साद गिरनारची : सोमनाथ-गीर अभयारण्य-उपरकोट किल्ला(जुनागढ)-गुरुशिखर
आसमंतची पूर्वकिनार तांबडा- तपकिरी रंगांच्या छटांनी उजाळून गेलेली…वारा चोहुबाजूंनी पिसाळल्यागत घोंघावत होता… उजडणाऱ्या नव्या दिवसाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती… आणि ह्या प्रभात-कल्लोळात मात्र नजरेसोमरील दोन स्थितप्रज्ञ शिखरे लक्ष वेधून घेत होती… एकमेकांना बिलगून उभी असलेली ही शिखरं व त्या दोन्ही शिखरांच्या माथ्यावरील मंदिराच्या घुमट्या ह्यांच्या आकृत्या बघता क्षणीच एकदम काळजात जाऊन बसल्या…! एक वेगळाच हुरूप मिळाला…! एक वेगळ्याच जगात आल्याची अनुभती.. ! गेले बरीच वर्षे मनात केलेला संकल्प पूर्तीस येऊन ठेपलेला.. गिरनार पर्वत..!!!

पर्वत डोंगर म्हटलं की नेहमीच साथीला असणारे
सह्य-मित्र मंडळ याखेपेस नव्हते.. तर बालपणीचे शालेय जीवनात लाभलेले
बिछडलेले नि कालांतराने नव्याने पुन्हा ऋणबंध जुळलेले काही मोजकेच सवंगडी
सोबतीला होते…!! अंजली, विजय, हर्षदा व तिचे पती महोदय अमित…! हम पांच !
खरतर ही चौकट आधीच ठरलेली नि अस्मादिक मागाहून ह्यांच्यात सामील झालेले..!
कामानिमित्त
पुण्यात जाणे झाले तेव्हा पिंपरी चिंचवड मध्ये (हे अस्सल पुण्यात येत
नाही) स्थायिक झालेल्या अंजलीशी भेट झालेली.. तेव्हा तिने हा प्लॅन
सांगितलेला.. सोमनाथ व गिरनार..! तीच ठरलेलं तिच्या मैत्रिणीसोबत.. पण
गोष्टी वेगाने बदलल्या व जाणारे वेगळेच ठरले..गिरनार ऐकताच मी सुध्दा चटकन
interested म्हटले खरं पण कामावर सुट्टी वगैरे बघून कळवतो कारण आरबीआय च
ऑडिट कधीही सुरू होणार होत..!
ह्यांचा प्लान समजून घेतला.. राजकोट
पर्यंत विमानाने व पुढे प्रवासासाठी गाडीच बुकिंग..! सोमनाथ – गिर जंगल
सफारी- गिरनार पर्वत..! माझं नक्की नसल्यामुळे अगदी संधी मिळाली तर ट्रेन
ने जायच नक्की केलं.. १३ मार्च ते १५ मार्च २०२०अंजलीने केलेल्या
पाठपुराव्यामुळे व आरबीआय वाले अजून यायचे पक्के करत नसल्याने ट्रेन ची
बुकिंग करून एकदाचे मोकळो झालो…!
१३ मार्च २०..! डुरंतो एक्स्प्रेस ने
राजकोट ला पोहोचलेलो..! माझ्यासाठी इथे येण्याची पहिलीच खेप सो उत्सुकता
वाढलेली..! तिथे माझे सवंगडी नुकतेच मुंबईहुन विमानाने निघालेले..! कोरोना
त्या काळात कुमारवयात असल्या कारणाने विमानाने येण्यास फारशी अडचण नव्हती
पण ह्या सगळ्यांनी तोंडावर मास्क च्या चोची लावलेल्या..! इकडे प्लॅटफॉर्म
वर उतरल्यावर माझ्या हाताशी दिड दोन तास होते सो निवांत होतो.. अंजलीने फोन
करून पिकअप गाडीवाला न्यायला येईल सांगितलेले नि मग इकडून त्यांना पिकअप
करायला राजकोट एअरपोर्ट… म्हटलं हाताशी बराच वेळ आहे व पाठीवर नेहमीची
ट्रेकला वापरतो ती सॅक आहे तेव्हा स्थानक फिरून घेऊया मग बाहेर फिरून येऊया
नाश्ता करूया वगैरे वगैरे.. स्थानकाबाहेर पडलो नि राजकोट बद्दल ज्या
अपेक्षा होत्या त्या अगदीच फोल ठरल्या.. दिसायला भकास परिसर.. ५ मिनिटाच्या
परिघात तर हॉटेलचं नाही.. होत्या त्या मंडप घातलेल्या टपऱ्या व तिथे खाऊन
जाण्यासारखे काही वाटले नाही.. काही अंतरावरच मग ‘अमृत’ मध्ये गुज्जू पेशल
ढोकळा फाफडा वगैरे नाश्ता केला नि पुन्हा स्थानकात आलो..ड्रायवर ला
येण्यास उशीर झाल्याने पुन्हा स्थानकात जाऊन बसलो.. ठरलेल्या प्लॅन मध्ये
प्रवासात अजून काय पाहता येईल ते गुगलू लागलो नि गिरनार वाटेवरच जवळपास
जुनागढ ला एक भुईकोट किल्ला असल्याचे सापडले.. ! ठरलं..
आता गाडी
एअरपोर्ट च्या दिशेने चाललेली.. इतर ड्रायवर काही कारणास्तव येऊ न शकल्याने
गाडीचा मालकच आलेला.. राजकोट स्थानिक असलेला हा पठ्ठ्या मी रेल्वे स्थानक
परिसराची अवेहलना केल्यामुळे भलताच नाराज झालेला नि मला समजवण्यासाठी
त्याने राजकोट चे गुणगान करणारे स्पेशालिटी सांगणारे पोवाडेच सुरू
केलेले..! त्या गप्पाटप्पा मध्ये त्या किल्ल्याचे स्थान जाणून घेतले नि
ठणकावून म्हटलं ‘उधरभी लेके जानेका..बाकी दोस्तलोग ना बोलेंगे फिरभी
जाऍंगे..!’
राजकोट एअरपोर्ट.. परिसर उत्तम..! दुपारी एक च्या सुमारास
चोची लावलेले सवंगडी आले.. गळाभेट झाल्या नि इथून खऱ्या अर्थाने प्रवास
सुरु झाला सोमनाथ च्या दिशेने…! विजू आता पुढच्या सीट वर असल्यामुळे
ड्रायवर च्या बडबड त्याला झेलावी लागणार होती..! जेवणासाठी राजकोट मध्येच
एका काठियावडी खानावळीत (नाव लक्षात नाही) जेवण घेतले..ड्रायवर च घेऊन
गेलेला पण जेवण एकदम उत्तम..!
आता ड्रायवर च राजकोट केव्हाच मागे
पडलेले..गाडीत अथांग गप्पाटप्पा व मनात येतील ती गाणी गुणगुणत आमचा सोमनाथ
च्या दिशेने प्रवास सुरु झालेला..! हर्षुचा नवरा अमित पण मिसळून गेला..
आम्हीदेखील शाळेच पहिलं रियुनियन व एक पिकनिक यांनातर प्रथमच एकत्र आलेलो
नि असा एकत्रित प्रवास करण्याची पहिलीच वेळ..! सो आमच्या उत्साहाला फारच
उधाण आलेले.. त्यातच बैंकेतून फोन आला आरबीआय ऑडिट वाले आलेत…! म्हटलं काय
योगायोग आहे.. हेच जर एक दिवस अगोदर आले असते तर सुट्टी मिळताना भलती
पंचाईत झाली असती..
समुद्र जवळ आला तस सोमनाथ मंदिर जवळ आल्याची चाहूल
लागली.. सायंकाळी ५ च्या सुमारास सोमनाथ मंदिर परिसरातील बुक केलेल्या
हॉटेलपाशी आलो..! इथे सोमनाथ मंदिर ट्रस्ट ची गेस्ट हाऊस उत्तम सोयीची
आहेत..
सांजवेळ ढळत होती म्हणून लगबगीने फ्रेश होऊन आम्ही समुद्र
किनाऱ्यावर गेलो तोच तिकडून पोलीस सगळ्यांना परतवून लावत होते..! पोपट..!
कारण काही कळले नाही पण अगदी दुकानं देखील बंद करायला सांगत होते.. बहुतेक
समुद्राच्या लाटा याजागी रौद्ररूप घेत असाव्यात म्हणून अंधारात धोका
टाळण्याचे कारण असावे हा आपला अंदाज..
आसमंतचे मावळतीचे रंग पुसट होत
गेले नि दूरवर पसरलेल्या या अथांग समुद्रकिनारी असलेले हे सोमनाथ मंदिर हे
जणू एक सुवर्णरत्न असल्यागत दिसू लागले.. कारण मंदिर परिसरातील रोषणाई व
त्या रोषणाईत उजळून निघालेले मंदिराचा कळस..!!

इथेच थोडीफार फोटुग्राफी करून आम्ही कॅमेरा ,मोबाईल इत्यादी सगळं सामान
नेण्यास मनाई असल्याने तिथे लॉकर मध्ये जमा केले व मंदिरात
निघालो..! ज्योतिर्लिंगांपैकी एक असे सोमनाथ मंदिर आतमध्ये प्रवेश करताच
भुरळ पाडते.. समोरच असलेले भव्यदिव्य देदीप्यमान असे शिवलिंग नजरेस पडते नि
आपसुकच उद्गार बाहेर पडतात – ओम नमः शिवाय..!! मंदिरात प्रवेश करण्यापासून
ते अगदी बाहेर पडेपर्यंत आपली नजर हटत नाही इतका तो सोमनाथ चा
प्रभाव..! याचं मंदिराच्या मागच्या बाजूस पंधरा वीस मिनिटांचा लेजर शो असतो
हे माहीत होतं.. तेवढ्या परिसरातील रोषणाई बंद केली जाते व मंदिराच्या
मागच्या भागावर लेजर लाईट्स या प्रकाशयोजनेचा वापर करून मंदिराबद्दलचा रंजक
इतिहासपट दाखवला जातो..! आमच्यातले विजुराजे एका भटजीकडून अभिषेक करत
असल्यामुळे आमची चुकामुक झाली नि परिणामी मी व विजू गोल गोल फिरत राहिलो..
नि त्या शो ची ५- १० मिनिटं अशीच फुकट गेली..!
आता जेवणाची वेळ..
त्यासाठी आमच्या हॉटेलच्या खालीच ट्रस्ट वाल्यांची जेवणाची सोय होती..पण
आम्हाला झालेला उशीर व तिथे असणारा गर्दी गोंधळ बघून आम्ही बाहेर पडलो..
आमचे स्वयंघोषित गाईड म्हणजे राजकोटी गाडीमालक म्हणाले चलो मेरे साथ…! नि
खरच दुपारच्या जेवणासरखीच इकडे उत्तम चवदार जेवण होत..!
दुसऱ्या
दिवशीच्या प्लॅन ची रूपरेखा आखून निद्रिस्त झालो..सकाळी साडे सहा च्या
सुमारास गाडीत बसलो नि पुढील गिर जंगल सफारी साठी रवाना झालो..! तत्पूर्वी
गाडीचालकाने त्रिवेणी संगम ची जागा दाखवली.. हिरण व कपिला या नावाच्या
नद्या जिथे समुद्राला येऊन मिळतात ती ही जागा… नुकत्याच झालेल्या
सूर्योदयामुळे फैलावलेली कोवळी किरणे व त्या किरणांमध्ये चमकणारे पाणी..
पाण्यावर बागडणारे समुद्रपक्षी… काठावर सूर्यदेवाला नमन करून पूजा करणारे
भक्त.. सारे दृश्य काही मस्त मस्त..!


थोड्याच वेळात भालकातीर्थ या मंदिराजवळ गाडी थांबली.. कथेनुसार श्रीकृष्णाने याच जागेवर देह सोडला.. झाडाखाली योग समाधी ला बसले असताना एका शिकारी हरीण समजून दुरून बाण(भल्ल) मारतो तो श्रीकृष्णाच्या पायाला लागतो..! झाल्याप्रकारामुळे भयभीत झालेल्या शिकारीला माफ करत श्रीकृष्ण हे सगळे इच्छेनुसार झालेय म्हणतात..! म्हणून या जागेला भालका(भल्ल) तीर्थ सँबोधतात..! मोकळा परिसर असल्यामुळे मंदिर खूप छान उठून दिसत.. ज्या झाडाखाली श्रीकृष्ण बसलेले त्याच झाडाभोवती मंदिर उभारलय..!!

आता आमची गाडी गिर अभयारण्याच्या दिशेने निघालेली.. पोहोचेपर्यंत
पावणे दहावाजलेले.. आवारात बरीच वर्दळ।होती.. पिंजरे लावलेल्या जीपमध्ये
माणसांना बसवून जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या पशुपक्षी बघायला नेले जात
होते..त्यात तेथील प्रत्येक गाडीसाठी नेमून दिलेला गाईड त्या त्या
गाडीतल्या प्रवाशांचे तिकीट परमिशन चेक करण्यात व्यस्त.. अशातच आमची
आवश्यक कागदपत्रे मंजूर झाली (ऑनलाइन बुकिंग आधीच केलेलं) व आमच्यासाठी
पिंजरेवाली जिप्सीगाडी वनखात्याचा चालक व नेमलेल्या गाईडसकट हजर झाली..
आमची बुकिंग देवालिया सफरसाठी (वेळ १तास) होती..

आखून दिलेल्या रस्त्याने जिप्सी संथ वेगाने जात होती व आम्ही सिंह
दिसतोय का हे बघत होतो..दरम्यान कोल्हे, काळवीट, हरीण नजरेस पडले.. काही
अवधीतच सिंह (नर व मादी) असल्याची चाहूल लागली… ठराविक अंतरावर गेले असता
ते जोडपं उन्हात झोपले होते सो निराशाच झाली.. पण गाईडने सांगितले ऊन
वाढतंय तस उठून सावलीत जातील..नेमकं तसेच झालं.. बाजूच्याच झाडाच्या सावलीत
जाईपर्यंत दोनेक मिनिटांची त्यांची चाल झोपेतली का असेना पण जंगल राजाला
साजेशी अशी रुबाबदारच वाटत होती..!


पुढे एका मोठ्या विहिरसदृश खड्ड्यात ठेवलेल्या बिबट्याचेही दर्शन झाले नि तासभराची सफारी फेरी संपुष्टात आली..! याचबरोबर अंजलीच्या डीएसेलार कॅमेऱ्याच्या लेन्स ला तडा गेल्याचे कळल्यामुळे कॅमेरा ची लेन्स बॅगेत गेली..!!
जंगलातून बाहेर पडून जिप्सी जंगलाच्या वेशीवर बांधलेल्या विश्रामगृह
मध्ये घेऊन गेली १५ मिनिटांच्या ब्रेक साठी.. इथे नाष्टापाण्याची सोय
आहे.. सभोवताली छान गार्डन आहे व माणसांनी खाऊ देऊन देऊन आळसावलेली माकड
सुद्धा अमाप आहेत..

इथे खाणंपिणं उरकून फोटोग्राफी करून गीरच्या मुख्य प्रवेशद्वारी परतलो.. नेमकं लक्ष तेथील एका दुकानात गेले जिथे वन्यजीवसंबंधित प्रिंटेड टीशर्ट टोपी वगैरे होते..

खरेदीसाठी खासच आहे हे दुकान..! शेवटी एक आठवण म्हणून परिसरात एक ग्रुप फोटो घेतला व आता आमच्या अंतिम ध्येयाकडे निघालो… गिरनार..!
जुनागढ
येईस्तोवर राजकोटी गाडीचालकाची पुन्हा बडबड सुरू झाली… आणि त्याच्या
बोलीभाषेला विजू पण चांगलाच सरावलेला.. दोघांची अध्येमध्ये जुंपत पण होती व
आम्ही मजा घेत होतो.. आता आमचा जठराग्नी चांगलाच भडकलेला.. नि आतापर्यंत
गाडीचालकाने सुचवलेले हॉटेल्स चांगले निघाल्यामुळे आताही त्याने सांगितलेले
गीता हॉटेल गाठले.. या हॉटेलची स्तुती आधीच कुठेतरी ऐकलेली..नि खरच इथलं
थाळी जेवण मस्तच होत..
जेवण झाले नि सगळे सुस्तावले.. पण इथे माझ्या अजेंडात असलेल्या किल्ल्यावर जायचे आधीच ठरलेले..! उपरकोट किल्ला..! चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात निर्मिलेला व चुडासामा च्या राजाने पुनर्बांधणी केलेला हा अतिप्राचीन किल्ला..! वाटलं थोडाफार असेल किल्ला..पण वस्तीच्या एका कोनाड्यात असलेला हा परिसर मुख्य बुरुजापासून एवढा पसरलेला आहे की बस्स.. आमच्या सवंगड्यांनी शेवटी शेवटी नांगीच टाकली…! तत्पूर्वी दोन तोफा, भूगर्भात दोन मजली खोदलेली चकीत करणारी बौद्धकालीन लेणी, पायऱ्यांची खोलवर गेलेली अचंबित करणारी विहीर ( पण पाण्याऐवजी प्लास्टिकचा कचरा भरलेला) आणि एकीकडे जमिनीत दगडात खोदलेली वर्तुळाकार विहीर इति पाहिले…!

एव्हाना गर्मीमुळे त्रस्त झालेलो व सवंगडीना आता अजून फिरणं नको होतं.. त्यात पुढच्या दिवशी गिरनार चढायचं होत.. त्या पर्वताच्या उंचीचा अंदाज मघाशी पायऱ्यांची विहीर पाहिली तेथून घेतलाच होता.. इकडून पर्वत असा समोर उभा दिसतो…

आमची गाडी फार अलीकडे लावलेली अन्यथा किल्ला परिसरात गाडीने देखील फिरण्यास रस्ता होता.. सो गाडीवाल्याला आत येण्यास सांगितले.. मगाशी तोफा पाहिल्या तिथेच बाजूला ‘महल’ व पडीक मस्जिद आहे.. बाकी कोणी येण्यास उत्सुक नव्हते सो अस्मादिक व अम्या पाहण्यास गेलो.. नि खरच मस्त आहे..छतावर जाण्यास पायऱ्या, आतमध्ये कोरीव काम, रेखीव खांब, आकर्षक खिडकी…


पाहून एकदम खूष झालो..एकंदर फोटोशूट ला साजेशी अशी मस्त जागा..! सो या
भागातच सेल्फी लवर्स, वेडिंग शूट करणाऱ्यांची वर्दळ जास्त ! मुख्य प्लॅन
मध्ये समाविष्ट नसलेला हा उपरकोट किल्ला बघितल्याचे समाधान वेगळेच..!
संध्याकाळ
होईस्तोवर आम्ही आता गिरनार च्या पायथ्याशी आलेलो.. जवळच एक जानकी
नावाच्या हॉटेल मध्ये बुकिंग केलेलं..वामकुक्षी घेऊन ताजेतवाने होऊन
संध्याकाळी ७- ८ च्या सुमारास थेट जेवायलाच बाहेर पडायचे ठरले… ! रात्री
अडीच तीन च्या सुमारास चढाई सुरू करण्याचा प्लॅन होता.. सो तत्पूर्वी आराम
महत्वाचा..! आराम करून संध्याकाळी जवळपासच्या हॉटेलात जेवण घेतले..मार्च
महिना असला तरी आता रात्री गारवा जाणवत होता…या परिसरात पर्वत चढताना
आधारासाठी काठ्या विकतात व भाड्यावरही पण मिळतात.. ते घेऊन आम्ही हॉटेलात
परतलो..
पर्वतावर चढताना लागणाऱ्या पायऱ्या आमच्या हॉटेलपासून १०-१५
मिनिटांच्या अंतरावर होत्या सो तेवढी चाल वाचवण्यासाठी तिथपर्यंत गाडी
नेण्याचे ठरले..! सेव एनर्जी… : D . लागणारे मुबलक पाणी-खाऊ व टॉर्च इति
अत्यावश्यक सामान घेऊन आम्ही सॅक तयार करून ठेवल्या.. व झोपी गेलो।
हॉटेलच्या खिडकीतून पर्वतावरील रात्रीचे लाईट्स लक्ष वेधून घेत होते..आता
काही क्षणांचा अवधी उरलेला..
पहाटे अडीच च्या सुमारास एका टपरीवर चहाचा
घोट झाला व आम्ही पहिल्या पायरीजवळ येऊन पोहोचलो..! परिसर एकदम शांत..अजून
तरी चढाई साठी फार कोणी आलं नव्हत.. पण वारे जोरकस सुरू होते.. तोच काय
तो आवाज..!’जय गिरनार’ चा जयघोष करून सुरवात केली.. ! आमच्या ५ जणांमध्ये
पर्वत चढण्यास जास्त टेंशन हर्षु ने आधीच घेतलेलं.. कारण गुडघेदुखीचा
त्रास..! मागे कधीतरी पाय दुखवल्याने तिला थोडं चालताना त्रास व्हायचा नि
एवढा पर्वत चढण्याचा अनुभवही नव्हता.. अस तर मी सोडले तर बाकी कुणालाच
अनुभव नव्हता.. अंजुच थोडाफार ट्रेकिंग सुरू होत तर एकेकाळी ट्रेक करणाऱ्या
विजूने गेले कित्येक वर्षे डोंगराची वाट धरली नव्हती… थोडक्यात आम्ही मस्त
रमतगमत जाणार होतो व किती वेळ लागेल हे ठाऊक नव्हते…!
पायऱ्या चढताना
अंतरा-अंतरावर लाईट्स आहेत.. अगदीच अंधार नसला तरी सोबत टॉर्च होती ते
उत्तम.. चढत जसे वर सरकत होतो तस हवेचा वेग वाढत होता.. इथेच ही अवस्था तर
वरती काय असेल याचा अंदाज आला.. आकाशातील चंद्र मावळतीला झुकलेला.. पण
त्याचा मंद प्रकाशदेखील सुखावत होता..! आमच्याखेरीज चढणाऱ्या भक्तांऐवजी
वरती टप्प्या टप्प्यावर असलेली दुकान उघडायला जाणाऱ्या दुकानदारांची लगबग
सुरू होती.आम्ही चढण्यास सुरुवात करून तासही उलटला नव्हता.. तोच डोलीवाले
दोघेजण हजर झाले.. कारण आमच्यात हर्षू मागे पडत होती… पण तिच्या मनात डोली
वगैरे करून जाण्याचा काही विचारच नव्हता.. शिवाय तिचा नवरोबा अम्या साथीला
होता.. ह्या दोघांनी त्या डोलीवाल्यांना आवश्यकता नाही म्हटले पण तरीदेखील
ते दोघे आमच्या ग्रुपच्या मागेपुढे घुटमळत होते.. हे म्हणजे अगदी शिकार
समोर असल्यावर पाळत ठेवण्यासारख होत…! म्हटलं येउदे आपण लक्ष नाही द्यायचं
बघूया कुठपर्यंत येतात ते….. हर्षुचा हौसला वाढवण्याच आमचं काम सुरूच
होत..आगरी बाणा दाखवायची हीच संधी आहे सांगून प्रोत्साहित करत होतो..!

आम्ही आता पायरीचा एकेक टप्पा पार पाडत थांबत थांबत एकत्र कूच करत
होतो.. एव्हाना आजूबाजूची झाडी वगैरे दूर होऊन आम्ही आता कातळाला भिडलेलो..
मागे वळून पाहिले तर पायथालगतच्या लाईट्समुळे चांदण्या भूतलावर
अवतारल्यागत वाटत होते.. आता दूर दूरचा नजारा म्हणजेच अंधारात मिणमिणते
प्रकाशदिवे नजरेस पडत होते..
आता अंगावर येणारे चढ सुरू झाले..
पायऱ्यांचे टप्पे लांबलचक होऊ लागले…आमच्या मागून येणारे पण पुढे जात होते
पण आम्ही निश्चीन्त होतो.. चार -पाच जणांचा एक ग्रुप प्रत्येक पायरीवर
मेणबत्तीने कापूर पेटवत पुढे जात होता…!! खर तर वाराच इतका जोरकस होता की
मेणबत्ती ची ज्योत पेटती ठेवण हेच मोठं दिव्य काम होत.. एक जोडपं तर लहान
बाळाला अंगावर घेऊन चढत होत..!! तर एक काका चक्क उतरायला घेत होते.. म्हटलं
एवढ्या लवकर कस दर्शन?? तर कळलं ते सावंतवाडीचे.. इकडे कुठे तरी कामासाठी
आलेले सो त्यांना वाटलेलं मंदिर खुल असेल म्हणून रात्रीच चढून गेलेले कारण
सकाळी त्यांना गावाकडे जायची बस होती..!! दर्शन घडले नाही तरी चेहऱ्यावर
निराशा नव्हती.. गुरुशिखर दर्शनाने आनंदी होते…!!
आम्ही आता जैन
मंदिराच्या परिसरात आलो.. इकडे बरच बांधकाम केलेलं आहे.. आणि चढ देखील इथे
ब्रेक घेतो..तितकंच दम घ्यायला उसंत मिळते..असही आता वरती किती अंतर आहे
याचा अंदाज घ्यायचा सोडून दिलेलं..!
काही तासभरातच आम्ही अंबाजीदेवीच्या
मंदिरापाशी येऊन पोहोचलो.. इथवर येईस्तोवर अंधुकस उजाडल होत…आणि
पूर्वेच्या बाजूस पाहिलं तेव्हा आमचे ध्येय एकदम सामोरे आले…!!!
आसमंतची
पूर्वकिनार तांबडा- तपकिरी रंगांच्या छटांनी उजाळून गेलेली…वारा
चोहुबाजूंनी पिसाळल्यागत घोंघावत होता… उजडणाऱ्या नव्या दिवसाच्या
स्वागताची जय्यत तयारी सुरू होती… आणि ह्या प्रभात-कल्लोळात मात्र
नजरेसोमरील दोन स्थितप्रज्ञ शिखरे लक्ष वेधून घेत होती… एकमेकांना बिलगून
उभी असलेली ही शिखरं व त्या दोन्ही शिखरांच्या माथ्यावरील मंदिराच्या
घुमट्या ह्यांच्या आकृत्या बघता क्षणीच एकदम काळजात जाऊन बसल्या…! एक
वेगळाच हुरूप मिळाला…! एक वेगळ्याच जगात आल्याची अनुभती.. !

आम्ही जिथे देवीच्या मंदिर परिसराजवळ पोहोचलो तोदेखील डोंगरमाथाच
होता जो खालून कुठूनही दिसतो.. पण पालिकडचे हे दोन मुख्य शिखर इथवर
येईपर्यंत नजरेस पडतच नाही..! पहिल्या शिखराच्या माथ्यावर गोरखनाथ मंदिर व
त्याच्या मागील अधिक उंचीवर असणाऱ्या शिखरावर श्रीदत्तगुरुंचे मंदिर…..!!
निव्वळ अप्रतिम !
आणि इथे भणाणता वाऱ्याचेच राज्य..कान वाजवून टाकतो..!
चोहुबाजूंनी इकडे तिकडे लोटू पाहणारा वारा काही सुचायला देत नाही… ह्या
वाऱ्याशीच लढा देत आता पुढची वाटचाल करायची होती… समोर तांबड्या प्रकाशात
लखाखणारी शिखर तुम्हाला साद घालतात..प्रेरित करतात…! हर्षु ने हळुहळू का
होईना पण आतापर्यंत आमच्यासोबतच यशस्वीरीत्या वाटचाल केली होती.. आणि
थोडीशी उसंत घेऊन ती व अम्या पुढे निघाले पण..!! क्या बात क्या बात…!
बाकी आम्ही उर्वरित त्रिकुट इथे काहीतरी खाऊन घेऊ म्हणून थांबलो… त्यात
मला ससे पकडण्याची इच्छा झाली .. पण माथ्यावर झुडूप होतीच कुठे जवळपास..
आणि विचारपूस केली तर टॉयलेटसाठी काहीच सोय नाही…! सह्यभटकंतीचा अनुभव
गाठीशी होता सो काम उरकून घेेण्यासाठी कड्याला बिलगून असलेल्या ढिसाळ
उतारावर हातभर खाली उतराव लागलं..! इतक्या उंचीपर्यंत भक्कम पायऱ्या
बांधल्या गेल्या… दुकान थाटली गेली… मग ही सोय का नाही.. महिलांसाठी मोठ्ठी
गैरसोय..!! थोडस विचित्रच वाटलं… अजून एक खिन्न करणारी गोष्ट म्हणजे
प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच…वाऱ्यासोबत इकडून तिकडून गिरक्या घेत शेवटी
आजूबाजूच्या दरीत झेपावत होत्या..! असो आम्ही टपरीवर गरम चहा व थंड भजी
खाऊन घेतली… वाराच एवढा की इथे गरम कितपत राहत असेल हाच प्रश्न होता..!
इकडून
आता गोरखनाथ शिखरापर्यंतचा मार्ग म्हणजे एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर
जाणारी म्हणायला बऱ्यापैकी सरळ अशी सोंडच होती.. अंतर अगदी जेमतेम पण
सोंडेवरची चाल सो दोन्ही बाजूने येणारा वारा तुम्हाला लगबगीने जायला भाग
पाडतो..
गोरखनाथ शिखरावर पोहोचलो… ! अरुंद जागेत अगदी छोटी घुमटी असलेले मंदीर..! दर्शन घेऊन आता लक्ष पुढील शिखराकडे गेले…!
हाच
अंतिम टप्पा…! गुरुशिखर अगदी समोर..! रौद्रभीषण असा कडा… त्या कड्यावर
नेणाऱ्या भयावह वाटणाऱ्या अश्या पायऱ्या…. आणि शिखरावर श्रीदत्तगुरूंचे
मंदिर….!! दर्शनासाठी खडतर मार्ग… तुमच्या श्रद्धेची, भक्तीची कसोटी घेणारा
हा मार्ग… या गुरुशिखरापर्यंतची वाटचाल अगदी अशक्यप्राय वाटत असली तरी
स्वतःवर असणारा विश्वास व मनातील निर्मळ भक्तिभाव तुम्हाला इथवर
पोहोचवतो…!! बऱ्याचजणांकडून ऐकलं होतं..आज अनुभवत होतो.. बघत होतो…!

हर्षु -अमित जोडीने एव्हाना पुढची वाटचाल सुरू केलेली..इथून पायऱ्या
पुन्हा खाली उतरतात आणि गुरुशिखरासाठी पुन्हा वर चढतात.. पायऱ्यांची
उंचीही आता वाढलेली… वाऱ्याने इथवर येईपर्यंत आपले कान चांगलेच वाजवलेले
असतात…आता मात्र लोटून देईल की काय इतका जोरकस वारा सुरू झालेला…!! अंतिम
टप्प्याच महत्व पटवून देत होता… !
गुरुशिखराच्या खाली आलो…इथेच एक काका
भेटले… विजू व मी त्यांची सहज विचारपूस केली तर कळले की ते निवृत्तीनंतरचा
काळ भटकंतीमध्ये व्यतीत करत होते…! गिर्यारोहण हा त्यांचा आवडत विषय
कळल्यावर गप्पाच सुरू झाल्या आमच्या….डोंगर गड किल्ले ग्रुपसोबत जात असले
तरी गिरनार ला मात्र एकटेच आले होते… चौथी का पाचवी वारी होती… ग्रेट..!
आणि या वयात त्यांना मनासारखे भटकायला देऊन सपोर्ट करणारे त्यांची घरची
माणसं पण ग्रेट..!
आता पुढे दोन कमानी लागल्या..एकीकडून गुरूशिखराच्या किंचित खाली
असलेल्या आश्रमाकडे वाट जाते तर दुसऱ्या कमानीतून पायऱ्या वरती
मंदिरापर्यंत नेतात…आपसूकच पहिले आम्ही मंदिराकडे वळलो..! कमाल म्हणजे
हर्षु व अमित ही जोडी आमच्यामध्ये पुढे होती.. बाकी मी विजू व अंजु मस्त
रमत गमत चाललेलो…
वेळ अंदाजे सकाळी आठ वाजता… कोवळे लख्ख ऊन पडलेले… पण
विलक्षण वारा असल्यामुळे ते उनदेखील फिके पडलेले…मंदिर आता अगदी तीसेक
पायऱ्यांच्या अंतरावर…! ये जा करणारे भाविक त्या तडाखेबाज वाऱ्याला लढा देत
अगदी हाताचा पण वापर करत लगबगीने चढत उतरत होते…! गोंगाट होता तो फक्त नि
फक्त वाऱ्याचा…! तुम्ही नक्कीच एका अद्भुत जागेत आल्याचे आपसूकच जाणवते…!!
श्रीदत्तगुरूंच्या
चरणांनी पुण्यवत झालेली ही भूमी…! श्रीदत्तगुरुंच्या पादुकांचे दर्शन झाले
नि नतमस्तक झालो…! पादुकांच्या मागेच गुरूंची प्रसन्न मूर्ती..! अरुंद
जागेत बांधलेले हे मंदिर अगदी साधे… पण या जागेची महती सहजतेेने लक्षात
येते.. खाली आश्रमातून प्रसाद घ्या असे पुजारीने सांगितले.. हा पुजारी
अगदी कापड गुंडाळून शांतचित्ताने बसलेला होता..!
आम्ही पुन्हा
कमानीपाशी आलो..आता आश्रमासाठी पुन्हा काही पन्नासेक पायऱ्या खाली उतरायचे
होते..! हर्षुला शक्य नसल्यामुळे ती व अम्या हळूहळू पुढे जातो म्हणाले..!
अंजु त्या कमानी जवळच माझी व विजू ची वाट बघत बसते म्हणाली..!
याच आश्रमाबद्दल सांगायचे तर इथे एक धुनी आहे जी दर सोमवारी मंत्र वगैरे
म्हणून प्रज्वलित केली जाते अस ऐकून होतो… रविवार असल्यामुळें काही पाहता
येणार नव्हतं..असो आम्ही दर्शन घेऊन दक्षिणा दिली नि निघणार तोच बाबा
म्हणाले प्रसाद घेऊन जा..त्याने एका खोलीकडे बोट दाखवले..मी व विजू गेलो तर
तिकडे ताट वाढत होते.. अन्नछत्र होते…!! सेवक खूप कडक शब्दात बोलताना
दिसले.. शिस्त म्हणजे शिस्त.. एकतर एवढ्या उंचावर अस अन्नछत्र चालवणे खूप
कठीण काम.. त्यांच्या मेहनतीला दाद देऊन एकही अन्नाचा दाणा वाया जाऊ न देणे
हे आपले काम..!! खरच चवदार होत जेवण..!! अशीही भूक लागलेली नि अकस्मात
आम्हाला खायला मिळाले..पण आम्ही फार वेळ न दवडता लगबगीने आटपल कारण अंजली
तिकडे वाट बघणार होती…!! याच आश्रमाच्या बाजूला कमंडलू नावाचे कुंड आहे पण
तिथे जाणारा मार्ग बंद होता..!
जवळपास पाऊण तास गेला असेल वाटलं होतं
अंजली वैतागून निघाली असेल पण मॅडम थांबलेल्या..! कमिटमेंट म्हणजे
कमिटमेंट..!! हर्षु – अमित ची जोडी एव्हाना खूप पुढे निघून गेल्यामुळे
दिसतही नव्हती.. ! अखेरीस आम्ही त्यांना पुन्हा अंबाजी माते मंदिराजवळ
गाठलंच..! इथेच मग चहा बिस्कीट झाले नि उतरायला घेतले…!
आता ऊन बरच
चढलेल सो खरी कसोटी आता होती…तरी आम्ही गप्पाटप्पा।करत उतरत होतो…आता मात्र
हर्षु हतबल झाली होती पण नेटाने उतरत होती… तिच्या मागे पुढे राहत आमचं
उतरण सुरू होत. पण दुपारचे १२ वाजले तसा उन्हाचा ज्वर वाढू
लागला..कातळदेखील तापून गेला..हळूहळू उतरण्यामुळे नाही म्हटलं तरी आम्ही तस
दोनेक तास मागे पडलेलो.. एकंदर हाताशी वेळ बघता नि आमची राजकोट हुन
परतीच्या ट्रेन ची वेळ बघता आम्ही त्रिकुट पुढे जाण्याच ठरलं..! हर्षु
अम्या येईपर्यंत निदान आमचं आटपून होईल व ड्रायव्हर ला पायऱ्या सम्पतात
तिथे गाडी ने पाठवता येईल ..!अम्याला आधी तस विचारून पाहिलं…अगदी डोली
घ्यायची का हे पण विचारून झालं.. पण हर्षु नाही म्हणाली.. गंम्मत म्हणजे
डोली वाल्यांकडे चौकशी करताना कळलं की त्यांचे दर माणूस किती वजनाचा आहे व
कोणत्या पायरीवर आहे त्यानुसार ठरत.. त्यांची मेहनत असली तरी त्यांचे दर
ऐकून पायी चाललेल् उत्तम वाटेल…
अंगाची चांगलीच लाही झालेली..! आणि
आम्ही शेवटची पायरी उतरलो…!! ड्रायवर ला गाडी घेऊन यायला सांगितलेच होते…२
वाजून गेलेले…!! विजूला एका मसाज वाल्या मामाने पटवले नि त्या माणसाला घेऊन
आम्ही हॉटेलवर…!! पायऱ्या उतरलो की मसाजवाले सशुल्क सेवेसाठी विचारतात..!
विजूला उघडा झोपवलंय नि ते मामा मस्त चोपताहेत..! विजू शिव्या घालतोय अस
नाही तस, तस नाही असं…नि मामा म्हणतात मी सांगतो तसच… आपण कधी असल्या
फंद्यात पडलो नव्हतो सो मी मस्त मजा घेत बघत होतो यांचा खेळ .. 😀
वाटलं
होतं हर्षुला खूप वेळ लागेल पण अम्याने तिला बऱ्यापैकी लवकर आणलं…हर्षुने
खरच आगरी बाणा दाखवत आवाहन पार पाडलेल..सो सगळ्यांनीच कौतुक केलं चिअरप
केलं..!!
आमची गाडी आता राजकोट च्या दिशेने निघालेली.. उशीर झाल्याने
जेवण न करताच निघालेलो.. आता थेट ट्रेन मध्ये गेल्यावर ऑर्डर करू अस
ठरलेलं… पूर्ण सफारीत कोरोनाच भय विसरून गेलेलो… पण आता मोबाईल वर अपडेट
बघताना प्रकरण वाढत चालल्याचे कळू लागले… सगळंच बंद होणार अश्या बातम्या
थडकू लागलेल्या…त्यातच रेल्वेकडून आम्हाला मेसेज आले… नो फूड सर्व्हिस…!!
नो ब्लॅंकेट्स…!! म्हटलं बोंबला आता..!
आम्ही आता प्लॅटफॉर्म वर ट्रेन गाठलेली..! सुटायला वीसेक मिनिटं उरलेली …
प्रश्न फक्त खाण्यापिण्याचा होता…! त्यासाठी विजू स्टेशननजीकच्या एका
हॉटेल मध्ये पार्सल घेण्यासाठी उतरलेला..त्याचीच वाट बघत बसलेलो.. तो
एकदाचा वेळेत आला नि आम्ही निर्धास्त झालो.!
काही मिनिटातच गाडी
सुटली…! धमालमस्तीने रंगलेली.. देवदर्शनाने मानसिक समाधान लाभलेली…मैत्रीची
गुंफण अधिकच दाट बनवलेली अशी ही सफर अगदी यादगार बनली…!! मुंबई सेंट्रल ला
गाडी सकाळी पोहोचली नि लवकरच पुन्हा कधी तरी भेटू फिरायला जाऊन म्हणून
एकेमकांचा निरोप घेतला…!!

https://yorocks.wordpress.com/2021/04/25/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%85/
पार्श्वभूमी:
आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टींचा ध्यास घेतला असतो. ती गोष्ट पुरी करण्यासाठी आपण जीवाचे रान करुन ते ध्येय गाठतो. पण कधीतरी असेही होते की कसलीही इच्छा, योजना मनात नसतांना एखादी गोष्ट आपसुक आपल्या पुढ्यात येऊन ठाकते आणि आपण अगदी झपाटल्यागत त्या मागे लागतो. ती पुरी करण्याच्या दॄष्टीने योग्य ती कार्यवाही अगदी नकळत घडून येते. घरात एखादं पक्वान्न बनवलं असतं आणि आई ते पक्वान्न आपल्या बाळाने खावं म्हणून आग्रह करत असते, पण अजाणतेपणामुळे बाळ मात्र नको नको म्हणत आढेवेढे घेत असतं. शेवटी आई बाळाचा हात धरुन स्वहस्ते त्याला भरवते आणि ती अवीट गोडी चाखतांच बाळाला जो आनंद होतो त्याचे वर्णन शब्दातीत असतं.
ऑगस्ट अर्थात श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माझ्याकडून गिरनार पर्वताची यात्रा घडली. त्याची कहाणीही थोडीफार अशीच आहे. ही यात्रा अगदी पाच सहा दिवसांची असली तरी तो प्रवास माझ्या मनात त्याआधी तीन महिन्यांपासून सुरु झाला होता. या प्रवासात जे जे घडले ते तुमच्याबरोबर शेअर करावे तसेच हा अनुभव कायम स्मरणात रहावा यासाठी हा लेखनप्रपंच.
हे निव्वळ प्रवासवर्णन नाही. तर त्याला माझ्या विचारांची,अनुभवांची जोड आहे. वर लिहिल्याप्रमाणे मूळ प्रवासाच्या ३ महिने अगोदर ज्या आणि जशा घटना घडून आल्या आणि ध्यानी मनी नसलेली ही यात्रा माझ्याकडून घडवली गेली त्याचे मला जसे जाणवले तसे वर्णन यात असेल. या लेखनमालिकेचा 'श्रद्धा' हाच मूळ गाभा आहे, हे लक्षात घेऊनच हे वाचाल तर हे लेखन अधिक भावेल असं वाटतं.
साधारण फेब्रुवारी महिन्यात माझा चुलत भाऊ माझ्या घरी आला होता. त्या वेळी त्याने 'दत्त अनुभुती' नामक एक पुस्तक मला भेट दिले. "वाच तुला नक्की आवडेल", असं म्हणाला. यात काय आहे? असं विचारताच या पुस्तकाच्या लेखकाने गिरनार पर्वताच्या ११ वार्या केल्या आहेत आणि त्या दरम्यानचे अनुभव यात लिहिले आहेत हे सांगितलं त्याने. “मी वाचेन” म्हणून ते पुस्तक असंच टीपॉयमध्ये इतर पेपरांसोबत ठेवून दिले आणि त्याबद्दल विसरून गेले. या घटनेला तीन साडेतीन महिने उलटून गेल्यावर १८ मे या दिवशी घरात एकटी असतांना अचानक मला या पुस्तकाची आठवण झाली. लगेच ते वाचायला घेतले. अक्षरशः ते खाली ठेववेना, इतके थरारक अनुभव त्यात लिहिले होते. तोवर मला गिरनार नामक एक उंच पर्वत असून तिथे दत्तगुरुंचे जागॄत स्थान आहे जिथे गीरच्या जंगलातून जावे लागते,इतपत जुजबी माहिती होती. मात्र हे पुस्तक वाचत असतांना बर्याच गोष्टी कळल्या. काही शंका कुशंका मनात आल्याही ज्यांचे निरसन गूगल भाऊंनी केले. दहा हज्जार पायर्या चढून या दत्तगुरुंच्या स्थानी पोहोचता येते हे वाचताच "माझा आपला इथूनच नमस्कार घे दत्तबाप्पा" हे सहजोद्गार निघाले. याचं कारण मी मुळात श्रद्धावान असले तरी आवाक्याबाहेर असलेली शारिरीक मेहनत घेऊन, खूप उंच चढून किंवा खूप वेळ चालत त्याचप्रमाणे तासंतास रांगा लावून देवदर्शन घेणार्यांतली नाही. देव तर आहेच ना सर्वत्र , मग काय गरज आहे इतका त्रास करुन कुठे जायची हे असं साधं सोपं लॉजिक मी नेहमी लावत आले आहे. त्यामुळे गिरनारबद्दल काही वेगळे घडण्याची सुतराम शक्यता माझ्या बाबतीत नव्हती. पण.....
तसे घडायचे नव्हते………..
हे पुस्तक वाचल्यापासून गिरनार माझ्या डोक्यात घोळू लागाला. दुसर्या दिवशी नेटवर गिरनार बद्दल माहिती वाचून काढली. यू ट्युबवर काही व्हिडीओज पाहिले. पुस्तक वाचून आवडल्याची पोच रविवारी रात्री भावाला व्हॉटसअपवर दिली. त्याच्याशी चॅटींग करत असतांना सहज बोलून गेले की “हे पुस्तक वाचल्यापासून एकदातरी गिरनारला जावंस वाटतंय रे”. त्यानेही थम्ब्स अप ची स्मायली पाठवली आणि मी झोपले. दुसर्या दिवशी स्वप्नात मी स्वतःला गिरनार पर्वत चढत असलेलं पाहिलं. दोन दिवस सतत हेच विचार करतेय त्याचा परिणाम म्हणून असले स्वप्न पडले असणार असा विचार करतच सकाळी उठले. दूध तापत ठेवले असतांना सहज म्हणून फोन हातात घेतला, नेट ऑन केलं. सर्वात पहिले दिसला तो भावाचा मेसेज की श्रावण महिन्यात २४ ते २९ ऑगस्ट गिरनार यात्रा,इतर माहिती आणि लवकर नावे नोंदवण्याची सुचना. माझ्या भावाची मेडीकल कॉलेजातील मैत्रीण, जी स्वतः ज्या ग्रुपसोबत गिरनार यात्रा करुन आली होती तिने याच ग्रुपच्या पुढच्या यात्रेसंबंधित माहिती माझ्यासाठी भावाला पाठवली होती.
आपलं स्वप्न खरं होऊ घातलंय की काय असं मनात येऊन जीवाची उगीचच तगमग होऊ लागली. का कोण जाणे पण आपण गिरनारला जावं असं वाटू लागलं, पण त्याचबरोबर दहा हजार पायर्या समोर दिसू लागल्या. हे काही आपल्याला झेपायचे नाही. लहानपणापासून आजतागायत कधीच कुठला मैदानी खेळ, नियमित व्यायाम काहीही न केलेली मी, आता एकदम दहा हजार पायर्या कशा काय चढणार? याबद्दल साशंक होते, नव्हे माझ्या आवाक्यातलं हे नाहीच अशी खात्री होती.पण आतला आवाज काही वेगळं सांगत होता आणि ते म्हणजे प्रयत्न तर करुया, इतके लोक जाऊन आले आहेत की.कदाचित जमेलही आपल्याला. द्विधा मनःस्थिती झाली. लेकाचे दहावीचे वर्ष, त्याला फक्त आईंसोबत ठेवणे नवर्याला योग्य वाटेना, आईंचे ही वय झाले आहे. मग नवरा म्हणाला की तुझी मनापासून जायची इच्छा दिसतेय तर तू जा, मी आणि आई मिळून घरचं मॅनेज करु. तरीही अशा अनोळखी ग्रुपसोबत एकटं जायला मन धजावत नव्हतं. गिरनार चढाई ग्रुपनेच करतात. तो रात्री चढला जातो त्यामुळे शक्यतो लोक ग्रुपनेच जातात. माझं हो /नाही अजूनही नक्की ठरत नव्हतं. शेवटी भावाशी बोलले. त्याने त्याच्या मैत्रिणीशी बोलायला सांगितलं. तिने अगदी आश्वस्त केलं, की “बिनधास्त नाव दे, तुला घेऊन जाणारा 'तो' आहे इतकं लक्षात ठेव, बाकी कसलीही शंका मनात आणू नकोस”. बस्स ! मनाचा निर्णय झाला होता की आता मागे पहायचं नाही, फक्त कुणाची तरी सोबत हवीशी वाटत होती. ऑफिसमधली माझी एक मैत्रीण गुजराती आहे, देवभोळी आहे. ती येईलसे वाटले. ऑफिसमध्ये पोचताच तिला अमुक अमुक तारखांना गिरनारला येशील का? विचारले. क्षणाचाही विलंब न लावता तिने होकार दिला आणि मी आमच्या दोघींचं नाव रजिस्टर केलं. नाव देऊन पैसे तर भरुन ठेवू, जाणं, न जाणं पुढे बघू असाच विचार करुन.
का माहीत नाही एकदम शांत, निवांत वाटू लागलं. मनाची दोलायमान अवस्था शमली होती.पण खरी कसोटी आता सुरु होणार होती. ती म्हणजे इतक्या पायर्या चढून उतरण्यासाठी शरीराला आणि मनालाही तयार करणे. तीन महिने माझ्या हातात होते. स्वतःच्या शारिरीक क्षमतेबद्दल खात्री होती की हे माझ्याच्यानं होण्यासारखं नाही. त्यात कॉलेस्टेरॉल वरचेवर धोक्याची पातळी गाठत असतं माझं. आपल्यामुळे ग्रुपमधल्या कोणाला त्रास होऊ नये असं वाटत होतं.जे आधी जाऊन आले होते ते ट्रेकर्स वगैरे, ज्यांच्या गाठीशी असे डोंगरमाथे पालथे घालण्याचा मुबलक अनुभव आहे. माझ्यासारख्या ‘कच्च्या लिंबू’ कॅटेगरीतलं कोणी चढून गेलंय याबद्दल काही माहिती मिळत नव्हती.शेवटी मनाशी निर्धार केला की गिरनारची वारी ‘दत्तगुरुंच्या’ इच्छेनेच पुरी करता येते ही वदंता आहे, ते निर्विवादपणे खरं, तरीही आपण आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवायचे, स्वतःची शारिरीक क्षमता वाढवायची,तितकं आपल्या हातात नक्कीच आहे. मगच देवाला आळवायचं की यापुढंचं सगळं तू बघून घे देवा.
झालं, दुसर्या दिवसापासून चालायला नियमितपणे सुरुवात केली, जी मी माझ्या लहरीनुसार कधी-मधी करत होते. ३-४ दिवस झाले, पण असे वाटू लागले की जिने चढण्यासाठी आवश्यक त्या व्यायामाची आता खरी गरज आहे. माझ्या काही ट्रेकर्स मैत्रिणींनी मोलाचे सल्ले दिले, त्यांचा फायदा चढताना झालाच. माझा भाचा गेली काही वर्षे मॅरेथॉन्स करत आलाय. त्याच्याशी बोलले. त्याच्याकडून जिने चढणे-उतरणे यासाठी शरीराची तयारी करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम प्रकार जाणून घेतले. त्याने पाठवलेले व्हिडिओज पाहिले आणि सुरु झाली माझी भौतिक तपश्चर्या. दररोज सकाळी सूर्यनमस्काराने सुरुवात, हॅमस्ट्रींगचे व्यायाम,क्रंचेस, स्क्वॅटस इ. त्याचबरोबर प्रोटीन्सयुक्त आहार. संध्याकाळी ऑफिसातून निघतांना जिने चढून -उतरण्याचा सराव. हे दररोज करत, हळू हळू वाढवत महिन्या दीड महिन्याभरात रोज १४ सू.न., ४५ स्क्वॅटस, 30 क्रंचेस आणि २० ते २२ जिने चढणे -उतरणे इथवर गाडी आली. त्यानुसार आहारात बदल केल्यामुळे असेल कदाचित किंवा व्यायाम हळू हळू वाढवत नेल्यामुळे शरीराला सवय झाली असावी म्हणून असेल, पण थकवा जाणवत नव्हता. याच्या जोडीला ऑफिसला येण्या- जाण्यासाठी ट्रेनचे जिने चढणे-उतरणे हे तर होतच होते.
दिवस पुढे पुढे सरकत होते. अधून मधून भेटणारे बारीक दिसतेयस असे बोलू
लागले. माझ्या गिरनार यात्रेबद्दल आणि त्यासाठीच्या तयारीबद्दल फारच कमी
जणांना माहीत होते. बापरे दहा हज्जार पायर्या? जमणार आहे का तुला? काही
झालं म्हणजे? असं माझ्या काळजीपोटी बोलून माझा आधीच डळमळता निर्धार
गळपाटून जाऊ नये म्हणून मीच ठरवलं जेव्हा जायला निघू तेव्हा सांगायचं
सर्वांना. वजनावर लक्ष ठेवून होते, ते काही कमी झाले नव्हते, मला थकवा,
अशक्तपणा जाणवत नव्हता, So I was on a right track असे स्वतःला समजावत माझी
साधना चालू ठेवली.
दिवस सरत होते. बघता बघता ऑगस्ट महिना येऊन ठेपला. घरापासून, घरच्यांपासून
दूर रहाणं हे ऑफिसनिमित्तानं अधेमधे होत असलं तरी आता जिथे जाऊन रहाणार
होतो ते एक गाव असणार होतं. तळेठी नावाचं गाव जिथून गिरनारचा पायथा सुरु
होतो. या गावात काहीच सुविधा नाहीत. अगदी बँकेचं एटीएमही नाही असं आम्हाला
सांगण्यात आलं होतं.त्यामुळे तिथे जाऊन दुसरं काही होऊ नये म्हणून
स्वतःला मी या काळात विशेष जपलं. केव्हाही डोकं वर काढणारी माझी दाढदुखी.,
या ऐन मोक्याच्या वेळेस कशी कच खाईल? जुलैमध्ये तिने आपला इंगा दाखवायला
सुरुवात केली. महिन्याभराचा अवधी होता. ताबडतोब डेंटीस्ट गाठून अक्कलदाढ
काढण्याची शस्त्रक्रिया उरकून घेतली. इतर फिलिंग्स वगैरे पूर्ण केली.
माझ्या सोबत येणारी माझी मैत्रीण तर दररोज नियमित चालण्याचा व्यायाम कित्येक वर्षे करत आली आहे, तसंच ती पूर्वी गिरनारलासुद्धा जाऊन आली होती, पण ५००० पायर्यांवरील अंबा मातेच्या देवळापर्यंत. त्यामळे तिला बर्याच गोष्टी माहीत होत्या. ती रोज काही ना काही सल्ला देत असे. ती माझ्या सोबत असणार ही गोष्ट मला फारच दिलासादायक होती. पण याच सुमारास काहीतरी विपरीत घडले.
तिची आई आजारी पडली. प्रकॄती खालावत जाऊन ती अत्यवस्थ झाली. हॉस्पिटल, आय सी यू, या चक्रात ती अडकली. आईचे वय ८७. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती. जर ती येऊ शकली नसती तर मी पुन्हा एकटी पडले असते. मी एकटीने गिरनारला जावे याला आमच्या आई तयार नव्हत्या. त्यांनी जरी असे बोलून दाखवले नाही तरी त्यांचा काळजीचा सूर मला जाणवत होता. त्यांच्या मनाविरुद्ध आणि जीवाला घोर लावून माझा पाय घराबाहेर पडला नसता. त्यावेळी मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना केली की “इतकं सारं घडवून आणलंयस तर आता काही मोडता येऊ नये असं वाटतंय, याउप्पर माझ्यासाठी जे उचित असेल तसं घडू दे आणि ते स्वीकारायची ताकद मला दे”.
७ ऑगस्टला माझ्या मैत्रिणीची आई देवाघरी गेली, तिचे दिवसकार्य वगैरे होऊन मैत्रीण २० तारखेला घरी आली. २४ तारखेला निघायचे होते, दत्तगुरुंनी मार्ग दाखवला होता.
ऑगस्ट सुरु झाला तसा आयोजकांनी गिरनारयात्रेत सहभागी होणार्यांचा व्हॉटस अप ग्रुप तयार केला. त्यावर रोज काही ना काही सुचना येत असत. प्रवासात आणायचे सामान, पर्वत चढताना घेऊन जायच्या वस्तू, अगदी चढतांना चप्पल, बूट कसे असावेत इतक्या बारीक-सारीक बाबतीत मार्गदर्शन केले जाऊ लागले.त्यांच्या अनुभवी सल्ल्याबरहुकुमच मी माझी बॅग भरत होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयत्या वेळी नवे बूट नकोत, म्हणून आधी बूट घेऊन ते घालून चालण्याचा, चढ-उताराचा सराव करु लागले. नऊ हजार पायर्यांच्या टप्प्याला भणाणता वारा असतो, छत्री कुचकामी ठरते, त्यामुळे रेनकोटच न्यायचे ठरवले. चढतांना आपण थकतो त्या वेळी पटकन एनर्जी मिळेल असे खाऊचे पदार्थ जवळ ठेव असा मोलाचा सल्ला भाच्याने दिला होता. त्याप्रमाणे स्निकर्स एनर्जी बार्स आणि खजूर, इलेक्ट्रलचे सॅशेस सोबत घेतले. बाम, रोल ऑन, सेंसर अशा वेदनाशमक गोष्टींनी औषधांची बॅग पूर्ण भरली.
या सुमारास पर्वतावर प्रचंड धुकं असतं. काही फुटांवरचंही दिसत नाही. त्यामुळे ७ ते ८ फूट लांब प्रकाशझोत पडेल अशी टॉर्च सोबत घ्यायची होती. ती घेतली. संपूर्ण चढाई रात्री करायची असली तरी अध्येमध्ये देवळात न्यायचे सामान विकणार्यांची दुकाने/घरे असतात. त्या लोकांशी संपर्क करुन कोणत्याही क्षणी डोलीची व्यवस्था करता येते ही दिलासाजनक खबर मिळाली. डोलीवाले किती पैसे घेतात तो अंदाज दिला गेला. मी तेव्हढे पैसे जवळ बाळगायचे ठरवले. कोणत्याही वेळी असे वाटले की आपण नाही चढू शकत तर अधिक त्रास सहन करण्यापेक्षा, किंवा एकटे वाटेत थांबण्यापेक्षा डोलीचा पर्याय चांगला होता. चढतांना जास्त वजन नको, म्हणून देवासाठीही घरुन काहीही प्रसाद्,वगैरे नेला नव्हता. आयोजक त्याची व्यवस्था करणार होते. अगदी रिक्त हस्ताने जात होते आणि खरंतर त्याला देऊन तरी काय देणार होते मी? तोच तर देत आला होता आजवर.
२४ ऑगस्ट २०१९....... गेले तीन महिने उराशी बाळगलेलं स्वप्न साकार होत होतं. आज दुपारी १२.४५ ची बांद्रा टर्मिनसवरुन ट्रेन होती. सकाळपासून शुभेच्छांचे फोन, मेसेजेस येत होते. समोरच्याच्या आवाजात काळजी जाणवत होती. मग मीच त्या प्रत्येकाला धीर दिला की काळजी करु नका, मी सुखरुप जाऊन येईन.
१०:३० वाजता निघाले.सर्वांनी बान्द्रा टर्मिनसलाच भेटायचे होते. तिथेच सारे सदस्य प्रथम भेटले. हा वसईचा ग्रुप.काही जण एकमेकांना ओळखत होते, तर काही अनोळखी. एकूण २४ सदस्य होते. पैकी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती ६९ वर्षांचे आजोबा आणि सर्वांत ज्युनियर त्या आजोबांचा ७ वर्षांचा नातू. बाकी सगळे अधले मधले. बरेचसे एकेकटे होते, आम्हा दोघींसारखे, फक्त एक जोडपं आणि आजोबा-नातवाचं कुटुंब. विशेष म्हणजे २४ पैकी फक्त ३ जण जे आयोजक होते तेच आधी गिरनारला जाऊन आले होते, पैकी एक मी वाचलेल्या 'दत्त अनुभुती' या पुस्तकाचे लेखक बाकी सर्व नवखे, माझ्यासारखेच साशंक, त्यामुळे अगदी हुश्श झालं. जुजबी ओळख वगैरे झाली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
https://www.maayboli.com/node/71555
तुमच्या गावी आलो आम्ही
प्रवास सुरु झाला. दोन वेगळ्या डब्यांत मिळून आमचे २४ लोक बसले होते. आयोजक थोड्या थोड्या वेळाने चक्कर मारुन कुणाला काही हवं नको ते पहात होते. मिनरल वॉटरचे वाटप करीत होते. जाताना दुपारचे जेवण बोरीवली येथे तर रात्रीचे अहमदाबाद येथे गाडीत चढवले गेले. आयोजकांचे टाय अप्स असलेल्या कॅटररने पॅक्ड फूड गाडीत पोहोचते केले. पहाटे पावणेतीनच्या सुमारास जुनागढ येणं अपेक्षित होतं, जिथे आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे अहमदाबादला जेवण झाल्यावर सगळे गुडुप झोपून गेलो. झोपताना अडीचचा गजर लावला होता. त्याप्रमाणे उठलो. सामान आवरले. गाडी वेळेवर पोहोचत होती. साधारण तीनला दहा मिनिटे असतांना आम्ही उतरलो. रिक्षात बसून लगेच तळेठी गाठले. तिथेच आमची रहयची सोय केली होती आणि तिथूनच सगळीकडे जायचे होते.
पंधरा-वीस मिनिटांत आमचे हॉटेल आले. रूम्स ताब्यात दिल्या गेल्या. रूमवर गेल्यावर काही वेळ आराम केला. सकाळी नऊ-साडेनऊला तयार रहायला सांगितले होते. त्याप्रमाणे आवरत होतो. रुमवरच चहा नाश्ता केला.
आज २५ ऑगस्ट रविवारचा दिवस होता. आज रात्री गिरनार चढण्यास सुरुवात करायची होती. खोलीबाहेर असलेल्या गॅलरीतून आजुबाजूला पर्वत शिखरे दिसत होती. त्यांपैकी अनेकांच्या माथ्यावर ढगांनी दुलई पसरली होती.हिरव्यागार पर्वतशिखरावर अधेमधे पिंजलेल्या कापसासारखे भासणारे ढगांचे पुंजके लक्ष वेधून घेत होते. यातलं नेमकं कुठलं आपल्याला चढायचंय? उत्सुकता शीगेला पोचत होती. डाव्या बाजूला दिसत असणारा पर्वत आम्हाला दाखवला गेला. त्यावर काही बांधकाम केलेलं दिसत होतं. तो जैन मंदीर परिसर, जो ४००० पायर्या चढल्यावर येतो तो. इथवर जाणारे बरेच आहेत. विशेषतः स्थानिक जैन लोक. तेथून अजून वरती अगदी इवलुसं काहीतरी दिसत होतं ते अम्बाजी धाम होतं, ५००० पायर्या चढून येणारं अंबा मातेचं मंदीर. मग दहा हजार पायर्यांवरचं दत्तशिखर कुठे होतं? तर तिथे पोहोचण्यासाठी हा अम्बाजी धामचा पर्वत चढून विरुद्ध बाजूने उतरावा लागणार होता आणि त्या पुढे अजून एक डोंगर चढून उतरल्यावर मग तिसर्या सुळक्यावर दत्तशिखर. अबब.....
त्यामुळे पायथ्यापासून वर नजर टाकली तर दत्तशिखर नजरेत येणे शक्यच नाही. मनात म्हटलं इथे काही मुखदर्शन, लांबून दर्शन, व्हीआयपी दर्शन, नवसाची रांग अशा कॅटेगरीज नाहीत. जे आहे ते दहा हज्जाराचा पल्ला गाठूनच पहायचं.
तळेठी गाव

साधारण दहाच्या सुमारास बाहेर पडलो. सर्वप्रथम तळेठी गावचे ग्रामदैवत 'भवनाथ' मंदीरात निघालो. गिरनार यात्रा ज्या गावातून सुरु होते त्या गावच्या दैवताला सर्वप्रथम आमची यात्रा निर्विघ्नपणे पार पडू दे असं साकडं घातलं जातं. त्यासाठी सर्वात आधी या शिवमंदीरात आलो.पाऊस नव्हता. प्रसन्न हवा होती. सुंदर नक्षीदार बांधकाम असलेले हे शिवमंदीर खूप छान आहे. दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो.
भवनाथ मंदीर
आता कुठे? याचं उत्तर आलं "जटाशंकर", बरं म्हणत निघालो. तसं आम्हाला सांगितलं गेलं की जास्त नाही पण पाचएकशे पायर्या चढायच्या आहेत. माझा 'आ' वासला. एकतर गेले काही दिवस कोणत्याही संख्येपुढे ‘पायर्या’ हा शब्द ऐकू येताच माझे कान टवकारले जात होते. माझी चलबिचल सुरु झाली. डोळ्यांसमोर भाच्याचं मॅरेथॉनचं शेड्युल आलं. स्पर्धेसाठी ढोर मेहनत घेतात मात्र स्पर्धा ज्या आठवड्यात आहे तो पूर्ण आठवडा आरामाचा असतो. कसलाही व्यायाम करायचा नसतो शेवटचे काही दिवस. स्पर्धेसाठी एनर्जी साठवून ठेवायची असते. मी सुद्धा असेच केले होते. पण हे काय भलतेच? आज रात्री ‘मिशन गिरनार’ आहे तर त्याआधी कशाला ५०० पायर्या चढून उतरायच्या? ते ही उन्हात? आपण ग्रुपसोबत आहोत त्यामुळे ग्रुप लीडरच्या मतानुसारच वागायला हवे हे कळत होते, तरी देखील मी एक खडा टाकायचा असे ठरवून बोलले की “आता रात्री जाणारच आहोत ना, तेव्हाच ५०० पायर्यांवर जटाशंकराचं दर्शन घेतलं तर नाही का चालणार?”, "नाही हो ताई, जटाशंकर या अंगाला आणि गिरनार त्या तिथे". “अरे देवा”, हे स्वगत होतं. शेवटी ठरवलं की आपण स्पष्ट बोलून तर बघू. म्हटलं, "दादा, आपण आत्ताच ५०० पायर्या चढून उतरलो तर आपली एनर्जी वाया नाही का जायची या उन्हात? रात्रीसाठी ठेवायला हवी ना शिल्लक? उद्या करुयात का जटाशंकर?” तर उत्तर आले की "जटाशंकर म्हणजे प्रिलिम आहे असं समजा आणि रात्री फायनल एक्झाम." “बोंबला… म्हणजे प्रिलिम नंतर लग्गेच त्याच दिवशी फायनल? आपल्या चुका सुधारायला काही वावच नाही की..”. हे ही अर्थात स्वगत होतं. आता ठरवलं की जाऊ दे आता हे लोक जिथे नेतील तिथे गपगुमान जायचं, सांगतील तसं चढायचं , सांगतील तेव्हा उतरायचं. बाकी कोणीच काही बोलत नव्हते तर आपणच का विरोध करावा? त्यात ६९ वर्षांचे आजोबा, दुसरे साठीचे जोडपे उत्साहात चढायला तयार होते त्यांच्यासमोर मी हॉटेलवर जाऊन आराम करते हे बोलायचीही लाज वाटू लागली. मनाशी पक्कं केलं जे व्हायचंय ते सर्वांसोबत माझंही होईल, आता जास्त आढेवेढे घेणं नको. आमच्या म्होरक्याने शेवटी म्हटलं “ताई तुम्ही चला तर खरं, नक्की आवडेल तुम्हाला असं ठिकाण आहे ते.”
त्यांच्या शब्दांची प्रचिती काही वेळातच आली.गल्लीबोळ पार करत एका आडवाटेला लागलो आणि काही क्षणांतच घनदाट जंगलात. आजूबाजूला प्रचंड मोठमोठाली झाडं आणि अवतीभवती दगडा-खडकांतून जाणारी वाट, काही ठिकाणी कच्च्या पायर्या. बाजूलाच खळखळत वाहणारा झरा. ज्याचा आवाज मन प्रसन्न करीत होता. झाडे झुडपे इतकी दाट होती की सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतही नव्हती, अंधारुन आलं होतं.जाता जाता पक्ष्यांचे विविध आवाज अगदी मोराचा केकाही ऐकू आला. वाटेत भरपूर माकडे दिसली. पण ती माणसांना त्रास देत नव्हती. एकंदर परीसर आल्हाददायक होता. अजून एक आनंदाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे जिथे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती तिथे जिओचे नेटवर्क मात्र व्यवस्थित मिळत होते. ताबडतोब घरी व्हिडिओ कॉल लावला आणि घरच्यांना ही रम्य जागा दाखवली. कधीही कुठेही माझ्यासोबत असणार्या घरच्या तीन मेम्बरांची प्रकर्षाने आठवण येत होती.मध्ये एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह ओलांडून पुढे जायचे होते, तिथे मात्र जरा भिती वाटली इतकंच. मुंबईकरांसाठी भुशी डॅमचे जे स्थान ते इथल्या स्थानिकांसाठी जटाशंकरचे. जागॄत देवस्थान म्हणून ज्ञात असलं तरी पिक्निक स्पॉट सारखी गर्दी, पाण्याच्या प्रवाहाखाली डुंबणारी जनता. पाचशे पायर्यांची तमा न बाळगता ट्रंका, पेटारे भरभरुन घरून आणलेले खाणे-पिणे उत्साहात वाहून नेणार्या बायका आणि दर पाचेक मिनिटांवर एखाद्या डेरेदार वॄक्षाखाली गोलाकार विसावलेला कुटुंब कबिला, मधोमध वर्तमानपत्राच्या कागदांवर उघडलेले खाण्याचे डबे, अगदी बाटल्या भरभरुन ताकसुद्धा घरुन घेऊन आली होती ही मंडळी. हे दॄश्य पाहून माझी मैत्रीण अगदी सद्गदीत झाली. मला म्हणे गुजराथी माणूस कधीही कुठेही भुकेला रहात नाही, ठाण मांडून खाणं चालू करतो आणि त्यापुढे मी गुजराथी माणूस आणि त्याची खाद्ययात्रा यावर एक चमचमीत व्याख्यान ऐकले.


पुढे जात जात आम्ही मंदीरात पोहोचलो. एका गुहेत , कपारीत ते स्वयंभू
शिवलिंग होते आणि त्या भोवती डोंगर कपारीतून वाहत आलेल्या झर्यातील पाणी
वाहत होतं. खरंच खूप शांत, रम्य वातावरण होतं तिथलं. मन प्रसन्न करुन गेला
तो माहोल. दर्शन झल्यावर आम्ही परतीचा मार्ग घेतला.
जटाशंकर मंदीर
यापुढचं ठिकाण होतं साक्षात गिरनार पर्वताची पहिली पायरी. नाही चढाई
रात्रीच करायची होती. पण भवनाथ आणि जटाशंकर दर्शनाननंतर गिरनारच्या प्रथम
पायरीवर नतमस्तक होत दत्तगुरुंना आणि स्वतःच्या आराध्य दैवताला प्रार्थना
करायची असते की आज रात्री आम्ही तुमच्या दर्शनासाठी निघणार आहोत. आम्हाला
सुखरुप वरपर्यंत नेऊन आणा. त्यानुसार आमच्यातील प्रत्येकाने पहिल्या
पायरीवर डोके टेकून मनोभावे प्रार्थना केली. शेजारीच 'चढवावा हनुमान' नामक
हनुमान मंदीर आहे. हनुमानाकडेही पर्वत चढून उतरण्यासाठी शक्ती द्यावी अशी
याचना करायची असते. ते ही केले आणि जेवून हॉटेलवर परतलो.
आराम केला. डोंगरावर नेण्याचे जुजबी सामान सॅकमध्ये भरले. आपल्याकडे काही देवळांत विशिष्ट पोशाख घालूनच प्रवेश दिला जातो असे बंधन इथे अजिबात नाही. ज्याला चढतांना जे कंफर्टेबल वाटेल ते घालावे असे सांगण्यात आले होते. जीन्स, शॉर्टस, थ्री फोर्थ काहीही. संध्याकाळी जरा पाय मोकळे करुन आलो आणि जेवलो. रात्रीसाडेअकराला पुन्हा आंघोळ करुन निघायचे होते. डोंगर चढतांना आधारासाठी प्रत्येकाला काठी देण्यात आली होती.
एका हातात टॉर्च आणि दुसर्या हातात काठी या दोन गोष्टी प्रत्येकाकडे असायलाच हव्यात असे सांगितले गेले होते. दुसर्या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत डोंगरावर नेटवर्क नसल्यामुळे संपर्क करता येणार नाही, तरी काळजी करु नये असे घरच्या सदस्यांना सांगून ठेवायची सुचना आधीच केली गेली होती. निघतांना घरी फोन केला, सर्वांशी बोलले. मन भरुन आले होते. नवर्याला म्हटलं की जोवर नेटवर्क मिळतंय तोवर मी तुला एसेमेस पाठवत राहीन, किती पायर्या चढले , कशी आहे वगैरे. तू सकाळी उठशील तेव्हा मी नेटवर्कमध्ये नसेन पण तुला निदान समजेल तरी माझा प्रवास.
गेले तीन महिने सतत ज्याचा विचार मनात घोळत होता, अगदी ध्यास लागला होता, ते आता काही तासांनंतर दॄष्टीपथात येणार होते. खरंच डोळ्यांनी दिसणार होते की अर्धवट परतावे लागणार होते? माहीत नाही. पण आता त्याची पर्वा नव्हती. ज्याने इथवर आणलं तोच ठरवेल पुढचं. पण जर त्रास झाला, विशेषतः श्वास लागला, धाप लागली तर न लाजता डोली करायची हे मी मनाशी ठरवले होते. तरीही ती वेळ येऊ नये, आपण पायी चढून जावे ही इच्छाही होतीच.
आता ज्यासाठी इतका अट्टाहास केला त्या गिरनारस्थित दत्तगुरुंबद्दल थोडेसे:-
(ही माहिती 'दत्त अनुभुती' हे पुस्तक तसेच आंतरजालावर गिरनार बद्द्ल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार इथे देत आहे).
गुजरात राज्यातील जुनागढ शहरात गिरनारच्या पर्वतरांगा आहेत. समुद्रसपाटीपासून ३६६५ फूट उंचीवर या पर्वतरांगांवरील सर्वांत उंच शिखर - गोरक्षशिखर आहे. तसेच 'गुरुशिखर' - हे गुरु दत्तात्रेयांचे अक्षय्य निवासस्थान आहे असे मानतात. 'गुरुशिखर' या ठिकाणी दत्तगुरुंच्या पादुका - खडकावर अर्धा ते एक इंच आत रुतलेल्या पावलांच्या ठशांच्या रुपात आहेत. पादुकांच्या मागे त्रिमुर्ती स्थापन केली आहे. पूर्वी गुरुजींव्यतिरिक्त केवळ एक व्यक्ती जाऊन दर्शन घेऊ शकेल इतपतच जागा होती, मात्र आता बांधकाम करुन साधारण १५ ते २० माणसे आत मावू शकतील इतकी जागा केली आहे. या स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी, ज्या वेळी अत्री ऋषी - आणि अनसुयामातेचे पुत्र म्हणून पृथ्वीवर लौकिक अवतार धारण केला होता तेव्हा, या गुरुशिखरावर तब्बल १२००० वर्षे तपश्चर्या केली होती असे म्हणतात. तपश्चर्या सुरु असताना जुनागढ येथे दुष़्काळ पडला. पाऊस पडत नव्हता, त्यामुळे पिक-पाणी होत नव्हते, गुरे, वासरे, माणसे मरु लागली. त्यावेळी अनसुया मातेने आपल्या लेकाला तपश्चर्येतून जागे केले. जागे होताच त्यांनी आपल्या हातातील कमंडलू खाली फेकला, तो दुभंगून दोन ठिकाणी पडला, एका ठिकाणी पाणी उत्पन्न झाले तर दुसर्या ठिकाणी अग्नी. अशा प्रकारे दत्तात्रेयांनी अग्नी व पाण्याची सोय करुन जुनागढ मधील दुष्काळ दूर केला होता. या स्थानावर आजही अन्नपूर्णेचा वास आहे असे म्हणतात व येथे येणार्या प्रत्येकाला अन्नपूर्णेचा प्रसाद दिला जातो. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून. त्यामुळे गिरनार चढत असतांना उपवास करु नये, इथला अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण केल्यावरच ही यात्रा संपन्न होते असे म्हणतात. त्या ठिकाणी आजही पाण्याचे कुंड आहे. या स्थानाला ‘कमंडलू तीर्थ’ असे संबोधले जाते. जिथे अग्नी प्रकटला तिथे आजही दर सोमवारी पिंपळाच्या पानांची मोळी ठेवून विशिष्ट मंत्रोच्चरण करतांच स्वयंभू अग्नी प्रकट होतो. हीच धुनी. दत्तगुरु तेथे धुनीच्या रुपात प्रकटतात व अनेकांना त्या धुनीत त्यांचे आजही दर्शन होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे इथे गोरक्षनाथांचे स्थान आहे. त्यांनी आपले सद्गुरु श्री दत्तात्रेयांना प्रार्थना केली होती की जिथे मी आहे तिथे तुम्ही, माझे गुरु असायलाच हवेत. म्हणूनच गोरक्षनाथांनी अधिक उंचावर जाऊन तापश्चर्या केली जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर दत्तपादुका राहातील. हे गोरक्षशिखर म्हणूनच सर्वात जास्त उंचीवर (३६६५ फूट) आहे. पायथ्यापासून ४००० पायर्यांवर जैन तीर्थंकर नेमिनाथ यांचे स्थान व जैन मंदीरे आहेत. तर ५००० पायर्या चढल्यावर अंबा मातेचे देऊळ आहे. अंबा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन,तिचा आशिर्वाद घेऊनच गुरु शिखराकडे मार्गस्थ व्हावे असा प्रघात आहे. साधारण अडीच ते तीन हजार पायर्यापर्यंतची वाट ही गीरच्या जंगलातील आहे. त्यामुळे वन्य श्वापदे दिसू शकतात. यासाठी काठी आणि टॉर्च सोबत घ्यायला सांगितले जाते.
स्वतःभोवती अनेक गूढ वलये ल्यालेला, अद्भुत अशा आख्यायिका ज्याबद्दल सांगितल्या जातात असा हा गिरनार पर्वत. गिरनार चढण्यास जायचे असल्यास व्यवस्थित रस्ता माहीत असलेली व्यक्ती सोबत असावी, त्याचप्रमाणे जो वहिवाटीचा रस्ता आहे, त्या वाटेनेच चढावे आणि उतरावे असे सांगितले जाते. गिरनार ही पर्वत शॄंखला आहे. वहिवाटेनुसार जैन मंदीर, अंबाजी, गोरक्षशिखर,गुरुशिखर या मार्गाने न जाता, वेगळ्याच पर्वतावरुन, वेगळ्या मार्गानेही जाता येत असावे, मात्र अशा कोणत्याही वेगळ्या मार्गावर पायर्या, लाईटस नाहीत. पायरी मार्गावर लाईटस आहेत पण फार अंधुक प्रकाश, त्यामुळे पावसाळी वातावरणात टोर्च शिवाय पर्याय नाही. इतर मार्गाने जाता -येतांना वाट चुकण्याची, वन्य श्वापदांची भिती असते. या पर्वतांवर बर्याच गुहा आहेत. तिथे आजही अनेक जण तपसाधना करीत असतात. अशा आडमार्गावर अनेक तांत्रिक त्यांची साधना करीत असतात, त्यांच्या मार्गातून आपण जाऊ नये आणि म्हणून वहिवाटेनेच पायर्या चढत जावं असं सांगितलं जातं.
शिर्डी, अक्कलकोट आणि इतरही काही देवस्थानांबद्दल जी वदंता आहे तीच या तीर्थक्षेत्राबद्दलही आहे की इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येऊ शकत नाही. 'दत्तगुरुंची इच्छा' असावीच लागते. अशा अनेक आख्यायिका, पुरातन कहाण्या मनात साठवत आम्ही २४ जण सांगितल्या गेलेल्या सुचनांचा आदर करुन, शंका कुशंकांना स्थान न देता, असं खरंच असेल का? असे उलट प्रश्न न करता अर्थात पूर्ण श्रद्धेने चढू लागलो. जास्त लोक ३० ते ५० या वयोगटातील होते. कौतुक करावे तर आमच्या चमूतल्या बाल शिलेदाराचे, रजत त्याचं नाव. खूप उंचावर असलेल्या दत्तबाप्पाच्या दर्शनाला आजी आजोबा आणि आजीची बहीण जात आहेत हे कळताच त्याने येण्याचा हट्टच धरला. इतका की शेवटी आयत्या वेळेस त्याला आणि त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईलाही आमच्या सोबत घेतले. कराटे शिकत असलेल्या या चिमुरड्याचा स्टॅमिना जबरदस्त, सात वर्षांचा हा पोरगा, न थकता उत्साहात चढला तसेच सकाळी उतरलाही, कुठेही झोप येतेय, दमलो अशी तक्रार, कुरकुर नाही की आईला त्याला कडेवर घ्यावे लागले नाही. हॅटस ऑफ टू रजत.
साडेअकराच्या सुमारास एकमेकांना शुभेच्छा देत बाहेर पडलो. पुन्हा एकदा बंद असलेल्या भवनाथ मंदीराला बाहेरुन नमस्कार करुन गार्हाणे घातले आणि मार्गस्थ झालो. पहिल्या पायरीपाशी आलो. बूट काढून पुन्हा एकदा पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो. त्यावेळी कंठ दाटून आला. सद्गुरुंना म्हटलं, “हे इतकं मोठं दिव्य करायला धजावतेय पण एकटी आहे, तुम्ही माझ्यासोबत रहा बस्स”. 'चढवावा हनुमंतालाही प्रार्थना केली. बूट घातले आणि चढण्यास सुरुवात केली.
क्रमशः
चालविसी हाती धरुनिया
आम्ही निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता. काही पायर्या चढून होताच घाम येऊ लागला. पहिल्या पाचशे पायर्या खूप थकवणार्या असतात. त्यापुढे शरीराला सवय होते. आम्हाला दिलेल्या सुचनांनुसार आम्ही सावकाश चढत होतो. तसेच चढत असतांना जास्त बोलत राहिले की दम लागतो हे ही लक्षात घ्यायला सांगितले होते. पाणी अगदी गरज वाटली तरच, घोटभर पित चढण्यास सांगण्यात आले होते. काही अंतर चढून गेल्यावर आमच्या मागे-पुढे मराठी भाषिक लोक दिसू लागले. चौकशी करतां तो ५० जणांचा ग्रुप नाशिक, मनमाड येथून आला होता असे कळले. आपल्या सोबतच आपली भाषा बोलणारी मंडळी आहेत हे पाहून जरा बरं वाटलं. आमच्या ग्रुप मध्ये सर्वांत पुढे आयोजकांतील एक व शेवटी सर्वांत सावकाश चढणार्या सदस्याच्या मागे एक आयोजक अशी ग्रुपची रचना सुरुवातीपासून होती. त्यामुळे कोणीही रस्ता चुकण्याची, भरकटण्याची भिती नव्हती. तसंच चढत असतांना सर्वांत पुढे गेलेला ग्रुप जिथे थांबून विश्रांती घेई, तिथे मागून चालणारी मंडळी पोचली की आधी पोचलेली मंडळी मार्गस्थ होत असत आणि हेच मग त्या नंतरच्या मंडळींनी पुढच्या टप्प्यातील मंड्ळींसाठी केले, त्यामुळे चढतांना संपूर्ण ग्रुपमध्ये एक समन्वय होता . कुणीतरी फारच पुढे निघून गेलंय आणि कुणीतरी मागे एकटं पडलंय अशी मिसिंग लिंक कोणाच्याच बाबतीत चढतांना घडली नाही.
पहिल्या पाचशे पायर्या चढून होण्याआधीच आमच्या ग्रुपमधील एक काका थकले. त्यांनी मी चढू शकत नाही. डोलीनेच जाईन हा निर्णय घेऊन टाकला. ते खरच घामाने निथळत होते, प्रचंड धापही लागली होती. त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला होता.ते जरा स्थिरस्थावर झाल्यावर आयोजकाने डोलीची व्यवस्था केली. डोलीवाल्याचे पैसे ठरवले. काकांना त्या डोलीवाल्याच्या ताब्यात देऊनच मग आयोजक पुढे चालू लागले.
मजल दरमजल करीत आमचे चढणे सुरु होते. आजूबाजूला बरीचशी टपरीवजा बंद दुकाने दिसत होती. साधारण अडीच हजार पायर्यांपर्यंत जंगलातील रस्ता असल्यामुळे वन्य श्वापदे आढळू शकतात. मध्यभागी दगडी पायर्या, एका बाजूला दरी तर दुसर्या बाजूला जंगल अशी रचना. ज्या बाजूला दरी होती,त्या बाजूला कठडा होताच असे नाही. त्या जंगलात कीर्र अंधारात पाहिले तर धुक्यामुळे काही अंतरावर पुढचे अजिबात दिसत नव्हते. भयपटात दाखवतात तसे झाडाचे बुंधे आणि धुक्यात अस्पष्ट होत गेलेली वाट...यामुळे वातावरणातील गुढ अजून वाढत होते. एका बाजूची अंधारात हरवलेली खोल दरी आणि दुसर्या बाजूचे धुक्यात अस्पष्ट दिसणारे जंगल. या दोन्ही गोष्टीची नाही म्हटलं तरी भिती वाटत होती. एकदा कधीतरी मी एकटीच राहिले. पुढची मंडळी किती पुढे गेलीत आणि मागून कोण येतंय हे धुक्यामुळे समजत नव्हते. कुणाचा बोलण्याचा आवाजही येत नव्हता. त्या क्षणी मी प्रचंड घाबरले आणि मनापासून सद्गुरुंना आळवले, मला भिती वाटतेय हे ही बोलले, काही वेळातच मागून आमची मंडळी येतांना दिसली. आता यापुढे चुकुनही डाव्या-उजव्या बाजूला बघायचे नाही, फक्त समोरच्या पायर्यांवर लक्ष केंद्रीत करुन पुढे चालायचे हे ठरवले.
हळूहळू चढतां चढतां ५०० पायर्या, १००० पायर्या, १२०० पायर्या असे टप्पे येत होते. अनेकदा येऊन गेलेल्या आयोजकांना ते टप्पे ओळखता येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. नवर्याला सांगून ठेवलं असल्यामुळे मला जेव्हा कळत होतं की ५०० पायर्या झाल्या, १००० झाल्या मी त्याला मेसेज करत होते. मी बरी आहे, फ्रेश आहे, हेही सांगत होते. माझा मेसेज गेल्यावर लगेच त्याचे उत्तर येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याला सांगितलं की आता कधीही नेटवर्क जाईल आणि मग तू काळजी करशील, त्यापेक्षा झोप आता.तसेच झाले. चार हजार पायर्यानंतर मेसेजेस जात नव्हते.
आता बरेच उंचावर आलो होतो. धुकं वाढत असल्यामुळे सुरुवातीला जसा दरदरून घाम येत होता तो येणं थांबलं. धुक्यातूनच आमचे मार्गक्रमण चालू होते. साधारण दोन फुटांवरचंही दिसत नहतं. आजूबाजूचेही थांबत चढत होते. माझ्यासाठी आश्चर्याची वाटणारी गोष्ट घडत होती ती म्हणजे मला अजूनतरी धाप लागली नव्हती, थकवा जाणवत नव्हता. एरव्ही थोडेसे चालून दमणारी मी, चालण्याचा आळस करणारी मी चढत असूनही ताजीतवानी होते. मी माझ्या आयुष्यात स्वतःला इतके फिट फक्त या चढाई दरम्यान अनुभवले. तरीही अति आत्मविश्वास दूर सारून मी अधे मधे थांबत होते. घोटभर पाणी, खजूर, स्निकर्स हे अधे मधे खात होते.
माझी मैत्रीण हळू हळू चढत होती. तिचा आणि एका काकींचा चालण्याचा वेग समान होता. त्यामुळे त्या दोघी एकत्र चालत होत्या. मी त्यांच्या जरा पुढे चालणार्या मंडळींसमवेत होते. चारहजार पायर्या झाल्यावर पहिला टप्पा - नेमिनाथ स्थान म्हणजे जैन मंदिरे आली. खूप भारी वाटत होते. इथवर तर सुखरुप पोचलो हा अनांद सोबत होता. जैन मंदीरांना वळसा घालून आम्ही पुढचा रस्ता धरला.
काही अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते आढळले. एक डाव्या बाजूला जिथे आता जशा पायर्या चढत आलो त्याच धाटणीच्या पायर्या होत्या तर उजवीकडे पायर्या नसून साधी वळणावळणांची वाट दिसत होती. प्रथम येणार्याला अर्थातच जिथे पायर्या दिसत आहेत तिथून जायचे असे वाटले असते. त्यानुसार मी डावीकडे वळणार तोच आमचे नेहमी सर्वांत शेवटी रहाणारे आयोजक आता 'वाटाड्याची' भुमिका चोख बजावत होते. त्यांनी उजवीकडे जिथे पायर्या नव्हत्या तो आपला रस्ता असे सांगितले. मी प्रश्न केला की मग ही पायर्यांची वाट कुठे जातेय? त्यावर तिथे थोडे अंतर चढून गेल्यावर रस्ताच नाही असे समजले. त्या प्रसंगी गिरनारसारख्या ठिकाणी रात्री चढत असताना अनुभवी ग्रुप सोबत असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.
आता पुढचा टप्पा अंबाजी धाम - ५००० पायर्या हे आमचं लक्ष्य होतं.आमच्यासोबतच ज्या दुसर्या ग्रुपने चढण्यास सुरुवात केली होती त्या ग्रुपमध्ये एक गॄहस्थ झांजांच्या तालावर "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामघोष करत चढत होते. त्या नीरव गूढ शांततेत त्यांचा धीरगंभीर आणि खणखणीत आवाज आश्वस्त करीत होता.बाळ जसं आईला "आई, आई" हाकारत तिच्या दिशेने पुढे चालत रहाते तसं वाटत होतं. ग्रुपमधील अनेकांनी गिरनार उतरुन परतल्यावर हाच अनुभव सांगितला की ते "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरण ऐकले की एक प्रकारची उर्जा मिळत होती चढण्यासाठी आणि चालण्याचे श्रम जाणवत नव्हते.
आता चढतांना ढग आम्ही ज्या उंचीवर होतो त्यापेक्षा खाली दरीत विहरतांना दिसू लागले. हळू हळू जमिनीपासूनचे अंतर वाढत आहे हे दरीत नजर टाकतांच लक्षात येत होते. दिवसाउजेडी हा परिसर किती विहंगम दिसत असेल याची कल्पना मनात करत चालत होते. अजूनतरी पाऊस आला नव्हता. अगदी एखादी चुकार सरही नाही. मात्र वातावरण तसेच धुक्याचे. चढत असतांना हा एकच फोटो वरुन दिसणार्या वाटेचा काढला. बाकी सारे फोटो दुसर्या दिवशी उजेडात काढलेले आहेत.

कालपर्यंत एकमेकांना अनोळखी असलेल्या ग्रुपमध्ये आता चढतांना मात्र मस्त 'बाँडींग' झालं होतं. कुणाला कसलीही मदत लागली तरी अनेक हात पुढे सरसावत होते. सोबत आणलेला खाऊ, चॉकलेटस यांची देवाणघेवाण होत होती. जे आयोजक नव्हते त्या पुरुषांनीही स्वतःहून एकेका स्त्रियांच्या ग्रुपसोबत राहून, त्यांच्या वेगाने चढत कोणीही एकटे मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली.
आम्हां सर्वांची चढत असतांना करमणूक करण्याची, श्रमपरिहार करण्याची जबाबदारी जणू आमच्यातील छोट्या सदस्याची होती. तो पठ्ठ्या भारी उत्साही. पटापट पायर्या चढून तो पुढे जाई आणि आपल्या घरची माणसे कुठवर पोचली हे तपासायला वरुन टॉर्च मारुन शोधत बसे. नेमका तो प्रकाशझोत मागून चढणार्यांच्या डोळ्यांवर पडून डोळे दिपत असत. बर्याचदा तर वीसेक पायर्या चढून गेलेला रजत परत तितक्याच तत्परतेने आई कुठवर आली हे बघायला खाली उतरत असे.या हिशोबाने मला तर वाटते त्याने गिरनार पर्वत सलग दोन वेळा चढून उतरला असावा.
हळूहळू वातावरणातील बदल जाणवत होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. आमचीसुद्धा ही एक प्रकारची उपासनाच चालू होती की आणि ती देखील या सिद्ध भुमीत जिथे साक्षात दत्तगुरुंनी स्वतः तपाचरण केले आणि त्यांना सद्गुरुस्थानी मानणार्या त्यांच्या कैक शिष्य, साधकांनी देखील. अशा कित्येकांच्या तपसाधनेची पवित्र स्पंदने या पवित्र भुमीत, इथल्या आसमंतात भरुन राहिली असतील जी आम्ही त्या ब्राह्म मुहुर्तावर ग्रहण करु शकत होतो. आधी जाणवली तशी भिती आता अजिबात वाटत नव्हती.खूप प्रसन्न असे वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.
धिम्या गतीने चढत-चढत आता अंबाजी धाम दॄष्टीपथात येऊ लागले. बघता-बघता ५००० म्हणजे निम्म्या पायर्या होत आल्या की. मी ज्यावेळी अंबाजी मंदीराजवळ पोचले तेव्हा ३.५८ वाजले होते. ११.३५ वाजता पहिल्या पायरीपासून सुरुवात करुन, मध्ये अनेकदा विश्रांतीसाठी थांबूनही साडे चार तासांत आम्ही ५००० चा टप्पा गाठू शकलो होतो. मंदीर तर अजून बंदच होते. माझ्या आधी पोचलेली मंडळी हसतमुखाने स्वागत करत समोर आली. त्यांनी सांगितल्यानुसार मंदीराच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला. ‘इथवर सुखरुप आणलंस आई, आता पुढेही असंच सुखरुप ने अशी प्रार्थना केली ‘आणि जिथे सगळे बसले होते त्या टपरीवजा हॉटेलात आले. आधी पोचून ताज्यातवान्या झालेल्या मंडळींनी नुकत्याच पोचलेल्यांना जागा करुन दिली. आयोजकांनी या हॉटेलच्या मालकांना झोपेतून उठवून आमची मंडळी आता हळूहळू पोचतायत तर चहा तयार ठेवा असे सांगितले. गरम गरम चहा आणि पार्ले़ जी बिस्कीटस खाऊन तरतरी आली.
हळूहळू एकेक करत सर्व पोचले. सारे वेळेत पोहोचलो होतो. आता पावणेपाचपर्यंत इथेच थांबायचे होते.कारण यापुढचे अंतर एक ते दीड तासात पूर्ण होणार होते. गुरुशिखर -मंदीर पहाटे साडे पाच वाजता दर्शनासाठी उघडते. त्या आधी तिथे पोचल्यास कुठेही थांबायची सोय नव्हती. पायर्यांवर बसावे लागले असते. त्यामुळे इथेच थांबलो. खरं तर अजून निम्म्या पायर्या बाकी होत्या. मग दीड तासांत कसे काय पोचलो असतो आम्ही? असं म्हणतात की ५००० पायर्या चढून अंबा मातेचा आशिर्वाद घेतला की यापुढचं अंतर ती अंबा माता लीलया पुरे करुन घेते, तिच्या कूपाशिर्वादाने पुढचा टप्पा झरझर पार केला जातो. ती आईच दत्तगुरुंच्या पुढ्यात आपल्याला नेऊन ठेवते, हे ऐकतांच अगदी भारावून गेले.
आमचे पाचही आयोजक मदतीस तत्पर होते. गिरनार पर्वत यात्रेचा आनंद जो आपल्याला मिळाला तो इतरांनाही मिळावा या नि:स्वार्थी भावनेने या यात्रेचे आयोजन केले जाते आणि ही नि:स्वार्थी वॄत्ती प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होती, हे विशेष. कुठेही चिडचिड नाही, हातचे राखून माहिती देणे नाही. आताही जिथे थांबलो होतो तिथे थोडं स्ट्रेचिंग करा म्हणजे पाय मोकळे होतील अशी हळुवार सुचना त्यांनी दिली. त्यानुसार स्ट्रेचिंग करुन आम्ही पावणे पाचच्या सुमारास पुन्हा निघालो.
आता गोरक्षनाथ शिखराकडे जाऊ लागलो. याच रस्त्यावर प्रचंड वारा असतो. इथे एकमेकांचे हात पकडून कडं करुनच पुढे जाता येते असे ऐकले होते. आम्ही जेव्हा इथे पोचलो त्या वेळी वारा तर होताच पण असा वादळी वारा नव्हता. व्यवस्थित एकेकटे चालता येत होते. आता हा पर्वत उतरुन दुसरा चढायचा होता. त्यामुळे १०००-१५०० पायर्या उतरायच्या होत्या. काठीच्या आधारे त्या नीट उतरुन पुन्हा पुढील पायर्या चढू लागलो.
याच वाटेवरुन जात असतंना जर कदाचित मुसळधार पाऊस आला असतां तर?..... पाऊस पडत असतांना आजूबाजूच्या कडेकपार्यांतूनही पाण्याचे ओहोळ वहात पायर्यावर येतात, वार्याचा वेग अशा वेळी प्रचंड वाढतो, चढणे मुश्कील होते असे ऐकले होते. अंगावर सरसरून काटा आला. आम्ही दुसर्या दिवशी दुपारी खाली उतरेपर्यंत पाऊस मात्र अज्जिबात आला नाही. जुनागढ हा भाग कमी पावसाचा, त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस संपला असावा असे म्हणावे तर आम्ही मुंबईत परतल्यावर नंतरच्याच आठवड्यात तिथे मुसळधार पाऊस पडला होता, रस्त्यांवर पावसाचे पाणी वेगाने वहात असल्याचे व्हिडीओज आमच्या गिरनार यात्रेच्या ग्रुपवर पाहिले आणि मनोमन देवाचे आभार मानले.
या घटनेचा नंतर विचार करीत असतंना जाणवलं की अरे आपल्याला तर गिरनारच्या वाटेवर व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळत होती जणू काही, तेही कसलेही व्ही आय पी स्टेटस नसतांना. पण व्ही आय पी स्टेटस नाही कसे म्हणावे बरं? आपण सारी तर ‘दत्तगुरुंची बाळं’... हा एकच निकष पुरेसा आहे की व्ही आय पी पास मिळवण्यासाठी. जणू काही दत्तगुरुंनी स्वतः आमच्यासाठी रदबदली केली होती. पंचमहाभुतांना जणू आदेश दिले होते की "माझी बाळं डोंगर चढतायत मला भेटायला येण्यासाठी. तुम्ही तुमचं रौद्र रुप दाखवलंत तर भांबावतील बिचारी, हाल होतील त्यांचे. खरी 'राज की बात' तर ही आहे की ती सारी चढत नाहीचेत मुळी, मीच त्यांना कडेवरुन घेऊन येतोय. तेव्हा हे पंचमहाभुतांनो, माझ्या कार्यात मला मदत करा." आणि या आदेशाचे पालन प्रत्येक ठिकाणी केले जात होते. आम्हाला मोकळा मार्ग मिळत होता. अगदी जिथे कुठे पायर्या पाण्यामुळे ओल्या आढळल्या, तिथे त्यांच्यावर शेवाळ मात्र नव्हते. त्यामुळे कुठेच घसरायलाही झाले नाही.
आजूबाजूला आता स्थानिक काठियावाडी स्त्री-पुरुष दिसू लागले. आसमंत हळूहळू उजळू लागला होता. काळ्याकुट्ट अंधाराचे रुपांतर निळ्या सावळ्या रंगात होत होते. पुढे जात असतांना हळूहळू गुरुशिखराचा सुळका दिसू लागला. सरळसोट सुळका.... बघूनच धडकी भरावी असा. पण पायर्या मात्र वळणा-वळणाने सावकाश वर जाणार्या होत्या. घाटातल्या रस्त्यासारख्या. या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आणि मन भरुन आले.
पहाट होत असतांना
आजूबाजूचं वातावरण भारलेलं जाणवत होतं. कोणत्याही मंदीरात, मंदीर परिसरात आपण पावित्र्य अनुभवतो. मात्र त्यात त्या स्थानमहात्म्याइतकेच योगदान इतर गोष्टींचेही असते, जसं फुलांचा मंद सुवास, धूप, उदबत्तीचा दरवळ, त्यांची हवेत विरत जाणारी वलये, शांतपणे तेवणारी समई, निरांजन, सोबत त्या मंदीरातील आराध्य दैवताची ऐकू येणारी आरती, स्तोत्र, धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चरण या सार्या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. म्हणून गर्दीत,कोलाहलातही आपण ती शांती, पावित्र्य अनुभवू शकतो. इथे मात्र त्यांपैकी काहीच नव्हते. जे होते ते अजून नजरेस पडलेही नव्हते, तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. अरुणोदयाची मंगल वेळ आणि गुरुशिखराचे सान्निध्य.....
गुरुशिखराबाहेर चपला, बूट काढायला जागा नाही, त्यामुळे आधी पन्नास एक
पायर्या शिल्लक असतांना चौथरा असेल तिथेच काढून वर जा असे सांगितले होते
आम्हांला.त्यानुसार ज्या टप्प्यावरुन मंदीराचे प्रवेशद्वार दिसत होते तिथे
बूट काढले आणि सुरु झाला अखेरचा पन्नास पायर्यांचा
प्रवास.....भावभावनांचे कल्लोळ मनांत उठवणारा.. तरीही मनाला तॄप्तीची
अनुभुती देणारा......
क्रमशः
पायर्यांची झलक
गुरुशिखर - गिरनार (या सुळक्यावर वरती जे निळ्या पांढर्या रंगात दिसतंय ते गुरुशिखर)
आजि म्या ब्रह्म पाहिले
तॄप्तीची अनुभुती ? कसं काय? अजून तर दर्शन व्हायचे होते त्याआधीच तॄप्ती? पण 'देवाघरची अशीच उलटी खूण असते', कुणाची ही वाट पहाण्यात एक अधीरता असते, घालमेल असते, पण या वाट पहाण्यात खरोखर तॄप्ती जाणवत होती, वाट पहाण्यातली तॄप्ती केवळ परमेश्वरच देऊ शकतो.
फक्त पन्नास पायर्या बाकी राहिल्यात या जाणीवेनेच आतून भरुन येत होते. जसजशी जवळ येत चालले होते, शरीरात सूक्ष्म कंप जाणवू लागला होता. धडधड वाढली होती. मी इथवर आले होते? नाहीच मुळी "तो" घेऊन आला होता.... माझं इथवर येणं घडून येण्यासाठी माध्यम ठरलेले अनेक जण आता नजरेसमोर येऊ लागले. पुस्तक देणारा भाऊ, या यात्रेविषयी माहिती देणारी त्याची डॉ. सहध्यायी, परीक्षा चालू असतांनाही “आई तू जा बिनधास्त म्हणणारा मुलगा”, वयाच्या ८२ व्या वर्षी घरची, लेकाची जबाबदारी सांभाळेन म्हणणार्या आई, आईला आणि लेकाला सोबत म्हणून , मनात असूनही माझ्याबरोबर न येता “तू निर्धास्तपणे जा”, म्हणणारा नवरा, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑफिसातून सुट्टी मिळू शकेल की नाही अशी शंका येत असंताना बाणेदारपणे बॉसना Sir, let her take leave I will take care of her work in her absence असे म्हणून आश्वस्त करणारा ऑफिसातील सहकारी, मला व्यायाम आणि आहारासंबंधी योग्य मार्गदर्शन करणारा माझा भाचा, या यात्रेचे पाचही आयोजक आणि इतर ग्रुप मेंबर्स…. सर्वांची मी ॠणी आहे, तुम्ही सर्व नसता तर हे भाग्य माझ्या वाट्याला आले नसते.
गिरनारची वारी करतांना वाटेत 'दत्तगुरु' कोणत्या ना कोणत्या रुपात दर्शन देतात असे ऐकले होते. पण मला असे कोणीही दिसले/भासले नव्हते. कसलीही अनुभुती, चमत्कारीक अनुभव का ही ही नाही. हा विचार मनात येताच सद्गुरुंचे शब्द आठवले. "बाळांनो, चमत्कार पाहून नमस्कार करु नका.समोर दिसणार्या चमत्काराने तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? खरा चमत्कार सद्गुरु घडवून आणतात तो भक्ताच्या मनात आणि मनात बदल घडला की प्रारब्ध बदलायला वेळ लागत नाही”. अचानकच आठवले ज्या वेळी 'दत्त अनुभुती' पुस्तकात दहा हजार पायर्यांच्या प्रवासाबद्दल वाचले, त्या वेळीच मुखपॄष्ठावर असलेल्या गुरुशिखरावरील दत्तगुरुंच्या फोटोकडे पाहून म्हटले होते की "माझा नमस्कार इथूनच घे दत्तबाप्पा" असं बोलणारी मी आणि गिरनार दर्शनाची आस मनात घेऊन इथवर पोचलेली मी.... हा माझ्या मनातील बदल होता. हा माझा प्रवास होता नकारात्मक भावनेतून, सकारात्मकतेकडे नेणारा, न्युनगंडाकडून आत्मविश्वासाकडे नेणारा..... सद्गुरुंनी सांगितलं होतं की “जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या ताकदीच्या बाहेरील कार्य आपण संपादन करतो, तेव्हा जाणावे की कुठेतरी, कुठल्यातरी क्षणाला ह्या कार्यामधील कुठलातरी भाग स्वयंभगवानाने माझे रुप घेऊन घडवून आणलेला आहे”. याहून जास्त अनुभुती कसली हवी होती मला? सद्गुरु म्हणतात की “परमेश्वराकडे प्रत्येकाची रांग ही वेगळीच असते, माझ्या रांगेत माझ्या पुढे कोणी नाही आणि मागेही नाही, मी एकटीच चालत असते माझ्या रांगेत, त्यामुळे अमक्याला हे मिळालं/दिसलं तर मला का नाही? हे विचार सोडा. 'ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला मिळणारच आहे , कारण 'तो' तर भरभरुन द्यायलाच बसला असतो आपल्या लेकरांना, आपलीच झोळी फाटकी असते”..... हे सारं आठवून डोळे पाझरतील की काय अशी अवस्था झाली. कसेबसे स्वतःला सावरत चढू लागले.
श्रावणासारख्या पवित्र महिन्यात, एकादशीच्या दिवशी, सोमवारी हे दुर्लभ दर्शन घ्यायला मिळणार होते. माझ्यासाठी आजच्या दिवसाला आणखी खास महत्व होते. कारण आज २६ ऑगस्ट हा माझ्या आईचा जन्मदिन. ती असती तर आज तिचा ७५ वा वाढदिवस असता.नेमक्या याच दिवशी मला सद्गुरुपादुकांचे दर्शन होणे हा निव्वळ योगायोग खचितच नव्हता. आई-वडीलांची पुण्याई मुलांच्या कामी येते असं म्हणतात, तेच घडत असावं माझ्या बाबतीत.
पावणेसहा ते सहाचा सुमार. शेवटची पायरी चढले. समोर, लोखंडी सरकते दार, त्या दाराजवळ बसलेला गणवेषधारी पहारेकरी. आतमध्ये दॄष्टीक्षेप टाकत मी आत पाऊल टाकले, जिथे साक्षात दत्तगुरु पादुकांच्या रुपात स्थिरावले होते, त्या गुरुशिखरावरील मंदीरात मी आता या क्षणी उभी होते. चालत थोडी पुढे गेले, पादुकांसमोर , सभोवती गोलाकार बॅरीकेडस होते, तरीही पादुका व्यवस्थित दिसत होत्या. राखाडी रंगाच्या पाषाणावर, साधारण सहा ते साडे सहा फूट उंचीच्या व्यक्तीच्या पायांचा आकार जितका असेल त्या आकाराची दोन पावले, त्या पाषाणात रुतलेली, त्यामुळे जरा खोलगट, पायाच्या बोटांपासून मध्यभागापर्यंत पादुका तशाच अनावॄत्त होत्या. मागच्या भागांवर फुले वाहिली होती, जरी अर्धा भागच दिसत असला तरी अंदाज येत होता पावलांच्या लांबीचा. पादुकांच्या मागेच त्रिमुर्ती, ती मात्र पादुकांच्या आकाराच्या तुलनेत, छोटीशी, साजरी. पादुकांकडे एकटक बघत असतांना नकळत हात जोडले गेले आणि इथवर आवरुन ठेवलेले अश्रू घळघळा डोळ्यांतून वाहू लागले. आता ते आवरणं शक्य नव्हतं. त्याच स्थितीत डोकं टेकलं. आपल्या खूप जवळच्या कुणालातरी आपण बर्याच काळानंतर भेटतोय असं वाटत होतं. असा काही वेळ गेला. सावरलं स्वतःला. समोरच पुजारी बसले होते, ते पहात होते.पण त्यांना हे सवयीचं असावं बहुदा, कारण प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखीच होत होती. मंदीरात अर्पण करण्यासाठी आम्हाला देण्यात आलेलं खडीसाखरेचं पाकीट आणि पादुकांसठी हिना अत्तराची छोटी बाटली, बाहेर काढली.गुरुजींना दिली. खडीसाखर लगेच प्रसाद म्हणून परत केली गेली. उभी राहिले, प्रदक्षिणा घालण्यासाठी. हात जोडून प्रदक्षिणा घालत परत समोर येत असतांना गुरुजी माझ्याकडे पहात माझ्या दिशेने येत असलेले दिसले, म्हणून तिथेच थांबले. त्यांनी एक लहानशी पोथी माझ्या हातात दिली आणि म्हणाले की "बेटी इसे रोज पढना, तुम्हारी हर इच्छा महाराज पुरी करेंगे!' त्या क्षणी पुन्हा एकदा कंठ दाटून आला. गुरुजी परत फिरुन पादुकांशेजारी जाऊन बसले. मला पुन्हा एकदा नमस्कार करायची अनिवार इच्छा झाली. पुन्हा एकदा पादुकांसमोर नतमस्तक झाले. मनोभावे नमस्कार केला. हुंदका दाटून आला. आवंढा गिळत उठले. अजून मागे बरीच माणसं खोळंबली आहेत. त्यांना माझ्यामुळे ताटकळत रहावं लागू नये असं वाटलं, कारण थोड्या थोड्या लोकांनाच एकावेळी आत सोडत होते. पादुकांकडे पहात- पहातच परत फिरले.
त्याच पायर्यांवर चढणारी माणसे होती. मी उतरु लागले. अगदी थोड्याच पायर्या उतरल्यावर माझी मैत्रीण दिसली. तिला म्हटले, “तू दर्शन घेऊन ये, मी थांबते इथे." अजूनही सूर्योदय झाला नव्हता. तांबडं फुटू लागलं होतं. ढगांआडून एखाद-दुसरी सोनेरी रेघ आकाशात पसरत चालली होती. एरव्ही हिल स्टेशन्सना, समुद्रकिनारी जाऊन सुर्यास्त कैक वेळा पाहिला आहे पण सूर्योदय पहाण्याची ही पहिलीच वेळ.तो सुद्धा गुरुशिखरावरुन दिसणारा सूर्योदय. पण तितका वेळ हाताशी नव्हता. आता धुनीचे दर्शन घ्यायचे होते. जी फक्त दर सोमवारीच प्रज्वलित होत असते.सहा वाजून गेले होते. आम्ही दोघी झटपट उतरु लागलो. अंधारात जे जाणवलं नव्हतं ते आता उजेडात दिसून आलं की बर्याच पायर्यांना कठडाच नाहीये. उतरतांना त्यामुळे जरा भिती वाटत होती. एकमेकींचा हात धरुन आम्ही खाली आलो. आता बर्याच पायर्या चढायच्या होत्या. त्या चढून झाल्या एकदाच्या. धुनीपाशी आणि त्याबाहेर गर्दी जमली होती. आम्ही पोहोचेपर्यंत आत धुनी प्रज्वलित झाली होती. आमच्यापैकी केवळ दोघे त्या वेळी तिथे होते, ज्यांना तो क्षण पाहण्याचे दुर्मिळ भाग्य लाभले. पुन्हा एकदा मनाला बजावले "ज्याला ज्याची गरज आहे, ते त्याला मिळणारच." शांतपणे रांगेत आत जात धुनीपाशी आलो. शिर्डीतल्या साईनाथांच्या द्वारकामाईतील धुनीची आठवण आली. लहानपणापासून देव म्हणजे साईबाबा हे समीकरण मनात फिट्ट झालेले. त्यांचंच बोट धरीत इथवर पोचले होते. मनोभावे धुनीला नमस्कार केला.
आता अन्नपूर्णेचा प्रसाद ग्रहण करायची वेळ. इतक्या लवकर पोचलो असूनही आत आमच्या आधीच पहिली पंगत बसली होती. त्यामुळे बाहेर थांबलो.पहिल्या पंगतीतील भाविकांचे प्रसादग्रहण झाल्यानंतर आम्हाला आत घेण्यात आले.एका वेळी साधारण तीस - चाळीस माणसे बसू शकतील इतकी जागा होती. सेवेकरीही तत्पर होते.भराभर पाने वाढण्यात आली. सकाळी साडे सहाच्या सुमारास डाळ, भात, शिरा-पुरीचा आस्वाद घेऊन आम्ही तेथून बाहेर आलो.
तिथून गोरक्ष गुफेकडे जायचे होते. पण स्त्रियांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे बाहेरच बाकीच्यांची वाट बघत थांबलो. तोवर सकाळचे साडे सात वाजले होते.गिरनार जागा झाला होता. वर्दळ वाढली होती. आम्ही आता अंबाजी मंदीराकडे चालू लागलो. ते दर्शन अजून बाकी होते. अंबाजी मंदीरापाशी आता पुजेच्या, ओटीच्या सामानाची दुकाने उघडली होती. ते घेऊन आत दर्शनासाठी गेलो. रेणुका मातेसारखं दिसणारं अंबामातेचं रुप मनात भरलं. बाहेर येऊन परत एकदा पहाटे जिथे चहा घेतला होता, त्या हॉटेलात विसावलो. गिरनार वारीतील सर्व स्थळांचे दर्शन घेऊन झाले होते. आता परतीची वाट धरायची होती. कोल्ड्रींक घेऊन थोडा आराम केला. साधारण सव्वा आठ-साडे आठच्या सुमारास खाली उतरण्यास सुरुवात केली.
आता खरी कसोटी होती. उतरतांना अधिक त्रास होतो, पाय लटपटतात, पायांत गोळे येतात असे ऐकून होते. उतरायला सुरुवात केली आणि अगदी ८-१० पायर्या उतरताच उजव्या पायांत क्रँप आल्यासारखे वाटले. धस्स झालं. चढतांना अगदी पिसासारखी चढले होते. आता काय ? पायाची बोटे जरा हलवली. काही क्षण थांबले. बरं वाटू लागल्यावर पुन्हा उतरायला सुरुवात केली. पायांत गोळे ,पाय लटपटणे यांपैकी काहीच होत नव्हते. त्यामुळे हायसं वाटलं. आता फक्त एकच चिंता होती , ती उन्हाची. उन्हं प्रखर झाली की त्याची झळ लागणार. मला तर उन्हात गेलयावर त्रास होतोच होतो. त्यामुळे शक्यतो उन्हं चढायच्या आत खाली उतरण्याचा प्रयत्न करायचा असे ठरवले. माझी मैत्रीण अगदी सावकाश उतरत होती. तिच्याशी बोलले. तिच्या सोबत ग्रुपमधल्या काही जणी होत्या. त्यामुळे ती म्हणाली की तू पुढे झालीस तरी चालेल आणि मी पुढे निघाले. मध्ये-मध्ये वाटेत आमच्या ग्रुपमधले कु़णीतरी भेटत होते. उतरतांनाही थांबत, विश्रांती घेतच उतरलो.
एका ठिकाणी एक भली थोरली शिळा तिरप्या अवस्थेत - (४५ डीग्री च्या कोनात कललेली) आढळली. ती शिळा देवीमातेने आपल्या दोन्ही हातांनी धरुन ठेवली आहे असे मानले जाते. त्या स्थानावर देवीला हळदी-कुंकू, बांगड्या वाहिलेल्या दिसत होत्या.
आजूबाजूचे सॄष्टीसौंदर्य आता नजरेत भरत होते. उतरत असतांनाच काही फोटो
काढले. सकाळच्या लख्ख प्रकाशात गिरनार डोळ्यांत साठवून घेत उतरत होतो.





या अशा डोंगरातील गुहा अधेमधे दिसत होत्या.
आता विरुद्ध दिशेने चढून येणारी माणसे वाटेत दिसत होती. वर्दळ वाढत होती. ते लोक "दत्तात्रेय" पर्यंत चढून परत येताय का? कधी चढायला सुरुवात केलीत वगैरे चौकशी करत होते.
एका ठिकाणी जे पाहिलं ते बघून थबकलेच. एक कॄश अंगकाठीचा युवक एल पी
जी सिलिंडर खांद्यावर घेऊन अनवाणी चढत होता, घामाने निथळत. त्यानंतर लगेच
काही बायका सुद्धा मोठाल्या फरशा डोक्यावर घेऊन चढतांना दिसल्या. स्वतःची
लाज वाटू लागली.
इथे यायचं म्हणून किती ते जीवाला जपलं होतं मी... ब्रॅण्डेड, अॅण्टीस्किड,
कंफर्टेबल शूज निवडून घेतले होते, अशाच इतरही अनेक गोष्टी कंफर्ट
देणार्या. स्वतःच्या कंफर्ट झोनमधून बाहेर यायचीच तयारी नसते नं आपली...
इथे हे बिचारे कष्टकरी.... त्यांच्या पायांत साध्या चपलाही नव्हत्या नि
शिरावर एव्हढं ओझं. मनात आलं आपल्याला मिळालेलं ‘व्ही आय पी स्टेटस’ हे या
यात्रेपुरतं नसून त्या ‘दयाघनाने’ जन्मापासून आपल्याला बहाल केलं आहे.
आपल्याला फक्त किंमत नाहीये त्याची. म्हणून तर साध्याशा मनाविरुद्ध
घडलेल्या गोष्टीचा आपण इतका बाऊ करत असतो. या कष्टकर्यांच्या रुपात खरोखर
‘देव दर्शन’ झाले आम्हा सर्वांनाच. इतर तीर्थस्थळांवर गर्दी करणार्या
भिकार्यांपेक्षा हे लोक स्वाभिमानाने जीवतोड मेहनत करुन कष्टाची भाकरी
मिळवत होते. मनोमन कडक सॅल्युट ठोकला त्यांना.
गिरनार यात्रेदरम्यान जाणवलेली एक खंत म्हणजे इतकं जागॄत देवस्थान असूनही हे फार दुर्लक्षित आहे. दुसर्याच दिवशी पाहिलेल्या सोमनाथ, प्रभास क्षेत्र येथील देवस्थानांचे वैभव बघता इथे तर किमान सुविधाही नाहीत. प्रसाधनगॄहही ९००० पायर्या चढून गेल्यावरच. सरकार इथे का लक्ष देत नाही? माहीत नाही. यात्रेकरुंसाठी नाही पण निदान इथल्या मजूरांचे असे अवजड सामान वाहून नेण्याचे कष्ट तरी दूर व्हावेत अशी मनोमन इच्छा आहे.
जैन मंदिरे दिसू लागली. त्या मंदीरांचे बाधकाम खूप सुंदर होते.
गिरनारच्या पार्श्वभुमीवर ही जैन मंदीरे सकाळच्या उन्हात खूप लोभसवाणी
दिसत होती.
जैन मंदिरे
हळूहळू उन्हे चढू लागली. नेमक्या किती पायर्या उतरुन झाल्या, किती राहिल्या, कळत नव्हते. थोड्याच पायर्या आता शिल्लक राहिल्या असाव्यात असं स्वतःला समजावत मी उतरु लागले. अता कधी एकदा खाली पोचतोय असे होऊ लागले होते. साडेदहाच्या सुमारास उन्हाची झळ जाणवू लागली. मी थांबले एके ठिकाणी. सॅकमधून टोपी, गॉगल काढला. इलेक्ट्रलची पावडर पाण्यात घालून प्यायले. जरा बरं वाटू लागलं. पुन्हा उतरायला सुरुवात. आमच्या ग्रुपमधील एकाने गुढगे दुखू लागल्यामुळे उतरतांना डोली केली असे समजले. वाटेत प्रत्येक दुकानदार डोली हवी का? असे विचारत होता. “नाही, नाही” म्हणत मी आपली शक्य तितक्या लवकर उतरण्याचा प्रयत्न करीत होते. दहा- पंधरा पायर्या मग सपाट चौथरा, त्यापुढे वळण पुन्हा पायर्या, चौथरा, वळण ही रचना आता इतकी सवयीची झाली की डोळे मिटूनही तेच दिसू लागले.
वाटेत एका दुकानात मालिशचे तेल विकण्यास ठेवले होते. सांधेदुखीवर रामबाण औषध म्हणून. मागे माऊंट अबूवरील गुरुशिखरावर जातांनाही असेच मालिशचे तेल विकत घेतले होते, त्याचा आईंना बराच फायदा झाला होता. त्यामुळे इथेही २ बाटल्या घेतल्या. गिरनारवर शॉपिंग ही करुन झाले.
आता जमिनीपासूनचे अंतर कमी कमी होत चाललेले दिसले आणि आपण आता अगदी अंतिम टप्प्यात पोचलोय हे जाणवले. माझ्या ग्रुपमधील दोघे वाटेत भेटले. आम्ही तिघेही आता एकत्रच उतरत होतो.साडेअकरा वाजता पहिल्या पायरीवर पोचलो. रात्री साडेअकराला इथूनच सुरुवात केली होती. बारा तास पूर्ण झाले होते. परततांना पहिल्या पायरीवर डोकं टेकून आणि शेजारील हनुमानाला नमस्कार करुन सुखरुप नेऊन आणल्याबद्द्ल आभार मानायचे असतात. तसंच ग्रामदैवत भवनाथांचे दर्शन घेऊन त्यांचेही आभार मानायचे असतात. मगच यात्रा पूर्ण झाली असं समजलं जातं. त्यामुळे बूट काढले. पायरीवर डोके टेकायला म्हणून खाली वाकले, डोके टेकले, कंबर प्रचंड दुखत होती हे तेव्हा जाणवलं. कसंबसं उठून चढवावा हनुमानालाही नमस्कार केला आणि भवनाथ मंदीराकडे निघालो.
रस्त्यावर रहदारी वाढली होती. आमच्या हातातील काठी आणि एकूणच अवतार बघून लोक गिरनार चढके आये क्या? दत्तात्रेय तक गये थे क्या? अशी चौकशी करु लागले. हो हो म्हणत आम्ही कसे तरी स्वत:ला रेटत भवनाथ मंदीरात आलो. दर्शन घेतले. कितीही थकला असलात तरीही न जेवता झोपायचे नाही अशी सक्त ताकीद आयोजकांनी दिली होती. जेवण्याचे हॉटेल आणि कुपनही आदल्या दिवशी निघतांनाच दिले होते. त्यामुळे आम्ही तिघे त्या हॉटेलात गेलो. कसेबसे दोन घास खाल्ले आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथे परत २ मजले चढायचे म्हणजे दिव्य.... ते पार पाडलं. खोलीत आल्यावर फ्रेश झाले, एक क्रोसिन घेतली आणि पायांना रोल ऑन फासून झोपून गेले.
एकेक करत सारे परतू लागले. दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रुपमधील सर्व खाली आले. आयोजकांनी एक मसाज करणारा माणूस बोलवून घेतला. तो प्रत्येकाच्या खोलीत जाऊन पायांना मसाज करुन देत होता. त्यामुळे खूप बरं वाटू लागलं.
सर्वांची गिरनार यात्रा पूर्ण झाली होती. यात्रा जरी पूर्ण झाली असली तरी या यात्रेआधी आणि त्या दरम्यान 'दत्तगुरुंशी' जुळलेली नाळ तशीच रहावी…..अगदी जन्मजन्मांतरीसाठी हीच इच्छा.
ही लेखमाला म्हणजे गिरनार वारीचे वर्णन आहे. पण ज्याप्रमाणे गिरनार वारी ‘दत्तगुरुंच्या इच्छेनेच’ घडते तसेच हे लेखनही. कारण बुद्धिदाताही 'तोच'. त्यामुळे हे लिहिणारी मी केवळ एक निमित्तमात्र, त्यानेच त्याला हवं तसं लिहून घेतलंय माझ्या हातून. असं असलं तरी या लेखनात अनवधानाने काही त्रुटी आढळल्या तर ते न्यून माझे समजून क्षमा कारावी.
शेवटी एकच सांगणे….
इदं न मम | इदं सद्गुरो:||
लेखनसीमा.
आयोजक - श्री. मंदार पाध्ये नंबर 99230 13375
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.