Saturday, November 15, 2025

लेह लडाख .......

 लेह लडाख .......    भाग एक 

16 जून 2018 ते 24 जून 2018 

यावर्षी कुठे सहलीला जायचे याचा विचार चालू होता. केरळ, काश्मीर, सिक्कीम दार्जिलिंग, अंदमान झाले होते. लेह लडाख, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल इत्यादी ठिकाणी कधी ना कधी बघायचीच होती.
शेवटी लेह लडाखला जाऊ असे ठरवले. 
लडाख ची संस्कृती आणि इतिहास तिबेटशी संबंधित आहे. लडाख उंच उंच तसेच बर्फाच्छादित पर्वत रांगांसाठी प्रसिद्ध आहे. हे पर्वत जागोजागी आपले रंग बदलतात. लडाख तिबेटी संस्कृतीसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. लडाख मध्ये खूप प्राचीन तिबेटी मठ तसेच तिबेटी हस्तलिखिते चांगल्या रीतीने जतन केली आहेत.
लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू काश्मीर व पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश तसेच उत्तरेस काराकोरम खिंडी आहे. लडाख हा काराकोरममधील सियाचीन हिमनदीपासून दक्षिणेस मुख्य ग्रेट हिमालयापर्यंत पसरलेला आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट शिया मुस्लिम, तिबेटी बौद्ध, तसेच काही प्रमाणात हिंदू व शीख आहेत.  
लेह हे  लडाखमधील सर्वात मोठे शहर आहे. लेह शहर हिमालय पर्वतरांगेत सिंधू नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ११,५०० फूट उंचीवर वसले आहे.  
लडाखी, बाल्टी व हिंदी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लेहमधील बहुसंख्य रहिवासी बौद्ध अथवा हिंदू धर्मीय आहेत. लेह शहर श्रीनगरसोबत ५३४ किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग १ द्वारे जोडले गेले आहे. तसेच उत्तर-दक्षिण धावणारा ४२८ किमी लांबीचा लेह–मनाली महामार्ग लेहला हिमाचल मधील मनाली शहराला जोडतो. 
लेह विमानतळावरून दिल्ली, श्रीनगर, चंदीगढ इत्यादी शहरांसोबत थेट विमानसेवा आहे.
जायचे ठरल्यावर कोण कोण मित्रमंडळी बरोबर येतील याची चाचपणी करणे सुरू झाले तसेच कोणत्या टूर ऑपरेटर ची मदत घ्यायची ते पण बघायला लागलो. मला शक्यतो ज्या प्रदेशाला भेट देतो आहे तेथील टूर ऑपरेटर तर्फे जायला आवडते कारण असे जाणे थोडे स्वस्त पडते. 
लेह लडाखला जाताना विमानाने डायरेक्ट लेहला न जाता श्रीनगर मधून रस्त्याने जा असा मला सल्ला मिळाला कारण लेह तसेच संपूर्ण लडाख प्रदेश समुद्रसपाटीपासून खूप उंचावर आहे व लेहला पोचल्यावर नंतर अजून उंचावर जायचे असते तेव्हा ऑक्सिजनची थोडी कमतरता असल्याने श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्रीनगर मधून आपण रस्त्याने आलो तर हळूहळू आपल्याला उंचीची सवय होऊ लागते. 
तर ओळखीच्यांकडून श्रीनगर मधीलच बोनाफाईड हॉलिडेज या टूर ऑपरेटर बरोबर संपर्क झाला. त्याने सहलीची प्राथमिक रूपरेषा करून दिली. आता मित्रमंडळींना विचारणे सुरू केले. 
आमच्या बरोबरअंदमानला आलेले श्री व सौ वढवेकर यायला तयार झाले. त्यांचा मुलगा चेतनही येणार होता. श्री व सौ कंद यांनी अगोदरच लडाखची सहल केल्याने ते येणार नव्हते. माझा मावस भाऊ उदय व त्याची सौ जयश्री महाजनी यांना विचारले त्यांनी विचार करून सांगतो असे सांगितले. 
मी तेव्हा दर रविवारी पहाटे बसने सिंहगडला जायचो. तेव्हा बसने सिंहगडला येणारे श्री खिरे माझे चांगले मित्र झाले होते. त्यांना विचारले. ते उभयता व त्यांचा मुलगा कौस्तुभ असे तिघे यायला तयार झाले. त्यांनी त्यांचे बालपणीचे मित्र उल्हास जोशी यांना विचारले. ते उभयता सुद्धा यायला तयार झाले. 
आता पुराणिक, वढवेकर, खिरे कुटुंबीयांचे प्रत्येकी तीन व जोशींचे दोन असे 11 जण तयार झालो होतो. उदय व जयश्री नंतर सांगणार होते. टूर ऑपरेटर बरोबर बोलून सहलीची रुपरेषा पक्की केली. त्याप्रमाणे विमानाची तिकिटे काढली. 
टूर ऑपरेटरने आम्हाला सहली दरम्यान काय काळजी घ्यायची त्या संदर्भात सूचना दिल्या. त्याने सांगितले,
Dimox 250 gm ही गोळी सहल सुरू झाल्यावर प्रत्येकाने तीन दिवस रोज दोन दिवस घ्यायची आहे.
आमच्याबरोबर जी गाडी असणार होती त्या गाडीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर असणार होता होता तरीसुद्धा आमच्याबरोबर छोटा ऑक्सिजन सिलेंडर ठेवणे गरजेचे आहे. बर्फावरून किरण परावर्तित होऊन डोळ्यांना त्रास होऊ शकतो म्हणून गॉगल वापरणे गरजेचे आहे.
सर्व तयारी झाली होती. उदय व जयश्रीने सुद्धा आम्ही येतो आहे असे सांगितले. आता निघायचे बाकी होते. एवढ्यात एक विघ्न आले. 
तेव्हा आमची मुलगी प्रियांका इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.  तिचे Syntel  (सिंटेल) या कंपनीत कॅम्पस सिलेक्शन झाले. कामावर रुजू होण्याची तारीख ही आम्ही निघण्याच्या एक आठवडा अगोदरची होती.  आम्ही सिंटेल मध्ये जाऊन आलो. त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली. विमानाची तिकिटेही काढली आहेत असेही सांगितले. प्रियांका सहल संपल्यावर कंपनीत रुजू होईल त्याची परवानगी द्या अशी विनंती केली. पण त्यांनी काही एक ऐकले नाही. ती रुजू झाली नाही तर तिची निवड रद्द होईल व आम्ही दुसऱ्या उमेदवाराची निवड करू असे त्यांनी सांगितले. 
मोठा कठीण प्रसंग होता. विमानाची तिकिटे रद्द केली तर खूप नुकसान झाले असते. तसेच माझ्या भरवशावर सर्वजण या सहलीला यायला तयार झाले होते. शेवटी प्रियांका म्हणाली इतके नुकसान करण्याऐवजी सर्वांचा हिरमोड होऊ नये म्हणून तुम्ही सर्व जा. मी एकटी घरी राहीन. शेवटी मनावर दगड ठेवून तिची येण्या जाण्याची तिकिटे रद्द केली. टूर ऑपरेटरला पैसे भरले होते पण काही पैसे देणे बाकी होते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. त्याला सुद्धा कल्पना दिली.
निघण्याच्या आदल्या दिवशीच अजून एक अडचण निर्माण झाली. उदय जयश्री अगोदरच दिल्लीला गेले होते. तेथे गेल्यावर जयश्रीच्या लक्षात आले की लडाख मध्ये प्रवेशा करता चेक पोस्टवर लागणारे आधार कार्ड पुण्यामध्ये घरीच विसरले आहे. या कार्डशिवाय तिला लडाख मध्ये प्रवेश करता आला नसता. दोघेही हवालदिल झाले होते. मला त्यावर उपाय सुचला. 
उदय, जयश्री औंधमध्ये रहात. उदयची बहीण अंजू सुद्धा औंधमध्येच राहते. उदयच्या घरात काम करायला येणाऱ्या  मावशींकडे घराची किल्ली होती. अंजूने मावशींकडून किल्ली घेऊन उदयच्या घरातून आधार कार्ड घेऊन माझ्याकडे पोचवायला होकार दिला त्यामुळे मोठा अडथळा दूर झाला.
शेवटी 16 जून उजाडला. 
16 जून 2018 .....   दिवस पहिला 
पहाटे पाच वाजता विमान होते. आम्ही पहिल्यांदाच प्रियांकाला सोडून सहलीवर चाललो होतो. त्यामुळे काहीशा जड अंतकरणानेच आम्ही घर सोडले. प्रियांकाची मावशी दोन घरे सोडूनच राहत होती तिने प्रियांकाकडे लक्ष देण्याचे व रात्री प्रियांकाच्या सोबतीला यायचे कबूल केल्यामुळे चिंता थोडी कमी झाली होती. 
आम्ही 10 जण मध्यरात्रीच पुणे विमानतळावर पोहोचलो. दिल्लीला जाताना मुंबईत एक थांबा होता. उदय, जयश्री आम्हाला सर्वांना मुंबई विमानतळावरच भेटले. सकाळी दिल्लीला पोचलो व पुढच्या दहाच्या विमानाने ११:३० च्या सुमारास श्रीनगरला पोचलो.  हा सर्व प्रवास इंडिगोच्या विमानाने केला.
श्रीनगरला टूर ऑपरेटरने गाडी पाठवली होती ही गाडी आमच्याबरोबर लेहपर्यंतच असणार होती. एकदा लेह मध्ये पोहोचल्यावर नंतर लेह मधील गाडी लडाखमधील सर्व प्रवासाकरता आमच्याबरोबर असणार होती. आता आम्ही मुक्कामाकडे म्हणजे सोनमर्गकडे चाललो होतो. वातावरण थंड पण आल्हादायक होते. दुपारचे जेवण रस्त्यावरील चांगले हॉटेल बघून घेतले. डोंगराच्या पायथ्याशी बर्फ साठला होता. रस्त्याच्या कडेला बर्फ वितळल्यामुळे तयार झालेले पाण्याने छोट्या नदीचे रूप घेतले होते. काश्मीरचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होतो. श्रीनगर ते सोनमर्ग अंतर साधारणपणे 97 किलोमीटर आहे. साधारणपणे तीन ते चार तास आम्हाला सोनमर्गला पोहोचायला लागले.
हॉटेलवर मध्ये पोहोचेपर्यंत थंडी खूपच वाढली होती. हॉटेलमध्ये जाऊन रूम ताब्यात घेतली. हॉटेल व रूम दोन्ही चांगले होते. रूममध्ये गादी खाली इलेक्ट्रिक फिटिंग उपकरण लावले होते त्यामुळे खोली उबदार होत होती. सोनमर्ग मध्ये टूर ऑपरेटर तर्फे काही दाखवायचे ठरले नव्हते. आमचे आम्हीच चालत फिरायला बाहेर पडलो. रस्त्याने लांब पर्यंत गेलो. याच रस्त्याने अमरनाथ यात्रेला जायचे असते असे आम्हाला सांगण्यात आले. सगळीकडे बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. डोंगराकडेने बर्फ वितळून पाणी वाहत होते. गरम गरम चहाची तल्लफ झाली. सर्वांनी चहा घेतला. अंधाराची चाहूल लागल्यावर परत फिरलो. हॉटेलमध्ये जाऊन जेवलो व झोपलो. 
उद्या कारगिल कडे निघायचे होते. प्रवास मोठा नव्हता. फक्त 120 किलोमीटर. श्रीनगर व कारगिल ला जोडणाऱ्या, समुद्रसपाटीपासून तीन हजार नऊशे मीटर उंचीवर असलेल्या झोझिला पास वरून जायचे होते.  जाता जाता सृष्टी सौंदर्य बघत जायचे होते. रस्त्यात महत्त्वाची ठिकाणे सुद्धा बघायची होती. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारगिल वॉर मेमोरियल बघायचे होते. 

विनय पुराणिक 
23 जुलै 2025 
9850090165

लेह लडाख .......    भाग दोन

16 जून 2018 ते 24 जून 2018 

17 जून 2018 ....... दिवस दुसरा 

सकाळी नाश्ता झाल्यावर कारगिल कडे निघालो. आजचा प्रवास फारसा मोठा नव्हता पण सोपा नव्हता. समुद्रसपाटीपासून 3900 मीटर उंचावर असलेला  झोझिला पास ओलांडून पुढे जायचे होते. श्रीनगर कारगिलला जोडणारा हा एकमेव रस्ता हा वर्षांमध्ये फक्त एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्येच चालू असतो. विपरीत म्हणजे अतिशय थंड हवामान तसेच बर्फाच्छादित रस्ते यामुळे बाकीच्या कालावधीत या रस्त्यावर प्रवास करणे शक्य होत नाही. झोझिला पासवर वारंवार हिमस्खलन आणि भूस्खलन होत असल्याने हा रस्ता रहदारीसाठी धोकादायक आहे.
आता हा रस्ता टाळण्यासाठी डोंगर रांगांमधून सुमारे 14 किलोमीटर लांबीचा बोगदा करण्याचे काम हातात घेतले आहे. हे काम 70 टक्के झाले आहे. हा झोझिला येथील बोगदा तयार झाल्यावर श्रीनगर मधून बारा महिने कारगिल व पुढे लेह, लडाख पर्यंत जाता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेची बचत होईल व जीवाची जोखीम टळेल.
या रस्त्यावरून प्रवास करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. बाजूला बर्फाच्छादित डोंगर, वळणा वळणाचे रस्ते. येथे गाडी चालकाचे काम खूप अवघड आहे. 
येथून पुढे आम्ही झिरो पॉईंट वरून जाणार होतो. याला झिरो पॉईंट का म्हणतात हे प्रथम सांगतो. आमचा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने होत होता. (NH-1) वर उल्लेख केल्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये जेव्हा हा मार्ग बंद होतो तेव्हा आपण जाऊ शकत असलेले शेवटचे ठिकाण म्हणजे झिरो पॉईंट.
हे स्थान लडाख आणि काश्मीर यांच्या सीमारेषेजवळ आहे.  सैन्य आणि सैन्याला गरजेचा असणारा दारूगोळा व अन्नसामग्रीचा पुरवठा याच मार्गाने होते त्यामुळे हे स्थान फार महत्त्वाचे आहे. 
पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे स्थान महत्त्वाचे आहे. Snow sledge व Snow biking तसेच ट्रेकिंग करता हे स्थान प्रसिद्ध आहे. येथे हॉटेल व्यवसायिकांनी पर्यटकांकरता चहा, बिस्किट व मॅगीची व्यवस्था केली आहे. 
येथे थांबून आम्ही येथील साहसी खेळांचा आनंद घेतला. तेथे भाड्याने मिळणारे शूज घालून बर्फात खेळलो. एकमेकांच्या अंगावर बर्फ टाकण्याची मजा घेतली. खूप फोटो काढले व नंतर चहा, बिस्किट खाऊन पुढे निघालो. रस्ता द्रास मधून जातो. हे गाव रशियातील सायबेरियानंतर जगातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण मानले जाते.  
मजल दरमजल करत आम्ही आजच्या सर्वात महत्त्वाच्या स्थळा कडे पोहोचलो. कारगिल वॉर मेमोरियल. 
कारगिल वॉर मेमोरियल हे भारतीयांची देशभक्ती जागवणारे स्मारक आहे. हे लद्दाखमधील द्रास (Dras) भागात टायगर हिल व तोलोलिंगच्या पायथ्याशी, कारगिल शहरापासून अंदाजे ५ किमी अंतरावर वसलेले आहे.
03 मे 1999 ते 26 जुलै 1999 या कालावधीमध्ये याच भागामध्ये भारत व पाकिस्तान मध्ये युद्ध लढले गेले. त्यावेळी या भागामध्ये पाकिस्तानने घुसखोरी केल्यावर भारताने ऑपरेशन विजय या नावाने मोहीम सुरू केली व  पाकिस्तानी सैन्याला, घुसखोरांना तोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट 4875 सारख्या उंच व दुर्गम डोंगररांगावरून हुसकावून लावले व एक अशक्यप्राय विजय मिळवला.
कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट अनुज नायर, राइफलमन संजय कुमार, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांच्यासारख्या शूरवीरांनी मोठा पराक्रम दाखवला.  हे सर्व व त्यांच्या बरोबरील अनेक जण या युद्धात अजरामर झाले. या शूरवीरांच्या स्मरणार्थ येथे एक युद्ध स्मारक उभे केले आहे. 
या स्मारकामध्ये आपल्याला खालील गोष्टी बघायला मिळतात. 
1. अमर ज्योती 
ही शहीद जवानांच्या सन्मानार्थ सतत पेटती ठेवलेली ज्योत आहे.   
2. ग्रॅनाईट स्तंभ
यावर बटालियनच्या नावासहित शहीद जवानांची नावे कोरलेली आहेत.
3. संग्रहालय 
या संग्रहालयामध्ये युद्धात वापरलेली शस्त्रे, हत्यारे तसेच गणवेश ठेवले आहेत. युद्धासंबंधी फोटो सुद्धा आहेत.
4. पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे
युद्धात वापरलेले गन शेल, पाकिस्तानी बंकर चे अवशेष तसेच सामग्री येथे बघायला मिळतात.
26 जुलै 1999 रोजी आपण विजय मिळवला होता व पाकिस्तानी घुसखोरांना मारले व हाकलले होते त्यामुळे दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.  युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी खास कार्यक्रम आयोजित केले जातात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारगिल स्मारका जवळ येथे हजर असलेला अधिकारी आपल्याला स्मारकाच्या मागील बाजूस दिसत असलेल्या तोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट 4875 या शिखरांवर आपल्या सैनिक व अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे चढाई केली त्याचे व त्यांच्या शौर्याचे चित्र त्याच्या वीरश्री युक्त भाषणाने आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभे करतो. आपले मन अभिमानाने भरून येते. नकळत डोळ्यात पाणी उभे राहते.
या स्मारकाजवळच कारगिल युद्धावर आधारित माहितीपट दाखविण्याची व्यवस्था केली आहे. ज्यायोगे आपल्याला या युद्धासंदर्भात सर्व माहिती कळते. आपल्या अधिकारी व सैनिकांनी केलेल्या बलिदानाची आपल्याला जाणीव होते. कळत नकळत आपल्यात देशभक्तीची जाणीव रुजते. देशा करता काहीतरी करावे असे वाटू लागते. 
हे युद्ध सुरू झाले तेव्हा सर्व महत्त्वाच्या पर्वत शिखरांवर पाकिस्तानी घुसखोरांनी कब्जा केला होता. भारतीय सैनिक खालच्या बाजूस होते. भारतीय सैन्याची हालचाल त्यांना सहज दिसत होती त्यामुळे सैन्याला शस्त्रपुरवठा करण्यात अडचण येत होती. 
पण  या अडचणी वर सुद्धा उत्तर शोधण्यात आले. पाकिस्तानी सैनिकांना आपल्या  सैन्याची हालचाल दिसू नये यासाठी या रस्त्यावर एक सलग व उंच भिंत बांधण्यात आली. पाकिस्तानी सैनिकांना कळू नये म्हणून हे काम रात्री करण्यात आले. अर्थात हे काम एका रात्रीत झाले नाही. याला काही कालावधी लागला. त्यामुळे अंतिम विजय मिळवायला उशीर झाला.
या मोहिमेमध्ये गाजवलेल्या पराक्रमा करता मरणोत्तर परमवीर चक्र मिळवलेले कॅप्टन विक्रम बात्रा यांनी या मोहिमेवर निघण्याअगोदर काढलेले उद्गार येथे लिहून ठेवले आहेत. 
कॅप्टन बात्रा म्हणाले होते. 
"मी तिरंगा फडकावून परत येईन किंवा तिरंग्यामध्ये गुंडाळला गेलेल्या अवस्थेत येईन. पण येईन हे नक्की. "
कॅप्टन बात्रांसारखे वीर आपल्या देशात आहेत व स्वतःच्या जीवाची आहुती देऊन ते आपल्या सीमांचे रक्षण करतायेत, म्हणून आपण सुरक्षित आहोत. नाही का?
वॉर मेमोरियल बघून होईपर्यंत खूप उशीर झाला होता. जेवणाची वेळ टळून गेली होती. जवळच्याच हॉटेलमध्ये दुपारचे जेवण केले.
आमचा ड्रायव्हर श्रीनगर मधील. मुस्लिम सुन्नी समाजातील. त्याला आम्ही जेवणाबद्दल विचारले. तो म्हणाला येथे मी जेवणार नाही. कारण विचारल्यावर त्याने उत्तर दिले, येथील मुसलमान शिया पंथाचे आहेत आणि आम्ही शिया मुसलमानांच्या हातचे खात नाही.
समाजामधली ही दूरी दूर व्हायला पाहिजे.
असो. साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कारगिल गावामध्ये पोहोचलो हॉटेलमधील खोल्यांचा ताबा घेतला. हॉटेल चांगले होते.  
आमच्याकडे भरपूर वेळ होता. त्यामुळे गावातच पायी फेरफटका मारायचे ठरवले. सर्वजण गावात तास दीड तास हिंडून आलो. रात्रीचे जेवण करून झोपलो. उद्या सकाळी लेहकडे कूच करायचे होते. 

विनय पुराणिक 
24 जुलै 2025 
9850090165










































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://itsmytravelogue.blogspot.com

   Cinematographic Wai - Menavali_November 6, 2013 We had a "real" long Diwali Holidays to our Company - 9 days - long enough to m...