Friday, July 3, 2026

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012

  2010 साली आमच्या शेजारचे वैष्णोदेवी यात्रेसाठी चालले होते तेव्हा माझ्या मनातही आले कि आपणही जावे पण त्यावर्षी काही कारणांमुळे नाही जाता आले. घरातील देवीसमोर नेहमी हात जोडुन प्रार्थना करायचे की माता राणी आम्हाला ही बोलव तुझ्या दर्शनाला. शेवटी 2012 साली हा योग जुळुन आला. जानेवारी 2012 मधे आमच्या बाबांच्या ओळ्खीचे एक काका आमच्या घरी आले होते तेव्हा बोलता बोलता त्यांनी विचारले की अमरनाथ यात्रेला येणार का? हे काका दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात आणी ह्या वेळेला ते 7 व्यांदा जात होते. ह्या वर्षी ते अमरनाथ-वैष्णोदेवी-अम्रुतसर जाणार होते. घरी आम्ही सर्वांनी विचार करुन मग मी , माझी बहीण आणि आई अस आमच 3 जणांच जाण ठरल. 22 जुन ते 31 जुन अशी 10 दिवसांची सहल होती. तयारी व प्रस्थान अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा जम्मू-काश्मीर राज्यामध्ये असून श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते पहायला दरवर्षी उन्हाळ्यात हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते परंतु लिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. असेही मानले जाते की शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो. गुहे मध्ये अजून काही लहान हिमखंड आहेत त्यांना गणेश -पार्वतीचे रुप समजले जाते. मुख्य लिंगाच्या वर नैसर्गिक पाण्याची घळ आहे, त्या घळीमधून पाणी टपकत असते व त्यामुळे हे शिवलिंग तयार होते. (माहिती जालावरुन साभार) गुहेकडे जाण्यासाठी मुख्यत्वे दोन रस्ते आहेत. पहिला मार्ग सोनमर्ग - बालताल- अमरनाथ च्या बाजूने आहे. हा रस्ता फक्त १३ किमी चा असून बहुंताशी भाविक याच मार्गाने येणे पसंत करतात. दुसरा मार्ग पहेलगाम - चंदनवाडी- पिस्सुटॉप- शेषनाग-पंचतरणी- अमरनाथ असा आहे. हा मार्ग ४५-५० किमीचा असून जास्त खडतर आहे. अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी आपल्याला आधी जम्मु काश्मीर बॆक मधुन फॊर्म आणुन आपली नोंद्णी करावी लागते व त्यासोबत डॊक्टरांचा आपण या यात्रेसाठी फिट असल्याचा दाखला ही जोडावा लागतो. आम्ही हे सर्व देउन आलो व आम्हाला दर्शन करण्यासाठी 25 जुनची तारीख त्यांनी दिली. 25 जुन सोमवार असल्यामुळे आम्ही ही खुश झालो. नोंद्णी झाल्यावर मग त्या काकांनीच रेल्वे बुकिंग, राह्ण्याची सोय या सर्वांची व्यवस्था केली. आम्ही बालताल (13 कि.मी) मार्गे जाणार होतो. एवढा लांबीचा ट्रेक आम्ही कधी केला नव्ह्ता. त्या काकांनी आम्हाला सांगितल तुम्ही रोज थोडे शुज घालुन चालण्याचा सराव करा. त्याप्रमाणे आम्ही जुहु चौपाटी वर रोज सकाळी चालण्याचा सराव करण्यासाठी जाउ लागलो. हळुहळु दिवस सरत होते व सोबत आमची तयारी ही सुरु होती. जम्मु काश्मीर मधे थंडी खुप असल्याने आम्हाला थर्मल घ्यावे लागले. शुज आम्ही बालताल ला जाउन घेतले तिथे स्वस्त आणि मस्त मिळ्तील अस आम्हाला काकांनी सांगितल होत आणि ते खरेच ठरले ते शुज माझ्याजवळ अजुन हि आहेत. लहान-मोठ्या अशा सर्व सामानाची खरेदी करुन आम्ही एकदाच्या बॆगा भरुन ठेवल्या. शेवटी 21 जुन उजाड्ला. उद्या निघायचे होते. रेल्वे प्रवासात खाण्यासाठी आई सर्व पदार्थांची तयारी करत होती. नंतर आम्ही आमच्या घराजवळ असलेल्या शिवमंदीरात गेलो व तिथे शिवशंभोला आमचा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना केली. 22 जुनला सकाळी 7.55 ची आमची स्वराज एक्स्प्रेस ही गाडी होती. आम्ही 7.15 पर्यंत वांद्रे टर्मीनसला पोहोचलो. काकांनी आमची सर्व इतर प्रवाशांसी ओळख करुन दिली. आम्ही एकुण 22 जण होतो या यात्रेसाठी. गाडीची वेळ झाली आणी आम्ही आमच्या जागेवर जाउन बसलो. गाडीमधे 70% प्रवासी तरी अमरनाथ ला जाणारेच होते. बम बम भोले च्या गजरात गाडीने वांद्रे टर्मीनस वरुन प्रस्थान केले. क्रमश:



22 जुन 2012 गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो. 23 जुन 2012 काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी. आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते. आम्हाला वाटले आता एखाद्या हॊटेलमधे जाऊ ,आराम करु आणी उद्या सकाळी बालताल साठी निघु. पण स्टेशन वरुन बाहेर येताच काकांनी सांगितल की आता आपली बस येईल व आपण बालताल साठी निघणार आहोत. आमचा तेव्हा मुड ऒफ झाला थोडा कारण 30 तासांच्या प्रवासाने आम्ही आधीच दमलो होतो. दोन दिवस आंघोळ केली नव्ह्ती व आता अजुन 10-12 तासांचा प्रवास आम्हाला बसने करायचा होता. पण आम्हाला 25 जुन ची तारीख दर्शनासाठी दिलेली होती त्यामुळे आम्हाला आज निघावच लागणार होते. 5 वाजता आमची बस आली व आम्ही बालतालच्या दिशेने निघालो. जम्मु ते बालताल अंतर 400 कि.मी आहे ते पार करण्यासाठी बसने 10 ते 12 तास लागतात. जसजसे आम्ही जम्मुपासुन पुढे जाऊ लागलो वातावरण बदलु लागले. हवेमधे गारवा वाढु लागला. रात्री 9-10 च्या सुमारास आम्ही एके ठिकाणी जेवणासाठी थांबलो. इतका वेळ आम्ही बंद खिड्क्यांच्या बसमधे होतो त्यामुळे आम्हाला बाहेरच्या थंडीचा अंदाज आला नाही. आम्ही असेच स्वेटर न घालता बसमधुन उतरलो. जसे उतरलो त्याच्या दुप्पट वेगाने पुन्हा बस मधे शिरलो. बाहेर खुप थंडी होती. आम्ही शाल,स्वेटर,कानटोपी, हातमोजे असा सर्व लवाजमा अंगावर चढवुन मग उतरलो. अमरनाथ यात्रेकरुंसाठी जागोजागी भंडारे असतात जेथे आपण मोफत स्वादिष्ट जेवणाचा लाभ घेऊ शकता. बालताल इथेही सर्व भंडारे असतात. जास्तीत जास्त भंडारे हे पंजाबमधील असतात. हे लोक 15 कोटीहुन ही जास्त खर्च करुन शिवभक्तांची सेवा करतात. आपण जाताच हे लोक भोले भोले म्हणुन आपले स्वागत करतात. विविध भाज्या , भातांचे विभिन्न प्रकार, मिठाया , चहा , कॊफी, गरम दुध अशा सर्व पदार्थांची रेलचेल असते. हे लोक आपल्याला राह्ण्यासाठी खोल्या ही देतात. आपण आपल्या इच्छेनुसार त्यांना पैसे देउ शकतो. भंडारामधे जेवण करुन आम्ही पुढे निघालो. 24 जुन 2012 जम्मु-उधमपुर-कुद-पट्नीटॊप-रामबाण-बनिहाल-अनंतनाग-श्रीनगर असे करत आम्ही सकाळी 7 च्या सुमारास सोनमर्ग ला पोहोचलो. गाड्यांची मोठी रांग लागली होती.कारण पुढे गेट लागला होता. सतत होणा-या दह्शतवादी कारवायांमुळे सर्व गाड्यांची कसुन तपासणी करण्यात येत होती.आमच्या गाडीचा नंबर यायला वेळ लागणार होता. मग तोपर्यंत आम्ही बसमधुन उतरुन जवळच असलेल्या हॊटेलात जाउन जरा ब्रश वगैरे करुन चहा-नाश्ता केला व जरा आसपास फिरलो. शेवटी एक तासाने गेट उघडले व आम्ही मार्गस्थ झालो. 9 वाजता आम्ही बालताल इथे पोहोचलो. इथे आपल्याला खुप सिक्युरिटी चेकींग मधुन जावे लागते. आपण सर्वांनी बस मधुन उतरायच. बसची सामानासकट चेकींग होते. महीला व पुरुषांसाठी वेगवेगळे चेकींग बुथ असतात तेथे आपण आपला दर्शनासाठी असलेला पास घेउन जायच. शेवटी सर्व सोप्स्कार आटपुन आम्ही बालताल येथे प्रवेश केला. आमची बस पार्किंग मधे निघुन गेली. आम्ही 2 दिवसांसाठी लागणार सामान सोबत घेतल होत बाकी सामान बसमधेच ठेवल होत. ज्या काकांसोबत आम्ही आलो होतो ते पंजाब येथील मलोट गावचे होते आणि त्यांचा हि इथे दरवर्षी भंडारा असतो. आम्ही तिथेच 2 दिवस राहणार होतो. आम्ही गेल्या गेल्या त्यांनी भोले भोले म्ह्णत आमचे स्वागत केले व आम्हाला चहा- नाश्ता आणुन दिला. बम बम भोले..! क्रमश:


अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 3 24 जुन 2012 चहा -नाश्ता करुन आम्ही आंघोळीला गेलो. त्या लोकांनी आम्हाला गरम पाणी दिले होते पण थंडी इतकी जास्त होती कि पाणी लगेच गार होत होते. आम्ही आंघोळीला गेलो त्याच वेळेला जोरदार पाउस सुरु झाला. अगोदरंच थंडी त्यात पाउस. आम्हाला नीट आंघोळ करताच आली नाही. कसेतरी दोन तांबे अंगावर घेतले आणि आलो बाहेर. आंघोळ उरकुन जेउन आम्ही बालताल फ़िरण्यासाठी बाहेर पडलो. बालताल हे अमरनाथ यात्रेसाठी मुख्य तळ आहे. सोनमर्गजवळ सिंध नदीच्या काठी सुंदर बालताल खोरे वसलेले आहे.त्याची समुद्र्सपाटी पासुन उंची 2743 मीटर आहे.सिंधच्या पाण्यामुळे, विखुरलेल्या हिरवाईने आणि बर्फाच्छ्दित पर्वतंरागांमुळे , ही दरी निसर्गप्रेमींसाठी नंदनवन मानली जाते.बालतालच्या अस्थिर प्रदेश आणि निर्जन जागेमुळे त्याला वारंवार ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साइट बनविण्यात हातभार लागला आहे. बालताल व्हॅलीचा नयनरम्य परिसर फोटोग्राफरमध्येही लोकप्रिय आहे वर्षंभर इथे वातावरण सुखद असते. (बालताल छावणी येथील काही दृष्य)













बालतालमध्ये ठिकठिकाणी भंडारे लागले होते. आपण कोणत्याही भंडारामध्ये जाउन जेवु शकतो. (आम्ही थांबलेलो तो भंडारा)

आम्ही आधी बुट घेउन आलो जे आम्हाला फक्त 150 रुपयात मिळाले. जागोजागी सैनिकांचा पहारा होता. आपले सैनिक तिथे डोळ्यात तेल घालुन आपली यात्रा सुरक्षित व्हावी म्हणुन पहारा देत होते हे पाहुन मन भरुन आले. आम्ही तेथील एका सैनिकासोबत फोटो काढण्याची इच्छा प्रकट केली, ते आधी नाही म्हणु लागले. मग तो फोटो सोशल मिडीयावर कुठेही टाकणार नाही अस आम्ही त्यांना सांगितल्यावर ते तयार झाले. थोड इकडेतिकडे फिरुन आम्ही आमच्या रुमवर आलो. निघायची सर्व तयारी करुन आम्ही 9 वाजताच जेवुन झोपुन गेलो. (भंडा-यामधे जेवताना) 



25 जुन 2012 रात्री 2 वाजता आम्ही उठलो. सकाळी 7-8 वाजता निघण्यापेक्षा आम्ही रात्री 3 वाजता निघणार होतो. त्यामुळे गर्दीही कमी मिळाली असती व आम्ही लवकर दर्शन घेउन आलो असतो. उठुन प्रात:विधी आटपुन आम्ही तयारीला लागलो. हाडे गोठवणारी थंडी होती त्यामुळे आम्ही आधी आपली अंर्तवस्त्रे मग त्यावर थर्मल , टी-शर्ट, स्वेटर , जाकीट व त्यावर रेनकोट, हातात हातमोजे, कानात कापुस , मग कानटोपी , जाड मोजे आणि बुट अशी जय्यत तयारी करुन बाहेर पडलो. चहा नाश्ता करुन आम्ही निघालो. आमच्या भंडाराच्या बाहेरच घोडेवाले,पालखीवाले , सामान नेण्यासाठी पिठ्ठु जमले होते, ज्यांना घोडे किंवा पालखीने जायचे असल्यास इथुनच ठरवुन जावे लागते. आम्ही पायी जाणार होतो, म्हणुन पुढे निघालो. जिथपर्यंत भंडारे होते तिथपर्यंत दिव्यांचा उजेड सोबत होता, मग अंधार सुरु झाला. विजेरीच्या उजेडावर बम बम भोले करत आम्ही निघालो. बालताल मार्ग खालील प्रमाणे बालताल - दोमेल - (2 किमी) दोमेल ते बराडी - ( 5 किमी) बराडी ते संगम - (4 किमी) संगम ते पवित्र गुफा - (3 किमी) (यात्रेचा मार्ग) 

 



पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला होता. आम्ही हळुहळु चालत होतो. दोमेल पार झाल्यानंतर उजडायला सुरुवात झाली. निसर्गाने त्याच रुपड दाखवायला सुरुवात केली. सगळीकडे धुके पसरले होते. सतत पाऊस सुरु होता त्यामुळे थंडीही वाढली होती, रस्ता निसरडा झाला होता. हा रस्ता खुप लहान आहे. एका बाजुला डोंगर आणि एका बाजुला दरी. जेमतेम 4 माणस एकत्र चालु शकतील एवढाच रस्ता आहे आणि यातुनच घोडेवाले हि ये-जा करतात. जरा दुर्लंक्ष केल तर आपण खाली दरीत पडु शकतो. (पावसाने चिखलमय झालेला रस्ता) 



(यात्रेचा मार्ग)





दोमेलपासुन पुढे कठीण चढाई सुरु होते. दोमेलपासुन बराडीपर्यंत यात्रेकरुंसाठी कोठेही थांबण्यासाठी जागा नाही. हि चढाई करता करता आम्ही दमलो. मुखाने बम बम भोले करत आम्ही चाललो होतो. जे लोक दर्शन करुन येत होते ते आम्हाला बस अजुन थोडच दुर आहे म्हणुन दिलासा देत होते. बराडीपर्यंत पोहचेस्तोवर आमची हालत खराब झाली होती. आम्ही हातात लोकरीचे मोजे घातले होते आणी ते पावसांमध्ये पूर्ण भिजले. थंडी इतकी होती कि आमचे हात सुन्न झाले होते. बराडी पोहचल्यावर एका लहानश्या टपरीवर चहा घेतला, थोड बर वाटल. पुन्हा चालायला सुरुवात केली. (चहा घेण्यासाठी थांबलेलो आम्ही, सर्वात शेवटी मी)

(बराडी ते संगम मार्गावरील एक ठिकाण)

(यात्रेत दिसलेले मनमोहक शिखर)

अजुन संगम यायच बाकी होत. हळुहळु पाय उचलत चालत होतो. एकदाचे संगम आले. (संगम - उजवीकड्चा रस्ता पहलगाव वरुन येणारा व डावीकडचा बालतालहुन)

पहलगाम आणी बालताल इथुन येणा-या दोन्ही रस्त्यांचा संगम इथे होतो. इथे पोहोचल्यावर आपल्याला पवित्र गुफा दिसु लागते.

(पवित्र गुफेकडे जाणारा मार्ग)

(संगमहुन गुफेकडे जाणारा मार्ग) 



पण अजुनही बाबा बर्फानी आणी आपल्यात 3 कि.मी चे अंतर आहे. संगमवरुन पुढे चालायला लागल्यावर डावीकडे कातळामधे कालीमाता आपल्याला दिसते. 

आता पुढील मार्ग हा पूर्ण ग्लेशियर वरुन जायचा होता. त्या ग्लेशियरच्या आधी एक भंडारा होता तेथे आम्ही जेवणासाठी थांबलो. पराठा भाजी खायला होत. पण जसे आम्ही जेवणासाठी हातमोजे काढले तेव्हा समजल हाताची बोटे पूर्ण सुन्न झाली होती. मी आणी बहीणीने अक्षरक्ष: तिथे रडायला सुरुवात केली. रात्री 2 पासुन आम्ही चालत होतो, निट खाणेही झाले नव्ह्ते. आता खायला होते तर आम्हाला तो पराठा बोटाने तोडता हि येत नव्ह्ता. शेवटी आमच्या आईने आम्हाला भरवल. कसतरी थोड खाउन व चहा घेउन आम्ही निघालो.ग्लेशियर वरुन जाताना सारखे पाय घसरत होते. (ग्लेशियरवरुन जाताना आम्ही व समोर पवित्र अमरनाथ गुफा) 

(ग्लेशियरवर तात्पुरती निवासासाठी बांधलेले तंबु) 



माझ्यामधे काहीच शक्ती उरली नव्हती. उंचावर विरळ हवेचा त्रास जाणवु लागला होता. मग मी गुफेपर्यंत जाण्यासाठी डोली केली. डोली म्हणजे एका खुर्चीला 2 बांबु आडवे लावलेले असतात. आपण त्या खुर्चीत बसायच मग 4 माणसे ती खुर्ची बांबुंच्या साहाय्याने उचलुन घेतात. (डोली - चित्र जालावरुन साभार) 

 



त्यांनी मला गुफेजवळ आणुन सोडल. मी इतर लोक येण्याची वाट पहात तिथेच बसले. थोड्या वेळाने सर्वजण आले. मग आम्ही तिथेच असलेल्या एका दुकानात आमचे सर्व सामान , बुट,कॅमेरा काढुन ठेवले. गुफेमधे हे सर्व नाही नेउ शकत. आम्ही बुट काढुन मोज्यांवर प्लास्टिकची पिशवी लावली. गुफेच्या आत सर्वत्र थंड पाणी असते म्हणुन ही काळजी घ्यायची. आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. गुफेबाहेर रांग होती . ओळीने एकेकाला आत सोडत होते. आमचा नंबर आला आणी समोर दिसले बाबा बर्फानी. तो क्षण आता मी इथे सांगु ही शकत नाही काय वाटले त्या वेळेला (तुझे रूप पाहता देवा,झाले सुख झाले माझ्या जीवा) सोमवार , 25 जुन 2012 दु. 2.30 मि. ला आमचे दर्शन झाले. यात्रा सुरु केल्यानंतर 12 तासांनी. बाबा बर्फानींचे दर्शन होताच सर्व थकवा निघुन गेला. डोळ्यातुन अश्रू वाहु लागले आणी मुखातुन बम बम भोले गाऊ लागलो. (पवित्र अमरनाथ गुफा)

(गुफेतील बाबा बर्फानी - चित्र जालावरुन साभार) 



जवळच दोन बर्फाचे आकार आहेत ते पार्वती माता व श्रीगणेश आहेत अशी मान्यता आहे. त्यांचेही दर्शन केले. आम्हाला प्रसादामधे चांदीचे बेलपत्र मिळाले. बाहेर आल्यावर हे शिवलिंग वितळुन जे पाणी तयार होत ते नळाच्या साहाय्याने बाहेर आणलेल आहे. आम्ही तिथुन ते पवित्र जल एका बाटलीमधे भरुन घेतल. पुन्हा एकदा गुफेकडुन पाहुन हात जोड्ले. भोले बाबांकडे प्रार्थना केली की आम्हाला पुन्हा तुझ्या दर्शनाला बोलव व आमचा या पुढील प्रवास सुखकर होवो. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. गुफेच्या आसपास वातावरण खुप थंड झाल होत. पुन्हा बालतालपर्यंत चालत जाण्याची आमच्यात शक्ती नव्ह्ती मग आम्ही घोडे केले खाली जाण्यासाठी. दु. 3.30 ला आम्ही निघालो ते रात्री 9 वाजता आम्ही 5 तासाने आमच्या भंडाराजवळ आलो. (परतीच्या मार्गावर असताना)

या 5 तासात आम्ही एकदाही घोड्यावरुन खाली उतरलो नाही आणी जेव्हा उतरलो तेव्हा आम्ही एकही पाऊल पुढे टाकु शकत नव्हतो. कंबरेखालील पुर्ण शरीर बधीर झाले होते. अक्षरक्ष: आम्ही स्वत:ला घसपटत आमच्या खोलीपर्यंत घेऊन गेलो. जाताच कसेतरी बुट काढुन आम्ही सरळ बिछान्यावर पडलो. 2-3 तासाने आमचे बाकीचे सहकारी आले तेव्हा त्यांनी उठवल्यावर आम्ही जेवायला गेलो. जेऊन येऊन पुन्हा झोपलो. पाय खुपच दुखत होते. मी जिथे झोपले होते तिथे माझ्या बाजुला एक दुस-या गटातील काकी होत्या, ते लोक उद्या दर्शनासाठी जाणार होते. त्यांनी माझी अवस्था पाहीली व स्वत:कडे असलेल्या तेलाने माझ्या हातापायांची मालिश करुन दिली. मी त्यांना ओळखत ही नव्ह्ते तरी त्यांनी माझ्यासाठी एवढ केल जणु भोले बाबांनीच तिला माझ्यासाठी पाठवल होत. अमरनाथ यात्रेला येणा-या प्रत्येकाला इथे भोले म्हणुन संबोधल जात. आम्ही सर्वच भोले होतो, इतर कोणत्याही ओळखीची तिथे आवश्यकता नव्हती. कधी निद्रेच्या अधीन झाले समजल हि नाही. उद्या आम्ही बालताल वरुन निघणार होतो जम्मुला जाण्यासाठी. माझ्या माताराणीचे दर्शन करण्यासाठी. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।। क्रमशः



26 जुन 2012 आज सकाळी आरामात 8 वाजता उठलो. आश्चर्याची गोष्ट अशी की अंग जराही दुखत नव्हते. रात्री आम्ही एवढे थकलेलो होतो की वाटल उद्या काही खर नाही आपल पण आम्ही सर्वजण एकदम ठिक होतो. चहा-नाश्ता करुन आम्ही 10 वाजता जम्मु कटराकडे प्रस्थान केले. काश्मीरमधे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. मुघल बादशहा जहांगीरने फारसी भाषेत म्हटले होते, ‘गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त’म्हणजे पृथ्वीवर कुठेही स्वर्ग असेल तर ते इथे आहे, ते येथे आहे आणि फक्त येथे आहे.याची प्रचीती आम्हाला पावलोपावली येत होती.बसच्या खिडकीतुन जिथपर्यंत नजर जात होती एकापेक्षा एक सुंदर नजारे दिसत होते. इथल्या सुंदर टेकड्या, उंच डोंगररांगा यांदरम्यान वाहणा-या नद्या व झरे, झुडूपांनी भरलेले जंगल, फुलांनी वेढलेल्या पायवाटा,जणू आपण एखाद्या स्वप्नातील जागेत आहोत असे आपल्याला भासते. भारताच्या नकाशामध्ये जम्मु-काश्मीर हा मुकुटाप्रमाणे आहे जो प्रत्येक हंगामात आपला रंग बदलतो. प्रवासात टिपलेले काही क्षण







अडीच तासांनी आम्ही श्रीनगर मधे पोहोचलो डल सरोवराच्या किनारी. आम्ही येथे मुघल गार्डन पाहण्यासाठी व डलमधे बोटिंग करण्यासाठी थांबलो. श्रीनगर जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी आहे. श्रीनगरमध्ये त्यांच्यावर तरंगणारी सुंदर सरोवरे आणि हाउसबोट्स पाहणे मनमोहक आहे. सुकामेवा आणि पारंपारिक काश्मिरी हस्तकला इथली काही प्रमुख आकर्षणे आहेत.डल सरोवर आणि नागिन सरोवर येथील प्रसिद्ध सरोवरे आहेत. श्रीनगरमधील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे डल सरोवर. श्रीधारा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या या सरोवरातील चमकणारे पाणी हे पाहण्यासारखे आहे.





श्रीनगरमधे दिसणारी शिकारा म्हणजे डल सरोवराचे सर्वाधिक आकर्षण.सांस्कृतिक प्रतीक म्हणून मान्यता प्राप्त,शिकारा ही एक नाव आहे. सरोवराचा आनंद लुटण्यासाठी, आपण शिकारा (वेनिसमधील गोंडोलासारखी दिसणारी अरुंद लाकडी नौका) नावेंमध्ये फिरायला जाउ शकतो.शिकाराचा उपयोग स्थानिक रहिवासी वाहतुकीसाठी करतात. शिकारामार्गे सरोवराच्या एका टोकापासून दुस-या बाजूला वस्तूंची वाहतूक केली जाते. येथील सरोवरातील बाजारपेठ खरेदीसाठी मुख्य आकर्षण आहे आणि तलावाच्या मध्यभागी बरीच दुकाने आहेत. हाताने तयार केलेले कानातले, लाकडी कलाकृती आणि केशर येथे मिळतात. आपण काश्मीरी वेषभुषा करुन शिकारामधे आपले फोटोही काढु शकतो.







डल सरोवराचे दुसरे आकर्षण म्हणजे हाउसबोट. हाउसबोट या स्थिर बोटी आहेत. जे सरोवराला भेट देणा-या पर्यटकांसाठी निवास म्हणून वापरल्या जातात.डल सरोवरावर हाऊस बोट ही संकल्पना ही ब्रिटीशांची होती, ज्याने पर्यटनाला चालना दिली.हाऊसबोट्स डल सरोवराचे विहंगम दृश्य तसेच सरोवराजवळील पर्वतांचे विहंगम दृश्य दर्शवितात. पर्यटन विभागाने वर्गीकृत केलेले हे हाऊसबोट्स एका साध्या खोलीच्या प्रकरणांपासून ते प्रशस्त लक्झरी स्वीट्सपर्यंतचे असू शकतात. त्यांचे आतील भाग काश्मिरी क्रिस्टल झूमर, कार्पेट्स आणि फर्निचरसह सुंदर सजावट केलेले असतात.हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे.



हाउसबोटमधे राह्ण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता तर आम्ही शिकारा बोटीतुन डल सरोवरात फ़ेरफ़टका मारुन आलो. (शिकारातुन सफारी)

शिकारातुन फिरुन आल्यावर आम्ही डल सरोवराजवळ असलेल्या निशांत गार्डनमधे गेलो. मुघल राजवटीत, मोघलांनी फारसी वास्तुकलेमध्ये ब-याच प्रकारच्या बागांची निर्मिती करण्यास सुरवात केली आणि या बागांच्या संयोजनाला मुघल गार्डन असे म्हणतात.श्रीनगरमधील मुघल गार्डनमध्ये निशांत बाग, शालीमार बाग, चश्मे शाही, परी महल, अचबल आणि वेरीनाग गार्डनचा समावेश आहे. निशांत बाग डल सरोवरच्या काठावर वसलेले आहे. जबरवान पर्वत त्याच्या पार्श्वभूमीवर आहे.नूरजहांचा मोठा भाऊ आसिफ खान यांनी 1633 मध्ये बागेची रचना केली.निशात बाग म्हणजे आनंदाची बाग. या बागेत दुर्मिळ प्रजातीची फुलझाडे, चिनार वृक्ष आणि सरुची झाडे देखील आढळतात. हा मुघल गार्डन, या प्रकारातील सर्वात मोठा टेरेस गार्डन आहे. येथे स्थित सुंदर झरे, मोठे लॉन आणि सुंदर फुलांमुळे ही बाग बरीच प्रसिद्ध आहे. येथील सर्वच बागा खुप सुंदर आहेत, आम्ही फक्त हिच पाहीली. खरच अशी बाग मी याआधी पाहिलीच नव्ह्ती. फुलांची इतकी विविधता तेथे होती. तुम्ही खाली दिलेल्या चित्रांमधे पाहु शकता. भरपुर फोटोग्राफी करुन आम्ही बागेतुन बाहेर आलो. येताना आम्ही काही फुलांच्या बिया घेतल्या घरी येउन लावण्यासाठी पण काय माहीत इथे मुंबईला आणुन लावल्यावर त्यातुन रोप आलेच नाही, असो.



(जबरवान पर्वत)













बाहेर येउन डलच्या किनारी आम्ही फालुदा खाल्ला व पुढे मार्गस्थ झालो. डल सरोवर आणि बागेत फिरुन येईपर्यंत आम्हाला 4 वाजले होते. रात्री 9 च्या सुमारास एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो. रोटी, डाल फ्राय, आलु-गोभी ची भाजी, जिरा राइस अशा मस्त गरमा गरम जेवणावर ताव मारला. उत्तर भारतात आपल्याला सर्व ठिकाणी असेच जेवण मिळ्ते. जेऊन निघालो ते मग थेट कुठेही न थांबता रात्री 1 वाजता आम्ही कटराला पोहोचलो. हॉटेलवर चेक-इन केल. रुमवर जाताच हात-पाय धुऊन सरळ ताणुन दिली. खुप प्रवास झाला होता आज. 27 जुन 2012 आज आम्ही आरामात 11 वाजता उठलो. आम्ही दुपारी 3 वाजता वैष्णोदेवी ट्रेक करणार होतो. कटरा हे जम्मू-काश्मीर राज्यातील त्रिकुटा पर्वतच्या पायथ्याशी असलेल्या रियासी जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. वैष्णो देवीला भेट देणा-या यात्रेकरूंसाठी कटरा बेस कॅम्प म्हणून ओळखले जाते.येथे भरपूर हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, ढाबे, फास्ट-फूड जॉइंट्स उपलब्ध आहेत जे सर्व प्रकारच्या बजेटमध्ये फिट आहेत. दरवर्षी लाखो भाविक या तीर्थस्थळी भेट देतात. वैष्णोदेवी मंदिराबद्द्ल.. वैष्णो देवी मंदिर, हिंदू मान्यतेनुसार शक्तीला समर्पित असे सर्वात पवित्र हिंदू मंदिर आहे , जे जम्मू आणि काश्मीर, राज्यातील त्रिकुट पर्वतावर वसलेले आहे. हे उत्तर भारतातील एक अत्यंत पवित्र स्थान आहे. या धार्मिक स्थळाची आराध्य देवी, वैष्णो देवी यांना सामान्यत: माता राणी आणि वैष्णवी म्हणूनही ओळखले जाते. माता वैष्णो देवीबद्दल अनेक कथा आहेत. एका प्रसिद्ध प्राचीन श्रद्धेनुसार, माता वैष्णो यांचे परम भक्त श्रीधर यांच्या भक्तीमुळे माता प्रसन्न झाली,आणि जगासमोर आपल्या अस्तित्वाचा पुरावा दिला. हि कथा खालीलप्रमाणे आहे. श्रीधर पंडित माता वैष्णो देवीचे उत्कट भक्त होते. ते सध्याच्या कटरा शहरापासून 2 किमी अंतरावर हंसली गावात राहत होते.एकदा माता वैष्णोने त्याला एका मोहक लहान मुलीच्या रुपात दर्शन दिले व श्रीधर पंडितला 'भंडारा' (भिक्षू आणि भक्तांसाठी मेजवानी) आयोजित करण्यास सांगितले. पंडितांनी खेड्यातून आणि जवळपासच्या ठिकाणाहून लोकांना बोलवायला सुरुवात केली. त्यांनी 'भैरव नाथ' नावाच्या एका स्वार्थी राक्षसालाही आमंत्रित केले. भैरव नाथ यांनी श्रीधर पंडित यांना विचारले की ते हे सर्व आयोजन कसे करणार आहेत आणि त्यांनी श्रीधरला अपयश आल्यास झालेल्या दुष्परिणामांची आठवण पण करून दिली. श्रीधर पंडित काळजीत बुडाले तेव्हा दैवी मुलगी हजर झाली आणि निराश होऊ नको मी सर्व व्यवस्था केली आहे. तुझ्या लहान झोपडीमधे 360 हून अधिक भाविकांना भोजनासाठी बसता येईल असे आश्वासन दिले. यानंतर बरेच गावकरी श्रीधरच्या घरी आले आणि जेवणासाठी जमले.मग कन्या रूपी मां वैष्णो देवीने एका विचित्र पात्रातून सर्वांना भोजन देण्यास सुरवात केली. भोजन देताना कन्या रूपी मां वैष्णो भैरवनाथ जवळ गेली असता त्याने सांगितले की मी खीर-पुरीऐवजी मांस खाईन आणि मद्यपान करीन.तेव्हा कन्या रूपी माता वैष्णोने त्याला समजावून सांगितले की हे ब्राह्मणांचे भोजन आहे, मांसाहार इथे नाही केला जात. पण भैरवनाथांनी मुद्दाम हा मुद्दा मांडला.भैरव नाथ यांनी कबूल केले की या मुलीकडे अलौकिक शक्ती आहेत आणि त्यांनी माताची पुढील परीक्षा घेण्यासाठी तिचा पाठलाग केला. माताने वायुरुप धारण केले आणि त्रिकुट पर्वताकडे गेली. भैरवनाथही त्यांच्या मागे गेले. बाणगंगा असे मानले जाते की आपल्या माताचे रक्षण करण्यासाठी पवनपुत्र हनुमान देखील होते. हनुमानजीला जेव्हा तहान लागली तेव्हा त्यांच्या आग्रहाने आईने धनुषाने डोंगरावर बाण सोडला एक प्रवाह निर्माण केला आणि त्या पाण्यात आपले केस धुतले.आज हा पवित्र प्रवाह बाणगंगा म्हणून ओळखला जातो. चरण पादुका याच ठिकाणी माता वैष्णो दोन क्षण थांबली आणि भैरवनाथ किती दूर आहे याचा अंदाज लावला. या ठिकाणी मातेच्या पायाचे ठसे अजूनही अस्तित्वात आहेत.असे म्हटले जाते की जो कोणी माता वैष्णोच्या पायांना स्पर्श करून प्रवासाला सुरुवात करतो त्याचा प्रवास यशस्वी ठरतो. अर्द्धकुमारी चरण पादुकाहुन पुढे जाउन माताने एका गुहेत प्रवेश केला आणि नऊ महिने ध्यान केले.आज जिथे माताने ध्यान केले त्या गुहेस अर्द्धकुमारी किंवा आदिकुमारी किंवा गर्भजून म्हणून ओळखले जाते. भैरवनाथही तिथेपर्यंत आले. मग एका साधुने भैरवनाथला सांगितले की तुम्ही जिला साधारण मुलगी मानता ती अदिशक्ति जगदंबा आहे, म्हणून त्या महाशक्तिचा पाठलाग करणे सोडून द्या. भैरवनाथांनी साधुचे ऐकले नाही. त्यानंतर माता गुहेच्या दुस-या बाजूने बाहेर निघुन गेली. भैरवनाथ हि माताच्या मागे गेले. भवन भैरवनाथला थांबवण्यासाठी पवनपुत्र हनुमान मधे आले आणि त्या दोघांमधे युद्ध झाले. मातेने भैरवनाथला इशारा दिला आणि परत जाण्यास सांगितले , तरीही तो ऎकत नव्हता तेव्हा माता वैष्णवींने महाकालीचे रूप धारण केले आणि भैरवनाथांचा वध केला. जिथे माता वैष्णो देवीने जिद्दी भैरवनाथची हत्या केली ती जागा पवित्र गुहा किंवा भवन म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी माता महाकाली (डावीकडील) माता महासरस्वती (उजवीकडे),आणि माता महालक्ष्मी (मध्यम) पिंडी म्हणून गुहेत बसल्या आहेत. या तिघांच्या एकत्रित स्वरूपाला माता वैष्णो देवीचे रूप म्हणतात. भैरव घाटी माताने भैरवनाथच्या मस्तकाचे शिरच्छेद केले आणि ते भवनपासून 8 किमी अंतरावर त्रिकुट पर्वताच्या भैरव खो-यात पडले. ते ठिकाण भैरोनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की त्यांच्या वधानंतर भैरवनाथांनी आपल्या चुकांबद्दल पश्चात्ताप केला आणि माताकडे क्षमा मागितली. माता वैष्णो देवीला ठाऊक होते की तिच्यावर हल्ला करण्यामागील भैरवनाथचा मुख्य हेतू मोक्षप्राप्ती करणे होता. माताने भैरवनाथाला पुनर्जन्माच्या चक्रातून केवळ स्वातंत्र्यच दिले नाही, तर त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले की जोपर्यंत माझ्या दर्शनानंतर भक्त तुमचे दर्शन करणार नाहीत तोपर्यंत माझे दर्शन पूर्ण मानले जाणार नाही. त्याच श्रद्धेनुसार आजही, माता वैष्णो देवीच्या दर्शनानंतर भक्त भैरवनाथांच्या दर्शनासाठी सुमारे तीन किलोमीटर अंतरावर चढून जातात. या दरम्यान, पंडित श्रीधर अधीर झाले. ते त्रिकुट डोंगराच्या दिशेने गेले त्याच दिशेने जे त्यांनी स्वप्नात पाहिले होते. अखेर ते गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ पोचले. त्यांनी अनेक पद्धतींनी देवीच्या पिंडीचे पुजन केले . त्यांच्या पूजेमुळे देवी प्रसन्न झाली. तिने त्याला दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला. तेव्हापासून श्रीधर आणि त्याचे वंशज माता वैष्णो देवीची पुजा करत आहेत. अशी हि माता वैष्णोची कथा आहे. आम्ही दुपारी 3 वाजता यात्रा सुरु केली. आमच्या हॉटेलसमोरच यात्रा नोंदणी केंद्र होते. तेथे आम्ही सर्वांनी आमची नोंदणी केली व पावती घेउन निघालो.ही पावती घेतल्यानंतरच आपण कटरा ते माँ वैष्णोच्या दरबारासाठी चढाई सुरू करू शकता. ही पावती घेतल्यानंतर तीन तासांच्या आत तुम्हाला 'बाण गंगा' चेकपॉईंटमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेथे सामान तपासल्यानंतरच तुम्ही यात्रा सुरू करू शकता. (दर्शनी दरवाजा - मागे चेकपोस्ट)

जर तुम्ही पावती घेतल्यानंतर 6 तासांच्या आत चेकपोस्टवर एन्ट्री न घेतल्यास तुमची पावती रद्द होईल. आम्ही चेकपोस्टवर पोहोचलो येथे स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा होत्या. आमची नोंदणी पावती येथे तपासली, सर्व सामानांची येथे तपासणी केली. मग आम्ही पुढे निघालो. (यात्रेच्या मार्गाची प्रतिकृती)

चेकपोस्टनंतर पहिला टप्पा आहे बाणगंगा.येथे या नदीत भक्तगण स्नान करुन पुढील यात्रा प्रारंभ करतात. आम्ही बाणगंगेचे दर्शन करुन पुढे निघालो. बाणगंगेनंतर आम्ही चरण पादुका येथे आलो.

येथे मंदीर आहे, जिथे माताचे चरण आहेत, त्यांचे दर्शन करुन जय माता दी चा जयघोष करत आम्ही निघालो. (यात्रेचा मार्ग)

यात्रा सुरु केल्यानंतर सुमारे 3 तासांनी आम्ही अर्द्धकुमारी येथे पोहोचलो. येथे गर्भजुन गुफा आहे. असे मानले जाते की मातेने या गुफेत नऊ महिने तपश्चर्या केली, आपण हे समजू शकतो की मूल जन्मापूर्वी 9 महिने आईच्या पोटातच राहतो म्हणूनच या गुफेला गर्भजुन म्हणतात. (अर्द्धकुमारी मंदीर)

गुफेचा आकार मातेच्या गर्भाच्या आकारासारखाच आहे.या छोट्या गुफेतून सर्वात मोठ्या आकाराचा माणूसही सहज बाहेर पडतो.आपल्याला त्या गुफेच्या आत जाउन यायच असत त्यासाठी आपल्याला इथे आपली नोंदणी पावती दाखवुन या दर्शनासाठी एक पावती घ्यावी लागते. आपल्याला एक ग्रुप नंबर दिला जातो आणि एका ग्रुपमधे 50 लोक असतात. एका वेळेला 5 ग्रुपला आत सोडतात. आत जाउन हि प्रत्यक्ष गुफेत जायला दीड ते दोन तास लागतात. प्रत्येकाला हि गुफा पार करायला 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ लागतो, त्यामुळे इथे खुप रांग होती. आम्ही हे दर्शन न करताच पुढे निघालो. संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी खाण्यापिण्याची सोय आहे. आम्ही अशाच एका भोजनालयात भोजन केले. इथे आपल्याला इडली-सांभार , राजमा-भात , कढी-भात , चहा, कॉफी, बिस्किटे अशा काही गोष्टीच मिळतात. पण इतक्या उंचावर आणि थंडीत त्या गरमागरम जेवणाची चव औरच.अर्द्धकुमारी पासुन भवन 7 कि.मी लांब आहे. जेवण करुन निघालो तेवढ्यात पाउस सुरु झाला. हा पाउस आमचा पिच्छा काही सोडत नव्हता. मग तिथेच शेडखाली थोडा वेळ थांबुन राहिलो. पाउस कमी झाल्यावर पुन्हा चालायला सुरुवात केली. अर्द्धकुमारी पासुन भवनपर्यंत कठीण चढाई आहे, आम्ही माताराणीचा जप करत शेवटी रात्री 1 वाजता भवन जवळ पोहोचलो. (भवन परिसर - हा आम्ही 2017 मधे घेतलेला फोटो आहे)

आपल्याला येथे क्लॉक रूम मधे आपल सामान (मोबाइल ,पर्स, कमरेचा पट्टा, शुज) जमा कराव लागत. भवन जवळ्च माताला भेट चढवण्यासाठी आपण चढावा घेउ शकतो. श्राइन बोर्डतर्फे हे दुकान आहे. येथे आपल्याला 21 रुपयांपासुन 101 रुपयांपर्यंत चढावा घेता येतो. आम्ही क्लॉक रूम मधे सामान ठेउन व चढावा घेउन दर्शनासाठी रांगेत जाउन उभे राहिलो, येथे पुन्हा एकदा आपली पावती तपासली जाते मगच आपल्याला आत सोडतात. प्राचीन मुळ गुफ़ा जि आहे ती आजकाल वर्षातील बराच काळ बंद ठेवली जाते कारण ही गुफ़ा खूपच लहान आहे. एकेका माणसाला ती पार करुन जायला कित्येक मिनिटे लागतात.प्राचीन मूळ गुफा कमी गर्दीच्या दिवसांवर किंवा पारंपारिक उत्सव किंवा धार्मिक प्रसंगी उघडली जाते. या गुहेतून माता राणीला भेट देणे हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव आहे. (प्राचीन मूळ गुफा - जालावरुन साभार)

त्यामुळे अधिक प्रवाश्यांना दर्शन सुविधा देण्यासाठी दोन नवीन टनेल (बोगदा) मार्ग वापरले जातात. प्रवेशासाठी एक बोगदा वापरला जातो जो थेट माताराणीच्या पिंडींजवळ जातो. दुसरा बोगदा दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी वापरला जातो. (नवीन मार्ग -जालावरुन साभार )

आम्ही गेलो तेव्हा खुप गर्दी असल्यांमुळे आम्हाला ही नव्या मार्गाने जावे लागले. आम्ही प्राचीन गुफेच्या जागेवरुन पुढे एका कॉरिडॉर मधे पोहोचलो, ज्याच्या छतावर अनेक घंटा लटकलेल्या दिसतात.काही अंतर चालल्यानंतर, आम्ही एका खुल्या जागी पोहोचलो जिथे मातेच्या वाहनाचा सिंहाचा पुतळा ठेवलेला आहे आणि मातेचा संपूर्ण पुतळा ठेवलेला आहे. इथुन बोगद्याचे प्रवेशद्वार आहे. बोगद्याच्या शेवटी संगमरवरी दगडाचा उंच व्यासपीठ आहे ज्यावर माता राणी नैसर्गिक खडकांच्या पिंडींच्या स्वरुपात विराजमान आहे. गुफेत चित्रे किंवा मूर्ती वगैरे नाहीत. आत गेल्यावर तिथे बसलेले भटजी आपल्याला तिलक लावतात व आपल्याला पिंडींची माहिती देतात. (वैष्णोदेवी पिंडी दर्शन - जालावरुन साभार)

गर्दी खुप असल्यामुळे आपल्याला आत जास्त वेळ थांबता येत नाही. माताचे दर्शन होताच डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. 2012 नंतर आता 2020 पर्यँत आम्ही प्रत्येक वर्षी वैष्णोदेवीला जातोय, आताही जेव्हा मातेचे दर्शन करतो तेव्हा डोळ्यातुन अश्रु येतात, मग हि तर पहिलीच वेळ होती मातेच्या सामोरी जाण्याची. असे म्हणतात की माता ज्यांना बोलावाते तेच लोक मातेच्या दर्शनासाठी येउ शकतात आणि आम्ही ते भाग्यशाली होतो. मनोमन मातेचे धन्यवाद मानले. माताराणीकडे प्रार्थना केली" हे भगवती माते तु असेच आमच्यावर तुझे कृपाछत्र ठेव. तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुदे. पुन्हा पुन्हा तुझ्या दर्शनाला आम्हाला बोलाव. जय माता दी !" दर्शन करुन बाहेर आलो व क्लॉक रूम कडे सामान घ्यायला निघालो. दर्शनाला येतानाच आप्ल्याला चढावामधे असलेला नारळ जमा करुन त्याबदल्यात प्रसादीचा कुपन देतात. आम्ही तो कुपन देउन अर्धा नारळ घेतला. प्रत्येकाला प्रसादी मधे खडीसाखर व एक सिक्का देतात ज्यावर पिंडी कोरलेली असते व वर्ष हि लिहलेले असते. (माझ्याजवळ आता २०१३ आणि २०१८ चे सिक्के आहेत)



क्लॉक रूम मधुन सामान घेउन आम्ही आता पुढे भैरवनाथ दर्शनासाठी निघालो. भवनपासुन भैरवनाथ मंदीर 1.5 कि.मी अंतरावर आहे. त्यासाठी आपल्याला कठीण चढाई करावी लागते. आम्ही 2 वाजता भैरवबाबांची यात्रा सुरु केली. आता पाय खुप दुखु लागले म्हणुन आम्ही हळुहळु चालत होतो. रात्री 3.30 वाजता आम्ही भैरवनाथ दर्शन केले. (भैरवनाथ मंदीर - जालावरुन साभार)

भैरवनाथहुन खाली पाहिले असता भवन चा वाघाच्या आकाराचा सुंदर नजारा दिसतो.

थोडा वेळ तेथे बसुन आम्ही मग कटरा कडे प्रस्थान केले. एवढी पायपीट करुन आता आम्ही खुपच थकलो होतो. माता राणीचा जप करत हळुहळु उतरायला लागलो. (खाली उतरत असताना झालेले कटरा शहराचे विहंगम दर्शन)

सकाळी 9.30-10 पर्यंत खाली कटराला आलो. हॉटेल रुमवर जाताच कपडे बदलुन व हातपाय धुउन सरळ झोपुन गेलो. याप्रकारे आमचे वैष्णोदेवी दर्शन झाले. जय माता दी क्रमशः






No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012

    2010 साली आमच्या शेजारचे वैष्णोदेवी यात्रेसाठी चालले होते तेव्हा माझ्या मनातही आले कि आपणही जावे पण त्यावर्षी काही कारणांमुळे नाही जाता ...