४ मे -(मायली) सपाट जमिनीवरची शांत झोप मिळाल्यामुळे असेल कदाचित आजची
सकाळ जरा जास्तच प्रसन्न वाटली. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू खूप यायचा पण
प्रत्यक्ष डोळ्यांना कमी दिसायचे. पक्षिमित्र यतींद्र दुर्बीण घेऊन
पक्षीनिरीक्षण तर करायचाच, पक्ष्यांशी संवादही साधायचा. बॅकेत नोकरी
करणाऱ्या यतींद्रचे छंद पक्षी निरीक्षण व वयस्क लोकांसाठी ट्रेकींग कॅंपचे
आयोजन करणे. अनेक पक्ष्यांचे आवाजही चांगले काढतो. त्याच्या जवळ
सांगायला अनेक किस्से, अनुभव होते पण भाषेचा प्रश्न होता. ते किस्से,
अनुभव भाषांतरित करून, त्याला उत्तम तऱ्हेने सजवून, विनोदाची पखरण करत
आमच्यापर्यंत पोचवायचं काम करायचा 'संजय'. यतींद्र, त्याची बायको,
फोनसुंदरी लता, एक जोडपं, पंधरा वर्षाचे मंदारा व अरूण असा त्यांचा
बेंगलोरचा 'यतींद्र' ग्रुप. सुरवातीला ते एक कोडंच होत. नेमकी ही मुलं
कुणाची आहेत? ते भावंडेही नव्हते तसेच ग्रुपमधल्या एकालाही आई-बाबा हाक
मारत नव्हते. ती मुलं यतींद्रच्या दोन मित्रांची हे शेवटच्या दिवशी कळलं.
धन्य ते आई-बाप, एवढ्या दूर अश्या ठिकाणी पाठवणारे, अन धन्य तो,
जबाबदारी घेणारा यतींद्र! आजचा ट्रेकही चारकिमी नऊहजार फूट उंची.
खालून सामान न पोचल्यामुळे व आचारीबुवा रुसल्यामुळे नाश्ता - डबा कसा काय
मिळतो, चिंताच होती. वाटेत एखाद्या स्थानिकाने लावलेल्या टपरीवर फक्त
चहा, कॉफी, ऑम्लेट व मॅगी मिळायचे. पण गरमा-गरम छोले-भटुरे, खीर व आमच्या
आग्रहास्तव केलेला फोडणीचा भात व डबाही मिळाला. आजचा ट्रेक पाच
किमी सातहजार फूट उंची. न थकवणारा, न शिणवणारा. आर्मीत नोकरी करणारा
कॅंपलीडर आमची वाटबघत होता. हा कॅंप एका दरीत मोकळ्या जागेत होता.
वॉव क्या सरकचित्रदर्शन
नजारा! निरभ्र आकाश, आजूबाजूला बर्फाच्छादित डोंगर, जमिनीवर अंथरलेले
हिरवे तृण गालिचे आणि हवेत सुखद गारवा, केवळ अप्रतिम! माईंड ब्लोईंग!
अश्या ह्या वातावरणात कॅंप फायरची रंगत वाढत असतानाच, अचानक मेघ दाटून
आले. खूप जोराने पाऊस, वादळाची शक्यता दिसू लागली. कॅंप लीडरने घाबरून
जाऊ नका, पॅनिक होऊ नका, तंबू उडू लागले तर खांबांना धरून ठेवा वैगेरे
सूचना देऊन सावध केलं. प्रसन्न, उल्हसित मन भीतीने व्यापलं. पण ही
अवस्था फार टिकली नाही. काय आश्चर्य! पाचच मिनिटात वातावरण पूर्ववत.
मोसम बदलते देर नही लगती!
५ मे - मरण यावं तर हिमालयाच्या कुशीत, असं जरी वाटत असलं तरी पहाटे
डोक्यावरच छप्पर आणि एकशेऐंशी डिग्रीत पहुडलेलं एकसंध जीवित शरीर बघून जीव
सुखावला. आजचा ट्रेकची उंची नऊहजार फूट. नेहमी प्रमाणेच जेवण,
विश्रांती घेत आरामाने पोचायचे होते. खूप ऊन नाही, खूप पाऊस नाही, आणि
शरीर पण ह्या वातावरणाला सरावले होते, गर्द हिरवाईत चालायला मजा येत होती.
छोट्या-मोठ्या हिमनद्या ओलांडत आगे कुच चालली होती. एका जरा मोठ्या
हिमनदीजवळ जेवण
विश्रांतीसाठी थांबलो. दुसऱ्या दिवशी आठ तास बर्फातून जायचे आहे हे
माहीत नव्हतं. मनसोक्त बर्फात खेळण्याचा आनंद घेत स्नोमॅनही बनवून टाकला.
कॅंपलीडर आनंदने छान स्वागत केलं. कॅंपची जागाही छान होती. छोटंसं
पठार. आजूबाजूला पाईन-देवदारची झाडे, चारी बाजूला बर्फाच्छादित
डोंगररांगा, रम्य ठिकाण! जग विसरायला लावेल असं निसर्ग सौंदर्य!
तारीख, वार विसरून गेलो होतो. जगात काय चाललंय हे कळायला वर्तमानपत्र,
टीव्ही नव्हते आणि जाणून घ्यायची इच्छापण होत नव्हती. लादेन गेल्याची बातमी
तेवढी कळली होती व आयपीएलची ताजा खबर क्रिकेटप्रेमी ठेवत होते. पण
दहाहजार फुटावरची एक एचपीएल (हिमालय प्रिमियम लीग) बघण्याची मजा काही औरच
होती. आपल्या अख्ख्या टीमला मागे टाकतील असे सहा पहाडी खेळाडू होते.
त्यांची चपळाई बघून दंगच झालो. अंबानी किंवा तत्सम मालक मंडळी, नाही,
फक्त अंबानींनी (सगळेजण मुंबई इंडियन्सवाले होते) इथल्या निदान ऑलराँउडर
मलिंगा(आम्ही ठेवलेलं नाव)
तरी घ्यायलाच पाहिजे, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. मॅच बघण्यात
जेवणाची वेळ केव्हा झाली ते कळलंच नाही. उद्याच्या ट्रेकची मानसिक तयारी
करत पथारी पसरली. तेवढ्यात मेघगर्जनेसह धो-धो पाऊस कोसळू लागला. आमचा तंबू
उतारावर असल्यामुळे पाणी आत शिरू लागलं. अंथरूण ओलं व्हायला लागलं.
काठ्यांच्या साहाय्याने सगळ्यांनी मिळून एक नाली खोदली. आता पाणी आत येणं
थांबलं होतं. दाटीवाटीने एका तंबूत चौदाजणी केव्हा झोपेच्या अधीन
झालो कळलंच नाही.
क्रमशः
८
मे -आज असं वाटतंय एक विखुरलेलं कुटुंब खूप दिवसांनी मंगलकार्यासाठी एकत्र
आली आणि ते कार्य एकमेकांच्या सहकार्याने पार पाडून एकमेकांचा निरोप घेत
आहेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा आनंद,
समाधान ओसंडून वाहत होते. दहा दिवसांपूर्वी हीच सगळी मंडळी एकमेकांना
सर्वस्वी परकी, अनोळखी होती, हे कुणाला सांगितलं तर खरंच वाटणार नाही. ही
वेगवेगळ्या जाती-धर्म, प्रांत, वर्गातील लोकं एकत्र यायला कारण होतं -
सौरकुंडीपास ट्रेकिंग कॅंप. 'आना आपं बंगळुरू' म्हणत यतींद्र ग्रुपने निरोप
घेतला. आंटी आय कॅन कुक मेनी रेसिपीज आदर दॅन मॅगी', असा हर्षाने जेवणाचा
प्रेमळ आमंत्रण देत, आकांक्षाने 'आय वॉंट टु हग यु' म्हणत व एक जादूची
झप्पी देत आयटीग्रुपने निरोप घेतला तर जुनागढवाल्यांनी 'आव जो' 'आव जो'
म्हणत. असे एक-एक करत मंडळी घरच्या वाटेला लागली. दहा दिवसांपूर्वी
ज्यांना आपण ओळखतही नव्हतो, ज्यांची नावं-गावं माहिती नव्हती आज
त्यांच्याशी भावबंध निर्माण झाले आणि म्हणूनच एकेकजण जाऊ लागले तसं उदास
वाटू लागलं. परत भेट होईल की नाही माहीत नाही पण जेव्हा जेव्हा ह्या
लोकांची आठवण काढू तेव्हा तेव्हा चेहऱ्यावर एक स्मित उमटेल - नक्कीच.
२९ एप्रिल - सकाळ्ळी सकाळी डेरे दाखल होणाऱ्या आम्ही दोघी मायलेकी. एसके३
मोहिमेला निघण्याच्या गडबडीत होता. आम्ही प्रातर्विधी आटोपून एसके४ला
निरोप द्यायला रांगेत उभ्या राहिलो. 'विश यु ऑल दी बेस्ट', 'हिप हिप
हुर्ये', 'वन टु, वन टु, वन टु थ्री' टाळ्यांच्या घोषात निरोप दिला. चंदेरी
केसांच्या सखीला निरोप नकळत जरा जास्तच जोषात दिला गेला कदाचित परवा मलाही
तेवढाच मिळावा ह्या अपेक्षेने. आमच्या ग्रुपची एकेक मंडळी येऊ लागली
होती. संध्याकाळचा माहौल तर फारच गमतीशीर होता. वेगवेगळ्या प्रांतातील
दीड-दोनशे लोकं त्या एवढ्याश्या जागेत खेळत होती. कुणाचा पायपोस कुणाला
नाही. कोण, कुठला खेळ, कुणाबरोबर खेळतोय हे इतरांना तर सोडूनच द्या, त्या
खेळणाऱ्या व्यक्तीलाही कळतं होतं की नाही देव जाणे. नुसता गोंगाट! 'चालो,
हाथ पकड लो, रौंड बनाओ' ची एका गुज्जुभाईंनी नेतृत्व स्वतः कडे घेत अशी
काही ओर्डर सोडली की क्षणात सगळ्यांनी पटापट हात पकडत मोठ्ठा गोल केला व
जेवणाची वेळ होईपर्यंत भाई सगळ्यांना नवनवीन खेळ खेळवत राहिले. कॅंप फायर
हा तर अतिशय मनोरंजक तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम!
तीनही दिवस अतिशय रंजक झाला.
३०एप्रिल- खळखळणाऱ्या बियास नदीच्या पार्श्वसंगीतात केलेला व्यायाम व ध्यान/प्राणायाम हा एक वेगळाच अनुभव होता. नाश्ता करून एक छोटासा(? ) डोंगर चढाई - चढण्याचा सराव. हाश - हुश्श करत एका देवळाच्या प्रांगणात पोचलो. औपचारिक सविस्तर ओळख कार्यक्रम झाला. तुमी कुठचे, आम्ही कुठचे अशी चढताना ओळख झालीच होती. एकंदरीत आपल्या बरोबर दहा दिवस असणारे लोकं थोडीफार कळली होती. गायक भूपेशभाई व कॅंप लीडरचा बहारदार गाण्याचा कार्यक्रम झाला. भूपेशभाई गाणं म्हणायला सदैव तयार असायचे, आढेवेढे न घेता, हे विशेष! त्यामुळे १० दिवस गाण्याच्या मेजवानीची सोय झाली होती. त्यांनी गाण्याचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हत. केवळ एक छंद, आवड म्हणून गातात. त्यांच्याजवळ गाण्याचा भरपूर साठा तर होताच शिवाय गातात पण छान. एकदम साधा आणि पारदर्शी वल्ली. संध्याकाळच्या कार्यक्रमात कॅंप लीडर युथ हॉस्टेलबद्दलची माहिती ट्रेक दरम्यानचे काय करायचे व काय करायचे नाही, कोणती सावधगिरी बाळगायची समजावून सांगितले.
१ मे - आजही सकाळी चालण्याचा सराव व बियास नदीकाठी काही व्यायामाचे प्रकार व ध्यान. कालच्या सारखीच आजची प्रसन्न सकाळ! नाश्ता करून रॅपलींगसाठी निघालो. दगडाची उंची फारशी नव्हती. आयुष्यात पहिल्यांदाच आणि तेही ह्यावयात करत असल्यामुळे मनात भीती होती. प्रात्यक्षिक बघून, धाडस करावंस वाटलं आणि न धडपडता जमिनीवर पाय ठेवला. पण दुपारच्या दगड चढाईचं (रॉक क्लाईंबिंग) धाडस मात्र केलं नाही. तरुणींनी यशस्वी प्रयत्न केला. महिलांमध्ये आघाडीवर होती दाक्षिणी फोनसुंदरी लताजी. भरतनाट्यम पारंगत लताला आम्ही 'फोनसुंदरी' हे नाव बहाल केलं होतं. तिचा नवरा व मुलगा कॅंपला आले नव्हते. ती सतत आंखों देखा नजाऱ्याचं थेट वर्णन फोनवर जोर-जोरात कानडी भाषेत देत असे. मला आपली हिच्या फोनच्या बिलाची काळजी! किती आलं असेल बिल.... देव जाणे? तिने दोन फोन तर ठेवलेच होते शिवाय जिथे सोय असेल तिथे दामदुपटीने बॅटरी चार्ज करून घ्यायची त्यामुळे तिची गैरसोय झाली नाही. ह्या क्षणी जे मला दिसतं आणि वाटतं, ते आत्ता सांगण्यातला जो आनंद, उत्स्फूर्तपण, ताजेपणा, टवटवीतपणा आहे तो दहा दिवसांनी घरी गेल्यावर थोडीच असणार? अगदी खरंय! तो तिच्या आवाज, हावभाव व देहबोलीतून जाणवायचा जरी भाषा कळत नसली तरी. तर अशी ही फोनसुंदरी लता अर्धा दगड चढली. पुढचं पाऊल टाकायला जागा शोधत होती. सगळ्यांचे कॅमेरे सज्ज होते. ' आँटी, इधर देखो'! हे ऐकताच, एवढ्या अवघडलेल्या अवस्थेतही तिने तिचा प्रसिद्ध डॉयलॉग 'आँटी मत कहो मुझे.... ' म्हणताच एकच हशा पिकला. असो, तर सरतेशेवटी बेंगळुरुच्या राणीने दगड सर केला.
२मे - नाश्ता करून व डबे भरून निघायची तयारी व गडबड. २४ किमी प्रवास बसचा व बाकीचा पायी करायचा होता. एस्के६ व ७ निरोप द्यायला उभे होते. आशयच्या 'येनगुडगुडे SSS नाडगुडगुडे SSSS' 'ढीशक्याँवSSSS ढीशक्याँव SSSSS' च्या जयघोषात मोहिमेला निघालो. सगळ्यांनाच वाटलं हा काहीतरी अर्थपूर्ण घोषवाक्य आहे. पण आशयच्या कंपूचा हे अर्थहीन घोषवाक्य 'हर हर महादेव' इतकंच स्फूर्तिदायक होतं. आशयने 'येनगुडगुडे नाडगुडगुडे' व इतरांनी 'ढीशक्याँव ढीशक्याँव' म्हणायचे हा रिवाजच झाला होता, पुढच्या मोहिमेला निघण्यापूर्वी व मुक्कामी पोचल्यावर. बसमधून उतरल्याबरोबर खरेदी झाली ती 'सहाऱ्याची' अर्थात काठीची. आजचा फक्त ५ किमीचा ट्रेक होता उंची गाठणार होतो सातहजार फूट. देवदार व पाईनच्या झाडीतून जाणारा स्वच्छ व रम्य ट्रेक! चारच्या आधी कॅंपवर पोचून चालणार नव्हते त्यामुळे निसर्गाचा आनंद, अनुभव लुटत आरामाने ४ वाजता सेगलीला पोचलो. वाटेत वीस-पंचवीस घरांची वस्ती असलेली एक दोन गावं लागली. वाटाड्या सेगलीचाच होता. आम्हाला सोडून तो त्याच्या घरी गेला. बहुतेक इथले तरुण कमीतकमी बारावीपर्यंत शिकलेले आहेत. शहराची मात्र विशेष ओढ नाही. घरटी एकजण तरी सैन्यात जातो. गरजा अतिशय सीमित असल्यामुळेच की काय इथलं जीवन कष्टी आहे पण दु:खी नक्कीच नाही. अश्या ह्या शांत, रम्य जीवनाची एका व्यक्तीला इतकी भुरळ पडली की ते परततील की नाही शंकाच होती. उद्या तुम्ही कोणी तिकडे गेलात आणि एखाद्या झाडाखाली पहुडलेले 'तुकाराम महाराज' भेटले तर आश्चर्य नाही. ते नक्कीच नाशिकचे तुकाराम माळी. आठ महिने हिमालयात व अति थंडीचे चार महिने नाशिकात राहायचे ठरवतच खाली उतरले. सेगलीत चहा व गरमा-गरम भज्यांनी स्वागत झाले. वीज नसल्यामुळे लवकर जेवण आटोपून छोटासा पण मनोरंजक कॅंप फायरचा विजेरीच्या प्रकाशात पार पडला.
६ मे - (लुंगा) आज लवकर सकाळी साडेसातलाच निघायचं होतं. कसाबसा नाश्ता
केला. रस्त्यातला जेवणाचा डबा (एक मठरी, एक तुकडा चिक्की व एक फ्रुटी)
बघून 'इससे मेरा क्या होगा? ' असे वाटले पण तेवढही पूर्ण खाऊ शकलो नाही.
आज आमच्याबरोबर दोन वाटाडे होते. हिरव्या - हिरव्या कुरणावरून चालत
निघालो. काल बर्फाच्या घसरगुंडीवरून मजेत भरपूर सराव केला होता. आता
घसरगुंड्या कधी येतात वाट पाहू लागलो. दोनेक किमी चढून जात नाही तो समोर
विस्तीर्ण बर्फाचे डोंगर. सुरुवातीला चढण खूप नव्हते पण जसजसे पुढे गेलो
तसतशी उंची वाढत जात होती. आज जवळपास तेराहजार फुट उंच चढायचे होते. नऊ
दिशेला बर्फच बर्फ होता. हिमवृष्टीमुळे दशदिशा बर्फमय झाल्या! आता चढणं
कठीण जाऊ लागलं. बर्फात पाय रुतू लागले. बर्फात कितीदा फतकल मारली देव
जाणे. बर्फावरून पटकन उठताही यायचे नाही. मागे-पुढे असणारा कोणीतरी
मदतीचा हात देऊन पुढे चालू लागायचा. प्रत्येकजण आपापल्या शारिरीक
ताकदीनुसार चालायचा. दोन्ही वाटाडे
गटनेता लाडे सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होते. 'काकी आधी टाच टेकवा,
म्हणजे चालायला सोपं जातं', हर्षदची प्रेमळ सूचना, 'काकू, छोटी - छोटी
पावलं टाका, व्हेरी गुड काकू' अशी आशयची शाबासकी, 'मी गड्डा केलाय
त्याच्यावरुनच चाला काकू' अशी केतनने करून दिलेली वाट, एका अवघड वळणावर
'फक्त दोरीची पकड सोडू नका, सावकाश जा', असा निनादचा सावधगिरीचा इशारा
ह्या सगळ्यांच्या मदतीने मी हा ट्रेक करू शकले. मदत करण्यात गुज्जुगटही
मागे नव्हता. आता ते जरा खुलू लागले होते. उंच डोंगररांगांवर 'दऱ्या'
मिटून जातात, आपापसातल्या. जात-पात, गरीब-श्रीमंत, मराठी - गुजराती -
कानडी भेदभाव उरतच नाही. टपरीवर पंचवीस रुपयाची कॉफी मिळायची. पाच
रुपयाचा कट पिणाऱ्या गटाला ही किंमत पाचपट होती तर बॅरिस्ता-सीसीडीत
पिणाऱ्याकरिता एकपंचमांश एवढी तफावत असली तरी तुम्ही असता एकाच
संप्रदयातले तो म्हणजे 'ट्रेककरी संप्रदाय'.
एका छोट्याश्या टापूवर फक्त पाच मिनिट जेवण/विश्रांतीसाठी थांबलो. आता
पुढे कंटाळा येईल इतक्या बर्फावरच्या घसरगुंड्याच घसरगुंड्याच होत्या.
किती अंतर पार केलं किती उरलं कळत नव्हतं. चालतोय, घसरतोय चालतोय असे
मार्गक्रमण चालू होते. बर्फाचे डोंगर पार झाले. अखेर
बाजीप्रभुप्रमाणे आम्ही पण खिंड लढवली - सौरकुंडी खिंड, निसर्गाशी
झुंजत. निसर्ग आपला मित्र खरा पण कधी पाठ फिरवेल सांगता येत नाही. एका
प्रसिद्ध महानगिर्यारोहक म्हणतो, 'you do not conquer mountain but
conquer yourself'. पण अजून बराच पल्ला गाठायचा होता तोही चिखलमय
निसरड्या डोंगरावरून. मी पाय घसरून आपटण्यापेक्षा घसरगुंडीचा पर्याय
निवडला. जेवढ्या बर्फावरच्या घासरगुंड्या केल्या तेवढ्या चिखल्यावरच्या.
बर्फ व चिखलावरून घसरून बुड बधीर झालं होतं. अंगात प्रचंड थंडी भरली होती.
कॅंप एका डोंगर उतारावर बर्फ साफ करून लावलेला होता. पोचल्याबरोबर आधी
चुलीजवळबसून शेक घेतला व गरमा - गरम दोन - तीन कप चहा प्यायल्यावर बरं
वाटलं. एक अंगदुखीवरची गोळी घेऊन जे झोपले ते दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले.
७ मे - (लेखनी) सकाळ उजाडली ते प्रचंड पायदुखीने. आदल्यादिवशी रात्रीपण न जेवल्यामुळे भूक लागली होती. चहा बिस्कीट खाल्ल्यावर तरतरी आली. आज नऊ वाजता कॅंप सोडायचा होता आणि चिखलाने माखलेले कपडे आवरणं एक मोठ्ठ काम होतं. आदल्या दिवशी कॅंप पोचल्यावर कोणी एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रत्येकाजवळ सांगण्यासारखे अनेक किस्से (धडपडण्याचे)होते. गप्पांना व हसण्या खिदळण्याला ऊत आला होता न कॅंप व ग्रुप लीडर आवरायची घाई करत होते. नाश्ता व डबे भरून दहा वाजता उतरायला सुरुवात केली. आज सगळ्यांचीच गती मंदावली होती . उतार खोल होता. एकच वाटाड्या होता. आम्हाला एक स्थानिक सोबत करत होता. त्याने मला उतरायला निरपेक्षभावनेने केलेली मदत आजन्म माझ्या स्मरणात राहिल. काही अंतरानंतर उतार कमी झाल्यावर, मी आता स्वतंत्र उतरू शकेन, हे बघून तो मॅगीचे पाकीट आणायला खालच्या गावात गेला. आम्ही जेवणाच्या थांब्यावर पोचेपर्यंत तो व त्याचा मित्र व अंडी व मॅगी आले. आजूबाजुच्या काटक्या गोळा करून आणल्या, तीन दगड लावले न हॉटेल थाटलं. हर्षद, हर्षा व आशाने चुलीवरच्या स्वयंपाकाची हौस भागवून घेतली. आज प्रत्येकाने गरमा-गरम ऑम्लेट/मॅगीवर ताव मारला. एरवी अश्या टपरीवरचे कायम गिऱ्हाईक होते बेंगलोरचा 'संजय ग्रुप'. संजय, बायको आशा, मुलगी रिया उर्फ मोगली, भाई आशिष व त्याची अतिशय गोड, नाजुक होऊ घातलेली गोल्फ खेळाडू पत्नी शिवानी. संजय एक अवलिया. एक उद्योगपती. कार रेसिंग शौकीन. सुसंस्कृत, उत्साही बडबड्या, चेष्टेखोर, सगळ्यांत मिळून-मिसळून राहणारा.... अखंड खळाळता चैतन्याचा झरा! आज कुणालाही विचारलं, वजा 'संजय'? तर प्रत्येकाचं उत्तर असेल.. ... ओह नो, हॉउ बोअरींग!
आजचा मुक्काम सगळ्यात उत्तम जागी मोहोरलेल्या सफरचंदाच्या बागेमध्ये होता. महिलांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना
अन्याय सहन करावा लागला, तंबूत राहावं लागलं. पुरुषांना मात्र छान टुमदार लाकडी बंगली होती. उद्या संगत-सोबत संपणार होती. आजचा कॅंप फायर जरा जास्तच रंगला गुज्जुकंपुच्या सक्रीय सहभागामुळे. गुज्जुकंपूने मोदींच गुजरात खास करून कच्छ बघण्याचं आमंत्रण दिलं. मोदींनी भूकंपानंतरचं कच्छचं रुपंच पालटून टाकलंय. तुमच्या महाराष्ट्रात सहा-सहा तास वीजकपात असते आमच्या इथे सहा मिनिटपण वीज गायब होत नाही. रस्ते, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा खूपच चांगल्या आहे. भविष्यात मोदी पंतप्रधान नक्की होतील पण त्यांनी गुजरात सोडून जाऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा होती. हे सगळं ऐकून व त्यांचं गुजरात व मोदीप्रेम बघून, गुजरातला एकदा नक्की भेट द्यायची, ठरवून टाकलं.
८ मे - आज जरा सगळे सुस्तावले होते. निघायची धावपळ नव्हती. जेवणाच्या वेळेपर्यंत बबेलीला पोचायचे होते. आरामात थोडेसे अंतर पायी व सव्वीस किमी बसने प्रवास करायचा होता. आज नाश्ताही खास होता-नुडल्स. आज जरा जास्तच जोषात 'येनगुडगुडे नाडगुडगुडे, ढीशक्याँव ढीशक्याँव' नारा दिल्या गेला. वारकऱ्याला वारी संपत नाही तो दुसऱ्या वारीचे वेध लागतात तीच अवस्था ट्रेककरीची असते. पुढच्या ट्रेकचे मनसुबे रचतच परतीची वाट धरली
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.