आता
पुढचे टार्गेट होते शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक. हि दोन्ही
ठिकाणे चाफळ गावापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आणि एकाच रस्त्यावर आहेत
असे काकांनी सांगितले. त्यानुसार चाफळच्या नैऋत्येस असणाऱ्या टेकडीकडे
निघालो. शिंगणवाडीच्या या डोंगराजवळ असणाऱ्या एका प्रशस्थ गुहेत (रामघळीत)
समर्थ संध्या करावयास जात असत. म्हणून आपल्या दैवताची म्हणजेच मारुतीची
मूर्ती त्यांनी येथे शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये स्थापन केली. या मारुतीस
खडीचा मारुती किंवा बालमारुती असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब व रुंद
असणा-या गाभा-यात साडेतीन फूट उंचीची छोटी मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख
असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. हे मंदिर अकरा
मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ राममंदिरातून बाहेर पडल्यानंतर
अर्ध्याच किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो. याला
शिंगणवाडी फाटा म्हणतात. या रस्त्यावर शिंगणवाडीकडे डावीकडे वळल्यानंतर
पुन्हा अर्धा किलोमीटर पुढे जायचे की डाव्याबाजूला एक कच्चा गाडी रस्ता
दिसतो. हा रस्ता थेट हनुमंतांच्या मंदिरा समीप घेऊन जातो. मात्र हा शेवटचा १
किलोमीटरचा रस्ता बराचसा खराब, कच्चा व थोड्या खड्या चढणीचा आहे. कारसारखे
वाहन मंदिरापर्यंत नेता येत असले तरी गाडी अत्यंत जपून चालवावी लागते
अन्यथा हे अंतर पायीच चढून गेलेले बरे.
समर्थ स्थापित "खडीचा मारुती"
शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतले आणि डोंगर उताराचा कच्चा रस्ता उतरून चाफळकडे जाणाऱ्या रस्त्याला न वळता डावीकडे वळण घेऊन तसेच पुढे शिवसमर्थ स्मारकाजवळ पोहोचलो. हे स्मारक म्हणजे शिवाजी महाराज व समर्थ रामदास या दोन महान विभूती ज्या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रथम भेटल्या ते ठिकाण. या मठालगतच्या एका शेवरीच्या झाडाखाली समर्थानी शिवरायांना अनुग्रह दिला. येथे समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या सुंदर मुर्त्या असून आजूबाजूचा परिसर सुंदर फुलझाडे लाऊन सुशोभित केलेला आहे. या स्मारकाचे उद्घाटन २६ एप्रिल १९९० साली शरद पवार यांच्या हस्ते झाले.
शिव-समर्थ स्मारक
शिव-समर्थ स्मारकाचा सुंदर परिसर
स्मारक
बघितले आणि तिथंच एका गावातल्या व्यक्तीला रामघळ कुठे आहे असे विचारले.
मामांनी तिथूनच लांब एका डोंगराकडे बोट दाखवले आणि म्हणाले "ती बघा रामघळ,
त्या तिथं". त्या कातळ टोपी घातलेल्या डोंगराकडे बघताच लक्षात आले की हि
रामघळ म्हणजे निश्चितच काहीतरी अफलातून जागा असणार. चाफळपासून एक-दोन डोंगर
ओलांडून साधारण दोन तासाच्या पायपिटीने चालत रामघळीत जाता येते असे
मामांनी सांगितले. म्हणजे हा तर झाला एक छोटा ट्रेकच. पण सध्या मात्र ट्रेक
करणे शक्य नसल्याने आणि कुटुंबकबिला बरोबर असल्याने रामघळीपर्यंत
जाण्यासाठी काही गाडी रस्ता आहे का याची पुन्हा चौकशी केली. थोड्या
चर्चेअंती असे कळाले की रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या पठारावर
पवनचक्क्या बसवलेल्या आहे. या पवनचक्क्यामुळे एक कच्चा गाडी रस्ता थेट
रामघळीच्या वर असणाऱ्या पठारावर गेलेला आहे. डोंगरावर जाऊन गाडी लावली की
फक्त १०० पायऱ्या उतरून रामघळीत पोहोचता येते. मग काय बेस्टच काम झालं.
लगेच रस्त्यात लागणाऱ्या गावांची नावे नीट समजून घेतली आणि तडक रामघळीकडे
गाडी वळवली.
कुबडीतीर्थ रामघळ येथील पठार
चाफळ
राममंदिराजवळून जाणारा मुख्य रस्ता पुढे पाटणला जातो आणि कराड-चिपळूण
रस्त्याला जोडतो. आम्हाला रत्नागिरीला जायचे असल्याने रामघळ करून पुढे हा
रस्ता पाटण गाठण्यासाठी खूप शॉर्टकट होता. त्यामुळे रामघळीला जाण्यासाठी
पुन्हा चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर आलो आणि आता चाफळकडे न वळता डावीकडे
पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त
१.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा
डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण ==> मधलीवाडी
==> वाघजाईवाडी ==> दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा
रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला
डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ,
सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसला आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत
याची खात्री पटली. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल
मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या
बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय
जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत.
थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला आणि दुपारच्या कडक उन्हात
सुद्धा पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. पठारावर सगळीकडे
लांबच लांब पवनचक्क्यांचे राज्य आहे. येथेच डोंगरकड्यालगत लांबून काही
रेलिंग लावलेले दिसले आणि त्याच्या जवळच दिसली रामघळीची स्वागत कमान.
रामघळीचे प्रवेशद्वार
“रामघळ
प्रवेशद्वार” असे लिहलेल्या कमानीतून घळीमधे उतरणाऱ्या जांभ्या दगडाच्या
पायऱ्या सुरु होतात. ह्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत
आहे. परिसरात माकड, वाघ, हरीण अशा प्राण्यांचे अनेक प्रतीकात्मक पुतळे
ठेवलेले आहेत. साधारण १० पायऱ्या उतरल्यानंतर डोंगरकड्याला लाकडी रेलिंग
लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट
बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा
भव्य पुतळा उभा केलेला आहे. हा सर्व परिसर न्याहाळत जसं जसे आपण पायऱ्या
उतरु लागतो तसा अचानकच हवेतला थंडपणा जाणवायला लागतो. बाजूच्या कातळाला
आधारासाठी थोडा जरी स्पर्श केला तरी तो नुकताच फ्रीज मधून काढून तिथे
ठेवल्यासारखा थंड लागतो. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि
त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक
कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.
सुशोभीकरणासाठी लावलेले लाकडी रेलिंग
रामघळीत उतरणाऱ्या ६०/७० पायऱ्या
डोंगरामध्ये
राहणाऱ्या रामदासांना एकांत प्रिय होता. त्यामुळे महाराष्ट्रात
समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक घळी व गुहा आहेत. त्यापैकीच एक
हि चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ. समर्थांचे हे अत्यंत आवडते ठिकाण.
त्यांचे बरेचसे लेखन याच घळीत झाले. चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या
पश्चिमेकडील डोंगरावर ही घळ आहे. ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य
होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास
डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत
निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त
निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग
करण्याची इच्छा देखील होत नाही.
घळीच्या
समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट
दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर
वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे
डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारी १ च्या उन्हात सुद्धा घळ इतकी
थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागलं. घळीमधे प्रवेश करण्याआधी
चपला काढल्या आणि तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे एक सणक डोक्यात गेली.
घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य
घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन
महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा
पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास
यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप
सुंदर दिसतो.
रामघळीचे
हे फोटो पाहून भविष्यात या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र
सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू
नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व
शांत ठेवण्यास मदत करावी.
रामघळीच्या
शांत आणि सुंदर परिसराने आमच्या सगळ्यांच्या मनावर इतकी मोहिनी घातली की
तिथून निघण्याची इच्छाच होईना. पण छोटी अन्विता बरोबर असल्याने आणि दुपारचे
२ वाजत आल्याने पोटात भुकेची जाणीव होऊ लागली. पुन्हा एकदा इथं निवांत वेळ
काढून नक्की यायचं असं मनाशी पक्क ठरवून रामघळीचा निरोप घेतला. पठारावर
गरागरा फिरणाऱ्या पवनचक्क्या पहात डोंगराच्या कडेने कच्चा रस्ता पार करून
पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. आता चाफळकडे न जाता समोर पाटण-तरळे-पाली
असा रस्ता घेतला आणि पुढे पाचच मिनिटात डावीकडे पाटणकडे जाणाऱ्या रस्तावर
लागलो. रामघळ ते पाटण हे अंतर साधारण १२ किलोमीटर आहे. कराड-चिपळूण
रस्त्यावर कोयनानगर येथे एका बऱ्यापैकी चांगल्या दिसणाऱ्या धाब्यावर
दुपारचे जेवण उरकले आणि दुपारी ४ वाजता गाडी चिपळूणच्या दिशेने भन्नाट
वेगात सोडली.
आता
आजच्या दिवसाचे शेवटचे टार्गेट होते ते म्हणजे डेरवणचा शिव-समर्थ गड.
कुंभार्ली घाटाचा वळणावळणाचा घाट रस्ता आणि या घाटावर आपली कडवी नजर ठेऊन
उभा असलेल्या जंगली जयगड या किल्ल्याचे रौद्र रूप पहात कोकणच्या भूमीत
प्रवेश केला. घाटमाथा उतरायचा अवकाश की देशावरच्या कोरड्या हवेत राहणाऱ्या
माणसाला कोकणातला दमटपणा लगेच जाणवायला लागतो. कुंभार्ली घाट उतरलो तेव्हा
घड्याळाचा काटा संध्याकाळचे ४.३० वाजले असे दाखवत होता. इंटरनेटवर कुठे तरी
वाचण्यात आले होते की डेरवणची शिवसृष्टी संध्याकाळी ६ वाजता पर्यटकांसाठी
बंद होते. त्यामुळे काहीही करून ५.३० पर्यंत तरी डेरवणला पोहोचणे गरजेचे
होते. मोबाईल मधील गुगल मैप APPLICATION डेरवणला जाण्यासाठी दोन पर्याय
दाखवत होती. एक म्हणजे चिपळूण शहराच्या थोडे अलीकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय
महामार्गावर डावीकडे वळायचे आणि पुढे सावर्डे गावापर्यंत राष्ट्रीय
महामार्गावर जाऊन सावर्डे फाट्याला पुन्हा डावीकडे वळायचे. इथून डेरवण फक्त
४ किलोमीटर. हा रस्ता नेहमीच्या वापरातला आणि मोठा असला तरी थोडा लांबचा
वाटत होता. तर दुसरा रस्ता म्हणजे कुंभार्ली घाट उतरल्यावर शिरगाव नावाचे
गाव लागते. या गावानंतर डावीकडे वळायचे आणि तिथून फक्त १५ किलोमीटरवर
डेरवण. दोन्ही रस्त्यामधला किलोमीटरचा फरक होता जवळ जवळ २० आणि वेळेची बचत
होती ३० मिनिटे.
डेरवणला
वेळेत पोहोचण्यासाठी निश्चितच दुसरा पर्याय उत्तम वाटत होता पण
पूर्वानुभवानुसार ट्रेक दरम्यान बरेच वेळेस गुगल आणि GPS यावर अति विश्वास
ठेवण्याचे झालेले परिणाम चांगलेच लक्षात होते. त्यामुळे या दुसऱ्या
रस्त्याचा पर्याय निवडण्याआधी स्थानिकांना या रस्त्याची सध्याची परिस्थिती
कशी आहे ते विचारायचे आणि मगच डावीकडे वळायचे असा निश्चय केला. त्यानुसार
दोन-चार स्थानिकांना रस्त्याबद्दल विचारले तेव्हा फक्त एकच जण म्हणाला की
मधे ४ किलोमीटरचा रस्ता खूपच खराब आहे त्यामुळे जाऊ नका. मात्र बाकीच्या
दोन-तीन जणांनी सल्ला दिला कि रोड चांगला आहे आणि डेरवणला जाण्यासाठी
तुम्हाला शॉर्टकट पडेल आणि तुम्ही लवकर पोहोचाल.
आता
स्थानिकांनीच रस्ता चांगला असल्याचा निर्वाळा दिल्याने शिरगाव नंतर गाडी
डावीकडे डेरवणच्या दिशेने वळवली आणि इथंच चूक झाली. सुरवातीचा साधारण ९
किलोमीटरचा रस्ता फारच छान घाटाचा आणि निसर्गरम्य असा होता. संध्याकाळच्या
शांत उन्हात कोकणातल्या आंब्या-फणसाच्या हिरव्यागार बागा पहात आणि छोट्या
वाड्या-वस्त्या मागे टाकत अचानक एका वळणावर गाडीला करकचून ब्रेक मारला.
पाहतो तर काय रस्ता एकदम गायबच. समोर एक ओबडधोबड कच्चा आणि फार तर फार एका
वेळी एक छोटी चारचाकी गाडी कशीबशी जाऊ शकेल एवढाच रस्ता झाडीत शिरलेला दिसत
होता. आपण रस्ता चुकलो की काय अशी शंका मनात आली पण आत्ता पर्यंत पार
केलेल्या अंतरावर कोठेच वळण लागले नसल्याने ती शक्यता पण नव्हती. बऱ कुणाला
काही विचारावं तर रस्त्यावर चीटपाखरू सुद्धा नाही. शेवटी गाडी पुढे
नेण्याआधी थोडं चालत जाऊन रस्त्याचा अंदाज घ्यावा असा विचार करून गाडीतून
खाली उतरलो आणि तेवढ्यात समोर झाडीत एक छोट कोकणी कौलारू घर दिसलं.
घरापर्यंत चालत जाऊन एक हाक दिली आणि आमच्या सुदैवाने आतून प्रतिसाद देखील
मिळाला. मामांना रस्त्याबद्दल विचारल तेव्हा म्हणाले “रस्ता बरोबरच आहे,
हाच पुढ डेरवणला जातो. पण मधे फक्त ४ किलोमीटर थोड जपून जावं लागेल. नंतर
रस्ता पुन्हा डांबरी आहे”. गाडी जाईल का असं दोन-तीनदा पुन्हा पुन्हा
विचारल्यावर मामा म्हणाले “जाईल ओ चारचाकी आरामात, डेरवणमधल्या वालावलकर
ट्रस्टच्या हॉस्पिटलच्या छोट्या गाड्या याच रस्त्याने कायम ये-जा करतात”.
तसाही ट्रेकमुळे यापेक्षाही भंगार आणि टुकार रस्त्यावर गाडी चालवण्याचा
दांडगा अनुभव आमच्या दोघांच्याही (माझ्या आणि गाडीच्या) पाठीशी असल्याने
देवाचं नाव घेतलं आणि गाडी पुढे नेली. पण खर सांगू तो ४ किलोमीटरचा रस्ता
मात्र भयंकरच खराब होता. कसं तरी जीवावर उदार होत हळू हळू गाडी चालवत
पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो आणि शेवटी सुटकेचा निश्वास सोडला. आता एवढ
सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच कि चुकूनही या मार्गाने डेरवणला जाऊ नये.
काही दिवसांनी हा रस्ता चांगला होईलही पण तो पर्यंत कशाला उगाच विषाची
परीक्षा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.