नुकतेच गोव्याला गेलो होतो तेव्हाचा अनुभव. या धाग्याची सुरवात करण्यास तो अनुभवच कारणीभूत ठरला आहे.
गोव्याला 'बिगफूट' या ठिकाणी एका एका ग्रुपला आत सोडतात आणि तिथे मांडलेले देखावे बघताना मागे त्या देखाव्यांचं वर्णन करणारी कॅसेट सुरू असते. प्रत्येक ठिकाणी काही मुली उभ्या राहून आता या देखाव्याचं वर्णन आहे, ते जे कॅसेटवर सांगताहेत ते इथे दाखवलं आहे वगैरे सांगत असतात. आम्हीही असे फिरत होतो. ते देखावे सुरू असतानाच मध्येच मार्ग एका सुवेनीर शॉपमधून जातो. (का ते ईश्वराला माहित!). तर आम्हीही त्या दुकानात घुसलो. काही वेळानी बाहेर आलो तर पुढे जो देखावा होता तिथे कॅसेट सुरूच नव्हती. आवाज कुठून भलत्या ठिकाणीच सुरू होता. आणि तिथे असलेली गाईड आपल्या इतर मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसलेली. तिला विचारलं की हे काय? तर म्हणे तुम्ही दुकानातून उशीरा आलात म्हणून ती ऑटोमॅटिक कॅसेट आपल्या वेगानं पुढे गेली. आता तुम्ही पुढे जाऊन ऐका. पण मग या इथल्या दॄष्यांचं काय? तर म्हणे तो चान्स गेला. दुकानात जाण्यापूर्वीच्या कॅसेटवरच्या निवेदनात दुकानात फक्त २ मिनिटं थांबा असं आहे म्हणे. हे आम्ही ऐकलच नव्हतं. आता देखाव्यांचं वर्णन सुरू असताना मधेच दुकानात किती वेळ थांबायचं हे सांगण्याची आयडियाही भारीच. शिवाय त्या दुकानाच्या आधी एक मुलगी एका प्रकारच्या दिव्यात तेल कसं घालायचं आणि मग तो सुलट केला तरी तेल कसं पडत नाही याचं प्रात्यक्षिक करून दाखवते. ते बघत असताना 'दुकानात केवळ दोन मिनिटं' ही सुचना कशी कानी पडणार? पण आम्हीही खट असल्याने पुढचा गृप येईपर्यंत तिथेच थांबलो आणि उरलेलं वर्णन पुन्हा ऐकलं. त्या गाईड मुली वैतागलेल्या वाटल्या. माझ्यामते ही प्रवाशांची फसवणुकच आहे.
मी हैदराबाद्ला फिरायला गेलो होतो. जाताना एका हॉटेलच बुकींग अॅडव्हान्स पाठवुन केल होत. हॉटेलमधे दुपारी १:३० वाजता मधे पोचल्यावर रिसेप्शन मॅनेजरने मला जवळच्या रेस्टॉरंट मधे जेऊन यायला सांगितल. दुपारचे चार वाजले तरी रुम मिळेना. गोडित विचारल तर रिसेप्शन वाला मॅनेजरने फिरुन या, तुमच सामान क्लॉक रुम मधे ठेवा अस सांगितल. मग मात्र मी त्याला धुतला.
शेवटी मीच अस म्हणालो की ए.सी. रुम नसेल तर साधी द्या पण रुम पाहिजेच. यावर तो म्हणाला हे आधी सांगितल असत तर दिली असती की. मी म्हणालो पण ए.सी. रुम बुक करुनही का नाही मिळाली ? यावर तो म्हणाला की आज जे पॅसेंजर जाणार होते त्यांनी मुक्काम वाढवला. त्यांना हाकलुन कस देणार ?
हे खर की सिझनला माझ्यापेक्षा जास्त रेट देणार दुसरा कस्टमर मिळाला हे परमेश्वर जाणे. शेवटी साध्या रुम मधे तीन दिवस राहिलो.
आम्ही काही नेहमी शिर्डीला जाणारे नाही. अनेकानेक वर्षांपूर्वी शाळेतून ट्रिपला गेले होते त्यानंतर गेल्या वर्षी गेलो. आमची कार जरा कमी गर्दीचा भाग पाहून थांबली. उतरतोय नाही तर एक माणूस धावत आला आणि 'चला चला, ४ नंबरच्या गेटवरून थेट दर्शन होतय' असं सांगत आम्हाला विचार करायची संधीही न देता घेऊन गेला. त्याच्यामागोमाग आम्ही पटापट गेलो. तो आधी त्याच्या दुकानात आम्हाला घेऊन गेला. चपला काढायला सांगितल्या आणि देवाकरता ताटं आमच्या हातात कोंबली. त्यात काहीबाही नेहमीच्या वस्तु होत्या. शाल पण घालून ताटाचं वजन आणि पैसे वाढवण्याचा त्याचा मनसुबा आम्ही तेवढ्यात हाणून पाडला. आणि मग आम्हाला दर्शनाकरता त्या सुप्रसिध्द ४ नंबरच्या गेटकडे सन्मानपूर्वक घेऊन जाण्याऐवजी केवळ हाताने दिशा दाखवण्यात आली.
आम्ही अनवाणी निघालो. मनात विचार करत होते की काय ही साईबाबांची कृपा. ज्या गेटमधनं दर्शन सुरू आहे त्याच गेटसमोर आपली कार थांबली. Happy तर ते ४ नंबरचं गेट खरंच लागलंही. पण त्यातून आत गेल्यावर जो भुलभुलैय्या सुरू झाला. भर दुपारची वेळ, अंगण तापलेलं आम्ही चटाचट पाय उचलत धावतोय - रिकाम्या रांगांमधून. बिचारी माझी लेकही हायहुय करत धावत होती. दीर्-जाऊ, त्यांचा मुलगा सगळी मंडळी आपली धावतायत. नवरा शहाणा. तो देवळात वगैरे येण्याच्या भानगडीत पडत नाही म्हणून बाजारातच फिरत होता. आम्ही असे धावत असताना एक भलंमोठं गेट लागलं आणि आम्ही पुन्हा मेन रस्त्यावर! आणि तिथून मग साग्रसंगित पुन्हा मेन रांगेत उभे. म्हणजे असं गेटवरून दर्शन वगैरे काही नव्हतच. प्रवेश केवळ मेन गेटवरूनच होता. कदाचित उत्सवाच्या प्रसंगी किंवा गर्दिच्या दिवशी ही इतर गेट्स उपयोगी असतील पण एखाद्या सामान्य दिवशी अशा मार्केटिंग गिमिक्सना प्लीजच फसू नका.
लहान वयातली मुलं जी ग्रुप करुन गोव्यात येतात त्यांना फॉरेनर सोबत फोटो वगैरे काढून देतो असे सांगुन, पैसे उकळणे वा कॅमेरा पळवने असे उद्योग सर्रास चालतात.
काही गुंड लोक हातचलाखी चा खेळ दाखवतात, ज्यात दर्शकाला तीन पैकी कोणत्या वाटी खाली लाल गोटी आहे हे ओळखायचे व बरोब्बर आल्यास तो जी किंमत लावेल त्याच्या दुप्पट पैसे मिळतात. या दर्शकांमधे त्याचे काही साथीदार असतात. ते बरोब्बर वाटीवर पैसे लावतात आणि हजारो रुपये जिंकल्याचे दाखवतात. मग ते पाहुन सामान्य लोक त्यास हमखास बळी पडतात. आणि जर एखादा खरच जिंकला तर त्यास हारे पर्यंत खेळण्यास भाग पाडतात अथवा पैसे हिसकावून घेतात.
सिंगापूर प्रवासात घेण्याची एक खबरदारी. तिथे एकदाच ठराविक दिवसांकरता MRT चा पास काढून बस किंवा ट्रेनमधून कितीही वेळा फिरता येतं. आम्ही ३ दिवसांचा पास काढला प्रत्येकी २०+आणखी काही सिंगापुरी डॉलर्सचा. त्यातले प्रत्येकी २० डॉलर्स हे डिपॉझिट म्हणून घेतलेले त्यामुळे परत मिळणार होते. त्यात जास्तीत जास्त कसं फिरता येईल वगैरे ठरवलं ('पैसा वसुल' भारतीय मनोवृत्ती, दुसरं काय!) त्याप्रमाणे फिरलोही. शिवाय लेकीला डबलडेकर खुप आवडली म्हणून मिळेल त्या डबलडेकरात वरती आणि सगळ्यात पुढे बसून शहरात फिरलो वगैरे वगैरे. पण पास घेताना एका महत्त्वाच्या गोष्टिकडे दुर्लक्ष झालं होतं. पासाची मुदत संपल्यावर तो काही ठराविक तिकिट काउंटर्सवर जमा करून आपलं डिपॉझिट परत मिळवायचं असतं. पास घेताना त्यांनी सांगितलं की ५ दिवसांच्या आत डिपॉझिट घ्यायला हवं. आम्ही गेले डुलत डुलत पाचव्या दिवशी तर आमचं डिपॉझिट काही मिळालच नाही. कारण ५ वा दिवस हा तो पास इश्श्यु केल्या दिवसापासूनचा मोजतात, संपल्यानंतरचा नाही. म्हणजे मुदत संपल्यावर पुढच्या दोन दिवसांत आम्ही डिपॉझिट क्लेम करायला हवं होतं. पण पहिल्यांदा गेलेल्या प्रवाशांना हे कसं कळणार?
असो. पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
उत्तरांचल मधे गढवाल भागात कस्तुरीमृगाच्या पोटातील कस्तुरी विकतात. त्याला कस्तुरीचा घमघमाट असतो. लोक हे महागडे कस्तुरी विकत घेतात. दहा एक दिवसात त्यातून वास यायचा बंद होतो. खरतर हरणाचे केस लावलेली ती एक गोल वस्तू असते आणि तिच्यावर सेंट मारलेला असतो.. सावधान !
शिर्डीच काय कुठल्याही तीर्थस्थळी असा प्रकार आहे.....शिर्डी आणि शनिशिंगनापुर ला जरा जास्तच आहे.....अस कोणी जरी गाडीजवळ येउन त्रास देउ लागला तर आम्ही local आहोत रे बाबा दुसरे लोक शोध अस सांगायच्.....बस मधुन उतरताना हे एजंट लोक जे कार्ड देतात ते घ्यायच नाही.....त्याना आपल्या मागे आले तरी काहीच उत्तर द्यायच नाही की विचारायच नाही.....तुम्ही काही विचारल तर तो तुम्हाला लवकर सोडत नाही.....
शनिशिंगनापुरला तर हे एजंट लोक गाड्यावरुन पाठिमागे लागतात.....त्यासाठी काही टीप्स
१. शिर्डी वरुन शनिशिंगनापुरला जाताना गाड्यावरच्या एजंट लोकांचा खुप त्रास होतो ..... त्यामानाने घोडेगाव वरुन शनिशिंगनापुरला जाताना कमी त्रास होतो....
२. गाड्यावरती काही एजंट मागे लागले तर सरळ गाडी बाजुला घेउन ५-१० मि थांबणे.....दुसरा काहीच उपाय नाही....(माझे गाव शनिशिंगनापुरपासुन २०किमी आहे .....)
३. कुठल्याही दुकानातुन फक्त पुजेचे सामन घ्यावे श्रद्धा असेल तरच नाहीतर बाकी इतर पुजा .... यंत्र याच्या फंदात पडु नये......
मथुरेला गेले असतील ना बरेच जण ?
कृष्णजन्मभूमी म्हणून प्रत्येक पंड्या वेगळ्याच मंदिरात घेऊन जातो आणि हीच अस्सल जागा आहे हे ठणकावून सांगतो. एका ठिकाणी तर कृष्णाचा जन्म कुठे झाला नेमकी ती जागा दाखवायला तयार होते. योग्य ती देणगी द्यावी लागत होती फक्त. विशेष म्हणजे इथं फसवणुकीपासून सावध रहा असा नम्र इशाराही देण्यात आला.
आणि वादग्रस्त म्हणून बंदोबस्तात असलेलं ठिकाण वेगळंच होतं. आता यातला एकाचाच दावा खरा असेल ना ?
काही कॉमन ट्रॅप्स-
१.VAT refunds. |प्रत्येक देशात याचे वेग वेगळे नियम असतात आणि सगळेच दुकानदार ते तुम्हाला सांगतिलच असे नाही. उदा. सिंगापुरात बिला बरोबर दुकानातुन एन्डोर्स केलेला येक फॉर्म लागतो , तो नसला तर रिफन्ड मिळणार नाही. या नियमांची आधिच माहिती करुन घेणे श्रेयस्कर.
२. खुप जास्त किमतीला वस्तु गळ्यात मारणे- उदा. थायलंड मधिल जेम फॅक्टरी. फॅक्टरी दाखवणारी व्यक्ती ते जेम तीथे किती स्वस्त मिळतात आणि तुम्हाला हे बाहेर विकुन कितीतरी फायदा होइल ई. सांगुन स्वस्त खडे महागात विकतात.
३. डुप्लिकेट वस्तु/पदार्थ - उदा. श्रीनगर ला दाल लेक मधे केशर / शिलाजीत विकणारे शिकारा घेउन फिरतात. थोडेसे केशर वाटित पाण्यात टाकुन रंग ही दाखवतात आणि प्रत्यक्षात रंगवलेले गवत विकतात.
४. गल्ली बोळात नेउन लुबाडणे- स्वस्त किंवा काही खास वस्तु विकायच्या बहाण्यानी मुख्य रस्त्या पासुन आत नेउन लुबाडळे जाते. उदा. शांघाय नान्जिन स्ट्रीट, भाषेची अडचण असल्याने प्रावासी ईथे काही फार करु शकत नाहीत.
सिमला, कुलू मनालीची टूर होती. त्यांनी जिथे जिथे चहा, पाण्यासाठी थांबवले ती सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती. पण ह्याबाबतीत केसरी वाले पण तिथेच गाड्या थांबवत असल्याने नक्की ट्रॅव्हल कंपनीचा दोष की तिथे सगळीकडेच असे असते की हे विशिष्ठ धाबेवाले टूर मॅनेजर्सना जास्त कट देतात आणि बाकी मनमानी करतात हे मला माहीत नाही.
तिथे कुलूला ज्या दुकानात ऑथेंटिक म्हणून नेले तेथे कपडे बरेच महाग पडले.. आणि ८०० रु चे ड्रेस मटेरील देखिल १५० रु च्या इतर दुकानातील मटेरीअल सारखेच फुले पडून खराब झाले.
फुलकारीचे कपडे सिमल्यानंतर कुठे दिसले नाहीत. पण टूर मॅनेजरने खूप मिळतील पुढे पुढे असे सांगीतले.
चोराची आळंदी चा अत्यंत वाईट अनुभव..
तिकडे ज्ञानेश्वर माऊली साठी नारळ आणी फुलांचे ताट घेतले.. त्याला विचारायचे विसरलो किती रु. झाले..
आम्हाला वाटले असती १०-२० रुपये किंवा ५० रु. खुप झाले तर. आम्ही परत आलो दर्शन करुन तर त्या महाभागाने रु.३०० मागितले मी अवाक झालो आणी सोबतचे मित्र सुध्दा खुप वेळ वाद घातला पण त्या ***(&*(&^*(&*(&*(&*(& दुकानदाराला लोकल दुकानदारानी सपोर्ट केला.. आम्ही पण बाराचे होतोच सगळ्या ठीकाणी बोंब मारुन आलो की हे प्रसादाचे ताट ३००रु. ला देतात कोणी घेऊ नका ... अतिशय विक्षीप्त अशी लोक आहेत तिथली ... देवाच्या नावाने चोर धंदे कशाला करतात देवच जाने Uhoh
जेंव्हा आम्ही पैसे देतच नाही म्हणालो तर त्या माकडानी आमचे चप्प्ल बुट लपवले घरात जाऊन .. आता आजुन राडा नको म्हणुन गुपचुप पैसे देऊन निघावे लागले.. आणि वाईट वाटणारी एकच गोष्ट म्हणजे तिथल्या तमाम जनते पैकी एकही जण ह्या &*&*(&(*& च्या विरुध्द बोलला नाही ..
माऊलींची ईछा म्हणून तो विषय तेंव्हाच डोक्यातुन काढुन टाकला पण आळंदी च्या लोकां विषयी आता फार काही चांगले वाटत नाही..
टी इस्टेट मध्ये फिरायला गेले असताना जागोजागी चहा (पत्ती, पावडर, फ्लेवर्ड चहा) मिळणारी दुकानं आहेत. ते सँपल म्हणुन चवीला जो थोडा चहा देतात तो चांगला असतो. पण (सो कॉल्ड) तोच विकत घेऊन घरी येऊन केला की अतिशय बेक्कार चहा होतो.
आश्चर्य म्हणजे टाटा टी इस्टेटमधला चहाही तसाच बेक्कार निघाला. ( भरपुर किंमत होती, ४००-५०० रु. किलो).
माझाही सचिन ट्रॅव्हल्सचा असाच अनुभव आहे सिमला-कुलू-मनालीचा. इथे मुद्दामहून त्यांची कोणाशी तुलना करण्याचा हेतु नाहि, पण जे अनुभवले आहे / बघितले आहे ते मांडतो आहे.
वाटेत जेवण्यासाठी आणि चहासाठी बस थांबवलेली सगळी ठिकाणे स्वछतागॄहांच्या बाबतीत भिकार होती [एकच अपवाद - चंदीगढ-दिल्ली बॉर्डर जवळचे हॉटेल]. जेवण्यासाठीचे हॉलही सुमार होते आणि केसरीवालेही त्याच हॉटेलमध्ये असले तरी त्यांना दिलेले हॉल आणि पदार्थ नक्कीच उजवे दिसत होते. [मी चुकून(!) एकदा केसरीच्या हॉलमध्ये शिरलो होतो.]
मनालीमध्ये सकाळी सुरेख सूर्यप्रकाश होता आणि संध्याकाळी पावसाचे भाकीत होते [जे नंतर खरे ठरले]. टूरलीडरला हे सांगूनही सकाळी नाश्त्याच्या वेळेला एका मराठी माणसाची 'ओळख' करून देण्यात आली. त्याचे मनाली मध्ये दुकान आहे आणि मराठी माणसानेच मराठी माणसाला मदत केली पाहिजे अशा अर्थाचे भाषण करून झाले. मग त्याच्या दुकानाची पत्रकेही स्वत: टूरलीडर्सनी उत्साहाने वाटली. मग गाड्या ह्या मराठी माणसाच्या 'अगरवाल' नावाच्या दुकानाकडे नेण्यात आल्या. [तिथे घेतलेले सगळे केशर घरी आल्यानंतर फेकून द्यावे लागले, हे सांगायला नकोच.] सगळी सकाळ अशी बाजारहाट करण्यात घालवल्यानंतर संध्याकाळी पावसात आम्ही site-seeing केलं. पुढे एका sports-club मध्ये खेळ खेळून निघताना एका टूरलीडरला तिथल्या game arranger बरोबर commission साठी घासाघिस करतानाही बघितलं.
ह्याच टूरमध्ये 'कुफ्री'ला २५० रुपये देऊन घोडेस्वारी केली. घोडेवाल्याने १ तासात ५ पॉईंट दाखवणार सांगितले आणि १५ मिनिटात एका ठिकाणी घेऊन गेले. उतरा आणि फिरा इथे पाऊण तास. तिथे एकाच जागी ५ दुर्बिणी लावल्या होत्या ५ दिशांना तोंड करून आणि त्यातून बघण्यासाठी ५० रुपये वेगळे. आमच्या ग्रूपमध्ये एकाकडे मस्त SLR camera with Telescopic Lens होता, तर त्यालाही फोटो काढू दिले नाहित ५० रुपये दिल्याशिवाय. हि जबरदस्ती तिथल्या स्थानीक लोकांची होती, पण ट्रॅव्हलवाल्यांनी ह्याबद्दल एका शब्दानेही कल्पना दिली नव्हती. खरंतर, ते आम्हाला जेव्हा कुफ्रीला घेऊन गेले तेव्हा ह्या घोडेवाल्यांच्या ग्रूपशिवाय दूसरा कोणताही ग्रूप तिथे ऊपलब्ध नव्हता. पण टूरलीडरकडे तक्रार केल्यावर उत्तर मिळाले की, ही additional activity आहे आणि ती करायची की नाही ह्याचा निर्णय तुमचा असेल असे आधीच सांगितले होते.
आणि शेवटचा अनुभव ह्याच टूरमधला - रोहतांग पास ला जाताना वाहतूक-मुरंबा टाळण्यासाठी पहाटे ३ वाजता उठवून नेण्यात आले. वाटेत ३:३० ला एका छोट्या दुकानासमोर गाडी थांबवून snow-suits भाड्याने घेण्याचा सल्ला देण्यात आला. [परत इथेही आग्रह नाही - निर्णय तुमचा]. आता ३ वाजता उठून निघाल्यावर परत गाडीत डुलकी लागली होती, त्यामुळे मेंदू विचार करण्याच्या स्थितीत नव्हता. गुमान २५० रुपये देऊन कपडे भाड्याने घेतले आणि मोज्यांसाठी ५० रुपये. निघालो. वाटेत अर्ध्या-पाऊण तासाने मध्येच [दुर्दॅवाने] जाग आली आणि तशीच दुकाने रांगेने उभी दिसली. प्रत्येकापुढे फलक होता - Rent-out Snow suits for entire day. Rs. 50 only. झोप जी काही उडाली ती पुन्हा लागली नाही.
केसरी ट्रॅव्हल्सचा.केसरीबरोबर सिक्कीम-दार्जिलिंग टुर केली, गंगटोक आणि दार्जिलिंग या दोन्ही ठिकाणी हॉटेल्सच्या बाबत आलेला हा वाईट अनुभव.
टुर बुकींगच्या वेळेस गंगटोकला ऑरेंज कंट्री क्लब रिसॉर्टमध्ये रहाण्याची व्यवस्था आहे म्हणुन सांगितलं होतं. गंगटोकला पोचल्यावर सांगितलं की आपल्यापैकी काही फॅमिलीज ऑरेंज कंट्रीमध्ये तर काही वेगळ्या हॉटेलमध्ये रहातील कारण ऑरेंज कंट्री फुल्ल आहे. हीच गोष्ट मुम्बईहून निघण्याच्या आधी सांगितली गेली नव्हती. ज्या हॉटेलमध्ये आम्ही काही फॅमिलीज राहिलो त्या हॉटेलचा दर्जा आणि ऑरेंज कंट्री रिसॉर्टचा दर्जा यात खुपच फरक होता.
तीच गोष्ट दार्जिलींगला झाली, काही फॅमिलीज हॉटेल व्हाईसरॉय तर उरलेल्यांची 'सोय' समोरच्याच तिबेट होम मध्ये करण्यात आली. दोन्ही होटेल्स समोरासमोर होती ही एकच गोष्ट सोडली तर दोघांच्या दर्जात प्रचंड फरक होता. टुर लीडरशी वादावादी झालीच तेव्हा त्याने सुचवलेला उपाय हा की फक्त रहा तिबेट होममध्ये पण जेवण्-नाश्ता व्हाईसरॉयमध्ये करायला या.
एकतर ८ तासाच्या बस प्रवासानंतर संध्याकाळी ६ वाजता दार्जिलिंगला पोचलेलो, त्यात हा मनःस्ताप. चिकाटीने टुर लीडरच्या खनपटी बसुन केसरीच्या मुंबई ऑफिसमध्ये रीतसर तक्रार नोंदवली. रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल व्हाईसरॉयच्या लाउंजमध्येच बसलो होतो, त्याच दर्जाच्या दुसर्या हॉटेलमध्ये जेव्हा त्यांनी सोय केली तोवर रात्रीचे ११ वाजले होते.
सर्वात वाईट या गोष्टीचे वाटले की या टुरमध्ये एकंदर १४ मराठी कुटुंबे होती पण एकाही कुटुंबाने येउन साधी विचारपुस/मदत करण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. त्यानंतर केसरीच काय कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर टुर करण्याची ईच्छा नाहीय.
ट्रेनमधे आमच्या नावाचे बुकिन्ग न करता वेगळ्याच नावाने बुक केलेली तिकिटे आणून दिली.
रहायला बेगमपेटमधे जे हॉटेल होते ते बरे होते. एक बस बुक केली होती ३ दिवसांसाठी
एक पुर्ण दिवस रामोजी फिल्मसिटीमधे गेला त्यामधे खाण्याची पॅकेटस देणार होते ती विसरली म्हणे घ्यायची म्हणून पार दुपारी दोन नंतर लंच टाईमपर्यंत काहीच दिले नाही. आणि संध्याकाळी चिवड्याची थोडीफार पॅकेटस आणून दिली.
त्या बसमधे आमचे कुटुंब आणि ३ ज्येष्ठ नागरिक महिला आणि २०/२५ दुकानदार होते बारामती, दौन्ड भागातले की जे शेवटपर्यंत आमच्याशी फारसे काही बोलले नाहीत. एनटीआर गार्डन पहायचे होते पण या सर्व गटाने विरोध केला म्हणून पहाता आले नाही.
बाकी तिकिटे काढण्यासाठी कुठे फारसे रांगेत थांबावे लागले नाही ही एक चांगली बाब होती.
पॅकेज ट्रीप मधे फारसे स्वातंत्र्य रहात नाही म्हणून मग पुढची ट्रिप (सिमला, मनाली) स्वतःच ठरवून केली. त्याबद्दल पुढच्या लेखात.
काश्मिर ला कोणी मार्तंड मंदिर दाखवत नाही...आम्ही ईकडून माहीती काढून गेलो होतो.. तिथे आमच्या लोकल माणसाला ही माहीत नव्हते...चौकशी केल्यावर रस्ता कळला.. हे त्याचे फोटो ईथे आहेत.... काही फोटोत माणसे आहेत.. त्यावरून त्या मंदिरा च्या उंचीचा अंदाज येईल.... हे कोणी टुर दाखवत असल्याचे ऐकीवात नाही.. ह्याची माहीती सकाळ मध्ये लिहायची होती...पण आळस.. (आता झटकायलाच हवा)..------
------
------
तसेच हडप्पा सारखे श्रीनगर मध्ये सापडले होते... पण काही केल्या त्याचा पत्ता लागला नाही.. दाल लेकच्याच बाजूला आहे असे वाचले होते...
लग्नाच्या आदल्या दिवशी रात्रीचा प्रवास होता...कोल्हापूर ते पुणे. रात्री ७.०० ला लक्झरीने कोल्हापूर सोडले. बसमध्ये अन्यत्र जसा लग्नाचा दंगा मुले घालत असतात तसा आमच्याही इथे चाललाच होता. मजेत होते सर्वच. साधारणतः दोन टोल नाके गेल्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास बाहेर पावसाची रिपरिप चालू असताना ड्रायव्हरने शेजारील सायरन ऐकून लक्झरी साईडला लावली. तो आणि त्याचा जोडीदार काही कागदपत्रे घेऊन खाली उतरलेले आम्ही पाहिले. म्हटले असणार काहीतरी पोलिसांची वा आरटीओची कागदपत्रांची तपासणी. आम्ही आत गप्पा मारीत बसलो असताना दहाएक मिनिटांनी तो ड्रायव्हर आम्हा तिघा सीनिअर्सना खाली येण्याविषयी विनंती करू लागला. आम्ही उतरलो. तो कुजबुजला, 'साहेब, १००० रुपये मागत आहे." बरे मग याचा आमच्याशी काय संबंध ? तर सांगावे की न सांगावे अशा विचारात ड्रायव्हर वदला, "गाडीतील प्रवाशांची यादी नाही म्हणून." हा काय प्रकार आम्हाला कळेना. यादी तर टूरिस्ट ऑफिसमध्ये आम्ही पैशासह दिली होती. शेवटी आम्ही सरळ आरटीओ व्हॅनकडे गेलो तर तिथे ते नेहमीचे ताठर थ्री स्टारवाले बसले होते. त्याना आम्ही शक्यतो नम्रपणे 'लग्नाचे वर्हाड आहे, यादी व सरकारी चार्जेस आम्ही नोंदणी करतानाच अदा केला आहे" असे सांगितल्यावर त्यातील एकाने आमची अब्रूच काढली, "तुम्ही लोक सुशिक्षित आणि सरकारी नोकरीवाले आहात असे तो ड्रायव्हर म्हणत्योय. पण तुमची ड्युटी होती की त्या यादीवर आरटीओने सहीशिक्का दिला आहे की नाही ते पाहण्याचा. तुम्हाला माहीत आहे ड्रायव्हरकडे कुठली यादी आहे ते?" आम्हाला यादी कोणती आहे ते माहीत असणे शक्यच नव्हते, किंबहुना आमच्या कुणाच्याच मनी ती बाब इतकी महत्वाची असते याची कल्पना आली नव्हती.
तर त्या टूर कंपनीने चक्क गेल्या आठवड्यात त्याच लक्झरीने गावातील प्राथमिक शाळेतील मुलांसाठी आयोजित केलेल्या महाबळेश्वरच्या सहलीची यादी या ड्रायव्हरकडे दिली होती. बारा वर्षाखालील मुलांना आरटीओ चार्जेस बसत नाही, या नियमाचा फायदा घेऊन त्या नालायक संचालकाने आम्ही दिलेले ९०० रुपये खिशात घातले होते. आणि जर चुकून पोलिसाने अडविले तर १०० रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचे संकेत त्या ड्रायव्हरला दिले होते. पण त्याच्या दुर्दैवाने [आणि आमच्याही] त्या रात्री थेट आरटीओ इन्स्पेक्टरनीच लक्झरी अडवली. पुढे जे व्हायचे ते झाले. लग्नासाठी तर जाणे भागच होते. कोल्हापूरातील एजंटला सेलवरून सत्राशेसाठ शिव्या आमच्या गाडीतील पोरांनी घातल्या आणि तो 'सौदा' १००० रुपयावर मिटविला. गाडी हलली.
पुढे लग्नात हा विषय काढला नाही. मात्र तिसर्या दिवशी कोल्हापुरला परतल्यावर ज्यावेळी आमची मुले संतापून त्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसली त्यावेळी त्या मालकाची घाबरगुंडी उडाली. त्याला आमचा राग अपेक्षित होताच पण शिवाजी पेठेतील ते आठदहा तरूण त्याला दिवसा चांदणे दाखवायचे या निश्चयाने तिथे आलेली पाहिल्यावर त्याने आम्हाला बोलावून घेऊन ते हजार रुपये तर दिलेच पण झालेल्या त्रासाबद्दल आरटीओ पासचे ९०० ही परत दिले आणि विनंती केली की हे प्रकरण पेपरमध्ये देऊ नका. मुलांना आवरले....तो पर्यंत शिव्यांचा भडिमार दुसरीकडुन चालूच होता.
यातून शिकायचे तर टूरला निघण्यापूर्वी टूर लीडर वा कुटुंब प्रमुखाने गाडीसंदर्भातील सर्व कागदपत्रे रितसर ड्रायव्हरकडे [अगदी त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह] पाहणे अत्यंत निकडीचे आहे.
अशा गोष्टी नेहेमी गव्हर्न्मेंट अप्रूव्हड दुकानातून घ्याव्यात. >>
सरकारी दुकानांमधे किमतीच्या बाबतीत फसवले जाणार नाही याची खात्री असते म्हणून अनेकदा पर्यटक अशा ठिकाणी खरेदी करणे पसंत करतात. पण जयपूर /राजस्थान मधे सरकारी वाटतील अशी काही खाजगी दुकाने आहेत. म्हणजे दुकानांची नावे सरकारी वाटतील अशी असतात जसे स्टेट हॅन्डलूम स्टोअर, नॅशनल हॅन्डिक्राफ्ट असो. शोरूम" असली काहीतरी. टॅक्सीवाले तुम्हाला सरकारी/ खादी ग्रामोद्योग सारखे आहे ई. म्हणत तिथे घेऊन जातात. अर्थात दुकानात कमी प्रतीच्या वस्तु आणि किमती अवाच्या सव्वा! तसेच प्रॉडक्ट बद्दल तद्दन खोटी माहिती, जसे नेहमीच्या रासायनिक रंग वापरलेल्या ब्लॉक प्रिन्टेड चादरी असतात पण नैसर्गिक रंग वापरून रंगवल्या आहेत म्हणून सांगतात किंवा देवी देवतांच्या मुर्तींवर बसवलेले कृत्रिम चकाकणारे खोटे खडे सफायर्स आहेत म्हणून सांगतात ई. तेव्हा राजस्थान मधे फिरतांना अशा ठिकाणी गेल्यास कॅश काउन्टर वर जाऊन खाजगी दुकान आहे का याची माहिती विचारावी, सर्टीफिकेट्स लावली असल्यास ती वाचावी.
आम्ही ऑगस्ट २०१२ मध्ये जवळच कुठेतरी तीन रात्रीकरता ट्रिपला जायचे म्हणून इडलीवाल्यांच्या जाधवगढ हॉटेलचे बुकिंग नेटवरून केले. आता आता त्यांची साईट बदलली आहे. पण आधीच्या साईटवर त्यांनी मेजर झोल केला होता. रुम्समध्ये चार प्रकार होते - टेन्ट, डिलक्स रूम, प्रिमियम रूम आणि स्वीट रुम्स. तर या प्रत्येकाचा फोटोही दिला होता. त्यातील आम्हाला स्वीट रुम चा आवडला. ४ स्वीट रुम होत्या. आम्ही एक बुक केली. पार्ट पेमेंट केले.
तिथे पोहोचलो तर त्यांनी जी रुम आम्हाला दिली ती अजिबातच त्या फोटोसारखी नव्हती. फोटोत चांगली प्रशस्त (स्वीट नावाला साजेशी) रुम होती आणि इथे तर नेहमीच्या रेग्युलर रुमसारखी रुम! आम्ही त्यांना विचारलं तर म्हणे हिच सगळ्यात बेस्ट रुम आहे. कॉर्नरला आहे, फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे वगैरे. प्रवासानं थकून गेल्याने आम्ही जास्त वाद घातला नाही. शिवाय तिथे फोनवरून इंटरनेट अॅक्सेस होत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की त्यांची साईट डाउन आहे त्यामुळे त्यांचा कॉम्प्युटर वापरायला झाला नाही. शेवटी त्यांनी जी रुम दिली होती त्यातच झोपलो. पण आम्हाला खात्री होती की काहीतरी गडबड नक्की आहे.
सकाळी उठून पुन्हा रिसेप्शन गाठलं. पुन्हा साईट डाउन होती (म्हणे). पुन्हा तुमची रुम बेस्ट आहे. फक्त याच रुमला बाल्कनी आहे वगैरे रेकॉर्ड सुरू झाली. पण सकाळी लॉनवर फिरताना आम्ही एका दुसर्या रुममधल्या स्त्रीला तिच्या बाल्कनीत उभं राहून छानपैकी चहा पिताना पाहिलं होतं... स्मित त्यामुळे आम्ही ते सांगताच त्यांनी लगेच वाक्य फिरवत 'तुमच्या रुमला सगळ्यात मोठी बाल्कनी आहे आणि तुमच्या रुममधून बेस्ट व्हू दिसतो' असा नविन मुद्दा आमच्या गळी उतरवायला सुरवात केली. पण आम्ही जी रुम म्हणून बुक केली ती ही नाहीच. फोटो कंप्लीटली वेगळाच होता, त्याचं काय?
आम्ही बुक केली तो स्वीट होता आणि जी रुम आम्हाला दिली ती प्रिमियम रुम होती हे त्यांनी सांगितलंच नाही.
आता मात्र हे प्रकरण धसास लावायचंच असं आम्ही ठरवलं. डिनरच्या आधी आम्ही पुन्हा एकदा रिसेप्शनमध्ये गेलो. यावेळी तिथे एक वेगळा माणूस होता. त्यानं आम्हाला मॅनेजरच्या रुममध्ये नेऊन त्याचा कॉम्प्युटर वापरू दिला. जाधवगढच्या साईटवर जाऊन आम्ही त्याला त्याची साईट दाखवली. घे बाबा, डोळे भरून बघ आणि सांग काय घोळ केलायत तो! त्याने कबुल केले की फोटो महाराजा स्वीट चा आहे आणि आम्ही राहतोय ती प्रिमियम रुम आहे. (महाराजा स्वीट हा जाधवगढ मधिल सगळ्यात मोठा आणि सर्वात उंचीवरचा स्वीट आहे. द बेस्ट रुम.)
मॅनेजर जागेवर नव्हता, त्याच्या घरी होता. त्याला फोन लावला तर म्हणे त्या फोटोत आहे तीच रुम आम्हाला दिलेय. तेच तुणंतुणं ऐकून मी फोन नवर्याच्या हातून घेतला आणि त्या मॅनेजरला झाप झाप झापलं. हा फ्रॉड आहे आणि स्वीटचे फोटो टाकून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय हे त्याला सांगितलं. मग तो क्षमा मागायला लागला. त्यानं आम्हाला म्युझियम स्वीटमध्ये शिफ्ट होण्याची विनंती केली. कारण महाराजा स्वीटमध्ये कोणी रहात होते म्हणे. शिवाय रात्रीचं जेवण आणि अनलिमिटेड वाईन ऑन द हाऊस देण्याची घोषणा केली. ते ऐकून तर आणखीनच वैताग आला. ( आम्ही डिनर केले पण वाईन घेतली नाही. स्मित )
एव्हाना आम्ही तीन रात्री तिथे राहण्याचा विचार रद्द केला होता. दुसर्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर लगेच निघायचा विचार होता म्हणून रुमदेखिल बदलली नाही. ब्रेकफास्ट नंतर हॉटेल सोडले. त्यांनी आमच्याकडून आम्ही आधी भरले होते तेवढेच म्हणजे रु. १०,००० घेतले. अजून काही घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक तोटा तसा काही झाला नाही. पण वैतागवाणी ट्रिप आणि एक विचित्र अनुभव गाठीशी आला.
ट्रिपअॅडवाईजर.कॉम या साईटवर मी माझा अनुभव लिहिला होता. ते खात्री झाल्यावरच तो अनुभव प्रसिद्ध करतात. पण माझा अनुभव प्रसिद्ध झाल्यावर देखिल जाधवगडची साईट अनेक महिने तशीच होती. नंतर त्यांनी स्वीटचा फोटो बदलून योग्य तो फोटो टाकला पण त्यातही झोल केला होता. इतर रुम्स च्या बाबतीत माहितीशेजारच्या छोट्या फोटोवर क्लिक केले असता तोच फोटो मोठा होत होता. पण याच फोटोच्या बाबतीत त्या योग्य छोट्या फोटोवर क्लिक केले असता पुन्हा महाराजा स्वीटचा फोटो दिसत होता.
(याच ट्रिपअॅडवायझर वर इतरांनी लिहिलेले जाधवगढचे अनुभव तर भयानक आहेत. तिथल्या ओपन शॉवर रुमच्या बाबतीतला अनुभव तर डेंजर आहे. कोणीतरी गेस्ट आंघोळ करत असताना वरून एक माणूस बघत होता म्हणे. अरेरे )
आता हे इथे लिहिण्याआधी त्यांची साईट तपासली तर आता रुम्सचे योग्य आणि सर्व प्रकार दिसत आहेत. साईटच पूर्णपणे नविन दिसत आहे.
ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.
ती गढी खरं तर छान आहे. त्यात एक थीम हॉटेल काढण्याची कल्पनाही छान आहे. परीसर चांगला आहे. आम्ही पावसाळ्याच्या शेवटास गेलो होतो त्यामुळे खूप सुंदर हिरवळ होती. पण इतपतच.
१. जेवण बोअर.
२. थीम नुसार खोल्यांचं अंतरंग नाही. ते नेहमीच्या हॉटेलांसारखंच आहे.
३. महाबेक्कार सर्व्हिस. स्टाफ ट्रेंड नाही.
४. बाहेरच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिक करता येता येतं ते येऊन गर्दी करतात.
५. टेन्टस दूर आहेत.
६. स्विमिंगपूल स्वच्छ नव्हता.
शिवाजी महाराजांचे सरदार जाधवराव यांची ही गढी.अलिकडचे काळात त्यांच्या वंशजांपैकी दादा जाधवराव हे जनता दलाचे आमदार अनेक वर्षे होते. ते फारसे बदमाष राजकारणी नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती फार श्रीमंतीची नाही.या गढीचा मेन्टेनन्सही त्याना शक्य होत नसावा . त्यामुळे बर्याच दिवसापासून ते ही गढी विकण्याच्या मागे लागले होते. ऐशीच्या दशकात त्यानी रजनीशआश्रेम वाल्यांशी सौदाही केला होता त्या काळात रजनीश बाबा सम्भोगातून समाधीकडे जाण्याच्या रस्त्यावर चालत होते. त्यांच्या परदेशी शिष्यांनी कोरेगाव भागात अक्षरशः ' नंगा''नाच घातला होता. त्यामुळी ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून सासवड परिसरातील लोकानी मोठे आन्दोलन करून हा सौदा रद्द करणे भाग पाडले होते.
मध्ये बरेच दिवस काहीच घडले नाही मग हेरिटेज वास्तू जपण्याच्या नावाखाली हा नवीन बाबा तेथे आला आणि लीज की विकत कुठल्या तरी टर्म खाली हे हॉटेल तिथे चालू आहे.... काही दिवसानी किल्लेही बळकावण्याचा विचार असेल... नुकतेच बाबाच्या हॉटेलच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकाम मनपाने तोडले आहे.
बाबाच्या करामती चम्पकच्या इडली हॉटेल आणि भामटा या धाग्यावर वाचा.....
मला नालासोपार्याच्या मिनि गोवा रीसॉर्ट मध्ये आलेला अनुभव -
मी त्यांची वेबसाईट वाचून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. फोनवर खूप चांगली माहिती दिली. मी म्हटले मराठी माणसाचं रीसॉर्ट आहे चला जाऊया. फोनवर त्यांना आम्हाला दोन एसी रूम्स हव्यात म्हणून सांगितले होते. (नवर्याला जायचे नव्हतेच तिथे तरी माझ्या हट्टाखातर आला)
नालासोपारा पश्चिमेला गाव संपलं की त्या रिसॉर्टला जाण्याचा रस्ता जेमतेम इंडिका गाडी जाईल एवढा आहे. जरा इकडे तिकडे झालात तर गाडी खाजणात अडकेल असा. गाडी आत नेतानाच नवरा वैतागलेला. आम्ही साडेपाच वाजता पोहोचलो. तिथे पोहोचल्या पोहोचल्या म्हणाला मला पटत नाहीये ही जागा परत जाऊया. तरी मी मूर्ख म्हणून थांबू पाहू बरी वाटतेय रे जागा असे म्हणून थाम्बवले.
रीसॉर्टच्या समोर जो बीच आहे तो एक्दम भारी आहे, त्याच्या प्रेमात पडलेले मी.
रीसॉर्ट मध्ये गेल्यावर अर्ध्या तासानंतर आम्हाला दोन रूम्स दिल्या एकीचाही एसी चालू नव्हता.एसी रूम्स न मिळाल्याने नवरोबा गाडी चलू करून त्यात एसी लावून बसले. एक तास एसी चालू होतो नाही होत हे पाहिल्यावर त्यांच्याकडे आम्ही रूम्स बदलून मागितल्या. तर नवीन रूम्स द्यायला आठ वाजले. नवीन रूम्सचे एसी देखील चालू नव्हते.
एसी टेक्निशियन येऊन एसी चालू करून देईपर्यंत आम्ही खायला बटाटा भजी आणी बटाटा जिप्स मागवले. एक तर रिसॉर्ट मध्ये पुरेसा उजेड नव्हता. खाजणाच्या बाजूला जागा असल्याने किंवा काही ही कारणाने प्रचंड डास होते, त्या डासांना हाकलत काळोखात भजी आणि चिप्स खाल्ले. चिप्स संपवल्यावर माझ्या लक्शात आले की ज्या प्लेटमध्ये चिप्स दिले होते ती मेलामाईनची प्लेट कळकट आणि चक्क तुटलेली - मध्यभागी तीन इंचाची आरपार चीर गेलेली होती. त्याक्षणी मी तिथून परत फिरायचा निर्णय घेतला. गाडीचे डिझेल किती खर्च करायचे एसी साठी ह्या विचाराने विना एसी च्या खोलीत जाऊन झोपलेल्या नवर्याला उठवलं.
अर्थात नंतर त्यावेळच्या केअरटेकर बरोबर वाद. सॉरी मुलाने चूक केली तो नवा आहेम तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला दुसरी प्लेट देतो, मी म्हटलं डॅमॅज इज ऑलरेडी डन आता फुकटात सुद्धा राहाणार नाही इथे. तुम्ही पैसे परत करा. मग आम्ही असे पैसे परत करू शकत नाही रुल नाहीये तसा, नंतर आम्ही पैसे उद्या बँक ट्रान्सफर करतो वगैरे सांगणे. अर्थात माझा विश्वास उडालेला होता. मी पोलिस स्टेशनला जायची तयारी करणे. तुम्ही इमॅजिन कराल तो सगळा वाद झाला. मग ओळ्खीच्या एका इन्स्पेक्टरला फोन केला तर तो नालासोपार्यातला राहणारा होता. मग तो त्या केअर्टेकरशी बोलला. नंतर तिथे उभे असणार्या एका माणसाशी बोलला. तो माणूस ह सगळा तमाशा तिथे उभं राहून पहत होता. मग ज्या इन्स्पेक्टरला फोन केला होता त्याच्याकडून कळले की तो माणूस त्या जागेचा मालक होत आणि ती जागा डेव्हलप करून रिसॉर्ट म्हणून चालवायला त्याने दुसर्या कंपनीला दिली होती. शिवाय तो मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या संरक्षणाला असलेला पोलिस होता. त्या माणसाने इन्स्पेक्टरला शब्द दिला की ह्यांना पैसे देववण्याची जबाबदारी माझी. मग केवळ दोन डिपार्टमेण्टची माणसे एक्मेकांना शब्द देत आहेत म्हणून मी गप्प बसले. दुसर्या दिवशी संध्याकाळी नालासोपारा स्टेशनला जाऊन पैसे घेतले. त्यावेळी आम्हाला कळाले की मॅनेजर आणि केअर्टेकर अत्यंत उर्मट आहेत आणि स्टाफला व्यवस्थित वागवत नाहीत शिवाय रिसॉर्ट वर येणार्या लोकांच्या पुढ्यात खुषाल सिगरेट फुंकत पायावर पाय घेऊन बसून राहातात.
ह्याच्यापुढे ऑथेंटिक रीव्ह्यु शिवाय कोणत्याही रिसॉर्ट मध्ये जायचे नाही असे ठरवले आहे.
युरोपातील झेक रिपब्लिक या देशात शेजारच्या देशातून रस्त्यावरून प्रवेश करताना काही पैसे भरावे लागतात. त्यामध्ये स्कॅम होत असते आणि त्यामुळे अर्थातच पर्यटकांची फसवणूक केली जाते. हे कसं करतात हे उघड करणारा व्हिडिओ.
फसवणूक टाळण्यासाठी ऑफिशियल मशिनींमधूनच तिकिटे घ्या. ही ऑफिशियल मशीन सहजासहजी दिसणार नाहीत अशा ठिकाणी असतात. तर फसवणुक करणारे दुकान उघडून अगदी समोरच बसलेले असतात.
Europe's HIGHWAY STICKER SCAM Exposed (Honest Guide) : https://www.youtube.com/watch?v=FsWcc-9KMEc
वरील व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे. नुकताच त्याचा अपडेट देणारा व्हिडिओही आला आहे. परिस्थितीत काही सुधारणा नाही.
They Sued Us But Failed. Let's Expose Them Again! : https://www.youtube.com/watch?v=9_JfUukoK4k
तो ट्रॅप असतो, त्या वस्तु आधीच तुटलेल्या अलगद कळणारही नाही अशा जोडल्या असतात कुठे धरायचे ते त्यांनाच माहीत असते. तुम्ही हात लावला की तुटल्याच समजा. मग तुम्हाला त्याचे पैसे देण्या शिवाय गत्यंतर नाही.
------
दिल्ली बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण मुंबईतही अशा काही गोष्टी होतात हे मला काही वर्षांपूर्वी कळले.
जर्मनीहुन एक कलीग आला होता आणि मुंबईला आम्ही कस्टमर व्हिजिटला गेलो होतो. माझा नेहमीचा टॅक्सी वाला होता, युपीचा. जर्मन कलीगला बायकोसाठी काहीतरी घ्यायचे होते, तेव्हा आम्ही बांद्र्याला पोचतच होतो, टॅक्सी वाल्याला सांगितले चांगला मॉल माहीत असेल तर तिकडे घे.
तो एका मोठ्या गिफ्ट शॉप टाईप दुकानाकडे घेऊन गेला, म्हटले इकडे नको. तर म्हणाला काही घेऊ नका पण दुकान एक राऊंड तर मारून या. मग नेतो मॉल मध्ये. म्हटलं का? तर म्हणे या दुकानात फॉरेनरला आणले की आम्हाला ५००₹ मिळतात मग त्याने काही घेतले नाही तरी.
गंमत म्हणुन आत जाऊन बघावे असा विचार केला तर आत जाताच एवढे दणकून स्वागत झाले जणु आम्ही मुख्य अतिथी आणि ते केव्हाचे आमची वाट पाहताहेत. ते पाहूनच त्याच्याही डोक्यात घंटा वाजली, म्हटले नुसते पाहायलाही नको, लगेच वळून बाहेर आलो. ड्रायव्हरला सांगितले परत अशा दुकानात आम्हाला कधीही न्यायचे नाही.
१९९५-२००० चा काळ. दिल्ली चंदिगढला फोन वरून हॉटेल बुक करून तिथे स्टेशनवर/विमानतळावर पोचून पुढे रिक्षा/टॅक्सीने हॉटेल वर पोचणे एक दिव्य असे. आपण ज्या हॉटेलला घेऊन जा म्हणुन सांगितले त्या ऐवजी त्यांना कमिशन मिळेल त्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्यास ड्रायव्हर लोक कुठल्याही थराला जात. आपण सांगू ते हॉटेल बंद पडलेय, अरे कालच त्या हॉटेलला आग लागली, तिथे तर काल पोलिसांची रेड पडली धंदा चालतो तिथे, त्या हॉटेलचे आता नाव बदललंय अमुक हॉटेल झालंय वगैरे नित्याचे. या सगळ्याला आपण पुरून उरलो की दुसऱ्याच हॉटेल समोर थांबवून साहेब हे हॉटेल पाहून तर घ्या, नाही पटलं तर नका राहु एकदा बघुन तर घ्या. आमच्या कंपनीचा काँट्रॅक्ट असतो डायरेक्ट पेमेंट होते हॉटेलचे आम्ही पैसे दिले तर परत मिळत नाही वगैरे थापा मी आधी मारायचो, तर ते म्हणणार ज्याने काँट्रॅक्ट ठरवला तो कमिशन खात असेल, तुम्ही नवा काँट्रॅक्ट ठरवा चांगली हॉटेल्स दाखवतो तुम्हाला पण कमिशन मिळेल. नुसती कटकट. (यापेक्षा अहमदाबाद, बरोडा वाले बरे. बुकिंग असेल तर एवढे भाडे, नसेल तर दहा रुपयात घेऊन जातो म्हणायचे.)
सगळेच एवढ्या चिकाटीने मागे लागत नसत, पण थोडीफार तरी नाटकं करत, काही तर भयंकर करत.
मी पण हळूहळू निर्ढावलो आणि आग लागली म्हटलं तर हो बरोबर त्याच्याच चौकशीला
आलोय फायर सेफ्टी डिपार्टमेंट कडून, रेड पडली म्हटले बरोबर, त्याचीच
स्टोरी कव्हर करायला आलोय आमच्या पेपरसाठी अशी उत्तरं देऊ लागलो.
एकदा दिल्ली वरून चंडीगडला बसने पहाटे पोचलो.
जवळ पास सायकल रिक्षाच होत्या आणि हॉटेलही फार लांब नव्हते. नाही ! त्याच
हॉटेल मध्ये न्यायचं आणि मध्ये दुसऱ्या हॉटेल बद्दल बोलायचंही नाही अशी
तंबी देऊन रिक्षा ठरवली.
तर रिक्षा वाल्याने त्याच हॉटेलच्या कागाळ्या सुरू केल्या, लोकांचे सामान
चोरीला जाते अन काय काय. मध्ये दुसरा रिक्षावाला क्रॉस झाला तर ओरडून
त्याला म्हणाला "साब को अमकेही हॉटेल मे जाना है, बताओ" तो: " वहा कलही
लडकी पकडी।" हा "देखो साब, मै ने बताया ना!"
मी "लडकी पकडी तो उधरही ले चलो."
आणि त्याने धाडकन रिक्षा कडेला घेऊन थांबवली आणि "मैने नही ले जाणा आप
को, मुझे नही फसना है कोई लफडे मे।" असे म्हणुन सरळ एका टपरी कडे निघून
गेला. पैसेही मागीतले नाहीत काही. मी बॅग घेऊन पुढच्या चौकात जाऊन दुसरा
रिक्षा केला.
हॉटेलवाल्याला झाला प्रकार सांगितला तर म्हणाला आम्ही धुतला असता त्याला हे
कळल्यावर म्हणुन त्याला चेहरा दाखवायचा नव्हता आम्हाला. आधी पण असे
प्रकार झालेत.
२००० नंतर मग वेगळी हॉटेल्स, त्यांचाच पिक अप असे सुरू झाले आणि हे ऍडव्हेंचर्स दुर्मीळ झाले.
मलाही हैदराबाद मध्ये जाम फसवलं आहे
रिक्षा तर कैच्याकै महाग असतात तिथं
मी एक बिल्डिंग शोधत होतो, रिक्षावाल्याला विचारला तर म्हणे लेके जाता, बैठो
म्हणलं किती घेणार? तर म्हणे 50रु
आणि म्हणे इतना फिक्स है, बाद में खिटखीट नई करना
म्हणलं ठिके आता काय, तेव्हा गुगल मॅप्स वगैरे नव्हते,मोबाईल पण अगदी मागासलेले असत
बसलो, आणि एक चौक ओलांडून मला म्हणे ये सामने बिल्डिंग
माझं असलं डोकं सरकला म्हणलं हेच तू बोलला असता तर मी चालत आलो असतो ना
मी अजिबात 50 रु देणार नाही
तर आरडाओरडा करायला लागला, शिव्या द्यायला लागला
बाकीचे दोन तीन रिक्षावाले आले
हिंदीत भांडणात आपण बाजू बरोबर असूनही वाद घालू शकत नाही हे कळलं
कानाला खडा म्हणून निमूटपणे त्याला पैसे दिले
नंतर कधीही रिक्षा करताना किती अंतर आहे, कितिकिमी वगैरे आधीच विचारायचो
सगळ्यात बेस्ट म्हणजे ट्रॅफिक पोलीस ला विचारायचे,इथून या ठिकाणी जायचे आहे, रिक्षाचे किती होतात
तो बरोबर अंदाज द्यायचा मग त्याप्रमाणेच रिक्षा ठरवायची
नैतर तुमचा खिसा हलका झालाच
हैदराबाद चे रिक्षावाले कचाकचा भांडतात
खूप वर्षांपूर्वी नवी दिल्लीत सुरुवातीला फसवून चांगलंच घेतलं पण नंतर साधारण नवी दिल्ली स्टेशन ते आम्ही उतरलो होतो त्या रंजीत हॉटेलपर्यन्त किती रिक्षेचा दर साधारण द्यायला हवा सांगणारी चांगली लोकं पण भेटली त्यामुळे अंदाज आला. दिल्लीत मिश्र अनुभव आले. नवी दिल्लीत आपल्याला जणू नवीन बघितल्यावर पकडतात, त्यात आमचं लेकरू लहान होतं मग काय सॉफ्ट टार्गेट. नंतर मात्र फार वाईट अनुभव आले नाहीत कारण थोडे अलर्ट होतो आणि साधारण इथून इथे रिक्षा किती घेते वगैरे हॉटेलवर विचारून घेतलं.
एका प्रायव्हेट बसने दिल्ली दर्शन करत होतो, तो माणूस सांगत होता, प्रदूषण वगैरे बस जास्त करत असली तरी पैसे फेकले की काही अडत नाही आमचं. लाल किल्ल्यात मीना बाजारात काही छोट्या वस्तु अतिशय स्वस्त मिळाल्या त्या मी गिफ्ट म्हणून घेतल्या.
नंतर महाराष्ट्र मंडळ आहे तिथे गेलो. दिल्ली आग्रा मथुरा बस बुक केली, आग्रा इथे अमुक दुकानातून हे घ्या ते घ्या, असं गाईड सांगत होता, मी छोट्या वस्तु सिलेक्ट केल्या, फार काही घेतलं नाही. एकीकडे पेठा घेतला मात्र कारण बस नंतर थांबणार नव्हती. येताना पिंपरी चिंचवड च्या डॉक्टर कपलला (दोन मुलांसह होते ते), त्यांनी रात्री दिल्लीत मध्येच कुठे सोडलं, उतरल्यावर ते इथून कसं जायचं विचार करत होते, ते बघून मी फार घाबरले पण आम्हाला सुखरूप हॉटेलसमोर सोडलं.
चांदणी चौकात शाली छान स्वस्त मिळाल्या, त्या जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट द्यायलाही घेतल्या. तिथे सर्व साड्या किंवा कपडे घेण्यासाठी आतमध्ये ओढायलाच बघतात, अशा ठिकाणी न जाता पराठे खाऊन आतल्या बाजूच्या गल्लीत खरेदी केली. तिथून येताना सायकलरिक्षेने आलो, स्वस्त होती, आम्ही थोडे वर पैसे दिले त्याला. काही रिक्षावाले (स्कूटर म्हणतात तिथे), मुलाला आत ओढायलाच बघायचे बसा बसा करत मग वाटेल तो रेट सांगायचे, त्यामुळे खूप सावध झालो आम्ही.
स्पेशल चाईल्डला घेऊन फिरताना काही फायदा घ्यायला बघत होते त्याचबरोबर काहींची मदतही झाली, म्हणून मी मिश्र अनुभव आले लिहिलं वरती.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.