Thursday, August 26, 2021

हवाई बेटांवरच्या सुरस गोष्टी

 नुकतीच हवाई ची ट्रिप झाली...
प्रवास वर्णन लिहिण्याचा बेत नाहीये, काळजी नसावी!  पण तिथे बर्याच स्थळांशी, रस्त्यांशी, झाडांशी , पानांशी निगडीत खूपशा स्थानिक आख्यायिका, छोट्या छोट्या लोककथा तुकड्या तुकड्यात ऐकायला, वाचायला मिळाल्या. मी तरी या कथा, ही पात्रं कधीच ऐकली नव्हती त्यामुळे या कथा मला इन्टरेस्टिंग वाटल्या आणि विसरुन जायच्या आधी लिहून इथे सगळ्यांशी शेअर कराव्या असं ठरवलं. बघा तुम्हाला कशा वाटतायत!

एक डिस्क्लेमर द्यायलाच हवा- मी तिथे पर्यटक म्हणून काहीच दिवसांसाठी गेले होते. माझा इतिहासाचा अभ्यास वगैरे नाही. टूर गाइड कडून, वेगवेगळ्या माहितीपत्रकांमधून, पर्यटन स्थळांच्या , म्युझियम्स वगैरेच्या बाहेरच्या पाट्या वाचून आणि काही संदर्भ इन्टरनेट वरून वाचून जमवलेली ही माहिती आहे. तेव्हा तपशीलात चुका असू शकतील. शिवाय नावा - गावांच्या उच्चारातही गडबड असू शकते. कुणाला अधिक माहिती असल्यास जरूर दुरुस्त करा!

पार्श्वभूमी:
h1.jpg

हवाई आता अमेरिकेचे ५० वे राज्य आहे. कमर्शियल टूरिस्ट स्पॉट आहेच. पण अमेरिकन संस्कृतीला आपलंसं करण्याआधीचा हवाई बेटांचा इतिहास बराच दूरवर जातो.

हवाई बेटे हा जागृत ज्वालामुखीचा प्रदेश. वारंवार होणार्‍या उद्रेकात लाव्हाचे लोट च्या लोट उसळतात आणि वाटेत येईल त्या प्रत्येक गोष्टीला होत्याचे नव्हते करतात. दुसर्‍या बाजूला याच बेटांवर मोठे डोंगर, पर्वत, नद्या, धबधबे आणि घनदाट पर्जन्यवनेही आहेत.

इथे मानवाचे पाऊल पडले ते म्हणजे सुमारे १५०० वर्षांपूर्वी! असे मानले जाते की पॅसिफिक मधल्या मार्किसस (मार्कीसा?) बेटवरून काही लोक कामचलाऊ होड्यांमधून हवाईला येऊन थडकले. ते इथे का आले याची कारणे नक्की माहिती नाहीत. कदाचित त्यांच्या बेटावर लोकसंख्येमुळे अन्नपदार्थ कमी पडत असतील म्हणून नविन प्रदेश शोधायला निघाले असावेत ? किंवा टोळीयुद्ध अथवा तत्सम कारणाने त्यांना त्यांचं बेट सोडायला भाग पडलं असू शकेल, किंवा साहस म्हणूनही असेल! हे लोक संख्येने फार नव्हते आणि मागासलेले (अप्रगत) होते. त्यांनी येताना कोंबड्या , डुकरे, भाज्या, कंद , फळे असे थोडेफार आणले होते. या बेटांवर तेव्हा खाण्यालायक काहीच नव्हते. अनिश्चित हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत हे आदिवासी तरले, जगले हेच विशेष! या लोकांनी तिथे ब्रेडफ्रूट, नारळ, टारो (अळू सारखे कंद) याची लागवड केली. भाले, गळ वापरून मासेमारीही करायचे.
या नंतर बर्‍याच वर्षांनी ताहितीयन लोक इथे आले. कालांतराने जपान, फिलिपाइन्स इ. ठिकाणांवरूनही माणसे इथे स्थलांतरित झाली. हे सर्व लोक येताना आपापले देव, धर्म, चालीरिती, प्रथा घेऊन आले. त्यामुळे इथल्या लोककथांमधे वेगवेगळ्या संस्कृतींचे मिश्रण आढळते.

ताहितीयन लोकांनी इथे थोड्याफार प्रमाणात समाजव्यवस्था अस्तित्वात आणली, जी बराच काळ इथल्या समाजव्यवस्थेचा कणा होती. टोळीचा राजा (अलिइ), प्रिस्ट/ धर्मगुरु आणि सर्वसामान्य लोक असे सामाजिक थर. त्यांचे कायदे- म्हणजे त्यांना असलेले अधिकार आणि मनाई असलेल्या गोष्टी ठरलेल्या असत - त्याला "कापु पद्धत" असे नाव होते. अर्थात जगात कोठेही असते त्याप्रमाणे राजे आणि धर्मगुरु यांनाच काय ते अधिकार! विशेषतः राजाला अमर्याद अधिकार असत, एका इशार्‍यावर लोकांच्या जीवन मरणाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याला असे. सामान्य लोकांनी मात्र "काय करायचे नाही" याचीच यादी लांब! समाजाच्या नियमांना "कापु" असं नाव असलं तरी बहुतेकदा "एखादी गोष्ट करण्यास मनाई" अशाच अर्थाने कापु हा शब्द पहायला मिळतो. सामान्यांना "कापु" असलेल्या गोष्टी पाहिल्या तर अवाक व्हायला होईलः
-अलिइच्या वाटेत येणे / दृष्टीस पडणे
-अलिइच्या पेक्षा उंच मानेने चालणे(!)
-अलिइच्या वाटेत/ त्याच्या मालकीच्या कोणत्याही गोष्टीवर आपली सावली पाडणे
-अलिइ बोलत असताना मधे बोलणे
-लाल अथवा पिवळी पिसं आभूषणात वापरणे (ती महत्त्वाच्या /राजघराण्यातील व्यक्तींसाठी राखीव असत!)

हे वरचे काही कापु होऊ नयेत म्हणून व्यवस्थाही असे. म्हणजे अलिइ एखाद्या वाटेने येणार असेल तर त्याच्यापुढे आधी त्याचे सेवक शंख फुंकून इतरांना सावध करत. तो आवाज ऐकला की सामान्य लोकांनी अ‍ॅम्ब्युलन्स येत असल्याप्रमाणे बाजूला व्हायचं आणि डोक्यामागे हात घेऊन जमिनीवर पालथे झोपायचे!!

hw2.jpg
हे एक त्यासंबंधीचे म्यूरल एका म्यूझियम मधले.

काही लॉजिकल कापुही होते - जसे ठराविक ठिकाणी मासेमारी करण्यास ठराविक काळ कापु, (उदा. माशांच्या विणीच्या काळात), ठराविक झाडे तोडण्यास कापु वगैरे.
स्त्रियांसाठी वेगळे कापु होते!
त्यांनी केव्हा कुठे किती जेवावं, याचे कडक नियम होते. काही पदार्थ खायला कापु, नवर्‍याच्या जेवणाच्या भांडयात आपले जेवण बनवण्यास कापु, नवरा जेवताना त्या खोलीत जायला कापु, शिवाय सामान्यांना असलेले बाकीचे कापु पण त्यांना होतेच! एकुणात काय बायकांना नुस्ते कापुच कापु!! Happy

या कापु असलेल्या गोष्टींचं अनवधानाने किंवा मुद्दाम उल्लंघन झाल्यास शिक्षा एकच! भयंकर प्रकारे मृत्यू ! कधी जाळून कधी दगडांनी ठेचून तर कधी पाण्यात बुडवून. टोळीचे "कापु अधिकारी" असत , ते त्या त्या गुन्हेगाराला शोधून काढून अत्यन्त निर्दयपणे शिक्षेची अंमलबजावणी करत. सुनावणी नाही की साक्षी पुरावे नाहीत!! या कापु पद्धतीच्या सहाय्याने टोळीचे राजे त्यांची सत्ता, दहशत राखून असायचे आणि त्यांच्या दृष्टीने त्यांच्या टोळीत सुव्यवस्थाही. लोकांनाही ते मान्य असे कारण त्यांच्या मते हे कापु देवांनीच बनवले होते आणि ते मोडल्याने देवाचा कोप होणारच अशी समजूत होती.
इतकेच नव्हे तर आपल्या हातून कापुचे उल्लंघन झाले आहे असे समजताच ती व्यक्ती काही वेळा स्वतःच आत्महत्याही करायची!
या शिक्षेतून मुक्ती देण्याचा अधिकार एक अलिइला होता किंवा अजून एक विचित्र मार्ग होता. प्रत्येक गावात किंवा मुलखात एक पुऊहोनुआ " Pu'uhonua " (आश्रय मंदीर) असायचं. कापुचा भंग झाल्यावर कापु अधिकारी तुमच्यापर्यन्त पोहोचायच्या आत जर तुम्ही या मंदिरापर्यन्त पोहोचलात (जे अजिबात सोपं नसायचं) तर तुमची शिक्षा माफ! तिथे रक्तपाताला मनाई होती! या मंदिरात माफीची प्रार्थना करून तुम्हाला परत समाजात मिसळता यायचं!
puuhanou.jpg
एका आश्रयमंदिराची प्रतिकृती : Place Of Refuge - Big Island
watchers.jpg
मंदिराचे राखणदार!

तर असा एकूण हा समाज. ही पार्श्वभूमी मुद्दाम लिहिली, पुढे मी ज्या लोककथा लिहीन म्हणतेय त्या यामुळे जास्त चांगल्या रिलेट करता येतील अशी आशा आहे.

या समाजांच्या देव देवता निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपात होत्या. जसे समुद्राचा देव, पिकांचा देव, ज्वालामुखीचा देव, निर्मिती करणारा देव, रक्षण करणारा देव , विनाशाचा देव वगैरे. हे देव एकदम शक्तिशाली पण तरीही मानवी भाव भावना असलेले असायचे. थोडे फार आपल्या देवांसारखेच. त्यांच्या संदर्भातल्या आणि दंतकथा नंतरच्या भागात.

--क्रमशः

 

कालो आणि हालोआ ची कथा

ही खूप खूप जुनी आख्यायिका आहे. आद्य दंतकथा म्हटले तरी चालेल.
हवाईयन संस्कृतीत "कालो" ( टारो प्लॅन्ट) म्हणजेच आपल्या अळू ला फार महत्त्वाचं स्थान आहे.
या बेटांवर फारसे काहीही खाण्यालायक उगवत नसताना आद्य हवाई लोकांना या झाडाने जगवलं आहे.
या लोकांच्या कल्पनाशक्तीच्या भरार्‍या मात्र अफाट आहेत. अळूच्या झाडाबद्दल कुणाला काही कथा सुचेल असं मला कधीही वाटलं नसतं! पण हवाईयन लोकांना सुचली ! Happy तर अशी ही गोष्ट :

पापा उर्फ पापाहानामोकु (जिच्यातून जमीन जन्मते अशी - म्हणजे भूमी माता) आणि वाकिआ (आकाश पिता) यांनी लग्न केले. त्यांच्या मीलनातून हवाई बेटे जन्मली. त्यांना एक सुंदर मुलगीही झाली - तिचे नाव हूहोकुलानी (तार्‍यांनी बनलेली, स्वर्गीय अशी).
ही कन्या तरुण झाल्यावर वाकिआ चे मन तिच्यावर गेले. पापाच्या नकळत त्याने तिला प्राप्त केलेच.
** त्यावेळच्या हवाईयन समाजात भावा बहिणीचे संबंध सर्रास प्रचलित होते हे इतर कथांतून वाचलेय पण बाप -मुलीच्या संबंधांचे हे एकच उदाहरण आहे की तेही समाजमान्य होते याची कल्पना नाही. असो. **

तर वाकिआ आणि हूहो च्या मीलनातून हूहोला मातृत्वाची चाहूल लागली. पापा(भूमी)ला हे अर्थात आवडले नाही. तिच्या शापाने हूहो अपुर्‍या दिवसाची बाळंत झाली. तिला एक वेडावाकडा विद्रुप आणि जन्मतः मृत मुलगा झाला. हूहो आणि वाकिआ दु:खी झाले. त्यांनी त्या बाळाचं नाव हालोआनाका ठेवलं आणि त्याला भूमीच्या कुशीत दफन केलं.
हूहोला दु:खाचा विसर पडत नव्हता. ती रोज बाळाला दफन केल्याच्या जागी जाऊन मातीतून हलकेच हात फिरवी, तिथली जमीन सारवून स्वच्छ करी. आणि त्या जागेवर अश्रू ढाळत राही.
शेवटी भूमी ही हूहोची आईच! तिचे मन द्रवले. जे झाले ते तिला बदलता येणार नव्हते. पण तिने एक मार्ग शोधला हूहोचे सांत्वन करण्याचा.
बाळाला दफन केल्याजागी एक दिवस एक सुंदर हिरवा कोंब आला. तेच कालो चे म्हणजे अळूचे झाड! हूहो नेहमीप्रमाणे त्या जागी येऊन मातीतून हलकेच हात फिरवत होती. जणू काही तिच्या बाळाचे पांघरुण सारखे करीत होती! तेव्हा अचानक तिला तो हिरवा कोंब दिसला. ती हर्षभरित झाली! वाकिआला म्हणू लागली, बघ बघ आपलं बाळ किती भराभरा वाढतंय! त्याला उभं पण राहता यायला लागलं!!

kalo.JPG
(हे चित्र एका व्हिजिटर पँप्फ्लेटवर होतं, त्याचा मी फोटो घेतलाय. योग्य नसल्यास काढून टाकेन)

दोघे त्या कोंबाची नीट काळजी घेऊ लागले. त्या कोंबाचे रोप झाले. त्याची पानं हृदयाच्या आकाराची होती. त्याच वेळी हूहोला पुन्हा दिवस गेल्याची चाहूल लागली! लवकरच तिला एक छानसं सुदृढ मानवी बाळ झालं. त्याचं नाव थोरल्या भावाच्या आठवणीसाठी "हालोआ" असं ठेवलं . हाच आद्य हवाईयन मानव आणि आपला आद्य पुरुष असे हवाईयन लोक मानतात.

हालोआदेखिल आपल्या भावाची म्हणजे त्या अळूच्या झाडाची काळजी घेऊ लागला, त्याला पाणी देऊ लागला. मोठ्या भावानेही त्याला कधी उपाशी राहू दिले नाही आणि त्याच्या अन्नपाण्याची काळजी शेवटपर्यन्त घेतली.

अजूनही अळूच्या झाडांची हवाई बेटावर सगळीकडे लागवड केली जाते.
ज्याच्याकडे भरपूर अळूची झाडं तो सुखी असं हवाईयन समजतात. वार्‍यावर ती हिरवीगार पाने डोलतात तेव्हा ती हुला नृत्य करतायत असं हवाईयन लोकांना वाटतं! त्या हृदयाकृती पानांच्या मध्यभागी खूपदा पावसाच्या पाण्याचे मोत्यासारखे थेंब जमतात ते त्यांना हालोआच्या आईचे अश्रू वाटतात.

taro.JPG

कालोच्या मुळापासून, पानापासून बनलेले पदार्थ हवाईयन लोकांचे आवडते अन्न आहे. पोइ हा घट्ट खिरीसारखा पदार्थ कालोच्या मुळापासून बनवतात, तो एक पवित्र पदार्थ समजला जातो. जेव्हा जेव्हा हवाईयन घरात पोइ बनवलं जातं तेव्हा घरात वादाला, भांडणाला मनाई असते. कारण मोठ्यांच्या समोर जोरजोरात बोलणे, वाद घालणे हे कापु आहे! आणि पोइ म्हणजे कालो हा तर सगळ्या हवाईयन लोकांचा मोठा भाऊच आहे!

--क्रमशः

 

ओहिया आणि लेहुआची प्रेमकहाणी

एका टोळीच्या अलिइ ची एक सुंदर कन्या होती. लेहुआ तिचं नाव.
लेहुआ अगदी फुलासारखी नाजुक आणि सुंदर होती. सगळ्या बेटावर तिच्या सौंदर्याचा बोलबाला होता.
अलिइ आपल्या एकुलत्या मुलीला मौल्यवान वस्तूप्रमाणे जपायचा. लेहुआ अगदी लाजरी बुजरी होती, कुणाशीच जास्त बोलायची नाही.

त्या टोळीत एक नविन युवक आला. ओहिया त्याचं नाव. ओहिया दिसायला अत्यन्त रुपवान, प्रमाणबद्ध शरीराचा, ताकदवान आणि धाडसी होता. तो युद्धकलेत आणि क्रिडाकौशल्यातही निपुण होता. लवकरच तो अलिइ चा उजवा हात बनला.

एकदा अलिइने शेकोटीभोवती छोट्याश्या समारंभाचे आयोजन केले होते, त्या प्रसंगी प्रथमच ओहिया आणि लेहुआची नजरानजर झाली. पहिल्या नजरभेटीतच ओहयो आपलं हृदय पार हरवून बसला! लेहुआदेखिल त्याच्या एकटक नजरेने बावरली, लाजेने चूर झाली!

अलिइ च्या चाणाक्ष नजरेतून हे सुटले नाही. त्याने ओहियाला टोकल्यावर ओहियाने आपण लेहुआच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली आणि अलिइकडे तिचा हात मागितला. अलिइ ला ओहियाच्या गुणांची कदर होतीच. त्याने दोघांच्या लग्नाला मान्यता दिली! लेहुआनेही लाजत लग्नाला रुकार दिला. ओहियाच्या आनंदाला पारावार राहिला नाही!

प्रथेप्रमाणे ओहियाने लेहुआसाठी घर बांधले. दोघांचे लग्न पार पडले.
बरेच महिने गेले. ओहिया आणि लेहुआ जणू काही एकमेकासाठीच बनले होते! एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. एकमेकाशिवाय दुसरे काही त्यांना सुचत नव्हते.

नियतीला त्यांचा हा आनंद बघवला नसावा. एक दिवस साक्षात पेले त्यांच्या घरासमोर आली! पेले ही हवाईयन संस्कृतीतील अग्नि / ज्वालामुखीची देवता अनेक कथांमधे येते. ही अफाट सुंदर परंतु शीघ्रकोपी आणि विनाशकारी क्षमता असलेली म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या कथा पण पुढे येतीलच.
**हर्ब काने या चित्रकाराने काढलेली तिची पेन्टिन्ग्स फार सुरेख आहेत. हे एक नक्की पहा : http://herbkanehawaii.com/image-catalog/gods-goddesses-legends/pele-g16/

तर ही पेले फिरत फिरत तिथे आली . ओहिया अंगणात लकडे फोडत होता. त्याचं रूप, लाकडे तोडताना लयबद्ध हालणारे त्याचे प्रमाणबद्ध शरीर पाहताच ती मोहित झाली. ती पुढे होऊन ओहियाच्या समोर आली, त्याच्या रुपाची उघड तारीफ केली. ओहियाने नम्रपणे तिचे स्वागत तर केले पण तिला फारसा प्रतिसाद दिला नाही. कसा देणार! त्याच्या नजरेला लेहुआखेरीज दुसरे काही सुंदर दिसतच नव्हते! भरीत भर म्हणून त्याच वे़ळी लेहुआ त्याचं दुपारचं जेवण घेऊन तिथे आली.

लेहुआला पहाताच जणू सर्व भान विसरून ओहिया तिच्याकडे धावला आणि तिला मिठीत घेतले.
पेलेचा ते पाहून जळफळाट झाला. तिने मग उघडपणे त्याला आपल्या मनीचा हेतू सांगितला.
ओहियाने लेहुआवरची नजरही न हटवता तिला नम्र नकार दिला. झाले! पेलेच ती, तिच्या मस्तकात संतापाची आग भडकली! सुडाने ती अक्षरशः धगधगू लागली !
नकार देण्याची जुर्रत करणार्‍या ओहयोचे तिने क्षणार्धात एका कुरुप झाडात रूपांतर केले!
लेहुआ ते पाहून शोक करू लागली. पेलेची क्षमा मागून तिने नवर्‍याच्या प्राणांची भीक मागितली. त्याच्याविना ती स्वतः जिवंत राहू शकणार नाही असे सांगून तिच्याकडे खूप गयावया केली. पण पेलेवर कसलाही परिणाम झाला नाही, लेहुआला लाथाडून आपला क्रोध शांत करायला ती उंच डोंगरात निघून गेली.

फुलासारखी नाजूक लेहुआ दु:खाने पार उन्मळून पडली. तिचा विलाप ऐकून इतर देवता जाग्या झाल्या. त्यांना तिचा शोक बघवला नाही. तिच्या दु:खाने त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले.
लेहुआ आणि ओहियासारख्या निष्पाप प्रेमी जिवांना पेलेने दिलेली क्रूर शिक्षा त्यांना मान्य नव्हती. पण पेलेच्या शिक्षेला मागे घेण्याची शक्ती त्यांच्याकडेही नव्हतीच!
मग इतर देवतांनी मिळून लेहुआला तिच्या ओहियाजवळ घेऊन जाण्यासाठी युक्ती शोधली!
त्यांनी तिचे रूपांतर नाजूक सुंदर फुलामधे केले आणि आता वृक्ष बनलेल्या ओहियाच्या खांद्यावर तिला कायमचे विसावू दिले.

हा ओहियाच्या झाडाचा फोटो.
ohiotree.jpg
(माझ्याकडचा फोटो तेवढा काही चांगला नाही, साधारण शिरिषाच्या फुलासारखे असते हे फूल. गुगल सर्च करून पहा!)

आजही ओहिया आणि लेहुआ हवाईत अजरामर आहेत.

ओहिया ची झाडं हवाईत सगळीकडे दिसतात. पेलेच्या ज्वालामुखीतला तप्त लाव्हा त्याच्या मार्गातल्या सगळ्या गोष्टींना भस्मसात करत असला, तरी कालांतराने त्या मृत्यूच्या तांडवावर मात करून पहिली नवजीवनाची खूण त्या लाव्हावर उगवते ती ओहियाच्या रोपट्याच्या रुपात! अर्थात त्याच्यासोबत त्याची लाडकी लेहुआही असतेच!

हे दोघे प्रेमी जीव एकत्र असतात तेव्हा सगळीकडे हसरं ऊन पसरतं.
मात्र लेहुआला ओहियापासून तोडले तर लेहुआबरोबर देवताही अश्रू ढाळू लागतात अन मुसळधार पाऊस पडतो!

म्हणून लेहुआचे फूल ओहियाच्या झाडावरून कधीच तोडू नये असं हवाईयन लोक मानतात.

-क्रमशः

 

साक्ष चमकणार्‍या पाण्याची

माउई बेटाची भौगोलिक रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.
बेटाच्या मध्यभागी ज्वालामुखीने बनवलेला उंच डोंगर. डोंगरामुळे ढग आडवले गेल्यामुळे बेटाच्या पश्चिमेला अगदी कोरडे हवामान आहे. इकडच्या बाजूचा डोंगर उतार उघडा वाघडा , राखाडी किरमिजी दिसतो.
maui1.jpg
याउलट आहे पूर्व बाजू! अडवलेल्या ढगांतून सतत होणार्‍या पावसाने बेटाची ही बाजू मात्र चिंब भिजलेली, धुक्यात गुरफटलेली, हिरव्याकंच पर्जन्यवनांनी आच्छादलेली अशी आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला समुद्र . अतिशय उंचसखल आणि फिरायला दुर्गम भाग आहे हा.
maui2.jpg

तर याच भागातलं एक निसर्गरम्य गाव - हाना !
इथे वाइअनापना नावाचा समुद्रकिनारा आहे. वाइअनापना चा अर्थ आहे "चमकणारे पाणी."
हा काळ्या रेतीचा किनारा त्याच्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहे.

blacksand.jpg

इथे किनार्‍याजवळ कातळांमधून लाव्हाने कोरलेल्या काही गुहा आहेत.

caves.jpg

एका गुहेबाहेर गोड्या पाण्याचे नैसर्गिक कुंड तयार झाले आहे. त्यातले पाणीही अगदी नितळ निळे आहे.
तर त्यासंबंधातली ही कथा :

एक हवाईयन राजकन्या होती - पोपोआलिया. दिसायला सुरेख, वयाने लहान.
एका दुप्पट वयाच्या, पाशवी ताकदीच्या क्रूर टोळीप्रमुखाशी - काकियाशी तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. खरं तर एका शक्तीप्रदर्शन स्पर्धेचं बक्षिस म्हणून ती काकियाला मिळाली !!

काकिया पोपोआलिया आणि आपल्या टोळीला घेऊन उंच डोंगरात राहू लागला. . बिचार्‍या पोपोआलियाला काकिया अतिशय वाईट वागणूक देत असे. शारिरीक छळ, मारहाण आणि मानसिक छळ यामुळे तिचं जगणं अवघड झालं होतं.
काकिया अतिशय संशयी आणि मत्सरी पुरुष होता. आपल्या मागे आपली तरुण आणि सुंदर पत्नी इतर कुणाशी तरी संधान बांधून असावी असा त्याला सतत संशय येई. त्यात त्याची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणारे त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला तिच्याबद्दल काहीबाही सांगून आणखी चिथावत असत.त्याचा परिणाम म्हणून काकिया आपल्या बायकोला अधिकच छळत असे.

पोपोआलियाला एक भाऊ होता, पिलाउवी. त्याला तिची काळजी वाटल्याने तो तिच्याजवळच घर बांधून रहायला आला. पण भावाच्या येण्याने पोपोआलियाचे आयुष्य सुधारण्याऐवजी अजूनच खडतर झाले. त्याच्या येण्याने काकिया अजूनच बिथरला. त्याला आता या भावा- बहिणीत संबंध असल्याचा संशय येऊ लागला. तो तिला अधिकच छळू लागला.

पोपोआलियाला आता हे सर्व असह्य झाले होते. एक दिवस ती पिलाउवीसोबत जंगलात फिरताना काकियाच्या चमच्यांपैकी कुणीतरी पाहिले आणि काकियाकडे चहाडी केली. झाले! काकियाने त्या दोघांनाही ठार मारण्याचे आदेश दिले!!
पोपोआलिया घाबरली. पण काकियाच्या माणसांच्या हातात पडण्याआधी आपली विश्वासू दासी मनोना हिला सोबत घेऊन ती तत्काळ तिथून पळून गेली! जंगलातून, दर्‍यांतून, गुहांमधून ठिकाणे बदलत लपत छपत राहू लागली. काकियाने तिला शोधायला माणसे पाठवली. पण त्यांना यश आले नाही.
वरचे वर कुठे कुठे ती दिसल्याच्या खबरा येत आणि तिच्या मागावरची माणसे पोहोचेपर्यन्त तिने ठिकाण बदललेले असायचे. काकिया संतापाने चवताळला होता.

पोपोआलिया आणि मनोना डोंगर दर्‍यातून, लाव्हाने कोरलेल्या गुहांमधल्या गुप्त मार्गांमधून प्रवास करत करत यथावकाश वाइअनापना या समुद्रकिनार्‍याजवळ पोहोचल्या.
waianapana2.jpg

किनार्‍याजवळच्या एका गुहेबाहेर चमकत्या नितळ पाण्याचे एक कुंड होते. गुहेत जायला त्या गोड्या पाण्याच्या कुंडातून पोहून पाण्याखालून जावे लागत होते.

waianapana.jpg

पोपोआलियाला ती गुहा लपण्यासाठी अगदी योग्य आणि सुरक्षित वाटली. ती आणि मनोना दिवसभर त्या गुहेत राहून रात्री अंधार पडल्यावर बाहेर येत आणि जवळच्या गावातील वस्तीवर अन्न शोधायला जात.

इकडे काकियाने तिचा शोध थांबवला नव्हता. अचानक समुद्रकिनार्‍यावरच्या मासेमारी करणार्‍या लोकांच्या बोलण्यातील " वाइआनपना किनार्‍याजवळच्या गावात रात्री फिरणार्‍या भुतां"बद्दल त्याच्या कानावर आले. धूर्त काकियाने त्याचा काढायचा तो अर्थ काढला आणि त्याने तडक वाइआनापना किनार्‍याकडे कूच केले.

बरेच शोधून आधी त्याच्या हाती काहीच लागले नाही . थकून एका टेकाडावर बसला असता खालच्या चमकत्या नितळ पाण्यात त्याला काहीतरी हलताना दिसले! ते एका पिवळ्या पिसाचे (काहिली) प्रतिबिंब होते!
ही काहिली केवळ राजघराण्यातल्या व्यक्तीच वापरू शकत. तर काहिली पाहून काकियाचा संशय बळावला , आणि नीट पहाताच पोपोआलिया आणि मनोनाची अस्पष्ट प्रतिबिंबं त्याला दिसली! मनोना आपल्या मालकिणीला पिसाने वारा घालत होती! असुरी आनंदाने त्याने तत्काळ गुहेत प्रवेश केला आणि त्या निष्पाप भयभीत स्त्रियांची अत्यन्त निर्दयीपणे आपल्या कुर्‍हाडीने हत्या केली!
गुहेबाहेरच्या त्या कुंडातले ते एरव्ही चमकणारे पाणी त्या दोघा दुर्दैवी तरुणींच्या रक्ताने लाल लाल झाले.

बिचार्‍या पोपोअलियाचे हाल तिच्या मरणानेच संपले!

असे म्हणतात की पोपोआलियावरच्या अन्यायाचा जाब विचारणारे तेव्हा कुणीच नसले तरी तिथल्या निसर्गाने काकियाने पाप पाहिले होते. त्या पापाची साक्ष देण्यासाठी अजूनही वसंत ऋतूत वर्षातल्या त्या ठराविक दिवशी कुंडातले चमकणारे पाणी आपला रंग बदलून रक्तासारखे लाल होते!!

वाइअनापना किनार्‍याजवळ हानाच्या आसपास रहाणारे स्थानिक लोक आपण स्वतः हा चमत्कार पाहिल्याचे सांगतात.अर्थात ते टूरिस्ट लोकांशी बोलत नाहीत पण स्थानिक टूर गाइड , ड्रायव्हर्स वगैरेशी त्यांची मैत्री असते.

काही अभ्यासकांनी उत्सुकतेने हा काय प्रकार आहे त्याचा पाठपुरावा केला. त्यांचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते!
वसंत ऋतूत काही ठराविक दिवशी खरोखरच इथले पाणी लाल झाल्याचे त्यांना आढळले. पण ते रक्त किंवा तत्सम काही नसून, त्याला एक विशेष कारण होते! एका विशिष्ट जातीच्या अगदी लहान आकाराच्या लाल रंगाच्या श्रिंप ची त्या सुमाराला त्या भागात तुफान पैदास होते. या श्रिंप ना त्या कुंडात वाढणारी एक शेवाळाची जात खायला आवडते. इतके श्रिंप दाटीवाटीने ते शेवाळ खायला गर्दी करत असल्यामुळे ते पाणी लाल दिसते!! ते शेवाळ खाऊन संपलं की ते निघून तरी जातात किंवा मरतात तरी. त्यामुळे ठराविकच काळ हा चमत्कार बघायला मिळतो !!

मानवी मन अजब आहे! मेंदूला न आकळणार्‍या गोष्टींचं समर्थन करायला काय काय गोष्टी रचेल काही सांगता येत नाही!! Happy

हवाईयन माणसांनी ही घटना दर वर्षी पाहिली असेल, आणि त्यांच्या सुपीक मेंदूने ही कथा रचली असेल ? की ही कथा खरीच घडली असेल आणि त्या लाल श्रिम्पचीही जन्म मृत्यूची साखळी तिथेच असणे हा फक्त एक योगायोग असेल? कुणास ठाऊक!!

- क्रमशः

***
या कथेतली नावे गाइड ने सांगताना मला नीट कळली नव्हती. ती नावे आणि आणखी काही संदर्भ शोधायला खालील वेबसाइटस चा उपयोग झाला :
http://www.sacred-texts.com/pac/index.htm
http://www.to-hawaii.com/maui/geography.php

 इंद्रधनुषी धबधब्याची गोष्ट

बिग आयलंड वर वाइलुकु नदी हिलो गावाजवळ एका पहाडावरून खाली उडी मारते.
wailuku1.jpg

इथे पुढे एक धबधबा आहे. त्यावर बरेचदा इन्द्रधनुष्य पडलेले दिसते , त्यामुळे त्याला रेनबो फॉल्स म्हणतात. तर त्या ठिकाणची ही आख्यायिका.

rainbow falls.jpg
हा तो सुंदर धबधबा. मला त्या इन्द्रधनुष्याचा फोटो मात्र नाही मिळाला!

या धबधब्याच्या मागच्या बाजूला एक गुहा आहे. फार फार वर्षांपूर्वी तिथे माउई हा दैवी शक्तीचा तरुण आणि त्याची आई हिना हे रहात होते.

माउई मासे पकडण्यासाठी रोज त्याची होडी घेऊन नदीतून पुढे समुद्रावर जात असे. घरी हिना एकटीच असे.
माउई आणि हिना ही दोन पात्रं समोआ,न्यूझीलंड आणि इतर काही पॉलिनेशियन कथांमधेही सापडतात. काही ठिकाणी ते बहीण भाऊ दाखवलेत, तर काही कथांत ते प्रियकर प्रेयसी किंवा नवरा बायको म्हणूनही दिसतात. या कथेत जरी ते आई - मुलगा दाखवले असले तरी त्यांची 'केमिस्ट्री' वेगळीच वाटते! गुंतागुंतीची नाती !!

तर या वाइलुकु नदीच्या वरच्या भागात एक कुना नावाचा राक्षसी सरडा रहात होता. तो बर्‍याचदा धबधब्याच्या काठावर येऊन खाली पाण्यात नहात किंवा कपडे धूत असलेल्या हिनाकडे बघत पडून रहात असे. तिचे कमनीय शरीर, लांब केस, कापडांवर कलाकुसर करताना नृत्य केल्याप्रमणे लवलवणारी लांबसडक सुबक बोटे ..... तिच्या सौंदर्याने कुना तिच्याकडे फारच आकर्षित झाला होता! अर्थात हिना त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत असे.
कुना तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेपटीने दगड धोंडे पाण्यात फेकत असे. पण हिनाला त्याच्या खवल्यांनी भरलेल्या हिडीस आकाराचे काय कौतुक वाटावे ? उलट त्याच्या दगड फेकण्यामुळे तिच्या कपड्यांचं आणि सामानाचं नुकसान व्हायचं, त्यामुळे एक दिवस तिने माउईला सांगून त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. हिनाच्या वाटेला गेल्यास त्याची काही खैर नाही असे माउईने त्याला धमकावले होते!
हिनाच्या संरक्षणासाठी ढगांच्या देवतेला तिच्याकडे लक्ष ठेवण्यास त्याने सांगून ठेवले.

या प्रकारामुळे कुना संतप्त झाला होता आणि हिनावर सुडाची संधी पहात होता. तिच्या प्राप्तीची शक्यता मावळल्याने तिला आता चिरडून ठार मारायचे असे त्याच्या मनाने घेतले!

एकदा माउई सकाळीच मासे पकडायला त्याच्या होडीत बसून निघून गेला. कुना वरून ते पहातच होता. त्याची होडी दिसेनाशी होताच कुना आवाज न करता धबधब्याच्या बाजूने सरपटत वरून खाली उतरला.

हिना आपल्याच नादात आपल्या गुहेच्या बाहेर एका पलंगपोसावर बांबूच्या छापांनी सप्तरंगी नक्षीकाम करण्यात दंग होती. अचानक तिने वळून पाहिले तर काय! कुना तिच्यापासून केवळ काही फुटांवर स्स स्स असे फुत्कार टाकत उभा होता !! पहिल्यांदाच ती त्या राक्षसी सरड्याला इतक्या जवळून पाहत होती . घाबरून गुहेत पळून जायला ती झटकन उठली पण कुनाने शेपटीच्या फटकार्‍याने मोठ्या शिळा टाकून तिची गुहेत जाण्याची वाटच बंद केली. कुनाने हिनावर झेप घेऊन तिचे लांब केस धरलेच होते पण ती कशीतरी निसटली आणि नदीच्या पात्रातून दगड गोट्यांतून धावत सुटली. कुनाच्या राक्षसी ताकदीपुढे आपला निभाव लागणार नाही हे तिला कळून चुकले होते. कुना झेपा घेत तिचा पाठलाग करू लागला.

हिनाला एक कल्पना सुचली. तिने हातातल्या त्या लांब कापडाचे एक टोक कमरेला बांधले आणि दुसर्‍या टोकाला दगड बांधून त्याचा फास तयार केला. तो फास तिने नदीपलिकडल्या उंच झाडावर फेकला. फांद्यांमधे दगड आपसूक अडकला. कुना आता तिच्यावर झेप घेणार, एवढ्यात हिनाने त्या कापडाला लोंबकळून त्या उंच झाडावर झेप घेतली.
वर ढगांच्या देवतेने ही झटापट पाहिली आणि तत्काळ ढगांचे आकार बदलून आणि सांकेतिक गडगडाट करून दूरवर समुद्रात मासेमारी करत असलेल्या माउईला सावध केले. माउईकडे दैवी शक्ती असल्याने त्याच्या होडीने झटक्यात मधले अंतर पार करून माउई धबधब्याजवळ पोहोचला!

हिनासोबत आगळीक करू पाहणार्‍या त्या हिडीस सरड्याला बघून माउईची तळपायाची आग मस्तकात पोहोचली. माउईची दैवी शक्ती ठाऊक असल्यामुळे कुनाही मागे सरकला. माउईने त्याला त्याच्याजवळच्या सोट्याने तडाखे द्यायला सुरुवात केली. दोघात तुंबळ युद्ध झाले. माउईची आता सरशी होणार असे वाटत असतानाच कुनाने धबधब्याच्या वरच्या अंगाला उडी घेतली आणि तिथे नदीतल्या खोल डोहात जाऊन तो लपून बसला. माउई त्याचा पाठलाग करत वर चढून आला, पण त्याला कुना काही सापडला नाही. त्यामुळे तो पुन्हा खाली उतरुन गेला.

कुनाला वाटले चला आता धोका टळला !! पण माउई हार मानणार्‍यातला नव्हता आणि कुनासारख्या राक्षसाला सोडून तर अजिबात देणार नव्हता. त्याने पेलेची (ज्वालामुखीची देवता) आराधना केली. तिला नैवेद्य म्हणून आपली होडी अर्पण केली आणि वाइलुकु नदीत लाव्हा सोडण्याची विनंती केली.

पेले त्याच्या प्रार्थनेने जागृत झाली.तिने त्याची विनंती मान्य करून मौना किआ शिखरावरून लाव्हाचा लोट वाइलुकु नदीत सोडला! खदखदणार्‍या लाव्हाने आणि विषारी वायूने आपले काम केले आणि कुना जागीच ठार झाला!

पेले अंतर्धान पावली. हिना पुन्हा एकदा निर्धास्तपणे कलाकुसर करू लागली आणि माउईला तिची काळजी करण्याची गरज उरली नाही.

kuna.jpg

अजूनही वाइलुकु नदीत मेलेल्या त्या सरड्याचे कलेवर आहे. थंड झालेल्या लाव्हामुळे त्याचा एक दगड बनून नदीच्या पात्रात बेटासारखा पडला आहे. उन्हे पडली की हिनाच्या त्या सप्तरंगी कापडाचे रंग आजही त्या धबाधब्यात अवतरतात!

 नूनू - हानामधल्या धुक्याची कथा

माउई बेटाच्या अग्नेय टोकाला हालेकालिआ शिखराच्या पायथ्याला पडणार्‍या पावसाने शिंपलेलं , हिरव्यागार पर्जन्यवनांनी अच्छादलेलं, नद्या, धबधब्यांनी , निळ्या समुद्रकिनार्‍यांनी सजलेलं हाना नावाचं बेहद्द सुंदर गाव आहे, जे आपल्या चमकणार्‍या पाण्याच्या गोष्टीत येऊन गेलंय.
hana1.jpg
इथे फार फार पूर्वी मेनेहून लोक रहायचे. काही दंतकथा मानतात की हे लोक अंगठ्याइतके उंच पण जादूई शक्ती असलेले असे होते. काही लोक मानतात की हे खरे तर हवाईला आलेलेआद्य इमिग्रन्ट्स होते आणि अनेक वर्षांनंतर ताहितीयन लोक जेव्हा इथे आले तेव्हा ते लोक संख्येने जास्त असल्याने ते आल्यावर हे मेनेहून लोक बेटांच्या आतल्या दुर्गम भागात लपून छपून राहून लागले.

तर गोष्ट या मेनेहून लोकांची नाहीच आहे मुळी. या मेनेहून लोकांना एकदा प्रत्यक्ष समुद्राचा देव कानालोआ याने भेट म्हणून एक मानवी मुलगा दिला. एकाच बोलीवर, की ठराविक वर्षांनी, एका ठराविक दिवशी तो मुलगा कानालोआकडे परत जाणार!
या मुलाचे नाव कौइकी. कौइकीला मेनेहुनांनी आपला मुलगा म्हणूनच वाढवलं. कौइकी समुद्रावरच आपला वेळ घालवी. लाटांवर स्वार होणे हा त्याचा आवडता खेळ होता.

माउई हा दैवी पुरुष त्यावेळी हानामधेच रहात होता. तोच सरड्याच्या गोष्टीतला माउई!
त्याला होती एक मुलगी, नूनू नावाची. नूनूचा अर्थ धुकं. माउई मासेमारी आणि नौकाबांधणीत पारंगत होता. तिथल्या समुद्राच्या लाटालाटांशी त्याचा परिचय होता. समुद्रावरच्या नेहमी दिसणार्‍या धुक्यावरूनच त्याने मुलीचे नूनू नाव ठेवले होते.
दर्यावर्दी माउईचीच मुलगी होती नूनू. तिलाही लहानपणापासून समुद्राचं आकर्षण होतं.
ती मोठी झाल्यावर एक दिवस समुद्रावरच तिची गाठ कौइकीशी पडली. प्रथमभेटीतच ते प्रेमात पडले. एकमेकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागले. नूनू त्याच्याशी लग्न करून त्याच्याच सोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न बघू लागली.
एक दिवस कौइकीने नूनूला जे सांगितले त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली! कौइकीने सांगितले की तो समुद्रदेवाचा, कानालोआचा मुलगा असून त्याच्या पित्याकडे म्हणजे कानालोआकडे परत जाण्याचा दिवस आता जवळ आला आहे! आणि कानालोआकडे परत जायचं म्हणजे मानवी अवतार संपवण्याची वेळ! कौइकीचे नूनूवर कितीही प्रेम असले तरी कानालोआची इच्छा मोडण्याची त्याची ताकद नव्हती! म्हणजेच आपल्या प्रियकरासोबत आयुष्य घालवण्यचे नूनूचे स्वप्न लवकरच भंग होणार होते.
नूनू रडत रडत बापाकडे गेली. काहीही करून दोघांची ही ताटातूट थांबवावी म्हणून तिने माउईला साकडे घातले. माउई धर्मसंकटात पडला! त्याचे तर आयुष्यच समुद्रावर अवलंबून! त्याला समुद्रदेवाचा रोष तर पत्करून चालणार नव्हते आणि लेकीची तगमगही बघवत नव्हती! मग त्याने एक उपाय काढला. त्याला स्वतःलाच तो उपाय जड जाणार होता कारण लाडकी लेक त्याच्यापासून कायमची दुरावणार होती. पण नूनू ऐकायला तयार नव्हती!

तो उपाय म्हणजे कौइकीने मानवी अवतार संपवायचा, कानालोआकडे जायचेही आणि नाहीही. नूनूने त्याच्यासोबत आयुष्य तर घालवायचे .... आणि नाहीही !! हे कसं ?

तर असं - माउईने त्याच्या दैवी शक्तीने कौइकीचं एका टेकडीत रूपांतर केलं ! ही टेकडी अर्धी हानाच्या जमिनीवर आणि अर्धी समुद्रात घुसली होती. आणि नूनूचं रूपांतर खरोखरच्या नूनूमधे म्हणजे धुक्यात केलं !! या नूनूला त्यानं कौइकीच्या खांद्यावर कायमसाठी ठेवलं. माउईपासून त्याची लाडकी लेक दुरावली खरी, पण नूनूला तिचा कौइकी कोणत्या का रूपात असेना, पण कायमचा मिळाला.

kauiki hill_0.jpg

या घटनेला आता अनेक शतकं उलटून गेली आहेत. अजूनही नूनू आपल्या प्रियकराला सर्वांगांनी बिलगून असलेली बघायला मिळते. सकाळच्या कोवळ्या उन्हात ती दवाच्या रुपात त्याच्यावर आवेगाने प्रेमाची बरसात करत रहाते. आणि ते पाहून तिचा बाप इन्द्रधनुष्याच्या रुपात समाधानाचं हसू हसतो!

--क्रमशः

कोपिष्ट सुंदरी - पेले!

हवाई बेटे ही ज्वालामुखीतून बनली आहेत. सतत होणार्‍या उद्रेकांमुळे आणि लाव्हाच्या वाहण्याने या बेटांचा आकार, उकार, भूगोल सतत बदलत आला आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या आणि जागॄत ज्वालामुखींमधे हवाईच्या बिग आयलंडवरच्या काइलाउआ या ज्वालामुखीचा नंबर लागतो.
निसर्गावर विजय मिळवल्याचा मनुष्यप्राण्याचा अहंकार (असलाच तर) या ज्वालामुखीच्या एका फटकार्‍यात कस्पटासारखा चिरडला जातो. त्याच्या उद्रेकांवर नियंत्रण तर सोडाच पण तो केव्हा कुठे किती होणार याचा अंदाजसुद्धा आधुनिक विज्ञानालाही आजवर अतिशय मर्यादित प्रमाणावरच लावता आला आहे.

आताच्या प्रगत मानवाची ही कथा तर मग अनेक शतकांपूर्वी इथे आलेल्या सर्वथा अप्रगत माणसाला या ज्वालामुखीमधे दैवी शक्ती दिसली असेल तर यात नवल काय ! त्यात ही दैवी शक्ती वेळोवेळी आपलं अस्तित्व समोरासमोर दाखवूनही देते!!
हवाईयन ज्वालामुखीची देवता "पेले" इथल्या अनेक दंतकथांमधे हजेरी लावते.
पेलेच्या विनाशकारी शक्तीमुळे तिचा दरारा असला तरी "नविन जमिनीला जन्म देणारी" म्हणून तिचा आदरही केला जातो.
बिग आयलंड वर व्होल्कॅनो नॅशनल पार्क आहे. तिथेच काइलाउआ शिखर आणि पेलेचं स्थान असलेलं हालेमाउमाउ हे ज्वालामुखीचं विवर आहे.
crator.jpg

त्याच ठिकाणी थॉमस जॅगर म्युझियम आहे. यात ज्वालामुखीची माहिती, भूगर्भातली हालचाल मोजणारी यंत्रे इ. तांत्रिक गोष्टींसोबत स्थानिक चित्रकार हर्ब काने याने काढलेली पेलेची एक से एक सुंदर पेन्टिन्ग्ज मांडली आहेत. इथे आणि पार्कमधे ठिकठिकाणी पेले आपल्याला भेटत राहते.

pele.jpg
** हा त्यातल्या एका पेन्टिंगचा फोटो - मूळ चित्र थॉमस जॅगर म्यूझियम - चित्रकार हर्ब काने***
या चित्रकाराची ही वेबसाइट आणि त्यातली ही पेलेची इतर चित्रं आवर्जून बघण्यासारखी : http://herbkanehawaii.com/image-catalog/gods-goddesses-legends/

पेले! ती मूळची हवाईची नव्हती. तिचं कुटुंब ताहिती किंवा तिथल्याच कुठल्याशा बेटावर राहत होतं. प्रत्यक्ष आकाश हा तिचा पिता आणि भूमी ही तिची माता असे काही लोककथा मानतात. पेलेचं सौंदर्य असं की कुणालाही भूल पाडणारं , संमोहित करणारं! स्वभाव अत्यन्त मनस्वी! एखाद्यावर प्रेम केलं तर ते सर्वस्व उधळून.. पण तितकीच चंचल आणि शीघ्रकोपी ! तिच्यात धगधगता अंगार भरलेला होता जणू! संतापाच्या आगीत कधी कुणाला भस्म करेल सांगता यायचं नाही! तिच्या चंचल स्वभावाला कधी चैनच पडायचं नाही. सतत कुठल्या तरी दूरच्या गावाला ,प्रवासाला जायची स्वप्नं पडायची. तर पुढे एकदा झालं असं की तिच्या बहिणीच्या नवर्‍यावरच तिच्या सौंदर्याची जादू झाली! पेलेला तो स्वतःचा विजयच वाटला! पण बहीणदेखिल कुणी साधीसुधी स्त्री नव्हती !! ती होती प्रत्यक्ष जलदेवता - नमाको कहाई ! दोघींच्या संघर्षातून काहीतरी अनिष्ट घडू नये म्हणून पेलेच्या आई वडिलांनी तिला आणि तिच्या इतर भावंडांना छोट्याशा होडीत बसवून रातोरात दूर निघून जायला सांगितलं.
पेलेने मोठा भाऊ कामोहोआइच्या (समुद्री ड्रॅगन्स चा - शार्क माशांचा राजा !) मदतीने लहान भावंडांचे रक्षण करून तो खडतर प्रवास केला. बर्‍याच दिवसांनंतर त्यांची होडी एका छोट्या छोट्या बेटांच्या माळेजवळ पोहोचली. तीच ही हवाई बेटं!
या बेटांवर तेव्हा मनुष्यवस्ती नव्हती. उत्तरेच्या बेटांवर हिमदेवतांचं वास्तव्य होतं. पेले तिच्या भावंडांना घेऊन तिथे पोहोचताच त्या हिमदेवतांनी हिमवादळे सोडून त्यांना सळो की पळो करून सोडलं. पेलेने दक्षिणेकडच्या बेटांवर मुक्काम हलवायचा निर्णय घेतला. प्रथम ती गेली कौआई बेटावर. तिथे तिने आपल्या भावंडांसठी घर बांधायचं ठरवलं.
इथे दुसरंच संकट तिच्या पाठलागावर आलं! तिच्या बहिणीच्या रुपात !! नमाकोकहाई तिला सुखाने जगू देणार नव्हतीच ! पेलेने इथल्या किनार्‍यावर घर बांधायला घेतले, पण पेलेने अग्नीसाठी खड्डा खणताच नमाकोकहाई ते खड्डे पाण्याने भरून टाकी! असं बर्‍याच वेळा झालं. दोघी बहिणींमध्ये युद्ध झालं. पेलेला या पहिल्या युद्धात जखमी करून मृत्यूशय्येवर सोडून नमाकोकहाई निघून गेली. पण पेले त्यातून जगली, सावरली आणि सूडाग्नी उरात घेऊन अजूनच शक्तीशाली बनली. आता ती माउई बेटावर पोहोचली. यावेळी किनार्‍यावर खड्डा न खणता हालेकालिआ या पर्वतशिखरावर तिने मोठे विवर खणले आणि तिच्या अग्नीची तिथे स्थापना केली.

नमाकोकहाईला लवकरच याची खबर लागली. तिने उत्तुंग लाटांच्या रुपात माउईच्या किनार्‍यावर धडका द्यायला सुरुवात केली. यावेळी उंच शिखरावरचे पेलेचे अग्निविवर तिला विझवता आले नाही.पेलेनेही लाव्हाचे विस्फोट, ज्वाळांचे तांडव आणि अग्निस्फुल्लिंगांची बरसात केली. हे महायुद्ध बराच काळ चालले.
या महायुद्धाचा हिंसक शेवट हाना येथे झाला. दोघी बहिणींमधे पुन्हा घनघोर युद्ध झालं. नमाकोकहाईने माघार घेतली. पण पेलेनेही तिच्या भौतिक देहाचा इथे त्याग केला. मृत्यूनंतर तिला देवत्व प्राप्त झाले.

यानंतर पेलेने सर्वात दक्षिणेच्या बेटावर (हेच हवाईचे बिग आयलंड) काइलाउआ शिखरावर हालेमाउमाउ नावाचे प्रचंड मोठे अग्निविवर बनवले. तेच तिचे शाश्वत निवासस्थान बनले. हवाईयन लोकांच्या दृष्टीने हे जागृत शक्तीपीठच आहे . कारण पेलेने तिच्या अस्तित्वाच्या खुणा वरचेवर त्यांना दिल्या आहेत!
आजही तिन्ही सांजेच्या वेळी काइलाउआ शिखरावर हालेमाउमाउ विवराच्या जवळ गेलात तर तो आख्खा परिसर पेलेच्या लाव्हाच्या उजेडात झगमगत असलेला दिसतो. तिच्या अस्तित्वाची साक्ष देणारी ती ज्वलंत निशाणी !
crator_2.jpg
** हा फोटो अज्जिबत चांगला आलेला नाही याची जाणीव आहे. प्रत्यक्षातल्या नेत्रदीपक दृष्याशी याची तुलनाही नाही.

पेलेच्या लाव्हाच्या लोटांनी विनाशाचे तांडव केले तरी कालांतराने त्यातूनच या बेटावर नव्या जमिनीची निर्मिती केली आहे. पूर्वी होता त्यापेक्षा या बेटाचा आकार खूप मोठा झाला आहे.

पेलेचे तिच्या या बेटांवर बारीक लक्ष असते. तिच्या चंचल स्वभावानुसार आजही तिच्या जिवाला कधी शांतता नसते ! ती सतत वेगवेगळी रुपे धारण करून या बेटावरून त्या बेटावर फिरत असते. कधी वृद्ध स्त्रीच्या तर कधी सुंदर तरुणीच्या रुपात येऊन कुणाचीही परीक्षा बघते. ती प्रसन्न झाली तर घेणार्‍याची झोळी फाटेल इतके मोठे दान त्याच्या पदरात टाकते. जाणता अजाणता तिचा उपमर्द केला तर मात्र तिच्या क्रोधाच्या तडाख्यात सापडणार्‍याची खैर नसते! मग तो सामान्य मानव असो, तिचा स्वतःचा प्रियकर असो वा तिचे आप्तस्वकीय!! ती संतापून तांडव करते तेव्हा या बेटांवर भूकंप होतात. ती एखाद्याला शिक्षा देते तेव्हा लाव्हाचे लोट वाहतात.
तिच्या अशा काही कथा पुढल्या भागांमधे ...

-- क्रमशः

 

कामापुआ आणि पेलेची कहाणी- आग आणि पाणी!

कामापुआ हा हवाईत "रानडुकराचा राजा" म्हणून ओळखला जातो. डुक्कर म्हटल्यावर आपल्याला किळसवाणा प्राणी डोळ्यासमोर येणे साहजिक आहे, पण त्यांच्या दृष्टीने ते अफाट (पुरुषी) ताकदीचं प्रतिक मानतात.
शक्तीशाली आणि संतापी अशा पेलेला एकदाच तिच्या तोडीस तोड प्रियकर मिळाला होता असे मानतात आणि तो म्हणजे कामापुआ !
त्यांची कथा काहीशी अशी घडते :
हिना ही हवाईतील चंद्रदेवता. ती तिच्या सौंदर्यासाठी आणि चिरतारुण्यासाठी ओळखली जाते.
हिना तरुण आणि अतिसुंदर तर तिचा नवरा एक अलिइ ओलोपना हा तिच्या मानाने अगदीच सामान्य रुपाचा, आणि वयस्कही होता. त्याचा लहान भाऊ काहिकी मात्र तरुण आणि रुबाबदार होता. हिनाचे मनोमन त्याच्यावर प्रेम होते. अर्थात तोही तिच्यावर अनुरक्त होताच. ओलोपनाला याची कल्पना नव्हती असे नाही, पण स्वतःचं वाढतं वय म्हणा, किंवा त्याच्यानंतर काहिकीच टोळी आणि हिनाला सांभाळेल अशी अपेक्षा म्हणूनही असेल, पण त्याने हरकत घेतली नव्हती.

यथावकाश हिनाने एका सुंदर राजबिंड्या रुपाच्या बाळाला जन्म दिला. त्याचं नाव कामापुआ. ते बाळ बघून मात्र ओलोपनाच्या समजूतदारपणाची जागा द्वेषाने आणि कडवटपणाने घेतली. हे नतद्रष्ट मूल काहिकीचं असून त्याचा त्या मुलाशी काहीही संबंध नाही असे त्याने जाहीर करून टाकले. काहिकीला टोळीतून हाकलून दिले.
बिचारा कामापुआ! लहानपणापासून बापाच्या प्रेमापासून वंचित राहिला. ओलोपना कायम त्याचा द्वेष करी. त्याला सतत घालून पाडून बोले. इतक्या राजबिंड्या बाळाचा कायम "डुक्करतोंड्या" म्हणून उद्धार करी. कामापुआला बाप आपला इतका राग राग का करतो हे कधी समजलंच नाही. वर्षामागून वर्षे गेली तरी तो बापाने आपला स्वीकार करावा म्हणून धडपडत राहिला, पण ओलोपनाचे प्रेम तो जिंकू शकला नाही तो नाहीच.

हळू हळू कामापुआ मोठा झाला. तरुण झाल्यावर तो जास्तच रुबाबदार , धाडसी आणि शक्तीमान झाला. हिनाच्या दैवी शक्तींचा अंशदेखिल त्याच्यात होता. ढग आणि पावसावर त्याचे स्वामित्व होते. वेगवेगळी रुपे त्याला बदलता यायची. आता त्याला ओलोपनाच्या स्विकाराची पर्वा राहिली नव्हती. वर्षानुवर्षांच्या उपेक्षेमुळे त्याच्या स्वभावात संताप आणि तिरस्कार भरला होता.

एक दिवस टोळीतील काही तरणे अनुयायी एकत्र करून वेगळी टोळी करण्यासाठी तो ओलो[पनाच्या टोळीतला अन्नसाठा, कोंबड्या, डुकरे घेऊन निघून गेला. ओलोपनाने त्यांना पकडून आणायला माणसे पाठवली. कामापुआ जंगलात दर्‍याखोर्‍यात राहून लागला. त्याला स्वतःच्या सुंदर रुपाचाही तिरस्कार वाटू लागला होता, त्याने त्याचे सुंदर केस मुंडन करून काढून टाकले. डोक्यावर एक शेंडी आणि हनुवटीवर दाढीचे खुंट , अंगावर कुरुप पट्टे, डोक्यावर डुकराची मुखवट्याची केसाळ टोपी अशा अवतारात राहू लागला. (काही दंतकथा तर असे मानतात की तो अर्धे शरीर डुकराचे आणि अर्धे मानवाचे अशा रुपात वावरू लागला.)
तरी एक दिवस तो पकडला गेलाच. मुसक्या बांधून त्याला ओलोपनासमोर आणण्यात आले. ओलोपनाने त्याला ठार मारण्याचे आदेश दिले. पण कामापुआ सगळ्यांच्या तावडीतून सुटला आणि उलट त्यानेच ओलोपनाची खांडोळी केली! संताप आणि तिरस्काराने शेवटी सगळ्या सीमा ओलांडल्या!

यानंतर तिथे न थांबता कामापुआ भटकत भटकत माउई बेटावर गेला. तिथे काहिकी रहात होता . कामापुआ त्याला जाऊन भेटला. पण त्याचं नशीब असं की काहिकीनेही त्याला स्विकारले नाही. "मला कोणी मुलगा नाही आणि मी तुला ओळखत नाही " असे म्हणून त्याला सरळ हाकलून दिले. कामापुआ पुन्हा एकदा झिडकारला गेला! वर्षानुवर्षांची त्याची जखम पुन्हा भळभळून वाहिली! अपमानाच्या , संतापाच्या आगीत त्याच्या मनातला सर्व चांगुलपणा वाहून गेला.

या दिवसानंतर तो मनाला मानेल तसे बेदरकार वागू लागला. कधी अन्नासाठी तर कधी निव्वळ शक्तीप्रदर्शनासाठी टोळ्यांवर हल्ले करणे, निरपराध लोकांची हत्या करणे, मनात येईल त्या स्त्रीला प्राप्त करणे हे त्याचे जीवन बनले.

असाच भटकत कामापुआ हवाई (बिग आयलंड) बेटावरील किलाउआ शिखराच्या परिसरात आला. इथे पेलेचा लौकीक त्याच्या कानावर आला. तिच्या सौंदर्याबद्दल ऐकून तिच्या प्राप्तीचे त्याला वेध लागले. तो सरळ त्या हालेमाउमाउ विवराच्या तोंडाशी येऊन उभा राहिला . जिथे त्या शिखरावर पाय ठेवायचं दु:साहस कुणी करू धजावत नसे तिथे एका विद्रुप तरुणाची ही हिंमत ? पेलेच्या बहिणींनी तिचे लक्ष त्याच्याकडे वेधले. कामापुआचा तो अवतार बघून पेलेच्या रागाचा पारा चढलाच! तिने त्याला "तू माणूस तरी आहेस का ? तू तर रानडुक्कर आहेस" असे हिणवले! तिने तिच्या भावाला पाठवले कामापुआला धमकावून हाकलून देण्यासाठी. कामापुआने एक सुंदर तरुणीचा आभास निर्माण करून त्याचे लक्ष विचलित केले!
भावाचे अस्त्र वाया गेलेले पाहून पेलेने स्वतःच क्रुद्ध शब्दात हेटाळणी करून कामापुआला तिथून निघून जाण्यास फर्मावले. कामापुआनेही तशाच शब्दात तिला उलट उत्तरे दिली! दोघांमधे बर्‍याच शाब्दिक चकमकी झडल्या. पेलेच्या बहिणींना ते पाहून गंमतच वाटली! बराय हिच्या संतापाला तोडीस तोड असं त्यांना वाटल्याशिवाय राहिलं नाही!
पेलेने कामापुआच्या दिशेने आगीचे लोट सोडले. कामापुआने वादळ सोडून ते विझवले!
पेलेच्या रागाचा लाव्हा खदखदत कामापुआवर चालून आला. कामापुआने मुसळधार पावसाला आवाहन करून तिचे विवर पाण्याने भरून टाकले! पेलेच्या लाव्हाला पावसाने भिजवल्यामुळे तिचा राग जरासा कमी झाला . कामापुआची आणि तिची दिलजमाई झाली एकदाची!

पुढचे काही दिवस पेले आणि कामापुआसाठी स्वर्गासुखाचे ठरले! पेलेच्या प्रेमाने हळूहळू कामापुआतला पशू मरून मूळचा माणूस जागा झाला. इतक्या वर्षानंतर त्याला कुणीतरी आहे तसं स्वीकारलं होतं, त्याच्यावर प्रेम करत होतं! हळू हळू त्याला मूळचं राजबिंडं रूप परत मिळालं. पेले मात्र त्याच्यातल्या बदलाने बिथरली! तिला त्याचं हे राजस रूप पूर्ण नविन होतं! तिचा कामापुआ तर एक मुंडन केलेला, विद्रुप असा मनुष्य होता! तिला फसवले गेल्यासारखे वाटले. ज्याच्यावर मी प्रेम केलं तो हा नव्हेच असे तिच्या मनाने घेतले! त्या दोघांत पुन्हा खटके उडू लागले.
दोघांचाही स्वभाव संतापी! दोघेही सामर्थ्यवान! प्रेम असले तरी एकत्र राहणे अवघडच होते त्यांचे !

शेवटी पेलेने कामापुआला कायमचे निघून जायला सांगितले. बेटाची अर्धी बाजू तिच्या आगीची आणि लाव्हाची आणि नद्या- धबधबे - पावसाने भिजलेली विरद्ध बाजू कामापुआची असे ठरले. "आयुष्यात कधीही मला भेटू नकोस " असे सांगून पेले स्वतःच्या भावंडांना घेऊन पुन्हा तिच्या विवरात निघून गेली. कामापुआने फेरविचार करू नये म्हणून त्याच्या दिशेने लाव्हाचे लोट सोडायला कमी केले नाही! शेवटी कामापुआने तिचे ऐकले. तिच्या लाव्हाच्या लोटांपासून बचाव करत त्याने समुद्रात उडी घेतली. समुद्रात पडताच त्याने माश्याचे रूप धरण केले आणि तो तिच्या बेटापासून कायमचा निघून गेला. त्या माश्याचे नाव हमुहमुनुकुनुकुआपुआ !! (तो मासा म्हणे डुकराच्या आवाजाच्या सदृश आवाजही करतो !! )

काही महिन्यांनी पेलेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलगा थेट कामापुआचं रूप घेऊन जन्मला होता. त्याला पाहून पेलेला कामापुआची उणीव प्रकर्षाने जाणवली. त्याच्या विरहाने ती बेचैन झाली. तिला आपली चूक उमगली. त्याच्या नावाने साद देत ती बेटावर दर्‍याखोर्‍यात कितीतरी काळ फिरली, पण कामापुआ कुठे नव्हताच. तो कधीही परत न येण्यासाठी कधीचाच निघून गेला होता !

पेलेची विराणी आजही तिथल्या दर्‍याखोर्‍यात, गुहांमधे घुमते!

-- क्रमशः

काही संदर्भ येथून साभारः
http://www.sacred-texts.com/pac/hlov/hlov13.htm
http://kms.kapalama.ksbe.edu/projects/mythslegends06/1127423/index.html
https://books.google.com/books?isbn=0313080852

 

महाराजा कामेहामेआ

हवाईच्या कथा राजा कामेहामेआच्या गोष्टीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत!
अर्थात ही निव्वळ दंतकथा नसून हा इतिहास आहे.
आपल्या इतिहासात जे स्थान शिवरायांचं आहे ते हवाईमधे राजे कामेहामेआचे आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये!

कामेहामेआ हा हवाईच्या इतिहासातला पहिला असा राजा होता ज्याने सगळ्या हवाई बेटांवर एकछत्री अंमल प्रस्थापित करु शकण्याचा पराक्रम केला.

km1.jpg

ही गोष्ट आहे अगदी अलिकडची. इतिहासाच्या भाषेत अगदी कालपरवाची.
साधारण १७५०सालाच्या आसपासपर्यन्त हवाई बेटांवर अनेक निरनिराळ्या टोळ्यांचे अधिपत्य होते. जास्तीत जास्त इलाख्यावर कब्जा करण्यासाठी त्यांची एकमेकात सतत भांडणे, लढाया चालत. इथे शांतता अशी कधी नव्हतीच . अनेक सामान्य लोक हकनाक मारले जात. सामान्यांना बरीचशी अन्यायकारक अशी कापु पद्धत अजूनही अस्तित्वात होती.

कामेहामेआचा जन्म नक्की कोणत्या साली झाला त्याची नोंद नाही. पण त्याच्या जन्मवर्षी आकाशात " पिसाच्या शेपटीचा तारा" प्रकट झाल्याचे लोक सांगतात. या वर्णनावरून तो हॅलेचा धूमकेतू दिसल्यचे वर्ष (१७५८)असावे असे मानले जाते.

हवाई बेटावरील (बिग आयलंड) कोना इथल्या अलिइची मुलगी केकुआपोवा गर्भवती होती . तिला डोहाळे कसले लागावेत तर एका अलिइचा डोळा काढून खाण्याचे!! तिचा नवरा केउआ याने शेवटी शार्क माश्याचा डोळा आणून तिला खायला घातला!! हा घटनेमुळे 'केकुआआणि केउआच्या पोटी एक महापराक्रमी मुलगा जन्माला येईल आणि तो पुढे आजू बाजूच्या सगळ्या अलिइंचा पाडाव करून संपूर्ण बेटावर सत्ता प्रस्थापित करेल 'असे भाकित एका कहुनाने(धमगुरु) केले!

झाले! आजूबाजूच्या इतर अलिइंच्या कानावर ही खबर गेलीच. ते कसे स्वस्थ बसणार ! ते सगळे त्या अजून जन्माला देखिल न आलेल्या बालकाच्या जिवावर उठले. केकुआला संरक्षण देऊन गुप्त ठिकाणी हलवण्यात आले. तिच्या मागावर इतर अलिइ आणि त्यांचे लोक सतत होतेच. त्यामुळे त्यांना सारखी लपण्याची जागा बदलावी लागत होती.
केकुआचे दिवसही भरत आले होते.

एके रात्री एका लहान झोपडीत केकुआ आणि केउआने आसरा घेतला. वादळी आणि पावसाळी रात्र होती. त्यात मारेकरी सतत मागावर. अशात नेमक्या अपरात्री केकुआला कळा सुरु झाल्या.
असं म्हणतात की अशा वाद्ळी रात्री अवघड ठिकाणी, बिकट परिस्थितीत जन्म घेणे हेही असामान्य माणसाचेच लक्षण आहे!
प्रसंग बाका होता. बाळाच्या रडण्याने त्यांची लपण्याची जागा गुप्त राहू शकणार नव्हती. मनावर दगड ठेवून बाळ जन्मताक्षणी केकुआ आणि केउआने निर्णय घेतला.
केउआने बाळ जन्मताक्षणी झोपडीच्या बाजूच्या भगदाडातून ते बाळ त्याच्या विश्वासू मित्र अलिइ नैओली याच्याकडे लगोलग सोपवले! नैओलीने ताबडतोब बाळ घेऊन तिथून प्रयाण केले आणि तो हवाई बेटाच्या उत्तर किनार्‍यावर सुरक्षितपणे पोहोचला. इकडे केकुआचे आणि केउआचे काय झाले असेल ? कुणास ठाऊक ! ते जगले की मारले गेले याची खबर कुणाला नाही.

इकडे त्यांच्या बाळाचे नाव पाइआ असे ठेवले गेले. नैओलीच्याच देखरेखीत पाइआ हळूहळू मोठा होऊ लागला. लहानपणापासून त्याला युद्धकलेचे शिक्षण देण्यात आले. पाइआ त्याच्या वयाच्या मानाने अंगापिंडाने थोराड होता.
पाइआ ५ वर्षांचा होईपर्यन्त इकडे त्याचे काही मारेकरी मेले तरी किंवा बरेचसे त्या भाकिताबद्दल विसरलेही. त्यामुळे पाइला पुन्हा घरी त्याच्या टोळीत परत आला. पाइआचा मामा कलानीओपु त्यावेळी राजा होता. पाइआला राजकुमाराची वस्त्रे देण्यात आली. मामे भाऊ आणि राजाचा वारस किवालोसोबत त्याला युद्धाचे आणि कापु कायद्यांचे शिक्षण आणि राजकीय मुत्सद्देगिरीचे शिक्षणही त्याला मिळाले आणि त्याने ते भराभर आत्मसात केले. हा मुलगा कधीच हसायचा नाही की कुणाशी जास्त बोलायचा नाही. त्यावरून त्याला कामेहामेआ (एकलकोंडा) असं म्हणू लागले.
कामेहामेआ आता तरुण झाला होता. त्याची उंची ७ फूट होती असे मानले जाते. तो अफाट ताकदवान आणि युद्धकलेत निपुण होता. कलानीओपुने आपल्या भाच्याच्या सामर्थ्यावर विश्वास टाकला होता. कामेहामेआनेही तो विश्वास सार्थ ठरवत आपल्या मामासाठी बर्‍याच लढाया जिंकल्या. किवालोला ते फारसं आवडत नव्हतं. तो कलनीओपुचा वारस असला तरी कामेहामेआचं महत्त्व नाही म्हटले तरी त्याच्या डोळ्यात खुपायचं.
कलानीओपु आणि कामेहामेआचं प्रस्थ त्या बेटावर वाढतच गेलं.

होता होता १७७९ साल उजाडलं. हे वर्ष कामेहामेआसाठीच नव्हे तर तमाम हवाईयन संस्कृतीच्या पटलावर एक प्रचंड मोठ्या बदलाची चाहूल घेऊन आलं!

राज्यात पिकांची देवी लोनोचा उत्सव सुरु होता. अचानक किलाकेकुआ खाडीच्या काठावर मोठा कोलाहल झाला.
समुद्रातून एक महाकाय आकार किनार्‍याच्या दिशेने सरकत येत होता ! एक राक्षसी नौका!! त्या लोकांनी इतकी मोठी नौका कधी पाहिलेलीच नव्हती . हळूहळू ती जवळ येताच लोकांना त्या नौकेवरचे त्रिकोणी मुकुट घातलेले गौरवर्णीय दिव्यपुरुष दिसले! साक्षात देवच हे! शंकाच नाही!! सगळे सामान्य जन गुडघे टेकवून या देवांचं अभिवादन आणि स्वागत करू लागले.

देव ?? हे देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन कुक आणि त्याचे साथी होते.
बाहेरच्या प्रगत जगाची पहिली पाउलखूण कॅप्टन कुक च्या रुपाने हवाई बेटांवर येऊन थडकली होती!! हवाई बेटं आता बाहेरच्या जगापासून फार काळ लपून राहणार नव्हती!
आगामी प्रचंड मोठ्या बदलांची, नव्या युगाची आता हवाईत सुरुवात होत होती!

-क्रमशः

टूरिस्ट गाइड्स खेरीज इतर संदर्भ येथून साभार :
https://www.nps.gov/puhe/learn/historyculture/kamehameha.htm
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=398

 

नव्या जगाची चाहूल

कॅप्टन कुक हा ब्रिटिश दर्यावर्दी होताच, पण नकाशे बनवण्याचं त्याचं कसबही वाखाणण्यासारखं होतं. पॅसिफिक मध्ये दक्षिणेला ताहिती, न्यूझीलंड पर्यन्त मोहिमा करून त्याने युरोपियनांसाठी समुद्री मार्ग आणि नकाशे बनवले.
cook3.jpg

त्याच्याकडे "डिस्कवरी" आणि "रिझोल्यूशन" ही शाही आरमारातली दोन आधुनिक आणि भलीमोठी जहाजं होती.
ताहितीवरून परत उत्तरेला जात असताना जनेवारी १७७८ मधे हवाई बेटांचे त्याला आणि त्याच्या खलाशांना दर्शन झाले. ही बेटं तोवर कोणत्याच नकाशात नव्हती. जगापासून लपलेलीच होती म्हणा.
या बेटांवर अन्नसाठी घेण्यासाठी आणि भविष्यातील वसाहतीची शक्यता बघण्यासाठी कुक ने जहाजे बंदरात वळवली.
तोवर बेटावरच्या रहिवाश्यांनी इतकी मोठी वेगवान जहाजं, लोखंडी वस्तू, शस्त्रे, तोफ, बंदुका वगैरे पाहिलेलेच नव्हते.
त्यात हे विचित्र कपडे घातलेले, गौरवर्णीय लोक नेमके लोनो च्या उत्सवादरम्यात येऊन पोहोचलेले! त्यांनी या लोकांना देवच मानले आणि त्यांचे जंगी स्वागत केले.
कामेहामेआ तेव्हा विशीतला नवतरूण होता. अलिइ कलानीओपुने आलेल्या "देवांना " काही कमी पडू नये याची काळजी घेतली. आपल्या लोकांकरवी त्याच्या बोटींवर अन्न, मांस, फळे पोहोचती केली.कामेहामेहाला त्याच्या दिमतीला दिले. कुकच्या माणसांनी मात्र स्थानिक लोकांना आवळा देऊन कोहळा काढण्याचा उद्योग आरंभला. साध्या लहान लोखंडी खिळ्यांच्या बदल्यात कापड,लाकूड, अन्न, सुंदर स्त्रिया, काय हवे ते त्या खलाश्यांना मिळत होते!
कामेहामेआ त्यांच्या शस्त्रास्त्रं, मोठ्या नावा हे बघून थक्क झाला तरी ते त्याला देव आहेत हे काही पटत नव्हते. मात्र या लोकांशी मैत्री करणे फायद्याचे आहे हे त्याने जाणले. कॅ. कुकबरोबर त्याने चांगली ओळख करून घेतली.
महिना दोन महिना पाहुणचार झोडून आणि पुरेसा अन्नसाठा करून घेऊन कुक ची जहाजे कॅनडा आणि अलास्काच्या मोहिमेवर निघाली.

एक वर्षानंतर कॅप्टन कुक पुन्हा हवाईला आला. उत्तरेकडून दक्षिण पॅसिफिक मधे जाताना अन्नसाठा , लाकूडफाटा भरायला त्याला ही बेटे सोयीची वाटली होती. आता पुन्हा आल्यावर हवाईयन लोकांना नाही म्हटले तरी जरा प्रश्न पडला, हे देव पुन्हा कसे आले? गेल्यावेळच्या अदरातिथ्याने संतुष्ट झाले नाहीत का? तरीही पुन्हा त्यांनी कुक आणि सहकार्‍यांचे स्वागत केले. पण तिथून निघताना यावेळी कुक च्या दुर्दैवाने त्यांची जहाजे वादळात सापडली आणि त्यांच्या दुरुस्तीकरता त्याला पुन्हा एकदा हवाईला परतावे लागले. यावेळी त्याच्या सहकार्‍यांपैकी एक जण आजारी होऊन हवाईला पोहोचताच मरण पावला. हवाईयन लोकांच्या दृष्टीने ही मोठी घटना होती! हे लोक दैवी पुरुष वगैरे काही नसून साधे मर्त्य मानव असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला! हे कुक च्या दृष्टीने घातक ठरले.
आता स्थानिक आणि खलाश्यांमधे खटके उडू लागले. एकदा तर त्यांच्या जहाजावरची एक नाव स्थानिक लोकांनी पळवून नेली! कुक संतप्त झाला. त्याने कलानीओपुला चर्चेच्या निमित्ताने बोलावून घेऊन स्वतःच्या जहाजावर बंदी बनवण्याचा प्रयत्न केला! पर्यायाने त्याने कामेहामेहाशीच थेट वाकडे घेतले !!
कामेहामेआ लगोलग त्याचे सर्वात तयारीचे तरणे गडी घेऊन बोटीवर हल्ला करण्यासाठी आला. वास्तविक बोटीवर कुकच्या लोकांकडे आधुनिक शस्त्रे होती आणि कामेहामेआ आणि सहकार्‍यांकडे मागास शस्त्रे! पण कलानीओपु आणी कुक अजून बोटीवर पोहोचले नसल्याने कुक या लोकांच्या आयता तावडीत सापडला. कुकला घेरण्यात आलेले पहाताच बोटीवरून कोणीतरी बंदुकीची गोळी झाडली आणि एक स्थानिक त्यात जखमी झाला! परिस्थिती हाताबाहेर जाईल हे लक्षात येऊन कुक हात वर करून गोळ्या झाडू नका असे सांगायचा प्रयत्न करत असतानाच एका भाल्याने त्याचा वेध घेतला!
स्थानिक लोकांशी वाकड्यात शिरल्याने इतक्या मोठ्या दर्यावर्दी कॅ. कुकचा हवाईमध्ये हकनाक मृत्यू झाला.

cook.jpgcook2.jpg

कामेहामेआ आणि सहकारी कलानीओपु ला यशस्वीरित्या सोडवून घेऊन गेले.

कलानीओपु आता म्हातारा झाला होता. त्याने मरण्यापूर्वी त्याचे राज्य कामेहामेआ आणि आपला मुलगा किवालो यांच्यात वाटून दिले. पण कलानीओपुच्या मृत्यूनंतर दोघा भावांचे पटले नाही. किवालोला सगळे राज्य आपल्याला मिळावे असे वाटे, त्या वैमनस्यातून त्याने कामेहामेआविरुद्ध कारवाया, हल्ले करायला सुरुवात केली. शेवटी एका निर्णायक लढाईत कामेहामेआकडून तो मारला गेला. अर्थातच आता कामेहामेआ सर्व राज्याचा राजा बनला. त्याने आजू बाजूच्या अलिइंना एकत्र आणायचा प्रयत्न केला. लढून किंवा सामोपचाराने, कधी एखाद्या अलिइच्या मुलीशी लग्न करण्याचे मान्य करून या काळात मोठ्या प्रमाणावर राज्यविस्तार केला. सर्व हवाई बेटे एकछत्री अंमलाखाली आणण्याचे त्याचे स्वप्न होते. छोट्या छोट्या अलिइंनी सतत एकमेकासोबत लढाया करून हकनाक माणसे मारण्यापेक्षा एक राजा, एक कायदा स्वीकारून शांततेने दीर्घकाळ जगावे असे त्याचे मत होते.

कॅ. कुकच्या प्रकरणातून त्याने एक धडा घेतला होता तो म्हणजे आपल्या बेटांच्या बाहेर मोठे जग आहे आणि ते आपल्यापेक्षा बरेच जास्त प्रगत आहे. कॅ. कुकच्या पाठोपाठ बाकीचे जगही मागोमाग आपल्याला शोधत येणार हे त्याने जाणले. हवाईच्या मागासलेल्या जगात राहिला असला तरी कामेहामेआ बुद्धीमान होता आणि त्याच्याकडे दूरदृष्टीही होती. त्याने आपल्या बेटाचे महत्त्व ओळखले. त्याने त्याचा व्यापारी उपयोग करण्याचे ठरवले. येणार्‍या जहाजांना अन्नसाठा आणी इतर सुविधा देण्याच्या मोबदल्यात घसघशीत महसूल घेणे सुरु केले. तसेच बेटावरील मौल्यवान चंदनाची लाकडे वगैरे वस्तूंच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर बोटी, शस्त्रास्त्रे यांची खरेदी केली. काही व्यापारी , दर्यावर्दी यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या आणि नव्या शस्त्रास्त्रांच्या मदतीने त्याने हवाईची इतर बेटेही हळूहळू जिंकून घेतली.

शक्य तिथे कामेहामेआने विरोधी अलिइंशी सामोपचाराने बोलणी करून युद्धे टाळण्याचा प्रयत्न केला. त्या बेटांवरील त्या काळच्या रानटी हिंसक प्रथांच्या पार्श्वभूमीवर आणि कोणतेही युद्ध जिंकण्याइतके प्रचंड संहारक सामर्थ्य अंगी असूनही हा शांतीचा मार्ग वापरणार्‍या कामेहामेआला त्यामुळेच एक सहृदय राज्यकर्ता मानले जाते.
kamahameha1.jpg

सन १८१० मधे कामेहामेआ हवाईचा सार्वभौम राजा बनला.
त्याने हवाईची जुनी कापु पद्धत पुढे चालू ठेवली तरी त्यात काळानुसार बदलही केले. त्याचे एक उदाहरण म्हणजे "मामालाहो कानावाई" म्हणजे "तुटलेल्या वल्ह्याचा कायदा " .
एका लढाईत कामेहामेआचा पाय दोन खडकांच्या फटीत अडकल्यामुळे त्याला हलता येईना. विरुद्ध टोळीतल्या एकाने संधी साधून एक लाकडी वल्हे त्याच्या डोक्यात हाणले, इतक्या जोरात की ते तुटले! आता पुन्हा तो वार करणार इतक्यात त्या विरोधी टोळीच्याच दुसर्‍या माणसाने पहिल्याला म्हटले, "जाऊ दे सोड त्याला, त्याला प्रतिकार पण करता येत नसताना मारण्यात काय पुरुषार्थ!" ते ऐकून कामेहामेआ भारावला. त्याचा जीव वाचलाच पण या प्रसंगानंतर त्याने हा "तुटलेल्या वल्ह्याचा " कायदाच केला. ज्यायोगे जखमी, स्त्रिया, वृद्ध , निरपराध प्रवासी किंवा एकूणच ज्याला स्वसंरक्षण करता येत नाही त्याला संरक्षण दिले जावे.
तेव्हाच्या कापुपायी केवळ अलिइवर आपली सावली पडली म्हणून जीव गमवावा लागणार्‍या सामान्यांसाठी हा मोठा दिलासा होता!

प्रथमच हवाईला एक पराक्रमी पण सहृदय असा राजा मिळाला, ज्याने आपल्या भूमीचे आणि सामान्य हवाईयन लोकांचे हित पाहिले.
कामेहामेआने आपल्या राज्य उभारणीच्या काळात युरोपियन आणि अमेरिकन प्रवाश्यांचे सहाय्य घेतले. त्यांच्याकडून आधुनिक युद्धकलेची माहिती घेतली. पण स्वतः जिवंत असेपर्यंत त्यांना वरचढ होऊ दिले नाही. बंदरात थांबण्याच्या प्रत्येक दिवसाचा त्यांच्याकडून मजबूत महसूल वसूल करून एक प्रकारे हवाईचे नियंत्रण कोणाच्या ताब्यात आहे याचा धडाही दिला.
kamehameha2.jpg
(शेवटच्या काळातले एक चित्र)

कामेहामेआने शेवटी आजारी पडल्यावरसुद्धा इतरांचे हित पाहिले. त्याने त्याच्या वारसांना सांगून ठेवले - नेहमी राजाच्या मृत्यूनंतर केला जाणारा नरबळीचा विधी मी मेल्यानंतर करू नका!
सन १८१९ मधे कामेहामेआचा मृत्यू झाला.

**********************************************

हवाईचे खर्‍या अर्थाने आधुनिक जगात विलिनीकरण

कामेहामेकाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीन आणि वारसांनी काही वर्षे राज्यकारभार केला. कामेहामेआ तिसरा याच्या कारकीर्दीत हवाईमधे अमेरिकन सहकार्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. उसाच्या नकदी पिकातून येणार्‍या पैशाने हवाईचे अर्थव्यवस्था आणि जीवनच बदलून गेले! त्याचबरोबर अमेरिकेतून मोठे मोठे बागायतदार या ऊस व्यापारात सहभाग घेऊ लागले. त्यांच्या पैशाच्या प्रभावाने त्यांनी इथल्या राज्यकारभारातही हळूहळू लक्ष घालायला सुरुवात केली. आपल्या हिताचे कायदे आणि नियम करण्यासाठी त्यांनी राजावर दबाव आणला. या बागायतदारांनी १८४०-१८५० दरम्यान इथे मोठ्या प्रमाणावर जमिनी आपल्या मालकीच्या करून घेतल्या.
हळूहळू त्यांच्यामागून अमेरिकी मिशनरी आणि धर्मप्रसारकांचेही इथे आगमन झाले. त्यांनीही बर्‍याच जमीनींवर कब्जा केला. जागोजगी चर्चेस उभी राहिली.

ही फक्त सुरुवात होती. हवाई बेटांचे भौगोलिक स्थान बघता अमेरिकेचा लष्करीतळाच्या दृष्टीने या बेटांवर डोळा होताच.
हवाईचे सगळेच राज्यकर्ते तेवढे हुषार नव्हते म्हणा किंवा हे होणे अपरिहार्य होते असेही म्हणता येईल... पण परिणामी अमेरिकेने पद्धतशीररित्या या बेटांचा ताबा घेतला आणि १९५९ मधे अधिकृतरित्या हवाई हे अमेरिकेचे ५०वे राज्य बनले.

***********************************************

आता हवाई ही पूर्वीसारखी मागास बेटे नाहीत. आता हा जगभरातील पर्यटकांचा स्वर्ग आहे. इथे सर्व तर्हेच्या सुखसोयी , मोठमोठ्या सुपरमार्केट चेन्स, मॉल्स, जगभरातील उपाहारगृहे , विविध प्रकारच्या जलक्रिडेच्या सोयी आहेत.
इथला मुख्य व्यवसाय आता पर्यटन हाच आहे. जगभरातून असंख्य प्रकारचे लोक आता इथले रहिवासी झालेत.
५०% हून जास्त लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला अहे, काही ज्यू, जेहोवाज विटनेस, बौद्ध , मुस्लीम देखिल लक्षणीय आहेत.
काही अल्प प्रमाणावर लोक अजूनही पारंपारिक निसर्गपूजा करतात अशी नोंद आहे. पण जनगणनेत धर्म या रकान्यात "इतर" असा पर्याय लिहिण्याइतके ते नगण्य आहेत म्हणे!
माझ्या लहानश्या मुक्कामात माझी काही कुणा स्थानिक हवाईयन माणसांशी ओळख झाली नाही त्यामुळे त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि आताच्या अमेरिकीकरणाबद्दल काय वाटते हे मला खरोखर माहित नाही . जगाच्या मागे पडलेल्या एका भूमीची अशी भरभराट होणे हे अपरिहार्य आणि त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम आहेच, पण त्यात कुठेतरी त्यांनी त्यांची मूळ ओळख हरवली याची हळहळ वाटते खरी!

--समाप्त.

संदर्भः
https://www.nps.gov/puhe/learn/historyculture/kamehameha.htm
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=398
http://www.hawaiihistory.org/index.cfm?fuseaction=ig.page&PageID=266
http://www.biography.com/people/james-cook-21210409

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...