चक्क
बर्फाचंच हॉटेल !
पं चतारांकित, सप्ततारांकित हॉटेलमध्ये राहणं हे आता सर्वपरिचित झालं आहे. पण संपूर्णपणे बर्फापासून बनवलेल्या हॉटेलमध्ये उणे ५० सें.ग्रे. तापमानात राहण्याची कल्पना कशी काय वाटते? तेथील जमीन बर्फाची, बेड बर्फाचं, संपूर्ण सजावट बर्फाची, फर्निचर बर्फाचं अगदी ग्लासेससुद्धा बर्फाचे.... खरं वाटत नाही ना? पण स्वीडनमधील किरूना शहरापासून अवघ्या दहा-पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या झुकासार्वी गावातील भव्य अशा 'आइस हॉटेल'ला भेट देण्याचा योग नुकताच आला. खरोखरीच जगातील एक आश्चर्य व चमत्कार वाटावा अशीच या हॉटेलची कल्पना व रचना आहे.
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आइस हॉटेलच्या परिसरात आम्ही येऊन पोहोचलो तेव्हा उणे १५० सें. मध्ये हॉटेल उभारणीचं काम जोरात सुरू होतं. नोव्हेंबर अखेरपासून सुमारे ५५०० चौ. मीटरच्या क्षेत्रात भव्य दिव्य असं हे आइस हॉटेल दरवर्षी बांधण्यात येतं. मागणीनुसार विविध स्वीटस, खोल्यांची संख्या ठरते. पण दिवसेंदिवस, या हॉटेलला साऱ्या जगातून प्रचंड मागणी येत असल्याने निदान ७०-८० खोल्या द्याव्याच लागतात, आणि तीन-चार महिने आधी त्याचं बुकिंग केलं नाही तर पर्यटकांना निराश होऊन परतावं लागतं.
या संपूर्ण हॉटेलच्या उभारणीसाठी रॉ मटेरिअल म्हणून दरवर्षी हजारो टन
बर्फाची जरूरी लागते. तो कसा उपलब्ध होतो याची फार महत्त्वपूर्ण माहिती आइस प्रॉडक्शन विभागाचे प्रमुख अल्फ केटो यांच्याशी बोलताना मिळाली. हे हॉटेल, त्याची सजावट, फर्निचर, रेस्टॉरंट, त्यातील क्रॉकरी, बार, ग्लासेस आदी सर्वांसाठी मिळून साधारणतः तीन हजार मेगा टन बर्फ दरवर्षी लागतो. आणि मुख्य म्हणजे तो स्फटिकासारखा स्वच्छ असणं महत्त्वाचं असतं.
झुकासावीं गावातून टॉनें नदी वाहते. लांबवर पसरलेल्या या नदीचा उगम आर्क्टिक सर्कलच्या २०० कि.मी. उत्तरेला होतो. प्रदूषणापासून ही नदी मुक्त आहेच. पण हिवाळ्यात ती जेव्हा गोठते तेव्हा त्यातील बर्फ, क्रिस्टल क्लिअर असतो. त्याला बुडबुडे येत नाहीत व तडेही जात नाहीत. त्यामुळे याच नदीतील गोठलेला बर्फ हॉटेल उभारणीसाठी कच्चा माल म्हणून दरवर्षी वापरण्यात येतो.
हा बर्फ काढण्याचं खास तंत्र आहे. प्रत्येक हिवाळ्यात या नदीतून शेकडो टन बर्फ काढण्यात येतो. पाणी गोठून बर्फ होऊ लागला की, कोणत्या भागातील बर्फ घ्यायचा ते क्षेत्र निश्चित केलं जातं. संपूर्ण हिवाळ्यात त्या क्षेत्रात जास्तीत जास्त बर्फ तयार होईल याची विशेष काळजी घेण्यात येते. साधारणतः मार्च मध्यापासून एप्रिल मध्यापर्यंत या बर्फाची प्रत्यक्ष कापणी केली जाते. तोपर्यंत हा बर्फ साधारणतः ८० सें.मी. जाडीचा झालेला असतो.
नदीतील हा बर्फ वापरण्यासाठी अत्यंत आधुनिक पद्धतीची यंत्रसामुग्री व उपकरणं वापरण्यात येतात. त्या यंत्रांच्या साहाय्याने गोठलेल्या बर्फाचे ठरावीक आकाराचे ब्लॉक्स कापण्यात येतात. पण त्यावेळी फार काळजी घ्यावी लागते. कारण कडाक्याच्या थंडीत ही यंत्रंच गोठण्याची भीती असते. ब्लॉक्स व्यवस्थित कापल्यानंतर खास बनवलेल्या क्रेन्सच्या साहाय्याने नदीतून, प्रत्येकी सुमारे दोन टन वजनाचे हे ब्लॉक्स उचलण्यात येऊन, खास सुरक्षित जागी ठेवण्यात येतात. तिथे सतत उणे ५० सें. तापमान असतं. मार्च-एप्रिलमध्ये नदीतून कापून काढण्यात आलेला बर्फ त्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हॉटेल उभारणीसाठी वापरण्यातु येतो.
नदीतील बर्फ वापरताना त्याचा दर्जा, हा मुख्य निकष असतो. दरवर्षी जानेवारी महिन्यात आइस हॉटेलचे तज्ज्ञ, त्या वर्षीच्या बर्फाच्या दर्जाबाबत आर्किटेक्ट्स आणि कलाकार यांच्याशी चर्चा करतात. कारण आइसचा दर्जा हा तापमान व पावसाचं प्रमाण यावर अवलंबून असतो व दरवर्षी त्यात भिन्नताही आढळून येते. साठवलेल्या बर्फाची वर्गवारी साधारणतः दोन भागात करण्यात येते. क्रिस्टल क्लिअर बर्फ हा ग्लासेस्, डिशेस् बनवण्यासाठी वापरण्यात
वेतो व राहिलेला, शिल्पाकृती आणि अन्य सजावटीसाठी उपयोगी पडतो.
नोव्हेंबर मध्यापासून हॉटेलच्या प्रत्यक्ष बांधणीस व सजावटीस आरंभहोतो. त्यावेळी जगातील नामांकित चित्रकार, डिझायनर्स तिथे येतात. आणि त्या वर्षीच्या हॉटेलची आखणी करण्यात येते. दरवर्षी सजावटीत नावीन्य ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. बर्फ हॉटेलमधील प्रत्येक वस्तू बर्फाचीच असते. म्हणजे खालची जमीन, बाजूच्या भिंती, दरवाजे, बेड्स, जिने, खुर्चा-टेबले, फोटोफ्रेम्स्, अगदी सारं सारं बर्फाचंच ! ते वितळून जाऊ नये, म्हणून संपूर्ण हॉटेलमध्ये सतत उणे ५० सें. तापमान कायम ठेवण्यात येते. हिवाळ्यात काही वेळेस बाहेरचं तापमान उणे २०० सें. पर्यंत घसरतं किंवा मार्च-एप्रिलमध्ये एक-दोन डिग्रीपर्यंत येतं. हॉटेलमधील तापमानात मात्र कधीही बदल होत नाही.
या हॉटेलमध्ये नानाविध प्रकारच्या खोल्या, स्वीट्स उभारण्यात येतात व त्यांचे रोजचे दर निरनिराळे असतात. डिलक्स स्वीटचा थाट काय वर्णावा? तेथील बर्फाची सारी सजावट डोळे दीपवणारीच होती. आर्ट स्वीटमधील बर्फाच्या कलाकृती आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतात. आइस व स्नो रूममधील बर्फाचे फर्निचर पाहून कोणीही चक्रावून न गेला तरच नवल. प्रत्येक स्वीट किंवा खोलीच्या बाहेर त्याची सजावट करणाऱ्या कलाकाराचं नाव वर्षातच कोरलेलं असतं व या खोल्यांनाही आकर्षक नावे दिली जातात. नोव्हेंबर महिन्यापासून सुमारे दोनशे कलाकार या कामात गुंतलेले असतात.
या आइस हॉटेलमध्ये काय नाही? तेथील आइस चर्च देखील एक मुख्य आकर्षण ठरलं आहे. संपूर्ण बर्फापासूनचं बनवलेलं अगदी हुबेहूब चर्च. दोन हजार साली या चर्चमध्ये लग्न लावण्यात येतील अशी जाहिरात करण्यात आली. तेव्हापासून नाताळ व नववर्षात इथे लग्न लावण्यासाठी जगभरातून जोडपी येऊ लागली. आता त्यांची संख्या अक्षरशः शेकड्यांनी झाली आहे. श्रीमंत व रसिक जोडपी सहा-सहा महिने आधी लग्नाचं बुकिंग करतात. लग्नानंतर नवविवाहित दांपत्यासाठी खास बर्फाची सजावट केलेले 'हनिमून स्वीट्स'ही आहेतच. रेस्टॉरंट व बारचं वर्णन काय करावं? संपूर्ण आइस बार, तिथे बर्फाची टेबलं, त्यावर बर्फाचे ग्लास, त्यात फसफसणारी शैंपेन व आजूबाजूला उणे ५० सें. तापमान. त्यामुळे हॉटेलमध्ये मुक्कामास आलेल्यांची गदी तिकडेच वळली तर आश्चर्य ते काय?
एवढ्या कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या गादीवर झोपायचं किंवा खुर्चीत बसायचं कसं हा प्रश्न प्रत्येकालाच पडणं साहजिकच आहे. बर्फाच्या बेडवर
रेडियरचं कातडं पसरण्यात येतं व त्यावर विशेष असा बिछाना असतो. या आइस हॉटेलमध्ये वावरताना, राहताना कशा प्रकारचे कपडे घालायचे याच्या खास सूचना देण्यात येतात. मुख्य म्हणजे गरम कपड्यांचे एकावर एक लेयर्स घालून इथे येणं महत्त्वाचं असतं. या लेयर्समुळे शरीरात हवा खेळती राहते. कॉटनचे कपडे टाळावेत. पायात नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचे बूट घालण्याचा सल्ला दिला जातो. कारण उणे तापमानाशी सामना देऊ शकणारे जाड लोकरीचे मोजे पायात चढवून आत उब ठेवणं जरुरीचं असतं. तसंच इथे खास बुटांचीही व्यवस्था केली जाते. हॉटेलमध्ये चालताना खाली संपूर्ण जमीन बर्फाची असते. त्या सुळसुळीत बर्फावरून किंवा बर्फाच्या जिन्यावरून चालताना खूपच काळजी घ्यावी लागते. नवीन ग्राहकांचं तर सोडाच पण रोजचा सराव असलेले कर्मचारीही दिवसातून एक-दोनदा साष्टांग नमस्कार घालतात. केवळ डोकंच नव्हे तर कान आणि मान यांचं संरक्षण करणारी कानटोपीही हवीच.
एवढी सगळी वेषभूषा केल्यानंतर तुम्ही आइस हॉटेलमध्ये राहण्यासाठी सज्ज होता. त्याचबरोबर हिवाळ्यात दिवसभर किंवा रात्रीला उणे १५ ते उणे २५० सें. तापमानात बाहेरच्या अन्य सफरीही तुम्ही करू शकता. नॉर्दन लाइट्सचा शोध घेण्यासाठी भटकंती, कुत्र्यांच्या किंवा रेंडियर्सच्या गाडीतून दूरवर फेरफटका, बर्फावरून घसरगुंडी आदी अॅक्टिव्हिटीज करताना वेळ कसा जातो, तेच समजत नाही.
डिसेंबरमध्ये सुरू झालेले आइस हॉटेल, साधारणतः एप्रिल मध्यापर्यंत, चार-पाच महिने सुरू असतं. साऱ्या जगातून येथे पर्यटकांची गर्दी उसळलेली असते. त्यांची संख्या पन्नास हजारांच्या घरात जाते. राहण्याचे रोजचे दर दोनशे-अडीचशे युरोपासून प्रत्येकी ७५० युरोपर्यंत असतात. निसर्गाचा आणि मानवनिर्मित असा हा चमत्कार पाहून आपण अक्षरशः चकित होऊन जातो. पण ही कहाणी येथेच संपत नाही. एप्रिलपासून हवेतील तापमान वाढू लागतं तेव्हा हे अवाढव्य आइस हॉटेल वितळायला सुरुवात होते. टॉनें नदीतून गेल्या मार्च-एप्रिलमध्ये जेवढा वर्फ 'उधार' म्हणून घेतलेला असतो तो संपूर्णपणे त्या नदीला परत करण्यात येतो. अशा रितीने वितळणाऱ्या हॉटेलचं पाणी अत्याधुनिक पद्धतीने परत नदीत सोडण्यात येतं.
आइस हॉटेलचा हा चमत्कार आता साऱ्या जगात लोकप्रिय होत आहे. जगातील सहावा आइस बार सप्टेंबर २०११ मध्ये इस्तंबूलमध्ये उघडण्यात आला. २०१२ मध्ये ही संख्या दुप्पट होण्याची खात्री आइस हॉटेल व्यवस्थापकांना वाटते आहे.
91132-
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
खंड : युरोप
देश : स्वीडन
राजधानी : स्टॉकहोम
क्षेत्रफळ : सुमारे ४,४८,९६५ चौ.कि.मी.
लोकसंख्या : सुमारे
९५,३५,२०८
चलन : स्वीडिश क्रोन (युरोही चालतात.)
भाषा : स्विडिश, सामी, फिनिश (पर्यटनात इंग्रजी)
कसे जाल?
स्टॉकहोम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तिथून किरूना इथे जाण्यासाठी रेल्वे किंवा स्थानिक विमानसेवा उपलब्ध आहे. स्टॉकहोमहून रात्री गाडीत बसलं, की तुम्ही सकाळी किरूना येथे पोहोचता. विमानतळापासून झुकासार्वी आइस हॉटेलला टॅक्सीने अगर बर्फावरील सरकत्या गाडीतून जाता येतं.
कधी जाल?
आइस हॉटेलची मजा लुटण्याचा मोसम म्हणजे डिसेंबर ते मार्च. अर्थात आइस हॉटेलला भेट द्यायची किंवा तिथे मुक्काम करायचा तर त्याचं आरक्षण निदान चार-पाच महिने आधी करणं गरजेचं असतं.
हवामान :
या महिन्यात तिथे प्रचंड थंडी असते. तापमान हे सरासरी उणे ४ पासून उणे २०-२५० सें. पर्यंत उतरतं. या हवामानाला तोंड देऊ शकणारे कपडे मात्र तुमच्याजवळ हवेत. उदा. ओव्हरकोट, घट्ट कानटोपी (बालाकलोह), थर्मलवेअर, हँडग्लोव्हज्, लोकरीचे पायमोजे व बर्फावर चालण्यासाठी उत्तम बूट.
सुरक्षितता :
हे राष्ट्र पूर्ण सुरक्षित आहे. त्यामुळे स्वतःचा कार्यक्रम आखून, एजंट अथवा इंटरनेटवरून बुकिंग करून स्वतंत्र्यरीत्या सहलीला जाता येऊ शकतं.
नॉर्दन लाईट्सचा
चमत्कार !
स्कँ डेनेव्हियातील नॉर्वे, फिनलँड, स्वीडनमधील आर्विटक सर्कलमध्ये चोवीस तासांचा उजेड मी दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. दोन महिने सूर्य, क्षितिजावर कायम राहत असल्यामुळे इथे अंधार होतच नाही. पण हिवाळ्यात याच भागात सूर्य क्षितिजावर येत नसल्याने चोवीस तास अंधार असतो. त्या अंधाराचा अनोखा अनुभव घेण्याचा, उणे तापमानात बर्फात मनसोक्त भटकण्याचा व मुख्य म्हणजे त्या वेळेस दिसणाऱ्या 'नॉर्दन लाईट्सची' मजा लुटण्याचा योग डिसेंबर महिन्यात आला. हे दोन्ही विरोधाभास आयुष्यातील अनमोल ठेवाच मानावा लागेल.
दोन वर्षांपूर्वी मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी जून-जुलै महिन्यात आम्ही तीन ठिकाणं निवडली होती. सुरवातीला फिनिश लॅपलँडची राजधानी रोव्हेनिमीला आलो. सांताक्लॉजचं गाव येथून जवळ आहे. आणि मुख्य म्हणजे आर्क्टिक सर्कलची रेषा आपण येथे ओलांडतो. आम्ही रोव्हेनिमीत प्रवेश केला तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच बोर्ड होता की, आज सूर्य उगवणार नाही व मावळणारही नाही. क्षितिजावर कायम राहील. याचा प्रत्यय पुढील काही तासातच आला. लवकरच झोपलो व बाहेरच्या आरडा-ओरडीने जाग आली. बाहेर पाहिलं तर लख्ख उजेड होता. अरे! पहाट झाली की काय? घड्याळात रात्रीचे पावणेबारा झाले होते. कपडे करून, हॉटेलजवळच्या
मुख्य चौकात आलो. पर्यटक, स्थानिक नागरिक यांचे थवेच्या थवे इथे फिरत होते. आकाशात आपल्याकडे दुपारी बारा वाजता दिसावा तसा सूर्य तळपत होता. युरोपमध्ये अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत उजेड दिसतो. पण तिथे थोड्या वेळासाठी का होईना सूर्यास्त होतो व परत दोन-तीन तासात सूर्योदय होतो. आर्विटक सर्कलमध्ये साधारणतः २१ मे ते २१ जुलैपर्यंत सूर्य क्षितिजावर कायम असतो. हा २४ तासांचा उजेड पाहण्यासाठी साऱ्या जगातून पर्यटक येथे येतात. आणि वर्षातले जवळजवळ पाच-सहा महिने अंधारात घालवलेल्या स्थानिक लोकांचा तर तो आनंदोत्सव असतो.
मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वात मोठी गर्दी उसळते ती नॉर्वेच्या अगदी उत्तरेला 'नॉर्थ केप' येथे. हे युरोपचं उत्तरेकडील अखेरचं टोक.
इथून उत्तर ध्रुव जेमतेम १७०० ते १८०० कि.मी. अंतरावर आहे. नॉर्थ केपच्या मोगारोया बेटावरील हॅनिंग स्वंग गावात आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुपारी चारच्या सुमारास आलो, तेव्हाही कडाक्याची थंडी होती. नॉर्थ केपचं प्रतीक म्हणून येथे अगदी उंचावर पृथ्वीचा भव्य गोल उभारण्यात आला आहे. पण इथून मध्यरात्रीचे सूर्यदर्शन फार दुर्मीळ असते. आम्ही मध्यरात्री त्या गोलाच्या चबुतऱ्यावर उभे होतो. तेव्हा तापमान शून्य अंशावर आलं होतं. आणि सर्वत्र धुकंच धुकं. त्यामुळे तिथून सूर्यदर्शन होऊ शकलं नाही. पण युरोपच्या अखेरच्या सीमेवर पाय ठेवल्याचा आनंद निश्चित मिळाला.
आर्किटक सर्कलमधून रात्रीचं सूर्यदर्शन घेण्याची आणखी एक संधी आम्हाला मिळणार होती. ट्रॉम्स प्रांतातील नार्विक येथे त्यासाठी मुद्दाम संध्याकाळच्या वेळेस गेलो. दुसऱ्या महायुद्धात नार्विक अक्षरशः बेचिराख झालं होतं. पण नंतरच्या काळात त्याची संपूर्ण पुनर्बाधणी करण्यात आली. गावात एक उंच टेकडी असून, त्यावर जाण्यासाठी गोंडोलाची सोय आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेकडीवर गेलो. सर्वत्र हीऽऽ गर्दी होती. आणि तिथून सूर्यनारायणाचं जे दर्शन घडलं, ते डोळ्यात किती साठवू असं होऊन गेलं. क्षितिजावर सूर्य तळपत होता आणि त्यातून तांबड्या, किरमिजी रंगांची नुसती उधळण होत होती. सूर्याची प्रखरताही खूपच जाणवत होती.
मध्यरात्रीचा सूर्य आणि चोवीस तासांचा उजेड बघितल्यानंतर, आता वेध लागले होते ते याच आर्किटक सर्कलमध्ये हिवाळ्यात चोवीस तासांचा अंधार असतो त्याचा अनुभव घेण्याचे. त्याचबरोबर 'ऑरोरा बोरिअॅलिस' किंवा 'नॉर्दन लाइट्स' हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्याचे. तो योग २०११ च्या डिसेंबर महिन्यातच जुळून आला.
चोवीस तासांचा अंधार व नॉर्दन लाइट्स, यासाठी दोन महत्वाची शहरं व त्यांच्या आजूबाजूचा परिसर आम्ही फिरणार होतो. रोव्हेनिमी व नॉर्वेच्या उत्तरेला असलेलं ट्रॉमसो. रशियाच्या मगरमिठीतून १९९१ मध्ये सुटका झालेल्या लॅटव्हिया या राष्ट्राची राजधानी रीगा इथून छोट्या विमानाने आम्ही रोव्हेनिमीला निघालो. उणे १५० सें. तापमान आणि सर्वत्र बर्फच बर्फ होतं. छातीत अक्षरशः धडकी भरली. कारण छोटे विमान असल्याने हातातील बॅगाही अखेरच्या क्षणी काढून घेण्यात आल्या होत्या व थंडीला तोंड देणारी सारी 'आयुधे' त्या बॅगेत होती. पाच मिनिटांसाठी का होईना पण केवळ स्वेटर व हातमोज्यांच्या साह्याने उणे १५० सें.शी सामना करायचा होता. पण वेळ निभाऊन नेली. रोव्हेनिमी शहर मात्र पूर्णपणे बर्फाच्छादित दिसत होतं. दोन वर्षांपूर्वी पाहिलेलं रोव्हेनिमी आज ओळखूही येत नव्हतं. ठिकठिकाणच्या ख्रिसमस ट्रीजवर ताजा स्नो पडल्याने त्याच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाळी आली होती.
रोव्हेनिमीला थोड्या वेळासाठी सूर्य क्षितिजावर येतो. त्या दिवशी सूर्योदय सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी तर सूर्यास्त दुपारी एक वाजून २१ मिनिटांनी असल्याचं सांगण्यात आलं. सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलबाहेर आलो तेव्हा संधिप्रकाश डोकावू लागला होता. रस्त्यांवर भुसभुशीत स्नो पडत असला, तर त्यावरून चालणं फारसं कठीण जात नाही. पण स्नो पडून गेल्या नंतर तो रस्ता कमालीचा गुळगुळीत होतो. त्यावरून चालणं महाकठीण. स्थानिक नागरिकांना त्याची सवय झालेली असते. वृद्ध लोक दोन अणकुचीदार काठ्या हातात घेऊन चालतात. नवीन पर्यटक दिवसातून एक-दोनदा तरी रस्त्यावर साष्टांग नमस्कार घालतातच...
रोव्हेनिमीच्या जवळ असलेल्या सांताक्लॉज गावातून आर्किटक सर्कलची रेषा आम्ही दुपारी बाराच्या सुमारास ओलांडली. तेव्हा थोडा उजेड होता. पण सर्वत्र दिवे लावावेच लागत होते. एकूण सारं वातावरण कमालीचं कुंद होतं. दुपारी दीड-दोननंतर प्रकाश कमी कमी होत गेला. आणि तीनच्या सुमारास आपल्याकडचे रात्रीचे आठ-नऊ वाजले आहेत असं वाटत होतं. त्या लोकांना सूर्यप्रकाशाचं महत्त्व का वाटतं याचा प्रत्यय क्षणाक्षणाला येत होता.
आता मुख्य आकर्षण होतं ते नॉर्दन लाइट्स पाहण्याचं. त्यासाठी उत्तर नॉर्वेतील 'ट्रॉमसो' शहरात आलो. उत्तर नॉर्वेचं क्षेत्रफळ १,१३,००० चौ.कि.मी. आहे. म्हणजे आकाराने उ. नॉर्वे व इंग्लंड हे जवळजवळ सारखे आहेत. फरक एवढाच, की इंग्लंडची लोकसंख्या आहे ५१ दशलक्ष व उ. नॉर्वेची जेमतेम
साडेचार लाख म्हणजे एका चौ.कि.मी. मागे चार नागरिक राहतात. येथील शहरं व खेडी यांच्यात प्रचंड अंतर आहे. जेमतेम साठ हजार लोकवस्तीचं ट्रॉमसो म्हणजे आर्विटकचं प्रवेशद्वार म्हणूनच ओळखलं जातं. उत्तर ध्रुवापासून अवघ्या दोन हजार कि.मी. अंतरावर असलेल्या या शहरात वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळ्यात मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी गर्दी होते आणि हिवाळ्यात नॉर्दन लाइट्सचा चमत्कार अनुभवण्याकरता.
ट्रॉमसोला २१ नोव्हेंबर ते २१ जानेवारी या दोन महिन्यात सूर्य क्षितिजावर येत नाही. त्यामुळे दिवसभर अंधाराचंच साम्राज्य असतं. मात्र सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत सूर्य क्षितिजाच्या जवळ असतो. त्यामुळे संधिप्रकाश जाणवतो. दुपारी एक-दोन नंतर मात्र सारा परिसर अंधारात बुडून जातो आणि मग हिवाळ्यातील विविध अॅक्टिव्हिटिजना सुरुवात होते.
दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात आमचा संध्याकाळपासूनचा मुख्य कार्यक्रम होता, नॉर्दन लाईट्सचा शोध घ्यायचा. त्याला 'नॉर्दन लाइट्स हंटिंग' असं म्हणतात. आमचा येथील स्थानिक गाइड हा प्रोफेशनल फोटोग्राफर होता. त्यामुळे पहिल्या दिवशी संध्याकाळी त्याने आम्हाला त्याच्या स्टुडिओमध्ये नेऊन नॉर्दन लाईट्सची चित्रं त्याच्या लॅपटॉपवर दाखवली व त्याची शास्त्रीय माहिती दिली.
नॉर्दन लाइट्स म्हणजे काय? तर सूर्यावर एकसारखे स्फोट होत असतात. त्यांच्यातून निरनिराळे पदार्थ बाहेर पडतात. दोन्ही ध्रुवांवर मॅग्नेटिक फोर्स जास्त असल्यामुळे त्या पदार्थातील पार्टीकल्स त्या मॅग्नेटिक फोर्समुळे पकडले जाऊन हे रंग दिसतात. अर्थात वर्षाचे बाराही महिने स्फोट होतच असतात. पण उन्हाळ्यात चोवीस तास उजेड असतो. अंधार नसतोच. त्यामुळे आकाशातील ही रंगउधळण दिसू शकत नाही. हिवाळ्यात संपूर्ण अंधार असला व आकाश पूर्णतः स्वच्छ असलं की, हा चमत्कार दिसू शकतो.
अर्थात हिवाळ्यातही ते रंग रोज दिसतीलच असं नाही. त्यासाठी बराच वेळ थांबायची तयारी जबरदस्त सहनशीलतेची गरज असते. कधीकधी पंधरा-वीस दिवसांची प्रतीक्षा करूनही त्यांचं दर्शन होत नाही. ते कोठे आणि कसं पहायचं याचंही शास्त्र आहे. हे नियम पाळले व मुख्य म्हणजे नशीबाची साथ असली तर रंगांची ही उधळण दिसते. आम्ही त्या बाबतीत कमालीचे नशीबवान ठरलो.
स्थानिक गाइडच्या स्टुडिओमध्ये माहिती घेण्याचा कार्यक्रम संपला तेव्हा संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते. बाहेरचं तापमान होतं उणे १० सें.
"आपण ट्रॉमसोपासून आगखी दूर तमॉक कँपमध्ये जाणार आहोत. त्यामुळे तापमानात आणखी घट होईल. या दृष्टीने काळजी घ्या." आमच्या गाइडने सर्वांना सूचित केलं. अर्थात त्या दृष्टीने आम्ही सज्ज होतोच.
नॉर्दन लाइट्स दिसण्यासाठी मिट्ट अंधार आणि अगदी स्वच्छ आकाश हवं असतंच पण हवामानही बरंच दिवस स्थिर असणं जरूरीचं असतं. त्यामुळेच ट्रॉमसो शहराच्या सीमेपासून दूरवर अगदी भित्र हवामानाच्या जागेची निवड करण्यात आली होती. आमची मोटार त्या दिशेने वेगाने पळत होती. दुसऱ्या मोटारीतून गाइडची पत्नी चहा, कॉफीचे थर्मास व केक-बिस्किट्स घेऊन येत होती. कारण लाइट्सच्या प्रतीक्षेत कडाक्याच्या थंडीत किती वेळ घालवावा लागेल, याचा काहीच अंदाज नव्हता. साधारणतः पाऊण-एक तासाच्या प्रवासानंतर एका शांत जागी आमची मोटार थांबली. खाली उतरलो. तापमान उणे १२० सें. आणि सर्वत्र बर्फच बर्फ !
नॉर्दन लाइट्स कसे बघायचे याचंही तंत्र आहे. ते आकाशात इंद्रधनुष्याप्रमाणे उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत (हवामान खूपच अनुकूल असेल तर क्वचित ते उघड्या डोळ्यांनाही दिसू शकतात.) त्यांचं दर्शन हे डिजिटल SLR कॅमेऱ्यामधूनच होतं. हे कॅमेरे लावण्यासाठी ट्रायपॉडची जरूरी असते. त्या दृष्टीने गाइडने तयारी ठेवली होती. चार-पाच ट्रायपॉडवर कॅमेरे लावले आणि आकाशाकडे पाहत आमची प्रतिक्षा सुरू झाली. सुदैवाने आकाश पूर्णतः निरभ्र होतं. ढग अजिबातच नव्हते आणि आकाशात बारीकसारीक असंख्य चांदण्या लकाकत होत्या. लाइट्स दिसण्यासाठी हे वातावरण अनुकुल असल्याचं गाइडने सांगितलं. अर्थात याचा अर्थ लाइट्स दिसतीलच असे नाही, अशी पुस्तीही त्याने जोडली.
आकाशात काही हालचाली सुरू होत्या. मधूनच एखादा अंधुकसा पट्टा दिसे. एकदम तो अस्पष्ट होत जाई. अर्ध्या-पाऊण तासानंतर, आधीचा तो पट्टा थोडा स्पष्ट झाला. कॅमेऱ्यातून पाहिलं. तो हिरवा पट्टा होता. नॉर्दन लाइट्सचं दर्शन घडलं, पण समाधान मात्र झालं नाही. म्हणून तास-दीड तासानंतर आम्ही जागा बदलण्याचं ठरवलं. आणखी वरती १५-२० कि.मी. अंतरावर गेलो. पुन्हा कॅमेरे आणि डोळे आकाशाकडे लावले.....
यावेळी मात्र आकाशातील हालचाली वाढलेल्या दिसल्या. भले मोठे लांब पट्टे तयार झाले. कधी आडवे.... कधी उभे.... वेडेवाकडे... कॅमेऱ्यातून पाहिलं आणि त्या नजाऱ्यावर अक्षरशः विश्वासच बसत नव्हता. आपण एखादा सिनेमा पाहतोय की काय? असाच भास होत होता. आकाशात हिरव्या
कराड नगरपालिका नगरवाचनालय
कराड़, जि. सातारा
रंगाची प्रचंड उधळण दिसत होती. मधूनच थोडे तांबडे रंग.... अक्षरशः नाचत होते. आम्ही त्या पार्श्वभूमीवर आमचे फोटो काढून घेतले. आणि मग कितीतरी वेळ त्या अद्भुत चमत्काराची मजा डोळे भरभरून पाहत राहिलो. कधी-कधी आकाश हिरव्या रंगाने भरून जाई. जणू हिरव्या रंगाचे भुईनळे उडत आहेत..... कॅमेऱ्यासमोरून हलावसंच वाटत नव्हतं. थंडी साफ पळाली होती. गाइडच्या पत्नीने गरमागरम कॉफी काढली. बरोबरचा केक खाऊन आम्ही नॉर्दन लाइट्स दिसल्याचा आनंदोत्सव साजरा केला.
रात्रीचे बारा वाजून गेले होते. आम्ही परत यायला निघालो. जवळच्याच एका गावातून जात असताना, खिडकीतून बाहेर पाहिलं तर सारं आकाश रंगांनी भरून गेलं होतं. खाली उतरलो. कॅमेऱ्यातून जे दृश्य पाहिलं, तो अद्भुत चमत्कार कसा वर्णावा? शाईची दौत भल्यामोठ्या कागदावर लवंडली तर शाई साऱ्या कागदभर जशी वेडीवाकडी पसरते, तसा हिरवा, किरमिजी रंग वरती-खालती, उभा-आडवा पसरला होता..... ते दृश्य अप्रतिम होतं. रंग मधूनच कमी व्हायचे तर कधी लांबवर पसरायचे.... त्यांचा अक्षरशः नाच सुरू होता. अत्यंत दुर्मीळ असं हे चित्र होतं. आम्ही खरोखरच भाग्यवान ठरलो होतो. नॉर्दन लाइट्स जमिनीपासून सुमारे १०० पेक्षा अधिक कि.मी. अंतरावर असतात. मात्र SLR कॅमेऱ्यातून रंगांचा हा नाच आपल्यासमोरच सुरू असल्यासारखं वाटतं.
नॉर्दन लाइट्स उत्तर नॉर्वेबरोबर, अलास्का, आइसलँड, स्वित्झर्लंड, फिनलँड, रशिया इथूनही काही वेळेस दिसतात. जपान किंवा अमेरिकेच्या काही भागातूनही ते क्वचित दिसल्याचं सांगण्यात आलं. पण उ. नॉर्वेतून ते अधिक स्पष्ट व दीर्घकाळ दिसू शकतात. नॉर्दन लाइट्सना जगाच्या विविध भागात निरनिराळ्या नावांनीही ओळखलं जातं. उत्तरेकडे 'ऑरोरा बोरिअॅलिस' तर दक्षिण ध्रुवावर 'ऑरोरा ऑस्ट्रेलिस' म्हणून संबोधलं जातं. नॉर्दन लाइट्सचं भौगोलिक कारण सर्वज्ञात असलं तरी त्याबद्दल अनेक देशात निरनिराळ्या समजुतीही आहेत. आकाशात रंगांची बरसात दिसणं हे अशुभ लक्षण आहे असं बराचसा अशिक्षित समाज आजही मानतो. आकाशातल्या अशा विचित्र घटनेमुळे आपत्ती कोसळणार, पीक चांगले येणार नाही अशा त्यांच्या कल्पना असतात.
मात्र नॉर्दन लाइट्सवर मोठ्या प्रमाणात संशोधनही सुरू आहे. ट्रॉमसो विद्यापीठात त्यासाठी स्वतंत्र विभाग असून जगभरातील शास्त्रज्ञ तेथे अभ्यासासाठी येत असतात. पर्यटनप्रेमींनी मध्यरात्रीचा सूर्य किंवा चोवीस तासांचा अंधार व
नॉर्दन लाइट्सचा चमत्कार पाहण्यासाठी आयुष्यात निदान एकदा तरी स्कॅन्डेनेव्हियाची सफर केलीच पाहिजे. हे दोनही विरोधाभास तुम्ही अनुभवू शकलात तर सोन्याहून पिवळं !
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
फिनलँड
नॉर्वे
या देशाचा एकचतुर्थांश भाग
खंड : युरोप
आर्क्टिक सर्कलमध्ये येतो.
राजधानी : ओस्लो
राजधानी : हेलसिंकी
क्षेत्रफळ : ३,२४, २२० चौ.कि.मी.
क्षेत्रफळ : ३,३६,५९३ चौ.कि.मी.
लोकसंख्या : सुमारे
लोकसंख्या : सुमारे ५२ लाख
४६,८१,१३४
चलन : युरो
चलन : नॉर्वेजिअन क्रोन (युरो)
भाषा : फिनिश, स्वीडिश
भाषा : नॉर्वेजियन
पर्यटनास इंग्रजी
पर्यटनास इंग्रजी
कधी जाल?
फिनलंडला किंवा नॉर्वेला जाण्यासाठी शेंजेन व्हिसा हवा. फिनलँडमधील मध्यरात्रीचा सूर्य पाहण्यासाठी २१ मे ते २१ जुलै व नॉर्दन लाइट्सकरता नोव्हेंबर ते फेब्रुवारी उत्तम सीझन आहे. त्यावेळी या भागात उणे १५० ते उणे ३०० सें. पर्यंत तापमान उतरतं. त्यामुळे चांगल्या माहितगारांकडून कपड्यांची व्यवस्था करून मगच जाणं अत्यंत आवश्यक आहे. तिथे जाईपर्यंत तिथल्या उणे तापमानाची कल्पना येत नाही व जिवावर बेतू शकतं. पण थंडीला तोंड देण्याची पुरेशी तरतूद असेल तर मात्र मस्त मजा येते. कठीण बर्फावरून चालताना व्यवस्थित काळजी घेणं जरूरीचं आहे. ही सहल आपली आपण आखूनही जाता येतं.
सुरक्षितता :
शंभर टक्के सुरक्षित.
[26/05, 4:52 pm] Swapnil Jirage: आठ हजार
वर्षांपूर्वीचं मूळ असलेली
'सामी' जमात
स्कँ डेनेव्हियातील विविध देशांना भेट देण्याचा योग आत्तापर्यंत तीन-चार वेळा आला. त्या देशांचा इतिहास, संस्कृती याबाबत वाचताना तेथील सर्वात जुन्या सामी जमातीचा उल्लेख बऱ्याचदा येतो. तिथे हिवाळ्यात जवळजवळ सहा महिने, उणे ५०० सें. तापमानात जीव घेणारी थंडी आणि २४ तासांचा अंधार असतो. राहिलेल्या सहा महिन्यात चोवीस तासांचं सूर्यदर्शन अशा टोकाच्या हवामानात शतकानुशतकं टिकून राहिलेल्या व आजही आपली वैशिष्ट्यं, चालीरिती जपणाऱ्या या जमातीबद्दल, पहिल्या भेटीपासून मोठी उत्सुकता व कुतूहल वाटत होतं. सुदैवाने तेथील मुक्कामात एक-दोन वेळा या जमातीत राहण्याची, मिसळण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामुळे त्यांची जीवनपद्धती, कुटुंबव्यवस्था, उद्योगधंदा याबाबत परिचय झाला.
सामी जमातीचं मूळ आठ हजार वर्षांपर्यंत जातं. आज त्यांच्या जमातीचे केवळ ८० ते ८५ हजार लोक राहिले असून ते प्रामुख्याने नॉर्वे, फिनलँड व रशियात विखुरले आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ चाळीस हजार सामी, नॉर्वेमध्ये आढळतात. उत्तर नॉर्वेतील करासजोक खेड्यात त्यांचं स्वतंत्र पार्लमेंट आहे. सामी जमातीच्या स्त्री-पुरुषांना मतदानाचे दोन अधिकार असतात. एक राष्ट्राच्या संसदेचा प्रतिनिधी निवडण्याचा आणि दुसरा सामी पार्लमेंटमध्ये प्रतिनिधी पाठवण्याचा. सामी जमातीची संस्कृती, वैशिष्ट्यं, कायम
राहावीत म्हणून या पार्लमेंटची स्थापना झाली होती. जमातीमधील विविध प्रश्न सोडवणं, तसंच सामींच्या समस्या राष्ट्रीय संसदेपुढे मांडणं हे काम पार्लमेंट करतं. सामी जमातीचा स्वतंत्र ध्वज आहे. तांबडा, निळा, पिवळा व हिरव्या रंगाच्या या झेंड्याला एक चक्र असतं. तांबडा रंग सूर्याचं तर निळा चंद्राचं प्रतीक मानण्यात येतं. सामी जमातीच्या पारंपरिक कपड्यांवर जे भरतकाम केलं जातं, त्यातही प्रामुख्याने याच रंगांचा वापर केला जातो.
सामी ही प्रामुख्याने भटकी जमात म्हणून ओळखली जाते. रेडियरचे कळप घेऊन हिवाळ्यात जागा बदलत फिरायचं. अशा प्रकारची त्यांची जीवनशैली आहे. प्रत्येक सामी कुटुंबाच्या मालकीचे रेंडियर्स असतात. एखाद्याकडे किती रेंडियर आहेत, यावरून त्याची श्रीमंती कळते. पण 'तुझा पगार किती?, तुझ्याकडे किती पैसे आहेत?' असा प्रश्न दुसऱ्याला विचारणं हे जसं असंस्कृत मानलं जातं, त्याचप्रमाणे 'तुझ्याकडे किती रॅडियर आहेत?' असं त्या समाजात एकमेकांना कधीही विचारलं जात नाही. मात्र निरनिराळ्या भागात किती रेंडियर्स असावेत, याचे नियम सरकारनेच घालून दिले आहेत. उदा. नॉर्वेमधील लॅपलँड प्रदेशात एक लाख रेंडियर बाळगण्याची परवानगी आहे.
बर्फाळ प्रदेशात रेंडियर म्हणजे वाळवंटातला उंट, आणि सामी जमातीचा शतकानुशतकांचा जीवनसोबती. निरनिराळ्या मोसमात रेंडियरचे निरनिराळे उपयोग आहेत. कडाक्याच्या थंडीत, बर्फाळ प्रदेशात, फार पूर्वीपासून वाहतुकीसाठी रेंडियरच्या गाडीचा वापर केला जातो. एका मर्यादेपर्यंत ते घोड्यापेक्षाही अधिक चपळ असतात. रेंडियरची शिंगं फार डौलदार व आकर्षक असतात. शिंगांपासून बनवलेली औषधं, माणसाची ठिसूळ हाडं मजबूत करण्यासाठी उपयोगी पडतात, असं चीनमध्ये मानण्यात येतं. त्याचे वैद्यकीय उपयोगही बरेच आहेत. रेंडियरची लोकर फार उबदार असते. त्यामुळे या लोकरीपासून बनवलेल्या कोटांना सर्व जगातून प्रचंड मागणी असते. साधारणतः हिवाळ्याच्या अखेरीस त्यांच्या अंगावरील लोकर कापण्यात येते. पण त्यामुळे उन्हाळ्यात रेडियर्सना डासांपासून फार त्रास होतो. या काळात ते गवत खातात. रेडियरचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा मालक त्यांचा विमा उतरवतो. अपघातात रेंडियर मारला गेला तर दंडाची रक्कम भरताना वाहन चालकाला अक्षरशः नाकीनऊ येतात.
या भागात रेडियरचं मांस फार लोकप्रिय आहे. 'रंडियर मीट'ची चव एकदा घेतली की, रोज त्यावर ताव मारावासा वाटला नाही तर आश्चर्य. त्यात प्रचंड चरबी असते. मला रेडियरचं गरमागरम सूप म्हणजे उणे तापमानात अक्षरशः मेजवानी वाटली. सहा महिन्यांच्या रेडियर बच्च्याचं मांस फार चविष्ट
मानलं जातं. सामी जमातीच्या एका खास रेस्टॉरंटमध्ये मुद्दाम जेवण्यास गेलो. मेनू होता - 'रेडियर मीट विथ मॅश पोटॅटो', सॅमेन फिश व सोबत वाइन.
रेडियरची नजर कमजोर पण कान व घ्राणेंद्रियं फार तीक्ष्ण असतात. बर्फाळ प्रदेशात चालताना कोठे दरी आहे, कोठे अन्य धोका संभवतो, हे त्यांना बरोबर समजतं. त्यांचं आयुष्य पंधरा ते वीस वर्षे असतं. पण आयुष्यभर सतत खूप चालल्याने त्यांना गुडघ्याचा रोग होतो. अशा रेंडियर्सना मारून त्याचा मालक व कुटुंबीय त्याचं मांस खातात.
सामी ही अत्यंत कष्टाळू व धाडसी अशी जमात आहे. हिवाळ्यात तर त्यांचं जीवन म्हणजे मृत्यूशी रोजचा सामना असतो. बर्फाळ डोंगरातून, हाडं गोठवणाऱ्या थंडीत भटकताना, हिमवर्षाव, बर्फाचे कडे कोसळून काय आपत्ती ओढवेल याचा भरवसाच नसतो. आजकाल अनेक सामी पुरुष आपल्या बायका, मुलांना एकाच ठिकाणी ठेवून आपली भटकंती चालू ठेवतात. प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतं. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलं की, सामी माणूस आपली झोपडी अक्षरशः पाच मिनिटांत उभारतो. त्याच्या मध्यभागी लाकडाची शेकोटी तयार केली जाते व त्याचा धूर चिमणीतून बाहेर सोडला जातो.
उणे ५००-६०० सें. तापमानात त्यांची आंघोळ करण्याची पद्धत पाहिली आणि माझ्या अंगात रेंडियरचा कोट असूनही मला हुडहुडी भरली. हिवाळ्यातच ट्रॉमसो शहरापासून सुमारे शंभर कि.मी. अंतरावरील एका अगदी खेड्यात राहणाऱ्या सामी कुटुंबात आम्ही मुद्दाम गेलो होतो. सॅम हा तरुण कुटुंब प्रमुख त्याची पत्नी व दोन मुलांसमवेत तिथे राहत होता. तिथे तापमान होतं उणे ३०० सें. सॅमने आमचे स्वागत केलं आणि चटकन आपल्या उबदार झोपडीत नेलं. रेडियरचं गरमागरम सूप प्यायल्याने आता आमच्या अंगात मस्त उब आली होती. अर्थात त्यांच्या दृष्टीने उणे ३०० सें. ही फार प्रचंड थंडी म्हणता येणारी नाही. वर्षातले दोन-तीन महिने त्यांना उणे ५००, उणे ६०० सें. मध्ये नेहमीच काढावे लागतात.
थंडी थोडी कमी असल्याने सॅमने आंघोळीचा निर्णय घेतला होता. झोपडीच्या समोरूनच एक नदी वाहत होती. अर्थात त्यावेळी ती संपूर्ण गोठली होती आणि तिच्यावर चांगलं एक फुटाचं बर्फ साचलं होतं. सॅमने चाकूने ते बर्फ फोडायला सुरुवात केली. तो स्वतः आत शिरू शकेल एवढ्या परिघाचा बर्फ त्याने फोडला. त्याच्या खाली पाणी होतं. मग सॅमने कपडे काढले आणि केवळ एका छोट्या चड्डीनिशी त्याने त्या गोलातून आत उडी मारली. ते दृश्य मी
कधीच विसरू शकणार नाही. उणे तापमान, गोठलेली नदी आणि त्यात बुडी मारायची... ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, ते दृश्य मी डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहत होतो. त्या नदीत सॅमने तीन-चार डुबक्या मारल्या. त्याच्या मते गोठलेल्या नदीचं आतलं पाणी तेवढं थंड नसतं. पाण्यातून बाहेर आल्यानंतर मात्र परिस्थिती फार भयावह असते. अक्षरशः धावत सॅम झोपडीत शिरला व आतील फायरसमोर बसला. सामी स्त्रिया व मुलंही याच पद्धतीने आठवड्यातून एकदा-दोनदा आंघोळ करतात. कडाक्याच्या थंडीत शरीराची कातडी शुष्क (ड्राय) होते. त्यासाठी चरबी असलेल्या रेंडियरचं मांस शिजवून त्याचा 'फेस पॅक' तोंडाला लावला जातो.
रेडियरच्या कातड्याची अर्धी चड्डी व कमरेला चाकू हा सामी पुरुषांचा वेष तर स्त्रिया भरतकाम केलेला स्कर्ट घालतात. बायकांच्या कमरेला पट्टा असतो. ज्या स्त्रीच्या पट्ट्यावर गोल गोळे असतात ती अविवाहित व चौकोनी म्हणजे विवाहित असं समजायचं. अशीच पद्धत अमेरिकेतल्या हवाई बेटांवर पहायला मिळाली होती. हवाईन स्त्रीने डाव्या कानावर फूल ठेवलं आहे की उजव्या यावरून ती विवाहित किंवा अविवाहित आहे हे ओळखता येतं.
सर्वसाधारणतः आपल्याच जमातीमध्ये लग्न करण्यास सामी मुलं-मुली उत्सुक असतात. मात्र आपला साथीदार आपणच निवडणार असा त्यांचा आग्रह असतो. सामी जमातीमधील विवाहसोहळा महिना-महिना चालतो. सॅमने त्याच्या लग्नाची जी गोष्ट सांगितली ती मोठी मजेशीर होती. त्यावेळीही पाहुण्यांची उठबस चांगली महिनाभर आधी सुरू झाली. लग्नाला निदान हजार लोकांची उपस्थिती नेहमीच असते. सॅमच्या लग्नाच्या वेळी पन्नास रेंडियर्सचे मांस लागलं होतं. म्हणजे वस्तुतः सॅमला चांगला आर्थिक फटका बसला. पण या जमातीत नवविवाहित दांपत्याला भेट म्हणून रेंडियर देण्याची पद्धत आहे. सॅमला एकूण ५५ रेंडियर भेट म्हणून मिळाले. त्यामुळे लग्नात त्याचा खरंतर पाच रेडियरचा नफाच झाला. पण महिनाभर व्होडका मद्याचा मात्र अक्षरशः पूर वाहत होता. तो खर्च सॅमला करावा लागला. अर्थात लग्न किंवा अन्य कोणत्याही समारंभात पाहुणेमंडळी, सर्व कामं अगदी घरच्यासारखी करतात हे विशेष.
सामी स्त्रियांची सौंदर्यदृष्टी वाखाणण्यासारखी असते. निरनिराळ्या पद्धतीचे कपडे शिवण्यात व हस्तकलांमध्ये त्या पारंगत असतात. लहानपणापासूनच त्यांना ती कला शिकवली जाते. त्यामुळेच या समाजाची प्राचीन परंपरा मोठ्या प्रमाणात जपली गेली आहे. किनाऱ्याजवळ राहणारे सामी लोक हे फार
पूर्वीपासून बोटी बांधण्यात निष्णात मानण्यात येतात. एका सामी कुटुंबाच्या १२५ वर्षांच्या जुन्या घरात गेलो होतो. तेथील माहोल काही आगळा-वेगळाच होता. नानाविध जनावरांची मुंडकी व शेकडो प्राचीन हत्यारे ठिकठिकाणी टांगली होती.
सामी जमात कमालीची परंपराप्रिय आहे. जुन्या समजुती, चालीरीती आजही त्यांच्यात कायम आहेत. त्याचे काही विधी पाहण्याची संधी मिळाली.
सर्वजण झोपडीत गोलाकार बसले होते. तुमच्यातल्या शापित गोष्टी नाहीशा व्हाव्यात व तुमचं चांगलं व्हावं, यासाठी तो विधी होता. ज्येष्ठ सामी माणसाने बसलेल्या प्रत्येकाच्या कपाळावर भस्मासारखे पट्टे ओढले. मध्यभागी अग्नी पेटवण्यात आला. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणारं जसं भांडं असतं, तशी एक किटली त्या अग्नीवर टांगण्यात आली. त्या सामी माणसाचं मग मंत्रपठण सतत सुरू होतं. त्याने किटलीतील रेंडियरचं दूध प्रसाद म्हणून सर्वांना दिलं. मोठ्या धीरगंभीर वातावरणात तो समारंभ पार पडला.
अर्थात आता सामी जमातीमधील तरुण पिढी लॅपटॉप व नोबाईल संस्कृतीचाही अंगीकार करत आहे. जुन्या चालीरिती सांभाळून आधुनिकतेचं वारं त्यांच्यात वाहत आहे. रोव्हेनिमीत एका रेस्टॉरंटमध्ये वीस-पंचवीस वर्षांची सामी तरुणी भेटली. तिचं सौंदर्य खरोखरीच अप्रतिम होतं. तीन-चार वर्षांपूर्वी ती भारतात आली होती. सिनेअभिनेत्री बनण्याची तिची इच्छा आहे. भारतातील बॉलीवुड जगाबद्दल तिला बरंच आकर्षण होतं. पण मुंबई-दिल्लीतली प्रचंड गर्दी पाहून ती कमालीची घाबरून गेली व परत आली, असं तिने हसतहसत सांगितलं.
सामी जमातीला शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळते. वैद्यकीय विम्याचं संरक्षण हे त्यातीलच एक मोठं साहाय्य. सामी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस काहीही आजार झाला तर त्यांना सर्व उपचार जवळजवळ मोफत मिळतात. सॅम म्हणाला, 'आता रेडियर घेऊन डोंगराळ भागात फिरतानाची भीती थोडी कमी झाली आहे. कारण उंच डोंगरावर काही अपघात झाला तरी दहा मिनिटात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत उपलब्ध होते... फक्त जवळ मोबाईल हवाच...
थरकाप उडवणारा अनुभव :
गैरसमजातून बाका प्रसंग
स्कैंडेनेव्हियाची पंधरा-वीस दिवसांची सहल संपवून आम्ही अखेरच्या मुक्कामासाठी फिनलँडची राजधानी हेलसिंकीला आलो. याआधी हेलसिंकीला दोन वेळा येणं झालं होतं. त्यामुळे या काहीशा परिचित शहरात पुन्हा भटकावयास मजा आली. दुसऱ्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सीची वाट पाहत मी, जयंती व आणखी तीन भारतीय सहप्रवासी, हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलो होतो.
चारला पाच मिनिटं असताना, एक टॅक्सी पोर्चमध्ये थांबली. ड्रायव्हर लॉबीत आला व 'पाच प्रवासी, एअरपोर्टसाठी' असं म्हणाला. साहजिकच ती आमचीच टॅक्सी असणार... म्हणून आम्ही उठलो. ड्रायव्हरनेही आमचं सर्वांचं सामान गाडीच्या डिकीत ठेवलं आणि विमानतळाच्या दिशेनं निघालो.
या परतीच्या प्रवासाचं टॅक्सीभाडं आम्ही आधीच सहलकंपनीकडे भरलं होतं व त्याची रिसीटही आमच्याकडे होती. वीस-पंचवीस मिनिटांत टॅक्सी विमानतळावर पोहोचली. ड्रायव्हरने सामान बाहेर काढलं व ट्रॉलीवर चढवलं सुद्धा. आता आम्ही निघणार, इतक्यात तो म्हणाला, 'टॅक्सीचे ८० युरो झाले.' आम्ही थोडे आश्चर्यचकित झालो. टॅक्सीचं भाडं आधीच भरलं आहे व ही त्याची रिसीट असं मी त्याला सांगितलं. त्याबरोबर त्याचं सारं रंगरूपच पालटलं. त्याला नीट इंग्रजी बोलता येत नव्हतं. पण 'चिटिंग, चिटिंग... पोलीस, पोलीस' असं तो ओरडू लागला. आजूबाजूचे अन्य प्रवासीही आमच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. आम्हाला तिथेच थांबायला सांगून तो 'पोलीस, पोलीस' असं ओरडत विमानतळाच्या दिशेने धावला.
आमच्यातील महिला चांगल्याच घाबरल्या. दाखवत नसलो तरी मनातून मीही हबकलोच होतो. समजा इथेही पोलीस व तो ड्रायव्हर एक झाले व आमच्याकडून पैसे काढण्यासाठी त्यांनी आम्हाला अडकवून ठेवले तर... काय करायचं? विमान सुटण्याची वेळही जवळ आली होती. नाना प्रश्न डोक्यात आले... प्रसंग मोठा बाका होता. इतक्यात तो ड्रायव्हर दोन पोलिसांना घेऊन आला. चांगले सहा-सव्वा सहा फूट उंचीचे, कमरेला दोन्ही बाजूंना पिस्तुलं लटकवलेले, धिप्पाड पोलीस पाहून सर्वांच्याच छातीत धडकी भरली...
सुदैवाने त्या पोलिसांना इंग्रजी येत होतं. मी त्यांना झाला प्रकार सांगितला. माझ्याजवळची रिसीटही दाखवली. त्यावर त्या स्थानिक कंपनीचे टेलिफोन नंबर होते. 'आम्ही फोन करून पाच मिनिटांत येतो' असं पोलिसांनी सांगितलं. आता काय होणार? महिला म्हणाल्या, '८० युरो देऊन टाकले असते तर बरं झालं असतं. त्यांनी चौकशीसाठी थांबवून ठेवलं तर काय करायचं? इतक्यात ते दोन पोलीस आले. पण यावेळी त्यांच्याबरोबर ड्रायव्हर नव्हता.
माझ्या हातात रिसीट परत देत दोघांपैकी एक पोलीस म्हणाला, "थोडा गैरसमज झाला आहे. ही टॅक्सी तुमची नव्हती. पण तुम्ही पैसे भरलेली कंपनी या ड्रायव्हरला पैसे देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याला परत पैसे देण्याचा प्रश्न नाही. या झाल्या प्रकारात तुमचा जो खोळंबा झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत." नंतर किमान दोन वेळा 'सॉरी, सॉरी' म्हणून त्यांनी आमचा निरोप घेतला... वस्तुतः चूक आमची होती. टॅक्सीत बसण्यापूर्वी आम्ही खात्री करून घ्यायला हवी होती. पण त्या पोलिसांची कार्यतत्परता व नम्रता कायमची लक्षात राहिली.
हिरवंगार 'लॅटव्हिया'
लॅ टव्हिया हे रशियाच्या मगरमिठीतून १९९१ मध्ये सुटलेलं अगदी छोटं राष्ट्र. दौगावा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देशाला तेराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. रीगा ही त्याची राजधानी. विशेष म्हणजे हिटलरचं हे अत्यंत आवडतं शहर होतं. त्यामुळेच या शहरावर दुसऱ्या महायुद्धात एकदाही बाँबहल्ला झाला नाही, असं मानण्यात येतं. लॅटव्हियाला स्वातंत्र्य मिळून वीस वर्षं उलटली. आधुनिकतेचे वारे वाहू लागले. त्याची चांगली फळे किती आणि दुष्परिणाम किती? रीगाच्या मुक्कामात या राष्ट्राचा थोडा परिचय करून घेता आला.
विमानातून रीगाचं जे पहिलं दर्शन झालं ते मोठं नयनरम्य होतं. हिरवंगार रीगा डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत जणू दुलईत पहुडलं होतं. दुपारी दोन-अडीच वाजताच सर्वत्र अंधार पसरू लागला होता. दिवेलागण केव्हाच होऊन, तापमानही शून्य अंशावर उतरलं होतं. याआधी हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया या पूर्वीच्या कम्युनिस्ट राष्ट्रांना भेटी दिल्या होत्या. कम्युनिस्ट राजवटीची मुख्य खूण म्हणजे ठिकठिकाणी दिसणाऱ्या राखाडी रंगांच्या 'मॅच बॉक्सेस' इमारती. पण रीगामध्ये त्या कुठेच दिसत नव्हत्या. इथेही थोड्या दूर अंतरावर तशी काही राखाडी खुराडी आजही असल्याचं नंतर कळलं. पण रीगाचा मध्यवर्ती ऑपेरा चौक हा पश्चिम युरोपातील एखाद्या सुंदर शहराचीच आठवण
91132-
करून देत होता.
लॅटव्हिया हे खरोखरच अगदी छोटं राष्ट्र. त्याचं एकूण क्षेत्रफळ ६४,५८९ चौ.कि.मी. आणि लोकसंख्या २.२४ दशलक्ष. कम्युनिस्ट राजवटीला रामराम ठोकल्यानंतर आता तिथे लोकशाही बऱ्याचशा प्रमाणात स्थिरावली आहे. हा देश युरोपियन युनियनचा सदस्य असून तेथील लॅटव्हियन चलन युरोच्या तुलनेत चांगलंच मजबूत आहे. एक युरो म्हणजे जवळजवळ ०.७० ते ०.७५ लॅटव्हियन पैसे. पण आज प्रत्यक्षात तेथील अर्थव्यवस्था काही फारशा चांगल्या अवस्थेत नाही. हे गणित कसं काय याचा उलगडा अनेक स्थानिक व्यक्तींशी बोलूनही होऊ शकला नाही.
लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर प्रगतीची काही पावलं निश्चितपणे टाकण्यात आली. लाकूड व धातू ही येथील मुख्य उत्पादनं. मोठ्या बोटी बांधणं, फर्निचर व धातूची निर्यात बऱ्याच प्रमाणात होते, पण त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी अद्याप रूळावर आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत व त्या तुलनेत लोकांचे उत्पन्न खूपच कमी आहे. उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसवताना सर्वांच्याच नाकीनऊ येतात. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विषय काढला की, सर्वसामान्य माणूस अत्यंत पोटतिडकीने बोलतो आणि सत्ताधाऱ्यांवर शिव्यांची लाखोली वाहतो. आमची स्थानिक गाइड लुसीही याला अपवाद नव्हती. माझ्यासारख्या चार दिवसाच्या पाव्हण्याकडेही तिने दिलखुलासपणे आपलं मतप्रदर्शन केलं. अर्थात हा लोकशाहीचा मोठा विजय मानावा लागेल.
या सर्वाचा परिणाम म्हणजे लॅटव्हियातील तरुण वर्ग देश सोडून नोकरीधंद्यासाठी अन्य युरोपियन देशात मोठ्या प्रमाणात जात आहे. लॅटव्हिया युरोपियन संघाचा सदस्य असल्याने त्यांना ते सहज शक्य होतं. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे विशेष. पश्चिम युरोपियन जीवन पद्धतीचं आर्कषण तर आहेच आणि त्यात आता तुलनेने जास्त मिळणाऱ्या पैशाची भर पडली आहे.
गंभीर आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने विविध उपाय योजिले आहेत. खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येत आहे. त्याची काही फळं दृष्टोत्पत्तीस आली असून आज परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येतो. लोकशाहीच्या या प्रयोगावर तरुण वर्ग खूष असला तरी वयाची सत्तरी ओलांडलेल्या बहुतांश वृद्धांना मात्र पूर्वीची कम्युनिस्ट राजवटच चांगली असं वाटतं. कारण त्यावेळी आजच्यासारखी स्पर्धा नव्हती.
-SETT
मर्यादित जीवनावश्यक वस्तू, फारसे कष्ट न करता, विनासायास मिळत होत्या. भुरळ पाडणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीची ओळखच नसल्याने तिचा मोहही होत नसे. त्यांच्या मते लोकशाहीतील आजची स्पर्धा जीवघेणी आहे. अर्थात आता या नवीन राजवटीशी जुळवून घेण्याखेरीज त्यांच्या पुढे काहीच पर्याय राहिलेला नाही.
लॅटव्हियाचे आर्थिक चित्र सध्या तरी खूप उत्साहवर्धक नसलं, तरी त्याचा इतिहास, संस्कृती, परंपरा या गोष्टींमध्ये मात्र हा देश संपन्न आहे. लॅटव्हियाची राजधानी रीगा या शहराला तेराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. रीगाच्या 'ओल्ड टाऊन'मध्ये फिरताना याची प्रचीती ठायी ठायी येते. येथील अगदी प्राचीन चार हजारांवर इमारती म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. १९व्या शतकातील लाकडाच्या इमारती आजही जशाच्या तशा उभ्या आहेत. त्यावरील कोरीव काम व त्यांची भव्यता डोळे दिपवून टाकते. त्यामुळेच युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून त्यांची घोषणा केली आहे.
लॅटव्हियाने अनेक स्वातंत्र्ययुद्धं पाहिली, अनुभवली. त्यामुळे येथील मध्यवर्ती चौकातील 'फ्रीडम मॉन्युमेंट' खरोखरच पाहण्यासारखं आहे. संपूर्णपणे दगड व धातूचं हे स्मारक १९३५ मध्ये लोकांच्या वर्गणीतून उभं राहिलं आहे. १९१८ ते २० या कालावधीत स्वातंत्र्यासाठी ज्या लॅटव्हियन लोकांनी जीवाचं बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ ते सुरुवातीला बांधण्यात आलं. मग निरनिराळ्या स्वातंत्र्याच्या चळवळींच्यावेळी स्मारकाची नावं बदलण्यात आली. आज १९९१ मध्ये रशियाच्या तावडीतून सुटका झाल्याचे स्मारक म्हणून ते प्रामुख्याने ओळखलं जातं.
रीगाच्या ओल्ड टाऊनमधील प्रसिद्ध 'कॉबल्ड स्टोन' रस्ते पाचव्या शतकात बांधले आहेत. 'कॉबल्ड स्टोन किडस' म्हणूनच स्थानिक लोक त्यांचा परिचय करून देतात. आजही त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चालताना त्या शहराच्या पूर्वस्मृती जागृत होतात. स्वातंत्र्य स्मारकाच्या जवळच एका स्तंभावर घड्याळ आहे. हे 'लायमा क्लॉक' १९२४ मध्ये उभारण्यात आलं होतं. १९३० मध्ये रीगा येथील एक बेकरी फार लोकप्रिय होती. त्यातील पदार्थ खाण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. त्या बेकरीचा लोगो या घड्याळावर आहे. शहरातील लोकांच्या भेटण्याचं अत्यंत लोकप्रिय ठिकाण म्हणून लायमा क्लॉक आज परिचित आहे.
रीगाच्या भेटीत एका गोष्टीचं कुतूहल होतं. कम्युनिस्टांच्या तावडीतून हे राष्ट्र आता स्टलं असलं तरी त्या राजवटीच्या काही महत्त्वाच्या खुणा अद्याप
शिल्लक आहेत का? लेनिन, स्टालिनचे पुतळे आजही पाहायला मिळतात का? पण लुसीने याबाबतचा स्पष्ट खुलासा केला. "एके काळी आमच्यावर कम्युनिस्टांची राजवट होती, हे खरं, पण ते मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांच्या दडपशाहीच्या कोणत्याही खाणाखुणा आता दिसू नयेत म्हणून नवीन सरकार तर दक्ष आहेच; पण सर्वसामान्य जनतेचीही तीच तीव्र इच्छा आहे. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेला लेनिनचा पुतळा, स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर म्हणजे १९९१ मध्येच तिथून उचलण्यात आला आणि आता रीगा पार्कर्स अँड गार्डन अॅथॉरिटीच्या गोदामात तो धूळ खात पडला आहे. १९१७च्या क्रांतीत लेनिनचं संरक्षण करणाऱ्या लॅटव्हियन रायफल बटालियनच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं लाल ग्रेनाईटचं स्मारक आजही तसंच ठेवण्यात आलं आहे. पण आता ते गोऱ्या व लाल अशा सर्वच रायफलमन्सचं स्मारक म्हणून ओळखलं जातं."
लॅटव्हियन स्त्री-पुरुष खाण्या व पिण्यात मोठे रसिक. तेथील एका मध्ययुगीन रेस्टॉरंटमध्ये आम्ही मुद्दाम जेवायला गेलो होतो. अक्षरशः एका भुयारात म्हणजे तळघरात ते बांधण्यात आलं आहे. सारं वातावरण त्या काळात घेऊन जाणारं. सजावट तर सोडाच पण क्रोकरी, व वेटर्सचे गणवेषही त्याच कालातील. हेरिंग, फ्लॉउंडर, ट्राऊट मासे खाणं म्हणजे लॅटव्हियन लोकांची मेजवानी. ते बनवण्याची त्यांची पद्धतही अगदी निराळी असते. फार सपकही नाही व तिखटही नाही. त्यामुळे आपल्यालाही त्याची चव आवडते. मद्यपानात एका लॅटव्हियन माणसाचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आल्याची गमतीदार माहिती इथे समजली. काही वर्षांपूर्वी रीगाच्या रस्त्यावर एक माणूस बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्या भटक्याचं रक्त पोलिसांनी तपासलं. तेव्हा त्यात जे अल्कोहोलचं प्रमाण आढळलं ते जगात सर्वात अधिक होतं, अशी माहिती तेथील अधिकृत पुस्तकात देण्यात आली आहे.
रीगाची एकूण लोकसंख्या जेमतेम सात लाख. त्यात मूळचे लॅटव्हियन, रशियन, पोलिश, युक्रेनियन, ज्यू या सर्वांचाच समावेश आहे. त्यामुळे रीगा म्हणजे या सर्वांच्या संस्कृतीचं, चालीरितींचं माहेरघर मानलं जातं. शहराचं बरंच मोठं क्षेत्र सुंदर बगिच्यांनी व्यापलं असून विशेष म्हणजे शहरात घनदाट जंगलंही भरपूर आहेत. त्यामुळे रीगा हिरव्यागार विळख्यात पडल्यासारखंच दिसते. हवामानाच्या बाबतीत निसर्गाचा काहीसा लहरीपणा इथे आढळून येतो. वर्षातले जवळजवळ सहा महिने अंधार असतो. हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. उणे १०० ते १५० सें. पर्यंत तापमान असतं. पण उन्हाळ्यात चोवीस तासांचा उजेड. मधूनमधून पाऊस. या अनिश्चित हवामानाला तोंड देण्याच्या तयारीने गेलात तर वर्षातल्या कोणत्याही मोसमात हिरव्यागार रीगचा मुक्काम मोठा सुखकारकच वाटतो.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
देश : लॅटव्हिया
राजधानी : रीगा
क्षेत्रफळ : सुमारे ६४,५८९ चौ.कि.मी.
लोकसंख्या : सुमारे २.२४ दशलक्ष
चलन : लॅटव्हियन लॅटस (युरो चालतात.)
भाषा : पर्यटनास इंग्रजी
कसे जाल ?
शेंजेन व्हिसा लागतो. रीगा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे विविध कंपन्यांची विमाने इथे उतरतात. टर्किश एअर लाईन्सने मुंबई-इस्तंबूल (साडेसात तास) व इस्तंबुल-रीगा (तीन तास) प्रवास सोयीचा ठरतो.
कधी जाल?
निरनिराळ्या मोसमात लॅटव्हियाचं सौंदर्य खुलून दिसतं. मे ते सप्टेंबर महिने उत्तम. थंडीची मजा घ्यायची असेल तर नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये जावं. अर्थात त्यावेळी दिवसाही अंधार व तापमान उणे अंशाखाली असतं.
सुरक्षितता : पूर्ण सुरक्षित.
'कोस्ट टू कोस्ट वॉक'
को णत्याही देशात भटकताना तिथल्या शहरांबरोबरच ग्रामीण भागात (कंट्री साईड) फिरण्यात मला व जयंतीला जास्त आवडतं. अनेक देशांमधील खेड्यात आम्ही वास्तव्य केलं आहे. कोणत्याही देशाच्या ग्रामीण भागात राहून तो देश आपल्याला सर्वार्थाने समजू शकतो असं मला वाटतं. तिथली वैशिष्ट्यं, संस्कृती, चालीरिती, खाद्यपदार्थ, पेय यांचा चांगला परिचय होतो. आता इंटरनेटच्या साहाय्याने जगाच्या कानाकोपऱ्यातील अशा जागा शोधून काढणं हा जयंतीचा आवडता छंदच झाला आहे. इंग्लंडमधील वेल्स भागात यापूर्वी दोन-तीन वेळा जाणं झालं होतं. पण वेल्सच्या नैऋत्येकडे टोकाला असलेला ६२० चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा 'पेंब्रुकशायर कोस्ट नॅशनल पार्क' हा संपूर्ण ब्रिटनमध्ये एकमेव व आगळा-वेगळा पार्क म्हणून ओळखला जातो. त्यातील छोटेखानी, टुमदार गावांत दोन-तीन आठवड्यांची मनसोक्त भटकंती करण्याची योजना जयंतीने आखली.
हा पार्क खऱ्याखुऱ्या अर्थाने व संपूर्णपणे समुद्रकिनाऱ्यावर आहे. अत्यंत निसर्गरम्य व विविध आकर्षणांनी नटलेल्या, सजलेल्या या पार्कची निर्मिती १९५२ मध्ये झाली. याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथल्या २९९ कि.मी. लांबीच्या व विविध किनाऱ्यांना जोडणाऱ्या 'पाऊलवाटा.' या पाऊलवाटा फार पद्धतशीररीत्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यांनाच 'कोस्ट टू कोस्ट पाथ'
म्हटलं जातं. या पाऊलवाटांचं जाळं उत्तमरितीने विणण्यात आलं आहे. एका किनाऱ्यावरून दुसऱ्या, दुसऱ्याहून तिसऱ्या गावातील किनाऱ्यावर जातानाची वाट ही समुद्राला बहुतांशी समांतर जाते. समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने ज्या उंच लहान टेकड्या आहेत, त्यातून या पाऊलवाटा काढण्यात आल्या आहेत सुरुवातीला चढण्यासाठी चक्क लाकडाच्या व्यवस्थित पायऱ्या... त्यानंतर नुसती पाऊलवाट... दूरवर नेणारी. अर्थात अगदी अरुंद... त्यावर एकामागून एक असंच चालावं लागतं. सर्वच्यासर्व २९९ कि.मी.चा मार्ग चालून जाण्यासाठी १० ते १५ दिवस लागतात. चालण्याचा उत्तम सराव असणाऱ्यांनाच ते शक्य होतं. सर्वच पर्यटक संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करतात असे नाही. आपली ताकद आणि उपलब्ध वेळ यांची सांगड घालून तिथे भटकंती करणं श्रेयस्कर ठरतं.
पाऊलवाटांद्वारे नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी जसा खास मार्ग आहे, तशीच अन्य साधनांच्या द्वारे फिरण्याची सोय आहे. पेंब्रुकशायर कौंटीमधील जवळजवळ २०-२२ लहानमोठी शहरं-खेडी उत्तम रस्त्यांनीही जोडण्यात आली आहेत. प्रचंड चढ-उतारांचे हे रस्ते समुद्राला समांतर असेच आहेत. त्यामुळे सायकलींवरून किंवा घोड्यांवरून रपेट करणाऱ्यांची संख्याही बरीच असते. त्याखेरीज समुद्रातून वॉटर टॅक्सीतून तुम्ही भरधाव वेगाने जाऊ शकता. प्रत्येक गाव व मार्ग यात छोट्या बसेसचंही जाळं उत्कृष्ट आहे. एका प्रवासाच्या बाबतीत मात्र पार्कच्या संयोजकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणजे मोटारीतील प्रवास. एकदा पार्कच्या परिसरात आलात की पर्यटकांनी शक्यतो मोटारीचा प्रवास टाळावा. 'मोटार तुमच्या अपार्टमेंटमध्ये किंवा राहण्याच्या जागी ठेवून द्या, आणि अगदी आवश्यक तेव्हाच त्याचा वापर करा.' अशा आग्रहाच्या सूचना ठिकठिकाणी लावलेल्या आढळून येतात. हा पार्क जास्तीत जास्त प्रदूषणमुक्त राहावा, ही त्यामागची भूमिका आहे व त्याचं मोठ्या प्रमाणात पालन होतं, असाही अनुभव संपूर्ण सहलीत आम्हाला आला.
या पार्कमध्ये कोणत्या मोसमात जायचं हा मुख्य प्रश्न होता. कारण योग्य काळ-वेळ असली तरच सफरीचा पूर्ण आनंद लुटता येतो. एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी तिथे जाण्यासाठी सर्वोत्कृष्ट. स्थानिक ब्रिटिशवासियांची त्यावेळी प्रचंड गर्दी उसळते. याचं मुख्य कारण म्हणजे कडाक्याचं उन्ह. त्यांच्या दृष्टीने ती उत्तम पर्वणी. पण आपल्यासारख्या पुणे-मुंबईकरांचं घर जवळजवळ बाराही महिने उन्हातच बांधलेलं असल्याने त्या उन्हात 'कोस्ट टू कोस्ट' फिरण्यात बिलकूल मजा वाटली नसती. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळ्यात, स्नो फॉलची भीती असते. प्रचंड हिमवृष्टीमुळे या पार्कमधील मार्ग अनेकदा बंद
होतात अशी माहिती मिळाली. मग हिवाळा संपतानाचा फेब्रुवारी-मार्चचा कालावधी सर्वार्थाने योग्य असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही 'आलो.
पेंब्रुकशायर कौंटीची एकूण लोकसंख्या २२ ते २३ हजार इतकी आहे. निरनिराळ्या खेड्यात पर्यटकांसाठी विविध सोयी उपलब्ध आहेत. कॅरव्हॅन घेऊन येणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने ठिकठिकाणी कॅरव्हॅनचे तळ दिसून येतात. त्याखेरीज सर्व सुखसोयींनी पूर्ण असलेल्या अपार्टमेंट्सची संख्याही भरपूर आहे. जयंतीने राहण्यासाठी पार्कमधील दोन गावांची निवड केली. पहिला मुक्काम होता 'लिट्ल हेवन' गावात. अटलांटिक महासागराच्या छोट्या किनाऱ्यावरील एक सर्वात लहान पण निसर्गसौंदर्याने कमालीचं नटलेलं गाव. खरोखरीचं 'हेवन.' गावात फक्त ४० घरं आहेत आणि साधारणतः सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वीचे दोन जुने पब. दुसरे गाव 'सेंट डेव्हिडस.' या गावाची लोकवस्ती दोन हजाराच्या घरात आहे. पण त्या गावात कॅथेड्रल आहे, या निकषावर ब्रिटनमधील सर्वात छोटं शहर समजलं जातं.
लिट्ल हेवन गावात जाण्यासाठी हॅवर फोर्डवेस्ट या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर उतरलो. बाहेर एकच टॅक्सी उभी होती. गिऱ्हाईक मिळाल्याने टॅक्सीवाला खूष झाला व त्याने आम्हाला तीन पौंडाचा डिस्काऊंट दिला. सुमारे १५ कि.मी. अंतरावरील लिट्ल हेवन खेड्यामध्ये प्रवेश करताना दुपारचे चार वाजले होते. तापमान २-३० सें. पर्यंत होतं. पाऊस नव्हता पण अंधारून आलं होतं. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवसाची सकाळ चक्क लखलखत्या उन्हात उजाडली. अर्थात या देशात हवामान कधी बदलेल याचा नेम नसतो.
गावात एकच मुख्य रस्ता आहे. पण तो उत्तम अवस्थेत. त्याच्या दुतर्फा मस्त रंगीबेरंगी एक मजली टुमदार घरं दिसली. जणू चित्रातीलच वाटावीत एवढी सुंदर. झाडं नशी सुकलेली, पण पालवी फुटण्याची सुरुवात होत होती. जवळच छोटा समुद्रकिनारा. आमच्या अपार्टमेंटमध्ये भरती-ओहोटीच्या वेळा लावलेल्या होत्या. आश्चर्य वाटलं. त्याचं मुख्य कारण मजेशीर होतं. लिट्ल हेवनमध्ये एकही दुकान नाही. तिथून सुमारे दोन-अडीच कि.मी. वरील ब्रॉड हेवन हे थोडं मोठं गाव. कोणत्याही खरेदीसाठी तिथे जावं लागतं. ब्रॉडला जाण्यासाठी रस्ताही होता व पायवाटही. पण प्रचंड चढउतारामुळे ते मार्ग थोडे कष्टाचे होते. ब्रॉड हेवनला पटकन जाऊन काही आणायचं तर किनाऱ्यावरून जाणं-येणं अधिक सोयीचं व सोपं. वळसा घातला की, आलं ब्रॉड हेवन. अर्थात त्यासाठी ओहोटीची वेळ माहीत हवी. भरतीच्या वेळी किनाऱ्यावरून जाणं-येणं शक्य नसतं. पण तरीही तुम्ही भरतीच्या लाटेत अडकलात, तर
सुरक्षिततेसाठी लाइफ जॅकेटसची व्यवस्था पूर्ण मार्गावर केलेली होती. अपार्टमेंटमधील नोटिशीप्रमाणे आज तिथे मासळी विक्रीसाठी येणार
होती... दारावर कोळीण किंवा कोळी डोक्यावर पाटी घेऊन आले आहेत, मग किमतीसाठी घासाघीस... अखेर मासळी कापून देऊन, त्या नाट्याचा गोड शेवट... हे आपल्याकडचं दृश्य माझ्या समोर उभं राहिलं. लिट्ल हेवनमध्ये मात्र त्या दृष्टीने निराशा पदरी पडली. उघड्या मेटॅडोरमधून पेटाऱ्यातून मासळी आली. स्थानिक कोळी शर्ट, पँटमध्येच होता. कॉड, हेक, सॅमन, क्रॅब, लॉबस्टरची यादी त्याने दिली. किमती निश्चित होत्या. वजन करून, कापून तो देत होता... पण मासळी विकत घेतानाची आपल्याकडची मजा मात्र इथे अनुभवायला मिळाली नाही.
पहिल्याच दिवशी या 'कोस्ट टू कोस्ट'ची माहिती घेऊन, चालण्याचा कार्यक्रम आखला. आमच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणारे ८०च्या पुढचे आजी-आजोबा हजार मैलांचं अंतर मोटारीने कापून या पार्कची मजा लुटण्यासाठी आले होते. रोज निदान वीस ते पंचवीस कि.मी. अंतर चालण्याचा त्यांचा कार्यक्रम होता. त्यामुळे दहा-बारा दिवसात ते पार्कची भ्रमंती पूर्ण करणार होते. अनेकांच्याकडे सायकली होत्या, तर काहीजण घोड्यांवरून जाण्याच्या तयारीत होते.
आम्ही सुरुवातीला दहा कि.मी.ची योजना आखली. त्याबाबतचं चांगलं मार्गदर्शनही मिळालं. पेंब्रुकशायरमध्ये 'पफिन' नावाचा स्थानिक पक्षी आहे. त्याच्या नावाने बससेवा आहे. त्याला 'पफिन शटल' म्हणतात. त्या बसचं एका दिवसाचं प्रत्येकी सहा पौंडाचं तिकीट काढलं. सुरुवातीला ब्रॉड हेवन इथून आम्ही आमचा प्रवास सुरू केला. पाऊलवाटेवर थोडा चिखल होता, पण चांगले बूट आणि अंगात ओव्हरकोट यामुळे अजिबात त्रास जाणवला नाही. मस्त ऊन्ह पडल्याने आम्ही त्या परिसराचं सौंदर्य मनसोक्त अनुभवत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पार्कची सीमा पूर्णतः समुद्रकिनाऱ्याच्या पट्टीत आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून त्याचं क्षेत्र जास्ती जास्त पाच कि.मी. पर्यंत होते.
या पार्कमध्ये काय नाही? नैसर्गिक साधन-सामुग्रीचा फार मोठा साठा इथे आढळून येतो. भूगर्भशास्त्राच्या माहितीनुसार येथील खडक निदान दोन हजार दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. अनेकांचे लांबलचक सुळके समुद्रात डोकावतात. त्यामुळे त्यांचं सौंदर्य खरोखरच अप्रतिम वाटतं. कोस्ट पाथचा रस्ता, काही ठिकाणी बराच उंचावर जातो. सुमारे दोनशे फूट उंचावरून अटलांटिक महासागराचा
व परिसराचा भव्यपणा डोळ्यात किती साठवू असं होऊन जातं. या पार्कच्या परिसरात नानाविध प्रकारची झाडं, लहान-लहान पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. एका बाजूला अथांग सागर... प्रचंड खडकाळ प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला मैलोन्मैल लांब पसरलेली हिरवीगार शेतं.... त्या हिरव्या पट्ट्यांचं नॅचरल लँडस्केपिंग अभूतपूर्व असंच होतं. शेतात मधूनमधून पांढऱ्याशुभ्र मेंढ्यांचे कळप.... मेंढ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या अंगावरचे तांबड्या-निळ्या रंगांचे ठिपके अगदी लांबूनही स्पष्ट दिसत. मधूनच जाड पायांचे घोडे शेतात चरताना दिसत... सारंच जणू चित्रातलं... कोणीतरी नामांकित चित्रकाराने रेखाटलेलं ते जणू चित्रच वाटत होतं.
आम्ही पाच-सहा कि.मी.चं अंतर चालून गेलो. मधून चढ-मधून उतार. त्यामुळे दम बऱ्यापैकी लागत होता. वाटेत लागलं समुद्रकिनाऱ्यावरचं 'नॉल्टन हेवन' नावाचं छोटं गाव. तिथे एका घराबाहेर पाटी होती 'गरमागरम पास्ती.' पास्ती म्हणजे वेल्सची खासियत. चिकन किंवा भाज्या व अॅस्पॅरॅगस घालून तयार केलेली मैद्याची गरमागरम पेस्ट्री. कडाक्याच्या थंडीत त्याची चव काय वर्णावी? ती तोंडात कोंबत असतानाच पफिन शटल आली. आता बसने तीन-चार गावं फिरून न्यूगेल कोस्टल पाथच्या तोंडाशीच उतरलो. बसमध्ये बसल्याने थोडी विश्रांती मिळाली. पायवाटेचा मार्ग जिथून सुरू होत होता, तिथेच ड्रायव्हरने बस थांबवली. त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नव्हता. मग पुन्हा एकदा आमची पदयात्रा सुरू केली. या पद्धतीने दिवसभराचा प्रवास केला, तर संपूर्ण परिसरातील निसर्गसौंदर्याचा मस्त उपभोग घेता येऊ शकतो.
इथले समुद्रकिनारे प्रचंड खडकाळ आहेत. त्यावरील वाळूही थोडी चिखलासारखी भुसभुशीत आहे. त्यामुळे उन्हाळा सोडला तर अन्य महिन्यात यातून चालण्यास गमबूटच उपयुक्त ठरतात. पेंब्रुकशायर कौंटीतील स्थानिक लोकांचा आवडता छंद म्हणजे नानाविध जातींच्या, आकारांच्या, रंगांच्या कुत्र्यांना घेऊन किनाऱ्यावर फिरायला जाणे. बेचकीसारख्या आकाराच्या काठीने चेंडू लांबवर टाकायचा, मग ती कुत्री सुसाट जाऊन तो चेंडू झेलतात. पण हा आनंद ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्यांतच उपभोगता येतो. कारण मे ते सप्टेंबर या पाच महिन्यात कुत्र्यांना किनाऱ्यावर नेण्यास बंदी असते. अन्यथा ४५० पौंड दंड भरावा लागतो.
आमच्या दुसऱ्या मुक्कामाची जागा 'सेंट डेव्हिडस' म्हणजे जणू एक स्वप्ननगरी होती. तिच्या तीनही बाजूंना सागराचा वेढा ! समुद्राच्या पाण्यातील विविध खेळांच्या साधनांची तसंच हस्तकलांची छोटी दुकानं, एक पोस्ट
ऑफिस, गावाच्या मध्यवर्ती असलेला छोटा चौक व खाटकाचं दुकान. साधारणत पंधरा ते वीस मिनिटात साऱ्या गावात फेरफटका सहज पूर्ण होऊ शकेल एवर क्षेत्रफळ. इथले कॅथड्रल खरोखरच पाहण्यासारखं आहे. ते बाराव्या शतकातले असून, आजही उत्तम अवस्थेत आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणरे पांढऱ्या वाळूचा बीच. कोस्ट पाथने तेथे पोहोचलो तेव्हा वातावरण पावसाळी होते. पावसाची रिमझिम सुरूही झाली होती. तरी बीचवर उत्साही पर्यटकांच गर्दी होतीच. याही हवामानात समुद्रात जाऊन सर्किंग करणारे धाडसी वीर जये दिसत होते, तशीच छोटी फावडी, बादल्या घेऊन वाळूत डोंगर तयार करण्याची बालकांमध्ये स्पर्धा सुरू होती. तर काहीजण काचेच्या बंद रेस्टॉरंटमध्ये बसून आइस्क्रीम खाण्यात दंग होते.
पेंब्रुकशायर पार्कमधील आणखी एक शहर खूप आवडलं ते म्हणजे 'टेन्बी.' ते बरंच लांब असल्याने दोन तासाच्या बस प्रवासानंतर आम्ही तिथे पोचलो. या गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. राजपुत्र लोकनियन याने १२६० मध्ये हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं. त्यामुळे सुरक्षिततेसाठी १३व्या शतकात गावाच्या सभोवताली दगडाची भक्कम भिंत बांधण्यात आली. आजही त्या भिंतीचे अवशेष पाहावयास मिळतात. तसेच गावात त्या काळी पाच कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्या कमानीही आज जवळजवळ त्याच अवस्थेत दिसतात. फरक एवढाच की, आता तिथे विविध दुकानांची व पर्यटकांची गर्दी उसळलेली दिसते.
वीस दिवसांच्या भटकंतीत आमचा पेंब्रुकशायर कोस्ट पार्कचा साठ ते सत्तर टक्के भाग पाहून झाला. जवळजवळ दीडशे-दोनशे कि.मी.चा परिसर दोन पायांच्या वाहनाने व पफिन शटलने पालथा घातला. आता आम्हाला थोड्या विश्रांतीची गरज होती. त्यासाठी साधारणतः मध्य इंग्लंडमधील प्रसिद्ध 'इंग्लिश रिव्हिएरा' विभागाची निवड जयंतीने केली होती. तिथल्या टुर्की गावात आम्ही राहणार होतो. पण हॅवरफोर्ड वेस्ट ते टुर्की हा प्रवास सरळ नव्हता. रेल्वे व बस दोन्ही प्रवास एकत्र करूनच तिथे पोचता येणार होतं. हे थोडं कठीण असल्याची कल्पना तिकिट देताना स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिली होती. पण आमची ही 'धाडसी सहलच' होती. त्यामुळे त्याला अनुसरूनच है धाड्स पत्करायचं असं ठरवलच होतं. एकूण चार वेळा गाड्या बदलून रेल्वेचा साडेसहा तासांचा प्रवास पार पाडला. काही वेळेस दोन गाड्यांमध्ये अवघं सात मिनिटांचं अंतर... मध्येच बसचा पाऊण तासांचा आणि शेवटी टॅक्सीचा पंधरा मिनिटांचा प्रवास... सोबत सामान आणि थंडीचे लांबलचक ओव्हरकोट...
पण व्यवस्थित आखणी, शिस्तबद्ध वाहतूक यामुळे कोणताही त्रास न होता आम्ही टुर्कीला अगदी वेळेवर पोचलो.
इंग्लिश खाडीवरील इंग्लिश रिव्हिएराचा किनारा, म्हणजे संपूर्ण इंग्लंडमध्ये आराम करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण. टुर्की, पँग्टन व ब्रिक्सहॅम या तीन शहरांचा मिळून इंग्लिश रिव्हिएरा ओळखला जातो. त्याला जवळजवळ ४० कि.मी. लांबीचा किनारा लाभला असून त्यावर वीस अत्यंत उत्कृष्ट बीचेस आहेत. भूगर्भशास्त्र, पुराणवस्तुसंशोधन व सजीव सृष्टी यांच्या दृष्टीने हा प्रदेश फार महत्वाचा असल्याने, युनेस्कोने 'जीओ पार्क' म्हणून त्याची घोषणा केली आहे.
आमचं टुर्की येथील अपार्टमेंट मिडफूट बीचवर होतं. सर्वच खोल्यांमधून निळंशार पाणी दिसायचं. पण विशेष म्हणजे त्या पाण्यात खडकाचं एक बेट होतं. त्याचा आकार माणसाच्या नाकासारखा होता. उंची १५ ते २० फूट. किनाऱ्यावरील दुर्बीणीच्या साहाय्याने तो अजस्त्र खडक पाहण्याची सोय होती. हा खडक ४०० दशलक्ष वर्षांपूर्वीचा जुना असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. राष्ट्रीय वास्तू म्हणून त्याची जपणूक केली जाते.
टुर्की व परिसरात पाहण्यासारखं, फिरण्यासारखं खूपच होतं. पण महत्वाचं आकर्षण म्हणजे रहस्यकथांची सम्राज्ञी अॅगथा ख्रिस्ती हिचं घर. अॅगथा ख्रिस्ती ही टॉकर्वेची रहिवासी. साऱ्या जगाला वेड लावणाऱ्या तिच्या रहस्यकथांची प्रेरणा तिला याच प्रदेशातून मिळाली. आयुष्याचा बहुतेक काळ तिने इथेच काढला. इथे असताना काही दिवस ती अचानक गायब झाली होती. तेव्हा ती कुठे गेली होती, याचंही रहस्यच आहे. डार्ट नदीच्या काठावर ग्रीन वे इथे तिचं अलिशान निवासस्थान आहे. रहस्यकथांचं लेखन करताना जी टेबल-खुर्ची ती वापरायची तसंच तिचा चष्मा, पेन या वस्तू तिथे पाहता येतात. दरवर्षी ११ ते १८ सप्टेंबरला अॅगथा खिस्ती महोत्सव इथे साजरा होतो. त्यात विविध कार्यक्रम आयोजण्यात येतात.
नयनरम्य बीचवर भरपूर भटकंती करायची आणि शेजारच्या मस्त रेस्टॉरंटमध्ये फिश अँड चिप्स व बिअर घेत तासन्तास बसून राहायचं हा इथे आलेल्या पर्यटकांचा नित्यक्रम. एक्झेटर या गावातील भुयारी मार्ग पाहून तर आपण थक्कच होतो. शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी हे भुयारी मार्ग १४ व १५व्या शतकात काढण्यात आले. आजही ते तसेच ठेवण्यात आले आहेत. येथील मुक्कामात 'कॉकिंग्टन' खेड्याला निश्चित भेट द्या असं काही नवीन मित्रांनी सांगितलं होतं. सुमारे दीड-दोन कि.मी. सरळ खोल दरीत
असलेल्या या गावाची लोकसंख्या अवघी ३५० आहे. अगदी जुन्या पद्धतीची शाकारलेली घरं. घरा-घरांत लेसच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. व्हिक्टोरियन काळात समतोल हवामानासाठी ते प्रसिद्ध होतं. त्यामुळे आजारी रुग्ण इथे राहायला येत. आज मात्र ते पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. तेथील 'ड्रम इन' पबची इमारत ८० वर्षांची जुनी व कमालीची आकर्षक आहे.
जवळजवळ महिनाभराच्या या आगळ्या-वेगळ्या भटकंतीने पर्यटनाचा एक वेगळाच आनंद व अनुभव आम्हाला दिला. चाकोरीबद्ध सहलींपेक्षा यात खूप काही शिकता आलं. ते मनाच्या कप्प्यात बंद करून आम्ही लंडनला परतीच्या प्रवासाला लागलो.
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
वेल्स (इंग्लंड)
लोकसंख्या : २८,७३,०००
राजधानी : कार्डिफ
भाषा : इंग्रजी व वेलिश
चलन : पौंड स्टर्लिंग
कसे जाल?
ब्रिटिश व्हिसा हवा. पेंब्रुकशायर कोस्ट नॅशनल पार्कची सहल स्वतःच आखून घ्यावी लागते. पार्कमधील विविध गावांत जाण्यासाठी 'पॅडिंग्टन' रेल्वे स्थानकातून गाड्या सुटतात. लिट्ल हेवनकरता पॅडिंग्टन ते स्वान्सी व स्वान्सी ते हॅवर फोर्ड वेस्ट अशी रेल्वे गाडी घेता येते. स्वतःची अगर भाड्याची मोटार घेऊन (अर्थात आंतरराष्ट्रीय परवाना हवा) फिरणं शक्य असेल तर ते फारच उत्तम.
कधी जाल?
एप्रिल ते सप्टेंबर हा कालावधी सर्वोत्तम. पण त्या काळात तिथे स्थानिक ब्रिटिशवासियांची प्रचंड गर्दी असते आणि उन्हही फार कडक असतं. फेब्रुवारी-मार्च महिना आपल्यासाठी चांगला. त्यावेळी स्नो व थंडीही कमी झालेली असते. फारसा पाऊस नसतो आणि वातावरण मोठे प्रसन्न असतं.
सुरक्षितता :
पूर्ण सुरक्षित.
अधिक माहितीसाठी :
enquiries--pembrokeshire Coast.org.UK.
आणीबाणीचा प्रसंग :
ती सनसनाटीपूर्ण पंधरा मिनिटं..
पश्चिम व पूर्व युरोपच्या एक महिन्याच्या सहलीतील ती रात्र आठवली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. हंगेरी, रूमानिया देश पाहून आम्ही बल्गेरियात प्रवेश केला होता. सोफिया या राजधानीच्या शहरात आमचा पहिला मुक्काम होता. प्रसिद्ध रोझ फेस्टिव्हलचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही रात्रीच्या मुक्कामासाठी तिथल्या 'हिल्टन' या पंचतारांकित हॉटेलमध्ये आलो. दहा-बारा मजली हिल्टनच्या पाचव्या-सहाव्या मजल्यावर आमच्या ग्रुपची राहण्याची व्यवस्था होती. दिवसभर भरपूर भटकंती झाल्यामुळे रात्री बिछान्यावर कधी अंग टाकतो, असं झालं होतं.
रात्री कधीतरी एकदम जोरजोरात प्रचंड मोठ्या आवाजात धोक्याचा इशारा देणारी घंटा वाजू लागली. खडबडून जागे झालो. घंटा थांबली आणि लाउडस्पीकरवरून सूचना देण्यात आली. 'ही आणीबाणीची वेळ आहे. असाल तसे, जवळच्या जिन्याने हॉटेलसमोरच्या पटांगणात या.' घंटानाद व सूचना असं चक्र सतत सुरू होतं...
क्षणभर काहीच लक्षात येईना. ही कसली आणीबाणी? आग, भूकंप की, आणखी काही? थंड हवेमुळे अंगात व्यवस्थित कपडे होते. परदेशात पासपोर्ट, पैसे यांची पर्स उशाखाली घेऊन झोपण्याची सवय आम्हा दोघांनाही आहे. क्षणार्धात पर्स घेऊन, एकमेकांचा हात धरत मी व जयंती खोलीबाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये अन्य प्रवाशांची प्रचंड धावपळ सुरू होती. 'फायर, फायर' असे काहीजण ओरडत होते. त्यांच्याप्रमाणे आम्हीही जिन्याकडे धावलो. समजा खालच्या मजल्यावर आग भडकली असेल तर काय करायचं? क्षणार्धात ब्रह्मांड आठवलं. आपण भारतात परत जाऊ की नाही हा प्रश्न मनात चमकून गेला. 'टॉवरिंग इन्फनों' चित्रपटातील एकेक दृश्य डोळ्यांसमोर येत होती. प्रत्येकजण जिन्यावरून जीव मुठीत धरून पळत होता. काहीजण अक्षरशः चड्डीवर होते. महिलाही समोर दिसेल ते वस्त्र गुंडाळून धावत होत्या. आमच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्या न्यूझिलंडच्या जॉनच्या हाती बाथ रोबच लागला. तो अर्धवट घालून तो भराभर पायऱ्या उतरत होता.
सुदैवाने जिन्यात लाइट होते. आम्ही धापा टाकत हॉटेलसमोरच्या
पटांगणात आलो. काहीजण आधीच पोचले होते, काही येत होते. इतक्यात हॉटेलचे कर्मचारी धावत तिथे आले. 'घाबरू नका, घाबरू नका' असं ते ओरडून सांगत होते. 'पण काय झालं ते प्रथम सांगा', असं सर्वजण विचारू लागले. त्याचवेळी आणीबाणीची सूचना देणाऱ्या माईकवरून सांगण्यात आलं की, 'हॉटेलच्या धूम्रपान बंदी असलेल्या विभागात कोणीतरी सिगारेट पेटवली होती. त्यामुळे आगीची सूचना देणारी घंटा व सूचना सुरू झाली... या सर्व प्रकारात ग्राहकांना जो त्रास झाला, त्याबद्दल हॉटेल व्यवस्थापन दिलगीर आहे.'
पंधरा-वीस मिनिटांच्या त्या भयानक नाट्याचा शेवट अखेर गोड झाला. सारं चित्र पालटलं होतं. रात्री दोन वाजता हाताला लागेल त्या वस्त्रानिशी जीव मुठीत घेऊन पळालेले सर्वजण खोल्यांमध्ये परतू लागले. आता सर्वत्र हास्यविनोदाचं वातावरण होतं. 'जॉनचा बाथरोब कसा सुंदर आहे,' 'मेरी आणि अॅलेक्स अंधारात कसे धडपडले' याची वर्णनं चविष्टपणे सांगितली जात होती..... सकाळी सहाच्या सुमारास जाग आली, तेव्हा दरवाज्या खालून एक पाकीट खोलीत सरकवलेलं दिसलं. उत्सुकतेने उघडून पाहिलं तर झाल्या प्रकाराबद्दल व्यवस्थापनाने लेखी माफी मागितली होती...
या घटनेतून एक धडा सर्व पर्यटकांनी अवश्य शिकावा. सहलीत विशेषतः परदेशात आपले पासपोर्ट्स, पैसे व अन्य महत्त्वाची कागदपत्रं शक्यतो आपल्याजवळ ठेवावीत. कोणताही प्रसंग उद्भवला, तरी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
चर्च :
कवट्यांनी, हाडांनी
सजवलेलं
त ब्बल चाळीस हजार मानवी कवट्या व त्यांच्या शरीरातील एक कोटीहून अधिक लहानमोठी हाडं यांनी सजवलेलं चर्च पहायला तुम्हाला कर्म वाटेल?... विश्वास बसत नाही ना? पण असं चर्च अस्तित्वात असून युनेस्कोचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जाही त्याला मिळाला आहे. झेक प्रजासत्ताकर्च राजधानी प्रागपासून ६५ कि.मी. अंतरावर असलेल्या 'कुटना होरा' या अगदी छोट्या पण तेराव्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या गावात, सजावटीचा हा अगदी आगळावेगळा नमुना आपल्याला पहायला मिळतो. तो अद्याप फारसा परिचित नाही हे खरं. पण कोणत्याही देशात भटकताना, तेथील अगदी 'ऑफबीट' ठिकाण शोधून काढण्याचं वेड असलेल्या जयंतीने तर याचा शोध लावला आणि क्षणाचाही विलंब न करता, आम्ही आमची गाडी तिकडे वळवली.
प्राग शहराच्या जसजसे बाहेर आलो तसं त्या परिसरातील ग्रामीण भागही किती निसर्गरम्य आहे, याची कल्पना येऊ लागली. कनुला किंवा रॅप सिडसच्या पिवळ्या धम्म फुलांचे लांबवर पसरलेले गालिचे आणि त्यांना हिरव्यागार गवताची झालर, असा हा परिसर सजला होता. कुटना होरा त्याकाळी चांदीच्या खाणींसाठी प्रसिद्ध होतं. त्यामुळे या भागाचा विकासही चांगला झाला. प्राचीन काळी राजाच्या राजवटीत प्राग नंतरचं सर्वात महत्त्वाचं व मोठं गाव म्हणून ते
ओळखलं जाई. तिथे असलेलं कॅथेड्रल, व्हर्जिन मेरीचं चर्च व ऑस्युअरी (हाडांची सजावट) यामुळे १९९५ नंतर, जगातील पर्यटकांची तेथील वर्दळ बरीच वाढली.
कुटना होराच्या जवळपास सेडलॅक येथे सिस्टर सिएन मठाची स्थापना बाराव्या शतकाच्या सुमारास झाली. बोहेमिआ मधील अशा प्रकारच्या या पहिल्याच मठामुळे आर्थिक व सांस्कृतिक चळवळीचं ते एक केंद्रच बनलं. येथे चांदीच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळे खाणींत काम करणाऱ्याची वसाहत आसपास वाढू लागली. मठाच्या प्रथेप्रमाणे, तिथे एक दफनभूमीही तेराव्या शतकाच्या मध्यापासून अस्तित्वात आली. सेडलॅक मठाच्या प्रमुख पाद्र्याने, जेरुसलेमहून पवित्र माती येथे आणली. ती सर्वत्र पसरवण्यात आली. त्यामुळे या दफनभूमीलाही पवित्र स्थान प्राप्त झालं. परिणामतः केवळ बोहेमिआ येथीलच नव्हे तर, आजूबाजूच्या सर्वच देशांमधील मृत व्यक्तींचं दफन येथे करण्यात येऊ लागलं.
त्याकाळी रोगराईमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असे. या भागात १३१८ मध्ये प्लेगच्या साथीने अक्षरश; थैमान घातलं होतं. त्यात तीस हजार लोक मृत्युमुखी पडले व त्या सर्वांचं दफन याच दफनभूमीत करण्यात आलं. त्यानंतर 'हुसाईट युद्धा'त धारातीर्थी पडलेल्यांवरचे अंत्यसंस्कारही याच भूमीत पार पडले. पण हुसाईटसनी १४२१ मध्ये हा अत्यंत सुंदर सेडलॅक मठ जाळून टाकला. त्यानंतरही अनेक लढाया या शहराच्या जवळपासच झाल्या.
हुसाईट युद्धांच्या आधी, चौदाव्या शतकात ऑल सेंटस सेमेट्री चॅपेलचं काम सुरू झालं होतं. आणि त्याच्याही आधीपासून, म्हणजे तेराव्या शतकाच्या अखेरीस जवळच बोहेमिआ येथे बांधण्यास सुरुवात झालेल्या, व्हर्जिन मेरीच्या चर्चचं बांधकाम संपलं होतं. या सेमेट्री चॅपेलला दोन मजले होते. वरच्या मजल्यावर चर्च व दफन केलेल्या माणसांच्या हाडांचा, कवट्यांचा साठा तळमजल्यावर होता. उखडून काढण्यात आलेल्या थडग्यांतील हाडं सुरुवातीला चर्चभोवती नुसती रचून ठेवण्यात आली. नंतर ती खालच्या भागात हलवण्यात आली. एक अर्धअंधत्व असलेल्या मठाधीपतीने १५११ मध्ये ती हाडं पिरॅमिडस्प्रमाणे एकावर एक रचून ठेवली. पण १६६१ मध्ये हाडांच्या या सजावटीची पुनर्रचना करण्यात येऊन, त्याच्या कोसळलेल्या छपराचं बांधकामही नव्याने करण्यात आलं. या चॅपेलच्या इतिहासाला १७८४ हे वर्ष अक्षरशः कलाटणी देणारं ठरलं. त्या वर्षी दुसऱ्या जोसेफने, सेडलॅक मॉनेस्ट्री बंद केली
व ऑरलिक येथील श्वार्झनबग्जर्स यांनी या मॉनेस्ट्रीची मालमत्ता खरेदी केलले त्यांनी या मानवी कवट्या हाडांच्या सजावटीची फेररचना करण्याचं ठरवले ते काम लाकडाचं कोरीव काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कारागीर फ्रेंटिसेव रिंट याच्याकडे सोपविण्यात आलं. त्याच्याच कुटुंबातील आणखी दोघांत त्याला याकामी साहाय्य लाभलं. त्यांनी सुरुवातीला ही सर्व लहानमोठी हाड कवट्या, क्लोरिन मिश्रित चुन्याच्या निवळीने निर्जंतुक व पांढऱ्याशुभ्र केल्या सर्वप्रथम या हाडांची जी सहा पिरॅमिडस रचण्यात आली होती, त्यातील थोड्या हाडांचा त्यांनी सजावटीसाठी वापर केला व बाकीची शेजारच्याच दफनभूमीतील क्रॉसखाली गाडली.
अर्थात आज दिसणारं चर्च व तेथील कवट्यांची, हाडांची सजावट (ऑस्युअरी) ही अठराव्या शतकातील आहे. जॅन सेंटिनी आसचेल यांनी है पुनर्बाधणीचं काम मोठ्या कुशलतेने पूर्ण केलं. व्हर्जिन मेरीच्या चर्चची पुनर्रचनाही त्यांनीच केली. सेंटिनी यांनी खालच्या भागातील चर्चबरोबरच या कवट्या व हाडांच्या सजावटीला संपूर्णपणे नवं रूप दिलं. ही सजावट, नक्षीकाम प्राचीन 'बॅरोक गॉथिक' पद्धतीचं आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सेडलॅक ऑस्युअरीसाठी एकूण ४० हजार मृतांच्या अवशेषांचा वापर करण्यात आला. त्यात प्रामुख्याने नानाविध आकारांच्या कवट्या, लहानमोठी, लांब-गोल हाडं व अन्य काही अवयवांचा समावेश आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात साधारणतः २२५-२५० लहानमोठी हाडं असतात. येथे तर त्यांची संख्या कोटींच्या घरात जाते. त्या सर्वाचा वापर या चर्चच्या सजावटीसाठी करण्यात आला आहे.
चर्चची इमारत तशी छोटी दिसते. चर्चच्या बाहेर उभं असताना, अशा प्रकारची सजावट आतमध्ये पहावयास मिळेल याची पुसटशीही कल्पना येत नाही. पंधरा-वीस पायऱ्या उतरून, आपण खालच्या मजल्यावर आलो, की सुरुवातीलाच दिसतात ती प्रचंड मोठी झुंबरं. छोट्या व थोड्या लांब हाडांच्या साहाय्याने या झुंबरांची रचना करण्यात आली आहे. त्यांच्याभोवती ज्या माळा आहेत, त्यात छोट्या कवट्या व हाडं एक सोडून एक अशा प्रकारे गुंफण्यात आली आहेत. या झुंबरांची बांधणी इतकी उत्कृष्ट आहे, की ती पाहतच रहावीशी वाटतात. थोडं पुढं गेलं, की चार कोपऱ्यांत हाडांचे व कवट्यांचे भव्य चषक उभे केले आहेत. त्यांची कल्पना तर खरोखरच अफलातून म्हणावी लागेल. माणसाच्या शरीरात जी अर्धगोलाकार छोटी, छोटी हाडं असतात, त्यांना एकत्रित बांधून प्रत्येक चषकाचा पाया तयार करण्यात आला
आहे. त्यावर एक-दीड फूट उंच, विविध आकारांची हाडं उभी चिकटवली आहेत. लांब हाडं व एकसारख्या आकाराच्या कवट्या गोलाकार लावून, या भव्य चषकांची बांधणी केली आहे. सर्व चषकांच्या दोन्ही बाजूंना चौकट आहे. एकावर एक दोन आडवी हाडं व त्यावर एक एक कवटी अशी रचना करून, चौकट सजवण्यात आली आहे.
निरनिराळ्या भिंतींवरील हाडांची कवट्यांची अन्य कलाकुसरही एकदम लक्ष वेधून घेते. एका जागी तीन मोठ्या कवट्या, वर, मध्यभागी व खाली टांगल्या आहेत. मधल्या कवटीच्या चारही बाजूंना हाडांची गुंफण आहे. दोन्ही - बाजूंना हाडांच्या माळा सोडण्यात आल्या आहेत. खालच्या बाजूला कवट्यांच्या मागच्या, नुसत्या गोलाकार भागांची माळ आहे. एका ठिकाणी लांबलचक हाडांचा स्टँड करून, त्याच्यावर मध्यभागी मोठी कवटी व चारही बाजूंना, एकूण आठ लांब हाडं लावून, त्याची रचना जणू घड्याळासारखी केली आहे. असे सजावटीचे नानाविध प्रकार येथे पहायला मिळतात. या ऑस्युअरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, वेड्या-वाकड्या हाडांच्या साहाय्याने चर्चप्रमुखांच्या स्वाक्षऱ्याही तयार करण्यात आल्या आहेत. तसंच हुसाईट युद्धात जे योद्धे मारले गेले, त्यापैकी काहींची डोकी फुटली. त्या कवट्या निराळ्या ठेवल्या आहेत. ऑस्युअरीमध्ये दोन-तीन ठिकाणी भव्य लाकडांच्या कपाटांत शेकडो हाडं व कवट्या नुसत्या पिरॅमिडस्प्रमाणे एकावर एक रचून ठेवलेल्या दिसतात.
युनेस्कोने या ऑस्युअरीला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला. कवट्या-हाडं यांची सजावट आणि तीही चर्चमध्ये हे सारं अगदी वेगळं वाटतं. कोणाला सांगितलं तर त्यांचा यावर चटकन विश्वास बसत नाही. अनेकजण शिसारी आल्यासारखाच आविर्भाव करतात. ते पाहताना भीती किंवा काही विचित्र वाटलं नाही का? हा आम्हाला जवळजवळ प्रत्येकाने विचारलेला प्रश्न ! दक्षिण अमेरिकेच्या सहलीत, लीमा येथे मृत्युगुंफेतील कवट्यांनी भरलेली विहीर किंवा कंबोडियात पॉल पॉटच्या राजवटीत निघृण हत्या केलेल्यांचं स्मारक म्हणून एकावर एक ठेवलेल्या कवट्या आम्ही पाहिल्या आहेत. पण या चर्चमध्ये आणि त्या दोन्ही ठिकाणांमध्ये खूप फरक आहे. त्या दोन्ही ठिकाणचं वातावरण अंगावर अक्षरशः काटा आणणारं होतं. तिथून कधी निघतो असं आम्हाला झालं होतं. पण कुटना होराच्या या ऑस्युअरीमध्ये तसं काहीही वाटत नाही. जवळजवळ दीड-दोन तास आम्ही तिथे मजेत घालवले. प्रत्येक सजावट बारकाईने पाहिली. भरपूर फोटो काढले. आम्हाला उत्कृष्ट सजावटीचा तो अगदी आगळावेगळा प्रकार वाटला. त्यामुळे झेक प्रजासत्ताकला जरूर जा
आणि कुटना होरातील या ऑस्युअरीला निश्चित भेट द्या, असं पर्यटनप्रेमीना आवर्जून सांगावंसं वाटतं.
- या सफरीविषयी उपयुक्त माहिती
देश : झेक प्रजासत्ताक
सुमारे १२,६०,०००
राजधानी : प्राग
चलन : झेक क्रोना (युरो
क्षेत्रफळ : ७८,८६६ चौ.कि.मी.
चलनात)
लोकसंख्या : प्रागची लोकसंख्या
भाषा : पर्यटनात इंग्रजी
कसे जाल?
झेकला जाताना शेंजेन व्हिसा हवा. कुटना होराची सहल स्वतःची स्वतः करावी लागते. प्रागहून टॅक्सीने तिथे जाता येतं. इंग्रजी बोलणारे गाइड उपलब्ध.
कधी जाल?
मे ते ऑक्टोबर हे महिने उत्तम. नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत हिवाळा.
सुरक्षित
पूर्ण सुरक्षित.
पृथ्वीच्या पोटातील 'मिठाची' खाण
मिठाची खाण... तीही जमिनीखाली एक हजार फूट खोल व ३०० कि.मी. लांब, त्यात २४०० लहानमोठी दालनं, मिठाच्या उत्तम शिल्पाकृती, कलाकृती, भव्य झुंबरं, धीरगंभीर वातावरण राखणारं चर्च, अत्युत्तम खाद्यपदार्थ मिळणारे रेस्टॉरंट, तारांकित- सर्व सुखसोयींनीयुक्त 'ग्रँड सॉल्ट हॉटेल', त्यामध्ये राहण्यासाठी स्वीटस, बिलिअर्डस् हॉल, मस्त सजवलेला बारसुद्धा... पृथ्वीच्या पोटातलं नऊ मजल्यांचे भव्यदिव्य शहरच... हा अद्भुत प्रकार पहायला मिळाला, पोलंडमधील क्रॅको शहरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या 'वेलिक्झा' या मिठाच्या खाणीत...
ज्यावेळी एक किलो मीठ व एक किलो सोनं यांची किंमत सारखी होती, त्यावेळी- म्हणजे मध्ययुगापासून 'वेलिक्झा' या खाणीतून मीठ काढण्यास सुरुवात झाली. अगदी आत्ता, म्हणजे १९९६ मध्ये येथील मीठ उत्पादन बंद करण्यात आलं. पण आजही ४०० कामगार या खाणीत काम करतात. पंधराव्या शतकातसुद्धा ही खाण पाहण्यासाठी पर्यटक येत असत.
अठराव्या-एकोणिसाव्या शतकापासून आधुनिक व अत्यंत सुरक्षित पद्धतीने पर्यटकांना खाणीत उत्तमरीत्या फिरता येते, राहता येते. जमिनीखाली तिसऱ्या मजल्यापर्यंत म्हणजे जवळजवळ ५०० फूट खोल जाऊन, बावीस दालनं व दोन कि.मी.चा मार्ग चालत जाता येतो... खाणीतून मीठ काढण्याच्या फार,
फार पूर्वीपासूनच्या पद्धती प्रत्यक्ष पाहता येतात... त्यामुळेच जगातील निदान नैसर्गिक हेरिटेजच्या पहिल्या यादीतच या खाणीचा समावेश करण्यात आल दहा लाख पर्यटक दरवर्षी या खाणीला भेट देतात. यूनेस्कोच्या सांस्कृतिक आहे.
ही कहाणी आहे, सुमारे १३५ दशलक्ष वर्षापूर्वीच्या मायोसीन काळाची त्या काळी या भागात समुद्र होता. समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या मिठाच स्फटिकीकरण त्यावेळेस सुरू झालं. ज्या खडकांमध्ये आधीपासूनच मिठाचे अवशेष होते, त्यांच्यात हे स्फटिक मिसळले जाऊन 'प्री कारपॅथियन सिंक नावाचा भाग तयार झाला. भूगर्भातील प्रचंड उलथापालथींमुळे, कारपॅथियन पर्वत उचलले जाऊन, मिठाच्या साठ्यांतही मोठे बदल झाले. वेलिक्झा खाणीत मिठाचा जो साठा आहे, त्याचे दोन प्रकार आहेत. वरचा भाग 'ब्लॉक' सारखा तर खालचा भाग थरांच्या स्वरूपात आहे. या खाणीत मध्ययुगापासून मीठ काढण्यात येत होतं. सुरुवातीला पृष्ठभागावर मिठाचं भरपूर प्रमाण असलेले जे झरे होते, त्यातून उकळून मीठ काढण्यात येत असे. ही पद्धत इ.स.पूर्व ३५०० वर्षांपासून सुरू होती. हा साठा जेव्हा संपला, तेव्हा खाणीत काम करणाऱ्यांनी खोल खणण्यास सुरुवात केली. आणि मग त्यांना मिठाचे अजस्त्र खडक लागले.
सुरुवातीपासून १७७२ पर्यंत वेलिक्झा खाणीची मालकी ड्यूक ऑफ क्रॅको व त्यानंतर पोलंडच्या राजाकडे होती. ज्याच्या जमिनीत मिठाची खाण तो कुबेर, अशी त्यावेळची परिस्थिती होती. १७७२ ते १९१८ या काळात खाणीची देखभाल, ऑस्ट्रियन प्रशासनाकडे गेली. १९१८ मध्ये पोलंडला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही सर्व मालमत्ता पोलिश राज्याची झाली.
या खाणीची रचना, नैसर्गिकदृष्ट्या तर मोठी विचित्र आहेच, पण शतकानुशतकं खाण खणत गेल्याने, जमिनीच्या खाली ३२७ मीटर्स (जवळजवळ एक हजार फूट) खोल, नऊ मजले तयार झालेत. ठिकठिकाणी अतिप्रचंड ब्लॉक्स फोडल्याने, जी लहान-मोठी दालनं (चेंबर्स) निर्माण झाली आहेत, त्यांची संख्या २४०० आहे. या दालनांना जोडणारे, सहा-सात फूट रुंदीचे पॅसेजेस २४५ कि.मी. (१५५ मैल) लांबीचे आहेत. जसजशी या खाणींबद्दलची माहिती बाहेरच्या जगाला होत गेली. तसे या खाणीबद्दलचं औत्सुक्य दिवसेंदिवस वाढू लागलं. त्यामुळे पुढे वेळोवेळी खाणीत अनेक सुविधा, सोयी व पर्यटनाच्या दृष्टीने विविध आकर्षणं निर्माण केली गेली. मुख्य म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रभावी उपाय योजण्यात आले. संपूर्ण खाणीत मिठाचे ब्लॉक्स
कोसळू नयेत म्हणून ठिकठिकाणी लाकडाचे मोठमोठाले ओंडके उभे-आडवे पण आकर्षकरीत्या रचले आहेत. लाकडाच्या ओंडक्यांचा वापर करण्याचं मुख्य कारण म्हणजे, लाकडावर मिठाची प्रक्रिया होत नाही. (लोखंडावर ती होते व लोखंड गंजू लागतं.) प्रत्येक मजल्यावर, मार्गावर हे ओंडके दिसून येतात. खाणीमधील सर्व मार्ग व्यवस्थित जोडण्यात आले आहेत. अनेक लहानमोठी दालनं आकर्षक व कलात्मकरीत्या सजवण्यात आली आहेत. दोन-अडीच तासांची भटकंती झाल्यानंतर, विश्रांतीसाठी, चविष्ट अल्पोपहाराकरिता रेस्टॉरंट तर हवीच. त्याचीही सोय करण्यात आली आहे. अशा त-हेने ही खाण म्हणजे, नऊ पातळ्यांवरचा एक चमत्कारच ठरला आहे.
खाणीत प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना काही गोष्टी सुरुवातीला स्पष्ट करण्यात येतात. पर्यटकांच्या गटाबरोबर खाणीचा अधिकृत गाइड असतो. कोणीही स्वतंत्ररीत्या या खाणीची सहल करू शकत नाही. खाणीत फिरण्याचा कालावधी साधारणतः तीन तासांचा असतो. त्यात एकूण ८०० पायऱ्या चढाव्या लागतात. त्यापैकी ३८० सुरुवातीला आहेत. त्यामुळे उत्तम पादत्राणं घालणं आवश्यक असतं. खाणीत सतत १४ ते १६ डि.सें. तापमान कायम असतं. म्हणून थोडे ऊबदार कपडे घालणं जरुरीचं. आता या खाणीत एक फार उत्तम सोय झाली आहे. ती म्हणजे अपंगांनाही व्हीलचेअरवरून, संपूर्ण खाण पाहता यावी, यासाठी स्वतंत्र मार्ग, लिफ्ट तयार करण्यात आली आहे. पर्यटक त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करताना दिसून आले.
खाणीत प्रवेश करण्यासाठी अगदी प्राचीन काळातील वाटणाऱ्या पण व्यवस्थित बांधणीच्या एकावर एक दोन अशा लिफ्टस् आहेत. एका लिफ्टमध्ये आठ माणसं उभी राहू शकतात. दोन्ही लिफ्ट एकदम सुटतात... जमिनीच्या पोटात शिरताना सर्वत्र अंधार असतो... छातीत थोडी धडकी भरते... दोनशे फूट खाली गेल्यानंतर आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. तिथे व्यवस्थित दिवे होते व तिथूनच खाणीतील भ्रमंती सुरू होते. काही मजले एकमेकांना जोडण्यात आले असून, बऱ्याच ठिकाणी पायऱ्या चढून किंवा उतरून जावं लागतं. तेथील विविध दालनांना आकर्षक नावं दिली आहेत.
'दी अँटोनिया शाफ्ट टॉप' हे दालन पहिल्या व तिसऱ्या मजल्यांना जोडण्यात आलं आहे. पूर्वीच्या काळी मीठ काढण्यासाठी व त्याच्या वाहतुकीसाठी कसे मार्ग आखण्यात आले होते, याची माहिती चलचित्रांद्वारे देण्यात येते. या संपूर्ण भागात छतांना, कॉलिफ्लॉवरच्या आकाराचे मिठाचे पांढरे पुंजके लगडलेले दिसत होते. तर काही ठिकाणी स्पॅगेटीसारख्या मिठाच्या दोऱ्या
छतातून लोंबत होत्या. अशा प्रकारे वरून मीठ झिरपत होतं. या मिठाच्या स्पॅगेटी किंवा कॉलिफ्लॉवर, दर महिन्याला १ सें.मी. या वेगाने वाढतात त्यामुळे एकतर ते कापावे लागतात किंवा काढून टाकण्यात येतात. जागतिक कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ कोपर्निकस हा पोलंडचा. त्यामुळे त्याच्याही नावान एक दालन आहे. कोपर्निकसने १४९३ मध्ये या खाणीला भेट दिली होती त्यावेळी क्रॅको अकादमीमध्ये तो विद्यार्थी म्हणून शिकत होता. त्या अकादमीच्या ५००व्या वार्षिक दिनानिमित्ताने १९७३ मध्ये हिरव्या मिठाच्या दगडात त्याचं अगदी हुबेहूब शिल्प कोरण्यात आलं आहे. 'कुनेंगुडा' गॅलरीत, इ.स. पूर्व ५५००-३५०० काळातील खेड्यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या भागातील त्या काळातील असणारी घरं, शेतं, लोक, त्यांचे व्यवसाय, जीवन व संस्कृती याची कल्पना त्यावरून येते.
खाणीत काम करणं म्हणजे जीवावरचं संकटच. कधी मिठाचे ब्लॉक्स कोसळतील, किंवा झिरपणाऱ्या पाण्याचा लोंढा अंगावर येईल, याचा काहीच नेम नाही. त्यामुळे कामगारांनी खाणीतच एक चर्च बांधलं. त्यात प्रार्थना करून, ते आपल्या कामाची सुरुवात करत असत. आजही ही परंपरा सुरू आहे. अशी एक-दोन छोटी चर्चेस् आमच्या या खाणीतल्या टूरमध्ये पहायला मिळाली. त्यातील दगडात कोरलेली येशूची मूर्ती व अन्य सजावट मन आकषून घेते. कफ अली
या खाणीचं मुख्य आकर्षण आहे 'सेंट किंगाज चॅपेल'. या चॅपेलची आखणी १८९६ पासून सुरू झाली. हिरव्या मिठाच्या अतिविशाल ब्लॉक्सच्या उत्खननातून या दालनाची निर्मिती केली आहे. हे दालन ५४ मीटर्सपेक्षा जास्त लांब, १५ ते १८ मीटर्स रुंद व १०-१२ मीटर्स उंच आहे. त्यात मिठाच्या दगडात कोरलेली नानाविध आकारांची, स्वरूपांची शिल्पं पहायला मिळतात. या भव्य-दिव्य दालनाच्या छताला ठिकठिकाणी प्रचंड मोठी झुंबरं टांगली आहेत. ही पांढरीशुभ्र झुंबरं प्रकाशात लखलखत असतात. लांबून पाहिलं तर ती अक्षरशः हिऱ्यांची वाटतात. पण प्रत्यक्षात ती मिठाच्या स्फटिकांपासून बनविण्यात आली असून एका झुंबराला ३७०० क्रिस्टल्स- स्फटिकं बसवली आहेत. मिठाच्या दगडात घडवण्यात आलेल्या अनेक शिल्पांमध्ये एक शिल्प सर्वांचं लक्ष वेधून घेतं. ते म्हणजे 'लास्ट सपर'. या ऐतिहासिक शिल्पाची खोली अवघी १७ सें.मी. आहे. पण समोरून पाहिलं तर ते निदान तीन-चार फूट खोल असल्यासारखं वाटतं. अन्य बरीच शिल्पंदेखील तुमचं चित्त खिळवून ठेवतात. शिल्पाकृती करण्याचं हे काम सत्तर वर्षे सुरू होतं. सुरुवातीला
१८९५ ते १९२० पर्यंत मार्कोवस्की यांचा एक भाऊ व अँटनी, विरोडेक या कलाकारांनी या कामाची पूर्तता केली. विशेष म्हणजे हे तिघंहीजण खाणकामगारच होते. याच चर्चमध्ये सेंट किंगाज व पोप पॉल (दुसरे) यांचेही पुतळे दिसून येतात.
विविध दालनं पाहत सुमारे दोन कि.मी. चालून आपण शेवटच्या दालनात येतो. आता आम्ही जमिनीत जवळजवळ ४७५ फूट खोल आलो होतो. या शेवटच्या दालनाचं नाव आहे 'विटोल्ड बुड्रेक'. हे गृहस्थ क्रॅको येथील खाणविषयक अकादमीत प्राध्यापक होते. या दालनाची उंची ३६ मीटर्स (१०८ फूट) आहे. येथील विशेष म्हणजे 'बंजी जंपिंग'. जमिनीच्या पोटात, ५० फुटांवर, धाडसी वीर बंजी जंपिंगची मजा येथे लुटू शकतात. अर्थात अन्य पर्यटकांसाठी विश्रांतीचीही सोय आहे. त्याला लागूनच 'वॉर्सा चेंबर'मध्ये बिलिअर्डस्, अन्य खेळ तसंच विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची सोय केली आहे. त्याच्याच एका भागात रेस्टॉरंट असून इथे चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
वेलिक्झा खाणीत पूर्वी अडीच लाख टनापर्यंत मीठ उत्पादन काढण्यात येत असे. मोठ्या प्रमाणात मिठाची निर्यातही होत असे. आमची टूर गाइड मायकाने सांगितलं, की नॉर्वे हे त्याकाळी मासेमारीमुळे श्रीमंत राष्ट्र झालं होतं. मासे टिकवण्यासाठी मिठाची मोठ्या प्रमाणात गरज लागे व ते मीठ पोलंडहून निर्यात होत असे.
कोणत्याही खाणीत काम करणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असतं. फुप्फुसाचे विकार व पर्यायाने अल्पायुष्य हे तेथील कामगारांच्या पाचवीलाच पुजलेलं ! पण मीठ खाणीतील कामगार मात्र याबाबतीत कमालीचे सुदैवी म्हणावे लागतील. मिठाच्या खाणीतील वातावरण, तेथील विशिष्ट हवामानामुळे आरोग्यास उपयुक्त ठरतं. या खाणीत काम करणाऱ्यांची प्रकृती उत्तम राहून त्यांचं आयुष्यही वाढतं असं सिद्ध झालं आहे. केवळ मनुष्यप्राण्याच्या बाबतीत हा चमत्कार आढळून येतो असं नाही. तर जनावरांनाही हाच नियम लागू पडतो. वेलिक्झा खाणीत पूवी वाहतुकीसाठी घोड्यांचा वापर करण्यात येत असे. वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या घोड्यांचंही आयुष्य वाढल्याचं तपासणीत वेळोवेळी आढळून आलं आहे. त्यामुळेच नाक, घसा इ. विकार असलेल्यांनी या खाणीत आवर्जून वास्तव्य करावं असं म्हटलं जातं. वेलिक्झा खाणीत राहण्यासाठी चार तारांकित हॉटेलची कल्पना यातूनच साकार झाली. त्याला उत्साही पर्यटकांकडून प्रतिसाद न मिळाला तरच आश्चर्य.
जवळजवळ तीन तास, आम्ही पृथ्वीच्या पोटात, ५०० फुटांपर्यंत भटक होतो. ना श्वसनाला त्रास जाणवत होता. ना चालायला. पायऱ्या चढतान उतरताना थकवाही अजिबात वाटला नाही. नागपूरजवळच्या काही कोळशाच्य खाणींमध्ये मी गेलो आहे. तिथे मात्र आत गेल्यावर कधी एकदा बाहेर पडतो असं होऊन जातं. पण इथे अगदी प्रसन्न वाटत होतं. अर्थात 'बरोबरच्या हा गाइडला सोडून जाऊ नका,' 'फार मागे राहू नका,' आदी सूचना सतत देण्यात येतात. कारण ते धोकादायक ठरू शकतं. पाचशे फूट खोल खाणीत आल्यानंतर, परत लिफ्टनेच वरती नेण्याची सोय केली आहे. या नऊ मजली अद्भुत विश्वातून बाहेर आल्यानंतर, खरोखरच जगातील एक आश्चर्य पाहिल्याचा आनंद मिळतो...
- या सफरीविषयी उपयुक्त माहिती
देश : पोलंड
लोकसंख्या : ३७,६६४,०००
राजधानी : वार्सो
चलन : पोलिश इलॉटी
क्षेत्रफळ : ३,१२,६८५ चौ.कि.मी.
भाषा : पोलिश
कसे जाल?
पोलंडला जाण्यासाठी शेंजेन व्हिसा आवश्यक आहे. पोलंडची राजधानी वॉर्साहून, विविध मार्गांनी क्रॅको येथे जाता येतं. क्रॅको वेलिक्झा अवघं १० कि.मी. अंतर आहे. रेल्वे, बस, मोटारीची उत्तम सोय.
कधी जाल?
वर्षातील कोणत्याही महिन्यात जाऊ शकता. अर्थात हिवाळ्यात तापमान ०° सें. पर्यंत येतं. मात्र सॉल्ट माइनची सहल आधी बुक करणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्रजी गाइड उपलब्ध होतो.
[26/05, 4:52 pm] Swapnil Jirage: 'आउशवित्झ कँप' : नाझी नरसंहार
ज र्मन नाझींनी ज्यूंवर केलेल्या भयानक अत्याचारांच्या कहाण्या, लेख, पुस्तक, चित्रपट यांद्वारे आत्तापर्यंत माहिती होत्या. त्या कहाण्या वाचताना प्रत्येक वेळी अंगावर काटा उभा राही. मनुष्यप्राणी एवढा निघृण, निर्दय होऊ शकतो, यावर विश्वासच बसत नसे. हिटलरचा आधुनिक अवतार म्हणजे कंबोडियाचा पोल पॉट. गेल्यावर्षी कंबोडियाच्या भेटीत, या पोल पॉटच्या 'एस-२१' या नरकभूमीला भेट दिली. त्याने लाखो लोकांना हाल-हाल करून मारलेल्या त्या भूमीवर पाय ठेवताना संताप व भीती अशी संमिश्र भावना निर्माण झाली. यावर्षी पोलंडच्या दौऱ्यात क्रॅकोजवळचा 'आउशवित्झ' हा नाझींचा सर्वात मोठा 'कसाईखाना' पाहिला. यमालासुद्धा लाजवेल अशा क्रौर्य कहाणींची परिसीमा येथे गाठली गेली. जिथे कमीत कमी १५ लाख ज्यूंना अनंत यातना देऊन मारण्यात आलं, त्या जमिनीवर आपण प्रत्यक्ष उभे आहोत, ही कल्पनाच अक्षरशः हादरवून सोडणारी होती.
वस्तुतः या कॅपला भेट देण्यासाठी आमची सकाळची वेळ निश्चित झाली होती. पण सहलसंचालिकेने सांगितलं, की "मी कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. दिवसाची सुरुवात, या जागेला भेट देऊन करावी असं मला वाटत नाही. सारा दिवस सुन्न होऊन जातो, असा माझा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे परिसरातील अन्य काही प्रेक्षणीय स्थळं पाहून मग दुपारनंतर आपण
आउशवित्झला जाऊ." सहलसंचालिकेने घेतलेला हा निर्णय अगदी बरोब होता, याची खात्री कँप भेटीनंतर आम्हा उभयतांना लगेच पटली... त्यादिवश रात्री कोणाच्याच घशाखाली अन्न उतरलं नाही...
क्रॅकोपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर पश्चिमेला 'Oswiecim' (ओस्विकिय नावाचं गाव होतं. सप्टेंबर १९३९ मध्ये या गावाचा ताबा नाझींकडे आला अगदी एकांतवासात शांत व जंगलांनी वेढलेला असा तो परिसर होत नाझींनी त्याचं नाव बदलून आउशवित्झ असं ठेवलं.
पहिल्या महायुद्धातील पराभवास ज्यूच जबाबदार असल्याने, त्यांचा अंश शिल्लक ठेवावयाचा नाही, असं ब्रीदच हिटलरने वेळोवेळी जाहीर केलं होते व त्यादृष्टीने ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात झाली. त्यासाठी पोलंडमध्ये अनेक छावण्या (कँप्स) उभारण्यात आल्या. आउशवित्झ हा त्यातील सर्वात मोठ कँप. हिटलरचा अत्यंत निकटचा सहकारी हायन्निश हिमलर याच्या आदेशान्वये एप्रिल १९४० मध्ये उपनगरात या कँपची बांधणी केली गेली. हिटलर हिमलर या सर्वांचा कमालीचा विश्वास संपादन केलेल्या रुडॉल्फ हॉस याच्याकडे आउशवित्झची सर्व सूत्रं सोपविण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धात पोलंड असं एकमेव राष्ट्र होतं, की जेथे ज्यूंना मद करण्याबाबत जाहीरपणे बोलल्यास, अधिकृतपणे मृत्युदंडाची शिक्षा सुनावलं जाई. त्यामुळे ज्यूंना साहाय्य केलं, या आरोपाखाली हजारो पोलिश लोकांचीहं हत्या करण्यात आली. पोलंडमधील सहा लाख ज्यूंना त्यांच्या वस्तीतच यमसदनास पाठवण्यात आलं. आणि सात लाखांपेक्षाही अधिकांची रवानग कँपमध्ये करण्यात आली. आउशवित्झ छावणीत अन्य युरोपीय देशांतून विशेषतः हंगेरी वगैरे ठिकाणांहून आणण्यात आलेल्या कैद्यांची संख्याही प्रचंड होती. पुढे पुढे तर ही छावणीही अपुरी पडू लागली. त्यामुळे त्याच्यापासून चार-पाच कि.मी. अंतरावर बिर्केनाऊ येथे आणखी एक कँप उभारण्यात आला. रोजच्या रोज हजारोंनी कैदी या दोन्ही छावण्यांत भरती करण्यात येत असत. प्रत्येक दिवसाची आवक मोठी व त्यामानाने मरणाऱ्यांचं प्रमाण कमी. त्यामुळे हे दोन्ही कँप स्त्री-पुरुष-मुलं यांनी नुसते भरभरून वाहत होते. नाझी सैनिक रोज नानाविध क्लृप्त्या काढून, जास्तीत जास्त हाल करून ज्यूंच्या जीवनाचा शेवट करत होते.
आम्ही आउशवित्झ आणि बिर्केनाऊ या दोन्ही छावण्यांना भेट दिली. तेथील अधिकृत गाइड, अत्यंत धीरगंभीर वातावरणात, प्रत्येक जागेची, वास्तूंची माहिती देतो. त्यामुळे तो सारा इतिहासच आपल्यासमोर उभा राहतो.
या क्रौर्य कहाणीची सुरुवात मालगाडीच्या डब्यांपासून होते. बिर्केनाऊ कँपमध्ये प्रवेश करताच समोरच्या रेल्वेमार्गावर दिसतो तो मालगाडीचा एक डबा. अशा शेकडो डब्यांमधूनच (वॅगन्स) ज्यूंना या छावण्यांत आणण्यात आलं. वस्तुतः मालगाडीच्या या डब्यांची निर्मिती जर्मनीने युरोपात मालाच्या ने-आणीसाठी केली होती. पण दुसऱ्या महायुद्धात याच वॅगन्सचा उपयोग, ठिकठिकाणहून लाखो ज्यूंची रवानगी ऑउशवित्झ कँपमध्ये करण्यासाठी केला गेला. हंगेरीहून तर हजारो ज्यूज येथे आणण्यात आले. त्यात स्त्रिया-लहान मुलं, विद्वान व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती, शास्त्रज्ञ या सर्वांचाच समावेश होता. आपल्याला कोठे नेण्यात येत आहे, याची त्यांना काहीच कल्पना नसायची. फक्त त्यांच्या सामानासह त्यांना डब्यांत अक्षरशः कोंबण्यात येत असे. जेमतेम ४०-५० माणसं मावू शकतील अशा एका डब्यात तीन-चारशे लोकांना मेंढरांसारखं भरण्यात येई. दोन-तीन दिवसांचा प्रवास असे. काही वेळेस वॅगनमधील मुक्काम लांबे. कारण उतरण्यासाठी फलाटांवर जागाच नसे. डब्यात हवा नाही, खायला काही नाही, प्यायला पाणी नाही, सर्व विधी एकमेकांच्या अंगावरच करावे लागत. त्यामुळे डब्यातल्या डब्यातच गुदमरून, अनेकांचा शेवट व्हायचा...
आउशवित्झच्या काळ्याकुट्ट कहाणीची सुरुवात या वॅगन्सपासून होते. त्यामुळेच ज्यूंच्या प्रत्यक्ष वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला एक डबा, २००९ मध्ये एक कटू आठवण म्हणून, कँपमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला. तो डबा कसा मिळवला याची कहाणीही महत्त्वाची आहे, कोणाचे वडील, कोणाची पत्नी, कोणाचा भाऊ अशा सर्वांनाच वॅगनमधून प्रवास करावा लागला. त्यामुळे लाखो ज्यूंच्या भावना या वॅगनशी जोडल्या गेल्या. त्यातूनच एक ज्यू, मूळ डबा मिळतो का, याचा शोध घेत होता. १९४४ मध्ये तो १३ वर्षांचा असताना, त्याचे वडील हंगेरीतून बेपत्ता झाले. अशाच डब्यातून त्यांची रवानगी झाली असणार याची खात्री त्याला पटली... मालगाडीच्या डब्याचा शोध घेत असताना त्याच्या प्रयत्नांना यश आलं. रेल्वेच्या जुन्या अवशेषांचा संग्रह करण्याची आवड असलेल्या एका व्यक्तीकडे जर्मन डच सीमेवर हा मूळ डबा २००८ मध्ये मिळाला. आणि त्याने ती वॅगन, आउशवित्झ कँपच्या म्युझियमला भेट म्हणून दिली- छळछावणीच्या भयानक व निघृण इतिहासाचा पहिला साक्षीदार असलेला मालगाडीचा 'डबा' येथे पहावयास मिळतो.
हंगेरी तसंच अन्य दहा युरोपियन देशांमधून ज्यूंना, मालगाडीच्या डब्यांतून, सर्वप्रथम वॉर्सोपासून शंभर कि.मी. अंतरावर असलेल्या ट्रेबालिका या छोट्या
स्थानकावर आणण्यात येत असे. तिथून गटागटाने आउशवित्झ्ज्ञ छावणीच जवळ बांधण्यात आलेल्या फलाटांवर उतरवण्यात येई. इथे त्यांना खुल्य हवेत पहिला श्वास जरी घेता आला तरी इथूनच त्यांच्या दुर्दैवाचा दुसरा अखेरचा अंक सुरू होई. या तथाकथित कैद्यांमध्ये अनेक श्रीमंत व्यक्ती असत. घरदार, मालमत्ता विकून आलेल्या त्यांच्याकडे रोख रक्कम, सोने हिरे, अन्य मौल्यवान वस्तू असत. नाझी सैनिक ते सर्व आपल्या ताब्यात घेत जिथे ही मालमत्ता जमा करून ठेवत तो भाग 'कॅनडा' या नावाने ओळखल जाई. त्याकाळी कॅनडामध्ये अशा किमती वस्तू मिळत असल्यामुळे युरोपियनांन कॅनडाचं मोठं आकर्षण वाटत असे. त्यावरून कॅनडा हा शब्द येथे प्रचलि झाला.
कॅनडात सर्व सामान खाली करून घेतल्यानंतर कैद्यांचं दोन भागांत वर्गीकरण करण्यात येत असे. एका गटात शारीरिकदृष्ट्या धट्टेकट्टे- मेहनतीचं कामं करू शकणारे व दुसऱ्या गटात दुर्बल स्त्री-पुरुष आणि मुलं. या धडधाकट लोकांना त्वरित कष्टाच्या कामांवर जुंपण्यात येत असे. उदा. शेती, मजुरी त्याखेरीज मेलेल्या माणसांचे मुडदे उचलणे, त्यांची कातडी सोलणे इ. कामंहं त्यांना करावी लागत. त्या भागात कमालीची थंडी पडत असे. तापमान उप १५, उणे २० डि.सें.पर्यंत उतरे. या कडाक्याच्या थंडीशी सामना करण्यासाठ पुरेसे कपडे तर सोडूनच द्या, पण साधी पादत्राणंही त्यांना दिली जात नसत परिणामतः चार-पाच दिवसांतच ते अखेरचा श्वास घेत. त्यांची जागा घेण्यासाठ नवीन वॅगन्समधून आणखी कैदी येतच असायचे!
दुसरीकडे स्त्रिया, मुलं आणि दुर्बल लोकांना आउशवित्झ छावणीत दाखल करण्यात येत असे. स्त्रिया व त्यांच्या मुलांना कँपमध्ये नेताना, नाझी सैनिक मोठं 'उदार' धोरण स्वीकारीत. ते म्हणजे आया व मुलं यांची फारकत करण्यात येत नसे. त्यांना एकत्रच पाठवण्यात येई. पण त्यामागे त्यांचा असा उद्देश होता की जर आई व मुलं यांची ताटातूट केली तर तिथे आक्रोश सुरू झाला असता.
आउशवित्झ कॅपचा परिसर जवळजवळ ५० चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा होता. येथील काही, एकमजली इमारती आधीच बांधलेल्या होत्या. सुरुवातीला त्यांची संख्या बावीस होती. त्यानंतर एकूण अठ्ठावीस ब्लॉक्स (इमारती) येथे उभे राहिले. प्रत्येक ब्लॉकची वेगळी कहाणी... थरकाप उडवणारी... जवळजवळ १५ लाख स्त्री-पुरुष-मुलांना या छावणीत हाल-हाल करून मारण्यात आलं. मारण्याची पद्धत सर्वत्र निरनिराळी... सर्व ब्लॉक्समध्ये नेऊन, कँपचा गाइड
आम्हाला त्याची माहिती देत होता.
काही ब्लॉक्समध्ये स्त्री-पुरुष-मुलं या 'कैद्यांचे' फोटो लावले होते. त्याच्या खाली तो कैदी कँपमध्ये कोणत्या तारखेला आला, त्याचा 'गुन्हा' (अर्थात बनावट) काय व कोणत्या दिवशी तो मरण पावला याची नोंद होती. त्यावरून छावणीत सर्वांचा मुक्काम जेमतेम दोन-तीन दिवस असल्याचं दिसून येतं. पुढे पुढे तर एक दिवसच ते येथे राहिल्याचं आढळून येतं. त्यामुळे ही नोंद ठेवणंच तुरुंग अधिकाऱ्यांनी बंद केलं.
आउशवित्झ छावणीत ११ नंबरची इमारत हा 'डेथ ब्लॉक' म्हणून ओळखला जाई. ज्यूंना येथे तीन प्रकारे मारण्यात येत असे. १) उपाशी ठेवून (Starvation) २) हवा-पाणी काहीही न देता गुदमरून टाकून. ३) दोन पायांवर सतत उभं ठेवून. उपाशी ठेवून मारण्याच्या खोल्या साधारणतः २०×१० फूट एवढ्या आकाराच्या होतया. एका खोलीत चारशे-पाचशे जणांना अक्षरशः कोंबण्यात येत असे. त्याच्या एका बाजूला असलेल्या काचेतून, नाझी सैनिक मस्त खात, पीत असल्याचं दिसायचं. या कोठडीत मुलं, महिला एक-दोन दिवसांतच प्राण सोडत असत. पुरुष वर्गसुद्धा तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळ तग धरत नसत. काही खोल्या पूर्णतः बंद असायच्या. फक्त थोडा उजेड येण्यासाठी वरच्या बाजूस ५०५ सें.मी.ची काचेची बंद खिडकी ठेवलेली असायची. इथेही असंच हाल करून मारण्यात येत असे. अक्षरशः गुदमरून, अनेकजण काही तासांतच अखेरचा श्वास घेत. दिवसच्या दिवस पायावर उभं ठेवून मारण्याच्या छोट्या खोल्या फारच भयंकर म्हणाव्या लागतील. त्यात सरपटत जाऊन प्रवेश करावा लागे. अशा तीन खोल्या तळमजल्यावर होत्या. ज्या खोलीत जेमतेम चार-पाच माणसं उभी राहू शकतील त्यात ७०-८० माणसं कोंबण्यात येत. नाझी सैनिक बंदुकीच्या दस्त्यांनी लोकांना आत ढकलत. विवस्त्र अवस्थेतील स्त्री-पुरुष-मुलं काही तासांतच हाल-हाल होऊन मरत.
या सर्व मार्गांनी यमसदनास पाठवण्यास, त्यांच्यादृष्टीने थोडा विलंब लागत असे. हा वेग वाढवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून वारंवार येत. गोळ्या घालून मारणं हा फारच 'सुखकर' मार्ग असल्याचं नाझींचं म्हणणं असायचं. त्यामुळे जास्तीत जास्त मरणयातना होऊन, तडफडून, अधिकाधिक ज्यूंना कसं मारता येईल यावर विचारविनिमय सुरू झाला. आउशवित्झमध्ये यासाठी एक प्रयोगशाळाही उघडण्यात आली. तेथे हाल करून मारण्याच्या विविध पद्धतींवर संशोधन सुरू झालं. बऱ्याच प्रयत्नांनंतर एक नामी क्लृप्ती शोधून
काढण्यात आली. आउशवित्झच्या परिसरात प्रचंड मोठमोठे डास व कीटक होते. त्यांना मारण्यासाठी 'क्रिस्टलाइज्ड प्रॉसिक अॅसिड' (सायनाइड) के झीक्लॉन-बी या नावाने ओळखलं जाई त्याचा वापर केला जात असे. ते इतके जहरी होतं, की त्याने हिंस्त्र जनावरंही सहज मारली जात. त्याच्या साहाय्या माणसं मारण्याचं ठरलं. तो प्रयोग यशस्वी ठरला. त्यातूनच 'गॅस चेंबरची कल्पना निघाली.
आउशवित्झ छळछावणीत जमिनीखाली तळघरात गॅसचेंबर्स बांधण्यान आलं. त्यात मोठमोठाले ओव्हन उभे केले. झीक्लॉन-बीचे डबेच्या डवे पिंपच्या पिंप तिथे आणण्यात आली. गॅस चेंबरची बांधणी ज्यू कैद्यांकडूनच करून घेण्यात आली. तळघरातील हे चेंबर्स हवाबंद होते. चेंबरच्या वरर्त मोठमोठाले शॉवर्स बांधून, त्यातून अॅसिडचा फवारा कैद्यांवर करण्याची सोय होती. त्याच्या एका बाजूला मोठी काच बसवण्यात आली. त्यातून आतील दृश्य नाझी पाहू शकत असत. हवाबंद खोलीत दाटीवाटीने उभ्या असलेल्या ज्यूंवर अॅसिडचे फवारे जोरात मारण्यात येत. त्यात अक्षरशः भाजून, त्यांची तडफड होई. अंगावरची कातडी लोंबकळू लागे. याचाच मोठा आसुरी आनंद नाझींना होत असे. एका वेळी सहाशे जणांना मारण्याची सोय येथे होती. भाजून काळी ठिक्कर पडलेल्यांची प्रेतं उचलून खंदकांत पुरण्याचं कामहं ज्यूंच्या अन्य बांधवांनाच करावं लागे. आजही गॅस चेंबरची इमारत जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. आतील धीरगंभीर वातावरणात, जणू सारं दृश्य समोर उभं राहतं. मन कमालीचं विषण्ण होतं. त्या दुर्दैवी जीवांना मूक श्रद्धांजली वाहून विचित्र मनःस्थितीत आपण बाहेर येतो.
या छावणीतील काही इमारतींमध्ये त्या काळातील अत्याचारांची कल्पना देणारी भव्य चित्रं लावण्यात आली आहेत. काही ज्यू कैद्यांनी जीव धोक्यात घालून, ती छायाचित्रं काढली व गुप्तपणे कँपबाहेर पाठवली. छावणी परिसरात,
लाखो दुर्दैवी ज्यूंची जी पादत्राणं सापडली ती काचेच्या दोन-तीन दालनांत ठेवण्यात आली आहेत, त्यात अगदी छोट्या बालकांचे बूटही दिसून येतात. वॅगन्समधून येथे येताना, ज्यू स्त्री-पुरुषांकडे सामानाच्या बॅगा असत. फलाटावर त्या काढून घेण्यात येत. त्यांच्यावर त्यांचे पत्तेही असत. या बॅगा येथे पहायला मिळतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे झीक्लॉन-बीचा वापर कैद्यांवर विषारी फवारणीसाठी केला जाई. त्याचे शेकडो रिकामे डबेही म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत.
म्युझिमच्या एका दालनात आलं की, तर सारं वातावरण कमालीचं सुन्न
होऊन जातं. या छळछावणीत असह्य यातनांनी तडफडून मरण पावलेल्या त्या लाखो ज्यू महिला, मुलं-मुली यांचे केस काचेच्या घरांत ठेवण्यात आले आहेत. त्या केसांचं वजन साडेसात हजार किलो आहे. त्यावरून, केवढ्या प्रचंड प्रमाणात स्त्री-संहार आउशवित्झमध्ये करण्यात आला होता, याची कल्पना येते. या दालनामध्ये छायाचित्रं काढण्यास बंदी आहे.
-
आउशवित्झ छावणीत हालहाल करून ज्यूंना मारण्याची जणू स्पर्धाच लागली होती. रोज नवीन क्लृप्त्या शोधण्यात येत. कधी जंगली कुत्री अंगावर सोडून शरीराचे लचके तोडून मारणे, कधी विवस्त्र करून फटक्यांची शिक्षा, कधी डोळे, नखं, सालटी काढून बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालणे... असे कितीतरी प्रकार... या सर्वाचा मुख्य सूत्रधार होता, छावणीचा प्रमुख रुडॉल्फ हॉस. कँपला लागूनच त्याचा भव्य बंगला होता. ज्यूंना मारण्याच्या नानाविध विकृत कल्पना त्याला इथेच सुचत असत. १९४४-४५ मध्ये चित्र बदलू लागलं. महायुद्धात सर्वत्र जर्मनीचा पराभव होऊ लागला. त्यामुळे कँपमधील नरसंहाराचे सर्व पुरावे नष्ट करण्याच्या मागे नाझी सैनिक लागले. हॉस आपल्या बायको-मुलांसह तिथून पळून गेला. पुढे त्याला पकडून आउशवित्झ छावणीत आणण्यात आलं. जेथे त्याने पाशवी अत्याचारांची परिसीमा गाठली, त्याच जागी तसंच हालहाल करून त्याला मारण्याची कल्पना होती. पण त्यावेळी तिथे जमलेल्या जनतेच्या भावना एवढ्या प्रक्षुब्ध होत्या, की त्यातून काहीतरी विपरीत घडू शकलं असतं. म्हणून तो निर्णय मागे घेऊन दोन-तीन दिवसांतच हॉसला फाशी देण्यात आली. कँपमधील सर्व अठ्ठावीस इमारती व विशेषतः ११ नंबरची इमारत जेथून दिसत होती, त्या जागेवर फाशीचा स्तंभउभारण्यात झाला. अर्थात फाशी देतानाही हॉसचा चेहरा निर्विकार होता. प्रायश्चित्ताची पुसटशी छटाही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती...
जवळजवळ तीन-साडेतीन तास आम्ही आउशवित्झ कँपमध्ये फिरत होतो. आता युनेस्कोने हा सारा परिसर 'वर्ल्ड हेरिटेज' म्हणून जाहीर केला आहे. नाझी नरसंहाराची जी कहाणी पुस्तकांतून वाचली होती, चित्रपटांतून पाहिली होती, तो सारा इतिहास जणू डोळ्यांसमोर उभा राहिला... स्वतःला संवेदनशील म्हणवणारा मनुष्यप्राणी इतका निर्दय बनू शकतो यावर विश्वास बसत नव्हता... पण आउशवित्झ कँप त्याची प्रत्यक्ष साक्ष देत होता...
अलास्का :
देनाली नॅशनल पार्क
अ लास्का हा अमेरिकेचा 'लास्ट फ्रंटिअर' म्हणजे अमेरिकेने सर्वात शेवटी विकत घेतलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. १८६७ मध्ये रशियाकडून एकरी दोन सेंट या भावाने अमेरिकेने त्याची खरेदी केली. इथली वस्ती अगदी कमी, पण आकाराने मात्र तो भव्य-दिव्य. अमेरिकेच्या ४८ प्रांतांपैकी जवळजवळ एकपंचमांश जागा एकट्या अलास्काने व्यापली आहे. तिथल्या निसर्गसंपत्तीचं वर्णन ते काय करावं? जगातील एकूण ग्लेशिअर्सपैकी निम्म्याहून अधिक ग्लेशिअर्स इथे आहेत. तिथल्या विस्तीर्ण तलावांची संख्या तीन लाखांच्या घरात जाते. साडेचौदा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीची ११ शिखरं त्यात डोकावतात आणि उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च मानलं जाणारं मॅकेनली पर्वताचं २०,२३० फुटांवरचं शिखरही अलास्कामध्येच आहे.
अशा या अलास्काची पहिली सफर बोटीतून केली होती. पण दुसऱ्या वर्षी अलास्कातील सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या अँकरेज शहरापासून एका अगदी आगळ्या-वेगळ्या सहलीची आखणी केली. अँकरेजचा संपूर्ण परिसर तर पहायचाच, पण अलास्कातील गोल्ड रशच्या काळात नावारूपाला आलेल्या कॅनडातील युकॉन प्रांताचाही परिचय करून घ्यायचा असं ठरवलं. तिथून परत अलास्कात शिरून, लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या फेअरबँकची वैशिष्ट्यं जाणून घ्यायची आणि मग अलास्काचं मुख्य आकर्षण असलेल्या 'देनाली नॅशनल पार्क'मध्ये चार-पाच दिवस मनसे भटकंती करायचा बेत आखला. एकूण वीस-बावीस दिवसात सुमारे सव्वा के हजार कि.मी.चा प्रवास प्रामुख्याने मोटारीने व काही बोटीने केल्यानंतर । अलास्का उलगडला, तो अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. तिथलं निसर्गस त्यातील विविधता, निसर्गाचा लहरीपणा, नानाविध प्राणी, पक्षी, मानवी जीव त्यांची संस्कृती, सारंच काही आगळं-वेगळं... कल्पनेच्याही पलीकडचं... मुंबईहून अँकरेजला जाण्यासाठी थेट विमान नाही. त्यामुळे काँटिनेंट एअरलाईन्सचं मुंबई-न्यू यॉर्क (१६ तास), नेवार्कला तीन तासांचा मुका होता. मग नेवार्क सिएटल (सहा तास) व सिएटल-अँकरेज (तीन तास) अ २८ तासात १३,५०० मैलांचं अंतर कापून आम्ही अँकरेज गाठलं. पा सभोवतालची बर्फमय पर्वतराजी व खाली अथांग प्रशांत महासागराचे मनोह दृश्य पाहून शीण कुठल्या कुठे पळाला...
अलास्काची खरेदी अमेरिकेने १८६७ मध्ये केली असली तरी प्रत्यक्षा अलास्काला राज्याचा दर्जा ९२ वर्षांनी म्हणजे १९५९ मध्ये मिळाला. पा २७ मार्च १९६४ची गुडफ्रायडेची संध्याकाळ ही अँकरेज व अलास्काच अन्य भागांच्या दृष्टीने काळ संध्याकाळ ठरली. त्या दिवशी सायंकाळी। वाजून ३६ मिनिटांनी सारं अलास्का प्रचंड भूकंपाने हादरलं. त्याची क्षमत ९.२ रिश्टर इतकी होती व तो जवळजवळ पाच मिनिटं टिकला. उत अमेरिकेतील तो सर्वात मोठा तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भूकंप. भूकंपाच केंद्रबिंदू अँकरेजपासून अवघ्या ७० मैलांच्या अंतरावर होता. त्यात १११ जण मृत्युमुखी पडले व पाच मिनिटात २०५ दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झालं. अँकरेजच्या मुक्कामात या भूकंपावर आधारित एक फिल्म पाहिली निसर्ग क्षणात होत्याचं नव्हतं कसं करून टाकतो, याचं दर्शन त्यातून घडलं पण आजच्या अँकरेजमध्ये त्याच्या पुसटशा खुणाही दिसून येत नाहीत. ज्युने ही अलास्काची राजधानी असली, तरी अँकरेज हेच अलास्कातील महत्त्वाचं शहर. पर्यटन, तंत्रज्ञान यात या शहराने जबरदस्त आघाडी घेतली आहे. तेल व मासळीच्या निर्यातीचं ते महत्त्वाचं केंद्र आहे. ते जणू अलास्काचं प्रवेशद्वारच मानण्यात येतं. त्यामुळे बोटीने, विमानाने जगातील पर्यटक प्रथम या शहरात येतात आणि मग निरनिराळ्या भागांकडे रवाना होतात.
अँकरेजमध्ये टोकाचं हवामान नसतं. त्यामुळे अलास्कातील साठ टक्के जनता अँकरेजमध्येच राहते. त्याच्या सभोवताली चुगाज पर्वतांचा वेढा आहे. पण पॅसिफिक महासागराचं इथलं पाणी काहीसं राखाडी रंगाचं आहे. विशेष म्हणजे या पाण्यात ग्लेशिअर फ्लॉवर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यात खेचून घेण्याची (सक्शन फोर्स) शक्ती अतिप्रचंड असते. 'त्यामुळे हे फ्लॉवर ग्लेशिअर्स व चिखल, पोहायला उतरणाऱ्यांचे अक्षरशः कर्दनकाळ असतात. आम्ही तिथे गेलो, त्याच्या काही दिवस आधी पोहणाऱ्या एका माणसाचे पाय त्यात अडकले होते. ते निघता निघेनात. अखेर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्याला खेचण्याचा प्रयत्न झाला. पण तोही अयशस्वी ठरला.
सहलीचं मुख्य आकर्षण होतं, अर्थातच अलास्काचं वैशिष्ट्य मानला जाणारा 'देनाली नॅशनल पार्क.' त्यासाठी फेअर बँकहून खास रेल्वे गाडीने देनालीकडे रवाना झालो. प्रवासात आजूबाजूचं निसर्गसौंदर्य पाहता यावं, म्हणून अलास्का रेल्वे बोर्डाने या गाडीसाठी खास पद्धतीचे डबे तयार केले आहेत. त्यांना 'डबल डेकर डुम कार्स' असं म्हटलं जातं. बरेच डबे, डबल डेकर म्हणजे दोन मजल्यांचे असतात आणि डब्यांच्या खिडकीपासूनचा छताचा सर्व भाग काचेचा असतो. त्यामुळे सभोवतालच्या सृष्टिसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. इतकंच नव्हे तर इंजिनपासून पहिल्या व शेवटच्या डब्यांना उघडी गॅलरी असते. त्यात उभं राहूनही फोटोग्राफी करता येते. गाडीची अंतर्गत सजावट अलास्काच्या सौंदर्याला साजेशीच होती. आतलं वातावरणही अगदी नैसर्गिक असल्यामुळे एखाद्या जंगलात बसूनच तुम्ही वाईनचे घोट घेत आहात, असं वाटत होतं. अत्यंत कठीण, डोंगराळ भागातून ही रेल्वे काढण्यात आली आहे. भरपूर चढ, वळणावळणाचा मार्ग व वाफेचं इंजिन यामुळे गाडीचा वेग तसा हळूच असतो. पण त्यामुळेच अलास्काचं सौंदर्य आपण डोळ्यात भरभरून साठवू शकतो. पाईन वृक्षांची घनदाट झाडी, अलास्कन पर्वतांच्या रांगा, त्यावरील पांढराशुभ्र व मधूनच उन्हात चकाकणारा स्नो, खळखळून वाहणाऱ्या जणू दुधाच्या नद्या, लांबच लांब पसरलेले व सागराप्रमाणे वाटणारे तलाव... किती पाहू असं होऊन जातं. त्यामुळे चार तासांचा प्रवास संपून देनाली नॅशनल पार्क रेल्वे स्टेशन कधी आलं ते समजलंसुद्धा नाही.
देनाली नॅशनल पार्क हा पूर्वी माऊंट मॅकेनली पार्क म्हणून ओळखला जायचा. निरनिराळ्या धाडसी विक्रमांसाठी येणाऱ्या, गिर्यारोहकांच्या आश्रयासाठी १९१७ मध्ये मॅकेनली पार्कची स्थापना केली होती. या पार्कमध्ये उत्तर अमेरिकेतील मॅकेनली पर्वताचं सर्वोच्च शिखर व आजूबाजूच्या पर्वतांचाही समावेश होता. पण १९८० मध्ये 'अलास्का नॅशनल इंटरेस्ट लँड कॉन्झव्हेंशन' मंडळाने या पार्कच्या सीमा चाळीस लाख एकराने वाढवल्या. त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि साठ लाख एकरांचा देनाली नॅशनल पार्क अस्तित् आला. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स प्रांतापेक्षाही त्याचं क्षेत्रफळ अधिक आहे अत्युत्कृष्ट निसर्गसौंदर्य, विविध जातींचे प्राणी, पक्षी, यांचं सर्वोत्तम उ करणारा व पर्यावरणाचं तंतोतंत पालन होणारा, जगातील एक अत्यंत महत्त्वाच पार्क म्हणून त्याने स्थान प्राप्त केलं आहे. देनाली याचा अर्थ स्थानिक भाषे 'महान.' खरोखरच हा पार्क सर्वार्थाने महान ठरला आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणतं? याचं उत्तर, अर्थात माऊंट एव्हरेस पण पर्वताची उंची पायापासून मोजली तर, मॅकेनली हे सर्वोच्च शिख असल्याचं उत्तर अमेरिकेत मानण्यात येतं. माऊंट एव्हरेस्ट, तिबेटच्या पठाराक उभा आहे. त्यामुळे तो सर्वात उंच ठरला आहे. याचा अर्थ एखाद्या बालकाः शिडीवर उभं राहून, आपण बास्केटबॉल खेळाडूंपेक्षा उंच आहोत आ भासवण्यासारखं आहे, अशा प्रकारचा मजकूर देनाली पार्कच्या माहिती पुस्तका वाचायला मिळाला. मेकॅनलीचं सौंदर्यही हिमालयाप्रमाणे अप्रतिम आहे. त्या २०,३२० फुटांवरचं सर्वोच्च शिखर सर्वप्रथम १९१० मध्ये सर करण्या आलं. आता दरवर्षी हजारो गिर्यारोहक हे शिखर पादाक्रांत करण्यासाठ येतात. त्यापैकी जेमतेम निम्मे यशस्वी होतात. कारण तिथलं टोकाचं व सत बदलणारं हवामान. गिर्यारोहकांना कधी प्रचंड हिमवृष्टी, कधी दाट धुर्व पाऊस-यातून मार्ग काढणं अत्यंत कठीण जातं. काहीजण दगावतातही. तरी मॅकेनलीचं आकर्षण दरवर्षी वाढतच आहे.
देनालीत अन्य धाडसी मोहिमाही आखण्यात येतात. हिवाळा सोडून अन मोसमात जंगलातील पायवाटांवरून मैलोन्मैल भटकणं, कठीण गड चढण सायकल-घोड्यावरून रपेट असे नानाविध उपक्रम करणाऱ्या हजारो धाडस वीरांची येथे सतत गर्दी असते. त्याच्या साठ लाख एकर म्हणजे २.४ दशला हेक्टर क्षेत्रफळात १६० प्रकारचे पक्षी व ४०० जातींची फुलझाडं आढळतात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तर सारा परिसर भडक, तांबड्या, पिवळ्या व सोनेों रंगांनी फुलून जातो. त्याचं चित्रीकरण करण्यासाठी साऱ्या जगातून नामांकित छायाचित्रकार येतात.
हिंस्त्र ग्रिझली अस्वलांसाठी (बेअर) पार्कचा संपूर्ण परिसर मुक्त व प्रसिद आहे. पण अन्य भागातील अस्वले व इथली यांच्यात थोडा फरक आढळतो ही टॉकलॅट (Toklat) जातीची अस्वलं असून, ती अन्य कोठेही दिसत नाहीत. ग्रिझली अस्वलांच्या तुलनेत ती फार अजस्त्र नसतात. त्यांचं वजन त्या मानानं कमी म्हणजे १०० ते १५० कि.ग्रॅ. पर्यंत असतं. त्यांचा रंग राखाडी असतो. किनाऱ्यांजवळची अस्वलं, गलेलठ्ठ होतात. कारण मासे हे त्यांचं मुख्य अन्न असतं. टॉकलॅट बहुतांशी शाकाहारी असतात. ती क्वचितच कधीतरी एखाद्या प्राण्याची शिकार करतात.
या जंगलात सर्व प्रकारच्या अस्वलांचा सर्वत्र संचार सुरू असतो. रस्त्यांच्या कडेला, ओढ्यांजवळ अनेकदा ही अस्वलं दिसून येतात. इतकंच नव्हे तर पर्यटकांच्या चालण्याच्या ट्रॅकमध्येही ते मुक्काम ठोकतात. देनाली पार्कमधील आमच्या हॉटेलच्या मागच्या घनदाट जंगलात चालण्याचा दहा कि.मी.चा ट्रॅक होता. बरोबरच्या दोन गोऱ्या पर्यटकांबरोबर आम्हीही या ट्रॅकमध्ये चालण्यासाठी गेलो. घनदाट झाडी व मध्ये पाऊलवाट. तिथे सर्व प्रकारच्या जनावरांना मुक्तद्वार. त्यामुळे अस्वलं, लांडगे, मूस, कॅरीबू कुठेही चरताना, बागडताना दिसतात. 'त्यांच्यापासून सावध रहा, मोठ्याने बोलू नका', अशा सूचना व कोणतं जनावर समोर आलं तर कसं वागावयाचं याच्या टीप्स ठिकठिकाणी लिहिल्या होत्या. उदा. मूस अंगावर आलं तर, पळायचं. पण अस्वल दिसलं तर बिलकूल धावायचं नाही. कारण अस्वल तासाला ५० कि.मी.च्या वेगाने पळू शकतं. उलट थोड्या मोठ्या आवाजात बोलणं सुरू करायचं व हळूहळू मागे चालू लागायन्नं. त्यावेळी दोन्ही हात वरती करून हलवायचे. म्हणजे समोर असलेला प्राणी आपल्यापेक्षा अधिक उंच आहे, असं वाटून अस्वल हल्ला करत नाही. अर्थात काही अस्वलं उभी राहिली की, त्यांची उंची सात-आठ फूटांपर्यंत असते. देनाली पार्कमध्ये पायी फिरताना एकच विचार मनात येत असे की, हे सर्व हातवारे करणं ठीक आहे. पण शेवटी देवाचं नाव घेत राहणं हेच महत्त्वाचं! हिवाळ्यात गोठवणाऱ्या थंडीने जनावरांची अवस्था तशी कठीण होते. झाडी कमी झाली, की त्यांना खायला पुरेसा चारा मिळत नाही. ग्रिझली बेअर उन्हाळ्यात गलेलठ्ठ होतात व हिवाळ्यात बहुतेक वेळ सुस्त पडून किंवा झोपून राहतात. अन्य प्राण्यांची अवस्थाही बहुतांशी अशीच असते.
पार्कमध्ये हिवाळ्यात कुणी पर्यटक राहत नाहीत. कारण तापमान उणे ५००, उणे ६०० सें. पर्यंत उतरतं. गावात अगदी मोजके स्थानिक लोक असतात. सर्व हॉटेल्स, ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून बंद होतात. गावातील मंडळी त्या हॉटेलची काळजी घेतात. एप्रिलपासून इथे पर्यटकांची थोडी वर्दळ सुरू होते. पोलंड, हंगेरी, मेक्सिको इथली तरुण मुलं देनालीच्या हॉटेलांमध्ये काम करण्यासाठी येतात. त्यांना नीट इंग्रजी येत नाही. त्यामुळे हॉटेलांमधील सव्हिस थोडी थंडच असते. पर्यटकांची गर्दी वाढू लागली की, एक-एक हॉटेल उघडू लागतं. आम्ही तेथील 'मॅकेनली व्हिलेज लॉज' या उत्तम हॉटेलमध्ये उत्ताले होतो. सीझनमध्ये सुरू झालेलं ते दुसरं हॉटेल होतं. तरीही तिथल्या बऱ्या सोयी अद्याप उपलब्ध झाल्या नव्हत्या. पण आमच्या स्वीटमधून अलास्क पर्वतराजी कमालीची सुंदर दिसत होती. या उंचावरील लॉजचं वैशिष्ट्य म्हण स्वच्छ हवामान असेल तर तिथून १३० मैलांवर असलेलं मॅकेनलीचं सर्वोच शिखर दिसू शकतं. तोही योग एके दिवशी सकाळी, स्वच्छ उन्हात जुल आला. देनाली हे गाव तसं छोटंच. हिल स्टेशनवर असतो तसा एकच मुख् रस्ता. त्याच्या दुतर्फा भरपूर रेस्टॉरंटस् व गिफ्ट शॉप्स... पार्कची भटकंती कशी करायची याचे काही नियम आहेत. पहिल्या १६ मैलांपर्यंत खाजगी वाहनांनी जाता येतं. पुढे मात्र शक्यतो पार्कच्या बसेसने फिरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रस्त्यांवर कमी वर्दळ राहते व जनावरांन त्रास होत नाही. पार्कमध्ये राहण्यासाठी झोपड्या, तंबूही उपलब्ध असतात धाडसी पर्यटक सायकली घेऊन तिथे येतात व मुक्काम करतात. आम् पार्कमध्ये बसमधून फिरत असताना अनेक स्त्री-पुरुष, मुलं सायकलींवरू रपेट मारताना दिसत होते.
पार्कच्या बसमधून विविध भागात आम्ही बरीच भटकंती केली. वीस पंचवीस सीट्सची आरामशीर बस. ड्रायव्हर कम गाइड पार्कचा उत्तम माहितगार त्याच्याकडे दीर्घ पल्ल्याची दुर्बीण व कॅमेरा. बसमध्ये टीव्ही स्क्रीनची सोय त्यामुळे लांबवरची जनावरं, शिखरंही कॅमेऱ्यात टिपून तो आम्हाला त्वरि पडद्यावर दाखवत असे. पार्कमध्ये एकूण चारशे-साडेचारशे कि.मी. फिरलेो एवढ्या मोठ्या अवाढव्य पार्कच्या तुलनेत हा पल्ला अगदीच छोटा होता. पण पार्कच्या महत्त्वाच्या भागांना भेट दिल्याने त्याचं स्वरूप समजू शकलं, देनालीचं सौंदर्य डोळे भरून पाहता आलं. काही ठिकाणी पाईन वृक्षाचं घनदाट जंगल, काही ठिकाणी झुडपं तर कोठे मैलोन्मैल लांब पसरलेली रंगीबेरंगी मैदाननं... मधूनमधून पांढऱ्या शुभ्र नद्या-नाले. अनेक तलाव.... सागराप्रमाणे विशाल. सभोवताली कमी-अधिक उंचीची अलास्कन पर्वतराजी. त्यावर अद्यापही भरपूर स्नो..... वाईल्ड लाईफ पाहण्याच्या बाबतीतही आम्ही सुदैवी ठरलो. आकर्षक शिंगांचं मूस, कॅरिबू मुक्तपणे बागडताना दिसली. विशेष म्हणजे दोन पांढरी अस्वलं अगदी जवळून पाहता आली. त्यांच्याबरोबर त्यांची दोन पांढरीशुभ्र बछडी दंगामस्ती करत होती.
या पार्कमधील रस्ते कच्चे पण उत्तम अवस्थेत होते. हिवाळ्यात त्यांच्यावर चार-पाच फुटांचं बर्फ साचतं. पण एप्रिलपासून साफसफाईला जोमाने सुरुवात
करून, मे महिन्यात सर्व पार्क पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असतो. रस्त्यांवर कुठेही खड्डे नाहीत. रस्ते मोकळे आहेत, म्हणून कोणीही सुसाट मोटारी चालवत नाहीत. नियमानुसार जास्तीत जास्त ३५ कि.मी.च्या वेगानेच सर्व वाहनं चालतात. प्रवासात प्रत्येक दोन तासांनी टॉयलेट्सची उत्तम व्यवस्था दिसून आली. पर्यावरणाची काळजी प्रत्येकजण घेत असतो. विशेष म्हणजे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या या आत्मीयतेमुळेच एवढा अवाढव्य पार्क आज अत्यंत सुंदर अवस्थेत टिकून आहे. विस्तीर्ण देनाली नॅशनल पार्कचं संरक्षण हिवाळ्यात कोण करतं? तर अलास्कन हस्की जातीची कुत्री हे काम करतात. साऱ्या जगातील हे एकमेव उदाहरण आहे. हिवाळ्यात पार्कमध्ये उणे ५००, उणे ६०० सें. तापमान दोन-तीन महिने सहज असतं. त्यावेळी सुमारे तीन हजार मैलांच्या परिसरात पार्कचे रेंजर्स या कुत्र्यांच्या गाडीतून फिरून देखरेख ठेवत असतात. तसंच त्या काळात, जे अतिधाडसी गिर्यारोहक इथे येतात, त्यांच्यासाठी बर्फ काढून, मार्ग मोकळा करण्याचं कामही ही कुत्री करतात. त्यावेळी तीन गटात या कुत्र्यांची विभागणी करण्यात येते. वस्तुतः ही कुत्री उंचीला फार नाहीत व आकर्षकही वाटत नाहीत. आपल्याकडील रस्त्यांवरच्या भटक्या कुत्र्यांसारखीच ती काहीशी दिसतात. पण त्यांची ताकद व गुणांबद्दल काय सांगायचं? आम्ही या कुत्र्यांच्या केंद्राला मुद्दाम भेट दिली व 'डॉग स्लेज शो' पाहिला. बर्फावरून घसरणारी सुमारे एक टन वजनाची गाडी पाच-सहा कुत्री सहज खेचतात. ही गाडी ओढण्यासाठी ती कमालीची उत्सुक असतात. त्यांच्या गळ्यात पट्टे बांधले की, आता गाडी ओढायला मिळणार याचा आनंद ते उड्या मारून व जोरजोरात भुंकून व्यक्त करत असतात. एकदा का रेंजरकडून पळण्याच्या व गाडी खेचण्याच्या सूचना मिळाल्या की, मग ते शांत होतात. बर्फावरून गाडी खेचणं तसं महाकठीण. ऐन हिवाळ्यात स्कँडेनेव्हियाच्या सफरीत उणे २०० सें. तापमानात बर्फावरून, या गाडीतून प्रवास करण्याचा योग आला. आम्ही थकलो, पण ती कुत्री चांगल्या वेगाने बर्फावरून पळत होती, गाडी खेचत होती. मध्ये कोठे थांबलो, तर लगेच त्यांचं भुंकणं सुरू. तो अनुभव मोठा चित्तथरारक होता.
या कुत्र्यांची सर्व प्रकारची काळजी रेंजर्स घेतात. हिवाळ्यात त्यांना चार हजार तर उन्हाळ्यात दोन-अडीच हजार कॅलरीजची जरूरी असते. त्यामुळे हिवाळ्यात दोन पौंड व उन्हाळ्यात एक पौंड खाणं त्यांना दिलं जातं. त्यात - विविधता असते. जीवनसत्त्व व कोंबडीची फॅट यावर भर दिला जातो. उन्हाळा हा ऋतु या कुत्र्यांच्या दृष्टीने तसा त्रासदायक. त्यामुळे यावेळी पाच-सहा फू उंचीच्या खास पिंजऱ्यात त्यांना ठेवण्यात येतं.
देनाली पार्कमधील चार-पाच दिवसांच्या मनसोक्त भटकंतीनंतर, आनं पुन्हा मोटारीने अँकरेजकडे निघालो. सुमारे साडेचारशे कि.मी.च्या या प्रवास अलास्काचे आणखी निराळं रूप दिसलं. आता हिवाळा पूर्णपणे संपून उन्हाल सुरू झाला होता. झाडांवरील स्नो नाहीसा होऊन तिथे हिरवी पालवी फुट होती. त्यांचं गडद हिरवंगार रूप कमालीचं आकर्षक वाटत होतं.
अँकरेजच्या जवळची काही बेटंही ग्लेशिअर्स व सी लाईफसाठी प्रसिद आहेत. त्यामुळे विटिअर, साऊथ सेवार्ड बेटांवर खास क्रूजने गेलो. '२६ ग्लेशिअर क्रूज', 'फॉक्स आयलंड'मधून ग्लेशिअर्सची भरपूर मजा अनुभवत आली. शंभर इंच स्नो पडला, की दबून, दबून त्याचा एक इंच जाडीचा है तयार होतो, त्याला ग्लेशिअर म्हणतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्ष, शतकानुशतरं सुरू असते. निळेशार ग्लेशिअर्स दिसायला आकर्षक असतात. पण त्यांचे अजस्त्र कडे जेव्हा प्रचंड मोठा आवाज करत तुटतात, कोसळतात त्यावे पोटात भीतीचा गोळा उठतो. पाण्यातील हिमनगांना बोटीने धडक दिली नं टायटॅनिकची आठवण होते. जागतिक हवामानात होणाऱ्या बदलांचा परिणाम या ग्लेशिअर्सवरही होत आहे. काही ग्लेशिअर्स आक्रसत आहेत. तर काहींचे लांबी व रुंदी वाढत आहे. त्याची शास्त्रशुद्ध माहिती क्रूजवर मिळाली. येथी रिग्ज ग्लेशिअरची रुंदी ७५ व लांबी १५६ मैल आहे. हा रोज एक-दोन पूर व वर्षाला ६०० फूट आक्रसत आहे. तर जॉन हॉपकिन्स ग्लेशिअरची रुंद एक मैल व लांबी १२.५ मैल असून तो रोज १० ते १५ फूट व वर्षाला चा हजार फूट वेगाने वाढतोय.
याच सफरीत नानाविध प्रकारचे समुद्रप्राणी, पक्षी पहायला मिळाले क्रूजच्या कॅप्टनकडे असलेल्या आधुनिक दुर्बीणीतून त्यांच्या बारीक हालचालीह टिपता आल्या. व्हेल माशाचे अनेक प्रकार असतात. हंप बॅक व्हेल हा मास नाकातून पाण्याचा फवारा उडवतो. तर दुसरे, डॉल्फिनसारखे पाण्यावर उड्य मारत असतात. मोठ्या खडकांवर शेकडो सी लायन सुस्त होऊन पडले होते सीगल पक्षांचे थवेच्या थवे आपल्याबरोबर बोटीतून सफर करतात. इथे खाजग बोटी भाड्याने घेऊन राहणाऱ्यांची संख्याही बरीच असते. पण त्यांचा उपद्रव समुद्रप्राणी, मासे, पक्षी यांना होणार नाही ना, याची विशेष दक्षता घेतली जाते. जून ते ऑगस्ट या कालावधीत किती बोटींना विहार करायला परवानगी द्यायची याचा निर्णय तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसारच घेतला जातो.
समुद्रपर्यावरण, हवेचा दर्जा, प्राण्यांचं जीवनमान, आवाजाचं प्रदूषण व मौज-मजा या सर्वांचा विचार करून या शिफारशी केल्या जातात व त्यांचं तंतोतंत पालन होतं हे विशेष. अलास्काची आठवण म्हणून काय खरेदी करायची असा प्रश्न जयंतीपुढे पडला होता. आमच्या टूरगाइडने तो क्षणात सोडवला. मूळ अलास्कियन समजल्या जाणाऱ्या एस्किमोंनी शोध लावलेली 'उलू' ही एक प्रकारची सुरी विकत घ्यावी असा सल्ला त्याने दिला. हजारो वर्षांपूर्वी, एस्किमो, मारलेले जनावर कापण्यासाठी धारदार दगडाचा वापर करत. हळूहळू त्यांनी या आयुधात थोडी सुधारणा केली. दगडाला अर्धगोलाकार आकार देऊन त्याचा उपयोग सुरू झाला. नंतर दगडाला वर पकडण्यासाठी मूठ आली. त्यातूनच आजच्या 'उलू'ची निर्मिती झाली. या उलूचं पातं अर्धगोलाकार व त्याला धरण्यासाठी वर लाकडाची मूठ असते. तो निरनिराळ्या आकारात मिळू शकतो. मांस, मासा कापण्यास तो फारच उपयोगी पडतो. त्यामुळे प्रत्येक अलास्कन कुटुंबाच्या घरात उलू हा हवाच. आम्हीही अलास्काची आठवण म्हणून छोट्या उलूची खरेदी केली आणि त्या 'लास्ट फ्रंटिअर'चा निरोप घेतला.
बर्फाळ प्रदेशातील 'स्लेज डॉग रेस'
बर्फावर धावणारी कुत्र्यांची गाडी ही आता बरीचशी परिचित झाली आहे. अनेक हौशी प्रवासी बर्फाळ प्रदेशात त्यातून सफर करण्याची मजाही लुटतात. परदेशात बर्फावरून धावणाऱ्या कुत्र्यांच्या स्पर्धा फार लोकप्रिय आहेत. त्यालाच 'स्लेज डॉग रेस' असं म्हणतात. यातील सर्वात लांब म्हणजे ११०० मैल अंतराची स्पर्धा, अँकरेज इथे दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयोजिण्यात येते. साऱ्या जगाचं ते एक आकर्षण असतं. अलास्काच्या भेटीत, स्पर्धेचा हा मार्ग पाहता आला. त्यात नानाविध भूमिकांनी सहभागी होणाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलता आलं आणि 'आयडिटीए रॉड' (IDI TA ROD-Historic Trail) या स्पर्धेच्या मुख्यालयाला भेट देऊन, त्या मागचा रोमांचकारी, धाडसी इतिहासही जाणून घेता आला.
शीत कटिबंधातील 'अलास्का' हा संपूर्ण बर्फाळ डोंगरांचा प्रदेश. मैलोन्मैल पसरलेले ग्लेशिअर्स, हिमनद्या, हिमनग आणि उणे ६०-७० डिग्रीपर्यंत उतरणारं तापमान. सुरुवातीला प्रामुख्याने गोल्ड रशमुळे हा प्रदेश जगाला परिचित झाला. इथल्या डोंगरात सोनं असल्याचा शोध लागला आणि त्यामुळे या भागात गर्दी एकदम वाढली. कमालीच्या थंडीत, हिमवर्षावाने गोठणाऱ्या या भागात मालाची ने-आण करण्यासाठी कुत्र्यांनी ओढायची गाडीच उपये असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. १९१०-१२ मध्ये आयडि रॉड खाणीत दहा हजारांवर लोकांनी गर्दी केली व तीस दशलक्ष डॉलर्स सोन्याचा खजिना हाती आला. यानंतर या बर्फाळ प्रदेशात वाहतुकीस कुत्र्यांच्या गाडीचा सर्रास वापर होऊ लागला.
१९२५च्या हिवाळ्यात नॉमे येथील भागात घटसर्प (डिफ्तेरिया) रोग साथ पसरली; नव्हे या साथीने अक्षरशः थैमान घातलं. कडाक्याची थंडी। हिमवर्षाव यामुळे सारी वाहतूक बंद पडली होती. अशा परिस्थितीत घटन प्रतिबंधक लस त्या भागात पाठवून, लोकांचे प्राण वाचवायचे कसे हा सको मोठा प्रश्न होता. अँकरेजहून रेल्वेने ही लस 'नेनाना' इथपर्यंत नेण्यात आहे आणि तिथून नॉमेपर्यंत पोहचवण्यासाठी बर्फावरून कुत्र्यांनी ओढावयाच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. नेनाना ते नॉमे हे अंतर ६७४ मैला होतं. त्यावेळी या प्रदेशात उणे ६४० सें. पर्यंत तापमान गेलं होतं.
अशा परिस्थितीत ही लस घेऊन जाण्याच्या कामगिरीसाठी अलास्कातीय उत्तम मशर्सची (कुत्री ओढणाऱ्या गाडीवरील स्वार) निवड करण्यात आले ग्लेशिअर्स, हिमनद्या, हिमनग अशा अनेक कठीण, जीवघेण्या अडथळ्यांव मात करत पाच दिवस व साडेसहा तासात कुत्र्यांनी हे अंतर पार केलं. म्हणा ही कुत्री रोज जवळजवळ १२५ ते १३० मैल धावत होती. काही ठिकाण मोठे बाके प्रसंग आले. एकदा टॉपकॉक नदी ओलांडत असताना ही कु अचानक थांबली. गाडीच्या चालकाने कितीही ढकललं तरी ती पुढे जाईनाह तेव्हा चालक पुढे आला. आणि पाहतो तो काय, पुढे बर्फाला आतल्या बाजूल मोठमोठ्या तडा गेल्या होत्या. कुत्री थोडी जरी पुढं गेली असती तरी सर्वजा बर्फात खोलवर गाडले गेले असते. कुत्र्यांची ही सावधगिरी थक्क करणारे होती. या यशस्वी मोहिमेत वीस मशर्स आणि शेकडो कुत्र्यांनी भाग घेतला. ब मोहिमेमुळेच असंख्य लोकांचे प्राण वाचले.
त्यातूनच स्लेज डॉग रेस (कुत्र्यांची बर्फावरून धावण्याची शर्यत बं कल्पना पुढे आली. १९७३ पासून तिची व्यवस्थित आखणी व नियोजन करण्यात येऊ लागलं. जो रेडिग्टन यांनी आपलं घर गहाण ठेवून, या स्पर्धेच्या प्राथमिक खर्चासाठी पैसे उभे केले आणि हळूहळू या शर्यतीचे प्रसिद्धी जगभरात झाली. जगातील विख्यात मशर्स त्यात भाग घेऊ लागले. दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या शनिवारी अँकरेजमधील फोर्थ अॅव्हेन चौकातून ही शर्यत सुरू होते. शेकडो स्लेज डॉग्ज टीम्स तीत उत्साहाने सहभागी होतात. ही शर्यत अधिकृतपणे १०४९ मैलांची आहे; परंतु प्रत्यक्षात स्पर्धकांना ११०० पेक्षाही अधिक मैलांचं अंतर कापावं लागतं. हा मार्ग कमालीचा खडतर असतो. अलास्का व कुस्कोविम या दोन पर्वतांच्या रांगा त्यांना पार कराव्या लागतात. सुमारे १५० मैलांची युकॉन नदीही ओलांडावी लागते. याखेरीज अस्वलं व अन्य हिंसक प्राण्यांच्या हल्ल्यापासूनही बचाव करावा लागतो. स्पर्धक रोज सुमारे १०० मैलांचं अंतर कापतात. विजयी स्पर्धक साधारणतः दहा दिवसात नॉमेला पोहचतात. ही सारी स्पर्धाच मोठी धाडसी व व रोमांचकारी असते.
आता मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप देत असून, विजेत्यांना अत्यंत आकर्षक बक्षीसं देण्यात येतात. मात्र तरीही कोणताही नफा कमावण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजिण्यात येत नाही. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात हजारो लोक स्वेच्छेने सेवा देत असतात. यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष आपणहून पुढे येतात. काहीजण स्पर्धकांना खाद्यपदार्थ पुरवण्याचं काम करतात. वाटेत अनेकजण स्पर्धकांना मुक्कामासाठी आपली घरं देतात. अगदी स्पर्धकांच्या खाद्यपदार्थांच्या प्लेट्स विसळणे, तसेच भांडी घासण्याची कामंही वाटून घेतली जातात. अँकरेज ते देनाली नॅशनल पार्कमधील अडीच हजार कि.मी.च्या आमच्या या प्रवासातील गाडीचा ड्रायव्हर ग्रेव्ही हासुद्धा आयडिटीए रॉड स्पर्धेचा स्वयंसेवक होता. मार्च महिन्यात दहा दिवसांची रजा घेऊन, खाद्यपदार्थ पुरवण्याच्या सेवेत तो दरवर्षी सहभागी होतो. त्याचा एक मित्र बोटीवर वायरलेस इंजिनिअर आहे. तो या स्पर्धेत दळणवळण मार्गदर्शक म्हणून काम करतो. असे अनेकजण आहेत. 'वर्षभरात आम्ही कोणीही एकमेकांना भेटत नाही. पण दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमची हमखास भेट होतेच !... ग्रेव्ही सांगत होता.
या स्पर्धेत भाग घेणारे मशर्स आपल्या कुत्र्यांची मुलापेक्षाही अधिक काळजी घेतात. अलास्कातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या फेअर बँक शहरातील मुक्कामात आयडिटी रॉड स्पर्धेतील काही विजेत्यांची भेट झाली. सुसन बुचर ही महिला या स्पर्धेतील नामांकित विजेती. १९८६, ८७, ८८ व ९० अशी चार वेळा तिने ११०० मैलांची ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकली आहे. ती आणि तिचा नवरा डेव्ह यांनी १९८८ मध्ये तर विक्रमच प्रस्थापित केला. त्यावर्षी ज्या ज्या स्पर्धांमध्ये त्या दोघांनी भाग घेतला, त्या सर्व स्पर्धांमध्ये ते विजयी ठरले. दुर्दैवाने ऑगस्ट २००६ मध्ये सुसनचा कॅन्सरने मृत्यू झाला. पण आता डेव्ह आणि तेकला व चेसना या त्यांच्या मुली, तिचं नाव पूढे चालवत आहेत. त्यांच्या केनलला (कुत्र्यांचं) आम्ही भेट दिली. कुत्र्यांचं अन्न व त्यांच्या औषधांची त्या जिवापाड कार घेतात. किंबहुना त्यांच्याकडची ३०-३५ कुत्री म्हणजे त्यांच्या कुटुंबाचार। भाग आहे. कुत्री व स्वार यांच्यातील परस्पर विश्वास आणि सहकार्यामुळे स्पर्धा जिंकता येते, अशी त्यांची भावना आहे.
अलास्काताली उणे ६० ते ७०० सें. च्या तापमानात या कुत्र्यांच्या पंजा विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या पंज्यांमध्ये फार अंतर तर नाही न मुख्यतः पाहिले जाते. अन्यथा बर्फात त्यांना 'स्नो बॉल'चा त्रास होतो.। बॉलमुळे असह्य वेदना होतात. त्यासाठी त्यांना 'डॉग बुटीज' (एक प्रका पायमोजे) घालण्यात येतात. स्पर्धेसाठी लांब पायांच्या हस्की जातीच्या कुत्र्यांचे निवड केली जाते. त्यांच्या शेपट्या झुबकेदार असतात. थंडीपासून करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ही कुत्री म्हणजे मशर्सचा अक्षरशः जीव प्राण असतात. ही स्पर्धा हे त्यांच्या परमविश्वासाचीच कसोटी असते, ३ म्हटलं तर ते वावगं ठरू नये. या शर्यतींचा अनुभव एकदा तरी घ्यायत हवा.
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
sette
अलास्का (उत्तर अमेरिका)
खंड : उत्तर अमेरिका
राजधानी : ज्युनो
क्षेत्रफळ : अंदाजे
१७,००,१४१ चौ.कि.मी.
लोकसंख्या : सुमारे
६,२२,९३२
चलन : अमेरिकन डॉलर्स
भाषा : इंग्रजी व स्पॅनिश
कसे जाल?
अलास्काला जाण्यासाठी अमेरिकेचा व्हिसा हवा. अलास्काची सफर क्रुजने करायची असेल, तर त्या बोटी सर्वसाधारणपणे सिएटलहून निघतात. अँकरेजपासून, मोटारीने अलास्काची सहल सुरू करता येते. अॅकरेजला जाण्यासाठी मुंबईहून थेट विमान नाही. पण अमेरिकेतील कोणत्याही मोठ्या शहरापासून, अँकरेजला विमानाने जाता येतं. अलास्काची सहल स्वतःची स्वतः करण्यात खरी मजा आहे. पण परदेशातील सहल कंपन्याद्वाराही जाता येतं.
कधी जाल?
अलास्कात पर्यटनाचा मोसम हा एप्रिलपासून सुरू होतो व सप्टेंबरपर्यंत हवा चांगली असते. हिवाळ्यात देनाली पार्क व अन्य बराच भाग बंदच असतो.
सुरक्षितता :
मनुष्यप्राण्यापासून पूर्ण सुरक्षित. पण इथे सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते, ती अस्वलं व अन्य प्राण्यांपासून. पार्कमध्ये फिरताना, फलकांवर लिहिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची जरुरी असते.
आगळा-वेगळा व्हाईटपास युकॉन रेल्वेचा प्रवास
अ "लास्कात गोल्डरशच्या काळात 'स्कॅगवे' या छोटेखानी बंदराला महत्व प्राप्त झालं. याचं मुख्य कारण 'व्हाईट पास अँड युकॉन रेल्ले १८९८ मध्ये या संपूर्ण बर्फाळ, खडकाळ प्रदेशातून हा रेल्वेमार्ग काढण्य आला. या प्रदेशात रेल्वेमार्ग काढणं अगदी अशक्य कोटीतील बाब होती. प तंत्रज्ञांनी, मजुरांनी ती शक्य करून दाखवली. पनामा कालवा, आयफे टॉवर, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा यांच्या बरोबरीनं या रेल्वेला महत्त्व प्राप्त झाल खाणीतील सोनं संपल्यानंतर सुवर्णप्रेमींची गर्दी ओसरली. पण हे आ पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी मात्र दरवर्षी वाढू लागली. आजही मे ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ही रेल्वे पर्यटकांना घेऊन नियमित धावते. मी व जयंती आमचं दोघांचंही या स्कॅगवे गावाशी नकळतपणे काह निराळंच नातं जोडलं गेलं आहे. एका वर्षी आम्ही व्हाईट पास रेल्वें जवळजवळ तीन हजार फूट उंचीचं अंतर गाठलं. आणि दुसऱ्या वर्षी त्याच उंचीवरून, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत मोटारीने स्कॅगवे भागात प्रवास केला. मे महिन्याच्या मध्याला, सकाळी सहा वाजता आमची बोट स्कॅगचे बंदराला लागली. थंडी व सोसाट्याचा वारा यामुळे बोटीच्या बाल्कनीत उभराहवत नव्हतं. आठच्या सुमारास सर्व प्रवासी बोटीबाहेर आले, त्यावेळी सर्वा विरळ धुक्याचा पडदा पसरला होता. चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगरांचा वेढा होता. स्कॅगवे हे अगदी छोटं गाव. लोकवस्ती जेमतेम एक हजार. गावाची बाजारपेठ म्हणजे चार-पाच ब्लॉक्स. स्कॅगवेमध्ये सरासरी तीस इंचापर्यंत पाऊस पडतो. हिवाळ्यात १७-१८ तास अंधाराचं साम्राज्य, तर उन्हाळ्यात १८-२० तास उजेड.
गोल्ड रशच्या काळात या गावात प्रचंड गर्दी उसळत असे. व्हाईट पास युकॉन रेल्वेमुळे खडतर भागातील सोनं शोधण्याचा मार्ग फारच सुकर झाला. ही रेल्वे म्हणजे जगातील एक अत्यंत कठीण पण कमालीची सीनिक रेल्वे लाईन आहे. क्लोन्डाईक पर्वतात सोनं असल्याच्या वृत्ताने १८९७-९८च्या काळात एकच खळबळ माजली होती. जो तो, ते सोनं मिळवण्यासाठी उत्सुक होता. त्यासाठीच १८९८ मध्ये व्हाईटपास युकॉन मार्गावर नॅरोगेज रेल्वेमार्ग तयार करण्यात आला. सिव्हिल इंजिनिअर्सच्या कामगिरीची ती कमाल होती. संपूर्ण बर्फाळ, खडकाळ, डोंगराळ प्रदेशात सुरुंग लावून अवघ्या २६ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यासाठी ४५० टन स्फोटकं व दहा हजार मजुरांचा वापर केला गेला. अत्यंत प्रतिकूल हवामान व भौगोलिक परिस्थितीवर मात करून, सुवर्णप्रेमींसाठी हा मार्ग उभा राहिला. ही रेल्वे जवळजवळ वीस मैलांचा फेरा घालून तीन हजार फूट उंचीवर येते. स्कॅगवेचा मार्ग सोन्याच्या खाणी गाठण्यासाठी अत्यंत सोपा होता. पण अत्यंत खडतर. तोच यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे 'गोल्ड रश' कमालीचा वाढला. १८९८ मध्ये स्कॅगवे हे अलास्कातील सर्वात मोठं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या शहराची लोकसंख्या वीस हजाराच्या पुढे गेली, इतकेच काय, पण लागून असलेल्या डाया येथेही दहा हजार लोक तंबू ठोकून राहू लागले. पण १९००च्या सुमारास खाणीतील सोनं संपलं आणि लोकसंख्याही हळूहळू घटत गेली. आज स्कॅगवेची लोकसंख्या जेमतेम हजार असली तरी तो अद्भुत रेल्वेमार्ग पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची एकच गर्दी उसळते.
आमची बोट ज्या किनाऱ्याला लागली, त्याच्या अगदी समोरच युकॉन रेल्वेचा मार्ग होता. आम्हाला गाडीची वाट पाहत तिथेच उभं राहण्यास सांगण्यात आलं. पाच-सहा मिनिटातच गाडी आली. अगदी जुने लाकडाचे डबे व वाफेवर चालणारं इंजिन लावलेली १४ डब्यांची ती गाडी होती. मुंबईत अगदी पूर्वी अशा जुन्या लोकलगाड्या होत्या. मला त्यांची आठवण झाली. डब्यात चढण्यासाठी पायऱ्या होत्या. बसण्याची व्यवस्था आरामशीर होती. दोन्ही बाजूंना दोन-दोन सीटस् व मध्ये जाण्या-येण्याचा मार्ग. प्रत्येक डब्यात स्वच्छ बाथरूमची सोय होती. शेजारच्या रॅकवर या रेल्वेची माहिती देणाऱ्या निरनिराळ्या भाषातील पुस्तिका होत्या. डब्यात हिटरचीही सोय होतीच. त्या वाफेच्या इंजिनाने शिट्टी मारली व आमची गाडी हळूहळू सुरू झाली. सुरुवातीला सर्वत्र झाडीच झाडी होती. मधूनमधून नदी-ओढेही वाहत होते लांबवर बर्फाच्छादित पांढरे शुभ्र डोंगर दिसत होते. थोड्याच वेळात आम्ही त्या पांढऱ्या डोंगरात प्रवेश केला. बघताबघता संपूर्ण बर्फाळ भागात गार्डी शिरली. पुढेपुढे तर चांगले चार-पाच फुटांचे बर्फाचे थर सभोवताली पसरले होते. आजूबाजूला सर्वत्र बर्फाचे डोंगर..... मधूनमधून बर्फाची सपाट मैदानं... काही ठिकाणी चक्क ग्लेशिअर्स.... आणि पाच-सहा फूट रुंदीचा रेल्वेमार्ग, तोही अक्षरशः नागमोडी. गाडी जात असलेल्या मार्गाचं, आजूबाजूच्या भागाचं वर्णन करणारी कॉमेन्ट्री डब्यात सतत सुरू होती.
डब्याच्या बाहेर येऊन, दोन डब्यांच्या मधल्या गँगवेमध्ये उभं राहण्याचं सोय होती. थंडी मी म्हणत होती. पण तिथून सृष्टिसौंदर्य अप्रतिम दिसत असल्याने व फोटो काढणं सोयीचं असल्याने तिथे पर्यटकांची गर्दी न झाली तरच नवल. वळणावर गाडीचं इंजिन व मागचे डबे यांचं दृश्य फार मस्त दिसायचं. वाटेत दोन-तीन बोगदे लागले. पूर्णपणे बर्फाने आच्छादिलेले गँगवेमध्ये उभं राहून डोकावताना अक्षरशः भीती वाटायची. कारण बर्फ इतके साचलं होतं की, थोडं पुढं गेलं तर डोकं आपटलंच! गाडीचा वेग फार नव्हता. तरीही तीस-चाळीस कि.मी. वेगाने गाडी डोंगराची नागमोडी वळणं चढत होती. पुढे एक प्रचंड मोठा, लांबलचक लोखंडी पूल दिसला. बर्फाच्य दोन खोलवर दऱ्यांवर तो बांधण्यात आला होता. पूर्वी त्यावरून ही गार्ड जायची. आता बाजूने मार्ग काढण्यात आला. पण शंभर वर्षांपूर्वी बर्फाच्य दऱ्यांवर हा पूल कसा बांधला असेल या नुसत्या कल्पनेनेही आपण थक्क होऊन जातो. त्या इंजिनिअर्सच्या कर्तृत्वाचं स्मारक म्हणून आजही तो पूल तसाच ठेवण्यात आला आहे. संपूर्ण रेल्वेमार्ग, पूल, बोगदे बांधणं, किती कठीण आहे याची जाणीव क्षणाक्षणाला होत गेली. आम्ही मे महिन्यात तिथे गेलो, तेव्हा डोंगरावरचं तापमान शून्य अंशापर्यंत होतं. हिवाळ्यात तर ते उपणे ४०, उणे ५० डि.सें.पर्यंत उतरतं. त्या काळात आजच्या आधुनिक साधनांचा पूर्णतः अभाव होता. शरीर गोठवणाऱ्या त्या थंडीत इंजिनिअर्स, मजूर यांनी कसं काय काम केलं असेल याची कल्पनाच करवत नाही.
वळणंवळणं घेत गाडी डोंगर चढत असताना लांबवर, डोंगरातून काढलेला नागमोडी रस्ता दिसत होता. त्यावरून काही वाहनं जात-येत होती. निसर्गसौंदर्याचा
आस्वाद घेत, आता मोटारीनेही हा डोंगर चढता-उतरता येतो. तो अनुभव आणखी निराळा... निवेदिका सांगत होती. व्हाईटपासला २८६५ फूट उंचावर आम्ही जवळजवळ दीड-पावणेदोन तासात पोचलो. गाडी थांबली. अर्थात खाली उतरणं शक्यच नव्हतं. कारण सर्वत्र बर्फच बर्फ ! इथे रेल्वेचे दोन ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. आमच्या पाठोपाठ पर्यटकांना घेऊन आणखी दोन रेल्वेगाड्या आल्या. मग आमची गाडी दुसऱ्या ट्रॅकवर गेली. दुसरी व तिसरी रेल्वे पहिल्या ट्रॅकवरून पुढे आली.
येथे सर्व ग्रेनाईट रॉक आहे. हिवाळ्यात आठ ते दहा फूट उंच बर्फ साचतं. काही ठिकाणी तर बर्फ निळा दिसतो. तिथे 'सेरूलियन ब्ल्यू' म्हणजे निळ्या-हिरव्या रंगांच्या छटांचा जलाशय तयार झाला आहे. हे सारं दृश्य डोळ्यात, कॅमेरात किती साठवू असं होऊन जातं. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. उलट दिशेने प्रवास सुरू झाला की, सीट्सही उलट्या करण्याची सोय आहे. उतरताना गाडीचा वेग अर्थातच थोडा जास्त होता. जाऊन-येऊन तीन तासांची ही सफर, मानवी चमत्काराचं वेगळंच दर्शन घडवते. या प्रवासासाठी प्रत्येकी ११० डॉलर्स मोजावे लागतात. गाडीत वाईनचा ग्लास व सँडविचेस हवी असल्यास किंमत आणखी वाढते. पण अलास्काच्या फेरीत स्कॅगवेला जाऊन, या गाडीत बसल्याशिवाय कोणीही परत येऊ नये हे मात्र निश्चित.
एखादी जागा, स्थळ, प्रदेश आपल्याला मनापासून आवडला व तिथे पुन्हा येण्याची खरोखरच इच्छा असली तर परमेश्वर ती निश्चित पूर्ण करतो, याची प्रचीती आम्हाला खूपवेळा आली आहे. जगाची भ्रमंती करताना, अनेक देशांना, प्रदेशांना दोन-तीनदा भेटी दिल्या. अलास्काच्या व विशेषतः स्कॅगवेच्या बाबतीतही त्याची पुनरावृत्ती झाली. अलास्काची पहिली सफर बोटीतून केली. दुसऱ्या वर्षी अलास्काचा राहिलेला भाग मोटारीने-रेल्वेने-बसने करण्याचं ठरवलं. अँकरेजहून कॅनडाच्या युकॉन टेरिटरीत शिरलो. युकॉनची राजधानी व्हाईटहॉर्ससाठी व डॉसन सिटी गोल्ड रशसाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात ६० डिग्रीपर्यंतचं तापमान तिथे निदान महिना-दीड महिना राहतं. तिथून मोटारीने क्लोन्डाइक पर्वतांच्या माथ्यावर तीन हजार फूटांवर गेलो. आणि बर्फाळ डोंगरातून काढण्यात आलेल्या वळणावळणाच्या रस्त्याने स्कॅगवेला यायला निघालो. यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे बर्फाळ डोंगरांवर, ग्लेशियर्सवर उन्ह चकाकत होतं. जणू संपूर्ण बर्फाळ प्रदेश सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघत होता. ते दृश्य अप्रतिम दिसतं. अगदी उंचावरून स्कॅगवे बंदर व छोटेखानी गाव या दृश्याची किती छायाचित्रं काढू असं वाटलं नाही तरच नवल!
गोल्ड रशच्या काळात जसजसा खिशात पैसा खुळखुळू लागला तसतसे सुवर्णप्रेमींचे पाय स्कॅगवे इथल्या एका सलूनकडे वळू लागले. आजही त्याच जुन्या थाटात ते सलून ठेवण्यात आलं आहे. या सलूनमध्ये सारं वातावरण व आतली सजावट शंभर वर्षांपूर्वीची आहे. अलास्कन बिअरची चव तिथे पाय खिळवून ठेवते. मस्त थंडीत सोबत चिप्स व साल्साची (टोमॅटो व कांद्याची चटणी) मेजवानी कोण चुकवेल?
अलास्कन आदिवासींची कला :
'टोटेम पोल'
चला अलास लास्काच्या कोणत्याही भागात जा. पंचवीस-तीस फूट उंचीचे रंगीबेरंगी खांब तुमचं लक्ष वेधून घेतात. अनेक घरांच्या समोर किंवा हेरिटेज वास्तूंच्या समोर हे खांब हमखास डौलात उभे दिसतात. त्यावर पक्षी, प्राणी व देवदेवता यांची नानाविध चित्रं कोरलेली व रंगवलेली असतात. याला म्हणतात 'टोटेम पोल'. अगदी प्राचीन काळापासून या टोटेम पोलची प्रथा इथे सुरू झाली. आता तिथल्या नेटिव्हज (आदिवासी) लोकांमुळे या कलेला चांगलीच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अलास्काच्या आठ दिवसांच्या क्रूज सफरीत हे 'टोटेम पोल' बनवण्याचं मूळ ठिकाण असलेल्या केचिकनला भेट दिली व ते तयार करणाऱ्या नेटिव्हजच्या तोंडूनच त्याची कहाणी ऐकता आली.
पहाटे चारच्या सुमारास आमची बोट केचिकनच्या बंदराला लागली तेव्हा मस्त उजाडलं होते. हवामानाच्या बाबतीत हे शहर फार विचित्र फेऱ्यात अडकलं आहे. इथे वर्षभर पाऊस पडतो व पावसाबरोबर ताशी १२० कि.मी.च्या वेगाने वारे वाहत असतात. थंडीत वीस-बावीस तासांचा अंधार. यामुळे सर्व व्यवहार मात्र ठप्प होतात. मे ते सप्टेंबरमध्ये भाग १८-२० तासांचा उजेड. त्यामुळे पर्यटन, मत्स्य व लाकूडकामाचा व्यवसाय जोरात चालतो.
सुमारे सात मैल लांब व अर्धा मैल रुंदीच्या या गावात सॅक्समन व्हिलेज हे 'टोटेम पोल'च्या निर्मितीत आघाडीवर आहे. त्या गावात प्रवेशासाठी प्रत्येकी तीन अमेरिकन डॉलर्स फी आकारली जाते. त्यामुळे गावाच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडते. पण हा सर्व पैसा, गावातील समाजोपयोगी कामांसाठी प्रामाणिकपणे वापरला जातो. इथले इंडियन्स म्हणजे स्थानिक आदिवासी, त्यांच्या खास पारंपरिक नृत्याने तुमचे स्वागत करतात. ते नृत्य पाहून आपल्या भारतीय आदिवासींच्या नृत्यांची आठवण होते.
पोटलॅक खेडं असंच अगदी छोटं. सर्वप्रथम तिथल्या टोटेम पोलच्या कारखान्यात गेलो. आत प्रवेश केला तर एक प्रकारचा सुवास सर्वत्र दरवळत होता. टोटेम पोल, सीडर लाकडापासून बनवतात व त्यालाच हा सुगंध येतो. सीडर लाकूड पावसातही चांगलं टिकतं. त्याला कीड लागत नाही. तसंच ते मऊ असतं. त्यामुळे त्यावर कोरीव काम करणं सोपं जातं. टोटेम पोलवर सर्वसाधारणतः प्राचीन देव, प्राणी, गरुड आदींची चित्रं रेखाटलेली असतात. त्यावर कोणती व कशी चित्रं काढावयाची याचं स्केच आधी कागदावर तयार करण्यात येतं व त्यानंतर लाकडावर कोरीव काम सुरू होतं.
आम्ही गेलेल्या कार्यशाळेत ३० फूट उंचीच्या टोटेम पोलचं कोरीवकाम व रंगकाम सुरू होतं. टोटेम पोल खराब होताना आतून कुजू लागतो. त्यामुळे कोरीव काम करण्याच्या आधी, त्यातला आतला भाग काढून टाकून तो पोकळ करतात. अर्थात शंभर वर्षांपूर्वीचे टोटेम पोल आजही उत्तम अवस्थेत आहेत. कोरीव काम झालं की, त्याला निरनिराळे रंग दिले जातात. तांबडा रंग हा आयर्न ऑक्साईड, सॅमन एग्ज व अॅसिड इन सलायव्हा यांपासून, तर काळा रंग राखेपासून बनवतात. टोटेम पोल बनवण्याच्या कलेला आता प्रतिष्ठा मिळू लागली आहे व त्याला प्रचंड मागणी आली आहे. त्यावर स्थानिक आदिवासी चांगला पैसा कमावतात. तो बनवण्यासाठी प्रत्येक फुटामागे २५०० अमेरिकन डॉलर्स खर्च येतो. म्हणजे ३० फूट उंचीच्या टोटेम पोलसाठी ७०-७५ हजार डॉलर्स मोजावे लागतात.
पर्यटकही सुव्हिनियर म्हणून या टोटेम पोलची फार मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्या कार्यशाळेच्या शेजारीच शॉपिंग सेंटर होतं. तिथे लहान-मोठ्या (सहा इंचापासून एक फुटापर्यंत उंच) आकाराचे टोटेम पोल व अन्य वस्तूंची विक्री होत होती. या पोलची बाजारपेठही चीनने कशी पादाक्रांत केली आहे, याची प्रचीती इथे आली. सीडर लाकडापासून जे टोटेम पोल तयार केले जातात, त्यांची किंमत १५० ते २०० डॉलर्स पर्यंत जाते. ते फारच महाग वाटतात. म्हणून अगदी हुबेहूब दिसणारे-वाटणारे टोटेम पोल १५-२० डॉलर्सपर्यंत अलास्काच्या कानाकोपऱ्यात मिळतात. फक्त त्याच्या मागे शिक्का असतो - 'मेड इन चायना!'
निसर्गरम्य
'अकाडिया नॅशनल पार्क' व व्हरमाँट
अमेरि *मेरिकेतील सर्वात जास्त गर्दी खेचणारा दुसऱ्या क्रमांकाचा पार्क म्हणजे अकाडिया नॅशनल पार्क. (पहिला क्रमांक यलो स्टोनचा लागतो.) बॉस्टनपासून २७० व न्यूयॉर्कहून ४७५ मैलांवर असलेला हा पार्क काही बाबतीत मात्र पहिल्या क्रमांकावर आहे. येथील कॅडिलॅक पर्वताच्या सर्वोच्च शिखरावरून अमेरिकेतला पहिला सूर्योदय तुम्ही पाहू शकता. पूर्व मिसिसिपीमध्ये स्थापन झालेला हा पहिला नॅशनल पार्क आणि केवळ खाजगी व्यक्तींनी दान केलेल्या जमिनींतून उभा राहिलेला ५० हजार एकरांचा हा पहिलाच पार्क ठरला आहे. ऑटम कलर्स व फॉल फॉलिएज (पानगळ) पाहण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या पार्कला चांगली दोन वेळा भेट दिली व तेथील बार हार्बर या अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील सुंदर, छोट्या गावात पाच-सहा दिवसांचा मुक्कामही करता आला.
या पार्कची सफर म्हणजे निसर्गसौंदर्याचा खजिनाच आहे. इथे काय नाही? सुमारे १६५ प्रकारची झाडं येथे आहेत. तर १५० पेक्षाही अधिक जातींचे पक्षी या पार्कमध्ये पहायला मिळतात. समुद्रातील नानाविध प्राण्यांची संख्या अशीच अगणित आहे. तीस ते सत्तर फूट लांबीचे व्हेल मासे सहज दृष्टीस पडतात. निरनिराळ्या साधनांनी, प्रकारांनी या पार्कची मजा पर्यटकांना तुटता येते. आम्ही सुरुवात केली ती पार्कच्या सर्वोच्च शिखरापासून. नागमोडी वळणं, दुसऱ्या बाजूला विशाल सागर.... मधूनच डोकावणारे डोंगरांचे सुळके, घनदाट झाडी आणि दूरवर दिसणारे सुंदर बिचेस... हे सौंदर्य डोळ्यात साठवत आम्ही १५३० फुटांवरील सर्वोच्च शिखरावर पोहोचलो. या नयनरम्य मार्गाची आणि शिखरावरील दृश्याची दोन रूपं पहायला मिळाली. पहिल्या दिवशी दुपारी अकराच्या सुमारास मोटारीने निघालो. तेव्हा लख्ख ऊन्ह होतं. हिरवीगार झाडी व मधूनमधून बदलू लागलेले पानांचे रंग उन्हात मस्त चकाकत होते. डाव्या बाजूचं सागराचं दर्शन तर अभूतपूर्व असंच म्हणावं लागेल. शिखरावर पोचलो तेव्हाही हवामानात बदल झालेला नव्हता. त्यामुळे तेथील पठारावरून खाली उतरता येत होतं आणि समोरचं दृश्य तर काय वर्णावं? अटलांटिक महासागरातील भल्यामोठ्या बोटी अगदी छोट्या झाल्या होत्या आणि दूरवर पांढऱ्या वाळूच्या बिचेसवर मुंग्यांप्रमाणे हालचाली दिसत होत्या. कॅडिलॅक पर्वताच्या रांगा दृष्टीपलीकडे पोहोचल्या होत्या. चार-पाच दिवसांनी पुन्हा एकदा या शिखरावर जाऊन ते निसर्गसौंदर्य पाहण्याचं ठरवलं. यावेळी आम्ही थोडे लवकर निघालो. अचानक हवा बदलली. सारं वातावरण पावसाळी झालं आणि दुसऱ्या क्षणी सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं. चार दिवसांपूर्वीची हीच ती वाट काय असा प्रश्न पडत होता. चार-पाच फुटाच्या पुढे काही दिसतच नव्हतं. शिखरावर पोहोचलो. त्या दिवसाचं सारं सौंदर्य जणू अदृश्यच झालं होतं. सर्वत्र धुकं आणि धुकंच. पण तिथल्या माहिती केंद्रात अकाडिया नॅशनल पार्कचा जो इतिहास समजला, तो मोठा रंजक म्हणावा लागेल.
सुमारे पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी माऊंट डेझर्ट बेटाचा जन्म झाला असं मानण्यात येतं. ज्वालामुखीची राख, वाळू, माती यांच्या उलथापालथीतून त्याची जडणघडण झाली. मग प्रामुख्याने दळणवळण, मासेमारीसाठी या बंदराचा वापर होऊ लागला. बार हार्बर हे बंदराकाठचं छोटं गाव, १७९६ मध्ये त्याला जोडलं गेलं. त्यातूनच पर्यटन व्यवसायाने येथे मूळ धरलं. नामांकित कलाकार, निसर्गप्रेमींची वर्दळ वाढली. १८८० मध्ये बार हार्बर येथील हॉटेल्सची संख्या तीसच्या घरात गेली व उन्हाळ्यातील सुंदर निसर्गरम्य ठिकाण म्हणून हा सारा परिसर ओळखला जाऊ लागला. अमेरिकेतील श्रीमंत पण दानशूर म्हणून ख्याती असलेल्या रॉकफेलर्स, मॉरगन्स, फोर्ड्स आदी कुटुंबांनी येथे मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून अलिशान मॅन्शन्स बांधले. पण त्याचबरोबर येथील निसर्गसौंदर्य, पर्यावरण यांचा समतोल बिघडू नये याबाबत ते आग्रही होते.
'एका छोट्या लाकडाच्या वखारीतून अकाडिया नॅशनल पार्कचा जन्म झाला.' मेन प्रांतातील राजकारणी व्यक्तीचे हे उद्गार यासंदर्भात फारच बोलके आहेत. विकासामुळे या सर्वांग सुंदर बेटाचं नुकसान होऊ नये म्हणून, येथे राहावयास आलेल्या लोकांनी १९०१ मध्ये 'सार्वजनिक जमीन विश्वस्त मंडळाची' स्थापना केली. आणि बॉस्टन येथील एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जॉर्ज डोर यांची त्याच्या संचालकपदी नेमणूक केली. डोर यांनी आपली सारी मालमत्ता तर या ट्रस्टला दिलीच पण ४३ वर्ष अव्याहतपणे काम करून, या परिसराचं सौंदर्य तसूभरही कमी होणार नाही याची दक्षता घेतली.
त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन या विश्वस्त मंडळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला. १९१९ मध्ये पूर्व मिसिसिपीमधील पहिलं नॅशनल पार्क म्हणून त्याची स्थापना झाली. डोर यांनाच या पार्कचे पहिले अधिक्षक म्हणून नेमण्यात आलं व १९४६ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत ते या पदावर होते. पार्ककरता जागा दान करण्यासाठी अनेक धनवान मंडळी पुढे आली. बघता-बघता पार्कचं क्षेत्र खूपच वाढू लागलं. जॉन रॉकफेलर यांनी तर दहा हजार एकरांपेक्षाही अधिक जमीन या पार्कला दिली. त्या सर्वातूनच आजचा ४९ हजार एकरांचा पार्क उभा राहिला. त्यात ४२ हजार एकराचं संरक्षित जंगल आहे. कमालीचं निसर्गप्रेम, पर्यावरणाची खरीखुरी आच, दानशूरवृत्ती आणि दूरदृष्टी ठेवणाऱ्या व्यक्ती एकत्र आल्या तर काय चमत्कार होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अकाडिया नॅशनल पार्क. १९४७ मध्ये या पार्कवर फार मोठं संकट आलं होत; ते म्हणजे भीषण आगीचं. माऊंट डेझर्ट बेटावर १७ हजार एकराच्या क्षेत्रात भयंकर आग लागली आणि दहा दिवस ती भडकत होती. अकाडिया पार्कमधील १० हजार एकरांना त्याची झळ पोचली. बार हार्बरमधील साठ मॅन्शन्स आगीच्या भक्षस्थानी पडले. त्या काळात २३ दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता बेचिराख झाली. पण या आपत्तीवरही योजनाबद्ध नियोजनाने मात करण्यात आली. त्या नुकसानीची पुसटशी आठवणही आज शिल्लक नाही.
या पार्कमध्ये भटकण्यासाठी नानाविध मार्ग आहेत. पार्कच्या किनाऱ्या-किनाऱ्याने सायकलवरून फिरायचं असेल तर ४५ मैलांचा ट्रॅक आहे. गिर्यारोहकांना येथे फार मोठी पर्वणीच मिळते. या पार्कमध्ये एकशेवीस मैलांपेक्षाही अधिक लांबवर गिर्यारोहण ट्रॅक उपलब्ध आहे. धाडसी गिर्यारोहक येथील काही सरळ सुळक्यांवरही चढताना दिसतात. मोटारीने अगर बसनेही पार्कमध्ये फिरता येतं. पण खास पूर्वीच्या घोडागाडीमधूनही तुम्ही पार्कचा फेरफटका मारू शकता. जॉन रॉकफेलर (ज्यू) याने, चुरा केलेल्या दगडांचा ४५ मैलांचा खास रस्ता त्यासाठी तयार केला आहे. या रस्त्यावरून घोडागाडीतून जाताना विशेष मजा तर वाटतेच पण आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचं जे दर्शन घडतं ते फारच अप्रतिम म्हणावं लागेल.
अकाडियाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षाच्या कोणत्याही मोसमात इथे पर्यटकांची गर्दी असते. अधिकृत आकडेवारी प्रमाणे दरवर्षी २० लाखापेक्षाही अधिक पर्यटक या पार्कला भेट देतात. अर्थात क्षणाक्षणाला बदलणाऱ्या हवामानाला तोंड देण्याच्या तयारीनेच इथे यावं लागतं. त्यामुळे ऊन असो की पाऊस, थंडी किंवा हिमवर्षाव होवो, पर्यटकांची संख्या वाढतच असते. एप्रिलपासून ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत या संपूर्ण परिसराचं सौंदर्य अभूतपूर्व असं असतं आणि कॅमेरातही ते मस्त टिपता येतं. त्यामुळे तो मोसम येथे भटकंती करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑटम कलर्सची सुरुवात होते. झाडांच्या पानांचे रंग बदलू लागतात. सर्व परिसर अक्षरशः रंगीबेरंगी होऊन जातो. त्याचवेळेस झाडांची पानं गळायला लागतात. केशरी, पिवळा, किरमिजी रंगांच्या पानांचा सडा कमालीचा मोहक दिसतो. या घनदाट झाडीतून छोट्या-छोट्या पायवाटांनी भटकण्यासाठी साऱ्या जगातून पर्यटकांची इथे गर्दी उसळते. आम्ही तीन-चार दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीनही वेळेस या भटकंतीची मजा लुटत होतो. अमेरिकेत ऑटम कलरमध्ये अकाडिया पार्कला जाणाऱ्या सहली फार लोकप्रिय आहेत. नामांकित सहल कंपन्यांच्या या सहली रोज असतात व त्याचं रिझव्हेंशन निदान वर्षभर आधी करावं लागतं.
आपापल्या मोटारींनी किंवा विशेषतः कॅरव्हॅननी या पार्कची सहल करणाऱ्यांची संख्याही भरपूर असते. त्यामुळे स्वतःच्या सायकलीही बरोबर आणता येतात. (अर्थात येथेही भाड्याने सायकली मिळतात.) कॅरव्हॅनसाठी संपूर्ण पार्कमध्ये ५०० कँप साइटस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे मुक्काम करण्याचा अनुभव काही निराळाच असतो. म्हणजे पार्कमध्ये दिवसभर भरपूर भटकायचं व रात्रीच्या निवासासाठी या कँपसाइटवर यावयाचं. त्याखेरीज बार हार्बर गावात समुद्रकिनारी उत्कृष्ट हॉटेल्स, अपार्टमेंटस् आहेत. मात्र हिवाळ्यात बार हार्बर जवळजवळ रिकामं होतं. बहतेक रेस्टॉरंटस् बंद होतात. त्यामुळे कॅम्प साइटवर कडाक्याच्या थंडीत बारबेक्यूचा श्रीलिंग अनुभव घेता येतो .
अकाडिया पार्कमध्ये भटकताना एक जागा पर्यटकांना खिळवून ठेवते. ती म्हणजे 'थंडर होल', अटलांटिकच्या किनाऱ्यावरच एक भलीमोठी गुहा तयार झाली आहे. भरतीच्यावेळी समुद्राचं पाणी त्या गुहेत जोरात शिरतं आणि त्याच वेगाने मागे येतं. त्यावेळी गुहेच्या तोंडाशी त्याचा उंच फवारा उडतो. कधीकधी हा फवारा ४० फुटांपर्यंत उंच जातो व त्याचा जोरदार आवाज येतो निसर्गाचा हा चमत्कार पर्यटकांना बराच वेळ खिळवून ठेवतो. अकाडिया नॅशनल पार्कमध्ये दिवसभर भरपूर भटकायचं, सुंदर बिचेसवर समुद्रात मस्त डुंबायचं आणि रात्रीच्या मुक्कामासाठी बार हार्बर गाठायचं असा आमचा दिनक्रम होता. सहा खेड्यांचं मिळून बार हार्बर बनलं आहे. १७६३ पासून तिथे वस्ती होऊ लागली. त्यानंतर या निसर्गरम्य बंदरात लॉबस्टरमन, जहाज बांधणी करणारे, कलाकार व श्रीमंत लोक यांची वर्दळ वाढली. अमेरिकेतील अत्यंत श्रीमंत लोकांनी इथे भव्य मॅन्शन्स बांधले. त्यातील अनेक बंगले खरोखरच पाहण्यासारखे आहेत.
अकाडिया पार्कच्या मुक्कामानंतर आम्ही न्यू इंग्लंडमधील सर्वात ग्रामीण विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'व्हरमाँट' प्रांतात प्रवेश केला. अगदी छोटी छोटी गावं, दूर-दूर अंतरांवरील फार्म हाऊसेस आणि ऑटम कलर्सचे रंग उधळणारी घनदाट झाडी यांमुळे हा सारा परिसर कमालीचा खुलून दिसतो. या भागाचं आणखी एक आकर्षण म्हणजे नद्या, नाले यांच्यावरील लाकडाचे 'कव्हर्ड ब्रिजेस'. नदी, ओढा यांचे पात्र ओलांडणारे रस्ते हे लाकडाचे असतात व लाकडाच्याच कमानींनी ते संपूर्ण रस्ते झाकण्यात येतात. या भागात हिवाळ्यात भरपूर हिमवृष्टी होते व सारे रस्ते बर्फमय होऊन जातात. पण या पुलावरील लाकडाच्या कमानींमुळे बर्फ रस्त्यावर पडत व साचत नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत नाही. अमेरिकेतील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा व्हरमाँट इथे सर्वात जास्त म्हणजे १०९ कव्हर्ड ब्रिजेस आहेत. त्याच्या मधल्या रस्त्यावरून वाहनांची जा-ये सुरू असते व बाजूलाच पादचाऱ्यांसाठीही छोटा लाकडाचाच मार्ग असतो. रंगीबेरंगी झाडांच्या पार्श्वभूमीवर हे कव्हर्ड ब्रिजेस त्या ग्रामीण सौंदर्यात भरच घालतात.
राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीचे गाव
"आता आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी ज्या खेडेगावात झाला तिथे जाणार आहोत..." असं बरोबरच्या टूर गाइडने सांगितलं तेव्हा आम्ही अक्षरशः उडलोच. "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी आणि व्हरमाँट येथील एका खेड्यात...? हो, हो सारे सांगतो आणि दाखवतोही..." टूर गाइड म्हणाला. थोड्याच वेळात आम्ही व्हरमाँट प्रांतातील 'प्लाय माऊथ नॉच' या अगदी छोट्या खेडेगावाच्या वेशीवर पोहोचलो. आजही ते गाव शंभर वर्षांपूर्वीचंच वाटत होतं. अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष कॅलव्हिन कुलिज यांचं हे जन्मगाव. संपूर्ण गाव आजही जसंच्या तसं ठेवण्यात आलं आहे. पण एवढ्या पुरतंच त्याचं महत्त्व नाही... या खेडेगावातच त्यांनी अमेरिकेचा तिसावा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
कुलिज हे १९२३ मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. तीन ऑगस्ट १९२३ ला ते प्लाय माऊथ नॉच या आपल्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आले होते... संध्याकाळची वेळ होती. कुलिज मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत बसले होते. इतक्यात वॉशिंग्टन डी.सी. वरून त्यांना एक तातडीचा संदेश आला की, राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डिंग यांचं नुकतंच निधन झालं. तेव्हा अमेरिकेच्या राज्यघटनेप्रमाणे तुम्ही जिथे असाल, तिथे त्वरित राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घ्या. साराच गोंधळ उडाला... रात्र झाली होती. त्या गावात वीजही नव्हती. कुलिज यांच्या स्वतःच्या घरात केरोसीनचा दिवा लावण्यात आला. त्यांचे वडील हे नोटरी होते. त्यामुळे त्यांनीच त्या मिणमिणत्या दिव्यात आपल्या मुलाला अमेरिकेचा तिसावा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ दिली.
आम्ही त्या एकमजली घरात व जिथे प्रत्यक्ष शपथविधी पार पडला त्या खोलीत प्रवेश केला. अगदी साधी खोली... एक टेबल, एक खुर्ची व केरोसीनचा दिवा आजही तिथे ठेवला होता. अगदी ८८ वर्षांपूर्वीचंच दृश्य... शपथविधी नंतर पुढल्या वर्षी कुलिज आपल्या गावी पुन्हा आले. तेव्हा याच घरात त्यांनी 'उन्हाळ्यातले व्हाईट हाऊस' बनवून कामकाज पाहिलं. कुलिज यांचा जन्म झालेलं घर, तेथील दुकान, पोस्ट ऑफिसची इमारत आजही अगदी जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. त्यांच्यावर अखेरचे अंत्यसंस्कारही इथेच झाले होते.
परतीच्या प्रवासात बॉस्टनला तीन-चार दिवसांचा मुक्काम केला. अमेरिकेच्या इतिहासात बॉस्टनला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची तुफान गर्दी असते. बॉस्टनमधील ऐतिहासिक वास्तू, विविध स्थळं पाहण्यासाठी पर्यटकांकरता विविध सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 'फ्रीडम ट्रेल' हे त्याचंच एक उदाहरण. बॉस्टन शहराच्या काही रस्त्यांवर फिरताना फूटपाथवर तांबडा पट्टा दिसून येतो. हाच तो 'फ्रीडम ट्रेल'. अडीच मैलांच्या या मार्गावरून तुम्ही चाललात की सर्व महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांचं दर्शन होतं. चुकण्याचा तर प्रश्नच नाही. एकाच दिवशी तुम्ही सर्व मार्ग कापू शकता किंवा टप्प्याटप्प्यानेही जाऊ शकता. त्याखेरीज वाटेत ठिकठिकाणी माहिती केंद्रं आहेत. त्यात या ट्रेलचे नकाशे व स्थळांची माहिती देणाऱ्या पुस्तिका मोफत उपलब्ध होतात... त्यामुळे ऐतिहासिक बॉस्टनचं मस्त दर्शन होतं.
खडतर 'अॅथाबास्का' ग्लेशिअर
'अ 'मेरिकेची एंपायर स्टेट बिल्डिंग ज्या ग्लेशिअरमध्ये सहज गाडली जाईल, अशा आठ हजार फूट उंचावरच्या अॅथाबास्का ग्लेशिअरवर आपण एक तास घालवणार आहोत', कॅनेडिअन रॉकिजच्या सहलीत व्हँकुअर, जॅस्परहून, ब्रिटिश कोलंबिया आइसफिल्डच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला आणि सहल-संचालकाने ही घोषणा केली; तेव्हा अंगात कमालीचा उत्साह आणि पोटात भीतीचा गोळा अशा दोन्ही भावना निर्माण झाल्या. मी व जयंतीने मैलोन्मैल लांब पसरलेले भरपूर ग्लेशिअर्स यापूर्वीही पाहिले होते. पण १२०० फूट उंचीच्या या ग्लेशिअरवर उभे असताना तो मध्येच खचला तर काय ही शंका मन अस्वस्थही करत होती. अर्थात बरोबरचे अमेरिकन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन सहप्रवासी ज्या धाडसाने या मोहिमेबाबत बोलत होते, ते ऐकलं आणि आमचीही भीती क्षणार्धात नाहीशी झाली.
कॅनेडिअन रॉकी माऊंटन पार्कला वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचं क्षेत्रफळ २०,५८५ चौ. कि.मी. असून जगातील एक मोठं संरक्षित क्षेत्र म्हणून ते ओळखलं जातं. इथे संपूर्णपणे बर्फाचं साम्राज्य असून 'अॅथाबास्का' ग्लेशिअर हे तेथील मुख्य आकर्षण आहे. सकाळी नऊच्या सुमारास आम्ही ब्रिटिश कोलंबिया आइस फिल्डवर पोहोचलो. त्याचं क्षेत्रफळ ३२५ चौ.कि.मी. असून रॉकी माऊंटनमधील ते बर्फाचं सर्वात मोठं क्षेत्र मानलं होतं. माऊंट कोलंबिया हे येथील सर्वोच्च शिखर असून ते १०,००० फुटांवर आहे. तिथे वर्षाला सात मीटर हिमवर्षाव होतो. ते पाणी वितळून पॅसिफिक, आर्टिक व अटलांटिक महासागरांना मिळतं. या कोलंबिया आइसफिल्ड मध्येच ॲथाबास्का हा मुख्य ग्लेशिअर आहे. त्याचं क्षेत्रफळ सहा चौ.कि.मी. असून लांबी ६ कि.मी. व रुंदी १ कि.मी. तर खोली २७० ते १००० फूट आहे. कोलंबिया आइसफिल्डमध्ये एप्रिल-मे पासून अॅक्टिव्हिटिजना सुरुवात होते. एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांची गर्दी असते. पण थंडीत मात्र तिथे कोणीही राहत नाही. एप्रिलच्या अखेरीस, कॅनडातील अनेक तरुण मुलं-मुली इथे नोकरीसाठी येतात. माहिती केंद्रात, तिकिट विक्री केंद्रात किंवा 'आइस एक्सप्लोअरर' बस चालवण्याची कामं ते करतात. इथले सहा महिन्यांचं वास्तव्य म्हणजे त्यांच्या दृष्टीने एक आव्हानच असतं.
सर्वप्रथम आम्ही कोलंबिया आइसफिल्डच्या मुख्य कचेरीत आलो. इथून आइसफिल्डचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. मैलोन्मैल लांब पसरलेलं बर्फाचं सपाट मैदान, लहान-मोठ्या उंचीचे बर्फाचे डोंगर, सोसाट्याचा वारा व जवळजवळ शून्य डिग्री तापमान. आता आम्ही साडेसहा हजार फुटांवर होतो. अॅथाबास्का ग्लेशिअर पाहण्यासाठी आठ हजार फुटांपर्यंत जाणार होतो. पण त्यासाठी निरनिराळ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. माहिती केंद्रात एका भव्य दालनात आइसफिल्ड, ग्लेशिअर्स आदींबाबतच्या अनेक छायाचित्रांचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. शेजारीच मोठं रेस्टॉरंट व तळमजल्यावर भरपूर रेस्टरूम्स. ग्लेशिअर्सची सहल जवळजवळ दीड-दोन तासांची असते. तिथे बाथरूमला जाणं शक्य नाही. त्यामुळे सर्व विधी आटोपून तयार राहण्याची सूचना सहल संचालकाने केली. तोपर्यंत त्याने या चित्तथरारक सफरीची तिकिटं काढून ठेवली. केंद्राच्या बाहेर आलो तर थंडी मी म्हणत होती. माझ्या अंगात थर्मल, न्यूझीलंडच्या मरिनो वुलचा उबदार स्वेटर व जॅकेट होतं. जयंतीही अशाच तयारीत होती. पण या थंडीत वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कानटोपी हवीच. तिचाही बंदोबस्त होताच. सुरुवातीला केंद्रापासून दोन-तीन कि.मी.चा प्रवास साध्या बसने केला. इथेही बर्फच बर्फ होतं. पण मधून बऱ्यापैकी रस्ता होता. त्यामुळे साधी बसही त्यावरून जाऊ शकत होती.
पुढच्या छोट्या केंद्रावर उतरल्यानंतर बर्फावरून जाण्यासाठीच बनवलेली खास बस सज्ज होती. ब्रीवेस्टर कंपनीच्या या 'आइस एक्सप्लोरर' बसमध्ये ५६ प्रवासी बसू शकतात. तिचं इंजिन २५० एच.पी.चं व विशेष म्हणजे प्रत्येक टायर ६६ × ३ एवढ्या प्रचंड आकाराचं असतं. अशा सहा टायरवर ती बस चालते. बस नियंत्रणाच्या चाकाचा आकार २५ इंच. ही बस खूपच उंच असते. बसमध्ये चढण्यासाठी, ड्रायव्हर बटण दाबून पायऱ्या बाहेर काढतो व प्रवासी बसले की पायऱ्या परत आत घेतल्या जातात. बस म्हणजे जणू एक प्रचंड मोठा सिक्स व्हिल रणगाडाच होता. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तो ग्लेशिअरवरून घसरत नाही व त्यातून बर्फाच्या डोंगरांवर चढणं, उतरणं फारसं धोकादायक वाटत नाही. एक 'आइस एक्सप्लोरर' बनवण्यासाठी ९० दिवस लागतात व कॅनडातील नामांकित कंपनी जरूरीप्रमाणे त्याचं उत्पादन करते.
आता या एक्सप्लोररमध्ये बसून आमचा प्रवास प्रत्यक्ष ग्लेशिअरच्या दिशेने सुरू झाला. सुमारे वीस-बावीस वर्षांची, चांगली धष्टपुष्ट तरुणी हे धूड चालवत होती आणि त्याचबरोबर तिची कॉमेंट्री सुरू झाली. महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असलेली मायका ड्रायव्हर-कम-टूर गाइड होती. ग्लेशिअरवर थोडा रस्ता आपोआप तयार झाला होता. पण काही ठिकाणी कमालीचा उतार तर काही ठिकाणी कमालीचा चढ. चढ उतारावर एकावेळी एकच 'एक्सप्लोरर' चालतो. वायरलेसच्या साहाय्याने संदेश देऊन, दुसरा एक्सप्लोरर थांबवण्यात येतो. या वाहनाचा बर्फावर चालण्याचा वेग तासाला १० ते १५ कि.मी. असतो. सुमारे १५-२० मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही अॅथाबास्का ग्लेशिअरच्या मध्यावर येऊन पोहोचलो.
सुदैवाने अजून कोणीही पर्यटक तिथे आले नव्हते. बसच्या पायऱ्या बाहेर आल्या आणि आम्ही खाली उतरलो. त्या क्षणाचं वर्णन काय करावं? आयुष्यात अनेक महत्त्वाच्या स्थळांना, आश्चर्यांना मी भेट दिली आहे. पण त्या ग्लेशिअरवर पाय ठेवला आणि एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यानंतर त्या वीरांच्या काय भावना होत असतील याची सहज कल्पना आली. आम्ही जणू एका निराळ्याच विश्वात आलो होतो. चारही बाजूंना मैलोन्मैल पसरलेला फक्त बर्फच बर्फ होता. दृष्टिक्षेपात दुसरं काहीच नाही..... केवळ बर्फाच्या लहान-मोठ्या टेकड्या... आठ हजार फुटांवर भुरभुरणारा स्नो मधूनच डोळ्यात जात होता. आता तेथील तापमान उणे १०० सें. पर्यंत गेल्याचं मायकाने सांगितलं. ज्यांना कडाक्याची थंडी, स्नोचा वर्षाव सहन होत नसेल त्यांनी बसमध्ये जाऊन बसण्याची सूचना तिने केली. पण मी व जयंती थंडीशी सामना करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारीने आलो होतो. त्यामुळे आम्ही चालत बरंच पुढे जाऊ लागलो. आमचा उत्साह पाहून मायकाही बरोबर येत होती. या बर्फावरून चालताना योग्य शूजची मात्र जरुरी असते. अन्यथा चांगलंच घसरायला होतं.
आता तर तापमान उणे १२० से. च्याही खाली उतरलं होतं. मायका महत्त्वाची माहिती देत होती. आपण या क्षणी उभे आहोत, तिथे या ग्लेशिअरची उंची १२०० फूट आहे. म्हणजे अमेरिकेची एंपायर स्टेट बिल्डिंग त्यात संपूर्णपणे गाडली जाऊ शकेल. ग्लेशिअर व आइसफिल्ड यात फार मोठा फरक असतो. आइसफिल्डवरचा बर्फ तसा भुशभुशीत असतो व तो लवकर वितळतो. पण ग्लेशिअरचा बर्फ हा शतकानुशतके दबून-दबून अतिशय घट्ट झालेला असतो. साधारणतः १०० इंच भुसभुशीत स्नो साचला तर तो दबून एक इंच घट्ट आइस होतो, ते म्हणजे ग्लेशिअर. ही प्रक्रिया वर्षानुवर्ष, शतकानुशतकं सुरू असते. ग्लेशिअरवर काही ठिकाणी बर्फ निळं आढळतं. ती धूळ असते. पण तरीही लांबून व जवळून ते दृश्य फारच अप्रतिम दिसतं.
जागतिक उष्णता वाढत असल्याचा परिणाम या ग्लेशिअरवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अॅथाबास्का ग्लेशिअर आक्रसत आहे. हिवाळ्यात बर्फ पडल्यामुळे तो १५ मीटर्स पुढे जातो. उन्हाळ्यात बर्फ वितळते. बर्फ वितळण्याचं हे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो २५ मीटर्स मागे येतो. म्हणजे दरवर्षी तो एकूण १० मीटर्सनी मागे-मागे येत आहे... आक्रसत आहे. आम्ही बरेच अंतर चालून आलो होतो... एक छोटी टेकडीही पादाक्रांत केली होती... वाऱ्याचा वेग वाढला होता. तापमान उणे १५० सें. च्या जवळपास पोहोचलं होतं. गॉगल असूनही बर्फ डोळ्यांना त्रास देऊ लागला होता. आता आम्ही मागे फिरलो... घट्ट बर्फावरून चालताना पावलं फार जपून टाकावी लागतात. त्यातून एकदा पाय घसरलाच... सुदैवाने फारसं लागलं नाही. जयंती व मायका दोघींच्या हाताला धरूनच उठता आलं. आइस एक्सप्लोररने त्याच मार्गाने परत आलो. तो एक तास मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. जणू एव्हरेस्ट सर केल्याचं समाधान मला वाटत होतं. काही धाडसी गिर्यारोहक पायी चालत जाऊन तिथली निरनिराळी शिखरं पादाक्रांत करतात. अनेकवेळा अनेकांच्या जीवावर बेततं. त्यामुळे त्यांना तिथल्या माहिती केंद्रावर नाव नोंदणी करूनच मोहीम सुरू करावी लागते. दरवर्षी, अचानक उद्भवणाऱ्या हिमवादळात निदान १०-१२ व्यक्ति निश्चित गायब होतात. त्यांचा काहीही शोध लागत नाही. तरीही दरवर्षी गिर्यारोहकांची संख्या वाढतेच आहे. आम्ही मात्र अॅथाबास्काचा चित्तथरारक अनुभव घेऊन सुखरूप परतलो होतो.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा)
खंड : उत्तर अमेरिका
राजधानी : व्हिक्टोरिया
क्षेत्रफळ : ९,४४,७३५ चौ.कि.मी
लोकसंख्या : सुमारे
४१,५६,०००
चलन : कॅनेडियन डॉलर्स
भाषा : इंग्रजी
कसे जाल?
या ग्लेशिअरवर जाण्यासाठी कॅनडाचा व्हिसा हवा. व्हँकुअर हे ब्रिटिश कोलंबियातील सर्वात महत्त्वाचं व मोठं शहर. भारतातून विविध विमानकंपन्यांची सेवा, व्हँकुअरसाठी उपलब्ध आहे. तिथून बसने किंवा मोटारीने रॉकी माऊंटन पार्कला जाता येतं. एखाद्या सहल कंपनीबरोबर जाण्याऐवजी, स्वतःच सहल आखून, प्रवास करायला इथे खूप मजा येते.
कधी जाल?
एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबर हा योग्य कालावधी. ऑक्टोबर ते मार्च हा सारा परिसर हिमवर्षावामुळे बंद असतो. केवळ अत्यंत सराईत, धाडसी गिर्यारोहक, स्कीइंग खेळाडूंनाच तिथे जाता येतं.
सुरक्षितता :
पूर्ण सुरक्षित.
थक्क करणारे अनुभव :
परदेशातील प्रामाणिकपणा.....
पश्चिम कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विभागाची राजधानी व्हिक्टोरिया, व्हॅकुअर, जास्पर, बाफ, केलोनो, व्हिसलर या अत्यंत सुंदर, नयनरम्य प्रदेशांचा दौरा दोन वर्षांपूर्वी केला होता. हिवाळा सुरू होत असताना तेथील हजारो मैलांच्या पार्कमधील झाडांचा रंग बदलून अक्षरशः रंगीबेरंगी होतो. यालाच 'फॉल सिझन' म्हणतात. नानाविध रंगांची, झाडांची पानं जमिनीवर पडलेली असतात. ही पानगळही डोळ्यांना कमालीची सुखावते. मस्त थंडी सुरू झालेली असते. अद्याप बर्फ पडलेला नसतो व पाऊसही फार त्रासदायक वाटत नाही. त्यामुळे यंदा परत व्हिक्टोरिया व्हँकुअरला जाण्याचं ठरवलं व १० ऑक्टोबरला तिथे रवाना झालो.
व्हिक्टोरिया-व्हँकुअर प्रवास फेरीने दीड तासांचा व विमानाने अवघ्या २४ मिनिटांचा आहे (म्हणजे जणू पुणे-मुंबई). मी व जयंती व्हिक्टोरियातील मुक्काम संपवून विमानाने व्हँकुअरला येण्यासाठी निघालो. त्यादिवशी सकाळी जोरदार पाऊस पडत होता. एअर कॅनडाचे ३६ सीटर, अगदी छोटं विमान व्हिक्टोरिया विमानतळावर थोडं लांबच उभं होतं. त्यामुळे तिथपर्यंत चालत जावं लागणार होतं. म्हणून मी व जयंतीने आमच्या स्वतःच्या छत्र्या उघडल्या व विमानापर्यंत गेलो. विमान अगदी छोटं होतं, त्यामुळे एअर हॉस्टेसने, त्या छत्र्या दरवाजाशेजारीच ठेवायला सांगितल्या. अवघ्या २४ मिनिटांत आम्ही व्हँकुअर विमानतळावर उतरलो. त्यावेळी तिथेही पाऊस पडतच होता. उतरताना पाहिलं तर दरवाजाजवळ छत्र्या नव्हत्या. हवाई सुंदरीने बहुधा आत ठेवल्या असतील म्हणून तिच्याकडे छत्र्या मागितल्या. त्यावर उलट तिनेच, आम्हाला विचारलं की "कोणत्या छत्र्या?" आम्ही तिच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी छत्र्या ठेवल्याची आठवण करून दिली. मग ती म्हणाली की, "व्हिक्टोरियातील एअर कॅनडाच्या कर्मचाऱ्यांना त्या एअरलाइन्सच्या छत्र्या आहेत, असं वाटलं असावं. त्यामुळे त्यांनी त्या नेल्या असाव्यात. आता मी काहीच करू शकत नाही."
छत्र्यांची किंमत अगदीच मामुली होती. पण परदेशातील प्रामाणिकपणा, कार्यक्षमता याबद्दल बरंच बोललं जातं याची आठवण झाली व माझ्यातला पत्रकार जागा झाला. व्हॅकुअर विमानतळावरील 'लॉस्ट अँड फाऊंड' काऊंटरवर आम्ही गेलो व आमची कहाणी त्यांना ऐकवली. कर्मचाऱ्याने व्हिक्टोरियाला फोन लावला. पण तिथले कर्मचारी अन्य कामात गुंतले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्याने व्हॅक्अरमधील आमच्या मुक्कामातील जागेचा टेलिफोन नंबर घेतला व काही असलं तर संपर्क साधतो असं सांगितलं. वेळ मारून नेण्याची त्याची ही क्लृप्ती असल्याचं आमचं मत झालं आणि आम्ही तो विषय विसरून गेलो.
सुमारे दोन तासांनंतर आम्ही व्हँकुअरच्या डाऊन टाऊनमधील शेरेटन हॉटेलच्या आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. पंधरा-वीस मिनिटं झाली नसतील तोच फोन खणखणला. ऑपरेटरने सांगितले की, "व्हँकुअर विमानतळावरून फोन आहे." एकदम काहीच लक्षात आलं नाही. फोनवरून सांगण्यात आलं की, 'तुमच्या दोन्ही छत्र्या पुढच्या विमानाने इथे आल्या आहेत. त्या कधीही येऊन घेऊन जा. मात्र आम्ही आमच्या माणसामार्फत त्या पाठवू शकत नाही. कारण अधिकृत बॅगेजमध्ये त्याची नोंद नाही.'
प्रामाणिकपणाचा आणखी एक मजेशीर अनुभव.....
परदेशातील प्रामाणिकपणाचा असाच मजेशीर अनुभव तुर्कस्तानच्या भेटीतही आला. इस्तंबूलला जाताना, एमिरेट्स विमान कंपनीतर्फे आम्ही दुबईमार्गे गेलो. विमान अपहरणाच्या घटनांमुळे, विमानात आपल्याबरोबर घ्यावयाच्या वस्तूंबाबत आता बरेच निर्बंध आले आहेत. त्यामुळे मुंबई विमानतळावर, अगदी विमानात चढताना, जयंतीच्या पर्समधला छोटा स्वीस चाकू, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढून घेतला. दुबईत उतरल्यानंतर विमानातील हवाई सुंदरीकडून तुम्ही तो परत घ्या, असं त्याने सांगितलं व त्याची रिसीट वगैरे काही दिली नाही.
विमान दुबईला उतरल्यानंतर, मी मुख्य हवाई सुंदरीकडे चाकूची विचारणा केली. पण आपल्याकडे अशी कोणतीच वस्तू देण्यात आलेली नाही असं तिने सांगितलं. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने चाकू लंपास केला असावा अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो. चाकू फार काही किमती नव्हता. पण आमच्या पहिल्यावहिल्या परदेश दौऱ्यात जयंतीने स्वित्झर्लंडला त्याची खरेदी केली होती. ही भावना त्यामागे होती. तुर्कस्तानमध्ये १८-२० दिवसांची भटकंती केल्यानंतर आम्ही तो विषय विसरूनही गेलो. परतीच्या प्रवासासाठी इस्तंबूल विमानतळावर बरेच लवकर येऊन पोहोचलो. वेळ होता, त्यामुळे हरवलेल्या चाकूची एमिरेट्सच्या काऊंटरवर चौकशी करावी अशी कल्पना जयंतीच्या मनात
थक्क करणारा परदेशातील प्रामाणिकपणा..... /
'४५ फूट उंच लाटा...' लॉबस्टर क्रूज आणि टायटॅनिक
ज "गात समुद्रभरतीच्या सर्वांत उंच लाटा कुठे दिसतात? व त्या किती फूट उंचीच्या असतात? कॅनडातील न्यूब्रुन्स्विक व नोव्हास्कोशिया या प्रांतांच्यामध्ये असलेल्या 'बे ऑफ फंडी' येथे हा अभूतपूर्व चमत्कार पाहायला मिळतो. हो ! खरोखरच हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. कारण भरतीच्या या लाटा ४५ ते ५० फुटांपर्यंत उंच उसळत असतात. 'हॉपवेल रॉक्स' म्हणून तो परिसर ओळखला जातो. ते दृश्य प्रत्यक्ष पाहण्याचा योग, त्या भागाची भटकंती करताना आला.
चोवीस तासांत इथे दोन वेळा मोठी भरती व दोन वेळा ओहोटी पाहता येते. त्यापैकी निदान एक भरती व ओहोटी दिवसा होते. भरती व ओहोटी यांच्या दरम्यान साधारणतः ६ तास १३ मिनिटांचं अंतर असतं. लाटांचं वेळापत्रक प्रत्येक दिवशी सुमारे एक तासाने पुढे-पुढे जातं. या खाडीच्या निरनिराळ्या भागांत त्यांच्यात थोडा फार फरक पडतो.
बे ऑफ फंडी मधील १०० दशलक्ष टन पाणी दिवसातून दोन वेळा आत-बाहेर, जात-येत असतं! जगातील सर्व ताज्या पाण्याच्या नद्यांचे प्रवाह एकत्र केले तरी ते यापेक्षा कमी होतील असं सांगण्यात आलं. त्यामुळेच तिथल्या लाटांची उंची ४५ ते ५० फुटापर्यंत असते. अटलांटिक महासागरातील ठरावीक उंचीच्या लाटांपेक्षा या लाटा पाचपट अधिक उंचीच्या असतात. या लाटा तीन पद्धतींनी पाहता येतात त्यांचा उभा, आडवा मारा, वेग आणि उंची हे सारं दृश्य मोठं अभूतपूर्व असंच असतं. आम्ही तिथे सकाळी दहाच्या
सुमारास पोचलो. मुख्य इमारतीच्या जवळ उतरलो तर स्थानिक गाइड धावतच पुढे आला. "आणखी दहा-पंधरा मिनिटांत भरती सुरू होईल. त्यामुळे सर्वप्रथम हॉपवेल रॉक्सच्या पायथ्याशी चला" असं त्याने सांगितलं. आम्ही थोडं अंतर चालत गेलो. मग लोखंडी जिन्याच्या ९९ पायऱ्या उतरून पायथ्याशी आलो. वर्षानुवर्षं लाटा व येथील खडक यांच्या संघर्षातून दगडांना फ्लॉवर पॉटचे नानाविध आकार प्राप्त झाले आहेत. आता भरतीची वेळ जवळ येत होती. तोपर्यंत या दगडांच्या पायथ्याशी भटकून, भरपूर फोटो काढून घेतले. हळूहळू पाणी चढू लागतं. आम्ही त्याच जिन्याने वर आलो व वरच्या 'व्ह्यू पॉइंट' वरून भरतीची मजा अनुभवू लागलो. पाहता-पाहता पाण्याचा जोर वाढू लागला. त्या दिवशीच्या अंदाजाप्रमाणे लाटा ४२ फुटांपर्यंत जातील असं सांगण्यात आलं. दोन-अडीच तासांनंतर पुन्हा तिथे गेलो. पाणी अर्ध्यापर्यंत चढलं होतं आणि जोरदार लाटा त्या दगडांना धडकत होत्या. अमेरिकेतील अलास्काच्या क्रूझ सफरीत, इन्साईड पॅसेजला जाताना बोटीला उंच उंच लाटांचे तडाखे बसत होते. त्यावेळी छातीत धडकी भरली होती. हे दृश्य त्यापेक्षाही भयंकर होतं. फरक एवढाच होता की, यावेळी आम्ही बोटीत नव्हतो, तर उंचावरून या लाटांच्या भराऱ्या पाहत होतो. भरती संपेपर्यंत उभे राहून ४०-४५ फूट उंचीच्या लाटा पाहण्याची इच्छा होती. पण अन्य कार्यक्रमांमुळे ते शक्य नव्हतं.
इथल्या 'हॉपवेल रॉक्स'ना फ्लॉवर पॉटचे जे आकार प्राप्त झाले आहेत, त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. सुमारे ३०० दशलक्ष वर्षांपूर्वीपासून या कथेला सुरुवात झाली. समुद्राच्या पाण्याच्या भरतीच्या लाटा या मऊ रेतीच्या खडकांच्या पायाला घासतात. त्यामुळे खालचा पाया कमजोर होत जातो व वरच्या कठीण भागाला आधार राहत नाही. ते खाली पडायला लागतात. त्यातूनच खडकांचे हे फ्लॉवर पॉटस् तयार झाले आहेत. त्यांचे आकार निरनिराळे असून, विशेष म्हणजे ते बदलत आहेत. वसंत ऋतूत मॉइश्चरमुळे फ्लॉवर पॉट्सच्या वरच्या भागाचे तुकडे निघतात. तसंच हिवाळ्यात अटलांटिक सागरावरील ही खाडी गोठते. ग्लेशिअर्स, स्नो, लाटा व वारा यामुळे या खडकांचा सतत संघर्ष सुरू असतो. त्यात मोठे खडक मात्र हजारो वर्षे टिकू शकतात. 'बे ऑफ फंडी'मधील फ्लॉवर पॉट्स अजून एक लाख वर्षे टिकू शकतील असा भूगर्भ शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
लॉबस्टर क्रूज
'बे ऑफ फंडी'चा चमत्कार पाहण्याआधी 'शेडिअॅक बे' वरून आलो. तिथे प्रामुख्याने मच्छिमाऱ्यांची वस्ती आहे. गावात प्रवेश केला, तेव्हा मध्यवर्ती ठिकाणी 'लॉबस्टर' (शिवडा) ची भलीमोठी प्रतिकृती उभारण्यात आली होती. हा सारा परिसर लॉबस्टरसाठी प्रसिद्ध मानण्यात येतो. जगात एकूण तीस जातींचे लॉबस्टर आहेत. त्यात येथील 'अटलांटिक लॉबस्टर' फार प्रसिद्ध व चविष्ट मानले जातात. लॉबस्टरची नजर स्थिर असते. त्यामुळे लहानसहान हालचालीही तो टिपू शकतो. अटलांटिक लॉबस्टर हे सर्वसाधारणतः ऑलिव्ह रंगांचे असतात. पण प्रामुख्याने त्यांचं अन्न व बाहेरचा प्रकाश यावर त्यांचा रंग अवलंबून असतो. लॉबस्टर हा दोन फुटांपर्यंत लांब व दोन पौंडापेक्षाही अधिक वजनाचा असू शकतो.
शेडिअॅक बेच्या भेटीत आम्ही अगदी आगळ्या-वेगळ्या 'लॉबस्टर क्रूझ'ची मजा अनुभवणार होतो. म्हणजे लॉबस्टर कशा पद्धतीने पकडण्यात येतात, त्यांच्या विविध जाती कोणत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रशुद्धपद्धतीने लॉबस्टर खायचा कसा यासंबंधीचं प्रशिक्षण या अर्ध्या दिवसाच्या क्रूझमध्ये दिलं जाणार होतं. एका अलिशान पण छोट्या क्रूझमधून, सकाळी अकराच्या सुमारास आमचा प्रवास सुरू झाला. शेडिअॅक बेचा सारा परिसर कमालीचा निसर्गरम्य. किनाऱ्यावरील कोळ्यांची छोटी रंगीबेरंगी घरं मागे टाकून आम्ही खाडीच्या चांगल्या मध्यवर्ती ठिकाणी आलो आणि लॉबस्टर संबंधीची माहिती देणारा आमचा वर्ग सुरू झाला.
या वर्गात आम्ही साधारणतः वीस पर्यटक विद्यार्थी-विद्यार्थिनी (अर्थात मी व जयंती वगळता बाकी सर्व गोरे) व तीन लॉबस्टर तज्ज्ञ यांचा समावेश होता. सर्वप्रथम आम्हाला दाखवण्यात आला तो २' x १' फूट लांबीरुंदीचा जाळीचा पिंजरा. त्याला म्हणतात 'लॉबस्टर ट्रॅप'. पिंजऱ्याच्या बाहेर लॉबस्टरला आकर्षित करणारे फिश लावण्यात येतात. लॉबस्टरला दोन कि.मी.पर्यंतचा वास येतो. या पिंजऱ्याला दोन कप्पे असतात. पहिला 'किचन रूम'. लॉबस्टर पिंजऱ्यात अडकला की, किचनरूममध्ये येतो. मग पुढची 'लिव्हिंग रूम.' या रूममध्ये तो ट्रॅप होतो. रोज हे पिंजरे पाण्यातून वर काढून त्यांची पाहणी केली जाते. काही वेळेस एक लॉबस्टर दुसऱ्या लॉबस्टरला खातोसुद्धा. न्यून्ब्रुन्स्विक भागात लॉबस्टर पकडण्याची परवानगी फक्त दोन महिने म्हणजे ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबर याच कालावधीत दिली जाते व केवळ परवानाधारकांनाच ती मिळते. लॉबस्टर टीचर मायकेलने 'ट्रॅप' मध्ये दोन भले मोठे लॉबस्टर बरोबर पकडले होते. नर, मादी, त्यांच्या विविध जाती यांची माहिती तो देत होता. आता खऱ्या किचनमध्ये तयार झालेले लॉबस्टर खाण्याची वेळ आली होती. सर्वप्रथम प्रत्येकाला गळ्यात अडकवण्यासाठी छोटा एप्रन देण्यात आला. कारण लॉबस्टर खाताना त्याचा प्रसाद शर्टावर, टी शर्टवर हमखास मिळतोच. प्रत्येकाच्या पुढे प्लेटमध्ये भलामोठा लॉबस्टर, तो तोडण्यासाठी नटक्रॅकर व आतला गर बाहेर काढून खाण्यासाठी दोन टोकं असलेला बारीक चमचा ठेवण्यात आला.
मायकेलच्या हातातही लॉबस्टर व नटक्रॅकर होता. शास्त्रशुद्धपद्धतीने लॉबस्टर कसा खायचा याचं प्रात्यक्षिक तो दाखवत होता व त्याचं अनुकरण आम्हाला करायचं होतं. नटक्रॅकरच्या साहय्याने एक एक नांगी तोडायची व टोकदार चमच्याच्या साहाय्याने त्यातील गर बाहेर काढून खायचा. अर्थात हे करताना कितीही काळजी घेतली तरी त्याचा रस प्लेटभर पसरायचाच. शेजारच्या प्लेटमध्ये तो उडत नव्हता एवढंच नशीब ! आयुष्यभर काट्या-चमच्याने खाणाऱ्या अन्य गोऱ्या सहप्रवाशांचीही चांगलीच तारांबळ उडत होती. त्यामुळे साऱ्या क्रूझवरचं वातावरण हास्यकल्लोळात डुबून गेलं होतं. लॉबस्टरच्या मधला पेंद्या चोखणे म्हणजे खरी कसोटी. प्रथम नटक्रॅकरमध्ये बरोबर अडकवून तो दाबणं महाकठीण काम होतं. कारण प्रत्येकाचे हात रश्याने अक्षरशः माखले होते. मायकेल प्रत्येक टेबलावर मधूनमधून येऊन प्लेटमधला लॉबस्टर तोडायला मदतही करत होता. खायला कितीही त्रास पडो पण अटलांटिक लॉबस्टर खायला एकदम चवदार. तो बनवण्याची त्यांची पद्धतही चांगली वाटली. स्वच्छ प्लेट वगैरे कल्पना मात्र लॉबस्टर खाताना पूर्णतः दूर ठेवावी लागते व त्याबद्दल कोणाचंच दुमत नसतं. त्याची चव जिभेवर एवढी मस्त राहते की अशा प्लेटकडे अखेरीस कोणाचं लक्षही जात नाही.
हा संपूर्ण प्रदेश लॉबस्टरसाठी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी केवळ लॉबस्टरचीच रेस्टॉरंट्स आहेत. त्याचा आस्वाद घेण्यासाठी दूरवरून खवय्ये येत असतात. अर्थात लॉबस्टर डिश तशी चांगलीच महाग असते. त्यासाठी प्रत्येकी २५ ते ३० डॉलर्स (सुमारे दोन हजार रु.) मोजावे लागतात. म्हणून अनेक रेस्टॉरंट्समध्ये दुपारी ४ ते ६ या कमी गर्दीच्या वेळेत तुम्ही गेलात तर १५ ते २० डॉलर्समध्ये लॉबस्टर मिळू शकतात. या संपूर्ण मुक्कामात तीन-चार वेळा लॉबस्टरचा आस्वाद घेतला. आजही त्याची आठवण झाली की, तोंडाला पाणी सुटतं.
टायटॅनिक व हॅलिफॅक्स
टायटॅनिक बोटीच्या दुर्घटनेचा व नोव्हास्कोशिया प्रांताची राजधानी हॅलिफॅक्सचा निकटचा संबंध असल्याचे वाचनात आलं होतं. हॅलिफॅक्सच्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामात याची चांगली माहिती मिळाली. टायटॅनिक म्युझियममध्ये टायटॅनिकचे काही अवशेष आणि समुद्राच्या तळाशी मिळालेल्या त्यातील दुर्दैवी प्रवाशांच्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहता आल्या. अजस्त्र हिमनगावर आपटून टायटॅनिक कशी बुडाली हे दाखवणारी फिल्म काळजाचा ठोका चुकवून गेली आणि त्यातील मृतांचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्या दफन भूमीला भेट देऊन त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
एप्रिल १९१२ मध्ये १३०० प्रवासी व ९०० कर्मचाऱ्यांना घेऊन टायटॅनिक बोट मोठ्या दिमाखात न्यू यॉर्कच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. प्रत्येक वसंत ऋतूच्या आरंभी, अटलांटिकच्या उत्तरेस अतिविशाल हिमनग पाण्यात पसरलेले असतात. त्यावर्षी तर बर्फाचं हे साम्राज्य आणखी दक्षिणेकडेही सरकलं होतं. यासर्व गंभीर परिस्थितीची कल्पना अन्य बोटी, टायटॅनिकच्या कप्तानाला वारंवार देत होत्या. पण त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टायटॅनिक वेगाने पुढे जातच होती.
... रविवार १४ एप्रिल रात्री ११ वाजून ४० मिनिटं झाली होती आणि प्रचंड हिमनगावर टायटॅनिक आदळली. अवघ्या २ तास ५० मिनिटांत म्हणजे १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजून २० मिनिटांनी या अतिअजस्त्र बोटीने समुद्राचा तळ गाठला. ही दुर्घटना जिथे घडली, त्यापासून हॅलिफॅक्स हे बंदर सुमारे ७०० मैलांच्या अंतरावर होते. ते सर्वात जवळचं मोठं बंदर. त्यामुळे मदतीच्या सर्व हालचाली तिथूनच सुरू झाल्या. टायटॅनिक बुडत असताना, कनार्ड ही पहिली बोट तेथे पोहोचली व एकूण ७०० जणांचे प्राण वाचू शकले. आता शोध घ्यावयाचा होता, तो मृतांची प्रेतं मिळवण्याचा. हॅलिफॅक्सहून निघालेली पहिली बोट घटनास्थळी २० एप्रिलला पोहोचली. सतत चार दिवस, या बोटीतील पाणबुडे समुद्राच्या तळाशी जाऊन प्रेतांचा शोध घेत होते. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी पाणबुडे वापरत असलेली उपकरणं किती प्रचंड वजनाची होती याची कल्पना म्युझियममध्ये ठेवलेल्या त्या साहित्यावरून आली. अत्यंत वजनदार शिरस्त्राण, प्राणवायूची नळकांडी, पायातले बूट, कपडे घालून तळ गाठावयाचा व तोही गोठलेल्या बर्फातून... खरोखरच हे मोठं दिव्यकर्मच होतं. तरी ३०६ प्रेतांचा शोध त्यांनी लावला. पण त्यापैकी ११६ प्रेतं ही भयानक अवस्थेत बोट हॅलिफॅक्सकडे निघाली. होती. त्यामुळे त्यांना परत जलसमाधी देण्यात आली व बाकी प्रेतं घेऊन ही याच मोहिमेवर आलेल्या दुसऱ्या बोटीतील पाणबुड्यांना १७ प्रेतं हाती लागली. त्यापैकी दोन पुन्हा समुद्रातच टाकण्यात आली. एकूण २०९ प्रेतं हॅलिफॅक्सला आणण्यात आली. तिथे एक तात्पुरतं शवागार उभारण्यात आलं व १ मे ते १२ जून या कालावधीत हॅलिफॅक्समधील तीन खास दफन भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही विविध ठिकाणांहून त्या दुर्दैवी जिवांचे नातेवाईक इथे येतात व फुले ठेवून त्यांना आदरांजली वाहतात.
म्युझियममध्ये अगदी समोर ठेवलेला बुटाचा लहान जोड आपलं लक्ष वेधून घेतो. 'एका अनोळखी बालकाचा...' हे वाक्य चटका लावून जातं. तिथेच एक लाकडाची आरामखुर्ची ठेवली होती. टायटॅनिकमध्ये प्रथम वर्गाचे प्रवासी डेकवर बसून हवा खाण्यासाठी तिचा वापर करत. अशा खुर्थ्यांची संख्या मर्यादित असायची, म्हणून ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना टीप द्यावी लागत असे. या दुर्घटनेनंतर हॅलिफॅक्स शहरावरही शोककळा पसरली होती. त्याचं वर्णन करणारी वर्तमानपत्रांची कात्रणंही तिथे पाहायला मिळाली.
दीडशे वर्षापूर्वीचं गाव
जुनी खेडी, त्यातल्या इमारती, संस्कृती, कला, जशीच्या तशी जतन करण्याकडे अनेक पाश्चिमात्य देशांचा मोठा कल असतो. दीडशे वर्षापूर्वीचं नोव्हास्कोशिया कसं होतं याची तंतोतंत कल्पना 'शेखुक व्हिलेज' वरून आजही येते. १८६० सालच्या शेब्रुक खेड्यातील पंचवीस घरं पर्यटकांना पाहण्यासाठी जशीच्या तशी ठेवण्यात आली आहेत. या छोटेखानी गावात प्रवेश केला आणि खरोखरच १५० वर्षं मागे गेल्यासारखं वाटलं. गावाच्या वेशीवरच लोहाराची भट्टी होती. पुढचं चाक भलं मोठं व मागचं अगदी छोटं अशी गमतीदार सायकल त्याकाळी फार लोकप्रिय होती. ती कशी बनवली जायची हे दाखवून लोहाराने ती चालवूनही दाखवली. पुढे एक छापखाना होता. त्यामध्ये १८८० सालातील छपाई यंत्रावर अक्षरं जुळवून छपाई सुरू होती. औषधाचं दुकान व डॉक्टरची तपासण्याची खोली मागेपुढेच होती. तिथे औषधांच्या मलमांच्या बाटल्या, डब्या, खलबत्ते वगैरे साहित्य अगदी जुन्या लाकडांच्या कपाटांत ठेवण्यात आलं होतं. पोस्टाच्या कचेरीत त्याकाळी टपालावर
शिक्के कसे मारले जात, तसंच पोस्टमनचा पोशाखही पहायला मिळाला. शिंप्याचं दुकानही अगदी हुबेहूब होतं. जुनी शिलाई मशिन, जड छोट्या-छोट्या कातऱ्या व कोळशाची इस्त्री... त्या काळातील घोड्याच्या बग्गीतून आइस्क्रीम खात आमची गावची सफर सुरू होती. घरांचे रंग, आकार, रचना, गावातील रस्ते. सर्व काही अगदी त्या काळातील... शेजारून स्वच्छ नदी संथपणे वाहत होती. शेखुक व्हिलेजचा निरोप घेताना चटकन मनात विचार आला की, आपल्याकडेही कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात तेथील वैशिष्ट्यं दाखवणारी गावं तयार करून पर्यटकांना आकर्षित करता येणार नाही का?
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
न्यूज़ुन्स्विक व नोव्हास्कोशिया
(कॅनडा)
न्यूबुन्स्विक
राजधानी : फ्रेडरिक्टन
क्षेत्रफळ : ७२,९०८ चौ.कि.मी.
लोकसंख्या : ३४,५०, ६५४
चलन : कॅनेडियन डॉलर्स
भाषा : इंग्रजी
नोव्हास्कोशिया
राजधानी : हॅलिफॅक्स
क्षेत्रफळ : ५५,२८३ चौ. कि.मी.
लोकसंख्या : ९,३७,८८९
चलन : कॅनेडियन डॉलर्स
भाषा : इंग्रजी
कसे जाल?
या दोन्ही राज्यांत जाण्यासाठी कॅनडाचा व्हिसा आवश्यक आहे. सर्व भागात मनसोक्त भटकंती करायची तर गाडी हवी. तरच तुम्ही दोन्ही राज्यांतील ग्रामीण भागांचं सौंदर्य, वैशिष्ट्यं अनुभवू शकाल. अमेरिका व कॅनडा यांच्या दरम्यान १५० मैलांची सीमा आहे. ती कायदेशीररित्या ओलांडून तुम्ही या भागात येऊ शकता. त्याचबरोबर विमानानेही तुम्ही राजधानीच्या शहरात पोहोचू शकता. भारतातल्या सहलकंपन्या येथे सहली आणत नाहीत. पण परदेशातल्या ट्रॅफलगार, इनसाईट, ग्लोबस, कॉसमॉस या सहलकंपन्यांच्या सहली आहेत. मात्र वेळेचे बंधन न ठेवता स्वतःची स्वतः भटकंती करण्याची खास शिफारस करावीशी वाटते.
कधी जाल?
एप्रिल ते सप्टेंबर-ऑक्टोबर हा लोकप्रिय मोसम. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑटम कलर्सही पाहता येतात.
सुरक्षितता :
सर्वच दृष्टींनी पूर्ण सुरक्षित.
अमेरिकेत व कॅनडात
अनुभवलेले ऑटम कलर्स
ऑ टम कलर्स व फॉल सिझन (झाडांच्या पानांची पानगळ) यांचं सौंदर्य कॅनडाच्या व्हिक्टोरिया व व्हॅकुअर या दोन शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी पाहिलं होतं. पण ऑटम कलरची खरी मजा पूर्वेकडील उत्तर कॅनडात व अमेरिकेतील न्यू इंग्लंडच्या प्रामुख्याने उत्तर भागांतील ग्रामीण प्रदेशात दृष्टीस पडते असं सांगण्यात आलं. निसर्गाचा हा आगळा-वेगळा चमत्कार पाहण्यासाठी साऱ्या जगातील निसर्गप्रेमी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत इथे गर्दी करतात.
यादृष्टीने जयंतीने अगदी निराळ्या सहली आयोजित केल्या कॅनडात न्यूनुन्स्विक, नोव्हास्कोशिया व प्रिन्स एडवर्ड आयलँड आणि न्यू इंग्लंडमधील मेन, न्यू हॅम्पशायर, व्हरमाँट व मॅसॅच्युसेटस् येथील जास्तीत जास्त कंट्री साईड भटकण्याची कल्पना तिने आखली. हा संपूर्ण भाग ऑटम कलर व फॉल फॉलिएजसाठी जगात प्रसिद्ध मानला जातो. आम्ही सप्टेंबर मध्यापासून ऑक्टोबर अखेरपर्यंत त्या भागात फिरायचं ठरवलं. त्यामुळे ऑटम कलर्स व फॉल सिझनची मजा तीन भागांत अनुभवता आली. ऑटम कलर्सची सुरुवात, बहर आणि पानगळ. साडे सहा हजार कि.मी.च्या भटकंतीत, घनदाट झाडांमधून बहरलेली ही रंगसंगती अक्षरशः चित्रात रेखाटल्यासारखी वाटली.
ऑटम कलर्स म्हणजे काय?
तर, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जेव्हा ऑटम सिझन सुरू होतो, तेव्हा काही झाडांच्या हिरव्या पानांचा रंग पूर्णतः बदलून तो नारिंगी, पिवळा, शेंदरी, किरमिजी होतो. पण ज्या झाडांची पानं सपाट (फ्लॅट) आहेत, त्यांचेच रंग बदलतात. उदा. मेपल्स, बर्च, सुमॅक... ख्रिसमस सारख्या झाडांच्या पानाचे रंग मात्र तसेच राहतात. कमालीची थंडी असलेल्या प्रदेशातच हा चमत्कार दिसून येतो. पानांमध्ये क्लोरोफिल नावाचं द्रव्य असतं. त्यामुळेच ही झाडं हिरवीगार दिसतात. पण ऑक्टोबरमध्ये सूर्याची प्रखरता तिथे कमी होते. सूर्यप्रकाश नसल्याने क्लोरोफिलचं प्रमाण घटतं व त्या झाडांचे मूळ रंग दिसू लागतात. हा मूळ रंग फार देखणा व आकर्षक असतो आणि तो दिसतोही अतिशय सुंदर. सर्वसाधारणतः सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा रंगपालट सुरू होतो. हळूहळू रंग दाट होतात. शेकडो मैलांची हिरवीगार जंगलं पिवळी, नारिंगी, केशरी, किरमिजी दिसू लागतात. अगदी उंचावरून तर हे दृश्य फार अप्रतिम दिसतं. काही ठिकाणी सपाट मैदानांवर छोटी-छोटी घरं दिसतात. झाडांच्या उधळलेल्या रंगांच्या पार्श्वभूमीवर ही घरं मोहक न वाटली तरच नवल...
पण हा सारा खेळ जेमतेम आठ-दहा दिवसांचा असतो. त्याचवेळेस रंगलेली ही पानं हळूहळू झडू लागतात. झाडांच्या परिसरात त्यांचा सडा पडतो. त्यालाच 'फॉल फॉलिएज' अर्थात पानगळ म्हणतात. रंगीबेरंगी पानांचा हा सडाही डोळ्यांना मोहवतो. मग मात्र ही सर्व झाडं पूर्णतः सुकतात. त्यांच्या फांद्यांच्या केवळ काड्या दिसू लागतात. त्यानंतर पाच-सहा महिने साम्राज्य असतं ते बर्फाचं. पांढरा शुभ्र बर्फ या फांद्यांवर व आजूबाजूला पडलेला दिसतो. एप्रिल-मे महिन्यात वसंत ऋतूत झाडांना पुन्हा हिरवी पालवी फुटू लागते. निसर्गाचं हे चक्र वर्षानुवर्षे, शतकानुशतकं सुरू आहे.
कॅनडाच्या नोव्हास्कोशिया, प्रिन्स एडवर्ड आयलंडमध्ये आम्ही शिरलो तेव्हा ऑटम कलरची नुकतीच सुरुवात होत होती. गर्द हिरव्या झाडीत शेंदरी, पिवळा, किरमिजी रंग डोकावू लागला होता. हे दृश्यही पाहण्यासारखं होतं. तेथील 'कॅबोट ट्रेल' हा जगातील एक अत्यंत सुंदर सीनिक ड्राईव्ह समजला जातो. या १२८ कि.मी. लांबीच्या ट्रेलचा जवळजवळ एक तृतियांश भाग हा ९५० चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या केप ब्रेटन नॅशनल पार्कमध्येच येतो. या नागमोडी वळणाच्या मार्गावरून ड्राईव्ह घेताना, आजूबाजूचं सौंदर्य डोळ्यात किती साठवू असं होऊन जातं. एका बाजूला विविध रंग उधळणारी झाडी आणि दुसऱ्या बाजूला अथांग अटलांटिक महासागर, पुढे आलेले अगदी सरळ डोंगरांचे सुळके आणि त्यामधून जाणारा चढ-उतारांचा मार्ग... ही सारी वाट कधीच संपू नये असं वाटत राहतं...
नोव्हास्कोशिया म्हणजे घनदाट झाडी. पण प्रिन्स एडवर्ड आयलंडचं सौंदर्य अगदी निराळं आहे. जेमतेम सव्वा लाख लोकवस्तीच्या या बेटाची राजधानी शार्लोट टाऊन. इथला बहुतेक सारा परिसर म्हणजे कंट्री साईड. तांबडी माती व मऊ वाळूचे बिचेस, हे इथलं वैशिष्ट्य. मैलोन्मैल लांब तांबड्या मातीची जमीन दिसते. त्यावर मधूनच रंगीत झाडांचे जंगल. ल्युपिन्स ही कणसासारखी पण रंगतदार फुलं, या बेटाच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. त्यामुळेच जगातील रसिक पर्यटकांची इथे मोठी गर्दी उसळते. इंग्लंडच्या प्रिन्स विल्यम या राजपुत्राने लग्न झाल्यानंतर याच बेटावर आपला मधुचंद्र साजरा केला होता. आम्ही या बेटावर आलो, त्याच्या पंधरा-वीस दिवस आधीच त्याचा इथे मुक्काम होता. मागे-पुढे कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता, आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन तो इथल्या किनाऱ्यावर बिनधास्त भटकताना स्थानिक नागरिकांना रोज भेटत असे आणि येथील रहिवासीही हात हलवून त्याचं स्वागत करत असत.
कन्फिडरेशन ब्रिज हे येथील आणखी एक आश्चर्य. प्रिन्स एडवर्ड बेट हे कॅनडात १८७३ मध्ये सामील झालं. त्यासाठी त्यांनी सरकारला एक अट घातली होती. हिवाळ्यात इथे उणे ६०० सें. पर्यंत तापमान घसरतं व सर्व भाग बर्फाने गोठून जातो. पण त्या काळातही या बेटाचा अन्य जगाबरोबरचा संबंध कायम राहिला पाहिजे अशी ती अट होती. त्यामुळे १९९७ मध्ये १२.९ कि.मी. लांबीचा हा पूल इथे बांधण्यात आला. गोठलेल्या पाण्यातील जगातील सर्वांत लांब पूल म्हणून तो ओळखला जातो. हिवाळ्यात या पुलाचा पाया संपूर्णपणे गोठलेल्या बर्फात असतो. पण तरीही पुढील शंभर वर्षे त्याला काहीही धोका नाही अशी लेखी हमी देण्यात आली आहे.
उत्तर कॅनडात जवळजवळ चार हजार कि.मी.चा प्रवास करून आम्ही उत्तर अमेरिकेतील मेन प्रोव्हिन्समधील बार हार्बर या समुद्र किनाऱ्यावरील सुंदर गावात प्रवेश केला. अमेरिकेतील अतिश्रीमंत लोकांचे मॅन्शन्स (अलिशान बंगले) इथे आहेत. आता हा संपूर्ण परिसर ऑटम कलर्सने फुलू लागला होता. अकाडिया नॅशनल पार्कमधून आम्ही नॉर्थ कॉनवेमध्ये आलो आणि बघतो तर सारे दृश्यच बदललं होतं. ऑटम कलर्सचा खरा डौल आता अनुभवता येत होता. व्हाईट माऊंटनच्या परिसरातील शेकडो मैलांच्या जंगलांचं रंगरूपच पालटलं
होतं. विविध रंगांनी हा सारा भाग सजला होता. वरून पाहताना तो रंगीबेरंगी गेलो. डोंगर माथ्यावरून ऑटम कलर्स व फॉल सिझनचं अगदी नयनरम्य रूप झाडांचा जणू सागरच वाटत होता. जवळच्याच एका डोंगरावर गोडोलातून डोळे भरून पाहता आलं. मधूनमधून छोटी-मोठी पाण्याची तळी, काही ठिकाणी चिमुकली घरं आणि त्यांना रंगीत घनदाट झाडीचा विळखा... निसर्गाचे विध्वंसक रूप आपण अनेकवेळा अनुभवतो. पण तोच निसर्ग इतकं सुंदर रूप धारण करू शकतो, यावर विश्वासच बसत नाही. नॉर्थ कॉनवे आणि न्यू इंग्लंड मधील सर्वात ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हरमाँट प्रदेशात आता फॉल फेस्टिव्हल सुरू होत होता. फॉल सिझनच्या निमित्ताने सर्वत्र मोठा उत्सवच साजरा केला जातो. ठिकठिकाणी लहानमोठ्या आकाराच्या तांबड्या व अन्य रंगांच्या भोपळ्यांची सजावट केली होती. या भोपळ्यांना प्रचंड मागणी असते. हे भोपळे घराबाहेर ठेवले म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नायनाट होतो, नजर लागत नाही असा समज आहे.
जास्तीत जास्त वजनाचा भोपळा पिकवण्याच्या स्पर्धा फॉल सिझनमध्ये होतात. आत्तापर्यंत १६५० पौंडाच्या वजनाचा भोपळा हा सर्वांत मोठा ठरला आहे. एका ठिकाणी भोपळ्यांचं प्रदर्शन होतं. त्याला मुद्दाम भेट दिली. इथेही ७० पौंडापासून तीन-चार पौंडांपर्यंतच्या वजनाचे भोपळे आढळले. मोठे भोपळे जनावरांना खायला घालतात. पण वजनदार भोपळ्यांचं पीक कसं काढलं जातं याचं गुपित राखण्यात येतं. लहान भोपळे विविध पदार्थ बनवण्यासाठी फारच उपयुक्त असतात. फज, केक, स्क्वॅश आदींसाठी त्याचा मोठा उपयोग होतो. भोपळ्याचं बी साधारणतः मे महिन्यात लावण्यात येतं व तीन-चार महिन्यांत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्याचं पीक तयार होतं.
ऑटम कलर्स व फॉल सिझनवर बदलत्या जागतिक हवामानाचा परिणामही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं स्थानिक नागरिकांशी बोलताना समजून आलं. व्हरमाँट भागाला हॅरिकन वादळाचा तडाखा बसल्यामुळे नद्यांना मोठे पूर आले, घरांची पडझड झाली आणि जमिनीही खचल्या. आम्हालाही फिरताना हे नुकसान दिसून आलं. पुनर्वसनाचं काम ठिकठिकाणी जोरात सुरू होतं. पण या वादळामुळे, पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पानं रंगण्याआधीच झडली. तर कडक उन्हामुळे रंग पक्के होण्यासही विलंब लागत होता. ऑटम कलर्स व फॉल सिझनची पूर्वीची मजा आता कमी होत आहे, अशी व्यथा अनेकांनी बोलून दाखवली.
- या सफरीविषयी उपयुक्त माहिती
कसे जाल?
ऑटम कलर्सची मजा लुटण्याकरता अमेरिका व कॅनडाचा व्हिसा आवश्यक आहे. अमेरिकेच्या न्यू इंग्लंडमधील या चारही राज्यांची आणि कॅनडातील प्रिन्स एडवर्ड आयलंडची संपूर्ण 'कंट्री साईड' ही कमालीची सीनिक आहे. अमेरिका व कॅनडातील स्थानिक सहलकंपन्या तिथे सहली आयोजित करतात. इंटरनेटवरून त्यांची माहिती घेऊन तिथलं बुकिंग करता येतं. पण त्या भागात भटकण्यासाठी स्वतःच्या मोटारीखेरीज दुसरा चांगला पर्याय नाही. मुख्य म्हणजे इथे फिरायला आल्यानंतर शक्यतो वेळेचं बंधन नको. कुठेही, कसंही व कधीही भटकायचं, स्थानिक खाद्य पदार्थांवर मस्त ताव मारायचा आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटायचा. कॅरॅव्हॅनमधून फिरणं शक्य असेल तर सोन्याहून पिवळं.
कधी जाल?
सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर सर्वोत्तम सिझन. म्हणजे ऑटम कलर्सची विविध रूपं पाहता येतात.
सुरक्षितता :
सर्वच दृष्टींनी पूर्ण सुरक्षित.
अनवट मेक्सिको
गाच्या पाठीवर मेक्सिकन लोकांकडे फारशा आदराने पाहिलं जात ज नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचे, अमेरिकेत घुसखोरी करणारे अशी त्यांची प्रतिमा अमेरिकनांनीच निर्माण केली आहे. पण त्या देशाचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे. तो वाचला आणि या देशाबद्दल कमालीचं औत्सुक्य निर्माण झालं. त्यामुळे मेक्सिकोला भेट देण्याचा निर्णय घेतला.
मेक्सिकोची सफर सुमारे महिनाभरात दोन भागांत करायची होती. सर्वप्रथम मेक्सिको विमानतळावर उतरलो आणि मध्य मेक्सिकोचा बराचसा परिसर फिरलो. त्यानंतर विमानाने अमेरिकेत फिनिक्स येथे आलो आणि मग मोटारीतून निघून अमेरिका-मेक्सिकोची सीमा ओलांडून कॉपर कॅनिअन, चिवावा हा उत्तरेकडचा भाग पालथा घातला. एकूण सुमारे साडेचार-पाच हजार कि.मी.च्या या प्रवासात संपूर्ण मेक्सिको पाहणं अशक्यच होतं. पण निदान त्याची तोंडओळख निश्चित होऊ शकली. मेक्सिको सरकारने व्हिसाच्या संबधीची मोठी अडचण मे २०१० पासून दूर केली आहे. ज्यांच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा आहे त्यांना मेक्सिकोत येण्यासाठी स्वतंत्र व्हिसाची जरुरी नाही. मेक्सिकोत 'पेसो' हे चलन आहे. पण त्याची खूण डॉलरप्रमाणेच अशी आहे. सर्वसाधारणतः एक अमेरिकन डॉलर म्हणजे ११ ते १२ पेसो असं प्रमाण धरायला हरकत नाही.
आम्हाला मेक्सिकोत जवळजवळ महिना घालवयाचा होता. त्यामुळे सर्वप्रथम, जगात प्रसिद्ध असलेल्या मेक्सिकन फूडची माहिती करून घ्यायचं ठरवलं. मेक्सिकोत आमचा मुक्काम सर्वोत्कृष्ट 'मेरियट' या हॉटेलमध्ये होता. पण तेथील पंचतारांकित पदार्थ खाण्यापेक्षा, शेजारच्या 'खाऊ गल्ल्यांमध्ये' जाऊन खाण्याच्या बाबतीत जयंती आग्रही होती. 'टॅको' हा तेथील सर्वात लोकप्रिय स्थानिक पदार्थ. टॅको म्हणजे मक्याचा फुलका. त्यात चिकन, मटण किंवा बीफचे तुकडे भरून त्यावर टोमॅटो, कांदा, मिरची हव्या त्या प्रमाणात घालून किंवा चटणी घालून त्याचा रोल करायचा. तो गरमागरम रोल तोंडात टाकायचा. पण हा टॅको कसा खायचा याचंही शास्त्र आहे. त्यावरून खाणारी व्यक्ती मेक्सिकन फूड खाण्यात पारंगत आहे की, नवखी याचा बरोबर अंदाज समोरच्याला येऊ शकतो. टॅको खाताना तोंड थोडं पुढे करायचे व मग रोल तोंडात कोंबायचा. ताठ उभं राहून खाऊ लागलात, की आतला मसाला शर्टावर पडलाच म्हणून समजा.
मेक्सिकोची आणखी एक खास चीज म्हणजे 'मोले सॉस'. मिरची, मिरी, बदाम, दालचिनी, बडिशेप, कांदा, लसूण, टोमॅटो आणि 'चॉकलेट' यांचे मिश्रण. मिरचीबरोबर चॉकलेट ही कल्पना आधी कशीचीच वाटली. पण आंबट-गोड सारखी तिखट-गोड अशी चव हळूहळू जिभेला चांगली वाटतं होती. प्लेटमध्ये फिशवर मोले सॉस दिलं जातं. सोबत जाड भाताची मूद. हे सॉस थोडे जास्त तिखट वाटत हे खरं. पण फिश, भात व करी सारखे सॉस ही हळूहळू मस्त मेजवानी वाटू लागते. मेक्सिकोचं राष्ट्रीय पेय आहे 'तकिला'. 'कोनॅक' हे नाव ज्या गावात ती प्रथम तयार झाली त्यावरून पडलं आहे. तसंच तकिला विभागावरून तकिला नाव मिळालं. तकिलाचे अनेक प्रकार असतात. याची कॉकटेल्स फार प्रसिद्ध आहेत व जगात त्यांनी चांगलं नाव मिळवलं आहे.
मेक्सिको शहरात 'अँथ्रॉपॉलॉजी म्युझियम' हे मुख्य आकर्षण. पाच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या देशातील अनेक अत्यंत प्राचीन अवशेष इथे उत्तमरीतीने जतन करून ठेवण्यात आले आहेत. त्यांची मांडणी खरोखरच आकर्षक आहे. या शहरातील मध्यवर्ती चौक म्हणजे 'झोकालो' हा तेथील संस्कृतींचा साक्षीदार. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा चौक म्हणून तो ओळखला जातो. चौकाच्या मध्यभागी एका उंच खांबावर मेक्सिकन ध्वज फडकत होता आणि चारही बाजूंना परदेशी पर्यटक, स्थानिक नागरिक व नानाविध वस्तूंचे विक्रेते यांची प्रचंड गर्दी उसळली होती.
या देशाला स्पॅनिशांच्या तावडीतून सुटून स्वातंत्र्य मिळाल्याला २०१० मध्ये दोनशे वर्षे पूर्ण झाली आणि क्रांतीचं शतकही पूर्ण झालं. नोव्हेंबर महिन्यात त्याचा महोत्सव साऱ्या देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. या चौकातही सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती. आणि विशेष म्हणजे झोकालो येथील नॅशनल पॅलेसमधील काही दुर्मीळ वस्तू व राष्ट्राचा अमोल ठेवा सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांची गर्दीही तिथे उसळली होती. विशेषतः शाळकरी मुला-मुलींच्या प्रचंड रांगा दिसत होत्या. या पॅलेसची भव्यता अभूतपूर्व अशीच आहे. नानाविध आकारांची भित्तीचित्रं हे येथील एक आकर्षण. दिएगो रिव्हेरा या चित्रकाराची चित्रं तिथे अक्षरशः खिळवून ठेवतात. ५० फूट रुंद आणि ७० फूट लांब इतकी जागा त्याने आपल्या कुंचल्याने रेखाटली आहे.
मेक्सिको शहरापासून जवळच असलेल्या 'तेओतिव्हाकान' येथे इ.स. पूर्व दोनशे वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या शहरातील अवशेष व पिरॅमिडस् पाहण्यासाठी गेलो. मध्यभागी भव्य चौक. त्याच्या डाव्या बाजूला मून पिरॅमिड व समोर सन पिरॅमिड. ही पिरॅमिडस् म्हणजे त्या काळातील पवित्र जागा. तेव्हा इथे दीड-दोन लाख लोकवस्ती होती. मून पिरॅमिडच्या समोर एक छोटा पण थोडा उंच चबुतरा आहे. तिथून छायाचित्र काढणं सोपं जातं. मून पिरॅमिडवर चढून जाताना पायात गोळे आले. पण उंचावरून, सन पिरॅमिड आणि या अगदी प्राचीन शहराच्या भव्यतेची कल्पना आली. सन पिरॅमिड हा खूपच उंच. त्याची उंची जवळजवळ दोन-अडीचशे फूट आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पिरॅमिड म्हणून तो ओळखला जातो. त्याची एक-एक पायरीच दीड-पावणे दोन फूट उंचीची आहे. मून पिरॅमिड चढताना चांगलीच दमछाक झाली होती. मेक्सिकोत अजून वीस-पंचवीस दिवस भटकंती करायची होती. त्यामुळे सन पिरॅमिड चढण्याचा उद्योग अर्ध्यावर सोडून दिला. पण त्याचे मनसोक्त फोटो मात्र काढले.
मध्य मेक्सिकोत शहरा-शहरांत फिरणं, प्रसिद्ध ठिकाणं पाहणं सुरू होतं. सर्वच गावांची रचना सर्वसाधारणतः सारखी. गावात मध्यवर्ती चौक, त्याच्या चारही बाजूंना गावात जाणारे छोटे-छोटे रस्ते आणि एक-दोन अगदी प्राचीन कॅथेड्रल्स. त्यांना चारशे-पाचशे वर्षाचा इतिहास. शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तू, अवशेष, अगदी उत्तम रीतीने जतन केलेले. मेक्सिकोतल्या क्रांतीचे मूळ तेथील चांदीच्या खाणीत काम करणाऱ्या कष्टकऱ्यांवर होणाऱ्या भयंकर अत्याचारात होते हे वाचनात आलं होतं. त्यामुळे चांदीच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या व बोगद्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हानाव्हातो (स्थानिक लोक याचा उच्चार ग्वानाक्वातो असाही करतात) शहरात प्रवेश केला. इथे चांदीचा भरपूर साठा असल्याचा शोध सोळाव्या शतकात लागला आणि तेव्हापासून तिथल्या श्रीमंत लोकांनी या शहराला अक्षरशः पोखरून चांदीवर अमाप पैसा कमावला. इथले सर्वच डोंगर पोखरल्याने गावाची रचना मोठी मजेशीर झाली आहे. या, त्यामानाने छोट्या गावात १४ कि.मी. लांबीचे बोगदे आहेत. ते सरळ नाहीत. तो जणू भुलभुलैय्या आहे. गावात फिरायचं तर मोटार, बोगद्यातून सुमारे एक कि.मी. अंतर जाते. मग उजव्या बाजूच्या बोगद्यातून डाव्या बाजूला वळते. परत डाव्या बोगद्यात प्रवेश केला जातो. तुम्ही कसे-कोठे जात आहात याचा पत्ताच लागत नाही. बोगद्यात दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी छोटी पायवाट आहे. मधून-मधून दिवेही आहेत. त्यामुळे हा बोगद्यातील प्रवास मोठा संस्मरणीय वाटतो.
येथील एका जुन्या चांदीच्या खाणीत गेलो. पूर्वी मिट्ट अंधारात किती कठीण प्रसंगात कामगार चांदी काढत असत, याचं प्रात्यक्षिक पाहिलं आणि अंगावर काटा उभा राहिला. व्हानाव्हातोमधील स्पॅनिश खाणमालकांनी येथील स्थानिक मजुरांना अक्षरशः गुलामासारखं राबवून घेतलं आणि ते स्वतः प्रचंड श्रीमंत झाले. त्यामुळे सूडाची, क्रांतीची भावना त्या स्थानिकांच्या मनात निर्माण झाली यात चूक ते काय? व्हानाव्हातो प्रमाणेच 'तास्को' हेही चांदीचे आगर आहे. मात्र कमालीचं सुंदर. ग्रीस परिसरांतील बेटांच्या सफरीत सेंटोरिनी, मिकोनस येथील डोंगर-उतारांवरील पांढरी शुभ्र छोटी-छोटी घरं पाहिली होती. ती कमालीची भावली. त्याच धर्तीवर तास्कोची रचना होती. डोंगर उतारावर घरं, रस्ते, चर्चेस, दुकानं यांचे एकाखाली एक थर आणि ते एका रांगेत होते. डोंगराच्या अगदी वरती, ब्राझील मधील रिओप्रमाणेच येशूचा हात पसरलेला भव्य पुतळा, जणू साऱ्या गावाला आशीर्वाद देत होता.
गावाच्या मध्यवर्ती चौकात येण्यासाठी प्रचंड नागमोडी वळणाचे अगदी अरुंद रस्ते आहेत. इथे गावात बसेसना जा-ये करता येत नाही. छोट्या टॅक्सीमधूनच प्रवास करावा लागतो. सर्व टॅक्सीज म्हणजे फॉक्सव्हॅगन मोटारी. त्यांची रचना मजेशीर असते. ड्रायव्हरच्या शेजारची सीट काढून टाकलेली. त्या दरवाजातून प्रवाशांनी आत प्रवेश करायचा व मागच्या सीटवर दोन प्रवाशांनी बसायचं. या दरवाजाला एक दोरी बांधलेली असते व त्याचं टोक ड्रायव्हरच्या हातात असतं. प्रवासी मागे बसले, की दोरी खेचून दरवाजा लावला जातो. सारेच प्रवासी दाटीदाटीने बसतात आणि मग चढणीचा प्रवास सुरू होतो. प्रचंड चढ-उतार आणि शार्प वळणं असा रस्ता असतो. फॉक्सव्हॅगनच्या एकामागोमाग रांगा लागलेल्या असतात. रस्त्यावर मध्येच कोणी उतरणाग असला तर विचारूच नका. पण कोणीही हॉर्न वाजवत नाही अगर पढे जाण्याचा प्रयत्नही करत नाही. सारे आरामात पण शिस्तीत. मध्यवर्ती चौड चांगलाच गजबजलेला. सभोवार चांदी कामाची प्रचंड दुकानं आणि मध्यभाग भव्य कॅथेड़ल. हेही निदान चारशे वर्षांपूर्वीचं आहे. आमचा येथील रात्रीच मुक्काम एका चांगल्या नामांकित हॉटेलमध्ये होता. सोयी खूप आधुनिक नव्हत्या, पण समोरच्या बाल्कनीतून रात्रीच्या झगमगाटातील १७०० मीटर्स उंचीवरचं तास्को कायमचं लक्षात राहिलं. हॉटेल खूपच मोठं होतं. जेवायला जाताना, वाटेत पारंपरिक स्वागताच्या कमानी होत्या. आपल्याकडे शुभकार्यात केळीच्या झाडाच्या कमानी उभारण्यात येतात. इथे मक्याच्या उंच रोपांच्या कमानी दिसल्या. त्यालाही मोठमोठी कणसं लगडलेली होती. ही रोपं थोडी सुकली होती. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा सुगंध येत होता. जेवायला स्थानिक मासळी, मोले सॉस आणि सोबत अर्थातच तकिला !
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जगातील अनेक दुर्मीळ, प्राचीन वास्तूंना, स्थळांना युनस्कोतर्फे वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला जातो. अमेरिकन विभागात मेक्सिकोतील सर्वात जास्त वास्तूंना हा सन्मान मिळाला आहे. १९८७ ते २००८ या कालावधीत मेक्सिकोतील एकूण २९ स्थळांना हा दर्जा प्राप्त झाला. प्राचीन, ऐतिहासिक स्थळांबरोबरच अगदी आगळ्या-वेगळ्या जागांनासुद्धा मेक्सिकोने हा सन्मान मिळवला हे विशेष. मध्य मेक्सिकोतून प्रवास करताना मोरेलियापासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर एका पार्कच्या दिशेने आमची मोटार वळवण्यात आली. दरवर्षी शरद ऋतूत (ऑटम) काळी आणि नारिंगी रंगांची लाखो फुलपाखरं दक्षिण कॅनडा व उत्तर अमेरिकेतून २२०० मैलांचा प्रवास करून, मध्य मेक्सिकोतील मिकोअन राज्यातील या छोट्या डोंगराळ भागात येतात. येथील उंच देवदार वृक्षांच्या जंगलांत थंडाव्यात त्यांचं वास्तव्य असतं. वस्तुतः अन्य महिन्यात हे जंगल हिरवेगार दिसतं. पण या लाखो फुलपाखरांच्या वास्तव्यामुळे त्या जंगलाचा सारा रंगच त्यावेळी बदलून जातो आणि नारिंगी रंगाचं आच्छादन जंगलाला प्राप्त होतं. हे सारं जंगलच जणू नारिंगी बनतं. त्यानंतर लगेच या फुलपाखरांचं स्थलांतर उत्तरेकडे होतं. फुलपाखरांच्या या अभयारण्याला युनेस्कोने २००८ मध्ये वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला. जगातील ही एक अत्यंत दुर्मीळ घटना मानण्यात येते. या जागेला भेट देण्याचा सर्वोत्कृष्ट कालावधी म्हणजे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा पूर्वार्ध.
पण नोव्हेंबर अखेरपासून मार्चपर्यंत हा आगळा-वेगळा चमत्कार पाहायला मिळतो. पर्यटकांच्यादृष्टीने मेक्सिकोतलं आणखी एक महत्त्वाचं शहर म्हणजे पुएब्ला. तेथील झोकालो असाच ऐतिहासिक महत्त्वाचा. स्पॅनिश संस्कृतीचा सारा परिचय इथे व्हायचा. बुलफाईट या अत्यंत लोकप्रिय खेळाची हीच जागा. त्याखेरीज गुन्हेगारांनाही इथेच फाशी दिली जायची. मात्र १८५४ पासून या चौकाचं रंगरूप साफ बदललं. आता तर स्वातंत्र्य महोत्सवाच्या रोषणाईने हा चौक झगमगून गेला होता. येथील कॅथेड्रलची इमारत वेगळ्या घाटणीची अशीच आहे.
मध्य मेक्सिकोत बारा-तेरा दिवसांत साधारणतः दोन-अडीच हजार कि.मी.चा प्रवास झाला. अजून बघण्यासारखं थोडं राहिलं होतं. पण वेळेचं बंधन होतं. उत्तर मेक्सिकोतील कॉपर कॅनिअन व मूळ 'तारामारा'. आदिवासींचे जीवनमान प्रत्यक्ष पाहण्याची सहल, अमेरिकेत फिनिक्स इथून सुरू होणार होती. त्यामुळे मेक्सिकोहून विमानाने ह्युस्टन मार्गे फिनिक्सला रवाना झालो.
अमेरिकेतल्या ह्युस्टन विमानतळावर मोठा गमतीदार प्रसंग अनुभवायला मिळाला. आमचं मेक्सिको-ह्युस्टन विमान जेव्हा विमानतळावर उतरलं तेव्हा मेक्सिकोतल्या विविध भागांतून आणखी तीन-चार विमानांचं आगमन झालं होतं. त्यामुळे निदान चार-पाचशे नागरिक इमिग्रेशनच्या रांगेत उभे होते. मी व जयंती वगळता, बाकी ८०-८५ टक्के मेक्सिकन नागरिक होते. रांगेतल्या प्रत्येक व्यक्तीकडे अमेरिकन सुरक्षा रक्षकांचं बारकाईने लक्ष होते. प्रत्येकाच्याजवळ सुरक्षा रक्षक येत होता व त्याचा पासपोर्ट मागत होता. पासपोर्टमधील फोटो व प्रत्यक्ष ती व्यक्ती एकच आहेत ना, याची दोन-तीनदा खात्री करून घेतली जात होती. सुरक्षा रक्षक माझ्या व जयंतीच्या जवळ आला. अन्य प्रवाशांप्रमाणेच आमच्याशी स्पॅनिश भाषेत बोलून त्याने पासपोर्ट मागितले. आमचे पासपोर्ट पाहिल्यानंतर थोडे आश्चर्याने तो आमच्याकडे पाहू लागला. "तुमचे पासपोर्ट भारतातील कसे?" असं विचारताच, 'आम्ही पर्यटक म्हणून तिथे गेलो होतो', असं सांगताच त्याने आमची तपासणीही केली नाही. बनावट पासपोर्टच्या साहाय्याने अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या मेक्सिकन नागरिकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे मेक्सिकोतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अशी कडक तपासणी, इमिग्रेशन काउंटरवर जाण्याआधीही होते, असं सांगण्यात आलं.
फिनिक्समध्ये एक-दोन दिवस आराम केल्यानंतर आम्ही मेक्सिकोची हद्द ओलांडून सॅन कॉलोंसच्या दिशेने निघालो. अमेरिका व मेक्सिको यांच्यात २७०० मैलांची सीमा आहे. याठिकाणी अमेरिकेने अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून घुसखोरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या दिवशी ४५१ मैलांचा प्रवास करून सॅन कार्लोस या छोटेखानी व अतिशय सुंदर बीच असलेल्या गावात आलो.
कॅक्टस्चा (निवडुंग) बगिचा हे येथील आणखी एक वैशिष्ट्य. हॉलिवूडच्या अनेक नामांकित चित्रपटाचं चित्रीकरण या बगिच्यात झालं आहे. मेक्सिकोत एकूण ८६३ प्रकारची कॅक्टस् असून, त्यांचे नानाविध उपयोग होतात. सजावटीसाठी ते लोकप्रिय आहेतच पण 'मागुये' वगैरे जातीच्या निवडुंगांचा रस उपयुक्त असतो. त्याच्या खोडातील रसापासून तकिला, मेझकाल आदी मद्य तयार केली जातात. मागुये मधून जो पुल्के रस काढला जातो, त्याची चव म्हणजे आपल्याकडील नीरा. त्याखेरीज निवडुंग म्हणजे कल्पवृक्षच. छत शाकारणी तसंच त्याच्या जाड दोऱ्यापासून अन्य वस्तूंची निर्मितीही करता येते. कारडॉन, सेनिता, सवारी या कॅक्टस्ना फळं येतात. त्यापासून जेली, जाम, वाईन बनवली जाते व तो व्यवसाय खूप लोकप्रिय आहे. कॅक्टसची झाडे कमी-अधिक उंचीची. दूरवर पसरलेली. यांची झुडपेही आढळतात. एक-दोन फुटांपासून दहा-बारा फूट उंचीचे कॅक्टस् दिसतात. या कॅक्टस्च आयुष्य शंभर वर्षांपर्यंत असतं.
आमचा रोजचा निदान तीनशे-चारशे मैलांचा प्रवास सुरू होता. रस्ते रुंद व उत्तम अवस्थेत. फक्त वाटेतल्या छोट्या-छोट्या गावातील मातीचे रस्ते भारताच्या ग्रामीण भागाची आठवण करून देत होते. 'अल्मॉस' या गावात आम्ही संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस प्रवेश केला. गावाच्या वेशीपासून रस्त्याच्या मध्यभागी मिणमिणते दिवे दिसले. संध्याकाळी सातच्या सुमारास गावात आलो, तेव्हा सर्वत्र सन्नाटा पसरला होता. अगदी जुन्या पद्धतीची बैठी घरं, कॉबल्ड स्ट्रीट व सर्वत्र नीरव शांतता. आमचं हॉटेल म्हणजे १७८९ साली बांधलेला नन्सचा मठ. आजही त्याचं रूप जवळजवळ तसंच. बैठ्या घराला मध्यभागी कोर्टयार्ड. त्यात जुने पुतळे व कारंजी. खोल्यांचे दरवाजे निदान १०-१२ फूट उंच. खुर्य्या-टेबलं-कपाटं अशीच जुनी. दुसऱ्या दिवशी सकाळी या छोटेखानी गावाचा फेरफटका मारण्यास निघालो आणि आश्चर्याचा धक्काच बसला. उत्तर अमेरिकेतील या भागात चांदीच्या खाणी असल्याचा शोध १६८३ मध्ये लागला आणि श्रीमंत लोकांनी इथे घरं बांधण्यास सुरुवात केली. आजही त्या काळातील हे अलिशान मॅन्शन्स जसेच्या तसे आणि अगदी उत्तम अवस्थेत ठेवण्यात आले आहेत.
गावची लोकसंख्या जेमतेम दहा ते अकरा हजार असेल. येथील १८० मॅन्शन्स 'नॅशनल मॉन्यूमेंट' म्हणून जाहीर करण्यात आलेत. ती घरं विकता येतात. पण त्यांच्या रचनेत काहीही बदल करता येत नाही. यापैकी काही मॅन्शन्सना प्रत्यक्ष भेट देता आली. बहुतेकांचं स्वरूप जवळजवळ एकसारखंच आहे. सुरुवातीला १५-२० फूट उंचीचा दिंडी दरवाजा. मधल्या पॅसेजमधून आत गेलं की, मध्यभागी कोर्टयार्ड (मोठे अंगण). त्यात कारंजी, नानाविध पुतळे, एखादा हौद, फुलझाडं. कोर्टयार्डच्या चारही बाजूंना मोठे पॅसेजेस् व आतल्या बाजूला भव्य खोल्या, दालनं. भिंतींची जाडी चांगली २५ ते ३० इंच. फर्निचर अगदी जुने. या इमारती दोनशे-तीनशे वर्षांच्या जुन्या. पण त्यावेळचं वैभव आजही कायम दिसतं. कुठेही तुटलेल्या नाहीत की फुटलेल्या नाहीत. घरात त्यांच्या पूर्वीच्या मालकांची, कुटुंबीयांची छायाचित्रं लावलेली दिसतात. दोनशे वर्षांपूर्वीचे अल्मॉस कसे होते याचं चित्र आमच्या टूरगाइडने दाखवलं. आजचे, आम्ही पाहत असलेले अल्मॉसही अगदी तसेच. मोठमोठ्या गुळगुळीत पांढऱ्या शुभ्र गोट्यांचे रस्ते. त्यातही बदल नाही. फरक एवढाच की, या रस्त्यांवरून त्याकाळी घोडागाड्या धावत; आता त्यांच्या जागी मोटारी पळताना दिसतात.
आमच्या सहलीचा अखेरचा व महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉपर कॅनिअन व तारामारा या मूळ आदिवासींच्या वस्तीला भेट. त्यासाठी अल् फुटें या ठिकाणी पोचलो. तेथून कॉपर कॅनिअनला छोट्या गाडीतून जावं लागतं. सकाळी सव्वा सहा वाजता अल् फुटेंहून गाडी पकडायची होती. प्लॅटफॉर्म अगदी छोटा. एक फूट उंचीचा. स्थानिक हमालांनी गाडीतून सामान काढून प्लॅटफॉर्मवर ठेवलं. हेच हमाल कॉपर कॅनियनची माहिती देणारी पुस्तकं, नकाशे, वस्तू विकत होते. बरोबर वेळेवर या चार डब्यांच्या गाडीने स्टेशनात प्रवेश केला. आम्ही १५-२० प्रवासी व त्याचं सामान तीन-चार मिनिटांत चढलं आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. सर्व डबे प्रथमवर्गाचे. एक डबा जेवणाचा. आमच्या तिकिटातच जेवणाचा समावेश होता. कॉपर कॅनिअनची उंची सुमारे २४०० मीटर्स. हा संपूर्ण रेल्वेमार्ग पूर्ण होण्यास ६३ वर्ष लागली. वाटेत ३७ पूल, ८७ बोगदे लागतात. पाच तासांच्या या प्रवासात दुतर्फा मस्त जंगल व मधूनमधून तिळाची शेतं दिसतात. आता आम्ही तारामारा प्रदेशात प्रवेश केला. वाटेत एक-दोन छोटी स्टेशनं लागली. 'सॅन ए फर्' येथे तारामारा समाजातील स्त्रियांचं पहिलं दर्शन झालं. त्यांचा पोशाख अगदी आपल्याकडच्या लमाणी स्त्रियांसारखा. पायघोळ रंगीबेरंगी झगा व कमरेला बांधलेलं मूल. हातांनी बनवलेल्या टोपल्या, भांडी आणि फळं विकण्यासाठी गाडीच्या दुतर्फा या स्त्रिया जमा होतात. त्यांच्याकडून या वस्तू घेण्याचा मोह आवरताही येत नाही. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही पोसाड बॅराकन्स या स्टेशनवर उतरलो. मस्त थंडीने कुडकुडायला होत होतं. आमचं हॉटेल आणखी उंचावर असल्याने तिथे मोठ्या बसेस जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे आम्हाला छोट्या बसने जावं लागलं.
हॉटेलच्या मागचा व आजूबाजूचा संपूर्ण परिसर म्हणजे कॉपर कॅनिअन. कॉपर कॅनिअन ही अमेरिकेच्या ग्रॅड कॅनिअनची मोठी आवृत्ती. पण त्यापेक्षा कितीतरी अधिक सरस. सुमारे चाळीस दशलक्ष वर्षांपूर्वी या भागात भयंकर ज्वालामुखीमुळे उलथापालथ झाली. शेकडो मैलांत लाव्हा रसाचे लोटच्या लोट उसळले आणि ते सर्वत्र पसरत गेले. उंचच उंच डोंगरांना कापऱ्या पडल्या व खोल दऱ्या निर्माण झाल्या. काही ठिकाणी लांबवर पठारं पसरली. हा सारा चमत्कार म्हणजे कॅनिअन. याला कॉपर कॅनिअन का म्हटलं जातं? तर पावसामुळे या डोंगरांच्या कड्यांवर फंगस येतो व तो जणू कॉपर ऑक्सिडाईज झाल्याप्रमाणे हिरवा दिसतो. म्हणून त्याला कॉपर कॅनिअन नाव पडलं. वस्तुतः या पर्वतांमध्ये कॉपर फारच थोडं आहे. चांदी व सोन्याचा साठाच तिथे अधिक. पण ते काढणे शक्य होत नाही. अनेक ठिकाणी पर्वतांचे सुळके बाहेर आल्यामुळे जणू कोरीव लेणी निर्माण झाली आहेत. आता हा २५०० चौ. मैलाचा परिसर कॉपर कॅनिअन नॅशनल पार्क म्हणून जाहीर झाला आहे. या कॅनिअनचं सौंदर्य अजमावण्यासाठी गोंडोलाची सोय करण्यात आली आहे. वीस डॉलर्सचं तिकिट घेऊन गोंडोलीतून एका टोकाकडून दऱ्याखोऱ्यांतून दुसऱ्या टोकाला जाता येतं. ओबड-धोबड, सोलवटलेले, नानाविध रंगांचे डोंगर, खोलवर दऱ्या या गोंडोलातून पाहताना निसर्गाच्या या चमत्काराने आपण थक्क न झालो तरच नवल. या दऱ्याखोऱ्यांत आजही तारामारा जमातीचे ६६,००० लोक राहतात. सोळाव्या शतकामध्ये स्पॅनिशांनी मेक्सिकोवर आक्रमण केलं. तेव्हा ते तारामारा आदिवासी दऱ्याखोऱ्यांत पळाले आणि आजही त्याच पद्धतीने आपल्या परंपरा, चालीरिती पाळत ते आयुष्य जगत आहेत. परसात जरुरी पुरतं धान्य पिकवायचं व शेळ्या-मेंढ्या पाळायच्या हे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन.
सुरुवातीला अगदी खोल दऱ्यांतील गुहांमधील त्यांची घरं पहायला गेलो. ते आपल्या आदिवासींप्रमाणे पाड्या-पाड्यांवर विखरून राहतात आणि डोंगरांच्या कपारीत गुहांमध्ये त्यांची घरं असतात. घरात प्रवेश करायचा तर दगडांच्या कपाऱ्या म्हणजे पायऱ्यांवर चढून आत जावं लागलं. अतिशय कठीण गोष्ट. पण आदिवासी स्त्री-पुरुष आमच्यासमोर टुणकन उडी मारून घरात जात होते. आश्वर्य म्हणजे त्या गुहेतील घराला दरवाजा होता. हिवाळ्यांत कमी थंडीच्या प्रदेशात जाताना ते दरवाजाला कडी व दगडाचे कुलूप लावून जातात.
या जमातीतील पुरुष हा दारू व शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. चपळपणा हा त्याचा सर्वांत मोठा गुण. हरणाचा पाठलाग करायचा, त्याला दमवायचं आणि ते हरण मारून खायचं हा त्यांचा आवडता छंद. लाकडी चेंडू काठीने उडवत डोंगरामागून डोंगर पालथे घालायचे हा येथील लोकप्रिय खेळ. या चेंडूला हात लावायचा नसतो. तो खेळ न थांबता १५-२० वीस तास चालू असतो. यांच्या बायका मात्र कमालीच्या कष्टाळू असतात. पायघोळ झगा व थंडीमुळे कानाला रंगीबेरंगी रुमाल बांधलेल्या तारामारा स्त्रिया, स्वतः बनवलेल्या विविध वस्तूंची विक्री करताना ठिकठिकाणी दिसतात.
काळ बदलला, वर्ष उलटली तरी आपल्या चालीरिती बदलण्यास ही तारामारा जमात अजिबात तयार नाही. तारामारा स्त्री-पुरुषांचा जबरदस्त विश्वास असलेल्या त्यांच्याच समाजातील एका महिला 'डॉक्टरांच्या' घरी गेलो होतो. आजाराचं निदान करण्याची तिची मजेशीर पद्धत प्रत्यक्ष बघायला मिळाली. तिने रोग्याला समोर उभं केलं. त्याच्या अंगावरून धूप ओवाळला. मग एक अंडं घेतलं. लिंबू जसं ओवाळतात, तसं ते अंडे तिने त्याच्या संपूर्ण शरीरावरून ओवाळलं. मग एका भांड्यात तिने ते अंडं फोडलं. अंड्यातील पांढरा व पिवळा बलक पाहून त्याला शरीराच्या कोणत्या भागाचा आजार झाला आहे त्याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे वनस्पतींचं औषध दिलं. त्या तारामारा पुरुषाने तिला भक्तिभावाने वंदन केलं आणि ते औषध घेऊन तो निघून गेला...
फार मोठा प्राचीन इतिहास, संस्कृती असलेल्या व त्यांचं उत्तमरित्या जतन केलेल्या देशाचा निरोप घेऊन आम्हीही अमेरिकामार्गे भारतात यायला निघालो.
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
खंड : उत्तर अमेरिका
राजधानी : मेक्सिको सिटी
क्षेत्रफळ : अंदाजे
१९,७०,५५० चौ.कि.मी.
लोकसंख्या : अंदाजे
चलन : मेक्सिकन पेसो (अमेरिकन डॉलर्स चालतात)
भाषा : स्पॅनिश (पर्यटनात इंग्रजी)
कसे जाल?
ज्यांच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा आहे त्यांना मेक्सिकोला जाण्यासाठी स्वतंत्र व्हिसाची जरुरी लागत नाही. भारतातून मेक्सिकोला जाण्यासाठी थेट विमान नाही. पण अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून मेक्सिकोला जाण्यासाठी छोटी विमानसेवा आहे. मेक्सिको व अमेरिका यांच्या दरम्यान २७०० मैलांची सीमा आहे. त्यामुळे अमेरिकेतून मोटारीतूनही मेक्सिकोमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करता येतो.
कधी जाल?
वर्षातले कोणतेही महिने जाण्यासाठी योग्य. कारण तिथलं हवामान जवळजवळ आपल्यासारखंच असतं.
सुरक्षितता :
पर्यटकांच्या दृष्टीने मेक्सिको तेवढं सुरक्षित नाही. एकट्या-दुकट्याने जाणं-फिरणं शक्यतो टाळावं. गट करून किंवा सहलकंपन्यांच्या मार्फत जाणं अधिक श्रेयस्कर.
जगातील सर्वात उंच राजधानीचं शहर :
लापाझ
द क्षिण अमेरिकेच्या सफरीत अखेरचा टप्पा होता, बोलिव्हिया देशाचा. त्याची राजधानी 'लापाझ.' हे जगातील सर्वात उंचावरील राजधानीचं शहर मानलं जातं. ३६०० मीटर्स म्हणजे १०,८०० फुटांवर ते वसलं आहे. या राजधानीचा विमानतळ व लागून असलेलं 'सुक्रे' शहर. ४१०० मीटर्स म्हणजे १२३०० फूट उंचावर. पण लापाझ हीच सर्वार्थाने बोलिव्हियाची राजधानी म्हणून ओळखली जाते. लापाझ म्हणजे पीस. या शहरात आमचा मुक्काम होता तीन-चार दिवसांचा. अत्यंत विरळ हवामानाशी सामना करणं व त्याच्याशी जुळवून घेणं हे आमच्यापुढचं पहिलं आव्हान होतं.
ब्राझील-अर्जेंटिनामधील इग्वासू धबधबा, पेरूमधील कुस्को ही इंकाची राजधानी, माचुपिचु, पुनो येथील टिटिकाका तलावातील 'उरोस' ही प्रसिद्ध तरंगती बेटं पाहून आता आम्ही बोलिव्हियात प्रवेश केला होता. लापाझच्या दिशेने जाऊ लागलो, तेव्हा दिवेलागण झाली होती. बोलिव्हियातून पूर्व अँडिज पर्वतांची शिखरं दिसतात. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या टोप्या चढवलेली शिखरं, लुकलुकणारे दिवे असलेली छोटी-छोटी घरं, हिरवीगार शेतं आणि थंड वारा यातून बस मार्ग काढत होती.
बोलिव्हिया हे सुमारे ११ लाख चौ. कि.मी. क्षेत्रफळाचं राष्ट्र. लोकसंख्या एक कोटीच्या घरात आहे. बोलिव्हियानो नावाचं चलन व्यवहारात असून स्पॅनिश व क्वेचुआ, आयमारा या स्थानिक भाषा सर्वसाधारणतः बोलल्या जातात. सुक्रे ही वैधानिक राजधानी असली तरी लापाझ हेच सर्व व्यवहाराचं केंद्र. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझील, तर दक्षिणेला अर्जेंटिना आहे त्यामुळे चारही बाजूंनी जमिनीने विळखा दिलेला देश म्हणून बोलिव्हिया ओळखला जातो. सुक्रे शहर सोडल्यानंतर बस डोंगर उतरू लागली. संध्याकाळी लापाझहून सुक्रे व आजूबाजूच्या गावात येणाऱ्यांची रहदारी प्रचंड होती. तेथील लोक नोकरीधंद्यासाठी लापाझला जातात व संध्याकाळी घरी परततात. रस्त्यांवर वाहनांची व पादचाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसते. कोणी, कसंही, कुठेही वाहन घुसवत आहे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नाही. एखादा दिसलाच तर हाताची घडी घालून उभा आहे, असे दृश्य पाहत आम्ही लापाझ शहरात प्रवेश केला. बसबाहेर पाय ठेवला आणि बाहेरच्या कमालीच्या थंड हवेची पहिली जाणीव झाली. त्याचबरोबर हॉटेलचा जिना चढताना थकवाही जाणवत होता. जवळजवळ साडेदहा हजार फूट उंचीवरील कुस्कोत आमची अशीच स्थिती झाली होती. त्या वातावरणाशी जुळवून घेण्यात सुरुवातीचे काही तास जातात.
लापाझमधील बेशिस्त वाहतूक पुणे शहराची आठवण करून देत होती. तसंच आणखी एका बाबतीत पुणे व अन्य शहरातील दृश्य आणि येथील स्थिती सारखीच दिसत होती. ती म्हणजे गॅसचे सिलेंडर्स घेऊन ठिकठिकाणी लोकांच्या लागलेल्या रांगा. नॅचरल गॅसची निर्मिती व निर्यात हे या राष्ट्राला लाभलेले मोठे वरदान. पण प्रत्यक्षात तो एक मोठा शाप ठरला आहे. कारण सत्ताधाऱ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार ! त्याचाच त्रास गरीब, मध्यमवर्गीय लोकांना भोगावा लागत आहे. लापाझ व परिसरात फिरताना अनेक ठिकाणी गॅसचे रिकामी सिलेंडर्स घेऊन लोकांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसत होत्या. सिलेंडरची गाडी येणार अशी बातमी मिळताच, स्त्री-पुरुषांची एकच झुंबड उडते. गॅस मिळण्यासाठी एक-दोन महिने सहज लागतात. अनेक ठिकाणी यासाठी रस्ता रोको केला जातो. बऱ्याच वेळा वाहतुकीचा मार्ग बदलावा लागत होता. लापाझमधील मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी विमानतळावर जाताना, अगदी सकाळी साडेपाच-सहा वाजताही एका चौकात रिकामे सिलेंडर्स घेतलेली निदान दीडशे-दोनशे लोकांची रांग आम्ही पाहिली.
लापाझ शहरात श्वसनाचा त्रास दुसऱ्या दिवशीही थोडा जाणवत होता. आम्ही आता लापाझच्या बॉटम सिटीला आलो. तिथे निसर्गाचा आगळा-वेगळा चमत्कार पहायला मिळाला. 'मून व्हॅली' म्हणजे हवामानातील बदल व वारा आदींमुळे नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक अद्भुत 'लँडस्केप' इथे पांढऱ्या मातीचे, वाळूचे, कमी-अधिक उंचीचे, शेकडो डोंगर तयार झाले आहेत. अमेरिकेतल्या 'ग्रँड कॅनियन'ची एक अगदी छोटी प्रतिकृती म्हणायला हरकत नाही. हजारो वर्षांपूर्वी चोकेया नदी इथून वाहत होती. या नदीच्या पात्रातील जमीन अतिशय सुपीक. वारा व बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन तिच्या पात्रात ५० मीटर्सपर्यंतच्या उंचीचे हे डोंगर निर्माण झाले. पण गेल्या शेकडो वर्षांत पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे अनेक डोंगरांवरचा मातीचा भाग वाहून गेला. काही टेकड्यांच्या माथ्यावर दगड आहेत. त्यामुळे तो वाहून जात नाही. या लहान-मोठ्या पांढऱ्या टेकड्या चढून अगदी वरती जाता येतं. वरून या मून व्हॅलीचं दृश्य फारच सुंदर दिसलं. आम्ही दुपारी अकराच्या सुमारास व्हॅलीमध्ये फिरत होतो तेव्हा उन्ह चांगलंच तळपत होतं. सूर्यकिरणांनी ती व्हॅली अक्षरशः लखलखत होती. या व्हॅलीला मून व्हॅली नाव कसं पडलं याची फारच गंमतीदार माहिती मिळाली. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगने या व्हॅलीला भेट दिली होती. तेव्हा निसर्गाचा हा चमत्कार पाहून त्याने उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली की, 'ही व्हॅली पाहून आज मला पुन्हा चंद्रलोकीची आठवण झाली.' तेव्हापासून ही 'मून व्हॅली' म्हणून ओळखली जाऊ लागली.
बोलिव्हियातील आणखी एक आश्चर्य म्हणजे 'सल्गर दे युनी' हे प्रचंड प्रमाणात मिठाचा साठा असलेलं पठार. साधारणतः ४० ते ४५ हजार वर्षांपूर्वी बोलिव्हियाच्या दक्षिण व पश्चिमेकडे असलेल्या पोटासी व ओरूर भागात मिनचिन नावाचं भलं मोठं सरोवर होतं. कालांतराने हे सरोवर कोरडं पडून त्यातून 'पोपो लेक' व 'उरू उरू लेक' या नावाची दोन सरोवरं तयार झाली व त्यासोबतच मिठाची दोन पठारं तयार झाली. एक 'सलार दि कोइप्सा' व दुसरं 'सलार दे मुनी.' सलार हे उत्तर अमेरिकेतील 'बोन्नेविल्ले' या मिठाच्या पठाराच्या जवळजवळ पंचवीसपट मोठं आहे. यावरून त्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. साधारणतः १५,५८२ चौ.कि.मी. जागेवर पसरलेलं हे मिठाचं पठार, अँडिज पर्वतराजींमध्ये ३,६५० मीटर उंचीच्या शिखराजवळ आहे. इथे मोठ्या प्रमाणात मिळणारी खनिज संपत्ती म्हणजे खडेमीठ व कॅल्शियम सल्फेट. तिथे जवळपास दहा अब्ज टन मिठाचा साठा असल्याचं सांगण्यात आलं व यातील जवळपास पंचवीस हजार टन मीठ दरवर्षी उपसण्यात येते.
'लापाझ शहरातील 'मुरीयो' चौकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. बोलिव्हियाचे तिसरे अध्यक्ष सांताक्रुझ यांचं इथे दफन करण्यात आलं होतं. शेजारीच काँग्रेसची इमारत व अध्यक्षांचं कार्यालय आहे. बोलिव्हियाचं लष्कर आता पूर्वीसारखं, राजसत्ता उलथवून टाकण्याइतकं सामर्थ्यवान राहिलेलं नाही. तेथील लोकशाही जागृत व मजबूत झाली आहे. १७-१८ ऑक्टोबर २००३ यादिवशी प्रामुख्याने या चौकात त्यावेळच्या अध्यक्षांच्या विरोधात जनतेची जोरदार निदर्शने झाली होती. त्याचे पडसाद अन्य भागातही उमटले. पण मुरीयो चौकात ७०-८० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तिथे रक्ताचे सडे पडल्याचं वर्णन सहल संचालकाने केलं. निदर्शक व लष्कर यांच्या चकमकीच्या खुणा आजही या चौकात पहायला मिळतात. इथे शासकीय इस्पितळाची भव्य इमारत आहे. त्याच्या वरच्या मजल्यावरील भिंतीत, त्यावेळी बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली भोकं, मुद्दाम तशीच ठेवण्यात आली आहेत. भ्रष्टाचारी अध्यक्षांच्या विरोधातील जनतेचं हे आंदोलन यशस्वी होऊन अखेर त्यांना सत्ता सोडावी लागली.... त्या देशातील लोकशाही अधिकाधिक मजबूत होवो, अशा शुभेच्छा देऊन त्या देशाचा आम्ही निरोप घेतला.
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
लापाझ (बोलिव्हिया)
खंड : दक्षिण अमेरिका
राजधानी : लापाझ, सुक्रे
क्षेत्रफळ : १०,९८,५८० चौ.कि.मी.
लोकसंख्या : ९२,४७,८१६
चलन : बोलिव्हियानो
भाषा : स्पॅनिश, क्वेचुआ, आयगारा
कसे जाल?
बोलिव्हियाचा व्हिसा भारतात मिळत नाही. दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांच्या सहलीत, त्या देशांमधील बोलिव्हियाच्या वकिलातीत जाऊन व्हिसा घ्यावा लागतो किंवा त्या देशात प्रवेश करताना सीमेवर. पण आधीच व्हिसा घेणं श्रेयस्कर. आम्ही बोलिव्हियाचा व्हिसा चिलीमधे घेतला होता. पण बोलिव्हियात प्रवेश करताना, तिथल्या कार्यालयात आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. कारण मूळ पासपोर्टबरोबर त्याची एक फोटोकॉपीही जोडावी लागते. अर्थात हा नियम सर्वच देशांना लागू नाही. जगातील १५-२० देशांनाच तो लागू असून, त्यात भारताचा समावेश आहे. त्या देशांची यादी कार्यालयाच्या बाहेर लावली होती. आमच्याजवळ पासपोर्टच्या फोटोकॉपीज् होत्या, पण त्या बॅग्ज् बसमध्ये गेल्याने खोळंबा झाला. थोडक्यात व्हिसा असलेल्या पानासह पासपोर्टची फोटोकॉपी हवीच.
दक्षिण अमेरिकेमधील अन्य देशांमधून बसने, मोटारीने किंवा विमानाने बोलिव्हियात प्रवेश करता येतो. मात्र तिथल्या हवामानाशी (जास्त उंचीवर असल्यामुळे) एकरूप होण्यासाठी निदान एक दिवसाची विश्रांती हवीच. बोलिव्हियाची किंवा दक्षिण अमेरिकेतील अन्य देशांची सफर एखाद्या सहल कंपनीबरोबर करणं श्रेयस्कर. कारण भाषेची मोठी अडचण होते. अर्थात विरळ हवामानाचा त्रास होणाऱ्यांनी तिथे जाणं टाळावं.
कधी जाल?
मे ते ऑक्टोबर, योग्य सिझन
सुरक्षितता :
हा संपूर्ण प्रदेश बराच गरीब आहे. इंग्रजी फारसं कोणाला येत नाही. त्यामुळे ग्रुपने राहणं श्रेयस्कर असतं.
नैसर्गिक आपत्तींच्या विळख्यातील
'इंडोनेशिया'
इं डोनेशियाचं नाव या ना त्या नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात नेहमी वाचनात येतं. कधी भूकंप, कधी त्सुनामी, कधी ज्वालामुखी त्या राष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेली. पण या संकटांवर मात करूनही इंडोनेशियाची विविध क्षेत्रांतील वाटचाल यशस्वीपणे सुरू असल्याचं वाचनात आलं होतं. तेथील बौद्धमंदिर म्हणजे जगातील एक आश्चर्य मानण्यात येतं. त्यामुळे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता, योग्यकर्ता आणि सुराबाया या तीन महत्वाच्या शहरांचा व परिसराचा दौरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आठ-दहा दिवसांच्या भटकंतीत, त्या देशाची तोंडओळख होऊ शकली. भारतातून इंडोनेशियाच्या कोणत्याही शहरात जाण्यासाठी थेट विमान नाही. आम्ही क्वालालंपूर मार्गे योग्यकर्ताला गेलो. इंडोनेशियाचा व्हिसा विमानतळावरच प्रत्येकी २५ अमेरिकन डॉलर्स भरून मिळतो. तो एक महिन्याचा पर्यटन व्हिसा असतो. अधिक काळ राहायचं असेल तर आपल्या देशातील त्यांच्या वकिलातीतून तो घ्यावा लागतो. योग्यकर्ताचा विमानतळ अगदीच छोटा आहे. त्यामुळे सर्वत्र गदींचगर्दी दिसली. आम्हालाच आमचं सामान हुडकून काढावं लागलं. पण एकूण व्यवस्था ठीक वाटली. इंडोनेशियात पाऊल ठेवल्यानंतर सर्वप्रथम परिचय व सराव करून घ्यावा लागतो तो तेथील लाखांच्या नोटांचा. एक अमेरिकन डॉलर म्हणजे आठ ते साडेआठ हजार इंडोनेशियन रुपये. क्षणार्धात तुम्ही लक्षाधीश होता. एका बर्गरची किंमत ४९,५०० रुपये. क्लब सँडविचसाठी २९,५०० रु. मोजावे लागतात. अर्थात हळूहळू या चलनाची सवय होते..जागतिक हवामानात होत असलेला बदल इथेही अनुभवायला मिळाला. वस्तुतः ऑक्टोबर ते एप्रिल हा येथील पावसाचा मोसम. मे ते सप्टेंबर महिन्यात पाऊस नसतो. पण आम्ही मेच्या मध्यास असतानाही दोन दिवस संध्याकाळी अक्षरशः मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. हवामान जवळजवळ आपल्या सारखंच. पाउस पडून गेल्यानंतर अधिकच गरम होऊ लागलं.
योग्यकर्ता हे 'जोजकार्ता' या नावानेही ओळखलं जातं. त्यामुळे सुरुवातीला गोंधळ उडतो. पण या शहराचे खरे नाव योग्यकर्ताच. इंडोनेशिया हे १७,५०५ बेटांचं मिळून बनलं आहे. त्यापैकी ३०० बेटांवर अजिबातच वस्ती नाही. अनेक बेटं एकमेकांना अगदी लागून आहेत. म्हणजे मासेमारीचं साहित्य ठेवायचं एका बेटावर व राहण्यासाठी शेजारच्या बेटावर जायचं अशी रचना आहे. कालीमादान, सुमात्रा, पापुआ, सुरावस्ती व जावा ही इंडोनेशिया मधली पाच मोठी बेटं. त्यापैकी जावा बेटात जकार्ता हे सर्वात जास्त लोकवस्ती असलेलं पहिल्या क्रमांकाचं शहर. त्यानंतर सुराबाया, समाहन, बांडुंग व योग्यकर्ता अशी क्रमवारी लागते.
योग्यकर्ता राज्य १७५५ मध्ये स्थापन झालं. हे पूर्वीचं अयोध्यकर्ता. अयोध्या हे रामायणातील अत्यंत प्रसिद्ध राज्य. 'कर्ता' म्हणजे जगातील सर्वोत्कृष्ट. योग्यकर्ता शहराची लोकसंख्या २५ लाख व त्याचं क्षेत्रफळ ३,१८६ चौ.कि.मी. इंडोनेशियात एकूण ३०० स्थानिक भाषा आहेत. प्रत्येक जातीची निराळी भाषा. पण सरकारी कार्यालयात, शाळांमध्ये, इंडोनेशियन भाषेचा व तेथील स्थानिक भाषेचा वापर केला जातो. इंडोनेशियाची ७५ टक्के लोकसंख्या मुस्लीम. राहिलेल्या २५ टक्क्यांमध्ये कॅथॉलिक, प्रोस्टेटंट, हिंदू, बौद्ध यांचा समावेश होतो. सर्वत्रच तसं धार्मिक एकात्मतेचं वातावरण. काही वेळेस कडवे मुसलमान वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र सरकारकडून त्याविरुद्ध कडक उपाय योजण्यात येतात. अन्यथा सर्व धर्म इथे गुण्यागोविंदाने नांदतात. विविध धर्मांच्यातर्फे वैद्यकीय मदत केंद्रे किंवा इस्पितळं चालवली जातात. पण त्यात सर्वच धर्मीयांना सारखी मदत मिळते हे विशेष वाटलं.
इंडोनेशियातील जिवंत ज्वालामुखींबाबत खूप कुतूहल होतं. यापूर्वी जगातील काही जिवंत ज्वालामुखी पाहण्याची संधी मिळाली होती. अमेरिकेतील हवाई
बेटावरील तसंच इटलीत सिसिली येथील इटना ज्वालामुखी हे मोठे म्हणून ओळखले जातात. त्या दोन्ही जागांना आम्ही भेट दिली होती. हवाईच्या 'व्होल्कॅनो नॅशनल पार्क'मध्ये आम्ही असतानाच वाऱ्याची दिशा बदलली आणि लाव्हा रसाचा भयंकर वास आमच्या दिशेनेच येऊ लागला. त्यामुळे तातडीने सर्व पर्यटकांना पार्कच्या बाहेर काढण्यात आलं व वाऱ्याची दिशा बदलल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. इंडोनेशियातील ब्रोमो ज्वालामुखी, शहरांपासून बराच दूर आहे. त्यामुळे त्याच्या उद्रेकाचा महत्त्वाच्या शहरांना तसा त्रास होत नाही. पण योग्यकर्ता शहरापासून अवघ्या तीस कि.मी. अंतरावर असलेल्या माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या 'पराक्रमाची' कहाणी ऐकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो पाहण्यासाठी गेलो. त्याचं दर्शन लांबून झालं पण त्याने केलेला विध्वंस मात्र जवळून पाहता आला. समुद्रसपाटीपासून २,९६८ मीटर्स उंच असलेला हा ज्वालामुखी जगातील एकं अत्यंत जागृत ज्वालामुखी मानण्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात धाडसीवीर या डोंगरावर गिर्यारोहण करतात. त्याच्या शिखरावर जाण्यासाठी सराईत गिर्यारोहकांनाही जवळजवळ दहा तास लागतात.
मेरापी हा २००४ व २००६ मध्ये जागृत झाला होता व त्याने मोठा विध्वंस केला. २००६ मध्ये तर त्याला भीषण भूकंपाची साथ होती. त्यात सहा हजार लोक मृत्युमुखी पडले. इथून तीस-पस्तीस कि.मी. अंतरावरील व जगातील एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या 'बोरोबुदूर' या बुद्ध मंदिराचं व 'प्रबनन' हिंदू मंदिराचं त्यात प्रचंड नुकसान झालं. २०१०च्या नोव्हेंबर महिन्यातही तो जागृत झाला व त्यात १७१ जण मरण पावले. याची पूर्वसूचना शासनाने लोकांना आधी दिली होती. पण त्याच्या अगदी जवळ राहणाऱ्या लोकांना, पळायला वेळच मिळाला. नाही.
मेरापी जागृत होतो, तेव्हा त्याचं स्वरूप किती भयंकर असतं, याचं वर्णन ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. ज्वालामुखीच्या चार अवस्था असतात.
१) शांत पण जागृत (ह्यावेळेस त्याच्यातून धूर येत असतो)
२) अधिक जागृत,
३) उद्रेकासाठी तयार व
४) उद्रेक
२०१० मध्ये २६ सप्टेंबरला तो जागृत होऊ लागला व नोव्हेंबर महिन्यात त्याचा उद्रेक झाला. सुमारे ८० कि.मी.च्या वेगाने त्याचा लाव्हा रस
वाहत येतो. त्याची उष्णता ६०० ते ८०० सेल्सियस एवढी असते. (गॅसवर १०० सें. वर पाणी उकळायला लागतं.) त्यामुळे त्याच्या जवळपासच्या लोकांना पळण्यासाठी अवघा सात सेकंदाचा वेळ मिळतो. त्याचं एकूण रूपही अक्राळविक्राळ असतं. त्याच्या ज्वाला मशरूमच्या फुलाप्रमाणे आकार घेत ८ कि.मी. पर्यंत उंच उडतात आणि त्याचे कण वीस कि.मी. च्या परिसरात पसरतात. वाऱ्याची दिशा जशी असेल तिथे ते विखुरले जातात.
लाव्हा रस जेव्हा शांत होतो, तेव्हा १४० क्युबिक मीटर्स लाव्हा तिथे साचतो. नोव्हेंबरमध्ये जागृत झालेल्या ज्वालामुखीचे परिणाम पुढे निदान आठ-दहा महिने लोकांना भोगावे लागत असल्याचं आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. या ज्वालामुखीतून अजस्र दगड, वाळू बाहेर पडून इतस्ततः पसरली गेली होती. आम्ही तिथे असतानाच एक दिवस संध्याकाळी प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे हे शेकडो लहान-मोठे दगड वाहत शेजारच्या नदीत गेले आणि नदीची पातळी अचानक वाढली. परिसरातील वस्ती खाली करावी लागली. अर्थात हे आता नित्याचंच झालं असल्याने त्याची सवय करून घेण्याखेरीज काही पर्याय नाही असं गावकऱ्यांनी बोलून दाखवलं.
लाव्हा रसापासूनच्या दगडांचे नानाविध उपयोग केले जातात. इटना, इथे त्यापासून बऱ्याच वस्तू बनवण्यात येतात व तिथेच त्यांची विक्री केली जाते. लाव्हा रसापासून बनवलेली एक सुंदर बाहुली आम्ही तिथे खरेदी केली. योग्यकर्ताच्या परिसरात सुद्धा रस्त्यांच्या दुतर्फा या दगडांपासून नानाविध आकारांच्या मूर्ती बनवण्याचं काम सुरू दिसलं. योग्यकर्ता भेटीचं मुख्य आकर्षण होतं 'बोरोबुदूर' बुद्ध मंदिर. हे जगातील सातवं आश्चर्य मानण्यात येतं. पूर्वी इथे कोणताच धर्म नव्हता. चवथ्या शतकात गुजरातमधून एक व्यापारी इथे आला. त्याने हिंदू धर्माची ओळख करून दिली. पाचव्या शतकात बुद्धिझम तिथे आला. हळूहळू हे दोन्ही धर्म वाढू लागले. त्यातूनच बोरोबुदूर हे बुद्ध मंदिर व प्रबनन् हिंदू मंदिराची उभारणी झाली.
बोरोबुदूर मंदिरात आत जाताना लुंगी नेसावी लागते. त्याला 'सरोंग' म्हणतात. प्रवेश तिकीट घेतल्यानंतर लुंगी नेसवली जाते आणि पाण्याची बाटली व चहा-कॉफी मोफत मिळते. या मंदिराची रचना अतिशय आकर्षक आहे. मंदिराची उंची ३५.५ मीटर्स. त्याचे एकूण नऊ टप्पे (लेव्हल्स) आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांपर्यंत जाता येते. २००६ मध्ये जो भीषण भूकंप झाला त्यामुळे या मंदिराचं बरेच नुकसान झालं होतं. त्याची दुरुस्ती युनेस्कोच्या देखरेखीखाली सध्या सुरू आहे.
प्रथम उंच पायऱ्या चढून वर जावं लागतं. वीस लाख मोठ्या शिळांनी हे मंदिर उभारलं आहे. त्यासाठी ५५,००० क्यूबिक्स मीटर्स लाव्हा वापरण्यात आला. या शिळा पिरॅमिडसप्रमाणे रचण्यात आल्या आहेत. तिथे बुद्धाच्या विविध मुद्रा व तीन अवस्थांचं दर्शन होतं. कामा, रूपा व अरूपा धातू. शेवटची स्थिती म्हणजे संतरूप. हे मंदिर बारकाईने व संपूर्ण पहायचं, समजून घ्यायचं तर २१ दिवस लागतात. या मंदिराच्या आत जागा नाही. त्याच्या चारही बाजूने प्रदक्षिणा घालूनच त्याचे भव्य-दिव्य स्वरूप लक्षात येतं. बाराशे वर्षं होऊनही ते उत्तम अवस्थेत आहे. इंडोनेशियन सरकार वारंवार त्याची डागडुजी करतं. त्यामुळे ते आणखी निदान हजार वर्षे निश्चित उभे राहील, असा दाखला तज्ज्ञांनी दिला आहे.
योग्यकार्ताच्या जवळच प्रबनन् हे आशियातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे. त्यात एकूण २४० देवळं असून, भिंतीच्या आत १६ व पलीकडे २२४ आहेत. त्यांना प्रवरा म्हणतात. आतल्या बाजूच्या देवळात ब्रह्मा, विष्णू व शिव या देवतांची मुख्य देवळं आहेत. त्यात शिवाचं मंदिर सर्वात उंच, म्हणजे ४७ मीटर्स. त्याच्या आधी नंदी, गरूड व राजहंस ही त्यांच्या वाहनांची मंदिरं आहेत. निरनिराळ्या भूकंपात या देवळांची मोठी हानी झाली होती. पण इंडोनेशियन सरकारने त्यांच्या पुनर्बाधणीचं काम जोरात हाती घेतलं. त्याचे दगड केव्हाही कोसळू शकतात. म्हणून ते बघण्यासाठी बंद आहे. या देवळांचा परिसर उत्तमरीत्या सुशोभित ठेवण्यात आला आहे. योग्यकर्ताच्या सुलतानाचा छोटा पॅलेसही पाहण्यासारखआ असून, इथल्या मुक्कामात प्रसिद्ध बाटिक प्रिंटस्, चांदीची विविध उत्पादनं करणाऱ्या कारखान्यांना भेट द्यायलाच हवी.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता म्हणजे मोठं गजबजलेलं शहर. कधीही आणि कोठेही जा, वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसतातच. अर्थात वाहतूक बरीचशी शिस्तीत असते. हे उद्योगधंद्यांचं शहर आहे. त्यामुळे या शहराची हवा, पाणी कमालीचं प्रदूषित. अगदी मुंबईसारखी झोपडपट्टी आणि टोलेजंग इमारतीही इथे आहेत. इंडोनेशियाची आर्थिक स्थिती खूप बरी असल्यामुळे २००८च्या जागतिक आर्थिक मंदीची झळ या राष्ट्राला बसली नाही. पण भारताप्रमाणेच इथे श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत आहेत आणि गरिबीही वाढत आहे. किंमती मोटारी रस्त्यांवरून फिरताना दिसतात आणि दारिद्र्याचंही दर्शन घडतं. इंडोनेशियातील बस वाहतुकीचे थांबे मला खरोखरच आकर्षक वाटले.
रस्त्यांवर बसेससाठी स्वतंत्र मार्ग आहेत आणि त्यांची आखणी व्यवस्थित असल्यामुळे त्यात अन्य वाहनं घुसताना दिसत नाहीत. सुमारे दीड-दोन फूट उंचीच्या पायावर, बस थांब्याची बंद शेड उभारलेली असते. चढण्यासाठी छोटे जिने. शेडमध्ये बसण्याची व्यवस्था. सरकत्या दरवाजांनी ती शेड बंदही होऊ शकते. बसचा दरवाजा त्याच उंचीचा असल्याने थेट बसमध्ये शिरता येतं. तिकडच्या प्रवाशांची शिस्तही चांगली वाटली. जकार्ताच्या मध्यवर्ती चौकात संसद आणि अन्य महत्त्वाच्या शासकीय इमारती आहेत. इथल्या नॅशनल म्युझियमला आम्ही मुद्दाम भेट दिली. अत्यंत प्राचीन वस्तू, पुतळे यांचा संग्रह असलेले असं हे मोठं संग्रहालय आहे. गणपती, बुद्ध, दुर्गादेवी यांच्या अगदी भव्य, आकर्षक व कित्येक शतकांपूर्वीच्या मूर्ती इथे दिसतात. अनेक शिलालेखांवर त्याकाळची माहिती, संस्कृतमध्ये लिहिली आहे. ती वाचण्यासाठी बरेचदा भारतातील संस्कृत तज्ज्ञांना बोलावण्यात येतं. चार हजार वर्षांपूर्वीची पोर्सिलोन, टेराकोटाची भांडी, अवशेष उत्तमरितीने जतन केले आहेत.
जकार्ताचं पहिलं नाव होतं सुंदा केलापा. 'सुंदा' म्हणजे स्थानिक लोक आणि 'केलापा' याचा अर्थ नारळ. स्थानिक राजपुत्राने ते बदलून 'जयाकर्ता' असं ठेवलं. त्यानंतर येथे डच आले. त्यांनी या शहराचं नाव 'बटाव्हिया' ठेवलं. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या जपानी राज्यकर्त्यांना डचांचं नामोनिशाणही नको होतं. त्यांना योग्य असं नाव सापडेना. म्हणून त्यांनी परत 'सुंदा केलापा' असंच नाव ठेवलं. पण त्यांना त्याचा उच्चारच करता येईना. म्हणून त्यांनी 'जयाकर्ता' नाव पसंत केलं. त्याचा अपभ्रंश होऊन 'जकार्ता' झालं व तेच पुढे प्रचलित होऊन गेलं. जकार्ता शहरापासून तीस मिनिटांच्या अंतरावर ३०० हेक्टर जागेत उभारण्यात आलेला 'मिनिएचर पार्क' म्हणजे संपूर्ण इंडोनेशियन संस्कृतीचा उत्तम परिचय आहे. तिथे ३३ प्रांतांची पॅव्हॅलियन्स बनवण्यात आली आहेत. त्यातून २५० संस्कृतींची माहिती मिळते. तिथले म्युझियम, बडे पार्क पाहण्यासारखे आहेतच. पण विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर बगिच्यांनी सजवलेला असून, हजारो लोकांची वर्दळ असूनही तेथील स्वच्छता आणि व्यवस्था वाखाणण्यासारखी आहे.
सुराबाया हे इंडोनेशियातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरं मोठं शहर. या शहराची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात आणि प्रामुख्याने उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुराबाया नाव कसं पडलं याची दंतकथा मोठी सुरस आहे. सुरा म्हणजे शार्कमासा आणि बाया म्हणजे मगर. शार्क समुद्रात असतो तर मगर नदीत. बाराव्या शतकात, एके दिवशी नदी समुद्राला जिथे मिळते तिथे मोठा आवाज सुरू झाला, तेव्हा स्थानिक लोकांना वाटलं की. शार्क व मगर यांची मारामारी सुरू आहे. ते पाहून काही जण सुरा तर काही जण बायाच्या नावाने ओरडू लागले. त्यावरून या जागेचं 'सुराबाया' असं नाव पडलं. शार्क मासा व मगर यांच्या मारामारीचं दृश्य दाखवणारे मोठे पुतळे शहराच्या अनेक चौकात दिसून येतात.
सुराबायात प्रामुख्याने जगातील सर्व नामांकित कंपन्यांच्या सिगरेट्सचे उत्पादन होतं. त्यामुळे भरपूर पैसा इथे खेळताना दिसतो. येथील एका चार मजली भव्य मॉलमध्ये गेलो होतो. पण याहूनही मोठे असे कितीतरी मॉल सुराबायात आहेत व त्यापैकी अनेक मध्यरात्रीपर्यंत उघडे असतात, अशी माहिती स्थानिक टूरगाइडने दिली.
सुराबायाहून सुमारे ९० कि.मी. अंतरावर असलेले मलंग शहर म्हणजे थंड हवेचं ठिकाण. इथे काही प्राचीन देवळंही आहेत. डचांच्या वसाहतीचे काही अवशेषही चांगले जतन केले आहेत. इथला बोलेवर्ड भाग खरोखरच पाहण्यासारखा आहे. श्रीमंतांचे अलिशान बंगले इथे आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट केली आहे. या सुंदर सजावटीमुळे तो सारा परिसर एकदम खुलून दिसतो.
कोणत्याही देशात गेलो तरी तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा यावर माझा व जयंतीचा नेहमीच भर असतो. जयंती तर विविध स्थानिक रेसिपींची भरपूर माहिती मिळविते. (भारतात परत आलो की त्यांचा प्रयोग सर्वप्रथम माझ्यावर होतो व त्याचं तोंडभरून कौतुक करावं लागतं हा भाग निराळा.) ठिकठिकाणी अगदी अस्सल इंडोनेशियन रेस्टॉरंट्समध्ये जेवणाचा योग आला. एका ठिकाणी त्यांच्या खास डिशची ऑर्डर दिली. त्या डिशचं नाव होते - 'नासी गोरेंग अॅड गुरामे टू सा.' नासी म्हणजे राईस आणि गोरेंग याचा अर्थ फ्राईड. माशाला गुरामे म्हणतात. टू सा म्हणजे या माशावर दोन निरनिराळ्या प्रकारचे सॉस घालून तो बनवण्यात येतो. मासा होता फिलापीया. हा मोठा चवदार मासा आहे. तो मस्त भाजून तिखट व आंबट लाल-काळ्या रंगाच्या सॉसमध्ये घोळवून देण्यात आला. त्याच माशाच्या डोक्यापासूनच्या कव्हरने मासा गार्निश केला होता. दिसायला आकर्षकच आणि चवीला लाजवाब... इंडोनेशियन रेस्टॉरंटस्मध्ये ठिकठिकाणी शेजारच्या टेबलांवर स्थानिक स्त्री-पुरुषांच्या हातात, बिअरसारखे मोठे जार दिसत होते. पण त्यात होता. 'लेमन टी' जेवणासोबत लेमन टी पिण्याची इथली खास पद्धत आहे. बिअरचा मोठा ग्लास जसा स्वस्त पडतो, त्याच हिशेबाने लेमन टीचा भला मोठा जार घेणं लोक पसंत करतात. त्या मस्त तिखट जेवणाबरोबर चहा, हे काँबिनेशन मात्र आम्हाला कसंसंच वाटलं.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
खंड : आशिया
लोकसंख्या :
राजधानी : जकार्ता
२३,७४, २४,३६३
क्षेत्रफळ : १४,१९,५८८ चौ.कि.मी.
चलन : इंडोनेशियन रुपये
भाषा : पर्यटनात इंग्रजी
कसे जाल ?
इंडोनेशियाचा व्हिसा, त्या देशाच्या महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांवर, आगमनानंतर, अमेरिकन डॉलर्समध्ये पैसे भरून मिळतो. तो एक महिन्याचा असतो. अधिक कालावधीसाठी हवा असल्यास मात्र, भारतातून घ्यावा लागतो. इंडोनेशियाची सहल स्वतः आखून करणं चांगलं. भारतातून इंडोनेशियाच्या कोणत्याही शहरात जाण्यासाठी थेट विमान नाही. पण क्वालालांपूर, बँकॉक, आदि ठिकाणांहून तिथे जाता येतं. इंडोनेशियातील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी अंतर्गत विमानसेवा आहे.
कधी जाल?
हवामान जवळजवळ आपल्यासारखंच. मे ते सप्टेंबर हा पर्यटनासाठी चांगला कालावधी. अर्थात क्वचित पावसाला तोंड द्यावं लागतं. इथे ऑक्टोबर ते एप्रिल पावसाचा मोसम असतो.
सुरक्षितता :
तसं सुरक्षित राष्ट्र आहे पण भारतासारखीच सर्वत्र प्रचंड गर्दी असल्यामुळे योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे.
संस्कृती, परंपरा जपणारा 'बाली'
'बा *ली बेटावर उभं राहून कोणत्याही दिशेने दहा दगड भिरकावलेत, तर त्यातील नऊ दगड देवळांवर पडतील.' डेन पसार बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी आणि जयंती उतरलो तेव्हा स्वागतासाठी आलेल्या स्थानिक टूर गाइडने बाली बेटाचा परिचय या शब्दात करून दिला, पुढच्या आठ-दहा दिवसांत बालीच्या कानाकोपऱ्यांत फिरताना त्याचं म्हणणं शंभरटक्के खरं असल्याची प्रचीती आली. इंडोनेशिया हे मुस्लीम राष्ट्र. पण बालीमध्ये जवळजवळ शंभरटक्के हिंदू. अर्थात अन्य राष्ट्र व बाली यांच्यात कोणताही तणाव नाही. बालीच्या पर्यटन विकासासाठी मध्यवर्ती सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळते. धार्मिक द्वेषाचं राजकारण न करता, आधुनिकतेबरोबरच हिंदू धर्माच्या परंपरा, चालीरिती यांच्यावर मनापासून प्रेम करणारा हिंदू समाज इथे आढळून येतो.
काही लाख वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उलथापालथीतून बाली बेटाचा जन्म झाला. बाली नावात संस्कृत भाषेचा भारतीय वारसा आहे. इंडोनेशिया या नावापेक्षा ते अधिक जुनं आहे. संस्कृतमध्ये बाली म्हणजे अर्पण करणं. सर्वसाधारणपणे देवाला नैवेद्य अर्पण करणं हा त्याचा अर्थ. बालीच्या कोणत्याही भागात सकाळच्या वेळेस जा, नारळाच्या झाडापासून बनवलेल्या छोट्या चौकोनी द्रोणात फुलं, फुलांच्या पाकळ्या, भात, एखादं बिस्किट व अगरबत्ती यांचा नैवेद्य प्रत्येक देऊळ, घर, दुकान, हॉटेल यांच्यासमोर ठेवलेला दिसून येतो. त्याला 'चनंगसारी' असं म्हणतात. देवाला नैवेद्य अर्पण करून, दिवसाची चांगली सुरुवात करायची ही परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे.
बालीची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात आहे. बाली हे बेट पूर्व-पश्चिमेला १५० कि.मी. व उत्तर-दक्षिणेला ८० कि.मी. पसरलं आहे. डेनपसार ही बालीची राजधानी. सर्वसाधारणतः सहा मोठी शहरं व चार हजार खेडी मिळून बाली वसलं आहे. शहरांमध्ये ९० टक्के हिंदू व १० टक्के मुस्लीम-ख्रिश्चन. पण खेड्यांमध्ये १०० टक्के हिंदू. बालीच्या मुक्कामात तेथील महत्त्वाची देवळे, समुद्राचा तळ दिसणारे अप्रतिम बिचेस आणि निसर्गसौंदर्याने नटलेली छोटी-छोटी बेटं तर पाहिलीच पण प्रामुख्याने ग्रामीण भागांत भटकंती केल्याने त्यांच्या प्रथा, चालीरिती, संस्कृती यांची भरपूर माहिती मिळाली.
सुरुवातीला बाली परिसरात फिरण्यासाठी आम्ही तीन दिवसांची टॅक्सी केली होती. रोज आठ ते नऊ तासांसाठी दहा लाख इंडोनेशियन रुपये ठरले. रक्कम वाचून धक्का बसला ना? पण संपूर्ण इंडोनेशियात आल्यापासूनच पर्यटक लक्षाधीश होऊन जातो. साधारणतः एक अमेरिकन डॉलर म्हणजे आठ ते साडेआठ हजार इंडोनेशियन रुपये. १० लाख रुपयाचे. सुमारे १२० डॉलर्स व आपले साडेपाच ते सहा हजार रुपये या लाखांच्या नोटा सुरुवातीला चांगलाच गोंधळ निर्माण करतात.
बालीतील हिंदू-बांधव नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतात. आजच्या काळात भारतानेच काय पण साऱ्या जगाने त्यांचं अनुकरण करावं अशी ही प्रथा वाटते. येथील हिंदू कॅलेंडरला 'साका' म्हणतात. ह्यांचं नवीन वर्ष मार्च किंवा एप्रिलपासून सुरू होतं. तो दिवस 'नेपी' या नावाने ओळखला जातो. नवीन वर्षाचा आदला दिवस, वाईट प्रवृत्तींचा नायनाट व्हावा म्हणून दीपोत्सव करून साजरा होतो. पण 'नेपी डे' हा शांतता दिन असतो. त्या दिवशी चार बंधनांची अंमलबजावणी संपूर्ण बालीमध्ये अत्यंत काटेकोरपणे केली जाते - १) विजेचा वापर अजिबात करायचा नाही २) सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद ३) कोणीही कुठेही प्रवास करायचा नाही ४) मौजमजा पूर्णतः वर्ज्य. इ.स. २००० पासून बालीचा आंतरराष्ट्रीय विमानतळही त्या दिवशी बंद राहतो. बाली रेडिओ व दूरचित्रवाणीची सर्व चॅनेल्स थंडावतात. रस्त्यावर एकही वाहन धावत नाही. अनेक जण उपवास करतात व घरात बसून ध्यानधारणा, पूजाअर्चा करतात. संपूर्ण बाली बेट अक्षरशः निर्मनुष्य दिसतं. 'नेपी डे' पूर्णतः प्रदूषणमुक्त असतो आणि मग अत्यंत प्रसन्न, शुद्ध वातावरणात दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते. मुंबई-पुण्यात गुढीपाडव्याला किंवा कोणताही एक दिवस प्रदूषणमुक्त होण्यासाठी अशा पद्धतीने पाळला तर?
बालीमधील आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे 'गालुगान.' हा वर्षातून दोन वेळा येतो. चांगल्या प्रवृत्तींचा वाईट प्रवृत्तींवर विजय ही त्या मागची भावना. प्रत्येक देवळात तो दिवस रोषणाई करून व फळाफुलांचा नैवेद्य दाखवून साजरा होतो. शाळांना, कार्यालयांना यादिवशी सुट्टी असते. बालीमधील हिंदू कमालीचे धार्मिक, देऊळ म्हणजे त्यांचा जीव की प्राण. तेथील पावित्र्य, स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखी असते. प्रत्येक खेड्यात पाच देवळं असतातच. देवळांची रचना अगदी जुन्या पद्धतीची, दगडांची. प्रवेशद्वारापाशी दीपस्तंभ असतात. विशेष म्हणजे गावातील सर्व बैठी घरं व देवळं यांची रचना, आकार जवळजवळ सारखाच असतो. कोणत्याही समारंभाच्यावेळी देवळांच्या प्रवेशद्वारांवर नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांच्या उंच कमानी उभारणं ही येथील पारंपरिक पद्धत. प्रत्येक गावातील कमानी निरनिराळ्या आकारांच्या असतात. आजच्या काळात बाली एकत्र कुटुंब पद्धत ऱ्हास पावत असली तरी तरुणवर्ग आपल्या वृद्ध आई-वडिलांची चांगली काळजी घेताना दिसतो. नोकरी धंद्यानिमित्त तो शहरात राहायला गेला तरी आई-वडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्याला जाणीव असते आणि वृद्धांसाठी शासकीय योजनांचा फारसा आधार नसल्याने त्यांनाही मुलांच्या साहाय्याची जरूरी भासते.
लग्न जमवण्याच्या बाबतीत मात्र बाली तरुण-तरुणी स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल कमालीचे जागरूक आहेत. सर्व लग्नं मुलं-मुली आपल्या पसंतीनेच ठरवतात. पालक त्यात सहसा हस्तक्षेप करत नाहीत व कोणी केला तर मुलं त्यांचं न ऐकता पळून जाऊन लग्न करतात. येथेही जाती-उपजाती, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेदभाव आहेतच. एखादा मुलगा उच्च जातीतील व मुलगी कनिष्ठ जातीतील असेल तर त्या लग्नाला कोणाकडूनही विरोध होत नाही. मुलगा खालच्या जातीतील व मुलगी वरिष्ठ तर मात्र मुलीकडच्यांची नाराजी स्पष्ट दिसते. लग्नाचं वय आता वाढून २८ ते ३० वयापर्यंत गेलं आहे. पण विशेष म्हणजे घटस्फोटांचं प्रमाण अगदी नगण्य आहे. कितीही मतभेद झाले तरी लग्नगाठ कायम ठेवावयाचीच अशी वृत्ती मुला-मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. लग्न स्वतः जमवण्याची आधुनिक पद्धत स्वीकारूनही चटकन विभक्त होण्याची पाश्चिमात्यवृत्ती बाली युवकांमध्ये नाही हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल. कुटुंब नियोजनाचं महत्त्व त्यांना पूर्णतः मान्य असून एक किंवा दोन मुलं होण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.
काही बाली कुटुंबातही जाण्याचा योग आला आणि खास बाली खाद्यपदार्थाची माहिती जयंतीने करून घेतली. तिथे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन जेवण्याची पद्धत दिसली नाही. प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार जेवतो. भात व मासे हे त्यांचं मुख्य जेवण. पण नानाविध प्रकारचे सॉस ही तेथील जेवणाची खासियत आहे. टोमॅटो सॉस, केचप, कांदा, लसूण, चिली, दालचिनी व साखर यांचं मिश्रण म्हणजे लालभडक बाली सॉस. थोड्या काळपट रंगाचं आणखी एक सॉस असतं. लाल सॉस खूप तिखट पण चवदार असतं. काळं सॉस थोडं गोड. या दोन्ही सॉसना एक निराळीच चव असते. मासा भाजला किंवा तळला की त्यावर हे सॉस टाकण्यात येतं. चिकन प्रामुख्याने गावठी कोंबडीचं. तीसुद्धा या सॉसमध्ये किंवा काही वेळेस नारळाच्या दुधात बनवली जाते. जेवणात भात हा हवाच. तो बाऊलमध्ये नुसता घेतला जातो किंवा प्लेटमध्ये त्याची उंच मूद असते. भात, सॉस, चिकन म्हणजे मस्त मेजवानी. बाली किंवा संपूर्ण इंडोनेशियातच एक पदार्थ परिचयाचा वाटला. तो म्हणजे, आपल्याकडच्या तांदळाच्या कुरड्या. हे पापडासारखे भाजण्यात येतात. अगदी विमानतळापासून गावातल्या टपरीवरच्या हॉटेलमध्येही या कुरड्या दिसून आल्या. मासे खाणाऱ्या पर्यटकांची बालीमध्ये तबियत खूष न झाली तरच नवल. समुद्र किनाऱ्यांवरील रॉक्समध्ये बर्फाच्या पेटाऱ्यांत प्रॉन्स, फिलापिया व स्थानिक रंगीबेरंगी ताजी मासळी ठेवलेली असते. ती पाहून आपण त्यातील मासा निवडायचा आणि मस्त सॉसमध्ये घोळवून तळलेल्या, भाजलेल्या माशावर ताव मारायचा! मद्यपानाच्याबाबतीत मात्र बाली माणूस तेवढा आग्रही नाही. 'अराक' हे येथील स्थानिक मद्य. आपल्याकडच्या ताडीप्रमाणे पाम ट्रीच्या फळांपासून त्याची निर्मिती होते. पण गावकरी पारंपरिक पद्धतीने ती बनवतात. त्यात अल्कोहोलचं प्रमाण बरंच जास्त असतं. त्यामुळे कडक मद्य म्हणून ते ओळखलं जातं.
जवाहरलाल नेहरूंनी बाली बेटाचं वर्णन आपल्या काव्यमय शब्दात 'दी मॉर्निंग ऑफ दी वर्ल्ड' (जगाची सकाळ) अशा शब्दात केलं होतं. बाली बेट म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. भव्य देवळं, उत्तम बीचेस आणि जणू स्वर्ग वाटावी अशी छोटी बेटं यांनी बाली नटलं आहे. बालीतील चार गावं ही कलेची माहेरघरं आहेत. बटुबुलन, सेलूक, मास आमि उबुद येथील लाकडांवरील व दगडांवरील कोरीव काम, पेंटिंग्ज आणि चांदीचे दागिने परदेशांतही प्रसिद्ध आहेत. आठ-दहा फूट उंचीचे, दगडांचे नानाविध पुतळे, लाकडावरचे बारीक कोरीव काम, भव्य पेंटिंग्ज आणि चांदीचे दागिने पाहून आपण थक्क होतो. बालीमध्ये धार्मिक कार्यासाठी चांदीच्या भांड्यांचा वापर होतो. पण विशेषतः ऑस्ट्रेलियात चांदीचे दागिने फार लोकप्रिय आहेत. त्यामुळे या चारही गावांतील माल परदेशांत निर्यात होतो. याचा परिणाम म्हणजे ही चारही गावं श्रीमंत झाली आहेत. पण त्यांनी आपल्या बैठ्या घरांचा, संस्कृतीचा अजिबात त्याग केलेला नाही, हे विशेष. बालीतील अन्य खेडी प्रामुख्याने भातशेती व मसाल्याच्या उत्पादनांत आघाडीवर आहेत. इथे भाताची शेतं पायऱ्या पायऱ्यांनी बनवलेली दिसतात. बालीच्या कोणत्याही ग्रामीण भागांत जा, लांबवर पसरलेली भाताची हिरवीगार शेतं, नारळाची झाडं, लवंगा व अन्य मसाल्याच्या पदार्थांची घनदाट झाडी आणि मधून-मधून टुमदार गाव, या दृश्याने आपण अक्षरशः वेडे होतो. नारळाच्या सुकलेल्या झावळ्यांपासून बनविलेली खास उंच इंडोनेशियन टोपी घातलेले शेतकरी शेतात काम करताना दिसतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक शेतात एक झोपडी उभारलेली दिसते, ती असते शेतकऱ्यांची विश्रांतीची खोली.
वर उल्लेख केल्याप्रमाणे बालीमध्ये लहान-मोठी प्राचीन मंदिरं आहेत. त्यातील काही जरूर पहायलाच हवीत. वैशाख हिंदू देऊळ हे ८ व्या शतकातील आहे. तिथे एकूण १८ देवळं आहेत. त्यात शिव मंदिर मुख्य. जवळजवळ साठ-सत्तर लांबलचक पायऱ्या चढल्यानंतर शिव मंदिराचं प्रवेशद्वार लागतं. येथील एकूण व्यवस्था मात्र समाधानकारक वाटली नाही. पैसे उकळण्याचा उद्देश दिसून येतो. कशाचाही पावत्या दिल्या जात नाहीत. याआधी इंडोनेशियातील योग्यकर्ता येथील 'बोरोबुदूर' बुद्धमंदिर पाहायला गेलो होतो. जगातील ते एक आश्चर्य मानण्यात येतं. तेथील सर्व व्यवस्था अत्यंत वाखाणण्यासारखी होती. इथे मात्र तो व्यवस्थितपणा अजिबात नव्हता. मूर्तीची देखभालही योग्य तन्हेने होत नसावी. कारण अनेक ठिकाणी शेवाळ साचलेलं दिसत होतं.
'तनाहा लॉत' हे समुद्रकिनाऱ्यावरील 'गॉड ऑफ सी' हे मंदिर मात्र अप्रतिम आहे. १५व्या शतकात ते बांधण्यात आलं होतं. या प्रत्येक मंदिराच्या मागे काही आख्यायिका आहे. येथे गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. पण समुद्राचं, प्रवेशद्वारापाशी आत आलेलं पाणी पवित्र मानलं जातं. आलास कोदाटन येथील 'मंकी फॉरेस्ट टेंपल' घनदाट जंगलात आहे. मंदिराच्या परिसरात माकडांचं वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे. इथे एकूण ८०० माकडं असून, त्यांचे तीन गट आहेत. काही वेळेस त्यांच्या गटा-गटांत भीषण मारामारी होते आणि अनेक माकडे रक्तबंबाळही होतात.
मेंगवीचं रॉयल टेंपल व उलुवाटूचं 'टेंपल ऑफ क्लिफ्स' हीसुद्धा पाहण्यासारखी आहेत. टेंपल ऑफ क्लिफ हे मंदिर समुद्रापासून सुमारे तीनशे-चारशे फूट उंचावर, दोन्ही बाजूंनी पुढे आलेल्या कड्यांवर बांधण्यात आलं आहे. तिथून सूर्यास्त फार सुंदर दिसतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेसच येथे पर्यटकांची गर्दी उसळते. येथील एक विशेष म्हणजे कमालीची आक्रमक वानरसेना. गलेलठ्ठ माकडं गळ्यातील, कानातील अलंकार ओरबाडून काढण्यासाठी अंगावर येतात. त्यादृष्टीने काळजी घ्यावी लागते.
बाली परिसरातील छोटी-छोटी बेटं म्हणजे अक्षरशः स्वर्ग म्हणावा लागेल.
तेथील समुद्राचं पाणी अत्यंत पारदर्शी आहे. निळे, हिरवे रंग त्यात सामावलेले आहेत. त्यामुळे बेटांवर राहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पण काही बेटांवर स्थानिक लोक राहतात. अशा चेनिन्गन् बेटावर आम्ही आवर्जून गेलो. तिथे ७०० हिंदू कुटुंबांची वस्ती आहे. या बेटांवर येताना स्त्री-पुरुष पर्यटकांनी शरीर झाकणारे व्यवस्थित कपडे घालून आलं पाहिजे असं आग्रहाने सांगितलं जातं व सर्वजण त्याचं पालनही करतात. येथील खाडीच्या पाण्यात 'सी वीड' नावाची एक प्रकारची वनस्पती मिळते. ती काढून वाढविण्याचा, सुकवण्याचा व्यवसाय येथील स्थानिक गावकरी करतात. ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. त्याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, औषधं तसंच जपानमध्ये आइस्क्रीम, सलाडमध्ये केला जातो. त्यामुळे त्याची निर्यात जपानला मोठ्या प्रमाणात होते आणि त्याद्वारे हे गावकरी चांगला पैसा कमावतात. या वनस्पतीच्या उत्पादनातून एक जोडपं महिन्याला १७५ अमेरिकन डॉलर्सपर्यंत उत्पन्न मिळवतं. येथील किनाऱ्यांवर या वनस्पती सुकवत ठेवलेल्या दिसतात. स्थानिक स्त्री-पुरुष तिथेच दिवसभर काम करत असतात. संध्याकाळच्या वेळेस पन्नास-साठ मीटर्सवर असलेल्या आपल्या घरांत मुक्कामासाठी जातात. विशेष म्हणजे या सर्व परिसरात गावकऱ्यांना निरनिराळ्या बेटांवर जाण्या-येण्यासाठी 'टॅक्सी बोट'ची सोय आहे. पवनचक्कीच्या साहाय्याने वीज निर्माण केली जाते. या बेटांवर मुलांसाठी शाळाही आहेत.
चेनिनगन्ला लागूनच असलेलं 'लेबोन्गन्' म्हणजे पांढऱ्याशुभ्र वाळूचं बेट. इथे हिरव्या, निळ्या समुद्राचा तळ दिसतो आणि मस्त पोहोण्याचा आनंद लुटता येतो. राहण्यासाठी किनाऱ्यावरच अलिशान 'झोपड्या' बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. अर्थात त्यासाठी रोजचे निदान १५०-२०० अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात. बालीची परंपरा, सौंदर्य, कायम ठेवण्यासाठी कुठेही टोलेजंग इमारती बांधावयाच्या नाहीत असा नियम आहे. या नियमाचं त्यामुळे काटेकोर पालन होतं. त्यामुळे येथील सर्व पंचतारांकित हॉटेल्ससुद्धा जास्तीतजास्त एक ते दोन मजल्यांचीच दिसतात.
संपूर्ण बालीमध्ये टॅक्सीज् सोडल्या तर कुठेही सार्वजनिक बस वाहतूक नाही. सर्वत्र मोटार सायकलींचे साम्राज्य आहे. प्रत्येक घरात निदान एकतरी मोटारसायकल हवीच. सर्व व्यवहार मोटारसायकलीवरून होतात. त्यामुळेच १९८६ पासून प्रशासनाला बस वाहतूक बंद करावी लागली. शेजारपाजाऱ्यांनाही जाता-येता मोटारसायकलवरून लिफ्ट दिली जाते. त्यामुळे स्थानिक लोकांचं बसवाचून विशेष काही अडत नाही. उत्साही पर्यटकांना भाड्याने मोटारसायकली मिळतात. पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर जावं लागत नाही. रस्त्यांवरील छोट्या-छोट्या दुकानांतून बाटल्यांमधून पेट्रोल भरून ठेवलेलं दिसून येतं. तसंच बऱ्याचवेळा संपूर्ण कुटुंबच मोटारसायकलवरून जात-येत आहेत हे येथील नित्याचं दृश्य. गोऱ्या पर्यटकांना त्याचं विशेष कौतुक वाटतं. त्यामुळे ते मुद्दाम थांबवून त्याची छायाचित्रं काढतात. बालीमध्ये गुन्हेगारी अजिबात नाही. इंग्रजी न समजल्यामुळे गैरसमज निर्माण झाले तरच. अर्थात छोटे मनी-चेंजर्स, वस्तू विक्रेते यांच्याकडून काही वेळेस फसवणूक होऊ शकते इतकंच.
इंडोनेशिया हे नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत दुर्दैवी राष्ट्र आहे. त्सुनामी, भूकंप, ज्वालामुखी यांचा विळखाच त्याला पडला आहे. बाली मात्र त्यादृष्टीने बरेचसे सुदैवी म्हणावे लागेल. त्सुनामीच्या धोक्याबाबत काहीच सांगता येत नाही. पण बालीच्या जवळपास तसा मोठा जिवंत ज्वालामुखी नाही. ब्रोमो येथून बराच लांब आहे. जवळ असलेला माऊंट बतूर ज्वालामुखी जिवंत आहे. १९२६ मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. आजही त्यातून धूर येताना दिसतो. पण प्रशासनातर्फे त्याचं सतत निरीक्षण केलं जातं. बालीच्या भटकंतीत रस्त्यांवर ठिकठिकाणी 'हाती-हाती' असे शब्द इंग्रजीत लिहिलेले फलक दिसत होते. त्याचा अर्थ 'हळू जा'. संस्कृतमुळे त्यांचे व आपले अनेक शब्द सारखे आहेत. उदा. टोपी. विमानतळावर, बसवर एक शब्द नेहमी दिसतो. 'परिविसाटा' म्हणजे पर्यटक. 'पिंटू' म्हणजे दरवाजा. बाली बेटावर बाली या स्थानिक व शासकीय व्यवहारात इंडोनेशियन भाषेचा वापर होतो. पण आता पर्यटनामुळे इंग्रजी सर्वत्रच बोललं जाऊ लागलं आहे. बालीतील सर्व तरुण-तरुणींना एका भारतीय कलाकाराने अक्षरशः वेड लावलं आहे. हा कलाकार म्हणजे शाहरूख खान. बालीच्या कानाकोपऱ्यांत भारताचा परिचय म्हणजे शाहरूख खान. त्याचे चित्रपट व विशेषतः नाच इथे कमालीचे लोकप्रिय आहेत. तो व अभिनेत्री काजोल यांचे नाच तरुण मुल-मुली आपणहून करून दाखवतात. 'कुछ कुछ होता है' याचा अर्थ अनेकांनी आम्हाला विचारला. अमिताभ बच्चनचं नावही त्यांच्या बरंच परिचयाचं आहे. बालीच्या सफरीत एका नव्या प्रदेशाचा परिचय तर झालाच शिवाय हिंदू धर्माची तेथील संस्कृती कशी कायम टिकून आहे याचीही प्रचीती आली. पर्यटनप्रेमींनी एकदा तरी बालीची सहल केलीच पाहिजे.
जकार्ता येथील वाहतूककोंडीवर उपाय :
'श्री इन वन' कार आणि 'जॉकी'
इंडोनेशियातील सर्वच शहरात वाह्नांची प्रचंड गर्दी दिसून आली. अगदी मुंबई, पुण्यासारखी. पण आपल्यापेक्षा खूप शिस्तीत तिथली वाहतूक सुरू असते. वाहतुकीच्या या समस्येवर मात करण्यासाठी तिथल्या प्रशासनाने अनेक उपाय योजिले आहेत. त्यातले काही यशस्वी ठरले. पण काहींमुळे आणखी गंभीर समस्या उभ्या राहिल्या. त्या सर्वांची मोठी गंमतीदार माहिती इंडोनेशियाच्या दौऱ्यात मिळाली.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता म्हणजे प्रचंड गजबजलेलं शहर. तिथे वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या नेहमीच दिसून येतात. पुण्याच्या बजाज कंपनीच्या तीन आसनी रिक्षा तिथे कमालीच्या लोकप्रिय आहेत. बजाज या नावानेच त्या ओळखल्या जातात. पण बजाज नावाचा उच्चार स्थानिक लोक काहीसा विचित्र करतात. टाटांनी 'नॅनो' कारसाठी तेथे परवाना मागितला होता. पण जपानी मोटार व्यावसायिकांच्या दबावामुळे तो मिळू शकला नाही. वस्तुतः छोटी 'नॅनो' मोटार हाच तिथल्या वाहतूक समस्येवरचा उपाय असल्याचे आमच्या स्थानिक टूरगाइडचं ठाम मत होतं.
जकार्तात रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने एक योजना जाहीर केली. शहरातील महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांवर सकाळी सात ते साडेनऊ व संध्याकाळी साडेचार ते सात या वेळात प्रत्येक खाजगी मोटारीत ड्रायव्हरसह तीनजण असलेच पाहिजेत. गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर कमीतकमी वाहनं फिरावीत हा त्या मागचा मुख्य उद्देश. 'श्री इन वन कार' या नावाने हा नियम इथे ओळखला जातो. निश्चित केलेल्या रस्त्यांवरून त्या ठरावीक वेळी खाजगी मोटारीत तीनपेक्षा कमी माणसं दिसली तर त्वरित ५० अमेरिकन डॉलर्स (सुमारे चार ते सव्वाचार लाख इंडोनेशियन रुपये) दंड आकारला जातो. पोलीस त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करतात. अर्थात खाजगी मोटारी सोडल्या तर टॅक्सीज्, बसेस् व मोटारसायकली यांना हा नियम लागू नाही.
पण या कायद्यामुळे वाहनांची संख्या कमी होण्याऐवजी नवीनच एक समस्या निर्माण झाली. ठरावीक वेळेत, प्रत्येक दिवशी मोटारीत तीन जण आणायचे कोठून? घरातले, आजूबाजूचे शेजारी, सर्वच जण एकाच ठिकाणी कामासाठी कसे काय जाऊ शकणार? आणि त्यांना दररोज शोधायचं कुठे? त्यामुळे दंडाचा भुर्दंड पडू लागला. जकार्तावासीय मोटारधारक अक्षरशः हैराण झाले. मग त्यावर काहींनी नामी युक्ती शोधून काढली. 'श्री इन वन कार' चे मार्ग जिथून सुरू होतात, त्याच्या अलीकडच्या फूटपाथवर सकाळ-संध्याकाळ शेकडो बेकार माणसं उभी राहू लागली. लिफ्टची खूण करत ते गाडी थांबवतात. मोटारचालक गरजेप्रमाणे माणसं मोटारीत घेतो. पण ही 'लिफ्ट' फुकट नसते. लिफ्ट मागणारे मोटार चालकावरच उपकार करत असल्यामुळे आपल्या मोटारीत बसल्याबद्दल मोटार चालकालाच, या लिफ्ट मागणाऱ्यांना मोबदला द्यावा लागतो. हा मोबदला रोजचा चांगला तीन-चार अमेरिकन डॉलर्सपर्यंत असतो. मोटारचालकाला जिथे जायचं आहे तिथपर्यंत लिफ्ट मागणारे जातात आणि पैसे घेऊन तिथे उतरतात. अशारीतीने मोटार मालकाचा दंडापासून बचाव होतो.
या लिफ्ट मागणाऱ्यांना जकार्तात 'जॉकी' या नावाने ओळखलं जातं. तिथे सकाळ-संध्याकाळ असे शेकडो जॉकी फूटपाथवर उभे असल्याचं चित्र दिसतं. आता तर अनेकांनी शेकडो मोटार चालकांशी महिन्याची अलिखित कंत्राटं केली आहेत. त्यामुळे मोटार मालकाला थोडे कमी पैसे जॉकीला द्यावे लागतात. जॉकीच्या व्यवसायाद्वारे महिन्याचं पोट भरणाऱ्यांची संख्या अक्षरशः हजारोंनी असल्याचं सांगण्यात आलं. 'श्री इन वन कार'मुळे वाहतूक समस्या बिलकूल सुटली नाही. हजारो बेकारांना रोजगार मात्र मिळाला. ते प्रशासनावर खूष नसले तरच नवल!
योग्यकर्ता, जकार्ता वगैरे ठिकाणी चीनप्रमाणे सायकलरिक्षाही फार लोकप्रिय आहेत. चीनमध्ये सायकलस्वार पुढे व प्रवासी मागे अशी रचना असते. पण इंडोनेशियात प्रवासी पुढे व सायकलस्वार मागे असतो. आम्ही प्रवाशांचा सन्मान करतो, त्यामुळे ते पुढे व चालवणारा मागे, अशी त्यामागची भावना असल्याचं एका रिक्षा चालकाने सांगितलं. पण स्थानिक प्रवाशांना मात्र ते मान्य नाही. सायकलरिक्षाने धडक दिली तर प्रथम प्रवाशाचा बळी जातो, मग रिक्षाचालकाचा हे त्यामागचं उद्दिष्ट असल्याचं प्रवाशांनी बोलून दाखवलं.
संपूर्ण इंडोनेशियात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त वाहतूक नियंत्रक आढळून येतात. शहरात, गावात गर्दीच्या वेळी वाहनांची कोंडी होते. तिथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस किंवा सिग्नल ही यंत्रणा नसते. मग त्या रस्त्यावरील, चौकातील काही नागरिक आपणहून पुढे येतात आणि वाहतूक नियंत्रण करू लागतात. आपली या कोंडीतून लवकर सुटका झाली म्हणून वाहनचालक त्यांच्या हातावर थोडे पैसेही
टेकवतात. पण आता हासुद्धा पैसे कमावण्याचा उद्योग झाला आहे. वाहतूक कोंडी होते कधी व आपण नियंत्रणाची सूत्रं हाती घेतो कधी, याची वाट पाहत अनेक जण उभे असतात. पण कोणालाही, हे काम करता येत नाही. त्या चौकात, भागात ज्याचा 'वट' असेल तो किंवा त्याचे साथीदारच हे काम करू शकतात. दुसरा कोणी पुढे आला तर त्याला हुसकावून दिलं जातं... प्रसंगी मारहाणही होते. पैसे कमवून देणारी ही 'समाज सेवा' इंडोनेशियात फार लोकप्रिय झाली आहे. आपल्या कामाचा भार कमी झाल्याने पोलीसही त्यांच्यावर खूष आहेत.
दृष्टीपल्याडचा 'व्हिएतनाम'
व्हि एतनाम म्हटला म्हणजे युद्ध, दारिद्र्य अशीच प्रतिमा निर्माण केली जाते. पण निसर्ग चमत्कारांनी, सौंदर्याने नटलेला व्हिएतनाम पाहण्यासाठीही जगातील पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. भारतीय पर्यटक व्हिएतनामला भेट देतात, तेव्हा त्यांना निवडक स्थळं पाहिली किंवा दाखवली जातात. पण सापा, हॅलाँग, ड्राय हॅलॉग, होई इन् बीच या ठिकाणी अगदी निराळा व्हिएतनाम अनुभवायला मिळतो.
सापा म्हणजे व्हिएतनाममधील सर्वात लोकप्रिय हिलस्टेशन. निसर्ग सौंदर्याबरोबरच या राष्ट्राची संस्कृती तेथे पाहण्यास मिळते. म्हणून हनोईहून (व्हिएतनामची राजधानी) संध्याकाळी रेल्वेने लावोकई इथे जाण्यासाठी निघालो. रेल्वे स्थानक व रेल्वेचे डबे, यांची स्थिती आपल्यासारखीच आहे. प्रथम दर्जाचे डबे व त्यातील सोयी मात्र परदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन, खूपच बऱ्यापैकी केलेल्या आढळल्या. पहाटे सहाच्या सुमारास लावोकई रेल्वे स्थानकावर उतरलो. तेथून मोटारीने ३८ कि.मी. अंतरावरील सापाकडे रवाना झालो. ग्रामीण भाग व डोंगरातील वळणावळणाचा मार्ग असूनही रस्ता उत्तम होता. सापा हे १३०० ते दोन हजार मीटर्स उंचीवरील थंड हवेचं ठिकाण. हनोईत घामाने चिकचिकाट होता, तर येथे मात्र मस्त थंडगार वारं वाहत होतं. व्हिएतनाममध्ये सापा व लॅक्सन येथे हिवाळ्यात तापमान शून्य अंशापर्यंत
उत्तरत. वस्तुतः हा सर्व घनदाट जंगलांचा प्रदेश. पण आता जंगल खूपच कमी झाली असून, त्यातील प्राण्यांची संख्याही चांगलीच रोडावली आहे. वाघ वगैरे तर व्हिएतनाममधून अदृश्यच होण्याच्या मार्गावर आहेत. वाघांना मारून, त्यांच्या हाडांपासून बनवलेली 'बोन जेली' खाल्ली की, हाडं मजबूत होतात, अनेक रोग नाहीसे होतात, अशी येथील मनुष्यप्राण्यांची पक्की समजूत ! त्यामुळे मनुष्यप्राणी जंगलातील प्राण्यांच्या जिवावरच उठला आहे.
सापाची लोकसंख्या ३८ ते ४० हजार. दहा वर्षांपूर्वी इथे केवळ पारंपारिक पद्धतीची घरं होती. पण आता हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. त्यामुळे रोजगारासाठी अन्य प्रांतातूनही लोक येथे येऊ लागले आहेत. आता त्याचं रंगरूपच पालटलं आहे. ग्रामीण भाग मात्र आपलं वैशिष्ट्य कायम टिकवून आहे. सापाला चारही बाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी वेढलं आहे. डोंगरांच्या उताऱ्यावरील पायऱ्या-पायऱ्यांची भातशेती, हे येथील मुख्य वैशिष्ट्य. प्रत्येक पायरी जेमतेम चार-पाच फूट रुंद व लांबच्या लांब पसरलेली. त्यात भाताचं पीक काढलं जातं. मे-जून महिन्यात भाताची रोपं तयार होतात. त्यावेळी डोंगर उतारांवरील या हिरव्यागार पायऱ्या फारच सुंदर दिसतात. उंचावरून हे दृश्य पहायचं तर क्षणात धुक्याचा पडदा सारं चित्र अदृश्य करून टाकतो आणि दुसऱ्याच क्षणी हा पडदा दूर होतो. येथे शेतीसाठी नांगर नाहीत व बैलही नाहीत. म्हशींच्या साहाय्याने शेती केली जाते. म्हशी उंच डोंगरांवर जाऊनही शेतीचं काम करू शकतात. पाठीवरून लाकडं आणण्याचे कामही म्हशी करतात. (आता जंगलंच शिल्लक राहिलेली नाहीत.) हिवाळ्यात मात्र या म्हशींची स्थिती कठीण असते. कारण त्या चरण्यासाठी डोंगरमाथ्यांवर जातात व तिथेच राहतात. त्यांची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे थंडीत त्यांचं मरण्याचं प्रमाण मोठं असतं.
सापाच्या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसतात ते काळा स्कर्ट, कमरेला रंगीबेरंगी पट्टा, डोक्याला स्कार्फ व पाठीवरील झोळीत बाळाला घट्ट बांधून घेतलेल्या 'ब्लॅक हमंग' स्त्रियांचे घोळकेच्या घोळके. हातांनी बनवलेल्या नानाविध वस्तूंची विक्री करण्यासाठी त्या पर्यटकांच्या मागे लागतात. ही हमंग जमात १७-१८व्या शतकात चीनमधून व्हिएतनाममध्ये आली. आज विविध भागात जवळजवळ आठ लाख हमंग राहतात. पण सापामध्ये त्यांची संख्या अधिक आहे. हमंगच्या पाच जमाती आहेत. ब्लॅक, रेड, ब्ल्यू, व्हाईट व फ्लॉवर. या प्रत्येकाचं वैशिष्ट्य व वेगळेपण आहे. फ्लॉवर हमंग जमातीचे स्त्री-पुरुष नानाविध रंगांचे स्कर्ट घालतात म्हणून त्यांना 'फ्लॉवर हमंग' म्हटलं जातं. या हमंग जमातीची माहिती करून घेण्यासाठी सापापासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या कॅटर्केट या गावात मुद्दाम चालत गेलो. गावात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावं लागलं. या तिकीटाचे पैसे गावाच्या, समाजाच्या विकास कार्यासाठी वापरले जातात. ब्लॅक हमंग, डोंगरावर उंचावर राहतात. त्यांच्या झोपडीवजा घराला एकून तीन दरवाजे असतात. मधला मोठा व दोन्ही बाजूंना दोन छोटे. रोजच्या जाण्या-येण्यासाठी दोन्ही छोट्या दारांचा वापर केला जातो. मोठा दरवाजा फक्त लग्नसमारंभ व अंत्ययात्रेच्या वेळेसच उघडण्यात येतो. अन्य वेळी तो दरवाजा बंदच असतो. हमंग जमातीच्या मुलांच्या मोफत शिक्षणाची सोय सरकारने केली आहे. पण या जमातीतलं फारसं कोणी शाळेत जातच नाही. विशेष म्हणजे या अशिक्षित, अडाणी समाजातील मुलं-मुली थोडं इंग्रजी ऐकून इथे येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी गाइड म्हणून काम करतात व चांगले पैसे कमावतात. आमची सापातील टूरगाइड तुर्ह ही ब्लॅक हमंगच होती व बऱ्यापैकी इंग्रजी बोलत होती. बहुसंख्य हमंग मात्र भात व मक्याची शेती करतात. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी त्यांना अन्य व्यवसायही करावा लागतो. हमंग स्त्रिया या अत्यंत मेहनती, कष्टाळू असतात. पुरुष मात्र आळशी. थोडा पैसा आला की, दारू व खाण्यावर तो उधळला जातो.
ब्लॅक हमंग स्त्रिया लग्नाआधी कानामध्ये छोट्या रिंगा घालतात व लग्नानंतर मोठ्या रिंगा घालतात. त्यामुळे त्यांच्यातील फरक लगेच लक्षात येतो. हमंगच्या निरनिराळ्या जमातीत लग्नं होत नाहीत. पण अनेक विवाह सापाच्या 'लव्ह मार्केट' मध्ये जमतात. याची कहाणी मजेशीर आहे. दर रविवारी सकाळी सापाच्या मध्यवर्ती चौकात मोठा बाजार भरतो. फळं, हस्तकलेच्या नानाविध वस्तू घेऊन, आजुबाजूच्या परिसरातील हमंग स्त्री-पुरुष, शनिवारी संध्याकाळपासून इथे येऊ लागतात. त्यांचा मुक्काम बाजारपेठेतच असतो. शनिवारी संध्याकाळी, रात्री हमंग मुलं-मुली, त्यांचे आई-वडील एकमेकांना पाहतात, भेटतात. इथेच अनेकांची लग्नं नक्की होतात. त्यामुळे ही बाजारपेठ 'लव्ह मार्केट' म्हणून ओळखली जाऊ लागली व आता पर्यटकांचं भेट देण्याचं एक स्थळ झालं आहे.
ब्लॅक हमंगमध्ये लग्नाची आणखी एक अजब पद्धत आहे. एखाद्या ब्लॅक हमंग मुलाला त्यांच्या समाजातील मुलगी आवडली तर तिला तो पळवून नेऊन तीन दिवस ठेवू शकतो. तिला तीन दिवसांचा वेळ दिला जातो. त्यात ती लग्नाला हो म्हणाली तर ठीक नाहीतर तिला परत घरी आणून सोडून द्यावे लागते. अर्थात हा प्रयोग तो पुन्हा दोन-तीन महिन्यांनी करू शकतो. मात्र परत तोच नियम लागू होतो. सापाच्या दोन-तीन दिवसांच्या मुक्कामात लाओचाय, तावान आदी आणखी पाच-सहा गावांना भेट दिली व अन्य जमातींच्या चालीरिती, संस्कृती यांची माहिती घेतली. रेड झाव ही अशीच एक आदिवासी जमात. त्यांच्यात मुलीचं लग्न झालं की, तिच्या भुवयांवरचे व कपाळावरचे येणारे केस कापण्यात येतात. यावरून ती स्त्री विवाहित असल्याचं समजतं. फार पूर्वी लग्न झालेली रेड झाव स्त्री स्वयंपाक करत असताना, तिचा केस जेवणात पडला, तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असं समजलं. या सर्व जमातीत एखाद्याचा मृत्यू झाला की, त्या कुटुंबातील कर्त्या तरुण मुलाच्या पोटात भीतीचा गोळा येतो. कारण त्याची आर्थिक स्थिती कशीही असो, त्याला साऱ्या गावाला दोन-तीन दिवस जेवण घालावं लागतं. या प्रथेमुळे तो अक्षरशः कर्जबाजारी होतो. पण आजकाल गावकरीही अशा प्रसंगी त्याला मदत म्हणून कोंबड्या, डुकरं भेट म्हणून देतात.
हनोईपासून १७० कि.मी. अंतरावर असलेलं 'हॅलॉग बे' म्हणजे निसर्ग निर्मितीचा एक आगळा-वेगळा चमत्कार आहे. चायना सी हा प्रशांत महासागराचाच भाग असून त्यातच हॅलाँग बे येतो. १५५३ चौ.कि.मी.च्या त्याच्या क्षेत्रात, निसर्गनिर्मित, नानाविध आकारांचे, डोंगरांचे, खडकांचे सुळके आणि गुहा तयार झाल्या आहेत. इथे एकूण १९६९ लहान-मोठी बेटं असून त्यापैकी काहींवर राहण्याचीही उत्तम सोय आहे. हॅलाँग बेच्या निळ्याशार समुद्रात, अलिशान हाऊसबोटीत आमचा चोवीस तासांचा मुक्काम होता. (इथे चार-पाच तासांची सहलही करता येते. पण एक दिवसाचा मुक्काम अधिक योग्य.) त्यामुळे या चमत्काराचा मनसोक्त आनंद लुटता आला. हॅलाँग बे हे बाराव्या शतकात व्हिएतनाममध्ये प्राचीन आंतरराष्ट्रीय बंदर होतं. हे बंदर दहा ते विसाव्या शतकापर्यंच्या अनेक देदिप्यमान विजयांचं साक्षीदार ठरलं आहे.
गेली पाचशे दशलक्ष वर्ष पृथ्वीच्या पोटातील प्रचंड हालचाली, समुद्राच्या पाण्याचं प्रतिगमन आणि उलथापालथ यातून चुनखडी व खनिजांचे हे डोंगर तयार झाले. शतकानुशतकं त्यांच्यावर पाऊस, पाणी, वारा यांच्या होणाऱ्या माऱ्याने त्यांना नानाविध आकार प्राप्त झाले. त्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच वाढलं. जणू एखादी सुंदर स्त्री, केस सोडून, डोळे मिटून उभी आहे, कोणी संत महात्मा मांडी घालून बसला आहे किंवा दोन अजस्र हत्तींची टक्कर झाली आहे, असं त्या खडकांचं वर्णन केलं जातं. काही खडकांचे फ्लॉवर पॉटस् नजर खिळवून ठेवतात. हे डोंगर कमी-अधिक उंचीचे, लांबीचे आहेत. छोट्या बोटीतून त्यांच्या अगदी जवळ जाऊन त्यांची छायाचित्रं काढता येतात. या सुळक्यांचं प्रतिबिंब स्वच्छ निळ्याशार पाण्यात पडतं. ते पाहण्याची मजा अवर्णनीय आहे. तिथल्या डोंगरांमध्येच प्रचंड मोठ्या गुंफा तयार झाल्या असून त्यातील काही गुंफा आम्ही आतून पाहिल्या. लुअन ग्रोटा, डॅन गो, संग सॉट आदी गुहांची निर्मिती सात लाख वर्षांपासून सुरू झाली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चुनखडीच्या डोंगरांच्या भेगांमध्ये वर्षानुवर्षे पाणी झिरपतं. यामुळे हळूहळू खडकांची झीज होते व त्यातून या अद्भुत गुंफाची निर्मिती झाली आहे. त्यामुळेच युनेस्कोने १९९४ मध्ये 'नॅचरल ब्युटी' व २००० साली 'आर्किऑलॉजिकल साईट' म्हणून या ठिकाणाला मान्यता दिली.
हॅलाँग बेचा हा चमत्कार पाण्यात आहे तर हॅलाँग बेपासून १९० कि.मी. अंतरावरील निंबिन् येथे जमिनीवरील 'ड्राय हॅलाँग' पहायला मिळतात. टॅम कॉक नावाच्या खेड्यातून आमची, अगदी छोट्या होडीतून सफर सुरू झाली. इथे कालव्यातून जाताना, दुतर्फा भाताची हिरवीगार शेतं दिसतात. त्यांना वेढलं आहे, जमिनीवरील चुनखडीच्या पांढऱ्या, काळपट व नानाविध आकारांच्या डोंगरांनी. हेच ते जमिनीवरील हॅलाँग. पाण्यातील हॅलाँग कमालीचे आकर्षक वाटतात, तर जमिनीवरील काहीसे रुक्ष. म्हणूनच त्यांना 'ड्राय हॅलाँग' म्हटलं जातं. अर्थात इथेही कित्येक वर्षांपूर्वी पाणीच होतं, पण शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून बंधारे टाकण्यात आले. ड्राय हॅलाँगचा चमत्कारही पाहण्यासारखा आहे.
डनांग हे व्हिएतनाममधील सर्वात जास्त लोकसंख्येचं चवथ्या क्रमांकाचं शहर. तेथून ३५ कि.मी. अंतरावर होई एन् बीच आहे. १६व्या व १७व्या शतकात होई एन् हे आंतराष्ट्रीय बंदर होतं. अनेक परदेशी बोटी व्यापारानिमित्त येते लागत असत. त्यामुळे जपानी, चिनी, डच व भारतीय व्यापारी इथे दुकानं उघडून दीर्घकाळ मुक्कामासाठी येत असत. या प्राचीन शहराच्या परिसरात अनेक सुंदर बिचेस् आहेतच, पण वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारती, मंदिरं, पॅगोडाज् अगदी जसेच्या तसे जतन करण्यात आले आहेत. त्यामुळेच युनेस्कोने डिसेंबर १९९९ मध्ये जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून या शहराची घोषणा केली. प्राचीन होई एन् गावातील जुन्या वास्तू आतून पहायच्या तर प्रत्येकी पाच अमेरिकन डॉलरचं तिकीट काढावं लागतं. त्या पैशाचा उपयोग वास्तूंचं जतन व्हावं म्हणून करण्यात येतो. असेंब्ली हॉल, जपानी कव्हर्ड ब्रिज, क्वॅन थंग ओल्ड हाऊस ही स्थळं पाहण्यासारखी आहेत. साऱ्या गावाची शंभर वर्षांपूर्वीची रचना कायम ठेवण्यात आली आहे. दोनशे वर्षांपूर्वीचं चायनीज घर, जसंच्या तसं दिसतं. आठ पिढ्या इथे एकत्र नांदतात. इथल्या घराची रचना महोगनी लाकडापासून बनवलेलं बारीक कलाकुसरीचं फर्निचर, स्वयंपाकघर, कोर्टयार्ड आपल्याला अगदी त्या काळाची आठवण करून देतं. जपानी पूल म्हणजे चायनीज, व्हिएतनामी व जपानी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना. होई एन् कारागिरांची मोठी कसोटी इथे दिसून येते. व्हिएतनाममध्ये आणखी बघण्यासारखं खूप आहे. आयुष्यात एकदा तरी व्हिएतनामची सफर केलीच पाहिजे.
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती.
खंड : आशिया
लोकसंख्या : साडेआठ
राजधानी : हनोई
कोटींपेक्षा अधिक
क्षेत्रफळ : सुमारे ३,३१,६९० चौ.कि.मी.
चलन : डाँग
भाषा : व्हिएतनामी व इंग्रजी
कसे जाल ?
व्हिएतनाममधील महत्त्वाच्या शहरांमधील विमानतळांवर व सीमांवर, अमेरिकन डॉलर्स भरून, 'ऑन अरायव्हल' व्हिसा मिळतो. पण ज्या स्थानिक कंपनीतर्फे तुम्ही फिरणार असाल, त्यांचं 'निमंत्रण पत्र' आधी घ्यावं लागतं. तुमचं नाव व पासपोर्ट क्रमांक त्यावर असतो. आम्ही हनोईमार्गे व्हिएतनाममध्ये प्रवेश केला. व्हिसा देण्याची तेथील पद्धत अत्यंत सोपी व जलद वाटली. सिंगापूर एअरलाइन्सने सिंगापूरमार्गे हनोईला जाता येतं. व्हिएतनामची सहल, आपण स्वतः इंटरनेटवरून किंवा ट्रॅव्हल एजंटकडून आपल्याला हवी तशी आखून घेणं श्रेयस्कर. व्हिएतनाममधील विविध शहरात जाण्यासाठी अंतर्गत विमानसेवा आहे. व्हिएतनामची कंट्रीसाईट अत्यंत सीनिक आहे. त्यामुळे मोटारीतूनही फिरावयास हवंच. येथील टूरगाइड व स्थानिक नागरिकांचं इंग्रजी खूप चांगलं नसलं तरी व्यवस्थित समजू शकतं. त्यामुळे कोठेही अडत नाही.
कधी जाल ?
ऑक्टोबर ते जानेवारी हा जाण्यासाठी सर्वोत्तम सीझन. पण या काळात गोऱ्या पर्यटकांची तुफान गर्दी उसळते. त्यामुळे सर्वच किमती कडाडतात. मुंबईसारखा उन्हाळा सहन करावयाची तयारी असेल तर मे-जूनही चांगला.
सुरक्षितता :
तशी काहीही भीती नाही. अर्थात प्रवासात नेहमीच घ्यावयाची दक्षता विसरून चालणार नाही.
व्हिएतनाममधील हिंदू मंदिरांचे अवशेष
व्हि एतनाममध्ये चंपा (चॅम) कालीन हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचं वाचण्यात आलं होतं. तेव्हा व्हिएतनामच्या भटकंतीत ते पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. कंबोडियातील अंगकोर देवळांची माहिती परिचित आहे. पण व्हिएतनाममधील चवथ्या ते तेराव्या शतकातील हिंदू मंदिरं, हा साऱ्या जगातील पुराणवस्तुसंशोधकांचा मोठा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय ठरली आहेत.
डनांग हे व्हिएतनाममधील एक महत्त्वाचं व मोठं शहर. त्याच्यापासून दक्षिणेला ७० कि.मी. व होई एन् गावापासून पश्चिमेला ४५ कि.मी. अंतरावर ही देवळं आहेत. त्यांना 'मी सन्' नावाने ओळखलं जातं. मी सन् (My Son) याचा अर्थ सुंदर डोंगर. ही मंदिरं घनदाट अरण्यात व कॅटस टुथ डोंगरांच्या रम्य परिसरात बांधण्यात आली आहेत. वास्तुशास्त्राचा एक अत्युत्कृष्ट नमुना म्हणून ती ओळखली जातात. त्या काळातील हिंदू धर्माची संस्कृती, कला व स्थानिक चालीरिती, परंपरा यांचा उत्तम समन्वय इथे पहायला मिळतो. त्यामुळेच युनेस्कोने डिसेंबर १९९९ मध्ये मी सन् ची मंदिरे ही जागतिक सांस्कृतिक ठेवा म्हणून जाहीर केली. होई एन् गावापासून टॅक्सी करून आम्ही मी सन् च्या परिसरात आलो. प्रवेशासाठी ६०,००० व्हिएतनामी डोंगचं (सुमारे तीन अमेरिकन डॉलर्स) तिकीट काढावं लागतं. आजही तिथे घनदाट झाडी व डोंगरांचा विळखा पहायला मिळतो. प्रवेशद्वारापाशी पोहचलो तेव्हा दुपारचे अकरा वाजले होते. हवेतील तापमान ३६ अंशापर्यंत गेलं होतं. या भागात आल्यानंतर मात्र झाडीमुळे चांगला गारवा जाणवू लागला. यावरून १२-१३व्या शतकात तिथे किती घनदाट जंगल असेल याची सहज कल्पना आली. सुरुवातीला चंपा साम्राज्याच्या वेळच्या सांस्कृतिक कलेचं दर्शन घडवणारा 'अप्सरा नृत्या'चा कार्यक्रम होता. त्यातील बासरी वादनाने त्या काळातही हे वाद्य किती लोकप्रिय होतं हे समजलं.
तिथून थोडं पुढे चालत गेलं, की मंदिराचे अवशेष दिसू लागतात. चवथ्या ते तेराव्या शतकापर्यंत येथे चंपा (चॅम) कालीन हिंदू राजांची राजवट होती. त्याकाळी नवीन राजा राज्यावर आला की, तो आपल्या सुखसमृद्धीसाठी व राज्याचं संरक्षण व्हावं म्हणून मंदिरं बांधत असे. तीच ही 'मी सन्' मंदिरं. अर्थात या देवालयांच्या पवित्र ठिकाणी फक्त राजे लोकांना व त्यांच्या घराण्यातील नातेवाईकांनाच दर्शनासाठी जाण्याची परवानगी असे. सर्वसामान्य जनतेला मात्र तिथे जाण्यास बंदी होती. १४व्या शतकापासून चंपा साम्राज्याचा अस्त झाला. १४ ते १९व्या शतकाच्या कालावधीत व्हिएतनामी राजांच्या कारकिर्दीत मी सन् चा विसर पडला. त्यानंतर विसाव्या शतकात फ्रेंचांची राजवट आली. त्यांनी घनदाट अरण्यातील, दऱ्याखोऱ्यातील या मंदिरांचा शोध लावला. त्यासाठी जबरदस्त परिश्रम घेतले. त्याला यश येऊन उत्खननात चंपाकालीन सत्तर हिंदू मंदिरं व अन्य वास्तू आढळून आल्या. कालांतराने व्हिएतनाम-अमेरिका युद्धात या भागात अमेरिकेने प्रचंड बॉबवर्षाव केला. त्यामुळे मंदिरांचं नुकसान झालं. अनेक इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. केवळ त्यांचं मूळ बांधकाम मजबूत असल्यामुळेच निदान काही वास्तू तग धरू शकल्या असं सांगण्यात आलं. त्यामुळे सुमारे दोनशे चौरस मीटरच्या या जागेत आज जेमतेम वीस मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात.
चंपाकालीन राज्याचा विकास हा साधारणतः दुसऱ्या ते १४व्या शतकापर्यंतच्या कालावधीत झाला. सुरुवातीला डनांग पासून त्याची सुरुवात झाली. मग दक्षिणेकडे म्हणजे आजच्या नाहतरंग व फान रंगपर्यंत त्याचा विस्तार झाला. चंपाकालीन राजांनी हिंदू धर्माचा व संस्कृत भाषेचा प्रामुख्याने स्वीकार केला. ४थ्या शतकात राजा भद्रवर्मन याने ही मंदिरं बांधायला आरंभ केला. या देवालयात शिवाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. कारण शिव हाच चंपाकालीन राजांचा रक्षणकर्ता होता, असं मानण्यात येतं. या सर्व देवालयांच्या, मनोऱ्यांच्या बांधणीत हिंदू संस्कृतीचा प्रभाव उघडउघड दिसून येतो. असं तज्ज्ञांचे मत आहे. बहुतेक मंदिरं ही सूर्याच्या दिशेने म्हणजे पूर्वाभिमुख बांधण्यात आली आहेत. चंपाकालीन जनतेची अशी भावना होती की, देव हे पूर्वेकडे राहतात. फार थोडी मंदिरं पश्चिमेकडे किंवा पूर्व-पश्चिम अशी दोन्ही बाजूंकडे प्रवेशद्वार असलेली आहेत. याचा अर्थ जेव्हा तो राजा, मरण पावेल तेव्हा त्याला ईश्वराचं स्थान प्राप्त होईल. त्याचा जो वारस राज्यावर बसेल, त्यालाही त्याचे आशीर्वाद प्राप्त होतील.
या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक वगळता ही सर्व देवालयं, विटांमध्ये बांधण्यात आली आहेत. (कंबोडियातील अंगकोर देवळांचं संपूर्ण बांधकाम दगडात आहे.) प्राचीन चंपाकालीन कारागीर हे विटांच्या बांधकामात अतिशय कुशल व वाकबगार मानले जात असत. तेव्हाच्या विटांची निर्मिती, बांधकाम, त्यावरील कलाकुसर पाहून ते जगातील पहिल्या क्रमांकाचे कलाकार मानावे लागतील, असा उल्लेख जगातील विविध देशांतील पुराणवस्तुसंशोधकांनी आवर्जून केला आहे. किंबहुना या देवळांच्या बांधकामासाठी ज्या विटा बनवण्यात आल्या, त्यांची निर्मिती, उभारणी, रचना हाच तज्ज्ञांच्या संशोधनाचा विषय ठरला आहे. याबाबत अनेक देशांच्या जाणकारांनी आपापली मतं मांडली असून आजही त्यावर संशोधन सुरू आहे. जपान, जर्मनी, पोलंड, इटली येथील खास तज्ज्ञ मुद्दाम इथे येऊन या विटांची त्यांच्या बांधकामांची माहिती घेत असतात.
विटांच्या बांधकामातील ही मंदिरं पंधराशे-सोळाशे वर्षे झाली तरी टिकून कशी राहिली? प्रचंड बाँब वर्षावातही त्यांनी टिकाव कसा धरला? याच्या संशोधनातून विद्वानांनी विविध मतं मांडली आहेत. विटांची बांधणी करणाऱ्या कारागिरांनी देवळाच्या विटा खास पद्धतीने बनवलेल्या दिसतात. एकतर विटांसाठीची माती ही अत्यंत बारीक करून घेण्यात आली त्यानंतर भाताची फोलपटं भाजून त्याची जी राख होते, ती या मातीत मिसळण्यात आली. अगदी कमी तापमानात, जास्त वेळ विटा भाजण्यात आल्या असाव्यात. मग एकावर एक वीट ठेवून देवळांचं बांधकाम करण्यात आलं. वास्तू बांधून झाल्यावर त्या विटांवर बारीक नक्षीकाम करण्यात आलं. त्यावेळी कलाकारांची खरी कसोटी होती. हे नक्षीकाम इतकं सुबक व दीर्घकालीन टिकणारं होतं, की आजही ते कायम राहिलं आहे. नक्षीकाम पूर्ण झाल्यावर माहितगारांच्या मते ती संपूर्ण इमारत जळाऊ लाकडांनी भाजण्यात येत असावी. त्यामुळेच हे बांधकाम पाऊस, वाऱ्यापासून टिकाव धरू शकलं. या विटांची रचनाही ज्या पद्धतीने करण्यात येत असे, त्यामुळेही हे बांधकाम अतिशय मजबूत झालं. या विटा एकावर एक ठेवण्यात आल्या आहेत. दोन विटांमध्ये तसूभरही अंतर नाही. ज्या सिमेंटसदृश पदार्थाने त्या चिकटवण्यात आल्या, ते इतकं कडक होतं की, इतकी वर्षे झाली तरी त्या तुटलेल्या नाहीत किंवा त्यांना साधे तडेही गेलेले नाहीत.
ज्या वास्तूंची बाँब हल्ल्यात बरीच पडझड झाली, त्यांची पुनर्बाधणी पुरातत्व खात्यातर्फे ठिकठिकाणी सुरू आहे. जिथे मूळ विटा कोसळल्या आहेत, तिथे नवीन विटांचं बांधकाम करण्यात आलं. पण नव्या व जुन्या विटांमधील फरक क्षणात लक्षात येतो. नव्या विटांवर शेवाळं चढायला सुरुवातही झाली आहे. पण ७व्या शतकातील विटांवर शेवाळ्याचा अंशही दिसून येत नाही. नवीन विटा किती वर्षे टिकतील, याबद्दल तज्ज्ञांना आताच शंका वाटू लागली आहे.
* या इमारतींच्या ठिकाणी त्यांची माहिती दगडांवर लिहिलेली आढळते. त्या काळातील विविध चालीरिती, संस्कृती, कला याबाबतचा बराचसा तपशील त्यामुळे उपलब्ध होतो. उदा. चंपाकालीन स्त्रियांची केशरचना कशी होती, त्या काळात विविध सण कसे साजरे होत असत, पुण्य-कर्म संबंधी काय कल्पना होत्या, याचं वर्णन विस्तृतपणे करण्यात आलं आहे. स्थानिक पुराणवस्तू खात्याने मंदिराच्या जागेची विभागणी दहा मुख्य गटांमध्ये केली आहे. त्यांना ए, बी, सी अशी नावं व क्रमांक दिले आहेत. त्यामुळे हे अवशेष पाहणं खूप सोपं जातं. या परिसरातील पहिली इमारत ४थ्या शतकात उभी राहिली. ६व्या शतकात ती तोडण्यात आली व ७व्या शतकात त्याची पुनर्बाधणी झाली. १० व्या शतकातील वास्तूचा उपयोग हा पुस्तकं ठेवण्यासाठी व राजघराण्यातील समारंभांसाठी होत असे. त्याचं छत हे बोटीच्या आकाराचं आहे. मालायो-पॉलिनेशियन वास्तुशास्त्राचा त्यावरील प्रभाव त्यामुळे स्पष्ट होतो.
फ्रेंचांना उत्खननात सापडलेल्या सत्तर मंदिरांपैकी केवळ एक म्हणजे शेवटचं देवालय हे दगडात बांधण्यात आलं आहे. अर्थात पूर्वी ते विटांचंच होतं. पण १३व्या शतकातील राजाने त्याची पुनर्बाधणी केली. त्याची उंची ३४ मीटर्स होती. पण बाँबवर्षावात ते पूर्णतः जमीनदोस्त झालं. आता तिथे फक्त शिवाची पिंड व काही खांब दिसतात. अमेरिकेच्या बाँबफेकी विमानांनी या भागावर बाँबचा एवढा वर्षाव केला की, अनेक इमारती पूर्णतः कोसळल्या. काहींचं अर्ध बांधकाम तुटलं. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अगदी खालूनही इथे बाँब टाकण्यात आले. त्यामुळे मी सन्च्या अनेक महत्त्वाच्या व मजबूत इमारतीही टिकू शकल्या नाहीत. अमेरिकन सैनिक अक्षरशः बेभान होऊन बाँबचा मारा करत होते. चंपाकालीन कलेचे एक जागतिक पातळीवरील विद्वान व पॅरिसच्या Guimel म्युझियमचे प्रमुख फिलिप स्टर्न यांना हे सारे पाहवलं नाही. त्यांनी त्याचा निषेध करणारे पत्र, थेट, अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना पाठवलं. निक्सन यांनीही त्याची दखल घेतली व त्वरित व्हिएतनाममधील अमेरिकन सैन्याला आदेश पाठविले की, व्हिएतकॉगवरील बाँबहल्ले चालू ठेवा. पण 'मी सन्' इमारतींचं यापुढे कोणतंही नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या. अर्थात त्याआधीच बराच विध्वंस घडला होता.
चंपाकालीन राजे, मंदिरं बांधायचे तेव्हा त्यात फार मोठ्या प्रमाणात सोनं, रलं, जडजवाहिर ठेवायचे. जमिनीच्या खाली पुरून किंवा मूर्तीमध्ये ते ठेवण्यात येत असे. तो राजा मरण पावला की, नंतर स्वर्गातही त्याला आताचं वैभव उपभोगता यावं, अशी कल्पना त्यामागे होती. नैवेद्यासाठी कोंबड्या, बोकड हे सोन्याचे करून ठेवत असत. एवढं वैभव त्या काळी होतं. इतकंच काय, शिवलिंगांना सोन्याचा पत्रा लावलेला असे. हे सर्व जडजवाहिर फ्रेंचांनी नेलं. मूर्तीमधील सोनं कसं फोडून काढण्यात आलं, याच्या खुणा आजही पहायला मिळतात.
चंपाकालीन सापडलेल्या अवशेषांचं एक उत्तम संग्रहालयही डनांग शहरात उभारण्यात आलं आहे. सर्व व्हिएतनाममधील एक महत्त्वाचं, पाहण्यासारखं संग्रहालय म्हणून ते मानण्यात येतं. १९१५ मध्ये ते बांधण्यात आलं. 'मी सन्' मंदिराच्या परिसरात मिळालेल्या निरनिराळ्या आकारांच्या दोन हजार दुर्मीळ मूर्ती व वस्तू इथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळजवळ पाचशे वस्तू आपण पाहू शकतो. बाराशेंचा दुर्मीळ ठेवा मात्र गोदामात आहे. संशोधकांना त्यांचा मोठा उपयोग होतो. १२ ते १५व्या शतकातील मूर्ती सँडस्टोन, टेराकोटा व तांब्याच्या आहेत. या सर्व अत्यंत दुर्मीळ मूर्ती व वस्तू व्हिएतनामी प्रशासनाने खरोखरच उत्तमरीतीने जतन केल्या आहेत.
चंपाकालीन मंदिरांचे अवशेष पाहून आपण अक्षरशः थक्क होतो. केवळ हिंदू मंदिरं म्हणून त्याचं महत्त्व नाही, तर शेकडो वर्षांपूर्वी विटांमध्ये एवढं मजबूत व उत्तम बांधकाम कारागिरांनी कसं केलं असेल याचं आश्चर्य वाटतं. आणि म्हणूनच जगातील तज्ज्ञांचा तो संशोधनाचा विषय ठरला आहे. जगभरातील आंतरराष्ट्रीय पर्यटक व स्थानिक नागरिक यांची मोठी गर्दी हे अवशेष पाहण्यासाठी उसळते. आम्ही गेलो, तेव्हा निदान दीड-दोन हजार पर्यटक तिथे आले होते. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोपमधील शेकडो पर्यटक इथे बराच वेळ घालवून त्या संस्कृतीची माहिती घेताना व त्यांची छायाचित्रं काढताना दिसतात. व्हिएतनामला जाणारे भारतीय पर्यटक ठरावीक स्थळांनाच भेट देतात. पण व्हिएतनामला जरूर जा व 'मी सन्' मंदिरांचे अवशेष नक्की पहा असं आवर्जून सांगावंसं वाटतं.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
कधी जाल?
डनांग हे व्हिएतनाममधील एक महत्त्वाचं शहर आहे. तिथून होई एन् गाव ३५ कि.मी.वर आहे. होई एन्पासून 'मी सन्' ला जाण्यासाठी टॅक्सीचं साधारणतः २५ ते ३० अमेरिकन डॉलर्स भाडं पडतं. होई एन् मधील प्रत्येक हॉटेलमधून 'मी सन्'च्या सहलीही उपलब्ध असतात.
व्हिएतनाममधील 'कुची टनेल्स'
व्हिएतनाम म्हटला म्हणजे, आठवतो, तो अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला, चारीमुंड्या चीत करणारा देश. जबरदस्त मनोनिग्रहाने, शतकानुशतकं विविध राजवटींशी टक्कर देत, आजही तो खंबीरपणे उभा आहे. या देशाबद्दल कमालीची उत्सुकता वाटत होती. म्हणूनच या राष्ट्राची जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी चांगली तीन आठवड्यांची सहल आखून घेतली. व्हिएतनामच्या एकूण ६४ प्रातांपैकी २२ प्रांतांमध्ये विमान, रेल्वे व बोटींच्या प्रवासाखेरीज केवळ मोटारीने दोन हजार कि.मी.ची मनसोक्त भटकंती केली आणि उलगडला तो आगळा-वेगळा व्हिएतनाम.
आमच्या भटकंतीत मुख्य आकर्षण होतं, ते 'कुची टनेल्स'चं. अमेरिकन सैनिकांना कधीही हुडकून न काढता आलेल्या या टनेल्सची रचना कशी असेल? एवढ्या मोठ्या सामर्थ्यवान राष्ट्राचा पराभव करण्याची किमया त्यांनी कशी साधली? त्यामागची गुपितं काय? हे जाणून घेण्यासाठी हुवेहून सव्वा तासाच्या विमान प्रवासाने सायगॉन येथे आलो. दक्षिण व्हिएतनामची पूर्वीची राजधानी व आताच्या संयुक्त व्हिएतनाममधील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर. सायगॉनचं नवीन नाव 'हो ची मिन्ह.' या शहराचं रंगरूप, रुबाब काही निराळाच आहे. स्कायस्क्रॅपर इमारती, भव्य मॉल्स, रस्त्यांवर मोटारसायकलींबरोबर किंमती मोटारीची वर्दळ. इथली श्रीमंती व ग्रामीण
भागातील गरिबी पाहिली की, त्यांच्यातील दरी किती मोठी आहे याची सहज कल्पना येते. रियुनिफिकेशन हॉल, सिटी पोस्ट ऑफिस, सिटी थिएटर, नॉट्रेडॅम कथेड्रल ही इथली प्रेक्षणीय स्थळंही पाहण्यासारखी आहेत.
सायगॉनपासून ५५ कि.मी. अंतरावर असलेलं कुची खेडं व त्याचा संपूर्ण परिसर हा युद्धकाळात, व्हिएतनामी कम्युनिस्टांचा मुख्य गुप्त तळ होता. यालाच व्हिएतकाँग असं म्हटलं जात असे. तिथेच कम्युनिस्ट सैनिकांनी गावकऱ्यांच्या मदतीने 'कुची टनेल्स' बांधले. या बोगद्यांचा शोध अमेरिकन सैनिकांना अखेरपर्यंत लागला नाही. हे बोगदेच त्यांचे कर्दनकाळ ठरले. त्यामुळे सर्वप्रथम ते बोगदे पाहण्यासाठी गेलो.
कुची गावाच्या परिसरात त्याकाळी घनदाट जंगलं होती. सुरुवातीला फ्रेंच राजवटीच्या काळात, लपण्यासाठी म्हणून कुची गावकऱ्यांनी ५० कि.मी. लांबीचे हे बोगदे जमिनीत खोदले होते. १९६१ ते ७५ च्या व्हिएतनाम-अमेरिका युद्धात त्यांची लांबी वाढतवाढत २०० कि.मी.च्याही पुढे गेली. या बोगद्यांचं जाळं म्हणजे, अशिक्षित गावकरी आणि सैनिक यांच्या कल्पनाशक्तीचा व कौशल्याचा अजब नमुना असून, स्थापत्यशास्त्राचं ते एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. हे बोगदे जमिनीखाली तीन पातळ्यांवर (लेव्हल्स) आहेत. पहिला टप्पा तीन मीटर, दुसरा सहा मीटर व तिसरा आठ ते दहा मीटर्सवर म्हणजे जमिनीखाली २५ ते ३० फूट खोल. विशेष म्हणजे हे बोगदे जेमतेम एक फूट लांबीच्या कुऱ्हाडींनी खणण्यात आले. (या कुऱ्हाडीचा नमुना प्रत्यक्ष बोगद्यांच्या ठिकाणी मुद्दाम ठेवण्यात आला आहे.) एवढ्या छोट्या कुऱ्हाडींनी, प्रामुख्याने रात्रीच्या वेळी, केवळ बॅटऱ्यांच्या प्रकाशात इतके खोल व लांबवर पसरलेले बोगदे कसे खणण्यात आले असावेत, याचंच आश्चर्य वाटतं. हे बोगदे दूरवरच्या अनेक गावात, काही घरांत, जंगलात निघत. त्यामुळे कुची परिसरात बोगद्यात लपलेले सैनिक साठ-सत्तर कि.मी. वरील गावातील एखाद्या घरातून बाहेर निघत. या गावाजवळून सायगॉन नदी वाहते. त्या नदीच्या काठाखालूनही बोगद्यांचा मार्ग काढण्यात आला होता. अमेरिकन विमानांचे बाँब हल्ले सुरू झाले की, व्हिएतनामी सैनिक त्या नदीत उडी मारून तिथून बोगद्यात शिरत व बाँबहल्ले थांबले की, बोगद्यांतून नदीत येत व नदीतून बाहेर निघत. त्यामुळे अमेरिकन सैनिकांना ते कुठे गायब होतात याचा पत्ता लागत नसे. हे बोगदे म्हणजे अमेरिकेची सर्वार्थाने डोकेदुखी ठरली होती. सायगॉन परिसरात जिथे जिथे अमेरिकेचे लष्करी तळ होते, तिथल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांपर्यंत कूची टनेल्स खणण्यात आले. व्हिएतनामी सैनिक टनेल्समधून या नाल्यात शिरत आणि तिथून बाँबने ते तळ उद्ध्वस्त करत. अमेरिकन सैनिकांना, तळावर बाँबहल्ला कसा व कुठून झाला, हेच समजत नसे.
दोनशे कि.मी. पेक्षाही लांबवर पसरलेल्या टनेल्समध्ये शिरण्यासाठी जंगलात अनेक ठिकाणी झाकणं होती. विश्वास बसणार नाही, पण ही झाकणं केवळ 'ए-४' कागदाच्या आकाराची होती. अत्यंत सडपातळ, बारीक पण काटक हिएतनामी सैनिक त्यातून सहज आत शिरत असत. जंगलात पालापाचोळ्यात ही झाकणं लपवलेली असत. पण बोगद्यांची प्रवेशद्वारं कुठेकुठे आहेत, याच्या खुणा व्हिएतनामी सैनिकांना बरोबर समजत असत. अमेरिकन सैन्याचा हल्ला सुरू झाला की, बिळात उंदीर शिरावेत तसे व्हिएतनामी सैन्य या भोकात उड्या मारून बोगद्यात गायब होत असत. ते कुठे अदृश्य होतात, याचंच अमेरिकन सैनिकांना कोडं होतं. ए-४ आकाराच्या झाकणातून सैनिक आत कसे शिरत असतील, हा प्रश्न प्रत्येकालाच पडणं शक्य आहे. आता काही टनेल्स पर्यटकांना पाहण्यासाठी शासनाने खुली केली आहेत. तिथे सैनिक झाकणातून आत कसे गायब होत, याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येतं. ते पाहून आपण थक्क होतो. या बोगद्यात बाहेरची हवा यावी म्हणून, जमिनीवर ठिकठिकाणी मुग्यांच्या वारुळासारखे मातीचे छोटे डोंगर बांधले होते. त्यांना साधारणतः सहा-सहा इंचांची भोकं असत. त्यातून बोगद्यात हवा जाण्याची व्यवस्था केली असे. सैनिक, गावकरी आदी सर्वांचा मुक्काम दिवसा बोगद्यात असे. आत जास्त वेळ थांबावं लागलं तर सर्वजण पहिल्या लेव्हललाच असत व रात्रीच्या वेळी बाहेर येऊन सर्व विधी वगैरे उरकण्यात येत. या बोगद्यात अनेक ठिकाणी अगदी सरपटत किंवा पूर्ण ओणवे होऊन चालावं लागे. पर्यटकांना त्याची कल्पना यावी म्हणून बोगद्यातून थोडं अंतर चालण्याची सोय आता करण्यात आली आहे. मी व माझी पत्नी जयंती, दोघेहीजण अगदी ओणवं होऊन, या बोगद्यातून तीन-चार मिनिटं चाललो. पहिल्या लेव्हलवरून, दुसऱ्या लेव्हलला पाच-सहा फुटावरून उडी मारताना आमची तर चांगलीच तारांबळ उडाली. गुदमरल्याने कधी एकदा बाहेर येतो असं होऊन गेलं. त्याकाळी केवळ बॅटऱ्यांच्या उजेडात व्हिएतनामी सैनिक कसे काय चालत असतील, आत तासन्तास कसे राहत असतील याची कल्पनाच
करवत नाही. त्याखेरीज जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी तात्पुरते दवाखाने, खाद्य पदार्थ बनवण्यासाठी स्वयंपाकगृहं यांचीही सोय बोगद्यातच करण्यात आली होती.
आमचा येथील टूर गाइड खर्ह झुबेन हा मोठा अनुभवी होता. त्याने कुची टनेल्सबद्दल प्रसिद्ध न झालेली बरीचशी माहिती आम्हाला दिली. या टनेल्सचा शोध लावण्यासाठी अमेरिकन सैनिक नानाविध क्लृप्त्या लढवत होते. त्यावेळच्या अमेरिकन सैन्यातील एक प्रमुख अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर टनेल्स सर्वांना पाहण्यासाठी खुली झाल्यानंतर मुद्दाम इथे आला. त्यावेळी झुबेन हाच त्याचा गाइड होता. त्या अधिकाऱ्याने झुबेनला सांगितलं की, या बोगद्यांची प्रवेशद्वारं अत्यंत अरुंद असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आमच्यातील फिलिपिन्स, कोरिएन वगैरे बारीक अंगकाठी असलेल्या सैनिकांना बोगद्यांचा शोध लावून त्यात उतरता यावे म्हणून आम्ही काही मॉडेल टनेल्स व त्यांची झाकणं बनवली होती. ती बनवण्याचं मुख्य काम माझ्याकडेच होतं. आता इथे येऊन ही झाकणं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, सरावासाठी आम्ही बनवलेली झाकणं, प्रत्यक्ष या झाकणांपेक्षा खूपच मोठी होती. ए-४ कागदाच्या आकाराची झाकणं व इतके खोल, लांब टनेल्स व्हिएतनामी सैनिकांनी तयार केले असतील याची कल्पनाच युद्धाच्या वेळी आम्हाला आली नाही. आमच्या पराभवाचं खरं कारण आज मला समजलं.'
व्हिएतनामी सैनिकांच्या आणखी एका क्लृप्तीमुळे अमेरिकन सैनिकांच्या जिवावरच बेतलं होतं. कुचीच्या जंगलात व्हिएतनाम्यांनी अनेक ठिकाणी खड्डे खणून सापळे (ट्रॅप्स) तयार केले होते. म्हणजे साधारणतः १५' X १५' फुटाचा खोल खड्डा. त्यावर गवताचं सिसॉसारखं झाकण व ते दिसू नये म्हणून भरपूर पालापाचोळा. अमेरिकन सैनिक, व्हिएतनाम्यांचा शोध घेत जंगलात फिरत असताना अचानक त्या खड्ड्यात कोसळत असत. तिथे खड्डा आहे, याचा अंदाजच त्यांना येत नसे. खड्ड्यात अणकुचीदार सळ्या लावलेल्या असत. विशेष म्हणजे या सळ्यांना कोब्रा सर्पाचं अत्यंत जहरी विष लावून ठेवण्यात येत असे. बेसावध अमेरिकन सैनिक खड्यात पडले की, सिसॉप्रमाणे दरवाजा बंद होई. त्या सळ्या त्यांच्या शरीरात आरपार घुसत आणि विष शरीरात भिनल्यामुळे काही सेकंदात ते शेवटचा श्वास घेत असत. पण ट्रॅप्सच्या सर्व जागा व्हिएतनामी सैनिकांना बरोबर माहीत असत.
त्यामुळे ते मात्र त्या जागांवरून चालणं टाळत. व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेने ७०० दशलक्ष डॉलर्स गुंतवले. तीस लाख व्हिएतनामी सैनिक, नागारिक मारले गेले. तर अमेरिकेचे साठ हजारांवर सैनिक मृत्युमुखी पडले. हे कुची टनेल्स शोधून काढणं हे अमेरिकेचं युद्धातील मुख्य धोरण होतं. कारण त्यांच्या विजयातील तोच सर्वात मोठा अडथळा होता. अतिशय तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असलेले ५०० जर्मन शेपर्ड कुत्रे त्यांनी कुची परिसरात सोडले. टनेल्सची प्रवेशद्वारं व सापळे शोधून काढण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. पण व्हिएतनाम्यांनी त्यातही अमेरिकेवर मात केली. प्रवेशद्वार, सापळे यांच्या आजूबाजूला, व्हिएतनामी सैनिक मिरची, मिरी यांची पावडर मोठ्या प्रमाणात पसरवून ठेवायचे. तो वास कुत्र्यांना अजिबात सहन होत नसे व ते दूर पळून जात. तसंच अमेरिकन सैनिक आपल्या जवळची कुकीज्, चुइंगम इतस्ततः फेकून द्यायचे. व्हिएतनामी ते गोळा करून या प्रवेशद्वारांच्या जवळ ठेवून द्यायचे. तो वास कुत्र्यांच्या परिचयाचा होता. त्यामुळेही ते तेथून परत फिरत. अमेरिकेची प्रत्येक योजना व्हिएतनामी सैनिकांनी गनिमी काव्यानी अयशस्वी ठरवली. अमेरिकेचा पराभव करायचाच या मनोनिग्रहाने ते लढले. त्यामुळे अमेरिकेला माघार तर घ्यावी लागलीच पण जगात त्यांची नाचक्कीही झाली.
अमेरिकेच्या प्रचंड आर्थिक शक्तीपुढे व्हिएतनाम अगदीच मामुली राष्ट्र होतं. युद्धासाठी आधुनिक शस्त्रास्त्रंही त्यांच्या दृष्टीने परवडणारी गोष्ट नव्हती. त्यामुळे अमेरिकेने टाकलेले बाँब निकामी करून त्याच कच्च्या मालापासून आपले बाँब किंवा शस्त्रास्त्रं ते तयार करत व त्याचे कारखाने टनेल्समध्येच असायचे. सैन्यात पुरुषांबरोबर व्हिएतनामी स्त्रियाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या; नव्हे सारा समाजच या युद्धात उतरला होता. प्रत्येक पातळीवर हे युद्ध सुरू होतं. सैनिकांना केवळ सुक्या खाद्यपदार्थांवर कित्येक दिवस राहावं लागे. वैद्यकीय मदत अत्यंत तुटपुंजी असे. औषधोपचार करता येत नाहीत अशा सैनिकांवर जायबंदी झालेला हात तोडा, पाय कापा असे उपाय योजावे लागत. पण त्यांच्या जिद्दीत काही फरक पडला नाही. अमेरिका अत्यंत निघृणपणे हे युद्ध लढली. नागरी वस्त्यांवर विषारी वायूंचा मारा तर व्हायचाच पण कुची जंगलातील प्राण्यांनाही सोडू नका, असे आदेश होते. विषारी वायूमुळे निदान ४० लाख व्हिएतनामी नागरिकांच्यात भयंकर रोग व शारीरिक विकृती निर्माण झाली. आजच्या पिढीवरही त्याचे परिणाम दिसून येतात. सायगॉनमध्ये 'वॉर रेमनन्टस्' म्युझियम उभारण्यात आला आहे. अमेरिकेच्या भयंकर अत्याचाराचं दर्शन घडवणारी शेकडो छायाचित्रं इथे दिसतात. माणूस इतका क्रूर होऊ शकतो, याचेच आश्चर्य वाटतं. अनेक छायाचित्रं अक्षरशः पाहवत नाहीत. अमेरिकन, रशियन, व्हिएतनामी विमानं, रणगाडे, तोफाही इथे पहायला मिळतात.
व्हिएतनामच्या कम्युनिस्ट राजवटीबद्दल अनेक मतभेद आहेत. आता तर राज्यकर्त्याच्या 'इझी चेअर कम्युनिझम'मुळे या राष्ट्रावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. पण व्हिएतनामी जनतेच्या जिद्दीला, चिकाटीला, सहनशीलतेला व कौशल्याला सलाम करून आम्ही व्हिएतनामचा निरोप घेतला.
'
निसर्गरम्य लाओस
ओस हे व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड या देशांइतकं भारतीय ला पर्यटकांमध्ये लोकप्रिय नाही. अमेरिका-व्हिएतनाम युद्धात तर सर्वात जास्त बॉम्ब वर्षाव झालेलं राष्ट्र म्हणून जागतिक इतिहासात त्याची नोंद झाली आहे. पण लाओसचं निसर्गसौंदर्य काही आगळे-वेगळंच आहे. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या व आशिया खंडातील सातव्या क्रमांकाच्या सर्वात लांब मेकाँग नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देशाने, गेल्या पाच-सात वर्षांत पर्यटनात चांगलीच आघाडी घेतली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने २००८ मध्ये जगातील ज्या ५३ स्थळांना भेट द्यावयासच हवी, याची यादी प्रसिद्ध केली त्यात लाओसचा पहिला क्रमांक होता. निसर्गसौंदर्याबरोबर कला, संस्कृती व जुन्या वास्तूंची जपणूकही त्यांनी उत्तम रीतीने केली आहे.
व्हिएतनाम-कंबोडिया-थायलंडच्या भटकंतीत लाओसचाही समावेश करून घेतला. कंबोडियातील सिएमरीप येथून आम्ही स्थानिक लाओ विमानाने पाकसे मार्फत, लाओसची राजधानी व्हिएन्टाईनला जाणार होतो. पाकसे हे अगदी छोटेखानी व निसर्गसौंदर्याने कमालीचं नटलेलं गाव आहे. लाओसचा 'ऑन अरायव्हल' व्हिसा आम्ही इथेच घेतला व तिथल्या एकूण थंड्या कारभाराची पहिली झलक अनुभवली. सिएम रीप-पाकसे या तीस सीटर विमानाच्या प्रवासात मी व जयंती आणि आणखी दोन प्रवासी एवढे चार जणच विमानात
होतो. ते दोघं लाओसचे नागरिक असल्याने त्यांना व्हिसाची जरुरी नव्हती. पाकसेला विमान पंधरा-वीस मिनिटंच थांबणार होते. आणि तेवढ्या वेळात आम्हाला व्हिसाचे सोपस्कार पूर्ण करायचे होते. लाओसमध्ये व्हिसाची फी सर्व राष्ट्रांना निरनिराळी आहे. सर्वात जास्त कॅनडाला, प्रत्येकी ४२ अमेरिकन डॉलर्स, भारताला ४० डॉलर्स तर काहींना ३०-३५ डॉलर्स. वेळ थोडा होता, त्यामुळे पटापट पैसे भरून, आम्ही पासपोर्टवर व्हिसाचे स्टँप चिटकवून घेतले व अरायव्हलचे स्टॅपिंग मारून आम्ही विमानात जाऊन बसू लागलो. इतक्यात मी पासपोर्ट पाहिले. व्हिसात माझे नाव बरोबर लिहिले होते. पण जयंतीच्या व्हिसावर तिचं नाव न लिहिता माझंच नाव लिहिलं होतं. आता आली का पंचाईत ? धावत धावत परत गेलो. पण इमिग्रेशनचे सर्व काऊंटर रिकामे. काम झाल्याने कर्मचारी घरी निघून गेल्याचं सांगण्यात आलं. आता काय करायचं? पुढे कोणी आक्षेप घेतला तर? पण लाओस विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, 'काही अडचण नाही. पैसे भरून स्टँप मारला आहे ना? मग कोणाचं नाव आहे हा काही प्रश्न नाही'. लाओसची पहिली ओळख ही अशी झाली.
इथे लाओ किप हे चलन असून, साधारणतः एक अमेरिकन डॉलर म्हणजे ८००० लाओ किप. पण व्यवहारात अमेरिकन डॉलर्स खुषीने स्वीकारण्यात येतात. व्हिएन्टाईन हे राजधानीचं शहर. मेकाँग नदीच्या किनाऱ्यावरच ते वसलं आहे. १५६३ मध्ये राजा सेत्थाथिरत याने हे राजधानीचं शहर म्हणून निवडलं आणि मेकाँग नदीच्या पाण्यानं अत्यंत सुपीक बनलेल्या या शहरामुळे राष्ट्राची मोठी भरभराट झाली. आताही दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात छोटं राजधानीचं शहर म्हणून ते ओळखलं जातं. या शहराची लोकसंख्या अवघी पाच लाख आहे. स्थानिक लोक या शहराचा उच्चार 'विअँग चॅन' असा करतात. हा फ्रेंच शब्द आहे. चॅन म्हणजे चंद्र. असंख्य देवळं, पॅगोडाज यांनी हे शहर भरलं आहे. गोल्डन स्तूप, बुद्धा पार्क, नाम नुम लेक, १५६५ मध्ये राजाने बांधलेलं हो फा के रॉयल टेंपल ही स्थळं पाहण्यासारखी आहेत.
व्हिएन्टाईनच्या मुक्कामात आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे भारतीय रेस्टॉरंटस्चा. व्हिएतनाम, कंबोडिया, लाओसमध्ये भारतीय पदार्थ दिसणं, मिळणं अशक्यच वाटलं होतं. पण विशेष म्हणजे व्हिएन्टाईनमध्ये मेकाँग नदीच्या किनाऱ्यावर चक्क दोन इंडियन रेस्टॉरंट्स दिसली. चेन्नईमधल्या एका इसमाने बँकॉकहून येऊन ती थाटली आहेत. भारतीय खाद्यपदार्थांना स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतो, असं त्यानं आवर्जून सांगितलं.
आम्हीही ओनियन उत्तप्पा व पंजाबी समोसाची चव जवळजवळ वीस-पंचवीस दिवसांनी चाखली. त्यासाठी चार अमेरिकन डॉलर्स मोजावे लागले. लाओसचं खरं सौंदर्य दिसलं ते, लुआंग प्रबंग व पाकसे या बेटावरून. व्हिएनटाईन आंग प्रबंग हा अवघा चाळीस मिनिटांचा विमान प्रवास. लुआंग प्रबंगचा विमानतळ छोटा पण सुंदर आहे. या शहराला हिरव्यागार डोंगरांचा विळखा पडला असून नामखन् व मेकाँग नद्यांच्या किनाऱ्यांवर ते वसले आहे. लुआंग म्हणजे पवित्र व प्रबंग म्हणजे बुद्धाची प्रतिमा. १३व्या ते १५व्या शतकातील अनेक मंदिरं, पॅगोडाज वास्तू येथे जशीच्या तशी जतन करण्यात आली आहेत. त्यामुळेच युनेस्कोने या शहराला 'वर्ल्ड हेरिटेज'चा दर्जा १९९५ मध्ये दिला. लुआंग प्रबंग शहरात जास्तीत जास्त दोन मजली इमारती बांधण्यासच परवानगी आहे. काहीही बांधकाम करायचं असेल तर, युनेस्कोच्या येथील कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते. जुन्या शहराचं रूप कायम राहावं म्हणून ही खबरदारी घेण्यात येते.
लाओसचा ताबा फ्रेंचांनी १८९३ मध्ये घेतला होता. सर्व हक्क व सार्वभौमत्व मिळावं म्हणून लाओ जनतेने फ्रेंचांच्या विरुद्ध लढा उभारला व अखेर १९५४च्या जिनेव्हा करारान्वये त्यांना स्वातंत्र्य मिळालं. पण लुआंग प्रबंगवरील फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव आजही दिसून येतो. रस्त्यांच्या दुतर्फा फ्रेंच कालीन पांढऱ्याशुभ्र दोन मजली इमारती, त्यात आता थाटण्यात आलेली रेस्टॉरंटस्, स्वच्छ रस्ते, त्यावरून धावणाऱ्या टुकटुक रिक्षा व शिस्तशीर पर्यटकांची गर्दी यामुळे शहराचं सौंदर्य मोठं खुलून दिसतं. इथे ४००-५०० वर्षापूर्वीची ६० बुद्ध मंदिरं होती. आता त्यापैकी ३२ मंदिरं शिल्लक आहेत. अनेक देवळं नैसर्गिकरित्या पडली आहेत तर काही चिन्यांनी १८८७ मध्ये केलेल्या आक्रमणात उद्ध्वस्त केली.
आमच्या भटकंतीत सुरुवातीला 'वॉटर मेलन टेंपल' पाहायला गेलो. याचा घुमट कलिंगडाच्या आकाराचा आहे. म्हणून त्याला 'वॉटर मेलन टेंपल' म्हटलं जातं. १५१२ मध्ये ते बांधण्यात आलं होतं. त्यावेळी ते लाकडात होतं. नंतर त्याची पुनर्बाधणी करून ते सिमेंट काँक्रीटमध्ये बांधण्यात आलं. शहरातील ३२ देवालयांपैकी हे मुख्य देऊळ आहे. त्यामुळे सर्व उत्सवांची सुरुवात इथूनच होते. रॉयल टेंपलची बांधणी १५६० सालची आहे. सर्व प्रमुख समारंभ या मंदिरात होतात. वस्तुतः हे बुद्ध टेंपल आहे. पण रामायणातील अनेक महत्त्वाचे प्रसंग इथे चितारण्यात आले आहेत. लुआंग प्रबंगच्या मुक्कामात तेथील रॉयल पॅलेसला म्हणजे आताच्या नॅशनल म्युझियमला भेट द्यायलाच हवी. पॅलेसची इमारत तर देखणी आहेच. पण लाओ व फ्रेंचकालीन उत्कृष्ट कलाकृतीही इथे पाहायला मिळतात. राजाच्या विविध वस्तू निरनिराळ्या दालनांत जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत. अगदी जुन्या मोटारीसुद्धा. राजा सिसावंग व्हॉग याने १९०४ ते १९०९ या कालावधीत हा राजवाडा बांधला. त्याचा मुलगा सिसावंग वथ्याना व त्याचे कुटुंबीय यांचं या राजवाड्यात अखेरचं वास्तव्य होतं. १९७५ मध्ये तेथील राजेशाही संपुष्टात आली व १९७६ मध्ये हा राजवाडा नॅशनल म्युझियम म्हणून सरकारने जनतेसाठी, पर्यटकांकरता खुला केला. योगायोग असा की, लुआंग प्रबंगमधील आमचा मुक्काम 'शांती व्हिला' या हॉटेलमध्ये होता. सिसावंग वथ्याना राजाच्या मुलीचा हा त्याकाळी राजवाडा होता. आता तिनेच त्याचं रूपांतर अलिशान हॉटेलमध्ये केलं आहे. पण त्याकाळचं वैभव दाखवणारं फर्निचर, झुंबरं आजही कायम ठेवली आहेत.
लुआंग प्रबंगचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी १५० मीटर्स उंचीवर असलेल्या पाऊ सी मंदिराला भेट देण्याचे आम्ही ठरवलं. तेथे वरती चढून जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. नॅशनल म्युझियमच्या समोरच्या प्रवेशद्वारातून गेलात तर ३२८ पायऱ्या चढाव्या लागतात व खन् नदीच्या बाजूकडून ४१० पायऱ्या. आम्ही ३२८ पायऱ्या चढण्याचं ठरवलं. बहुतांशी पायऱ्यांची रचना अगदी व्यवस्थित आहे. मध्ये-मध्ये थांबत चढल्याने अजिबात त्रास होत नाही व चांगली स्ट्रेस टेस्ट होते. देवळाच्या जागी आल्यानंतर, डोंगरांच्या कुशीत वसलेलं लुआंग प्रबंग पाहून आपला सारा थकवा क्षणात दूर होतो. मस्त वारा खात, इथून हलूच नये असे वाटतं.
लुआंग प्रबंगहून सुमारे ४० कि.मी. अंतरावर असलेल्या पाको केव्हज् पाहण्यासाठी आम्ही मेकाँग नदीतून खास बोटीमधून जाणार होतो. लांबलचक बोट हे येथील वैशिष्ट्य मानलं जातं. तिथे मोटारीनेही जाता येतं. पण मेकाँगच्या किनाऱ्यावरील सृष्टीसौंदर्य पाहता यावं म्हणून मुद्दाम बोटीतून ही सहल आयोजिण्यात आली होती. सुरुवातीला तिचं पात्र फार रुंद नव्हतं. पण खडकाळ होतं. काही खडकांना वळसा घालीत, तर काहींवरून उड्या घेत, मेकाँग वाहत होती. पाणीही चांगलं पाच-सहा मीटर खोल. जून-जुलै महिन्यात पावसाचं पाणी आणखी वाढतं. या मार्गावर मेकाँग नदीच्या किनाऱ्यालगत १३-१४ खेडी आहेत. प्रत्येक गावचं दृश्य जवळजवळ सारखंच पण खिळवून ठेवणारं. घनदाट झाडी व त्यात लपलेली छोटी छोटी घरं. दहा वर्षांपूर्वी गावकरी ही झाडं तोडत असत. पण आता पर्यावरणाचं व पर्यटनाचं महत्त्व त्यांच्या लक्षात
आलं असून वृक्षतोड बरीच कमी झाली आहे. साऱ्या परिसराला हिरव्यागार डोंगराचा विळखाच आहे. त्यामुळे दृश्य जणू एखाद्या सुंदर चित्रासारखं वाटतं. होडीमधून गावात जायचं असेल तर किनाऱ्यावर मातीच्या पायऱ्या आहेत. ठिकठिकाणी गावकरी छोट्या पडावांतून मासेमारी करत होते. काही ठिकाणचा किनारा, चुनखडीच्या दगडांमुळे पांढरा शुभ्र दिसून उन्हात मस्त चकाकत होता. बहुतेक स्थानिक लोक लुआंग प्रबंग या मोठ्या शहराला जाण्यासाठी मेकाँग नदीचाच मार्ग पत्करतात. त्यामुळे मधूनमधून टॅक्सीबोटीची वाहतूक सुरू असते. एका टॅक्सीतून तर पाच-सहा म्हशींना उपचारांसाठी नेण्यात येत होतं.
लाओसी महिला कमालीच्या कष्टाळू. किनाऱ्यालगतच्या सुपीक प्रदेशात त्या सतत काही उत्पादन काढत असतात. पण त्याखेरीज अन्य व्यवसायही करतात. सुरुवातीला आम्ही किनाऱ्यालगतच्या हॅग साय गावात गेलो. इथे पूर्वी दारू बनवण्यासाठी लागणारे रांजण मोठ्या प्रमाणात तयार होत. त्यामुळे जार बनवणारं गाव म्हणूनच ते ओळखलं जायचं. आता राईस वाईन, राईस व्हिस्की बनवणाऱ्या घरगुती डिस्टीलरीज इथे आहेत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन हस्तकलेचे स्टॉल्सही गावात उभारण्यात आलेत.
जवळजवळ दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही पाको केव्हज्ला पोहोचलो. इथे ऊ नदीही मेकाँगला मिळते. त्यामुळे तिचं पात्र सागराप्रमाणे विस्तीर्ण झालं आहे. पाको केव्हज् म्हणजे स्थानिक लोकांचे मोठे श्रद्धास्थान. साठ-सत्तर पायऱ्या चढून वर गेले की, गुहेत दिसतात बुद्धाच्या असंख्य लहान-मोठ्या मूर्ती. आपलं भलं व्हावं यासाठी पवित्र दिवशी बुद्धाची मूर्ती येथे ठेवायची अशी प्रथा आहे. एप्रिलच्या मध्यास पाकोला प्रचंड मोठी जत्रा भरते. निदान २०-२५ हजार भाविक तिथे हजेरी लावतात.
पाकसे इथेही मेकाँग नदीचं फार मनोहर रूप पाहता आलं. इथे या नदीवर प्रचंड मोठेमोठे धबधबे आहेत. खोन फार पेंग हा धबधबा तर ३० मीटर्स उंच व खूप रुंद आहे. या सर्व धबधब्यांमुळेच फ्रेंच सैन्य कंबोडियातून, मेकाँग नदी पार करून लाओस गाठू शकलं नाही. या परिसरात जवळजवळ चार हजार लहान-मोठी बेटं आहेत. त्यावर राहण्याची मजा काही औरच.
ज्या देशात जाऊ, तेथील खाद्य संस्कृतीची चांगली माहिती करून घ्यायची हाही आमच्या भटकंतीचा एक उद्देश असतो. लाओसचं मुख्य आकर्षण मानलं जाणाऱ्या 'खो लॅम' या बांबूत बनविण्यात येणाऱ्या चिकट भाताची ऑर्डर पहिल्याच जेवणात दिली व त्याची कृतीही समजावून घेतली. चिकट भात हे
लाओ लोकांचं शतकानुशतकांपासून चालत आलेलं मुख्य जेवण. हा चिकट भात बनवण्याच्या नानाविध पद्धती आहेत. नुसत्या वाफेवरतीही तो बनतो. पण तो बांबूच्या पाईपमध्ये तयार करण्याची कृती निराळीच म्हणावी लागेल. प्रथम तांदळात मक्याच्या कणसाचे दाणे, बटाटा स्मॅश करून मिसळायचा. त्यात नारळाचं दूध घालायचं. मग साधारणतः एक वर्षाचा जुना कोवळा बांबू घ्यायचा. तो वरून फोडायचा. त्यात तो तांदूळ व सर्व मिश्रण घालून व केळीच्या पानांनी बांबूचं झाकण बंद करायचं. काही तास तो बांबू तसाच ठेवायचा. मग मंद विस्तवाखाली बांबू चांगला भाजायचा. भाजून झाला की, बांबूचा कठीण भाग सोलून काढायचा. आत बांबूचा जो पांढरा पापुद्रा असतो, तो खाण्यास योग्य असतो. त्याच्यासह तो गरमागरम भात खायचा. यालाच म्हणतात 'खो लॅम.' तो अत्यंत ताजा व स्वच्छ असतो. त्याला एक निराळीच 'चव असते. आम्ही मस्त भाजलेल्या चिकनबरोबर 'खो लॅम'वर हात मारला. आजही त्याची चव आठवली, की तोंडाला पाणी सुटतं. याच पद्धतीने बांबूमध्ये फिशही बनवण्यात येतं.
लाओसचा आणखी एक खास पदार्थ म्हणजे 'काई पेन'. म्हणजे आपल्याकडची कुरकुरीत पातळ भजी. काई ही एक वनस्पती असून नद्यांच्या मध्यभागी दगडांखाली ती वाढते. तिथून काढल्यानंतर ती काळजीपूर्वक निरनिराळी करून सुकवण्यात येते. मग त्यात चिंचेचं पाणी मिसळून, सपाट पानावर घालून, त्याचा पातळ हिरवा पापुद्रा तयार होईपर्यंत कुटण्यात येते. त्यात टोमॅटोचं आंबट सॉस, तीळ, मीठ घालून त्याचे बारीक-बारीक काप तळले की, खुसखुशीत काई पेन तयार ! जणू आपल्याकडची बारीक पापुद्र्याची भजी. आम्ही लाओ बिअरबरोबर 'स्टार्टर' म्हणून ती खाल्ली. ती एवढी चविष्ट होती की, ते खाऊनच आमचं अर्ध जेवण झालं. एक जेवण लाओ कुटुंबात ठेवण्यात आलं होतं. मस्त सजवलेलं घर. जेवणासाठी छोटे टेबल व बसण्यास लाकडाची बैठक. त्यावर मांडी घालून बसायचं. चिकन, फिश, भात असा मस्त बेत. लाओसी आदरातिथ्य तर विचारायलाच नको. वजनाचा विचार न करताच जेवावं लागतं.
लाओसची आर्थिक स्थिती व्हिएतनाम, कंबोडियापेक्षा थोडी बरी आहे. त्यांचं सारं जीवन अवघ्या दोन-तीन तासांच्या अंतरावर असलेल्या बँकॉकवर अवलंबून आहे. शेतांच्या मालकीच्या बाबतीत लाओसने व्हिएतनाम, कंबोडियाच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकलं आहे. इथेही पूर्वी शेतीची मालकी सरकारकडेच होती. पण १९८५ मध्ये तेथील कम्युनिस्ट सरकारने थोडं खुलं धोरण जाहीर केलं. शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा दिला. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग कमालीचा खूष व समाधानी वाटला.
लुआंग प्रबंगमध्ये खरेदीसाठी फार मोठी सोय उपलब्ध आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावर रोज संध्याकाळी साडेचार ते साडेदहा पर्यंत 'नाईट मार्केट' भरतं. त्या रस्त्यावरील वाहनांची वाहतूक यावेळी बंद केली जाते. शेकडो स्टॉल्स उभारण्यात येतात. अशी एकही गोष्ट नाही, की जी इथे मिळत नाही. लुआंग प्रबंगला दिवसभर भटका व रात्री आरामात नाईट मार्केटमध्ये चक्कर मारा. आमचा दिनक्रम असाच होता. लाओसला जरुर जा व निसर्गसौंदर्याची, पर्यटनाची भरपूर मजा लुटा असं आग्रहानं सांगावंसं वाटतं.
माहूत बनण्याचं प्रशिक्षण
लुआंग प्रबंगच्या मुक्कामात आम्ही एक वेगळाच कोर्स केला. तो होता हत्तीचा माहूत बनण्याचं प्रशिक्षण. दोन दिवसांचं हे प्रशिक्षण 'ऑल लावो एलिफंट कॅप'मध्ये घेतलं. सर्वप्रथम माहुताचा वेष परिधान करावा लागतो. मग हत्तींना तोंडी तसेच प्रत्यक्ष कृतींनी सूचना कशा द्यायच्या हे शिकवले जातं. त्यानंतरची पायरी म्हणजे हत्तीवर अंबारी कशी चढवायची, हत्तीच्या पाठीवर व मानेवर माहुताने बसायचं कसं आणि हत्तीला विविध सूचना देऊन नियंत्रणात ठेवायचं कसं याची. विशेषतः जंगलात अन्य जनावरं आजूबाजूला असताना, हत्तीवर ताबा ठेवावा लागतो हा मोठा चित्तथरारक अनुभव असतो. अर्थात त्यावेळी शेजारी मुख्य माहूत होता म्हणून बरं... पण लाओसला गेलात तर हे प्रशिक्षण जरूर घ्या...
* या सफरीविषयीची उपयुक्त माहिती पुढील पानावर.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
खंड : आशिया
लोकसंख्या : सुमारे ५५ लाख
राजधानी : व्हिएन्टाईन
चलन : किप
क्षेत्रफळ : २,३६,८०० चौ.कि.मी.
भाषा : लाओ व इंग्रजी
कसे जाल ?
लाओसमध्ये महत्त्वाच्या शहरांतील विमानतळांवर व सीमांवर 'ऑन अरायव्हल' व्हिसा मिळतो. पण सारा थंड कारभार आहे. तिथे पासपोर्टच्या रिकाम्या पानावर व्हिसाचा शिक्का मारून, त्यावर हाताने नाव लिहिण्यात येतं. भारतीय पर्यटक लाओसमध्ये फारसे जात नाहीत. इंटरनेटवरून किंवा एजंटमार्फत सहल आखून घ्यावी लागते. बँकॉकहून व्हिएन्टाईन किंवा लुआंग प्रबंग ही शहरं अवघी दोन-तीन तासांच्या अंतरांवर आहेत. लाओस आणि व्हिएतनामला थाय एअरवेजने किंवा बोटीने जाता येतं.
कधी जाल?
येथील हवामान वर्षभर गरम, आर्द्र असतं. सरासरी तापमान २८ ते ३८० सें. पर्यंत असतं. मे ते सप्टेंबर पाऊस असतो. पण तो पर्यटनात अडथळा आणत नाही.
सुरक्षितता :
पूर्ण सुरक्षित
मेकाँग' नदीतील पर्यटन
मे काँग ही जगातील बारावी व आशिया खंडातील सातव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी. तिबेटमधून ती निघते आणि चीन, लाओस, कंबोडिया, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम या सहा राष्ट्रांमधून ४,३०० कि.मी.चा प्रवास करून अखेर व्हिएतनाममध्ये चायना सीला मिळते. या सहाही देशांच्या दृष्टीने तिला महत्त्वाचं स्थान आहे आणि ती अक्षरशः अन्नदात्री म्हणूनच मानण्यात येते. सहापैकी तीन देशात या नदीमधून ५०० कि.मी. पेक्षा अधिक भटकंती, त्यावरील कैरंग येथील जगातील एका मोठ्या फ्लोटिंग मार्केटला भेट आणि विशेष म्हणजे व्हिएतनाम-कंबोडियाची सीमा या नदीतून ओलांडण्याचा योग नुकताच आला. पर्यटनाचा हा मोठा आगळा-वेगळा अनुभव म्हणावा लागेल.
भारतीय पर्यटक परदेशात, लांबचा प्रवास बहुतांशी विमानाने, आगगाडीने किंवा बसने करतो, पण व्हिएतनाम, कंबोडिया व लाओसला जात आहात तर जास्तीतजास्त प्रवास मेकाँग नदीतून करा असं काही ब्रिटीश पर्यटक मित्रांनी सुचवलं. त्यामुळे या तीन राष्ट्रांची सुमारे महिनाभराची सफर करताना तेच उद्दिष्ट समोर ठेवून सहलीची आखणी, जयंतीने करून घेतली.
मेकाँगचे नाव मोठे समर्पक म्हणावे लागेल. मे म्हणजे मदर (आई) व काँग हे नदीचं खरं नाव. या सहाही राष्ट्रांसाठी ती मातेच्या मनासारखी विशाल व दयाळू आहे. तिचं पाणी पिण्यासाठी तर उपयोगी पडतंच, पण तिच्या काठचा प्रदेश सुपीक बनल्याने तिथे भरपूर पीक घेता येतं. लाखो एकरात फळा-फुलांच्या बागा बहरतात. मासेमारीमुळे श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सर्वांचंच पोट भरतं. धंदे-जोडधंदे, हजारोंना रोजगार व निवारा देतात. आता या नदीत अलिशान हाऊसबोटीत राहणं, शेकडो कि.मी.ची सफर करणं, एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश करणं हे गोऱ्या पर्यटकांमध्ये कमालीचे लोकप्रिय होत आहे. त्यामुळे मेकाँग नदीतील वर्दळही बरीच वाढली आहे.
ही नदी आपल्या एकूण मार्गक्रमणेत सुमारे २५० कि.मी. व्हिएतनाममधून, कंबोडियातून ५०० कि.मी. व लाओसमध्ये १२५० कि.मी. चं अंतर कापते. ठिकठिकाणी तिची विविध रूपं अनुभवता आली. कुठे तिचा आकार सागरासारखा विशाल होता. व्हिएतनामच्या मेकाँग डेल्टा-त्रिभुज प्रदेशात असंख्य कालव्यांमुळे, प्रचंड मोठं शहर व त्यातील जोड रस्त्यांचं जाळं असं चित्र भासत होतं. लाओसमध्ये ती विशाल खडकांवरून उड्या मारत वाहत होती. विशेष म्हणजे व्हिएतनाम-कंबोडियाची सीमा ओलांडतानाच्या चार-साडेचार तासांच्या प्रवासात, निरनिराळ्या राजवटी तिच्या काठांवर कशा टिकून राहिल्या, त्यांचे परिणाम काय झाले याचाही अनुभव घेता आला.
व्हिएतनाममधील सायगॉन शहरातून आम्ही मोटारीने निघालो व दीड-दोन तासात 'काय बी' या छोट्या बंदरावर आलो. मेकाँग त्रिभुज प्रदेशातील बोटीचा पहिला प्रवास इथून सुरू होणार होता. काय बी हे तिएन जियांग प्रांताची राजधानी माय थो च्या जवळ आहे. त्या भागाची लोकसंख्या जवळजवळ दीड लाखाच्या घरात असून ती मेकाँग डेल्टाच्या दुतर्फा विखुरली आहे. डेल्टा म्हणजे नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश. त्याच्या एका बाजूला मायथो, दुसऱ्या बाजूला साऊथ चायना समुद्र व तिसरीकडे कंबोडिया आहे. या डेल्टा प्रदेशात अनेक लहान-मोठ्या कालव्यांमुळे फार मनोहर दृश्य निर्माण झालं आहे. सारी लोकवस्ती या कालव्यांच्या आजूबाजूला तर काही गरीब कुटुंबांचं कायमचं वास्तव्य कालव्यातील छोट्या पडावात. आमचा प्रवास एका छोट्या अलिशान बोटीतून कालव्या कालव्यांमधून सुरू झाला. मेकाँग नदीचा त्रिभुज प्रदेश १३ प्रांतात व ४०,००० कि.मी.च्या परिसरात पसरला आहे. ही नदी व तिचे असंख्य कालवे म्हणजे इथल्या लोकांचं सर्वस्व. प्रत्येक व्यवहार या कालव्यांशी संबंधित. नदीचं मोठं पात्र सोडून आता आमची बोट कालव्या-कालव्यातून जाऊ लागली. कालव्यांच्या दुतर्फा नारळ, मॅग्रोव्हची घनदाट झाडी व लहान-मोठी असंख्य फ्लोटिंग मार्केटस्, किनाऱ्यांवर विविध व्यवसाय चालतात व त्या मालाची विक्री या बोटींच्या बाजारपेठेत करण्यात येते.
सुरुवातीला काही वस्तूंचं उत्पादन स्थानिक नागरिक कसं काढतात हे पहायचं ठरवलं. किनाऱ्यावरील छोट्या फलाटावर बोट थांबली आणि उडी मारून आम्ही बंधाऱ्यावर आलो. एका मोठ्या शेडमध्ये अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने तांदळापासून करमुरे बनवण्यात येत होते. मला आपल्याकडच्या पूर्वीच्या कुरमुऱ्यांच्या भट्टीची आठवण झाली. इथे विशेष म्हणजे जळणासाठी भाताच्या तुसाचा वापर करण्यात येत होता. आमच्या समोरच बनवण्यात आलेलं गरमागरम पॉपकॉर्न, चिक्की आकर्षक वेष्टनात बांधून लगेच शेजारच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यात आली. बोटीतून फिरत असलेले परदेशी पर्यटक, स्थानिक नागरिक त्यांची खरेदी करत होते.
मेकाँग नदीच्या काठावर सुपीक जमिनीत मुख्य पीक काढण्यात येतं ते म्हणजे भाताचं. त्यामुळे त्यापासून बनवण्यात येणारी राईस वाईन, दक्षिण-पूर्व आशियात सर्वच राष्ट्रांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. तसेच मेकाँग डेल्टात आंबा, फणस, रांबुतन, पॉमेलो आदी ट्रॉपिकल फळांची रेलचेल असते. त्यापासून फ्रूटवाईन बनते. त्या बनवण्याच्या अनेक घरगुती डिस्टीलरीज किनाऱ्या-किनाऱ्यांवर दिसून येतात. त्यापैकी एका वाईन डिस्टीलरीला भेट दिली व राईस वाईन बनवण्याचं प्रात्यक्षिक पाहिलं. प्रथम तांदूळ पाण्यात काही तास भिजवतात व नंतर शिजवतात. मग शिजवलेला तांदूळ ठरावीक जारमध्ये आठ-नऊ दिवस ठेवण्यात येतो. त्यात यीस्ट टाकल्याने तो चांगला फरमेंट होतो. मग गाळून त्याची राईस वाईन तयार होते. चवीलाही ती चांगली असते. पण मला फ्रूट वाईन अधिक आवडली. निरनिराळ्या व्हरायटीज्ची चव चाखत आमचा नाल्या-नाल्यांमधून प्रवास सुरूच होता. याच वेळेस नाल्यांच्या पाण्यातून छोट्या-छोट्या बोटीतून स्थानिक नागरिकांचीही जा-ये सुरू होती. काही होड्या तर महिला वल्हवत होत्या. कोणी भाजीपाला घेऊन जात होतं, तर मुलांना शाळेत पोचवण्यात येत होतं. मधूनच बांधकामाच्या साहित्याची ने-आण थोड्या मोठ्या बोटीतून चालू होती. पर्यटकांनी नारळपाणी, शीतपेयं किंवा हस्तकला वस्तूंची खरेदी करावी म्हणून विशेषतः महिला विक्रेत्या वल्ही मारत घिरट्या घालत होत्या. त्यांच्याकडे केळ्यांचे गोड वेफर्स, नारळाचे काप व अन्य वस्तु होत्या. त्यांना आमच्यासारखे भरपूर गिऱ्हाईकही मिळत होते.
वाटेत अनेक सुंदर बेटं लागली. त्यातील ड्रॅगॉन, यूनिकॉर्न, टर्टल बेटांवर पर्यटकांसाठी राहण्याचीही सोय आहे. ती झोपडीवजा रिसॉर्टस् जवळजवळ मेकाँग नदीतच आहेत. त्यामुळे नदीतील वाहतुकीचं दृश्य तिथून मोठे 'मजेशीर दिसतं. त्यापैकी टर्टल बेटावर बोटीतच आमची दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणाचा मेनू अर्थातच खास व्हिएतनामी होता. १) बनाना फ्लॉवर सलाड : या सलाडमध्ये मस्त व भरपूर शेंगदाण्याचं कूट असतं. त्यामुळे अगदी आपल्याकडच्या काकडीच्या कोशिंबिरीची चव वाटते. २) डीप फ्राईड स्प्रिंग रोल : यावर फिश सॉस टाकावं लागतं. फिश सॉस म्हणजे माशाला मीठ लावून बरेच महिने सुकवतात. त्यातून जो ज्यूस बाहेर पडतो त्यापासून हा सॉस तयार केला जातो. तो थोडा आंबट, थोडा तिखट असा असतो. त्यामुळे स्प्रिंग रोलला एकदम चव येते. ३) स्टर फ्राईड चिकन विथ लेमन ग्रास : गवती चहाच्या वासाने चिकन लाजवाब न लागले तरच नवल. ४) स्नेक हेड फिश अँड पेपर: या माशाचं डोकं हे सापासारखं असतं. काही तासांपूर्वीच मेकाँग नदीतून तो काढण्यात आला होता त्यामुळे त्याचा ताजेपणा अगदी जाणवत होता. ५) सोबत भात पण हा भात थोडा चिकट असतो. त्यावर सॉस टाकून आपण तो आपल्या सारखा बनवू शकतो. शेवटी मेकाँग डेल्टामधीलच ताजी फळं. या जेवणानंतर चांगल्यापैकी डुलकीच येणार होती. पण थोड्याच वेळात आम्ही व्हिन लॉगच्या किनाऱ्यावर पोचलो.
व्हिन लॉग ते कॅन थो हा तास-दीड तासांचा प्रवास मोटारीने करताना कॅन थोला जोडणाऱ्या एका नव्या पुलावरून जावं लागतं. दोन-तीन वर्षांपूर्वीच तो बांधण्यात आला. जपान सरकारच्या एका कंपनीकडे त्याच्या बांधकामाचं कंत्राट होतं. बांधकाम सुरू झालं आणि वर्ष-दीड वर्षात त्याचा एक भाग कोसळून, त्यात ३० व्हिएतनामी मजूर ठार झाले. जपान सरकारने त्वरित काम थांबवून चौकशीचे आदेश दिले. जपानचे पंतप्रधान स्वतः घटनास्थळी आले. मृतांच्या नातेवाईकांची त्यांनी माफी मागितली. त्यांना भरपूर नुकसानभरपाई दिली, पण मुख्य म्हणजे हा अपघात मालाच्या भ्रष्टाचारातून, भेसळीतून झाला का याची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत सुरू केली. त्यात निष्कर्ष निघाला की भ्रष्टाचारामुळे हे बांधकाम पडलं नसून खाडीच्या पाण्यातील दोषामुळे हा अपघात घडला होता.
कॅन थो म्हणजे मेकाँग डेल्टाच्या किनाऱ्यावरील सर्वात मोठं शहर. हा डेल्टा प्रांत पूर्वी कंबोडियात होता. १८व्या शतकात तो व्हिएतनामने पादाक्रांत केला. इथे आमचा चोवीस तासांचा मुक्काम, मेकाँग नदीतच अलिशान हाऊस बोटीत होता. त्याचं नाव होतं, मेकाँग रिव्हर लॉज. मेकाँग नदीवरील सर्वात मोठ्या व जगातील प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या कैरंग फ्लोटिंग मार्केटला भेट हा आमचा इथला मुख्य कार्यक्रम होता. पण आणखी एक आकर्षण होतं, ते म्हणजे खास व्हिएतनामी पदार्थ कसे बनवायचे याचा बोटीतील कुकिंग क्लास. जयंती तर त्यासाठी कमालीची उत्सुक होतीच, पण मीही तिच्याबरोबर हजेरी सावली. भात, नूडल्स व सूप हे व्हिएतनामी जेवणातले मुख्य पदार्थ, ऐंशी दशलक्ष व्हिएतनामी जनतेचं हे रोजचं अन्न. व्हिएतनाममध्ये शाकाहारी जेवण मिळतच नाही का? या प्रश्नाला तेथील शेफने सुरुवातीलाच उत्तर दिलं. ताज्या भाज्या व हर्ज प्रत्येक जेवणात भरपूर प्रमाणात देण्यात येतात. त्यामुळे शाकाहारींची बिलकूल अडचण होत नाही. भौगोलिकदृष्ट्या व्हिएतनामच्या तीन भागांमध्ये, जेवण बनवण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. मध्य भागात मिरची, मिरपूड यांचा भरपूर प्रमाणात वापर होत असल्याने त्यांचे पदार्थ चांगलेच तिखट असतात. उत्तरेकडे तिखटाचं प्रमाण कमी असतं. दक्षिणेकडे तर खाद्य पदार्थांवर फ्रेंचांचा प्रभाव आजही जाणवतो. सर्वच ठिकाणच्या नूडल्सचे प्रकार, आकार पाहून पर्यटक खूष न झाले तरच नवल. विविध व्हिएतनामी पदार्थांनी पोट इतकं भरलं की, रात्रीच्या जेवणाचा विचारही मनात आला नाही.
दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं. कारण कैरंग फ्लोटिंग मार्केट पहाटे साडेपाचला सुरू होऊन नऊ वाजेपर्यंत सर्व बाजार संपलेला असतो. त्यामुळे सकाळी सहाच्या सुमारासच छोट्या बोटीतून मार्केटच्या दिशेने निघालो. हा सर्व मार्ग गजबजलेला होता. काही ठिकाणी दिसत होते ते नदीतील पेट्रोल पंप, अगदी आपल्याकडच्या रस्त्यांवरच्यासारखे. लाकडाच्या भल्यामोठ्या फलाटावर पेट्रोलचं मशिन व त्याला पाईप होते. डिझेल भरण्यासाठी आलेली बोट फलाटाला लागून उभी रहायची. मग तिच्यात पाईपने डिझेल भरण्यात येत असे. या पेट्रोल पंपाची साठा करण्याची टाकी कुठे असते याबाबत कुतूहल होतं. मुख्य फलाटाच्या शेजारीच लागून आणखी एक फलाट होता. त्यात उंचावर मोठ्या टाक्यांमधून हा साठा करण्यात येतो. आमच्या २०-२५ कि.मी. च्या प्रवासात असे निदान चार-पाच पेट्रोल पंप लागले. काही ठिकाणी तर तिथे डिझेल भरण्यासाठी छोट्या बोटींची रांगच लागलेली दिसली. आता नदीचं पात्र बरेच रुंद झालं होतं. ठिकठिकाणाहून जोडणाऱ्या कालव्यांमुळे हे पात्र म्हणजे मुख्य मार्ग व आजूबाजूच्या छोट्या-छोट्या गल्ल्या असंच चित्र दिसत होतं. लहानमोठ्या बोटींची वर्दळ बरीच वाढली होती. कालव्यांमधूनही बोटींची ये-जा सुरू होती. छोट्या पडावांपासून मोठ्या होड्यांपर्यंत निदान ४००-५०० बोटी इकडून-तिकडे फिरत होत्या. हेच ते प्रसिद्ध कैरंग फ्लोटिंग मार्केट, खरोखरच या मार्केटचं रूप काही निराळंच वाटलं. रंगीबेरंगी बोटी, त्यातील निरनिराळ्या आकारांची फळं, भाज्या, वस्तू यामुळे तो सारा परिसर जणू चित्रमयच झाला होता. मेकाँग डेल्टाच्या निरनिराळ्या प्रांतातील, शहरातील, खेड्यातील नागरिक या फ्लोटिंग मार्केटला येतात. गावातील शेतकरी आपला माल विकण्यास घेऊन येतात. घाऊक व्यापारी त्यांचा माल खरेदी करतात आणि खेड्यातील छोटे दुकानदार तो विकत घेतात. इथे प्रामुख्याने खरेदी-विक्री होते ती फळं, फुलं व भाजीपाल्याची. हा माल निरनिराळ्या बोटीवर ठेवलेला असतो. माल विकत घेणारे-देणारे होडीतून त्या बोटीच्या जवळ जातात, किंमतीची बोलणी होतात. मग माल होडीत चढवला-उतरवला जातो. कोणत्या बोटीत काय माल विक्रीसाठी आहे, हे समजण्यासाठीची इथली पद्धत फार मजेशीर वाटली. त्या बोटीवर एक उंच काठी लावलेली असते. विक्रीसाठी उपलब्ध असलेली फळं व अन्य माल त्यावर टांगलेला असतो. त्यावरून बोटीत या वस्तू विक्रीसाठी आहेत हे दुरूनही समजू शकतं. या मार्केटमध्ये मोठे-पिवळे नारळ, फणस, आंबे, कलिंगड, केळी, अन्य अनेक स्थानिक फळं यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. या बाजारहाटाच्या निमित्ताने शेकडो गावकरी, व्यापारी दूरवरून येतात. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्थाही आवश्यक असते. त्यासाठी पडावातील फिरती उपहारगृहं इथे आहेत. त्यात नूडल्स, सूप, मिंट टी, शीतपेय विकत मिळतात. आम्हीही त्या फिरत्या उपहारगृहातून नारळपाणी खरेदी केलं. या बाजारात लहान मुलांचे कपडे, खेळणी त्याचबरोबर लॉटरी विक्रेतेही होडीतून इकडेतिकडे फिरत होते. सारा बाजार सकाळी नऊपर्यंत चालतो. त्यानंतर मेकाँग नदीचं ते पात्र अगदी रिकामं होऊन जातं.
कॅन थोचा मुक्काम आटोपून आम्ही व्हिएतनाम-कंबोडियाच्या सीमेवरील चाऊ डॉक या गावात आलो. मेकाँग नदीचा हा परिसर मासळीच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. बासा, कॅट फिश आदी मासळींवर प्रक्रिया करून ती अमेरिका, युरोपला पाठवली जाते. त्यामुळेच चाऊ डॉकच्या किनाऱ्यावर एका भल्या मोठ्या माशाचा पुतळा उभारण्यात आला आहे.
आमच्या मेकाँग नदी सफरीतील एका महत्वाच्या टप्प्याला चाऊ डॉकपासून सुरुवात होणार होती. ती म्हणजे या नदीतून प्रवास करत आम्ही व्हिएतनाम-कंबोडियाची सीमा ओलांडून, कंबोडियाची राजधानी नॉमपेन्हला जाणार होतो. सुमारे १८० कि.मी.चा हा प्रवास छोट्या स्पीड बोटीने चार-साडेचार तासात पार करायचा होता. चाऊ डॉकमधील आमचा मुक्काम, व्हिक्टोरिया या किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये होता. आणि त्यांच्याच व्हिक्टोरिया स्पीड बोटीने
आम्ही सीमा ओलांडणार होतो. सकाळी सातच्या सुमारास, हॉटेलच्या बोटीवर, ही छोटी सात आसनांची स्पीड बोट सज्ज होती. त्यात केवळ आम्ही दोघं. एक कप्तान, त्याचा साहाय्यक आणि व्हिएतनाम-कंबोडियाच्या इमिग्रेशन कार्यालयात आम्हाला मदत करण्यासाठी एक कर्मचारी एवढे पाच जणच होतो. बोटीत नाश्ता, चहा-कॉफी त्याचबरोबर बाथरुमची सोय होती.
साधारणतः तासाला चाळीस कि.मी.च्या वेगाने ही स्पीड बोट अंतर कापेल असं कप्तानाने सांगितलं. समोरच्या मोठ्या व बाजूच्या छोट्या खिडक्यातून आजूबाजूचं दृश्य चांगलं दिसत होतं. सोबत कप्तानाची कॉमेंट्री होती. सुरुवातीला मेकाँगचं पात्र सर्वसाधारण नदीसारखंच होतं. पाणीही बरंच गढूळ वाटलं. अनेक ठिकाणी एका किनाऱ्यावरून दुसरीकडे फेरीने ये-जा सुरू होती. सुमारे अर्धा-पाऊण तासात आम्ही सर्वप्रथम व्हिएतनामच्या इमिग्रेशन कार्यालयापाशी आलो. बोट किनाऱ्याला लागली व कठडा नसलेल्या आठ-दहा पायऱ्यांचा पूल चढून आम्ही इमिग्रेशन कार्यालयात आलो. सोबत इंग्रजी व व्हिएतनामी बोलू शकणारा व समजणारा गाइड होता म्हणून बरं. अन्यथा कोणाचंच संभाषण कोणाला समजलं नसतं. चपट्या नाकाचे, बुटके, पांढऱ्या पोशाखातील इमिग्रेशन अधिकारी मोठे गमतीदार दिसत होते. आम्हाला एका हॉटेलमध्ये बसवून, आमचे पासपोर्ट घेऊन गाइड आत गेला. वस्तुतः देशाबाहेर जायचं असल्याने स्टॅपिंगसाठी काहीच अडचण नव्हती. तिथे आमच्याखेरीज अन्य कोणी प्रवासीही नव्हते. पण सारा थंडा कारभार. वीस-पंचवीस मिनिटांनी गाइड पासपोर्ट घेऊन आला. व्हिएतनामचा निरोप घेऊन आम्ही कंबोडियाच्या दिशेने निघालो.
बोटीत बसल्याबरोबर, कप्तानाने बोटीवरील व्हिएतनामचा ध्वज काढून कंबोडियाचा लावला. व्हिएतनामची हद्द संपली व कंबोडियात आपण अधिकृतरीत्या प्रवेश करत आहोत त्यामुळे त्यांचा ध्वज लावण्यात येतो, असे कप्तानाने सांगितलं. पाच-सात मिनिटांनंतर बोट परत किनाऱ्याला लागली. इथे कंबोडियाचं इमिग्रेशन कार्यालय होतं. आम्हाला इथूनच कंबोडियाचा 'ऑन अरायव्हल' व्हिसा मिळणार होता. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होतीच. समजा व्हिसा नाकारला तर? ना घरका ना घाटका ! कंबोडियातील इमिग्रेशन ऑफिसही आरामशीर होतं. एका झाडाखाली बसण्यासाठी खुर्चा होत्या. इथेही फक्त आम्हीच प्रवासी दिसत होतो. पण सीझनमध्ये अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, युरोपियन पर्यटकांची संख्या बरीच असते व त्यांनाही व्हिसा घ्यावा लागतो. समोर दुसऱ्या झाडाखाली बसून गलेलठ्ठ कंबोडियन इमिग्रेशन अधिकारी आरामात नूडल्स खात व ज्यूस पीत होते. 'इथे येणाऱ्या सर्वांनाच व्हिसा मिळतो का?' गाइडला विचारलं. यावर तो म्हणाला की, 'काही इस्लामिक देशातील लोकांना व्हिसा नाकारण्यातही येतो. अर्थात आमचे व इमिग्रेशन खात्याचे चांगले संबंध असतात. व्हिसाची फी प्रत्येकी वीस अमेरिकन डॉलर्स होती. प्रत्यक्षात गाइडने आमच्याकडून २३ डॉलर्स घेतले. त्यामुळे या 'संबंधांमागचं' गुपित स्पष्ट होतं. आम्हाला झाडाखाली बसवून गायब झालेला गाइड चांगला अर्धा-पाऊण तासाने उगवला. मग त्याने आम्हाला इमिग्रेशन ऑफिसर समोर उभं केलं. काही न बोलता ऑफिसरने आमच्या पासपोर्टवर कंबोडियाचा व्हिसा चिकटवला. मी त्याचे आभार मानले. पण तो आमच्या गाइडशी हास्यविनोद करण्यात मग्न होता. दोघांची 'गट्टी' जमली होती.
बोटीत बसल्यानंतर आमचा कंबोडियातील खराखुरा प्रवास सुरू झाला. आता हळूहळू मेकाँगचं पात्र चांगलंच विस्तारू लागलं होतं. थोडं पुढे गेल्यानंतर तर ती सागराप्रमाणेच विशाल वाटत होती. आता मार्गात बोटीही नव्हत्या. त्यामुळे आमची स्पीड बोट चांगल्या वेगाने पाणी कापत मार्गक्रमण करत होती. व्हिएतनाम व कंबोडिया ही तशी अगदी गरीब राष्ट्र. पण एक गोष्ट स्पष्ट होती की, व्हिएतनाममध्ये मेकाँगच्या दोनही किनाऱ्यांना जशी भरपूर भातशेती, फळझाडं दिसत होती, त्या तुलनेत इथे फारच कमी. दारिद्र्य, भकासपणा क्षणोक्षणी जाणवत होता. ओसाड जमिनी, मोडकळीस आलेली घरं, मेकाँगच्या सुपीक किनाऱ्यांवर अजिबात शोभत नव्हती. बोटीच्या कप्तानाला हा फरक विचारला. त्याने सांगितलं की, याची मुळं कंबोडियाचा क्रूरकर्मा पोल पॉटच्या राजवटीत आहेत. पोल पॉटने १९७६ मध्ये कंबोडियाची सूत्रं हाती घेतली. तेव्हा जनतेने आनंदोत्सव साजरा केला. आपली गरिबी दूर होणार, राहणीमान सुधारणार म्हणून त्यांचा जल्लोष सुरू होता. पण अल्पावधीतच त्यांना पोल पॉटचं खरं रूप कळून आलं. कंबोडियाची एकूण लोकसंख्या ७० लाखाच्या घरात. पण १९७० ते ७९ या अवघ्या नऊ वर्षात ३० ते ३५ लाख लोक मारले गेले. विशेषतः पोल पॉटने २०-२५ लाख जनतेला हालहाल करून मारलं. अनेक जण कायमचे बेपत्ता झाले. निम्मी लोकसंख्याच संपुष्टात आली. रोगराई वाढली, खायला काही नाही, जगायचं कसं? अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर गेली तीस वर्षे राज्य करत असलेले हुन सेन, पोल पॉटप्रमाणे क्रूर नसले तरी सर्वसामान्यांसाठी फारसं काही करत नाहीत. अधिकारावर असलेल्यांची चलती. बाकी राष्ट्र भुकेकंगाल!
मेकाँग नदीच्या काठावरचा हा इतिहास मन सुन्न करणारा होता. किती जणांचे बळी तिथे गेले असतील याची कल्पनाच करवत नव्हती. नदीचं पात्र सागराप्रमाणे भव्य, पण कमालीचं शांत वाटत होतं. मधूनमधून छोट्या फलाटासारख्या फळ्यांवर बसून स्थानिक स्त्री-पुरुष मासेमारी करत होते. त्यांची जीर्ण झालेली जाळी, त्यांच्या आर्थिक स्थितीची कल्पना देत होती. व्हिक्टोरियाच्या स्पीड बोटीमधील कर्मचाऱ्याने समोर आणून ठेवलेले सँडविचेस्, कॉफी घशाखाली उतरत नव्हती. चार-साडेचार तासांच्या प्रवासानंतर समोर उंच इमारती दिसू लागल्या. कंबोडियाची राजधानी नॉम पेन्ह शहर जवळ आलं होतं. आता चित्र बदलू लागलं. शहरी झगमगाटात कंबोडियातील सर्वसामान्य जनतेचं खरंखुरं चित्र हरवून गेलं होतं.
नॉम पेन्हहून आम्ही सिएम रिपला विमानाने आलो. तिथे शहरापासून ५० कि.मी. अंतरावर तोनले सॅप तलाव आहे. त्याच नावाच्या नदीचं पाणी त्यात जातं आणि तोनले सॅप नदी ही पुढे मेकाँग नदीलाच मिळते. त्यामुळे मेकाँग नदीचा एक भाग म्हणून तो ओळखला जातो. मे ते ऑक्टोबर महिन्यात मेकाँग नदीतून उलट्या दिशेने पाण्याचा जोर इतका प्रचंड असतो की, तोनले सॅप नदीचं पाणी तलावातच परत जातं आणि तलावाचं क्षेत्र तीन हजार ते साडेसात हजार चौ.कि.मी.पर्यंत पसरतं. कोरड्या मोसमात तलाव पूर्ववत होतो. या नदीतून ४०-५० कि.मी.चा प्रवास करून तेथील 'क्रोकोडाईल मार्केट' (मगरींची बाजारपेठ) पहायला जाण्याचा कार्यक्रम होता.
तोनले सॅप नदीचं पाणी खूपच खराब होतं. फारसे पाणी नसल्याने काही ठिकाणी तर नदीचा तळ दिसत होता. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरही बघण्यासारखं काही विशेष नव्हतं. पण अर्ध्या-पाऊण तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका प्रचंड मोठ्या लाकडाच्या फलाटाजवळ आलो. आजूबाजूला नदीतच गरीब कोळ्यांची घरं होती व हा फलाट म्हणजे त्यांचं बाजाराचं ठिकाण होतं. अनेक वस्तू या फलाटावर विकायला ठेवण्यात आल्या होत्या. फलाटाला मध्यभागी एक चांगला १० x १० फुटाचा व पाच-सहा फूट खोल, खोलगट भाग करण्यात आला होता. त्यात थोडं पाणी होतं व चारही बाजूंनी मजबूत कठडे होते. आतमध्ये लहान-मध्यम-अजस्त्र अशा विविध आकारांच्या निदान १५-२० जिवंत मगरी सुस्त पडल्या होत्या. हेच ते मगरींचं मार्केट.नदीच्या किनाऱ्यांवर चिखलात या मगरींचं वास्तव्य असतं. स्थानिक गावकरी दोरखंडाच्या साहाय्याने त्यांना पकडतात व विकण्यासाठी बाजारात आणून ठेवतात. प्रामुख्याने रशियन व काही श्रीमंत पर्यटकांना मगरीचं मांस फार आवडतं. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला ते तयार असतात. मोठ्या आकाराची एक मगर १५०-२०० अमेरिकन डॉलर्सना सहज विकली जाते. पर्यटक कोणती मगर पसंत असल्याचं सांगतात. सौदा नक्की होतो. आणि मग तिला इथेच मारून, तिचं मांस काढून दिलं जातं. पर्यटकांचा मोसम असताना दिवसाला एक-दोन मगरी सहज विकल्या जातात, असं सांगण्यात आलं. वस्तुतः मेकाँग नदीच्या पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी, मच्छीमारीकरता व शेतीसाठीच करायचा असा अलिखित करार सहाही राष्ट्रांमध्ये झाला होता.
पण चीनने ही अट धुडकावून आपल्या भागात मेकाँग नदीवर वीज निर्मितीसाठी तीन धरणं बांधली. त्यामुळे अन्य पाच देशांना पाणी कमी पडू लागले. म्हणून थायलंड, म्यानमार, लाओस, कंबोडिया व व्हिएतनाम या पाच राष्ट्रांनी एका संयुक्त आयोगाची स्थापना केली व त्यात एकमताने असा निर्णय घेण्यात आला की, कोणत्याही देशाने मेकाँग नदीवर वीज निर्मितीसाठी धरण बांधायचं नाही. केवळ पिण्यासाठी, शेतीकरता व मच्छीमारीसाठीच या पाण्याचा उपयोग करायचा. याचं काटेकोर पालन ही राष्ट्र करतात. त्यामुळेच लाओसने वीज निर्मितीसाठी नुकतंच बांधलेलं धरण दुसऱ्या नदीवर आहे. मेकाँग नदी म्हणजे या सर्व देशांची तारणकर्ती, रक्षणकर्ती, सर्वकाही आहे. तिच्याबद्दल अनेक दंतकथाही ऐकायला मिळतात. या नदीच्या तळाशी नागांची वस्ती आहे. म्हणून या नदीपासून सर्व प्रजेचं रक्षण होतं, असं भाविक मानतात. लाओसमध्येही मेकाँग नदीतून प्रवास केला. तिची अनेक रुपं पाहिली. कायम लक्षात राहणारी अशी ही सफर ठरली.
प्राचीन अवशेषांचा 'ट्युनिशिया'
ट्यु निशिया हा आफ्रिकेतील चिमुकला देश सवार्थाने आगळा-वेगळा म्हणावा लागेल. त्याचं एकूण क्षेत्रफळ १,६३,००० चौ.कि.मी. आहे. १३०० कि.मी.चा विस्तीर्ण समुद्रकिनाराही या देशाला लाभला आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के जनता, ही किनाऱ्यांवरील लहान, मोठ्या शहरांत, गावांत तर वीस टक्के लोकवस्ती दक्षिणेकडे सह्मरा वाळवंटात राहते. या राष्ट्राला एक हजार वर्षांचा इतिहास असून, नऊ संस्कृतींचा प्रभाव त्यांच्यावर आहे. दुसऱ्या शतकापासूनचे रोमनकालीन अवशेष आजही तेथे पहावयास मिळतात. विविध काळांतील दोनशे आर्किऑलॉजिकल साईटस या देशाने उत्तमरीत्या जतन केल्या आहेत. भारतात हा देश अद्याप फारसा परिचित नसला तरी, इंग्लंड, अमेरिका, युरोपमधील पर्यटक फार मोठ्या संख्येने तेथे जात आहेत.
ट्युनिस ही ट्युनिशियाची राजधानी, येथे पोहोचण्यासाठी, भारतातून अर्थातच थेट विमान नाही. टर्किश एअरलाइन्सने इस्तंबूलमार्गे किंवा इजिप्त एअरवेजने जाता येतं. इजिप्त एअरवेजने गेलो तर कैरोला एक दिवसाचा मुक्काम करावा लागत होता. त्यामुळे आम्ही टर्किश एअरवेजने गेलो. ट्युनिशियाचा व्हिसा दिल्लीहून घ्यावा लागतो. ट्युनिस विमानतळावर इमिग्रेशन काउंटरवर फार वेळ लागणार नाही अशी अपेक्षा होती. पण पाहतो तर तिथे लांबच लांब रांगा लागलेल्या. त्यात गोऱ्या पर्यटकांबरोबर स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात दिसत होते. मग असं समजलं, की ट्युनिशियातील अनेकजण नोकरी धंद्यासाठी दुसऱ्या देशात जातात. त्यामुळे त्याचीही गर्दी होती. त्यात सारा थंडा कारभार. पण इमिग्रेशन, कस्टमला काही अडचण आली नाही. टॅक्सीसेवाही चांगली. पण पिवळ्या रंगाची अधिकृत टॅक्सीच घेणं योग्य असतं. आम्ही गेलो, त्या दिवशी रात्री ट्युनिसमध्ये मुसळधार पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी मात्र मस्त ऊन्ह पडलं. भटकंतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत आम्हाला हवामानाची चांगली साथ लाभली.
ट्युनिशियाचा इतिहास, संस्कृती यांची जडणघडण तसेच व्यापार, त्याला लागून असलेल्या भूमध्यसागराच्या विस्तीर्ण किनाऱ्यावरच झाला. तेथील नैसर्गिक, सांस्कृतिक ठेवा, प्राचीन अवशेष यांमुळे ट्युनिशियाला एक खास स्थान प्राप्त झालं असं निश्चितपणे म्हणावं लागेल. उत्तरेकडील समुद्रकिनाऱ्यालगतची जमीन अत्यंत सुपीक असल्यामुळे ऑलिव्ह, कॉर्क व अन्य विविध प्रकारचं चांगलं पीक निघतं. ट्युनिशियाचा दोन तृतीयांश भाग अक्षरशः सपाट आहे. कोणतेही डोंगर दोनशे मीटर्सपेक्षा उंच नाहीत. अपवाद, शेजारच्या अल्जेरियाला लागून असलेल्या पश्चिम सीमेवरील अॅटलास पर्वतांच्या रांगा. पण त्यांचीही उंची फार नाही. अनेक संस्कृती इथे नांदल्या. बर्बर्स, फिनिशियन्स, रोमन, व्हेंडल्स, अरब, तुर्की, स्पॅनिश, फ्रेंच इत्यादींनी आळीपाळीने ट्युनिशियावर राज्य केलं. शेवटची राजवट फ्रेंचांची होती. वीस मार्च १९५६ मध्ये ट्युनिशियाला स्वातंत्र्य मिळालं. पण आजही तिथे फ्रेंचाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सध्या काहीशी राजकीय अस्थिरता असली, तरी ऑलिव्ह, खजुराच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच पर्यटनात हा देश चांगली आघाडी घेत आहे.
ट्युनिशियाचे मुख्य आकर्षण म्हणजे अर्थातच तेथील प्राचीन अवशेष. ते देशभर विखुरले आहेत. ते पाहण्याची सुरुवात आम्ही ट्युनिसपासून ११० कि.मी. अंतरावर असलेल्या 'डोग्गा' या गावापासून केली. युनेस्कोने त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला असून, सर्व अवशेष अतिशय उत्तमरीत्या जतन केले आहेत. वस्तुतः याच्या आजूबाजूचा भाग तसा ग्रामीण आहे. पण कोणीही इथे येऊन घाण करत नाही, की कचरा टाकत नाही. युरोपच्या एवढी नसली, तरी चांगली स्वच्छ टॉयलेटस् प्रत्येक ठिकाणी आहेत, हे विशेष. ट्युनिशियात प्राचीन अवशेष पाहण्यासाठी तिकिट आहे आणि फोटो काढावयाचे असले तर एक दिनार जास्त द्यावा लागतो. हे अवशेष पाहण्यासाठी येणारे बहुतेक पर्यटक हे गोरे असतात. त्यामुळे तिकिटगृह उघडलेलं नसलं, दरवाजावरती कर्मचारी नसला तरी, प्रत्येकजण प्रामाणिकपणे पैसे ठेवून आत प्रवेश करतो. सर्व अवशेषांची देखभाल सरकारच्या कलाविभागातर्फे करण्यात येते. त्यासाठी या सर्व पैशाचा उपयोग केला जातो.
डोग्गा हे पंचवीस हेक्टरमध्ये वसलेलं रोमनकालीन शहर. त्याकाळातील मंदिरं, थिएटर्स, घरं, स्नानगृहं, एकमेकांना जोडणारे फरसबंदी रस्ते इतकंच काय घोडागाडीच्या चाकांच्या खुणाही तिथे पहावयास मिळतात. 'Thygga' हे त्या गावाचं पूर्वीचं नाव. पण रोमन राज्यकर्त्यांच्या काळात ते डोग्गा या नावाने ओळखलं जाऊ लागलं. दुसऱ्या ते चौथ्या शतकाचा काळ हा डोग्गाचा सुवर्णकाळ म्हणावयास हरकत नाही. नंतर मात्र भटक्या व हिंसक प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचा ताबा घेतल्याने शहराचा ऱ्हास होऊ लागला. Byzantines राजवटीत त्याला थोडे बरे दिवस आले, पण नंतर पुन्हा अवकळाच आली.
डोग्गा अवशेष पाहताना, दर्शनी भागातच दिसतं ते, साडेतीन हजार प्रेक्षक बसू शकतील असं अँफी थिएटर. त्यावरून सहज लक्षात येतं, की डोग्गाची लोकसंख्या ५ हजाराच्या पुढे कधीच गेली नाही. तिथून सरळ रस्ता राजधानीच्या शहराकडे जातो. तिथे दहा मीटर्स उंचीचे स्तंभ दिसून येतात. त्यांना ज्युपिटर, ज्युनो, मिनर्व्ह यांची नावं देण्यात आली आहेत. त्याला लागूनच 'स्क्वेअर ऑफ विंड्स' आहे. तिथे मोझेंक टाइल्सच्या जमिनीवर वाऱ्याच्या दिशा दाखवण्यात आल्या आहेत. राजधानीच्या शहरात मोठी दुकानं व मंदिरांचे अवशेष दिसतात. इथे जास्तीत जास्त लोक राहत होते. काही अंतरावर वेश्याव्यवसाय चालायचा. त्याच्याच खाली मसाजची व्यवस्था होती. एका ठिकाणी घोड्याच्या नाल्याच्या आकाराची टॉयलेटस् दिसून येतात. शहरातून उजवीकडे गेल्यानंतर २१ मीटर्स उंचीचा कोलोसियम दृष्टीस पडतो. त्याची Carthaginian व लिबियन भाषेत माहिती देणारा दगडाचा अवशेष ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. लिबियन भाषेतील मजकुरामुळे, त्या काळातील बऱ्याच गोष्टींचं आकलन तज्ज्ञांना होत आहे. सॅटर्न (रोमन - धान्यदेवता). मिनर्व्ह यांची अनेक मंदिरं परिसरात दिसून येतात.
ट्युनिसपासून जवळच कार्थेज हे प्राचीन ऐतिहासिक गाव वसलं आहे. येथील अवशेष तीन युद्धांत नामशेष झाले. प्युनिककाळातील हे अवशेष इ.स.पूर्व १४६ मध्ये रोमन सैन्याने बहुतांशी उद्ध्वस्त केले. तरीही शिल्लक राहिलेल्या भागांवरून त्याकाळची कल्पना येऊ शकते. हा सारा परिसर खरोखरच पाहण्यासारखा आहे. कार्थेजचं पूर्वीचं नाव Byrsa. फिनिशियन्सनी बर्बर्स आदिवासींच्या साहाय्याने ते उभारलं. फिनिशियन्स व आफ्रिकन संस्कृतीचा
उत्कृष्ट मिलाप येथे सापडलेल्या वस्तू, पुतळे यांवरून कळतो. त्याकाळी अंत्यविधीच्या वेळी, मृताच्या चेहऱ्यावर मुखवटे चढवण्यात येत. असे काही मुखवटे उत्खननात मिळाले. त्यावरून दोन्ही जमातींमधील विधी, प्रथा कशा सारख्या होत्या हे समजून येतं. टेराकोटा दगडातील हे मुखवटे, शवपेट्या आता कार्थेज येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अवशेषांमध्ये जमिनीखाली अन्नधान्य, तेल-लाकूड ठेवण्याची मोठमोठाली गोदामं आहेत. अशुद्ध पाणी समुद्रापर्यंत पोहोचवण्याचे तसंच श्रीमंतांच्या घरात बॉयलर्समधून खोल्यांपर्यंत वाफ वाहून नेण्याचे मार्ग आजही स्पष्ट दिसून येतात. जे रोमनकालीन अवशेष सापडले त्यात प्रामुख्याने पुतळे, शवपेट्या व दागदागिने यांचा समावेश आहे. विजयोत्सवाचं दर्शन घडवणारी, दगडात कोरलेली दोन भव्य चित्रं तेथील अँफी थिएटरमध्ये मिळाली.
निळा-पांढरा वेष परिधान केलेल्या एखाद्या परीसारखे सुंदर दिसणारे, समुद्रकिनाऱ्यावरील 'सिदीबाऊ-सेड' (Sidi-Bou-Said) हे अगदी छोटं गाव, ट्युनिशियातील एक आकर्षण आहे. जगातील अनेक नामांकित चित्रकारांचं हे अगदी आवडतं ठिकाण. आठवडेच्या आठवडे ते इथे मुक्काम ठोकतात, आणि चित्रं काढताना दिसतात. विविध जागतिक प्रदर्शनांत या गावाची चित्रं पहावयास मिळतात. डोंगरउतारावरील येथील सर्व घरं पांढरीशुभ्र असून, त्यांच्या खिडक्या, दरवाजे यांना निळा रंग देण्यात आला आहे. कडक उन्हाळ्यात घरात थंडावा रहावा हा त्यामागचा हेतू. भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील अनेक गावांत, घरांना असे रंग देण्याची पद्धत आढळून येते. ग्रीसमध्ये काही बेटांवर अशी घरं आम्ही पाहिली आहेत. ही रंगसंगती कमालीची मोहक वाटते. सिदी-बाऊ-सेड मध्ये निळ्याशार सागराच्या पार्श्वभूमीवर तर ही छोटी छोटी घरं अगदी चित्रातल्या सारखीच दिसतात. या गावात छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चालत अगदी उंचावर जाता येतं. तिथून पाण्याचा आणि घरांचा जो निळा-पांढरा सागर दिसतो तो अप्रतिम असाच म्हणावा लागेल. पर्यटकांमध्ये हे गाव कमालीचं लोकप्रिय असल्याने, रस्त्यांच्या कडेला अनेक लहान, लहान रेस्टॉरंटस् आइस्क्रीम पार्लर्स थाटण्यात आली आहेत. त्यात आरामात बसून, येथील मजा मस्त अनुभवता येते.
तिसऱ्या शतकातील भव्य अशा रोमन कोलोसियमचे अवशेष 'अल् जेम' (Eljem) इथे पहायला मिळाले. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन आफ्रिकन युगातलं हे एक महत्त्वाचं शहर होतं. येथील १५ हजार हेक्टर परिसरात ऑलिव्ह झाडांपासून तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असे. अल् जेम हे रोमनकाळी
थायड्स या नावानं ओळखलं जायचं. तिथे इ. स. २३०, कोलोसियमच्या धर्तीवर अॅफीथिएटर बांधण्यात आलं. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने, त्याची रचना, कोलोसियमपेक्षा सरस होती. कारण त्यात, कोणत्याही अडथळ्याविना प्रेक्षक कार्यक्रम बघू शकायचे. आणि या थिएटरचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असे. थायड्स अँफी थिएटर, भव्यतेत रोमन साम्राज्यात सहाव्या क्रमांकाचं म्हणून ओळखलं जाई. त्याची लांबी १४९, रुंदी १२४ व उंची ३६ मीटर्स आहे. ते बांधण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला. तीन कमानींमधून या थिएटरमध्ये प्रवेश करण्यात येत असे. या थिएटरची तीस ते पस्तीस हजार प्रेक्षक बसू शकतील इतकी क्षमता होती. निःशस्त्र गुलाम आणि वाघ, सिंह यांच्यासारखे हिंस्त्र पशू यांची लढाई आणि शूर योद्ध्यांची नेमबाजी इथे पहायला मिळत असे. तळघरात गुलाम व जनावरं यांना ठेवण्यासाठी खोल्या होत्या. हे सर्व अवशेष अतिशय उत्तम रितीने जतन करण्यात आले आहेत. आजही या थिएटरमध्ये काही विशेष कार्यक्रम आयोजिण्यात येतात.
सफक्स (sfax) हे ट्युनिशियातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर. येथील लोक अन्य ट्युनिशियन्सपेक्षा वेगळे मानले जातात. ते काटकसरीने राहतात, व्यापारात हुशार आहेत आणि एकूण राष्ट्राच्या तुलनेत इथे पदवीधरांचं प्रमाण अधिक आहे. ट्युनिशियातील बहुतेक सर्व मोठ्या शहरांची रचना जवळजवळ सारखीच म्हणावी लागेल. शहराची विभागणी दोन भागांत होते. एक मदिना म्हणजे जुनं शहर व दुसरे नवीन शहर. मदिनाच्या वेशीवर संरक्षणासाठी तटबंदी दिसून आली. युरोपमध्येही अनेक ठिकाणी अशीच रचना दिसते. मदिनामध्ये शेकडो छोटी छोटी दुकानं असतात. तो जणू भुलभुलैय्याच असतो. सफक्समध्ये मदिनाला लागूनच नवं शहर वसलं आहे.
ट्युनिस ही आर्थिक व प्रशासकीय राजधानी तर कैरोऊन (Kairouan) ही धार्मिक राजधानी मानण्यात येते. मक्का, मदिना व जेरुसलेम यांच्यानंतरचं चौथं पवित्र शहर म्हणून ते ओळखलं जातं. येथील पवित्र पाणी थेट मक्केहून येतं, असा समज आहे. या मदिनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची रचना, अगदी विचित्र आहे. तीस हेक्टरमध्ये ते पसरलं असून, साडेसात कि.मी. लांबीची तटबंदी त्याच्या भोवती आहे. मदिनात ५० मशिदी व अनेक कबरी दिसतात. त्यातील सर्वात महत्त्वाची 'ग्रेट मॉस्क' मशीद ६७१ मध्ये बांधण्यात आली होती. त्यामधील नमाजच्या खोलीला ४०० खांब आहेत आणि त्यापैकी काही रोमन शहरातून आणण्यात आले. प्रार्थनेसाठीचं येथील व्यासपीठ, संपूर्ण इस्लाममधील सर्वात जुनं व्यासपीठ म्हणून ओळखलं जातं. त्याची उंची ३१.५ मीटर्स असून ८३६ मध्ये उभारण्यात आलं होतं. कैरोऊन पासून पश्चिमेला ११५ कि.मी. अंतरावर व एक हजार मीटर्स
उंचावर 'सबितला' (Sabitla) या पहिल्या व दुसऱ्या शतकातील अतिशय सुंदर, रोमनकालीन शहराचे अवशेष पहायला मिळतात. त्याकाळी सुफेतुल्ला या नावाने ते गाव ओळखले जाई. तेव्हा हा सारा परिसर आजच्यासारखा ओसाड नव्हता. घनदाट जंगल व ऑलिव्हची झाडं यांमुळे शहराचं सौंदर्य अधिकच उठून दिसायचं. साम्राज्याच्या सीमेवरील या गावाची लोकसंख्या बारा हजाराच्या घरात होती. सुरुवातीलाच दिसते, वेशीवरील भव्य कमान. त्यामागे एकेकाळी राजधानीचं शहर वसलं होतं. सर्वसाधारणतः गावात एक मंदिर असतं. पण येथे मात्र तीन मंदिरं एकमेकांना लागून व जोडलेली दिसून येतात. ज्युपिटर, ज्युनो व मिनर्व्ह यांची ती मंदिरं होती. विशेष म्हणजे, आजही ते अवशेष जवळजवळ उत्तम अवस्थेत आहेत. शहरातील थिएटर आणखी थोडं दूर, उंचावर आहे. शहरात पाच मोठी सार्वजनिक स्नानगृहं होती व ती दुसऱ्या शतकांत बांधण्यात आली होती. इथे शहराच्या अन्य भागांचे अवशेषही पहायला मिळतात. याला लागूनच एक म्युझियम आहे. विविध काळात इथे सापडलेल्या अत्यंत दुर्मीळ वस्तू त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
ट्युनिशियाच्या भेटीत, ट्युनिस येथील बार्डो म्युझियमला भेट द्यायलाच हवी. अत्यंत उत्कृष्ट अशा मोझेंक टाइल्सची चित्रं, जुने अवशेष आदींचा संग्रह इथे आहे. त्याची स्थापना १८८८ मध्ये झाली. या म्युझियमची इमारतही नजरेत भरावी अशीच आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात एका अत्यंत ज्येष्ठ अधिकऱ्याचे निवासस्थान म्हणून ती बांधण्यात आली. पण लगेच त्याचं रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आलं. एकूण तीन मजल्यांवर चाळीस दालनांमध्ये हा म्युझियम विभागण्यात आला आहे. टाइल्सची जमिनीवरील चित्रं, खराब होऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येते. म्युझियमच्या प्रवेशद्वारावरच आपली पादत्राणं काढून, विशिष्ट प्रकारच्या कापडापासून बनवलेले मोजे पायात चढवावे लागतात.
जगातील सर्वोत्कृष्ट मोॉक टाइल्सची चित्रं इथे पाहता येतात. या टाइल्स अगदी छोट्या आहेत. त्यांच्या साहाय्याने या भव्य कलाकृती तयार करणं म्हणजे खरोखरच मोठी कसोटी म्हणावी लागेल. इतिहासपूर्व काळापासून आधुनिक काळापर्यंतची चित्रं इथे दिसतात. त्यात विविध सामाजिक परिस्थितींचं वर्णन चितारलं आहे. प्राचीन काळातही समाजात दोन प्रकारचं आयुष्य जगणारी माणसं दिसून येतात. एका चित्रात वरच्या भागात काही मजूर मेहनत करत
आहेत, दोरखंडाने सामान ओढत असल्याचं दिसतं. तर त्याच्याच खाली, दोन श्रीमंत व्यक्ती ऐषारामात् बसून सुरापान करताना दिसून येतात. हिसपॅनिक-मुरिश, टर्किश पर्शियन, युरोपमधील प्रामुख्याने इटालियन व काही इस्लामिक कलाकृती येथे पहायला मिळतात. छतांवरील मोडॉक पेंटिंग्ज पाहून तर आपण थक्कच होतो.
ट्युनिशियात फिरताना, सहारा वाळवंटाचा भाग वगळता, ठिकठिकाणी दिसतात त्या ऑलिव्ह झाडांच्या बागा. या देशात ऑलिव्हची साडेपाच कोटीपेक्षा अधिक झाडांची लागवड आहे. ही बागायत मोठी बघण्यासारखी असते. जाड बुंध्याच्या, डेरेदार ऑलिव्ह झाडामध्ये १० ते १५ फुटांचं अंतर ठेवण्यात येतं. आणि त्याची सरळ रेषेतील रांग, चांगली दीड, दोन कि.मी. लांब असते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा ऑलिव्ह फळांचा मोसम असतो. ही फळं झाडावरून काढण्याची प्रत्येक देशातील पद्धत निरनिराळी आहे. इथे ती हातांनी काढतात. तर स्पेनमध्ये ती काठीने झोडपून काढत असल्याचं मी पाहिलं होतं. ऑलिव्ह तेलाचा वापर सर्वच देशांत वाढला असल्याने त्याच्या निर्यातीपासून ट्युनिशियाला चांगलं उत्पन्न मिळतं. त्याखेरीज ऑरेंज व बदामाची झाडंही दिसून येतात. इथे कॅक्टसच्या झाडांच्याही लांबवर पसरलेल्या रांगा पहायला मिळाल्या. कॅक्टसला फळं येतात. त्यांना 'प्रिकली पेअर' म्हणतात. अरेबिक भाषेत 'हिंदी' फळं म्हणून ती ओळखली जातात. त्यांना काटे असल्यामुळे हातमोजे घालून ती काढावी लागतात. ती खातात व त्याची चव किव्ही फळासारखी लागते. सजावट व कुंपण यांसाठी कॅक्टसचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग ट्युनिशियात करताना दिसून येतो.
ट्युनिशियाच्या ग्रामीण भागांत महामार्गावर, रस्त्यांच्या कडेला दुतर्फा छोटी छोटी दुकानं थाटलेली दिसली. ती होती पेट्रोलची. कॅन्स, ड्रम्स, बाटल्या एकावर एक ठेवून, त्यात पेट्रोल, विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मुख्य रस्त्यांवरच ही विक्री राजरोसपणे सुरू असते. हे पेट्रोल लिबियातून चोरून आणण्यात येतं. तिथे पेट्रोल फार स्वस्त आहे. ट्युनिशियात साधारणतः ५० ते ६० रु. लिटर या दराने पेट्रोल मिळतं. पण लिबियातून आलेलं पेट्रोल १० ते १५ रु. लिटर दराने विकण्यात येतं. दरात एवढा फरक असल्याने, या दुकानांसमोर मोटारींच्या रांगा लागलेल्या दिसतात. विशेष म्हणजे पोलिसांच्या साहाय्यानेच हा बेकायदेशीर धंदा सुरू असतो. या देशात शिक्षण सक्तीचं व मोफत असून, मुलांना लष्करात एक वर्षाची सेवा करावीच लागते. प्रत्येक शाळेवर ट्युनिशियाचा ध्वज फडकताना दिसतो. ध्वजाचा रंग लाल व त्यावर
चंद्रकोर व स्टार असतो. त्याला मोठा अर्थ आहे. लाल रंग म्हणजे जनतेची राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती. आणि स्टार हे मुस्लिम धर्माचे पाच आधारस्तंभ !
ट्युनिशियात १४-१५ दिवसांत चांगली दोन-सव्वा दोन हजार कि.मी.ची भटकंती झाली. इथले रस्ते खूपच उत्तम आहेत. त्यानंतर दोन-तीन दिवस आराम करण्यासाठी ट्युनिसपासून ६५ कि.मी. अंतरावरील 'हॅमामेट' या समुद्रकिनाऱ्यावरील गावात आलो. येथील वातावरण पूर्णतः निराळं आहे. भूमध्य सागराचं निळंशार पाणी, विशाल समुद्रकिनारा लाभलेलं पर्यटकांचं हे अत्यंत आवडीचं ठिकाण आहे. ट्युनिशियात भरपूर फिरायचं आणि इथे येऊन मस्त विसावायचं! या देशात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा हाच कार्यक्रम असतो. प्राचीन वास्तूंची उत्तम जपवणूक, स्वच्छता आणि देशाबद्दलचा खराखुरा अभिमान यामुळेच, जगाच्या नकाशावर, पर्यटनात, ट्युनिशिया चांगली आघाडी घेताना दिसतो आहे.
- या सफरीविषयी उपयुक्त माहिती
खंड : आफ्रिका
लोकसंख्या : सुमारे
राजधानी : ट्युनिस
चलन : दिनार
क्षेत्रफळ : १, ६३,००० चौ.कि.मी.
भाषा : अरेबिक (पर्यटनात इंग्रजी)
कसे जाल?
ट्युनिशियाचा व्हिसा दिल्लीहून घ्यावा लागतो. तेथे जाण्यासाठी भारतातून थेट विमान नाही. पण टर्कीश एअरवेजने इस्तंबुलमार्गे किंवा इजिप्त एअरवेजने कैरोमार्गे जाता येतं.
कधी जाल?
तापमान जवळजवळ भारतासारखंच. त्यामुळे कोणत्याही मोसमात जाता येतं.
सुरक्षितता :
हा देश पूर्ण सुरक्षित आहे. इंग्रजी बोलू व समजू शकणारे गाइड उपलब्ध असतात.
'सहारा' वाळवंटात...
हारा हे जगातील सर्वात मोठं वाळवंट. नव्वद लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ स असलेला वाळूचा हा रखरखीत महासागर, आफ्रिकेतील एकूण १० राष्ट्रांमध्ये पसरला आहे. उन्हाळ्यात तेथील तापमान दिवसा ६०-६५० सें. सें. पर्यंत चढतं. आणि रात्रीच्या वेळी शून्य अंशापर्यंत उतरतं. गेली दोन वर्षे अमेरिकेतील अलास्का, स्कँडेनेव्हियातील आर्क्टिक सर्कलमध्ये हजारो मैल पसरलेल्या बर्फाच्या ग्लोशिअर्सवर हिवाळ्यात मनसोक्त फिरणं झालं होतं. अशीच भटकंती, यावर्षी त्याच्या अगदी उलट म्हणजे सहारा वाळवंटात करण्याची कल्पना, जयंतीच्या मनात आली.
त्यासाठी ट्युनिशिया या आफ्रिकेतील अगदी छोट्या राष्ट्राची निवड तिने केली. त्या देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ ५० हजार चौ.कि.मी.चं क्षेत्र हे सहारा वाळवंटाने व्यापलं आहे. आणि विशेष म्हणजे ४४४ व्हेइकल किंवा उंट या वाहनांच्या साहाय्याने येथे, तुम्ही काही तासांत, सहाराच्या अगदी मध्यभागी पोहोचू शकता. ट्युनिशियाच्या दौऱ्यात चांगली आठशे-नऊशे कि.मी.ची भटकंती चक्क सहारा वाळवंटातच केली. त्यामुळे क्षितिजापर्यंत मैलोन्मैल लांब पसरलेली वाळूची मैदानं, सॅन्डुन्स (वाळूच्या टेकड्या), वाळवंटातील बगीचे (ओअॅसिस), या ओसाड प्रदेशात राहणारे आदिवासी, त्यांची घरं, जीवनपद्धती, सहारात नंदनवन निर्माण करून, करोडो डॉलर्सचं उत्पन्न देणारी खजुराची झाडं, टोकाच्या हवामानातील सोबती उंट व अन्य प्राणी यांची चांगली माहिती करून घेता आली.
ट्युनिशियाच्या अगदी दक्षिणेला असलेलं 'डाऊज' हे सहारा वाळवंटाचं प्रवेशद्वार मानण्यात येतं. त्यामुळे ट्युनिशियाची राजधानी ट्युनिस येथून मोटारीने फिरत, फिरत प्रथम डाऊजला आलो. या गावाच्या पुढचा, सभोवतालचा सारा परिसर सहारा वाळवंटात येत असल्याने आता ते पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्रच झालं आहे. या शहराला इतिहासही आहे. या भागात म्राझिग (Mrazig) या स्थानिक भटक्या जमातीचे लोक राहत होते. त्यांची राहणी, जीवनमान सरकारला तापदायक व्हायचं. त्यामुळे ट्युनिशियावर त्याकाळी राज्य करत असलेल्या फ्रेंचांनी १९११ मध्ये डाऊज गावाची निर्मिती केली. पण सहारातील अनेक गावांत आजही वाळवंटातील जे खरं जीवन पहायला मिळतं, ते येथे दिसत नाही. कारण डाऊज मधील सोयी खूपच आधुनिक असून, पर्यटनाचं महत्त्व लक्षात घेऊन, आता तेथे उत्तम हॉटेल्सही बांधण्यात आली आहेत.
डाऊजच्या जुन्या भागात फेरफटका मारताना, पारंपरिक पद्धतीनुसार राहून, खजुराच्या उत्पन्नावर जगणारी काही कुटुंबं पहावयास मिळतात. पण नवीन डाऊजमधील चित्र अगदी वेगळं आहे. तेथील लोकांची उपजीविका ही प्रामुख्याने पर्यटनावर होत असते. पर्यटकांना उंटावरून तसंच आधुनिक वाहतूक साधनं म्हणजे, जीप्स, क्वाड, घोडागाडीतून वाळवंटात फिरवून आणून येथील लोक पैसे कमावतात. इतकंच काय आता एअर बलूनमधूनही सहारा दर्शन घडू शकतं. आम्हीही येथे उंटावरून फेरफटका मारून आलो. पण केवळ हौस एवढंच त्याचं स्वरूप असतं.
डाऊजच्या मुक्कामात तिथे नव्याने उघडण्यात आलेल्या म्युझियमला भेट द्यावयास हवी. वाळवंटातील जीवन कसं असतं, याची प्राथमिक कल्पना तेथील अनेक वस्तू पाहून येते. बेदुईन या वाळवंटातील भटक्या जमातीचे राहण्याचे तंबू, त्यांचे कपडे, दागदागिने, शरीरावर गोंदवून घेण्याची प्राचीन पद्धत या सर्वाचं दर्शन येथे घडतं. प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात डाऊज येथे 'सहारा महोत्सव' भरतो. संपूर्ण ट्युनिशियातील सर्वात जुना व अत्यंत लोकप्रिय उत्सव म्हणून तो ओळखला जातो. सहारामधील पारंपरिक नृत्यं, मृष्टियुद्ध, उंट आणि घोड्यांच्या शर्यती व वाळवंटातील विविध प्राण्यांची शिकार कशी करण्यात येते, याची प्रात्याक्षिकं त्यात दाखवण्यात येतात. तसंच स्थानिक कलाकुसर दाखवणाऱ्या वस्तूंची बाजारपेठ उघडण्यात येते. तीन दिवसांच्या या उत्सवाला परदेशी पर्यटकांची गर्दी तर उसळतेच. पण संपूर्ण ट्युनिशियातून
मुला-बाळांना घेऊन लोक येत असतात.
प्रत्यक्ष सहारा वाळवंटात, त्यातील काही भागांत प्रवास सुरू करण्याआधी या वाळवंटाची थोडी माहिती करून घेतली, ट्यूनिशियाच्या दक्षिण व लागून असलेल्या अल्जेरियाच्या काही भागात ते पसरले आहे. हजारो मैल लांब दिसणारी पांढऱ्या वाळूची पठारं, त्यातील उंच-लहान वाळूच्या टेकड्या, मधून मधून दृष्टीस पडणारे पांढऱ्या दगडांचे डोंगर, क्वचित कोठे खजुराच्या झाडांची हिरवळ, त्याच्या आसपास राहणारे स्थानिक आदिवासी, हे सहाराचं सर्वसाधारण चित्र म्हणता येईल. या वाळवंटात जायचं तर काही बंधनं पाळावी लागतात व त्याची अंमलबजावणी अत्यंत कडकपणे होते. सागराप्रमाणे विशाल, भव्य असलेलं हे वाळवंट आकर्षक वाटलं तरी ते फार धोकादायक ठरू शकतं. वाळूचं वादळ इतकं भयानक असतं, की रस्ते, टेकड्या पूर्णतः नाहीशा होतात. गावंच्या गावं उडून जातात. होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनांची शिफारस असलेले उंट, अगर फोरव्हील गाड्या आणि स्थानिक गाईड यांच्या साहाय्यानेच वाळवंटातील सहल करणं श्रेयस्कर. वाळवंटात हवामान क्षणाक्षणाला बदलू शकतं. ६०० सें. तापमान एकदम २०-२५ डिग्रीपर्यंत उतरतं. सारंच अनिश्चित. त्यादृष्टीने सर्व काळजी व दक्षता घेऊनच प्रवास करणं योग्य. त्यासाठी काय व कोणते कपडे घालावेत आदी सूचना देण्यात येतात. प्रवासाच्या वेळी जास्तीत जास्त जड कपडे, जोरदार वाऱ्याला तोंड देऊ शकेल, असा डोक्याला गुंडाळावयाचा स्कार्फ, गळ्यात दोरी अडकवता येणारी हॅट व डोळ्यांना गॉगल्स असणं जरुरीचं असतं. सहारा वाळवंटाच्या परिसरात आमचा मुक्काम चांगला सात-आठ दिवस होता. फोरव्हील लँडक्रूझर व काही ठिकाणी उंटावरून प्रवास करून आम्ही निरनिराळ्या भागांतील जास्तीत जास्त प्रदेश पाहणार होतो. त्यामुळे वाळवंटातील खरं जीवन अनुभवता येणार होतं.
पहिली उत्सुकता होती ती सहारातील पारंपरिक घरं पाहण्याची. त्यासाठी 'मटमटा' परिसरात आलो. येथील सौंदर्य काही वेगळंच म्हणावं लागेल. लांबवर पसरलेल्या पठारावर काही ठिकाणी उभी असलेली हिरवीगार खजुराची झाडं मोठी उठून दिसत होती. थोडं पुढे गेल्यानंतर, पहिल्या दृष्टिक्षेपात, डोंगर पोखरून त्यात काही घरं बांधलेली दिसली. त्यांचं स्वरूप एकदम निराळंच वाटतं व ती पटकन ओळखूही येत नाहीत. रोमन काळापासून येथे या पद्धतीची घरं बांधण्यात येऊ लागली. कडक उन्हापासून बचाव व शत्रूपासून संरक्षण हे दोन्ही हेतू लक्षात घेऊन, त्यांची रचना झालेली दिसते. ही घरं
म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक सर्वोत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. तांबड्या-पांढऱ्या मातीच्या एका टेकडीजवळ आम्ही आलो, तेव्हा समोर दिसली, एक छोटी गोल आकाराची विहीर. वाळवंटात सर्वात मोठं दुर्भिक्ष म्हणजे पाण्याचं. जेमतेम ५० ते १०० मि.मी. पाऊस पडतो. पंधराशे मीटर्स खोल जाऊनही पाणी लागत नाही व लागलं तर ते खारं. त्यामुळे डोंगरावरून येणारं पाणी पाईपच्या साहाय्याने या विहिरीत साठवण्यात येतं. त्याच्या बाजूलाच घरात शिरण्यासाठी एक छोटा गोलाकार दरवाजा होता. त्यावर माशाचं व पंजाचं चित्र छापण्यात आलं होतं. पंजा म्हणजे इस्लामचे पाच स्तंभ व मासा याचा अर्थ, वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन घरातील सर्वांचं चांगलं व्हावं.
दरवाजातून आत गेल्यानंतर समोर होतं, मस्त सारवलेलं अंगण (कोर्ट यार्ड). त्याच्या भोवताली डोंगर फोडून छोट्या-मोठ्या आकारांच्या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या घरात एकूण बारा जणांचं कुटुंब राहत होतं. मुख्य व्यवसाय अर्थातच शेती. कुटुंबातील पुरुष मंडळी कामावर गेली होती.
त्यामुळे सर्वत्र महिलांचाच वावर दिसत होता. बहुतेक खोल्या जमिनीच्या पातळीवर पण एक-दोन मात्र वरती होत्या. तेथे चढून जाण्यासाठी चक्क पायऱ्या होत्या. एका खोलीत गेलो. ती झोपण्याची खोली होती. खोलीची उंची चांगली आठ-दहा फूट खोलीत साडेतीन चार फूट उंचीचा ओटा बांधण्यात आला होता. कुटुंबातील मुख्य पुरुष ओट्यावर व बाकी सर्वजण खाली झोपतात. अशा एकाला एक लागून झोपण्याच्या दोन-तीन खोल्या होत्या. त्याच्या शेजारीच बसण्याची खोली. चांगली स्वच्छ. येथे सतरंज्या पसरलेल्या. लागूनच स्वयंपाकगृह होतं. तेथे एक-दीड फूट उंचीचे लांबलचक ओटे व त्यावर जुनी, पारंपरिक भांडी ठेवली होती. पूर्वी खजुराच्या झाडांचा पालापाचोळा जाळून त्यावर स्वयंपाक होत असे. आता अनेक ठिकाणी सर्रास गॅसचा वापर केला जातो. मध्यभागी असलेल्या अंगणात, टेराकोटा दगडापासून बनवलेली एक भलीमोठी भट्टी (ओव्हन) होती. जात्यावर दळण्यात आलेल्या पिठापासून बनवलेल्या रोट्या (ब्रेड) त्यावर भाजण्यात येतात. आम्हालाही मधाबरोबर या गरमागरम रोट्या खाण्यास देण्यात आल्या. पंचतारांकित हॉटेलातही मिळणार नाही अशी ती डिश वाटली.
डोंगर पोखरून बांधण्यात आलेल्या वाळवंटातील या घरांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, बाहेर कितीही गरम असलं तरी, येथील प्रत्येक खोलीत वर्षभर १७० सें. पर्यंत तापमान राहतं. त्यामुळे यातील वास्तव्य सुखकर न झालं तरच नवल. आता मटमटा गाव व परिसर पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. त्यामुळे ही पारंपरिक घरं त्यांचं मूळ स्वरूप कायम ठेवून सजवण्यात येतात. याच पद्धतीने बांधण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये दुपारचं जेवण घेतलं. बाहेरचं तापमान ४५०-५०० सें. होतं. पण हॉटेलमध्ये कोणताही एसी, पंखे नसताना थंडगार. बरोबरच्या गोऱ्या पर्यटकांना 'चिल्ड बिअरची' आठवणसुद्धा होत नव्हती.
सहारातील बर्बर्स ही जमात डोंगरात राहत असे. त्यांची प्राचीन काळातील घरं चेनिनी व क्युलेड सोल्ताने कसर या अगदी दक्षिणेकडच्या गावात आजही पहायला मिळतात. म्हणून तिकडे गेलो. विशेषतः चेनिनीमध्ये ती अतिशय उत्तमरीत्या जतन केली आहेत. ही घरं डोंगरात खुराड्यांसारखी दिसतात. राहण्याबरोबरच प्रामुख्याने धान्य साठवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जायचा. त्यांना स्थानिक भाषेत Ksour असं म्हटलं जातं. डोंगरात भुयारं खणून त्याचा राहण्याकरता, साठवणुकीकरता वापर होत असे. येथील 'सेव्हन स्लीपर्स मॉस्कही' पाहण्यासारखी आहे. त्याच्या मागे एक दंतकथा आहे. तिसऱ्या शतकात रोमन सम्राटाच्या त्रासापासून बचाव करण्याकरता, ख्रिश्चन बर्बर्स लोकांनी या गुहांचा आश्रय घेतला. पण त्यांचा शोध लागला व त्यांना पकडण्यात येऊन येथील जमिनीखालीच जिवंत गाडण्यात आलं. आश्चर्य म्हणजे ते मेले नाहीत. त्यांना झोप लागली. चार शतकांनंतर त्यांना जाग आली. मग ते पृथ्वीतलावर परत आले. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि अखेर त्यांचं निधन होऊन त्यांना मुक्ती मिळाली. तांबड्या दगडाच्या टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर ही पांढरीशुभ्र मशिद मोठी उठून दिसते.
ट्युनिशिया सहारा वाळवंटात, खजुराची एकूण सुमारे तीस लाख झाडं असून 'ट्युनिशिअन डेटस्' ही जगात प्रसिद्ध मानण्यात येतात. त्यामुळे भटकंतीतील दोन-तीन दिवस ओअॅसिस (वाळवंटातील हिरवळ), तेथील खजुराची झाडं, खजुराचं उत्पादन यांची माहिती घेण्यासाठी ठेवले होते. ट्युनिशियात तीन प्रकारचे ओअॅसिस आढळतात. १) सहारा वाळवंटातील २) डोंगरातील व ३) समुद्रकिनाऱ्याजवळचे. त्यापैकी वाळवंट व डोंगरातील ओअॅसिस या भागात पहावयास मिळाले. शेकडो मैल लांब पसरलेल्या सहाराच्या वाळूच्या पठारावर मधूनच तीन-चार एकरात खजुराच्या झाडांची बागायत दिसते. त्याला म्हणतात सहारा ओअॅसिस. त्याच्याच आसपास दगडाच्या डोंगरांच्या खोऱ्यातही काही ठिकाणी खजुराची अशीच हिरवळ दृष्टीस पडते. तो डोंगरातील ओअॅसिस. काही गावांमध्ये मुद्दाम थांबून खजुराच्या उत्पादनाची माहिती तज्ज्ञांना विचारली.
वाळवंटातील हे सुपीक बगिचे खरोखरच पाहण्यासारखे असतात. पाणी तसचं अन्य सोयी लक्षात घेऊन खजुराच्या झाडांची लागवड करण्यात येते. उष्ण व कोरड्या हवामानात हे पीक येतं. जमिनीत मीठ साचून राहू नये म्हणून खजुराच्या झाडांना सतत पाणी लागतं. विहिरींमध्ये पाण्याचा साठा करून, पाईपद्वारे हा पाणीपुरवठा करण्यात येतो. खजुराचं झाड वीस मीटरपेक्षा जास्त उंच जाऊ शकतं. त्याचं आयुष्य शंभर वर्षांपेक्षा अधिक व एक झाड वर्षाला शंभर किलोपर्यंत फळ देतं. प्रत्येक झाडाला खजुराचे १० ते २० घड लागतात. त्यांची लांबी कमीअधिक असते. ऑक्टोबर अखेर ते जानेवारी हा खजुराच्या फळांचा सीझन. फळं लागली, की कीटक, पाऊस, उन यांच्यापासून फळांना संरक्षण मिळावं म्हणून त्यांच्यावर प्लास्टिकची कव्हर्स घालण्यात येतात. अर्थात सर्वच ठिकाणी त्याची जरुरी नसते. तयार झालेल्या खजुरांचे घड झाडावरून खाली उतरवण्याचं काम महाकठीण व कष्टाचं. एका झाडासाठी निदान चारजण लागतात. एकजण झाडाच्या अगदी वर, एक झाडाच्या मानेजवळ, त्याखाली एक व जमिनीवर एकजण अशी रचना करण्यात येते. या कामासाठी प्रत्येक मजुराला दिवसाला जेमतेम एक दिनार (५५ ते ६० रु) रोजगार मिळतो. हा मोबदला अगदीच कमी आहे. त्यामुळे तरुणवर्ग या कामापासून दूर जात आहे.
खजुराची नर आणि मादी अशी झाडं असतात. त्यापैकी मादी झाड फळ देतं. फळांचा मोसम संपला, की मादी झाडाची सर्व पानं काढून ती स्वच्छ करतात. झाडांना खत घालण्यात येतं. मादी आणि नर झाडांच्या फुलांच्या परागकणांचं मीलन (reunion) करण्यात येतं. हे काम मार्च व एप्रिलमध्ये होतं. त्यामुळे झाडं उत्कृष्ट फळं देतात. ट्युनिशियात खजुराच्या १५० पेक्षाही अधिक जाती आहेत. खजुराचा आकार एकपासून आठ सें.मी.पर्यंत असतो. पिवळा, अगदी काळा, तांबडा किंवा बदामी रंगाचा खजूर असतो. 'Deglet nour' (डिजलेट नूर) हा हिरवा खजूर सर्वोत्कृष्ट मानण्यात येतो. त्याची किंमत इतर खजुरांपेक्षा खूपच अधिक असते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत पारदर्शी असतो. त्याची आतील बीसुद्धा दिसते. अर्थात हा खजूर प्रामुख्याने निर्यात होतो. ट्युनिशियात दरवर्षी निदान पावणेदोन ते दोन लाख टन खजुराचं उत्पादन होतं. त्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खजुराच्या व्यवसायाशी संबंधित आहे. खजुराचं झाड जणू कल्पवृक्षाप्रमाणेच असतं. त्याच्या झावळ्यांपासून अनेक वस्तू बनवण्यात येतात. पण वाळवंटात त्याचा मुख्य उपयोग, वाळूचं वादळ थोपवण्यासाठी फेन्सिंग म्हणून करण्यात येतो. झावळ्या एकमेकांत गुंफून बनवण्यात आलेले एकदोन कि.मी. लांबीचे फेन्सिंग, वाळवंटातील अनेक गावांच्या वेशीवरील लहान-मोठ्या टेकड्यांवर लावलेलं दिसतं. अर्थात मोठ्या वादळांना ते तोंड देऊ शकत नाही.
ट्युनिशिया व अल्जेरिया या दोन राष्ट्रांच्या सीमा लागून आहेत. आज आम्ही वाळवंटातून प्रवास करत या सीमेवरील तमेरजा व शिबिका या गावांत आलो. जवळजवळ सव्वाशे कि.मी.चा हा प्रवास खरोखरच चित्तथरारक होता. सर्वत्र वाळूचं पठार, वाळूच्या टेकड्या व मधून मधून दगडांचे डोंगर. त्यातून हा रस्ता ट्युनिशियन लष्कराने तयार केला आहे. आम्ही जेमतेम ४०-५० कि.मी. अंतर लँडक्रूझरने कापलं आणि वादळ सुरू झालं. वाळूचे प्रचंड मोठे भोवरे होऊन अक्षरशः गरागरा फिरत होते. समोरचं काहीच दिसत नसल्याने मोटार पंधरा-वीस मिनिटं थांबवावी लागली. बरोबरच्या गाइडने सांगितलं, की हे खूपच छोटं वादळ आहे. याच्या ७० ते ८० पट अधिक मोठी वादळं येतात. त्यात रस्ते, गावं उद्ध्वस्त होतात. मग वादळ शमल्यानंतर जेसीबी वगैरे यंत्रांच्या साहाय्याने रस्ते मोकळे करावे लागतात. गेल्या वर्षी अलास्कात फिरताना हिमवृष्टी सुरू झाली. रस्ते स्नोने भरून गेले. नंतर जेसीबीच्या साहाय्याने ते साफ करण्यात येत होते. इथे स्नोऐवजी वाळू होती. रौद्ररूप दाखवणारी निसर्गाची ही केवढी भिन्न टोकं ! गाइडच्या दृष्टीने छोटं वाटणारं वादळच आम्हाला इतकं झंझावाती वाटत होतं, की त्यापेक्षा मोठ्याची कल्पनाही करता येत नव्हती. मोटारीबाहेर पडून, वादळाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल का, या प्रश्नाला गाइडने स्पष्ट नकार दिला. दणकट लँडक्रुझर मोटारही वाळूत क्षणात गाडली जाऊ शकते. तर माणसाचं काय?...
तमेरजा व शिबिका गावं जवळ आली आणि पाण्याचे लोटच्या लोट वाहत येत असल्याचं दिसलं, गाईडने सांगितलं, की अल्जेरियात आज मोठं वादळ, पाऊस झाल्याने नद्यांना पूर आले आहेत. ते पाणी या गावांत शिरलं. १९६९ मध्ये तीन आठवडे मुसळधार पाऊस कोसळला. महापूर आला आणि त्यात नदीकाठचं तमेरजा अक्षरशः वाहून गेलं. समोर दिसत आहेत, ते त्या गावचे अवशेष. आता थोड्या उंचावर नवीन तमेरजा वसलं आहे. तमेरजा हे सीमेवरील अगदी शेवटचं गाव. तमेरजा, शिबिका दोन्ही गावं तशी अगदी जवळजवळ. सहारन् अॅटलास पर्वतराजींच्या कुशीत वसलेली. येथील लाल रंगाच्या डोंगराचे कडे अक्षरशः कातरलेले दिसतात. कडाक्याचं ऊन्ह, विचित्र हवामान, पाणी यांमुळे हे कॅनियन्स तयार झाले आहेत. अमेरिकेतील अँड कॅनियन, मेक्सिकोतील कॉपर कॅनियन आकर्षक असले तरी तसे रुक्ष वाटतात. येथील तांबडे-पांढरे कॅनियन्स अमेरिकेच्या झायान नॅशनल पार्कची आठवण करून देतात.
या डोंगरातून ठिकठिकाणी कोसळणारे पाण्याचे झरे खरोखरच पाहण्यासारखे आहेत. सुरुवातीला ते अगदी अरुंद मार्गातून, दगडांमधून मार्ग काढत येतात आणि मग त्यांचं रूपांतर छोट्या छोट्या धबधब्यांत होतं. पाण्यामुळेच या भागांत, डोंगरांच्या कुशीत खजुराची बागायत दिसून येते. हेच ते माऊंट ओअॅसिस. अत्यंत खडकाळ. डोंगरांच्या पार्श्वभूमीवर दऱ्याखोऱ्यांतील ही हिरवळ मन प्रसन्न करते.
सहारा अॅटलास माऊंटन मधील आणखी अगदी निराळे कॅनियन्स, मेटलोव्ही परिसरात पहायला मिळाले. 'रेड लीझार्ड' नावाच्या रेल्वेने पर्यटकांना तेथे नेण्यात येतं. त्या भागात फॉस्फेटच्या खाणी आहेत. त्याच्या वाहतुकीसाठी १९१० मध्ये हा रेल्वेमार्ग बांधण्यात आला. आणि त्या प्रांताच्या गव्हर्नरसाठी ही खास रेल्वेगाडी तयार करण्यात आली. आता ती पर्यटनासाठी उपलब्ध आहे. सुमारे तासादीडतासाच्या प्रवासात वाळवंटातील डोंगरांचे आगळे-वेगळे लँडस्केप, बोगदे, पूल, पाण्याचे झरे व खोल दऱ्या पहावयास मिळतात. काही ठिकाणी गाडी थांबते, आणि खाली उतरून तुम्हाला हे सर्व पाहता येतं, भरपूर फोटो काढता येतात. निसर्गाचा हा चमत्कार थक्क करणारा आहे.
"आता आपण पाच हजार चौ.कि.मी. क्षेत्रफळातील आणखी एक अद्भुत प्रकार पहायला आलो आहोत." आमचा टूरगाइड अस्मान म्हणाला. हे भव्य पठार उन्हाळ्यात मिठाच्या कणांनी व्यापलेलं असतं आणि पावसाळ्यात त्याचं रूपांतर मिठाच्या सागरात होतं. डाऊज आणि Chott El-Dje-rid यांच्या दरम्यान हे दृश्य दिसतं. येथे बाष्पीभवन हळूहळू होतं. त्यामुळे प्रत्येक मोसमात याचे रंग पालटतात. कधी भडक निळा, कधी गुलाबी तर कधी व्हॉयोलेट अशी रंगसंगती तेथे उधळताना दिसते. त्यामधून रस्ता बांधण्याचं कठीण काम ट्युनिशियन लष्कराने यशस्वीरीत्या पार पाडलं. पूर्वी उन्हाळ्यात या रस्त्यावरून मोटारीने प्रवास करणं फार धोकादायक होतं. कारण प्रखर सूर्यप्रकाश व कमालीची उष्णता यांमुळे येथे मृगजळाची भीती असायची. हा रस्ता तयार होण्याआधीच्या रस्त्याची पातळी सागराला लागून होती. त्यामुळे ड्रायव्हर मृगजळात फसावयाचे. आणि त्या विशाल सागरात ड्रायव्हर व मोटार यांचा पत्ताही लागायचा नाही.
हा सागर पार करून पुढे गेलं, की दिसतात त्या दोन-तीन फुटांपासून पाच-सहा फुटांपर्यंत उंचीच्या व आठ-दहा फूट क्षेत्रफळाच्या तांबड्या दगडाच्या छोट्या टेकड्या. ऊन्ह, वारा, पाऊस यांमुळे वाळूला नानाविध आकार प्राप्त झाले आहेत. अशा अनेक टेकड्या या भागात आहेत. इथेच आम्हाला वाळवंटातील लांडग्याचं पिल्लू बघायला मिळालं. त्याचे कान टोकदार व डोळे बटबटीत होते. मोठ्या आकाराच्या पाली किंवा हॉर्नेड व्हायपर हे सरपटणारे प्राणी वाळूत लपून राहतात. येथील टोकाच्या हवामानात ही जनावरं चांगली टिकाव धरतात. आणि पाण्यावाचून कितीही दिवस राहणं हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य.
स्कँडेनेव्हियाच्या दौऱ्यात तेथील मुख्य प्राणी रेनडिअरची चांगली माहिती मिळाली होती. त्यामुळे इथे उंटाबद्दल कुतूहल होतं. उंट हा प्राणी पाण्याशिवाय एक महिना सहज राहू शकतो. वाळवंटात सामान वाहून नेण्यासाठी त्याचा सर्वात मोठा उपयोग होतो. पाठीवर १५० ते २०० किलो सामान घेऊन, रोजचा १५० कि.मी.चा पल्ला तो गाठू शकतो. वाळवंटातील सर्व मिरवणुका उंटावरून निघतात. लग्न समारंभाच्यावेळेस तर त्याला चांगलं सजवण्यात येतं. त्याच्यावर रंगीबेरंगी अंबारी चढवण्यात येते. आणि अंबारीत, बंद पडद्याआड बसवून, वधूला वाजत-गाजत लग्नमंडपात आणण्यात येतं, असा एक सोहळाही पहावयास मिळाला. त्यावेळी पारंपरिक वाद्यांनी, संगीत वाजवण्यात येत होते. उंटाचं दूध व मांसही फार लोकप्रिय आहे. उंटाच्या कातडीपासून बूट, पर्सेस बनवण्यात येतात. सहारात तग धरू शकणारा, आणखी एक प्राणी म्हणजे बोकड. तो कागद खाऊनही आपली भूक भागवू शकतो.
सहारा वाळवंटात आठ-नऊ दिवस भरपूर भटकंती केली आणि जास्तीत जास्त प्रदेश पाहिला. हा एक अगदी निराळा अनुभव होता. पृथ्वीतलावर निसर्गाची किती भिन्नभिन्न रूपं दिसतात, याची पुन्हा एकदा प्रचीती आली.
जं गलांचा फेरफटका मारणं, त्यातील दुर्मीळ जनावरांचा शोध घेणं, त्यांची माहिती मिळवणं यात एक निराळंच 'थ्रिल' असतं. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील 'क्रुगर नॅशनल पार्क'मधील तीन दिवसांच्या मुक्कामात याचा अनुभव घेतला होता. त्यामुळेच यावेळेस केनया व झिंबाब्वे 'इथले विविध पार्क्स (इथे जंगलांना पार्क म्हणतात) मध्ये मनसोक्त फिरायचे, 'बिग 5' प्राण्यांना जास्तीत जास्त जवळून पाहायचं यासाठी जवळजवळ बारा-तेरा दिवसांची सहल आयोजित करून घेतली. मुख्य म्हणजे ही सफर कोणा सहल कंपनीबरोबर नव्हती. त्या क्षेत्रातील माहितगारांकडून त्याची व्यवस्थित आखणी केली होती. त्यामुळे आम्हाला 'जंगल लाईफ' खूप जवळून पाहता व अनुभवता आलं.
जंगल म्हटलं म्हणजे आपल्याकडचं जे चित्र समोर येतं; ते म्हणजे घनदाट झाडी व त्यात लपलेली जनावरं. पण आफ्रिकेत जंगलांचं स्वरूप निरनिराळं आहे. काही ठिकाणी उंच, घनदाट झाडांचं जंगल आहे तर, बऱ्याच ठिकाणी झुडुपांचं व सुकलेल्या गवताचं. ही झुडुपं किंवा गवतही कमरेपेक्षा जास्त उंचीचं असू शकतं. पण घनदाट झाडीपेक्षा या झुडुपांत किंवा गवतात जनावरांचा शोध घेणं त्यामानाने सोपं जातं. अर्थात जंगलांत फिरताना 'चिकाटी' आणि 'नशीब' या दोन बाबी फार महत्त्वाच्या असतात. चार-चार दिवस भटकंती करूनसुद्धा दुर्मीळ जनावरं दृष्टीसही पडत नाहीत. पण एखादा दिवस असा उजाडतो की, सिंह, लेपर्ड, चित्ता, पांढरा गेंडा या सर्वांचंच अगदी जवळून दर्शन होतं. त्यांच्या बारीकसारीक हालचाली पाहता येतात. कॅमेरात टिपता येतात. जणू साऱ्या श्रमाचं चीज होतं. तो क्षण अक्षरशः अत्यानंदाचा असतो.
केनयाच्या नैरोबी विमानतळावर उतरल्यानंतर 'आफ्रिकन क्वेस्टर' कंपनीच्या प्रतिनिधीने 'जॅबो' (म्हणजे हॅलो) म्हणत आमचं स्वागत केलं. आम्हीही त्याला 'मसुरी' (फाईन) असं प्रत्युत्तर दिलं. तेथील नऊ दिवसांच्या भटकंतीत फरीद हा आमचा ड्रायव्हर कम् गाइड असणार होता. प्रवासाच्या सुरुवातीला केनया सफारीची त्याने जी माहिती सांगितली, विविध जनावरांवरील जी पुस्तकं वाचायला दिली त्यावरून तो या विषयातील एक चांगला जाणकार असल्याचं आमचं मत झालं सहलीच्या अखेरीस तर त्यावर शिक्कामोर्तबच करावं लागलं.
या सफरीत आम्ही माऊंट केनया, सांबारू, अॅबरडटस्, लेक नकुरू व मसाईमारा इथल्या पार्कमध्ये फिरणार होतो. पहिला मुक्काम होता माऊंट सफारी क्लबमध्ये. अत्यंत अलिशान अशा या क्लबचे विन्स्टन चर्चिल हे संस्थापक सदस्य. अनेक नामांकित व्यक्तींनी इथे वास्तव्य केलं आहे. नयनरम्य परिसर व माऊंट केनयाच्या उतारावर तो असून, ५,१९९ मीटर्स उंचीवरील माऊंट केनयाचं शिखर इथून दिसतं. ते शिखर सर करणं ही सर्वच गिर्यारोहकांची इच्छा असते. ग्लेशिअर्स, रानटी हत्ती, म्हशी यांचे अडथळे पार करून त्यात यशस्वी होणारे धाडसी पर्यटकही मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
केनया सफारीत रोज सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी सुमारे चार-पाच तासांचा 'गेम ड्राईव्ह' (जंगलातील भटकंती) करण्याचा कार्यक्रम होता. संपूर्ण प्रवासासाठी इथे चांगल्या मजबूत मॅटेडोर गाड्या उपलब्ध होत्या. थोडे जास्त पैसे मोजले तर फोरव्हीलर्सचीही व्यवस्था होती. जंगलांतील खराब व अरुंद रस्त्यांवर त्यामुळे प्रवास बराच सुकर होतो. जंगलांत फिरताना या मोटारीचं छप्पर उघडण्यात येतं. त्या छपरातून जनावरांना अगदी जवळून पाहून त्यांचे मनसोक्त फोटोही काढता येतात. तसंच या प्रत्येक मोटारीत एक वायरलेस सेट असतो. त्यामुळे जंगलात फिरणाऱ्या सर्व वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहतो. आणीबाणीच्या प्रसंगी तर त्याचा उपयोग होतोच पण कुठे काय जनावरं आहेत, तिथे लगेच जा - अशा प्रकारच्या सूचनाही एकमेकांना देता येतात.
माऊंट केनयावरून आम्ही वासोनैरो नदीच्या किनारी वसलेल्या 'सरोवा साभा लॉज'मध्ये पोचलो. या वासोनैरो नदीला दोन महिन्यांपूर्वी महापूर आला
होता. त्यात अनेक लॉजेस अक्षरशः वाहून गेली. पण त्यातून हे सरोवा लॉज बचावलं. सुदैवाने पुराचं पाणी सकाळी वाढल्याने फार मनुष्यहानी झाली नाही. या लॉजची रचना मोठी आकर्षक वाटली. जणू झाडावर उभारलेली पंचतारांकित झोपडी. या लॉजच्या समोरून जी वासोनैरो नदी वाहते तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील शेकडो मगरी. पुराच्या वेळेस या मगरी चिखलात लपून बसल्या आणि पाणी ओसरल्यानंतर परत बाहेर आल्या. किनाऱ्याच्या बाजूला निदान सहा फूट लांबीच्या अनेक अजस्त्र मगरी पडलेल्या दिसून येतात. इथे दुसऱ्या किनाऱ्यावर स्थानिक आदिवासींची वस्ती आहे. ते आदिवासी या मगरींची नजर चुकवून किनाऱ्याच्या कडेकडेने नदी ओलांडण्याचे धाडस पत्करतात. पण कधीकधी मोठा बाका प्रसंग उद्भवतो. सुस्त वाटणारी मगर एकदम चपळ बनून नदी ओलांडणाऱ्याला तोंडात पकडते. असा भयानक प्रसंग वर्षातून एखादं वेळेस दिसतो, असं तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
समुद्रसपाटीपासून सुमारे सात हजार फूट उंचावर असलेला व ७६७चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा अॅबरडरस नॅशनल पार्क हा घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध. त्यामुळे तिथे मोठ्या जनावरांचं दर्शन तसं दुर्मीळ आहे. यासाठी इथून थोड्या उंचावर जंगलात 'आर्क लॉज' उभारण्यात आलं आहे. तिथे संपूर्ण लाकडाच्या खोल्या असून, त्याच्या सभोवताली पाण्याचं मोठं डबकं आहे. तिथे अनेक जनावरं पाणी पिण्यासाठी येतात. तसेच त्याच्या जवळ प्रचंड दलदल असून त्यात निराळ्या प्रकारचं खनिजयुक्त मीठ मोठ्या प्रमाणात मिसळण्यात येतं. ते जनावरांना आकर्षित करायला उपयुक्त ठरतं. या लॉजला बाहेरच्या बाजूला काचेच्या व उघड्या गॅलरीज् असून, तिथून जनावरांचं दर्शन होतं व फोटोही काढता येतात. पर्यटकांसाठी इथे आणखी एक चांगली सोय करण्यात आली आहे. रात्रभर बाहेरच्या बाजूला फोकस लाईट असतात. गॅलरीतला बार चोवीस तास उघडा असतो. पण तुम्ही तुमच्या खोलीत झोपला आहात व दुर्मीळ जनावर पाणी पिण्यासाठी आलं तर तुम्हाला उठवण्यासाठी बेलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकदा बेल वाजली तर हत्ती आले आहेत. दोन वेळा वाजली तर ऱ्हायनो, तीनवेळा लेपर्ड व चार वेळा बेल वाजली तर काहीतरी आगळं-वेगळं दृश्य आहे असं समजायचं. मात्र या डबक्यात एप्रिल-मे महिन्यात केवळ एकदाच लेपर्ड आल्याची नोंद होती. हत्ती, जंगली म्हशी, हरणे आदींचा संचार मात्र मुक्तपणे होता. हत्ती व दुर्मीळ गेंड्यांचा वावर गॅलरीतून मस्त पाहता आला. अर्थात एप्रिल-मे महिन्यात इथे पाऊस चांगला पडतो. ठिकठिकाणी पाणी साचतं, झाडं हिरवीगार होतात. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी किंवा खाद्यासाठी फार लांब जावं लागत नाही.
केनयात जंगलतोडीची तक्रार मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यात हा पार्क तर आघाडीवर मानण्यात येतो. पूर्वी केनयात १५ टक्के जंगल होतं. ते प्रमाण आता पाच टक्क्यांवर आलं आहे. युनोच्या अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार, देशाच्या एकूण जमिनीच्या १० टक्क्यांपेक्षा कमी जमिनीवर जर जंगल असेल, तर तो देश पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध मानला जात नाही. या पार्कमध्ये जळाऊ कोळसा, तसंच इमारतींच्या बांधकामासाठी फार मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या वृक्षतोड केली जाते. जाणूनबुजून आगी लावल्या जातात. याची गंभीर दखल शासनाने व स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याजवळील एकूण जमिनीच्या १/८ जागेवर झाडं लावलीच पाहिजेत असं बंधन शासन घालत असून ही मोहीम यशस्वी करणाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यात येत आहे.
गुलाबी रंगाच्या व निदान दीड ते दोन लाख फ्लेमिंगोचं वास्तव्य असलेला नकुरू तलाव व त्याच्या आजूबाजूचा पार्क हा संपूर्ण आफ्रिकेतील महत्त्वाच्या व दुर्मीळ पक्षांचा परिसर, म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या किनाऱ्याला, फ्लेमिंगो पक्षांची गुलाबी किनार अगंदी लांबपर्यंत पसरलेली दिसते. त्यांच्याजवळ जाणं तसं कठीण. कारण ते लगेच उडून जातात. पण दुर्बिणीतून त्यांच्या हालचाली, पाण्यात तुरुतुरू पळणं, परेड खरोखरच पाहण्यासारखी असते. चव्वेचाळीस चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा नकुरू तलाव हा खाऱ्या पाण्याचा आहे. त्या निळ्याभोर पाण्यात फ्लेमिंगो आपलं अन्न शोधत असतात. फ्लेमिंगो मूळचे इथलेच. पण फेब्रुवारी-मार्च महिन्यात मात्र त्यांचं स्थलांतर टांझानियात होते. त्यांच्याखेरीज निदान ४५० जातींचे पक्षीही या पार्कमध्ये आढळून येतात. त्यामुळे पक्षीप्रेमींच्या दृष्टीने हा पार्क म्हणजे मोठा खजिनाच म्हणावा लागेल.
अत्यंत दुर्मीळ असा पांढरा गेंडा नकुरू पार्कमध्ये दिसण्याची शक्यता आहे असं गाइड फरीदने आम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याचबरोबर काळे गेंडेही इथे आहेत. फ्लेमिंगो पक्षांची रांग पाहून परतत असताना फरीदने अचानक गाडी झुडुपात घुसवली. सुरवातीला तीन-चार काळे गेंडे दिसले. त्यांच्या मागे पांढरा गेंडा चरत होता. त्याची कातडी अगदी पांढरी होती. ही पांढरी कातडी चांगलीच उठून दिसत होती. काळे व पांढरे मिळून जवळजवळ ८० गेंडे या पार्कमध्ये आहेत. पांढऱ्यांची संख्या मात्र जेमतेम १५ ते २० इतकीच आहे.
संपूर्ण आफ्रिकेत 'बिग 5' हा शब्द प्रयोग फार पूर्वीपासून परिचित आहे. हे पाच बिग कोण? सिंह, लेपर्ड-चित्ता, गेंडा, हत्ती व जंगली म्हैस. ते आकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना 'बिग 5' म्हटलं जात नाही, तर या पाचही प्राण्यांची जमिनीवरून शिकार करणं अत्यंत कठीण असतं म्हणून त्यांना 'बिग 5' असं संबोधलं जातं. त्यापैकी गेंडा, हत्ती व जंगली म्हैस यांचं मनसोक्त दर्शन आत्तापर्यंत झालं होतं. राहिलेल्या दोन पण सर्वांत महत्त्वाच्या 'बिग'चे दर्शन होणार की नाही? या प्रश्नाने मी व जयंतीने फरीदला अक्षरशः सतावून सोडलं होतं. तो बिचारा बराच धीर देत होता. पण 'एप्रिल-मे महिन्यात हे प्राणी बाहेर येत नाहीत व गवतही थोडे उंच आलं आहे. त्यामुळे काहीवेळेस त्यांचा शोध घेणं तसं कठीणच जातं अशी सारवासारवही करत होता.
लेक नकुरू ते मसाईमारा हा जवळजवळ ३५० कि.मी.चा प्रवास, आतल्या अत्यंत खराब रस्त्यामुळे त्रासदायकच वाटला. त्यात मसाईमारा येथील मारा सरोवा कॅम्पमध्ये दुपारचं जेवण घेऊन आणखी सव्वापाच हजार फूट उंचीवरच्या मारा सरिना लॉजला आम्हाला जायचं होतं. वस्तुतः तिथे जाण्यासाठी नैरोबीहून विमानाची सोय आहे. पण त्रास झाला तरी मोटारीनेच जा, कारण त्या गवतात दुर्मीळ प्राणी दिसण्याची शक्यता अधिक असा सल्ला माहीतगारांनी दिला होता.
दुपारचं जेवण आटोपून आम्ही मारा सरिना लॉजकडे कूच केलं. हवा पावसाळी होती आणि रस्ता अत्यंत खराब होता. फारसे पर्यटक तिथे जात नाहीत व जातात ते विमानाने. त्यामुळे फरीद जरा घाईतच होता. स्थानिक बिअर, टस्कर व फिलापिया मासळीवर मस्त ताव मारल्याने माझ्याही डुलक्या सुरू झाल्या होत्या. इतक्यात फरीदने गाडी एकदम थांबवली आणि जवळजवळ कमरेएवढ्या वाढलेल्या सुक्या गवतात घुसवली. 'बहुधा तिथे सिंह दिसतो आहे' या त्याच्या वाक्याने मीही खडबडून जागा झालो. जयंतीने कॅमेरा सरसावला आणि उघड्या टपातून आम्ही आजूबाजूला पाहू लागलो. मोटार जोरात जात होती आणि अचानक थांबली...
समोर वनराज गवतात मस्त आराम करत होते. थोडं पुढे गेलो तर त्यांचं सारं कुटुंबच समोर आलं. दोन-तीन सिंहीणी व त्यांची दहा बाळं. शेजारीच एक म्हैस मारली होती. दोन सिंहिणी व चार-पाच बछडे अद्याप त्या म्हशीच्या सांगाड्यातच बसून ताव मारत होते.... काहींचं भोजन पूर्ण झालं होतं तर काहींची भूक अद्याप भागली नव्हती. फरीदच्या अंदाजानुसार ही म्हैस त्यांनी काही तासांपूर्वीच मारली असावी. कारण निम्मे कुटुंबीय अद्याप ताटावरून उठले नव्हते...
'आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन' अशी आमची स्थिती झाली होती. किती फोटो काढू, कसं शूटिंग करू यात आम्ही मग्न होतो. शिकार केल्यानंतर खाण्याचा पहिला मान सिंहाचा. त्यामुळे खाऊन तृप्त झाल्याने सिंह सुस्तावला होता. त्याला बहुधा 'मी पाणी पिऊन येते. तोपर्यंत बछड्यांना सांभाळ' असं सांगून एक सिंहीण निघून गेली. जाताना ती सिंहाच्या जवळ जाऊन एक मिनिट भर थांबली... त्यांच्यात खरोखरच असाच संवाद झाला असेल का? आता सर्व सिंह कुटुंबीय आमच्या मोटारीच्या सावलीत अगदी मोटारीला खेटून पहुडलं. फरीदने गाडी केव्हाच बंद केली होती. अजिबात हालचाल न करण्याच्या सूचना तो आम्हाला खुणांद्वारे करत होता. समजा, सिंह किंवा सिंहिणीने जेमतेम दोन-तीन फूट उंचावरील उघड्या छताच्या दिशेने उडी घेतली असती तर... सारंच चित्तथरारक होतं. आम्हाला लवकर पोहोचायचं होतं. हे तर आम्ही कधीच विसरून गेलो होतो. एक बछडा सिंहाच्या आयाळीशी खेळण्याचा प्रयत्न करत होता. सिंहाने ते थोडावेळ सहन केलं. पण नंतर एक हलकासा पंजा मारून, 'त्रास देऊ नकोस' म्हणून बछड्याला सुनावलं. हे सर्व नाट्य जवळजवळ अर्धा-पाऊण तास चाललं होतं..... जणू डिस्कव्हरी चॅनेल... फरक एवढाच होता, की यावेळी आम्ही केवळ तिघं त्याचे साक्षीदार होतो. अखेर फरीदने गाडी सुरू केली. सिंह, दोन सिंहिणी, सहा-सात बच्चे थोडे बाजूला झाले. त्यांना काहीही इजा पोहोचणार नाही अशा दक्षतेने फरीदने तिथून गाडी काढली.
पुढच्या प्रवासात जंगलाच्या या राजाची जी वैशिष्ट्यं समजली ती फारच उद्बोधक वाटली. दिवसाचे जवळजवळ वीस तास सिंह हा आळसटून पडलेला असतो. बहुतेक शिकार सिंहिणीच करतात. मात्र कुठेही त्या अडचणीत असतील, तर मात्र तो त्यांच्या मदतीला धावतो. तो क्वचित शिकारही करतो. वस्तुतः सिंह तासाला ६० कि.मी.च्या वेगाने पळू शकतो. पण त्याचा स्टॅमिना खूपच कमी असतो. त्यामुळे त्याला शिकार करायची असेल तर पहिल्या २०० मीटर्सच्या टप्प्यातच तो सावज पकडतो. अन्यथा सोडून देतो. त्याचं कुटुंब हे सर्वसाधारणतः तीस जणांचं असतं व आयुष्य १५ ते २० वर्ष. सिंहाला जंगलात तसा एकही शत्रू नाही. तरस (हायना) त्याची पिल्लं पळवितात व खातात. मात्र मोठ्या सिंहावर किंवा सिंहिणीवर हल्ला करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. पण विशेष म्हणजे नैसर्गिकरित्या मेलेल्या सिंहाचा सांगाडा
शक्यतो कधीच मिळत नाही. कारण वृद्धत्वाने किंवा आजाराने सिंह मरायला टेकला की त्याचा वास तरसांना बरोबर येतो व ते त्याचा पुरता फडशा पाडतात. सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे मनुष्यप्राणी. त्या भागातही मनुष्यप्राण्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच सिंहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे...
'बिग 5'च्या दर्शनाच्या बाबतीत यावेळी आमचं ग्रहमान चांगलंच अनुकूल आहे याची झलक तर मिळाली होती. मारा सरिना लॉज अगदी उंचावर बांधलं आहे. प्रत्येक खोलीतून समोरच्या जंगलाचा परिसर मस्त दिसतो. खोलीत पाऊल टाकलं आणि थोड्या अंतरावर हत्तींच्या कळपाचं दर्शन झालं. बबून (अजस्त्र माकडं) पासून सावध राहण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात रोज निदान सहा-सात तासांचा गेम ड्राईव्ह करायचा होता. त्यासाठी साधारणतः पाच-सहा गाड्या एकदम बाहेर पडतात व शक्यतो बरोबर राहतात. एखादी गाडी जंगलातील चिखलात फसली, रस्ता चुकला किंवा काही बाका प्रसंग निर्माण झाला तर मदत मिळावी हा त्यामागचा हेतू.
एकदा दुपारच्या वेळेस रस्त्यावर पाच-सहा गाड्या उभ्या होत्या व सर्वांचं लक्ष थोड्या दूरवर असलेल्या झाडाकडे होतं. आम्हीही त्या तांड्यात सामील झालो. कॅमेरा, दुर्बीण त्याच झाडाच्या दिशेने रोखली तर झाडाच्या फांदीवर एक लांबलचक लेपर्ड बसला होता. शेजारीच त्याने मारलेलं हरिण लटकत होतं. लेपर्डच्या मानेत जबरदस्त ताकद असते. त्यामुळेच मारलेलं जनावर ओढत तो झाडावर चढवू शकतो. लेपर्ड व चित्ता यांच्यात फरक आहे. लेपर्डची शेपटी लांब असते व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात. लेपर्ड सर्वसाधारणपणे सूर्यास्ताच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस शिकार करतो. त्याची दृष्टी व श्रवणयंत्र फार तीक्ष्ण असते. त्याचं आयुष्य साधारणतः वीस वर्षापर्यंत असतं. त्याच्या कातड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त मागणी आहे.
एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास आम्ही मोटारीने लॉजच्या मागच्या बाजूस गेलो. तिथून एक छोटी नदी वाहत होती. त्या ठिकाणी काही जनावरं दिसतात का याचा शोध घ्यायचा होता. आमच्याबरोबर आणखी एक गाडी होती. आम्ही पुढे निघून जात होतो. इतक्यात वायरलेसवरून संदेश आला, की लगेच मागे फिरा. सुमारे पाचशे मीटर्स मागे आलो तर समोर चित्तीण व तिची तीन बाळं उभी होती. तिच्या हालचाली कमालीच्या मोहक होत्या. बच्चे कंपनीही रुबाबात आईबरोबर उभं राहून जणू आम्हाला फोटोसाठी पोज देत
होते. चार-पाच मिनिटं हे फोटो सेशन झालं आणि समोरच्या गवतात सर्व कुटुंब गायब झालं. अवघ्या काही सेकंदांत तिथे आणखी एक मोटार आली. चित्तीण जेमतेम शंभर मीटर अंतरही गेली नसेल. पण गवतात ती दिसेनाशी झाली... त्या मोटारीतील लोकांची निराशा झाली. आम्ही मात्र सुदैवी ठरलो होतो... चित्ता हा जगातील सर्वात चपळ प्राणी. तो तासाला १०० कि.मी.च्या वेगाने पळतो. पण त्याचा हा वेग पहिल्या ५०० मीटर्सपर्यंतच असतो. त्याचं शरीर गोंडस, लवचीक, छाती भरदार व मुख्य म्हणजे पाय लांब असतात. शिकार करण्याची त्याची पद्धत निराळी असते. तो आपल्या सावजाच्या जवळ दबकत, दबकत जातो आणि एकदम हल्ला चढवतो. त्या जनावराला गुदमरून टाकून तो त्याला मारतो व शिकार लगेच खायची नसेल तर पालापाचोळ्याने झाकून ठेवतो. अन्यथा तरस त्या आयत्या मिळालेल्या शिकारीवर डल्ला मारतात.
हत्ती आणि पाणगेंडे यांच्या वजनाची माहिती मजेशीर आहे. आफ्रिकन हत्ती साधारणतः ३.२ मीटर्स उंच असतो व त्याचं वजन सहा हजार कि. ग्रॅमपर्यंत असतं. हत्तीचं आयुष्य ७० वर्षांपर्यंत असतं. गेंड्याचं वजन १४८० कि.ग्रॅम व मादीचं १३६० कि. ग्रॅम असतं. इथे ठिकठिकाणी दिसणाऱ्या झेब्यांचे दोन प्रकार आढळतात. एक गाढवासारखा तर दुसरा घोड्यासारखा. जिराफांचं वर्गीकरणही तीन प्रकारांत केलं जातं. जास्तीत जास्त वजनदार जिराफ ११०० कि. ग्रॅमचा आढळून आला आहे. माकडांचे एकूण सहा प्रकार आहेत. उंच बबून चांगलेच आक्रमक असतात व त्यांची टोळी धोकादायक ठरू शकते. केनयाच्या जवळजवळ साडेतीन-चार हजार कि.मी.च्या भटकंतीत विविध प्राण्यांविषयी खूपच माहिती मिळाली.
केनयाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने चार प्रकारच्या उत्पन्नांवर आधारित आहे. ते म्हणजे- १) पर्यटन, २) कॉफी, ३) चहा व ४) फुलं (गुलाब). त्यात पर्यटनाचा क्रमांक पहिला आहे. केनया सरकार पर्यटन क्षेत्र विकसित करायचा खूपच प्रयत्न करत आहे. पर्यटकांनी जंगलात फिरताना काय दक्षता घ्यावी याचे नियम करण्यात आले आहेत. उदा. मोटारीतून फिरताना शक्यतो मुख्य रस्ता सोडून आत जाऊ नये, अगदी दुर्मीळ प्राणी दिसला तरच झुडुपांत शिरावं, पण परत लवकरात लवकर मुख्य रस्त्यावर यावं, जनावरांच्या जवळ बोलू नये, टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खायलाही घालू नये, सिंह, गेंडा, लेपर्ड-चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त वाहनांनी थांबू नये, जनावरांचा पाठलाग करू नये व त्यांना त्रास देऊ नये इत्यादी.... या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड करून त्वरित पार्क बाहेर काढण्याचे अधिकार रेंजर्सना आहेत. सरकार याबाबत अतिशय दक्ष असल्यानेच केनया सफारीला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
केनया
लोकसंख्या : अंदाजे
खंड : आफ्रिका
३,११,३२,७३७.
राजधानी : नैरोबी
चलन : केनियन शिलिंग.
क्षेत्रफळ : सुमारे ५,८२,६४६ चौ. कि.मी.
भाषा : स्वाहिली व इंग्रजी.
कसे जाल?
केनयासाठी विमानतळावर 'ऑन अरायव्हल' व्हिसा. पण इथेही सारा थंडा कारभारच आहे. मुंबईहून केनया एअर लाईन्सने नैरोबीला जाता येतं. केनयाची सहल, आपण स्वतः इंटरनेटवरून किंवा एजंटमार्फत आखून घ्यावी. जास्त लोकांचा ग्रुप असला तर खर्च खूपच कमी येतो. केनयाच्या विविध भागांत फिरण्यासाठी मोटारीची व्यवस्था असते. जंगल भटकंतीसाठी आठ-दहा दिवस तरी हवेतच.
कधी जाल?
जुलै-ऑगस्ट हा सर्वोत्तम सीझन. स्थलांतर करताना जनावरांचे तांडेच्या तांडे दृष्टीस पडतात.
सुरक्षितता :
पर्यटकांना तसा धोका नसला, तरी वस्तू खरेदीत फसवाफसवी वगैरेंपासून सावध राहण्याची खबरदारी घ्यावी. टूर गाइडच्या सूचनांचं व्यवस्थित पालन करावं.
जगातलं एक आश्चर्य :
व्हिक्टोरिया फॉल्स
गात तीन धबधबे हे आश्चर्यकारक मानण्यात येतात. अमेरिका-कॅनडा ज इथून दिसणारा सर्वपरिचित कारक मानण्यात येतात. अमेरिका कॅनडा 'इग्वासू' आणि झिंबाब्वे व झांबियामधील 'व्हिक्टोरिया.' यापैकी आमचे पहिले दोन पाहून झाले होते. त्यामुळे व्हिक्टोरियाचं दर्शन घेण्याची योजना आखली. झिंबाब्वेचा व्हिसा ही फार मोठी डोकेदुखी असते. कारण तो भारतातून देण्यात येत नाही. झिंबाब्वेची राजधानी हरारे येथे सर्व कागदपत्रं पाठवण्यात येतात व तिथून त्याची मंजुरी मिळते. याला निदान अडीच-तीन महिन्यांचा कालावधी लागतो व त्यात व्हिसा नाकारण्याचं प्रमाणच अधिक असतं. पण या सर्व अडचणींवर मात करून मी आणि जयंती अखेर व्हिक्टोरिया फॉल्सच्या छोटेखानी विमानतळावर उतरलो.
ज्या कंपनीतर्फे आमची तिथल्या तीन दिवसांची सहल आखण्यात आली होती. त्यांचा प्रतिनिधी विमानतळावर स्वागतासाठी हजर होता. विमानतळ ते व्हिक्टोरिया गाव हा प्रवास सुमारे २० कि.मी.चा. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. त्यात हत्ती, सिंह, जंगली म्हशी यांचा सर्रास वावर. रात्री तर सारे प्राणी रस्त्यावरच उतरतात. या जंगलात स्थानिक आदिवासी राहतात. पोटापुरतं धान्य पिकवायचं व त्यावर उदरनिर्वाह करायचा ही त्यांची दैनंदिनी. पण त्यांना मुख्य उपद्रव हत्तीपासून होतो. कारण हत्ती शेतांची मोठ्या प्रमाणात नासधूस करतात.
व्हिक्टोरिया फॉल्सच्या गावात व परिसरात पर्यटकांसाठी उत्तम लॉजेस् उभारण्यात आली आहेत. त्यातील सोयी-सुविधा अगदी पंचतारांकित आहेत. आमचं लॉज तर फॉल्सच्या अक्षरशः हाकेच्या अंतरावर होतं. पहिल्या दिवशी सनसेट पाहण्यासाठी झांबेझी नदीत क्रूझ सफारीचा कार्यक्रम होता. क्रूझमध्ये प्रवेश करताना, स्थानिक आदिवासी पारंपरिक नृत्याने तुमचं स्वागत करतात. एक तासाच्या सफारीत व्हिक्टोरिया फॉल्सच्या मिस्टचं मस्त दर्शन झालं. ते पाहून फॉल्सबद्दलचं कुतूहल आणखी वाढलं. झांबेझी नदीच्या दुतर्फा काही बेटं आहेत. त्यातील जंगलांत, किनाऱ्यावर नानाविध जनावरांचं दर्शन होतं. विशेषतः तीन-चार पाणघोडे नदीत डुंबत असल्याचं पहायला मिळालं. क्रूझ फेरीत 'झांबेझी' नावाचीच स्थानिक बिअर चाखली. थोडीशी गोड पण चवदार बिअर झिंबाब्वेची आठवण कायम ठेवते.
आता आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती फॉल्स प्रत्यक्ष पाहण्यासाठी. प्रत्येक धबधब्याची काही खास वैशिष्ट्यं असतात. तो कुठून व कसा चांगला दिसतो हे फार महत्त्वाचं असतं. उदा. नायगारा, अमेरिकेपेक्षा कॅनडाच्या दिशेने जास्त आकर्षक वाटतो. नायगाराच्या दोन्ही बाजूंना आम्ही दोन-दोन दिवसांचा मुक्काम केला होता. कॅनडात फॉल्सला अगदी लागून असलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये ३२व्या मजल्यावर आमची खोली होती. तिथून नायगाराचं घोड्याच्या नालासारख्या आकाराचं अगदी हुबेहूब दर्शन व्हायचं. नायगाराला कॅनडाच्या बाजूने रात्री रंगीबेरंगी दिवे सोडण्यात येतात. तो झगमगाट मात्र अमेरिकेच्या दिशेने नजरेत भरतो. तीच कथा इग्वासूची. हा धबधबा ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधून दिसू शकतो. पण ब्राझीलमधून त्याची भव्यता खऱ्याखुऱ्या अर्थाने अनुभवाला येते. नायगारा हा एकाच ठिकाणाहून कोसळतो. इग्वासू हा विस्तीर्णपणे पसरला आहे. सुमारे तीन-साडेतीन कि.मी.च्या टप्यात त्याचं पाणी पडतं. याचे एकूण २०० ते ३०० लहान-मोठे धबधबे आहेत. अर्थात त्याचा निश्चित आकडा कोणीच सांगू शकत नाही. काही ठिकाणी त्याची उंचीही कमी-अधिक म्हणजे २५०-३०० फुटांपासून २५ ते ३० फुटांपर्यंत तर कुठे तो दोन-तीन टप्प्यांत कोसळताना दिसतो.
अमेरिका व कॅनडा या दोन्ही श्रीमंत राष्ट्रांनी, नायगाराच्या अगदी जवळ जाऊन किंवा धबधब्याच्या पोटात शिरून धबधबा पाहण्यासाठी, अत्याधुनिक साधनांच्या साहाय्याने आकर्षक व सुरक्षित सोयी उपलब्ध केल्या आहेत. तेवढी उत्तम व्यवस्था इग्वासू किंवा व्हिक्टोरिया पाहताना नाही. इग्वासू धबधब्याच्या बाजूने थोड्या अंतरावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांवरून उतरताना धबधब्याचा विस्तीर्णपणा अनुभवता येतो. अर्थात तो एका दृष्टिक्षेपात दिसत नाही. पायऱ्यांनी जसजसं पुढे जाऊ, तसतसं अधिकाधिक धबधबे दिसू लागतात. व्हिक्टोरियाची शान काही निराळीच आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून त्याची गणना होते. युनेस्कोने त्याला वर्ल्ड हेरिटेजचाही दर्जा दिला आहे. फॉल्सच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर एक पूर्णाकृती भव्य पुतळा दिसतो. तो आहे डॉ. डेव्हिड लिव्हिंगस्टोन यांचा. ते स्कॉटिश मिशनरी होते. या भागात फिरत असताना १८५५ मध्ये त्यांना या धबधब्याचा सर्वप्रथम शोध लागला. तो पाहिल्यानंतर डॉ. डेव्हिड इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्या धबधब्याला आपल्या देशाच्या राणीचंच नाव देऊन टाकलं. तेव्हापासून तो 'व्हिक्टोरिया फॉल्स' म्हणूनच ओळखला जाऊ लागला.
हजारो वर्षांपूर्वी या भागात जमिनीतून वर आलेल्या लाव्हारसातून या धबधब्याची निर्मिती झाली, असं सांगण्यात येतं. हा धबधबा निरनिराळ्या उंचीवरून कोसळतो आणि ठिकठिकाणी त्याची रुंदी कमीअधिक आहे. एकूण १६ व्ह्यू पॉइंटस्वरून आपण तो पाहू शकतो. त्यासाठी रेन फॉरेस्टमधून चार-साडेचार कि.मी.चा फेरफटका मारावा लागतो. सुरुवातीला सातव्या टप्प्यावरून म्हणजे सुमारे ७० मीटर्स उंचीवरून फॉल्सचं पहिलं सुंदर दर्शन घडतं. इथे ७१ पायऱ्या उतरून खाली गेलं, की अगदी समोर म्हणजे १००-१५० फुटांवरून पांढरेशुभ्र पाणी प्रचंड वेगाने कोसळताना दिसतं. पण इथे धबधब्याची रुंदी खूपच कमी आहे. तो एखादा मोठा ओढाच वाटतो. त्यानंतरचा थांबा आहे ९३ व ९५ मीटर्सवरचा. इथे त्याची रुंदी सर्वात जास्त म्हणजे सुमारे ८३० मीटर्सपर्यंत पसरली आहे. जणू पाण्याचा पांढराशुभ्र सलग पडदा.... त्याचा आकार नायगाराच्या दुप्पट आहे. रेनकोट, छत्री असूनही आम्ही अक्षरशः ओलेचिंब झालो होतो. तेथील वारा व पाण्याचा मारा रेनकोट, छत्री यांना अजिबात दाद देत नाही. फोटो काढणं, शूटिंग करणं अशक्य होत होतं. जयंती फोटो काढत असताना तिच्या डोक्यावर छत्री धरण्याचं काम मला सतत करावं लागत होतं. नव्हे प्रत्येक पर्यटकांची तीच अवस्था झाली होती. इथे आम्ही व फॉल्स यात १५०-२०० मीटर्स एवढं अंतर होतं. या व्ह्यू पॉइंटवर धबधबा पाहण्याची बऱ्यापैकी व्यवस्था करण्यात आली असून आजूबाजूच्या रेनफॉरेस्टमुळे नैसर्गिक वातावरण कायम राहिलं आहे. व्हिक्टोरियाची एकूण रुंदी आहे १.७ कि.मी. पावसाळ्यात दरसेकंदाला १० हजार लीटर्स या वेगाने पाणी कोसळतं. एप्रिल व मे महिना म्हणजे या फॉल्सची जास्तीतजास्त मजा लुटण्याचा सीझन. आम्ही १५ मेला तिथे होतो. त्यामुळे त्याचं सर्वोच्च सुंदर रूप आमच्यासमोर उभं होतं. आम्ही आणखी पुढे जाऊ लागलो, तसतसं धबधब्याचं अधिकाधिक अप्रतिम दर्शन होऊ लागलं. पण आता 'मिस्ट'मुळे सर्वत्र जणू पांढरं धुकं पसरलेलं दिसे. इतक्यात थोडं ऊन्ह आलं, की क्षणार्धात विस्तीर्ण धबधबा दिसून येई. त्या अचूक वेळी फोटो टिपणं ही खरोखरच कसोटी. पण आमच्या सुदैवाने ते क्षण बऱ्याचदा आले. त्याचवेळी समोर वेळोवेळी तयार होणाऱ्या इंद्रधनुष्याची बहार काय वर्णावी ?
धबधब्याची त्यानंतरची उंची १०१, १०५ व सर्वांत उंच १०८ मीटर्स.
इथून व्हिक्टोरियाचं रूप म्हणजे केवळ पांढऱ्या ढगांचे लोट ! त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभं राहणंही अशक्य. १०५ व १०८ मीटर्स उंचीवर धुमझोड पाऊस आणि इंद्रधनुष्याची कमान ! समोर काही दिसतच नव्हतं. फक्त पाणी कोसळण्याचा प्रचंड मोठा आवाज.... सारंच अद्भुत ! व्हिक्टोरिया व इग्वासू यांच्यात आणखी एक मोठा फरक आढळला. इग्वासू धबधब्याचं पाणी पावसाळ्यात मळकट, तांबडं झालं होतं. कारण इग्वासू नदीत चिखलाचं पाणी आलं होतं. त्यामुळे इग्वासूची शान नाही म्हटले तरी कमी वाटली. याउलट झांबेझी नदी मात्र पांढरी शुभ आहे. जणू दुधाचा महासागर. त्यामुळे त्याचा डौल काही वेगळाच वाटला, हे मान्य करावं लागलं.
आता धबधब्यापासून आम्ही थोडे दूर गेलो. पाऊस, मिस्ट खूपच कमी झालं आणि शांत झांबेझी नदीचं दर्शन घडलं. समोर नदीवर बांधण्यात आलेला जुना पण कमानदार पूल दिसतो. त्याच्या एका बाजूला झिंबाब्वे तर दुसऱ्या बाजूला झांबिया. झांबियात प्रवेश करायचा तर त्या देशाचा व्हिसा लागतो. दोन उंच कड्यांच्यामधून झांबेझी, खळखळाट करत वाहते. या पुलाच्या खाली काही धाडसी खेळ खेळण्याची सोय आहे. उदा. बंजी जंप. कमरेला दोरी बांधून पाण्याच्या दिशेने १११ मीटर खोल उडी मारायची. तो नुसतं पाहून भीतीने थरकाप उडतो. या नदीवर दोन्ही बाजूंना दोरी बांधली होती. त्या दोरीवर झोपून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत सरकत यायचं. धाडसी पर्यटक इथे मोठ्या संख्येने आढळून येतात. व्हिक्टोरियाच्या मुक्कामात आणखी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे हवांगे नॅशनल पार्क. सुमारे ९० मिनिटांच्या अंतरावरील हा पार्क १४,६५० चौ.कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेला आहे. इथे जवळजवळ १०० जातींचे प्राणी, ४०० जातीचे पक्षी व ५० प्रकारचे सरपटणारे जीव आढळतात. पण इथलं मुख्य आकर्षण म्हणजे हत्ती. इथल्या हत्तींची संख्या वीस हजारांपेक्षाही अधिक आहे. व्हिक्टोरियात आणखीही पाहण्यासारखं खूप आहे.
या सफरीविषयी उपयुक्त माहिती
झिंबाब्वे
लोकसंख्या : अंदाजे
खंड : आफ्रिका
१,३०,३६,८०५
राजधानी : हरारे
चलन : झिंबाब्वेअन डॉलर्स. (अमेरिकन डॉलर्स लोकप्रिय)
क्षेत्रफळ : ३,९०,५८० चौ.कि.मी.
भाषा : पर्यटनात इंग्रजी
कसे जाल?
झिंबाब्वेचा व्हिसा मिळणं फार कठीण आहे. त्यामुळे झांबियाला जाऊन व्हिक्टोरिया फॉल्सचं दर्शन घ्यावं, झिंबाब्वेतून तो अधिक चांगला दिसतो, हे खरं असलं तरी झिंबाब्वेचा व्हिसा म्हणजे मोठी डोकेदुखी आहे. जोहान्सबर्ग किंवा नैरोबीमार्गे व्हिक्टोरियाला विमानाने जाता येतं.
कधी जाल?
व्हिक्टोरिया फॉल्स कोणत्याही देशातून पहायचा असला तरी एप्रिल-मे महिन्यातच जायला हवं. त्यावेळी पावसामुळे भरपूर पाणी असतं. नंतर तो कोरडा पडू लागतो.
सुरक्षितता :
झिंबाब्वेत 'टुरिस्ट पोलीस' पर्यटकांचे खरे मित्र आहेत. काहीही अडचण आली तर त्वरित त्यांच्याशी संपर्क साधावा.
झिंबाब्वे : थोडं कडू, थोडं गोड
दोन टोकाचे अनुभव
पर्यटनात नेहमीच नानाविध अनुभव येत असतात. काही चांगले काही वाईट. काही आयुष्यभर लक्षात राहणारे. झिंबाब्वेच्या सफरीच्या वेळी दोन अगदी टोकाचे अनुभव अनुभवायला मिळाले. पर्यटकांच्यादृष्टीने ते उपयुक्त ठरतील म्हणून मुद्दाम देत आहे.
झिंबाब्वेचा व्हिसा ही एक फार मोठी डोकेदुखी असल्याची कल्पना सुरुवातीला आली नाही. बरं! माझ्या व जयंतीच्या पासपोर्टवर आत्तापर्यंत बऱ्याच देशांचं स्टॅपिंग झालं असल्याने इथे तो नाकारला जाण्याची शक्यताही वाटत नव्हती. व्हिसासाठी कोणती कागदपत्रं जोडायची याचीही आता चांगली माहिती झाल्याने, त्यातही काही अडचण येण्याचा प्रश्न नव्हता. तरीही दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटच्या सूचनेप्रमाणे निदान तीन-साडेतीन महिने आधी कागदपत्रं सादर केली.
झिंबाब्वेत आमचा सर्व मुक्काम व्हिक्टोरिया फॉल्स इथेच होता. तिथे (आर.सी.आय. रिसॉर्ट कॉन्डेमिनियम इंटरनॅशनल) या कंपनीच्या अपार्टमेंटचं बुकिंग आम्ही केलं होतं व तसं लेखीपत्रही मिळालं होतं. आमचा मुक्काम आठवड्याचा होता. कागदपत्रं सादर केल्यानंतर सुमारे पंधरा दिवसात दिल्लीतील झिंबाब्वे कॉन्स्युलेटने कळवलं की, 'तुम्हां दोघांनाही व्हिसा नाकारण्यात आला आहे.' सुरवातीला त्याचं काहीच कारण सांगण्यात येत नव्हतं. बरीच चौकशी केल्यानंतर कळलं, की हरारे येथील इमिग्रेशन ऑफिसने, व्हिक्टोरिया फॉल्सच्या रिसॉर्टकडे आमच्या बुकिंगसंबंधी चौकशी केली. पण त्यांच्याकडे एवढ्या लवकर, बुकिंग संबंधी काहीही नोंद संगणकावर झाली नव्हती. त्यामुळे आमचा व्हिसा नाकारण्यात आला. पण बुकिंग निश्चित असेल तर लगेच अपील दाखल करा, असंही दिल्ली कार्यालयाने स्पष्ट केलं.
आम्ही लगेचच आर.सी.आय.शी संपर्क साधला. त्यांनी त्या ठरावीक काळात आमचं आठवड्याचं बुकिंग त्याच रिसॉर्टमध्ये आहे असं आणखी एक पत्र दिलं आणि फॉल्स येथील रिसॉर्टने त्वरित त्यासंबंधीचं पत्र हरारे येथील मुख्य इमिग्रेशन कार्यालयात दाखल केलं. त्या सर्वांचा संदर्भ व आवश्यक ती सर्व कागदपत्रं जोडून आम्ही अक्षरशः दोन दिवसांत दिल्ली कार्यालयात अपील दाखल केलं. त्यांनी कागदपत्रं हरारे इथे पाठवली व दहा-पंधरा दिवसांत अपिलाचा निर्णय कळेल असं सांगण्यात आलं.
पंधरावीस दिवस झाले तरी अपिलाचा काहीच निर्णय कळेना. मी दिल्ली कार्यालयाशी सतत संपर्कात होतो व रिसॉर्ट आणि आर.सी.आय. हरारे येथील इमिग्रेशन कार्यालयाकडे चौकशी करत होते.
अपिलाचं काय झालं हेच कळत नव्हतं. तेव्हा पत्रकाराच्या भूमिकेतून तेथील एकूण कारभाराची अधिक माहिती घेतली. ती फारच धक्कादायक होती. दिल्ली व हरारे यांचा ई-मेल किंवा अन्य कोणत्याही आधुनिक यंत्रसामग्रीच्याद्वारे काहीही संपर्क होत नाही. फॅक्सद्वारे दिल्लीहून हरारे इथे कागदपत्रं पाठवली जातात व व्हिसाचा निर्णय तिथून एकतर फोनवरून किंवा फॅक्सने दिल्लीला कळवला जातो. दिल्लीहून हरारे कार्यालयाशी फोनवरून आठवडा-आठवडा संपर्कही नसतो किंवा तिकडूनही काही कळवलं जात नाही. आमच्या व्हिसासाठी दिल्ली कार्यालयातील एक-दोन कर्मचारी बरीच मदत करत होते. ते हरारेला रोज फोन लावायचे. पण तिकडे फोनच उचलत नसत. कोणत्याही प्रकारे दिल्लीहून हरारेला संपर्कच साधणं अशक्य झालं होतं.
आता अपील दाखल करून जवळजवळ महिना उलटला होता. गेल्या वीस दिवसांत फक्त दोघांचे व्हिसा मंजूर झाले व तीस जणांचे नाकारण्यात आले होते अशी माहिती मला मिळाली. सारा अनागोंदीचा कारभार असल्याचं दिल्ली कार्यालयाने मान्य केलं. व्हिक्टोरियाच्या रिसॉर्टच्या मुख्य व्यवस्थापाकांचा मला ई-मेल आला व त्यांचेही प्रयत्न थकल्याचे त्यांनी कबूल केले. मग हरारे इथल्या इमिग्रेशन कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कहाण्या कानावर आल्या. तुम्ही बिझनेस ट्रिपसाठी जात असाल, तर कंपनीचा तेथील एजंट, हरारे कार्यालयात जाऊन टेबलाखालचा व्यवहार करतो आणि मग तुम्हाला व्हिसा मंजूर करण्यात आल्याचा फोन हरारेहून त्वरित येतो. वैयक्तिकरित्या जाणाऱ्या पर्यटकाला मात्र कोणीही वाली नसतो. या गोष्टी कितपत खऱ्या याची काहीच कल्पना नाही. पण प्रत्यक्ष अनुभव मात्र या 'कहाण्यांना' बळकूटी देणाराच होता.
एक-एक दिवस पुढे जात होता. अपील करून दीड महिना उलटला. आता प्रत्यक्ष झिंबाब्वेला जाण्यासाठी फक्त एक महिना उरला होता. यापेक्षा जास्त वाट पाहणं आम्हाला शक्य नव्हतं कारण निदानं एक महिना आधी, व्हिक्टोरिया फॉल्स येथील रिसॉर्टचं बुकिंग रद्द करण्याची गरज होती. अन्यथा बुकिंगचे सर्व पैसे वाया गेले असते. त्यामुळे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत थांबलो. दिल्लीतील कार्यालयात संध्याकाळी पाचच्या सुमारास मोठ्या आशेने अखेरचा फोन केला. तिथून नेहमीप्रमाणे नकारघंटाच ऐकू आली. जगातलं एक आश्चर्य बघायचं चुकणार म्हणून खूप वाईट वाटलं आणि नाइलाजास्तव दिल्लीतील एजंटला, पासपोर्ट लगेच मुंबईला पाठवून देण्यास सांगितलं. आता संपूर्ण प्रवासाची फेरआखणी करावी लागणार होती. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत पंधरा दिवसांची सफर केली होती. त्यामुळे या सहलीत द. आफ्रिकेचा समावेश केला नव्हता. केनयाहून आम्ही जोहान्सबर्गमार्गे सरळ व्हिक्टोरिया फॉल्सला जाणार होतो. आता यावेळी परत द. आफ्रिकेत दहा-बारा दिवस घालवण्याचा निर्णय घेतला. विमान प्रवासाची पुन्हा आखणी केली. यात आम्हाला चांगलाच आर्थिक फटका बसला. पण जगातला तिसरा मोठा धबधबा पाहता येणार नाही ही हुरहुर मोठी होती...
त्या सर्वात आणखी एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास माझा मोबाईल वाजला. 'मी जयप्रकाश प्रधानांशी बोलू शकते का? दिल्लीतील झिंबाब्वे कॉन्स्युलेटमधून मी बोलत आहे.' फोनवरून एक स्त्री बोलत होती. मी एकदम गोंधळलोच... कारण 'झिंबाब्वे' नावाचा मला आता चांगलाच संताप येऊ लागला होता... 'तुम्हाला यावेळी चांगली बातमी सांगण्यासाठी मी मुद्दाम फोन केला आहे. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला व्हिसा मंजूर झाल्याचा निरोप आम्हाला आत्ताच फोनद्वारे कळवण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांत फक्त हे दोनच व्हिसा देण्यात आले. पण तुमचे पासपोर्ट कोठे आहेत? ते त्वरित आमच्या कार्यालयात पाठवून द्या... म्हणजे त्यावर लगेच स्टॅपिंग करून देऊ.'
आता काय करावं? परत प्रवासाची फिरवाफिरव? आर.सी.आय.चे तेच रिसॉर्ट पुन्हा मिळणं शक्यच नव्हतं. मग दुसरीकडे बुकिंग ? यात परत प्रचंड आर्थिक नुकसान होतेच. पण भविष्यात तरी पुन्हा व्हिसा मिळेल की नाही? ही भीतीही वाटत होती. अखेर अनंत अडचणींना तोंड देऊन मिळालेली ही संधी सोडायची नाही असा निर्णय मी व जयंतीने घेतला. यावेळी दौऱ्याच्य आखणीत खूप अडथळे येत होते हे खरं. पण दैवही अनुकूल वाटत होतं. मुंबईत द. आफ्रिकेच्या व्हिसाचे काम अपेक्षेपेक्षा खूपच लवकर झाले. लगेच चवथ्या दिवशी पासपोर्ट परत दिल्लीला पाठवले आणि एकदाचा झिंबाब्वेचा शिक्का आमच्या पासपोसर्टवर उमटला. भ्रष्टाचार, लालफितीची दिरंगाई, बेपर्वाई आणि अज्ञान यांचा कहर तिथे असल्याचे नंतर अनेकांनी सांगितलं. त्यात भरीसभर म्हणजे प्रचंड गरिबी. त्यामुळे पर्यटनाचं महत्त्वच त्यांना कळत नाही का? असाही प्रश्न पडला...
झिंबाब्वेच्या बाबतीत आलेला हा पहिला अनुभव भयानकच होता. आता प्रत्यक्ष त्या देशात काय मांडून ठेवलं आहे ही चिंता होती. सुदैवाने आता ज्या कंपनीतर्फे आमची तेथील सफर आयोजिण्यात आली होती. त्यांची सर्व व्यवस्था चोख वाटत होती. व्हिक्टोरिया फॉल्सचं वर्णन तर काय करावं?
खरोखरच ते जगातले एक अद्भुत आश्चर्य आहे. ते दृश्य डोळ्यात, कॅमेरात भरभरून साठवून आम्ही खाली आलो. इतक्यात एका पर्यटकानं सांगितलं की, आमच्या हॉटेलच्या मागे जंगलातून चालत गेलं की, झिंबाब्वे व झांबिया यांना जोडणाऱ्या पुलाचं आणि झांबेझी नदीचं फार मनोहर दर्शन घडतं. थोडं धाडस करून आम्ही दोघं जंगलातून चालत निघालो. या जंगलात हत्ती, रानटी म्हशी, डुकरं यांचा दिवसाही मुक्त संचार असतो. त्यामुळे मनातून तशी भीतीही वाटत होती. थोडं अंतर चालत गेलो आणि आम्ही रस्ता चुकलो. जंगलात सर्वत्रच पाऊलवाटा. त्यामुळे काहीच समजेना. कुठून या भानगडीत पडलो असंच वाटू लागलं. इतक्यात समोरून एक धिप्पाड, काळाकुट्ट व अंगात 'टुरिस्ट पोलीस' असं जाकिट घातलेला माणूस आला. आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये राहतो असे त्याने प्रथम विचारले. आम्हाला कुठे जायचं आहे हे त्याने बरोबर ओळखलं. 'तुम्ही रस्ता चुकला आहात, माझ्या बरोबर चला' असे तो सांगू लागला. याच्याबरोबर जावं की नाही? या संभ्रमात आम्ही पडलो. अखेर त्याच्या मागोमाग निघालो. आम्ही कसा रस्ता चुकलो आहोत हे त्याने प्रथम दाखवलं. त्यानंतर तो आम्हाला त्या स्पॉटवर बरोबर घेऊन गेला. त्याने आमचे फोटो काढले आणि आम्हाला सुखरूप आमच्या हॉटेलवर आणून सोडलं. त्या 'टुरिस्ट पोलीसाचे' आम्ही मनःपूर्वक आभार मानले.
पुढच्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामात हे 'टुरिस्ट पोलीस' पर्यटकांना फार मोठी मदत करत असल्याचं आम्ही बघितलं. स्थानिक विक्रेते पर्यटकांच्या बरेच मागे लागतात. त्यावेळी हे टुरिस्ट पोलीस लगेच हस्तक्षेप करतात व त्यांचा धाक या विक्रेत्यांवर मोठ्या प्रमाणात असतो. 'टुरिस्ट पोलीस' दलाची आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न मी केला. तेव्हा कळलं की, पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणी हे पोलीस सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत काम करतात. त्यांच्या गणवेषामुळे ते लगेच ओळखू येतात. पर्यटकांना सर्व प्रकारची मदत करण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं असतं. त्यांचं अस्तित्व सर्वत्र खरोखरच जाणवतं. त्यामुळे व्हिक्टोरिया फॉल्स परिसरात तुम्ही अगदी बिनधास्तपणे फिरू शकता. लूटमारी, चोरी यांची भीती तर अजिबात वाटत नाहीच व कोणत्याही प्रकारच्या साहाय्यासाठी हा टुरिस्ट पोलीस तत्पर असतो. त्याचा फार मोठा आधार वाटतो. आपल्या देशातही ही कल्पना राबवता येऊ शकेल का? प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी होईल का? झिंबाब्वे देशाच्या संबंधातील हे दोन टोकाचे अनुभव कायमचे लक्षात राहिले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.