Saturday, September 11, 2021

Valley Of Flower - फुलदरी

 अशी कधी वेळ आली आहे का? ५ वाजताची रेल्वे.. ४ तिकिटे.. रागात धुमसणारा एक मित्र... एकाचा फोन लागत नाहीये.. दोन जवळचे मित्र कलटी घेवुन मजा पहात बसलेत... तब्बल १० दिवसांची रजा टाकून आम्ही दोघे आता नक्की येतो म्हणनार्‍यांची वाट पहातोय. तेवढ्यात सागरचा फोन आला आणी शक्य तितके प्रेमांनी बोलून त्याला ऐरोलीला बोलवले. हा सागर फोन बंद करून प्रवासाची तयारी करत होता अन आमचा जीव टांगणीला लागला होता. शेवटी ३ वाजता मी, सागर अन सुजीतने ऐरोलीवरून गाडी पकडली आणी धावत पळत दिल्लीला जाणारा गरीब रथ पकडला. कारण काय तर फ़ूलो की घांटी अथवा Valley Of Flower म्हणुन ओळखल्या जाणाया उत्तराखंडमधील एका दरीत फिरायला जाणे. दोन महिन्याची तयारी, बर्‍याच भटकंती वाचून अन तिथे जाऊन आलेल्या दोघांशी बोलून ठरविले की फूलदरी मध्ये जायचे. वर्षातून ८ महिने बर्फाच्छादित अन फक्त ४ महिने फुलांनी बहरणारी उत्तराखंडातील फुलदरी म्हणजे राष्ट्रीय उद्यान तसेच UNESCO चे जागतीक वारसा स्थळ आहे. ह्याच फुलदरीजवळ शिखांचे पवित्र धर्मस्थान हेमकुंड साहीब आहे. त्यामुळे ह्या वेळेलाच बरेच शीख लोक ह्या पवित्र जागेला भेट देतात अन १७००० फूट ऊंचीवर असलेल्या पवित्र कुंडामध्ये स्नान करतात. ॠषीकेशहून बद्रीनाथला जाणार्‍या रस्त्यावरून जवळपास १५ किमी चालत जावे लागते.

गरीब रथातून दिल्लीकडे जाणारा प्रवास चालू झाला होता. गरीब रथामध्ये आमच्या बरोबर २ जागा असणारे नवीन लग्न झालेल जोडप होते. त्याना एकांत (न मागता) द्यावा म्हणुन आम्ही दोन डब्यांच्या मध्ये दरवाज्यात जाऊन बसलो. अन गप्पांना सुरूवात झाली. रेल्वेचा वेग किती असतो ही चर्चा चालू होती. सुजीत आणी सागर दरवाज्यातून पाय बाहेर सोडून बसले होते. मुबंई ते दिल्ली १४०७, गरीब रथ घेतो १६ तास... जवळपास ८० किमी प्रती तास... अन एका रेल्वे कर्मचार्याने आम्हाला पकडले. गरिब रथाचा वेग ताशी १५० किमी असे सांगीतले अन दरवाजा लावुन घेतला अन आम्हाला आमच्या जागेकडे हाकलले.
सकाळी हजरत निजामुद्दिनला पोहोचल्यावर शेजारच्या जोडप्याने व्यवस्थित रस्ता सांगितला. प्रवासाची तयारीची मी टिपणं काढली होती, ती मुंबई मध्ये विसरली होती. आता भरवसा सगळा मेंदूतील माहितीवर होता पण फुलदरीच्या इतक्या भटकंत्या वाचल्या होत्या की जणू सगळ काही पाठ होत. तेथुन टॅक्सी पकडून आम्ही बस स्थानकावर पोहोचलो. बसला वेळ होता म्हणुन थोडफार खाणं झाले. बस जवळपास दुपारी ऋषीकेशला (समुद्रसपाटीपसून उंची १२२० फूट) पोहोचली. हरीद्वारला परत जाताना थांबयचे असे ठरले होते. सायंकाळचा बेत होता लक्ष्मण झूला अन गंगानदीचा घाट. लक्ष्मण झूला गंगानदीवर असलेला झूलता पुल आहे. आम्ही पूलावरून गंगानदी पार केली. ह्यावेळेला बर्फ वितळून येणारे पाणी असल्यामुळे गंगानदीला बराच जोर असतो. मंदीरे पहाण्यात फारसा रस नव्हता. इकडे तिकडे भटकत राहीलो.
ऋषीकेश अन लक्ष्मण झूला...

संध्याकाळी जोशीमठला जाण्यसाठी गाडी ठरविण्यासाठी गेलो. तवेरा किंवा सुमोचा प्लान होता पण तिघेच असल्याने अन दुसर्यादिवशी गाडी हवी असल्याने त्याने अल्टो गाडी सुचविली. आम्ही १२२० फूटावरून १२००० फूटापर्यंत अल्टोने जाणार होतो. त्याला विचारले अल्टो जाऊ शकेल का तर गाडीवाला म्हणाला.. इधर तो यहीच चलता है.
रूमवर परत येऊन सागरला सांगितले की अल्टोने जायचे आहे तर त्याचा विश्वासच बसला नाही. सकाळी गाडी पहिल्यावर सुद्धा जराशी काळजी वाटली पण रस्ते पहिल्यावर नंतर वाटले बर झाले अन छोटी गाडी घेतली. साधारणतः ऋषीकेश ते जोशीमठ गाडीभाडे होते २५०० रू. पण बरेच तेथील खाजगी गाडया ( महिन्द्रा मॅक्स) ४०० रू प्रती व्यक्ती घेऊन जातात.

गंगानदीच्या काठाने आमचा प्रवास चालू झाला. ऋषीकेशहून बाहेर पडताच अर्ध्या तासातच आम्ही गाडी थांबविली आणी रस्त्याकडेला फोटो काढू लागलो. चालक लवकर निघण्याची घाई करत होता, पण आम्ही दुर्लक्ष करत होतो. त्याचा पहिला फटका आम्हाला तेथेच मिळाला. १० मिनीटांच्या प्रवासानंतर एका वहानाच्या रांगेजवळ गाडी थांबली. ५ मिनीटापुर्वी दरड कोसळल्यामुळे गाडया थांबल्या होत्या. आम्ही धावतच कोसळलेली दरड पहायला गेलो. जवळपास २०-३० मीटरचा रस्ता डोंगरावरून पडलेल्या दगड अन मातीच्या खाली बूजला होता. बर्‍याच ठिकाणी दगड आणी माती अजुन पडतच होते. आता सगळे BRO JCB ची वाट पहात होते. हिमालय हा मातीचा पर्वत आहे. त्यामुळे दरड कोसळने ही नेहमी घडणार्‍या घटना आहेत. बरेच शीख प्रवासी तिथे दिसत होते. तितक्यात शीख तरूणांचा एक जत्था मोटारसायकली वरून आला. त्यानी रस्ता पाहीला. गाडयाला लावलेली कुदळ अन फावडे घेऊन त्यांनी मोटारसायकली जातील इतकाच रस्ता बनविला अन निघून गेले. बरेच शीख तरुण मोटारसायकली घेऊन हेमकुंड या त्यांच्या पवित्र धर्मस्थळी जाताना दिसत होते.
कोसळलेली दरड

गंगेच्या किनारी बरेच आश्रम आहेत. तसाच एक आश्रम जवळच होता म्हणुन आम्ही तिकडे निघालो. राम मंदीर, त्यात पोथी वाचणारी बरेच लोक, बाजूला छोटी छोटी घर त्यात भगवी वस्त्र नेसलेले साधू, गर्द झाडी, बरीच माकडे असं आश्रमाचे स्वरूप होत. पोथी वाचणारे बहुतांश लोक राजस्थानी दिसत होते. एक रस्ता गंगेकिनारी जात होता. आयुष्यात प्रथमच गंगानदीच्या पाण्यात उतरणार होतो. मनात थोडासा अध्यात्मिक भाव कि काय दाटून आला होता. बहुतेक आश्रमाच्या वातावरणाचा आणि गंगेच्या किनायाचा प्रभाव असावा. बर्फ वितळून पाणी वहात असल्याने बरंच गढूळ होते. गंगेच्या पाण्याला जबरदस्त ओढ होती. किनारी बसलेल्याने सांभाळून असा सल्ला दिला. पाण्यातून बाहेर येताच किनारी बसलेल्या माणसाने आमची विचारपूस केली, मग आम्ही पण विचारपूस चालवली. हा राजस्थानी होता. या माणसाचा बराच मोठा उद्योग धंदा जयपूर जवळ होता. मुले उद्योग बघत असल्यामुळे वडिलमंडळीना १५ दिवसांसाठी पोथी वाचन करायला पाठीवले होते. आमच्या कामाबद्द्ल जाणून घेतल्यानंतर त्याने आम्हाला आम्ही काम करत असलेल्या उद्योगाला जर करखाना काढून हवा असेल तर राजस्थानात कारखाना काढून देण्याची तयारी दाखिवली. पण आम्ही संपुर्णपणे फिरण्याच्या मूड मध्ये होतो त्यामुळे हा हा ना ना करत तेथून निघालो. एव्हाना JCB ने आपले काम चालू केले होते अन रस्ता मोकळा केला जात होता. जोवर रस्ता साफ होत नव्हता सगळ्या गाडया शिस्तीने एकामागे एक उभ्या होत्या. नंतर सुद्धा घाई न करता एकच मार्ग पकडून निघून गेल्या. रस्ता साफ झाल्यानंतर आमचा प्रवास परत चालू झाला.
गंगानदी

जोशीमठ हे ऋषीकेश पासून २५०किमी आहे. सपुंर्ण रस्ता गंगा नदीच्या काठालगत जातो. प्रवासात पाण्याचा आवाज साथ देत असतो. कधी कधी आवाज एवढा मोठा असायचा की वाटायचे धबधबाच आहे. प्रवासात नदीचा आवाज कानात बसूनच गेला होता. गंगानदीला मध्ये रस्त्यात बयाच नद्या मिळतात. नद्याच्या संगमाला प्रयाग असे म्हणतात म्हणूनच बर्याच गावांची नावे प्रयागने शेवट असलेली आहेत. ऋषीकेश पासून रस्ता अश्याप्रकारे...
ऋषीकेश ते देवप्रयाग ७४ किमी
देवप्रयाग ते श्रीनगर ३४ किमी
श्रीनगर ते रूद्रप्रयाग ३३ किमी
रूद्रप्रयाग ते कर्णप्रयाग ३१ किमी
कर्णप्रयाग ते नंदप्रयाग २१ किमी
नंदप्रयाग ते चमोली १० किमी
चमोली ते जोशीमठ ४८ किमी.

श्रीनगर हे गाव अतिशय सुंदर आहे. मुख्य म्हणजे चार धाम यात्रेतील बरेच भाविक ह्याच रस्त्यावरुन बद्रिनाथ किंवा केदारनाथला जातात. येथील गावे पठारावर वसवलेली असतात अन बर्‍याचदा नदीपासून उंचीवर असतात. रस्त्यात बरेच शिख प्रवासी त्यांचा झेंडा दाखवून लोकांना थांबून जेवायला सांगत होते. बरेच शीख तरुण मोटारसायकली घेऊन हेमकुंड या त्यांच्या पवित्र धर्मस्थळी जाताना दिसत होते. ह्या मार्गातील बहुतेक मुख्य शहरामध्ये गुरूद्वारा आहे. तिथे शीख प्रवासी सेवा म्हणुन काम पण करतात अन रात्री मुक्काम पण करतात.तसेच बरेसचे साधू चालत जाताना दिसत होते. हे साधू पायी चारधामची यात्रा पूर्ण करत असतात.
प्रवासातील फोटो अन प्रयाग

कर्णप्रयाग मधील पूल कोसळ्याची बातमी परवाच वर्तमानपत्रात वाचली. दरड कोसळने, वाहनावरील ताबा जाणे अथवा समोरून येणाया वाहनाचे धडक चुकवण्याच्या वेळी ह्या रस्त्यावर बरेच अपघात होतात आणि वहाने दरीतील नदीतून वाहून जातात. चालक चांगला होता, अपघातविषयी अभावानेच बोलत होता. १- २ अपघताच्या जागा दाखविल्या इतकचं. नाहीतर बराच वेळ ऋषीकेश मधल्या जिल्ह्याबदद्ल, चार धाम रस्त्याबददल, बोलीभाषेबददल बोलत होता. रस्त्यामध्ये चालकाच्या पाहुण्याचे एक होटेल होते तेथे दुपारी खाण्यासाठी थांबलो. गेले दोन दिवस तंदूरी रोटी खावून कंटाळा आला होता मग तेथुन पुढे पराठा खाणं चालू केले.

ह्या भागातील नद्यांच्या पाण्याला चांगलाच वेग असतो. कोयनेसारखे पाणी अडवून विदयुत निर्मीतीला येथे मर्यादा असल्याने Run of the River तंत्रज्ञान वापरले आहे. ह्यामध्ये पाण्याच्या वेगाचा उपयोग जनित्र फिरवण्यासाठी केला जातो. ह्या मार्गामध्ये असे बरेचसे प्रकल्प आहेत.

मी अल्टोमध्ये चालकाशेजारी बसलो होतो. सुजीत अन सागर मागे बसले होते. दोघे थोडेसे घाबरलेले वाटले. का घाबरलेले ते मला बद्रिनाथच्या रस्त्याला समजले. जेव्हा जेव्हा गाडी U पिन वळणावरुन वळत होती तेव्हा तेव्हा त्यांना दरीचा तळ दिसायचा अन असं वाटायचे की एक चाक रस्त्यावरून खाली दरी जाते आहे. पण ह्या रस्त्यावरून प्रवास करणार्‍यांना हा अनुभव काही नवीन नाही.
BRO बोर्डर रोड ओर्गनाझेशन (भारतीय भूसेना अख्यारीत) ही संस्था इथल्या पूल आणि रस्त्याची बांधणी अन देखभाल करते. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तितक थोडं आहे. जबरदस्त उंचीवर, नैसर्गीक प्रतिकूल परस्थितीत रस्ते वाहतुकीयोग्य ठेवणे ही एक प्रकारचे युद्धच असावे जणु त्यांच्यासाठी.. बरेच रस्ते तर दगडातून कोरून काढलेले आहेत. रस्त्यातून प्रवास करताना त्यांच्या जिद्दीला अक्षरशः सलाम देत होतो.
रस्ते...ज्यांच्याबद्दल आजही आदरयुक्त भीती आहे...

नकाशा..आ.जां. साभार
भाग २- जोशीमठ, औली, बद्रिनाथ, मान.
भाग ३ - Valley of flower अन हेमकुंड साहिब... लिहित आहे..

मी कधीही हिमशिखर पाहिले नव्हते, चालकाला सांगितले होते की हिमशिखर दिसले कि गाडी थांबव म्हणुन... पहिल्यांदा हिमशिखर पाहिले तो क्षण अविस्मरणीय होता. माझ्या आयुष्यातील प्रथम हिमशिखर...


दरड कोसळणे आणी थोडा निवांतपणा म्हणुन जोशीमठला जवळपास संध्याकाळी ४ ला पोहोचलो. चालकाने आम्हाला ऑफर दिली कि थोडे जादा पैसे दिलेतर तो दुसर्‍यादिवशी आम्हाला बद्रीनाथ अन माणा इथे घेवुन जाईल. १५०० ज्यादा एका दिवसाचे मागत होता. आम्ही पण तयार झालो. त्या दिवशी सायंकाळी आम्ही जोशीमठमध्ये फिरत होतो.
जोशीमठ (जोर्तीमठ) 9000 ft
शंकरार्चायांनी वसवलेल्या मठापैकी एक, पण औली, बद्रीनाथ किंवा हेमकुंडाच्या रस्त्यावरील मुक्कामाचे ठिकाण जसे महाबळेश्वर शेजारी वाई. निवास अन वाहतूक मुख्य उद्योग. छोटेसे पण टुमदार गाव... तसेच डोंगराच्या उतारावर असल्यामुळे गावात फिरताना सुद्धा तीव्र उतार आहेत. रूममध्ये सामान ठेवुन आम्ही शंकराचार्‍यांनी वसवलेला मठ पहायला गेलो. आता मठाबददल तितकेसे आठवत पण नाही पण तिथे छोटीसी गुहा होती अन त्यात ध्यानस्थ बसण्यासाठी जागा होती. दोन मिनटे ध्यानस्थ बसल्यावर बरच शांत वाटल होते. बहुतेक फोटो काढायला परवानगी नव्हती म्हणुन माझ्याजवळ मठाचे फोटो नाहीत.

सकाळी उठल्यानंतर औलीला निघालो. सगळीकडे दाट धुके पसरले होते अन माइकल शुमाकर अल्टो चालवीत होते. सावकाश जाता येइल असं सांगितल्यावर गेट लागेल अस उत्तर मिळाले.
बाकी औली हे भारतातील स्कीइंग साठी प्रसिदध जागा आहे. औलीमध्ये असलेल्या उतारामुळे अन त्या वर पडणार्‍या बर्फामुळे भारतातले स्कीइंग प्रेमी तिथे डिसेंबर मध्ये जातात. पण आम्ही गेलो तेव्हा बर्फ नव्हता. आम्हाला रस्त्यात एक सफरचंदाचे झाड दिसले. गाडीतून उतरून बरेच फोटो अन २-४ सफरचंद सुदधा काढले. तिथुन परत आम्ही जोशीमठला आलो.

सफरचंदाचे झाड.

जोशीमठला बद्रीनाथच्या रस्त्यावर बरीच मोठी रांग दिसत होती मग गेट लग जायेगा चा अर्थ कळाला. ह्या भागातील रस्ते बरेच अरूंद असल्याने गेट पदधत वापरतात. ठरविक रस्ते फक्त एका बाजूच्या वाहतुकीसाठी वापरला जातो. ठरावीक वेळाने एका बाजूची वहाने आली की दुसर्‍या बाजूचा दरवाजा उघडा करतात. भारतीय सेना ह्या गोष्टीचे नियंत्रण करते. वहातुकीच्या नियत्रंणाबरोबर ह्यामुळे समोरून येणार्‍या वहानामुळे अपघात होत नाहीत अन समोरून वहाने नसल्याने ओलांडून जाण्याचे प्रमाण कमी होते. ह्या गेटमुळे स्थानिक रोजगाराला सुद्धा मदत होते, २-३ तास लोक शाल, जाजंम पहात होते अन खरेदी करत होते.
आता आम्ही गेट उघडण्याची वाट पहात होतो, अन चालकाने नरसिंह मंदिराबद्दल सांगितले. बसून रहाण्याऎवजी चला मंदीर पाहुन येऊ म्हणुन निघालो. मंदीर बरेच जुने पण सुंदर होते. येथील मंदीरे रंगवताना लाल, सोनेरी, निळा पिवळ्या रंगाचा सुरेख वापर करतात.
नरसिंह मंदिर

जवळपास एका तासाने गेट उघडले अन वहातूक चालू झाली. प्रवासात आम्ही लम्हा (संजय दत्त अन बिपशा बसु) सिनेमातील गाणी ऎकायचो. परत परत तीच गाणी ऎकायचो अन आजुबाजूला हिरवेगार पर्वत, खळखळ वहणाया नद्या, काय माहीती काय तरी जादू झाली. आज ही जेव्हा लम्हा मधील गाणी ऎकतो. डोळ्यासमोर तेच पर्वत, नदी, रस्ते हिरवळ दिसू लागते.
परत रस्ते, नदी अन..

एका गेटजवळ..

जवळपास दोन तासांनी आम्ही गोविंदघाटजवळ पोहोचलो. इथे आणी ऐक गेट लागते जिथे जवळपास तासभार वाट पहावी लागते. इथुन जवळूनच फूलदरील रस्ता जातो. जिथे आम्ही सायंकाळी परत येणार होतो. इथुन जवळच पांडवपठार आहे. असं म्हणतात कि पांडवांचा जन्म इथेच झाला पण आम्ही तेथे जाणार नव्हतो. आम्ही बद्रीनाथला जाणार्‍या गेट उघडण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मराठी आवाज ऐकू आले. चार पाच माणसे रिटायरमेंट साजरी करण्यासाठी चारधाम यात्रेसाठी बद्रीनाथला चालली होती. मग तुम्ही कुठले आम्ही कुठले पासून ज्या चर्चा चालू झाल्या त्या उत्तराखंडचे चालक अन महाराष्ट्रातले चालक इथपर्यंत आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूरातुन निघालेला चालक स्टेरींगवरचा हाथ फक्त १० अंश दोन्ही बाजूला वळवतो अन वेग वाढवत कमी करत रहातो,अन मुंबईला पोहोचतो. जोडीला चालकाचा अभिनय करून दाखवित होते अन त्यांना दाद देण्यात अन हसण्यात आमचा तास कसा गेला कळालाच नाही. त्यानंतर गेट उघडल्यानंतर आमचा प्रवास बद्रीनाथकडे चालू झाला. आता मी मागे बसलो होतो अन प्रत्येक वळणाला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकत होता. गाडीचे चाक दरीत आहे की रस्त्यावर आहे कळत नव्हते. थोडया अंतरावर चालकाने रस्त्याशेजारी गिधाडे दाखविली, जवळपास २ ते ३ फूट उंच गिधाडे होती. जरा त्यांनी मान वर केली असती तर अल्टोच्या खिडकीतुन आत आली असती. भीती वाटली पण फोटो काढले. चारधामची यात्रा पायी करणारे बरेच साधु भाविक रस्त्यात दिसत होते.
गिधाडे...

साधु, पायी यात्रा करणारे भाविक..

माणा
दूरवर आता बद्रिनाथ दिसू लागले होते. ढगांनी बद्रीनाथवर मस्त चादर पांघरली होती. दुपारी मंदीर बंद असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा माणा ह्या गावाकडे वळविला. माणामधुन भारतीय सेनेसाठी सीमेवर जाण्यासाठी खास रस्ता आहे. माणा भारत अन चीन सीमेवरील शेवटचे गाव आहे त्याहून सुद्धा हे गाव पौरणीक महत्वाचे आहे. असं म्हणतात की पांडव त्यांच्यी शेवटची स्वर्गारोहण यात्रा येथुनच चालू केली. ज्यावेळी नदी ओलांडताना प्रवाहाच्या वेगामुळे पार करता येत नव्हती तेव्हा भीमाने एक शिळा उचलून ठेवली अन सर्वांनी नदी पार केली. तीच शिळा आज ही तेथे दाखवतात. तसेच व्यासांनी अन गणपतीने महाभारत ह्याच गावात लिहले हे दाखविणारी व्यास गुहा अन गणपती मंदीर पण आहे.
आता वर्तमान काळ, स्वर्गारोहण म्हणुन जी वाट आहे तो एक सुंदर ट्रेक आहे. ह्याच्या शेवटी नदी पर्वतावरून विखरून पडते ती जागा सहस्त्रधारा म्हणुन प्रसिदध आहे. मध्ये रस्त्यात एक सुंदर तलाव आहे. वेळेअभावी आम्हाला हा ट्रेक करता आला नाही. तसेच बद्रिनाथ, माणा हे काय प्लान मध्ये नव्हतेच. पण परत कधी बद्रीनाथला गेलो तर सहस्त्रधाराला नक्की जाईन. मध्यंतरी आज तक का आनी कोणीतरी पांडवाच्या स्वर्गाची वाट शोधली होती. त्यांच्या पदधतीने, जस की पांडवाना यमाने कुत्रा बनून साथ दिली होती तसेच ह्यांच्या बरोबर पण एक कुत्रा रस्ता संपेपर्यंत होता म्हणे. कमेर्‍याचे फोकस अन पांडवांच्या झालेल्या हालाचे वर्णन इतके भयानक होते की मी स्वर्गाला जाणार्‍या पायर्‍या पाहुच शकलो नाही ज्यांची जाहिरात सबंध कार्यक्रमभर चालु होती.

माणा गांव

भीमाची शिळा

स्वर्गारोहण वाट

माणातील आजी

व्यास गुहा...महाभारत लिहलेली जागा...

पण ह्या गावतील दुकाने त्यांची जाहिरात भारतातील शेवटचे दुकान म्हणुन करतात. बरेच प्रवासी भारताच्या शेवटच्या दुकानतील वस्तु आठवण म्हणुन घेतात. असाच एकजण वस्तु घ्या म्हणुन मागे लागल्यावर सागर म्हणाला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडीयावरून घेऊ कारण ते सुद्धा भारतातील शेवटची ठिकाण आहे. पण माणा मधील दुकानांच्या आगळ्या जहिरातीला दाद देत आम्ही बद्रीनाथला निघालो. एव्हाना मंदीर उघडलेले होते.

भारतातील शेवटची दुकान...

बद्रिनाथ 10248 ft
चारधाम मधील हे एकच असे मंदीर आहे ज्यात भगवान कृष्णाची मुर्ती आहे बाकी इतर तीन ठिकाणी भगवान शंकरांची. आख्यायिका अशी आहे की हे सुद्धा शंकरचे मंदीर होते. शंकर अन पार्वती एकदा ह्या मंदीरात बसले असताना पार्वतीला बर्फामध्ये खेळणारे लहान मूल दिसते. ते मूल घेऊन या म्हणुन ती शंकराजवळ हट्ट धरते. स्त्रीहट्टच तो, देव सुदधा बळी पडला (राम सुद्धा). लहान मुलाला घेण्यासाठी जसे शंकर अन पार्वती मंदीराबाहेर आले तसा विष्णुंनी मंदीरात प्रवेश केला अन दार लावले. मग भगवान शंकरानी ते मंदीर सोडून हिमालयात निघून गेले.

अशाप्रकारे आता तेथे भगवान कृष्णाची पूजा होते. हिवाळ्यातील काही महिने ती मुर्ती जोशीमठला आणतात अन बर्फ वितळू लागला की ती परत बद्रीनाथला नेतात. मंदीराजवळ गरम पाण्याचे कुंड आहेत. दुपारी सुदधा जिथे थंडी वाजत होती तेव्हा गरम पाण्याच्या कुंडातून वाफा येत होत्या. त्या पाण्यात पाय शेकून घेताना छान वाटत होते. दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी होती. मंदीराच्या दरवाज्याच्या थोडया ऊंचीवर एक घंटा आहे. पण ऊंच असल्यामुळे कोणाला ती वाजविता येत नव्हती. बरेच जण उडया मारत होते. सागरला मी म्हणालो आपण घंटा वाजवु. मी बाजुच्या खांबावर निम्म्यापर्यंत चढलो अन तेथून घंटेकडे उडी मारली अन जोरात घंटा वाजविली. ती ऎकून एकाने आरोळी दिली बोलो बद्रीबाबा की जय.

बद्रीनाथ..

गोविंदघाट 6000ft
आल्या मार्गाने परत आम्ही गोविंदघाटला आलो जेथुन आमचा फूलदरीकडे प्रवास दुसर्‍या दिवशी चालू होणार होता. गोविंदघाट हे एकाद्या बेस़कॅम्प सारखे आहे. जिथे एक गुरुद्वारा आहे. बरेच शीख भाविक, विदेशी प्रवासी, पर्वतारोहक अन आमच्या सारखे (हौशी, गवशी, नवशी) तेथे जमले होते. गोविंदघाट ते फूलदरी अन हेमकुंडच्या पायथ्याशी असणारे घांघरिया येथुन १५ किमी वर आहे. होटेलमध्ये सामान ठेऊन आम्ही फिरायला निघालो. शीख धर्मातील वस्तू विकणारी बरीच दुकाने होती तसेच रेनकोट काटया विकणारी दुकाने पण आहेत.
गोविंदघाट

नदीकाठी आम्ही आमच्या जागा पकडून बसलो. गुरुद्वाराजवळ येणार्‍या जाणार्‍या लोकांची गडबड होती. बाजूने घुं घुं असा आवाज करीत नदी वहात होती. हेमकुंड पायी येणार्‍या नातेवाईकाचे स्वागत करायला घोडयावरून पुढे आलेल्यांची गडबड चालू होती. घोडेवाले घोडयांना चारापाणी करून उद्याची भाडी ठरवत होते. आम्ही तिघे मात्र ज्यासाठी तीन महिने तयारी करून इथपर्यंत पोहोचलो होतो त्यासाठी एक रात्र वाट पहाणार होतो.


माणामधे सुरेख धुर्‍या विणतात स्थानिक लोक. ते पाहिले की नाही? पाहता पाहता डिझाईन्स बनवतात.
सरस्वतीच्या उगमाच्या आसपास एक प्रकारची लालसर करवंदासारखी छोटी फळे येणारी झाडे असतात, त्यांची फळे चाखली की नाही?
सरस्वती, गंगामाई, पुष्पावती, अलकनंदा, मंदाकिनीचा अखंड नाद ऐकला की नाही? गरुडगंगेच्या पाण्यात हात घातला की नाही? हेमकुंडाला भेट दिली का?
नृसिंह मंदिरामागे आदिश्रीशंकराचार्यांचे जिथे वास्तव्य होते, ती जागा आहे. त्यांचे एक वस्त्र आहे (हे कितपत खरे ते ठाऊक नाही मात्र) ते पाहिले के नाही? तिथल्या भिंतींवरचा धर्मपीठांबद्दलचा इतिहास वाचला की नाही?
आणि इतक्या दूर तिथे ज्ञानोबामाऊलींचे पसायदानही पूजेमध्ये विराजमान आहे, त्या कागदाचे दर्शन घेऊन धन्य धन्य वाटले की नाही?
स्वर्गारोहिणी शिखर सरस्वती उगमापासून किती सुरेख दिसते ना?
गंगेचा अफाटपणा अनुभवला की नाही?

मी केलेल्या ह्या ट्रेकच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या, धन्यवाद ह्या धाग्यासाठी :)

पहाटे पहाटे चालायला सुरु करायचे असं ठरले पण झोप थोडीशी जादा झाली अन पहाटेऎवजी सकाळी चालायला सुरुवात केली. फक्त गरजेचं साहित्य बरोबर घेतलेले होते. बाकीच्या गोष्टी हॉटेलमध्येच ठेवल्या होत्या. थंडी जबरदस्त होती म्हणून उबदार कपडे घालुनच निघालो पण पहिलाच चढ थंडीला पळवून लावणारा निघाला. आम्ही टी शर्ट वर आलो. प्रवासात चालताना फोटो काढायचे नाहीत अस ठरले होते पण कॅमेरा बाहेर निघाला...

आमच्याबरोबर बरेच शीख लोक पायी, डोली किंवा घोडयावर बसून घांघरिया कडे निघाले होते. रस्ता व्यवस्थीत बांधला होता.रस्त्याला लागून असणाया दरीमधून पुष्पावती नदी तुफान वेगाने कोसळत होती. चालणारे डोलीवले अन घोडयांना जायला बर्‍यापैकी जागा होती. डोलीवाले अक्षरश: धावत होते. आम्हाला पहिल्याच चढाला दम लागला. पण जसे जसे वातावरणाला जुळवले गेलो, दम लागणे कमी झाले अन निवांत चालू लागलो. प्रत्येक किमीला बोर्ड होते. पण चालणे साधारणता ताशी २ कि मी होते.

गोविंदघाट ते घांघरिया-

asd

asd

asd

river

asd

मध्येच रस्त्याजवळ नदीत उतरण्यासाठी वाट होती. आम्ही फोटोसाठी उतरलो पण तेथे आधीच एक शीख सरदार आपल्या मुलासह पाण्यात पाय सोडुन बसले होते. तो सरदार आम्हाला म्हणाला, पाण्यात पाय सोडुन बसा, पाय दुखायचे थांबतील. सुजीत अन सागरने शूज काढले अन पाय पाण्यात टाकताच मला पाण्यात पाय टाकु नको म्हणाले. मी त्यांच्या चेहर्‍यावरूनच समजलो. पाणी इतके थंड होते की पाय बधीर झाले अन सरदाराला वाटले की पाय दुखायचे थांबले.या छोटया विश्रांती नंतर परत चालायला सुरुवात केली. आता परत येणारे बरेच लोक भेटत होते. बरेच लोक रस्त्यात उभे राहून शिल्लक राहिलेली ग्लुकोन डी, प्रसादासारखी वाटत होते, तेवढीच चालायला शक्ती.

riv2

asd

asd

mount

asd

जवळपास निम्मे अंतर चालून झाले होते. रस्ता खडा चढ होता. गोविंदघाट समुद्रसपाटी पासुन उंची आहे ६००० फुट, घांघरिया १०००० फुट, फूलदरी आहे ११००० ते २०३५७ फुट, हेमकुंड साहिब आहे १५५०० फुट. एका दिवसत १४ किमी मध्ये ४००० फुट पार करायचे होते. फुलदरीची चाहूल लागली होती, रस्त्याकडेला छोटी छोटी लाल, सफेद अन जांभळी फुले दिसू लागले होते. एव्हाना घोडे, डोली यांची वर्दळ कमी झाली होती. हवामानाशी जुळल्यामुळे चालताना बराच कमी दम लागत होता.

गोविंदघाट ते घांघरिया-

ASD

asd

asd

asd

शेवटचा टप्पा मात्र जबरदस्त खडा चढ होता. पावसाने गैरहजेरी नोंद करून चांगलीच मदत केली होती. रस्ता अरुंद होता. पुष्पावती नदीने मात्र साथ सोडली नव्हती. जास्तच अल्ल्डपणे ती उतरत होती अन आम्ही दमून वर चढत होतो. येथे जरा जास्त वर्दळ जाणवत होती, घोडे अन डोलीवाले पहिले भाविक उतरुन परत जे दमलेले होते त्यांना आफर करत होते. चढ, चालल्यामुळे दमलेले भाविक कमी किंमतीत आता घोडयावर बसुन जात होते.

१४ किमी चालुन आल्यानंतर पहिल्यांदा घांघरिया गावाचे दर्शन झाले. सुरुवातीला हेलीपॆड अन नंतर टेंट, बाजुच्या पर्वतातून कोसळणारा धबधबा, ह्या सगळ्याभोवती पाईन वृक्षांची दाटी, चित्रकाराने काढलेलं चित्रच जणु. आम्हाला मात्र वेळ नव्हता धावत पळत जावुन आम्हाला होटेल मध्ये खोल्या बुक करायच्या होत्या. गढवाल टुरिझमच्या खोल्या सुंदर होत्या पण आरक्षित होत्या. मग एका छोटया होटेल मध्ये खोल्या मिळाल्या. थोडयावेळाने आवरून वगैरे आम्ही खायला म्हणून त्या होटेलच्या उपहारगृहामध्ये आलो. सुजीतने झोपण्याचा त्याचा बेत जाहीर केला अन आम्ही घांघरिया फिरुन येण्याचा. अन आम्ही मार्गदर्शक ठरवायला निघालो.

घांघरिया...

asd

घांघरिया हे गाव फक्त हॉटेल, अन खानावळींनी भरलेले आहे. मार्च ते आगस्ट इतकेच दिवस तेथे लोक राहतात. बर्फ पडू लागला की लोक गांव रिकामे करून जातात. रात्री ५ ते ९ इतकाच वेळ वीज असते ती पण डिझेल जनरेटरने मिळालेली. खाण्याचे साहित्य, डिझेल अन इतर लागणार्‍या सर्व वस्तु गोविंदघाटहून घोडयावरून येतात. सहाजीकच प्रत्येक वस्तुचा दर वाढत जातो. गढवाल टुरिझमचे एक कार्यालय आहे. तिथे मार्गदर्शक मिळतो कि काय पहायला गेलो.
तेथील मार्गदर्शक आधीच एका शीख सरदाराबरोबर बोलत होता. त्या कार्यालयात बरीच फुलदरीबद्द्ल पुस्तके होती. पुस्तके चाळता चाळता कळाले की तो त्या सरदाराला बरोबर घेऊन चालला आहे अन तो आम्हाला त्याच्याबरोबर घेऊन जावु शकेल. पण तो काही पैसे कमी करायला तयार नव्हता. मग त्याला म्हणालो थोडेसे गांव फिरुन येतो अन मग सांगतो. अन फिरता फिरता चौकशी करता कळाले कि गावात दोनच मार्गदर्शक आहेत. मग दुसर्‍या मार्गदर्शकाकडे गेलो. रजनीश चौहान नाव त्याचे. त्याचे घांघरीया मध्ये छोटेसे दुकान आहे, शोभेच्या वस्तु विकण्याचे. आम्ही जावुन निवांत गप्पा मारत बसलो. तो त्याच्या हिमालयातील ट्रेकचे फोटो दाखवत राहीला. परदेशी लोकांबरोबर औलीला केलेल्या स्किईंगचे फोटो दाखविले. त्याचा जवळचा DSLR कॅमेरा दाखवत होता, पण पैसे काही केल्या कमी करेना. मग तो त्याच्या कॅमेर्‍याने आमचे फोटो काढणार अन आम्हाला देणार असे ठरले. त्याच्या दुकानात जवळपास २-३ तास आम्ही बसलो होतो. कोणताही शीख दुकानात आला कि तो सांगायचा दुकान बंद करुन चाललोय, नंतर या. किंवा मालक बाहेर गेलाय, परत थोडया वेळाने या. रजनीश अस का करतोय आमच्या लक्षात येत नव्हते, एव्हाना त्याची अन आमची चांगलीच ओळख झाली. रजनीशला त्याबद्द्ल छेडले तर तो म्हणाला त्याला शीख आवडत नाहीत. का आवडत नाहीत त्याचा अनुभव आम्हाला आला. दोन शीख मुले त्याच्या दुकानात आली. त्यांनी रजनीशचा दरवाज्यावरचा बर्फाच्या कडयावर ट्रेक करतानाचा फोटो पाहिला होता. आत येत शीख तरुणांनी त्याला विचारले की तो फोटो मध्ये फक्त त्या मुलांचा चेहरा बसवुन देशील का म्हणून. रजनीश म्हणाला ते काही शक्य नाही. ते म्हणाले मग फक्त फोटो दे... हमारे यहा सबकुछ होता है, हम कर लेंगे. यावर रजनीशने त्यांना अक्षरशः हाकलले. तो फोटो एका विदेशी मुलीने एका ट्रेकींगवेळी काढला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी येतो म्हणून आम्ही तेथुन निघालो.

दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता रजनीशच्या दुकानाजवळ पोहोचलो.रजनीश आमचीच वाट पहात होता. त्याच्या भावाच्या दुकानातून दुपारसाठी परोठे घेतले. अन फुलदरीजवळ पोहोचलो. चार पाच पर्यटक फुलदरीच्या गेटजवळ तिथल्या कर्मचार्यांची वाट पहात होते... आम्ही तिथला फुलदरीचा नकाशा पाहू लागलो.

थोडयाच वेळात आम्ही पैसे भरून आत मध्ये प्रवेश मिळवला.फुलदरी किती सुंदर आहे त्याचे वर्णन शब्दात मी तरी करु शकत नाही, म्हणून फोटो....

फुलदरी...

ghanghariya

cross

way to VOF

VOFsarts

१९३० साली ३ ब्रिटीश गिर्यारोहक रस्ता चुकल्यामुळे भ्युंदार दरी मध्ये आले अन पहातात तर सगळे पुष्पवाती नदीच्या खोर्‍यात पर्वत उतार फुलांनी भरून गेलेले तेव्हा Valley of Flower चा शोध लागला अन भ्युंदार दरी, Valley of Flower म्हणून नकाशावर आली अन तशीच ओळखली जावु लागली. त्यातील एका गिर्यारोहकाने Valley of Flower असे पुस्तक पण लिहले. १९८२ ला राष्ट्रीय उद्यानाचा अन २००४ ला UNESCO जागतीक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला.

flower

flower2

way

flow3

flower way

bird1

way to vOF

bird 2

flowerbed

flower7

flower5

bell flower

फुलदरी मध्ये मे पासून ऑगस्ट पर्यंत वेगवेगळी फुले उमलत असतात कि जणु पर्वत उतारावर गालिचे. जर थोडया दिवसांनी पर्वत उताराचा रंगच बदलून जात असतो. बर्‍याचदा विविधरंगी फुलांचे पट्टे दुरवरून दिसतात.

flower bed2

flower6

flowerbed3

we

Bird4

बर्‍याच वनस्पती संशोधकानी इथे संशोधन करून बरीच हिमालयीन फुलांबददल माहीती जमविली आहे.रजनीश बरोबर आम्ही फिरत फिरत फुलदरीच्या मध्यभागात आलो. तेथे मार्गारेट लेग्गे ह्या वनस्पती संशोधकाची संशोधन करत असताना मरण पावली तिची कबर..

marga

आता पावसाला सुरुवात झाली. येथील वातावरण केव्हा ही बदलू शकते. रजनीश तेथेच थांबला पण आम्ही पुढे चलतच होतो. आम्हाला फुलदरीच्या शेवटी असलेल्या लाल फुलांचा जमिनीवर अंथरलेला गालीचा पहायचा होता. भर पावसात आम्ही शेवटपर्यंत पोहोचलो. तेथे गुलाबाच्या फुलासारखी छोटी छोटी फुलांनी नदीच्या दोन्ही बाजूला अन दोन्ही बाजूच्या पर्वत उतारावर सुंदर गालिचा पांघरला होता.

फुलदरीचा शेवट

end1

flower bed

end2

एव्हाना पाऊस बराच वाढला होता. अन आम्ही एका छोटया गुहेसारख्या जागेत आडोशाला थांबलो होतो. मग फुलदरीबदद्ल गप्पा चालू झाल्या. रजनीशच्या म्हणण्यानुसार जी फुले कमी ऊंचीवर उगवत होती ती आता जास्त ऊंचीवर उगवत आहेत. कारण सर्व भागातील तापमान वाढत आहे. ब्रह्मकमळ फुल जे फूलदरी मध्ये सहजरित्या मिळायचे त्यासाठी आता पर्वतमाथ्यावर जावे लागते. हेमकुंड साठी जे भाविक प्लॅस्टीक रेनकोट घेऊन येते त्यामुळे इतक्या ऊंचीवर कचरा होत आहे. घोडयांची लीद मुळे सुद्धा कचर्‍याचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर जेव्हा फुलदरी राष्ट्रीय उद्यान झाले तेव्हापासून तेथे हिमालयीन शेळ्याना चरायला बंदी आहे. पण ह्याच शेळ्या अन बकर्‍यामुळे फुलदरीची खताची गरज भागविली जायची अन त्यांच्या विष्ठेतून जाणार्‍या बियामुळे फुलदरीचा विस्तार होत होता, त्यावर आता मर्यादा आल्या आहेत. गरम हवेमुळे फुलदरी ऊंचीकडे चालली आहे.

फुलदरीचे संवर्धन किंवा ती वाचवणे का गरजेचे आहे तर समजा दोन वनस्पती संशोधकाना हिमालयतील फुलांची नोंद अथवा संशोधन करायला सांगितले तर एक बरीच वर्षे हरिद्वार ते माण फेर्‍या मारत बसेल तर दुसरा फक्त फूलदरीमध्ये बसुन ३-४ महिन्यात जवळपास सर्व जातींची नोंद घेवु शकेल.

पाऊस कमी होण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. ढग सुद्धा दाटून येत होते. मग आम्ही जड पायाने माघार घेतली. जर वेळी अशा जागेतून निघताना बर्‍याचदा मी ठरवत असतो कि मी परत येथे येणार पण मला असं वाटत होते कि परत आल्यावर फुलदरी अस्तित्वात असेल कि नाही. असं वाटत असत की ह्या जागा कुणालाही माहीती होऊ नयेत निदान त्या तितक्या सुरक्षित तरी राहतील.

त्या दुपारी भर पावसात आम्ही ३-४ कि मी चालत परत घांघरिया मध्ये आलो. जबरदस्त थंडीने काकडलो होतो. मस्तपैकी अथंरूणामध्ये ताणून दिली. सांयकाळी परत रजनीशच्या दुकानात जाऊन गप्पा टप्पा करत बसलो. त्याच्याबरोबर फोटो काढून घेतले.

रजनीश अन त्याचे दुकान

rajneesh

rahneesh shop

दुसया दिवशी आम्हाला हेमकुंड साहिब पाहून परत गोविंदघाटला जायचे होते. म्हणजे समुद्रसपाटी पासून १०,०००(घांघरिया) फूटावरुन १५०००(हेमकुंड साहिब) पर्यंत जायचे अन ६००० फुटापर्यंत (गोविंदघाट) खाली यायचे.
हेमकुंड साहिब हे शीखांच्या पवित्र जागांपैकी एक जागा आहे. या स्थानाबददल दोन ऐकीव कथा आहेत. गुरु गोविंद सिंगानी त्यांच्या पुर्वीच्या जन्मी तेथे तपस्या केली होती. ते तेथुन देवाला भेटले अन देवानी त्यांना परत जन्म घेऊन लोकांना धर्माची शिकवण अन द्रुष्ट शक्ती विरुद्ध लढा देण्याचा आदेश दिला.त्यांच्या पवित्र ग्रंथामध्ये ह्या जागेचा उल्लेख बर्फाचा तलाव अन सात पर्वत शिखरांच्या मधील जागा असे आहे. दुसर्‍या कथेत जेव्हा मुघल गुरु गोविंद सिंगाना मारण्यासाठी प्रयत्न करत होते तेव्हा गुरु गोविंद सिंग येथे पळून आले अन त्यांनी तपस्या करत येथे त्यांचा पवित्र ग्रंथाचे लिखाण केले. १९३२ साली भारतीय सेनेतुन निव्रुत्त झालेल्या सैनिकांनी ही जागा शोधुन काढली. तसेच ह्या जागेजवळच लक्ष्मण मंदीर आहे. आख्यायिका अशी आहे की लक्ष्मणाने येथे शेष नाग स्वरूपात तप केले होते.

हेमकुंड (आंतरजालावरून साभार)

123

हेमकुंड (आंतरजालावरून साभार)

asd

तिसर्‍या दिवशी सकाळी आम्ही चालायला सुरुवात केली. ७-८ किमी मध्ये ४०००-४५०० फुटाचा चढ, जो जाणवत होता, खडा चढ म्हणु शकता. खडया चढामुळे अन उंचीमुळे दम लागत होता. थंडीमध्ये सुद्धा घाम येत होता म्हणून जॅकेट काढावे तर थंडी वाजत होती. मध्ये रस्त्यात १-२ छोटे छोटे ग्लेशीअर पण होते. त्यावरून जाताना सावधगिरी बाळगावी लागत होती. निम्म्या रस्त्यात परत पाऊस चालू झाला त्यामुळे फार दुरवरचे काही दिसत नव्हते अन कॅमेरा सुदधा बाहेर काढता येत नव्हता. जस वर जात होतो तसा तापमानतील फरक लक्षात येत होता. २-३ तासांच्या सलग चालण्यानंतर आम्ही हेमकुंडला पोहोचलो. तेथे तलाव आहे. अन त्या तलावामध्ये डुबुकी मारणे हा एक अनुभवच होता. जवळपास ३-४ अंश तापमान, गार वारा अन बाणांसारखे थेंब मारणारा पाऊस.. कपडे काढून पाण्यात उतरलो तेच शरीराच्या संवेदना गायब झाल्या तर सागर म्हणाला फोटो चांगला आला नाही आणी एकदा डुबुकी मारा. दुसर्या वेळी शरीराने नकार देण्याचा प्रयत्न केला पण मनापुढे हार मानावी लागली. जवळपास तेथुन ५- १० मिनटे शेजारच्या खोलीत शेकोटी जवळ बसल्यावर शरीराच्या जाणीवा परत आल्या. मुंबईहून नॉन शीख येथे आलेत हे कळाल्यावर वेलकमजी म्हणून स्वागत झाले.

गुरुद्वारा

123

345

567

लक्ष्मण मंदीर
456

lake

तेथे गुरुद्वारामध्ये दर्शन घेतल्यानंतर बराच वेळ गुरुद्वारामधील ब्लॅकेट मध्ये बसून होतो. तेथे जवळ लंगर चालु होता. गरम दाल खिचडीची चव १५००० फूटावर जास्तच छान लागते म्हणून कि काय २ च्या जागी ४ वाडगी भरून दाल खिचडी संपविली अन २-३ कप चहा तो ही पेल्यातून. मी तर तेथेसुद्धा चुली शेजारची जागा पकडून उभा होतो. बाहेर येउन आम्ही लक्ष्मण मंदीरात दर्शन घेतले. एका शीख सरदारने आम्हाला सात पर्वतावरचे सात निशान दाखविले पण ढगांमुळे ३-४ निशानच दिसु शकले. तेथे जवळच ब्रह्मकमळाच्या फुलांच्या कळ्या होत्या. वार्‍याबरोबर त्याचा मस्त सुगंध येत होता. म्हणे की ब्रह्मकमळांच्या अतीसुगंधाने कोणीही बेशुद्ध पडू शकतो.

ब्रम्हकमळ...

456

आता परत जायची वेळ आली होती. घांघरियाहून गोविंदघाट जवळपास २० किमी.. आम्ही उतरून घांघरीया मध्ये आलो. पटकन सॅक पॅक करून आम्ही चालत घांघरियाकडे निघालो. शेवटचे ४-५ किमी फारच त्रासदायक होते. मी तर सुजित अन सागरपेक्षा जास्त दमलो होतो. मी मागे रहात होतो म्हणून सागर माझ्या बरोबर होता. जरी आम्ही शरीराने दमलो होतो, पण आमचे मन मात्र अतिशय उत्साही होते.. बहुतेक फुलदरीचा प्रभाव असावा.



उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर

स्वप्न, तयारी आणि ट्रुम्सोकडे प्रयाण

डॉ सुहास म्हात्रे in भटकंती

 स्वप्न

उत्तर ध्रुव म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो बारा महिने बर्फाच्छादित आणि सतत शून्याखाली अनेक अंश सेंटिग्रेड थिजलेला प्रदेश. नुसत्या नावानेच हुडहुडी भरायला लावणार्‍या उत्तर ध्रुवाबद्दल माझ्या मनात कोठेतरी एक अनामिक आकर्षण फार पूर्वीपासूनच आहे... नक्की केव्हापासून ते सांगता येणार नाही पण बहुदा शाळेत भूगोल शिकताना या प्रदेशाची प्रथम ओळख झाली तेव्हापासूनच असावे. तेथे राहणार्‍या एस्किमो लोकांच्या बर्फाच्या घरांनी (igloo) माझे कुतूहल अधिकच वाढवले. त्यातच उत्तर ध्रुवीय प्रदेशांत दिसणार्‍या "ऑरोरा बोरियालीस" या निसर्गचमत्काराची माहिती झाली तेव्हातर कधी ना कधी तेथे जायचेच हे मनात पक्के झाले... कधी? कसे? याचा काही पत्ता नव्हता पण जायचे नक्की झाले एवढे मात्र खरे... तो काळ बहुतेक कॉलेजचा होता त्यामुळे आणि सफर उत्तर ध्रुवीय प्रदेशाची होती, म्हणजे अर्थातच सफरीच्या इतर सणकांप्रमाणे तेव्हाच्या तुटपुंज्या खिशासह धोकटी पाठीवर मारून तडक निघण्यासारखी सोपी शक्यता नव्हती. त्यामुळे माझे हे स्वप्न बराच काळ अपूर्ण राहिले... पण ते गप्प बसले नाही. मनाच्या कोपर्‍यात बसून मधून मधून ढुशी मारत "मी इथेच आहे. मला विसरू नकोस." असे सांगतच राहिले.

शेवटी हो ना करता करता, सहा महिन्यापूर्वी ठरवले की आता खूप झाले, चला निघा आता. मग आंतरजालावर पर्यटन कंपन्यांचा शोध घेणे सुरू झाले. आंतरजालाचे इतर असंख्य उपयोग आहेतच, पण माझ्या भटकंतीला आंतरजाल जी मदत पुरवत आहे त्यामुळे मलातर ते केवळ देवाची देणगीच वाटते... आंतरजालाशिवाय जगाच्या एका कोपर्‍यात बसून दुसर्‍या टोकावरच्या ठिकाणाची सखोल माहिती काढून, कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या अनोळखी माणसांबरोबर (कंपन्यांबरोबर) इ- पत्रव्यवहार करून सर्व व्यवस्था पक्की करणे आणि काही आठवड्यात निर्धास्तपणे बॅग घेऊन सफरीला बाहेर पडणे केवळ अशक्य होते.


(वरील चित्र आंतरजालावरून साभार)

वरच्या आकृतीत Arctic Circle म्हणजेच 66° 33′ 44 ″ही अक्षांश रेखा निळ्या रंगाच्या तुटक रेषेच्या वर्तुळाने दाखवलेली आहे. या वर्तुळाच्या आतला प्रदेश उत्तर शीतकटिबंध, आर्क्टिक अथवा उत्तर ध्रुवीय प्रदेश होय आणि अश्याच प्रकारच्या दक्षिणेकडच्या भागाला अंटार्क्टिक म्हणतात हे सर्वांना माहीत आहेच. उत्तर ध्रुवीय प्रदेशात हजारो वर्षांपासून मानवी वस्ती आहे पण दक्षिण ध्रुवीय प्रदेशात कायमची मानववस्ती कधीच नव्हती. मात्र गेल्या काही दशकांत अंटार्क्टिका खंडावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी अनेक देशांनी तेथे आपले झेंडे रोवून हा भाग आपला आहे अशी दवंडी पिटली आहे. ब्रिटन तर एका भागाला त्यांच्या राणीचे नाव देवून मोकळा झाला आहे. गंमत अशी की या भागावर चिली व अर्जेंटिनाने अगोदरपासूनच दावे केलेले आहेत ! या चढाओढीत भारतही सामील आहे. मात्र या सगळ्या प्रकाराला कोणतीही आंतरराष्टीय मान्यता नाही. असो.

तयारी

उत्तर ध्रुवीय प्रदेश जरी कॅनडा, अमेरिका (अलास्का), रशिया, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क (ग्रीनलंड), आईसलँड व फ़िनलंड इतक्या देशांत वाटून गेलेला असला तरी मला हवी असलेली मुख्य आणि इतर आकर्षणे चांगल्या प्रकारे केवळ नॉर्वेमध्येच उपलब्ध आहेत हे कळले... आणि अशा तर्‍हेने सहलीचा देश नक्की झाला.

मग बर्‍यापैकी संशोधनानंतर तीन चार टूर कंपन्यांची लघूसुची बनवली. त्यांच्या ऑफर्सचा आणि इतर माहितीचा अभ्यास करताना ज्ञानात बरीच भर पडली. त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे होत्या:

१) ऑरोरा बोरियालीस हा अत्यंत लहरी निसर्गचमत्कार जमून यायला निरभ्र आकाश, अंधारी रात्र आणि सूर्यावरची विद्युतचुंबकीय वादळे यांचे समीकरण जमायला लागते. आणि हे सगळे थंडीच्या दिवसातच जास्त जमून येते (बोंबला! हुडहुडी!).

२) या शिवाय थंडीच्या दिवसांत या प्रदेशात दिवस फक्त अगदी २ ते ४ तासांचा असतो त्यामुळे लांब अंधार्‍या रात्रींमुळे ऑरोरा दिसण्याचे प्रमाण वाढते (हुडहुडी जरा कमी झाली! ).

३) ऑरोरा बोरियालीस बघण्यासाठी ट्रुम्सो हे उत्तर नॉर्वेतील शहर सर्वोत्तम समजले जाते. शिवाय तेथे बर्फामधल्या मजा करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत (हुडहुडी अजून जरा कमी झाली आणि थोडा हुरूपपण आला! ).

४) नॉर्वेच्या अती उत्तरेस असलेल्या किर्केनेस नावाच्या गावात दर हिवाळ्यात केवळ आकाशातून पडलेला बर्फ वापरून एक "स्नो हॉटेल" बनवले जाते. म्हणजे एस्किमोंच्या बर्फाच्या घरात राहण्याचा अनुभव घेण्याची संधी आहे (आनंदाची गरमी आणि हुडहुडी…दोन्ही एकदमच अनुभवली!). २००८ साली National Geographic ने या हॉटेलची जगातील २५ सर्वोत्तम नव्या साहसांमध्ये (World’s 25 Best New Adventures) गणना केली होती. केवळ एक रात्र राहण्याकरता येथे सर्व जगातून प्रवासी येत असतात. हे हॉटेल दर डिसेंबरमध्ये नव्याने बांधतात आणि २० डिसेंबर ते २० एप्रिल पर्यंत चालू राहते. एप्रिलच्या शेवटी ते हवेच्या वाढलेल्या तापमानाने विरघळते! अशी हॉटेल्स स्वीडन व कॅनडामध्येही आहेत पण किर्केनेसचे स्नो हॉटेल जगात सर्वात जास्त उत्तरेला आहे.

अजूनही बर्‍याच अगोदर माहीत नसलेल्या पण करण्या-बघण्या-सारख्या गोष्टी सापडल्या त्या प्रवासवर्णनात येतीलच. या सगळ्या संशोधनात खालील मुख्य कच्चा आराखडा नक्की झाला:
१) मुख्य आकर्षणे ऑरोरा व स्नो हॉटेल : सगळी सहल यांच्या भोवतीच गुंफायची.
२) सहलीचा काळ जानेवारी : ऑरोरा बघायचा असेल तर थंडी सहन करण्याला पर्याय नाही !

नंतर निवडलेल्या टूर कंपन्यांचे विकल्प पडताळून पाहायला सुरुवात केली. प्रवास करताना जितक्या विविध प्रकारची वाहने वापरता येतील तितका प्रवास जास्त मजेशीर बनतो असे मला वाटते. एक टूर फार पसंत पडली जी "नॉर्वेची राजधानी ऑस्लोपासून बेर्गन नावाच्या बंदरापर्यंत रेल्वेने तेथून पुढे किर्केनेस पर्यंत क्रूझ बोटीने आणि तेथून परत ऑस्लोला विमानाने" अशी होती. मात्र या टूरमध्ये ऑरोरा बघण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या ट्रुम्सोमध्ये एकच दिवस वस्ती होती. आणि ट्रुम्सोमधला एक दिवस क्रूझच्या मध्यभागी असल्याने टूर कस्टमाईझ करून तेथे दोन दिवस जास्त राहणेही शक्य नव्हते. त्यामुळे ती टूर नापास झाली. इतर टूर्समध्येही काही ना काही खोट निघत गेली.

शेवटी फ्योर्ड टूरच्या एका टूरमध्ये बरेच (जवळ जवळ ५०टक्के) बदल करून ०७ ते १५ फेब्रुवारीची कस्ट्माईझ्ड इटिनेररी पक्की केली, ती पुढीलप्रमाणे होती:

"दम्माम - अ‍ॅमस्टरडॅम - ऑस्लो - ट्रुम्सो" असा सलग प्रवास - ट्रुम्सो (३ रात्री) – ट्रोल्फ्योर्ड हुर्टिग्रुटन क्रूझ (२ रात्री बोटीवर) - किर्केनेस (१ रात्र स्नो हॉटेलमध्ये) - ऑस्लो (२ रात्री) – "ऑस्लो - अ‍ॅमस्टरडॅम - दम्माम" असा सलग परतीचा प्रवास.


(वरील मूळ नकाशा आंतरजालावरून साभार)

यातला दम्माम-ऑस्लो-दम्माम हा विमानप्रवास माझी जबाबदारी होती तर नॉर्वेमध्ये ऑस्लोपासून-ऑस्लोपर्यंतचा सर्व प्रवास, हॉटेल्स, आकर्षणे, इ. जबाबदारी फ्योर्डटूरची होती.

इतर सहलींत आणि या सहलीत एक फार मोठा फरक होता... हुडहुडीचा ! तिचा काहीतरी बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा खास हुडहूडीनिरोधक आयुधे जमवायला सुरुवात केली. युद्धाची तयारी खालच्या चित्रात दिसत आहे...

१. रुपा थर्मलवेअर : हे मागच्या सुटीत भारतातून आणायचे असे ठरवून आठवणीने विसरून आलो होतो ! शेवटी दम्माम्ममध्ये जगभरच्या पर्यायांतून थर्मलवेअर शोधताना हाच पर्याय सर्वोत्तम वाटला... आणि सर्व सहलभर त्याने माझे असे उत्तम संरक्षण केले की या भारतीय उत्पादनाचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
२. लोकरीची टोपी : डोके, कान आणि मानेचा मागचा भाग झाकू शकणारी
३. लोकरी मफलर
४. लोकरी हातमोजे : बर्फ़ाच्या खेळाडूंच्या वापराचे हातमोजे काही मिळू शकले नाही. मग लोकरीच्या हातमोजाचे दोन जोड घेतले. मात्र या अस्त्राची मात्रा किती कमी पडणार हे ध्यानात येण्याअगोदरच कर्मधर्मसंयोगाने योग्य हातमोजे विकत कसे घ्यावे लागले हे पुढे येईलच.
५. आतमध्ये कृत्रिम फर असलेले जाड जॅकेट
६. बर्फासाठी खास बूट भारतात आणि दम्माममध्ये मिळाले नाहीत. मग माझे जाडसे नायकेचे स्नीकर्स व टेनिस खेळताना वापरतात तसल्या जाड पायमोज्यांच्या दोन जोड्या (एकावर एका घालायला) आणि अजून दोन जोड्या राखीव असा शस्त्रसाठा केला. हाच उपाय मी स्वित्झर्लंडच्या हिवाळ्यात यशस्वीपणे वापरला होता... पण इथे त्यापेक्षा २,०००+ किमी जास्त उत्तरेला जायचे होते म्हणून जरा साशंक होतो. पण गरज पडल्यास ट्रुम्सोमध्ये खरेदी करू असे ठरवले होते.
७. कानांचे थंडीपासून संरक्षण करणारे इयर डिफेंडर्स
असा जेवढा शक्य होता तेवढा जामानिमा गोळा केला... अजून काही गरज पडल्यास ट्रुम्सोमध्ये बघून घेऊ असे ठरवले.

शेंगेन व्हिसाची कथा

नॉर्वेला जायचे म्हणजे "शेंगेन" व्हिसा काढणे आले. १९८५ मध्ये काही युरोपियन देशांनी मिळून एक व्हिसा पद्धत सुरू केली आहे. हा करार लुक्झेंबोर्ग येथील शेंगेन शहरात झाला म्हणून त्याला शेंगेन व्हिसा असे नाव पडले आहे. आजच्या घडीला या करारात २६ देश सामील आहेत. या पद्धतीमुळे आता एकच (शेंगेन) व्हिसा काढून तुम्ही युरोपमधल्या अनेक सभासद देशांची सफर निर्वेधपणे करू शकता. भारताचा व्हिसा घेऊन परदेशी माणसे आपल्या बहुतेक सर्व राज्यातून इतर काही सोपस्कार न करता हिंडू फिरू शकतात असाच काहीसा हा प्रकार आहे... महत्त्वाचा फरक असा की भारत हा एक अखंड देश आहे आणि शेंगेनचे सर्व सभासद स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे आहेत. मात्र या कराराने प्रवाशांची प्रचंड सोय केली आहे हे निर्विवाद आहे. शिवाय यामुळे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मोलाची मदत झाली आहे. असो.

शेंगेन व्हिसासाठी केवळ अर्ज व कागदपत्रे पुरेशी नसतात तर राजदुतावासात जाऊन बायोमेट्रीक्स मशीनमध्ये तुमच्या दहाही बोटांचे ठसे व फोटो काढून घ्यावा लागतो. त्यासाठी नॉर्वेच्या रियाधमधील राजदुतावासात जाण्याची वेळ त्यांच्या संस्थळावर पक्की करायला गेलो तर संस्थळाने लगेच दुसर्‍या दिवशीचीच वेळ दिली. दम्माम-रियाध हे अंतर ४५० किमी आहे आणि चारचाकीने जायला साधारण ४ ते ५ तास लागतात. म्हणजे कामावरून सुट्टी घेऊन जायला पाहिजे तेव्हा वेळ पुढे ढकलण्यासाठी राजदूतावासाला फोन केला. तर तिथल्या मॅडम म्हणाल्या बरा फोन केलात. मीच तुम्हाला फोन करणार होते. आमच्या बायोमेट्रीक्स मशीनमध्ये बिघाड झाला आहे आणि पुढच्या एक आठवड्याच्या सगळ्या वेळा रद्द केल्या आहेत. मशीन ठीक झाले की आम्ही तुम्हाला फोन करू.

संस्थळावर लिहिले होते की व्हिसा मिळायला अर्ज स्वीकारल्यापासून कमीत कमी दोन आठवडे तरी लागतील. मी तर २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी असे सहलीचे व विमानाचे बुकिंग कन्फर्म करून बसलो होतो. पण आता वाट पाहण्यापलीकडे हातात काहीच नव्हते. एक आठवडा झाला तरी फोन आला नाही म्हणून परत चौकशी केली तरी मशीन दुरुस्त झालेले नव्हते आणि कधी होईल याची खात्रीलायक बातमीही नव्हती. तीन चार दिवसानंतर सुरू होणार्‍या नाताळच्या आणि त्यानंतरच्या वर्षारंभाच्या सुटीनंतरच काय ते आता होईल अशी सुवार्ताही (?!) त्या मॅडमनी दिली. म्हणजे ५ जानेवारीच्या अगोदर व्हिसाचा अर्ज देणे शक्य नाही हे नक्की झाले. आणि ती तारीखही नक्की नव्हती!

आता फार धोका न पत्करता सरळ सहल पुढे ढकलायचे ठरवले कारण सहलीच्या अगोदरच्या दोन आठवड्यात बदल केला तर ५० ते ७५% भुर्दंड पडला असता. पुढची तारीख ठरवताना ध्यानात आले की मूळ तारखेच्या नंतर पंधरा दिवसांनी अमावस्या आहे... अरे, म्हणजे अंधारी रात्र, ऑरोरा दिसण्यासाठी सर्वोत्तम. मग ७ ते १५ फेब्रुवारी असे नक्की करून कारवाई सुरू केली. टूर कंपनीने साधारण १०% जादा फी आकारून बदल करून दिले. ऑनलाईन तिकीट बुक केलेल्या कंपनीलाही तिकिटाचा दिवस बदलण्यासाठी फोन लावला तर त्यांनी तिकिटाच्या एकूण किमतीच्या जवळ जवळ ३०% सरचार्ज सांगितला. पण चार दिवसांनी फोन केल्यास बराच फायदा होईल असेही सांगितले. चार दिवसांनी फोन केला तर पलीकडल्या बाईसाहेबांनी ८०% जास्त खर्च येईल म्हणून सांगितले. डोके सणकले नसते तरच आश्चर्य ! म्हटले, "This is cheating. I was asked to wait for 4 days for a better offer and now you are asking me to pay more than twice your previously quoted charges. Connect me to your team leader. I wish to lodge a complaint." तश्या बाईसाहेब जरा गडबडल्या आणि जरा थांबा मीच टीम लीडरशी बोलते असं म्हणून मला होल्डवर ठेवत्या झाल्या आणि दोन मिनिटात परत येऊन म्हणाल्या, "सर माझी थोडी चूक झाली. मी तुम्हाला पहिल्या वर्गाच्या तिकिटातला फरक सांगितला होता." तिने नवीनं सांगितलेली रक्कम पहिल्यापेक्षा थोडी कमी होती आणि माझा ऑस्लोपर्यंतच प्रवास व पुढचे सहलीचे ऑस्लो-ट्रुम्सो हे विमान हे अगदी अडीच तासांच्या फरकाने होते त्यामुळे ते मिळणारे विमान मला चुकवायचे नव्हते याकरिता मी ती म्हणाली ती रक्कम भरून बुकिंग केले. पण ज्या तर्‍हेने सर्व व्यवहार झाला त्यात मेकमायट्रीप.कॉम च्या एकंदर कारभाराबद्दल मनात संशय निर्माण झालाच. म्हणून परत त्यांच्याच संस्थळावर शोध घेतला... आणि दिसले की त्यांच्याच संस्थळावर त्याच विमानात मी भरलेल्या मूळ किमतीपेक्षा फक्त ५% जादा किमतीवर भरपूर जागा शिल्लक होत्या ! आजपर्यंत मी या कंपनीला डोळे मिटून असंख्य वेळेला राजाश्रय दिला आहे. पण या अनुभवानंतर त्यांची आमची कायमची कट्टी झाली आहे !

व्हिसाचा प्रश्न लोबकळतच राहिला. राजदूतवासातल्या मॅडम दरवेळेला, "मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते पण याबाबतीत काहीही करू शकत नाही" असे म्हणत होत्या. दुःखात सुख एवढेच की सहलीची तारीख पुढे ढकलल्यामुळे निकड कमी झाली होती पण काळजी कायमच होती. शेवटी १२ जानेवारीला १४ जानेवारीची भेट पक्की झाली आणि आम्ही रियाधला रवाना झालो. सगळे प्राथमिक सोपस्कार आटपून त्या ग्रेट बायोमेट्रीक्स मशीनसमोर बसलो तर ते चालवायला संरक्षक काचेपलीकडे बसलेल्या तरुणीकडून ते काही सुरू होईना ! तिच्या गडबडीवरून आणि एकंदर अविर्भावांवरून काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट दिसत होते... आता इतके दिवस थांबून आणि परत ४५० किमी चा प्रवास करून आल्यावर परत गाडी मूळपदावर येऊन थांबणार की काय असा विचार मनात आला आणि आता परत सहल पुढे ढकलली तर तिकीट बुक केलेली कंपनी किती कापणार याचा विचार करू लागलो. तेवढ्या ती तरुणी आत गेली आणि एका सहकार्‍याला घेऊन आली आणि म्हणाली, "मी येथे नवीनं आहे. या कामाचा मला नीट अनुभव नाही." मी मनात म्हटले, " देवा ही बोलते ते खरं असू दे. मशीनमध्ये गडबड नसू दे." तो तरुणही म्हणाला, "काही प्रॉब्लेम नाही. मेन डेटाबेसला लिंक व्हायला कधी कधी वेळ लागतो." मी परत मनात, "तसेच असू दे बाबा, तसेच असू दे." कारण एव्हाना मला त्या मशीनच्या इटुकल्या खोलीत बसून अर्धापाऊण तास वेळ झाला होता.

शेवटी एकदाचे मशीन सुरू झाले आणि मग मात्र काम पाच मिनिटात आटपले. तो तरुण म्हणाला, "तुम्ही व्हिसा कसा कलेक्ट करणार?". इतके दिवस आणि आजचा इतका वेळ त्यांचे अत्याचार सहन केले होतेच; तेव्हा त्याला म्हणालो, "मी दम्मामहून आलो आहे हे तुला माहीत आहेच. व्हिसा आत्ताच देणार असशील तर थांबतो. नाहीतर लगेच दम्मामला परत जाणार. फक्त माझ्या गैरहजेरीत इतर कोणाला माझा पासपोर्ट कलेक्ट करता येईल त्याचे तुमचे प्रोसीजर सांग." तो म्हणाला, "छे, छे, व्हिसा असा ताबडतोप देता येणार नाही. ऑस्लोवरून रिपोर्ट आला की मिळेल. कमीत कमी दहा दिवस लागतील."

त्याच्याकडून पासपोर्टची पावती घेऊन परत निघालो. निघेपर्यंत दोन वाजले होते. वाटेत एक बरे रेस्तरॉ पाहून जेवून घेतले आणि परत दम्मामच्या दिशेने मार्गस्थ झालो. रियाधपासून साधारण १५० किमी दूर आलो असेन तोच फोन वाजला. पलीकडून त्या बायोमेट्रीक्स मशीनवाल्या तरुणीचा आवाज आला, "मी नॉर्वे एंबॅसीमधून बोलतेय. आज व्हिसा करता आलेले अमुक अमुक तुम्हीच का?" "होय." "तुम्ही रियाधमध्येच आहात काय?" व्हिसाचा सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मनात आले की आता अजून काय प्रॉब्लेम बाकी राहिला आहे? तिला म्हटले की, "मी दम्मामच्या वाटेवर आहे पण काय प्रॉब्लेम आहे ते तर सांग." तशी ती म्हणाली, "प्रॉब्लेम काहिच नाही. तुमचा व्हिसा तयार आहे. लगेच येऊन घेऊन जावू शकता." आनंदाच्या भरात आभार प्रदर्शित केले आणि तिने त्वरित फोन बंद केला. आणि लगेच ध्यानात आले आता साडेतीन वाजलेत परत जाईपर्यंत राजदूतावास बंद होणार. परत फोन करणे आले... या वेळेस तो त्या तरुणाने उचलला आणि म्हणाला, "काळजी करू नका. पासपोर्ट राजदूतावासाच्या गेटवर ठेवला आहे. तेथे पावती दाखवून ताब्यात घ्या." मग काय, त्याचे आभार मानले आणि ३०० किमी चा जास्त वळसा मारून व्हिसासकट पासपोर्टचा खजिना दम्मामला आणूनच या यशस्वी मोहिमेची सांगता केली.

नंतरचे सात फेब्रुवारीपर्यंतचे दिवस मात्र फारच हळूहळूच गेले... बदमाश संपता संपत नव्हते !

अशा तर्‍हेने सुरुवात झालेल्या आणि काही दिवसापूर्वीच केलेल्या अतिथंड सफरीचे हे आहे ताजे गरमागरम वर्णन ! चला तर माझ्याबरोबर उत्तर ध्रुवीय प्रदेशाच्या मजेदार सहलीला.

====================================================================

सहलीचा पहिला दिवस... खरं तर पहिली रात्र सुरू झाली... कारण विमान पहाटे १:२० वाजताचे होते. सगळे सोपस्कार आटपून विमान २० मिनिटे वेळेअगोदर सुटले आणि हा हा म्हणता त्याने १० किमी ची उंची गाठली. वाटले होते की रात्र असल्याने रात्रभर युरोपमधल्या शहरांचा चमचमाट बधायला मिळेल. पण अर्ध्या तासातच ते ढगांच्या गालिच्याच्या वर गेले आणि खिडकीतून काळोखाशिवाय काहीच दिसेनासे झाले. दम्माम-अॅमस्टरडॅम हे अंतर ४,७५० किमी आहे आणि आमचा उड्डाणकाळ साडेसहा तासाचा होता. सगळा वेळ डुलक्या घेणे आणि मधून मधून खिडकीतून अंधाराकडे डोकावणे यातच घालवावा लागला.

शेवटी एकदाचे अॅमस्टरडॅमला उतरण्याची घोषणा झाली तेव्हा जरा हायसे वाटले. वैमानिकाने विमान २० मिनिटे अगोदर ऊडवून शिवाय जरा जोरात चालवले होते त्यामुळे ते वेळेअगोदर ३० मिनिटे अॅमस्टरडॅमला उतरणार होते. हा माझा शेंगेनमधला पहिला विमानतळ होता त्यामुळे इमिग्रेशनचे सोपस्कार येथेच करायचे होते. ऑस्लोचे विमान पकडण्यासाठी मला फक्त ५५ मिनिटेच वेळ होता त्यांमुळे मनात जराशी काळजी होती. आता जरा हायसे वाटले कारण त्यात अजून ३० मिनिटाची भर पडली होती.

विमानात शेवटचा अर्धा तास खुर्चीमागच्या मॉनिटर्सवर आमचे उतरायचे गेट, तेथून इमिग्रेशनच्या काउंटर्सकडे जाणारा मार्ग, पुढच्या ९० मिनिटातल्या युरोपभरच्या कनेक्टिंग विमानांच्या वेळा आणि गेट्स हे सर्व परत परत दाखवत होते. त्यामुळे सगळ्या शंकांना आपोआप उत्तरे मिळाली होती. विमानातून बाहेर आल्या आल्या इमिग्रेशनच्या काउंटर्सकडे मोहरा वळवला. दहा एक मिनिटात इमिग्रेशन ऑफिसरसमोर उभा होतो. त्याच्यापुढे माझा पासपोर्ट सरकवला. त्याने करड्या नजरेने पासपोर्टमधला माझा फोटो आणि माझ्याकडे तीनदा आलटून पालटून पाहिले आणि मग रुक्ष आवाजात माझ्या येण्याचे प्रयोजन विचारले.

"येथून ऑस्लोला जाणार. नॉर्वेमध्ये प्रवासी म्हणून जाणार आहे." मी.

"एवढ्या थंडीत नॉर्वेला?" त्याच्या आवाजात जरासा अविश्वास होता.

"नॉर्दर्न लाइट्स बघायला थंडीतच यायला लागते ना? शिवाय पुढे किर्केनेसला जाऊन स्नो हॉटेलमध्ये राहायचे आहे."

"अॅमस्टरडॅम पण खूप छान आहे. इथे नाही थांबणार?" आता त्याच्या आवाजात जराशी नरमाई आल्यासारखे वाटले.

"नाही. सगळे नेदरलँड अगोदरच बघून झाले आहे. पुर्वी एकदा उन्हाळ्यात टूलिप सीझनमध्ये आलो होतो."

"पुन्हा केव्हातरी परत नेदरलँडला जरूर भेट द्या" शिक्का मारून स्मितहास्य करत त्याने पासपोर्ट माझ्या हातात दिला.

"नक्की" मीही स्मितहास्याची परतफेड करत म्हणालो आणि दुसऱ्या बाजूस गेलो.

ऑस्लोच्या विमानाच्या गेटवर पोचलो आणि ध्यानात आले की अरे हे सगळे काम विमानातून उतरल्यापासून ३० मिनिटातच संपले होते ! अॅमस्टरडॅम हा प्रवाशांची वर्दळ व आकारमानाने युरोपमधल्या मुख्य विमानतळांपैकी एक आहे, तरीसुद्धा विमानात मिळालेली पूर्णं माहिती , विमानतळाची रचना आणि इमिग्रेशनमधली तत्पर सेवा यामुळेच हे शक्य झाले होते.

ऑस्लोचे विमान वेळेवर सुटले. अ‍ॅमस्टरडॅम ते ऑस्लो हे अंतर ९१५ किमी आहे आणि ऊड्डाणसमय साधारण दोन तासाचा आहे. अर्धा तासानंतर ढगांचा ससेमिरा कमी होऊ लागला आणि त्याच सुमारास पूर्वेकडे तांबडे फुटायला सुरुवात झाली होती.

हळूहळू ढगांची चादर दूर होऊन खालचा परिसर दिसू लागला होता त्याचे हे पहिले दर्शन...

.

प्रथम मला वाटले की हा बर्फाने थिजलेला समुद्र आहे. पण जसजसे ढग कमी होऊ लागले तसे दृश्य स्पष्ट होत गेले आणि ध्यानात आले की हा समुद्र नसून बर्फाने झाकलेली जमीन आहे. ऑस्लो जवळ येऊ लागल्यावर आणि विमान उंची कमी करू लागल्यावर बर्फाळलेला समुद्र आणि जमीन बाजूबाजूला दिसायला लागले. हे अवर्णनीय दृश्य पहिल्यांदाच पाहताना मी केवळ अवाक् झालो...

.

नंतर दिसलेली बर्फाने न्हालेली ऑस्लो नगरी आणि तिच्या आजूबाजूचा थिजलेला परिसर... उत्तर ध्रुवीय प्रदेशाच्या जवळपास पोचल्याची पावती देत होती...

.

.

ऑस्लोपर्यंत KLM ने प्रवास झाला होता पण आता विमानकंपनी बदलून SAS Scadenavian Airlines ने ऑस्लो ते ट्रुम्सो असा प्रवास करायचा होत. त्यामुळे चेक् ईन केलेली बॅग ताब्यात घेतली आणि इमिग्रेशनचे काम तर अ‍ॅमस्टरडॅमलाच झाले होते पण पुढचे ट्रुम्सोला जाणारे विमान पकडायला परत चेक् ईन करणे आवश्यक होते. काउंटरवर गेलो तर फक्त सामान देण्यासाठीच्याच रांगा दिसत होत्या. सगळ्यांनी प्रथम मशीनवर चेक् ईन करून फक्त सामान द्यायला काउंटरच्या रांगेत उभे राहा असे बोर्ड लावलेले होते. चेक् ईन मशीन्स पर्यायी सोय म्हणून अनेक ठिकाणी पाहिली होती पण इथे फक्त तोच एक पर्याय होता. पुढे सर्व नॉर्वेभर असेच होते.

चेक् ईन करून निर्गमनद्वाराजवळ आलो तर तिथली पाटी ट्रुम्सोचे तापमान -७ डिग्री सेल्सियस दाखवत होती (हुडहुडी !)

पण त्याच पाटीवर सूर्याला ढगांनी झाकले नाही असे दिसत होते म्हणजे ऑरोरा दिसण्याची संधी जास्त आहे असे मनाला समजावले. सगळे काम संपल्यावरही पुढचे विमानाचे बोर्डिंग सुरू व्हायला तासभर बाकी होता म्हणून सगळ्या निर्गमन (Departures) भागात एक चक्कर मारली. ऑस्लोचा विमानतळ एक मध्यम आकाराचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सध्या त्याचे नविनीकरण करून मोठा आणि अत्यानुधीक बनवण्याचे काम जोरात चालू होते...

आणखी एक नविन गोष्ट तेथे बघायला मिळाली. नॉर्वेजियन एअरलाईनच्या विमानांच्या शेपट्यांवर स्कॅडेनेव्हीयातिल प्रसिद्ध व्यक्तींची चित्रे आणि नावे छापलेली होती. या प्रकारे मान देण्याचा प्रकार पहिल्यांदाच पाहत होतो.

सगळीकडे बर्फच बर्फ होते पण विमानवाहतूक मात्र सुरळीत चालू होती...

.

विमान बरोबर वेळेवर पावणेबाराला सुटले आणि १,१५० किमी आणि दोन तासांचे ट्रुम्सोच्या दिशेने उड्डाण सुरू झाले. विमानाने आकाशात झेप घेतली आणि घरे, रस्ते आणि जंगलांनी बर्फात काढलेली नक्षी लहान लहान होत नाहीशी झाली.

.

जसजसे विमान उत्तरेला जाऊ लागले तसतसा बर्फाच्छादित जमीन जाऊन सगळा परिसरच बर्फमय दिसू लागला... बर्फाचीच सपाटी, बर्फाचीच तळी, बर्फाच्याच नद्या आणि बर्फाचेच डोंगर !

.

.

बर्फाळ प्रदेशाचं प्रचंड आकर्षण असलेल्या मला काय पाहू आणि काय नको असे होऊन गेले. न्याहारी द्यायला आलेल्या हवाईसुंदरीने दोन तीनदा हाक मारल्यावरच मला ती ऐकू आली. ट्रुम्सो जवळ येऊ लागले आणि मग बेटाबेटांचा भूप्रदेश आणि न गोठलेला समुद्र दिसायला लागला...

.

'गल्फ स्ट्रीम' अथवा 'नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट' नावाच्या गरम पाण्याचा प्रवाहामुळे नॉर्वेच्या पश्चिम किनार्‍यावरचा समुद्र न गोठता तेथली सगळी बंदरे हिवाळ्यातही वाहतुकीसाठी खुली असतात. या प्रवाहाच्या बाजूला असलेल्या भूभागाचे तापमान हजार दीड हजार किमी दक्षिणेला असलेल्या ऑस्लोपेक्षा जास्त असते !

हे ट्रुम्सोचे पहिले दर्शन...

या शहराचे इंग्लिश स्पेलिंग जरी Tromso असे असले तरी त्याचा नॉर्वेजियन उच्चार "ट्रुम्सो" असा आहे. Arctic Circle च्या ३५० किमी उत्तरेला असलेले हे शहर उत्तर ध्रुवीय प्रदेशातले लोकसंख्येनुसार दोन नंबरचे आहे. ते ट्रोम्सोया नावाच्या एका बेटावर वसलेले आहे. ते उत्तरेकडचे पॅरीस म्हणुनही ओळखले जाते. ६५ ते ७५ अक्षांशाच्या मधल्या पट्ट्यामध्ये ऑरोरा दिसण्याची जास्त शक्यता असते. ट्रुम्सो या पट्ट्यातले सर्वात मोठे शहर आहे हाही एक मुद्दा ट्रुम्सोच्या प्रसिद्धीला बळकटी देऊन आहे.

ट्रुम्सो विमानतळावर बॅगेची वाट पाहताना घेतलेली विमानतळ परिसराची चित्रे...

.

.

.

विमानतळाबाहेर पडून हॉटेलच्या दिशेने निघालो तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते पण शीतकटिबंधातले सुर्यमहाराज अस्ताला जावून अंधार पडायला सुरुवात झाली होती...

.

वाटेत या रेस्तराँच्या पाटीने लक्ष वेधून घेतले (Kebab लिहिले आहे म्हणजे बहुदा टर्कीश असणार)...

हॉटेलवर पोचून चेक् ईन केले तेव्हा तीन-सव्वातीन वाजले होते. संघ्याकाळच्या बर्फावरच्या कुत्र्यांच्या गाडीतून फिरायला जायच्या कार्यक्रमासाठी सव्वासहाला निघायचे होते. म्हणजे चांगला तीन तासांचा वेळ होता. घरातून निघून तीन विमानप्रवासांसह एकूण १४ - १५ तास झाले होते. मस्तपैकी गरमागरम शॉवर घेतला आणि मोबाइलमध्ये दोन तासानंतरचा गजर लावून ताणून दिली.

(क्रमशः)

सहलीचा विचार असा एकदम सोडून देवू नका. आंतरजालावर जरा अजून शोध केल्यास इतर काही पर्याय सापडू शकतील.

उदाहरणादाखल, http://www.globusjourneys.com/ वर थोडे संशोधन केल्यास बरेच पर्याय (भेटीची ठिकाणे व आर्थिक बाजूच्या संदर्भात) दिसतील... ह्या कंपनीच्या प्रवाशांच्या जरूरी प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणार्‍या अनेक विभाग दिसतील... कदाचित् तुमच्या आवडीचा एखादा पर्याय सापडू शकेल.








लखनौ, प्रयागराज, वाराणसी आणि सारनाथ

उत्तर प्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीनं भारतातलं सगळ्यात प्रसिद्ध राज्य. परदेशी लोकांचा तर उत्तर प्रदेश म्हणजेच भारत असा गैरसमज झालेला दिसतो. क...