या भागात रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षीण भागातील किनार्याने भटकंती करायची आहे.
पावस आणि इतर पर्यटन स्थळांचा नकाशा
भाट्ये किनारा : भाट्ये गावातील खाडीच्या
जवळ असलेला हा किनारा त्याच नावाने ओळखला जातो. येथे समुद्राला काजळी नदी
येऊन मिळते. या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते. समुद्रकिनारी सुरूबन
आहे. फयान चक्रीवादळात त्याचे मोठे नुकसान झाले. हा किनारा सुमारे दीड
किलोमीटर लांबीचा आहे.
रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट
आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला
असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त
पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि
वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात
त्यांच्यासाठी भाट्ये बीच हा उत्तम पर्याय आहे.
किनाऱ्याच्या टोकाला झरीविनायकाचं मंदिर आहे. येथील
गोमुखातून वाहणाऱ्या झऱ्यापासून तळे तयार झाले आहे. हे तळे बारमाही
पाण्याने भरलेले असते. यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले
जाते. मंदिर खूप मोठे नाही पण जाता जाता दहा/पंधरा मिनिटे थांबून पाहण्यासारखे आहे.
कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट
'झरी विनायक' मंदिरानंतर येणारा वळणावळणाचा छोटासा घाट चढायचा कि भाट्ये बीचपासून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला एक प्रशस्थ रिसॉर्ट आपले लक्ष वेधून घेतो. हा आहे “कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट”. हा लक्झरी रिसॉर्ट समुद्राजवळील एका मोठ्या टेकडीवर बांधलेला आहे.
या रिसॉर्टच्या आवारात समुद्राकडे तोंड करून एक भली मोठी बोटीसारखी कलाकृती बनवलेली आहे. हि बोटीच्या आकाराची रचना टायटॅनिक पॉइंट म्हणून ओळखली जाते.
हा संपूर्ण परिसर कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट यांची खाजगी मालमत्ता असल्याने जर का आपण या हॉटेलमधे उतरलेले टूरिस्ट नसाल तर माणशी ५० रुपये मोजून या रिसॉर्टच्या आत जाण्यासाठी गेटपास मिळतो. पण हे मोजलेले ५० रुपये वाया जात नाहीत हे मात्र खरं.
या टायटॅनिक पॉइंट नावाच्या सी-फेसिंग बोटीतून समोर अमाप सुंदर दृश दिसते. इतर कोणत्याही हॉटेल किंवा रिसॉर्ट मधून अरबी समुद्राचे एवढे सुंदर दृश्य बघायला मिळत नाही नाही. थोडक्यात सांगायचे तर १५० रुपये पूर्ण वसूल होतात असे म्हणायला हरकत नाही..
पावस हे एक आध्यात्मिक केंद्र आहे. रत्नागिरीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर पावस हे निसर्गरम्य गाव आहे. श्री ज्ञानेश्र्वर महाराजांच्या नाथ परंपरेतील महापुरुष स्वामी स्वरुपानंद यांचे पावस हे जन्मगाव. येथेच स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत होऊन पावस हे आता तीर्थक्षेत्र बनले आहे. विष्णुपंत आणि रखमाबाई गोडबोले यांच्या पोटी स्वामींचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस तर पुढील शिक्षण रत्नागिरीला झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये सन १९१९ ला दाखल झाले. तिथे त्यांना आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण मिळाले. अठराव्या वर्षापासूनच ते महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. स्वामीजींनी महात्मा गांधीजींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामिल होऊन स्वावलंबन आणि राष्ट्रीय शिक्षण याला अनुसरुन पावस येथे शाळा काढली. ब्रिटीश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेताना त्यांनी येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगला. नंतर पुण्याचे गुरु बाबामहाराज वैद्य यांच्या कडून आध्यात्मिक कार्याची दीक्षा मिळाली आणि त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. पावसला येऊन त्यांनी कठोर तपश्चर्या केली. दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला आणि त्यांना स्वामी ही उपाधी मिळाली. “राम कृष्ण हरी” हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्यांना दिला.

स्वामींजी १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधिस्त झाले. स्वामी स्वरूपानंदांनी जेथे संजीवन समाधी घेतली त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या स्मृतिमंदिराच्या तळाशी असलेल्या ध्यानगुंफेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे. मंदिरातील शांतता, पावित्र्य आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. स्वामींचे वास्तव्य असलेली ‘अनंत निवास’ ही इमारत समाधीजवळच आहे. १९३४ ते १९७४ पर्यंत स्वामीजींचे वास्तव्य येथे होते. समाधी मंदिराच्या शेजारी एका आवळीच्या झाडात काही वर्षांपूर्वीच एक स्वयंभू गणपती प्रकट झाला आहे ज्याला "आवळी गणेश" असे म्हणतात. मंदिर परिसर मोठा असून येथे भक्तनिवास व प्रसादाची सोय देखील आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे.


स्वामी स्वरूपानंदांनी १५ ऑगस्ट १९७४
रोजी येथे समाधी घेतली. त्यांच्या ४० वर्षांच्या वास्तव्याने हे ठिकाण
पवित्र झाले आहे. त्यांची समाधी व स्मृतिमंदिर येथे बांधण्यात आले आहे.
समाधीमंदिराच्या शेजारी आवळीच्या एका झाडात स्वयंभू गणपती आहे. येथे
भाविकांची सतत वर्दळ असते. रत्नागिरीत आलेला पर्यटक पावस व गणपतीपुळे येथे
आल्याशिवाय जातच नाही. स्वामींच्या समाधीमंदिरात निवासाची व भोजनाची
(मर्यादित) सोय आहे. रत्नागिरी एसटी स्टँडवरून पावस या मार्गावर दर तासाने
बससेवा उपलब्ध आहे. वाटेत फिनोलेक्स कंपनीचा मोठा कारखाना आहे
पावसमध्ये आढळला शिलालेख!
तालुक्यातील पावस येथील श्री विश्वेश्वर मंदिराच्या दीपमाळेजवळ मंदिर जीर्णोद्धाराविषयीचा शिलालेख सापडला आहे. सन १७२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याबाबत यात उल्लेख आहे. हा शिलालेख पुण्यातील इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी वाचला असून, त्यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली.
श्री विश्वेश्वर व श्री सोमेश्वर या दोन्ही मंदिरांची बांधणी सारखी आहे. काष्ठशिल्पे, दिशा, रचना यात साम्य असल्याने या मंदिरांचे जीर्णोद्धार एकाचवेळी झाले असावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. पावसच्या स्वामी स्वरूपानंद मंदिराजवळच विश्वेश्वराचे मंदिर आहे. विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी-पोतदार यांनी केला, असा शिलालेखावर उल्लेख आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या काळातला हा असावा, असे सांगून श्री. तेंडुलकर म्हणाले मंदिरात गेलो, तेव्हा मंदिराची बांधणी सारखी आढळली.
काष्ठशिल्प सारखीच आहेत. विश्वेश्वर मंदिराच्यासमोर दीपमाळेजवळ एक शिलालेख भग्नावस्थेत आढळला. सचित्र पावस दर्शन पुस्तकात शिलालेखाचा फोटो दिला आहे; पण त्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यावेळी शिलालेख पाहिला, तो वाचता येत नव्हता. तो अभ्यास करून वाचला. अनेक ठिकाणी मंदिर परिसरात शिलालेख वाईट पद्धतीने पडलेले असतात. द्वारशिल्प व त्यातील महत्त्वाचे भाग रत्नागिरी जिल्ह्यात आहेत.
दरम्यान, श्री. तेंडुलकर यांच्या ‘मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात’ या पुस्तकात ३५९ शिलालेखांचा समावेश आहे. यात रत्नागिरीचे ७ शिलालेख आहेत. मराठा सरदारांनी केलेल्या बांधकामाची माहिती पोहोचवण्यासाठी अभ्यासाची गरज तेंडुलकर यांनी व्यक्त केली.
शिलालेख काय?
शके १६४७ विश्वावसू नाम संवत्सरे, यावर्षी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार नानाजी रघुनाथ शेणवी पोतदार यांनी केला, असा सात ओळीतील मजकूर या शिलालेखावर कोरला आहे. सोमेश्वराचा शिलालेख उपलब्ध नाहीये. त्या अर्थी या दोन्ही मंदिरांचा जीर्णोद्धार इ. स. १७२५ ला केलेला असावा, हे स्पष्ट होत आहे. कोकणातल्या मंदिरांच्या दृष्टीने हा इतिहास महत्त्वाचा आहे.
ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत
तेंडुलकर यांना यापूर्वी शंकरेश्वर मंदिर, लांजाला संघ नाथेश्वर मंदिरात शिलालेख आढळले. त्याचे वाचन त्यांनी केले. तसेच, धूतपापेश्वर मंदिरात द्वारपालाच्या डावीकडे मागे संस्कृतमधील शिलालेख सापडल्याचे सांगितले. जिल्ह्यात विविध ठिकाणी असे शिलालेख आहेत. त्यांचा आणखी शोध घ्यावा लागेल. साफसफाई करावी लागेल. त्यातून बरीच माहिती मिळू शकते. शिलालेख हे समकालीन व अस्सल विश्वसनीय पुरावे आहेत; परंतु ते सार्वजनिक ठिकाणी असल्याने दुर्लक्ष होत असून आपण ऐतिहासिक ठेवा गमावतो आहोत. हा ठेवा संरक्षित व्हावा, अशी भूमिका तेंडुलकर यांनी मांडली.
गणेशगुळे :
गलबतवाल्यांचा गणपती म्हणून येथील गणपती ओळखला जातो. हे मंदिर पुरातन
असून, जांभ्या दगडामध्ये बांधले असून, चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात
प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे
दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक
मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे, असे मानले जाते आणि म्हणूनच
या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. येथील
समुद्रकिनाऱ्यावरील वाळू बांधकामाला वापरली जाते. ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला
गेला’ (गणपतीपुळ्याला) अशीही आख्यायिका आहे.
पावसपासून जवळचे पुढचे ठिकाण म्हणजे गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे गणेशगुळे. थोडे आडवाटेला असल्याने पावस गावापासून जवळ असूनही हे सहसा कोणाला माहीत नसणारे ठिकाण. पावस गावातून बाहेर पडताच साधारण २ किलोमीटर अंतरावर ढाकणी मोहोल्ला एरियामधे रस्त्यांचे एक जंक्शन (चौक) लागते. इथून सरळ जाणारा रस्ता राजापूर-पूर्णगड-आंबोळगडाकडे तर उजवीकडे जाणारा छोटा रस्ता काझी मोहोल्ल्यावरून गणेशगुळ्याकडे जातो. गणेशगुळ्याचे गणपती मंदिर याच रस्त्यावर गणेशगुळे गावाच्या खूप आधी एका मोठ्या सडयावर (पठारावर) आहे. त्यामुळे गणपती मंदिर पाहण्यासाठी गणेशगुळे गावात जाण्याची गरज नाही. मात्र ज्यांना सुंदर समुद्रकिनारा पहायचा असेल त्यांनी एक बराच मोठा डोंगरउतार उतरून समुद्राकाठी वसलेले गणेशगुळे गाव नक्की पहावे.
"गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला" या म्हणीवरून गणेशगुळे गाव आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे. जांभ्या दगडाची बांधणी असणारे हे पुरातन मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते. पूर्वी श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एके दिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते.
स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशूळाच्या विकाराने आजारी होते. या आजाराला कंटाळून ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, "माझं इथे वास्तव्य असून, याठिकाणी असणा-या विहिरीतलं पाणी प्राशन कर, तुझी व्याधी बरी होईल". चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. तेव्हापासून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला.
गणेशगुळेचा समुद्रकिनारा
गणेशगुळे गावाजवळील किनारपट्टीवर समुद्रमार्गे गलबतांमधून व्यापार करणारे अनेक गलबतवाले पूर्वी या ठिकाणी व्यापारउदीम सुरळीत व्हावा, असं या गणपतीकडे मागणं मागायचे. तेव्हापासूनच हा गणपती ‘गलबतवाल्यांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हे मंदिर एका बाजूला टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे मन प्रसन्न व शांत करणारे आहे.
गणेशगुळे येथे रहाण्याची सोयः-
१) ओशेनो पर्ल बीच होम स्टे, गणेशगुळे : 02352-237800, 02352-219400, 8605599789, 9405340784
2) “सरस्वती सदन”
श्रीमती सुलोचना यशवंत नागवेकर
मु.पो. गणेशगु़ळे, घर नं. ८५,
ता. जि.- रत्नागिरी,
Tel. 952352 237210
रुम्स-३ उपलब्ध बेड- ६ टेरीफ- Rs.१50/- जादा व्यक्तिसाठी- Rs.५0/-
आडिवरे, कशेळी परिसर
पूर्णगड
रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर पुढे फक्त १० किलोमीटर अंतरावर इतिहासकाळात घेऊन जाणारा पूर्णगड नावाचा एक छोटासा किल्ला लागतो. किल्ला अगदीच इटूकला म्हणजे जाता जाता फक्त ३० मिनिटे वेळ काढून पहावा एवढाच. किल्ला एका लहानश्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला मुचकुंदी नदीची खाडी तर पश्चिमेला पसरला आहे अथांग समुद्र त्यामुळे किल्ल्यावरून दिसणारे दृश अमाप सुंदर दिसते. कोणी म्हणत छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. तर कोण म्हणत लहान आकाराचा किल्ला म्हणजेच पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा हा किल्ला दिसतो म्हणून पूर्णगड. काही का असेना पण किल्ला अगदी छोटुसा आणि सहकुटुंब भेट देण्यासारखा.

पूर्णगड हे किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्याचे गाव. कोकणी कौलारू घरांच्या रांगांमधून वर चढणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेने मोजून १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाज्याजवळ पोहोचतो. दरवाज्याच्या डाव्या हाताला एक विहीर दिसते. दाराशीच एक हनुमंताचे छोटेखानी मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. दरवाज्याच्या मध्यभागी गणपती तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसतात. आत असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या देवडय़ा अजूनही सुस्थितीत आहेत. दरवाज्याजवळच तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे ज्यावरून संपूर्ण गडाची फेरी मारता येते. बहुतेक ठिकाणची तटबंदी अजुनची उत्तम स्थितीतील आहे. याच तटबंदीत किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस एक लहानसा दिंडी दरवाजा आहे. आयताकृती असा आटोपशीर घेर असणाऱ्या या किल्ल्यात आत एक वृंदावन, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, दारूगोळा किंवा धान्य साठवण्यासाठी असणाऱ्या काही इमारती असे मोजकेच अवशेष दिसतात.
कशेळी : येथे
समुद्रकिनारी कनकादित्याचे म्हणजे सूर्यमंदिर आहे. मंदिराच्या आवारात श्री
गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गा, श्री मारुती व श्री विष्णूचीही
मंदिरे आहेत. कनकादित्य मंदिरावर तांब्याचा पत्रा आहे. हे सूर्यमंदिर
प्राचीन असून, सुमारे ९०० वर्षांपूर्वीचे असावे. शिलाहार वंशातील भोजराजाने
शके १११३मध्ये दानपत्र लिहून दिलेला ताम्रपट आजही मंदिरात पाहावयास मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे १६६१मध्ये भेट दिली होती. इतिहासाचार्य
राजवाडे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, बॅ. नाथ पै यांची कनकादित्यावर
श्रद्धा होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणारे कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर हे भारतातील मोजक्याच सूर्य मंदिरापैकी एक. निसर्गाचा सुंदर वरदहस्त लाभलेले कशेळी गाव रत्नागिरीपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातले कनकादित्य सूर्यनारायणाचे मंदिर हे एखाद्या कोकणी घरासारखेच वाटते. पुर्णपणे लाकडाने बनवलेले हे अत्यंत सुंदर मंदीर निश्चितच पाहण्यासारखे आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे खांबांवरील नक्षीकाम तसेच अनेक देवदेवतांच्या व पुराणातील निवडक प्रसंगांच्या कोरलेल्या लाकडी प्रतिमा अतिशय सुंदर आहेत. गाभाऱ्यात कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे. हि मूर्ती सुमारे ९०० वर्षापूर्वीची आहे असे सांगतात.
मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात कथा सांगितली जाते ती येथे देतोय. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजार्याने दक्षिणेकडे जाणार्या एका व्यापार्याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळीजवळ समुद्रकिनार्याजवळ अडकले. कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्याने नावाड्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील एका गुहेत आणून ठेवली आणि जहाज सुरू झाले व पुढे मार्गस्थ झाले. काही वर्षांनी गावातील कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
त्या कनकेचा आदित्य म्हणजे सूर्य म्हणून यास 'कनकादित्य' असे संबोधले जाते. समुद्रकिनार्यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची एक नैसर्गिक गुहा आहे, ज्या गुहेत ही मूर्ती सापडली. त्या गुहेला आता 'देवाची खोली' असे म्हणतात.
कनकादित्य मंदिराची जुनी प्रकाशचित्र
बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्याचे पुजारी होते. त्यांची किर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहारराजा शके १११३ मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्रस्नानासाठी कशेळीला आला असताना त्याने ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिला, असे वर्णन करणारा ताम्रपट या मंदिरात आहे. हा ताम्रपट सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्याने हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट सध्या मंदिरात न ठेवता बँकेच्या लॉकरमधे ठेवण्यात आला आहे. मंदिराचे आवार खूपच प्रशस्त असून मंदिर परिसरात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी इतरही चार छोटी मंदिरे आहेत. शिवाय एक मारुती मंदिर देखील आहे. मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीरदेखील आवर्जून पहावी अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्यावेळी कशेळी गावाला भेट दिल्याचे देखील स्थानिक लोक सांगतात. मंदिराजवळ नुकताच एक मोठा भक्त निवास बांधण्यात आला आहे.
इथे मुक्काम करावयाचा झाल्यास भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक - ०२३५३-२२६३१७ किंवा रमेश पांडुरंग ओळकर ०२३५३-२२६३२३.
आडिवरे :
नवसाला पावणारी आडिवरे गावची महाकालीदेवी प्रसिद्ध आहे. दक्षिणाभिमुख
असलेल्या देवीची वाडा पेठ या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. आद्य
शंकराचार्यांनी श्री महालक्ष्मीची स्थापना केल्याचे मानले जाते.
मंदिरामध्ये महाकालीसमोर उत्तरेस तोंड करून श्री महासरस्वती, उजव्या बाजूला
महालक्ष्मी आहे. महाकाली मंदिर परिसरात योगेश्वरी, नगरेश्वर, रवळनाथ
मंदिरे आहेत. पावसवरूनही येथे येता येते.
कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून फक्त चार किलोमीटरवर अंतरावर असणारे आडीवरे गावातील महाकालीचे जागृत देवस्थान. पुन्हा रत्नागिरी-राजापूर या मुख्य रस्त्यावर आलो आणि उजवीकडे राजापूरकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर लगेच एक छोटासा घाट उतरला कि उजवीकडे लागतो व्येत्येच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा रस्ता तर अगदी थोडसंच पुढ रस्त्याच्या डाव्याबाजूला दिसते महाकालीचे कौलारू मंदिर.
रत्नागिरी-आडिवरे हे अंतर ३९ किलोमीटर तर राजापूर-आडिवरे हे अंतर २८ किलोमीटर. थोडक्यात काय तर रत्नागिरी शहर किंवा राजापूरपासून आडिवरे तसं जवळ जवळ सारख्याच अंतरावर. कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणेच आडिवरे गावातील महाकालीचे देवस्थान रत्नागिरीच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे आडिवरे हा गाव धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. अनेकांची कुलदेवता असलेल्या या देवीचे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी १३२४ मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. असे म्हणतात कि कशेळीच्या मंदिरात असणाऱ्या ताम्रपटात 'अट्टविरे' नामक गावाचा उल्लेख आढळतो, तेच हे आडिवरे. शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक थोरांनी या मंदिराला भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे लोक सांगतात.
आडीवरे या गावात श्री महाकाली यांचे आगमन कसे झाले या संबंधी मंदिराच्या
पुजार्यांनी एक दंतकथा सांगितली ती अशी कि, सुमारे बाराशे वर्षापूर्वी
भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी
नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच
प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करूणा भाकली.
त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने
दृष्टांत दिला "मी महाकाली आहे, तू मल वर घे आणि माझी स्थापना कर".
त्याप्रमाणे दुसर्या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील श्री
महाकालीची मूर्ती सापडली व त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती
अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली.
मंदीरात महाकालीसमोर उत्तरेस श्री महासरस्वती तर उजव्या बाजुस श्री
महालक्ष्मीची स्थापना केली आहे. मंदिर परिसरातच उजव्या बाजुला योगेश्वरी,
प्राकारात नगरेश्वर व रवळनाथ मंदिर आहे. देवीचे दर्शन
घेताना सर्वप्रथम परिसरातील नगरेश्वराचे दर्शन प्रथम घ्यावे, त्यानंतर श्री
देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ आणि त्यानंतर श्री महाकाली आणि
महासरस्वतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. या संपुर्ण
परिसराला महाकाली पंचायतन असेही म्हणतात. कोकणातील इतर देवालयांप्रमाणेच
श्री महाकालीचे मंदिरहि कौलारू आहे.
आडिवरे येथील महाकलीच्या या सुंदर पण नुकतेच जीर्णोद्धाराचा साज चढवलेल्या मंदिरात महालक्ष्मीचे पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे एकाच मंदिरात महाकाली, योगेश्वरी, महालक्ष्मी, महासरस्वती आणि रवळनाथ असे पाच देवतांचे अधिष्ठान आहे. महाकालीची मूर्ती चतुर्भुज असून काळया पाषाणात कोरलेली आहे. या दक्षिणाभिमुख मूर्तीच्या मस्तकावर पंचमुखी टोप, एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात तलवार तर चौथ्या हातात पंचपात्र आहे. मंदिर गाभाऱ्यात फोटोग्राफी करण्यासाठी मज्जाव असणारा बोर्ड लावलेला असल्यामुळे या सुंदर मुर्त्यांचे फोटो मात्र काढता येत नाहीत.
दरवर्षी विजयादशमीमध्ये नवरात्रौत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध
प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीत यात्रा भरते आणि भाविकांचे पाय
आडिवरेकडे वळतात. उत्सव काळात देवीला
वस्त्रालंकारांनी देवीला विभुषित केले जाते. दहाव्या दिवशी दसरा होतो. याच
काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक
कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
मंदिर आवारातच एक विहीर आहे. आता या विहिरचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या विहिरीवर असणारा एक लाकडी रहाट. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरली जाणारी रहाटाची पद्धत खूप दिवसांनी येथे पाहायला मिळाली.
गावखडी : रत्नागिरीहून पावसमार्गे पूर्णगडच्या खाडीपुलावरून पुढे गेल्यावर गावखडी किनारा आहे. उजव्या बाजूला दाट सुरुबन आहे व एक किलोमीटर लांबीचा सुंदर सागरकिनारा आहे. गावखडीच्या किनाऱ्यावरून पूर्णगड किल्ल्याची तटबंदी दिसू शकते. गावखडी येथे कासव ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची घरटी संरक्षित करून पिल्ले समुद्रात सोडली जातात. श्री. डिंगणकर व त्यांचा मित्रसमूह गेलेली पाच वर्षे कासवांवर संशोधनही करीत आहे. त्यामुळे या ठिकाणाला नवीन ओळख मिळाली आहे. या वर्षी १५ घरट्यांमध्ये अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. पावस-गावखडी हे अंतर नऊ किलोमीटर आहे.

देवाचे गोठणे : श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते.
आंबोळगड
नाटेपासून पुढे फक्त ५ किलोमीटर अंतरावर आंबोळगड आहे. यशवंतगडाप्रमाणेच मुसाकाजी बंदरावर लक्ष देण्यासाठी आंबोळगड या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. तटबंदीच्या तुरळक अवशेषावरून येथे पूर्वी किल्ल्या होता एवढीच काय ती या आंबोळगडाची राहीलेली ओळख. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे.
किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहिर व वाड्यांची जोती आहेत.
गडाच्या मधोमध ऐश्वर्यशाली व राजेशाही थाट असलेले वडाचे झाड जणू त्या गडावर सत्ता गाजवत आहे असे भासते. तिथे असणारी घनदाट झाडे सूर्यकिरणांना आत शिरण्यास मज्जाव करतात असे वाटते.
आंबोळगड गावात प्रवेश करताच डावीकडे सुंदर असा समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. इतका शांत, स्वच्छ आणि निर्मनुष्य समुद्रकिनारा म्हणजे बागडायला आणि आंघोळीसाठी आमंत्रणच .आंबोळगडाचा समुद्रकिनारा खुपच विस्तीर्ण आहे. इथे फार वावर नसल्याने समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या विविध आकाराच्या शंखांचा नुसता सडा पडलेला असतो. आंबोळगडाच्या त्या विस्तीर्ण समूद्रकिनाऱ्यावर, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघणारी सोनेरी वाळू आणि फेसाळणा-या लाटा यांच्याशी मस्ती करताना वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही.
आंबोळगड किल्ला आणि समुद्रकिनार्याबरोबरच आंबोळगड परिसरात बघण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे गगनगिरी महाराजांचा आश्रमः-
गगनगिरी महाराज आश्रम आंबोळगड
आंबोळगडाचे अवशेष पाहून परत मुख्य रस्त्यावर येऊन २०० मीटर पुढे गेल्यावर अफाट पसरलेल्या पठाराचा भाग दिसतो. तिथून सरळ पुढे गेल्यावर रस्ता एक वळसा घेऊन संपतो.
तिथेच आंबोळगडला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या गाडय़ांचा शेवटचा थांबा आहे.
त्याचा डाव्या बाजूस गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आश्रमाच्या कंपाऊंडमध्ये एक सुंदर दत्त मंदिर आहे.
या ठिकाणी समुद्राने वेढलेल्या विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. महाराजांचे भक्त या पवित्र आश्रमाला जरूर भेट देतात. आंबोळगडाच्या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाचा परिसर इतका शांत आहे की लगत असलेल्या सागराच्या रौद्रभीषण लाटांची गाजच फक्त परिसराची शांतता भंग करत राहाते.हे पठार डोंगराच्या कडेला संपते. याच कडय़ापासून समुद्र ४०-५० फूट खोल आहे. समुद्राच्या लाटा सतत गडाच्या दगडी कठडय़ाला येऊन आदळतात आणि त्यामुळे निर्माण होणारे शुभ्र फेसाळ कारंजे आल्हाददायक वाटतात.

आश्रमाच्या शांत परिसरात मागील बाजूला गगनगिरी महाराजांनी जिथे तपश्चर्या केली त्या गुहेला भेट देतां येते. इथे भेट दिल्यावर सुंदर निसर्गाविष्कारा बरोबरच एका तपोभूमीला भेट दिल्याचे समाधान मिळते. आंबोळगडाचा तुटलेला काळाकभिन्न कडा, विस्तीर्ण निळाशार समुद्र, खाडीमुखावरचा आंबोळगड हे सारे काही एका दृष्टीक्षेपांत न सामावणारे पण अविस्मरणीय असे आहे.
या बरोबरच परिसरातील गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर यांना भेट देता येईल.
आडिवरे जवळच्या वेत्येच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचे ठरवले. आडिवरे गावानंतर लगेचच डावीकडे 'वेत्ये चौपाटीकडे' असे लिहलेल्या रस्त्यावर फाट्यापासून समुद्रकिनारा फक्त ३ किलोमीटर. आहे
वेत्ये गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते.
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) https://ratnagiritourism.in हि वेबसाईट
३) https://www.bytesofindia.com
४) http://yashvartak.blogspot.com/2015/12/blog-post_13.html
५) https://www.maayboli.com/
६) https://sites.google.com/site/weekendtravelplans/
७) https://www.pudhari.news/news/Konkan/
८) https://www.esakal.com/kokan/
९) https://www.lokmat.com/ratnagiri/
११) https://talukadapoli.com/places/
१२) http://ferfatka.blogspot.com/2013/08/blog-post_15.html
१३) http://www.misalpav.com