ही
फेसबुक पोस्ट असती तर मी याची सुरूवात "लंडन मधल्या लॉर्ड्स क्रिकेट
ग्राउण्डला सगळेच लाइक करतात. पण त्याच शहरात असलेल्या या ओव्हल ला एक
लाइकतरी बनतोच" अशी केली असती. हे लंडनमधेच असलेले ओव्हल क्रिकेट ग्राउण्ड.
पूर्वी केनिंग्टन ओव्हल किंवा नुसतेच द ओव्हल म्हणत - आता अधिकृत नाव "
"किया ओव्हल". क्रिकेटप्रेमींच्या लंडन ट्रिपमधला टीआरपी लॉर्ड्स खेचून
घेते आणि हे तितकेच चांगले मैदान उपेक्षित राहते. मी लॉर्ड्स याआधीच पाहिले
आहे, त्याच्या टूरबद्दल काही वर्षांपूर्वी इथे लिहीलेही आहे.
पण लॉर्ड्स इतकीच याचीही परंपरा आहे - इंग्लंड मधली पहिली कसोटी इथेच
खेळली गेली, हे ही जवळजवळ तितकेच जुने आहे आणि हे ही सेण्ट्रल लंडनपासून
अंडरग्राउण्ड (ट्यूब)ने किंवा बसने जायला अगदी सोपे आहे. आणि लॉर्ड्सइतकेच
सुंदर आहे.
जाईन त्या ठिकाणी क्रिकेटसंबंधी काही असेल तर बघण्यात इंटरेस्ट असतोच. त्यामुळे हे ओव्हल क्रिकेट ग्राउण्डही पाहायचे होतेच. मागेही एकदा थेट ग्राउण्डवर जाउन चौकशी केली होती. पण त्या दिवशी ओव्हलची टूर नव्हती. यावेळेस आधीच चौकशी करून बुक करून ठेवली. क्रिकेटप्रेमी असाल व लंडनला गेलात तर टूर घ्या. आवडेल नक्की.
लहानपणीपासून क्रिकेट बघणार्यांना इंग्लंडची सहा फेमस ग्राउण्ड तोंडपाठ असतील - लॉर्ड्स - लंडन, हेडिंग्ले - लीड्स, ट्रेण्ट ब्रिज - नॉटिंगहॅम, एजबस्टन - बर्मिंगहॅम, ओल्ड ट्रॅफोर्ड - मँचेस्टर, आणि ओव्हल - लंडन. त्यातले हे सर्वात न-इंग्लिश मैदान. इंग्लिश ग्राउण्ड्स ही भरपूर स्विंग व थोडाफार बाउन्स असलेली आहेत. पण ओव्हल हे सहसा स्पिनला साथ देणारे समजले जाते (म्हणजे इंग्लिश कंडिशन्सच्या मानाने. ८०ज किंवा ९०ज मधल्या भारतीय मैदानांत पहिल्याच दिवशी बॉल गर्रकन वळायचा, इतके नव्हे). तसेच सहसा नेहमीच्या इंग्लिश सीझनमधे शेवटची मॅच ही ओव्हलवर असते. आजकाल हे इतके पाळले जात नाही पण इंग्लिश परंपरेनुसार तसे आहे.

टूरला फारशी गर्दी नव्हती. हे मैदान "सरे" या काउण्टीच्या संघाचे असल्याने
त्यांच्या कप्तानांचे फोटो तेथे लावले आहेत. पुरूष व महिला संघाच्या.
बाहेरच जी माहिती देतात त्यावरून कळाले की नाव जरी ओव्हल असले तरी हे मैदान
आता ओव्हल पेक्षा वर्तुळासारखेच जास्त आहे. लहानपणापासून असलेला एखादा समज
चुकीचा होता हे कळाल्यावर आता सगळेच समज पडताळून पाहायला हवेत असे
आपल्याला जसे वाटते तसेच काहीतरी वाटले हे ऐकून
क्रिकेट मधे ओव्हल आकाराची काही ग्राउण्ड्स फेमस आहेत - अॅडलेडचे ओव्हल,
त्रिनिदादचे क्वीन्स पार्क ओव्हल आणि न्यूझीलंडचे नवीन हॅगली ओव्हल. पण ही
सगळी खरोखरच त्या आकाराची आहेत. म्हणजे असावीत. आता ते ही चेक करायला
पाहिजे.
पण हे ग्राउण्ड जेथे बांधले तेथे ओव्हल आकाराचे रस्ते होते व मधे एक पार्क. तेथे घरे बांधणार होते पण काही कारणाने ते बारगळले व तेथे क्रिकेट ग्राउण्ड उभारायचे ठरले. या जागेची पारंपारिक मालकी ब्रिटिश राजघराण्याकडे असते. त्यामुळे सध्या प्रिन्स विल्यम तेथील मालक आहे (म्हणजे "डची ऑफ कॉर्नवॉल" ही ट्र्स्ट ही मालक. चालू राजाचा/राणीचा थोरला मुलगा ड्यूक ऑफ कॉर्नवॉल हे नामाभिधान लावतो व तो इथला मालक असतो (मुलगी असेल तर डचेस). यापेक्षा खोलात गेलो तर ग्राउण्ड बाजूला राहून आपण इंग्लिश राजघराण्यातली टायटल्स वगैरेमधेच हरवू. सध्या विल्यम हा "ड्यूक ऑफ कॉर्नवॉल" पण आहे आणि "प्रिन्स ऑफ वेल्स" पण. ही काय भानगड आहे हे कुतूहल असेल तर विकीवर शोधा). नुकतेच तेथे नवीन LED फ्लडलाइट्स बसवण्यात आले आहेत त्यांचा आकार प्रिन्स ऑफ वेल्स या टायटलचे तीन पिसांचे चिन्ह आहे त्याच्यासारखा बनवला आहे. या लिंकवरचा रात्रीचा ते लाइट्स ऑन असतानाचा फोटो पाहिलात तर लक्षात येईल - आणि इतर मैदानांवरच्या लाइट्सच्या तुलनेत त्याचे वेगळेपणही. तर सुरूवातीला त्या पार्कच्या जागेतच मैदान बनवण्यात आले व ते खरोखरच ओव्हल आकाराचे होते. पण नंतर त्यात बदल होत गेले व आता ते वर्तुळासारखे जास्त आहे.
समर मधे जेव्हा तेथे पाऊस नसतो व लख्ख उन असते तेव्हा हे मैदान अगदी सुरेख दिसते.
काहीकाही मैदानांची सहज ओळख पटेल अशा खुणा तेथे असतात. लॉर्ड्सची ती जुनी इमारत व आता दुसर्या बाजूला असलेले मिडिया सेण्टर यावरून ते मैदान लगेच ओळखता येते. काही वर्षांपूर्वी हेडिंग्ले की ओल्ड ट्रॅफोर्ड यापैकी एका ठिकाणी स्टॅण्ड्सच्या मागून गाड्या जाताना दिसत. आता बहुधा नवीन स्टॅण्ड्स बांधले असतील. पण ओव्हलच्या एका बाजूला तारांनी बांधल्यासारखे दिसणारे गोल आकाराचे "गॅस होल्डर्स" ही या मैदानाची अगदी प्रसिद्ध ओळखीची खूण आहे. ते ज्या काय कामाकरता बांधले होते त्याकरता वापरणे कधीच बंद झाले. पण या मैदानाची ती ओळख असल्याने ते तसेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला (असे वाचले). आता तेथे ते बांधकाम तसेच ठेवून त्याच्या आत फ्लॅट्स बांधत आहेत असे दिसले.

या मैदानावर तब्बल २८ खेळपट्ट्या आहेत. मॅचकरता त्यातील मधल्या खेळपट्ट्यांपैकी एक वापरली जाते. बाकीच्या प्रॅक्टिस विकेट्स.
१९७१ साली भारताने पहिल्यांदा इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमधे सिरीज जिंकली. त्यावेळच्या ओव्हलवरच्या मॅच मधे काही लोकांनी एक हत्तीचे पिल्लू मैदानावर आणले होते. बहुधा त्या दिवशी किंवा त्याच्या आसपास असलेल्या गणेश चतुर्थीशी त्याचा संबंध होता. इथे आणखी माहिती मिळेल. ही मॅच व सिरीज भारताने जिंकली त्यानंतरचे सेलिब्रेशनही प्रसिद्ध आहे. त्याशिवाय इतर काही इंटरेस्टिंग आठवणी आहेत - २००७ साली कुंबळेने मारलेले शतक, २०११ साली तेंडुलकरचे ९ धावांनी हुकलेले (व त्यानंतर ८-९ महिने लांबलेले) १०० वे शतक, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली मॅच आणि टेस्ट चॅम्पियनशिपची ऑस्ट्रेलियाबरोबर हरलेली फायनल. जुन्या मॅचेसमधे चौथ्या डावात ४३८ करायचे असताना गावसकरने मारलेले २२१ व फक्त ८ रन्स राहिलेले असताना अनिर्णित राहिलेली मॅच. लॉर्ड्सप्रमाणेच इथेही "ऑनर बोर्ड" आहे - शतके मारणारे व ५ पेक्षा जास्त विकेट्स घेणार्यांची नावे. आणि लॉर्ड्सप्रमाणेच इथेही त्यात सचिन तेंडुलकर नाही (मात्र इथे गावसकर आहे). कुंबळे आहे पण तो विकेट्सकरता नसून शतकाकरता आहे.
पण या मैदानावरचा एक प्रसिद्ध बोर्ड १८८२ सालचा "अॅशेस" या शब्दाचा उगम
दाखवतो. त्यावेळेस इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरूद्ध सिरीज हरल्यावर इंग्लिश
प्रेसने इंग्लिश क्रिकेटबद्दल जे लिहीले त्यावरचा फलक इथे लावलेला आहे.
इंग्लिश क्रिकेटची राख - अॅशेस- ऑस्ट्रेलियाला गेल्या असे तेव्हा त्यात
लिहीले गेले होते. तेव्हा नंतर पुढच्या कप्तानांनी त्या अॅशेस आपण जिंकून
आणू असे म्हणायला सुरूवात केली व ते नाव प्रचलित झाले. असा इतिहास तेथे
सांगितला जातो.
टूरच्या दिवशी बहुतांश मोकळे असलेले स्टॅण्ड्स (आणि खाण्याचे स्टॉल्स) लौकरच असलेल्या भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळेस तुडुंब भरतील असे टूर गाइडने सांगितले आणि आज तसेच चित्र दिसले. पूर्वीच्या मॅचेससचे हायलाइट्स पाहताना कोणत्यातरी एखाद्या कोपर्यात सूट्/कोट घालून आलेले जेमतेम ५०-६० भारतीय प्रेक्षक दिसत. त्यांनी चीयर करावे असे फार काही आपले लोक मैदानातही करत नसत. आता हे चित्र पूर्ण पालटले आहे. जगातील कोणत्याही क्रिकेट ग्राउण्डवर अगदी सहज उठून दिसणारे, खूप आवाज करणारे भारतीय प्रेक्षक खूप संख्येने दिसतात. पूर्वीच्या (२००० च्या आधीच्या) तुलनेत आपली मैदानातही कामगिरी चांगली होतेच. पण केसरी, वीणा किंवा अशा अनेक टूर्समधून प्रचंड संख्येने प्रवास करणारे असंख्य लोक या मैदानांना सुद्धा भेटी देतात. लॉर्ड्सच्या टूरचा प्रमुख कस्टमर हा भारतीय आहे हे तेथीलच एका स्टाफने आम्हाला सांगितले होते. यावेळेस तेथे गेलो तेव्हा एका गेटच्या बाजूला एका देशी टूर कंपनीने तेथे फूटपाथवरच टेबलवर बुफे लावला होता व देसी पब्लिक तेथे साग्रसंगीत जेवत होते. हे जरा अवांतर झाले पण गेल्या काही वर्षांत हे बदल अगदी सहज जाणवतात.
आजच्या भारत-इंग्लंड सामन्याची वेळ साधून ही या थोड्याफार उपेक्षित पण दिसायला सुंदर मैदानाची ही एक ओळख!
आमचं मुंबई हायकोर्टासमोरचं ' ओव्हल ' पण खासच, नांवाला शोभेल अशा आकाराचं ! >> डबल डेकर च्या वरच्या डेक मधून परफेक्ट ओव्हल आकार दिसतो. हायकोर्ट साइडला कडेने उभी असलेली नारळाची झाडं, त्यामागे राजाबाई टॉवर आणि विरूद्ध बाजूच्या आर्ट डेको इमारती... पावसाळ्यात तर फारच सुंदर दिसत.
अश्याच एका भारत पाक सामन्याच्या वेळी भरलेले मैदान... फोटो मुलाने काढलेला आहे. तो सामना भारत जिंकला होता.
लॉर्ड्सची जादू!
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा. इंग्लिश संघ तेवढा भारी राहिला नाही आणि गेल्या दशकात भारतीय संघ व बोर्ड सर्वात बलाढ्य झाले. १९९६ मधे शतक मारल्यावर रिची बेनॉला मुलाखत देताना अत्यंत बुजरा असलेला गांगुली २००२ मधे नेटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यावर तेथील व्हिझिटर्स गॅलरी मधे काहीतरी "एमसीसीच्या कामकाजातून वगळावे लागले असतील असे" शब्द उच्चारत स्वतःचा शर्ट गरागरा फिरवत नाचला तेव्हा हा बदल सर्वात जास्त जाणवला.
पण तरीही लॉर्ड्सचे आकर्षण तसेच राहिले. मागच्या वीस पंचवीस वर्षातील बर्याच इमेजेस समोर येतात.. ८३ चा विजय, ८६ मधे वेंगसरकरने तेथील शतकाची केलेली हॅटट्रिक, ९० मधे गूचच्या त्रिशतकानंतर अझर चे सुंदर शतक व फॉलोऑन टाळायला २४ रन्स व दुसर्या बाजूला फक्त हिरवानी बाकी असताना कपिल ने मारलेल्या चार सिक्स, मग ९६ सालचे गांगुलीचे झालेले व द्रविडचे हुकलेले शतक हे भारतच्या मॅचेसमधले व मॅग्राथच्या २००५ मधल्या पहिल्या पाच विकेट्स यासारख्या इतरांच्याही.
त्यामुळे लंडनला फिरायला जायचे म्हंटल्यावर पहिल्यांदा तेथील टूरची माहिती काढून घेतली. तेथे गेल्यावर आपण प्रभावित होतो ते तेथील याच इतिहासामुळे. तसे ग्राउंड फार मोठे नाही. पण तेथे आहे ती परंपरा व इतिहास. डब्ल्यू जी ग्रेस पासून सचिन तेंडुलकर पर्यंत असंख्य नवे जुने खेळाडू ज्या दारातून पॅव्हिलियन मधे जायचे/जातात तेथून आत जाताना आपल्याला काहीतरी वेगळे वाटतेच.
टूरमधे तो गाईड बरेच मजेदार, माहितीपूर्ण किस्से सांगतो. तेथील ड्रेसिंग रूम्स मधे तेथे शतक झळकवणार्यांची नावे लिहीलेली आहेत त्यात असलेले अजित आगरकरचे नाव तो आवर्जून दाखवतो, तसेच सचिन, गावसकर, लारा, पॉण्टिंग ही नावे तेथे नाहीत हे ही दाखवतो (पुढच्या चार-पाच दिवसात सचिनचे लागावे). तेथे कसे कोणालाही सोडत नाहीत, अमुक/तमुक करू देत नाहीत वगैरे "आम्ही किती कडक आहोत" ची कौतुकेही अधूनमधून असतात. पण तरीही धमाल येते.
अॅशेसबद्दल बरेच असते त्यात पण इतरही खूप माहिती देतात. गाईड हलकेफुलके बोलून वातावरण जास्त गंभीर होउ देत नाहीत. स्टेडियम मधली ठराविक महत्त्वाची ठिकाणे, होम टीम व व्हिजिटर टीम ची ड्रेसिंग रूम्स, पॅव्हिलियन्स, लॉर्ड्सची ती प्रसिद्ध "लॉन्ग रूम" दाखवतात, पण या ठिकाणी फोटो काढू देत नाहीत. बाकी मग प्रेक्षकांच्या भागातून फिरताना फोटो काढता येतात. तसेच त्या मीडिया सेंटरमधे ही.
लंडनला जायचे म्हंटल्यावर बघण्याच्या लिस्टमधे लॉर्डस पहिले टाकलेच होते. तेथे टूर असते असे कळाले होते पण गर्दीमुळे बुकिंग केलेले बरे असेही कळाले. पण प्रत्यक्षात तेवढी गरज लागली नाही. सकाळी लौकर हॉटेल मधून निघून जवळच्या "बेकर स्ट्रीट" स्टेशन वर उतरलो आणि तेथून ट्यूब (अंडरग्राउंड) ची लाईन बदलून सेंट जॉन्स वूड येथे जायचे होते. पण ती लाईन नेमकी बंद होती (वीकेण्डला लंडन मधे ट्यूबच्या काही लाईन्स बर्याच वेळा मेन्टेनन्स साठी बंद असतात, त्याची माहिती त्यांच्या वेब साईटवर आणि स्टेशन्स मधे व्यवस्थित दिलेली असते). एकच स्टेशन एवढे अंतर होते, पर्यायी बसही होती. पण तेथील लोक म्हणाले पाचच मिनीट अंतर आहे, जा चालतच. म्हणून निघालो, पण प्रत्यक्षात अंतर बरेच निघाले. आणि त्याच रस्त्यावर बसेस असूनही घेतल्या नाहीत कारण किती पुढे जायचे आहे हेच माहीत नव्हते.
शेवटी १० च्या सुमारास पोहोचलो. आता कोणत्या गेटने जायचे, ते तेथे एक दोघांना विचारून नॉर्थ गेटने गेलो तर तेथील टीपिकल सरकारी माणूस म्हणाला तुम्हाला दुसर्या गेटने जावे लागेल. "जरा आतून जाऊ द्या" वगैरे म्हणून बघितले पण त्याच्या चेहर्यावर "आम्ही कॅमेरून साहेबांना सुद्धा येथून सोडत नाही" भाव बघून निमूटपणे त्या दुसर्या गेटवर गेलो. सव्वादहा झालेले. आम्हाला वाटले आता टूर डेस्कवरचा माणूस ब्रिटिश वक्तशीरपणा, परंपरा वगैरेवर एक लेक्चर देऊन पुढच्या टूरला यायला सांगणार पण तो बराच फ्रेंडली निघाला. थोडाफार उशीर तेथे चक्क चालतो. आम्ही तिकीट काढणारच होतो पण तरीही आडमुठेपणा करतील असे वाटले होते तसे झाले नाही.
जेव्हा मॅच चालू असते तेव्हा ही टूर नसते. तेव्हा तुम्ही जाणार असाल तर खात्री करून जा.
कपिल ने घेतलेला रिचर्ड्सचा तो प्रसिद्ध कॅच तेथे नक्की कोठे घेतला होता हे विचारायचे विसरलो, पण व्हिजिटर्स गॅलरीत उभे राहिल्यावर गांगुलीने शर्ट येथेच फिरवला होता ना हे विचारल्यावर "येथे येणारा प्रत्येक भारतीय ते विचारतो" हे त्याने सांगितले. पण तेथे उभे राहिल्यावर त्याचे महत्त्व जाणवते. आधीचे आपले खेळाडू तेथील संकेतांचा भंग होईल असे वागण्याची शक्यताच नव्हती. आधीच्या बर्याच पिढ्यांवर ते त्यांनी आपल्यावर राज्य केल्याचे बॅगेज होते, अधूनमधून त्यांच्या विरूध्द चांगले खेळताना सुद्धा चुकून एकदा जमून गेल्याचेच फिलिंग येत असे. त्यात ते एमसीसीचे जाणकार, इन्फ्लुएन्शिअल मेम्बर्स प्रचंड संख्येने आजूबाजूला बसलेले असतात. तसेच ब्रिटिश मिनिस्टर्स वगैरेही तेथे मॅच च्या वेळेस येत असणार. अशा वेळेस बहुतेक भारतीय खेळाडूंची मानसिकता त्या लोकांचा रोष ओढवेल असे काही करण्याची नसायची. नेटवेस्ट ट्रॉफी भारताने जिंकली तेव्हा आधीच्या वर्षी मुंबईत फ्लिंटॉफने फिरवलेला शर्ट गांगुलीच्या डोक्यात असावा. पण तरीही "तुम्ही आमच्याकडे असे वागलात तर आम्हीही तुमच्याकडे असेच वागू" दाखवायला जबरी हिंमत लागली असणार.
तसेच महत्त्व वाटते ते गावसकर ने नाकारलेल्या एमसीसीच्या मेम्बरशिपचे. सध्याच्या काळात एखाद्याने नाकारली तर त्याचे विशेष काही वाटणार नाही. पण ही गोष्ट आहे साधारण ८७-८८ च्या वेळची. टूरच्या वेळेस तो गाईडच सांगतो की ती मेम्बरशिप एवढी अवघड आहे की एखादा माणूस कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रचंड पैसे खर्च करून मेम्बरशिप साठी अर्ज करतो आणि त्याच्या मुलाच्या लग्नाच्या सुमारास त्याला एमसीसी कडून पहिले उत्तर येते. वीस बावीस वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सगळी सूत्रे त्यांच्याकडे असताना गावसकर ने ते नाकारण्याचेही तेवढेच महत्त्व आहे. आपल्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांच्या विरूद्ध असे फार क्वचित केले जाते.
टूर संपल्यावर आपल्याला तेथील स्टोअर मधे जाऊन लॉर्ड्सचा लोगो असलेल्या गोष्टी घेता येतात. तसेच तेथील म्युझियम मधे फिरता येते. तेथे असलेल्या एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले...भारताने जिंकलेला १९८३ चा प्रुडेन्शियल कप!
"१९८३ चा प्रुडेन्शियल कप आमच्या म्युझियम मधे आहे. तो येथे कसा? भारताने कधी तो मागितलाच नाही. तेव्हाच्या लॉर्ड्सच्या लोकांना ठामपणे वाटते की भारतीय संघ तो मागायचेच विसरला"
लॉर्ड्सच्या टूरचा गाईड आम्हाला सांगत होता. टूरनंतर तेथील संग्रहालयात नीट ठेवलेला तो कप पाहिला, कपिलच्या हातात तो उंचावलेला कप इतकी वर्षे फोटोत बघितला होता. प्रत्यक्ष बघताना जबरी वाटते. पण तो अजूनही भारतात का नाही हे मात्र समजत नाही.
हा ग्राउंडचा फोटो. यात दिसते ती तेथील पॅव्हिलियनची बिल्डिंग व
आपल्याकडून बघताना उजवीकडे दिसते ती पांढरी पाहुण्या संघाची गॅलरी. आपला
संघ तेथे नेहमी दिसतो मॅच च्या दिवशी. खाली पिच झाकण्यासाठी ते कव्हर
वापरतात ते म्हणजे एक "हॉवरक्रॉफ्ट" आहे.
हे स्टेडियम. अत्यंत स्वच्छ वगैरे सांगायलाच नको. या बाजूने त्या मीडिया
सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे.
त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया
सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो.
हे मीडिया सेंटरमधून दिसणारे ग्राउंड.
हे "नर्सरी ग्राउंड". मुख्य मैदानाच्या बाजूला आहे. येथे सराव केला जातो. मॅचच्या दिवशी येथे बरेच खेळाडू असतात.
>> या बाजूने त्या मीडिया सेन्टरच्या पुढच्या बाजूला उतार आहे. दोन्ही बाजूंमधे ८ फुटांचा फरक आहे. त्यामुळे पॅव्हिलियन च्या बाजूने बोलिंग करणे व नर्सरी एण्ड (मीडिया सेन्टर) च्या बाजूने करणे यात फरक पडतो.
माझ्यामते ग्राऊंडचा स्लोप विकेटच्या डिरेक्शन मध्ये नाहीये, 'अक्रॉस द विकेट' आहे ?!? त्यामुळे पॅव्हेलिअन एण्डकडून चेंडू आपणच इन्स्विंग (उजव्या फलंदाजास) होतो.
कपिलने कॅच घेतला रिचर्ड्सचा तेव्हा मदनलाल नर्सरी एण्डकडून बोलिंग टाकत होता. डीप मिडविकेट/काऊ कॉर्नर ला तो कॅच घेतला ती जागा ग्रॅण्डस्टॅण्डच्या डाव्या बाजूला.. खाली चित्रात लाल रंगाने दाखवल्याप्रमाणे!

लॉर्ड्सच्या इतक्या वार्या करून झाल्यात की कानाकोपरा ठाऊक असल्यासारखं वाटतं आता
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.