
काश्मीर सफरनामा - पूर्वतयारी
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच हे प्रवासवर्णन मायबोलीवर टाकायचे होते पण पहिला भाग लिहिला त्याच दिवशी संध्याकाळी पहलगाम हल्ल्याची बातमी आली. अगदी एक आठवडा आधी आपण त्याच गावात होतो ह्या विचाराने अजूनही मनात धडकी भरते. हल्ल्यात बळी पडलेले तीनजण तर आपल्या डोंबिवलीतलेच होते हा आम्हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता.
माझ्यासाठी फिरायला जायच्या ठिकाणांच्या यादीत काश्मीर तसं कधी वरच्या स्थानावर नव्हतं. कधीतरी जाऊन येऊ असं वाटायचं. ईशान्य भारत आणि पश्चिम घाट जिथे फुलपाखरं आणि चतुर जास्त आढळतात तिथे आधी फिरून यायचं असं मी आणि प्रसादने ठरवलं होतं. तरी २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात साऊथ एशिया ड्रॅगनफ्लाय मीट श्रीनगर मध्ये करायचं ठरवलं गेलं. आम्ही नऊ दिवस चतुर फोटोग्राफी आणि साईटसीईंग करायचं असं ठरवून मुंबई- श्रीनगर तिकिटं काढली. प्रवासाच्या काही दिवसांपूर्वीच कलम ३७० हटवण्यात आले आणि सुरक्षेच्या दृष्टीने आमचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर पुढच्या कुठल्याही सहलींसाठी आम्ही काश्मीरचा पर्याय विचारात घेतलाच नव्हता.
फेब्रुवारी २०२४ ला माझ्या मुलीचा शांभवीचा जन्म झाला आणि काही महिन्यांसाठी का होईना माझ्या भटकण्यावर निर्बंध आले. अगदी जवळ जरी कुठे जायचे झाले तरी तिच्या खाण्याच्या, झोपेच्या वेळा सांभाळून सर्व करावं लागायचं. या वर्षी प्रसादची ऑल इंडिया कम्युनिटी मेडिकल कॉन्फरन्स २०२५ श्रीनगरला होणार असं जाहीर झालं. या निमित्ताने का होईना जरा फिरून येऊया असं आम्ही ठरवलं. प्रसादची आई एरवी प्रवासाला जायला नको नको असं म्हणणाऱ्या. त्या आणि सासरेबुवा दोघेही SBI मध्ये कामाला होते. कामानिमित्त होणारा प्रवास सोडला तर ते दोघेही खास पर्यटनासाठी असे कधीही बाहेर गेले नव्हते. पण गेल्या वर्षी सासूबाई रिटायर झाल्यावर अचानक मैत्रिणीसोबत दुबई फिरून आल्या. त्या प्रवासामुळे आलेल्या आत्मविश्वासामुळेच की काय त्यांनी काश्मीरसाठी लगेच हो म्हटलं. मावशीलासुद्धा घेऊन जाऊया असं म्हणाल्या. तर अशा प्रकारे प्रसाद, मी, प्रसादची आई, मावशी आणि शांभवी असे पाचजण काश्मीरला जायला तयार झालो.
फिरायला जाताना आम्ही गर्दीची ठिकाणे टाळतो. यावेळी तर छोटी शांभवी सोबत
होती. कॉन्फरन्स नेमकी एप्रिलच्या महिन्याच्या मध्यात होती. हा कालावधी
म्हणजे ट्युलिप फेस्टिव्हल आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा त्यामुळे
काश्मीरमध्ये सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत असते. कुठल्याही ट्रॅव्हल
कंपनीसोबत जायचं नाही असं आधीच ठरवलं होतं. सर्वात आधी दोन ज्येष्ठ नागरिक
आणि सव्वा वर्षाचं पिल्लू सांभाळून काय काय पाहता येईल याची माहिती गोळा
केली. यापूर्वीच्या आमच्या बऱ्याचशा ट्रिप्स या फुलपाखरं आणि चतुर
फोटोग्राफीसाठी असत. यावेळी काश्मीरचे एंडेमिक ड्रॅगनफ्लाय आणि टाचण्या
पाहता येणार नाही म्हणून प्रसादचा जीव अगदी हळहळत होता. एक दिवस मी
ताहिरसोबत फिरायला जातो. (ताहीर म्हणजे काश्मीरचा स्टेट एंटॉमॉलॉजिस्ट आहे
आणि चतुरांवर संशोधन करतो. २०१९ ची ड्रॅगनफ्लाय मीट त्याच्या पुढाकारानेच
होणार होती. ) त्या दिवशी तुम्ही चौघेजण काय ते मुघल गार्डन्स बघून घ्या
असा सल्ला त्याने दिला. मला ते फारसं पटलं नाही. पर्यटकांवर हल्ले होत नसले
तरी उगाच आडवळणाच्या जागी एकटे का जा. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण
धुसफूस चालूच होती. शेवटी आर्मी मधून रिटायर झालेल्या आमच्या एका
परिचितांना कॉल केला. ते म्हणाले तसा पर्यटकांना तिथे धोका नसला तरी उगाच
फार माहीत नसलेल्या जागी जाऊन का स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्या.
ड्रॅगनफ्लाय मीटची गोष्ट वेगळी होती. त्यांनी सांगितल्यावर अगदी नाईलाज
झाल्यासारखं का होईना पण प्रसादने तो प्लॅन रद्द केला. पण तो वैतागला आणि
म्हणाला. "असं असेल तर तिथे कुठेही हल्ला होऊ शकेल अगदी पर्यटकांची खूप
गर्दी असेल अशा जागीही होऊ शकेल.”
तो जे बोलला ते अगदी खरं होईल असं त्यावेळेला वाटलं नव्हतं.
सहलीसाठी तयारी सुरु केली. या बाबतीत मी नव्या ट्रेन्डला धरून चालत नाही. म्हणजे रील्स पाहून काय काय बघायचं असं ठरवत नाही. तर सर्वात आधी मायबोली आणि मिसळपाववरची प्रवासवर्णने वाचते. जवळपास सर्वानीच काश्मीर सहलीसाठी प्रवासी कंपन्यांचा आधार घेतला होता. मला ट्रिप स्वतः आखायची होती. इथल्या वाचनालयात मला काश्मीर पर्यटनावर (लेखकाचे नाव आता आठवत नाही) एक सुंदर पुस्तक मिळाले. त्यांनी काश्मीरच्या काही जुन्या मंदिरांबद्दल आणि काही वेगळ्या ठिकाणांबद्दल जी माहिती दिली होती ती इथे आंतरजालावरसुद्धा सापडत नव्हती.
आमच्या कंपनीतले CSR प्रमुख नेवे सर जेव्हा काश्मीर फिरायला गेले होते तेव्हा त्यांच्या तिथल्या गाडीवाल्याबद्दल खूप चांगलं बोलत असत. ते लक्षात होते म्हणून त्यांच्याकडून यासिनचा नंबर घेतला. यासिनचं श्रीनगरमध्ये स्पोर्ट शूजचं दुकान आहे. त्या व्यतिरिक्त तो पर्यटकांसाठी गाडीची सोयसुद्धा करतो. त्याला कॉल करून नऊ दिवसांसाठी गाडी बुक केली. बाकी हवामान आणि राहायची सोय या बाबतीत त्याचा सल्ला विचारला. त्याने सांगितलं कि शक्यतो दाल लेक जवळ राहू नका. त्या महिन्यात फार गर्दी असणार आहे. तुम्ही बाहेर फिरायला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकाल. राहण्यासाठी राजबाग एरिया अगदी योग्य आहे. त्या भागातील हॉटेल्स जेव्हा शोधायला लागले तेव्हा कळलं की माझ्या बजेटमध्ये असणारी साऱ्या हॉटेल्सची बुकिंग्स आधीच फुल होती. एखाद्या चांगल्या होम स्टे मध्ये राहू असा विचार केला आणि यासिनला विचारलं तर त्याचं होमस्टेबद्दल मत फारसं अनुकूल नव्हतं. “मॅडम होमस्टे क्यू बुक कर रहे हो. वहा पे ना ठिकसे रास्ता होगा ना आपको अच्छी सर्विस मिलेगी. ये लोग बस एक कमरा उपर चढाके होमस्टे बना देते हैं. वहा पे गाडी अंदर तक नही जायेगी और फिर आपको वहा तक सामान कॅरी करना पडेगा”. पण शेवटी कुठलाच पर्याय दिसेना तेव्हा गुगल रिव्ह्यूच्या भरवश्यावर इक्राम इन होमस्टे बुक केला. हा आमचा निर्णय अजिबात चुकला नाही. त्याचे रिव्ह्यू खरं तर खूपच चांगले होते. मालकाने गाडी अगदी आतपर्यंत आणता येईल याची खात्री दिली. बाकी हाउसबोट आणि पहलगाम हॉटेल बुकिंग्स लगेच झाल्या. विमानाचे तिकीट मात्र अव्वाच्या सव्वा होते. सध्या कामानिमित्त आम्ही सिंधुदुर्गमध्ये स्थायिक झालो असल्याने गोव्यावरून प्रवास करायचा ठरवले आणि गोवा-दिल्ली - श्रीनगर अशी जातानाची आणि येताना श्रीनगर- चंदीगड- गोवा अशी तिकिटे बुक करून टाकली. एप्रिल महिना असल्याने रात्र वगळता बाकीच्या वेळी थंडी वाजणार नाही असं यासिन म्हणाला होता. त्यामुळे प्रत्येकी दोन जोड थर्मल आणि एक साधा स्वेटर अशी सर्वासाठी खरेदी आणि छोटीसाठी काही थंडीचे कपडे घेतले. तिची खाण्याची काही आबाळ होऊ नये म्हणून ती खाऊ शकेल असा भरपूर खाऊ सासूबाईंनी बांधून घेतला.
प्रवासवर्णन आणि बाकी कंपन्यांच्या जाहिराती पाहिल्या असता सहली या गुलमर्ग, सोनमर्ग, श्रीनगर आणि पहलगाम अशा चार ठिकाणीच फिरत होत्या. मित्रपरिवारातले जे आधी जाऊन आले होते त्यांना कॉल केला. मयूर वगळता सर्वजण ट्रॅव्हल कंपनीसोबत जाऊन आले होते. सोनमर्ग काही खास नाही असा सल्ला बऱ्याच लोकांकडून मिळाला म्हणून ते कॅन्सल केलं. त्याऐवजी युसमर्ग करायचं असं ठरवलं. गुलमर्गला गोंडोला राईड करायची असं ठरवलं. तुम्हाला ज्या दिवशी गोंडोला राईड करायची आहे त्याच्या बरोबर एक महिना आधी त्याची बुकिंग करता येते म्हणून अगदी एक महिना आधी ती साईट उघडली तर एक आठवड्यापूर्वी त्यांनी असं ठरवलं होतं कि पर्यटकांच्या इच्छेला मान देऊन ते बुकिंग विंडो दोन महिना आधी उघडत आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा तिथे असणार होतो त्या दिवसाची बुकिंग फुल झाली होती. गुलमर्ग कॅन्सल. सोनमर्ग नाय आणि गुलमर्ग नाय मगे तुमी थंय जाऊन बगलात तरी काय असा प्रश्न नवऱ्याच्या मामीने आम्ही काश्मीरला जाऊन आल्याच्या दुसऱ्या दिवशी विचारला होता. पण जाण्याच्या आधी आठवडाभर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर गुलमर्ग गोंडोला राईडचे, तिथल्या तुफान गर्दीचे, धक्काबुक्कीचे विडिओ आदळायला लागले त्यामुळे ती राईड मिळाली नाही हे बरंच झालं. एवढ्या गर्दीत शांभवीला घेऊन तीन तास माझ्याने उभं राहवलं नसतं.
काही ठिकाणी जाताना घोडा करावा लागतो असं ऐकलं होतं. मला ते टाळायचं होतं. कारण आमच्यात एकच व्यक्ती घोड्यावर बसू शकत होता तो म्हणजे माझा नवरा. सासूबाई आणि त्यांची बहीण दोघेही ज्येष्ठ नागरिक. माझा प्रॉब्लेम वेगळाच म्हणजे अगदी जगावेगळाच होता. माझं जे मूळ गाव आहे त्या गावातले लोक घोड्यावर बसू शकत नाहीत. असा काहीतरी नियम आहे. म्हणजे घोड्यावर बसले कि घोडा पुढे जात नाही, थांबून राहतो किंवा मग अगदी उधळतो असं म्हणतात. माझ्या आईने हे मला इतक्यांदा ऐकवलं आहे की मला उगाच हा नियम चुकीचा आहे वगैरे वगैरे सिद्ध करायला जायचं नव्हतं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणून का होईना घोडा थांबला तर ठीक पण चुकून उधळला तर हातपाय मोडून घ्यायचे नव्हते आणि त्यापेक्षा वाईट म्हणजे नंतर आईची बोलणी ऐकायची नव्हती. त्यामुळे फक्त एकच ठिकाण जिथे जाण्यासाठी घोड्याशिवाय पर्याय नव्हता ते म्हणजे बैसरन व्हॅली हे सुद्धा आम्ही आमच्या यादीतून काढून टाकले.
भाग दुसरा : https://www.maayboli.com/node/87043
(क्रमश:)
आम्ही २०२३ च्या मे महिन्यात काश्मीर सहल केली होती. तिथून आल्यावर काश्मीर सहलीचे प्रवासवर्णन लिहायला सुरुवात पण मी केलेली.. मात्र माझा आळस नडला आणि प्रवासवर्णन लिहायचे अर्ध्यातच सोडले.
तुमचे लेख वाचायला आवडतील.
पूर्ण काश्मिरमध्ये सर्वांत जास्त मला आवडलेलं ठिकाण असेल तर पहलगाम .. शांत आणि अतिशय निसर्गरम्य स्थळ. रस्त्याला जाताना कुठेही उभे राहून फोटो काढा.. प्रत्येक जागा चित्रमय, आकर्षक आहे. निदान मला तरी तसं वाटलं. रस्त्याच्या बाजूने वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या लहान- सहान नद्या आणि त्यावर फुललेले काश्मिरी लाल गुलाब..! धरतीवरचा स्वर्ग उगाच म्हणत नाहीत काश्मिरला .. हे कळून चुकतं.
नवऱ्याने काश्मीर सहलीचे बुकींग केले तेव्हा मनात भिती होती .. मी म्हटलं देखील तसं .. माझी पहिलीच असली तरी त्याची काश्मिरला जाण्याची ही तिसरी वेळ होती.. त्याने म्हटलं.. पर्यटकांना नाही अतिरेकी लक्ष्य करत आणि सुरक्षाही भक्कम असते, त्यामुळे आम्ही अगदी आपल्या शहरात फिरतो तसे बिनधास्त फिरत होतो तेव्हा काश्मिरमध्ये.. मनात कसलीही भीती किंवा शंका नव्हती.. मात्र या वर्षी अतिरेक्यांनी जेव्हा पहलगामला पर्यटकांवर हल्ला केल्याचं वाचलं तेव्हा खूप सुन्न वाटलं. हादरायला झालं.
आम्ही काश्मीरला गेलेलो तेव्हा ' वसुधैव कुटुंबकम् ' ही संकल्पना असलेले G-20 शिखर संमलेन नुकतेच काश्मिरमधे संपन्न झालेले.. श्रीनगर विमानतळ छान सजवलेले होते... परिषदेचे झेंडे लावलेले होते .. उत्साही वातावरण होते अगदी सगळीकडे.. काश्मिरला येण्याआधी मनात जी भीती होती ती गायब झालेली ..
आम्ही पहलगाम, श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि दुधपथरी अशी पाच ठिकाणं केली होती. दुधपथरी हे मला आवडलेलं दुसरं पर्यटनस्थळ .. अतिशय शांत वाटलं मला त्याजागी.. आम्ही पायीच फिरलो होतो तिथे.. जवळचं एका व्हॅलीत ' राझी' चित्रपटाचं शुटींग झालेलं.. असं ड्रायव्हर म्हणालेला..
पहलगामला बैसरन व्हॅली कॅन्सल केली होती कारण तिथे संपूर्ण दिवस जाणार होता .. जाण्या - येण्यात वेळही खूप लागणार होता.. आणि घोड्या वाल्यांचे रेटही खूप जास्त वाटले.. त्या बदल्यात मग बेताब व्हॅली आणि चंदनवारी या ठिकाणी भेट दिली. अरु व्हॅलीत जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती असं सांगत होते सगळे ड्रायव्हर पण त्यांचं म्हणणं मला पटले नव्हते.. कमी वेळात जास्त पैसे कमवायचे म्हणून पर्यटकांना मूर्ख बनवायचं काम असावं ते..!
सोनमर्ग मला गुलमर्गपेक्षाही आवडलं.
सोनमर्गला घोड्यावरून प्रवास केला होता.. घोडा डोंगराच्या कडे-कडेने चालायचा .. फार भीती वाटायची .. घोड्याचा पाय सरकला तर..?
' मन चिंती ते वैरी न चिंती..'शेवटी म्हटलं , मी पायीच चालते आपली.. तेच सोयीस्कर पडेल.
गुलमर्गला शंकराचं लाकडी मंदिर होतं. तिथे दर्शन घेऊन छान फोटो काढले होते. मंदिराजवळ ओल्या खोबऱ्याचे तुकडे विकणारे विक्रेते खोबरं घ्या म्हणून मागे लागत होते.. मनात म्हटलं हे नारळ आमच्या इथूनच आले असतील.
गेल्यावर्षी ते शंकराचे मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असं वाचून वाईट वाटलं. तिथेच राजेश खन्ना आणि मुमताजच्या ' जय जय शिवशंकर ... ' ह्या 'आपकी कसम ' ह्या चित्रपटातल्या गाण्याचे शुटिंग झाले होते असं वाचले होते.
गुलमर्गला गंडोलाचे तिकीट मिळाले होते, एक महिना आधी बुक केले होते म्हणून.. गर्दी असते तिथे मात्र तीन तास वगैरे एव्हढे नाही लागले .. गंडोलात बसण्याचा अनुभव छान होता. गंडोला मध्येच तांत्रिक कारणाने थांबला तेव्हा जराशी भीती वाटलेली..!
आम्ही स्वतःच काश्मिरमधल्या पर्यटन कंपनीकडे बुकिंग केले होते सहलीचे..
स्मरणात राहेल अशीच आमची काश्मीर सहल झालेली..!
भाग पहिला : https://www.maayboli.com/node/87035
आम्ही ८ एप्रिलला श्रीनगरला रात्री पोहोचणार होतो आणि १६ एप्रिलला परत येणार होतो. ११ ते १३ एप्रिल रोजी शेर-ए-काश्मीर कव्हेंशन सेंटरमध्ये प्रसादची कॉन्फरन्स होती. सासूबाई आणि मावशीचं असं म्हणणं होतं की आम्हाला झेपेल तेवढं आम्ही फिरू, एखाद्या ठिकाणी जमणार नाही असं वाटलं तर छोटीला आमच्याकडे द्या, आम्ही गाडीत बसू. तुम्ही दोघे निवांत हवं तेवढं फिरून या. दोघांनाही गुडघेदुखीचा त्रास होता. प्रसादच्या आईची गुडघेदुखी निघायच्या काही दिवस आधी बळावली. त्यांनी नियमितपणे फिजिओथेरपी चालू ठेवून प्रवासाच्या आधी ती पूर्ण बरी केली.
८ एप्रिलला प्रसादच्या मावसभावाने, कौस्तुभने आम्हाला गोवा (दाभोळी) विमानतळावर सोडलं. तिथून दुपारी दीड वाजता दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात बसलो. सासूबाई आणि मावशी यापूर्वी एक दोन वेळा विमानात बसल्या होत्या. शांभवीचा हा पहिला विमान प्रवास होता. ती कधी शहाण्या बाळासारख वागेल किंवा कधी वैतागेल असं काहीच सांगता येत नव्हतं. विमानात दोन वर्षापर्यंतच्या बाळाच्या आईवडिलांना हवाईसुंदरींकडून विशेष सूचना दिल्या जातात, बाळाला कानात दडे बसलं की काय करायचं किंवा डायपर कुठे बदलायचा. त्या सूचना हवाई सुंदरीने दिल्या आणि विमानाने उड्डाण सुरु करण्याआधीच शांभवी झोपून गेली ती विमान दिल्लीला उतरल्यावरच उठली.
दिल्लीला उतरल्यावर सासूबाई अगदी खूषच झाल्या. आम्ही तिथे थांबणार जरी नसलो तरी अगदी हसून मनापासून म्हणाल्या की तुमच्यामुळे दिल्लीला पाय लागले हो! तिथला ले ओव्हर अगदी थोडा होता. पोटात फार काही गेलं नव्हतं त्यामुळे विमानतळावर डोसा वगैरे खाऊन घेतलं. मग श्रीनगरला जाणाऱ्या विमानात बसलो. यावेळी शांभवी जागी होती. तिला विमानाची सुरक्षा पत्रकं, सीटच्या मागे लिहिलेल्या सूचना वगैरे दाखवून तासभर गुंतवून ठेवलं. बाजूच्याच रांगेत एक बंगाली कुटुंब बसलं होतं, त्यांची तीन-चार वर्षांची मुलगी सोबत होती. तिला बघत बघत शांभवीचा बाकीचा वेळ मजेत गेला. तिला असे लहान ताई आणि दादा लोक फार आवडतात.

आता दोन सूर्यास्ताची गंमत. दिल्लीला विमानतळावर आम्ही पहिला सूर्यास्त
पाहिला आणि विमान दिल्लीवरून श्रीनगरला जात असताना अर्ध्या तासाने
विमानातून पुन्हा सूर्यास्त पाहिला. विमान आकाशात उडाल्यावर मावळलेला सूर्य
आम्हाला पुन्हा क्षितीजावर दिसला आणि दुसऱ्यांदा सूर्यास्त अनुभवता आला.
श्रीनगरला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता, त्यामुळे विमान उतरताना
दिसणारे हिमाच्छादित डोंगर वगैरे पाहायला मिळणार नव्हते. दिल्लीतल्या ले
ओव्हरमध्येच यासिनला फोन करून कळवले असल्याने तो आम्हाला विमानतळावर
घ्यायला येणार होता. त्याला विमानतळावर कॉल कसा करावा हा एक प्रश्नच होता.
कारण काश्मीरमध्ये दुसऱ्या राज्यातले सिम चालत नाहीत. तुम्हाला पोस्टपेड
किंवा लोकल नंबरचे प्रीपेड सिम घ्यावे लागते. यासिन एक्झिटच्या जवळच उभा
असेल याची खात्री होती. सिम मिळेपर्यंत त्याला कॉल करता येणं शक्य नव्हतं.
एक्झिट गेटजवळच आम्हाला सिम विकणारे एक छोटे शॉप दिसले. बरेच पर्यटक तिथून
सिमकार्ड विकत घेत होते. मी आणि प्रसादने बाराशे रुपये देऊन दोन लोकल
सिमकार्ड घेतली आणि लगेच यासिनला फोन लावला. तो अगदी गेट जवळच उभा होता. भर
पावसातून आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो आणि त्याक्षणीच कुठून तरी प्रकट
झाल्यासारखे तीन-चार लोक आमचे सामान घेण्यासाठी धावत आले. विचार करायला
सुद्धा वेळ मिळाला नाही. यासिनला गाडी थोडी दूर लावावी लागली होती. त्या
सर्वानी सामान गाडीत लावून दिल्यावर त्यांनी त्यांची वर्ल्ड फेमस ख़ुशी
घेतली. पाचशे रुपये!!
गाडीत बसण्यापूर्वी बाजूला पाहिलं तर एका कुंडीत चॉकलेटी आणि पांढऱ्या
मिक्स रंगाचे ट्युलिप्स लावले होते. येह्ह्ह्हह्ह!! मी पाहिलेले पहिले
ट्युलिप्स!!!!!!
यासिनने हसून सर्वांचं स्वागत केलं आणि ओळख करून घेतली. माणूस दिसायला आणि बोलायला अगदी सौम्य वाटला. बोलता बोलता त्याने आमच्याबद्दल चौकशी केली. प्रसाद डॉक्टर आहे म्हटल्यानंतर त्याच्याशीच जास्त गप्पा सुरु झाल्या. अर्ध्या तासात राजबाग मध्ये आमच्या होमस्टे च्या ठिकाणी पोहोचलो. मालक म्हणाला होता त्याप्रमाणे गाडी अगदी आतमध्ये नेण्याची सोय होती. आमच्या रूम्स वरच्या मजल्यावर होते. पाऊस पडत असल्याने यासिनने मला शांभवीला वर घेऊन जायला मदत केली. आम्ही रूममध्ये सामान लावून ठेवले. अगदी व्यवस्थित आणि आटोपशीर रूम्स होत्या. स्वच्छता तर वाखाणण्यासारखी होती. खाली डायनिंग रूममध्ये काही लोक आधीच जेवत होते, त्यामुळे पुरेशी जागा नव्हती. म्हणून सासूबाईंना आणि मावशीला आधी खाली जेवायला पाठवले. होमस्टेच्या मालकाने सांगून ठेवलं होतं की जेवण इथे करणार असाल तर आधी कळवा. त्यामुळे सकाळी घरून निघतानाच त्याला रात्री जेवण तयार ठेवायला सांगितले होते. सासूबाई आणि मावशी जेवून आल्यावर म्हणाल्या, बडबडे आहेत हो हे लोक.
नंतर आम्ही तिघे जेवायला खाली आलो. अगदी घरगुती जेवण होतं. सासुबाईंनी इशारा दिल्याप्रमाणे सर्वजण अगदी बोलके निघाले. मालक इलहाम निळ्या डोळ्यांचा मुस्लिम धर्मगुरूंसारखी दाढी राखलेला होता. पस्तीशीच्या आसपास वय असेल. लग्न झालेलं होतं पण त्याची बायको क्वचितच बाहेर दिसायची. त्याची आई होमस्टे मधील जेवणाचं पाहत असे. तिला मराठी व्यवस्थित समजत होतं आणि काही प्रमाणात बोलताही येत होतं. कारण ऐंशीच्या दशकात एक गुप्ते नावाचे आर्किटेक्ट कुटुंबासोबत त्यांच्या घरी भाड्याने राहत होते. त्यांच्याशी ह्या कुटुंबियांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. इलहामचा बाबा सरकारी नोकरीतून इलेकट्रीकल इंजिनीअर म्हणून निवृत्त झाला होता. आम्ही जेवण होईपर्यंत त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या. नंतर रूम गरम ठेवण्याची सोय त्यांच्याकडून समजून घेतली आणि झोपायला रूमवर परत आलो. पाऊस अजूनही पडतच होता. दुसऱ्या दिवशी चरार-ए-शरीफ आणि युसमर्ग पाहायला जायचे होते.

आमच्या श्रीनगर मुक्कामाचे ठिकाण - इक्राम इन

इक्राम इनच्या समोरची बाग

इक्राम इनची परसबाग
(क्रमश:)
काश्मीर सफरनामा: युसमर्ग आणि चरार-ए-शरीफ
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
दुसऱ्या दिवशी लवकर जरी उठलो असलो तरी शांभवीचं सगळं आवरून तयार व्हायला
थोडा अधिक वेळ लागला. सासूबाई आणि मावशी सगळं आटपून वेळेत तयार झाल्या
होत्या. आता पाऊस थांबला होता पण वातावरण ढगाळ होतं. हवामान खात्याच्या
अंदाजानुसार काश्मीरमध्ये आठ ते दहा एप्रिल पाऊस असणार होता. आज आम्हाला
चरार-ए-शरीफ आणि युसमर्गला जायचं होतं. दोन्ही ठिकाणं बडगाम जिल्ह्यात
आहेत. इलहामला रात्री नाश्त्याबद्दल विचारलं होतं. त्याच्याकडे नऊ वाजता
नाश्ता मिळणार होता पण आम्ही तेव्हाच फिरायला बाहेर पडणार होतो म्हणून
त्याला साधा ब्रेड बटर द्यायला सांगितला. होमस्टेमध्ये एक झेक स्त्री
तिच्या पंजाबी नवऱ्यासोबत काश्मीर पाहायला आली होती. त्यांचाही आज युसमर्ग
पाहायचा प्लॅन होता. यासिन वेळेत न्यायला आला. आज त्याचीही तब्येत ठीक
नव्हती. त्याचा ड्रायव्हरशी अजून संपर्क होऊ शकला नव्हता म्हणून आज तोच
आम्हाला फिरवणार होता.
युसमर्गच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला. वाटेत यासिन आम्हाला बऱ्याच ठिकाणांची माहिती सांगत होता. त्याने आम्हाला काश्मिरी धाटणीची जुनी घरे दाखवली. त्यांचा फोटो आम्हाला घेता आला नाही. मुख्य शहरातले फोटो आम्हाला फारसे काढता आले नाही.
चरार-ए-शरीफ दर्गा आम्हाला वाटेतच लागणार होता पण आम्ही युसमर्गहून परत येताना तिथे भेट देणार होतो. ब्रेड बटरने आमचं काही फारसं भागलं नसल्याने आम्हाला पुन्हा भूक लागली होती. आम्ही दर्ग्याच्या समोर गाडी थांबवाली आणि तिथे असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो. तिथे एक भल्या मोठ्या पुरीसारखा पदार्थ तळत होते. तो प्रसादने मुद्दाम मागून घेतला. खायला बरा लागला. चहा आणि छोलेपुरी मागवली. शांभवीला लाडू आणि कुरमुरे खायला दिले पण तिला आमच्यासमोर असणारे वेगळे पदार्थ खायचे होते. आजूबाजूला काही दुकानं होती, त्यांच्या दर्शनी भागात हिरव्या रंगाचा तळ असणारी भांडी एकावर एक रचून ठेवली होती. यासिनला विचारलं तर तो म्हणाला, ही मांसविक्रीची दुकानं आहेत.
खाऊन झाल्यावर पुन्हा युसमर्गच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या आजूबाजूला सफरचंद, पेअर आणि बदामाच्या बागा होत्या. पानही दिसू नये एवढी झाडं फुलांनी बहरली होती. यासिन सहज त्या झाडांमधील फरक समजावून सांगत होता. वाटेत गुराखी मेंढ्याचे कळप घेऊन जाताना दिसत होते. एक वाईट गोष्ट म्हणजे एवढ्या सुंदर स्वर्गासारख्या जागेला कचऱ्याचे गालबोट लागले होते. आम्हाला वाटलं, वाढत्या पर्यटनामुळे कचरा झालाय. यासिन म्हणाला की गावातल्या लोकांनीच हा कचरा केलाय.
युसमर्ग हे श्रीनगरच्या पश्चिमेला आणि गुलमर्गच्या दक्षिणेला पीरपांजाल पर्वतरांगांतील हे एक गवताळ पठार आहे. चहुबाजूने पाईन आणि फरच्या झाडांनी वेढलेले हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने आतापर्यंत फारसे माहीत नव्हते. दूधगंगा नदी इथूनच उगम पावते. असं म्हणतात की येशू ख्रिस्त या इथे येऊन गेला होता म्हणून या जागेला युसमर्ग म्हणतात. अर्थात याचा संदर्भ कुठेही आढळत नाही. श्रीनगरपेक्षा इथले लोक फेरन हा त्यांचा पारंपरिक पोशाख घातलेले जास्त प्रमाणात दिसत होते. इथल्या थंडीत वापरायला हा पोशाख अगदी सोयीचा. हातही आतमध्ये घेता येतात. यावर यासिनने एक गंमत सांगितली. पूर्वी एका पर्यटकाला त्याच्या ट्रीपच्या पहिल्याच दिवशी युसमर्गला घेऊन आला होता. इथे आल्यावर त्याने फेरन घातलेल्या लोकांना पाहिलं आणि यासिनला विचारलं," यहापे लोगोंके हात क्यो नही हैं"?
मुसळधार पावसात दिसणारे युसमर्ग
पाईनचे जंगल
लांबवर पसरलेली गवताळ कुरणे, उजवीकडे युसमर्गचा जलाशय
सुंदर पण बंद असलेले 'जेकेटीडीसी'चे रिसॉर्ट
प्रवेशद्वारावर मोजून आठ गाड्या होत्या. यासिन सांगत होता सोनमर्ग गुलमर्गला हजार गाड्या सीजनला सहज असतात. आम्ही गाडीतून उतरल्यावर घोडेवाले मागेच लागले. सांगून समजावूनही ऐकेनात. ते लोक पिच्छा सोडतच नाहीत. त्यात एका आजोबांच्या वयाच्या घोडेवाल्याला बघून मला खरंच वाईट वाटलं. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी इथे 'नीलनाग सरोवर' हे उत्तम ठिकाण आहे . मला तो ट्रेक करायची इच्छा होती पण सध्या जमण्यासारखं नव्हतं. पुढे कधी जमेल की नाही माहीत नाही. एप्रिलच्या हल्ल्यानंतर युसमर्ग पर्यटनासाठी बंद केले गेले होते. आता पुन्हा सुरु झाले आहे का याची कल्पना नाही. आम्ही थोडा वेळ कुरणांवर असंच फिरायचं ठरवलं. यासिनने सांगितलं की इथे जम्मू आणि काश्मीर राज्य पर्यटन मंडळाचा रिसॉर्ट आहे. फिरायला जाण्यापूर्वी तिथे जेवणाची ऑर्डर देऊन या. आम्ही तिथे गेलो तर ते बंद होते. त्याच्या आसपास चिटपाखरूही नव्हते. यासिन म्हणाला," देखिये, अभी टूरीजम का पीक सीजन हैं और सरकारी रिसॉर्ट बंद पडा हैं."
आसपास खाण्यापिण्याच्या फार सोयी दिसत नव्हत्या. एक छोटंसं हॉटेल दिसलं. एक काश्मिरी तरुण ते चालवत होता. आम्ही साधं पण अतिशय चविष्ट असं जेवण तिथे जेवलो. पहिल्यांदाच प्रसिद्ध काश्मिरी कहावा प्यायलो. त्याने आम्ही कुठून आलो वगैरे चौकशी केली. हा मुलगा अतिथंडीच्या काळात पर्यटन बंद असते तेव्हा भारताच्या अन्य राज्यात जाऊन काश्मिरी हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीचे काम करत असे. नंतर अनेक लोकांशी बोलताना आम्हाला कळले की पर्यटनाचा हंगाम नसतो तेव्हा बरेच लोक अन्य राज्यात अशा वस्तूंच्या विक्रीसाठी जातात. पण कोविडच्या काळात या मुलाचं काम बंद पडलं. मग इथे येऊन त्याने शेती सुरु केली. हे हॉटेल सुरु केलं.
जेवण झाल्यावर आम्ही तिथे थोडं फिरलो. आम्हाला इथल्या भटक्या जातीच्या गुज्जर लोकांची मातीची बसकी घरं दिसली. या घरांना 'ढोक' म्हणतात अशी माहिती गुगलने दिली. सहा महिने ते लोक या घरात राहतात. बर्फ पडायला सुरुवात झाली की जम्मूला स्थलांतर करतात. यासिनने आम्हाला एक प्रकारच्या बेरीची झुडुपं दाखवली. त्याला लालभडक रंगाची फुले आली होती. आता काही दिवसांनी बेरी तयार होतील. मग ते इथले स्थानिक लोक खातात.
भटक्या गुज्जरांची घरं (ढोक)
परत येताना चरार- ए - शरीफला थांबलो. आपण इतरत्र जशा मशिदी पाहतो, त्यांच्या घुमटापेक्षा या मशिदीची रचना वेगळी होती. बर्फ साचून राहू नये म्हणून असे असावे . हा दर्गा सूफी संत शेख नुरुद्दीन नूरानी म्हणजेच नंद ऋषींच्या स्मरणार्थ १४६० मध्ये बांधली होता. मुस्लिम आणि हिंदू दोघांनाही हे आदराचे स्थळ आहे. १९९५ मध्ये दहशदवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जुनी मशीद नष्ट झाली. सध्या जी मशीद आहे ती नव्याने बांधलेली आहे . त्याबद्दल काश्मिरी लोकांच्या मनात अजूनही सरकारबद्दल राग आहे. त्याची एक झलक रात्री जेवताना दिसली. १९९४ मध्ये हिजबुल मुहाजिद्दीनच्या हारून खान उर्फ मस्त गुलने त्याच्या सहकाऱ्यांसोबत या दर्ग्यात आश्रय घेतला होता. त्यानंतर सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत आतंकवाद्यांनी दर्ग्याला आग लावली आणि सातशे वर्षे जुनी धार्मिक वास्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ३० आतंकवादी मारले गेले पण मस्त गुल पळण्यात यशस्वी झाला.
चरार-ए-शरीफ दर्गा
दर्ग्याचे सध्या बंद असलेले मुख्य प्रवेशद्वार
इथे स्त्रियांना मुख्य दरवाजातून प्रवेश नव्हता. त्यांनी बाजूच्या दरवाज्यातून आत जाऊन जाळीतून दर्शन घ्यायचे. मी शांभवीला घेऊन पुढे गेले. दरवाज्याजवळ असणाऱ्या माणसाने मला पाहिलं आणि खुणेने डोकं झाकून घ्यायला सांगितलं. मी जॅकेटचा हूड डोक्यावर घेतला. त्याने मान डोलावली. शांभवीला तिची टोपी घातली तर तिने ती भिरकावून दिली. स्कार्फ तिच्या डोक्याला बांधायचा प्रयत्न केला तोही तिने काढून फेकून दिला. तेवढ्यात दर्ग्यातून काही तरुण मुली बाहेर आल्या. त्या सर्वजणी एवढ्या सुंदर होत्या ना! शांभवीला बघून त्यांनी तिचे गालगुच्चे घेतले आणि माझी तिला स्कार्फ बांधायची खटपट बघून म्हणाल्या "अरे छोड दो. छोटी बच्ची तो हैं. इनके लिए सब माफ होता हैं. ऐसेही लेके जाओ अंदर." आत गेलो तर पाय रुततील एवढा मऊ गालिचा आत अंथरला होता. शांभवीला घेऊन खाली बसले तर ती घोडा घोडा करत खेळायला लागली. तिथल्या लहान मुलींना खेळण्यासाठी हाका मारून बोलवायला लागली. मग पाचच मिनिटात आम्ही तिला घेऊन बाहेर आलो.
प्रसाद ज्या दरवाज्यातून आत गेला त्या दरवाजातून सारे पुरुष ये-जा करत होते. आत कॅमेरा न्यायला बंदी असल्याने कॅमेऱ्याची बॅग बाहेर ठेवणे क्रमप्राप्त होते. शेवटी घाबरत घाबरत प्रसादने कॅमेरा आणि मोबाईल असलेली बॅग बाहेर ठेवली. त्याची घालमेल बाहेर असलेल्या दारवान आणि सुरक्षा रक्षकाने पाहिली असावी. "आपका कोई सामान यहा पे चोरी नहीं होगा. आप घबराईये मत." असे म्हणून त्या रक्षकाने त्याला धीर दिला. दर्ग्याच्या मुख्य भागात सर्वांना जाता येत नाही. मात्र जाळीतून आत असलेल्या कबरीचे दर्शन घेता येते. आतली प्रकाशयोजना अगदी सुंदर होती. विविध रंगांच्या काचांमुळे रंगीबेरंगी प्रकाश अक्षरशः सर्वत्र नाचत होता. तेवढ्यात प्रसादला तिथे आलेल्या एका मध्यमवयीन माणसाने हाक मारली आणि त्याची विचारपूस केली. शेवटी काश्मिरी भाषेत प्रसादसाठी त्याने 'गाऱ्हाणे' घातले आणि शेंगदाणे-फुटण्याचा प्रसादही दिला. अपेक्षेप्रमाणे त्यानेही ख़ुशी मागितली. पण बॅग आधीच बाहेर ठेवलेली असल्याने प्रसादकडे पैसे नव्हते. त्याने तसे सांगितल्यावर तो माणूस फारसा नाराज न होता निघून गेला. बाहेर आल्यावर बॅग घेऊन आधी कॅमेरा वगैरे गोष्टी तपासून पाहिल्या! दारवानाने विचारले, "आप कहासे आए हो? आप मुस्लिम हो?" प्रसादने नाही म्हटल्यावर तो दारवान म्हणाला, "भगवान सबका होता है! कशमीर में मजे करना." दर्ग्याच्या बाहेर आपल्याकडे कशी प्रसाद विकण्याची दुकानं असतात तशी हलवा विकणारी दुकानं होती. आम्ही थोडा हलवा विकत घेऊन खाल्ला.
दर्ग्यासमोर असलेली दुकानांची रांग
वेगवेगळ्या मिठाईच्या पदार्थांनी सजलेलं दुकान
ही ती भली मोठी पुरी आणि बाजूला शिऱ्यासारखा गोड हलवा
वाटेत यासिनने एका ठिकाणी गाडी थांबवली. तिथे बरीचशी सफरचंद आणि पेअरची झाडं फुलली होती. आम्ही तिथे थांबून बरेच फोटो काढले.
सफरचंदाची फुलं
सफरचंदाची फुलं (जवळून)
पिअरची फुलं
परत आलो तेव्हा अंधार होत आला होता. यासिनने सांगितलं की त्याच्या ड्राईवरशी त्याचा संपर्क झाला असून तो आता उद्यापासून तुम्हाला फिरवेल. रात्रीचे जेवण इक्राम मध्येच घेतले. इलहामच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारताना त्यांना सहज आम्ही काय काय पाहिलं त्याबद्दल सांगत होतो. चरार - ए - शरीफचा विषय निघाल्यावर इलहामच्या बाबाने ती १९९४-९५ ची अतिरेकी लपून बसल्याची गोष्ट आम्हाला सांगितली आणि अगदी हळहळत म्हणाला. " सैन्याने अतिरेक्यांना पकडायच्या सबबीखाली आमची जुनी मशीद जाळून टाकली. अगदी जपानी पद्धतीचं लाकडी सुबक बांधकाम होतं ते." आग अतिरेक्यांनी न लावता भारतीय सैन्यानेच लावली हा त्यांचा समाज अगदी पक्का होता. डोळ्यातून सैन्याबद्दलचा राग दिसत होता. आम्ही आम्हाला मिळालेल्या सल्ल्यापैकी महत्वाचा सल्ला वापरला. प्रत्युत्तर करायचं नाही. या विषयावर चर्चा करायची नाही. फक्त ऐकून घ्यायचं.
(क्रमश:)
खीरभवानी, मानसबल आणि वुलर सरोवर
हवामानाच्या अंदाजानुसार आजसुद्धा पाऊस असणार होता पण प्रत्यक्षात आकाश अगदी मोकळं होतं. नंतर दिवसभरही पावसाने विश्रांतीच घेतली होती. आजपासून आम्हाला यासिनचा ड्रायव्हर बशीर फिरवणार होता. तो अगदी वेळेत आला. त्याच्या चेहेऱ्यावर एवढे रागीट भाव होते की मला बी आर चोप्रांच्या महाभारतातल्या दुर्योधनाची आठवण आली. फारसं काही न बोलता त्याने गाडी सुरु केली. आज आम्ही खीरभवानी मंदिर, मानसबल सरोवर आणि वूलर सरोवर पाहणार होतो. यातलं खीरभवानी मंदिर सोडलं तर बाकी दोन्ही जागांना पर्यटक फारसे भेट देत नाहीत. सध्या ट्युलिपचा हंगाम असल्याने श्रीनगरच्या रस्त्यांवर ट्रॅफिक खूप होतं. बशीरने दुसऱ्या रस्त्याने गाडी बाहेर काढली. अक्ख्या जगाचा राग आलाय असा चेहरा करून तो गाडी चालवत होता. हा आम्हाला यासिनसारखं माहिती वगैरे सांगेल की नाही याची खात्री नव्हती. पण एकदा गाडी ट्रॅफिकमधून बाहेर काढल्यावर तो आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीबद्दल व्यवस्थित बोलायला लागला.
गंदरबलला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणारी मोहरीची शेती
खीरभवानी मंदिर गंदरबल जिल्ह्यात तुलमुला गावात आहे. तासाभरात आम्ही
तिथे पोहोचलो. इथे सैनिकांचा कडक बंदोबस्त होता. हे मंदीर काश्मीरमधल्या
अगदी मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे अतिरेक्यांच्या धमक्या मिळूनही हिंदू
पुजारी मंदिर सोडत नाहीत. इथल्या देवीचे स्थान एका चिंचोळ्या कुंडात आहे.
मंदिराच्या चोहोबाजूने पाणी असते. या पाण्याचे रंग ऋतुमानानुसार बदलतात.
पाणी काळसर झाले असता पुढे येणाऱ्या संकटांची नांदी मानली जाते. कुंडाच्या
पाण्यात फुले आणि दूध अर्पून देवीची पूजा केली जाते. एकेकाळी काश्मीरमध्ये
शाक्यपंथीयांचे प्राबल्य होते आणि ही त्यांची आराध्यदेवता होती.
खीरभवानी मंदिराचे प्रवेशद्वार
खीरभवानी मंदिराचा प्रशस्त परिसर आणि त्यात असलेली हनुमान आणि शंकराची मंदिरे
चिनार वृक्षाची पाने
खीरभवानीचे मुख्य मंदिर आणि भोवताली असणारे रंग बदलणाऱ्या अद्भुत पाण्याचे कुंड
खीरभवानी (उजवीकडची)
या देवस्थानाबद्दल एक आख्यायिका आहे की देवी मूळची श्रीलंकेतली. रावणाचा निर्दयपणा आणि क्रूरता पाहून तिला तिथे राहायची इच्छा राहिली नाही. तेव्हा रामायणकाळात हनुमानाने तिला इथे काश्मीरमध्ये आणले. पुढे रावणाचा अंत झाला पण देवी काश्मीरमध्येच राहिली. स्वामी विवेकानंदानीही या मंदिराला भेट दिली होती. या मंदिराची अवस्था पाहून ते व्यथित झाले होते. असे म्हणतात तेव्हा देवीने त्यांना दृष्टांत दिला होता की अशा जीर्ण मंदिरात राहण्याचीच तिची इच्छा आहे. तिची इच्छा असेल तर ती स्वतःसाठी सुवर्णजडित सातमजली मंदिरही बनवू शकते.
मंदिराच्या पटांगणात चिनार वृक्षांची झाडं आहेत. मंदिराचे पटांगणंही
प्रशस्त आणि स्वच्छ आहे. देवीचे दर्शन घेतलं की पेलाभर तांदळाच्या खिरीचा
प्रसाद मिळतो. काल युसमर्ग आणि चरर-ए- शरीफला स्थानिक लोक सोडून बाकी
पर्यटक फारसे दिसत नव्हते. इथे मात्र मराठी आणि बंगाली पर्यटक खूप मोठ्या
संख्येने होते.
तांदळाची खीर (खीरभवानीचा प्रसाद)
मंदिरातून बाहेर आलो तर सासूबाईंना काश्मिरी वस्तूंचं दुकान दिसलं. त्यांनी स्वतःसाठी एक छोटी पर्स घेतली. ते पाहून बशीर म्हणाला की या दुकानांमध्ये दोन नंबरचा माल मिळतो. तुम्हाला अस्सल कलाकुसरीच्या वस्तू हव्या असतील तर मी तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईन. बशीरच्या बहिणीच्या नवऱ्याचा केरळला काश्मिरी कलाकुसरीच्या वस्तू विकायचा व्यवसाय आहे. पर्यटन बंद असते तेव्हा बशीर तिथे जाऊन त्याला मदत करतो.
इथून ५-६ किलोमीटर अंतरावर मानसबल सरोवर आहे. आम्ही पंधरा वीस मिनिटात
तिथे पोहोचलो. आम्हाला तिथे सोडून बशीर गाडी पार्क करायला गेला. सरोवराच्या
किनाऱ्याजवळच सुंदर बाग होती आणि अगदी समोर शिकाऱ्यांची रांग होती. इथे
बोट राईड करूया का विचारल्यावर सगळे तयार झाले. आम्हाला शिकाऱ्यावाल्यांशी
बोलताना पाहून बशीरने कॉल केला. तो म्हणाला," अरे आप यहापे शिकारा राइड मत
करना. इससे अच्छा दल मे होता हैं." आम्ही त्याला म्हटलं," टेन्शन नही. इधर
भी करेंगे और उधर भी."
मानसबलच्या किनाऱ्याचे उद्यान
मानसबलचे शिकारे
इथल्या शिकाऱ्यांची रचना दलमध्ये असणाऱ्या शिकाऱ्यांपेक्षा वेगळी होती.
दर ठरवल्यावर आम्ही शिकाऱ्यामध्ये बसलो. मानसबल दलपेक्षा खूप स्वच्छ आणि
सुंदर आहे ह्याचा तिथल्या लोकांना खूप अभिमान होता. तिथून हिमालयाच्या
पर्वतरांगेचे सुंदर दर्शन होत होते. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला झरोका
मुघल बागेजवळ आणून सोडले. शिकारावाला म्हणाला," तुम्ही बागेत निवांत फिरून
या. आम्ही इथेच तुमची वाट पाहत थांबतो." उतरल्यावर प्रसादला किनाऱ्याजवळ
चतुर उडताना दिसले. त्याने आम्हाला पुढे जायला सांगितले आणि स्वतः फोटो
काढायला सुरुवात केली.
फक्त काश्मीर खोऱ्यात आढळणारी डॅम्सेलफ्लाय/टाचणी - काश्मीर डॅम्सेल
मानसबलच्या काठावर वसलेले काश्मिरी गाव
मानसबल किनाऱ्यावर राहण्याचा अनुभव काय विलक्षण असेल?
काश्मीरचे आरस्पानी सौंदर्य

या सरोवराचे पाणी इतके नितळ आहे की तळाशी असणाऱ्या पाणवनस्पती दिसतात
झरोका बाग मानसबल सरोवराच्या उत्तरेच्या काठावर वसली आहे. ही बाग मुघल
सम्राट जहांगीरच्या पहिल्या पत्नी पत्नी नूरजहानसाठी बनवली गेली होती.
एखाद्या झरोक्यातून पाहावे तसे इथून मानसबल सरोवराचे अत्यंत मनोहारी दर्शन
घडते.
मानसबल दर्शन - झरोका मुघल बागेतून
उत्तरेच्या काठावरचा विशाल चिनार
आम्ही पायऱ्या चढत बागेत जात असताना दोघेजण आमच्याकडे आले. त्यांनी
विचारलं," मानसबल कि स्पेशल डिश है यहा के मछली का कटलेट. क्या आप खाओगे?"
मी काही बोलणार त्या अगोदर त्याने मी मंदिरात कपाळावर लावलेला गंध पाहिला
आणि म्हणाला," आप खीर भवानी होके आये हैं क्या? तो फिर फिश नही खायेंगे आप.
फिर कहावा या चाय ही पी लिजिए." आम्ही होकार दिला.
झरोका मुघल बाग
बागेमध्ये फेरफटका मारून होईपर्यंत त्या माणसाने कहावा आणि चहा आणून
दिला. कहावा पिऊन झाल्यानंतर शिकारा आम्हाला घेऊन पुन्हा किनाऱ्यावर आला.
भूक लागली होती. इथे खाण्यापिण्याच्या फार सोयी नव्हत्याच. एक स्टॉल दिसला.
त्याच्याकडे शाकाहारी पदार्थ फार कमी होते. त्याने आम्हाला त्यांच्याकडचा
पिझ्झा खाऊन बघायला सांगितलं आणि खरंच अगदी अप्रतिम चव होती त्याची.
कहावा
पाणथळ पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी मानसबल एक उत्तम ठिकाण आहे. इथल्या
सरोवरात वाढणाऱ्या कमळांचे कंद हा स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचा एक स्रोत
आहे. ते याची विक्री करतात तसेच या कंदाची भाजीही केली जाते.
पक्षीनिरीक्षणासाठी ठाण मांडून बसायला उत्तम जागा
सरोवराच्या किनाऱ्यावर एक प्राचीन मंदिर होते. खाऊपिऊ झाल्यांनतर आम्ही
तिथे गेलो. खीरभवानी प्रमाणेच हे मंदिर देखील कुंडात होते. एक मुस्लिम
व्यक्ती त्या मंदिराची देखरेख करत होती. आम्हाला येताना पाहून त्याने
आपल्या डोक्यावरची टोपी काढून बाजूला ठेवली. मंदिराबद्दल माहिती सांगितली.
आम्हाला माशांना घालण्यासाठी काही खाऊही दिला. आम्ही त्याला काही पैसे
दिले, ते त्याने घेतले. इथे लावलेल्या माहिती फलकानुसार इसवी सन ८००-९००
च्या दरम्यान या मंदिराचे बांधकाम राजा अवंतिवर्मन किंवा शंकरवर्मनच्या
कारकिर्दीत करण्यात आले असावे. बराच काळ या मंदिराचा खालचा अर्धा भाग
जमिनीत गाडला गेला होता.
मंदिराकडे जाणारा रस्ता
पाण्यातील मंदिर
प्रसाद आणि मी
कळसाच्या दर्शनी भागात दिसणारा गणपती
आता संध्याकाळ होत आली होती. म्हणून वुलर सरोवराला जायची घाई केली. हे
आशियातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. याचे जुने
नाव आहे, महापद्मसर. भारतात ज्या पाणथळ जागांना रामसर स्थळांचा दर्जा
मिळाला आहे, त्यापैकी हे एक सरोवर आहे. पण हा दर्जा मिळूनसुद्धा ह्या
सरोवराची दुर्दशा थांबली नाही. अजूनही सरोवरावर चहुबाजूने शेतीसाठी
अतिक्रमण होत आहे. कचरा टाकणे, स्थलांतरित पक्ष्यांची शिकार हे नित्याचेच
आहे.
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर - वुलर
आम्ही ऐकले होते की इथे दुपारनंतर वाऱ्याचे वादळ उठण्याची शक्यता असते.
त्यामुळे इथे बोटींग करताना सरोवराच्या मध्यभागी नेत नाहीत. सरोवराच्या
काठाकाठाने फिरवून आणतात.
वुलरमधून नौका चालवणारा काश्मिरी गावकरी
वुलरच्या काठावर वुलर वँटेज पार्क हे एक सुंदर उद्यान आहे. इथून
सरोवराचे काही सुंदर फोटो काढता आले. इथून सूर्यास्त फार छान दिसतो असं
म्हणतात. पण आम्हाला अंधार पडेपर्यंत तिथे थांबायचं नव्हतं. त्यामुळे एका
सुंदर अनुभवाला मुकलो.
वुलर वँटेज पार्क

वुलरवरून दिसणारी संध्याकाळ आणि उरीपासून गुरेझपर्यंत दिसणारा परिसर
वुलरवरून दिसणारे प्रत्येक दृश्य हे स्वप्नवत होते
वँटेज पार्कात दिसलेला हुदहुद पक्षी

होमस्टेमध्ये पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. इथे एक चांगलं होतं. अगदी खेळीमेळीचं वातावरण असायचं. इलहाम आणि त्याची आई मस्त गप्पा मारत बसायचे. इक्राममध्ये काम करणारे अमित आणि प्रिया हे जोडपं पश्चिम बंगालचं होतं. अमित बराचसा आमच्या घरी काम करणाऱ्या शंकर काकांसारखा दिसत होता म्हणून की काय शांभवीने लगेच त्याच्याशी मैत्री केली. वुलर पाहून आलो म्हटल्यावर इलहामने आम्हाला तिथून तीन तासाच्या अंतरावर असणारे गुरेझ व्हॅली हे ठिकाण सुचवलं. तो नुकताच तिथे जाऊन आला होता. त्या जागेबद्दल आणि तिथल्या स्थानिक लोकांबद्दल त्याने आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. वुलर सरोवराबद्दल बोलताना तो खूप हळहळला. त्याच्या चहुबाजूने अतिक्रमण होऊन वुलर आता मरणपंथाला लागलं आहे असं सांगत होता. नेहेमीप्रमाणे इलहामच्या बाबाने मात्र मानसबल मंदिराचे फोटो पाहिल्यावर त्याचं भाषण सुरु केलंच. "अरे ऐसे मंदिर तो आपको काश्मीर के हर एक गाव में दिखेंगे. आपने ऐसे सुना होगा की काश्मिरी मुसलमानोने मंदिर तोड दिये. पर ये सच बात नाही हैं."मंदिरोंमे पूजा करनेवाले लोग भी हर एक गाव में दिखेंगे क्या असं विचारायची खूप इच्छा होती. पण शिवशिवणाऱ्या जिभेला घातला आणि जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवसापासून प्रसादची कॉन्फरन्स सुरु होणार होती.
वुलर सरोवराचा उल्लेख राजतरंगिणीतही येतो. ललितादित्याने तिबेटचा बीमोड करण्यासाठी चीनला महापद्मनाग सरोवराजवळ त्यांची सैनिकी छावणी उभारण्याची परवानगी दिली होती. पण चीनी सैन्याने त्याचा लाभ घेतला नाही.
खीरभवानी मंदीर परीसरात सीआरपीएफ कॅंप आहे का अजून? ९० च्या दशकातला
हिंसाचार सुरू होण्याआधी काही वर्षं त्या कुंडातले पाणी लालभडक दिसायचे अशी
दंतकथा आहे.
त्या प्रांगणात एका छोट्या हॉटेलमध्ये अप्रतिम दम आलू खाल्ला होता.
मी दोनदा श्रीनगरला गेलेय. तिथले लोक आपल्यासारखेच वाटले. आता जन्मापासुन भारतद्वेष शिकवलाय त्यांना त्याला ते तरी काय करणार. तिथे इन्डस्ट्रीज नाहीत त्यामुळे घाऊक रोजगार नाहीत. खाजगी बँका व सरकारी कार्यालये ह्याच नोकरीच्या संधी. त्यात सरकारी नोकर्या वशिल्यांच्या तट्टुंनी भरलेल्या. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊनही चांगली नोकरी मिळत नाही, इन्जीनियरीग करुनही ड्रायव्हर सारखी कामे करावी लागतात. आणि हे लोक बिहार/युपीकरांसारखे इतरत्र जाऊन स्थिरावत नाहीत. आम्हाला भेटलेले काश्मिरी अगदी गोव्यापर्यंत पोचले पण न आवडुन परत गेले. हवामानाचाही फरक पडतो. काश्मिरसारख्या स्वर्गात राहणारा माणुस इतरत्र रखरखाटात व प्रदुषणात कितपत जमवुन घेईल.
हे फ्रस्ट्रेशनही कुठेतरी बाहेर पडतेच ना. मागच्या सफरीतला ड्रायव्हर इन्जिनीयर झालेला होता. तो अगदी यंग अँग्री मॅन होता, म्हणे आमच्या जीवावर अख्खी इन्डिया चालते, आम्ही कमावतो. त्याच्याशी अजुन काय हुज्जत घालणार, तो स्वतःच पिडीत आहे बिचारा.
तरी २०१३ व २०२५ मधल्या काश्मिरीत खुप फरक जाणवला.
ललितादित्याने तिबेटचा बीमोड करण्यासाठी चीनला महापद्मनाग सरोवराजवळ त्यांची सैनिकी छावणी उभारण्याची परवानगी दिली होती. पण चीनी सैन्याने त्याचा लाभ घेतला नाही >>>>>
नशिब म्हणायचे. एकदा तळ ठोकला असता तर जीव गेला तरी तिथुन हलले नसते.
निशात, शालिमार बाग आणि सर प्रतापसिंह वस्तुसंग्रहालय
आजपासून डॉक्टरांची कॉन्फरन्स सुरु व्हायची होती. प्रसाद आवरून शेर-ए-
काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरला गेला. नोंदणी करून आणि महत्त्वाचे
काही सत्रे आटोपून तो आम्हाला मुघल बागांमध्ये येऊन येऊन भेटणार होता.
त्यामुळे आज लांबचा दौरा न आखता फक्त श्रीनगर पाहायचं असं ठरवलं होतं.
शेर-ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर आणि IAPSMCON २०२५
शेर-ए- काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर - मुख्य सभागृह
सर्वात पहिला थांबा होता निशात बाग. काश्मीरमधल्या मुघल बागांमध्ये हे
दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उद्यान आहे. १६ व्या शतकात बेगम नूरजहानचा भाऊ आणि
शाहजहानचा सासरा असिफ खान याने या बागेची निर्मिती केली होती. याच्या
नावाचा अर्थसुद्धा गार्डन ऑफ जॉय किंवा आनंदाचे उद्यान असा होता. इथल्या
बऱ्याच उद्यानांची रचना ही डोंगर उताराच्या पायऱ्यापायऱ्यांवर केली आहे.
निशात बागेच्या पार्श्वभूमीला झबरवान डोंगररांगेचे मनोहरी दृश्य दिसते.
उद्यान्याच्या मध्यातून पाण्याचा खळाळता प्रवाह टप्प्याटप्प्याने खाली उतरत
येतो.
झबरवान डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेली निशात बाग
चेरीच्या झाडाखाली फॅमिली फोटो
आनंदाची "निशात" बाग
हिरव्या चिनारांच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी चेरी ब्लॉसम
दलच्या बाजूला असलेले निशातचे प्रवेशद्वार
जवळपास तीसेक पायऱ्या चढून गेल्यावर निशातचे खरे सौंदर्य दिसते
मुघल बागेचे एक वैशिष्ट्य - चादर इफेक्ट
या जागेबद्दल एक कथा अशी आहे की बागेचे काम पूर्ण झाले तेव्हा त्या वेळचा मुघल बादशाह शाहजहानने आपल्या सासऱ्याकडे या बागेचे तीनदा तोंडभरून कौतुक केले. बिचाऱ्याला आशा होती की आपला सासरा बाग आपल्याला देऊन टाकेल. जेव्हा सासऱ्याने तसा काही विषय काढला नाही तेव्हा त्याला राग आला आणि त्याने बागेचा पाणीपुरवठा बंद करायचा आदेश दिला आणि बाग ओसाड झाली. बिचाऱ्या असिफ खानचे लक्ष कशातही लागेना. एकदा त्याला असं उदास झाडाखाली बसलेले पाहून त्याच्या एका नोकराने बागेचा पाणीपुरवठा पुन्हा सुरु केला. ते पाहून असिफ खान घाबरला त्याने पाणी बंद करायला सांगितले. जावई असलेल्या बादशहाची आज्ञा मोडून पाणी पुन्हा सुरु केले तर तो जीव घेईल अशी त्याला भीती वाटली. पण शाहजहानच्या कानावर ही गोष्ट जाताच त्याला आपल्या मालकाबद्दल काळजी असणाऱ्या नोकराचे कौतुक वाटले आणि त्याने बागेचा पाणीपुरवठा पुर्ववत करण्याचा आदेश दिला.
आम्ही बागेमध्ये फिरायला सुरुवात केली तेव्हा बर्फ नुकताच कमी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फुलांचे नवीन ताटवे लावण्याचे काम सुरु होते. तिथले माळी फुलांच्या बिया विकत घेण्यासाठी गळ घालत होते. मी एक पाकीट घेतले खरे पण ते बॅगेच्या चोर कप्प्यात पडून राहिले आणि अजूनपर्यंत त्या बिया लावण्याचे काम माझ्या हातून झाले नाही. तशाही त्या बिया आपल्याकडे रुजणार नाही असे मला कुणीतरी आधी सांगितले होते. पण तरीही प्रयोग करायची माझी प्रचंड इच्छा होतीच. बाग अर्धी फिरून होईपर्यंत प्रसादचीही महत्वाची सत्रं आटोपली होती. तो आम्हाला बागेत येऊन भेटला.
एका ठिकाणी काश्मिरी पोशाखावर फोटो काढून देत होते. दोन्ही सासूबाईंना विचारले, "तुम्हाला फोटो काढायचे आहेत का?" आम्हाला वाटलं त्यांना हे फोटो वगैरे काढून घेणं त्यांना काही आवडणार नाही पण सासूबाईंनी अगदी आनंदाने होकार दिला. आम्हाला बरे वाटले. दोघीनी स्वतःचे फोटो काढलेच पण आम्हा तिघांनाही फोटो काढायला लावले. एक वर्षाच्या मुलीच्या मापाचेही कपडे होते त्यांच्याकडे. शांभवीचे फोटो भलतेच क्युट आलेत. पूर्ण गोंधळलेला भाव आहे फोटोमध्ये.
इथून मग चार किलोमीटरवर असणाऱ्या शालिमार बागेत गेलो. आज जरी या जागेला मुघल गार्डन म्हणत असले आणि जहांगीर बादशहाने ही बाग त्याच्या बेगम नूरजहानसाठी निर्माण केली असे म्हणत असले तरी सर्वप्रथम राजा प्रवरसेन द्वितीय याने स्वतःसाठी इथे उद्यानगृह वसवले होते. जहांगीराने या बागेचे रूपांतर राज उद्यानात केले आणि त्याला 'फराह बक्ष' (आनंददायक) असे नाव दिले. ही बाग तीन सज्जांमध्ये विभागली गेली आहे. पहिला सज्जा म्हणजे दिवाण-ए-आम, दुसरा दिवाण-ए- खास आणि तिसरा जनाना बाग. बागेच्या मधोमध कालवा वाहतो आणि कालव्याच्या दुतर्फा चिनार वृक्षांची रांग आहे.
शालिमारमध्ये प्रवेश केल्यावर
शालिमारमध्येही फुलांचे ताटवे लावण्याचे काम सुरु होते
दिवाण-ए-आम (पब्लिक गार्डन)कडे जाताना
बागेतला हा कालवा पुढे जाऊन दलला मिळतो
बागेमधील मुघलकालीन बांधकाम
बांधकामाभोवती असणारी शेकडो कारंजी

मुघलकालीन चित्रकला
बागेतील मुख्य आकर्षण
चेरी ब्लॉसम
पॅन्सीची फुलं
बागेतून दिसणारी मशीद - जणू परिकथेतील किल्ला
शालिमार बागेतून बाहेर पडतानाच पाऊस सुरु झाला. लगेच बाहेर आलो. बशीरने जेवणासाठी एका ढाब्याकडे गाडी नेली. जेवण ठीकठाक होते. केसरी टूर्सची बरीच मंडळी इथे जेवायला थांबली होती.
जेवण आटोपले तरी पाऊस सुरूच होता. या पावसात उरलेल्या बागा आणि बाकीची स्थळं पाहणं शक्यच नव्हतं म्हणून आम्ही सर प्रतापसिंग वस्तुसंग्रहालयात गेलो. हे संग्रहालय श्रीनगरच्या वजीर भागात आहे . १८८९ मध्ये याची स्थापन झाली. पूर्वी हे संग्रहालय काश्मीरी राजांच्या उन्हाळी सुट्टीच्या राजवाड्यात होते. २०१७ पासून ते बाजूच्याच नवीन इमारतीत हलवण्यात आले आहे. मला वाटलं होतं त्यापेक्षा हे संग्रहालय बरेच मोठे होते. ८०००० पेक्षाही जास्त वस्तू या संग्रहालयात मांडल्या आहेत. यात पुरातत्त्व, वाद्य, हस्तलिखित, धातूंच्या वस्तू, वस्त्र, काश्मिरी हस्तकला, नाणी, नैसर्गिक इतिहास असे बरेच विभाग आहेत. पण आम्हाला पोहोचायलाच उशीर झाल्याने आम्ही फक्त पुरातत्व, इतिहास, नाणी आणि जैवविविधता असे चारच विभाग पाहू शकलो. संग्रहालय बंद व्हायला पाऊण एक तास असताना वीज गेली आणि आम्हाला नाईलाजाने बाहेर पडावे लागले. संग्रहालयात काश्मीरचा इतिहास अगदी अश्मयुगीन काळातल्या हत्यारांपासून ते बौद्ध, हिंदू, मुघल ते स्वातंत्रपूर्व काळापर्यंत मांडला आहे.
सर प्रतापसिंहाचा राजवाडा - संग्रहालयाची जुनी जागा
संग्रहालयाची नवी इमारत
काश्मीरच्या विविध भागात उत्खननातून मिळालेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती (गणपती, काली, नरसिंह, विष्णू इत्यादी)
श्रीनगरमध्ये हारवन इथल्या २००० वर्षे जुन्या बौद्ध मठातील टेराकोटा फरशा. यावर् खरोष्ठी लिपीत अंक कोरले आहेत.
काश्मीर देवसर काझीगुंड इथे मिळालेले शिवलिंग
अवंतिपूर इथे सापडलेली नवव्या शतकातील हत्यारे
कधीकाळी काश्मीर हे प्राचीन संस्कृतीने बहरले होते याची साक्ष देणारी पुरातन भांडी
काश्मिरी पद्धतीचे जुने मंदिर
काही मूर्तींमध्ये असलेले चौथे मुख पाहण्यासाठी संग्रहालयात मागच्या बाजूला आरशाची व्यवस्था केली आहे
नॅचरल हिस्टरी विभागात काढलेला एकमेव फोटो! वूली मॅमथची कवटी. कधीकाळी हा जीव काश्मीरमध्ये वावरत असेल याचा पुरावा.
जम्मू काश्मीरमधील पहिले कागदी चलन (वर्ष १८७६)
इथून बशीर आदल्यादिवशी म्हणाला होता त्याप्रमाणे आम्हाला खरेदीसाठी घेऊन गेला. इथे अगदी अस्सल वस्तू मिळतात असं बशीरचे म्हणणे होते. तिथल्या दुकानदारांनी काश्मिरी कशिद्याचे, भरतकामाचे वेगवेगळे नमुने दाखवले. सासूबाईंनी एक-दोन ड्रेस घेतले. गालिच्यांचा, लाकडी नक्षीकामाचा विभाग सुरेखच होता.तिथल्या दुकानदारानी काही मराठी शब्द आणि वाक्यं शिकून घेतली आहे. (हे काश्मीरमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसलं.) या ताई. हे आवडेल तुम्हाला. हे घ्या. वगैरे वगैरे. मी बहिणीसाठी किरकोळ खरेदी केली आणि इक्राम इनमध्ये परतलो.
इक्राम इनच्या खिडकीमधून दिसणारे शंकराचार्य मंदिर. आमच्या पुढच्या प्रवासाचा आरंभबिंदू.
शंकराचार्य मंदिर, ट्युलिप गार्डन, बोटॅनिकल गार्डन, दाचीगाम, हारवान, दल सरोवर
आजचा दौरा सुरु होणार होता शंकराचार्य मंदिरापासून. काल बशीरला विचारलं होतं की कुठल्या वेळेला गेलो तर बरं पडेल? तर तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "अरे ऐसा भगवान के दरवाजे के लिये जाने के लिए कोई टाइम थोडी होता हैं. कभी भी जा सकते है". त्याला म्हटलं," भावा, गर्दी कमी कधी असेल ते सांग." तर बशीरभाऊ म्हणाले की सकाळी लवकर गेलो तर गर्दी जरा कमी असेल. त्याप्रमाणे सकाळी लवकर शंकराचार्यांच्या टेकडीवर पोहोचलो. प्रसादला कॉन्फरन्सच्या तिसऱ्या दिवशी त्याचा पेपर सादर करायचा असल्यामुळे आज त्याच्याकडे फिरायला मोकळा वेळ होता.
शंकराचार्य मंदिर जिथे आहे त्या पर्वताला गोपाद्री पर्वत म्हणतात. तो सुमारे हजार फूट उंच असून मोटारींसाठी पक्का रस्ता वरपर्यंत गेला आहे. तिथून अडीचशे दगडी पायऱ्यांचा मंदिराकडे जाणारा मार्ग आहे. मंदिर फार जुने म्हणजे इसवी सन पूर्व २०० पासून आहे असे सांगितले जाते तर काही अभ्यासकांच्या मतानुसार आदि शंकराचार्यांच्या भेटीनंतर बहुधा जहांगीर बादशहाच्या काळात या मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे काश्मीरमधले सर्वात जुने मंदिर मानले जाते. सुरुवातीला सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने इथे बांधकाम केले व नंतर राजा गोपादित्य याने येथे जेष्ठेश्वराचे मंदिर उभारले असे म्हणतात.
आम्ही वर पोहोचल्यावर बशीरने एके ठिकाणी गाडी थांबवली. पर्यटक यायला
सुरुवात झाली होती. त्यामुळे गाड्या पार्क करण्यासाठी फारशी जागा नव्हती.
आम्हाला पायऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत थोडं चालावं लागणार होतं. वाटेत एक
रिक्षा मिळाली तिने आम्हाला पायऱ्यांपर्यंत सोडले. सासूबाई आणि मावशी
दोघींनाही गुडघेदुखीमुळे चढायला झेपलं नसतं त्यामुळे त्या खालीच थांबणार
होत्या. आम्ही वर चढायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे मराठी पर्यटकांची
गर्दी जास्त होती.
शंकराचार्य मंदिर परिसरातून दिसणारे श्रीनगरचे विहंगम दृश्य
मध्ये नागमोडी वळणांची झेलम (स्थानिक उच्चार - जेहलम) नदी
मंदिराचा कळस
मंदिराच्या भिंतींच्या फटींमध्ये भाविक नाणी खोचून ठेवतात
आम्ही दर्शन घेऊन खाली आल्यानंतर गर्दी दुप्पट झाली होती. पण आजूबाजूचे
वातावरण इतके सुंदर होते की त्या गर्दीतही कंटाळा येत नव्हता.
आदि शंकराचार्यांची मूर्ती
दगडी पायऱ्यांचा मार्ग
शंकराचार्य टेकडीवरचे जंगल
दर्शन घेऊन आल्यावर शंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती ती गुहा पाहायला
गेलो. आत त्यांची प्रतिमा ठेवली आहे. आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.
आत गेलेले पर्यटक रेंगाळत होते आणि बाहेर यायला खूप वेळ लावत होते.
ड्युटीवर असणारा सैनिक वैतागला होता. जोरजोरात ओरडून आत गेलेल्या लोकांना
बाहेर यायला सांगत होता. "देखिये गुफा में ऑक्सिजन लेवल कम होता है. इसलिये
वहा पे ज्यादा देर मत रुकीये. आप बेहोष हो सकते है."
रांगेत उभा असलेला एक उत्तर भारतीय माणूस अगदी लाडात आल्यासारखा त्याला म्हणाला," अगर कुछ हुआ तो आप हैं ना हमारी मदत के लिये."
आर्मीवाला अजून भडकला. त्याच्यावर खेकसला," देखिये हमसे जितना होगा उतना हम
कर रहे है. आप इस गुफा मे आपकी जान चली जायेगी तो आपकी डेड बॉडी उठाने के
लिये हेलिकॉप्टर बुलाना पडेगा."
उत्तर भारतीय माणूस अगदी गप झाला.
इथून पुढचा थांबा होता. इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन. पूर्वीची सिराज
बाग. दल सरोवराच्या काठावर आशियातले हे सर्वात मोठे ट्युलिप गार्डन वसले
आहे. ही बाग झबरवान रांगेच्या पायथ्याशी एकूण ७४ एकरवर पसरली आहे.
ट्युलिपचा बहर महिनाभर असतो. त्याच दरम्यान ट्युलिप फेस्टिवलच्या तारखा
घोषित करतात आणि या काळात काश्मीरमध्ये जास्त गर्दी असते. बशीर म्हणायचा की
या महिन्यात त्याला दल रोडला यायची इच्छा नसते. फेस्टिव्हलमुळे पर्यटक
वाढतात आणि त्याचबरोबर ट्रॅफिक. कॉन्फरन्सच्या निमित्ताने ही फुलं पाहायला
मिळाली. नाहीतर एवढ्या गर्दीत आम्ही इथे यायचं टाळलं असतं.
ट्यूलिपचे वाफे आणि विपिंग विलोचे वृक्ष
ट्युलिप्सचे रांगोळी प्रदर्शन
......
.......
७५ पेक्षा जास्त जातींचे ट्युलिप या बागेत आहेत
ट्युलिपच्या रंगांमधले वैविध्य फोटोत मावत नाही.
वाट चुकलेला पाहुणा
या वर्षी ट्युलिपच्या हंगामात साडेआठ लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी या
उद्यानाला भेट दिली. पोहोचल्यावर तिथली अगदी चोख व्यवस्था पाहून चकित झालो.
एवढी गर्दी असूनही फुलांचा आनंद घेता येत होता. अनेक शाळांच्या सहलीदेखील
आल्या होत्या. लहान मुलं शिक्षकांसोबत ट्युलिप्स पाहायला आली होती. सासूबाई
म्हणाल्या," इथल्या मुलांचे गाल अगदी सफरचंदांसारखेच आहेत."
ट्युलिप गार्डनच्या अगदी बाजूलाच जवाहरलाल नेहरू बोटॅनिकल गार्डन होते.
आम्ही हे निवांत पाहू शकलो नाही कारण ऊन फारच वाढलं होतं. त्यामुळे घाईघाईत
उद्यानाला एक फेरी मारली. १७ एकरवर पसरलेले हे उद्यान माजी पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ निर्माण करण्यात आले आहे. या बोटॅनिकल
गार्डनमध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त शोभेची झाडे आणि वनस्पती आहेत.
बागेत फुललेली क्रॅब ॲपलची झाडे (गुगलचा अंदाज)
क्रॅब ॲपलची फुलं
त्यानंतर बशीर आम्हाला जेवायला राजा ढाबा नाव असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. जेवणाचा दर्जा ठीकठाक होता. पण पर्यटकांची तुफान गर्दी आणि त्यामुळे वेटर्सना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. कसबसं जेवण आटपून दाचीगाम अभयारण्याची वाट धरली. श्रीनगर शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर दल सरोवराच्या पूर्वेला हे अभयारण्य आहे. दाचीगामचा अर्थ होता, दहा गावे. हे अभयारण्य बसवताना दहा गावे विस्थापित करण्यात आली होती. 'हंगूल' या काश्मिरी हरणांसाठी हे अभयारण्य सुरक्षित करण्यात आले आहे. हा काश्मीरचा राज्य प्राणी आहे. १९४० च्या दरम्यान ह्या हंगूल हरणांची संख्या ४०००-५००० च्या आसपास होती. २००४ च्या गणनेत फक्त १९७ हंगूल आढळले. शिकार, अधिवासाचा होणारा नाश, पाळीव गुरांमुळे होणारी अतिचराई यामुळे यांची संख्या कमी होत गेली. तसेच त्यांच्या प्रजननाची मुख्य जागा दाचीगामच्या वरच्या भागात आहे आणि त्या भागात बकरवाल गुराखी आणि त्यांचे कुत्रे उन्हाळ्यात तळ ठोकून असतात. तरीही वन्यखात्याच्या प्रयत्नामुळे २०२४च्या गणनेत हंगूलची संख्या २८९ पर्यंत वाढल्याचे दिसून आले.
दाचीगामचे प्रवेशद्वार
हंगूल (काश्मिरी स्टॅग) ..... फोटो आंतरजालावरून साभार
दाचीगाम प्रवेशद्वारावरून पलीकडच्या बाजूचे दिसणारे दृश्य
पूर्वी ब्रिटिश अधिकारी, राजेराजवाडे इथे शिकारीस येत असत. डोंगरउतारावर हे अभयारण्य पसरले असून थंडीच्या दिवसात हंगूल पायथ्याशी येतात. त्या वेळेस ती मोठ्या प्रमाणात पाहता येतात. आम्ही गेलो तेव्हा थंडी ओसरली असल्यामुळे की काय आम्हाला हंगूल काही दिसले नाहीत. पूर्वी इथे बॅटरीवर चालणाऱ्या गाडीने फिरायची सोय होती. आता ही सुविधा बंद असल्याचे कळले. जंगलातल्या पायवाटेवरून आम्ही थोडा वेळ फिरलो. जवळच ॲनिमल रेस्क्यू सेंटर होते. जखमी वन्यप्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले जातात आणि त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात येते. तिथे गेलो तर पिंजऱ्यात दोन बिबटे आणि हिमालयन काळे अस्वल पाहिले. इथे यायच्या आधी दाचीगामचे गूगलवर फोटो पाहताना त्यात स्नो लेपर्ड (बर्फाळ प्रदेशातला बिबट्या) पाहिला होता. हा दुर्मिळ आणि लाजाळू प्राणी आहे. असे वाटले की हा इथे दिसला तर किती छान होईल, आपण नैसर्गिक अधिवासात त्याला पाहायची शक्यता कमीच आहे. तेवढ्यात तिथे एक काश्मिरी तरुण आला, तो तिथेच काम करत असेल असा विचार करून मी त्याला स्नो लेपर्डबद्दल विचारलं. तो हसत म्हणाला," मॅडम झू नही, ये रेस्क्यू सेंटर हैं". मी म्हटलं," हो मला माहित आहे, मी सहज विचारतेय कारण तो दुर्मिळ प्राणी आहे म्हणून मला पाहायचा आहे ". मग तो म्हणाला की आधी इथे असलेल्या स्नो लेपर्डवर उपचार करून जंगलात सोडून देण्यात आले आहे. तो आम्हाला तिथे बाजूलाच ब्राउन बेअर असा फलक असणाऱ्या पिंजऱ्याकडे घेऊन गेला. तिथे तर कुणीच दिसत नव्हतं. पिंजरा अतिप्रचंड होता आणि त्यात बरीच झाडी वाढली होती. याला पण सोडून दिलं का असं विचारल्यावर तो तरुण म्हणाला, "नही. अभी मिलाता हूं आपसे." तो आम्हाला पिंजर्याच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्याने जोरात हाक मारली,"सेबास्टियन!" त्याबरोबर एक भल्या मोठ्या टेडी बेअरसारखे तपकिरी अस्वल दुडू दुडू धावत त्याच्याजवळ आले.
त्या तरुणाने आपले नाव शबीर सांगितले. शबीर गेली अनेक वर्षे
दाचीगाममध्ये नॅच्युरलिस्ट म्हणून काम करतो. त्याने आम्हाला सेबॅस्टिअनची
गोष्ट सांगितली. सेबास्टियन खूप लहान असताना त्याच्या आईचा गाडीच्या धडकेत
मृत्यू झाला. तेव्हापासून तो दाचीगाममध्ये आहे. शबीर म्हणाला की याला आता
पुन्हा जंगलात सोडणे शक्य नाही. तो लहानपणापासून इथेच वाढलाय.
शबीरने दाखवलेला ओढा
शबीर आणि आम्ही
सेबास्टियन (हिमालयन तपकिरी अस्वल IUCN श्रेणी - critically endangered)
आम्ही सर्वानी बऱ्याच गप्पा मारल्या. प्रसादने आणि मी आमच्या फुलपाखरांच्या, चतुरांच्या आवडीबद्दल सांगता त्याने सांगितले की दाचीगाममध्ये ऑगस्ट महिन्यात चतुर मोठ्या संख्येने पाहता येतील. त्यावेळी तुम्ही इथे या. आमच्या काही सामायिक ओळखीही निघाल्या. नंतर तो आम्हाला जवळच असणाऱ्या एका ओढ्याकडे घेऊन गेला म्हणाला," इस झरने का पानी पीके देखिये. आपने कभी इतना मीठा पानी पिया नही होगा." पाणी खरंच खूप गोड होते. त्यानंतर त्याने सेंटरची जागा आतून दाखवली. तिथे नुकतीच रेस्क्यु केलेली हिमालयन काळ्या अस्वलाची पिल्ले होती. प्राण्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली. तिथे करण्यात येणारे रेस्क्यू ऑपरेशन, संवर्धनाचे कार्यक्रम, लोकांमध्ये राबवण्यात येणारे वन्यजिवांबद्दल जागरूकता कार्यक्रम याबद्दल तो भरभरून बोलला. शांभवीला बघून त्याला त्याच्या लहान मुलीची आठवण झाली. तिचे फोटो मला दाखवले आणि म्हणाला, "बेटीया अल्ला की देन होती हैं." प्राण्यांच्या खाऊसाठी म्हणून आम्ही रेस्क्यू सेंटरला थोडी मदत केली.
इथून जवळच हारवन या गावात बौद्ध मठाचे अवशेष आहेत. बशीर इथे कधीही आला नव्हता. गुगलच्या मदतीने आणि स्थानिक लोकांना विचारून आम्ही ती जागा शोधली. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या वाटेवरून थोडं आत गेल्यावर मठाकडे जाणारा चढणीचा रस्ता सुरु होत होता. चढ असल्याने सासूबाई आणि मावशींनी दोघांनीही इथे यायचं टाळलं. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत तुरळक स्थानिकांची घरं सुद्धा होती. पर्यटक नव्हतेच. अंदाजे रस्ता शोधत होतो. थोडं वर पोहोचलोच होतो की एका बाजूने वरून आवाज आला, "कॅमेरा बॅग मे रख दिजिये. यहा पे कॅमेरा फोटोग्राफी अलाऊड नही है." आम्ही गळ्यात लटकत असणारा कॅमेरा बॅगेत ठेवून दिला. थोडं अजून वर चढल्यावर मठाकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसायला लागल्या आणि तो ओरडणारा माणूस ही. तो भारतीय पुरातत्व खात्यातला होता. त्याचं नाव आता मी विसरले. त्याने या जागेची आणि इथल्या इतिहासाची व्यवस्थित माहिती दिली. आम्ही कोण कुठले विचारल्यावर म्हणाला की इथे भेट देणारे अर्ध्याहून जास्त पर्यटक महाराष्ट्रातले असतात.
मठात बौद्ध भिक्षु राहत असत त्या खोल्यांचे अवशेष
......
स्तूपाचे अवशेष
कुशाण सम्राट पहिल्या कनिष्काने बौद्ध धर्माची चौथी बौद्ध परिषद पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात कधीतरी या ठिकाणी आयोजित केली होती. बौद्ध धर्मातील महान गुरु नागार्जुन हे ही इथे बराच काळ राहिले होते. ह्या भागात बौद्ध धर्माचा सुरुवातीचा विकास झाला आणि इथूनच त्याचा प्रसार आशियाच्या इतर भागात झाला. हा मठ इथे कधी बांधला गेला यांची निश्चित माहिती उपलब्ध नाही. उत्खननातून मिळालेले पुरावे पहिल्या ते सहाव्या शतकातले आहेत. आठव्या शतकापर्यंत बौद्ध हा काश्मीरचा मुख्य धर्म होता. नंतर त्याची जागा हिंदू धर्माने घेतली. काही काळापर्यंत दोन्ही धर्म या भागात एकत्र नांदत होते. इस्लामी आक्रमणानंतर काश्मीरमधून बौद्ध धर्म आणि मठांचे अस्तित्व पुसले गेले. आज फारच थोडे पर्यटक इथे भेट देतात. या जागेवर पुरातत्वशास्त्रज्ञ पंडित रामचंद्र काक यांनी उत्खनन केले तेव्हा त्यांना इथे स्तूपाचे आणि बौद्ध भिक्षु राहत असत त्या जागांचे अवशेष मिळाले. उत्खननात मिळालेल्या फरशा व इतर वस्तू सर प्रतापसिंह वस्तुसंग्रहालयात हलवल्या आहेत.
पुन्हा खाली उतरून गाडीकडे आलो तर सासूबाई आणि मावशीचे चेहरे पडले होते आणि बशीर जोरजोरात हसत होता. झालं होतं काय की बशीरला पोटाचा काहीतरी त्रास होता आणि डॉक्टरने त्याला सोनोग्राफी करून घ्यायला सांगितले होते. गाडी चालवण्यातून त्याला वेळ मिळत नव्हता म्हणून आता आम्ही फिरून येईपर्यंत जवळच असणाऱ्या सेंटरवर त्याला सोनोग्राफी करू म्हणून तो गाडी सुरु करून निघाला. फक्त मला असं इथे जायचं आहे असं त्याने आम्हा दोघांना आणि सासूबाईंना सांगितलंच नाही. त्यामुळे हा आपल्याला किडनॅप वगैरे करतोय की काय या विचाराने दोघीही घाबरल्या आणि या आपल्याला किडनॅपर समजल्या या विचाराने बशीरला खूप गंमत वाटली म्हणून तो जोरात हसत होता. भाऊ तू खरोखरच किडनॅपर वाटतोस असं त्याला सांगायची मला खूप खूप इच्छा झाली होती पण मी आवर घातला.
पुन्हा श्रीनगरची वाट धरली. अजून अंधार पडायला बराच वेळ होता म्हणून
दलमध्ये एक शिकारा राईड करूया का असं विचारलं तर सर्वजण तयार झाले. आम्ही
एक शिकारा ठरवला. इकडच्या रितीरिवाजाप्रमाणे घासाघीस केली. त्यांच्या आणि
आमच्या मनाला पटेल असा दर ठरल्यानंतर शिकारा सफरीला सुरुवात केली.
शिकारेवाले तुम्हाला काही ठराविक पॉईंट दाखवतात ज्यामध्ये तरंगते बेट,
त्याच्या चार बाजूला असणारे चार चिनार, पाणथळ भागात केली जाणारी शेती,
फ्लोटिंग मार्केट, हैदर चित्रपटात दाखवलेला पूल अशी वेगवेगळी ठिकाणे आहेत.
सध्या सुमारे हजारापेक्षाही जास्त शिकारे आणि हाऊसबोटी या सरोवरात आहे.
इतक्या वर्षांच्या पर्यटनाच्या वर्दळीमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे
दल सरोवरात भरपूर गाळ साचला आहे. सरोवराचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे.
संध्याकाळी शिकारा राईड केल्यामुळे भाजीपाला आणि इतर वस्तूंचा भरणारा
'तरंगता बाजार' काही आम्हाला पाहता आला नाही.

हैदर चित्रपटातला दाखवलेला पूल
शिकारा सफरीदरम्यान लांबून दिसलेला हरी पर्वतावरचा किल्ला
किल्ल्यावरची रोषणाई
.....
दलमधल्या हाऊसबोटी
तरंगता कापडबाजार
......
दलच्या पाणथळ भागात अनेक वर्षे शेती केली जाते. खत म्हणून तिथलाच गाळ
वापरला जातो. हे सर्व पॉईंट दाखवल्यानंतर शिकारावाला आम्हाला फ्लोटिंग
मार्केटमध्ये घेऊन गेला. इथे बरेच शिकारे थांबले होते. आमच्या बाजूच्या
शिकाऱ्यामध्ये कुटुंब होते ते चक्क मावशीचे शेजारी निघाले. आम्ही
दुकानांमध्ये एक चक्कर टाकली.
नेहमीप्रमाणे गोडगोड बोलून, मराठीमध्ये काही वाक्यं टाकून दुकानदारांनी
वस्तू खरेदी करण्यासाठी गळ घातली. मैत्रिणीसाठी एक स्कार्फ आणि ड्रेसचं
कापड घेऊन आम्ही बाहेर आलो. परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत चहा विकणाऱ्या
शिकाऱ्यावाल्याकडे चहा आणि हॉट चॉकलेट घेतलं. आता शेवटचा थांबा होता तो
म्हणजे दलमधल्या तरंगत्या बेटावर असणारे चार चिनार. यातला एक चिनार कोसळला
आहे. त्याजागी नवीन चिनार वृक्ष लावण्यात आला आहे.
चार चिनार बेटावरून दिसणारे संध्याकाळचे दृश्य
शिकारा बाहेर येईपर्यंत चांगलाच अंधार पडला होता. बशीरला टाटा करून इक्राममध्ये परतलो. उद्याचा मुक्काम हाऊसबोटमध्ये होता. त्यामुळे सामानाची आवराआवर करायची होती.
चष्मेशाही, परिमहल, बुर्झाहोम, हजरतबल आणि निगीन सरोवर
आज कॉन्फरन्सचा शेवटचा दिवस होता. प्रसादला पेपर सादर करायचा होता म्हणून आज अर्धा दिवस आम्ही उरलेले लोक राहिलेले मुघल गार्डन्स पाहून घेणार होतो. रात्रीचा मुक्काम हाऊसबोटीत होता म्हणून सामान आवरून ठेवलं होतं. नाश्ता झाल्यावर ते गाडीत टाकलं आणि चष्मेशाही उद्यानाकडे निघालो.
श्रीनगरपासून चष्मेशाही ९ किलोमीटर अंतरावर एका टेकडीच्या पायथ्याशी दल
सरोवराजवळ आहे. उद्यानात शिरतानाच ' हँगिंग गार्डन' सारखे उंचावर लावलेले
बगीचे लक्ष वेधून घेतात. येथील झऱ्यांच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असा
स्थानिकांचा विश्वास आहे. इथले पाणी नेहरूंसाठी विमानाने दिल्लीला नेले जात
असे, असेही सांगितले जाते. शाहजहानच्या आज्ञेवरून १६४२ मध्ये त्याचा सरदार
अली मर्दन खान याने हे उद्यान उभारले असे म्हणतात.
चष्मेशाही उद्यान
इथून परिमहलकडे जाताना रस्त्यात भयानक ट्राफिक होते. ट्युलिपच्या हंगामात काश्मीर पर्यटकांनी ओसंडून वाहते. बशीरने गाडी दुसऱ्या बाजूने बाहेर काढली. हा रस्ता कुठल्यातरी सरकारी संस्थेच्या बाजूने जात होता आणि तिथे एक्सरे स्कॅनिंग मशिनमधून पर्यटकांच्या गाडीतल्या सामानाची तपासणी चालली होती. नेमकं आज सगळं सामान गाडीत होतं. आमच्याबरोबर अजून काही पर्यटकांच्या गाड्या थांबल्या होत्या. मी एकटीने सर्व सामान तपासणीसाठी नेलं असतं पण खूप वेळ लागला असता. बशीर लगेच गाडीतून उतरला, त्याने सासूबाई आणि मावशीला गाडीतच थांबायला सांगितलं. मला म्हणाला, " में सामान मशीन मे डाल दूंगा. आप दुसरी साईडसे उठा लेना." बशीरमुळे ते चेकिंग लवकर आटोपलं. मला एकटीला करायला खूप धावपळ झाली असती.
चष्मेशाही उद्यानाच्या जवळच सुमारे दीड किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर
परिमहल आहे. फार पूर्वी म्हणे इथे एक बौद्ध मठ होता. शाहजहानचा थोरला मुलगा
शिकोह याने या मठाचे रूपांतर एका शैक्षणिक संस्थेत केले. इथे सुफी
तत्वज्ञानाची शाळा, ज्योतिषी केंद्र, खगोलशास्त्र अभ्यास केंद्र व वेधशाळा
सुरु केली होती. या ठिकाणी इमारतींचे जुने अवशेष पाहायला मिळतात. मी ऐकलं
होतं की परिमहलच्या पायथ्याशी कुठेतरी सम्राट अशोकाच्या काळातला एक जुना
अवशेष आहे. मी शोधायचा प्रयत्न केला पण मला कुठेही तसा माहितीचा फलक वगैरे
दिसला नाही.
परीमहल बाग
इमारतीचे जुने अवशेष
......
......
दोन्ही बागा अगदी आरामात फिरून झाल्या, तोपर्यंत दुपार झाली होती. प्रसादचे पेपर प्रेझेंटेशन आटोपले होते. श्रीनगरच्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढत तोही कसाबसा परिमहलपर्यंत पोहोचला. दोन दिवस ढाब्यांमध्ये गर्दीत जेवल्यामुळे यावेळी बशीरला म्हटलं आता जरा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन चल. तो आम्हाला एका उच्चभ्रू परिसरातल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. या भागात अगदी राजवाडे भासावे एवढे प्रशस्त बंगले होते.
जेवण झाल्यावर आम्ही बुर्झाहोमकडे निघालो. श्रीनगरच्या वायव्येला १६
किलोमीटर अंतरावर बुर्झाहोम हे एक पुरातत्वीय उत्खनन स्थळ आहे. १९३० च्या
दरम्यान इथे उत्खनन केल्यावर खूपच महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या. या
ठिकाणचे ऐतिहासिक महत्व असे आहे की काश्मीर खोऱ्यातील मानवाचा पहिला रहिवास
इथे सुरु झाला. इथल्या उत्खननात त्या मानवांच्या राहण्याच्या गुहा,
दफनविधी केल्यावरचे खड्डे, हाडे, मातीची भांडी आढळले आहे. इथल्या बऱ्याच
वस्तू या आता संग्रहालयात हलवल्या आहेत.
ही एकच गुहा तिथे दिसत होती. पण ती चारही बाजूने बंद केली होती.
त्यामुळे इथे नीट काही पाहता आले नाही. प्रतापसिंह वस्तुसंग्रहालयात या
गुहेचे मॉडेल पाहिले होते त्यामुळे प्रत्यक्षात हे ठिकाण पाहायची खूप इच्छा
होती. पण इथे माहितीचा फलक वगैरे काहीही नव्हते. तिथे असणाऱ्या माणसाला
विचारलं तर त्यानेही काही सांगितलं नाही. हे इथे असलेले स्टोनहेंज पहा,
एवढंच बोलून तो निघून गेला.
बुर्झाहोम स्टोनहेंज
वाटेत दिसलेला गुराखी
हाऊसबोटीत जायच्या आधी आम्हाला हरी पर्वतावरचा किल्ला पाहायचा होता पण अचानक कळलं की तो आज बंद आहे. मग बशीरला गाडी हजरतबल दर्ग्याकडे न्यायला सांगितली. तेवढ्यात यासिनचा फोन आला. उद्या पहलगामला निघायचं होतं, त्यासंबंधी बोलून झाल्यावर त्याने हजरतबलच्या जवळ असणाऱ्या मूनलाईट बेकरीमधून वॉलनट फज आठवणीने घ्यायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही ते घेतलं आणि खरंच काय चव होती त्याची!
हजरतबलची मशीद शाहजहानने बांधली आहे. याचे विशेष महत्त्व असे की इथे
मुस्लिम धर्मसंस्थापक मोहंमद पैगंबर यांचा एक केस जपून ठेवला आहे.
पैगंबरांच्या जन्मदिनी व इतर विशेष प्रसंगी तो केस भाविकांना दर्शनासाठी
प्रदर्शित केला जातो. त्यावेळेस मुस्लिम भाविकांची इथे गर्दी उसळते. २७
डिसेंबर १९६३ ला काश्मीर हादरवून टाकणारी घटना घडली. मशिदीतील पवित्र केस
गायब झाल्याचे आढळले आणि काश्मीरमध्ये दंगलीचा आगडोंब उसळला. सुदैवाने तो
केस परत सापडला आणि मग सारे शांत झाले. आम्ही गेलो होतो तेव्हा हजरतबल
दर्ग्याच्या आजूबाजूला आपल्या मंदिरांकडे असते तशीच गर्दी होती. चपला, बूट
काढून आत गेलो. इथेही डोकं झाकून घ्यायचं होतं आणि आतल्या भागात
स्त्रियांना प्रवेश नव्हता. थोडा वेळ बाहेरच्या गालिच्यावर बसून सर्वजण
बाहेर आलो.
हजरतबल मशीद
इथून पुढे गाडी निगीन सरोवराकडे वळवली. आम्ही गोल्डन फ्लॉवर हाऊसबोटीत राहणार होतो. दलपेक्षा निगीन अधिक शांत आणि रम्य आहे म्हणून आम्ही तिथे राहायचे ठरवले होते. हाऊसबोटीच्या मालकाला फोन केला, त्याने सरोवराच्या गेटजवळ यायला सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो तर शिकारेवाला आमची वाट पाहत होता. सर्व सामान शिकाऱ्यात भरून आम्ही हाऊसबोटीकडे निघालो. एकास एक लागून डुनु कुटूंबियांच्या तीन हाऊसबोटी होत्या. त्यांना हाऊसबोटींच्या व्यवसायात शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.
निगीन सरोवर
.......
गौहर नावाचा तरुण इथली सर्व व्यवस्था सांभाळत होता. आम्ही रूम्समध्ये सामान वगैरे ठेवून बाहेर येईपर्यंत प्रसादने गौहरशी गप्पा मारायला सुरुवात केली होती. इथलं काम सांभाळून गौहर काश्मीरच्या विविध भागात ट्रेक्सचे आयोजनही करतो. तो कामानिमित्त गोव्यात राहून गेला होता. एकंदरीत हे लोक भारताच्या दुसऱ्या भागात कायमस्वरूपी वास्तव्य करत नाहीत असं वाटलं. शांभवी लगेच गौहरबरोबर खेळायला लागली. तिने त्याचं 'गोलल' असं बारसं करून टाकलं. तो दिसला नाही की लगेच त्याला 'गोलल गोलल' अशा हाका मारत सुटायची. सासूबाई आणि मावशी दोघीही इथला थाट पाहून खुश झाल्या. आमच्या रूमच्या खिडकीमधून निळ्या पाकोळ्या आत बाहेर उडत होत्या. सकाळ झाली की बाहेर स्थलांतरित बदकंही पोहोताना दिसतील असं गौहर म्हणाला.
हाऊसबोटीचा सज्जा
.....
......
.......
सरोवराच्या अगदी आत राहिलात तरी विक्रेते काही तुमची पाठ सोडत नाहीत.
निशात बागेत जसे काश्मिरी ड्रेसवर फोटो काढून घेतले तसे इथे शिकाऱ्यात बसून
फोटो काढून देणारे येतात. गौहरने एका फोटोग्राफर काकांना बोलावले होते.
मला वाटलं की सासूबाई म्हणतील बागेत काढले ना फोटो! आता पुन्हा कशाला? पण
त्या तर भयानक उत्साही. जीवाचं काश्मीर करायचं त्यांनी ठरवलं होतं. लगेच
तयार झाल्या आणि मलाही फोटो काढायला त्यांनी शिकाऱ्यात ढकललं. हे काका पण
मस्तच होते. बंगलोरला फोटोग्राफी शिकले होते आणि त्यांनी काढलेले आमचे फोटो
निशात बागेत काढलेल्या फोटोंपेक्षा कितीतरी भारी आलेत. फोटो काढता काढता
छान गप्पा मारत होते. त्यांच्याकडचे ड्रेसही खूप जास्त सुंदर होते. "आता
इथल्या स्त्रिया घालतात का असे कपडे?" असं विचारल्यावर आपल्याकडचे एखादे
काका आजोबा म्हणतात ना आमच्या आईचा पदर कधी डोक्यावरून खाली घसरला नाही
तशाच टोनमध्ये काका सांगू लागले," मेरी दादी पेहनती थी ऐसे कपडे और गेहने.
आजकालकी लडकीया उन्हे तो बस जीन्स पेहनना अच्छा लगता हैं." फोटोसेशन
आटपल्यावर प्रसाद आणि मी काकांसोबत हाऊसबोटीच्या पायऱ्यांवर बसून मस्त
गप्पा मारत बसलो. गप्पांच्या नादात लक्ष नव्हतं मग अचानक मागे पाहिलं तर
काकांचा शिकारा एकटाच सफारीला निघाला होता. काका ओरडले आणि गौहर एक लांब
काठी घेऊन आला. काठीने शिकारा जवळ ओढून काका शिकाऱ्यात बसून आम्हाला टाटा
करून निघाले. तो गेल्यावर गौहर म्हणाला की आता सगळ्यांकडे कॅमेरा असल्याने
यांना रोज काम मिळेलच असं नसतं. पहिल्यापेक्षा त्यांचं उत्पन्न बरंच कमी
झालं आहे.
नंतर एक फुलांच्या बिया विकणारा शिकारेवाला आला. त्याच्याकडून मी काही कंद
घेतले. ते कंद घरी परत आल्यावर मी कुंडीत लावले तर तीन महिने तसेच होते.
आताच त्याला हिरवी पालवी फुटली आहे. कुठली फुलं येतात त्याची वाट पाहायची.
......
संध्याकाळ झाल्यावर एक जयपूरचं नवविवाहित जोडपं आमच्या हाऊसबोटीत राहायला आलं. बरे होते लोक तसे. पण आल्यापासून सारखी तक्रार तक्रार करत होते. फिरायला शिकारा असाच हवा तसाच हवा. पूर्ण संध्याकाळ ते रात्र त्या जोडप्यातली मुलगी त्यांच्या टूर कंपनीला कॉल करून ड्रायव्हरची तक्रार करत होती. ज्यावेळी तक्रार करत नसत तेव्हा तारक मेहता का उलटा चष्माचे एपिसोड मोठ्या आवाजात मोबाईलवर पाहत असत.
रात्री थंडी फार वाढली होती. हाऊसबोटीच्या सज्ज्यात बसून निगीन सरोवराचा रात्रीचा नजारा काही औरच दिसत होता. कपडे, दागिने आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या वस्तू घेऊन अजून काही विक्रेते बोटीवर आले. नातेवाईकांना द्यायला आम्ही काही भेटवस्तू घेतल्या. गौहरने तयार केलेले अप्रतिम जेवण जेवलो. हाऊसबोटीवर अजून एक दिवस मुक्काम वाढवायला हवा होता असं वाटत होतं.
निगिनची नाईटलाईफ
.....
......