फ़ुलोंकी घाटीबद्दल खूप काही ऐकून होते, खूप काही वर्षांपासून. काही वर्षांपासून आपणही जावे वाटायला लागले. काही स्वप्ने स्वप्नेच राहणार हे माहीत असते पण काही स्वप्ने प्रत्यक्षात उतरु शकतात हेही माहीत असते. हिमालयात फिरावे हे असेच एक स्वप्न आहे. पण बर्फयुक्त थंडी अजून कधीच अनुभवली नाहीये.जिथे उभा जन्म गेला त्या मुंबईत 20 डिग्री तापमान झाले की लगेच स्वेटर घालून त्या थंडीला मी पळवून लावते. तिथे 2 आणि 3 डिग्रीमध्ये काय निभाव लागणार? म्हणून आता हळूहळू सुरवात करून थंडीचा अनुभव घ्यायचा ठरवलंय. अंतिम लक्ष्य कैलास मानसरोवर यात्रा आहे.
त्याचवेळी युथ हॉस्टेलचा फुलोनकी घाटीचा ट्रेक नजरेला पडला. ऑगस्टचा शेवटचा पंधरवडा म्हणजे जीएसटीचे काम तोवर संपलेले असेल असा अंदाज बांधून बुकिंग केले.
हा अंदाज चुकीचा ठरला हे नंतरचे...
तर असो.
प्रवास कसा करायचा याची चर्चा सुरू झाल्यावर ऐशूने ट्रेनने प्रवास करायचा म्हणून ओरड करायला सुरू केली. तिने 4 वेळा झेलम एक्सप्रेसने प्रवास केलाय 3 दिवसांचा. ती मजा तिला परत अनुभवायची होती. मला 29 तासांचा प्रवास म्हणजे अगदी जीवावर आलेले. एवढा प्रवास मी केलाच नाहीये आजवर. माझा प्रवास म्हणजे मुंबई ते आंबोली एवढाच. पण शेवटी तिच्या हट्टापुढे माघार घेऊन एकदाची जातानाही रेल्वे बुक केली. येताना मात्र विमानाने यायचे निश्चित होते. येतानाही परत 30 तास प्रवासात घालवणे मला झेपणारे नाहीय.
ऋषिकेश
दिल्ली सोडल्यानंतर गाडी जरी थांबत थांबत, इतर गाड्यांना खो देत निघाली तरी
हरिद्वारला मात्र वेळेत म्हणजे 1 वाजता पोचली. हरिद्वारला उतरल्यावर
गर्मीने नको जीव झाला. स्टेशनबाहेर पडताच नेहमीप्रमाणे रिक्षावाल्यानी
घेराव घातला. ऋषिकेशच्या आमच्या पत्त्यावर पोचवायचे एकाने 600 सांगितले.
मी 400 वर सौदा करायचा प्रयत्न केला पण तो 500 वर हटून बसला. तसे बघितले
तर एसटी स्टँड समोरच होता पण गाड्या त्या दिवशी जरा उशिराने धावताहेत ही
माहिती एका पोलिसाने दिली. आधीच एसटी लेट, म्हणजे तौबा गर्दी असणार, त्यात
इतके सामान घेऊन एसटीने जरी गेलो तरी ऋषीकेश एसटी स्टँडवरून इच्छित स्थळी
परत रिक्षानेच जावे लागले असते. त्यामुळे उगीच कुठे पैशांचे तोंड बघत
बसणार असा विचार करून एका रिक्षावाल्यासोबत 450 रु फिक्स केले व निघालो.
हरिद्वार ते ऋषिकेश शेअर रिक्षाने गेल्यास माणशी 35 रुपये पडतात म्हणे. पण
35 रुपयात प्रवास करायचा असेल तर 6 माणसांची क्षमता असलेल्या जागेत 10
जणांना बसावे लागते. आम्ही तिघी आणि आमचे सामान यानेच रिक्षा भरून गेलेली
☺. अजून कोणी सवारी घेणार नाही रिक्षावाल्याने सांगितले, त्यावर भरोसा
ठेवत भयाण जोरदार फटफट आवाज करत साधारण 30 च्या वेगाने डिझेल की अजून
कुठल्या भेसळमिश्रित इंधनावर चालणाऱ्या, रस्त्यातल्या कुठल्याही लहानश्या
खड्डयाच्या धक्क्याने रिक्षातून उडून बाहेर आदळायची भीती असलेल्या
रिक्षात देवावर हवाला ठेऊन बसलो. पुढे वारंवार असेच देवावर हवाला ठेऊन
प्रवास करायचे प्रसंग येतील याची ही केवळ पूर्वसूचना होती हे नंतर कळले.
देवभूमीत देवाची लीला अगाध आहे. हरिद्वार ते ऋषिकेश अंतर 25 किलोमीटर आहे
पण वाटेतील रस्ता इतका खराब आहे की या प्रवासाला 2 तास लागले. हरिद्वार
ऋषिकेश जोडणारे एक जंगल आहे. जंगलातला रस्ता बराच बरा आहे पण जंगल
संपल्यावर लगेच भयानक तुटका रस्ता. असल्या रस्त्यावर चाक पंचर झाले नाही
तरच नवल. 15-20 मिनिटे त्यात गेली. शेवटी 3 च्या सुमारास बेस कॅम्पवर
पोचलो.
![]() |
| ऋषीकेशच्या वाटेवरचे एक शिल्प |
![]() |
| हरिद्वारच्या असंख्य घाटांपैकी एक! |
![]() |
| पंक्चर झालेले चाक बदलायची वाट पाहताना दिसलेले एक सुंदर पान |
![]() |
| एक असेच मंदिर. |
मी पेमेंट केलेलं त्याचा बँक अडवाईस जोडलेला फॉर्मसोबत पण बँकेने त्यावर
तारीख घातली नव्हती. माझ्या अडवाईस वर बँक पेमेंट नंबर वेगळा व yhai च्या
बँक स्टेटमेंटवरचा युटीआर नम्बर वेगळा. त्यामुळे आमचे पेमेंट नक्की कधी
झाले हे त्यांना कळत नव्हते. आमचा फॉर्म त्यासाठी त्यांनी आधीच वेगळा
काढून ठेवलेला. आम्हाला बघताच, नावही न विचारता, आमचे फॉर्म्स इतके फटकन
कसे काढले ह्याचे मला कोडे पडलेले, त्याचे लगेच निराकरण झाले. मग माझ्या
एसबीआय अकोन्टला लॉगिन करून तारीख मिळवली, ती त्याला दिली तेव्हा कुठे
आमची रिसीट बनली.
Yhaiने भारत मंदिर धर्मशाळेत सोय केलेली. गेल्या गेल्या अंघोळ केली व
बाहेर पडलो. 4 वाजता चहा मिळणार तेव्हा जास्त लांब जाऊ नका, 5 वाजता
ओरिइंटेशन आहे त्याला हजर हवेच वगैरे वगैरे सूचना मिळालेल्या असल्याने जवळच
असलेली नदी बघू हा विचार करून नदीच्या दिशेने निघालो. वाटेत इटकुलीशी
कचराकुंडी व कुंडीच्या 1 मीटर परिसरात कचऱ्याचे भव्य साम्राज्य, त्याच्यात
काही खायला मिळतेय का शोधणारी गुरे व कुत्रे असा नेहमीचा थाट होता. रिक्षा,
दुचाक्या, चारचाक्या चालवणाऱ्या मंडळीना माणसे रस्त्यावर उतरली कीे बहिरी
व आंधळी होतात याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बहिऱ्यांचेही कान फाटतील
इतके कर्कश हॉर्न बसवून घेतलेले आणि एक बोट कायम हॉर्नवरच ठेवून गाडी
चालवायची सवय लावून घेतलेली. अर्थात बहिऱ्यांना ऐकू येत नसल्याने व
आंधळ्यांना दिसत नसल्याने या हुषारीचा काहीही उपयोग होत नाही ही गोष्ट
वेगळी. रस्त्यात माणसे हवी तशी फिरत होती. वाहने त्या गर्दीतून कर्कश
आवाजात जमेल तिथून जमेल तशी वाट काढत होती. एकूण भारतातील कुठल्याही शहरात
जसा सिन असतो तसाच ऋषिकेशला होता.
त्या गोंधळातून वाट काढत नदीकिनारी म्हणजेच त्रिवेणी घाटावर पोचलो. घाट
खूप सुंदर बांधलाय. गंगामैया प्रचंड वेगाने धावत होती. आंबोलीतली 1 व
कोकणातल्या 1-2 नद्या बघत आयुष्य गेलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला
उत्तरेतल्या नद्या बघितल्या की धक्का बसतो. इतक्या वेगात धावणारी व
पलीकडचा तट इतका दूर असलेली नदी बघून मला नेहमी आश्चर्य वाटते. ब्रह्मपुत्र
नदी पहिल्यांदा बघितली तेव्हा हा कुठला समुद्र हा प्रश्न मी विचारलेला.
तिचा तर पलीकडचा तट दिसलाच नाही. अगदी समुद्रच वाटते. ब्रम्हपुत्र हा नद
आहे, नदी नाही हे बहुतेक त्याचा अवाढव्य आकार पाहून ठरवले असणार.
घाटावर पायऱ्या बांधलेल्या त्यातली फक्त 1 च पायरी दिसत होती. 2 नंबरच्या
पायरीवरूनही नदी धावत होती. घाट खूप स्वच्छ होता. अपेक्षित कचरा, भिकारी
वगैरे अजिबात दिसले नाहीत. बहुतेक पावसाळा असल्यामुळे की काय, पाण्यात
भरपूर माती होती. घाटावर काही बायका पानाच्या द्रोणात फुले, अगरबत्ती,
पिठाचा छोट्टूसा दिवा, त्यात तुपात भिजवलेली एक फुलवात व त्यावर कापराची एक
वडी असा सगळा थाट रचून विकत बसलेल्या पण विकत घ्याच म्हणून गळ्यात मात्र
पडत नव्हत्या. खूप लोक फुलांचे द्रोण विकत घेऊन नदीला दिव्याने ओवाळून मग
तो सगळा सरंजाम पाण्यात सोडत होते तर काही पायरीवरच पूजा मांडून तिथेच दिवा
लावत होते.
![]() |
| गंगापूजेचा फुलांचा द्रोण. |
एकाच हातात द्रोण धरून पाण्यात सोडला तर लाटेच्या माऱ्याने तो लगेच उपडा
होतो. द्रोण दोन्ही हातांच्या ओंजळीत धरुन ती ओंजळ पाण्याखाली धरली तर वरचा
द्रोण अलगद लाटेवर स्वार होऊन दुरवर हेलकावत जातो हे टेक्निक तेवढ्यात
बघून घेतले. हे अर्थात थोडे रिस्की आहे कारण ओंजळ पाण्याखाली धरण्यासाठी
पाण्यात थोडे वाकावे लागते व त्या भानगडीत तोल जाऊन नदीत पडलात तर तुम्ही
पडलात हे तुम्हाला कळायच्या आधीच तुम्ही 500 मीटर तरी वाहत जाल इतक्या
वेगात नदी धावत असते. इतक्या वेगात धावणारी नदी, घाटावर बऱ्यापैकी गर्दी
तरी कुठेही जीवरक्षक दिसले नाहीत किंवा पाण्यात कुठेही आधार धरायची सोय
दिसली नाही. ऋषिकेशला जाताना वाटेत हरिद्वारचे घाट दिसले तिथे पाण्यात
आधारासाठी रेलिंग लावलेले दिसत होते पण इथे तसे काहीही नव्हते. कदाचित
पाण्याखाली गेले असावेत. नदीत डुबकी मारणारे एकदोघे दिसले पण ते पायरीवरूनच
डुबकी मारत होते. आत पुढे अजून पायऱ्या असणार पण दिसत नव्हत्या.
हल्ली कुठेही भेटतात ते सेल्फी सम्राट नदीतटावरही होते. त्यांची गंमत
बघण्यात थोडा टाईमपास केला. वेडी दिसणारी एक बाई जेवणाचा डबा धुवायला
किनारी आली. अर्धा पाऊण किलो तरी भरेल इतका मोठा दगड तिने गळ्यात बांधलेला
म्हणून ती वेडी असावी असे मला वाटले. पण तिने डब्बा शहाण्यासारखा धुतला,
चूळ भरली व आता ही पाणी पितेय की काय असे मला वाटत असतानाच डब्बा भरून
मातीमिश्रित पाणी ती प्यायलीही. गंगामैया सगळ्यांचे रक्षण करते असा विचार
करत मी घाटावरची इतर गंमत बघायला लागले.
![]() |
| सेल्फी सम्राट |
गंगा आरतीची वेळ संध्याकाळी साडेसहा की सातची होती. भाविकांनी लवकर येऊन
आपापल्या शिटा धराव्यात हे आवाहनही केलेले होते पण आम्ही भाविक नसल्याने ते
फारसे गांभीर्याने घेतले नाही. घड्याळात साडेचार वाजत आलेले तेव्हा नंतर
परत येऊन रात्रीच्या अंधारात दिव्यांचा द्रोण सोडायची गंमत करू व आरतीही
बघू म्हणत परतलो.
परतून आलो तर लोक चहा पित बसलेले. मी जड होतात म्हणून बॅगेत भरलेले सिरॅमिक
कप काढून ठेवले पण स्टीलचे टाकायला विसरले त्यामुळे त्याच पावली मागे
फिरून एक 10 रूपयाचा प्लास्टिक कप विकत घेतला. परत हॉस्टेलवर आले तर एक
ग्रुप 'ताट,वाटी, चमचा, टिफिन बॉक्स सगळे आमचे आम्ही आणायचे' हे तुम्ही
सांगितले नाही म्हणून हुज्जत घालत होता. 'वर या, साईट उघडून दाखवतो कुठे
लिहिलेय ते' म्हणून मॅनेजर साहेबांनी त्यांना वरून छज्यातूनच गप्प केले.
मॅनेजर साहेब जरा भारीच दिसताहेत याची नोंद करत चहा घेतला आणि ओरिएंटेशनची
वाट बघत बसलो. शेवटी ते सहा वाजताच झाले. इंडियन स्टॅंडर्ड टाइम, अजून
काय?
ओरिएंटेशनमध्ये मॅनेजर साहेबांनी सगळ्या डुज व डोंट्स ची माहिती दिली.
आधीच्या पिढीला जेवढा निसर्ग दिसला तेवढा आताच्या पिढीला दिसत नाही आणि हे
असेच सुरू राहीले तर येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीही शिल्लक राहणार नाही
म्हणून युथ हॉस्टेल ही जागतिक संस्था जगभरात तरुणांनी परत निसर्गाच्या जवळ
जावे यासाठी प्रयत्न करते. त्यांनी आयोजित केलेल्या निसर्गयात्रांना साधे
शाकाहारी जेवण, तंबूत मुक्काम व शक्य तितकी कामे आपली आपणच करायची यावर भर
असतो. जेवणाचे ताट,वाटी, डब्बा आपले न्यायचे, प्रत्येक वेळी ते वापरले की
आपले आपणच घासून घ्यायचे, तंबू जसा स्वच्छ मिळाला तसाच तो जाताना पुढच्या
ग्रुपसाठी स्वच्छ करून मग निघायचे वगैरे त्यांचे बरेच नियम आहेत. कुठल्याही
प्रकारचे अमली पदार्थ न वापरण्याविषयीचे नियमही खूप कडक आहेत व त्यांचे
तसेच कडक पालन केले जाते. त्यामुळे एकट्या मुलीसुद्धा त्यांचे ट्रेक
बिनधास्त करतात. बहुतेक वेळा ते जंगलात सोबत गाईड देत नाहीत, जिथे रस्ता
चुकण्याची शक्यता असते तिथे मार्गदर्शनपर बोर्ड लावलेले असतात. जमलेल्या
मेम्बर्समधून ग्रुप लीडर व को लीडर म्हणून अनुभवी लोकांची निवड करतात,
त्यांना जबाबदारी नीट समजवतात त्यामुळे जंगलात जाणारे मेम्बर्स सहसा रस्ता
चुकत नाहीत. माझा yhai सोबतचा हा तिसरा ट्रेक, त्यापैकी निलगिरी ट्रेकला
सोबत गाईड होता (ज्याचे कारण वेगळे होते) पण गोवा ट्रेकला गाईड नव्हता.
ह्या ट्रेकलाही सोबत गाईड नसणार, फक्त फुलोनकी घाटी मध्ये गाईड असणार ही
माहिती मॅनेजर साहेबांनी दिली. ह्या ट्रेकला तशीही गाईडची गरज नव्हती हे
नंतर लक्षात आले.
ही सगळी माहिती घेतल्यावर परत त्रिवेणी घाटावर गेलो. आता घाटावर बऱ्यापैकी
गर्दी होती. फुलांचा एक द्रोण विकत घेऊन तो गंगार्पण केला. नदीचे पाणी आता
थोडे कमी झाले होते व दुसरी पायरी दिसत होती. गंगाआरतीची नुकतीच सुरवात होत
होती. आरती जिथे होते तिथे लोकांची गर्दी तर होतीच पण आम्ही ज्या बाजूला
होतो त्या बाजूनेही खूप गर्दी होती. आम्हीही त्या गर्दीत घुसून शक्य तितके
पुढे जाऊन इतर जनतेप्रमाणे मोबाईलवर विडिओ चित्रीकरण सुरू केले. त्या
भानगडीत मी घाटाची पहिली पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन उभी राहिले. मी
नदीत पडते की काय या भयाने ऐशु एक डोळा मोबाईलवर व एक डोळा माझ्यावर ठेऊन
होती, पण मी काही नदीत पडले नाही.
आरती बराच वेळ सुरू होती व आरती करणारे भटजी वेगवेगळ्या पोझेस घेऊन, गोल
गोल फिरून आरती करत होते. मला हा प्रकार पर्यटकांसाठी केल्यासारखा वाटला.
15 वर्षांपुर्वीही आरती अशीच होत होती का हा प्रश्न मनात आला. आरतीचे
दिवे अतिशय सुंदर होते.
आरती गाणारे सुद्धा अगदी तालासुरात गात होते. एकूण मस्त माहौल होता. लोक
विडिओ घेत होते. एकाच्या मोबाईल स्क्रीनवर आरती दिसायच्या ऐवजी कोणी स्त्री
पुरुष आलटून पालटून दिसत होते. तो स्काईपवर घरच्यांना आरती दाखवत होता हे
थोड्या वेळाने माझ्या लक्षात आले. आरती पार पडल्यावर घाटावर उगीच इकडे
तिकडे फिरून टाइमपास केला. त्या दिवशी जन्माष्टमी असल्याने बरेच बाळगोपाळ
कृष्णाच्या वेशात वावरत होते.
घाटावर गावठी मक्याची कणसे दिसली म्हणून घ्यायला थांबलो. इथे स्वीटकॉर्न
मिळतात जे मला अजिबात आवडत नाहीत. आमचे मराठी ऐकून कणीसवाला मराठीत
बोलायला लागला. मी थक्क! तिकडचे भय्ये इकडे येऊन भरले म्हणून मराठ्यांनी
चक्क ऋषिकेश गाठावे? त्याला विचारले कधी येऊन राहिला म्हणून. तर म्हणे मी
सातारचा, माझे आई बाबा इथे येऊन स्थायिक झाले, कधी मधी जातो सातारला.
म्हटले बरे आहे गड्या!!
8.30 वाजता डिनर असल्याने त्या सुमारास रमत गमत परतलो. दुसऱ्या दिवशी साडे
तीन वाजता उठून पावणे पाचला जोशीमठसाठी निघायचे होते. ट्रेक साठीचे कपडे
वेगळ्या बॅगेत पॅक करायचे काम पार पाडून झोपलो.
रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली. चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.
जोशीमठ
रात्री झोप अशी काही लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप
पडली, चहा घ्या म्हणून. चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला
निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.
उत्तराखंड हिमालयाचा पायथा व आजूबाजूला पसरलेल्या भागात आहे. उत्तर बाजू
हिमालयात येते, उत्तरखंडातली सगळी उंच शिखरे म्हणजे नंदादेवी, बद्रीनाथ,
कामेत ह्या भागात येतात. तिथले सगळ्यात उंच शिखर नंदादेवी साधारण 7800
मीटर उंचीवर आहे. म्हणजे जवळ जवळ 25,000 फूट. दक्षिणेला शिवालीक रेंज आहे.
जिम कॉर्बेटचा प्रसिद्ध कुमाऊं भाग यात येतो. याच्या खालच्या टोकाला
दलदलीचा तराई भाग येतो.
आमच्या ह्या सफरीत आम्ही हरिद्वार-ऋषिकेश पासून सुरवात करून फुलोनकी
घाटी-हेमकुंड साहिब करणार होतो व पुढे बद्रीनाथला जाणार होतो.
हरिद्वार-ऋषिकेश समुद्रसपाटी पासून साधारण 1,200 फूट उंचीवर आहे, फुलोनकी
घाटी 12,000 फुट उंचीवर तर हेमकुंड साहिब 15,000 फूट उंचीवर आहे.
चारधामातले बद्रीनाथ त्या मानाने खाली आहे, 10,800 फूट उंची.
1200 फुट उंचीवरून सुरवात करून आमचा पहिला टप्पा होता जोशीमठ 6,150 फूट उंचीवर.
ऋषिकेश ते जोशिमठ अंतर फक्त 250 किमी असले तरी रस्ते गोल गोल वळणे घेत वर
चढत असतात त्यामुळे वेगावर बंधन येते. उत्तराखंडात बहुतांश सँड स्टोन व
स्लेट स्टोनचे प्राबल्य आहे. हे दगड म्हणजे इथे दिसतात तसे दगड नाहीयेत तर
आकाराने प्रचंड मोठे असे बोल्डर्स आहेत, शिळा म्हणता येतील. याना धरून
ठेवणाऱ्या मातीची सतत धूप होत असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी या शिळा
खाली येतात गडगडत. एकेक खडक इतका मोठा की एकटा एका गाडीला आरामात दरीत घेऊन
जाईल.
जून जुलै महिन्यात या भागात उन्हाळा असतो, चार धाम यात्री बहुतेक या
महिन्यात येतात. ऑगस्टपासून मात्र पावसाला सुरवात होते व सोबत दरडी
कोसळायलाही सुरवात होते.
![]() |
| कोसळलेली दरड |
![]() |
| दरड दूर करून रस्ता साफ करताना बोर्डर रोड organisation. |
उत्तराखंडातले रस्ते चांगले आहेत पण जागोजागी वरून येणाऱ्या पाण्यामुळे व
कोसळणाऱ्या दरडींमुळे तेवढा रस्ता खराब होतो. या कारणामुळे 250 किमी पार
करायला सहज 10 ते 12 तास लागतात. म्हणजे तेवढे लागले तर आपले नशीब फारच
चांगले समजायचे. त्यापेक्षा जास्त वेळ लागणे नेहमीचे आहे तिथे.
आमच्या गटात 28 लोक होते, 15 स्त्रिया व 13 पुरुष. मिनीबसने गणपती बाप्पा मोरयाचा घोष करत निघालो.
गाडी गोल गोल फिरत जाते त्यामुळे पोटातही गोल गोल फिरायला लागते.
गाडीतल्या 1-2 सोबतीणी अधून मधून बस थांबवून उतरत होत्या बॉक बॉक करत.
शामलीही एकदा उतरली. हे सगळे पाहून मी घाबरून खाणेच टाळले.
मध्ये एकदा गाडी थांबली, आम्ही सगळे हात पाय मोकळे करायला उतरलो. होय ना
करता नाष्टाही तिथेच करायचे ठरले व शेवटी तिथेच तासभर गेला. मला नाश्ता
करण्यात रस नसल्याने मी इकडे तिकडे झाडे पाहत वेळ काढला.
रस्त्यावर लिंबूसरबत, कणसे वगैरे विकणारे बरेच होते. आमच्या ग्रुपमधल्या
काहींनी लिंबूसरबत घेऊन ते छान आहे असा निर्वाळा दिल्यावर मीही थोडे धाडस
करून गेले सरबतवाल्याकडे. रस्त्यावरचे खाणे म्हणजे पोट बिघडवून घेणे हे
डोक्यात पक्के. प्रवासात पोट बिघडवून घ्यायची रिस्क कोण घेईल? स्टॉलवर
गेल्यावर आधी त्याला विचारले, भय्या पानी कहासे लाये? तो म्हणाला यहा नॅचरल
मिनरल वाटर मिलता है, वोही हम लाते है।। मला आश्चर्य वाटले. म्हटले कहा
है? त्याने थोड्या अंतरावरच्या एका पाइपकडे बोट दाखवले. डोंगरावरचे पाणी
घळीतून खाली येत होते, त्या घळीतच एक पाइपचा तुकडा घुसवून ठेवलेला. घळीतले
थोडे पाणी त्या पाइपमधून येत होते, खाली बादल्या लावून हॉटेलवाले ते पाणी
सैपाक व पिण्यासाठी वापरत होते.
ये पानी बहोत साफ है, इतना अच्छा पानी कही मिलेगा नहीं, पिके देखो जरा।
म्हटल्यावर मी सरबतही प्यायले व पाणीही पोटभर प्यायले. दोघांची चव
अमृततुल्य! इथे मुंबईत क्लोरीनयुक्त पाण्याची चव तोंडात बसलेली. तिथले
डोंगरातून, दगड धोंड्यातून वाहत येणारे पाणी अगदी अमृताहून गोड लागले.
नॅचरल मिनरल वॉटर ह्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. तिथे सगळ्यांनी आपल्या
पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या. त्यानंतर पूर्ण ट्रेकभर असेच डोंगराचे
पाणी आम्ही सगळे पित होतो. ट्रेक आटपून परत ऋषिकेशला आल्यावर विकतचे पाणी
घ्यावे लागले.
प्रवासात बसमधल्या लोकांचे नेहमीचे अंताक्षरीचे प्रयोग सुरू झालेले. कोण
कोण काय कसे आहेत याचा अंदाज यायला लागलेला. 2 मोठे ग्रुप होते. एक
अमदाबादच्या मुलींचा ग्रुप व एक बेंगलोरच्या मुलींचा ग्रुप. मला गुजराती
लोकांची थोडी ऍलर्जी आहे कारण स्थळ काळ न पाहता गुजरातीत मोठमोठ्याने
बोलणे ही त्यांची खासियत मला अजिबात आवडत नाही. गुजराती ग्रुपमधल्या 3 मुली
रिपोर्टर होत्या, कुठल्यातरी दैनिकात काम करत होत्या. मला त्या
दैनिकाच्या वाचकांचे उगीचंच थोडे वाईट वाटले. पूर्ण ट्रेकभर त्या मुलींनी
त्यांच्या बडबडीने कानांवर व वागणुकीने डोळ्यांवर (सगळ्यांच्याच) अत्याचार
केले. त्याउलट बंगलोरकर मुली. अगदी सॉफीसफिकेटेड वागणूक. थोडी शिष्टपणाकडे
झुकणारी. पण इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजीही घेत
होत्या. त्यांच्यासोबत 1 तरुण जोडपे होते जे हा ट्रेक आटपून पुढे लेहला
जाऊन महिनाभर राहणार होते. ऐकल्यावर मी हेव्याने जळून मेले. त्या
जोडप्यासोबत एक गृहस्थ होते ज्यांना तो ग्रुप मामा म्हणून हाक मारत होत्या.
दोन हरयानवी मित्र व दोन गुजराती मित्र होते. गुजराती एकमेकांना इतके
चिकटलेले की मी त्यांचे नामकरण रमेस व सुरेस केले. ते स्वतः व त्यांचा
बिंनेस यापलीकडे बोलायला त्यांच्याकडे दुसरे काहीही विषय नव्हते. ते
बालपणापासून एकत्र होते म्हणे. दोघा हरयानवीमधला एक बँकेत होता, प्रचंड
बडबड्या, थोडा फ्लर्ट पण लाघवी. आवाज चांगला होता व सुरात होता. ऑफ बिट
गाणी तोंडपाठ होती. त्याचा मित्र मात्र अबोल होता, हा आमचा को ग्रुप लीडर
होता.
ऐशु पर्यावरण पर्यवेक्षक होती. म्हणजे ट्रेकदरम्यान कोणी कचरा इथे तिथे
टाकत तर नाहीय ना हे बघणे तिची जबाबदारी होती. बाकी उरलेल्यात एक धुळ्याचे
कुलकर्णी जोडपे होते, मुंबईची एक सीए मुलगी नूपुरा होती, शामली तिला लगेच
चिकटली. एक मुंबईचाच फोटोग्राफर अशोक होता जो मोठ्ठा कॅमेरा घेऊन अखंड
फोटो टिपत होता.
आमचा ग्रुपलिडर महेशही मुंबईचाच होता. त्याने सह्याद्रीत व सह्याद्रीबाहेर
भरपूर ट्रेकबाजी केलेली होती. एक बंगलोरचे जोडपे होते जे कोणाशी
तोंडदेखलेही काही बोलत नव्हते ना हसत होते. बायकोला प्रत्येक गोष्टीचा
त्रास होत होता व चेहरा सतत लटकावून नवरा मीही तुझ्यासोबत त्रासात आहे हे
तिला दाखवत होता. बायको चुकून आजूबाजूला नसेल तेव्हा तो चेहरा थोडा हसरा
करायचा. एक गुजराती जोडपे जे वयाने चाळीशीत होते पण एकमेकांचे नवरा बायको
नव्हते तेही कोणात फारसे मिसळत नव्हते. तरी ते नवरा बायको नसल्याने
त्यांच्याबद्दल इतरांनी नसती कुजबुज करून घेतली, ज्यात गुजराती मंडळ
आघाडीवर होते. कोण नवरा बायको, कोण फक्त मित्र ह्या चौकशा व चर्चा लोक का
करतात देव जाणे.
कर्नाटकचे संजय होते जे वयाने माझ्याएवढेच होते पण माझे वय कोणाला माहीत
नसल्याने एकटेच सिनियर सिटीझनचा मान मिळवून बसलेले. त्यांनी चारधाम याआधी
दोनदा केलेले. घरी इस्टेटीवरून वाद झाल्यामूळे नैराश्य आले, ते वातावरण
नको म्हणून बाहेर पडले आणि मग प्रवासाला जाणे हा छंद झाला. आम्ही दोघे
सोडता बाकी ग्रुपचा वयोगट 20 ते 35 एवढा होता.
गाडीत अंताक्षरी सुरू झाल्यावर गुजराती मंडळ हिरीरीने पुढे झाले. एक बाजू
ते सांभाळायला लागले पण प्रॉब्लेम असा की गाणे कुठलेही असो, पहिल्या
ओळीनंतरची चाल ते ओढून ताणून गरबा चालीवर नेत होते.
मीही सुरवातीला यात भाग घ्यायचा प्रयत्न करून पाहिला. पण एकतर मला नवीन
गाण्यांपैकी एकही गाणे माहीत नव्हते आणि जी मला माहित होती ती गाणी कोणी
गायला लागले की गुजराती मंडळ ती हायजॅक करून चुकीचे शब्द वापरून वर गरबा
चालीत गात होते. दोन्ही बाजूनी हाच ग्रुप गाणी रगडतोय आपला. मी सहन करू
शकत नाही अशा गोष्टींच्या लिस्टमध्ये गाण्याची चाल बदलून व चुकीचे शब्द
वापरून गाणी गाणे हे टॉप 50 मध्ये येत असल्याने मी अंताक्षरीचा नाद सोडला व
खिडकीबाहेर लक्ष केंद्रित केले.
खिडकीबाहेर जर जमिनीच्या लेवलच्या वर पाहिले तर उंचच उंच हिरवेगार डोंगर,
डोंगरमाथ्यावरून खाली झेपावणारे मजबुत मोठ्ठाले धबधबे, कोणी फेकल्यासारख्या
पडलेल्या शिळा, उंचच उंच वृक्ष, झाडे, झुडपे, डोंगर कापत निघालेले इवलुले
रस्ते, मधूनच डोकावणारी घरे असा नयनरम्य नजारा दिसायचा व जमिनीच्या
लेव्हलच्या खाली पाहिले तर रस्त्याशी काटकोन करत खाली झेपावलेली दरी,
दरीच्या तळाला रोंरावत धावणारी नदी आणि नदीपात्रात पडलेल्या प्रचंड शिळा
हे अंगावर काटा आणणारे दृश्य दिसायचे. मुंबईत असताना 'हिमाचल परिवहन
मंडळाची बस दरीत कोसळून सगळे प्रवासी वाहून गेले' ही बातमी मी चहाचा घोट
घेता घेता नुसती हेडलाईन वाचून बाजूला टाकायचे. इथे मात्र ती बातमी माझीही
असू शकते याची सतत जाणीव होत होती.
मजल दरमजल करत शेवटी 4 वाजता जोशीमठ गाठले. तिथला मुख्य रस्ता
स्वातंत्र्यदिनी संचलन की तसल्याच काही निमित्ते बंद होता असे ऋषीकेशला
मॅनेजरसाहेबांनी सांगितलेले. तो आजही बंद असल्याचे दिसले. ड्रायवर तिथे
ड्युटीवर असलेल्या पोलिसाशी वाद घालत बसलेला तेवढ्यात Yhai चे आजचे ग्रुप
लीडर तिथे येऊन पोचले. त्यांना पाहताच हे गृहस्थ अतिउत्साही आहेत हे लक्षात
आले. पोलिसाशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, बस दुसऱ्या रस्त्याने नेऊन
आपण आपल्या लिस्टवरची 2 देवळे पाहून घेऊ म्हणत त्यांनी ड्रायवरला आवरले व
बस वळवून घेतली. लोकांना खरेतर बेस कॅम्पवर म्हणजेच हॉटेलवर जाऊन फ्रेश
व्हायचे होते पण तसे केले तर देवळे पाहण्यासाठी परत चालत यावे लागेल, बस
येणार नाही असे ग्रुपलीडर साहेबांनी म्हटल्यावर लोक गपचूप देवळे पाहायला
राजी झाले.
बस आम्हाला एक छोट्याश्या देवळाकडे घेऊन गेली. तिथे उतरून आजूबाजूचा परिसर
पहात आम्ही नृसिंहाचे देऊळ पाहायला गेलो. हा नृसिंह म्हणजे आपला भक्त
प्रल्हादवाला नृसिंह, विष्णूचा चौथा अवतार. ह्या देवळात बद्रीविशाल ही
बद्रीनाथमधील देवता थंडीच्या दिवसात राहायला येते. तिकडे वर बर्फ पडायला
लागला की पुजारी तिथली एक मूर्ती घेऊन इथे येतात. नरसिंहाच्या देवळात मग
दोन मूर्ती पूजल्या जातात.
अशी आख्यायिका आहे की नरसिंहाच्या मूर्तीचा उजवा हात दिवसेदिवस कृश होत
चाललाय व एके दिवशी तो हात तुटून पडेल. कलयुगाच्या समाप्तीची सुरवात होतेय
याची ती खूण असेल. नंतर खूप मोठी दरड कोसळून बद्रीनाथला जाणारा रस्ता
कायमचा बंद होईल व कलयुग संपेल. परत सत्ययुग सुरू होईल व बद्रीविशाल आपला
मुक्काम इथून 20 किलो मीटर वर असलेल्या भविष्य बद्रीनाथ मंदिरात हलवतील.
या प्रवासादरम्यान बद्रीनाथच्या वाटेवर इतक्या खतरनाक दरडी कोसळलेल्या
बघितल्या की ही आख्यायिका एके दिवशी खरी होणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही
संशय राहिला नाही. फक्त ते घडताना मी त्या भागात नसावे ही प्रार्थना मी
मनातल्या मनात केली.
नृसिंहाच्या देवळाची व मूर्तीची स्थापना आदी शंकराचार्यांनी केलेली आहे.
देऊळ परिसरात अजून काही मंदिरे आहेत ज्यांना मी बाहेरूनच नमस्कार केला.
आदी शंकराचार्यांचे देऊळही या मंदिरांच्या परिसरात आहे. तिथेच
केदारनाथसारखे दिसणारे एक खूप मोठे दगडी देऊळ बांधून पूर्ण झालेले आहे. आत
मूर्ती स्थापना अजून झालेली नाही.
दोन्ही देवळे पाहून आम्ही बसने हॉटेलात गेलो. आमची खोली मिळताच दोन्ही पोरी
बेडवर आडव्या झाल्या व घोरायला लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच
निघायचे असल्याने जोशीमठ पाहायची संधी मिळणार नव्हता. त्यामुळे आता काळोख
पडायच्या आत जितके पाहायला मिळते तितके पाहून घेऊ म्हणत मी लगबगीने फ्रेश
झाले व एकटीच बाहेर पडले.
थोडी पुढे आले तर सिनियर सिटीझन संजय दिसले. त्यांनी पुढे शंकराचार्य मठ
आहे, चला पाहू म्हणून सुचवताच मीही मठ पहायचे ठरवले. मठाकडे जाणारा रस्ता
जवळजवळ 60 अंशाच्या कोनात वर चढत होता, पण परत कधी पाहायला मिळणार म्हणत मी
निमूटपणे चालायला लागले. संजय चारधाम यात्रेचे डबल पुण्य गाठीशी बांधून
असल्याने त्यांना सगळ्या जागांची खडानखडा माहिती होती.
हिंदू धर्माला संगठित करणारे आदी शंकराचार्य यांनी चार दिशांना जे चार मठ
स्थापन केले त्यात बद्रिकाश्रमी स्थापन केलेला मठ म्हणजे जोतिर्मठ किंवा
जोशीमठ. आठव्या वर्षी संन्यास घेऊन ते वाराणसीला आले, तिथून बद्रीकाश्रमी
आले. इथे त्यांनी जिथे तपसाधना केली ती गुहा पाहायला मिळते. ज्या तुतीच्या
झाडाखाली बसून त्यांनी शंकराची आराधना केली ते झाड, ती शंकर पिंडी व तिथली
अखंड ज्योती आजही पाहायला मिळते. ते झाड कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे.
कल्पवृक्षाचा बुंधा प्रचंड विस्तारलाय. 10-15 लोक हातात हात घालून बुंध्या
भोवती उभे राहिले तर त्यांना बुंधा कदाचित कवेत घेता येईल इतका तो पसरलेला
आहे. बुंध्याभोवती मजबूत लोखंडी जाळी बसवलीय आणि एका बाजूला ती उघडी आहे
जिथून पूजा अर्चा करता येते. अर्थात वृक्षाची पूजा अर्चा का करावी हा
मुद्दा आहेच पण श्रद्धेपुढे आपण काय करणार ?
मी आधी मठाचा परिसर फिरून पाहिला. खूप छान जागा आहे. गच्चीवरून पूर्ण
जोशीमठाचे दर्शन होते. तिथे गुलाबाची झाडे लावलेली ज्याला मंद सुगंधित
टप्पोरे गुलाब लागलेले. मुंबईत कितीही मेहनत घेतली तरी गुलाबाची झाडे काही
बहरत नाहीत अशी मनोमन टिप्पणी करत मी तिथे फिरून शंकराचार्यांची व
त्यांच्या शिष्याची गुहा वगैरे सगळे पाहून घेतले. वर गुहा पाहायला जात
असताना गोड आप्पे तळल्याचा मस्त वास येत होता पण प्रसाद म्हणून कोणी आप्पे
वाटताना दिसले नाहीत याचे थोडे वाईट वाटले.
तिथून खाली येत असताना परत संजय भेटले. ते पुढे चाललेले. पुढे कल्पवृक्ष
आहे तोही पाहून घ्या असा त्यांनी सल्ला दिला. कल्पवृक्षाच्या बुंध्यातच
श्री जोतेश्वर महादेव मंदिर आहे.
झाडाच्या पानांचे वगैरे निरीक्षण करून मी मंदिराकडे मोर्चा वळवला. श्री
जोतेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन, अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन मी कल्पवृक्षाचे
जवळून दर्शन घेत असताना तिथला पुजारी म्हणाला की कल्पवृक्षाला हात लावून
तुम्ही जी काय इच्छा मनात धराल ती पूर्ण होतेच. मी काय इच्छा धरावी याचा
विचार करत होते इतक्यात सुरेस व सोबत संजय तिथे आले. संजयनी व मी सुरेसला
कल्पवृक्षालाच साकडे घाल म्हणून सल्ला दिला. तोही बिचारा घायकुतीला आल्याने
त्याने लगेच कल्पवृक्षाला धरून इच्छा प्रदर्शित केली आणि काय आश्चर्य!!
पुढच्याच क्षणी त्याची कॉर्ड कमरेच्या पाऊचमध्ये सापडली. सद्गदित होऊन तो
परत जोतेश्वराच्या मंदिरात देवाचे पाय पकडायला धावला. (हे आपले उगीच,
शंकराच्या देवळात फारतर नंदीचे पाय धरता येतील). मला आधी काय करावे
सुचेना, पण लगेच स्वतःला सावरून मी हॉटेलकडे धाव घेतली. असा इच्छापूर्ती
कल्पवृक्ष हाताशी सापडलाय तर याचा मुलींनाही लाभ मिळावा या इच्छेने मला
भारून टाकले.
इच्छापूर्ती कल्पवृक्षाबद्दल ऐकताच ऐशु लगेच उठून बसली. रात्रीच्या जेवणात
चिकन सूप मिळावे ही इच्छा मी मनात धरली तर पुरी होईल का ? तिने आशेने
विचारले. माझा संताप संताप झाला. देवभूमी उत्तराखंडात येऊन असल्या इच्छा?
तू थोडी बुद्धीच आधी माग, ती मिळाल्यावर इतर इच्छा आपोआप सुचतील म्हणत
दोघींनाही ओढत देवळात नेले. दोघीनीही कल्पवृक्षकडे कसल्या कसल्या इच्छा
मागितल्या. शामलीने खरेच इच्छा पुऱ्या होणार का हे दोन दोनदा विचारून परत
परत काहीबाही मागत राहिली. तिच्या ग्रुपसाठीही म्हणे मागितले. मुली
काहीतरी अतरंगी मागणार हे मी जाणून असल्याने 'त्यांच्या योग्य इच्छाच
पुऱ्या होवोत, बाकीच्या डीलिट मार रे कल्पवृक्षा' ही इच्छा करून गप्प बसले.
रात्री जेवणानंतर जोशींमठमध्ये फिरताना एका रोडसाईड स्टॉलवर अकस्मात
मोमोज, नूडल्स व पास्ता मिळाल्यावर कल्पवृक्ष खरोखर लगेच इच्छापूर्ती करतो
हा निर्वाळा ऐशूने दिला. मी यांनी अजून काय इच्छा मागितल्या असतील
ह्याचा विचार करणे सोडून दिले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच निघून जोशींमठ ते गोविंदघाट हा 25 किमी प्रवास बसने व
गोविंदघाट ते घागरिया हा 13 किमी ट्रेक पायी करायचा होता. ट्रेक पायी
करणे जरी अपेक्षित असले तरीे आम जनतेसाठी तिथे हेलीकॉप्टर, खेचर, पोर्टर व
पालखीची सोय होती. स्वतःच्या खर्चाने यातले कुठलेही साधन निवडायला yhaiची
आडकाठी नव्हती.
घागरिया











इथवरच्या प्रवासात सुदधा दूरवर डोंगरात घरांचा पुंजका दिसायचा, एखादे छोटे खेडे किंवा वाडी असावी. शहरात, बंद दारामागच्या सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मला असे डोंगरदरीच्या कुशीत राहणाऱ्या लोकांचे कायम कुतूहल वाटत राहिलेय. दूर कुठेतरी, जिथे वीजेचा कायम लपंडाव, जीवनावश्यक वस्तू, सोयी वेळच्या वेळी मिळतील याची अशाश्वती, नैसर्गिक प्रकोपाची धास्ती अश्या वातावरणात लोक कसे राहत असतील? पण ही काळजी फक्त मला. तिथले लोक आरामात होते, बाया एखादी गाय नाहीतर शेरडू हाताशी घेऊन शेजारणीशी निवांत गप्पा मारतांना दिसायच्या. गटागटाने शाळेत जाणारी किंवा येणारी मुले दिसायची. ती मंडळी बहुतेक आमच्याकडेही माझ्यासारखेच प्रश्न डोक्यात घेऊन बघत असतील. 'काय एवढे सोने लागलेय इथे की एवढया लांबून हे लोक कडमडतात इथे' म्हणत असतील मनात.












अधून मधून मेक्सिकन वेव्ह करत होत्या बहुतेक. ते दृश्य मला खूप थरारक वाटले.
तळमजल्यावर होती, म्हणजे खोलीचा दुसरा दरवाजा बाहेरच्या बाजूने जमिनीवर उघडत होता. त्या खोलीत एक भले मोठे गॅसचे चुलाणे आणि त्यावर भला मोठा 1 मीटर व्यास असलेला पाण्याचा टोप ठेवलेला होता. सकाळ संध्याकाळ हे चुलाणे सुरू असलेले पाहिले, कदाचित दिवसभरही असेल पण दिवसा तिथे राहायची वेळ आली नाही. भल्या पहाटे 5 वाजताही गरम पाणी मिळत होते. 50 रुपयात मोठी बादलीभर रनिंग हॉट वॉटर!
घाटीच्या वाटेवर..
दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता दारावर थाप पडली, बेड टी साठी. मी बेडमधूनच ओरडून नको म्हणून सांगितले. उठायचा कंटाळा आलेला पण एकदा जाग आल्यावर उठून बसलेच. साडेसात वाजता निघायचे होते. मी मग गरमागरम पाणी आणून फ्रेश झाले, मुलींना उठवून तयार व्हायला भाग पाडले. हे रोजचे काम लागलेले माझ्या मागे. पोरी ट्रेकला आलेल्या की कुंभकर्णासारखे डाराडूर झोपायला देव जाणे. रोज मला भूपाळ्या गाव्या लागायच्या. तयारी झाल्यावर आम्ही सगळे नाश्ता करून, पॅकेड लंच घेऊन सवासातला खाली गोळा झालो पण गुजराती मंडळाचा पत्ता नव्हता. शेवटी महेश वर जाऊन आल्यावर मंडळ आरामात खाली उतरले.
घाटीला जाणारा रस्ता सँडस्टोन टाकून बनवलेला आहे. रस्ता खूप अरुंद आहे, नीट बांधून काढलेला नाही त्यामुळे तिथे घोड्यांना परवानगी नाही. चालत जायचे नाहीतर पिट्टू, पालखी इत्यादी पर्याय आहेत. पिट्टू म्हणजे खुर्चीत माणसांना वाहून नेणारे नेपाळी पोर्टर . ते माणसाला वेताच्या खुर्चीत बसवून ती खुर्ची पाठीवरून वाहून नेतात. माझ्यासारख्याना हातात काहीही सामान नसताना चालणे कठीण होते तिथे हे लोक पाठीवर 100 किलोचा बोजा लीलया पेलुन नेतात. चालताना एका लयीत चालत राहतात, आपल्यासारखे सुरवातीला सुसाट राजधानी आणि मग कुर्डुवाडी मेल असे चालणे नसते त्यांचे.
आम्ही घाटीला जाणार हे कळताच घोडेवाले बाजूला झाले व पोर्टर जमले. एक दोघांना भाव विचारले. शेवटी एकजण जाऊन येऊन 3,000 म्हणाला. उगीच भाव करत बसणे मला योग्य वाटले नाही. ज्याने हा सौदा ठरवला तो दुसऱ्या पोर्टरला घेऊन आला आणि हा घेऊन जाईल म्हणाला. पण स्वतः तोही बरोबर चालायला लागला. मला पिट्टू करायचा आग्रह करायला लागला. मी त्याला निक्षून नकार दिला तरी त्याने आमची पाठ काही सोडली नाही. मी त्याला जायला सांगितले तरीही हटेना. शेवटी मी म्हटले ये बाबा, सोबत यायचे तर ये, तुझी मर्जी. मी काही ठरल्यापेक्षा जास्त पैसे देणार नाही.
घागरियातून वरच्या दिशेने गेले की पुढे 2 रस्ते लागतात. खालून आला तितकाच मोठा आणि दगडात बांधून काढलेला रस्ता तसाच सरळ वर हेमकुंडला जातो. त्याच रस्त्याला एक डावा फाटा फुटतो जो घाटीत जातो. हा रस्ता खूप चिंचोळा आहे. सुरवातीला तर चालवणार नाही इतके गोल गुळगुळीत लहानमोठे दगड रस्त्यात आहेत. पिठठू पण या रस्त्यावरून सवारी नेत नाहीत. जरी खालूनच पिठठू केला तरी घाटीच्या ऑफिसपर्यंत आपल्याला चालावे लागते या त्यानंतर पिठठूस्वारी. तर त्या रस्ता म्हणता येणार नाही अशा रस्त्यावरून कसेबसे पुढे गेले की घाटीचे ऑफिस लागते. तिथे पास घ्यावा लागतो जो तीन दिवस चालतो. आमचा पास yhai ने काढला पण ऐशूच्या पोर्टरचा पास मला काढावा लागला. हॉटेलमध्येच आम्हाला आमचा गाईड अंशुल भेटलेला. त्याने इथे ऑफिससमोर उभ्या उभ्या आमची मिटिंग घेऊन कुठल्याही फुलाला हात लावू नका, वास घेऊ नका व तोडू नका, फुले विषारी असतात म्हणून सांगितले. अर्थात मी फुले तोडणार नव्हतेच पण सरसकट सगळी फुले विषारी नाहीत हे मला माहित होते.
ऑफिसच्या बाहेर घाटीत कुठल्या महिन्यात कुठली फुले फुलतात याचा बोर्ड लावलेला. बोर्ड थोडा सुस्थितीत व वाचता येईल असा ठेवायला काहीच हरकत नव्हती. ऱ्होडोडेंड्रोन म्हणजे बुरांश, मे मध्ये फुलतात हे वाचून अचानक ट्यूब पेटली. गोविंदघाटातून घागरियाला येताना वाटेत काही झाडे पाहिलेली ज्यांची पाने खूप ओळखीओळखीची वाटत होती पण नाव लक्षात येत नव्हते. ती सगळी ऱ्होडोडेंड्रोन होती. या झाडाची पाने नेहमी आता आपण गळणार की काय या चिंतेत आधीच खाली मान टाकून असतात. एवढी चिंता करूनही पाने गळत नाही ती नाहीच.
हा रस्ताही नेहमीसारखा एक बाजू डोंगर व दुसरी बाजू दरी असा सजला होता. दुतर्फा भरपूर फुले फुललेली होती. आमचा पिठठू आमच्यासोबतच अतिशय हळू हळू पण एका लयीत चढत होता. मध्ये मध्ये उंच बाकासारख्या जागा केलेल्या आहेत, तिथे पाठीवरची सवारी उतरवून थोडा आराम करता येतो.
अवघड रस्त्यावरून जाताना हा दुसरा पोर्टर माझा हात धरून नीट सांभाळून नेत होता. नेपाळची माहिती देत होता. त्याच्या मते नेपाळला इथल्यापेक्षा जास्त सुंदर फुले आहेत पण तिथे जायची, राहायची काहीही सोय नसल्याने पर्यटक त्या फुलांपर्यंत पोचू शकत नाहीत. पोटापुरते धान्य पिकवण्याइतपत शेती त्याच्याकडे होती पण त्याव्यतिरिक्त जगायला जे काही लागते त्यासाठी लागणारा पैसा कमावण्याची फारशी साधने तिथे नसल्याने त्याला भारतात यावे लागत होते. त्याला इथले काहीही आवडत नव्हते, इथली कोंबडीदेखील त्याला उकडलेल्या बटाट्यासारखी लागत होती पण करणार काय? गेली कित्येक वर्षे नेपाळ सरकार झोपेत होते, आताचे सरकार बरे आहे, काहीतरी चांगले होईल यावर त्याचा विश्वास होता.
चालता चालता त्याच्याकडून अजून बरीच माहिती मिळत होती. घाटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांवरच यांचे पोट अवलंबून असते. सिजनमध्ये रोज साधारण किती पर्यटक येतात विचारल्यावर कधी दिवसाचे 200 -300 पर्यटक असतात तर कधी चार पाच सुद्धा नसतात म्हणाला. घाटी खूप उंचीवर असल्यामुळे इथे कधी पाऊस पडेल त्याचा भरोसा नसतो. आम्हालाही दुपारी 2 पर्यंत परतीचा रस्ता धरा म्हणून सांगितलेले कारण त्यानंतर कधीही पाऊस कोसळू शकतो. आमचे नशीब जोरदार असल्याने आम्ही तिथे असताना लख्ख ऊन होते. पाऊस जास्त पडतोय असे वाटले तर घाटी बंद करतात. हेमकुंडला मात्र कितीही पाऊस असला तरी जाता येते. असा पाऊस असला की पोर्टर बसून राहतात. हेमकुंडला जाणारे बहुतेकजण घोड्याचा पर्याय निवडतात.
हे सगळे ऐकून घाटीला जायचा रस्ता नीट का नाही करत? सुरवातीला इतके दगड पडलेत ते नीट करायला काय जाते? रोपवे सुरू करणे शक्य आहे का? वगैरे विचार माझ्या मनात आले. उत्साहाच्या भरात सरकारला दोन चार शिव्या घातल्यानंतर माझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला. तिथे जाणे जर सोप्पे झाले तर त्याचे कासचे पठार नाही का होणार? माणसाचा पाय जिथे पडतो तिथल्या निसर्गाचा सत्यानाश होतो हा इतिहास नसून वर्तमान आहे. त्यामुळे घाटीला जाणारा रस्ता असा दुर्गम असण्यातच घाटीचे भले आहे.
या रस्त्यावर वाटेत कुठेही चहाची टपरी वगैरे काहीही नाही. असे काही थाटण्याइतपत मोकळी जागा घाटीच्या रस्त्यावर कुठेही नाही.
'कोणीतरी अंगरेज बाई इथे रोज यायची, तिनेच घाटी शोधली' असे बऱ्याच वर्षांपासून ऐकून होते. कालांतराने 'बाईने शोध लावला नसून कोणी बुवा इथे वाट चुकून आला त्यामुळे बाईला कळले' ही भर त्यात पडली. मीही याबाबत फारसे खोलात गेले नव्हते. पण इथे आल्यावर इथला जंगली वृक्षांनी वेढलेला, जरा पाय घसरला तर थेट स्वर्गारोहण घडवणारा रस्ता बघितल्यावर या सगळ्या गावगप्पा असणार असे वाटायला लागले. कोणीही सामान्य बुद्धीचा माणूस या रस्त्यावर चुकून आलाच तर आपण वाट चुकलोय हे तात्काळ त्याच्या लक्षात येईल व तो मागे फिरेल.
म्हणून मग नेटवर शोधाशोध केली तेव्हा कळले की 1931 साली कामेत शिखर सर करून परतणारे तीन ब्रिटीश गिर्यारोहक वाट चुकून घाटीत उतरले व हा फुलांचा खजिना त्यांच्या हाती लागला. म्हणजे ते मी आता जात होते त्या रस्त्याने वर गेले नाहीत तर वर असलेल्या फुलांच्या मोकळ्या पठारावर ते त्याही वरच्या बाजूने उतरले. या पठारावरील पुष्पसंपदेच्या प्रेमात पडून त्यांनी याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नाव दिले. त्या गिर्यारोहकांपैकी एकाने या घाटीवर पुस्तकही लिहिले. 1939 साली इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनने घाटीवर संशोधन करण्याचे ठरवले. जोन मार्गारेट त्यानिमित्ते इथे आली. घाटीत संशोधन करत असताना पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. तिची बहीण त्यानंतर इथे आली व तिने घाटीत जोन मार्गारेटचे एक स्मारक उभारले. 1939 साली आजच्या मानाने काहीही सुविधा नसताना या दोघी मुली इतक्या प्रतिकूल हवामानात घाटीत जा ये करत होत्या हे वाचून विस्मित व्हायला झाले. कामात रस असला की कुठल्याही अडथळ्यांची क्षिती वाटत नाही हेच खरे!

काल आम्ही घागरियासाठी चढत होतो तेव्हा एक तरुण विदेशी जोडपे आमच्यासोबत चढत होते. या विदेशी लोकांची खरेच कमाल असते. पाठीवरच्या सॅकमध्ये ढिगानी सामान भरून ते आरामात फिरतात. ह्या जोडीला कुठेही जायची घाई नव्हती. घागरियाच्या वाटेवर ते अधून मधून दरीत पाय सोडून निवांत बसलेले पाहिले होते. आताही ते आम्हाला ओलांडून पुढे निघून गेले. 'अब ये सिधे अंगरेज के कबर पे जायेंगे' इति पोर्टर.
घाटीसाठी चढत असताना त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या हेमकुंड साहिबला जाणारा रस्ता दिसत राहतो. 'वो उप्पर गेटजैसा दिख रहा है ना, बस उसके आगे है थोडासा' पोर्टर ने रस्ता दाखवून ज्ञानदान केले. ते बघून उद्याचा दिवस खूप कठीण आहे याची मनाने नोंद केली. तो निसर्गनिर्मित तथाकथित गेट डोंगराच्या टोकाला होता आणि तिथे जाणारा रस्ता V शेपमध्ये दिसत होता. V चे पुढचे तंगडे किती चढाचे आहे दिसते ना डोळ्यांना? बस तो रस्ता तसाच दिसत होता. रस्त्याला कठडे म्हणून पांढऱ्या-लाल पट्ट्या लावलेल्या, त्यामुळे इतक्या लांबूनही रस्ता ओळखू येत होता. उद्या पायी चढाई अशक्य ही खूणगाठ तिथेच मनाशी बांधली.
वाटेत फुलेच फुले जरी असली तरी उंच गगनाला भिडलेली झाडेही भरपूर होती. खरेतर झाडे भरपूर होती असे म्हणणे चूक आहे. आम्ही जंगलातल्या पायवाटेवरून चालत होतो हे म्हणणे जास्त बरोबर आहे. आणि जंगलात झाडे नसली तर ते कसले जंगल? पक्ष्यांचे आवाज भरपूर येत होते पण बुलबुल व दयाळ हे नेहमीचेच आवाज मला ओळखता येत होते. बाकी इतर पक्षी ओळखायचे कान व पहायची दृष्टी मला अजून लाभलेली नाही. शहरात मला पक्षी भेटतात पण जिथे भेटायला हवेय तिथे नाही भेटत.
झाडांमध्ये भूर्जपत्राची म्हणजे इंडियन बर्चची झाडे भरपूर दिसली.

देवदाराची झाडेही भरपूर दिसली. देवदार इतके उंच वाढतात की बुंध्याला चिकटून वर पाहिले तरी टोक दिसणे अशक्य.

घाटीतल्या फुलांचे फोटो पाहिलेले तरी घाटी नेमकी कशी दिसते याची मला फारशी कल्पना नव्हती. अजून किती चालायचे आहे म्हणून पोर्टरला अधून मधून विचारत होतेच. चालता चालता त्याने ती बघा घाटी म्हणून एका विस्तीर्ण पठाराकडे काठीने निर्देश केला. समोर खूप लांबवर पूर्ण हिरवेगार पठार दिसत होते.

ये है घाटी?
हा, यहीसे शुरू होती है।

'अरे हे तर हिरवे पठार दिसतेय, फुलांचा मागमूसही दिसत नाहीये, याच्यासाठी का इतकी पायपीट करतेय मी? उगीच हाईप केलीय बहुतेक ही जागा' हे सगळे विचार एका मागोमाग एक मनात येऊन मी बरीचशी निराश झाले.
ह्या पठारावर काय दिसणारे एवढे? उगीच लोक काहीही लिहितात आणि आमच्यासारखे मूर्ख धावत सुटतात... असले काहीबाही मनात येत होते.

वर जे दिसतेय त्याचा थोडा जवळून फोटो. इथे फुलांची गर्दी होती जी नंतर जवळ गेल्यावर लक्षात आली.

इतनीही है क्या घाटी? म्हटल्यावर तो म्हणाला की खूप मोठी आहे, इथे दिसते ती केवळ सुरवात. पुढे भरपूर मोठी आहे, एका दिवसात बघून होणार नाही.

बघू आता काय काय दिसते ते म्हणत मी चालत होते.
घाटी दर आठवड्यात रंग बदलते म्हणे. त्या आठवड्यात घाटीने गुलाबी व
पांढऱ्या रंगाची ओढणी ओढलेली ही बातमी आम्हाला खालीच मिळालेली.
त्याप्रमाणे अधून
मधून गुलाबी रंग मला लांबून दिसत होता पण बाकी हिरव्या रंगाचेच प्राबल्य दिसत होते.

जसजशी घाटी जवळ यायला लागली तसा फुलांचा कुंद वास आसमंतात भरलेला जाणवायला लागला. फुलांच्या वासाने मला नेहमीच ताजेतवाने वाटते. अब तो आ गयी घाटी पोर्टर म्हणाला. समोर पाहिले तर लांबवर एक उंच दगड दिसत होता व त्याच्या सावलीत उभी राहून शामली 'आत्या, आत्या' म्हणून हाका मारत होती. ह्या दगडाला पोर्टर घाटीचे गेट म्हणत होते. घाटी इथून सुरू होते.

आमचा पूर्ण ग्रुप तिथे बसलेला दिसला. आजूबाजूला पोर्टर लोक आराम करत होते. पिट्टू व पालखीतून आलेले लोक तिथे उतरून पुढे घाटी बघायला गेले होते, त्यांचे पोर्टर झोपा काढत होते.

लाल दिसतेय ती पालखी. 1 आकडा लिहिलाय तिथे बसायचे, मागे दोन पोर्टर व पुढे दोन पोर्टर. याचे दिवसाचे भाडे 10,000 पासून पुढे, सवारी किती जड त्याप्रमाणे. बाजूला दिसतोय तो पिट्टू म्हणजे वेताची खुर्ची.
तिथे बसून आम्ही डब्बा खाल्ला. ते काम झाल्यावर महेश व अंशुलने सगळ्यांना एकत्र करून 'ज्यांना नदीकिनारी यायचंय, त्यांनी माझ्यासोबत या' जाहीर केले. महेश गेल्यावर्षी घाटीला येऊन गेलेला, त्याला यंदा नदीकिनारी जाण्यात रस होता. ग्रुप गेला उडत असे बहुतेक मनाशी बोलत तो, अंशुल, शामली, हरयाणवी मित्र, नूपुरा, अशोक वगैरे सगळे भराभर चालत पुढे गेले. आम्हाला त्या वेगाने जाणे जमले नसते व तसेही आरामात चालत जितके दिसेल तितके पहायचे हे उद्दिष्ट मनात आधीच ठरले होते. ग्रुपपैकी गुजराती व बेंगलोरी मंडळे कुठेही दिसली नाहीत. बाकी सगळे दिसले.
ऐशू ज्याच्या पाठीवरून आलेली तो पोर्टर आम्ही पोचल्यावर लगेच जमिनीवर आडवा झाला. खूप दमलाय का म्हणून विचारले तेव्हा त्याला सर्दीने ताप आल्याचे कळले. औषध वगैरे काय घेतले का विचारल्यावर, काही नाही उत्तर मिळाले. त्याला सॅरिडॉनच्या 2 गोळ्या दिल्या. मग आमची स्वारी घाटीकडे वळली.
लांबून पाहिल्यावर हिरवे पठार वाटणारी घाटी जवळून काही वेगळीच दिसत होती. असंख्य फुले फुललेली होती, त्यांचा एकत्रित धुंद वास आसमंतात भरला होता आणि आपण स्वर्गात आहोत असा भास होत होता. याआधी फक्त प्रदर्शनातुन विविध फुले मी एकत्र पाहिली होती. पण नैसर्गिकरित्या फुललेली, तरीही इतके वैविध्य असलेली फुले मी पहिल्यांदाच पाहत होते. दूरवर नजर टाकली तर फुलांच्या भरगच्च ताटव्यातून बांधून काढलेली नागमोडी पायवाट, दुतर्फा मी-मी करत डोके काढणारी गच्च फुलझाडे, अधून मधून वाहता झरा इत्यादी सिनरी दिसत होती. स्वर्गाचे तिकीट मिळालेच तर तिथे काय दिसेल याची झलक मला दिसत होती.
घाटी पहिल्यांदा पाहिल्यावर मनात आलेल्या विचारांचा आता कुठे मागमूसही उरला नव्हता. नव्या उत्साहाने मी व माझ्यामागून ऐशूने घाटीच्या पायवाटेवर पाऊल टाकले.

घाटी:
गच्च गालिचे वाटावेत :

अजून काही फोटो:
हा फोटो मोठा करून पाहिल्यास खाली एक स्त्री दिसेल. तो पॉईंट अतिशय सुरेख होता, मी तिथे अर्धा पाऊण तास बसून पाण्याचा खळखळाट ऐकत होते. याचा विडिओही अशे, तो अपलोड करून खाली लिंक देते. घाटीत असे नयनरम्य नजारे ठिकठिकाणी आहेत. उगीच हावरटासारखे सगळे बघत फिरण्यापेक्षा जागोजागी मन भरेपर्यंत थांबून सगळे डोळे भरून पहाण्याकडे आमचा कल होता. अर्थात त्यामुळे बरेच पाहायचे राहिले पण जे पाहिले ते मनावर कायमचे कोरले गेले. डोळ्यांसमोर आपोआप विडिओ फिरत राहतो.

एका वळणावर गुजराती मंडळातली एकजण दिसली. ट्रेक सुरू झाल्यापासून ती मोबाईल एकतर हातात धरून नाहीतर स्टिकवर चढवून सेल्फी काढण्याच्या पोझमध्ये फिरत असताना दिसायची. तिला सगळ्यांनी सेल्फी क्वीन नाव ठेवलेले. तिला इथे बसून मोबाईल समोर बडबड करताना पाहून अचानक माझी ट्यूब पेटली. ती ट्रॅव्हलॉग रेकॉर्ड करत होती.

दूरवर दिसणारी बर्फाच्छादित पर्वतशिखरे

प्रत्यक्ष घाटीत!!!!
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/64260
आम्ही पायवाटेवरून चालायला सुरुवात केल्यावर माझा पोर्टरही मागून यायला लागला.(त्याचे नाव विसरले.) बाकी कोणी पोर्टर घाटीत नव्हते, सगळे त्या मोठया दगडी गुहेत आराम करत होते. मी याला म्हटले की सोबत यायची तशी गरज नाही पण तो तरी आला मागून…

घाटी चढताना दिसलेले हिरवेगार गवती पठार प्रत्यक्षात कमरेएवढ्या उंच झाडांचे दाट जंगल आहे.

आपण दुरून जंगल बघतो तेव्हा झाडे आपल्यापेक्षा खूप उंच असल्याने आपल्याला लांबून बुंध्याची गर्दी दिसते. घाटीतली झाडे आपल्यापेक्षा खूप बुटकी असल्याने आपल्याला लांबून त्यांचे हिरवेगार माथे दिसतात व त्यामुळे पठार पाहतोय असे वाटते.

काही झाडे 5-6 फूट एवढीसुद्धा वाढलेली आहेत पण ती सगळीच फुलझाडे असल्याने खूप नाजूक आहेत. अधून मधून मोठी झाडेही वाढलेली आहेत, पण ती या फुलांच्या भानगडीत न पडता स्वतःचा ग्रुप करून वेगळी राहतात.

उत्तराखंडभर पसरलेल्या शिळा इथेही इथे तिथे पडलेल्या आहेत, ज्याला टेकून आपल्याला आराम करता येतो. काही उत्साही लोक शिळांवर चढून निवांत बसले होते.

घाटीत आमच्या ग्रुपचे लोक फारसे दिसले नाहीत. शामली वगैरे आधीच पुढे निघून गेली होती. त्यांना नदीकिनारी जायचे होते जे तिथून 5 किमी दूर होते. हम वहातक नहीं जायेंगें हे मी पोर्टरला आधीच सांगून टाकले. निदान स्मारकापर्यंत जाऊ असे तो म्हणाला. म्हटले बघू. आमच्या जितके आवाक्यात आहे तितके पाहू.
बाकी गुजराती ग्रुप मधले एखादे चुकार वासरू अधून मधून दिसायचे. रमेशसुरेश अजिबात दिसले नाहीत. बंगलोर ग्रुपपण सगळा गायब. बेंगलोरी नवराबायको एका शिळेवर चढून आराम करत बसलेले. बायको शांत बसलेली त्यामुळे नवरापण निवांत.

मलाही शिळेवर चढून थोडे शायनिंग करायचे होते, पण माझे फोटो काढायला उत्सुक फोटोग्राफर कुणी नव्हतेच तर कसली शायनिंग मारणार.... तरी हातापाया पडून एक फोटो काढून घेतला.

घाटीत टाचणीएवढया बारीक फुलांपासून तळहाताएव्हढ्या मोठ्या फुलांपर्यंत वैविध्य आहे. सगळी फुले एकात एक मिसळून वाढतात, एकात एक गुंतलेली वेगवेगळी फुले एकत्र नांदतात, त्यामुळे खूप लक्षपूर्वक पाहावे लागते. टाचणीएव्हढया फुलांचे प्रत्यक्ष रूप पाहण्याची माझ्या डोळ्यांची क्षमता नसल्याचे मला जाम वाईट वाटत होते. परत घाटीत गेले तर मी सोबत भिंग घेऊन जाणार आहे. आणि फोटो काढायला सोबत जिप्सी हवा. (माझेही एखाद दोन फोटो भिडेखातर काढून देईल बिचारा.)
ह्यात बघा कमीत कमी तीन प्रकारची फुले दिसताहेत. आणि ती काळी फुले आहेत तो पूर्ण गुच्छच टाचणीएवढा आहे. त्यातले प्रत्येक फुल किती मोठे असेल देव जाणे. मुळात फुल कसे दिसते तेही मला नीट दिसू शकले नाही. तिथे भिंग हवे.

ती काळी फुले थोडी जवळून… फोटोत मोठी वाटताहेत, प्रत्यक्षात एक गुच्छ टाचणीएवढा.. हिमालयन थरोवॅक्स
thorowax root.

Botanical name : bupleurum candollei.

खालच्या फोटोतल्या फुलाचे नाव माहीत नाही बहुतेक हिमालयन स्ट्रॉबेरी असावी पण त्याच्या वरच्या बाजूला हिमालयन थरोवॅक्स व खालच्या बाजूला लॉंग स्टेम थरोवॅक्स आहेत असा माझा अंदाज आहे.

आणि पिवळी फुले - जॅकमॉंट्स लिगुरिया. Ligularia jacquemontiana

अजून थोडी पिवळी फुले - आनंदी सेनेसीओ
Senecio laetus

लांबून पठारासारखी सपाट वाटली तरी घाटीत चढउतार भरपूर आहेत. पुष्पावती ही एक मोठी नदी घाटीतून वाहते, अधून मधून लहानमोठे झरे वाहतात जे त्या नदीला जाऊन मिळतात. लोकांना चालण्यासाठी दगडी पायवाटा बांधल्यात, त्या नागमोडी दगडी पायवाटेवरून चालत फुले पाहत फिरताना खूप मस्त वाटते. झरे कधी मिनी नदीत रूपांतरित होतात. अशा ठिकाणी झऱ्यांवर छोटे पूल बांधलेत.

हा ब्रिज
अगदी खेळण्यातला वाटतो ना? तसाच आहे. आणि चालताना कधी पायाखाली येतो कळतही नाही.
यावरून पलीकडे जायचे. एकावेळी एकानेच.

फुलांचा कुंद वास हवेत गच्च भरलेला, आपण मस्त रमतगमत चालतोय, स्वच्छ पाणी खळखळाट करत वाहतेय, वाटले तर तेच पाणी आपण हाताने उचलून थेट पितोय, भुंग्याची व मधमाशांची गुणगुण जोरात सुरू आहे. माणसांचे तुरळक आवाज सोडल्यास इतर कुठलाही मानवनिर्मित आवाज रसभंग करत नाहीये. भुंगे, मधमाश्या, फुले, झाडे, डोंगर, झरे असा रसरशीत जिवंत निसर्ग आजूबाजूला अखंडित हालचाल करत असूनही एक विलक्षण स्तब्धता वातावरणात पसरलीय असे काहीसे नशिले स्वप्नवत वातावरण घाटीत अनुभवास येते. फक्त आमच्या नशिबी होता तसा स्वच्छ सूर्यप्रकाशी दिवस मिळायला हवा.

हा एक झरा, याचे पाणी पिता येते.

मी पोर्टरचा सल्ला विचारून पाणी पीत होते.
हेही वाहते पाणी आहे, डोळ्यांना दिसत नसले तरी 

हे पण तिथेच बाजूला

आपण काहीतरी पाहत चालत असतो, चालता चालता वळणावर वळून पुढे गेलो की अचानक काही वेगळाच नजारा समोर उभा ठाकतो. घाटी ही खरेच प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. कॅमेऱ्यात प्रत्येक फुलाचे सौंदर्य बंदिस्त करता येईल पण अशी वेगवेगळी सौंदर्यस्थळे बेगुमानपणे, अनियंत्रित फुललेली पाहणे काय आहे ते अनुभवण्यासाठी मात्र घाटीतच जावे लागेल.

जून ते सप्टेंबर हे चार महिने घाटी पर्यटकांसाठी खुली असते. बाकीचे महिने शुभ्र हिम पांघरून फुलबिया झोपलेल्या असतात. जून महिन्यात बर्फ वितळू लागते व बिया जाग्या होऊन रोपे डोळे चोळत माना उंचावू लागतात. आठ महिने पांढरीशुभ्र असलेली घाटी या महिन्याच्या शेवटी शेवटी हिरवा शेला पांघरून घेतलेली दिसते. जून महिन्यात घाटीला गेल्यास वितळणाऱ्या हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर्स व वाढत असलेली रोपे दिसतात. जून महिन्यात गोल्डन लिली फुलते जी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसते. आम्हाला अर्थातच दिसणे शक्य नव्हते.
वर पाहिलेले लाल फुल परत एकदा -

हे आहे रुबी सिंकफॉईल. याचे शास्त्रीय नाव Potentilla argyrophylla scarlet starlit.
हे एक रूप

हे खालचे सिल्वर लिफ सिंकफॉईल. शास्त्रीय नाव Potentilla fruicticosa.

त्याची फळे असावीत का ती? किती गोड दिसताहेत..

खाली दिलेय ते जेरॅनियम.

याला हिल जेरॅनियम म्हणतात. Geranium collinum

हे मिडो जेरॅनियम . Geranium Pratense

हेही तेच

अजून एक रूप

ह्या खालच्या गर्दीत हिमालयन बालसम, थरोवॅक्स, जेरॅनियम आणि अजून एक खूप लहान फुल आहे.

खालच्या फोटोतल्या जेरॅनियमला हिंदीत रतनज्योत म्हणतात असे फ्लॉवर्स ऑफ इंडिया सांगतेय. Wallich geranium.
बोटॅनिकल नाव Geranium Wallichianum
हे नेपाळ जेरॅनियम. Geranium nepalense. बाकी जेरनियम च्या तुलनेत खूप
लहान. बाकीची साधारण जुन्या मोठया 1 रुपयाएवढी होती, हे चार आण्याचे
नाणे 

यात हा रंग सुद्धा दिसला.

जुलै - ऑगस्ट हे घाटी पाहायचे खरे महिने. जून मध्ये तरारलेली रोपटी या महिन्यात फुलू लागतात. जुलैच्या सुरवातीपासून एपिलॉबीयम लॅटिफोलियम फुलायला लागते. याला तिथे रिव्हर ब्युटी म्हणतात. मला हे फुल पहावयास मिळाले नाही. नदीच्या आसपासचा भाग या फुलाने पूर्ण भरून जातो व घाटी गुलाबी दिसायला लागते.
गुलाबी रंगात मी ही फुले पाहिली -

ही लौस्वर्ट असू शकतील.
खालचे बहुतेक हिमालय विलो हर्व असावे.
Royle's Willow-Herb,
Botanical name: Epilobium royleanum Hausskn. Epilobium royleanum
ऑगस्टपर्यंत हिम पूर्णतया वितळून गेलेले असते व असंख्य फुले दाटीवाटीने ऊन खात उभी असताना पहावयास मिळतात. फुलांची सर्वाधिक संख्या जरी ऑगस्टच्या मध्यावर पाहायला मिळाली तरी तोवर कित्येक फुलझाडे त्यांचे एका आठवड्याचे आयुष्य जगुन बिया जमिनीत टाकून परत झोपलेली असतात. हे चक्र सतत चालतच असते, त्यामुळे घाटीतल्या फुलांचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर जून ते सप्टेंबर ह्या दरम्यान वेगवेगळ्या वेळी येऊन दरवेळी वेगळी फुले पाहून तो घेता येतो. ब्लु पॉपी हे तिथले एक प्रसिद्ध फुल आम्ही तिथे जायच्या आधीच फुलून गेले होते. अर्थात हेमकुंडच्या रस्त्यावर आम्हाला ते भेटले, पण त्याचे घाटीतले आयुष्य संपले होते.
खाली दिलेली फुले तुऱ्यात येतात. एक फुल नखाएव्हढेही नसेल, अशी असंख्य फुले एका तुऱ्यात असतात.
हा एक तुरा:

फुललेली फुले :

याचे नाव हिमालयन नॉटविड. गर्द गुलाबी दांडा व त्यावर अतिशय फिक्कट गुलाबी फुले. याचे भरपूर पीक आहे घाटीत. अतिशय सुंदर दिसतात ही फुले.

बोटॅनिकल नाव : Persicaria wallichii. फुले किती लहान असतील याचा एक अंदाज.

आम्ही गेलो त्या दिवशी घाटीत फारशी गर्दी नव्हती. आम्ही चालत असताना अधून मधून कोणी भेटायचे. एक स्त्री जी खाली झऱ्याकडे भेटलेली ती परत एकदा वर भेटली. आम्हा दोघींना पाहून तिने दोन मैत्रिणी ट्रेक करताय का विचारले. मला सांगायला थोडा संकोच वाटत होता तरी मी म्हटले आमचा मायलेकींचा ट्रेक आहे. तिने आधी ओSSS असा दीर्घ आवाज काढून भुवया वगैरे उंचावल्या व नंतर तोंड वाकडे केले. म्हणाली, हे माझ्यासोबतही नेहमी होते. मला यात तोंड वाकडे करण्यासारखे काय ते कळेना. तर म्हणे मी आईसोबत असले की लोक आम्हालाही मैत्रिणी समजतात. मी म्हटले ही तर कॉम्प्लिमेंट आहे, यात वाईट काय? तेव्हा उसासा टाकून ती म्हणाली की ही आईसाठी कॉम्प्लिमेंट आहे, पण माझे काय? आईला ती आहे त्यापेक्षा कमी वयाची समजतात ते ठीक आहे पण तिला ज्या काही वयाची समजतात त्याच वयाची मलाही समजतात त्याचे काय? माझ्यासाठी ही कॉम्प्लिमेंट नाही. हा मुद्दा आजवर माझ्या लक्षात न आल्याचे मी मान्य केले. ऐशु अजून तेवढी मोठी न झाल्याने सध्या तरी तिला काही प्रॉब्लेम नाहीय :).
हे अल्पाईन मांजराचे शेपूट
alpine कॅट टेल. Phleum alpinum

हे फुलझाड बघून आपल्याइथल्या तालीमखाना ह्या फुलझाडाची आठवण झाली. तेही असेच दिसते. याला व्हर्लफ्लॉवर म्हणतात, शास्त्रीय नाव Morina longifolia. याला अतिशय सुंदर गुलाबी फुले येतात. बहुतेक फुले येऊन गेली आणि नुसते झाड मला भेटले.

आधीच लिहिल्याप्रमाणे घाटीत विविध आकाराच्या व रंगाच्या इंपेशन्स उर्फ बालसमचे अमाप पीक येते. नखाएव्हढी ते बोटाएवढी लांब फुले आणि गुलाबी, पिवळा व पांढरा ह्या तीन रंगांत वेगवेगळे कॉम्बिनेशन हे इतके तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला सहज दिसले. तज्ञ मंडळींना त्यातले अजून काही बारकावे दिसत असणार. एका आठवड्यात गुलाबी बालसम सर्वाधिक फुललेली असते तर पुढच्या आठवड्यात पांढरी तर त्या पुढच्या आठवड्यात पिवळी. इतर सर्व फुलझाडांच्या गर्दीत बालसम डोके वर काढून उंच मिरवत असल्याने लांबून ज्या रंगाची बालसम फुललीय त्या रंगाची ओढणी घाटीने पांघरल्यासारखी दिसते. दर आठवड्यात नवनवीन फुले फुलायचे काम सुरू असल्याने घाटी दर आठवड्याला रंग बदलते. ही हिमालयन बालसम 6 फुटांपर्यंत वाढलेली मी पाहिलीय. याचे आपल्याकडचे भावंड म्हणजे तेरडा जेमतेम दीड फूट वाढतो.
बॉलसमचे काही फोटो:
घाटीत जीचे स्मारक आहे त्या मिस जोन लेगीचे नाव दिलेले बालसम. बोटॅनिकल नाव : Impatiens leggei

हे बहुतेक Meebold's Balsam असावे. Impatiens meeboldii

हे हिमालयन बालसम असावे. लांबी साधारण आपल्या बोटाएवढी. ही दोन फुले एकाखाली एक आहेत.
शास्त्रीय नाव Impatiens sulcata.

हे Rugged Yellow Balsam, Impatiens cristata

घाटीत फुलांच्या जागांचाही एक क्रम आहे. जरी वेगवेगळी फुले एकत्र फुलत असली तरी त्यात एखादया फुलाचे प्राबल्य असते. चालत थोडे पुढे गेले की त्या फुलाचे प्राबल्य कमी होते आणि त्याजागी दुसरे फुल जास्त दिसायला लागते. त्यामुळे एका दिवसात कितीही फिरलो तरी घाटीतली सगळी फुले पाहिल्याचे समाधान काही लाभत नाही. यासाठी एकच उपाय - कुठल्याही टूर ऑपरेटरच्या नादाला न लागता आपले आपण येऊन आठवडाभर इथेच मुक्काम करायचा. टूर ऑपरेटर फक्त एक दिवस घाटी दाखवतात.
घाटीत फिरताना जेव्हा ही मान टाकून पडलेली, सुकल्यासारखी दिसणारी काळी फुले प्रथम दिसली तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, सुकलेली फुले म्हणत. सुकून काळी पडलेली, मिटल्यासारखी दिसणारी अतिशय अनाकर्षक फुले.

ही फुले ताजी असताना कशी दिसत असावीत हा विचार करत असताना अचानक एका फुलातून भुंगा बाहेर पडून दुसऱ्या फुलात घुसला. सुकलेल्या फुलात भुंगा काय करतोय?

मी पोर्टरला विचारले, ये फुल सुख गये है ना?
'नहीं, ये फुल ऐसेही है। हमारे नेपालमेभी ये है।' तो उत्साहाने म्हणाला.
मी नव्याने त्या फुलांकडे पाहू लागले. कुठल्याही बाजूने ही फुले ताज्या फुलांसारखी दिसत नव्हती पण भुंगा इंटेरेस्टेड आहे म्हणजे फुले ताजी व आतमध्ये मध असणार हे निश्चित.
याचे नाव कूट किंवा कुष्ठ. बोटॅनिकल नाव: Saussurea auriculata

वर या फुलांसोबत पांढरी फुले दिसताहेत ती आहेत मिल्क पार्सली. दुधासारखी पांढरी शुभ्र.

मी याला गुपचूप ओवा नाव देऊन टाकले

ही फर्न लिफ मिल्क पार्सली. बोटॅनिकल नाव :Selinum filicifolium

लांबून अशी दिसतात

खालच्या फोटोत बहुतेक दोन जाती एकत्र झालेल्या आहेत.

ही आहेत मोऊंटन अँजेलिका. मी याला बडीशोप नाव दिले 

शास्त्रीय नाव Angelica oreadum

हि फुलेही वरच्या मिल्कविड सारखी मोठ्या गुच्छात येतात.

बऱ्याच ठिकाणी झाडे दबल्यासारखी वाटत होती. जणू कोणी तिथे त्या फुलांवर लोळले होते. आमच्या समोर तरी कोणी असा गाढवपणा करताना दिसले नाही. एकतर कोणी लोळले किंवा बसले असावे अथवा वाऱ्यामुळे झाडे दबली असावीत. फुले तोडू नका असे खाली ऑफिसात सांगतात. पण आपल्याकडे मूर्खांचा भरणाच जास्त आहे त्याला काय करणार? माझ्या ऑफिसातली एक मुलगी गेल्या वर्षी घाटीला गेली होती, ती सांगत होती की हेमकुंडच्या वाटेवर मूर्ख लोक ब्रम्हकमळे तोडून, त्यासोबत सेल्फी काढून नंतर ती फुले फेकून देत होते. त्यांना ओरडणारेही काही ट्रेकर्स होते पण फुल एकदा तोडले की गेलेच ते. ही सगळी फुले तिथे फक्त झाडांवर ताजी राहतात. तुम्ही फुल तोडले की पाच मिनिटात ते मान टाकते. मग का तोडावे? डोळ्यांनीच घ्या न हवा तितका आनंद. मालकीहक्कही हवा ही भावना का?
हे आहे ब्लु सॉ थिसल. शास्त्रीय नाव Lactuca brunoniana

हे आहे ब्लॅडर फूल. शास्त्रीय नाव Silene vulgaris

हे आहे फ्लिबेन. शास्त्रीय नाव Erigeron multiradiatus

हे Anaphalis nepalensis चे वेरीएशन आहे असे मला वाटते.

फ्लॉवर्स ऑफ इंडिया वर जरी नेपाळ पर्ली एवरलास्टिंग नाव दिलेय तरी फुलांमध्ये थोडा फरक आहे हे नक्की.

घाटीतून चालताना पायवाटेवरूनच बहुतेक जण चालत होते, अधून मधून फुलांचे जंगल विरळ झाले होते, पायवाट सोडून मी तिथून शक्य तितके आत जाऊन फुले पाहात होते. पण हे सगळीकडे शक्य नव्हते. त्यामुळे पायवाटेवरून चालत दोन्ही बाजूला लांबवरची जितकी फुले दिसतात तितक्यावर समाधान मानणे भाग होते.
कित्येक झाडांची पानेही फुलांसारखा आकार व रंग हेधारण करून मिरवीत होती.

हे अजून एक

घाटीमध्ये फिरत फिरत खूप वेळ गेल्यावर अंगावर पावसाचे बारीक तुषार पडल्यासारखे वाटायला लागले. आता परत फिरायचे का असे पोर्टर विचारायला लागला. घाटीत वरखाली करून ऐशु व मी थोडे थकलो होतो म्हणून आम्ही परत फिरायचा निर्णय घेतला. घाटीत जेवढे आत चालत जाणार तेवढेच माघारी चालत यावे लागते, फिरताना कायम हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आम्ही होतो त्या ठिकाणाहून लांबवर मिस लेगीचे स्मृतिस्थळ दिसत होते पण आम्ही जिथे होतो तिथून ते थोडे खाली असल्याने तिथवर जाण्याइतकी ताकद अंगात नव्हती ना हातात तेवढा वेळ होता. भराभर उतरून तिथपर्यंत जाता आले असते पण परतताना असल्या डोंगराळ व ऑक्सिजन कमी असलेल्या जागी चढ चढणे किती कठीण असते हे ज्ञान केवळ अनुभवाने येते.
हे गोल पानांचे घंटी फुल.

शास्त्रीय नाव Codonopsis rotundifolia

फुल गळून गेले की मागे असे उरते.

हे अजून एक घंटीफुल. ट्रेलिंग बेलफ्लॉवर. Cyananthus lobatus

घाटीपेक्षा खाली उतरताना ही फुले जास्त आढळली.इतकी होती की तेवढा परिसर पूर्ण निळा....

ह्या फुलामागचे बालसम सुद्धा पहा किती वेगळे दिसतेय

काही फुले अनोळखी राहिली.

घाटीतून पाय निघता निघत नव्हता. बघण्यासारखे अजून बरेच काही होते पण निघणे भाग होते. आज सुदैवाने अजिबात पाऊस पडला नव्हता, बऱ्यापैकी ऊन होते. मी सोबत छत्री घेऊनच फिरत होते त्यामुळे पावसाची फारशी भीती नव्हती पण पाऊस पडला तर उतरताना त्रास झाला असता. त्यामुळे जास्त वेळ न घालवता घाटीला टाटा, बाय बाय, फिर मिलेंगे म्हणत आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. जेवढे चालत आत गेलेलो तेवढेच चालत परत त्या दगडी गुहेपर्यंत आलो.
ऐशुचा पोर्टर आमची वाट पाहत बसलेला. त्याची मस्त झोप काढून झालेली व गोळीच्या प्रभावाने त्याचा तापही गेला होता.
पुढे रिकामा पोर्टर, त्याच्यामागे मी व आमच्यामागे ऐशूला घेऊन तिचा पोर्टर अशी वरात घाटी उतरायला लागली. उतरणे सोपे जाईल असा चढताना माझा समज झालेला तो गैर होता हे उतरताना कळले. तरी आम्ही शक्य तितक्या हळू चालत होतो. उतरताना गुढगे व पावलांवर खूप ताण येऊन पायाचे तुकडे पडताहेत असा भास होत होता. खूप ठिकाणी थांबत थांबत मी उतरत होते.
आधीच लिहिल्याप्रमाणे घाटीचा रस्ता फारसा रुंद नाही. काही ठिकाणी तर एका वेळेस दोन माणसे आरामात बाजूबाजूने चालू शकतील, तिसरा मात्र सोबत चालू शकणार नाही इतका अरुंद आहे. रस्ता कसला, दगड टाकून बनवलेली पायवाट म्हणायला हवी. एका बाजूला घनदाट जंगल, दुसऱ्या बाजूला खोल दरी, रेलिंग्स कुठे आहेत तर कुठे नाहीत. आणि पायवाटेवर ओबडधोबड दगड. पाय बिय सटकला तर गेलो थेट खाली दरीची खोली मोजत. हल्ली कोणी दरीत पडले होते का वगैरे प्रश्न जिभेच्या टोकावर आले होते, महतप्रयासाने आवरले. नैतर आपल्यालाच प्रात्यक्षिक मिळायचे. ह्या दगडांचा काय भरोसा!!! असे असूनही काही तरुण मुले, जी बहुतेक उत्तराखंडातलीच असावीत, धडाधड धावत उतरत होती. मागून हसत ओरडत धावणाऱ्या मंडळींचा आवाज आला की मी जंगलाच्या बाजूला सरकून मंडळींना जागा करून द्यायचे.
घाटीत फिरताना फारसे कोणी दिसले नाहीत पण उतरताना लोक दिसत होते. वाटेत एक बंगाली जोडपे दिसले. चेहऱ्यावरून व हातातल्या लाल पांढऱ्या बांगडीवरून मी ओळखले, शिवाय भाषाही बॉंग. बाबा कंटाळून गेल्यासारखा पुढे पुढे जाऊन थांबत होता आणि बाई प्रत्येक फुलासोबत सेल्फी काढत होती, फुलांचेही फोटो काढत होती. वर घाटीत फोटो काढून पोट भरले नव्हते बहुतेक. बाबाने पायात फ्लोटर्स घातलेले, बाईने चक्क स्लीपर्स. मनात म्हटले, असले धारिष्ट्य पाहिजे. आम्ही मुंबैत अँकल सपोर्टवाले शूज शोधत चार दुकाने फिरलो आणि इथे लोक बिनधास्त स्लीपर्स घालून फिरताहेत. असो.
वाटेवर अशी मोहक पानांची नक्षी दिसत होती.

आम्ही खूपच हळू चालत होतो. घाटीच्या गेटपाशी ठेवलेल्या पालख्यासुद्धा आमच्या मागून येऊन पुढे निघून गेल्या. चालणे म्हणजे कठोर शिक्षाच आहे असे मला वाटायला लागले. ते नेहमीचे 'कुठून झक मारली आणि....' वगैरे डिप्रेसिंग विचार डोक्यात तांडव करायला लागले. पोर्टर हाताला धरून नेत होता आणि पिट्टूत बसायचा आग्रह करत होता. शेवटी नाईलाजाने मी पिट्टूत बसायला तयार झाले. त्या खुर्चीतून मी पडेन अशी सतत भीती वाटत होती. पण तरी पोर्टरने मला बसवले व खुर्ची पाठीवर टाकून निघाला.
पिट्टूत बसले की आपल्याला आपल्या पाठीवर म्हणजे पर्यायाने पोर्टरच्या पाठीवर रेलून बसावे लागते. तसे बसले नाही तर पोर्टरला वजन वाहून न्यायला त्रास होतो. म्हणजे आपण खुर्चीत जवळजवळ साठ अंशाचा कोन करून बसतो. त्या अवस्थेत मग आपली इच्छा असो वा नसो, आकाश पाहात बसावे लागते. जास्त चुळबुळ केली तर पोर्टरला त्रास.

इथे एका बाजूची खोल दरी बघून मला धडकी भरलेली, उगीच बिचारा कुठे अडखळला आणि माझ्यासकट दरीत गेला म्हणजे? मी गुपचूप आकाश बघत बसले. आकाश तसे सुंदर होते. निळ्याशार आकाशात स्वच्छ सफेद ढग अंग पूर्ण पिंजून घेऊन सुखाने वाळवीत निवांत बसले होते. त्यांच्या खाली आकाशात घुसलेली उंच झाडे व त्यांच्या पानांनी केलेली मनोहारी नक्षी. निळ्या पांढऱ्या पार्श्वभूमीवर ही हिरवी काळी नक्षी खुलून दिसत होती.

पण वरचे दृश्य कितीही देखणे असले तरी पायवाट खडकाळ व नागमोडी होती. जुन्या भूत किंवा रहस्यपटात कसे गोल जिने असतात, नायिका घामाघूम होऊन गोल गोल फिरत एकतर चढत किंवा उतरत असते तसे आम्ही गोल गोल फिरत उतरत होतो. खडकाळ रस्त्याने गाडी जात असताना आपल्याला आत कसे गचके बसतात तसेच वर खुर्चीत गचके बसत होते. अर्ध्या तासात मला चक्करायला लागले, एसटीचे गचके खात मी आंबोली घाट उतरतेय असा भास व्हायला लागला. आंबोली घाटात मला हमखास पोटात ढवळायला लागते. त्यामुळे आताही पोटात ढवळणे आलेच... शिवाय पिट्टूत बसून जाताना मागून येणाऱ्या फांद्यांकडे थोडे लक्ष ठेवावे लागते. अर्थात पोर्टर काळजी घेतो, आपल्याला तेवढी भीती नसते पण मला जरा धाकधूक वाटत होतीच.
हे सगळे लक्षात घेऊन मी खाली उतरायचे ठरवले. पोर्टर नको म्हणत होता पण मी उतरलेच. असे गोल गोल फिरून झिंगण्यापेक्षा पायाचे तुकडे पडलेले परवडले. त्याचा हात धरून हळू हळू चालत आले एकदाची खाली. खाली जिथे हेमकुंडचा रस्ता मिळतो तिथे पोर्टरने आम्हाला सोडले. किती पैसे म्हणून विचारल्यावर ऐशुचे चार हजार मागितले. मी म्हटले तीन हजार ठरले होते. आपकी सवारीभी बहोत भारी थी जी म्हटल्यावर काय बोलणार? म्हटले आधीच सांगायचे ना? तेव्हाच सवारी बघून घ्यायची. आम्हा दोघींचे मिळून पाच हजार देते म्हटल्यावर त्या दोघांचा चेहरा पडला. एवढयाने नाही होणार म्हटल्यावर अजून एक हजार काढून दिले. ते दोघे खुश झाले. मीही उगीच गम्मत म्हणून घासाघीस करत होते. पैसे मी तसेही दिलेच असते. मी कदाचित थोडे पैसे जास्त दिले असतील. पण ज्या परिस्थितीत हे लोक काम करतात ते बघता घासाघीस करणे मला जमले नसते.
पोर्टर गेल्यानंतर त्या रस्त्यावर आम्ही बराच वेळ शामलीची वाट पाहात बसून राहिलो. निघायचा विचार करत होतो तोवर शामली खाली आली. तिच्यासोबत रमत गमत आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. वाटेत बाजार लागला. छोटी छोटी ढाबा टाइप हॉटेले होती. गोड पदार्थ जास्त खपत असावेत, परात भरून गुलाबजाम वगैरे बाहेर मांडले होते. शिरस्त्याप्रमाणे दोन्ही पोरींना लगेच भूक लागली. त्यांना गोड नको होते व तिखटात प्रचंड तेलकट सामोसे वगळता इतर जे काही होते त्यात आम्ही खाऊ असे काहीही नव्हते. होय नको करत समोसे छोल्यांवर आडवा हात मारला गेला. मोठ्या कढईत दूध उकळत ठेवले होते. त्याचाही थोडा आनंद घेतला गेला. मी फक्त चहापानावर समाधान मानले. हे हॉटेल नेमके गुरुद्वारासमोर होते. खालून गोविंदघाटावरून चालत येणारे शीख लोक ह्या गुरुद्वारात रात्रीचा मुक्काम करतात व सकाळी उठून हेमकुंडसाहिबला निघतात. इथल्या लंगरमध्ये जाऊन जेवायचा बेत मी जाहीर करताच पोरींनी तो लगेच हाणून पाडला. लंगरमध्ये जेवायचे असे माझे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न आहे. हे कसले डोंबलाचे स्वप्न असे बहुमताने ठरल्यामुळे मी गप्प बसले. असो.
ढाब्यातून बाहेर पडल्यावर पुढच्या वळणावर आपले हॉटेल आहे असे स्वप्नरंजन करत शेकडो किलोमीटर पदयात्रा केली तेव्हा कुठे नंदलोकपाल हॉटेल आले. पायाचे तुकडे पडले असल्याने दोन पावले चालले तरी मला वीस किलोमीटर चालल्यासारखे वाटत होते.
हॉटेलात पोचताच रनिंग हॉट वॉटरवाल्याला गाठले व गरमागरम पाण्याने आंघोळ केली. बेक्कार प्रवास करून परतल्यावर आधी कडकडीत पाण्याने अंघोळ करायची. पूर्ण शीण उतरून जातो. मुलींनीही हात पाय धुतले. ऐशूने लगेच बेड गाठला. मीही थोडा वेळ झोपले. मला खरेतर खाली जाऊन फिल्म पहायची होती. तिथल्या एका सेंटरमध्ये घाटीवर बनवलेली एक फिल्म दाखवतात. तीस रुपये प्रति व्यक्ती. घाटीत जायच्याआधी ती नक्की पहा अशा सूचना आम्हाला मिळालेल्या. आदल्या दिवशी पोरी फिल्म बघायला गेल्या तेव्हा मी रूमवर झोपले होते. आज मी फिल्म बघायचा बेत केला पण तोवर पाऊस पडायला लागला. उबदार रूम सोडून त्या बर्फ़ाळ पावसातुन फिल्म बघायला जायलाच हवे का असा विचार मी करत होते. 'यु ट्यूबवर आहे, तू बघ नंतर आरामात' असे शामली म्हणाल्यावर मात्र मी जास्त विचार न करता सरळ बेड गाठला.
साडेआठच्या सुमारास जाग आल्यावर जेवणाच्या दिव्य जागी तोल सावरत गेले. नेहमीसारखे मस्त जेवण होते. सोबत नूडल्स असल्यामुळे पोरीही आनंदाने जेवल्या. तिकडे नूडल्सना चौम्याउ की चाऊमेन असे काहीतरी म्हणतात, नूडल्स म्हणत नाहीत. ऐशु अर्धवट झोपेत जेवली. तिचे अंग थोडे गरम लागत होते, तिला गोळी देऊन झोपवले. शामलीला मात्र जेवल्यावर कॅम्प फायर मध्ये रस होता. तिला तसेही उशिरा झोपायची सवय असल्याने इतक्या लवकर झोप येणे शक्य नव्हते. माझी झोपमोड नको म्हणून रूमला बाहेरून कडी घालून तू कॅम्पफायरला जा असे तिला सांगून मी झोपले. तिची एका ग्रुपबरोबर चांगली गट्टी जमलेली. आम्ही दोघी मात्र अँटीसोशल असल्यासारखे सगळ्यांशी जेवढ्यास तेवढे ठेवले होते आणि मागून गॉसिप करत होतो.
साडेदहाच्या सुमारास मला अचानक जाग आली. आमची रूम तीन माणसांसाठी होती, एक डबलबेड व बाजूला एक सिंगलबेड. सिंगलवर मी झोपायचे, डबलवर पोरी झोपायच्या. तिथे फक्त ऐशु झोपलेली, शामली नाही. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मी उठून दरवाजा पाहिला तर बाहेरून कडी. बाहेर पॅसेजमध्ये उघडणारी खिडकी नुसती लोटलेली होती, ती उघडून बघितले तर पॅसेजचा दरवाजासुद्धा लावलेला दिसत होता पण त्याच्या बाहेरून बोलण्याचे आवाज ऐकू येत होते. शामली बहुतेक तिथेच असणार असा अंदाज बांधून मी मोठ्याने चार पाच हाका मारल्या. कुणी उत्तर दिले नसते तर मला खिडकीतून उडी मारून बाहेर जाऊन दरवाजा उघडता आला असता. तिकडे हिमालयात खिडक्यांना ग्रील ब्रिल लावायच्या भानगडी कोणी करत नाहीत; उडी मारून जाण्याइतपत मोठ्या खिडक्या मात्र बिनधास्त बनवतात. पण उडी मारायची वेळ आली नाही. आमचे ग्रुप मॅनेजर शेजारच्याच खोलीत झोपले होते. माझा आवाज ऐकून ते बाहेर आले. काय झालेय हे मी सांगताच त्यांनी दाराची कडी काढली. बाहेर yhai ची पोरटी अजून धिंगाणा घालताहेत हे लक्षात येताच ते एकदम भडकले. साडेनवाला लाईट आउट करायची शिस्त मोडलीच कशी असे म्हणत त्यांनी पॅसेजचे दार उघडून कॅम्पफायरवाल्या मंडळींवर चांगलेच तोंडसुख घेतले. 'शी, कसला बोअर माणूस आहे' म्हणत पाय आपटत शामली परतली. तिला आताही झोप येत नव्हतीच पण बाहेरच्या जगाशी संबंध प्रस्थापित करणारे टीव्ही व मोबाईल हे तिचे दोन्ही सखे बंद असल्यामुळे नाईलाजाने तिला झोपावे लागले.
बाहेर जोरदार पाऊस पडल्याचा आवाज येत होता. माझ्या बेडच्या बाजूची खिडकी
थोडीशी उघडीच राहात होती व त्यातून थंडगार हवेची झुळूक आत येत होती. जाड
जाड रजायांमध्ये स्वतःला गुरफटून घेऊन आम्ही निवांत झोपलो.
उद्या हेमकुंड साहिब यात्रा करायची होती.
पुढचा भाग : https://www.maayboli.com/node/65194
(१. फुलांची नावे फ्लॉवर ऑफ इंडिया वेबसाईट वरून घेतलेली आहेत. कुठे चुकून मी भलतेच नाव दिले असेन तर कृपया सांगा. दुरुस्त करेन.
२. बहुतेक सगळे फोटो ऐशुने आयफोन 7 वर काढलेले आहेत. बाहेरून लिंक देणे अजून जमत नसल्याने मी मायबोलीवर सेव करून फोटो टाकलेत. त्यामुळे मूळ फोटोतली clarity बरीच कमी झालीय. काही फोटो माझ्या मोटो वर काढलेले आहेत. ते सो-सो आहेत :))
हेमकुंड साहिब..
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65129
नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता जाग आली, बेड टी टाळून हॉट रनिंग वॉटरवाल्याकडून पाणी मागवून आन्हिके आटपून नाश्त्याला गर्दी केली. रात्रभर पाऊस होताच, आताही भुरभुर सुरू होती. बॅगेत होते तितके कपडे अंगावर चढवले असूनही थंडी वाजत होतीच. आज घाटी बंद होती. काल स्वच्छ ऊन व आज पावसाची भुरभुर. इथल्या निसर्गाचा काही भरोसा नाही. आज आमची घाटी भेट असती तर काही खरे नव्हते. युथ हॉस्टेलची आमची शेवटची बॅच होती. त्यामुळे आज आमच्या बाजूने घाटीत जाणारे कोणी नव्हते.
नाश्ता करून खाली आलो. हेमकुंडला प्रसाद खायचा असल्याने आज सोबत डब्बा नव्हता. खाली येताच घोडेवाल्यांनी घेराव घातला. पोर्टर लाम्ब उभे राहून मजा पहात होते. घाटी बंद असल्याने आज त्यांना काहीच काम नव्हते. हेमकुंडला कुणी पोर्टर घेऊन जात नाही. घोडे नाहीतर पायी जातात. आज जवळ जवळ 3600 फूट उंच चढून जायचे होते. दोन दिवस सलग चाली चाली केल्यावर आज तिसऱ्या दिवशी आमच्यातले बहुतेक जण गारद झाले. बहुतेकानी घोडे करायचे ठरवले. शामलीच्या ग्रुपने चालत जायचे ठरवले. आमचे आधीच घोडा करायचे ठरले होते. रमेशसुरेश पण घोड्यानेच जाणार होते. त्यांनी घासाघीस करून आमच्यासाठीही घोडे ठरवले.
घोड्यावर स्वार होऊन आम्ही व सुरेशरमेश हेमकुंडसाहिबच्या दिशेने निघालो. आदल्या दिवशी माझा पिट्टूचा अनुभव घेऊन झालेलाच, आज घोड्याचा अनुभव. पिट्टूप्रमाणे हाही अनुभव थोडा त्रासदायक वाटला. घोडा दुडक्या चालीने चालतो तसे वर बसलेले आपणही हलत राहतो. हा रस्ताही खाली गोविंदघाटातून येणाऱ्या रस्त्याप्रमाणे प्रशस्त पायऱ्यांचा आहे. घोडा पायरी चढतो तेव्हा आपल्याला बरेच हिंदकळायला होते.
घोड्यावरून जायचा दुसरा तोटा म्हणजे आपल्याला आजूबाजूचे फारसे काही पाहता येत नाही, घोडा हवा तिथे थांबवता येत नाही. माझा घोडा चालता चालता बाजूला वाढलेली फुलझाडे स्वाहा करत निघालेला. सतत हलत असल्यामुळे फोटो काढणेही मुश्किल होऊन बसते.
हेमकुंड रस्त्यावर सुदैवाने पावसाची भुरभुर मिळाली नाही. रस्त्याच्या सुरवातीला एक जबरदस्त धबधबा आहे. मी काल बराच वेळ तिथे थांबून त्याला मनसोक्त पाहून घेतले होते. त्यामुळे आज फक्त घोड्यावरून दर्शन घेतले.

तसे उत्तराखंडात जागोजागी धबधबे भेटत होते. आणि तेही कसले जबरदस्त!! पाण्याने फुगलेले, रोंरावत प्रचंड उंचीवरून कोसळणारे!!! धबाबा तोय आदळे लिहीणारे स्वामी रामदास इथे आले असते त्यांनी किती भव्य काव्य लिहिले असते!
उत्तरखंडातल्या धबधब्याखाली चुकूनही कुणी भिजताना दिसले नाही. इथे महाराष्ट्रात धबधबे खास लोकांनी त्यात भिजावे म्हणून बनत असतात असा समज आहे. मी आत्ता जानेवारीत आंबोलीला गेले होते, तर लोक घाटातल्या धबधब्याखाली उभे होतेच... पण उत्तराखंडात कुणीही धबधब्यांच्या आजूबाजूला फिरकताना कधी दिसले नाही. कोण धाडस करेल त्या बर्फ़ाळ पाण्यात भिजायचे? फक्त हिंदी चित्रपटातल्या हिरोईनला नाईलाजाने उतरावे लागत असेल. जसे राम तेरी ... मध्ये मंदाकिनी.
घोड्यावरून बरेच वर आल्यावर त्यांच्या टाईम प्लिजचा एक पॉईंट आला. सगळे घोडेवाले तिथे थांबत होते. आम्हीही उतरून घोड्याला जरा मोकळा केला. तिथे चहापाण्याची व खाण्याची व्यवस्था करणारे स्टॉल अर्थातच होते. ऐशूने लगे हाथ मॅगी खाऊन घेतली. अमृततुल्य हे शब्दही थिटे पडतील इतका सुंदर लेमन टी मला त्या खोपटात प्यायला मिळाला. इतका सुंदर की मी परत एक कप घेतला व येतानाही आस्वाद घेतला.
ह्या अशा टपऱ्या असतात जिथे खायला काही मिळू शकते.

मॅगी

आमचे घोडे की खेचरे, त्यांनाच माहीत...

आज ऊन अजिबात नव्हते. पाऊस अधून मधून तुषार सिंचन करून जात होता. वातावरणात प्रचंड धुके भरले होते.
खालच्या फोटोत सरदारजी दरीच्या टोकाला उभा आहे असे वाटतेय ना? तसे नाहीये. तो मागचा रस्ता चढून आलाय. इथेच घोड्यांचा थांबा आहे. आम्ही घोड्यावरून हा रस्ता चढून आलो. मी चहा पित बसले होते व हा माणूस अचानक वर आला. एकदम तीव्र चढ असल्याने मागचा रस्ता अजिबात दिसत नाहीय.
त्याने अंगात घातलंय त्याला इथे पोंचो म्हणतात. पन्नास का काय रुपयांना हा रेनकोट मिळतो, चार दिवसात फाटून जातो.

मधूनच वारा धुके बाजूला करे व निसर्गाचे विलोभनीय दृश्य दिसे.

रस्त्याच्या एका बाजूला नेहमीप्रमाणे दरी होती. पण ती घाटीच्या दरीसारखी भयानक वाटत नव्हती. कारण खाली घागरिया अधून मधून दिसत होते. घाटीत भेटलेली बरीच फुले या रस्त्यावर फुललेली होती. ब्लु पॉपीही पाहिले. हाईप केल्याचे सार्थक करत हे फुल खूप सुंदर दिसते. बरेच वर म्हणजे समुद्रसपाटीपासून साधारण 14,000 फूटांवर वर्ल्ड फेमस ब्रम्हकमळ दिसायला लागले.
ब्रम्हकमळाचे या आधी मी फोटो पाहिले होते पण फोटोवरून फुलांच्या अधिवासाची म्हणजे नैसर्गिक स्थितीत ते कसे असेल याची कल्पना येत नाही. सवारी केल्यापासून घोडेवाल्याला ब्रह्मकमळ कधी दिसेल हा प्रश्न विचारून मी हैराण केल्यामुळे त्याने ते एकदाचे दिसल्यावर 'वो देखो, आ गया आपका ब्रम्हकमल' म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. मला तरीही ते कुठे आहे ते दिसेना. शेवटी ऐशु म्हणाली की ते लांबवर जमिनीत दिवे उगवल्यासारखे वाटताहेत ती ब्रम्हकमळे. ही कमळे इतर फुलांसारखी रस्त्याला लगटून नव्हती. कदाचित रस्त्याजवळ असलेली तोडली गेली असावीत. रस्त्यापासून दूर खाली दरीत किंवा वर चढणीवर फुले दिसत होती. पावसामुळे माती ढिली झाली होती त्यामुळे तिथवर जाऊन कोण बघणार? 'उपर तालाब के पास भी बहोत है। वहा देख लेना।' म्हणत घोडेवाला घोड्याला पुढे दामटवत होता पण तरी आम्ही घोडे थांबवायला लावले.
लांबून कमळे खूप सुरेख दिसत होती. जमिनीपासून साधारण फूट दोन फूट वाढलेल्या झुडपावर ही कमळे येतात. ह्या झुडपाची पाने साधारण आपल्या भांबुरड्याच्या पानासारखी दिसतात. चारपाच झुडपांचा एकत्र गुच्छ असतो, प्रत्येक झुडपातून एक दांडा बाहेर पडतो, दांड्याच्या टोकाला कमळ. ऑफ व्हाइट हिरवट झाक असलेला उभट फुगीर दिवा कसा दिसेल तशी ही कमळे दिसतात. आकार साधारण मोठ्या सोललेल्या उभट नारळाएवढा. आजूबाजूच्या हिरवाईत ही दुधी फुले उठून दिसतात, बागेत लावलेल्या दिव्यांसारखी.
बाहेरून इतकी सुरेख दिसणारी फुले अंतर्यामी मात्र चक्क कुरूप आहेत. आपल्याला जे दुधी हिरवट दिसते ते पानांचेच एक्सटेन्शन असते, खरी फुले आत असतात. बाकीच्या हिरव्या पानांच्या गर्दीत 3 -4 जांभळ्या रेषा असलेली पाने दुधी होतात व एकमेकांना झाकून गोल करतात. त्या गोलाच्या आत पाच सहा अष्टरसारखी दिसणारी, चॉकलेटी-काळसर-निळसर अरुप फुले असतात. ती खरी फुले. बरे काही सुवास वगैरे असावा तर तसेही काही नाही. दुरून डोंगर साजरे तशी ही दुरूनच साजरी दिसतात. जायच्या आधी फुलांबद्दल इतके काही वाचल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष फुल बघितले तेव्हा वाटले उगीच ओव्हर हाईप केलेय यांना!!
यांना कमळे का म्हणतात देव जाणे. कुठल्याही बाजूने ही कमळे वाटत नाही, ना कमळाच्या कुळाशी कसला संबंध आहे. ही चक्क ऍस्टरसी (asteraceae) कुळातली फुले आहेत.
ब्रम्हकमळ कायम अर्धोन्मीलीत राहते, ती वरची स्पेशल पाने आतल्या फुलांना झाकून ठेवतात ज्यामुळे थंडीपासून फुलांचे रक्षण होते. मला जरी ब्रम्हकमळ स्पेशल वाटले नाही तरी तिबेटी लोकांमध्ये त्याचे खूप महत्व आहे. तिबेटी औषधांमध्ये याचा वापर होतो. खरेतर जरा जास्तच वापर होतो ज्यामुळे फुलांची संख्या रोडावतेय.
हा फोटो नेटवरून साभार (इंटरनेटवर व आपल्याइथे जी फुले ब्रम्हकमळे म्हणून प्रसिध्द आहेत ती प्रत्यक्षात निवडुंगाची फुले आहेत. Epiphyllum oxypetalum असे सर्च करा)

आम्ही घोडे थांबवले खरे पण जिथे थांबवले तो घोड्यांचा स्टॉप नसल्यामुळे घोड्यावर चढउतार करण्यासाठी तिथे काहीही सोय नव्हती. (तिकडे खूप ठिकाणी 3 फुटी छोटे बाकडेसदृश्य प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत ज्यावर चढून आपण घोड्याच्या पाठीवर बसू शकतो) त्यामुळे मी खाली उतरणे अशक्य. मी उतरलेही असते पण मग परत चढणार कसे? जमिनीवरून रिकीबीत पाय टाकून वर चढण्यासाठी आवश्यक ते लवचिक शरीर माझ्याकडे नसल्याने मी उतरलेच नाही. अर्थात घोडेवाला तुम्हाला कुठूनही घोड्यावर चढवू शकतो. त्याला फक्त सवारीत इंटरेस्ट असतो, त्यामुळे तो निरिच्छ मनाने तुमच्या सीटला वर ढकलून तुम्हाला घोड्यावर चढवू शकतो.
आम्ही कुणी घोड्यावरून पायउतार होत नाही हे पाहून आम्हा सर्वांतर्फे सुरेश उतरला. थोड्या चढावावर फुले दिसत होती. तिथे जाऊन त्याने फोटो काढले. बादमे सबको फोटो देता हु असे जरी तो म्हणाला तरी नंतर आम्ही विसरून गेलो. फोटो काढून झाल्यावर परत वरात पुढे निघाली.
बरेच वर आल्यावर एका ठिकाणी थेट वरपर्यंत घेऊन जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. चांगल्या रुंद, अर्धा फूट उंची असलेल्या मजबूत सिमेंटी पायऱ्या थेट वरपर्यंत नेतात, वळणावळणाच्या रस्त्यामुळे आपण जास्त चालतो, ते वाचते. या पायऱ्यांचा अजिबात वापर करू नका, कारण सुरवातीला जरी फक्त अर्धा फूटाची पायरी असली तरी पुढे दोन ते अडीज फुटाची एकेक पायरी बनवल्यामुळे चढून जायला खूप त्रास होतो असा धोक्याचा इशारा आम्हाला ऋषिकेशलाच देण्यात आला होता. आमचे घोडे अर्थात त्यांच्या रस्त्यानेच जाणार होते.
मजल दरमजल करत शेवटी पर्वताच्या टोकाला येऊन हेमकुंडला पोचलो. उतरायला घोड्यांचा वेगळा प्लॅटफॉर्म नव्हता तर एक उंच दगड प्लॅटफॉर्म म्हणून वापरला होता. कसेबसे मी माझा जीव व घोडा त्याचा तोल सांभाळत आम्ही दगडाला चिकटलो व मी एकदाची पायउतार झाले. हुश्श बिश्य करून झाल्यावर हेमकुंडसाहिबच्या दिशेने निघालो. त्या परिसरात प्रवेश केला की समोर मोठे गुरुद्वारा आहे पण त्याचे प्रवेशद्वार मात्र मागे आहे. आपल्याला समोर दिसते ती लंगरची जागा. तिथे एक भलीमोठी कढई ठेवलेली, आत अख्खा माणूस बसेल एवढी. त्यात साबणयुक्त गरम पाणी होते. कढईखाली मोठे चुल्हाण होते त्यामुळे तो भाग उबदार झालेला होता. आमच्यासारखी काकडलेली जनता त्या चुल्हाणाची ऊब मिळवत उभी होती. हे सगळे इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच मांडलेले. दरवाज्याच्या आतल्या बाजूला एकजण गरमागरम चहा देत होता. तिथेच स्टीलच्या पेल्यांची व 6 इंची परातींची रास होती. त्या राशीतून पेला उचलून घ्यायचा, चहावाल्यासमोर जाऊन सत श्री अकालचा नारा लावायचा की ग्लास भरून चहा आपल्या ताब्यात. बाहेर येऊन चुल्हाणाच्या आजूबाजूला उभे राहून स्वतःला शेकत चहा प्यायचा. पिउन झाला की कढईशेजारी ठेवायचा. कारसेवा करणारे भाविक कढईतले गरम पाणी वापरून ग्लास व पराती धुत होते. कुणी भाविक तिथे नसेल तर गुरुद्वाराचे लोक स्वतःच येऊन ग्लास धुत होते. अर्थात सत श्री अकालचा नारा लावायची काही गरज नव्हती. गुरुद्वारात येणाऱ्या प्रत्येकाला चहा खिचडी मिळत होती.
चहा पिउन झाल्यावर गोल वळसा मारून बिल्डिंगच्या मागच्या बाजूला गेलो. समोर निळ्याशार पाण्याचे विस्तीर्ण हेमकुंड होते. समोर उभा डोंगर होता, त्याच्यावर जाडजुड पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या रेषा ओढलेल्या दिसत होत्या ज्या हेमकुंडात विसर्जित होत होत्या. हे दृश्य 2-3 मिनिटेच दिसू शकले. फोटो काढायचा विचार करेपर्यंत एक खूप मोठा धुक्याचा ढग तलावावर येऊन विसावला, त्याने डोंगरासकट तलाव झाकून टाकला. त्याने तिथून हलायचे मनावर घेतलेच नाही. मी नंतर चार पाच वेळा तरी परत तिथे येऊन पाहिले पण डोंगर दिसला नाही.

हेमकुंडाचे पाणी बर्फाचेच होते पण तरीही त्यात लोक बुचकळत होते. काठाला जाड लोखंडी साखळ्या अडकवलेल्या, एक साखळी हातात धरायची व जो बोले सो निहाल आरोळी देत डुबकी मारायची. श्रद्धा असली की सगळे साध्य होते. तळे बघत असताना 'बीबीयोंके लिये अंदर इस्नान का प्रबंध किया है' म्हणत एका सरदाराने मला आत जायला सांगितल्यावर मी तिथून काढता पाय घेतला. तिथेच आवारात एक लक्ष्मणाचे मंदिरही आहे. उत्तराखंडात रामापेक्षा लक्ष्मण जास्त प्रसिद्ध आहे बहुतेक. लक्ष्मण झुला, लक्ष्मण सेतू, लक्ष्मण मंदिर वगैरे.
टोकाला दिसतेय ते लक्ष्मण मंदिर..

तिथेच बाजूला शंकराचे मंदिरही होते. आमच्या ग्रुपमधली उन्नती तिथे भेटली. तिने कुठूनतरी ब्राम्हकमल तोडून आणले होते. 'आज अमुक तमुक तिथी आहे, आज शिवजीला ब्रम्हकमळ वाहिले तर अमुक इतका पुण्यलाभ होतो' हे तिने ऐकवल्यावर तिच्या कानाखाली दोन ब्रम्हकमळे काढावीत अशी तीव्र इच्छा मला झाली. पुण्य मिळवण्याची सुवर्णसंधी हाती असूनही तिचा लाभ आम्ही घेत नाही आहोत म्हणून आमच्या बद्दल उपहास व तिरस्कार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आत शंकर महाराज पिंडीच्या रुपात तिच्यासारख्या पंडित लोकांनी वाहिलेली ब्रम्हकमळे अंगावर धारण करून बसले होते. जेव्हा तुमची तांडव करायची इच्छा होईल तेव्हा ह्या पंडितांना आधी बघा ही विनंती करून मी बाहेर पडले.
तिथून निघून वर गुरुद्वारात गेलो. मोठ्या प्रशस्त हॉल मध्ये धीरगंभीर सुरात ग्रंथसाहिब पठण सुरू होते. मध्ये साखळी लावून हॉलचे दोन भाग केलेले. जवळ जवळ सगळी जनता एका भागात बसलेली, दुसरा भाग रिकामा होता. मी आधी ग्रंथसाहिबसमोर जाऊनडोके टेकले व रिकाम्या भागात बसले. थोड्या वेळात पठणावरून लक्ष उडाले व लोकांचे निरीक्षण करायचे आवडते काम मी हाती घेतले. हॉलच्या दोन्ही बाजूला जमिनीलगत कपाटे होती, आत कांबळ्या ठेवल्या होत्या. आपल्याला एक कांबळी काढून घ्यायची, लपेटून आरामात कीर्तन ऐकत हवा तितका वेळ बसायचे व जाताना घडी घालून कांबळी परत कपाटात ठेऊन द्यायची. इथले कीर्तन कॅनडात लाईव्ह दाखवले जाते ह्याचे जागोजागी बोर्ड लावले होते. आता इथे आलोच आहोत तर कडाह प्रशाद खायला मिळावा असा एक विचार डोक्यात येऊन घट्ट झाला. थोड्या वेळाने एकजण प्रशाद आणून वाटायला लागलाही. पण हाय रे दैवा! तो माझ्या बाजूला आलाच नाही. मी चुकीच्या ठिकाणी बसले होते की काय देव जाणे. मी अजून थोडा वेळ वाट पाहून शेवटी परत खाली आले.
खाली आल्यावर आजूबाजूचा प्रदेश फिरून पाहिला. अतिशय सुंदर जागा!! उंच पर्वताच्या टोकावर एवढे मोठे मंदिर बांधणे व वर्षाचे पाच महिने तिथे येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणे खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्ट खालून 13 किमी दूर असलेल्या गोविंदघाटातून आणावी लागते. शहरात 13 किमी म्हणजे काहीच नाही पण इथे 13 किमी चढण करावी लागते. एकेक मीटरचा हिशोब करावा लागतो.
एका जागी ब्रम्हकमळे फुललीत ही बातमी सुरेशने दिल्यावर मी ब्रम्हकमळ पाहायला पळत गेले. त्यांची दयनीय अवस्था व जिथे फुलली होती ती जागा पाहता टूरिस्ट लोकांची सोय व्हावी म्हणून कोणीतरी दुसरीकडून उपटून त्यांना तिथे लावले हे उघड होते. मी हात न लावता शक्य तितके निरीक्षण केले. हात लावला तर हाताच्या उष्णतेने अजून सुकतील अशी भीती वाटली.
ब्रम्हकमळे केवळ दुरून पाहावीत, जवळ आली तर त्यांचे सौंदर्य नष्ट होते हे माझे मत झाले. ब्रम्हकमळे दुरून अतिशय विलोभनीय दिसतात. आणि दूर असलेलीच बरी. मानवी संपर्कात निसर्गाचा नाशच झालेला आहे. स्वतःच्या फुटपट्ट्या लावून माणूस निसर्ग मोजतो व हवा तसा वापरतो. मीही माझी सौंदर्यपट्टी लावून ब्रम्हकमळाचे मोजमाप केलेच ना. हजारो वर्षे हे फुल तिथल्या जनमानसात महत्वाचे स्थान मिळवून आहे ते सौंदर्यामुळे नाही तर त्याच्या उपयोगितेमुळे. आधीच लिहिल्याप्रमाणे ह्या झाडाची पाने, फुले, मूळे सगळेच तिथल्या स्थानिक व तिबेटी जडिबुटीत वापरतात. मॉडर्न मेडिसीनमध्ये मात्र यावर अजून संशोधन झालेले नाही. ब्रम्हकमळाचे उल्लेख आपल्या पुराणातही आहेत. महाभारतात द्रौपदीला भीमाने ब्रम्हकमळे आणून दिलेली असा उल्लेख आहे.
आमचे बरेच ग्रुपमेंबर्स आता पोचत होते पण शामली अजून पोचली नव्हती. त्यामुळे मला थोडी काळजी वाटायला लागली. थोड्या वेळाने नुपुरा आली. तिला विचारले तर म्हणाली की चालणे अशक्य झाल्यामुळे तिने अर्ध्या वाटेतुन घोडा केला, शामली मात्र चालत येतेय. थोड्या वेळाने ग्रुपलीडर महेशपण पोचला. तो म्हणाला काळजी करू नका, ती बेबी स्टेप टाकत टाकत येतेय. बरोबर पोचेल. बऱ्याच वेळाने खाली पिवळा ठिपका दिसायला लागला. तीच शामली हे मी लगेच ओळखले. आज पाऊस असल्याने आम्ही वीणावर्ल्डचे पिवळेधम्मक पोंचो अंगावर चढवले होते, तो रंग दुरून उठून दिसत होता.
शामली आल्यावर परत एकदा चहापान केले व तलावभेट घेतली. त्यानंतर गुरुद्वारात जाऊन पाया पडून खाली आलो तर ऐशूने आपल्या ग्रुपमधले सगळे आत जाऊन खिचडी खाताहेत हे शुभवर्तमान सांगितले. आम्हीही परातीच्या डोंगरातून पराती घेतल्या, खिचडीवाल्याकडे जाऊन खिचडी वाढून घेतली व आत जाऊन बसलो. आत बाकडे व त्यासमोर लाम्बलचक अरुंद टेबले होती जिथे निवांत बसून खाता येत होते. आज पाऊस असला तरी बऱ्यापैकी गर्दी होती. 2013ला झालेल्या प्रलयात इथल्या गुरुद्वाराचे व रस्त्याचे खूप नुकसान झाले होते. पण त्याच्या काहीही खुणा आता शिल्लक नव्हत्या. आत सुरेश रमेश खिचडी खात बसले होते. रमेशची तब्येत बऱ्यापैकी बिघडल्यामुळे तो एकाच जागी पडून होता. आमच्या ग्रुपचे बहुतेक लोक आता पोचले होते व खिचडी खात थट्टामस्करीला उधाण आले होते.
तुमचे फिरून झाले की परत निघू म्हणून घोडेवाल्याने सांगून ठेवले होते. परत निघायचे का म्हणून सुरेशला विचारल्यावर तो म्हणाला की गुरुद्वारात प्रशाद मिळणार आहे, तो खाऊन निघुया. हे शब्द कानी पडताच माझ्या मनीची वठलेली आशा फटाककन अंकुरित झाली आणि भराभरा पाने फुटून ती डोलायलाही लागली. आधी झालेली निराशा मी त्याला सांगितली. पण त्या पक्क्या गुज्जुने पूर्ण चौकशी केलेली व दीड वाजता प्रशाद मिळणार ही बातमी पक्की होती. प्रशाद घेतल्याशिवाय जायचे नाही ह्या त्याच्या निर्धाराला मी लगेच पाठिंबा जाहीर केला.
दीड वाजायला फक्त पाच दहा मिनिटेच शिल्लक असल्याने आम्ही दोघे गुरुद्वारात निघालो. मी मुलींना विचारले तर 'घरी शिरा खायला मिळत नाही का तुला' हा लूक मिळाला. मीही त्यांना 'गेलात उडत, गाढवांना गुळाची चव काय' हा लूक देऊन गुरुद्वारात गेले.
गुरुद्वारात आता खूप गर्दी होती. मी आधी गेले तेव्हा अर्धा हॉल रिकामा होता, आता त्या बाजूला बीबीयोंकी गर्दी होती. मीही त्यात सामील झाले. मध्येच सुरेशने येऊन बरोब्बर पावणे दोन वाजता प्रशाद मिळणार हे सांगितले. आजूबाजूच्या गर्दीत देवभक्त किती व प्रशादभक्त किती असावेत हा विचार करत मी बसून राहिले. दीड वाजता कीर्तन संपले. दुसऱ्या एका बाबाने सगळ्यांचे आभार मानले व भक्त लोकांनी आजूबाजूला स्वच्छता कशी राखावी वगैरे गोष्टींवर लेक्चर सुरू केले. लहान बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या भारतीयांना ही स्वच्छतेची गोष्ट वारंवार सांगावी लागते व इतक्या वेळा सांगूनही ती त्यांच्या कानाच्या आत जाऊन मेंदूपर्यंत अजिबात पोचत नाही याचा खेद वाटणे मी आता बंद केलेय. ते लेक्चर काही पंधरा मिनिटात संपणार नाही अशी भीती वाटत असताना बरोब्बर पावणेदोनच्या काट्याला ते संपले व गरम कडाह प्रशाद घेऊन सरदार अवतरले. हा प्रशाद नेहमी दोन्ही हातांची ओंजळ करून घ्यायचा हे मी या आधीच्या माझ्या एकमेव प्रशादग्रहण अनुभवातून शिकले होते. आणि तो प्रशाद ओंजळीभरूनच मिळतो. उगीच आपले हातावर चार फुटाणे पडले न पडले केल्यासारखे घाईघाईत वाटत नाहीत. ओंजळभरून प्रशाद घेऊन देत्या सरदाराला, गुरुद्वाराला दुवा व वरच्या देवाचे आभार मानून मी मन लावून थोडा थोडा प्रशाद जिभेवर रेंगाळवत चवीने खाल्ला, परत एकदा ग्रंथ साहिबसमोर जाऊन डोके टेकवले आणि आम्ही परतीची वाट धरली.
घोडा वर जाताना जितका त्रास होत होता त्याच्या दुप्पट त्रास उतरताना होत होता. शारीरिक त्रास होत होता हे वेगळे, घोडा त्याच्या तंद्रीत उंचावरून खाली उतरत असताना समोर सतत दरी पाहून होणारा मानसिक त्रास वेगळा. आजूबाजूला पाहायचे लक्षात येतच नव्हते. सगळे लक्ष घोड्यावर व रस्त्यावर लागले होते. वाटेत घोड्यांचा टाईम प्लिज आल्यावर थोडे हुश्श केले. असेच तुडुक तुडुक करत जात असताना सुरेश चालत असलेला दिसला. म्हणाला, कंटाळलो घोड्यावर बसून, खूप त्रास होतो. मी तरी अजून थोडे गेले कशीबशी. मांड्या, गुढगे, पोटऱ्या, घोटे सगळे व्यवस्थित चेचून मिळत होते. आणि हे ज्याच्या कृपेने ते घोडेमहाराज निर्विकार मनाने व चेहऱ्याने धबाधब उड्या मारत पायऱ्या उतरत होते. शेवटी असह्य होऊन मीही खाली उतरले. उतरण्यासाठी नीट जागा नव्हतीच, उंच दगडांचा आधार घेऊन उतरले. घोडेवाला ऐशूला घेऊन पुढे गेला व मी दुखणारे अंग घेऊन बेबी स्टेप्स टाकत हळूहळू उतरले. कालच्या स्पॉटच्या बऱ्याच पुढे ऐशु थांबलेली. ती मस्त टाईमपास करत बसलेली. गोविंदघाटातून वर चढून येताना तिची बऱ्यापैकी वाट लागलेली पण हळूहळू इथल्या हवेची सवय होऊन आता ती पूर्ण फिट झालेली. पण माझी हळूहळू वाट लागायला लागलेली. आज चेहरा थोडा सुजलेला. असो. दुखरे पाय घेऊन मी शामलीची वाट पाहत बसले. बऱ्याच वेळाने ती आल्यावर परत भलीमोठी लांबलचक पदयात्रा करून आम्ही हॉटेलात पोचलो.
गरम पाणी मागवून फ्रेश झाल्यावर मी आवराआवर करत बॅग भरायला घेतली. मुलींनी नेहमीच्या सवयीनुसार जिथे शक्य आहे तिथे सामान फेकले होते. ते सगळे शोधून काढून बॅगेत भरले. उद्या घालायचे कपडे बाहेर काढून ठेऊन बाकी सगळे पॅक करून मी निवांत झोपले. आज जेवायचीही इच्छा नव्हती. उद्या सकाळी परत गोविंदघाटापर्यंत 9 किमी तंगडतोड व तिथून पंचवीस किलोमीटरवर असलेल्या बद्रीनाथपर्यंत बसने प्रवास हे काम होते.
घंगरिया ते हेमकुंड साहिब रस्ता. मध्येच डावीकडे जाणारी रेघ घाटीला जाते.

हे एक वचन हॉटेलात लावले होते.

हे लिहिलेले शंभर टक्के खरे आहे. हिमालयात जाऊन आकाशाला टेकलेले पर्वत व झाडे पाहिली की आपण अतिशय क्षुद्र आहोत याची जाणीव होते. मोहमाया नष्ट होतात, त्यामुळे नवी पापे हातून घडत नाहीत.
पुढचा भाग: https://www.maayboli.com/node/65219
बद्रीनाथ.
मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65194
आता परतीचा रस्ता असल्याने सगळे लोक निवांत होते. आज पाऊस नव्हता. हवाही स्वच्छ कोरडी होती. पण रात्रभर पाऊस पडत होता त्यामुळे सगळीकडे ओले चिप्प झाले होते, हवेत प्रचंड गारवा होता. सगळे आवरून, काही मागे राहिले तर नाही ना हे चेक करून नाश्ता, डब्बा वगैरे घेऊन आम्ही निघालो. खाली नेहमीसारखे घोडेवाले, पोर्टर गोंधळ घालत होते. घाटी व हेमकुंड साहिबला जाणाऱ्यांची गडबड चाललेली. आम्ही फक्त सामान नेणारे घोडे मिळतात का पाहायला लागलो. आमच्या तिघींमध्ये फक्त दोन सॅकस होत्या, त्या दोन्ही मुलींच्या पाठीवर देऊन मी निवांत होते. हॉटेलच्या आजूबाजूला असलेले घोडे वर हेमकुंडला जाणारे होते, त्यांना खाली जाण्यात रस नव्हता. थोडे चालत खाली जाऊया, हेलिपॅडच्या इथे आपल्याला घोडे मिळतील म्हणत आमचा ग्रुप चालू लागला. आज उतरण असल्याने दोन्ही मुलींची पाठीवर सॅक घेऊन चालायची तयारी होती, पण घोडे मिळताहेत तर जाऊदे सामान त्यांच्यावरून असे माझे मत पडले. अर्धे उतरून गेल्यावर सामानाचे ओझे वाटले असते तर तिथून घोडा करावा लागलाच असता. घोडेवाले तसे प्रत्येक वळणावर हजर असतात. शहरातून येणाऱ्या माणसांची कुवत त्यांना माहीत असते.
हेलिपॅडच्या इथले एक दृश्य. ते तंबू दिसताहेत ते ट्रेक टू हिमालय कंपनीचे.

तो पांढरा बोर्ड दिसतोय तो हेलिपॅडकडे जायचा रस्ता दाखवतोय. तिथून थोडे खाली गेले की हेलिपॅड. हेलिकॉप्टरने आलात तरी इथून वर गोविंदधामपर्यंत जायला दीडेक किमी चालावे लागते. तरी हा एक चांगला पर्याय आहे. स्वच्छ हवा असेल तर सकाळी सहाला जोशीमठहुन निघायचे व गोविंदघाटाला यायचे.साधारण तासभर लागतो पोचायला. गोविंदघाटात राहायची व्यवस्था बहुतेक नाही. तिथून कॉप्टरने पाच मिनिटात गोविंदधाम म्हणजेच घंगरिया. सामान हॉटेलात टाकून लगेच घाटीसाठी निघायचे. आपला एक दिवस वाचतो जो घाटीत घालवता येतो. जाताना पायी जायचे म्हणजे रस्त्यावरची शोभाही बघून होते. यायचे जायचे पायी करण्यात पॉईंट नाही. हेलिकॉप्टर माणशी 3200 घेत होते, आम्ही तिथे होतो तेव्हा. पाऊस असेल किंवा हवा खूप जास्त खराब असेल तर हेलिकॉप्टरसेवा बंद असते त्यामुळे जोशीमठवरून निघताना हवेचा अंदाज घेऊनच हा प्लॅन करावा.
हेलिपॅडपर्यंत जाईतो घोडेही मिळाले. घोड्यांवर सामान टाकून पुढे पाठवून दिले. सामान कुणी चोरून नेईल वगैरे काळजी करण्यात इथे काही अर्थ नसतो. कोणालाही तुमच्या सामानात रस नसतो. तरीही आपले किमती सामान आपल्यासोबत बाळगलेले बरे.
परत जाताना येतानाचीच वाट असली तरी आम्ही घोड्यावरून आलो असल्याने फारसे काही पाहता आले नव्हते. त्यामुळे आता रमत गमत रस्ता बघत निघालो. रात्रभरच्या पावसाने काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहात होते. पाण्यात पाय घातला तर बूट-मोजे ओले होऊन उगीच त्रास, त्यामुळे जिथे रस्त्यावर पाणी होते तिथे दगड टाकून पाणी ओलांडायची सोय केली होती.

दुतर्फा तुफान फुले फुलली होती. यातली कित्येक वर घाटीत मी पाहिलेली, कित्येक मला नवी होती. फोटो काढत आरामात यात्रा सुरू होती.
ही आहेत ग्रेसफुल सेनेसीओ. खरेच खूप ग्रेसफुल दिसतात. शास्त्रीय नाव :Senecio graciliflorus

तीनही रंगात फुललेल्या बालसमसोबत निळी घंटीफुलेही चिक्कार होती. चारही दिशांना नुसती रंगांची उधळण.....
ह्या खालच्या फुलाचे नाव माहीत नाही. कदाचित पांढऱ्या पानाचे हॉगविड असू शकेल. किंवा त्या कुळातले कुणी.
शास्त्रीय नाव :Semenovia candicans

ही एजवर्थस कॅम्पियन. शास्त्रीय नाव :
Silene indica var. edgeworthii

ही खालची फुले खूप नाजूक होती. अगदीच लहान. नाव लिफी मिडो रुई. हिंदीत मामेरा. शास्त्रीय नाव :Thalictrum foliolosum

पानांची रचना पहा.

फ्लॉवर्स ऑफ इंडियावर ह्याला शोधत असताना , आयुष्य भरभराटीत जावे म्हणून
नवजात शिशुना ह्या फुलांची उशी करून त्यावर निजवतात असे वाचायला मिळाले. 

ही तिथली लोकल कंटोली. हिंदीत बन करेला म्हणतात.
शास्त्रीय नाव :
Herpetospermum pedunculosum

ही फुले पाहिल्यावर ऐशूला आठवले की पहिल्या दिवशी घाटीवरची फिल्म
पाहायला ती गेली होती तेव्हा या फुलांची काहीतरी आख्यायिका तिथे
सांगितलेली. तिला अर्थातच ती आता आठवत नव्हती


ही आहेत हिमालय टीसेल. हिंदीत फुली म्हणतात. शास्त्रीय नाव : Dipsacus inermis
खूप सुंदर दिसतो हा गुच्छ, खूप लहान आहे. फोटोत कल्पना येत नाही. 2 सेमी असेल फारतर.

ही Wight's Myriactis असावीत असे वाटतेय, शास्त्रीय नाव : Myriactis wightii

जवळून : खूपच लहान फुले.

हे हिमालय ब्लु सो-थिसल असण्याची शक्यता आहे. मूळ पाकळी याहून गडद
रंगाची आहे असे दिसतेय, मी पाहिलेली कदाचित पाण्यामुळे फिकट झाली असेल.
शास्त्रीय नाव: Lactuca brunoniana
ही लायलॅक हिमालयन अष्टर

शोबाजी करणारे आयन्यूला
. हे बऱ्यापैकी मोठे होते.

हे बहुतेक बार्बेड फॉरगेट मी नॉट असावे

थेंबात उतरलेले आकाश

आम्ही जाईपर्यंत स्नेक लिली फुलून गेली होती, तिला फळे धरली होती.

एक मधला मोठा पूल क्रॉस केल्यावर छोटी छोटी गावे लागायला लागली. ह्या पुलाच्या ठिकाणी 2013 मध्ये महापूर येऊन सगळे वाहून गेले. आता तिथे संरक्षक बंधारे घालायचे काम सुरू आहे. घाटीत असताना पोर्टर सांगत होता की ढगफुटी झाली तेव्हा तो आणि अजून खूप जण घंगरियात अडकून पडले. खाली येणे अशक्य होते. शेवटी लष्कराने सुटका केली.
या वाटेवर खूप टपऱ्या भेटतात. आलू प्रॉठा वगैरे शहरी जिन्नस मिळायला लागतात. एका स्टॉलवर आम्ही फ्रुट चाट घेतला.
शेवटी चालून चालुन खूप वैताग आला. कधी एकदा वाट संपतेय असे झाले. सुदैवाने पाऊस अजिबात नव्हता, नाहीतर हाल झाले असते. चढताना जो चढ श्वास लावणारा ठरतो तोच उतरताना पावले व गुढग्याची वाट लावणारा ठरतो.
असे अनेक चढउतार करत शेवटी एकदाचे पुलना गाव आले. तिथे आमच्या बॅगा एका
ठिकाणी ठेवलेल्या होत्या. त्याचे पैसे वगैरे देऊन झाल्यावर तिथे वाट बघत
असलेल्या ट्रॅक्समध्ये सगळे जाऊन बसायला लागले. प्रत्येक गाडीत दहाजन
कोंबायचेच हा नियम असल्याने आमची दहा पंधरा मिनिटे गाड्यांमध्ये फिट
होण्यातच गेली. पण कोणीही पुलना ते गोविंदघाट चालत जायचे नाव काढले नाही.
सगळे आत कोंबले गेल्यावर गाडी एकदाची सुरू झाली व अर्ध्या तासात
लक्ष्मण सेतुला पोचली. रस्ता वळणाचा जरी असला तरी साधा होता. आणि अशा
साध्या रस्त्यावरही एक गाडी चारी चाके वर करून रस्त्याच्या बाजूला पडलेली.
तिला काढायचे काम सुरू होते. इथे एकूणच अनिश्चितता फार आहे.
लक्ष्मणसेतू पार करून गाडी आल्यावर इथेच उतरायचे की गोविंदघाटापर्यंत जायचे हा प्रश्न उभा राहिला. इथे उतरायचे तर पस्तीस रुपये, शेवटपर्यंत जायचे पन्नास रुपये. मला व सुरेशरमेशला शेवटपर्यंत जायचे होते पण काहीही कारण नसताना एक उतरतोय म्हणून दुसरा करत बाकीचे लोक भराभर गाडीतून उतरले. मुली उतरल्यावर मला उतरावे लागले. इथून जवळच तर आहे हे मुलींचे मत पडले. तीन दिवसांपूर्वी इथे यायला किती मोठी पदयात्रा केली होती हे विसरून गेल्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला.. जाताना जिथे पराठे खाल्ले तिथेच मुलींनी परत पराठे व मॅगी खाल्ली आणि आम्ही निघालो. मी एका म्हाताऱ्याला गोविंदघाट किती दूर आहे म्हणून विचारले तर तो म्हणाला एक किमी. त्याला बहुतेक नीट मोजणी येत नव्हती.
आम्ही तिथल्या बाजारातून म्हणजे दोन्ही बाजूला लावलेल्या स्टॉलमधून पदयात्रा करत निघालो. मुली प्रत्येक स्टॉलसमोर थांबून उगीच टाईमपास करत होत्या. सरदार घालतात तसली कडीसुद्धा तिथे विकत घेतली बहुतेक. पुढे गुरूद्वारा दिसल्यावर ग्रुपमधले दोघे तिघे आत गेले. मलाही जायचे होते, पण पोरी कसल्या जायला देताहेत?
ते स्टॉल्स अखेर संपले व आम्ही मोकळ्या जागी आलो. तिथे आल्यावर समोर किती चढण आपली वाट पाहतेय हे मला दिसले. तो रस्ता दिसल्यावर येताना बसमधून उतरून खाली किती उतरत आलो होतो ते मला आठवले आणि लक्ष्मणसेतुला गाडीतून उतरल्याचा भयंकर पश्चाताप झाला. हॉटेलात मला काहीच खायचे नव्हते, ना काही शॉपिंग करायची होती. गुरुद्वारात जाऊन लंगरही हाणता आला नाही आणि फुकट पदयात्रा मात्र गळ्यात पडली. अजून पंधरा रुपये देऊन मी एवढ्यात आरामात बसपर्यंत पोचले असते. मुलींना याचे काहीही सोयरेसुतक नव्हते. त्या दोघीही ठणठणीत होत्या व पाठीला सॅक लावून मजेत जात होत्या. मला मात्र एकेक पाऊल उचलताना ब्रह्मांड आठवत होते. त्यात वाटेत रस्त्यावर पाणी आलेले. दगडांवरून तोल सावरत जाणे एरवी सोपे असते पण मला खूप कठीण गेले. पुढे उभा चढ होता. प्रत्येक पावलाला दोन दोन मिनिटे थांबत मी कशीबशी एकदाची हमरस्त्यावर आले. शामली व ऐशु न कंटाळता माझ्यासोबत थांबत होत्या ते नशीब.
बस आमची वाट पाहात उभी होती. मुलींनी सामान डिकीत वगैरे टाकले व आम्ही बसमध्ये जाऊन बसलो. मला कधी एकदा बद्रीनाथला पोहोचतो असे झाले होते. बद्रीनाथ तिथून फक्त पंचवीस किमी दूर होते, पण हिमालयाचे पंचवीस किमी म्हणजे आपले 250 किमी असे धरून चालायचे. सगळी मंडळी पोचल्यावर बस एकदाची सुरू झाली. जोशीमठवरून आम्ही पुढे निघालो. नकाशावर अंतर पंचवीस किमी असले तरी चार हजार फूट चढायचे होते, त्यामुळे सरळ रस्ता असा नव्हताच. नुसती वळणे, वळणे आणि अजून वळणे. बस आपली गोल गोल फिरत जाते. दिसणारा निसर्ग अर्थातच प्रेक्षणीय आहे.
वाटेत शिरस्त्याप्रमाणे दोन तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे खोळंबा झाला. तिथले रस्ते एकदम लहान असतात. समोरून दुसरी गाडी आली तर दोघेही संभाळून चालवतात एवढे लहान. मोठ्या बसेस तिथे पाहिल्या नाहीत. बहुतेक नसाव्यात, तेवढी जागाच नाहीये. जिथे लॅन्डस्लाईड होते तिथला रस्ता नष्ट होतो. जे काही खडकाळ शिल्लक राहते त्यावरून बस जाते तेव्हा आपण बोटीत आहोत असा भास होतो व जर ती बोट उलटली तर रस्त्याला चिकटून असलेल्या हजार फूट खोल दरीत रोरावत वाहणाऱ्या बर्फ़ाळ पाण्यात मोक्षप्राप्ती निश्चित.
माझ्या शेजारी बंगलोर मंडळाचे मामा बसले होते. त्यांची ही दुसरी बद्रीनाथवारी. इधर आनेके पहले सब कुछ घरवालोंके नामपे लिख देनेका हा सल्ला न विचारता त्यांनी दिला. आप लिखके आये क्या म्हणून मी विचारल्यावर हसत हो म्हणाले. चार दिवसांपूर्वी जोशीमठला असताना माझ्या डोक्यात पुढे कधीतरी केदारनाथही करुया असे आले होते. पण या प्रवासाचा अनुभव घेतल्यावर डोक्यातले धाडसी विचार आपोआप अस्तंगत पावले. (आता ते परत आलेत डोक्यात. परत घाटीत तर जायचेच पण सोबत छोटी चारधाम यात्राही करायची असे काहीसे फिरतेय डोक्यात. उबदार घरात सोफ्याच्या मऊशार सिंहासनावर बसलेला माणूस शूर, धाडसी व. व. असतो.
रच्याकने, केदारनाथ-गंगोत्री-यमुनोत्री-बद्रीनाथ ही छोटी चारधाम यात्रा. बद्रीनाथ-रामेश्वरम-द्वारका-जगन्नाथपुरी ही बडी चारधाम यात्रा.)
तर अशी कोट्यवधी गोल गोल वळणे घेतल्यावर आम्ही साडेतीन चारच्या सुमारास एकदाचे बद्रीनाथला पोचलो. बद्रीनाथला युथ हॉस्टेलची स्वतःची जागा आहे. मोठ्या प्रशस्त जागी स्त्री व पुरुषांसाठी वेगवेगळ्या निवासात मोठ्या डॉर्मिटरीज, जेवणाचा वेगळा हॉल, मॅनेजरसाठी वेगळा बंगला कम ऑफिस वगैरे सगळे बांधले आहे.
इथे आम्ही दोन रात्री राहणार होतो. आमचा आजवर सुरू असलेला, युथ हॉस्टेलच्या भाषेतला फाईव्ह स्टार ट्रेक संपून आमचे पाय आता हळूहळू जमिनीला लागणार याची चुणून इथल्या वास्तव्यात आली. आजवर आम्ही हॉटेलात राहात होतो जे युथ हॉस्टेलच्या नियमांना धरून नव्हते. पण आज व उद्या डॉर्मिटरीत राहणार होतो व कॉमन टॉयलेट्स वापरणार होतो. हे युथ हॉस्टेलच्या नियमांशी सुसंगत होते.
गेल्या गेल्या डोर्ममध्ये आपापल्या जागा पकडून झाल्या. मी जो बेड निवडला त्याच्या शेजारी अजून एकच बेड खाली होता, तो ऐशूने पकडला. शामलीला समोरचा बेड मिळाला. बेड वगैरे सगळे व्यवस्थित होते, उशी, पांघरुणे होती. काकडून जायला होईल इतकी थंडी बाहेर होती. पावसाची बारीकमोठी भुरभुर सुरू होती. बेड पकडून सामान टाकल्यावर लगेच चहापानासाठी डायनिंग हॉलमध्ये बोलावले. तिथे चहा पिऊन झाल्यावर बद्रीनाथाचे दर्शन घ्यायला त्वरित निघायचे की उद्या संध्याकाळी दर्शन घ्यायचे याची चर्चा सुरू झाली. उद्या सकाळी उठून 5 किमी ट्रेक करून मानाला जायचे होते. माझ्यासारखे काही मेम्बर्स जे पार गठाळून गेले होते त्यांना कसल्याही चर्चेत रस नव्हता. पण इतर उत्साही मेम्बर्सनी आता लगेच जाणे योग्य हा मुद्दा मांडला. उद्या येताना उशीर वगैरे झाला तर मंदिर भेट चुकण्याची भीती होती. आता सहाच वाजत आले होते व मंदिर आठ की नऊ पर्यंत उघडे असल्याने आरामात दर्शन होणार होते.
माझा चेहरा आदल्या दिवसापासून सुजायला लागला होता व आतापावेतो सुजून भोपळ्यासारखा टम्म झाला होता. प्रचंड थकवा जाणवत होता. 'तुम्ही आता काहीही हालचाल न करता गुपचुप पडून राहा' असे ग्रुपलीडरने बजावले. तशीही कुठे ताकद राहिली होती माझ्या अंगात?
बद्रीनाथला गेल्यावर आपापले टॉवेल्स उचलून मंदिरात जायचे व तिथल्या तप्तकुंडात अंघोळ करून ट्रेकचा सगळा शीण घालवायचा असा सल्ला ऋषीकेशला मिळाला होता. तप्तकुंडात अंघोळ करायचेही एक टेक्निक आहे. एकदम पाण्यात शिरलात तर अंग भाजेल. म्हणून आधी फक्त पहिल्या पायरीवर बसायचे व पाय पाण्यात सोडायचे. पायांना गरम पाणी सोसायला लागले की दुसऱ्या पायरीवर सरकायचे. असे करत एकेक पायरी खाली सरकत गळ्यापर्यंत पाण्यात बसायचे. तुमचा सगळा शीण निघून ताजेतवाने वाटायला लागते. हे ज्ञान ऋषीकेशला टूर मॅनेजरसाहेबांनी दिले होते.
आजच मंदिरात जायचे ठरल्यावर सगळ्याजणी डॉर्ममध्ये कपडे घ्यायला परतल्या. ऐशु व शामली कपडे घेऊन इतरांबरोबर मंदिरात गेल्या व मी बेडवर पडले.
रात्री साडेआठच्या सुमारास भाविक परतले. ऐशूला विचारले तर ती म्हणाली की पाणी इतके प्रचंड गरम होते की पहिल्या पायरीवर बसणेही शक्य नव्हते. तिथे कुणाचीतरी बादली व मग त्यांना मिळाला, बादलीने कुंडातून पाणी आणून त्यांनी मगाने कुंडस्नानाचा आनंद घेतला. चिप्प ओले झालेले कपडे घेऊन मुली आल्या होत्या. निवासाबाहेर दोऱ्या बांधलेल्या होत्या कपडे वाळत घालायला. त्यावर कपडे दोन दिवस होते तसेच चिप्प राहिले. शेवटी हरिद्वारला एका रात्रीत वाळले.
रात्री जेवण करून परतलो तेव्हा डोर्ममध्ये असंतोषाचे वारे वाहत असल्याचे आढळले. आज दोन ग्रुप वस्तीला होते. आमच्या बिल्डिंगीत दोन हॉल होते. प्रत्येकात सोळा सतरा बेड होते. म्हणजे एकूण जवळ जवळ 30-35 बेड होते. आणि यांना मिळून सामायिक 4 टॉयलेट्स आणि 2 बाथरूम होते. असंतोष यावरून सुरू होता. इतक्या लोकांसाठी हे टॉयलेट बाथरूम पुरेसे नाहीत अशी बडबड आमच्या ग्रुपमधल्या काहीजणी करत होत्या. सर्व संबंधितांना शक्य तितकी दूषणेही देऊन झाली. दुसऱ्या ग्रुपचे काय मत होते देव जाणे. त्यांचे दर्शन फक्त जेवणाच्या वेळेस झाले होते. त्यांच्या ग्रुपमध्ये १०-१२ बायका होत्या, आम्ही १६ जणी होतो.
माझ्या मतेतरी काही प्रॉब्लेम नव्हता. युथ हॉस्टेल कित्येक वर्षे हा ट्रेक करतेय, काही प्रॉब्लेम असता तर त्यांनी काहीतरी उपाय केले असतेच.
बडबड करणारे सदस्य शेवटी कंटाळून झोपायच्या तयारीला लागले तेव्हा दुसरे संकट उभे राहिले. आधीच्या भागात लिहिलंय तसं बंगलोरकर ग्रुप जरा सॉफीसटीकेटेड होता व गुजराती ग्रुप नॉर्मल गुजराती होता :). ट्रेक सुरू झाल्यापासून बस मधला प्रवास सोडता कोणी कोणाच्या अध्यातमध्यात नव्हते, थेट संपर्क नव्हता. पण एका हॉल मध्ये सगळे राहणार म्हटल्यावर भांड्याला भांडे लागायला लागले. बंगलोरकर मुलींनी सगळे फटाफट आटपून बेड पकडले. त्यांना आता दिवे बंद करायचे होते. पण गुजराती मुलींची बडबड संपेना. त्यात आपले आवाज किती मोठे आहेत हेही त्यांना माहीत नव्हते. त्यांची आवराआवर संपेना. आम्ही बाकीचे लोक वैतागलो. इतर लोकांना झोपायचे आहे हे त्यांच्या गावीच नव्हते. तोंडाने बडबड, हाताने सामान आवरणे व एका मागोमाग एक मुलगी उठून टॉयलेटला जात होती. जाताना हॉलचा दरवाजा तसाच उघडा. त्यातून गार वारा आत येई, मग कुणी उठून तो बंद करी. मला तर शेवटी हसायला यायला लागले. एकजण सतत प्लास्टिकच्या पिशवीतून सामान काढघाल करत बसलेली, ती पिशवी इतका चुरचुर आवाज करत होती की शेवटी एक बंगलोरकरीन ओरडलीच. तास दीड तासभर हा गोंधळ चालू होता. शेवटी सगळे झोपले एकदाचे.
मला सवयीने सकाळी चारला जाग आली. मी आज कुठेही जायचे नाही असे ठरवले होते. पण जाग आल्यावर बाकीची पलटण उठायच्या आधीच मी उठून माझे आवरून घेतले. बाथरूममध्ये मोठा स्टोरेज गिझर होता. त्याचे गरम पाणी काढून अंघोळही करून घेतली. अंगदुखी थोडी कमी होईल म्हणून.
हळूहळू एकेकजण उठली. सगळ्यांचे व्यवस्थित आवरून झाले. काल रात्री प्रॉब्लेम्स होतील होतील म्हणून इतकी चर्चा झालेली, पण सकाळी काहीही प्रॉब्लेम झालेला दिसला नाही.
नाश्ता झाल्यावर डबा घेऊन बसने माना गावापर्यंत जायचे व तिथून 5 किमी ट्रेक करून वसुधारा धबधबा पाहायचा असा कार्यक्रम होता. माना हे त्या बाजूने भारतातील शेवटचे खेडे. पूढे काही किमी गेल्यावर चिनी बॉर्डर लागते. पांडव वनवासात असताना मानात राहिले होते. भीमाने नदीवरील पूल म्हणून टाकलेली शिळा याच भागात आहे.
मला थोडा ताप आल्यासारखे वाटत होते व तसेही आज ट्रेक अजिबात जमला नसता म्हणून मी बेडवर पडून राहायचे ठरवले. माझ्याकडे लक्ष द्यायला कोण नसणार म्हणून ऐशुने माझ्यासोबत राहायचे ठरवले. शामली ट्रेकला जाणार होती. बंगलोरकर ग्रुपने त्या येत नाहीत म्हणून ग्रुप लिडरला थेट सांगितले होते बहुतेक. कारण इथे त्या कोणाला काही बोलल्या नाहीत पण तयारीही करत नव्हत्या. गुजराती मुलींचा कर्कश आवाजात गोंधळ सुरू होता. मेकअप वगैरे सगळे आटोपल्यावर त्या सगळ्या गेल्या आणि त्यातल्या दोघी परत आल्या. तिकडे गाडीचा ड्राइव्हर हॉर्न वाजवत होता आणि इकडे एकजण बॅगेतून एकेक टॉप काढून तो अंगाला लावून कसा दिसतोय हे दुसरीला विचारत होती. फोटोत टॉप चांगला दिसायला हवा ही तिची काळजी तिच्या बडबडीवरून इतरांच्या लक्षात आली. पूर्ण ग्रुपला बाहेर खोळंबत ठेऊन फोटोत टॉप चांगला दिसायला हवा ही काळजी करणाऱ्या दिव्य मुलीला शेवटी मनासारखा टॉप सापडला व तो चढवून ती मैत्रिणीबरोबर गेली.
ती खोलीबाहेर पडताच बंगलोर ग्रुपने तिच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली. त्यांनी नंतर आरामात तयारी केली. त्यांच्या बोलण्यावरून जिथे ग्रुप गेला तिथेच त्याही निघाल्या हे माझ्या लक्षात आले. बसमधून जाता आले असते, पण गुजराती संसर्ग टाळायचा असणार. शेवटी तो ग्रुपही निघाला. त्यांच्यातली एक, जी नंतर लेहला महिनाभरासाठी जाणार होती, तिची तब्येत माझ्यासारखीच बिघडलेली. ती बिछान्यात पडून राहिली. तिचा नवराही गेला नाही. तिने भारी नाचवले त्याला दिवसभर. आणि बंगलोरकर दुसरे जोडपे, कुणाशीही न बोलणारे, तेही गेले नाही. ऐशूने अंघोळ आटपली व माझ्यासाठी गोळ्या आणायला म्हणून गावात गेली. ती आता इतकी फिट झालेली की बाहेर इतक्या थंडीतही ती टी शर्ट व शॉर्टस घालून फिरत होती. अशा तऱ्हेने सगळे गेल्यावर आमचा हॉल एकदम शांत झाला आणि मी निवांत झोपले.
बऱ्याच वेळाने जाग आल्यावर बघितले तर कुणाशीही न बोलणारी बेंगलोरी मॅडम चक्क शेजारणीशी बोलत होती. तिला युथ होस्टेलच्या ट्रेकबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे जेवल्यावर भांडी घासणे वगैरे प्रकारांना ती खूप वैतागली होती. परत कद्धी कद्धी म्हणून युथ हॉस्टेलच्या ट्रेकला येणार नाही हेही तिने जाहीर करून टाकले.
दुपार झाल्यावर मी माझा डब्बा खाऊन घेतला. आम्हाला दुपारचे जेवण मिळणार नव्हते, न जाणाऱ्यांनी आपापले डब्बे भरून घ्यावेत असे सकाळी सांगण्यात आले होते. ऐशु मस्त गाव फिरून, डोसा वगैरे चापुन आली होती. तिला बद्रीनाथ गाव खूप आवडले.
संध्याकाळी बऱ्याच उशिरा ट्रेकर्स परतले. शामलीने ट्रेकच्या गमती जमती सांगितल्या, गुजराती ग्रुपचे गॉसिप केले. सगळ्यात भारी म्हणजे बेंगलोरी ग्रुप त्यांच्या मागूनच फिरत होता, प्रायव्हेट टॅक्सी करून ते आले होते. आणि त्यांनी तिकडे ग्रुपच्या कुणाला साधी ओळखही दाखवली नाही, मग बोलणे तर दूरच.
दुपारी ऐशुने येताना एक डिप्रेसिंग बातमी आणली होती. आम्ही ज्या रस्त्यावरून काल आलो होतो त्या रस्त्यावर रात्री भली मोठी दरड कोसळली होती, जवळजवळ दोन किमी इतका रस्ता पूर्ण नाहीसा झाला होता व त्यामुळे आज सकाळी ऋषिकेशला निघालेला आमच्या आधीचा ग्रुप बद्रीनाथलाच अडकून पडलेला. ग्रुपमधली एक मुलगी ऐशूला गावात भेटली. ती म्हणाली की ज्यांची दुसऱ्या दिवशी फ्लाईट किंवा रेल्वेची तिकिटे होती ते लोक पुढे निघून गेले, जे वाहन मिळेल त्याने जाऊ म्हणत. बाकीचे मागे राहिले.
आता शामली म्हणाली की आधीच्या ग्रुपची बस यांच्या बसबरोबर परत आली. हे सगळे ऐकल्यावर परत कधी इथे चुकून आलोच तर बॅक टू बॅक तिकिटे बुक करायची नाहीत हे ठरवले. मध्ये एक दिवस जाऊ द्यायचा. इथे कसलाच भरोसा देता येत नाही. सगळे दैवाधिन. तशी आमची तिकिटे अजून दोन दिवसानंतरची होती, त्यामुळे तेवढे टेंशन नव्हते.
संध्याकाळपर्यंत मला थोडे हिंडता फिरता यायला लागले. देवळात जाऊन यायचे मनात होते पण ऐशूने नको म्हटले. पूर्ण आराम करच म्हणून ती ओरडायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी जे हाल झाले ते पाहता आराम केला ते बरेच झाले म्हणायचे.
जेवताना लोक जरा अस्वस्थ होते. रस्ता क्लीअर होण्यावर दोन्ही ग्रुपचे ऋषिकेश पोचणे अवलंबून होते. जोशीमठचे उत्साही कॅम्प लीडर इथे कालच आमच्या आधी पोचले होते. ते बिनदास्त सगळ्यांना रस्ता क्लीअर झाला म्हणून सांगत होते. उद्या आम्ही तुम्हा सगळ्यांना धाडून देणार आहोत, रस्ता क्लिअर आहे. काही जण हुज्जत घालत होते, 2 दिवस तरी काही होत नाही अशी बातमी आहे आणि तुम्ही म्हणताय क्लीअर झाला. मला ह्या सगळ्या प्रकरणात युथ हॉस्टेलने अशी भूमिका का घेतली व कॅम्प लीडर खोटे का बोलत होते हे शेवटपर्यंत कळले नाही. सगळ्यांची परतीची तिकिटे होती, कुणालाही बद्रीनाथमध्ये राहण्यात रस नव्हता, चार दिवस मुक्काम करण्यासारखे तिथे काहीही नाहीय. तुम्ही अगदीच कट्टर भाविक असाल तर गोष्ट वेगळी. अशा वेळेस जे खरे आहे ते सांगायला पाहिजे होते.
ट्रेकवरून आलेली मंडळी संध्याकाळी गावात गेली. हिंडून फिरून रात्री उशिरा परतली, येताना हादडूनही आली. त्यामुळे वातावरण परत थोडे गरम झाले. कारण आमचे जेवण बनवू नका हे कुणी सांगितले नव्हते. येताना आकाशगंगा दिसल्याचे शामलीने सांगितल्यावर मला थोडे वाईट वाटले. मी गेटबाहेर जाऊन काही दिसते का बघायचा प्रयत्न केला पण गार्डने बाहेर जाऊ दिले नाही. आत सर्वत्र दिवे होते त्यामुळे आकाश नीट दिसत नव्हते.
दुसऱ्या दिवशी साडेसहाला निघायचे असा फतवा निघाला. मी बॅगा भरून झोपले. नेहमीप्रमाणे उठून आन्हिके आवरून सहा वाजता नाश्ता घेतला, डबे भरून घेतले व निघण्यासाठी बाहेर आलो. कॅम्प लीडर आताही रस्ता क्लीअर झाला ही रेकॉर्ड वाजवत होते. त्यावरून दुसऱ्या ग्रुपमधल्या काही जणांचे त्यांच्याशी खूप जोरात वाजले. गुजराती मंडळाने सुद्धा त्यांच्याशी या विषयावरून भांडण करून घेतले. शेवटी सगळे आपापल्या बसमध्ये बसले व आम्ही निघालो.
बाहेर येऊन दोन तीनशे मीटर जात नाही तेवढ्यात रस्ता लाकडे टाकून अडवल्याचे दिसले. याचा अर्थ कोसळलेली दरड साफ केली नव्हती व बसला पुढे जायची परवानगी नव्हती. मग युथ हॉस्टेलने फक्त 300 मीटर जाण्यासाठी आम्हाला का बस मधून धाडले? त्यांचा एकूण एटीट्युड काहीही करा पण आमच्या हद्दीतून बाहेर पडा असा होता. असे वागणे असोसिएशनला अजिबात शोभत नाही खरे तर...
आम्ही बस मधून उतरून सामान घेईपर्यंत आमच्या ग्रुपने ट्रॅक्स ठरवल्या. बस न्यायला परवानगी नसली तरी ट्रॅक्सने दरडीच्या जागी जाता येत होते. तिथे ट्रॅक्सने जाऊन कोसळलेली दरड पायी क्रॉस करून पलीकडे जायचे व तिथून दुसरे वाहन करून ऋषीकेशला जायचे असा प्लॅन बनवला.
मला हा प्लॅन सोप्पा वाटला. कोसळलेली दरड क्रॉस करणे म्हणजे आपल्याइथे रस्त्याच्या कामासाठी ओतून ठेवलेली वाळू क्रॉस करण्यासारखे आहे असा समज मी का करून घेतला माहीत नाही. मला तेव्हा खरेच तसे वाटले. पुढे काय वाढून ठेवले होते याचा अजिबात अंदाज न येता मी ट्रॅक्समध्ये चढले.
ऋषिकेशला परत..
मागचा भाग :
https://www.maayboli.com/node/65219
जोशीमठावरून बद्रीनाथला ज्या वाटेने आलो होतो त्याच वाटेने आता परत निघालो. अर्ध्या तासात दरडीच्या जागी पोहोचलो. गाडीतून उतरून समोर पाहिले तर रस्ता गायब.. तिथे दगडमातीचे डोंगर पसरलेले. माती उचलणारे जेसीबी होते, काम सुरू होत होते.
सामान गाडीतून काढून घेतल्यावर ते उचलून नेण्यासाठी पोर्टर आले. तेवढाच
त्यांना धंदा. आम्हाला भेटला तो पोर्टर म्हातारा होता, त्याला सामान
द्यायला मला जीवावर आले होते.
पण दिले नाही तर त्याचे पोट भरणार नाही आणि आम्हाला उचलवणारही नाही अशी
द्विधा परिस्थिती. त्यामुळे निमूट सामान देऊन चालू लागलो. जायचे कुठून
त्याचा पत्ताच नव्हता.
वो देखो, लोग जा रहे है, वहासे जानेका। तो म्हणाला.
त्याने दाखवल्या दिशेने रस्त्याच्या बाजूला एक पायवाट वर जात होती. थोडी वर जाऊन ती दरडीच्या दिशेने वळली होती. आम्ही होतो तिथून फारसे उंच नव्हते, तीसेक फूट असेल फारतर. तिथवर जायचे, मग तिथून दरडीला समांतर रस्ता असेल, त्यावरून चालत गेलो की येईल त्या बाजूचा रस्ता. फारतर दहावीस मिनिटात पोचू त्या बाजूला असा विचार करून मी चालायला सुरुवात केली.
वर जाण्यासाठी पायऱ्या व धरण्यासाठी एका बाजूला लोखंडी आधार अशी व्यवस्थित तयारी करून पायवाट दगडात बांधली होती. म्हणजे हा रस्ता आता दरड कोसळल्यावर तयार झाला नव्हता तर वर डोंगरावरून खाली यायचा नेहमीच्या वापरातील रस्ता होता हे चढताना लक्षात आले.
पायऱ्या चढून गेल्यावर तशीच दगडी पायवाट पुढे जात होती. त्यावर बऱ्यापैकी रहदारी होती. सकाळचे सात साडेसात वाजले होते. शाळेच्या गणवेशातली मुले होती, स्वेटर घातलेल्या स्त्रिया होत्या. सामान घेऊन जाणारे पुरुष होते व त्यांच्यात आम्ही. आमचा दुसरा ग्रुपही सोबत होता. सगळे मागे पुढे चालत होते. रात्री पाऊस पडून गेल्याच्या खुणा होत्या पण आता मात्र कोवळे ऊन पडले होते.
दरडीकडे जाणारे वळण मागे पडल्यावर मागचे दिसायचे बंद झाले. आता दोन्ही बाजूला फक्त झाडी व पायवाटेवर चालणारे लोक इतकेच राहिले. चालता चालता समोर पाहिले तर पायाखालची वाट चक्क साठ डिग्रीचा अंश करून वर निघालेली. माझ्या पायाखालची जमीन सरकतेय की काय असे क्षणभर वाटले. आमचा ग्रुपलिडर महेश लक्ष ठेऊन होता सगळ्यांवर.
त्याला विचारले, ही वाट कुठे जातेय? आपण कसे जाणार? तो शांतपणे म्हणाला, मॅडम, ट्रेक अजून संपला नाही. ही वाट अशीच वर जाणार. ह्या डोंगराच्या वर टोकाला एक गाव आहे, आपण तिथवर चढून जाणार. गावातून खाली उतरायचा रस्ता आहे. तिथून खाली उतरलो की गेलो पलीकडे.
मला काय बोलायचे सुचेना. मी हतबुद्ध होऊन त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले.
मॅडम, सह्याद्रीतले ट्रेक्स केलेत ना तुम्ही? मग करा सुरवात चालायला.
काय बोलणार आता. मी असे कितीसे केलेत सह्याद्रीतले ट्रेक्स? आमची पारसिक टेकडीच माझे कळसुबाई. पण आता बोलण्यात शक्ती घालवून काही उपयोग नव्हता. काल बिछान्यात पडून राहिले ते बरे केले म्हणत चालायला सुरुवात केली.
हा रस्ता त्या वरच्या गाववाल्यांसाठी होता बहुतेक. नागमोडी वळणे घेत वर जात असला तरी बरेच ठिकाणी खूप कच्चा होता. फक्त काही ठिकाणी दगड टाकून पक्का केला होता. गेले तीन दिवस आम्ही चालत असलो तरी ते रस्ते याच्यापेक्षा चांगले होते. दिवसभर रस्ते साफ केले जात होते. इथे चिखल, पाणी, दगड, धोंडे, शेण.. हरे राम!!
माझा अंत पाहणारा चढ मी अगदी हळू हळू चढायला सुरवात केली. सतत धाप लागत होती. मुलीही सोबत होत्या. त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. मलाच सगळे प्रॉब्लेम्स घेरायला आले होते. शेवटी वैतागून प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष केले व आजूबाजूला लक्ष द्यायला लागले.
इतका सकारात्मक निसर्ग व इतके आशावादी लोक परत भेटले तर इथे डोंगरातच भेटतील, शहरी लोक सदा वैतागलेले असतात हा अनुभव परत एकदा आला
परत चालायचे म्हणून मी वैतागले होते पण आजूबाजूच्या जनतेला हे रोजचेच होते. खाली दरड कोसळून रस्ता बंद झालाय याचे त्यांना काहीही वाटत नव्हते कारण त्यांच्यासाठी डोंगर चढउतार रोजचाच होता, दरड कोसळो अगर राहो. खाली जायला गाडी रस्ता असा नव्हताच. इमरजन्सी खाली जायचे तर घोडे व पिट्टू. अन्यथा पायी जायचे हेच आयुष्य. कुणाला मेडिकल इमरजन्सी आली तर? पण असले प्रश्न फक्त आपल्या डोक्यात गर्दी करतात. तिथे हिमालयात जशी परिस्थिती उद्भवेल तसे लोक उपाय करतात, आपल्यासारखे उद्याचे मरण आज चिंतुन डोके फिरवून घेत नाहीत. लोकांचे रोजचे व्यवहार नेहमीसारखे चालू होते.
वर चढताना पाहिले की जिथे जागा मिळेल तिथे काही ना काही पेरलेले दिसत होते. बहुतेक ठिकाणी धान्यात मका, भाज्यांत राजगिरा, कोबी, फ्लॉवर वगैरे लावले होते. जागा किती असावी? दोन्ही बाजूच्या जंगलात जरा सपाट असलेली जागा मिळाली की ती साफ करून त्यात शेती. उपलब्ध जागा जेमतेम 10 बाय 12 फुटाच्या आसपास. जितकी उपलब्ध होईल तितकी घ्यायची व पेरायचे. लोकांनी होत्या परिस्थितीत स्वतःची सोय करून घेतली होती.
मला चढ खूप जड जात होता. जितके चढतेय तितकेच उतरायचे हे माहीत असल्यामुळे उतरणसुद्धा तितकीच जड जाणार याचा अंदाज आलेला, मानसिक तयारी होत होती, पर्यायच नव्हता.
पण या निमित्ताने इथे यायचे तर फिटनेस किती महत्वाचा आहे याची परत एकदा नव्याने जाणीव झाली. आजचा ट्रेक पूर्णपणे अनपेक्षित होता. तरी आम्ही ट्रेकच्या नावाखाली आलो होतो. भरपूर चालायचे आहे हे माहीत होते. पण जे धार्मिक यात्रा म्हणून येतात, तेही साठी उलटल्यावर, त्यांचे अशा वेळी काय होत असेल? असे अस्मानी संकट ओढवले तर काय तोंड देणार याला? मी तर म्हणेन की चारधाम यात्रा करायची असेल तर ती जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकर करा, अंगात ताकद आहे तोवर. अनपेक्षित संकटे आली की यात्रेचा आनंद संपतो व नसता त्रास मागे लागतो.
डोंगर पूर्ण चढून गेल्यावर गाव आले. फारतर तीस चाळीस घरे असतील. पण
नीटनेटके, स्वच्छ गाव. दगडी लाद्यांनी बांधून काढलेला रस्ता पूर्ण गावातून
फिरवला होता. बहुतेक सगळी घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागून होती.
गावातून जात असताना वाटेत शौचालये बांधलेली दिसली. काही सार्वजनिक असावीत.
आमच्या ग्रुपमधल्या एकाने एक वापरूनही पाहिले
नळाने पाण्याची सोय, गावात वीज वगैरे सगळे होते. शाळा गावात होती की
खाली ते कळले नाही पण शाळेची मुले ये-जा करताना वाटेत भेटत होती. एकूण
इतके वर उंचावर असूनही मला वाटले होते तसे गाव मागास वगैरे काही नव्हते.
नीटनेटके लोक, नीटनेटके खेडे.
गावातून बाहेर पडून खाली उतरणीला लागलो. उतरणीचा रस्ता तितकासा चांगला नव्हता. आम्ही चढून आलो तो रस्ता बहुतेक जास्त वापरात होता, त्या बाजूला जवळच बद्रीनाथ होते, जिथे सगळ्या सोयी होत्या. या बाजूला गोविंदघाट, जिथे फारशा सोयी नाहीत. त्यामुळे बहुधा हा रस्ता फारसा वापरात नव्हता.
रस्ता ठिकठिकाणी अरुंद होता व मोठे दगड, शिळानी भरलेला होता. त्यात माती ओलसर, त्यामुळे पाय ठेवताच ढासळते की काय अशी भीती. अशा स्थितीत आजूबाजूच्या फांद्यांचा, मोठ्या दगडांचा आधार घेत मी खाली उतरायला लागले. चढताना मी फोटो काढत होते पण आता मात्र ऐशु ओरडायला लागली. फोटो काढायच्या नादात पाय घसरला तर.... शेवटी मोबाईल बॅगेत टाकला. वरून कोसळलेली दरड दिसत होती. दगडमाती बाजूला करून नवीन रस्ताबांधणीचे काम जोरात सुरू होते. मी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना उगीच विचारले किती दिवस लागतील, तुमचा काय अंदाज? आज संध्याकाळपर्यंत रस्ता खुला होणार याबद्दल कोणालाही संदेह नव्हता.
आम्ही उतरायला लागलो तो आम्हाला विरुद्ध बाजूने चढणारे लोक भेटायला
लागले. त्यात लोकल कमी होते आणि गोविंदघाट/जोशीमठावरून निघून बद्रीनाथला
जाणारे भाविक जास्त होते. घोडेवाले व पिट्टू त्यातल्या त्यात धंदा करून
घेत होते. पिट्टू शेजारून जाताना काही भीती नव्हती. पण घोडा समोरून आला
की माझी वाट लागायची. नेमका वळणावर जर तो समोर आला तर मग सत्यानाशच!
खाली जाताना एका बाजूला डोंगरी भिंत किंवा झाडे व दुसऱ्या बाजूला जंगलाने
भरलेली दरी हाच सिन कायम होता. घोडे आले की मी त्या झाडांना किंवा भिंतीला
पालीसारखी चिकटून उभी राहायचे.
ज्यांना घोडे मिळाले नाहीत ते दमले भागले जीव पायी चढत होते.
वयोवृद्धांना असे थांबत थांबत चढताना बघून होणारा त्रास कळत होता, वाईट
वाटत होते.
हळू हळू आम्ही खाली उतरलो एकदाचे. या बाजूलाही रेलिंगसकट पायऱ्या
बांधल्या होत्या. म्हणजे दरड बरोबर अंदाज घेऊन वरून येणाऱ्या दोन
रस्त्यांच्या दरम्यान कोसळलेली.
आणि ती जरी अशी कोसळली नसती, एखादा रस्ता घेऊन कोसळली असती तरी वर
राहणाऱ्यांना काही फरक पडला नसता. त्यांचा पर्यायी रस्ता तयार असणार हे
नक्की. फक्त आमच्यासारख्या शहरी लोकांचे अजून थोडे हाल झाले असते.
खाली गाड्यांची बरीच गर्दी होती. वरून उतरणारे लोक गाड्या करून निघत होते. आम्ही खाली आलो तर आमच्या ग्रुपचे बरेच लोक एका मिनीबसच्या मागे उभे असल्याचे दिसले. ही बस युथ हॉस्टेलची नव्हती तर आमच्या ग्रुपने ठरवली होती. माणसी पाचशे रुपये काढून. आम्ही सामान डिकीत टाकून गाडीत स्थानापन्न झालो. गाडीत अजून तीनचार सीट्स खाली होत्या. एका जोडप्याने विनंती केल्यावर आम्ही त्यांनाही सोबत घेतले. उतरताना मला खूप कंटाळा आलेला पण आता मी ठीकठाक झाले होते. हिमालयातली हवा खूप जादुई आहे. तुम्ही कितीही दमला तरी ते तेव्हढ्यापुरतेच. थोडी विश्रांती घेतली की परत ताजेतवाने वाटते. आणि मी तशीही त्या हवेच्या प्रेमात होतेच.
इथे मुंबईत कायम एक धुळीचा करडा पडदा हवेत टांगलेला असतो. कधी अवकाळी धो धो पाऊस पडला तर त्यानंतरचा एक दिवस हा पडदा दूर झालेला असतो. बाकी पावसाळ्याचे थोडे दिवस सोडले तर उरलेले महिने धुरकटच असतात, स्वच्छ वातावरण नसतेच. त्यामुळे मुंबई/महाराष्ट्राबाहेर गेले की मला बरे वाटते. जोशीमठ गाठले तेव्हाच ऐशु म्हणाली होती, इथे सगळे फुल्ल HD दिसतेय. गेले चार पाच दिवस आम्ही फुल HD फोटोजिनिक दृश्ये सभोवती पाहात होतो, स्वच्छ हवा फुफ्फुसात भरत होतो.
आम्ही सकाळी साडेसहाला निघालो होतो. तिथून अर्ध्या पाऊण तासात दरडीच्या जागी पोचलो. तिथून पदयात्रा करून ह्या बाजूला पोचायला साडेदहा अकरा वाजले. बस लगेच पंधरा मिनिटात सुटली. आता थेट ऋषिकेश गाठायचे होते. आज जवळ जवळ तीनशे किमीचा प्रवास करायचा होता. बद्रीनाथ सोडल्यावर जोशीमठावरून ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने परत ऋषिकेशला जायचे होते. या रस्त्यावर अनेक देवस्थळे आहेत, ज्यांचे उल्लेख आपल्या पुराणांमध्ये येतात. उत्तराखंड ही खरेच देवभूमी आहे. इथे जागोजागी पुराणकालीन संदर्भ विखुरलेले आहेत. इतके की आपण थकेहारे एखाद्या शिळेला टेकून थोडा विश्राम घ्यावा आणि नंतर कळावे की त्याच शिळेला पांडवांपैकी कुणाचेतरी चरणकमल लागले होते. असो. मला असली शिळा सापडली नाही पण अजून थोडे फिरले असते तर नक्कीच सापडली असती.
बद्रीनाथ ते ऋषिकेश वाटेवर पंचप्रयाग लागतात. गाडी थांबणे शक्य नसल्याने सगळ्या प्रयागांचे मी गाडीतुनच जाता येता दर्शन घेतले. प्रयाग म्हणजे नदीचा संगम. गंगामैय्या वरून निघते ती अनेक रूपे घेऊन निघते. अलकनंदा, भागीरथी, पुष्पावती, धौली गंगा, नंदाकिनी, मंदाकिनी अशा अनेक नावांनी वाहात ती शेवटी गंगा होते.
जोशीमठजवळ प्रथम विष्णूप्रयाग आहे. इथे नारदाने विष्णूची उपासना केली होती. या जागी अलकनंदा व धौली गंगा एकमेकींना मिळतात व अलकनंदा नावाने एकत्रित वाहू लागतात.
तिथुन पुढे गेले की नंदप्रयाग. नंदराजाने इथे तप केले होते म्हणून याचे नाव नंदप्रयाग पडले म्हणे. इथे अलकनंदेला नंदाकिनी येऊन भेटते. तिचे पाणी घेऊन अलकनंदा अजून मोठी होत पुढे निघते. जगप्रसिद्ध अभिज्ञान शाकुंतलम मधले कण्व ऋषी इथेच तप करत होते व नंतर दुष्यंत-शकुंतलेचा विवाहही या स्थळी पार पडला.
कर्णप्रयागला अलकनंदेशी पिंडर नदी संगम पावते. दुष्यंत-शकुंतलेची भेट इथेच झाली व रोमान्स इथेच कर्णप्रयागच्या निसर्गरम्य स्थळी फुलला असे कालिदासाने लिहून ठेवले आहे. कालिदास त्याच्या गोष्टींमध्ये खरी स्थळे वापरत होता असे दिसते. हल्ली वास्सेपूर, सज्जनपूर असली खोटी नावे वापरतात. आयटेमला भेटायचे तर आपल्या एरियापासून थोडे लांब जायला हवे हे ज्ञान आश्रमकन्या असली तरी शकुंतलेला होते. तिचे घर नंदप्रयागला पण दुष्यंताला भेटायला जायची कर्णप्रयागला. पूर्ण उत्तराखंड सुंदर आहेच पण विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे पंचप्रयाग खूप निसर्गरम्य दिसतात. कालिदास उगीचच प्रेमात नव्हता पडला या भागाच्या! मेघदूतातही कर्णप्रयागाचा उल्लेख आहे.
चौथा प्रयाग रुद्रप्रयाग. इथे अलकनंदेला मंदाकिनी येऊन मिळते. शंकराने त्याचे तांडव इथे केले होते. म्हणून रुद्रप्रयाग. शंकराची त्याची आवडती रुद्रविणा वाजवून त्याने विष्णूला मोहात पाडले तेही इथेच.
याच्यापुढे येतो देवप्रयाग. इथे अलकनंदेला गंगेची सगळ्यात मोठी उपनदी भागीरथी मिळते. भागीरथी व अलकनंदेचा हा संगम खूप पवित्र मानला जातो. वेगाने धावत, उसळत येणारी भागीरथी व शांतपणे वाहणारी अलकनंदा एकत्र येतात तो पॉईंट खूप सुंदर आहे. पावित्र्यात अलाहाबादच्या त्रिवेणी संगमानंतर देवप्रयाग संगमाचे स्थान आहे. बऱ्याच पौराणिक आख्यायिका या स्थळी घडल्याचे उल्लेख आहेत.
या संगमानंतर गंगा या नावाने गंगामैय्या वाहते व त्याच नावाने शेवटी समुद्राला मिळते.
हे सगळे संगम मी गाडीतून पाहिले. प्रत्येक ठिकाणचा संगम तितकाच सुंदर दिसतो. दोन बाजूने धावत येणाऱ्या हिरव्या पाण्याच्या नद्या एकत्र झाल्यावर पांढऱ्या फेसाने चमकायला लागतात आणि अजून वेगात धावायला लागतात. इकडे सगळीकडे नदीचे पाणी लकाकत्या, चमकत्या पाचूसारखे दिसते. तरीही काही ठिकाणी दोन नद्यातला फरक खूप ठळक दिसतो. प्रत्येक प्रयागाच्या भरपूर आख्यायिका आहेत, त्या ठिकाणी पुरातन देवळे आहेत. ही सगळी देवळे पहायची माझी इच्छा आहे. त्यासाठी परत एकदा तिकडे जाऊन ह्या कामासाठी वाहन बुक करून फिरावे लागणार. पंचप्रयागाव्यतिरिक्त अन्य छोटे मोठे खूप संगम आहेत.
तर आता आपण थेट ऋषीकेश गाठणार हा विचार करत मी बसमध्ये बसले, बस सुरू झाली. जाताना जे काही दिसले होते ते परत दिसते का हे मी बघत होते. डोळा लागावा अशी इच्छा होती पण सहसा मोटार गाडीने प्रवास करताना मला झोप लागत नाही. असाच तास दीड तास गेला आणि बस परत थांबली. पुढे दरड कोसळलेली व गाड्यांची भली मोठी रांग लागलेली. आधी आम्ही सगळे गाडीतच बसून राहिलो. मग चुळबुळ करत दोन चार लोक खाली उतरले, मग अजून थोडे उतरले असे करत माझ्यासारखे तिघे चौघे सोडून पूर्ण बस खाली झाली. माझ्या पोरी तर आधीच पसार झालेल्या. मग काही लोक दरड कुठे पडली ते पाहायला पुढे गेले व तीन चार तास काहीही हलत नाही हा दुःखद समाचार घेऊन परतले. आमची बस नेमकी एका हॉटेल कम ढाब्यासमोर थांबलेली. तिथे राजमा चावल, प्राठा वगैरे रोजचे पदार्थ होते असे बोर्डावरून कळत होते. डब्बे सोबत होते तरी ग्रुपमधले काहीजण तिथे जेवायला गेले. मला गाडीतून उतरायची अजिबात इच्छा नव्हती. मी बसल्या जागेवरूनच विचारले; हॉटेलात कढी चावल नव्हते. मी मग माझा डब्बा खाऊन गप्प पडून राहिले. थोड्या वेळाने शामली आली. ती नेहमीसारखी गरमागरम बातमी घेऊन आलेली. आमच्या सोबतचा युथ होस्टेलचा दुसरा ग्रुप आमच्या मागेच दुसऱ्या बसमध्ये होता. त्यांना म्हणे युथ हॉस्टेलची बस मिळाली, आमच्यासाठीसुध्दा हॉस्टेलने बस पाठवलेली पण आम्ही आधीच बस करून निघालो असल्याने आमची चुकली. माझे डोकेच फिरले हे ऐकून. बस पाठवणार हे बद्रीनाथलाच आम्हाला सांगितले असते तर काय बिघडले असते? आमच्या सगळ्यांचे फोन नंबर व आमच्या नातलगांचेही फोन नंबर इमरजन्सी कॉन्टॅक्ट म्हणून यांनी घेऊन ठेवले होते, ग्रुप लीडर, सब लीडर सगळ्यांची नावे यांच्याकडे होती. यापैकी कुणालाही एक फोन करून सांगितले असते तर काय बिघडले असते? उगीच आम्ही माणशी पाचशे रुपये फुकट घालवले. युथ हॉस्टेल असा गलथानपणा कधी करत नाही. पण बद्रीनाथपासून त्यांना काय झाले होते देव जाणे....
मुलींना हॉटेलात किंवा डब्बा खाण्यात रस नव्हता. त्यांना नूडल्स खायच्या होत्या. चांगले हॉटेल शोधुया म्हणत मुली परत कुठेतरी गडप झाल्या, सोबत माझी पाण्याची बाटली घेऊन गेल्या. मी डोळा लागतो का याचे प्रयत्न करत बसले. साधारण अडीज तीनच्या सुमारास अचानक सगळीकडे गलका सुरू झाला. दरड साफ होऊन वाहतूक परत सुरू झाल्याने रस्त्याच्या जान मे जान आली होती. आमच्या बसवाल्याने बस सुरू केली तसे इतस्तत: पसरलेले बसचे उतारू गाडीत चढायला लागले. पण आमचे दोन पॅसेंजर्स त्या गर्दीत नव्हते. मी आरडाओरडा करून महेशला दोघींना शोधायला पिटाळले. दहा मिनिटांनी तो त्यांना शोधून घेऊन आला. शामलीने आल्यावर एक चांगली व एक वाईट बातमी आहे म्हणत खूपच चांगल्या नूडल्स मिळाल्या ही चांगली बातमी म्हणून सांगितली व महेशने येऊन त्यांना घाईघाईत हॉटेलातून बाहेर काढल्यामुळे माझी पाण्याची बाटली तिथेच राहून गेल्याची दुःखद बातमी सांगितली. आता यावर काहीच करता येण्यासारखे नसल्याने तुम्ही वेळेत भेटलात हेच थोर नशीब म्हणत मी गप्प बसले.
यानंतर पुढे फक्त एकच कोसळलेली दरड भेटली व तिने फक्त अर्धा पाऊण तास वेळ घेतला. या वेळेस आम्ही कुठल्यातरी शहराच्या मार्केटात होतो. तिथे आम्ही काकडी वगैरे फलाहार केला. सहा साडेसहाच्या सुमारास आम्ही ऋषिकेशपासून साधारण शंभर दीडशे किमी दूर होतो. काही लोकांना चहापानाची हुक्की आल्यामुळे बस परत थांबली. चहा, बिस्कीट, भजी वगैरेचा आस्वाद घेणे आलेच. काही मेम्बर्स मात्र चुळबुळ करत होते. वाटेवर कुठेतरी एक गेट आहे म्हणे, ते पावणे आठला बंद होते. त्यानंतर रस्ता बंद. त्यामुळे ऋषिकेशला जायचे तर ती जागा पावणेआठ आधीच पार करणे गरजेचे आहे. आम्ही असे सगळीकडे थांबत मजा करत गेलो तर वेळेत कसे पोचणार? हे गेट बहुतेक देव प्रयागच्या थोडे आधी होते. गेट वगैरेचे ऐकून परत सगळेजण घाई करून गाडीत बसले व एकदाचे निघालो. मी गेट कुठे दिसते का पाहात होते पण मला कुठेही असे गेट दिसले नाही.
अजून शंभर दीडशे किमी म्हणजे ऋषिकेशला पोचायला दहा अकरा वाजणार. दिवसा जे रस्ते मला धडकी भरवतात त्या रस्त्यांवरून रात्रीचा प्रवास करायचा या कल्पनेने मला अस्वस्थ वाटायला लागले. अर्थात गाडी मी चालवत नव्हते. पण हा असला प्रवास मला खूप खतरनाक वाटायला लागला. या भागात परत कध्धी कध्धी पाय ठेवायचा नाही हे मी तेव्हाच ठरवले.
हळूहळू काळोख पडला. दोघी पोरी झोपलेल्या. बसमधले इतर लोक अंताक्षरी, सामुदायिक गाणी, सोलो गाणी, थोडीफार बाचाबाची वगैरे सगळे प्रकार हाताळून दमली व पेंगायला लागली. माझ्यासारखे जागे लोक फार थोडे होते. मला झोप येणे अशक्य होते. समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश व आपल्या गाडीचा प्रकाश एवढेच काय ते प्रकाशाचे स्त्रोत रस्त्यावर होते. बाकी डिप्प काळोख. सोबतीला खोल दरीत वाहणाऱ्या नदीचा दुरून ऐकू येणारा खळखळाट. समोरून गाडी आली की दोघेही गाडी संभाळून चालवायचे. एका ठिकाणची दरड आम्ही पोचण्याआधी साफ करून झालेली पण त्यामुळे रस्ता खराब झाला होता. तिथे एक गाडी फसली होती. ती निघावी यासाठी आमच्या गाडीला थोडे रिव्हर्स घ्यावे लागले. माझा जीव जायचीच वेळ आलेली. खरेतर माझी भीती पूर्णपणे अनाठायी होती. तिथल्या बसचालकांना पुरेसा अनुभव असतो. स्वतःच्या जीवाची काळजी त्यांनाही असतेच. आणि दुर्दैवाने तसाच काही प्रसंग तुमच्यासाठी लिहिला असेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. जीव जेव्हा जायचा तेव्हा जाणारच. पण मी असले सुविचार डोक्यात आणायच्या मूडमध्ये तेव्हा नव्हते. गाडी पडलीच तर पडत्या गाडीत माझ्या डोक्यात काय विचार येतील हा विचार डोक्यातून हुसकावून लावत मी ऋषिकेश कधी येतेय याची वाट पाहात बसले.
साधारण अकराच्या सुमारास ऋषिकेश आले व दहा पंधरा मिनिटात आम्ही बेस कॅम्पच्या गेटबाहेर पोचलो. मी शारीरिक व मानसिकरित्या इतकी दमले होते की कधी एकदा गादीवर अंग टाकते असे झाले होते. मुलींना जागे करून सामान गोळा करायला सांगितले व मी गेटच्या दिशेने चालायला लागले. गेटच्या आत कुठली नौटंकी आमची वाट पाहात होती हे तेव्हा कळले असते तर...
बेस कॅम्प परत एकदा
अतिशय थकल्या भागल्या अवस्थेत मी गेटच्या आत पाऊल टाकले. आत मॅनेजरसाहेब पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे येरझाऱ्या घालत होते. त्यांचा अवतार पाहून मी महेशलाच रूमची काय व्यवस्था म्हणून विचारले. त्याने पहिल्या मजल्यावर तीन नंबरच्या रूममध्ये सामान ठेवा, मग बघू असे मोघम सांगितले. आम्ही तीन नंबरमध्ये गेलो तर तिथे आधीच सात आठ सॅकस पडलेल्या होत्या. म्हणजे इतके लोक ह्या खोलीत राहणार होते की काय? गेल्या वेळेस आम्हा तिघीना मिळून एक रूम होती.
काय करायचे वगैरे विचार करायला संधी मिळायच्या आधीच जेवायला चला म्हणून बोलावणे आले. साडे अकरा वाजता काय जेवणार? पण नाही जेवलो तर मॅनेजर साहेब उगीच भडकतील या भीतीने मुलींना जेवायला घेऊन गेले. जेवून होत होते तोवर 'डिपॉझिट केलेल्या बॅगा ताब्यात घ्या' म्हणून फर्मान निघाले. दुसऱ्या विंगेतल्या पहिल्या मजल्यावर बॅगा होत्या. मुलींना ताटे धुवून वर घेऊन जायच्या कामाला लावून मनातल्या मनात चरफडत मी बॅगा घ्यायला गेले. तिथे पाहते तर आपल्याला बॅग ठेवताना दिलेला स्टिकर तिथल्या बॅगेवर लावलेल्या स्टिकरशी मॅच करून मगच बॅग मिळत होती. हे जेव्हा ऐकले तेव्हा जाताना स्टिकर्स का दिले होते ते मला कळले. (तशी एरवी मी हुशार आहे हो!) बॅगा डिपॉझिट करायचे काम मी मुलींना दिले होते. त्यांनी स्टिकर्स आणून दिल्यावर मला वाटले ते सोबत नेत असलेल्या सॅक्सना लावण्यासाठी दिले. म्हणून मी ते तेव्हाच सॅक्सना लावून टाकले. यथावकाश आमच्या पदयात्रेत ते पडूनही गेले होते. आता काय करायचे? पहिल्या मजल्यावर बॅगांचा महापूर आलेला. माझी एक मोठी सॅक त्यात चटकन दिसली. मॅडम मॅडम म्हणून ओरडणाऱ्या तिथल्या पोराला अजिबात न जुमानता मी सॅक उचलली. खूप शोधूनही दुसरी बॅग सापडलीच नाही. माझी बॅग तुम्ही लोकांनी हरवलीत म्हणून मी तिथल्या पोरावर खूप ओरडले पण बॅग सापडली नाही.
शेवटी मिळालेली सॅक आधी खोलीत ठेवूया म्हणत माझ्या खोलीमध्ये जाण्यासाठी खाली आले तर मॅनेजर व सुरेशची खडाजंगी चालू होती. झोपायला जागाच नाही म्हणून सुरेश तापला होता. मॅनेजरानी असले छप्पन सुरेश याआधी बघितले असल्यामुळे ते सुरेशपेक्षा जास्त तापले होते. या प्रश्नाचा सामना मलाही करावा लागणार असा विचार करत मी सॅक ठेवायला रूम नंबर तीनमध्ये गेले.
रूम नंबर तीनमध्ये कधीही युद्ध सुरू होईल इतके स्फोटक वातावरण तयार झाले होते. त्या लहानश्या खोलीत एकच बेड होता ज्यावर तीन माणसे जेमतेम झोपू शकली असती. बेड नवा दिसत होता पण त्यावर चादर बिदर काही घातलेली नव्हती, ना उशीचा पत्ता होता. खाली जमिनीवर जाड सतरंजी अंथरली होती. त्यावर फारतर चार मुली झोपू शकल्या असत्या. अर्थात ते झोपणे अजिबात सुखाचे झाले नसते ही बात वेगळी. पूर्ण गुजराती ग्रुप आमच्या सोबत कोंबला होता. सोबत आम्ही तिघी. ऐशूने बेडचा ताबा घेऊन ती घोरत पडली होती, तिच्या बाजूला शामली पडून मोबाईल बघत होती. उरलेल्या बेडवर मुलींनी सॅकमधले सामान अर्धवट उपसून ठेवले होते. त्या दोघी सोडून बाकी सगळा कोलाहल माजला होता. झोपायला जागाच नाही हे बघून सगळ्यांचे पित्त उसळले होते. माझी एक बॅग अजून आणायची असल्याने मिळालेली सॅक तिथे सोडून मी परत खाली गेले.
सुरेश गेटवर तणतणत कसलासा फॉर्म भरत होता. भरताना अधूनमधून 'मै इधर एक पलभी नही रुक सकता' हे वाक्य तो कुणाला स्पेसिफिक असे नसून इन जनरल हवेत सोडत होता. मॅनेजर साहेब तोवर पहिल्या मजल्यावर आले होते व वरून खालचा तमाशा बघत होते. मला बॅगेची काळजी असल्याने मी बॅगेकडे आधी लक्ष द्यायचे ठरवले. आज बॅग मिळाली नाही व उद्या मॅनेजरसाहेबांकडे प्रकरण गेले तर माझे काही खरे नव्हते. माझ्याकडे स्टिकर्स नाहीत हे कळताच त्यांची प्रतिक्रिया काय होणार हे वेगळे सांगायची गरज नव्हतीच. आताच त्यांची तळपायाची आग मस्तकी पोचून तिथून ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या.
परत दोन जिने चढून वर पहिल्या मजल्यावर गेले. माझ्या मागचे चढणे काही सुटत नव्हते. मी पोचले तोपर्यंत बाहेरच्या महापुरातल्या बऱ्याचशा बॅगा मालकवर्ग घेऊन गेला होता. बॅगवाला पोरगा तिथे नव्हता व बॅगांनी भरलेली एक खोली जी आधी उघडी होती तिला कुलूप घातले गेले होते. बाहेर उरल्या सुरल्या बॅगांमध्ये माझी बॅग शोधली पण नाही सापडली. रात्रीचे साडेबारा वाजत आले होते पण आता झोप वगैरे सगळी उडाली होती. परत खाली येऊन त्या पोराला शोधून काढले, दादापुता करून वर घेऊन जाऊन खोली उघडून घेतली व आत बॅगांच्या ढिगाऱ्यात बॅग शोधायला लागले. मागे उभा राहून पोरगा मॅनेजर साहेबांना कळले तर काय होईल हे सांगत होता पण मला ते आधीच माहीत असल्याने मी तिकडे दुर्लक्ष केले. साधारण वीस पंचवीस मिनिटांच्या तपश्चर्येनंतर, भरपूर बॅगा उलटसुलट करून पाहिल्यावर माझी बॅग एकदाची सापडली.
बॅग घेऊन खाली आले तर उन्नती व अजून एकजण गेटकडे फॉर्म भरत होत्या. कसले फॉर्म्स भरत होत्या देव जाणे.... पहिल्या मजल्यावर महेश दिसला. त्याला विचारले. ट्रेक संपायच्या आधीच कॅम्प सोडून जायचे असेल तर तसा फॉर्म भरून द्यावा लागतो म्हणे. म्हणजे सुरेशरमेश पाठोपाठ उन्नती व तिची मैत्रीणसुद्धा कॅम्प सोडून गेले म्हणायचे. मी रूममध्ये पोचले तेव्हा सहा सात गुजरातणी आपले सगळे सामान काढून ते परत भरत बसलेल्या. रूममध्ये अजिबात जागा नव्हती.
मी आणलेल्या बॅगमधून कपडे काढून, माझे हात पाय धुवून, कपडे बदलून आता झोपायचे काय करायचे याच्या विचारात बसले. शामली म्हणाली मॅनेजरला सांग आम्हाला जागा नाही म्हणून. उत्तर काय मिळणार हे माहीत असूनही मी जाऊन त्यांना सांगितले. ते म्हणाले, अब रहो वहीपे, बादमे देखते है। आता रात्रीचा एक वाजत आलेला. अजून बादमे म्हणजे नक्की कधी? मी परत येत होते तर महेश परत भेटला. मी त्याला म्हटले की हा काय आचरटपणा चाललाय, जागेची व्यवस्था का नाही केली जात आहे? तर म्हणे दोन ग्रुप एकदम आल्याने प्रश्न निर्माण झाला. आमचे येणे प्लॅनप्रमाणे होते पण तो दुसरा ग्रुप काल येऊन आज सकाळी जाणार होता. तोही आमच्या बरोबर आल्यामुळे जागेची टंचाई निर्माण झाली. त्यात आपण घाईघाईत बस करून यायची चूक केली म्हणून मॅनेजर भडकलेत. मी म्हटले यात आपली काय चूक? यांनी का नाही बस पाठवतो म्हणून फोन करून आपल्याला सांगितले? तर तो काहीच बोलला नाही. काहीतरी झाले होते नक्कीच. मॅनेजरसाहेबांची खोली बाजूला होती व तिच्यातून बोलण्याचे आवाज येत होते. नक्की काय भानगड झालेली ती फक्त त्या लोकांनाच माहीत होती.
मी गुपचूप रूमवर परतले. तोवर अजून चार गुजरातणी सामान घेऊन निघत होत्या. यांना इतक्या रात्रीची हॉटेले कुठे सापडली हा प्रश्न मला पडला. शामली म्हणाली की त्यांनी सुरेशला फोन करून हॉटेल शोधले. शामली गुजरात्यांच्याच कॉलेजात असल्याने तिला खबरा काढायचे काम चांगले जमते. इथे कुठे टेकायलाही जागा दिसत नसल्याने आपणही हॉटेल गाठूया असा विचार करून मी उरलेल्या तिघा मुलींना सुरेशचा फोन नंबर विचारला पण त्यांच्याकडे त्याचा नंबर नव्हता. आता काय करावे हा विचार करत होते पण शामली खरी हुशार. ती म्हणाली आपल्याला आता कशाला हवे हॉटेल? आपण फक्त सहा जणीच उरलो. आपण तिघी वर झोपू, या तिघी खाली झोपतील. तिचे बरोबर होते. इतस्ततः पडलेले सामान आवरले गेले असते तर नक्कीच झोपायला जागा झाली असती.
मग मी शांतपणे मुलींनी उपसून ठेवलेले सामान आवरले. त्याच्यात अर्धा पाऊण तास गेला. रात्रीचे दीड दोन वाजत आले होते. त्या तिघी मुली सामान आवरून झोपल्यावर मी गॅलरीचे न लागणारे दार लावायचा अयशस्वी प्रयत्न करून शेवटी फक्त मेन दरवाजा लावून बेडवर पडले. खोलीतला लाईट जरी बंद केला तरी खाली रस्त्यावर लाईट होते, आम्ही पहिल्या मजल्यावर असल्याने रस्त्यावरून प्रकाश खोलीत येत होता व लाईट बंद केल्यासारखे वाटत नव्हते. बेड फारसा सुखद नव्हता, उशीही नव्हती. वर फॅन नव्हता, न पांघरायला चादर. पण युथ हॉस्टेलच्या दृष्टिकोनातून हा फाईव्ह स्टार ट्रेक होता. मी गोव्याच्या ट्रेकला गेले होते तेव्हा तंबूत झोपल्यावर तंबूतल्या बिछायतीखालचे दगड अंगाला टोचायचे. सहसा दगड धोंडे काढून जागा साफ करूनच तंबू गाडले जातात. पण शेवटी जंगलच ते! झाडांची वर आलेली मुळे, जमिनीत खोलवर गाडल्या गेलेल्या मोठ्या दगडांचे जमिनीवर आलेले भाग वगैरे गोष्टी काढता येत नाहीत. झोपायची जागा जिथे पटकावली तिथेच मोठा दगड किंवा मूळ निघाले तर तसेच ऍडजस्ट करून झोपावे लागायचे. त्या मानाने खोली व गादी हा स्वर्गच म्हणायचा.
रात्रीचे दोन अडीज वाजत आले होते. मला झोप येत नव्हती. ऐशुची एक झोप होऊन ती आता फ्रेश झाली होती. इतक्या रात्री ऋषिकेशला हॉटेले बरी उघडी असतात हा मला टोचणारा प्रश्न तिच्या अंगावर उडवल्यावर ती म्हणाली, कुठे कोण हॉटेल शोधत लांब गेलेय? तो बघ सुरेश समोरच दिसतोय. आपल्या रस्त्याच्या त्या बाजूला त्याचे हॉटेल आहे. मी पडल्या पडल्याच समोर पाहिले तर खरोखर सुरेश समोरच्या बिल्डिंगीत, गॅलरीत उभा राहून कुणाशीतरी फोनवर बोलत होता. हे गुजराती रात्री अडीज वाजतासुद्धा फोन सोडत नाहीत अशी सुरवात करून थोडे थोडे कुजबुज गॉसिप करत असताना कधितरी डोळा लागला.
इतक्या उशिरा झोपुनही सकाळी सवयीने जाग आली. उठून सगळे आवरून घेतले. मुलींना उठवून आवरायला लावेपर्यंत ब्रेकफास्ट तयार असल्याचा निरोप मिळाला. मी सामान आवरते तोवर तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या म्हणून मुलींना पिटाळून मी बॅग भरायला घेतली. माझी सॅक खूप मोठी असल्यामुळे मी युथ होस्टेलची एक सॅक ट्रेकसाठी घेतलेली. तुम्ही स्वतःची सॅक आणली नाही तर बेस कॅम्पवर सॅक मिळते. ट्रेकला न लागणारे सामान आपल्या बॅगेत ठेऊन ती बॅग बेस कॅम्पवर ठेऊन द्यायची व त्यांच्या सॅकमध्ये ट्रेकचे सामान भरून ट्रेकला जायचे. आल्यावर सॅक परत करायची. याचा चार्ज भरावा लागत नाही.
मी घेतलेली सॅक रिकामी करून माझी बॅग भरत होते तोवर मुली नाश्ता करून परत आल्या. खाली बोलावलंय लौकर... चल, चल करून त्या मला खाली घेऊन गेल्या. खाली सुरेश लोकांच्या घोळक्यात गोरामोरा चेहरा करून उभा होता. तो तर रात्रीच कॅम्प सोडून गेला होता, मग आता परत कसा इथे? शामलीकडे अर्थातच सगळ्या बातम्या होत्या. तो सकाळी परत आला व भांडण करून त्याने नाश्ता मिळवला. नियमानुसार युथ हॉस्टेलने आज सकाळचा नाश्ता देऊन मग आमची पाठवणी करणे अपेक्षित होते. तुम्ही झोपायला जागा दिली नाहीत म्हणून आम्हाला बाहेर जावे लागले, नाहीतर आम्ही गेलो नसतो. त्यामुळे नाश्त्यावरचा आमचा हक्क जात नाही असा फुलफ्रुफ गुज्जू युक्तिवाद करून त्याने मॅनेजर साहेबांना गप्प केले व नाश्ता मिळवला. मग चेहरा का पडलाय?
त्यावर शामलीने सांगितलेली कथा सुरेशच्या दृष्टीने दुःखद असली तरी बाकी ग्रुपच्या दृष्टीने प्रचंड विनोदी होती.
काल कॅम्प सोडणारा सुरेश पहिला होता. शिवाय जाताना तो खूप गाजावाजा करून गेला होता. त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन थोड्या गुजरातणी पण गेल्या. त्यांनी अर्थातच जायच्या आधी त्याला फोन करून हॉटेलची चौकशी केली. सुरेशने त्याचे दोन तीन फोन नंबर इथे लोकांना दिले होते. त्यातला एक नंबर त्याने गुजरातेत बायकोच्या नंबरवर फॉरवर्ड केला होता. आता हा नंबर का द्यावा इथे? तरी त्याने तो दिला. तो कॅम्प सोडून गेल्यावर आमच्या खोलीतल्या ज्या इतर मुली गेल्या त्यांनी आधी सुरेशला फोन लावून चौकशी केली. ते फोन त्यांनी न चुकता आधी त्या फॉरवरडेड फोनवर केले व नंतर सुरेशच्या ऋषीकेशच्या फोनवर. रात्री साडेबारा एकला फोनवर 'हॉटेल कहा है? रूम कैसी है ?' ही बाईच्या आवाजात चौकशी व्हायला लागल्यावर त्याच्या बायकोचे डोके फिरले. त्यात एक्स्ट्रा इंधन म्हणजे याचे लग्नाआधी अफेअर होते. लग्नानंतरही तो घरी खोटे सांगून तिच्याबरोबर बाहेरगावी जायचा. आता ते सगळे संपले होते पण अचानक रात्री बायांचे फोन आलेले बघून बायकोला तोच जुना संशय आला. त्याची सगळी रात्र बायकोला समजवण्यात गेली होती. म्हणजे काल रात्री अडीज वाजता तो फोनवर बायकोची समजूत घालत होता तर... अर्थात ही भानगड सगळ्यांना हिलारियस वाटत होती पण सुरेश खूप नर्व्हस होता. बनारसी साडी घेऊन जा, खड्यांचे दागिने घेऊन जा वगैरे सल्ले देऊन लोकांनी त्याचा मूड नंतर ठीक केला. सुरेशने त्याची खासगी गोष्ट इतक्या लोकांसमोर का जाहीर केली हा प्रश्न मला आधी पडलेला, पण मी असे पाहिलंय की काही लोकांच्या खासगी बाबी ते स्वतःच खासगी ठेऊ इच्छित नाहीत, त्यांना खासगी व सार्वजनिक असा फरक मान्य नसतो.
आमच्या बेस कॅम्पसमोरच एक लॉज होते, जिथे रात्री आमच्या लोकांनी आश्रय घेतला होता. मी सुरेशला प्रत्यक्ष विचारले , त्याच्या मते राहण्यासाठी जागा ठीकठाक होती. आम्हाला तरी कुठे फाईव्ह स्टार जागा हवी होती! दिवसभर फिरून आल्यावर रात्री सुखात झोपण्यापूरती सोय झाली म्हणजे झाले. एका दिवसाचे भाडे पाचशे रुपये होते, कितिही लोक रहा. मुलींना जागा बघायला पिटाळून मी सामान आवरायला खोलीत वर गेले. सगळे आवरून होईपर्यंत एशूने समोरच्या गॅलरीतून फोन करून रूम ठीकठाक असल्याचे सांगितले. मुली परत आल्यावर आमचे सामान घेऊन आम्ही बेस कॅम्पला टाटा बाय बाय करून बाहेर पडलो.
लॉज ज्याचे होते त्याचा लॉज हा साईड बिझिनेस होता, मेन बिझिनेस तेलाचा घाऊक व्यापार. मेन बिझिनेससाठी भले मोठे गोदाम बांधल्यावर जागा उरली असावी. त्याचे काय करावे म्हणून खोल्या बांधून भाड्याने द्यायला सुरुवात केली असावी. तळमजल्यावर छोटेसे ऑफिस व तेलाचे मोठे दुकान होते. पहिला मजला तेलाच्या डब्यांचे गोदाम म्हणून वापरला जात होता. दुसरा मजला लॉज म्हणून वापरला जात होता. साधारण एक मजला 10 ते 12 फूट उंच असतो. पण याने गोदामाचा विचार करून इमारत बांधल्यामुळे एकेक मजला 20 फुटी होता. साधारण जिन्याला आठदहा पायऱ्या असतात, त्यानंतर लँडिंग व पुढे परत आठ दहा पायऱ्या असतात. या लॉजच्या जिन्याला सरळ 40 पायऱ्या होत्या, मध्ये काहीही लँडिंग नाही. तेलाचे गोदाम असल्याने त्या संगमरवरी पायऱ्या तेलाने माखून पूर्ण काळ्या झाल्या होत्या. रस्त्यावर उभे राहून मी त्या वर जाणाऱ्या 40 पायऱ्या पहिल्यांदा पाहिल्या तेव्हा दुसरे हॉटेल पाहावेच हा विचार डोक्यात आला. पण एकच दिवस तर राहायचेय म्हणून विचार झटकून पायऱ्या चढायला घेतल्या. युथ हॉस्टेलच्या ट्रेकचे सूप वाजले तरी माझा ट्रेक काही संपत नव्हता. अगदी आरामात हळूहळू वर चढून पहिला मजला गाठला. तिथून दुसऱ्या मजल्यासाठीही पायऱ्या चाळीसच होत्या पण इथे संगमरवराचा पांढरा रंग दिसत होता.
खोली छान हवेशीर व स्वच्छ होती. तिघी आरामात झोपतील इतका मोठा बेड होता. गरम पाण्यासाठी बाथरूममध्ये स्टोरेज गिझर होता व खोलीत कूलर होता. ऋषिकेशला एसीपेक्षा कूलर जास्त वापरले जातात असे माझे निरीक्षण आहे. खूप ठिकाणी कूलर दिसले. खोलीतला कूलर चक्क वॉशिंग मशीनएवढा मोठा होता. तो वापरला तर त्याचे शंभर रुपये जास्तीचे द्यायचे. पण कूलर वापरण्याइतपत गरम हवा आम्ही तिथे असताना सुदैवाने नव्हती. आदल्या दिवशीच्या दगदगीने व रात्रीच्या नौटंकीने शारीरिक व मानसिक थकवा इतका आला होता की खोली जाताच आम्ही तिघीही बेडवर पडलो व गाढ झोपी गेलो.
समारोप
मागचा भाग : https://www.maayboli.com/node/65351
बारा साडेबाराच्या सुमारास जाग आली. आजचा दिवस मी ऋषिकेश दर्शनासाठी राखून ठेवला होता. मुलींनाही उठवले. अंघोळी वगैरे सगळे आधीच आटपले असल्याने लगेच तयार होऊन बाहेर पडलो. आमच्या बाजूच्या खोलीत मुंबईकर अशोक उतरलेला. सकाळी आमच्यासोबतच तोही कॅम्पवरून इथे आला होता. फिरायला सोबत जाऊ म्हणाला होता, पण त्याच्या खोलीला कुलूप दिसल्यावर आम्ही निघालो.
इतके दिवस थंडी व पावसात घालवले होते. इथे ऋषिकेशला टळटळीत ऊन होते. इकडे गर्मीसुदधा भरपूर असते असे ऐकून होते पण नशिबाने आम्ही होतो तेव्हा सगळे आलबेल होते. खाली आल्यावर इकडे तिकडे फिरून, त्रिवेणी घाटाच्या दिशेने जाऊन आलो. गेल्या वेळेस वाटेत जो कचऱ्याचा डोंगर दिसलेला तो गायब झाला होता. कचराकुंडी बापूडवाणी होऊन एका बाजूला उभी होती. सगळे एकदम साफ, चकाचक. आठ दिवसांपूर्वी जिथे इतका कचरा पाहिलेला तिथे आता सफाई पाहून मला आश्चर्यच वाटले. बहुतेक तेव्हा सफाई कामगारांचा संप वगैरे असेल. गुगल मॅपवर लक्ष्मण झुला शोधून तिथे जायला रिक्षा वगैरे काही मिळते का बघत कोपऱ्यापर्यंत आलो. एक दहा सीटर रिक्षा दिसली.
इथली रिक्षा म्हणजे मूळ हिरवा/पिवळा/काळा असलेला पण आता त्यातला बराचसा रंग उडालेला पत्र्याचा सांगाडा. रिक्षा धावताना खूप मोठा आवाज करते त्यामुळे ती वेगात जाते असा भास होतो, प्रत्यक्षात तिचा वेग आवाजापेक्षा खूपच कमी असतो. सुरक्षित इतकी की आपले लक्ष नसेल तर रस्त्यावरचा छोटासा धक्काही आपल्याला बाहेर फेकू शकतो!! रिक्षावाला अगदी पंधरा सोळाचा पोरगा दिसत होता. पण एकूण रुपडे पाहून खरेच पंधरा सोळा वर्षाचा आहे की सततच्या उपासमारीमुळे असा दिसतोय याचा अंदाज येत नव्हता. मुंबईत असे लोक फारसे दिसत नाहीत पण मुंबईबाहेर गेले की कोऱ्या, रंगहीन चेहऱ्याचे, खंगलेल्या शरीराचे, पाठीला बाक येऊन पोट त्याला चिकटलेले लोक दिसतात. सुख, आनंद, आशेचा स्पर्श कधी आयुष्याला झाला होता याची पुसटशी खुणसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नसते. हे लोक कामे करत असतात, रिक्षा चालवायचे, ओझे वाहायचे, माल विकायचे.. जणू जन्मापासून तेच काम करताहेत व असेच करताकरता एके दिवशी संपतीलही. न समजता आला दिवस ढकलत काढणारे लोक!!
लक्ष्मणझुल्यापर्यंत किती घेणार विचारल्यावर त्याने दहा रुपये सवारी सांगितले. लक्ष्मणझुला इतका जवळ असल्याचे गुगलमॅप दाखवत नव्हता. रिक्षा सुरू झाल्यावर काहीही संभाषण करणे अशक्य होते. रस्ते काही ठिकाणी चांगले होते, काही ठिकाणी खड्डे पडले होते. इथे मुंबईत पण खड्ड्यात रस्ते असतात, त्यामुळे आम्हाला तिथल्या खड्ड्यातल्या रस्त्यांची फारशी मातब्बरी वाटली नाही. वाटेत असंख्य देवळे व तितकेच योग आश्रम दिसत होते. काही आश्रम बाहेरून हाय फाय हॉटेलसारखे दिसत होते. यांना आश्रम का म्हणावे हा प्रश्न पडावा इतके हायफाय.
हरिद्वार-ऋषिकेश ही भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडणाऱ्या परदेशी मंडळींची पंढरी आहे. इथे येऊन भा सं च्या गंगेत डुबकी मारल्याशिवाय काही खरे नाही असा समज एकतर करून दिला गेलाय किंवा झालाय. जे काही असेल ते असो. डुबकी मारण्यासाठी आलेल्या लोकांच्या आदरातिथ्याची व डुबकी मारायची उत्तम सोय इथे आहे. जन्मापासून भारतीय लोक ह्या भा सं बद्दल इतके काही ऐकून असतात की कधीतरी त्यावर जमलेला भरमसाठ भुसा पाखडून त्याखाली काय आहे हे बघायची बुद्धी कोणाला होत नाही. हिंदू धर्म म्हणजे हा प्रश्न कोणी विचारला तर चटकन उत्तर देता येणार नाही. वेद, उपनिषदे, गीता यात काय सांगितलंय विचारले तरी उत्तर देता येणार नाही. ही उत्तरे शोधणारे शेवटी ऋषिकेश हरिद्वारला येऊन पोचतात. उत्तरे मिळतात का माहीत नाही पण मिळत असावीतही. भारतीयांना इथवर पोचायची गरज नाही. त्यामुळेच बहुधा इथले योग आश्रम परदेशी लोकांनी भरलेले असतात.
वाटेत चोटीवाला रेस्तराँचे बोर्ड पाहून तिथे जायचे का हा प्रस्ताव मी मांडताच दोन विरुद्ध एक मतांनी तो तात्काळ फेटाळला गेला. मुलींनी जर्मन बेकरीत जायचे नक्की केले होते. पुणे सोडून ही बेकरी ऋषिकेशला कधी आली याचे नवल करत इथे नक्की आहे ना बेकरी म्हणून परत परत विचारल्यावर, इथेच आहे व तिथेच खा म्हणून मित्रमंडळाकडून जोरदार शिफारस झालेली आहे हे कळले. काही उपाय नाही हे जाणून मी गप्प बसले.
अर्ध्या तासाने एका चौकासारख्या दिसणाऱ्या जागी रिक्षावाल्याने आणून सोडले. येही है लक्ष्मणझुला म्हणून त्याने सांगितले खरे पण आजूबाजूला कुठेही झुल्याचा मागमूस दिसत नव्हता. दहा रुपयात इतक्या लांब रिक्षा आली म्हणजे इथे भरपूर स्वस्ताई असणार असा विचार करत मी उतरले. आजूबाजूला चौकशी केल्यावर खरा लक्ष्मणझुला तिथून अजून एक किमी दूर आहे व तिथवर चालत जावे लागते हे कळले. आलिया भोगासी म्हणत मी मुलींच्या मागून चालू लागले. झुल्याच्या आधी जो रस्ता होता त्यावर कुठल्यातरी पंथाच्या लोकांची मिरवणूक सुरू होती, सगळा रस्ता भरून गेला होता. हरवेन या भीतीने मी ऐशुचा हात घट्ट धरून त्या गर्दीतून बाहेर पडले. बाकी पुढे स्टॉल्स, दुकाने, हॉटेले वगैरे सगळा बाजार मांडला होता व त्यांच्यामधून उरलेल्या जागेतून वाट काढत लक्ष्मणझुला गाठायचा होता.
लक्ष्मणझुल्याकडे जायच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप चित्तवेधक स्टॉल्स आहेत. तुम्हाला सेमी प्रेशस स्टोन्स मध्ये रस असेल तर इथे भांडार आहे… गळ्यातले, कानातले, बोटातले, हातातले.. जे हवे ते आहे. किमती घासाघीस करून ठरवता येतात. बाकी फंकी कपडे, बॅगा, ट्रेकिंग साहित्य, पुस्तकांची दुकाने, रुद्राक्ष माळा व इतर भक्तीसाहित्य असल्या विविध दुकानांची तिथे रेलचेल आहे. त्यातच अधेमध्ये क्षुधाशांती गृहे आहेत. तुम्हाला जर असले वातावरण व तिथे शॉपिंग करणे आवडत असेल तर या भागाला भेट द्याच. काही शॉपिंग करायचे नाही असे आधीच ठरवून टाकल्यामुळे फक्त नयनसुख घेत मी चालत होते. शॉपिंग करायची असती तर मात्र वाट लागली असती. कुठे कुठे काय काय घेऊ असे झाले असते. कारण जे बघत होते ते सगळेच मला आवडत होते.
वाटेत कढीचावल असा मोठा बोर्ड दुकानावर लावून एक गुटगुटीत ब्राम्हण
भाताने भरलेल्या ताटांमध्ये पिवळीजर्द कढी ओतून देत असताना दिसला. हाय रे
दैवा!! कढीचावलच्या देशात येऊन मी परदेशी अन्न खायला उत्सुक असलेल्यांच्या
मागून जर्मन बेकरी शोधत फिरत होते.
असेच बराच वेळ वर खाली चालल्यावर एकदाचा लक्ष्मणझुला आला. तिथून वर एका जागी जर्मन बेकरी व रेस्तराँ लिहिलेले दिसत होते पण ती ओरिजिनल नाही, ओरिजिनल तिकडे झुलेपार आहे अशी खबर असल्याने मुलींनी तिकडे दुर्लक्ष केले. ते रेस्तराँ खूप छान जागी आहे. थोडे उंचीवर असल्याने तिथे बसून लक्ष्मणझुला व परिसर व्यवस्थित न्याहाळता येईल असे वाटत होते.
लक्ष्मणझुल्यावर तुडुंब गर्दी होती. इतकी गर्दी की तुम्ही स्वतःची सेल्फी जरी काढलीत तरी तुमच्यासोबत अजून चार टाळकी फोटोत येतील. इतक्या गर्दीला सामावून घेणारा लोखंडी झुला चांगलाच मजबूत बांधलाय. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या ह्या पुलावर तेव्हा जीप न्यायची परवानगी होती पण आता बहुतेक फक्त बाईक्सना परवानगी आहे. पूर्ण लोखंडी बांधकाम असले तर चालायचा रस्ता डांबरी आहे.

मला सहसा गर्दीत जायला अजिबात आवडत नाही पण इथल्या तुडुंब गर्दीत
स्वतःला लोटून देण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. गर्दी सगळी आमच्यासारख्या
बघ्यांचीच होती. अशा लोकप्रिय जागी गेले की लोक किती फिरतात याची जाणीव
होते. हाय फाय सॉफीसटीकेटेड ट्रॅव्हलर्स द
सगळीकडेच असतात. पण अशा लोकप्रिय ठिकाणी म्हातारेकोतारे, गर्दीला
बुजलेल्या, प्रथमच प्रवासाला निघाल्यासारख्या दिसणाऱ्या बायका, अगदी लहान
मुले, मोठी कुटुंबे घेऊन फिरणारे कुटुंबप्रमुख असे विविध प्रकारचे लोक
असतात. सगळे त्याच उत्सुकतेने फिरत असतात. ताजमहलला सुद्धा असे विविध
सामाजिक स्तरावरचे लोक दिसले होते. अशी ठिकाणे melting पॉईंट्स आहेत
खरेतर. येणाऱ्याचा सामाजिक स्तर, पूर्वपीठिका निरनिराळी असेल पण इथे सगळे
एका स्तरावर येतात, प्रत्येकजण त्याच औत्सुक्याने, आनंदाने ते ठिकाण पाहात
असतो.
झुल्यावरच्या गर्दीत आम्ही तिघी मागेपूढे राहिलो. मुली खूप मागे राहिल्या हे लक्षात येताच मी तिथेच थांबून त्या येताहेत का पाहात होते तेवढ्यात एका मध्यमवयीन गृहस्थाने मला अडवून जरा फोटो निकालो म्हणत त्याचा मोबाईल माझ्या हातात दिला. मला हे काम अजिबात आवडत नाही कारण हातात कोंबलेल्या मोबाईलची कॅमेरा सेटिंग चटकन लक्षात आली नाहीत तर उगीच कानकोंडे वाटायला लागते. तितक्यात शामली येताना दिसल्यावर मोबाईल तिच्याकडे देऊन ह्या गृहस्थाचे फोटो काढ, मी ऐशूला शोधून आणते म्हणत मी सटकले. मी मागे जाऊन ऐशूला शोधून आणले आणि पाहाते तर शामली वाकडे तोंड करून हातात मोबाईल घेऊन उभी होती व तो गृहस्थ फुफाजी, तावजी, मौसीजी पुकारत फोटोसाठी माणसे गोळा करत होता. शेवटी त्याचे सगळे फुफाजी, ताऊजी, मौसाजी व त्यांचे चिल्ले पिल्ले एकदाचे एकत्र उभे राहिले व फोटो निघाला. त्याचा मोबाईल परत देऊन शामली मला म्हणते, हा माणूस ग्रेट होता, मोबाईल माझ्या हातात देऊन तो मागे फॅमिली शोधायला गेला.
इतक्या गर्दीतसुद्धा अधून मधून अशा मोकळ्या जागा सापडतात.

झुल्यावर इतकी गर्दी आहे तरी माकडे अजिबात न घाबरता लोखंडी बांधकामावरून सरसर चढत उतरत असतात. माकडे आजूबाजूला असताना हातात काहीही न ठेवणेच योग्य. मी माकडांचा वाईट अनुभव घेतलाय एकदा. ताजमहालला जाताना वाटेत गरज नसताना मथुरेला थांबलो. गाडीतून उतरल्याबरोबर चष्मा सांभाळा म्हणून ड्राइवरने सांगितले होते, सोबत केळी ठेवा म्हणूनही सांगितले होते. पण केळेवाले दिसले नाहीत व माकडे तोंडावरून चष्मा ओढून नेतील यावर मी विश्वास ठेवला नाही. मागून माझ्या खांद्यावर माकडाने त्याचा कोमल हात ठेवल्यावर मी मागे चेहरा वळवला, त्याने क्षणार्धात चष्मा ओढला व तो छतावर गेला. हे इतक्या झटपट झाले की मला तो थेट छतावर जात असतानाच दिसला, माझ्या पाठीमागे आलेला दिसलाच नाही. लोक ओरडले की केला फेको उसकी तरफ, वो चष्मा फेकेगा. आमच्याकडे केळेही नव्हते. चष्मा गेला.
भटके, बाईकवाले, सेल्फीवाले, फॅमिली फोटोवाले, थांबून खाली वाहात असलेली गंगा पाहणारे यांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या पुलाच्या मध्यभागी आल्यावर भणाणून जाणारा वारा अनुभवायला मिळाला. झुल्याची लांबी 137 मीटर आहे, खालचे गंगेचे पात्र तेवढे रुंद आहे. आणि गंगेची लांबी विचारूच नका. एवढा मोकळा अवकाश समोर आल्यावर भणाणता वारा असणारच. आम्ही तिथे थांबून वाऱ्याचा आनंद घेत असताना अचानक पायाखालची जमीन हलल्याचा भास झाला. दचकून आजूबाजूला बघितले तर बाकीचे लोकपण आमच्यासारखेच चकित झालेले दिसले. क्षणार्धात काय होतेय ते कळले. पूल चक्क झुलत होता. लक्ष्मण 'झुला' आहे हे माहीत होते पण तो असा झुलेल ही कल्पना केली नव्हती. आता एकदा शोध लागल्यावर मजा यायला लागली. झुला मस्त थोडा थोडा झुलत होता आणि रेलिंगला धरून सगळे झुलण्याचा आनंद घेत होते. तिथे बराच वेळ गंगा दर्शन, फोटोग्राफी, झुलने वगैरेचा आनंद घेतल्यावर तिथून निघून झोन्क गावी आलो. लक्ष्मण झुला गढवाल जिल्ह्यातल्या तपोवन व झोन्क ह्या दोन गावांना जोडतो.
झुल्यावरून दिसणारे गंगेचे विशाल पात्र

झोन्कमध्ये आल्यावर मात्र आता जास्त वेळ न दवडता बेकरी शोधा नैतर मिळेल त्या दुकानात शिरून कढीचावल ऑर्डर करेन म्हणून मी धमकी दिली. पुलाच्या खालीच पायऱ्या उतरून नदीच्या तटी जायची सोय होती. त्या पायऱ्यांवर एक हॉटेल होते. जर्मन बेकरी तिथेच अशी पक्की बातमी होती. पण तिथल्या रेस्तराँचे नाव काही भलतेच होते. मी म्हटले, खड्ड्यात गेली बेकरी, जे मिळाले तिथे जाऊ.
गंगा बीच रेस्तराँ असे मस्त नाव धारण केलेले ते हॉटेल बाहेरून छोटेसे दिसत असले तरी आत भरपूर जागा होती. बसायला भारतीय बैठक होती, टेबल खुर्च्याही मांडल्या होत्या. मांडी घालून आरामत बसायचे व बाहेर वाहणारी गंगा पाहायची. आम्ही गेलो तेव्हा तिथे फारसे कुणी नव्हते. संध्याकाळी गजबजाट होत असणार. मला जागा आवडली. शांत, निवांत एकदम. बाहेर एका कोपऱ्यात एक परदेशी ध्यान लावून बसलेला. रेस्तराँमध्ये जास्त गोंगाट नसलेली इंग्रजी गाणी अगदी बारीक आवाजात लावून ठेवलेली. मेन्यूमध्ये इटालियन, इस्रायली, इंडियन, चायनिज, थाई वगैरे पदार्थ होते. अर्थात सगळे शाकाहारी होते. ऋषिकेशला मांसाहार करतात का माहीत नाही. मुस्लिम जनता दिसत होती म्हणजे मांसाहाराची सोय असणार. पण आपल्याकडे हॉटेलात चिकन तंदुरी टांगलेले दिसतात तसे तिथे कुठेही दिसले नाही.
टेस्ट करून पाहू म्हणून मी जेवण येईपर्यंत लेमन टी ऑर्डर केला. चवीला चांगला होता. अर्थात हेमकुंडला प्यायलेल्या लेमन टी सारखा चहा कुठेही मिळणार नाही पण हा सुद्धा चांगला होता. मुलींनी मला अगम्य असलेले पदार्थ ऑर्डर केले, त्यातला फक्त पिझ्झा ओळखू आला. बाकीच्यांची नावे माहीत नसली तरी मला काही फरक पडत नव्हता. मी सगळे पदार्थ थोडे थोडे खाऊन बघितले. चवीला चांगले होते. तसल्या नावाचे पदार्थ इथे उगीचच 300 च्या पुढे किंमती लावून विकतात. त्यामानाने तिथे किंमती बऱ्याच ठीक वाटत होत्या व प्लेटी बऱ्यापैकी भरून येत होत्या.
गंगादर्शन करत दोनएक तास मन लावून खात बसलो. खाणे झाल्यावर बिल विल देऊन खाली आलो. ऐशूला तरी आशा वाटत होती की हीच ती बेकरी असणार पण आता नाव बदलले असणार. पण मालकाने गेल्या पंधरा वर्षात हॉटेलचे नाव बदलले नाही असे सांगून तिला निराश केले. तिला ज्याने सांगितले होते तो सहा महिन्यांपूर्वी ऋषिकेशला आला होता. पण पत्ता सांगताना त्याने उलट पत्ता सांगितला असणार. म्हणजे आम्ही ज्या बाजूला उतरलो त्याच्या विरुद्ध घाटावर तो राहिलेला असणार व त्यामुळे त्या बाजूने लक्ष्मणझुला ओलांडून तो बेकरीत आला असणार. असो. त्यानंतर आम्ही खाली जाऊन नदितटावर बसुन बराच वेळ घालवला. तिथले वातावरण खूप छान होते. धावती गंगा पाहात शांत बसून राहायचे. त्या बाजूलाच तेरा मंझील मंदिर हे तेरा माळ्याचे मंदिर आहे. पण तिकडे जायचे राहून गेले.
संध्याकाळ होत आली तसे परत निघालो. लक्ष्मणझुल्यावरून चालत परत तपोवनला आलो. आता झुल्याचा बाजार ओलांडला की रिक्षा स्टँड. असा विचार करत परतीचा प्रवास करत असताना शॉपिंग करायचा मोह झालाच. सहज म्हणून एका दुकानात टी शर्ट पाहिले व तिथे मुलींनी उत्तराखंड वगैरे लिहिलेले टी शर्टस, लेगिंगस, वूलन रॅकसॅक वगैरे घेतली. दुकानदार नेपाळी होता. त्याच्याकडे डबल मटेरियल लावलेले होजियारी कुर्ते, पॅन्टस, टी शर्ट वगैरे माल भरपूर होता व खूप छान होता. एकावर एक दोन मटेरिअल्स ठेऊन कापड शिवायचे. मग वर मशीनची शिलाई मारून आजूबाजूचे फक्त वरच्या थराचे कापड कापायचे. होजियरी असल्याने ते लगेच गोल फिरते व आतले कापड दिसते. अशी मशीन वापरून वेगवेगळी डिझाइन्स करायची व त्यावर अधून मधून हाताने भरतकाम करायचे. हे सगळे नेपाळवरून करून आणले म्हणून दुकानदार सांगत होता. तिथून निघून एका गुजराती दुकानदाराकडे जाऊन अजून थोडा खिसा हलका केला. पुढे जात असताना चुकून एका प्रेशस स्टोनच्या दुकानासमोर रेंगाळले. दुकानदाराने मला सिर्फ देखो देखो करत दुकानात नेले. हे उत्तरांचल उद्योग मंत्रालयाचे दुकान होते. तिथे गंडकी नदीतील शाळीग्राम घेतला. काही सेमी प्रेशस दगडांच्या माळा घेतल्या. हे दगड खरेच आहेत हे दाखवण्यासाठी त्याने लाईट्स बंद करून दगड एकमेकांवर घासुन प्रकाश पाडून दाखवला. ही रत्ने एवढी स्वस्त विकणे कसे परवडते यावर तो म्हणाला की हिमालयातील खाणीतून ही रत्ने मिळतात, सरकार रत्ने काढायचा व पॉलिश करायचा खर्च घेते. अर्थात मी फारसा विश्वास ठेवला नाही. पण खिसा मात्र खाली झाला.
तिथून पुढे आल्यावर गायत्री एम्पोरियम हे पुस्तकाचे दुकान दिसले. तिथे जाणे अनिवार्य होते. त्याच्याकडे पुस्तकांचा खजिनाच होता. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, आयुर्वेद, उपचार पद्धती, मानसशास्त्र,तिबेटी संस्कृती, योग... कुठलाही विषय घ्या, कुठलाही लेखक घ्या.... हिंदी व इंग्रजीत पुस्तकांचे भांडार तिथे होते. वेगवेगळ्या विषयांवर सीडीज होत्या. तिथे बरीच पुस्तके घेऊन उरलेला खिसा हलका केला. त्याच्याकडे सुवासिक, कफ, पित्त, वात प्रकृतीला योग्य अगरबत्या होत्या. . मित्रमंडळींना भेट म्हणून भरपूर पाकिटे घेतली गेली.
एवढी शॉपिंग करून खिसा बऱ्यापैकी हलका झाल्यावर रिक्षावाल्याने जिथे सोडले होते ती जागा आली. आता संध्याकाळची वेळ असल्याने तिथे भरपूर गर्दी होती व भरपूर रिक्षाही होत्या. मी तीन चार रिक्षावाल्याना विचारले. भारत मंदिर धर्मशाळेजवळ जायला कुणीही तयार नव्हते, सगळे बाहेर मेन रोड वर सोडणारे होते व सवारी तीस रुपये सांगत होते. तिकडे सगळा सवारीचा भाव असतो. जेवढ्या सवाऱ्या मिळतील तेवढ्या रिक्षात कोंबायच्या. मला तीस रुपये द्यायला त्रास नव्हता पण मेन रोडवरून भरपूर आत चालावे लागले असते. आमच्या हातात आता पुस्तके व इतर शॉपिंगचे ओझे होते त्यामुळे चालायची अजिबात इच्छा नव्हती. सकाळी दहा रुपयात आणून सोडणारा रिक्षावाला कोण देवमाणूस होता देव जाणे!!
आम्हाला रिक्षा मिळत नाहीय बघून माझी चिडचिड व्हायला लागली. माझा राग मी मोठ्याने मराठीत व्यक्त करू लागले, पाय अर्थात चालतच होते. जेवढे जमेल तसे चालू, रिक्षा मिळाली की तिच्यात बसू हा विचार करत चालत होते. तेव्हढ्यात एक रिक्षावाला आला व रिक्षा लावून आम्हाला बसा म्हणाला. मी कुठे जायचे हे सांगितल्यावर म्हणतो अंदर नही जाते, वहासे कोई सवारी वापस नही मिलती. मी वैतागले होते त्यामुळे रिक्षात बसले. आम्ही तिघी बसताच त्याने रिक्षा सुरू केली. मला आश्चर्य वाटले. मुझे और सवारी नही लेंनी असे रिक्षावाल्याने म्हटल्यावर भांग नसेल ना चढवली? असे मी मनातल्या मनात बोलून घेतले.
रिक्षावाला गप्पा मारायच्या मूडमध्ये होता.
आप महाराष्ट्रसे आये हो ना?
हम्म
मै आपको देखतेही जान गया आप महाराष्ट्रसे हो
अच्छा?
मै भी था महाराष्ट्रमे
कहा?
नाशिक
रिक्षा चलाते थे क्या?
नही, फॅक्टरीमे था
तो वापस क्यू आये?
राज ठाकरेके डर से
क्या?????
मला धक्काच बसला. तो म्हणाला की त्याच्या फॅक्टरीत काहीतरी युनियनचा प्रॉब्लेम झाला, त्यात याचा काहीतरी हात होता. प्रकरण हाताबाहेर जायला लागले तसा हा घाबरून तिथून पळून आला. मुझे वहा अच्छा लगता था लेकीन अब वापस नही जा सकता.
अशी बडबड सुरू असतानाच त्याने रिक्षा एक ठेल्याशी आणून लावली. मी बाहेर बघितले. जिथे आम्हाला सोडायची बात झालेली तिथून हा भाग खूप लांब होता. मी त्याला काही विचारणार तेवढ्यात तो रिक्षातून पायउतार झाला व ठेल्यावर जाऊन त्याने ऑर्डर दिली. ठेला एक मुलगी चालवत होती. भिजवलेले काबुली चणे, पांढरे वाटाणे, हरभरे इत्यादी कडधान्ये तिने हारीने मांडून ठेवलेली व ऑर्डर प्रमाणे हवे ते कडधान्य कढईत भाजून त्यावर मसाला, कांदा, चटण्या वगैरे टाकून देत होती. या बाबाने काबुली ऑर्डर केले व ते तयार होईपर्यंत तो मुलीशी गप्पा मारत उभा राहिला.
आम्ही तिघीही रिक्षातून पाहात होतो. शामलीला एवढा धक्का बसलेला की तिला बोलणे सुचत नव्हते. शेवटी थोडी सावरल्यावर ती म्हणाली, कसला कुल ड्युड आहे हा माणूस. आपल्या रिक्षात पॅसेंजर बसलेत, त्यांना त्यांच्या जागी वेळेत सोडायची आपली जबाबदारी आहे, आपण त्याचे पैसे घेणार आहोत याचे याला काहीही देणे घेणे नाही. हा आरामात रिक्षा लावून गप्पा मारतोय. आपण का नाही याच्यासारखे होत?
आधी मलाही धक्का बसलेला, पण नंतर हा असला अतरंगी रिक्षावाला आम्हालाच भेटायचा होता हा विचार करून मला जाम हसू आले. आम्ही महाराष्ट्रातले हे त्याने ओळखून मुद्दाम आम्हाला आत घेतले आणि आता अतरंगीपणा करत होता.
तोवर त्याची ऑर्डर बनवून झालेली. तिने पुडी पॅक करताना ह्याने अजून एक्सट्राची चटणी घालून घेतली व रिक्षात येऊन बसला व आरामात खायला सुरवात केली.
मै जबभी यहासे जाता हु, ये जरूर खाता हु. त्याने काहीतरी नाव घेतले त्या चाटचे. अच्छा है, आपभी खाके देखो.
मग मीही दहा रुपये देऊन एक पुडी मागवली. प्रकार एवढा काही खास नव्हता, ठीकठाक होता.
रिक्षावाल्याचे खाऊन झाल्यावर त्याला पाण्याची आठवण झाली. आम्ही भली मोठी बाटली घेऊन फिरत होतोच. त्यातलेच त्याला थोडे दिले. त्याचे सगळे आटोपल्यावर रिक्षा परत सुरू केली.
यहा सब आरामसे चलता है ना, मी त्याला विचारले.
हा, तो म्हणाला. ऋषिकेशमे तो सब आरामसे होता है, कोई जलदी नही। यहा तो सब फोकटमे मिलता है! फोकटका खाना, रेहना, मौत भी फोकट मे।
वो कैसे?
गंगामैयामे जाके डुबकी लगानेकी, मैया लेके जायेगी साथ। आपके यहा जहर भी
खरीदना पडता है, ट्रेनके नीचे आ गये तो भी पैसा भरना पडता है।
मी म्हटले हा भय्या, ऐसा आराम तो सिर्फ यहीपर मिल सकता है!
यथावकाश तो अजून बडबड करत आमच्या इथल्या मेन रोड कॉर्नरकडे आला व रिक्षा आत घेतली. मला म्हणाला आपको जहातक जाना है, मै छोडता हु। मी म्हटले मी प्रति सवारी तीस रुपयांपेक्षा जास्त देणार नाही. तो हसायला लागला, आपका जो मन करे दे दो!
आम्हाला हवे होते तिथे उतरून त्याला टाटा बाय बाय करून उतरलो. खोलीत जायच्याआधी तो 20 x 2 पायऱ्यांचा डोंगर चढायचा होताच. हळूहळू खोलीत आल्यावर बेडवर अंग टाकून दिले. संध्याकाळी साडे सात, आठच्या सुमारास जाग आल्यावर रात्री नऊ वाजता परत एकदा त्रिवेणी घाटावर गेलो. घाटावर आता फारसे लोक नव्हते. पाणीही आधीच्या मानाने कमी झाले होते. वातावरणातले मनुष्यनिर्मित आवाज नाहीसे झाले होते. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा आवाज आसमंतात भरून राहिला होता. ते जादुई वातावरण अनुभवत थोडा वेळ बसून राहिलो व परत खोलीत परतलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचचे डेहराडूनहुन फ्लाईट होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी जरा आरामातच उठलो. ऋषिकेशला अजून बरेच काही पाहण्यासारखे होते पण मुली कंटाळलेल्या. मग मीही कंटाळा केला. इथे रूमवर चहा कॉफी वगैरे काही मिळण्यासारखे नसल्याने खाली जाणे भाग होते. तयार होऊन बाहेर आलो तर आमचा कॅम्पमेट अशोक निघत होता. त्याचेही फ्लाईट होते पण ते दोन वाजताचे होते. वाटेत रस्ता कसा आहे माहीत नाही म्हणून मी लवकर निघतोय म्हणून त्याने सांगितल्यावर आपणही लवकर निघायला हवे याची मी मनाशी नोंद करून ठेवली. येताना आमची रिक्षा पंक्चर झाली होती.
खाली आल्यावर हॉटेल मालक भेटला. त्याला हॉटेल बुकिंगसाठी ओळखपत्राची कॉपी हवी होती. मी फोटोकॉपी दुकान कुठे असेल म्हणून विचारल्यावर त्याने ती आयडियाच सोडून दिली व फक्त पाचशे रुपये घेऊन हिशोब मिटवला.
आम्ही राहात होतो तो भाग बराचसा निवासी होता, तिथे कुठलेही हॉटेल, ढाबा
वगैरे काही नव्हते. रिक्षाही कुठे दिसत नसल्याने चालत मेन रोड पर्यंत जाणे
भाग होते.
मी आजूबाजूला बंद दुकाने पाहात चालत असताना रस्त्याच्या कडेला एक ठेला
दिसला. एकजण तिथे उभा राहून काहीतरी खाताना दिसला. मी तिथे मोर्चा वळवला.
ऐशु नको नको म्हणून ओरडत होती पण तिकडे दुर्लक्ष करून मी डिशची चौकशी
केली. ठेल्यावर छोले कुलचे मिळत होते. जो इसम खात होता त्याने जरूर ट्राय
करो, अच्छे है म्हणून शिफारिस केल्यावर मी ठेलेवाला काय करतो हे बघायला
लागले. तेवढ्यात कुणीसा बाईकवरून आला व पार्सलची ऑर्डर दिली. त्यामुळे मला
पहिल्यापासून पदार्थाची रेसीपी पाहता आली. काबुली चणे हळद मीठ घालून उकडून
परातीत भरून मंदाग्नीवर ठेवले होते. पळस, साग किंवा तत्सम मोठ्या आकाराची
पाने बाजूलाच रचून ठेवली होती. ऑर्डर आली की एक मोठा डाव भरून छोले पानावर
काढून घ्यायचे, त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून पानावरच मॅश
करायचे, मग बाजूला ठेवलेल्या तीनचार कोरड्या पुडीतल्या चिमूट चिमूट पुडी
त्यात टाकायच्या. बहुतेक चाट मसाला, गरम मसाला, आमचूर पूड, धनेजिरे पूड
वगैरे मसाले असावेत. त्यावर हिरवी व चिंचेची चटणी टाकायची आणि सगळे परत
पानावर चांगले फिरवून मिक्स करायचे. मग दोन्ही बाजूने एकेक टोमॅटो
कांद्याची चकती लावून द्यायचे. कुलचे बहुतेक रेडिमेड होते. मी खाल्लेले
मुंबईतले कुलचे व नान चवीला सारखेच वाटले होते, फक्त आकारात फरक होता. पण
खरा कुलचा म्हणजे यीस्ट घालून फुगवलेल्या मैद्याच्या पिठाची जाडसर रोटी.
यीस्टमुळे पीठ फुगलेले असते, कुलचाला आत थोडी जाळी पडते. ठेल्यावरचे कुलचे
आतुन पावासारखे फुलले होते. भरपूर लोणी लावून तव्यावर गरम करून
छोल्यासोबत दोन कुलचे मिळत होते. आम्ही तिघींमध्ये एक डिश घेतली. मुलींनी
आधी भुवया उडवीत, काहीही खाते ही बाई असा चेहरा करत चव घेतली व दोघीही
तुटून पडल्या. ऐशु छोले अजिबात खात नसे पण आता ह्या कृतीने घरी केलेले
छोले कुलचे आनंदाने खाते. मायबोलीकर अल्पनाने लिहिलेली अमृतसरी छोले ही
रेसिपी बरीचशी याच्या जवळपास जाते.

छोले असे दुलहनसारखे सजवून ठेवले होते

ही फायनल डिश:

कुलचे:

छोले कुलचे खाऊन जीवात जीव आल्यावर दुपारचे जेवण कुठे घ्यावे असा विचार करत मेन रोडच्या दिशेने निघालो. चोटीवाला रेस्तराँमध्ये जाऊन जेवावे, तिथे पोचेपर्यंत जेवायची वेळ झालीच असती. पायीच जाऊया म्हणजे वाटेत बघण्यासारखे काही असेल तेही बघून होईल असा कार्यक्रम ठरवून निघालो. मेनरोडवर थोडे पुढे गेलो तर आमचा ग्रुपलिडर महेश भेटला. त्याची दुसऱ्या दिवशीची ट्रेन होती. कुठे राहिलास म्हणून विचारल्यावर म्हणाला की अजून कॅम्पमध्येच मॅनेजर साहेबांसोबत त्यांच्या खोलीत राहतोय. त्याच्यासोबत तिथला लोकल माणूस होता. उत्तम जेवण कुठे मिळणार याचा पत्ता लोकल माणसाशिवाय अजून कोण सांगू शकणार? त्याला विचारले असता त्याने राजस्थानी मिष्ठान भांडारचे नाव सांगितले. अतिशय उत्कृष्ठ राजस्थानी व उत्तर हिंदुस्थानी जेवण मिळेल याची खात्री त्याने दिल्यावर पत्ता घेऊन आम्ही तिकडे जाण्यासाठी यु टर्न मारला.
त्या रस्त्यावर हा लोकल ओवन दिसला. यात बिस्किटे बनवून विकली जात होती:

बिस्किटे घरीच बनवून इथे फक्त गरम करत होता असे वाटले:

तोवर ऊन खूप वाढले होते पण रिक्षा मिळेना. शेवटी चालतच निघालो. मेन
रोडवरून बरेच पुढे गेल्यामुळे परत तेवढेच मागे यावे लागले. राजस्थानी
मिष्ठान भांडार मेन मार्केट रोडवरच खूप गजबजलेल्या भागात आहे. बरीच पायपीट
केल्यावर एकदाचे पोचलो. दुकान बाहेरून नेहमीचेच वाटते पण पदार्थ खरेच
ए-वन आहेत. त्यांच्या थाळीची वेळ झाली नव्हती व थाळी असती तरी फारसे काही
खाल्ले गेले नसते म्हणून समोसा व कचोरी चाट मागवले. चव अप्रतिम, प्लेट दोन
माणसांना पुरेल इतकी होती. थाळी खायची खूप इच्छा होती पण त्यासाठी खूप
थांबावे लागले असते व तेवढी भूकही नव्हती. कधी ऋषीकेशला गेलात तर
राजस्थानी मिष्ठान भांडारची वारी अजिबात चुकवू नका. त्यांचे इंटिरियर
सुद्धा पाहण्याजोगे आहे. भिंती, कपाटे, टेबले, जिथे जागा मिळेल तिथे
बोधवचने चिकटवलेली आहेत. 

समोसे:

चाट:

भरल्या पोटाने रमतगमत खोलीवर पोचलो. थोडा आराम केला व परतीच्या प्रवासाला सुरवात म्हणून खाली येऊन डेहराडूनला जाणारी रिक्षा पकडली. तासाभरात डेहराडून विमानतळ गाठले व तिथून फ्लाईटने मुंबई, एका नितांत सुंदर ट्रेकच्या आठवणी सोबत घेऊन!
*********
या ट्रेकमध्ये बरेच काही पाहिले, जेवढे पाहिले त्यापेक्षा बरेच काही पाहायचे राहून गेले. चारधाम यात्रा करावी हा विचार याआधी मनात चुकूनही कधी आला नव्हता. पण तिथे गेल्यावर चारधाम करावा हा विचार वरखाली उसळत राहिला. कधी वाटायचे की हा अनुभव घ्यायलाच हवा, तर कधी वाटायचे, नकोरे बाबा, परत हा प्रवास नको. तिथून परतल्यावर आता चारधाम करावासा वाटायला लागलेय.
मी अजून कुठेही पूर्ण प्लॅनिंग करून गेलेले नाही. अचानक ठरले, बुकिंग केले व तिथे गेल्यावर त्या भागाचा परिचय झाला असेच घडलेले आहे. हा ट्रेक युथ हॉस्टेलने प्लॅन केला असल्याने स्वतःहून करण्यासारखे काही फक्त शेवटच्या दोन दिवसातच शक्य होते. पण ट्रेकआधीचे दिवस खूप घाईत गेल्यामुळे फारसे काही ठरवता आले नाही. मला वाटते कुठेही जाण्याआधी असे प्लॅनिंग केलेले खूप चांगले. वेळ सत्कारणी लागतो. ऋषीकेशला जितके पाहिले त्यापेक्षा अजून बरेच काही पाहता आले असते. पण थोडा कंटाळा केला.
फिजिकल फिटनेस व स्टॅमिना किती महत्वाचा आहे हे या ट्रेकने ठळकपणे दाखवून दिले. हिमालयात जायचे तर फिटनेस हवाच. तो नसेल तर तुम्हाला पूर्ण आनंद घेता येत नाही. आता बहुतेक सगळीकडे हेलिकॉप्टरची सोय आहे. पण निसर्ग न्याहाळत पायी जाण्यात जी मजा आहे ती पाच मिनिटात हवेतून तिथे पोचण्यात नाही.
फुलोनकी घाटीतली बरीच फुले अजून पाहायची आहेत. जी पाहिली ती परत पाहायची आहेत. त्यामुळे परत जाणार हे नक्की...
सगळ्यात शेवटी युथ हॉस्टेलबद्दल. शेवटी त्यांचा थोडा गोंधळ झाला, अचानक
माणसे जास्त झाल्यामुळे व्यवस्थापन बिघडले. पण हे वगळता, माझा युथ
होस्टेलचा खूप चांगला अनुभव आहे. मी यापुढेही त्यांच्या ट्रेक्सना नक्की
जाईन, फक्त जिथे तंबूत राहायचे ते ट्रेक्स टाळेन.
एकट्याने ट्रेक करायचाय पण तेवढी हिम्मत होत नसेल तर युथ हॉस्टेल बेस्ट, खूप सुरक्षित.
मात्र आम्हाला जसे सगळीकडे घोडे किंवा सामान उचलायला पोर्टर मिळत होते
तसेच युथ होस्टेलच्या इतर ट्रेक्सवर मिळतील असे अजिबात नाही. इथे मिळाले
कारण ही सोय इथे होती, युथ हॉस्टेलचा याच्याशी काही संबंध नव्हता. तुम्ही
कुठे जंगलात किंवा बर्फात ट्रेकला गेलात तर तिथे स्वतःच सामान उचलून
चालायची तयारी ठेवा. 
शेवटी एवढेच म्हणेन की बघण्यासारखे, अनुभवण्यासारखे भरपूर आहे. रोजच्या धावपळीतून वेळ काढून बाहेर पडा.
मंझील मिलही जायेगी, भटकते हुएही सही
गुमराह तो वो है, जो घरसे निकलेही नही।
***********
एकत्रित सर्व लिंक



























































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.