https://reflectedmarathi.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%20Kedarnath
केदारनाथ यात्रा
केदारनाथ यात्रा
"हम भी एक दिन केदारनाथ आयेंगे महादेव, सुना है वहां स्वर्ग से हवा आती
है" 2018 साली आलेल्या केदारनाथ या सिनेमातील या संवादाने मनाला खुप भुरळ
घातलेली होती. त्यामुळे कधी एकदा केदारनाथ बाबाचे दर्शन घ्यायला जातोय असे
झालेले होते. मी नेमका त्यावेळी आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीत व्यस्त होतो.
व्यस्त म्हणजे असा व्यस्त कि ज्याचे नाव तेच, "नो हिलिंग नो डुलिंग". अशा
परीस्थितीमुळे फिरण्यासाठी किंवा तिर्थयात्रेसाठी बाहेर पडण्याचा विचारच
करू शकत नव्हतो. आयर्नमॅनचा किताब मिळवण्यात दोन-तीन वर्ष गेली आणि
त्यानंतर लगेच कोविड-19 ची महामारी आली. या महामारीमुळे उत्तराखंड सरकारने
सलग दोन वर्षे कोणालाच केदारबाबाच्या दर्शनासाठी सोडले नाही. माझ्या
व्यस्तपणामुळे सौ.ला सोबत घेऊन शेवटचे कुठे फिरायला गेलो होतो ते आठवतही
नव्हते. कूठेच फिरायला जाता आलेले नव्हते. त्यामूळे "नवरा फिरायला नेत
नाही" या जागतिक समस्येने मला ग्रासले होते. आणि हि समस्या लवकरात लवकर
सोडवली नाही तर तिचे विस्फोटात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
माझी बायको यशोदा टूर्सकडुन माझ्यापेक्षाही जास्त ठिकाणे फिरून आलेली आहे
परंतु सोबत जाण्याची मजा काही औरच असते.
फिरायला कुठे जायचे? या विषयावर बराच उहापोह झाला. मनुष्यनिर्मित
कृत्रिम सौंदर्य पहायला मला अजिबात आवडत नाही. निसर्गसौंदर्य आवडते पण
गर्दी गोंगाट नसेल तरच. फिरायला न्या पण कुठे फिरायला न्यायचे? हे पण
तुम्हीच ठरवा. मग असे ठरले कि आपण धार्मिक स्थळांना भेटी देणे योग्य ठरेल.
भगवंतांच्या कृपेने आपण जे काही आहोत त्याचा सदुपयोग व्हावा. बाकीचे लोक
परदेशात फिरायला जावोत नाहीतर कुठेही जावोत आपल्याला त्याच्याशी काही
देणेघेणे नाही. मोर नाचला म्हणुन लांडोर नाचवायची नाही. एकेक करून आपण
भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे पाहु असे ठरले. सर्वप्रथम उज्जैनला जाऊन
महाकाल दर्शन घेऊन आलो. रेल्वेप्रवास करून अगदी सहजगत्या दर्शन करता
येणारे ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैनचे महाकाल. तिथे भोलेबाबाची अशी कृपा
झाली कि एक पैसाही न देता थेट लिंगावर माथा टेकवुन दर्शन घेता आले. जवळच
असणारे ओंकारेश्वर आणि इंदोरही उरकुन घेतले. इंदोरच्या खाऊगल्लीचा आवर्जुन
आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही थेट वैष्णोदेवी यात्रा करून आलो. आणि
केदारनाथ दर्शनासाठी ऑगस्टमध्ये जाण्याचे ठरले. जागतिक समस्येवर मात
करण्याचे हे प्रयत्न.
ऑगस्ट
महीना निवडल्यामुळे खुप लोकांनी खुप टिका केली आणि तुम्हाला खुप त्रास होईल
अशी फुकटची भविष्यवाणी पण केली. मी आवश्यक अभ्यास करून म्हणजे पावसाचे
प्रमाण, पावसाचे नक्षत्र, तापमान आलेख, भाविकांची गर्दी ई. गोष्टी आणि आपले
सणसुद विचारात घेऊन 20 ऑगस्ट हि निघण्याची तारीख ठरवली. माझ्यासोबत माझे
दोन मित्र यायला तयार झाले. गणेश परदेशी आणि दिनेश बोडके तेही सहकुटुंब
(मुलांसहीत). केदारनाथ ट्रेक एकट्याने करणे हेच एक खुप मोठे आव्हान असते.
सहकुटुंब मुलांना सोबत घेऊन करणे म्हणजे आव्हान महाकठीण करून घेणे. महाकठीण
आव्हान म्हणजे गदाधारी भीमाला गदायुद्धाचे आव्हान दिल्यासारखे होते.
साध्या सोप्या गोष्टी करायला आम्हाला आवडतच नाही अशा अविर्भावात आम्ही
रेल्वे बुकींग केले. जे जाऊन आले आहेत त्यांच्याकडुन आम्ही माहीती घेण्याचा
प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला भिती घालण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही.
लोकांनी घातलेल्या भितीला वैतागुन माझे दोन्ही मित्र दर्शनासाठी
हेलिकॉप्टरनेच जायचे या मुद्द्यावर ठाम झाले आणि मी पायीच जाणार या
मुद्द्यावर ठाम होतो. हेलिकॉप्टरने केदारनाथ दर्शन आरक्षित करण्याच्या
संकेतस्थळाला दहा ते पंधरा वेळा भेट देऊन झालेले होते. हेलिकॉप्टरने
जाण्यायेण्याच्या खर्चाचा विचार केला तर ते पांढर्या हत्तीला
कुरवाळण्यासारखे असुन त्यामुळे सर्वांच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडणार हे
स्पष्ट दिसत होते. हळुहळू मी दोघांचेही मनपरीवर्तन करून पायी चालत जाणे कसे
शक्य आहे हे त्यांना समजावुन सांगितले. दोघांचे प्रत्येकी 20000 (वीस
हजार) वाचणार असल्यामुळे दोघेही खुश झाले पण त्यांनी पैसे खर्च करण्याची
तयारीसुद्धा ठेवलेली होती. आम्ही जोरदार तयारीला लागलो. ट्रेकसाठी उपयुक्त
असणारे व्यायाम करायला सुरुवात केली आणि जेवणात पौष्टिक अन्नपदार्थांचा
समावेश केला. ट्रेकसाठी लागणारे आवश्यक साहीत्य ज्यांच्याकडे नव्हते
त्यांना ते त्यांना खरेदी करायला लावले. पावासापासुन संरक्षण होण्यासाठी
मित्र गणेशने पोंचोची सामुहीक खरेदी केली. एकुण दहा पोंचो लागणार होते.
पुणे ते दादर, दादर ते बांद्रा टर्मिनस (लोकल रेल्वे) आणि बांद्रा
टर्मिनस ते हरीद्वार या रेल्वे प्रवासासाठी आम्हाला तब्बल 40 (चाळीस) तास
लागले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता घर सोडले होते आणि आम्ही सोमवारी सकाळी
नऊ वाजता हरीद्वारला पोचलो. मित्र दिनेशने इंटरनेटवरून आमच्यासाठी 14
(चौदा) आसनी बस आरक्षित करुन ठेवलेली होती. त्या बसचा ड्रायव्हर
रेल्वेस्टेशनबाहेर आमची वाट पाहत थांबलेला होता. आम्ही रेल्वेतुन उतरलो आणि
चहा पिऊन लगेच बसमध्ये बसुन सोनप्रयागकडे रवाना झालो. रस्त्यातील एटीममधुन
प्रवासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम काढुन घेतली. शिवपुरी येथे दुपारी
फुलके, राजमा आमटी आणि भात असे स्वस्तात अमर्यादित जेवण मिळाले. मजलदरमजल
करत आम्ही संध्याकाळी सोनप्रयागच्या अलीकडे सीतापुरमध्ये मुक्काम केला. ईथे
पण एक स्वस्तात मस्त हॉटेल मिळाले. केदारनाथ दर्शनाला जाण्यासाठी पहाटे
अडीचचा अलार्म लावुन आम्ही झोपी गेलो.
रात्री अडीच वाजता सर्वजण ऊठले. सर्व आवराआवरी करून आम्ही बसने
सोनप्रयागला गेलो. तिथे चिटपाखरूही नव्हते. एका टपरीवजा हॉटेलमध्ये ताजा
चहा मिळाला. थोडया अंतरावर बोलेरोमध्ये झोपलेल्या एका ड्रायव्हरला ऊठवले.
त्या बोलेरोने आम्हाला सोनप्रयाग वाहनतळापासुन गौरीकुंडापर्यंत पोचवले.
पहाटे तीन वाजुन पन्नास मिनिटांनी आम्ही केदारनाथच्या पहील्या पायरीवर पाय
ठेवला. चालताना आधार मिळावा म्हणुन गौरीकुंड येथे सर्वांसाठी बांबुच्या
काठ्या विकत घेतल्या. तिथे प्रवासासाठी लागणारे सर्व साहीत्य विकत मिळते.
पहीले सहा किलोमीटर अंतर आम्ही अंधारातच पार केले. उजेड आल्यावर आम्हाला
आजुबाजुचे धबधबे दिसायला लागले. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते.
पायातील बूट पाण्यापासुन वाचवण्याचा खुप प्रयत्न केला परंतु काहीही उपयोग
झाला नाही. सर्वात लहान ट्रेकर आयुष सोडला तर प्रत्येकाकडे सॅक होती. सॅकचे
ओझे घेऊन चढावर चढणे अवघड जात होते आणि तो चढ संपण्याचे नाव घेत नव्हता.
नदी ओलांडुन उजवीकडे गेल्यावर तर चढाची तीव्रता आणखीणच वाढली. वाटेत चहा,
मॅगी याचे असंख्य टपरीवजा हॉटेल्स आहेत. पाण्याच्या बाटल्याही विकत मिळतात.
त्यामुळे या गोष्टींचे आनावश्यक ओझे वागवण्याची गरज नाही. रस्त्यावरील
घोडयांची लीद साफ करण्यासाठी सफाई कामगार ठेवलेले आहेत. त्यामुळे रस्ता
स्वच्छ राहण्यास मदत होते. वाटसरूंना मार्गावर चालताना घोडेस्वार आणि पालखी
या दोहोंचाही अडथळा जाणवतो हे मात्र खरे. ठिकठिकाणी शौचालये उभारलेली
आहेत. एकुण अठरा किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला दहा तास लागले. मंदिर
येईपर्यंत शरीर पुर्णपणे थकुन गेले होते. माझ्या अनुभवाचा वापर करून मी
सर्वांना सावकाश गतीने वर घेऊन आलो होतो. मंदिराचे अदभुत आणि स्वर्गिय
सौंदर्य पाहुन थकवा क्षणार्धात नाहीसा झाला हेही तेवढेच खरे. स्वर्गाची हवा
मिळवणे सोपे थोडीच असते. मंदिर परीसरात तुरळक गर्दी होती. त्यामुळे
दर्शनासाठी आम्हाला थेट मंदिरात जाता आले. शून्य मिनिटात आम्ही केदारबाबाचे
माथा टेकवुन दर्शन घेतले. एकदम निवांत दर्शन मिळाले. सर्वजण म्हटले कि असे
दर्शन मिळण्यास भाग्य लागते. नंतर आम्ही फोटो आणि व्हिडीओचा तुफान वर्षाव
सुरु केला.
आम्ही हीटरची (पाणी गरम करणारा)
सुविधा असलेले हॉटेल शोधले. हे हॉटेल मंदिराच्या उजव्या बाजुला होते. आम्ही
संध्याकाळी पुन्हा मंदिराकडे गेलो. संध्याआरतीच्या वेळी मंदिरावर विद्युत
रोषणाई सोडलेली होती. त्या विद्युत रोषणाईने मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलले
होते. मंदिराच्या मागे दिसणारे भव्य बर्फाचे डोंगर ते मंदिर स्वर्गिय
असल्याची जाणीव करून देत होते. संध्याआरती नंतर सर्वजणांनी पोटोबा केला.
माझी एकादशी होती. एका परमपुज्य स्वामीजींमुळे मला एकादशीचा फराळ मिळाला.
संध्याकाळी गारठा चांगलाच जाणवत होता. दुसर्या दिवशी लवकर ऊठुन आम्ही
गारठ्यात आंघोळ्या करून दर्शन रांगेत थांबलो अर्थात गरम पाण्याने. तेव्हा
पाऊस सुरु झाला होता. तिथे पाऊस आला कि प्रचंड गारठा पसरतो. ओल्या फरशीवर
अनवाणी चालल्याने पायाची बोटे सुन्न झाली होती. चाळीस मिनिटे रांगेत
थांबल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा मनसोक्त दर्शन मिळाले. दर्शन घेतल्यानंतर
आम्ही पावसातच खाली उतरायला सुरुवात केली. सर्वांनी पोंचो घातला आणि
छ्त्रीही डोक्यावर धरली होती. एका ठिकाणी थांबुन सर्वांनी नाष्टा केला.
उतरताना सुद्धा हे अंतर संपता संपत नाही. तीन ते चार किलोमीटर अंतर पार
केल्यावर पाऊस थांबला. आम्ही मजल दरमजल करत सात तास पंधरा मिनिटांनी
गौरीकुंडला पोचलो. आमची प्रचंड दमछाक झालेली होती. कोणालाही कसलाही त्रास न
होता आम्ही दहाच्या दहा जण सहीसलामत केदारबाबाचे दर्शन घेऊन खाली उतरलो या
विचारानेच आमचा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला होता. थोडेफार पाय
दुखण्याव्यतिरीक्त कसलाही त्रास नाही. वाहनचालक प्रताप आमची वाट पाहत
थांबलेला होता. भ्रमणध्वनीवरून त्याचा ठावठिकाणा घेऊन आम्ही बसमध्ये बसलो.
अनावश्यक सामान आम्ही बसमध्ये तसेच बॅगांमध्ये ठेवलेले होते. गणेशने
उरापोटावर उचलुन पुण्यापासुन पोतेभरून पाण्याच्या बाटल्या आणलेल्या होत्या
आणि केदारनाथला जाताना ते पोते तसेच बसमध्ये ठेवले होते. आम्ही केदारनाथाचे
दर्शन घेऊन येईपर्यंत दोन दिवसात आमचा वाहनचालक प्रताप याने त्या सर्व
बाटल्या फस्त केलेल्या होत्या. त्याने त्याचा चांगलाच प्रताप दाखवला. हे
पाहुन माझे टाळके सटकले होते पण मी खुप संयम ठेवला. वेलकम सिनेमातील नाना
पाटेकर स्वत:ला "कंट्रोल उदय..." म्हणतो तसा मी स्वत:ला "कंट्रोल विजय"
म्हणत होतो.
उत्तराखंडमध्ये
वाहतुकीचे काही नियम आहेत आणि ते सर्वांना पाळावेच लागतात कारण ते आपल्या
सुरक्षेसाठीच आहेत. संध्याकाळी आठ ते पहाटे चार या वेळेत रस्त्यावर वाहन
चालवण्यास बंदी आहे. जिथे आठ वाजतील तिथे वाहन थांबवुन मुक्काम करावा
लागतो. तेथील भौगोलिक परीस्थिती अशी आहे कि कोणत्याही क्षणी कोणत्याही
ठिकाणी दरड कोसळू शकते. रात्री अपरात्री बचाव कार्यास खुप अडथळे येतात. चार
वाजता सर्वजण बसमध्ये बसलो. प्रवासासाठी आमच्याकडे चार तास शिल्लक होते.
त्या वेळेत आम्ही हरीद्वारला पोचणे शक्य नव्हते. पण जिथपर्यंत जाता येईल
तिथे जाऊन मुक्काम करू असे एकमताने ठरवुन आम्ही निघालो. संध्याकाळ
होईपर्यंत शंभर किमीपेक्षा जास्त अंतर पार झालेले होते आणि अचानक तुफान
पाऊस सुरु झाला. दरड कोसळायला सुरुवात झाली होती. आम्ही कसेबसे तिथुन
निसटलो आणि एक छानसे हॉटेल शोधुन मुक्काम केला. ते ठिकाणही छान आणि एकदम
किफायतशीर होते.
सोनप्रयाग ते
हरीद्वार प्रवासाचे निम्मे अंतर पार करून ठेवल्यामुळे दुसर्या दिवशी
आम्हाला निवांत वेळ मिळाला. रस्त्यात देवप्रयाग लागल्यावर आम्ही घाट उतरून
खाली गेलो. जिथे दोन नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला प्रयाग म्हणतात. जसे
पंचकेदार तसे पंचप्रयाग सुद्धा आहेत. देवप्रयाग म्हणजे अलकनंदा आणि
भागीरथी या दोन नद्यांचा संगम. येथुनच गंगेचा चित्तथरारक प्रवास सुरु होतो.
दोन वेगवेगळ्या रंगाचे पाण्याचे प्रवाह एकत्र येतात आणि या दोन नद्या
एकत्र आल्यावरच ती गंगा बनते. देवप्रयाग या अतिशय पवित्र ठिकाणी स्नान
करण्याचे भाग्य मिळाले. मी याठिकाणी आईसाठी तर्पण केले. देवप्रयाग याठिकाणी
रघुनाथ मंदिर आहे. प्रभु श्रीरामचंद्रांनी येथे तपस्या केलेली आहे. ज्या
दगडी आसनावर त्यांनी यपस्या केली ते तिथे अजुनही जसेच्या तसे आहे. त्याचे
मनोभावे दर्शन घेतले. प्रभु श्रीरामचंद्रांनी ब्रम्हहत्या पापाचे
प्रायश्चित म्हणुन येथे स्नान आणि तपस्या केलेली आहे. भक्तशिरोमणी हनुमान
त्यांना याठिकाणी घेऊन आला होता.
त्यानंतर आम्ही नाष्ट्यासाठी थांबलो. ईकडे स्थानिक पदार्थच उपलब्ध आहेत,
दाक्षिणात्य पदार्थ औषधालाही मिळत नाहीत. कोणताही पदार्थ बनवायचा असो ईकडे
फोडणी देताना जिरा आणि धन्याचा मारा करतात. जिरा आणि धन्याची फोडणी दिलेली
मसाला मॅगी मी फक्त एक घास खाऊन टाकुन दिली. खाऊच शकलो नाही. त्यामुळे
हॉटेलमध्ये प्रवेश करताच जिरा आणि धने नको असे निक्षुन सांगितलेले केव्हाही
उत्तम. ईकडे राजमा थाळी खुप स्वस्त आहे. आम्ही नव्वद रुपयांमध्ये
अमर्यादित जेवण केले.
हृषिकेशला आम्ही गाईड (शंभर
रुपये) घेतला. लक्ष्मण झुलाचे नुतनीकरणाचे काम सुरु झालेले असुन त्याचा
वापर सध्या बंद आहे. काचेचा पृष्ठभाग आणि दोन्ही बाजुला केदारनाथ
मंदिराच्या आकाराची प्रवेशद्वारे हि नविन लक्ष्मण झुलाची वैशिष्ट्ये असणार
आहेत. नुतन लक्ष्मण झुला जुलै 2023 पासुन वापरात येईल असे कंत्राटदाराचे
म्हणणे आहे. हृषीकेशमध्ये भुतनाथ (महादेव) मंदिर आहे परंतु वेळेअभावी
आम्हाला दर्शन घेता आले नाही. तिथे आम्ही गीता भवन, भगवान शंकराची गंगेच्या
प्रवाहातील मुर्ती आणि गंगाकाठचे वेगवेगळे घाट पाहीले. गीताप्रेसच्या भव्य
दुकानातुन अनेक महत्वपुर्ण ग्रंथ खरेदी केले. हृषीकेशमध्ये चोटीवाला
हॉटेलच्या व्हरांड्यात मेकअप करून अलिशान खुर्चीवर एक माणुस बसलेला असतो.
हा माणुस पर्यटकांचे आकर्षण ठरतो. आपल्याला असे वाटते कि ती मुर्ती आहे
परंतु त्याने हालचाल केल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो.
हृषीकेश उरकुन आम्ही हरीद्वारच्या दिशेने निघालो. संध्यासमयी हर कि पौडी
येथे होणार्या गंगा आरतीला आम्हाला हजेरी लावायची होती. हर कि पौडीच्या
जवळ असणारे हॉटेल्स प्रचंड महाग होते. म्हणुन आम्ही तिथुन एक किमी लांब
अंतरावर ओयोच्या सहाय्याने स्वस्तात हॉटेल बुक केले. हर कि पौडी येथे
संध्यासमयी गंगास्नान आणि गंगापुजन केले. त्यानंतर सामुहिक गंगाआरती केली.
त्यादिवशीच्या गंगाआरतीला गायिका अनुराधा पौडवाल स्वत: हजर होत्या. दररोज
तिथे त्यांच्या आवाजातील आरती ध्वनीक्षेपकावर वाजवली जाते परंतु आज त्या
स्वत: तिथे हजर होत्या हा एक विलक्षण योग अनुभवण्यास मिळाला. गंगाआरती
झाल्यानंतर आमचा प्रवास पुर्ण झाला आणि मी टूर संपल्याची घोषणा केली. जे जे
ठरवले होते ते ते सर्व व्यवस्थित पार पडले. त्यानंतर ज्याला जे जे वाटेल
त्याने ते ते केले. दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी एक वाजता आम्ही
ट्रेनमध्ये बसुन मुंबईकडे रवाना झालो आणि रविवारी पहाटे चार वाजता पुणे
येथे पोचलो. आमचे मुख्य आकर्षण केदारनाथ हेच होते. परंतु त्यासोबत आम्हाला
देवप्रयाग, हृषीकेश आणि हरीद्वार देखिल करता आल्यामुळे आम्ही सर्वजण जाम
खुश होतो.
अशी हि स्वनियोजित केदारनाथ ट्रिप आणि ट्रेक अतिशय कमी खर्चात भरघोस आनंद देऊन गेली.
जय केदारनाथ!
बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)
बोराटयाची नाळ (Boratyachi Naal)
लिंगाणा माझ्यासाठी नेहमीच एक आकर्षण आहे. विशेषत: जेव्हापासुन शिखर
फाऊंडेशनबरोबर तो मी सर केलाय. लिंगाणाच्या माथ्यावरुन मोहरीचे पठार
जेव्हा पाहीले तेव्हापासुनच तिथे जाण्याची तीव्र ईच्छा मनामध्ये होती पण
जाण्याचा मार्ग नाहीत नव्हता. मढेघाटला जाताना वाचलेल्या पाटीच्या आणि
दिशेच्या आधारे ही तीच मोहरी असावी अशी माझी पक्की खात्री झाली होती. गुगल
मॅप्सवर शोधाशोध केल्यानंतर तिकडे जाण्यासाठी हाच मार्ग दाखवलेला होता.
मागच्या वर्षी याच दिवसामध्ये तिथे जाऊन आलो. पण तेव्हासुद्धा बोराटयाच्या
नाळेत उतरायचे राहुन गेले होते. बोराटयाच्या नाळेविषयी खुप ऐकलेले होते.
ऐकलेली बोराटयाची नाळ तेव्हा नुसती बघुन ठेवली होती. अर्थात मी पुन्हा ईकडे
येणार होतोच तिला जवळुन पाहायला. या जानेवारीतले तीन रविवार मी क्रिकेट
खेळ्ण्यात वाया घालवले, उत्कृष्ट फलंदाज वगैरे ट्रॉफी मिळाली पण ट्रेकींग
करण्याचे तीन रविवार गेल्याचं दु:ख जरा जास्त होतं. खरंतर बोराटयाची नाळ
जानेवारी २०१४ मध्येच "Target Locked" करुन ठेवली होती. जानेवारीत
क्रिकेटचा अडथळा आला नसता तर फेब्रुवारीत रायलिंग पठारावर उन्हाचे चटके
खावे लागले नसते. फेब्रुवारीच्या अखेरीस मुहुर्त मिळाला. ट्रेकला जाऊन आलं
आणि फोटो फेसबुकवर टाकले की ब-याच मित्रांचा ठरलेला डायलॉग असतो, काय भाऊ?
मला का नाही बोलला? आलो असतो की राव मी पण... वगैरे वगैरे. म्हणुन ब-याच
मित्रांना माझ्या आगामी ट्रेकची आगाऊ कल्पना देऊन ठेवली होती. पण सगळेच
कामात अडकलेले. आता मला हा डायलॉग तरी ऐकावा लागणार नाही की मला का नाही
बोलला?
उणादुणा एकच मित्र बरोबर होता. आम्ही रसद आणि दोघांना पुरेल एवढे पाणी
बरोबर घेऊन रात्री ११ वाजता सिंहगड रोडने निघालो. पासळीला ०१:३० वाजता
पोचलो. पासळीत गाडी लावुन एका व्हरांडयात कॅरी मॅट टाकली आणि आडवे झालो.
| पासळीच्या पुढे मढेघाटाकडे जाताना लागणारी हिच ती पाटी मोहरी १० कि.मी. |
सकाळी पक्षांच्या किलबिलाटाने जाग आली. लगोलग आवरा आवरी करून मढे
घाटाचा रस्ता धरायचा होता. अजुन तांबडं फुटायचं होतं. छोटासा घाट संपल्या
संपल्याच उजवीकडचा चढ चढुन झाल्यावर सुर्योदयाचा आनंद घेण्यासाठी गाडी उभी
केली.
सुर्यनारायणाचे दर्शन झाले. त्याची कोवळी किरणे राजगड आणि तोरण्यावर
पसरली. सोनेरी किरणांमध्ये भिजलेला तोरणा अफाट सौंदर्याचे प्रदर्शन करत
होता. फोटो काढले नाहीत तर नवलच.
| सुर्योदयाची कोवळी किरणे तोरणा आणि राजगडवर |
जास्त वेळ न घालवता पुढे निघालो. कुसारपेठच्या पुढील रस्त्यावर मोठी खडी पसरवलेली होती काम चालु होते.
| मोहरी रस्त्याचे काम सुरु आहे. |
"पुढे खडी टाकलीये रोडवर गाडी घेऊन जाऊ नका? त्या खडीवरुन चाकं टिकायची न्हाय"
एका
मावशीनं सबुरीचा सल्ला दिला. खडीकडं बघुन ते अगदी खरंही वाटलं. त्याच
ठिकाणी गाडी वळवुन पार्क केली. दमुन आल्यावर गाडी वळवण्याचा त्रास नको
म्हणुन अगोदरच केलेली तजवीज. तेथुन मोहरी पाच की.मी. होती. एकुण आमची
पायपीट 10 कि.मी. ने वाढणार होती. थोडे पुढे गेल्यावर जाणवलं की ही खडी
जास्त लांबपर्यंत नाहीये. थोडीशी शक्कल वापरायचं ठरवलं. गाडीत मी एकटाच
बसलो आणि माझ्या बाजुकडचे चाक रस्त्याकडेच्या मातीवरुन घेतले. काम फत्ते.
खडीची कटकट संपल्यावर निवांत गाडीला बाजुला लावुन हुश्श करून घेतलं.
तोच
समोरून पाण्याचे हांडे घेऊन येणा-यांचा ग्रुप दिसला. कुसारपेठचे होते ते.
पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन रोज 2 की.मी. अंतर कापतात
बिचारे. विशेष म्हणजे पाणी वाहणा-यांमध्ये पुरुष सुद्धा होते. कुसारपेठ
येथे पाणी मागायची माझी तरी आता हिंमत होणार नाही.
| पाण्यासाठी रोज २ कि.मी पायपीट |
खडीचा अडथळा दूर झाल्यावर मी वेगात अंतर कापले. अधून मधून दिसणारे
काही नजारे ब्रेक दाबायाला भाग पाडत होते. दुर्ग दुर्गेश्वर रायगड सकाळच्या
कोवळ्या उन्हात झळाळुन निघालेला दिसत होता. या ठिकाणावरुन रायगडाचं वेगळं
रूप पाहायला मिळतं. जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांचा दरबार तेवढ्या
दुरुनही लक्ष वेधुन घेत होते.
| कोवळया उन्हात न्हाऊन निघालेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड |
आजुबाजुचे नजारे कैमे-यात कैद करत होतो आणि अधून मधून माझ्यावरही कैमेरा घेत होतो.
| रायगड आणि लिंगाणा एकत्रित (रायलिंग) |
| मातीचा रस्ता |
| पोकलॅंड रस्त्यासाठी खडक फोडतोय |
काही अंतर पुढे गेल्यावर एक पोकलँड आणि बुलडोजर उकरा उकरी करत
असल्याचे आढळुन आले. नजीकच्या काळात चांगला रस्ता मिळेल अशी आशा उरी
बाळगायला हरकत नाही. मी तर वाट बघतोय कधी हा रस्ता डांबरी होतोय म्हणजे
पावसाळ्यात इथला स्वर्ग पाहायला येता येईल.
इथेच गाडी लावावी लागणार होती. मागच्या वेळेस इथेच लावली होती.
मोहरी गावातून पुढे पायपीट चालु ठेवली. रायलिंगकडे जाण्याच्या दिशेला
ठिकठिकाणी दगडांवर पांढरे बाण दाखवलेले आहेत. त्या बाणांचा पाठलाग केला तरी
चालेल. फक्त एक लक्षात ठेवायचे की पुढे गेल्यानंतर उजव्या बाजुला वळायचं
नाही. उजव्या बाजुला काळ नदीचा उगम आहे. मग ठरवा जायचं की नाही. अनेक कातळ
कड्यांवरुन उड्या घेणारं पाणी एकत्र जमलं की त्याची काळ नदी होते जी
साक्षात एक काळाचे रूप आहे. तिची सुरुवातच एका अजस्त्र धबधब्याने होते.
| काळ नदीच्या उगमाकडील बाजु रायलिंगकडे जाताना उजवीकडे |
पण काही उपयोग नाही पावसाळ्यात इथे येता येणे तेवढे सोपे नाही आणि
उन्हाळ्यात तो धबधबा सुरु असणं अवघड आहे. रस्ता जेव्हा डांबरी होईल तेव्हाच
पावसाळ्यातला आनंद घेण्यासाठी इथे येता येईल. वाट पाहतोय.
थोडी दाट झाडी ओलांडुन झाल्यावर हळु हळु लिंगाणा समोर दिसायला लागतो.
| रायलिंगकडे जाताना डाव्या बाजुचे दृश्य |
| समुद्रातील शार्कसारखा दिसणारा सह्याद्रीवरील लिंगाणा |
लिंगाण्याच्या सुळक्याने जमिनीतुन हळुच टोक वर काढल्यासारखं दिसतं.
आणि त्याचं ते टोक समुद्रात वावरणा-या शार्क माशाची आठवण करुन देते. शार्क
मासा समुद्रात वावरताना एक कल्ला पाण्याबाहेर काढुन पोहतो, पाण्याच्या
बाहेर आलेलं शार्कचं ते टोक दिसलं की भल्याभल्यांची तंतरते. लिंगाणा म्हणजे
सह्याद्रीवरचा शार्कच जणु. याला बघितल्यावर सुद्धा भल्याभल्यांची तंतरते.
त्यात मी पण आहे, जरी सर केलेला असला तरीही.
| SN= सिंगापुर नाळ, RP= रायलिंग पठार |
रायलिंगच्या अलीकडे सिंगापुर नाळ बाण करून दाखवलेली आहे. तिकडे जाऊन
जरा सिंगापुर नाळेचे मुखदर्शन करून आलो. खरंतर माझ्यासाठी सिंगापुर नाळ
कोणती आणि बोराट्याची नाळ कोणती ओळखता येणं निव्वळ अशक्य होतं. मी कधीच
माहितगार व्यक्तीबरोबर तिथे गेलेलो नाही. दुस-यांदा या पठारावर आलोय
स्वबळावर. बोराट्याची नाळ मी स्वत: शोधणार होतो. बोराटयाच्या नाळेचे
वेगवेगळया कोनातुन काढलेले फोटो ईथे देत आहे. हा सुरुवातीचा...
| रायलिंगच्या जवळ असणारी हीच बोराटयाची नाळ असावी असे गृहीत धरुन आत घुसलो |
| मोठा दगड एका छोटया दगडामुळे अडकला |
| येथुन वाट असावी अशी अपेक्षा होती |
लिंगाणा बेसकडे जाणारी वाट रूळलेली असावी आणि त्यामुळे ती चटकन दिसेल अशी
माझी अपेक्षा होती. आणि त्या वाटेने कडयाच्या कडेने लिंगाणा बेसला जाऊन
येता येईल या माझ्या मनोकल्पना किती बालीश होत्या हे मला तिथे गेल्यावरच
कळले. लिंगाणाबेसला जायची वाट सापडली नाही पण बोराटयाची नाळ बरीच वर-खाली
करुन झाली. छोटे-मोटे दगड पायाच्या धक्क्याने घरंगळत सुटतात. त्यामुळे पुढे
उतरत असणा-या ट्रेकरला ईजा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे प्रत्येक
ट्रेकरने ईथुन जाताना काळजी घेण्याची गरज आहे. काही पॅचेस अवघड आहेत पण
चढता येण्याजोगे. वाट शोधुन सापडली नाही मग नाद सोडुन दिला. रायलिंगवरुन
लिंगाणा पाहुन निघायचे ठरवले.
| रायलिंगवरुन लिंगाणा आणि मागे रायगड |
| लिंगाणा शिखर |
| मोहरी गावातील विहीर |
| गाडीवर मातीचा लेप |
घरी जात असताना वेल्ह्याच्या गुंजवणीमध्ये पोहलो. ट्रेकनंतर पोहले की शरीर
मोकळे होते. मस्त पोह्ल्यानंतर घराकडे मोर्चा वळवला. कारभारणीने फोन
वाजवला, घरी निघालोय सांगितले.
| गुंजवणी नदीत पोहणे |
| पायांची अवस्था |
अशा प्रकारे बोराटयाच्या नाळेतुन लिंगाणाबेसला कसे पोचायचे नाही याचा एक मार्ग मला माहीत आहे. तुम्हाला हवा आहे का?
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.