Thursday, April 23, 2020

मळण , आनंदीबाईंचे माहेर

मळण हे एक तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण, साधारणपणे गुहागरपासून १२ कि.मी. अंतरावर वसलेले, वर्षाचे बाराही महिने हिरवळीने नटलेले गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
परंतु या गावाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या एक लक्षात येईल की या गावाला पेशवेकालीन इतिहास आहे. पेशवेकालीन ‘ध’ चा ‘मा’ करणा-या आनंदीबाईंचे माहेर म्हणून हे गाव परिचित आहे. मळण गावातील सुतारवाडीत आनंदीबाईंचा वाडा आहे. तसा फलक रस्त्याच्या कडेला आहे. सध्या वाड्याच्या जोत्याव्यतिरिक्त तिथे काही नाही. वाड्याजवळच एक विहीर आहे.सध्या ब्राम्हणवाडीत ओक कुटुंबीय रहातात. पैकी  श्री. राजन ओक यांच्याकडे ओक घराण्याचा कुलवृत्तांत आहे. ओक घराणे मुळचे पालशेत या गावचे. घराण्यातील एका कुटुंबाला पालशेतची देशमुखी मिळाली आणि त्यात सरंजामी म्हणुन आठ गावे होती, त्यातील मळण एक. पुढे पालशेतमधून या आठ गावात ओक घराण्यातील कुटुंब विखुरली गेली. आनंदीबाईंचे वडील राघो ओक तर  आई काकुबाई ओक.
 राघोबादादांच्या पत्नी, आनंदीबाई या दुसर्‍या कुळातील. नाशीककर ओक घराण्यातील एक व्यक्ती पेशवे दरबारात होते. त्यांच्या मध्यस्थीने पेशव्यांच्या घराण्याची सोयरिक मळणमधील ओक कुलोत्पन्न आनंदीबाईंशी झाली.
 
आनंदीबाईंनी एक अक्षर बदलले आणि पेशवेकाळाचा इतिहास बदलला. या आनंदीबाईंचा इतिहास सर्वज्ञात आहे. आनंदीबाईंचे माहेर मळणच्या ‘ओक’ घराण्यातले. त्यांच्या वाडयाचा चौथरा अजूनही पाहावयास मिळतो.
 
 दुसरी साक्ष म्हणजे पुढे ५० मीटर अंतरावर एक ऐतिहासिक तलाव वसलेले आहे.मळण गावात दोन तळी आहेत, ज्याच्या जीर्णोध्दार पेशव्यांनी केला असे मानले जाते. तळ्याला लागूनच ओलेती वस्त्रे बदलण्यासाठी दोन खोल्या आहेत.  या तलावात स्नानासाठी आनंदीबाई येत असत.
या तलावाचे मुख्य दोन भाग आहेत. या तलावाला बारमाही पाणी असते. असे म्हटले जाते की, या तलावाच्या खोदाईतील दगडाने जवळच ५० मीटर अंतरावर शंकराचे मंदिर उभारले आहे ते आज हरेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.  या मंदिराचे बांधकाम राघो ओकांनी तलाव खोदण्यातून निघालेल्या दगडांचा वापर करुन केलेले आहे.
या मंदिरामध्ये आनंदीबाई भक्तिभावाने स्नानानंतर दर्शनाला जात असत. यानंतर त्या पालखीतून शृंगारासाठी येत असत त्या भागाला आज शृंगारतळी म्हणून ओळखले जाते असे जुन्या लोकांकडून समजते. हाच भाग आज गुहागर तालुक्यातील एक महत्त्वाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून गणला जातो.
येथील हरेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीला तीन दिवस मोठया प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये मळण गावातील ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या परिसरातील भाविक सहभागी होतात. भजन, कीर्तन, गायन आदी कार्यक्रम या वेळी होतात.
 तलावाच्या भिंत बांधून तलावाचे दोन भाग केलेत, एक भाग जनावरांना पाणी पिण्यासाठी तर दुसरा भाग आंघोळीसाठी वापरला जात असे. तलावातील अशुध्द पाणी वाहून जाण्यासाठी पाट खणून ते पाणी जवळच्या नारळी, पोफळीच्या बागांना पुरवले आहे.या तलावाच्या पश्चिमेला घोड्यांची पाग व जनावरांचे गोठे होते. तलावाचे बांधकाम राघो महादेव ओक ( आनंदीबाईंचे वडील ) यांनी ई.स. १७४२ साली सुरु करुन पुर्ण केले. राघो ओक हे कारकुन व शिलेदार असल्यामुळे नोकरीच्या निमित्ताने बहुतांश काळ घाटावर असत.राघो महादेव यांना नारोपंत नावाचा एक मुलगा होता. भा. इ. स. मंडळाच्या त्रैमासिकात छापल्या गेलेल्या श्री. पां. न. पटवर्धन यांच्या ‘कित्येक नवे शोध’ या लेखात ‘रघुनाथराव ओक यांना औरस मुलगा नव्हता म्हणून त्यानी बाबुराव यांना दत्तक घेतले’ हे विधान सर्वस्वी गैर आहे. सरदेसाई यांनी छापलेल्या वंशावळीत आनंदीबाई यांच्या भावाचे नाव हे गणपतराव असे दिले आहे. परंतु या नावाचा पुढे काही पाठपुरावा नाही असे ‘ओक घराण्याचा इतिहास’ या पुस्तकात दिले आहे. आनंदीबाई यांना एक दत्तक बंधू होता यावर सर्वांचे एक मत आहे. फक्त आनंदीबाई यांच्या सक्ख्या भावाचे नाव काय यावर अनेकांची मते वेगळी आहेत. 
नासिक येथील तीर्थोपाध्याय यांचाकडे असलेल्या माहितीनुसार राघो महादेव यांना नारोपंत आणि गोपाळराव असे दोन औरस मुलगे होते. परंतु हा गोपाळ नाव असलेला बंधू कदाचित लहान वयात वारला असावा कारण पेशवे दप्तरातील कागदपत्रे च्या चौथ्या खंडात आनंदीबाई यांनी भाऊबीजेसाठी आपल्या भावांना आणण्यास कोपरगावाहून माणसे व पोशाख धाडले. तसेच भाऊबीजेला नारोपंत आणि नासिक येथील एक चुलता असे आले असे उल्लेख मिळतो. यात गोपाळराव तसेच दत्तक बंधू बापूराव यांचा कुठेही उल्लेख मिळत नाही. त्यामुळे राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. पुढे त्यांना तीन औरस मुले. आनंदीबाई, गोपाळराव आणि नारोपंत. त्यातील गोपाळराव हे लहानपणी वारले असावेत पुढे नारोपंत सुद्धा फार जगू न शकल्याने घराणे चालू राहावे यासाठी म्हणून बाबुराव या आपल्याच घराण्यातील चुलत्याला राघो महादेव यांनी दत्तक घेतले असे समजते. ही सर्व नाती समजावीत म्हणून खाली वंशावळ देत आहे. 

आनंदीबाई पुढे यांनी आपल्या दत्तक भावासाठी म्हणून काही इनाम मिळवून दिले. ते अगदी इनाम कमिशन पर्यंत चालू होते. पुढे इंग्रजांच्या आमदानीत त्यांना पेन्शन मिळू लागले. बाबुराव ओक यांची मुले पुढे बरीच भांडकुदळ निघाली. यामुळे घराण्याचे फार नुकसान झाले. या या बापूंचा मोठा चिरंजीव माधवराव ओक हे सन १९१४ पर्यंत हयात होते. माधवरावांचा मुलगा विनायकराव यांनी पुढे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये चित्रकला शिकवत असत. ते सन १९११ मध्ये वारले. यांना दोन मुले. पैकी विश्वनाथ विनायकराव हे मुंबईत वकील होते. बापूराव ओक यांची आई म्हणजे काकूबाई ओक अर्थात आनंदीबाई पेशवे यांची आई. त्यांना सालिना ५००० रुपये मिळत असत. अर्थातच बाबुराव ओक हे आनंदीबाई यांच्यावर अवलंबून होते असे नाही.


 आनंदीबाई व रघुनाथराव पेशवे यांचा पुत्र दुसरा बाजीराव याचा वाडा जवळच असलेल्या पालशेत बंदराजवळील असगोली गावाच्या टेकडीवर आहे. अर्थात याही वाड्याचे फक्त जोते शिल्लक आहे. या चौथर्‍यावर जाण्यासाठी पायर्‍या अजून शाबुत आहेत. जवळच "श्रीमंत तळे" नावाचा तलाव आहे. वाड्यात भुयार असून तिथून थेट बंदरावर जाता येते असा समज आहे.

  गुहागर गावात देखील आनंदीबाईंचा चौसोपी वाडा व घोड्यांचा पागा होता, मात्र त्या जागी आता कौटिल्य लॉज आहे. समोरच उत्तर पेशवाईतील कारकून हरिपंत फडके यांच्या वाड्याचे जोते आणि कमानी शिल्लक आहेत. हरिपंत फडके हे सवाई माधवरावांच्या काळात सेनापती झाले. बारभाईचे कारस्थान, तोतयाचे बंड, मोरोबाचे बंड अश्या अनेक घडामोडीत ते सहभागी होते. ते नाना फडणवीसांचे मुख्य सल्लागारही होते. पेशव्यांनी त्यांची एकनिष्ठता आणि कर्तुत्व पाहून त्याना कोकणातील देशमुखी वतन करुन दिली. पुढे सिध्दटेक येथे त्यांचे निधन झाले. 
तसेच पेशवाईतील आणखी एक प्रमुख घराणे म्हणजे पेठे . या घराण्यातील सुप्रसिध्द त्रिंबकराव पेठे देखील गुहागरचेच.
   या गावाची प्रसिद्ध ग्रामदेवता श्री चंडिका देवीचे येथे पुरातन मंदिर असून ते ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. या देवीचा शिमग्यात व दस-यात मोठया प्रमाणात उत्सव साजरा करण्याकडे येथील ग्रामस्थांचा कल असतो.
या देवीचे आसपासच्या गावात खूप मोठया प्रमाणात भक्त आहेत. ते आपली गा-हाणी सोडवण्यास किंवा कौल मागण्यास गर्दी करतात. देवी त्यांची इच्छा पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिरात रूपांतर केले आहे. शिवाय जुन्या मूर्ती विसर्जित करून नवीन मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत.
    या विविध परंपरा जपणारे मळण गाव आज आपल्या दिमाखात मिरवत आहे. या गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यातून वेळ मिळाल्यास इतर मजुरीचे व्यवसाय करतात. अशा या पेशवेकोलीन इतिहास लाभलेल्या गावाला प्रत्येक इतिहासप्रेमीनी एक वेळ तरी भेट द्यायला हवी. आनंदीबाईंचे माहेर पाहायला हवे.

संदर्भ –
 १. ओक घराण्याचा इतिहास – श्री. भ. प्र. ओक.
 २. त्रैमासिक वर्ष ४ अंक १-४ – कित्येक नवे शोध हा पटवर्धन यांचा लेख 
 ३. ऐतिहासिक व्यक्तींची वंशावळ - गो. स. सरदेसाई
  ४. पेशवे दप्तरातून निवडलेले कागद खंड ४ – गो. स. सरदेसाई

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...