हेदवीची बामणघळहेदवीची बामणघळ
‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील, तसेच आसपासच्या परिसरातील काही पर्यटनस्थळांची माहिती घेऊ या.
गुहागर हे या परिसरातील पर्यटनाचे केंद्रस्थान आहे. आसपास भरपूर काही बघण्यासारखे आहे. येथे किमान दोन दिवस तरी मुक्काम हवा. सकाळी उठावे कोकणी थाटाचा दडपे पोहे, तांदूळपिठाचे घावन, आटवल भात (मेतकुटासह) असा नाश्ता करावा व बाहेर पडावे, आसपास फिरावे दुपारी जेवण करून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा बाहेर पडावे. फिरतफिरत संध्याकाळी किनाऱ्यावर यावे. वाळूत रेघोट्या ओढत सूर्यास्त पाहावा, शहाळ्याचे पाणी प्यावे, परत संध्याकाळी आवडीप्रमाणे बिरड्याची उसळ, कुळथाचे पिठले, केळफुलाची भाजी, हंगामाप्रमाणे कच्च्या फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ, मोदक, किंवा मत्स्याहारींनी सुरमई, पापलेट, बांगडा असे अनेक प्रकारचे मासे यांवर ताव मारावा, सोलकढी प्यावी, काजू खाऊन मुखशुद्धी करावी. आणखी काय हवे?
खूप महत्त्वाचे : समुद्रावर जाताना पर्यटकांनी भरती-ओहोटीचे वेळापत्रक कसे ठरवतात, याचे कोष्टक माहिती करून घ्यावे. ज्या दिवशी तुम्ही कोठल्याही समुद्रकिनाऱ्यावर असाल, त्या दिवशीच्या तिथीची पाऊणपट करावी. थोडक्यात चतुर्थी असेल, तर पाऊणपट म्हणजे तीन. त्यात एक आकडा मिळवल्यावर चार बेरीज होते. म्हणजेच चार ही भरतीची वेळ असेल व १२ तासांनी पहाटे चार वाजता ओहोटी होईल. साधारण रोज १५ मिनिटांचा फरक पडत जातो. ओहोटीच्या वेळी पाणी मागे ओढले जाते. त्या वेळी धोका जास्त असू शकतो. हे लक्षात घ्यावे.
व्याडेश्वर मंदिरातील नंदीचे शिल्पव्याडेश्वर मंदिरातील नंदीचे शिल्प
गुहागर : गुहा म्हणजे बुद्धी, तिचे आगर म्हणून गुहागर. काहींच्या मते, गुह म्हणजे कार्तिकस्वामी व त्याच्या नावावरून गुहागर. काहींच्या मते येथे मोठ्या प्रमाणावर गो (गाय) गृहे (गोठे) होते, म्हणून गुहागर. अशी नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पाच किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण, नारळी-पोफळीच्या झाडांची हिरवी किनार असलेला येथील किनारा आबालवृद्धांचे आकर्षण ठरला आहे. येथील श्री व्याडेश्वर अनेक कुटुंबांचा कुलस्वामी आहे. गावात रस्त्याच्या दुतर्फा तीन-चार फुटांची चिऱ्याची भिंत असलेली संरक्षक भिंत व त्यामागे टुमदार घर व मागे वाडी अशी बहुतेक घरांची रचना आहे. गुहागर शहरात निवास-न्याहारी योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी घरगुती निवासव्यवस्था उपलब्ध आहे. समुद्रकिनारी अनेक रिसॉर्टदेखील आहेत.
देव व्याडेश्वर : गुहागर एसटी स्टँडजवळच मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला व्याडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात असलेल्या वाड्या व त्यांचा हा देव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याडमुनींनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून या स्थानाला ‘व्याडेश्वर’ संबोधले जाते. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून, समोरील भव्य सभामंडपात तेवढेच भव्य आकाराचे नंदीचे शिल्प आहे. मंदिराच्या चार कोपऱ्यांत गणपती, दुर्गादेवी, लक्ष्मीनारायण आणि सूर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. मंदिर परिसरात पर्यटकांसाठी भक्तनिवासाची सुविधा आहे.
लक्ष्मीनारायण, गुहागरलक्ष्मीनारायण, गुहागर
लक्ष्मीनारायण मंदिर : गुहागरमधील खालचा पाट भागात हॉटेल कौटिल्यजवळ २५० वर्षांपूर्वीचे पेशव्यांचे सरदार हरिपंततात्या फाडले यांनी बांधलेला मंदिरसमूह आहे. येथे यापूर्वीही मंदिर असावे, असे संदर्भ मिळतात. संपूर्ण दगडी तटबंदी असलेल्या मंदिरात श्री विष्णू-लक्ष्मीची बाजूला असलेला गरुड व मागे पितळेच्या प्रभावळीसह संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. मंदिर परिसर स्वच्छ व शांत आहे.
श्री दुर्गादेवीचे मंदिर : गुहागर शहरातील वरचापाट भागात श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. या मार्गावर मुख्य रस्त्यालगत देवीच्या नावाने खांब उभारला आहे. मंदिर प्रांगणात पंचायतन असून, त्यामध्ये श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री कृष्णेश्वर व समोरचा पिंपळ हे श्री भगवान सूर्यनारायणाचे मंदिर आहे. दर वर्षी येथे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या कालावधीत शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. श्री दुर्गादेवीच्या कमानीजवळ कै. शिवरामशास्त्री शारंगभट खरे व मंदिराची रचना करणारे कै. पद्माकरभट दातार यांची समाधी आहे. समाधीच्या पुढच्या बाजूस कै. कृष्णाभट खरे यांनी बांधलेले कृष्णेश्वराचे मंदिर आहे. कृष्णेश्वराच्या मंदिरासमोर देवीचे तळे असून, त्यात एक लाकडी मल्लखांबासारखा सागवानी लाकडाचा खांब आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला असला, तरी जुन्या लाकडी कोरीवकामाचा वापर केला आहे. अतिशय सुंदर अशी श्री दुर्गादेवीची अष्टभुजा, संगमरवरी मूर्ती संपूर्ण चांदीच्या सिंहासनावर उभी आहे. देवीच्या हातामध्ये चक्र, अंकुश, सर्प, त्रिशूळ, शंख, घंटा, परशू असून, महिषासुराची शेंडी धरलेली दाखविली आहे.
दुर्गादेवी मंदिर, गुहागरदुर्गादेवी मंदिर, गुहागर
कार्तिकस्वामी मंदिर : वरचा पाट भागात कार्तिकस्वामी मंदिर आहे. येथे एक फूट सहा इंच उंचीची मूर्ती आहे. पूर्वी येथे फक्त शिळा होती. १९९५मध्ये जीर्णोद्धाराच्या वेळी संगमरवराची मूर्ती बसविण्यात आली.
उफराटा गणपतीउफराटा गणपती
उफराटा (उरफाटा) गणपती : सुमारे ३०० वर्षापूर्वी कोळी लोकांना समुद्रात ही मूर्ती सापडली. तिची स्थापना करताना ती पूर्वाभिमुख होती. स्थानिक कथेप्रमाणे असे सांगितले जाते, की एकदा समुद्र खूपच खवळला होता व त्याचे पाणी गुहागरमध्ये शिरेल अशी भीती वाटू लागली. सर्व लोकांनी श्री गजाननाचा धावा सुरू केला. अखेर भक्तांच्या हाकेला बाप्पा धावून आला. त्याने आपले मुख पूर्वेकडून सागराच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेला केले. त्याबरोबर सागर शांत झाला. दिशा बदलल्याने याचे नाव उरफाटा गणपती पडले.
बिवलीचा लक्ष्मीकेशव
बिवलीचा लक्ष्मीकेशव
बिवली : ‘बिवलीचा लक्ष्मीकेशव’ प्रसिद्ध आहे. शाळिग्रामापासून बनविलेली लक्ष्मीकेशवाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक तर येतातच; पण या शिल्पाचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासकही येतात. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या प्रकारच्या मूर्तीस केशवमूर्ती म्हणतात. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी गावोगावचे लोक देवळातील सुंदर मूर्ती त्या काळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून देत असत किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवूत असत. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी बसवली. हे नीळकंठशास्त्री थत्ते न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले होते. चिपळूणपासून २५ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. कोकणात श्री विष्णूची अनेक मंदिरे आहेत. दिवेआगरपासून अशा मूर्ती दिसून येतात. साधारण शिलाहार व होयसळ शैलीचा प्रभाव या शिल्पांवर दिसून येतो. ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. प्रत्येक मूर्तीच्या शिल्पामध्ये वेगळेपण असले, तरी शैली एकच दिसून येते. मूर्ती सालंकृत असून, डोक्यावर समृद्धीचे प्रतीक असलेला शोभिवंत मुकुट आहे. तसेच ‘तीन माळा गळा’ शोभून दिसतात. यातील एका माळेतीळ पदकात आंबे दिसून येतात. बारकाईने पाहिल्यास अनेक दागिने कोरलेले आढळून येतात. मंदिर परिसर निसर्गरम्य आहे.
दोणवली : हे चिपळूण तालुक्यातील एक निसर्गरम्य ऐतिहासिक गाव आहे. गावात पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मंदिर उभे आहे. गाभाऱ्यात संगमरवरी पाषाणाची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची सुबक मूर्ती आहे. मंदिराचा सभामंडप उघडा असून गाभारा बंदिस्त आहे. मंदिराची बांधणी जांभा दगड, गूळ, चुना इत्यादींपासून केली आहे. हे मंदिर इ. स. १७७४दरम्यान थोरले माधवराव पेशवे यांनी बांधले असा उल्लेख आहे. मंदिराच्या पिछाडीस ओहोळावर असलेला मोठ्या आकाराच्या जांभ्या दगडापासून तयार केलेला अर्धवर्तुळाकृती ऐतिहासिक पूल बघण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक येत असतात. खेकडे संवर्धनासाठी या गावाची निवड करण्यात आली आहे.
मळण - आनंदीबाईंचे माहेर : राघोबादादांच्या पत्नी व महत्त्वाकांक्षी आनंदीबाई यांचे माहेर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनाव ओक असे होते. आजही या कुटुंबाची येथे घरे आहेत. आनंदीबाईंच्या माहेरच्या वाड्याचा चौथरा आणि त्या काळचे तळे पाहता येते. शृंगारतळीहून मळणला जाण्यासाठी मार्ग आहे.
पालशेत गुंफा : २००१मध्ये प्रथमच डेक्कन कॉलेजमधील पुरावास्तू संशोधक अशोक मराठे यांनी सुसरोंडी येथील ही गुंफा शोधून काढली. सुमारे ९० हजार वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवी वस्ती असल्याचा पहिला पुरावा येथे मिळाला. येथे अश्मयुगीन हत्यारेही सापडली. ट्रेंर्किंगची आवड व पुरावास्तू अभ्यासाची आवड असणाऱ्यांनी येथे जरूर भेट द्यावी.
कोंडकारूळ गरम पाण्याचा झरा : बोऱ्याबंदरजवळच एका टेकडीवर खडकातून सतत गरम पाणी पाझरत असते.
बुधल समुद्रकिनाराबुधल समुद्रकिनारा
बुधल : ज्याला इंग्रजीमध्ये लँडस्केप म्हणतात, अशी भरपूर ठिकाणे कोकणामध्ये आहेत. अशांपैकी एक म्हणजे वेळणेश्वरच्या उत्तरेला असलेले बुधल हे छोटेखानी गाव. हे या वर्णनात चपखल बसते. गावाच्या कडेला असलेल्या काळ्या खडकांवर समुद्राच्या लाटांचे सतत थैमान चालू असते. याकडे बघता बघता वेळ कसा जातो समजत नाही. अर्धवर्तुळाकार पुळण, रूपेरी वाळूचा छोटा किनारा हे थोडा वेळ तरी अनुभवावे.
वेळणेश्वर मंदिरवेळणेश्वर मंदिर
वेळणेश्वर दीपमाळवेळणेश्वर दीपमाळ
वेळणेश्वर : कोकणातील सुंदर सागरकिनाऱ्यांपैकी वेळणेश्वरचा किनारा प्रसिद्ध आहे. लांबवर असणारा सुरक्षित किनारा म्हणून हा ओळखला जातो. कोळ्यांची वस्ती मोठी असल्याने काठावर नांगरलेल्या होड्या समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात असतात, हे दृश्य खूप छान दिसते. उंच डोंगरातील घाटातून खाली येताना सागराचे विलोभनीय दर्शन होते. वेळणेश्वर हा मी पाहिलेला पहिला समुद्रकिनारा आहे. ५० वर्षांपूर्वीची शांतता आता येथे राहिली नाही, तरी या भागात आल्यावर येथे आल्याशिवाय चैन पडत नाही. पूर्वी किनाऱ्यावर वाळूत पावलांचे ठसे अजिबात नसायचे. आता पर्यटक खूप येतात. किनाऱ्याची नैसर्गिक शोभा मात्र तशीच आहे. अद्यापही संपूर्ण किनारा जणू नारळाच्या उंच झाडांनी सजविला आहे असे वाटते.
वेळणेश्वर किनारा
वेळणेश्वर किनारा
समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे, त्याला ‘मेरुमंडल’ म्हणतात. हे मंदिर साधारण सन ११०० ते १२००मधील आहे. आदिलशहाच्या पदरी काम करणारे येथील गोखले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हणतात. मंदिर प्रांगण खूपच मोठे आहे. त्यात ३० फूट उंचीची देखणी दीपमाळ आहे. घुमटाकार तीन शिखरे आहेत. गाभाऱ्यात तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून, त्यावर शंकराचा मुखवटा ठेवून पोशाख घालतात. शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालिमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंचधातूच्या, तर विठ्ठल-रखुमाईची पाषाणमूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. कोकणातील लोक श्रद्धाळू आहेत. स्थानिक लोक या काळभैरवाला कौल लावताना पाहायची संधी मिळाल्यास जरूर घ्यावी.
हेदवीचं दशभुजा गणेश मंदिर
हेदवीचं दशभुजा गणेश मंदिर
हेदवी : अप्रतिम निसर्गाच्या सान्निध्यात असलेले येथील दशभुजा गणपती मंदिर महाराष्ट्रातील गणेशभक्तांचे आवडते ठिकाण झाले आहे. निसर्गाच्या कोंदणात वसलेले हे टुमदार मंदिर पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे. मंदिराचे बांधकाम साधारण १७६० ते ७५ या कालावधीत केळकरस्वामींनी केले व त्यासाठी पेशव्यांनी मदत केली होती, असे सांगितले जाते. मंदिर टेकडीवर असून, पाहावे तिकडे गर्द झाडी आहे. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा-फुलांच्या बागा यांमुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व इथल्या परिसराच्या प्रेमात पडतोच. देवदर्शनाइतकेच निसर्गाचेही पर्यटकांना प्रेम असतेच.
दशभुजा गणेशदशभुजा गणेश
मंदिरातील मूर्ती ही पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून, उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजूच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमल, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धींपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून, सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून, अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता, ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. (अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
हेदवीची बामणघळ : हेदवीचा समुद्रकिनारा खूप छोटा आहे; पण आकर्षक आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे बामणघळ. समुद्राच्या पाण्याचा मारा व दहेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला जाणारे लोक अधिक जाणकार असतील, तर त्यांची पावलं आपोआप गणपती मंदिराच्या अलीकडे असलेल्या बामणघळीकडे वळतात. बामणघळ हा निसर्गाचा अनोखा चमत्कार आहे. हेदवीपासून तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूस जाणारा उतार लागतो. या रस्त्याने गेल्यास समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्याच्या उजव्या बाजूचा परिसर काळ्या कातळाने आणि डोंगराने वेढलेला आहे. या संपूर्ण परिसरात समुद्राच्या उसळत्या लाटांची कातळाशी पकडापकडी सुरू असते. किनाऱ्यावरच थोड्या अंतरावर उमा-महेशाचं एक सुंदर मंदिर आहे. डोंगरावरून येणारी गोड्या पाण्याची धार मंदिरात असलेल्या कुंडात पडते. मंदिरापासून थोडं आणखी पुढे डोंगराच्या दिशेने गेल्यावर कातळामध्ये समुद्रापर्यंत पडलेली एक उभी मोठी चीर दिसते. हीच ती प्रसिद्ध बामणघळ. किनाऱ्यावरून सुरू होणाऱ्या कातळापासून काही फूट आतपर्यंत ही घळ पडलेली आहे. एखादी अरुंद दरी असावी, एवढी, म्हणजे सुमारे दहा ते पंधरा फूट एवढी तिची उंची आहे. समुद्राच्या लाटांचं वेगानं येणारं पाणी या ठिकाणी वर्षानुवर्षं घुसून ही घळ तयार झाली आहे. लाटांचं पाणी एवढ्या वेगाने आत घुसतं, की कातळात तयार झालेले वेगवेगळे आकार पार करत ते घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत शिरतं आणि तिथून वेगानं वर उसळतं. भरतीची वेळ असेल आणि लाटांचा जोर जास्त असेल, तर एवढ्या खोल असलेल्या घळीतूनही हे पाणी वेगानं वर आकाशाच्या दिशेने फेकलं जातं आणि कातळाच्या पृष्ठभागापासून काही फूट वर उडतं. घळीच्या अगदी वरच्या टोकापर्यंत किंवा बाजूलाही आपल्याला उभं राहता येत असल्यामुळे, कधीकधी आपल्यालाही या तुषारसिंचनाचा आनंद घेता येतो; मात्र ही घळ जेवढी सुंदर, तेवढीच धोकादायक आहे. अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात आल्याच्या घटनाही इथे घडल्या आहेत. सतत समुद्राचं पाणी उडून पडत असल्यामुळे कातळ निसरडे असण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हा धोका जास्तच असतो. घळ अतिशय अरुंद आणि खोल असल्यामुळे हा चमत्कार पाहताना पूर्ण काळजी घेऊन आणि सुरक्षित अंतरावरूनच पाहणं योग्य. याच परिसरात उमराठ आणि नरवण येथील निसर्गरम्य परिसरात असलेली मंदिरंही पाहण्यासारखी आहेत.
बाव यामुळे येथे खडकाला पडलेल्या दोन ते तीन फूट रुंद, १५ फूट खोल आणि २०-२५ फूट लांबीच्या घळीतून भरतीच्या वेळी एखाद्या कारंज्यासारखे उंच पाणी उडते. हे खूपच आकर्षक दिसते. भरतीची वेळ पाहून येथे जावे.
गोपाळगडगोपाळगड
गोपाळगड : वाशिष्ठी नदीच्या मुखावर अंजनवेलजवळ सागरी दुर्ग या प्रकारात मोडणारा गोपाळगड शतकानुशतके उभा आहे. हा किल्ला नक्की कधी व कोणी बांधला याबद्दल माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदरापासून (दाल्भेश्वर) चिपळूणपर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी अंजनवेलचा किल्ला बांधण्यात आला. सन १६६०मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला, त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण केले. मराठी अमदानीत हे परगण्याचे ठिकाण होते. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला असून, चौथ्या बाजूला खंदक आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. दगड व चुन्याचा २० फूट उंचीचा, आठ फूट रुंदीचा दगडी बांधकामातील तट चांगल्या स्थितीत आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ साडेसात एकर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून, सहा तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. किल्ल्यावर धान्यकोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी दिसून येतात. येथून सावित्रीचे नयनमनोहर दृश्य दिसते.
गोपाळगडगोपाळगड
अंजनवेल : येथील एन्रॉन प्रकल्प खूपच गाजला. अंजनवेल येथील ताठरखानबाबा यांचा ३०० वर्षांपूर्वीचा दर्गा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जवळील धोपावे येथून दापोलीसाठी फेरीबोट आहे. आपल्याबरोबर गाडी नेण्याची व्यवस्था येथे आहे.
मोडकाघर फाटा : येथून वेळणेश्वर व हेदवी, तसेच तवसाळ येथे जाता येते. येथे बोट क्लब आहे.
पेवे : येथे झोलाई देवी मंदिर, तसेच जमलशाहबाबा दर्गा ही दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत.
रोहिला : हेदवीपासून सात किलोमीटर अंतरावर सुंदर वाळूची पुळण आणि त्यापलीकडे सुरूबन आहे. उजवीकडे नारळाची झाडे दाटीवाटीने उभी आहेत.
तवसाळ : हेदवीपासून १२ किलोमीटर अंतरावर जयगडच्या बाजूला दक्षिणेस हे समुद्रकिनारी असलेले एक सुंदर ठिकाण आहे. शास्त्री नदीच्या मुखावर हे ठिकाण आहे. समोरच जयगड या जलदुर्गाचे दर्शन होते. तवसाळ हा छोटा आणि कमी गर्दीचा किनारा आहे. येथून शास्त्री नदीत (जयगड खाडी) नौकानयनाची सोय उपलब्ध आहे. तसेच पर्यटकांसाठी मासे पकडण्याची सोय करण्यात आली आहे. या खाडीतून सूर्यास्ताचे सौंदर्य अनुभवता येते. फेरीबोटीतून वाहनासह जयगडला जाता येते. जयगडहून गणपतीपुळेमार्गे रत्नागिरीला जाण्यासाठी मार्ग आहे.
वाशिष्ठी नदीवाशिष्ठी नदी
रम्य वाशिष्ठी परिक्रमा : धार्मिक, तसेच अभ्यास म्हणून नर्मदा परिक्रमा, कृष्णा परिक्रमा करणारे भरपूर प्रवासी आहेत; पण वाशिष्ठी नदीची परिक्रमा हीपण निसर्गाच्या सान्निध्यात खूप सुंदर दर्शन घडविते. नदीची लांबी सुमारे ७० किलोमीटर असून, ती पूर्णपणे रत्नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतील कुंभार्ली घाटाच्या बाजूच्या दरीत ९०० मीटर उंचीवर तिचे उगमस्थान आहे.. चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली या तालुक्यांतून ती वाहत जाते. कोयना जलविद्युतकेंद्राच्या पाण्याचा विसर्ग अलोऱ्याजवळ या नदीत होतो. त्यामुळे या नदीचे पाणी गोड झाले आहे. या नदीच्या किनाऱ्यावर मोठी, बहुविध जैवविविधता आढळते. मगरींचे वास्तव्य हे या नदीमधील मुख्य आकर्षण. या नदीच्या खोऱ्यात क्षेत्र परशुराम, दोणवली, मालदोली, मोरवणे, १८०० वर्षांपूर्वीची पन्हाळेकाजी येथील बौद्ध व हिंदू लेणी, दाभोळ बंदर, गोपाळगड, गोवळकोट अशी पर्यटन ठिकाणे आहेत. वाशिष्ठीला मिळणारी खेडजवळून वाहणारी जगबुडी ही मोठी नदी आहे. नावाप्रमाणे तिला पावसाळ्यात प्रचंड पूर येऊन आसपासच्या भागात ती थैमान घालते. जगबुडीच्या उगमाजवळ कोयनेच्या पर्जन्यक्षेत्रातील उच्चतम पावसाची नोंद होते. मुळातच पुरातन काळापासून या नदीच्या काठावर अनेक राजवटी होऊन गेल्या. येथे ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणे आहेत. आदिलशाही राजवटीत या नदीतून व्यापारउदीम चालत होता. केरळला मागे टाकील एवढा समृद्ध किनारा या नदीला मिळाला आहे. मगरींचा मोठा अधिवास असलेले हे एकमेव ठिकाण आहे. चिपळूण येथील इतिहासतज्ज्ञ, पत्रकार धीरज वाटेकर व त्यांच्या मित्रमंडळींनी यात पुढाकार घेऊन वाशिष्ठीची परिक्रमा करून तिचे अनेक पैलू पुढे आणले आहेत. त्यामुळे येथील पर्यटन केरळला नक्कीच मागे टाकेल. नदीच्या दोन्ही तीरांवर अनेक पुरातन व ऐतिहासिक ठिकाणे आहेत. ही परिक्रमा पर्यटकांना नक्कीच आनंद देईल. (याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वाशिष्ठी नदीवाशिष्ठी नदी
कसे जाल गुहागर येथे?
सागरी महामार्गामुळे आपल्या छोट्या गाडीसह फेरीबोटीचा वापर करून दापोलीपासून जयगडपर्यंत जाता येते. चिपळूणला रेल्वे स्टेशन असून, ते उत्तर दक्षिण भारताशी जोडलेले आहे. गुहागर, वेळणेश्वर येथे राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स व निवासी व्यवस्था आहे. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जाण्यास योग्य.
y 29 | 06:45 AM
मार्लेश्वर धबधबामार्लेश्वर धबधबा
‘करू या देशाटन’ या सदरात सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात पाहू या संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यांतील काही पर्यटनस्थळांबद्दल....
.............
नारळी-पोफळी आणि सुरूची बने, डोंगर-दऱ्या, त्यातून खळखळत वाहणारे निर्झर, त्यांच्या संगतीत राहणारी, आंब्याचा गोडवा असणारी, देवभोळी, पण व्यवहारी माणसे हे कोकणचे वैशिष्ट्य. पश्चिमेस अंजनवेलपासून तवसाळपर्यंत असलेला सुंदर सागरकिनारा, त्यावर असलेली पुरातन मंदिरे, पूर्वेस सह्याद्रीच्या उतरंडीवरील मार्लेश्वरपासून अलोऱ्यापर्यंत असलेली निसर्गरम्य, ऐतिहासिक ठिकाणे पर्यटकांना साद घालीत असतात.
मार्लेश्वर गुंफामार्लेश्वर गुंफा
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील श्री क्षेत्र मार्लेश्वर हे उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी होते. खरे तर येथे पावसातच येण्यात मजा आहे. येथे एका नैसर्गिक गुहेत दोन शिवपिंडी आहेत. त्यातील एक स्वयंभू मार्लेश्वराची व दुसरी स्वयंभू मल्लिकार्जुनाची. भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ आहे. मंदिरातील गुहेत समयांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही दिवा लावण्यास परवानगी नाही. गुहेतील खबदाडींमध्ये ‘डुरक्या घोणस’ या जातीच्या बिनविषारी सापांचे अस्तित्व आहे. परंतु त्यांचा कोणालाही उपद्रव झाल्याचे ऐकिवात नाही. येथे त्या सापांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण करायला मनाई आहे. जेव्हा हे स्थान निर्माण झाले, तेव्हा येथे पार्वती नव्हती. म्हणूनच या देवस्थानाच्या पद्धतीप्रमाणे येथे दर मकरसंक्रांतीला शिव-पार्वतीचे लग्न लावले जाते. येथील मार्लेश्वर हा ‘वर’ आणि साखरपा या गावाची भवानी (गिरिजादेवी) ही ‘वधू’ यांचे लग्न लावले जाते. (या विशेष विवाहसोहळ्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
बावनदीवरील सुमारे २०० फूट उंचीवरून पडणारा येथील धबधबा धारेश्वर या नावाने ओळखला जातो. मोठ्या पावसात या धबधब्याला एकूण बारा छोटे-छोटे धबधबे येऊन मिळतात. अर्थात उन्हाळ्यामध्ये हा क्षीण होतो. अतिशय निसर्गरम्य ठिकाण म्हणून हे ठिकाण ट्रेकर्सच्या यादीत आहे. मार्लेश्वरच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरची चढण असून, ५०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडी-कोळवणमार्गे मार्लेश्वर सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरीहून वा मुंबईहून येताना देवरूखहून हातीवमार्गे हे ठिकाण सुमारे १८ किलोमीटर दूर आहे.
प्रचितगडप्रचितगड
प्रचितगड : संगमेश्वरजवळील शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. अनेक संकटांची प्रचिती देणारा तो प्रचितगड असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. शिवरायांनी २९ एप्रिल १६६१ रोजी शृंगारपूर जिंकले. त्याच वेळी कोकणावर नजर ठेवता येईल असा प्रचितगडही घेतला. १७१०-१२मधील छत्रपती शाहू महाराज व रामचंद्रपंत अमात्य यांच्या करारात प्रचितगडाचा उल्लेख येतो.
नंतर जानेवारी १८१८मध्ये कर्नल प्रॉथरने प्रचितगडाचा ताबा घेतला. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा हा महत्त्वाचा टेहळणी किल्ला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर गावातून या गडावर सह्याद्री पर्वतामधून पायवाटेने जाता येते. शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडीक वास्तू असून, येथील कातळाच्या कुंडात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटला पाहिजे.
कर्णेश्वर मंदिर, कसबाकर्णेश्वर मंदिर, कसबा
कसबा संगमेश्वर : संगमेश्वरजवळ पुलाच्या अलीकडेच चिपळूणकडून येताना डाव्या बाजूला कसबा येथे कर्णेश्वराचे मंदिर आहे. मंदिरशैली इ. स. ७०० ते १०००मधील असावी. सभामंडपाची रचना मध्य कर्नाटकमधील हुबळीजवळील हनगल येथील मंदिरांसारखी वाटते. इसवी सन १०६४च्या सुमारास गुजरातच्या कदंब राजांचा जावई चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी राज्य करत होता. त्याने हे मंदिर बांधले. ते त्याच्या नावाने ‘कर्णेश्वर शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिरातील शिल्पकला अप्रतिम आहे. क्वचित दिसणारी कार्तिकस्वामी व सूर्यनारायण यांची दोन मंदिरे कसब्यात आहेत. याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना या मंदिराच्या जवळ असलेल्या देसाई वाड्यातच मुघलांनी दगाफटक्याने पकडून नेले. मंदिराजवळच देसाईवाडा आहे. (मार्लेश्वर आणि कर्णेश्वर मंदिराबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
देवरूख : हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. रायगडावरून विशाळगडावर जाताना छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती संभाजीराजे श्री सोळजाई मंदिरात दर्शनासाठी येथे येत असत. येथे त्या वेळची घोड्यांची पागाही आहे. समाजसुधारक पार्वतीबाई आठवले व भूदानयज्ञातील विनोबाजींचे सहकारी शरदशेठ सार्दळ व त्यांची कन्या स्वातंत्र्यसैनिक विमल सार्दळ यांचे जन्मस्थान येथे आहे.
देवरूख येथे गणेशमूर्तींचे अनोखे संग्रहालय आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तब्बल दोनशे गणेशमूर्ती तेथे पाहायला मिळतात. (या संग्रहालयाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते, अशी परंपरा आहे; मात्र देवरुख येथील ऐतिहासिक चौसोपी वाड्यातील उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि शुद्ध षष्ठीला संपतो. गेली ३५० वर्षे हा उत्सव सुरू आहे. (या अनोख्या गणेशोत्सवाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
शिरंबेचा मल्लिकार्जुनशिरंबेचा मल्लिकार्जुन
शिरंबेचा मल्लिकार्जुन : संगमेश्वर तालुक्यात माखजन, वहाळ गावाजवळ हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसरात सुमारे ५० चौरस फुटांच्या तळ्याच्या मध्यभागी कोकणी पद्धतीच्या मंदिराची उभारणी केली गेली आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटा पूल बांधण्यात आला आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी स्वच्छ, वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असे आहे, की जे पाण्यात आहे. येथील शिवलिंगही पाण्यामध्येच आहे. गाभारा सभामंडपाच्या खूप खाली आहे. शिवलिंग निम्मे पाण्यातच आहे. मंदिराजवळ ग्रामदेवता व गणपतीचे मंदिर आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकावरून शिरंबे येथे जाण्याची सोय आहे.
भातगाव खाडीपूलभातगाव खाडीपूल
भातगाव खाडीभातगाव खाडी
भातगाव खाडीपूल : सागरी मार्गावर अनेक ठिकाणी पूल झाल्यामुळे कोकणातील दळण वळण खूप सोपे झाले आहे. असाच हा एक पूल आहे, जो कोकणाचे सौंदर्य अधिक खुलवून दाखवितो. या पुलाच्या पूर्वेला कापशी, गड व शास्त्री या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यामुळे शास्त्री नदीचे विशाल पात्र एखाद्या छोट्या समुद्रासारखे भासते. गणपतीपुळ्याहून येताना जाकादेवीजवळ डावीकडे वळल्यावर हा पूल लागतो. येथून गुहागर व चिपळूण जवळ पडते. हा पूल जयगड खाडीवर (शास्त्री नदीवर) आहे. येथून शास्त्री नदी जयगडपर्यंत नागमोडी वळणे घेत जाते. दुतर्फा उंच सदाहरित डोंगर व मधून जाणारी शास्त्री नदी हे अतिशय सुंदर दृश्य दिसते. जयगडजवळील तवसाळपासून इथपर्यंत तासिका तत्त्वावर डुबको (मोटरबोट) मिळतात व केरळप्रमाणे खाडीतील नौकानयनाचा आनंद येथे मिळतो. भातगाव हे माझे गाव आहे. गावात जुगाई देवीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. गावाच्या वरच्या बाजूने गुहागरकडे जाणारा रस्ता आहे. तेथूनही खाडीचे विहंगम दृश्य दिसते.
वीर-देवपाट पालखीवीर-देवपाट पालखी
वीर/देवपाटचा धबधबा : वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो. कोकणात महामार्गापासून किंवा सागरकिनाऱ्यापासून अशी अनेक ठिकाणे दडलेली आहेत, की तेथे कोकणाचे अस्तित्व टिकून आहे. असेच एक जोडगाव म्हणजेच वीर व देवपाट. चिपळूणकडून येताना सावर्ड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे वहाळकडे एक रस्ता गेला आहे. वहाळच्या पुढे देवपाट आहे. येथे एक धबधबा आहे. तसेच या गावात श्री लक्ष्मी मल्लमर्दन देवस्थान, आहे. या गावात पारंपरिक दशावतार नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कोकणातील अशा सर्वच गावांतून गणपती, होळी व गावच्या देवाची जत्रा हे सण दिवाळीपेक्षाही मोठ्या आनंदाने, पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. पालखी घेऊन केलेले नृत्य खूप उत्साहित करणारे असते. आता रस्ते झाल्यामुळे खाडीचे सौंदर्य बघता येत नाही. शास्त्री नदीला आरवलीकडून गड नदी व देवपाटकडून कापशी नदी अशा दोन नद्या मिळतात. भातगाव पुलाच्या पूर्वेला हा त्रिवेणी संगम आहे.
आरवली व तुरळ – गरम पाण्याचे झरे : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात आरवली येथे गरम पाण्याचे कुंड आहे. त्वचारोगावर उपाय म्हणून अनेक लोक येथे स्नानासाठी येत असतात. येथील पाणी मध्यम गरम (कोमट) असते.
आरवली येथून थोडे पुढे गेल्यावर तुरळ येथे अगदी उकळते पाणी कुंडातून सतत बाहेर येत असते. येथील पाणी इतके गरम असते, की कुंडातून बाहेर पडणारे पाणी सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत गरम असते. येथे बहिरोबाचे एक जुने मंदिर असून, प्राचीन मूर्तीही पाहायला मिळतात.
अलोरे विद्युतगृह : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना प्रकल्पाची विद्यृतगृहे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. कोयना धरणाचे पाणी उंचावरून बोगद्याद्वारे खाली आणून त्यावर विद्युतनिर्मिती केली जाते. आता हे विद्युतगृह बघण्यास बंदी आहे. वरच्या बाजूला प्रसिद्ध कुंभार्ली घाट आहे. येथे पावसाळ्यात छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात. येथून लांबवरच्या कोकणाचे दर्शन होते.
शिवसृष्टी, डेरवणशिवसृष्टी, डेरवण
डेरवणची शिवसृष्टी : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डे गावाजवळ डावीकडे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डेरवण येथे श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देखणी शिवसृष्टी उभी करण्यात अली आहे. आहे. येथील परिसरात प्रवेश करतानाच समोर रस्त्यावर दुतर्फा असलेले घोड्यावरील सशस्त्र मावळे आपल्याला शिवकाळात घेऊन जातात. लहान मुले तर मावळे पाहून हरखून जातात. येथे शिवसमर्थ गड या नावाने उभारलेल्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित शिल्पे कोरण्यात आली आहेत. शिवरायांच्या लहानपणापासून अनेक प्रसंग यात साकारले आहेत. विविध प्रसंग अक्षरशः जिवंत वाटतात व बघणाऱ्यांना खिळवून ठेवतात. शिवराज्याभिषेकाचे शिल्प फारच अप्रतिम आहे. शिवसृष्टीच्या जवळ असलेला समाधी मंदिराचा परिसरही अत्यंत रम्य व शांत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत पर्यटक शिवसृष्टीला भेट देऊ शकतात. सीतारामबुवा वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही भव्य शिवसृष्टी उभारली गेली आहे. कोकणाची पर्यटनातील हे एक प्रमुख ठिकाण झाले आहे. येथे वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हॉस्पिटलही चालविले जाते.
तेरव मंदिरतेरव मंदिर
तेरव मंदिरतेरव मंदिर
तेरव : येथील मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे आहे. १८६०मध्ये त्याचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर २००२मध्ये लोकवर्गणीतून भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या यादीत अधिकृत पर्यटनस्थळ म्हणून हे समाविष्ट करण्यात आले आहे. मंदिरात चार देवींच्या मूर्ती आहेत. भवानी, वाघजाई, कालकाई आणि नवदुर्गा अशा चार देवता येथे आहेत. तसेच सात उद्यानांनी त्याची शोभा वाढविली आहे. कामथे रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेला हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
श्री क्षेत्र परशुरामश्री क्षेत्र परशुराम
श्री क्षेत्र परशुराम : सात चिरंजीवांपैकी (ज्यांना मृत्यू नाही असे) परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानले जातात. पश्चिम दिशेचे संरक्षणकर्ते म्हणून ते कोकण किनारी वास्तव्य करून आहेत. काश्यप ॠषींना पृथ्वी दान करून स्वतःसाठी समुद्राला मागे हटवून अपरान्त भूमीची म्हणजेच कोकणाची निर्मिती करणाऱ्या श्री परशुरामांचे हे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणहून मुंबईकडे जाताना घाटाच्या माथ्यावर श्री परशुरामाचे देवस्थान आहे. महामार्गापासून उजवीकडे देवस्थानाला जाण्यासाठी रस्ता आहे. आदिलशाहीत जीर्णोद्धार केलेले हे मंदिर आहे. खाली उतरतानाच्या जांभ्या दगडांच्या पायऱ्या (पाखाडी) जावळीचे चंद्रराव मोरे यांनी सुमारे ३०० वर्षांपूर्वी बांधल्या आहेत. परशुरामाच्या या मंदिराच्या रचनेमध्ये आदिलशाही वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: मंदिराचा घुमट या पद्धतीचा आहे.
श्री परशुराम शयनकक्षश्री परशुराम शयनकक्ष
उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या एका बेगमेने उभारला आहे. यामागे एक कथाही सांगितली जाते. ती अशी - एकदा या बेगमेच्या नौका समुद्रात बुडाल्या होत्या. या बेगमेला सागराचा देव म्हणून परशुराम माहिती होता. तिने नवस बोलला, की तारवे परत आल्यास देऊळ बांधीन. त्यानंतर तिच्या नौका खरोखरच सुखरूपपणे किनाऱ्याला लागल्या. त्यानंतर परशुरामाचे मंदिर बांधून तिने नवस फेडला. या मंदिरामध्ये काळ, काम आणि परशुराम यांच्या मूर्ती आहेत. मध्यभागी असलेली परशुरामाची मूर्ती इतर दोन मूर्तींपेक्षा उंच आहे. या मंदिरातली लाकडावर केलेली कलाकुसर सुरेख आहे. श्री परशुराम मंदिराच्या मागील बाजूस परशुरामाची माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. मंदिराचा वार्षिक उत्सव म्हणजे परशुरामाचा जन्मोत्सव. परशुरामाचा जन्म अक्षय्य तृतीयेचा. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपासून सुरू होणारा हा उत्सव पुढे तीन दिवस चालतो.
सवतसडा धबधबासवतसडा धबधबा
सवतसडा धबधबा : चिपळूणपासून पाच किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूसच हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पाऊलवाट आहे. चिपळूण आणि सवतसडा रस्त्यावर पेढे या गावात बघण्यासारखे एक दत्त मंदिरही आहे.
करंजेश्वरी, गोवळकोटकरंजेश्वरी, गोवळकोट
मोरवणे : चिपळूणच्या पश्चिमेस खेर्डीच्या पुढे डाव्या बाजूस मोरवणे या निसर्गरम्य गावात एक वैशिष्ट्यपूर्ण मारुती मंदिर आहे. या मंदिरात ४०० वर्षांपूर्वीची प्रताप मारुतीची, तळहातावर सहज मावेल एवढी अंदाजे तीन इंच रुंद, चार इंच लांब आणि एक इंच जाडीची, छोटीशी, काळ्या, मृदू पाषाणातील लहान मूर्ती आहे. श्री रामदास सांप्रदायिक असलेल्या एका स्वामींनी ही मूर्ती सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते.
चिपळूणचे म्युझियमचिपळूणचे म्युझियम
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. चिपळूण शहर हे साधारणत: दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजण बौद्ध लेणी शहरालगत गुहागर बायपास मार्गावर आहेत. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या १५५ वर्षांच्या संस्थेने चिपळूण वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली आहे. कोकण परिसरातील इतिहास व वैभवाची ओळख त्यामुळे पर्यटकांना होणार आहे. जुन्या मूर्ती, शास्त्रे, भांडी, दरवाजे अशा दुर्मीळ वस्तूंचा संग्रह चिपळूणच्या वैभवात भर घालत आहे. (या संग्रहालयाबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मालदोली येथील मगरीमालदोली येथील मगरी
चिपळूण व आसपासचा परिसर हे विविध जातींचे पक्षी बघण्याचे ठिकाण आहे. वाशिष्ठी, जगबुडी या नद्यांमध्ये मोठमोठ्या मगरींचे वास्तव्य आहे. येथील नद्यांच्या खाड्या या निसर्गसंपत्तीने व खारफुटीच्या वनांनी समृद्ध आहेत. जवळच खेर्डी येथे आता औद्योगिक वसाहत उभारण्यात आली आहे. चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. येथे शाक्तपंथीयांना भावणारी देवीची यादवकालीन अष्टभुजा मूर्ती असून कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण, सुंदर मूर्ती येथे आहे.
चिपळूणमधील दळवटणे भागात शिवाजी महाराजांची छावणी होती. शिवाजी महाराजांचा येथे राज्याभिषेकापूर्वी दोन महिने मुक्काम होता. दिवंगत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चिपळूणला तीन वेळा भेट दिली होती. राज्याचे पहिले कृषिमंत्री दिवंगत प. कृ. सावंत चिपळूणचेच. प्रसिद्ध अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर या गावचेच. माझे वडील चिपळूण नगरपालिकेत ओव्हरसीअर होते. त्याच वेळी जुन्या चिपळूण नगरपालिकेचे कार्यालय त्यांच्या देखरेखीखाली बांधले गेले. माझ्या दोन्ही थोरल्या बंधूंचा जन्म चिपळूणचा. दोघेही केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सचिव होते.
मालदोलीमालदोली
गोवळकोट : गोवळकोट ऊर्फ गोविंदगड हा गिरिदुर्ग वाशिष्ठी खाडीच्या तीरावर उभा आहे. प्रसिद्ध मुस्लिम विचारवंत दिवंगत हमीद दलवाई व विद्यमान खासदार हुसेन दलवाई हे गोवळकोटजवळील मिरजोळी या गावचे सुपुत्र. हा किल्ला चिपळूणपासून अगदी जवळ म्हणजे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. पायथ्याशी करंजेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यातील हे मंदिर खूपच छान आहे. हा किल्ला एखाद्या बेटासारखा आहे. गोवळकोट किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असून, जवळच गोवळकोट बंदर आहे. पूर्वी किल्ल्यावर २१ तोफा होत्या असे म्हणतात. करंजेश्वरी मंदिराजवळील पायऱ्या चढून गेल्यावर गडावर प्रवेश करण्यापूर्वी समोर दोन बुरुज व त्यामध्ये दरवाजाची जागा दिसते. परंतु आज तिथे किल्ल्याचा दरवाजा, त्याचे खांब व कमान यांच्या फक्त खुणाच शिल्लक आहेत. क्रिकेटपटू गुलाम परकार या गावचेच.
रामचंद्र वासुदेव मराठे न्यास, मालदोलीरामचंद्र वासुदेव मराठे न्यास, मालदोली
मगरींचे गाव - मालदोली : मालदोली हे खाडीवरील बंदर मगरींसाठी प्रसिद्ध आहे. पूर्वी येथे मालाचे वजन केले जाई. त्यामुळे मालदोली हे नाव पडले, असे मानले जाते. खारफुटीच्या जंगलामुळे येथे मगरींचे वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे मगरींचे गाव म्हणून ओळख निर्माण झालेल्या मालदोलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. येथे असलेले श्री भैरवेश्वर व्याघ्राम्बर मंदिरही खूप सुंदर आहे. एका सफारीमध्ये किमान आठ ते २० मगरी पाहता येतात. त्यांची लांबी सुमारे आठ ते १० फूट असते. क्रोकोडाइल सफारीसाठी जून ते फेब्रुवारी हा चांगला हंगाम असतो. या काळात मगरदर्शनासाठी बोटसफरींची व्यवस्था करण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर मगरींचा नैसर्गिक अधिवास असलेले हे एकमेव ठिकाण आहे. केरळसदृश निसर्ग हे येथील वैशिष्ट्यआहे. केरळप्रमाणे बॅकवॉटरची मजा येथे अनुभवता येते. या गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ या हेरिटेज वास्तूला अवश्य भेट द्यावी. (वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाइल सफारी यांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वाशिष्ठी बॅकवॉटरवाशिष्ठी बॅकवॉटर
कसे जाल चिपळूण येथे?
चिपळूण हे कोकण रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्गाने जोडलेले आहे. पुण्याहून ताम्हिणी घाट, वरंधा घाट, आंबेनळी घाट (पोलादपूर), कुंभार्ली घाट व कोल्हापूरहून आंबा घाटातून येता येते. जवळचा विमानतळ सध्या कोल्हापूर - २०० किलोमीटर. चिपळूणमध्ये राहण्यासाठी भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. अतिपावसाचा (जुलै) कालावधी सोडून वर्षभर कधीही जावे.
(या भागासाठी चिपळूणचे पर्यटनविषयक अभ्यासक धीरज वाटेकर यांचे सहकार्य मिळाले.)
- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.