Sunday, October 11, 2020

अडालज की वाव - Adalaj Stepwell

 


अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या 

अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता. 

अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे. 

ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली. 

राणा वीर सिंगशी झालेल्या युद्धात सुलतानाचा विजय झाला आणि राणा वीर सिंग ना युद्धात वीरगती प्राप्त झाली. राणा जी च्या पत्नी राणी रूपबा ह्या अत्यंत रूपवान होत्या आणि ती बातमी सुलतानाला समजल्यावर हा सुलतान राणीकडे लग्नाची मागणी करू लागला. अर्थात ती मागणी ही धमकीपेक्षा कमी नक्कीच नसणार. राणी ने अट घातली की तिच्या पती ने हाती घेतलेली अडालज विहीर जर सुलाताने पूर्ण केली तर ती लग्नाला संमती देईल आणि मग काय, हे अडलेलं काम अत्यंत वेगाने सुरु झालं. विहीर पूर्ण झाल्यावर राणी ने जातीने विहिरीची पाहणी केली, संत सज्जनांना विहिरीच्या पाण्यात स्नान करू देऊन ते पाणी पवित्र केलं आणि मग ह्यात विहिरीत उडी मारून जीव दिला. एक पतिव्रता स्त्री मरणापूर्वी गावकऱ्यांसाठी अमूल्य उपहार देऊन गेली आणि आपल्यासारख्यांना अभिमान देऊन गेली. राणीच्या आत्मदानाचा ह्या विहिरीशी संबध आहे. एका वीर राजपूत राणीच्या बलिदानाची साक्ष देत ही विहीर आज 500 वर्ष उभी आहे. 

विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे. 

विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात

विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.

ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे.

होळकर राजवाडा - Holkar Palace, Indore

 

इंदौर हे मध्यप्रदेशातील एक महत्वाचे शहर आणि ह्या शहरात मानाने उभ्या असेलेल्या काही इतिहासील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकर वाडा, शिवरायांचा मावळा गगनभरारी घेत निघाला आणि त्याने राज्यविस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले, थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर. अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चालेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले. बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे (आत्ताचे सिंधिया) तसेच इंदौर चे हे सरदार होळकर.

मल्हारराव होळकर ह्यांनी स्वराज्यनिर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या. सन १७३८च्य पालखेडच्या प्रसिद्ध लढाईत सुद्धा पेशव्यांबरोबर मल्हारराव होते. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचने शिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला. हि जहांगिरी ची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हार रावांच्या पत्नी सौ गौतामाबाई होळकर ह्यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली. सन १७३४ ला बहाल केलेल्या ह्या खाजगी जहांगिरीत मालवा, खान्धेश मधील अनेक गावांबरोबर इंदौर चा ही समावेश होता. आणि मग होळकरांचे कुटुंब इंदौरला स्थिर झाले. पुढील काही वर्ष हि मंडळी खाननदी काठी राहिली आणि साधारण सन १७४७ ला ह्या राजवाड्याचे काम चालू झाले. ह्या राजवाड्याने मराठ्यांचा पानिपतात झालेला प्रभाव ऐकला आणि सन १७६५ ला पानिपत युद्धाचे दु:ख ना पचवता मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला आणि मग राजकारण पहिले, अनेक शासक पहिले. मराठ्यामधले आपसी वैर पहिले. होळकरांमधील अंतर्गत गृहयुद्ध ही पहिले. 

मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदौर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. त्यानंतर चे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मात्तबर मराठे सरदार शिंदे आणि होळकरा यांच्यामधील दुही विकोपाला गेली आणि होळकरांनी उज्जैन वर हल्ला केला आणि बदला म्हणून शिंदेंचे सेनापती सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदौर वर हल्ला केला. राजवाड्याचे अतोनात नुकसान झाले, मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असे समजून वाडा खोदून काढला गेला. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यावर इंदौर ला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आले. होळकरांचे प्रधानमंत्री तात्या जोग ह्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला, ते बांधकाम सन १८१८ ते १८३३ इतके चालले. राजवाड्यात दगडी आणि लाकडी अश्या दोन्ही प्रकारची बांधकामे आहेत. सन १८३४ ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळे एक मजला जळून गेला. पुढे सन १९८४ साली शीखांविरुद्ध दंगलीत हा राजवाडा सामाजाकंटकांकडून पुन्हा जाळला गेला. असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा

विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोगल, मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. ७ माजली उंच वाड्याचे खालचे तीन माजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत. जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी ग्यालेरी अप्रतिम दिसते. भक्कम मराठा शैलीच्या दरवाजातून आत गेलं की मधला चौक लागतो आणि समोर एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार हॉल आहे. 

डावीकडील इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, शस्त्र , गालिचे, भांडी तसेच काही ऐतिहासिक कागद पात्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा विसंतुष्ट वाढले होते. पुढे नाना साहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी होळकरांकडून एक लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते तो १८५८ सालचा दस्तावेज ही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि राजवाड्याची ऐतिहासिक माहिती सुद्धा लोकांसाठी उपलब्ध आहे. राजवाड्यासमोर एक लहानसा पण सुंदर बगीचा असून तिथे अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा आहे. 

हा राजवाडा २५० वर्ष्याच्या इंदौर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे. आणि नक्की बघावा असा आहे. राजवाड्याच्या प्रवेशासाठी रु १० आणि कॅमेरा साठी रु. २५ अशी फी आकारली जाते.

राजवाडा आवर्जून बघावा असाच आहे रात्री विद्युत रोषणाई केलेला राजवाडा तर फारच खुलून दिसतो. इंदौर रेल्वे स्टेशन राजवाडा जवळ आहे, अगदी चालत गेलात तर अधी कृष्णापुरा छत्री बघून थोडी विश्रांती घेऊन राजवाड्यावर येऊ शकतात. राजवाड्या बाहेर गर्दीचे मार्केट आहे. खाण्यापिण्याच्या गाड्याही ह्या परिसरात भरपूर आहे.

Thursday, October 1, 2020

गणपती गडद / Ganapati Gadad

 

गणपती गडद
रविवार दिनांक : ३१ जुलै २०१६

रमा दादा सतत म्हणायचा की  "गणपती गडदला" जाऊ. गणपती समजले पण हे 'गडद' काय आहे ते कळले नव्हते . गडद ऐकल्यावर वाटते कि डार्क , गूढ , अनाकलनीय ! पण गणपती गडद ट्रेक मुळे मला कळले की 'गडद’ म्हणजे खडकात खोदलेली गुहा. काय मग मंडळी , आहे कि नाही आपली मराठी भाषा समृद्ध !  
माळशेज डोंगररांगेत मुरबाड - धसई जवळ पळू सोनावळे गावाजवळील डोंगरात लेणी कोरल्या आहेत . ह्या लेण्या २५०० वर्ष जुन्या असून ध्यानधारणेसाठी व धार्मिक विधी परंपरा शिकवण्यासाठी ह्यांचा उपयोग होत असे. " गणपती गडद " हा १२ लेण्यांचा संच असून यातील मुख्य लेणी दुमजली आहे . ह्या लेणीच्या द्वारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरली असल्याने ह्या लेण्यांना गणपती गडद असे म्हणतात . 


गणपती गडद लेण्या : प्रथम दर्शन !
टीम : पाऊल - कल्याण स्टेशन !
गणपती गडदच्या लेण्या आणि बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह
सेल्फी : गणपती गडदच्या लेण्यांमध्ये ! 

आम्ही १३ जण कल्याण वरून मुरबाड करिता निघालो . रमा दादा आणि रोहन धसईला असल्याने सोनावळे गावीच आम्हाला भेटले. रविवारी वरुणदेवतेचा विशेष लोभ आम्हावर होता . सकाळपासूनच पाऊस खूप कोसळत होता. मुसळधार पाउसामुळे सर्वत्र चिखल ! गावातील निलेश नावाच्या एका मुलाला आम्ही वाटाड्या म्हणून सोबत घेतले होते. निलेश सोबतच आम्ही निवांत गुहेकडे निघालो होतो.  आजूबाजूला हिरवीगार शेती आणि शेतात काम करणाऱ्या शेतकरी स्त्रिया असे दृश्य पाहून छान वाटले . जवळच एक छोटा ओढा लागला . झुळझुळते पाणी पाहिले कि त्यात उड्या मारण्याचा मोह कुणालाही आवरता येणार नाही . वाटेतील पहिलाच ओढा असल्याने सर्वांनीच मज्जा केली . 
धबधबा आणि त्यामागील दुमजली लेणी 


लेण्याच्या विरुद्ध बाजूने काढलेला फोटो 


लेण्यांकडे जाणारा थोडासा अवघड  अरुंद मार्ग 
थरारक अनुभव !

गणपती गडद ही खूप साधी सरळ आणि मज्जा करत पार पडणारी ट्रेक आहे . येथील अल्लाहदायक वातावरण तुम्हाला  भुरळ घालते . नजर जाईल तिथे तुम्हास  शुभ्र धबधबे दिसतात . एवढ्या निर्जन ठिकाणी आणि तेही इतक्या उंचीवर लेण्या कश्या कोरल्या असतील हा प्रश्न कुणालाही पढ़ेल. लेण्यांच्या समोरूनच डोंगररांगेतील बहुदा सर्वात मोठा धबधबा कोसळतो . मुख्य गुहा खूप प्रशस्त आहे .  आत गणपतीची मूर्ती असलेला सभामंडप आहे . सभामंडप दोन कोरीव खांबांवर उभा आहे. खांबांवर छताचा भार तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. गाभार्‍याच्या मागील भिंतीत एक खिडकी कोरलेली असुन आत एक दालन कोरलेले आहे, गावातील मंडळी म्हणतात की हा बंद केलेला चोर दरवाजा आहे ज्याची वाट शिवनेरीस जाते . पण त्या दालनाचा आकार पाहून हे सत्य असेल असे वाटत नाही . 
धबधब्याचे विलोभनीय दृश्य : येथून १०० फूट पेक्षा जास्त रॅपलिंग करता येते 



" मी "
गाभाऱ्यातील २ खांब 
द्वारचे फोटो  काढायला येणाऱ्या सततच्या व्यत्यया मुळे रोहनची अवस्था ! 


लेण्याचे प्रवेशद्वार : ह्या द्वारावर सुंदर नक्षीकाम आहे आणि मध्यास गणपती कोरलेला आहे 
गणपती बाप्पा मोरया ! गणपती आणि श्री हनुमानाचे मंदिर !


धवल आणि लांडे नसताना सर्व नियोजन करणे तसे कठीणच पण शेवट पर्यंत त्यांनी नियोजनात मदत केली. पण स्वप्निल - रमा - रोहन असल्याने सर्वच सुरळीत झाली. एकूण १६ जण होतो . अविनाश - अनिकेत- महेश  ह्यांनी आम्ही सर्व जण रास्ता चुकणार नाही ना ह्याची काळजी घेतली. वेळो वेळी ते दिशादर्शन करत होते . 


राहुल : ह्या पाण्याची चवच निराळी ! 


सौजन्य : रोहन भगत 
वैभव आणि राहुल ह्यांचे खरे आभार कारण भर पावसात आमचे फोटो काढण्याचे काम त्यांनी केले. भर पावसात मोबाईल बाहेर ठेवून फोटो काढणे साधी गोष्ट नव्हे बरे !  स्वप्निल -शुशांका, तन्मय-ऐश्वर्या ह्यांनी सर्वात जास्त ट्रेक एंजॉय केली . 


निम्मी ताई 

निमिषासाठी ट्रेक काही खासच झाली, कारण धबधबे पाहणे आणि पावसात मनसोक्त भिजणे  हेच तिचे स्वप्न होते. सोनल सोबत तिने खूप धमाल केली. अभिषेकने सुरक्षेसाठी जी रोप घेतली होती तिची जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडली. प्रथमेशला त्याची पहिली ट्रेक नक्कीच आवडली असेल.   परतीच्या वाटेवरील मिळालेल्या धबधब्यावर सर्वांनी  खूप धमाल केली. एक ट्रॅक्स आणि त्यात १६ जण भरलेली . भरलेली काय चक्क कोंबलेली .. हाहाहा . सोनावळे ते धसई असा ट्रॅक्स मधील प्रवास ना विसरण्याजोगा आहे. 

निसर्गाच्या सान्निध्यात, रात्रीच्या शांत वातावरणात मुक्काम करण्यातली मजा काही औरच असते. ही मजा अनुभवायची असेल, तर गणपती गडद हे ठिकाण उत्तम ठरेल असे मला वाटले . पण दमदार पाऊसामुळे "गणपती गडद" हा ट्रेक खरोखरच दमदार झाला ! 
दंतकथा १ : ह्या द्वारातून एक भुयार थेट शिवनेरीस जाते ! भुयाराचे तोंड बंद केले आहे ! 

दंतकथा : 
पायथ्याच्या पळु गावाबद्दल एक दंतकथा आहे. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्‍यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु सोनावळे (पळुन आलेल्या मोर्‍यांमुळे "पळु") असे नाव पडले.

आम्ही कसे गेलो  :-  कल्याण - माळशेज मार्गावर (४७ किमी) उमरोली गावाच्या पुढे फाटा आहे. या फाट्यावरुन उजव्या बाजुचा रस्ता धसई मार्गे (१० किमी) सोनावळे गावात जातो. 



गणपती गडद धबधबा 


  
वैभव : शांत - निवांत ! 


लेण्यांमधून दिसणारा धबधबा 

लेण्यांमधून दिसणारा धबधबा 

शुभ्र फेसाळ धबधबा आणि टीम पाऊल 






पहिला ग्रुप फोटो 




अवि दादा !

राहुल : क्लोज टू परफेक्ट 

सोनल 

अविनाश दादा आणि मी 




सेल्फी टाइम 

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...