगळ्यांची पीडीएफ करुन नेगीजींना पाठवून दिली ईमेल वर. त्यामुळे सगळे काम घर बसल्या झाले. मूळ प्रती आपल्या बरोबर घेऊन जायच्या होत्या.

मला आता चांगलाच उत्साह संचारला होता. एका दिवसात पुऱ्या, पराठे, गुळपापडीची वडी असे काय काय प्रवासासाठी करून घेतले. हो, मुंबई दिल्ली रेलवेचा प्रवासच मुळी २६ तासांचा होता. त्यामुळे बेगमी करून ठेवली. 

बॅगा भरून आम्ही बांद्र्याला रेल्वे मधे बसलो तेंव्हा वाटले की फायनली आपण निघालो आहोत; खरंच! दिवसभराच्या धावपळीने दमलो होतोच थोड्याच वेळात झोपी गेलो.

सकाळी जाग आल्यावर लक्षात आले की अजून आजचा दिवस रेल्वेतच घालवायचा आहे. पण सकाळी उठून स्वयंपाक घरात जायचे नाही, कुठल्याही कामाची चिंता नाही ही भावना जास्त सुखावत होती. गेले ८/९ महिने काही ना काही कारणाने दमछाकच चालु होती. मधेमधे सुट्ट्या घेतल्या; त्यांनीही दमवलेच होते. त्यामुळे खूप दिवसांनी एक निवांतपणा मिळाला होता. आजचे नाश्ता आणि जेवण आम्ही बरोबर घेतले होते. त्यामुळे परत पांघरुणात शिरत झोपून गेले. नंतर कधीतरी उशीरा जाग आल्यावर यथावकाश चहा, जेवणे झाली. वेळ मिळणार माहित असल्याने पुस्तक आणले होतेच बरोबर. वाचनाची नुसती चैन केली आज.

रात्री ३ला गाडी निजामुद्दीनला पोहोचली. तिथून आम्हाला पुढची गाडी नवी दिल्ली स्टेशन वरून सकाळी ६.२०ला होती. या दोन स्टेशन मधले अंतर खरेतर २० मिनिटाचे. पण रात्री अपरात्री कुठे टॅक्सी शोधा म्हणून इथूनच ट्रेन चे तिकीट काढले होते. ती ४वाजताची होती. तासभर फलाटावरच थांबलो. ४.३०ला नवी दिल्ली. आता परत २ तासाचे वेटींग होते. पण फलाटावर थांबायला बरे वाटत होते. इथे एक अमृतसरची मुलगी आम्हाला भेटली. ती पण आमच्या सारखीच इंदूरहून येऊन थांबली होती. तिचीही गाडी साधारण आमच्याच वेळेला होती. ती भेटल्यामुळे गप्पांमधे वेळ कसा गेला कळालेच नाही. मधे मधे "अमृतसरलापण शेलींग होत होते का ग?" असे बाळबोध प्रश्ण विचारून माझे भौगोलीक अज्ञान उघड केले. तिचीही करमणूक झाली असावी. तिने मग बातम्यात सांगतात तो अमृतसर जिल्हा की तालुका आहे. मूळ अमृतसर शहर लांब आहे बॉर्डर पासून; अशी माहिती पुरवली.

सकाळी काठगोदामच्या ट्रेन मधे बसलो. ११.३० ला काठगोदामला पोहोचलो सुद्धा.
रस्त्यातील काही फोटो :
Road.jpgrul.jpg

हॉटेल बुकिंग आधीच झाले होते. हॉटेलला गेलो, बॅगा टाकल्या आणि आधी आंघोळी उरकल्या. मस्त फ्रेश झालो. लोकल अन्न पदार्थ - काही गरम खाऊया असे ठरले. फार नको होते पण ताजे गरम अन्न खायचे होते. प्रवासात घरून आणलेले पुरले होते. 

काठगोदामला २ हॉटेल सत्यार्थ आहेत. त्यापैकी आम्ही थांबलेलो ते स्टेशनपासून लांब होते. एक अगदी स्टेशन समोरच आहे. पण त्याची व्यवस्था तेवडी चांगली नाही असे कळाले. हे बुकिंग सुद्धा नेगींनी करुन ठेवले होते. हॉटेल तसे लॉजिंग स्वरुपाचे होते पण आम्हाला एक रात्रच काढायची होती त्यामुळे चालणारे होते. हॉटेलला रेस्टॉरंट नव्हते म्हणूनच आजुबाजूला काही लोकल अन्नपदार्थ मिळाले तर पहावेत असे वाटले आणि पहाडी उन्हाचे सोनस्नान झाले. तेथील स्टाफही बराच होता. त्यांच्याशी फक्त चेक इन आणि आऊट एव्हढाच काय तो संबंध आला.

image.pnghotel.jpg

काठगोदाम स्टेशन ते बाजार / हलद्वानी असा साधारण ५ किमीचा रस्ता आहे. या रस्त्यावर काय नाही ते विचारा.. कपड्याच्या सगळ्या ब्रांडसची अद्ययावत दुकाने होती. मोठमोठी स्टार हॉटेल्स् होती. आणि आमचे घोडे नेमके तिथेच अडले. लोकल काही खाण्यासाठी इथे रेस्टॉरंटस् अशी फार दिसलीच नाहीत. रस्त्यावर बेलफळ रसाच्या गाड्या अगदी आपल्याकडे उसाच्या रसाच्या असतात तश्या उभ्या होत्या. पण पोटात भुकेचे कावळे ओरडत असताना ही रिस्क नको वाटली. मी पहिल्यांदाच लोकांना बेलफळ रस पिताना पाहिले.

शेेवटी खूप तंगडतोड करून एक पंजाबी रेस्टॉरंट सापडले- "डीपीज नानक". अनेकांनी तिथे हेच रेफर केले. दुपारच्या चांदण्यातली पायपीट कामी आली. जेवण खरच खूप छान होते. अगदी गरम अन्न पटापट आणून दिले. पोटभर जेवून लस्सी कम रोज फ्लेवर घातलेले ताक पिऊन हॉटेलवर आलो  आल्या आल्या बिछान्यावर ताणून दिली ते थेट ७ वाजता उठलो. रात्री परत एकदा काठगोदाम स्टेशन च्या दिशेने चक्कर मारली आणि सबवे खाऊन गप झोपी गेलो. उद्या पासून खरी यात्रा सुरू होणार होती. दरम्यान के एम व्ही एन् कडून फोना फोनी झाली होती. उद्या सकाळी ७ ला आमच्या हॉटेल वरूनच पिक अप होता. त्या एक्साईमेंटमधेच झोपी गेलो.

 

WhatsApp Image 2025-06-15 at 6.10.24 PM.jpeg
तुम्हाला चालेल ना हा फोटो इथे ?

 आता काठगोदामला त्यांचे Tourist Rest House नाहीये. त्यामुळेच दुसऱ्या हॉटेलमधे रहावे लागले. रस्ता रुंदीकरणाच्या कामात पाडले गेलेय आणि परत होण्याची शक्यता नाहीये असे सांगत होते. त्यांनाही गैरसोय होतेय खरतर यात्रा सुरु करायला. काढतील काहीतरी मार्ग.

मुंबई दिल्ली आमचा प्रवास खूपच जास्तीचा झाला कारण महिनाभर आधी आरक्षण केले, त्यात जी आधी कंन्फर्म झाली त्याने प्रवास केला. पण राजधानीने गेल्यास १८ तासात दिल्लीला पोहोचतो आपण. दिल्लीला दुपारी १२.३०ला पोहोचतो. मग रात्री ८ची रानीखेत पकडून सकाळे ६ला काठगोदाम असे करता येते. पण याला बरोबर वेळे आधी नियोजन पाहिजे. तसेच दिल्लीत मेट्रोसेवा चांगली आहे. सकाळी ६.१५ला पहिली मेट्रो धावते. जाणकारांनी माहिती द्यावी मेट्रोविषयी.

 

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३

Submitted by निकु on 21 June, 2025 - 09:45

या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841

काठगोदाम ते पिथौरागड
एकूण अंतर -२४५ किमी

आज पासून यात्रेला सुरुवात बरं मंडळी!

संपूर्ण यात्रेचा मार्ग खाली दिलेल्या नकाशातून पटकन समजून येईल :
road map (1).jpg

सकाळी तशी गडबड नव्हती. संस्थेची गाडी आम्हाला हॉटेल मधून पिकअप करणार असल्याने ७ च्या आधी आवरून तयार रहायचे होते. माझे आवरणे चालू असतानाच सकाळी ६.३०ला कर्मचारींचा फोन आला की काही जणांची गाडीच सकाळी ७ ला येतेय त्यामुळे आम्हीपण रेल्वेस्थानकावरच ७ पर्यंत पोहोचावे. म्हणजे झाले का.. वेळापत्रक अर्ध्यातासाने अलिकडे आले. आम्ही लवकर उठलो होतो म्हणून बरे झाले. आवरून इतक्या लवकर रिक्षा मिळेल का असा विचार करत असतानाच पटकन एक रिक्षा मिळाली. आम्ही स्थानकात नीट वेळेवर पोहोचलो. तोवर इतर यात्री देखील जमले होते. दोन टेम्पो ट्रॅव्हल्स आमची वाट बघत होत्या. एकमेकांची जुजबी ओळख करून घेत आम्ही गाडीत स्थानापन्न झालो. आम्ही मुंबईचे ५ जण होतो. ७ जणांचा एक ग्रुप तमिळनाडूहून आला होता अजून एक काका केरळचे, एक काकू डेहराडूनच्या आणि बाकीचे तिथलेच लोकल उत्तराखंडवासी मिळून आमचा २० जणांचा ग्रुप होता.

स्टेशनहून आम्हाला फ्रेश होण्यासाठी काठगोदामच्या पी. डब्ल्यू. डी. गेस्ट हाऊसला नेण्यात आले. गाडी अगदी मस्तपैकी आमच्या हॉटेलवरूनच गेली. मग आम्हीपण (मनातला सात्विक संताप आवरत), सगळ्यांना हे बघा आम्ही इथूनच आलो हे दाखवले. आम्ही जरी आदल्या दिवशी आलो तरी बाकीचे लोक सकाळीच प्रवास करून आलेले. त्यांना फ्रेश होण्यासाठी हा थांबा आहे असे सांगितले. पण आम्ही गाडीतून उतरतो तो काय; पत्रकार, स्थानिक न्यूज चॅनेलचे वार्ताहर यांनी आम्हाला गराडाच घातला. हे सगळे खूपच अनपेक्षित होते. सगळ्याबाजूने एकदम कॅमेरांचा क्लिक्लीकाट झाला. हे लोक आमचे फोटो काढत होते, मुलाखती घेत होते. आम्हाला एकदम पेज थ्री पर्सनॅलीटी झाल्यासारखे वाटले. तुम्ही ह्या यात्रेला का आलात? कुठुन आलात? नवरा बायको असतील तर अजून एखाद दोन प्रश्ण. एक वेगळा अनुभव होता.

इथल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपुलकीने स्वागत केले. या सगळ्या लोकांबरोबर हे लोक सुद्धा दारात चहाचा ट्रे आणि पाणी घेऊन उभे होते. भराभर २/३ खोल्या स्त्रिया आणि पुरुषांना फ्रेश होण्यासाठी उघडल्या गेल्या. आमच्या स्वागताला येथील महापौर उपस्थित होते. त्यांनी हार घालून केलेल्या स्वागताचा स्वीकार करून आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही भीमतालला निघालो. आमची पहिलीच बॅच असल्याने महपौरांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला, "हर हर महादेव!" च्या गजरात गाड्यांनी भीमतालकडे कूच केले.

सकाळचा नश्ता आज भीमतालला होणार होता. सकाळच्या वर्ताहरांच्या गडबडीत बराच वेळ गेलेला. तसा थोडा उशीरच झालेला पण सकाळच्या व्हीआयपी ट्रीटमेंटमुळे सगळे खुश होते.

भीमताल हे नैनीताल मधील मोठे सरोवर म्हणतात. कदाचित त्याहुनही मोठे नौकुचिया ताल असेल फक्त. त्याच्या भीमकाय आकारामुळे त्याला हे नाव मिळाले असावे. काही लोक, येथे भीमाने गदा मारून या सरोवराची निर्मिती केली म्हणून त्याला भीमताल म्हणतात असेही सांगतात. तसेही आपल्याकडे प्राचीन काही असले तर ते पांडव किंवा राम, सीता,लक्ष्मण यांच्य्यापैकी कुणाचे तरी असते.

भीमतालला गाडीतून उतरल्यावर लगेचच के एम् व्हि एन चे कर्मचारी रेस्ट हाऊसच्या दरवाज्या बाहेर हात जोडून आमची वाट बघत होते. प्रत्येकाचे स्वागत हात जोडून आणि ओम् नम: शिवाय म्हणून केले जात होते. आत गेल्यावर बुरांशच्या सरबताचा ट्रे सरबराई साठी हजर होताच. बुरांश (Rhododendron Flower) हे येथील स्थानिक फूल आहे. लाल रंगाचे फूल असते. फेब्रुवारी अखेर पासून एप्रिल पर्यंत साधारणपणे सिझन असतो म्हणतात. आम्ही गेलो तेंव्हा सिझन संपलाच होता. पण रस्त्यात एखादे झाड किरकोळ फुले अंगावर वागवून असायचे. याची चवही छान आहे काहीशी आंबट गोड. हृदयासाठी हे फूल चांगले म्हणतात.

भीमतालला, कुणाला आंघोळी वगैरे उरकण्याच्या दृष्टीने परत खोल्या उघडून देण्यात आल्या. हे पहिले रेस्ट हाऊस आम्ही पाहिले. अतिशय नेमक्या ठिकाणी बांधले होते, सभोवती छोटीशी बाग, तिथे बसायला बाक. खुप सुंदर रचना होती. कुठूनही तुम्हाला भीमतालचे दर्शन होत राहिल अशी व्यवस्था मला खूपच आवडली. हवाही छान होती त्यामुळे फोटोप्रेमी लगेच कॅमेरा घेऊन सरसावले आणि यथेच्छ क्लिक्लीकाट झाला. थोड्या वेळाने आमचा नास्ता लागल्याची वर्दी आली. मस्त पुरी भाजी, पोहे, सॅण्डवीच असा भरगच्च मेन्यू होता. शिवाय चहा, कॉफी होतीच. भरपेट खाल्यानंतर आम्हाला यात्रेच्या आजच्या दिवसाची माहीती देण्यात आली. वार्ताहरांशी बातचीत झाली. आम्हाला परत एकदा हार घालून शुभेच्छा दिल्या गेल्या. हरहर महादेव, जयकारा बीर बजरंगी, हर हर महादेव, ओम् नम: शिवाय असा गजर करत आमच्या दोन्ही टेम्पो ट्रॅव्हल्स सुसाट सुटल्या.

भीमताल :
Bhimlake1.jpg

रेस्टहाऊस बाहेरील सुशोभिकरण :
bhim1.jpg

इथेच आमच्या स्वागताचा कार्यक्रम झाला :
bhimmtl 1.jpg

बाजूच्या बागेमधूनच भीमताल डोकावतोय
bhimtl.jpg

आजचे जेवण जागेश्वरला आणि मुक्काम पिथौरागडला होता. भीमताल पासूनच थंड हवा आणि निसर्गाची सुंदर पहाडी रुपे दिसायला सुरुवात झाली होती. वळणावळणाचा रस्ता दोन्ही बाजूला हिरवे डोंगर बघायला मजा येत होती.

रस्त्यात काफल विकणारी लहान मुले दिसली. आमच्यातील देहराडूनहून आलेल्या काकूंची ही चौथ्यांदा यात्रा होती आणि येथील स्थानिक फळे, फुलांबाबत त्यांना चांगली माहिती होती. त्यांच्या बरोबर आम्हीपण घेतली. सगळ्यांना आवडली. आपल्या चन्यामन्या बोराचे हे सख्खं भावंड वाटावे इतकी चव सारखी वाटली मला. दिसायलाही तसेच. इथले हे सिजनल फळ आहे. लहान मुले डोंगरातून गोळा करून आणतात. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्याला विकतात. आपल्य्याकडे नाहीका पूर्वी बोरघाटात मुले करवंद गोळा करुन विकत. ही मुले तशीच होती. काफलची झाडे नंतर बरीच दिसली आम्हाला. पण बिया खायच्या नाहीत आणि फळे ही आवडली म्हणून खूप खायची नाहीत बरं! नाहीतर दुसऱ्या दिवशी पोटाने जाणीव करून दिलीच समजा.

Kfl.jpg

मधे गोलू देवतेचे मंदिर बघून आम्ही जागेश्वर कडे निघालो. गोलू देवता ही नवसाला पावणारी देवता, न्यायाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. लोक आपले मागणे चिठ्ठीत लिहून ही चिठ्ठी येथे बांधतात आणि मागणे पूर्ण झाले की घंटा बांधतात. विशेष करून कोर्टकचेऱ्याच्या कामासाठी येथे नवस बोलला जातो असे म्हणतात. ही येथील अनेक लोकांची कुलदेवताही आहे. त्यामुळे भरपूर चिठ्ठ्या, घंटानी आवार भरून गेले आहे. मूळ गाभारा छोटासाच आहे. मूर्ती पाहिल्यावर मला आपल्या खंडेरायाचीच आठवण झाली. अगदी तशीच घोड्यावर बसलेली आणि तलवार हातात धरलेली मुर्ती आहे. दर्शन घेऊन कांचीधामला वळसा घालून आम्ही जागेश्वरला निघालो.

गोलू देवता मंदिराचे आवार : सगळ्या खांबाना कश्या चिठ्ठ्या आणि घंटा बांधल्यात पहा :
Golu devt temp.jpg

हा अजून एक प्रदक्षिणा मार्गावरचा :
IMG-golu.jpg

अश्या काही मोठ्याला घंटापण आहेत.
road map (2).jpg

जागेश्वरला पोहोचेपर्यंत उशीर झाला होता तरी परत तसेच हसमुख बुरांशच्या सरबताने आणि ओम् नम: शिवायच्या गजराने स्वागत झाले. जेवणे पटापट उरकून आम्ही जागेश्वरधामचे दर्शन घेतले. जागेश्वर हा एक मंदिर समूह आहे. येथे छोटी छोटी १०८ मंदीरे, वेगवेगळ्या दिशेकडे तोंड करून आहेत. एकूण म्हणे २५०च्या आसपास ही मंदिरे विखुरलेली आहेत त्यातली एका ठिकाणी स्थित असलेली मंदिरे आपल्याला पहायला मिळतात ती १०८ आहेत जवळपास. हे स्थानच खूपच रमणीय आहे. विकीपिडीया २२४ संख्या सांगतो पण तेवढी काही वाटली नाहीत. मोठी, मुख्य मंदिरे ३ आहेत. २ महदेवाची आणि एक देवीचे. हे ज्योतिर्लिंगही मानले जाते. ८वे ज्योतिर्लिंग - नागेशं दारुकावने असे वर्णन असलेले ते हेच होय असे मानतात. या विषयी अनेक मतांतरे आहेत. पुराणकाळा नुसार श्रीविष्णूंनी या शिव मंदीराची स्थापना केली तर काहींची सप्तर्षींनी असे मानतात. आदि शंकराचार्यानी हि मंदीरे शोधून काढली असेही सांगतात. थोडक्यात प्राचीन तपोभूमी म्हणजे जागेश्वरधाम समूह आहे. इथे २ उंचच उंच देवदाराची झाडे आहेत. त्याना शिवपार्वती मानतात. त्यांचे आणि त्यांच्या बरोबर आमचे असे दोन्ही प्रकारे फोटो काढून बाहेर पडलो.

जागेश्वर धाम मंदिर समूह :
Jag templs.jpg

वरुन दिसणारे जागेश्वर :
Jeshwr.jpg

अजून एक :
jag2.jpg

रेस्ट हाऊस मधून दिसणारे जंगल :
jag view frm trh2.jpg

आता मात्र कुठेही न थांबता पिथौरागड गाठायचे असे ठरले. निघायला ५ वाजून गेले होते आणि अजून प्रवास बाकी होता. आम्ही असे ऐकले होते की इकडे रस्त्यात झरे लागतात. त्यांचे पाणी खूप चविष्ट असते. तसा एक झरा लागल्यावर आम्ही रस्त्यात थांबलो. घाटात असते तसे एक देवीचे देऊळ होते - गुरना देवीचे. त्याच्या समोर झरा. हा प्रसिद्ध वॉटर स्पॉट होता. जाणारे येणारे थांबून पाणी भरताना दिसत होते. खरोखरच थंड,ताजे खरेखुरे मिनरल वॉटर. याच्या पुढे बिसलेरीची किंमत ती काय. नंतरही जेंव्हा जेंव्हा संधी मिळाली आम्ही असे झऱ्याचे पाणी पित राहिलो.

लांबून दिसणारे पिथौरागड :
on d wy.jpg

परत एकदा माळा घालून, बुरांशच्या सरबताने आणि हरहर महादेवाच्या गजरात आमचे पिथौरागडला स्वागत झाले. आत हे सगळीकडे असणार की काय याने गंमत वाटत होती. या प्रकाराला आम्ही हळूहळू सरावत होतो. रात्री तिथल्या महादेवांच्या मूर्तीचे पूजन आणि एक दिवा शहिदांसाठी हा रोमांचपूर्ण कार्यक्रम झाला. आम्हाला दुसऱ्या दिवशीची माहीती दिली गेली. रात्री पौर्णिमेच्य्या चंद्राचे दर्शन, उल्का मातेच्या देवळात घेतले. इथे आवारात मोठे मंदिर आहे. पूर्ण चंद्राची छायाचित्रे घेतली. दिव्यांनी झगमगते पिथौरागड वरुनच पाहून घेतले.

पोहोचल्या पोहोचल्या आपल्याला दर्शन होते ते याच शिवशंभूच्या मुर्तीचे. भोवताली सगळीकडे झाडांनी सजावट केली आहे.
shiv11.jpg

उल्का मातेच्या मंदिरातून दिसणारे रात्रीचे पिथौरागड :
pith t night1.jpg

पिथौरागडच्या कँटीनमधे एक छान तक्ता लावला आहे, आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती देणारा : आवडला म्हणून मुद्दाम फोटो काढून घेतला :
chrt  t pithgrh.jpg

आजच्या रोमांचकारी कार्यक्रमा बद्दल सांगायचेच राहिले. रात्री जेवणा आधी एक दिवा शहिदांसाठी हा कार्यक्रम असतो छोटासा. त्यांनी आवारात एक शहिद स्मारक केले आहे. मोठे खांब अर्ध गोलाकार बांधून पिथौरागड जिल्ह्यातील प्रत्येक शहिदाचे नाव त्यावर लिहिले आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील नावेही यात समाविष्ट आहेत. भली मोठी यादी वाचताना अंगावर काटा येतो. यातील अनेकांना, लष्करातील मरणोत्तर शौर्य पुरस्कारही प्राप्त आहेत. जवळपास प्रत्येक गावातील जवान आहेत. याचे प्रत्यंतर प्रवासात येतेच. अनेक लहान लहान गावांच्या वेशीवर शहिद अमुक अमुक यांच्या गावात आपले स्वागत आहे अश्या कमानी दिसतात. आम्ही येथे दिवा लावला व श्रद्धांजली वाहिली. काहींनी गाणी म्हटली. वातावरण एकदम भावूक झाले. पहाडी लोक जसे प्रेमळ, विश्वासू तेवढेच शूर लढवय्ये असतात. कधीही पाठ फिरवत नाहीत. त्यामुळेच कुमाऊ रेजिमेंट युद्धात, नेहमी सर्वात पुढे असते.काय म्हणावे यांना. या आयांची खरच कमाल वाटते, गावोगावी शहिद असताना देखील आपल्या मुलांना सैन्यात घालण्याचे धाडस त्या करतात. मी मनापासून या सगळ्यांनाच सॅल्यूट केला. हात जोडून शहिदांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली. नुकत्य्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे जास्तच जाणवले होते. सगळ्यांची तिच अवस्था होती. त्यात आमच्या बरोबर एका शहिदाची आई होती - माझ्या आईच्याच वयाच्या- देहरादूनहून आलेल्या श्रीमती स्वराज यादव. मी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांनीही न बोलताच हात हातात घेतला आणि थोपटले. जणूकाही त्यांना कळालं होतं मला काय वाटतेय ते. कमाल, कमाल अनुभव होता तो.

या भारलेल्या वातावरणातच आज विसावा घेऊया!

क्रमशः

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...