: १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
ऑगस्टमध्ये विमानाची तिकिटे काढली होती. लवकर काढून पैसे वाचवायचं ठरवलं तरी आज उद्या वीकेंडला करत करत ऑगस्ट म्हणजे सुद्धा उशिरच झाला हे तिकीटे काढताना लक्षात आले. पण आणखी किती उशीर करणार म्हणुन काढून टाकली.
जाताना पुणे ते जयपूर थेट, आणि येताना उदयपूरहून दिल्ली मार्गे पुणे अशी तिकिटे होती.
मी, माझी बायको माधवी आणि दोन लहान मुली, तिची मैत्रीण ऋचा, तिचा नवरा समीर, त्यांचा मुलगा, लहान मुलगी असे आठ जण सोबत होतो. त्यांची मुलगी फार लहान असल्यामुळे त्यांनी फक्त जयपूर मध्ये पाच दिवस फिरून परतायचं, तर आम्ही पुढे आणखी 3 दिवस उदयपूर भागात फिरायचं आणि मग निघायचं असा बेत होता.

दिवाळीच्या काळात चमचमते पुणे शहर
पुण्याहून रात्री उशिराचं विमान होतं. त्याने आम्ही जयपूरला मध्यरात्री २ च्या सुमारास पोहोचणार होतो. त्यामुळे रात्री दूरचा प्रवास न करता विमानतळाच्या परिसरातच एक हॉटेल बघितलं, जेणेकरून तेथे पटकन पोहोचून उरलेली रात्र झोप पूर्ण करता येईल. दुसऱ्या दिवशीपासून जयपूर सोडेपर्यंत चार दिवसांसाठी एअरबीएनबी वरून एक घर बुक करून ठेवलं होतं.
विमानतळ रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी प्रीपेड रिक्षा कॅब असे काउंटर टाकलेले असतात. ते प्रवाशांच्या सोयीसाठी की लुटीसाठी असा प्रश्न कधी कधी पडतो. मागे दिल्लीत मला बरा अनुभव होता. इथे मात्र विमानतळाच्या दारापासून अवघ्या दीड किलोमीटर असलेल्या हॉटेल साठी त्यांनी आम्हाला एका सेदान गाडीचे ४५० रु. सांगितले. त्यापेक्षा कमी दरात उबर वरून SUV गाडी मिळाली. समोरच प्रशस्त पार्किंग आणि तिथे कॅब मिळणेसुद्धा सोयीस्कर होते.
आठवड्याभराचे सामान, अर्धवट झोपेतली मुले सोबत असल्यामुळे कॅब आवश्यक होती. एरवी हलके सामान असताना एवढे अंतर चालून जायला काही वाटत नाही. २–४ मिनिटांत हॉटेलला पोहोचलो आणि झोपलो. पहिल्या दिवशी सर्वांची झोप पूर्ण करण्यावर भर दिला. निवांत उठलो, आवरले, नाश्ता करून आधी त्या एअर-बीएनबीवाल्या घरी सामान नेऊन टाकले आणि मगच फिरायला बाहेर पडलो.
गलताजी मंदिर
पहिले ठिकाण होते गलताजी मंदिर, यालाच मंकी टेम्पल म्हणूनही ओळखले जाते. याला कारण या परिसरात प्रचंड संख्येने असलेली माकडे.

इथे गलताजी नावाच्या महाराजांचं, मारुतीचं, राम लक्ष्मण जानकी अशी छोटी छोटी लागून काही मंदिरे आहेत. दोन डोंगरांच्या मधोमध असलेल्या खिंडीत ही मंदिरे आहेत आणि इथून वाहणाऱ्या प्रवाहाला अडवून दोन मोठे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगळे असे स्नानकुंड आहेत. तिथे स्नान करून फार पुण्य मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे, आणि त्यामुळेच फार गर्दी सुद्धा. आणि ओघानेच थोडा गचाळ राडासुद्धा. असो.
.jpeg)
मंदिराकडे जाताना राजस्थानी शैलीचे सुंदर वाडे आहेत, कुंडाच्या आजूबाजूचे बांधकाम फार सुंदर आहे. वर सांगितलेली मंदिरे ही कुंडाच्या बाजूने पायऱ्या वर चढून गेल्यावर आहेत. तिथून आणखी पुढे गेल्यास टेकडीवर एक सूर्य मंदिर आहे, तिथून जयपूर शहराचे दृश्य छान दिसते असे समजले. पण ऊन फार असल्यामुळे, आणि जयपूर शहराच्या दृश्यासाठी प्रसिद्ध असलेले नाहारगड हे आमच्या यादीत असल्यामुळे आम्ही आणखी वर जाणे टाळले.
हे मंदिर शहराच्या फार बाहेर आहे, जाताना आम्ही उबर केली होती, पण रस्ता पाहून येताना पटकन गाडी मिळणे अवघड आहे अशी आमची चर्चा चालूच होती, ती ऐकून त्या ड्रायवर ने पुढे कुठे जायचे असे विचारले. आम्ही यापुढे गोविंद देव मंदिर ठरवले होते ते सांगितले. ते उबर वर टाकून किती होतात ते त्याला सांगितले, तो आणखी १५० घेऊन तिथेच आमच्यासाठी थांबायला तयार झाला.
त्याच कॅबमध्ये बसून आम्ही गोविंद देव मंदिराकडे निघालो. हे मंदिर सिटी पॅलेसच्याच परिसरात होते. इथे येताना जयपूरला पिंक सिटी असा लौकिक देणारा भाग सुरू झाला.
पिंक सिटी
प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड हे १८७६ च्या सुमारास भारतात येणार होते, जयपूरला भेट देणार होते. हल्ली जशी राष्ट्रपती पंतप्रधानांची भेट असली की रस्ते आणि परिसराची डागडुजी करण्याची लगबग उडते तशी झाली. तेव्हाच्या जयपूरच्या राजांनी सगळं शहर रंगवून काढलं.

खरं पाहता हा रंग गुलाबी नाही. अरिजितच्या गाण्यामधला गेरूआ आहे. त्याला गुलाबी का म्हटलं गेलं त्याची दोन तीन कारणं सांगितली जातात.
-
- एक म्हणजे हा रंग इंग्रजांसाठी फारसा परिचित नव्हता. त्याला इंग्रजीमध्ये नेमका शब्द मिळाला नाही, त्यामुळे टेराकोटा पिंक किंवा नुसताच जवळपास चा म्हणून पिंक असा शब्द तेव्हाच्या पत्रकारांनी वापरला आणि तोच रूढ झाला.
- किंवा तेव्हा एडवर्ड सोबत आलेला कारकून कलर ब्लाइंड होता त्यामुळे त्याला हा रंग नेमका समजला नव्हता आणि त्याने जो लिहिला तोच रंग रूढ झाला.
- आणखी एक कारण म्हणजे राजाच्या मनात गुलाबी हाच रंग होता, आतिथ्याचे प्रतीक म्हणून तो रंग निवडला होता. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो रंग बनला नाही,
जे सामान वापरलं गेलं त्यातून रंगकाम झाल्यावर हीच छटा दिसू लागली. तरीही गुलाबी रंगाचा बेत असल्यामुळे तोच शब्द वापरला गेला असं ही सांगतात.
यातलं कुठलंही किंवा आणखी काही कारण असो, तेव्हापासुन जयपूरची गुलाबी शहर अशी ओळख निर्माण झाली हे मात्र खरं. हीच ओळख जपण्यासाठी नंतर हा रंग तेव्हापासुन आजपर्यंत वापरला गेला. जे जुनं शहर आहे, त्याला तटबंदी होती आणि सर्व दिशांना वेगवेगळ्या नावांचे दरवाजे आहेत. त्यामुळे या भागाला चार-दिवारी असंही म्हणतात. या भागात सर्व इमारतींना हाच रंग वापरला जावा असा राजाने कायदाच आणला होता. आजही सर्व इमारतींची दर्शनी बाजू आणि किमान पहिला मजला याच रंगाचा आहे. कोणी वर वाढीव बांधकाम केलं असेल तर काही ठिकाणी वेगळा रंग दिसतो, पण सगळीकडे उठून मात्र हाच रंग दिसतो.
याच भागात बापु बाजार, जोहरी बाजार, त्रिपोलीया बाजार अशा अनेक प्रसिद्ध बाजारपेठा आहेत. त्यातली सर्व दुकाने याच रंगात आहेत. दुकानांच्या फलकासाठी सारखीच जागा आहे आणि बहुतांश दुकानांची ती जागा सारख्याच पद्धतीने रंगवली आहे. नव्या पद्धतीची इलेक्ट्रिकल यंत्रणा फार कमी दुकानांनी वापरली आहे. त्यामुळे इथे अगदी जुन्या काळातल्या बाजारात आल्यासारखंच वाटतं.
मंदिराचे पट
गोविंद देव मंदिरात पोहोचल्यावर कळलं कि हे मंदिर ५ वाजेपर्यंत बंद होतं. राजस्थानातल्या सर्व मंदिरात हा एक प्रकार होता. दिवसात काही वेळा इथे पट म्हणजे देवासमोरचे पडदे काही वेळा आरती नंतर चालु बंद होतात. पट बंद म्हणजे दर्शन बंद. इथे त्यांनी देवाची सकाळची उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, दुपारच्या वामकुक्षीच्या वेळा, रात्रीचे जेवण, रात्रीची झोप अशा सर्व पद्धती कटाक्षाने पाळलेल्या दिसतात.
परंपरा म्हणुन चांगलंच म्हणायचं. स्थानिक लोकांना त्या वेळा माहित असतात, पण बाहेरून फिरायला आलेल्यांचे मात्र हेलपाटे होतात. आधीच जवळपासच्या जागा, तिथे अधेमधे फिरणं, खाणं पिणं याच्या वेळा सांभाळाव्या लागतात. लहान मुलं किंवा ज्येष्ठ सोबत असतील तर अधिकच. आणि त्यात हि भर.
चोखी धानी
आम्हाला इथून पुढे चोखी धानीला जायचं होतं. ते फक्त संध्याकाळीच असतं आणि ते शहराबाहेर होतं, तिथे जायला बराच वेळ लागतो. त्यामुळे आम्ही इथे तासभर दर्शनासाठी थांबायचं मग निघायचं ठरवलं असतं तर बराच वेळ गेला असता. त्यामुळे आम्ही सिटी पॅलेस करायला येऊ तेव्हा पुन्हा प्रयत्न करू असा विचार करून चोखी धानीला निघालो.
हि जागा सुद्धा शहराबाहेर असल्यामुळे कॅब ड्रायवरनेच आम्हाला आधीच्या ड्रायव्हरसारखीच मी तुमच्यासाठी थांबतो अशी ऑफर दिली. गलताजी आणि चोखी धानी दोन्ही ठिकाणी मला असं वाटलं कि ओला उबर मिळायला थोडी अडचण होऊ शकते हे खरं, पण काही वेळ थांबण्याची तयारी असेल तर ओला उबर किंवा स्थानिक ऑटो, टमटम असे काही पर्याय मिळूही शकतात.

चोखी धानीमध्ये १००० रु., १२०० रु., १३०० रु. प्रति व्यक्ती असे काही तरी ३ पर्याय आहेत. त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला फोटोसहित माहिती आणि अद्ययावत किमती मिळू शकतील. हे शुल्क म्हणजे प्रवेश आणि निवडलेल्या पर्यायात अमर्यादित जेवण असे आहे. आत ढीगभर आणखी कुल्फी, पाणीपुरी, मसाला दूध, कॉर्न चाट, वेगवेगळे गेम्स असे अनेक काउंटर आहेत. तिथे प्रत्येक ठिकाणी २०, ३०, ४०, ५० अशा प्रमाणात खर्च होतोच.
त्यापैकी १००० वाला पर्याय म्हणजे, राजस्थानी थाळी, जी भारतीय बैठकीत पंगतीत मिळते. दुसरा मल्टीक्युझिन पर्याय नेहमीसारख्या रेस्टारंट मध्ये असतो तसा प्रकार. आणि एक रॉयल प्रकार ज्यात थोड्या आणखी चकचकीत अशा दालनात चांदीच्या ताट वाटीमध्ये जेवण असे पर्याय आहेत. यातले दुसरे दोन पर्याय आपल्याला पुण्यात किंवा महाराष्ट्रातही सहज मिळतात. त्यामुळे इथे येऊन राजस्थानी खेड्याचा फील पहिल्या पर्यायातच होता, त्यामुळे आम्ही तोच निवडला.
यात फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने आपल्याला ६.३०, ७.१५ अशा वेळा मिळतात. त्यावेळेस गेलो तर आपल्याला प्राधान्य मिळते. उशिरा उशिरा प्रचंड गर्दी होत जाते आणि वाट बघावी लागते. तिथे प्रचंड गर्दी असतेच, परंतु परिसर अतिशय विस्तीर्ण आहे त्यामुळे अगदी गजबज किंवा धक्काबुक्की झाल्यासारखं वाटत नाही. गर्दी आरामशीर पसरते. आम्ही गेल्यावर थोडा वेळ स्टॉल्स मध्ये टाईमपास केला आणि आमच्या वेळेत ७.१५ वाजता जेवायला गेलो. लगेच नंबर लागला आणि निवांत जेवण झालं.

तिथे एक एक विभाग २-३ पारंपरिक राजस्थानी वेशभूषा असलेल्या वेटरकडे सोपवलेले असतात. ते सर्व पदार्थ अगदी हसत खेळात अगत्याने, आग्रहाने वाढतात. काही पदार्थ खाण्याची पद्धत कुस्करून, तूप घालून अशी जी काही असेल ती सांगतात आणि तशा पद्धतीने खाऊन बघण्याचा आग्रह करतात. ज्यांनी आपल्याकडे सुद्धा थाळी रेस्टोरंट मध्ये अशी सेवा घेतलेली असेल त्यांनी हा अनुभव घेतला असेलच. पण अशा ठिकाणी पहिल्यांदाच आलेले किंवा राजस्थानी पदार्थांची अजिबात ओळख नसलेले लोकही येतात, त्यामुळे अशी माहिती मिळणे त्यांच्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे. सर्व पदार्थ आम्हाला आवडले, चव छान होती.
एवढी सेवा दिल्यावर त्यांना टीप देणे अनिवार्य नसते, पण त्यांची अपेक्षा असते आणि ते राम राम सा म्हणत दोन तीनदा व्यक्त करतात.
हेच इथे असलेल्या सर्व कलाकारांचेही आहे. त्यांनाही टीप ची अपेक्षा असते. इथे मेहेंदी काढून घेणे, राजस्थानी लोककला, नृत्य, मटके डोक्यावर ठेवून तोल सांभाळून नाचणे, आगीचे खेळ, जादूगाराचे खेळ, कठपुतळी असे अनेक सादरीकरण आपण निःशुल्क बघू शकतो. त्यासाठी त्या कलाकारांना थोड्या थोड्या अंतरावर मंडप बांधून दिलेले आहेत. दर १०-१५ मिनिटांनी ते आजूबाजूला थोडी गर्दी जमली कि काही मिनिटांचा खेळ सुरु करतात. मागे ३-४ वादक, एखादा गायक बसलेले असतात, ते गाणी म्हणतात आणि त्या तालावर मध्यभागी नर्तक किंवा आगीचे खेळ करणारे कलावंत आपली कला सादर करतात.
पण प्रत्येकच ठिकाणी टीप देणे मध्यमवर्गीय मंडळींना सोपे नाही. त्या कलाकारांची मेहनत दिसून येते. दर १५-२० मिनिटात नव्या खेळाला सज्ज व्हावे लागते. रोज रोज हे करून काही जणांच्या चेहऱ्यावर थकवा दिसतो, किंवा एकसुरीपणा दिसतो. ज्यांचा स्वभावच हसतमुख असतो असे कलाकार तरी हसत कला सादर करतात.
एखाद दुसऱ्या खेळात ठीक आहे, पण आपल्याला प्रवेशालाच १००० किंवा अधिकचा चुना लागलेला असतो. पाण्याच्या बाटल्या, फिरत फिरत काही मुलांचे गेम्स, मुलांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी, काही आपल्याला आकर्षित करणाऱ्या गोष्टी अशा अनेक ठिकाणी आपला खिसा रिकामा होत असतो. त्यांना १००० रुपयांची थाळी खाणारे लोक श्रीमंत वाटत असतील, आणि ज्यांच्यासाठी १००० रुपये चिल्लर आहे असेही लोक तिथे नक्कीच येऊन जात असतील. पण आपण इतकी वारेमाप दौलतजादा करण्याइतकेही मालदार नसतो. त्यामुळे २-४ खेळ बघितले कि पुढे आपला हात आखडता होतो. प्रत्येक सादरीकरणानंतर बक्षीस मागणे हि त्यांची मजबुरी, आणि आपल्या मर्यादेबाहेर त्यांच्याकडे कानाडोळा करणे हि आपली मजबुरी.
इथे सादर होणारे खेळ चांगले आहेत. कुठलंही सादरीकरण अगदी अत्युच्च दर्जाचा असतं असं नाही, पण राजस्थानमध्ये येऊन इथल्या संस्कृती, खेडेगावांची तोंडओळख करून घेत, इथल्या विविध कला एका ठिकाणी काही तासात अनुभवायला मिळते. सर्व लोक आपापल्या कुटुंब मित्रपरिवारासोबत मजा करायला आलेले असतात. संध्याकाळी आल्हाददायक वातावरण असतं त्यामुळे तिथे वेळ छान जातो. महागडं मात्र नक्कीच आहे. त्यांनी प्रवेश शुल्कात कुल्फी, मसाला दूध असे जे काही अधिकचे पर्याय आहेत तिथे एक कुपन देऊन एकदा निशुल्क आणि कोणाला अधिक हवे असेल तर सशुल्क असे करायला हरकत नाही. पण एवढी लूट असूनही तिथे होणारी गर्दी पाहता ते एवढे दिलदार होतील असे वाटत नाही.

इथेच त्यांनी हल्दी घाटीच्या लढाईचा दिखावा, भूलभुलैया, फोटो काढण्यासाठी चिक्कार प्रॉप्स, बनारसच्या घाटाची प्रतिकृती आणि तिथे संध्याकाळी दोनदा गंगा आरती असे अनेक मनोरंजक प्रकार केलेले आहेत. राजस्थानी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू यांची दुकाने आहेत.
राजस्थानच्या स्थानिक लोकांना किंवा राजस्थानमध्ये या आधी येऊन गेलेल्या लोकांना इथे काही नावीन्य वाटणार नाही, किंवा पैसे वसुल होत आहेत असे वाटणार नाही. पहिल्यांदा आलेल्यांना छान अनुभव मिळेल.

तर इथे भरपेट जेवण आणि मनोरंजनाचा आस्वाद घेतल्यावर आमचा दिवस संपला. पहिल्याच दिवशी असं जोरदार मनोरंजन करून मात्र आम्ही मुलांच्या दृष्टीने थोडी चुक केली असंही वाटून गेलं. त्यांच्या दृष्टीने हि जयपूरमधली सर्वोत्तम जागा होती. कदाचित ट्रीपच्या शेवटच्या दिवशी क्लायमॅक्स सारखी संध्याकाळ इथे घालवणे आणखी उत्तम झाले असते. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या. आमच्या ट्रीपची सुरुवात तर नक्कीच जोरदार झाली.
क्रमशः ।
२ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
जयपूरमधल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पेटपुजेने झाली. त्याला खरं तर महापूजा म्हणता येईल.
प्याज कचोरी
जयपुर ला प्याज कचोरी प्रसिद्ध आहे. रावत मिष्ठान्न भांडार, लक्ष्मी मिष्ठान्न भांडार अशी त्यासाठी प्रसिद्ध नावे आहेत. दोन्ही ठिकाणी खाण्याचा आम्हाला योग जुळुन आला. त्यापैकी माझ्या जयपूरलाच राहणाऱ्या सहकाऱ्याने रावतचे विशेष कौतुक केले. त्यानेच असंही सुचवलं की तिथे अगदी जाऊन खाण्याची गरज नाही, कारण तिथे प्रचंड गर्दी असते, तो स्वतः हल्ली पार्सल मागवुनच खातो. तर आम्ही आमच्या एअर-बीएनबीच्या पत्त्यावर सकाळी त्या कचोऱ्या आणि समोसे स्विगीमार्फत मागवले. मुलांचं आणि आमचं आवरे आवरेपर्यंत पार्सल येऊन त्यावर ताव मारून झाला.

मोठ्या शहरात तुम्हाला तिथले खास खाद्यपदार्थ खाऊन बघायचे असतील पण कधी तशा जागी प्रत्यक्ष जाणे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमात बसवता येत नसेल तर हि एक चांगली सोय आता झालेली आहे. अर्थात काही पदार्थ हे तिथेच खाण्यात मजा आहे. पाणी पुरी, डोसे असे पदार्थ घरी मागवण्यात तेवढी मजा नाही.
प्याज कचोरी मस्त होती. गंमत म्हणजे त्यात कांद्यापेक्षा बटाटा जास्त होता. आपण समोश्यात भरतो काहीसं त्या प्रकारचं सारण होतं, पण वेगळं होतं. आम्ही समोसासुद्धा मागवला होता त्यामुळे तेच सारण भरून फक्त वेगळे आकार काढले असं नव्हतं. आपल्याकडे मिळतात त्यापेक्षा वेगळीच होती कचोरी. नाश्ता अपेक्षेपेक्षा जरा गच्च झाला.
सिटी पॅलेस
त्यानंतर आम्ही भटकंतीची सुरुवात केली सिटी पॅलेस मधुन. सिटी पॅलेस आणि राजघराण्याची मालकी असलेल्या आणखी काही वास्तु आणि स्मारकांचे तिकीट तुम्ही एकत्र घेऊ शकता. ते किंचित स्वस्तही पडतं आणि मुख्य म्हणजे पुन्हा पुन्हा रांगेत उभे राहायचे कष्ट वाचतात. असंच जयपूरमधल्या इतर सरकारी व्यवस्थापन असलेल्या आणखी ३-४ गोष्टींचं एक संयुक्त तिकीट आहे आणि त्याची एक ऑनलाईन वेबसाईट आहे. ती अत्यंत फालतु आहे. मी आणि समीर आम्ही दोघांनी बरेचदा ऑनलाईन तिकीट काढण्याचे प्रयत्न केले, काही प्रयत्नांनंतर पेमेंटपर्यंत गाडी पोहोचली आणि आमच्या खात्यातुन पैसे कटूनही तिकीट मात्र निघालंच नाही. ते कटलेले पैसे ट्रिप संपल्यावर कधीतरी आम्हाला परत मिळाले. तोपर्यंत जीवाला घोर होता कारण आम्ही ६ तिकिटे एकत्र काढत होतो.

थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जयपूरच्या कुठल्याही पर्यटन स्थळी गेलात तर तिथे तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढणे आणि ते काढताना संयुक्त तिकीटाची चौकशी करून ते समक्ष घेणे उत्तम. एका ठिकाणी रांगेत जावे लागेल, पण हे पैसे कटून ते परत येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा बरं.
सिटी पॅलेसला तिकीट खिडकीवर जे कर्मचारी होते त्यांना तिकिटे विकण्यात जराही रस दिसत नव्हता. अतिशय कंटाळवाण्या सुरात एक एक वाक्य बोलायला जड होत असल्यासारखे ते बोलत होते. त्यांच्याकडून संयुक्त तिकिटांची माहिती घेऊन ते घेणे हे एक काम कसेतरी पार पडले. तिथे एक अत्यंत महागडे (जवळपास ४००० प्रत्येकी) तिकीट सुद्धा आहे, त्यात तुम्हाला इतर सामान्य पर्यटकांना मिळत नाहीत अशा महालाच्या आणखी अंतर्गत दालनांमध्ये जाण्याची परवानगी मिळते आणि शाही परिवार उपलब्ध असेल तर त्यांनाही भेटायची संधी मिळते असे ऐकले.
जयपुर, उदयपुर दोन्ही ठिकाणच्या राजांनी मोठमोठे महाल बांधले, ते वाढवत नेले. स्वातंत्र्यानंतर त्यांचे राज्य तर खालसा झाले, परंतु त्यांना हे महाल आणि काही मोठमोठ्या खाजगी मालमत्ता मात्र तशाच ठेवता आल्या. त्यांना सुरुवातीला पेन्शन मिळत असे, पण इंदिरा गांधींच्या काळात तीही बंद झाली. पर्यटन वाढले तसे त्यांनी आपल्या या वास्तुंचे रूपांतर संग्रहालय, स्मारक, आलिशान हॉटेल अशा गोष्टींमध्ये केले आणि आज हेच त्यांच्या उतपन्नाचे एक प्रमुख स्रोत आहेत.

सिटी पॅलेसला आम्ही गाईड घेतला. जवळपास सर्व ठिकाणी गाईडची सेवा ठराविक दराने उपलब्ध आहे. तुमच्या समूहात किती लोक आहेत या नुसार गाईडची फी ठरते. शक्यतो लहान मुलांना तुम्ही स्वतः मोजु नका, मोठ्यांचा आकडा सांगा. त्यांना एखाद दुसऱ्या मुलाकडे पाहुन उंचीनुसार वाटले कि त्यांना सुद्धा पकडावे तर तशी बोलणी करता येते. आम्हाला सहसा ४ मोठे पकडुन ४००-५०० रुपये लागत होते.
एक दोन ठिकाणी आम्ही गाईड नाही घेतला, त्याबद्दल पुढे लिहीनच. पण जिथे जिथे घेतला तिथे एक अपवाद वगळता आम्हाला गाईड सोबत घेणे योग्यच वाटले. काही मंडळी हल्ली अशा ठिकाणी फक्त फोटो काढायला, रील बनवायला येतात आणि जागेबद्दल, इतिहासाबद्दल काही न जाणून घेता पुढे जातात. इतिहास तुम्ही वाचुही शकता, पण सर्वांनाच तेवढा रस नसतो. सरावलेल्या गाईडला कुठल्या ठिकाणी काय सांगायचे, किती बोलायचे, सर्वसाधारणपणे लोकांना कुठल्या गोष्टी आवडतात, कुठे जास्त कुतूहल वाटते, हे माहित असते. ते त्यांच्या ठराविक वेगाने बरोबर तासाभरात तुम्हाला छान सफर करवुन आणतात. वाचनाची आवड असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनाच इतिहासाची एक छोटी ओळख होते, ज्याला काही थोडीफार माहिती असेल त्याची गाईड सोबत रंजक चर्चाही होऊ शकते.
जयपुर हे शहर अठराव्या शतकात राजा सवाई जय सिंग (शिवरायांच्या इतिहासातल्या मिर्झा जयसिंग यांचे वंशज) यांनी वसवले. आमेर ही त्यांची आधीची राजधानी होती. तिथे वाढती लोकसंख्या आणि पाण्याची कमतरता या कारणामुळे त्यांनी तिथुन काही अंतरावर असलेल्या जागेत हे शहर वसवले. नव्याने वसवल्यामुळे इथे त्यांना बऱ्यापैकी नियोजन करणे शक्य झाले. इथला महाल हा त्यांच्या वंशजांनीच वाढवत वाढवत आपल्याला दिसतो त्या स्वरूपात आणलेला आहे.

इथे सुरुवातीला एका संग्रहालयात आम्ही फिरून आलो. राजवंशातल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वापरलेली उंची वस्त्रे, रेशमी, सोन्याचा मुलामा असलेले कपडे, त्यांची हत्यारे, त्यातही सोने चांदीच्या मूठ असलेल्या तलवारी, भाले, त्यांच्या मनोरंजनाची साधने इत्यादी गोष्टी होत्या. त्यापैकी एका राजाची उंची कमी आणि जाडी अत्यंत जास्त असं असल्यामुळे त्यांचे कपडे फारच वेगळ्या आकाराचे होते.


मध्ये एका दालनामध्ये सूक्ष्मचित्र, जयपुरी साड्या आणि शाली रजया वगैरे, अत्तरे असे बनवणारे कलाकार कारागीर बसले होते. याला ३६ कारखाना असं नाव होतं. जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित असलेले पिढीजात कलावंत, ज्यांनी पूर्वी राजांसाठी अशा गोष्टी बनवल्या असतील, आज त्याच गोष्टी त्या सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि राजघराण्याने त्यांना हि जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती गाईडने दिली. राजाश्रयाने इथली कला किती बहरली हे तर आम्ही ठिकठिकाणी पाहतच होतो.




त्यानंतर आम्ही महालाच्या २-३ भागांमध्ये फिरलो. वेगवेगळ्या प्रसंगी आणि जमलेल्या संख्येनुसार जिथे दरबार किंवा सभा भरत असे अशा जागा होत्या. तिथे एका ठिकाणी महालाच्या मधोमध अशी मोकळी जागा होती जिथे चार दिशांना चार दरवाजे होते. चारही दरवाजांवर खूप सुंदर रंगकाम केलेले होते. राजा प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या दाराने प्रवेश करत असे. हौसेला अंत नसतो. इथल्या राजांच्या लहरी आणि ऐशो आरामाचे प्रकार पाहुन थक्क व्हायला होतं.
.png)

पुढे एक चांदीची महाकाय घागर पाहिली. याची चांदीचे सर्वात मोठे पात्र असा विश्वविक्रम म्हणून नोंद झालेली आहे. ब्रिटिशांच्या काळात इथल्या एका राजाला इंग्लंडला जायचे होते. तो अत्यंत धार्मिक होता, फक्त गंगाजलानेच अंघोळ करत होता म्हणे. तिकडे जाऊन कसं हे करता येईल यासाठी हे पात्र खास बनवले गेले. या घागरीत गंगाजल भरून ते जहाजात घेऊन राजा इंग्लंडला गेला. त्या काळात भारतीय राजांची छानछोकी कुठल्या स्तरावर गेली होती याचा यावरून अंदाज येतो.

जयपुरमध्ये राहणारा राजा धार्मिक आहे म्हणुन तिथे गंगाजल मागवुन रोज फक्त तेच वापरतो. म्हणजे त्याच्याच राज्यातले इतर लोक, भारतात राहणारे इतर लोक धार्मिक नाहीत का? धार्मिक असण्याचा संबंध आपल्या वैयक्तिक आचरणाशी आहे कि आपल्याकडे असलेला पैसा अडका वापरून, इतरांना राबवुन त्याचा दिखावा करण्यात आहे? राजाला गंगाजल न्यायचंच होतं तर साध्या ५००-१००० घागरी घेऊनही नेता आलं असतं. परंतु एवढी नजरेत भरणारी महाकाय आणि तीही चांदीची घागर नेण्याचा हेतु धर्मपालन कि आपल्या धर्माचं स्तोम दाखवुन इतरांसमोर प्रदर्शन? आणि हे सगळं बघणारे इंग्रज याचा कसा विचार करत असतील? आपल्या धर्म आणि संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात काय प्रतिमा तयार होत असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. असो.
शेवटी असे दालन पाहिले जिथे स्वातंत्र्यानंतर जयपूरच्या राजांच्या भेटीस सरदार वल्लभभाई पटेल आले, आणि यांच्यासमक्ष जयपूर भारतात विलीन झाले. तेव्हा त्यांना राजाच्या समान मानाचे आसन देण्यात आले होते. तेव्हा जी बैठक व्यवस्था होती, ती तशीच जपुन ठेवली आहे.

इथे आजूबाजूला जयपूरच्या अनेक पिढ्यातल्या राजांची चित्रे आणि छायाचित्रे आहेत. त्यापैकी एक राजे असे होते, ज्यांनी एकोणिसाव्या शतकात आपल्या आवडीची कॅमेरा आणला होता. त्यांनी हौस आणि सराव म्हणुन आपल्या दरबारातल्या अनेक माणसांची छायाचित्रे काढली होती. आज त्या माणसांना नावाने ओळख नसली तरी भारतात काढली गेलेली अगदी सुरुवातीची छायाचित्रे म्हणुन आजही ते अनामिक दृश्य स्मृतीत आहेत. हे राजेही भारतातले सुरुवातीचे छायाचित्रकार असावेत.

इथल्या शिल्प, चित्र आणि सर्वच रंगकामांमध्ये फार सुंदर बारकावे असतात. उदाहरणार्थ महालाच्या प्रवेशद्वारापाशी असलेले हे छोटेसे संगमरवरी हत्ती पहा.

आता या हत्तीवर बसलेला माहुत सुद्धा किती बारीकीने बनवलाय बघा. त्याची पगडी, त्याची दाढी, सगळं सुंदर पद्धतीने दाखवलं आहे.

मध्ययुगीन राजस्थानात प्रचलित असलेल्या अनेक प्रकारच्या पगड्या आणि पागोटे. यातले काही ग्रामीण भागात अजुनही वापरात आहेत.
इतर छायाचित्रे





जंतर मंतर
सिटी पॅलेसच्या समोरच जंतर मंतर नावाचं स्थळ आहे. या भागातच (सिटी पॅलेस आणि चार दिवारी) मुख्य पर्यटन स्थळे असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक रिक्षावाले सतत फिरत असतात. तिथे तुम्ही शेअरिंग बेसिस वर इथुन तिथे जाऊ शकता किंवा तेच तुम्हाला आम्ही हि हि स्थळे फिरवुन आणतो असं पॅकेज देऊन सुद्धा ठरवायचा पर्याय देतात. हा भाग छोट्या रस्त्यांचा आणि गल्लीबोळांचा आहे त्यामुळे इथे कॅब करून अडकण्यापेक्षा हा पर्याय बरा आहे. तुम्ही कुठल्या वेळी तिथे पोहचुन सुरुवात करत आहात, किती वेळ शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही हा निर्णय करू शकता. माझ्या मते जयपूरच्या अंतर्गत फिरण्यासाठी रिक्षा आणि काही बाहेरची ठिकाणे करण्यासाठी कॅब हा चांगला पर्याय आहे.
जंतर मंतर या नावावरून हल्ली आपला समज काही तांत्रिक मांत्रिक गोष्टींची किंवा जादुटोण्याची जागा असा होऊ शकतो. जंतर हा यंत्र या शब्दाचा अपभ्रंश आहे, मंतर हा मंत्र या शब्दाचा. जंतर मंतर हे खगोलशास्त्राशी संबंधित भव्य आकाराची यंत्रे असलेले ठिकाण आहे. इथे मंत्र हा शब्द आपले देवाचे मंत्र या अर्थाने नाही तर खगोलीय गणिते करताना वापरलेली सूत्रे असा आहे. तुम्ही वैदिक गणिताशी परिचित असाल तर त्यात पाहिले असेल. त्यात गणिताच्या संकल्पना आणि सूत्रे सुद्धा श्लोक किंवा मंत्राच्या स्वरूपात लिहिलेली आहेत.



जयपुर शहर वासवणाऱ्या राजाला स्वतःस खगोल, ज्योतिष या विषयांमध्ये प्रचंड रस होता. त्यामुळे त्यांनी भारतात तीन शहरात जंतर मंतर बनवले. इथे सूर्य प्रकाश ज्या कोनात येतो त्यावरून वेळ समजेल, राशी, नक्षत्र वगैरे समजतील अशी यंत्रे आहेत. आधी ती यंत्रे छोट्या आकाराची बनवुन चाचणी केली गेली आणि मग त्याच्याच बाजूला मोठ्या आकाराची यंत्रे बनवली गेली. ज्योतिषशास्त्री या गोष्टी आकडेमोड करून मांडु शकतात, पण इथे ते अगदी सुलभ होते. इथे उजेड असतानाच जायला हवे तर आपण गाईड घेऊन या गोष्टी उत्तम रित्या समजावुन घेऊ शकतो. अशा ठिकाणी येऊनही या ठिकाणाचा फक्त फोटोसाठी पार्श्वभूमी म्हणुन वापर करून जाणारे लोक येतातच.




इथल्या राजांच्या छानछोकीसोबतच कलाकुसर, छायाचित्रण, स्थापत्य, खगोल, ज्योतिष अशा विविध विषयांमधील आवड, त्यावर अभ्यास आणि त्याच्या विकासासाठी सढळ हस्ते केलेली मदत, असे विविध पदर समोर येत होते.
जंतरमंतर मध्येसुद्धा कठपुतळी कार्यक्रम एका कोपऱ्यात चालु होता. चार लोक जमले कि एक गाणे सादर करून मग त्यांना बक्षीस मागणे, हि पद्धत इथे बऱ्याच ठिकाणी आहे.

बाहेर पडल्यावर आम्ही कुल्फी घेतली. त्याचा विशेष उल्लेख यासाठी, कि त्यांची देण्याची पद्धत अनोखी होती. कुल्फीच्या काडीला खालच्या बाजूने एक कागदी डिश मधोमध छिद्र करून वर सरकवुन त्याने दिली. याचा फायदा असा कि कुल्फी खाताना बऱ्याचदा जे ओघळ हातावर येतात ते रोखण्यासाठी हा एकदम साधा मस्त उपाय वाटला.

हवा महल
जंतरमंतर नंतर आम्ही हवा महलला गेलो. हि जागा आजकाल प्रचंड लोकप्रिय आहे. याच्या आत काय आहे त्यासाठी नसून ती बाहेरून अतिशय सुंदर दिसते त्यामुळे. हल्ली लोक इंस्टाग्रामेबल प्लेसेस अशा रिल्स बनवतात, तशा जागा शोधून येतात, त्यात हि जागा टॉपला आहे.


हि जागा सिटी पॅलेस च्याच एका बाजूला आहे आणि मुख्यतः राणी आणि राजवंशातल्या स्त्रियांसाठी हा महाल बनवला गेला होता. याची जी दर्शनी बाजू लोकप्रिय आहे त्याचे वैशिष्टय म्हणजे अनेक मजले एकावर एक असलेले सुंदर सज्जे आणि खिडक्या. इतक्या खिडक्या असल्यामुळे याचे नाव हवा महल पडले असावे.
इथे फार काही ऐतिहासिक घटना किंवा रोचक गोष्टी नाहीत. इथे गाईड फक्त राणी इथून जात असे, तिथून खाली बघत असे, राणीला सर्व दिसत असे पण राणी कोणाला दिसत नसे, किंवा अमुक काच इकडून आली, तमुक माणके तिकडून आली अशा प्रकारची माहिती सांगतो.


अगदी ह्याच गोष्टी आमेरच्या किल्ल्यामधील महालात सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही तो बघुन येथे आलात किंवा तिकडे जाणारच असाल तर इथे गाईड नाही घेतलात तरी चालेल.



इथल्या बहुतांश सर्वच गाईडला तुम्हाला कुठल्यातरी दुकानात न्यायचंच असतं. त्यांचं कमिशन किंवा एक ठराविक फी असणार त्यामागे. पण इथल्या गाईडने कहर केला. आम्हाला हवा महल आतुन पाहुन झाल्यावर त्याची बाहेरची प्रसिद्ध असलेली बाजु बघायची होती. त्याच्या अगदी समोरच एक टॅटू कॅफे नावाचा कॅफे प्रसिद्ध झालेला आहे. तिथे मुख्य आकर्षण हवा महालाचा व्ह्यू तर आहेच पण तिथले खाद्यपदार्थही छान असल्याचा फीडबॅक होता. तिथे जायचं होतं. संध्याकाळी तिथेच काही तरी खायचा आमचा बेत होता. तसं मुलांनाही सांगुन ठेवलं होतं.
या गाईडने मात्र परस्पर ओळखीची रिक्षा ठरवुन एक दीड किलोमीटर वर असलेल्या एका दुकानात न्यायचा प्रचंड आग्रह केला. आम्ही टॅटू कॅफेत जायचं आहे, इथे ग्रुप फोटो काढायचा आहे वगैरे सांगत होतो, त्यावर अरे वहा क्यू पैसे बरबाद करने है आप को, वहा बस फोटो खिचने के लिये लोग जाते है, उससे बढिया फोटो मै आपको खिचके दूंगा. (त्याने हवा महालाच्या आत फोटो मात्र खरंच चांगले काढले होते) बस दस मिनट आप चलिये. वहिपे आप को यहांसे बढिया खानेकी जगह दिखाऊंगा असा आग्रह लावला. आमच्यातल्या एक दोघांची त्याच्याशी हि हुज्जत चालु असताना इतरांना, मुलांना नीट न समजल्यामुळे ते रिक्षात जाऊन बसलेही होते. प्रचंड ट्राफिक आणि मागच्या गाड्यांचे भोंगे वाजायला लागले होते. शेवटी आम्ही बसलो.
या दुकानाचं वर्णन त्याने दुकान असं न करता इथले कलाकार कारागीर रंगमहालात काम करायचे. त्यांच्यावर राण्यांचे नियंत्रण असायचे. आता इथल्या राणीच्या निगराणीखाली असलेल्या ठिकाणी तुम्हाला नेतो, ब्लॉक प्रिंटिंग दाखवतो असं केलं होतं. पण तिथे समोर गेल्यावर एखाद्या कारखाना किंवा महालाऐवजी साधं दुकान पाहुन सगळ्यांचा, विशेषतः मुलांचा फार हिरमोड झाला. त्यांना प्रचंड भुक लागली होती. तिथे एक गाईडने सांगितलेलं प्रसिद्ध थाळी रेस्टॉरंट खरंच होतं आणि गुगलवर उत्तम रेटिंगही होतं. पण ते सुरु व्हायला आणखी पुष्कळ वेळ होता.
मग आम्ही मुलांना आजूबाजूला कुठेतरी खायला न्यायला पर्याय बघत असताना त्याचा "बस दस मिनट यहां चलिये" असा आग्रह सुरूच होता. मग मात्र आम्ही त्याला झापलं. म्हटलं आम्ही आता मुलांना खाऊ घातल्याशिवाय कुठेही जाणार नाही, तुम्हाला जायचं तर तुमचे पैसे घ्या आणि निघा. मग तो जरा नरमला, आणि मी इथेच थांबतो म्हणाला.
गोविंद देवजी मंदिर
आम्ही मुलांना थोडं खाऊ घातल्यावर ती शांत झाली. जो होता है अच्छे के लिये होता है म्हणतात तसं झालं. या हॉटेलच्या बाजूलाच गोविंद देवजी मंदिर होतं. काल तिथले पट बंद असण्याची वेळ होती म्हणुन दर्शन राहुन गेलं होतं. आता तिथे पुन्हा तशीच वेळ लवकरच होणार होती, म्हणुन आम्ही अक्षरशः पळत पळत मंदिरात गेलो. बाहेरून नेमका अंदाज येत नसला तरी आत प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे.


या मंदिराची कथा अशी कि, औरंगजेबाच्या हल्ल्याच्या भीतीने वृंदावनातील कृष्णाची मूर्ती राजस्थानात आणली गेली. इथल्या राजाने या मूर्तीला आपल्या महालातच एका बाजूला प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधले. आणि मूर्तीची आख्यायिका अशी कि हि मूर्ती कृष्णाच्याच वंशातल्या नातवाच्या पिढीतील एकाने घडवली. त्याने आपल्या आईच्या इच्छेसाठी मूर्ती बनवण्याचा तीनदा प्रयत्न केला. पहिल्या दोनदा बनवलेल्या मूर्तीने आईचे समाधान झाले नाही, पण इथे असलेली हि तिसऱ्या प्रयत्नात घडवलेल्या मूर्तीने मात्र आई खुश झाली आणि हमारे गोविंदजी ऐसेही थे अशी त्यावर कौतुकाची मोहोर उमटवली. हि माहिती आम्हाला गाइडनेच दिली. आमचं खाणं आणि दर्शन होईपर्यंत तो दुकानात थांबलेलाच होता. त्याने आम्हाला इकडे आणल्यामुळे आमचा प्लॅन बदलला पण देवदर्शन झालं. गोविंदजींचं बोलावणं असावं.
आम्हाला दुकानात सोडल्यावर तो निघायच्या तयारीत होता. मी त्याला मुद्दाम आठवण दिली, भैया आप तो हवा महल के सामने हमारी फोटो खिचने आने वाले थे... त्याचा चेहरा जरा अडकल्यासारखा झाला. मुलांचं थोडं खाणं आणि न ठरवता दर्शन झाल्यामुळे आम्ही आता जरा शांत झालो होतो, पण मघाशी त्याने जे आम्हाला भरीस पाडून इकडे आणलं होतं त्यामुळे मी त्याला त्याच्याच आश्वासनाची आठवण फक्त करून दिली, आणि मग ठीक है.. निकलीये आप, हम देख लेंगे म्हणुन निरोप दिला.
ब्लॉक प्रिंटिंग
आतमध्ये गेल्यावर दुकानदाराने आम्हाला ब्लॉक प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तुम्ही राजस्थानी प्रकारचे प्रिंटेड कपडे पाहिले असतील. संपूर्ण कापडावर एका विशिष्ट प्रकारचे डिझाईन पुन्हा पुन्हा छापलेले असते. लाकडी साच्यांच्या मदतीने हे केले जाते. आता हे मशीनच्या साहाय्याने सुलभ झाले असले तरी हे असे साचे वापरून आधी हाताने केले जायचे. हि जयपूरची शैली प्रसिद्ध आहे.


एकाच दुकानात राजस्थानी स्त्रिया पुरुष दोघांचे कपडे, बेडशीट, रजया, गालिचे असे सर्व उपलब्ध होते. दोन तीन मजल्यांचे ते दुकान होते. तिथे थोडी खरेदी करून झाल्यावर आम्ही पुन्हा टॅटू कॅफेत जायचे ठरवले.
टॅटू कॅफे
टॅटू कॅफेची खासियत तिथला व्ह्यू असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी असते. सगळे पर्यटक तिथे फोटो काढण्यात वेळ घालवतात. त्यामुळे त्यांनी प्रति माणशी २५० रुपये अशी किमान प्रवेश फी ठेवली आहे. तुम्ही ती रक्कम खाण्यापिण्यात वसुल करू शकता. म्हणजे ४ लोक गेले तर किमान १००० रुपये द्यावे लागतीलच, तुम्ही ८०० रुपयांचं बिल केलं तर तुमचा तोटा.. जास्तीचं बिल झालं तर उरलेले पैसे शेवटी भरायचे.
मघाशी जर ते थाळी रेस्टॉरंट चालु असते तर व्यवस्थित जेवणच झाले असते. पण ते बंद असल्यामुळे फक्त चाट पदार्थ खाऊन आमचे पुरेसे जेवण झाले नव्हते. त्यामुळे इतर कुठे आणखी खाण्यापेक्षा आपण कॅफेत गेलो तर तेवढे बिलाचे पैसे वसुल करण्या इतपत तर आपण खाऊच, आणि ह्या बाजूचा व्ह्यु गाईडच्या गडबडीत राहून गेला तोही पाहुन घेऊ असा विचार करून आम्ही तिथेच जायचे ठरवले.

तिथे गेल्यावर टॅटू कॅफेत किमान २ तास वेटिंग असल्याचे कळले. त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर आणखी एक तसाच कॅफे होता. टॅटू कॅफे इतका प्रसिद्ध नव्हता पण तिथे वेटिंग नव्हते, आम्हाला तसाच व्ह्यू आणि बाल्कनीच्या कडेला टेबल मात्र मिळाले. खाद्यपदार्थही आता टॅटू कॅफेची चव न घेतल्यामुळे तुलना करू शकत नाही, पण सर्वांची चव समाधानकारक होती.

संध्याकाळचं वातावरण छान होतं. आमची सगळी ऑर्डर एक एक करत येऊन सगळ्यांचं खाणं पिणं होई पर्यंत आम्हाला निवांत वेळ मिळाला. भरपूर फोटो काढून झाले. व्ह्यू खरंच सुंदर होता. तिथे रस्त्यावर, बाल्कनीज मध्ये, कॅफे मध्ये सगळ्यांची फोटो सेल्फी चालू होते. प्री वेडिंग शूट वाले अनेक कपल आणि त्यांच्या फोटोग्राफर्सची टीम सुद्धा इकडे तिकडे दिसत होते. आम्ही गेलो त्या कॅफेमध्ये सुद्धा दोन कपल्स आणि त्यांची टीम आलेली होती. त्यांच्याकडून जास्त पैसे घेतले असा आम्हाला अंदाज आला. त्यांचे थोडे आपापसात आणि स्टाफशी थोडे खटकेही उडाले, पण काही तरी तोडगा निघाला आणि त्यांचे आळीपाळीने फोटो काढणे सुरु झाले.
आमचे खाणे चालु असे पर्यंत स्टाफ एकदम खुशमिसाज होता, तेच आमचं बिल बनल्यावर मात्र त्यांची आम्ही निघण्यासाठी घाई सुरु झाली. त्यांचा धंदाच खाण्यापिण्यापेक्षा त्या जागेमुळे जास्त चालत असल्यामुळे हे अपरिहार्य होते. असो. आमचा आजचा दिवस हवा महालासमोर हवा खात निवांत टेरेस डिनरने संपला.
क्रमशः
३ : आमेर, नाहरगड
आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली.
आमेर
जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत.
राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते. परंतु विकिपीडियावर उपलब्ध माहितीनुसार या किल्ल्याचे नाव येथील अंबिकेश्वर (महादेव) मंदिरामुळे किंवा अंबा देवीमुळे पडुन त्याचे पुढे आमेर झाले.
आपल्या मनात किल्ला म्हटलं की राजगड, रायगड असे जे किल्ले येतात तसे नाही. सह्याद्रीमध्ये किल्ले जसे प्रचंड उंच डोंगरावर असतात, तसा नाही, परंतु त्या तुलनेत एका छोट्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. इंग्रजीत बारीक फरक सांगायचा झाला तर याला फोर्ट म्हणण्या ऐवजी कॅसल म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. गढी हा शब्दही कदाचित योग्य होईल. हा किल्ला तुम्ही जोधा अकबर चित्रपटात बघितला असेल. जोधाबाई या इथल्याच राजकुमारी होत्या.
गाईडच्या मते याला किल्ला म्हणणे चुक आहे, त्याच्या लेखी हा सुद्धा सिटी पॅलेस सारखा महालाच होता. आमेर म्हणजे राजदरबार आणि राजपरिवारच्या निवासाची जागा, जयगड जो इथुन समोरच दिसतो ती सैनिकांची जागा, नाहरगड इथून थोडा लांब आहे ती राजस्त्रियांच्या विरंगुळ्याची जागा.
आमेरकडे जाताना एक तळे लागते. तिथून किल्ल्याचे दृश्य छान दिसते. तिथे काही वेळ थांबुन आम्ही किल्ल्याकडे निघालो. तुम्ही याच्या जवळूनच किल्ल्याकडे पायी जाऊ शकता, किंवा इथे हत्तीवर बसून जाण्याची सुद्धा सोय आहे.

आम्ही गाडी केलेली असल्यामुळे गाडीने पुढून गावातून एक छोटा रस्ता आहे त्याने गेलो, परंतु तिथे मोठ्या संख्येने गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जाम होता. गाडी हळू हळू पुढे सरकत होती. शेवटी आम्ही प्रवेशद्वार जवळ आल्यावर गाडीतून उतरून ड्रायव्हरला गाडी पार्किंगमध्ये नेऊन थांबायला सांगितले आणि उरलेला रस्ता पायी पायी गेलो.
इथल्या किल्ल्यांच्या दरवाज्यांना गणेश पोल, सुरज पोल अशी नावे असतात. त्यावरून आठवलं, इथल्या लोकांच्या बोलण्यात दरवाजाला गेट हाच शब्द वापरतात. समजा कारचं दार नीट लागलं नसेल तर कॅबवाले म्हणतील, कोई तो गेट खुला रह गया है. हॉटेलवाले काचेच्या दरवाजालासुद्धा गेट म्हणतात. आपका सामान गेटपे छोड दिजिये, बंदा ले आयेगा. आपल्याकडे सहसा घराची दुकानाची दारे असतात त्यांना दार किंवा दरवाजा, इंग्रजीत म्हटलं तर डोअर असं म्हणतात आणि गेट हा शब्द अंगणाचं गेट किंवा सोसायटीचं गेट असा वापरतात. त्यामुळे सुरुवातीला हे ऐकायला गमतीशीर वाटतं.

आमेर किल्ल्यामध्ये अतिशय सुंदर स्थापत्य, रंगकाम बघायला मिळतं.


गाईडच्या माहितीनुसार इथल्या दरवाजांवर, भिंतीवर जे रंग आहेत, चित्र आहेत, ते ४०० वर्षांपासून तसेच आहेत. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले रंग इथे वापरले गेले आहेत.




इथे शीश महल फार सुंदर आहे. आधी तिथे आत जाता येत असे, परंतु आपल्या पर्यटकांच्या निष्काळजी वागण्यामुळे तिथे प्रवेश बंद करण्यात आला.

इथे एका राजाला अनेक राण्या होत्या त्यांच्यासाठी राजाने वेगवेगळे महाल बनवले होते. त्यांना एकमेकींच्या महालात जाण्याची परवानगी नव्हती, पण मध्यभागी एका ठिकाणी त्या एकत्र येऊन वेळ घालवत असत. राजाला कुठल्याही राण्यांच्या खोलीत जायला मार्ग असा बनवला होता कि तो नेमका कुठे प्रवेश करत आहे, कोणत्या राणीकडे जात आहे हे इतर राण्यांना कळत नसे.


जयपुरला याच गोष्टी ऐकायला मिळत होता होत्या. चित्तोडगडला जाईपर्यंत एकही युद्धकथा ऐकायला मिळाली नाही. यहां के राजा मुघलोंके सेनापती होते थे, हे गाईडने सांगितले. याचे कारण असे, कि जोधा अकबर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इथल्या राजांनी मुघलांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले होते. मुघलांच्या दरबारी त्यामुळे इथल्या राजांना मोठा मान आणि पद मिळत असे. त्यांनी शौर्य गाजवले, पण ते मुघलांसाठी, इतरत्र. त्यामुळे इथे त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांच्यावर युद्ध प्रसंग तसे आले नाहीत. महाराणा प्रतापांच्या प्रसिद्ध हल्दी घाटीच्या लढाईत विरुद्ध बाजूने मुघलांच्या वतीने लढणारे इथल्याच राजाचे सैन्य आणि स्वतः राजा होते. आपल्या शिवरायांवर पुरंदरचा तह करायची वेळ आणणारे मिर्झा राजा जयसिंग इथलेच. पुढे ब्रिटीशांशीही जुळवुन घेतले होते. त्यामुळे इथले राजवाडे, महाल, संपत्ती, ऐश्वर्य सगळे शाबूत राहिले, बहरत गेले.

आमेरहुन दिसणारे जयगडचे दृश्य
आज जरा ढगाळ वातावरण होते. आणि पाऊसही थेंब थेंब येऊन जात होता. दुपारच्या वेळी तो थोडा पडून गेला. आम्ही जयगडला जायचे रद्द केले. तिथे एक तोफ हेच मुख्य आकर्षण असल्याचे कळले, तिथे सैनिकी वापराचा किल्ला असल्यामुळे इतर इमारती वगैरे जास्त नव्हत्या. आम्ही दुपारचे जेवण करून थेट नाहरगडला गेलो.
नाहरगड
नाहरगडला सर्व जयपुर शहराचा व्ह्यू दिसतो. इथे सुद्धा राण्यांसाठी बांधलेली हवेली वगैरे आहे. फार काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे नाही. तिथे एक नव्याने बनवलेले लोणावळ्याच्या सुनील'स वॅक्स म्युझिअमसारखे एक नवीन दालन आहे, तिथल्या शीशमहलची आमचा ड्रायवर फार जाहिरात करत होता. तोही ऐतिहासिक नाही तर आता नव्याने एक आकर्षण म्हणुन बांधलेला आहे. ह्याचे तिकीट प्रति माणशी ५०० असे होते. आम्हाला गुगलवरचे फोटो पाहुन त्यात फारसा रस वाटला नाही.





या किल्ल्यावर पडाव कॅफे प्रसिद्ध आहे. संध्याकाळी सूर्यास्त, मोकळी हवा आणि जयपूर शहराचे दृश्य हे तिथले मुख्य आकर्षण. आम्ही गाईड न घेता निवांत तिथली हवेली बघितली, आणि संध्याकाळ होत आली होती तर तिथेच थांबायचे ठरवले. पण हवामानाच्या मनात ते नव्हते. ढगाळ वातावरणामुळे जयपूरचे दृश्य काही स्पष्ट दिसले नाही आणि पाऊस सुरु झाला. सूर्यास्त दिसायची शक्यता सूर्याआधी मावळली.
आम्ही तिथुन निघालो. येता येता रस्त्यात जलमहाल लांबुन बघितला. हा महाल एका तळ्यात छोट्या बेटावर बांधला आहे, त्यामुळे नाव जल महाल. पण तो सध्या पर्यटकांसाठी बंद होता. त्यामुळे बाहेरूनच बघुन पुढे निघालो.

रात्रीचे जेवण शाही रसोडा नावाच्या रेस्टोरंट मध्ये केले. तिथले वातावरण आणि सजावट नावाप्रमाणेच शाही होती. तिथे लाईव्ह परफॉर्मन्स चालु होता. नृत्यांगना अतिथींच्या टेबलजवळ जाऊन जाऊन राजस्थानी गाण्यांवर नृत्य करत होती आणि कोणाला नाचण्यात रस असल्यास त्यांनाही प्रोत्साहन देत होती. माहौल एकदम मस्त होता. जेवण मात्र तेवढे शाही नव्हते.



पावसामुळे आज फार लवकर अंधार पडला होता. अपेक्षेपेक्षा कमी स्थलदर्शन झाले, पण तरी मजा आली.
क्रमशः
४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ.
यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.
पत्रिका गेट
आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही पत्रिका गेट पासुन केली. जयपुरच्या विमानतळापासुन अगदी जवळ एक जवाहर सर्कल आहे. जयपुर शहरात प्रवेश करताना एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं द्वार आपलं स्वागत करतं. त्याचं नाव आहे तोरण द्वार. राजस्थानमध्ये अतिथी, विशेषतः बाहेरगावाहून आलेले जावई आधी दारावरील तोरणाला स्पर्श करून मग आत येतील अशी परंपरा होती. त्या परंपरेची आठवण ठेवत, विमानतळावर उतरलेले प्रवासी जयपूरला येताना या तोरणाला पार करून शहरात येतील, त्यांचं स्वागत हे द्वार करेल अशी ही कल्पना होती.


या द्वाराच्या मागच्या बाजूला एक गोलाकार आकाराची बाग आहे. ती बाग ओलांडुन दुसऱ्या बाजूला आहे पत्रिका गेट. हवामहल, सिटी पॅलेस अशा जयपूरच्या प्रसिद्ध वास्तूंची झलक दाखवणारं, तशाच लालसर पाषाणातुन बनवलेलं, आणि पारंपरिक राजस्थानी पद्धतीने रंगवलेलं, अतिशय सुंदर नक्षीकाम असलेलं हे द्वार, राजस्थानच्या संस्कृतीचं आणि कलेच्या वारशाचे प्रतीक आहे. राजस्थान पत्रिका नावाचं इथे एक प्रमुख वर्तमानपत्र आहे. त्यांचा माध्यम समुह आहे. त्यांनी ह्याचा खर्च प्रायोजित केल्यामुळे याचे नाव पत्रिका गेट ठेवले गेले.


हे दोन्ही द्वार गेल्या काही वर्षात बांधले गेले आणि फार लोकप्रिय झाले. इथे फोटो सुंदर येतात त्यामुळे "इंस्टाग्रामेबल" जागा म्हणुन इथे तरुणाईची वर्दळ असते. प्री वेडिंग शूटवाल्यांची गर्दी असते. शहरातून येताना आधी पत्रिका गेट लागतं. आम्ही पोचलो त्यादिवशी ऊन नव्हतं, थोडंसं ढगाळ आणि प्रसन्न वातावरण होतं. आम्हीही आमची फोटोची हौस भागवुन घेतली. तिथेच मुलांसाठी घोडे घेऊन फिरणारे लोक होते. त्यावर मुलांची घोड्यावरून चक्कर मारण्याची हौस फिटली.
तिथे निवांत वेळ घालवुन रमत गमत बागेतुन फिरत फिरत आम्ही दुसऱ्या बाजुला तोरण गेटला पोहोचलो. इथे पत्रिका गेटपेक्षा थोडी कमी जागा आहे. तेवढ्या जागेत प्री वेडिंग वाल्यांचं बरंच काही चालु होतं. इथुन आम्ही पटकन निघालो आणि मसाला चौकात गेलो.
मसाला चौक म्हणजे इथली एक खाऊ गल्ली आहे. सरकारने जागा घेऊन छान फूड कोर्ट बांधले आहे. चारही बाजूंना खाद्यपदार्थांची दुकाने आणि मध्यभागी बसायला जागा अशी व्यवस्था आहे. याचा उद्देश राजस्थानी खाद्यपदार्थ आणि विक्रेते यांना चांगली जागा मिळावी असा असला तरी इथे पावभाजी, डोसा उत्तप्पा यांचीही रेलचेल होती. आम्ही २-४ स्टॉलवरून पराठे, पावभाजी असे वेगवेगळे पदार्थ घेतले. चव ठीकठाक होती. मला वाटतं चविष्ट खाऊ गल्ली ही नैसर्गिक वेलीसारखी असते. ती आपोआप वाढत गेली, गजबजत गेली तर तिथे उत्तम चवदार पदार्थ मिळतात. स्वच्छता असेलच असं नाही. आणि अगदी पद्धतशीर आखुन रेखुन बागेत रोपटी लावावी तशी लावली तर तेवढी मजा येत नाही.
मसाला चौकात यायचं आणखी एक कारण म्हणजे त्याच्या समोरच अल्बर्ट हॉल संग्रहालय आहे. आम्हाला पुढे तिथे जायचंच होतं त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी मसाला चौक सोयीस्कर जागा होती.
अल्बर्ट हॉल संग्रहालय
अल्बर्ट हॉल संग्रहालय हे जयपूरच्या राजाने इंग्लंडच्या राजकुमाराच्या सन्मानार्थ बांधले. हाच राजकुमार पुढे जाऊन इंग्लंडचा राजा बनला. त्याच्या जयपुर दौऱ्यावेळी इमारतीचे शिळापूजन झाले. याच दौऱ्यात जयपूरच्या सर्व इमारती रंगवल्या होत्या, ज्यावरून पिंक सिटी हे नाव कसे पडले त्यावर मी पहिल्या भागात लिहिले आहे. त्या राजकुमाराला खुश करण्याची केवढी लगबग होती हे यावरून लक्षात येते.

इंग्रजी आणि भारतीय स्थापत्यशैलीचा मिलाफ करून हे बांधले आहे. याच्या नावात हॉल आहे कारण सुरुवातीला याचे नाव फक्त अल्बर्ट हॉल होते. राजाच्या मनात टाऊन हॉल बांधायचे होते. काही वर्षातच एका इंग्रजी संग्रहकार आणि राजाच्या पुढाकाराने इथे एक भव्य प्रदर्शन भरवले गेले. या प्रदर्शनात भारत आणि जगभरातुन कलाकुसर, शिल्पकला याचे वेगवेगळे नमुने गोळा करून मांडले गेले होते. हे प्रदर्शन यशस्वी झाल्यावर येथे कायमस्वरूपी संग्रहालय झाले. त्यामुळे याचे नाव आहे अल्बर्ट हॉल संग्रहालय.

कल्पना करा, या सर्व गोष्टी आहेत एकोणिसाव्या शतकातल्या, म्हणजे १८७६ - १८९० च्या काळातल्या. त्या काळात भारतात असे प्रदर्शन, संग्रहालय या गोष्टी किती रोचक वाटतात. आपलं जसजसं इतिहासाचं शिक्षण, वाचन घडत जातं, तसतसं प्रत्येक कालखंडाबद्दल काही ठळक गोष्टी लक्षात राहतात आणि त्या कालखंडाविषयी आपली काही एक धारणा होते. माझ्या डोक्यात हा कालखंड म्हणजे १८५७ च्या उठाव अयशस्वी झाल्यावर जी काही वर्षे उदासीन गेली, हळू हळू राजकारण सनदशीर मार्गाकडे वळले, काँग्रेस स्थापन झाली अशा गोष्टी आहेत. त्याच काळात एकीकडे भारतात असे प्रयोग होत असतील अशी कल्पना करवत नाही.

त्यातुन या प्रदर्शनात काही जणांना प्रशिक्षण देऊन भेट देणाऱ्या लोकांना व्यवस्थित माहिती देण्याचे काम नेमणे हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि तो इतर संग्रहालयात राबवण्यात आला. ब्रिटिशांचा अनेक गोष्टींबाबत राग येतो, पण हा प्रयोगशील स्वभाव, गुणग्राहकता, अभ्यासु वृत्ती, शिस्तबद्ध दस्तऐवजीकरण याची भारतात अनेक भन्नाट उदाहरणे आहेत. अशा गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत.

इथली इमारत अत्यंत सुंदर असली तरी जुनी झालेली आहे. वस्तुसंग्रह उत्तम आहे. निवांत माहिती बघत, न्याहाळत बघितला तर बराच वेळ सहज जातो. इथे भारतातल्या वेगवेगळ्या भागात जी विशेष कला आहे, शैली आहे त्याचे नमुने आणि थोडी पार्श्वभूमी बघता येते. त्यापैकी एका नमुन्याची गोष्ट रंजक आहे. हि शैली म्हणे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील फक्त एका कुटुंबाकडे होती. ते कुटुंब नंतर राजस्थानच्या सीमावर्ती प्रांतात स्थलांतरित झाले आणि त्यांच्याकडून हा नमुना बनवून घेतला गेला. आत वस्तूंचे फोटो आम्ही काढले नाहीत. त्यामुळे त्या वस्तूचं नेमकं वर्णन आता आठवत नाही. तुम्ही तिथे गेलात तर नक्की सावकाश पहा, तुम्हाला सापडेल.
इथे एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मोठ्या मुलांनी (९-१० वयोगट) इथे फार रस घेऊन सर्व गोष्टी निवांत बघितल्या आणि बघु दिल्या. लहान मुलांना (२-४) जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आणि उरलेला वेळ त्यांना बाजूला घेऊन बसलो.
इथुन बाहेर पडल्यावर आजचा उरलेला वेळ खरेदीसाठी ठरवला होता. माधवी आणि ऋचाला आम्ही आमचे व्यापार खाते सोपवले आणि त्यांचे शिष्टमंडळ बाजारात पाठवले. इथे चारदिवारीच्या भागात बापू बाजार, झवेरी बाजार, त्रिपोलीय बाजार असे वेगवेगळे भाग आहेत. तिथे शर्ट, कुर्ते, पर्स, चादरी, रजया, दागिने असे सर्व काही मिळते. तिथे रात्रीपर्यंत मनसोक्त खरेदी करून त्या थेट मुक्कामाच्या ठिकाणी आल्या.
समीर आणि मी बाल संगोपन खाते आमच्याकडे घेतले आणि मुलांना घेऊन पुन्हा जवाहर सर्कलच्या बागेत घेऊन गेलो. जेवणाची वेळ होईपर्यंत तिथेच त्यांना खेळवले. तोरण गेट आणि पत्रिका गेटच्या रात्रीच्या दिव्यांसकटचे दृश्य बघितले आणि घरी (एअर बी एन बी) गेलो.


घरीच जेवण मागवले. जेवण केल्यावर माधवी आणि ऋचाची प्रत्येकी २-४ थैल्या भरून केलेली खरेदी बघितली आणि झोपी गेलो.
पुढचा दिवस आमचा जयपूरमधला शेवटचा होता. या दिवशी आमची चित्तोडगढ साठी ट्रेन होती. त्यामुळे सकाळी एखादी जागा बघुन जेवण करून आम्हाला ट्रेन गाठायची होती.
इसरलाट
आम्ही आवरून इसरलाटला गेलो. हि जागा तशी पाहण्याच्या दृष्टीने पटकन होते. परवाच व्हायला हवी होती. पण तेव्हा वेळ संपत आल्यामुळे जमले नाही. हि सुद्धा सिटी पॅलेस जवळच आहे. एके काळी जयपूरच्या सिंहासनासाठी दोन भावांमध्ये लढाई झाली. त्यापैकी एक जिंकला आणि त्याला राज्य मिळाले. त्या विजयाची आठवण म्हणून हा मिनार बांधण्यात आला.

इथे वर जाण्यासाठी गोल गोल निमुळता जिना आहे.

वर गेलो कि संबंध जयपूरचे दृश्य दिसते.

त्यापलीकडे इथे बघण्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे आपल्या हौशी पर्यटकांनी भिंतीवर लिहिलेले प्रेम व्यक्त करणारे शिलालेख.

एकाच ठिकाणी एका बाजूला रक्ताची महागडी किंमत मोजून लढलेले युद्ध आणि दुसऱ्या बाजूला आयत्या इमारतीत कुठून तरी उचललेल्या विटकरीने फुकटात केलेले विद्रुप प्रेम लेख.
यानंतर आम्ही लक्ष्मी मिष्ठान्न भंडारला गेलो. इथे मिठाई आणि चाट पदार्थांचे दुकान आहे आणि बाजूलाच त्यांचे हॉटेल आहे. तिथे जेवण उत्तम होते. इथली डाळ बाटी आणि लस्सी आणि इतर पदार्थ मला चोखी धानीपेक्षा जास्त आवडले.


गच्च जेवणानंतर आम्ही सामान घेऊन स्टेशनला गेलो आणि चित्तोडगडला रात्री पोहोचलो. ४.५ दिवस जयपूरला निवांत घालवून आणि बऱ्याच गोष्टी बघत इथला प्रवास संपला. पुढचे ३ दिवस उदयपूर विभागात जाणार होते. त्याबद्द्ल उर्वरित लेखांमध्ये.
क्रमशः।
५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते.
उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली.
मराठी पर्यटक
चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या. त्यांचे काही नातलग पुण्यात राहतात म्हणाले. असेच माझ्या बायकोसोबत ती जयपूरमध्ये खरेदी करत असताना झाले. तिथल्या दुकानदाराने सुद्धा ते पुण्याहुन आलेत का अशी चौकशी केली. त्या लोकांना मुंबईची हिंदी आणि पुण्याची हिंदी वेगळी ओळखु येते म्हणे. खरं तर आम्ही पुण्याचे नाही, छ. संभाजीनगरचे. तरी मराठी तर सोडाच आमच्या हिंदीवरही पुण्याचा प्रभाव पडलाय हे कळल्यावर गंमत वाटली.
आपल्या मराठी मंडळींमध्ये पर्यटनाची खरंच फार आवड आहे. याआधी काही महिने आम्ही उत्तराखंडला गेलो होतो तिथेही मराठी मंडळी प्रत्येक ठिकाणी आसपास असायची. इथे जयपूरला तर रोज केसरी, वीणा वर्ल्ड वगैरे सोबत मोठमोठे मराठी समुह दिसायचे. मला फार माहिती नाही, पण इतर राज्यात अशा मोठ्या प्रवास कंपन्या आहेत का कोणास ठाऊक. तिकडे ग्रुप टूर तेवढ्या प्रचलित नसाव्यात असं वाटतं. एवढे मोठे ग्रुप मराठीच दिसतात. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेलो होतो. तेव्हा तिथला नेपाळी गाईडसुद्धा म्हणाला होता कि आमच्याकडे भारतातले जे लोक येतात त्यापैकी मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रातलेच असतात.
इतर समूह म्हटलं तर गुजराती लोक असतात, त्यांच्यात कौटुंबिक एकोपा फार छान दिसतो. त्यांचे मोठे समुह त्यांच्याच कुटुंबीय आणि गोतावळ्याचे पाहण्यात आलेत. दाक्षिणात्य कुटुंबेसुद्धा दिसतात, पण संख्येने थोडे लहान. बाकी सुटीच्या दिवसात त्या त्या राज्यातले स्थानिक लोकही असतात. उत्तराखंडची काही शहरे, जयपुर वगैरे दिल्लीहुन फार पटकन पोहोचण्यासारखी असल्यामुळे तिथे दिल्लीतुन आलेले सुद्धा बरेच लोक असतात.
आमचा चित्तोडगडचा गाइड तर म्हणाला, ये आप लोग का सीजन चल रहा है अभी. हमे सालभर का अंदाजा होता है, मराठी लोग कब आएंगे, बंगाली कब आएंगे. आप लोग गर्मीयोमे या दिवाली के बाद आते हो, वो लोग दुर्गापूजा के बाद आते है. कदाचित असं सुद्धा असेल, मुलांच्या सुट्ट्या बघुन आम्ही प्रवास करतो तेव्हा तीच मराठी लोकांची सोयीस्कर वेळ असल्यामुळे तेव्हा मराठी लोक जास्त दिसत असतील. असो.
चित्तोडगड
चित्तोडगढ हा फक्त किल्ला नाही. एकाच वेळी तो भारताच्या इतिहासातला मानबिंदू आहे आणि त्याचवेळी आपल्या हृदयातली भळभळती जखमसुद्धा. याचे मुळ नाव "चित्रकूट दुर्ग" होते. हा किल्ला प्रचंड विस्तीर्ण आहे. हि अनेक पिढ्या मेवाड घराण्याच्या राजवंशाची राजधानी होती. इथे तब्बल २७ वेळा हल्ले झाले. त्यापैकी २४ वेळा ते परतवुन लावण्यात इथल्या लोकांना यश आले.

ज्या ३ वेळा त्यांना अपयश आले, त्यावेळेस इथल्या महिलांनी मोठ्या संख्येने "जौहर" केला. सावरकरांनी हा शब्द "जय हर" चा अपभ्रंश असावा असा अंदाज केला होता. मध्यपूर्वेतून आलेल्या इस्लामी आक्रमकांची बर्बरता, त्यांचे पराभूतांप्रतीचे क्रौर्य याच्या बऱ्याच कथा आहेत. आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसत असेल तर त्यानंतर आपल्या सन्मानास ठेच पोहोचु नये म्हणुन स्त्रिया चितेमध्ये स्वतःहुन उडी घेऊन आत्मबलिदान करत असत. त्यानंतर उरले सुरले योद्धे जीवावर उदार होऊन, मरणाची खात्री असूनही बलवत्तर शत्रुवर चालुन जात असत. केवळ आपल्या गेलेल्या स्वकीयांच्या सन्मानाप्रती आदरांजली म्हणुन. याला "साका" म्हणतात.

मी लहानपणी चौथी पाचवीत असताना आई बाबांसोबत इथे येऊन गेलो होतो. तेव्हाही आम्ही गाइड केला होता आणि इथली माहिती ऐकली होती. तशी माझी स्मृती चांगलीच आहे, पण इथल्या गोष्टीने मनावर फार परिणाम केला होता.
इथे एक मोठा विजयस्तंभ आहे. राणा कुंभ यांच्या एका युद्धातल्या विजयाच्या स्मृतीसाठी बांधलेला विजयस्तंभ आहे. अतिशय सुंदर, पाहणाऱ्याच्या मनावर लगेच प्रभाव टाकणारा हा स्तंभ आहे.

तिथुन थोडंसंच पुढे गेलं कि लगेच मोडतोड केलेली शिल्पं, काही भग्न अवशेषसुद्धा दिसतात. हा असा विरोधाभास आहे. विजय आणि पराभव दोन्हीच्या खुणा अगदी आजूबाजूला. मी वेरूळला खुपदा गेलेलो आहे. असे भग्न अवशेष पाहुन मला नेहमीच वाईट वाटतं.

लहानपणीच्या इथे दिलेल्या भेटीमुळे राणी पद्मिनीची गोष्ट मला संजय भन्साळीचा चित्रपट येण्याच्या आधीपासुन माहित होती आणि ती पाहुन आश्चर्यही वाटलं नव्हतं. काही "पुरोगामी" मंडळींनी त्यावर विनाकारण टीका केली होती, स्त्रियांना फक्त वस्तु आणि सन्मानाची ट्रॉफी असल्यासारखं दाखवलं आहे असा आक्षेप नोंदवला होता. आपण आजच्या काळातले मापदंड काही शतके आधीच्या काळावर लावणे मला चुकीचे वाटते. आपल्या समाजात भले तेव्हा आणि आज सुधारणेस भरपुर वाव असेल, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा असेल. पण स्त्रियांना आक्रमकांकडे जी वागणुक मिळत असे तिचा विचार करता, तेव्हाच्या मानी स्त्रियांना मरण श्रेयस्कर वाटलं असेल तर ते समजु शकतं. राणी पद्मिनीची गोष्ट आज सांगितली जाते तशीच घडली असेल का यावर वादविवाद आहेत, पण असे जौहर वेगवेगळ्या काळात झाले होते हे मात्र खरे.
इथे बाजूलाच समाधीश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.

इथला महादेव थोडा वेगळा आहे. तीन मुखे असलेल्या दुर्मिळ रूपात पाहायला मिळतो. तिन्ही मुखांवर वेगळे हावभाव आहे. त्याची गोष्ट गाइडने सांगितली, पण नीटशी लक्षात राहिली नाही.

जवळच एक गोमुख कुंड आहे, ज्यातुन सतत जलप्रवाह सुरु असतो, ते आम्ही लहानपणी बघितले होते. ते यावेळी पूर्ण पाण्यात बुडाले होते.
चित्तोडगड हे संत मीराबाईंचे सुद्धा सासरचे घर होते. त्या मेवाड च्या राजवंशातल्या पुत्रवधु होत्या. लग्न झाले असले तरी त्या कृष्णभक्तीत इतक्या लीन होत्या कि त्यांचे नवऱ्याकडे, संसाराकडे हवे तितके लक्ष नव्हते म्हणुन त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी त्यांचा छळ केला, मारायचे प्रयत्न केले, पण कृष्णाने नेहमी त्यांना वाचवले असे सांगितले जाते. शेवटी त्या द्वारकेत गेल्या आणि तिकडेच कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाल्या अशी एक कथा आहे. या चमत्कारी कथासुद्धा किती खऱ्या किती खोट्या यावर चर्चा होते.

मीराबाईंचे सासरे राणा संगा (संग्रामसिंह) यांनी त्यांच्या विनंतीवरून बांधलेले श्याम मंदिर आजही येथे आपल्याला दिसते. येथे संत मीराबाई कृष्णाची आराधना करत असत असे सांगितले जाते. समोर त्यांच्या गुरु संत रविदासांच्या पदचिन्हांवर बांधलेली छत्रीसुद्धा आहे. आपल्याकडे इतिहास व्यवस्थित लिहुन ठेवण्याची पद्धत उशिरा आल्यामुळे त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दंतकथांची भर पडते.
अशीच एक दंतकथा अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला बघण्याचा हट्ट धरल्यामुळे राणीला एका शीश महालामध्ये आणुन तिचे फक्त प्रतिबिंब क्षणभर दाखवुन तिला परत पाठवले गेले अशी आहे. आम्ही लहानपणी आलो होतो तेव्हाच्या गाइडने हि कथा सांगितली होती आणि ती जागाही दाखवली होती. तेव्हा उन्हाळा होता आणि फार शुष्क वातावरण होते, मला घरी जाईपर्यंत उष्णतेचा प्रचंड त्रास झाला होता. तेव्हा किल्ला आणि परिसर अगदी कोरडा ठाक होता.

यावेळी मात्र चांगला पाऊस पडून गेला होता आणि ती दाखवलेली जागा आज तळ्यात पाण्याने वेढलेली होती. पद्मावत चित्रपटाच्या वेळी झालेल्या वादंगापासुन या कथेवर बराच खल झाला आणि आता असं काही घडलं नाही असं सांगतात. तो गाइड म्हणाला वो तो हमारे बापजादे गाइड लोगोंकी गलती थी. उन्होंने टुरिस्ट लोगोंको बताने के लिये बढा चढा के कोई कहानी बना दी और वही फैल गयी.
या गाइडला इथल्या इतिहासाचा फार अभिमान होता, आणि तेवढाच जयपूरच्या राजांवर राग होता. त्यांनी मुघलांशी हात मिळवला, मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला, या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टी त्याने सांगितल्या. तेवढं वगळता अतिशय अदबीने आओ सां, पधारो सां अशा पद्धतीने बोलत होता. इथे बरेच लोक अशाच अदबीने बोलतात, ते पाहुन आमच्या मुलांना गंमत वाटली होती. तीही अधुन मधुन खाओ सां, पिओ सां अशी बोलत होती.
चित्तोडगडला जैन समाजाची अनेक तीर्थस्थळे आहेत. शहरात धर्मशाळा आहेत. अनेक शतकांपासुन इथे जैन मुनी, जैन व्यापारी यांचा वावर आहे. जैन व्यापारी आणि मेवाडच्या राजांमध्ये चांगले संबंध होते. भामाशाह नावाच्या व्यापाऱ्याने महाराणा प्रतापांना बरीच मदत केली होती. त्यापैकी काही आम्ही बाहेरून बघितली.
सावलिया सेठ
चित्तोडगडहुन आम्ही कॅबने उदयपुरकडे निघालो. वाटेत एक सावलिया सेठ नावाचे मंडफिया गावात एक प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे तिथे जायचे होते. इथल्या कृष्णाचे वैशिष्ट्य असे कि हा व्यापारी वर्गात या मंदिराविषयी विशेष श्रद्धा आहे. त्याला व्यापारात भागीदार म्हणुन ठेवले तर आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. अनेक व्यवसायांमध्ये कृष्ण याप्रकारे मानलेला भागीदार आहे. त्याच्या वाट्याची म्हणुन काही रक्कम देवधर्मासाठी बाजूला ठेवली जाते. त्यामुळे याला "सेठोका सेठ" असेही म्हणतात.
पण आम्ही तिथे येईपर्यंत तिथे पट बंद होण्याची वेळ झाली होती. मी पहिल्या भागात या बद्दल सांगितले आहे. इथल्या मंदिरांमध्ये आरती, भोजन, विश्राम अशा वेगवेगळ्या निमित्ताने पट म्हणजे देवासमोर पडदे लावुन दर्शन बंद करतात. त्याची वेळ गाठणे आव्हानात्मक असते. आमची वेळ चुकली. आज कॅब दिवसभर आमच्या ताब्यात होती, चित्तोडगड आणि उदयपूर मिळुन आमचे दिवसाला ३०० किमान किमी ठरलेले असतात तेही होणार नव्हते. त्यामुळे पहाटे लवकर इथे येऊन परत चित्तोडगड किल्ला बघायला गेलो असतो तरी चालले असते. पण हि झाली पश्चातबुद्धी. आम्ही कृष्णाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. पुन्हा जोराचा पाऊस झाला. वाटेत जेवण करून आम्ही उदयपूरला पोहोचलो.
उदयपूर सिटी पॅलेस
उदयपूरलाही कमी अधिक जोराने पाऊस होताच. आता कुठली आऊटडोअर ठिकाणे पाहण्यात अर्थ नव्हता. आम्ही सिटी पॅलेसला गेलो. उदयपूरचा सिटी पॅलेस अतिशय भव्य आहे. इथे तिकिटे, पार्किंग फीस, तिथल्या तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॉल मध्ये असतात तशा गाड्या आहेत. सगळ्याच गोष्टी अतिशय महाग आहेत. पार्किंग ५०० रुपये, ती गाडी एका दिशेने जाण्यासाठी १०० रुपये, परत येताना वेगळे पैसे. इतकी भरगच्च गर्दी असुन एवढी लुट कशासाठी असा प्रश्न पडला.

महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांनी चित्तोडगडावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्वकीयांच्या सल्ल्यावरून हे शहर वसवले आणि राजधानी बनवली. त्यामुळे याचे नाव उदयपुर. नंतरच्या अनेक पिढ्यांनी महालाच्या रचनेत भर घालत घालत आज या स्थितीत आणलेला आहे. महाराणा प्रतापांना मात्र या शहरात फारसे वास्तव्य करता आले नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य जंगल आणि अरावली पर्वतात गनिमी काव्याने लढण्यात गेले.
इथे राजांची वंशावळ, त्यांच्या वापरातली हत्यारे, माणिक मोती अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात.



महालात फिरताना आपण कुठून कुठे जात आहोत हे आपल्याला समजत नाही. एका खोलीतुन दुसऱ्या खोलीत जाण्याचे रस्ते, जिने सगळे अगदी अरुंद आणि चिंचोळे बांधले आहेत.

महाल एवढा मोठा असताना इथे जागा कमी का याचे उत्तर म्हणजे कोणी महालात हल्ला करायला आले तर त्यांना एक एक करून यायला आणि मोठे हत्यार न उगारता यायला भाग पडावे यासाठी.
राजस्थानी चित्रांमध्ये गोष्ट सांगण्याची एक शैली आहे. कॉमिक बुक मध्ये जसं प्रत्येक प्रतिमेत वेगळा प्रसंग किंवा प्रसंगांची मालिका असते तसं इथे नसतं. एखादी घटना आणि त्यातले क्रमानुसार घडलेले वेगवेगळे क्षण इथे एकाच चित्र प्रतिमेत दाखवलेले असतात. त्यामुळे ती घटना माहित नसेल तर थोडं समजायला अवघड जाऊ शकतं. नमुना म्हणुन मी एका चित्राचा फोटो काढला आहे.

यात राजा एका वृक्षावर बसलेला आहे आणि अस्वलाची शिकार करतानाचा प्रसंग आहे. यात अस्वल आडोशातुन बाहेर निघाले, झाडाजवळ आले अन मग शिकारीनंतर मरून पडले अशा अस्वलाच्या हालचाली आहेत, पण प्रथमदर्शनी पाहताना वाटेल जंगलातील अनेक अस्वले दाखवली आहेत. तसे नसुन हा आत्ता सांगितलेला घटनाक्रम आहे.

उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर म्हटले जाते. हे तलाव मानव निर्मित आहेत. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी प्रतिभा घेऊन समजा कोणी राजस्थानात पहिल्यांदा उदयपूरला आले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. या तलावातही जलमहाल, जगत मंदिर पॅलेस असे महाल बांधले आहेत. तिथे अत्यंत महागडे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. या सगळ्याचे दृश्य सिटी पॅलेस मधुन छान दिसते.




राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम
पॅलेस पाहिल्यावर आम्ही पॅलेससमोरच्याच गल्ल्लीत "विरासत" नावाचा एक अतिशय सुंदर राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. पपेट शो तर आधी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी होते आणि चोखी धानीमध्ये लोककलांचे सादरीकरणही पाहिले होते. पण त्या सर्वांचा दर्जा आणि इथल्या दर्जामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.

इथे सर्व उच्च प्रतीचे व्यावसायिक कलावंत, छान बसवलेले संगीत आणि नृत्य सादरीकरण पाहायला मिळाले. इथुन जवळच गणगौर घाटावर गेल्या अनेक वर्षांपासुन असा कार्यक्रम प्रसिद्ध आहे, तिथल्याच काही कलावंतांनी आपला वेगळा चमु घेऊन इथे सादरीकरण सुरु केले आहे.

याच गल्लीच्या तोंडाशी जगदीश्वर नावाचे उंचावर बांधलेले मंदिर आहे. तिथे छान दर्शन झाले. थोडे राजस्थानी बोलीभाषेतले भजन ऐकायला मिळाले.
आमचे "हॉटेल बंजारा हेरिटेज" इथुन जवळच होते. ऑनलाईन बुकिंग करताना आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत नाही. आमचे हॉटेल छान होते, जागा छान होती. पण इथल्या अत्यंत गजबजलेल्या भागात. सिटी पॅलेस जवळ रस्ते फार छोटे आहेत, चढ उताराचे आहेत आणि अनेक ठिकाणी वन वे आहे. पॅलेस नंतर वर सांगितलेली दोन ठिकाणे आम्ही पायीच फिरलो. कॅब वाला पॅलेसच्या पार्किंगमध्ये थांबलेला होता. त्याला नेमके आमच्या हॉटेलच्या गल्लीमध्ये गाडी आणता येणार नव्हती.
सिटी पॅलेसच्या गल्लीमध्ये एक सशुल्क पार्किंग होती, मी त्याला तिथे बोलावुन घेतले. कुटुंबाला हॉटेलमध्ये चेक-इन करून रुममध्ये सोडले. कॅबवाला सशुल्क पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिथुन सामान एका रिक्षात टाकले आणि मग हॉटेलमध्ये आणले.

त्याच हॉटेलमध्ये टेरेस रेस्टॉरंट होते. इथल्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक छोट्या पण उंच बिल्डिंग आहेत आणि त्यावर रूफ टॉप रेस्टॉरंट आहेत. त्यांना लेकचा छान व्ह्यू आहे. त्यादिवशी पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे नीट दिसत नव्हते. पण इतर दिवशी दिसत असेल. तिथे संध्याकाळची हवा, योग्य आवाजात संगीत आणि एकंदर वाईब मस्त होती. जेवणही छान होते. इथे यायचा कुटाणा होत असला तरी इथली सेवा, जेवण, एकूण मुक्काम आम्हाला आवडला.
प्रसन्न वातावरणात आणखी एक दिवस संपला.
क्रमशः।
चित्तोडगडवर मात्र काही ठिकाणी काही मंदिरांच्या तिथे जाऊ देत नाहीत ते बघून घालमेल होते. तिथे जाऊ देत नाहीत कारण अल्लादिन खिलजी किंवा तत्सम हरामखोरांनी त्या मंदिरांमध्ये तोडफोड केलेली आहे अशा ठिकाणी जाऊ देत नाहीत.
राजस्थानात जाण्यापूर्वी तिथल्या राजपूत राजांचा इतिहास माहिती करून घ्यायला हवा होता असे जाणवले. आपल्याला फार तर राणा प्रतापविषयी थोडीफार माहिती असते. पण राजपूत राजघराण्यातील राणा प्रताप हा शेवटचा स्वतंत्र बाण्याचा राजा होता. नंतरच्या राजांनी मुघलांपुढे नांगी टाकली आणि मग शिवाजी महाराजांविरूध्द यश मिळावे म्हणून शतचंडी यज्ञ करणारे मिर्झाराजे जयसिंग असले गुलाम निपजले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंत ३०-४० राजे तरी झाले. त्याविषयी काहीच माहिती नव्हती त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गाईड सांगत होते किंवा संग्रहालयांमध्ये लिहिले होते ते काहीच समजले नाही.
बाकी उदयपूरवरून चित्तोडगडला जाताना चित्तोडगड शहरात प्रवेश करतानाच एक गुड्डुभाई कचोरीवाला म्हणून आहे. त्याच्याकडील कांदा कचोरी खूप प्रसिध्द असते.

उदयपूर-चित्तोडगड रस्त्यावर बाजूला शेतांमध्ये नीलगाई दिसतात.
उदयपूरला जाऊन सात वर्षे झाली. त्यावेळेस विरासत हा शो बहुदा चालू झाला नसावा. तेव्हा नावही ऐकले नव्हते. पण गणगोर घाटावर धरोहर म्हणून राजस्थानी लोकनृत्ये, कठपुतली वगैरेंचा एक शो बघितला होता. तो खूपच आवडला. आम्ही त्या गणगोर घाटाजवळच पिचोलाच्या जवळपास एका छोटेखानी हॉटेलात राहिलो होतो. तिथे पिचोलावर एक लहानसा ब्रिज होता आणि त्या ब्रिजच्या पलीकडचा भाग एकदम मस्त होता. तिथे गोव्याची आठवण व्हावी असे छोटे कॅफे होते. तिथेच आमराई म्हणून एक मस्त रेस्टॉरंट आहे. तिकडचे जेवण मस्त होते. एकंदरीत राजस्थानी खाणे खूपच आवडले. दालभाटी-चुर्मा तर खूपच सुंदर. आम्ही राहिलो होतो त्या हॉटेलात गच्चीवर सकाळी नाश्ता असायचा. तो पण छान होता. तो सगळा परिसर होता छान पण सगळे सरकारी कायदेकानू आणि नियम धाब्यावर बसवून सगळा कारभार चालला होता असे वाटले. समजा चुकूनमाकून तिथे आग वगैरे लागली असती तर कसलीच व्यवस्था तिथे होती असे वाटत नाही.
आम्ही गेलो होतो ते १० जानेवारीच्या आसपास. मस्त गुलाबी थंडी तिथे होती. ती थंडी मुंबईतून गेलेल्यांना त्रास होईल अशी होती. त्यापेक्षा जानेवारीचा शेवट/फेब्रुवारी पहिला आठवडा हा अधिक योग्य काळ असेल असे वाटले. सिटी पॅलेसजवळच एक व्हिन्टेज कार म्युझिअम होते. तिथे मोठ्या उत्साहाने गेलो खरे पण तिथे गेल्यावर निराशा झाली. जुन्या २०-२५ गाड्या असतील आणि त्यासाठी सात वर्षांपूर्वी प्रत्येकाचे साडेतीनशे रूपये तिकिट होते. ते कै च्या कै वाटले. तसेच जगमंदिरमध्ये राहायच्या खोल्या आहेत. बायकोला असे कुठे गेल्यावर उचकापाचकी करून त्या खोल्या बघायची खूप हौस आहे. त्याप्रमाणे एक खोली बघितली. ती खोली ठिकठाकच होती. इतकी काही असामान्य नव्हती. त्या खोलीचे दर किती तर दिवसाला ३६ हजार रूपये. म्हटले बोंबला. प्रियांका चोप्रा वगैरे लोक तिथे येऊन लग्न करून जातात म्हणून सगळेच दर वाढले आहेत की काय कल्पना नाही.
एकूण उदयपूर आणि चित्तोडगड मस्तच आहे. कधीनाकधी सगळ्यांनी बघावा असा तो भाग आहे.
इतिहास माझा आवडीचा विषय आहे, त्यामुळे अगदी सखोल नाही तरी थोडी थोडी माहिती ऐकण्यात वाचण्यात आलेली लक्षात राहते. दुसरं म्हणजे एखादी जागा पाहुन आल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळत राहतो त्यामुळे त्यासंदर्भात आल्यावरही थोडं वाचन करतो. आता इंटरनेटमुळे हे अगदी सुलभ आहे. त्यामुळे आपापल्या आवडीप्रमाणे आधी किंवा नंतर आपण जागेची आणि इतिहासाची थोडी अधिक माहिती घेऊ शकतो.
६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
आजचा दिवस उदयपुरच्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली.
सहेलियोंकी बारी
हे एक सुंदर उद्यान आहे. राजपरिवारातल्या स्त्रियांसाठी विरंगुळ्याचे, मनोरंजनाचे ठिकाण म्हणुन हे बनवण्यात आले. एकदम विस्तीर्ण उद्यान, छोटेसे तळे, अनेक कारंजे, फुलांचे ताटवे इथे बघायला मिळतात. त्याव्यतिरिक्त इथे काही नसलं तरी इथे येऊन मन प्रसन्न नक्कीच होतं. त्या काळात टीव्ही, रेडिओ काही नसताना, पडदा पद्धत प्रचलित असताना, स्त्रियांना बाहेरही मुक्त वावर करता येत नसेल. त्यामुळे अशा जागी येऊन नक्कीच विरंगुळा मिळत असेल. टीव्हीवर रामायण दाखवतात त्यात राम लक्ष्मण जेव्हा मिथिलेत पोहोचतात तेव्हा त्यांची आणि सीतेची भेट अशाच बागेत दाखवलेली आहे.








एकलिंगजी मंदिर
यानंतर आम्ही गेलो एकलिंगजी मंदिरात. हे मेवाड राजघराण्याचे कुलदैवत. महाराणा प्रतापांच्या अनेक पिढ्या आधीचे पूर्वज बाप्पा रावळ यांनी हे मंदिर बांधले. त्यांचाही तिथे पुतळा आहे. या बाप्पा रावळांनी राज्याचे खरे स्वामी आणि राजे म्हणजे महादेवच, आम्ही फक्त त्यांचे दिवाण (सेक्रेटरी) अशा भावनेने राज्य केले. राज्यकर्त्यांकडे विनम्रता असणे फार आवश्यक आहे. त्यांच्या वंशजांची देखील अशीच मान्यता आहे. बाप्पा रावळ ते आजवर किती राजांनी खरंच हा विचार कृतीत आणला असेल ते कोणास ठाऊक.


आजचे पंतप्रधानसुद्धा स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात, आपल्या कार्यालयाचे नाव बदलुन सेवातीर्थ ठेवतात. इथे आल्यावर लक्षात येते, अशा प्रकारचा विचार आपल्या देशात किंवा संस्कृतीत केवळ लोकशाहीतुन किंवा माध्यमांमध्ये एक प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न म्हणुन आलेला नाही तर शेकडो वर्षे आधीपासुन आहे. प्रश्न हा आहे कि उच्चासनावरचा सत्ताधारी काहीही म्हणो, त्याच्या आजूबाजूची व्यवस्था तो या विचाराच्या अनुरूप राबवु शकतो कि नाही. सामान्य जनतेला सरकार दरबारी कामे करवुन घेताना आपण हक्काची सेवा घेत आहोत असं वाटतं कि बाबूंसमोर लाचार झाल्यासारखं वाटतं. असो. कुठे तरी विचाराचं बीज असेल तर त्याचं फळ मिळण्याची आशा ठेवता येते, कोणाला असं बोलण्याइतपतही विनम्रतेची गरज वाटली नाही तर कसली आशा?
हल्दी घाटी
एकलिंग मंदिरानंतर आम्ही हल्दी घाटीला गेलो. ही महाराणा प्रतापांच्या आणि चेतक घोड्याच्या प्रसिद्ध गोष्टीची जागा. हल्दी घाटीजवळची माती पिवळसर रंगाची असल्यामुळे याचे नाव असे पडले असावे.


जयपूरचे राजा मानसिंग यांनी मुघल बादशाह अकबराच्या वतीने मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला. महाराणा प्रताप चेतक या आपल्या लाडक्या आणि रुबाबदार घोड्यावर होते. ते घोड्याला खोटी सोंड लावत असत. हत्ती हत्तीवर हल्ला करत नाही, आणि या खोट्या सोंडीमुळे शत्रुपक्षातला हत्ती गोंधळत असे.

राजा मानसिंग एका हत्तीवर अंबारीत होते, महाराणा प्रतापांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला, परंतु ते वाचले. मेवाडचे सैन्य संख्येने कमी होते. त्यांनी शौर्य गाजवले. परंतु मुघलांची सरशी होतेय असं वाटायला लागलं. महाराणा प्रताप मुघलांच्या तावडीत सापडु नयेत म्हणुन त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथुन निसटायला सांगितले. झाला मानसिंग नावाच्या त्यांच्या सरदाराने त्यांचे राजचिन्ह परिधान केले आणि मुघलांना आपण महाराणा प्रताप असल्याचे भासवत मरेपर्यंत लढले.

महाराणा प्रताप आणि काही सैनिक तिथुन आपापल्या घोड्यांवर निसटले. चेतक घोडाही जखमी झाला होता तरीही त्याने या खिंडीत मोठी उडी मारून त्यांना पलीकडे पोहचवले आणि तो कोसळला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो महाराणांचा इमानदार आणि लाडका घोडा होता. महाराणा प्रतापांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक बनवुन घेतले.
महाराणा प्रताप म्युझियम
या ठिकाणाहून जवळच एक म्युझियम बनवण्यात आले आहे. तिथे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर आधारित अनेक प्रसंगांची शिल्पे आहेत. प्रत्येक शिल्पासमोर समूह जमला कि एक ध्वनिफीत वाजवली जाते, आणि त्या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगाची माहिती मिळते. त्यासोबतच एका छोट्या चित्रपटगृहात एक लघुपट दाखवला जातो ज्यात वर सांगितलेला प्रसिद्ध लढाईचा प्रसंग सविस्तर समजावुन सांगितलेला आहे.




राजस्थानी वीरांच्या मांदियाळीत आपल्या महाराजांना मानाचे स्थान पाहुन आनंद झाला.

महाराणा प्रताप प्रचंड संघर्षमय आयुष्य जगले. राजस्थानातले अनेक राजे मुघलांना सामील झाल्यामुळे ते एकटे पडले होते. आर्थिक आणि मनुष्यबळ दोन्हीची चणचण त्यांनी सोसली. जंगलात राहुन, कंदमुळे खाऊन, गनिमी काव्याने त्यांनी लढा चालु ठेवला. आपला बराचसा प्रांत मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला. त्यांचे एक स्वप्न होते, त्यांची पिढीजात राजधानी असलेले चित्तोडगड परत मिळवण्याचे, ते मात्र अर्धवट राहिले.
राजस्थानबाहेरून आलेल्या, तिथल्या इतिहासाची फारशी माहिती नसलेल्या, आणि महाराणा प्रतापांचे फक्त नाव ऐकून असलेल्या लोकांना त्यांचे आयुष्य, प्रेरणादायी चरित्र थोडक्यात समजावुन घेण्यासाठी हि उत्तम जागा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प सरकारी नाही, एका जोडप्याने इतिहासावरील प्रेमापोटी आपल्या मेहनतीने, जमापुंजीचा वापर करून आणि लोकसहभागातुन बनवलेले स्मारक आहे. आपल्याकडे नुकताच बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतुन उभा राहिलेला शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा असाच कौतुकास्पद आहे.
हल्दी घाटी स्मारक
या स्मारकाजवळच उंच टेकडीवर आणखी एक जागा आहे. तिथे महाराणा प्रतापांचा चेतक घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. आजूबाजूला काहीच नाही. दूर दूरपर्यंत अरावली डोंगर रांगांचं दृश्य.


आमच्या ड्रायव्हरने खरं तर चेतक स्मारक समजुन आम्हाला इथे आणलं होतं. तो स्थानिक असल्यामुळे आतापर्यंत तरी काही सांगायची किंवा मॅप लावण्याची गरज पडली नव्हती. मी फक्त मधुन मधुन वेळेचा अंदाज घ्यायला मॅप बघत होतो.
इथे आल्यावर मात्र मला त्याने चुकीच्या ठिकाणी आणल्यासारखं वाटलं. मी कुठे कुठे जायचं हे ठरवताना या जागांचे गुगलवरचे फोटो बघितले होते त्यामुळे चेतक स्मारक हे नाही हे माझ्या लक्षात आलं. मी मॅपवर चेक करून त्याला जागा आणि फोटो दाखवले. मग त्याला पण लक्षात आलं, हां ये भी एक है, लेकिन वहा कोई नही जाता. म्युझियम के बाद लोग यही पर आते है.
इथे बरेच लोक कॅब घेऊन फिरतात त्यामुळे कुठली ठिकाणं सोबत बघायची त्याचा या ड्रायव्हर आणि त्यांच्या मालक लोकांचा सुद्धा एक आडाखा असतो. मी कॅब ठरवतांना दोन तीन जणांशी बोललो. एक जण स्वतःच मला पूर्ण दिवसाचा प्लॅन सांगत होता, आणि त्यात बदल करायचीही त्याची तयारी नव्हती. त्यामुळे जो जरा त्याबाबतीत लवचिक होता त्याच्याकडून मी कॅब घेतली होती.
त्याने मला विचारलं तिकडे घेऊन जाऊ का? पण आम्हाला आणखी जेवण करून मग नाथद्वाराला पोहोचायचं होतं. त्यापलीकडे पण एक जागा मी बघुन ठेवली होती पण तिकडे जायलाही वेळ मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्या चेतनच्या खऱ्या स्मारकाचा विचार सोडला आणि आम्ही रस्त्यात जेवण करून नाथद्वाराला गेलो.
हल्दी घाटाजवळ चैत्र महिन्यात गुलाब भरपूर येतात म्हणे. आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यांपासुन इथे गुलाबजल, गुलाब सरबत अशी अनेक उत्पादन स्थानिक लोक तयार करतात. त्याला चेत्री गुलाब का शरबत म्हणतात. महाराणा प्रतापांच्या स्मारकात सुद्धा तिथला माणुस या उत्पादनाची माहिती देत होता. इथे प्रत्येक पर्यटनस्थळांवर कुठल्या न कुठल्या उत्पादनाशी व्यापाराशी संलग्न काहीतरी असतंच. कमालीचे व्यावसायिक आहेत इथले लोक.
नाथद्वारा
नाथद्वारा हे श्रीकृष्णाचे महत्वाचे ठिकाण आहे. इथे त्याला श्रीनाथजी म्हणुन संबोधले जाते. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यातल्या भाविकांसाठी, विशेषतः वैष्णवांसाठी हे फार श्रद्धेचे स्थान आहे. या मंदीरात बाल रूपातल्या कृष्णाची काळ्या दगडातली मूर्ती आहे.
इथल्या कथेनुसार हि स्वयंभु असुन, आधी गोवर्धन पर्वतावर प्रकट झाली होती. त्यानंतर ती मथुरेत होती. औरंगजेबाच्या मथुरेवर मंदिरांची नासधुस करण्यासाठी हल्ला करण्याची बातमी कळल्यावर तिथल्या लोकांनी ती तिथुन हलवली. त्यांचा रथ या ठिकाणी आल्यावर जमिनीत रुतला आणि पुढे सरकत नव्हता. तेव्हा पुजाऱ्यांची अशी धारणा झाली कि श्रीनाथजींनी आता याच जागेची निवड केलेली आहे. तेव्हाच्या मेवाडच्या राजांनी इथे मंदिरासाठी जागा दिली. जवळपासचा इतर कोणताही राजा औरंगजेबाच्या भीतीने या मूर्तीला जागा देण्यासाठी तयार नव्हता.
या गावात आल्यावर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत कि गुजरातमध्ये असा प्रश्न पडावा इतके गुजराती भाविक आणि दुकानदार आहेत. मला तर मागच्या वर्षी आम्ही द्वारकेत जाऊन आलो त्याचीच आठवण झाली. तसंच वातावरण, गजबज आणि थोडी अस्वच्छता. आणि इथे त्याउप्पर व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ.

नीट पाट्या नाहीत, कुठून कुठे जायचे नीट समजत नाही. मंदिरात जाण्यासाठी रांग इकडून तिकडे वळवायला पंढरपूरमध्ये आहे तशी नवीन इमारत बांधली आहे पण त्यावर नीट नामनिर्देश नाही. तिथे तुम्हाला मोबाईल वगैरे सर्व काढून ठेवावा लागतो आणि पुरुष आणि महिलांना वेगळे जावे लागते. अशा परिस्थितीत कोणी हरवले तर मज्जाच.
आम्ही मोबाईल ठेवत असतानाच तिथले कर्मचारी ओरडायला लागले जल्दी जाओ, जल्दी जाओ, दर्शन बंद हो जायेगा. झालं, मला वाटलं इथे ते इतर मंदिरांसारखं पट बंद झाले तर सावलिया सेठ राहिलं तसं हे सुद्धा राहुन जातं कि काय. आम्ही अगदी पळत पळत गेलो आणि गर्दीत धक्काबुक्की करत कसं तरी दर्शन झालं.
स्टॅच्यू ऑफ बिलीफ
नाथद्वारामध्येच एक नवीन विश्वास स्वरूपम नावाचं अम्युजमेंट पार्क बनवलं आहे. तिथे मुख्य आकर्षण आहे शंकराचा एक भव्य पुतळा. याचं नाव आहे "स्टॅच्यू ऑफ बिलीफ". यात आपण चित्रांमध्ये किंवा मालिकांमध्ये कैलास पर्वतावर एका पाषाणावर बसलेले महादेव, बाजूला त्रिशुल अशा प्रकारे दाखवले आहेत. हा जवळपास ३५० फुट उंच पुतळा असुन, सध्याच्या घडीला जगातील चौथा सर्वोच्च पुतळा आहे. नाथद्वाराच्या जवळपास फिरताना अनेक किलोमीटर दूरवरून हा पुतळा दिसत राहतो.

या पुतळ्याच्या अवतीभवती एक भव्य पार्क बनवले आहे आणि त्यात वॅक्स म्युझियम, मिरर हाऊस, हॉरर हाऊस, काही साहसी खेळ, अशी अनेक आकर्षणे बनवली आहेत. तिकीट घेताना याची अनेक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तिकिटे आहेत. ते ठरवणं फार गोंधळाचं काम आहे. तुम्ही इथे किती वाजता पोहोचता आणि हाताशी किती वेळ शिल्लक आहे, त्यावरून हा निर्णय घ्यावा लागतो.

पार्क मधील प्रत्येक गोष्ट सभ्य भाषेत अति व्यावसायिक आणि सरळ भाषेत अति लुटारू आहे. पार्क प्रचंड मोठा आहे. तिकीट खिडकी पासून आत जवळपास पाऊण एक किलोमीटर लांब असेल. त्यांनी तिथे जाण्यासाठी गाड्या ठेवल्या आहेत पण त्याचे वेगळे तिकीट घ्यावे लागते. येताना पुन्हा वेगळे घ्यावे लागते. आत मिळणारे खाद्यपदार्थसुद्धा महाग आहेत.
पार्कच्या तिकिटातच संध्याकाळी एक लाईट अँड साउंड शो असतो. पुतळ्याच्या समोरच खाली ओपन थिएटर आहे, तिथे बाजुच्या बेंचेस वर जागा मिळाली तर तिथे किंवा मध्यभागी वर्तुळाकार भागात तुम्ही सरळ खाली बसुन हा शो बघु शकता. तो शो सुरु करण्याआधी संपुर्ण पार्क मधील सर्व लाईट बंद केले जातात आणि मग तो शो सुरु होतो. शो मध्ये दाखवलेले काही इफेक्ट आणि संगीत छान आहे, पण २० मिनिटाच्या शो मध्ये दाखवलेली गोष्ट आणि त्याचं निवेदन फार रटाळ होत जातं. मध्ये मध्ये तर काही दृश्य अगदी असंबद्ध वाटतात.

पार्क नंतर आम्ही जवळच एका ठिकाणी छोटीशी चौपाटी झाली आहे, तिथे जेवलो. रात्री उशिरा उदयपूरच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. उद्यासाठी थोडी आवराआवरी करून ठेवली आणि झोपलो. उद्या या ट्रिपचा शेवटचा दिवस, आणि या मालिकेला शेवटचा लेख...
क्रमशः।
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.