https://samantfort.blogspot.com/2023/06/eternal-flame.html
![]() |
| Eternal Flame |
अमेरीकेतल्या सुप्रसिध्द
नायगारा फ़ॉल पासून ३७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क (Chestnut
Ridge Park) आहे. नायगरा एकदा पाहुन झाला होता त्यामुळे यावेळी वेगळ
काहीतरी बघुया म्हणून शोधाशोध करतांना "इटर्नल फ़्लेम" ची माहिती मिळाली. हा तसा छोटा अप्रसिध्द ट्रेक आहे. अमेरीकेत प्रत्येक
राज्यात अनेक स्टेट पार्क (राखीव जंगल) आहेत आणि त्या राखीव जंगलांमध्ये अनेक आखीव
रेखीव ट्रेल्स असतात. जागोजागी लावलेले दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना , जिथे पायवाट धोकादायक असेल तिथे लावलेले संरक्षक कठडे, लाकडाच्या ओंडक्यांच्या पायर्या हे सगळ पाहिल की आपल्या सारख्या सह्याद्रीत
फिरणार्यांना "पाणीकम" वाटत राहात. पण "इटर्नल फ़्लेम" चा ट्रेक चक्क याला
अपवाद होता.
नुकतेच वसंत ऋतूचे आगमन झालेले असल्यामुळे, वेगवेगळ्या रंगाच्या फ़ुलांनी झाड गच्च भरलेली होती. ट्रेकच्या सुरवतीच्या टप्प्यात या झाडांनी स्वागत केल. झाडांवर पान अपवादानेच दिसत होती. अर्थात ही झाड खास इथे आणून लावलेली असावीत अस जंगलात शिरल्यावर लक्षात आले. जंगलात पाईन आणि ओकचे उंचच उंच वॄक्ष होते. त्याच्या दाट सावलीतून वाट जात होती. साधारणपणे १० मिनिटे चालल्यावर पायवाट तीव्र उतारावरुन खाली उतरायला लागली . वॄक्षांची आडव्या पसरलेल्या एकामेकांत गुंतलेल्या मुळांमुळे काही ठिकाणी पायर्यांसारखी रचना तयार झाली होती. या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या पायर्यांवरुन मुळांचा आधार घेत उतरल्यावर आम्ही एका ओढ्याच्या काठाने जाणार्या चिंचोळ्या पायवाटेवर पोहोचलो.
ओढ्याच्या काठाने जाणार्या वळणा वळणाच्या सुंदर वाटेने जातांना आजूबाजूच्या झाडीत पक्ष्यांचा किलीबिलाट ऐकायला येत होता. अचानक एका झाडावरुन सुंदर निळा पक्षी उडाला आणि ओढ्या पलिकडच्या झाडावर जाऊन बसला. त्याची (Blue jay) सुंदर छायाचित्र मिळाली. त्यामुळे चाल मंदावली , आजूबाजूच्या झाडीत आवाजांचा वेध घेत पक्षी शोधायला सुरुवात केली. काही पक्षांची छायाचित्र मिळाली तर काहींच फक्त निरिक्षण करण्यातच आनंद मानावा लागला.
| Blue Jay |
| Sparrow |
| Red winged black bird |
| Eastern Blue Bird |
| Eternal Flame Water fall |
| Eternal flame water fall |
नैसर्गिक वायूचे स्त्रोत
कसे तयार होतात ? याबद्दल जिओलॉजीच्या
अभ्यासक्रमात शिकलो होतो,
वारा, पाऊस, उष्णता इत्यादिंचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील
खडकांवर परिणाम होऊन त्याची झीज होते. हा झीज झालेला भाग पाण्या बरोबर वाहून जातो आणि
ज्या ठिकाणी पाणी खोल आणि संथ असते अशा ठिकाणी हा गाळ साचतो. त्याबरोबरच पाण्याबरोबर
वाहून आलेले जैविक घटकही इथे साचत जातात. हा
गाळ कालांतराने कठीण होतो आणि गाळाचे खडक (Sedimentary Rock) तयार होतात. सरोवर, नदीचं पात्र , नद्यांनी निर्माण केलेला
त्रिभूज प्रदेश , समुद्र तळ इत्यादी ठिकाणी हे गाळाचे दगड तयार होतात.
याठिकाणी खनीज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याचे आपण वाचलेले असते.
इटर्नल फ़्लेमचा (Eternal Flame) व्हिडीओ पाहाण्यासाठी प्ले बटणावर टिचकी मारा
पृथ्वीच्या पोटात होणार्या उलथापालथीमुळे हे गाळाचे दगड जमिनीत खोलवर दाबले जातात. या दगडावर पडणार्या दाब आणि उष्णतेमुळे जैविक घटकांचे रुपांतर खनिज तेलात आणि नैसर्गिक वायूत होते. भूगर्भात होणार्या हालचालींमुळे दगडांमध्ये पडलेल्या भेगांमधून नैसर्गिक वायू जमिनीवर येतो. बर्याचदा वीज पडल्यामुळे हा वायू पेट घेतो आणि जमिनीवर ज्योती पेटलेल्या दिसतात. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे भूगर्भातून बाहेर पडणार्या नैसर्गिक वायुमुळे पेटलेल्या ज्योती पाहायला मिळतात. भारतातील हिमाचल प्रदेशात असलेल्या प्रसिध्द ज्वालाजी मंदिरातही अशाच प्रकारे जमिनीतून बाहेर येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे तयार झालेल्या ज्योती दिसतात.
इटर्नल फ़्लेमचा अभ्यास Indiana University Bloomington आणि Italy's
National Institute of Geophysics and Volcanology या दोन संस्थांच्या जिओलॉजिस्टनी
२०१३ साली केला . त्यांना असे आढळुन आले की इटर्नल फ़्लेम मध्ये पाझरणार्या वायूत ईथेन (ethane) आणि प्रोफ़ेन (propane)
वायूचे
प्रमाण 35% आहे. हे प्रमाण जगातील इतर
ज्ञात नैसर्गिक वायूच्या स्त्रोतां पेक्षा जास्त आहे. इतर ठिकाणी मिथेन वायू मोठ्या
प्रमाणात आढळून येतो.
संशोधकांना या परिसरात असे अनेक छोटे छोटे नैसर्गिक वायूचे पाझर ('micro seeps') आढळून आले. या नैसर्गिक वायूचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले हा वायू जवळच असलेल्या Rhinestreet Shale मध्ये तयार झालेला आहे अंदाजे ४०० मिटर्स (१३००फ़ूट ) खोल असलेल्या या नैसर्गिक वायूच्या साठ्यातील वायू भूगर्भातील हालचालींमुळे (Tectonic activity) तयार झालेल्या खडकां मधील भेगां मधून जमिनीवर आला आहे. नैसर्गिक वायू तयार होण्यासाठी जमिनी खाली स्त्रोताचे (shale) तापमान १०० °C च्या आसपास असावे लागते. या तापमानात कार्बन विघटन होऊन नैसर्गिक वायूचे रेणू तयार होतात. परंतू Rhinestreet Shale मधील तापमान १०० °C पेक्षा कमी आहे तसेच इतर नैसर्गिक वायूच्या स्त्रोतांपेक्षा त्याची खोलीही कमी आहे तरीही तिथे नैसर्गिक वायू कसा तयार झाला ? असा प्रश्न संशोधकांना पडला आहे. त्यावर सध्या अभ्यास चालू आहे.
आपल्या इथे धबधब्याच्या खालच्या
भागात डोह असतो. तो नसला तरी आजूबाजूचे खडक पडून धबधब्या पर्यंत जाण्याचा मार्ग दुष्कर
झालेला असतो. पण या ठिकाणी बर्फाच्या लाद्या सरकण्यामुळे गुळगुळीत पॄष्ठभाग तयार झाला
आहे. त्यामुळे ज्योती तेवत असलेल्या गुहेपर्यंत सहज जाता आले. गुहेच्या वरुन पाण्याच्या
धारा पडत होत्या त्या धारांच्या पडद्या आड ज्योती तेवत होत्या. नैसर्गिक वायू जळल्यावर
येणार टिपिकल वास त्या ठिकाणी येत होता. पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नी) , वायू आणि आकाश ही पंचमहाभूत या निबिड
अरण्यात एकाच वेळी पाहायला मिळत होती. आग आणि पाणी हे विरुध्द गुणधर्म असणारी महाभूत या ठिकाणी एकत्र नांदत होती.
या भारावलेल्या
वातावरणात काही वेळ थांबून आलेल्या मार्गाने परत फ़िरलो. एक वेगळा छान ट्रेक झाला. मी
आजवरच्या भटकंतीत पाहीलेल अजून एक सुंदर ठिकाण
म्हणून "इटर्नल फ्लेम" कायम आठवणीत राहील.
जाण्यासाठी :- अमेरीकेतल्या सुप्रसिध्द नायगारा फ़ॉल
पासून ३७ किलोमीटर आणि बफेलो विमानतळापासून १७ किलोमीटर अंतरावर चेस्टनट रिज्ड पार्क
(Chestnut
Ridge Park) आहे. या
पार्क मध्ये ३ ट्रेक आहेत. त्यातील मध्यम श्रेणीतला हा ट्रेक आहे. जाऊन येऊन साधारणपणे
अंतर ३ किलोमीटर आहे. मे महिना ते ऑक्टोबर हा ट्रेक करता येतो. अमेरीकेत अनेक पार्क्स
मध्ये जाण्यासाठी फी भरावी लागते. पण या ट्रेकसाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.
Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.