(फेसाळणाऱ्या शुभ्र पाण्याचा अस्मानी धबधबा कि जणु दुधाची गंगा जी भगीरथाने पृथ्वी वर आणली)
पावसाळा आला कि सगळे जण ट्रेकर्स होतात, रस्त्यावर तुडुंब गर्दी, रस्त्याला खड्डे, आणि धबधब्यावर दारू पिऊन हुल्लडबाजी करणारे टोळभैरव या पेक्षा वेगळे चित्र नसते. हिरवागार शालू नेसलेली वसुंधरा, धुक्याची चादर या सगळ्या निसर्गकवींच्या कल्पना आहेत ज्या आपण इंस्टाग्राम, फेसबुक वर फोटोंमध्ये पाहू शकतो.
मागील वर्षी खूप ट्रेक्स केले पण धबधबा राहिला होता. दुधसागर ची सगळी माहिती काढली आणि या वेळेस जायचे ठरवले. ट्रेन नि जायचे असल्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक मध्ये अडकण्याचा प्रश्नच नव्हता. २१ जुलै २०१८, शनिवारी गोवा एक्सप्रेसनी निघालो. पहाटे ३ वाजता चा अलार्म लावून झोपलो पण झोप लागत नव्हती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. शेवटी CastleRock स्टेशन वर Announcement ऐकली. दुधसागर ला जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरणाऱ्या लोकांना कायदेशीर ताकिद होती. पण आता येईल त्या संकटाला तोंड द्यायची तयारी झाली होती. बरोबर Explorers चे अनुभवी ट्रेक लीड्स तुषार आणि आदित्य होते. बरोबर रोप, हार्नेस, कॅराबिनर इत्यादी सर्व सेफ्टी gears होते त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नव्हते. Solaneum सर्विस स्टेशन वर गाडी २० सेकंड थांबली, तेवढ्यात तयारीत असलेले आम्हीसगळे जण खाली उतरलो. ट्रेन निघून पुढे गेली. आमच्या बरोबर अजून हि काही ग्रुप्स उतरले होते जे मोठ्या संख्येने आले होते. आमच्या मध्ये एक वयस्कर काका होते ज्यांची कदाचित ट्रेक आणि ट्रिप या मध्ये गल्लत झाली होती आणि ट्रॉली वाली ट्रॅव्हल बॅग, छत्री आणि एका पिशवीत पाण्याची बाटली आणि लक्ष्मी नारायण चिवडा घेऊन काका आमच्या बरोबर उतरले. त्यांची जय्यद तयारी पाहून आमच्या पोटात गोळा आला, आणि या पावसात आपले हाल होणार आहेत याची कल्पना आली, पण मनाचा निर्धार ठाम होता कि कुठल्याही संकटाला तोंड देऊ पण दुधसागर चा ट्रेक करू .
प्राथमिक सूचना तुषार कडून मिळाल्यानंतर आम्ही दुधसागर कडे निघालो. वाटेत काही वेली झाडावरून खाली आल्या होत्या ज्या भयंकर काटेरी होत्या. एक दोन जखमा झाल्यानंतरच त्या अलगद कशा बाजूला करायच्या ह्याचे कौशल्य विकसित होत होते. वाटेत जळवा अंगावर चढायची भीती होती. तुषारच्याच पायावर सर्वप्रथम जळु लागल्यामुळे मीठ टाकून तिला कसे अलगद बाजूला करता येते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. आता आम्ही सगळे अगदी Trained झालो होतो, आत्मविश्वास वाढला होता. आणि काकांची ओली झालेली बॅग उचलायला पण आमच्यात उसने अवसान आले होते.
आणि परीक्षेची वेळ आली, जंगलामधील एक ओढा पार करून आम्हाला जायचे होते. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी आणि वेग वाढत होता आणि त्यामुळे ओढा पार करणे कठीण जात होते. थ्रिल वाढत होते आणि तरुणांचा उत्साहसुद्धा, पण कमकुवत मनाच्या आणि जरा वयस्कर माणसांची कढी पातळ होत होती. आरडा ओरडा करत काही स्थानिक गावकरी, तुषार आणि आदित्य यांनी रोप च्या साहाय्याने ५ , ६ जणांना ओढा पार करून दिला पण त्यानंतर गणित अवघड झाले, पाण्याचा वेग प्रचंड वाढला आणि तुषार नि दुसऱ्या सोप्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. काही जणांचा हिरमुड झाला. पावसात वॉटरप्रूफ कव्हर मध्ये घातलेल्या मोबाइल नी फोटो काढायची नामी संधी आम्ही दवडली होतो. पुन्हा वर आलो आणि पुढे चालू लागलो. पुन्हा तोच ओढा पण इथे जरा पाण्याचा वेग कमी होता आम्ही तत्परतेने दोरी बांधली आणि एका मागून एक पलीकडे गेलो. काकांचा एक बूट वाहून गेला आता मात्र आम्ही त्यांना तिथेच थांबायचा सल्ला दिला आणि त्यांनी तो ऐकला. जाताना आधारासाठी थांबलेल्या ४-५ जणांनि सर्व शक्ती पणाला लावली आणि महाभारतातल्या अरुणी ची गोष्ट आठवून दिली. आमचा आत्मविश्वास दुणावला आणि संकट हे तोंड दिल्यावर ते परत जाते हे पक्के झाले.
आता थोडेच अंतर राहिले होते, View पॉईंट ला जवळ जवळ पोहोचलोच होतो. जाता जाता दुधसागर चे अर्धवट दर्शन घडत होते त्याला छायाचित्रात टिपण्याची आम्ही संधी सोडणे शक्यच नव्हते. शेवटी View पॉईंट ला गेल्यावर आमचे डोळे दिपून गेले. डोंगर माथ्यावर धुक्याची चादर पसरलेली होती. आकाशात कृष्ण मेघांची गर्दी झालेली आणि त्यांना बाजूला सरकावुन आपली किरणे पसरवण्याची सूर्यनारायणाची निरर्थक धडपड चालू होती.
काही तुरळक किरणे इमाने इतबारे प्रकाश पसरवण्याचे काम करत होती. डोंगरावरून प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा उरात धडकी भरवत होता. कड्या कपाऱ्यातुन वाट काढत अनेक क्षीर रांगा धरणी मातेकडे झेपावत होत्या. दूधसागर चे हे फेसाळणारे वेगळे दूध पाहायला मिळाले ज्याचा उंच शिखरावर पान्हा फुटला होता आणि धरणी मातेची क्षुधा शांत करण्यासाठी वेगाने खाली सरसावत होता.
खळखळणारे पाणी गर्जना करत खाली येत होते आणि हिरव्या निसर्गाच्या सौन्दर्यात भर घालत होते. त्यातून उडणारे धवल तुषार पुन्हा एकदा धुक्यात मिसळू पाहत होते. हे नयनरम्य दृश्य फोटो काढून चोरायचा आम्ही शिताफीने प्रयत्न करत होतो पण निसर्गाने सगळी कडे सेफ्टी डोअर्स लावले होते. तिथे असलेल्या माकडांनी आम्हाला सळो की पळो करून सोडले. कोणची पिशवी ओढ, कोणाला गुरगुरूंन भीती दाखव या आणि अशा नाना प्रकारांनी आम्हाला तिथून हुसकावून लावायचा त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी आम्ही त्यांचीच सुधारीत आवृत्ती होतो आणि फोटो काढल्याशिवाय तिथून हलणार नव्हतो. शेवटी सेल्फी, सोलो, ग्रुप असे सगळे फोटो सेशन झाल्यावर आम्ही निघालो.
पावसाचा जोर वाढला होता. दुधसागर अजूनच अक्राळविक्राळ होत होता. त्याचे विराट रूप मनामध्ये, कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत आम्ही ओढ्यापाशी आलो. काका आमची वाट बघून कंटाळलेले होते. अजून एक ग्रुप आम्ही लावलेल्या दोरीला धरून पलीकडे जात होता. त्यांचे लीडर्स आता अरुणी झाले होते. त्यांचा एकंदरीत पेहराव बघता ते प्रोफेशनल वाटत नव्हते, पण ग्रुप मोठा होता आणि रात्री पासून पावसात भिजल्यामुळे आता लवकरात लवकर परतीची गाडी पकडायची घाई झाली होती. पाऊस कोसळत होता क्षणाचीही उसंत न घेता. अजून थांबलो तर पाणी वाढेल आणि आपण इथेच अडकून राहू या भीतीने सर्व ग्रुप चे लीडर्स आपापल्या परीने लवकर ओढा ओलांडायला सांगत होते. आणि अचानक एका मुलीचा पाय घसरला, तिच्या ग्रुप च्या लीडरने सर्व शक्ती पणाला लावून तिला उभे करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याही पायात बूट नसल्यामुळे तो जास्त वेळ तग धरू शकला नाही आणि त्याचा हि पाय घसरला. या सर्व प्रकारामुळे दोरी वर असलेल्या इतर लोकांवर ज्यादा ताण आला आणि त्यामुळे एकच कोलाहल माजला. पलीकडे उभा असलेला आमचा लीडर तुषार हा सर्व प्रकार पाहत होता त्याने तत्परतेने Tapesling ला लावून कॅराबिनर अडकवून तो मैदानात (पाण्यात) उतरला. तो कॅराबिनर दोरीला अडकवणार एवढ्यात पाण्याचा वेग अचानक वाढला आणि एक जण त्या अरुणी लीडर्स च्या भिंतीला भेदून निसटला. एका क्षणात तो पार कोसभर लांब वाहून गेला. हा सगळा प्रकार पाहून भीती चे वातावरण पसरले आणि दोरीवरील सगळ्यांचे पाय घसरू लागले. एक, दोन करता करता बरेच जण वाहून जायला लागले. आम्ही मुख्य प्रवाहाच्या कडेला उभे राहून काळाने चालवलेली क्रूर चेष्टा पहात होतो. हळहळ करत होतो. एवढ्यात तुषारचा हि पाय घसरण्याच्या बेतात होता. त्याची धडपड बघून आमच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानी मोठ्या धैर्याने स्वतःचा तोल सावरत कसे तरी करून कॅराबिनर दोरीला अडकवला आणि आमच्या जिवात जीव आला. सैल झालेला दोर झाडावरून काढून पुन्हा घट्ट बांधणे शक्य नसल्यामुळे रस्सीखेच केल्यासारखी आम्ही ती ओढून ताठ ठेवायचा प्रयत्न करु लागलो.
एवढ्यात अंकित च्या मानेवर जळू चढली होती. पण आणलेले मीठ तुषारच्या बॅगमध्ये ओढ्याच्या पलीकडे होते. काय करावे सुचेना. तेवढ्या काही लोकांनी प्रसंगावधान राखून चुना काढला आणि त्याच्या मानेवर लावला तशी जळू खाली पडली. गायछाप खाणाऱ्या लोकांचा मना पासून राग येत असला तरी आज त्यांनी लावलेला चुना कामी आला होता.
एवढ्यात पुढून कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला तसे गावातले स्थानिक लोक पाण्यात पळत सुटले त्यांना असे पळताना पाहून आम्ही अजून गडबडलो कारण समजत नव्हते कि अपघात होऊन गेलाय आणि आता Rescue Operation सुरु झालंय. १५ मिनिटांनी ते एका मुलीला घेऊन बाहेर आले. ती प्रचंड भांबावलेली होती. सकाळ पर्यंत चढत्या क्रमाने वाढणारा आमचा आत्मविश्वास आता उतरता क्रम ना घेता थेट शून्यावर आला होता. पाऊस थांबत नव्हता. आम्ही उभे असलेल्या जागेवर आता पाणी साचू लागले होते. आत्ताच काही तरी प्रयत्न केले तर ट्रेन मिळेल अथवा जंगलात आणि या पाण्यात आपला काही टिकाव लागणार नाही याची खात्री झाली. काटेरी वेली, जळवा, पाऊस, चिखल, हुसकावणारी माकडे हि वास्तविक पाहता संकटे नव्हती तर निसर्गाची सूचना होती. पण माणसाचा उन्मत्तपणा ऐकायचे नाव घेत नव्हता. असे वाटत होते कि दूधसागर गर्जना करून सांगतोय "चालते व्हा". पण इकडे आड नि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. रात्री पासून पोटात काही नव्हते; वाजले होते सकाळचे ११. शेवटी तुषार ने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी डोंगर चढून रेल्वे ट्रॅक नि जायचे ठरवले. आदित्य ला ओढ्यातून परत पाठवण्यात आले. आदित्य आमच्यात आल्यावर आम्हाला थोडे हायसे वाटले.
आम्ही इतर ग्रुप आणि आदित्य बरोबर उलटे चालू लागलो घनदाट झाडीतून काटेरी वेली चुकवत पोटाची भूक विसरून आम्ही चढू लागलो. एक अर्ध्यातासामध्ये आम्ही रेल्वे ट्रॅकवर लागलो. या सगळ्या प्रकारामुळे आमचे अंदाजे ३. ५ किमी अंतर वाढले होते. रेल्वे येताच बाजूला उभे राहून अधून मधून फोटो काढत मजल दरमजल करत आम्ही ज्या गावातून ट्रेक सुरु केला होता त्या गावात खाली उतरलो. सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व ग्रुप ची एकाच ठिकाणी झुंबड उडाली होती. त्यांना सर्वांना नाश्ता देणे आणि त्याचा हिशेब ठेवणे त्या बिचाऱ्या गावातल्या हॉटेल मालकाला जिकिरीचे जात होते. शेवटी आम्ही नाश्ता वगळून थेट कुळें स्टेशन
ला जेवायला जायचे ठरवले, पण एकमत होईना शेवटी काहींनी तसेच पावसात पोहे पोटात कोंबले आणि चहाचे एक दोन झुरके मारले. पुन्हा प्रवास सुरु झाला. आता मात्र रात्रभर पायात असलेले ओले बूट सहन होत नव्हते आणि पायात गोळे यायला लागले होते. त्यात पुन्हा रेल्वेच्या रुळांवरुंन चालताना गुढघ्याच्या वाट्या कराकरा वाजत होत्या. घामेजलेल्या, ओल्या कपड्यांचा वास सहन होता नव्हता आणि रस्ता आमचा अंत बघत होता. कसे तरी करत आम्ही "कुळें" स्टेशन ला पोहोचलो तिथे वनाधिकाऱ्यांनी आमची चौकशी सुरु केली.
सुदैवाने आम्ही आवश्यक ती वनविभागाची परवानगी आणि तिकिटे काढलेली होती. आदित्य ती घेऊन आला. थोडी चुकामुक झाली आहे अशी कारणे देऊन आम्ही तिथून निसटलो. जे ३ लोक हरवले होते ते आमच्या आधी इतर ग्रुप बरोबर अंबिका हॉटेलवर पोहोचले होते. अंबिका हॉटेलवर आधी पोटभर जेवलो तेवढ्यात तुषार हि पोहोचला आणि आमची संख्या पूर्ण झाली. सरते शेवटी पांडुरंगाच्या कृपेने आम्ही वेळेत परतीच्या गाडीत बसलो आणि आषाढी एकादशीला आपापल्या घरी माऊलीच्या दर्शनाला पोहोचलो.
हा ब्लॉग लिहिण्यामागे कारण एवढेच कि हा प्रसंग कधीही येऊ शकतो आणि कोणावरही. दुधसागर ह्या धबधब्या जवळ जाण्यास सरकारने मनाई केली आहे ती या अशा प्रकारच्या भूतकाळातील प्रसंगानं मुळेच. निसर्गाचे सौंदर्य बघण्यात मजा घ्यावी पण कळपाने जाऊन माणसाची झुंडशाही तिथे चालणार नाही हे ध्यानात ठेवावे. एका फटक्यात निसर्ग आपल्याला लोळवु शकतो. त्याचा आदर करण्यातच सर्वांचे भले आहे.
या सर्व प्रकारातून एक धडा मिळाला संकटाला तोंड हि देता आले पाहिजे आणि वेळप्रसंगी पाठसुद्धा दाखवता आली पाहिजे. म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास "! तुषार च्या प्रसंगावधानाला आणि साहसाला सलाम. Explorers च्या टीमने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले म्हणून सर्व जण सुखरूप घरी येऊ शकलो.
बाकी ट्रेकिंग करत राहा, नवीन आव्हाने घेत राहा. त्याशिवाय कळणार तरी कसे तुम्ही नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कोणाला घाबरता !!!
वैभव कुलकर्णी -- ट्रेककथा सदरासाठी
४ तासाचा ट्रेक - ४४ तासांचा प्रवास…….दुधसागर धबधबा
चेहरापुस्तकावर कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो आले होते त्यात दुधसागर धबधब्याचे फोटो होते. याचे शुभ्र दुधाच्या रंगाचे पाणी पाहून दुधसागर हे नाव शोभत होते. ज्याने कोणी हे नाव ठेवलं त्याच्या बुद्धीला सलाम. दुधा सारखा असणारा त्याचा रंग पाहून मनात म्हटलं होत कि राव एकदा तरी हा बघावा, नंतर चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटात परत याची झलक दिसली. हा चित्रपट फक्त त्या एका दृष्यापुरता पाहायचो. नोव्हेंबर महिन्यात दुधसागर ला जायचा योग जुळून आला. परत शिवशौर्य संस्थेसोबत दुधसागर ट्रेक करायचा प्लान केला. ट्रेक फी भरून नोंदणी केली आणि दुधसागर बद्दल जितकी माहिती जमवता येईल तितकी जमवायला सुरुवात केली. त्या धबधब्याचे मनमोहक फोटो पाहून "जयंत कुलकर्णी" सरांच्या फोटोची आठवण होत होती.
(जालावरून साभार)
गुगल वर चुकीची माहिती दिली आहे कि क्यासल रॉक नंतर दुधसागर स्टेशन येते पण त्या नंतर करंजोल स्टेशन लागते मग १० मिनिटांनी दुधसागर स्टेशन येते. बसने जाण्यासाठी मडगाव गाठावे तिथून शेअर जीप भेटतात. दुधसागर धबधबा हा मांडवी नदीवर आहे. भारतातील उंच धबधब्यांमध्ये याची गणती होते. ३१० मीटर उंचावरून हा कोसळतो (तब्बल १०१७ फुट). पणजी पासून या धबधब्या पर्यंतचे अंतर ६० किमी आहे. हा धबधबा भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानात आहे. इथे जेवण्याची व राहण्याची सोय नाही आहे.
चेहरापुस्तकावर शिवशौर्य त्या धबधब्याचे फोटो आणि विडीओ उपलोड करून उत्सुकता अजून वाढवत होते. त्यात एक खबर मिळाली की त्या धबधब्याला उतरायला रेल्वे पोलिसांनी मनाई केली आहे. बाजूने जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यावर प्लास्टिकच्या बॉटल्स फेकणे, बोगद्यात गैरप्रकार करणे या प्रकारांमुळे पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे थोडी धाकधूक होती की ट्रेक रद्द करावा लागतोय की काय पण तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्क साधून काही प्रोब्लेम नसल्याच कळाल आणि जीव भांड्यात पडला. हे संकट दूर होतेय न होतेय तेच अजून एक खबर आली की कोकणातून जाणाऱ्या कुठल्याच गाडीच रिजर्वेशन उपलब्ध नाहीये. पण रिजर्वेशन व्हाया मिरज हुबळी एक्स्प्रेसने उपलब्ध होते मग काय लगेच डन करून तिकिटे कन्फर्म केली.
२१ नोव्हेंबरला सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून आमची गाडी सुटणार होती त्यामुळे सकाळी लवकर उठून तयारी करून वेळेत पोचलो. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाड्या तिथून असल्यामुळे पूर्ण प्ल्याटफोर्म वर भय्ये दिसत होते. त्या प्ल्याटफोर्म वर लादीकरणाचा काम चालू होते त्यात ते कसेही अस्ताव्यस्त त्यात पडून होते. रेल्वे गाड्यांचा महत्वाचा थांबा असल्यामुळे जाम दुर्गंधी सुटली होती, कधी एकदाची गाडी सुटतेय अस वाटत होत.

बाजूलाच आलिशान अशी "महाराजा एक्स्प्रेस" दिमाखात उभी होती. बाहेरूनच गाडीचे रूप पाहून समाधान मानले कारण त्या गाडीची तिकीट ही आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी नाहीये. नाकाला लावलेला रुमाल गाडी हलल्यावरच काढला आणि एकदाचा मोकळा श्वास घेतला.
(महाराजा एक्स्प्रेस बाहेरून - जालावरून साभार)
(महाराजा एक्स्प्रेस आतून - जालावरून साभार)
रेल्वेने पहिल्यांदाच इतका मोठा प्रवास करणार असल्यामुळे थोडासा एक्साईटेड होतो. वाटेत लागणारे उसाचे मळे, दूरवर दिसणाऱ्या पवनचक्की पाहत कधी मिरजला पोचलो ते कळलंच नाही.


एका स्टेशनच मजेशीर नाव


गाडी पुणे, सातारा दरमजल करत एकदाची मिरजला पोचली, तिथे एका खानावळीत जेवणाची सोय केली होती. तिथले साध जेवण अप्रतिम होत. शिवशौर्य संस्थेसोबत केलेल्या प्रत्येक ट्रेक मध्ये कधीच हॉटेल मध्ये खाण झाल नाही, एकतर घरगुती खानावळीत, किंवा त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या घरी जेवण झालं. त्यामुळेच ट्रेक मध्ये कधी पोटाने त्रास दिला नाही.
जेवण आटोपल्यावर मिरज वरून दुधसागर ला जाणारी ट्रेन पकडायची होती त्यामुळे प्ल्याटफोर्म वर आलो तर तिथे पंढरपूरला जाणारे वारकरी गाडीची वाट पाहत कुडकुडत बसले होते. लहान-थोर मंडळी त्या विठूरायाला पाहण्यासाठी चालली होती. आम्ही गोवा निझामुद्दीन एक्स्प्रेसने दुधसागर साठी रवाना झालो. क्यासल रॉक नंतर लागणाऱ्या दुधसागर या छोट्या स्टेशन वर आम्हाला उतरायचं होत. तिथे कुठलाच प्लाटफोर्म नाहीये आणि गाडी अवघी २/३ मिनिटे थांबते. मोबाईल मध्ये २.३० चा गजर लावून झोपी जायचा प्रयत्न केला पण सतत हलत असल्यामुळे झोपच येईना. एकदाचा दुधसागरला उतरलो, गाडी थोडा वेळ थांबणार असल्यामुळे सर्वजण पटापट उतरले. रात्रीचे ३ वाजले होते. तिथे स्टेशन मास्तरांशी बोलून त्या काळोखातून चालायला सुरुवात केली, त्यांनी सांगितल्या प्रमाणे रुळाच्या एका बाजूने सर्वजण चालत होते.
रात्रीच्या त्या काळोखात ब्याटरीच्या उजेडात रेल्वेच्या बोगद्यातून चालायला खूप मजा येत होती. दुधसागर धबधब्याचा बोर्ड असलेल्या ठिकाणी थोड फोटो सेशन करून पुढे चालू लागलो
तिथे धबधब्याच्या समोर एक मचाण बांधल आहे. तिथे थोडावेळ बसलो आणि थोड उजाडताच खाली धबधब्याला जाण्यासाठी खाली उतरायला लागलो.
मचाण, वरच्या माळ्यावर जाणाऱ्या पायऱ्या तुटल्या आहेत
सकाळच्या नाश्त्याची तयारी
मचाणा जवळून दिसणारा धबधबा
उतरताना असलेली घसाऱ्याची वाट
जो धबधबा आपण फोटोत पाहतो त्यापेक्षा थोडा वेगळा दिसल्यामुळे थोडासा हिरमोड झाला. पाणी इतके जास्त नव्हते पण वरून पडणारे पाणी नावाप्रमाणे एकदम शुभ्र धवल होते.
(टीप: धबधब्याखाली जाण्यास मनाई आहे. त्या पाण्यात उतरण्या आधी लाइफ ज्याकेट घालणे बंधनकारक आहे.)
खालून दिसणारा धबधबा
सकाळचा नाश्ता
तिथे नाश्ता करून थोडावेळ थांबून निघालो. आम्ही निघालो आणि परदेशी पर्यटक, देशी पर्यटकांची रांग लागली. मनात म्हटलं लवकर आलो आणि लवकर निघालो त्याचा फायदा झाला. उगाच गर्दी नाही भेटली. आता धबधब्यापासून चेक पोस्ट पर्यंत ११ किमी चालायचं होत. जनरली लोकं गाड्यांनी ते अंतर येत होते आणि आम्हाला चालताना पाहून आश्चर्य करत होते. धबधब्यापासून निघालेली ती वाट थंड सावलीतून असल्यामुळे चालायला मजा येत होती. जवळ जवळ ५ किमी अंतरापर्यंत आम्हाला ऊन लागलच नाही, नंतरही ऊन अस म्हणाव इतक लागलच नाही.
हसत मजा मस्करी करत अंतर पटापट कापल जात होत, आणि हुरूप वाढवणारी एक बातमी कळाली की पुढे चेक पोस्टच्या आधी १.२५ किमी वर छोट्या धरणावर आंघोळ करायला मिळणार, त्या पाण्यात डुंबायला मिळणार आहे. मग काय चालण्याचा स्पीड अजून वाढला. एकदाचा त्या डुंबायच्या जागेवर येताच कपडे काढून लगेच पाण्यात प्रवेश केला. वाह स्वर्ग सुख म्हणजे अजून काय!! एकदम मस्त वाटल. मागाहून येणारा आमचा ग्रुप येईपर्यंत पाण्यात मनसोक्त मजा केली.
आता पोटात कावळेच काय हत्ती डान्स करू लागले होते म्हणून ब्यागेतला नाश्ता करून परत पदयात्रा चालू केली. चेकपोस्टला पोचतोय तोच जेवणासाठी बोलावण आलं, चेकपोस्ट च्या बाजूलाच वन भोजनाची सोय केलेली होती. गोवन स्टाइल जेवण जेवायला खूपच मजा आली. डाळीची खीर, भाज्यांचं लोणच, सोलकढी एकदम मस्त. भुकेमुळे फोटो काढायचं भान राहील नाही. परतीची रेल्वे तिकिटे कन्फर्म नसल्यामुळे अर्धेजण ट्रेन ने तर अर्धेजण लक्झरी बसने मुंबई कडे रवाना होणार होते. आमचा नंबर लक्झरी बस मध्ये होता म्हटलं एकदम मस्त निदान झोप तरी नीट काढता येईल. येताना ट्रेन मध्ये झोपेच खोबर झाल होत. मग तुडुंब पोटाने गाडीत बसून मडगाव रेल्वे स्टेशन ला पोचलो. सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही लक्झरी बसने मुंबईला आलो.
अजून एका छानशा ट्रेकची सांगता झाली, ४ तासाच्या ट्रेक साठी ४४ तासांचा प्रवास केला होता.
ट्रेक : दुधसागर धबधबा
दिनांक : २१-२२ नोव्हें २०१५



No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.