जर्मनी..
BMW,फोक्सवॅगन, 'मर्सी' वाली जर्मनी..
FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
ब्लॅक फॉरेस्ट,हॅमबर्ग, कूकू क्लॉक'वाली जर्मनी..
रोमँटीक रोडवरच्या वॉक वाली जर्मनी..
बर्लीन, फ्रँकफर्ट, म्युनीक 'ओक्टोबर्-फेस्ट' म्हणजे जर्मनी..
जगात भारी अशी, 'बियर अॅट इट्स बेस्ट' म्हणजे जर्मनी..
हिटलर, नाझी,अन महायुद्धातली 'आग' म्हणजे जर्मनी..
राख...., पुन्हा पेटलेला 'चिराग' म्हणजे जर्मनी..
Exhibitions , ख्रिसमस मार्केटच्या 'धूम' वाली जर्मनी..
टेक्नॉलॉजीकल, इकॉनॉमीकल 'बूम' म्हणजे जर्मनी..
(बास आता.. न्हाईतर तेल हितच संपायचं.. :D )
तर...
ऑन-साईट जाणं (आम्हा बिगर ऐटीवाल्यांच्या) नशीबात नाही, आणी स्वखर्चाने परदेशी जायची (अजुनतरी) ऐपत नाही..
४-५ वर्ष चांगली 'घासवून' घेतल्यावर आमच्या सायबाला थोSSडी दया आली आणी म्हणाला,
"जा पोरांनो.. करा मज्जा.."
महिनाभर जर्मनीचा पोग्राम ठरला. आणी पहिल्यावहिल्या परदेशगमनाची तयारी चालु झाली. पुन्ह्यांदा 'अपुर्वाई' वाचुन काढलं..
पोटातले कावळे जादा ओरडाय लागले तर त्यांच्यापुरती कामाला येईल एवढी पाककला
शिकुन घेतली. तशी भुक लागल्यास दिसलं ते खायची तयारी होतीच म्हणा.. MTR चे
रेडी-टू-कुक, मॅगीची २५-३० पाकीटे, १ कुकर, प्रती-डोकी ४-५ किलो तांदुळ, ३
जीन्स, ५-६ टी-शर्ट यांनी बॅगा भरल्या..
१००० युरो कॅश आणी १००० चे डेबिट कार्ड थॉमस कुक कडुन घेतले.
९ जुन २०१३. पहाटे ५.५५ ची फ्लाईट. टर्कीश एअरलाईन (सस्तातली)
न्युरेंबर्गला जायचं होतं. तिथं वैशाख वणवा चालु होता. मुंबई-इस्तांबुल-न्युरेंबर्ग असा प्रवास होता.
भारतातल्या ४ टोकाची ४ टाळकी मुंबईत जमली.
दिल्लीवाला म्हणाला, "याSSर.. ऑक्टोबरफेस्ट मै जाना चाहिए था याSSर.."
म्या म्हटलं.. "फुकटात मिळालय.. गोड मानुन घे बाबा.."
युरोप पहायला मिळणार याची उत्सुकता होतीच.. टिवल्या-बावल्या करत, सौंदर्य न्याहाळत ;) प्रवास चालु झाला..
मुंबई ते टर्की ७ तास लागले. जाताना 'गॉड मस्ट बी क्रेझी' पाह्यला. विमान इस्तांबुलला पोहोचलं..
आणी आहाहा.. युरोपचं पहिलं दर्शन घडलं..
१.

२.

टर्कीला trans-continental country (आशीया+युरोप) म्हणतात. समुद्रकाठचं इस्ताम्बुल पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं..
३ तास वेटींग टाईम होता. पेश्शल टर्कीश डिलाइट
Lokum ची टेस्ट घेतली. कुणाकडेच 'चांगला' म्हणावा असा कॅमेरा नव्हता, पण तरी दिस्सल त्याचे फोटो काढायचं काम चालु होतं.
संध्याकाळी ७ ला न्युरेंबर्गला पोहोचलो. घड्याळं (अर्थातच मोबाईलमधली) साडे-तीन तास मागे सरकवली..
आणी विमानतळाबाहेर पाय ठेवताच.. श्वास घेताच.. 'तो' feeeeeel आला..
जर्मन कलीग रिसिव्ह करायला आला होता.. आज 'आवडी'त बसायची हौस पुर्ण झाली. सुरुवात चांगली झाली :) ..
थोड्या वेळामागे पाउस झाला होता. 'क्षणात येते सरसर शिरवे…' टाईप वातावरण होते. तशी हिरवळ तर वर्षभर असतेच म्हणा..
थोड्याच वेळात कुकरच्या शिट्ट्यांनी हॉटेल Maximilian दणाणून गेले.
मसालेभाताच्या आणी पंजाबी तडक्याच्या घमघमाटाने Nuremberg चा Gostenhof
परिसर दरवळून गेला. जेवल्यावर मस्त झोप लागली.
पहाटे ४.३० ला सूर्योदय, अन रात्री ९.३० ला सुर्यास्त व्हायचा. त्यानंतरही प्रकाश असायचाच. म्हणजे १७-१८ तासांचा दिवस. सहीच ना?.
सोमवारपासुन ऑफिसची गडबड सुरु झाली. आठवड्याचा Travel पास २१ युरो मध्ये
होता. महत्वाचं म्हणजे हाच पास कोणत्याही लोकल-बस, ट्राम, मेट्रोला चालतो.
लगेच दुसर्याच दिवशी जाम उकडायला लागले होते. आणी प्रॉब्लेम असा होता, की
हॉटेलात किंवा ऑफिसमध्ये 'हिटर' तर होते, पण AC किंवा Fan यातले कुठेच,
काहीच नव्हतं. जर्मन लोक्स 'समर' एन्जोय करत होते. पण आम्हाला ३०-३२
डिग्रीत कासावीस व्हायला लागलं होतं. Room service ला फोन करून AC ची
व्यवस्था करायला सांगितलं, पण त्यांनी चक्क नकार दिला. आम्ही चौघेही अगदी
तिसर्या महायुद्धाच्या तयारीत रिसेप्शनवर जाऊन धडकलो. पण तिथल्या सुबक
ठेंगण्या बघताच आम्ही शरणागती पत्करली. दोघीतली १ सु.ठें. बाजूलाच कळफलक
बडवत होती. दुसरीने आमची समस्या ऐकून घेतली आणी "२ मिनिट" म्हणुन ती फोनवर
व्यस्त झाली.
आता आमचा बेंगॉली बाबू वैतगलाच. तीला उद्देशुन हिंदीतच म्हणाला, "साला एक
तो तेरी ये जर्मनी इतनी गरम.. और उपरसे तू इतनी गरम.. चोलबे ना.."
आम्ही लगेच "ख्या..ख्या..ख्या.."
तेवढ्यात कळफलकवाली समोर येत म्हणाली "We have arranged table fan in your room"
अक्सेंट ओळखीचा वाटला, चौघांच्याही माना सिंक्रोनाईझ होउन तीच्याकडे वळल्या. अरे ही तर आपल्यातलीच..
नेमप्लेट-"दिव्याराणी".. गरमी अजुनच वाढली.
ऊ तेरी.. ये तो सब समझती है यार..
आम्ही फक्त Danke म्हणालो आणी कलटी मारली. (थॅन्क्यु)
च्यायला हे इंडियन्स ना.. कुठेही भेटतात. ;)
१ चित्र हजार शब्द बोलून जातं म्हणे.. तर तिथला Summer काहीसा असा होता..

पहिला विकेंड - म्युनिक.
'न्युरेम्बर्ग' दक्षिण जर्मनीत आहे. या भागाला 'बवेरीया' म्हणतात. बवेरीयान
स्टेटची राजधानी 'म्युनिक'चा दौरा ठरला. म्युनिकला जर्मन्स 'München-
म्युन्शेन' म्हणतात. ऑक्टोबर्-फेस्ट इथे म्युनिकमधेच असतो.
४२ युरोत ५ जणांचा विकेंड पास मिळतो. रात्री १२ पासुन २१ तास पुढे जर्मनीत
कुठेही ट्रेनने फिरता येते. युरोपात एकंदरीतच कनेक्टीव्हिटी उत्तम.ट्रेनचा
प्रवास अत्युत्तम..
1.जाताना मस्त हिरवेगार नजारे, चर्च, आणी अशी घरे दिसत होती. या घरांवर खापर्यांऐवजी सोलार पॅनल आहे. व्हॉट अॅन ऐडीया सरजी..

2. म्युनिकमधे फिरायला आम्ही हा ऑप्शन सेलेक्ट केला.२० युरोत एका
दिवसाचा पास होता. याला Hop-on-hop-off बस म्हणतात. अशा दिसणार्या
कुठल्याही बसमधे कुठेही hop-on- कुठेही hop-off व्हा.

बाल्कनीत बसुन म्युनीक बघायची मजाच काही और..

हे पहा..

3. दुसरा ऑप्शन हा होता.. यांना सेगवे टुर्स म्हणतात. गावभर या
मुंग्यांची रांग असते. मोटर बसविलेल्या, बॅटरीवर चालणार्या या गाड्या.
आजकाल दिल्लीत पण हे चालु आहे असं ऐकलंय..

4. पण एक समजत नव्हतं.. स्साला, एवढी गर्दी का आहे? माणसंच्-माणसं
चोहीकडे होती. असं वाटत होतं की, ज्योतीबाची जत्राच भरलीय.. सगळीकडे गाणी,
बॅन्ड, नाच, धिंगाणा अन बियरचा तर महापूर..

शेवटी एकाला पकडुन विचारलंच, "काय रे बाबा.. का एवढी गर्दी ?"
तेंव्हा समजलं.. म्युनीक वॉज सेलेब्रेटींग इट्स 855th बर्थडे.
१५-१६ जुन.
काय भाग्य.. काय भाग्य.. गेल्या जन्मीचं पुण्य मोठं, म्हणुन म्युनिकचा 'बर्डे' साजरा करायला मिळाला..
५. एका परफॉर्मन्समधे 'बॉन्ड थिम' ऐकण्यात गुंतलेली चिमुरडी-

6. चौकात बियरची व्यवस्था अशा झोपड्यांत करण्यात आली होती.. खायची प्यायची चंगळ होती.

7. Angle of peace- इ.स. १८७० च्या फ्रॅन्को-जर्मन युद्धानंतर हे उभारण्यात आलं होतं.

8. एक चर्च-



9. जवळच्याच एका होटेलबाहेर हे कुत्रं बांधलं होतं.

German Shepherd तर फेमस आहेतच. जर्मनीत एखाद्या शिंगराएवढी (शिंगरु) कुत्री पहायला मिळाली.
तिथला प्रत्येक भिकारी १-२ कुत्री पाळतो. बेघर, की ज्याच्याकडे ते कुत्रं
पाळण्याचा परवाना आहे त्यांना सरकार भत्ता देते असे समजले. ते काहिही
असेल,पण त्या बिचार्या माणसाकडे आपलं असं, जीव लावणारं कुणीतरी आहे ना..
बास झालं..
10. मेरीयनप्लाट्झ. Marienplatz- इथे सर्वात जुना चौक आहे. सेंट मेरी'ज/ ओल्ड लेडी'ज चौक. सायकल रिक्षा सुद्धा मिळतात इथे..

11. बवेरीयन नॅशनल मुझीयम-

12. लुडविग-I

13. जर्मन पारंपारीक वेशभूषेतले आजी-आजोबा

14. आणी या पारंपारीक पोरीला 'फोटु काढु का?' म्हणताच लगेच मॅडमने ही पोज दिली..

15. कदाचीत फेस्टिवलमुळे जागोजागी असले जिवंत पुतळे दिसत होते.. आणी मागे 'जत्रा'..

16. आणी रस्त्यांवर सुद्धा कला बहरली होती. यातला पहिलं चित्र ज्या
कॅसलचं आहे, तो Neuschwanstein castle आमचं पुढचं टारगेट ठरलं. जगातला
सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल आहे हा..

17. Nymphenburg Palace- बवेरीयन राजांचं गतवैभव. मोठं पॅलेस आहे.. १६६४ ला बांधण्यात आलं होतं.
वेळ अपुरा पडल्याने जास्त पाहता नाही आलं.

18. त्यावेळेस एक राजेशाही लग्न चालु होतं. त्यांची गाडी-

19. ऑलिंपिक स्टेडियम- इथे १९७२ चे आयोजन झाले होते. इथेच एक अॅक्वेरीयम पण आहे. BMW village च्या अगदी जवळ आहे हे.

20. BMW Headquarters- अप्रतीम.
'बालाजी मोटर वर्क्स' नाही हां.. बवेरीयन मोटर वर्क्स. जगातल्या काही ३-४ लिडिंग कार्सपैकी एक..

21. या इमारती समोरच त्यांच्या 'कार' आणी 'बाईक्स' शो साठी ठेवल्या आहेत. मी BMW च्या 'बायका' पहिल्यांदाच पाह्यल्या.
शोरुम मधील Phantom car-

22. BMW, फोक्स्वॅगन, 'मर्सी'वाली जर्मनी.. फरारी, पोर्श, लॅबोर्गिनी.. सगळ्या डोळं भर्रुन बघितल्या..
..

यातली एखादी घ्यायचा विचार केला होता.. पण यांचा ग्राउंड क्लियरंस एवढा कमी होता की पुण्यात चालणार नाहीत म्हणुन..
नाहीतर असल्या बाबतीत मी खर्च करायला मागे-पुढे बघतच नाही.. होऊ दे खर्च. ;)
23. FC Bayern Munich च्या 'जर्सी' वाली जर्मनी..
Allianz Arena football stadium. (हे एकच चित्र जालावरुन साभार)

24.घरी/शेजारी फोटु दावताना म्हटलं, बघा किती स्वच्छ आहे पाणी.. तुमच्यासारखं निर्माल्य टाकत नाहीत ते लोक..
तर बायकांचं उत्तर- "असायचंच.... देवाला फुलं वाहुन माहित आहे काय त्यांना??"
बायका रॉक.. SYG shox..

25. लास्ट बट नॉट द लिस्ट..
आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण?? :D

या मुलींनी नुसता उच्छाद मांडला होता.. एका म्हातार्याला 'बकरा' करुन छुपं व्हिडिओ शूटींग चाललं होतं.
वेळ पाळण्याच्या बाबतीत सगळेच काटेकोर होते. एखाद्या वेळेस जर काही
चुकलेच तर, 'आपणच चुकीचे असू' असे ठरवावे, इतकी परफेक्ट सिस्टीम. पण...
म्युनीक ते न्युरेम्बर्गची ट्रेन काही कारणाने आलीच नाही. मग स्टेशन
मास्तराने सांगीतले की, ज्यांचे आरक्षण आहे त्यांनी एकतर तासभर वाट पाहावी
किंवा दुसर्या एका ट्रेनमधुन म्युनीकला जावे. दुसरी ट्रेन १० मिनीटातच
होती. त्यामुळे
२ ट्रेनचं पब्लीक एका ट्रेनमधे जायला फलाटावर गोळा झालं. इतकी गर्दी झाली
की छ.शि.ट.वर असल्यासारखे वाटत होते. आमचे आरक्षण नसल्याने जागा 'पकडायची'
होती. त्या दिवशी आमच्या सुप्त गुणांना जर्मनीत वाव मिळाला. दिवाळीत घरी
जाताना KSRTC च्या बसमधे 'डायवर-शिट'कडुन जाणे किंवा अगदी खिडकीतुन प्रवेश
मिळवण्याची कला अवगत असल्याने, जास्त त्रास झाला नाही.
जर्मन्स बाहेर फारसे कुणाशी बोलत नाहीत. ट्रेनमधे बाजुच्या सिटवर अगदी
'रासलीला' चालु दे किंवा एखादा 'कॅरेक्टर ढीला' बसुदे, काही सोयर सुतक
नसते. आमच्या डब्ब्यात काही अपवाद वगळता सर्व शांतता होती. अपवाद एवढेच
होते की, एका कोपर्यात एक तमीळ कुटुंब छिन्न्गुडगुडे नाडगुडगुडे ;) करत
होतं, दुसरीकडे आमचा बेंगाली बाबु (गावाला ऐकु जाईल इतक्या आवाजात)
हेडफोनवर 'चिकनी चमेली' ऐकत होता. मी भारतीय रेल-प्रवासाशी तुलना करत होतो
इतक्यात , "बाबा, माझे पाय दुखताहेत" म्हणत एक मुलगी रडू लागली. गर्दीत
काहीच दिसत नसताना मी ओरडलो, "ओ भाऊ,तीला इकडे पाठवून द्या". तीला माझ्याच
सीटवर अॅडजस्ट करुन घेत त्या पुणेकर बाबाशी माझ्या गप्पा चालु झाल्या.
साल्झबर्ग- ऑस्ट्रीया
पॅरीस्,प्राग,व्हेनीस,का बर्लीन यावर भांडुन झाल्यावर अगदी जवळच्याच साल्झबर्गला जायचं ठरलं.
१. ट्रेनचा प्रवास:- आरामदायक पुश्-बॅक सीट, कमालीची स्वच्छता, मोठ्या
काचांतुन दिसणारा हिरवागार निसर्ग, गाई, घोडे, पर्वत्, नद्या, आणी
स्वप्नातली घरे.. और क्या चाहीए??

ऑस्ट्रियात असणारे साल्झबर्ग हे शहर जर्मनीच्या दक्षीण सीमेजवळ आहे.
Salzach नदीच्या किनारी, आल्प्सच्या सानिद्ध्यात वसलेले हे गाव एक 'कल्चरल
वर्ल्ड हेरीटेज साईट' आहे. Baroque architecture / स्थापत्यकलेसोबतच इथली
महाविद्यालये प्रसिद्द आहेत.रोमन्/गॉथीक शैलीचे चर्च पाहावयास मिळतात.
जगप्रसिद्द संगीतकार 'मोझार्ट' यांचे जन्मस्थान असलेल्या साल्झबर्गच्या
नसानसात संगीत आहे. मीठ वाहुन नेणार्या जहाजांमुळे या शहराला Salzburg हे
नाव पडले म्हणतात.
समर ओपेरा इवेंट, शंभर वर्षांपासुन जुलै-ऑगस्ट्मधे भरणारा Salzburg
Festival सुद्धा प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रो-बवेरीयन हा जर्मन भाषेचाच एक
डायलेक्ट इथे बोलला जातो.
२. म्युनीकप्रमाणे आम्ही इथेही हॉप्-ऑन्-हॉप्-ऑफ बस निवडली. असे सगळीकडे
'पेव्हड ब्लॉक' आहेत. च्यामारी फक्त तिथलेच उखडत कसे नाहीत कोणास ठाऊक??
आणी नाहीतर आपल्या इथे.. जाऊदे.

या बसवर जे चित्र दिसतेय, ते १९६५ सालच्या Sound of Music नामक
सुप्रसिद्ध, ढीगभर पुरस्कार विजेत्या चित्रपटातील आहे. माझ्यासारखा बर्याच
जणांनी अजुन हा पाह्यला नसेलच अशी खात्री आहे. :) यातील Julie Andrews
नामक हिरवीणीचा जन्मही Salzburg येथेच झालाय. बसमधे गाईडच्या ऐवजी हेडफोन
साथ देतात. शहराची माहिती घेत आणी या चित्रपटातील गाणी ऐकत जुन्या शहरातुन
आपण फिरु शकतो. या शहरातील बर्याच जागांचे चित्रीकरण Sound of Music मध्ये
झालंय.
३. जाता-जाता काढलेला तिथल्या जंगली महाराजांचा फटु-

४. युरोपातली आवडलेली अजुन एक गोष्ट म्हणजे इथल्या खिडक्या. सगळ्या खिडक्या फुलांनी सजवलेल्या पहावयास मिळतात.

५. आमचा पहिला थांबा होता 'मीराबेल गार्डन्स'. (Mirabell Palace and Gardens). या फोटोत मागे दिसणारे ते पॅलेस UNESCO हेरीटेज आहे.

६. १६ व्या शतकात बांधलेलं हे मीराबेल पॅलेस १८ व्या शतकात आगीत जळालं
होतं. सध्या इथली बाग भुमिती वापरुन बनवलेल्या फुलांच्या नक्षी, पुतळे,
कारंजे यांनी पर्यटकांना आकर्षीत करते. या बागेत डो-रे-मी हे गाणं शूट
झालंय असे समजले. या चित्रात जो डोंगरावर दिसतोय तो आहे Hohensalzburg
फोर्ट.

७. गेल्याच पावसाळ्यात येथे महापूर आला होता.. Salzach नदीत बोटीतुन
फिरायची व्यवस्था आहे. या राईड मध्ये आल्प्सचेही दर्शन घडते. ट्रीप थोडी
महाग असली तरी पैसे वसूल होतात.. असा बर्फ जिंदगानीत पयल्यांदाच बघितल्याने
त्या जर्मन मुलीला (आणी ब्रिटीश कप्तानाला) 'जांदो..और आग्गे जांदो..' असे
ओरडुन सांगावेसे वाटत होते..

जाताना सुंदर पुल दिसत होते.

कप्तानाचे विनोद चालले होते. बरेच अंतर गेल्यावर त्याने एकाजागी बोट
थांबवली. कसलीतरी चक्रं बराच वेळ गोल्-गोल फिरवली.. इंजीनाचा जोरात आवाज
येऊ लागला.. आणी बोटीने 'गर्रर्र'कन 'स्पॉट टर्न' मारला. मस्त 'हवाका झोका'
आला, आणी त्या ३६० डिग्री टर्नने मजा़ आली.. अविस्मरणीय अनुभव.

८. नदीतुन जाताना किनार्यावरची हिरवळ पाहातच होतो.. ड जीवनसत्वाचा आभाव जरा जास्तच आहे तिकडे.. ;)
ते फोटो नाहीत, पण त्याऐवजी दिसलेली ही युन्वर्सीटी बघा.. साल्झबर्ग येथे पुण्याप्रमाणेच विद्यार्थी बरेच आहेत..
९. आम्हाला फक्त मद्रासचा मोझार्ट माहिती.. 'ए.आर' आणी 'आर.डी' इथेच
आमचे संगीत घुटमळायचे.. लहानपणीच मोझार्टने किबोर्ड आणी व्हायोलीनवर
प्राविण्य मिळविले होते. आम्हाला 'मोझार्ट मोन्युमेंट' पाहायला मिळाले.
कुणीतरी मोझार्ट बद्द्ल म्हटले होते, "Posterity will not see such a
talent again in 100 years". या गावात बरेच रस्ते, चौक, इमारती, पुल यांना
मोझार्टचे नाव दिलंय. बहुतेक मार्केटींगचा भाग असावा. त्याच्या नावाने
गोड्-धोड पदार्थसुद्धा आहेत जसे की, Mozartkugeln. हा एक चॉकलेट्चा बॉल
असतो.
Wolfgang Amadeus Mozart. १७५६-१७९१.
असं म्हणतात की मोझार्टला साल्झबर्ग आवडत नव्हते. तो इथे फक्त एक बिशपचा
सेवेकरी होत. पण त्याच्यामुळे इतकी प्रसिद्धी मिळाली या शहरास.

१०. एका चौकात बुद्दीबळाचा डाव मांडलाय. मुफ्त..मुफ्त्..मुफ्त.. पण वाट पहावी लागते.
वातावरण एकदम मस्त होते. यालाच Mozartkugel monument म्हणतात. (चॉकलेटचा प्रकार)

११. वरच्या फोटोतल्या फोर्टला जायला ट्रेन सुद्धा आहे. या ट्रेनची
सुरुवात १८९२ ला झालीय. पण आम्ही गिर्यारोहणाचा मार्ग स्विकारला..
गल्ली-बोळातुन साल्झबर्ग एक्स्प्लोर करायला मजा आली. पण उन्हाचं दमुन गेलो.

हाच तो Hohensalzburg फोर्ट. १०७७ साली बांधण्यात आलेल्या या फोर्टवर
झालेल्या गेल्या ९०० वर्षांच्या इतिहासात, आक्रमणात कोणालाही विजय मिळाला
नाही. बर्याचदा याचे बांधकाम झाले, बदलले. आता इथे एक म्युझीयम आहे.


किल्ल्यावरुन दिसणारं साल्झबर्ग कॅथेड्रल.. एवढी मेहनत घेतली तरी, इथलं दृष्य थकवा घालवतं.

१२. लिओपोल्ड्स्क्रोन. १७३६ ला बांधण्यात आलेला महाल. 'लिओपोल्ड'ने
बांधला. पण पुढे बवेरीयाचा राजा 'लुयीस-I' याचे निवासस्थान होते. सध्या ही
खाजगी मालमत्ता असल्याने फक्त बाहेरुन पाहता येते. पण येथील बागेत प्रवेश
आहे.


१३. परतताना या दोघींचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.. मागची एकदम कार्टुन कॅरेक्टर होती.

१४. लिव्ह लाईफ किंग साईझ..
अशा बाईक्स भाड्याने मिळतात. लक्षात असु द्या.. बायकोला खुश्श कराल.. काय तो थाट.. व्वा!!!

मॉरल ऑफ द स्टोरी- 'प्रागला गेलो असतो तर बरे झाले असते का?' असे काहीदा वाटत होते.. पण एकदा भेट द्यायला काही हरकत नाही.. वेन्जॉय.
बेंगाली बाबू फक्त दोन आठवड्यासाठी आला होता. त्यामुळे आमच्या
टोळीतला सर्वाधीक रसीक (रंगेल?) भिडू परतीच्या वाटेवर होता. हो..रसीकच!
कारण वय वर्ष ४०+ आणी आम्हा जवानाना लाजवतील असे चाळे असायचे.(काही किस्से
आधी लिहिले आहेतच). त्याला चक्क मराठी लावण्यापण आवडायच्या. 'लागली कुणाची
उचकी' ही त्याची फेवरेट होती. मग एकदा त्याला 'पिकल्या पानाचा देठ की हो
हिरवा' ऐकायला दिली. गर्भीत अर्थ सुद्धा सांगितला आणी म्हटलं, " घे.. खास
तुझ्यासाठीच आहे" ;)
पण बाबा बेंगालींची एक शिकवण आवडली. आपण ताजमहालाचा फोटो का काढतो? तर म्हणे सौंदर्य!!
त्याचं तत्वज्ञान आपल्या संदीप खरेसारखं होतं.
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर.. मज अब्रूचे थिटे बहाणे- नामंजूर.. :)
पहिल्या विकांताला म्युनिक आणी साल्झबर्ग ह्या अनुक्रमे जर्मनी व
ऑस्ट्रियातील सुंदर शहरांना भेटी दिल्या. त्या शहरांचा हवाहवासा वाटणारा
गोंगाट, कार्स, बाइक्स, इमारती,मोठे रस्ते, अन ती जीवनपद्धती थोडीफार
अनुभवल्यावर म्हटलं की आता 'चेन्ज मंगता है'. जरा शांत, निवांत, नयनरम्य,
निसर्गरम्य अशा नॉयश्वानस्टाईन कॅसल (Neuschwanstein Castle) ला जायला
सगळेच बाय डिफॉल्ट सहमत होते.
नॉयश्वानस्टाईन कॅसल- Neuschwanstein Castle
पुन्हा एकदा विकेंड पास काढला. पहाटे ४.१५ ची ट्रेन होती.
हॉटेलमधुन चालतच Hauftbahnhauf (स्टेशन) ला जायचे ठरवले. रात्री-अपरात्री
नविन शहरात फिरायची भिती वाटत नव्हती. रस्त्यात कुत्री नव्हती. बर्याच
हॉटेलांबाहेर मुलं-मुली अगदी टाईट होउन वाईट अवस्थेत पडली होती. त्यांच्या
बाजुला सिगरेट्ची थोटकं आणी बर्गर पडले होते. असो.
न्युरेम्बर्ग ते फ्युसन जवळपास ३२० किमी चा प्रवास होता. फ्युसन
(Fussen) पासुन Hohenschwangau १० किमी. म्हणजे एका दिवसात जवळपास ७०० किमी
प्रवास आणी थोडेफार चालणे होणार होते. पण हे सगळं हेक्टीक होणार नाही याची
खात्री होती. थॅन्क्स टू DB-Bahn. (जर्मन रेल्वेला डॉएच्च बान म्हणतात)
वाटेत म्युनीकला ट्रेन बदलायची होती. न्याहारीचा उत्तम पर्याय होता- McD. स्वस्तात मस्त.. २ युरोत १ बर्गर आणी १ कॉफी मिळायची.
फ्युसन ते Hohenschwangau या खेड्याला जायला बस मिळतात. कॅसल याच
खेड्यात आहे. आम्ही पोहोचलो तेंव्हा रिमझीम पाउस पडत होता. छत्र्या घेऊन
फिरणार्या लोकांचा थोडा रागच येत होता.
१. इंट्रो म्हणुन एक फोटो बघुन घ्या.

प्रत्येक ठिकाणी प्रवासी मदत केंद्र असतात. (त्यांना इंग्रजी येतं).काही चुकायचा प्रश्नच नाही. मोफत माहिती व नकाशे घेतले.
Hohenschwangau गावातल्या दोन टेकड्यांवर नॉयश्वानस्टाईन आणी
Hohenschwangau असे दोन कॅसल आहेत. दुसर्या लुडवीग राजाने १८८६ साली
नॉयश्वानस्टाईन कॅसल बांधला. या स्थळाला Fairytale Destinations म्हणतात.
जगातला सर्वात सुंदर समजला जाणारा हा कॅसल उंचीवर असल्याने दुरुनच नजरेत भरतो. आजुबाजुची झाडी आणी त्यात हा चमत्कार.
२. नॉयश्वानस्टाईनच्या टेकडीवरुन दिसणारे Hohenschwangau खेडं. या फोटोत
जो दिसतोय तो आहे Hohenschwangau कॅसल आहे. आणी एका सुंदर तलावाचं (Swan
lake) दर्शन पण घडतंय.
(माफ करा. थोडे उलट-सुलट क्रमाने फोटो दाखवतोय. पण तशी गरज वाटली)

३. Hohenschwangau कॅसल म्हणजेच High Swan County Palace. असं नाव
पडण्याचं कारण म्हणजे या दोन्ही कॅसल्स मधे असणारे हंस. म्हणजे सजीव हंस
नव्हे, पण चित्रात, छोट्या प्रतिकृती, अगदी दरवाजच्या हॅन्डलवर सुद्धा हंस
आहेत. बवेरीयाचा राजा दुसरा मॅक्सीमिलीयन याने हा कॅसल बांधला. खरंतर एका
जुन्या कॅसलला परत बांधले. या राजाचा मुलगा म्हणजेच दुसरा लुडवीग. हे
कुटुंब Hohenschwangau कॅसलमधेच रहायचं. १८६४ मध्ये मॅक्सीमिलीयनचा मृत्यु
झाल्यावर दुसरा लुडवीग राजा झाला.


४. हा कॅसल पहायला टेकडीवर गेलो. याच्या आपल्या बाजुला बरीच चित्रे
आहेत. विशेषतः युद्धाची. लुडवीगला एक शुर्-वीर योद्धा करायचे
मॅक्सीमिलीयनचे स्वप्न होते. पण झाले काही वेगळेच. लुडवीगला यापेक्षा जास्त
संगीत,कला, वाचन आणी काव्य याची आवड होती. त्याचमुळे त्याला फेअरी टेल
किंग म्हणतात.
'रोमॅन्टीक रोडवरच्या वॉकवाली जर्मनी' ती हीच.
Hohenschwangau कॅसलच्या आतले फोटो.


५. कुठल्यातरी आडवाटेने उतरत असताना Swan lake चा एक अतीसुंदर देखावा पहावयास मिळाला.
इथले पाणी अगदी स्थीर वाटत होते. कसलाही आवाज नाही. सगळं कसं शांत.. शांत..
इतकं सुंदर हिरवंगार दृष्य होतं.. नजरेत आणी कॅमेर्यात फक्त भरुन घेतलं..



रच्याकने, हे अगदी पर्फेक्ट हनिमून डेस्टीनेशन वाटतय की नाही?
(लग्नानंतर) इकडेच जायचा विचार आहे.. इच्छुक कॅन्डीडेट्सनी व्यनीतुन संपर्क
करावा. (नियम व अटी लागू) ;)
६. ही वाट दूर जाते.. स्वप्नामधील गावा..



इथल्या तलावाच्या काठाला बसुन थोडं खाउन घेतलं. निवांत चार गाणी ऐकली.. मग पुढचा कॅसल बघायला तय्यार..
७. इथल्या जंगलातुन फिरताना, इथला धबधबा पाहताना, त्याच्या पुलावरुन
जाताना छोट्या लुडवीगला नेहमी वाटायचं की इथे एक घर बांधायचंय, की
ज्यासारखं जगात दुसरं घर कुठेच नसेल. आणी त्याने ते याच आल्प्सच्या भागात
बांधलं. त्याला नाव दिलं New Hohenschwangau castle. (इंग्रजी- New
Swanstone Castle). लुडवीगच्या मृत्युनंतर याला नॉयश्वानस्टाईन म्हणु
लागले. याचं बांधकाम युद्धाच्या दृष्टीने केलं गेलं नाही. मित्र आणी
संगीतकार रिचर्ड वॅग्नर याला एकांतात राहण्यासाठी हे बांधण्यात आलं. १९६९
ला बांधकाम सुरु झालं, पण पुर्ण व्हायच्या आत लुडवीगचा संशयास्पदरित्या
मृत्यु झाला. (दुसर्या मजल्यावरचं काम अर्धवट राहिलय. त्यामुळे सध्या इथे
एक हॉटेल चालवतात)
प्रवेशव्दार- फोटो पाहिल्यावर लक्षात येइल की, सुरक्षेपेक्षा सौंदर्यावर जास्त भर दिला गेलाय.

कॅसलच्या आतले फोटो काढण्यास मनाई असल्याने...

८. लुडवीगने स्वखर्चाने बांधलेल्या या कॅसलवर खूप पैसा खर्च केला होता.
या कॅसलने इतकं वेड लावलंय की, जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा कॅसल
म्हणुन हा प्रसिद्ध आहे. Sleeping Beauty Castle of Disneyland चं मॉडेल
यावरुनच तयार झालंय. वर्षाला १३ लाख तर उन्हाळ्यात रोज ६००० लोक भेट देतात.
इतक्या गर्दीला मॅनेज करण्यासाठी फक्त ४० मिनीटाची 'गाइडेड टूर' हा एकच
पर्याय आहे. जर्मन, इंग्रजी, फ्रेंच भाषांचा पर्याय आहे. त्यामुळे
१४ युरोचं तिकीट काढावं लागतं.
तिन मजली इमारत पाहिली. १८८० च्या काळात सुद्धा त्यावेळेच्या सगळ्या सुखसोई
इथे होत्या.टॉयलेटमधे फ्लश सिस्टीम, गरम आणी थंड पाण्याची व्यवस्था,
बॅटरीवर चालणारी बेल, एवढेच नव्हे तर टेलीफोन लाईन सुद्धा. हे सगळं आत
पहावयास मिळतं. लुडविगची रसिकता सुद्धा जागोजागी दिसते.
(धुकं जास्त होतं त्यामुळे हा थोडा एडीट केलाय.)

आतले फोटो नाहीत त्यामुळे तो राजेशाही थाट इथे दिसणार नाही. पण विकीवरचा एक फोटो देतोय.. यात Swan दिसतोय. इतर माहिती व फोटो इथे पाहता येतील.

---------------
|| SYG ||
जर्मनीत पोहोचल्यावर लगेच २ दिवसातच चपात्या करण्याचा कंटाळा आला होता. नंतर पंधरा दिवसानी तर साधा कुकर लावायचा म्हटलं तरी आमच्यात बाचाबाची
व्हायची. बाहेरचं खाण परवडणेबल नव्हतं. आम्ही ज्या हॉटेलात होतो तिथं साधा
नाश्ता करायचा म्हटलं तर चौदा युरो खर्चायला लागायचे. १४*८५ रु.????
माझं टिप्पीकल-मध्यमवर्गीय-कर्नाटकी-कुटुंबातलं-मराठी-मन हिशोब करु
लागायचं. सकाळी नाश्त्याला मॅगी खायची वेळ आली. ऑफिसात जेवणाचे ८-१० काउंटर
असायचे. पण एका ठिकाणी धड चव मिळेल तर शप्पथ. बिच्चार्या शाकाहारी
दिल्लीकराला तर फक्त गवत, फळं, ज्युस आणी बटाटे यावर भागवावे लागे.
मी आणी एक मल्लू, जे मिळेल ते पोटात ढकलायचो. 'माणसं खातात ना, मग चालतं
आपल्याला' म्हणत मत्स्य, वृषभ,वराहादी अवतार फस्त करायचो. पण उकडलेली
कोंबडी नुसत्या मीठा आणी मिरीसोबर कशी आणी किती खाणार?
ऑफिसात ज्या दिवशी समोसे किंवा चिकन बिर्यानी होती त्या दिवशी Indian
काउंटरवर झुंबड उडाली होती. 'आम्हाला पण थोडं शिल्लक ठेवा रेSS' म्हणावं
लागलं. शेवटी संगम,ताज,राजा हिदुस्थानी यासारख्या खानावळी शोधुन काढल्या.
कॉन्ट्री मारली की १५ ते २० युरोत रात्रीची पोटं भरायची. (तिथे भात अनलिमिटेड अन फुक्कट असतो. )
१. कभी खुशी, कभी गम.. आमचं मम्मं -
.
.
.
कामानिमित्ताने कलोनला जायचा सुयोग आला. पश्चीम भागात असणारे
Cologne (जर्मन-Köln) हे जर्मनीतील आकाराने चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर
आहे. आपल्याला सर्वांना Eau de Cologne बद्दल माहिती असेलच.
माझे आजोबा हे अत्तर वापरायचे. आजोबांना सांगीतलं की, तुमच्या त्या
अत्तरवाल्या कलोनला जाउन आलो. त्यांना कित्ती आनंद झाला.. आणी मलाही.
त्यांची शाबासकी मिळाली की मला अजुन असाच आनंद होतो.. :)
आता हे अत्तर Procter & Gamble चे आहे. Eau de Cologne या फ्रेंच शब्दांचा अर्थ होतो- कलोनचे पाणी.
न्युरेंबर्गहून ट्रेनने सोमवारी सकाळीच कलोनला जाणार होतो. पहाटे
हॉटेलातून बाहेर पडलो तोच चक्क मर्सीडीज नामक टॅक्सी आमची वाट पाहत होती.
मनातल्या मनात त्या रथाला नमस्कार करत मी ती पायरी चढलो. सारथ्याने १८०
च्या वेगाने घुमवत साडेतीन मिंटात स्टेशनावर पोहचवले. पहाटेचं सोडा..
स्साला दिवसा-ढवळ्या भर गावात १८० च्या स्पीडने गाड्या चालवतात ही माणसं..
क ह र !!
(मनातः- त्यात काय एवढं इशेष? एकतर हिरवा सिग्नल दिसला की वाटेत कुण्णी
येणार नाही (अगदी कुत्रंसुद्धा) याची खात्री असते ना.., रस्त्यात
गोमातांच्या मिटींगा चालत नाहीत, "वनवे'त हेडलाईट लावला की
प्रवाहाच्या विरुद्द दिशेने जाता येतं" हे कुणाच्या गावी पण नाही, खड्यात
मधे-मधे रस्ते न बांधता त्या उलट औषधाला पण खड्डे ठेवले नाहीत, आणी 'शिस्त
ही पाळायची गोष्ट आहे' असं वाटतं त्यांना.. :D >>
या म्हणावं लक्शुमी रस्त्यावर!! फक्त सर्कीट नाहीत म्हणुन..नाहीतर सगळे शुमाकर व्हायच्या लायकीचे आहेत.)
२. एका जनतागाडीने (फोक्सवॅगनने) दिवसा, गर्दीच्या वेळेत, गावातल्या रस्त्यावर घेतलेला वेग - कॅचमीइफयुकॅन..

त्या वेगाची आता सवयच झाली होती. आमची ट्रेन ICE (InterCityExpress)
होती. या ICE ट्रेन 370 kmph ने धावू शकतात. आमच्या ट्रेनने २४० चा वेग
गाठला होता. बाहेरचं दृष्य पाहायचं सोडुन झोपायचे उद्योग याआधी केले
नव्हते, पण कलोनला पोहोचल्यावर क्लासरुम ट्रेनींगमधे झोपल्यापेक्षा
ट्रेनमधे झोपलेले बरे म्हटले. लॅपटोपच्या बॅगांना साखळ्यांची गरज नाही याची
खात्री होती. बिंधास्स होतो.. पण.. कलोनला पोहोचलो आणी एकदम शॉक लगा लगा लगा.. शॉक लगा..
एका कलीगचे वॉलेट गायबले होते. कुणी मारले असेल? मर्सीत पडले का ट्रेनमधे?
आपली रेल्वे असती तर पळत पळत जाउन शोधून आलो असतो. तो तर पार घाबरला
होता.. पैशापेक्षा महत्वाची कर्डं आणी लायसन्स होते.
पण आभार त्या सिस्टीमचे, स्टेशनवर तक्रार नोंदवली आणी ४ दिवसात
मुद्देमालासहीत पाकीट हॉटेलात परत.. ब्बास्स.. आहा आहा.. और क्या चाहिए??
३. जर्मनीच्या प्रेमात पडायला अजुन एक कारण.. InterCityExpress.

कलोनात बरेच वेगळे अनुभव आले. इथले रस्ते, इमारती सगळंच बवेरीयापेक्षा
वेगळं वाटत होतं. मेट्रोत टॅटू-पियर्सींग केलेले, बिना शर्टाची फिरणारे
सलमान पाहायला मिळत होते. साळकाया-माळकाया तिकडे लक्षपण देत नव्हत्या,
"तुझा मुडदा बशीवला" वगैरे शिव्या देण्यात त्यांना काही रस दिसला नाही.
४. ग्राफिटी - गावातल्या, सबवेतल्या बर्याच भिंती स्प्रे-पेंट केल्या आहेत. कलाकार आहेत एकेक..
कला / सौंदर्य -

ह्हेSS..
हारली रं हारली.. हारली रे हारली..

र्हाईन नदीच्या काठी वसलेले कलोन पुर्वीपासून एक महत्वाचे बंदर व
वाहतुक केंद्र मानले जायचे. इथे २००० वर्षापासूनचा इतिहास सांगणारे पुरावे
मिळाले आहेत. पुर्वी फ्रेंचांची सत्ता होती. दुसर्या महायुद्धात सर्वात
जास्त बॉम्बीन्ग या शहराने झेललं. जवळपास ९५ टक्के लोकसंख्या यामुळे कमी
झाली (स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले) आणी जवळजवळ सगळं शहर उध्वस्त झालं
होतं. महायुद्धाच्या पुर्वी जवळपास ११००० च्या संखेने असणारे ज्यू, शेवटी
एकतर मारले गेले होते किंवा त्यांची हकालपट्टी झाली होती.
तरी बर्याच जुन्या इमारती परत बांधण्यात आल्यात. हे बांधकाम १९५० पासून
१९९० पर्यंत चाललं होतं. जुन्याची आठवण ठेवत, नव्याचा स्विकार करणारं शहर
हौशा-गौशांनी भरलंय. पण आमच्या दुर्दैवाने फिरायला शनी-रवी मिळाला नाहीच.
फक्त ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी बाहेर पडायचो, गावभर हिंडुन
रात्री-अपरात्री हॉटेलात परत. :(
खालचा फोटो न्युरेम्बर्गच्या एका संग्रहालयात काढलाय. महायुद्दातली हानी
दाखवणार्या या फोटोत र्हाईन नदी, कलोन कॅथेड्रल आणी Hohenzollern
Bridge, त्याची युद्धात लागलेली वाट.. दिसत आहेत.
५. हिटलर, नाझी,अन महायुद्धातली 'आग' म्हणजे जर्मनी..

६. आणी सध्य-परिस्थीती- नव्या जोमाने पुन्हा उभा राहिलेला जर्मनी..
राख...., पुन्हा पेटलेला 'चिराग' म्हणजे जर्मनी..

र्हाईन नदीचा उगम स्विस आल्प्समधे होतो. ती जर्मनीतून पुढे
नेदरलॅन्डमधे जाते. कलोनचे शेजारील शहर ड्युसेलडॉर्फ हे सुद्धा याच नदीच्या
काठावर आहे. आणी ते सुद्धा एक मोठे बंदर आहे. 'सख्खे शेजारी आणी पक्के
वैरी' असणारी ही शहरे बियर, कर्नीव्हल्स आणी फुटबॉल यावर कायम भांडत असतात.
कलोनच्या बियरला कोल्श, तर ड्युसेलडॉर्फच्या बियरला आल्ट म्हणतात. इकडे ती
आणी तिकडे ही बियर ऑर्डर करणे म्हणजे चेष्टेचा विषय होऊ शकतो.
कोल्श भाषा सुद्धा असल्याने, अशी एकमेव आहे की जी आपण पिऊ शकतो असे म्हटले जाते.
या नदीतुन मोठ्या कार्गो शिप्स जाताना बघायला आवडले. काठावर कितीही बसुन राहिलो तरी वेळ सहज निघुन जातो.
७. र्हाईन आणी माल वाहतुक करणार्या बोटी-- एवढ्या मोठ्या पात्राच्या नद्या मी (पुराखेरीज) पाहिल्या नव्हत्या..

८. पूल टू धमाल.. पूल आणी कुलपे-
याच नदीवर असणार्या Hohenzollern Bridge वर रेल्वे धावतात. जवळपास अर्धा
किलोमिटर लांबी असेल. इथे एक इंटरेस्टींग गोष्ट पहायला मिळते. या संपुर्ण
पुलावर आतल्या बाजुने तारांची एक जाळी आहे. याला असंख्य रंगी-बेरंगी,
आकर्षक कुलपं लावली आहेत. चौकशी केल्यावर समजले की, प्रेमात पडलेली आणी
नुकतच लग्न झालेली जोडपी इथे येतात आणी या कुलपांवर आपले नाव, बदाम, तारीख
वगैरे कोरुन ती इथे अडकवतात. हो.. इथे-तिथे माणसं सारखीच की.. आपले
वासु-सपना किल्याच्या भिंतीवर विटांनी नावे कोरतात अगदी तस्सेच. फकस्त फर्क
इतनाइच है के, कोल्श लोक्स थोडे इस्टाईलसे करतात. कुलुपात अडकल्यावर
किल्ल्या र्हाईनला अर्पण केल्या जातात.
पण आजकाल मुळात कुलपांवर विश्वास कितपत ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे.. :(
हे प्रकार बर्याच ठिकाणी पहायाला मिळातात. या कुलपांना 'पॅडलॉक्स' म्हणतात.

थोड्याच जागा शिल्लक..
हरी अप..


९. इथे अजुन एक गम्मत बघायला मिळाली. दोन मुली कटर घेउन आल्या होत्या.
लगेच तिथल्या पादचार्यांच्या मदतीने त्यांनी एक कुलुप कापायला सुरुवात
केली. कुलुप नदीत फेकताच, एकीच्या डोळ्यात डेन्युब-र्हाईन उभ्या राहिल्या
होत्या. बाजुला पाहिले तर.. तिथली र्हाईनमाई सुद्धा संथ वाहत होती.. 'पुलावरच्या सुख-दुखांची जाणीव' तीला पण नव्हती..

आम्ही याच भागात २-३ वेळा आलो. नदीच्या काठावर बसायचो. एकदा पुलावरची
फुलं पाहण्यात गुंग झालो होतो, तेवढ्यात एक खरंखुरं गुलाबाचं फुलं नाकासमोर
आलं. ते फुल ज्या मुलीच्या हातात होतं ती सुद्धा गुलाबासारखीच होती.. अगदी टवटवीत..
आता एवढी स्माईल देत समोर आलेल्या फुलाला नाकारायची हिंमत कोणाकडे? आणी
टिव्हीत पाहिले होते की बाहेर अशीच Free Hugs वगैरे मिळतात. आमच्या नशीबात
फुल नाही तर फुलाची पाकळी.. ;) ते घेताक्षणी ती म्हणाली "वन युरो प्लिझ.."
मला एक काटा टोचलाच. च्यायला गुलाबाचं फुल ८५ रुपैला? अजुन १५ रुपये घातले
तर कुंडीसकट मिळंल की.. (नोट- मराठीतली कुंडी)
मी निर्लज्जासारखे फुल परत केले. ती पण निर्लज्जासारखी "डान्के-चूस" (Danke
Chus म्हणजेच थॅन्कयू-गूडबाय) म्हणाली. का कुणाला म्हाईत, पण.. बायदवे,
tschüss हे चॉव (chow) चेच जर्मन रुपडे आहे.
१०. कलोन कॅथेड्रल - (Kölner Dom)
मेन स्टेशनामधुन बाहेर पडताच, आपल्याला हा भव्य-दिव्य Dom दिसतो. पुर्ण
फोटो येण्यासाठी दूर उभे राहुनच फोटो काढावा लागतो. या रोमन कॅथोलीक चर्चचं
बारच्या शतकात चालू झालेले बांधकाम पुढे ६०० वर्ष चालू होतं.
जर्मनीतली Most visited landmark म्हणून ही जागा प्रसिद्ध आहे. रोज साधाररण २० हजार पर्यटक येथे भेट देतात..
इथल्या जवळच्या रस्त्यांवर बरेच भटकलो. एका ठिकाणी Dunkin donuts परवडणेबल
दरात मिळायचे. पोटभर खायचो. मॉलमध्ये वगैरे फिरलो. 'जर्मनीत खरेदी करु नका'
असा सल्ला ऑफिस कलिग्जनी का दिला होता ते समजले.
खालच्या फोटोतली माणसे (भिंगाखाली धरुन) पाहिली की या वास्तूची भव्यता लक्षात येइल.

या चर्चला दोन उंच मनोरे आहेत. बाहेरच्या पायर्यांवर अनेकदा काही गृप
आपली कला सादर करीत असतात. आम्हाला आत जाउन चर्च पाहता आले. पण संध्याकाळी
वेळाने गेल्यामुळे या मनोर्यामधल्या पायर्या चढून वर जाता आले नाही. वरुन
नदी आणी कलोन शहराचा नजारा मस्त दिसतो म्हणे.
आत काचांवर छान चित्रे काढली आहेत.
अंदरसे आणी बाहरसे -



.
१०. जगात भारी अशी "बियर अॅट इट्स बेस्ट" म्हणजे जर्मनी..
नदीकाठी बर्याच मधुशाला आहेत. आमचा कलीग आम्हाला एका गुहेसारख्या
वाटणार्या Gilden Im Zims मधे घेउन गेला होता. आधुनिकता आणी परंपरा यांना
जोडणारा हा पब अलिकडचाच असला तरी खूप प्रसिद्ध आहे. प्रवेश करताच फक्त
'आहा' अशी भावना.. संगीत, कलर्स, लाइट्स, चित्रे, आणी बघण्यासारखं बरच काही
आहे. एखाद्या ऐतीहासिक,पौराणीक संग्रहालयात गेल्यासारखं वाटतं. एकावेळी
हजार्-बाराशे पिणार्यांची व्यवस्था करतो हा पब.
या फोटोत दिसतोय अशा लहान, उभट ग्लासात बियर मिळते. काय ती 'साकी', काय
तो 'माहोल', काय ती 'बियर'.. आणी विशेष म्हणजे या साकी आपले ग्लास संपले रे
संपले की (तुम्हाला डिस्टर्ब न करता) लगेच दुसरे ग्लास ठेउन जातात. जाता
जाता एका कागदावर फुली मारुन जातात. (चार उभ्या आणी एक तिरकी रेघ अश्या
मोळ्या बांधतात.) काही वेळाने आपल्याला त्या साकीची जुळी बहिणसुद्धा दिसू
लागली की मग आपण 'बास कर बाई आता' म्हणू शकतो किंवा ग्लासाखालखी कागदी चकती
ग्लासावर ठेवली तरी तीला 'बिल आणायचंय' हे समजतं.
इथे माझी ऑर्डर गंडली होती. चुकुन एक अख्खी फक्त उकडलेली कोंबडी ताटात आली. करवतीने कापुन खाता-खाता नाकी नऊ आले होते.
Gilden Im Zims पब आणी कोल्श बियर -
.
११. नदीच्या काठावर अजुन एक चर्च आहे.

शनवारवाडा आणी बाजीराव - ;)
.
(कर्मश्या..)
---------
|| SYG ||
मालोर्का
नोव्हेंबर-डिसेम्बर
महिन्याचे दिवस होते. जर्मनीत थंडीने काकडून गेलो होतो. तापमान 0 डिग्री
च्या आसपास आसवे. अगदी वैतागाल्यासारखे झालेले. त्यामुळे जवळपास जास्त
खर्चिक नसलेला पण थोडे उबदार हवामान असलेल्या आणि कमीत कमी वेळेचा प्रवास
असणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात घोळत होता. आणि अचानक एक छान वीक एंड
ऑफ सिझन ऑफर सापडली. स्पेन देशातील भूमध्य समुद्रात असणाऱ्या मालोर्का
बेटावर ३ दिवस दोन वेळचे खाणे आणि विमान प्रवासासह एकूण किंमत प्रवासी १९०
युरो. मग काय पटकन बुकिंग केले आणि सपत्निक निघालो. माझ्या गावापासून
न्युर्नबर्ग विमानतळावर येवून पोहोचलो. न्युर्नबर्ग वरून ११ वाजताचे विमान
घेवून दुपारी पाल्मा विमानतळावर उतरलो. मालोर्का बेटावर तसे बस-सेवा इतकी
उपयुक्त नाही वाटली आणि त्यात ऑफ सिझन म्हणून तिथे सिस्क्ट (sixt) कार
रेंटल वाल्यांकडून गाडी ३ दिवसांसाठी भाड्याने घ्यायचे ठरवले. गाडी घेऊन
तडक पागुएरा (Paguera) गावातले हॉटेल बेव्हेर्ली प्लाया (Beverly Playa)
गाठले. संध्याकाळी समुद्रकिनारी एक फेरफटका मारला आणि एक नितांत सुंदर
सूर्यास्त बघावयाला मिळाला.
सूर्यास्त



0 डिग्री तापमानातून एकदम १२ डिग्री मध्ये एकदम हायसे वाटले, त्यात
समुद्र नेहमीपेक्षा थोडा खवळलेला आहे असे कळले. समुद्रकिनारी मनसोक्त
फिरून रात्री शहरात फेर फटका मारायला निघालो. मालोरका बेटावर ऑफ-सिझन
असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. तिथे एका दुकानात एक पंजाबी आणि सिंधी
माणसांशी थोड्या वेळ गप्पा मारून मग रात्री हॉटेल मध्ये परतलो. हॉटेल मध्ये
बुफ़्फ़ॆ पद्धत होती आणि नानाविविध प्रकारचे शाकाहारी आणि सी-फूड आईटमस
ठेवलेले होते. जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि निद्रिस्थ झालो.
दुसर्या दिवशी सकाळी न्याहारी करून दिवसभराचा प्लान तयार केला.आश्या हॉटेल
मध्ये खाण्याची फारच छान सोय असते. न्याहारी आणि रात्रीच्या जेवणात
नानाविविध पदार्थांची रेलचेल असते. आपण फक्त बुकिंग करतांना हे सर्व आपल्या
ऑफर मध्ये अंतर्गत आहेत ना ह्याची खात्री करून घ्यावी. आज सकाळचे वातावरण
ढगाळ होते. तापमान १० डिग्री ते १२ डिग्री असल्याने समुद्र किनार्यावर
जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यात गाडी दिमतीला असल्याने बेटाचे एकदम शेवटचे
टोक काप दे फोर्मेंटोर (Cap de Formentor) बघायचे ठरवले. बेटाविषयी जास्त
काही माहिती जमवली नव्हती. बेटाचा भूगोलही परिचित नव्हता. वाटले कि सरळ
रस्ता असेल त्यामुळे तीन एक ठिकाणे बघून होतील. आणि रात्री मालोर्का ची
मुख्य शहर पाल्मा हि बघायला जाता येईल. असा सर्व विचार करून गाडी हाणायला
सुरवात केली. पोर्ट दे पोलेन्का (Port de Pollença) शहर ओलांडल्या नंतर
मात्र डोंगर लागले. आणि मग शेवटपर्यंत नागमोडी रस्ते आणि हेअर पिन घाट. एका
ठिकाणी रस्त्याच्या बाजुला पार्किंग दिसले. गाडी चालवून थकलो होतो आणि
उत्सुकतेपोटी तिथे थांबलो. समोरचे दृश्य बघून एकदम आ वासून उभे राहिलो.
डोन्गर माथ्यावरून समुद्र




समोर अथांग पसरलेला भूमध्य समुद्र आणि बाजूला समुद्रातून उंच वर आलेले
सुळके. तिथे थांबल्याचे चीज झाले असे वाटले. वारा अफाट वेगाने वहात होता.
तिथे जो खडक होता त्या खडकावर वार्याने सुंदर कोरीव काम केले होते त्या
पार्किंग प्लेस पासून ते शेवटच्या टोका पर्यंत खडकाला जसे काही
रांजणखळग्याचे रूप प्राप्त झाले होते.
तुफान वार्यामुळे झिजलेला खडक


तिथून बाजूला वळून बघितले तर समोर जाणारा रस्ता नागमोडी वळणे घेत थेट
खाली जातोय आणि पुन्हा दुसर्या बाजूने घाटावर चढत जातोय असे दिसले. मग
लक्षात आले कि आता पुढचा रस्ता अजून जिकरीचा असणार, पण शेवट पर्यंत जायचे
निश्चित असल्याने मागे हटायचे नाही असे ठरवले.
घाटातली वाट - वळणदार रस्ता

डोन्गराच्या माथ्यावरून


अगदी २० ते २५ किलोमीटर च्या वेगाने निघालो. पुढे चांगला रस्ता जाऊन
खराब रस्ता लागला. थोड्यावेळ पुन्हा वाटले कि इथेच थांबावे कारण सोबत इतर
गाड्याही दिसत नव्हत्या. तशीच गाडी पुढे चालवत राहिलो आणि पुन्हा चांगला
रस्ता लागला. मग थोडा हुरुप आला आणि पुढच्या ३० मिनिटात आम्ही काप दे
फोर्मेंटोर ला पोहोचलो. मालोर्काचा उत्तरेकडील शेवटच्या टोकावर...
काप दे फोर्मेंटोर -घाटातली वाट

हेअर्पिन घाट


इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता - credits for youtube video: mallorcafotobox
काप दे फोर्मेंटोर
खाली खोल समुद्र आणि मागे डोंगर रांगा... तिथला अप्रतिम निसर्ग अथांग
समुद्र खडकांचे सुळे मनात साठवले. दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम तिथेच उरकला
आणि थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळ होण्याच्या आताच तो घाट मागे टाकायचे
ठरवले. तिथून तडक घाट उतरत आणि मजल दरमजल करत पोर्टो क्रिस्तो (Porto
Cristo) ला पोहोचलो. घड्याळात बहितलेतर दुपारचे ४ वाजलेले होते. सकाळीच
हॉटेलमध्ये माहिती मिळवली होती कि तिथे एक नैसर्गिक गुहा आहे जी
लवणस्तम्भांसाठी प्रसिद्ध आहे, कुएवास देस द्राख (Cuevas des Drach) असे
तिचे नाव. साडेचारला शेवटचा प्रवेश होता. तो मिळवून ती गुहा बघितली. अतिशय
म्हणजे अतिशय सुंदर असा अनुभव होता तो. ती गुहा समुद्राला समांतर असणाऱ्या
खडकात होती. जिथे समुद्र सपाटी पेक्षा खोल जागाहोती तिथे समुद्राचे पाणी
झिरपून निळ्या शार पाण्याची अनेक छोटी छोटी तळी त्या गुहेत तयार झाली होती.
त्यातील एक तळे बर्यापैकी मोठे होते. त्या तळ्यात सर्वांना नावेने एक फेरी
मारून पलीकडे नेण्यात आले. ते निळे पाणी आणि छतामधून खाली येणारे असंख्य
निरनिराळ्या आकाराचे पिवळसर लवणस्तम्भ, त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब..शब्द
कमी पडतात ते सांगायला. तिथे फोटो काढायला मनाई होती. इच्छुकांनी गूगल फोटो
सर्च नक्की करावा. जेव्हा मालोर्कात सिझन असतो तेव्हा तिथे नावेतून
जातांना बाजूने दोन नावात कलाकार लोक गिटार वाजवून वातावरण निर्मिती करतात
असे कळले. धन्य ते लोक ज्यांना ते अनुभवत आले.
Cuevas des Drach photo credit goes to http://www.cuevasdeldrach.com/design/images/show/show1.jpg

ती गुहा नजरेत साठवून आम्ही बाहेर आलो आणि आमचे पुढचे लक्ष्य काला
मोण्ड्रागो (Cala Mondrago) गाठायला निघालो. इथे अनुभव कमी पडला.. कारण
साडे पाच नंतर अंधार पडायला सुरुवात झाली होती. मग तो प्लान रद्द करून सरळ
पाल्मा शहरात आलो..मार्केट मध्ये गाडी पार्क केली आणि कपड्याच्या दुकानात
गेलो. झाले काय कि निघण्याच्या घाईत माझे कपडे घरीच राहिले होते. वेंधळेपणा
दुसरे काय...खरेदी करून पुन्हा हॉटेल मध्ये आलो. रात्रीच्या जेवणाची वेळ
कधीच संपली होती. मोठ्या मुश्किलीने एक चायनिस हॉटेल सापडले आणि जेवणाचा
प्रश्न सुटला. दिवसभराचा प्रवास फक्त ३०० किलोमीटर आणि रात्री समाधानाची
झोप.
दुसरा दिवसाचे स्वागत सुर्याकिरणाने झाले. नाश्ता करून हॉटेल चेक आउट
करून दिवसभराचे प्लान्निंग केले. आता लक्ष्य होते ते सा कोलाब्रा (Sa
Calobra) चा एक अतिशय नजर वेधक समुद्रकिनारा.. त्याचा फोटो बघितला आणि
हॉटेलमध्ये त्याच्याविषयी माहिती करून घेतली. पुन्हा निघालो गाडी हाणीत..आज
थोडे चक्कर आल्यासारखे वाटत होते..वाटले कि जर दूर जायचेय तर थोडी शक्ती
हवी म्हणून एक-दोन केळी खाल्ली आणि पुढे निघालो. कालचा अनुभव पाठीशी
होता..घाटाची मानसिक तयारी केली होती.. गाडीत इंधन टाकले आणि निश्चिंत होऊन
पुढे निघालो. वाटेत सुरेख इमारती असलेली गावे लागत होती. आणि एकदाचा घाट
सुरु झाला...
नैसर्गिक कमान


डोन्गरावरून समुद्राचे प्रथमदर्शन - सा कोलाब्रा

इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता-credit for youtube video: Quentin Field-Boden
घाट
मध्ये अनेक सायकल स्वार भेटत होते. त्यांचा उत्साह बघून हुरूप वाढत
होता..परिसर निसर्गसंपन्न होता. कालपेक्षा आजचा घाट जरा कठीणच होता. मजल
दरमजल करत डोंगराच्या माथ्यावर आलो. थकवा जाणवत होता. समोर डोंगरातून
समुद्राचे दर्शन झाले. थोडे पाणी पिउन पुन्हा पुढे डोंगर उतरत, चढत आणि
पुन्हा उतरत असे निघालो आणि सा कोलाब्रा ला पोहोचलो. मनसोक्त फोटो काढले.
समुद्राच्या पाण्याचा निळा रंग शब्दापालीकडचा होता. कितीही प्रयत्न केला
तरी फोटोत नाही उतरला.
समुद्राच्या पाण्याचा रंग अप्रतिम - सा कोलाब्रा


तिथे आम्ही थोडे गंडलोच. आम्हाला वाटले कि हेच ते ठिकाण ज्याचे फोटो
आम्ही पहिले होते. नंतर थोड्या वेळाने सहजच बाजूला फेरफटका मारायला गेलो तो
एक रस्ता दिसला. तसेच पुढे गेलो आणि वाटले कि पुढे काहीतरी intersting
असावे. पुढे एक बोगदा लागला आणि तो ओलांडल्यावर मात्र पुन्हा डोळे दिपून
गेले.
खडकातून आरपार खोदलेला मार्ग

खडकातून बोगदा

बोगद्यातून बाहेर आल्यावर...

तीनही बाजूला उंचच उंच डोंगर मध्ये मोठी वाळू पसरलेली आणि समोरच्या
बाजूला दोन उंच कड्यांच्या मध्ये फेसाळलेला समुद्र. हेच होते ते टोरण्ट दे
पारेइस (Torrent de Pareis)... फोटोत बघितलेले...स्वतःला भाग्यवान समजून
तिथली ती शांतता आणि त्यात होणारा लाटांचा आवाज कानात साठवला. पर्वतातून
येणारा एक झरा/ओढा समुद्राला अगदी एका कोपर्यात येउन मिळत होता..तो गोड्या
आणि खार्या पाण्याचा संगम पण मस्तच. जास्त फोटो काढता आले नाहीत कारण
कॅमेरा ची बेटरी संपली...
टोरण्ट दे पारेइस-उन पडल्यावर काय मस्त दिसत असेल ना

दोन उंच पर्वतांमध्ये वसलेला समुद्र- टोरण्ट दे पारेइस

>इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता-credits for youtube video: viajesylugares
टोरण्ट दे पारेइस
आता वातावरण ढगाळ झाले होते. उन नसल्यामुळे थंडी ही वाजत होती आणि जेवण
राहिले होते त्यामुळे नाईलाजानेच परत निघालो. तिथे एका हॉटेलात डाळ-ब्रेड
खायला मिळाली. सुरेख झाली होती डाळ. जेवणानंतर मग सरळ घाट उतरून संद्याकाळ
होयीस्तोवर डायरेक्ट विमानतळावर आलो. गाडी परत देऊन रात्रीच्या विमानाने
न्युर्नबर्ग ला माघारी आलो जिथे उणे दोन डिग्री तापमान आणि चिक्कार बर्फ
आमची वाट बघत होता. पुन्हा त्या बर्फातून वाट काढत विमानतळावरून रात्री २
वाजता घरी पोहोचलो आणि गुडुप्प झोपलो. सकाळी ऑफिस होते ना...
निसर्ग कमान आणि बोगद्यातून असलेला रस्ता हा एकेरी वाहतुकीचा आहे ना? बोगद्याच्या भिंतीलगत दिसतायत ते दिवे आहेत ना?
लावणास्थाम्भाच्या
गुहा तिथे बर्याच आहेत. आम्हाला वेळेअभावी हि एकाच बघत आली. आणि तेथील
लोकांकडून कळले कि हि बरीच प्रसिद्ध आहे म्हणून. ह्या गुहेचे वैशिष्ट
म्हणजे पाणी झिरपून तयार झालेले तलाव आणि त्यातून नौकायान.
नैसर्गिक कमानीचा रस्ता दुतर्फी आहे आणि कमालीचा अरुंद आहे. कमानीत
मात्र एका वेळेला एका दिशेतूनच वाहतुकीला प्राधान्य आहे. समोरून येणाऱ्या
वाहनांना मात्र रस्ता मोकळा असेल तरच कमानीतून जाता येते.
बोगद्याच फोटोतील रस्ता हा पादचार्यांसाठी आहे. त्या परिसरात वाहतुकीस
परवानगी नाही. बोगद्यात तीन ठिकाणी प्रकाशासाठी खिडक्या आहेत तरीही जमिनीवर
दिवे लावले आहेत जेणेकरून त्या मार्गात पुरेसा प्रकाश असेल.
मेनोर्का नामक ठिकाण तिथून जवळच आहे असे गूगलबाबा म्हणतोय, तिकडे गेला होतात का?
होय, तिथे मेनोर्का आणि इबिझ्झा अशी अजून दोन बेटे आहेत. दोन्हीही सुंदर
आहेत असे ऐकलेले. पण कसे होते ना कि अशा विशेष ऑफर्स फक्त एकाच ठिकाणासाठी
आगमन आणि गमन विमान तिकिटसोबत येतात आणि आमचे वास्तव्य फक्त ३ दिवसांसाठीच
होते त्यामुळे फक्त मालोर्काच बघितले. आम्ही शक्यतो पर्यटन करतांना बरीचशी
ठिकाणे न करता एकाच ठिकाणी मुक्काम करतो आणि त्याचा पूर्ण आस्वाद घेण्याचा
प्रयत्न करतो.
लावणास्थाम्भाच्या गुहा तिथे बर्याच आहेत. आम्हाला वेळेअभावी हि एकाच बघत आली. आणि तेथील लोकांकडून कळले कि हि बरीच प्रसिद्ध आहे म्हणून. ह्या गुहेचे वैशिष्ट म्हणजे पाणी झिरपून तयार झालेले तलाव आणि त्यातून नौकायान.
नैसर्गिक कमानीचा रस्ता दुतर्फी आहे आणि कमालीचा अरुंद आहे. कमानीत मात्र एका वेळेला एका दिशेतूनच वाहतुकीला प्राधान्य आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना मात्र रस्ता मोकळा असेल तरच कमानीतून जाता येते.
बोगद्याच फोटोतील रस्ता हा पादचार्यांसाठी आहे. त्या परिसरात वाहतुकीस परवानगी नाही. बोगद्यात तीन ठिकाणी प्रकाशासाठी खिडक्या आहेत तरीही जमिनीवर दिवे लावले आहेत जेणेकरून त्या मार्गात पुरेसा प्रकाश असेल.