भारतात अनेक अभयारण्य आहेत की जी अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेली नाहीत. पण त्यांचं सौंदर्य इतर जंगलांच्या तुलनेत काही कमी नाही. काही ठिकाणी तर तिथली विविधता, निसर्गसौंदर्य हे केवळ अतुलनीय आहे. पण आजही जंगलं म्हणली की लोकांच्या डोळ्यासमोर येतात ती कान्हा, बांधवगड, ताडोबा, जिम कॉर्बेट अशी नावाजलेली जंगलं. देशाच्या प्रत्येक भागात आपण गेलो तरीही आपल्या निसर्गाचा तितकाच आनंद देणारी जंगलं आहेत. काही दिवसांपूर्वी आपण उत्तरेचे विहगगान बघितले, कॉर्बेट, दुधवासारखी उत्तर भारताच्या सौंदर्याला चार चांद लावणाऱ्या जंगलांची माहिती घेतली. अगदी ईशान्येकडील जंगलाचीही माहिती घेतली. मध्य भारताच्या जंगलातही फेरफटका मारला. पश्चिम भारतातील रणथंबोर सारख्या जंगलांचीही सफर केली. दक्षिण भारतातल्या काही जंगलांचं सौंदर्य वाचनातून अनुभवलं.
भारताच्या आग्नेय भागातील निसर्गाचं सौंदर्यही असंच सुरेख आहे. इथल्या जंगलात फिरताना, इथली जैवविविधता अनुभवताना देखील निराळा आनंद मिळतो. भारताच्या अनेक भागात पक्षी स्थलांतर करून येतात.
काही कालावधीसाठी तिथे वास्तव्य करतात आणि पुन्हा आपल्या मूळ स्थानी परततात. हे चक्र गेली अनेक वर्षे सुरु आहे. आणि ही क्रिया दरवर्षी पाहायला मिळते. काही पक्षी भारतातल्या भारतात स्थलांतर करतात. तर काही अगदी दूर देशातून येतात. भारताच्या किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या अशाच दोन पक्षी अभयारण्यांविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. ती म्हणजे ‘नेलापट्टू पक्षी अभयारण्य’ आणि ‘पुलिकत पक्षी अभयारण्य’ आकाराने छोटे असलेले नेलापट्टू पक्षी अभयारण्य अनेक प्रजातींच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. पूर्वी जेव्हा अभयारण्याचा दर्जा या अधिवासाला मिळाला नव्हता अगदी तेव्हापासून इथे पक्षी मोठ्या संख्येने आहेत. इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे गेली चार ते पाच दशके येथे हजारोंनी पक्षी येतात. काही इथेच वास्तव्य करतात तर काही येथून स्थलांतर करतात.
आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर जिल्ह्यातील सुल्लुरुपेटा तालुक्यात असणारे हे अभयारण्य म्हणजे पक्षी निरीक्षकांसाठी आणि निसर्ग प्रेमींसाठी स्वर्गच. पक्ष्यांच्या दृष्टीने या अधिवासाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सुमारे ४५८.९२ हेक्टर भागाला १९७६ साली नेलापट्टू पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या अभयारण्याच्या एकूण भागाच्या सुमारे २८८.१५ हेक्टरचा भाग हा कल्लुरू राखीव वनाचा आहे. सुमारे ८२.५६ हेक्टर भागात नेलापट्टू तलाव आहे. आणि उर्वरित सुमारे ८८.२२ हेक्टर जंगल भाग हा पूर्वी असंरक्षित वनांचा होता, तो आता अभयारण्यात समाविष्ट करण्यात आला आहे. सुमारे १ हजार मिलिमीटर पाऊस दरवर्षी या भागात होतो. आणि हा पाऊसच या तळ्याला असणारा पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. मे महिन्यात या तलावातील पाणी कमी होते. नेलापट्टू गावातले लोक पाण्याच्या गरजेसाठी याच तलावावर अवलंबून आहेत. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात पाण्याचा साठा कमी होतो. याच कालावधीत इथे असणारे पाणपक्षी दुसरीकडे स्थलांतर करतात.

इथे असणारे स्थानिक लोक इथल्या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी आग्रही आहेत आणि तसा प्रयत्नही करतात. त्यांच्या मताप्रमाणे हे पाणपक्षी येथे येणं हे चांगल्या हवामानाचं चिन्ह आहे. पक्षी वेळेवर येथे दाखल झाले की त्या वर्षी पाऊस चांगला पडतो, पिक चांगल्या प्रमाणावर येतं असा त्यांना विश्वास आहे . या पाणपक्ष्यांची विष्ठा हे स्थानिक लोक आपल्या शेतात खत म्हणूनही वापरतात. इथल्या पाणपक्ष्यांच्या संरक्षणात असलेला स्थानिक लोकांचा सहभाग ही या अभयारण्याची अत्यंत जमेची बाजू. स्पॉट बिल्ड पेलिकन अर्थात ठिपक्याचा चोचीचा झोळीवाला हा येथे दिसणारा अत्यंत महत्त्वाचा पक्षी. इथे या पक्ष्याच्या मोठ्या वसाहती आढळून आल्या आहेत. विणीसाठी हे पक्षी इथे येतात. त्यामुळे या पक्षी अभयारण्याला या पक्ष्याच्या विणीच्या अधिवासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने या भागातील दुसरे महत्त्वाचे अभयारण्य म्हणजे ‘पुलीकत पक्षी अभयारण्य’. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात आणि तामिळनाडू मधील तिरूवल्लूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. सुमारे ७५९ चौरस किलोमीटर एवढ्या मोठ्या भागात पसरलेले हे पक्षी अभयारण्य भारतातील चिल्का सरोवरानंतरचे दोन नंबरचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. एकूण क्षेत्राच्या ८४ टक्के भाग हा आंध्र प्रदेशमध्ये तर १६ टक्के भाग हा तामिळनाडूमध्ये मोडतो. ग्रेटर फ्लेमिंगो, स्पॉट बिल्ड पेलिकन, सी गल अशा अनेक पक्ष्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या या पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी देश-विदेशातून येत असतात.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत येथे हजारो स्थलांतरित पक्षी येतात. या कालावधीत येथे त्यांची वीण होते. या सरोवरात असलेली २० बेटं ही या पक्ष्यांच्या वसाहतींचे मुख्य ठिकाण. याच बेटांमध्ये एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्रीहरीकोटा बेट. याठिकाणी इस्त्रो चे ‘सतीश धवन अंतराळ केंद्र’ हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. याशिवाय पेरनाडू, इरक्कम आणि वेनाडू अशी काही मोठं बेटं या ठिकाणी आहेत. याभागात सुमारे १२०० मिमी एवढा दरवर्षी पाऊस पडतो. येथील प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने या पक्षी अभयारण्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथे असणारे पाणपक्षी आणि त्यांच्या वसाहती हा निसर्गचक्राचा महत्त्वाचा घटक आहे आणि तो वाचवणे अतिशय गरजेचे आहे.
भारताला लाभलेला निसर्ग, इथली जैवविविधता, नेलापट्टू, पुलीकत सारखी अभयारण्य वाचवणं हे आपल्या सर्वाचंच कर्तव्य आहे. निसर्ग वाचला, टिकला तरच आपण वाचू. हे लक्षात घेतलं आणि त्याप्रमाणे पावलं उचलली तरच संपूर्ण मानवजात आपण वाचवू शकू. निसर्गात असलेले विविध रंग पाहणं, त्याचा आस्वाद घेणं, आणि निसर्गाच्या या खजिन्याचा आनंद लुटताना त्यात हरवून जाणं हे केलं तर निसर्गाची भाषा आपल्याला सहज उमजेल. आणि त्याला वाचवण्याची गुरुकिल्ली सहज सापडेल यात शंका नाही.
कसे जाल?
नेलापट्टू पक्षी अभयारण्य : पुणे/मुंबई-चेन्नई-तिरुपती- नेलापट्टू
पुलीकत पक्षी अभयारण्य : पुणे/मुंबई- चेन्नई-तिरुपती- पुलीकत
भेट देण्यास उत्तम हंगाम : ऑक्टोबर ते फेब्रुवारी
काय पाहू शकाल?
पक्षी : ठिपक्यांच्या चोचीचा झोळीवाला, करवानक, चिखली तुतारी, सामान्य टिलवा, हिरवी तुतारी, उलटचोचिचा तुतारी, ठिपकेवाली तुतारी, छोटा टिलवा, शेकाट्या, तपकिरी डोक्याचा कुरव, सामान्य सुरय, छोटा खंड्या, पांढऱ्या छातीचा खंड्या, काळ्या टोपीचा धीवर, मोठा रोहीत, छोटा बगळा, मोठा बगळा, गाय बगळा, वंचक, रात ढोकरी, राखी बगळा, उघड्या चोचीचा करकोचा, काळा तापस, अडई, चमचा ,चाकरांग बदक , तलवार बदक , थापट्या , मालिन बदक , भुवई बदक , हळदी कुंकू , टिबुकली , काळ्या डोक्याचा शराटी, छोटा पाणकावळा, चमचा, भुवई बदक, तिरंदाज, निरनिराळ्या प्रजातींची बदके, इ.
(सदराचे लेखक महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत.)
(शब्दांकन : ओंकार बापट)
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.