Thursday, April 4, 2024

नर्मदे हर. 3

 

लेखांक ७९ : दहीबेहड्याचा नाखूनवाले दादा आश्रम आणि राजघाटावरचा 'पैशाचा पाऊस'

कोsहम्

आता मात्र काठाने चालताना अभूतपूर्व असा चिखल दिसू लागला . चिखल तुडवून जाण्याशिवाय पर्याय शिल्लक नव्हता . त्यात माझ्या पायामध्ये अडकवून घालण्याची साधी चप्पल असल्यामुळे ती सतत चिखलामध्ये रुतून बसायची . सरदार सरोवर धरणाचे हे फुगवटा क्षेत्र असल्यामुळे पाण्याची पातळी उतरली की असा चिखल काही काळ दिसायचा . लवकरच त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात गवत उगवायचे . परंतु या अतिरिक्त पाण्यामुळे मोठमोठी झाडे मात्र वठून जायची . हळूहळू अशा वठलेल्या महावृक्षांची संख्या वाढत गेली . पांढरी फट पडलेली त्यांची खोडे पाहून वाईट वाटायचे . केवळ मुळांचा खोलवर पसारा गेलेला असल्यामुळे ही झाडे अजूनही जागेवर ताठ उभी होती .

 दतवाडा , गोलाता , छोटा बडदा , सनदेवा , आवली , सेगवा इतकीच गावे आज पार करता येणे शक्य होणार होते .इथे चिखलातून चालताना एक केवट राम भेटला आणि त्याने माझा फोटो काढला . 

छोटा बडदा टप्प्यामध्ये एक कठीण ओढा नावेने पार करून दिल्यावर एका केवटाने काढलेले प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र . मागे पाण्यामध्ये तरंगणारी मोटर दिसते आहे . एका मोठ्या बॅरलला बांधून या मोटर्स लटकत सोडतात .

पायातल्या चपला चिखलाने बरबटलेल्या आहेत .

आज-काल इतक्या काठाने खूपच कमी परिक्रमावासी जात असल्यामुळे काठावरील निवासी लोक कुतूहलाने फोटो काढायचे . बरेचदा गावातील तरुणांच्या व्हाट्सअप समूहावर वगैरे हे फोटो फॉरवर्ड होत असावेत असा माझा अंदाज आहे . आज हमने मैया किनारे एक परकम्मा वासी देखा वगैरे वगैरे ! 

गावातील लोक त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत अतिशय सजग असतात हे नेहमी लक्षात ठेवावे ! तुमच्या नजरेमध्ये कोणीही नसले तरी तुमच्यावरती अनेक नजरा असतात याचे भान सतत बाळगावे . विशेषतः एक अशी 'मेहेरनजर' तुमचा पाठलाग करत असते जी तुमचा जीवनाकडे बघण्याचा 'नजरिया'च बदलून टाकण्याचे सामर्थ्य बाळगते ! आणि ती असते नर्मदा मातेची कृपादृष्टी ! ती तुम्हाला कुठेही पाहू शकते कारण ती सर्व साक्षीणी आहे . परंतु तरीदेखील ती आपल्याकडे पाहते आहे असे आपल्या मूढ मतीला वाटावे म्हणून आपले किनाऱ्या किनाऱ्याने चालायचे इतकेच !

चंगा बाबा आश्रमाच्या पुढे काठाने चालताना जी बेटे तुम्हाला दिसत आहेत ती मी चालताना पाणी उतरल्यामुळे संपूर्ण चिखलाचा पट्टा बनलेली होती . हे उपग्रह चित्र पाणी पातळी बऱ्यापैकी वाढलेली असताना काढलेले आहे . मी काठाने चालताना बहुतांश चिखलच होता .

मैयाकाठी अनेक माणसे भेटायची .नर्मदे हर करायची . प्रत्येक भेटणारा माणूस काठाने रस्ता नाही हेच सांगायचा . परंतु त्यात त्याचा दोष नसायचा . रस्ता नाही असे सांगताना "रस्ता " या प्रकाराची एक संकल्पना त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असायची . परिक्रमा वासी ला सुखाने चालता यावे , सावली मिळावी , विसावा मिळावा , घरे दिसावीतघरे दिसावीत ,खायला प्यायला मिळावे ,दुकाने सापडावीत ,अधून मधून झालेच तर नर्मदा मातेचे दर्शन देखील व्हावे असा रस्ता म्हणजे परिक्रमेचा रस्ता असे काहीसे गणित बहुतांश नर्मदा तटवासी लोकांच्या डोक्यात पक्के बसलेले आहे . आणि ते तसे बसण्यास बऱ्याच अंशी बहुसंख्य परिक्रमावासी कारणीभूत आहेत . मी मात्र हट्टाने म्हणा किंवा दुराग्रहाने म्हणा परंतु काठाकाठानेच चालायचा प्रयत्न करायचो . पदोपदी मला मोहन साधूने दिलेले सल्ले आठवायचे . समोर प्रचंड माजलेला चिखल दिसला की मला मोहन साधू आठवायचा . तो सांगत असायचा , " देख बेटा , रास्ते मे तुझे बहुत लोग मिलेंगे । बतावेंगे की बाबाजी आगे रास्ता नही है। उनके पाव छूने का और पूछने का , प्रभू आप लोग चल सकते हो ऐसा रास्ता है क्या ? वे बोलेंगे हम तो आराम से चल लेते है । बात खतम ! झोली कमंडल  उठाने का और चल पडने का ! " मी अगदी असेच करायचो . एकदाच शांतपणे आणि नम्रपणे समोरच्या माणसाला तुमचा काठाकाठाने चालण्याचा शुद्ध हेतू सांगितला की सर्वच लोक खूप सहकार्य करायचे असा माझा स्वानुभव आहे . शिवाय या मार्गाने जाणारे कोणीतरी खूप दिवसांनी , किंवा खूप महिन्यांनी , किंवा खूप वर्षांनी भेटले , असे देखील आवर्जून सांगायचे . त्यामुळे हुरुप अजून वाढायचा ! नर्मदा खंडामध्ये या प्रकारच्या चालण्याला तटैतटै चलना असे म्हणतात . रस्त्यावरून चालत परिक्रमा करण्याच्या प्रकाराला इकडे रोड-ई-रोड चलना असे म्हणतात .त्यामुळे कोणी अडवलेच तर मी लगेच सांगून टाकायचो . "नर्मदे हर भगवन् । हम रोडीरोड नही चलते । तटैटटै चलते है । " म्हणजे आपल्या मराठीमध्ये काठाकाठाने अथवा तटातटाने .हे ऐकल्याबरोबर तुमचे अर्धे काम होऊन जायचे . पुढे फारच धोकादायक काही असेल तर लोक सांगायचेच . आता सुद्धा वरती आपण जी छायाचित्रे पाहिली ती ज्या केवटाने काढली त्याने मला अतिशय खोल आणि धोकादायक असा एक ओढा त्याच्या छोट्याशा नावेतून पार करून दिल्यावर काढलेली आहेत . मला ओढा ओलांडून दिल्यावर तो घरी निघून गेला . मी त्याला मला मोहीपुरा गावात मिळालेल्या शेंगा देऊन टाकल्या . दिवसातून एकदा तरी नर्मदे काठी चक्कर मारल्याशिवाय ग्रामस्थांना चैन पडत नाही . ती आहेच तशी ! लाघवी ! मनस्वी ! तेजस्वी ! ओजस्वी ! तपस्वी ! प्रत्येक पावलाला तिचे स्मरण करावे आणि तीने क्षणोक्षणी आपल्याला पावावे ! अशीच ती पतीत पावना आहे ! पंत महाराज बाळेकुंद्रीकर या कर्नाटक प्रांतात होऊन गेलेल्या महान संतांचे एक पद मला पदोपदी आठवायचे ! 

क्षणोक्षणी विसरतो तुजला । 

परी राखीसी निशीदिनी मजला। 

सेवा स्मरण काही न करिता । 

योगक्षेम वाहतोसी भला । 

आजूबाजूला रम्य काही दिसले की क्षणात तिचा विसर पडून जायचा . आपला मूळ मानवी स्वभावच असा आहे . त्यात या परिसरामध्ये प्रचंड चिखल असल्यामुळे पक्षी जीवन चांगले समृद्ध होते . दोनशे दोनशे चक्रवाक पक्षांचे थवे दिसायचे . इतक्या मोठ्या संख्येने विहार करणारे चक्रवाक पाहिल्यावर भान हरपून जायचे ! सर्वात प्रथम जेव्हा मी नर्मदाष्टक म्हटले तेव्हा मला कळाले नव्हते की इतक्या पक्षांचा आणि प्राण्यांचा उल्लेख शंकराचार्यांनी कशासाठी केला आहे ? परंतु जेव्हा प्रत्यक्ष हे सर्व प्राणी पक्षी दिसतात तेव्हा खरोखरीच आनंदाची अनुभूती मिळते ! चक्रवाक शर्मदे देवी नर्मदे ! तुझा जयजयकार असो ! छोटे मोठे भुरे बगळे तर मोजायलाच नकोत . छोटी आणि मोठे पाणकावळे , पाणकोंबड्या , पाकोळ्या , चित्रबलाक , करकोचे , आयबीस सर्वच पक्षी शेकड्याच्या संख्येने दिसत होते ! अगदी कोतवाल पक्षी सुद्धा ५० च्या गटाने उडताना मी प्रथमच पाहिले ! हा अतिशय तापट पक्षी असतो . आणि कितीही मोठा शिकारी पक्षी आला तरी त्याच्या अंगावर तुटून पडतो त्यामुळे कोतवालाचे घरटे ज्या झाडावर असेल त्या झाडावर तुम्हाला अनेक पक्षांची घरटी सापडतात . बघा नुसता पक्ष्यांचा विषय निघाला तरी मैया चा विसर पडला ! असेच काठावर चालताना देखील व्हायचे ! पक्षी बघत चालताना आपण कुठे आहोत काय करतो आहोत या साऱ्याचे भान विसरून जायचो . मग ती हळूच एखादी टपली मारायची ! गुडघ्यावर आपटायचो , किंवा घसरून पडायचो , किंवा तोल जायचा , किंवा पाय मुरगळायचा आणि मग क्षणात भानावर यायचो ! नर्मदा मातेचा जयजयकार करून पुन्हा चालायला लागायचो . मी अशी कल्पना करायचो साडीच्या पदरावर जशी पशु पक्षांची चित्रे ओळीने काढलेली असतात तशा या जिवंत पक्षी मालिका नर्मदा मातेने ल्यालेल्या आहेत ! या सर्वांवर कडी करायचे ते वरडोळा नावाचे मासे ! हे मासे दोन डोळे वरती काढून अतिशय गमतीशीर प्रकारे समूहाने पोहताना दिसत . हिरवट पोपटी रंगाचे हे मासे दुरून पाहिल्यावर एखाद्या सापासारखे वाटायचे . पण त्यांचे डोळे पाहिले की हसून हसून पुरेवाट व्हायची ! इतक्या मजा मजा ते पोहताना करायचे ! आद्य शंकराचार्य म्हणतात त्वदम्बुलीनदीनमीन दिव्यसंप्रदायकम् ! अर्थात तुझ्या पाण्यामध्ये रमामाण झालेल्या गरीब बिचाऱ्या माशांना दिव्यत्व प्रदान करणारी अशी तू आहेस ! विषय निघालाच आहे म्हणून या वरडोळा माशा विषयी थोडेसे संशोधन घडले ते सांगतो . ॲनाब्लेप्स किंवा फोर आईड फिश अर्थात चार डोळ्याचा मासा असे या माशाचे नाव आहे . हा प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेत आढळतो .

दक्षिण अमेरिकेच्या फ्रेंच गुयाना , सूर्यनाम अथवा सूरीनाम , गुयाना या देशांमध्ये हा मासा आढळतो . गमतीचा भाग म्हणजे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोकसंख्या गेली हजारो वर्षे आहे . आपण गयाना असा उल्लेख करतो परंतु प्रत्यक्षात ते गुयाना आहे . इथल्या सत्ताधारी पक्षाची वेबसाईट करण्याचे काम एका मित्रासोबत मी करून दिले होते त्यामुळे मला हे माहिती आहे . इथे अनेक वर्षे निरंकुश सत्ता गाजवणारा रामअवतार नावाचा हिंदू राजकारणी होता . आजही त्या भागात फार मोठ्या प्रमाणात हिंदू लोक आहेत . आणि हे आत्ता गेलेले नसून हजारो वर्षांपूर्वी तिथेच स्थलांतरित झालेले आहेत . कॅरिबियन बेटे गौतमालय अथवा ग्वाटेमाला तसेच गुयाना खंडातील देश इथे प्रामुख्याने तमिळ वंशीय लोक आढळतात . कारण नौकानयनाचा प्रगत अभ्यास जगात सर्वप्रथम तमिळ दर्यावर्दींनी हे आता सर्वमान्य आहे .अलीकडच्या काळात या लोकांनी धर्म बदलले असले तरी आपली मूळ भारतीय नावे तशीच ठेवली आहेत . या काळामध्ये मी ७२ राजकारणी लोकांचे कार्टून कॅरिकेचर बनवून दिले होते . बहुतांश लोक भारतीय होते !  आता संशोधकांना मला इतकेच सांगायचे आहे की नर्मदा खंडातून हा मासा तिकडे गेला की तिकडून नर्मदा खंडामध्ये आला याचे कृपया संशोधन करावे ! हा मासा पाण्याच्या वर आणि पाण्याच्या खाली एकाच वेळी बघू शकतो ! त्याचे डोळे त्यासाठी बनलेले आहेत . 

वर डोळा मासा किंवा चार डोळ्याचा मासा ( ॲनाब्लेप्स )

पाण्याच्या पातळीच्या वरती बघणे आणि खाली बघणे अशी दोन्ही कामे हा डोळा करू शकतो

चतुर्नेत्र मत्स्याचे नेत्रविच्छेदन

त्याचे हे हसरे तोंड मी खूप वेळा पाहिले आहे ! या माशांना काठावर काय चालू आहे याची प्रचंड उत्कंठा असते ! 

विशेषतः तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते तुम्हाला अजिबात पाठ दाखवत नाहीत ! सतत ते डोळे तुमचा वेध घेत असतात ! नर्मदा परिक्रमा ज्यांनी काठाने केलेली आहे त्यांना हा मासा दिसला नाही असे होऊच शकत नाही इतक्या बहुसंख्येने हे नर्मदेमध्ये आहेत .

या माशांचा क्रमांक एकचा शत्रू आहे भुरा बगळा !

मी काठावर शांतपणे बसून बगळे मासे कसे पकडतात ते पाहायचो . विशेषतः काठाने मनुष्य चालला की वर डोळा मासा मला शोधायला वर येणार हे माहिती असल्यामुळे हे बगळे माझ्यासोबत उडायचे ! या सर्व मजा मजा तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये पदोपदी अनुभवायला मिळतात ! फक्त आपले चहुकडे चौकस लक्ष पाहिजे . आजूबाजूला खूप मजेशीर घटना घडत असतात ! या माशाचे अजून एक वैशिष्ट्य आहे . यातील नर आणि मादी यांचे जननेंद्रिय एका कुठल्यातरी बाजूला असते . डाव्या किंवा उजव्या . त्यामुळे यांची जोडी फार मुश्किलीने बनते . उजव्या हाताचा नर आणि डाव्या हाताची मादी असेल तरच त्यांची जोडी बनू शकते . तसेच डावा वर आणि उजवी मादी एकत्र नांदतात . असे जोडीने एकत्र पोहणारे ॲनाब्लेप्स मासे देखील मी खूप पाहिले . 

उडता उडता पाणी पिणारा कोतवाल पक्षी (सर्व छायाचित्रे संग्रहित आहेत )

नर्मदा खंडाची शान चक्रवाक पक्षी अर्थात रूडीज शेल्डक

चक्रवाक पक्षाच्या लीला पाहणे अतिशय नेत्र सुखद असते

अतिशय धष्टपुष्ट आणि सतत क्रियाशील असणारा हा पक्षी आहे

काठाने चालत येणारा एखादा परिक्रमा वासी दिसला की लगेच चक्रवापक्षी आवाज द्यायचा "आला आला ! " चक्क आला असा शब्द आपल्याला ऐकू येतो ! 

हजारो मैल उडण्याची ताकद या पंखांमध्ये आहे

हे पक्षी किती भाग्यवान आहेत ! दिवस-रात्र नर्मदा मातेमध्ये संचार करतात ! म्हणून तर ती त्यांचे कल्याण करते ! चक्रवाक शर्मदे ! शर्म म्हणजे कल्याण , शर्मदा म्हणजे कल्याण करणारी नर्मदा !

 पाणपक्ष्यांच्या बहुसंख्येमुळे इथे दगडावर असे नक्षीकाम तुम्हाला सर्वत्र आढळते .

चालताना वाटेत काही घाट लागले . परंतु फारशी मनुष्य वस्ती नव्हती . आज दुपारी निघाल्यामुळे अंतर निम्मेच चालणार होतो . 

अशा रीतीने कित्येक वर्षे जुनी झाडे वठलेली पाहणे वेदनादायक होते . खाली देखील वठलेल्या झाडांचे ओंडके पडलेले आपण पाहू शकता .

मध्ये छोटी बडदा नावाचा घाट लागतो

छोटी बडदा भागातील नर्मदा मैय्या

घाटाचे अजून एक छायाचित्र

घाटावरील देवळ्या

श्री अग्नेश्वर महादेवाचे मंदिर . नर्मदा पुराणा मध्ये ज्या ज्या मंदिरांचा उल्लेख आलेला आहे त्या सर्व मंदिरांना तीर्थ म्हणण्याची पद्धत नर्मदा खंडामध्ये आहे . हे मंदिर देखील तीर्थक्षेत्र असून त्याची अवस्था किती साधारण आहे पहा .

श्री अग्नेश्वर महादेव
इथून पुढे चिखलातूनच मार्गक्रमण करत राहिलो . पाणी नुकतेच उतरल्यामुळे हा चिखल झालेला होता . कदाचित दोन-तीन दिवसांनी वरचा पृष्ठभाग वाळला असता . संदेवा आणि आवलीया गावांच्या मध्ये खेडापती हनुमंताचे एक छोटेसे मंदिर , एका भव्य वटवृक्षापाशी होते . त्याचे दर्शन घेऊन पुढे चालत राहिलो .

श्री खेडापती हनुमान मंदिर

मंदिर परिसरातील भव्य वटवृक्ष

पुढे चालत राहिलो .  हळूहळू एक टेकडी वजा टापू डाव्या हाताला दिसू लागला . सूर्य मावळतीकडे झुकला होता . इथे राहण्याची काही सोय झाली तर पहावी असा विचार करेपर्यंत नाव वल्हवत घरी निघालेल्या एका केवटाने इशारा केला की टेकडीवर जावे . त्याप्रमाणे मी वरती चढू लागलो . मुरमाड जमीन होती . झाडी देखील कमी होती . त्यामुळे पाय सटकत होते . खाली सर्वत्र केळी , वांगे अशी शेती होती . केळीच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे एकत्र औषध घालण्याची एक सुंदर सिस्टीम इथे लावलेली मी पाहिली . आणि शेतकऱ्याकडून ती कशी चालते वगैरे समजावून घेतले . गुजरात मध्ये हे संयंत्र बनत होते . वापरण्यासाठी अतिशय सोपे होते . औषधाचा अपव्यय टाळणारी यंत्रणा होती . डोंगरावर एके ठिकाणी मला जेसीबी ट्रॅक्टर वगैरे दिसू लागले . वरती गेल्यावर एक छोटा मुलगा धावतच स्वागतासाठी आला . हा दही बेहडा नावाच्या गावातील नाखूनवाल्या बाबांचा आश्रम होता . 

नाखून वाले बाबांचा आश्रम येण्यापूर्वी नर्मदा मैया चा किनारा असा आहे . सर्वत्र चिखल पाणी दलदल यांचे साम्राज्य पसरलेले आहे .

हीच  सेगवां गावातील नाखून वाले बाबांच्या आश्रमाची टेकडी .दही बेहडा नावाच्या गावाची ही एक वाडी आहे . 

टेकडीच्या सर्वोच्च बिंदू वरून काढलेले आश्रमाचे चित्र . उजवीकडे भगवा कळस दिसतो आहे ते हनुमान मंदिर आहे . त्याला लागूनच परिक्रमावासींची खोली आहे . डावीकडे मोठी गोशाळा आहे . मधोमध दिसणाऱ्या झाडाखाली साधुकुटी आहे .

आश्रमातील हनुमान जी

समोर दिसणाऱ्या निळ्या भिंतीच्या खोलीमध्ये मी मुक्काम केला . हिरवे कापड लावले आहे तिथे चूल आहे . अंगणामध्ये बसूनच भोजन केले होते .

साधूंचा आशीर्वाद मिळायला देखील भाग्य लागते हेच खरे !

 साधकुटी . समोर पिवळ्या रंगाची भिंत म्हणजे परिक्रमावासी निवास .

महाराजांना परिसराची रंगरंगोटी करण्याचा छंद आहे असे जाणवते . प्रत्येक छायाचित्रांमध्ये वेगळ्या रंगाच्या भिंती दिसत आहेत .सर्व चित्रे गूगल नकाशावरून साभार . 

आश्रम अतिशय सुंदरपणे सजवलेला आहे

आश्रमाच्या स्वतःच्या गाड्या घोड्या जेसीबी सर्व आहे .

या परिसरामध्ये लांडग्यांचा मुक्त वावर आहे . त्यामुळे छोट्या जनावरांची काळजी घ्यावी लागते . आश्रमाचे वर जोडलेले एक व्यापक चित्र टेकडीच्या ज्या बिंदू वरून काढले आहे त्या बिंदूवर उभा असलेला लांडगा .

पूर्वी इथे नखे न कापण्याचा संकल्प केलेले एक संत राहत असावेत .इथे असलेल्या महंतांच्या समोर जाऊन मी नमस्कार केला . परंतु ते माझ्याशी एकही शब्द बोलले नाहीत . मी त्यांना नाखून वाले दादा यांच्या बद्दल विचारले तरी देखील त्यांनी काही उत्तर दिले नाही . पुढे जावे किंवा काय करावे अशा विचारांमध्ये असतानाच या छोट्या मुलाने एक खोली उघडून दिली आणि मला आत मध्ये मुक्काम करण्याची सूचना केली . ही खोली मैयाच्या बाजूला असल्यामुळे मग याचे सुंदर दर्शन होत होते . खोली अत्यंत अंधारी होती . दोन-तीन छोट्या खिडक्या होत्या . अंधारामुळे आत मध्ये प्रचंड डास होते . एका कोपऱ्यामध्ये मी आसन लावले .पूजा अर्चा वगैरे आटोपून घेतले . आश्रमामध्ये एक गोशाळा होती . ती पाहिली . हनुमंताचे सुंदर देवालय होते . तिथे बसून मारुतीची स्तोत्रे वगैरे म्हणू लागलो . इतक्यात साधु महाराज आले आणि मारुतीची आरती झाली . तेव्हा देखील ते एकही शब्द माझ्याशी बोलले नाहीत . त्यानंतर थोडावेळ मंदिरामध्ये बसून मी शांतपणे झोपी गेलो . उपाशीपोटीच झोपलो . खरे म्हणजे साधूंना मी विचारू शकत होतो की भोजन प्रसाद ची काय सोय होऊ शकते . परंतु परिक्रमेच्या नियमामध्ये हे बसत नाही . अशा पद्धतीने नर्मदा मैया तुमच्याकडून तितीक्षा या गुणाचा अभ्यास करून घेत असते. अगदीच भूक लागली तर कमंडलू मध्ये नर्मदा जल असतेच ते प्यायचं .मनात जर असा संकल्प केला की मैय्या मला भूक लागली आहे , तुझ्या जलाने माझे पोट भरू दे ,तर तुमची भूक शांत होते ,हे मी स्वतः अनुभवले आहे . तसेच करून शांतपणे पडलो . परंतु त्या खोलीमध्ये इतके डास होते की त्यांनी मला फोडून काढले . मी मनोमन विचार केला की बरे झाले चला ! किमान डास तरी उपाशी झोपणार नाहीत ! थोड्या वेळातच मला डोळा लागला . चिखलातून चालणे दमवणारे असते . पायाची शक्ती निघून जाते . कारण प्रत्येक पाऊल उचलायला तुम्हाला दुप्पट शक्ती लावावी लागत असते . रात्रीचे साडेदहा अकरा वाजले असतील . तीन-चार छोटी मुले मला उठवायला आली . खोलीमध्ये पूर्ण अंधार होता . मला एक क्षणभर कळेना काय चालू आहे . मुलांनी मला जागे केले आणि म्हणाली , "बाबाजी चलो भोजन करते है । " मी त्यांना विचारले , "तुम्ही कोण आहात ? " त्यांनी मला सांगितले की ती आसपास राहणारीच मुले होती व संध्याकाळी आश्रमामध्ये खेळण्यासाठी व गोसेवा करण्यासाठी येत असत . त्या सर्वांनी गोठा झाडून साफ केला होता . गाईंच्या धारा काढल्या होत्या . त्यांना व्यवस्थित चारापाणी केले होते . आणि इथेच परिक्रमावासींसाठी ठेवलेल्या शिध्यापासून सुंदर अशी भाजी आणि टिक्कड बनवले होते . "म्हणजे इथे परिक्रमावासींना सदाव्रत मिळते का ! " "होय तर शंभर टक्के मिळते " त्यांच्यातला सर्वात मोठा मुलगा  उत्तरला . त्याचे वय अंदाजे दहा-बारा वर्षे असावे . बाकीची मुले सहा सात आठ वर्षाची होती . इतक्या लहान वयात इतकी समज येते कुठून असे शहरी मनुष्यास वाटू शकते . परंतु खेडोपाडी राहणाऱ्या मुलांमध्ये समज लवकर येत असते हे आपल्यापैकी बहुतेकांना अनुभवाला आलेले असेलच . त्यातच अजून थोडी अधिकची समज नर्मदा खंडातल्या मुलांना असते हे मी अनुभवले . अनेक वेळा अनुभवले . त्यातलाच हा एक प्रसंग होता . मी जेवायला बसलो तेव्हा स्वयंपाक ज्याने केला होता तो मुलगा मला सांगू लागला . हा साधू स्वभावाने थोडासा अलिप्त आणि विक्षिप्त होता . इंग्रजीमध्ये त्याला मूडी असे म्हणतात . म्हणजे यांचा मूड असेल तर ते पंचपक्वान्नांचा स्वयंपाक करून खाऊ घालायचे . आणि नसला की ही अशी तऱ्हा होती . त्यामुळे ही मुले गोसेवा करून खरे तर घरी गेली होती . पण या ११ - १२ वर्षाच्या मुलाला असे वाटले की आज बहुतेक स्वामीजी रागाच्या भरात आहेत . तरी एकदा परिक्रमावासी जेवला का ते बघून यावे . चूल थंड पडलेली पाहिल्यावर त्याने ओळखले की परिक्रमावासी उपवासी झोपी गेलेला आहे .मग त्याने लगेच निर्णय घेतला मी स्वयंपाक करून याला खाऊ घालावे आणि मगच घरी जावे . त्यानंतर त्याने मित्रमंडळी गोळा करून आणली . कुणी भाजी चिरली , कुणी कणिक मळली तर कोणी पोळ्या भाजल्या . ही मुले कोण मला माहिती नाही . या मुलांची माझी आयुष्यात पुन्हा भेट होईल का? ते देखील माहिती नाही . जरी भेट झाली तरी मी त्यांना ओळखेन का ? तर ही देखील शक्यता कमीच आहे . मग त्यांनी माझ्यासाठी इतके का करावे ? हेच नर्मदे काठी राहणाऱ्या लेकरा बाळांना देखील उमगलेले अध्यात्म आहे . जो त्रास मला होऊ शकतो तो समोरच्याला देखील होऊ शकतो याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे . जे केल्यावर मला बरे वाटेल ते केल्यावर समोरचा देखील सुखावेल याचा अंदाज असला पाहिजे . जो परमात्मा माझ्या शरीरात वास करत आहे ,तोच परमात्मा समोरच्या देहाला देखील हलवीत आहे , याची प्रचिती आल्याखेरीज अशी कृती घडणे शक्य आहे काय !? नेमाडी भाषेमध्ये या मुलांच्या गप्पा चालू होत्या . आपण फार मोठे काहीतरी पुण्य कर्म केले आहे असा अविर्भाव त्यांच्या कुठल्याच कृतीमध्ये किंवा वाणीमध्ये अजिबात झळकत नव्हता . उलट आपण केले ते आपले कर्तव्यच आहे असाच भाव मला त्यांच्या वागण्यातून जाणवत होता . विशेषतः त्यातील एका सात आठ वर्षाच्या मुलाने बोललेले वाक्य माझ्या काळजाला स्पर्श करून गेले .तो नेमाडी भाषेत बोलला परंतु मला त्याचा आशय नेमका कळाला . तो म्हणाला , "आम्ही उपस्थित असताना एखादा परिक्रमावासी गावातून उपाशी निघून गेला हे मैया ला जर कळाले तर ती आम्हाला क्षमा करेल काय बाबाजी ? " मैयाच्या प्रती लोकांचे किती प्रेम आहे हे असे पदोपदी जाणवते . आबालवृद्ध सर्वचजण सतत तिचे ऋणाईत असतात . मुलांना आवरा-आवरीला मदत करून झोपायला निघून गेलो . चौघांना प्रेमभराने मिठ्या मारल्या . त्यांना देण्यासाठी माझ्याकडे अजून होते तरी काय ! प्रेम द्यावे प्रेम घ्यावे ! प्रेमे प्रेमची वाढवावे ! मुले देखील आनंदाने परतली . सकाळी आम्ही आल्याशिवाय जाऊ नका असे सांगायला विसरली नाहीत ! मला भरपूर चावून घेतल्यामुळे डासांचे देखील पोट भरले होते . त्यामुळे उत्तर रात्री शांत झोप लागली . सकाळी लवकर उठून आन्हीके आटोपून घेतली . थोडीशी गोसेवा केली . इतक्यात एक मुलगा आलाच . त्याने सुंदर असा चहा बनवून दिला . माझ्या खोली समोरच एका रंगीबेरंगी खोलीमध्ये साधु महाराज मुक्कामाला होते . छोटीशीच खोली असली तरी वर एक मजला चढवला होता . मुलाने मला कोरा चहा करून आणून दिला . आणि म्हणाला चला आता मी गाई चारायला घेऊन जातो आहे आपण एकत्रच जाऊया . मी सामान उचलेपर्यंत हा गुरे घेऊन आला सुद्धा . महाराजांची इच्छा दिसत नाही असे पाहून त्यांची परवानगी न घेताच मी नर्मदे हर असा जोरात पुकारा करून पाऊल उचलले . टेकडी मुलाच्या गतीने वेगाने उतरलो . याला काहीतरी द्यावे असे मला फार वाटत होते . इतक्यात मला आठवले की बंगाली परिक्रमावासेने मला दिलेली हॅट पद्धतीची टोपी मी कधीच वापरणार नव्हतो . ती टोपी मी त्या मुलाला दिल्यावर त्याचा आनंद गगनात मावेना ! टोपी घालून तो त्याच्या लाडक्या वासरा समोर गेला आणि त्याला टोपी दाखवली ! मी पावलांना गती दिली होती परंतु जाता जाता त्याच्या बाललीला पाहत होतो . नंतर त्याने ती टोपी त्या वासराला घातली ! पुन्हा स्वतः घातली ! ते निरागस बालपण पाहून फार आनंद वाटला ! छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आनंद घेता आला पाहिजे ! आनंद समोरच्या वस्तूमध्ये नसतोच ! तर तो आपल्याला आपल्या अंतर्यामी उत्पन्न करावा लागतो . लहान मुले निष्कपट निष्पाप असल्यामुळे त्यांना हे सहज साध्य होते . मी अतिशय वेगाने किनारा पकडला . हा बडवानी जिल्हा होता . लवकरच शुलपाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार होता . इथून जवळच असलेल्या राजघाटापर्यंत गेल्यावर किनारा सोडावा लागणार होता . कारण इथून पुढे भयानक डूबक्षेत्र चालू होते . हे डूब क्षेत्र किती भयंकर आहे याचे काही ड्रोन व्हिडिओ युट्युब वर उपलब्ध आहेत ते आपण अवश्य पहावेत . आता किनारा सोडावा लागणार या कल्पनेने व्यथित झालो आणि गती एकदम कमी करून टाकली . इथले नर्मदा जल अतिशय शांत आहे . पाण्याला प्रचंड खोली आहे . उथळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण काही उगाच नाही आली . जितके पाणी खोल तितके खरोखरच अतिशय शांत भासते . चिखलाचे प्रमाण वाढतच होते . त्यासोबतच पक्षी जीवन देखील समृद्ध होत चालले होते . मानवी वावर जवळपास 0 होता . कोणी पूर्वी चालत गेल्याच्या खाणाखुणा देखील दिसत नव्हत्या. नाही म्हणायला त्या परिसरामध्ये एक अतिशय विचित्र वास भरून राहिला होता . हा वास खरंतर दुर्वास अथवा दुर्गंध मला ओळखीचा वाटत होता . इतक्यात त्या वासाचे उगमस्थान सापडलेच ! सांगलीला कृष्णामाईच्या माई घाटावर किंवा सरकारी घाटावर किंवा कधीतरी विष्णू काठावर पोहायला जायचो . मगरींचा वावर कुठल्या भागात आहे त्यानुसार घाट बदलायचा . तेव्हा मी काठावर चाललेल्या दारूच्या हातभट्ट्या पाहिल्या होत्या . हो वास पक्का नाकात बसला होता . इथे देखील तोच वास येत होता . इथून पुढे खूप साऱ्या हातभट्ट्या मी पाहिल्या . हातभट्टीची दारू बनविताना त्याचा माल मसाला सतत उकळावा लागतो व एका नळीतून वाफ गोळा करून ती तत्काळ थंड करावी लागते . आता हे सर्व प्रकरण थंड करण्यासाठी वाहते पाणी आवश्यक असते . त्यामुळे नर्मदा मातेतील वाहत्या पाण्याचा वापर करून दारू थंड केली जाते . ज्याला दारूचे व्यसन नाही असा मनुष्य जवळ देखील जाऊ शकणार नाही इतका हा घाण वास असतो . ज्या मडक्यामध्ये दारू भरलेली आहे अशी मडकी मातीमध्ये खड्डा करून लपवून ठेवलेली असतात . हातभट्टी वाले तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देतात . हा धंदा अवैध आहे हे माहिती असल्यामुळे परिक्रमावासींना मान देऊन थोडेफार पुण्य कमविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असतो . तुम्ही या भट्टी विषयी बाहेर वाच्यता न करणे अपेक्षित असते . काही भट्टी वाल्यांनी तर मला असे देखील सांगितले की त्यांना हे सर्व करण्याची लाज वाटते परंतु दुसरा कुठला धंदा पुरेसे उत्पन्न देत असल्यामुळे दुर्दैवाने हे करावे लागते . बरेच भट्टी लावणारे स्वतः ती दारू पीत नाहीत . अनेकदा गावठी दारू पिल्यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला अशी बातमी आपण वाचतो ती दारू अशाच ठिकाणी अतिशय बेकार पद्धतीने बनविलेली असते . दारू हा आपला विषय नाही परंतु तरीदेखील त्याचे एवढे रसभरीत वर्णन मी का करतो आहे असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे . हेतू इतकाच आहे की मुळात नर्मदे काठी काय काय प्रकार निर्विघ्नपणे आणि तिच्याच कृपेने सुरू असतात याची आपल्याला कल्पना यावी . भट्टी लावण्यापूर्वी मैयाची रीतसर पूजा केली जाते ! इतकंच नव्हे तर दारू तयार झाल्यावर पहिला घोट मैयालाच पाजला जातो . नर्मदा माता कळणे किती कठीण आहे विचार करून पहा ! तिने काहीही स्वीकारावे म्हणजे नक्की काय काय स्वीकारावे याचे हे एक उदाहरण ! सारेच अगम्य आहे . नर्मदा माता कुठल्याही याचकाला निराश करीत नाही हेच याचे सार आहे . इथे खूप सारे ओढे आडवे आले होते . ते इतके खोल आणि गाळाने भरलेले होते की ते ओलांडण्यासाठी बरेचदा अर्धा एक किलोमीटर आत मध्ये जावे लागायचे तरीदेखील गुडघाभर चिखलातून चालल्यावरच पैलतीर सापडायचा .

उजव्या हाताला नर्मदा माता वाहते आहे . तिच्या काठाने चालत जाताना डावीकडून येऊन मिळालेला ओढा लक्षात येत नाही . मग पुन्हा उलटे फिरावे लागते आणि जिथे ओढा पार करता येणे शक्य आहे अशा ठिकाणावरून तो पार करावा लागतो . दही बेहड्यानंतर आडवा आलेला हा पहिलाच ओढा .

बऱ्याच अंतरापासून मला एक पूल दिसत होता . हा बडवानी आणि धार यांना जोडणारा ३० मोर्‍यांचा तीन किलोमीटर लांबीचा पूल होता . परंतु कितीही चालले तरी हा पूल जवळच येत नव्हता ! इथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपसणाऱ्या मोटर्सच जाळे होते .अचानक महापूर आला की या सर्व मोटर पाईप सकट वाहून जात आणि बडवाणीच्या पुलाला जाऊन अडकत . हे मला एका शेतकऱ्यानेच सांगितले . इथे अडकलेल्या मोटर्सच्या जंजाळातून मग लोक आपापली मोटर ओळखून परत आणायचे . आता वाटेमध्ये कसरावद घाट लागला . यालाच छोटी कसरावद असे सुद्धा म्हणतात .इथे दक्ष प्रजापतीने सहस्र यज्ञ केले होते . या घाटावर तीन छोटीशीच परंतु अतिशय पुरातन व नितांत सुंदर अशी शिवमंदिरे होती . वीट काम होते आणि प्लास्टरवर सुंदर असे कोरीव काम व नक्षीकाम केलेले होते . या मंदिरांचे सौंदर्य खरोखरीच लक्षात राहण्यासारखे होते . 

छोटी कसरावद घाटावरील तीन सुंदर शिवमंदिरे . शेजारी हनुमंताचे देवालय .

या ठिकाणी नर्मदा मातेचे पात्र अति भव्य आहे . मंदिरांच्या मागे कसरावदचा पूल दिसतो आहे . धरणाचे पाणी वाढल्यावर ही मंदिरे डुबक्षेत्रात जातात . तरी देखील त्यांचे बांधकाम टिकून आहे . 

 डूब मध्ये गेलेली मंदिरे मागे दिसत आहे पहा

कसरावद भागामध्ये पूर आल्यावर नर्मदा मैया अशी वाहते ! कुसुमाग्रजांची 'कणा' कविता आठवून देणारे हे दृश्य आहे !

इथे शेजारी अजून एक मारुतीचे मंदिर होते .दर्शनासाठी आलेले एक नवविवाहित नवरा बायको भेटले . हे दोघे केवट होते . रात्रभर नावे मध्ये बसून मासे पकडायचे . कल्पना करा इतक्या भयाण रात्री नदीच्या मधोमध नावे मध्ये बसून मासे पकडणे तेही संपूर्ण अंधारात , किती कठीण आणि धाडसाचे काम आहे ! त्या माताराम चे मला कौतुक वाटले . आज काल सुशिक्षित शहरी मुली शक्यतो आपल्या पतीला त्याच्या व्यवसायामध्ये एका मर्यादेच्या बाहेर जाऊन साथ देण्यास स्पष्ट नकार देतात .आणि इथे तर तीन किलोमीटर रुंदीच्या नर्मदा पात्रामध्ये रात्र काढायची आहे ! नुसते बसून राहायचं नाही जाळे पसरायला मदत करायची आहे , नाव वल्हवायला मदत करायची आहे .मासे गोळा करायचे आहेत .

हीच ती तीन मंदिरे आणि खाली नांगरलेल्या नावा . परंतु या चित्रावरून नर्मदेचे पात्र किती मोठे आहे याचा अंदाज येत नाही . म्हणून अजून एक नकाशा खाली जोडतो आहे .

आता या चित्रामध्ये पुन्हा त्याच नाव आणि तीच मंदिरे खालच्या बाजूला दिसत आहेत पहा . यावरून तुम्हाला कळेल की रात्री मासेमारीसाठी किती मोठ्या पात्रामध्ये राहावे लागते .

 छोटी कसरावद चा पूल आणि डोहकूप

किनाऱ्याने चालण्याचा मार्ग हा असा आहे .

पात्राच्या भव्यतेचा अंदाज यावा म्हणून पुलावरून काढलेले संग्रहित छायाचित्र सोबत जोडत आहे .

 रात्रभर असे नावेत बसून राहायला कंटाळा येत नाही का असे विचारल्यावर दोघेही लाजले आणि निघून गेले !  नर्मदा मातेला बिचारीला कोणाकोणाचे काय काय चोजले पुरवावे लागतात हे तिचे तिलाच ठाऊक . 

 रेवा आणि नावा यांचे अतूट नाते आहे

मध्ये नरसिंहाचे एक मंदिर लागले .

शेजारीच हनुमंताचे मंदिर देखील होते .

इथून थोडेसे पुढे चालत गेल्यावर अखेरीस तो पूल आला . पुलाला लागूनच एक डोह कूप होते .

 छोटी कसरावद येथील पूल आणि डोहकूप . मध्ये अशा काही जलमग्न समाधी लागतात . अनेक समाधी महापुरामध्ये वाहून जातात . अनेक समाधी वाहून येतात . चालताना सर्वत्र असा चिखल पार करावा लागतो . इथे समोर नाव दिसते आहे तो आडवा आलेला ओढा आहे . हा पार करण्याकरता बरेच आत जावे लागले . 

हाच तो ओढा आणि त्याच्या काठावरील समाधी . बरेच आत गेल्यावर हा ओलांडता आला .

थोडेसे पुढे आल्यावर सप्तमातृका मंदिर आहे . परिसरातील सर्व महावृक्ष अति पाण्यामुळे वठलेले दिसत आहेत पहा .

चित्रात काय काय पाहाल ? सप्त मातृका मंदिर , महापुरामुळे खचलेला घाट , पाण्याच्या मोटर्सचे पाईप , वठलेले महावृक्ष , नर्मदेकाठ चा चिखल व त्यावर माजलेले गवत .

इथून पुढे गेल्यावर राजघाटचा सुबक , ठेंगणा , बसका , दगडी पूल लागतो .

या भागातील मैद्याची विविध रूपे

भव्य दिव्य नर्मदा मैया

इथे अंगात आलेल्या स्त्रियांचे भूत उतरवण्याचे काम चालू होते . एक भगत अशा स्त्रियांना मोकळ्या सोडलेल्या केसांना पकडून फरफटत नर्मदेमध्ये न्यायचा आणि जोरात ओरडून सांगायचा , " हिच्या अंगामध्ये शिरलेल्या हे भुता ! जोपर्यंत तू बाहेर जात नाहीस तोपर्यंत हिला मी पाण्याबाहेर काढणार नाही ! " आणि तिचे नाक तोंड पाण्यामध्ये बुडवायचा . क्षणात भूत निघून जायचे आणि महिला हात हलवून वाचवायची खूण करायची . बऱ्याच वेळा भूतबाधा वगैरे मानसिक व्याधी असतात .गाव देहात मध्ये प्रचंड कष्टाची कामे पडतात . घरातील कामाचा अति ताण सहन न झाल्यामुळे स्त्रिया असे काहीतरी बाधा वगैरे झाल्याचे नाटक बरेचदा करतात . परंतु नाका तोंडात पाणी गेल्यावर मरण्यापेक्षा भूत गेलेले चांगले असा विचार कुठलीही सूज्ञ व्यक्ती करेल . मी थोडा काळ तिथे थांबून हा सर्व भूत उतरवण्याचा खेळ पाहिला . त्यानंतर पुन्हा मोटारींचे जंजाळ ओलांडात चिखल तुडवत अखेरीस राजघाट गाठला . अतिशय सुंदर दगडामध्ये बांधलेला हा घाट आहे . इथे पूर्वी अन्नदान केले जायचे . परंतु सध्या हे संपूर्ण क्षेत्र डूब मध्ये जात असल्यामुळे इथे अन्नदान बंद आहे . परंतु तरीदेखील छोटासा मांडव घालून एका संस्थेची मंडळी अन्नदान करता देणगी गोळा करत होती . व सर्वांना मोफत चहा वाटला जात होता . चहा हे पेय भारतामध्ये कसे पसरवले गेले याचा इतिहास मोठा रंजक आहे . माझी आजी म्हणजे आईची आई मूळ पुण्यातली . घोरपडी पेठेत तिचा वाडा होता . आणि मंडई मध्ये वडिलांचे दुकान होते . त्यामुळे झाशीची राणी शाळा क्रमांक तीन मधून घरी जाताना ती काही काळ वडिलांच्या दुकानात थांबून मग घरी जायची . हिचा जन्म १९१२ सालचा . तिने टिळकांना पाहिले होते . पंचम जॉर्ज राजा जेव्हा मंडईमध्ये आला होता तेव्हा त्याच्यासमोर 'आनंदकंद ऐसा ,हा हिंद देश माझा' हे गाणे आम्ही पाच मुलींनी ठसक्यात गायले होते असे ती अभिमानाने सांगते ! पंचम जॉर्ज राजाच्या हातून त्यांना विक्टोरिया राणीचे चांदीचे पदक व एक एक बिस्किट मिळाले होते ते घेतल्यावर मात्र त्याच्या पाया मी कशी पडले नाही याचा तिला सार्थ अभिमान होता ! याच काळामध्ये मंडईमध्ये काही इंग्रज लोक एक टेबल लावून बसायचे . आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सांगायचे की हा आम्ही बनवलेला काढा आहे . प्रकृतीला अतिशय उत्तम आहे . एकदा पिऊन तरी पहा ! हाच तो चहा ! तोपर्यंत लोकांना चहा नावाचे पेय माहिती सुद्धा नव्हते . ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा शोध लागला की भारतातील ईशान्य भागामध्ये चहाचे उत्पादन चांगले होते आहे ,तेव्हा त्यातून आर्थिक लाभ मिळावा यासाठी त्यांनी चहाचे असे मार्केटिंग संपूर्ण भारतभर सुरू केले . हे सर्व माझ्या आजीने स्वतः पाहिलेले आहे . सुरुवातीला चहाची पाने विकली जायची . डस्ट स्वरूपामध्ये चहा अलीकडे मिळू लागला . एकंदरीत या चहाने सध्या भारतातील जवळपास प्रत्येक घर व्यापलेले आहे . हे पेय सध्या जणूकाही भारताचे राष्ट्रीय पेय झालेले आहे की काय असे म्हणावयास पुरेसा वाव आहे . गेली दहा वर्षे तर देशाचा कारभार देखील 'चाय वाला ' चालवीत आहे ! याहून अधिक महती या पेयाची ती काय वर्णावी !

धरणातील पाण्याची पातळी उतरलेली असतानाचा राजघाट 

धरणामध्ये पाणीसाठा असल्यावर हाच राजघाट असा बुडून जातो . पूल देखील पाण्याखाली जातो

 राजघाट 

मी असा विचार केला की आता शूल पाणीच्या झाडीमध्ये प्रवेश करावा लागणार आहे . पुन्हा नर्मदा मातेचे दर्शन लवकर होणार नाही . त्यामुळे आता इथे मनसोक्त स्नान करावे . आणि मगच पुढे मार्गस्थ व्हावे . इतक्यात तुकाराम बुवा सुरवसे देखील रस्ता मार्गाने चालत तिथपर्यंत आले . त्यांना देखील माझी ही कल्पना मी सांगितली . त्यांनी देखील होकार दिला आणि आम्ही दोघे स्नानाची तयारी करू लागलो . झोळीतील सामान तपासताना माझ्या असे लक्षात आले की माझ्याकडे शेवटचे २० रुपये राहिलेले आहेत . शूल पाणीच्या झाडीमध्ये माझ्या या साध्या चपला चालणार नव्हत्या. तिथे मजबूत बुटांची आवश्यकता होती . तसेच शुलपाणेश्वराच्या झाडीमध्ये छोटी छोटी वनवासी मुले धावतच येतात आणि आपल्याला चॉकलेट गोळ्या मागतात हे देखील मला अनेकांनी सांगून ठेवले होते . त्यांना नाराज न करता काहीतरी खाऊ द्यावाच लागतो असे मला अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगण्यात आले . अशा गोळ्या घेण्यासाठी देखील मला पैशांची गरज होती . परंतु खिशामध्ये वीसच रुपये मात्र उरलेले असल्यामुळे सारा विषयच संपला होता . मी मैयाला ती वीस रुपयांची नोट दाखवली आणि झोळीमध्ये टाकून दिली . मी आणि तुकाराम बुवा सुरवसे स्नानासाठी नर्मदा मातेमध्ये उतरलो . पाणी अतिशय धीर गंभीर परंतु खोल होते . सुमारे तासभर मनसोक्त स्नान केले . स्नान म्हणजे फक्त डुबक्या मारणे . अंग चोळणे ,अंग घासणे ,साबण लावणे , अंगाचा मळ काढणे वगैरे नर्मदा मातेमध्ये अजिबात करायचे नसते . संपूर्ण घाटावर आम्ही दोघेच स्नान करत होतो . ओंकारेश्वर मार्गे गाडीने परिक्रमा उचलणारे जे लोक असतात ते तिथून निघाल्यावर थेट राजघाटवर येतात . अशा पद्धतीने नर्मदा परिक्रमा उचललेल्या दोन मोठ्या बस तिथे राजघाटावर दाखल झाल्या . आणि दोन्ही बसमधून ६० - ६० परिक्रमावासी बाहेर पडले . त्यांचा टूर गाईड त्यांना घाटाची माहिती सांगू लागला . आता हे १२० लोक पाण्यामध्ये शिरणार त्यापूर्वीच आपण बाहेर पडावे असा विचार मी केला . इतक्यात त्यांच्या गाईडने त्यांना आमच्या दोघांकडे बोट करून दाखविले हे पहा हे आहेत खरे परिक्रमावासी ! हे पायी परिक्रमा करत आहेत . त्याने असे म्हटल्याबरोबर सर्वजण आमच्या दिशेला धावले ! मी कमरे एवढ्या पाण्यात उभा होतो . माझ्या अंगाला छाटी गुंडाळलेली होती . एका मातारामने मला नमस्कार करून हातात दहा रुपयाची नोट ठेवली . दुसरी आली , तिसरी आली असे करता करता तिथे एक रांग लागली . कोणी दहा वीस रुपये ,कुणी पन्नास रुपये , कुणी शंभर रुपये , कोणी ५०० रुपये असे माझ्या हातात ठेवायला सुरुवात केली . माझे अंग देखील अजून ओले होते . पैसे ठेवण्यासाठी मला माझी ओंजळ पुरेना . मी सर्वांना सांगत होतो की थांबा मला बाहेर येऊ द्या . परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते . तुकाराम बुवा माझ्या शेजारी उभे होते . परंतु त्यांच्या हातात कोणी एक रुपया सुद्धा दिला नाही . माझ्या हातातील काही नोटा पाण्यात पडायला लागल्या त्या उचलून तुकाराम बुवांनी परत मला दिल्या . अखेरीस मी बाहेर आलो आणि ते सर्व पैसे जमिनीवर टाकले . अंग पुसले .कपडे बदलले . आणि तसेच सर्व पैसे झोळीमध्ये कोंबले आणि पुढे चालायला लागलो . पुढच्या मुक्कामी जाऊन ते मोजले . एक रुपयाच्या नाण्यापासून पाचशे रुपयांच्या नोटेपर्यंत ते सर्व मिळून तब्बल तेराशे रुपये होते !शिवाय हे सर्व लोक पुढे चार किलोमीटर अंतरावर भोजन प्रसाद करणार होते तिथे देखील मला भोजनासाठी येण्याचे आमंत्रण यांनी केले .तिथे पुन्हा काही दक्षिणा मिळाली . तुकाराम बुवांना देखील आश्चर्य वाटले की फक्त मलाच इतके पैसे कसे काय मिळाले ? मी त्यांना वीस रुपयांची नोट मैयाला दाखविली तो किस्सा सांगितला . आणि मग दोघांनी देखील मैयाचा जयजयकार केला ! तुकाराम सुरवसे यांनी थोड्याच वेळापूर्वी रस्त्यावरून येताना पैसे काढले होते . त्यामुळे त्यांना एक रुपया सुद्धा नर्मदा मातेने दिला नाही . तसे पाहायला गेले तर आम्ही दोघे शेजारी शेजारी उभे होतो आणि तुकाराम सुरवसे माझ्यापेक्षा वयस्कर दिसतात त्यामुळे त्यांना देखील कोणीतरी दक्षिणा देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही .त्यांनी देखील त्या क्षणी संकल्प केला की इथून पुढे नर्मदा परिक्रमे मध्ये पैशाचा विचार करणार नाही . माझ्यावर मैय्याने अशा रीतीने त्या दिवशी राजघाटावर पैशांचा पाऊस पाडला ! पुढे देखील दक्षिणा मिळत गेली परंतु एकाच वेळी इतकी दक्षिणा कोठेच मिळाली नाही . पुन्हा एकदा तिने हे सिद्ध करून दाखवले की परिक्रमा वासीने  पैशाची चिंता करू नये . फक्त पुढील पावलाचा विचार करत नर्मदा मातेचे नामस्मरण करत मार्गक्रमण करीत रहावे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,

 साधक भावे लोटांगण घाली ।

 त्याची चिंता साधूस लागली ।

 सुगमपणे नेऊन घाली ।

 जेथील तेथे ॥ 

तसेच मैय्याचे आहे.  मैयाने योग्य वेळी पाडलेल्या पैशाच्या या पावसामुळे मी शूल पाण्याच्या झाडीतील लेकरा बाळांना चांगल्या दर्जाचे गोळ्या चॉकलेट देऊ शकलो . अन्यथा इथे अतिशय स्वस्तातले बेचव चॉकलेट वाटण्याची प्रथा पडलेली आहे परंतु मी मात्र एक इक्लेअर्स , किस मी , मेलडी , रावळगाव टॉफी , पारले मँग  बाईटस् , आलपेनलिबे असे चांगले चॉकलेट वाटू शकलो . आता या मुलांना गोळ्या चॉकलेट द्याव्यात की नाही द्याव्यात या विषयाचा सविस्तर उहापोह त्या प्रकरणात करूच . पण तूर्तास मैयाने माझी लाज राखली हे खरे ! मैया है वह । सब जानती है ! नर्मदे हर !

लेखांक एकोणऐंशी समाप्त (क्रमशः )

 

लेखांक ८० : बडवानीचे सिद्धेश्वर मंदिर आणि बीजासन पासून शूलपाणी च्या झाडी चा प्रारंभ

कोsहम्

आता राजघाट सोडून मैय्याकडे चक्क पाठ करून सरळ चार किलोमीटर जायचे होते . कारण इथून पुढे नर्मदा मातेच्या काठावर मनुष्यवस्ती जवळपास 0 आहे . त्यामुळे परिक्रमावासींची सेवा फारशी होत नाही . शिवाय सरदार सरोवर धरणाचे हे सर्व धारणाक्षेत्र असल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी आडवे-तिडवे घुसलेले आहे . सर्व डोंगराळ परिसर आहे . आणि पायवाटा जवळपास नाहीतच . त्यामुळे नाईलाजाने मार्ग सोडावा लागला . वाटेमध्ये प्रचंड वीट भट्ट्या होत्या . एका वीट भट्टीमध्ये जाऊन त्यांची सर्व प्रक्रिया समजून घेतली . इथे ग्रामीण भागामध्ये अशी पद्धत आहे की लोक आपल्या घरासाठी लागणाऱ्या विटा स्वतः भाजतात .

त्यासाठी लागणारी माती आणणे ,ती गाळणे ,चाळणे , कालवणे , मळणे , घडवणे , विटा थापणे , त्या रचणे , खणखणीत भाजणे , भट्टी लावणे इत्यादी सर्व कामे घरातील सर्व लोक वाटून घेऊन करतात . यातील उष्णता किती ठेवायची आणि दगडी कोळसा व अन्य जळणाचे प्रमाण किती पाहिजे याचे ज्ञान ज्याला आहे त्याच्या विटा उत्तम होतात . समर्थ रामदास स्वामी यांनी वीट प्रकरण नावाचे एक अतिशय सुंदर प्रकरण लिहिलेले आहे . त्यात त्यांनी वीट भट्टी टाकण्यासाठी लागणारा कच्चामाल कुठला ,हत्यारे कुठली , त्याची सोय कशी लावावी , कामगार कसे पाहून ठेवावेत , त्यांना किती काम द्यावे ,किती सुट्टी द्यावी ,विटेचा दर्जा कसा तपासावा व खणखणीत वीट कशी भाजावी वगैरे सर्व गोष्टी विस्तारपूर्वक दिलेल्या आहेत . गंमत म्हणजे बालकामगार ठेवू नयेत हे देखील त्यांनी सांगितले आहे . हे प्रकरण ज्याने विस्तारपूर्वक अभ्यासले आहे त्याला या वीट भट्टीमध्ये आल्यावर नवीन काही पाहतो आहे असे वाटतच नाही . समर्थ नक्की अशा एखाद्या भट्टीमध्ये सर्व काही शिकले असतील आणि मग त्यांनी स्वभावानुसार ते लिखित स्वरूपात नोंदवून ठेवले . तुकाराम सुरवसे देखील मागून चालत येत माझ्यासोबत चालू लागले . इथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर एका मंगल कार्यालयामध्ये आम्हाला भेटलेल्या बस मधल्या परिक्रमावासींचा भोजन प्रसाद चालू होता . तिथून पुढे जावे असा विचार करत असतानाच आतील लोकांनी आम्हाला पाहिले आणि आवाज दिला . कार्यालय मध्ये जाऊन सर्वांसोबत भोजन प्रसाद घेतला . या सर्वांचा परिक्रमेचा पहिलाच दिवस असल्यामुळे ते सर्वजण मोठ्या उत्कंठेने मला परिक्रमे विषयी माहिती विचारत होते . मी देखील त्यांना जमेल तितकी माहिती पुरवत होतो . भोजन प्रसाद झाल्यावर पुन्हा एकदा सर्वांनी माझ्यावर नमस्काराचा आणि दक्षिणेचा हल्ला केला .प्रचंड सेल्फी काढले गेले . आयुष्यात पहिल्यांदाच मला सेलिब्रिटी झाल्यासारखे भासत होते !  परंतु मी स्वतःला समजावून सांगत होतो . तू चालक आहेस . ती मालक आहे ! ती एक आहे तोवर तुला मूल्य आहे . ती नसली की तू शून्य आहेस ! पुन्हा एकदा भरपूर दक्षिणा जमा झाली . ती सर्व शूलपाणीच्या झाडीतच संपविण्याचा संकल्प मनोमन करून पाऊल उचलले . थोडेसे अंतर चालल्यावर दाट वस्तीचे शहर लागले . या रस्त्यावरच सिद्धेश्वराचे मंदिर आणि परिक्रमा वासी आश्रम होता . हे शहर संपले की तुम्ही शूल पाणीच्या झाडीच्या दिशेने मार्गस्थ होता . साधारण शूलपाणीश्वराची झाडी म्हणजे काय आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून एक नकाशा सोबत जोडत आहे . 

पुढील नकाशा मध्ये बारकाईने खालील गोष्टी पहा .

उजवीकडे वरच्या कोपऱ्यात बडवानी शहर दिसत आहे . त्याच्यावरून निळसर रंगाची नर्मदा माता रेषेप्रमाणे वाहत आहे . इथून तोरणमाळ अभयारण्य चालू होते . हे सर्व डोंगर आहेत . तोरणमाळ वनाच्या उजवीकडे जी पांढरी रेषा दिसते आहे ती आपल्या महाराष्ट्राची सीमारेषा आहे . डावीकडे शूलपाणेश्वर अभयारण्य आहे . त्याच्या मधून पांढरी रेखा जाते तो देखील महाराष्ट्र आहे . या दोन उभ्या रेखा आणि वरती आडवी नर्मदा माता ही महाराष्ट्राची सीमा आहे . आपल्या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये भारताचे डोके जम्मू-काश्मीर जसे दिसते तसे महाराष्ट्राचे जे डोके दिसते तोच हा प्रदेश आहे . खाली शहादा गाव दिसते आहे ते धुळे आणि नंदुरबार च्या सीमेवर आहे . वरचा चौकोन म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे खाली धुळे आहे . डावीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसते आहे तिथेच सरदार सरोवर धरणाची भिंत आहे .या संपूर्ण भागामध्ये अतिशय खोल दरीमध्ये नर्मदेचा प्रचंड जलसाठा आहे .नकाशात खालच्या बाजूला दिसणारा पाणीसाठा तापी नदीचा आहे .

महाराष्ट्राच्या डोक्यावर जणू नर्मदा मातेने आशीर्वादाचा हातच ठेवलेला आहे . महाराष्ट्र शासनाने अधिकृत महाराष्ट्र गीत म्हणून ज्या गीताची नुकतीच निवड केली आहे त्यातील नद्यांचे वर्णन करणाऱ्या ओळीमध्ये त्यामुळे पहिले नाव नर्मदा मातेचे येते .

रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी । एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी । 

जरी नर्मदा थेट संपर्कात नसली तरीदेखील तापीच्या किनाऱ्यावरील संस्कृती आणि नर्मदा किनार ची संस्कृती एकसारखीच आहे . नर्मदेच्या खालून तिला समांतर वाहणारी तापी नदी एकेकाळी नर्मदा नदीमध्ये मिसळत होती असे भूगोल तज्ञ मानतात नदीमध्ये मिसळत होती असे भूगोल तज्ञ मानतात . काही भूपृष्ठीय हालचालीमुळे या नद्यांचे प्रवाह विलग झाले . परंतु तरीदेखील या भारतातील दोन सर्वात जुन्या नद्या आहेत हे सर्व मान्य आहे . त्यामुळे नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ अकोला अमरावती नागपूर या भागातील संस्कृती नर्मदा खंडातील संस्कृतीच्या जवळपास जाणारी आहे . सिद्धेश्वराचे मंदिर अतिशय प्रशस्त होते . एका बाजूला पत्राची शर्ट टाकून तिथे परिक्रमा वासी उतरतील अशी सोय केली होती . मी पोहोचण्यापूर्वी बरेच परिक्रमावासी तिथे येऊन थांबले होते . सायकलवरून परिक्रमा करणारे काही लोक आले होते . विशाल प्रकाश जवंजाळ नावाचा एक तेजस्वी तरुण मुलगा देखील आमच्या आधीच तिथे येऊन थांबला होता .  बडवानी शहरातील नोकरदार आणि व्यापारी लोक तिथे येऊन अतिशय प्रेमाने आस्थेने प्रत्येक परिक्रमावासीची चौकशी करत अत्युत्कृष्ट सेवा तिथे देत होते . प्रत्येक परिक्रमा वाशीला तुम्हाला काय हवे हे वेळोवेळी विचारले जात होते . परिसरामध्ये अनेक मंदिरे होती त्या सर्वांचे दर्शन करून विश्रांती घेण्यासाठी येऊन बसलो . आता प्रचंड उकाडा जाणवू लागला होता . त्यामुळे उघडाच बसलो होतो . इतक्यात सायकल वरचे परिक्रमावासी निघाले आणि जाता जाता त्यांनी आमच्या सोबत एक फोटो काढला . मी त्यांना मित्राचा क्रमांक देऊन तिथे तो पाठविण्याची विनंती केली .

कट्ट्यावर बसले आहेत ते सायकल वरचे परिक्रमा वासी आहेत . नव्या कोऱ्या हरकुलीस सायकल परिक्रमेसाठी या सर्वांनी विकत घेतल्या होत्या . प्रस्तुत परिक्रमावासी त्याची झोळी आणि तुकाराम बुवा सुरवसे व त्यांच्यासोबतचा मध्य प्रदेश परिक्रमावासी (दुखी राम ) लाल पायऱ्या चढून गेलात की मंदिरात जाता येते .

मागे असलेल्या गोदामा मध्ये परिक्रमावासीना देण्यासाठी नवनवीन वस्तू आणून ठेवल्या होत्या तसेच फोमच्या गाद्यांची चवड लावली होती . हे परिक्रमा वासी खूप हुशार आणि विद्वान होते . यांच्याशी अल्पकाळच भेट झाली तरी चांगली गट्टी जमली होती . हे जाताना मी पूजन करत बसलो आहे हे तुमच्या लक्षात येईल . माझा पूजासाहित्याचा पिवळा डबा ठेवलेला आहे . 

मंदिराचे प्रवेशद्वार . इथे स्पष्टपणे लिहिले आहे की बस मधल्या परिक्रमावाशींची सेवा येथे केली जात नाही . फक्त आणि फक्त पैदल परिक्रमावासीयांची सेवा केली जाते . 

त्याचे कारण स्वाभाविक आहे . ओंकारेश्वर मधून परिक्रमेला निघालेली प्रत्येक बस या मार्गे जाते .एका बस मध्ये ४० ते ६० लोक असतात .अचानक दोन-तीन बस आल्या तर इतक्या लोकांना सामावून घेण्याची या मंदिराची क्षमताच नाही .

हनुमान मंदिर . उजवीकडे दोन पांढरे खांब आहेत तिथे आत आम्ही मुक्काम केला होता . 

सिद्धेश्वर मंदिराचे सभागृह

श्री सिद्धेश्वर महादेव

हनुमान जी मंदिर

श्री सिद्धेश्वर हनुमानजी

परिक्रमावासींच्या मुक्कामाची सोय

आम्ही इथेच उतरलो होतो

मंदिरामध्ये मजेशीर पद्धतीने वाचवलेले झाड

आश्रमाचा माझ्या वहीमध्ये घेतलेला शिक्का

अन्नक्षेत्र ,सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान ,राजघाट रोड , बडवानी ?६९३९४५०२३ । ९५८९८५४००८

इथे भेटलेल्या विशाल प्रकाश जवंजाळ या तरुणाशी माझा विशेष स्नेह जुळला . बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या सरस्वती नगर मध्ये राहणारा हा तरुण अतिशय हुशार विद्वान नम्र आणि ध्येयवेडा होता . नीटनेटका स्वच्छ राहणारा विशाल आपले मन देखील तितकेच नीटनेटके आणि स्वच्छ राहील याची परिपूर्ण काळजी घेत असे .

विशाल प्रकाश जवंजाळ चिखली , बुलढाणा

या परिसरातील छोट्या छोट्या गावांमध्ये माझ्या एका मित्रामुळे माझे फिरणे झालेले आहे .  धोतरा भणगोजी नावाच्या गावामध्ये राहणारा किशोर भांदुर्गे हा माथाडी कामगार माझा खूप चांगला मित्र . हे गाव चिखलीच्या शेजारीच आहे . विशालचे हस्ताक्षर खूप सुंदर होते . तसेच त्याचे बोलणे चालणे सर्व पद्धतशीर होते . 

परिक्रमेची समाप्ती करताना विशाल जवंजाळ

सोबतचा मोबाईल न वापरता मौनामध्ये परिक्रमा करणारा एक आदर्श परिक्रमावासी विशाल जवंजाळ

विशालने अत्यंत कमी वेळामध्ये अतिशय आदर्श पद्धतीने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली . केवळ साधू संतांची संवाद साधणे आणि बाकी जगाशी मौन राहणे हा त्याचा नियम मला फारच आवडला .

नर्मदा परिक्रमे ने मला जे अनेक मित्र दिले त्यातील विशालचे स्थान अतिशय आढळ आहे ! अगदी या वडासारखे ! 

सध्या विशाल अरुणाचल प्रदेश सरकारच्या एका प्रकल्पासाठी तिथे राहून काम करतो आहे . परंतु परिक्रमेला जेव्हा तो आला किंवा वकिलीचे शिक्षण नुकतेच आटोपलेले होते . याने देखील माझ्याप्रमाणेच कुठलेही नियोजन न करता अचानक परिक्रमा उचलली होती . माझ्या गाठीशी आता बऱ्यापैकी अनुभव असल्यामुळे मी त्याला समोर बसवून परिक्रमा किती दिवसांमध्ये पूर्ण करता येईल याचा अंदाज बांधून दिला . नवीन चालताना सुरुवातीला काही दिवस कमी चालण्याची प्रवृत्ती असते . तसे जर याने चुकून माकून केले असते तर याची परिक्रमा पूर्ण होण्यापूर्वीच चातुर्मास लागला असता . आम्ही अक्षरशः कागद पेन घेऊन बसलो . आणि दररोज किती किलोमीटर चालल्यावर त्याची परिक्रमा पूर्ण होऊ शकते याचा गणितीय अंदाज काढला . एकही दिवस कोठेही मुक्काम वाढवायचा नाही अशी अट त्याला मी सांगितली तरच ध्येय गाठणे शक्य होते . अक्षरशः अटीतटीच्या वेळी याची परिक्रमा सुरू झाली होती ! तुकाराम सुरवसे वगैरे मंडळी चातुर्मास करणार होती त्यामुळे त्यांचा प्रश्न नव्हता . परंतु विशालला मात्र फार गतीने चालणे अत्यावश्यक होते आणि त्यासाठी लागेल ते करण्याची तयारी असल्याचे विशाल ने सांगितले . त्याने देखील सोबत फोन आणलेला नव्हता . म्हणजे फोन सोबत होता परंतु तो बंद करून ठेवला होता . याने खरोखरीच शूलपाणी च्या झाडीनंतर वेगवान वाटचाल केली आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात तीस मार्चला बरोबर त्याने समुद्र पार केला ! पलीकडच्या तटावर गेल्यावर त्याने दिवसभराचे मौन धारण केले . फक्त रात्री अंधार पडल्यावर किंवा साधुसंतांनी विचारल्यावर तो बोलायचा . बाकी शंभर टक्के मौन . हा नियम पाळल्यामुळे त्याची परिक्रमा अतिशय सुंदर रीतीने वेळेत पूर्ण झाली ! चातुर्मास लागण्याच्या आदल्या दिवशी याची परिक्रमा संपली ! याचे देखील सुमारे २० किलो वजन कमी झाले होते ! आताच्या काळातील आदर्श तरुण कसा असावा ? विशाल जवंजाळ सारखा असावा ! गंमत म्हणजे त्याच्या मौनाचे समापन झाले आणि त्याला त्याचा मित्र राम सातपुते याचा पहिला फोन आला ! राम सातपुते याला विशाल म्हणाला की तू माझ्या मौनाचे सारे पुण्य मिळवलेस मित्रा ! ( गंमत पहा ! २०२४ च्या निवडणुकीला नरेंद्र मोदी यांनी सोलापूर मतदार संघातून खासदारकीसाठी याच राम सातपुते यांना प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे केले आहे ! )

तर असा हा आमचा विशाल ! मी त्याला गमतीने कायम म्हणतो की मी तुझ्याशी प्रचंड गप्पा मारल्यामुळेच तू उत्तर ताटावर गेल्यावर मौन धारण केलेस ! न जाणो पुन्हा माझ्यासारखा एखादा गप्पाडदास भेटायचा ! परंतु याच्या आणि माझ्या गप्पा अतिशय सकारात्मक विचारांवरच व्हायच्या . आजही होतात !  आम्ही सर्वांनी मिळून नंतर मंदिरातील आरती वगैरे एकत्रपणे केली . इथे अथर्व योगी नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता त्याच्याशी चांगली गट्टी जमली . पुजाऱ्यांचा मुलगा होता हा . मंदिरातील सर्व कामांमध्ये सर्वांना मदत करत होता . प्रत्येक गोष्ट पुढाकार घेऊन स्वतः करत असे. इथे सुदाम कुलकर्णी नावाचे एक मराठी काका भेटले . यांनी सुंदर अशी गावांची यादी आणि शिवमहिम्नाचे पुस्तक मला भेट दिले .  हे काका दररोज येऊन गेली अनेक वर्षे सर्व परिक्रमावासींना गावांची यादी पुरवीत आहेत . ओंकारेश्वर पासून तसे हे स्थान जवळ असल्यामुळे या यादीचा उपयोग बहुतेक परिक्रमावाशींना होत असतो . हे सर्व कार्य ते स्वखर्चाने करतात .यांनी दिलेली पत्रके खालील प्रमाणे . 

श्री सुदाम कुलकर्णी काका यांनी बडवाणी येथे दिलेली उपयुक्त पत्रके

काकांशी थोडावेळ गप्पा मारून विश्रांती घेण्याकरता जागेवर गेलो  . इथे एक स्वयंघोषित डॉक्टर परिक्रमावासी उगाच सर्वांचे पाय तपासत फिरत होते . माझे तळपाय मुळात कडक आहेत . मी मध्यंतरी दोन अडीच वर्ष चप्पल सोडलेली होती . त्या काळात तळपायाची त्वचा राठ आणि जाड झाली ती पुन्हा पातळ झालीच नाही ! त्यामुळे काटे बीटे मोडण्याचे प्रमाण फार कमी ! परंतु यांनी माझा पाय तपासून पायात एक काटा आहे असे जाहीर केले . मला जरा देखील दुखत नव्हते किंवा वेदना सुद्धा नव्हती . परंतु यांनी ब्लेडने काटा काढण्याचे निमित्ताने माझ्या पायाची भरपूर कातडी कापून काढली आणि पायातून भळाभळ रक्त वाहू लागले . मग त्यांची पळता भुई थोडी झाली . अखेर मी देवळात जाऊन चिमुटभर हळद जखमेत कोंबली . आता संपूर्ण झाडीमध्ये ही जखम त्रास देणार होती . इतक्यात स्थानिक सेवेकरी आले आणि त्यांनी मला विचारले की मी पायात काय घालतो आहे ? मी साधी चप्पल घालतो आहे हे पाहिल्यावर ते मला आतल्या खोलीत घेऊन गेले आणि कपाट उघडले . तिथे विविध आकाराचे विविध प्रकारचे बूट चप्पल सॅंडल वगैरे होते . पायाला आरामदायक ठरेल असा एक बूट यांनी मला त्यांच्या मंडळातर्फे दिला ! अशा रीतीने परिक्रमेतील आठवे पादत्राण मला बडवानी मध्ये ७० - ७१ व्या मुक्कामी मिळाले . चप्पल देखील चांगलीच होती . ती मी मागे ठेवणार होतो परंतु यांनी मला सांगितलं की सोबत घेऊन जा आणि शुलपाणीच्या झाडीमध्ये कोणाला तरी देऊन टाक . ही कल्पना मला आवडली आणि मी चप्पल स्वच्छ धुऊन प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवली . विशालच्या फोनवरून एक फोटो मित्राला पाठवल्या बरोबर त्याचा फोन आला . इथे मी माझे मित्र बाळासाहेब वाल्हेकर आणि घनश्याम ढाणे यांच्याशी फोनवर बोलून घेतले . विशेषतः रावेरखेडी इथे मला शामराव ढाणे ची खूप आठवण आली होती . बाजीराव हा त्याचा आवडीचा विषय . शिवछत्रपती आग्र्यावरून सुटून कसे आले असतील याचा अभ्यास करण्याकरता आग्रा ते राजगड पायी चाललेला हा मनुष्य . दिवंगत थोर इतिहासकार निनादराव बेडेकर यांचा हा जणु मानसपुत्रच . यांना मला भेटायला येण्याची इच्छा होती . आता इथून पुढे मी शूलपाणी च्या झाडीमध्ये शिरणार असल्यामुळे रेंज वगैरे मिळण्याचा प्रश्नच नव्हता . बरे हे अंतर पार करायला किती दिवस लागतात याचे नेमके उत्तर कोणीच देत नव्हते . कोणी सांगायचे दहा दिवस लागतात . कोणाला पंधरा दिवस लागले . तर कोणी चारच दिवसात पार होते असे देखील सांगितले . त्यामुळे नक्की किती दिवस लागतील याचा काही अंदाज येत नव्हता . शिवाय इथे देखील चालण्याचे अनेक मार्ग आहेत . ९० टक्के परिक्रमावासी सडक मार्गाने महाराष्ट्रातील प्रकाशा शहादा वगैरे बाजूने जातात .हे अंतर खूप लांब पडते . आणि इथे झाडी लागतच नाही . विषय निघाला आहे म्हणून एक संकल्पना स्पष्ट करून घेतो . शूलपाणेश्वराची झाडी असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर घनदाट अरण्य येत असेल .परंतु वास्तवात तसे काही नसून प्रत्यक्ष बघायला गेले तर इथल्या डोंगरांवर एक देखील झाड आढळत नाही . उघडे बोडखे डोंगर माथे आणि दूरवर पसरलेली त्यांची रांग या खेरीज इथे काहीही दिसत नाही . मी असे ऐकले आहे की पूर्वी इथे खूप घनदाट झाडी होती . परंतु माणसाच्या हव्यासापोटी ती सर्व नष्ट झाली . आता हे एक वैराण वाळवंट असल्यासारखे आहे . मध्ये कुठेही पाणी प्यायला मिळत नाही . गाव म्हणजे तीन-चार घरे असतात . आणि ती देखील कित्येक किलोमीटर लांब असतात . त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पुरेशी तयारी करून प्रवेश करावा लागतो . परंतु तरीदेखील पूर्वी इथे आदिवासी मामा लोक नर्मदा मातेच्या आदेशाने जी लुटालुट करायचे ती आता थांबलेली आहे . उलट या सर्व लुटारूंचा म्होरक्या असलेला मनुष्य आता येथे परिक्रमावासीं ना अन्नक्षेत्र व निवासाची सेवा देतो ! 

या मार्गाची माहिती अनेक पुस्तकांमध्ये विविध प्रकारे दिलेले आहे . माझ्याकडे असलेल्या पुस्तकामध्ये काय माहिती दिली होती ते आपण पाहूया .

बहुतेक पुस्तकामध्ये झाडीच्या मार्गाने जाऊ नका असे सुचवले जाते . परंतु जर सावकाश गतीने नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चालले तर झाडी सारखा सोपा आणि सुकर मार्ग नाही असे माझे स्पष्ट मत आहे . सडक मार्गाने जाताना खूप लांबचा वळसा मारावा लागतो . अंतरही वाढते आणि मनुष्य थकून जातो कारण मैया देखील दिसत नाही .

आता इथून पुढे जाण्याचे चार मार्ग आहेत असे लक्षात घ्यावे . जिथे धरणाची भिंत आहे तिथून पुढचे गाव गोरा कॉलनी म्हणून आहे . तिथपर्यंत पोहोचण्याचे आहे असे गृहीतक ध्यानात ठेवून हे चार मार्ग आखले आहेत . पैकी पहिला मार्ग अशक्यप्राय आहे . किंबहुना हा मार्ग नाहीच आहे . राजघाट वरून बडवानी कडे न येता मैयाच्या किनाऱ्याने सरळ चालत राहायचे . इथे तुम्हाला कुठेही वाटेत काहीही मिळत नाही असे सांगण्यात येते . इथे पूर्वी जी गावे होती ती आता उठली आहेत आणि पुनर्वसित झाली आहेत . नर्मदेच्या मूळ काठावरील अनेक  तीर्थक्षेत्रे , मंदिरे ,गावे सर्व जलमग्न झालेली आहेत . आपण चालतो ते प्रत्यक्षात डोंगर माथ्यावरून चालतो . आणि उजव्या बाजूची दरी म्हणजे सरदार सरोवर चा धरण साठा आहे .  या मार्गाने गेलेला एकच मनुष्य मला भेटला आणि त्याने मला सांगितले की पुन्हा एक लक्ष रुपये दिले तरी मी त्या मार्गाने जाणार नाही इतका तो भयंकर आहे . वाटेमध्ये तीन ते चार वेळा त्याचा प्राण जाता जाता मैयाने वाचवले . अतीव धाडसाची आवड असून देखील मी सुद्धा या मार्गाने गेलो नाही . अर्थात सिद्धेश्वर मंदिरात पायाला झालेली मानवनिर्मित जखम हे एक महत्त्वाचे कारण होते . परंतु नर्मदा मातेच्या कृपेने ही जखम एक-दोन दिवसात बरी सुद्धा झाली . त्यामुळे हा मार्ग स्वीकार्य नाही , कारण मागा साधू देखील या मार्गाने जात नाहीत . मुळात हा मार्गच नाही . इथून आपण चालणे म्हणजे नर्मदा मातेच्या डोक्याला त्रास देणे आहे . इथे वन्यशापदांचे भय आहे . आणि तुमचा तोल गेल्यास पकडण्यासाठी एक सुद्धा झाड नाही. पायाखालचा डोंगर अत्यंत निसरडा आणि मुरबाड आहे . त्यामुळे आपण त्याला मार्ग क्रमांक शून्य म्हणू . आता पहिला मार्ग खालील प्रमाणे आहे .

 

शूल पाणीच्या झाडीतून जाणारे जे दहा टक्के परिक्रमा वासी आहेत त्यातील सात आठ टक्के या मार्गाने जातात .

दुसरा मार्ग म्हणजे सर्वांचा लाडका सडक मार्ग . हा खालील प्रमाणे आहे .

तीन राज्यातून जाणारा हा निव्वळ सडक मार्ग अतिशय लांबचा तापदायक आणि कंटाळवाणा आहे .

मी अशा एखाद्या मार्गाच्या शोधात होतो ज्याने मी मैयाच्या जवळ देखील राहीन आणि तिचे दर्शन किंवा वेळप्रसंगी स्पर्श देखील मला घडेल . परंतु अति धोकादायक असे काही त्या मार्गात असणार नाही . वेळप्रसंगी भोजन प्रसादी नाही मिळाली तरी चालणार होते . आठवडाभर उपाशीपोटी चालण्याची तयारी मी ठेवली होती . 

       शूलपाणेश्वराची नक्की कथा काय आहे याची उत्कंठा तुमच्याप्रमाणेच मला देखील होती . त्यामुळे अगदी थोडक्यात ती कथा सांगतो .ब्रह्मदेवाचे पुत्र कश्यप ऋषींची पत्नी दिती . तिच्या मुलांना दैत्य म्हणत . अंधक नावाचा तिचा पुत्र असुरांचा राजा होता . याने ४००० वर्षे तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतले आणि पार्वती मातेच्या आग्रहाखातर महादेवांकडून असा वर मिळविला की याला भगवान विष्णू शिवाय कोणीही मारू शकणार नाही . यानंतर त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवला आणि पुढे हा महादेवांवरच उलटला आणि त्यामुळे चिडलेल्या महादेवांनी त्याच्या गळ्यात शूल अर्थात भाला खूपसला . त्याचे चिकट रक्त काही केल्या भाल्यावरून निघेना . महादेवांनी पृथ्वीवरील सर्व तीर्थांवर त्यांचा शूल धुवून पाहिला . परंतु त्याच्या रक्ताचे चिकट डाग काही जाईनात . अखेरीस मोठ्या रागाने या भागात येऊन त्यांनी आपल्या हाताने तो शूल पर्वतामध्ये खूपसला . हाताला संस्कृत मध्ये पाणि म्हणतात . शूलपाणि याचा अर्थ हातामध्ये भाला घेतलेला अर्थात महादेव . इथे मात्र हा भाला दोन पर्वतांमधून वाहणाऱ्या नर्मदा जलामुळे स्वच्छ झाला . त्यामुळे या तीर्थाचे नाव शूलपाणेश्वर असे पडले . आणि जिथे हा शूल घुसला तिथे एक कुंड तयार झाले आहे त्याला चक्र तीर्थ म्हणतात . इथे ब्रह्मदेवाने स्थापन केलेले ब्रह्मेश्वर नावाचे लिंग आहे आणि त्याच्या दक्षिणेला शेषशायी भगवान विष्णूंचे मंदिर आहे .  तिथे १०८ क्षेत्रपाल नित्यनिवास करतात  अशी मान्यता आहे .

इथून जवळच रुद्र कुंड , मार्कंडेय मुनींची गुहा , रणछोडजीचे मंदिर इत्यादी तीर्थक्षेत्रे आहेत . ज्याला शूलपाणीश्वराची पंचकोशी मानले जाते . जाते नव्हे जात असे कारण आता वर वर्णन केलेले सर्व जलमग्न झालेले आहे . परंतु आजही नर्मदा जला मध्ये हे सर्व जागृतपणे शिल्लक आहे . महादेवाला त्रिशूलधारी मानण्याची पद्धत आहे . परंतु नर्मदा पुराणांमध्ये देखील त्याच्या हातामध्ये शूल अर्थात भाला आहे इतकाच उल्लेख आहे . असो .

सकाळी स्नान पूजा वगैरे आटोपून निघालो . खरे तर राजघाट ते घोंगसा मैय्याकाठचा मार्ग होता . पण मला कोणीच तो सांगितला नाही . अर्थात घोंगसा इथून पुढे मात्र खरोखरीच मार्ग नाही .त्यामुळे मी आपला डांबरी रस्ता पकडून शूल पाणीच्या झाडीच्या दिशेने प्रस्थान ठेवले . अर्थात ते एका दृष्टीने बरे झाले कारण मला वाटेमध्ये झाडीतल्या मुलांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाची गोळ्या बिस्किटे आणि लेखनासाठी वही पेन वगैरे विकत घेता आले . इथे अतिशय स्वस्तातल्या गोळ्या मिळतात ज्या पन्नास रुपये शेकडा वगैरे असतात . परंतु त्यातील साखर अतिशय हलक्या दर्जाची असते व रसायने हीन प्रकारची असतात .क्वचित साखरेच्या ऐवजी सॅकरीन देखील वापरलेले असते. चव देखील विचित्र असते . त्यामुळे मी चांगल्या ब्रँडच्या गोळ्या विकत घेतल्या . त्याने माझ्या पाठीवरील भार चांगलाच वाढला ! मैया ने भरभरून दान दिलेले असल्यामुळे खर्चाची फिकीर नव्हती . दुकानदार मला सुचवत होता की असले महागडे चॉकलेट घेण्यापेक्षा साधे घ्या . स्वस्त पडतील . परंतु मी त्याला चांगल्या दर्जाचे चॉकलेटच केवळ द्यायला सांगितले . पूर्वी सांगितल्याप्रमाणे इक्लेअर्स , रावळगाव टॉफी ,मेलडी ,किस मी ,मँगो बाईट , ॲल्पेन्लीबे अशा सर्व गोळ्यांची पाकिटे विकत घेतली . सोबत एक मोठी वही आणि काही पेन घेतली . कारण माझी डायरी संपत आली होती .  कल्याणपुरा पिछौडी मार्गे एका गायत्री आश्रमात आलो . आज एकादशीचा उपवास होता .एका फळ वाल्याने सकाळीच मला सहा संत्री दिली होती . वही पेन वगैरे घेताना गुळ आणि दाणे देखील मी घेऊन ठेवले होते .  गायत्री आश्रमात दुपारी एकच्या सुमाराला मी पोहोचलो आणि अंगणामध्ये मला बसायला सांगण्यात आले . इथल्या माताराम माझ्यासाठी मोरसाळीच्या लाह्यांचा फराळ घेऊन आल्या . हा पदार्थ अतिशय चविष्ट होता . दोन मोठे पेले ताक प्यालो . 

आश्रमाकडे जाण्याचा मार्ग

सुंदर से मंदिर

आश्रमाचे प्रवेशद्वार

इथेच अंगणामध्ये घातलेल्या मांडवामध्ये मला डोळा लागला .

नर्मदा मातेचे झोकदार वळण , पिछोडी गाव आणि गायत्री शक्तीपीठ आश्रम दाखवणारा नकाशा .इतका सुद्धा मैया चा किनारा सोडायला जीवावर यायचे .

इथपर्यंत येताना वाटेत देखील एका नर्मदा भक्ताने मला दोन पेले मही अर्थात ताक पाजले होते . याने त्याच्या शेतामध्ये पाच-सहा ताडाची झाडे लावली होती . त्याची माहिती मी त्याला दिली होती. 

गायत्री आश्रमामध्ये एक ॲक्युपंक्चर चे शिबिर आणि त्या निमित्ताने प्रवचन चालले होते ते ऐकत बसल्या बसल्या मला डोळा लागला . थेट साडेतीन वाजता जाग आली . तोपर्यंत इथे बरीच भक्त मंडळी जमली होती . इथल्या माता मला राहण्यासाठी आग्रह करू लागल्या . परंतु मी पुढे जायचे ठरविले . इथे एक बीए पास झालेला परंतु सरकारी डॉक्टर आहे म्हणून सांगणारा ॲक्युपंक्चर करणारा डॉक्टर आला होता त्याला व त्याच्या निमित्ताने जमलेल्या सर्वांनाच परिक्रमेचा अर्थ माझ्या परीने समजावून सांगितला व त्यांच्या काही शंकांना उत्तरे देऊन पुढे निघालो . योगायोगाने गुगल नकाशावर या आश्रमाचे फोटो शोधताना याच शिबिराचा फलक आणि त्या 'डॉक्टरचा ' फोटो देखील सापडला !  इथे मी १५ मार्च २२ रोजी होतो आणि शिबिर १४ मार्चला चालू झाले होते . 

शिबिराचा माहिती फलक . डी ए टी याचा अर्थ डिप्लोमा इन थेरपी असा असावा . परंतु थेरपीस्टचा रुबाब डॉक्टरांच्या वर होता !

हेच ते डॉक्टर महोदय ज्यांना परिक्रमे विषयी खूप शंका होत्या .

भवती गाव ओलांडून बिजासन या गावात आलो . या सर्व गावांची नावे आता आपण लक्षात ठेवावीत . कारण ही सर्व शंभर टक्के वनवासी / आदिवासी बांधवांची वस्ती असलेली गावे आहेत . या गावामध्ये अतिशय मोठी होळी असते . या संपूर्ण परिसरामध्ये होळीचा सण हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो . त्याला इथं भगुराई अथवा भंगुरी असे म्हणतात . या गावांमध्ये दिल्लीवाल्या बाबांचा आश्रम एका उंच टेकडीवर होता . परंतु तिथे न जाता गावातच असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये थांबण्याचा निर्णय घेतला .गावामध्ये आदिवासी अर्थात मामा लोकांच्या सणाची जोरदार तयारी चालली होती .मोठीच जत्रा येथे भरते . त्याची लावा लावी सर्वत्र सुरू होती .मोठे मोठे मांडव टाकले जात होते .दुकाने बांधली जात होती . सर्वत्र धावपळ सुरू होती . बाजार ज्या मैदानात भरतो त्या मैदानातच राधाकृष्ण मंदिर होते . इथे प्रत्येक गावामध्ये कधी जत्रा असते व कधी होळी होणार ते ठरलेले असते .त्या नियोजनानुसार बिजासन गावामध्ये उद्या अर्थात १५ मार्च २२ रोजी होळी होती . परवा असाच १६ दिनांकाला सेमलेट गावामध्ये होळी होती .आणि नंतर १७ मार्च रोजी डही नावाच्या गावामध्ये ,उत्तर तटावर होळीचा सण साजरा होऊन भंगुराई संपणार होती . या यात्रा बघण्यासारख्या असतात ! गावोगावचे आदिवासी तरुण-तरुणी जमेल तितका नट्टापट्टा करून या यात्रेमध्ये येतात . मुले सुद्धा कानात गळ्यात अलंकार घालतात . टिकल्या ,गंध , लाली (rouge) , लिपस्टिक वगैरे सर्व लावतात ! रंगीबेरंगी गॉगल अडकवतात ! शक्यतो सर्व मित्र आणि सर्व मैत्रिणी एकसारखे कपडे शिवून घेतात . 

हे शक्यतो सॅटीनच्या चमकदार वस्त्राचे कपडे असतात .

 

सणासाठी नटून नाचणारे आदिवासी पुरुष

 

सणासाठी नटलेली एक आदिवासी स्त्री

हे सर्वच प्रेमळ अत्यंत विनोदी दिसतात ! पूर्वी तर या सणाचे स्वरूप फारच वेगळे आणि विचित्र होते . अजूनही काही ठिकाणी हे प्रकार चालू आहेत असे कळले . त्याचे काय असते . ऐका तर मग .जत्रा सुरू झाली की तरुण-तरुणींचे जथे जत्रेतून फिरू लागतात . इथे त्यांची नवीन वयात आलेल्या मुलींवर नजर असते . एखाद्या तरुणाला एखादी मुलगी जोडीदार म्हणून आवडली की तो त्याच्या मित्रांच्या सहाय्याने योजना बनवून तिला चक्क पळवून नेतो . सर्वांच्या समोर हा प्रकार घडतो . गावातील तरुण त्याला अडवू शकले तर तो तरुण काही कामाचा नाही हे सिद्ध होते . परंतु याची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तो तिला त्याच्या गावी पळवून नेतो . अशाप्रसंगी मुली देखील प्रतिकार करत नाहीत . त्यानंतर मुलीच्या बापाकडून किमान ३०,००० ते जास्तीत जास्त एक लाख रुपये उकळले जातात आणि मगच त्या मुलीची सुटका केली जाते . परंतु मुलीच्या बापाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली तर ती मुलगी कायमची त्या तरुणासोबत राहू लागते . जोपर्यंत बाप पैसे आणून देत नाही तोपर्यंत त्या मुलीवर या तरुणाचा संपूर्ण अधिकार राहतो . हा खेळ सर्व संमतीने गेली हजारो वर्षे चालू असल्यामुळे याची पोलिसात तक्रार वगैरे अजिबात केली जात नाही . सर्वांना मान्य असलेला हा प्रकार आहे . परंतु अलीकडे काही वर्षापासून हा खेळ जवळपास बंद पडल्यात जमा आहे . एकंदरीत समाजाचा कस कमी झाल्याचे हे लक्षण आहे असे जुने जाणते आदिवासी सांगतात . त्यांच्या काळात त्यांनी कशा मुली पळवून आणल्या याचे किसे ऐकताना हसून हसून माझी पुरेवाट झाली ! स्वयंवर म्हणतात ते यालाच ! इथल्या मुली देखील इतक्या चपळ असतात की त्यांनी ठरवले की एखाद्या तरुणाच्या हातात सापडायचे नाही तर त्या अजिबात सापडू शकत नाहीत ! परंतु त्यांनाच तो तरुण आवडला असेल तर मात्र त्या आपली गती कमी करून त्याच्या तावडीत सापडतात ! सगळाच अगम्य खेळ आहे ! परंतु या प्रकारामध्ये झालेली लग्न चिरकाल टिकतात असे देखील अनुभवी लोकांनी सांगितले . हा नुसता खेळ नसून 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ' चा 'गेम ' आहे . या सणात सर्वच लोकांचा तमोगुण चरमबिंदूला पोहोचलेला असतो . कारण सर्वजण प्रचंड मोहाची दारू पितात आणि भरपेट चिकन मटण खातात . परंतु तरीदेखील धनुष्यबाण घेऊन फिरणारे काही मामा आजूबाजूला दिसतात . त्यांच्या दहशतीमुळे सर्वत्र एक प्रकारची शिस्त जाणवते .

 सोबत पैसे असल्यामुळे गरज पडल्यास असू द्यावे म्हणून एक औषध मला घ्यायचे होते . ते बिजासन मध्ये नसल्यामुळे मेडिकल वाला गाडीवर बडवानी ला गेला आणि दोन तासात औषध घेऊन आला . मला त्याने मंदिरात औषध आणून दिले . खरे तर त्याने एवढे कष्ट घेण्याची गरज नव्हती . परंतु परिक्रमावासींचा शब्द इथले लोक पडू देत नाहीत याचे हे ज्वलंत उदाहरण मी अनुभवले . इथे शेजारी एका मारवाड्याचे दुकान होते . दुकानांमध्ये मारवाडीण होती . मला आश्रमामध्ये मिळालेले बूट फारसे काही कामाचे नव्हते . कारण ते साधे चालण्याचे बूट होते . सुदैवाने मी अजून ते फारसे घातले नव्हते . काही काळ ते घातल्यावर पायाला चावत आहेत म्हणून काल धुवून ठेवलेल्या चपलाच घालून इथवर आलो होतो . या मारवाड्या कडे स्पोर्ट शूज आहेत असे मला दिसले . खरे तर मी याच्याकडे गोळ्या बिस्किटे कुठली आहे ते पाहायला गेलो होतो . सकाळी दुकानदाराने मला अतिशय भंगार चवीच्या पायनॅपल वगैरे एक-दोन फ्लेवरच्या गोळ्या खपवल्या होत्या . त्याची पाकिटे विना मोबदला विना तक्रार मारवाडीणीने मला बदलून दिली . मी बुटांची चौकशी केली आहे हे लक्षात ठेवून तिचा पती आल्यावर तिने त्याला मंदिरात पाठवले . तो मला बूट हवेत का विचारू लागला .नव्हे नव्हे एक बूट माझ्याकडून घ्याच म्हणून मागे लागला .मी त्याला सांगितले की मला कालच हे नवीन बूट मिळाले आहेत . तो मला म्हणाला ते नवीन बूट मला द्या आणि माझ्याकडचे तुम्हाला घ्या . त्याच्या आग्रहाखातर पुन्हा दुकानात गेलो . त्याने लावलेले दुकान उघडले . भगव्या रंगाचे नायकीचा लोगो असलेले ट्रू कॉपी बूट त्याने मला दिले . आणि मला मिळालेले बूट काढून घेतले . तो म्हणाला हे बूट इथे खूप चालतात . कोणीही शंभर दोनशे रुपयाला विकत घेईल .मी त्याला सुचविले की हा बूट मला फुकट मिळालेला असल्यामुळे तू देखील विकू नकोस . एखाद्या परिक्रमा वासी लाच दे . मी फार आग्रह केला तरी तो पैसे घेत नव्हता . अखेरीस कसे बसे दोनशे रुपये त्याच्या खिशात कोंबून मी बाहेर पडलो . बूट खूपच चांगल्या दर्जाचा होता . अशा रीतीने परिक्रमेतील नववे पादत्राण माझ्या चरणापाशी विसावले .  रात्री मंदिरामध्ये शांत झोप लागली . उद्या भल्या पहाटे उठून मोठे अंतर कापायचे होते . 

 श्री राधाकृष्ण मंदिर बिजासन

ह्याच उघड्या मंदिरामध्ये उजव्या बाजूला मी आसन लावले होते

मंदिरातील राधाकृष्ण देवता विग्रह

या भागातील लोक असे रंगीबेरंगी कपडे घालतात

शूलपाणीश्वराच्या नुसत्या नावातच झाडी आहे . प्रत्यक्षात सर्व डोंगर उघडे-बोडखे आहेत .

एकाही डोंगरावर तुम्हाला एखादे मोठे झाड दिसत नाही . इथले वन्य जीवन मात्र समृद्ध आहे .

बिजासन गावचे सरपंच आणि ग्रामसचिव यांच्या क्रमांक वरील प्रमाणे . रस्त्याबाबत किंवा निवासा बाबत काही शंका असल्यास आपण संपर्क करू शकता . ( कृपया वरील क्रमांकावर मदत पाठवू नये . केवळ चौकशी करता )

आज मी पार केलेली गावे खालील प्रमाणे होती . बरवानी , बरवानी खुर्द , भीलखेडा ,कल्याणपुर ,नांदगाव , बोम्या , पिछौडी , सिरसानी , कटोरा , नैनपुरा , सोंदल , भमाटा , अवलदा , भवती , अमलाली आणि बिजासन . 

ही गावे तर नर्मदा मातेच्या काठावर होती परंतु मार्ग मात्र गावागावातून होता . कारण पाण्याची पातळी वाढली की गावाचा निम्म्याहून अधिक भाग जलमग्न होतो . त्यामुळे या भागातील रस्ते नष्ट झाले आहेत . आता उद्या खूपच मोठा टप्पा पार करायचा होता . आणि हा तोच भाग होता जिथे पूर्वी परिक्रमावासींना ना लुटले जायचे ! आणि त्याची पूर्वतयारी म्हणून बिजासन गावात मुक्कामाला राहिलेल्या माणसांची गप्पा मारायला काही लोक यायचे ! आज तर मी इथे बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या होत्या ! आता उद्या काय होते ते उद्या पाहू असा विचार करून नर्मदा मातेचे स्मरण करत पाठ टेकली . उद्या काय होणार याचा विचार करून मेंदूतून स्त्रवणारे ॲड्रेनलीन चे स्त्राव प्रचंड चालून थकल्यामुळे क्षणात पाझरलेल्या मेलॅटोनिन अर्थात स्लिप हार्मोन पुढे तोकडे पडले आणि मी घोरू लागलो !

लेखांक ऐंशी समाप्त ( क्रमशः )

 

लेखांक ८१ : भिल्ल राजाची बोरखेडी , कुलीची साधुकुटी व घोंगसा येथील श्री संत लखनगिरी आश्रम

कोsहम्

साधारण १०० ते १२० किलोमीटरचा हा पट्टा आहे . पूर्ण परिसर डोंगराळ आहे . डोंगर माथ्यावर जिथे सपाटी मिळेल तिथे घरे वस्ती आहेत . बाकी डोंगर उतारावर उगवणारी धान्यं पिकवून वर्षभर लोक अत्यंत गरिबीमध्ये जगतात . प्रत्येकाकडे थोडीफार गुरेढोरे असतात . पूर्वी इथे फक्त कमरेचे वस्त्र वापरले जायचे . स्त्रिया पुरुष दोघेही उघडेच असायचे . अलीकडे परिक्रमावासींची संख्या वाढल्यापासून स्त्रिया पूर्ण वस्त्र घालत आहेत . पुरुष अजूनही बहुतांश उघडेच दिसतात . खाली केवळ एक लंगोटी असते . नवीन तरुण आजकाल आधुनिक कपडे घालताना दिसतात . जुने म्हातारे मात्र फक्त लंगोटी मध्ये दिसतात . जेवढे म्हणून आवश्यक आहे तितकेच निसर्गाकडून घ्यायचे अशी वृत्ती या वनवासी लोकांमध्ये दिसते . मला हवे आहे म्हणून ओरबाडून घे अशी वृत्ती इथे अजिबात आढळत नाही . घरे म्हणजे छोट्या छोट्या झोपड्या असतात . डोंगराच्या पायथ्याशी पक्की घरे दिसतात . प्रत्येक घराच्या बाहेर एका उंच मचाणावर पिण्याच्या पाण्याचा माठ मातीमध्ये गाडून ठेवलेला असतो . त्यातील पाणी केवळ पिण्यासाठी जपून वापरणे अपेक्षित असते . करण कित्येक मैल पायपीट करत हे पाणी डोक्यावर वाहून आणलेले असते . या संपूर्ण परिसराचे पुनर्वनीकरण करणे शक्य आहे . परंतु त्याला स्थानिक आदिवासींची साथ मिळणे आवश्यक आहे . लाकडासाठी व अन्य कामासाठी इथली सर्व झाडे तोडण्यात आलेली आहेत . साठ व सत्तरच्या दशकामध्ये परिक्रमा केलेल्या लोकांनी इथे घनदाट जंगलातून चालल्याचे अनुभव सांगितले आहेत . आता मात्र दूर दूर पर्यंत मोठे झाड दिसतच नाही . या भागाचे काही नकाशे खालील प्रमाणे . 

राजघाट पासून पुढे भिल्लांची गावे सुरू होतात . भिलखेडा हे त्यातले पहिले गाव आपण मानू शकतो . इथले भिल्ल तुलनेने संपन्न आहेत .

इथून पुढे खऱ्या अर्थाने डोंगरदऱ्या चालू होतात आणि बिजासन गावात पोहोचेपर्यंत आपण शुलपाणीच्या झाडीचा आरंभ केलेला असतो .

बिजासन ते घोंगसा याच मार्गात बोरखेडी नजीक लूटमार केली जायची . आता ते सर्व थांबलेले आहे . परंतु इथे डोंगराच्या किती घड्या आहेत हे आपण पाहू शकता ! हा संपूर्ण परिसर अतिशय थकवणारा आहे . पाण्याचा थेंब मिळत नाही . अखंड चालावे लागते . दूरवर नर्मदा मैया दिसत राहते . 

 घोंगसा येथील लखनगिरी बाबांचा आश्रम सोडल्यावर मात्र तुम्हाला भादल या महाराष्ट्र ,मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या गावापर्यंत येण्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागतात . वाटेमध्ये अनेक डोंगर दऱ्या लागतात . इथे नर्मदा मैया उत्तरेकडे वळते . वरील सर्व नकाशे दिशा फिरवून लावलेले आहेत याची कृपया नोंद घ्यावी . नर्मदा माई आपल्या उजव्या हाताला राहावी अशा दृष्टीने नकाशा फिरवलेला आहे . प्रत्यक्षात आपण पश्चिमेकडे चालत आहोत हे लक्षात ठेवावे . 

आता इथली गावे कशी आहेत ते पाहूया . त्यासाठी सर्वाधिक लोकवस्ती असलेले भादल गाव निवडले आहे . हे अर्धे मध्य प्रदेश आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . या गावातील दाट लोकवस्ती पहा ! इतकी विरळ घरे दिसतात . आणि ही घरे सोडली की आजूबाजूला सर्व जंगल आहे . जंगल म्हणजे घनदाट झाडीचे जंगल नव्हे , तर ओसाड माळरानाचे जंगल

हा सर्व असा परिसर आहे . समोर नर्मदा माता दर्शन देत राहते .

या झाडीचा सर्वात उंच टप्पा आता लागतो . भादलच्या खोल दरीतून तोरणमाळ या थंड हवेच्या महाराष्ट्रातील ठिकाणाच्या उंचीचे खप्परमाळ पार करून आपल्याला बिलगाव ला जावे लागते . हा सर्वात कठीण मानला जाणारा टप्पा आहे . बरेच परिक्रमावासी इथून नर्मदा परिक्रमा सोडण्याचा निश्चय करतात . परंतु नर्मदा मातेच्या कृपेने तुम्ही हा टप्पा पार झालात की मग पुढे इतके कठीण मार्ग कुठेच लागत नाहीत . इथे नकाशा मावविण्याच्या दृष्टीने अजून थोडा तिरका केला आहे याची कृपया नोंद घ्यावी . 

बिलगाव ते धडगाव प्रचंड डोंगरांचे उतार आहेत . जपून उतरावे लागते . नाहीतर गुडघ्यांची वाट लागते . इथे निर्मनुष्य वन प्रदेश चालू होतो . या भागात वन्यजीवन समृद्ध आहे . डोंगरांची उंची वाढते व वस्ती कमी होत जाते . त्यामुळे आपण नर्मदेपासून थोडा लांबचा मार्ग निवडतो . वरील नकाशामध्ये दिसणारा उंच गडद डोंगर हे एक अभयारण्य आहे .

खुंटामोडीच्या पुढे शूलपाणेश्वर अभयारण्य लागेपर्यंत थोडीफार मानवी वस्ती लागते . परंतु तरीदेखील हे सर्व आदिवासी क्षेत्रच आहे .

काठी गावातली भारतातील सर्वात मोठी होळी पाहून पुढे गुजरात राज्यामध्ये आपण प्रवेश करतो .

पांढर माती माथासर मार्गे आपण सरदार सरोवराच्या धरणापाशी पोहोचतो .इथे मात्र चांगली झाडी आहे .

इथे देखील धरणाच्या भिंतीपासून गोरा कॉलोनी या नवीन वसाहतीतील नूतन शूलपाणेश्वर मंदिरामध्ये तुम्ही पोहोचलात की मगच शूलपाणीची झाडी संपली असे मानले जाते! आता आपल्याला साधारण कल्पना आली असेल की शूल पाणीची झाडी म्हणजे नक्की काय प्रकार आहे !

वरील सर्व नकाशे आपण एकदा बारकाईने नीट तपासलेत आणि अभ्यासलेत की आपल्याला इथून पुढचे सर्व लिखाण कळणे सोपे आणि सोयीस्कर जाणार आहे . मुळात या शूलपाणीच्या झाडीचा इतका धसका परिक्रमावासी का घेतात हे तुम्हाला हा मार्ग पाहिल्यावर लक्षात आले असेलच . हा वन मार्ग नको असेल तर सडक मार्ग खूपच लांबचा आहे तो खालील प्रमाणे आहे .

बडवाणी प्रकाशा शहादा अक्कलकुवा मार्गे  गोरा कॉलनी ला जाणारा हा रस्ता देखील संपूर्ण डांबरी असल्यामुळे तितकाच दमवणारा आहे . त्यामुळे इथून देखील परिक्रमा सोडणारे खूप लोक आहेत . विशेषतः महाराष्ट्रातील परिक्रमावासी शहाद्यापासून सरळ आपले गाव गाठतात . परंतु असे करू नये . थोडासा संयम बाळगला तर हा टापू तितकासा कठीण नाही . नर्मदा मातेवर विश्वास ठेवून चालत राहावे . 

मला ही झाडी पार करण्यासाठी नऊ ते दहा दिवस लागले . अतिशय सावकाश आणि निवांत पणे झाडी पार करायची असेल तरी पंधरा दिवस खूप झाले . काही लोक विक्रमी चार ते पाच दिवसांमध्ये झाडी पार करतात . हलक्या फुलक्या निराहारी अथवा अल्प आहारी ब्रह्मचारी लोकांना हे सहज शक्य आहे . असो .

             मी पहाटे लवकर उठलो आणि स्नान पूजा वगैरे आटोपून झोळी उचलली . थोडे अंतर चालत गेल्यावर मला एक टेकडी दिसली . हे मोरकट्टा नावाचे गाव होते . मोरटक्का वेगळा आणि मोरकट्टा वेगळा . पूर्वी इथूनच लूटालूट चालू व्हायची . या गावात एक टेकडी होती . टेकडीच्या टोकाला छोटीशी साधू कुटी होती . तिथून एका साधूने मला हात केला . त्यामुळे मी टेकडीचा गोलाकार घाट चढून वरती गेलो .वरती बरेच साधू बसलेले होते . अनेक परिक्रमा वासी देखील थांबले होते .  प्रजापती पिता पुत्र आणि त्यांच्या सोबतचे दोन साधू देखील येथे थांबले होते . या साधूंची नावे मी आज विचारून घेतली . ती अमर गिरी आणि राधे गिरी अशी होती . मागे एका प्रकरणांमध्ये तनय प्रजापती याला रामायण शिकवणारा तरुण साधू असा उल्लेख मी ज्याचा केला तो अमर गिरी होता . आणि जनरल व्ही पी सिंग यांचा तथाकथित भाऊ म्हणजे राधे गिरी . त्यांच्यासोबत चा एक माणूस हरवला होता आणि दोन नवीन माणसे त्यांना मिळाली होती . हे गटागटाने परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी नित्याचे आहे . सर्वांचे गांजा पान सुरू होते . मला साधूने काळा चहा दिला . तो घेऊन मी पुढे निघालो . 

हीच ती टेकडीवरची साधू कुटी

टेकडी चढण्यासाठी मजेशीर गोलाकार मार्ग तयार करण्यात आला होता . त्यामुळे टेकडीच्या चहुबाजूने चालावे लागायचे .

मोर कट्टा गावचे सरपंच आणि ग्रामसचिव यांचे संपर्क क्रमांक आपल्या माहिती करता . (कृपया केवळ चौकशीसाठी संपर्क करावा . दानधर्म या क्रमांकावर करू नये )

इथून पुढे गेल्यावर थोडे अंतर पार झाले आणि जिल्हा परिषदेची एक शाळा लागली . या शाळेतील पाण्याची टाकी भरून वाहत होती . आणि शाळेला कुलूप होते . पाणी वाया चालले होते . म्हणून मी माझे कपडे इथे धुण्याचा निर्णय घेतला ! आणि उंचावरून पडणाऱ्या त्या पाण्यामध्ये कपडे धुऊन अखेरीस स्नान देखील आटोपले .  प्रजापती पिता पुत्र यांनी जाताना मला आंघोळ करताना पाहिले आणि त्यांना खूप मौज वाटू लागली ! वेगळे काही दिसले की अचानक निर्णय घेण्याची माझी प्रवृत्ती आहे . त्याचे नेमस्तपणे चालणाऱ्या लोकांना फार आश्चर्य वाटायचे . परंतु व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरे . असो . बरेच अंतर चालल्यावर छोटे ओढे नाले ओलांडल्यावर पुन्हा मोठाले डोंगर दिसू लागले . हे सर्व कच्चे मातीचे रस्ते होते . आणि एका एका जीप वर ४० ४० लोक भरून लोक भंगुरैची जत्रा बघायला चालले होते . जीप चालक अतिशय बेदरकारपणे गाड्या चालवत होते . सर्वच प्रकार एकंदरीत भयावह वाटणारा होता . जीपच्या बॉनेटवर , टपावर आणि चारही बाजूने लोक लटकलेले होते . आत मध्ये तर किती लोक भरले होते हे मोजता येणे कठीणच . गंमत म्हणजे लोक हा प्रवास आनंदाने करत होते ! नर्मदे हरचा पुकारा मात्र शक्यतो कोणी करत नव्हते . मोटरसायकलवर देखील चार चार पाच पाच लोक बसून प्रवास करत होते . इथले रस्ते अतिशय घसरडे मुरमाड आणि धोकादायक आहेत . तरी देखील एकाही चालकाचे वेगावर नियंत्रण नव्हते . हे धोकादायक वाहन चालन चांगलेच लक्षात राहील असे होते . 

संग्रहित छायाचित्र

इथे उजव्या हाताला नर्मदा माता अधून मधून दर्शन देत राहते . एके ठिकाणी नर्मदा मातेला जाऊन मिळणारा ओढा अशा प्रकारे मिळतो की आपल्याला पाहताना अखंडित भारताचा नकाशा दिसतो .  या भागाचा गूगल नकाशा खाली जोडत आहे . 

हे बऱ्यापैकी तिरके करून काढलेले उपग्रह चित्र आहे त्यामुळे नकाशा लंबाकृती दिसतो आहे . परंतु डोंगरावरून चालताना मात्र अगदी भारत दिसतो .

अनेक परिक्रमावाशी या दृश्याचे प्रकाशचित्र काढतात .

पुढे बोरखेडी नावाचे गाव लागते . सर्वात जास्त लूटमारीच्या घटना याच गावात घडायच्या . इथे हिरालाल रावत नावाचा गावातील एक प्रमुख आदिवासी परिक्रमावाशांची सेवा करतो . हाच पूर्वी लूटमार करण्यामध्ये अग्रेसर असायचा असे सांगण्यात येते . परंतु युट्युब वर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावर ते असे सांगतात की मी स्वतः कधी लुटमार केली नाही परंतु लुटणाऱ्या लोकांना मी मतपरिवर्तित करून थांबविले . हे मात्र योग्य आहे . त्यांना नक्की लुटालुट कोण करतो आहे हे सर्व माहिती असायचे . त्यामुळे हिरा मामा ने सांगितले आहे या भीतीमुळे लुटमार थांबली . साधारण २०१० च्या नंतर लूटमारीच्या घटना पूर्णपणे थांबल्या . हीरामामा याला स्थानिक आदिवासी त्यांचा राजा मानायचे . त्यामुळे यांचे दर्शन घ्यावे अशी इच्छा होती . परंतु काल मी ज्या बिजासन गावामध्ये थांबलो होतो तिथली भंगुरै बघायला भिल्लराज गेले होते . रस्त्याच्या डाव्या हाताला एक मैदान आणि शेजारी त्याचे घर आहे . इथेच परिक्रमा वासी शक्यतो मुक्काम करतात . 

 

बोरखेडी येथील आदिवासींचा म्होरक्या हिरालाल रावत उर्फ सर्व परिक्रमावासींचा लाडका हिरा मामा

आज परिक्रमावासियांची सेवा कशी करायची याचा एक आदर्श वस्तू पाठ हिरा मामा ने घालून दिलेला आहे

मोर कट्टा बोरखेडी कुली घोंगसा या सर्वच गावातील आदिवासी लोक परिक्रमावस्यांना लुटत असत . परंतु नंतर हिरा मामांनी गावोगावी जाऊन ग्रामसभा घेतल्या आणि परिक्रमावासींना लुटणाऱ्या माणसांवर बहिष्कार टाकण्याची पद्धत सुरू केली . ही प्रेरणा त्यांना नर्मदा मातेनेच दिली असे ते आदरपूर्वक नमूद करतात . लुटमार वाढल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमावासींची संख्या खूप कमी झाली होती . परंतु हिरा मामा सारख्या चाणाक्ष माणसाला हे लक्षात आले की इथून जितके अधिक परिक्रमावासी जातील तितकीच अधीक लक्ष्मी या प्रांतामध्ये येणार आहे . त्यामुळे हे सर्व प्रकार आता पूर्णपणे थांबले आहेत . आणि खरोखरच आता परिक्रमावासी इथल्या लोकांना खूप काही देत देत पुढे जातात . आता त्यांनी येऊन लुटण्याची परंपरा थांबली असून परिक्रमावासीच आपल्या जवळचे सामान लुटत लुटत पुढे जातो . इथे बहुतांश परिक्रमा वासी मुक्काम करतात .

परंतु अजून दिवस शिल्लक असल्यामुळे चालत राहण्याचे मी ठरवले . अनेक चढ उतार पार केल्यावर कुली नावाचे गाव लागते . ही सर्व गावे नर्मदा मैयाच्या काठावरच आहेत .  समोर एक नदी आडवी आली व तिच्यावरचा मोठा पूल होता .तत्पूर्वी डाव्या हाताला टेकाडावर एक झोपडी दिसली . कडकडून भूक लागलेली होतीच . ही एका साधूची कुटी होती आणि तो भंगुरै बघायला निघाला होता . माझ्या आधीच इथे अमर गिरी राधेगिरी प्रजापती पिता पुत्र आणि अजून चार-पाच परिक्रमावासी पोहोचले होते . त्या साधूने आम्हाला इथे पाहिजे तितका वेळ राहण्याची आणि हवे ते बनवून खाण्याची मुभा दिली आणि नर्मदे हर केले .  सर्वांनी मिळून उत्कृष्ट अशी खिचडी केली . ती भक्षण करून क्षणभर विसावा घेतला . 

 

कूली येथील हीच ती साधूकुटी जिथे आम्ही स्वयंपाक केला .

साधू कुटीमध्ये चालू असलेल्या कन्या भोजनाचे संग्रहित चित्र . आम्ही देखील याच अंगणामध्ये भोजन प्रसाद घेतला .

 कुली च्या साधू कुटीमध्ये कन्या भोजन करणाऱ्या आदिवासी कन्या

पडल्या पडल्या आमच्या हास्यविनोद इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या . मी भेटलेल्या साधूं कडून भारतातील अन्य यात्रांची माहिती घ्यायचो . मुळात साधू कधी निवांत सापडत नाहीत . तसे ते सापडले की त्यांना सोडू नये ! नर्मदा परिक्रमा सोडून भारतामध्ये अजून किमान १००० पेक्षा अधिक विविध क्षेत्रांच्या परिक्रमा पुराण प्रसिद्ध आहेत ! साधू लोक अखंड या सर्व यात्रा करत असतात . दक्षिण भारतात याच प्रकाराला गिरीवळम असे म्हणतात . गिरीला वळसा घालणे . अर्थात परिक्रमाच . इथून निघालो . भंगुरई बघायला जाणाऱ्या लोकांची संख्या फार वाढली होती . रंगीबिरंगी गॉगल घालून नटले थटलेले तरुण-तरुणी जाताना दिसत होते . जणू काही वर्षभर याच क्षणाची हे सर्वजण वाट पाहत होते असे त्यांचे वर्तन होते ! याच कारणासाठी योग्य वयामध्ये चतुर्भुज व्हावे हे उत्तम आणि तसे इथे हे लोकं होतात हे देखील महत्त्वाचे !  

 

भंगुराईसाठी जमलेले तरुण तरुणी . आदिवासी तरुणांची अंगकाठी शिडशिडीत असली तरी देखील त्यांची नजर मात्र फारच भेदक असते . ( प्रातिनिधिक चित्र )

इथून पुढे मी पुन्हा एकदा जंगलातून जाणारा शॉर्टकट निवडला . जंगल याचा अर्थ निर्मनुष्य प्रदेश . झाडी वगैरे नावाला सुद्धा नाही .ही डोंगरावरची एक पायवाट होती . अतिशय मुरमाड आणि निसरडी होती . चालताना फार लक्षपूर्वक चालावे लागत होते . कारण डाव्या हाताला तीव्र उतार होता . आणि शेकडो फूट खोल दरी होती . इतक्यात मी पाहिले की एक तरुण अत्यंत वेगाने या पायवाटेवरून मोटरसायकलने मागून आला . त्याला मी जागा करून दिली . पुढे एका खिंडीमध्ये जाऊन तो थांबला . याचे नाव सुनील होते . तो त्याच्या सासुरवाडीला निघाला होता . सेम्लेट गावातली भंगुरई प्रसिद्ध आहे . ती बघण्यासाठी हा चालला होता . याने मला डोंगरावर चालताना पाहिले होते . त्यामुळे मला जमेल असा अजून एक कठीण शॉर्टकट त्याने मला दाखवला . तो म्हणाला या मार्गाने जर तुम्ही गेलात तर थेट लखनगिरी आश्रमातच पोहोचाल . लखनगिरी आश्रम संगमावरती आहे . आणि जेव्हा जेव्हा नर्मदेची पाणी पातळी वाढते तेव्हा संगमांमध्ये खोल आतपर्यंत पाणी शिरते . आता सुदैवाने ती नदी कोरडी पडलेली होती . त्यामुळे त्या नदीच्या पात्रातून जाणारा हा शॉर्टकट त्याने मला दाखवला . ही नदी कोरडी पडली आहे हे फक्त नेहमी या भागातून जाणाऱ्या माणसालाच माहिती असते .फार क्वचित ही नदी कोरडी असते .बाकीचे लोक मात्र या नदीला मोठा वळसा मारून पुन्हा उलटी फिरून आश्रमाकडे येतात . या सोप्या मार्गाने मी काही काळातच लखनगिरी आश्रमामध्ये पोहोचलो . नर्मदा मातेचे अतिशय विहंगम दर्शन या आश्रमातून होते ! डोंगरांच्या रांगांमध्ये साठलेले तिचे भव्य जल आपण किती कःपदार्थ आहोत याची आपल्याला जाणीव करून देते . पाण्याची पातळी चढ-उतार होत असल्यामुळे तेवढ्या भागात एकही वनस्पती उगवत नाही . फक्त गवत तेवढे दिसते . जिथं काहीच नाही उगवत , तिथं सुद्धा उगवतं तेच गवत ! आश्रमामध्ये छोट्या-मोठ्या कुटी बांधलेल्या होत्या . हा आश्रम चालवणारे नर्मदा गिरीजी महाराज म्हणून आहेत तेच नेमके मला सामोरे आले . मी महाराजांना साष्टांग दंडवत केला . महाराजांनी एक मोठे दगडी शिवलिंग स्थापन केले आहे त्याच्या शेजारी आसन लावण्याची मला सूचना केली . आत्ता थोडा गडबडीत आहे नंतर निवांत भेटू असे मला सांगायला विसरले नाहीत . केवळ माझ्या नजरेतून माझा भाव त्यांनी कसा काय ओळखला असेल ! माझ्या मनात अगदी आले होते की या महात्म्याचा सत्संग घडला तर बरे होईल ! उजवीकडे एका मोकळ्या जागेवर पत्राची शेड टाकून तिथे मोठ्या शिळेला शिवलिंग म्हणून पुजले होते . इथेच लखनगिरी बाबांची मूर्ती देखील होती . लखनगिरी बाबा इथे येऊन राहिले आणि त्यांनीच इथल्या आदिवासींचे मतपरिवर्तन केले असे सर्वजण मानतात . नर्मदा मातेचे भाऊ म्हणून भिल्ल लोकांना मामा म्हणतात . या मामा लोकांचे प्रबोधन करून परिक्रमा वासींना लुटण्याऐवजी परिक्रमा वाशींची सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जागवणारे हेच ते लखनगिरी महाराज . अर्थात ही लूटमार बंद कशी काय झाली याच्या अनेक सुरस कथा नर्मदा खंडात सांगितल्या जातात . एका आदिवासीने मला सांगितले की पूर्वी एक पोलीस कमिशनर नर्मदा परिक्रमेला आले होते . त्यांची लुटालूट झाली . त्यांनी शांतपणे सर्वांची नावे वगैरे लक्षात ठेवली . चेहरे लक्षात ठेवले . आणि परिक्रमा संपल्यावर मोठा फौज फाटा घेऊन ते आले आणि लुटमार करणाऱ्या भिल्लांना बेदम मारहाण केली . तेव्हापासून हा प्रकार बंद पडला . परंतु ही कथा मला फारशी व्यावहारिक वाटली नाही . कारण मारहाण करून कोणी लूटमार करण्याचे सहजासहजी सोडणार नाही . मन परिवर्तन आणि मतपरिवर्तन झाल्यासच ते शक्य आहे . इथे नर्मदा मातेमध्ये स्नान करणे शक्य आहे असे मला एका सेवेकरी साधने सांगितल्यामुळे मी किनाऱ्याकडे गेलो . 

घोंगसा येथील लखनगिरी महाराजांचा आश्रम . या चित्रामध्ये दिसणारी नदी नर्मदा मैया नसून तिला येऊन मिळणारी एक नदी आहे . डावीकडे दिसणारा डोंगर उतरून मी थेट आश्रमामध्ये आलो . पाण्याची पातळी किती वाढते हे तुम्हाला टेकडीवर पडलेल्या पाण्याच्या खुणा पाहिल्यावर लक्षात येईल.

समोरच्या काठावरून आश्रम असा दिसतो .

हा आश्रम श्री पंचदशनाम आखाडयांपैकी जुना आखाडा या आखाड्याचा आहे . पंच दश म्हणजे पंधरा . जुना आखाडा ,उदासीन आखाडा इत्यादी पंधरा आखाडे आहेत . आश्रमाचा क्रमांक इथे दिलेला आहे . ९७५४४८६९६१

आश्रम अतिशय सुंदर होता. इथून हलूच नये असे वाटे . आश्रमाच्या विविध कुटींमध्ये आधीपासूनच काही साधू राहत होते . परिसरातील छोटी मुले इथे मदती करता येऊन राहिली होती . त्यांच्यावरती लहानपणापासून हा संस्कार होत होता . शिवलिंग भव्य आणि गोंडस होते . त्याच्या शेजारीच मी आसन लावले . स्नानासाठी म्हणून मी मैया कडे गेलो तर एक तरुण मुलगा मैय्याकडे तोंड करून ध्यानस्थ बसलेला दिसला . जवळ जाऊन पाहिले तर तो आपला विशाल जवंजाळ होता ! माझ्या येण्याची चाहूल लागल्यामुळे त्याचे ध्यान भंग पावले आणि आम्ही दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली ! वेव्हलेंग्थ जुळणे नावाचा प्रकार आमच्या बाबतीत सहज घडलेला होता . याचे स्नान झाले होते . मीच नाना करता खाली उतरलो . प्रचंड खडक असलेला किनारा होता . नर्मदा मातेचे यापूर्वीचे किनारे वेगळे होते . आणि हा किनारा वेगळा होता हे मला थोड्याच वेळात कळले . हा किनारा नसून एका डोंगराचा टोकाचा भाग होता . ज्याच्या दरीमध्ये नर्मदा जल साठले होते . परिक्रमेमध्ये पोहण्याला परवानगी नाही कारण नर्मदा मातेला लाथ लागते . म्हणून मी नेहमीप्रमाणे पद्मासन घालून पाण्यावर झोपून राहिलो . नर्मदा जलाचा तो प्रेमळ स्पर्श अतिशय हवाहवासा होता ! परवा राजघाटवर स्नान केल्यावर पुन्हा हा स्पर्श मिळेल किंवा नाही याची शाश्वती नव्हती . बराच काळ मी असा पडून होतो . इथे दगडाचे काही सुळके अधून मधून वर आले होते ते फार धोकादायक होते . इतक्यात माझ्या असे लक्षात आले की माझा पद्मासन घातलेला उजवा पाय माझ्याच लंगोटी मध्ये फसला आहे . आणि तो सोडवायच्या नादात पाय पूर्णच अडकला . पाय झाडायचे नाहीत त्यामुळे मी पाय स्थिर ठेवले होते . पाय सोडविताना अतिरिक्त शक्ती लावल्यामुळे आणि पाणी थंडगार असल्यामुळे उजव्या पायाला गोळा आला किंवा वांब आला . या गडबडीत माझ्या तोंडातून श्वास बाहेर पडला (जो तरंगण्यासाठी तुम्हाला आवश्यक असतो ) आणि मी हळूहळू खाली बुडू लागलो .चांगले पोहता येत असल्यामुळे बुडण्याची भीती मला नव्हती .  परंतु हातपाय न मारणे हा नियम असल्यामुळे शांतपणे काय काय होते आहे ते पाहत होतो .नवीन ठिकाणी गेल्यावर शांतपणे खाली जाऊन पाण्याची खोली अनुभवणे हा माझा आवडीचा कार्यक्रम असतो. मला असे लक्षात आले की हे पाणी फारच खोल आहे ! मी बराच खाली गेलो होतो ! तळ काही लागतच नव्हता . अखेरीस नर्मदा मातेची करुणा भाकली आणि लंगोटीतून पाय सुटला . केवळ हात मारत वरती आलो . सुमारे वीस पंचवीस फूट सहज खाली गेलो होतो . तरी मला तळ लागला नव्हता . तेव्हा मला लक्षात आले की मी किती भयानक पाण्यामध्ये उतरलो होतो . हे पाणी उतरले असते तर तो पर्वताचा एक उभा दगडी कडाच होता ! आणि मी खाली गेलो होतो ती दरी होती ! नशीब तिथल्या एखाद्या वाळलेल्या झाडामध्ये वगैरे लंगोटी फसली नाही ! पाण्याच्या स्तंभाचा दाब माझ्या कानावर भयंकर जाणवत होता . वरती आल्याबरोबर मी बाहेर पडलो . माझे पाहून स्नाना साठी अजून काही लोक जमले . यातील बऱ्याच जणांना पोहायला येत नव्हते . सर्वांना मी विनंती केली की कृपया काठावर बसून स्नान करावे . नंतर मला कळाले की इथे मगरी सुद्धा असतात ! मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मातेने वाचवले होते ! इथून पुढे मी पाण्यात उतरण्यापूर्वी लंगोटी घट्ट करून मगच उतरायचो . मी बाहेर आल्याबरोबर विशाल म्हणाला की तुझे डोळे खूप लाल झाले आहेत !हे स्वाभाविक होते . वीस पंचवीस फूट पाण्याच्या खाली गेल्यावर तेवढ्या वजनाच्या पाण्याच्या स्तंभाचे वजन अथवा दबाव तुमच्या देहावर पडलेला असतो . त्याला प्रतिरोध करण्यासाठी रक्तदाब वाढतो . अजून थोडे खाली गेले आणि तोंड बंद करून कानातून हवेचा आतील दबाव वाढवला नाही तर कान फुटू शकतात . या प्रक्रियेला स्कुबा डायविंग करताना शिकवले जाते . इक्विलायझिंग असे याला म्हणतात . मी याचे रितसर प्रशिक्षण घेतले होते . माझ्याकडे स्वतःचा स्नॉर्केलिंग चा सेट सुद्धा आहे तो घेऊन विविध नैसर्गिक जलसाठ्यांच्या तळाशी असलेले जल जीवन पाहणे मोठे आनंददायक असते . ही इक्विलायझिंग ची प्रक्रिया केल्यामुळे डोळे लाल झाले होते . आश्रमामध्ये गेल्याबरोबर नर्मदा गिरी स्वामी म्हणालेच , "परिक्रमेला आला आहेस की पोहायला आला आहेस ? " मी त्यांना सांगितले की मी पाण्यावर पद्मासून घालून झोपलो होतो . परंतु त्यांना ते पटले नाही . स्वाभाविक होते . हे आसन स्थिर पाण्यावर करणे तितकेसे सोपे नाही . त्यात एखाद्या शहरी बाबूला तर अशक्य असणारी अशीच ही गोष्ट आहे ,असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे . मी स्वामीजींना सांगितले की मला स्वयंपाकामध्ये वगैरे मदत करायची आहे . त्यांनी सांगितले , "सिर्फ आनंद लेते रहो । परिक्रमावासी हो । आप की सेवा यहा नही ली जायेगी । परिक्रमा पूर्ण हो जाये तब यहाँ आकर रुकना । और जितनी मर्जी हो उतनी सेवा करना । "  विशाल आणि मी पूजनाला बसलो . इथे कृष्णा अष्टेकर नावाचे एक परिक्रमा वासी आले होते . पुण्यामध्ये कर्वे रस्त्यावर वासुदेव निवास आहे येथील ते अनुगृहीत होते . अतिशय सात्विक गृहस्थ होता . परंतु प्रचंड भावनाशील होते . यांनी त्यांची नर्मदा मैया अतिशय सुंदर अशा बाहुलीच्या रूपात नटवली होती ! तो प्रकार मला चांगलाच आवडला ! आणि मनोमन असे वाटले की आपली मजा सुद्धा अशीच करता आली तर किती छान होईल ! पुढे माझी ती सूप्त इच्छा मैय्याने पूर्ण केली . तो प्रसंग योग्य वेळी सांगेनच . 

या बाहुलीला काजळ लिपस्टिक वगैरे लावल्यामुळे आणि तसे काही करण्याचा कृष्णा अष्टेकर यांचा अनुभव नसल्यामुळे ती फारच मजेशीर आणि भयानक दिसत होती !  प्रजापती पिता पुत्र आणि राधे गिरी अमर गिरी हे उशिरा मुक्कामी पोहोचले . त्यांनी नेहमीचा मार्ग निवडला होता . सर्वजण चालून खूप थकलेले दिसले . मी विशाल सोबत गप्पा मारत बसलो . कृष्णा अष्टेकर देखील वासुदेव निवास मध्ये माझे जाणे असते हे कळल्यावर खूप खुश झाले . यांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती . मी त्यांना त्यांची गुरुपरंपरा आहे तिथे स्मरण करून देत धीर दिला आणि सांगितले की तुमची परिक्रमा नक्की पूर्ण होणार आहे . सद्गुरूंच्या चरणावर आणि मैयावर संपूर्ण विश्वास ठेवून एका वेळी एकच पाऊल टाकत राहा . हे बराच दिवस इथे राहिले होते . या आश्रमाची काही चित्रे गुगल नकाशावर सापडली ती आपल्यासाठी देत आहे .

लखनगिरी आश्रमाचे प्रवेशद्वार . मागे विस्तीर्ण पसरलेली मैया . 

आश्रम मधील शिवलिंगआश्रम मधील शिवलिंग . आणि लखनगिरी बाबांची मूर्ती . अलीकडे या शिवलिंगाला जलहरी बनवून समोर नंदी स्थापन केला आहे असे फोटो वरून कळाले . मी अगदी याच ठिकाणी आसन लावले होते .

आश्रमाला कोणीतरी घेऊन दिलेली ही भगव्या रंगाची कॅप्सूलच्या आकाराची नाव माझ्या लक्षात राहिली . या संपूर्ण परिसरात कोणी संकटात असेल तर या नावेद्वारे मदत पोहोचवली जाते . काही परिक्रमावासी इथून नावेने गोरा कॉलनी पर्यंत देखील जातात असे ऐकण्यात आले . नावेत बसलेल्या माणसांच्या आकारावरून नावेच्या आकाराची कल्पना यावी . आश्रमासाठी लागणारे सर्व साहित्य या नावेद्वारे समोर काठावर असलेल्या डही गावाच्या बाजारातून आणले जाते .

आश्रमातील विविध कुटी

आश्रमामध्ये मदतीसाठी थांबलेला आदिवासी मुलगा . त्यांची नावे आपल्याला मोठी मजेशीर वाटतात . 

आश्रमातील शिवलिंग आणि आजूबाजूला बसलेले परिक्रमा वासी

आश्रमासमोरील नर्मदा मैया . इथेच मी खोलीचा अनुभव घेऊन वर आलो . समोरच्या तटावर पाण्याची वाढलेली पातळी किती जाऊ शकते त्याच्या खुणा दिसत आहेत . इथे मोकळ्या जागेवर अजून एक बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे असे स्वामींनी मला सांगितले .

या घाटावर नावेतून नर्मदा मातेला साडी नेसवतानाचे दृश्य !

हे काम करणारा आदिवासी तरुण . अर्धी नाव साडी ने भरलेली आहे इतकी मोठी साडी आहे .

नर्मदा माते ला नेसवली गेलेली साडी

या आश्रमाच्या पुढे नर्मदा माता उजवीकडे वळण घेते अर्थात उत्तरवाहिनी होते आणि पुन्हा पश्चिमेकडे वळून दक्षिण वळण घेत पुन्हा सरळ पश्चिमेला वाहू लागते . 

वरील नकाशात डही नावाच्या गावाजवळ नर्मदा माता उत्तर वाहिनी झालेली दिसते आहे पहा . त्याच वळणाचे हे वरील छायाचित्र आहे . आश्रम बरोबर या वळणावरच आहे . 

यानंतर नर्मदा गिरी महाराजांचा खूप चांगला सत्संग लाभला . महाराज अतिशय स्पष्ट वक्ते होते . त्यांच्याशी बोलण्यासाठी परिक्रमेतील एक साधू महाराज आले आणि सांगू लागले की यापूर्वीची परिक्रमा त्यांनी १९८४ साली केली होती

. तेव्हा लखनगिरी महाराजांनी  त्यांना ठेवून घेतले होते आणि भाकरी खाऊ घातली होती . त्यांना क्षणात उडवून लावत नर्मदा गिरी महाराज म्हणाले की हे शक्यच नाही . कारण मुळात लखनगिरी महाराज या स्थानावर २००० सालानंतर आले ! तो साधू खजिल होऊन तोंड बारीक करून निघून गेला . नर्मदा गिरी महाराज मला सांगू लागले , " मला खोट्याची फार चिड आहे . एक वेळ तुम्ही चुकीचे बोला , चालेल . परंतु खोटे बोलू नका . मुळात परिक्रमेमध्ये काही बोलूच नका ! तेवढा आपला अधिकार असता तर परिक्रमा करावी लागली असती काय ? शहरी परिक्रमावासींचा मला याच कारणासाठी राग येतो . इथे येऊन मला आश्रमामध्ये काय काय सुधारणा केल्या पाहिजेत ते सुचवतात . इथे प्रत्येक गोष्ट करायला मी एकटाच असतो . ५० सुविधा उभ्या केल्यावर त्या जपणार आणि सांभाळणार कोण आहे ? तुम्ही परिक्रमा वासी लोक आधीच एवढे दमून येता . तुम्हाला काम लावणे बरोबर आहे काय ? इथे आधीच माणसे मिळत नाहीत कुठल्याही कामाला . पूर्वी तर फार विषम परिस्थिती होती . गुरुजींच्या कृपेमुळे आता परिक्रमा वासी निर्धोकपणे या प्रांतातून प्रवास तरी करू शकतात .  नाहीतर पूर्वी चक्क नागडे करून सोडायचे हे लोक . अजूनही ते काही फार बदलले आहेत असे नाही . फक्त आता ते थोडेसे सावध असतात इतकेच . " नर्मदा गिरी महाराज अत्यंत पोट तिडकीने बोलत होते . त्यांचे म्हणणे आणि अतिशय बरोबर होते . मुळात ज्या सुविधा आपण शहरांमध्ये उपभोगतो त्या तशाच्या तशा जंगलामध्ये उभे करण्याचा अट्टाहास हाच मुळी मूर्खपणाचा आहे . उदाहरणार्थ बांधलेला संडास शहरांमध्ये चालतो कारण इथे मलनि:सारण व्यवस्था आधीच उभी केलेली असते . जंगलामध्ये असा संडास उभा करण्याची गरज काय ? आणि प्रयोजन तरी काय ? मला महाराजांचा रोखठोक स्वभाव खूप आवडला . असे साधू फार कमी आढळतात . यांना माणसांची फार चांगली पारख होती . जोपर्यंत मी त्या आश्रमामध्ये होतो तोपर्यंत शेपटासारखा त्यांच्यासोबत फिरत होतो . या साधू कडून किती शिकावे असे मला झाले होते !त्यांनी देखील सुरुवातीला पुणे शहरातून आला आहे म्हणून माझ्यावर धरलेला डूख नंतर सोडून दिला . विशेषतः काठाने चालण्याचा माझा आग्रह त्यांना सांगितल्यावर त्यांनी इथून पुढचा झाडीतला मार्ग मात्र कृपा करून ठरलेल्या प्रमाणेच पार करण्याचा मौलिक सल्ला दिला . तसे न ऐकणाऱ्या परिक्रमावासींचे काय हाल झाले आहेत याचे किस्से त्यांनी मला सांगितले . अजूनही काही दूर दरासची खेडी आहेत जिथे अक्षरशः अन्नान्न दशा आहे . इथे काहीही होऊ शकते . त्यातील बऱ्याच लोकांना परिक्रमा काय आहे ते देखील माहिती नसते कारण गेली अनेक दशके इथून कोणीच गेलेले नाही . 

महाराजांचे हे सर्व सांगणे मी काळजीपूर्वक ऐकत होतो . त्यांच्या रूपाने साक्षात नर्मदामाताच मला सावध करत आहे असे मला वाटले . रात्री इथे खूप सुंदर आकाश दिसते . प्रकाश प्रदूषण जवळपास शून्य आहे . त्यामुळे कधीही देखील न दिसणारे तारे इथून दिसतात . मी तनय आणि आश्रमात राहिलेल्या तीन मुलांना संपूर्ण आकाश दाखवले . आणि आकाशावरून दिशा कशी ओळखायची ते शिकवले . या मुलांची नावे मोठी मजेशीर होती . गुमान , सदानंद आणि मच्छर अशी त्यांची नावे होती . आदिवासींमध्ये नावे आपल्यापेक्षा वेगळी असतात . गारद्या ,फोदला , मनीया , हमाल्या , भिला अशी नावे असतात . रात्री खूप छान झोप लागली . सकाळी उठून आन्हिके आटोपली . थंडगार नर्मदा जलाने काठावर बसून स्नान केले . 

आश्रमाचा माझ्या वहीमध्ये मिळालेला शिक्का

माँ नर्मदा दत्त आश्रम

ब्रह्मलीन स्वामी लखनगिरी जी महाराज

संचालक प्रबंधक संत नर्मदा गिरीजी महाराज

ग्राम घोंगसा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश

 मोबाईल 09754486961

विशाल ला माझ्यासोबत चालायची इच्छा होती . परंतु त्याला मी आधीच गतिमान चालण्याचे महत्त्व आणि गरज पटवून सांगितली होती . नाहीतर त्याची परिक्रमा पूर्ण झाली नसती . त्यामुळे मी त्याला अतिशय वेगाने पुढे निघून जायला सांगितले . मी थोडेसे काठाने चालून पाहणार होतो . आणि मग मूळ मार्ग पकडणार होतो . त्यामुळे मी झोळी उचलली आणि हळूच काठावरचा मार्ग पकडला . नर्मदा गिरी स्वामींचे माझ्यावर बारीक लक्ष होते . मी का ठा कडे दूरवर पोहोचलो होतो . त्यांनी जोरात आवाज देऊन मला सरळ रस्त्याने जायची तंबी दिली . पुन्हा एकदा हा नर्मदा मातेचा आदेश आहे असे मानून मी उलटा फिरलो आणि धोपट मार्ग पत्करला . लवकरच आपला महाराष्ट्र सामोरा येणार होता !

लेखांक एक्क्याऐंशी समाप्त (क्रमशः )

 

लेखांक ८२ : सेमलेटची भंगुरई आणि खारिया भादल चे नक्करसिंग सोलंकी

कोsहम्

घोंघसा आश्रमातून निघाल्यावर थोडीशी झाडी लागते . मैया ला उजव्या हाताला ठेवून आपण चालत राहायचे . मध्ये अनेक डोंगर येतात . यातील एका डोंगराच्या डाव्या उतारावरून चालत राहावे लागते . मध्ये काही खिंडी लागतात . त्या पार करत करत आपण चालत राहायचं . पायाखालची जमीन मुरमाड आहे . त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते . पाय सटकला की दरीमध्ये पडणे निश्चित आहे . बरं इथे पडताना मध्ये धरण्यासाठी एखादे झाड सुद्धा नाही . 

इथे उजव्या हाताला मोरदेव झरना नावाचे एक गाव आहे . इथे पावसाळ्यामध्ये मोराच्या आकाराचा एक धबधबा पडतो असे ऐकले . नंतर मला भेटलेला एक परिक्रमा वासी या मार्गाने आला त्याने देखील या झऱ्याबद्दल सांगितले . गुगल नकाशावर याची काही चित्रं सापडली ती आपल्यासाठी देत आहे .

 

मोरदेव झरना

डोंगराची सोंड धरून चालत राहिलो .

मी चालत एका खिंडीमध्ये पोहोचलो . इथे भिल्लांचे काही देव आहेत . लाकडाच्या कुऱ्हाडीने तासलेल्या मूर्ती असतात . इथे काही काळ कट्टयावर बसून विश्रांती घेतली .

हीच ती खिंड आणि हेच ते देव आणि हाच तो कट्टा .

( संग्रहित छायाचित्र )

मी इथे काही काळ बसलेला असतानाच मागून प्रजापती पिता पुत्र आणि राधे गिरी व अमर गिरी आले . त्यांना इथे बसून मी चटकन पुढे निघालो . डोंगराचा उतार तीव्र होता . आणि मी प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो . इतक्यात माझ्या मागून दोन माताराम आल्या . दोघीही तरुण होत्या . दोघींच्या डोक्यावर जड पिशव्या चुंबळ करून ठेवलेला होत्या .दोघीही बहिणी असाव्यात . यातली मोठी बहिण जी होती तिला पाहून मी अवाकच झालो . तिच्या डोक्यावर दोन मोठ्या पिशव्या होत्या . उजव्या कडेवर तीन वर्षाची मुलगी होती . आणि डाव्या हातात एक तान्हे बाळ तिने पकडले होते जे तिच्या पदराआड अमृतपान करत होते . परंतु हे सर्व करताना ती अतिशय वेगाने चालत होती . आणि ते देखील तीव्र उताराच्या मुरमाड पायवाटेने जिथून पाय सटकला की सर्वांचा कपाळमोक्ष निश्चित आहे ! तिच्या पायात साध्या स्लीपर होत्या ! मागून येऊन या दोघी अतिशय वेगाने पुढे निघून गेल्या . तिचा तो आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो ! जिथे प्रत्येक पाऊल टाकताना हजार वेळा विचार केला पाहिजे तिथे हे लोक बिंनधास्त पळत होते ! त्यांचे पाहून माझ्या देखील पायांना गती आली . त्या कुठे पावले टाकत आहेत त्याचा मी अभ्यास केला . आणि मग हळूहळू मला देखील वेगाने डोंगर उतरण्याची युक्ती सापडली . मी विनाकारण पडण्याला घाबरत होतो . एकदा पडण्याचे भय संपले की मनुष्य अचाट कृत्ये करू शकतो . जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे लागू होते ! अशा पद्धतीने परिक्रमेमध्ये भेटणारा प्रत्येक जीव तुम्हाला काही ना काही शिकवून जातो . तुमचे जीवन कालच्या पेक्षा अधिक समृद्ध करतो . तुम्हाला विचार करण्याची एक नवीन दिशा देतो .किंवा तुम्ही ज्या दिशेने चालले आहात ती दिशा योग्य की अयोग्य याचे मार्गदर्शन तरी करतोच करतो ! 

अजूनही काही लोक डोंगर उतरताना दिसले . अतिशय वेगाने धावत हे डोंगर उतरतात . या डोंगरांचा उतार सर्वसामान्य नाही . अतिशय निसरडे डोंगर आहेत .

हे सर्व लोक सेमलेट गावातील भंगुरै बघायला चालले होते . इथे असलेली शंभर एक गावे अशी आहेत की गावातील सर्वजण सर्वांना ओळखतात . प्रत्येक गावात कोण राहते आहे आणि त्याच्या घरात कोण कोण सदस्य आहेत हे जवळपास प्रत्येकाला माहिती असते . मुलींची लग्न देखील आसपासच्या गावातच लावलेली आहेत . त्यामुळे त्यांना देखील सर्वांची सर्व माहिती आहे . 

अखेर सेमलेट गावात पोहोचलो . सर्वत्र मोठाच मेळा भरला होता . कोणाचा कोणाला मेळ लागत नाही तो खरा मेळा ! छोटी मोठी दुकाने लागली होती . खाण्याचे पदार्थ , नाश्त्याच्या गाड्या , शीतपेये , दागिन्यांची दुकाने , वाणसामानाची दुकाने ,फळांची भाज्यांची दुकाने असे सर्व लागले होते . या गावापर्यंत डांबरी सडक येत होती त्यामुळे सर्वसामान इथे गाडीने आणण्यास सोपे होते . एक सारख्या कपड्यांच्या जोड्या परिधान करून आदिवासी मुले मुली जत्रा भर फिरत होते . इन्स्टंट फोटो काढण्याचा स्टॉलवर फार गर्दी होती .

नटून थटून भंगुरै बघायला आलेली एक आदिवासी तरुणी . बहुतांश तरुणांची लग्न या जत्रेतच जुळतात .तिच्या हातातील चांदीचे तोडे बघा ! जितके अधिक दागिने तितकी अधिक श्रीमंत घरातील मुलगी ! तितकी तिला मागणी अधिक ! 

आपल्या मुलाचे लग्न जुळण्यासाठी जत्रेत आलेल्या

 एका कुटुंबाने मला पकडले आणि माझ्यासोबत त्यांचा इन्स्टंट फोटो काढण्याची विनंती केली . लगेच स्टुडिओ वाल्याने तो फोटो काढून दिला . आणि त्याची एक छापील प्रत मला मोफत भेट दिली .  तो फोटो आपल्यासाठी खाली जोडत आहे . त्यावरून तुम्हाला मामा लोकांचा पारंपारिक वेश कळेल . 

एका आदिवासी कुटुंबासोबत प्रस्तुत लेखक सेमलेट गावातील यात्रेदरम्यान . पायात नवा कोरा बूट दिसतो आहे . आदिवासी लोकांची नजर किती भेदक असते पहा . आदिवासी स्त्रियांचे पारंपारिक अलंकार या काळात तुम्हाला पाहायला मिळतात . जे मुख्यत्वे करून चांदीमध्ये घडवलेले असतात . प्रत्येक तरुणाच्या गळ्यामध्ये शेला असतोच . बाहेर पडले की तो डोक्याला बांधला जातो . पुरुषांनी कमरेला लोकरीची शाल लुंगी सारखी गुंडाळलेली असते . परिक्रमावासींना मात्र जुने जाणते मामा लोक मान देतात .

या गावातील सरपंचाच्या घरी भोजन प्रसाद मिळतो असे मला कळले . खरे म्हणजे जत्रेमध्ये काय म्हणाल ते खाता आले असते . परंतु ते परिक्रमेच्या नियमात बसणारे नाही . इथे धनुष्यबाण विकणारा देखील एक मनुष्य मला सापडला . परंतु त्याने मला धनुष्याला हात देखील लावू दिला नाही . माहिती किंवा किंमत सांगणे तर फार लांबची गोष्ट . धनुष्यबाण फक्त आदिवासी लोकांना दिला जातो . त्याचे पावित्र्य हे लोक जपतात .

अगदी लहान असल्यापासून आपल्या मुलांना आदिवासी धनुर्विद्या शिकवतात . त्यांचे धनुष्यबाण लहान आकाराचे असतात . 

भाल्याने मासेमारी करणारा एक आदिवासी मुलगा . धनुष्यबाण , भाला , फाल्या नावाचा कोयत्या सारखा सुरा इत्यादी वापरण्याचे प्रशिक्षण लहानपणापासून यांना असते .  हे लोक अत्यंत निर्भय असतात . अशा जमातींना खरे म्हणजे लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये आग्रहाने भरती करून घेतले पाहिजे . म्हणजे गुन्ह्यांचे प्रमाण नगण्य होईल . 

सेम्लेट हे एक वनग्राम आहे . याच्या अंतर्गत आठ गावे येतात . भादल ,कोटबांधणी , धंजारा ,तुवरखेर्डा , खेरवणी , जीवनी , सेम्लर , पाटी आणि कारी ही ती गावे होत .  उमराव सिंग सोळंकी या गावचे सरपंच होते .


सेम्लेट गावचे सरपंच उमराव सिंह सोळंकी

(संपर्क : ९७५४४९०८४८ /97544 90848 )

कन्हैयालाल राठोड हे इथले ग्रामसचीव आहेत .

 सेम्लेट गावच्या सरपंचाच्या घरी मी गेलो आणि उतार उतरून खाली असलेल्या एका खोलीमध्ये सामान ठेवले . घरात पाहुण्या रावळयांची गडबड चालू होती . तशा गडबडीत देखील सरपंचाच्या मुलीने मला ताटभर  गरमागरम ताजे भोजन आणून दिले . थंडगार फ्रिजमधील पाणी देखील आणून दिले . या भोजनाने अक्षरशः तृप्त झालो .

सरपंच तेवढ्या गडबडीमध्ये देखील दोन मिनिटांसाठी मला येऊन भेटून निघून गेला . विश्रांतीसाठी पडलो असतो तर झोप लागली असती म्हणून मी लगेच पुढे निघण्याचा निर्णय घेतला . बाहेर बंदोबस्तासाठी काही पोलीस उभे होते . त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला कळाले की इथे कुठल्याही प्रकारच्या पोलीस बंदोबस्ताची गरज लागत नाही . आदिवासींचे स्वतःचे कायदे आहेत आणि स्वतःचे नियम ते कठोरपणे पाळतात . पोलिसांपर्यंत प्रकरण जाऊ देणे म्हणजे अपयश मानले जाते . त्यामुळे पोलीसही फारसा हस्तक्षेप करत नाहीत केवळ ' ड्युटी ' लागली आहे म्हणून येऊन बजावून जातात . हा मुद्दा सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे . शहरांमध्ये अशी स्वयंशिस्त कुठेही आढळत नाही . पाश्चात्य राष्ट्रांमध्ये देखील पोलिसिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते . कारण पोलीस काढून घेतले की तिथले गुन्ह्यांचे प्रमाण कैक पटीने वाढते . या उलट आपल्या इथे सामाजिक दबावापोटी लोक बरेचसे नियम मनापासून स्वेच्छा पूर्वक पाळतात .

या जत्रेमध्ये मला विशाल देखील भेटला होता . पुन्हा मी त्याला पुढे निघून जायचा सल्ला दिला आणि भोजन प्रसाद घेतल्यावर मी देखील निघालो . जंगलातील वाट लागली . एक आदिवासी माझ्यासोबत चालू लागला . चालता चालता त्याने मला परिक्रमेविषयी बरेच प्रश्न विचारले . आणि ऐन जंगलाच्या मधोमध आल्यावर मला सांगू लागला की तो ख्रिश्चन झालेला आहे . आणि ख्रिश्चन होणे कसे फायद्याचे आहे हे तो मला ऐकवू लागला . मध्ये एक कोरडा ओढा लागला . तिथे एका झाडाच्या सावलीमध्ये मी त्याला घेऊन बसलो . आणि सुमारे एक तास न थकता न कंटाळा त्याला चांगले उद्बोधक प्रवचन दिले . पुन्हा एकदा आंग्लास्त्र इथे कामाला आले ! तो खरोखरच विचारात पडला आणि मी पुढे निघालो . परंतु अशा दुर्गम ठिकाणी देखील ख्रिस्ती धर्मप्रचारक येऊन कशा पद्धतीने धर्म परिवर्तन करत आहेत ही पाहून मला आश्चर्य वाटले . विशेषतः शेकडो परिक्रमावासी येथून जात असून देखील इथल्या लोकांना धर्मविषयक फारसे ज्ञान कोणी देत नाही याचे मला राहून राहून नवल वाटले आणि वाईट देखील वाटले . उलट पक्षी आपल्या वागण्यातून आपल्या धर्माविषयी समोरच्या माणसाच्या मनामध्ये घृणा किंवा तिटकारा तर निर्माण होत नाही ना याची काळजी घेणे प्रत्येक परिक्रमावासीचे महत्त्वाचे काम आहे असे मला वाटते .

 

सेम्लेट कडे उतरणारा डोंगर . 

  आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती . घर अतिशय साधे होते परंतु त्यातील विटा नक्षीदार पद्धतीने बाहेर काढून त्रिमितीय नक्षी तयार करण्यात आली होती . घराला सुंदर असा रंग देखील देण्यात आला होता . आतून   शेणाने सारवलेल्या खोल्या भिंती ऐवजी गवताच्या तट्ट्यांनी शेकारल्या होत्या . कौलांमुळे उन्हाचा दाह कमी होत होता . अंगणामध्ये गाई म्हशी शेळ्या कोंबड्या होत्या . मी दारात उभा राहून नर्मदेहर असा आवाज दिला . नकरसिंग ची आई दारात आली एका झोपडीकडे हात करून तिथे आसन लावायला सांगितले . स्वतः नक्करसिंग आणि त्याचा भाऊ सेमलेटची होळी खेळायला गेले होते . खेळायला म्हणजे स्वतः भुत्या म्हणून तिथे नक्करमामा चा तो भाऊ नाचत असे . नक्कर सिंगची पत्नी पाणी देऊन गेली

 . मी उतरलो होतो त्याच खोलीमध्ये यांची आटा चक्की होती . जाता जाता तिने मला धान्याकडे लक्ष ठेवायला सांगितले . मला तेव्हा त्याचा अर्थ कळाला नाही परंतु काही वेळाने जेव्हा बाहेरच्या शेळ्या कशा चटकन आत मध्ये येऊन धान्य किंवा पीठ खाऊन जातात हे पाहिले तेव्हा राखण करण्याचे महत्त्व कळाले . यातली एक काळी पांढरी शेळी तर एवढी हुशार होती की कितीही अडवले तरी ती पीठ खाऊनच जायची !  शिवाय एक मारकुटी म्हैस देखील होती . तिच्याशी देखील मी खूप खेळलो . ती अत्यंत तापट होती . सुदैवाने या दोन्ही जीवांचे फोटो मला गुगल नकाशावर सापडले . 

नक्कर सिंहची तापट म्हैस आणि आगाऊ व चोरट्या शेळ्या ! 

याची आई म्हातारी होती परंतु खंबीर व करारी होती . सर्व घरावर तिचा वचक आहे असे मला जाणवले . घरातील सर्वजण भंगुरई बघण्यासाठी सेमलेटला गेलेले होते . सासु सुना दोघीच घरात होत्या . त्यामुळे दोघींचा वावर थोडासा मुक्त होता . मला देखील त्यांनी फारशी बंधने घातली नाहीत . उलट मला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या अंगणात बोलवले . अंगणामध्ये एक बाज ठेवलेली होती . त्याच्यावर घरातील मुख्य पुरुष झोपायचा . एका बाजूला पिण्याच्या पाण्याचा रांजण जमिनीपासून वर बांधलेल्या लाकडी टेबलावर मातीत गाडून ठेवला होता . ही पद्धत इकडे सर्वत्र आढळते . या दोघींकडून मला आदिवासी प्रथा परंपरां बद्दल बरीच माहिती कळली . त्यांनी मला आधीच कल्पना देऊन ठेवली की येणारी सर्व माणसे प्रचंड दारू पिऊन आलेली असतील त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू नये . किंवा मोजकेच बोलावे . माझा स्वभाव बोलका आहे हे म्हातारीच्या लक्षात आले ! एकंदरीत आदिवासी कुटुंबामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाचक असतो असे मला जाणवले . म्हातारीची सुनेपुढे अक्षरशः दहशत होती . म्हातारीला चार शब्द वाकडे बोलले की इथल्याही सुनेला लगेच आनंद व्हायचा ! सुनेची चूक दाखविताच म्हातारी खुश व्हायची ! घरोघरी मातीच्या चुली ! इतक्यात डोंगर उतारावरून यात्रा संपवून येणारी माणसे दिसू लागली . सूर्य पश्चिमेला मावळत होता आणि हा डोंगर पूर्वेला होता त्यामुळे सूर्याच्या उजेडामध्ये उंच च उंच माणसे डोंगर उतरताना दिसू लागली ! ही माणसे चमचम चमकत होती ! नक्की काय प्रकार आहे कळत नव्हते . सर्वच जण थोडे जवळ आल्यावर लक्षात आले की त्यांनी आपल्या डोक्यावर मोठ्या मोठ्या टोपल्यांच्या साह्याने मोरपिसे बांधलेली होती . शिवाय त्याला लटकवलेले आरसे चमकी वगैरे चमकत होते . 

बहुतेक वाघाला मोठा प्राणी समोर उभा आहे असे वाटावे म्हणून हा वेष तयार झाला असावा असे वाटते कारण दुरून पाहताना खरोखरच सात-आठ फूट उंचीची माणसे येत आहे तसे वाटत होते  .बांबूच्या मोठ्या मोठ्या कामठ्या वापरून मजबूत अलंकार तयार केले होते . आणि ते उत्कृष्ट सजवले होते . या सर्वांच्या कमरेला विशिष्ट आकाराचे वाळवलेले भोपळे होते व त्याचा आवाज खूप दूरपर्यंत घुंगरासारखा ऐकू यायचा . शिवाय मोठी मोठी घुंगरे होती ती वेगळी . अंगावर पांढऱ्या रंगाचे पट्टे व गोल काढून गळ्यात उंबराच्या माळा घातल्या होत्या .हातात काठ्या ,भाले ,तलवारी , धनुष्यबाण , फाल्या अशी हत्यारे होती . काही पुरुष स्त्रीच्या वेषामध्ये देखील नटले होते . काहींनी अंगावर रंगीबेरंगी चिन्ध्या गुंडाळल्या होत्या . सोबत धीर गंभीर वाजणारे ढोल , ढोलकी व थाळी अशी वाद्ये होती . एकाच रंगाच्या घागरा चोळ्या व चांदीचे ठसठशीत दागिने घातलेल्या स्त्रिया होत्या . मुलांच्या गळ्यात साखळ्या होत्या . उतरणारे सर्व लोक आमच्यासमोरूनच जात होते . मी उठून सर्वांना सामोरा गेलो . आणि येणाऱ्या लोकांशी भरपूर चर्चा केली , गप्पा मारल्या . काही उत्साही तरुणांनी माझ्यासोबत फोटो काढले . मी त्यांच्यासोबत ढोल वाजवला . त्यांचे ताल आत्मसात करून घेतले . इथे प्रत्येक गोष्ट आदिवासी लोक आपल्या स्वतःच्या हाताने बनवितात . अगदी ढोला साठी लागणारे कातडे देखील स्वतः मिळविले व कमविले जाते . केवळ चारच छिद्रे व पाचवे तिरके छिद्र असलेली सुंदर व एक सू री वाजणारी बासरी देखील यांच्याकडे होती . ती देखील वाजवून पाहिली . तिच्यावर वाजणारी विवक्षित धून आणि ढोलाचा धीर गंभीर खर्जातला आवाज थेट ध्यानामध्ये घेऊन जाई ! इथे तरुणांनी माझ्यासोबत जे फोटो काढले ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी पाठवून दिले . नर्मदा मातेची असीम कृपा कशी आहे पहा ! या आदिवासी लोकांना त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये पाहण्याचे भाग्य मला लाभले ! नाहीतर आजकाल हे सर्व लोक आधुनिक पेहराव करतात ! परंतु आजही महत्त्वाच्या सणासमारंभाला आपला पारंपारिक वेष ते पुन्हा धारण करतात . या आदिवासी पेहरावाचा आनंद सर्वांनी घ्यावा !

 सेमलेटची यात्रा करून आलेले आदिवासी तरुण ! सोबत प्रस्तुत लेखक . आपादमस्तक त्यांचा पेहराव नीट अभ्यासा !

असा वेष घालून ज्या वेगाने ते डोंगर उतरले ते पाहता पूर्वी लुटमार होताना परिक्रमावासींची काय अवस्था होत असेल हे लक्षात आले !

हे लोक आपापल्या गावी गेल्यावर घरी न झोपता बाहेर अंगणातच एकत्रितपणे झोपतात . व दुसऱ्या दिवशी पूजा पाठ झाल्यावरच घरी परत जातात . यांनी केलेला पेहराव एक व्रत म्हणून ते पाळतात . व त्याची थट्टा केलेले त्यांना चालत नाही . याची कृपया नोंद घ्यावी . 

हे चारही फोटो एकाच वेळी काढलेले असले तरी वेगळे वेगळे आहेत . म्हणून सर्वच्या सर्व जसेच्या तसे दिलेले आहेत .  या मुलांनी मला त्यांचे नृत्य देखील करून दाखवले . एकंदरीत कुठेतरी मुक्काम करायचा तो त्यांनी नकरसिंहच्या अंगणातच ठोकला त्यामुळे मला यांच्याशी खूप वेळ संवाद साधता आला . मी ढोल वाजवला हे त्यांनी पाहिल्यामुळे माझ्याशी ते व्यवस्थित बोलले . वाद्य वादन यांच्याकडे खूप पवित्र मानले जाते . सहजासहजी कोणाला वाद्याला हात लावू दिला जात नाही .

अशा रितीने नटून थटून हे लोक जत्रेमध्ये जाऊन नक्की काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे . म्हणूनच सेम्लेटच्या जत्रेतील त्याच दिवशी व रात्री घेतलेले हे व्हिडिओ पहा .

इतक्यात नकरसिंह आणि त्याचा भाऊ तिथे आले . भाऊ भुत्या झाला होता . मी माझा परिचय त्याला करून दिला आणि त्याच्या घरी आज मुक्कामी असल्याचे सांगितले . त्याला फार आनंद झाला . आणि त्याने सांगितले की सणाच्या नियमानुसार आज तो घरी झोपायला येऊ शकत नाही . आज हे सर्व तरुण जंगलामध्ये चिकन मटन शिजवून खातात आणि दारू पिऊन झोपी जातात . असे सांगेपर्यंत सर्वजण गोल करून मोहाची दारू प्यायला बसले सुद्धा ! उद्या होळी होईपर्यंत हे लोक आपले कपडे बदलणार नव्हते आणि आपल्या घरी देखील जाणार नव्हते . हे सर्व पावरी आदिवासी किंवा भिल्ल लोक आहेत .त्यांची भाषा पावरी . आडनाव लावताना सोळंकी पावरा अशी आडनावे लावतात .आणि जात लिहिताना डावरा किंवा दावरा अशी जात लिहितात . होळी हाच यांचा प्रमुख सण आहे .  हेच लोक पूर्वी लुटालूट करायचे . परंतु आता चित्र बदलले आहे . आता यांच्या मदतीशिवाय हा टप्पा पार करता येणे अशक्य आहे ! एक पिढी पूर्वीपर्यंत हे लोक केवळ लंगोटीवर फिरायचे . आणि स्त्रिया फक्त अर्धा घागरा घालायच्या .उपवस्त्र देखील नेसत नसत . आता हे लोक अंगभर कपडे घालतात . यूट्यूबर लोकांनी जगातल्या अनेक प्रांतातील पेहराव बदलून दाखवले आहेत त्याचे हे एक उदाहरण ! प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये पकडण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे लोकांनी आपले नैसर्गिक राहणीमान बदलून टाकले आहे ! या लोकांची याहा मोगा नामक एक देवी आहे .जी गुजरातमध्ये वडफळी जवळ आहे .तिलाच हे मानतात . मध्यप्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रातील नंदुरबार या भागामध्ये सर्वत्र हे लोक फक्त पावरी भाषाच बोलतात . यांच्या गाडीवर याहा मोगा किंवा जय आदिवासी असे लिहिलेले असते .हे लोक चिवट , तापट परंतु परिक्रमावासींसाठी मात्र उपकारक आहेत .नवीन मुले थोडीशी ब्रिगेडी झाल्यासारखी वाटतात . हे लोक लहान मुलांनाही खुशाल दारू पाजतात . दारू पिणे इथे सन्मानाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते . मोहाची दारू औषधी देखील असते . पोट साफ करण्याचे काम ही दारू करते . अर्थातच योग्य प्रमाणात घेतली तर . प्रस्तुत लेखक व्यक्तिगत जीवनात अपेयपान व सुरापानाचा कडक निषेध करतात याची कृपया नोंद घ्यावी . ही सर्व माहिती आपणा करता जशी आहे तशी देत आहे इतकेच .

इथली लहान मुले एक जात शूर , भित्री , बुजरी व नागडी उघडी असतात .एखादा परिक्रमावासी दिसल्याबरोबर जीवाच्या आकांताने एक दीड किलोमीटर दूरवरून डोंगरावरून पळत खाली येतात .यांना पडण्याचे , घसरण्याचे ,आपटण्याचे जणू भयच नसते . हलकीफुलकी मुले टणाटण उड्या मारत खाली येताना पाहून मला भीती वाटायची . एका गोळीसाठी हा सर्व आटापिटा ! या भागातील मुलांना पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींनी बिघडवले आहे असे पालकांचे स्पष्ट मत आहे . सतत गोळ्या खाऊन इथल्या मुलांचे दात कधी नव्हे ते किडू लागले आहेत . त्यामुळे यांना शक्यतो चॉकलेट गोळ्या दिल्या नाही पाहिजेत . परंतु असे जरी असले तरी देखील तुम्हाला बघून ही एक दीड किलोमीटर पळत येणार हे निश्चित आहे . त्यामुळे त्यांना काहीतरी खाऊ द्यावाच लागतो . मी इतके सूत्र पाळले की प्रत्येक मुलाला चॉकलेट देताना प्लास्टिक पर्यावरणासाठी कसे घातक असते हे समजावून सांगितले आणि प्लास्टिक माझ्याकडे जमा करून घेतले आणि मगच गोळी खायला सांगितली . ठराविक अंतराने एखाद्या चुलीमध्ये मी ते प्लास्टिक नष्ट करायचो . 

आता हळूहळू या भागामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत . सोलरची वीज देखील घरोघरी आलेली आहे . साध्या विजेचे जोडदेखील प्रत्येक गावात पोहोचले आहेत . इथले लोक अतिशय निर्भय आहेत हे मात्र अगदी खरे . राहून राहून असे वाटते की ही लढाऊ जमात पोलीस लष्कर किंवा निमलष्करी दलामध्ये पाहिजे . तेच त्यांच्यासाठी योग्य स्थान आहे . असो .

हेच ते नकरसिंग सोलंकी . वनग्राम खारिया भादल .मागे त्याचे सजवलेले घर

 नकरसिंगच्या घरावर लावलेली पाटी . हे तिघेजण या भागातील तीन चार लोकांना सेवेसाठी मदत करतात असे दिसते . 

उजवीकडे बसलेला नकरसिंग सोलंकी . अन्य आदिवासी तरुणांच्या तुलनेने नकर मामा ची तब्येत मला चांगली धष्टपुष्ट वाटली . डोळ्यातील भेदकपणा मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारच . 

इथेच आसन लावले

याच भागातील अन्य एक घर . घरांची रचना कशी आहे लक्षात यावे म्हणून चित्र जोडले .

श्रीमंत आदिवासींची घरे आतून अशी असतात .

नकरसिंगचे आंगण .होळी साजरी करून परत आलेली सर्व मंडळी इथेच झोपली .

डावीकडून नकरसिंगची खंबीर आई , डोक्याला केशरी पागोटे बांधलेला नकरसिंह ,उजवीकडून दुसरा त्याचा भाऊ आणि भावजय . मधोमध उभे मराठी पद्धतीचे पागोटे घातलेले बहुतेक त्याचे वडील किंवा वडील बंधू आहेत . (संग्रहित छायाचित्र )

घराच्या आतून अशी चित्रे काढली जातात

 सुदैवाने मी गेलो तेव्हा इथे एकटाच होतो . 

माझ्या आधी विशाल जवंजाळ इथे दुपारचे जेवण घेऊन गेला असे मला म्हातारीने सांगितले . परंतु मुक्कामाला मी एकटाच होतो . ती रात्र अतिशय संस्मरणीय अशी गेली . हा माझा ७३ वा मुक्काम होता . संध्याकाळपर्यंत घरातील सर्वजण परतले . खूपच मोठे कुटुंब होते . भरपूर लहान मुले होती . कोण कोणाचे कोण आहे हे कळणार नाही इतकी माणसे होती . नकरसिंगचा जो भाऊ भुत्या बनला होता त्याच्या हातामध्ये एक वडिलोपार्जित अप्रतिम अशी तलवार होती . माझ्या काही शस्त्रविद्या पारंगत मित्रांमुळे या शस्त्रांचे थोडेफार  ज्ञान मला झालेले आहे. त्यानुसार ही एक अप्रतिम तलवार होती . हिचा धातू देखील अप्रतिम होता आणि बऱ्यापैकी वापर देखील झालेला होता . ही तलवार घेऊन तो झोपण्यासाठी खाली गावामध्ये निघून गेला . एक तरुण भाऊ जो काहीच बनला नव्हता तो मात्र घरी थांबला . प्रचंड दारूच्या नशे मध्ये असलेला हा घराच्या आत मध्ये ठेवलेला ढोल काढून वाजवू लागला . आपण गणपती मध्ये जो गजाढोल बघतो त्यापेक्षा थोडासा आकाराने मोठा आणि लाकडाच्या खोडापासून बनवलेला अतिशय जड परंतु अतिशय अप्रतिम असा हा ढोल असतो . तो ठेवण्यासाठी लाकडाचे एक मेज बनवलेले असते.  आदिवासींच्या नियमानुसार कोणीही अचानक येऊन वाद्य वाजवू शकत नाही . त्यातले ज्ञान आहे अशीच व्यक्ती हात लावू शकते . हा डोळे मिटून धीर गंभीर ढोल वाजू लागला . मी एक ढोलक उचलून त्याला हळूहळू साथ देऊ लागलो . माझा ताल पक्का आहे आणि तो जो ताल वाजवतो आहे तो मला कळलेला आहेत हे लक्षात आल्यावर आमची चांगली जोडी जमली . आम्ही दोघांनी हे वादन चालू केले आणि उत्स्फूर्तपणे घरातील लहान मोठ्या मुली मुले आणि सर्वच जणांनी हातात हात घालून आमच्या भोवती फेर धरला . आणि आदिवासी नृत्य करायला सुरुवात केली . हे सर्व अतिशय धीर गंभीर शांत आणि स्वाभाविकपणे उत्स्फूर्तपणे घडलेले होते . यात कुठलाही दिखावा भपका अजिबात नव्हता ! मैयाची निर्मळ भावंडे ! मामालोक ! तास दोन तास वादन झाले . त्यानंतर मला नकर सिंग च्या बायकोने भाकरी आमटी आणून दिली . भोजनप्रसाद झाल्यावर मी पुन्हा ढोलावर गेलो . रात्री बारा वाजेपर्यंत मी अखंड ढोल वाजवत होतो . मंडला दिंडोरी भागातील आदिवासी लोकांचे जे ताल आहेत त्याच्यात आणि इथल्या तालामध्ये खूप साधर्म्य होते . लय देखील एकसारखी  ठाय होती . जोवर जागे आहेत तोवर घरातील सर्व नृत्य करत राहिले . हा त्या वाद्याचा मान असतो . ते वाद्य वाजत आहे आणि तुम्ही लोळत पडले आहात असे कोणी करत नाही . नकरसिंगच्या बहिणी उत्तम शिवणकाम करत . आता देखील अख्या गावाचे कॉस्च्युम्स त्यांनीच शिवलेले होते . त्यांचे एका बाजूला शिवणकाम सुरू होते . घरामध्ये खोल्या फारशा नसतात . आम्ही ढोल वाजवत होतो ती एक पातळी . फुटभर उंचीच्या पायरीच्या पातळीत सारे घर . त्याला मध्ये एक लांबच लांब आडवी भिंत . आत स्वयंपाक घर . बाकी झोपायला सर्वजण अंगणामध्ये येत . 

त्या ढोलाचा धीर गंभीर आवाज इतका जबरदस्त होता की त्याने मी अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये गेलेलो होतो . एकच एक ठेका एकच एक ताल तुम्ही सलग दोन-तीन तास अतिशय ठाय लयी मध्ये अखंड वाजवत राहिलात तर तुम्हाला उन्मनी अवस्था निश्चितपणे प्राप्त होते . तसेच आमचे झाले होते . अखेरीस तो भाऊ वाजवता वाजवता ढोलावरच झोपला . मग मात्र मी भानावर आलो आणि वादन थांबवले . आणि ताबडतोब झोपायला निघून गेलो . एक परिक्रमावासी वाद्यवादन करत आहे त्याचा सन्मान म्हणून मला कोणीही थांबवण्याची सूचना वगैरे केली नाही ,उलट मला साथ दिली ,त्याचे मला फार कौतुक वाटते . अतिथी देवो भव या वचनाचे याहून सुंदर पालन ते काय असू शकते ! 

त्या ढोलाच्या तालाने माझ्या मनाला एक संथपणा आणला होता . पडल्या पडल्या माझ्या कानामध्ये तो ताल वाजत राहिला . हा ताल ओळखीचा वाटत होता . डोळे मिटल्या-मिटल्या माझ्या डोळ्यासमोरून काही दृश्य झरझर सरकू लागली . परिक्रमेतून उलटा चालत मी जबलपूर ला पोहोचलो . तिथून उलटी दृश्य पहात पहात हळूहळू लहान झालो . बालपणीचा माझा अवतार पाहता पाहता तान्हे लेकरू झाला . आणि त्यानंतर माझ्या जन्माचा प्रसंग आठवला .एका क्षणामध्ये मी एका द्रवामध्ये तरंगतो आहे असे दिसू लागले . आणि माझ्या लक्षात आले की मी माझ्या आईच्या गर्भामध्ये आहे . आणि आता पुन्हा एकदा तोच ताल मला ऐकू येऊ लागला ! हा ताल होता माझ्या आईच्या हृदयाची धडधड ! तो ताल आणि हा ताल यात खूप साम्य होते ! नव्हे नव्हे हाच तो ताल ! नर्मदा मातेच्या उदरामध्ये अतिशय खुशाल पणे पडलेल्या एका लेकराच्या कानावर पडणारा नर्मदा मातेचा हृदय नाद होता तो ताल !  परिक्रमा म्हणजे जणू गर्भवासच ! गर्भाला जसे अन्न पाणी सर्वकाही आईकडून मिळते तसेच परिक्रमा वाशीला सर्व काही नर्मदा माई देते . गर्भारमाता जिथून जशी जाईल तिथून तिथून गर्भाला जावेच लागते परंतु मातेची सोबत असल्यामुळे आणि तिच्याशी नाळ जुळलेली असल्यामुळे त्याच्या जीवाला कुठलाही धोका होत नाही . तसेच परिक्रमेमध्ये परिक्रमावासीचे होते  . नर्मदा माता जिथून कुठून जाईल तिथून फक्त आपण जात राहायचे . बाकी सर्व चिंता तिला असते . आपण फक्त साक्षी भावाने पहात राहायचे . या परिक्रमे नंतर प्रत्येक माणसाचा आवर्जून पुनर्जन्म होतो ! पूर्वजन्मीचे संस्कार , वासना , ईषणा , अहंकार , विचार सारे सारे नष्ट होऊन जाते . उरते ते फक्त एक तान्हे बालक .

आणि आता या बाळाला माहिती असते की काहीही हवे असेल तर फक्त आईला हाक मारायची !

 नर्मदेssssss हर !

पुढील लेखांक 

लेखांक ब्याऐंशी समाप्त ( क्रमशः )

 

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

स्नान पूजा आटोपून नक्करसिंगचे घर सोडले . हे सर्वजण शेतातच रात्रभर झोपले होते . तिथे यांचे काहीतरी चालू आहे ते दिसले . सर्वजण मिळून मोहाची दारू गाळत बसले होते . बाबाजी तुम्ही इकडे येऊ नका , मीच तिकडे येतो असे म्हणत नकरसिंग आला . परंतु वाटेत मी पाहिलेल्या सगळ्या भट्ट्यांचे पत्ते त्याला सांगितल्यावर तो फारच अचंबित झाला . त्याच्या लक्षात आले की मी संपूर्णपणे काठाने आलो आहे . या भट्ट्या अशा ठिकाणी उभ्या केलेल्या असतात जिथून कोणीच जात नाही . एकंदरीत दारूची भट्टी हा माझ्यासाठी नवीन प्रकार नाही इतकेच मला त्याला सांगायचे होते . याला काहीतरी द्यावे असे फार वाटत होते . तसे निघताना मी घरातल्या मुलांना गोळ्या खाऊ आणि पैसे वाटले होते . परंतु नकरसिंगला देण्यासारखे काही नव्हते . माझ्या असे लक्षात आले की तो पायामध्ये बूट घालून फिरत आहे . हे रबरी बूट अत्यंत गरम होणारे होते . त्यामुळे मी त्याला वेदांत विला आश्रमात मला मिळालेल्या चपला देऊ केल्या . आधी त्याला विचारले कारण मी त्या पादत्राणांचा वापर करीत अनेक नद्यानाले ओलांडले होते . त्याने सांगितले या माळावर कुठलीही गोष्ट वाया जात नाही . त्यामुळे तुम्ही बिनधास्त मला चपला द्या . तसेही नर्मदे काठी फिरलेल्या चपला पवित्रच आहेत असा त्याचा भाव बघून मला फार बरे वाटले . नकरसिंग ने अतिशय कष्टपूर्वक इथून पुढे खप्परमाळपर्यंतचा सगळा मार्ग सुरेख चुन्याच्या बाणांनी रेखित केला होता . नंतर माझ्या असे लक्षात आले की त्याने बाण मारताना ते अत्यंत हुशारी पूर्वक अशा पद्धतीने मारले होते की सोप्यात सोपा मार्ग सापडावा आणि वाटेतील प्रत्येक दुकानाजवळून ,घराजवळून तो मार्ग जावा . जेणेकरून त्या लोकांना परिक्रमावासींकडून , आणि परिक्रमावासींना त्यांच्याकडून चार गोष्टी प्राप्त होतात . त्याचा हा विचार मला आवडला . परंतु हे लक्षात आल्यावर मात्र मी बाणांचा फारसा भरवसा न धरता स्वतःला भावणाऱ्या शॉर्टकट मार्गाने चालत राहिलो . अर्थात हे मार्ग बऱ्यापैकी धोकादायक होते परंतु बाणांना धरून चालणाऱ्या परिक्रमावासीला मात्र कोणालाही कुठेही चौकशी करावी लागणार नाही अशी व्यवस्था त्याने करून ठेवली होती . बरे हे काम तो दरवर्षी करायचा . कारण इथे दिसणारा निसर्ग पावसाळ्यामध्ये आपले रूप पालटतो . दगडांवरचे बाण पुसले जातात . किंवा शेवाळ्याने झाकले जातात . या भागातील निसर्ग पावसाळ्यामध्ये कसा असतो हे पाहिल्यावर तुम्हाला या प्रदेशाला शुलपाणीची झाडी का म्हणतात ते लक्षात येईल ! गुगल नकाशावरून काही सुंदर अशी पावसाळी दृश्य मला या भागाचा शोध घेताना सापडली ती आपल्यासाठी सोबत जोडत आहे .
 शूलपाणीची झाडी पावसाळ्यात अशी दिसते
इथे दिसणार्‍या दर्या म्हणजे प्रत्यक्षामध्ये नद्या नाले आहेत . जे पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहतात .
मी चालताना मात्र हे सर्व ठणठणीत कोरडे होते
दऱ्या अशा खोल आहेत . परंतु थोडे धाडस केल्यावर खाली उतरायला मार्ग सापडत होते . कृपया परिक्रमेमध्ये अशा मार्गांचा अवलंब करू नये अशी सर्वांना प्रार्थना आहे .एवरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण यांच्याकडून फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर प्रस्तरारोहणाचे प्रारंभिक धडे प्रस्तुत लेखकाने घेतलेले आहेत . त्यामुळे अशी वेडी साहसे करू धजावलो . परंतु सर्वांनी जाता येण्यासारखा हा मार्ग निश्चितपणे नाही . 
ढगांचे साम्राज्य आणि मुसळधार पाऊस ! दिसायला हे दृश्य छान असले तरी केवळ पावसावर शेती अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवांसाठी इथला प्रत्येक पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो . अतिवृष्टी आणि अनावृष्टी हे दोन्ही त्यांच्यासाठी अत्यंत घातक असते . पर्यावरणामध्ये होणारे मोठे बदल त्यांना परवडणारे नसतात . 
इथे अशी उभी सरळ सोट वाढणारी झाडे जास्त आहेत . अधून मधून घरे दिसतात . सर्वच घरांमध्ये परिक्रमावासींची सेवा होते असे नाही . उलट ठराविक एक दोन लोक आहेत ज्यांच्या घरी परिक्रमावासींची व्यवस्था होते . बाकीच्या लोकांची गरिबी नजरेत भरणे इतकी सुस्पष्ट असते . त्यामुळे या भागातून जाताना कोणाकडे कशाची याचना करू नये असे सुचवावेसे वाटते . कारण तुम्हाला नाही म्हणणे त्या व्यक्तीसाठी कष्टदायक असते .
पावसाळ्यामध्ये बहरलेली हिरवीगार शेती व मधोमध छोटेसे घर . 
एक आदर्श आदिवासी घर कसे असते पहा . केवळ विटा आणि मातीच्या साह्याने रचलेली भिंत असते . सिमेंटचा वापर केलेला नसतो . दारं खिडक्या इत्यादीसाठी लाकूड न वापरता फांद्यांचेच शिवलेले तट्टे वापरतात . डावीकडे पिण्याच्या पाण्याचे मेज आणि त्यावर मातीत गाडून ठेवलेले माठ दिसत आहेत . त्याच्यावर सोलर बसवलेला आहे . . उजवीकडे सौर दिव्याचा खांब आहे जो अंगणातील उजेडासाठी आहे . हे सर्व वीज वगैरे अलीकडे आलेले आहे . अंगणात पांढऱ्या रंगाचा बाज ठेवलेला आहे . त्यावर घरमालक झोपतो . बाकी घर आतून रिकामेच असते . उजवीकडे गोठा दिसतो आहे . कौलांची शाकारणी केलेली आहे .

मोकळी जागा मिळेल तिथे शेती केली जाते . 
डोंगर उतारावर देखील नाचणी  , कुळीथ वगैरे भरड धान्याची आणि वनभाज्यांची शेती केली जाते . 
पूर्वी या भागातील लोकांचे जीवन इथे असलेल्या धार्मिक पर्यटनामुळे सुरक्षित होते . अर्थात नर्मदेमध्ये जलमग्न झालेल्या अनेक मंदिरांमध्ये जाण्यासाठी भाविक याच मार्गाने यायचे . त्यातून रोजगार निर्माण व्हायचे .
परंतु आता मात्र सर्व काही जलमग्न झालेले आहे आणि पुन्हा त्याचे अवतरण होण्याची शक्यता मावळत चाललेली आहे .
शूल पाणीच्या झाडीमध्ये अतिशय प्राचीन मंदिरे होती याचे अवशेष आजही तिथे काठावर सापडतात . शास्त्रोक्त पद्धतीने या मंदिरांचे जतन किंवा पुनर्स्थापन करता येणे शक्य होते . आजही पाण्याखाली ही सर्व मंदिरे सुस्थितीमध्ये आहेत इतके त्यांचे बांधकाम उत्तम दर्जाचे आहे . 
धरण बांधणे या विषयाला माझा विरोध नाही . परंतु ते बांधताना जलमग्न होणाऱ्या तीर्थक्षेत्रांची पुरेशी काळजी किंवा दखल घेतली गेली नाही हे देखील खरे आहे . 
आता हे पाणी इतके खोल साठलेले आहे की तिथे काहीच करता येणे शक्य नाही . 
महाराष्ट्र राज्य हे धरणांच्या बाबतीत संपूर्ण भारतामध्ये सर्वात अग्रेसर राज्य राहिलेले आहे . जलसंधारण तज्ञ असे मानतात की महाराष्ट्रामध्ये आता नवीन धरण उभे करण्यासाठी जागाच शिल्लक नाही इतकी धरणे आणि लघु पाटबंधारे बांधून झालेले आहेत . परंतु ही सर्व धरणे जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक धरणामध्ये एक तरी महत्त्वाचे पौराणिक मंदीर जलमग्न झालेले आहे . वर्षातून काही दिवसांसाठी असे एखाद्या मंदिर पाण्याच्या बाहेर आले तर लोकांना चमत्कार वाटतो . परंतु इतके सुंदर मंदिर पाण्याखाली जाणे हाच एक मला मोठा चमत्कार वाटतो . त्यासाठी कोणी कोणी कसे कार्य केले आहे याचा अभ्यास इतिहासामध्ये घुसून करता येणे सहज शक्य आहे . 
पळसनाथाचे मंदिर हे एक प्रसिद्ध उदाहरण याबाबत देता येते
उजनी धरणामध्ये बुडविल्या गेलेल्या या प्रसिद्ध मंदिराला  बुडण्यापासून वाचवणे सहज शक्य होते असे आपल्याला नकाशा पाहून देखील कळते . परंतु त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत .
हे मंदिर किती सुंदर आहे हे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच अशी शंका येऊ लागते की इतके सुंदर मंदिर जलमग्न कसे काय होऊ दिले जाते ? का याच्यामागे काही निश्चित हेतू आहे ? किंवा मंदिराचे अस्तित्व इतके नगण्य मानले गेले आहे की त्याच्या असण्या नसण्याने काही फरक पडू नये असे वर्तन आपल्या हातून घडले आहे ? विचार करून पहावा लागेल हे नक्की . 
इतकी वर्षे पाण्याखाली राहून देखील या मंदिराची वीटदेखील हललेली नाही . अजूनही अशा पुरातन मंदिरांचे संवर्धन आणि संगोपन शक्य आहे .
धरण परिसरातील खोली वाढविण्यासाठी गाळ उपसला जातो त्याचा वापर करून अशा काठाजवळ असलेल्या मंदिरांसाठी सीमा भिंत उभे केल्यास ही मंदिरे वाचू शकतात . 
असेच एक प्रसिद्ध मंदिर आहे वाघेश्वराचे . पवना नदीच्या काठावरील हे मंदिर कायमचे जलमग्न झालेले आहे . 
मंदिर वाचवणे शक्य आहे हे परिसर पाहून आपण हे सांगू शकता . परंतु त्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीचा अभाव आपल्याकडे आहे हे मान्य केलेच पाहिजे . 
भोरच्या भाटघर धरणामध्ये देखील असेच एक कांबरेश्वर नावाचे मंदिर जलमग्न झालेले आहे आणि अजून देखील भक्कम उभे आहे . 
दरवर्षी ते पाण्याबाहेर येते आणि सांगते की मी अजूनही शाबूत आहे . अजून तरी मला वाचवा . एक एक दगड काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन माझी पुन्हा उभारणी करा . 
गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावरील मुक्तेश्वर महादेव सिद्धेश्वर महादेव घटेश्वर महादेव आणि संगमेश्वर महादेव ही मंदिरे देखील अशीच जायकवाडी धरणाच्या डूबक्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक आणली गेल्यासारखी दरवर्षी बुडवली जातात . थोडीशी बांधबंधिस्ती करून ही सर्व मंदिरे वाचवून एक अप्रतिम पर्यटन क्षेत्र म्हणून याचा विकास करता येणे शक्य आहे .
मुक्तेश्वराचे मंदिर आणि जलपातळी दिसते आहे
हळूहळू थोडे थोडे दगड सटकत एक दिवस हे मंदिर नामशेष होणार

घटेश्वर महादेवाचे मंदिर देखील असेच संपूर्णपणे बुडून जाते .
धरणाचे पाणी उतरल्यावर मंदिरे दिसू तरी लागतात
अनेक वेळा पाण्यामध्ये बुडून देखील बांधकामे टिकून आहेत ती वास्तुशारदांच्या कौशल्यामुळे
सिद्धेश्वर मंदिर किती पुरातन आहे आणि इथला राजा हत्तीवर बसून दर्शनासाठी कसा यायचा याची शिल्पेच मंदिरामध्ये कोरलेली आहेत ही शिल्पे देखील जलमग्न होतात . भविष्यात या देशाच्या राजाला या मंदिरामध्ये पाणबुडीत बसून जावे लागेल की काय ?
शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या या मंदिरांचे संवर्धन करणे किंवा पुनर्व निर्माण करणे खरोखरीच इतके अवघड कार्य आहे काय ?
ही सर्व मंदिरे मी स्वतः पाहिलेली आहेत म्हणून त्यांचे उदाहरण दिले . याखेरीज मला माहिती नसलेली हजारो मंदिरे आहेत जी दरवर्षी धरणाच्या पाण्यात बुडवली जातात . मनात शंकेची पाल चुकचुकते . की हे सर्व धर्म बुडविण्यासाठी मुद्दाम तर नाही ना केलेले ?
अन्यथा इतकी सुंदर मंदिरे पाण्याखाली कोण बुडवतो ?
अशा पद्धतीने मंदिर बुडल्यावर आत मध्ये जाऊन येथे नित्य पूजा कोणी करू शकेल काय ?आपल्याला काय झाले आहे कळत नाही . किमान आपल्या परिसरातील अशा मंदिरा बाबत आपण आवाज का उठवू शकत नाही ? स्थानिक लोकप्रतिनिधीला वेठीला का धरू शकत नाही ?
आपण इतके पुरोगामी झालो का , की आपल्या जन्मदात्याला व त्यांच्या संस्काराला देखील मागे टाकले ? छोटेसेच का होईना किमान एक मंदिर बांधून पहावे . म्हणजे या तळमळीचा अर्थ आपल्या लक्षात येईल .
विकासाची कास आपण निश्चितपणे धरली परंतु धरणांचे भूमिपूजन करण्याची जितकी राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे होती तितकी इच्छाशक्ती या पौराणिक वारशा चे जतन करण्याची अजिबात नाही हे मान्यच करावे लागेल . 
आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही .
काही लोक नर्मदा बचाव आंदोलनाचे समर्थन याबाबतीत करतील . तोही मुद्दा स्पष्ट करून टाकतो . नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये विशेषत्वाने डुबग्रस्त लोकांना जमिनी देणे हा विषय महत्त्वाचा होता . मंदिरे वाचविणे किंवा त्यांचे पुनर्वसन हा विषय या आंदोलनाच्या अजेंड्या मध्ये प्राधान्याने कुठेच नव्हता . मी स्वतः या आंदोलनाचा भाग राहिलेलो असल्यामुळे आपणास हे खात्रीपूर्वक सांगत आहे . त्या काळातील नर्मदा जलमग्न झालेल्या एकाही पुरातन मंदिराचा असा फोटो तुम्हाला सापडत नाही यात सर्व आले .  परंतु एक गोष्ट छाती ठोकपणे सर्वांना सांगतो . सर्वांना म्हणजे या देशाच्या आणि संस्कृतीच्या शत्रूंना प्रामुख्याने सांगतो . तुम्ही कितीही तीर्थक्षेत्रे बुडवा . कितीही श्रद्धास्थाने जलमग्न करा . नर्मदा माता पवित्र आहे आणि पवित्रच राहील . तिच्या ज्या भूमीला किनाऱ्याचा मान प्रदान करेल तिथे नवे नवे प्रासाद उभे राहतील . नवनवी मठ मंदिरे निर्माण होतील . आणि ही अभेद्य संस्कृती टिकून राहील . अगदी नर्मदेच्या प्रवाहासारखी . 
आज द्वारका जलमग्न झालेली असली तरी देखील या देशाच्या पंतप्रधानाला अर्थात राजाला पाणबुड्याचे कपडे घालून तळाशी जाऊन तिचे दर्शन घ्यावे लागते ! असा असतो तीर्थ महिमा ! तो कालातीत आहे . अक्षुण्ण आहे . अभेद्य आहे . अडूबनीय आहे . 
शूलपाणीच्या झाडीमध्ये जी लुटालूट व्हायची त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला असे जाणवते की लूटमार करणारे लोक प्रामुख्याने कोळी किंवा केवट समाजातील असायचे . हे ते लोक होते ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे नर्मदे काठी होणाऱ्या धार्मिक पर्यटनातून चालत असे . परंतु ही तीर्थस्थानेच जलमग्न झाल्यामुळे या लोकांपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही . अजूनही नवीन धरणे आपल्या देशामध्ये भविष्यामध्ये होणार आहेत . ती बांधणाऱ्या अभियंत्यांनी कृपया एवढेच लक्षात घ्यावे की डुबक्षेत्रामध्ये एखादे पुरातन मंदिर तर बुडत नाही आहे ना ते पाहून त्याची बांधबंधिस्ती करावी . उदाहरणार्थ समर्थ रामदासांचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी डोणगाव येथे शिवछत्रपतींच्या स्नुषा सकवार बाई साहेबांनी बांधलेली आहे . हे पुरातन मंदिर कल्याण सागर जलाशयामध्ये बुडणार होते . परंतु प्रचंड प्रमाणात भराव वगैरे घालून मंदिराचे रूपांतर एका बेटात करण्यात आले आणि मंदिर वाचविले गेले . थोडक्यात इच्छाशक्ती असेल तर हे सर्व करता येणे शक्य आहे .
भूम परांडा जवळील डोमगाव येथील कल्याण स्वामींचे समाधी मंदिर धरणात बुडण्यापासून पद्धतशीरपणे वाचवण्यात आलेले आहे .
मंदिर बांधताना देखील उंचावर बांधल्यामुळे वाचवणे अधिक सोपे झाले आहे हे लक्षात घ्यावे .
सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की नर्मदा खंडामध्ये असलेल्या विविध धरणांमध्ये अक्षरशः हजारो मंदिरे जलमग्न झालेली आहेत . भविष्यामध्ये असे काही होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच एक भक्त म्हणून घ्यायला काय हरकत आहे ? आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाण्याचा जपून वापर केला तरी देखील आपण ही पाण्यात बुडणारी मंदिरे वाचवू शकतो . हे वाक्य ऐकायला अतिशयोक्तिपूर्ण वाटेल परंतु ढळढळीत सत्य आहे . कारण एक समाज म्हणून आपण पाणी जपून वापरायला सुरुवात केली की अशा प्रकारच्या धरणांची गरजच हळूहळू कमी होत जाणार आहे . ओघाने विषय आला आणि मनापासून बोलावासा वाटला म्हणून थोडासा विस्तार केला त्याबद्दल क्षमा असावी . 
तीव्र उताराचा डोंगर उतरत एका नदीच्या पात्रामध्ये मी आलो . नकरसिंगने आधीच सांगितले होते की या नदीचा एक काठ मध्य प्रदेशामध्ये आहे तर दुसरा किनारा महाराष्ट्रामध्ये आहे ! महाराष्ट्राच्या बाजूला उंचावर एक घर दिसत होते . त्याला मी जोरात मराठी मध्ये बोलून विचारले की हा महाराष्ट्र आहे का ? परंतु त्या माणसाला मराठी येत नव्हते ! ते जाऊ द्या ! इथून साधारण ८० किलोमीटर परिसरामध्ये कोणीही मराठी बोलताना आढळले नाही ! सर्वत्र पावरी ,बिलोरी, भिलड , अहिराणी अशा आदिवासी लोकांच्या भाषाच बोलल्या जातात असे आढळले . याचा अर्थ या संपूर्ण भागाची विभागणी आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी तीन भागांमध्ये जाणून-बुजून करण्यात आली ! काही भाग गुजरात मध्ये काही भाग महाराष्ट्रामध्ये आणि काही भाग मध्य प्रदेश मध्ये ठेवण्यात आला . त्यामुळे आदिवासी लोकांची राजकीय एकी भंग पावली आणि ते कधीच एकत्र येणार नाहीत याची सोय तत्कालीन राजकारणी लोकांनी करून ठेवली ! खरे पाहायला गेले तर या संपूर्ण भागाचे मिळून काही जिल्हे करता आले असते जे एकाच कुठल्यातरी राज्यामध्ये सुरक्षित राहिले असते . कारण तीनही राज्यांमध्ये या भागातील नागरिकांची संस्कृती समानच आहे . एक खासदार नसल्यामुळे या लोकांचा आवाज देशपातळीवर फारसा उठत नाही . 
सर्वच राजकीय पक्षांना या भागातील उमेदवार आदिवासी समाजातील द्यावा लागतो . महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये हिना गावित या खासदार आहेत . आणि त्यांचा शुलपाणीच्या झाडीतील आदिवासी लोकांशी चांगला संपर्क आहे असे लक्षात येते . याच परिसरातील एका गावामध्ये आलेल्या हिना गावित यांचे संग्रहित छायाचित्र . मागे उभ्या असलेल्या आदिवासी स्त्रियांच्या दंडातील वक्राकार वाकी पहाव्यात . तीनही राज्यातील स्त्रिया असेच दागिने घालतात ! 
या भागामध्ये येऊन शहरी लोक मदतीचे वाटप वगैरे करत असतात . परंतु खरे पाहायला गेले तर या लोकांना भौतिक वस्तूंची गरज नसून स्वाभिमानाची , सन्मानाची , समान वागणुकीची गरज आहे .
निसर्ग यांना पुरेसे शिक्षण देत असतो . आपण यांना काय शिकवणार ! आपणच त्यांच्याजवळ राहून खूप काही शिकू शकतो !
मुळात आदिवासी वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कार्याबाबत माझे काही स्पष्ट मत झालेले आहे . आपण शहरांमध्ये जे शिक्षण घेतो ते या भागातील मुलांना देण्याचा अट्टाहास किंवा दुराग्रह करणे म्हणजे या मुलांचे आणि पर्यायाने परिसराचे कायमचे नुकसान करण्यासारखे आहे . याच परिसरामध्ये आणि याच भागातील संसाधने वापरून ते उत्तम प्रकारे जीवन कसे जगू शकतील याचे शिक्षण खरे म्हणजे त्यांना मिळणे आवश्यक आहे . यांना ट्रिग्नोमेट्री शिकवणे म्हणजे एखाद्या उत्तम गायिकेला विणकाम शिकवण्यासारखे आहे . माझ्या एका मित्राने काही वर्षांपूर्वी बारा मावळातील दुर्गम गावामध्ये जाऊन तिथल्या मुलांना अभ्यास करता यावा म्हणून सौरदिवे वाटले होते . त्यामुळे मुलांनी दिव्याच्या उजेडात अभ्यास केला की नाही माहिती नाही परंतु मुले लवकर झोपायची बंद झाली आणि त्यामुळे ती आता उशिरा उठतात , अशी तक्रार पालकांनी माझ्याजवळ केलेली मला आठवते ! तसेच काहीसे हे आहे ! त्यामुळे या भागातील लोकांना मदत करण्याची इच्छा आपल्याला असेल तर ती स्वागतार्हच आहे . फक्त आपल्याला इतकीच काळजी घ्यायची आहे की आपल्या शहरातील गरजा वेगळ्या आणि या भागातील गरजा वेगळ्या !  बास ,इतके गणित डोक्यात बसले तरी पुरेसे आहे ! असो .
मी नदीमध्ये उतरलो . नदीचे पात्र चांगलेच रुंद होते . दोन्ही बाजूंनी डोंगर असलेली ही नदी . खोल दरी मधून वाहत होती . पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे साधारण दहा टक्के ते वीस टक्के भागातूनच पाणी वाहत होते . बाकी खडकाळ जमिनीमध्ये एकतर पाणी साठले होते किंवा शेवाळे देखील वाळून गेलेले होते असा सर्व भाग होता . चालताना काळजीपूर्वक चालावे लागत होते . कारण प्रचंड निसरडे खडक नदी मातेच्या उदरामध्ये होते . मी या नदीचे पाणी प्यायलो . त्याला महाराष्ट्राचा वास येत होता ! महाराष्ट्राची चव त्या पाण्याला जाणवत होती . नदी आटलेली असल्यामुळे पाणी जड आणि क्षारयुक्त होते . शेवाळे देखील भरपूर होते . एरवी असे वास येणारे पाणी जर मी प्यायलो असतो तर हटकून आजारी पडलो असतो . परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला नर्मदा मातेने विशेष शक्तीच जणू काही दिलेली असते . तिचा वापर करून तुम्ही असे प्रसंग लीलया टाळता . वैद्यकीय दृष्ट्या पाहायला गेले तर उत्तम हवेमध्ये ,उत्कृष्ट सात्विक आहार घेत , दीर्घश्वसन करत ,भरपूर चालल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता कैक पटीने वाढलेली असते . त्यामुळे एरवी सहज तुम्हाला होणारे कुठलेही रोग इथे मात्र सहजासहजी होत नाहीत . त्यावर शरीर लगेच काम करते . सतत चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अखंड व वेगाने चालू असते . त्यात आपली फुफ्फुसे ताजा प्राणवायू रक्तात सतत मिसळत असतात . आणि पोटामध्ये निरंतर सर्वजंतुशर्मदा नर्मदा जलाचे प्राशन सुरू असते ! आधी व्याधी अर्थात शारीरिक व मानसिक सर्व रोगांचे उपाय करणारी नर्मदा माता समोर वाहत असते ! शरीरातील आणि मनातील सर्व मल सतत बाहेर फेकला जात असतो . शब्दशः लिटर्समध्ये घाम प्रतिदिवशी गाळला जातो . अशाप्रसंगी तुम्हाला काही आजार वगैरे झाले तर ते आश्चर्यच मानले पाहिजे ! मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील माझा सर्वाधिक फिटनेस किंवा सर्वात तंदुरुस्त अवस्था परिक्रमेदरम्यानच अनुभवली ! तशी शक्ती ,तशी ऊर्जा , तशी ताकद ,तशी हिंमत यापूर्वी कधी प्राप्त झाली नाही व अजूनही होईल याची शाश्वती नाही . नर्मदा मातेची कृपा अपरंपार आहे . या नदीच्या पात्रामध्ये पूर्ण वेळ मी एकटाच चालत होतो . एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ती जागा होती ! जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी जलस्त्रोतावर येतात हे माहिती असल्यामुळे मी अत्यंत सावधपणे पावले टाकत होतो . नदीतील क्षारामुळे सगळे दगड पांढरे फटक पडले होते . धरणाची पाणी पातळी वाढली की ही नदी खूप भरून वाहते असे मला सांगण्यात आले होते . आणि तशा खुणा दोन्ही बाजूच्या दगडी भिंतींवर दिसत होत्या . केवळ वन्यश्वापदांचे आवाज वगळता इथे दुसरे काहीच नव्हते . उकाडा सुरू झाला होता . तीनही बाजूने दगड असल्यामुळे मी चांगला तापलो होतो . एके ठिकाणी खोल डोह सापडल्यावर त्यात आंघोळ करून घेतली . या नदीचे फोटो मला सापडले नाहीत परंतु याच भागातील अन्य एका नदीचे फोटो खाली टाकतो यावरून तुम्हाला ती झरकल नावाची नदी कशी होती याचा अंदाज येईल . खालील चित्रात दिसणाऱ्या नदीपेक्षा मी चाललो ती नदी बरीच मोठी होती . व साधारण अशीच होती .
पात्राची रुंदी अधिक होती आणि पाणी याहून खूपच कमी होते .
या भागातील एका नदीच्या काठी बसलेला आदिवासी मनुष्य . असे कोणीतरी भेटावे असे मला फार वाटे परंतु त्या दिवशी कोणीच भेटले नाही . 
चहुबाजूने दगड तापले होते आणि त्यातून येणारे अश्म उष्णतामान ज्याला इंग्रजीमध्ये रॉक रेडिएशन म्हणतात ते भाजून काढत होते .सुदैवाने नदीपात्रातून चालता येईल एवढा रस्ता सर्वत्र मिळत होता . हा प्रवास अतिशय संस्मरणीय असा होता ! 
समोर दिसणारा अभेद्य पहाड ही आपली महाराष्ट्र भूमी आहे या कल्पनेने अतिशय आनंद होत होता . खड्या आवाजात मी म्हटलेली महाराष्ट्र गीते त्या दरी खोऱ्यामध्ये दुमदुमत होती ! 
राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा ! प्रणाम  घ्यावा माझा हा , श्री महाराष्ट्र देशा !
महाराष्ट्रातील भादल गाव या नदीच्या वरती होते . तिथे देखील परिक्रमावासींची सेवा करणारे एक आदिवासी कुटुंब आहे . परंतु एवढे कठीण कातळ चढून वरती जाणे माझ्या जीवावर आले होते त्यामुळे मी पुढे पुढे चालत राहिलो . तसेही महाराष्ट्राचे पाणी पिऊन पोट भरले होतेच ! या मातीची चवच न्यारी आहे हेच खरे ! या नदीचे पाणी वास्तवात आटलेले होते . महाराष्ट्रातल्या तापी खोऱ्यातील कुठल्यातरी धरणातील पाणी सोडल्यामुळे मला हे पाणी दिसत होते .  मी नदी पात्रातून चालत असल्यामुळे सर्वात खालच्या पातळीवर होतो . आणि आता मला खप्पर माळ गाठायचा होता जे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ याचे जुळे भावंड आहे . तोरणमाळ आणि खप्पर माळ दोन्ही एकाच उंचीचे माळ असून दोहोंमध्ये केवळ ३२ किलोमीटर अंतर आहे . याचा अर्थ आता अखंड चढणे क्रमप्राप्त होते . आजपर्यंत नर्मदे काठी अनेक प्रकारचे खडक पाहिले . पण महाराष्ट्रातील काळ्य कभिन्न बेसाल्ट खडकाची मजा कुठल्याच दगडात नाही !
इथे चहूबाजूंनी उंचच उंच खडक असल्यामुळे सुंदर प्रतिध्वनी निनादत होते . काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी । पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी ! या महाराष्ट्र गीताच्या ओळी खड्या आवाजात म्हणत होतो आणि चहूबाजूनी त्याचे प्रतिध्वनी निनादत होते ! हा खडा पहाड चढण्याचे जीव घेणे साहस करण्यासाठी मला प्रचंड ऊर्जा देणारे हे शब्द होते ! सरळ पायवाटेने जाण्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र देशाला मिठी मारत ,आलिंगन देत ,चुंबन घेत खडी पहाडी भिंत चढत होतो ! खात्री होती की ही भूमी आपल्याला सोडणार नाही ! जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा ! या भूमीचे उपकार कुठल्या शब्दात मानावेत ? जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते असे सर्व जपणारी भारत वर्षातील एकमेव भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र ! अगदी अस्तंगत होत चाललेली नर्मदा परिक्रमा देखील पुनरुज्जीवीत करण्याचे महन्मंगल कार्य याच मराठी मातीने केलेले आहे ! परिक्रमा मार्गावरील लोक मराठी परिक्रमावासींना काहीही म्हणोत , परंतु आज सर्वाधिक नर्मदा परिक्रमावासी हे या महाराष्ट्राच्या भूमीतूनच येतात हे सर्वजण एकमुखाने मान्य करतात ! महाराष्ट्र ज्या विषयांमध्ये हात घालतो ती गोष्ट सर्वोत्तमच होते ! मी तर असे देखील ऐकले की नर्मदा मातेवरील सरदार सरोवर धरणाची भिंत महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये होती . परंतु कागदोपत्री फेरफार झाल्यावर आता ती भिंत गुजरातच्या हद्दी मध्ये दिसते आहे . त्यावर जगातील सर्वात मोठा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभा केला खरा परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा गुजरातकडे पाठ करून माझ्या महाराष्ट्राकडेच पाहत आहे ! जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा तेव्हा सर्वप्रथम तिच्या रक्षणासाठी उभा राहिला तोच हा महाराष्ट्र ! जेव्हा जेव्हा या भारत देशाला मागास म्हणून हिणविले गेले तेव्हा तेव्हा प्रगतीची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करून दाखविणारा तोच हा महाराष्ट्र ! साक्षात परमात्मा म्हणून जन्म घेतलेल्या भगवान श्रीकृष्णाला कौंडिण्यपूरच्या रूपाने सासुरवाडी म्हणून निवडावासा वाटला तोच हा महाराष्ट्र ! १४ वर्षे वनवासातील सर्वाधिक काळ जिथे प्रभू रामचंद्रांनी कंठला तोच हा महाराष्ट्र ! परमेश्वरी अवतार परशुरामाला विसावा घ्यावासा वाटला तोच हा महाराष्ट्र ! भारतीय सैन्य दलांमध्ये आजही ज्याचा दबदबा आहे तोच हा महाराष्ट्र ! आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी भारतामध्ये आल्यावर सर्वप्रथम ज्याचे स्मरण होते तोच हा महाराष्ट्र ! संपूर्ण भारत वर्षातील सर्वात समृद्ध संत परंपरा असलेला तोच हा महाराष्ट्र ! भारतावर आक्रमण केलेल्या डच , फ्रेंच , इंग्रज , वलंदेज , पोर्तुगीज , हबशी , सिद्दी , आदिलशहा , निजामशहा ,कुतुबशहा ,इमादशहा , बरीदशहा ,मोगल अशा प्रत्येक परकीय आक्रमकाला आपल्या अधिपत्याखाली यावेसे वाटायचा परंतु कधीच त्यांच्या गुलामगिरी मध्ये न पिचलेला तोच हा महाराष्ट्र !
या सर्वांना पुरून उरणारा , गाडून टाकणारा शिवछत्रपती रुपी महापुण्यपुरुष जन्माला घालणारा तोच हा महाराष्ट्र !
मोडेन पण वाकणार नाही , स्वधर्मा मध्ये मरण पत्करेन पण परधर्माला शरण येणार नाही , अशा बाण्याने हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या महापराक्रमी परमप्रतापी एकमेवाद्वितीय शंभू छत्रपतींचा जन्मदाता तोच हा महाराष्ट्र ! अटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या बाजीरावाचा लाडका तोच हा महाराष्ट्र !  इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांची सेना उभी करणारा तोच हा महाराष्ट्र ! अखंड भारत भ्रमण करून आल्यावर समर्थ रामदास स्वामींनी राहण्यासाठी निवडला तोच हा महाराष्ट्र ! अखंड भारतातील अगणित तीर्थक्षेत्रे पाहिल्यावर कृष्णा तटाकी विसावलेल्या समर्थ रामदास स्वामींनी संदेश दिला ,
आहे तितुके जतन करावे । 
पुढे आणखी मेळवावे ।
 महाराष्ट्र राज्य करावे । 
जिकडे तिकडे ॥
अशा महान राष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल ठेवताना माझी मनस्थिती काय झाली होती हे शब्दात वर्णन करता येणे खरोखरच कठीण आहे . म्हणूनच नर्मदा मातेने आपल्या महाराष्ट्राच्या डोक्यावर तिचा हात ठेवलेला आहे ! तो आशीर्वादाचा हात आहे ! तो कृतज्ञतेचा हात आहे ! तो एका आईचा हात आहे ! भारताचा नकाशा काढून महाराष्ट्राकडे पहा ! तुम्हाला नर्मदा मातेने महाराष्ट्राच्या डोक्यावर ठेवलेला हात नक्की दिसेल ! 
दिसतोय का आशीर्वादाचा हात पहा बरं ? नाही दिसत ? मी दाखवतो ! खालील नकाशा पहा !

करण्या भारतभू अखंड फिरूनी । 
झुंजे महाराष्ट्र हा ।
रेवा ही कर मस्तकी फिरवुनी ।
आशिष देते पहा ॥

कपाळी महाराष्ट्राची माती धारण केली . त्या पवित्र मातीची चिमूट जिभेवर टाकली . महाराष्ट्राच्या भूमीवर शहरलेल्या अंगाने पाऊल टाकले . आणि वेगाने पर्वत चढत धावडी गावामध्ये आलो . इथे एक झोपडी दिसली . इनेश खेरसिंग पावरा नावाचा तरुण मुलगा मला सामोरा आला . "नर्मदे हर बाबाजी ! चहा घेणार का ? " शुद्ध मराठी भाषेतले ते शब्द ऐकले आणि डोळ्यातून कृष्णा गोदावरी प्रकट झाल्या ! इनेशला देखील माझा भाव लक्षात आला ! आणि तो मला म्हणाला ! "महाराष्ट्रातल्या मराठी येणाऱ्या पहिल्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे बाबाजी ! या बसा ! इथे असं आसन लावा !"  ते शब्द कानावर पडल्यावर जो काही आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही . यापूर्वी अनेकांशी अनेक भाषांमध्ये बोललो ! पण मातृभाषेचे , मातृस्तन्याचे जे अमृतत्व आहे ते अन्यत्र कसे जाणवणार ! ते एकमेवाद्वितीय असेच आहे ! इनेशचे शिक्षण नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवन शाळेमध्ये झाले होते . या शाळेमध्ये महाराष्ट्रातून येणारे चळवळीतले कार्यकर्ते मराठी भाषेतून शिक्षण द्यायचे . त्याच्या परिणाम स्वरूप या भागातील नवीन पिढीला मराठी भाषा चांगली लिहिता वाचता बोलता येते . घरी हे लोक पावरी भाषेतच बोलतात . इथली सर्वच मुले पुढील शिक्षणासाठी मध्यप्रदेश किंवा गुजरातमध्ये न जाता महाराष्ट्रा मध्ये जाणे पसंत करतात . जळगाव ,धुळे , शिरपूर , फैजपूर , शहादा यांना जवळ पडते आणि बडवाणी पेक्षा आधुनिक आहे असे वाटते .  आणि ते खरे देखील आहे . मी चालत पार केलेल्या त्या भव्य नदीने अशा रीतीने महाराष्ट्राचा संपर्क मध्यप्रदेशशी तोडून टाकलेला आहे ! इनेश कडून मी जीवन शाळेबद्दल भरपूर माहिती मिळवली . अजूनही या शाळा सुरू आहेत . इथे राहून स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे . अशा सर्वस्व अर्पण केलेल्या निस्पृह ,निरागस ,निरलस , सेवाभावी कार्यकर्त्यांचा वापर आपल्या स्वतःच्या वैचारिक कंडांना शमविण्यासाठी वापरणाऱ्या दांभिक ,दुतोंडी , परराष्ट्रपोषित , परजीवी नेतृत्वाचा करावा तितका निषेध थोडा आहे . असो . नर्मदा माता सर्व पाहते आहे ! 
जीवन शाळेमध्ये शिकणारी मुले (संग्रहित छायाचित्र )
किती सुंदर शाळा आहे पहा ! अशा शाळेत शिकायला मिळणे हे किती भाग्याचे आहे ! फक्त अशा शाळेतून विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण मिळावे इतकी माफक अपेक्षा आहे ! नसलेली दुःखे त्यांच्या डोक्यामध्ये घालून त्यांच्या सुखी जीवनाचा विध्वंस करू नये इतकीच काळजी शाळा चालकांनी घ्यायची आहे . 
या मुलांचे सामर्थ्य अपरंपार आहे ! तुम्ही शिकविले नाही तरी नर्मदा मैया त्यांना खूप काही शिकवतेच आहे ! अशी स्वयंअध्ययनातून घडलेली तेजस्वी एतद्देशीय पिढीच देश तारू शकते . परदेशी विचारांच्या शिळ्या शिक्षणावर पोसलेली आंग्लभाषाबटीक पिढी फार फार तर अन्य देशांचा तथाकथित उद्धार करेल ! 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । 
हा व्यर्थ भार विद्येचा !
तिच्या अर्थात भारतमातेच्या उद्धारासाठी कामाला येणार नसेल तर माझे उच्चशिक्षण , सारे व्यर्थ आहे !
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा द्यावे ।
माझ्या गुणांच्या सुगंधाने माझी मातृभूमी सुगंधित व्हावी यासाठीच हा गुणसमुच्चय आहे !
इनेश हा तरुण मला खूप आवडला . त्याचा परिसराचा देखील चांगला अभ्यास होता . मुख्य म्हणजे तो स्वतःच्या मेंदू ने विचार करणारा मुलगा होता . याने दिलेला काळा चहा अप्रतिम होता . सकाळपासून चालून आलेला थकवा या चहाने पळून गेला . मी निघाल्यावर याने त्याच्या फोनवर माझ्यासोबत फोटो काढला आणि मित्राच्या फोनवर पाठवून दिला .
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी बोलणारा जो पहिला युवक भेटला त्या इनेश खेरसिंग पावरा सोबत प्रस्तुत लेखक धावडी गावामध्ये . उन्हाचा तडाखा आपल्या लक्षात येईल . मागे दिसणाऱ्या डोंगराच्या उंचीवर मला जायचे होते . हा निंबालपाडा होता .
याच गावातील अजून दोन तरुण मला इथे आवर्जून येऊन भेटले . . पुढे मी निघून गेल्यावर त्यांनी इनेश कडून माझ्या मित्राचा क्रमांक घेतला आणि त्याच्यावर दोन फोटो पाठवून दिले ते देखील खाली जोडत आहे .
हा इथल्या आदिवासींचा उत्सवाचा फेटा आहे . रंगीबेरंगी झालर डोक्याला गुंडाळलेले लोक सर्वत्र दिसतात . डावीकडचा पेवसिंग आहे आणि उजवीकडचा निर्मल आहे . दोघेही भाबरीचेच आहेत .या दोघांशी देखील भरपूर गप्पा मारल्या .

भंगुरई सणाची गावामध्ये सुरू असलेली लगबग . सुंदर नक्षीकाम केलेली दिमडी . ही टिमकी सारखी  काडीने वाजवायची इथे पद्धत आहे . निर्मल गावचा हिरो आहे ! इथल्या मुलांच्या केशरचना मजेशीर असतात . साध्या कात्रीने एकमेकांचे केस मुले कापतात .
इथून मी इनेश चा निरोप घेतला आणि पुढे निघालो .डोंगरातून जाताना मला आलेला एक हृदयस्पर्शी अनुभव सांगायचाच राहिला . भादलच्या पुढे रस्त्याचे काम सुरू आहे . जिथे अजिबात रस्ता नाही असा डोंगर फोडत पोकलेन मशीन हळूहळू पुढे सरकत होते . दुरून पाहिल्यावर मला तिथे एक विचित्र प्रकार दिसला म्हणून मी त्या यंत्राजवळ गेलो . दोन छोटी मुले जी मोठमोठ्याने रडत होती दिसेल तो दगड उचलून जेसीबी वर फेकत होती . मी चॉकलेट घेऊन त्यांच्या दिशेने गेलो . परंतु मला पाहून ती अजूनच घाबरली आणि वेगाने दरीमध्ये उतरली . दोघेही पूर्ण उघडे होते . एकाचे वय सहा वर्षे तर एक आठ वर्षाचा असेल .  मला पाहून त्यांनी अजून खोल दरीमध्ये उतरू नये म्हणून मी त्यांच्यापासून लांब गेलो . त्यांनी पुन्हा दरीतूनच जेसीबी वर दगड फेकायला सुरुवात केली . त्यांच्या त्या इवल्याशा दगडाने त्या राक्षसी यंत्राला काहीही फरक पडत नव्हता . परंतु नक्की काय प्रकार झाला आहे हे जाणून घेण्यासाठी मी जेसीबी जवळ गेलो आणि चालकाला यंत्र थांबवण्याची सूचना केली . तो देखील मशीन बंद करून लगेचच बाहेर आला . आणि माझ्याशी चक्क मराठी मध्ये बोलू लागला . हा धुळ्याचा मुलगा होता आणि चालक म्हणून या यंत्रावर इथे आला होता . धडगाव पासून भादलला जोडणारा रस्ता बनविण्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू होते . त्याची कारवाई हा बिचारा करत होता . त्याने मला सांगितले की चार-पाच किलोमीटर ही मुले त्याच्या मागावर आहेत . आणि अखंड दगडांचा वर्षाव करत आहेत . हा मुलगा आदिवासी असल्यामुळे त्याला मुलांची भाषा देखील कळत होती . मी त्याला सांगितले की त्याने पावरी भाषेत बोलून मुलांना जवळ घ्यावे आणि त्यांना काय होते आहे विचारावे . त्याच्याजवळ मुलांना देण्यासाठी खाऊ सुद्धा दिला . त्यांनी खाऊ तर घेतला नाहीच परंतु ते त्याला म्हणू लागले , " आमचा डोंगर तू का खातो आहेस ? आमच्या डोंगराला तू भोक का पाडतो आहेस ? आम्ही तुला उचलून फेकून देऊ ! " पहा !
कशी आहे आदिवासींची निसर्गाप्रती निष्ठा ! आपण ज्या डोंगरावर राहतो , ज्याच्यावर खेळतो बागडतो त्याला कोणी ओरखडे मारतो आहे या कल्पनेनेच त्या मुलांना दुःखावेग आलेला होता . निसर्गावर इतके प्रेम करणाऱ्या या आदिवासींना नर्मदा मातेने भाऊ न मानावे तर काय मानावे ! मला त्या मुलांचे खूप कौतुक वाटले . मी त्या मुलाला काही काळ काम थांबवण्यास सांगितले . आणि त्या मुलांची क्षमा मागण्यास देखील सांगितले . अर्थातच हे सर्व आपल्या मानवी वृत्तीला लक्षात घेता खोटेच होते ! परंतु तरीदेखील ती मुले रडत रडतच परतली . या एका घटनेने मला आदिवासी आणि निसर्ग यांच्यातले अतूट नाते जे कळले ते हजारो पुस्तके वाचून कळले नसते . आपण ज्याला विकास म्हणतो तो खरोखरच विकास आहे का ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे . बाह्य संकल्पनांचे अनुशीलन आणि अनुकरण करताना आपण त्यातला आपला गाभा सोडता कामा नये . अन्यथा ते अंधानुकरण ठरेल . इथे बनविलेल्या रस्त्याने आदिवासी कोठेही जाणार नसून "लँड माफिया "  मात्र आवर्जून आपल्या उंची गाड्यातून येथे येणार आहेत आणि जमिनींचे सौदे करणार आहेत .आपण नक्की कुठल्या दिशेने जातो आहोत याचे आत्मचिंतन काही ठराविक काळाने पुन्हा पुन्हा करणे अत्यंत अत्यावश्यक आहे ते याचसाठी .असो .
डोंगर चढून सपाटीवर आलो . हेच खप्पर माळचे पठार होते . इथून संपूर्ण शूलपाणीचा परिसर अतिशय सुंदर दिसत होता . इथून पुढे अजून एक खूप मोठा आणि उंच कठीण डोंगर चढायचा होता . त्यानंतर उतार चालू होणार होता . परंतु तो चढण्याची शक्तीच अंगात उरलेली नव्हती . प्रचंड भुकेची आग पोटात पडलेली होती . एका झोपडीतून एक म्हातारा बाहेर आला . आणि मला खुणेनेच त्याने जवळ बोलावले . मला आत मध्ये बसण्याची सूचना केली . म्हातार बुवांचे डोळे अतिशय करारी होते . नजर भेदक होती . झुपकेदार मिश्या होत्या . सडसडीत देहयष्टी होती . फक्त एक चट्ट्या पट्ट्याची चड्डी घातलेली होती .  नजर सांगत होती की हा मनुष्य सामान्य नाही . असामान्य आहे . "नर्मदे हर महाराज " मी म्हणालो . " किती मूर्ती आहेत ? " मराठीत आलेल्या प्रश्नामुळे मी खुश झालो . " मी आणि मैया आम्ही दोघेच आहोत "मी उत्तरलो . म्हातारबुवा काही केल्या हसत नव्हते . त्यांचा चेहरा खरोखरच कृद्ध होता ! आयुष्यभराच्या अनुभवाच्या सुरकुत्या त्या करारी चेहऱ्याला समृद्ध करत होत्या . भेदक नजर समोरच्या माणसाची न बोलताच परीक्षा करत होती. फोदला मामांनी स्वतः तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसांची नर्मदा परिक्रमा केलेली होती . त्यामुळे परिक्रमावासींचे जीवन कसे असते याची त्यांना चांगली कल्पना होती . त्यातूनच त्यांनी वाटेने जाणाऱ्या परिक्रमावासींना सेवा देण्यास सुरुवात केली . यांचा आवाज अत्यंत करारी , थोडीशी उद्दाम भासू शकेल अशी भाषा , इथल्या परिसरातील भाषेमध्ये सहजपणे उगवलेल्या शिव्या , परंतु अत्यंत निर्मळ मन असा एकंदरीत प्रकार होता . यांच्या मिशा आणि शरीर यष्टी पाहून राहुन राहुन भिडे गुरुजींची आठवण यायची . अगदी तशीच अंगकाठी आणि ठेवण होती . यांचा मुलगा दिनेश म्हणून होता . नंतर तो मला भेटला . मी घरी गेलो तेव्हा फोदला मामा एकटेच घरी होते . त्यांनी मला एक कडक आणि अतिशय मोठी ज्वारीची भाकरी आणून दिली . त्यावर लाल मिरचीच्या वाटलेल्या तिखटाचा गोळा आणि सुकी रानभाजी दिली . दिवसभर चालून थकलेल्या शरीराला ते अन्न अक्षरशः अमृता समान भासले ! फोदला मामा अतिशय गरिबीत राहत होता . तरीदेखील आपल्या घासातला घास परिक्रमावासीला आवर्जून देत होता . हे करण्यासाठी फार मोठे काळीज लागते . आज तरी मी एकटाच होतो . परंतु एरवी इथे खूप मोठ्या संख्येने परिक्रमा वासी येतात . त्यातील कोणालाही फोदला मामा उपाशी जाऊ देत नाही . अलीकडेच दिनेश शी माझा पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्याने माझ्या विनंतीवरून त्याच्या घरातील सेवेचे काढलेले काही फोटो मला पाठवले . ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
अत्यंत भेदक नजर असलेले फोदलामामा गारद्या पावरा . ग्राम भाबरी / धावडी खप्परमाळ महाराष्ट्र
दिनेश फोदला पावरा . हा मामांचा मुलगा .अतिशय हुशार आहे आणि उत्तम मराठी बोलतो .
बीए पर्यंत शिक्षण झाल्यामुळे परदेशी परिक्रमावासींशी सुद्धा तो तोडका मोडका संवाद साधू शकतो ! होय परदेशातील अनेक लोकांनी आतापर्यंत नर्मदा परिक्रमा केलेली आहे ! जागो भारत जागो ! हा अमेरिकेतील एक परिक्रमा वासी होता .
माझी भाकरी खाऊन झाली . तोपर्यंत दिनेश तिथे आला . माझ्या परिक्रमेची व्यवस्थित चौकशी त्याने केली . त्याच्या मोबाईलवर त्याने आमच्या तिघांचा एक फोटो काढला . घरी आलेल्या परिक्रमावासींचे अधून मधून तो फोटो काढत असायचा . त्याप्रमाणे माझ्याबरोबर देखील  एक आठवण म्हणून त्याने फोटो काढला . 
माझ्याकडे तो फोटो पाठवणे त्याला शक्य नव्हते कारण खप्परमाळा चा उंच पहाड चढल्याशिवाय इथे रेंजच येत नाही . त्यामुळे मी त्या फोटोचा नाद सोडून दिला होता . परंतु परवा अचानक दिनेशने कुठून तरी माझा क्रमांक मिळवला आणि मला फोन केला . तो नोकरी शोधण्यासाठी सध्या पुण्यामध्ये आलेला आहे . त्यानंतर त्याने मला सर्व फोटो ई-मेल केले . आपल्या माहिती करता ते फोटो सोबत जोडत आहे .
 फोदला मामा पावरा , दिनेश आणि प्रस्तुत लेखक
मामांची काटक तब्येत पहा ! 
दिनेशच्या ई-मेल ला मी केलेला रिप्लाय . याच्या पलीकडे या कुटुंबाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही . 
दुर्दैवाने दिनेशने फोनवर एका अतिशय दुःखद बातमी दिली . त्यादिवशी आमचे हे फोटोसेशन चालू असताना दिनेशची आई तिथे आली . मी जी भाकरी खाल्ली होती ती याच माऊलीच्या हातची होती . तिच्या हाताची चव त्या भाकरी मध्ये उतरलेली होती . मी त्यांना पायावर डोके ठेवून नमस्कार केला होता . दिनेशने सांगितलेली बातमी ऐकली आणि माझे मन सुन्न झाले . महिन्याभरापूर्वीच या माऊलीचे खप्परमाळ येथेच रक्ताच्या उलट्या करीत दुःखद निधन झाले . त्यांना टी बी झाला होता . इथे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा पोहोचू शकत नाही . साधी मोबाईलची रेंज यायची असेल तर एक फार मोठा पहाड चढून जावे लागते . तेव्हा कुठे ठराविक टोकावर पोहोचले की एक काडी रेंज येते . अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीवर कुठलाही उपचार फोदला मामा करू शकले नाहीत . ज्या नदीतून मी वर आलो होतो तिथेच खाटेवर बांधून देह नेला जातो आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात . जो  चढ एकट्याने चढताना माझे पाय लटलट कापत होते तो उतार चौघेजण खाटेवरचा जड देह घेऊन कसे उतरत असतील ? फक्त कल्पना करून पहा .म्हणजे तुम्हाला हे आदिवासी कुठल्या पदार्थाचे बनले आहे त्याची कल्पना येईल . 
मला ही बातमी ऐकून आतोनात दुःख झाले . ही माऊली अतिशय खंबीरपणे परिक्रमा वाशींची सेवा करत असे . दिनेशने मला पाठवलेले खालील फोटो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे दोघे मिळून किती सेवा करत होते . 
 फोदला गारद्या पावरा यांचे साधेसुधे घर पहा . घरात कपाट नसून एका बांबूवर कपडे टाकलेले आहेत आणि त्यावर दव पडू नये म्हणून प्लास्टिक अंथरले आहे . समोर ठेवलेली बाज स्वतः घरीच तयार केलेली आहे . घराच्या सारवलेल्या जमिनीवर सुंदर असे नक्षीकाम यांनी स्वतःच केलेले आहे . या घरामध्ये काहीच नाही . फक्त नर्मदा परिक्रमा वासींचे  आतोनात अगत्य आहे . 
मागे ठेवलेल्या जात्यावर पीठ दळून मगच भाकरी देता येते . जेवणारी तोंडे कधी दोन असतात .
तर कधी अनेक असतात . त्यांना अगत्याने वाढताना फोदला मामा .
भोजन प्रसादी वाढून देखरेख करताना फोदला मामा
  फोदला मामांच्या कुटीमध्ये विसावलेले साधू संत
 भर उन्हामध्ये चालून आल्यावर शेणाने सारवलेल्या या कुटीतला थंडावा काही वेगळाच आहे
हीच ती माऊली जिने अक्षरशः हजारो लाखो परिक्रमा वासींवर तिच्या उपकारांची आणि कृपेची सावली धरली होती .तिच्या अवेळी निघून जाण्याने फोदला मामांचा खंबीर आधार हरपला आहे . 
आपणास खरोखरीच या कुटुंबाच्या मार्फत नर्मदा परिक्रमा वासींना काही अन्नदान वगैरे मदत करायची असेल तर मामांच्या जी पे क्रमांकावर संपर्क साधावा . माझ्या वहीमध्ये मी तो लिहून घेतला होता . आपणही नोंदवून ठेवावा . 

यातील पहिला क्रमांक GPay वर आहे असे मला दिनेशने सांगितले . रेंज नसल्याने इथे फोन लागत नाही याची कृपया नोंद घ्यावी . दिनेश चा क्रमांक देखील सोबत देत आहे . त्याची पत्नी व अडीच वर्षाचा मुलगा गावीच राहत आहेत .मी घरी गेलो तेव्हा ते लेकरू सहा महिन्याचे होते !

जी पे क्रमांक :७४४७७२१४९१ (7447721491)
फोदला गारद्या पावरा : ६३५६४८५८७५ 6356485875
निलेश फोदला पावरा : ९४२२९२५२८४
+91 94229 25284
फक्त मदत केल्यावर ती भाबरीमध्ये पोहोचेल याची दक्षता घेण्याची विनंती करावी . किंवा आज-काल नंदुरबार मार्गे या गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे असे कळते . तोरणमाळ मार्गे येथे गाडीने जाता येते . किंवा अजून एका प्रकारे आपण यांना मदत करू शकतो . या भागामध्ये अतिशय सुंदर असा धूप किंवा गुग्गुळ मिळतो . रानावनामध्ये फिरून हा डिंक गोळा करावा लागतो . दिनेश कडे कायम हे गुग्गुळ विक्रीसाठी उपलब्ध असते . आपण ते विकत घेऊन घरी किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या आप्तेष्टांना वाटू शकतो . पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था दिनेश करू शकतो असे मला त्याने त्या दिवशी सांगितले होते . हा लेख लिहीत असतानाच दिनेश पावरा याची पुण्यामध्ये भेट झाली ! कामाच्या शोधासाठी तो पुण्यामध्ये आलेला आहे . त्याने अजून एक भयप्रद बातमी दिली . अतिशय निवडून पारखून त्याने २१००० रुपयाचा एक सुंदर बैल आणला होता जो नुकताच पट्टेरी वाघाने दावणी सह तोडून पळवून नेला . त्यामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे . त्यात आईच्या जाण्यामुळे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे . 
आपल्या घासातला घास अत्यंत विषम परिस्थितीमध्ये परिक्रमावासींना भरविण्याचे मोठे काम हे कुटुंब करत आहे . 
सुदैवाने दिनेशने योग्य वेळी माझ्याशी संपर्क केला त्यामुळे ही सर्व छायाचित्रे आपल्याला दाखवू शकलो . मैयाची लीला अपरंपार आहे . केशरी लुंगी गुंडाळलेले फोदला मामा आणि त्यांच्या शेजारी लाल शाल गुंडाळलेली ती माऊली . समोर दिनेश ची भावंडे . ही एकूण आठ भावंडे आहेत .
 फोदला मामा उत्तम धनुर्धर आहे . त्याचे बाण बघताना परिक्रमावासी . 
विदेशी परिक्रमावासी सोबत फोदला मामा आणि दिनेश चा मोठा भाऊ
हे घर पूर्णपणे सार्वजनिक झालेले आहे . इथे यांचे स्वतःचे काहीही नाही . सर्व काही परिक्रमा वासींसाठीच आहे . 
आलेल्या सर्व परिक्रमावासींची अगत्यपूर्वक सेवा हे कुटुंब करते .
झोपडीच्या अंगणामध्ये उतरलेले परिक्रमावासी . एका बाजूला सुरू असलेले बाज विणण्याचे काम .
सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणारे परिक्रमावासी . गमतीचा भाग असा आहे की इथून पुढचा टप्पा हा नर्मदा परिक्रमेतील सर्वात कठीण टप्पा आहे . व तो पार केल्या केल्या महाराष्ट्राकडे जाणारी डांबरी सडक लागते . इथून बरेचसे परिक्रमा वासी आपापल्या घरी निघून जातात . परंतु फोदला मामाला मात्र अशा सर्वांची देखील सेवा करावीच लागते !
 फोदला मामाची गुरे 
 मामांच्या कुटीमध्ये रात्री भोजन प्रसाद घेणारे परिक्रमावासी . 

 फोदला मामाच्या कुटीमध्ये विसावलेले परिक्रमा वासी . स्वतः मात्र त्यांच्या सेवेमध्ये तत्परपणे उभा असलेला मामा . स्वतःची सुंदर अशी परिक्रमा झालेली असल्यामुळे खरे तर हे सर्व करण्याची त्यांना काहीही गरज नाही . परंतु हा महात्मा हे पुण्याचे काम करत आहे हे आपले सौभाग्य आहे !
 फोदला मामांच्या घरातून होणारे नर्मदा मैय्याचे दर्शन
 फोदला मामांच्या दारात आदिवासी मुलांचे भोजन .
मुलांच्या मागे उतरत्या छपराची कुटी दिसते आहे ती पाहून ठेवा . इथेच मी माझे सामान ठेवले होते .
 निघताना दिनेशने या कुटीमध्ये माझा फोटो काढला . अचानक मागून फोदला मामा खिडकीमध्ये प्रकट झाला . त्याची भेदक नजर पाहून तुमच्या लक्षात येईल की पूर्वी हेच भिल्ल लोक धनुष्यबाण घेऊन अशा भेदक नजरेने समोर आल्यावर परिक्रमावासींची भितीने  काय गाळण उडत असेल !
कडकडीत दुपार झालेली होती . इतक्या गरीब गृहस्थीला आपल्या मुक्कामाचा त्रास द्यायला नको असा विचार करून मी सामान उचलले आणि पुढे निघालो . फोदला मामाने मला डोंगरावर चढण्याचा रस्ता कसा आहे व त्यात काय काय धोके आहेत हे नीट समजावून सांगितले . दिनेशने जाता जाता त्याचे छोटेसे दुकान मला दाखवले . गुग्गुळ देखील पाहिला . त्याच्या सहा महिन्याच्या बाळासाठी खाऊ आणि यथाशक्ती काही मैय्याचा प्रसाद ठेवून डोंगर उरावर घेतला . हा पहाड मला वाटला त्याच्यापेक्षा अधिक भयंकर निघाला ! म्हणतात ना दुरून डोंगर साजरे ! आज मैय्याने माझ्यासाठी काय परीक्षा मांडून ठेवली आहे याची मला कल्पनाच नव्हती . ती रात्र लक्षात राहिली . . .




लेखांक त्र्याऐंशी समाप्त (क्रमशः )

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...