Thursday, April 30, 2020

रामायणाच्या पाऊलखुणा....

चार पाच महिन्यांपूर्वी जेव्हा यावर्षीची वार्षिक कौटुंबिक सहल कुठे न्यायची असा विचार करत होतो, तेव्हा अचानक दहा वर्षांपूर्वी टाटा मध्ये असताना निखिलने सुचवलेल्या वायनाड ची आठवण झाली. लग्नाआधी माझ्या केरळ वाऱ्या दोन तीन झाल्या होत्या पण लग्नानंतर एकही नाही. त्यामुळे केरळ आणि कर्नाटक अशी मोपल्यांच्या बंडाची सुरुवात जिथे झाली ते वायनाड- काबिनी - कुर्ग - मडीकेरी-म्हैसूर- बंगलोर अशी भरगच्च ट्रीप ठरवली.

खरेतर वायनाड हे तसे फार प्रसिद्ध नाही. पण नेमके राहूल गांधींनी अमेठी बरोबर हा मतदारसंघ निवडला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. आमच्या ट्रीपची सुरुवात आम्ही पनवेल- कोझीकोड (कालिकत) अशा रेल्वे प्रवासाने केली. त्यामुळे रात्रभर रेल्वेचा प्रवास आणि नंतर तीन तास रोडचा प्रवास करुन मुले वैतागली होती. त्यामुळे उरलेला पहिला दिवस हा आराम करण्यातच घालवला. त्यावेळी काय काय पहायचे याचा अभ्यास करताना एकदम सीतादेवी - लव कुश मंदिराने लक्ष वेधून घेतले. ड्रायव्हरला विचारले तर त्याला काहीच माहिती नाही. पण त्याला दाखवल्यावर आणि गुगळे मॅप्स वर बघितल्यावर सकाळी लवकर यायला तो यायला तयार झाला. सकाळी म्हणजे पहाटेच कारण हे एकदम वेगळ्या वाटेवर आणि तासाभराच्या अंतरावर असल्याने, उशिरा गेलो तर आमचे दिवसभराचे गणित चुकणार होते. पण लव- कुश मंदिर हे वाचूनच मी बाकी कुठे नाही गेलो तरी चालेल पण इथे जायचेच हे ठरवून टाकले.

लवकर झोपलेलो असल्याने पहाटे पाचलाच जाग आली. त्यामुळे आमच्या दोघांचे आवरुन आणि मुलांना झोपेतच उचलून, आम्ही वायनाड- पालुपल्ली प्रवासाला सुरुवात केली. बोलता बोलता ड्रायव्हरही म्हणाला की मी पाचशे वेळा वायनाडला आलो असेन पण पालुपल्लीला आणि पर्यायाने या मंदिरात पहिल्यांदाच चाललोय.

तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. फोटोत बघितलेल्या मंदिरामुळे माझी उत्सुकता फारच वाढली होती. आणि मंदिराच्या त्या पहिल्या प्रत्यक्ष दर्शनाने तर आपण इकडे यायचा अगदी योग्य निर्णय घेतला याचे समाधान वाटले. सकाळचे रम्य वातावरण आणि ते अप्रतिम असे मंदिर यामुळे आमच्या ट्रीपची सर्वार्थाने मस्त सुरुवात झाली होती.

मंदिरात आवारात प्रवेश केल्यावर समोरच सीतादेवीचे मंदिर आहे. सकाळच्या आरतीची वेळ असल्याने मंदिरातल्या सगळ्या समया पेटवलेल्या होत्या. त्याची अद्भूत अशी आरास डोळ्यांचे पारणे फेडत होती. त्या प्रकाशात सीतामाईही अगदी उजळून निघाली होती. त्याच्या शेजारीच लव- कुशांचे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर आहे. त्यांच्या मूर्ती अगदी वेगळ्या अशा होत्या. त्याबरोबरच गणपती, नागदेवता, शिव, अय्यप्पा आणि सुब्रमण्यम यांचीही छोटी छोटी मंदिरे त्या आवारात आहेत.

तिथून बाहेर पडताना, भिंतीवर लिहिलेल्या स्थानमहात्म्याने एकदम रोमांचित झालो. आणि तिथेच काही लिखित माहिती मिळेल का असे विचारले. तिथे एक छोटेसे दहा पानी मल्याळम भाषेतील माहितीपुस्तिका मिळाली. नशिबाने शेवटी एक पान इंग्रजी मध्ये होते आणि त्यामुळे या पवित्र स्थानाची बऱ्यापैकी माहिती कळली.

ही जागा म्हणजे रामायणातील वाल्मिकी आश्रम. इथेच सीतेने लव-कुशाला जन्म दिला. आणि अश्वमेध यज्ञासाठी प्रभू श्रीरामांनी सोडलेल्या अश्वाला या दोघांनी इथेच अडवले होते. पूर्वीच्या काळी हा सगळा परिसर जवळपास पंधरा हजार एकरांचा होता. पण आता मात्र फारच थोडा परिसर उरला आहे. ही जी मंदिरे होती त्यालाच वाल्मिकी आश्रम किंवा पूर्व स्थानम् असे म्हणतात. भिंतीवर लिहिलेल्या चार ओळींमध्ये शेवटची ओळ होती की इथूनच जवळ असलेल्या मूलस्थानम् ला भेट दिल्याशिवाय तुमची यात्रा आणि दर्शन पूर्ण होणार नाही. आलोच आहोत तर जाऊच या म्हणून मग गाडी तिकडे वळवली.

पाच मिनिटांवर असलेले ते ठिकाण म्हणजे रामायणातील एक अद्भूत ठिकाण आहे. कारण संपूर्ण रामायणातील ही एकमेव जागा आहे जिथे श्रीराम, सीतामाता, लव-कुश, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वाल्मिकी ऋषी, हनुमान आणि इतर देवता यांची भेट झाली. पूर्वी वाल्मिकी आश्रमाचाच भाग असलेल्या या ठिकाणी सीतेने अग्निपरीक्षा दिली आणि ती धरणीमातेला शरण गेली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी रामाने तिचे केस पकडले पण त्याच्या हातात फक्त केस राहून सीता मात्र भूगर्भाच्या उदरात गेली. त्यामुळे तिथे केस नसलेल्या सीतेच्या मूर्तीची पूजा करतात.

हे सगळे माझ्यासाठी अद्भुतच होते. कुणीही कितीही प्रयत्न केला तरी आपली ही पुरातन संस्कृती आणि त्यातील दैवते ही वेगवेगळ्या रुपात आपल्यासमोर येतच रहातात. अगदी अनपेक्षितपणे हा पुरातन सांस्कृतिक ठेवा आमच्या समोर आला आणि आमच्या वार्षिक सहलीची सुरुवात ही रामायणमय झाली. पुढच्या वेळी कुणी आले तर मी याठिकाणी मी नक्की घेऊन येणार असे आमच्या ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून तर या संपूर्ण सहलीचे फळ पहिल्या तीन तासातच मिळाले. तुम्हीही कुणी वायनाडला आलात तर या ठिकाणी अगदी न चुकता भेट द्या.

हृषीकेश कापरे
०३.०६.१९

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...