Wednesday, February 25, 2026

कुमाऊँमधील रम्य भटकंती

भाग १: प्रस्तावना
 नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता.

तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद! ट्रेकिंग आणि त्याच्यासोबत आकाशदर्शन, तेही अतिशय कडक थंडीमध्ये! थोडावेळसुद्धा उघड्या ठिकाणी बाहेर जाऊन बघणं किंवा अंगणामध्ये जाऊन आकाश दर्शन करणं अतिशय कठीण होतं! पण हा सगळा अनुभव ह्यावेळेस घेता आला.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका लग्नाच्या निमित्ताने पिथौरागढ़ला जाणं झालं. पुढे काही दिवस तिबेट सीमेपासून साधारण शंभर किलोमीटर अलीकडे मुन्सियारी म्हणून एक एक गाव आहे. त्या गावामध्ये थांबून ट्रेकिंग आणि आकाशदर्शन करायचं असं ठरवलं. तिथे इतकी कडक थंडी असते ह्या दिवसांमध्ये! मागच्या वेळेचा अनुभव होता की आपण अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे आपण मोकळ्या जागेमध्ये पाच मिनिटंसुद्धा थांबू शकत नाही! इतकी थंडी असते. अक्षरशः दोन-तीन अंश तपमान असतं. जवळच सगळा हिमालय आणि थंड प्रदेश असल्यामुळे वारे पण खूप गार असतात. त्याच्यामुळे किती वेळ प्रत्यक्ष आकाश दर्शन करता येईल ही शंका होती. तासांमध्ये करता येईल का मिनिटांमध्ये करता येईल इथपासून शंका होती. पण आकाश दर्शनसुद्धा मनासारखं करता आलं. खूप सुंदर आकाश बघता आलं! त्याला जोडून ट्रेकिंग सुद्धा करता आलं.


.

.

.

ह्या प्रवासाची सुरुवात १ डिसेंबरला झाली. मुंबई ते बरेली असा प्रवास ट्रेनने केला आणि बरेली मधून पुढे टणकपूरला बसने गेलो. उत्तर प्रदेश थोडासा बघितला. उत्तर प्रदेशातले कमालीचे धूळ असलेले रस्ते बघितले! बरेलीच्या जवळ एका ठिकाणी शेतामध्ये असलेला बिबट्यासुद्धा बघायला मिळाला होता! असा हा सगळा प्रवास झाला. टणकपूरला पुढची बस घेण्याच्या आधी रात्री एका छोट्या बस स्टॉपवर थांबावं लागलं. तेव्हापासून थंडीचा कहर सुरू झाला! आणि थंडीची तयारी किती कमी होती, ते मला लक्षात आलं. अक्षरशः एक एक मिनिट जात नव्हता आणि पुढची माझी बस जी होती ती मध्यरात्री तीनची होती. कारण पहाड़ी भागामध्ये रात्री बस कमी प्रवास करतात. पहाटे बस निघतात. टणकपूरची विलक्षण थंडी अनुभवली. मग पहाटे तीन वाजता बस निघाली.

टणकपूर उत्तर प्रदेश- उत्तराखंडच्या सीमेजवळ आहे. नेपाळला अगदी लागून आणि कालीगंगा नदीजवळ आहे. पुढे चंपावत- लोहाघाटमार्गे पिथौरागढ़चा प्रवास झाला. सकाळी साडेआठला तिथे पोहोचलो. पण रात्रीचा प्रवास थरारक होता! त्या घाटाच्या रस्त्यावर बस टर्न करायलासुद्धा फार कमी जागा असतात. अतिशय विलक्षण अशा या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली.


.

.

आठ दिवस मी उत्तराखंडमध्ये होतो. त्या दिवसांमध्ये फिरता आलं आणि ट्रेकिंग करता आलं. जिथे जिथे जाऊ शकलो खूप विलक्षण वाटत होतं. सतत मी किती भाग्यवान आहे हीच जाणीव व्हावी, असा हा प्रवास होता. हा सगळा प्रवास व त्यातले अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे.

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 डिसेंबर 2025.

समाजजीवनमानआस्वादलेख

प्रतिक्रिया

वाचतोय. फोटो आवडले. भाग्यवान आहात, सावकाशपणे सर्व पाहात आहात.

आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली.

IMG_7853

IMG_20190427_113916_487

भाग २: पिथौरागढ़ भ्रमंती

३ डिसेंबरची‌ सकाळ! कालची रात्र उघड्या बस स्टॉपवर थंडीत काढल्यानंतरचा पहाटेचा अंधारातला घाटाचा प्रवास! ही रात्र संपणारच नाहीय असं वाटत होतं. पण चक्क रात्र लवकर गेली. डुलकी लागली आणि तास गेलेले कळालं नाही. टाईम लॅप्स फोटोग्राफीमध्ये जसे काही तासांचे काही सेकंद होतात, तशीच रात्र भरभर गेल्यासारखी वाटली! टनकपूरवरून तीनला निघालेली बस साडेपाचला चंपावतला चहासाठी थांबली तेव्हा पहाट झाल्याचं दिसलं! सर्वदूर उंच पर्वत! वळणा वळणांचा रस्ता! डोंगरात थोडी थोडी घरं आणि उतारावरची‌ शेती! "बीआरओ" च्या हिरक परियोजनेच्या अंतर्गत हा रस्ता येतो. नंतर लोहाघाट, गुरना मार्गे पिथौरागढ़! रस्ता कुठे बंद नाहीय आणि ट्रॅफिक जामही नाहीय. त्यामुळे तसं लवकरच म्हणजे साडेआठला पिथौरागढ़ला पोहचलो.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

लग्नाकरता येणा-या नातेवाईकांसाठीच्या हॉटेलमध्ये जायचं आहे. पिथौरागढ़! साधारण १६०० मीटर उंचीवर वसलेलं शहर. दूरवर हिमशिखरं दिसत आहेत! कोवळ्या ऊन्हाचा आनंद घेत रस्ता विचारत निघालो. काही मुलं सोबतीला आली. त्यांनी शॉर्ट कट असलेल्या पायवाटा (पगडंडी) दाखवल्या. पहाड़ी लोक खरंच खूप वेगळे आहेत. त्यांच्यासोबत छोटा पण मस्त वॉक झाला. नंतर बायकोच्या बाजूचे नातेवाईक भेटले. गप्पा- गोष्टी झाल्या. लग्नासाठी आलेल्यांच्या भेटी झाल्या. नंतर भरपूर आरामही झाला.

डिसेंबर महिना असल्यामुळे इथे सूर्यास्त लवकर होतो. साडेपाचनंतर लगेच अंधार होतो! आणि दुपारी कमी असलेली थंडी लगेच फणा काढते! पिथौरागढ़च्या हॉटेलच्या गच्चीतून आकाश बघितलं. शहराचे दिवे बरेच आहेत आणि चंद्रही पोर्णिमेजवळ आहे. त्यामुळे चांगल्या स्वच्छ आकाशासाठी अजून वाट बघावी लागेल.


.

.

.

रात्री चांगला आराम झाल्यावर दुस-या दिवशी ४ डिसेंबरला चंडाक हिलकडे जायला निघालो. लग्नाचे विधी दुपारनंतर आहेत. त्यामुळे सकाळी १० पर्यंत मोकळा वेळ आहे. हॉटेलपासून चंडाक हिल साधारण साडेसात किलोमीटर येतं. गावातला मुख्य रस्ता माहिती आहे. त्यामुळे सहजपणे निघालो. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेतले आणि पुढे निघालो. हळु हळु घरं, दुकानं, सरकारी कार्यालयं मागे पडली आणि डोंगर सुरू झाला. दूरवरचे नजारेही सुरू झाले! अहा हा! हिमालयाच्या भव्यतेचा अनुभव देणारा हा परिसर! सकाळचे फिरायला आलेले तुरळक लोक सोडले तर निर्जन असा घाटाचा रस्ता! बाजूला डोंगरात व खाली छोटी गावं! सुंदर भ्रमंती‌ झाली. पूर्ण डोंगर चढल्यावर दूरवर अनेक हिमशिखरं नजरेच्या कक्षेत आली! त्याशिवाय दूरवरच्या डोंगरातले नागमोडी रस्ते आणि गावंही दिसत आहेत. एका ठिकाणी देवदार झाडांमध्ये जाणारी सुंदर पायवाट आहे! अहा हा! अवर्णनीय अनुभव! मनसोक्त फिरलो. थंडी इतकी कडक की, पूर्ण १५ किलोमीटर झाले तरी एक थेंबही घाम आला नाही आणि अजिबात तहानही लागली नाही! फक्त स्वेटर काढता आलं इतकंच. परतीच्या मार्गावर परत चहाचा ब्रेक घेतला आणि हॉटेलवर पोहचलो. बरेलीमधल्या "सॅटेलाईट" बसस्टँडनंतर इथे "उल्का माता मंदिर" आणि "अंतरिक्ष बंगलासुद्धा" बघायला मिळाला!

दुपारनंतर हळु हळु लग्नाचे विधी सुरू झाले. हिमालयात तरी डीजेचा त्रास नसावा अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. अर्थात् दिल्लीसारख्या ठिकाणी होतो तितका त्रास नव्हता. लग्नामध्ये बँड वाजवणारे लोक मस्त सजून आले आहेत. पारंपारिक वाद्य आणि पहाड़ी संगीत! वरात मुलीकडच्या मंगल कार्यालयात गेल्यानंतरच दुपारचं जेवण झालं. इथल्या संगीताची शैली आणि वरातीतल्या लोकांचा पोशाख काहीसा तिबेटी बौद्ध पद्धतीचा वाटला. ऊन असेपर्यंत थंडी वाट बघत थांबलीय! लग्नाचे उरलेले विधी नंतर आहेत आणि ते खूप वेळ चालू राहतील. त्यामुळे आम्ही काही जण संध्याकाळी पिथौरागढ़वरून सत्गढ़ ह्या गावाला जायला निघालो.


.

.

सत्गढ़! पिथौरागढ़पासून २० किलोमीटर अंतरावर पण अगदी डोंगरात वसलेलं‌ हिमालयातलं पहाड़ी गांव! मागच्या वेळी इथलं आकाश अ वि श्व स नी य होतं! दरीमध्ये असलेली गावं अंधारात बुडाली आहेत! हळु हळु संधीप्रकाश जातोय. अंधारातच सत्गढ़ला पोहचलो! इथे जाताना आता कच्चा रस्ता झालाय. पण सुदैवाने आम्ही अशा जागी उतरलो जिथून मस्त पायवाटेने जावं लागेल. तीव्र चढाची पण छोटी सात मिनिटांची पायवाट! एक सुंदर ट्रेक. चला, निदान पायी चालताना तरी थंडीपासून सुटका मिळतेय! पण कसलं काय! जेमतेम चालत असेपर्यंत आणि पाच एक मिनिट गरम वाटलं. नंतर लगेच थंडीचा कडाका सुरू! आकाश दर्शन करणं खरंच सोपं नाहीय! थंडी भयाण होतेय! आकाशात थोडे ढग आहेत! कुठे कुठे अंधुक तारे दिसत आहेत. पण चंद्राचं तेज आकाशात पसरलंय! समोर डोंगरात ध्वज मंदिरातला दिवा चमकतोय! हिमालय! वा!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जानेवारी 2026.


भाग ३: सत्गढ़- हिमालयाच्या कुशीतलं गाव

✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन

✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं!
✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग
✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं
✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!"

सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत. सिंह रास- मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी दिसत आहेत. फोटोग्राफीसाठी मोबाईल सेट करून ठेवला. हात थड थड कापत आहेत. पण अहा! काय रम्य पहाट! हळु हळु पक्ष्यांचं कूजन सुरू झालं!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

सत्गड़! १९०० मीटर उंचीवरचं गाव. इथे जानेवारीनंतर बर्फ पडतो. आत्ताही भयाण थंडी आहे. इतकी थंडी की, तोंड धुणं- चूळ भरणंही नकोसं वाटावं! उजाडल्यानंतर चहा घेतला. इथे चहा हा पिण्याहून खूप मोठा अनुभव आहे! आधी हात गरम करायचे. नंतर चेह-यावर वाफ घ्यायची! आणि मग हळु हळु चहा घ्यायचा. असा पहिला राउंड! दिवसभरात किमान दोन आकडी राउंडस नक्की होतात! नंतर सहज तपमान बघितलं तर दिसलं की, सकाळी आठ वाजताचं सत्गड़मधलं तपमान १ अंश सेल्सियस आहे! म्हणजे पहाटे अजून कमी असणार! व्वा! तासभर तरी आकाश दर्शन करता आल्याचा आनंद झाला.

थोडा दिवस वर आल्यावर आणि दुसरा चहा व नाश्ता झाल्यावर फिरायला बाहेर पडलो. इकडे कुठेही गेलो तरी रम्य परिसर! नव्याने झालेला जीपचा कच्चा रस्ता बघत बघत त्या दिशेने बाहेर पडलो. डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, दूरवर वर आलेला सूर्य आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! अहा हा! आणि फुलं- झाडं तर खूप सुंदर. पुढे मोकळ्या जागेमधून दूरवरची दृश्य समोर आली‌ आणि सकाळच्या केशरी ऊन्हात चमकणारे हिम शिखरही दिसले! व्वा! कच्च्या रस्त्याने खाली उतरून धारचुला हायवेला आलो. मनसोक्त पायपीट केली. मन भरणार नाही हे माहिती असूनही फोटो घेतले.


.

.

.

.

.

मुलीसोबत अजिंठा- वेरुळ- देवगिरी फिरलो होतो तेव्हा ती म्हणाली होती, अरे हा तर खारूताईंचा जिल्हा आहे! जिथे तिथे खारूताई! तिच्या हातावरसुद्धा खारूताई आली होती तेव्हा. तसा हा पिथौरागढ़ जिल्हा मला तिच्या लाडक्या ब्याऊंचा जिल्हा वाटतोय! तिच्या ऍलेक्ससारखेच ऍलेक्स सगळीकडे दिसत आहेत! तासभरात पाच किलोमीटर फिरलो आणि परत नातेवाईकांच्या घरी आलो. दिवसा समोरचा ध्वज मंदिराचा डोंगर, शेती, जंगल काय दिसतंय! कोवळं ऊन आणि चहा!

दिवसभरात गप्पा, चहा, आराम आणि निसर्गाला न्याहाळण्याचा क्रम सुरू राहिला. इथे दिवस तसा छोटा आहे. समोरच डोंगर आहेत, त्यामुळे सूर्य एक तास उशीरा प्रकट होतो आणि दुपारी तीननंतर परत डोंगराआड जातो! दुपारच्या वेळीच ती थंडी थोडी कमी वाटते. लोक दुपारी बाहेरची कामं करतात. गुरांचा संभाळ, जंगलाजवळून गवत डोक्यावरून आणणं, काही घराची कामं असं करतात. चार वर्षांपूर्वी इथे नेटवर्क खूप विरळ होतं. आता अगदी जोरात आहे. गावात घरांची कामंही सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी पिथौरागढ़मध्येही गूगल पे चालत नव्हतं. आता सत्गड़मध्येही चालतंय!

दुपारी ध्वज मंदिराला जायचं होतं. पण माझ्या भाच्याला जमलं नाही. म्हणून नंतर माझ्या साडू- भाऊंबरोबर सत्गड़च्याच वरच्या भागात थोडा ट्रेक केला. डोंगर चढून वर गेलं की एक मैदान आहे. हनुमानाचं मंदिर आहे. तिथे मोकळ्या जागेतून विलक्षण नजारा दिसला! पंचाचुली शिखरं, ॐ पर्वत आणि इतर शिखरं खूप छान दिसत आहेत. बायनॅक्युलरमधून अजून छान दिसली आणि फोटोही घेता आले. अंधार पडायच्या आत तिथून परत यायला निघालो. येताना एक थरारक प्रसंग झाला!

आम्ही वेगाने शेतांमधून खाली उतरत घराकडे येत होतो. साडू भाऊंचं घर सत्गडमधलं जवळ जवळ सगळ्यांत वरचंच घर. पुढे लगेच जंगल व डोंगर सुरू होतो. घरापासून जेमतेम ३०० मीटर अलीकडे असताना साडू भाऊ एकदम थांबले आणि मला हाताला धरून धावायला लागले. त्यांनी हळु आवाजात मला सांगितलं, "शेर! देखो वहाँ खड़ा है!" खाली शेतात आणि घराच्या अगदी वर १०० मीटर अंतरावर खराच एक काळपट पिवळा मोठा प्राणी दिसत होता. आणि तो स्थिर होता. आम्हांला बघूनही पळाला नाही. ते पुढे म्हणाले की, कोल्हा असता तर पळून गेला असता. पण हा स्थिर उभा आहे, म्हणजेच तो वाघ आहे! आणि इथे तसे वाघ व इतर प्राणी काही नवीन नाहीत! अंधार पडल्यामुळे फोटो घेता आला नाही किंवा बायनॅक्युलरनेही बघता आलं नाही. दोन मिनिटांत तो हललेला दिसला व नंतर झाडीत दिसेनासा झाला! आम्ही नंतर लांबच्या वाटेने खाली उतरलो. साडू भाऊंच्या नजरेतून जाणवत होतं की, तो कोल्हा नव्हता!

घरी पोहचलो, चहा घेतला आणि रात्रच झाली! अगदी साडेपाच वाजता पूर्ण अंधार आहे आणि तारे दिसत आहेत! थंडी सहन होईल तितका वेळ म्हणजे अर्धा- पाऊण तास दुर्बीण सेट करून आकाश दर्शन केलं. नंतर मग मोबाईल फोटोग्राफी सुरू केली. इथे रात्री साडे- सहा- सातपर्यंत नीजानीज होते! संध्याकाळी उद्याचा कार्यक्रम ठरवला. उद्या सकाळी लवकर मुन्स्यारीला जायला निघेन. खाली रोडवरूनच थेट जाणारी जीप मिळेल. सत्गड़- कनालीछीना- जौलजिबी- मदकोट अशा रस्त्याने जायला मिळेल. बारा वर्षांपूर्वी उत्तराखंड मदत कार्यामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा ह्याच गावांमध्ये फिरलो होतो. उद्या परत तिथे जायला मिळणार! कडक थंडीमुळे घेतलेल्या रजाई- पांघरुणासोबतच्या उत्सुकतेसह निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 7 जानेवारी 2026.


भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास
✪ गोरी गंगेच्या तीरावर!
✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी
✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव
✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक
✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय!

६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच. वळणा वळणाचा रस्ता! उलटीची भिती नको म्हणून पोहचेपर्यंत काहीच खायचं नाही असं ठरवलं. टनकपूर- पिथौरागढ़ प्रवासातही उपास केला होता. त्याचा उपयोग होतो, असा माझा अनुभव होता.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)

पिथौरागढ़- धारचुला हायवेने जीप निघाली! कनालीछीना, मेर्थी, ओगला, जौलजिबी अशी गावं तशी ओळखीचीच. अनेक वेळेस इथे येणं झालं आहे. कडक थंडीमुळे बंद असलेल्या काचांमधूनही बाहेरचा विराट नजारा जाणवतोय! कालीगंगेच्या पलीकडे नेपाळ! जौलजिबीला गोरीगंगा नदीचा पूल ओलांडून गाडीने डावा रस्ता घेतला. इथून पुढेच ती गावं होती. घरूडी, मनकोट, लुमती, चामी अशी जिथे २०१३ च्या पूरानंतर मदत कार्यासाठी मैत्री संस्थेच्या टीमसोबत काही‌ दिवस काम करता आलं होतं. फार वेगळा अनुभव होता तो. एका टप्प्यावर तर एक रौरावता धबधबा केवळ एका फळीसारख्या पुलावरून ओलांडावा लागला आणि मदत कार्यासाठी येऊन मीच इथे अडकतो की काय, असं वाटलं‌ होतं. तेव्हाचे त्या गावांमधले प्रवास, अनेक ठिकाणी झालेली शिबिरं आणि रेशन वाटप आणि पुढे अनेक ठिकाणी धबधब्यांमध्ये वाहणारी नदी ओलांडून केलेले प्रवास! खूप विलक्षण अनुभव होते. अनेक गावांमध्ये नद्यांनी मोठा विध्वंस केला होता. खूप नुकसान झालं होतं. मैत्रीतल्या अनेक जणांनी तर अनेक महिने इथे काम केलं होतं. आता अगदी वेगळ्या निमित्ताने माझं त्याच रस्त्यावरून जाणं होतंय! त्या सगळ्या आठवणी मनात दाटून येत आहेत.


.

.

.

.

जौलजिबी मागे पडलं तसा रस्ता हळु हळु बिघडत जातोय. चामी, लुमती अशी गावं मागे पडली. मदकोटच्या आधी खूप दुर्गम भाग लागला. बाजूलाच खळाळत वाहणारी गोरी गंगा! पण ह्यावेळी पात्र शांत वाटतंय. काही ठिकाणी अगदी अरुंद रस्ता आणि कुठे कुठे रस्त्यावर वाहतं पाणी! थोड्या अंतरानंतर तर रस्ता अगदीच बिकट झाला. इतका की, इथून ट्रक किंवा बससुद्धा सध्या जात नसणार असं वाटतंय. दोन जीप्ससुद्धा कशा बशा एकमेकींना ओलांडत आहेत! काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. डोंगरातून जाऊन नंतर नदी ओलांडून रस्ता पैलतीरावर आला. कदाचित मदकोटनंतर चांगला असेल असं वाटलं होतं. पण रस्ता बिकटच आहे. मी काहीही नाश्ता केला नाही ते बरंच झालं, कारण काही प्रवासी सतत उलटी करत आहेत! खूप वेळाने जीप थोडा वेळ थांबली तेव्हा आसमंत नीट बघता आला. व्वा! हिमालयाच्या किती आत आहे जी जागा!

नदी ओलांडल्यानंतर थोड्या वेळाने परत घाट रस्ता सुरू झाला. नक्की, आता मुन्सियारीपर्यंत सलग चढ असणार. बघता बघता नदी खूप मागे पाताळात राहिली आणि रस्ता वर चढत गेला! अवाक् करणारा परिसर! डोंगरातली छोटी छोटी गावं! आणि शक्य त्या सगळ्या लोकांना व पोचवणारा व त्यांचं सामानही नेणारा जीप ड्रायव्हर! पहाडी गाणी! सत्गडवरून सकाळी ७ ला निघालेली जीप ११ वाजण्याच्या सुमारास मुन्सियारीमध्ये पोहचली! पोट हलकं असल्यामुळे काहीच त्रास न होता पोहचलो. सत्गडच्या नवीनजींच्या ओळखीतून इथल्या एका माणसाची ओळख मिळाली होती. त्या गुप्ताजींना भेटलो. त्यांनी एक चांगला होमस्टे सुचवला. आकाश दर्शनासाठी मोकळी गच्ची आणि अगदी समोर पंचाचुली आणि इतरही हिमशिखरं! वा! शिवाय मुख्य गावातच आहे, त्यामुळे जेवण- चहा जवळच मिळेल. मस्त चहा, नाश्ता आणि गप्पा झाल्यावर त्या सौम्या होमस्टेमध्ये गेलो. दुपारच्या ऊन्हात थंडी कमी वाजतेय. पण रात्री मजा येणार! पण काय ठिकाण आहे हे! अहा हा! आणि बाजूच्याच हॉटेलमध्ये आत गेल्यावर तर अजून सुंदर व्ह्यू मिळतोय! अगदी पंचाचुली शिखरांच्या सत्संगात असल्यासारखं‌ वाटतंय!

मुन्सियारी! पर्यटकांमुळे गजबजलेलं आणि वस्ती वाढलेलं पण तरी छोटसंच गांव! चहु बाजूंनी उंच पर्वत आणि द-या! इथे रात्र खूप लवकर पडणार. म्हणून दुपारी जास्त आराम न करता चार वाजताच नंदा देवी मंदिर बघायला निघालो. इथून साधारण दीड- दोन किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे एक छोटा ट्रेकसुद्धा होईल. अपेक्षेप्रमाणे रस्ता खूपच सुंदर आहे! अगदी हिमशिखरांकडे नेणारी वाट वाटेल असा! शांत रस्ता, दुतर्फा झाडं आणि नजारे! मंदिरामध्येही छान बाग आहे आणि दृश्यं सुंदर दिसत आहेत. मनसोक्त फोटो काढून आणि दृश्यांचा आनंद घेऊन परत निघालो. अंधार पडण्याच्या आत होम स्टेमध्ये पोहचायचं आहे आणि आकाश दर्शनाची सुरूवात करायची आहे! त्याआधी अर्थातच संध्याकाळची शिखरांवरची लालिमासुद्धा टिपायची आहे!

सूर्य डोंगराआड गेल्यावर थंडी वाढायला लागली. दुर्बीण सेट केली. तिथल्या हॉटेलवाल्यांनाही सांगितलं. तेही बघायला येतो म्हणाले. सूर्य मावळताना लालसर होणा-या हिमशिखरांचे फोटो घेतले. आणि साडेपाच वाजता तारे दिसायला लागले! पंचाचुलीच्या बाजूलाच ब्रह्महृदय आणि रोहिणी प्रकटले! नंतर गुरूसुद्धा आला. दोनच दिवसांपूर्वी पोर्णिमा झालेली असल्यामुळे चंद्रही लवकरच आला. पंचाचुलीच्या मागून होणारा चंद्रोदय! अहा हा! कडक थंडीमध्ये काही वेळ आकाश निरीक्षण केलं. खूप अंधुक तारे दिसत आहेत! मोबाईलच्या फोटोमध्ये देवयानी आकाशगंगा स्पष्ट येते आहे! फोटो सुंदर घेता आले! संध्याकाळीच जेवण केलं. रात्रभराच्या टाईम लॅप्सचं सर्व सेटींग करून ठेवलं. थोडा वेळ आकाश दर्शन केलं आणि रात्री ९ च्या सुमारास निद्रा आराधना सुरू केली. पहाटे उठून पहाटेचं आकाशही बघणार आहे. नक्कीच, ह्या कडक थंडीमध्येही आकाश दर्शन करता येणार! आणि आकाश फार सुंदर दिसणार!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 18 फेब्रुवारी 2026.

भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

✪ अंध गायकासोबत विशेष भेट

✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली!
✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स!
✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला
✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद
✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब!

७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता. पहाटे तेजस्वी गुरू, मघा, पुनर्वसू, व्याध, स्वाती, चित्रा छान दिसले! अनेक कृत्रिम उपग्रहसुद्धा दिसत आहेत. हळु हळु पहाट होतेय. दुर्बिणीतून बघणं मात्र खूप कठिण आहे. दुर्बिणीच्या आरशाचं झाकण काढायलाच कष्ट पडले! बोटं गार पडत आहेत. थोडा वेळ दुर्बिणीतून निरीक्षण केलं. उजाडण्याआधी पूर्वेला एक ठळक तारा दिसला. हा शुक्र तर असू शकत नाही! विशाखा नक्षत्राच्या जवळ इतका ठळक तारा नाहीय! हा निश्चितच बूध असला पाहिजे. चक्क अर्धा तास बूध दिसला!

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील: https://niranjan-vichar.blogspot.com/2026/02/experiencing-kumaon-himalay... माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल: https://open.spotify.com/show/00vTZSU2qaJE8FwVTHPe6p )


.

.

.

.

पंचा चुली हिमशिखरांच्या मागून उगवणा-या चंद्राचा व्हिडिओ.


शर्मिष्ठा मावळून सप्तर्षी वर येईपर्यंतचा 8 तासांचा टाईम लॅप्स व्हिडिओ.

मुन्सियारीमधली पहिली रात्र छान गेली. अद्याप चंद्र मोठा आहे आणि त्यामुळे थोडा फरक पडतोय. जितके अंधुक तारे अजून दिसले असते ते अजून दिसत नाही‌ आहेत. दुर्बिणीतूनसुद्धा खूप वेगळे असे ऑब्जेक्टस अजून तरी दिसले नाही आहेत. ही कसर फोटोमध्ये मात्र भरून निघतेय. प्रत्येक लाँग एक्स्पोजर फोटोमध्ये उपग्रहांच्या‌ ट्रेल्स येत आहेत. अजून दोन रात्री इथे थांबेन. पहाटेपासून उठल्यामुळे सकाळी परत झोप घेतली. रात्रभरामध्ये मोबाईलमध्ये आलेले फोटो बघितले. चंद्रोदयाचा व्हिडिओ/ टाईम लॅप्स तितका नीट आला नाहीय. आज आणि उद्या परत त्याचा प्रयत्न करेन. थंड पाण्यामुळे सकाळचं आन्हिक आवरणं हा मात्र त्रासाचा विषय ठरतोय! आणि थंडीवर चहाची ऊब!

दिवसा दिवसाच्या दृश्यांचा मनसोक्त आनंद घेतोय. कितीही‌ वेळा बघितलं तरी मन भरत नाही. काय ते उंच पर्वत! डोंगरातली छोटी छोटी गावं! त्यात जाणारे नागमोडी रस्ते! दूरवरून डोंगरातल्या वळणादार रेषा वाटतात! मुन्सियारीच्या जवळ तसं फिरायला खूप आहे. काही ग्लेशियर्सचे‌‌ ट्रेक इथून जवळच सुरू होतात. मुन्सियारीमध्येही काही छान ट्रेक आहेत. खेलिया टॉप हा असाच एक ट्रेक. तो करायची इच्छा आहे. पण तो खूप मोठा आहे- जाऊन येऊन सात- आठ तास जातील. आणि आकाश दर्शनाचं जागरण होत असल्यामुळे दिवसा आराम केला पाहिजे. त्यामुळे हा ट्रेक नाही करता आला. पण मुन्सियारी गावातच जास्त फिरलो. आणि अगदी जवळचे छोटे ट्रेक करतो आहे.

संध्याकाळी एक विशेष भेट झाली. पिथौरागढ़ जिल्ह्यातल्या बेरीनागचे अंध गायक- सुंदर बाफिला भेटले. इथे गावात एक जत्रा सुरू आहे. त्यात गाण्यासाठी ते आले आहेत. गुप्ताजींचे मित्र असल्यामुळे त्यांनी ओळख करून दिली. ते माझ्या बाजूच्या रूममध्येच थांबले आहेत. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. त्यांनी बोलता बोलता सहज म्हणून काही गाणी गायली! अप्रतिम वाटली! त्यांचे बरेच कार्यक्रम व शो झालेले आहेत. दिवसभरात त्यांच्याशी अधून मधून भेट होत राहिली. त्यांचं युट्युब चॅनल आहे. पण आज आधुनिक तंत्रज्ञान वापरून अंध व्यक्तीसुद्धा कसा कंप्युटर व मोबाईल वापरू शकतात हे त्यांना माहिती नव्हतं. त्याबद्दल त्यांना थोडी माहिती दिली. माझ्या ओळखीच्या व्यक्तींचे अनुभव सांगितले.

दिवसभर हिमालयातल्या दृश्यांचा आनंद घेतल्यावर आता रात्रीच्या आकाशाची ओढ वाटतेय! सूर्य साधारण तीन वाजताच डोंगराआड गेला. हळु हळु थंडी सुरू झाली. पाच वाजता पंचा चुलीचे शिखर लाल व्हायला लागले! आणि साडेपाच पासून रात्र सुरू झाली! तारे प्रकाशित झाले! आज आणि उद्या चंद्र येईपर्यंत चांगला अंधार मिळेल. त्या वेळेत खूप सुंदर आकाश मिळालं! शर्मिष्ठा- सारथी परिसरामध्ये आणि पश्चिमेला श्रवण आणि डेनेब ता-याच्या जवळ आकाशगंगेचा पांढरा पट्टा काही वेळ दिसला! बायनॅक्युलरने तर अप्रतिम पिठुर चांदणं दिसतंय! ढिगाने अंधुक उपग्रह जाताना दिसत आहेत! वा! सातच्या रात्री चंद्रोदयाचा टाईम लॅप्स परत एकदा घेऊन बघितला. पण नीट आला नाही. पण नुसत्या डोळ्यांनी दिसणारं काय दृश्य आहे ते! शिखरांमागून हळु हळु लालसर प्रकाश वर येतो! हळु हळु चंद्राचं टोक वर येतं आणि त्या प्रकाशात शिखर पाठमोरं दिसतं! वा!

असं सात आणि आठ डिसेंबरच्या रात्री मुन्सियारीवरून छान आकाश दर्शन केलं. अखेर आठच्या रात्री शिखरांच्या आड उगवणारा चंद्रही टिपता आला! स्टार ट्रेलचाही छान टाईम लॅप्स घेता आला. रात्री चंद्र थोडा उशीरा उगवत असल्यामुळे तोपर्यंत आकाशही छान बघता आलं. फोटोमध्ये अँड्रोमिडा आकाशगंगाच नाही तर अंधुक अशी ट्रायंग्ल्युलम गॅलक्सी- M33 सुद्धा उमटली! युरेनससुद्धा कृत्तिकेच्या बाजूला फोटोत स्पष्ट आला. मध्ये मध्ये ढग असल्यामुळे टेलिस्कोपिक निरीक्षणं अशी मात्र तेवढी करता आली नाहीत. शिवाय दुर्बिणीने बघताना थंडीमुळे मर्यादाही आली. बायनॅक्युलरने मात्र वेड्यासारखे तारे दिसले.

असं मुन्सियारीमध्ये तीन रात्री मनसोक्त आकाश दर्शन केलं. अगदी सगळी इच्छा पूर्ण केली. टाईम लॅप्स व्हिडिओही मिळाला. रात्रीच्या अंधारात आणि पहाटेही दिसणारे पंचा चुली शिखर डोळे भरून बघितले! आता परत जावं लागेल! इथून पिथौरागढ़ला जाण्यासाठी जीपच सोयीची आहे. इथून थलकडे बस जाते, पण तिथून पिथौरागढ़ला जायला फिरून जावं लागेल. दोन वेळेस जीप्स निघतात. काही जीप्स अगदी पहाटे साडेचारला जातात आणि दुस-या काही जीप्स सकाळी ११ ला जातात. मी त्या जीपने जायचं ठरवलं. गुप्ताजींच्या ओळखीने जीपवाल्याशी बोलून ठेवलं. पहाटेचं आकाश दर्शन करून मग टेलिस्कोप पॅक करून ठेवेन आणि मुन्सियारीतच एक ट्रेक करेन. त्यानंतर ११ च्या जीपने निघेन. हे ठरवून आठच्या रात्री उशीरापर्यंत आकाश दर्शन केलं. नंतर ढग आले तेव्हा टाईम लॅप्सचे फोटो लावून निद्राधीन झालो.

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 20 फेब्रुवारी 2026.


भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास


✪ पायवाटेवरची सुंदर भ्रमंती
✪ काटक बनवणारी पहाड़ी जीवनशैली
✪ एकमेकांना धरून राहणारी साधी माणसं
✪ पर्वत कितने ऊँचे कितने गहरे होते हैं!
✪ पहाड़ाची नानाविध रूपं!
✪ सत्गड़ची रमणीय संध्याकाळ

९ डिसेंबरची पहाट! मुन्सियारी आकाश दर्शनाचं शेवटचं सत्र! डोळे भरून आकाश बघितलं. चंद्र प्रकाशात चमकणारी पंचा चुलीची शिखरं मन भरून बघितली! थंडीचाही भरपूर आनंद घेतला! उजाडल्यावर टेलिस्कोप पॅक केला. चहाचा पहिला राउंड झाल्यावर आवरून भटकायला निघालो. कोवळं ऊन अंगावर घेताना मस्त वाटतंय. काल गावात थोडं फिरलो होतो तेव्हा एक जागा सुंदर दिसली होती. त्या भागात अजून पुढे फिरेन.

(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. )

एका सुंदर गाण्यासह जीपमधून बघितलेला नजारा इथे बघता येईल.


.

.

.

.

.

.

.

मुन्सियारी गांव! तालुक्याचं ठिकाण आहे आणि पिथौरागढ़ जिल्ह्यातील जवळ जवळ उत्तरेकडचं सर्वांत मोठं गाव. इथे फिरताना खूप महिला डोक्यावर सिलेंडर घेऊन जाताना दिसत आहेत. इतक्या जास्त की, असं वाटलं की, कदाचित महिन्यातून आजच इथे सिलेंडर मिळत असतील आणि म्हणून त्या नेत असतील. आणि रिक्षा नसल्यामुळे डोक्यावरून नेत असाव्यात. पण नंतर कळालं की, इथे सिलेंडर रोज मिळतो आणि महिला अशाच त्या नेतात. पुढे महिला इतरही मोठं सामान नेताना दिसल्या.

मुन्सियारी गाव फिरलो. छोटी छोटी आणि चौकोनी घरं. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये इथे बर्फवृष्टी होते. त्यासाठी अनेक घरांमध्ये रूम हीटरही असतो. हे गाव तसं सीमेलगत जाणा-या रस्त्यांवर येत नाही. त्यामुळेही कदाचित इथले जवळचे रस्ते इतके सुस्थितीत नाही आहेत. पायवाटेवरून हिमालयाच्या शिखरांचा आनंद घेत मस्त चाललो. छोटे धबधबे दिसले. पायवाटेवर शाळेत जाणारे मुलं भेटले. पहाड़ामध्ये येण्या जाण्याची‌ साधनं कमी असल्यामुळे पायी जाण्याचं आणि मेहनतीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे शक्यतो लठ्ठपणा कमी दिसतो.

पायवाट छोट्या गावांकडे जातेय. रस्त्याच्या बाजूने आतमध्ये जातेय. पुढे गेल्यावर पायवाट परत रस्त्याकडे आली आणि येताना मुख्य रस्त्यावरून चालत आलो. रस्त्यावरही शाळेत जाणारे मुलं आणि पालक दिसले. कितीही फिरलो आणि कितीही निसर्ग सौंदर्य बघितलं तरी कमी वाटेल असा आसमंत! परत होमस्टेकडे गेलो आणि पंचा चुलींना न्याहाळत चहाचा आनंद घेतला! जीपचा प्रवास करायचा असल्यामुळे नाश्ता टाळला.

जीप होमस्टेपाशीच मिळाली. फक्त मुनिस्यारीमध्ये सगळ्या लोकांना घरपोच जाऊन घेण्यात आणि पेट्रोल भरण्यात वेळ गेला. त्यामुळे प्रत्यक्ष बाहेर पडायला १२ वाजले. ह्या प्रवासात समोरची सीट मिळाली! त्यामुळे मनसोक्त फोटोज आणि व्हिडिओ घेता आले.

पहाड़ी लोकांचा साधेपणा आणि एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती सतत जाणवते. एका महिलेने अगदी सहजपणे जीप ड्रायव्हरकडे मोठी रक्कम दिली आणि पुढे एका गावात द्यायला सांगितली. त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं की, ते काही आधीपासून ओळखीचे नाहीत. पण विश्वासाने तिने पैसे दिले आणि तितक्याच सहजपणे त्याने देतो म्हणून सांगितलं. मुख्य मार्गालगतच्या गावांमध्येही जीपने नंतर सामान पोहचवलं. जीपचा प्रवास खूप सुंदर झाला. खूप सुंदर व्ह्यू मिळाला. पुढे बरम गावात जीप जेवायला थांबली तेव्हाही बाजूच्या गोरीगंगेचं छान दर्शन घेता आलं. वाटेत अनेक वेळा थांबत थांबत गेल्यामुळे आणि जेवणाच्या ब्रेकमुळे पोहचायला उशीर होत गेला. जौलजिबीपासून मोठा रस्ता सुरू झाला. तरीही प्रत्यक्ष सत्गडला पोहचायला ५ वाजत आले.

सत्गडला घरापर्यंत आता कच्चा रस्ता झाला आहे. पण तोही ट्रेकइतकाच सुंदर आहे. लॅपटॉप, बायनॅक्युलर आणि टेलिस्कोप घेऊन हा छोटेखानी १० मिनिटांचा ट्रेक केला. संध्याकाळच्या लाल सूर्यप्रकाशात काय विलोभनीय आसमंत दिसतोय! अर्थात् जाताना वाघाची आठवण आलीच! काही गाववासीही भेटले. अंधार पडण्याच्या थोडं आधी सत्गडला पोहचलो. सामानसह चालल्यामुळे मिळालेली उष्णता लवकरच गेली आणि थंडीचा कडाका सुरू झाला! अशा वेळी चहा खरोखर अमृततुल्य! घराच्या गच्चीतून दिसणारे डोंगर आणि झाडी हळु हळु काळोखात विलीन झाली. तारेही प्रकट झाले! आणि ध्वज मंदिरातला तेजस्वी दिवाही प्रकाशित झाला. चंद्र अजून जास्त उशीरा येत असल्यामुळे रात्री सत्गडमध्येही आकाश खूप छान मिळालं आणि आणखी छान फोटो घेता आले. उद्या ध्वज मंदिराचा ट्रेक करेन आणि परवा परतीचा प्रवास सुरू होईल!

पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 फेब्रुवारी 2026.






























No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

कुमाऊँमधील रम्य भटकंती

भाग १: प्रस्तावना   नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल...